तुकारामगाथा-२


1251
कोठें मी तुझा धरूं गेलें संग । लावियेलें जग माझ्या पाठीं ॥१॥ सर सर रे परता अवगुणाच्या गोवळा । नको लावूं चाळा खोटा येथें ॥ध्रु.॥ रूपाच्या लावण्यें नेली चित्तवृत्ती । न देखें भोंवतीं मी ते माझी ॥२॥ तुकयाचा स्वामी माझे जीवीं च बैसला । बोलीं च अबोला करूनियां ॥३॥
1252
कोड आवडीचें । पुरवीना बाळकाचें ॥१॥ तेव्हां कैसी ते माउली । जाणा काशासाटीं व्याली ॥ध्रु.॥ वत्साचिये आसे । धेनु धांवेना गोरसें ॥२॥ तुका म्हणे धरि । बाळ टाकिलें वानरीं ॥३॥
1253
कोडियाचें गोरेपण । तैसें अहंकारीज्ञान ॥१॥ त्यासि अंतरीं रिझे कोण । जवळी जातां चळिसवाण ॥ध्रु.॥ प्रेतदेह गौरविलें । तैसें विटंबवाणें जालें ॥२॥ तुका म्हणे खाणें विष्ठा । तैशा देहबुद्धिचेष्टा ॥३॥
1254
कोडें रे कोडें ऐका हें कोडें । उगवूनि फार राहे गुंतोनियां थोडें ॥१॥ पुसतसे सांगा मी हें माझें ऐसें काई । रुसूं नका नुगवे तो झवे आपुली आई ॥ध्रु.॥ सांगतों हें मूळ काहीं न धरावी खंती । ज्यालें ज्यवो मेलें मरो प्रारब्धा हातीं ॥२॥ तुका म्हणे अभिमान सांडावा सकळीं । नये अंगावरी वांयां येऊं देऊं कळी ॥३॥
1255
कोण आतां कळिकाळा । येऊं बळा देईंल ॥१॥ सत्ता झाली त्रिभुवनीं । चक्रपाणी कोंवसा ॥ध्रु.॥ लडिवाळांचा भार वाहे । उभा आहे कुढावया ॥२॥ तुका म्हणे घटिका दिस । निमिश ही न विसंभे ॥३॥
1256
कोण आमचीं योगतपें । करूं बापें जाणावीं ॥१॥ गीत संतसंगें गाऊं । उभीं ठाऊं जागरणीं ॥ध्रु.॥ आमुचा तो नव्हे लाग । करूं त्याग जावया ॥२॥ तुका म्हणे इंद्रियांसी । ये चि रसीं रंगवूं ॥३॥
1257
कोण आम्हां पुसे सिणलें भागलें । तुजविण उगलें पांडुरंगा ॥१॥ कोणापाशीं आम्हीं सांगावें सुखदुःख । कोण तानभूक निवारील ॥ध्रु.॥ कोण या तापाचा करील परिहार । उतरील पार कोण दुजा ॥२॥ कोणापें इच्छेचें मागावें भातुकें । कोण कवतुकें बुझावील ॥३॥ कोणावरी आम्हीं करावी हे सत्ता । होइल साहाता कोण दुजा ॥४॥ तुका म्हणे अगा स्वामी सर्व जाणां । दंडवत चरणां तुमच्या देवा ॥५॥
1258
कोण उपाव करूं भेटावया । जाळावी हे काया ऐसें वाटे ॥१॥ सोडोनियां गांव जाऊं वनांतरा । रुकुमादेवीवरा पहावया ॥ध्रु.॥ करूं उपवास शोधूं हें शरीर । न धरवे धीर नारायणा ॥२॥ जाती आयुष्याचे दिवस हे चारी । मग केव्हां हरी भेटशील ॥३॥ तुका म्हणे कांहीं सांगा विचारोनि । विठो तुझे मनीं असेल तें ॥४॥
1259
कोण घरा येतें आमुच्या काशाला । काय ज्याचा त्याला नाहीं धंदा ॥१॥ देवासाटीं जालें ब्रम्हांड सोइरें । कोमळ्या उत्तरें काय वेचे ॥ध्रु.॥ मानें पाचारितां नव्हे आराणुक । ऐसे येती लोक प्रीतीसाटीं ॥२॥ तुका म्हणे रांडे नावडे भूषण । कांतेलेंसें श्वान पाठीं लागे ॥३॥
1260
कोण जाणे कोणा घडे उपासना । कोण या वचनाप्रति पावे ॥१॥ आतां माझा श्रोता वक्ता तूं चि देवा । करावी ते सेवा तुझी च मां ॥ध्रु.॥ कुशळ चतुर येथें न सरते । करितील रिते तर्क मतें ॥२॥ तुका म्हणे जालें पेणें एके घरीं । मज आणि हरी तुम्हां गांठी ॥३॥
1261
कोण त्याचा पार पावला धुंडितां । पुढें विचारितां विश्वंभरा ॥१॥ अणुरेणु सूक्ष्मस्थूळा पार नाहीं । श्रुती नेती त्या ही खुंटलिया ॥ध्रु.॥ फळांत कीटक येवढें आकाश । ऐसीं तरुवरास अनेक किती ॥२॥ दाविलें अनंतें अर्जुनासि पोटीं । आणीक त्या सृष्टी कृष्णलोक ॥३॥ तुका म्हणे लागा संतांचिये कासे । ठाव घेतां कैसे वांचा जीवें ॥४॥
1262
कोण दुजें हरी सीण । शरण दीन आल्याचा ॥१॥ तुम्हांविण जगदीशा । उदार ठसा त्रिभुवनीं ॥ध्रु.॥ कोण ऐसें वारी पाप । हरी ताप जन्माचा ॥२॥ तुका म्हणे धांव घाली । कोण चाली मनाचे ॥३॥
1263
कोण पर्वकाळ पहासील तीथ । होतें माझें चित्त कासावीस ॥१॥ पाठवीं भातुकें प्रेरीं झडकरी । नको राखों उरी पांडुरंगा ॥ध्रु.॥ न धरावा कोप मजवरी कांहीं । अवगुणी अन्यायी म्हणोनियां ॥२॥ काय रडवीसी नेणतियां पोरां । जाणतियां थोरां याचिपरी ॥३॥ काय उभी कर ठेवुनियां कटीं । बुझावीं धाकुटीं लडिवाळें ॥४॥ तुका म्हणे आतां पदरासी पिळा । घालीन निराळा नव्हे मग ॥५॥
1264
कोण पुण्य कोणा गांठी । ज्यासी ऐसियांची भेटी ॥१॥ जिहीं हरी धरिला मनीं । दिलें संवसारा पाणी ॥ध्रु.॥ कोण हा भाग्याचा । ऐसियांसी बोले वाचा ॥२॥ तुका म्हणे त्यांचे भेटी। होय संसारासी तुटी ॥३॥
1265
कोण या पुरुषार्थाची गति । आणियेला हातोहातीं । जाहाज पृथ्वीपति । केली ख्याती अद्भुत ॥१॥ भला रे पुंडलिका भला । महिमा नव जाये वर्णिला । दगा देउनि अवघियांला । सांटविलें अविनाश ॥ध्रु.॥ केलें एके घरीं केणें । भरलीं सदोदित दुकानें । दुमदुमिलीं सुखानें । हे भाग्याची पंढरी ॥२॥ तुकयाबंधु म्हणे किल्ल्या । संताचे हातीं दिल्या । आंगावेगळें आपुल्या । टाकुनि जाला मेहेमान ॥३॥
1266
कोण येथें रिता गेला । जो जो आला या ठाया ॥१॥ तातडी ते काय आतां । ज्याची चिंता तयासी ॥ध्रु.॥ नांवासाटीं नेघें भार । न लगे फार वित्पित्त ॥२॥ तुका म्हणे न लगे जावें । कोठें देवें सुचनें ॥३॥
1267
कोण वेची वाणी । आतां क्षुल्लका कारणीं ॥१॥ आतां हें चि काम करूं । विठ्ठल हृदयांत धरूं ॥ध्रु.॥ नेंदाविया वृत्ति । आतां उठों चि बहुती ॥२॥ उपदेश लोकां । करूनी वेडा होतो तुका ॥३॥
1268
कोण सांगायास । गेलें होतें देशोदेश ॥१॥ नेलें वार्‍यां हातीं माप । समर्थ तो माझा बाप ॥ध्रु.॥ कोणाची हे सत्ता । जाली वाचा वदविता ॥२॥ तुका म्हणे या निश्चयें । माझें निरसलें भय ॥३॥
1269
कोण साक्षीविण । केलें उद्धारा भजन ॥१॥ ऐसें सांगा जी दातारा । माझी भक्ति परंपरा ॥ध्रु.॥ कोणें नाहीं केली आळी । ब्रम्हज्ञानाहुनि वेगळी ॥२॥ कोणाचें तों कोड । नाहीं पुरविला लाड ॥३॥ कोणाच्या उद्धारा । केला विलंब माघारा ॥४॥ तुका म्हणे भिन्न । कांहो बोले साक्षीविण ॥५॥
1270
कोण सुख धरोनि संसारीं । राहों सांग मज बा हरी । अवघ्या नाशिवंता परी । थिता दुरी अंतरसी ॥१॥ प्रथम केला गर्भि वास । काय ते सांगावे सायास । दुःख भोगिलें नव ही मास । आलों जन्मास येथवरी ॥२॥ बाळपण गेलें नेणतां । तारुण्यदशे विषयव्यथा । वृद्धपणीं प्रवर्तली चिंता । मरें मागुता जन्म धरीं ॥३॥ क्षण एक तो ही नाहीं विसावा । लक्ष चौर्‍यांशीं घेतल्या धांवा । भोवंडिती पाठीं लागल्या हांवा । लागो आगी नांवा माझ्या मीपणा ॥४॥ आतां पुरे ऐसी भरोवरी । रंक होऊनि राहेन द्वारीं । तुझा दास मी दीन कामारी । तुका म्हणे करीं कृपा आतां ॥५॥
1271
कोण होईंल आतां संसारपांगिलें । आहे उगवलें सहजें चि ॥१॥ केला तो चालवीं आपुला प्रपंच । काय कोणां वेच आदा घे दे ॥ध्रु.॥ सहजें चि घडे आतां मोळ्याविण । येथें काय सीण आणि लाभ ॥२॥ तुका म्हणे जालों सहज देखणा । ज्याच्या तेणें खुणा दाखविल्या ॥३॥
1272
कोणतें कारण राहिलें यामुळें । जें म्यां तुज बळें कष्टवावें ॥१॥ नाहीं जात जीव नाहीं होत हानी । सहज तें मनीं आठवलें ॥ध्रु.॥ नाहीं कांहीं चिंता मरतों उपवासी । अथवा त्या म्हैसी गाई व्हाव्या ॥२॥ हें तों तुज कळों येतसे अंतरीं । लाखणीक वरी साच भाव ॥३॥ तुका म्हणे देवा नासिवंतासाठीं । पायांसवें तुटी करिती तुझ्या ॥४॥
1273
कोणा एकाचिया पोरें केली आळी । ठावी नाहीं पोळी मागें देखी ॥१॥ बुझाविलें हातीं देउनी खापर । छंद करकर वारियेली ॥ध्रु.॥ तैसें नको करूं मज कृपावंता । काय नाहीं सत्ता तुझे हातीं ॥२॥ तुका म्हणे मायबापाचें उचित । करावें तें हित बाळकाचें ॥३॥
1274
कोणा चिंता आड । कोणा लोकलाज नाड ॥१॥ कैंचा राम अभागिया । करी कटकट वांयां ॥ध्रु.॥ स्मरणाचा राग । क्रोधें विटाळलें अंग ॥२॥ तुका म्हणे जडा । काय चाले या दगडा ॥३॥
1275
कोणा पुण्या फळ आलें । आजि देखिलीं पाउलें ॥१॥ ऐसें नेणें नारायणा । संतीं सांभाळिलें दीना ॥ध्रु.॥ कोण लाभकाळ । दीन आजि मंगळ ॥२॥ तुका म्हणे जाला । लाभ सहज विठ्ठला ॥३॥
1276
कोणा पुण्यें यांचा होईन सेवक । जींहीं द्वंदादिक दुराविलें ॥१॥ ऐसें वर्म मज दावीं नारायणा । अंतरीं च खुणा प्रकटोनि ॥ध्रु.॥ बहु अवघड असे संतभेटी । तरि जगजेठी करुणा केली ॥२॥ तुका म्हणे मग नयें वृत्तीवरी । सुखाचे शेजारीं पहुडईन ॥३॥
1277
कोणा मुखें ऐसी ऐकेन मी मात । चाल तुज पंढरिनाथ बोलावितो ॥१॥ मग मी न धरीं आस मागील बोभाट । वेगीं धरिन वाट माहेराची ॥ध्रु.॥ निरांजिरें चत्ति करितें तळमळ । केधवां देखती मूळ आलें डोळे ॥२॥ तुका म्हणे कई भाग्याची उजरी । होईंल पंढरी देखावया ॥३॥
1278
कोणा ही केंडावें हा आम्हां अधर्म । जोजो पावे श्रम तोतो देव ॥१॥ म्हणउनि चित्ता सिकविलें वोजें । आतां हें चि दुजें न बोलावें ॥ध्रु.॥ हालविलें जरि परउपकारें । जिव्हे पाप खरें उपाधीचें ॥२॥ तुका म्हणे जीव प्रारब्धा आधीन । कोण वाहे सीण करुणा शोभे ॥३॥
1279
कोणाचिया न पडों छंदा । गोविंदासी आळवूं ॥१॥ बहुतांचीं बहु मतें । अवघे रिते पोकळ ॥ध्रु.॥ घटापटा ढवळी मन । होय सीण न करूं तें ॥२॥ तुका म्हणे पांडुरंग । भरूं भाग आला तो ॥३॥
1280
कोणाचें चिंतन करूं ऐशा काळें । पायांचिया बळें कंठीतसें ॥१॥ पाहातसें वाट येई गा विठ्ठला । मज कां हा केला परदेश ॥ध्रु.॥ बहुतांचे सत्ते जालों कासावीस । जाय रात्री दिस वैरियांचा ॥२॥ तुका म्हणे बैसें मनाचिये मुळीं । तरीं च ही जाळीं उगवतीं ॥३॥
1281
कोणाच्या आधारें करूं मी विचार । कोण देइल धीर माझ्या जीवा ॥१॥ शास्त्रज्ञ पंडित नव्हें मी वाचक । यातिशुद्ध एक ठाव नाहीं ॥२॥ कलियुगीं बहु कुशळ हे जन । छळितील गुण तुझे गातां ॥३॥ मज हा संदेह झाला दोहीं सवा । भजन करूं देवा किंवा नको ॥४॥ तुका म्हणे आतां दुरावितां जन । किंवा हें मरण भलें दोन्ही ॥५॥
1282
कोणापाशीं आतां सांगों मी बोभाट । कधीं खटखट सरेल हे ॥१॥ कोणां आराणूक होईंल कोणे काळीं । आपुलालीं जाळीं उगवूनि ॥ध्रु.॥ माझा येणें दुःखें फुटतसे प्राण । न कळतां जन सुखी असे ॥२॥ भोगा आधीं मनें मानिलासे त्रास । पाहें लपायास ठाव कोठें ॥३॥ तुका म्हणे देतों देवाचें गार्‍हाणें । माझें रिण येणें सोसियेलें ॥४॥
1283
कोणापाशीं द्यावें माप । आपीं आप राहिलें ॥१॥ कासयाची भरोवरी । काय दुरी जवळी ॥ध्रु.॥ एकें दाखविले दाहा। फांटा पाहा पुसून ॥२॥ तुका म्हणे सरलें वोझें । आतां माझें सकळ ॥३॥
1284
कोणाशीं विचार करावा सेवटीं । एवढ्या लाभें तुटी जाल्या तरे ॥१॥ सांभाळितो शूर आला घावडाव । पुढें दिला पाव न करी मागें ॥ध्रु.॥ घात तो या नांवें येथें अंतराय । अंतरल्या पाय गोविंदाचे ॥२॥ तुका म्हणे गडसंदीचा हा ठाव । केला तो उपाव कार्या येतो ॥३॥
1285
कोणी एकी भुलली नारी । विकितां गोरस म्हणे घ्या हरी ॥१॥ देखिला डोळां बैसला मनीं । तो वदनीं उच्चारी ॥ध्रु.॥ आपुलियाचा विसर भोळा । गोविंद कळा कौतुकें ॥२॥ तुका म्हणे हांसे जन । नाहीं कान ते ठायीं ॥३॥
1286
कोणी निंदा कोणी वंदा । आम्हां स्वहिताचा धंदा ॥१॥ काय तुम्हांसी गरज । आम्ही भजूं पंढरिराज ॥ध्रु.॥ तुम्हांसारिखें चालावें । तेव्हां स्वहिता मुकावें ॥२॥ तुका म्हणे हो कां कांहीं । गळ दिला विठ्ठल पायीं ॥३॥
1287
कोणी सुना कोणी लेंकी । कोणी एकी सतंता ॥१॥ अवघियांची जगनिंद । जाली धिंद सारखी ॥ध्रु.॥ अवघ्या अवघ्या चोरा । विना वरा मायबापा ॥२॥ तुका म्हणे करा सेवा । आलें जीवावर तरी ॥३॥
1288
कोणे गांवीं आहे सांगा हा विठ्ठल । जरी ठावा असेल तुम्हां कोणा ॥१॥ लागतसें पायां येतों लोटांगणीं । मात तरी कोणी सांगा याची ॥ध्रु.॥ गुण रूप याचे वाणिती या संतां । मज क्षेम देतां सुख वाटे ॥२॥ सर्वस्वें हा जीव ठेवीन चरणीं । पांडुरंग कोणी दावी तया ॥३॥ तुका म्हणे गाईंवत्सा तडातोडी । तैसी जाते घडी एकी मज ॥४॥
1289
कोणें तुझा सांग केला अंगीकार । निश्चिति त्वां थोर मानियेली ॥१॥ कोणें ऐसा तुज उपदेश केला । नको या विठ्ठला शरण जाऊं ॥ध्रु.॥ तेव्हां तुज कोण घालील पाठीसी । घासील भूमीसी वदन यम ॥२॥ कां रे नागवसी आयुष्य खातो काळ । दिसेंदिस बळ क्षीण होतें ॥३॥ तुका म्हणे यासि सांगा कोणी तरी । विसरला हरी मायबाप ॥४॥
1290
कोण्या काळें येईंल मना । नारायणा तुमचिया ॥१॥ माझा करणें अंगीकार । सर्व भार फेडूनि ॥ध्रु.॥ लागली हे तळमळ चित्ता । तरी दुश्चिता संसारी ॥२॥ सुखाची च पाहें वास । मागें दोष सांभाळीं ॥३॥ इच्छा पूर्ण जाल्याविण । कैसा सीण वारेल ॥४॥ लाहो काया मनें वाचा । देवा साच्या भेटीचा ॥५॥ कांटाळा तो न धरावा । तुम्ही देवा दासांचा ॥६॥ तुका म्हणे माझे वेळे । न कळे कां हें उफराटें ॥७॥
1291
कोपोनियां पिता बोले प्रल्हादासी । सांग हृषीकेशी कोठें आहे ॥१॥ येरू म्हणे काष्ठीं पाषाणीं सकळीं । आहे वनमाळी जेथें तेथें ॥ध्रु.॥ खांबावरी लात मारिली दुर्जनें । खांबीं नारायण म्हणतां चि ॥२॥ तुका म्हणे कैसा खांब कडाडिला । ब्रम्हा दचकला सत्यलोकीं ॥३॥
1292
कोरडिया ऐशा सारून गोष्टी । करा उठाउठीं हित आधीं ॥१॥ खोळंबला राहे आपुला मारग । पहावी ते मग तुटी कोठें ॥ध्रु.॥ लौकिकाचा आड येईंल पसारा । मग येरझारा दुःख देती ॥२॥ तुका म्हणे डांख लागे अळंकारें । मग नव्हे खरें पुटाविण ॥३॥
1293
कोरडिया गोष्टी नावडती मना । नाहीं ब्रम्हज्ञानाविण चाड ॥१॥ दाखवीं आपुलें सगुण रूपडें । वंदीन मी कोडें पाय तुझे ॥ध्रु.॥ न लगे तो मोक्ष मज सायुज्यता । नावडे हे वार्ता शून्याकारी ॥२॥ तुका म्हणे चाड धरीन श्रीमुखें । येशिल कवतुकें जवळीक ॥३॥
1294
कोरड्या गोठी चटक्या बोल । शिकल्या सांगे नाहीं ओल ॥१॥ कोण यांचें मना आणी । ऐकों कानीं नाइकोनि ॥ध्रु.॥ घरोघरीं सांगती ज्ञान । भूस सिणें कांडिती ॥२॥ तु का म्हणे आपुल्या मति । काय रितीं पोकळें ॥३॥
1295
कौडीकौडीसाटीं फोडिताती शिर । काढूनि रुधिर मलंग ते ॥१॥ पांघरती चर्म लोहाची सांकळी । मारिती आरोळी धैर्यबळें ॥२॥ तुका म्हणे त्यांचा नव्हे चि स्वधर्म । न कळे चि वर्म गोविंदाचें ॥३॥
1296
कौतुकाची सृष्टी । कौतुकें चि केलें कष्टी ॥१॥ मोडे तरी भलें खेळ । फांके फांकिल्या कोल्हाळ ॥ध्रु.॥ जाणणियासाटीं । भय सामावलें पोटीं ॥२॥ तुका म्हणे चेता । होणें तें तूं च आइता ॥३॥
1297
कौलें भरियेली पेंठ । निग्रहाचे खोटे तंट ॥१॥ ऐसें माता जाणे वर्म । बाळ वाढवितां धर्म ॥ध्रु.॥ कामवितां लोहो कसे । तांतडीनें काम नासे ॥२॥ तुका म्हणे खडे । देतां अक्षरें तें जोडे ॥३॥
1298
क्या कहुं नहीं बुझत लोका । लिजावे जम मारत धका ॥१॥ क्या जीवनेकी पकडी आस । हातों लिया नहिं तेरा घांस ॥ध्रु.॥ किसे दिवाने कहता मेरा । कछु जावे तन तूं सब ल्या न्यारा ॥२॥ कहे तुका तूं भया दिवाना । आपना विचार कर ले जाना ॥३॥
1299
क्या गाऊं कोईं सुननवाला । देखें तों सब जग ही भुला ॥१॥ खेलों आपणे राम इसातें । जैसी वैसी करहों मात ॥ध्रु.॥ काहांसे ल्यावों माधर वाणी । रीझे ऐसी लोक बिराणी ॥२॥ गिरिधर लाल तो भावहि भुका । राग कला नहिं जानत तुका ॥३॥
1300
क्या मेरे राम कवन सुख सारा । कहकर दे पुछूं दास तुम्हारा ॥ध्रु.॥ तनजोबनकी कोन बराईं । ब्याधपीडादि स काटहि खाईं ॥१॥ कीर्त बधाऊं तों नाम न मेरा । काहे झुटा पछतऊं घेरा ॥२॥ कहे तुका नहिं समज्यात मात । तुम्हारे शरन हे जोडहि हात ॥३॥
1301
क्याला मज आयो वारितेसी घरा । खेळतों सोकरा नंदाचा मी ॥१॥ बहु दिसीं जाली यासीं मज भेटी । आतां वाटे तुटी न परावी ॥ध्रु.॥ कोवळें बोलतो मना आवरतें । डोळियाचें पातें ढापवेना ॥२॥ आजि सकळांसी आलें चोलुनियां । कां गो पाठी वांयां पुलविली ॥३॥ तुमचें तें काय खोळंबलें काज । बल्या कां गो मज कोंडा घरीं ॥४॥ तुकयाचा धनी गोकुळनायक । सरा कांहीं एक बोलतों मी ॥५॥
1302
क्रियामतिहीन । एक मी गा तुझें दीन ॥१॥ देवा करावा सांभाळ । वारीं माझी तळमळ ॥ध्रु.॥ नको माझे ठायीं । गुणदोष घालूं कांहीं ॥२॥ अपराधाच्या कोटी । तुका म्हणे घालीं पोटीं ॥३॥
1303
क्षणक्षणा हा चि करावा विचार । तरावया पार भवसिंधु ॥१॥ नाशिवंत देह जाणार सकळ । आयुष्य खातो काळ सावधान ॥ध्रु.॥ संतासमागमीं धरूनि आवडी । करावी तांतडी परमार्था ॥२॥ तुका म्हणे येह लोकीच्या वेव्हारें । नये डोळे धुरें भरूनि राहों ॥३॥
1304
क्षणक्षणां जीवा वाटतसे खंती । आठवती चित्तीं पाय देवा ॥१॥ येई वो येई वो येई लवलाहीं । आळिंगूनि बाहीं क्षेम देई ॥ध्रु.॥ उतावळि मन पंथ अवलोकी । आठवा ते चुकी काय जाली ॥२॥ तुका म्हणे माझ्या जीवींच्या जीवना । घाला नारायणा उडी वेगीं ॥३॥
1305
क्षणक्षणां सांभाळितों । साक्षी होतों आपुला ॥१॥ न घडावी पायीं तुटी । मन मुठी घातलें ॥ध्रु.॥ विचारतों वचनां आधीं । धरूनि शुद्धी ठेविली ॥२॥ तुका म्हणे मागें भ्यालों । तरीं जालों जागृत ॥३॥
1306
क्षणभरी आम्ही सोसिलें वाईट । साधिलें अवीट निजसुख ॥१॥ सांडी मांडी मागें केल्या भरोवरी । अधिक चि परी दुःखाचिया ॥२॥ तुका म्हणे येणें जाणें नाहीं आतां । राहिलों अनंताचिये पायीं ॥३॥
1307
क्षमाशस्त्र जया नराचिया हातीं । दुष्ट तयाप्रति काय करी ॥१॥ तृण नाहीं तेथें पडे दावाग्नि । जाय तो विझोनि आपसया ॥२॥ तुका म्हणे क्षमा सर्वांचें स्वहित । धरा अखंडित सुखरूप ॥३॥
1308
क्षर अक्षर हे तुमचे विभाग । कासयानें जग दुरी धरा ॥१॥ तैसे आम्ही नेणों पालटों च कांहीं । त्यागिल्याची नाहीं मागें चाड ॥ध्रु.॥ प्रतिपादिता तूं समविषमाचा । प्रसाद तो याचा पापपुण्य ॥२॥ तुका म्हणे तुम्हां नाना अवगणीं । लागे संपादणी लटिक्याची ॥३॥
1309
क्षरला सागर गंगा ओघीं मिळे । आपण चि खेळे आपणाशीं ॥१ ॥ मधील ते वाव अवघी उपाधि । तुम्हां आम्हांमधीं ते चि परी ॥ध्रु.॥ घट मठ जाले आकाशाचे पोटीं । वचनें चि तुटी तेथें चि तें ॥२ ॥ तुका म्हणे बीजें बीज दाखविलें । फल पुष्प आलें गेलें वांयां ॥३॥
1310
क्षीर मागे तया रायतें वाढी । पाधानी गधडी ऐशा नांवें ॥१॥ समयो जाणां समयो जाणां । भलतें नाणां भलतेथें ॥ध्रु.॥ अमंगळ वाणी वदवी मंगळी । अशुभ वोंगळी शोभन तें ॥२॥ तुका म्हणे नेणें समयो ठाया ठाव । राहाडी ते वाव नरकाडी ॥३॥
1311
क्षुधा तृषा कांहीं सर्वथा नावडे । पहावया धांवें कोल्हांटासी ॥१॥ कथेसी साक्षेपें पाचारिला जरी । म्हणे माझ्या घरीं कोणी नाहीं ॥ध्रु.॥ बलत्कारीं जरी आणिला कथेसी । निद्रा घे लोडेंसी टेंकूनियां ॥२॥ तुका म्हणे थुंका त्याच्या तोंडावरी । जातो यमपुरी भोगावया ॥३॥
1312
क्षुधारथी अन्नें दुष्काळें पीडिलें । मिष्टान्न देखिलें तेणें जैसें ॥१॥ तैसें तुझे पायीं लांचावलें मन । झुरे माझा प्राण भेटावया ॥ध्रु.॥ मांजरें देखिला लोणियांचा गोळा । लावुनियां डोळा बैसलेंसे ॥२॥ तुका म्हणे आतां झडी घालूं पाहें । पांडुरंगे माये तुझे पायीं ॥३॥
1313
क्षुधेलिया अन्न । द्यावें पात्र न विचारून ॥१॥ धर्म आहे वर्मा अंगीं । कळलें पाहिजे प्रसंगीं ॥ध्रु.॥ द्रव्य आणि कन्या । येथें कुळ कर्म शोधण्या ॥२॥ तुका म्हणे पुण्य गांठी । तरि च उचितासी भेटी ॥३॥
1314
क्षेम देयाला हो । स्फुरताती दंड बाहो ॥१॥ आतां झडझडां चालें । देई उचलूं पाउलें ॥ध्रु.॥ सांडीं हंसगती । बहु उत्कंठा हे चित्ती ॥२॥ तुका म्हणे आईं । श्रीरंगे विठाबाईं ॥३॥
1315
क्षेम मायबाप पुसेन हें आधीं । न घलीं हें मधीं सुख दुःख ॥१॥ न करीं तांतडी आपणांपासूनि । आइकेन कानीं सांगतीं तें ॥ध्रु.॥ अंतरींचें संत जाणतील गूज । निरोप तो मज सांगतील ॥२॥ पायांवरी डोईं ठेवीन आदरें । प्रीतिपडिभरें आळिंगून ॥३॥ तुका म्हणे काया करीन कुरवंडी । ओवाळून सांडीं त्यांवरून ॥४॥
1316
क्षोभ आणि कृपा मातेची समान । विभाग जतन करुनि ठेवी ॥१॥ क्षणभंगुर ते उपजली चिंता । खरी अखंडता आवडीची ॥ध्रु.॥ सिकवूं जाणे तें गोमाटियासाटीं । लोभें नाहीं तुटी निश्चियेंसी ॥२॥ अघवें चि मिथ्या समया आरतें । देता तो उचितें काळ जाणे ॥३॥ न करी वेव्हार नेदी गांजूं कोणा । भेडसावी तान्हें हाऊ आला ॥४॥ तुका म्हणे करी जिवाची जतन । दचकूनि मन जवळी आणी ॥५॥
1317
खडा रवाळी साकर । जाला नामाचा चि फेर । न दिसे अंतर । गोडी ठायीं निवडितां ॥१॥ तुम्ही आम्ही पांडुरंगा । भिन्न ऐसें काय सांगा । जाळविलें जगा । मी हें माझें यासाटीं ॥ध्रु॥ पायीं हातीं नाकीं शिरीं । हेम राहे अळंकारीं । मुसे आल्यावरी । काय निवडे वेगळें ॥२॥ निजलिया लाभ हानी । तों च खरी ते स्वप्नीं । तुका म्हणे दोन्ही । निवारलीं जागतां ॥३॥
1318
खद्योतें फुलविलें रविपुढें ढुंग । साक्षी तंव जग उभयतां ॥१॥ आपल्या आपण नाहीं शोभों येत । चार करी स्फीत दाखवूनि ॥ध्रु.॥ खाणार ताकाचें आसातें माजीरें । आपणें चि अधीर कळों येतें ॥२॥ तुका म्हणे जळो मैंदाची मवाळी । दावूनियां नळी कापी सुखें ॥३॥
1319
खरें नानवट निक्षेपीचें जुनें । काढिलें ठेवणें समर्थाचें ॥१॥ मजुराच्या हातें मापाचा उकल । मी तों येथें फोल सत्ता त्याची ॥ध्रु.॥ कुलाळाच्या हातें घटाच्या उत्पत्ति । पाठवी त्या जाती पाकस्थळा ॥२॥ तुका म्हणे जीवन तें नारायणीं । प्रभा जाते कीर्णीं प्रकाशाची ॥३॥
1320
खरें बोले तरी । फुकासाठीं जोडे हरी ॥१॥ ऐसे फुकाचे उपाय । सांडूनियां वांयां जाय ॥ध्रु.॥ परउपकार । एका वचनाचा फार ॥२॥ तुका म्हणे मळ । मनें सांडितां शीतळ ॥३॥
1321
खरें भांडवल सांपडलें गांठी । जेणें नये तुटी उदमासी ॥१॥ संवगाचें केणें सांपडलें घरीं । भरूनि वैखरी सांटविलें ॥ध्रु.॥ घेतां देतां लाभ होतसे सकळां । सदेवां दुर्बळा भाव तैसा ॥२॥ फडा आलिया तो न वजे निरासे । जरि कांहीं त्यास न कळतां ॥३॥ तुका म्हणे आतां जालीसे निश्चिंती । आणीक तें चित्तीं न धरूं दुजें ॥४॥
1322
खळा सदा क्षुद्रीं दृष्टी । करी कष्टी सज्जना ॥१॥ करितां आपुलाले परी । धणीवरी व्यापार ॥ध्रु.॥ दया संतां भांडवल। वेची बोल उपकार ॥२॥ तुका म्हणे आपुलालें । उसंतिलें ज्यांणीं तें ॥३॥
1323
खादलें च खावें वाटे । भेटलें भेटे आवडी ॥१॥ वीट नाहीं पांडुरंगीं । वाढे अंगीं आर्त तें ॥ध्रु.॥ इंिद्रयांची हांव पुरे। परि हें उरे चिंतन ॥२॥ तुका म्हणे पोट भरे । परि ते उरे भूक पुढें ॥३॥
1324
खावें ल्यावें द्यावें । जमाखर्च तुझ्या नांवें ॥१॥ आतां चुकली खटपट । झाड्या पाड्याचा बोभाट ॥ध्रु.॥ आहे नाहीं त्याचें । आम्हां काम सांगायाचें ॥२॥ तुका म्हणे चिंता । भार वाहे तुझ्या माथां ॥३॥
1325
खिस्तीचा उदीम ब्राम्हण कलयुगीं । महारवाडीं मांगीं हिंडतसे ॥१॥ वेवसाव करितां पर्वत मांगासी । ते पैं विटाळासी न मनिती ॥ध्रु.॥ मांगिणीशीं नित्य करीतसे लेखा । तोंडावरि थुंका पडतसे ॥२॥ आशा माया रांडा नांव हें कागदीं । आठवीना कधीं नारायण ॥३॥ तुका म्हणे देह जालें पराधीन । पांडुरंगाविण गति नाहीं ॥४॥
1326
खुंटोनियां दोरी आपणियांपाशीं । वावडी आकाशीं मोकलिली ॥१॥ आपुलिया आहे मालासी जतन । गाहाणाचे ॠण बुडों नेणें ॥ध्रु.॥ बीज नेलें तेथें येईंल अंकुर । जतन तें सार करा याची ॥२॥ तुका म्हणे माझी निश्चिंतीची सेवा । वेगळें नाहीं देवा उरों दिलें ॥३॥
1327
खेचर खडतर । काळ कांपती असुर । नांदे भीमातीर । पंढरपुर पाटणीं ॥१॥ आतां करी कां रे हाकारा । सहस्र नामें एकसरा । दवडिते खेचरा । अंगसंगें धरूनी ॥ध्रु.॥ सीते जाली झडपणी । राहाणे वासुगीच्या बनीं । पावली जननी । झोंटि मोकळिया केशी ॥२॥ लाविलें कावरें । प्रल्हादा म्हैसासुरें । आली येकसरें । दांत खात रंगासी ॥३॥ वसुदेवाचीं बाळें । सात खादलीं ज्या काळें। आली भोगवेळे । तया कारणें तेथें ॥४॥ पांडवें बापुडीं । वाज केलीं फिरती वेडीं । धांवोनियां काढी । अंगसंगें त्राहाविलीं ॥५॥ नामाचें चिंतन । तेथें धांवते आपण । न विचारितां हीण । भाव देखे जयाचा ॥६॥ कुळीची कुळदेवता । तुका म्हणे आम्हां माता । काय भय भूतां । काळ यमदूताचें ॥७॥
1328
खेळ नव्हे बरा इंद्र कोपलिया । देव म्हणे तयां भेऊं नका ॥१॥ नका धरू भय धाक कांहीं मनीं । बोले चक्रपाणि गौळियांसि ॥२॥ गौळियांसि धीर नाहीं या वचनें । आशंकितमनें वेडावलीं ॥३॥ वेडावलीं त्यांसि न कळतां भाव । देवआदिदेव नोळखतां ॥४॥ नोळखतां दुःखें वाहाती शरीरीं । तुका म्हणे वरि भारवाही ॥५॥
1329
खेळ मांडियेला वाळवंटीं घाई । नाचती वैष्णव भाई रे । क्रोध अभिमान केला पावटणी । एक एका लागतील पायीं रे ॥१॥ नाचती आनंदकल्लोळीं । पवित्र गाणें नामावळी । कळिकाळावरि घातलीसे कास । एक एकाहुनी बळी रे ॥ध्रु.॥ गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा । हार मिरवती गळां । टाळ मृदंग घाई पुष्पवरुषाव । अनुपम्य सुखसोंहळा रे ॥२॥ लुब्धलीं नादीं लागली समाधी । मूढ जन नर नारी लोकां । पंडित ज्ञानी योगी महानुभाव । एकचि सद्धिसाधकां रे ॥३॥ वर्णाभिमान विसरली याति । एकएकां लोटांगणीं जाती । निर्मळ चित्तें जालीं नवनीतें । पाषाणा पाझर सुटती रे ॥४॥ होतो जयजयकार गर्जत अंबर । मातले हे वैष्णव वीर रे । तुका म्हणे सोपी केली पायवाट । उतरावया भवसागर रे ॥५॥
1330
खेळतां न भ्यावें समर्थाच्या बाळें । तयाच्या सकळ सत्तेखालीं ॥१॥ तरी लेवविला शोभे अळंकार । नाहीं तरी भार मानाविण ॥ध्रु.॥ अवघी च दिशा असावी मोकळी । मायबाप बळी म्हणऊनि ॥२॥ तुका म्हणे माझें ऐसें आहे देवा । म्हणऊनि सेवा समर्पिली ॥३॥
1331
खेळतां मुरारी जाय सरोवरा तिरीं । तंव नग्न चि या नारी तेथें देखियेल्या । मांडिले विंदान ख्याल सुखाचें संधान । अंग लपवूनी मान पिलंगत चाले ॥१॥ ख्याल मांडिला रे ख्याल मांडिला रे । पायां पडतां रे न सोडी नेदी साउलां रे ॥ध्रु.॥ साड्या साउलीं पातळें गोंडे कसणिया चोळ्या । बुंथी घेउनी सकळा कळंबावरी पळे। खांदी धरूनियां करीं दृष्टी घालोनि सामोरी । बैसे पाला वोढी वरी खदखदां हांसे ॥२॥ आनंदें कल्लोळ बाळा खेळती सकळ देती उलटिया चपळ । एकी एकीहूनि म्हैस वेल सुर काडी । एकी उगविती कोडीं । नाना परीच्या निकडी खेळ मांडियेला ॥३॥ एकी आलिया बाहेरी पाहे लुगडें तंव नारी । म्हणे नाहीं नेलें चोरी काय जाणों केव्हां । केला सकळी हाकारा तंव आलिया बाहेरा । आतां म्हणतील घरां जावें कैशा परी ॥४॥ तंव हांसे वनमाळी वरी पाहोनी सकळी । लाजे रिघालिया जळीं मागें पुढें हात । लाज राखावी गोपाळा आम्हांजणींची सकळां । काय मागसी ये वेळा देऊं गुळवाटी ॥५॥ जोडोनियां कर या गे सकळी समोर । वांयां न बोलावें फार बडबड कांहीं । भातुकें भूषण नाहीं चाड नेघें धन । करा एक चित्त मन या गे मजपाशीं ॥६॥ एक एकीकडे पाहे लाज सांडूनियां राहे । म्हणे चला आतां सये जाऊं तयापाशीं । जोडोनियां हात कैशा राहिल्या निवांत । तुका म्हणे केली मात लाज राखिली तयांची ॥७॥
1332
खेळतों ते खेळ पायांच्या प्रसादें । नव्हती हीं छंदें नासिवंतें ॥१॥ माझा मायबाप उभा विटेवरी । कवतुकें करी कृपादान ॥ध्रु.॥ प्रसादाची वाणी वदें ती उत्तरें । नाहीं मतांतरें जोडियेलीं ॥२॥ तुका म्हणे रस वाढितिया अंगें । छाया पांडुरंगें केली वरी ॥३॥
1333
खेळींमेळीं आले घरा गोपीनाथ । गोपाळांसहित मातेपाशीं ॥१॥ मातेपाशीं एक नवल सांगती । जाली तैसी ख्याती वोणव्याची ॥२॥ ओवाळिलें तिनें करूनि आरती । पुसे दसवंती गोपाळांसि ॥३॥ पुसे पडताळुनी मागुती मागुती । गोपाळ सांगती कवतुक ॥४॥ कवतुका कानीं आइकतां त्यांचे । बोलतां ये वाचे वीट नये ॥५॥ नयन गुंतले श्रीमुख पाहतां । न साहे लवतां आड पातें ॥६॥ तेव्हां कवतुक कळों आलें कांहीं । हळुहळु दोहीं मायबापां ॥७॥ हळुहळु त्यांचें पुण्य जालें वाड । वारलें हें जाड तिमिराचें ॥८॥ तिमिर हें तेथें राहों शके कैसें । जालियां प्रकाशें गोविंदाच्या ॥९॥ दावी तुका म्हणे देव ज्या आपणा । पालटे तें क्षणामाजी एका ॥१०॥
1334
खेळों मनासवें जीवाच्या संवादें । कौतुक विनोदें निरांजनी ॥१॥ पचीं पडिलें तें रुचे वेळोवेळां । होतसे डोहळा आवडीस ॥ध्रु.॥ एकांताचें सुख जडलें जिव्हारीं । वीट परिचारीं बरा आला ॥२॥ जगाऐसी बुद्धि नव्हे आतां कदा । लंपट गोविंदा जालों पायीं ॥३॥ आणीक ते चिंता न लगे करावी । नित्य नित्य नवी आवडी हे ॥४॥ तुका म्हणे धडा राहिला पडोन । पांडुरंगीं मन विसांवलें ॥५॥
1335
खेळों लागलों सुरकवडी । माझी घोंगडी हारपली ॥१॥ कान्होबाचे पडिलों गळां । घेई गोपाळा देई झाडा ॥ध्रु.॥ मी तों हागे उघडा जालों । अवघ्या आलों बाहेरी ॥२॥ तुका म्हणे बुद्धि काची । नाहीं ठायींची मजपाशीं ॥३॥
1336
खोंकरी आधन होय पाकसिद्धी । हें तों घडों कधीं शके चि ना ॥१॥ खापराचे अंगीं घासितां परिस । न पालटे कीस काढिलिया ॥२॥ पालथे घागरी रिचवितां जळ । तुका म्हणे खळ तैसे कथे ॥३॥
1337
खोट्याचा विकरा । येथें नव्हे कांच हिरा ॥१॥ काय दावायाचें काम । उगा च वाढवावा श्रम ॥ध्रु.॥ परीक्षकाविण । मिरवों जाणों तें तें हीण ॥२॥ तुका पायां पडे । वाद पुरे हे झगडे ॥३॥
1338
खोल ओले पडे तें पीक उत्तम । उथळाचा श्रम वांयां जाय ॥१॥ लटिक्याचे आम्ही नव्हों सांटेकरी । थीतें घाली भरी पदरीचें ॥ध्रु.॥ कोणा इहलोकीं पाहिजे पसारा । दंभ पोट भरायाचे चाडे ॥२॥ तुका म्हणे कसीं अगी जें उतरे । तें चि येथें सरे जातिशुद्ध ॥३॥
1339
गंगा आली आम्हांवरि । संतपाउलें साजिरीं ॥१॥ तेथें करीन मी अंघोळी । उडे चरणरजधुळी । येती तीर्थावळी । पर्वकाळ सकळ ॥ध्रु.॥ पाप पळालें जळालें । भवदुःख दुरावलें॥२॥ तुका म्हणे धन्य जालों । सप्तसागरांत न्हालों ॥३॥
1340
गंगा गेली सिंधुपाशीं । जरी तो ठाव नेदी तिशी ॥१॥ तिणें जावें कवण्या ठाया । मज सांगा पंढरिराया ॥ध्रु.॥ जळ क्षोभलें जलचरां । माता बाळा नेदी थारा ॥२॥ तुका म्हणे आलों शरण । देवा त्वां कां धरिलें मौन्य ॥३॥
1341
गंगा न देखे विटाळ । तें चि रांजणीं ही जळ ॥१॥ अल्पमहदा नव्हे सरी । विटाळ तो भेद धरी ॥ध्रु.॥ काय खंडिली भूमिका । वर्णा पायरिकां लोकां ॥२॥ तुका म्हणे अगीविण । बीजें वेगळीं तों भिन्न ॥३॥
1342
गंगाजळा पाहीं पाठी पोट नाहीं । अवगुण तो कांहीं अमृतासी ॥१॥ रवि दीप काळिमा काय जाणे हिरा । आणिका तिमिरा नासे तेणे ॥ध्रु.॥ कर्पूरकांडणी काय कोंडा कणी । सिंधू मिळावणीं काय चाले ॥२॥ परिस चिंतामणि आणिकांचा गुणी । पालटे लागोनि नव्हे तैसा ॥३॥ तुका म्हणे तैसे जाणा संतजन । सर्वत्र संपूर्ण गगन जैसें ॥४॥
1343
गंगेचिया अंताविण काय चाड । आपुलें तें कोड तृषेपाशीं ॥१॥ विठ्ठल हे मूर्ति साजिरी सुंदर । घालीं निरंतर हृदयपुटीं ॥ध्रु.॥ कारण तें असे नवनीतापाशीं । गबाळ तें सोसी इतर कोण ॥२॥ बाळाचे सोईतें घांस घाली माता । आटाहास चिंता नाहीं तया ॥३॥ गाऊं नाचों करूं आनंदसोहळा । भाव चि आगळा नाहीं हातां ॥४॥ तुका म्हणे अवघें जालें एकमय । परलोकींची काय चाड आतां ॥५॥
1344
गंधर्व अग्नि सोम भोगिती कुमारी । कोठें चराचरीं त्याग केला ॥१॥ गायत्री स्वमुखें भक्षीतसे मळ । मिळाल्या वाहाळ गंगाओघ ॥ध्रु.॥ कागाचिये विष्ठें जन्म पिंपळासि । पांडवकुळासि पाहातां दोष ॥२॥ शकुंतळा सूत कर्ण शृंगी व्यास । यांच्या नामें नाश पातकांसि ॥३॥ गणिका अजामेळ कुब्जा तो विदुर । पाहातां विचार पिंगळेचा ॥४॥ वाल्हा विश्वामित्र वसिष्ठ नारद । यांचे पूर्व शुद्ध काय आहे ॥५॥ न व्हावी तीं जालीं कर्में नरनारी । अनुतापें हरी स्मरतां मुक्त ॥६॥ तुका म्हणे पूर्व नाठवी श्रीहरी । मूळ जो उच्चारी नरक त्यासि ॥७॥
1345
गंधर्वनगरीं क्षण एक राहावें । तें चि पैं करावें मुळक्षत्र ॥१॥ खपुष्पाची पूजा बांधोनि निर्गुणा । लक्ष्मीनारायणा तोषवावें ॥ध्रु.॥ वंध्यापुत्राचा लग्नाचा सोहळा । आपुलिया डोळां पाहों वेगीं ॥२॥ मृगजळा पोही घालुनि सज्ञाना । तापलिया जना निववावें ॥३॥ तुका म्हणे मिथ्या देहेंद्रियकर्म । ब्रम्हार्पण ब्रम्ह होय बापा ॥४॥
1346
गजइंद्र पशु आप्तें मोकलिला । तो तुज स्मरला पांडुरंगा ॥१॥ त्यासाठीं गरुड सांडुनि धांवसी । माया झळंबेसी दिनानाथा ॥ध्रु.॥ धेनु वत्सावरी झेंप घाली जैसी । तैसें गजेंद्रासी सोडविलें ॥२॥ तुका म्हणे ब्रीद बांधलें यासाठीं । भक्तांसी संकटीं रक्षावया ॥३॥
1347
गजेंद्र तो हस्ती सहस्र वरुषें । जळामाजी नक्रें पीडिलासे ॥१॥ सुहुदव सांडिलें कोणी नाहीं साहे । अंतीं वाट पाहे विठो तुझी ॥ध्रु.॥ कृपेच्या सागरा माझ्या नारायणा । तया दोघांजणा तारियेलें ॥२॥ तुका म्हणे नेले वाऊनि विमानी । मी ही आईंकोनी विश्वासलों ॥३॥
1348
गडी गेले रडी । कान्हो नेदीस तूं चढी ॥१॥ आम्ही न खेळों न खेळों । आला भाव तुझा कळों ॥ध्रु.॥ न साहावे भार । बहु लागतो उशीर ॥२॥ तुका आला रागें । येऊं नेदी मागें मागें ॥३॥ हाल - अभंग २
1349
गणेश सारजा करिती गायना । आणि देवांगना रंभे ऐशा ॥१॥ तेथें आम्हीं मानवांहीं विनवावें तें काय । सुरवर पाय वंदिति जेथें ॥ध्रु.॥ ज्याच्या गायनासी तटस्थ शंकर । त्या हि परि पार न कळे तुझा ॥२॥ तुका म्हणे आम्ही किंकर ते किती । इंद्राची हि मति नागविशी ॥३॥
1350
गति अधोगति मनाची युक्ति । मन लावीं एकांतीं साधुसंगें ॥१॥ जतन करा जतन करा । धांवतें सैरा ओढाळ तें ॥ध्रु.॥ मान अपमान मनाचें लक्षण । लाविलिया ध्यान तें चि करी ॥२॥ तुका म्हणे मन उतरी भवसिंधु । मन करी बंधु चौर्‍यांशीचा ॥३॥
1351
गयाळाचें काम हिताचा आवारा । लाज फजितखोरा असत नाहीं ॥१॥ चित्ती न मिळे तें डोळां सलों येतें । असावें परतें जवळूनि ॥ध्रु.॥ न करावा संग न बोलावी मात । सावधान चित्ती नाहीं त्यासी ॥२॥ तुका म्हणे दुःख देतील माकडें । घालिती सांकडें उफराटें ॥३॥
1352
गरुडाचें वारिकें कासे पीतांबर । सांवळें मनोहर कैं देखेन ॥१॥ बरवया बरवंटा घनमेघ सांवळा । वैजयंतीमाळा गळां शोभे ॥ध्रु.॥ मुगुट माथां कोटि सूर्यांचा झळाळ । कौस्तुभ निर्मळ शोभे कंठीं ॥२॥ ओतींव श्रीमुख सुखाचें सकळ । वामांगीं वेल्हाळ रखुमादेवी ॥३॥ उद्धव अक्रूर उभे दोहींकडे । वर्णिती पवाडे सनकादिक ॥४॥ तुका म्हणे नव्हे आणिकांसारिखा । तो चि माझा सखा पांडुरंग ॥५॥ विराण्या - अभंग २५
1353
गरुडावरि बैसोनि येतो जगजेठी । त्याचे चरणीं मिठी घालूं चला ॥१॥ सांवळें रूपडें देखिलें लोचनीं । शंख चक्र दोन्ही शोभताहे ॥ध्रु.॥ पीतांबर झळके हे चि त्याची खूण । वाकी रुणझुण करिताती ॥२॥ गरुडाचा चपेटा असे नेटें । कस्तुरीमळवट शोभताहे ॥३॥ पदक एकावळी शोभताहे कंठीं । तुका म्हणे मिठी घालूं चला ॥४॥
1354
गर्जत जावें नामावळी । प्रेमें टाळी वाहोनि ॥१॥ येणें सुखें पुढती धांवे । भेटी सवें गोपाळा ॥ध्रु.॥ लोटांगण घाला तळीं । वंदा धुळी संतांची ॥२॥ तुका म्हणे विठ्ठल लाहो । ऐसा बाहो उभारा ॥३॥
1355
गर्भा असतां बाळा । कोण पाळी त्याचा लळा ॥१॥ कैसा लाघवी सूत्रधारी । कृपाळुवा माझा हरी ॥ध्रु.॥ सर्प पिलीं वितां चि खाय । वांचलिया कोण माय ॥२॥ गगनीं लागला कोसरा । कोण पुरवी तेथें चारा ॥३॥ पोटीं पाषाणांचे जीव । कवण जीव त्याचा भाव ॥४॥ तुका म्हणे निश्चळ राहें । होईंल तें सहज पाहें ॥५॥
1356
गर्भाचें धारण । तिनें वागविला सिण ॥१॥ व्याली कुर्‍हाडीचा दांडा । वर न घली च तोंडा ॥ध्रु.॥ उपजला काळ । कुळा लाविला विटाळ ॥२॥ तुका म्हणे जाय । नरका अभक्ताची माय ॥३॥
1357
गळित जाली काया । हें चि लळित पंढरिराया ॥१॥ आलें अवसानापासीं । रूप राहिलें मानसीं ॥ध्रु.॥ वाइला कळस । तेथें स्थिरावला रस ॥२॥ तुका म्हणे गोड जालें । नारायणीं पोट धालें ॥३॥
1358
गव्हांच्या घुगर्‍या । नाचण्यांच्या पुर्‍या । बर्‍या त्या चि बर्‍या । पाधाणी त्या पाधाणी ॥१॥ काय थोरपण । वांयां जाळावा तो शीण । कारणापें भिन्न । निवडे तें निराळें ॥ध्रु.॥ रुचि वोजेपाशी । गरज ते जैशीतैशी । करूं नका नाशी । खावें खाणें जालें तें ॥२॥ तुका म्हणे मोठा । काय करावा तो ताटा । नाहीं वीण निटा । पाविजेत मारग ॥३॥
1359
गव्हाराचें ज्ञान अवघा रजोगुण । सुखवासी होऊन विषय भोगी ॥१॥ त्यासी ज्ञानउपदेश केला । संगेंविण त्याला राहावेना ॥२॥ तुका म्हणे संग उत्तम असावा । याविण उपावा काय सांगों ॥३॥
1360
गहूं एकजाती । परी त्या पाधाणी नासिती ॥१॥ वर्म जाणावें तें सार । कोठें काय थोडें फार ॥ध्रु.॥ कमाईच्या सारें । जाति दाविती प्रकार ॥२॥ तुका म्हणे मोल । गुणा मिथ्या फिके बोल ॥३॥
1361
गांठोळीस धन भाकावी करुणा । दावूनि सज्जना कींव पीडी ॥१॥ नाठेळाची भक्ति कुचराचें बळ । कोरडें वोंगळ मार खाय ॥ध्रु.॥ सांडोव्यासी घाली देवाची करंडी । विल्हाळ त्या धोंडी पूजा दावी ॥२॥ तुका म्हणे ऐसे माकडाचे छंद । अवघे धंदधंद सिंदळीचे ॥३॥
1362
गाई गोपाळ यमुनेचे तटीं । येती पाणिया मिळोनि जगजेटी । चेंडू चौगुणा खेळती वाळवंटीं । चला चला म्हणती पाहूं दृष्टी वो ॥१॥ ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी । चित्त विव्हळ देखावया हरी । मिस पाणियाचें करितील घरीं । बारा सोळा मिळोनि परस्परीं वो ॥ध्रु.॥ चिरें चोळिया त्या धुतां विसरती । ऊर्ध्व लक्ष लागलें कृष्णमूर्ती । कोणा नाठवे कोण कुळ याती । जालीं ताटस्त सकळ नेत्रपातीं वो ॥२॥ दंतधावनाचा मुखामाजी हात । वाद्यें वाजती नाइके जनमात । करी श्रवण कृष्णवेणुगीत । स्वामी तुकयाचा पुरवील मनोरथ वो ॥३॥
1363
गाईंन ओंविया पंढरिचा देव । आमुचा तो जीव पांडुरंग ॥१॥ रंगलें हें चत्ति माझें तया पायीं । म्हणउनि घेई हा चि लाहो ॥२॥ लाहो करीन मी हा चि संवसारीं । राम कृष्ण हरि नारायण ॥३॥ नारायण नाम घालितां तुकासी । न येती या रासी तपतीर्था ॥४॥ तीर्था रज माथां वंदिती संतांचे । जे गाती हरिचे गुणवाद ॥५॥ गुणवाद ज्याचे गातां पूज्य जाले । बडिवार बोले कोण त्यांचा ॥६॥ त्याचा नाहीं पार कळला वेदांसी । आणीक ही ॠषि विचारितां ॥७॥ विचारितां तैसा होय त्यांच्या भावें । निजसुख ठावें नाहीं कोणा ॥८॥ कोणा कवतुक न कळे हे माव । निजलिया जिवें करी धंदा ॥९॥ करुनि कवतुक खेळे हा चि लीळा । व्यापूनि वेगळा पाहातुसे ॥१०॥ सेवटीं आपण एकला चि खरा । सोंग हा पसारा नट केला ॥११॥ लावियेलें चाळा मीपणें हें जन । भोग-तया कोण भोगविशी ॥१२॥ विषयीं गुंतलीं विसरलीं तुज । कन्या पुत्र भाज धनलोभा ॥१३॥ लोभें गिळी फांसा आविसाच्या आशा । पडोनि मासा तळमळी ॥१४॥ तळमळ याची तरी शम होईंल । जरी हा विठ्ठल आठविती ॥१५॥ आठव हा तरी संतांच्या सांगातें । किंवा हें संचित जन्मांतरें ॥१६॥ जन्मांतरें तीन भोगितां कळती । केलें तें पावती करितां पुढें ॥१७॥ पुढें जाणोनियां करावें संचित । पुजावे अतीत देव द्विज ॥१८॥ जन्म तुटे ऐसें नव्हे तुम्हां जना । पुढिल्या पावना धर्म करा ॥१९॥ करा जप तप अनुष्ठान याग । संतीं हा मारग स्थापियेला ॥२०॥ लावियेलीं कर्में शुद्ध आचरणें । कोणा एका तेणें काळें पावे ॥२१॥ पावला सत्वर निष्काम उदार। जिंकिली अपार वासना हे ॥२२॥ वासनेचें मूळ छेदिल्या वांचून । तरलेंसें कोणी न म्हणावें ॥२३॥ न म्हणावें जाला पंडित वाचक । करूं मंत्रघोष अक्षरांचा ॥२४॥ चाळविलीं एकें ते चि आवडीनें । लोक दंभमानें देहसुखें ॥२५॥ सुख तरी च घडे भजनाचें सार । वाचे निरंतर रामनाम ॥२६॥ राम हा उच्चार तरी च बैसे वाचे । अनंता जन्माचें पुण्य होय ॥२७॥ पुण्य ऐसें काय रामनामापुढें । काय ते बापुडे यागयज्ञ ॥२८॥ यागयज्ञ तप संसार दायकें । न तुटती एके नामेंविण ॥२९॥ नामेंविण भवसिंधु पावे पार । अइसा विचार नाहीं दुजा ॥३०॥ जाणती हे क्तराज महामुनि । नाम सुखधणी अमृताची ॥३१॥ अमृताचें सार निजतत्व बीज । गुह्याचें तें गुज रामनाम ॥३२॥ नामें असंख्यात तारिले अपार । पुराणीं हें सार प्रसद्धि हे ॥३३॥ हें चि सुख आम्ही घेऊं सर्वकाळ । करूनि निर्मळ हरिकथा ॥३४॥ कथाकाळीं लागे सकळा समाधि । तात्काळ हे बुद्धि दुष्ट नासे ॥३५॥ नासे लोभ मोहो आशा तृष्णा माया । गातां गुण तया विठोबाचे ॥३६॥ विठोबाचे गुण मज आवडती । आणीक हे चित्ती न लगे कांहीं ॥३७॥ कांहीं कोणी नका सांगों हे उपाव । माझा मनीं भाव नाहीं दुजा ॥३८॥ जाणोनियां आम्ही दिला जीवभाव । दृढ याचे पाये धरियेले ॥३९॥ धरियेले आतां न सोडीं जीवेंसी । केला ये च विशीं निरधार ॥४०॥ निरधार आतां राहिलों ये नेटीं । संवसारतुटी करूनियां ॥४१॥ येणें अंगीकार केला पांडुरंगें । रंगविला रंगें आपुलिया ॥४२॥ आपुली पाखर घालुनियां वरि । आम्हांसी तो करी यत्न देव ॥४३॥ देव राखे तया आणिकांचें काय । करितां उपाय चाले तेथें ॥४४॥ तेथें नाहीं रिघ कळिकाळासी जातां । दास म्हणवितां विठोबाचे ॥४५॥ विठोबाचे आम्ही लाडिके डिंगर । कांपती असुर काळ धाकें ॥४६॥ धाक तिहीं लोकीं जयाचा दरारा । स्मरण हें करा त्याचें तुम्ही ॥४७॥ तुम्ही निदसुर नका राहूं कोणी । चुकावया खाणी गर्भवास ॥४८॥ गर्भवासदुःख यमाचें दंडणें । थोर होय शीण येतां जातां ॥४९॥ तान भूक पीडा जीतां ते आगात । मेल्या यमदूत जाच करिती ॥५०॥ जाच करिती हे म्हणसी कोणा आहे ठावें । नरकीं कौरवें बुडी दिली ॥५१॥ बुडी दिली कुंभपाकीं दुर्योधनें । दाविना लाजेनें मुख धर्मा ॥५२॥ धर्म हा कृपाळू आलासे जवळी । बैसला पाताळीं वरि नये ॥५३॥ न ये वरि कांहीं करितां उपाव । भोगवितो देव त्याचे त्यासी ॥५४॥ त्यांसी अभिमान गर्व या देहाचा । नुच्चारिती वाचा नारायण ॥५५॥ नारायण विसरलीं संवसारीं । तया अघोरीं वास सत्य ॥५६॥ सत्य मानूनियां संतांच्या वचना । जा रे नारायणा शरण तुम्ही ॥५७॥ तुम्ही नका मानूं कोणी विसवास । पुत्र पत्नी आस धन वित्त ॥५८॥ धन वित्त लोभ माया मोहपाश । मांडियले फासे यमदूतीं ॥५९॥ दूतीं याच्या मुखा केलेंसे कुडण । वाचे नारायण येऊं नेदी ॥६०॥ नेदी शुद्धबुद्धि आतळों चित्तीसी । नाना कर्म त्यासी दुरावती ॥६१॥ दुराविलीं एकें जाणतीं च फार । निंदा अहंकार वादभेद ॥६२॥ वाद भेद निंदा हे फंद काळाचें । गोवितील वाचे रिकामिकें ॥६३॥ रिकामिक देवा होय नव्हे मना । चिंतेचिये घाणा जुंपिजेसी ॥६४॥ सेवटीं हे गळा लावुनियां दोरी । सांभाळ ये करी वासनेचा ॥६५॥ वासनेचा संग होय अंतकाळीं । तरी तपोबळी जन्म धरी ॥६६॥ धरूनियां देव राहतील चित्ती । आधींचिया गती आठवाया ॥६७॥ आठवावा देव मरणाचे काळीं । म्हणउनि बळी जीव दिले ॥६८॥ दिले टाकूनियां भोग ॠषेश्वरीं । खाती वनांतरीं कंदमूळें ॥६९॥ मुळें सुखाचिया देव अंतरला । अल्पासाटीं नेला अधोगती ॥७०॥ गति हे उत्तम व्हावया उपाव । आहे धरा पाव विठोबाचे ॥७१॥ विठोबाचे पायीं राहिलिया भावें । न लगे कोठें जावें वनांतरा ॥७२॥ तरती दुबळीं विठोबाच्या नांवें। संचित ज्या सवें नाहीं शुद्ध ॥७३॥ शुद्ध तरी याचे काय तें नवल । म्हणतां विठ्ठल वेळोवेळां ॥७४॥ वेळा कांहीं नाहीं कवणाचे हातीं । न कळे हे गति भविष्याची ॥७५॥ भविष्य न सुटे भोगिल्यावांचूनि । संचित जाणोनि शुद्ध करा ॥७६॥ करावे सायास आपुल्या हिताचे । येथें आलियाचे मनुष्यपण ॥७७॥ मनुष्यपण तरी साधी नारायण । नाहीं तरी हीन पशुहूनी ॥७८॥ पशु पाप पुण्य काय ते जाणती । मनुष्या या गति ठाउकिया ॥७९॥ ठाउकें हें असे पाप पुण्य लोका । देखती ते एकां भोगितिया ॥८०॥ भोगतील एक दुःख संवसारीं । काय सांगों परी वेगळाल्या ॥८१॥ ल्यावें खावें बरें असावें सदैव । हे चि करी हांव संवसारीं ॥८२॥ संवसारें जन गिळिले सकळ । भोगवितो फळ गर्भवासा ॥८३॥ वासनेचें मूळ छेदिल्यावांचून । नव्हे या खंडण गर्भवासा ॥८४॥ सायास केलियावांचुनि तें कांहीं । भोगावरी पाहीं घालूं नये ॥८५॥ नये बळें धड घालूं कांट्यावरि । जाये जीवें धरी सर्प हातीं ॥८६॥ हातीं आहे हित करील तयासी । म्हणउनि ॠषीं सांगितलें ॥८७॥ सांगती या लोकां फजित करूनि । आपण जे कोणी तरले ते ॥८८॥ तेणें वाळवंटीं उभारिले कर । कृपेचा सागर पांडुरंग ॥८९॥ गंगाचरणीं करी पातकांची धुनी । पाउलें तीं मनीं चिंतिलिया ॥९०॥ चिंतनें जयाच्या तारिले पाषाण । उद्धरी चरण लावूनियां ॥९१॥ लावूनियां टाळी नलगे बैसावें । प्रेमसुख घ्यावें संतसंगें ॥९२॥ संतसंगें कथा करावें कीर्तन । सुखाचें साधन रामराम ॥९३॥ मग कोठें देव जाऊं न सके दुरी । बैसोनि भीतरी राहे कंठीं ॥९४॥ राहे व्यापुनियां सकळ शरीर । आपुला विसर पडों नेदी ॥९५॥ नेदी दुःख देखों आपुलिया दासा । वारी गर्भवासा यमदूता ॥९६॥ तान भूक त्यासी वाहों नेदी चिंता । दुश्चिंत हे घेतां नाम होती ॥९७॥ होती जीव त्यांचे सकळ ही जंत । परि ते अंकित संचिताचे ॥९८॥ चेवले जे कोणी देहअभिमानें । त्यांसी नारायणें कृपा केली ॥९९॥ कृपाळू हा देव अनाथा कोंवसा । आम्ही त्याच्या आशा लागलोंसों ॥१००॥ लावियेले कासे येणें पांडुरंगें । तुका म्हणे संगें संतांचिया ॥१०१॥
1364
गाईन ते लीळा चरित्र पवाडे । राखिले संवगडे सहित गाई ॥१॥ चोरिलें नवनीत बांधविला गळा । जे तुम्हीं गोपाळा छंद केले ॥ध्रु.॥ मोहिल्या गोपिका पांवयाच्या छंदें । केली ते गोविंदें क्रीडा गाऊं ॥२॥ मायबापा लाड दाखविलें कौतुक । तें या आणूं सुख अंतरासी ॥३॥ निर्दाळिले दुष्ट भक्तां प्रतिपाळी । ऐसा म्हणों बळी आमुचा स्वामी ॥४॥ तुका म्हणे सरसी असों येणें वोघें । लागोनि संबंधें सर्वकाळ ॥५॥ डांका - अभंग ८
1365
गाऊं नेणें कळा कुसरी । कान धरोनि म्हणें हरी ॥१॥ माझ्या बोबडिया बोला । चित्ती द्यावें बा विठ्ठला ॥ध्रु.॥ मज हंसतील लोक । परि मी गाईंन निःशंक ॥२॥ तुझे नामीं मी निर्लज्ज । काय जनासवें काज ॥३॥ तुका म्हणे माझी विनंती । तुम्ही परिसा कमळापती ॥४॥
1366
गाऊं नेणें परी मी कांहीं गाईंन । शरण जाईंन पांडुरंगा ॥१॥ ब्रम्हांडनायक मी त्याचा अंकित । काय यमदूत करिती काळ ॥ध्रु.॥ वश्या ज्याच्या नामें तारिली गणिका । अजामेळासारिखा पापरासीं ॥२॥ चरणींच्या रजें अहिल्या तारिली । रूपवंत केली कुबजा क्षणें ॥३॥ पृथिवी तारिली पाताळासी जातां । तुका म्हणे आतां आम्ही किती ॥४॥
1367
गाऊं वाऊं टाळी रंगीं नाचों उदास । सांडोनि भय लज्जा शंका आस निरास ॥१॥ बळियाचा बळी तो कैवारी आमुचा । भुक्तिमुक्तिदाता सकळां ही सिद्धींचा ॥ध्रु.॥ मारूं शब्दशस्त्रबाण निःशंक अनिवार । कंटकाचा चुर शिर फोडूं काळाचें ॥२॥ म्हणे तुकयाबंधु नाहीं जीवाची चाड । आपुलिया तेथें काय आणिकांची भीड ॥३॥
1368
गाऊं वाणूं तुज विठो तुझा करूं अनुवाद । जिकडे पाहें तिकडे सर्वमय गोविंद ॥१॥ आनंद रे विठोबा जाला माझे मनीं । देखिले लोचनीं विटेसहित पाउले ॥ध्रु.॥ न करीं तपसाधनें रे मुक्तीचे सायास । हा चि जन्मोजन्मी गोड भक्तीचा रस ॥२॥ तुका म्हणे आम्हां प्रेमा उणें तें काईं । पंढरीचा राणा सांटविला हृदयीं ॥३॥
1369
गाजराची पुंगी । तैसे नवे जाले जोगी ॥१॥ काय करोनि पठन । केली अहंता जतन ॥ध्रु.॥ अल्प असे ज्ञान । अंगीं ताठा अभिमान ॥२॥ तुका म्हणे लंड । त्याचें हाणोनि फोडा तोंड ॥३॥
1370
गाढव शृंगारिलें कोडें । कांहीं केल्या नव्हे घोडें ॥१॥ त्याचें भुंकणें न राहे । स्वभावासी करील काये ॥ध्रु.॥ श्वान शिबिके बैसविलें । भुंकतां न राहे उगलें ॥२॥ तुका म्हणे स्वभावकर्म । कांहीं केल्या न सुटे धर्म ॥३॥
1371
गाढवाचे अंगीं चंदनाची उटी । राख तया तेणें केलीसे भेटी ॥१॥ सहज गुण जयाचे देहीं । पालट कांहीं नव्हे तया ॥ध्रु.॥ माकडाचे गळां मोलाचा मणि । घातला चावुनी टाकी थुंकोनि ॥२॥ तुका म्हणे खळा नावडे हित । अविद्या वाढवी आपुलें मत ॥३॥
1372
गाढवाचे घोडे । आम्ही करूं दृष्टीपुढें ॥१॥ चघळी वाहाणा । माघारिया बांडा सुना ॥ध्रु.॥ सोंगसंपादनी । तरि करूं शुद्ध वाणी ॥२॥ तुका म्हणे खळ । करूं समयीं निर्मळ ॥३॥
1373
गाढवाचें तानें । पालटलें क्षणक्षणें ॥१॥ तैसे अधमाचे गुण । एकविध नाहीं मन ॥ध्रु.॥ उपजतां बरें दिसे । रूप वाढतां तें नासे ॥२॥ तुका म्हणे भुंकते वेळे । वेळ अवेळ न कळे ॥३॥
1374
गातां आइकतां कांटाळा जो करी । वास त्या अघोरीं कुंभपाकीं ॥१॥ रागें यमधर्म जाचविती तया । तु दिलें कासया मुख कान ॥ध्रु.॥ विषयांच्या सुखें अखंड जगासी । न वजे एकादशी जागरणा ॥२॥ वेचूनियां द्रव्य सेवी मद्यपान । नाहीं दिलें अन्न अतीतासी ॥३॥ तीर्थाटण नाहीं केले उपकार । पाळिलें शरीर पुष्ट लोभें ॥४॥ तुका म्हणे मग केला साहे दंड । नाइकती लंड सांगितलें ॥५॥
1375
गाती ओंव्या कामें करितां सकळें । हालवितां बाळें देवावरि ॥१॥ ॠद्धिसिद्धी दासी दारीं ओळंगती । सकळ संपत्ति सर्वां घरीं ॥२॥ घरीं बैसलिया जोडलें निधान । करिती कीर्तन नरनारी ॥३॥ नारीनर लोक धन्य त्यांची याति । जयांसि संगति गोविंदाची ॥४॥ गोविंदें गोविंद केले लोकपाळ । चिंतनें सकळ तुका म्हणे ॥५॥
1376
गातों नाचतों आनंदें । टाळघागरिया छंदें ॥१॥ तुझी तुज पुढें देवा । नेणों भावे कैसी सेवा ॥ध्रु.॥ नेणों ताळ घात मात । भलते सवां पाय हात ॥२॥ लाज नाहीं शंका । प्रेम घाला म्हणे तुका ॥३॥
1377
गातों भाव नाहीं अंगीं । भूषण करावया जगीं ॥१॥ परि तूं पतितपावन । करीं साच हें वचन ॥ध्रु.॥. मुखें म्हणवितों दास । चित्तीं माया लोभ आस ॥५॥ तुका म्हणे दावीं वेश । तैसा अंतरीं नाहीं लेश ॥३॥
1378
गातों वासुदेव मीं ऐका । चित्त ठेवुनि ठायीं भावें एका । डोळे झाकुनि रात्र करूं नका । काळ करीत बैसला लेखा गा ॥१॥ राम राम स्मरा आधीं । लाहो करा गांठ घाला मूळबंदीं । सांडावा उगिया उपाधी । लक्ष लावुनि राहा गोविंदीं गा ॥ध्रु.॥ ऐसा अल्प मानवी देह । शत गणिलें अर्ध रात्र खाय । पुढें बालत्व पीडा रोग क्षय । काय भजनासि उरलें तें पाहें गा ॥२॥ क्षणभंगुर नाहीं भरवसा । व्हा रे सावध सोडा माया आशा । न चळे बळ पडेल मग फासा । पुढें हुशार थोर आहे वोळसा गा ॥३॥ कांहीं थोडें बहुत लागपाठ । करा भक्ति भाव धरा बळकट । तन मन ध्यान लावुनियां नीट । जर असेल करणें गोड शेवट गा ॥४॥ विनवितों सकळां जनां । कर जोडुनि थोरां लाहनां । दान इतुलें द्या मज दीना । म्हणे तुकयाबंधु राम म्हणा गा ॥५॥
1379
गाबाळाचे ग्रंथीं कां रे पडां सदा । मिथ्या भेदवादा वागवितां ॥१॥ संसारगाबाळीं पडसी निखळ । जालासी तूं खळ तेणें मना ॥ध्रु.॥ साधनसंकटीं गुंतसी कासया । व्यर्थ गा अपायामाजी गुंती ॥२॥ निर्मळ फुकाचें नाम गोविंदाचें । अनंतजन्माचे फेडी मळ ॥३॥ तुका म्हणे नको करूं कांहीं कष्ट । नाम वाचे स्पष्ट हरि बोलें ॥४॥
1380
गायत्री विकोन पोट जे जाळिती । तया होय गति यमलोकीं ॥१॥ कन्येचा जे नर करिती विकरा । ते जाती अघोरा नरकपाता ॥ध्रु.॥ नाम गाऊनियां द्रव्य जे मागती । नेणों तयां गति कैसी होय ॥२॥ आमुचा सांगाती आहे तो श्रीहरि । न लगे दुराचारी तुका म्हणे ॥३॥
1381
गायनाचे रंगीं । शक्ति अद्भुत हे अंगीं ॥१॥ हें तों देणें तुमचें देवा । घ्यावी अखंडित सेवा ॥ध्रु.॥ अंगीं प्रेमाचें भरतें । नाहीं उतार चढतें ॥२॥ तुका म्हणे वाणी । नाम अमृताची खाणी ॥३॥
1382
गायें नाचें वायें टाळी । साधन कळी उत्तम हें ॥१॥ काय जाणों तरले किती । नाव ऐती या बैसा ॥ध्रु.॥ सायासाचें नाहीं काम । घेतां नाम विठोबाचें ॥२॥ तुका म्हणे निर्वाणीचें । शस्त्र साचें हें एक ॥३॥
1383
गावलोकिकाहीं लावियेलें पिसें । काय सांगों ऐसें तुजपासीं ॥१॥ तोंड काळें केलें फिरविलें मज । नाहीं धरिली लाज पांडुरंगा ॥ध्रु.॥ काय तुजपासीं सांगों हें गार्‍हाणें । मग काय जिणें तुझें माझें ॥२॥ कोणासाटीं आतां करावा संसार । केली वारावार आपणें चि ॥३॥ तुका म्हणे आम्ही मोडिला घरचार । धरियेला धीर तुझ्या पायीं ॥४॥
1384
गावे म्हणउनि गीत । धरुनि राहे तैसें चत्ति ॥१॥ हें चि थोर अवघड आहे । अन्न देखोनि भूक राहे ॥ध्रु.॥ ऐकावी म्हूण कथा । राहे तैसें धरुनि चित्ता ॥२॥ तुका म्हणे धणी । नव्हे जेविल्यावांचुनि ॥३॥
1385
गासी तरि एक विठ्ठल चि गाई । नाहीं तरि ठायीं राहें उगा ॥१॥ अद्वैतीं तों नाहीं बोलाचें कारण । जाणीवेचा श्रम करिसी वांयां ॥२॥ तुका म्हणे किती करावी फजिती । लाज नाहीं नीतिं निलाजिरा ॥३॥
1386
गुणा आला ईटेवरी । पीतांबरधारी सुंदर जो ॥१॥ डोळे कान त्याच्या ठायीं । मन पायीं राहो हें ॥ध्रु.॥ निवारोनी जाय माया । ऐसी छाया जयासी ॥२॥ तुका म्हणे समध्यान । हे चरण सकुमार ॥३॥
1387
गुणांचा चि सांटा । करूं न वजों आणिका वाटा ॥१॥ करिती छंद नानापरी । भरोन सिणती आडभरी ॥ध्रु.॥ नेमली पंगती । आम्हां संतांची संगती ॥२॥ तुका म्हणे लीळा । येर कवतुक पाहों डोळां ॥३॥
1388
गुणांचे आवडी वाचेचा पसरू । पडिला विसरु इतरांचा ॥१॥ आदिमध्यअंतीं नाहीं अवसान । जीवनीं जीवन मिळोनि गेलें ॥ध्रु.॥ रामकृष्णनाममाळा हे साजिरी । ओविली गोजिरी कंठाजोगी ॥२॥ तुका म्हणे तनु जालीसे शीतळ । अवघी सकळ ब्रम्हानंदें ॥३॥
1389
गुरुकृपे मज बोलविलें देवें । होईंल हें घ्यावें हित कांहीं ॥१॥ सत्य देवें माझा केला अंगीकार । आणीक विचार नाहीं आतां ॥ध्रु.॥ होईं बळकट घालूनियां कास । हा चि उपदेश तुज आतां ॥२॥ सडा संमार्जन तुळसीवृंदावन । अतीतपूजन ब्राम्हणाचें ॥३॥ वैष्णवांची दासी होई सर्वभावें । मुखीं नाम घ्यावें विठोबाचें ॥४॥ पूर्णबोध स्त्रीभ्रतारसंवाद । धन्य जिहीं वाद आइकिला ॥५॥ तुका म्हणे आहे पांडुरंगकथा । तरेल जो चित्ती धरील कोणी ॥६॥
1390
गुरुचिया मुखें होइल ब्रम्हज्ञान । न कळे प्रेमखुण विठोबाची ॥१॥ वेदातें विचारा पुराणातें पुसा । विठोबाचा कैसा प्रेमभाव ॥२॥ तुका म्हणे सांडा जाणिवेचा शीण । विठोबाची खूण जाणती संत ॥३॥
1391
गुरुपादाग्रींचें जळ । त्यास मानी जो विटाळ ॥१॥ संतीं वाळिला जो खळ । नरकीं पचे चिरकाळ ॥ध्रु.॥ गुरुतीर्थी अनमान । यथासांग मद्यपान ॥२॥ गुरुअंगुष्टा न चोखी । मुख घाली वेश्येमुखीं ॥३॥ तुका म्हणे सांगों किती । मुखीं पडो त्याचे माती ॥४॥
1392
गुरुमार्गामुळें भ्रष्ट सर्वकाळ । म्हणती याती कुळ नाहीं ब्रम्हीं ॥१॥ पवित्राला म्हणती नको हा कंटक । मानिती आत्मिक अनामिका ॥ध्रु.॥ डोहोर होलार दासी बलुती बारा । उपदेशिती फारा रांडापोरा ॥२॥ कांहीं टाण्या टोण्या विप्र शिष्य होती । उघडी फजिती स्वधर्माची ॥३॥ नसता करुनी होम खाती एके ठायीं । म्हणती पाप नाहीं मोक्ष येणें ॥४॥ इंद्रियांचे पेठे भला कौल देती । मर्यादा जकाती माफ केली ॥५॥ नाहीं शास्त्राधार पात्रापात्र नेणे । उपदेशून घेणें द्रव्य कांहीं ॥६॥ तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य पूर्ण । विठोबाची आण नरका जाती ॥७॥
1393
गुरुशिष्यपण । हें तों अधमलक्षण ॥१॥ भूतीं नारायण खरा । आप तैसा चि दुसरा ॥ध्रु.॥ न कळतां दोरी साप । राहूं नेंदावा तो कांप ॥२॥ तुका म्हणे गुणदोषी । ऐसें न पडावें सोसीं ॥३॥
1394
गुळ सांडुनि गोडी घ्यावी । मीठ सांडुनि चवि चाखावी ॥१॥ ऐसा प्रपंच सांडुनि घ्यावा । मग परमार्थ जोडावा ॥ध्रु.॥ साकरेचा नव्हे ऊंस । आम्हां कैंचा गर्भवास ॥२॥ बीज भाजुनि केली लाही । जन्ममरण आम्हांसि नाहीं ॥३॥ आकारासी कैंचा ठाव । देह प्रत्यक्ष जाला वाव ॥४॥ तुका म्हणे अवघें जग । सर्वां घटीं पांडुरंग ॥५॥
1395
गुळें माखोनियां दगड ठेविला । वर दिसे भला लोकाचारी ॥१॥ अंतरीं विषयाचें लागलें पैं पिसें । बाहिरल्या वेषें भुलवी लोकां ॥ध्रु.॥ ऐसिया डांभिकां कैची हरिसेवा । नेणे चि सद्भावा कोणे काळीं ॥२॥ तुका म्हणे येणें कैसा होय संत । विटाळलें चित्त कामक्रोधें ॥३॥
1396
गेला कोठें होता कोठुनियां आला । सहज व्यापला आहे नाहीं ॥१॥ आहे साच भावें सकळव्यापक । नाहीं अभाविक लोकां कोठें ॥२॥ कोठे नाहीं ऐसा नाहीं रिता ठाव । अनुभवी देव स्वयें जालें ॥३॥ जातों येतों आम्ही देवाचे सांगांतें । तुका म्हणे गात देवनाम ॥४॥
1397
गेली वीरसरी । मग त्यासि रांड मारी ॥१॥ मग नये तैसी सत्ता । गेली मागील आणितां ॥ध्रु.॥ भंगलिया चित्ता । न ये काशानें सांदितां ॥२॥ तुका म्हणे धीर । भंगलिया पाठीं कीर ॥३॥
1398
गेले टळले पाहार तीन । काय निदसुरा अझून । जागे होउनि करा कांहीं दान । नका ऐकोनि झाकों लोचन गा ॥१॥ हरी राम कृष्ण वासुदेवा । जाणवितसें जना । चिपळ्या टाळ हातीं मुखीं घोष । नारायणा गा ॥ध्रु.॥ जें टाकेल कोणा कांहीं । फळ पुष्प अथवा तोय । द्या परी मीस घेऊं नका भाई । पुढें विन्मुख होतां बरें नाहीं गा ॥२॥ देवाकारणें भाव तस्मात । द्यावें न लगे फारसें वित्त। जालें एक चित्त तरी बहुत । तेवढ्यासाठीं नका करूं वाताहात गा ॥३॥ आलों येथवरी बहु सायासें । करितां दान हें चि मागावयास । नका भार घेऊं करूं निरास । धर्म सारफळ संसारास गा ॥४॥ आतां मागुता येईल फेरा । हें तों घडे या नगरा । म्हणे तुकयाबंधु धरा । ओळखी नाहीं तरी जाल अघोरा गा ॥५॥
1399
गेले पळाले दिवस रोज । काय म्हणतोसि माझें माझें ॥१॥ सळे धरोनि बैसला काळ । फाकों नेदी घटिका पळ ॥ध्रु.॥ कां रे अद्यापि न कळे । केश फिरले कान डोळे ॥२॥ हित कळोनि असतां हातीं । तोंडीं पाडोनि घेसी माती ॥३॥ तुज ठाउकें मी जाणार । पाया शोधोनि बांधिसी घर ॥४॥ तुका म्हणे वेगें । पंढरिराया शरण रिघें ॥५॥
1400
गोकुळींची गती कोण जाणे परि । पाहों आला वरी इंद्रराव ॥१॥ इंद्रापाशीं मेघ बोलती बडिवार । सकळ संहार करुनि आलों ॥२॥ आतां जीव नाहीं सांगाया ते रानीं । पुरिलें पाषाणीं शिळाधारीं ॥३॥ रिता कोठें नाहीं राहों दिला ठाव । जल्पती तो भाव न कळतां ॥४॥ न कळतां देव बळें हुंबरती । साच ते पावती अपमान ॥५॥ माव न कळतां केली तोंडपिटी । इंद्र आला दृष्टी पाहावया ॥६॥ पाहतां तें आहे जैसें होतें तैसें । नाचती विशेषें तुका म्हणे ॥७॥
1401
गोकुळीच्या सुखा । अंतपार नाहीं लेखा ॥१॥ बाळकृष्ण नंदा घरीं । आनंदल्या नरनारी ॥ध्रु.॥ गुढिया तोरणें । करिती कथा गाती गाणें ॥२॥ तुका म्हणे छंदें । येणें वेधिलीं गोविंदें ॥३॥
1402
गोड जालें पोट धालें । अवचित वाचे आलें । म्हणतां पाप गेलें । विठ्ठलसें वाचेसी ॥१॥ सत्य माना रे सकळ । उद्धरिला अजामेळ । पातकी चांडाळ । नामासाटीं आपुलिया ॥ध्रु.॥ चित्त पावलें आनंदा । सुखसमाधीतें सदा । म्हणतां गोविंदा । वेळोवेळां वाचेसी ॥२॥ हें जाणती अनुभवी । जया चाड तो चोजवी । तुका म्हणे दावी । रूप तें चि अरूपा ॥३॥
1403
गोड नांवें क्षीर । परी साकरेचा धीर ॥१॥ तैसें जाणा ब्रम्हज्ञान । बापुडें तें भक्तीविण ॥ध्रु.॥ रुची नेदी अन्न । ज्यांत नसतां लवण ॥२॥ अंधळ्याचे श्रम । शिकविल्याचें चि नाम ॥३॥ तुका म्हणे तारा । नाव तंबुर्‍याच्या सारा ॥४॥
1404
गोड लागे परी सांगतां चि न ये । बैसे मिठी सये आवडीची ॥१॥ वेधलें वो येणें श्रीरंगरंगें । मीमाजी अंगें हारपलीं ॥ध्रु.॥ परते चि ना दृष्टी बैसली ते ठायीं । विसावोनि पायीं ठेलें मन ॥२॥ तुकयाच्या स्वामीसवें जाली भेटी । तेव्हां जाली तुटी मागिल्यांची ॥३॥
1405
गोडीपणें जैसा गुळ । तैसा देव जाला सकळ ॥१॥ आतां भजों कवणे परी । देव सबाह्य अंतरीं ॥ध्रु.॥ उदका वेगळा । नव्हे तरंग निराळा ॥२॥ हेम अळंकारा नामीं । तुका म्हणे तैसे आम्ही ॥३॥
1406
गोणी आली घरा । दाणे खाऊं नेदी पोरा ॥१॥ भरी लोकांची पांटोरी । मेला चोरटा खाणोरी ॥ध्रु.॥ खवळली पिसी । हाता झोंबे जैसी लांसी ॥२॥ तुका म्हणे खोटा । रांडे संचिताचा सांटा ॥३॥
1407
गोदे कांठीं होता आड । करूनि कोड कवतुकें ॥१॥ देखण्यांनीं एक केलें । आइत्या नेलें जिवनापें ॥ध्रु.॥ राखोनियां ठाव । अल्प जीव लावूनि ॥२॥ तुका म्हणे फिटे धनी । हे सज्जनीं विश्रांति ॥३॥
1408
गोपाळ प्रीतीनें कैसे विनविती । विक्राळ श्रीपती होऊं नको ॥१॥ नको रे बा कृष्णा धरूं ऐसें रूप । आम्हां चळकांप सुटलासे ॥ध्रु.॥ होई बा धाकुटा शाम चतुर्भूज । बैसोनियां गुज सुखें बोलों ॥२॥ वोणव्याच्या रागें गिळिशील आम्हां । तुका मेघशामा पायां लागे ॥३॥
1409
गोपाळ म्हणती कान्होबा या रे कांहीं मागों । आपुलाले आम्ही जीवीची तया आवडी सांगों । एक म्हणती उगे रे उगे मागेंचि लागों । निजों नका कोणी घरीं रे आजि अवघेचि जागों ॥१॥ जाणोनि नेणता हरि रे मध्यें उगाचि बैसे । नाइकोनि बोल अइके कोण कोणाचे कैसे । एक एकाच्या संवादा जाणे न मिळे ची ऐसें । पोटीचें होटा आणवी देतो तयांसि तैसें ॥ध्रु.॥ एक म्हणति बहु रे आम्ही पीडिलों माया । नेदी दहींभातसिदोरी ताक घालिती पिया । तापलों वळितां गोधनें नाहीं जीवन छाया । आतां मागों पोटभरी रे याच्या लागोनि पायां ॥२॥ एक म्हणति तुमचें अरे पोट तें किती । मागों गाई म्हैसी घोडे रे धन संपत्ति हित्त । देव गडी कान्हो आमुचा आम्हां काय हातिं । कन्याकुमरें दासी रे बाजावरी सुपती ॥३॥ एक म्हणती बेटे हो कोण करी जतन । गाढव तैसेंचि घोडें रे कोण तयाचा मान । लागे भवरोग वाहतां खांदीं चवघे जण । हातीं काठ्या डोया बोडक्या हिंडों मोकळे राण ॥४॥ एक म्हणती रानीं रे बहु सावजें फार । फाडफाडूं खाती डोळे रे पाय नेतील कर । राखोनि राखे आपणा ऐसा कइचा शूर । बैसोनि राहों घरीं रे कोण करी हे चार ॥५॥ घरीं बैसलिया बहुतें बहु सांगती काम । रिकामें कोणासि नावडे ऐसें आम्हासि ठावें । चौघांमध्यें बरें दिसेसें तेथें नेमक व्हावें । लपोनि सहज खेळतां भलें गडियासवें ॥६॥ एक म्हणती गडी ते भले मळिती मता । केली तयावरी चाली रे बरी आपुली सत्ता । नसावे ते तेथें तैसे रे खेळ हाणिती लाता । रडी एकाएकीं गेलिया गोंधळ उडती लाता ॥७॥ एक म्हणती खेळतां उगीं राहतीं पोरें । ऐसें काय घडों शके रे कोणी लहान थोरें । अवघीं येती रागा रे एका म्हणतां बरें । संगें वाढे कलह हरावा एकाएकीं च खरें ॥८॥ एक म्हणती एकला रे तूं जासील कोठें । सांडी मांडी हें वाउगें तुझे बोल चि खोटे । ठायीं राहा उगे ठायीं च कां रे सिणसी वाटे । अवघियांची सिदोरी तुझे भरली मोटे ॥९॥ तुका म्हणे काय काहण्या अरे सांगाल गोष्टी । चाटावे तुमचे बोल रे भुका लागल्या पोटीं । जागा करूं या रे कान्होबा मागों कवळ ताटीं । धाले गडी तुका ढेकर देतो विठ्ठल कंठीं ॥१०॥
1410
गोपाळां उभडु नावरे दुःखाचा । कुंटित हे वाचा जाली त्यांची ॥१॥ जालें काय ऐसें न कळे कोणासी । म्हणती तुम्हांपासीं देव होता ॥२॥ देवासवें दुःख न पवते ऐसें । कांहीं अनारिसें दिसे आजी ॥३॥ आजि दिसे हरि फांकला यांपाशीं । म्हणउनि ऐशी परि जाली ॥४॥ जाणविल्याविण कैसें कळे त्यांसि । शाहाणे तयांसि कळों आले ॥५॥ कळों आलें तीहीं काफुंदे शांत केला । ठायींचा च त्यांला थोडा होता ॥६॥ होता तो विचार सांगितला जना । गोपाळ शाहाणा होता त्याणें ॥७॥ सांगे आतां हरि तुम्हां आम्हां नाहीं । बुडाला तो डोहीं यमुनेच्या ॥८॥ यासी अवकाश नव्हे चि पुसतां । जालिया अनंता कोण परि ॥९॥ परि त्या दुःखाची काय सांगों आतां । तुका म्हणे माता लोकपाळ ॥१०॥
1411
गोपाळांचें कैसें केलें समाधान । देउनि आलिंगन निवविले ॥१॥ ज्वाळाबरोबरि तुम्हां कां ग्रासीन । अवतार घेणें तुम्हांसाटीं ॥ध्रु.॥ निर्गुण निर्भय मी सर्वांनिराळा । प्रकृतिवेगळा गुणातीत ॥२॥ चिन्मय चिद्रूप अवघें चिदाकार । तुका म्हणे पार नेणे ब्रम्हा ॥३॥
1412
गोपीचंदन मुद्रा धरणें । आम्हां लेणें वैष्णवां ॥१॥ मिरवूं अळंकार लेणें । हीं भूषणें स्वामीचीं ॥ध्रु.॥ विकलों ते सेवाजीवें । एक्या भावें एकविध ॥२॥ तुका म्हणे शूर जालों । बाहेर आलों संसारा ॥३॥
1413
गोमट्या बीजाचीं फळें ही गोमटीं । बाहे तें चि पोटीं समतुक ॥१॥ जातीच्या संतोषें चित्तासी विश्रांति । परतोनि मागुती फिरों नेणें ॥ध्रु.॥ खर्‍याचे पारखीं येत नाहीं तोटा । निवडे तो खोटा ढाळें दुरी ॥२॥ तुका म्हणे मज सत्याचि आवडी । करितां तांतडी येत नाहीं ॥३॥
1414
गोरस घेउनी सातें निघाल्या गौळणी । तंव ती कृष्णाची करणी काय करी तेथें । जाला पानसरा मिठी घातली पदरा । आधीं दान माझें सारा मग चाला पंथें ॥१॥ सर जाऊं दे परता । मुळीं भेटलासी आतां । नाट लागलें संचिता । खेपा खुंटलिया ॥ध्रु.॥ आसुडी पदरा धरी आणीक दुसरा । येरी झोंबतील करा काय वेडा होसी । आलों गेलों बहु वेळां नेणों गोरा कीं सांवळा । सर परता गोवळा काय बोलतोसी ॥२॥ आम्ही येथें अधिकारी मागें केली तुम्ही चोरी । आतां कळलियावरी मागें केलें त्याचें । बोलिल्या हांसुनी आम्ही सासुरवासिनी । कां रे झोंबसी दुरूनी करी मात कांहीं ॥३॥ वांयां परनारी कैशा धरिसी पदरीं । तयां कळलिया उरी तुज मज नाहीं । जडला जिव्हारीं फांकों नेदी तया नारी । जेथें वर्म तें धरी जाऊं पाहे तियेचें ॥४॥ तया हाती सांपडल्या हाटीं पाटीं चुकाविल्या । कृष्णमळिणीं मिळाल्या त्याही न फिरती । तुका म्हणे खंती वांयां न धरावी चित्तीं । होतें तुमच्या संचितीं वोडवलें आजि ॥५॥
1415
गोविंद गोविंद । मना लागलिया छंद ॥१॥ मग गोविंद ते काया । भेद नाहीं देवा तया ॥ध्रु.॥ आनंदलें मन । प्रेमें पाझरती लोचन ॥२॥ तुका म्हणे आळी । जेवी नुरे चि वेगळी॥३॥
1416
गोविंद भ्रतार गोविंद मुळहारी । नामें भेद परि एक चि तो ॥१॥ एकाचीं च नामें ठेवियेलीं दोनी । कल्पितील मनीं यावें जावें ॥२॥ जावें यावें तिहीं घरऴिचया घरीं । तेथिची सिदोरी तेथें न्यावी ॥३॥ विचारितां दिसे येणें जाणें खोटें । दाविती गोमटें लोका ऐसें ॥४॥ लोक करूनियां साच वर्तताती । तैशा त्या खेळती लटिक्याची ॥५॥ लटिकीं करिती मंगळदायकें । लटिकीं च एकें एकां व्याही ॥६॥ व्याही भाईं हरि सोयरा जावायी । अवघियांच्या ठायीं केला एक ॥७॥ एकासि च पावे जें कांहीं करिती । उपचार संपत्ति नाना भोग ॥८॥ भोग देती सर्व एका नारायणा । लटिक्या भावना व्याही भाईं ॥९॥ लटिका च त्यांणीं केला संवसार । जाणती साचार वेगळा त्या ॥१०॥ त्यांणीं मृत्तिकेचें करूनि अवघें । खेळतील दोघें पुरुषनारी ॥११॥ पुरुषनारी त्यांणीं ठेवियेलीं नावें । कवतुकभावें विचरती ॥१२॥ विचरती जैसे साच भावें लोक । तैसें नाहीं सुख खेळतीया ॥१३॥ यांणीं जाणितलें आपआपणया । लटिकें हें वांयां खेळतों तें ॥१४॥ खेळतों ते आम्हीं नव्हों नारीनर । म्हणोनि विकार नाहीं तयां ॥१५॥ तया ठावें आहे आम्ही अवघीं एक । म्हणोनि निःशंक खेळतील ॥१६॥ तयां ठावें नाहीं हरिचिया गुणें । आम्ही कोणकोणें काय खेळों ॥१७॥ काय खातों आम्ही कासया सांगातें । कैसें हें लागतें नेणों मुखी ॥१८॥ मुखीं चवी नाहीं वरी अंगीं लाज । वरणा याती काज न धरिती ॥१९॥ धरितील कांहीं संकोच त्या मना । हांसतां या जना नाइकती ॥२०॥ नाइकती बोल आणिकांचे कानीं । हरि चित्ती मनीं बैसलासे ॥२१॥ बैसलासे हरि जयांचिये चित्ती । तयां नावडती मायबापें ॥२२॥ मायबापें त्यांचीं नेती पाचारुनि । बळें परि मनीं हरि वसे ॥२३॥ वसतील बाळा आपलाले घरीं । ध्यान त्या अंतरीं गोविंदाचें ॥२४॥ गोविंदाचें ध्यान निजलिया जाग्या । आणीक वाउग्या न बोलती ॥२५॥ न बोलती निजलिया हरिविण । जागृति सपन एक जालें ॥२६॥ एकविध सुख घेती नित्य बाळा । भ्रमर परिमळालागीं तैशा ॥२७॥ तैसा त्यांचा भाव घेतला त्यांपरी । तुका म्हणे हरि बाळलीला ॥२८॥
1417
गोविंदाचें नाम गोड घेतां वाचे । तेथें हे कइंचे वैरभाव ॥१॥ भावें नमस्कार घातले सकळीं । लोटांगणें तळीं महीवरि ॥२॥ वरि हातबाहे उभारिली देवें । कळलीया भावें सकळांच्या ॥३॥ सकळ ही वरि बहुडविले स्थळा । चलावें गोपाळा म्हणे घरा ॥४॥ राहिलीं हीं नाचों गोविंदाच्या बोलें । पडिलीया डोलें छंदें हो तीं ॥५॥ छंद तो नावरे आपणा आपला । आनंदाचा आला होता त्यांसि ॥६॥ त्यांच्या तुका म्हणे आनंदें सकळ । ठेंगणें गोपाळ समागमें ॥७॥
1418
गोविंदावांचोनि वदे ज्याची वाणी । हगवण घाणी पिटपिट ते ॥१॥ मस्तक सांडूनि सिसफूल गुडघां । चार तो अवघा बावळ्याचा ॥ध्रु.॥ अंगभूत म्हूण पूजितो वाहाणा । म्हणतां शाहाणा येइल कैसा ॥२॥ तुका म्हणे वेश्या सांगे सवासिणी । इतर पूजनीं भाव तैसा ॥३॥
1419
गोहो यावा गांवा । ऐसे नवस करी आवा ॥१॥ कैचें पुण्य तया गांठी । व्रतें वेची लोभासाटीं ॥ध्रु.॥ वाढावें संतान । गृहीं व्हावें धनधान्य ॥२॥ मागे गारगोटी । परिसाचीये साटोवाटी ॥३॥ तुका म्हणे मोल । देउन घेतला सोमवल ॥४॥
1420
गौरव गौरवापुरतें । फळ सत्याचे संकल्प ॥१॥ कठिण योगाहुनि क्षम । ओकलिया होतो श्रम ॥ध्रु.॥ पावलें मरे सिवेपाशीं । क्लेश उरत ते क्लेशीं ॥२॥ तुका म्हणे बहु आणी । कठिण निघालिया रणीं ॥३॥
1421
गौळणी आल्या वाज । म्हणती या गे राखों आज । सांपडवुनी माजघरांत धरुनी कोंडूं । उघडें कवाड उभ्या काळोशाचे आड । साता पांचा एक भीड मौनेंची ठेल्या ॥१॥ नित्य सोंकवला नेदी । सांगों चित्त बोला । आतां सांपडतां याला कोण सोडी जीवें ॥ध्रु.॥ जाणोनियां हरी त्याच घरा आला चोरी । गडियां ठेवुनी बाहेरी पूर्वद्वारें शिरे । त्यांच्या भयाभीत चाले पिलंगत भोंवतालें । पाहे तंव देखियेलें नवनीत पुढें ॥२॥ उतरोनि सिंकें । पाहे चाखोनियां निकें । गोड तें चि एका एकें । हातीं लांबवितो । जाणे राखती तयांसि । तेथें अधिक चि नासी । माग लावी हात पुसी । चोरी जाणावया ॥३॥ जाणोनियां नारी । मूळ वर्मद्वार धरी । माजे कोंडूनी भीतरी । घरांत धरीयेला । कां रे नागविसी । माझे मुळीं लागलासी । आणवीन तुजपासीं । मागें खादलें तें ॥४॥ दोही संदी बाहे । धरूनि नेती माते पाहे । काय नासी केली आहे । घरामाजी येणें । तुका म्हणे मुख । त्याचें वाढों नेदी दुःख । दसवंती कवतुक। करुनी रंजविल्या ॥३॥
1422
गौळणी बांधिती धारणासि गळा । खेळे त्या गोपाळांमाजी ब्रम्ह ॥१॥ धांवोनियां मागे यशोदे भोजन । हिंडे रानोरान गाईपाठीं ॥ध्रु.॥ तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगीं । भोळेपणालागीं भीक मागे ॥२॥
1423
गौळीयाची ताकपिरें । कोण पोरें चांगलीं ॥१॥ येवढा त्यांचा छंद देवा । काय सेवा भक्ती ते ॥ध्रु.॥ काय उपास पडिले होते । कण्याभोंवते विदुराच्या ॥२॥ तुका म्हणे कुब्जा दासी । रूपरासी हीनकळा ॥३॥
1424
ग्रंथाचे अर्थ नेणती हे खळ । बहु अनर्गळ जाले विषयीं ॥१॥ नाहीं भेदू म्हुण भलतें चि आचरे । मोकळा विचरे मनासवें ॥२॥ तुका म्हणे विषा नांव तें अमृत । पापपुण्या भीत नाहीं नष्ट ॥३॥
1425
ग्रासोग्रासीं भाव । तरी देहिं च जेवी देव ॥१॥ धरीं स्मरण तें सार । नाहीं दुरी तें अंतर ॥ध्रु.॥ भोगितां तूं भावें । देव जेऊं बैसे सवें ॥२॥ तुज पावो देवा । भावें अंतरींची सेवा ॥३॥ गुंतला साधनीं । देव नाहीं त्रिभुवनीं ॥४॥ तुका म्हणे हातीं । न धरितां गमाविती ॥५॥
1426
घटीं अलिप्त असे रवि । अग्नि काष्ठामाजी जेवी । तैसा नारायण जीवीं । जीवसाक्षीवर्तनें ॥१॥ भोग ज्याचे तया अंगीं । भिन्न प्रारब्ध जगीं । विचित्र ये रंगीं । रंगें रंगला गोसावी ॥ध्रु.॥ देह संकल्पासारिखें । एक एकांसी पारिखें । सुख आणि दुःखें । अंगी कर्में त्रिविध ॥२॥ तुका म्हणे कोडें । न कळे तयासी सांकडें । त्याचिया निवाडें । उगवे केलें विंदान ॥३॥
1427
घडिया घालुनि तळीं चालती वनमाळी । उमटती कोमळीं कुंकुमाचीं ॥१॥ वंदा चरणरज अवघे सकळ जन । तारियेले पाषाण उदकीं जेणें ॥ध्रु.॥ पैस धरुनी चला ठाकत ठायीं ठायीं । मौन्य धरुनी कांहीं नो बोलावें ॥२॥ तुका अवसरु जाणवितो पुढें । उघडलीं महाल मंदिरें कवाडें ॥३॥
1428
घरीं रांडा पोरें मरती उपवासीं । सांगे लोकांपासीं थोरपण ॥१॥ नेऊनियां घरा दाखवावें काय । काळतोंडा जाय चुकावूनि ॥२॥ तुका म्हणे आम्ही जाणों त्या प्रमाण । ठकावे हे जन तैसे नहों ॥३॥ जोहार - अभंग ३
1429
घरोघरीं अवघें जालें ब्रम्हज्ञान । परि मेळवण बहु माजी ॥१॥ निरें कोणापाशीं होय एक रज । तरि द्या रे मज दुर्बळासी ॥ध्रु.॥ आशा तृष्णा माया कालवूनि दोन्ही । दंभ तो दूरोनि दिसतसे ॥२॥ काम क्रोध लोभ सिणवी बहुत । मेळवूनि आंत काळकूट ॥३॥ तुका म्हणे तेथें कांहीं हातां नये । आयुष्य मोलें जाये वांयांविण ॥४॥
1430
घरोघरीं बहु जाले कवि । नेणे प्रसादाची चवी ॥१॥ लंडा भूषणांची चाड । पुढें न विचारी नाड ॥ध्रु.॥ काढावें आइतें । तें चि जोडावें स्वहितें ॥२॥ तुका म्हणे कळे । परि होताती अंधळे ॥३॥
1431
घातला दुकान । देती आलियासी दान ॥१॥ संत उदार उदार । भरलें अनंत भांडार ॥ध्रु.॥ मागत्याची पुरे । धणी आणिकांसी उरे ॥२॥ तुका म्हणे पोतें । देवें भरिलें नव्हे रितें ॥३॥
1432
घातला दुकान । पढीये तैसा आहे वान ॥१॥ आम्ही भांडारी देवाचे । द्यावें घ्यावें माप वाचे ॥ध्रु.॥ उगवूं जाणों मोडी । जाली नव्हे त्याची जोडी ॥२॥ तुका म्हणे पुडी । मोल तैसी खरी कुडी ॥३॥
1433
घालिती पव्हया । वाटे अनाथाच्या दया ॥१॥ तैसें कां हें नये करूं । पांडुरंगा आम्हां तारूं ॥ध्रु.॥ रोगियासी काढा । देउनि वारितील पीडा ॥२॥ बुडत्यासाटीं उडी । घालितील कां हे जोडी ॥३॥ सारितील कांटे । पुढें मागिलांचे वाटे ॥४॥ तुका म्हणे भार । घेती भागल्यांचा फार ॥५॥
1434
घाली कवाड टळली वाड राती । कामें व्यापिलीं कां पडिली दुश्चित्ती । कोणे लागला गे सदैवेचे हातीं । आजि शून्य शेजे नाहीं दिसे पती वो ॥१॥ बोले दूतिकेशीं राधा हें वचन । मशीं लाघव दाखवी नारायण । म्हणे कोमळ परी बहु गे निर्गुण । याशीं न बोलें कळला मज पूर्ण वो ॥ध्रु.॥ धाडिलें गरुडा आणिलें हनुमंता । तैं पाचारिलें होउनि ये वो सीता । लाजिनली रूप न ये पालटितां । जाला भीमकी आपण राम सीता वो ॥२॥ सत्यभामा दान करी नारदासी । तैं कळला वो मज हृषीकेशी । तुळे घालितां न ये कनक वो रासी । सम तुके एक पान तुळसी वो ॥३॥ मज भुली पडली कैशापरी । आम्हां भोगूनि म्हणे मी ब्रम्हचारी । दिली वाट यमुने मायें खरी । तुम्हां आम्हां न कळे अद्यापवरी वो ॥४॥ जाणे जीवींचें सकळ नारायण । असे व्यापूनि तो न दिसे लपून । राधा संबोखिली प्रीती आलिंगून । तुका म्हणे येथें भाव चि कारण वो ॥५॥
1435
घालुनियां भार राहिलों निश्चितीं । निरविलें संतीं विठोबासि ॥१॥ लावूनियां हातें कुरवाळिला माथा । सांगितलें चिंता न करावी ॥ध्रु.॥ कटीं कर सम चरण साजिरे । राहिला भीवरें तीरीं उभा ॥२॥ खुंटले सायास अणिकि या जीवा । धरिले केशवा पाय तुझे ॥३॥ तुज वाटे आतां तें करीं अनंता । तुका म्हणे संता लाज माझी ॥४॥
1436
घालुनियां मापीं । देवभक्त बैसले जपीं ॥१॥ तैसी होते सांडउलंडी । निजनिजांची मुडी ॥ध्रु.॥ अमुपीं उखतें । आपण वोस आपण यातें ॥२॥ देव आतां जाला । उगवे संकोच वहिला ॥३॥ अखंड नेलें वेठी । भार सत्याविण गांठी ॥४॥ आडकिला झोंपा । रिता कळिवरचा खोंपा ॥५॥ गोदातीरीं आड । करिते करविते द्वाड ॥६॥ तुका म्हणे बळें । उपदेशाचें तोंड काळें ॥७॥
1437
घालूनि लोळणी पडिलों अंगणीं । सिंचा सिंचवणी तीर्थ वरि ॥१॥ वोल्हावेल तनु होईंल शीतळ । जाली हळहळ बहुतापें ॥ध्रु.॥ पावेन या ठाया कई जालें होतें । आलों अवचितें उष्ट्यावरि ॥२॥ तुका म्हणे कोणी जाणवा राउळी । येइल जवळी पांडुरंग ॥३॥
1438
घालूनियां कास । बळें आलों मागायास ॥१॥ प्रेमें देई पाठवूनि । पांडुरंगा सेवाॠणी ॥ध्रु.॥ होई रे शाहाणा । कळों नेदावें या जना ॥२॥ तुका म्हणे पायीं । जडलों मग उरलें काईं ॥३॥
1439
घालूनियां ज्योती । वाट पाहें दिवसराती ॥१॥ बहु उतावळि मन । तुमचें व्हावें दरुषण ॥ध्रु.॥ आलों बोळवीत । तैसें या चि पंथें चित्ती ॥२॥ तुका म्हणे पेणी । येतां जातां दिवस गणीं ॥३॥
1440
घालूनियां मध्यावर्ती । दाटुनि उपदेश देती ॥१॥ ऐसे पोटभरे संत । तयां कैंचा भगवंत ॥ध्रु.॥ रांडापोरांतें गोविती । वर्षासन ते लाविती ॥२॥ जसे बोलती निरोपणीं । तैसी न करिती करणी ॥३॥ तुका म्हणे तया । तमोगुणियाची क्रिया ॥४॥
1441
घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचें ॥१॥ तुम्ही घ्या रे डोळे सुख । पाहा विठोबाचें मुख ॥ध्रु.॥ तुम्ही ऐका रे कान । माझ्या विठोबाचे गुण ॥२॥ मना तेथें धांव घेई । राहें विठोबाचे पायीं ॥३॥ तुका म्हणे जीवा । नको सोडूं या केशवा ॥४॥
1442
घेईंन मी जन्म याजसाठीं देवा । तुझी चरणसेवा साधावया ॥१॥ हरिनामकीर्तन संतांचे पूजन । घालूं लोटांगण महाद्वारीं ॥ध्रु.॥ आनंदें निर्भर असों भलते ठायीं । सुखदुःख नाहीं चाड आम्हां ॥२॥ आणीक सायास न करीं न धरीं आस । होईंन उदास सर्व भावें ॥३॥ मोक्ष आम्हां घरीं कामारी ते दासी । होय सांगों तैसी तुका म्हणे ॥४॥
1443
घेऊं नये तैसें दान । ज्याचें धन अभिळाषी ॥१॥ तो ही येथें कामा नये । नर्का जाय म्हणोनि ॥ध्रु.॥ विकी स्नानसंध्या जप । करी तप पुढिलांचें ॥२॥ तुका म्हणे दांभिक तो । नर्का जातो स्वइच्छा ॥३॥
1444
घेऊनियां चक्र गदा । हा चि धंदा करी तो ॥१॥ भक्ता राखे पायापासीं । दुर्जनासी संहारी ॥ध्रु.॥ अव्यक्त तें आकारलें । रूपा आलें गुणवंत ॥२॥ तुका म्हणे पुरवी इच्छा । जया तैसा विठ्ठल ॥३॥
1445
घेतां आणिकांचा जीव । तेव्हां कींव कराना ॥१॥ आपलें तें वरदळ नेदा । हें गोविंदा कृपणता ॥ध्रु.॥ सेवा तरी इच्छा सांग । चोरिलें अंग साहेना ॥२॥ तुका म्हणे अरे धन्या । निसंतान्या विठोबा ॥३॥
1446
घेती पाण्यासी हुंबरी । त्यांचें समाधान करी ॥१॥ ऐशी गोपाळांची सवे । जाती तिकडे मागें धांवे ॥ध्रु.॥ स्थिरावली गंगा । पांगविली म्हणे उगा ॥२॥ मोहरी पांवा काठी । तुका म्हणे यांजसाठी ॥३॥
1447
घेसी तरी घेई संताची भेटी । आणीक ते गोष्टी नको मना ॥१॥ सर्वभावें त्यांचें देव भांडवल । आणीक ते बोल न बोलती ॥ध्रु.॥ करिसील तो करीं संतांचा सांगत । आणीक ते मात नको मना ॥२॥ बैससी तरी बैस संतां च मधीं । आणीक ते बुद्धी नको मना ॥३॥ जासी तरि जाई संतांचिया गांवां । होईंल विसावा तेथें मना ॥४॥ तुका म्हणे संत सुखाचे सागर । मना निरंतर धणी घेइ ॥५॥
1448
घोंगडियांचा पालट केला । मुलांमुलां आपुल्यांत ॥१॥ कान्होबा तो मी च दिसें । लाविलें पिसें संवगडियां ॥ध्रु.॥ तो बोले मी उगाच बैसें । आनारिसें न दिसे ॥२॥ तुका म्हणे दिलें सोंग । नेदी वेंग जाऊं देऊं ॥३॥
1449
घोंगडियांची एकी राशी । त्याचपाशीं तें ही होतें ॥१॥ माझियाचा माग दावा । केला गोवा उगवों द्या ॥ध्रु.॥ व्हावें ऐसें निसंतान । घेइन आन तुजपाशीं ॥२॥ तुका म्हणे लाहाण मोठा । सांड ताठा हा देवा ॥३॥
1450
घोंगडियास घातली मिठी । न सोडी साटी केली जीवें ॥१॥ हा गे चोर धरा धांवा कोणी । घरांत राहाटे चहूं कोणी ॥ध्रु.॥ नोळखवे म्यां धरिला हातीं । देह्यादिप माय लाविली वाती ॥२॥ न पावे धांवणें मारितो हाका । जनाचारीं तुका नागवला ॥३॥
1451
घोंगडें नेलें सांगों मी कोणा । दुबळें माझें नाणीत मना ॥१॥ पुढें तें मज न मिळे आतां । जवळी सत्ता दाम नाहीं ॥ध्रु.॥ सेटे महाजन ऐका कोणी । घोंगडियाची करा शोधणी ॥२॥ घोंगडियाचा करा बोभाट । तुका म्हणे जंव भरला हाट ॥३॥
1452
घोंटवीन लाळ ब्रम्हज्ञान्या हातीं । मुक्तां आत्मस्थिती सांडवीन ॥१॥ ब्रम्हभूत होते काया च कीर्तनीं । भाग्य तरी ॠणी देवा ऐसा ॥ध्रु.॥ तीर्थ भ्रमकासी आणीन आळस । कडु स्वर्गवास करिन भोग ॥२॥ सांडवीन तपोनिधा अभिमान । यज्ञा आणि दान लाजवीन ॥३॥ भक्तिभाग्यप्रेमा साधीन पुरुषार्थ । ब्रम्हींचा जो अर्थ निजठेवा ॥४॥ धन्य म्हणवीन येहे लोकीं लोकां । भाग्य आम्हीं तुका देखियेला ॥५॥
1453
घ्या रे भाईं प्या रे भाईं । कोणी कांहीं थोडें बहु ॥१॥ ये च हाटीं ये च हाटीं । बांधा गाठी पारखून ॥ध्रु.॥ वेच आहे वेच आहे । सरलें पाहे मग खोटें ॥२॥ उघडें दुकान उघडें दुकान । रात्री जाली कोण सोडी मग ॥३॥ तुका म्हणे अंतकाळीं । जाती टाळीं बैसोनि ॥४॥
1454
घ्या रे भोंकरें भाकरी । दहींभाताची सिदोरी । ताक सांडीं दुरी । असेल तें तयापें ॥१॥ येथें द्यावें तैसें घ्यावे । थोडें परी निरें व्हावें । सांगतों हे ठावें । असों द्या रे सकळां ॥ध्रु.॥ माझें आहे तैसें पाहे । नाहीं तरी घरा जाये । चोरोनियां माये । नवनीत आणावें ॥२॥ तुका म्हणे घरीं । माझें कोणी नाहीं हरी । नका करूं दुरी । मज पायां वेगळें ॥३॥
1455
घ्या रे लुटी प्रेम सुख । फेडा आजि धणी । चुकला तो मुकला । जाली वेरझार हाणी ॥१॥ घाला घातला वैकुंठीं । करूनियां जीवें साटी । पुरविली पाठी । वैष्णवीं काळाची ॥ध्रु.॥ अवघें आणिलें अंबर । विठोसहित तेथें धुर । भेदूनि जिव्हार । नामबाणीं धरियेला ॥२॥ संचित प्रारब्ध क्रियमाण । अवघीं जालीं गहन । केलीं पापपुण्यें । देशधडी बापुडीं ॥३॥ आनंदें गर्जती निर्भर । घोष करिती निरंतर । कांपती असुर । वीर कवणा नांगवती ॥४॥ जें दुर्लभ ब्रम्हादिकां । आजि सांपडलें फुका । घ्या रे म्हणे तुका । सावचित्त होउनी ॥५॥
1456
घ्यावी तरी घ्यावी उदंड चि सेवा । द्यावें तरी देवा उदंड चि ॥१॥ ऐसीं कैंचीं आम्ही पुरतीं भांडवलें । आल्या करीं बोलें समाधान ॥ध्रु.॥ व्हावें तरीं व्हावें बहुत चि दुरी । आलिया अंतरीं वसवावें ॥२॥ तुका म्हणे तुझें सख्यत्व आपणीं । अससील ॠणी आवडीचा ॥३॥
1457
चंचळीं चंचळ निश्चळीं निश्चळ । वाजवी खळाळ उदकासी ॥१॥ सोपें वर्म परि मन नाहीं हातीं । हा हा भूत चित्ती भ्रम गाढा ॥ध्रु.॥ रविबिंब नाहीं तुटत उदका । छायेची ते नका सरी धरूं ॥२॥ तुका म्हणे भय धरी रज्जूसाटीं । नाहीं साच पोटीं कळलें तों ॥३॥
1458
चंदन तो चंदनपणें । सहज गुणसंपन्न ॥१॥ वेधलिया धन्य जाती । भाग्यें होती सन्मुख ॥ध्रु.॥ परिसा अंगीं परिसपण । बाणोनि तें राहिलें ॥२॥ तुका म्हणे कैंची खंती । सुजाती ते ठाकणी ॥३॥
1459
चंदनाचे गांवीं सर्पांच्या वसति । भोगिते ते होती द्वीपांतरीं ॥१॥ एका ओझें एका लाभ घडे देवा । संचिताचा ठेवा वेगळाला ॥ध्रु.॥ क्षीराची वसति अशुद्ध सेवावें । जवळी तें जावें भोगें दुरी ॥२॥ तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड । त्याहुनि दगड बरे देवा ॥३॥
1460
चंदनाचे हात पाय ही चंदन । परिसा नाहीं हीन कोणी अंग ॥१॥ दीपा नाहीं पाठीं पोटीं अंधकार । सर्वांगें साकर अवघी गोड ॥ध्रु.॥ तुका म्हणे तैसा सज्जनापासून । पाहातां अवगुण मिळे चि ना ॥२॥
1461
चंदनाच्या वासें धरितील नाक । नावडे कनक न घडे हें ॥१॥ साकरेसी गोडी सारिखी सकळां । थोरां मोट्या बाळां धाकुटियां ॥२॥ तुका म्हणे माझें चित्त शुद्ध होतें । तरि का निंदितें जन मज ॥३॥
1462
चक्रफेरीं गळीं गळा । होता गोवियेला माळा ॥१॥ फुटोनियां गेला कुंभ । जालों निष्काम स्वयंभ ॥ध्रु.॥ धरित चि नाहीं थारा । वेठी भ्रमण खोंकरा ॥२॥ तुका म्हणे कौतुक कोडें । आगी काय जाणे मढें ॥३॥
1463
चतुर मी जालों आपुल्या भोंवता । भावेंविण रिता फुंज अंगीं ॥१॥ आतां पुढें वांयां जावें हें तें काई । कामक्रोधें ठायीं वास केला ॥ध्रु.॥ गुणदोष आले जगाचे अंतरा । भूताच्या मत्सरावरी बुद्धि ॥२॥ तुका हमणे करूं उपदेश लोकां । नाहीं जालों एका परता दोषा ॥३॥
1464
चत्ति तें चिंतन कल्पनेची धांव । जे जे वाढे हांव इंद्रियांची ॥१॥ हात पाव दिसे शरीर चालतां । नावें भेद सत्ता जीवाची ते ॥ध्रु.॥ रवीचिये अंगीं प्रकाशक कळा । वचनें निराळा भेद दिला ॥२॥ तुका म्हणे माप वचनाच्या अंगीं । मौन्य काय रंगीं निवडावें ॥३॥
1465
चत्तिाचा चाळक । त्याचें उभय सूत्र एक ॥१॥ नाचवितें नानाछंदें । सुखें आपुल्या विनोदें ॥ध्रु.॥ चंद्र कमळणी । नाहीं धाडीत सांगोनि ॥२॥ तुका म्हणे उठी । लोह चुंबकाचे दृष्टी ॥३॥
1466
चत्तिाचें बांधलें जवळी तें वसे । प्रकाशीं प्रकाशे सर्वकाळ ॥१॥ अंतरीं वसावी उत्तम ते भेटी । होऊं कांहीं तुटी न सके चि ॥ध्रु.॥ ब्रम्हांड कवळे आठवणेसाटीं । धरावा तो पोटीं वाव बरा ॥२॥ तुका म्हणे लाभ घरिचिया घरीं । प्रेमतंतु दोरी न सुटतां॥३॥
1467
चरणाचा महिमा । हा तो तुझ्या पुरुषोत्तमा ॥१॥ अंध पारखी माणिकें । बोलविशी स्पष्ट मुकें ॥ध्रु.॥ काय नाहीं सत्ता । हातीं तुझ्या पंढरीनाथा ॥२॥ तुका म्हणे मूढा । मज चेष्टविलें जडा ॥३॥
1468
चरणीं नमन सद्ग‍ूच्या पूर्ण । नित्य हरिगुण गाऊं सदा ॥१॥ गोवर्धन जेणें नखीं हो धरिला । काळ्या नाथिला महाबळी ॥ध्रु.॥ ऐसे हरिगुण गातो वाचेवरि । पतितासी तारी जनार्दन ॥२॥ तुका म्हणे हें चि सज्जना जीवन । वाचेसी स्मरण गोविंदाचें ॥३॥
1469
चरफडें चरफड शोकें शोक होये । कार्यमूळ आहे धीरापाशीं ॥१॥ कल्पतसे मज ऐसें हें पाहातां । करावी ते चिंता मिथ्या खोटी ॥ध्रु.॥ न चुके होणार सांडिल्या शूरत्वा । फुकट चि सत्वा होइल हानी ॥२॥ तुकयाबंधु म्हणे दिल्या बंद मना । वांचूनि निधाना न पवीजे ॥३॥
1470
चला आळंदीला जाऊं । ज्ञानदेवा डोळां पाहूं ॥१॥ होतिल संताचिया भेटी । सुखाचिया सांगों गोष्टी ॥ध्रु.॥ ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर । मुखीं म्हणतां चुकती फेर ॥२॥ तुम्हां जन्म नाहीं एक । तुका म्हणे माझी भाक ॥३॥
1471
चला जाऊं रे सामोरे । पुढें भेटों विठ्ठल धुरे ॥१॥ तुका आनंदला मनीं । कैसा जातो लोटांगणीं । फेडावया धणी । प्रेमसुखाची आजि ॥ध्रु.॥ पुढें आले कृपावंत । मायबाप साधुसंत ॥२॥ आळंगिला बाहीं । ठेविला विठोबाचे पायीं ॥३॥
1472
चला पंढरीसी जाऊं । रखुमादेवीवरा पाहूं ॥१॥ डोळे निवतील कान । मना तेथें समाधान ॥ध्रु.॥ संतां महंतां होतील भेटी । आनंदें नाचों वाळवंटीं ॥२॥ तें तीर्थांचे माहेर । सर्वसुखाचें भांडार ॥३॥ जन्म नाहीं रे आणीक । तुका म्हणे माझी भाक ॥४॥
1473
चला बाई पांडुरंग पाहूं वाळवंटीं । मांडियेला काला भोंवती गोपाळांची दाटी ॥१॥ आनंदें कवळ देती एकामुखीं एक । न म्हणती सान थोर अवघीं सकळिक ॥ध्रु.॥ हमामा हुंबरी पांवा वाजविती मोहरी । घेतलासे फेर माजी घालुनियां हरी ॥२॥ लुब्धल्या नारी नर अवघ्या पशुयाती । विसरलीं देहभाव शंका नाहीं चित्तीं ॥३॥ पुष्पाचा वरुषाव जाली आरतियांची दाटी । तुळसी गुंफोनियां माळा घालितील कंठीं ॥४॥ यादवांचा राणा गोपीमनोहर कान्हा । तुका म्हणे सुख वाटे देखोनियां मना ॥५॥
1474
चला वळूं गाई । बैसों जेऊं एके ठायीं ॥१॥ बहु केली वणवण । पायपिटी जाला सिण ॥ध्रु.॥ खांदीं भार पोटीं भुक । काय खेळायाचें सुख ॥२॥ तुका म्हणे धांवे । मग अवघें बरवें ॥३॥
1475
चला वळूं गाईं । दूर अंतरल्या भाईं ॥१॥ खेळ खेळतां जाला शीण । कोण करी वणवण ॥ध्रु.॥ गाईं हकारी कान्हया । म्हणोनि लागती ते पायां ॥२॥ तुका म्हणे द्यावें । नाम संकीर्तन बरवें ॥३॥
1476
चवदा भुवनें जयाचिये पोटीं । तो चि आम्हीं कंठीं साठविला ॥१॥ काय एक उणें आमुचिये घरीं । वोळगती द्वारीं रिद्धिसिद्धी ॥ध्रु.॥ असुर जयानें घातले तोडरीं । तो आम्हांसि जोडी कर दोन्ही ॥२॥ रूप नाहीं रेखा जयासि आकार । आम्हीं तो साकार भक्तीं केला ॥३॥ अनंत ब्रम्हांडें जयाचिये अंगीं । समान तो मुंगी आम्हासाठीं ॥४॥ रिद्धिसिद्धी सुखें हाणितल्या लाता । तेथें या प्राकृता कोण मानी ॥५॥ तुका म्हणे आम्ही देवाहूनि बळी । जालों हे निराळी ठेवुनि आशा ॥६॥
1477
चवदा भुवनें लोक तिन्हीं दाढे जो कवळी । संपुष्ट तो संबळीमध्यें देखा ॥१॥ उत्पत्तिसंहारकरिता जो पाळण । तो नंदा नंदन म्हणवीतसे ॥ध्रु.॥ असुर तोडरी दैत्यांचा काळ । जाला द्वारपाळ बळीचा तो ॥२॥ लक्षुमीचा स्वामी क्षीराच्या सागरा । उच्छिष्टकवळा पसरी मुख ॥३॥ तुकयाबंधु म्हणे चतुरांचा रावो । भावें तो पाहा हो केला वेडा ॥४॥
1478
चहुंकडूनियां येती ते कलोळ । सभोंवते जाळ जवळि आले ॥१॥ सकुमार मूर्ति श्रीकृष्ण धाकुटी । घोंगडी आणि काठी खांद्यावरि ॥ध्रु.॥ लहान लेंकरूं होत ते सगुण । विक्राळ वदन पसरिलें ॥२॥ चाभाड तें एक गगनीं लागलें । एक तें ठेविलें भूमीवरि ॥३॥ तये वेळे अवघे गोपाळ ही भ्याले । तुकें ही लपालें भेऊनियां ॥४॥
1479
चहूं आश्रमांचे धर्म । न राखतां जोडे कर्म ॥१॥ तैसी नव्हे भोळी सेवा । एक भाव चि कारण देवा ॥ध्रु.॥ तपें इंद्रियां आघात । क्षणें एका वाताहात ॥२॥ मंत्र चळे थोडा । तरि धड चि होय वेडा ॥३॥ व्रतें करितां सांग । तरी एक चुकतां भंग ॥४॥ धर्म सत्व चि कारण । नाहीं तरी केला सिण ॥५॥ भूतदयेसि आघात । उंचनिच वाताहात ॥६॥ तुका म्हणे दुजें । विधिनिषेधाचें ओझें ॥७॥
1480
चांगला तरी पूर्णकाम । गोड तरी याचें चि नाम । दयाळ तरी अवघा धर्म । भला तरी दासा श्रम होऊं नेदी ॥१॥ उदार तरी लक्ष्मीयेसी । जुंझार तरी कळिकाळासी । चतुर तरी गुणांची च रासी । जाणता तयासी तो एक ॥ध्रु.॥ जुनाट तरी बहु काळा । न कळे जयाची लीळा । नेणता गोवळीं गोवळा । लाघवी अवळाभुलवणा ॥२॥ गांढ्या तरी भावाचा अंकित । बराडी तरी उच्छिष्टाची प्रीत । ओंगळ तरी कुब्जेशीं रत । भ्याड अनंत बहु पापा ॥३॥ खेळतो येणें चि खेळावा । नट तो येणें चि आवगावा । लपोनि जीवीं न कळे जीवा । धरितां देवा नातुडेसी ॥४॥ उंच तरी बहुत चि उंच । नीच तरी बहुत चि नीच । तुका म्हणे बोलिलों साच । नाहीं अहाच पूजा केली ॥५॥
1481
चांगलें नाम गोमटें रूप । निवती डोळे हरती ताप । विठ्ठल विठ्ठल हा जप । प्रगट स्वल्प । अति सार ॥१॥ शस्त्र हे निर्वाणींचा बाण । निकट समय अवसान । कोठें योजेल दश दान । खंडी नारायण दुःख चिंतनें ॥ध्रु.॥ सकळ श्रेष्ठांचें मत । पावे सिद्धी पाववी अनंत । म्हणोनि व्हावें शरणागत । आहे उचित एवढें चि ॥२॥ म्हणोनि रुसलों संसारा । सर्प विखार हा पांढरा । तुजशीं अंतर रे दातारा । या चि दावेदारानिमत्ति ॥३॥ येणें मज भोगविल्या खाणी । नसतां छंद लाविला मनीं । माजलों मी माझे भ्रमणीं । जाली बोडणी विटंबना ॥४॥ पावलों केलियाचा दंड । खाणी भोगिविल्या उदंड । आतां केला पाहिजे खंड । तुका दंडवत घाली देवा ॥५॥
1482
चाकरीवांचून । खाणें अनुचित वेतन ॥१॥ धणी काढोनियां निजा । करील ये कामाची पूजा ॥ध्रु.॥ उचितावेगळें । अभिलाषें तोंड काळें ॥२॥ सांगे तरी तुका । पाहा लाज नाहीं लोकां ॥३॥
1483
चाड अनन्याची धरी नारायण । आपणासमान करी रंका ॥१॥ रंक होती राजे यमाचिये घरीं । आचरणें बरी नाहीं म्हणवोनि ॥२॥ नसंपडे इंद्रचंद्रब्रम्हादिकां । अभिमानें एका तळिमात्रें ॥३॥ तळिमात्र जरी होय अभिमान । मेरु तो समान भार देवा ॥४॥ भार पृथिवीचा वाहिला सकळ । जड होती खळ दुष्ट लोक ॥५॥ दुष्ट अक्त जे निष्ठ‍ मानसीं । केली हे तयांसी यमपुरी ॥६॥ यमदूत त्यांसी करिती यातना । नाहीं नारायणा भजिजेलें ॥७॥ जे नाहीं भजले एका भावें हरी । तयां दंड करी यमधर्म ॥८॥ यमधर्म म्हणे तयां दोषियांसी । कां रे केशवासी चुकलेती ॥९॥ चुकलेती कथा पुराणश्रवण । होते तुम्हां कान डोळे मुख ॥१०॥ कान डोळे मुख संतांची संगति । न धरा च चित्ती सांगितलें ॥११॥ सांगितलें संतीं तुम्हां उगवूनि । गर्भाद येऊनि यमदंड ॥१२॥ दंडूं आम्हीं रागें म्हणे यमधर्म । देवा होय श्रम दुर्जनाचा ॥१३॥ दुर्जनाचा याणें करूनि संहार । पूर्णअवतार रामकृष्ण ॥१४॥ रामकृष्णनामें रंगले जे नर । तुका म्हणे घर वैकुंठी त्यां ॥१५॥
1484
चातुर्याच्या अनंतकळा । सत्या विरळा जाणत ॥१॥ हांसत्यासवें हांसे जन । रडतां भिन्न पालटे ॥ध्रु.॥ जळो ऐसे वांजट बोल । गुणां मोल भूस मिथ्या ॥२॥ तुका म्हणे अंधळ्याऐसें । वोंगळ पिसें कौतुक ॥३॥
1485
चारी वेद जयासाटीं । त्याचें नाम धरा कंठीं ॥१॥ न करीं आणीक साधनें । कष्टसी कां वांयांविण ॥ध्रु.॥ अठरा पुराणांचे पोटीं । नामाविण नाहीं गोठी ॥२॥ गीता जेणें उपदेशिली । ते ही विटेवरी माउली ॥३॥ तुका म्हणे सार धरीं । वाचे हरिनाम उच्चारीं ॥४॥
1486
चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणिती । प्रत्यक्ष ये मूर्ति विठोबाची ॥१॥ चहुंयुगांचें हें साधन साधिलें । अनुभवा आलें आपुलिया ॥२॥ एवढें करूनि आपण निराळा । प्रत्यक्ष डोळां दाखविलें ॥३॥ दावुनि सकळ प्रमाणाच्या युक्ति । जयजयकार करिती अवघे भक्त ॥४॥ भक्ति नवविधा पावली मुळची । जनार्दननामाची संख्या जाली ॥५॥ नवसें ओंव्या आदरें वाचितां । त्याच्या मनोरथा कार्यसिद्धि ॥६॥ सीमा न करवे आणीक ही सुखा। तुका म्हणे देखा पांडुरंगा ॥७॥
1487
चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणिती । बांधवी तो हातीं गौळणीच्या ॥१॥ गौळणिया गळा बांधिती धारणीं । पायां चक्रपाणी लागे तया ॥२॥ तयाघरीं रिघे चोरावया लोणी । रितें पाळतूनि शिरे माजी ॥३॥ माजी शिरोनियां नवनीत खाये । कवाड तें आहे जैसें तैसें ॥४॥ जैसा तैसा आहे अंतर्बाह्यात्कारीं । म्हणउनि चोरी नसंपडे ॥५॥ नसंपडे तयां करितां खटपट । वाउगे बोभाट वर्माविण ॥६॥ वर्म जाणती त्या एकल्या एकटा । बैसतील वाटा निरोधूनि ॥७॥ निवांत राहिल्या निःसंग होऊनि । निश्चळि ज्या ध्यानीं कृष्णध्यान ॥८॥ न ये क्षणभरी योगियांचे ध्यानीं । धरिती गौळणी भाविका त्या ॥९॥ भाविका तयांसी येतो काकुलती । शाहाण्या मरती नसंपडे ॥१०॥ नलगे वेचावी टोळी धनानांवें । तुका म्हणें भावें चाड एका ॥११॥
1488
चाल केलासी मोकळा । बोल विठ्ठल वेळोवेळां ॥१॥ तुज पापचि नाहीं ऐसें । नाम घेतां जवळीं वसे ॥ध्रु.॥ पंच पातकांच्या कोडी । नामें जळतां न लगे घडी ॥२॥ केलीं मागें नको राहों । तुज जमान आम्ही आहों ॥३॥ करीं तुज जीं करवती । आणिक नामें घेऊं किती ॥४॥ तुका म्हणे काळा । रीग नाहीं निघती ज्वाळा ॥५॥
1489
चाल घरा उभा राहें नारायणा । ठेवूं दे चरणांवरि माथा ॥१॥ वेळोवेळां देई क्षेमआलिंगन । वरी अवलोकन कृपादृष्टी ॥ध्रु.॥ प्रक्षाळूं दे पाय बैसें माजघरीं । चित्त स्थिर करीं पांडुरंगा ॥२॥ आहे त्या संचितें करवीन भोजन । काय न जेवून करिसी आतां ॥३॥ करुणाकरें नाहीं कळों दिलें वर्म । दुरी होतां भ्रम कोण वारी ॥४॥ तुका म्हणे आतां आवडीच्या सत्ता । बोलिलों अनंता करवीन तें ॥५॥
1490
चाल माझ्या राघो । डोंगरीं दिवा लागो ॥ध्रु.॥ घर केलें दार केलें । घरीं नाहीं वरो । सेजारणी पापिणीचीं पांच पोरें मरो ॥१॥ घरीं पांच पोरें । तीं मजहुनि आहेत थोरें । पांचांच्या बळें । खादलीं बावन केळें ॥२॥ घर केलें दार केलें । दुकान केला मोटा । पाटाची राणी धांगडधिंगा तिचा मोटा ॥३॥ दुकान केला मोटा । तर पदरीं रुका खोटा । हिजडा म्हणसी जोगी । तर सोळा सहस्र भोगी । तुका म्हणे वेगीं । तर हरि म्हणा जगीं ॥४॥
1491
चालवणें काय । ऐसें अंगे माझे माय ॥१॥ धांव धांव लवलाहें । कंठीं प्राण वाट पाहे ॥ध्रु.॥ पसरूनि कर । तुज चालिलों समोर ॥२॥ देसील विसांवा । तुका म्हणे ऐशा हांवा ॥३॥
1492
चालावा पंथ तो पाविजे त्या ठाया । ऐकिल्या वांयां वारता त्या ॥१॥ ऐका जी वोजे पडतसें पायां । भावाचि तें जायावाट नव्हे ॥ध्रु.॥ व्याली कुमारीचा अनुभवें अनुभव । सांगतां तो भाव येत नाहीं ॥२॥ तुका म्हणे येथें पाहिजे आरालें । बिंबीं निवळलें तरि भासे ॥३॥
1493
चालिती आड वाटा । आणिकां द्राविती जे नीटा ॥१॥ न मनीं तयांचे उपकार । नाहीं जोडा तो गंव्हार ॥ध्रु.॥ विष सेवूनि वारी मागें । प्राण जातां जेणें संगें ॥२॥ बुडतां हाक मारी । ठाव नाहीं आणिकां वारी ॥३॥ तुका म्हणे न करीं हिंका । गुण घेऊन अवगुण टाका ॥४॥
1494
चालिले सोबती । काय मानिली निश्चिती ॥१॥ काय करिसी एकला । काळ सन्निध पातला ॥ध्रु.॥ कांहीं सावध तो बरवा । करीं आपुला काढावा ॥२॥ चालिले अगळे । हळू च कान केश डोळे ॥३॥ वोसरले दांत । दाढा गडबडल्या आंत ॥४॥ एकली तळमळ । जिव्हा भलते ठायीं लोळे ॥५॥ तुका म्हणे यांणीं । तुझी मांडिली घालणी ॥६॥
1495
चालिलें न वाटे । गाऊनियां जातां वाटे ॥१॥ बरवा वैष्णवांचा संग । येतो सामोरा श्रीरंग ॥ध्रु.॥ नाहीं भय आड । कांहीं विषमांचें जड ॥२॥ तुका म्हणे भिक्त । सुखरूप आदीं अंतीं ॥३॥
1496
चाले हें शरीर कोणाचिये सत्ते । कोण बोलवितें हरीविण ॥१॥ देखवी दाखवी एक नारायण । तयाचें भजन चुकों नका ॥ध्रु.॥ मानसाची देव चालवी अहंता । मी चि एक कर्त्ता म्हणों नये ॥२॥ वृक्षाचीं हीं पानें हाले त्याची सत्ता । राहिली अहंता मग कोठें ॥३॥ तुका म्हणे विठो भरला सबाहीं । तया उणें कांहीं चराचरीं ॥४॥
1497
चालें दंडवत घालीं नारायणा । आपुल्या कल्याणा लागूनियां ॥१॥ बैसविला पदीं पुत्र राज्य करी । पिता वाहे शिरीं आज्ञा त्याची ॥२॥ तुका म्हणे आहे ठायींचा चि मान । आतां अनुमान कायसा तो ॥३॥
1498
चावळलें काय न करी बडबड । न म्हणे फिकें गोड भुकेलें तें ॥१॥ उमजल्याविण न धरी सांभाळ । असो खळखळ जनाची हे ॥ध्रु.॥ गरज्या न कळे आपुलिया चाडा । करावी ते पीडा कोणा काईं ॥२॥ तुका म्हणे भोग भोगितील भोगें । संचित तें जोगें आहे कोणा ॥३॥
1499
चाहाडाची माता । व्यभिचारीण तत्वता ॥१॥ पाहे संतांचें उणें । छिद्र छळावया सुनें ॥ध्रु.॥ जेणों त्याच्या वाचें । कांहीं सोडिलें गाठीचें ॥२॥ तुका म्हणे घात । व्हावा ऐसी जोडी मात ॥३॥
1500
चिंतनाची जोडी । हा चि लाभ घडोघडी ॥१॥ तुम्ही वसूनि अंतरीं । मज जागवा निर्धारीं ॥ध्रु.॥ जाय जेथें मन । आड घाला सुदर्शन ॥२॥ तुका म्हणे भोजें । नाचें हो ऐसें न लजें ॥३॥
1501
चिंतनासी न लगे वेळ । सर्व काळ करावें ॥१॥ सदा वाचे नारायण । तें वदन मंगळ ॥ध्रु.॥ पढिये सर्वोत्तमा भाव । येथें वाव पसारा ॥२॥ ऐसें उपदेशी तुका । अवघ्या लोकां सकळां ॥३॥
1502
चिंतनें अचिंत राहिलों निश्चळ । तें चि किती काळ वाढवावें ॥१॥ अबोल्याचा काळ आतां ऐशावरी । वचनाची उरी उरली नाहीं ॥ध्रु.॥ करूं आला तों तों केला लवलाहो । उरों च संदेहे दिला नाहीं ॥२॥ तुका म्हणे मोह परते चि ना मागें । म्हणउनि त्यागें त्याग जाला ॥३॥
1503
चिंतनें सरे तो धन्य काळ । सकळ मंगळ मंगळांचें ॥१॥ संसारसिंधु नाहीं हरिदासा । गर्भवास कैसा नेणती ते ॥ध्रु.॥ जनवन ऐसें कृपेच्या सागरें । दाटला आभारें पांडुरंग ॥२॥ तुका म्हणे देवा भक्तांचे बंधन । दाखविलें भिन्न परी एक ॥३॥
1504
चिंतले पावलीं जयां कृष्णभेटी । एरवीं ते आटी वांयांविण ॥१॥ वासना धरिती कृष्णाविणें कांहीं । सीण केला तिहीं साधनांचा ॥२॥ चाळविले डंबें एक अहंकारें । भोग जन्मांतरें न चुकती ॥३॥ न चुकती भोग तपें दानें व्रतें । एका त्या अनंतेंवांचूनियां॥४॥ चुकवुनि जन्म देईंल आपणा । भजा नारायणा तुका म्हणे ॥५॥
1505
चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी । प्रवेश भीतरी केला देवें ॥१॥ देव आला घरा नंदाचिया गांवा । धन्य त्याच्या दैवा दैव आलें ॥२॥ आलें अविनाश धरूनि आकार । दैत्याचा संहार करावया ॥३॥ करावया क्तजनाचें पालण । आले रामकृष्ण गोकुळासी ॥४॥ गोकुळीं आनंद प्रगटलें सुख । निर्भर हे लोक घरोघरीं ॥५॥ घरोघरीं जाला लक्ष्मीचा वास । दैन्यदाळिद्रास त्रास आला ॥६॥ आला नारायण तयांच्या अंतरा । दया क्षमा नरा नारीलोकां ॥७॥ लोकां गोकुळींच्या जालें ब्रम्हज्ञान । केलियावांचून जपतपें ॥८॥ जपतपें काय करावीं साधनें । जंवें नारायणें कृपा केली ॥९॥ केलीं नारायणें आपुलीं अंकित । तो चि त्यांचें हित सर्व जाणे ॥१०॥ सर्व जाणे एक विष्णु साच खरा । आणीक दुसरा नाहींनाहीं ॥११॥ नाहीं भक्ता दुजें तिहीं त्रिभुवनीं । एका चक्रपाणीवांचूनियां ॥१२॥ याच्या सुखसंगें घेती गर्भवास । तुका म्हणे आस त्यजूनियां ॥१३॥
1506
चिंता नाहीं गांवीं विष्णुदासांचिये । घोष जयजयकार सदा ॥१॥ नारायण घरीं सांठविलें धन । अवघे चि वाण तया पोटीं ॥ध्रु.॥ सवंग सकळां पुरे धणीवरी । सेवावया नारी नर बाळा ॥२॥ तुका म्हणे येणें आनंदी आनंदु । गोविंदें गोविंदु पिकविला ॥३॥
1507
चिंतामणिदेवा गणपतीसी आणा । करवावें भोजना दुजे पात्रीं ॥१॥ देव म्हणती तुक्या एवढी कैची थोरी । अभिमानाभीतरी नागवलों ॥ध्रु.॥ वाडवेळ जाला सिळे जालें अन्न । तटस्थ ब्राम्हण बैसलेती ॥२॥ तुका म्हणे देवा तुमच्या सुकृतें । आणीन त्वरित मोरयासी ॥३॥
1508
चिंतिलें तें मनिंचें जाणें । पुरवी खुणे अंतरींचें ॥१॥ रात्री न कळे दिवस न कळे । अंगीं खेळे दैवत हें ॥ध्रु.॥ नवसियाचे नव रस । भोगी त्यास भिन्न नाहीं ॥२॥ तुका म्हणे सम चि देणें । समचरण उभा असे ॥३॥
1509
चित मिले तो सब मिले । नहिं तो फुकट संग । पानी पाथर येक ही ठोर । कोरनभिगे अंग ॥१॥
1510
चितसुं चित जब मिले । तब तनु थंडा होये । तुका मिलनां जिन्होसुं । ऐसा विरला कोये ॥१॥
1511
चित्त गुंतलें प्रपंचें । जालें वेडें ममतेचें ॥१॥ आतां सोडवीं पांडुरंगा । आलें निवारीं तें आंगा ॥ध्रु.॥ गुंतली चावटी । नामीं रूपीं जाली तुटी ॥२॥ तुका म्हणे चाली । पुढें वाट खोळंबली ॥३॥
1512
चित्त ग्वाही तेथें लौकिकाचें काई । स्वहित तें ठायीं आपणापें ॥१॥ मनासी विचार तो चि साच भाव । व्यापक हा देव अंतर्बाहीं ॥ध्रु.॥ शुद्ध भावा न लगे सुचावा परिहार । उमटे साचार आणिके ठायीं ॥२॥ भोगित्यासी काज अंतरीचें गोड । बाहिरल्या चाड नाहीं रंगें ॥३॥ तुका म्हणे भाव शुद्ध हें कारण । भाट नारायण होईल त्यांचा ॥४॥
1513
चित्त तुझ्या पायीं । ठेवुनि जालों उतराईं ॥१॥ परि तूं खोटा केशीराजा । अंतपार न कळे तुझा ॥ध्रु.॥ आम्ही सर्वस्वें उदार । तुज देऊनियां धीर ॥२॥ इंद्रियांची होळी । संवसार दिला बळी ॥३॥ न पडे विसर । तुझा आम्हां निरंतर ॥४॥ प्रेम एकासाटी । तुका म्हणे न वेचे गांठी ॥५॥
1514
चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती । व्याघ्र हे न खाती सर्प तया ॥१॥ विष तें अमृत अघातें हित । अकर्तव्य नीत होय त्यासी ॥ध्रु.॥ दुःख तें देईंल सर्व सुख फळ । होतील शीतळ अग्निज्वाळा ॥२॥ आवडेल जीवां जीवाचे परी । सकळां अंतरीं एक भाव ॥३॥ तुका म्हणे कृपा केली नारायणें । जाणियेते येणें अनुभवें ॥४॥
1515
चित्त समाधानें । तरी विष वाटे सोनें ॥१॥ बहु खोटा अतिशय । जाणां भले सांगों काय ॥ध्रु.॥ मनाच्या तळमळें । चंदनें ही अंग पोळे ॥२॥ तुका म्हणे दुजा । उपचार पीडा पूजा ॥३॥
1516
चित्ता ऐसी नको देऊं आठवण । जेणें देवाचे चरण अंतरे तें ॥१॥ आलिया वचनें रामनामध्वनि । ऐकावीं कानीं ऐसीं गोडें ॥ध्रु.॥ मत्सराचा ठाव शरीरीं नसावा । लाभेंविण जीवा दुःख देतो ॥२॥ तुका म्हणे राहे अंतर शीतळ । शांतीचें तें बळ क्षमा अंगीं ॥३॥
1517
चित्ता मिळे त्याचा संग रुचिकर । क्षोभवितां दूर तों चि भलें ॥१॥ ऐसी परंपरा आलीसे चालत । भलत्याची नीत त्यागावरी ॥ध्रु.॥ हो कां पिता पुत्र बंधु कोणी तेही । विजाति संग्रहीं धरूं नये ॥२॥ तुका म्हणे सत्य पाळावें वचन । अन्यथा आपण करूं नये ॥३॥
1518
चित्ती घेऊनियां तू काय देसी । ऐसें मजपासीं सांग आधीं ॥१॥ तरि च पंढरिराया करिन साटोवाटी । नेघें जया तुटी येईंल तें ॥ध्रु.॥ रिद्धिसिद्धि कांहीं दाविसी अभिळास । नाहीं मज आस मुक्तीची ही ॥२॥ तुका म्हणे तुझें माझें घडे तर । भक्तीचा भाव रे देणें घेणें ॥३॥
1519
चित्ती नाहीं आस । त्याचा पांडुरंग दास ॥१॥ असे भक्तांचिये घरीं । काम न संगतां करी ॥ध्रु.॥ अनाथाचा बंधु । असे अंगीं हा संबंधुं ॥२॥ तुका म्हणे भावें । देवा सत्ता राबवावें ॥३॥
1520
चित्तीं तुझे पाय डोळां रूपाचें ध्यान । अखंड मुखीं नाम वर्णावे गुण ॥१॥ हें चि एक तुम्हां देवा मागणें दातारा । उचित तें करा माझा भाव जाणूनि ॥ध्रु.॥ खुंटली जाणींव माझें बोलणें आतां । करूं यावी तैसी करावी बाळकाची चिंता ॥२॥ तुका म्हणे आतां नको देऊं अंतर । न कळे पुढें काय बोलों विचार ॥३॥
1521
चित्तीं धरीन मी पाउलें सकुमारें । सकळ बिढार संपत्तीचें ॥१॥ कंठीं धरिन मी नाम अमृताची वल्ली । होईंल राहिली शीतळ तनु ॥ध्रु.॥ पाहेन श्रीमुख साजिरें सुंदर । सकळां अगर लावण्यांचें ॥२॥ करिन अंगसंग बाळकाचे परी । बैसेन तों वरी नुतरीं कडिये ॥३॥ तुका म्हणे हा केला तैसा होय । धरिली मनें सोय विठोबाची ॥४॥
1522
चित्तीं नाहीं तें जवळीं असोनि काय । वत्स सांडी माय तेणें न्यायें ॥१॥ प्रीतीचा तो वायु गोड लागे मात । जरी जाय चित्त मिळोनियां ॥२॥ तुका म्हणे अवघें फिकें भावाविण । मीठ नाहीं अन्न तेणें न्यायें ॥३॥
1523
चित्तीं बैसलें चिंतन । नारायण नारायण ॥१॥ न लगे गोड कांहीं आतां । आणीक दुसरें सर्वथा ॥ध्रु.॥ हरपला द्वैतभाव । तेणें देह जाला वाव ॥२॥ तुकयाबंधु म्हणे आम्ही । जालों निष्काम ये कामीं ॥३॥
1524
चिन्हें उमटताती अंगीं । शकुना जोगीं उत्तम ॥१॥ आठवला बापमाय । येइल काय मूळ नेणों ॥ध्रु.॥ उत्कंठित जालें मन । ते चि खुण तेथींचि ॥२॥ तुका म्हणे काम वारीं । आळस घरीं करमेना ॥३॥
1525
चिरगुटें घालूनि वाढविलें पोट । गर्‍हवार बोभाट जनामध्यें ॥१॥ लटिके चि डोहळे दाखवी प्रकार । दुध स्तनीं पोर पोटीं नाहीं ॥२॥ तुका म्हणे अंतीं वांज चि ते खरी । फजिती दुसरी जनामध्यें ॥३॥
1526
चुंबळीचा करी चुंबळीशीं संग । अंगीं वसे रंग क्रियाहीन ॥१॥ बीजा ऐसें फळ दावी परिपाकीं । परिमळ लौकिकीं जाती ऐसा ॥ध्रु.॥ माकडाच्या गळां रत्न कुळांगना । सांडूनियां सुना बिदी धुंडी ॥२॥ तुका म्हणे ऐसा व्याली ते गाढवी । फजिती ते व्हावी आहे पुढें ॥३॥
1527
चुकलिया आम्हां करितसां दंड । हाकासी कां खंड पांडुरंगा ॥१॥ चाळविलीं एकें रिद्धिसिद्धीवरी । तैसा मी भिकारी नव्हें देवा ॥ध्रु.॥ कां मी येथें गुंतों मांडूनि पसारा । मागुता दातारा दंभासाटीं ॥२॥ केलें म्यां जतन आपुलें वचन । ठायींचें धरून होतों पोटीं ॥३॥ तुका म्हणे ताळा घातला आडाखीं । ठावें होतें सेकीं आडविसी ॥४॥
1528
चुकलिया ताळा । वाती घालुनि बैसे डोळां ॥१॥ तैसें जागें करीं चित्ता । कांहीं आपुलिया हिता ॥ध्रु.॥ निक्षेपिलें धन । तेथें गुंतलेसे मन ॥२॥ नाशिवंतासाटीं । तुका म्हणे करिसी आटी ॥३॥
1529
चुकली ते वाट । पुढें सांपडवी नीट ॥१॥ म्हणउनी गर्भवास । नेणती ते हरिचे दास ॥ध्रु.॥ संचिताचा संग । काय जाणों पावें भंग ॥२॥ तुका म्हणे दृष्टी । उघडितों नव्हे कष्टी ॥३॥
1530
चुकलों या ऐशा वर्मा । तरी कर्मा सांपडलों ॥१॥ पाठी लागे करी नास । गर्भवास भोगवी ॥ध्रु.॥ माझें तुझें भिन्नभावें । गळां दावें मोहाचें ॥२॥ तुका म्हणे पाठेळ केलों । नसत्या भ्यालों छंदासी ॥३॥
1531
चुराचुराकर माखन खाया । गौळणीका नंद कुमर कन्हया ॥१॥ काहे बडाईं दिखावत मोहि । जाणत हुं प्रभुपणा तेरा खव हि ॥ध्रु.॥ और बात सुन उखळसुं गळा । बांधलिया आपना तूं गोपाळा ॥२॥ फेरत वनबन गाऊ धरावतें । कहे तुकयाबंधु लकरी लेले हात ॥३॥
1532
चोर टेंकाचे निघाले चोरी । आपलें तैसें पारखे घरीं ॥१॥ नाहीं नफा नागवे आपण । गमाविले कान हात पाय ॥ध्रु.॥ बुद्धिहीन नये कांहीं चि कारणा । तयासवें जाणा तें चि सुख ॥२॥ तुका म्हणे नाहीं ठाउकें वर्म । तयासी कर्म वोडवलें ॥३॥
1533
चोरटें सुनें मारिलें टाळे । केंउं करी परि न संडी चाळे ॥१॥ ऐसें एक दुराचारी गा देवा । आपुलिया जीवा घात करी ॥ध्रु.॥ नाक गेलें तरि लाज ना विचार । हिंडे फजितखोर दारोदारीं ॥२॥ तुका म्हणे कर्म बिळवंत गाढें । नेदी तया पुढेंमागें सरों ॥३॥
1534
चोराचिया धुडका मनीं । वसे ध्यानीं लंछन ॥१॥ ऐशा आम्हीं करणें काय । वरसो न्यायें पर्जन्य ॥ध्रु.॥ ज्याच्या बैसे खतावरी । ते चुरचुरी दुखवूनि ॥२॥ तुका म्हणे ज्याची खोडी । त्याची जोडी त्या पीडी ॥३॥
1535
चोरासी चांदणें वेश्येसी सेजार । परिसेंसी खापर काय होय ॥१॥ दुधाचे आधणीं वैरिले पाषाण । कदा काळीं जाण पाकनव्हे ॥२॥ तुका म्हणे जरि पूर्वपुण्यें सिद्धि । तरि च राहे बुद्धि संतसंगीं ॥३॥
1536
चोरें चोरातें करावा उपदेश । आपुला अभ्यास असेल तो ॥१॥ शिंदळीच्या मागें वेचितां पाउलें । होईल आपुलें तिच्या ऐसें ॥ध्रु.॥ तुका म्हणे भितो पुढिलिया दत्ता । म्हणऊनि चिंता उपजली ॥२॥
1537
चौक भरियेला आसनीं पाचारिली कुळस्वामिनी । वैकुंठवासिनि ये धांवोनी झडकरी ॥१॥ रंगा येई वो विठाई सांवळिये डोळसे । तुझें श्रीमुख साजिरें तें मी केधवां देखेन ॥ध्रु.॥ रजतमधुपारती । पंचप्राणांची आरती । अवघी सारोनी आइती । ये धांवती झडकरी ॥२॥ मन मारोनियां मेंढा । आशा मनसा तृष्णा सुटी । भक्तिभाव नैवेद्य ताटीं । भरोनि केला हाकारा ॥३॥ डांका अनुहात गजरे । येउनि अंगासी संचरे । आपुला घेउनी पुरस्कार । आरोग्य करीं तुकयासी ॥४॥
1538
छळी विष्णुदासा कोणी । त्याची अमंगळ वाणी ॥१॥ येऊं न द्यावा समोर । अभागी तो दुराचार ॥ध्रु.॥ नावडे हरिकथा । त्याची व्यभिचारीण माता ॥२॥ तुका म्हणे याति । भ्रष्ट तयाचि ते मति ॥३॥
1539
छोडे धन मंदिर बन बसाया । मांगत टूका घरघर खाया ॥१॥ तीनसों हम करवों सलाम । ज्या मुखें बैठा राजाराम ॥ध्रु.॥ तुलसीमाला बभूत चर्‍हावे । हरजीके गुण निर्मल गावे ॥२॥ कहे तुका जो साई हमारा । हिरनकश्यप उन्हें मारहि डारा ॥३॥
1540
जंव नाहीं देखिली पंढरी । तोंवरी वर्णिसी थोर वैकुंठींची ॥१॥ मोक्षसिद्धी तेथें हिंडे दारोदारीं । होऊनि कामारी दीनरूप ॥ध्रु.॥ वृंदावन सडे चौक रंग माळा । अभिन्नव सोहोळा घरोघरीं ॥२॥ नामघोष कथापुराणकीर्तनीं । ओविया कांडणीं पांडुरंग ॥३॥ सर्व सुख तेथें असे सर्वकाळ । ब्रम्ह तें केवळ नांदतसे ॥४॥ तुका म्हणे जें न साधे सायासें । तें हें प्रत्यक्ष दिसे विटेवरि ॥५॥
1541
जंव हें सकळ सद्धी आहे । हात चालावया पाये । तंव तूं आपुलें स्वहित पाहें । तीर्थयात्रे जायें चुकों नको ॥१॥ जंव काळ असे दुरी ठेला । तंव तूं हरिगुण गायें आइक वहिला । मनीं भाव धरूनि भला । न वंचें त्याला चुकों नको ॥२॥ जोडोनि धन न घलीं माती । ब्रम्हवृंदें पूजन इति । सत्य आचरण दया भूतीं । करीं सांगाती चुकों नको ॥३॥ दशा यौवन बाणली अंगीं । पांगिला नव्हें विषयसंगीं । काम क्रोध लोभ मोह त्यागीं । राहें संतसंगीं चुकों नको ॥५॥ मग तेथें न चले कांहीं । सत्ता संपदा राहेल ठायींच्या ठायीं । पुढें संचित जाईल ग्वाही । तुका म्हणे ते ही यमआज्ञा ॥५॥
1542
जग अमंगळ । लागे देखतां विटाळ ॥१॥ धर्म भूतांची ते दया । सत्य कारण ऐसीया ॥ध्रु.॥ नव्हे माझें मत । साक्षी करूनि सांगें संत ॥२॥ तुका म्हणे जीवें । दावी उमटूनि अनुभवें ॥३॥
1543
जग अवघें देव । मुख्य उपदेशाची ठेव ॥१॥ आधीं आपणयां नासी । तरि उतरे ये कसीं ॥ध्रु.॥ ब्रम्हज्ञानाचें कोठार । तें हें निश्चयें उत्तर ॥२॥ तुका म्हणे ते उन्मनी । नास कारया कारणीं ॥३॥
1544
जग ऐसें बहुनांवें । बहुनावें भावना ॥१॥ पाहों बोलों बहु नये । सत्य काय सांभाळा ॥ध्रु.॥ कारियासी जें कारण । तें जतन करावें ॥२॥ तुका म्हणे संतजनीं । हें चि मनीं धरावें ॥३॥
1545
जग चले उस घाट कोन जाय । नहिं समजत फिरफिर गोदे खाय ॥ध्रु.॥ नहिं एकदो सकल संसार । जो बुझे सो आगला स्वार ॥१॥ उपर श्वार बैठे कृष्णांपीठ । नहिं बाचे कोइ जावे लूठ ॥२॥ देख हि डर फेर बैठा तुका । जोवत मारग राम हि एका ॥३॥
1546
जग जोगी जग जोगी । जागजागे बोलती ॥१॥ जागता जगदेव । राखा कांहीं भाव ॥ध्रु.॥ अवघा क्षेत्रपाळ । पूजा सकळ ॥२॥ पूजापात्र कांहीं । फल पुष्प तोय ॥३॥ बहुतां दिसां फेरा । आला या नगरा ॥४॥ नका घेऊं भार । धर्म तो चि सार ॥५॥ तुका मागे दान । द्या जी अनन्य ॥६॥ सरवदा - अभंग १
1547
जग तरि आम्हां देव । परि हे निंदितों स्वभाव ॥१॥ येतो हिताचा कळवळा । पडती हातीं म्हुन काळा ॥ध्रु.॥ नाहीं कोणी सखा । आम्हां निपराध पारिखा ॥२॥ उपक्रमें वदे । तुका वर्मासी तें भेदे ॥३॥
1548
जगदेश जगदेश तुज म्हणती । परि या जनामाजी असशील युक्ति । पुण्यपापविरहित सकळां अधिपति । दृष्टा परि नळणी अलिप्त गति ॥१॥ जय देव जय देव जय पंढरिनाथा । श्रीपंढरिनाथा । नुरे पाप विठ्ठल म्हणतां सर्वथा ॥ध्रु.॥ आगम निगम तुज नेणती कोणी । परि तूं भाव भक्ति जवळी च दोन्ही । नेणतां विधियुक्त राते पूजेनी । न माये ब्रम्हांडीं संपुष्टशयनीं ॥२॥ असुरां काळ भासे विक्राळ पुढें । पसरी मुखएक चावितो धुडें । भक्ता शरणागता चाले तो पुढें । दावी वाट जाऊ नेदी वांकडें ॥३॥ एकाएकीं बहु विस्तरला सुखें । खेळे त्याची लीळा तो चि कवतुकें। तेथें नरनारी कवण बाळकें । काय पापपुण्य कवण सुखदुःखें ॥४॥ सकळा वर्मां तूं चि जाणशी एक । बद्ध मोक्ष प्राप्त आणि सुखदुःख। जाणों म्हणतां तुज टकलीं बहुतेकें । तुका म्हणे शरण आलों मज राखें ॥५॥
1549
जगा काळ खाय । आम्ही माथां दिले पाय ॥१॥ नाचों तेथें उभा राहे । जातां व्यंग करी साहे ॥ध्रु.॥ हरिच्या गुणें धाला । होता खात चि भुकेला ॥२॥ तुका म्हणे हळु । जाला कढत शीतळु ॥३॥
1550
जगाचा हा बाप दाखविलें माये । माती खातां जाये मारावया ॥१॥ मारावया तिणें उगारिली काठी । भुवनें त्या पोटीं चौदा देखे ॥२॥ देखे भयानक झांकियेले डोळे । मागुता तो खेळे तयेपुढे ॥३॥ पुढें रिघोनियां घाली गळां कव । कळों नेदी माव मायावंता ॥४॥ मायावंत विश्वरूप काय जाणे । माझें माझें म्हणे बाळ देवा ॥५॥ बाळपणीं रीठा रगडिला दाढे । मारियेले गाढे कागबग ॥६॥ गळां बांधऊनि उखळासी दावें । उन्मळी त्या भावें विमळार्जुन ॥७॥ न कळे जुनाट जगाचा जीवन । घातलें मोहन गौळियांसी ॥८॥ सिंकीं उतरूनि खाय नवनीत । न कळे बहुत होय तरी ॥९॥ तरीं दुधडेरे भरले रांजण । खाय ते भरून दावी दुणी ॥१०॥ दुणी जालें त्याचा मानिती संतोष । दुभत्याची आस धरूनियां ॥११॥ आशाबद्धा देव असोनि जवळी । नेणती ते काळीं स्वार्थामुळें ॥१२॥ मुळें याच देव न कळे तयांसी । चत्ति आशापाशीं गोवियेलें ॥१३॥ लेंकरूं आमचें म्हणे दसवंती । नंदाचिये चित्ती तो चि भाव ॥१४॥ भाव जाणावया चरित्र दाखवी। घुसळितां रवी डेरियांत ॥१५॥ डेरियांत लोणी खादलें रिघोनि । पाहे तों जननी हातीं लागे ॥१६॥ हातीं धरूनियां काढिला बाहेरी। देखोनियां करी चोज त्यासी ॥१७॥ सिकवी विचार नेणे त्याची गती । होता कोणे रीती डेरियांत ॥१८॥ यांसी पुत्रलोभें न कळे हा भाव । कळों नेदी माव देव त्यांसी ॥१९॥ त्यांसी मायामोहजाळ घाली फांस । देर आपणास कळों नेदी ॥२०॥ नेदी राहों भाव लोभिकांचे चित्ती । जाणतां चि होती अंधळीं तीं ॥२१॥ अंधळीं तीं तुका म्हणे संवसारीं । जिहीं नाहीं हरि ओळखिला ॥२२॥
1551
जगीं ऐसा बाप व्हावा । ज्याचा वंश मुक्तिस जावा ॥१॥ पोटा येतां हरलें पापा । ज्ञानदेवा मायबापा ॥ध्रु.॥ मुळीं बाप होता ज्ञानी । तरी आम्ही लागलों ध्यानीं ॥२॥ तुका म्हणे मी पोटींचें बाळ । माझी पुरवा ब्रम्हींची आळ ॥३॥
1552
जगीं कीर्ति व्हावी । म्हणोनी जालासी गोसावी॥१॥ बहुत केलें पाठांतर । वर्म राहिलेंसे दूर ॥ध्रु.॥ चित्तीं नाहीं अनुताप । लटिकें भगवें स्वरूप ॥२॥ तुका म्हणे सिंदळीच्या । व्यर्थ श्रमविली वाचा ॥३॥
1553
जगीं ब्रम्हक्रिया खिस्तीचा व्यापार । हिंडे घरोघर चांडाळाचे ॥१॥ आंतेजा खिचडी घेताती मागून । गाळिप्रधानि मायबहिणी ॥ध्रु.॥ उत्तमकुळीं जन्म क्रिया अमंगळ । बुडविलें कुळ उभयतां ॥२॥ तुका म्हणे ऐसी कलयुगाची चाली । स्वाथॉ बुडविलीं आचरणें ॥३॥
1554
जगीं मान्य केलें हा तुझा देकार । कीं कांहीं विचार आहे पुढें ॥१॥ करितों कवित्व जोडितों अक्षरें । येणें काय पुरें जालें माझें ॥ध्रु.॥ तोंवरि हे माझी न सरे करकर । जो नव्हे विचार तुझ्या मुखें ॥२॥ तुका म्हणे तुज पुंडलिकाची आण । जरी कांहीं वचन करिसी मज ॥३॥
1555
जडलों अंगाअंगीं । मग ठेवीं प्रसंगीं । कांहीं उरीजोगी। लोकीं आहे पुरती ॥१॥ ठेवीं निवारुनि आधीं । अवकाश तो चि बुद्धी । सांपडली संधी । मग बळ कोणासी ॥ध्रु.॥ गळा बांधेन पायीं । हालों नेदीं ठायिचा ठायीं । निवाड तो तईं । अवकळा केलिया ॥२॥ तुका म्हणे ठावे । तुम्ही असा जी बरवे । बोभाटाची सवे । मुळींहुनी विठोबा ॥३॥
1556
जडलों तों आतां पायीं । होऊं काईं वेगळा ॥१॥ तुम्हीं संतीं कृपा केली । गंगे चाली ओघाची ॥ध्रु.॥ सांभाळिलों मायबापा । केलों तापावेगळा ॥२॥ वोरसें या जीव धाला । तुका ठेला मौन्य चि ॥३॥
1557
जतन करीन जीवें । शुद्धभावें करूनी ॥१॥ विठ्ठल विठ्ठल हें धन । जीवन अंतकाळींचें ।ध्रु.॥ वर्दळ हें संचित सारूं । बरवा करूं उदिम हा ॥२॥ तुका म्हणे हृदयपेटी । ये संपुटीं सांटवूं ॥३॥
1558
जन तरी देखें गुंतलें प्रपंचें । स्मरण तें त्याचें त्यासी नाहीं ॥१॥ म्हणऊनि मागें परतलें मन । घालणीचें रान देखोनियां ॥ध्रु.॥ इंद्रियांचा गाजे गोंधळ ये ठायीं । फोडीतसे डोईं अहंकार ॥२॥ तुका म्हणे देवा वासनेच्या आटें । केलीं तळपटें बहुतांचीं ॥३॥
1559
जन देव तरी पायां चि पडावें । त्याचिया स्वभावें चाड नाहीं ॥१॥ अग्नीचें सौजन्य शीतनिवारण । पालवीं बांधोनि नेतां नये ॥२॥ तुका म्हणे विंचु सर्प नारायण । वंदावे दुरोन शिवों नये ॥३॥
1560
जन पूजी याचा मज कां आभार । हा तुम्ही विचार जाणां देवा ॥१॥ पत्र कोण मानी वंदितील सिक्का । गौरव सेवका त्या चि मुळें ॥ध्रु.॥ मी मीपणें होतों जनामधीं आधीं । कोणें दिलें कधीं काय तेव्हां ॥२॥ आतां तूं भोगिता सर्व नारायणा । नको आम्हां दीनां पीडा करूं ॥३॥ आपुलिया हातें देसील मुशारा । तुका म्हणे खरा तो चि आम्हां ॥४॥
1561
जन मानविलें वरी बाह्यात्कारीं । तैसा मी अंतरीं नाहीं जालों ॥१॥ म्हणउनी पंढरीनाथा वाटतसे चिंता । प्रगट बोलतां लाज वाटे ॥ध्रु.॥ संतां ब्रम्हरूप जालें अवघें जन । ते माझे अवगुण न देखती ॥२॥ तुका म्हणे मी तों आपणांसी ठावा । आहें बरा देवा जैसा तैसा ॥३॥
1562
जन विजन जालें आम्हां । विठ्ठलनामा प्रमाणें ॥१॥ पाहें तिकडे बापमाय । विठ्ठल आहे रखुमाई ॥ध्रु.॥ वन पट्टण एकभाव । अवघा ठाव सरता जाला ॥२॥ आठव नाहीं सुखदुःखा । नाचे तुका कौतुकें ॥३॥
1563
जन हें सुखाचें दिल्याघेतल्याचें । अंत हें काळींचें नाहीं कोणी ॥१॥ जाल्या हीन शक्ति नाकडोळे गळती । सांडोनि पळती रांडापोरें ॥ध्रु.॥ बाइल म्हणे खर मरता तरी बरें । नासिलें हें घर थुंकोनियां ॥२॥ तुका म्हणे माझीं नव्हतील कोणी । तुज चक्रपाणी वांचूनियां ॥३॥
1564
जननिया बाळका रे घातलें पाळणा । पंचतत्वी जडियेल्या वारतिया चहूं कोणा । अखंड जडियेल्या तया ढाळ अंगणा । वैखरी धरूनि हातीं भाव दावी खेळणा ॥१॥ निजीं रे निजीं आतां । म्हणोनि परिये दे माता । खेळतां कष्टलासी बाळा तूं रे नेणतां । निजीं रे निजीं आतां ॥ध्रु.॥ खेळतां बाहेरि रे मुला लोकांच्या सवें । बागुल काळतोंडा नाहीं नेतो तें ठावें । खेळतां दुश्चित्ता रे देखोनि तें न्यावें । म्हणोनि सांगें तुज शीघ्र वचन पाळावें॥२॥ संचित मागें तुज शुद्ध होतें सांगाती । तेणें तुज वांचविलें वेरझारिया हातीं । आणीक नेली मागें काय जाणों तीं किती । आलासि येथवरि थोरपुण्यें बहुतीं ॥३॥ खेळतां शुक देवा तो रे लागला पाठीं । लपाला वरुषें बारा तिये मातेचे पोटीं । रिघतां बाहेरि रे पळे घेऊनि कासोटी । ते चि परी जाली स्वामी भेणें रिघें कपाटीं ॥४॥ खेळतां चक्रवर्ती जनका लागला धाक । पडिला अग्नीमाजी पाव जळत एक । भरलासे कांप अंगीं सुख नाठवें दुःख । आप पर तें ही नाहीं देहभाव सकळिक ॥५॥ सिभ्रीया चक्रवर्ती कव पडिली अवचिती । धीट तो न भे तया मास कापिलें हातीं । टाकिलें तयावरी खुणें गोविला अंतीं । पावला मायबाप हिरोन घेतला हातीं ॥६॥ बांधलें अजामेळा वेश्यागणीका कैसी । मारिली हाक धाकें कळलें मायबापासी । घातली धांव नेटें वेगीं पावला त्यासी । हिरोनि नेलीं दोघें आपणयां तीं पासी ॥७॥ धरूनी आठवू रे बाळा राहें निश्चळ । खेळतां दुश्चिता रे नको जाऊं बरळ। टोंकताहे तुजलागीं दिवस लेखूनी काळ । मग नेदी आठवूं रे नेत्रीं घालीं पडळ ॥८॥ ऐसी तीं कृपावंतें बाळा मोहिलें चित्त । सुस्वरें कंठ गाय मधुर आणि संगीत । तेणें तें चि चित्त राहे होऊनियां निवांत । पावती तुका म्हणे नाहीं विश्वास ते घात ॥९॥
1565
जननी हे जाणे बाळकाचें वर्म । सुख दुःख धर्म जें जें कांहीं ॥१॥ अंधापुढें जेणें दिधला आधार । त्याचा हा विचार तो चि जाणे ॥ध्रु.॥ शरणागता जेणें घातलें पाठीशीं । तो जाणे तेविशीं राखों तया ॥२॥ कासे लागे तया न लगती सायास । पोहोणारा त्यास पार पावी ॥३॥ तुका म्हणे जीव विठ्ठलाचे हातीं । दिला त्याची गति तो चि जाणे ॥४॥
1566
जननी हे म्हणे आहा काय जालें । शरीर रक्षिलें काय काजें ॥१॥ काय काज आतां हरिविण जिणें । नित्य दुःख कोणें सोसावें हें ॥२॥ हें दुःख न सरे हरि न भेटे तों । त्यामागें चि जातों एका वेळे ॥३॥ एकवेळ जरी देखतें मी आतां । तरी जीवापरता न करितें ॥४॥ करितां हे मात हरीचें चिंतन । शुभ तो शकुन तुका म्हणे ॥५॥
1567
जनाचिया मना जावें कासियेसी । माझी वाराणसी पांडुरंग ॥१॥ तेथें भागीरथी येथें भीमरथी । अधिक म्हणती चंद्रभागा ॥ध्रु.॥ तेथें माधवराव येथें यादवराज । जाणोनियां भाव पुंडलिकाचा ॥२॥ विष्णुपद गया ते चि येथें आहे । प्रत्यक्ष हें पाहे विटेवरी ॥३॥ तुका म्हणे हे चि प्रपंच उद्धरी । आतां पंढरपुरी घडो बापा ॥४॥
1568
जनीं जनार्दन ऐकतों हे मात । कैसा तो वृत्तांत न कळे आम्हां ॥१॥ जन्म जरा मरण कवण भोगी भोग । व्याधि नाना रोग सुखदुःखें ॥ध्रु.॥ पापपुण्यें शुद्धाशुद्ध आचरणें । हीं कोणांकारणें कवणें केलीं ॥२॥ आम्हां मरण नाश तूं तंव अविनाश । कैसा हा विश्वास साच मानूं ॥३॥ तुका म्हणे तूं चि निवडीं हा गुढार । दाखवीं साचार तें चि मज ॥४॥
1569
जन्म मृत्यू फार जाले माझ्या जीवा । ऐक माझा धांवा पांडुरंगा ॥१॥ सिणलों बहुत करितां येरझारा । रखुमाईच्या वरा पावें वेगीं ॥२॥ तुका म्हणे तूं गा पतितपावन । घेई माझा सीण जन्मांतर ॥३॥
1570
जन्ममरणांची कायसी चिंता । तुझ्या शरणागतां पंढरीराया ॥१॥ वदनीं तुझें नाम अमृतसंजीवनी । असतां चक्रपाणी भय कवणा ॥ध्रु.॥ हृदयीं तुझें रूप बिंबलें साकार । तेथें कोण पार संसाराचा ॥२॥ तुका म्हणे तुझ्या चरणांची पाखर । असतां कळिकाळ पायां तळीं ॥३॥
1571
जन्ममरणांची विसरलों चिंता । तूं माझा अनंता मायबाप ॥१॥ होतील ते डोळां पाहेन प्रकार । भय आणि भार निरसलीं ॥ध्रु.॥ लिगाडाचें मूळ होतीं पंच भूतें । त्यांचें यां पुरतें विभागिलें ॥२॥ तुका म्हणे जाला प्रपंच पारिखा । जिवासी तूं सखा पांडुरंगा ॥३॥
1572
जन्मा आलिया गेलिया परी । भक्ति नाहीं केली । माझें माझें म्हणोनियां । गुंतगुंतों मेलीं ॥१॥ येथें कांहीं नाहीं । लव गुरूच्या पायीं । चाल रांडें टाकी रुका । नकों करूं बोल । गुरुविण मार्ग नाहीं । करिसी तें फोल ॥२॥ खाउनी जेउनि लेउनि नेसुनि । म्हणती आम्ही बर्‍या । साधु संत घरा आल्या । होती पाठमोर्‍या ॥३॥ वाचोनि पढोनि जाले शाहणे । म्हणती आम्ही संत । परनारी देखोनि त्यांचें । चंचळ जालें चित्त ॥४॥ टिळा टोपी घालुनि माळा । म्हणती आम्ही साधु । दयाधर्म चित्तीं नाहीं । ते जाणावे भोंदु ॥५॥ कलियुगीं घरोघरीं । संत जाले फार । वीतिभरी पोटासाठीं । हिंडती दारोदार ॥६॥ संत म्हणती केली निंदा । निंदा नव्हे भाई । तुका असे अनन्यें भावें शरण संतां पायीं ॥७॥ वाघा - अभंग १
1573
जन्मा आलियाचा लाभ । पद्मनाभदरुषणें ॥१॥ पाठीलागा येतो काळ । तूं कृपाळु माउली ॥ध्रु.॥ कोण्या उपायें हें घडे । भव आंगडें सुटकेचें ॥२॥ बहु उसंतीत आलों । तया भ्यालों स्थळासी ॥३॥ तुका म्हणे तूं जननी । ये निर्वाणी विठ्ठले ॥४॥
1574
जन्मा आलों त्याचें । आजि फळ जालें साचें ॥१॥ तुम्ही सांभाळिलों संतीं । भय निवारली खंती ॥ध्रु.॥ कृत्याकृत्य जालों । इच्छा केली ते पावलों ॥२॥ तुका म्हणे काळ । आतां करूं न शके बळ ॥३॥
1575
जन्मा येउनि काय केलें । तुवां मुदल गमाविलें ॥१॥ कां रे न फिरसी माघारा । अझुनि तरी फजितखोरा ॥ध्रु.॥ केली गांठोळीची नासी । पुढें भीके चि मागसी ॥२॥ तुका म्हणे ठाया । जाई आपल्या आलिया ॥३॥
1576
जन्मा येऊन उदार जाला । उद्धार केला वंशाचा । मेळवूनि धन मेळवी माती । सदा विपत्ती भोगीतसे ॥१॥ नाम घेतां न मिळे अन्न । नव्हे कारण देखिलिया । धर्म करितां ऐके कानीं । बांधे निजोनि डोकियासी ॥ध्रु.॥ घरा व्याही पाहुणा आला । म्हणे त्याला बरें नाहीं । तुमचे गावीं वैद्य आहे । बैसोनि काय प्रयोजन ॥२॥ उजवूं किती होतिल पोरें । मरतां बरें म्हणे यांसी । म्हणऊनि देवा नवस करी । दावी घरींहुनि बोनें ॥३॥ पर्वकाळीं भट घरासी आला । बोंब घाला म्हणे पोरां । तुमचा उणा होईंल वांटा । काळ पिठासी आला ॥४॥ दाढी करितां अडका गेला । घरांत आला बाइलेपें । म्हणे आतां उगवीं मोडी । डोईं बोडीं आपुली ॥५॥ तीर्थ स्वप्नीं नेणें गंगा । पूजन लिंगा गांविंचिया । आडकुनि दार बैसे दारीं । आल्या घर म्हणे ओस ॥६॥ तुका म्हणे ऐसे आहेत गा हरी । या ही तारीं जीवांसी । माझ्या भय वाटे चित्ती । नरका जाती म्हणोनि ॥७॥
1577
जन्मा येऊनि कां रे निदसुरा । जायें भेटी वरा रखुमाईंच्या ॥१॥ पाप ताप दैन्य जाईंल सकळ । पावसी अढळउत्तम तें ॥ध्रु.॥ संतमहंतसद्धिहरिदासदाटणी । फिटती पारणीं इंद्रियांचीं ॥२॥ तुका म्हणे तेथें नामाचा गजर । फुकाची अपार लुटी घेई ॥३॥
1578
जन्मा येऊनि तया लाभ जाला । बिडवईं भेटला पांडुरंगा ॥१॥ संसारदुःखें नासिलीं तेणें । उत्तम हें केणें नामघोष॥ध्रु.॥ धन्य ते संत सद्धि महानुभाव । पंढरीचा ठाव टाकियेला ॥२॥ प्रेमदाते ते च पतितपावन । धन्य दरुषण होय त्याला ॥३॥ पावटणिया पंथें जालिया सिद्धी । वोगळे समाधि सायुज्यता ॥४॥ प्रेम अराणूक नाहीं भय धाक । मज तेणें सुखें कांहीं चिंता ॥५॥ तें दुर्लभ संसारासी । जडजीवउद्धारलोकासी ॥६॥ तुका म्हणे त्यासी । धन्य भाग्य दरूषणें ॥७॥
1579
जन्मा येणें घडे पातकाचे मूळें । संचिताचें फळ आपुलिया ॥१॥ मग वांयांविण दुःख वाहों नये । रुसोनियां काय देवावरी ॥ध्रु.॥ ठाउका चि आहे संसार दुःखाचा । चित्ती सीण याचा वाहों नये ॥२॥ तुका म्हणे नाम त्याचें आठवावें । तेणें विसरावें जन्मदुःख ॥३॥
1580
जन्मांतरिंचा परिट न्हावी । जात ठेवी त्यानें तें ॥१॥ वाखर जैसा चरचरी । तोंड करी संव दणी ॥ध्रु.॥ पूर्व जन्म शिखासूत्र । मळ मूत्र अंतरीं ॥२॥ तुका म्हणे करिती निंदा । धुवटधंदा पुढिलांचा ॥३॥
1581
जन्मांतरीं शुद्ध नाहीं आचरण । यालागीं चरण अंतरले ॥१॥ वोडवलें संचित येणें जन्में पाहतां । आतां पंढरिनाथा कृपा करीं ॥ध्रु.॥ पतितपावन ब्रिद साच करीं देवा । यालागी कुढावा करीं माझा ॥२॥ अपराधी पातकी दृष्ट दुराचारी । अहाळलों भारी संवसारें ॥३॥ कामक्रोध आदि कल्पनेच्या त्रासें । तुज न पवें ऐसें जालें देवा ॥४॥ हा ना तोसा ठाव जाला पांडुरंगा । नये चि उपेगा काय करूं ॥५॥ आपुलिया नांवा धांवणिया धांवें । लवकरी यावें तुका म्हणे ॥६॥
1582
जन्मोजन्मीं दास । व्हावें हे चि माझी आस ॥१॥ पंढरीचा वारकरी । वारी चुकों नेदीं हरी ॥ध्रु.॥ संतसमागम । अंगीं थिरावलें प्रेम ॥२॥ स्नान चंद्रभागे । तुका म्हणे हें चि मागें ॥३॥
1583
जन्मोजन्मींची संगत । भेटी जाली अकस्मात ॥१॥ आतां सोडितां सुटेना । तंतु प्रीतीचा तुटेना ॥ध्रु.॥ माझें चित्त तुझ्या पायां । मिठी पडिली पंढरिराया ॥२॥ तुका म्हणे अंतीं । तुझी माझी एक गति ॥३॥
1584
जप करितां राग । आला जवळी तो मांग ॥१॥ नको भोंवतालें जगीं । पाहों जवळी राख अंगीं ॥ध्रु.॥ कुड्याची संगती । सदा भोजन पंगती ॥२॥ तुका म्हणे ब्रम्ह । साधी विरहित कर्म ॥३॥
1585
जप तप ध्यान न लगे धारणा । विठ्ठलकीर्त्तनामाजी सर्व ॥१॥ राहें माझ्या मना दृढ या वचनीं । आणिक तें मनीं न धरावें ॥ध्रु.॥ कीर्तनसमाधि साधन ते मुद्रा । राहतील थारा धरोनियां ॥२॥ तुका म्हणे मुक्ति हरिदासांच्या घरीं । वोळगती चारी ॠद्धिसिद्धि ॥३॥
1586
जपाचें निमत्ति झोपेचा पसरु । देहाचा विसरू पाडूनियां ॥१॥ ऐसीं तीं भजनें अमंगळवाणी । सोंगसंपादणी बहुरूप्याची ॥ध्रु.॥ सेवेविशीं केलें लोभाचिये आसे । तया कोठें असे उरला देव ॥२॥ तुका म्हणे मानदंभ जया चित्तीं । तयाची फजीती करूं आम्ही ॥३॥
1587
जयजय म्हणा राम । हातें टाळी वाचे नाम ॥१॥ आटाआटी नाहीं ज्यास । न वेचे मोल न पडे खांस ॥ध्रु.॥ आपण म्हणे आणिकां हातीं । यज्ञादिकीं नये ते गति ॥२॥ आसन भोजन करितां काम । ध्यानसमाधि म्हणतां राम ॥३॥ मंत्र जपा हा चि सार । वर्णा याती जयजयकार ॥४॥ म्हणतां राम म्हणे तुका । वेळोवेळां चुकों नका ॥५॥
1588
जया दोषां परीहार । नाहीं नाहीं धुंडितां शास्त्र । ते हरती अपार । पंढरपुर देखिलिया ॥१॥ धन्य धन्य भीमातीर । चंद्रभागा सरोवर । पद्मातीर्थी विठ्ठल वीर । क्रीडास्थळ वेणुनादीं ॥ध्रु.॥ सकळतीर्थांचें माहेर । भूवैकुंठ निर्विकार । होतो नामाचा गजर । असुरकाळ कांपती ॥२॥ नाहीं उपमा द्यावया । सम तुल्य आणिका ठाया । धन्य भाग्य जयां । जे पंढरपूर देखती ॥३॥ उपजोनि संसारीं । एक वेळ पाहें पा पंढरी । महा दोषां कैची उरी । देवभक्त देखिलिया ॥४॥ ऐसी विष्णूची नगरी । चतुर्भुज नर नारी । सुदर्शन घरटी करी । रीग न पुरे कळिकाळा ॥५॥ तें सुख वर्णावया गति । एवढी कैची मज मति । जे पंढरपुरा जाती । ते पावती वैकुंठ ॥६॥ तुका म्हणे या शब्दाचा । जया विश्वास नाहीं साचा । अधम जन्मांतरिचा । तया पंढरी नावडे ॥७॥
1589
जया नाहीं नेम एकादशीव्रत । जाणावें तें प्रेत शव लोकीं ॥१॥ त्याचें वय नित्य काळ लेखीताहे । रागें दात खाय कराकरा ॥ध्रु.॥ जयाचिये द्वारीं तुळसीवृंदावन । नाहीं तें स्मशान गृह जाणां ॥२॥ जये कुळीं नाहीं एक ही वैष्णव । त्याचा बुडे भवनदीतापा ॥३॥ विठोबाचें नाम नुच्चारी जें तोंड । प्रत्यक्ष तें कुंड रजकाचें ॥४॥ तुका म्हणे त्याचे काष्ठ हातपाय । कीर्तना नव जाय हरीचिया ॥५॥
1590
जया शिरीं कारभार । बुद्धि सार तयाची ॥१॥ वर्ते तैसें वर्ते जन । बहुतां गुण एकाचा ॥ध्रु.॥ आपणीयां पाक करी । तो इतरीं सेविजे ॥२॥ तुका म्हणे शूर राखे । गाढव्या वाखेसांगातें॥३॥
1591
जयाचिये द्वारीं सोन्याचा पिंपळ । अंगीं ऐसें बळ रेडा बोले ॥१॥ करील तें काय नव्हे महाराज । परि पाहे बीज शुद्ध अंगीं ॥ध्रु.॥ जेणें हे घातली मुक्तीची गवांदी । मेळविली मांदी वैष्णवांची ॥२॥ तुका म्हणे तेथें सुखा काय उणें । राहे समाधानें चित्तीचिया ॥३॥
1592
जयाचिये वाचे नये हा विठ्ठल । त्याचे मज बोल नावडती ॥१॥ शत्रु तो म्यां केला न म्हणें आपुला । जो विन्मुख विठ्ठला सर्वभावें ॥२॥ जयासी नावडे विठोबाचें नाम । तो जाणा अधम तुका म्हणे ॥३॥
1593
जयापासोनि सकळ । महीमंडळ जालें ॥१॥ तो एक पंढरीचा राणा । नये श्रुती अनुमाना ॥ध्रु.॥ विवादती जयासाठीं । जगजेटी तो विठ्ठल ॥२॥ तुका म्हणे तो आकळ । आहे सकळव्यापक ॥३॥
1594
जयासी नावडे वैष्णवांचा संग । जाणावा तो मांग जन्मांतरीं ॥१॥ अपवित्र वाचा जातीचा अधम । आचरण धर्म नाहीं जया ॥ध्रु.॥ मंजुळवदनीं बचनागाची कांडी । शेवटीं विघडी जीवप्राणा ॥२॥ तुका म्हणे ज्याचा पिता नाहीं शुद्ध । तयासी गोविंद अंतरला ॥३॥
1595
जये ठायीं आवडी ठेली । मज ते बोली न संडे ॥१॥ पुरवावें जीवींचें कोड । भेटी गोड तुज मज ॥ध्रु.॥ आणिलें तें येथवरी । रूप दुरी न करावें ॥२॥ तुका म्हणे नारायणा । सेवाहीना धिग वृत्ति ॥३॥
1596
जयेवेळीं चोरूनियां नेलीं वत्सें । तयालागीं तैसें होणें लागे ॥१॥ लागे दोहीं ठायी करावें पाळण । जगाचा जीवन मायबाप ॥२॥ माय जाल्यावरी अवघ्या वत्सांची । घरीं वत्सें जीचीं तैसा जाला ॥३॥ जाला तैसा जैसे घरिंचे गोपाळ । आणिक सकळ मोहरी पांवे ॥४॥ मोहरी पांवे सिंगें वाहिल्या काहाळा । देखिला सोहाळा ब्रम्हादिकीं ॥५॥ ब्रम्हांदिकां सुख स्वपनीं ही नाहीं । तैसें दोहीं ठायीं वोसंडलें ॥६॥ वोसंडल्या क्षीर अमुप त्या गायी । जैसी ज्याची आईं तैसा जाला ॥७॥ लाघव कळलें ब्रम्हयासी याचें । परब्रम्ह साचें अवतरलें ॥८॥ तरले हे जन सकळ ही आतां । ऐसें तो विधाता बोलियेला ॥९॥ लागला हे स्तुती करूं अनंताची । चतुर्मुख वाची भक्ती स्तोत्रें ॥१०॥ भक्तिकाजें देवें केला अवतार । पृथ्वीचा भार फेडावया ॥११॥ पृथिवी दाटीली होती या असुरीं । नासाहावे वरीभार तये ॥१२॥ तया काकुलती आपल्या दासांची । तयालागीं वेची सर्वस्व ही ॥१३॥ स्वहित दासांचें करावयालागीं । अव्यक्त हें जगीं व्यक्ती आलें ॥१४॥ लेखा कोण करी यांचिया पुण्याचा । जयांसवें वाचा बोले हरी ॥१५॥ हरी नाममात्रें पातकांच्या रासी । तो आला घरासि गौळियांच्या ॥१६॥ गौळिये अवघीं जालीं कृष्णमय । नामें लोकत्रय तरतील ॥१७॥ तरतील नामें कृष्णाचिया दोषी । बहुत ज्यांपाशीं होइल पाप ॥१८॥ पाप ऐसें नाहीं कृष्णनामें राहे । धन्य तो चि पाहे कृष्णमुख ॥१९॥ मुख माझें काय जो मी वर्णू पार । मग नमस्कार घाली ब्रम्हा ॥२०॥ ब्रम्हा नमस्कार घाली गोधनासी । कळला तयासि हा चि देव ॥२१॥ देव चि अवगा जालासे सकळ । गाईं हा गोपाळ वत्सें तेथें ॥२२॥ तेथें पाहाणें जें आणीक दुसरें । मूर्ख त्या अंतरें दुजा नाहीं ॥२३॥ दुजा भाव तुका म्हणे जया चित्ती । रवरव भोगिती कुंभपाक ॥२४॥
1597
जरा कर्णमूळीं सांगों आली गोष्टी । मृत्याचिये भेटी जवळी आली ॥१॥ आतां माझ्या मना होई सावधान । वोंपुण्याची जाण कार्यसिद्धी ॥ध्रु.॥ शेवटील घडी बुडतां न लगे वेळ । साधावा तो काळ जवळी आला ॥२॥ तुका म्हणे चिंतीं कुळींची देवता । वारावा भोंवता शब्द मिथ्या ॥३॥
1598
जरि न भरे पोट । तरि सेवूं दरकूट ॥१॥ परि न घलूं तुज भार । हा चि आमुचा निर्धार ॥ध्रु.॥ तुझें नाम अमोलिक । नेणती हे ब्रम्हादिक ॥२॥ ऐसें नाम तुझें खरें । तुका म्हणे भासे पुरें ॥३॥
1599
जरि हा हो कृपा करिल नारायण । तरी हें चि ज्ञान ब्रम्ह होय ॥१॥ कोठोनियां कांहीं न लगे आणावें । न लगे कोठें जावें तरावया ॥ध्रु.॥ जरी देव कांहीं धरिल पैं चित्तीं । तरि हे चि होती दिव्य चक्षु ॥२॥ तुका म्हणे देव दावील आपणा । तरि जीवपणा ठाव नाहीं ॥३॥
1600
जरि हे आड यती लाज । कैसें काज साधतें ॥१॥ कारण केलें उठाउठी । पायीं मिठी घातली ॥ध्रु.॥ समपिऩला जीव भाव । धरिला भाव अखंड ॥२॥ तुका म्हणे आड कांहीं । काळ नाहीं घातला ॥३॥
1601
जरी आलें राज्य मोळविक्या हातां । तरी तो मागुता व्यवसायी ॥१॥ तृष्णेचीं मंजुरें नेणती विसांवा । वाढें हांव हांवां काम कामीं ॥ध्रु.॥ वैभवाचीं सुखें नातळतां अंगा । चिंता करी भोगा विघ्न जाळी ॥२॥ तुका म्हणे वाहे मरणाचें भय । रक्षणउपाय करूनि असे ॥३॥
1602
जरी तुझा मज नसता आधार । कैसा हा संसार दुर्‍हावला ॥१॥ ऐसा बळी कोण होइल पुरता । जो हे वारी चिंता आशापाश ॥ध्रु.॥ मायामोहफांसा लोकलाजबेडी । तुजवीण तोडी कोण एक ॥२॥ हें तों मज कळों आलें अनुभवें । बरें माझ्या जीवें पांडुरंगा ॥३॥ तुका म्हणे यास तूं चि माझा गोही । पुरी भाव नाहीं जना लोका ॥४॥
1603
जरी माझी कोणी कापितील मान । तरी नको आन वदों जिव्हे ॥१॥ सकळां इंद्रियां हे माझी विनंती । नका होऊं परतीं पांडुरंगा ॥ध्रु.॥ आणिकांची मात नाइकावी कानीं । आणीक नयनीं न पाहावें ॥२॥ चित्ता तुवां पायीं रहावें अखंडित । होउनी निश्चित एकविध ॥३॥ चला पाय हात हें चि काम करा । माझ्या नमस्कारा विठोबाच्या ॥४॥ तुका म्हणे तुम्हां भय काय करी । आमुचा कैवारी नारायण ॥५॥
1604
जरी मी नव्हतों पतित । तरि तूं पावन कैंचा येथ ॥१॥ म्हणोनि माझें नाम आधीं । मग तूं पावन कृपानिधी ॥ध्रु.॥ लोहो महिमान परिसा । नाहीं तरीं दगड जैसा ॥२॥ तुका म्हणे याचकभावें । कल्पतरु मान पावे ॥३॥
1605
जळती कीर्तनें । दोष पळतील विघ्नें ॥१॥ हें चि बिळवंत गाढें । आनंद करूं दिंडीपुढें ॥ध्रु.॥ किळ पापाची हे मूर्ति । नामखड्ग घेऊं हातीं ॥२॥ तुका म्हणे जाऊं । बळें दमामे ही लावूं ॥३॥
1606
जळातें संचित । ऐसी आहे धर्म नीत ॥१॥ माझ्या विठोबाचे पाय । वेळोवेळां मनीं ध्याय ॥ध्रु.॥ नेदी कर्म घडों । कोठें आडराणें पडों ॥२॥ तुका म्हणे मळ । राहों नेदी ताप जाळ ॥३॥
1607
जळालें तें बाहए सोंग । अंतर व्यंग पडिलिया ॥१॥ कारण तें अंतरलें । वाइट भलें म्हणवितां ॥ध्रु.॥ तांतडीनें नासी । तांतडीनें च संतोषी ॥२॥ तुका म्हणे धीर । नाहीं बुद्धि एक स्थिर ॥३॥
1608
जळे माझी काया लागला वोणवा । धांव रे केशवा मायबापा ॥१॥ पेटली सकळ कांति रोमावळी । नावरे हे होळी दहन जालें ॥ध्रु.॥ फुटोनियां दोन्ही भाग होऊं पाहे । पाहातोसी काय हृदय माझें ॥२॥ घेऊनि जीवन धांवें लवलाहीं । कवणाचें काहींहीं न चले येथें ॥३॥ तुका म्हणे माझी तूं होसी जननी । आणीक निर्वाणीं कोण राखे ॥४॥
1609
जळो आतां नांव रूप । माझें पाप गांठींचें ॥१॥ संतांचिया चरणरजें । उतरूं ओझें मातीचें ॥ध्रु.॥ लटिकियाचा अभिमान । होता सीण पावित ॥२॥ तुका म्हणे अरूपींचें । सुख साचें निनांवें ॥३॥
1610
जळो ते जाणींव जळो ते शाहाणींव । राहो माझा भाव विठ्ठलपायीं ॥१॥ जळो तो आचार जळो तो विचार । राहो मन स्थीर विठ्ठलपायीं ॥ध्रु.॥ जळो हा लौकिक जळो दंभमान । लागो जीव ध्यान विठ्ठलाचें ॥२॥ जळो हें शरीर जळो हा संबंध । राहो परमानंद माझा कंठीं ॥३॥ तुका म्हणे येथे अवघें चि होय । धरीं मना सोय विठोबाची ॥४॥
1611
जळो प्रेमा तैसा रंग । जाय भुलोनि पतंग ॥१॥ सासूसाटीं रडे सून । भाव अंतरींचा भिन्न ॥ध्रु.॥ मैंद मुखींचा कोंवळा । भाव अंतरीं निराळा ॥२॥ जैसी वृंदावनकांती । उत्तम धरूं ये हातीं ॥३॥ बक ध्यान धरी । सोंग करूनि मासे मारी ॥४॥ तुका म्हणे सर्प डोले । तैसा कथेमाजी खुले ॥५॥
1612
जळो माझी ऐसी बुद्धी । मज घाली तुजमधीं । आवडे हे विधि । निषेधीं चि चांगली ॥१॥ तूं स्वामी मी सेवक । उंच पद निंच एक । ऐसें करावें कौतुक । नको करूं खंडणा ॥ध्रु.॥ जळ न खाती जळा । वृक्ष आपुलिया फळा । भोक्ता निराळा । तेणें गोडी निवडिली ॥२॥ हिरा शोभला कोंदणें । अळंकारीं मिरवे सोनें । एक असतां तेणें । काय दुजें जाणावें ॥३॥ उष्णें छाये सुख वाटे । बाळें माते पान्हा फुटे । एका एक भेटे । कोण सुख ते काळीं ॥४॥ तुका म्हणे हित । हें चि मानी माझें चित्त । नव्हे आतां मुक्त । ऐसा जाला भरवसा ॥५॥
1613
जळो माझें कर्म वायां केली कटकट । जालें तैसें तंट नाहीं आलें अनुभवा ॥१॥ आता पुढें धीर काय देऊं या मना । ऐसें नारायणा प्रेरिलें तें पाहिजे ॥ध्रु.॥ गुणवंत केलों दोष जाणायासाठीं । माझें माझें पोटीं बळकट दूषण ॥२॥ तुका म्हणे अहो केशीराजा दयाळा । बरवा हा लळा पाळियेला शेवटीं ॥३॥
1614
जळों अगी पडो खान । नारायण भोक्ता ॥१॥ ऐसी ज्याची वदे वाणी । नारायणीं ते पावे ॥ध्रु.॥ भोजनकाळीं करितां धंदा । म्हणा गोविंदा पावलें ॥२॥ तुका म्हणे न लगे मोल । देवा बोल आवडती ॥३॥
1615
जळों त्याचें तोंड । ऐसी कां ते व्याली रांड ॥१॥ सदा भोवयासी गांठी । क्रोध धडधडीत पोटीं ॥ध्रु.॥ फोडिली गोंवरी । ऐसी दिसे तोंडावरी ॥२॥ तुका म्हणे नाहीं । चित्ती समाधान कांहीं ॥३॥
1616
जळोजळो तें गुरुपण । जळोजळो तें चेलेपण ॥१॥ गुरु आला वेशीद्वारीं । शिष्य पळतों खिंडोरीं ॥ध्रु.॥ काशासाटीं जालें येणें । त्याचें आलें वर्षासन ॥२॥ तुका म्हणे चेला । गुरू दोघे हि नरकाला ॥३॥
1617
जळोत तीं येथें उपजविती अंतराय । सायासाची जोडी माझी तुमचे पाय ॥१॥ आतां मज साहे येथें करावें देवा । तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवूनि ॥ध्रु.॥ भोगें रोगा जोडोनियां दिलें आणीकां । अरुचि ते हो कां आतां सकळांपासूनि ॥२॥ तुका म्हणे असो तुझें तुझे मस्तकीं । नाहीं ये लौकिकीं आतां मज वर्तनें ॥३॥
1618
जवळी नाहीं चित्ति । काय मांडियेलें प्रेत ॥१॥ कैसा पाहे चद्रिद्राष्टि । दीप स्नेहाच्या शेवटीं ॥ध्रु.॥ कांतेलेंसें श्वान । तैसें दिशा हिंडे मन ॥२॥ त्याचे कानीं हाणे । कोण बोंब तुका म्हणे ॥३॥
1619
जवळी मुखापाशीं । असतां नेघे अहर्निशीं ॥१॥ भवनिर्दाळण नाम । विठ्ठल विठ्ठल नासी काम ॥ध्रु.॥ सुखाचें शेजार । करूं कां नावडें घर ॥२॥ तुका म्हणे ठेवा । कां हा न करी चि बरवा ॥३॥
1620
जा रे तुम्ही पंढरपुरा । तो सोयरा दीनांचा ॥१॥ गुण दोष नाणी मना । करी आपणासारिखें ॥ध्रु.॥ उभारोनि उभा कर । भवपार उतराया ॥२॥ तुका म्हणे तांतड मोठी । जाली भेटी उदंड ॥३॥
1621
जाऊं देवाचिया गांवां । देव देईंल विसांवा ॥१॥ देवा सांगों सुखदुःख । देव निवारील भूक ॥ध्रु.॥ घालूं देवासी च भार । देव सुखाचा सागर ॥२॥ राहों जवळी देवापाशीं । आतां जडोनि पायांसी ॥३॥ तुका म्हणे आम्ही बाळें । या देवाचीं लडिवाळें ॥४॥
1622
जाऊनियां तीर्था काय तुवां केलें । चर्म प्रक्षाळिलें वरीं वरीं ॥१॥ अंतरींचें शुद्ध कासयानें जालें । भूषण तों केलें आपणया ॥ध्रु.॥ इंद्रावण फळ घोळिलें साकरा । भीतरील थारा मोडे चि ना ॥२॥ तुका म्हणे नाहीं शांति क्षमा दया । तोंवरी कासया फुंदा तुम्ही ॥३॥
1623
जागा घरटी फिरे तस्कराची दिवसाराती । नीदसुरें नाडिलीं असो मागों किती ॥१॥ हाट करी सकळ जन । वस्तु करा रे जतन ॥ध्रु.॥ हुशार ठायीं । निजनिजेलिया पाहीं ॥२॥ सावचित्त असे खरा । लाभ घेउन जाये घरा ॥३॥ तराळ राळ बोंबें उतराई । राखा आपुलिया भाई ॥४॥ हरिच्या नामीं घालूं जागा । तुका म्हणे हुशार गा ॥५॥
1624
जाणतें लेकरूं । माता लागे दूर धरूं ॥१॥ तैसें न करीं कृपावंते । पांडुरंगे माझे माते ॥ध्रु.॥ नाहीं मुक्ताफळा । भेटी मागुती त्या जळा ॥२॥ तुका म्हणे लोणी । ताक सांडी निवडूनि ॥३॥
1625
जाणतों समये । परि मत कामा नये ॥१॥ तुम्ही सांगावें तें बरें । देवा सकळ विचारें ॥ध्रु.॥ फुकाचिये पुसी । चिंता नाहीं होते ऐसी ॥२॥ तुका म्हणे आहे । धर पाय मज साहे ॥३॥
1626
जाणपण बरें देवाचे शिरीं । आम्ही ऐसीं बरीं नेणतीं च ॥१॥ देखणियांपुढें रुचे कवतुक । उभयतां सुख वाढतसे ॥ध्रु.॥ आशंकेचा बाधा नाहीं लडिवाळां । चित्त वरि खेळा समबुद्धि ॥२॥ तुका म्हणे दिशा मोकळ्या सकळा । अवकाशीं खेळा ठाव जाला ॥३॥
1627
जाणवलें इंद्रा चरित्र सकळ । वांकुल्या गोपाळ दाविताती ॥१॥ तातडिया मेघां आज्ञा करी राव । गोकुळींचा ठाव उरों नेदा ॥२॥ नेदाविया काईं म्हसी वांचों लोक । पुरा सकळिक सिळाधारीं ॥३॥ धाक नाहीं माझा गोवळियां पोरां । सकळिक मारा म्हणे मेघां ॥४॥ म्हणविती देव आपणां तोंवरी । जंव नाहीं वरी कोपलों मी ॥५॥ मीपणें हा देव न कळे चि त्यांसी । अभिमानें रासि गर्वाचिया ॥६॥ अभिमानरासि जयाचिये ठायीं । तुका म्हणे तई देव दुरी ॥७॥
1628
जाणसी उचित । पांडुरंगा धर्मनीत ॥१॥ तरि म्यां बोलावें तें काईं । सरे ऐसें तुझे पायीं ॥ध्रु.॥ पालटती क्षणें । संचितप्रारब्धक्रियमाण ॥२॥ तुका म्हणे सत्ता । होसी सकळ करिता ॥३॥
1629
जाणावें ते काय नेणावें ते काय । ध्यावे तुझे पाय हें चि सार ॥१॥ करावें तें काय न करावें तें काय । ध्यावें तुझे पाय हें चि सार ॥ध्रु.॥ बोलावें तें काय न बोलावें तें काय । ध्यावे तुझे पाय हें चि सार ॥२॥ जावें तें कोठें न वजावे आतां । बरवें आठवितां नाम तुझें ॥३॥ तुका म्हणे तूं करिसी तें सोपे । पुण्यें होती पापें आमुच्या मतें ॥४॥
1630
जाणावें तें सार । नाहीं तरी दगा फार ॥१॥ डोळे झांकिलिया रवि । नाहीं ऐसा होय जेवीं ॥ध्रु.॥ बहुथोड्या आड । निवारितां लाभें जाड ॥२॥ तुका म्हणे खरें । नेलें हातींचे अंधारें ॥३॥
1631
जाणिवेच्या भारें चेंपला उर । सदा बुरबुर सरे चि ना ॥१॥ किती याचें ऐकों कानीं । मारिलें घाणीं नाळकरी ॥ध्रु.॥ मिठेंविण आळणी बोल । कोरडी फोल घसघस ॥२॥ तुका म्हणे डेंगा न कळे हित । किती फजित करूं तरी ॥३॥
1632
जाणे अंतरिंचा भाव । तो चि करितो उपाव ॥१॥ न लगें सांगावें मांगावें ॥ जीवें भावें अनुसरावें । अविनाश घ्यावें । फळ धीर धरोनि ॥ध्रु.॥ बाळा न मागतां भोजन । माता घाली पाचारून ॥२॥ तुका म्हणे तरी । एकीं लंघियेले गिरी ॥३॥
1633
जाणे त्याचें वर्म नेणे त्याचें कर्म । केल्याविण धर्म नेणवती ॥२॥ मैथुनाचें सुख सांगितल्या शून्य । अनुभवाविण कळूं नये ॥२॥ तुका म्हणे जळो शाब्दिक हें ज्ञान । विठोबाची खूण विरळा जाणे ॥३॥
1634
जाणे भक्तीचा जिव्हाळा । तो चि देवीचा पुतळा ॥१॥ आणीक नये माझ्या मना । हो का पंडित शाहाणा ॥ध्रु.॥ नामरूपीं जडलें चत्ति । त्याचा दास मी अंकित ॥२॥ तुका म्हणे नवविध । भक्ति जाणे तो चि शुद्ध ॥३॥
1635
जाणे वर्तमान । परि तें न वारे त्याच्याने ॥१॥ तो ही कारणांचा दास । देव म्हणवितां पावे नास ॥ध्रु.॥ वेची अनुष्ठान । सिद्धी कराया प्रसन्न ॥२॥ तुका म्हणे त्याचें । मुदल गेलें हाटवेचें ॥३॥
1636
जाणों नेणों काय । चित्तीं धरूं तुझे पाय ॥१॥ आतां हें चि वर्म । गाऊं धरूनियां प्रेम ॥ध्रु.॥ कासया सांडूं मांडूं। भाव हृदयीं च कोंडूं ॥२॥ तुका म्हणे देवा । जन्मोजन्मीं मागें सेवा॥३॥
1637
जाणोनि अंतर । टाळिसील करकर ॥१॥ तुज लागली हे खोडी । पांडुरंगा बहु कुडी ॥ध्रु.॥ उठविसी दारीं । धरणें एखादिया परी ॥२॥ तुका म्हणे पाये । कैसे सोडीन ते पाहें ॥३॥
1638
जाणोनि नेणतें करीं माझें मन । तुझी प्रेमखूण देऊनियां ॥१॥ मग मी व्यवहारीं असेन वर्तत । जेवीं जळाआंत पद्मपत्र ॥ध्रु.॥ ऐकोनि नाइकें निंदास्तुति कानीं । जैसा कां उन्मनी योगिराज ॥२॥ देखोनि न देखें प्रपंच हा दृष्टी । स्वप्नीचिया सृष्टी चेविल्या जेवीं ॥२॥ तुका म्हणे ऐसें जालियावांचून । करणें तें तें सीण वाटतसे ॥४॥
1639
जातां पंढरीच्या मार्गा । काय वणूप सुखा मग ॥१॥ घडे लाभ लक्षकोटि । परब्रम्हीं होइल भेटी ॥ध्रु.॥ नाम गर्जत येती संत । त्यांच्या दर्शनें होईजे मुक्त ॥२॥ जो अलक्ष्य ब्रम्हादिकां । आला संनिध म्हणे तुका ॥३॥
1640
जातिविजातीची व्हावयासि भेटी । संकल्प तो पोटीं वाहों नये ॥१॥ होणार तें घडो होणाराच्या गुणें । होइल नारायणें निर्मिलें तें ॥ध्रु.॥ व्याघ्राचिये भुके वधावी ते गाय । याचें नांव काय पुण्य असे ॥२॥ तुका म्हणे न करी विचार पुरता । गरज्याची माता पिता खर ॥३॥
1641
जाती पंढरीस । म्हणे जाईंन तयांस ॥१॥ तया आहे संवसार । ऐसें बोले तो माहार ॥ध्रु.॥ असो नसो भाव । जो हा देखे पंढरिराव ॥२॥ चंद्रभागे न्हाती । तुका म्हणे भलते याती ॥३॥
1642
जातीचा पाईंक ओळखे पाइका । आदर तो एका त्याचे ठायीं ॥१॥ धरितील पोटासाटीं हतियेरें । कळती तीं खरें वेठीचींसीं ॥ध्रु.॥ जीताचें तें असे खरें घायडाय । पारखिया काय पाशीं लोपे ॥२॥ तुका म्हणे नमूं देव म्हुण जना । जालियांच्या खुणा जाणतसों ॥३॥
1643
जातीचा ब्राम्हण । न करितां संध्यास्नान ॥१॥ तो एक नांनवाचा ब्राम्हण । होय हीनाहूनि हीन ॥ध्रु.॥ सांडुनियां शाळिग्राम । नित्य वेश्येचा समागम ॥२॥ नेघे संतांचें जो तीर्थ । अखंड वेश्येचा जो आर्थ ॥३॥ तुका म्हणे ऐसे पापी । पाहूं नका पुनरपि ॥४॥
1644
जातीची शिंदळी । तिला कोण वंशावळी ॥१॥ आपघर ना बापघर । चित्ती मनीं व्यभिचार ॥ध्रु.॥ सेजे असोनियां धणी । परद्वार मना आणी ॥२॥ तुका म्हणे असील जाती । जातीसाठीं खाती माती ॥३॥
1645
जातीचें तें चढे प्रेम । पक्षी स्मरे राम राम ॥१॥ ते काय गुण लागती येरां । कागा पिंजरा शोभेना ॥ध्रु.॥ शिकविलें तें सुजात सोसी । मग तयासी मोल चढे ॥२॥ तुका म्हणे वेषधारी । हिजड्या नारी नव्हती ॥३॥
1646
जातो न येतिया वाटा । काय निरवितो करंटा ॥१॥ कैसा जालासे बेश्रम । लाज नाहीं न म्हणे राम ॥ध्रु.॥ पाहे वैरियाकडे । डोळे वासुनियां रडे ॥२॥ बांधुनियां यमा हातीं । दिला नाहीं त्याची खंती ॥३॥ नाहीं यांपें काम । ऐसें जाणे तो अधम ॥४॥ अझुन तरि मुका । कां रे जालासि म्हणे तुका ॥५॥
1647
जातो वाराणसी । निरवी गाई घोडे म्हैसी ॥१॥ गेलों येतों नाहीं ऐसा । सत्य मानावा भरवसा ॥ध्रु.॥ नका काढूं माझीं पेवें । तुम्हीं वरळा भूस खावें ॥२॥ भिकारियाचे पाठीं । तुम्ही घेउनि लागा काठी ॥३॥ सांगा जेवाया ब्राम्हण । तरी कापा माझी मान ॥४॥ वोकलिया वोका । म्यां खर्चिला नाहीं रुका ॥५॥ तुम्हीं खावें ताकपाणी । जतन करा तूपलोणी ॥६॥ नाहीं माझें मनीं । पोरें रांडा नागवणी ॥७॥ तुका म्हणे नीट । होतें तैसें बोले स्पष्ट ॥८॥
1648
जाय जाय तूं पंढरी । होय होय वारकरी ॥१॥ सांडोनियां वाळवंट । काय इच्छिसी वैकुंठ ॥ध्रु.॥ खांद्या पताकांचे भार । तुळसीमाळा आणि अबीर ॥२॥ साधुसंतांच्या दाटणी । तुका जाय लोटांगणीं ॥३॥
1649
जाय तिकडे लागे पाठीं । नाहीं तुटी आठवाची ॥१॥ हरूनियां नेलें चत्ति । माझें थीत भांडवल ॥ध्रु.॥ दावूनियां रूप डोळां । मन चाळा लावियेलें ॥२॥ आणीक तोंडा पडिली मिठी । कान गोठी नाइकती ॥३॥ बोलिल्याचा आठव न घडे । वाणी ओढे ते सोईं ॥४॥ तुका म्हणे प्रेमधगी । भरली अंगीं अखंड ॥५॥
1650
जाय परतें काय आणिला कांटाळा । बोला एक वेळा ऐसें तरी ॥१॥ कां हो केलें तुम्ही निष्ठ‍ देवा । मानेना हे सेवा करितों ते ॥ध्रु.॥ भाग्यवंत त्यांसी सांगितल्या गोष्टी । तें नाहीं अदृष्टीं आमुचिया ॥२॥ तुका म्हणे तुम्हापासूनि अंतर । न पडे नाहीं स्थिर बुद्धि माझी ॥३॥
1651
जाय फाकोनियां निवडितां गाईं । आपलाल्या सोयी घराचिये ॥१॥ घराचिये सोयी अंतरला देव । गोपाळांचे जीव गोविंदापे ॥२॥ गोविंदे वेधिलें तुका म्हणे मन । वियोगें ही ध्यान संयोगाचें ॥३॥
1652
जायांचें अंगुलें लेतां नाहीं मान । शोभा नेदी जन हांसविलें ॥१॥ गुसळितां ताक कांडितां भूस । साध्य नाहीं क्लेश जाती वांयां ॥२॥ तुका म्हणे नाहीं स्वता भांडवल । भिकेचें तें फोल बीज नव्हे ॥३॥
1653
जायाचे अळंकार । बुडवूनि होती चोर ॥१॥ त्यांसी ताडणाची पूजा । योग घडे बर्‍या वोजा ॥ध्रु.॥ अभिलाषाच्या सुखें । अंतीं होती काळीं मुखें ॥२॥ तुका म्हणे चोरा । होय भूषण मातेरा ॥३॥
1654
जायाचें शरीर जाईंल क्षणांत । कां हा गोपिनाथ पावे चि ना ॥१॥ कृपेचे सागर तुम्ही संत सारे । निरोप हा फार सांगा देवा ॥ध्रु.॥ अनाथ अज्ञान कोणी नाहीं त्यासि । पायापें विठ्ठला ठेवीं मज ॥२॥ तुका म्हणे ऐसें करावें निर्वाण । मग तो रक्षण करिल माझें ॥३॥
1655
जाला कवतुक करितां रोकडें । आणीक ही पुढें नारायण ॥१॥ येउनियां पुढें धरिला मारग । हरावया भाग इंद्रापाशीं॥२॥ इंद्रा दहीं दुध तूप नेतां लोणी । घेतलें हिरोनि वाटे त्यांचें ॥३॥ हिरोनि घेतल्या कावडी सकळा । म्हणती गोपाळा बरें नव्हे ॥४॥ नव्हे तें चि करी न भे कळिकाळा । तुका म्हणे लीळा खेळे देव ॥५॥
1656
जाला प्रेतरूप शरीराचा भाव । लिक्षयेला ठाव श्मशानींचा ॥१॥ रडती रात्रदिवस कामक्रोधमाया । म्हणती हायहाया यमधर्म ॥ध्रु.॥ वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा । ज्ञानाग्नि भरभरां जीवित्वेसी ॥२॥ फिरविला घट फोडिला चरणीं । महावाक्य जनीं बोंब जाली ॥३॥ दिली तिळीजुळी कुळनामरूपांसी । शरीर ज्याचें त्यासी समर्पिलें ॥४॥ तुका म्हणे रक्षा जाली आपींआप । उजळला दीप गुरुकृपा ॥५॥
1657
जाला हा डांगोरा । मुखीं लहानाचे थोरा ॥१॥ नागविलों जनाचारीं । कोणी बैसों नेदी दारी ॥ध्रु.॥ संचिताचा ठेवा। आतां आला तैसा घ्यावा ॥२॥ तुका म्हणे देवें । म्हणों केलें हें बरवें ॥३॥
1658
जालासि पंडित पुराण सांगसी । परि तूं नेणसी मीं हें कोण ॥१॥ गाढवभरी पोथ्या उलथिशी पानें । परि गुरुगम्यखुणे नेणशी बापा ॥२॥ तुका कुणबियाचा नेणे शास्त्रमत । एक पंढरीनाथ विसंबेना ॥३॥
1659
जालिया दर्शन करीन मी सेवा । आणीक ही देवा न लगे दुजें ॥१॥ प्रारब्धा अंगीं अन्न आच्छादन । स्थिर करोनि मन ठेवीं पायीं ॥ध्रु.॥ ये गा ये गा ये गा कृपाळुवा हरी । निववीं अभ्यंतरीं देउनि भेटी ॥२॥ आसावलें मन जीवनाचे ओढी । नामरूपें गोडी लावियेली ॥३॥ काय तुम्हांपाशीं नाहीं भांडवल । माझे मिथ्या बोल जाती ऐसे ॥४॥ काय लोखंडाचे पाहे गुण दोष । सिवोनि परिस सोनें करी ॥५॥ तुका म्हणे माझें अवघें असों द्यावें । आपुलें करावें ब्रीद साच ॥६॥
1660
जाली गाढवी दुधाळ । महिमा गाईंची पावेल ॥१॥ श्वान जालेंसे चांगलें । तरी कां सांगातें जेवील ॥ध्रु.॥ जाली सिंदळा चांगली । तरि कां पतिव्रता जाली ॥२॥ तुका म्हणे ऐशा जाति । काय उंचपण पावती ॥३॥
1661
जाली झडपणी खडतर देवता । संचरली आतां निघों नये ॥१॥ मज उपचार झणी उपचार झणी आतां करा । न साहे दुसरा भार कांहीं ॥ध्रु.॥ नेऊनियां घाला चंद्रभागे तिरीं । जीवा नाहीं उरी कांहीं आतां ॥२॥ तुका म्हणे कळों आलें वर्तमान । माझें तों वचन आच्छादलें ॥३॥
1662
जाली तडातोडी । अवघीं पडिलों उघडीं ॥१॥ नव्हों कोणांची च कांहीं । तुझे भरलिया वाहीं ॥ध्रु.॥ पारुशला संवसार । मोडली बैसण्याची थार ॥२॥ आतां म्हणे तुका । देवा अंतरें राखों नका ॥३॥
1663
जाली पाकसिद्धि वाट पाहे रखुमाई । उदक तापलें डेरां चीकसा मर्दुनी अई ॥१॥ उठा पांडुरंगा उशीर जाला भोजनीं । उभ्या आंचवणा गोपी कळस घेउनी ॥ध्रु.॥ अवघ्या सावचित्त सेवेलागीं सकळा । उद्धव अक्रूर आले पाचारूं मुळा ॥२॥ सावरिली सेज सुमनयाति सुगंधा । रत्नदीप ताटीं वाळा विडिया विनोदा ॥३॥ तुका विनंती करी पाहे पंढरीराणा । असा सावचित्त सांगे सकळा जना ॥४॥
1664
जाली हरिकथा रंग वोरसला । उचितासी आला पांडुरंग ॥१॥ वांटितो हें प्रेम उचिताचा दाता । घेई रे तूं आतां धणीवरि ॥ध्रु.॥ प्रेम देऊनियां अवघीं सुखीं केलीं । जें होतीं रंगलीं विटलीं तीं ॥२॥ तुकें हें दुर्बळ देखियलें संतीं । म्हणउनि पुढती आणियेलें ॥३॥
1665
जाली होती काया । बहु मळीन देवराया ॥१॥ तुमच्या उजळली नामें । चित्त प्रक्षाळिलें प्रेमें ॥ध्रु.॥ अनुतापें झाला झाडा । प्रारब्धाचा केला तोडा ॥२॥ तुका म्हणे देह पायीं । ठेवूनि झालों उतराईं ॥३॥
1666
जाले आतां सांटे । कासयाचे लहान मोटे ॥१॥ एक एका पडिलों हातीं । जाली तेव्हां चि निश्चींती ॥ध्रु.॥ नाहीं फिरों येत मागें । जालें साक्षीचिया अंगें ॥२॥ तुका म्हणे देवा । आतां येथें कोठें हेवा ॥३॥
1667
जाले समाधान । तुमचे धरिले चरण ॥१॥ आतां उठावेंसें मना । येत नाहीं नारायणा ॥ध्रु.॥ सुरवाडिकपणें । येथें सांपडलें केणें ॥२॥ तुका म्हणे भाग । गेला निवारला लाग ॥३॥
1668
जालें पीक आम्हां अवघा सुकाळ । घेऊं अवघा काळ प्रेमसुख ॥१॥ जाली अराणुक अवघियांपासून । अवघा गेला सीण भाग आतां ॥ध्रु.॥ अवघा जाला आम्हां एक पांडुरंग । आतां नाहीं जग माझें तुझें ॥२॥ अवघे चि आम्ही ल्यालों अळंकार । शोभलों हि फार अवघ्यांवरी ॥३॥ तुका म्हणे आम्ही सदेवांचे दास । करणें न लगे आस आणिकांची ॥४॥
1669
जालें भांडवल । अवघा पिकला विठ्ठल ॥१॥ आतां वाणी काशासाटीं । धीर धरावा च पोटीं ॥ध्रु.॥ आपुल्या संकोचें । म्हणऊनि तेथें टांचे ॥२॥ घेतों खर्‍या मापें । तुका देखोनियां सोपें ॥३॥
1670
जालें रामराज्य काय उणें आम्हांसी । धरणी धरी पीक गाईं वोळल्या म्हैसी ॥१॥ राम वेळोवेळां आम्ही गाऊं ओविये । दळितां कांडितां जेवितां गे बाइये ॥ध्रु.॥ स्वप्नीं ही दुःख कोणी न देखे डोळां । नामाच्या गजरें भय सुटलें काळा ॥२॥ तुका म्हणे रामें सुख दिलें आपुलें । तयां गर्भवासीं येणें जाणें खुंटलें ॥३॥
1671
जालों आतां एके ठायीं । न वंचूं कांहीं एकमेकां ॥१॥ सरलों हेंगे देउनि मोट । कटकट काशाची ॥ध्रु.॥ सोडोनियां गांठीं पाहें । काय आहे त्यांत तें ॥२॥ तुका म्हणे जालों निराळा । आतां गोपाळा देऊं बोभा ॥३॥
1672
जालों आतां दास । माझी पुरवीं हे आस ॥१॥ पंढरीचा वारकरी । वारी चुकों नेदीं हरी ॥ध्रु.॥ संतसमागम । अंगीं भरोनियां प्रेम ॥२॥ चंद्रभागे स्नान । तुका म्हणे हें चि दान ॥३॥
1673
जालों आतां दास । माझे तोडोनियां पाश ॥१॥ ठाव द्यावा पायांपाशीं । मी तो पातकांची राशी ॥ध्रु.॥ सकळ ही गोवा । माझा उगवूनि देवा ॥२॥ तुका म्हणे भय । करा जवळी तें नये ॥३॥
1674
जालों जीवासी उदार । त्यासी काय भीडभार ॥१॥ करीन आडक्या घोंगडें । उभें बाजारीं उघडें ॥ध्रु.॥ जोंजों धरिली भीड । तोंतों बहु केली चीड ॥२॥ तुका म्हणे मूळ । तुझें उच्चारीन कुळ ॥३॥
1675
जालों तंव साचें । दास राहवणें काचें ॥१॥ हें कां मळितें उचित । तुम्ही नेणा कृपावंत ॥ध्रु.॥ सिंहाचें ते पिलें । जाय घेऊनियां कोल्हें ॥२॥ तुका म्हणे नास । आम्हां म्हणविलियां दास ॥३॥
1676
जालों द्वारपाळ । तुझें राखिलें सकळ ॥१॥ नाहीं लागों दिलें अंगा । आड ठाकलों मी जगा ॥ध्रु.॥ करूनियां नीती । दिल्याप्रमाणें चालती ॥२॥ हातीं दंड काठी । भा जिवाचिये साटीं ॥३॥ बळ बुद्धी युक्ति । तुज दिल्या सर्व शक्ति ॥४॥ तुका म्हणे खरा । आतां घेईंन मुशारा ॥५॥
1677
जालों निर्भर मानसीं । म्हणऊनि कळलासी ॥१॥ तुझे म्हणविती त्यांस । भय चिंता नाहीं आस ॥ध्रु.॥ चुकविसी पाश । गर्भवासयातना ॥२॥ तुझें जाणोनियां वर्म । कंठीं धरियेलें नाम ॥३॥ तुका म्हणे तेणें सुखें । विसरलों जन्मदुःख ॥४॥
1678
जालों बळिवंत । होऊनियां शरणागत ॥१॥ केला घरांत रिघावा । ठायीं पाडियेला ठेवा ॥ध्रु.॥ हाता चढे धन । ऐसें रचलें कारण ॥२॥ तुका म्हणे मिठी । पायीं देउनि केली लुटी ॥३॥
1679
जालों म्हणती त्याचें मज वाटे आश्चर्य । ऐका नव्हे धीर वचन माझें ॥१॥ शिजलिया अन्ना ग्वाही दांत हात । जिव्हेसी चाखत न कळे कैसें ॥ध्रु.॥ तापलिया तेली बावन चंदन । बुंद एक क्षण शीतळ करी ॥२॥ पारखी तो जाणे अंतरींचा भेद । मूढजना छंद लावण्यांचा ॥३॥ तुका म्हणे कसीं निवडे आपण । शुद्ध मंद हीन जैसें तैसें ॥४॥
1680
जालों स्वयें कृष्ण आठव हा चित्ती । भेद भयवृत्ति उरली आहे ॥१॥ उरली आहे रूप नांव दिसे भिन्न । मी आणि हा कृष्ण आठवतो ॥२॥ तोंवरि हा देव नाहीं तयापासीं । आला दिसे त्यासि तो चि देव ॥३॥ देवरूप त्याची दिसे वरी काया । अंतरीं तो भयाभीत भेदें ॥४॥ भेदें तुका म्हणे अंतरे गोविंद । साचें विण छंद वांयां जाय ॥५॥
1681
जाळा तुम्ही माझें जाणतें मीपण । येणें माझा खुण मांडियेला ॥१॥ खादलें पचे तरि च तें हित । ओकलिया थीत पिंड पीडी ॥ध्रु.॥ तरि भलें भोगे जोडिलें तें धन । पडिलिया खानें जीवनासी ॥२॥ तुका म्हणे मज तारीं गा विठ्ठला । नेणतां चि भला दास तुझा ॥३॥
1682
जाळें घातलें सागरीं । बिंदु न राहे भीतरी ॥१॥ तैसें पापियाचें मन । तया नावडे कीर्त्तन ॥ध्रु.॥ गाढव गंगेसी न्हाणिलें। जाउनि उकरड्यावरि लोळे ॥२॥ प्रीती पोसिलें काउळें । जाउनि विष्ठेवरी लोळे ॥३॥ तुका म्हणे तैसी हरी । कीरव्या नावडे कस्तुरी॥४॥
1683
जावें बाहेरी हा नाठवे विचार । नाहीं समाचार ठावा कांहीं ॥१॥ कांहीं न कळे तें कळों आलें देवा । मांडिला रिघावा कवतुक ॥२॥ कवतुकासाठीं क्त देहावरि । आणिताहे हरि बोलावया ॥३॥ यासि नांव रूप नाहीं हा आकार । कळला साचार भक्ता मुखें ॥४॥ मुखें भक्तांचिया बोलतो आपण । अंगसंगें भिन्न नाहीं दोघां ॥५॥ दोघे वेगळाले लेखिल जो कोणी । तयाचा मेदिनी बहु भार ॥६॥ तयासी घडलीं सकळ ही पापें । भक्तांचिया कोपें निंदा द्वेषें ॥७॥ द्वेषियाचा संग न घडावा कोणा । विष जेंवी प्राणां नाश करी ॥८॥ करितां आइके निंदा या संतांची । तया होती ते चि अधःपात ॥९॥ पतन उद्धार संगाचा महिमा । त्यजावें अधमा संत सेवीं ॥१०॥ संतसेवीं जोडे महालाभरासी । तुका म्हणे यासि नाश नाहीं ॥११॥
1684
जिंकावा संसार । येणें नांवें तरी शूर ॥१॥ येरें काय तीं बापुडीं । कीर अहंकाराचीं घोडीं ॥ध्रु.॥ पण ऐशा नांवें । देवा धरिजेतो भावें ॥२॥ तुका म्हणे ज्यावें । सत्य कीर्तीनें बरवें ॥३॥
1685
जिकडे जाय तिकडे सवें । आतां यावें यावरी ॥१॥ माझ्या अवघ्या भांडवला । तूं एकला जालासी ॥ध्रु.॥ आतां दुजें धरा झणी । पायांहूनि वेगळें ॥२॥ तुका म्हणे आतां देवा । नका गोवा यावरी ॥३॥
1686
जिकडे पाहे तिकडे देव । ऐसा भाव दे कांहीं ॥१॥ काय केलों एकदेशी । गुणदोषीं संपन्न ॥ध्रु.॥ पडें तेथें तुझ्या पायां । करीं वायां न वजतें ॥२॥ तुका म्हणे विषमें सारी । ठाणें धरी जीवासी ॥३॥
1687
जिकडे पाहें तिकडे उभा । अवघ्या गगनाचा गाभा॥ १ ॥ डोळां बैसलें बैसलें । रूप राहोनि संचलें ॥ध्रु.॥ न वर्जितां दाही दिशा । जिकडे पाहें तिकडे सरिसा ॥२॥ तुका म्हणे समपदीं । उभा दिठीचिये आधीं ॥३॥
1688
जिचें पीडे बाळ । प्राण तयेचा विकळ ॥१॥ ऐसा मातेचा स्वभाव । सूत्र दोरी एक जीव ॥ध्रु.॥ सुखाची विश्रांती । उमटे मातेचिये चित्ती ॥२॥ तुका म्हणे संत । तुम्ही बहु कृपावंत ॥३॥ वें माहेरास । हे च सर्वकाळ आस ॥१॥ घ्यावी उच्छिष्टाची धणी । तीर्थ इच्छी पायवणी ॥ध्रु.॥ भोग उभा आड । आहे तोंवरी च नाड ॥२॥ तुका म्हणे देवें । माझें सिद्धी पाववावें ॥३॥
1689
जिव्हा जाणे फिकें मधुर क्षार । येर मास पर हातास न कळे ॥१॥ देखावें नेत्रीं बोलावें मुखें । चित्ता सुखदुःखें कळों येती ॥ध्रु.॥ परिमळासी घ्राण ऐकती श्रवण । एकाचे कारण एका नव्हे ॥२॥ एकदेहीं भिन्न ठेवियेल्या कळा । नाचवी पुतळा सूत्रधारी ॥३॥ तुका म्हणे ऐशी जयाची सत्ता । कां तया अनंता विसरलेती ॥४॥
1690
जिव्हे जाला चळ । नेये अवसान ते पळ ॥१॥ हें चि वोसनावोनी उठी । देव सांटविला पोटीं ॥ध्रु.॥ नाहीं ओढा वारा । पडिला प्रसंग तो बरा ॥२॥ तुका म्हणे जाली । मज हे अनावर बोली ॥३॥
1691
जिहीं तुझी कास भावें धरियेली । त्यांची नाहीं केली सांड देवा ॥१॥ काय माझा भोग आहे तो न कळे । सुखें तुम्ही डोळे झांकियेले ॥ध्रु.॥ राव रंक तुज सारिके चि जन । नाहीं थोर लहान तुजपाशीं ॥२॥ तुका म्हणे मागें आपंगिलें भक्तां । माझिया संचिता कृपा नये ॥३॥
1692
जींवीचा जिव्हाळा । पाहों आपुलिया डोळां ॥१॥ आम्हां विठ्ठल एक देव । येर अवघे चि वाव ॥ध्रु.॥ पुंडलिकाचे पाठीं । उभा हात ठेवुनि कटी ॥२॥ तुका म्हणे चित्तीं । वाहूं रखुमाईंचा पती ॥३॥
1693
जीव खादला देवत । माझा येणें महाभूतें । झोंबलें निरुतें । कांहीं करितां न सुटे ॥१॥ आतां करूं काय । न चले करितां उपाय । तुम्हां आम्हां सय । विघडाविघड केली ॥ध्रु.॥ बोलतां दुश्चिती । मी वो पडियेलें भ्रांती । आठव हा चित्तीं । न ये म्हणतां मी माझें ॥२॥ भलतें चि चावळे । जना अवघिया वेगळे । नाठवती बाळें । आपपर सारिखें ॥३॥ नका बोलों सये । मज वचन न साहे । बैसाल त्या राहें । उग्या वाचा खुंटोनी ॥४॥ तुम्हां आम्हां भेटी । नाहीं जाली जीवेंसाटीं । तुका म्हणे दृष्टी । पाहा जवळी आहे तों ॥५॥
1694
जीव जायवरी सांडी करी माता । हे तों आश्चर्यता बाळकाची ॥१॥ दुर्बळ कीं नाहीं आइकत कानीं । काय नारायणीं न्यून जालें ॥ध्रु.॥ क्षणक्षणा माझा ने घावा सांभाळ । अभाग्याचा काळ ऐसा आला ॥२॥ तुका म्हणे नाहीं वचनासी रुचि । फल कटवें चि तें तें होय ॥३॥
1695
जीव जीती जीवना संगें । मत्स्या मरण त्या वियोगें ॥१॥ जया चित्तीं जैसा भाव । तयां जविळ तैसा देव ॥ध्रु.॥ सकळां पाडीये भानु । परि त्या कमळाचें जीवनु ॥२॥ तुका म्हणे माता । वाहे तान्हे याची चिंता ॥३॥
1696
जीव तो चि देव भोजन ते भक्ति । मरण तेचि मुक्ति पापांड्याची ॥१॥ पिंडाच्या पोषकी नागविलें जन । लटिकें पुराण केलें वेद ॥ध्रु.॥ मना आला तैसा करिती विचार । म्हणती संसार नाहीं पुन्हा ॥२॥ तुका म्हणे पाठीं उडती यमदंड । पापपुण्य लंड न विचारी ॥३॥
1697
जीवन उपाय । वैदेवाणी तुझे पाय ॥१॥ ते मी नाठवीं घडिघडी । म्हणोनियां चरफडीं ॥ध्रु.॥ तुटे भवरोग । जेथें सर्व सुखें भोग ॥२॥ तुका म्हणे विटे । धरियेले जें गोमटें ॥३॥
1698
जीवन हे मुक्त नर जाले पावन । तजा हो दुर्जनसंगति ही ॥१॥ बहुत अन्न विष मोहरीच्या मानें । अवघें चि तेणें विष होय ॥२॥ तुका म्हणे जेणें आपलें स्वहित । तैसी करीं नीत विचारूनि ॥३॥
1699
जीवनावांचूनि तळमळी मासा । प्रकार हा तैसा होतो जीवा ॥१॥ न संपडे जालें भूमिगत धन । चरफडी मन तयापरी ॥ध्रु.॥ मातेचा वियोग जालियां हो बाळा । तो कळवळा जाणा देवा ॥२॥ सांगावे ते किती तुम्हांसी प्रकार । सकळांचें सार पाय दावीं ॥३॥ ये चि चिंते माझा करपला भीतर । कां नेणों विसर पडिला माझा ॥४॥ तुका म्हणे तूं हें जाणसी सकळ । यावरि कृपाळ होई देवा ॥५॥
1700
जीवभाव त्याचा गेला अभिमान । म्हणऊनि जन हांसे कंसा ॥१॥ सावध करितां नये देहावरि । देखोनियां दुरि पळे जन ॥२॥ जन वन हरि जालासे आपण । मग हे लोचन झांकियेले ॥३॥ झांकुनि लोचन मौन्यें चि राहिला । नाहीं आतां बोलायाचें काम ॥४॥ बोलायासि दुजें नाहीं हें उरलें । जन कृष्ण जाले स्वयें रूप ॥५॥ रूप पालटलें गुण नाम याति । तुका म्हणे भूतीं देव जाला ॥६॥
1701
जीवशिवाच्या मांडूनि हाला । अहं सोहं दोन्ही भेडती भला ॥१॥ घाली हुतुतू फिरोनि पाही आपुणासि । पाही बळिया तो मागिला तुटी पुढिलासि ॥ध्रु.॥ खेळिया तो हाल सांभाळी । धुम घाली तो पडे पाताळीं ॥२॥ बळिया गांढ्या तो चि खेळे । दम पुरे तो वेळोवेळां खेळे ॥३॥ हातीं पडे तो चि ढांग । दम पुरे तो खेळिया चांग ॥४॥ मागें पुढें पाहे तो जिंके । हातीं पडे तो चि आधार फिके ॥५॥ आपल्या बळें खळे रे भाई । गडियाची सांडोनि सोई ॥६॥ तुका म्हणे मी खेळिया नव्हें । जिकडे पडें त्याचि सवें ॥७॥
1702
जीवाचें जीवन अमृताची तनु । ब्रम्हांड भूषणु नारायण ॥१॥ सुखाचा सांगात अंतकासी अंत । निजांचा निवांत नारायण ॥ध्रु.॥ गोडाचें ही गोड हर्षाचें ही कोड । प्रीतीचा ही लाड नारायण ॥२॥ भावाचा निज भाव नांवांचा हा नांव । अवघा पंढरिराव अवतरलासे ॥३॥ तुका म्हणे जें हें साराचें हें सार । माझा अंगीकार तेणें केला ॥४॥
1703
जीविता तो माझा पिता । उखता तो उखत्यांचा ॥१॥ जनार्दनीं सरती कर्में । वाते भ्रमे अनेत्र । अपसव्य सव्यामधीं । ऐसी शुद्धी न धरितां ॥२॥ तुका म्हणे खांद्या पानें । सिंचतां भिन्न कोरडी ॥३॥
1704
जीवित्व तें किती । हें चि धरितां बरें चित्तीं ॥१॥ संत सुमनें उत्तरें । मृदु रसाळ मधुरें ॥ध्रु.॥ विसांवतां कानीं । परिपाक घडे मनीं ॥२॥ तुका म्हणे जोडी । हाय जतन रोकडी ॥३॥
1705
जीवींचें कां नेणां । परि हे आवडी नारायणा ॥१॥ वाढवावें हें उत्तर । कांहीं लाज करकर ॥ध्रु.॥ कोठें वांयां गेले । शब्द उत्तम चांगले ॥२॥ तुका म्हणे बाळा । असतात प्रिय खेळा ॥३॥
1706
जीवींचें जाणावें या नांवें आवडी । हेंकड तें ओढी अमंगळ ॥१॥ चित्तीच्या संकोचें कांहीं च न घडे । अतिशयें वेडे चार तो चि ॥ध्रु.॥ काळाविण कांहीं नाहीं रुचों येत । करूनि संकेत ठेवियेला ॥२॥ तुका म्हणे कळे वचनें चांचणी । काय बोलवूनि वेळोवेळां ॥३॥
1707
जीवें जीव नेणे पापी सारिका चि । नळी दुजयाची कापूं बैसे ॥१॥ आत्मा नारायण सर्वां घटीं आहे । पशुमध्यें काय कळों नये ॥ध्रु.॥ देखत हा जीव हुंबरे वरडत । निष्ठ‍ाचे हात वाहाती कैसे ॥२॥ तुका म्हणे तया चांडाळासी नर्क । भोगिती अनेक महादुःखें ॥३॥
1708
जीवें व्हावें साटी । पडे संवसारें तुटी ॥१॥ ऐशीं बोलिलों वचनें । सवें घेउनि नारायण ॥ध्रु.॥ नाहीं जन्मा आलों । करील ऐसें नेदीं बोलों ॥२॥ ठाव पुसी सेणें । तुका म्हणे खुंटी येणें ॥३॥
1709
जीवेंसाटीं यत्नभाव । त्याची नाव बळकट ॥१॥ पैल तीरा जातां कांहीं । संदेह नाहीं भवनदी ॥ध्रु.॥ विश्वासाची धन्य जाती । तेथें वस्ती देवाची ॥२॥ तुका म्हणे भोळियांचा । देव साचा अंकित ॥३॥
1710
जुंझायाच्या गोष्टी ऐकतां चि सुख । करितां हें दुःख थोर आहे ॥१॥ तैसी हरिभक्ति सुळावरील पोळी । निवडे तो बळी विरळा शूर ॥ध्रु.॥ पिंड पोसिलियां विषयांचा पाइक । वैकुंठनायक कैंचा तेथें ॥२॥ तुका म्हणे व्हावें देहासी उदार । रकुमादेवीवर जोडावया ॥३॥
1711
जुंझार ते एक विष्णुदास जगीं । पापपुण्य अंगीं नातळे त्यां ॥१॥ गोविंद आसनीं गोविंद शयनीं । गोविंद त्यां मनीं बैसलासे ॥ध्रु.॥ ऊर्ध पुंड भाळीं कंठीं शोभे माळी । कांपिजे किळकाळ तया भेणें ॥२॥ तुका म्हणे शंखचक्रांचे शृंगार । नामामृतसार मुखामाजी ॥३॥
1712
जुनाट हें धन अंत नाहीं पार । खात आले फार सरलें नाहीं ॥१॥ नारद हा मुनि शुक सनकादिक । उरलें आमुप तुम्हां आम्हां ॥ध्रु.॥ येथूनियां धना खाती बहु जन । वाल गुंज उणें जालें नाहीं ॥२॥ तुका म्हणे धना अंत नाहीं पार । कुंटित चार वाचा तेथें ॥३॥
1713
जे केली आळी ते अवघी गेली वांयां । उरला पंढरिराया श्रम माझा ॥१॥ काय समाधान केलें कोण वेळे । कोणें माझे लळे पाळियेलें ॥ध्रु.॥ आभास ही नाहीं स्वप्नीं दुश्चिता । प्रत्यक्ष बोलतां कंइचा तो ॥२॥ आतां पुढें लाज वाटे पांडुरंगा । भक्त ऐसे जगामाजी जाले ॥३॥ तुका म्हणे आतां नाहीं भरवसा । मोकलीसी ऐसा वाटतोसी ॥४॥
1714
जे गाती अखंड विठ्ठलाचे गीत । त्यांचे पायीं चत्ति ठेवीन मी ॥१॥ जयांसी आवडे विठ्ठलाचें नाम । ते माझे परम प्राणसखे ॥ध्रु.॥ जयांसी विठ्ठल आवडे लोचनीं । त्यांचें पायवणी स्वीकारीन ॥२॥ विठ्ठलासी जिहीं दिला सर्व भाव । त्यांच्या पायीं ठाव मागईंन ॥३॥ तुका म्हणे रज होईंन चरणींचा । म्हणविती त्यांचा हरिचे दास ॥४॥
1715
जे दोष घडले न फिटे करितां कांहीं । सरते तुझ्या पायीं जाले तैसे ॥१॥ माझा कां हो करूं नये अंगीकार । जालेती निष्ठ‍ पांडुरंगा ॥ध्रु.॥ यातिहीन नये ऐकों ज्यां वेद । तयां दिलें पद वैकुंठींचें ॥२॥ तुका म्हणे कां रे एकाचा आभार । घेसी माथां भार वाहोनियां ॥३॥
1716
जें का रंजलें गांजलें । त्यासि म्हणे जो आपुलें ॥१॥ तो चि साधु ओळखावा । देव तेथें चि जाणावा ॥ध्रु.॥ मृदु सबाह्य नवनीत । तैसें सज्जनाचें चित्त ॥२॥ ज्यासि आपंगिता नाहीं । त्यासि घरी जो हृदयीं ॥३॥ दया करणें जें पुत्रासी । ते चि दासा आणि दासी ॥४॥ तुका म्हणे सांगूं किती । तो चि भगवंताची मूर्ती ॥५॥
1717
जें जें कांही करितों देवा । तें तें सेवा समर्पें ॥१॥ भेद नाहीं सर्वात्मना । नारायणा तुज मज ॥ध्रु.॥ आम्ही दुजें नेणों कोणा । हें चि मना मन साक्ष ॥२॥ तुका म्हणे जगन्नाथा । हें अन्यथा नव्हे कीं ॥३॥
1718
जें जें केलें तें तें साहे । कैसें पाहें भाविक ॥१॥ ओंवाळूनि माझी काया । सांडिली यावरूनि ॥ध्रु.॥ काय होय नव्हें करूं । नेणें धरूं सत्ता ते ॥२॥ तुका म्हणे कटीं कर । उभें धीर धरूनि ॥३॥
1719
जें जें जेथें पावे । तें तें समर्पावें सेवे ॥१॥ सहज पूजा या चि नांवें । गळित अभिमानें व्हावें ॥ध्रु.॥ अवघें भोगितां गोसावी । आदीं आवसानीं जीवी ॥२॥ तुका म्हणे सिण । न धरितां नव्हे भिन्न ॥३॥
1720
जें जें मना वाटे गोड । तें तें कोड पुरविसी ॥१॥ आतां तूं चि बाह्यात्कारीं । अवघ्यापरी जालासी ॥ध्रु.॥ नाहीं सायासाचें काम । घेतां नाम आवडी ॥२॥ तुका म्हणे सर्वसांगे । पांडुरंगे दयाळे ॥३॥
1721
जें ज्याचें जेवण । तें चि याचकासी दान ॥१॥ आतां जाऊं चोजवीत । जेथें वसतील संत ॥ध्रु.॥ होतीं धालीं पोटें । मागें उरलीं उच्छिष्ट ॥२॥ तुका म्हणे धांव । पुढें खुंटईंल हांव ॥३॥
1722
जेंजें होआवें संकल्पें । तें चि पुण्य होय पाप ॥१॥ कारण तें मनापासीं । मेळविल्या मिळे रसीं ॥ध्रु.॥ सांडी मांडी हाली चाली । राहे तरि भली बोली ॥२॥ तुका म्हणे सार । नांव जीवनाचे सागर ॥३॥
1723
जेजे आळी केली तेते गेली वांयां । उरला पंढरिराया श्रम माझा ॥१॥ काय समाधान केलें कोण वेळे । कोणें माझे लळे पाळियेले ॥ध्रु.॥ अभ्यास तो नाहीं स्वप्नीं ही दुश्चिता । प्रत्यक्ष कैंचा चि तो ॥२॥ आतां पुढें लाज वाटे पांडुरंगा । भक्त ऐसें जगामाजी जालें ॥३॥ तुका म्हणे आतां नाहीं भरवसा । मोकलिसी ऐसा वाटतोसी ॥४॥
1724
जेजे कांहीं मज होईल वासना । तेते नारायणा व्हावें तुम्हीं ॥१॥ काय भाव एक निवडूं निराळा । जाणसी तूं कळा अंतरींची ॥ध्रु.॥ तुजविण मज कोण आहे सखा । जें सांगा आणिकां जीवभाव ॥२॥ अवघें पिशुन जालें असे जन । आपपर कोण नाठवे हें ॥३॥ तुका म्हणे तूं चि जीवांचें जीवन । माझें समाधान तुझे हातीं ॥४॥
1725
जेणें घडे नारायणीं अंतराय । होत बाप माय वर्जावीं तीं ॥१॥ येर प्रिया पुत्र धना कोण लेखा । करिती तीं दुःखा पात्र शत्रु ॥ध्रु.॥ प्रल्हादें जनक बिभीषणें बंधु । राज्य माता निंदु भरतें केली ॥२॥ तुका म्हणे सर्व धर्म हरिचे पाय । आणीक उपाय दुःखमूळ ॥३॥
1726
जेणें तुज जालें रूप आणि नांव । पतित हें दैव तुझें आम्ही ॥१॥ नाहीं तरी तुज कोण हें पुसतें । निराकारी तेथें एकाएकी ॥ध्रु.॥ अंधारे दीपा आणियेली शोभा । माणिकासी प्रभा कोंदणासी ॥२॥ धन्वंतरी रोगें आणिला उजेडा । सुखा काय चाडा जाणावें तें ॥३॥ अमृतासी मोल विषाचिया गुणें । पितळें तरी सोनें उंच निंच ॥४॥ तुका म्हणे आम्ही असोनिया जना । तुज देव पणा आणियेलें ॥५॥
1727
जेणें नाहीं केलें आपुलें स्वहित । पुढिलांचा घात इच्छीतसे ॥१॥ संचितासी जाय मिळोनियां खोडी । पतनाचे ओंडीवरी हांव ॥ध्रु.॥ बांधलें गांठी तें लागलें भोगावें । ऐसियासी देवें काय कीजे ॥२॥ तुका म्हणे जया गांवां जाणे जया । पुसोनियां तया वाट चाले ॥३॥
1728
जेणें माझें चित्त राहे तुझ्या पायीं । अखंड तें देई प्रेमसुख ॥१॥ देहभाव राख दीन करूनियां । जनाचारी वायां जाय तैसा ॥ध्रु.॥ द्रव्य दारा नको मानाची आवडी । कवणेविशीं गोडी प्रपंचाची ॥२॥ तुझें नाम माझें धरूनियां चित्त । एकांत लोकांत सदा राहो ॥३॥ तुका म्हणे तुझे जडोनियां पायीं । जालों उतराईं पांडुरंगा ॥४॥
1729
जेणें माझें हित होइल तो उपाव । करिसील भाव जाणोनियां ॥१॥ मज नाहीं सुख दुःख तया खंती । भावना हे चित्तीं नाना छंदें ॥ध्रु.॥ तोडीं हे संबंध तोडीं आशापाश । मज हो सायास न करितां ॥२॥ तुका म्हणे मी तों राहिलों निश्चिंत । कवळोनि एकांतसुख तुझें ॥३॥
1730
जेणें मुखें स्तवी । तें चि निंदे पाठीं लावी ॥१॥ ऐसी अधमाची याती । लोपी सोनें खाय माती ॥ध्रु.॥ गुदद्वारा वाटे । मिष्टान्नांचा नरक लोटे ॥२॥ विंचु लाभाविण । तुका म्हणे वाहे शीण ॥३॥
1731
जेणें वाढे अपकीर्ति । सर्वार्थी तें वर्जावें ॥१॥ सत्य रुचे भलेपण । वचन तें जगासी ॥ध्रु.॥ होइजेतें शूर त्यागें । वाउगें तें सारावें ॥२॥ तुका म्हणे खोटें वर्म । निंद्यकर्म काळिमा ॥३॥
1732
जेणें वेळ लागे । ऐसें सांडीं पांडुरंगे ॥१॥ कंठ कंठा मिळे देई । माझा वोरस तूं घेई ॥ध्रु.॥ नको पीतांबर । सांवरूं हे अळंकार ॥२॥ टाकीं वो भातुकें । लौकिकाचें कवतुकें ॥३॥ हातां पायां नको । कांहीं वेगळालें राखों ॥४॥ तुका म्हणे यावरी । मग सुखें अळंकारीं ॥५॥
1733
जेणें हा जीव दिला दान । तयाचें करीन चिंतन । जगजीवन नारायण । गाईन गुण तयाचे ॥१॥ जो या उभा भीवरेच्या तिरीं । कट धरूनियां करीं । पाउलें सम चि साजिरीं । अंतरीं धरोनि राहेन ॥ध्रु.॥ जो या असुरांचा काळ । भक्तजनप्रतिपाळ । खेळे हीं लाघवें सकळ । तयाच्या भाळ पायांवरी ॥२॥ जो या गोपाळांच्या मेळीं । खेळु खेळे वनमाळी । रसातळा नेला बळी । राहे पाताळीं स्वामी माझा ॥३॥ जो हा लावण्यपुतळा । जयाचे अंगीं सकळ कळा । जयाचे गळां वैजयंतीमाळा । तया वेळोवेळां दंडवत ॥४॥ जयाचे नाम पाप नासी । लक्ष्मी ऐसी जयाची दासी । जो हा तेजोपुंज्यरासी । सर्वभावें त्यासि तुका शरण ॥५॥
1734
जेणें होय हित । तें तूं जाणसी उचित ॥१॥ मज नको लावूं तैसें । वांयां जायें ऐसें पिसें ॥ध्रु.॥ धरितोसी सत्ता । होसी सकळ जाणता ॥२॥ चतुराच्या राया । अंगीकारावें तुकया ॥३॥
1735
जेथें आठवती स्वामीचे ते पाय । उत्तम ते ठाय रम्य स्थळ ॥१॥ रान अथवा घर एकांत लोकांत । समाधान चत्ति तें ते घडी ॥ध्रु.॥ धन्य तो हा काळ सरे आनंदरूप । वाहातां संकल्प गोविंदाचे ॥२॥ तुका म्हणे लाभकाळ ते चि जीणें । भाग्य नारायण उत्तम तें ॥३॥
1736
जेथें कीर्तन करावें । तेथें अन्न न सेवावें ॥१॥ बुका लावूं नये भाळा । माळ घालूं नये गळां ॥ध्रु.॥ तटावृषभासी दाणा । तृण मागों नये जाणा ॥२॥ तुका म्हणे द्रव्य घेती । देती ते ही नरका जाती ॥३॥
1737
जेथें जातों तेथें तू माझा सांगाती । चालविसी हातीं धरूनियां ॥१॥ चालों वाटे आम्ही तुझा चि आधार । चालविसी भार सवें माझा ॥ध्रु.॥ बोलों जातां बरळ करिसी तें नीट । नेली लाज धीट केलों देवा ॥२॥ अवघें जन मज जाले लोकपाळ । सोइरे सकळ प्राणसखे ॥३॥ तुका म्हणे आतां खेळतों कौतुकें । जालें तुझें सुख अंतर्बाहीं ॥४॥
1738
जेथें जातों तेथें पडतो मतोळा । न देखिजे डोळां लाभ कांहीं ॥१॥ कपाळीची रेखा असती उत्तम । तरि कां हा श्रम पावतों मी ॥ध्रु.॥ नव्हे चि तुम्हांस माझा अंगीकार । थीता संवसार अंतरला ॥२॥ भोग तंव जाला खरा भोगावया तो । भांडवल नेतो आयुष्य काळ ॥३॥ कोठें तुझी कीर्ती आइकिली देवा । मुकतों कां जीवा तुका म्हणे ॥४॥
1739
जेथें जावें तेथें कपाळ सरिसें । लाभ तो विशेषें संतसंगें ॥१॥ पूर्व पुण्यें जरि होतीं सानुकूळ । अंतरायमूळ नुपजे तेथें ॥ध्रु.॥ भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा । निकट वास बरा संतांपायीं ॥२॥ तुका म्हणे हे चि करावी मिरासी । बळी संतांपाशीं द्यावा जीव ॥३॥
1740
जेथें जेथें जासी । तेथें मज चि तूं पासी ॥१॥ ऐसा पसरीन भाव । रिता नाहीं कोणी ठाव ॥ध्रु.॥ चत्ति जडलें पायीं । पाळती हें ठायीं ठायीं ॥२॥ तुका म्हणे पोटीं । देव घालुनि सांगें गोष्टी ॥३॥
1741
जेथें देखें तेथें उभा । अवघ्या गगनाचा गाभा ॥१॥ डोळां बैसलें बैसलें । ध्यान राहोनि संचलें ॥ध्रु.॥ सरसावलें मन । केले सोज्वळ लोचन ॥२॥ तुका म्हणे सवें । आतां असिजेत देवें ॥३॥
1742
जेथें देखें तेथें तुझी च पाउलें । विश्व अवघें कोंदाटलें । रूप गुण नाम अवघा मेघश्याम । वेगळें तें काय उरलें । जातां लोटांगणीं अवघी च मेदिनी । सकळ देव पाट जालें । सदा पर्वकाळ सुदिन सुवेळ । चत्ति प्रेमें असे धालें ॥१॥ अवघा आम्हां तूं च जालासी देवा । संसार हेवा कामधंदा । न लगे जाणें कोठें कांहीं च करणें । मुखीं नाम ध्यान सदा ॥ध्रु.॥ वाचा बोले ते तुझे चि गुणवाद । मंत्रजप कथा स्तुति । भोजन सारूं ठायीं फल तांबोल कांहीं । पूजा नैवेद्य तुज होती । चालतां प्रदक्षणा निद्रा लोटांगण । दंडवत तुजप्रति । देखोन दृष्टी परस्परें गोष्टी । अवघ्या तुझ्या मूर्ति ॥२॥ जाल्या तीर्थरूप वावी नदी कूप । अवघें गंगाजळ जालें । महाल मंदिरें माड्या तनघरें । झोपड्या अवघीं देव देवाइलें । ऐकें कानीं त्या हरिनामध्वनी । नाना शब्द होत जाले । तुका म्हणे या विठोबाचे दास । सदा प्रेमसुखें धाले ॥३॥
1743
जेथें पाहें तेथें कांडिती भूस । चिपाडें चोखूनि पाहाती रस ॥१॥ काय सांगों देवा भुलले जीव । बहु यांची येतसे कींव ॥ध्रु.॥ वेठीचें मोटळें लटिकें चि फुगे । पेणिया जाऊनि भिक्षा मागे ॥२॥ तुका म्हणे कां उगे चि खोल । जवळी दाखवी आपणां बोल ॥३॥
1744
जेथें माझी दृष्टि जाय । तेथें पाय भावीन ॥१॥ असेन या समाधानें । पूजा मनें करीन ॥ध्रु.॥ अवघा च अवघे देसी । सुख घेवविसी संपन्न ॥२॥ तुका म्हणे बंधन नाहीं । ऐसें कांहीं ते करूं ॥३॥
1745
जेथें माझी दृष्टि राहिली बैसोन । तेथें चि हें मन गुंडाळातें ॥१॥ टाळावी ते पीडा आपुल्यापासून । दिठावेलें अन्न ओकवितें ॥ध्रु.॥ तुम्हांसी कां कोडें कोणे ही विशीचें । नवलाव याचें वाटतसे ॥२॥ तुका म्हणे वेगीं उभारा जी कर । कीर्त मुखें थोर गर्जईंन ॥३॥
1746
जेथें लIमीचा वास । गंगा आली पापा नास ॥१॥ तें म्यां हृदयीं धरिलें । तापें हरण पाउलें ॥ध्रु.॥ सेवा केली संतजनीं । सुखें राहिले लपोनि ॥२॥ तुका म्हणे वांकी । भाट जाली तिहीं लोकीं ॥३॥
1747
जेथें वैष्णवांचा वास । धन्य भूमी पुण्य देश ॥१॥ दोष नाहीं ओखदासी । दूत सांगे यमापाशीं ॥ध्रु.॥ गरुडटकयांच्या भारें । भूमि गर्जे जेजेकारें ॥२॥ सहज तयां जनां छंद । वाचे गोविंद गोविंद ॥३॥ तुळसीवनें रंगमाळा । अवघा वैकुंठसोहळा ॥४॥ तुका म्हणे भेणें । काळ नये तेणें राणें ॥५॥
1748
जेवितां ही घरी । नाक हागतिया परी ॥१॥ ऐसियाचा करी चाळा । आपुली च अवकळा ॥ध्रु.॥ सांडावें मांडावें । काय ऐसें नाहीं ठावें ॥२॥ तुका म्हणे करी । ताका दुधा एक सरी ॥३॥
1749
जेविले ते संत मागें उष्टावळी । अवघ्या पत्रावळी करुनी झाडा ॥१॥ सोवळ्या ओंवळ्या राहिलों निराळा । पासूनि सकळां अवघ्यां दुरीं ॥ध्रु.॥ परें परतें मज न लागे सांगावें । हें तों देवें बरें शिकविलें ॥२॥ दुसर्‍यातें आम्ही नाहीं आतळत । जाणोनि संकेत उभा असे ॥३॥ येथें कोणीं कांहीं न धरावी शंका । मज चाड एका भोजनाची ॥४॥ लांचावला तुका मारितसे झड । पुरविलें कोड नारायणें ॥५॥
1750
जेवीं नवज्वरें तापलें शरीर । लागे तया क्षीर विषातुल्य ॥१॥ तेवीं परमार्थ जीहीं दुराविला । तयालागीं झाला सन्निपात ॥ध्रु.॥ कामिनी जयाच्या जाहाली नेत्रासी । देखी तो चंद्रासी पीतवर्ण ॥२॥ तुका म्हणे मद्यपानाची आवडी । न रुचे त्या गोडी नवनीताची ॥३॥
1751
जैशा तुम्ही दुरी आहां । तैशा राहा अंतरें ॥१॥ नका येऊं देऊं आळ । अंगीं गोपाळ जडलासे ॥ध्रु.॥ अवघा हा चि राखा काळ । विक्राळ चि भोंवता ॥२॥ तुका म्हणे मज ऐशा । होतां पिशा जगनिंद्य ॥३॥
1752
जैशासाठीं तैसें हावें । हें बरवें कळलेंसे ॥१॥ उदास तूं नारायणा । मी ही म्हणा तुम्ही च ॥ध्रु.॥ ठका महाठक जोडा । जो धडफुडा लागासी ॥२॥ एकांगी च भांडे तुका । नाहीं धोका जीवित्वें ॥३॥
1753
जैसा अधिकार । तैसें बोलावें उत्तर ॥१॥ काय वाउगी घसघस । आम्ही विठोबाचे दास ॥ध्रु.॥ आम्ही जाणों एका देवा । जैसी तैसी करूं सेवा ॥२॥ तुका म्हणे भावें । माझें पुढें पडेल ठावें ॥३॥
1754
जैसा तैसा आतां । मज प्रमाण अनंता ॥१॥ पायां पडणें न संडीं । पोटीं तें च वर तोंडीं ॥ध्रु.॥ एका भावें चाड । आहे तैसें अंतीं गोड ॥२॥ तुका म्हणे आम्हां । टळणें चि नाहीं नेमा ॥३॥
1755
जैसा निर्मळ गंगाओघ । तैसा भाग वोगरीं ॥१॥ प्रेम वाढे ग्रासोग्रासीं । ब्रम्हरसीं भोजन ॥ध्रु.॥ तृप्तीवरि आवडी उरे । ऐसे बरे प्रकार ॥२॥ तुका म्हणे पाख मन । नारायण तें भोगी ॥३॥
1756
जैसी तैसी तरि वाणी । मना आणी माउली ॥१॥ लेकरांच्या स्नेहें गोड । करी कोड त्या गुणें ॥ध्रु.॥ मागें पुढें रिघे पोटीं । साहे खेटी करीतें ॥२॥ तुका विनवी पांडुरंगा । ऐसें पैं गा आहे हें ॥३॥
1757
जैसीं तैसीं तरी । शरणागतें तुझीं हरी ॥१॥ आतां न पाहिजे केलें । ब्रीद लटिकें आपुलें ॥ध्रु.॥ शुद्ध नाहीं चित्त । परी म्हणवितों भक्त ॥२॥ मज कोण पुसे रंका । नाम सांगे तुझें तुका ॥३॥
1758
जैसें चित्ती जयावरी । तैसें जवळी तें दुरी ॥१॥ न लगे द्यावा परिहार । या कोरडें उत्तर । असे अभ्यंतर । साक्षभूत जवळी ॥ध्रु.॥ अवघें जाणे सूत्रधारी । कोण नाचे कोणे परी ॥२॥ तुका म्हणे बुद्धि । ज्याची ते च तया सिद्धि ॥३॥ हीं पाइतन भूपतीशीं दावा । धिग त्या कर्तव्या आगी लागो ॥१॥ मुंगियांच्या मुखा गजाचा आहार । न साहावे भार जाय जीवें ॥२॥ तुका म्हणे आधीं करावा विचार । शूरपणें तीर मोकलावा ॥३॥
1759
जैसें तैसें बाळ मातेसी आवडे । बोलतां बोबडे शब्द गोड ॥१॥ आपुले आवडी लेववी खाववी । पाहोनियां जीवीं सुख वाटे ॥२॥ तुका म्हणे काय देऊं परिहार । काय ते साचार जाणतसें ॥३॥
1760
जैसें तैसें राहे देवाचें हें देणें । यत्न करितां तेणें काय नव्हे ॥१॥ दासां कृपासिंधु नुपेक्षी सर्वथा । अंतरींची व्यथा कळे त्यासी ॥ध्रु.॥ मागों नेणे परी माय जाणे वर्म । बाळा नेदी श्रम पावों कांहीं ॥२॥ तुका म्हणे मज अनुभव अंगें । वचन वाउगें मानेना हें ॥३॥
1761
जैसें दावी तैसा राहे । तरि कां देव दुरी आहे ॥१॥ दुःख पावायाचें मूळ । रहनी ठाव नाहीं ताळ ॥ध्रु.॥ माळामुद्रांवरी । कैंचा सोंगें जोडे हरि ॥२॥ तुका म्हणे देखें । ऐसे परीचीं बहुतेकें ॥३॥
1762
जो का निर्गुण निराकार । तेथें धरियेले अवतार ॥१॥ निर्गुण होता तो सगुणासि आला । भक्तिसाटीं प्रगटला ॥ध्रु.॥ जो का त्रिभुवनचाळक । तो हा नंदाचा बाळक ॥२॥ सोडविलें वसुदेवदेवकीसि । अवतार धरिला तिचे कुशी ॥३॥ मारियेला कंसराणा । राज्यीं स्थापिलें उग्रसेना ॥४॥ तुका म्हणे देवादिदेव । तो हा उभा पंढरिराव ॥५॥
1763
जो भक्तांचा विसावा । उभा पाचारितो धांवा ॥१॥ हातीं प्रेमाचें भातुकें । मुखीं घाली कवतुकें । भवसिंधू सुखें । उतरी कासे लावूनि ॥ध्रु.॥ थोर भक्तांची आस । पाहे भोंवताली वास ॥२॥ तुका म्हणे कृपादानी । फेडी आवडीची धणी ॥३॥
1764
जो मानी तो देईल काई । न मनी तो नेईल काई ॥१॥ आम्हां विठ्ठल सर्वभूतीं । राहो चित्तीं भलतैसा ॥ध्रु.॥ आध्येन तें जना काई । जल्पें वांयांविण ठायीं ॥२॥ वंदी निंदी तुज तो गा । तुका म्हणे पांडुरंगा ॥३॥
1765
जो या गेला पंढरपुरा । आणीक यात्रा न मानी तो ॥१॥ सुलभ माय पंढरिराणा । पुरवी खुणा अंतरींच्या ॥ध्रु.॥ जन्मांतरिंच्या पुण्यरासी । वारी त्यासी पंढरी ॥२॥ बाहेर येतां प्राण फुटे । रडें दाटे गहिवरें ॥३॥ दधिमंगळभोजन सारा । म्हणती करा मुरडींव ॥४॥ मागुता हा पाहों ठाव । पंढरिराव दर्शनें ॥५॥ तुका म्हणे भूवैकुंठ । वाळुवंट भींवरा ॥६॥
1766
जों जों घ्यावा सोस । माझे वारीं गर्भवास । लटिक्याचा दोष । अधिक जडे अंगेसीं ॥१॥ आतां आहे तैसें असो । अनुताप अंगीं वसो । येवढें चि नसो । माझें आणि परावें ॥ध्रु.॥ जागाजालेपणें । काय नासावें स्वप्न । शब्दाचिया शिणें । कष्ट मिथ्या मानावे ॥२॥ छाये माकड विटे । धांवे कुपीं काय भेटे । तुका म्हणे फुटे । डोईं गुडघे कोंपर ॥३॥
1767
जोडिले अंजुळ । असें दानउतावळि ॥१॥ पाहा वाहा कृपादृष्टी । आणा अनुभवा गोष्टी ॥ध्रु.॥ तूं धनी मी सेवक । आइक्य तें एका एक ॥२॥ करितों विनंती । तुका सन्मुख पुढती ॥३॥
1768
जोडिलें तें आतां न सरे सारितां । जीव बळी देतां हाता आलें ॥१॥ संचित सारूनि बांधिलें धरणें । तुंबिलें जीवन आक्षय हें ॥ध्रु.॥ शीत उष्ण तेथें सुखदुःख नाहीं । अंतर सबाही एक जालें ॥२॥ बीज तो अंकुर पत्र शाखा फळें । प्राप्तबीज मुळें अवघें नासे ॥३॥ तुका म्हणे नामीं राहिलीसे गोडी । बीजाच्या परवडी होती जाती ॥४॥
1769
जोडी कोणांसाटीं । एवढी करितोसी आटी ॥१॥ जरी हें आम्हां नाहीं सुख । रडों पोरें पोटीं भूक ॥ध्रु.॥ करूनि जतन । कोणा देसील हें धन ॥२॥ आमचे तळमळे । तुझें होईंल वाटोळें ॥३॥ घेसील हा श्राप । माझा होऊनियां बाप ॥४॥ तुका म्हणे उरी । आतां न ठेवीं यावरी ॥५॥
1770
जोडीच्या हव्यासें । लागे धनांचें चि पिसें ॥१॥ मग आणीक दुसरें । लोभ्या नावडती पोरें ॥ध्रु.॥ पाहे रुक्याकडे । मग अवघें ओस पडे ॥२॥ तुका म्हणे देवा । तुला बहुत चि हेवा ॥३॥
1771
जोडोनियां कर । उभा राहिलों समोर ॥१॥ हें चि माझेंभांडवल ।जाणे कारण विठ्ठल ॥ध्रु.॥ भाकितों करुणा । आतां नुपेक्षावें दीना ॥२॥ तुका म्हणे डोईं । ठेवीं वेळोवेळां पायीं ॥३॥
1772
जोडोनियां धन उत्तम वेव्हारें । उदास विचारें वेच करी ॥१॥ उत्तम चि गती तो एक पावेल । उत्तम भोगील जीव खाणी ॥ध्रु.॥ परउपकारी नेणें परनिंदा । परस्त्रिया सदा बहिणी माया ॥२॥ भूतदया गाईंपशूचें पालन । तान्हेल्या जीवन वनामाजी ॥३॥ शांतिरूपें नव्हे कोणाचा वाईंट । वाढवी महत्व वडिलांचें ॥४॥ तुका म्हणे हें चि आश्रमाचें फळ । परमपद बळ वैराग्याचें ॥५॥
1773
ज्ञानियांचा गुरु राजा महाराव । म्हणती ज्ञानदेव ऐसें तुम्हां ॥१॥ मज पामरा हें काय थोरपण । पायींची वाहाण पायीं बरी ॥ध्रु.॥ ब्रम्हादिक जेथें तुम्हां वोळगणे । इतर तुळणें काय पुरे ॥२॥ तुका म्हणे नेणे युक्तीची ते खोलीं । म्हणोनि ठेविली पायीं डोईं ॥३॥
1774
ज्ञानियांचे घरीं चोजवितां देव । तेथें अहंभाव पाठी लागे ॥१॥ म्हणोनियां ऐसे सांडिले उपाय । धरियेले पाय दृढ तुझे ॥ध्रु.॥ वेदपारायण पंडित वाचक । न मळिती एक एकांमधीं ॥२॥ पाहों गेलों भाव कैसी आत्मनिष्ठा । तेथें देखें चेष्टा विपरीत ॥३॥ आपुलिया नाहीं निवाले जे अंगें । योगी करती रागें गुरगुरु ॥४॥ तुका म्हणे मज कोणांचा पांगिला । नको बा विठ्ठला करूं आतां ॥५॥
1775
ज्या ज्या आम्हांपाशीं होतील ज्या शक्ति । तेणें हा श्रीपती अळंकारूं ॥१॥ अवघा पायांपाशीं दिला जीवभाव । जन्ममरणाठाव पुसियेला ॥ध्रु.॥ ज्याचें देणें त्यासी घातला संकल्प । बंधनाचें पाप चुकविलें ॥२॥ तुका म्हणे येथें उरला विठ्ठल । खाये बोले बोल गाये नाचे ॥३॥
1776
ज्यां जैसी आवडी त्यां तैसा विभाग । देत पांडुरंग तृप्ति जाली ॥१॥ मुखींचें उच्छष्टि हिरोनियां खात । विस्मित विधाता देखोनियां ॥ध्रु.॥ दिलें जें गोपाळां तें नाहीं कोणासि । विस्मित मानसीं सुरवर ॥२॥ देव ॠषि मुनि सद्धि हे चारण । शिव मरुद्गण चंद्र सूर्य ॥३॥ तुका म्हणे आले सकळ हि सुरवर । आनंदें निर्भर पाहावया ॥४॥
1777
ज्यांच्या संगें होतों पडिलों भोवनीं । ते केली धोवनी झाडूनियां ॥१॥ आतां एकाएकीं मनासीं विचार । करूं नाहीं भार दुजा याचा ॥ध्रु.॥ प्रसादसेवनें आली उष्टावळी । उचित ते काळीं अवचित ॥२॥ तुका म्हणे वर्म सांपडलें हातीं । सांडिली ते खंती चिंता देवा ॥३॥
1778
ज्याचा ऐसा अनुभव । विश्व देव सत्यत्वें ॥१॥ देव तया जवळी असे । पाप नासे दरुषणें ॥ध्रु.॥ कामक्रोधा नाहीं चाली । भूतीं जाली समता ॥२॥ तुका म्हणे भेदाभेद । गेले वाद खंडोनि ॥३॥
1779
ज्याची खरी सेवा । त्याच्या भय काय जीवा ॥१॥ करितां स्वामीसवें वाद । अधिक अधिक आनंद ॥ध्रु.॥. असावा तो धर्म । मग साहों जातें वर्म ॥२॥ वदे वाग्देवी । तुका विठ्ठली गौरवी ॥३॥
1780
ज्याची जया आस । तयाजवळी त्या वास ॥१॥ येर जवळी तें दुरी । धेनु वत्स सांडी घरीं ॥ध्रु.॥ गोडी प्रियापाशीं । सुख उपजे येरासी ॥२॥ तुका म्हणे बोल । घडे तयाठायीं मोल ॥३॥
1781
ज्याचे गर्जतां पवाडे । कळिकाळ पायां पडे ॥१॥ तो हा पंढरीचा राणा । पुसा सा चौं अठरा जणां ॥ध्रु.॥ चिंतितां जयासी । भुक्तिमुक्ति कामारी दासी ॥२॥ वैकुंठासी जावें । तुका म्हणे ज्याच्या नांवें ॥३॥
1782
ज्याचे गर्जतां पवाडे । श्रुतिशास्त्रां मौन्य पडे ॥१॥ तेथें माझी वाचा किती । पुरे करावया स्तुती ॥ध्रु.॥ सिणलें सहजर तोंडें । शेषाफणी ऐसें धेंडें ॥२॥ तुका म्हणे मही । पत्र सिंधु न पुरे शाही ॥३॥
1783
ज्याचे गांवीं केला वास । त्यासी नसावें उदास॥१॥ तरी च जोडिलें तें भोगे । कांहीं आघात न लगे ॥ध्रु.॥ वाढवावी थोरी । मुखें म्हणे तुझे हरी ॥२॥ तुका म्हणे हे गोमटी । दासा न घलावी तुटी ॥३॥
1784
ज्याचे माथां जो जो भार । ते चि फार तयासी ॥१॥ मागें पुढें अवघें रितें । कळों येतें अनुभवें ॥ध्रु.॥ परिसा अंगीं अमुपसोनें । पोटीं हीन धातु चि ॥२॥ आपुला तो करि धर्म । जाणे वर्म तुका तें ॥३॥
1785
ज्याचें जया ध्यान । तें चि होय त्याचें मन ॥१॥ म्हणऊनि अवघें सारा । पांडुरंग दृढ धरा ॥ध्रु.॥ सम खूण ज्याचे पाय । उभा व्यापक विटे ठाय ॥२॥ तुका म्हणे नभा । परता अनूचा ही गाभा ॥३॥
1786
ज्याचें जैसें भावी मन । त्यासि देणें दरुषण ॥१॥ पुरवूं जाणे मनिंची खूण । समाधान करोनि ॥ध्रु.॥ आपणियातें प्रगट करी । छाया वरी कृपेची ॥२॥ तुका म्हणे केले दान । मन उन्मन हरिनामीं ॥३॥
1787
ज्याणें ज्याणें जैसें ध्यावें । तैसें व्हावें कृपाळें ॥१॥ सगुणनिर्गुणांचा ठाव । विटे पाव धरियेले ॥ध्रु.॥ अवघें साकरेचें अंग । नये व्यंग निवडितां ॥२॥ तुका म्हणे जें जें करी । तें तें हरी भोगिता ॥३॥
1788
ज्याने आड यावें कांहीं । त्याचें नाहीं बळ आतां ॥१॥ मन येथें साह्य जालें । हरिच्या धालें गुणवादीं ॥ध्रु.॥ चुकुर तो गेला काळ । जालें बळ संगाचें ॥२॥ तुका म्हणे धरूं सत्ता । होईंल आतां करूं तें ॥३॥
1789
ज्यावें हीनपणें । कासयाच्या प्रयोजनें ॥१॥ प्रारब्धीं संसार । बरी हिमतीची थार ॥ध्रु.॥ होणार ते कांहीं । येथें अवकळा नाहीं ॥२॥ तुका म्हणे देवें । कृपा केलिया बरवें ॥३॥
1790
ज्यासी आवडी हरिनामांची । तो चि एक बहु शुचि ॥१॥ जपतो हरिनामें बीज । तो चि वर्णांमाजी द्विज ॥२॥ तुका म्हणे वर्णा धर्म । अवघें आहे सम ब्रम्ह ॥३॥
1791
ज्यासी नावडे एकादशी । तो जिता चि नरकवासी ॥१॥ ज्यासी नावडे हें व्रत । त्यासी नरक तो ही भीत ॥ध्रु.॥ ज्यासी मान्य एकादशी । तो जिता चि मुक्तवासी ॥२॥ ज्यासी घडे एकादशी । जाणें लागे विष्णुपाशीं ॥३॥ तुका म्हणे पुण्यराशी । तो चि करी एकादशी ॥४॥
1792
ज्यासी विषयाचें ध्यान । त्यासी कैंचा नारायण ॥१॥ साधु कैंचा पापीयासी । काय चांडाळासी काशी ॥ध्रु.॥ काय पतितासी पिता । काय अधमासी गीता ॥२॥ तुका म्हणे निरंजनी । शट कैंचा ब्रम्हज्ञानी ॥३॥
1793
ज्वरल्यासी काढा औषध पाचन । मूढां नारायण स्मरवितो ॥१॥ भवव्याधि येणें तुटेल रोकडी । करूनियां झाडी निश्चयेसी ॥ध्रु.॥ आणिकां उपायां अनुपान कठिण । भाग्यें बरें सीण शीघ्रवत ॥२॥ तुका म्हणे केला उघडा पसारा । भाग्य आलें घरा दारावरी ॥३॥
1794
झंवविली महारें । त्याची व्याली असे पोरें ॥१॥ करी संताचा मत्सर । कोपें उभारोनि कर ॥ध्रु.॥ बीज तैसें फळ । वरी आलें अमंगळ ॥२॥ तुका म्हणे ठावें । ऐसें जालें अनुभवें ॥३॥
1795
झड मारोनियां बैसलों पंगती । उठवितां फजिती दातयाची ॥१॥ काय तें उचित तुम्हां कां न कळे । कां हो झांका डोळे पांडुरंगा ॥ध्रु.॥ घेईंन इच्छेचें मागोनि सकळ । नाहीं नव्हे काळ बोलायाचा ॥२॥ तुका म्हणे जालों माना अधिकारी । नाहीं लोक परी लाज देवा ॥३॥
1796
झरा लागला सुखाचा । ऐसा मापारी कइंचा ॥१॥ जो हें माप तोंडें धरी । सळे जाली ते आवरी ॥ध्रु.॥ जाले बहु काळ । कोणा नाहीं ऐसें बळ ॥२॥ तुका म्हणे तळ । नाहीं पाहेसा सकळ ॥३॥
1797
झांकूनियां नेत्र काय जपतोसी । जंव नाहीं मानसीं प्रेमभाव ॥१॥ रामनाम म्हणा उघड मंत्र जाणा । चुकती यातना गर्भवास ॥ध्रु.॥ मंत्र यंत्र संध्या करिसी जडीबुटी । तेणें भूतसृष्टी पावसील ॥२॥ तुका म्हणे ऐक सुंदर मंत्र एक । भवसिंधुतारक रामनाम ॥३॥
1798
झाड कल्पतरू । न करी याचकीं आव्हेरू ॥१॥ तुम्ही सर्वी सर्वोत्तम । ऐसे विसरतां धर्म ॥ध्रु.॥ परिसा तुमचें देणें । तो त्या जागे अभिमानें ॥२॥ गार्‍हाण्यानें तुका । गर्जे मारुनियां हाका ॥३॥
1799
झाडा वरपोनि खाऊनियां पाला । आठवी विठ्ठला वेळोवेळां ॥१॥ वल्कलें नेसुनि ठुंगा गुंडाळुनी । सांडी देहभान जवळुनी ॥ध्रु.॥ लोकमान वमनासमान मानणें । एकांतीं राहणें विठोसाटीं ॥२॥ सहसा करूं नये प्रपंचीं सौजन्य । सेवावें अरण्य एकांतवास ॥३॥ ऐसा हा निर्धार करी जो मनाचा । तुका म्हणे त्याचा पांग फिटे ॥४॥
1800
झेला रे झेला वरचेवर झेला । हातिचें गमावी तो पाठीं साहे टोला ॥१॥ त्रिगुणाचा चेंडू हातें झुगारी निराळा । वरिलिया मुखें मन लावी तेथें डोळा ॥ध्रु.॥ आगळा होऊनि धरी वरिचिया वरी । चपळ तो जिंके गांढ्या ठके येरझारीं ॥२॥ हातीं सांपडलें उभें बैसों नेदी कोणी । सोरीमागें सोरी घेती ओणवें करूनि ॥३॥ डाई पडिलिया सोसी दुःखाचे डोंगर । पाठीवरी भार भोंवता ही उभा फेर ॥४॥ तुका म्हणे सुख पाहे तयाचें आगळें । जिंकी तो हरवी कोणी एका तरी काळें ॥५॥
1801
टंवकारूनि दृष्टी लावुनियां रंग । दावी झगमग डोळ्यांपुढें ॥१॥ म्हणती शिष्यासी लागली समाधी । लटकी चि उपाधी झकविती ॥ध्रु.॥ दीपाचिया ज्योती कोंडियेलें तेज । उपदेश सांजरात्रीमाजी ॥२॥ रांगोळिया चौक शृंगारुनी वोजा । आवरण पूजा यंत्र करी ॥३॥ पडदा लावोनियां दीप चहूं कोनीं । बैसोनि आसनीं मुद्रा दावी ॥४॥ नैवेद्यासी म्हणे करावें पक्वान्न । पात्रासी दिव्यान्न परवडी ॥५॥ जाला उपदेश कवळ घ्या रे मुखीं । आपोशन शेखीं बुडविलें ॥६॥ पाषांड करोनि मांडिली जीविका । बुडवी भाविकां लोकांप्रती ॥७॥ कायावाचामनें सोडवी संकल्प । गुरु गुरु जप प्रतिपादी ॥८॥ शुद्ध परमार्थ बुडविला तेणें । गुरुत्वभूषणें भोग भोगी ॥९॥ विधीचा ही लोप बुडविला वेद । शास्त्रांचा ही बोध हरविला ॥१०॥ योगाची धारणा नाहीं प्राणायाम । सांडी यम नेम नित्यादिक ॥११॥ वैराग्याचा लोप हरिभजनीं विक्षेप । वाढविलें पाप मतिलंडें ॥१२॥ तुका म्हणे गेलें गुरुत्व गुखाडी । पूर्वजांसी धाडी नर्कवासा ॥१३॥
1802
टळिा टोपी उंच दावी । जगीं मी एक गोसावी ॥१॥ अवघा वरपंग सारा । पोटीं विषयांचा थारा ॥ध्रु.॥ मुद्रा लावितां कोरोनि । मान व्हावयासी जनीं ॥२॥ तुका म्हणे ऐसे किती । नरका गेले पुढें जाती ॥३॥
1803
टाक रुका चाल रांडे कां गे केली गोवी । पुसोनियां आलें ठाव म्हणोनि देतें सिवी ॥१॥ आतां येणें छंदें नाचों विनोदें । नाहीं या गोविंदें माझें मजसी केलें ॥ध्रु.॥ कोरडे ते बोल कांगे वेचितेसी वांयां । वर्ते करूनि दावीं तुझ्या मुळीचिया ठाया ॥२॥ याजसाठीं म्या डौर धरियेला हातीं । तुका म्हणे तुम्हा गांठी सोडायाची खंती ॥३॥
1804
टाळ दिडी हातीं । वैकुंठींचे सांगाती ॥१॥ जाल तरी कोणा जा गा । करा सिदोरी ते वेगा ॥ध्रु.॥ जाती सादावीत । तेथें असों द्यावें चित्त ॥२॥ तुका म्हणे बोल । जाती बोलत विठ्ठल ॥३॥
1805
टाळघोळ सुख नामाचा गजर । घोषें जेजेकार ब्रम्हानंदु ॥१॥ गरुडटके दिंडी पताकांचे भार । आनंद अपार ब्रम्हादिकां ॥ध्रु.॥ आनंदें वैष्णव जाती लोटांगणीं । एक एकाहुनि भद्रजाति ॥२॥ तेणें सुखें सुटे पाषाणां पाझर । नष्ट खळ नर शुद्ध होती ॥३॥ तुका म्हणे सोपें वैकुंठवासी जातां । रामकृष्ण कथा हे ची वाट ॥४॥
1806
टिळा टोपी माळा देवाचें गवाळें । वागवी वोंगळ पोटासाटीं ॥१॥ तुळसी खोवी कानीं दर्भ खोवी शेंडी । लटिकी धरी बोंडी नासिकाची ॥ध्रु.॥ कीर्तनाचे वेळे रडे पडे लोळे । प्रेमेंविण डोळे गळताती ॥२॥ तुका म्हणे ऐसे मावेचे मइंद । त्यांपाशीं गोविंद नाहीं नाहीं ॥३॥
1807
ठकिलें काळा मारिली दडी । दिली कुडी टाकोनियां ॥१॥ पांघुरलों बहु काळें । घोंगडें बळें सांडवलें ॥ध्रु.॥ नये ऐसा लाग वरी । परते दुरी लपालें ॥२ ॥ तुका म्हणे आड सेवा । लाविला हेवा धांदली ॥३॥
1808
ठाकलोंसें द्वारीं । उभें याचक भीकारी ॥१॥ मज भीक कांहीं देवा । प्रेमभातुकें पाठवा ॥ध्रु.॥ याचकाचा भार । नये घेऊं येरझार ॥२॥ तुका म्हणे दान । सेवा घेतल्यावांचून ॥३॥ सदाशिवावर अभंग ॥ २ ॥
1809
ठायींची ओळखी । येइल टाकुं टाका सुखीं ॥१॥ तुमचा जाईल ईमान । माझे कपाळीं पतन ॥ध्रु.॥ ठेविला तो ठेवा । अभिळाषें बुडवावा ॥२॥ मनीं न विचारा । तुका म्हणे हे दातारा ॥३॥
1810
ठाव तुम्हांपाशीं । जाला आतां हृषीकेशी ॥१॥ न लगे जागावें सतत । येथें स्वभावें हे नीत ॥ध्रु.॥ चोरट्यासी थारा । येथें कैंचा जी दातारा ॥२॥ तुका म्हणे मनें । आम्हां जालें समाधान ॥३॥
1811
ठाव देऊनिया राखें पायापासीं । मी तों आहें रासी पातकाची ॥१॥ पातकाची रासी म्हणतां लागे वेळ । ऐके तो कृपाळ नारायण ॥ध्रु.॥ नारायणनामें अवघें सांग जालें । असंग चि केलें एकमय ॥२॥ एकमय जालें विठोबाच्या नामें । भेदाभेद कर्म आणिक कांहीं ॥३॥ तुका म्हणे चित्तीं चिंतिलें जें होतें । तें होय आपैतें नामें याच्या ॥४॥
1812
ठाव नाहीं बुड । घरें वसविसी कुड ॥१॥ भलते ठायीं तुझा वास । सदा एरवी उदास ॥ध्रु.॥ जागा ना निजेला । धाला ना भुकेला ॥२॥ न पुसतां भलें । तुका म्हणे बुझें बोलें ॥३॥
1813
ठेवा जाणीव गुंडून । येथें भाव चि प्रमाण ॥१॥ एका अनुसरल्या काज । अवघें जाणें पंढरिराज ॥ध्रु.॥ तर्कविर्कासी वाव । न लागे सायासीं ॥२॥ तुका म्हणे भावेंविण । अवघा बोलती तो सीण ॥३॥
1814
ठेविलें जतन । करूनियां निज धन ॥१॥ जयापासाव उत्पित्त । तें हें बीज धरिलें हातीं ॥ध्रु.॥ निवडिलें वरळा भूस । सार आइन जिनस ॥२॥ तुका म्हणे नारायण । भाग संचिताचा गुण ॥३॥
1815
ठेवूनि इमान राहिलों चरणीं । म्हणउनि धणी कृपा करी ॥१॥ आम्हांसी भांडार करणें जतन । आलें गेलें कोण उंच निंच ॥ध्रु.॥ करूनि सांभाळीं राहिला निराळा । एक एक वेळा आज्ञा केली ॥२॥ तुका म्हणे योग्यायोग्य विनीत । देवा नाहीं चित्त येथें देणें ॥३॥
1816
ठेवूनियां डोईं । पायीं जालों उतराईं ॥१॥ कारण तें तुम्हीं जाणां । मी तराळ नारायणा ॥ध्रु.॥ प्रसंगीं वचन । दिलें तें चि खावें अन्न ॥२॥ तुका म्हणे भार । तुम्ही जाणां थोडा फार ॥३॥ उपदेश अभंग ॥ ११ ॥
1817
डगमगी मन निराशेच्या गुणें । हें तों नारायणें सांतवीजे ॥१॥ धीरें तूं गंभीर जीवनें जगाचें । जळो विभागाचें आत्रीतत्या ॥ध्रु.॥ भेईंल जीव हें देखोनि कठिण । केला जातो सीण तो तो वांयां ॥२॥ तुका म्हणे आवश्यक हें वचन । पाळावें चि वान समयो आहे ॥३॥
1818
डळमळिला मेरु आणि तो मांदार । पाताळीं फणिवर डोईं झाडी ॥१॥ लोपे तेजें सूर्य आणीक हा चंद्र । कांपतसे इंद्र थरथरां ॥ध्रु.॥ ऐसें रूप उग्र हरीनें धरिलें । दैत्या मारियेलें मांडीवरी॥२॥ तुका म्हणे भक्तांकारणें श्रीहरि । बहु दुराचारी निर्दाळिले ॥३॥
1819
डाई घालुनियां पोरें । त्यांचीं गुरें चुकवीलीं ॥१॥ खेळ खेळतां फोडिल्या डोया । आपण होय निराळा ॥ध्रु.॥ मारिती माया घेती जीव । नाहीं कीव अन्यायें ॥२॥ तुका कान्होबा मागें । तया अंगें कळों आलें ॥३॥
1820
डिवेना डसेना बुझेना निर्मळ । परि अमंगळ स्वीकारीना ॥१॥ परंतु गर्धब अपवित्र जाणा । पर्वकाळीं दाना देऊं नये ॥ध्रु.॥ डिवी लात्री बुजे बहु नेदी दुध । मुखीं नाहीं शुद्ध विष्ठा खाय ॥२॥ परंतु ते गाय पवित्र हो जाणा । पर्वकाळीं दाना देऊजेते ॥३॥ ब्राम्हणें ब्राम्हणा सद्ग‍ू करावा । परि न करावा शूद्रादिक ॥४॥ तुका म्हणे देवें सांगितली सोय । म्हणोनि त्याचे पाय धरिले जीवें ॥५॥
1821
डोई वाढवूनि केश । भूतें आणिती अंगास ॥१॥ तरी ते नव्हति संतजन । तेथें नाहीं आत्मखुण ॥ध्रु.॥ मेळवूनि नरनारी । शकुन सांगती नानापरी ॥२॥ तुका म्हणे मैंद । नाहीं त्यापासीं गोविंद ॥३॥
1822
डोळां भरिलें रूप । चित्ता पायांपें संकल्प ॥१॥ अवघी घातली वांटणी । प्रेम राहिलें कीर्तनी ॥ध्रु.॥ वाचा केली माप । रासीं हरिनाम अमुप ॥२॥ भरूनियां भाग । तुका बैसला पांडुरंग ॥३॥
1823
डोळियां पाझर कंठ माझा दाटे । येऊं देई भेटे पांडुरंगे ॥१॥ बहु दिस टाकिले निरास कां केलें । कोठें वो गुंतलें चत्ति तुझें ॥ध्रु.॥ बहु धंदा तुज नाहीं वो आठव । राहिलासे जीव माझा कंठीं ॥२॥ पंढरीस जाती वारकरी संतां । निरोप बहुतां हातीं धाडीं ॥३॥ तुजविण कोण सांवा धांवा करी । ये वो झडकरी पांडुरंगे ॥४॥ काय तुझी वाट पाहों कोठवरी । कृपाळु कांपरी विसरलासी ॥५॥ एक वेळ माझा धरूनि आठव । तुका म्हणे ये वो न्यावयासी ॥६॥
1824
डोळियांचें दैव आजि उभें ठेलें । निधान देखिलें पंढरीये ॥१॥ काय ते वानावें वाचेचे पालवें । वेदा न बोलवे रूप ज्याचें ॥ध्रु.॥ आनंदाच्या रसें ओंतीव चांगलें । देखतां रंगलें चित्त माझें ॥२॥ तुका म्हणे मी तों सगळाच विरालों । विठ्ठल चि जालों दर्शनानें ॥३॥
1825
डोळ्यामध्यें जैसें कणु । अणु तें हि न समाये ॥१॥ तैसें शुद्ध करीं हित । नका चित्ती बाटवूं ॥ध्रु.॥ आपल्याचा कळवळा। आणिका बाळावरि न ये ॥२॥ तुका म्हणे बीज मुडा । जैशा चाडा पिकाच्या ॥३॥
1826
डौरलों भक्तिसुखें । सेवूं अमृत हें मुखें ॥१॥ संतसंगें सारूं काळ । प्रेमसुखाचा कल्लोळ ॥ध्रु.॥ ब्रम्हादिकांसी सुराणी । तो हा आनंद मेदिनी ॥२॥ नाहीं वैकुंठींचा पांग । धांवे कथे पांडुरंग ॥३॥ मुक्त व्हावें काशासाठीं । कैची येणें रसें भेटी ॥४॥ तुका म्हणे गोड । हें चि पुरे माझें कोड ॥५॥
1827
ढालतलवारे गुंतले हे कर । म्हणे जुंझणार कैसा जुंझे ॥१॥ पेटी पडदळे सिले टोप ओझें । हें तों जालें दुजें मरणमूळ ॥ध्रु.॥ बैसविलें मला येणें अश्वावरी । धावूं पळूं तरी कैसा आतां ॥२॥ असोनि उपाय म्हणे हे अपाय । म्हणे हायहाय काय करूं ॥३॥ तुका म्हणे हा तों स्वयें परब्रम्ह । मूर्ख नेणे वर्म संतचरण ॥४॥
1828
ढेंकणाचे संगें हिरा जो भंगला । कुसंगें नाडला तैसा साधु ॥१॥ ओढाळाच्या संगें सात्विक नासलीं । क्षण एक नाडलीं समागमें ॥ध्रु.॥ डांकाचे संगती सोनें हीन जालें । मोल तें तुटलें लक्ष कोडी ॥२॥ विषानें पक्वान्नें गोड कडू जालीं । कुसंगानें केली तैसी परी ॥३॥ भावें तुका म्हणे सत्संग हा बरा । कुसंग हा फेरा चौर्‍याशीचा ॥४॥
1829
ढेंकणासी बाज गड । उतरचढ केवढी ॥१॥ होता तैसा कळों भाव । आला वाव अंतरींचा ॥ध्रु.॥ बोरामध्यें वसे अळी । अठोळीच भोंवती ॥२॥ पोटासाटीं वेंची चणे । राजा म्हणे तोंडें मी ॥३॥ बेडकानें चिखल खावा । काय ठावा सागर ॥४॥ तुका म्हणे ऐसें आहे । काय पाहे त्यांत तें ॥५॥
1830
ढेकरें जेवण दिसे साचें । नाहीं तरि काचें कुंथाकुंथी ॥१॥ हे ही बोल ते ही बोल । कोरडे फोल रुचीविण ॥ध्रु.॥ गव्हांचिया होती परी । फके वरी खाऊं नये ॥२॥ तुकां म्हणे असे हातींचें कांकण । तयासी दर्पण विल्हाळक ॥३॥
1831
तंव ते म्हणे ऐका हृषीकेशी वो । नवाजिलें तुम्ही म्हणां आपणांसि वो । तरी कां वंचनुक सुमनासि वो । नट नाट्य बरें संपादूं जाणतोसि वो ॥१॥ सर हो परता परता हो आतां हरी । म्हणे सत्राजिताची कुमरी । जाणतें मी या शब्दाच्या कुसरी । ऐसें च करून ठकविलें आजिवरी ॥ध्रु.॥ भावें गेलें म्हुण न व्हावा वियोग । मनिचे आर्त जन्मांतरीं व्हावा संग । तों तों केलें हें पाठमोरें जग । ऐसें काय जाणें हे तुझे रंग ॥२॥ काय करूं या नागविलें कामें । लागलें तयास्तव इतुकें सोसावें । नाहीं तरी कां नव्हती ठावीं वर्में । परद्वारीं ऐसा हाकलिती प्रसिद्ध नांवें ॥३॥ काय किती सांगावे तुझे गुण । न फुटे वाणी निष्ठ‍ ऐसा निर्गुण । आप पर न म्हणसी माय बहीण । सासूसुनास लावुनि पाहासी भांडण ॥४॥ इतुकियावरी म्हणे वैकुंठिंचा राणा । होऊन गेलें तें नये आणूं मना । आतां न करीं तैसें करी क्रिया आणा । भक्तवत्सल म्हणे तुकयाबंधु कान्हा ॥५॥
1832
तंव तो हरि म्हणे वो निजांगने वो । लाइ नीच कां देसील डोहणे वो । मजपें दुजें आलें तें देव जाणे वो । शब्द काय हे बोलसी ते उणे वो ॥१॥ पाहा मनीं विचारुनी आधि वो । सांडूनि देई भ्रांति करीं स्थिर बुद्धि वो । तंट केलें हें माझें तुझें उपाधीं वो । उघडी डोळे आझुनि तरी धरीं शुद्धि वो ॥ध्रु.॥ कोठें तरी दुनियांत वर्तलें वो । स्त्रियांनीं भ्रतारा दानां दिलें वो । कैसा भला मी नव्हे तें सोसिलें वो । रुसतेसी तूं उफराटें नवल जालें वो ॥२॥ काय सांग म्यां दैन्य केली कैसी वो । तुझ्या गर्वें आणविलें हनुमंतासि वो । कष्टी केलें मज गरुडा भीमकीसि वो । तुकयाबंधु म्हणे खरें खोटें नव्हे यासि वो ॥३॥
1833
तक्र शिष्या मान । दुग्धा म्हणे नारायण ॥१॥ ऐशीं ज्ञानाचीं डोबडें । आशा विटंबिलीं मूढें ॥ध्रु.॥ उपदेश तो जगा । आपण सोंवळा इतका मांगा ॥२॥ रसनाशिश्नाचे अंकित । तुका म्हणे वरदळ स्पित ॥३॥
1834
तजिलें भेटवी आणूनि वासना । दाविल्याचे जना काय काज ॥१॥ आळवावें देवा भाकूनि करुणा । आपुलिया मना साक्ष करीं ॥ध्रु.॥ नाहीं जावें यावें दुरूनि लागत । आहे साक्षभूत अंतरींचा ॥२॥ तुका म्हणे हा आहे कृपासिंधु । तोडी भवबंधु तात्काळिक ॥३॥
1835
तटाचे जातीला नाहीं भीड भार । लाता मारी थोर लाहान नेणे ॥१॥ परी तो त्या विशेष मानुष होऊन । करी खंड मान वडिलांचा ॥ध्रु.॥ बेरसा गाढव माया ना बहीण । भुंके चवीविण भलतें चि ॥२॥ तुकयाबंधु म्हणे बोकड मातलें । न विचारी आपुले तोंडीं मुते ॥३॥
1836
तडामोडी करा । परि उत्तम तें भरा ॥१॥ जेणें खंडे एके खेपे । जाय तेथें लाभें वोपे ॥ध्रु.॥ दाविल्या सारिखें । मागें नसावें पारिखें ॥२॥ मागें पुढें ॠण । तुका म्हणे फिटे हीण ॥३॥
1837
तन मन धन दिलें पंढरिराया । आतां सांगावया उरलें नाहीं ॥१॥ अर्थचाड चिंता नाहीं मनीं आशा । तोडियेला फांसा उपाधीचा ॥२॥ तुका म्हणे एक विठोबाचें नाम । आहे जवळी दाम नाहीं रुका ॥३॥
1838
तप तीर्थ दान व्रत आचरण । गातां हरिगुण वारूं नये ॥१॥ कोटि कुळें त्याचीं वाटुली पाहाती । त्या तया घडती ब्रम्हहत्या ॥ध्रु.॥ आपुलिया पापें न सुटे सायासें । कोणा काळें ऐसें निस्तरेल ॥२॥ व्हावें साह्य तया न घलावें भय । फुकासाटीं पाहे लाभ घात ॥३॥ तुका म्हणे हित माना या वचना । सुख दुःख जाणा साधे फुका ॥४॥
1839
तपाचे सायास । न लगे घेणें वनवास ॥१॥ ऐसें कळलें आम्हां एक । जालों नामाचे धारक ॥ध्रु.॥ जाळीं महाकर्में । दावीं निजसुख धर्में ॥२॥ तुका म्हणे येणें । कळिकाळ तें ठेंगणें ॥३॥
1840
तपासी तें मन करूं पाहे घात । धरोनि सांगात इंद्रियांचा ॥१॥ म्हणोनि कीर्तन आवडलें मज । सांडोनियां लाज हें चि करी ॥ध्रु.॥ पाहातां आगमनिगमाचे ठाव । तेथें नाहीं भाव एकविध ॥२॥ तुका म्हणे येथें नाहीं वो विकार । नाम एक सार विठोबाचें ॥३॥
1841
तम भज्याय ते बुरा जिकीर ते करे । सीर काटे ऊर कुटे ताहां सब डरे ॥१॥ ताहां एक तु ही ताहां एक तु ही । ताहां एक तु ही रे बाबा हमें तुम्हें नहीं ॥ध्रु.॥ दिदार देखो भुले नहीं किशे पछाने कोये । सचा नहीं पकडुं सके झुटा झुटे रोये ॥२॥ किसे कहे मेरा किन्हे सात लिया भास । नहीं मेलो मिले जीवना झुटा किया नास ॥३॥ सुनो भाई कैसा तो ही । होय तैसा होय । बाट खाना आल्ला कहना एकबारां तो ही ॥४॥ भला लिया भेक मुंढे । आपना नफा देख । कहे तुका सो ही संका । हाक आल्ला एक ॥५॥ मलंग - अभंग १
1842
तया घडले सकळ नेम । मुखीं विठोबाचें नाम ॥१॥ कांहीं न लगे सिणावें । आणिक वेगळाल्या भावें । वाचे उच्चारावें । रामकृष्णगोविंदा ॥ध्रु.॥ फळ पावाल अवलिळा । भोग वैकुंठ सोहळा ॥२॥ तुका म्हणे त्याच्या नांवें । तो चि होइजेल स्वभावें ॥३॥
1843
तया साटीं वेचूं वाणी । अइकों कानीं वारता ॥१॥ क्षेम माझे हरिजन । समाधान पुसतां त्यां ॥ध्रु.॥ परत्रींचे जे सांगाती । त्यांची याती न विचारीं ॥२॥ तुका म्हणे धैर्यवंतें । निर्मळचित्तें सरवीं तीं ॥३॥
1844
तयांसवें करी काला दहींभात । सिदोर्‍या अनंत मेळवुनी ॥१॥ मेळवुनी अवघियांचे एके ठायीं । मागें पुढें कांहीं उरों नेदी ॥२॥ नेदी चोरी करूं जाणे अंतरींचें । आपलें हीं साचें द्यावें तेथें ॥३॥ द्यावा दहींभात आपले प्रकार । तयांचा वेव्हार सांडवावा ॥४॥ वांटी सकळांसि हातें आपुलिया । जैसें मागे तया तैसें द्यावें ॥५॥ द्यावें सांभाळुनी सम तुकभावें । आपण हि खावें त्यांचें तुक ॥६॥ तुक सकळांचे गोविंदाचे हातीं । कोण कोणे गति भला बुरा ॥७॥ राखे त्यासि तैसें आपलाल्या भावें । विचारुनि द्यावें जैसें तैसें ॥८॥ तैसें सुख नाहीं वैकुंठींच्या लोकां । तें दिलें भाविकां गोपाळांसि ॥९॥ गोपाळांचे मुखीं देउनी कवळ । घांस माखे लाळ खाय त्यांची ॥१०॥ त्यांचिये मुखींचे काढूनियां घांस । झोंबतां हातांस खाय बळें ॥११॥ बळें जयाचिया ठेंगणें सकळ । तयातें गोपाळ पाडितील ॥१२॥ पाठी उचलूनि वाहातील खांदीं । नाचतील मांदीं मेळवुनी ॥१३॥ मांदीं मेळवुनी धणी दिली आम्हां । तुका म्हणे जमा केल्या गाईं ॥१४॥
1845
तयासी नेणतीं बहु आवडती । होय जयां चित्तीं एक भाव ॥१॥ उपमन्यु धुरु हें काय जाणती । प्रल्हादाच्या चित्तीं नारायण ॥ध्रु.॥ कोळें भिल्लें पशु श्वापदें अपारें । कृपेच्या सागरें तारियेलीं ॥२॥ काय तें गोपाळें चांगलीं शाहाणीं । तयां चक्रपाणी जेवी सवें ॥३॥ तुका म्हणे भोळा भाविक हा देव । आम्ही त्याचे पाव धरूनी ठेलों ॥४॥
1846
तरले ते मागें आपुलिया सत्ता । कमाईं अनंता करूनियां ॥१॥ उसनें फेडितां धर्म तेथें कोण । ते तुज अनन्ये तुम्ही त्यांसी ॥ध्रु.॥ मज ऐसा कोण सांगा वांयां गेला । तो तुम्ही तारिला पांडुरंगा ॥२॥ तुका म्हणे नांवासारिखी करणी । न देखें हें मनीं समजावें ॥३॥
1847
तरलों म्हणऊनि धरिला ताठा । त्यासी चळ जाला फांटा ॥१॥ वांयांविण तुटे दोड । मान सुख इच्छी मांड ॥ध्रु.॥ ग्वाहीविण मात । स्थापी आपुली स्वतंत्र ॥२॥ तुका म्हणे ऐसीं किती । नरका गेलीं अधोगती ॥३॥
1848
तरि कां नेणते होते मागें ॠषी । तींहीं या जनासी दुराविलें ॥१॥ वोळगती जया अष्टमासिद्धि । ते या जनबुद्धी नातळती ॥२॥ कंदमूळें पाला धातूच्या पोषणा । खातील वास राणां तरी केला ॥३॥ लावुनियां नेत्र उगे चि बैसले । न बोलत ठेले मौन्यमुद्रे ॥४॥ तुका म्हणे ऐसें करीं माझ्या चित्ता । दुरावीं अनंता जन दुरी ॥५॥
1849
तरि कां पवाडे गर्जती पुराणें । असता नारायण शक्तिहीन ॥१॥ कीर्तीविण नाहीं नामाचा डांगोरा । येर कां इतरां वाणीत ना ॥ध्रु.॥ तरि च म्हणा तो आहे चिरंजीव । केलियाचा जीव सुखीं गुण ॥२॥ चांगलेपण हें निरुपायता अंगीं । बाणलें श्रीरंगा म्हणऊनि ॥३॥ तरि च हा थोर सांगितलें करी । अभिमान हरीपाशीं नाहीं ॥४॥ तुका म्हणे तरि करिती याची सेवा । देवापाशीं हेवा नाहीं कुडें ॥५॥
1850
तरि कां मागें वांयां कीर्ती वाढविली । जनांत आपुली ब्रिदावळी ॥१॥ साच करितां आतां फिरसी माघारा । ठायींचें दातारा नेणवेचि ॥ध्रु.॥ संतांसी श्रीमुख कैसें दाखविसी । पुढें मात त्यांसी सांगईंन ॥२॥ घेईंन डांगोरा तुझिया नामाचा । नव्हे अनाथांचा नाथ ऐसा ॥३॥ तुका म्हणे आधीं राहिलों मरोनि । तूं कां होसी धनी निमित्याचा ॥४॥
1851
तरि च जन्मा यावें । दास विठ्ठलाचें व्हावें ॥१॥ नाहीं तरि काय थोडीं । श्वानशूकरें बापुडीं ॥ध्रु.॥ ज्याल्याचें तें फळ । अंगीं लागों नेदी मळ ॥२॥ तुका म्हणे भले । ज्याच्या नावें मानवलें ॥३॥
1852
तरि च हा जीव संसारीं उदास । धरिला विश्वास तुम्हां सोईं ॥१॥ एके जातीविण नाहीं कळवळा । ओढली गोपाळा सूत्रदोरी ॥ध्रु.॥ फुटतसे प्राण क्षणांच्या विसरें । हें तों परस्परें सारिखें चि ॥२॥ तुका म्हणे चित्तीं राखिला अनुभव । तेणें हा संदेह निवारला ॥३॥
1853
तरि च होय वेडी । नग्न होय धडफुडी ॥१॥ काय बोलाचें गौरव । आंत वरी दोन भाव ॥ध्रु.॥ मृगजळा न्याहाळितां । तान न वजाये सेवितां ॥२॥ न पाहे आणिकांची आस । शूर बोलिजे तयास ॥३॥ तुका म्हणे हें लक्षण । संत अळंकार लेणें ॥४॥
1854
तरि म्यां आळवावे कोणा । कोण हे पुरवील वासना । तुजवांचूनि नारायणा । लावी स्तना कृपावंते ॥१॥ आपुला न विचारी सिण । न धरीं अंगसंगें भिन्न । अंगीकारिलें राखें दीन । देई जीवदान आवडीचें ॥ध्रु.॥ माझिये मनासिहे आस । नित्य सेवावा ब्रम्हरस । अखंड चरणींचा वास । पुरवीं आस याचकाची ॥२॥ माझिया संचिताचा ठेवा । तेणें हे वाट दाविली देवा । एवढ्या आदराचा हेवा । मागें सेवादान आवडीनें ॥३॥ आळवीन करुणावचनीं । आणीक गोड न लगे मनीं । निद्राजागृती आणि स्वप्नीं । धरिलें ध्यानीं मनीं रूप ॥४॥ आतां भेट न भेटतां आहे । किंवा नाहीं ऐसें विचारूनि पाहें । लागला झरा अखंड आहे । तुका म्हणे साहे केलें अंतरीं ॥५॥
1855
तरी कां वोळगणे । राजद्वारीं होती सुने ॥१॥ अंगीं दावुनि निष्कामता । पोकळ पोकळी ते वृथा ॥ध्रु.॥ कासया मोकळ । भोंवतें शिष्यांचे गाबाळ ॥२॥ तुका म्हणे ढाळे । बाहेर गुदे तें निराळें ॥३॥
1856
तरी च हीं केलीं । दानें वाईंट चांगलीं ॥१॥ येक येक शोभवावें । केलें कवतुक देवें ॥ध्रु.॥ काय त्याची सत्ता । सूत्र आणीक चाळिता ॥२॥ तुका म्हणे धुरें । डोळे भरिले परि खरें ॥३॥
1857
तरी सदा निर्भर दास । चिंताआसविरहित ॥१॥ अवघा चि एकीं ठाव । सर्व भाव विठ्ठलीं ॥ध्रु.॥ निरविलें तेव्हां त्यास । जाला वास त्यामाजी ॥२॥ तुका म्हणे रूप ध्यावें । नाहीं ठावे गुणदोष ॥३॥
1858
तरी हांव केली अमुपा व्यापारें । व्हावें एकसरें धनवंत ॥१॥ जालों हरिदास शूरत्वाच्या नेमें । जालीं ठावीं वर्में पुढिलांची ॥ध्रु.॥ जनावेगळें हें असे अभिन्नव । बळी दिला जीव म्हणऊनि ॥२॥ तुका म्हणे तरी लागलों विल्हेसी । चालतिया दिसीं स्वामी ॠणी ॥३॥
1859
तरीं आम्ही तुझी धरियेली कास । नाहीं कोणी दास वांयां गेला ॥१॥ आगा पंढरीच्या उभ्या विटेवरी । येई लवकरी धांवें नेटे ॥ध्रु.॥ पालवितों तुज उभी करोनि बाहे । कृपावंता पाहे मजकडे ॥२॥ तुका म्हणे तुज बहु कान डोळे । कां हे माझे वेळे ऐसी परी ॥३॥
1860
तरीं च म्यां देवा । साटी करूनियां जीवा ॥१॥ येथें बैसलों धरणें । दृढ कायावाचामनें ॥ध्रु.॥ आवरिल्या वृित्त । मन घेउनियां हातीं ॥२॥ तुका म्हणे जरा । बाहेर येऊं नेदीं घरा ॥३॥
1861
तरीं भलें वांयां गेलों । जन्मा आलों मागुता । म्हणऊनि ठेलों दास । सावकास निर्भयें ॥१॥ उणें पुरें काय माझें । त्याचें ओझें तुम्हांसी ॥ध्रु.॥ सांभाळावें तें म्या काईं । अवो आईं विठ्ठले । मागें जया जाईं नें स्थळा । तुज गोपाळा विसरेंना ॥२॥ आपलें म्यां एकसरें । करुनि बरें घेतलें । तुका म्हणे नारायणा । आतां जाणां आपुलें ॥३॥
1862
तरुवर बीजा पोटीं । बीज तरुवरा सेवटीं ॥१॥ तैसें तुम्हां आम्हां जालें । एकीं एक सामावलें ॥ध्रु.॥ उदकावरील तरंग । तरंग उदकाचें अंग ॥२॥ तुका म्हणे बिंबच्छाया । ठायीं पावली विलया ॥३॥
1863
तळमळी चित्ती दर्शनाची आशा । बहु जगदीशा करुणा केली ॥१॥ वचनीं च संत पावले स्वरूप । माझें नेदी पाप योगा येऊं ॥ध्रु.॥ वेठीऐसा करीं भक्तिवेवसाव । न पवे चि जीव समाधान ॥२॥ तुका म्हणे कईं देसील विसांवा । पांडुरंगे धांवा घेतें मन ॥३॥
1864
तळि एक अर्ध राई । सीतबुंद पावे काई । तया सुखा नाहीं । अंतपार पाहतां ॥१॥ म्हणउनी करा लाहो । नका मागें पुढें पाहों । अवघ्यामध्यें आहों । सावचित्त तों ॥ध्रु.॥ तीथॉ न येती तुळणी । आजिया सुखाची धणी । जे कासी गयेहुनी । जीं आगळीं असती ॥३॥ येथें धरी लाज । वर्ण अभिमान काज । नाडला सहज । तुका म्हणे तो येथें ॥३॥
1865
तांतडीनें आम्हां धीर चि न कळे । पाळावे हे लळे लवलाहीं ॥१॥ नका कांहीं पाहों सावकाशीं देवा । करा एक हेवा तुमचा माझा ॥ध्रु.॥ वोरसाचा हेवा सांभाळावी प्रीत । नाहीं राहों येत अंगीं सदा ॥२॥ तुका म्हणे मज नका गोवूं खेळा । भोजनाची वेळा राखियेली ॥३॥
1866
तांबगी हें नाणें न चले खर्‍या मोलें । जरी हिंडविलें देशोदेशीं ॥१॥ करणीचें कांहीं न मने सज्जना । यावें लागे मना वृद्धांचिया ॥ध्रु.॥ हिरयासारिका दिसे शिरगोळा । पारखी ते डोळां न पाहाती ॥२॥ देऊनियां भिंग कामाविलें मोतीं । पारखिया हातीं घेतां नये ॥३॥ तुका म्हणे काय नटोनियां व्यर्थ । आपुलें हें चित्त आपणा ग्वाही ॥४॥
1867
ताकें कृपण तो जेवूं काय घाली । आहाच ते चालीवरुनि कळे ॥१॥ काय तुम्हां वेचे घातलें सांकडें । माहें आलें कोडें आजिवरि ॥ध्रु.॥ सेवेंविण आम्ही न लिंपों काया । जाला देवराया निर्धार हा ॥२॥ तुका म्हणे तुझीं राखावया ब्रीदें । येणें अनुवादें कारियासी ॥३॥
1868
तातडीची धांव अंगा आणि भाव । खोळंबा तो मग निश्चियाचा ॥१॥ म्हणउनि बरी विचारावी चाली । उरीचि ते बोली कामा येते ॥ध्रु.॥ कोरडें वैराग्य माजिरा बडिवार । उतरे तो शूर अंगींचें तें ॥२॥ तुका म्हणे बरी झर्‍याची ते चाली । सांचवण्या खोली कैसीयांची ॥३॥
1869
तान्हे तान्ह प्याली । भूक भुकेने खादली ॥१॥ जेथें तें च नाहीं जालें । झाडा घेतला विठ्ठलें ॥ध्रु.॥ वास वासनेसी नाहीं । मन पांगुळलें पायीं ॥२॥ शेष उरला तुका । जीवा जीवीं जाला चुका ॥३॥
1870
तान्हेल्याची धणी । फिटे गंगा नव्हे उणी ॥१॥ माझे मनोरथ सिद्धी । पाववावे कृपानिधी ॥ध्रु.॥ तूं तों उदाराचा राणा । माझी अल्प चि वासना ॥२॥ कृपादृष्टीं पाहें । तुका म्हणे होईं साहे ॥३॥
1871
ताप हें हरण श्रीमुख । हरी भवरोगा ऐसें दुःख । अवलोकितां उपजे सुख । उभें सन्मुख दृष्टीपुढें ॥१॥ न पुरे डोळियांची धणी । सखोल कृपेची च खाणी । स्तवितां न पुरे वेदवाणी । तो हा समचरणी कृपानिधी ॥ध्रु.॥ रामकृष्णध्यान वामननारसिंहीं । उग्र आणि सौम्य कांहीं च नाहीं । सांपडे भरलीये वाही । भाव शुद्ध पाहीं याचें भातुकें ॥२॥ गुणगंभीर चतुर सुजाण । शूर धीर उदार नारायण । व्यापक तरी त्रिभुवन । मनमोहनलावण्य हें ॥३॥ ठाण हें साजिरें सुंदर । अविनाश अविकार । अनंत आणि अपार । तो हा कटीं कर धरिताहे ॥४॥ जयाची वाणी सुमनमाळा । परमामृतजिव्हाळा । अनंता अंगीं अनंत कळा । तुका जवळा चरण सेवे ॥५॥ कान्होबा नाट अभंग ७
1872
तापल्यावांचून नव्हे अळंकार । पिटूनियां सार उरलें तें ॥१॥ मग कदाकाळीं नव्हे शुद्ध जाति । नासें शत्रु होती मित्र ते चि ॥ध्रु.॥ किळवर बरें भोगूं द्यावें भोगा । फांसिलें तें रोगा हातीं सुटे ॥२॥ तुका म्हणे मन करावें पाठेळ । साहावे चि जाळ सिजेवरि ॥३॥
1873
तामसाचीं तपें पापाची सिदोरी । तमोगुणें भरी घातले ते ॥१॥ राज्यमदा आड सुखाची संपत्ति । उलंघूनि जाती निरयगांवा ॥ध्रु.॥ इंद्रियें दमिलीं इच्छा जिती जीवीं । नागविती ठावीं नाहीं पुढें ॥२॥ तुका म्हणे हरिभजनावांचून । करिती तो सीण पाहों नये ॥३॥
1874
तारतिम वरी तोंडा च पुरतें । अंतरा हें येतें अंतरीचें ॥१॥ ऐसी काय बरी दिसे ठकाठकी । दिसतें लौकिकीं सत्या ऐसें ॥ध्रु.॥ भोजनांत द्यावें विष कालवूनि । मोहचाळवणी मारावया ॥२॥ तुका म्हणे मैंद देखों नेदी कुडें । आदर चि पुढें सोंग दावी ॥३॥
1875
तारिलीं बहुतें चुकवूनि घात । नाम हें अमृत स्वीकारितां ॥१॥ नेणतां सायास शुद्ध आचरण । यातीकुळहीन नामासाटीं ॥ध्रु.॥ जन्म नांव धरी भक्तीच्या पाळणा । आकार कारणा या च साटीं ॥२॥ असुरीं दाटली पाप होतां फार । मग फेडी भार पृथिवीचा ॥३॥ तुका म्हणे देव भक्तपण सार । कवतुक वेव्हार तयासाटीं ॥४॥
1876
तारी ऐसे जड । उदकावरी जो दगड ॥१॥ तो हा न करी तें काईं । कां रे लीन नव्हां पायीं ॥ध्रु.॥ सीळा मनुष्य जाली । ज्याच्या चरणाचे चाली ॥२॥ वानरां हातीं लंका । घेवविली म्हणे तुका ॥३॥
1877
तारुण्याच्या मदें न मनी कोणासी । सदा मुसमुसी खूळ जैसा ॥१॥ अंठोनी वेंठोनीं बांधला मुंडासा । फिरतसे म्हैसा जनामधीं ॥ध्रु.॥ हातीं दीडपान वरती च मान । नाहीं तो सन्मान भलियांसी ॥२॥ श्वानाचिया परी हिंडे दारोदारीं । पाहे परनारी पापदृष्टी ॥३॥ तुका म्हणे ऐसा थोर हा गयाळी । करितां टवाळी जन्म गेला ॥४॥
1878
तारूं लागलें बंदरीं । चंद्रभागेचिये तिरीं ॥१॥ लुटा लुटा संतजन । अमुप हें रासी धन ॥ध्रु.॥ जाला हरिनामाचा तारा । सीड लागलें फरारा ॥२॥ तुका जवळी हमाल । भार चालवी विठ्ठल ॥३॥
1879
तिन्ही लोक ॠणें बांधिले जयानें । सर्वसिद्धि केणें तये घरीं ॥१॥ पंढरीचोहोटां घातला दुकान । मांडियेले वान आवडीचे ॥ध्रु.॥ आषाढी कार्तिकी भरियेले हाट । इनाम हे पेंठ घेतां देतां ॥२॥ मुक्ति कोणी तेथें हातीं नेघे फुका । लुटितील सुखा प्रेमाचिया ॥३॥ तुका म्हणे संतसज्जन भाग्याचें । अनंतां जन्मींचे सांटेकरी ॥४॥
1880
तिर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनीं ॥१॥ मिळालिया संतसंग । समर्पितां भलें अंग ॥ध्रु.॥ तिर्थी भाव फळे । येथें आनाड तें वळे ॥२॥ तुका म्हणे पाप । गेलें गेल्या कळे ताप ॥३॥
1881
तिहीं ताळीं हेचि हाक । म्हणती पांढरा स्फटिक । अवघा बुडविला लौकिक । सुखें चि भीके लाविलीं ॥१॥ थोंटा नांव शिरोमणी । नाहीं जोडा त्रिभुवनीं । म्हणोनि शाहाणे ते कोणी । तुझे दारीं बैसतिना ॥ध्रु.॥ निर्गुण निलाजिरा निनांवा । लंड झोंड कुडा देवा । नागवणा या नांवा । वांचूनि दुजा नाइकों ॥२॥ सर्वगुणें संपन्न । कळों आलासी संपूर्ण । तुकयाबंधु म्हणे चरण । आतां जीवें न सोडीं ॥३॥
1882
तिहीं त्रिभुवनीं । आम्ही वैभवाचे धनी ॥१॥ हातां आले घाव डाव । आमचा मायबाप देव ॥ध्रु.॥ काय त्रिभुवनीं बळ । अंगीं आमुच्या सकळ ॥२॥ तुका म्हणे सत्ता । अवघी आमुची च आतां ॥३॥
1883
तीथाअची अपेक्षा स्थळीं वाढे धर्म । जाणावें तें वर्म बहु पुण्य ॥१॥ बहु बरी ऐसी भाविकांची जोडी । काळ नाहीं घडी जात वांयां ॥ध्रु.॥ करूनी चिंतन करवावें आणिकां । तो या जाला लोकां नाव जगीं ॥२॥ तुका म्हणे ऐसे परउपकारी । त्यांच्या पायांवरी डोईं माझी ॥३॥
1884
तीर देखोनियां यमुनेचें जळ । कांठीं च कोल्हाळ करिताती ॥१॥ कइवाड नव्हे घालावया उडी । आपणासि ओढी भय मागें ॥२॥ मागें सरे माय पाउला पाउलीं । आपल्या च घाली धाकें अंग ॥३॥ अंग राखोनियां माय खेद करी । अंतरीचें हरी जाणवलें ॥४॥ जाणवलें मग देवें दिली बुडी । तुका म्हणे कुडी भावना हे ॥५॥
1885
तीर्थ जळ देखे पाषाण प्रतिमा । संत ते अधमा माणसाऐसे ॥१॥ वांजेच्या मैथुनापरी गेलें वांयां । बांडेल्याचें जायां जालें पीक ॥ध्रु.॥ अभाविक सदा सुतकी चांडाळ । सदा तळमळ चुके चि ना ॥२॥ तुका म्हणे वरदळी ज्याची दृष्टी । देहबुद्धि कष्टी सदा दुःखी ॥३॥
1886
तीर्थांचे मूळ व्रतांचें फळ । ब्रम्ह तें केवळ पंढरिये ॥१॥ तें आम्हीं देखिलें आपुल्या नयनीं । फिटलीं पारणीं डोळियांचीं ॥ध्रु.॥ जीवांचें जीवन सुखाचें सेजार । उभें कटीं कर ठेवूनियां ॥२॥ जनाचा जनिता कृपेचा सागर । दीनां लोभापार दुष्टां काळ ॥३॥ सुरवरां चिंतनीं मुनिवरां ध्यानीं । आकार निर्गुणीं तें चि असे ॥४॥ तुका म्हणे नाहीं श्रुती आतुडलें । आम्हां सांपडलें गीती गातां ॥५॥
1887
तीर्थाचिये आस पंथ तो निट देव । पाविजेतो ठाव अंतराय ॥१॥ म्हणऊनि भलें निश्चळ चि स्थळीं । मनाचिये मुळीं बैसोनियां ॥ध्रु.॥ संकल्पारूढ तें प्रारब्धें चि जिणें । कार्य चि कारणें वाढतसे ॥२॥ तुका म्हणे कामा नाहीं एक मुख । जिरवितां सुख होतें पोटीं ॥३॥
1888
तीर्थाटणें एकें तपें हुंबरती । नाथिले धरिती अभिमान ॥१॥ तैसे विष्णुदास नव्हती साबडे । एकाचिया पडे पायां एक ॥ध्रु.॥ अक्षरें आणिती अंगासी जाणीव । इच्छा ते गौरव पूज्य व्हावें ॥२॥ तुका म्हणे विधिनिषधाचे डोहीं । पडिले त्यां नाहीं देव कधीं ॥३॥
1889
तीर्थे फळती काळें जन्में आगळिया । संतदृष्टी पाया हेळामात्रें ॥१॥ सुखाचे सुगम वैष्णवांचे पाय । अंतरींचा जाय महाभेव ॥ध्रु.॥ काळें हि न सरे तपें समाधान । कथे मूढजन समाधिस्थ ॥२॥ उपमा द्यावया सांगतां आणीक । नाहीं तिन्ही लोक धुंडाळितां ॥३॥ तुका म्हणे मी राहिलों येणें सुखें । संतसंगें दुःखें नासावया ॥४॥
1890
तीर्थेचकेलीं कोटीवरी । नाहीं देखिली पंढरी ॥१॥ जळो त्याचें ज्यालेंपण । न देखे चि समचरण ॥ध्रु.॥ योग याग अनंत केले । नाहीं समचरण देखिले ॥२॥ तुका म्हणे विठ्ठलपायीं । अनंत तीर्थे घडिलीं पाहीं ॥३॥
1891
तीळ जाळिले तांदुळ । काम क्रोधे तैसे चि खळ ॥१॥ कां रे सिणलासी वाउगा । न भजतां पांडुरंगा ॥ध्रु.॥ मानदंभासाठीं । केली अक्षरांची आटी ॥२॥ तप करूनि तीर्थाटन । वाढविला अभिमान ॥३॥ वांटिलें तें धन । केली अहंता जतन ॥४॥ तुका म्हणे चुकलें वर्म । केला अवघा चि अधर्म ॥५॥
1892
तुका इच्छा मीटइ तो । काहा करे चट खाक । मथीया गोला डारदिया तो । नहिं मिले फेरन ताक ॥१॥
1893
तुका उतरला तुकीं । नवल जालें तिहीं लोकीं ॥१॥ नित्य करितों कीर्तन । हें चि माझें अनुष्ठान ॥ध्रु.॥ तुका बैसला विमानीं । संत पाहाती लोचनीं ॥२॥ देव भावाचा भुकेला । तुका वैकुंठासी नेला ॥३॥
1894
तुका और मिठाईं क्या करूं रे । पाले विकारपिंड । राम कहावे सो भली रुखी । माखन खांडखीर ॥१॥
1895
तुका कुटुंब छोरे रे । लरके जोरों सिर गुंदाय । जबथे इच्छा नहिं मुईं । तब तूं किया काय ॥१॥
1896
तुका दास तिनका रे । रामभजन निरास । क्या बिचारे पंडित करो रे । हात पसारे आस ॥१॥
1897
तुका दास रामका । मनमे एक हि भाव । तो न पालटू आव । ये हि तन जाव ॥१॥
1898
तुका पंखिबहिरन मानुं । बोईं जनावर बाग । असंतनकुं संत न मानूं । जे वर्मकुं दाग ॥१॥
1899
तुका प्रीत रामसुं । तैसी मिठी राख । पतंग जाय दीप परे रे । करे तनकी खाक ॥१॥
1900
तुका बस्तर बिचारा क्यों करे रे । अंतर भगवा न होय । भीतर मैला केंव मिटे रे । मरे उपर धोय ॥१॥
1901
तुका मार्य़ा पेटका । और न जाने कोये । जपता कछु रामनाम । हरिभगतनकी सोये ॥१॥
1902
तुका मिलना तो भला । मनसुं मन मिल जाय । उपर उपर माटि घसनी । उनकि कोन बराईं ॥१॥
1903
तुका म्हणे पुन्हा न येती मागुत्या । कृष्णासीं खेळतां दिवस गमे ॥१॥ दिवस राती कांहीं नाठवे तयांसी । पाहातां मुखासी कृष्णाचिया ॥२॥ याच्या मुखें नये डोळयासी वीट । राहिले हे नीट ताटस्थ चि ॥३॥ ताटस्थ राहिलें सकळ शरीर । इंद्रियें व्यापार विसरलीं ॥४॥ विसरल्या तान भुक घर दार । नाहीं हा विचार आहों कोठें ॥५॥ कोठें असों कोण जाला वेळ काळ । नाठवे सकळ विसरल्या ॥६॥ विसरल्या आम्हीं कोणीये जातीच्या । वर्णा ही चहूंच्या एक जाल्या ॥७॥ एक जाल्या तेव्हां कृष्णाचिया सुखें । निःशंकें भातुकें खेळतील ॥८॥ खेळता भातुकें कृष्णाच्या सहित । नाहीं आशंकित चत्ति त्यांचें ॥९॥ चित्ती तो गोविंद लटिकें दळण । करिती हें जन करी तैसें ॥१०॥ जन करी तैसा खेळतील खेळ । अवघा गोपाळ करूनियां ॥११॥ करिती आपला आवघा गोविंद । जना साच फंद लटिका त्या ॥१२॥ त्याणीं केला हरि सासुरें माहेर । बंधु हे कुमर दीर भावें ॥१३॥ भावना राहिली एकाचिये ठायीं । तुका म्हणे पायीं गोविंदाचे ॥१४॥
1904
तुका म्हणे सुख घेतलें गोपाळीं । नाचती कांबळीं करुनि ध्वजा ॥१॥ करूनियां टिरी आपुल्या मांदळ । वाजविती टाळ दगडाचे ॥२॥ दगडाचे टाळ कोण त्यांचा नाद । गीत गातां छंद ताल नाहीं ॥३॥ नाही ताळ गातां नाचतां गोपाळां । घननीळ सावळा तयामध्यें ॥४॥ मधीं जयां हरि तें सुख आगळें । देहभाव काळें नाहीं तयां ॥५॥ तयांसि आळंगी आपुलिया करीं । जाती भूमीवरी लोटांगणीं ॥६॥ निजभाव देखे जयांचिये अंगीं । तुका म्हणे संगीं क्रीडे तयां ॥७॥
1905
तुका राम बहुत मिठा रे । भर राखूं शरीर । तनकी करूं नावरि । उतारूं पैल तीर ॥१॥
1906
तुका रामसुं चित बांध राखूं । तैसा आपनी हात । धेनु बछरा छोर जावे । प्रेम न छुटे सात ॥१॥
1907
तुका वेडा अविचार । करी बडबड फार ॥१॥ नित्य वाचे हा चि छंद । राम कृष्ण हरि गोविंद ॥ध्रु.॥ धरी पांडुरंगीं भाव। आणीक नेणें दुजा देव ॥२॥ गुरुज्ञान सर्वा ठायीं । दुजें न विचारी कांहीं ॥३॥ बोल नाईंके कोणाचे । कथे नागवा चि नाचे ॥४॥ संगउपचारें कांटाळे । सुखें भलते ठायीं लोळे ॥५॥ कांहीं उपदेशिलें नेणे । वाचे विठ्ठल विठ्ठल म्हणे ॥६॥ केला बहुतीं फजित । तरी हें चि करी नित्य ॥७॥ अहो पंडितजन । तुका टाकावा थुंकोन ॥८॥
1908
तुका संगत तीन्हसें कहिये । जिनथें सुख दुनाये । दुर्जन तेरा मू काला । थीतो प्रेम घटाये ॥१॥
1909
तुका सुरा नहि सबदका रे । जब कमाइ न होये । चोट साहे घनकि रे । हिरा नीबरे तोये ॥१॥
1910
तुका सुरा बहुत कहावे । लडत विरला कोये । एक पावे उंच पदवी । एक खौंसां जोये ॥१॥
1911
तुकाप्रभु बडो न मनूं न मानूं बडो । जिसपास बहु दाम । बलिहारि उस मुखकी । जीसेती निकसे राम ॥१॥
1912
तुज ऐसा कोण उदाराची रासी । आपुलें चि देसी पद दासा ॥१॥ शुद्ध हीन कांहीं न पाहासी कुळ । करिसी निर्मळ वास देहीं ॥२॥ भावें हें कदान्न खासी त्याचे घरीं । अभक्तांची परी नावडेती ॥३॥ न वजासी जेथें दुरी दवडितां । न येसी जो चित्ता योगियांच्या ॥४॥ तुका म्हणे ऐसीं ब्रीदें तुझीं खरीं । बोलतील चारी वेद मुखें ॥५॥
1913
तुज करितां होती ऐसे । मूढ चतुर पंडित पिसे॥१॥ परि वर्म नेणे तें कोणी । पीडाखाणी भोगितील ॥ध्रु.॥ उलंघितें पांगुळ गिरी । मुकें करी अनुवाद ॥२॥ पापी होय पुण्यवंत । न करी घात दुर्जन ॥३॥ अवघें हेळामात्रें हरि । मुक्त करी ब्रम्हांड ॥४॥ तुका म्हणे खेळे लीळा । पाहे वेगळा व्यापूनि ॥५॥
1914
तुज करितां होय ऐसें कांहीं नाहीं । डोंगराची राईं रंक राणा ॥१॥ अशुभाचें शुभ करितां तुज कांही । अवघड नाहीं पांडुरंगा ॥ध्रु.॥ सोळा सहजर नारी ब्रम्हचारी कैसा । निराहारी दुर्वासा नवल नव्हे ॥२॥ पंचभ्रतार द्रौपदी सती । करितां पितृशांती पुण्य धर्मा ॥३॥ दशरथा पातकें ब्रम्हहत्ये ऐसीं । नवल त्याचे कुशीं जन्म तुझा ॥४॥ मुनेश्वरा नाहीं दोष अनुमात्र । भांडवितां सुत्र वध होती ॥५॥ तुका म्हणे माझे दोष ते कायी । सरता तुझा पायीं जालों देवा ॥६॥ पाळणा
1915
तुज काय करूं मज एक सार । अमृतसागर नाम तुझें ॥१॥ काय येणें उणें आम्हां तयापोटीं । गोवितां हे कंठीं कामधेनु ॥ध्रु.॥ नोळखे तानुलें माय ऐसी कोण । वोरसे देखून शोक त्याचा ॥२॥ जो नाहीं देखिला याचक नयनीं । तो पावे घेउनि लज्जा दान ॥३॥ नामासाटीं प्राण सांडियेला रणीं । शूर ते भांडणीं न फिरती ॥४॥ तुका म्हणे आम्ही गातां गीतीं भला । भेटूनी विठ्ठला काय चाड ॥५॥
1916
तुज केलिया नव्हे ऐसें काईं । डोंगराची राईं क्षणमात्रें ॥१॥ मज या लोकांचा न साहे आघात । देखणें प्रचित जीव घेती ॥ध्रु.॥ सहज विनोदें बोलियेलों गोष्टी । अरंभी तों पोटीं न धरावी ॥२॥ दीनरूप मज करावें नेणता । याहुनी अनंता आहें तैसा ॥३॥ तुका म्हणे जेणें मज तूं भोगसी । तें करीं जनासीं चाड नाहीं ॥४॥
1917
तुज घालोनियां पूजितों संपुष्टीं । परि तुझ्या पोटीं चवदा भुवनें ॥१॥ तुज नाचऊनि दाखवूं कौतुका । परी रूपरेखा नाहीं तुज ॥ध्रु.॥ तुजलागीं आम्ही गात असों गीत । परी तूं अतीत शब्दाहूनि ॥२॥ तुजलागीं आम्हीं घातियेल्या माळा । परि तूं वेगळा कतृऩत्वासी ॥३॥ तुका म्हणे आतां होऊनि परमित । माझें कांहीं हित विचारावें ॥४॥
1918
तुज च पासाव जालोंसों निर्माण । असावें तें भिन्न कासयानें ॥१॥ पाहावा जी ठायीं करूनि विचार । नुन्य कोठें फार असे चि ना ॥ध्रु.॥ ठेविलिये ठायीं आज्ञेचें पाळण । करूनि जतन राहिलोंसें ॥२॥ तुका म्हणें आतां बोलतसें स्पष्ट । जालों क्रियानष्ट तुम्हाऐसा ॥३॥
1919
तुज जाणें तानें नाहीं पांडुरंगा । कां जी मज सांगा उपेक्षिलें ॥१॥ तुज ठावें होतें मी पातकी थोर । आधीं च कां थार दिधली पायीं ॥ध्रु.॥ अंक तो पडिला हरिचा मी दास । भेद पंगतीस करूं नये ॥२॥ तुका म्हणे आम्ही जिंतिलें तें खरें । आतां उणें पुरें तुम्हां अंगीं ॥३॥
1920
तुज ते सवे आहे ठावें । घ्यावें त्याचें बुडवावें । परि ते आम्हांसवें । आतां न फावे कांहीं ॥१॥ नव्हों सोडायाचे धणी । कष्टें मेळविलें करोनि । पाहा विचारोनी । आढी धरोनि काम नाहीं ॥ध्रु.॥ अवघे राहिले प्रकार । जालों जीवासी उदार । असा हा निर्धार । कळला असावा असेल ॥२॥ आतां निदसुर नसावें । गाठ पडली कुणब्यासवें । तुकयाबंधु म्हणे राखावें । देवा महत्व आपुलें ॥३॥
1921
तुज दिला देह । आजूनि वागवितों भय ॥१॥ ऐसा विश्वासघातकी । घडली कळतां हे चुकी ॥ध्रु.॥ बोलतों जें तोंडें । नाहीं अनुभविलें लंडें ॥२॥ दंड लाहें केला । तुका म्हणे जी विठ्ठला ॥३॥
1922
तुज दिलें आतां करीं यत्न याचा । जीवाभाव-वाचाकायामन ॥१॥ भागलों दातारा सीण जाला भारी । आतां मज तारीं शरणागता ॥ध्रु.॥ नेणतां सोसिली तयाची आटणी । नव्हतां ही कोणी कांहीं माझीं ॥२॥ वर्म नेणें दिशा हिंडती मोकट । इंद्रियें सुनाट दाही दिशा ॥३॥ वेरझारीफेरा सिणलों सायासीं । आतां हृषीकेशी अंगिकारीं ॥४॥ तुका म्हणे मन इंद्रियांचे सोईं । धांवे यासी काईं करूं आतां ॥५॥
1923
तुज न करितां काय नव्हे एक । हे तों सकळिक संतवाणी ॥१॥ घेई माझा भार करीं कइवार । उतरीं हा पार भवसिंधु ॥ध्रु.॥ उचित अनुचित पापपुण्यकाला । हा तों नये मला निवडितां ॥२॥ कुंटित राहिली बोलतां बोलतां । पार न पवतां वाणी पुढें ॥३॥ पुसतां ही कोणां न कळे हें गुज । राखें आतां लाज पांडुरंगा ॥४॥ तुका म्हणे बहु पाहिलें या जीवें । वर्म जालें जी ठावें नाम तुझें ॥५॥
1924
तुज न भें मी कळिकाळा । मज नामाचा जिव्हाळा ॥१॥ माझा बळिया नेणसी कोण । संतां साहे नारायण ॥ध्रु.॥ शंख वधिला सागरीं । वेद घेउनि आला चारी ॥२॥ कूर्में दैत्य वधिला जेठी । हात पाय लपवी पोटीं ॥३॥ वाराहरूप धरिलें गाढें । धरा प्रतापें धरिली दाढे ॥४॥ हिरण्यकश्यप विदारिला । भक्त प्रल्हाद रक्षिला ॥५॥ वामन जाला दिनानाथ । बळी पाताळीं घातला दैत्य ॥६॥ छेदुनियां सहस्र भुजा । कामधेनु आणिली वोजा ॥७॥ शिळा प्रतापें सागरीं तारी । स्थापी बिभीषण रावण मारी ॥८॥ मारोनियां कंसराव । पिता सोडविला वसुदेव ॥९॥ पांचाळीसी गांजितां वैरी । वस्त्रें आपण जाला हरी ॥१०॥ गजेंद्र स्मरे राम राम । त्यासी पाववी वैकुंठधाम ॥११॥ तुका म्हणे हरिरूप जाले । पुन्हा जन्मा नाहीं आले ॥१२॥
1925
तुज नाहीं शक्ति । काम घेसी आम्हां हातीं ॥१॥ ऐसें अनुभवें पाहीं । उरलें बोलिजेसें नाहीं ॥ध्रु.॥ लपोनियां आड । आम्हां तुझा कैवाड ॥२॥ तुका म्हणे तुजसाठी । आम्हां संवसारें तुटी ॥३॥
1926
तुज पाहातां समोरी । दृष्टि न फिरे माघारी ॥१॥ माझें चित्त तुझ्या पायां । मिठी पडिली पंढरिराया ॥ध्रु.॥ नव्हे सारितां निराळें । लवण मेळवितां जळें ॥२॥ तुका म्हणे बळी । जीव दिला पायांतळीं ॥३॥
1927
तुज पाहावें हे धरितों वासना । परि आचरणा नाहीं ठाव ॥१॥ करिसी कैवार आपुलिया सत्ता । तरि च देखता होइन पाय ॥ध्रु.॥ बाहिरल्या वेषें उत्तम दंडलें । भीतरी मुंडलें नाहीं तैसें ॥२॥ तुका म्हणे वांयां गेलों च मी आहे । जरि तुम्ही साहे न व्हा देवा ॥३॥
1928
तुज मज ऐसी परी । जैसे तरंग सागरीं ॥१॥ दोहींमाजी एक जाणा । विठ्ठल पंढरीचा राणा ॥ध्रु.॥ देव भक्त ऐसी बोली । जंव भ्रांति नाहीं गेली ॥२॥ तंतु पट जेवीं एक । तैसा विश्वेंसीं व्यापक ॥३॥
1929
तुज मज नाहीं भेद । केला सहज विनोद ॥१॥ तूं माझा आकार । मी तों तूं च निर्धार ॥ध्रु.॥ मी तुजमाजी देवा । घेसी माझ्या अंगें सेवा ॥२॥ मी तुजमाजी अचळ । मजमाजी तुझें बळ ॥३॥ तूं बोलसी माझ्या मुखें । मी तों तुजमाजी सुखें ॥४॥ तुका म्हणे देवा । विपरीत ठायीं नांवा ॥५॥
1930
तुज मागणें तें देवा । आम्हां तुझी चरणसेवा ॥१॥ आन नेघों देसी तरी । रिद्धी सिद्धी मुक्ति चारी ॥ध्रु.॥ संतसंगति सर्वकाळ । थोर प्रेमाचा सुकाळ ॥२॥ तुका म्हणे नाम । तेणें पुरे माझें काम ॥३॥
1931
तुज म्हणतील कृपेचा सागर । तरि कां केला धीर पांडुरंगा ॥१॥ आझुनि कां नये तुज माझी दया । काय देवराया पाहातोसि ॥ध्रु.॥ आळवितों जैसें पाडस कुरंगिणी । पीडिलिया वनीं तानभूक ॥२॥ प्रेमरसपान्हा पाजीं माझे आई । धांवें वो विठाईं वोरसोनि ॥३॥ तुका म्हणे माझें कोण हरी दुःख । तुजविण एक पांडुरंगा ॥४॥
1932
तुज वर्णी ऐसा तुज विण नाहीं । दुजा कोणी तीहीं त्रिभुवनीं ॥१॥ सहस्रमुखें शेष सिणला बापुडा । चिरलिया धडा जिव्हा त्याच्या ॥ध्रु.॥ अव्यक्त अलक्षा अपारा अनंता । निर्गुणा सचिद नारायणा ॥२॥ रूप नाम घेसी आपुल्या स्वइच्छा । होसी भाव तैसा त्याकारणें ॥३॥ तुका म्हणे जरी दाविसी आपणा । तरि च नारायणा कळों येसी ॥४॥
1933
तुजऐसा कोणी न देखें उदार । अभयदानशूर पांडुरंगा ॥१॥ शरण येती त्यांचे न विचारिसी दोष । न मागतां त्यांस अढळ देसी ॥ध्रु.॥ धांवसी आडणी ऐकोनियां धांवा । कइवारें देवा भक्तांचिया ॥२॥ दोष त्यांचे जाळी कल्पकोटिवरी । नामासाटीं हरि आपुलिया ॥३॥ तुका म्हणे तुज वाणूं कैशा परी । एक मुख हरी आयुष्य थोडें ॥४॥
1934
तुजकरितां होतें आनाचें आन । तारिले पाषाण उदकीं देवा ॥१॥ कां नये कैवार करूं अंगीकार । माझा बहु भार चड जाला ॥ध्रु.॥ चुकलासी म्हणों तरी जीवांचा ही जीव । रिता नाहीं ठाव उरों दिला ॥२॥ तुका म्हणे ऐसें काय सत्ताबळ । माझे परी कृपाळ आहां तुम्ही ॥३॥
1935
तुजलागीं माझा जीव जाला पिसा । अवलोकितों दिशा पांडुरंगा ॥१॥ सांडिला वेव्हार माया लोकाचार । छंद निरंतर हा चि मनीं ॥ध्रु.॥ आइकिलें कानीं तें रूप लोचन । देखावया सीण करिताति ॥२॥ प्राण हा विकळ होय कासावीस । जीवनाविण मत्स्य तयापरी ॥३॥ तुका म्हणे आतां कोण तो उपाव । करूं तुझे पाव आतुडे तो ॥४॥
1936
तुजवरी ज्याचें मन । दरुषण दे त्याचें ॥१॥ कैसा जाती शुद्ध भाव । हात पाव ना वृत्ती ॥ध्रु.॥ अवघियांचा करूनि मेळा । तुज डोळां रोखिलें ॥२॥ तुका म्हणे तुज आड । लपोनि कोड दावीं देवा ॥३॥
1937
तुजवांचून कोणा शरण । जाऊं आतां कर जोडून ॥१॥ कोण करील माझें साहे । चित्ती विचारूनि पाहें ॥ध्रु.॥ तूं तंव कृपेचा सागर । दीनबंधु जगदोद्धार ॥२॥ तुका म्हणे निका । भवसिंधु तारक नौका ॥३॥
1938
तुजवाचुनी मागणें काय कोणा । महीमंडळीं विश्वव्यापकजना । जीवभावना पुरवूं कोण जाणे । तुजवांचुनी होत कां रावराणे ॥१॥ नसे मोक्षदाता तिहींमाजि लोकां । भवतारकु तूजवांचुनि एका । मनीं मानसीं चिंतितां रूपनाम । पळे पाप ताप भयें नास काम ॥२॥ हरी नाम हें साच तुझें पुराणीं । हरीहातिचें काळगर्भादियोनी । करूं मुखवाणी कैसी देशघडी । तुजवांचुनि वाणितां व्यर्थ गोडी ॥३॥ भवभंजना व्यापक लोक तिन्ही । तुज वाणितां श्रमला शेषफणी । असो भावें जीव तुझ्या सर्व पायीं । दुजें मागणें आणीक व्यर्थ काई ॥४॥ दिनानाथ हे साक्ष तूझी जनासी । दिनें तारिलीं पातकी थोर दोषी । तुका राहिला पायिं तो राख देव । असें मागतसे तुझी चरणसेवा ॥५॥
1939
तुजविण कोणां । शरण जाऊं नारायणा ॥१॥ ऐसा न देखें मी कोणी । तुजा तिहीं त्रिभुवनीं ॥ध्रु.॥ पाहिलीं पुराणें । धांडोळिलीं दरुषणें ॥२॥ तुका म्हणे ठायीं । जडून ठेलों तुझ्या पायीं ॥३॥
1940
तुजविण चाड आणिकांची कांहीं । धरीन हें नाहीं तुज ठावें ॥१॥ तरणउपाय योगक्षेम माझा । ठेवियेला तुझ्या पायीं देवा ॥ध्रु.॥ कोण मज आळी काय हे तांतडी । सोनियाची घडी जाय दिस ॥२॥ तुझिया नामाचें ल्यालोंसें भूषण । कृपा संतजन करितील ॥३॥ तुका म्हणे जाला आनंदाचा वास । हृदया या नास नव्हे कधीं ॥४॥
1941
तुजविण देवा । कोणा म्हणे माझी जिव्हा ॥१॥ तरि हे हो कां शतखंड । पडो झडोनियां रांड ॥ध्रु.॥ कांहीं इच्छेसाटीं । करिल वळवळ करंटी ॥२॥ तुका म्हणे कर । कटीं तयाचा विसर॥३॥
1942
तुजविण मज कोण वो सोयरें । आणीक दुसरें पांडुरंगे ॥१॥ लागलीसे आस पाहा तुझें वास । रात्री वो दिवस लेखीं बोटीं ॥२॥ काम गोड मज न लगे हा धंदा । तुका म्हणे सदा हें चि ध्यान ॥३॥
1943
तुजविण वाणीं आणिकांची थोरी । तरी माझी हरी जिव्हा झडो ॥१॥ तुजविण चित्ता आवडे आणीक । तरी हा मस्तक भंगो माझा ॥ध्रु.॥ नेत्रीं आणिकांसि पाहीन आवडी । जातु ते चि घडी चांडाळ हे ॥२॥ कथामृतपान न करिती श्रवण । काय प्रयोजन मग यांचें ॥३॥ तुका म्हणे काय वांचून कारण । तुज एक क्षण विसंबतां ॥४॥ स्वामींचे स्त्रीनें स्वामींस कठिण उत्तरें केलीं - अभंग ७
1944
तुजविण सत्ता । नाहीं वाचा वदविता ॥१॥ ऐसे आम्ही जाणों दास । म्हणोनि जालों उदास ॥ध्रु.॥ तुम्ही दिला धीर। तेणें मन झालें स्थिर ॥२॥ तुका म्हणे आड । केलों मी हें तुझें कोड ॥३॥
1945
तुजविणं कांहीं । स्थिर राहे ऐसें नाहीं ॥१॥ कळों आलें बहुता रीती । पांडुरंगा माझ्या चित्तीं ॥ध्रु.॥ मोकलिली आस । सर्वभावें जालों दास ॥२॥ तुका म्हणे तूं चि खरा । येर वाउगा पसारा ॥३॥
1946
तुजवीण तीळभरी रिता ठाव । नाहीं ऐसें विश्व बोलतसे ॥१॥ बोलियेले योगी मुनी साधु संत । आहेसि या आंत सर्वांठायीं ॥ध्रु.॥ मी तया विश्वासें आलों शरणागत । पूर्वीचें अपत्य आहें तुझें ॥२॥ अनंत ब्रम्हांडें भरोनि उरलासि । मजला जालासि कोठें नाहीं ॥३॥ अंतपार नाहीं माझिया रूपासि । काय सेवकासि भेट देऊं ॥४॥ ऐसें विचारिलें म्हणोनि न येशी । सांग हृषीकेशी मायबापा ॥५॥ तुका म्हणे काय करावा उपाय । जेणें तुझे पाय आतुडति ॥६॥
1947
तुजवीण मज कोण आहे देवा । मुकुंदा केशवा नारायणा ॥१॥ जोडोनियां कर कृपेच्या सागरा । गोपीमनोहरा पांडुरंगा ॥ध्रु.॥ साच करीं हरी आपुली ब्रिदावळी । कृपेनें सांभाळीं मायबापा ॥२॥ साहए होसी जरी जाती सहा वैरी । मग ध्यान करीं आवडीनें ॥३॥ सर्व अपराध क्षमा करीं माझा । लडिवाळ तुझा पांडुरंगा ॥४॥ कृपा करोनियां द्यावी क्षमा शांति । तेणें तुझी भक्ति घडेल देवा ॥५॥ ऐंसें तों सामर्थ्य नाहीं नारायणा । जरी तुज करुणा येइल कांहीं ॥६॥ तुका म्हणे आतां आपंगावें मज । राखें माझी लाज पांडुरंगा ॥७॥
1948
तुजशीं संबंध चि खोटा । परता परता रे थोंटा ॥१॥ देवा तुझें काय घ्यावें । आप आपणां ठकावें ॥ध्रु.॥ जेथें मुदल न ये हातां । व्याज मरावें लेखितां ॥२॥ तुका म्हणे ऐसा । त्रिभुवनीं तुझा ठसा ॥३॥
1949
तुजसवें आम्हीं अनुसरलों अबळा । नको अंगीं कळा राहों हरी हीन देऊं ॥१॥ सासुरवासा भीतों जीव ओढे तुजपाशीं । आतां दोहीविशीं लज्जा राखें आमुची ॥ध्रु.॥ न कळतां संग जाला सहज खेळतां । प्रवर्तली चिंता मागिलांचियावरि ॥२॥ तुका म्हणे असतां जैसें तैसें बरवें । वचन या भावें वेचुनियां विनटलों ॥३॥
1950
तुजसवें येतों हरी । आम्हां लाज नाहीं तरी । उचलिला गिरी । चांग तईं वांचलों ॥१॥ मोडा आतां खेळ । गाई गेल्या जाला वेळ । फांकल्या ओढाळ । नाहीं तो चि आवरा ॥ध्रु.॥ चांग दैवें यमुनेसी वांचलों बुडतां । निलाजिरीं आम्ही नाहीं भय धाक या अनंता ॥२॥ खातों आगी माती । आतां पुरे हा सांगाती । भोंवतां भोंवेल । आम्हां वाटतें हें चित्तीं ॥३॥ तुका म्हणे उरी नाहीं तुजसवें । शाहाणे या भावें दुरी छंद भोळियां सवें ॥४॥
1951
तुझा दास ऐसा म्हणती लोकपाळ । म्हणऊनि सांभाळ करीं माझा ॥१॥ अनाथाचा नाथ पतितपावन । हें आतां जतन करीं नाम ॥ध्रु.॥ माझें गुण दोष पाहातां न लगे अंत । ऐसें माझें चित्त मज ग्वाही ॥२॥ नेणें तुझी कैसी करावी हे सेवा । जाणसी तूं देवा अंतरींचें ॥३॥ तुका म्हणे तूं या कृपेचा सिंधु । तोडीं भवबंधु माझा देवा ॥४॥
1952
तुझा दास मज म्हणती अंकित । अवघे सकळिक लहान थोर ॥१॥ हें चि आतां लागे करावें जतन । तुझें थोरपण तुज देवा ॥ध्रु.॥ होउनी निर्भर राहिलों निश्चिंतें । पावनपतित नाम तुझें ॥२॥ करितां तुज होय डोंगराची राईं । न लगतां कांहीं पात्या पातें ॥३॥ तुका म्हणे तुज काय ते आशंका । तारितां मशका मज दीना ॥४॥
1953
तुझा भरवसा आम्हां । फार होता पुरुषोत्तमा ॥१॥ भवसागरसंकटीं । तारिशील जगजेठी ॥ध्रु.॥ नाम आदित्याचें झाड । त्याचा न पडे उजेड ॥२॥ सिलंगणीचें सोनें । त्यासीं गाहाण ठेवी कोण ॥३॥ तुका म्हणे देवा । ब्रिद सोडूनियां ठेवा ॥४॥
1954
तुझा म्हणऊनि जालों उतराईं । त्याचें वर्म काईं तें मी नेणें ॥१॥ हातीं धरोनियां दावीं मज वाट । पुढें कोण नीट तें चि देवा ॥ध्रु.॥ देवभक्तपण करावें जतन । दोहीं पक्षीं जाण तूं चि बळी ॥२॥ अभिमानें तुज लागली हे लाज । शरणागतां काज करावया ॥३॥ तुका म्हणे बहु नेणता मी फार । म्हणऊनि विचार जाणविला ॥४॥
1955
तुझा म्हणविलों दास । केली उच्छिष्टासी आस ॥१॥ मुखीं घालावा कवळ । जरी तूं होशील कृपाळ ॥२॥ सीण भाग माझा पुसें । तुका म्हणे न करीं हांसें ॥३॥
1956
तुझा म्हणवून तुज नेणें । ऐसें काय माझें जिणें ॥१॥ तरि मज कवणाचा आधार । करोनियां राहों धीर ॥ध्रु.॥ काय शब्दीं चि ऐकिला । भेटी नव्हतां गा विठ्ठला ॥२॥ तुका म्हणे आतां । अभय देई पंढरिनाथा ॥३॥
1957
तुझा म्हणोनियां दिसतों गा दीन । हा चि अभिमान सरे तुझा ॥१॥ अज्ञान बाळका कोपली जननी । तयासी निर्वाणीं कोण पावे ॥ध्रु.॥ तैसा विठो तुजविण परदेशी । नको या दुःखासीं गोऊं मज ॥२॥ तुका म्हणे मज सर्व तुझी आशा । अगा जगदीशा पांडुरंगा ॥३॥
1958
तुझा विसर नको माझिया जीवा । क्षण एक केशवा मायबापा ॥१॥ जाओ राहो देह आतां ये चि घडी । कायसी आवडी याची मज ॥ध्रु.॥ कुश्चीळ इंद्रियें आपुलिया गुणें । यांचिया पाळणें कोण हित ॥२॥ पुत्र पत्नी बंधु सोयरीं खाणोरीं । यांचा कोण धरी संग आतां ॥३॥ पिंड हा उसना आणिला पांचांचा । सेकीं लागे ज्याचा त्यासी देणें ॥४॥ तुका म्हणे नाहीं आणिक सोइरें । तुजविण दुसरें पांडुरंगा ॥५॥
1959
तुझा शरणागत । जन्मोजन्मींचा अंकित ॥१॥ आणीक नेणें कांहीं हेवा । तुजवांचूनि केशवा ॥ध्रु.॥ हें चि माझें गाणें । तुझें नामसंकीर्तन ॥२॥ तुझ्या नामाचीं भूषणें । तुका म्हणे ल्यालों लेणें ॥३॥
1960
तुझा शरणागत जालों मी अंकित । करीं माझें हित पांडुरंगा ॥१॥ पतितपावन तुझी ब्रीदावळी । ते आतां सांभाळीं मायबापा ॥ध्रु.॥ अनाथाचा नाथ बोलतील संत । ऐकोनियां मात विश्वासलों ॥२॥ न करावी निरास न धरावें उदास । देई याचकास कृपादान ॥३॥ तुका म्हणे मी तों पातकांची रासी । देई पायापासीं ठाव देवा ॥४॥
1961
तुझा संग पुरे संग पुरे । संगति पुरे विठोबा ॥१॥ आपल्या सारिखें करिसी दासां । भिकारिसा जग जाणे ॥ध्रु.॥ रूपा नाहीं ठाव नांवा । तैसें आमुचें करिसी देवा ॥२॥ तुका म्हणे तोयें आपुलें भेंडोळें । करिसी वाटोळें माझें तैसें ॥३॥
1962
तुझाठायीं ओस । दोन्ही पुण्य आणि दोष ॥१॥ झडलें उरलें किती । आम्ही धरियेलें चित्ती ॥ध्रु.॥ कळलासी नष्टा । यातिक्रियाकर्मभ्रष्टा ॥२॥ तुका म्हणे बोला । नाहीं ताळा गा विठ्ठला ॥३॥
1963
तुझिया दासांचा हीन जालों दास । न धरीं उदास मायबापा ॥१॥ तुजविण प्राण कैसा राहों पाहे । वियोग न साहे क्षणभरि ॥ध्रु.॥ आणिक माझ्या जीवें मोकलिली आस । पाहे तुझी वास पांडुरंगा ॥२॥ सर्वभावें तुज आणिला उचित । राहिलों निश्चिंत तुझे पायीं ॥३॥ तुका म्हणे तुज असो माझा भार । बोलतों मी फार काय जाणें ॥४॥
1964
तुझिया नामाचा विसर न पडावा । ध्यानीं तो राहावा पांडुरंग ॥१॥ सांगितला मंत्र श्रीरामनामाचा । सर्वकाळ वाचा हें चि बोले ॥ध्रु.॥ उफराटें नाम वाल्मीक बोलीला । तो ही वंद्य केला नारायणें ॥२॥ तुका म्हणे मज तुझा चि भरवसा । धांवुनियां कैसा येसी देवा ॥३॥
1965
तुझिया पार नाहीं गुणां । माझी अल्प मति नारायणा । भवतारका जी सुजाणा । एक विज्ञापना पायांपाशीं ॥१॥ काय जाणावें म्यां दीनें । तुझिये भक्तीचीं लक्षणें । धड तें तोंड धोऊं नेणें । परि चिंतनें काळ सारीं ॥ध्रु.॥ न लवीं आणीक कांहीं पिसें । माझिया मना वांयां जाय ऐसें । चालवीं आपुल्या प्रकाशें । हातीं सरिसें धरोनियां ॥२॥ तुज समर्पिली काया । जीवें भावें पंढरीराया । सांभाळीं समविषम डाया । करीं छाया कृपेची ॥३॥ चतुर तरीं चतुरां रावो । जाणता तरीं जीवांचा जीव । न्यून तो कोण एक ठाव । आरुष भाव परि माझा ॥४॥ होतें तें माझें भांडवल । पायांपें निवेदिले बोल । आदरा ऐसें पाविजे मोल । तुका म्हणे साच फोल तूं जाणसी ॥५॥
1966
तुझिया पाळणा ओढे माझें मन । गेलों विसरोन देहभाव ॥१॥ लागला पालट फेडणें उसणें । येणें चि प्रमाणें पांडुरंगा ॥२॥ तुका म्हणे माझा जीव जैसा ओढे । तैसा चि तिकडे पाहिजेल ॥३॥
1967
तुझिया विनोदें आम्हांसी मरण । सोसियेला सीण बहु फेरे ॥१॥ आतां आपणें चि येसी तें करीन । नाम हें धरीन तुझें कंठीं ॥ध्रु.॥ वियोगें चि आलों उसंतीत वनें । संकल्प हे मनें वाहोनियां ॥२॥ तुका म्हणे वर्म सांपडलें सोपें । गोवियेलों पापें पुण्यें होतों ॥३॥
1968
तुझिये संगति । जाली आमुची निश्चिति ॥१॥ नाहीं देखिलें तें मळे । भोग सुखाचे सोहळे ॥ध्रु.॥ घरीं ताकाचें सरोवर । येथें नवनीताचे पूर ॥२॥ तुका म्हणे आतां । आम्ही न वजों दवडितां ॥३॥
1969
तुझी कीर्ती सांगों तुजपुढें जरी । ब्रम्हांडीं ही हरी माईना ते ॥१॥ मेरूची लेखणी सागराची शाई । कागद हा मही न पुरे चि ॥ध्रु.॥ अनंत अपार आपंगिले भक्त । माझें चि संचित ओडवेना ॥२॥ तुका म्हणे तुम्हां बोल नाहीं देवा । पामरें म्यां सेवा केली नाहीं ॥३॥
1970
तुझी माझी आहे जुनी सोयरीक । आधीं बंधु लेंक मग जाले ॥१॥ वांटेकरी म्हणून पुसती आतां । परि आहे सत्ता करीन ते ॥ध्रु.॥ लेंकीचें लेंकरूं नातु जाल्यावरी । मंगळा ही दुरि अंतरलों ॥२॥ बाइलेचा भाऊ पिसुना सोयरा । म्हणउनि करा विनोद हा ॥३॥ आकुळीं तों करूं नये तें चि केलें । न बोलावें भलें तों चि आतां ॥४॥ न म्हणसी लेंकी माउसी बहिणी । आम्हां केलें धणी पापाचें त्या ॥५॥ बहु पांचांजणी केली विटंबना । नये दाऊं जना तोंड ऐसें ॥६॥ तुका म्हणे आधीं मूळ तें चि धरूं । मागील तें करूं उरी आतां ॥७॥
1971
तुझीं वर्में आम्हां ठावीं नारायणा । परी तूं शाहाणा होत नाहीं ॥१॥ मग कालाबुली हाका देते वेळे । होतोसि परी डोळे नुघडिसी ॥ध्रु.॥ जाणोनि अज्ञान करावें मोहरें । खोटी खोडी हे रे तुझी देवा ॥२॥ तुकयाबंधु म्हणे कारण प्रचीति । पाहातों वेळ किती तेच गुण ॥३॥
1972
तुझे थोर थोर । भक्त करिती विचार ॥१॥ जपतपादि साधनें । मज चिंतवेना मनें ॥ध्रु.॥ करुणावचनें । म्यां भाकावीं तुम्हां दीनें ॥२॥ तुका म्हणे घेई । माझें थोडें फार ठायीं ॥३॥
1973
तुझे दारींचा कुतरा । नको मोकलूं दातारा ॥१॥ धरणें घेतलें घरांत । नको धरून उठवूं हात ॥ध्रु.॥ घेतली मुरकुंडी । थोर जालों मी लंडी ॥२॥ तुका म्हणे जगजीवना । ब्रिदें पाहें नारायणा ॥३॥
1974
तुझे नामें दिनानाथा । आम्ही उघडा घातला माथा ॥१॥ आतां न धरावें दुरी । बोल येईंल ब्रीदावरी ॥ध्रु.॥ पतित होतों ऐसा ठावा । आधीं कां न विचारावा ॥२॥ तुका म्हणे तुझे पायीं । आम्ही मिरास केली पाहीं ॥३॥
1975
तुझे पाय माझी काशी । कोण जाय माझें काशी॥१॥ तुझें रूप तें चि ध्यान । तें चि माझें अनुष्ठान ॥ध्रु.॥ तुझे चरण ते चि गया । जालें गयावर्जन देहा ॥२॥ तुका म्हणे सकळ तीथॉ । तुझें पायीं वसती येथें ॥३॥
1976
तुझे पाय माझे राहियेले चित्ती । ते मज दाविती वर्म देवा ॥१॥ आम्हां अंधां तुझ्या पायांचा आधार । जाणसी विचार चाळवितां ॥ध्रु.॥ मन स्थिर ठेलें इंद्रियें निश्चळ । हें तों माझें बळ नव्हे देवा ॥२॥ पापपुण्य भेद नासिलें तिमिर । त्रिगुण शरीर सांडियेलें ॥३॥ तुका म्हणे तुझा प्रताप हा खरा । मी जाणें दातारा शरणागत ॥४॥
1977
तुझे पाय माझें भाळ । एकत्रता सर्वकाळ ॥१॥ हें चिं देई विठाबाईं । पांडुरंगे माझे आईं ॥ध्रु.॥ नाहीं मोक्ष मुक्ति चाड । तुझी सेवा लागे गोड ॥२॥ सदा संग सज्जनांचा । नको वियोग पंढरीचा ॥३॥ नित्य चंद्रभागे स्नान । करीं क्षेत्रप्रदक्षण ॥४॥ पुंडलीक पाहोन दृष्टी । हर्षो नाचों वाळवंटीं ॥५॥ तुका म्हणे पांडुरंगा । तुझें स्वरूप चंद्रभागा ॥६॥
1978
तुझे पोटीं ठाव । व्हावा ऐसा माझा भाव ॥१॥ करीं वासनेसारिखें । प्राण फुटे येणें दुःखें ॥ध्रु.॥ अहंकार खोटे । वाटे श्वापदांची थाटे ॥२॥ तुका म्हणे आईं । हातीं धरूनि संग देईं ॥३॥
1979
तुझे मजपाशीं मन । माझी येथें भूक तान ॥१॥ जिव्हा रतें एके ठायीं । दुजें बोलायाचें काईं ॥ध्रु.॥ माझिया कवतुकें । उभा पहासी भातुकें ॥२॥ तुका म्हणे साचें । तेथें मागील कईंचें ॥३॥
1980
तुझे म्हणों आम्हां । मग उणें पुरुषोत्तमा ॥१॥ ऐसा धर्म काय । अमृतानें मृत्यु होय ॥ध्रु.॥ कल्पवृक्षा तळीं । गांठी बांधलिया झोळी ॥२॥ तुका म्हणे परीस । सांपडल्या उपवास ॥३॥
1981
तुझे वणूप गुण ऐसी नाहीं मती । राहिल्या त्या श्रुती मौन्यपणें ॥१॥ मौन्यपणें वाचा थोंटावल्या चारी । ऐसें तुझें हरी रूप आहे ॥ध्रु.॥ रूप तुझें ऐसें डोळां न देखवे । जेथें हें झकवे ब्रम्हादिक ॥२॥ ब्रम्हादिक देवा कर्माची कचाटी । म्हणोनि आटाटी फार त्यांसी ॥३॥ तुका म्हणे तुझें गुण नाम रूप । आहेसी अमुप वाणूं काई ॥४॥
1982
तुझें अंगभूत । आम्ही जाणतों समस्त ॥१॥ येरा वाटतसे जना । गुढारसें नारायणा ॥ध्रु.॥ ठावा थारा मारा । परचिया संव चोरा ॥२॥ तुका म्हणे भेदा । करुनि करितों संवादा ॥३॥
1983
तुझें दास्य करूं आणिका मागों खावया । धिग् जालें जिणें माझें पंढरीराया ॥१॥ काय गा विठोबा तुज म्हणावें । थोराच्या दैवें गोड शुभअशुभ ॥ध्रु.॥ संसाराचा धाक निरंतर आम्हांसी । मरण भलें परि काय अवकळा तैसी ॥२॥ तुझे शरणागत शरण जाऊं आणिकांसी । तुका म्हणे कवणा लाज हें कां नेणसी ॥३॥
1984
तुझें नाम गाऊं आतां । तुझ्या रंगीं नाचों था था ॥१॥ तुझ्या नामाचा विश्वास । आम्हां कैंचा गर्भवास ॥ध्रु.॥ तुझे नामीं विसर पडे । तरी कोटी हत्या घडे ॥२॥ नाम घ्या रे कोणी फुका । भावें सांगतसे तुका ॥३॥
1985
तुझें नाम गाया न सोपें डवळा । गाऊं कळवळा प्रेमाचिया ॥१॥ येइल आवडी जैसी अंतरींची । तैसी मनाची कीर्ती गाऊं ॥२॥ माझें मुख नामीं रंगो सर्वकाळ । गोविंद गोपाळ राम कृष्ण ॥३॥ अबद्ध चांगलें गाऊं जैसें तैसें । बाहे बाळ जैसें मायबापा ॥४॥ तुका म्हणे मज न लावीं वांकडें । मी तुझें बोबडें बाळ तान्हें ॥५॥
1986
तुझें नाम गोड नाम गोड । पुरे कोड सकळ ही ॥१॥ रसना येरां रसां विटे । घेतां घोट अधिक हें ॥ध्रु.॥ आणिकां रसें मरण गांठी । येणें तुटी संसारें ॥२॥ तुका म्हणे आहार जाला । हा विठ्ठला आम्हांसी ॥३॥
1987
तुझें नाम पंढरिनाथा । भावेंविण नये हाता ॥१॥ दाहां नये विसां नये । पंनासां साटां नये ॥ध्रु.॥ शां नये सहस्रा नये । लक्षकोडीलागीं नये ॥२॥ तुका म्हणे पंढरिनाथा । भावेंविण नये हाता ॥३॥
1988
तुझें नाम माझे मुखी असो देवा । विनवितों राघवा दास तुझा ॥१॥ तुझ्या नामबळें तरले पतित । म्हणोनि माझें चत्ति तुझे पायीं ॥२॥ तुका म्हणे तुझें नाम हें सादर । गातां निरंतर सुख वाटे ॥३॥
1989
तुझें नाम मुखीं तयासी विपत्ति । आश्चर्य हें चत्तिीं वाटतसे ॥१॥ काय जाणों काय होसील निजला । नेणों जी विठ्ठला मायबापा ॥ध्रु.॥ भवबंधनाचे तुटतील फांसे । तें कां येथें असे अव्हेरिलें ॥२॥ तुका म्हणे माझें दचकलें मन । वाटे वांयांविण श्रम केला ॥३॥
1990
तुझें नाम मुखीं न घेतां आवडी । जिव्हा ते चि घडी झडो माझी ॥१॥ हें मज देई हें मज देई । आणिक दुजें कांहीं न मगें तुज ॥ध्रु.॥ बहिर कान तुझी कीर्ती नाइकतां । पाय न देखतां जात डोळे ॥३॥ मना तुझें ध्यान नाहीं नित्य काळ । धिग तें चांडाळ जळो जळो ॥३॥ हातपाय तेणें पंथ न चलतां । जावे ते अनंता गळोनियां ॥४॥ तुजविण जिणें नाहीं मज चाड । तुका म्हणे गोड नाम तुझें ॥५॥
1991
तुझें प्रेम माझ्या हृदयीं आवडी । चरण न सोडीं पांडुरंगा ॥१॥ कासया सिनासि थोरिवां कारणें । काय तुझें उणें होइल देवा ॥ध्रु.॥ चातकाची चिंता हरली जळधरें । काय त्याचें सरे थोरपण ॥२॥ चंद्र चकोरांचा पुरवी सोहळा । काय त्याची कळा न्यून होय ॥३॥ तुका म्हणे मज अनाथा सांभाळीं । हृदयकमळीं स्थिर राहें ॥४॥
1992
तुझें म्हणवितां काय नास जाला । ऐकें बा विठ्ठला कीर्ती तुझी ॥१॥ परी तुज नाहीं आमचे उपकार । नामरूपा थार केलियाचे ॥ध्रु.॥ समूळीं संसार केला देशधडी । सांडिली आवडी ममतेची ॥२॥ लोभ दंभ काम क्रोध अहंकार । यांसी नाहीं थार ऐसें केलें ॥३॥ मृत्तिका पाषाण तैसें केलें धन । आपले ते कोण पर नेणों ॥४॥ तुका म्हणे जालों देहासी उदार । आणीक विचार काय तेथें ॥५॥
1993
तुझें रूप पाहतां देवा । सुख जालें माझ्या जीवा ॥१॥ हें तों वाचे बोलवेना । काय सांगों नारायणा ॥ध्रु.॥ जन्मोजन्मींचे सुकृत । तुझे पायीं रमे चित्त ॥२॥ जरी योगाचा अभ्यास । तेव्हां तुझा निजध्यास ॥३॥ तुका म्हणे भक्त । गोड गाऊं हरिचें गीत ॥४॥
1994
तुझें वर्म आम्हां कळों आलें सुखें । संतांचिया मुखें पांडुरंगा ॥१॥ अवघा चि नट वाउगा पसारा । चेईला तूं खरा तूं चि एक ॥ध्रु.॥ म्हणउनि देहबुद्धि नासिवंता । नातळे या चित्ता नेदावया ॥२॥ सोय हे लागली पुढिलांची वाट । पावले जे नीट तुजपाशीं ॥३॥ तुका म्हणे नाहीं कोणासवें काज । बोलायाचें मज अंतरींचें ॥४॥
1995
तुझें वर्म ठावें । माझ्या पाडियेलें भावें ॥१॥ रूप कासवाचे परी । धरुनि राहेन अंतरीं ॥ध्रु.॥ नेदी होऊं तुटी । मेळवीन दृष्टादृष्टी ॥२॥ तुका म्हणे देवा । चिंतन ते तुझी सेवा ॥३॥
1996
तुझें वर्म हातीं । दिलें सांगोनियां संतीं ॥१॥ मुखीं नाम धरीन कंठीं । अवघा सांटवीन पोटीं ॥ध्रु.॥ नवविधा वेढिन आधीं । सांपडलासी भावसंधी ॥२॥ तुका म्हणे बळिये गाढे । कळिकाळ पायां पडे ॥३॥
1997
तुझ्या नामाची आवडी । आम्ही विठो तुझीं वेडीं ॥१॥ आतां न वजों अणिकां ठायां । गाऊं गीत लागों पायां ॥ध्रु.॥ काय वैकुंठ बापुडें । तुझ्या प्रेमासुखापुढें ॥२॥ संतसमागममेळे । प्रेमसुखाचा सुकाळ ॥३॥ तुका म्हणे तुझ्या पायीं । जन्ममरणा ठाव नाहीं ॥४॥
1998
तुझ्या रूपें माझी काया भरों द्यावी पंढरीराया । दर्पणींची छाया एका रूपें भिन्नत्व ॥१॥ सुख पडिलें साटवण सत्ता वेचे शनें शनें । अडचणीचे कोन चारी मार्ग उगवले ॥ध्रु.॥ वसो डोळ्यांची बाहुली कवळे भिन्न छाया आली । कृष्णांजन चाली नव्हे प्रति माघारी ॥२॥ जीव ठसावला शिवें मना आलें तेथें जावें । फांटा पडिला नांवें तुका म्हणे खंडलें ॥३॥
1999
तुटे भवरोग । संचितक्रियमाणभोग ॥१॥ ऐसें विठोबाचें नाम । उच्चारितां खंडे जन्म ॥ध्रु.॥ वसों न सके पाप । पळे त्रिविध तो ताप ॥२॥ तुका म्हणे माया । होय दासी लागे पायां ॥३॥
2000
तुटे मायाजाळ विघडे भवसिंधू । जरि लागे छंदु हरिनामें ॥१॥ येर कर्म धर्म करितां ये कळी । माजी तरला बळी कोण सांगा ॥ध्रु.॥ न पढवे वेद नव्हे शास्त्रबोध । नामाचे प्रबंध पाठ करा ॥२॥ न साधवे योग न करवे वैराग्य । साधा भक्तिभाग्य संतसंगें ॥३॥ नव्हे अनुष्ठान न कळे ब्रम्हज्ञान । करावी सोपान कृष्णकथा ॥४॥ तुका म्हणे वर्म दावियेलें संतीं । यापरती विश्रांति आणिक नाहीं ॥५॥
2001
तुमचा तुम्हीं केला गोवा । आतां चुकवितां देवा ॥१॥ कैसें सरे चाळवणें । केलें काशाला शाहाणें ॥ध्रु.॥ कासया रूपा । नांवा आलेति गा बापा ॥२॥ तुका म्हणे आतां । न सरे हवाले घालितां ॥३॥
2002
तुमचिये दासींचा दास करूनि ठेवा । आशीर्वाद द्यावा हा चि मज ॥१॥ नवविधा काय बोलिली जे भक्ती । घ्यावी माझ्या हातीं संतजनीं ॥२॥ तुका म्हणे तुमच्या पायांच्या आधारें । उत्तरेन खरें भवनदी ॥३॥
2003
तुमची तों भेटी नव्हे ऐसी जाली । कोरडी च बोली ब्रम्हज्ञान ॥१॥ आतां न बोलावें ऐसें वाटे देवा । संग न करावा कोणांसवें ॥ध्रु.॥ तुम्हां निमित्यासी सांपडले अंग । नेदावा हा संग विचारिलें ॥२॥ तुका म्हणे माझी राहिली वासना । आवडी दर्शनाची च होती ॥३॥
2004
तुमचे स्तुतियोग्य कोटें माझी वाणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥ भिक्तभाग्य तरी नेदीं तुळसीदळ । जोडूनि अंजुळ उभा असें ॥ध्रु.॥ कैचें भाग्य ऐसें पाविजे संनिध । नेणें पाळूं विध करुणा भाकीं ॥२॥ संतांचे सेवटीं उच्छिष्टाची आस । करूनियां वास पाहातसें ॥३॥ करीं इच्छा मज म्हणोत आपुलें । एखादिया बोलें निमित्याच्या ॥४॥ तुका म्हणे शरण आलों हें साधन । करितों चिंतन रात्रदिवस ॥५॥
2005
तुमच्या पाळणा ओढतसे मन । गेलों विसरोन आपणासी ॥१॥ लागेल पालटें फेडावें उसणें । येणें चि प्रमाणें पांडुरंगा ॥ध्रु.॥ तुमचे आवडी संबंधाचा त्याग । घेतला ये लाग जगनिंदेचा ॥२॥ तुका म्हणे जैसा माझा जीव ओढे । तैसें च तिकडे पाहिजेल ॥३॥
2006
तुम्हां आम्हां उरी तोंवरी । जनाचारी ऐसें तैसी ॥१॥ माझें घोंगडें टाकुन देई । एके ठायीं मग असों ॥ध्रु.॥ विरोधानें पडे तुटी । कपट पोटीं नसावें ॥२॥ तुका म्हणे तूं जाणता हरी । मज वेव्हारीं बोलविसी ॥३॥
2007
तुम्हां आम्हां जंव जालिया समान । तेथें कोणां कोण सनमानी ॥१॥ उरी तों राहिली गोमटें गौरव । ओढे माझा जीव पायांपाशीं ॥ध्रु.॥ नेणपणें आम्ही आळवूं वोरसें । बोलवितों रसें शब्दरत्नें ॥२॥ तुका म्हणे लळे पाळीं वो विठ्ठले । कां हे उरविले भेदाभेद ॥३॥
2008
तुम्हां आम्हां तुटी होईंल यावरी । ऐसें मज हरी दिसतसे ॥१॥ वचनाचा कांहीं न देखों आधार । करावा हा धीर कोठवरी ॥ध्रु.॥ सारिलें संचित होतें गांठी कांहीं । पुढें ॠण तें ही नेदी कोणी ॥२॥ जावें चि न लगे कोणांचिया घरा । उडाला पातेरा तुझ्या संगें ॥३॥ तुका म्हणे आम्हां हा चि लाभ जाला । मनुष्यधर्म गेला पांडुरंगा ॥४॥
2009
तुम्हां आम्हां सरी । येथें कईंच्या या परी ॥१॥ स्वामिसेवा अळंकार । नाहीं आवडिये थार ॥ध्रु.॥ खुंटलिया वाचा । मग हा आनंद कइचा ॥२॥ तुका म्हणे कोडें । आम्ही नाचों तुज पुढें ॥३॥
2010
तुम्हां आम्हांसवें न पडावी गांठी । आलेति जगजेठी कळों आतां ॥१॥ किती म्हणों आतां वाइटा वाइट । शिवों नये वीट आल्यावरी ॥ध्रु.॥ बोलिल्याची आतां हे चि परचित । भीड भार थीत बुडवील ॥२॥ तुका म्हणे आली रोकडी प्रचिती । झांकणें तें किती कोठें देवा ॥३॥
2011
तुम्हां उद्धरणें फार । मज दुसरी नाहीं थार ॥१॥ आतां जैसें तैसें सोसा । काय करणें हृषीकेशा ॥ध्रु.॥ बरें न दिसेल ओळी । एका अन्न एका गाळी ॥२॥ लावितो आभार । तुका विखरलेती फार ॥३॥
2012
तुम्हां ठावा होता देवा । माझें अंतरींचा हेवा ॥१॥ होती काशानें सुटका । तरि हे वैकुंठनायका ॥ध्रु.॥ नसतें सांभाळिलें । जरि तुम्हीं आश्वासिलें ॥२॥ तुका म्हणे कृपाळुवा । बरवा केला सावाधावा ॥३॥
2013
तुम्हां न पडे वेच । माझा सरेल संकोच ॥१॥ फुकासाटीं जोडे यश । येथें कां करा आळस ॥ध्रु.॥ कृपेचें भुकेलें । होय जीवदान केलें ॥२॥ तुका म्हणे शिकविलें । माझें ऐकावें विठ्ठलें ॥३॥
2014
तुम्हां सांगतों कलयुगा फळ । पुढें होइल ब्रम्हगोळ ॥१॥ आम्हां म्हणतील कंटक । ऐसा पाडिती दंडक ॥ध्रु.॥ स्त्रिया पूजुनि सरे देती । भलते स्त्रियेसि भलते जाती ॥२॥ श्रेष्ठ वर्ण वेदविद्वांस । अंगीकारी मद्यमांस ॥३॥ चारी वर्ण अठरा याती । कवळ करिती एक पंक्ती ॥४॥ म्हणती अंबेचा क्रीडाकल्लोळ । शिवरूप प्राणी सकळ ॥५॥ ऐसें होइल शकुन देतों । अगोदर सांगुन जातों ॥६॥ तुका सद्गुरुदास्य करी । सिद्धि पाणी वाहे घरीं ॥७॥
2015
तुम्हां होईल देवा पडिला विसर । आम्हीं तें उत्तर यत्न केलें ॥१॥ पतितपावन ब्रीदें मिरविसी । याचा काय देसी झाडा सांग ॥ध्रु.॥ आहाच मी नव्हें अर्थाचें भुकेलें । भलत्या एका बोलें वारेन त्या ॥२॥ तुका म्हणे देह देईन सांडणें । सहित अभिमानें ओवाळूनि ॥३॥
2016
तुम्हांआम्हांसी दरुषण । जालें दुर्लभ भाषण ॥१॥ म्हणऊनि करितों आतां । दंडवत घ्या समस्तां ॥ध्रु.॥ भविष्याचें माथां देह । कोण जाणें होइल काय ॥२॥ म्हणे तुकयाचा बंधव । आमचा तो जाला भाव ॥३॥
2017
तुम्हांसाटीं आम्हां आपुला विसर । करितां अव्हेर कैसें दिसे ॥१॥ विचाराजी आतां ठायीचें हे देवा । आम्हां नये हेवा वाढवितां ॥ध्रु.॥ आलों टाकोनियां सुखाची वसती । पुढें माझ्या युक्ति खुंटलिया ॥२॥ तुका म्हणे जाला सकळ वृत्तांत । केला प्रणिपात म्हणऊनि ॥३॥
2018
तुम्हांसी न कळे सांगा काय एक । असया संकल्प वागवूं मी ॥१॥ आहे तेथें सत्ता ठेविलें स्थापूनि । प्रमाणें चि वाणी वदे आज्ञा ॥ध्रु.॥ कृपा जाली मग न लगे अंगसंग । निजध्यासें रंग चढता राहे ॥२॥ तुका म्हणे मागें बोलिलों तें वाव । आतां हा चि भाव दृढ झाला ॥३॥
2019
तुम्हांसी हें अवघें ठावें । किती द्यावें स्मरण ॥१॥ कां बा तुम्ही ऐसें नेणें । निष्ठ‍पणें टाळित असां ॥ध्रु.॥ आळवितां मायबापा । नये कृपा अझूनि ॥२॥ तुका म्हणे जगदीशा । काय असां निजेले ॥३॥
2020
तुम्ही आम्ही भले आतां । जालों चिंता काशाची॥१॥ आपुलाले आलों स्थळीं । मौन कळी वाढेना ॥ध्रु.॥ सहज जें मनीं होतें । तें उचितें घडलें ॥२॥ तुका म्हणे नसतें अंगा । येत संगा सारिखें ॥३॥
2021
तुम्ही कांटाळलां तरी । आम्हां न सोडणें हरी ॥१॥ जावें कवणिया ठाया । सांगा विनवितों पायां ॥ध्रु.॥ केली जिवा साटी । आतां सुखें लागा पाठी ॥२॥ तुका म्हणे ठाव । न सोडणें हा चि भाव ॥३॥
2022
तुम्ही गोपी बाळा मज कैशा नेणा । इंद्र अमरराणा म्यां चि केला ॥१॥ इंद्र चंद्र सूर्य ब्रम्हा तिन्ही लोक । माझे सकळीक यम धर्म ॥ध्रु.॥ मजपासूनिया जाले जीव शिव । देवांचा ही देव मी च कृष्ण ॥२॥ तुका म्हणे त्यांसी बोले नारायण । व्यर्थ मी पाषाण जन्मा आलों ॥३॥
2023
तुम्ही तरी सांगा कांहीं । आम्हांविशीं रखुमाबाई ॥१॥ कांहीं उरलें तें ठायीं । वेगीं पाठवुनी देई ॥ध्रु.॥ टोकत बैसलों देखा । इच्छीतसें ग्रासा एका ॥२॥ प्रेम देउनि बहुडा जाला । तुका म्हणे विठ्ठल बोला ॥३॥
2024
तुम्ही तों सदैव । आधरपणें माझी हांव ॥१॥ जळो आशेचें तें जिणें । टोंकतसावें दीनपणें ॥ध्रु.॥ येथूनि सोडवा । आतां अनुभवेंसी देवा ॥२॥ तुका म्हणे जालें । एक मग हें निमालें ॥३॥
2025
तुम्ही पाय संतीं । माझे ठेवियेले चित्ती ॥१॥ आतां बाधूं न सके काळ । जालीं विषम शीतळ ॥ध्रु.॥ भय नाहीं मनीं । देव वसे घरीं रानीं ॥२॥ तुका म्हणे भये । आतां स्वप्नीं ही नये ॥३॥
2026
तुम्ही बैसलेती निर्गुणाचे खोळे । आम्हां कां हे डोळे कान दिले ॥१॥ नाइकवे तुझी अपकीर्ति देवा । अव्हेरली सेवा न देखवे ॥ध्रु.॥ आपुले पोटीं तों राखियेला वाव । आम्हांसी कां भाव अल्प दिला ॥२॥ तुका म्हणे दुःखी असें हें कळों द्या । पुढिलिया धंद्या मन नेघे ॥३॥
2027
तुम्ही माझा देवा करिजे अंगीकार । हा नाहीं विचार मजपाशीं ॥१॥ आतां दोहीं पक्षीं लागलें लक्षणें । देवभक्तपण लाजविलें ॥ध्रु.॥ एकांतीं एकलें न राहे निश्चळि । न राहे च पळ मन ठायीं ॥२॥ पायीं महत्वाची पडिली शंकळा । बांधविला गळा स्नेहा हातीं ॥३॥ शरीर सोकलें देखिलिया सुखा । कदान्न हें मुखा मान्य नाहीं ॥४॥ तुका म्हणे जाला अवगुणांचा थारा । वाढली हे निद्रा अळस बहु ॥५॥
2028
तुम्ही येथें पाठविला धरणेकरी । त्याची जाली परी आइका ते ॥१॥ आतां काय पुढें वाढवुनि विस्तार । जाला समाचार आइका तो ॥ध्रु.॥ देवाचें उचित एकादश अभंग । महाफळ त्याग करूनि गेला ॥२॥ तुका म्हणे सेवा समर्पूनि पायीं । जालों उतराईं ठावें असो ॥३॥
2029
तुम्ही विश्वनाथ । दीनरंक मी अनाथ ॥१॥ कृपा कराल ते थोडी । पायां पडिलों बराडी ॥ध्रु.॥ काय उणें तुम्हांपाशीं । मी तों अल्पें चि संतोषी ॥२॥ तुका म्हणे देवा । कांहीं भातुकें पाठवा ॥३॥
2030
तुम्ही संत मायबाप कृपावंत । काय मी पतित कीर्ती वाणूं ॥१॥ अवतार तुम्हां धराया कारणें । उद्धरावें जन जड जीव ॥ध्रु.॥ वाढविलें सुख भक्ति भाव धर्म । कुळाचार नाम विठोबाचें ॥२॥ तुका म्हणे गुण चंदनाचे अंगीं । तैसे तुम्ही जगीं संतजन ॥३॥
2031
तुम्ही संतजनीं । माझी करावी विनवणी ॥१॥ काय तुक्याचा अन्याय । त्यासी अंतरले पाय ॥ध्रु.॥ भाका बहुतां रीती । माझी कीव काकुलती ॥२॥ न देखे पंढरी । तुका चरण विटेवरी ॥३॥
2032
तुम्ही सनकादिक संत । म्हणवितां कृपावंत ॥१॥ एवढा करा उपकार । देवा सांगा नमस्कार ॥ध्रु.॥ भाकूनि करुणा । विनवा वैकुंठींचा राणा ॥२॥ तुका म्हणे मज आठवा । मुळ लवकरी पाठवा ॥३॥
2033
तुम्ही साच नुपेक्षाल हा भरवसा । मज जाणतसां अधीरसें ॥१॥ कासया घातला लांबणी उद्धार । ठेवा करकर वारूनियां ॥ध्रु.॥ सुटों नये ऐसें कळले निरुतें । कां घ्यावें मागुतें आळवुनि ॥२॥ तुका म्हणे तुम्ही सभाग्य जी देवा । माझा तुम्हां केवा काय आला ॥३॥
2034
तुम्ही साधु संत कैवल्यसागर । मोक्षाचे आगर तुम्हां घरीं ॥१॥ तेथें मतिमंद काय बोलों वाणी । अमृताचे धणी पाणी कां घ्या ॥ध्रु.॥ कोटी भानु तेजीं खद्योत बापुडें । तैसा तुम्हांपुढें काय बोलों ॥२॥ तुम्ही अवघे चिंतामणि कल्पतरूचीं वनें । त्यापुढें धांवणें मषकांनीं ॥३॥ वाराणशीक्षेत्र गंगा वाहे कोड । का तेथें पाड कोकणाचे ॥४॥ पल्लवाचा वारा हिमकरीं काय । गगनावरी छाय कोण करी ॥५॥ समुद्राची तृषा हरी ऐसा कोण । जगाची जी तान्ह निववितो ॥६॥ मेरूचा पाठार अवघी ते क्षिति । मषकाचे हातीं मुष्टि फावे ॥७॥ सिंहापुढें काय जंबूक आरोळी । मोतियांचे वोळी कांच काय ॥८॥ कापुरासि काय लावूनि उटावें । काय ओवाळावें दीपकासि ॥९॥ तैशी तुम्ही निरे ज्ञानाचे भरींव । तेथें म्यां बोलावें पाड काय ॥१०॥ कृपानिधि तुम्हीं बोलविलें बोला । सुखें न्याय केला तुमचा मीं ॥११॥ अज्ञान मी वेडें म्हणवितों बाळ । माझा प्रतिपाळ करणें तुम्हां ॥१२॥ बोबडें बोलणें न धरावा कोप । क्षमा करा बाप कृपासिंधु ॥१३॥ तुका म्हणे तुम्ही संत बापमाय । भयें धरिले पाय कृपानिधि ॥१४॥
2035
तुम्हीं जावें निजमंदिरा । आम्ही जातों आपुल्या घरा ॥१॥ विठोबा लोभ असों देई । आम्ही असों तुमचें पाई ॥ध्रु.॥ चित्त करी सेवा । आम्ही जातों आपुल्या गावां ॥२॥ तुका म्हणे दिशा भुलों । फिरोन पायापाशीं आलों ॥३॥
2036
तुळसीमाळा घालुनी कंठीं । उभा विटेवरी जगजेठी । अवलोकोनि पुंडलीका दृष्टी । असे भीमातटीं पंढरीनाथ ॥१॥ भुक्तिमुक्ति जयाच्या कामारी । रिद्धीसिद्धी वोळगती द्वारीं । सुदर्शन घरटी करी । काळ कांपे दुरी धाकें तया ॥२॥ जगज्जननी असे वाम भागीं । भीमकी शोभली अर्धांगीं । जैसी विद्युल्लता झमके मेघीं । दरुषणें भंगी महा दोष ॥३॥ सुखसागर परमानंदु । गोपीगोपाळां गोधनां छंदु । पक्षीश्वापदां जयाचा वेधु । वाहे गोविंदु पांवा छंदें ॥४॥ मुखमंडित चतुर्भुजा । मनमोहना गरुडध्वजा । तुका म्हणे स्वामी माझा । पावे भक्तिकाजा लवलाहीं ॥५॥
2037
तुळसीवृंदावनीं उपजला कांदा । नावडे गोविंदा कांहीं केल्या ॥१॥ तैसे वंशामध्यें जाले जे मानव । जाणावे दानव अक्त ते ॥ध्रु.॥ केवड्यामधील निगपध कणसें । तैशीं तीं माणसें भक्तिहीन ॥२॥ तुका म्हणे जेवीं वंदनांतिल आळी । न चढे निढळीं देवाचिया ॥३॥
2038
तुशीं कोण घाली हुंबरी । साही पांगल्या अठरा चारी ॥ध्रु.॥ सहस्र मुखावरी हरी । शेष शिणविलें ॥१॥ चेंडुवासवें घातली उडी । नाथिला काळिया देऊनि बुडी ॥२॥ अशुद्ध पीतां करुणा नाहीं । तुवां माउशी ही मारियेली ॥३॥ रावणाचें घर बुडविलें सारें । त्याचीं रांडापोरें मारियेलीं ॥४॥ जाणो तो ठावा आहेसि आम्हां । तुवां आपुला मामा मारियेला ॥५॥ याशीं खेळतां नाश थोरू । तुकयास्वामी सारंगधरू ॥६॥ हमामा - अभंग २
2039
तू आम्हां सोयरा सज्जन सांगाति । तुजलागीं प्रीति चालो सदा ॥१॥ तूं माझा जिव्हाळा जीवाचा जिवलग । होसी अंतरंग अंतरींचा ॥ध्रु.॥ गण गोत मित्र तूं माझें जीवन । अनन्यशरण तुझ्या पांयीं ॥२॥ तुका म्हणे सर्वगुणें तुझा दास । आवडे अभ्यास सदा तुझा ॥३॥
2040
तूं कृपाळू माउली आम्हां दीनांची साउली । न संरित आली बाळवेशें जवळी ॥१॥ माझें केलें समाधान रूप गोजिरें सगुण । निवविलें मन आलिंगन देऊनी ॥ध्रु.॥ कृपा केली जना हातीं पायीं ठाव दिला संतीं । कळों नये चित्तीं दुःख कैसें आहे तें ॥२॥ तुका म्हणे मी अन्यायी क्षमा करीं वो माझे आईं । आतां पुढें काईं तुज घालूं सांकडें ॥३॥
2041
तूं च मायबाप बंधु सखा आमचा । वित्त गोत जीवलग जीवाचा ॥१॥ आणीक प्रमाण नाहीं दुसरें आतां । योगक्षेमभार तुझे घातला माथां ॥ध्रु.॥ तूं च क्रियाकर्म धर्म देव तूं कुळ । तूं च तप तीर्थ व्रत गुरु सकळ ॥२॥ म्हणे तुकयाबंधु करिता कार्यता देवा । तूं च भाव भक्ति पूजा पुनस्कार आघवा ॥३॥
2042
तूं पांढरा स्पटिक मणी । करिसी आणिकां त्याहुनि ॥१॥ म्हणोनि तुझ्या दारा । न येत ठकती दातारा ॥ध्रु.॥ तुझी ठावी नांदनूक । अवघा बुडविला लोक ॥२॥ तुका म्हणे ज्याचें घेसी । त्यास हें चि दाखविसी ॥३॥
2043
तूं बळिया शिरोमणी । आहेसि माजी ये त्रिभुवनीं । रिघालों पाठी तुझी म्हणउनी । आतां करीन मी असेल तें ॥१॥ तूं देवा प्रतापदिनकर । सुरा असुरांचा सुर । महावीरां वीर धनुर्धर । मी तों पामर काय तेथें ॥ध्रु.॥ कृपासिंधु दीनवत्सल । फोडिली देवाची बंदशाळ । संहारूनि राक्षसदळ । शरणागत राजीं स्थापिला ॥२॥ उपकर्म करावा बहुत । तरी तूं जाणसी धर्मनीत । उचित काय तें अनुचित । राखें शरणागत आलों आतां ॥३॥ किती म्यां काय विनवावें । शरण आलों जीवें भावें । तुकयाबंधु म्हणे करावें । क्षेम अवघें येणें काळें ॥४॥
2044
तूं माउलीहून मयाळ चंद्राहूनि शीतळ । पाणियाहूनि पातळ कल्लोळ प्रेमाचा ॥१॥ देऊं काशाची उपमा दुजी तुज पुरुषोत्तमा । ओंवाळूनि नामा तुझ्या वरूनि टाकिलों ॥ध्रु.॥ तुवां केलें रे अमृता गोड त्या ही तूं परता । पांचां तत्वांचा जनिता सकळ सत्तानायक ॥२॥ कांहीं न बोलोनि आतां उगा च चरणीं ठेवितों माथा । तुका म्हणे पंढरिनाथा क्षमा करीं अपराध ॥३॥
2045
तूं माझा कोंवसा । परी न कळे या धसां ॥१॥ कूट खाती मागें पुढें । जाती नरयेगांवा पुढें ॥ध्रु.॥ माझी म्हणती कवी । निषेधुनि पापी जीवीं ॥२॥ तुका म्हणे पांडुरंगा । आतां कोण लेखी जगा ॥३॥
2046
तूं माझा मायबाप सकळ वित्त गोत । तूं चि माझें हित करिता देवा ॥१॥ तूं चि माझा देव तूं चि माझा जीव । तूं चि माझा भाव पांडुरंगा ॥ध्रु.॥ तूं चि माझा आचार तूंचि माझा विचार । तूं चि सर्व भार चालविसी ॥२॥ सर्व भावें मज तूं होसी प्रमाण । ऐसी तुझी आण वाहातुसें ॥३॥ तुका म्हणे तुज विकला जीवभाव । कळे तो उपाव करीं आतां ॥४॥
2047
तूं माझी माउली तूं माझी साउली । पाहातों वाटुली पांडुरंगे ॥१॥ तूं मज येकुला वडील धाकुला । तूं मज आपुला सोयरा जीव ॥२॥ तुका म्हणे जीव तुजपाशीं असे । तुझियानें ओस सर्व दिशा ॥३॥
2048
तूं श्रीयेचा पति । माझी बहु हीन याती ॥१॥ दोघे असों एके ठायीं । माझा माथा तुझे पायीं ॥ध्रु.॥ माझ्या दीनपणां पार । नाहीं बहु तूं उदार ॥२॥ तुका म्हणे पांडुरंगा । मी ओहोळ तूं गंगा ॥३॥
2049
तूंचि अनाथाचा दाता । दुःख मोह नासावया चिंता । शरण आलों तुज आतां । तारीं कृपावंता मायबापा ॥१॥ संतसंगति देई चरणसेवा । जेणें तुझा विसर न पडावा । हा च भाव माझिया जीवा । पुरवीं देवा मनोरथ ॥२॥ मज भाव प्रेम देई कीर्ती । गुण नाम वर्णावया स्तुती । विघ्नां सोडवूनि हातीं । विनंती माझी परिसावी हे ॥३॥ आणीक कांहीं नाहीं मागणें । सुखसंपत्तिराज्यचाड धन । सांकडें न पडे तुज जेणें । दुजें भक्तीविण मायबापा ॥४॥ जोडोनियां कर पायीं ठेवीं माथा । तुका विनवी पंढरिनाथा । रंगीं वोडवावी रंगकथा । पुरवीं व्यथा मायबापा ॥५॥
2050
ते काय पवाडे नाहीं म्यां ऐकिले । गोपाळ रक्षिले वनांतरीं ॥१॥ मावेचा वोणवा होऊनि राक्षस । लागला वनास चहूंकडे ॥ध्रु.॥ गगनासी ज्वाळा लागती तुंबळ । गोधनें गोपाळ वेडावलीं ॥२॥ तुका म्हणे तेथें पळावया वाट । नाहीं वा निपट ऐसें जालें ॥३॥
2051
ते चि करीं मात । जेणें होइल तुझें हित ॥१॥ काय बडबड अमित । सुख जिव्हारीं सिणविसी ॥ध्रु.॥ जो मुळव्याधी पीडिला । त्यासी देखोन हांसे खरजुला ॥२॥ आराथकरी सोसी । त्यासि हांसे तो आळसी ॥३॥ क्षयरोगी म्हणे परता । सर रोगिया तूं आतां ॥४॥ वडस दोहीं डोळां वाढले । आणिकां कानें कोंचें म्हणे ॥५॥ तुका म्हणे लागों पायां । शुद्ध करा आपणियां ॥६॥
2052
ते माझे सोयरे सज्जन सांगाती । पाय आठविती विठोबाचे ॥१॥ येरा मानी विधि पाळणापुरतें । देवाचीं तीं भूतें म्हणोनियां ॥ध्रु.॥ सर्वभावें जालों वैष्णवांचा दास । करीन त्यांच्या आस उच्छिष्टाची ॥२॥ तुका म्हणे जैसे मानती हरिदास । तैशी नाहीं आस आणिकांची ॥३॥
2053
तें च किती वारंवार । बोलों फार बोलिलें ॥१॥ आतां माझें दंडवत । तुमच्या संत चरणांसी ॥ध्रु.॥ आवडी ते नीच नवी । जाली जीवीं वसती ॥२॥ तुका म्हणे बरवें जालें । घरा आलें बंदरीचें ॥३॥
2054
तें हीं नव्हे जें करितां कांहीं । ध्यातां ध्यायीं तें ही नव्हे ॥१॥ तें ही नव्हे जें जाणवी जना । वाटे मना तें नव्हे ॥ध्रु.॥ त्रास मानिजे कांटाळा । अशुभ वाचाळा तें ही नव्हे ॥२॥ तें ही नव्हे जें भोंवतें भोंवे । नागवें धांवे तें ही नव्हे ॥३॥ तुका म्हणे एक चि आहे । सहजिं पाहें सहज ॥४॥
2055
तेज्या इशारती । तटा फोक वरी घेती ॥१॥ काय सांगावें त्याहूनी । ऐका रे धरा मनीं ॥ध्रु.॥ नव्हे भांडखोर । ओढूनि धरूं पदर ॥२॥ तुका म्हणे तोंड । काळें करा खालीं मुंड ॥३॥
2056
तेणें वेशें माझीं चोरिलीं अंगें । मानावया जग आत्मैपणे । नाहीं चाड भीड संसाराचें कोड । उदासीन सर्व गुणें । भय मोह लज्जा निरसली शंका । अवघियां एक चि पणें । विठ्ठलाच्या पायीं बैसोनि राहिलीं । भागलीं नुटित तेणें ॥१॥ आतां त्यांसीं काय चाले माझें बळ । जालोंसें दुर्बळ सत्वहीन । दग्ध पट दिसे संगति बरवंट । काय त्याचें कारण ॥ध्रु.॥ आळसें दृष्टी न पाहे आपुलें । एक चि देखिलें सर्वरूप । मानामान तेथें खुंटोनि राहिलें । पिसुन तो कोण बाप । ज्योति ना अंधार अवघा एकंकार । तेथें काय पुण्यपाप । विठ्ठलावांचुनि कांहीं च नावडे । वेगळाल्या भावें रूप ॥२॥ बळबडिवार लौकिक वेव्हार । गेली आशा तृष्णा माया । सुखदुःखाची वार्ता नाइके । अंतरलों दुरी तया । मीतूंपणनिःकाम होऊनि । राहिलों आपुलिया ठायां । तुजविण आतां मज नाहीं कोणी । तुका म्हणे देवराया ॥३॥
2057
तेणें सुखें माझें निवालें अंग । विठ्ठल हें जग देखियेलें ॥१॥ कवतुकें करुणा भाकीतसें लाडें । आवडी बोबडें बोलोनियां ॥ध्रु.॥ मज नाहीं दशा अंतरीं दुःखाची । भावना भेदाची समूळ गेली ॥२॥ तुका म्हणे सुख जालें माझ्या जीवा । रंगलें केशवा तुझ्या रंगे ॥३॥
2058
तेथें सुखाची वसति । गाती वैष्णव नाचती । पताका झळकती । गर्जती हरिनामें ॥१॥ दोषा जाली घेघेमारी । पळती भरले दिशा चारी । न येती माघारीं । नाहीं उरी परताया ॥ध्रु.॥ विसरोनि देवपणा । उभा पंढरीचा राणा । विटोनि निर्गुणा । रूप धरिलें गोजिरें ॥२॥ पोट सेवितां न धाये । भूक भुकेली च राहे । तुका म्हणे पाहे । कोण आस या मुक्तीची ॥३॥
2059
तेरा दिवस जाले नश्चिक्र करितां । न पवसी अनंता मायबापा ॥१॥ पाषाणांची खोळ घेउनि बैसलासी । काय हृषीकेशी जालें तुज ॥ध्रु.॥ तुजवरी आतां प्राण मी तजीन । हत्या मी घालीन पांडुरंगा ॥२॥ फार विठाबाईं धरिली तुझी आस । करीन जीवा नास पांडुरंगा ॥३॥ तुका म्हणे आतां मांडिलें निर्वाण । प्राण हा सांडीन तुजवरी ॥४॥
2060
तेलनीशीं रुसला वेडा । रागें कोरडें खातो भिडा ॥१॥ आपुलें हित आपण पाही । संकोच तो न धरी कांहीं ॥ध्रु.॥ नावडे लोकां टाकिला गोहो । बोडिले डोकें सांडिला मोहो ॥२॥ शेजारणीच्या गेली रागें । कुत्र्यांनी घर भरिलें मागें ॥३॥ पिसारागें भाजिलें घर । नागविलें तें नेणे फार ॥४॥ तुका म्हणे वांच्या रागें । फेडिलें सावलें देखिलें जगें ॥५॥
2061
तेव्हां धालें पोट बैसलों पंगती । आतां आम्हां मुक्तिपांग काईं ॥१॥ धांवा केला आतां होईंल धांवणे । तया कायी करणें लागे सध्या ॥ध्रु.॥ गायनाचा आतां कोठें उरला काळ । आनंदें सकळ भरी आलें ॥२॥ देवाच्या सख्यत्वें विषमासी ठाव । मध्यें कोठें वाव राहों सके ॥३॥ तेव्हां जाली अवघी बाधा वाताहात । प्रेम हृदयांत प्रवेशलें ॥४॥ तुका म्हणे आम्हीं जिंतिलें भरवसा । देव कोठें दासा मोकलितो ॥५॥
2062
तेव्हां होतों भोगाधीन । तुम्हां भिन्न पासूनि ॥१॥ आतां बोलों नये ऐसें । आनारिसें वेगळें ॥ध्रु.॥ सन्मुख जालों स्वामीकडे । भव औठडे निराळे ॥२॥ चिंतिलें तें चिंतामणी । फिटे धणी तों द्यावें ॥३॥ सहज स्थित आहे अंगीं । प्रसंगीं ते वंचेना ॥४॥ तुमची देवा धरिली कास । केला नास प्रपंचा ॥५॥ तुका म्हणे जाणोनि वर्म । कर्माकर्में ठेविलीं ॥६॥
2063
तैसे नहों आम्ही विठ्ठलाचे दास । यावें आणिकांस काकुलती ॥१॥ स्वामिचिया सत्ता ठेंगणें सकळ । आला कळिकाळ हाताखालीं ॥ध्रु.॥ अंकिताचा असे अभिमान देवा । समर्पूनि हेवा असों पायीं ॥२॥ तुका म्हणे आम्हां इच्छेचें खेळणें । कोड नारायणें पुरवावें ॥३॥
2064
तो चि प्रसंग आला सहज । गुज धरितां नव्हे काज । न संडितां लाज । पुढें वोज न दिसे ॥१॥ तूं तर न होसी शाहाणा । नये सांगतों तें ही मना । आपण आपणा । आतां प्रयत्न देखावा ॥ध्रु.॥ न पुरवी पाहातां वाट । द्यावें प्रमाण चोखट । कास घालूनियां नीट । चौघाचार करावा ॥२॥ आतां श्रमाचें कारण । नव्हे व्हावें उदासीन । न पडे तयाविण । गांठी तुकयाबंधु म्हणे ॥३॥
2065
तो चि लटिक्यामाजी भला । म्हणे देव म्यां देखिला ॥१॥ ऐशियाच्या उपदेशें । भवबंधन कैसें नासे । बुडवी आपणासरिसे । अभिमानें आणिकांस ॥ध्रु.॥ आणिक नाहीं जोडा । देव म्हणवितां या मूढा ॥२॥ आणिकांचे न मनी साचें । तुका म्हणे या श्रेष्ठांचें ॥३॥
2066
तो बोले कोमळ निष्ठ‍ साहोनि । कोपतां गौळणी हास्य करी ॥१॥ करावया दास्य भक्तांचें निर्लज्ज । कवतुकें रज माथां वंदी ॥२॥ दिलें उग्रसेना मथुरेचें राज्य । सांगितलें काज करी त्याचें ॥३॥ त्यासि होतां कांहीं अरिष्टनिर्माण । निवारी आपण शरणागता ॥४॥ शरणागतां राखे सर्व भावें हरि । अवतार धरी तयांसाटीं ॥५॥ तयांसाटीं वाहे सुदर्शन गदा । उभा आहे सदा सांभाळित ॥६॥ तळमळ नाहीं तुका म्हणे चत्तिा । भक्तांचा अनंता भार माथां ॥७॥
2067
तो या साच भावें न कळे चि इंद्रा । म्हणउनि धारा घाली सिळा ॥१॥ घाली धारा मेघ कडाडिला माथा । वरि अवचिता देखियेला ॥२॥ देखती पाऊस वोळला गोपाळ । भ्याले हे सकळ विचारिती ॥३॥ विचार पडला विसरले खेळ । अन्याय गोपाळ म्हणती केला ॥४॥ लागलेंसे गोड न कळे ते काळीं । भेणें वनमाळी आठविती ॥५॥ आतां कायकैसा करावा विचार । गोधनासि थार आपणिया ॥६॥ यांचिया विचारें होणार ते काईं । तुका म्हणे ठायीं वेडावलीं ॥७॥
2068
तों च हीं क्षुल्लकें सखीं सहोदरें । नाहीं विश्वंभरें वोळखी तों ॥१॥ नारायण विश्वंभर विश्वपिता । प्रमाण तो होतां सकळ मिथ्या ॥ध्रु.॥ रवि नुगवे तों दीपिकाचें काज । प्रकाशें तें तेज सहज लोपे ॥२॥ तुका म्हणे देहसंबंध संचितें । कारण निरुतें नारायणीं ॥३॥
2069
तोंडें खाये फार । पादे बोचा करी मार ॥१॥ एक ऐसे ते शाहाणे । आपुले अधीन तें नेणें ॥ध्रु.॥ कुले घालूनि उघडे । रागें पाहे लोकांकडे ॥२॥ खेळे जुतकर्म । मग बोंबली जुलूम ॥३॥ निजतां आला मोहो । वीतां म्हणे मेला गोहो ॥४॥ तुका म्हणे त्यांनीं । मनुष्यपणा केली हानी ॥५॥
2070
तोंडें बोलावें तें तरी वाटे खरें । जीव येरेयेरें वंचिजे ना ॥१॥ हें तुम्हां सांगणें काय उगवूनि । जावें समजोनि पांडुरंगा ॥ध्रु.॥ जेवित्याची खूण वाढित्या अंतरीं । प्रीतीनें हे धरी चाली तेथें ॥२॥ तुका म्हणे बहु परीचे आदर । अत्यंत वेव्हारसंपादणी ॥३॥
2071
तोंवरि तोंवरि जंबुक करि गर्जना । जंव त्या पंचानना देखिलें नाहीं ॥१॥ तोंवरि तोवरिं सिंधु करि गर्जना । जंव त्या अगिस्तब्राम्हणा देखिलें नाहीं ॥ध्रु.॥ तोंवरि तोंवरि वैराग्याच्या गोष्टी । जंव सुंदर वनिता दृष्टी पडिली नाहीं ॥२॥ तोंवरि तोंवरि शूरत्वाच्या गोष्टी । जंव परमाईंचा पुत्र दृष्टी देखिला नाहीं ॥३॥ तोंवरि तोंवरि माळामुद्रांचीं भूषणें । जंव तुक्याचें दर्शन जालें नाहीं ॥४॥
2072
तोंवरि तोंवरि शोभतील गारा । जंव नाहीं हिरा प्रकाशला ॥१॥ तोंवरि तोंवरि शोभतील दीपिका । नुगवता एका भास्करासी ॥२॥ तोंवरि तोंवरि सांगती संताचिया गोष्टी । जंव नाहीं भेटी तुक्यासवें ॥३॥
2073
तोंवरी म्यां त्यास कैसें निषेधावें । जों नाहीं बरवें कळों आलें ॥१॥ कोणाचिया मुखें तट नाहीं मागें । वचन वाउगें बोलों नये ॥ध्रु.॥ दिसे हानि परी निरास न घडे । हे तंव रोकडे अनुभव ॥२॥ आपुलिया भोगें होईंल उशीर । तोंवरी कां धीर केला नाहीं ॥३॥ तुका म्हणे गोड करील सेवट । पाहिली ते वाट ठायीं आहे ॥४॥
2074
तोडुनि पुष्पवटिका फळवृक्षयाति । बाभळा राखती करूनि सार ॥१॥ कोण हित तेणें देखिलें आपुलें । आणीक पाहिलें सुख काईं ॥ध्रु.॥ धान्यें बीजें जेणें जाळिलीं सकळें । पेरितो काळें जिरें बीज ॥२॥ मोडोनिया वाटा पुढिलांची सोय । आडरानें जाय घेउनि लोकां ॥३॥ विषाचें अमृत ठेवूनियां नाम । करितो अधम ब्रम्हहत्या ॥४॥ तुका म्हणे त्यास नाइके सांगतां । तया हाल करितां पाप नाहीं ॥५॥
2075
त्या हरिदासांची भेटी घेतां । नकाऩ उभयतासी जातां ॥१॥ माते परीस थोरी कथा । भाड घेतां न लाजे ॥ध्रु.॥ देतां घेतां नरकवासी । उभयतांसी रवरव ॥२॥ तुका म्हणे नरकगांवा । जाती हांवा धरोनि ॥३॥
2076
त्यांचिया चरणां माझें दंडवत । ज्यांचें धनवित्त पांडुरंग ॥१॥ येथें माझा जीव पावला विसांवा । म्हणऊनि हांवा भरलासें ॥ध्रु.॥ चरणींचें रज लावीन कपाळा । जीं पदें राउळा सोईं जाती ॥२॥ आणिक तीं भाग्यें येथें कुरवंडी । करूनियां सांडीं इंद्राऐसी ॥३॥ वैष्णवांचे घरीं देवाची वसति । विश्वास हा चित्तीं सत्यभावें ॥३॥ तुका म्हणे सखे हरिचे ते दास । आतां पुढें आस नाहीं दुजें ॥५॥
2077
त्यांनीं धणीवरी संग केला हरीसवें । देऊनि आपुलें तो चि देईल तें खावें ॥१॥ न ठेवी आभार प्रेमाचा भुकेला । बहु दिवस संग हा चि निर्धार त्याला ॥ध्रु.॥ कान्होबा तू जेवीं घासोघासीं म्हणती । आरुष गोपाळें त्यांची बहु देवा प्रीती ॥२॥ तुका म्हणे आतां जाऊं आपुलिया घरा । तोय वांचविलें ऐसें सांगों रे दातारा ॥३॥
2078
त्यांसि राखे बळें आपुले जे दास । कळिकाळासि वास पाहों नेदी ।१॥ पाउस न येतां केली यांची थार । लागला तुषार येऊं मग ॥२॥ येउनि दगड बैसतील गिरी । वरुषला धारीं शिळाचिये ॥३॥ शळिांचिये धारीं वरुषला आकांत । होता दिवस सात एक सरें ॥४॥ एक सरें गिरि धरिला गोपाळीं । होतों भाव बळी आम्ही ऐसे ॥५॥ ऐसें कळों आलें देवाचिया चित्ता । म्हणे तुम्हीं आतां हात सोडा ॥६॥ हांसती गोपाळ करूनि नवल । आइकोनि बोल गोविंदाचे ॥७॥ दावितील डोया गुडघे कोपर । फुटले ते भार उचलितां ॥८॥ भार आम्हांवरि घालुनि निराळा । राहिलासी डोळा चुकवुनि ॥९॥ निमित्य अंगुळी लावियेली बरी । पाहों कैसा गिरी धरितोसि ॥१०॥ सिणले हे होते ठायींच्या त्या भारें । लटिकें चि खरें मानुनियां ॥११॥ यांणीं अंत पाहों आदरिला याचा । तुका म्हणे वाचा वाचाळ ते ॥१२॥
2079
त्याग तंव मज न वजतां केला । कांहीं च विठ्ठला मनांतूनि ॥१॥ भागलिया आला उबग सहज । न धरितां काज जालें मनीं ॥ध्रु.॥ देह जड जालें ॠणाच्या आभारें । केलें संवसारें कासावीस ॥२॥ तुका म्हणे गेला आळसकळिस । अकर्तव्य दोष निवारिले ॥३॥
2080
त्याग तरी ऐसा करा । अहंकारा दवडावें ॥१॥ मग जैसा तैसा राहें । काय पाहें उरलें तें ॥ध्रु.॥ अंतरींचें विषम गाढें । येऊं पुढें नेदावें ॥२॥ तुका म्हणे शुद्ध मन । समाधान पाहिजे ॥३॥
2081
त्यागें भोग माझ्या येतील अंतरा । मग मी दातारा काय करूं ॥१॥ आतां असो तुझे पायीं हें मोटळें । इंद्रियें सकळें काया मन ॥ध्रु.॥ सांडीमांडी विधिनिषेधाचा ठाव । न कळतां भाव जाइल वांयां ॥२॥ तुका म्हणे आतां नको उजगरा । लपवीं दातारा अंगीं मज ॥३॥
2082
त्याचें सुख नाहीं आलें अनुभवा । कठिण हें जिवा तोंचिवरी ॥१॥ मागिलांचे दुःख लागों नेदी अंगा । अंतर हें संगा नेदी पुढें ॥२॥ तुका म्हणे सर्वविशीं हा संपन्न । जाणती महिमान श्रुति ऐसें ॥३॥
2083
त्रासला हा जीव संसारींच्या सुखा । तुजविण सखा नाहीं कोणी ॥१॥ ऐसें माझें मनीं वाटे नारायणा । घालावी चरणावरि मिठी ॥ध्रु.॥ कइं तें सुंदर देखोनि रूपडें । आवडीच्या कोडें आळंगीन ॥२॥ नाहीं पूर्व पुण्य मज पापरासी । म्हणोनि पायांसी अंतरलों ॥३॥ अलभ्य लाभ कैंचा संचितावेगळा । विनवी गोपाळा दास तुका ॥४॥
2084
त्राहे त्राहे सोडवीं अनंता । लागों दे ममता तुझे पायीं॥१॥ एक चि मागणें देई तुझी गोडी । न लगे आवडी आणिकाची ॥ध्रु.॥ तुझें नाम गुण वर्णीन पवाडे । आवडीच्या कोडें नाचों रंगीं ॥२॥ बापा विठ्ठलराया हें चि देई दान । जोडती चरण जेणें तुझे ॥३॥ आवडीसारखें मागितलें जरी । तुका म्हणे करीं समाधान ॥४॥
2085
त्रिपुटीच्या योगें । कांहीं नव्हे कोणां जोगें । एक जातां लागें । एक पाठीं लागतें ॥१॥ मागें पुढें अवघा काळ । पळों नये न चले बळ । करितां कोल्हाळ । कृपे खांदां हरि वाहे ॥ध्रु.॥ पापपुण्यात्मयाच्या शक्ति । असती योजिल्या श्रीपती । यावें काकुलती । तेथें सत्तानायेका ॥२॥ तुका उभा पैल थडी । तरि हे प्रकाश निवडी । घातल्या सांगडी । तापे पेटीं हाकारी ॥३॥
2086
त्रिविधकर्माचे वेगळाले भाव । निवडूनि ठाव दाखविला॥१॥ आलियाचा झाडा राहिल्याचा ठाव । सुख गौरव संतां अंगीं ॥ध्रु.॥ हिशेबें आलें तें सकळांसी प्रमाण । तेथें नाही आन चालों येत ॥२॥ तुका म्हणे नाहीं पापपुण्य खतीं । झाड्याची हुजती हातां आली ॥३॥
2087
त्रुशाकाळें उदकें भेटी । पडे मिठी आवडीची ॥१॥ ऐसियाचा हो कां संग । जिवलग संतांचा ॥ध्रु.॥ मिष्टान्नाचा योग भुके । म्हणतां चुके पुरेसें ॥२॥ तुका म्हणे माते बाळा । कळवळा भेटीचा ॥३॥
2088
त्रैलोकींचा नाथ सकळांचा आधार । बळिचें तुवां घर धरियेलें ॥१॥ आम्हां मोकलिलें कोणां निरविलें । कोणा हातीं दिले तिन्ही लोक ॥ध्रु.॥ अनाथांचा बंधु दासांचा कैवारी । ब्रिदें तुझीं हरी जाती वांयां ॥२॥ तुका म्हणे ऐसें बोलिला दुर्वास । वाटला संतोष पांडुरंगा ॥३॥
2089
त्रैलोक्य पाळितां उबगला नाहीं । आमचें त्या काई असे ओझें ॥१॥ पाषाणाचे पोटीं बैसला दर्दुर । तया मुखीं चार कोण घाली ॥ध्रु.॥ पक्षी अजगर न करी संचित । तयासि अनंत प्रतिपाळी ॥२॥ तुका म्हणे तया भार घातलिया । उपेक्षीना दयासिंधु माझा ॥३॥
2090
थडियेसी निघतां पाषाणांच्या सांगडी । बुडतां मध्यभागीं तेथें कोण घाली उडी ॥१॥ न करी रे तैसें आपआपणा । पतंग जाय वांयां जीवें ज्योती घालूनियां ॥ध्रु.॥ सावधपणें सोमवल वाटी भरोनियां प्याला । मरणा अंतीं वैद्य बोलावितो गहिला ॥२॥ तुकाम्हणे करीं ठायींचा चि विचार । जंवें नाहीं पातला यमाचा किंकर ॥३॥
2091
थुंकोनियां मान । दंभ करितों कीर्तन ॥१॥ जालों उदासीन देहीं । एकाविण चाड नाहीं ॥ध्रु.॥ अर्थ अनर्थ सारिखा । करूनि ठेविला पारिखा ॥२॥ उपाधिवेगळा । तुका राहिला सोंवळा ॥३॥
2092
थोडे तुम्ही मागें होती उद्धरिले । मज ऐसे गेले वांयां जीव ॥१॥ आतां याचा काहीं न मनावा भार । कृपेचा सागर आहेसी तूं ॥ध्रु.॥ तुज आळवितां पापाची वसति । राहे अंगीं किती बळ त्याचें ॥२॥ तुका म्हणे उदकीं तारिले दगड । तैसा मी ही जड एक देवा ॥३॥
2093
थोडें आहे थोडें आहे । चित्त साहे जालिया ॥१॥ हर्षामर्ष नाहीं अंगीं । पांडुरंगीं सरलें तें ॥ध्रु.॥ अवघ्या साधनांचें सार । न लगे फार शोधावें ॥२॥ तुका म्हणे लटिकें पाहें । सांडीं देह अभिमान ॥३॥
2094
थोडें परी निरें । अविट तें घ्यावें खरें ॥१॥ घ्यावें जेणें नये तुटी । बीज वाढे बीजा पोटीं ॥ध्रु.॥ चित्त ठेवीं ग्वाही । आणिकांशीं चाड नाहीं ॥२॥ आपलें तें हित फार । तुका म्हणे खरें सार ॥३॥
2095
थोर अन्याय केला तुझा अंत म्यां पाहिला । जनाचिया बोलासाटीं चित्ती क्षोभविलें ॥१॥ भागविलासी केला सीण अधम मी यातिहीन । झांकूनि लोचन दिवस तेरा राहिलों ॥ध्रु.॥ अवघें घालूनियां कोडें तानभुकेचें सांकडें । योगक्षेम पुढें तुज करणें लागेल ॥२॥ उदकीं राखिले कागद चुकविला जनवाद । तुका म्हणे ब्रीद साच केलें आपुलें ॥३॥
2096
थोर ती गळाली पाहिजे अहंता । उपदेश घेतां सुख वाटे ॥१॥ व्यर्थ भराभर केलें पाठांतर । जोंवरी अंतर शुद्ध नाहीं ॥ध्रु.॥ घोडें काय थोडें वागवितें ओझें । भावेंविण तैसें पाठांतर ॥२॥ तुका म्हणे धरा निष्ठावंत भाव । जरी पंढरीराव पाहिजे तो॥३॥
2097
दंड अन्यायाच्या माथां । देखोनि करावा सर्वथा ॥१॥ नये उगे बहुतां घाटूं । सिसें सोनियांत आटूं ॥ध्रु.॥ पापुण्यासाठीं । नीत केली सत्ता खोटी ॥२॥ तुका म्हणे देवा । दोष कोणाचा तो दावा ॥३॥
2098
दंभें कीर्ति पोट भरे मानी जन । स्वहित कारण नव्हे कांहीं ॥१॥ अंतरती तुझे पाय मज दुरी । धरितां हे थोरी जाणिवेची ॥ध्रु.॥ पिंडाच्या पाळणें धांवती विकार । मज दावेदार मजमाजी ॥२॥ कैसा करूं घात आपुला आपण । धरूनि गुमान लोकलाज ॥३॥ तुका म्हणे मज दावी तो सोहोळा । देखें पाय डोळां तुझे देवा ॥४॥
2099
दगडाच्या देवा बगाड नवस । बाईंल कथेस जाऊं नेदी ॥१॥ वेची धनरासी बांधलें स्मशान । दारीं वृंदावन द्वाड मानी ॥ध्रु.॥ चोरें नागविला न करी त्याची खंती । परी द्विजा हातीं नेदी रुका ॥२॥ करी पाहुणेर विव्हाया जावयासी । आल्या अतीतासी पाठमोरा ॥३॥ तुका म्हणे जळो धिग त्याचें जिणें । भार वाही सीण वर्म नेणे ॥४॥
2100
दधिमाझी लोणी जाणती सकळ । तें काढी निराळें जाणे मथन ॥१॥ अिग्न काष्ठामाजी ऐसें जाणे जन । मथिलियाविण कैसा जाळी ॥ध्रु.॥ तुका म्हणे मुख मळीण दर्पणीं । उजळिल्यावांचूनि कैसें भासे ॥२॥
2101
दया क्षमा शांति । तेथें देवाची वसति ॥१॥ पावे धांवोनियां घरा । राहे धरोनियां थारा ॥ध्रु.॥ कीर्तनाचे वाटे । बराडिया ऐसा लोटे ॥२॥ तुका म्हणे घडे । पूजा नामें देव जोडे ॥३॥
2102
दया तिचें नांव भूतांचें पाळण । अणीक निर्दळण कंटकांचें ॥१॥ पाप त्याचें नांव न विचारितां नीत । भलतें चि उन्मत्त करी सदा ॥२॥ तुका म्हणे धर्म रक्षावया साठीं । देवास ही आटी जन्म घेणें ॥३॥
2103
दर्दुराचें पिलुं म्हणे रामराम । नाहीं उदक उष्ण होऊं दिलें ॥१॥ कढेमाजी बाळ करी तळमळ । गोविंद गोपाळ पावें वेगीं ॥ध्रु.॥ आज्ञा तये काळीं केली पावकासी । झणी पिलीयासी तापवीसी ॥२॥ तुका म्हणे तुझे ऐसे हे पवाडे । वणिऩतां निवाडे सुख वाटे ॥३॥
2104
दर्पणासी नखटें लाजे । शुद्ध खिजे देखोनि ॥१॥ ऐसें अवगुणांच्या बाधें । दिसे सुदें विपरीत ॥ध्रु.॥ अंधळ्यास काय हिरा । गारां चि तो सारिखा ॥२॥ तुका म्हणे भुंके सुनें । ठाया नेणे ठाव तो ॥३॥
2105
दर्पणासी बुजे । नखटें तोंड पळवी लाजे ॥१॥ गुण ज्याचे जो अंतरीं । तो चि त्यासी पीडा करी ॥ध्रु.॥ चोरा रुचे निशी । देखोनियां विटे शशी ॥२॥ तुका म्हणे जन । देवा असे भाग्यहीन ॥३॥
2106
दर्शनाची आस । आतां ना साहे उदास ॥१॥ जीव आला पायांपाशीं । येथें असें कलिवरेंसीं ॥ध्रु.॥ कांहीं च नाठवे । ठायीं बैसलें नुठवे ॥२॥ जीव असतां पाहीं । तुका ठकावला ठायीं ॥३॥
2107
दर्शनाचें आर्त जीवा । बहु देवा राहिलें ॥१॥ आतां जाणसी तें करीं । विश्वंभरीं काय उणें ॥ध्रु.॥ येथें जरी उरे चिंता । कोण दाता याहूनी ॥२॥ तुका म्हणे जाणवलें । आम्हां भलें एवढेंच॥३॥
2108
दसरा दिवाळी तो चि आम्हां सन । सखे संतजन भेटतील ॥१॥ आमुप जोडल्या सुखाचिया राशी । पार या भाग्यासी न दिसे आतां ॥ध्रु.॥ धन्य दिवस आजि जाला सोनियाचा । पिकली हे वाचा रामनामें ॥२॥ तुका म्हणे काय होऊं उतराई । जीव ठेऊं पांयीं संतांचिये ॥३॥
2109
दह्यांचिया अंगीं निघे ताक लोणी । एका मोलें दोन्ही मागों नये ॥१॥ आकाशाचे पोटीं चंद्र तारांगणें । दोहींशी समान पाहों नये ॥ध्रु.॥ पृथ्वीचा पोटीं हिरा गारगोटी । दोहोंसी समसाटी करूं नये ॥२॥ तुका म्हणे तैसे संत आणि जन । दोहींसी समान भजूं नये ॥३॥
2110
दाखवूनि आस । केला बहुतांचा नास ॥१॥ थोंटा झोडा शिरोमणी । भेटलासी नागवणी ॥ध्रु.॥ सुखाचें उत्तर । नाहीं मुदलासी थार ॥२॥ तुका म्हणे काय । तुझे घ्यावें उरे हाय ॥३॥
2111
दाटे कंठ लागे डोळियां पाझर । गुणाची अपार वृष्टि वरी ॥१॥ तेणें सुखें छंदें घेईंन सोंहळा । होऊनि निराळा पापपुण्यां ॥ध्रु.॥ तुझ्या मोहें पडो मागील विसर । आलापें सुस्वर करिन कंठ ॥२॥ तुका म्हणे येथें पाहिजे सौरस । तुम्हांविण रस गोड नव्हे॥३॥
2112
दाढी डोई मुंडी मुंडुनियां सर्व । पांघुरति बरवें वस्त्र काळें ॥१॥ उफराटी काठी घेऊनियां हातीं । उपदेश देती सर्वत्रासी॥२॥ चाळवुनी रांडा देउनियां भेष । तुका म्हणे त्यास यम दंडी ॥३॥
2113
दाता तो एक जाणा । नारायणा स्मरवी ॥१॥ आणीक नासिवंतें काय । न सरे हाय ज्यांच्यानें ॥ध्रु.॥ यावें तयां काकुलती । जे दाविती सुपंथ ॥२॥ तुका म्हणे उरी नुरे । त्याचे खरे उपकार ॥३॥ अलंकापुरीं ब्राम्हण धरणें बसून बेताळीस दिवस उपवासी होता त्यास द्दष्टांत कीं देहूस तुकोबापाशी जाणें. ब्राम्हण स्वामीपें आला त्याबद्दल अभंग ॥ ३१ ॥
2114
दाता नारायण । स्वयें भोगिता आपण ॥१॥ आतां काय उरलें वाचे । पुढें शब्द बोलायाचे ॥ध्रु.॥ देखती जे डोळे । रूप आपुलें तें खेळे ॥२॥ तुका म्हणे नाद । जाला अवघा गोविंद ॥३॥
2115
दानें कांपे हात । नाव तेविशीं मात ॥१॥ कथी चावटीचे बोल । हिंग क्षीरीं मिथ्या फोल ॥ध्रु.॥ न वजती पाप । तीर्था म्हणे वेचूं काय ॥२॥ तुका म्हणे मनीं नाहीं । न ये आकारातें कांहीं ॥३॥
2116
दामाजीपंताची रसद गुदरली । लज्जा सांभाळिली देवरायें ॥१॥ तयाचें चरित्र परिसा हो सादरें । करितों नमस्कार संतजना ॥ध्रु.॥ मंगळवेढा असे विस्त कुटुंबेंसी । व्यापारी सर्वांसी मान्य सदा ॥२॥ कर्म काय करी ठाणाचा हवाला । तों कांहीं पडला कठिण काळ ॥३॥ धान्याचीं भांडारें होतीं तीं फोडिलीं । पंढरी रक्षिली दुष्काळांत ॥४॥ दुबळें अनाथ तें हि वांचविलें । राष्टधांत ते जाली कीर्ति मोठी ॥५॥ मुजुम करीत होता कानडा ब्राम्हण । फिर्याद लिहून पाठविली ॥६॥ अविंदाचें राज्य बेदरीं असतां । कागद पाहतां तलब केली ॥७ ॥ दामाजीपंतासी धरोनि चालविलें । इकडे या विठ्ठलें माव केली ॥८॥ विकते धारणे सवाईंचें मोल । धान्याचें सकळ द्रव्य केलें ॥९॥ दामाजीपंताच्या नांवें अर्जदास्त । लिहून खलेती मुद्रा केली ॥१०॥ विठो पाडेवार भक्तां साहए जाला । वेदरासी गेला रायापासीं ॥११॥ जोहार मायबाप पुसती कोठील । तंव तो म्हणे स्थळ मंगळवेढें ॥१२॥ दामाजीपंतांनीं रसद पाठविली । खलेती ओतिली अर्जदास्त ॥१३॥ देखोनियां राजा संतोष पावला । म्हणे व्यर्थ त्याला तलब केली ॥१४॥ काय तुझें नांव पुसती यंत्रधारी । तो म्हणे बेगारी विठा कां जी ॥१५॥ पावल्याचा जाब द्यावा मायबाप । करोनि घेतों माप म्हणती ते ॥१६॥ पावल्याचा जाब दिधला लिहून । तसरीफ देऊन पाठविला ॥१७॥ छत्री घोडा शिबिका आभरणांसहित । दिला सवें दूत पाठवूनि ॥१८॥ वाटे चुकामुक जाली याची त्यांची । ते आले तैसे चि मंगळवेढा ॥१९॥ दामाजीपंतासी बेदरासी नेलें । राजा म्हणे जालें कवतुक ॥२०॥ काल गेला विठा बेगारी देऊन । तसरीफ देऊन जाब दिला ॥२१॥ काय तुमचें काज बोला जी सत्वर । बोलाजी निर्धार वचनाचा ॥२२॥ कैंचा विठा कोण पाठविला कधीं । काढोनियां आधीं जाब दिला ॥२३॥ पहातां चि जाब हृदय फुटलें । नयन निडारले राजा देखे ॥२४॥ सावळें सकुमार रूप मनोहर । माथां तेणें भार वाहियेला ॥२५॥ दामाजीपंतासी रायें सन्मानिलें । तो म्हणे आपुलें कर्म नव्हे ॥२६॥ आतां तुमची सेवा पुरे जी स्वामिया । शिणविलें सखया विठोबासी ॥२७॥ निरोप घेऊनि आला स्वस्थळासी । उदास सर्वासीं होता जाला ॥२८॥ दामाजीपंतांनीं सेविली पंढरी । ऐसा त्याचा हरि निकटवृत्ति ॥२९॥ तुका म्हणे विठो अनाथ कैवारी । नुपेक्षी हा हरि दासालागीं ॥३०॥
2117
दारिद्रानें विप्र पीडिला अपार । तया पोटीं पोर एक असे ॥१॥ बाहेरी मिष्टान्न मिळे एके दिशीं । घेऊनी छंदासि त्या चि बैसे ॥ध्रु.॥ क्षुधाकाळीं रडे देखिलें तें मागे । कांहीं केल्या नेघे दुजें कांहीं ॥२॥ सहज कौतुकें बोले बापमाये । देवापाशीं आहे मागशी तें ॥३॥ तेव्हां तुजलागीं स्मरे नारायणा । जीवींच्या जीवना पांडुरंगा ॥४॥ लागली हे क्षुधा जात असे प्राण । काय हें निर्वाण पाहातोसि ॥५॥ ब्रम्हांडनायक विश्वाचा पाळक । वरी तिन्ही लोक पोसितोसि ॥६॥ प्राण हा उत्कर्ष जाहला विव्हळ । तेव्हां तो कृपाळ धांव घाली ॥७॥ सांडूनि वैकुंठ धांव घाली तई । आळंगिला बाहीं कृपावंतें ॥८॥ तुका म्हणे दिला क्षीराचा सागर । राहे निरंतर तयापासीं ॥९॥
2118
दारीं परोवरी । कुडीं कवाडीं मी घरीं ॥१॥ तुमच्या लागलों पोषणा । अवघे ठायीं नारायणा ॥ध्रु.॥ नेदीं खाऊं जेवूं । हातींतोंडींचें ही घेऊं ॥२॥ तुका म्हणे अंगीं । जडलों ठायींचा सलगी ॥३॥
2119
दावी वर्म सोपें भाविकां गोपाळां । वाहे त्यांच्या गळां पाले माळा ॥१॥ मान देती आधीं मागतील डाव । देवा तें गौरव माने सुख ॥२॥ मानती ते मंत्र हमामा हुंबरी । सिंतोडिती वरि स्नान तेणें ॥३॥ वस्त्रें घोंगडिया घालुनियां तळीं । वरी वनमाळी बैसविती ॥४॥ तिंहीं लोकांसी जो दुर्लभ चिंतना । तो धांवे गोधना वळतियां ॥५॥ यांच्या वचनाचीं पुष्पें वाहे शिरीं । नैवेद्य त्यांकरीं कवळ मागे ॥६॥ त्यांचिये मुखींचें हिरोनियां घ्यावें । उच्छष्टि तें खावें धणीवरी ॥७॥ वरी माथां गुंफे मोरपिसांवेटी । नाचे टाळी पिटी त्यांच्या छंदें ॥८॥ छंदें नाचतील जयासवें हरी । देहभाव वरी विसरलीं ॥९॥ विसरली वरी देहाची भावना । ते चि नारायणा सर्वपूजा ॥१०॥ पूजा भाविकांची न कळतां घ्यावी । न मागतां दावी निज ठाव ॥११॥ ठाव पावावया हिंडे मागें मागें । तुका म्हणे संगें भक्तांचिया ॥१२॥
2120
दावूनियां कोणां कांहीं । ते चि वाहीं चाळविलीं ॥१॥ तैसें नको करूं देवा । शुद्धभावा माझिया ॥ध्रु.॥ रिद्धिसिद्धी ऐसे आड । येती नाड नागवूं ॥२॥ उदकाऐसे दावुनि ओढी । उर फोडी झळईं ॥३॥ दर्पणींचें दिलें धन । दिसे पण चरफडी ॥४॥ तुका म्हणे पायांसाटीं । करीं आटी कळों द्या ॥५॥
2121
दावूनियां बंड । पुरे न करी तें भांड ॥१॥ जळो जळो तैसें जिणें । फटमरे लाजिरवाणें ॥ध्रु.॥ घेतलें तें सोंग । बरवें संपादावें सांग ॥२॥ तुका म्हणे धीरें । देवें नुपेक्षिलें खरें ॥३॥
2122
दास जालों हरिदासांचा । बुद्धिकायामनेंवाचा ॥१॥ तेथें प्रेमाचा सुकाळ । टाळमृदंगकल्लोळ । नासे दुष्टबुद्धि सकळ । समाधि हरिकीर्त्तनीं ॥ध्रु.॥ ऐकतां हरिकथा । भक्ति लागे त्या अभक्तां ॥२॥ देखोनि कीर्तनाचा रंग । कैसा उभा पांडुरंग ॥३॥ हें सुख ब्रम्हादिकां । म्हणे नाहीं नाहीं तुका ॥४॥
2123
दासां सर्व काळ । तेथें सुखाचे कल्लोळ ॥१॥ जेथें वसती हरिदास । पुण्य पिके पापा नास ॥ध्रु.॥ फिरे सुदर्शन । घेऊनियां नारायण ॥२॥ तुका म्हणे घरीं । होय म्हणियारा कामारी ॥३॥
2124
दासीचा जो संग करी । त्याचे पूर्वज नर्का द्वारीं ॥१॥ ऐसे सांगों जातां जना । नये कोणाचिया मना ॥ध्रु.॥ बरें विचारूनी पाहें । तुज अंतीं कोण आहे ॥२॥ तुका म्हणे रांडलेंका । अंतीं जासिल यमलोका ॥३॥
2125
दासों पाछें दौरे राम । सोवे खडा आपें मुकाम ॥१॥ प्रेमरसडी बांधी गळे । खैंच चले उधर ॥ध्रु.॥ आपणे जनसु भुल न देवे । कर हि धर आघें बाट बसावे ॥२॥ तुका प्रभु दीनदयाला । वारि रे तुज पर हुं गोपाला ॥३॥
2126
दास्य करी दासांचें । उणें न साहे तयांचें । वाढिलें ठायींचें । भानें टाकोनियां धांवे ॥१॥ ऐसा कृपेचा सागर । विटे उभा कटीं कर । सर्वस्वें उदार । भक्तांलागीं प्रगटे ॥ध्रु.॥ हृदयीं श्रीवत्सलांछन । मिरवी भक्तांचें भूषण । नाहीं तयाचा सीण । सुख धरिलें लातेचें ॥२॥ सत्यभामा दान करी । उजुर नाहीं अंगीकारी । सेवकाच्या शिरीं । धरूनि चाले पादुका ॥३॥ राखे दारवंटा बळीचा । रथी जाला अर्जुनाचा । दास सेवकांचा । होय साचा अंकित ॥४॥ भिडा नो बोलवें पुंडलिकाशीं । उभा मर्यादा पाठीशीं । तुका म्हणे ऐसी । कां रे न भजा माउली ॥५॥
2127
दिक चि या नाहीं संसारसंबंधा । तुटेना या बाधा भवरोगाची ॥१॥ तांतडींत करीं म्हणऊनि तांतडी । साधिली ते घडी सोनियाची ॥ध्रु.॥ संकल्पाच्या बीजें इंद्रियांची चाली । प्रारब्ध तें घाली गर्भवासीं ॥२॥ तुका म्हणे बीजें जाळुनी सकळ । करावा गोपाळ आपुला तो ॥३॥
2128
दिनदिन शंका वाटे । आयुष्य नेणवतां गाढें ॥१॥ कैसीं भुललीं बापुडीं । दंबविषयांचे सांकडीं ॥ध्रु.॥ विसरला मरण । त्याची नाहीं आठवण ॥२॥ देखत देखत पाहीं । तुका म्हणे आठव नाहीं ॥३॥
2129
दिनरजनीं हा चि धंदा । गोविंदाचे पवाडे ॥१॥ संकिल्पला देह देवा । सकळ हेवा तये ठायीं ॥ध्रु.॥ नाहीं अवसान घडी । सकळ जोडी इंद्रियां ॥२॥ कीतिऩ मुखें गर्जे तुका । करी लोकां सावध ॥३॥
2130
दिनाचा कृपाळु दुष्टजना काळ । एकला सकळ व्यापक हा ॥१॥ हांसे बोले तैसा नव्हे हा अनंत । नये पराकृत म्हणों यासि ॥२॥ यासि कळावया एक भक्तिभाव । दुजा नाहीं ठाव धांडोळितां ॥३॥ धांडोळितां श्रुति राहिल्या निश्चित । तो करी संकेत गोपींसवें ॥४॥ गोपिकांची वाट पाहे द्रुमातळीं । मागुता न्याहाळी न देखतां ॥५॥ न देखतां त्यांसि उठे बैसे पाहे । वेडावला राहे वेळोवेळां ॥६॥ वेळोवेळां पंथ पाहे गोपिकांचा । तुका म्हणे वाचा नातुडे तो ॥७॥
2131
दिला जीवभाव । तेव्हां सांडिला म्यां ठाव ॥१॥ आतां वर्ते तुझी सत्ता । येथें सकळ अनंता ॥ध्रु.॥ माझीया मरणें । तुम्ही बैसविलें ठाणें ॥२॥ तुका म्हणे काई । मी हें माझें येथें नाहीं ॥३॥
2132
दिली चाले वाचा । क्षय मागिल्या तपाचा ॥१॥ रिद्धि सिद्धि येती घरा । त्याचा करिती पसारा ॥ध्रु.॥ मानदंभांसाटीं । पडे देवासवें तुटी ॥२॥ तुका म्हणे मेवा । कैचा वेठीच्या नदवां ॥३॥
2133
दिली मान तरी नेघावी शत्रूची । शरण आलें त्यासी जतन जीवें ॥१॥ समर्थासी असे विचाराची आण । भलीं पापपुण्य विचारावें ॥ध्रु.॥ काकुळतीसाटीं सत्याचा विसर । पडिलें अंतर न पाहिजे ॥२॥ तुका म्हणे यश कीर्ति आणि मान । करितां जतन देव जोडे ॥३॥
2134
दिली हाक मनें नव्हे ती जतन । वेंटाळिल्या गुणें धांव घेती ॥१॥ काम क्रोध मद मत्सर अहंकार । निंदा द्वेष फार माया तृष्णा ॥ध्रु.॥ इंद्रियांचे भार फिरतील चोर । खान घ्यावया घर फोडूं पाहे ॥२॥ माझा येथें कांहीं न चले पराक्रम । आहे त्याचें वर्म तुझे हातीं ॥३॥ तुका म्हणे आतां करितों उपाय । जेणें तुझे पाय आतुडती ॥४॥
2135
दिवट्या छत्री घोडे । हें तों बर्‍यांत न पडे ॥१॥ आतां येथें पंढरिराया । मज गोविसी कासया ॥ध्रु.॥ मान दंभ चेष्टा । हे तों शूकराची विष्ठा ॥२॥ तुका म्हणे देवा । माझे सोडववणे धांवा ॥३॥
2136
दिवट्या वाद्यें लावुनि खाणें । करूनि मंडण दिली हातीं ॥१॥ नवरा नेई नवरी घरा । पूजन वरा पाद्याचें ॥ध्रु.॥ गौरविली विहीण व्याही । घडिलें कांहीं ठेवूं नका ॥२॥ करूं द्यावें न्हावें वरें । ठायीचें कां रे न कळे चि ॥३॥ वर्‍हाडियांचे लागे पाठीं । जैसी उटिका तेलीं ॥४॥ तुका म्हणे जोडिला थुंका । पुढें नरका सामग्री ॥५॥
2137
दिवसा व्यापारचावटी । रात्री कुटुंबचिंता मोटी ॥१॥ काय करूं या मनासी । नाठवे हृषीकेशी ॥ध्रु.॥ वेश्येपाशीं रात्रीं जागे । हरिकीर्त्तनीं निद्रा लागे ॥२॥ तुका म्हणे काय जालासी । वृथा संसारा आलासी ॥३॥
2138
दीन आणि दुर्बळांसी । सुखरासी हरिकथा ॥१॥ तारूं भवसागरींचें । उंचनीच अधिकार ॥ध्रु.॥ चरित्र तें उच्चारावें । केलें देवें गोकुळीं ॥२॥ तुका म्हणे आवडी धरीं । कृपा करी म्हणऊनी ॥३॥
2139
दीनानाथा तुझीं ब्रिदें चराचर । घेसील कैवार शरणागता ॥१॥ पुराणीं जे तुझे गर्जती पवाडे । ते आम्हां रोकडे कळों आले ॥ध्रु.॥ आपुल्या दासांचें न साहासी उणें । उभा त्याकारणें राहिलासी ॥२॥ चक्र गदा हातीं आयुधें अपारें । न्यून तेथें पुरें करूं धावें ॥३॥ तुका म्हणे तुज भक्तीचें कारण । करावया पूर्ण अवतार ॥४॥
2140
दीप घेउनियां धुंडिती अंधार । भेटे हा विचार अघटित ॥१॥ विष्णुदास आम्ही न भ्यो कळिकाळा । भुलों मृगजळा न घडे तें ॥ध्रु.॥ उधळितां माती रविकळा मळे । हें कैसें न कळे भाग्यहीना ॥२॥ तुका म्हणे तृणें झांके हुताशन । हें तंव वचन वाउगें चि ॥३॥
2141
दीप न देखे अंधारा । आतां हें चि करा जतन ॥१॥ नारायण नारायण । गांठी धन बळकट ॥ध्रु.॥ चिंतामणीपाशीं चिंता । तत्वता ही नयेल ॥२॥ तुका म्हणे उभयलोकीं । हे चि निकी सामोग्री ॥३॥
2142
दुःख वाटे ऐसी ऐकोनियें गोष्टी । जेणें घडे तुटी तुझ्या पायीं ॥१॥ येतो कळवळा देखोनियां घात । करितों फजित नाइकती ॥ध्रु.॥ काय करूं देवा ऐसी नाहीं शक्ति । दंडुनि पुढती वाटे लावूं ॥२॥ तुका म्हणे मज दावूं नको ऐसे । दृष्टीपुढें पिसे पांडुरंगा ॥३॥
2143
दुःखाचिये साटीं तेथें मिळे सुख । अनाथाची भूक दैन्य जाय ॥१॥ उदाराचा राणा पंढरीस आहे । उभारोनि बाहे पालवितो ॥ध्रु.॥ जाणतियाहूनि नेणत्याची गोडी । आळिंगी आवडी करूनियां ॥२॥ शीण घेऊनियां प्रेम देतो साटी । न विचारी तुटी लाभा कांहीं ॥३॥ तुका म्हणे असों अनाथ दुबळीं । आम्हांसी तो पाळी पांडुरंग ॥४॥
2144
दुःखाची संगति । तिच्याठायीं कोण प्रीति ॥१॥ अवघें असो हें निराळें । करूं सोइरें सावळें ॥ध्रु.॥ क्षणभंगुर ते ठाव । करूनि सांडावे चि वाव ॥२॥ तुका म्हणे बरा । ठाव पावलों हा थारा ॥३॥
2145
दुःखाचे डोंगर लागती सोसावे । ऐसें तंव ठावें सकळांसीं ॥१॥ कांहीं न करिती विचार हिताचा । न करिती वाचा नामघोष ॥ध्रु.॥ भोग कळों येतो मागिल ते जन्म । उत्तम मध्यम कनिष्ठ ते ॥२॥ तुका म्हणे येथें झांकितील डोळे । भोग देतेवेळे येइल कळों ॥३॥
2146
दुःखी होती लोभें करावें तें काईं । उडतील गाईं म्हैसी आतां ॥१॥ आणीकही कांहीं होईंल अरष्टि । नायिके हा धीट सांगितलें ॥२॥ सांगों चला याच्या मायबापांपाशीं । निघाले घरासि देवा रागें ॥३॥ रागें काला देतां न घेती कवळ । टोकवी गोपाळ क्रोधियांसि ॥४॥ क्रोध देवावरि धरियेला राग । तुका म्हणे भाग न लभती ॥५॥
2147
दुःखें दुभागलें हृदयसंपुष्ट । गहिंवरें कंठ दाटताहे ॥१॥ ऐसें काय केलें सुमित्रा सखया । दिलें टाकोनियां वनामाजी ॥ध्रु.॥ आक्रंदती बाळें करुणावचनीं । त्या शोकें मेदिनी फुटों पाहे ॥२॥ काय हे सामर्थ्य नव्हतें तुजपाशीं । संगें न्यावयासी अंगभूतां ॥३॥ तुज ठावें आम्हां कोणी नाहीं सखा । उभयलोकीं तुका तुजविण ॥४॥ कान्हा म्हणे तुझ्या वियोगें पोरटीं । जालों दे रे भेटी बंधुराया ॥५॥
2148
दुखवलें चत्ति आजिच्या प्रसंगें । बहु पीडा जगें केली देवा ॥१॥ कधीं हा संबंध तोडिसी तें नेणें । आठवूनि मनें पाय असें ॥ध्रु.॥ आणिकांची येती अंतरा अंतरें । सुखदुःख बरेंवाइट तीं ॥२॥ तुका म्हणे घडे एकांताचा वास । तरिच या नास संबंधाचा ॥३॥
2149
दुजा ऐंसा कोण बळी आहे आतां । हरि या अनंता पासूनिया ॥१॥ बळियाच्या आम्ही जालों बळिवंता । करूं सर्व सत्ता सर्वांवरी ॥२॥ तुका म्हणे आम्ही जिवाच्या उदारा । जालों प्रीतिकरा गोविंदासी ॥३॥
2150
दुजें खंडे तरी । उरला तो अवघा हरि ॥ आपणाबाहेरी । न लगे ठाव धुंडावा ॥१॥ इतुलें जाणावया जाणा । कोंडें तरी मनें मना ॥ पारधीच्या खुणा । जाणतें चि साधावे ॥ध्रु.॥ देह आधीं काय खरा । देहसंबंधपसारा ॥ बुजगावणें चोरा । रक्षणसें भासतें ॥२॥ तुका करी जागा । नको चाचपूं वाउगा ॥ आहेसि तूं आगा । अंगीं डोळे उघडी ॥३॥
2151
दुडीवरी दुडी । चाले मोकळी गुजरी ॥१॥ ध्यान लागो ऐसें हरी । तुझे चरणीं तैशापरी ॥ध्रु.॥ आवंतण्याची आस । जैसी लागे दुर्बळासी ॥२॥ लोभ्या कळांतराची आस । बोटें मोजी दिवस मास ॥३॥ तुका म्हणे पंढरीनाथा । मजला आणिक नको व्यथा ॥४॥
2152
दुद दहीं ताक पशूचें पाळण । त्यांमध्यें कारण घृतसार ॥१॥ हें चि वर्म आम्हां भाविकांचे हातीं । म्हणऊनि चित्तीं धरिला राम ॥ध्रु.॥ लोहो कफ गारा अग्नीचिया काजें । येर्‍हवी तें ओझें कोण वाहे ॥२॥ तुका म्हणे खोरीं पाहारा जतन । जोंवरि हें धन हातीं लागे ॥३॥
2153
दुधाचे घागरी मद्याचा हा बुंद । पडिलिया शुद्ध नव्हे मग ॥१॥ तैसे खळां मुखें न करावें श्रवण । अहंकारें मन विटाळलें ॥ध्रु.॥ काय करावीं तें बत्तीस लक्षणें । नाक नाहीं तेणें वांयां गेलीं ॥२॥ तुका म्हणे अन्न जिरों नेदी माशी । आपुलिया जैशी सवें श्वगॉ ॥३॥
2154
दुधाळ गाढवी जरी जाली पाहे । पावेल ते काय धेनुसरी ॥१॥ कागाचिया गळा पुष्पाचिया माळा । हंसाची तो कळा काय जाणे ॥ध्रु.॥ मर्कटें अंघोळी लावियेले टिळे । ब्राम्हणाचे लीळे वर्तूं नेणे ॥२॥ जरी तो ब्राम्हण जाला कर्मभ्रष्ट । तुका म्हणे श्रेष्ठ तिहीं लोकीं ॥३॥
2155
दुबळें सदैवा । म्हणे नागवेल केव्हां ॥१॥ आपणासारिखें त्या पाहे । स्वभावासी करिल काये ॥ध्रु.॥ मूढ सभे आंत । इच्छी पंडिताचा घात ॥२॥ गांढें देखुनि शूरा । उगें करितें बुरबुरा ॥३॥ आणिकांचा हेवा । न करीं शरण जाई देवा ॥४॥ तुका म्हणे किती । करूं दुष्टाची फजिती ॥५॥
2156
दुर्जनाचा मान । सुखें करावा खंडण ॥१॥ लात हाणोनियां वारी । गुंड वाट शुद्ध करी ॥ध्रु.॥ बहुतां पीडी खळ । त्याचा धरावा विटाळ ॥२॥ तुका म्हणे नखें । काढुनि टाकिजेती सुखें ॥३॥
2157
दुर्जनाची गंधी विष्ठेचिया परी । देखोनियां दुरी व्हावें तया ॥१॥ अइका हो तुम्ही मात हे सज्जन । करूं संघष्टन नये बोलों ॥ध्रु.॥ दुर्जनाचे अंगीं अखंड विटाळ । वाणी रजस्वला स्रवे तैशी ॥२॥ दुर्जनाचें भय धरावें त्यापरी । पिसाळलेवरी धांवे श्वान ॥३॥ दुर्जनाचा भला नव्हे अंगसंग । बोलिलासे त्याग देशाचा त्या ॥४॥ तुका म्हणे किती सांगावें पृथक । अंग कुंभीपाक दुर्जनाचें ॥५॥
2158
दुर्जनाची जाती । त्याचे तोंडीं पडे माती ॥१॥ त्याची बुद्धि त्यासी नाडी । वाचे अनुचित बडबडी ॥ध्रु.॥ पाहें संतांकडे । दोषदृष्टी सांडी भडे ॥२॥ उंच निंच नाहीं । तुका म्हणे खळा कांहीं ॥३॥
2159
दुर्जनाची जोडी । सज्जनाचे खेंटर तोडी ॥१॥ पाहे निमित्य तें उणें । धांवे छळावया सुनें ॥ध्रु.॥ न म्हणे रामराम । मनें वाचे हें चि काम ॥२॥ तुका म्हणे भागा । आली निंदा करी मागा ॥३॥
2160
दुर्जनाचें अंग अवघें चि सरळ । नर्काचा कोथळ सांटवण ॥१॥ खाय अमंगळ बोले अमंगळ । उठवी कपाळ संघष्टणें ॥ध्रु.॥ सर्पा मंत्र चाले धरावया हातीं । खळाची ते जाती निखळे चि ॥२॥ तुका म्हणे कांहीं न साहे उपमा । आणीक अधमा वोखट्याची ॥३॥
2161
दुर्जनासि करी साहे । तो ही दंड हे लाहे ॥१॥ शिंदळीच्या कुंटणी वाटा । संग खोटा खोट्याचा ॥ध्रु.॥ येर येरा कांचणी भेटे । आगी उठे तेथूनी ॥२॥ तुका म्हणे कापूं नाकें । पुढें आणिकें शिकविती ॥३॥
2162
दुर्बळ हें अवघें जन । नारायणीं विमुख ॥१॥ झाडोनियां हात जाती । पात्र होतीं दंडासी ॥ध्रु.॥ सिदोरी तें पापपुण्य । सवेंसिण भिकेचा ॥२॥ तुका म्हणे पडिला वाहो । कैसा पाहा हो लटिक्याचा ॥३॥
2163
दुर्बळा वाणीच्या एक दोनि सिद्धि । सदैवा समाधि विश्वरूपीं ॥१॥ काय त्याचें वांयां गेलें तें एक । सदा प्रेमसुख सर्वकाळ ॥ध्रु.॥ तीर्थ देव दुरी तया भाग्यहीना । विश्व त्या सज्जना दुमदुमिलें ॥२॥ तुका म्हणे एक वाहाती मोळिया । भाग्यें आगळिया घरा येती ॥३॥
2164
दुर्बळाचे हातीं सांपडलें धन । करितां जतन नये त्यासी ॥१॥ तैसी परी मज झाली नारायणा । योगक्षेम जाणां तुम्ही आतां ॥ध्रु.॥ खातां लेतां नये मिरवितां वरि । राजा दंड करी जनराग ॥२॥ तुका म्हणे मग तळमळ उरे । देखिलें तें झुरे पाहावया ॥३॥
2165
दुर्बळाचें कोण । ऐके घालूनियां मन । राहिलें कारण । तयावांचूनि काय तें ॥१॥ कळों आलें अनुभवें । पांडुरंगा माझ्या जीवें । न संगतां ठावें । पडे चर्या देखोनि ॥ध्रु.॥ काम क्रोध माझा देहीं । भेदाभेद गेले नाहीं । होतें तेथें कांहीं । तुज कृपा करितां ॥२॥ हें तों नव्हे उचित । नुपेक्षावें शरणागत । तुका म्हणे रीत । तुमची आम्हां न कळे ॥३॥
2166
दुर्बुद्धि ते मना । कदा नुपजो नारायणा ॥१॥ आतां ऐसें करीं । तुझे पाय चत्तिीं धरीं ॥ध्रु.॥ उपजला भाव । तुमचे कृपे सद्धिी जावो ॥२॥ तुका म्हणे आतां । लाभ नाहीं या परता ॥३॥
2167
दुर्वासया स्वामी गुंतलों भाकेसी । पुसा जा बळीसी निरोप द्यावा ॥१॥ त्याचे आज्ञेविण आम्हां येतां नये । द्वारपाळ राहें होऊनियां ॥ध्रु.॥ पुसे दुर्वासया बळीसी जाऊनि । येरू म्हणे झणी बोलों नका ॥२॥ तुका म्हणे केला अन्यत्राचा त्याग । तेव्हां पांडुरंग सखा जाला ॥३॥
2168
दुर्वासें निरोप आणिला ये रिती । मग वाढलेती नारायणा ॥१॥ ठेविलें चरण बळिचिये द्वारीं । शीर अंगावरी लांबविलें ॥ध्रु.॥ पाडियेलें द्वार द्वारावतियेसी । वरि हृषीकेशी निघालेती ॥२॥ तेथूनियां नाम पडिलें द्वारका । वैकुंठनायका तुका म्हणे ॥३॥
2169
दुष्ट आचरण ग्वाही माझें मन । मज ठावे गुण दोष माझे ॥१॥ आतां तुम्ही सर्वजाण पांडुरंगा । पाहिजे प्रसंगाऐसें केलें ॥ध्रु.॥ व्याह्याजांवायांचे पंगती दुर्बळ । वंचिजे तो काळ नव्हे कांहीं ॥२॥ तुका म्हणे आतां जालों शरणागत । पुढिल उचित तुम्हां हातीं ॥३॥
2170
दुष्ट भूषण सज्जनाचें । अलभ्यलाभ पुण्य त्याचें ॥१॥ धन्य ऐसा परउपकारी । जाय नरका आणिकांवारि ॥ध्रु.॥ मळ खाये संवदणी । करी आणिकांची उजळणी ॥२॥ तुका म्हणे त्याचा । प्रीती आदर करा साचा ॥३॥
2171
दुष्टाचें चत्ति न भिन्ने अंतरीं । जरी जन्मवरी उपदेशिला । पालथे घागरी घातलें जीवन । न धरी च जाण तें ही त्याला ॥१॥ जन्मा येउनि तेणें पतन चि साधिलें । तमोगुणें व्यापिलें जया नरा । जळो जळो हें त्याचें ज्यालेपण । कासया हे आलें संवसारा ॥ध्रु.॥ पाषाण जीवनीं असतां कल्पवरी । पाहातां अंतरीं कोरडा तो । कुचर मुग नये चि पाका । पाहातां सारिखा होता तैसा ॥२॥ तुका म्हणे असे उपाय सकळां । न चले या खळा प्रेत्न कांहीं । म्हणऊनि संग न करितां भला । धरितां अबोला सर्व हित ॥३॥
2172
दूरि तों चि होतों आपुले आशंके । नव्हतें ठाउकें मूळभेद ॥१॥ आतां जेथें तेथें येइन सांगातें । लपाया पुरतें उरों नेदीं ॥ध्रु.॥ मिथ्या मोहें मज लाविला उशीर । तरी हे अंतर जालें होतें ॥२॥ तुका म्हणे कां रे दाखविसी भिन्न । लटिका चि सीण लपंडाईं ॥३॥
2173
देई डोळे भेटी न धरीं संकोच । न घलीं कांहीं वेच तुजवरी ॥१॥ तुज बुडवावें ऐसा कोण धर्म । अहनिऩशीं नाम घेतां थोडें ॥ध्रु.॥ फार थोडें काहीं करूनि पातळ । त्याजमध्यें काळ कडे लावूं ॥२॥ आहे माझी ते चि सारीन सिदोरी । भार तुजवरी नेदीं माझा ॥३॥ तुका म्हणे आम्हां लेंकराची जाती । भेटावया खंती वाटतसे ॥४॥
2174
देईंल तें उणें नाहीं । याचे कांहीं पदरीं ॥१॥ पाहिजे तें संचित आतां । येथें सत्ता करावया ॥ध्रु.॥ गुणां ऐसा भरणा भरी। जो जें चारी तें लाभे ॥२॥ तुका म्हणे देवीं देव । फळे भव आपुला ॥३॥
2175
देऊं कपाट । कीं कोण काळ राखों वाट ॥१॥ काय होईंल तें शिरीं । आज्ञा धरोनियां करीं ॥ध्रु.॥ करूं कळे ऐसी मात। किंवा राखावा एकांत ॥२॥ तुका म्हणे जागों । किंवा कोणा नेंदूं वागों ॥३॥
2176
देऊं ते उपमा । आवडीनें पुरुषोत्तमा ॥१॥ पाहातां काशा तूं सारिखा । तिंहीं लोकांच्या जनका ॥ध्रु.॥ आरुष हे वाणी । गोड वरूनि घेतां कानीं ॥२॥ आवडीनें खेळे । तुका पुरवावे सोहाळे ॥३॥
2177
देऊनियां प्रेम मागितलें चित्त । जाली फिटाफिट तुम्हां आम्हां ॥१॥ काशानें उदार तुम्हांसी म्हणावें । एक नेसी भावें एक देसी ॥ध्रु.॥ देऊनियां थोडें नेसील हें फार । कुंटिसी विचार अवघियांचा ॥२॥ तुका म्हणे आम्हां भांडवल चित्त । देउनी दुश्चित पाडियेलें ॥३॥
2178
देखण्याच्या तीन जाती । वेठी वार्ता अत्यंतीं ॥१॥ जैसा भाव तैसें फळ । स्वातीतोय एक जळ ॥ध्रु.॥ पाहे सांगे आणि जेवी । अंतर महदांतर तेवी ॥२॥ तुका म्हणे हिरा । पारखियां मूढां गारा ॥३॥
2179
देखत आखों झुटा कोरा । तो काहे छोरा घरंबार ॥ध्रु.॥ मनसुं किया चाहिये पाख । उपर खाक पसारा ॥१॥ कामक्रोधसो संसार । वो सिरभार चलावे ॥२॥ कहे तुका वो संन्यास । छोडे आस तनकी हि ॥३॥
2180
देखत होतों आधीं । मागें पुढें सकळ । मग हे दृष्टी गेली । वरी आले पडळ । तिमिर कोंदलेंसें । वाढे वाढतां प्रबळ । भीत मी जालों देवा । काय ज्याल्याचें फळ ॥१॥ आतां मज दृष्टी देई । पांडुरंगा मायबापा । शरण आलों आतां । निवारूनियां पापा । अंजन लेववुनी । करीं मारग सोपा । जाईन सिद्धिपंथें । अवघ्या चुकती खेपा ॥ध्रु.॥ होतसे खेद चित्ता । कांहीं नाठवे विचार । जात होतों जना । मागें तोही सांडिला आधार । हा ना तोसा ठाव जाला । अवघा पडिला अंधार । फिरलीं माझीं मज । कोणी न देती आधार ॥२॥ जोंवरि चळण गा । तोंवरि म्हणती माझा । मानिती लहान थोर देहसुखाच्या काजा । इंद्रियें मावळलीं । आला बागुल आजा । कैसा विपरीत जाला । तो चि देह नव्हे दुजा ॥३॥ गुंतलों या संसारें । कैसा झालोंसें अंध । मी माझें वाढवुनी । मायातृष्णेचा बाध। स्वहित न दिसेचि । केला आपुला वध । लागले काळ पाठीं । सवें काम हे क्रोध ॥४॥ लागती चालतां गा । गुणदोषाच्या ठेंसा । सांडिली वाट मग । जालों निराळा कैसा । पाहातों वास तुझी । थोरी करूनी आशा । तुका म्हणे वैद्यराजा । पंढरीच्या निवासा ॥५॥
2181
देखिलासि माती खातां । दावियानें बांधी माता ॥१॥ जाळी घेउनि कांबळी काठी । गाई वळी वेणु पाठीं ॥ध्रु.॥ मोठें भावार्थाचें बळ । देव जाला त्याचें बाळ ॥२॥ तुका म्हणे भक्तासाठीं । देव धांवे पाठोवाटीं ॥३॥
2182
देखिलें तें धरिन मनें । समाधानें राहेन ॥१॥ भाव माझी सांटवण । जगजीवन कळावया ॥ध्रु.॥ बोळवीन एकसरें । उत्तरें या करुणेच्या ॥२॥ तुका म्हणे नयों रूपा । काय बापा करीसी ॥३॥
2183
देखीचा दिमाख शिकोनियां दावी । हिर्‍यां ऐसी केवीं गारगोटी ॥१॥ मर्यादा ते जाण अरे अभागिया । देवाच्या ऐसिया सकळ मूर्ति ॥ध्रु.॥ काय पडिलेंसी लटिक्याचे भरी । वोंवाळुनि थोरी परती सांडीं ॥२॥ तुका म्हणे पुढें दिसतसे घात । करितों फजित म्हणउनी ॥३॥
2184
देखीचें तें ज्ञान करावें तें काई । अनुभव नाहीं आपणासी ॥१॥ इंद्रियांचे गोडी ठकलीं बहुतें । सोडितां मागुतें आवरेना ॥ध्रु.॥ युक्तीचा आहार नीतीचा वेव्हार । वैराग्य तें सार तरावया ॥२॥ नाव रेवाळितां घाला घाली वारा । तैसा तो पसारा अहंतेचा ॥३॥ तुका म्हणे बुद्धि आपुले अधीन । करी नारायण आतुडे तों ॥४॥
2185
देखोनि पुराणिकांची दाढी । रडे स्फुंदे नाक ओढी ॥१॥ प्रेम खरें दिसे जना । भिन्न अंतरीं भावना ॥ध्रु.॥ आवरितां नावरे । खुर आठवी नेवरे ॥२॥ बोलों नयें मुखावाटां । म्हणे होतां ब्यांचा तोटा ॥३॥ दोन्ही सिंगें चारी पाय । खुणा दावी म्हणे होय ॥४॥ मना आणितां बोकड । मेला त्याची चरफड ॥५॥ होता भाव पोटीं । मुखा आलासे शेवटीं ॥६॥ तुका म्हणे कुडें । कळों येतें तें रोकडें ॥७॥
2186
देखोनि हरखली अंड । पुत्र जाला म्हणे रांड ॥ तंव तो जाला भांड । चाहाड चोर शिंदळ ॥१॥ जाय तिकडे पीडी लोकां । जोडी भांडवल थुंका ॥ थोर जाला चुका । वर कां नाहीं घातली ॥ध्रु.॥ भूमि कांपे त्याच्या भारें । कुंभपाकाचीं शरीरें ॥ निष्टुर उत्तरें । पापदृष्टी मळिणचित्त ॥२॥ दुराचारी तो चांडाळ । पाप सांगातें विटाळ ॥ तुका म्हणे खळ । म्हणोनियां निषद्धि तो ॥३॥
2187
देखोनियां तुझ्या रूपाचा आकार । उभा कटीं कर ठेवूनियां ॥१॥ तेणें माझ्या चित्ता होतें समाधान । वाटतें चरण न सोडावे ॥ध्रु.॥ मुखें गातों गीत वाजवितों टाळी । नाचतों राउळीं प्रेमसुखें ॥२॥ तुका म्हणे मज तुझ्या नामापुढें । तुश हें बापुडें सकळी काळ ॥३॥
2188
देखोवेखीं करिती गुरू । नाहीं ठाउका विचारु ॥१॥ वर्म तें न पडे ठायीं । पांडुरंगाविण कांहीं ॥ध्रु.॥ शिकों कळा शिकों येती । प्रेम नाहीं कोणां हातीं ॥२॥ तुका म्हणे सार । भक्ति नेणती गव्हार ॥३॥
2189
देती घेती परज गेली । घर खालीं करूनियां ॥१॥ धांवणियाचे न पडे हातीं । खादली राती काळोखी ॥ध्रु.॥ वघियांचे अवघें नेलें । काहीं ठेविलें नाहीं मागें ॥२॥ सोंग संपादुनि दाविला भाव । गेला आधीं माव वरि होती ॥३॥ घराकडे पाहूं नयेसें जालें । अमानत केलें दिवाणांत ॥४॥ आतां तुका कोणा न लगे चि हातीं । जाली ते निश्चिती बोलों नये ॥५॥
2190
देव अवघें प्रतिपादी । वंदी सकळां एक निंदी ॥१॥ तेथें अवघें गेलें वांयां । विष घास एके ठायां ॥ध्रु.॥ सर्वांग कुरवाळी । उपटी एकच रोमावळी ॥२॥ तुका म्हणे चत्ति । नाहीं जयाचें अंकित ॥३॥
2191
देव आड जाला । तो भोगिता मी उगला । अवघा निवारला । शीण शुभाअशुभाचा ॥१॥ जीवशिवाचें भातुकें । केलें क्रीडाया कौतुकें । कैचीं येथें लोकें । हा आभास अनित्य ॥ध्रु.॥ विष्णुमय खरें जग । येथें लागतसे लाग । वांटिले विभाग । वर्णधर्म हा खेळ तयाचा ॥२॥ अवघी एकाची च वीण । तेथें कैचें भिन्नाभिन्न । वेदपुरुष नारायण । तेणें केला निवाडा ॥३॥ प्रसादाचा रस । तुका लाधला सौरस । पायापाशीं वास । निकट नव्हे निराळा ॥४॥ मंबाजी गोसावी यांनीं स्वामीस पीडा केली - अभंग ॥५॥
2192
देव आतां आम्हीं केला असे ॠणी । आणिका वांचूनि काय गुंता ॥१॥ एकाचें आर्जव करू एकनिष्ठ । आणिकांचा बोभाट कामा नये ॥ध्रु.॥ बहुतांचे आर्जव केलिया खटपट । नाहीं हा शेवट शुद्ध होत ॥२॥ पुरता विचार आणोनी मानसीं । अंतरलों सर्वासि पई देखा ॥३॥ तुका म्हणे देवा चरणीं असो भाव । तेणें माझा जीव संतोष हा ॥४॥
2193
देव आमचा आमचा । जीव सकळ जीवांचा ॥१॥ देव आहे देव आहे । जवळीं आम्हां अंतरबाहे ॥ध्रु.॥ देव गोड देव गोड । पुरवी कोडाचें ही कोड ॥२॥ देव आम्हां राखे राखे । घाली कळिकाळासी काखे ॥३॥ देव दयाळ देव दयाळ । करी तुक्याचा सांभाळ ॥४॥
2194
देव आहे सुकाळ देशीं । अभाग्यासी दुर्भिक्षा ॥१॥ नेणती हा करूं सांटा । भरले फांटा आडरानें ॥ध्रु.॥ वसवूनि असे घर । माग दूर घातला ॥२॥ तुका म्हणे मन मुरे । मग जें उरे तें चि तूं ॥३॥
2195
देव कैंचा तया दुरी । भाका बरी करुणा ॥१॥ आळवित्या न लगे धर । माय जाणे रे भातुकें ॥ध्रु.॥ नावे तरी ज्याचा भार । पैल पार जवळी त्या ॥२॥ आतां परदेशी तुका । जाला लोकांवेगळा ॥३॥
2196
देव गावा ध्यावा ऐसें जालें । परदेशी नाहीं उगलें । वडील आणि धाकुलें । नाहीं ऐसें जालें दुसरें तें ॥१॥ नाहीं लागत मुळीहूनि । सुहृदजन आणि जननी । लागल्या लागें त्यागें सांडूनि । लोभीये मांडणी संयोगाची ॥ध्रु.॥ शिव बाटला जीवदशे । बहुत ओतत आलें ठसें । हीन जालें भूषणाचें इच्छे । निवडती कैसे गुणागुण ॥२॥ आतां हे हुतांश तों बरें । अवघे एक च मोहरें । पिटिलियाविण नव्हे खरें । निवडें बरें जातिशुद्ध ॥३॥ तुका उतावेळ याजसाटीं । आहे तें निवेदीन पोटीं । आवडी द्यावी जी येथें लाटी । तुझी जगजेठी कीर्ती वाखाणीन ॥४॥
2197
देव घ्या कोणी देव घ्या कोणी । आइता आला घर पुसोनी ॥१॥ देव न लगे देव न लगे । सांटवणेचे रुधले जागे ॥ध्रु.॥ देव मंदला देव मंदला । भाव बुडाला काय करूं ॥२॥ देव घ्या फुका देव घ्या फुका । न लगे रुका मोल कांहीं ॥३॥ दुबळा तुका भावेंविणें । उधारा देव घेतला रुणें ॥४॥
2198
देव जडला जाइना अंगा । यासी काय करूं सांगा ॥१॥ वरकड देव येती जाती । हा देव जन्माचा सांगाती ॥ध्रु.॥ अंगीं भरलें देवाचें वारें । देव जग चि दिसे सारें ॥२॥ भूत न बोले निरुतें । कांहीं केल्या न सुटे तें ॥३॥ जीव खादला दैवतें । माझा आणि पंचभूतें ॥४॥ तुका म्हणे वाडें कोडें । उभें पुंडलिकापुढें ॥५॥
2199
देव जाणता देव जाणता । आपली च सत्ता एकाएकीं॥१॥ देव चतुर देव चतुर । जाणोनि अंतर वर्ततसे ॥२॥ देव निराळा देव निराळा । अलिप्त विटाळा तुका म्हणे ॥३॥
2200
देव जाले अवघे जन । माझे गुण दोष हारपले ॥१॥ बरवें जालें बरवें जालें । चत्ति धालें महालाभें ॥ध्रु.॥ दर्पणीचें दुसरें भासे । परि तें असे एक तें ॥२॥ तुका म्हणे सिंधुभेटी । उदका तुटी वाहाळासी ॥३॥
2201
देव तिंहीं बळें धरिला सायासें । करूनियां नास उपाधीचा ॥१॥ पर्वपक्षी धातु धिःकारिलें जन । स्वयें जनार्दन ते चि जाले ॥२॥ तुका म्हणे यासी न चले तांतडी । अनुभवें गोडी येइल कळों ॥३॥
2202
देव तिला आला । गोडगोड जीव धाला ॥१॥ साधला हा पर्वकाळ । गेला अंतरींचा मळ ॥ध्रु.॥ पापपुण्य गेलें । एका स्नानें चि खुंटलें ॥२॥ तुका म्हणे वाणी । शुद्ध जनार्दनीं जनीं ॥३॥
2203
देव तीर्थ येर दिसे जया ओस । तोचि तया दोष जाणतिया ॥१॥ तया बरें फावे देवा चुकवितां । संचिताची सत्ता अंतराय ॥ध्रु.॥ शुद्धाशुद्धठाव पापुण्यबीज । पाववील दुजे फळभोग ॥२॥ तुका म्हणे विश्वंभराऐसें वर्म । चुकविल्या धर्म अवघे मिथ्या ॥३॥
2204
देव ते संत देव ते संत । निमित्य त्या प्रतिमा ॥१॥ मी तों सांगतसें भावें । असो ठावें सकळां ॥ध्रु.॥ निराकारी ओस दिशा । येथें इच्छा पुरतसे ॥२॥ तुका म्हणे रोकडें केणें । सेवितां येणें पोट धाय ॥३॥
2205
देव त्यां फावला गोपाळां । नाहीं तेथें कळा अभिमान ॥१॥ नाडलीं आपल्या आपण चि एकें । संदेहदायकें बहुफारें ॥२॥ फारें चाळविलीं नेदी कळों माव । देवाआदिदेव विश्वंभर ॥३॥ विश्वासावांचुनि कळों नये खरा । अभक्तां अधीरा जैसा तैसा ॥४॥ जैसा भाव तैसा जवळि त्या दुरि । तुका म्हणे हरि देतो घेतो ॥५॥
2206
देव दयाळ देव दयाळ । साहे कोल्हाळ बहुतांचा ॥१॥ देव उदार देव उदार । थोड्यासाटीं फार देऊं जाणे ॥२॥ देव चांगला देव चांगला । तुका लागला चरणीं ॥३॥
2207
देव धरी नाना सोंगें । नाम श्रेष्ठ पांडुरंग ॥१॥ तो हा गवळियाचे घरीं । नाम सारितो मुरारि ॥ध्रु.॥ धन्य यशोदेचें प्रारब्ध । नाचे अंगणीं गोविंद ॥२॥ ऐशा भक्तांसाटीं देवें । नाना धरियेलीं नांवें ॥३॥ होय दासांचा जो दास । तुका म्हणे विठ्ठलास ॥४॥
2208
देव निढळ देव निढळ । मूळ नाहीं डाळ परदेशी ॥१॥ देव अकुळी देव अकुळी । भलते ठायीं सोयरीक ॥२॥ देव लिगाड्या देव लिगाड्या । तुका म्हणे भाड्या दंभें ठकी ॥३॥
2209
देव पाहावया करीं वो सायास । न धरीं हे आस नाशिवंत ॥१॥ दिन शुद्ध सोम सकाळीं पातला । द्वादशी घडला पर्वकाळ ॥ध्रु.॥ द्विजां पाचारूनि शुद्ध करीं मन । देई वो हें दान यथाविध ॥२॥ नको चिंता करूं वस्त्रा या पोटाची । माउली आमुची पांडुरंग ॥३॥ तुका म्हणे दुरी सांगतों पाल्हाळीं । परी तो जवळी आहे आम्हां ॥४॥
2210
देव पाहों देव पाहों । उंचे ठायीं उभे राहों ॥१॥ देव देखिला देखिला । तो नाहीं कोणां भ्याला ॥ध्रु.॥ देवा कांहीं मागों मागों । जीव भाव त्यासी सांगों ॥२॥ देव जाणे देव जाणे । पुरवी मनींचिये खुणे ॥३॥ देव कातर कातर । तुका म्हणे अभ्यंतर ॥४॥
2211
देव बराडी देव बराडी । घाली देंठासाटीं उडी ॥१॥ देव भ्याड देव भ्याड । राखे बळीचें कवाड ॥ध्रु.॥ देव भाविक भाविक । होय दासाचें सेवक ॥२॥ देव होया देव होया । जैसा म्हणे तैसा तया ॥३॥ देव लाहान लाहान । तुका म्हणे अनुरेण ॥४॥
2212
देव बासर देव बासर । असे निरंतर जेथें तेथें ॥१॥ देव खोळंबा देव खोळंबा । मज झळंबा म्हूण कोंडी ॥ध्रु.॥ देव लागट देव लागट । लाविलिया चट जीवीं जडे ॥२॥ देव बावळा देव बावळा । भावें जवळा लुडबुडी ॥३॥ देव न व्हावा देव न व्हावा । तुका म्हणे गोवा करी कामीं ॥४॥
2213
देव भक्तालागीं करूं नेदी संसार । अंगें वारावार करोनि ठेवी ॥१॥ भाग्य द्यावें तरी अंगीं भरे ताठा । म्हणोनि करंटा करोनि ठेवी ॥ध्रु.॥ स्त्री द्यावी गुणवंती नसती गुंते आशा । यालागीं कर्कशा पाठी लावी ॥२॥ तुका म्हणे मज प्रचित आली देखा । आणीक या लोकां काय सांगों ॥३॥
2214
देव भला देव भला । मिळोनि जाय जैसा त्याला ॥१॥ देव उदार उदार । देतां नाहीं थोडें फार ॥ध्रु.॥ देव बळी देव बळी । जोडा नाहीं भूमंडळीं ॥२॥ देव व्हावा देव व्हावा । आवडे तो सर्वां जीवां ॥३॥ देव चांगला चांगला । तुका चरणीं लागला ॥४॥
2215
देव मजुर देव मजुर । नाहीं उजुर सेवेपुढें ॥१॥ देव गांढ्याळ देव गांढ्याळ । देखोनियां बळ लपतसे ॥२॥ देव तर काईं देव तर काईं । तुका म्हणे राईं तरी मोटी ॥३॥
2216
देव राखे तया मारील कोण । न मोडे कांटा हिंडतां वन ॥१॥ न जळे न बुडे नव्हे कांहीं । विष तें ही अमृत पाहीं ॥ध्रु.॥ न चुके वाट न पडे फंदीं । नव्हे कधीं कधीं यमबाधा ॥२॥ तुका म्हणे नारायण । येता गोर्‍या वारी वाण ॥३॥
2217
देव वसे चित्तीं । त्याची घडावी संगती ॥१॥ ऐसें आवडतें मना । देवा पुरवावी वासना ॥ध्रु.॥ हरिजनासी भेटी । नहो अंगसंगें तुटी ॥२॥ तुका म्हणे जिणें । भलें संतसंघष्टणें ॥३॥
2218
देव सखा आतां केलें नव्हे काईं । येणें सकळईं सोइरीं च ॥१॥ भाग्यवंत जालों गोतें सपुरतीं । आतां पुण्या नीती पार नाहीं ॥ध्रु.॥ पाहातां दिसती भरलिया दिशा । ठसावला ठसा लोकत्रयीं ॥२॥ अविनाश जोडी आम्हां भाग्यवंतां । जाली होती सत्ता संचिताची ॥३॥ पायांवरी डोईं ठेवाया अरोथा । जाली द्यावी सत्ता क्षेम ऐसी ॥४॥ तुका म्हणे जीव पावला विसावा । म्हणवितां देवा तुमचींसीं ॥५॥
2219
देव सखा जरी । जग अवघें कृपा करी ॥१॥ ऐसा असोनि अनुभव । कासाविस होती जीव ॥ध्रु.॥ देवाची जतन । तया बाधूं न शके अग्न ॥२॥ तुका म्हणे हरी । प्रर्‍हादासि यत्न करी ॥३॥
2220
देव होईजेत देवाचे संगती । पतन पंगती जगाचिया ॥१॥ दोहींकडे दोन्ही वाहातील वाटा । करितील सांटा आपुलाला ॥ध्रु.॥ दाखविले परी नाहीं वर्जिजेतां । आला तो तो चित्ता भाग भरा ॥२॥ तुका म्हणे अंगीं आवडीचें बळ । उपदेश मूळबीजमात्र ॥३॥
2221
देव होसी तरी आणिकांतें करिसी । संदेह येविशीं करणें न लगे ॥१॥ दुष्ट होसी तरी अणिकांतें करिसी । संदेह येविशीं करणें न लगे ॥२॥ तुका म्हणे जें दर्पणीं बिंबलें । तें तया बाणलें निश्चयेसीं ॥३॥
2222
देवकीनंदनें । केलें आपुल्या चिंतनें ॥१॥ मज आपुलिया ऐसें । मना लावूनियां पिसें ॥ध्रु.॥ गोवळे गोपाळां । केलें लावूनियां चाळा ॥२॥ तुका म्हणे संग । केला दुरि नव्हे मग॥३॥
2223
देवा आतां ऐसा करीं उपकार । देहेचा विसर पाडीं मज ॥१॥ तरीं च हा जीव सुख पावे माझा । बरें केशीराजा कळों आलें ॥ध्रु.॥ ठाव देई चित्ती राख पायांपाशीं । सकळ वृत्तींसी अखंडित ॥२॥ असे भय आतां लाज काम क्रोध । तोडावा संबंध यांचा माझा ॥३॥ मागणें तें एक हें चि आहे आतां । नाम मुखीं संतसंग देई ॥४॥ तुका म्हणे नको वरपंग देवा । घेई माझी सेवा भावशुद्ध ॥५॥
2224
देवा आदिदेवा जगत्रया जीवा । परियेसीं केशवा विनंती माझी ॥१॥ माझी वाणी तुझे वर्णी तुझे वर्णी गुण नाम । ऐसी देई प्रेम कांहीं कळा ॥२॥ कळा तुजपाशीं आमचें जीवन । उचित करून देई आम्हां ॥३॥ आम्हां शरणागतां तुझा चि आधार । तूं तंव सागर कृपासिंधु ॥४॥ सिंधु पायावाट होय तुझ्या नामें । जाळीं महाकर्में दुस्तरें तीं ॥५॥ तीं फळें उत्तमें तुझा निजध्यास । नाहीं गर्भवास सेविलिया ॥६॥ सेविंलिया राम कृष्ण नारायण । नाहीं त्या बंधन संसाराचें ॥७॥ संसार तें काय तृणवतमय । अग्नि त्यासी खाय क्षणमात्रें ॥८॥ क्षणमात्रें जाळी दोषांचिया रासी । निंद्य उत्तमासी वंद्य करी ॥९॥ करीं ब्रिदें साच आपलीं आपण । पतितपावन दिनानाथ ॥१०॥ नाथ अनाथाचा पति गोपिकांचा । पुरवी चित्तीचा मनोरथ ॥११॥ चित्ती जें धरावें तुका म्हणे दासीं । पुरविता होसी मनोरथ ॥१२॥
2225
देवा ऐकें हे विनंती । मज नको रे हे मुक्ति । तया इच्छा गति । हें चि सुख आगळें ॥१॥ या वैष्णवांचे घरीं । प्रेमसुख इच्छा करी । रिद्धिसिद्धी द्वारीं । कर जोडूनि उभ्या ॥ध्रु.॥ नको वैकुंठींचा वास । असे तया सुखा नास । अद्भुत हा रस । कथाकाळीं नामाचा ॥२॥ तुझ्या नामाचा महिमा । तुज न कळे रे मेघशामा । तुका म्हणे आम्हां । जन्म गोड यासाटीं ॥३॥
2226
देवा ऐसा शिष्य देई । ब्रम्हज्ञानी निपुण पाहीं ॥१॥ जो कां भावाचा आगळा । भक्तिप्रेमाचा पुतळा ॥ध्रु.॥ ऐशा युक्ति ज्याला बाणे । तेथें वैराग्याचें ठाणें ॥२॥ ऐसा जाला हो शरीरीं । तुका लिंबलोण करी ॥३॥
2227
देवा तुज मज पण । पाहों आगळा तो कोण ॥१॥ तरी साच मी पतित । तूं च खोटा दिनानाथ । ग्वाही साधुसंत जन । करूनि अंगीं लावीन ॥ध्रु.॥ आम्ही धरिले भेदाभेद । तुज नव्हे त्याचा छेद ॥२॥ न चले तुझे कांहीं त्यास । आम्ही बळकाविले दोष ॥३॥ दिशा भरल्या माझ्या मनें । लपालासी त्याच्या भेणें ॥४॥ तुका म्हणे चत्ति । करी तुझी माझी नीत ॥५॥
2228
देवा तुजपें माझ्या पूर्वजांचें ॠण । आहे तें कां नेदिसी अझून । अवगलासीं झोंडपणें । परी मी जाण जीवें जिरों नेदीं ॥१॥ कळों येईंल रोकडें । उभा करिन संतांपुढें । तुझें काय एवढें । भय आपुलें मागतां ॥ध्रु.॥ आजिवरी होतों नेणता । तों तुज फावलें रे अनंता । कवडीचा तो आतां । पडों नेदीन फेर ॥२॥ ठेविला ये जीवनीं जीव । म्हणे तुकयाचा बंधव । माझा गळा तुझा पाव । एके ठायीं बांधेन ॥३॥
2229
देवा तूं आमचा कृपाळ । भक्तिप्रतिपाळ दीनवत्सळ । माय तूं माउली स्नेहाळ । भार सकळ चालविसी ॥१॥ तुज लागली सकळ चिंता । राखणें लागे वांकडें जातां । पुडती निरविसी संतां । नव्हे विसंबतां धीर तुज ॥२॥ आम्हां भय चिंता नाहीं धाक । जन्म मरण कांहीं एक । जाला इहलोकीं परलोक । आलें सकळैकवैकुंठ ॥३॥ न कळे दिवस कीं राती । अखंड लागलीसे ज्योती । आनंदलहरीची गती । वर्णू कीर्ती तया सुखा ॥४॥ तुझिया नामाचीं भूषणें । तों यें मज लेवविलीं लेणें । तुका म्हणे तुझियान गुणें । काय तें उणें एक आम्हां ॥५॥
2230
देवा तूं कृपाकरुणासिंधु । होसी मायबाप आमचा बंधु । जीवनसिद्धी साधनसिंधु । तोडिसी भवबंधु काळपाश ॥१॥ शरणागता वज्रपंजर । अभयदाना तूं उदार । सकळां देवां तूं अगोचर । होसी अविकार अविनाश ॥ध्रु.॥ भागली स्तुति करितां फार । तेथें मी काय तें गव्हार । जाणावया तुझा हा विचार । नको अंतर देऊं आतां ॥२॥ नेणें भाव परि म्हणवीं तुझा । नेणें भक्ति परि करितों पूजा । आपुल्या नामाचिया काजा । तुज केशीराजा लागे धांवणें ॥३॥ तुझिया बळें पंढरीनाथा । जालों निर्भर तुटली व्यथा । घातला भार तुझिया माथां । न भीं सर्वथा तुका म्हणे ॥४॥
2231
देवा बोलें आतां बोला । त्वां कां धरिला अबोला॥१॥ भेऊं नको देई भेटी । तूं कां पडिलासी संकटीं ॥ध्रु.॥ तुझ्या जीवींचें मी जाणें । म्हणसी मुक्ती आम्हां देणें ॥२॥ तुका म्हणे न लगे कांहीं । चित्त राहो तुझे पायीं ॥३॥
2232
देवा मी चांडाळ चांडाळ । म्हणतां लागताहे वेळ । नसे पाहातां भूमंडळ । ऐसा अमंगळ खळ दुसरा ॥१॥ जन्मा उपजलियापासुनी । असत्य कर्म तें अझुनी । सत्य आचरण नेणें स्वप्नीं । निखळ खाणी अवगुणांची ॥२॥ भक्ति दया अथवा कथा । कानीं न साहवे वार्ता । अखंड विषयांची वेथा । अधम पुरता अधमाहुनी ॥३॥ काम क्रोध दंभ अहंकार । गर्व ताठा मद मत्सर । यांचें तरी माहेरघर । परउपकार वैरी तैसा ॥४॥ निंदा द्वेष घात विश्वास । करितां नाहीं केला आळस । करूं नये ते केले संतउपहास । अभक्ष तें ही भिक्षलें ॥५॥ पाळिलें नाहीं पितृवचन । सदा परद्वारीं परधनीं ध्यान । बोलों नये घडलें ऐसें अनोविन । दासीगमन आदिकरूनी ॥६॥ कायामनें वाचाइंद्रियांशीं । सकळ पापांची च राशी । तुकयाबंधु म्हणे ऐसियासी । आलों हृषीकेशी तुज शरण ॥७॥
2233
देवांच्या ही देवा गोपिकांच्या पती । उदार हे ख्याती त्रिभुवनीं ॥१॥ पातकांच्या रासी नासितोसी नामें । जळतील कर्में महा दोष ॥ध्रु.॥ सर्व सुखें तुझ्या वोळगती पायीं । रिद्धि सिद्धि ठायीं मुक्तिचारी ॥२॥ इंद्रासी दुर्लभ पाविजे तें पद । गीत गातां छंद वातां टाळी ॥३॥ तुका म्हणे जड जीव शक्तिहीन । त्यांचें तूं जीवन पांडुरंगा ॥४॥
2234
देवाचा भक्त तो देवासी गोड । आणिकांसी चाड नाहीं त्याची । कवणाचा सोइरा नव्हे च सांगाती । अवघियां हातीं अंतरला ॥१॥ निष्काम वेडें म्हणतील बापुडे । अवघियां सांकडें जाला कैसा । माझें ऐसें तया न म्हणत कोणी । असे रानीं वनीं भलते ठायीं ॥ध्रु.॥ प्रातःस्नान करी विभूतिचर्चन । दखोनिया जन निंदा करी । कंठीं तुळसीमाळा बैसोनि निराळा । म्हणती या चांडाळा काय जालें ॥२॥ गातां शंका नाहीं बैसे भलते ठायीं । शिव्या देती आईं बाप भाऊ । घरी बाइल म्हणे कोठें व्याली रांड । बरें होतें शंड मरता तरी ॥३॥ जन्मोनि जाला अवघियां वेगळा । म्हणोनि गोपाळा दुर्लभ तो । तुका म्हणे जो संसारा रुसला । तेणें चि टाकिला सिद्धपंथ ॥४॥
2235
देवाचिया वस्त्रा स्वप्नीं ही नाठवी । स्त्रियेसी पाठवी उंच साडी ॥१॥ गाईंचें पाळण नये चि विचारा । अश्वासी खरारा करी अंगें ॥ध्रु.॥ लेकराची रास स्वयें धांवें क्षाळूं । न म्हणे प्रक्षाळूं द्विजपायां ॥२॥ तुका म्हणे त्याच्या तोंडावरि थुंका । जातो यमलोका भोगावया ॥३॥
2236
देवाचिये चाडे प्रमाण उचित । नये वांटूं चित्त निषेधासीं ॥१॥ नये राहों उभें कसमळापाशीं । भुंकतील तैसीं सांडावीं तीं ॥२॥ तुका म्हणे क्षमा सुखाची हे रासी । सांडूनि कां ऐसी दुःखी व्हावें ॥३॥
2237
देवाचिये पायीं देई मना बुडी । नको धांवों वोढी इंिद्रयांचे ॥१॥ सर्व सुखें तेथें होती एकवेळे । न सरती काळें कल्पांतीं ही ॥ध्रु.॥ जाणें येणें खुंटे धांवे वेरजार । न लगे डोंगर उसंतावे ॥२॥ सांगन तें तुज इतुलें चि आतां । मानी धन कांता विषतुल्य ॥३॥ तुका म्हणे तुझे होती उपकार । उतरों हा पार भवसिंधु ॥४॥
2238
देवाचिये पायीं वेचों सर्व शक्ती । होतील विपित्त ज्याज्या कांहीं ॥१॥ न घेई माझी वाचा पुढें कांहीं वाव । आणि दुजे भाव बोलायाचे ॥ध्रु.॥ मनाचे वांटणी चित्ताचा विक्षेप । राहो हा अनुताप आहे तैसा ॥२॥ तुका म्हणे घेई विठ्ठलाचा छंद । आनंदाचा कंद विस्तारेल ॥३॥
2239
देवाचिये माथां घालुनियां भार । सांडीं किळवर ओंवाळूनि ॥१ ॥ नाथिला हा छंद अभिमान अंगीं । निमित्याचे वेगीं सारीं ओझें ॥ध्रु.॥ करुणावचनीं लाहो एकसरें । नेदावें दुसरें आड येऊं ॥२॥ तुका म्हणे सांडीं लटिक्याचा संग । आनंद तो मग प्रगटेल ॥३॥
2240
देवाची ते खूण आला ज्याच्या घरा । त्याच्या पडे चिरा मनुष्यपणा ॥१॥ देवाची ते खूण करावें वाटोंळें । आपणा वेगळें कोणी नाहीं ॥ध्रु.॥ देवाची ते खूण गुंतों नेदी आशा । ममतेच्या पाशा शिवों नेदी ॥२॥ देवाची ते खूण गुंतों नेदी वाचा । लागों असत्याचा मळ नेदी ॥३॥ देवाची ते खूण तोडी मायाजाळ । आणि हें सकळ जग हरी ॥४॥ पहा देवें तेंचि बळकाविलें स्थळ । तुक्यापें सकळ चिन्हें होतीं ॥५॥
2241
देवाची पूजा हे भूताचें पाळण । मत्सर तो सीण बहुतांचा ॥१॥ रुसावें फुगावें आपुलियावरि । उरला तो हरि सकळ ही ॥२॥ तुका म्हणे संतपण यां चि नांवें । जरि होय जीव सकळांचा ॥३॥
2242
देवाची भांडारी । आदा विनियोग करी ॥१॥ आतां न माखे हातपाय । नेणों होतें ऐसें काय ॥ध्रु.॥ देवें नेली चिंता । जाला सकळ करिता ॥२॥ तुका म्हणे धणी । त्यासी अवघी पुरवणी ॥३॥
2243
देवाचे घरीं देवें केले चोरी । देवें देव नागवूनि केला भिकारी ॥१॥ धांवणियां धांवा धांवणियां धांवा । माग चि नाहीं जावें कवणिया गांव ॥ध्रु.॥ सवें चि होता चोर घरिचिया घरीं । फावलियावरी केलें अवघें वाटोळें ॥२॥ तुका म्हणे येथें कोणी च नाहीं । नागवलें कोण गेलें कोणाचें काईं ॥३॥
2244
देवाचे म्हणोनि देवीं अनादर । हें मोठें आश्चर्य वाटतसे ॥१॥ आतां येरा जना म्हणावें तें काई । जया भार डोई संसाराचा ॥ध्रु.॥ त्यजुनी संसार अभिमान सांटा । जुलूम हा मोटा दिसतसे ॥२॥ तुका म्हणे अळस करूनियां साहे । बळें कैसे पाहें वांयां जाती ॥३॥
2245
देवाचें चरित्र नाठवे सर्वथा । विनोदार्थ कथा गोड वाटे ॥१॥ हातावरि हात हासोनि आफळी । वाजवितां टाळी लाज वाटे ॥२॥ तुका म्हणे थुंका त्याच्या तोंडावरि । जातो यमपुरी भोगावया ॥३॥
2246
देवाचें निर्माल्य कोण शिवे हातीं । संकल्पासी होती विकल्प ते ॥१॥ वाहिलें देह हें देवा एकसरें । होईंल तें बरें तेणें द्वारें ॥ध्रु.॥ होता भार त्याची निवारली खंती । येथें आतां रिती साटवण ॥२॥ तुका म्हणे इच्छे पावविले कष्ट । म्हणऊनि नष्ट दुरावली ॥३॥
2247
देवाचें भजन कां रे न करीसी । अखंड हव्यासीं पीडतोसी ॥१॥ देवासी शरण कां रे न वजवे तैसा । बक मीना जैसा मनुष्यालागीं ॥ध्रु.॥ देवाचा विश्वास कां रे नाहीं तैसा । पुत्रस्नेहें जैसा गुंतलासी ॥२॥ कां रे नाहीं तैसी देवाची हे गोडी । नागवूनी सोडी पत्नी तैसी ॥३॥ कां रे नाहीं तैसे देवाचे उपकार । माया मिथ्या भार पितृपूजना ॥४॥ कां रे भय वाहासी लोकांचा धाक । विसरोनि एक नारायण ॥५॥ तुका म्हणे कां रे घातलें वांयां । अवघें आयुष्य जाया भक्तिविण ॥६॥
2248
देवाच्या उद्देशें जेथें जेथें भाव । तो तो वसे ठाव विश्वंभरें ॥१॥ लोभाचे संकल्प पळालियावरी । कैंची तेथें उरी पापपुण्या ॥ध्रु.॥ शुद्ध भक्ती मन जालिया निर्मळ । कुश्चळी विटाळ वज्रलेप ॥२॥ तुका म्हणे ज्याचें तयासी च कळे । प्रांत येतो फळें कळों मग ॥३॥
2249
देवाच्या निरोपें पिटितों डांगोरा । लाजे नका थारा देऊं कोणी ॥१॥ मोडिलें या रांडे सुपंथ मारग । चालविलें जग यमपंथें ॥ध्रु.॥ परिचारीं केली आपुली च रूढी । पोटींची ते कुडी ठावी नाहीं ॥२॥ तुका म्हणे आणा राउळा धरून । फजित करून सोडूं मग ॥३॥
2250
देवाच्या प्रसादें करा रे भोजन । व्हाल कोण कोण अधिकारी ते ॥१॥ ब्रम्हादिकांसि हें दुर्लभ उच्छिष्ट । नका मानूं वीट ब्रम्हरसीं ॥ध्रु.॥ अवघियां पुरतें वोसंडलें पात्र । अधिकार सर्वत्र आहे येथें ॥२॥ इच्छादानी येथें वळला समर्थ । अवघें चि आर्त पुरवितो ॥३॥ सरे येथें ऐसें नाहीं कदाकाळीं । पुढती वाटे कवळीं घ्यावें ऐसें ॥४॥ तुका म्हणे पाक लक्षुमीच्या हातें । कामारीसांगातें निरुपम ॥५॥
2251
देवाच्या संबंधें विश्व चि सोयरें । सूत्र ओढे दोरें एका एक ॥१॥ आहाच हें नव्हे विटायासारिखें । जीव जीवनीं देखें सामावलें ॥ध्रु.॥ आणिकांचें सुख दुःख उमटे अंतरीं । एथील इतरीं तेणें न्यायें ॥२॥ तुका म्हणे ठसावलें शुद्ध जाती । शोभा चि पुढती विशेषता ॥३॥
2252
देवावरिल भार । काढूं नये कांहीं पर ॥१॥ तानभुके आठवण । घडे तें बरें चिंतन ॥ध्रु.॥ देखावी निश्चिंती । ते चि अंतर श्रीपती ॥२॥ वैभव सकळ । तुका मानितो विटाळ ॥३॥
2253
देवावरी भार । वृत्ति अयाचित सार ॥१॥ देह देवाचे सांभाळी । सार योजे यथाकाळीं ॥ध्रु.॥ विश्वासीं निर्धार । विस्तारील विश्वंभर ॥२॥ तुका म्हणे व्हावें । बळ एक चि जाणावें ॥३॥
2254
देवासाटीं जाणा तयासी च आटी । असेल ज्या गांठीं पुण्यराशी ॥१॥ निर्बळा पाठवी बळें वाराणसी । मेला आला त्यासी अर्ध पुण्य ॥ध्रु.॥ कथें निद्राभंग करावा भोजनीं । तया सुखा धणी पार नाहीं ॥२॥ यागीं रीण घ्यावें द्यावें सुख लाहीं । बुडतां चिंता नाहीं उभयतां ॥३॥ तुका म्हणे वर्म जाणोनि करावें । एक न घलावें एकावरी ॥४॥
2255
देवासी अवतार भक्तांसी संसार । दोहींचा विचार एकपणें ॥१॥ भक्तांसी सोहळे देवाचिया अंगें । देव त्यांच्या संगें सुख भोगी ॥ध्रु.॥ देवें भक्तां रूप दिलासे आकार । भक्तीं त्याचा पार वाखाणिला ॥२॥ एका अंगीं दोन्ही जालीं हीं निर्माण । देवभक्तपण स्वामिसेवा ॥३॥ तुका म्हणे येथें नाहीं भिन्नभाव । भक्त तो चि देव देव भक्त ॥४॥
2256
देवासी तो पुरे एकभाव गांठी । तो चि त्याचे मिठी देइल पायीं ॥१॥ पाहोनि राहीन कवतुक निराळा । मी मज वेगळा होऊनियां ॥ध्रु.॥ कांहीं नेघें शिरीं निमित्याचा भार । न लगे उत्तर वेचावें चि ॥२॥ तुका म्हणे जीवें पडिलिया गांठी । मग नाहीं मिठी सुटों येत ॥३॥
2257
देवासी पैं भांडों एकचत्ति करूनि । आम्हांसि सज्जनीं सांगितलें ॥१॥ आम्हां काय आतां देवें आडो परी । भेटी नेदी तरी सुखें नेदो ॥ध्रु.॥ तो चि नांदो सदा हरि पैं वैकुंठीं । आम्हां देशवटी देवो सुखें ॥२॥ देवें अभिमान चित्तांत धरिला । तरी तो एकला राहो आतां ॥३॥ चित्ती धरोनि नाम असों सुखें येथें । हषॉ गाऊं गीत गोविंदाचें ॥४॥ तुका म्हणे सर्व देवाची नष्टाईं । आम्ही सुखें डुलतसों ॥५॥
2258
देवासी लागे सकळांसी पोसावें । आम्हां न लगे खावें काय चिंता ॥१॥ देवा विचारावें लागे पापपुण्य । आम्हासी हे जन अवघें भलें ॥ध्रु.॥ देवासी उत्पत्ति लागला संहार । आम्हां नाहीं फार थोडें काहीं ॥२॥ देवासी काम लागला धंदा । आम्हासी ते सदा रिकामीक ॥३॥ तुका म्हणे आम्ही भले देवाहून । विचारितां गुण सर्वभावें ॥४॥
2259
देवी देव जाला भोग सरला यावरी । सांगाया दुसरी ऐसी नाहीं उरली ॥१॥ हरिनाम देवनाम तुम्ही गाऊनियां जागा । पेंठवणी मागा नका ठेवूं लिगाड ॥ध्रु.॥ शेवटीं सुताळी बरवी वाजवावी डांक । ताळा घाली एक सरलियाचे शेवटीं ॥२॥ गुंडाळा देव्हारा मान देती मानकरी । तुका म्हणे बरीं आजि कोडीं उगविलीं ॥३॥
2260
देवीं आणि दैतीं सिंधू गुसळिला । भार पृथ्वीस जाला साहावेना ॥१॥ जालासी कासव धरिली पाठीवरी । चिंता तुज हरी सकळांची ॥ध्रु.॥ तये काळीं देव करिताती स्तुती । कृपाळु श्रीपती म्हणोनियां ॥२॥ तुका म्हणे ऐसे उदंड पवाडे । ज्यासी सहस्र तोंडें सिणला तो ही ॥३॥
2261
देवें जीव धाला । संसार तो कडू झाला ॥१॥ ते चि येतील ढेंकर । आनंदाचे हरिहर ॥ध्रु.॥. वेधी आणिकांस । ऐसा जया अंगीं कस ॥२॥ तुका म्हणे भुक । येणें न लगे आणीक ॥३॥
2262
देवें दिला देह भजना गोमटा । तों या जाला भांटा बाधिकेच्या ॥१॥ ताठोनियां मान राहिली वरती । अहंकारा हातीं लवों नल्हे ॥ध्रु.॥ दास म्हणावया न वळे रसना । सइरवचना बासे गळा ॥२॥ तुका म्हणे कोठें ठेवावा विटाळ । स्नानें नीर्मळ व्हावयासी ॥३॥
2263
देवें देऊळ सेविलें । उदक कोरडें चि ठेविलें ॥१॥ नव्हे मत गूढ उमानें कांहीं । तूं आपणआपणापें पाहीं ॥ध्रु.॥ पाठें पूर वोसंडला । सरिता सागर तुंबोनि ठेला ॥२॥ वांजेघरीं बाळ तान्हा । एक बाळी दों कानां ॥३॥ तुका म्हणे पैस । अनुभविया ठावा गोडीरस ॥४॥ ॥ लोहागांवीं कीर्तनांत मेलें मूल जीत झालें ते समयीं स्वामींनीं अभंग केले ते ॥
2264
देश वेष नव्हे माझा । सहज फिरत आलों । करूं सत्ता कवणावरी । कोठें स्थिर राहिलों । पाय डोळे म्हणतां माझे । तींहीं कैसा मोकलिलों । परदेशीं नाहीं कोणी । अंध पांगुळ जालों ॥१॥ आतां माझी करीं चिंता । दान देई भगवंता । पाठीं पोटीं नाहीं कोणी । निरवीं सज्जन संता ॥ध्रु.॥ चालतां वाट पुढें । भय वाटतें चित्तीं । बहुत जन गेलीं नाहीं आलीं मागुतीं । न देखें काय जालें। कान तरी ऐकती । बैसलों संधिभागीं । तुज धरूनि चित्तीं ॥२॥ भाकितों करुणा गा । जैसा सांडिला ठाव । न भरें पोट कधीं नाहीं निश्चळ पाव । हिंडतां भागलों गा । लक्ष चौर्‍यांशी गांव । धरूनि राहिलों गा । हा चि वसता ठाव ॥३॥ भरवसा काय आतां । कोण आणि अवचिता । तैसी च जाली कीर्ति । तया मज बहुतां । म्हणउनि मारीं हाका । सोयी पावें पुण्यवंता । लागली भूक थोरी । तूं चि कृपाळू दाता ॥४॥ संचित सांडवलें । कांहीं होतें जवळीं । वित्त गोत पुत माया । तुटली हे लागावळी । निष्काम जालों देवा । होतें माझे कपाळीं । तुका म्हणे तूं चि आतां । माझा सर्वस्वें बळी ॥५॥
2265
देह आणि देहसंबंधें निंदावीं । इतरें वंदावीं श्वानशूकरें ॥१॥ येणें नांवें जाला मी माझ्याचा झाडा । मोहा नांवें खोडा गर्भवास ॥ध्रु.॥ गृह आणि वित्त स्वदेशा विटावें । इतरा भेटावें श्वापदझाडां ॥२॥ तुका म्हणे मी हें माझें न यो वाचे । येणें नांवें साचे साधुजन ॥३॥
2266
देह जाईंल जाईंल । यासी काळ बा खाईंल ॥१॥ कां रे नुमजसी दगडा । कैचे हत्ती घोडे वाडा ॥ध्रु.॥ लोडें बालिस्तें सुपती । जरा आलिया फजिती ॥२॥ शरीरसंबंधाचें नातें । भोरड्या बुडविती सेतातें ॥३॥ अझुनि तरी होई जागा । तुका म्हणे पुढें दगा ॥४॥
2267
देह तंव असे भोगाचे अधीन । याचें सुख सीण क्षीणभंगर ॥१॥ अविनाश जोडी देवापायीं भाव । कल्याणाचा ठाव सकळही ॥ध्रु.॥ क्षणभंगुर हा तेथील पसारा । आलिया हाकारा अवघें राहे ॥२॥ तुका म्हणे येथें सकळ विश्रांति । आठवावा चित्तीं नारायण ॥३॥
2268
देह तंव आहे प्रारब्धा अधीन । याचा मी कां सीण वाहूं भार ॥१॥ सरो माझा काळ तुझिया चिंतनें । कायावाचामनें इच्छीतसें ॥ध्रु.॥ लाभ तो न दिसे याहूनि दुसरा । आणीक दातारा येणें जन्में ॥२॥ तुका म्हणे आलों सोसीत संकटें । मी माझें वोखटें आहे देवा ॥३॥
2269
देह तुझ्या पायीं । ठेवूनि जालों उतराईं ॥१॥ आतां माझ्या जीवां । करणें तें करीं देवा ॥ध्रु.॥ बहु अपराधी । मतिमंद हीनबुद्धि ॥२॥ तुका म्हणे नेणें । भावभक्तीचीं लक्षणें ॥३॥
2270
देह नव्हे मी हें सरे । उरला उरे विठ्ठल ॥१॥ म्हणऊनि लाहो करा । काळ सारा चिंतनें ॥ध्रु.॥ पाळणाची नाहीं चिंता । ठाव रिता देवाचा ॥२॥ तुका म्हणे जीवासाटीं । देव पोटीं पडेल ॥३॥
2271
देह निरसे तरी । बोलावया नुरे उरी ॥१॥ येर वाचेचें वाग्जाळ । अळंकारापुरते बोल ॥ध्रु.॥ काचें तरी कढे । जाती ऐसें चित्ती ओढे ॥२॥ विष्णुदास तुका । पूर्ण धनी जाणे चुका ॥३॥
2272
देह प्रारब्धा शिरीं । असोन करी उद्वेग ॥१॥ धांव घालीं नारायणा । माझ्या मना जागवीं ॥ध्रु.॥ ऐसी चुकोनियां वर्में । पीडा भ्रमें पावलों ॥२॥ तुका म्हणे कैंचा भोग । नव्हे रोग अंगींचा॥३॥
2273
देह मृत्याचें भातुकें । कळों आलें कवतुकें ॥१॥ काय मानियेलें सार । हें चि वाटतें आश्चर्य ॥ध्रु.॥ नानाभोगांची संचितें । करूनि ठेविलें आइतें ॥२॥ तुका म्हणे कोडीं । उगवून न सकती बापुडीं ॥३॥
2274
देह हा सादर पाहावा निश्चित । सर्व सुख एथें नाम आहे ॥१॥ ब्रम्ह जें देखणें द्वैत जेव्हां गेलें । शरीर तें जालें ब्रम्हरूप ॥ध्रु.॥ यजन याजन तप व्रतें करिती । विकल्पें नागवती शुद्ध पुण्या ॥२॥ तुका म्हणे सर्व सुख एथें आहे । भ्रांति दूर पाहें टाकुनियां ॥३॥
2275
देहबुद्धि वसे जयाचियें अंगीं । पूज्यता त्या जगीं सुख मानी ॥१॥ थोर असे दगा जाला त्यासी हाटीं । सोडोनिया गांठी चोरीं नेली ॥ध्रु.॥ गांठीचें जाउनि नव्हे तो मोकळा । बांधिलासे गळा दंभलोभें ॥२॥ पुढिल्या उदिमा जालेंसे खंडण । दिसे नागवण पडे गांठी ॥३॥ तुका म्हणे ऐसे बोलतील संत । जाणूनियां घात कोण करी ॥४॥
2276
देहबुद्धि वसे लोभ जयां चित्तीं । आपुलें जाणती परावें जे ॥१॥ तयासि चालतां पाहिजे सिदोरी । दुःख पावे करी असत्य तो ॥२॥ तुका म्हणे धर्म रक्षाया कारणें । छाया इच्छी उन्हें तापला तो ॥३॥
2277
देहभाव आम्ही राहिलों ठेवूनि । निवांत चरणीं विठोबाच्या ॥१॥ आमुच्या हिताचा जाणोनि उपाव । तो चि पुढें देव करीतसे ॥ध्रु.॥ म्हणउनी नाहीं सुख दुःख मनीं । ऐकिलिया कानीं वचनाचें ॥२॥ जालों मी निःसंग निवांत एकला । भार त्या विठ्ठला घालूनियां ॥३॥ तुका म्हणे जालों जयाचे अंकित । तो चि माझें हित सर्व जाणे ॥४॥
2278
देहीं असोनियां देव । वृथा फिरतो निर्दैव ॥१॥ देव आहे अंतर्यामीं । व्यर्थ हिंडे तीर्थग्रामीं ॥ध्रु.॥ नाभी मृगाचे कस्तुरी । व्यर्थ हिंडे वनांतरीं ॥२॥ साखरेचें मूळ ऊंस । तैसा देहीं देव दिसे ॥३॥ दुधीं असतां नवनीत । नेणे तयाचें मथित ॥४॥ तुका सांगे मूढजना । देहीं देव कां पाहाना ॥५॥
2279
दैत्यभारें पीडिली पृथुवी बाळा । म्हणोनि तूज येणें जालें गोपाळा । भक्तिप्रतिपाळक उत्सव सोहळा । मंगळें तुज गाती आबळ बाळा ॥१॥ जय देव जय देव जय गरुडध्वजा । श्रीगरुडध्वजा । आरती ओवाळूं तुज भक्तीकाजा ॥ध्रु.॥ गुण रूप नाम नाहीं जयासी । चिंतितां तैसा चि होसी तयांसी । मत्स्य कूर्म वराह नरसिंह जालासी । असुरां काळ मुणि ठाके ध्यानासी ॥२॥ सहजर रूपें नाम सांवळा ना गोरा । श्रुति नेती म्हणती तुज विश्वंभरा । जीवनां जीवन तूं चि होसी दातारा । न कळे पार ब्रम्हादिकां सुरवरां ॥३॥ संतां महंतां घरीं म्हणवी म्हणियारा । शंखचक्रगदाआयुधांचा भारा । सुदर्शन घरटी फिरे अवश्वरा । सकुमार ना स्थूळ होसी गोजिरा ॥४॥ भावेंविण तुझें न घडे पूजन । सकळ ही गंगा जाल्या तुजपासून । उत्पत्ति प्रळय तू चि करिसी पाळण । धरूनि राहिला तुका निश्चयीं चरण ॥५॥
2280
दैन्य दुःख आम्हां न येती जवळी । दहन हे होळी होती दोष ॥१॥ सर्व सुखें येती मानें लोटांगणीं । कोण यांसी आणी दृष्टीपुढें ॥ध्रु.॥ आमुची आवडी संतसमागम । आणीक त्या नाम विठोबाचें ॥२॥ आमचें मागणें मागों त्याची सेवा । मोक्षाची निर्दैवा कोणा चाड ॥३॥ तुका म्हणे पोटीं सांटविला देव । नुन्य तो भाव कोण आम्हां ॥४॥
2281
दो दिवसांचा पाहुणा चालतो उताणा । कां रे नारायणा न भजसी ॥१॥ तूं अखंड दुश्चित्ता तुज नेती अवचिता । मग पंढरीनाथा भजसी केव्हां ॥२॥ तुका म्हणे ऐसे आहेत उदंड । तया केशव प्रचंड केवीं भेटे ॥३॥
2282
दोन्ही टिपरीं एक चि नाद । सगुण निर्गुण नाहीं भेद रे । कुसरी अंगें मोडितील परी । मेळविति एका छंदें रे ॥१॥ कांहींच न वजे वांयां रे । खेळिया एक चि बसवंत अवघियां रे । सम विषम तेथें होऊं च नेदी । जाणऊनि आगळिया रे ॥ध्रु.॥ संत महंत सद्धि खेळतील घाई । ते च सांभाळी माझ्या भाई रे । हात राखोन हाणिती टिपर्‍या । टिपरें मिळोनि जाय त्याची सोई रे ॥२॥ विताळाचें अवघें जाईल वांयां । काय ते शृंगारूनि काया रे । निवडूनि बाहेर काढिती निराळा । जो न मिळे संताचिया घाई रे ॥३॥ प्रकाराचें काज नाहीं सोडीं लाज । निःशंक होउनियां खेळें रे । नेणतीं नेणतीं च एकें पावलीं मान । विठ्ठल नामाचिया बळें रे ॥४॥ रोमांच गुढिया डोलविती अंगें । भावबळें खेळविती सोंगें रे। तुका म्हणे कंठ सद्गदित दाटे । या विठोबाच्या अंगसंगें रे ॥५॥
2283
दोन्ही हात ठेवुनि कटीं । उभा भीवरेच्या तटीं । कष्टलासी साटीं । विठ्ठला ॥१॥ भागलासी मायबापा । बहु श्रम केल्या खेपा । आम्हालागीं सोपा । दैत्या काळ कृतांत ॥ध्रु.॥ होतासी क्षीरसागरीं । मही दाटली असुरीं । म्हणोनियां घरीं । गौळियांचे अवतार ॥२॥ केला पुंडलिकें गोवा । तुज पंढरीसि देवा । तुका म्हणे भावा । साटीं हातीं सांपडसी ॥३॥
2284
दोराच्या आधारें पर्वत चढला । पाउलासाटीं केला अपघात ॥१॥ अष्टोत्तरदशें व्याधि ज्य वैद्यें दवडुनी । तो वैद्य मारूनि उत्तीर्ण जाला ॥ध्रु.॥ नव मास माया वाइलें उदरीं । ते माता चौबारीं नग्न केली ॥२॥ गायत्रीचें क्षीर पिळुनी घेऊनी । उपवासी बांधोनी ताडन करी ॥३॥ तुका म्हणे दासां निंदी त्याचें तोंड । पहातां नरककुंड पूर्वजांसी ॥४॥
2285
दोष करूनि आम्ही पतित सद्धि जालों । पावन मागों आलों ब्रीद तुझें ॥१॥ आतां पतिता तारावें कीं ब्रीद हें सोडावें । यांत जें पुरवे तें चि सांगा ॥ध्रु.॥ उद्धार तुमच्यानें नव्हे हो श्रीहरि । सोडा झडकरी ब्रीद आतां ॥२॥ तें ब्रीद घेउनी हिंडों दारोदारीं । सांगूं तुझी कीर्ती रे पांडुरंगा ॥३॥ देवें हारविलें ब्रीद हें सोडिलें । पतितें जिंकिलें आम्हीं देवा ॥४॥ तुका म्हणे आम्हीं उठलों दैन्यवरि । विचारा श्रीहरी तुम्ही आतां ॥५॥
2286
दोष पळती कीर्तनें । तुझ्या नामें संकीर्तनें ॥१॥ हें कां करूं आदरिलें । खोटें वचन आपुलें ॥ध्रु.॥ तुम्ही पापा भीतां । आम्हां उपजावया चिंता ॥२॥ तुका म्हणे सेवा । कळिकाळा जिंकी देवा ॥३॥
2287
दोहीं बाहीं आम्हां वास । असों कास घालूनि ॥१॥ बोल बोलों उभयतां । स्वामीसत्ता सेवेची ॥ध्रु.॥ एकसरें आज्ञा केली । असों चाली ते नीती ॥२॥ तुका म्हणे जोहारितों । आहें होतों ते ठायीं ॥३॥
2288
दोहींमध्यें एक घडेल विश्वासें । भातुकें सरिसें मूळ तरी ॥१॥ करिती निरास निःशेष न घडे । कांहीं तरी ओढे चित्ती माये ॥ध्रु.॥ लौकिकाची तरी धरितील लाज । काय माझ्या काज आचरणें ॥२॥ अथवा कोणाचें घेणें लागे रीण । नाहीं तरी हीनकर्मी कांहीं ॥३॥ व्यालीचिये अंगीं असती वेधना । तुका म्हणे मना मन साक्ष ॥४॥
2289
द्या जी आम्हां कांहीं सांगा जी रखुमाई । शेष उरलें ठायीं सनकादिकांचें ॥१॥ टोकत बाहेरी बैसलों आशा । पुराया ग्रासा एकमेकां ॥ध्रु.॥ येथवरी आलों तुझिया नांवें । आस करुनी आम्ही दातारा ॥२॥ प्रेम देउनियां बहुडा आतां दिला । तुका म्हणे आतां विठ्ठल बोला ॥३॥
2290
द्या जी माझा विचारोनियां विभाग । न खंडे हा लाग आहाचपणें ॥१॥ किती नेणों तुम्हां साहाते कटकट । आम्ही च वाईंट निवडलों ते ॥ध्रु.॥ करवितां कल्हें जिवाचियेसाटीं । हे तुम्हां वोखटीं ढाळ देवा ॥२॥ तुका म्हणे धीर कारण आपुला । तुम्हीं तों विठ्ठला मायातीत ॥३॥
2291
द्याल ऐसें दिसे । तुमचें साचपण इच्छे ॥१॥ म्हणऊनि न भंगे निर्धार । केलें लोचनें सादर ॥ध्रु.॥ मुखाची च वास । पुरला पाहे अवकाश ॥२॥ तुका म्हणे कळे । काय लाभ कोण वेळ ॥३॥
2292
द्याल ठाव तरि राहेन संगती । संतांचे पंगती पायांपाशीं ॥१॥ आवडीचा ठाव आलोंसें टाकून । आतां उदासीन न धरावें ॥ध्रु.॥ सेवटील स्थळ निंच माझी वृत्ति । आधारें विश्रांती पावईन ॥२॥ नामदेवापायीं तुक्या स्वप्नीं भेटी । प्रसाद हा पोटीं राहिलासे ॥३॥
2293
द्याल माळ जरी पडेन मी पायां । दंडवत वांयां कोण वेची ॥१॥ आलें तें हिशोबें अवघिया प्रमाण । द्यावें तरी दान मान होतो ॥ध्रु.॥ मोकळिया मनें घ्याल जरी सेवा । प्रसाद पाठवा लवकरी ॥२॥ तुका म्हणे तुम्ही जालिया कृपण । नामाची जतन मग कैची ॥३॥
2294
द्रव्य असतां धर्म न करी । नागविला राजद्वारीं ॥१॥ माय त्यासि व्याली जेव्हां । रांड सटवी नव्हती तेव्हां ॥ध्रु.॥. कथाकाळीं निद्रा लागे । कामीं श्वानापरी जागे ॥२॥ भोग स्त्रियेसि देतां लाजे । वस्त्र दासीचें घेउनि निजे ॥३॥ तुका म्हणे जाण । नर गाढवाहुनी हीन ॥४॥
2295
द्रव्याचा तो आम्ही धरितों विटाळ । तया पाठी काळ लाग करी ॥१॥ करोनियां हें चि राहिलों जीवन । एक नारायण नाम ऐसें ॥२॥ तुका म्हणे हें चि करुनि जतन । आलिया ही दान याचकासी ॥३॥
2296
द्रव्याचिया कोटी । नये गांडीची लंगोटी ॥१॥ अंती बोळवणेसाटीं । पांडुरंग धरा कंठीं ॥ध्रु.॥ लोभाची लोभिकें । यांचें सन्निधान फिकें ॥२॥ तुका म्हणे हितें । जग नव्हो पडो रितें ॥३॥
2297
द्रव्याचिया मागें किळकाळाचा लाग । म्हणोनियां संग खोटा त्याचा ॥१॥ निरयाचें मूळ घालुनिया मागें । मांडिली प्रसंगें कथा पुढें ॥ध्रु.॥ आजिच्या प्रसंगें हा चि लाभ घ्यावा । पुढील भार देवावरी घाला ॥२॥ प्रालब्ध कांहीं न पालटे सोसें । तृष्णेचें हें पिसें वांयांविण ॥३॥ तुका म्हणे घेई राहे ऐसें धन । सादर श्रवण करोनियां ॥४॥
2298
द्वारकेचें केणें आलें या चि ठाया । पुढें भक्तराया चोजवीत ॥१॥ गोविलें विसारें माप केलें खरें । न पाहे माघारें अद्यापवरी ॥ध्रु.॥ वैष्णव मापार नाहीं जाली सळे । पुढें ही न कळे पार त्याचा ॥२॥ लाभ जाला त्यांनीं धरिला तो विचार । आहिक्य परत्र सांटविलें ॥३॥ तुका म्हणे मज मिळाली मजुरी । विश्वास या घरीं संतांचिया ॥४॥
2299
द्वारपाळ विनंती करी । उभे द्वारीं राउळा ॥१॥ आपुलिया शरणागता । वाहों चिंता नेदावी ॥ध्रु.॥ वचना या चत्ति द्यावें । असो ठावें पायांसी ॥२॥ तुका म्हणे कृपासिंधू । दीनबंधू केशवा ॥३॥
2300
द्वेषाचिया ध्यानें हरिरूप जाले । भाव हारपले देहादिक ॥१॥ देहादिक कर्में अभिमान वाढे । तया कंसा जोडे नारायण ॥२॥ नारायण जोडे एकविध भावें । तुका म्हणे जीवें जाणें लागे ॥३॥
2301
धडकला अग्नि आह्या येती वरी । गोपाळ श्रीहरी विनविती ॥१॥ अरे कृष्णा काय विचार करावा । आला रे वोणवा जळों आतां ॥ध्रु.॥ अरे कृष्णा तुझें नाम बळिवंत । होय कृपावंत राख आतां ॥२॥ तुका म्हणे अरे कृष्णा नारायणा । गोपाळ करुणा भाकितिले ॥३॥
2302
धणी न पुरे गुण गातां । रूप दृष्टी न्याहाळितां ॥१॥ बरवा बरवा पांडुरंग । कांति सांवळी सुरंग ॥ध्रु.॥ सर्वमंगळाचें सार । मुख सिद्धीचें भांडार ॥२॥ तुका म्हणे सुखा । अंतपार नाहीं लेखा ॥३॥
2303
धन मेळवूनि कोटी । सवें नये रे लंगोटी ॥१॥ पानें खाशील उदंड । अंतीं जासी सुकल्या तोंडें ॥ध्रु.॥ पलंग न्याहाल्या सुपती । शेवटीं गोवर्‍या सांगाती ॥२॥ तुका म्हणे राम । एक विसरतां श्रम ॥३॥
2304
धनवंत एक बहिर अंधळे । शुभ्र कुष्ठ काळे भोग अंगीं ॥१॥ परारब्धगति न कळे विचित्र । आहे हातीं सूत्र विठोबाचे ॥ध्रु.॥ आणीक रोगांचीं नांवें घेऊं किती । अखंड असती जडोनियां ॥२॥ तुका म्हणे नष्ट संचिताचें दान । पावे खातां पण सुख नेदी ॥३॥
2305
धनवंता घरीं । करी धन चि चाकरी ॥१॥ होय बैसल्या व्यापार । न लगे सांडावें चि घर ॥ध्रु.॥ रानीं वनीं दीपीं । असतीं तीं होतीं सोपीं ॥२॥ तुका म्हणे मोल । देतां कांहीं नव्हे खोल ॥३॥
2306
धनवंतालागीं । सर्वमान्यता आहे जगीं ॥१॥ माता पिता बंधु जन । सर्व मानिती वचन ॥ध्रु.॥ जव मोठा चाले धंदा । तंव बहिण म्हणे दादा ॥२॥ सदा शृंगारभूषणें । कांता लवे बहुमानें ॥३॥ तुका म्हणे धन । भाग्य अशाश्वत जाण ॥४॥
2307
धना गुंतलें चित्त माझें मुरारी । मन घेउनी हिंडवी दारोदारीं । मरे हिंडतां न पुरे यासि कांहीं । मही ठेंगणी परी तें तृप्त नाहीं ॥१॥ न दिसे शुद्ध पाहातां निजमती । पुढें पडिलों इंद्रियां थोर घातीं । जिवा नास त्या संगती दंड बेडी । हरी शीघ्र या दुष्टसंगासि तोडीं ॥२॥ असीं आणिकें काय सांगों अनंता । मोहो पापिणी दुष्टमायाममता । क्रोध काम यातना थोर करी । तुजवांचुनी सोडवी कोण हरी ॥३॥ निज देखतां निज हे दूरि जाये । निद्रा आळस दंभ यी भीत आहे । तयां विस्त देहीं नको देउं देवा । तुजवांचुनी आणिक नास्ति हेवा ॥४॥ करीं घात पात शंका लाज थोरी । असे सत्य भाव बहू भक्ति दूरी । नको मोकलूं दीनबंधु अनाथा । तुका वीनवी ठेवुनी पायिं माथा ॥५॥
2308
धनासीं च धन । करी आपण जतन ॥१॥ तुज आळवितां गोडी । पांडुरंगा खरी जोडी ॥ध्रु.॥ जेविल्याचें खरें । वरी उमटे ढेंकरें ॥२॥ तुका म्हणे धाय । तेथें कोठें उरे हाय ॥३॥
2309
धनी ज्या पाइका मानितो आपण । तया भितें जन सकळीक ॥१॥ जिवाचे उदार शोभती पाईंक । मिरवती नाईंक मुगुटमणि ॥ध्रु.॥ आपुलिया सत्ता स्वामीचें वैभव । भोगिती गौरव सकळ सुख ॥२॥ कमाइचीं हीणें पडिलीं उदंडें । नाहीं तयां खंड येती जाती ॥३॥ तुका म्हणे तरि पाइकी च भली । थोडीबहुत केली स्वामिसेवा ॥४॥
2310
धनें वित्तें कुळें । अवघियानें ते आगळे ॥१॥ ज्याचे नारायण गांठीं । भरला हृदय संपुटीं ॥ध्रु.॥ अवघें चि गोड । त्याचें पुरलें सर्व कोड ॥२॥ तुका म्हणे अस्त । उदय त्याच्या तेजा नास्त ॥३॥
2311
धन्य आजि दिन । जालें संताचें दर्शन ॥१॥ जाली पापातापा तुटी । दैन्य गेलें उठाउठीं ॥ध्रु.॥ जालें समाधान । पायीं विसांवले मन ॥२॥ तुका म्हणे आले घरा । तो चि दिवाळीदसरा ॥३॥
2312
धन्य काळ संतभेटी । पायीं मिठी पडिली तो ॥१॥ संदेहाची सुटली गांठी । जालें पोटीं शीतळ ॥ध्रु.॥ भवनदीचा जाला तारा । या उत्तरा प्रसादें ॥२॥ तुका म्हणे मंगळ आतां । कोण दाता याहूनि ॥३॥
2313
धन्य जालों हो संसारीं । आम्ही देखिली पंढरी ॥१॥ चंद्रभागे करूं स्नान । पुंडलीकाचें दर्शन ॥ध्रु.॥ करूं क्षेत्रप्रदक्षिणा। भेटूं सत या सज्जनां ॥२॥ उभे राहूं गरुडपारीं । डोळेंभरुनी पाहों हरी ॥३॥ तुका म्हणे वाळवंटीं । महालाभ फुकासाटीं ॥४॥
2314
धन्य ते पंढरी धन्य भीमातीर । आणियेलें सार पुंडलिकें ॥१॥ धन्य तो हि लोक अवघा दैवांचा । सुकाळ प्रेमाचा घरोघरीं ॥ध्रु.॥ धन्य ते ही भूमी धन्य तरुवर । धन्य ते सुरवर तीर्थरूप ॥२॥ धन्य त्या नरनारी मुखीं नाम ध्यान । आनंदें भवन गर्जतसे ॥३॥ धन्य पशु पक्षी कीटक पाषाण । अवघा नारायण अवतरला ॥४॥ तुका म्हणे धन्य संसारातें आलीं । हरिरंगीं रंगलीं सर्वभावें ॥५॥
2315
धन्य ते संसारीं । दयावंत जे अंतरीं ॥१॥ येथें उपकारासाठीं । आले घर ज्यां वैकुंठीं ॥ध्रु.॥ लटिकें वचन । नाहीं देहीं उदासीन ॥२॥ मधुरा वाणी ओटीं । तुका म्हणे वाव पोटीं ॥३॥
2316
धन्य तें गोधन कांबळी काष्ठिका । मोहरी पांवा निका ब्रीद वांकी ॥१॥ धन्य तें गोकुळ धन्य ते गोपाळ । नर नारी सकळ धन्य जाल्या ॥ध्रु.॥ धन्य देवकी जसवंती दोहींचें । वसुदेवनंदाचें भाग्य जालें ॥२॥ धन्य त्या गोपिका सोळा सहस्र बाळा । यादवां सकळां धन्य जालें ॥३॥ धन्य म्हणे तुका जन्मा तींचि आलीं । हरिरंगीं रंगलीं सर्वभावें ॥४॥
2317
धन्य तो ग्राम जेथें हरिदास । धन्य तो चि वास भाग्य तया ॥१॥ ब्रम्हज्ञान तेथें असे घरोघरीं । धन्य त्या नरनारी चतुर्भुज ॥ध्रु.॥ नाहीं पापा रिघ काळाचें जीवन । हरिनामकीर्त्तन घरोघरीं ॥२॥ तुका म्हणे तिहीं तारिलें सकळां । आपल्या कोटिकुळासहित जीव ॥३॥
2318
धन्य त्या गौळणी इंद्राच्या पूजनीं । नैवेद्य हिरोनि खातो कृष्ण ॥१॥ अरे कृष्णा इंद्र अमर इच्छिती । कोण तयांप्रति येइल आतां ॥२॥ तुका म्हणे देव दाखवी विंदान । नैवेद्य खाऊन हासों लागे ॥३॥
2319
धन्य दिवस आजि डोळियां लाधला । आनंद देखिला धणीवरी ॥१॥ धन्य जालें मुख निवाली रसना । नाम नारायणा घोंष करूं ॥ध्रु.॥ धन्य हें मस्तक सर्वांग शोभलें । संताचीं पाउलें लागताती ॥२॥ धन्य आजि पंथें चालती पाउलें । टाळिया शोभले धन्य कर ॥३॥ धन्य तुका म्हणे आम्हांसी फावलें । पावलों पाउलें विठोबाचीं ॥४॥
2320
धन्य दिवस आजि दरुषण संतांचें । नांदे तया घरीं दैवत पंढरीचें ॥१॥ धन्य पुण्य रूप कैसा जालें संसार । देव आणि भक्त दुजा नाहीं विचार ॥ध्रु.॥ धन्य पूर्व पुण्य वोडवलें निरुतें । संतांचें दर्शन जालें भाग्यें बहुतें ॥२॥ तुका म्हणे धन्य आम्हां जोडली जोडी । संतांचे चरण आतां जीवें न सोडीं ॥३॥
2321
धन्य देहूं गांव पुण्य भूमि ठाव । तेथें नांदे देव पांडुरंग ॥१॥ धन्य क्षेत्रवासी लोक दइवाचे । उच्चारिती वाचे नामघोष ॥ध्रु.॥ कर कटी उभा विश्वाचा जनिता । वामांगीं ते माता रखुमादेवी ॥२॥ गरुड पारीं उभा जोडुनियां कर । अश्वत्थ समोर उत्तरामुख ॥३॥ दिक्षणे शंकर लिंग हरेश्वर । शोभे गंगातीर इंद्रायणी ॥४॥ लक्ष्मीनारायण बल्लाळाचें वन । तेथें अधिष्ठान सिद्धेश्वर ॥५॥ विघ्नराज द्वारीं बहिरव बाहेरी । हनुमंत शेजारीं सहित दोघे ॥६॥ तेथें दास तुका करितो कीर्तन । हृदयीं चरण विठोबाचे ॥७॥ शाक्तावर - अभंग १३
2322
धन्य पुंडलिका बहु बरें केलें । निधान आणिलें पंढरिये ॥१॥ न पवीजे केल्या तपांचिया रासी । तें जनलोकांसी दाखविलें ॥ध्रु.॥ सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव । शास्त्रांनी हा भाव निवडिला ॥२॥ विष्णुपद गया रामधाम काशी । अवघीं पायांपाशीं विठोबाच्या ॥३॥ तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस । तात्काळ या नास अहंकाराचा ॥४॥
2323
धन्य बा ह्या ऐशा नारी । घरीं दारीं नांदती ॥१॥ चोरूनिया तुजपाशीं । येतां त्यांसी न कळतां ॥ध्रु.॥ दोन्हीं ठायीं समाधान । सम कठीण बहुतचि ॥२॥ तुका म्हणे जीवासाठीं । दुर्लभ भेटी ते देवा ॥३॥
2324
धन्य भावशीळ । ज्याचें हृदय निर्मळ ॥१॥ पूजी प्रतिमेचे देव । संत म्हणती तेथें भाव ॥ध्रु.॥ विधिनिषेध नेणती । एक निष्ठा धरुनी चित्तीं ॥२॥ तुका म्हणे तैसें देवा । होणें लागे त्यांच्या भावा ॥३॥
2325
धन्य मी मानीन आपुलें संचित । राहिलीसे प्रीत तुझे नामीं ॥१॥ धन्य जालों आतां यासि संदेह नाहीं । न पडों या वाहीं काळा हातीं ॥ध्रु.॥ ब्रम्हरस करूं भोजन पंगती । संतांचे संगती सर्वकाळ ॥२॥ तुका म्हणे पोट धालें चि न धाये । खादलें चि खायें आवडीनें ॥३॥
2326
धन्यधन्य ज्यास पंढरीसी वास । धन्य ते जन्मास प्राणी आले ॥१॥ बहु खाणीमध्यें होत कोणी एक । त्रिगुण कीटक पक्षिराज ॥ध्रु.॥ उत्तम चांडाळ नर नारी बाळ । अवघे चि सकळ चतुर्भुज ॥२॥ अवघा विठ्ठल तेथें दुजा नाहीं । भरला अंतर्बाहि सदोदीत ॥३॥ तुका म्हणे येथें होउनी राहेन । सांडोवा पाषाण पंढरीचा ॥४॥
2327
धन्या आतां काय करूं । माझें तान्हुलें लेकरूं ॥१॥ धन्या अवचित मरण आलें । मज कोणासी निरविलें ॥ध्रु.॥ माझें दारवंड नका पाडूं । त्याचे हात पाय तोडूं ॥२॥ एके हातीं धरली दाढी । घे कुर्‍हाडी दुजे हातीं ॥३॥ येरी घाव घालूं पाहे । तंव तो उठोनि उभा राहे ॥४॥ तुका म्हणे अवघीं चोरें । सेकी रामनाम सोइरें ॥५॥
2328
धन्ये शुद्ध जाती । धरीं लौकरी परती ॥१॥ ऐकिलें तें चि कानीं । होय परिपाक मनीं ॥ध्रु.॥ कळवळा पोटीं । सावधान हितासाठीं ॥२॥ तुका म्हणे भाव । त्याचा तो चि जाणां देव ॥३॥
2329
धरावा तो बरा । ठाव वसतीचा थारा ॥१॥ निजविल्या जागविती । निज पुरवूनि देती ॥ध्रु.॥ एक वेवसाव । त्यांचा संग त्यांचा जीव ॥२॥ हितें केलें हित । ग्वाही एक एकां चित्त ॥३॥ विषमाचें कांहीं । आड तया एक नाहीं ॥४॥ तुका म्हणे बरीं । घरा येतील त्यापरी ॥५॥
2330
धरावें तों भय । अंतरोनि जाती पाय ॥१॥ जाल्या तुटी देवासवें । काय वांचोनि करावें ॥ध्रु.॥ कोणासी पारिखें । लेखूं आपणासारिखें ॥२॥ तुका म्हणे असो । अथवा हें आतां नासो ॥३॥
2331
धरितां इच्छा दुरी पळे । पाठी सोहळे उदासा ॥१॥ म्हणऊनि असट मन । नका खुण सांगतों ॥ध्रु.॥ आविसापासी अवघें वर्म । सोस श्रम पाववी ॥२॥ तुका म्हणे बीज न्यावें । तेथें यावें फळानें ॥३॥
2332
धरितां ये पंढरीची वाट । नाहीं संकट मुक्तीचें ॥१॥ वंदूं येती देव पदें । त्या आनंदें उत्साहें ॥ध्रु.॥ नृत्यछंदें उडती रज । जे सहज चालतां ॥२॥ तुका म्हणे गरुड टके । वैष्णव निके संभ्रम ॥३॥
2333
धरितों वासना परी नये फळ । प्राप्तीचा तो काळ नाहीं आला ॥१॥ तळमळी चत्ति घातलें खापरीं । फुटतसे परी लाहीचिया ॥ध्रु.॥ प्रकार ते कांहीं नावडती जीवा । नाहीं पुढें ठावा काळ हातीं ॥२॥ जातों तळा येतों मागुता लौकरी । वोळशाचे फेरी सांपडलों ॥३॥ तुका म्हणे बहु करितों विचार । उतरें डोंगर एक चढें ॥४॥
2334
धरियेलीं सोंगें । येणें अवघीं पांडुरंगें ॥१॥ तें हें ब्रम्ह विटेवरी । उभें चंद्रभागे तिरीं ॥ध्रु.॥ अंतर व्यापी बाहे । धांडोळितां कोठें नोहे ॥२॥ योगयागतपें । ज्याकारणें दानजपें ॥३॥ दिले नेदी जति । भोग सकळ ज्या होती ॥४॥ अवघी लीळा पाहे । तुका म्हणे दासां साहे ॥५॥
2335
धरियेलें रूप कृष्ण नाम बुंथी । परब्रम्ह क्षिती उतरलें ॥१॥ उत्तम हें नाम राम कृष्ण जगीं । तरावयालागीं भवनदी ॥२॥ दिनानाथब्रिदें रुळती चरणी । वंदितील मुनि देव ॠषि ॥३॥ ॠषीं मुनीं भेटी दिली नारायणें । आणीक कारणें बहु केलीं ॥४॥ बहु कासावीस जाला भक्तांसाटीं । तुका म्हणे आटी सोसियेली ॥५॥
2336
धरिला पालव न सोडी माझा येणें । कांहीं करितां या नंदाचिया कान्हें । एकली न येतें मी ऐसें काय जाणें । कोठें भरलें अवघड या राणें रे ॥१॥ सोडी पालव जाऊ दे मज हरी । वेळ लागला रे कोपतील घरीं । सासू दारुण सासरा आहे भारी । तुज मज सांगतां नाहीं उरी रे ॥ध्रु.॥ सखिया वेशिया होतिया । तुज फावलें रे फांकतां तयांसी । होतें अंतर तर सांपडतें कैसी । एकाएकीं अंगीं जडलासी रे ॥२॥ कैसी भागली हे करितां उत्तर । शक्ति मावळल्या आसुडितां कर । स्वामी तुकयाचा भोगिया चतुर । भोग भोगी त्यांचा राखे लोकाचार वो ॥३॥
2337
धरिलीं जीं होतीं चित्तीं । डोळां तीं च दिसती ॥१॥ आलें आवडीस फळ । जालें कारण सकळ ॥ध्रु.॥ घेईंन भातुकें । मागोनियां कवतुकें ॥२॥ तुका म्हणे लाड । विठोबा पुरवील कोड ॥३॥
2338
धरिल्या देहाचें सार्थक करीन । आनंदें भरीन तिन्ही लोक ॥१॥ लावीन निशान जावया वैकुंठा । माजवीन पेठा कीर्तनाच्या ॥ध्रु.॥ नामाचिया नौका करीन सहस्रवरि । नावाडा श्रीहरि पांडुरंग ॥२॥ भाविक हो येथें धरा रे आवांका । म्हणे दास तुका शुद्धयाति ॥३॥
2339
धरी दोही ठायीं सारखा चि भाव । देवकी वसुदेव नंद दोघे ॥१॥ दोन्ही एके ठायीं केल्या नारायणें । वाढविला तिणें आणि व्याली ॥२॥ व्याला वाढला हा आपल्या आपण । निमित्या कारणें मायबापा ॥३॥ माय हा जगाची बाप नारायणा । दुजा करी कोण यत्न यासि ॥४॥ कोण जाणे याचे अंतरींचा भाव । कळों नेदी माव तुका म्हणे ॥५॥
2340
धरूनि पालव असुडीन करें । मग काय बरें दिसे लोकीं ॥१॥ काय तें विचारा ठायींचें आपणां । जो हा नारायणा अवकाश ॥ध्रु.॥ अंतर पायांसी तो वरी या गोष्टी । पडिलिया मिठी हालों नेदीं ॥२॥ रुसलेती तरी होईंल बुझावणी । तांतडी करूनि साधावें हें ॥३॥ सांपडलिया आधीं कारणासी ठाव । येथें करूं भाव दृढ आतां ॥४॥ तुका म्हणे तुझे ठाउके बोभाट । मग खटपट चुकली ते ॥५॥
2341
धरूनि हें आलों जीवीं । भेटी व्हावी विठोबासी ॥१॥ संकल्प तो नाहीं दुजा । महाराजा विनवितों ॥ध्रु.॥ पायांवरि ठेविन भाळ । येणें सकळ पावलें ॥२॥ तुका म्हणे डोळेभरी । पाहिन हरी श्रीमुख ॥३॥
2342
धरूनियां चाली हांवा । येइन गांवां धांवत ॥१॥ पाठविसी मूळ तरी । लवकरी विठ्ठले ॥ध्रु.॥ नाचेन त्या प्रेमसुखें । कीर्ती मुखें गाईंन ॥२॥ तुका म्हणे संतमेळीं । पायधुळी वंदीन ॥३॥
2343
धरूनियां मनीं बोलिलों संकल्प । होसी तरि बाप सिद्धी पाव ॥१॥ उत्कंठा हे आजी जाली माझे पोटीं । मोकळिली गोष्टी टाळाटाळ ॥ध्रु.॥ माझा मज असे ठाउका निर्धार । उपाधि उत्तर न साहे पैं ॥२॥ तुका म्हणे जरि दिली आठवण । तरि अभिमान धरीं याचा ॥३॥
2344
धरूनियां सोईं परतलें मन । अनुलक्षीं चरण करूनियां ॥१॥ येई पांडुरंगे नेई सांभाळूनि । करुणावचनीं आळवितों ॥ध्रु.॥ बुद्धि जाली साहए परि नाहीं बळ । अवलोकितों जळ वाहे नेत्रीं ॥२॥ न चलती पाय गळित जाली काया । म्हणऊनि दया येऊं द्यावी ॥३॥ दिशच्या करितों वारियासीं मात । जोडुनियां हात वास पाहें ॥४॥ तुका म्हणे वेग करावा सत्वर । पावावया तीर भवनदीचें ॥५॥
2345
धरोनि दोन्ही रूपें पाळणें संहार । करी कोप रुद्र दयाळ विष्णु ॥१॥ जटाजूट एका मुगुट माथां शिरीं । कमळापति गौरीहर एक ॥ध्रु.॥ भस्मउद्धळण लक्ष्मीचा भोग । शंकर श्रीरंग उभयरूपीं ॥२॥ वैजयंती माळा वासुगीचा हार । लेणें अळंकार हरिहरा ॥३॥ कपाळ झोळी एका स्मशानींचा वास । एक जगन्निवास विश्वंभर ॥४॥ तुका म्हणे मज उभयरूपीं एक । सारोनि संकल्प शरण आलों ॥५॥
2346
धरोनियां फरश करी । क्तजनाचीं विघ्नें वारी ॥१॥ ऐसा गजानन महाराजा । त्याचें चरणीं हालो लागो माझा ॥ध्रु.॥ सेंदुर शमी बहुप्रिय ज्याला । तुरा दुर्वांचा शोभला ॥२॥ उंदिर असे जयाचें वहन । माथां जडितमुगुट पूर्ण ॥३॥ नागयज्ञोपवीत रुळे । शुभ्र वस्त्र शोभित साजिरें ॥४॥ भावमोदक हराभरी । तुका भावें हे पूजा करी ॥५॥
2347
धर्म तो न कळे । काय झांकितील डोळे ॥१॥ जीव भ्रमले या कामें । कैसीं कळों येती वर्में ॥ध्रु.॥ विषयांचा माज । कांहीं धरूं नेदी लाज ॥२॥ तुका म्हणे लांसी । माया नाचविते कैसी ॥३॥
2348
धर्म रक्षावया अवतार घेशी । आपुल्या पाळिसी भक्तजना ॥१॥ अंबॠषीसाटीं जन्म सोसियेलें । दुष्ट निर्दाळिले किती एक ॥ध्रु.॥ धन्य तुज कृपासिंधु म्हणतील । आपुला तूं बोल साच करीं ॥२॥ तुका म्हणे तुज वणिऩती पुराणें । होय नारायणें दयासिंधु ॥३॥
2349
धर्म रक्षावया साठीं । करणें आटी आम्हांसि ॥१॥ वाचा बोलों वेदनीती । करूं संतीं केलें तें ॥ध्रु.॥ न बाणतां स्थिति अंगीं । कर्म त्यागी लंड तो ॥२॥ तुका म्हणे अधम त्यासी । भक्ति दूषी हरीची ॥३॥
2350
धर्माची तूं मूर्ती । पाप पुण्य तुझे हातीं ॥१॥ मज सोडवीं दातारा । कर्मापासूनि दुस्तरा ॥ध्रु.॥ करिसी अंगीकार । तरी काय माझा भार ॥२॥ जिवींच्या जीवना । तुका म्हणे नारायणा ॥३॥
2351
धर्माचे पाळण । करणें पाषांड खंडण ॥१॥ हें चि आम्हां करणें काम । बीज वाढवावें नाम ॥ध्रु.॥ तीक्षण उत्तरें । हातीं घेउनि बाण फिरें ॥२॥ नाहीं भीड भार । तुका म्हणे साना थोर ॥३॥
2352
धवळलें जगदाकार । आंधार तो निरसला ॥१॥ लपों जातां नाहीं ठाव । प्रगट पा पसारा ॥ध्रु.॥ खरियाचा दिवस आला । वाढी बोला न पुरे ॥२॥ तुका म्हणे जिवें साटीं । पडिली मिठी धुरेसी ॥३॥
2353
धांव कान्होबा गेल्या गाई । न म्हणे मी कोण ही काई ॥१॥ आपुलियांचें वचन देवा । गोड सेवा करीतसे ॥ध्रु.॥ मागतां आधीं द्यावा डाव । बळिया मी तो नाहीं भाव ॥२॥ तुका म्हणे ऐशा सवें । अनुसरावें जीवेंभावें ॥३॥
2354
धांव घालीं आई । आतां पाहातेसी काई ॥१॥ धीर नाहीं माझे पोटीं । जालें वियोगें हिंपुटीं ॥ध्रु.॥ करावें सीतळ । बहु जाली हळहळ ॥२॥ तुका म्हणे डोई । कधीं ठेवीन हे पायीं ॥३॥
2355
धांव धांव गरुडध्वजा । आम्हां अनाथांच्या काजा ॥१॥ बहु जालों कासावीस । म्हणोनि पाहें तुझी वास ॥ध्रु.॥ पाहें पाहें त्या मारगें । कोणी येतें माझ्या लागें ॥२॥ असोनियां ऐसा । तुज सारिखा कोंवसा ॥३॥ न लवावा उशीर । नेणों कां हा केला धीर ॥४॥ तुका म्हणे चाली । नको चालूं धांव घालीं ॥५॥
2356
धांवा केला धांवा । श्रम होऊं नेदी जीवा ॥१॥ वर्षे अमृताच्या धारा । घेई वोसंगा लेंकरा ॥ध्रु.॥ उशीर तो आतां । न करावा हे चिंता ॥२॥ तुका म्हणे त्वरें । वेग करीं विश्वंभरे ॥३॥
2357
धांवा शीघ्रवत । किंवा घ्यावें दंडवत ॥१॥ तुमचा जातो बडिवार । आम्हीं होतों हीनवर ॥ध्रु.॥ न धरावा धीर । धांवा नका चालों स्थिर ॥२॥ तुका म्हणे वाणी । माझी लाजली जी गुणीं ॥३॥
2358
धांवे त्यासी फावे । दुजे उगवूनि गोवे ॥१॥ घ्यावें भरूनियां घर । मग नाहीं येरझार ॥ध्रु.॥ धणी उभें केलें । पुंडलिकें या उगलें ॥२॥ तुका म्हणे ठसा । गेला पडोनियां ऐसा ॥३॥
2359
धांवे माते सोईं । बाळ न विचारितां कांहीं ॥१॥ मग त्याचें जाणें निकें । अंग वोडवी कौतुकें ॥ध्रु.॥ नेणे सर्प दोरी । अगी भलतें हातीं धरी ॥२॥ तीविन तें नेणें । आणीक कांहीं तुका म्हणे ॥३॥
2360
धांवोनियां आलों पहावया मुख । गेलें माझें दुःख जन्मांतरिंचें ॥१॥ ऐकिलें ही होतें तैसें चि पाहिलें । मन स्थिरावलें तुझ्या पायीं ॥२॥ तुका म्हणे माझी इच्छा पूर्ण जाली । कांहीं न राहिली वासना हे ॥३॥
2361
धाई अंतरिंच्या सुखें । काय बडबड वाचा मुखें ॥१॥ विधिनिषेध उर फोडी । जंव नाहीं अनुभवगोडी ॥ध्रु.॥ वाढे तळमळ उभयता । नाहीं देखिलें अनुभवितां ॥२॥ अपुल्या मतें पिसें । परि तें आहे जैसेंतैसें ॥३॥ साधनाची सिद्धि । मोन करा र बुद्धि ॥४॥ तुका म्हणे वादें । वांयां गेलीं ब्रम्हवृंदें ॥५॥
2362
धाकुटयाचे मुखीं घांस घाली माता । वरी करी सत्ता शाहाणियां ॥१॥ ऐसें जाणपणें पडिलें अंतर । वाढे तों तों थोर अंतराय ॥ध्रु.॥ दोन्ही उभयतां आपण चि व्याली । आवडीची चाली भिन्न भिन्न ॥२॥ तुका म्हणे अंगापासूनि निराळें । निवडिलें बळें रडतें स्तनीं ॥३॥
2363
धालें मग पोट । केला गड्यांनी बोभाट ॥१॥ ये रे ये रे नारायणा । बोलों अबोलण्या खुणा ॥ध्रु.॥ खांद्यावरी भार । तीं शिणती बहु फार ॥२॥ तुकयाच्या दातारें । नेलीं सुखी केलीं पोरें ॥३॥
2364
धालों सुखें ढेकर देऊं । उमटे जेवूं तोंवरी ॥१॥ क्रीडा करूं निरांजनीं । न पुरे धणी हरिसवें ॥ध्रु.॥ अवघे खेळों अवघ्यामधीं । डाईं न पडों ऐसी बुद्धी ॥२॥ तुका म्हणे वांचवीत । आम्हां सत्ता समर्थ ॥३॥
2365
धिंदधिंद तुझ्या करीन धिंदड्या । ऐसें काय वेड्या जाणितलें ॥१॥ केली तरी बरें मज भेटी भावास । नाहीं तरि नास आरंभिला ॥ध्रु.॥ मरावें मारावें या आलें प्रसंगा । बरें पांडुरंगा कळलेंसावें ॥२॥ तुकयाबंधु म्हणे तुझी माझी उरी । उडाली न धरीं भीड कांहीं ॥३॥
2366
धिग जिणें त्याचा स्वामी हीन वर । मरण तें बर भलें मग ॥१॥ ऐका जी देवा ऐसी आहे नीत । काय तें उचित सांभाळावें ॥ध्रु.॥ देशोदेशीं धाक जयाच्या उत्तरें । तयाचें कुतरें परि भलें ॥२॥ तुका म्हणे हें कां सुचलें उत्तर । जाणोनि अंतर ओळखावें ॥३॥
2367
धिग जीणें तो बाइले आधीन । परलोक मान नाही दोन्ही ॥१॥ धिग जीणें ज्याचें लोभावरी मन । अतीतपूजन घडे चि ना ॥ध्रु.॥ धिग जीणें आळस निद्रा जया फार । अमित आहार अघोरिया ॥२॥ धिग जीणें नाहीं विवेक वैराग्य । झुरे मानालागीं साधुपणा ॥३॥ तुका म्हणे धिग ऐसे जाले लोक । निंदक वादक नरका जाती ॥४॥
2368
धिग तो दुर्जन नाहीं भूतदया । व्यर्थ तया माया प्रसवली ॥१॥ कठिण हृदय तया चांडाळाचें । नेणे पराचें दुःख कांहीं ॥ध्रु.॥ आपुला का प्राण तैसे सकळ लोक । न करी विवेक पशु जैसा ॥२॥ तुका म्हणे सुखें कापीतसे गळे । आपुलिया वेळे रडतसे ॥३॥
2369
धीर तो कारण एकविधभाव । पतिव्रते नाहो सर्वभावें ॥१॥ चातक हे जळ न पाहाती दृष्टी । वाट पाहे कंठीं प्राण मेघा ॥ध्रु.॥ सूर्यविकाशनी नेघे चंद्रामृत । वाट पाहे अस्तउदयाची ॥२॥ धेनु येऊं नेदी जवळी आणिकां । आपुल्या बाळकाविण वत्सा ॥३॥ तुका म्हणे नेम प्राणांसवेंसाटी । तरी च या गोष्टी विठोबाची ॥४॥
2370
धीर तो कारण साहे होतो नारायण । नेदी होऊं सीण वाहों चिंता दासांसी ॥१॥ सुखें करावें कीर्तन हर्षे गावे हरिचे गुण । वारी सुदर्शन आपण चि किळकाळ ॥ध्रु.॥ जीव वेची माता बाळा जडभारी होतां । तो तों नव्हे दाता प्राकृतां यां सारिखा ॥२॥ हें तों माझ्या अनुभवें अनुभवा आलें जीवें । तुका म्हणे सत्य व्हावें आहाच नये कारणा ॥३॥
2371
धीर नव्हे मनें । काय तयापाशीं उणें ॥१॥ भार घातलियावरी । दासां नुपेक्षील हरी ॥ध्रु.॥ याऐसी आटी । द्यावी द्रव्याचिये साटी ॥२॥ तुका म्हणे पोटें । देवा बहु केलें खोटें ॥३॥
2372
धेनु चरे वनांतरीं । चत्ति बाळकापें घरीं ॥१॥ तैसें करीं वो माझे आईं । ठाव देऊनि राखें पायीं ॥ध्रु.॥ न काढितां तळमळी । जिवनाबाहेर मासोळी ॥२॥ तुका म्हणे कुडी । जीवाप्राणांची आवडी ॥३॥
2373
धोंडएासवें आदळितां फुटे डोकें । तों तों त्याच्या सुखें घामेजेना ॥१॥ इंगळासी सन्निधान अतित्याईं । क्षेम देतां काईं सुख वाटे ॥२॥ तुका म्हणे आम्हांसवें जो रुसला । तयाचा अबोला आकाशासीं ॥३॥
2374
ध्याइन तुझें रूप गाइन तुझें नाम । आणीक न करीं काम जिव्हामुखें ॥१॥ पाहिन तुझे पाय ठेविन तेथें डोय । पृथक तें काय न करीं मनीं ॥ध्रु.॥ तुझे चि गुणवाद आइकेन कानीं । आणिकांची वाणी पुरे आतां ॥२॥ करिन सेवा करीं चालेन मी पायीं । आणीक न वजें ठायीं तुजविण ॥३॥ तुका म्हणे जीव ठेविला तुझ्या पायीं । आणीक तो काईं देऊं कोणा ॥४॥
2375
ध्यानी योगीराज बैसले कपाटीं । लागे पाठोवाटीं तयांचिया ॥१॥ तान भुक त्यांचें राखे शीत उष्ण । जाले उदासीन देहभाव ॥ध्रु.॥ कोण सखें तयां आणीक सोयरें । असे त्यां दुसरें हरीविण ॥२॥ कोण सुख त्यांच्या जीवासि आनंद । नाहीं राज्यमद घडी तयां ॥३॥ तुका म्हणे विष अमृता समान । कृपा नारायण करितां होय ॥४॥
2376
ध्यानीं ध्यातां पंढरिराया । मनासहित पालटे काया ॥१॥ तेथें बोला कैची उरी । माझें मीपण जाला हरि ॥ध्रु.॥ चित्तचैतन्यीं पडतां मिठी । दिसे हरिरूप अवघी सृष्टि ॥२॥ तुका म्हणे सांगों काय । एकाएकीं हरिवृत्तिमय ॥३॥
2377
न करवे धंदा । आइता तोंडीं पडे लोंदा ॥१॥ उठितें तें कुटितें टाळ । अवघा मांडिला कोल्हाळ ॥ध्रु.॥ जिवंत चि मेले । लाजा वाटुनियां प्याले ॥२॥ संसाराकडे । न पाहाती ओस पडे ॥३॥ तळमळती यांच्या रांडा । घालिती जीवा नांवें धोंडा ॥४॥ तुका म्हणे बरें जालें । घे गे बाइले लीहिलें ॥५॥
2378
न करा टांचणी । येथें कांहीं आडचणी ॥१॥ जिव्हा अमुप करी माप । विठ्ठल पिकला माझा बाप ॥२॥ तुका म्हणे सर्वकाळ । अवघा गोविंद गोपाळ ॥३॥
2379
न करावी आतां पोटासाटीं चिंता । आहे त्या संचिता माप लावूं ॥१॥ दृष्टी ते घालावी परमार्थाठायीं । क्षुल्लका उपायीं सिण जाला ॥ध्रु.॥ येथें तंव नाहीं घेइजेसें सवें । कांहीं नये जीवें वेचों मिथ्या ॥२॥ खंडणें चि नव्हे उद्वेग वेरझारीं । बापुडे संसारीं सदा असों ॥३॥ शेवटा पाववी नावेचें बैसनें । भुजाबळें कोणें कष्टी व्हावें ॥४॥ तुका म्हणे आतां सकळांचें सार । करावा व्यापार तरी ऐसा ॥५॥
2380
न करावी चिंता । भय धरावें सर्वथा ॥१॥ दासां साहे नारायण । होय रिक्षता आपण ॥ध्रु.॥ न लगे परिहार । कांहीं योजावें उत्तर ॥२॥ न धरावी शंका । नये बोलों म्हणे तुका ॥३॥
2381
न करावी स्तुति माझी संतजनीं । होईंल या वचनीं अभिमान ॥१॥ भारें भवनदी नुतरवे पार । दुरावती दूर तुमचे पाय ॥२॥ तुका म्हणे गर्व पुरवील पाठी । होईंल माझ्या तुटी विठोबाची ॥३॥
2382
न करि त्याचें गांढेपण । नारायण सद्धि उभा ॥१॥ भवसिंधूचा थडवा केला । बोलाविला पाहिजे ॥ध्रु.॥ याचे सोईं पाउल वेचे । मग कैचे आडथळे ॥२॥ तुका म्हणे खरें खोटें । न म्हणे मोटें लहान ॥३॥
2383
न करीं उदास । माझी पुरवावी आस ॥१॥ ऐका ऐका नारायणा । माझी परिसा विज्ञापना ॥ध्रु.॥ मायबाप बंधुजन । तूं चि सोयरा सज्जन ॥२॥ तुका म्हणे तुजविरहित । माझें कोण करी हित ॥३॥
2384
न करीं तळमळ राहें रे निश्चळ । आहे हा कृपाळ स्वामी माझा ॥१॥ अविनाश सुख देईंल निर्वाणी । चुकतील खाणी चौर्‍याशीच्या ॥ध्रु.॥ आणिकिया जीवां होईंल उद्धार । ते ही उपकार घडती कोटि ॥२॥ आहिक्य परत्रीं होसील सरता । उच्चारीं रे वाचा रामराम ॥३॥ तुका म्हणे सांडीं संसाराचा छंद । मग परमानंद पावसील ॥४॥
2385
न करीं तुमची सेवा । बापुडें मी पण देवा । बोलिलों तो पाववा । पण सिद्धी सकळ ॥१॥ आणीक काय तुम्हां काम । आम्हां नेदा तरी प्रेम । कैसे धर्माधर्म । निश्चयेंसी रहाती ॥ध्रु.॥ आम्हीं वेचलों शरीरें । तुझी बीज पेरा खरें । संयोगाचें बरें । गोड होतें उभयतां ॥३॥ एका हातें टाळी । कोठें वाजते निराळी । जाला तरी बळी । स्वामीविण शोभेना ॥३॥ रूपा यावे जी अनंता । धरीन पुटाची त्या सत्ता । होईंन सरता । संतांमाजी पोसणा ॥४॥ ठेविलें उधारा । वरी काय तो पातेरा । तुका म्हणे बरा । रोकडा चि निवाड ॥५॥
2386
न करीं पठन घोष अक्षरांचा । बीजमंत्र आमुचा पांडुरंग ॥१॥ सर्वकाळ नामचिंतन मानसीं । समाधान मनासी समाधि हे ॥ध्रु.॥ न करीं भ्रमण न रिघें कपाटीं । जाईंन तेथें दाटी वैष्णवांची ॥२॥ अनु नेणें कांहीं न वजें तपासी । नाचें दिंडीपाशीं जागरणीं ॥३॥ उपवास व्रत न करीं पारणें । रामकृष्ण म्हणें नारायण ॥४॥ आणिकांची सेवा स्तुती नेणें वाणूं । तुका म्हणे आणु दुजें नाहीं ॥५॥
2387
न करीं रे मना कांहीं च कल्पना । चिंतीं या चरणां विठोबाच्या ॥१॥ येथें सुखाचिया रासी । पुढें ठाव नाहीं कल्पनेसी॥ध्रु.॥ सुखाचें ओतिलें साजिरें श्रीमुख । शोक मोह दुःख पाहाता नाहीं ॥२॥ तुका म्हणे येथें होईंल विसांवा । तुटतील हांवा पुढिलिया ॥३॥
2388
न करीं रे संग राहें रे निश्चळ । लागों नेदीं मळ ममतेचा ॥१॥ या नांवें अद्वैत खरें ब्रम्हज्ञान । अनुभवावांचून बडबड ते ॥ध्रु.॥ इंद्रियांचा जय वासनेचा क्षय । संकल्पा ही न ये वरी मन ॥२॥ तुका म्हणे न ये जाणीव अंतरा । अंतरीं या थारा आनंदाचा ॥३॥
2389
न कळतां काय करावा उपाय । जेणें राहे भाव तुझ्या पायीं ॥१॥ येऊनियां वास करिसी हृदयीं । ऐसें घडे कई कासयानें ॥ध्रु.॥ साच भावें तुझें चिंतन मानसीं । राहे हें करिसी कैं गा देवा ॥२॥ लटिकें हें माझें करूनियां दुरी । साच तूं अंतरीं येउनि राहें ॥३॥ तुका म्हणे मज राखावें पतिता । आपुलिया सत्ता पांडुरंगा ॥४॥
2390
न कळतां कोणीं मोडियेलें व्रत । तया प्रायिश्चत्त चाले कांहीं ॥१॥ जाणतियां वज्रलेप जाले थोर । तयांस अघोर कुंभपाक ॥ध्रु.॥ आतां जरी कोणी नाइके सांगतां । तया शिकवितां तें चि पाप ॥२॥ काय करूं मज देवें बोलविलें । माझें खोळंबिलें काय होतें ॥३॥ तुका म्हणे जना पाहा विचारूनी । सुख वाटे मनीं तें चि करा ॥४॥
2391
न कळसी ज्ञाना न कळसी ध्याना । न कळेसी दर्शना धुंडाळितां ॥१॥ न कळेसी आगमा न कळेसी निगमा । न बोलवे सीमा वेदां पार ॥२॥ तुका म्हणे तुझा नाहीं अंतपार । म्हणोनि विचार पडिला मज ॥३॥
2392
न कळे जी भक्ती काय करूं सेवा । संकोचोनि देवा राहिलोंसे ॥१॥ जोडोनियां कर राहिलों निवांत । पायांपाशीं चित्त ठेवूनियां ॥ध्रु.॥ दिशाभुली करीं स्थळीं प्रदक्षणा । भ्रमें नारायणा कष्टविलें ॥२॥ तुका म्हणे जालों आज्ञेचा पाळक । जीवनासी एक ठाव केला ॥३॥
2393
न कळे तत्वज्ञान मूढ माझी मती । परि ध्यातों चित्तीं चरणकमळ ॥१॥ आगमाचे भेद मी काय जाणें । काळ तो चिंतनें सारीतसें ॥ध्रु.॥ कांहीं नेणें परि म्हणवितों दास । होइल त्याचा त्यास अभिमान ॥२॥ संसाराची सोय सांडिला मारग । दुराविलें जग एका घायें ॥३॥ मागिल्या लागाचें केलेंसे खंडण । एकाएकीं मन राखियेलें ॥४॥ तुका म्हणे अगा रखुमादेवीवरा । भक्तकरुणाकरा सांभाळावें ॥५॥
2394
न कळे तें कळों येईंल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥१॥ न दिसे तें दिसों येईंल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥ध्रु.॥ न बोलों तें बोलों येईंल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥२॥ न भेटे तें भेटों येईंल आपण । करितां चिंतन विठोबाचें ॥३॥ अलभ्य तो लाभ होईंल अपार । नाम निरंतर म्हणतां वाचे ॥४॥ तुका म्हणे आसक्त जीव सर्वभावें । तरतील नांवें विठोबाच्या ॥५॥
2395
न कळे ब्रम्हज्ञान आचार विचार । लटिका वेव्हार करीतसे ॥१॥ विश्वामित्री पोटीं तयाचा अवतार । नांव महाखर चांडाळाचें ॥ध्रु.॥ द्रव्यइच्छेसाटीं करीतसे कथा । काय त्या पापिष्ठा न मिळे खाया ॥२॥ पोट पोसावया तोंडें बडबडी । नाहीं धडफुडी एक गोष्टी ॥३॥ तुका म्हणे तया काय व्याली रांड । येउनिया भंड जनामध्यें ॥४॥
2396
न कळे महिमा वेद मोनावले । जेथें पांगुळले मनपवन ॥१॥ चंद्र सूर्य ज्याचें तेज वागविती । तेथें माझी मती कोणीकडे ॥ध्रु.॥ काय म्यां वाणावें तुझ्या थोरपणा । सहस्रवदना वर्णवेना ॥२॥ तुका म्हणे आम्ही बाळ तूं माउली । कृपेची साउली करीं देवा ॥३॥
2397
न कळे माव मुनि मागे एकी अंतुरी । साठी संवत्सरां जन्म तया उदरीं ॥१॥ कैसा आकळे गे माये चपळ वो । त्रिभुवनव्यापक सकळ वो ॥ध्रु.॥ हनुमंता भेटी गर्व हरिला दोहींचा । गरुडा विटंबना रूपा सत्यभामेच्या ॥२॥ द्रौपदीचा भेद पुरविला समयीं । ॠषि फळवनीं देंठीं लावितां ठायीं ॥३॥ अर्जुनाच्या रथीं कपि स्तंभीं ठेविला । दोहीं पैज तेथें गर्व हरी दादुला ॥४॥ भावभक्ती सत्वगुण जाला दुर्जना । तुका म्हणे सकळां छंदें खेळे आपण ॥५॥
2398
न गमे न गमे न गमे हरिविण । न मगे न मगे न मगे मेळवा शाम कोणी गे ॥१॥ तळमळ करी तैसा जीव जळाविण मासा । दिसती दिशा ओसा वो ॥ध्रु.॥ नाठवे भूक तान विकळ जालें मन । घडी जाय प्रमाण जुगा एकी वो ॥२॥ जरी तुम्ही नोळखा सांगतें ऐका । तुकयाबंधूचा सखा जगजीवन ॥३॥
2399
न गमेसी जाली दिवसरजनी । राहिलों लाजोनि नो बोलावें ॥१॥ रुचिविण काय शब्द वार्‍या माप । अनादरें कोप येत असे ॥ध्रु.॥ आपुलिया रडे आपुलें चि मन । दाटे समाधान पावतसें ॥२॥ तुका म्हणे तुम्ही असा जी जाणते । काय करूं रिते वादावाद ॥३॥
2400
न घडे मायबापें बाळकाचा घात । आपणादेखत होऊं नेदी ॥१॥ कां मी मनीं चिंता वाहूं भय धाक । काय नव्हे एक करितां तुज ॥ध्रु.॥ वर्म जाणे त्याच्या हिताचे उपाय । तान भूक वाहे कडिये खांदीं ॥२॥ तुका म्हणे तूं गा कृपावंत भारी । ऐसें मज हरी कळों आलें ॥३॥
2401
न चलवे पंथ वेच नसतां पालवीं । शरीर विटंबिलें वाटे भीक मागावी ॥१॥ न करीं रे तैसें आपआपणां । नित्य राम राम तुम्ही सकळ म्हणा ॥ध्रु.॥ राम म्हणवितां रांडा पोरें निरविशी । पडसी यमा हांतीं जाचविती चौर्‍याशी ॥२॥ मुखीं नाहीं राम तो ही आत्महत्यारा । तुका म्हणे लाज नाहीं तया गंव्हारा ॥३॥
2402
न देखवे डोळां ऐसा हा आकांत । परपीडे चित्त दुःखी होतें ॥१॥ काय तुम्ही येथें नसालसें जालें । आम्हीं न देखिलें पाहिजे हें ॥ध्रु.॥ परचक्र कोठें हरिदासांच्या वासें । न देखिजेत देशें राहातिया ॥२॥ तुका म्हणे माझी लाजविली सेवा । हीनपणें देवा जिणें जालें ॥३॥
2403
न देखिजे ऐसें केलें । या विठ्ठलें दुःखासी ॥१॥ कृपेचिये सिंव्हासनीं । अधिष्ठानीं बैसविलें ॥ध्रु.॥ वाजता तो नलगे वारा । क्षीरसागरा शयनीं ॥२॥ तुका म्हणें अवघें ठायीं । मज पायीं राखिलें ॥३॥
2404
न देखें न बोलें नाइकें आणीक । बैसला हा एक हरि चित्तीं ॥१॥ सासुरें माहेर मज नाहीं कोणी । एक केलें दोन्ही मिळोनियां ॥२॥ आळ आला होता आम्ही भांडखोरी । तुका म्हणे खरी केली मात ॥३॥
2405
न देखोन कांहीं । म्या पाहिलें सकळ ही ॥१॥ जालों अवघियांपरी । मी हें माझें ठेलें दुरी ॥ध्रु.॥ न घेतां घेतलें । हातें पायें उसंतिलें ॥२॥ खादलें न खातां । रसना रस जाली घेतां ॥३॥ न बोलोनि बोलें । केलें प्रगट झांकिलें ॥४॥ नाइकिलें कानीं । तुका म्हणे आलें मनीं ॥५॥ ब्रम्हचारी फिर्याद गेला - अभंग २
2406
न धरी प्रतिष्ठा कोणाची यम । म्हणतां कां रे राम लाजा झणी ॥१॥ सांपडे हातींचें सोडवील काळा । तो कां वेळोवेळां नये वाचे ॥ध्रु.॥ कोण लोक जो हा सुटला तो एक । गेले कुंभपाक रवरवांत ॥२॥ तुका म्हणे हित तों म्हणा विठ्ठल । न म्हणे तो भोगील कळेल तें ॥३॥
2407
न पडो आतां हाडीं घाव । मध्यें कींव नासक ॥१॥ करविली आत्महत्या । जीवा कां द्वंदाचा ॥ध्रु.॥ आशापाशीं गुंतला गळा । तेणें कळाहीन जालों ॥२॥ तुका म्हणे लावूं मुळी । जीवकुळी थोरेसी ॥३॥
2408
न पवीजे तया ठाया । आलों कायाक्लेशेसीं ॥१॥ आतां माझें आणीं मना । नारायणा ओजेचें ॥ध्रु.॥ बहु रिणें पिडिलों फार । परिहार करावा ॥२॥ तुका म्हणे निर्बळशक्ति । काकुलती म्हुण येतों ॥३॥
2409
न पवे सन्निध वाटते चिंता । वरि या बहुतांची सत्ता । नुगवे पडत जातो गुंता । कर्मा बळिवंता सांपडलों ॥१॥ बहु भार पडियेला शिरीं । मी हें माझें मजवरी । उघड्या नागविलों चोरीं । घरिच्याघरीं जाणजाणतां ॥ध्रु.॥ तुज मागणें इतुलें आतां । मज या निरवावें संतां । जाला कंठस्फोट आळवितां । उदास आतां न करावें ॥२॥ अति हा निकट समय । मग म्यां करावें तें काय । दिवस गेलिया टाकईल छाय । उरईल हाय रातिकाळीं ॥३॥ होईल संचिताची सत्ता । अंगा येईल पराधीनता । ठाव तो न दिसे लपतां । बहुत चिंता प्रवर्तली ॥४॥ ऐसी या संकटाची संधी । धांव घालावी कृपानिधी । तुका म्हणे माझी बळबुद्धी । सकळ सिद्धी पाय तुझे ॥५॥
2410
न पालटे एक । भोळा भक्त चि भाविक ॥१॥ येरां नास आहे पुढें । पुण्य सरतां उघडें ॥ध्रु.॥ नेणे गर्भवास । एक विष्णूचा चि दास ॥२॥ तुका म्हणे खरें । नाम विठोबाचे बरें ॥३॥ ॥ स्वामींनीं पत्र पंढरीनाथास पंढरीस पाठविलें ते अभंग ॥ ६६ ॥ संतांबरोबर पाठविल्या पत्राचे अभंग ३६
2411
न पालटे जाती जीवाचिये साटीं । बाहे तें चि पोटीं दावी वरी ॥१॥ अंतरीं सबाहीं सारिखा चि रंग । वीट आणि भंग नाहीं रसा ॥ध्रु.॥ घणाचिया घायें पोटीं शिरे हिरा । सांडूं नेणे धीरा आपुलिया ॥२॥ तुका म्हणे कढे करावी शीतळ । ऐसें जातिबळ चंदनाचें ॥३॥
2412
न पाहें माघारें आतां परतोनि । संसारापासूनि विटला जीव ॥१॥ सामोरें येऊनि कवळीं दातारा । काळाचा हाकारा न साहावे ॥ध्रु.॥ सावधान चित्त होईंल आधारें । खेळतां ही बरें वाटईंल ॥२॥ तुका म्हणे कंठ दाटला या सोसें । न पवे कैसें जवळी हें ॥३॥
2413
न पूजीं आणिकां देवां न करीं त्यांची सेवा । न मनीं या केशवाविण दुजें ॥१॥ काय उणें जालें मज तयापायीं । तें मी मागों काई कवणासी ॥ध्रु.॥ आणिकाची कीर्ती नाइकें न बोलें । चाड या विठ्ठलेंविण नाहीं ॥२॥ न पाहें लोचनीं श्रीमुखावांचूनि । पंढरी सांडूनि न वजें कोठें ॥३॥ न करीं कांहीं आस मुक्तीचे सायास । न भें संसारास येतां जातां ॥४॥ तुका म्हणे कांहीं व्हावें ऐसें जीवा । नाहीं या केशवाविण दुजें ॥५॥
2414
न बैससी खालीं । सम उभा च पाउलीं ॥१॥ ऐसे जाले बहुत दिस । जालीं युगें अठ्ठाविस ॥ध्रु.॥ नाहीं भाग सीण । अराणूक एक क्षण ॥२॥ तुका म्हणे किती । मापें केलीं देती घेती ॥३॥
2415
न बोलतां तुम्हां कळों न ये गुज । म्हणउनी लाज सांडियेली ॥१॥ आतां तुम्हां पुढें जोडीतसें हात । नका कोणी अंत पाहों माझा ॥२॥ तुका म्हणे आम्ही बैसलों शेजारीं । करील तें हरी पाहों आतां ॥३॥
2416
न बोलसी तें ही कळलें देवा । लाजसी आपुलिया नांवा । तुज मी नाहीं घालीत गोवा । भीड केशवा कासयाची ॥१॥ उतरीं आपुला हा पार । मजशीं बोलोनि उत्तर । माझा तुज नव्हे अंगीकार । मग विचार करीन मी ॥२॥ दात्या आणि मागत्यासी । धर्मनीति तरी बोलिली ऐसी । यथानशक्ति टाकेल तैसी । बाधी दोघांसी विन्मुखता ॥३॥ म्हणोनि करितों मी आस । तुझिया वचनाची वास । धीर हा करूनि सायास । न टळें नेमास आपुलिया ॥४॥ तुझें म्यां घेतल्या वांचून । न वजें एथूनि वचन । हा चि माझा नेम सत्य जाण । आहे नाहीं म्हणे तुका म्हणे ॥५॥
2417
न बोलावें परी पडिला प्रसंग । हाकलितें जग तुझ्या नामें ॥१॥ लटिकें चि सोंग मांडिला पसारा । भिकारी तूं खरा कळों आलें ॥ध्रु.॥ निलाजिरीं आम्ही करोनियां धीर । राहिलों आधार धरूनियां ॥२॥ कैसा नेणों आतां करिसी शेवट । केली कटकट त्याची पुढें॥३॥ तुका म्हणे कांहीं न बोलसी देवा । उचित हे सेवा घेसी माझी ॥४॥
2418
न बोलेसी करा वाचा । उपाधीचा संबंध ॥१॥ एका तुमच्या नामाविण । अवघा सीण कळतसे ॥ध्रु.॥ संकल्पाचे ओढी मन । पापपुण्य सम चि ॥२॥ तुका म्हणे नारायणीं । पावो वाणी विसांवा ॥३॥
2419
न मनावी चिंता । कांहीं माझेविशीं आतां ॥१॥ ज्याणें लौकिक हा केला । तो हें निवारिता भला ॥ध्रु.॥ माझे इच्छे काय । होणार ते एक ठाय ॥२॥ सुखा आणि दुःखा । म्हणे वेगळा मी तुका ॥३॥
2420
न मनावी चिंता तुम्हीं संतजनीं । हिरा स्पटिकमणी केंवि होय ॥१॥ पडिला प्रसंग स्तळा त्या सारिखा । देखिला पारिखा भाव कांहीं ॥ध्रु.॥ बहुतांसी भय एकाचिया दंडें । बहुत या तोंडें वचनासी ॥२॥ तुका म्हणे नाहीं वैखरी बा सर । करायाचे चार वेडे वेडे ॥३॥
2421
न मनावें तैसें गुरूचें वचन । जेणें नारायण अंतरे तें । आड आला म्हुन फोडियेला डोळा । बिळनें आंधळा शुक्र केला ॥१॥ करी देव तरी काय नव्हे एक । कां तुम्ही पृथक सिणा वांयां ॥ध्रु.॥ उलंघुनि भ्रताराची आज्ञा । अन्न ॠषिपत्न्या घेउनि गेल्या । अवघे चि त्यांचें देवें केलें काज । धर्म आणि लाज राखियेली ॥२॥ पितियासी पुत्रें केला वैराकार । प्रल्हादें असुर मारविला । बहुत विघ्नें केलीं तया आड । परि नाहीं कैवाड सांडियेला ॥३॥ गौळणी करिती देवाशीं व्यभिचार । सांडुनी आचार भ्रष्ट होती । तयां दिलें ते कोणासी नाहीं । अवघा अंतर्बाहीं तो चि जाला ॥४॥ देव जोडे ते करावे अधर्म । अंतरे तें कर्म नाचरावें । तुका म्हणे हा जाणतो कळवळा । म्हणोनि अजामेळा उद्धरिलें ॥५॥
2422
न मनीं ते ज्ञानी न मनीं ते पंडित । ऐसे परीचे एकएका भावें ॥१॥ धातू पोसोनियां आणिकां उपदेश । अंतरीं तो लेश प्रेम नाहीं ॥ध्रु.॥ न मनीं ते योगी न मनीं ते हरिदास । दर्शनें बहुवस बहुतां परीचीं ॥२॥ तुका म्हणे तयां नमन बाह्यात्कारी । आवडती परी चत्तिशुद्धीचे ॥३॥
2423
न मिळती एका एक । जये नगरीचे लोक ॥१॥ भलीं तेथें राहूं नये । क्षणें होईंल न कळे काय ॥ध्रु.॥ न करितां अन्याय । बळें करी अपाय ॥२॥ नाहीं पुराणाची प्रीति । ठायींठायीं पंचाइती ॥३॥ भल्या बुर्‍या मारी । होतां कोणी न निवारी ॥४॥ अविचार्‍या हातीं । देऊनि प्रजा नागविती ॥५॥ तुका म्हणे दरी । सुखें सेवावी ते बरी ॥६॥
2424
न मिळो खावया न वाढो संतान । परि हा नारायण कृपा करो ॥१॥ ऐसी माझी वाचा मज उपदेशी । आणीक लोकांसी हें चि सांगे ॥ध्रु.॥ विटंबो शरीर होत कां विपित्त । परि राहो चित्तीं नारायण ॥२॥ तुका म्हणे नासिवंत हें सकळ । आठवे गोपाळ तें चि हित ॥३॥
2425
न म्हणे कवणां सद्धि साधक गंव्हार । अवघा विश्वंभर वांचूनियां ॥१॥ ऐसें माझे बुद्धि काया वाचा मन । लावीं तुझें ध्यान पांडुरंगा ॥ध्रु.॥ गातां प्रेमगुण शंका माझ्या मनीं । नाचतां रंगणीं नाठवावी ॥२॥ देई चरणसेवा भूतांचें भजन । वर्णा अभिमान सांडवूनि ॥३॥ आशापाश माझी तोडीं माया चिंता । तुजविण वेथा नको कांहीं ॥४॥ तुका म्हणे सर्व भाव तुझे पायीं । राहे ऐसें देई प्रेम देवा ॥५॥
2426
न म्हणे वो आम्ही आपुलेनि चित्ती । निःशेष अतिप्रीति विषयीं तो ॥१॥ खोटा तो विटाळ । म्हणोनि गाबाळ सांडियेले ॥ध्रु.॥ भांगतमाखूचा चित्ताचा आदर । कोरडें उत्तर चाटावें तें ॥२॥ तुका म्हणे आम्ही नव्हों फजितखोर । तुटीचा व्यापार करावया ॥३॥
2427
न म्हणे साना थोर । दृष्ट पापी अथवा चोर ॥१॥ सकळा द्यावी एकी चवी । तान हरूनि निववी ॥ध्रु.॥ न म्हणे दिवस राती । सर्व काल सर्वां भूतीं ॥२॥ तुका म्हणे झारी । घेतां तांब्यानें खापरी ॥३॥
2428
न ये नेत्रां जळ । नाहीं अंतरीं कळवळ ॥१॥ तों हे चावटीचे बोल । जन रंजवणें फोल ॥ध्रु.॥ न फळे उत्तर । नाहीं स्वामी जों सादर ॥२॥ तुका म्हणे भेटी । जंव नाहीं दृष्टादृष्टी ॥३॥
2429
न राहे क्षण एक वैकुंठीं । क्षीरसागरीं त्रिपुटी । जाय तेथें दाटी । वैष्णवांची धांवोनि ॥१॥ भाविक गे माये भोळें गुणाचें । आवडे तयाचें नाम घेतां तयासी ॥ध्रु.॥ जो नातुडे कवणिये परी । तपें दानें व्रतें थोरी । म्हणतां वाचे हरि । राम कृष्ण गोविंदा ॥२॥ चौदा भुवनें जया पोटीं । तो राहे भक्तांचिये कंठीं । करूनियां साटी। चत्ति प्रेम दोहींची ॥३॥ जया रूप ना आकार । धरी नाना अवतार । घेतलीं हजार । नांवें ठेवूनि आपणां ॥४॥ ऐसा भक्तांचा ॠणी । पाहातां आगमीं पुराणीं । नाहीं तुका म्हणे ध्यानीं । तो कीर्तनीं नाचतसे ॥५॥
2430
न राहे रसना बोलतां आवडी । पायीं दिली बुडी माझ्या मनें ॥१॥ मानेल त्या तुम्ही अइका स्वभावें । मी तों माझ्याभावें अनुसरलें ॥२॥ तुका म्हणे तुम्हीं फिरावें बहुतीं । माझी तों हे गती जाली आतां ॥३॥
2431
न लगती मज शब्दब्रम्हज्ञान । तुझिया दर्शनावांचूनियां ॥१॥ म्हणऊनि तुझें करितों चिंतन । नावडे वचन आणिकांचें ॥ध्रु.॥ काय ते महत्वी करावी मान्यता । तुज न देखतां पांडुरंगा ॥२॥ तुका म्हणे तुज दिधल्यावांचूनि । न राहे त्याहूनि होइन वेडा ॥३॥
2432
न लगावी दिठी । माझी तुझे मुखवटी ॥१॥ आधीं पाउलें पाउलें । ते मी पाहेन तें भलें ॥ध्रु.॥ देईन हे काया । वरि सांडणें सांडाया ॥२॥ तुका म्हणे देवा । बहु आवडसी जीवा ॥३॥
2433
न लगे चंदना सांगावा परिमळ । वनस्पतिमेळ हाकारुनी ॥१॥ अंतरीचें धांवे स्वभावें बाहेरी । धरितां ही परी आवरे ना ॥ध्रु.॥ सूर्य नाहीं जागें करीत या जना । प्रकाश किरणा कर म्हुन ॥२॥ तुका म्हणे मेघ नाचवी मयूरें । लपवितां खरें येत नाहीं ॥३॥
2434
न लगे चिंता आतां अन्मोन हाता । आलें मूळ भ्राता गेला त्याचें ॥१॥ घरभेद्या येथें आहे तें सुकानु । धरितों कवळून पाय दोन्ही ॥ध्रु.॥ त्याचें त्याचिया मुखें पडिलें ठावें । न लगे सारावें मागें पुढें ॥२॥ तुकयाबंधु म्हणे करील भेटी भावा । सोडीन तेधवां या विठ्ठला ॥३॥
2435
न लगे देवा तुझें आम्हांसी वैकुंठ । सायुज्याचा पट न लगे मज ॥१॥ देई तुझें नाम मज सर्वकाळीं । मागेन वनमाळीहें चि तुज ॥ध्रु.॥ नारद तुंबर उद्धव प्रल्हाद । बळी रुक्मांगद नाम ध्याती ॥२॥ सद्धि मुनिगण गंधर्व किन्नर । करिताती गजर रामनामें ॥३॥ तुका म्हणे हरी देई तुझें नाम । अखंडित प्रेम हें चि द्यावें ॥४॥
2436
न लगे देशकाळ । मंत्रविधानें सकळ । मनें चि निश्चळ । करूनि करुणा भाकावी ॥१॥ येतो बैसलिया ठाया । आसणें व्यापी देवराया । निर्मळ ते काया । अधिष्ठान तयाचें ॥ध्रु.॥ कल्पनेचा साक्षी । तरि आदरें चि लक्षी । आवडीनें भक्षी । कोरडें धान्य मटमटां ॥२॥ घेणें तरि भाव । लक्षी दासांचा उपाव । तुका म्हणे जीव । जीवीं मेळविल अनंत ॥३॥
2437
न लगे द्यावा जीव सहज चि जाणार । आहे तो विचार जाणा कांहीं ॥१॥ मरण जो मागे गाढवाचा बाळ । बोलिजे चांडाळ शुद्ध त्यासी ॥२॥ तुका म्हणे कई होईंल स्वहित । निधान जो थीत टाकुं पाहे ॥३॥
2438
न लगे पाहावें अबद्ध वांकडें । उच्चारावें कोडें नाम तुझें ॥१॥ नाहीं वेळ नाहीं पंडितांचा धाक । होत कां वाचक वेदवक्ते ॥ध्रु.॥ पुराणीं ही कोठें न मिळे पाहातां । तैशीं या अनंता ठेवूं नामें ॥२॥ आपुलिया मना उपजे आनंद । तैसे करूं छंद कथेकाळीं ॥३॥ तुका म्हणे आम्ही आनंदें चि धालों । आनंद चि ल्यालों अळंकार ॥४॥
2439
न लगे मरावें । ऐसा ठाव दिला देवें ॥१॥ माझ्या उपकारासाटीं । वागविला म्हुण कंठीं ॥ध्रु.॥ घरीं दिला ठाव । अवघा सकळ ही वाव ॥२॥ तुका म्हणे एके ठायीं । कोठें माझें तुझें नाहीं ॥३॥
2440
न लगे मायेसी बाळें निरवावें । आपुल्या स्वभावें ओढे त्यासी ॥१॥ मज कां लागला करणें विचार । ज्याचा जार भार त्याचे मायां ॥ध्रु.॥ गोड धड त्यासी ठेवी न मगतां । समाधान खातां नेदी मना ॥२॥ खेळतां गुंतलें उमगूनी आणी । बैसोनियां स्तनीं लावी बळें ॥३॥ त्याच्या दुःखेंपणें आपण खापरीं । लाही तळीं वरी होय जैसी ॥४॥ तुका म्हणे देह विसरे आपुला । आघात तो त्याला लागों नेदी ॥५॥
2441
न लगे हें मज तुझें ब्रम्हज्ञान । गोजिरें सगुण रूप पुरे ॥१॥ लागला उशीर पतितपावना । विसरोनि वचना गेलासि या ॥ध्रु.॥ जाळोनि संसार बैसलों अंगणीं । तुझे नाहीं मनीं मानसीं तें ॥२॥ तुका म्हणे नको रागेजों विठ्ठला । उठीं देई मला भेटी आतां ॥३॥
2442
न वजावा तो काळ वांयां । मुख्य दया हे देवा ॥१॥ म्हणऊनि जैसें तैसें । रहणी असें पायांचे ॥ध्रु.॥ मोकळें हे मन कष्ट । करी नष्ट दुर्जन ॥२॥ तुका म्हणे कांहीं नेणें । न वजें येणेंपरी वांयां ॥३॥
2443
न वजे वांयां कांहीं ऐकतां हरिकथा । आपण करितां वांयां न वजे ॥१॥ न वजे वांयां कांहीं देवळासी जातां । देवासी पूजितां वांयां न वजे ॥ध्रु.॥ न वजे वांयां कांहीं केलिया तीर्थ । अथवा कां व्रत वांयां न वजे ॥२॥ न वजे वांयां जालें संतांचें दर्शन । शुद्ध आचरण वांयां न वजे ॥३॥ तुका म्हणे भाव असतां नसतां । सायास करितां वांयां न वजे ॥४॥
2444
न विचारितां ठायाठाव । काय भुंके तो गाढव ॥१॥ केला तैसा लाहे दंड । खळ अविचारी लंड ॥ध्रु.॥ करावें लाताळें । ऐसें नेणे कोण्या काळें ॥२॥ न कळे उचित । तुका म्हणे नीत हित ॥३॥
2445
न व्हावें तें जालें । तुम्हां आम्हांसी लागलें ॥१॥ आतां हालमाकलमें । भांडोनियां काढूं वर्में ॥ध्रु.॥ पाटोळ्यासवेंसाटी । दिली रगट्याची गांठी ॥२॥ तुका म्हणे हरी । आणूनियां करिन सरी ॥३॥
2446
न व्हावें तें जालें देखियेले पाय । आतां फिरूं काय मागें देवा ॥१॥ बहु दिस होतों करीत हे आस । तें आलें सायासें फळ आजि ॥ध्रु.॥ कोठवरि जिणें संसाराच्या आशा । उगवो हा फांसा येथूनियां ॥२॥ बुडालीं तयांचा मूळ ना मारग । लागे तो लाग सांडूनियां ॥३॥ पुढें उलंघितां दुःखाचे डोंगर । नाहीं अंतपार गर्भवासा ॥४॥ तुका म्हणे कास धरीन पीतांबरीं । तूं भवसागरीं तारूं देवा ॥५॥
2447
न संगतां तुम्हां कळों येतें अंतर । विश्वीं विश्वंभर परिहार चि न लगे ॥१॥ परि हे अनावर आवरितां आवडी । अवसान ते घडी पुरों देत नाहीं ॥ध्रु.॥ काय उणें मज येथें ठेविलिये ठायीं । पोटा आलों तईपासूनिया समर्थ ॥२॥ तुका म्हणे अवघी आवरिली वासना । आतां नारायणा दुसरियापासूनि ॥३॥
2448
न संगावें वर्म । जनीं असों द्यावा भ्रम ॥१॥ उगींच लागतील पाठीं । होतीं रितीं च हिंपुटीं ॥ध्रु.॥ सिकविल्या गोटी । शिकोनि धरितील पोटीं ॥२॥ तुका म्हणे सीण । होइल अनुभवाविण ॥३॥
2449
न संडवे अन्न । मज न सेववे वन ॥१॥ म्हणउनी नारायणा । कींव भाकितों करुणा ॥ध्रु.॥ नाहीं अधिकार । कांहीं घोकाया अक्षर ॥२॥ तुका म्हणे थोडें । आयुष्य अवघें चि कोडें ॥३॥
2450
न संडावा आतां ऐसें वाटे ठाव । भयाशी उपाव रक्षणाचा ॥१॥ म्हणऊनि मनें वळियेलें मन । कारियेकारण चाड नाहीं ॥ध्रु.॥ नाना वीचि उपाधि करूनियां मूळ । राखतां विटाळ तें चि व्हावें ॥२॥ तुका म्हणे येथें न वेचे वचन । निजीं निजखूण सांपडली ॥३॥
2451
न संडावा ठाव । ऐसा निश्चयाचा भाव ॥१॥ आतां पुरे पुन्हा यात्रा । हें चि सारूनि सर्वत्रा ॥ध्रु.॥ संनिध चि सेवा । असों करुनियां देवा ॥२॥ आज्ञेच्या पाळणें । असें तुका संतां म्हणे ॥३॥
2452
न संडी अवगुण । वर्में मानीतसे सिण ॥१॥ भोग देतां करिती काई । फुटतां यमदंडें डोई ॥ध्रु.॥ पापपुण्यझाडा । देतां तेथें मोटी पीडा ॥२॥ तुका म्हणे बोला । माझ्या सिणती विठ्ठला ॥३॥
2453
न सरे भांडार । भरलें वेचितां अपार ॥१॥ मवित्याचें पोट भरे । पुढिलासी पुढें उरे ॥ध्रु.॥ कारणापुरता लाहो आपुलाल्या हिता ॥२॥ तुका म्हणे देवा । पुढें केला चाले हेवा ॥३॥
2454
न सरे लुटितां मागें बहुतां जनीं । जुनाट हे खाणी उघडिली ॥१॥ सद्धि महामुनि साधक संपन्न । तिहीं हें जतन केलें होतें ॥ध्रु.॥ पायाळाच्या गुणें पडिलें ठाउकें । जगा पुंडलिकें दाखविलें ॥२॥ तुका म्हणे येथें होतों मी दुबळें । आलें या कपाळें थोडें बहु ॥३॥
2455
न सोडीं न सोडीं न सोडीं । विठोबा चरण न सोडीं ॥१॥ भलतें जड पडो भारी । जीवावरी आगोज ॥ध्रु.॥ शतखंड देह शस्त्रधारी । करितां परी न भीयें ॥२॥ तुका म्हणे केली आधीं । दृढ बुद्धी सावध ॥३॥
2456
नका कांहीं उपचार माझ्या शरीरा । करूं न साहती बहु होतो उबारा । मनोजन्य व्यथा वेध जाला अंतरा । लवकरी आणा नंदाचिया कुमरा ॥१॥ सखिया वेशिया तुम्ही प्राणवल्लभा । निवेदिला भाव आर्तभूत या लोभा । उमटली अंगीं वो सांवळी प्रभा । साच हे अवस्था कळे मज माझ्या क्षोभा ॥ध्रु.॥ नये कळों नेदावी हे दुजियासि मात । घडावा तयासि उत्कंठा एकांत । एकाएकीं साक्षी येथें आपुलें चित्त । कोण्या काळें होइल नेणों भाग्य उदित वो ॥२॥ स्वाद सीण देहभान निद्रा खंडन । पाहिले तटस्थ उन्मळित लोचन । अवघें वोसाऊन उरले ते चरण । तुका म्हणे दर्शनापें आलें जीवन ॥३॥
2457
नका घालूं दुध जयामध्यें सार । ताकाचे उपकार तरी करा ॥१॥ नेदा तरी हें हो नका देऊं अन्न । फुकाचें जीवन तरी पाजा ॥२॥ तुका म्हणे मज सगुणाची चाड । पुरवा कोणी कोड दुर्बळाचें ॥३॥ उतराधिपदें - २२
2458
नका दंतकथा येथें सांगों कोणी । कोरडे ते मानी बोल कोण ॥१॥ अनुभव येथें व्हावा शिष्टाचार । न चलती चार आम्हांपुढें ॥ध्रु.॥ निवडी वेगळें क्षीर आणि पाणी । राजहंस दोन्ही वेगळालीं ॥२॥ तुका म्हणे येथें पाहिजे जातीचें । येरा गाबाळाचें काय काम ॥३॥
2459
नका धरूं कोणी । राग वचनाचा मनीं ॥१॥ येथें बहुतांचें हित । शुद्ध करोनि राखा चित्ती ॥ध्रु.॥ नाहीं केली निंदा । आम्हीं दुसिलेंसे भेदा ॥२॥ तुका म्हणे मज । येणें विण काय काज ॥३॥
2460
नका मजपाशीं । वदो प्रपंचाचे विशीं ॥१॥ आतां नाइकावी कानीं । मज देवाविण वाणी ॥ध्रु.॥ येऊनियां रूपा । कोण पाहे पुण्यपापा ॥२॥ मागे आजिवरी । जालें माप नेलें चोरी ॥३॥ सांडियेलीं पानें । पुढें पिका अवलोकन ॥४॥ पडों नेदी तुका । आड गुंपूं कांहीं चुका ॥५॥
2461
नका वांटूं मन विधिनिषेधांसी । स्मरावा मानसीं पांडुरंग ॥१॥ खादलिया अन्ना मासी बोलों नये । अवघें चि जाये एका घांसें ॥ध्रु.॥ जोडी होते परी ते बहु कठिण । करितां जतन सांभाळावें ॥२॥ तुका म्हणें येथें न मना विषाद । निंबेंविण व्याध तुटों नये ॥३॥
2462
नको आतां पुसों कांहीं । लवलाहीं उसंती ॥१॥ जाय वेगीं पंढरपुरा । तो सोयरा दीनांचा ॥ध्रु.॥ वचनाचा न करीं गोवा । रिघें देवासीं शरण ॥२॥ तुका म्हणे कृपावंता । बहु चिंता दीनाची ॥३॥
2463
नको आम्हांसवें गोपाळा । येऊं ओढाळा तुझ्या गाई ॥१॥ कोण धांवें त्यांच्या लागें । मागें मागें येरझारी ॥ध्रु.॥ न बैसती एके ठायीं । धांवती दाही दाहा वाटां ॥२॥ तुका म्हणे तू राख मनेरी । मग त्या येरी आम्ही जाणों ॥३॥
2464
नको ऐसें जालें अन्न । भूक तान ते गेली ॥१॥ गोविंदाची आवडी जीवा । करीन सेवा धणीवरी ॥ध्रु.॥ राहिलें तें राहो काम । सकळ धर्म देहीचे ॥२॥ देह घरिला त्याचें फळ । आणीक काळ धन्य हा ॥३॥ जाऊं नेदीं करितां सोस । क्षेमा दोष करवीन ॥४॥ तुका म्हणे या च पाठी । आता साटी जीवाची ॥५॥
2465
नको कांहीं पडों ग्रंथाचे भरीं । शीघ व्रत करीं हें चि एक ॥१॥ देवाचिये चाडे आळवावें देवा । ओस देहभावा पाडोनियां ॥ध्रु.॥ साधनें घालिती काळाचिये मुखी । गर्भवास सेकीं न चुकती ॥२॥ उधाराचा मोक्ष होय नव्हे ऐसा । पतनासी इच्छा आवश्यक ॥३॥ रोकडी पातली अंगसंगें जरा । आतां उजगरा कोठवरि ॥४॥ तुका म्हणे घालीं नामासाठी उडी । पांडुरंग थडी पाववील ॥५॥
2466
नको घालूं झांसां । मना उपाधिवोळसा ॥१॥ जे जे वाहावे संकल्प । पुण्य तरी ते चि पाप ॥ध्रु.॥ उपजतो भेव । होतो कासावीस जीव ॥२॥ तुका म्हणे पाहों । होइल तें निवांत राहों ॥३॥
2467
नको दुष्टसंग । पडे भजनामधीं भंग ॥१॥ काय विचार देखिला । सांग माझा तो विठ्ठला ॥ध्रु.॥ तुज निषेधितां । मज न साहे सर्वथा ॥२॥ एका माझ्या जीवें । वाद करूं कोणासवें ॥३॥ तुझे वणूप गुण । कीं हे राखों दुष्टजन ॥४॥ काय करूं एका । मुखें सांग म्हणे तुका ॥५॥
2468
नको देऊं देवा पोटीं हें संतान । मायाजाळें जाण नाठवसी ॥१॥ नको देऊं देवा द्रव्य आणि भाग्य । तो एक उद्वेग होय जीवा ॥२॥ तुका म्हणे करीं फकिराचे परी । रात्रदिवस हरि येइल घरा ॥३॥
2469
नको धरूं आस व्हावें या बाळांस । निर्माण तें त्यांस त्यांचें आहे ॥१॥ आपुला तूं गळा घेई उगवूनि । चुकवीं जाचणी गर्भवास ॥ध्रु.॥ अवेज देखोनि बांधितील गळा । म्हणोनि निराळा पळतुसें ॥२॥ देखोनियां त्यांचा अवघड मार । कांपे थरथर जीव माझा ॥३॥ तुका म्हणे जरी आहे माझी चाड । तरी करीं वाड चित्ति आतां ॥४॥
2470
नको नको मना गुंतूं मायाजाळीं । काळ आला जवळी ग्रासावया ॥१॥ काळाची हे उडी पडेल बा जेव्हां । सोडविना तेव्हां मायबाप ॥ध्रु.॥ सोडवीना राजा देशींचा चौधरी । आणीक सोइरीं भलीं भलीं ॥२॥ तुका म्हणे तुला सोडवीना कोणी । एका चक्रपाणी वांचूनियां ॥३॥
2471
नको बोलों भांडा । खीळ घालुन बैस तोंडा ॥१॥ ऐक विठोबाचे गुण । करीं सादर श्रवण ॥ध्रु.॥ प्रेमसुखा आड । काय वाजातें चाभाड ॥२॥ तुका म्हणे हिता । कां रे नागवसी थीता ॥३॥
2472
नको ब्रम्हज्ञान आत्मस्थितीभाव । मी भक्त तूं देव ऐसें करीं ॥१॥ दावीं रूप मज गोपिकारमणा । ठेवीन चरणांवरी माथा ॥ध्रु.॥ पाहोनि श्रीमुख देइन आलिंगन । जीवें निंबलोण उतरीन ॥२॥ पुसतां सांगेन हितगुज मात । बैसोनि एकांत सुखगोष्टी ॥३॥ तुका म्हणे यासी न लावीं उशीर । माझें अभ्यंतर जाणोनियां ॥४॥
2473
नको मज ताठा नको अभिमान । तुजवांचूनि क्षीण होतो जीव ॥१॥ दुर्धर हे माया न होय सुटका । वैकुंठनायका सोडवीं मज ॥२॥ तुका म्हणे तुझें जालिया दर्षण । मग निवारण होइल सर्व ॥३॥
2474
नको माझे मानूं आहाच ते शब्द । कळवळ्याचा वाद करीतसें ॥१॥ कासयानें बळ करूं पायांपाशीं । भाकावी ते दासीं करुणा आम्हीं ॥ध्रु.॥ काय मज चाड असे या लौकिकें । परी असे निकें अनुभवाचें ॥२॥ लांचावल्यासाटीं वचनाची आळी । टकळ्यानें घोळी जवळी मन ॥३॥ वाटतसे आस पुरविसी ऐसें । तरि अंगीं पिसें लावियेले ॥४॥ तुका म्हणे माझी येथें चि आवडी । श्रीमुखाची जोडी इच्छीतसें ॥५॥
2475
नको येऊं लाजे होय तूं परती । भजों दे श्रीपती सखा माझा ॥१॥ तुझे संगतीनें मोटा जाला घात । जालों मी अंकित दुर्जनाचा ॥२॥ तुका म्हणे रांडे घेइन काठीवरी । धनी सहाकारी राम केला ॥३॥
2476
नको विद्या वयसा आयुष्य फारसें । नाहीं मज पिसें मुक्तीचें ही ॥१॥ रामकृष्ण म्हणतां जावो माझा प्राण । हें चि कृपादान मागतसें ॥ध्रु.॥ नको धन मान न वाढे संतान । मुखीं नारायण प्राण जावा ॥२॥ तुका म्हणे दीन काकुलती येतों । तुज निरवितों पांडुरंगा ॥३॥
2477
नको सांडूं अन्न नको सेवूं वन । चिंतीं नारायण सर्व भोगीं ॥१॥ मातेचिये खांदीं बाळ नेणे सीण । भावना त्या भिन्न मुंडाविया ॥ध्रु.॥ नको गुंपों भोगीं नको पडों त्यागीं । लावुनि सरें अंगीं देवाचिया ॥२॥ तुका म्हणे नको पुसों वेळोवेळां । उपदेश वेगळा उरला नाहीं ॥३॥
2478
नको होऊं देऊं भावीं अभावना । या चि नांवें जाणा बहु दोष ॥१॥ मेघवृष्टी येथें होते अनिवार । जिव्हाळ्या उखर लाभ नाड ॥ध्रु.॥ उत्तमा विभागें कनिष्ठाची इच्छा । कल्पतरु तैसा फळे त्यासी ॥२॥ तुका म्हणे जिणें बहु थोडें आहे । आपुलिया पाहें पुढें बरें ॥३॥
2479
नजर करे सो ही जिंके बाबा दुरथी तमासा देख । लकडी फांसा लेकर बैठा आगले ठकण भेख ॥१॥ काहे भुला एक देखत आंखो मार तडांगो बाजार ॥ध्रु.॥ दमरी चमरी जो नर भुला । सोत आघो हि लत खाये ॥२॥ नहि बुलावत किसे बाबा आप हि मत जाये । कहे तुका उस असाके संग फिरफिर गोदे खाये ॥३॥ दरवेस -अभंग १
2480
नटनाट्य तुम्ही केलें याच साटीं । कवतुकें दृष्टी निववावी ॥१॥ नाहीं तरि काय कळलें चि आहे । वाघ आणि गाय लांकडाची ॥ध्रु.॥ अभेद चि असे मांडियेलें खेळा । केल्या दीपकळा बहुएकी ॥२॥ तुका म्हणे रूप नाहीं दर्पणांत । संतोषाची मात दुसरें तें ॥३॥
2481
नटनाट्ये अवघें संपादिलें सोंग । भेद दाऊं रंग न पालटे ॥१॥ मांडियेला खेळ कौतुक बहुरूप । आपुलें स्वरूप जाणतसों ॥ध्रु.॥ स्फटिकाची शिळा उपाधि न मिळे । भाव दावी पिवळे लाल संगे ॥२॥ तुका म्हणे आम्ही या जनाविरहित । होऊनि निश्चिंत क्रीडा करूं ॥३॥
2482
नभोमय जालें जळ । एकीं सकळ हरपलें ॥१॥ आतां काय सारासारी । त्याच्या लहरी तयांत ॥ध्रु.॥ कैचा तेथ यावा सांडी । आप कोंडी आपण्यां ॥२॥ तुका म्हणे कल्प जाला । अस्त गेला उदय ॥३॥
2483
नमस्कारी भूतें विसरोनि याती । तेणें आत्मस्थिती जाणीतली ॥१॥ परउपकारीं वेचियेल्या शक्ती । तेणें आत्मस्थिती जाणीतली ॥ध्रु.॥ द्वयें द्वैतभाव नाहीं जया चत्तिीं । तेणें आत्मस्थिती जाणीतली ॥२॥ जयाचिये वाचे नये निंदास्तुती । तेणें आत्मस्थिती जाणीतली ॥३॥ उचित अनुचित जाणे धर्मनीती । दृढ भाव भक्ति मानव तो ॥४॥ तुकयाबंधु म्हणे वरकड ते येर । संसाराचे खर भारवाही ॥५॥
2484
नमावे पाय हें माझें उचित । आशीर्वादें हित तुमचिया॥१॥ कृपेचा वोरस न समाये पोटीं । म्हणोनि उफराटीं वचनें हीं ॥ध्रु.॥ तुमची उष्टावळी हें माझें भोजन । झाडावें अंगण केरपुंजे ॥२॥ परि ऐसें पुण्य नाहीं माझें गांठीं । जेणें पडे मिठी पायांसवें ॥३॥ तुका म्हणे राहे आठवण चित्ती । ऐशी कृपा संतीं केली तुम्हीं ॥४॥
2485
नमितों या देवा । माझी एके ठायीं सेवा ॥१॥ गुणअवगुण निवाडा । म्हैस म्हैस रेडा रेडा ॥ध्रु.॥ जनीं जनार्दन । साक्ष त्यासी लोटांगण ॥२॥ तुका म्हणे खडे । निवडू दळणीं घडघडे ॥३॥
2486
नमो विष्णुविश्वरूपा मायबापा । अपरा अमुपा पांडुरंगा ॥१॥ विनवितों रंक दास मी सेवक । वचन तें एक आइकावें ॥ध्रु.॥ तुझी स्तुति वेद करितां भागला । निवांत चि ठेला नेति नेति ॥२॥ ॠषि मुनि बहु सिद्ध कविजन । वर्णितां ते गुण न सरती ॥३॥ तुका म्हणे तेथें काय माझी वाणी । जे तुझी वाखाणी कीर्ती देवा ॥४॥
2487
नमोनमो तुज माझें हें कारण । काय जालें उणें करितां स्नान ॥१॥ संतांचा मारग चालतों झाडूनि । हो का लाभ हानि कांहींतरि ॥ध्रु.॥ न करिसी तरि हेंचि कोडें मज । भक्ती गोड काज आणीक नाहीं ॥२॥ करीं सेवा कथा नाचेन रंगणीं । प्रेमसुखधणी पुरेल तों ॥३॥ महाद्वारीं सुख वैष्णवांचे मेळीं । वैकुंठ जवळी वसे तेथें ॥४॥ तुका म्हणे नाहीं मुक्तिसवें चाड । हें चि जन्म गोड घेतां मज ॥५॥
2488
नम्र जाला भूतां । तेणें कोंडिलें अनंता ॥१॥ हें चि शूरत्वाचे अंग । हरी आणिला श्रीरंग ॥ध्रु.॥ अवघा जाला पण । लवण सकळां कारण ॥२॥ तुका म्हणे पाणी । पाताळ तें परी खणी ॥३॥
2489
नये इच्छूं सेवा स्वइच्छा जगाची । अवज्ञा देवाची घडे तेणें ॥१॥ देहाचा निग्रही त्याचें तो सांभाळी । मग नये किळ अंगावरी ॥ध्रु.॥ आपलिया इच्छा माता सेवा करी । न बाधी ते थोरी येणें क्षोभें ॥२॥ तुका म्हणे सांडा देखीचे दिमाख । मोडसीचें दुःख गांड फाडी ॥३॥
2490
नये ऐसें बोलों कठिण उत्तरें । सलगी लेंकुरें केली पुढें ॥१॥ अपराध कीजे घडला तो क्षमा । सिकवा उत्तमा आमुचिया॥ध्रु.॥ धरूं धावें आगी पोळलें तें नेणे । ओढिलिया होणें माते बाळा ॥२॥ तुका म्हणे फार ज्याचा जार त्यासी । प्रवीण येविशीं असा तुम्ही ॥३॥
2491
नये जरी कांहीं । तरी भलतें चि वाहीं ॥१॥ म्हणविल्या ढास । कोण न धरी वेठीस ॥ध्रु.॥ समर्थाच्या नांवें । भलतैसें विकावें ॥२॥ तुका म्हणे सत्ता । वरी असते बहुतां ॥३॥
2492
नये जरी तुज मधुर उत्तर । दिधला सुस्वर नाहीं देवें ॥१॥ नाहीं तयाविण भुकेला विठ्ठल । येइल तैसा बोल रामकृष्ण ॥ध्रु.॥ देवापाशीं मागें आवडीची भक्ति । विश्वासेंशीं प्रीति भावबळें ॥२॥ तुका म्हणे मना सांगतों विचार । धरावा निर्धार दिसेंदिस ॥३॥
2493
नये पाहों मुख मात्रागमन्याचें । तैसें अभक्ताचें गुरुपुत्रा ॥१॥ म्हणऊनि बरें धरितां एकांत । तेणें नव्हे घात भजनासी ॥ध्रु.॥ नये होऊं कदा निंदकाची भेटी । जया द्वैत पोटीं चांडाळाच्या ॥२॥ तुका म्हणे नका बोलों त्यासी गोष्टी । जयाचिये दृष्टी पाप वाढे ॥३॥
2494
नये पुसों आज्ञा केली एकसरें । आम्हांसी दुसरें आतां नाहीं ॥१॥ ज्याचें तो बळिवंत सर्व निवारिता । आम्हां काय चिंता करणें लागें ॥ध्रु.॥ बुद्धीचा जनिता विश्वाचा व्यापक । काय नाहीं एक अंगीं तया ॥२॥ तुका म्हणे मज होईंल वारिता । तरी काय सत्ता नाहीं हातीं ॥३॥
2495
नये वांटूं मन । कांहीं न देखावें भिन्न ॥१॥ पाय विठोबाचे चित्ती । असों द्यावे दिवसराती ॥ध्रु.॥ नये काकुळती । कोणा यावें हरिभक्ति ॥२॥ तुका म्हणे साईं । करील कृपेची विठाईं ॥३॥
2496
नये सोमसरी उपचाराची हरी । करकरेचें करीं काळें तोंड ॥१॥ मागतों इतुकें जोडुनियां कर । ठेउनियां शीर पायांवरी ॥ध्रु.॥ तुम्हां आम्हां एके ठायीं सहवास । येथें द्वैत द्वेष काय बरा ॥२॥ तुकयाबंधु म्हणे बहुतां बहुतां रीती । अनंता विनंती परिसावी हे ॥३॥
2497
नये स्तवूं काचें होतें क्रियानष्ट । फुंदाचे ते कष्ट भंगा मूळ ॥१॥ नाहीं परमार्थ साधत लौकिकें । धरुन होतों फिकें अंगा आलें ॥ध्रु.॥ पारखिया पुढें नये घालूं तोंड । तुटी लाभा खंड होतो माना ॥२॥ तुका म्हणे तरी मिरवतें परवडी । कामावल्या गोडी अविनाश ॥३॥
2498
नयो वाचे अनुचित वाणी । नसो मनीं कुडी बुद्धि ॥१॥ ऐसें मागा अरे जना । नारायणा विनवूनि ॥ध्रु.॥ कामक्रोधां पडो चिरा । ऐसा बरा सायास ॥२॥ तुका म्हणे नानाछंदें । या विनोदें न पडावें ॥३॥
2499
नर नारी बाळें अवघा नारायण । ऐसें माझें मन करीं देवा ॥१॥ न यो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद । अवघा गोविंद निःसंदेह ॥ध्रु.॥ असावें म्यां सदा विषयीं विरक्त । काया वाचा चित्त तुझे पायीं ॥२॥ करोनियां साहए पुरवीं मनोरथ । व्हावें कृपावंत तुका म्हणे ॥३॥
2500
नरदेह वांयां जाय । सेवीं सद्ग‍ूचे पाय ॥१॥ सांडोनियां अहंभाव । धरीं भक्ती पूजीं देव ॥ध्रु.॥ थोराचिये वाटे । जातां भवशोक आटे ॥२॥ प्रल्हादातें तारी । तुका म्हणे तो कंठीं धरीं ॥३॥

Labels

Followers