ऐसा चितावोनिया मनी ।Aisa Chitavoniya mani

ऐसा चिंतावोनियां मनीं । म्हणे निमाली पूतना भगिनी ।
माझिया राज्या आली हानि । म्हणोनि माभळपट पाठविला ॥१॥
तंव पिढेदान त्या प्राप्त झालें । नवलचि हें अपूर्व ऐकिलें ।
येऊनि आम्हांतें जाणविलें । नव्हे बाळ हें तान्हुलें श्रीहरी ॥२॥
मग म्हणे वो रिठासुरा । जाऊनि तुह्नी बाळकासि मारा ।
देईन अर्धराज्य भारा । कार्यसिद्धि झालिया ॥३॥
मग रिठासुर तो मायावी । गुंफिली रिठेमाळ अति बरवी ।
करीं घेऊनियां सादावी । नंद चौबारा जाऊनि ॥४॥
म्हणे हें बाळका लेववितां । सर्वकाळ कंठीं असतां ।
कोण्याही भयाची तया वार्ता । स्पर्शोचि नेणे सामर्थ्यगुणें ॥५॥
कदापिही नव्हे भूतबाधा । दिठीचें भय नाहीं त्या कदा ।
ऐसें ऐकोनियां यशोदा । आवडी घाली हरिकंठीं ॥६॥
निळा म्हणे पालखीं बाळ । निजऊनियां यशोदा वेल्हाळ ।
मेळऊनिया स्त्रिया सकळ । हास्यविनोदें बैसली ॥७॥





No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Labels

Followers