संत एकनाथ अभंग -२


१२४७
ज्ञातिकुळ सांडिलें आम्हीं वेंगीं । माय माहेर त्याजिलें तुजलागीं । अंग अर्पिलें अंगीचिये अंगीं । शेखीं रतलासे दासी कुब्जेलागीं ॥१॥ सर सर निर्गुणा तु अगुणाचा हरी । जवळीं असतां जालासीं कैसा दुरी । चित्त उतटे चितिंता निरंतरी । मन मावळलें न दिसे दृश्यकारी ॥२॥ तुजलागी सांडिला देहसंग । तुजविण विटला विषयभोग । जळो तुझा उपदेश सांगसी योग । आम्हा देई सप्रेम संयोग ॥३॥ एक म्हणती गे सांडा शब्द आटी । शब्दा नातुडे कोरड्या ज्ञानगोष्टी । आजिचा सुदीन श्रीकृष्नीं झाली भेटीं । हरुषें निर्भर स्वानंद भरली सृष्टी ॥४॥ एक म्हणती गे सांडा शब्दज्ञान । ध्येय जोडलें कोईसें आतां ध्यान । भज्य भजन एक झालें भजन । गेली त्रिपुटी मिथ्या मोक्षबंधन ॥५॥ एक म्हणती गे चला मांडु रासु । म्हणे उगवेल मायामय दिवसु । दैवें जोडला गे कृष्ण परमहंसु । शोधा निजतत्व सांडोनि आळसु ॥६॥ गोपी मंडळी मिळाली कृष्णापाशीं । जैशीं रश्मि मिनल्या रविबिंबासी । कृष्ण भोगितां नाठवे दिननिशीं । एका जनार्दनीं ऐक्यता प्रेमेसी ॥७॥
१२४८
ज्ञान ध्यान जप तप तें साधन । तें हे संतनिधान सखे माझे ॥१॥ संतापायीं आधीं जावें वो शरण । संसार बोळवण होय तणें ॥२॥ तयाचे हें मुळ संतांचे पाय । आणीक उपाय नाही नाहीं ॥३॥ द्वैत अद्वैताचा न सरेचि कोंभ । तो हाचि स्वयंभ संतसंग ॥४॥ एका जनार्दनीं परब्रह्मा जाम । द्वैत क्रियाकर्म तेथे नाहीं ॥५॥
१२४९
ज्ञान ध्यान वर्म शाब्दिक कवित्व । हे तो न कळे अर्थ मूढाप्रती ॥१॥ राम सुखें गावा राम सुखें गावा । वाचे आठवावा कृष्ण सदा ॥२॥ एका जनार्दनीं राम कृष्ण मनीं । भजा आसनीं शयनीं सर्वकाळ ॥३॥
१२५०
ज्ञान वैराग्य कावडी खांदीं । शांति जीवन तयामधीं ॥१॥ शिवनाम तुम्हीं घ्या रे । शिवस्मरणीं तुम्हीं रहा रे ॥२॥ हरिहर कावड घेतली खांदी । भोवती गर्जती संतमांदी ॥३॥ एका जनार्दनीं कावड बरी । भक्ति फरारा तयावरी ॥४॥
१२५१
ज्ञान होय आधीं संतां शरण जातां । मग वोळखितां कळे रुप ॥१॥ नामांचे जें मुळ रुपांचें रुपस । पंढरीनिवास हृदयीं धरी ॥२॥ प्रपंचीं परमाथीं तारक हें नाम । ब्रह्मानंद प्रेम सर्व वसे ॥३॥ सच्चिदानंद खूण एका जनार्दनीं । स्वयं ब्रह्म जाण नाम असे ॥४॥
१२५२
ज्ञानदीपिका उजळी । नाहीं चितेंची काजळीं ॥१॥ ओवाळिला देवदत्त । प्रेमें आनंद भरित ।२॥ उष्ण चांदणें अतीत । तेज कोंदलें अद्भुत ॥३॥ भेदाभेद मावळले । सर्व विकार गळाले ॥४॥ एका मिळाली जनार्दनीं । तेजीं मिळाला आपण ॥५॥
१२५३
ज्ञानदेव चतुरक्षरीं जप हा करितु सर्वज्ञा । ज्ञानाज्ञानविरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा । ज्ञाता ज्ञेय जागे होय ऐसी प्रतिज्ञा । ज्ञानाग्नीनें पापें जळती हें ज्याची आज्ञा ॥१॥ ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतां ज्ञानदेव देतो । वासुदेव होतो अखंड वदनीं वदे तो ॥ ध्रु० ॥ नररुपें विष्णु अवतरला हा भगवान । नदी नद वापी कूप पाहतां उदक नव्हे भिन्न । नवल हेचि पशु ह्मौसा करितो वेदाध्ययन । नमन करुनी सद्वावें जपतां होय विज्ञान ॥२॥ देवाधीश देव भक्ताप्रती वर दे । देतां वर ब्रह्मांडा ब्रह्मा आनंद कोंदे । देशिकराज दयानिधि अलंकापुरीं जो नांदे । देशभाषा ज्ञानदेवी गीतार्थ वदे ॥३॥ वक्ता श्रोता श्रवणेंपठणें पावती समभाव । वर्णूं जातां अघटित महिमा होतो जीवशिव । वंदुनी अनन्य एका जनार्दनीं धरी दृढभाव । वर्षती निर्जर ज्ञानदेवनामें पुष्पांचा वर्षाव ॥४॥
१२५४
ज्ञानदेव ज्ञानदेव वदतां वाचे । नाहीं कळिकाळाचें भेव जीवां ॥१॥ जातां अलंकापुर गांवीं । मोक्ष मुक्ति दावी वाट त्यासी ॥२॥ ब्रह्मज्ञान जोडोनी हात । म्हणे मी तुमचा अंकित ॥३॥ वाचे वदतां इंद्रायणी । यम वंदितो चरणीं ॥४॥ एका जनार्दनीं भावें । ज्ञानदेवा आठवावें ॥५॥
१२५५
ज्ञानदेव म्हणे भाजनें आणावीं । तंव तीं देखिलीं अवघीं दिव्यरुप ॥१॥ उचलोनी करीं घेतलें भाजन । विठ्ठल विठ्ठल जाण शब्द निघे ॥२॥ सकळ ते संत गोरियासी म्हणती । धन्य तुझी भक्ति त्रैलोक्यांत ॥३॥ एका जनार्दनीं पाक सिध्द जाहला । बैसलासे मेळा भोजनासी ॥४॥
१२५६
ज्ञानदेवें उपदेश करुनियां पाहीं । सोपान मुक्ताई बोधियेली ॥२॥ मुक्ताईनें बोधखेचरासी केला । तेणे नामियाला बोधियेलें ॥२॥ नाम्याचें कुंटुंब चांगा वटेश्वर । एका जनार्दनीं विस्तार मुक्ताईचा ॥३॥
१२५७
ज्ञानराजासाठीं स्वयें भिंत वोढी । विसरुनी प्रौढीं थोरपण ॥१॥ तो हा महाराज चंद्रभागे तीरीं । कट धरूनी करीं तिष्ठतसे ॥२॥ नामदेवासाठीं जेवी दहींभात । न पाहे उचित आन दुजें ॥३॥ गोरियाचें घरी स्वयें मडकीं घडी । चोखियाची वोढी गुरेंढोरे ॥४॥ सावत्या माळ्यांसी खुरपुं लागे अंगें । कबीराचे मागें शेलें विणी ॥५॥ रोहिदासासवें चर्म रंगुं लागे । सजन कसायाचे अंगें मांस विकी ॥६॥ नरहरी सोनारा घडुं फुंकुं लागे । दामाजीचा वेगें पाडीवार ॥७॥ जनाबाईसाठीं वेंचितसें शेणी । एका जनार्दनीं धन्य महिमा ॥८॥
१२५८
ज्ञानराजें बोध केला । सत्यबळा रेडा बोलाविला प्रतिष्ठानीं ॥१॥ भोजलिंग ज्याची समाधी आळंदीं । ज्ञानराज बोधी तिघांजणां ॥२॥ सत्यबळें बोध गैबीराया केला । स्वयें ब्रह्मा झाला सिद्धरुप ॥३॥ एका जनार्दनीं ऐसी परंपरा । दाविले निर्धारा करुनिया ॥४॥
१२५९
ज्ञानाचें जें अधिष्ठान । महादेव एकचि जाण ॥१॥ कर्म उपासना साधन । पैं शिवचि अधिष्ठान ॥२॥ तेथुनी प्राप्त सर्व देवां । मुखीं शंकर वदावा ॥३॥ याकारणें शिवशक्ति । जनहो करा दिनरात्रीं ॥४॥ एका जनार्दनीं शंकर । पावती भवसिंधु पार ॥५॥
१२६०
ज्ञानाभिमान विश्वामित्रा । रंभेमागें जाला कुत्रा ॥१॥ ज्ञानाभिमान दुर्वासासी । म्हणोनी शापी अंबऋषी ॥२॥ ज्ञानाभिमान ब्रह्मीयासी । म्हणोनी चारेलें गाईवत्सांसी ॥३॥ ज्ञानभिमान नको देवा । एका जनार्दनीं देई सेवा ॥४॥
१२६१
ज्या नामे पाषाण जळांत तरलें । नाम त्या रक्षिलें प्रल्हादासी ॥१॥ अग्नि विष बाधा नामेंचि निवारीं । गिरीं आणि कंदरें रक्षी नाम ॥२॥ ब्रह्महत्यारी वाल्हा नामेंचि तरला । त्रैलोकीं मिरवला बडिवार ॥३॥ एका जनार्दनीं नामेंचि तरलें । जडजीव उद्धरिलें युगायुगीं ॥४॥
१२६२
ज्या सुखा कारणें योगाभ्यास । शरीर दंड काय क्लेश । तें उभें आहे अपैस । भीमातीरीं वाळुवंटीं ॥१॥ न लगे दंडन मुंडनी आटी । योगायागाची कसवटी । मोकळी राहाटी । कुंथाकुंठी नाहीं येथें ॥२॥ न लगे अष्टांग धूम्रपान । वायु आहार पांचग्र्नि साधन । नग्न मौन एकांत स्थान । आटाआटी न करणे ॥३॥ धरुनियां संतसंग । पाहें पाहे पांडुरंग देईन । सुख अव्यंग । एका जनार्दनीं निर्धारें ॥४॥
१२६३
ज्या सुखाकारणें देव वेडावला । वैकुंठ सांडुनीं संतसदनीं राहिला ॥१॥ धन्य धन्य संतांचें सदन । जेथें लक्ष्मीसहित शोभे नारायण ॥२॥ सर्व सुखांची सुखराशी । संतचरणीं भुक्तिमुक्ति दासी ॥३॥ एका जनार्दनीं पार नाहीं सुखा । म्हणोनि देव भुलले देखा ॥४॥
१२६४
ज्या सुखासी नाहीं अंत । तें सुख पाहे हृदयांत ॥१॥ सुख सुखाची मिळणी करुनी । घेईक आपुले मनीं ॥२॥ सुखें सुखानुभाव । हाचि ब्रह्माविद्येचा भाव ॥३॥ सुखें सुखाची मांडणी । शरण एका जनार्दनीं ॥४॥
१२६५
ज्यांचें आयुष्य नोहे लेखा । तेही देखा निमाले ॥१॥ इतरांचा पाड कोण । नेमिलें जाण न चुके तें ॥२॥ आणिलें तें उसनें साचा । देणें तयाचा प्रकार ॥३॥ शरण एका जनार्दनीं करी विनवणी सर्वांसी ॥४॥
१२६६
ज्यांचें देणें न सरे कधीं । नाहीं उपाधी जन्मांची ॥१॥ काया वाचा आणि मनें । धरितां चरण लाभ बहु ॥२॥ चौर्‍यांशीचें नाहीं कोडें । निवारें सांकडें पैं जाण ॥३॥ एका जनार्दनीं शरण । संतपूजनें लाभ बहु ॥४॥
१२६७
ज्याकारनें योगें रिघती कपाटीं । तो उभा असे ताटीं चंद्रभागे ॥१॥ सांवए रुपडें गोजिरे गोमटें । धरिले दोन्ही विटे समचरण ॥२॥ वैजयंती माळा तुळशीहार मिरवला । निढळीं शोभला चंदन वो माय ॥३॥ एका जनार्दनीं मौन्य धरुनी उभा । चैतान्याचा गाभा पाडुरंग ॥४॥
१२६८
ज्याचा केला अंगीकार । न मानी भार त्याचा हा ॥१॥ अरिमित्रां सम देणें । एकचि पेणें वैकुंठ ॥२॥ उत्तर मध्यम चांडाळ । देणें स्थळ एकची ॥३॥ एका जनार्दनीं भाकी कींव । उद्धारा जीव पातकी ॥४॥
१२६९
ज्याचे गेले कामक्रोध । तोचि साधु जगीं सिद्ध ॥१॥ लोभ मोह नाहीं ज्याशी । तोचि साधु निश्चयेंसी ॥२॥ गेले मद आणि मत्सर । साधु तोचि निर्विकार ॥३॥ एका जनार्दन साधु । त्याचे चरण नित्य वंदूं ॥४॥
१२७०
ज्याचे पुराणीं पोवाडे । तो हा उभा वाडेंकोंडें ॥१॥ कटीं कर ठेवुन गाढा । पाहे दिगंबर उघडा ॥२॥ धरुनी पुंडलिकाची आस । युगें जाहलीं अठ्ठावीस ॥३॥ तो हा देव शिरोमणी । एका शरण जनार्दनीं ॥४॥
१२७१
ज्याचें देणें न सरे कधीं । नाहीं उपाधी संबंध ॥१॥ एका नामासाठीं सोपें । नारी अमुपें पातकी ॥२॥ शुद्ध अथवा अशुद्ध याती । होत सरती हरिनामें ॥३॥ एका जनार्दनीं नाम सार । उतरी पार भवनदी ॥४॥
१२७२
ज्याचें नाम स्मरतां कलिकाळ ठेंगणा । तया नारायणा विसरले ॥१॥ करिती पूजन आणि कांची स्तुती । दैन्यवाणे होती अंतकाळीं ॥२॥ एका जनार्दनीं तयाचें बंधन । कोण करील खंडन जन्म कर्मा ॥३॥
१२७३
ज्यासी आत्मलाभ झाला । त्याचा देह प्रारब्धे वर्तला । कायावाचामनें आपुला व्यापार करिताती ॥१॥ होतें हाणितलें तोंडावरी । तेथें इंद्र अग्नि झुंजारी । पैं शुन्य बोले परस्परी । अग्नीसी इंद्र ॥२॥ हात नमस्कारी चरण । तेथें सुसरीतें झालें इंद्रियमन । हाता त्वचेसी केलें मर्दन । तो वामन वायु ॥३॥ शिश्न मुखामाजी मुतती । तेथें भाडती वरुन प्रजापति । तेथें नैऋत्य वसती । अश्विनीदेवो ॥४॥ कीं मुखीं गालीप्रदान । ऐको पैं श्रवण । तेथें दिशा आणि अग्नी । भांडती पैं ॥५॥ कीं तापले नेत्रीचें पाती । तेजें सुर्यासूर्य भांडती । ऐसें इंद्रियें वर्तती । आपाअपले परी ॥६॥ ऐसा विवेक ज्यासी कळला । त्याचा कामक्रोध भस्म झाला । तेणें शांतीचा रोंविला ॥ ध्वजस्तंभु ॥७॥ त्याचा विवेक करुनी । तो वर्तें जनीं वनीं । परी आत्मसुखाचा धनी । झाला तोचि एक ॥८॥ एकाजनार्दनीं या विवेंकें । राज्य केलें भीष्में जनकें । भिक्षुका आत्मसुखें । पावले तेणें ॥९॥
१२७४
ज्यासी करणें चित्तशुद्धी । कर्में आचरावीं आधीं ॥१॥ तरीच होय मनः शुद्धी । सहज तुटती आधि व्याधि ॥२॥ चित्ताची स्थिरता । होय उपासने तत्त्वतां ॥३॥ चित्त झालिया निश्चळ । सहज राहील तळमळ ॥४॥ एकाजनार्दनीं मन । होय ब्रह्मारूप जाण ॥५॥
१२७५
ज्यासी नाहीं संतसंग । ते अभंग दुःख भोगिती ॥१॥ तैसा नको विचार देवा । देई सेवा संतसंग ॥२॥ अखंड नाम वाचे कीर्ति । संतसंग विश्रांती मज देई ॥३॥ मागणें ते द्यावें । आणिक मागणें जीवीं नाहीं ॥४॥ म्हणे जनार्दनाचा एका । सुलभ सोपा उपाय ॥५॥
१२७६
ज्यासी प्रतिज्ञा निर्धारीं । देवा हारी आणियेलें ॥१॥ तो हा शांतनूचा रावो । भीष्म देवो संग्रामीं ॥२॥ शस्त्र न धरें ऐसा बोलु । साचा केला संग्रामीं ॥३॥ विकल पडतांचि अर्जुन । धरिलें सुदर्शन हस्तकी ॥४॥ ऐसा कृपेचा कळवळा । एका जनार्दनीं पाळी लळा ॥५॥
१२७७
झाला नामपाठ झाला नामपाठ । मोक्षमार्ग वाट सोपी झाली ॥१॥ आवडी आदरें नामपाठ गाये । हरिकृपा होय तयावारी ॥२॥ जनार्दनाचा एका नामपाठें निका । तोडियेली शाखा अद्वैताची ॥३॥ किर्तनमहिमा
१२७८
झालिया गुरुकृपा सुगम । सर्वत्र ठावें परब्रह्मा ॥१॥ तेथें नाहीं जन्ममरण । भवबंधन असेना ॥२॥ ऐसा धरितां विश्वास । काय उणें मग तयास ॥३॥ एका जनार्दनीं भाव । स्वयें आपणचि होय देव ॥४॥
१२७९
झाली संध्या संदेह माझा गेला । आत्माराम हृदयीं शेजें आला ॥धृ०॥ गुरुकृपा निर्मळ भागीरथी । शांति क्षमा यमुना सरस्वती । असीपदें एकत्र जेथें होती । स्वानुभाव स्नान हें मुक्तास्थिती ॥१॥ सद्बुद्धीचें घालुनि शुद्धासन । वरी सदगुरुची दया परिपुर्ण । शमदम विभुती चर्चुन जाण । वाचें उच्चारी केशव नारायण ॥२॥ बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा । ममता म्हातारी मरोनि गेली तेव्हां । भक्ति बहीण धाऊनि आली गांवा । आतां संध्या कैशी मी करुं केव्हां ॥३॥ सहज कर्में झालीं ती ब्रह्मार्पण । जन नोहें अवघा हा जनार्दन । ऐसें ऐकेतां निवती साधुजन । एका जनार्दनीं बाणली निज खुण ॥४॥
१२८०
टाकूनियां निंदा स्तुतीचे वचन । तया नारायण जवळीं आहे ॥१॥ न लगे उपवास पारणें कारणें । सुखे नारायण घरा येती ॥२॥ ठायींच बैसोनि जपे नामावळी । पुर्ण कर्मा होळी होय तेणें ॥३॥ एका जनार्दनीं धरितां पायीं भाव । रमेसह देव घरी नांदें ॥४॥
१२८१
टाळमृदंग मोहरी । नौबद वाजे नानापरी ॥१॥ घण घणाणा घंटा वाजे । घण घणाना घंटा वाजे ॥२॥ उपासना याचे पायीं । अवघी माझी विठाबाई ॥३॥ एका जनार्दनीं भाव । अवघा माझा पंढरीराव ॥४॥
१२८२
ठायीं ठेविलिया मन । सहज होईल उर्तीण ॥१॥ आलों ज्या कारणा । तेंचि करवा पंढरीराणा ॥२॥ वाउगी ती आस । मनीं नसावी सायास ॥३॥ येतों काकुलती । एका जनार्दना प्रती ॥४॥
१२८३
ठेवणें अनंत जन्मांचे । सांपडलें आजी सांचें ॥१॥ पुंडलिके तें पोखलें । जगा उपकार केलें ॥२॥ महा पातकी चांडाळ । मुक्त होय दरुशनें खळ ॥३॥ एका जनार्दनीं निश्चय । वेदादिका हा आश्रय ॥४॥
१२८४
डोई बोडोनी केली खोडी । काया विटंबिली बापुडी ॥१॥ ऐसें नोहे निर्मळपण । शुद्ध करी कां अंतःकरण ॥२॥ राख लाउनी वरच्यावरी । इंद्रियें पीडिलीं भरोवरी ॥३॥ संध्या स्नान द्वादश टिळे । फासे घालुनी कापी गळे ॥४॥ बगळा लावूनियां टाळी । ध्यान धरुनी मत्स्य गिळी ॥५॥ पाय घालुनी आडवा । काय जपतोसी गाढवा ॥६॥ कन्येसमान घरची दासी । तिशीं व्यभिचार करिसी ॥७॥ लोकांमध्यें मिरविसी थोरी । घरची स्त्री परद्वारीं ॥८॥ श्वान आले बुद्धिपणा । चघळोनी सांडी तो वहाणा ॥९॥ एका जनार्दनीं निर्मळ भाव । तेथें द्वेषा कैंचा ठाव ॥१०॥
१२८५
डोळा न दिसे न्याहारी । दृष्टी जाली पाठीमोरी ॥१॥ अझुनी काइसा रे मोहो । मिथ्या विषयाचा संदेहो ॥२॥ कानीं बैसलीसे टाळी । आली यमाची उथाळी ॥३॥ अंग वाळलें कांचरी । चंद्रबिब चढलें शिरीं ॥४॥ शिश्न अंगुळी सांडुं मागें । मूत्री चोरपान्हा लागे ॥५॥ नाना विषयीं करी न सुखी । म्हणतां स्त्री प्रत्यक्ष थुंकी ॥६॥ वेश्या धन घेऊनि सांडी बोला । स्त्री वार्धक्यें घाली टोला ॥७॥ अग्नी आंचवल्या पोळी । पुत्र नाना स्नेह जाळी ॥८॥ लाळ सुटलीसे तोंडें । तरी खेळवी नातुंडें ॥९॥ मान कापुनी विषयावरी । मरण चढिलेंसें शरीरें ॥१०॥ बळ प्रौढीं स्त्रीनें धन । क्षीण जाल्या उदासीन ॥११॥ पाठी बैसविली आवडी । शेखीं नागउनी सोडी ॥१२॥ पुरुष वार्धक्य नावडे । मेल्या कानकेशा रडे ॥१३॥ दांत पडोनी सांगे गोष्टी । नाक लागतए हनुवटीं ॥१४॥ मोह ममता सांडीं काम । अखंड जपे रामराम ॥१५॥ रामनामें होइल हित । एर्‍हवीं बुडालें स्वहित ॥१६॥ एका जनार्दनीं पुरा । बालतारुण्य न रिघे जरा ॥१७॥
१२८६
डोळा फोडोनियां काजळ ल्याला । नाम कापून शिमगा खेळला ॥१॥ वेंचिती धन लक्ष कोटी । आयुष्य क्षणचि नोहे भेटी ॥२॥ मिथ्या बागुलाचा भेवो । बाळें सत्य मानिती पहाहो ॥३॥ ऐसें मिथ्या नको मनीं । एका जनार्दनीं ॥४॥
१२८७
डोळियांनें रूप पहावें साचार । मुखानें उच्चार रामनाम ॥१॥ हृदयीं आठव नाम तें वसावें । करें पैं अर्पावे संतचरण ॥२॥ पदें प्रदक्षणा करी तीर्थाटन । हेंची पैं कारण पूजनाचें ॥३॥ एका जनार्दनीं ऐशी करी पूजा । तेणें गुरुराजा तोष पावे ॥४॥
१२८८
डोळियाची भुक हारपली । पाहतां श्रीविठ्ठल माउली ॥१॥ पुंडलिकें बरवें केलें । परब्रह्मा उभें ठेलें ॥२॥ अठ्ठावीस युगें जालीं । आद्यापि न बैसें खालीं ॥३॥ उभा राहिला तिष्ठत । आलियासीं क्षेम देत ॥४॥ ऐसा कृपाळु दीनाचा । एका जनार्दनीं साचा ॥५॥
१२८९
तंतुपट जेवीं एकत्व दिसती । तैसीं भगवद्भक्ति सर्वांभुतीं ॥१॥ सर्वत्रीं व्यापक विठ्ठल विसांवा । म्हणोनी त्याच्य गांवा मन धांवे ॥२॥ एका जनार्दनीं व्यापक विठ्ठल । तेथें नाहीं बोल आन दुजा ॥३॥
१२९०
तयां ठायीं अभिमान नुरे । कोड अंतरीचें पुरे ॥१॥ तें हें जाणा पंढरपूर । उभ देव विटेवरी ॥२॥ आलिंगनें काया । होतासे तया ठाया ॥३॥ चंद्रभागे स्नान । तेणें पुर्वजा उद्धरणा ॥४॥ एका जनार्दनीं शरण । पंढरी भूवैकुंठ जाण ॥५॥
१२९१
तयां ठायीं जातां शुध्द होय अमृत । नारदें ही मात सांगितली ॥१॥ तेव्हां एकादशी आली सोमवारीं । विमान पंढरीं उतरलें ॥२॥ अमृताचें ताट घेउनी आला इंद्र । गर्जती सुरवर जयजयकारें ॥३॥ देव सुरवर आले पंढरीसी । नामा कीर्तनासी उभा असे ॥४॥ सुरवर देव बैसले समस्त । कीर्तनीं नाचत नामदेव ॥५॥ एका जनार्दनीं देव कीर्तनासी । सांडोनी स्वर्गासी इंद्रराव ॥६॥
१२९२
तयाचिये भेटीं जावें उठाउठीं । कृपाळु जगजेठी उदार तो ॥१॥ पूर्वी उपमन्युसी क्षीरसागर दिधला । अढळपदीं ठेविला बाळ धुरु ॥२॥ राक्षसाचे कुळीं बिभिषण जाण । लंकेसी स्थापन चंद्रार्क तो ॥३॥ एका जनार्दनीं उदार सर्वज्ञ । एक नारायण समर्थ तो ॥४॥
१२९३
तयाचे संगती अपार । विश्रांती घर पंढरी ॥१॥ म्हणोनि वारकारी भावें । जाती हावें पंढरीसी ॥२॥ योगयाईं जो न संपडे । तो पुंडलिका पुढें उभा असे ॥३॥ शोभे चंद्रभागा उत्तम । धन्य जन्म जाती तेथें ॥४॥ घेऊनि आवडी माळ बुका । वाहती फुका विठ्ठला ॥५॥ एका जनार्दनीं भावें । हेंचि मागणें मज द्यावें ॥६॥
१२९४
तयालागीं ज्ञानी म्हणती नैमित्तिक पितृ श्राद्धादिक जाणावें तें ॥१॥ संतांचें दर्शन ज्ञानियाची भेटी । उत्थापन अटी करणें लागे ॥२॥ एकादशी शिवरात्री प्रदोषादि । रामजयंत्यादि नाना पर्वे ॥३॥ नैमित्तिक ऐसेंक तयासी म्हणती । त्यायोगें पावती आत्मतत्वीं ॥४॥ एका जनार्दनीं यातें आचराल । तरीच पावाल चित्तशुद्धी ॥५॥
१२९५
तरठ्या तरठ मारूं केला । बुडत्याचें डोई दगड दिला ॥१॥ तैसें जन्मोनियां प्राणी विषयांतें गेलें भुलोनीं ॥२॥ अंधाचें संगतीं । कोण सुख चालतां पंथीं ॥३॥ एका जनार्दनीं देवा । नोहें सांगात बरवा ॥४॥
१२९६
तरले तरती भरंवसा । कीर्तनमहिमा हा ऐसा ॥१॥ म्हनोनियां हरीचे दास । कीर्तन करिती सावकाश ॥२॥ एका जनार्दनीं कीर्तन । आनंदें होती तें पावन ॥३॥
१२९७
तरले तरती हा निर्धार । नामाचि सार घेतां वाचे ॥१॥ तें हें श्रीरामानाम वाचा । शंकराचा विश्राम ॥२॥ उणें पुरें नको कांहीं । वाया प्रवाहींपडुं नको ॥३॥ एका जनार्दनीं नाम । पूर्ण चैतन्य निष्काम ॥४॥
१२९८
तरले संगती अपार । वाल्मीकादि हा निर्धार । पापी दुराचार । अजामेळ तरला ॥१॥ ऐसा संताचा महिमा । नाहीं आनिक उपमा । अनुसरलिया प्रेमा । तरताती निःसंदेह ॥२॥ वेदशास्त्रें देती ग्वाही । पुराणें हीं सांगती ठायीं । संत्संगा वांचुनि नाहीं । प्राणियांसी उद्धार ॥३॥ श्रुति हेंचि पैं बोलती । धरावी संतांची संगती । एका जनार्दनीं प्रचीती । संतसंगाची सर्वदा ॥४॥
१२९९
तरी सोहं नव्हे याग । सोहं नव्हे त्याग । आणि अष्टांग योग । सोहं नव्हे ॥१॥ सोहं नव्हे दान । सोहं नव्हे तीर्थ । मंत्रादि दीक्षित । सोहं नव्हें ॥२॥ सोहं नव्हे वारा । पंचभूतांचा पसारा । सोहंच्या विचारा । साधु जाणती ॥३॥ एका जनार्दनीं । आपण आपणासी जाणणें । साक्षित्व देखणें । तेंचि सोहं ॥४॥
१३००
तरीच यावें जन्मा । ठेवा पांडुरंगीं प्रेमा ॥१॥ नाहीं तरी श्वानसुकर । जन्मा आले ते अपार ॥२॥ नेणें पंढरीची वारी । जन्मा आलातो भिकारी ॥३॥ संतसेवा दया नेणें । जन्मा आला तो पाषाण ॥४॥ कधीं करुं नेणें भजन । बैसें गृहीं मण्डुक जाण ॥५॥ नाहीं विश्वास मानसीं । एका जनार्दनीं म्हणे त्यासी ॥६॥
१३०१
तळीं पृथ्वीं वरी गगन । पाहतां अवघेंचि समान ॥१॥ रिता ठाव नाहीं कोठें । जगीं परब्रह्मा प्रगटे ॥२॥ स्थावर जंगम पहातां । अवघा भरला तत्त्वतां ॥३॥ भरुनीउरला दिसे । एका जनार्दनी हृदयीं वसे ॥४॥
१३०२
तळीं पृथ्वीवरी गगन । पाहतां दोन्हींही समान ॥१॥ रूप नाम वर्नाश्रम । कर्म अकर्मक बद्धतां ॥२॥ धर्म अर्थ काम मोक्ष । ऐशी वेद बोले साक्ष ॥३॥ एका जानर्दनीं शुद्ध । नाहीं भेद भुतमात्रीं ॥४॥
१३०३
तळीं हारपली धरा । वरी ठावो नाहीं अंबरा ॥१॥ ऐसा सहजीसहज निजे । एकाएकपणेंविन शेजे ॥२॥ डावे उजवे कानीं । निजे नीज कोंदलें नयनीं ॥३॥ दिवसनिशीं हारपलीं दोन्हीं । एका निजिजे जनार्दनीं ॥४॥
१३०४
ताट भोक्ता आणि भोजन । जो अवघाचि झाला आपण ॥१॥ भली केली आरोगण । सिद्ध स्वादुचि झाला आपण ॥२॥ कैसी गोडी ग्रासोग्रासीं । चवी लागली परम पुरुषीं ॥३॥ रस सेवितां स्वमुखें । तेणें जगदुदर पोखे ॥४॥ संतृप्त झाली तृप्ती। क्षुधेतृषेची झाली शांती ॥५॥ एका जनार्दनीं तृप्त झाला । शेखीं संसारा आंचवला ॥६॥
१३०५
तान मान सर्वथा । तें भजन न मने चित्ता ॥१॥ वेडेंवाकुडें तुमचे नाम । गाइन सदोदित प्रेम ॥२॥ वाचा करुनी सोंवळी । उच्चारीन नामावळी ॥३॥ नाम तारक हें जनीं । व्यास बोलिले पुराणीं ॥४॥ एका जनार्दनीं जप । सुलभ आम्हां विठ्ठल नाम देख ॥५॥
१३०६
तापत्रयें तापलीया पंढरीसी यावें । दरुशनें मुक्त व्हावें हेळामात्रें ॥१॥ दुःखाची विश्राती सुखाचा आनंद । पाहतां चिदानंद विठ्ठल देव ॥२॥ संसारीं तापलें त्रितापें आहाळले । विश्रांतीये आले पंढरीसी ॥३॥ सर्वांचे माहेर भाविकंचे घर । एका जनार्दनी निर्धान केला असे ॥४॥
१३०७
तापलिया तापें शिणलीया मार्गीं । पोहे ठाकी वेगीं कृष्णकथा ॥१॥ कृष्णकथा गंगा सांवळें उदक । मना बुडी दे कां वोल्हावसी ॥२॥ वोल्हावलें मन इंद्रियां टवटवी । गोपिराज जीवीं सांठविलें ॥३॥ सांठविलें जीवीं जाणा याची खुणा । जरी होय करुणा सर्वांभुतीं ॥४॥ सर्वांभूतीं राम दृष्टीचें देखणें । नाहीं दुजेंपणें आडवस्ती ॥५॥ आडवस्ती नाहीं एका जनार्दनीं । श्रीरामावांचुनी । आन नेणें ॥६॥
१३०८
तापलीया तापत्रयें संतां शरण जावें । जीवेंभावें धरावें चरण त्यांचे ॥१॥ करुनि विनवणी वंदु पायवाणी । घालुं लोटांगणी मस्तक हें ॥२॥ उपासनामार्ग सांगती ते खुण । देती मंत्र निर्वाण विठ्ठल हरि ॥३॥ एका जनार्दनीं संतासी शरण । रात्र आणि दिन चिंतूं त्यासीं ॥४॥
१३०९
तारले नामे अपार जन । ऐसें महिमान नामाचें ॥१॥ अधम तरले नवल काय । पाषाण ते पाहें तरियेले ॥२॥ दैत्यदानव ते राक्षस । नामें सर्वांस मुक्तिपद ॥३॥ एका जनार्दनीं नाम सार । जपा निरंतर हृदयीं ॥४॥
१३१०
तारावया जड मूढ । आहे उघड उपाव ॥१॥ सोपें रामनाम घेतां । नाहीं तत्त्वतां साधन ॥२॥ आणिकांसी साधन कष्ट । होती फलकट शेवटीं ॥३॥ तैसें नोहें नाम हें निकें । गोडी फिकें अमृत ॥४॥ एका जनार्दनीं सार । नामोच्चार सुलभ ॥५॥
१३११
तारावया भोळे भक्त । कृपावंत पंढरीनाथ ॥१॥ करुनी मीस पुंडलीकांचे । उभा उगाचि विटेवरी दिसे ॥२॥ ऐसा भक्तांसी भुलला । तारावया उभा ठेला ॥३॥ जनीं जनार्दनीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥
१३१२
तारिलें वो येणें श्रीगुरुनायके । बोधाचिये कासे लावुनि कवतुकें ॥१॥ या भवसागरीं जलासी तुं तारुं । परतोनियां पाहो कैंचा मायापुरु ॥२॥ एका जनार्दनीं कडिये । संचला प्रपंच लाउनी थडीये ॥३॥
१३१३
तारुण्याचें मदें घेशी एकमेंकां झोबीं । वायां जाईल नरदेह धरीं हरीशी झोंबी ॥१॥ तरीच खेळ भला रे वायां काय गलबला । एकावरी एक खाली पडतां मारी यमाजी टोला रे ॥२॥ हातीम हात धरुनियां घालिसी गळां गळाखोडा रे । फजीत होसी खालीं पडतां हांसतील पोरें रांडा रे ॥३॥ एका जनार्दनीं म्हणे खेळ नोहें भला रे । आपण न पडतां दुजियासी पाडी तोचि खेळिया भला रे ॥४॥
१३१४
तिसरे अवतारीं नामा उध्दव जन्मला । करुनी कृष्ण दास्यत्व मान्य पैं जाहला ॥१॥ ज्ञान वैराग्य भक्ति कृष्ण सांगे तयासी । तेणें चुकविलें शापबंधासी ॥२॥ भागवत मथितार्थ स्वयें सांगे आपण । कृष्णावेगळा न जाय अर्धक्षण ॥३॥ यापरी दास्यत्व तेथें निकट केलें । एका जनार्दनीं म्हणे वंदूं त्यांचीं पाउलें ॥४॥
१३१५
तिहीं त्रिभुवना ज्याची सात्त वाहे । तो चोरी करिताहे घरोघरीं ॥१॥ न कळे न कळे लाघव तयाचें । ब्रह्मादीक साचे वेडावती ॥२॥ वेद शास्त्र श्रुती कुठित पै होती । तया गौळणी बांधिनी धरुनियां ॥३॥ योग मुद्रा साध्न योगी साधिताती । तयांसि नाहे प्राप्ति हेंचि रुप ॥४॥ तें बाळरुप घेउनि वोसंगा । हालविती पई गा बाळकृष्णा ॥५॥ जयाचेनि होय तृप्ति पैं सर्वांसी । तो मागे यशोएसी दहींभात ॥६॥ दहींभात लोनी खाउनी न धाय । घरोघरीं जाय चोरावया ॥७॥ एका जनार्दनीं न कळे वैभव । दावितसे माव भोळ्या जना ॥८॥
१३१६
तिहीं त्रिभुवनीं पातकी पीडिले । ते मुक्त जाहले पंढरीसी ॥१॥ पाहतां सांवळा अवघीयां विश्रांती । दरुशनें शांतीं पातकीयां ॥२॥ एका जनार्दनीं पाहतां रुपडे । कैवल्य उघडे विटेवरी ॥३॥
१३१७
तिहीं त्रिभुवनीं सत्ता जयाची । तो गोपाळाचि उच्छिष्टे खाय ॥१॥ खाउनी उच्छिष्ट तृप्तमय होय । यज्ञाकडे न पाहे वांकुडे तोंडे ॥२॥ ऐसा तो लाघव गोपाळांसी दावी । एका जनार्दनीं काहीं काळों नेदी ॥३॥
१३१८
तीन अक्षरी जप पंढरी म्हणे वाचा । कोआटी या जन्मांचा शीण जाय ॥१॥ युगायुगीं महात्म्य व्यासें कथियेलें । कलियुगें केलें सोपें पुंडलिकें ॥२॥ महा पापराशी त्यांची होय होळी । विठ्ठलनामें टाळी वाजवितां ॥३॥ एका जनार्दनीं घेतां पैं दर्शन । जद जीवा उद्धरण कलियुगीं ॥४॥
१३१९
तीन अक्षरें निवृत्ति । जो जप करी अहोरात्रीं । तया सायुज्यता मुक्ती । ब्रह्मस्थिती सर्वकाळ ॥१॥ चार अक्षरें ज्ञानदेव । जो जप करी धरील भाव । तया ब्रह्मपदीं ठाव । ऐसें शिवादिदेव बोलिले ॥२॥ सोपान हीं तीन अक्षरें । जो जप करील निर्धारें । तयास ब्रह्म साक्षात्कारें । होय सत्वर जाणिजे ॥३॥ मुक्ताबाई चतुर्विधा । जो जप करील सदा । तो जाईल मोक्षपदा । सायुज्य संपदा पावेल ॥४॥ ऐसीं हीं चौदा अक्षरें । जो ऐके कर्णविवरें । कीं उच्चारीं मुखद्वारें । तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे ॥५॥ एका जनार्दनीं प्रेम । जो जप करील धरील नेम । तयास पुन: नाहीं जन्म । ऐसें पुरुषोत्तम बोलिले ॥६॥
१३२०
तीरा आणिला श्रीकृष्ण । हरिखे यमुना झाली पुर्ण । चढ़े स्वानंदजीवन । चरण वंदनार्थ ॥१॥ वसुदेव म्हणे कटकटा । यमुना रोधिली वाटा । कृष्ण असतां निकटा । मोहं मार्ग न दिसे ॥२॥ कृष्ण असतां हातीं । मोहें पडली भ्रांति । मोहाचिये जाती । देव नाठवे बा ॥३॥ मैळ मुकी वेताळ । मारको मेसको वेताळ । आजी कृष्ण राखा सकळ । तुम्हीं कुळदेवतांनी ॥४॥ अगा वनींच्या वाघोबा । पावटेकीच्या नागोबा । तुम्ही माझिया कान्होंबा । जीवें जतन करा ॥५॥ हातींचा कृष्ण विसरुन । देव देवता होतों दीन । मोहममतेचें महिमान । देवा ऐसें आहें ॥६॥ मोहें कृष्णांची आवडी । तेथें न पडे शोक सांकडीं । एका जनार्दनीं पावलें परथडी । यमुनेच्या ॥७॥
१३२१
तीर्थ कानडें देव कानडे । क्षेत्र कानडें पंढरीये ॥१॥ विठ्ठल कानडे भक्त हे कानेड । पुंडलीकें उघडें उभे केलें ॥२॥ कानडीया देवा एका जनार्दनीं भक्तें । कवतुकें तयातें उभेंकेलें ॥३॥ एका जनार्दनीं भक्ताचिय चाडा । विठठल कानडा विटेवरी ॥४॥
१३२२
तीर्था जाती उदंड । त्याचें पाठीमागें तोंड ॥१॥ मन वासना ठेउनी घरीं । तीर्थां नेली भांडखोरी ॥२॥ गंगेंत मारितां बुडी । मन लागलें बिर्‍हाडीं ॥३॥ नमस्कार करितां देवासी । मन पायपोसापाशीं ॥४॥ लवकर करी प्रदक्षिणा । उशीर झालासे भोजना ॥५॥ एका जनार्दनीं स्थिर मन । नाहीं तंव काय साधन ॥६॥
१३२३
तीर्थाटन गुहावास । शरीरा नाश न करणें ॥१॥ समागम संतसेवा । हेंचि देवा आवडतें ॥२॥ करितां रामनाम लाहो । घडती पाहाहो धर्म त्या ॥३॥ सकळ कर्में जाती वायां । संतपायां देखतां ॥४॥ एका जनार्दनीं होतां दास । पुरे आस सर्वही ॥५॥
१३२४
तुज सगुण जरी ध्याऊं तरी तुं परिमित होशी । तुज निर्गुण जरी ध्याऊं तरी तूं लक्षा न येसी । साचचि वेद पुरुषा न कळे श्रुति अभ्यासेंसी । तो तुं नाभाचा जो साक्षी शब्दें केवीं आतुडसी ॥१॥ राम राम रामा सच्चिदानंद रामा । भवसिंधु तारक जयतुं मेघःश्यामा । अनंत कोटी ब्रह्मांडधीशा अनुपम्य महिमा । अहं सोहं ग्रासुनी हें तो मागतसे तुम्हां ॥२॥ अष्तांगयोगें शरीर दंडुनि वायुसी झुंज घेवो । बहुसाल अंतराल तयाचा येतसे भेवों । कर्मचि जरी आचरुं रुढ धरुनियां भावों । विधिनिषेध माथा अंगी वाजतसे घावो ॥३॥ तीर्थयात्रेसी जाऊं तरी तें तीर्थ दुरी राहे । पर्वकाळ विचारितां नित्यकाळ वायांजाये । हाती जपमाळा घेउनी अगणित गणूं पाहे । तेथें पापिणी निद्रा घाला घालुनिया जाये ॥४॥ गृहशिखासुत्र त्यजुनी संन्यास करुं । न नासे संकल्प तयाचा धाक थोरु । तेथें मन निश्चळ न राहे यासी काय बा करुं । वेषचि पालटे न पालटे अहंकारु ॥५॥ जनीं जनार्दन प्रत्यक्ष डोळा कां न दिसे त्यासी । ममतांहकृतीनें योगी बुडविलेंसाधन आश्रमासी । एका जनार्दनीं सिद्ध साधन कां न करसीं । सांडी मांडी न लगे मग तूं रामचि होसी ॥६॥
१३२५
तुज सांगतसे मना । पाहें पंढरीचा राणा ॥१॥ नको दुजा छंद कांहीं । राहें विठ्ठलाचे पायीं ॥२॥ विषयीक वासना । सोडी सोडी सत्य जाणा ॥३॥ जेणें घडे सर्व सांग । फिटे संसाराचा पांग ॥४॥ म्हणे जनार्दनाचा एका । सुलभ उपाव नेटका ॥५॥
१३२६
तुजविण आम्हां कोण आहें देवा । धांव यादवराया मायबापा ॥१॥ पडिलोंसे डोहीं प्रपंच आवर्ती । कोण करी शांति तुजविण ॥२॥ जन्ममरणाचा पडिलासे फेरा । सोडवी दातारा मायबापा ॥३॥ एका जनार्दनीं धांवे लवलाहीं । येवोनियां हृदयीं ठाव देई ॥४॥
१३२७
तुझिया कृपेचें पोसणें मी दीन । करीं तुं जतन जनार्दना ॥१॥ अंकित मी दास कायामनेंवाचा । हेलावा कृपेचा करी देवा ॥२॥ कदा नुपेक्षिसी आलिया शरण । हें मागोनी महिमान चालत आलें ॥३॥ एका जानार्दनीं कॄपेचा वोरस । करी जगदीश मजवरी ॥४॥
१३२८
तुझिया खेळा बहु भ्याले । नेणों ब्रह्मादिक ठकले ॥१॥ कान्होबा आमुचा तुं गडी । न सोडिसी आपुली खोडी ॥२॥ चोरी करितां गौळणी बांधिती । तुझी न कळे वेदशास्त्रं गती ॥३॥ एका जनार्दनीं शरण । आम्हीं न सोंडुं तुझे चरण रे कान्होबा ॥४॥
१३२९
तुझिया चरणीं अनुपम्य सुख । हें तो अलोलिक रमा जाणे ॥१॥ जाणती ते भक्त प्रेमळ सज्जन । अभाविक दुर्जन तयां न कळे ॥२॥ भक्तियुक्त ज्ञान तेथें घडे भजन । वायां मग शीण जाणीवेचा ॥३॥ एका जनार्दनीं वाउगे ते बोल । भक्तीविण फोल नावडती ॥४॥
१३३०
तुझी संगती नाहीं कामाची । मी सुदंरा कोवळ्या मनाची । मज दृष्टी होईल साची । मग तुझी घेइन चर्या ॥१॥ कसें वेड लाविलें कान्हों गोवळियां ॥धु॥ माझा वंश आहे मोठ्याचा तुं तंव यातीहीन गौळ्याचा । ऐक्य जालीया नांवरुअ पाचा । ठावाचि पुसलिया ॥२॥ तुझ्या अंगेची घ्रट घाणी । तनु काय दिसती वोगळवाणी । मुरली वाजविसी मंजुळवाणी । मनमोहन कान्हया ॥३॥ तुझ्या ठिकाणी अवगुणा मोठा । चोरी करुनी भरिसी पोटा । व्रजनारी सुंदरा चावटा । अडविसी अवगुणीया ॥४॥ सर्व सुकहची कृष्णासंगती । वेणुनादें गाई गोप वेधती । एका जनार्दनी हरिरुपी रमतीं । त्या व्रज सुंदरीया ॥५॥
१३३१
तुझें तुझ्या ठायीं । तुजचि शुद्धि नाहीं । मी मी म्हणती काई । न कळे तुज ॥१॥ मीपण ठेवितां ठायीं । तुंचि ब्रह्मा पाहीं । इतर साधन कांहीं । नलगे येथें ॥२॥ मीपण तत्त्वतां । साच जेथें अहंता । एका जनार्दनीं तेचि ते निजात्मता ॥३॥
१३३२
तुझें श्रीमुख सुंदर । कुसुम शुभकांति नागर । कासें पीतांबर मनोहर । पाहुनी भुल पडली । करुणाघना ॥१॥ मुरली नको वाजवुं मनमोहना ॥धृ ॥ सर परता होय माघारा । देहभाव बुडाला सारा नाहीं सांसारासी थारा । भेदाभ्रम गेला । कमलनयना ॥२॥ ध्वनि मंजुळ ऐकिली कानीं । सर्व सुखां जाली धनी । एका जनार्दनीं ध्यानी मनीं । एकपणा जगजीवना ॥३॥
१३३३
तुझ्या चरणापरतें । शरण जाऊं आणिकातें ॥१॥ काया वाच आणि मन । रिघाली शरण तुमची ॥२॥ निवारुनि भवताप । त्रिविध तापें तो संताप ॥३॥ एका जनार्दनीं चित्तें । शरण आला न करा परतें ॥४॥
१३३४
तुझ्या मुरलीचा ध्वनी । अकल्पित पडिला कानीं । विव्हळ जालें अंतःकरणी । मी घरधंदा विसरलें ॥१॥ अहा रे सांवळीया कैशी वाजविली मुरली ॥धृ॥ मुरली नोहे केवळ बाण । तिनें हरीला माझा प्राण । संसार केला दाणादीन । येउनि हृदयी संचरली ॥२॥ तुझ्या मुरलीचा सुर तान । मी विसरले देहभान । घर सोडोनि धरिलें रान । मी वृंदावना गेले ॥३॥ एका जनार्दनीं गोविंदा । पतितपावन परमानंद । तुझ्या नामाचा मज धंदा । वृत्ति तंव पदीं निवर्तली ॥४॥
१३३५
तुटती बंधनें संतांच्या दारुशनें । केलें तें पावन जगीं बहु ॥१॥ महा पापराशी तारिलें अपार । न कळे त्यांचा पार वेदशास्त्रां ॥२॥ वाल्मिकादि दोषी तारिलें अनुग्रही । पाप तेथें नाहीं संत जेथें ॥३॥ पापताप दैन्य गेलें देशांतरीं । एका जनार्दनीं निर्धारी सत्य सत्य ॥४॥
१३३६
तुमचिया नामस्मरणीं । निशिदिनीं मति लागो ॥१॥ आठव तो मज द्यावा । दुजा हेवा मी नेंणें ॥२॥ वारंवार नाम कीर्ति । आठवीन श्रीपती दयाळा ॥३॥ एका जनार्दनाचा आपुला । पाहिजे सांभाळिला मायबापा ॥४॥
१३३७
तुमचे अप्रमाण होतां बोल । मग फोल जीवित्व माझें ॥१॥ कासया वागवुं सुदर्शन । नाहीं कारण गदेचें ॥२॥ तुमचा बोल व्हावा निका । हेंचि देखा मज प्रिय ॥३॥ मज यावें उणेपण । तुमचें थोरपण प्रकाशुं द्या ॥४॥ एका जनार्दनीं देव । स्वयमेव बोलती ॥५॥
१३३८
तुमचे पायीं ठेवितां भाळ । पावलों सकळ अंतरीचें ॥१॥ आतां पुरली वासना । आठवितां तुमचे गुणा ॥२॥ जन्माचें सार्थक । पाहतां तुमचें श्रीमुख ॥३॥ शरण एका जनार्दनीं । धन्य नाम तुमचें वदनीं ॥४॥
१३३९
तुमचे वर्णितं पोवाडे । कळिकाळ पायां पडे ॥१॥ तुमचे वर्णिती बाळलीला । तें तुज आवडे गोपाळा ॥२॥ तुमचें वर्णील हास्यमुख । त्यांचे छेदिसी संसारदुःख ॥३॥ तुमचे दृष्टीचे दरुशन । एका जनार्दनीं तें ध्यान ॥४॥
१३४०
तुमचें कृपेंचे पोसणें । त्याचें धांवणें करा तुम्हीं ॥१॥ गुंतलोंसे मायाजळीं । बुडतों जळीं भवाच्या ॥२॥ कामक्रोध हे मगर । वे ढिताती निरंतर ॥३॥ आशा तृष्णा या सुसरी । वेढिताती या संसारीं ॥४॥ म्हणोनि येतों काकुळती । एका जनार्दनीं विनंती ॥५॥
१३४१
तुमचें चरित्र श्रवण । आवडी करुं तें कीर्तन ॥१॥ संसार पुसोनियां वाव । निजपद देशी ठाव ॥२॥ स्वभावें कीर्तन करितां । एवढा लाभ ये हातां ॥३॥ एका जनार्दनीं कीर्तनं । होती पातकी पावन ॥४॥
१३४२
तुमचें जाहलिया दरुशन । जन्ममरण फिटला पांग ॥१॥ आतां धन्य जाहलों करुणाकरा । विश्वभंरा दयाळुवा ॥२॥ मागें कासविसक बहु जाहलों । दरुशनें पावलों सुखातें ॥३॥ एका जनार्दनीं कृपा केली । फळाची आली सर्वस्वे ॥४॥
१३४३
तुमचें तुम्हां सांगतों साचें । मनें वाचे रामनाम ॥१॥ तेणें उतराल पैलथडी । चुकेल बेडी चौर्‍याशींची ॥२॥ प्रपंचाचें भोवर जाळें । यांत सगळे अटकाल ॥३॥ काया वाचा आणि मनें । एका जनार्दनीं आठवावा ॥४॥
१३४४
तुमचें देणें तुमचें देणें । नको वैकुंठ हें पेणें ॥१॥ नानामतें मतांतर । अंतर गोवुं नये तेथ ॥२॥ पेणें ठेवा पंढरीसी । आहर्निशीं नाम गाऊं ॥३॥ भाळे भोळे यती संत । बोलूं मात तयांसी ॥४॥ चरणरजवंदीन सांचे । एका जनर्दनीं म्हणे त्यांचें ॥५॥
१३४५
तुमचें नाम आठवितां । धणी न पुरे पंढरीनाथा ॥१॥ सुख अनुपम्य कल्प कोडी । युगा ऐसा एक घडी ॥२॥ निजध्यास जडतां नामीं । सुखें सुख दुणावें प्रेमीं ॥३॥ एका जनार्दनीं नाम । शेष्ठा धामांचे हें धाम ॥४॥
१३४६
तुमचें नामसंकीर्तन । हेंचि माझें संध्यास्नान ॥१॥ तुमच्या पायाचें वंदन । हेंचि माझें अनुष्ठान ॥२॥ तुमच्या पायाचा साक्षेप । हाचि माझा कालक्षेप ॥३॥ तुमच्या प्रेमें आली निद्रा । हीच माझी ध्यान मुद्रा ॥४॥ एका जनार्दनीं सार । ब्रह्मारुप हा संसार ॥५॥
१३४७
तुमच्या चरणांपरतें । शरण न जाण आणिकातें ॥१॥ ऐसे चरण पावन । उद्धरिले असंख्य जन ॥२॥ चरणरजांचें ध्यान । शंकरक करितो आपण ॥३॥ एका जानर्दनीं शरण । धरिलें चरण न सोडी जाण ॥४॥
१३४८
तुमच्या चरणींक मिठी । आतां तुटी न करावी ॥१॥ थोराचे जें थोरपण । तुम्हां करणें सहजची ॥२॥ मी पतीत दीन हीन । म्हणोनि शरण तुम्हांसी ॥३॥ पतीत पावन तुम्ही संत । एवढें आर्त पुरवा ॥४॥ एका जनार्दनीं शरण । त्याचे चुकवा जन्ममरण ॥५॥
१३४९
तुमच्या सेवेचा महिमा । मज न कळें पुरुषोत्तमा ॥१॥ पुजा करणे कवणें रीती । नेणें जपमाळ हातीं ॥२॥ स्नानसंध्या न कळे कांहीं । मन असो तुझें पायीं ॥३॥ तुम्हां मागणें इतुकें । एका जनार्दनीं द्यावें कौतुकें ॥४॥
१३५०
तुम्हांलागीं हरिहर । येती सत्वर अलंकापुरी ॥१॥ ऐशी थोरी तुमची देवा । न कळे अनुभवावांचूनि ॥२॥ माझे चित्त समाधान । जाहलें ध्यान धरितांचि ॥३॥ आठवी तुमचे गुण । जाहलें खंडन जन्ममृत्यु ॥४॥ वारंवार क्षणाक्षणा । माथा चरणां तुमचिया ॥५॥ भाकितों करुणा वचनीं । शरण एका जनार्दनीं ॥६॥
१३५१
तुम्हांसी कारण पडलिया सांगा । नाम्याचे प्रसंगा सेवा तुमची ॥१॥ संदेह मनासी नका धरुं सर्वथा । माझी आण तत्वतां तुम्हांलागीं ॥२॥ नामयाचें सांकडें वारीन मी वेगें । तुम्ही कांहीं अंगे शिणूं नका ॥३॥ एका जनार्दनीं वैकुंठींचा राणा । सांगतसे खुणा अंतरीच्या ॥४॥
१३५२
तुम्हासांठी उणेपण । स्वयें मजलागुन येऊं द्या ॥१॥ प्रतिज्ञा तुमची न्यावी सिद्धि । मधीं उपाधी येऊ नेदी ॥२॥ घेउनी हातीं सुदर्शन । आलें विघ्न निवारी ॥३॥ दारवंटा राखीन तुमचा । एका जनार्दनीं साचा ब्रीद माझें ॥४॥
१३५३
तुम्ही उदार सर्वगुणें । मी रंकपणें रंकाहुनी ॥१॥ काया वाचा आणि मन । केलें समर्पण तव चरणीं ॥२॥ आणिक नाहीं कांहीं चाड । सेवा दृढ संतांची ॥३॥ एका जनार्दनीं तुमचा दास । आहे आस पायांची ॥४॥
१३५४
तुम्ही कृपा केलियावरी । पात्र होईन निर्धारी ॥१॥ आतां नका धरूं दुजें । मीतूंपणाचें उतरा ओझें ॥२॥ एका जनार्दनीं शरण । जीवींची निजखूण त्या द्यावी ॥३॥
१३५५
तुम्ही बहुतांचे केलेंसे धांवणें । आतां नारयणें कठेण केलें ॥१॥ हो उनी उदास अवलोकितो दिशा । पुरवा माझी इच्छामायाबापा ॥२॥ एका जानर्दनीं त्रैलोकीं नाम । तुम्हीं तो निष्काम देवा बहु ॥३॥
१३५६
तुम्हीं उदार कृपाळ । मागें केलें प्रतिपाळ ॥१॥ तैसे मज सांभाळावें । वदनीं वदवावें नाम तुमचें ॥२॥ आशापाश नका मोह । याचा निःसंदेह पाडावा ॥३॥ एका जनार्दनीं विज्ञापना । परिसा दीन दासाची ॥४॥
१३५७
तुम्हीं करुनियां सेवा । वाढविलें मज नांवा ॥१॥ ऐसा कृपाळू उदार । पांडुरंग तूं निर्धार ॥२॥ नानापरी उपचार । नित्य पुरवा अपार ॥३॥ उतराई नोहे देखा । म्हणे जनार्दनीं एका ॥४॥
१३५८
तुम्हीं कूपाळु कृपाळु । विश्वजन प्रतिपाळ ॥१॥ म्हणोनि येतों काकुलती । कूपाळुवा श्रीपती ॥२॥ एका जनार्दनीं देवा । सर्व सारुनि पायीं ठेवा ॥३॥
१३५९
तुम्हीं कृपांवतं देव । माझा हेवा चुकवावा ॥१॥ सांपडलो काळाहातीं । उगवा गुंती तेवढी ॥२॥ माझें मन तुमचे चरणें । राहो चक्रपाणी सर्वदा ॥३॥ शरण एका जानर्दनीं । तुम्हीं धनी ब्रह्मांडीं ॥४॥
१३६०
तुम्हीं कृपाळुजी देवा । केलीं सेवा आवडी ॥१॥ करुनी सडा समार्जन । पाळिलें वचन प्रमाण ॥२॥ उगाळुनि गंध पुरविलें । सोहोअळे केले दासाचे ॥३॥ ऐसा अपराधी पतीत । एका जनार्दनीं म्हणत ॥४॥
१३६१
तुम्हीं तंव उदार मायबाप संत । करावें कृतार्थ मजलागीं ॥१॥ ठेवा माथां हात वंदुं पायवाणी । आणिक दुजें मनीं नाहें कांहीं ॥२॥ गुण दोष याती न पहा कारण । करितो भजन निशिदिनीं ॥३॥ एका जनार्दनीं तयाचा मी दास । एवढीची आस पायी मिठी ॥४॥
१३६२
तुम्हीं पढरीये जातां । तरी मी पाया लागेन आतां । चरणरजें जाली साम्यता । तुमचे पाऊल माझे माथां ॥१॥ जेथें जेथें पाउल बैसे । एका एकपणेंविण असे ॥धृ॥ पंढरीचे वाटे । पसरिले ते मी गोटे । पाया लागेन अवचटे । तें सुख आहे मल मोठे ॥२॥ जेथें पाउलांचा माग । तेथें माझें अखंड अंग । चरणरज आम्हां भोग । काय करशील वैकुंठ चांग ॥३॥ संत भेटतील वाडेंकोडें । तरी मी आहे पायांपुढे । हेही आठवण न घडे । तरी मी वाळवंटीचें खडे ॥४॥ यात्रा दाटेल घसणीं । लागेन अवघियां चरणीं । एका जनार्दनीं कीर्तनीं । आठवा आसनीं शयनीं ॥५॥
१३६३
तुम्हीं पुर्ण कृपा केली । मज दाविली निजमूर्ति ॥१॥ तेणे निवरला शीण । गेलें जन्ममरण भान ॥२॥ जें जें मधी होतें आड । त्याचें कोडें फेडिलें ॥३॥ जाचलों होतों पषऊर्मीं । पावलों दरुशनों सुख जेणें ॥४॥ एका जनार्दनीं वासना ।जाहलें समाधान मना ॥५॥
१३६४
तुम्हीं संतजन । माझें ऐका हो वचन ॥१॥ करा कृपा मजवरी । एकदां दाखवा तो हरी ॥२॥ आहे तुमचे हातीं । म्हणोनि येतो काकुळती ॥३॥ एका जनार्दनीं म्हणे थारा । संतीं द्यावा मज पामरा ॥४॥
१३६५
तू म्हणशील बा हें माझें । वायां वाहसी वाउगें ओझें ॥१॥ सोडी दे टाकूनी परता येई । रामनाम वाचे सदा गाई ॥२॥ नामाचि जाण सत्य सार । वायां कां वाहशील भार ॥३॥ एका जनार्दनीं नाम सार । वेदशास्त्रीं हा निर्धार ॥४॥
१३६६
तूं नायकसी कवणाचें । बोलतां नये बहु वाचें । तुझें तुज हिताचें । वर्म आम्हीं सांगूं ॥१॥ होई सावध झडकरी । नको पडुं आणिके भरीं । वायांची धांवसी दिशाभरी । श्रमूं निर्धारीं तुजची ॥२॥ ब्रह्मज्ञानाची भरोवरी । वाउगी न करी निर्धारी । कर्म अकर्म आधीं सारी । मग निर्धारीं सुख पावे ॥३॥ जेणें तुष्टे जनार्दन । हेंचि करी पां साधन । शरण एका जनार्दन । वाउगा शीण न करी ॥४॥
१३६७
तेजाचें जें तेज तेंचि परब्रह्मा । परम मंगलधाम त्यासी म्हणती ॥१॥ तेंचि नेमियेलें जोडोनियां कर । व्यापुनी चराचर भरलेसें ॥२॥ एका जनार्दनीं तोचि पुरुषोत्तम । मनासी आराम तया ठायीं ॥३॥
१३६८
तेजाचें तेजस रुपाचें रुपस । वैकुंठनिवास पंढरीये ॥१॥ पाहतां चित्त निवे मनाचें उन्मन । तें समचरण विटेवरी ॥२॥ आदि अंत नाहीं पाहतां प्रकार । तो हा सर्वेश्वर भीमातटीं ॥३॥ योगी चिंतिती अखंडता मनीं । तें उभे असें रंगणीं वैष्णवांचें ॥४॥ समाधी अष्टांग साधनें साधिती । तो मागे क्षीरापती आपुल्या मुखें ॥५॥ एका जनार्दनीं भावाचा लंपट । सांडोनि वैकुंठ कीर्तनीं डोले ॥६॥
१३६९
तेथें मुख्य हरिहर । शोभे चंद्रभागा तीर ॥१॥ जाऊं चला पंढरपुर । भेटुं आपल्या माहेरा ॥२॥ आर्त सांगुं जीवींचा । पुनीत ठाव हाचि साचा ॥३॥ हरिहरां होय भेटीं । वास तयांसी वैकुंठीं ॥४॥ एका जनर्दनीं शरण । पंढरी पुण्यठाव भीवरा जाण ॥५॥
१३७०
तेथें रावणाचा गर्व परिहार । पर्णिली सुंदर सीतादेवी ॥१॥ देवी दुंदुभीं वाजविल्या अपार । तेव्हां कळों सरे भार्गवासी ॥२॥ भार्गव पातला आला गर्वराशी । कोणें धनुष्यासी सोडियलें ॥३॥ भंगियेला गर्व तोषला भार्गव । एका जनार्दनीं अपुर्व आशीर्वाद ॥४॥
१३७१
तेहतीस कोटी देव बांदवडी लंका बंदीखान । गडलंका बंदीखान बंदिमोचन रामचिंतन देव करिती ध्यान । अंत गती सीता सती चोरुनी नेली जाण । अठरा पद्मे वानर भार वीरचालिला दारुण राम चालिले आपण ॥१॥ राम चढत रथ क्षिती डौलत त्रैलोक्य कंपायमान । रथु घडघडी शेषु फडफडी कूर्म लपवी मान । वराह बुडी दाढा तडतडी समुद्रा घाली पलाण । मेरु कुळाचळ कांपती चळचळ राक्षसा निधान ॥धृ॥ हनुमान बळी फाळी आसाळी अखय पौळी उपटितु । ब्रह्मा ब्रह्मापाशी बांधोनी त्यासी आणी लंकेसी अनर्थु । रावणु यासी हाणें खर्गेसीं घाव हनुमंत हाणतु । घावो पोचटु कैसा पैलु जैसा रामेसी कैसा भीडसी तुं ॥२॥ पुंसी लावुनि आंगी हनुमान रागी दावो सवेगी तेणें केला । बिभिषणु ते वेळीं रावणाजवळीं बुद्धि सोज्वळीं भेदला । त्यासी हाणिनि लाथा दवडी सर्वथा शरण रघुनाथा तो आला । न जाणता रावण लंकादान पूर्व संकल्प रामें घातला ॥३॥ रामाची ख्याती वाणूं किती शिळा तरती सागर । स्वयें बुडती आणिका बुडविती तरोनि तारीती वानर । लंका पारी सुवेळा गीरी रामु भारी दुर्धर । दाहा छत्रे लंकेवरी रावण पाहे नर वानर । येकु बाण सोडी काढुनी वोढी दहा छत्रे पाडी रघुवीर ॥४॥ शिष्टाई करितां अंगदु धरितां मंडपु अवचिता आणिला । मंडपु शिरीं देखोनी दुरी राम भारी कोपला । लंका बिभीषणा दिधली जाणा तेथील अर्थु कांआणिला । स्वामीबळें उडतां बैसलां माथां मजहीं न कळतां पैं आला । तेणेची उडडाणें आनंदें तेणें सभेसी मंडप सांडिला ॥५॥ हुडहुडां तत्काळीं वानर महाबळी वीरा खंदवी करिती । दांडें गुंडे पर्वत खांडे बळी अतुर्बळी हाणती । खंड्डे त्रीशुळ कौती मुदगल हातीं भाले कपाळां रोविती । पुच्छी धरुनी वानरां भवंडिती गरगरां येरे निशाचरां उपटिती ॥६॥ सेली सांबाळधर कोतेकर आढा उंचव्हाणका तोमर । आळगाईत बाणाईत त्रिशुळ चक्र धनुर्धर । अश्व गजपती नरपती नावाणगे वीर थोर थोर । नरांतक सुरांतक रणकर्कश दुर्धर । काळांतक यमांतक विकटमुखें भ्यासुर ॥७॥ नळनीळागंद जाबुवंत सुग्रीव महावीर । तार तरळ गव गवाक्ष गंधमर्दन दुर्धर । हनुमान महावीर अजरामर सुखें नुदधी मुखदुस्तर । वृक्ष पर्वत हातींन मिळे जुप्तती चालिले करिती भुभूःकार ॥८॥ वीरां वानरां रणीं झोट धरणी मागें कोण्ही न सरती । निशाणा दणदण खडगें खणखण बाण सणसणां सुटती । उतीं शिरीं माथां घायें देतां टणके कैसे उठती । वृक्षें रथु मोडिती गज झोडिती वीर पाडिती पैं क्षिती । लंकेपुढा अशुद्ध भडभडा रणनदी वाहती ॥९॥ रावनसेना मोडिली जाणा कोपू दशानना पैं आला । ढोल टमक भेरी रण मोहरी घावो निशाणा घातला । निशाचर वीर आला आपार भारदुर्धर चालिला । दहा छतेरे शिरीं रावणावरी रामु सन्मुख लोटला । वानर बहरी सपरिवारी रामु कैसा दिखिला ॥१०॥ श्यामसुंदर अति मनोहर मूर्ति रेखिला अति निगुती । कुंडलें साकार टिळकू पिवळा रेखिला अति निगुती । कुंडलें साकार निराकार श्रवणें विकार लोपली । देखोनी वदन कोटी मदन लज्जा अनंगा ते होती । चंद्र क्षीण बापुडा उपमें थोडा पुर्ण इंदु रघुपती ॥११॥ ऐसा मुख्य मयंकनिष्कंलक आर्त चकोर सेविती । आबाहु भावो अजानुबाहो धनुष्य मिरवे त्या हाती । द्वैत दळण करी पुर्ण बाणु शोभा सदगती । विजुकासे विसरळी अस्तगती । चरणींतोडरु गर्जे घोर विवरी कांपती ॥१२॥ रामु रावण वरुषे बाण पवन पुर्ण खिळिला । बाणाचा वळसा फिरतो कैसा लोह धुळासे उठिला । शर पिसारा सुटला वारा रावणू अंबरा उडविला । वाहाटुळी पान भ्रमें जाण तेवीं दशानन भ्रमला । न लगतां घावो रावण पाहो युद्ध क्रोधु सांडिला । कुंभकर्ण बळी तियेवेळीं देउनी आरोळी उठिला ॥१३॥ महामोह धूर्ण कुंभकर्ण अर्धचंद्रे निवाटिला । निकुंबळागिरी आटकभारी हानु आग्रीं चालिला । इंद्रजित निकटे कोटी कपटे करी सपाटे येकला । बाळ ब्रह्माचारी निराहारी तेणें इंद्रजीत मारिला । तें देखोनि रावण कोपला पुर्ण राम गर्जोनि हांकिला ॥१४॥ रामनाम जल्प फेडी पाप करी निष्पाप नामें एकें । रामावेगळें जाण न विधे आन अनुसंधानें नेटकें । तंव गजी राम ध्वजीं राम रामरुप आसके । रामु नर रामु वानर रामु निशाचर निमींखे । पाहे लंकेकडे राम चहुंकडे मागें पुढें रामु देखें । धनुष्य बाणा रामपुर्ण आपण्या राम वोळखें ॥१५॥ ऐसें युद्ध देखे परम सुख रावण हरिखें कोंदला । छेदुनी दशमुख केला विश्वमुख राम सम्यकु तुष्टला । नैश्वरासाठीं स्वरुपीं भेटीं रामु कृपाळु होय भला । राजपद गेलें स्वपद दिधलें आत्माराम प्रगटला । एका जनार्दनीं आनंदु त्रिभुवनीं देह विदेह रामु जाहला ॥१६॥
१३७२
तोंडभरी विवेक मनीं वाहे अभिलाख । विवेक केला रंक विषयाचा ॥१॥ वैराग्याविण ज्ञान बोलती तें उणें । घरोघरीं पोसणें लाविताती ॥२॥ जुनाट परिपाठी सांगताहे गोष्टी । विरक्तिविण पोटीं ज्ञान नेघे ॥३॥ परिसोनी ग्रंथ निरोप ज्ञानकथा । मनीं वाहे आस्था विषयांची ॥४॥ आरंभींच डाव पडियेला खोटा । पचलें नाहीं पोटा रामनाम ॥५॥ धडधडीत वैराग्य वरी वाहे विवेक । ज्ञानासी तो एक अधिकारी ॥६॥ वैराग्य विवेक बाणलेंसें अंगीं । ज्ञान तयालागीं वोसरलें ॥७॥ एका जनादनीं विवेकेशीं भेटी । वैराग्याविण गोष्टी फोल होय ॥८॥
१३७३
तोंडी घासु डोई टोला । ऐसा भजनार्थ जाला ॥१॥ तो सर्वस्वी नागवला । वैरी आपुला आपणचि ॥२॥ एका जनार्दनीं मात । भज भज सदगुरुनाथ ॥३॥
१३७४
तोचि एक संसारीं । वाचे हरिनाम उच्चारी ॥१॥ न करी आणिक पैं धंदा । नित्य आठवी गोंविदा ॥२॥ हरिनाम चिंतना । ज्याची रंगली रसना ॥३॥ एका जानर्दनीं संत । ज्याचें समाधान चित्त ॥४॥
१३७५
त्यांचिया इच्छेसारखें करावें । त्यांच्या मागें जावे वनांतरीं ॥१॥ वनासी जाऊनी नानापरी खेळे । हमामे हुतुतु बळें गडी घेती ॥२॥ सर्वांघडी संतां सर्वावरिष्ट देव । तयावरी डाव गाडी घेती ॥३॥ अंगावरी डाव आला म्हणती गोपाळ । देई डाव सकळ आमुचा आम्हां ॥४॥ पाठीवरी बैसती देवतें म्हणती । वांकरे श्रीपति वेंगीं आतां ॥५॥ एका जनार्दनी गडियांचे मेळीं । खेळें वनमाळी मागें पुढें ॥६॥
१३७६
त्यागुनी कर्म जाहला संन्यासी । ज्ञान ध्यान नाहीं मानसीं ॥१॥ शिखा सूत्र त्यागून जाण । करी दंडासी ग्रहण ॥२॥ नित्य भिक्षा पुत्राघरीं । मठ बांधोनी राहे द्वारीं ॥३॥ एका जनार्दनीं संन्यास । वायांची नाश कायेचा ॥४॥
१३७७
त्यागूनियां स्त्री संन्यासी जे होती । पतना ते जाती अंतकाळीं ॥१॥ घेउनी संन्यास ध्यान पै स्त्रियांचे । गुंतलासे आशे वायां जाये ॥२॥ नारायण नामीं नाहीं पैं आचार । सर्व अनाचार स्त्रीतें लक्षी ॥३॥ एका जनार्दनीं संन्यास लक्षण । गीतेमाजीं कृष्ण बोलियेला ॥४॥
१३७८
त्राहित त्राहित त्राहित । विठ्ठल देव तो त्राहित ॥१॥ वेदवचनें निर्धार । नाम तारक हें सार ॥२॥ तारका तारका श्रेष्ठ । पुराणीं हा बोभाट ॥३॥ म्हणे जनार्दनाचा एका । नाम तारका हें देखा ॥४॥
१३७९
त्रिकाळ साधन न लगे अनुष्ठान । आसन वसन त्याग नको ॥१॥ सोपें सोपेंक जपा आधीं रामनाम । वैकुंठींचे धाम जपतां लाभें ॥२॥ एका जनार्दनीं नामाचा प्रताप । तरेल तें खेप चौर्‍यांशींची ॥३॥
१३८०
त्रिगुणात्मक त्रिमूर्ति वेगळा । पाहे तो सांवळा दत्तरावो ॥१॥ मन माझे वेधलें दत्ताचे चरणीं । नाहीं आन मनीं दुजा छंद ॥२॥ परात्पर पहावा हृदयीं तैसा ध्यावा । एका जनार्दनीं सांठवावा दत्त मनीं ॥३॥
१३८१
त्रिगुणात्मक देह पंचभुतीं खेळ । शेवटीं निर्फळ होईल रया ॥१॥ दिसती भूताकृति वाउगी ते मिथ्या । शेवटीं तत्त्वतां कांहीं नुरे ॥२॥ पंचभुतें विरती ठायींचे ठायीं । वाया देहादेहीं बद्धमुक्त ॥३॥ एका जनार्दनीं नाथीलाची खेळ । अवघा मायाजाळ जाईल लया ॥४॥
१३८२
त्रिगुणात्मक माडियेला डाव । सहा चार अठरा गडी वांटिले एका त्यांचे नाव ॥१॥ कान्होबा खेळूं लागोरीचा खेळ । तुम्ही आम्ही मिळूं एका ठायीं सहज होईलमेळा ॥२॥ चौदा बारा सोला पंचविसाचा करुनी मेळ । एक एका पुढे पळती अवघा हलकलोळ ॥३॥ एका जनार्दनीं म्हणे कन्होबा खेळ अतु आवरीं । खेळ खेळतां शिणलों आम्हीं पुरे बा वेरझारी ॥४॥
१३८३
त्रिगुणाविरहित नाम दत्तात्रेय । गातां वदतांह होय आनंद चित्ता ॥१॥ पालटेल मन संसारभावना । अंती ते चरणा भेटी होय ॥२॥ योगयाग कसवटी वाउगी रहाटी । दत्त म्हणतां होटी सव जोडे ॥३॥ एका जनार्दनीं वदतां दत्त वाचे । अनंत यागांचे पुण्य जोडे ॥४॥
१३८४
त्रिपुटीविरहित कर कटीं उभा । त्रैलोक्याची शोभा शोभे गे माये ॥१॥ परे परता वैखरिये आरुता । पश्यंती निर्धारिता न कळें गे माये ॥२॥ मध्यमा मध्यमीं उभा तो स्वयंभ । अद्वयांनंद कोंभ कर्दळीचा गे माये ॥३॥ एका जनार्दनीं आहे तैसा भला । हृदयीं सामावाला माझ्या गे माये ॥४॥
१३८५
त्रिभुवनापरती पंढरीये पेठ । उभा तो वैकुंठ विटेवरी ॥१॥ पहा चला जाऊं पंढरीये । नवस पुरती सये अंतरीचे ॥२॥ उभा विटेवरी घेऊनी बुंथी । शंख चक्र गदा पद्म हातीं शोभती ॥३॥ राहीं रुक्मिणी उभ्या दोही दोबाही । चामरें मयुरपिच्छ ढाळिती ठायीं ॥४॥ एका जनार्दनीं पहातां रुप । पाहतां पाहतां जालें मन तद्रूप ॥५॥
१३८६
त्रिभुवनामाजी सोपें । चुकती खेपे पाहतां ॥१॥ तो हा बाळ दिगंबर । परात्पर सोयरा ॥२॥ आलियासी देतो मुक्ती । नामस्मृति तात्काळ ॥३॥ एका जनार्दनीं रुपं । गोमटें अमूप श्रीविठ्ठल ॥४॥
१३८७
त्रिभुवनामाजीं चाले ज्याची सत्ता । म्हणे तत्त्वतां चोर आला ॥१॥ तयाचिया भेणें पळोनियां आलों । बोलतां हे बोल नवल चोज ॥२॥ एका जनार्दनीं दावुनी लाघव । सांवत्याचें वैभव प्रगट करी ॥३॥
१३८८
त्रिभुवनीं उदार । भोळा राजा श्रीशंकर ॥१॥ जे चिंती जया वासना । पुरवणें त्याची क्षणा ॥२॥ यातीं कुळ न पाहे कांहीं । वास कैलासीं त्या देई ॥३॥ एका जनार्दनीं सोपें । शिवनाम पवित्र जपें ॥४॥
१३८९
त्रिभुवनीं ज्याची सत्ता । लाज वाटे त्यासी गातां ॥१॥ म्हणा काया वाचा त्याचे दास । न करा आणि कांची आस ॥२॥ एका जनार्दनीं भाव । त्याचे पायीं ठेवा जीव ॥३॥
१३९०
त्रिभुवनीं तुमची थोरी । पतितपावन म्हणती हरि ॥१॥ तें हें तारक सत्यनाम । शंकराचा तूं विश्राम ॥२॥ ब्रीद गाजे पतिताचें । तिहीं लोकी तुमचें साचें ॥३॥ शरण एका जनार्दनीं । आम्हीं पतित तूं पावन ॥४॥
१३९१
त्रिभुवनींचा दीप प्रकाशु देखिला । हृदयस्थ पाहिला जनार्दनं ॥१॥ दीपाची ती वाती वातीचा प्रकाश । कळिकामय दीप देहीं दिसे ॥२॥ चिन्मय प्रकाश स्वयं आत्मज्योती । एक जनार्दनीं भ्रांति निरसली ॥३॥
१३९२
त्रिवर्ग भोजना बैसले ते जाणा । गोणाई नाम्याकारण बोलतसे ॥१॥ नाम्या किती शिकवितां नायकसी बाळा । विठ्ठलाचा चाळा नको नाम्या ॥२॥ घेऊनि कापड जाईं बाजारासी । तेणें वडिलांसी समाधान ॥३॥ नामदेव म्हणे उदईक जाईन । एका जनार्दनीं आण वाहातसे ॥४॥
१३९३
त्रिविधपातें तापलें भारी । तया पंढरी विश्रांती ॥१॥ आणिके सुख नाही कोठें । पाहतां नेटें कोटि जन्म ॥२॥ कालाचेहि न चले बळ । भुमंडळ पंडरीये ॥३॥ भुवैकुंठ पंढरी देखा । ऐसा लेखा वेदशास्त्री ॥४॥ एका जनार्दनी धरुनि कास । पंढरीचा दास वारकरी ॥५॥
१३९४
त्रैलोक्याचा जो धनी । समचरणीं पंढरीये ॥१॥ धरुनियाबाळरुपी । उभाचि पहा पा विटेवरी ॥२॥ शोभताती संतभार । करतीं जयजयकार नामघोष ॥३॥ पुढें दक्षिनवाहिनी भीमा । ऐसा महिमा तेथीचा ॥४॥ एका जनार्दनीं वेधलें मन । लागलें ध्यान विठोबाचें ॥५॥
१३९५
त्रैलोक्याचा मुगुटमणी । चक्रपाणी श्रीविठ्ठ्ल ॥१॥ तया गावें वेळोवेळी । आणीक चाळा विसरुनी ॥२॥ संसाराचें नुरे कोड । पुरे चाड अंतरीची ॥३॥ एका जनार्दनीं शरण । देव स्वयें तिष्ठे आपण ॥४॥
१३९६
त्र्यंबक शिखरीं जीवन्मुक्त तुम्ही । नाथाचे ते धामीं गुप्तरुप ॥१॥ सर्वकाळ विठ्ठल विठ्ठल पैं वाचें । सार्थक देहाचें येणें करुनी ॥२॥ अखंड नामोच्चार समाधी सोहळा । आणिक न ये डोळां आड कांहीं ॥३॥ एका जनार्दनीं म्हणावा आपुला । आसनीं शयनीं त्याला विसरुं नका ॥४॥
१३९७
त्वंपद तत्पद असिपद यांवेगळा दिसे । खोल बुंथी घेऊनी विटेवरी उभा असे गे माय ॥१॥ वेडावला पुंडलिके उभा केला । तेथोनी कोठें न जाय गे माय ॥२॥ भक्तां अभयकर देतुसे अवलीळ । मेळवोनी मेळा वैष्णवांचा गे माय ॥३॥ पुंडलिकें मोहिला उभ उघाडचि केला । एका जनार्दनी ठसावला रुपेंविण गे माय ॥४॥
१३९८
थुरकात थुरकत चालतु । राधिकेचे गळां मिठी घालितु । तयेसी चुंबन आवडी देतु । पाहतां यशोदेसी मग रडतु ॥१॥ देई देई म्हणे चेंडूवातें । म्हणोनि आसडी निरीतें । यशोदा म्हाणे राधे परते । कां गे रडविसी कृष्णा ॥२॥ राधिका म्हणे ऐका मामिसें । याचा चेंडु मजपाशी नसे । हा क्रियानष्ट बोले भलतैसें । चेंडू मजपाशी नाही आणि तुमची असे ॥३॥ कृष्ण म्हणे झाडुनी चीर दावी । राधा झाडिता चेंडू पडिला लवलाहीं । म्हणे पाहे वो माझे आई । चेंडू घेउनी आण वाहेती पाहीं ॥४॥ यशोदेनें उचलोनि घेतिला कडेवरी । चेंडू झेलितसे सव्य अपसव्य करीं । एका जनार्दनीं भाव न कळे निर्धारीं । लाजोनी ती राधा आली आपुले घरीं ॥५॥
१३९९
थोर अन्यायी दयघना । सांभाळीं दीना आपुल्या ॥१॥ वारंवार क्षणक्षणीं । मस्तक चरणीं तुमच्या ॥२॥ कुर्वडीन आपुली काया । तुमचे पायांवरुनी ॥३॥ एका जनार्दनीं तुमचा दास । न करी उदास तयासी ॥४॥
१४००
थोर गर्भीची यातना । आठवितां दुःख मना ॥१॥ नऊमास वैरी । पचे विष्ठेचें दाथरीं ॥२॥ जन्म होतांचि जननी । सुख मानी अनुदिनीं ॥३॥ बाळ वाढतसे सायासें । तों तों माउली संतोषे ॥४॥ तारूण्याच्या येतां भरा । मातेसी करी पाण उतारा ॥५॥ पावला सवें म्हातारपण । नाकीं तोंडीं लाळ जाण ॥६॥ नाठवेचि राम राम । एका जनार्दनीं तो अधम ॥७॥
१४०१
दंभ मान ही उपाधी । निरसेल आधिव्याधी । नामें जोडे सर्व सिद्धि । धन्य जगीं नाम तें ॥१॥ उच्चारितां घडघडा । माया तृष्णा पळती पुढा । ऐसा नामच पोवाडा । ब्रह्मादिकां अत्यर्क्य ॥२॥ आगमनिगमांचें ज्ञान । नामें साधे वैराग्य निधान । एका जनार्दनीं पावन । नाम जाण निर्धारें ॥३॥
१४०२
दक्षिण द्वारका पंढरी । शोभतसे भीमातीरीं ॥१॥ चला जाऊं तया ठायां । वंदू संताचिया पायां ॥२॥ नाचुं हरुषें वाळुवंटीं । पुंडलिक पाहुनी दृष्टी ॥३॥ एका जनार्दनीं मागत । येवढा पुरवी मनींचा हेत ॥४॥
१४०३
दत्त दत्त म्हणतां वाचे । तेणें सार्थक जन्मांचें ॥१॥ मनें चितावा श्रीदत्त । अंतर्बाह्म पूर्ण भरित ॥२॥ दत्तरुप पाहे डोळां । तेणें भय कळिकाळा ॥३॥ एका जनार्दनीं जपा । मंत्र द्वयाक्षरीं हा सोपा ॥४॥
१४०४
दत्त दत्त म्हणे वाचे । काळ पाय वंदी त्याचें ॥१॥ दत्तचरणीं ठेवी वृत्ती । होय वृत्तीची निवृत्ती ॥२॥ दत्तरुप पाहे डोळां । वंद्य होय कळिकाळा ॥३॥ एका जनार्दनीं दत्त । हृदयीं वसे सदोदित ॥४॥
१४०५
दत्त दत्त वदतां वाचे । होय जन्माचें सार्थक ॥१॥ ऐसा जया नामीं वेधु । परमानंदु हृदयीं ॥२॥ दत्त आलिंगनीं समाधान । तेणें नासे मीतूपण ॥३॥ एका जनार्दनीं वेधु । दत्तनामें लागला छंदु ॥४॥
१४०६
दत्त देतां आलिंगन । कैसे होताहें अभिन्न ॥१॥ स्वलीला स्वरुपता । तिन्हीं दावी अभिन्नता ॥२॥ लाघवी श्रीदत्त । देवभक्त आपणचि होत ॥३॥ मीचि जनार्दन मीचि एका । दत्तस्वरुपीं मीच मी देखा ॥४॥ एका जनार्दनीं दत्त पुढें मागें । सगुन निर्गुण रुपें लागला संगे ॥५॥
१४०७
दत्त ध्यावा दत्त गावा । दत्त आमुचा विसांवा ॥१॥ दत्त अंतर्बाह्म आहे । दत्तविण कांही नोहे ॥२॥ दत्त जनीं दत्त वनीं । दत्तरुप हें अवनीं ॥३॥ दत्तरुपी लीन वृत्ती । एका जनार्दनीं विश्रांती ॥४॥
१४०८
दत्त नामाचा उच्चार । मुखीं वास निरंतर ॥१॥ तयापाशी शांति क्षमा । प्राप्त होय निजधामा ॥२॥ सर्व सुखें तयापाशी । ऋद्धिसिद्धि त्याच्या दासी ॥३॥ भुक्ति मुक्ति लोटांगणीं । लागताती त्या चरनीं ॥४॥ म्हणे एका जनार्दनीं । मना लागलेंसे ध्यान ॥५॥
१४०९
दत्त माझा दीनानाथ । भक्तालागीं उभा सतत ॥१॥ त्रिशुळ घेऊनियां करीं । उभा असे भक्ताद्वारी ॥२॥ भाळीं चर्चिली विभुती । रुद्राक्षाची माळ कंठी ॥३॥ जवळी असे कामधेनु । तिचा महिमा काय वानुं ॥४॥ एका जनार्दनीं दत्त । रुप राहिलें हृदयांत ॥५॥
१४१०
दत्त माझी माता दत्त माझा पिता । बहिणी बंधु चुलता दत्त माझा ॥१॥ दत्त माझा गुरु दत्त माझा तारु । मजशीं आधारु दत्तराज ॥२॥ दत्त माझे जन दत्त माझें मन । सोइरा सज्जन दत्त माझा ॥३॥ एका जनार्दनीं दत्त हा विसांवा । न विचारित गांवा जावें त्याच्या ॥४॥
१४११
दत्त माझी माय । आम्हां अनाथांची गाय ॥१॥ प्रेमपान्हा पाजी वेगीं । गुरुमाउली आम्हालांगी ॥२॥ आम्हां प्रीतीची साउली । श्रीगुरु दत्तराज माउली ॥३॥ आमची जीवींची जीवलगी । आम्हांलागीं घे वोसंगीं ॥४॥ एका जनार्दनीं । दत्तराज मायबहिणी ॥५॥
१४१२
दत्त माझी माय । आम्हां सुखा उणें काय ॥१॥ नित्य प्रीति दत्तनामीं । दत्त वसे गृहरामीं ॥२॥ दत्ताविण नसे दुजें । दत्त मायबाप माझें ॥३॥ दत्तात्रय दत्तात्रय । नाहीं कळिकाळाचें भय ॥४॥ एका जनार्दनीं दत्त । नित्य देख हृदयांत ॥५॥
१४१३
दत्त वसे औदुंबरीं । त्रिशुळ डमरु जटाधारी ॥१॥ कामधेनु आणि श्वान । उभे शोभती समान ॥२॥ गोदातीरीं नित्य वस्ती । अंगीं चर्चिली तिभुती ॥३॥ काखेमाजीं शोभे झोळी । अर्धचंद्रं वसे भाळीं ॥४॥ एका जनार्दनीं दत्त । रात्रंदिनीं आठवित ॥५॥
१४१४
दत्त सबाह्म अंतरीं । दत्तात्रय चराचरीं ॥१॥ दत्तात्रय माझें मन । हरोनि नेलें मीतूंपण ॥२॥ मुळीं सिंहाद्री पर्वती । दत्तात्रयें केली वस्ती ॥३॥ भक्तां मनीं केला वास । एका जनार्दनीं विश्वास ॥४॥
१४१५
दत्तराया करुं प्रथम नमन । द्वीतीय चरणां सदगुरुच्या ॥१॥ सदगुरुच्या चरणां करावा प्रणाम । मुखीं नित्य नाम सद जप ॥२॥ नित्य जपा वाचे गुरुराया स्वामी । तेणें सुखधामीं प्राप्त व्हाल ॥३॥ प्राप्त व्हाल तुम्हीं आत्यांतीक सुखा । जेथें जन्म दुःखा पार नाहीं ॥४॥ पार नाहीं वेदा शास्त्रे मौनावली । पुराणें ती झालीं मौनरुप ॥५॥ शेष ब्रह्मा आणि इंद्र । सुर्य अग्नि चंद्र अंत नाहीं ॥६॥ अंत नाहीं त्याचा अनंत स्वरुप । अनिर्वाच्य रुप सदगुरुचें ॥७॥ सदगुरुचें रुप तें स्वयंप्रकाश । दृश्यीं जो प्रकाश सद्‌गुरुचा ॥८॥ सद्‌गुरूचा प्रेमा माझिया अंतरीं । अनुभव साक्षीत्कारीं झाला असे ॥९॥ झाला असे अनुभव अपरोक्ष । शास्त्री जे विवक्षा केली असे ॥१०॥ केली असे स्तुति संत महानुभावी । सदगुरु वदवी मजलावी ॥११॥ मजलागीं त्यांनी दिली असे वाचा । उपकार तयाचा काय वानुं ॥१२॥ काय वानुं माझ्या सदगुरुदयाळा । बहुत कळवळा ज्यासी माझा ॥१३॥ ज्यासीं माझा प्राण अर्पण मी केला । देहा हा विकिला सर्वस्वं मी ॥१४॥ सर्वस्वें मी वसे सदगुरुचे पायीं । अन्य प्रिय नाहीं मजलागीं ॥१५॥ मजलागीं दया केली गुरुरायें । ह्रुदयीं तें पाय धरियले ॥१६॥ धरियेलीं जीवीं पाउलें कोवळीं । कंठीं एकावळी नाममाळा ॥१७॥ नाममाळा कंठीं शोभे ही साजिरी । हृदयीं गोजरीं गुरुमुर्ति ॥१८॥ गुरुमूर्ति वसे ज्याचे हृदयकमळीं । तया चंद्रमुळीं मागें पुढें ॥१९॥ मागें पुढें उभा राहे तो रक्षित । कांहीच आघात येवो नेदी ॥२०॥ येवो नेदी कदा कल्पनेची बाधा । आणिक आपदा शिष्यालागीं ॥२१॥ शिष्यालागीं गुरु करिताती बोध । स्वरुप स्वानंद देती तया ॥२२॥ देती त्या गुरु अनुपम सुख । स्वानंद कौतुक त्यासी लाभे ॥२३॥ त्यासी लाभे आत्मा सर्व अंतर्यामी । चिन्मयसुख धार्मीं पहुडे तो ॥२४॥ पहुडे तो नये कदाकाळीं देहा । तोचि निःसंदेहा पावलासे ॥२५॥ पावलासे ब्रह्मा अखंड परात्पर । सारासार विचार करोनियां ॥२६॥ करोनिया जेणें नित्य सनानसंध्या । दोषाची ते बाधा वारियेली ॥२७॥ वारियेली जेणे चित्तविक्षेपता । अकरोनि उपास्यता सगुणमूर्ति ॥२८॥ सगुणमुर्तीसी न म्हणावें मायीक । शास्त्र आत्यांतिक सांगतसे ॥२९॥ सांगतसे शास्त्र देवध्यान करा । विक्षेप तो वारा चित्ताचा पैं ॥३०॥ चित्ताचा गेलिया विक्षेप सकळ । आवरण केवळ राहिलेसे ॥३१॥ राहिलेसे जया स्वरुपावरण । त्याचें निवारण ज्ञानें होय ॥३२॥ ज्ञानें अहोय परी ज्ञानप्राप्तिलागीं । साधनें तीं अंगी विवेकादी ॥३३॥ विवेक वैराग्य शमादी ते षटक । चौथी ते देख मुमुक्षता ॥३४॥ मुमुक्ष ते पुढें श्रवण मनन । निजे तें ध्यासन पाहिजें कीं ॥३५॥ पाहिजें कीं तत्त्व पदार्थशोधन । साधनें हीं जाण अंतरंग ॥३६॥ अंतरंग साधनें करावी परमार्था । त्यागावी सर्वथा बहिरंग ॥३७॥ बहिरंग साधनें होय स्वर्गप्राप्ती । निष्कामी होती चित्तशुद्दी ॥३८॥ चित्तशुद्धि झाल्या अंतरंगा आधिकार । विवेक निर्धार सांगतसो ॥३९॥ सांगतो आतां विवेकांचे तथ्य । ब्रह्मा हेंचि सत्य जगन्मिथ्या ॥४०॥ मिथ्या माया कार्य जगत प्रकार । ब्रह्मा हेंचि सार विवेक हा ॥४१॥ विवेक हा स्मरा अनुभवकरा । वैराग्य अवधारा एकचित्तें ॥४२॥ एकचित्तें करा वैराग्य श्रवण । तेणें समाधान स्वरुपी होय ॥४३॥ स्वरुपी होय स्थिती वैराग्याच्या योगे । अन्ना विषसंगें सेवु नये ॥४४॥ सेवुं नये विषय वमनांचें परी । विट तो अंतरी सदा असो ॥४५॥ सदा असो प्रीति परमार्थालागीं । विषयीं विरागी यांचें नांव ॥४६॥ याचें नांव शम मनाचा निग्रहो । विषयी आग्रहो चित्ता नाहीं ॥४७॥ चित्ता नाही कधीं विषयाची स्फुर्ति । अंतर हे वृत्ति झाली असे ॥४८॥ झाली असे सर्व इंद्रिया स्थिरता । दम हें तत्त्वतां म्हणती त्या ॥४९॥ म्हणती त्य औपरम स्वधर्मासी । त्यागवे विधीसी सर्वस्वची ॥५०॥ सर्वस्वेचि शीत उष्णाएं साहणें । तितिक्षा म्हणनेम तयालागीं ॥५१॥ तयालागीं श्रद्धा म्हणताती जनीं । सदगुरुवचनीं विश्वास तो ॥५२॥ विश्वास असावा वेदांतांचे ठायी । सदगुरुचे पायी लीन व्हावें ॥५३॥ लीन व्हावें चित्त्त सदगुरुवचना । तोचि समाधान प्राप्त झाला ॥५४॥ प्राप्त झाला प्राणी मुमुक्षतेंलागीं । प्रपंचसंसंगीं विटला तो ॥५५॥ विटला संसारा आणि घरदारा । पुत्र परिवारा मिथ्या मानी ॥५६॥ मिथ्या मानी सर्व प्रपंचवैभव । विषयाचें नांव नांवडें ज्यासी ॥५७॥ नावडे ज्यांसी इष्ट मित्र ते सोयरे । परमार्थी वेव्हारे चित्त ज्याचें ॥५८॥ चित्त ज्यांचें झालें प्रपंचासी विरक्त । त्याचे मनीं आर्त सदगुरुभेटी ॥५९॥ सदगुरुभेटी व्हावी ऐसें ज्याचें मनीं । तो सर्वालागुनिअ विचारित ॥६०॥ विचारित मला सदगुरु कैं भेटती । रात्रंदिवस चित्तीं दुजें नाहीं ॥६१॥ दुजें नाहीं तया आणिक जगांत । सदगुरु सर्वत्र दिसतसे ॥६२॥ दिसतसे गुरु आसनीं शयनीं । आणिक भोजनीं गुरु दिसे ॥६३॥ गुरु दिसे जागृती स्वप्न आणि सुषप्ती । आनंद नेणई गुरुवीण ॥६४॥ गुरुवीण जनीं न दिसे ज्या अन्य । चित्त होय धन्य गुरु भेटी ॥६५॥ गुरुभेटी होता चित्त स्थिर होय । तळमळ जाय मनांचीं तें ॥६६॥ मनाची ते शंती होता पाय धरीं । दंडवत करी वेळोवेळां ॥६७॥ वेळोवेळां गुरुसी करी नमस्कार । जोडोनियां कर उभा राहीं ॥६८॥ जोडोनियां हात पुढें गुरुराया । बोलत सखया तारा स्वामी ॥६९॥ तारा स्वामी मज भवाचे सागरीं । व्हावें कर्णधारी मजलागीं ॥७०॥ मजलागीं गुरों तुमचा आधार । वोस चराचर तुम्हांवीण ॥७१॥ तुम्हावीण सखा मज नाहीं कोणी । वाटतें चरणीं घालु मिठी ॥७२॥ मिठी घालुं पायंसदगुरुसमर्थ । तेणें निजस्वार्था पावतील ॥७३॥ पाववीअल सुखा सदगुरु माउली । ती मज गाउली शिष्यवत्सा ॥७४॥ शिष्यवत्सालागी पाजी ज्ञानदुग्ध । तेणें देह शुद्ध होय त्याचा ॥७५॥ देह त्याचा केला ब्रह्मा हा गुरुनें । काय वाचा मनें चरण धरी ॥७६॥ चरण धरीतसे शिष्य वेळोवेळां । माझा कळवळा असो तुम्हां ॥७७॥ तुम्हावीण मज कोण हो तारील । दीन उद्धरेल कैशापरीं ॥७८॥ कैशापरी मज होईल सुटका । प्रपंच लटिका वाटे केव्हां ॥७९॥ केव्हा वाटे मज जगत हें मिथ्या । ब्रह्माचें सत्यत्व केव्हा पावें ॥८०॥ केव्हा पावएअ मज स्वरुपचि शांती । तें मज निश्चिती सांगा स्वामी ॥८१॥ सांगा स्वामी मज कृपा हो करुनी । शिष्य विनवणी करी ऐशीं ॥८२॥ करी ऐशी दया मज गुरुराया । लागतसे पाया शिष्यराज ॥८३॥ शिष्यराजा झाली अष्टभाव प्राप्ती । सदगुरुंनीं हातीं धरियेला ॥८४॥ धरियेला करीं नेला एकांतांत । अंकीं बैसवीत सदगुरुराव ॥८५॥ सदगुरुराव बोलती त्या क्षणीं । लागली उन्मनी तया लागीं ॥८६॥ तयालागीं नाहीं देहींची आठव । स्थुल सुक्ष्म भाव मावळले ॥८७॥ मावळले चारी देह चारी अवस्था । शिष्य तो तत्त्वता ब्रह्मा झाला ॥८८॥ ब्रह्मा झाला तयाचा देह आत्मस्थिती । द्वैताद्वैतप्रतीत नाहीं जया ॥८९॥ नाहीं जया सुखदुःखाची भावना । समुळ वासना निरसली ॥९०॥ निरसली त्याची अहंकार कल्पना । सुखदुःख यातना नाही तया ॥९१॥ नाहीं तया जीव शिव भेदाभेद । समुळ हे वाद मिथ्या झाले ॥९२॥ मिथ्या झालें ज्ञान ज्ञेय आणि ज्ञाता । भोज्य भोग भोक्ता मावळला ॥९३॥ मावळला तेव्हा सद्वैत प्रपंच । एक ब्रह्मा साच अनुभविलें ॥९४॥ अनुभविलें तेणें अनुभव वेडावला । विचार निमाला जिये ठायीं ॥९५॥ जिये ठायींगती नाहीं षटप्रमाणा । साधन लक्षणा ठाव कैंचा ॥९६॥ ठाअव कैंचा तेथें परादिका वाच । जेथें त्या शब्दाचा लाग नाहीं ॥९७॥ लाग नाहीं तेथें उपपत्ति युक्ति । अपरोक्ष प्रतीति लया गेली ॥९८॥ लया गेली तया स्थानीं मज ठेविलें । सदगुरुदयाळें दीनानाथें ॥९९॥ दीनानाहें तया ठायीं निजविलें । नवजाती वर्णिलें गुण तया ॥१००॥ एका जनार्दन गुरुपायीं लीन । ब्रह्मा परिपुर्ण अनुभविलें ॥१०१॥
१४१६
दत्तात्रय नाम ज्याचे नित्य मुखीं । तया समसुखीं नाहीं दुजा ॥१॥ भावें दत्त दत्त म्हणतसे वाचे । कळिकाळ त्याचे पाय वंदी ॥२॥ दत्ताचें पैं रुप ज्याचे वसे नेत्रीं । आहिक्य परत्री तोचि सुखी ॥३॥ गुरु दत्ताराया देई आलिंगन । तयासी वंदन करिती सर्व ॥४॥ दत्तरायाची जे करिताती यात्रा । त्याचेनीं पवित्र होते तीर्थ ॥५॥ ज्याचे चित्तीं वसे गुरुदत्त ध्यान । त्याचेनि पावन तिन्ही लोक ॥६॥ दत्तालागीं अपीं तन मन धन । परब्रह्मा पुर्ण तोचि झाला ॥७॥ दत्तचरण तीर्थ जो का नित्य सेवी । उगवितो गोवी प्रपंचाची ॥८॥ दत्तावरुनियां कुरवंडी काया । तयाचिया पाया मोक्ष लागे ॥९॥ एका जनार्दनीं मुखीं दत्तनाम । हरे भवश्रम क्षणामाजीं ॥१०॥
१४१७
दत्तात्रेय नाम । नित्य जपे जो निष्कामा ॥१॥ तया नाहीं द्वैतभाव । दृष्टी दिसे गुरुराव ॥२॥ दत्ताविण नसे स्थान । दत्तरुप जन वन ॥३॥ ध्यानीं मनीं दत्तराज । दत्तविण नाही काज ॥४॥ एका जनार्दनीं जपा । दत्तनाम मंत्र सोपा ॥५॥
१४१८
दयाळु उदार पंढरीराव । भाकितां कवि पुरवी इच्छा ॥१॥ ऐसा याचा अनुभव । आहे ठाव मागोनियां ॥२॥ जे जे होती शरणागत । पुरवी आर्त तयाचें ॥३॥ उपमन्यु ध्रुव बाळ । दिधलें अढळपद त्यांतें ॥४॥ पुराणीं तो व्यासें बहु । वर्णिलें दावुं कासया ॥५॥ एका जनार्दनीं एकचि भाव । तेणें देव तुष्टता ॥६॥
१४१९
दयेचें धाम नेघे कोणाचाही श्रम । हरि वाणीं सप्रेम दृढ निजभावें ॥१॥ प्रसन्न होऊनी दीनातें पहातो । आवडी उद्धरीतो भाविकांसी ॥२॥ एका जनार्दनीं भक्तीसी भुलला । म्हणोनी वेडावला भक्तामागें ॥३॥
१४२०
दरुशनें तरती प्राणी । ऐशी आयणी जयाची ॥१॥ ठेवितांचि मस्तकी हात । देवाचि करीत तयासी ॥२॥ देउनी नाममात्रा रस । भवरोगास छेदिती ॥३॥ एका जनार्दनीं ते संत । कृपावंत दीनालागीं ॥४॥
१४२१
दर्पणामाजीं आपण । जीवरुपें शिव जाण ॥१॥ जेणे स्वरूपें आपण । तद्रूप बिंब दिसे जाण ॥२॥ अग्नि राखें झाकोळिला । तरी अग्नीपणें संचला ॥३॥ जीवशिव दोन्हीं हो का एक । तरी मलीन एक चोख ॥४॥ थिल्लरीं प्रतिबिंब भासे । बिंबाअंगीम काय संचिता वसे ॥५॥ निर्वाळूनि पहातां वेगीं । बिंब प्रतिबिंब वाउगी ॥६॥ ऐसें भुलूं नये मन । शरण एका जनार्दन ॥७॥
१४२२
दशरथ संतानहीन जाला । पुत्रजन्ययाग केला ॥१॥ सांगे वसिष्ठ आचार्य । धर्मशास्त्र ऐके राय ॥२॥ पुसों जावं जी डोहळीयां । जें जें प्रिया मागती ॥३॥ ऐका कौसल्या संभ्रम । उदरीं संभवला राम ॥४॥ पुसों जातां डोहळे । आन अन्य तें वर्तलें ॥५॥ जनार्दन उदरा आला । एकाएकीं डोळिया घाला ॥६॥
१४२३
दहा अवतार घेत भक्ताचियां काजा । तो हा विटेवरी राजा पंढरीचा ॥१॥ भक्तांचें उणें न पाहे आपण । उच्छिष्ट काढी धर्माघरीं न लाजे जाण ॥२॥ अर्जुनाची घोडीं रणांगणीं धुतली । भक्ति नये उणें कृपेची माउली ॥३॥ एका जनार्दनीं भक्तांचीया काजा । विटाएवरी उभा राहिला सहजा ॥४॥
१४२४
दही दुध चोरुनी दे सर्वांना । ऐसें मज सांगताती । आई मज मारुं नको । नाहीं नाहीं म्या पाहिली माती ॥१॥ तें न ऐकिलें म्हणोनि मजवर । रुसले सांगाती । बळीरामही जो भेटला । तोही माझा पक्षपाती ॥२॥ एका जनार्दनीं पूर्ण कृपेनें । आम्हीं भजूं दीनराती ॥३॥
१४२५
दांभिकाची भक्ति । वरीवरी देहस्थिती अंतरीं तो गती । वेगळी बापा ॥१॥ नाम गाय प्रेमभरित । रडे स्फुंदे डोळे पुसीत । अंतरीचा हेत । वेगळा बापा ॥२॥ वृंदावनाचें तें फळ । कडु जैसें सर्वकाळ । तैसा मनोमेळ । वेगळा बापा ॥३॥ धरुनी ध्यान । बक जैसा लक्षी मीन । परस्त्री देखोन । विव्हळ बापा ॥४॥ सांगे आत्मज्ञान स्थिती । अंतरीं तों वेगळी रीती । द्रव्य जोडे कैशा रीती । हेंची ध्यान बापा ॥५॥ न कळे कांहीं स्वहित । सदा द्रव्यदारांवर चित्त । तयासी भगवंत । प्राप्त नाहीं ॥६॥ शरण एका जनार्दन । नको मज तयाचें दरुशन । अभाविकांसी भाषण । नको देवा ॥७॥
१४२६
दाता तोचि म्हणावा । नामावांचोनि नेणें जीवा ॥१॥ थोर तोचि म्हणावा । नेणें भूताचा तो हेवा ॥२॥ लहान तोचि म्हणावा । काया वाचा भजे देवा ॥३॥ एका जनार्दनीं म्हणे । देवावांचुनी कांहीं नेणें ॥४॥
१४२७
दानधर्म कोणान घडे सर्वथा । राम नाम घेतं सर्व जोडें ॥१॥ कर्म धर्म कांहीं न होती सांग । रामनामें पांग फिटे त्याचा ॥२॥ वेदशास्त्रांव्युप्तत्ती पढतां श्रम पोटीं । रामनामें कोटी जप घडे ॥३॥ आचार विचार न कळे साचार । एका जनार्दनीं निर्धार राम जपा ॥४॥
१४२८
दामशेटी म्हणे ऐवजाचा धनी । आणिला तो मजलागुनी दावी आतां ॥१॥ वंदुनी चरण म्हणे चला आंत । जगीं हें प्रख्यात करुं नका ॥२॥ एका जनार्दनीं बोलोनियां मात । धरियेला हात वडिलांचा ॥३॥
१४२९
दामशेटीचा कारकुन । स्वयें झाला नारायण ॥१॥ लग्नतिथी धरली निकी । नोहे कोणा पैं ओळखी ॥२॥ विठ्ठलशेटी ऐसें नाम । एका जनार्दनीं प्रेम ॥३॥
१४३०
दामा सांगे गोणाईसी । पोरें धरिलीसे विवसी ॥१॥ न पाहे संसाराचा छंद । मनीं धरिला तो गोविंद ॥२॥ एका जनार्दनीं सांगे । पुत्र जन्मोजन्मीं न फिटे पांग ॥३॥
१४३१
दामाजीचा भाव पाहूनी श्रीहरी । अनामिका निर्धारी स्वयें जाला ॥१॥ घेऊनियां द्रव्य निघाला तो हरी । जोहार जोहार करी बादशहातें ॥२॥ द्रव्य देऊनियां रसीच घेतली । भक्ताची माउली विठाबाई ॥३॥ एका जनार्दनीं भक्ताचियासाठीं । धांवे पाठोपाठीं भक्ताचिया ॥४॥
१४३२
दामोदर गावा दामोदर पहावा । दामोदर सांठवा हृदयमाजीं ॥१॥ गोपीराजी ध्यान दामोदरीं मन । चुकलें बंधन नाम घेतां ॥२॥ जनार्दनाचा एका दामोदरी मिनला । कृतकृत्य झाला उभय लोकीं ॥३॥
१४३३
दास मी होईन कामारी दासीचा । परि छंद सायासाचा नाहीं मनीं ॥१॥ गाईन तुमचएं नाम संतांचा सांगात । यापरती मात दुजी नाहीं ॥२॥ निर्लज्ज कीर्तनीं नाचेन मी देवा । एकाजनार्दनीं भावा पालट नको ॥३॥
१४३४
दासां दुःख झालें फार । वेगीं करा प्रतिकार ॥१॥ सुख मानिलें संसारीं । दासां दुःख झालें भारी ॥२॥ सोडुनियां मी स्वधर्म । आचरलों नीच कर्म ॥३॥ सेवा केली नीच याती । द्रव्यलोभें घाताघातीं ॥४॥ अन्न ग्रास न जाय मुखीं । पश्चात्ताप झाला शेखीं ॥५॥ पुण्यस्थान मी पावलोम । गुरुचरणीं विश्रामलों ॥६॥ स्वामी विनंती अवधारा । दीनबांधी करुणाकरा ॥७॥ कर जोडोनिया शीर । ठेवियलें पायांवर ॥८॥ जन्मनाम जनार्दन । मुखीं गुरुअभिधान ॥९॥
१४३५
दासासी संकट पडतां जडभारी । धांवे नानापरी रक्षणार्थ ॥१॥ पडतां संकटीं द्रौपदी बहीण । धांवे नारायन लावलाहें ॥२॥ सुदामियाचें दरिद्र निवटिले । द्वारकेतुल्य दिलें ग्राम त्यासी ॥३॥ अंबऋषीसाठीं गर्भवास सोसी । परिक्षितीसी रक्षी गर्भामाजीं ॥४॥ अर्जुनाचें रथीं होउनी सारथी । उच्छिष्ट भक्षिती गोवळ्यांचें ॥५॥ राखितां गोधनें मेघ वरुषला । गोवर्धन उचलिला निजबळें ॥६॥ मारुनी कंसासुर सोडिले पितर । रक्षिलें निर्धारें भक्तजन ॥७॥ एकाजनार्दनीं आपुलें म्हणवितां । धांव हरि सर्वथा तयालागीं ॥८॥
१४३६
दास्य करुं हरिदासाचें । तेणें जन्माचें सार्थक ॥१॥ बुद्धि वसो तुमचे नामीं । आणिका कामीं न गुंतो ॥२॥ संसार तो पारिखा जाहला । या विठ्ठला पाहतां ॥३॥ पालटला भेदाभेद । एका जनार्दनीं आनंद ॥४॥
१४३७
दास्यत्व करीन मी देवा । माझी पुरवा आस तुम्ही ॥१॥ देऊनियां कृपादान । निरवावें जाण संतांसी ॥२॥ मग ते धरितां आपुलें करीं । होती कामारी भुक्ति मुक्ति ॥३॥ एका जनार्दनीं शरण । तुमचें महिमान न कळे ॥४॥
१४३८
दास्यत्वें चोखट । रामनामें सोपीं वाट ॥१॥ करितां लाधलें चरण । मना जाहलें समाधान ॥२॥ होतों जन्मोजन्मीं तापलों । तुमचे दरुशनें निवांत ठेलों ॥३॥ शरण एका जनार्दनीं । जनार्दन एकपणीं ॥४॥
१४३९
दिव्य तेज झळकती रत्नकीळा फांकती अगणीत लावण्या तेज प्रभा दिसती गे माये ॥१॥ कानडा वो सुंदर रुपडा गे । अंतरीं बाहेरीं पाहतां दिसे उघडा गे ॥२॥ आलिंगनालागीं मन उताविळ होय । क्षेम द्तां माझें मीपण जाय ॥३॥ मागें पुढें चहुकडे उघडे पाही । पाहावयासी गेलें मजला ठक पडले बाई ॥४॥ बाहेरी पाहुं जातां आतंरी भासे । जें जें भासेम तें तें येकीयेक समरसें ॥५॥ एका जनार्दनीं जिवीचा जिव्हाळा । एक पणें पाहतां न दिसे दृष्टीवेगळा ॥६॥
१४४०
दिसे सगुण परि निर्गुण । आगमां निगमां न कळे महिमान । परा पश्यंती खुटलीया जाण । त्यांचे न कळे शिवाजी महिमान ॥१॥ पहा हो सांवळा नंदाघरीं । नवनीताची करीतसे चोरी । गौळणी गार्‍हाणी सांगती नानापरी ॥ त्यांचे महिमान न कळे श्रमले सहाचारी ॥२॥ कोणी म्हणती यासी शिक लावूं । कोणी म्हणती आला बाऊ । दाखवी लाघव नवलाऊ । अगम्य खेळ ज्याचा कवणा न कळे कांहीं ॥३॥ चोरी करितां बांधितीं उखळी दावें । येतो काकुळती माते मज सोडावं । एका जनार्दनी दावीं सोंग बरवें । ज्यांची कीर्ति ऐकतां अघ नासे सर्वे ॥४॥
१४४१
दीन म्हणोनी नाच रे कीर्तनीं । तेणें चक्रपाणी करी कृपा ॥१॥ अनाथाचा नाथ पतीतपावन । म्हणोनी कीर्तन तया गोडी ॥२॥ एका जनार्दनीं गोडाचें तें गोड । कीर्तन सुरवाड तिहीं लोकीं ॥३॥
१४४२
दीनाचिया काजा । धांवे वैकुंठिचा राजा ॥१॥ तो हा हरी विटेवरी । समकर धरुनी करीं ॥२॥ भक्तां पुंडलिकां पाहें । उभारुनी दृढ बाहे ॥३॥ एका जनार्दनीं शरण । विठ्ठलनाम पतीतपावन ॥४॥
१४४३
दीनाचें उपार्जन करी पोटासाठीं । म्हणे मज लंगोटी द्याहो कोण्हीं ॥१॥ घेउनी संन्यास हिंडे दारोदारी । ' नारायण ' करी पोटासाठी ॥२॥ काम क्रोध वैरी सदोदित पीडी । वरी शेंडी बोडी करुनीं काई ॥३॥ व्यर्थ विटंबना करिती जनांत । संन्याशाची मात सोंग दावी ॥४॥ एका जनार्दनीं संन्यास साचा । रामनाम वाचा उच्चार करी ॥५॥
१४४४
दीपकळिकेमाजीं कळा । तैसा परब्रह्मा पुतळा ॥१॥ असोनियां नसे जगीं । जैसा प्राणवायु संगीं ॥२॥ करवी खेळवी नाना खेळा । परी आपण अलिप्त सकळां ॥३॥ एका जनार्दनीं सुत्रधारी । खेळ खेळोनी अलिप्त निर्धारी ॥४॥
१४४५
दीपकाचे ठायीं नाहीं द्वैतभाव । चोर आणि साव सारखाची ॥१॥ तैसं ब्रह्माज्ञान । सांगताती गोष्टी । अभाविका पोटीं स्थिर नोहे ॥२॥ शुद्ध पंचामृतें काग तो न्हाणिला । परी कृष्णवर्ण पालटला नोहे त्याचा ॥३॥ एका जनार्दनीं खळाचा स्वभाव । पालट वैभव नोहे त्यासी ॥४॥
१४४६
दीपांचें तें तेज कळिकें ग्रासिले । उदय अस्त ठेले प्रभेविण ॥१॥ लोपलीसे प्रभा तेजाचे तेजस । जाहली समरस दीपज्योती ॥२॥ फुंकिल्यावांचुनीं तेज तें निघालें । त्रिभुवनीं प्रकाशिलें नवल देख ॥३॥ एका जनार्दनीं ज्योतीचा प्रकाश । जाहला समरस देहीं देव ॥४॥
१४४७
दीपाचिया अंगसंगा । कोण सुख आहे पतंगा ॥१॥ दीपा रूपाचेनि कोडें । पतंग स्नेहांत उडी पडे ॥२॥ एका निमाले देखतो । दुजा उडी घाली अवचितीं ॥३॥ ऐशी भुललीं बापुडीं । एका जनार्दनीं धरूनि गोडी ॥४॥
१४४८
दुःखाचिया भोगी कोडी । रसना गोडी बाधक ॥१॥ पाहतां रस उत्तम दिसत । भीतरीं रोगाचें गळ गुप्त ॥२॥ गळीं अडकला जो मासा । तो जीत ना मरे चरफडी जैसा ॥३॥ जन्ममरण लागले खांदीं । एका जनार्दनीं धरा शुद्धी ॥४॥
१४४९
दुःखाच्या खडकीं आदळती प्राणी । परि संसाराचा मनीं वीट नये ॥१॥ कामाचिया लाटे कर्दमाचे पुरीं । बुडे तरी हाव धरी अधिकाराची ॥२॥ वारितां नायके भ्रमलासे कीर । सांपडे सत्वर पारधीया ॥३॥ एका जनार्दनीं यामाचीया फांसां । पडेल तो सहसा न कळे मुढा ॥४॥
१४५०
दुजा छंद नोहे वाचे । वदे साचें हरिनाम ॥१॥ कोटी कुळें होती पावन । नामस्मरण करितांची ॥२॥ यम न पाहे तयाकडे । वांडें कोंडे नमस्कारी ॥३॥ विधी शची उमारमण । वंदिती चरण आवडी ॥४॥ म्हणे जनार्दनाचा एका । उपाय नेटका कलियुगीं ॥५॥
१४५१
दुजा नाहींजया भाव । अवघा देव विठ्ठल ॥१॥ आणिक कांहीं नाहीं चंद्र । नाम गोविंद सर्वदा ॥२॥ नाना मंता करिती खंड । छेदिती पाखांड अंतरीचें ॥३॥ एका जनार्दनीं तेचि संत । उदार कृपावंत दयाळू ॥४॥
१४५२
दुजियाची निंदा नको रे करूं मना । चिंती या चरण संताचिया ॥१॥ होउनी उदास गाई सदा नामक । बैसोनि निष्काम एकान्तासी ॥२॥ एकान्तीसी गोडी शंभु जाणे जोडी । आणिक परवडी न कळे कांहीं ॥३॥ एका जनार्दनीं रामनाम सार । करितां उच्चार आळस नको ॥४॥
१४५३
दुजी येऊनी पुढें बोले ऐकें वो बाई । घुसळण घुसळितां डेरां फोडिला पाहीं ॥१॥ धांवुनि आलीं सासु मारितसें मजला । हांसतसे आपण तेथोनि पळाला ॥२॥ वांसुरें तीं साडीं मुला चिमुरे घेतो । द्या रे नवनीत म्हणोनि तया मारितो ॥३॥ लपविलें ठायीं उरों नेदी कांहीं । एका जनार्दनीं पुरें आतां बाई ॥४॥
१४५४
दुजेंपणें पाहे तरी देवाचे चरण । आणि तें कीर्तन वैष्णवांचें ॥१॥ कीर्तनीं नाचती हरिदास प्रेमें । दुजेपणा नेमें हारुनी जाय ॥२॥ एका जनार्दनीं दुजेपणा टाकुणी । वासुदेवचरणीं लीन होई ॥३॥
१४५५
दुजेपणी दृष्टी न घालुं । सर्वा चालु एक सत्ता ॥१॥ हाचि पुर्वीचा संकल्प । निर्विकल्प नाम जपूं ॥२॥ नाहीं काहीं वाटावाटीं । करुं एकवटी मनाची ॥३॥ एका जनार्दनीं उदास । जाहलों दास संतचरणीं ॥४॥
१४५६
दुजेपणें नको पाहुं सर्वाठायीं । एकरुप देहीं दिसे ॥१॥ येणें सर्व काम सुगम सोपारें । दुजेपंणे वावरे देहबुद्धी ॥२॥ मन चित्त अहंकार करणें या विचार । दुजेपणें पार केवीं तरे ॥३॥ एका जनार्दनीं दुजेपणा सांडी । विठ्ठलचि मांडी हृदयामाजीं ॥४॥
१४५७
दुडीवरी दुडी गौळणी सातें निघाली । गौळणी गोरस म्हणों विसरली ॥१॥ गोविंदु घ्या कोनी दामोदरु घ्या गे । तंव तंव हांसती मथुरेच्या गे ॥२॥ दुडीया माझारी कान्होंबा झाला भरी । उचंबळे गोरस सांडे बाहेरी ॥३॥ एका जनार्दनी सबलस गौळणी । ब्रह्मानदु न समाये मनीं ॥४॥
१४५८
दुध आणिलें परगृहींहूनी । संतोष नाही माझे मनीं । श्रीहरी देईल मज लागुनी । तरीच दुध घेईन ॥१॥ पिता म्हणतां हे वचन । बाळा तूं अज्ञान । कां वर्जिलें अन्नपान । क्षुधा बहुत पीडितसे ॥२॥ तंव बोले उपमन्यु । भोजन न करी दुधावांचून । श्रीहरी देईल मजलागुन तरीच भोजन करीन ॥३॥ देवा त्वां ध्रुवा अढळपद दिलें । मजलागी निष्ठुर मन केलें । एका जनार्दनीं बोले । बाल वाचे सदद ॥४॥
१४५९
दुबळ्यांसी धन । सांपडलिया नोहे जतन । अभाविकांसी नाम जाण । तैशा रीतीं ॥१॥ धनलोभीयाचे परी । जैसें चित्त धनावरी । तैसें हृदया माझारीं । नाम जप ॥२॥ कामी पुरुषाचें ध्यान । तया न कळे आप्तजन । जैसा पारध्याधीन । मृग होय ॥३॥ अभाविकाचे बोल । नव्हती ते फोल । एका जनार्दनीं मोल । तया नाहीं वेंचत ॥४॥
१४६०
दुबार बाहुली वस्तुरूप झाली । पाहतां सोहं मेळी चिदांनंद ॥१॥ अधमात्रा स्थान नयनींच प्रमाण । मसुरेसमान हा वर्ण जेथें ॥२॥ सुषुम्ना कुंडलिनी कासीया सांगातिनी । निश्चिती तें नयनीं बिंदुरूप ॥३॥ एका जनार्दनी पाहे डोळियां भीतरीं । सबाह्म अभ्यंतरीं तरीच दिसे ॥४॥
१४६१
दुरवरी वोझें वाहिलासे भार । आतां वेरझार खुंटलीसे ॥१॥ माझिया पैं मनें मानिला विश्वास । दृढभावें आस धरियेली ॥२॥ सांपडला मार्ग उत्तमाउत्तम । गेलें कर्म धर्म पारुषोनी ॥३॥ एका जनार्दनीं पाहतां निश्चित । निवारली भ्रांति देहा देव ॥४॥
१४६२
दुर्जनाचें संगें दुर्जन लागत । नाना विटंबीत सज्जनासी ॥१॥ दुर्जनाचें अन्न सेउनी दुर्वास । छळिलें पांडवांस निशीमाजीं ॥२॥ एका जनार्दनीं दुर्जनाचा संग । तेणें होय भंग भाविकांचा ॥३॥
१४६३
दुर्बळांची कन्या समर्थाचे केलीं । अवदसा निमाली दरिद्राची ॥१॥ हरिकृपा होतां भक्ता निघती दोंदें । नाचती स्वानंदें हरिरंगी ॥२॥ देव भक्त दोन्हीं एकरुप झाले । मुळीचें संचलें जैसे तैसे ॥३॥ पाजळली ज्योती कापुराची वाती । ओवाळितां आरती भेद नुरे ॥४॥ एका जनार्दनीं कल्पाचि मुराला । तोचि हरि झाला ब्रह्मारुप ॥५॥
१४६४
दुर्लभ नरदेह पावला । प्राणी देवासी विसरला ॥१॥ सुख मानिलें संसारी । जाऊनि पडीला अघोरीं ॥२॥ संसारसिंधुसी तारक । स्वामी दत्तराज एक ॥३॥ त्याचें नाम आठवितां । चुकली भवार्णवाची वार्तां ॥४॥ एका जनार्दनीं दत्त । भवसिंधु तारक समर्थ ॥५॥
१४६५
दुस्तर मार्ग आटाआटी । पंढरी सृष्ती तारक ॥१॥ कोणा न लगे दंडन । कायापीडन कष्ट ते ॥२॥ नको उपवास विधीचा पडदा । शुद्ध अशुद्धा न पहावें ॥३॥ मुगुटमणीं पुंडलीक । दरुशनें पातक हरतसे ॥४॥ एका जनर्दनीं निर्मळ । पंढरी स्थळ सर्वांसी ॥५॥
१४६६
दुस्तर सायास न करीं । वाचे म्हणे हरिहरी । वैकुंठ पायरी । सोपी तेणें ॥१॥ तें नाम विठोबाचें । सुलभ वदें कां रे वाचे । अनंता जन्माचें दोष जाती ॥२॥ प्रचीत पाहे अर्धक्षण । नाम उच्चारी रे जाण । तेणें तुटे भवबधन । यमदुतांचें ॥३॥ नाम घेतां उठाउठीं । पातकाच्या पळती थाटी । पुर्वज उद्धरती कोटी । बेचाळिसासहित ॥४॥ एका जनार्दनीं प्रेम । गाईं तूं विठ्ठल नाम । आणिक सोपें वर्म । नाहीं नाहीं ॥५॥
१४६७
दृढभाव हृदयीं धरा । वाचे स्मरा विठ्ठ्ल ॥१॥ मग तुम्हां काय उणें । होय पेणें वैकुंठ ॥२॥ धरा सत्यसमागम आवडीं । कीर्तनपरवडीं नाचावें ॥३॥ एका जनार्दनीं श्रोतें । एकात्मतें पावाल ॥४॥
१४६८
दृश्य तो जोगिळी देखणें कवळी । दृष्टी ज्याचें मेळी समरस होय ॥१॥ लक्षालक्ष भेदी निरसी उपाधी । महाशून्य पदीं पैठा होय ॥२॥ मन पवन गांठीं संगम गोल्हाटीं । तूर्या औटपिठीं स्थिर करी ॥३॥ मनाचें उन्मन जनार्दनीं खूण । यालागीं शरण एकनाथ ॥४॥
१४६९
दृष्टी देखे परब्रह्मा । श्रवनीं ऐके परब्रह्मा ॥१॥ रसना सेवी ब्रह्मारस । सदा आनंद उल्हास ॥२॥ गुरुकृपेचें हे वर्म । जग देखें परब्रह्मा ॥३॥ एका जनार्दनीं चराचर । अवघे ज्यासी परात्पर ॥४॥
१४७०
दृष्टी पाहतां बिठोबासी । आनंद होय सुखराशी ॥१॥ ऐसा अनुभव मना । पाहें पाहें पंढरीराणा ॥२॥ एका दरुशनें मुक्ती । देतो रखुमाईचा पती ॥३॥ एका जनार्दनीं गमन । गोजिरें विटें समचरण ॥४॥
१४७१
दृष्टी पाहतां भीमातरी । स्वर्गीं वास तया निरतरां ॥१॥ ऐसा तेथीचा महिमा । आणिक नाहीं दुजी उपमा ॥२॥ दक्षिन द्वारका पंढरी । वसे भीवरेचे तीरीं ॥३॥ जेथें वसे वैकुंठ देवो । एका जनार्दनीं गेला भेवो ॥४॥
१४७२
दे दे दे मोरी कन्हया साडीछे । तुम भलो नंदजी नंदन लालसे ॥१॥ मैतो आई मथुरा हाटछे । बिगरी तु क्या धरे घाटछे कन्हया ॥२॥ ज्याकर बोलुंगी जशोदा नंदछे । तरी खोड तांडुगी हातछे कन्हया ॥३॥ एक जनार्दन बिनती करतछे । दोनो हात जोडकरछे कन्हया ॥४॥
१४७३
देऊनिया अभयदान । संतीं केलें मज पावन । निरसोनी भवबंधन । तारिलें मज ॥१॥ ऐसा संतसमागम । नाहीं आणीक विश्रामक । योगीयांचें धाम कुंठीत पैं झाले ॥२॥ आणीक एक वर्म । मुख्य इंद्रियांचा धर्म । मन ठेवुनी विश्राम । नामचिंतन करावें ॥३॥ एका जनार्दनीं जाण । संत आमुचें निजधान । काया वाच मन । दृढ पायीं ॥४॥
१४७४
देऊळ बांधिलें कळस साधिलें । स्थापन तें केलें लिंगाप्रती ॥१॥ पाया जो खांदला मध्येचि भंगला । शब्द मावळला काय सांगों ॥२॥ वरिल्या मंडपा मुंगीये धरिलें । त्रिभुवनीं व्यापिलें मकुड्यानें ॥३॥ एका जनार्दनीं मंडप उडाला । देवही बुडाला देवळा सहित ॥४॥
१४७५
देखणा जाहलों देखणां जाहलों । देखणा जाहलों विठ्ठला ॥१॥ जन्ममरण विसरलें । पाहतां पाहणें हारपलें ॥२॥ तुटली आशापाश बेडी । हेचि जोडी जोडली ॥३॥ एका जनार्दनीं देव । धरिला ठाव न सोडीं ॥४॥
१४७६
देखती निमाले आपुले पुर्वज । पितापुत्र सहज तेही गेले ॥१॥ नाहीं त्या यमासी करुणा कवणाची । भोगविती दुःखाची नाना योनी ॥२॥ सुकृत पदरीं मूळ नाहीं दोरा । घालितां अघोरा अंत न लगे ॥३॥ एका जनार्दनीं नाहीं तेथें सुख । भोगविती दुःख न सांगवे ॥४॥
१४७७
देखावया भक्तपण । रूप धरिलें सगुण ॥१॥ तो हा पंढरीचा राणा । वेदा अनुमाना नये तो ॥२॥ भाविकांचें पाठीमागें । धावें लागे लवलाही ॥३॥ खाये तुळशीपत्र पान । न म्हणे सान थोडे तें ॥४॥ एका जनार्दनीं हरी । आपुली थोरी विसरे ॥५॥
१४७८
देखिला अवचिता डोळा सुखाचा सागरु । मन बुद्धी हारपला झाले एककारु । न दिसे काया माय कृष्णी लागला मोहरु ॥१॥ अद्वया आनंदा रे अद्वया आनंदा रे । वेधियल्या कामिनी अद्वया आनंदा रे ॥२॥ खुटले येणें जाणें घर सासुर । नाठवे आपपर वेधियलें सुंदर । अति सब्राह्म व्यापिलें कृष्ण पराप्तर नागर वो ॥३॥ सावजी कळलें आतां लोधलें निर्गुणा । एका जनार्दनीं कृपा केली परिपुर्णा । गगनीं गिळियलें येणें उरी नुरेचि आपणा ॥४॥
१४७९
देखिलें कंदर्पाच्या बापा । आम्हीं नेणों पुण्य पापा ॥१॥ कैंचे पाप कैंचे पुण्य । देह नामें पडलें शून्य ॥२॥ शुन्य म्हणताती बिंदुलें । तेंचि विश्वाकार झालें ॥३॥ एका शुन्याचा विस्तारु । जनार्दनींक जगदाकारु ॥४॥
१४८०
देखे देखे ग जशोदा मायछे । तोरे छोरींयानें मुजें गारी देवछे ॥१॥ जमूनाके पानीयां मैं ज्यावछे । बीच मीलके घागरीया फोडछे ॥२॥ मैंने ज्याके हात पकरछे । देखे आपही रोवछे मायना ॥३॥ एका जनार्दन गुन गावछे । फेर जन्म नहीं आवछे मायना ॥४॥
१४८१
देखों तितकें आहे ब्रह्मा । वायां सांडीं कीं भवभ्रम ॥१॥ पोटीं नाहीं परमार्थ । धरिती स्वार्थाचा अर्थ ॥२॥ अर्थ नाहीं जयापाशीं । अनर्थ स्पर्शेना तयासी ॥३॥ अर्थापाशी असत्य जाण । एका जनार्दनीं शरण ॥४॥
१४८२
देखोनि कीर्तनाची गोडी । देव धांवे लवडसवडी ॥१॥ वैकुंठीहुनि आला । कीर्तनींतो सुखें धाला ॥२॥ ऐसा कीर्तनाचा गजर । देव नाचतासे निर्भर ॥३॥ भुलला कीर्तनीं । एका शरण जनार्दनीं ॥४॥
१४८३
देखोनिया देवभक्त । सनकादिक आनंदात ॥१॥ म्हणती जावें पंढरपुरा । पाहूं दीनांचा सोयरा ॥२॥ आनंदें सनकादिक । पाहूं येती तेथें देख ॥३॥ विठ्ठलचरणीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥
१४८४
देखोनिया हरलिंग । जो न करी तया साष्टांग ॥१॥ मुख्य तोचि वैरी । स्वमुखें म्हणतसे हरी ॥२॥ व्रत न करी शिवरात्र । कासयानें होती पवित्र ॥३॥ ऐशियासी यमपुरी । एका जनार्दनीं निर्धारीं ॥४॥
१४८५
देठीचें फळ देठी पिके । न तोडितां जो चवी चाखे ॥१॥ गोड साखरसें साखरसें । रामनाम रसे चवी आलें ॥२॥ न तोडी न फोडी सगळेंची सेवी । ब्रह्मादिकां तो वाकुल्या दावी ॥३॥ एका जनार्दनीं घेतली गोडी । जीव गेला तरी चवी न सोडी ॥४॥
१४८६
देतो मोक्ष मुक्ति वाटितसे फुका । ऐसा निश्चयो देखा करुनी ठेलो ॥१॥ सांवळें रुपडें गोजिरें गोमटें । उभें पुडंलीके पेठें पंढरीये ॥२॥ वाटितसे इच्छा जयासी जे आहे । उभारुनी बाह्म देत असे ॥३॥ एका जनार्दनीं देतां न सरे मागे । जाहली असतीं युगें अठ्ठावीस ॥४॥
१४८७
देव आणि भक्त करिती जयजयकार । नाम घोष अंबर गर्जतसे ॥१॥ आनंदे वैष्णव हरिकथा करिती । गाती नाचताती प्रेमछंदे ॥२॥ नारद तुंबर भक्त पुंडलिक । वैष्णव आणिक नाम गाती ॥३॥ सोपान आनंदे समाधि बैसला । एका जनार्दनीं केला जयजयकार ॥४॥
१४८८
देव आणि भक्ति एकचि विचार । दुजे पाहे तयां घडे पातक साचार ॥१॥ देव आणि श्रुति सांगती पुराणें । देव आणि भक्त एकरुपपणें ॥२॥ एका जनार्दनीं जया समता दृष्टी । भक्ता पाहतां देवा होतसें भेटी ॥३॥
१४८९
देव गुज सांगे भक्तां । अंकित अंकिता तुमचा मी ॥१॥ तुम्हालागीं अवतार । धरणें साचार मजलागीं ॥२॥ तुम्हां न यावें उणेपण । माझें थोरपण कोण वानी ॥३॥ म्हणोनि गळां घालीं मिठी । एका जनार्दनीं पडली गांठी ॥४॥
१४९०
देव जाला पाठींपोटीं । तया नाहीं आटापाटी ॥१॥ जेथें जाय तेथें देव । नाहीं भेव सर्वथा ॥२॥ संसारासी मारुनी लाथा । केला तत्त्वतां देशोधडी ॥३॥ विषयांचें ठेचिलें तोंड । मोडिलें बंड पांचाचें ॥४॥ जनार्दनाचा एक म्हणे । देवा पाहणें पाठींपोटीं ॥५॥
१४९१
देव तुष्टला मय दे घे । तुजावांचुनी कांही नेघे ॥१॥ देवा इतुली कृपा करीं । जो मी तुझा घोट भरीं ॥२॥ आणिक कांहीं मागेन जरी । तरी मज दंडावें हरी ॥३॥ वैकुंठ देई रे एका । तो तंव फोडीव फटका ॥४॥ क्षीरसागर शेषशयन । इतुकें न दे चाळवण ॥५॥ सोहं पद विसावून । देतां घेतां लाजिरवाणें ॥६॥ एका जनार्दनीं तुष्टला । सकल सर्वांगी घोटला ॥७॥
१४९२
देव दगडाचा भक्त तो मेणाचा । एका दोहींचा विचार कैसा ॥१॥ खरेपणा नाहीं देवाचे ते ठायीं । भक्त अभाविक पाहीं दोन्हीं एक ॥२॥ एका जनार्दनीं ऐसें देवभक्तपण । निलाजेर जाण उभयतां ॥३॥
१४९३
देव दासाचा अंकित । म्हणोनि गर्भवास घेत ॥१॥ उणें पडों नेदी भक्ता । त्याची स्वयें वाहे चिंता ॥२॥ अर्जुनासाठी वरी । स्वयें शस्त्र घेत करें ॥३॥ प्रल्हादाकारणें । स्तंभामाजी गुरगरणें ॥४॥ बळिया द्वारीं आपण । रुप धरीं गोजिरें सगुण ॥५॥ ऐसा अंकित भावाचा । एका जनार्दनीं साचा ॥६॥
१४९४
देव देव म्हणोनि फिरताती वेडे । चित्त शुद्ध नाहीं तंव देव केवीं जोडे ॥१॥ पाहे तिकडे देव आहे । दिशा व्यापुनी भरला आहे ॥२॥ एका जनार्दनीं आर्तभूत । देव उभा असे तिष्ठत ॥३॥
१४९५
देव देहीं आहे सर्व ते म्हणती । जाणतिया न कळे गती देव नेणे ॥१॥ ऐसें ते भुलले देवा विसरले । तपताती वहिले करुनी कष्ट ॥२॥ देवाची ती भेटी नाहीं जाहली तया । शिणताती वायां कर्महीन ॥३॥ एका जनार्दनीं जवळी असोनी देव । कल्पनेंन वाव केला मनें ॥४॥
१४९६
देव धांवे मागें न करी आळस । सांडितां भवपाश मायाजाळ ॥१॥ सर्वभावें जें कां शरण रिघती । तयांचें वोझें श्रीपती अंगें वाहे ॥२॥ नको भुक्तिमुक्ति सदा नामीं हेत । देव तो अंकित होय त्यांचा ॥३॥ एकाजनार्दनीं ऐसा ज्यांचा भाव । तया घरीं देव पाणी वाहे ॥४॥
१४९७
देव नाहीं ऐसे स्थळ । रितें कोठें आहे सकळ ॥१॥ पाहतां सर्वाठायीं देव आहे । अणुरेणु भरुनी उरला पाहे ॥२॥ एका जनार्दनीं देव । पाहतां समूळ एक भाव ॥३॥
१४९८
देव पाहतां मजमाजीं भेटला । संदेह फिटला सर्व माझा ॥१॥ माझा मीच देव माझा मीच देव । सांगितला भाव श्रीगुरुनें ॥२॥ एका जनार्दनीं पाहिलासे देव । फिटला संदेह आतां माझा ॥३॥
१४९९
देव पुजिती आपुले भक्ता । मज वाढविलें म्हणे उचिता ॥१॥ ऐसा मानीं उपकार । देव भक्ति केला थोर ॥२॥ देवाअंगीं नाहीं बळ । भक्त भक्तीनें सबळ ॥३॥ देव एक देशीं वसे । भक्त नांदतीं समरसें ॥४॥ भक्तांची देवा आवडी । उणें पडों नेदी अर्ध घडी ॥५॥ नाहीं लाज अभिमान देवा । एका जनार्दनीं करी सेवा ॥६॥
१५००
देव प्रसन्न जाला माग म्हणे वहिला । भक्त घरोघरीं विचार पुसों गेला ॥१॥ भाव कीं भ्रांति आळस की भक्ती । विचारुनी व्यक्ति ठायीं ठेवा ॥२॥ अरे हें गुह्मा गोप्य कुडे करुं नये उघडे । तरी द्वारोद्वार पुसुं जाय वेडे ॥३॥ विलंब करितां पहा हो उदास जाला देवो । निवालिया खंती न घाली म्हणे घावो ॥४॥ शिकविलें नायकती वरिलें तें करिती । आपुलेनि कर्में आपण गुंतताती ॥५॥ एकाजनार्दनीं शीतळ भाव । आळसाचें देव दुर्‍हाविला ॥६॥
१५०१
देव भक्त उभे दोन्हीं एके ठायीं । चला जाऊं पायीं तया गांवा ॥१॥ आवडीचा हेत पुरेल मनाचा । उच्चारितां वाचा विठ्ठल नाम ॥२॥ करुनियां स्नान पुंडलिकांची भेटी । नाचुं वाळुवंटीं वाहु टाळी ॥३॥ अजाऊ महाद्वारीं पाहुं तो सांवळा । वोवाळुं गोपाळा निबलोण ॥४॥ एका जनार्दनीं मनोरथ पुरे । वासना ते नुरे मांगे कांहीं ॥५॥
१५०२
देव भक्त एके ठायी । संतमेळ तया गांवीं ॥१॥ तें हें जाणा पंढरपुर । देव उभा विटेवर ॥२॥ भक्त येती लोटांगणीं । देव पुरवी मनोरथ मनीं ॥३॥ धांवे सामोरा तयासी । आलिगुन क्षेम पुसीं ॥४॥ ऐशी आवडी मानी मोठी । एका जनार्दनीं घाली मिठी ॥५॥
१५०३
देव भक्त दोनी करिताती काला । तयांच्या सुखाला वर्णी कवण ॥१॥ धन्य भाग्य त्यांचे गोकुळ जनांचें । ठेवणें सदाशिवाचें खेळतसे ॥२॥ उच्छिष्ट तें काय खाय तयाचेनी होतें । नाहींकंटाळत तयालागीं ॥३॥ एका जनार्दनीं भक्तांची आवडी । वाढवीत गोडी नित्य नवी ॥४॥
१५०४
देव भक्त दोन्हीं तीर्थ क्षेत्र नाम । ऐसा एक संभ्रम कोठें नाहीं ॥१॥ प्रयागादी तीर्थ पहाती पाहतां । न बैसे तत्त्वतां मन माझें ॥२॥ पंढरीची ऐसा आहे समागम । म्हणोनि भवभ्रम हरलासे ॥३॥ एका जनार्दनीं पाहतां विठ्ठल देव । फिटला तो भेव संसाराचा ॥४॥
१५०५
देव भक्त दोन्हीं समचि सारखें । पाहातां पारिखें न दिसे दुजें ॥१॥ भक्ताचें अंगें देव असें । देवाचे हृदयीं भक्त वसें ॥२॥ ऐसीं परस्परें मिळणी । शरण एका जनार्दनीं ॥३॥
१५०६
देव भक्तपणें नाहीं दुजा भाव । एकरुप ठाव दोहीं अंगीं ॥१॥ दुजेपण नाहीं दुजेपण नाहीं । दुजेपण नाहीं दोहीं अंगीं ॥२॥ एका जनार्दनीं देव तेचि भक्त । सब्राह्म नांदत एकरुपीं ॥३॥
१५०७
देव भुलला भावासी । सांडोनियां वैकुंठासी ॥१॥ उघडा आला पंढरपुरा । तो परात्पर सोइरा ॥२॥ पाहूनियां पुंडलिका । भुलला तयाच्या कौतुका ॥३॥ उभा राहिला विटेवरी । एका जनार्दनीं हरी ॥४॥
१५०८
देव मनुष्य सुताचें बाहुलें । बापें बोळवणा सांगातें दिलें ॥१॥ शेवट पालऊन दिसे मधु । नेसो जाय तंव अवघाचि संबंधू ॥२॥ आंत बाहेरी अवघेचि सूत । स्वरूप देखतां निवताहे चित्त ॥३॥ नीच नवा शोभतु साउला । एका जनार्दनीं मिरवला ॥४॥
१५०९
देव म्हणती मेसाबाई । पूजा अर्चाकरिती पाही ॥१॥ नैवेद्य वहाती नारळ । अवघा करिती गोंधळ ॥२॥ बळेंचि मेंढरें बोकड मारिती । सुकी रोटी तया म्हणती ॥३॥ बळेंचि आणिताती अंगा । नाचताती शिमगी सोंगा ॥४॥ सकळ देवांचा हा देव । विसरती तया अहंभाव ॥५॥ एका जनार्दनीं ऐसा देव । येथें कैसा आमुचा भाव ॥६॥
१५१०
देव म्हणे नाम्या जातो मी पळोनी । काढी पां धुंडोनी मजलागीं ॥१॥ ऐसें म्हणोनी देवें घातलीसे कास । निघे ह्रषीकेश पाहुनी नाम्या ॥२॥ क्षणीं होय गुप्त क्षणीं तो प्रगट । पाठीं लागे स्पष्ट नामदेव ॥३॥ दूर गेलिया देव माळा पुष्पें टाकी खूण । तीं तें ओळखून नामा येत ॥४॥ एका जनार्दनीं भक्ताचा कैवारी । अभिमान बोहरी करितसे ॥५॥
१५११
देव म्हणे नाम्या परीस कोठें आहे । पाहूं लवलाहे दावी मज ॥१॥ हांसूनियां नामा पांडुरंगा सांगे । परीस चंद्रभागे टाकियेला ॥२॥ ऐसें प्रेमभरीत बोलताती दोघे । तों राजाई ती मागें त्वरें आली ॥३॥ घालूनि दंडवत देवासी आदरें । नामयासी उत्तरें बोलतसे ॥४॥ एका जनार्दनीं मागावया परीस । परिसा घरास त्वरित आला ॥५॥
१५१२
देव म्हणे नाम्या व्यापार बरवा केला । दामशेटी तुला रागावती ॥१॥ जाहले आठ दिवस जाईं तूं लौकरी । द्रव्य घेउनी झडकरी यावें मागें ॥२॥ वंदूनि श्रीविठ्ठला घरीं आला नामा । त्याला बोले दामा जाईं आधीं ॥३॥ एका जनार्दनीं आठ दिन जाहले । नाम्या जाय वहिलें ऐवज आणीं ॥४॥
१५१३
देव म्हणे भक्तांसी आवडी । मी जाहलों तुमचा गडी ॥१॥ सांगाल तें करीन काम । मजवर ठेवा तुमचें प्रेम ॥२॥ भाव भुज द्यावा । आणिक मज नाहीं हेवा ॥३॥ आवडीनें देव बोले । भक्तांमाजीं स्वयें खेळे ॥४॥ खेळतां गोपाळीं । एका जनार्दनीं गोकुळीं ॥५॥
१५१४
देव म्हणे सांवत्या लपवी मजला । उशीर बहु जाहला येईल चोर ॥१॥ लपावया स्थान नसे दुजें आन । उदर फ़ाडून लपविला ॥२॥ भक्ताचे उदरीं बैसे नारायण । कृपेचें सिंहासन घालूनियां ॥३॥ एका जनार्दनीं नामा तेथें आला । माग तो वहिला नाहीं कांही ॥४॥
१५१५
देव वसे पंढरीसी । येती सनकादिक ऋषी । वंदोनी पुडंलिकासी । चरण वंदिती विठ्ठलाचे ॥१॥ करीती कीर्तन गजर । नाना आद्यें परिकर । नाचती निर्धार । भाळे भोळे आवडीं ॥२॥ दिंडी जागरण एकादशीं । क्षीरपती द्वादशी करिताती आवडीसी । भक्त मिळोनी सकळ ॥३॥ मिळतां क्षीरापती शेष । तेणें सुख सुरवरास । एका जनार्दनीं दास । वैष्णवांचा निर्धारें ॥४॥
१५१६
देव विठ्ठल तीर्थ विठ्ठल । अवघा विठ्ठल भरलासे ॥१॥ जन विठ्ठल वन विठ्ठल । जळीं स्थळीं विठ्ठल भरलासे ॥२॥ भाव विठ्ठल देव विठ्ठल । अवघा विठ्ठल भरलासे ॥३॥ एका जनार्दनीं मनीं विठ्ठल । जप तप ध्यान विठ्ठल ॥४॥
१५१७
देव विसरला देवपणासी । देखोनी भक्तांसी भुलला ॥१॥ नावडेचि वैकुंठ धाम । तो निष्काम कीर्तनीं नाचतो ॥२॥ नावडे शेषशायी आसन । उभा जघन धरुनी विटे ॥३॥ ऐसा प्रेमाचा भुकेला । एका जनार्दनीं धाला ॥४॥
१५१८
देव संत दोन्हीं एकचि मेळ । गदारोळ कीर्तनी ॥१॥ ती हे त्रिवेण पंढरी । आहे भीवरेचे तीरीं ॥२॥ येती वारकारी ।आनंदे नाचती गजरीं ॥३॥ म्हणे जनार्दनाचा एका । पुंडलिकें दाखविला निका ॥४॥
१५१९
देव सर्वाठायीं वसे । परि न दिसे अभाविकां ॥१॥ जळीं स्थळीं पाषाणीं भरला । रिता ठाव कोठें उरला ॥२॥ जिकडे पाहे तिकडे देव । अभाविकां दिसे वाव ॥३॥ एका जनार्दनीं नाहीं भाव । तंव तया न दिसे देव ॥४॥
१५२०
देव सुंदर घनसावळा । कासे सोनसळा नेसला ॥१॥ चरणीं वाळे वाकी गजर । मुगुट कुडलें मनोहर ॥२॥ बाही बाहुवटे मकराकार । गळांशोभे वैजयंती हार ॥३॥ एका जनार्दनीं ध्यान । विटे शोभे समचरण ॥४॥
१५२१
देवकी करी चिंता । केवीं आठवा वांचे आतां । ऐसी भावाना भावितां । जिवीं तळमळ ॥१॥ तंव न दुखतांचि पोट । वेण न लगतां उद्धट । कृष्ण झाला प्रगट । स्वयें अयोनिया ॥२॥ हरि सुनीळ सांवळें । बाळ निजतेजे तेजाळें । देखोनि वेल्हाळे । स्वयं विस्मीत ॥३॥ ऐसें देखोनि श्रीकृष्णासी । मोहे आच्छादुं जाय त्यासी । तंव प्रकाशु तियेंसीं । कैसा आंवरेना ॥४॥ वेगीं वसुदेवातें म्हणे । तुम्हीं गोकुळांसी न्या तान्हें । एका जनार्दनें कृपा केलीं ॥५॥
१५२२
देवकी निज उदरीं । गर्भाजी पाहे थोरी । तंव सबाह्म अभ्यंतरीं । व्यापक श्रीकृष्ण ॥१॥ अगे हा स्वतः सिद्ध हरी । स्वयंप्रकाश करीं । मीपणा माझारी । गर्भु वाढे ॥२॥ आतां नवल कैसे परी । आठवा गर्भु धरी । त्याहि गर्भा माझारीं मज मी देखे ॥३॥ दाहीं इंद्रियां माझारीं । गर्भांची वाढे थोरी । कर्म तदाकारीं । इंद्रिय वृत्ति ॥४॥ चितप्रकाशासी डोहळे । सद्रूप सोहळे । आनंद कल्लोळे गर्भू वाढे ॥५॥ तेथें स्वस्वरुपस्थिती सुखरुप प्रसुती । आनंद त्रिजगतीं परिपूर्ण ॥६॥ एका जनार्दनी । ज्ञानगर्भु सार । चिद्रुप चराचर । निखळ नांदे ॥७॥
१५२३
देवकी म्हणे वसुदेवासी । वेगीं बाळके न्यावें गोकुळासी । घवघवीत तेजोराशी । देखे श्रीकृष्ण ॥१॥ पूर्ण प्रकाश निजतेजें । पाहतां न दिसें दुजें । तेथें कैंचे माझें तुझें । लपणें छपणें ॥२॥ सरसर अरजे दुरी । परब्रह्मा आम्हां छरीं । अहं कंसाचे भय भारी । बाधी कवणा ॥३॥ सवेचि पाहे लीळा ।मुगुट कुंडले वनमाळा । कंठीं कौस्तुभ तेजाळा । कळी तटी सुत्र ॥४॥ क्षुद्र घंटिका किंकणी । बाहु भूषणें भुषणीं । चिद्रेत्नें महामणी । वीर कंकणें ॥५॥ कमलवदन हरी । कमले नेत्रधारी । लीला कमळे करी । झेलीतसे ॥६॥ करकमळीं कमळा । सेवी चरणकमळा । ऐशी वसुदेव देखे डोळां । दिव्य मूर्ति ॥७॥ लक्ष्मी डवल उनियां जाण । हृदयीं श्रीवत्सलांछन । द्विजापदांचे महिमान । देखे दक्षिणाभागीं ॥८॥ शंख चक्रादि आयुधें चारी । पीतांबर धारी । सगुण निर्गुण हरि । समसाम्य ॥९॥ ऐसे सगुण निर्गुण भाका । पहात पहात देखा । भिन्न भेदाचि न रिघे रेखा । कृष्णापणीं ॥१०॥ एका जनार्दनीं खरें । निजरुप निर्धारें । अहं कंसाचे वावरे । मिथ्या भय ॥११॥
१५२४
देवकी वसूदेवाकडे पाहे । तंव तो स्वानंदे गर्जताहे । येरी धावोनि धरी पाये । उगे रहा ॥१॥ जळो जळो हे तुमची बुद्धी । सरली संसारशुद्धी । कृष्ण लपवा त्रिशुद्धी । जग प्रगट न करावा ॥२॥ आतां मी करुं कैसें । भ्रतारा लागलें पिंसे । मज मायेच्या ऐसें । पुरुष ममता न धरी ॥३॥ मज मायेची बुद्धी ऐसी । म्यां आच्छादिलें श्रीकृष्णांसी । वेगें होईन तुमची दासी । अति वेगेंशीं बाळ न्यावें ॥४॥ येरु म्हणे नवल जालें । तुज कृष्णें प्रकाशिलें । त्वां केवीं अच्छादिलें । कृषरुप ॥५॥ सरसर अरजे मूढें । बोलसी तितुकें कुडें । कृष्णरुप वाडें कोडें । माया कैंची ॥६॥ येरी म्हणे सांडा चावटी । कोरड्या काय सांगू गोष्टी । गोकुळासी उठाउठी । बाळ न्यावें माझें ॥७॥ अवो कृष्णीं चिंतीसी जन्ममरण । हेंचि तुझें मूर्खपणा । कृष्णानामें जन्ममरण । समूळ निर्दळिलें ॥८॥ सरो बहु बोलाचा बडीवारु । परि निर्धारु न धरवे धीरु । या लगीं लेकरुं । गोकुळा न्यावें ॥९॥ तुम्हीं न माना माझिया बोला । वेणेंवीण उपजला । नाहीं योनिद्वारां आला । कृषाणानाथु ॥१०॥ आतां मी काय करुं वो । वसुदेव म्हणे नवलाओ । तुझ्या बोलाचा अभिप्रावो । तुझा तुमची न कळे ॥११॥ चोज कैसेवीण । ज्या नाहीं जन्ममरण । त्यासी मारील कवण । समुळ वावो ॥१२॥ जेणें मीपण आभासे । तेणें माझें मूर्खपणें तुम्हां दिसें । हें अंगींचे निजरुप पिसें । न कळें तुम्हां ॥१३॥ कृष्ण निजबोधु सुंदरा । यासी जीवें जतन करा । जाणिवेच्या अहंकारा । गुंता झणीं ॥१४॥ आतां काय मीं बोलुं शब्दू । ऐसा करितां अनुवादू । बोले खुंटला शब्दू । प्रगटला कृष्ण ॥१५॥ प्रकृति पुरुष दोन्हीं । मीनली एकपणीं । एका जनार्दनीं । बंदी मोक्ष ॥१६॥
१५२५
देवतांचे अंगीं असतां विपरित । परी संतकृपा त्वरित करिती जगीं ॥१॥ जैसी भक्ति देखती तैसे ते पावती । परी संतांची गती विचित्रची ॥२॥ वादक निंदक भेदक न पाहाती । एकरुप चिंतीं मन ज्यांचें ॥३॥ भक्ति केल्या देव तुष्टे सर्वकाळ । न करितां खळ म्हणवी येर ॥४॥ संतांचे तों ठायीं ही भावना नाहीं । एका जनार्दनीं पायीं विनटला ॥५॥
१५२६
देवपुजा करी आदरें । अतीत आलिया न बोले सामोरें ॥१॥ कासया पूजन दांभिक । तेणें देवा नोहे सुख ॥२॥ अतीतासी देणें पूजा । तेणें संतोषें पावे पूजा ॥३॥ एका जनार्दनीं पूजा । ऐसी न करी गरुडध्वजा ॥४॥
१५२७
देवपूजे ठेवितां भावो । तो स्वयेंचि जाला देवो ॥१॥ आता कैसेनी पूजुं देवा । माझी मज होतसे सेवा ॥२॥ अन्न गंध धूप दीप । तेंही माझेंचि स्वरुप ॥३॥ एका जनार्दनीं करी पूजा । तेथें पूज्य पूजकू नाहीं दुजा ॥४॥
१५२८
देवरे देवरे मोरी घागरीया लालसे । मैं बोलुंगी जशोदा मायछें ॥१॥ हाम रहीन दसे नामछे । तारी भीद नहीं मारो कामछे ॥२॥ आकर पकरीयो मोरे आंगछे । मैं लाजे न आइगे मा अवछो ॥३॥ एका जनार्दनी तोरे पुत्रनें हामछे । फजितीन मानली आइछे ॥४॥
१५२९
देवा तुम्ही आहांत समर्थ । काय मागूं मी पदार्थ ॥१॥ देणे द्याला तरी हेंचि द्यावें । संतचरंण मी वंदावें ॥२॥ दुजे मागणें सायासी । नाहीं नाहीं हषीकेशी ॥३॥ बोलतसे तोंडभरी । ऐसें नका म्हणें हरि ॥४॥ अंकित मी तुझा देवा । एका जनार्दनीं ठेवा ॥५॥
१५३०
देवा परिस उदार । भक्त जाणा निर्धार ॥१॥ याजसाठीं धावें पाठीं । देत लंगोटीं आपुली ॥२॥ आपण दिगंबरची असे । भक्त वस्त्र भूषणें सौरसें ॥३॥ म्हणोनि भक्ताचा अंकित । एका जनार्दनीं तिष्ठत ॥४॥
१५३१
देवा माझे मन लागों तुझें चरणी । संसारव्यसनीं पडों नेदी ॥१॥ नामस्मरण घडो संतसमागम । वाउगाची भ्रम नको देवा ॥२॥ पायीं तीर्थायात्रा मुखीं राम नाम । हाचि माझा नेम सिद्धि नेई ॥३॥ आणिक मागणें नाहीं नाहीं देवा । एका जनार्दनीं सेवा दृढ देई ॥४॥
१५३२
देवांचें पूजन । घडतां रामस्मरण ॥१॥ हेचि एका पूजा सार । वायां कासया पसर ॥२॥ करुं बैसे देवपूजे । मनीं भाव आन दुजे ॥३॥ ऐसें पूजेचें लक्षण । सांगें एका जनार्दन ॥४॥
१५३३
देवांचें हें गूज सकळ मंत्रमय । जें कां निजध्येय शंकराचें ॥१॥ तें हें रामनाम सेविती सर्वभावें । रामरुप व्हावें निश्चयेंसीं ॥२॥ नष्ट अजामेळाचें पतितत्व गेलें । दिव्यरुप जालें वाल्मिकीचें ॥३॥ शरीर संपत्ती बळें अपूर्व सकळ । जाला द्वारपाळ एका जनार्दनीं ॥४॥
१५३४
देवाचरणीं ठाव । तैसा गुरचरणीं भाव ॥१॥ गुरु देव दोन्हीं समान । ऐसें वेदांचें वचन ॥२॥ गुरु देवमाजीं पाहीं । भिन्न भेद नाहीं नाहीं ॥३॥ देवा पुजितां गुरुसी आनंद । गुरुसी पुजितां देवा परमानंद ॥४॥ दो नामाचेनि छंदें । एका जनार्दनीं परमानंदें ॥५॥
१५३५
देवाचे ते आप्त जाणावे ते संत । त्यांचे चरणीं रत व्हावें सर्वदा ॥१॥ श्रीहरीची भेटी सहजची होय । श्रमलीया जाय क्षणमात्रें ॥२॥ पापाचे पर्वत भस्म नामाग्रीतं । अभक्ता न कळें हित नाम न घेती ॥३॥ एका जनार्दनीं संताचिया कृपें । नाम होय सोपें त्याच्या ॥४॥
१५३६
देवाचे सोईरे संत रे जाणावें । यापरतें जीवें नाठवी कोणा ॥१॥ पडतां संकट आठवितसे संतां । त्याहुनी वारिता नाहीं दुजा ॥२॥ म्हणोनि घरटी फिरे तया गांवीं । सुदर्शनादि मिरवी आयुधें हातीं ॥३॥ लाडिकें डिंगर वैष्णव ते साचे । एका जनार्दनीं त्याचें वंदी पाय ॥४॥
१५३७
देवाचें तें ध्यान । आठवावें रात्रदिन ॥१॥ मुगुट कुंडलें मेखळा । कांसे शोभे सोनसळा ॥२॥ शंख चक्र गदा पद्म । सदा उदार मेघःश्याम ॥३॥ ऐसा हृदयीं आठवा । एका जनार्दनीं सांठवा ॥४॥
१५३८
देवातळींचें वस्त्र तें म्हणती अपवित्र । उदके भिजविलें तें जालें पवित्र ॥१॥ देवापरीस जळ सबळ केलें । ज्ञान तें दुर्बळ होऊनीं ठेलें ॥२॥ नीचाचेनी स्पर्शे देवो विटाळला । पाणीये प्रक्षाळुनी सोंवळा केला ॥३॥ एका जनार्दनीं साच नाहीं भाव । संशयची देव नाहीं केला ॥४॥
१५३९
देवासी आवडे भक्तसमागम । त्यांचें सर्व काम करी अंगें ॥१॥ भक्ताकाजालागीं अवतार धरी । नांदे भक्तांघरीं स्वयें देव ॥२॥ भक्तांविण देवा कांहींचि नावडे । भक्त तो आवडें सर्वकाळ ॥३॥ एका जनार्दनीं भक्तांचा अंकित । देव सदोदित स्वयें होत ॥४॥
१५४०
देवासी कांहीं नेसणें नसे । जेथें तेथें देव उघडांची दिसे ॥१॥ देव निलाजरा देव निलाजरा । देव निलाजरा पाहा तुम्हीं ॥२॥ न लाजे तेथें नाहीं गांव । पांढरा डुकर झाला देव ॥३॥ एका जनार्दनीं एकल्या काज । भक्ति तेणेंचि नेली लाज ॥४॥
१५४१
देवासी तुष्टण्या एक युक्ति आहे । रामनाम गाय मुखीं सदा ॥१॥ काया वाचा मनें संतासींशरण । तेणें नारायण तुष्ट होय ॥२॥ नामापरतें साधन आणीक नाहीं दुजें । एका जनार्दनीं निज नाम सार ॥३॥
१५४२
देवासी तो आवडे भक्त । नाहीं हेतु दूसरा ॥१॥ बळी सर्वस्व करी दान । त्याचें द्वारपाळपण केलें त्वां ॥२॥ धर्म सदा होय उदास । त्याचे घरी तुझा वास ॥३॥ तुझा भक्त अंबऋषी । त्याचे गर्भवास सोशिसी ॥४॥ तुम्हीं उदार जगदानीं । शरण एका जनार्दनीं ॥५॥
१५४३
देवासी तो पुरी एक भाव । नेणें वैभव दासाचें ॥१॥ जया चित्तीं जी वासना । तैशीं कामना पुरवणें ॥२॥ नाहीं पडत गोंवोंगुती । आपणचि हातीं करितुसे ॥३॥ एका जनार्दनीं अंकित राहे । तिष्ठत द्वारीं त्याच्या ॥४॥
१५४४
देवासी तो पुरे एक प्रेमभाव । पूजा अर्चा वाव सर्व जाणा ॥१॥ मनापासूनियां करितां कीर्तन । आनंदें नर्तन गातां गीत ॥२॥ रामकृष्णहरि उच्चार सर्वदा । कळिकाळ बाधा तेणें नोहे ॥३॥ एका जनार्दनीं हाचि पैं विश्वास । सर्वभावें दास होईन त्याचा ॥४॥
१५४५
देवासी तो प्रिय एक नाम आहे । म्हणोनि तूं गाये सदोदित ॥१॥ कला हें कौशल्या अवघे विकळ । मंगळां मंगळ रामनाम ॥२॥ एका जनार्दनीं नाम मुखीं गातां । मुक्ति सायुज्यता पाठीं लागे ॥३॥
१५४६
देवासी तो भाव पुरे । तेणें देव सदा झुरे । भक्तलागीं सरे । वैकुंठासी ॥१॥ भाव धरावा बळकट । आणिक नको कांही कष्ट । साधन हें श्रेष्ठ । कलीमाजीं ॥२॥ भावे प्राप्ति होय देव । अभक्तसी संदेह । जवळी असोनी देव । नाहीं म्हणती ॥३॥ भावें देव घरीं नादे । एका जनार्दनीं आनंदें । म्हणोनि संतवृदें । तया न विसरती ॥४॥
१५४७
देवासी तो मुख्य कीर्तनाची गोडीं । म्हणोनियां उडी घाली स्वयें ॥१॥ नावडे तया आणिक संकल्प । कीर्तनीं विकल्प करितां क्षोभे ॥२॥ साबडे भाळे भोळे नाचताती रंगी । प्रेम तें अंगी देवाचिये ॥३॥ एका जनार्दनीं धांवे लवलाहे । न तो कांहीं पाहे आपणातें ॥४॥
१५४८
देवासी तों पुरे । एक तुळशीपान बरें ॥१॥ नाहीं आणिक आवडी । भावासाठीं घाली उडी ॥२॥ कण्या भाजी पान फळे खाय । न पाहे यातिकुळ स्वयें ॥३॥ प्रीतीनें दहींभात । उच्छिष्ट गोवळ्यांचें खात ॥४॥ भक्तिसुखें भुलला हरि । एकाजनार्दनीं निर्धारीं ॥५॥
१५४९
देवासी दुजे नावडे सर्वथा । करितां हरिकथा समाधान ॥१॥ येऊनिया नाचे कीर्तनीं सर्वदा । निवारी आपदा सर्व त्याची ॥२॥ भाविकांसाठी मोठा लोभापर । नाचतो निर्भर कीर्तनांत ॥३॥ एका जनार्दनीं आवडे कीर्तन । म्हणोनि वैकुंठसदन नावडेची ॥४॥
१५५०
देवासी ना गवे ग्रहांचाहीं ग्रहो तो राम रावणें आणिला रणा । सुरनर वानर भक्ता निशाचर समुह मीनलीसे सेना । चैत्यन्य चोरटी ते रुपें गोरटी आणिली राम अंगना रे ॥ध्रु॥ राम देखोनी दिठी हरिखली गोरटी । स्वानंदाची सृष्टी हेलावतु । जानकी पाहे रघुनाथा राम न पाहे सीता । चरणावरी माथा ठेवूं नेदी ॥१॥ तंव देव म्हणती देवा सीतेचिया भावा नमस्कार घ्यावा अनुसरु आतां । विनविती जगत्पत्ति ऐकें सीतापती । उभी आहेतिष्ठती जनकतनया । विनवी बिभीषण म्रुदुबचनी लक्षुमण । सीतेलागीं रावण निर्दाळिला । जीलागीं शिणविलें तिसीं । कां दुर्‍हांविलें । हनुमंत म्हणे बोले सांगास्वामी ॥२॥ तुं जीवींचें न सांगसी आणि मौन्याचि राहसी । तें गुढ वेदशास्त्रांसी नकळे मा । आम्हीं तंव वानरें प्रकृतीचीं पामरें । तेंकेवीं वनचरें जाणोन बा । सीता सीता घोकणी ते जनकनंदिनी । उभी असे येउनी जवळी मा । जवळी आल्या पाठी तुंन पहासी दृष्टी । कुसरी हे उफराटी न कळे आम्हां ॥३॥ पाहोनी प्लवंगम नहीं । हे परपुरु मीनली ऐसी झाली बोली । प्रकृति अंगिकारिली कैसी जाय । तरी हे जीवाची मोहिनी कामजनित जननी । देखतां नयनीं भुलवी जगा । तरी हेंदिव्य देउनि पाहा हो दाखवूं शुद्ध भावो । संज्ञा रामरावो करुनी ठेला ॥४॥ हें देखोनि समस्त राहिले तटस्थ । हनुमंत काय तेथें करिता झाला । हेंविषम विश्वकुंड पेटविले प्रचंड । सहजाग्नि उदंड प्रज्वाळिला । येरी कुंडाकडे पाहे तंव रामरुप दिसताहे । नवल दिव्यमाय आरंभिलें । येथें भावचि प्रमाण । अग्निमाजीं स्नान । करुनी रामचरण दृढ धरीन ॥५॥ अगा परिसें तेजोराशी तूं साक्षीं या कर्मासी । जठरींचा जठरवासी जठराग्नी । चपल चंचल योगें मन जेथें जाय वेगें । सरिसा पुढे मागें अवघा राम । राम साडोनि मना विषयो ये जरी ध्याना । तरी देह हुताशना दग्ध करी ॥६॥ वाचिक व्यापारु स्वरवराण उच्चारु । रामेविण अक्षरु केवीं निघें । वचना वदनीं राम कथे मेघःश्याम । रामेवीण उपशम शब्द नाहीं । वाचा जे वावडे तें तें राम घडे । रामेवीण उघडे वचन नाहीं । हाकीं हांकितां हाका हाकेमाजीं राम देखा । नाहीं तरी देव मुखा दहन करीं ॥७॥ हे काया आतळे तेथेंचि राम मिळे । रामाविन वेगळें उरलेंनाहीं । देहो देहो बहुतांसी संदेहो । देहीं रामरावो प्रकट नांदे । राम श्वासोश्वास रामनिमिष निमिष । रामामाजीं वास रामपणें । रामेविण शरीर क्षीण जाय आन मोहर । तरी देहो हा वैष्वानर भस्म करीं ॥८॥ जागृती जें जें दिसें तें राम असे । स्वप्नीं जें आभासें तेंही रामु । सुषुप्तीचें सुख केवळ राम देख । रामेविणं आणिक नाहीं नाहीं । आम्हां रामरुपीं उप्तत्ती रामरुपी स्थिती । अंती तेही मती रामराम । तेथें अग्नीसी तो अतौता अग्निअमाजीं सीता । राम म्हणोनि तत्त्वता उडीघाली ॥९॥ तेथें बुजालीं वानरें भ्यालीं निशाचरें । सुरनर खेंचरें चाकाटलीं । उडीसारसी देख सकळां पडिली शंक । अवघीच टकमक पहात ठेली । तेथें तम धुमाचे घोळ रजरक्तकल्लोळ । राहिलें निश्चय सीतातेजें । धगधगीत इंगळ लखलखीत ज्वाळा । लोपुनी जनकबाळा मिरवे किसी ॥१०॥ दहनदिप्ती सुखा मुळ ते सीता देखा । अग्निचिया शिखा शाखा सीता । सीता अंगमेळे अग्निचे पाप जळे । जें रावणाच्या घरीं मेळे धुतां घडलें । हे पतिवरता निर्दोष अग्नि जाला चोख । जयजयकारें घोष अवघे करिती । तें देखोनी राघवा जाकळीलें कणवा । अवघेपणें अवघा खेंवा आला ॥११॥ प्रकृति पुरुषा भेटी खेवां पडीली मिठी । येरयेरां पोटीं हारपली । तेथें योग काहीं स्मरतां स्मरतें नाहीं । मीतुंपणा पाहीं बुजावणी । रामरुपीं तत्त्वतां मिळोनी गेली सीता । न निवडे सर्वथा कांही केलिया । अशोकाचे शोक वियोगाचें दुःख । हरुनी म्हणावें सुख तंव म्हणतें नाहीं ॥१२॥ शीवशक्ति संयोग अभ्यांसेंवीण योग । कल्पनेविण भोग भोगीतसे । एका जनार्दनीं सहजेसी मिळणी । प्रकृती रामचरणीं सती झाली । एकपणाचेनि आले नुरेचि पैं वेगळें । रामरुपीं सगळें सामावलें ॥ नवल पैं लाघव देहें देहीं राघव । देव पुढें दिव्य उतरील बा ॥१३॥
१५५१
देवासी प्रिय होय कीर्तन । नाचे येऊन आनंदे ॥१॥ न विचारी यतीकुळ । असोत अमंगळ भलतैसे ॥२॥ करिती कीर्तन अनन्यभावें । ते पढिये जीवेंभावें ॥३॥ शरण एका जनार्दनीं । कुळें पावन होती कीर्तनीं ॥४॥
१५५२
देवो न कळे अभाविकां । उघड पंढरीसी देखा । भोळे सकळाम भाविकां । ठाऊका असे ॥१॥ न कळे तयांचे विंदान । भेटी जातां वेधी मन । तोडित बंधन । संसाराचें क्षणार्धें ॥२॥ रुप पाहतां गोजिरें । आवडे डोळियां साजिरें । चित्त क्रोध । अवघा तो परमानंद ॥३॥ नुरे काम आणि क्रोध । अवघाअ तो परमानंद । एक जनार्दनी गोविंद । अभेदपणें पाहतां ॥४॥
१५५३
देवो विसरें देवपण । अपीं वासना भक्तांसीं ॥१॥ भक्त देहीं सदा वसे । धर्म अर्थ अर्पितसे ॥२॥ जे जे भक्ताची वासना । पुरवी आपण त्याचि क्षणा ॥३॥ एका जनार्दनीं अंकित । उभा तेथेंचि तिष्ठत ॥४॥
१५५४
देशाविरहित काळासी अतीत । ते देवभक्त पंढरीये ॥१॥ जाऊनियां कोणी पहा । देवाधिदेव विठोबासी ॥२॥ जन्ममरणाचे तुटतील फांसे । पाहतां उल्हासें देवभक्तां ॥३॥ एका जनार्दनीं विटेवरी निधान । लेवुनी अंजन उघडें पहा हो ॥४॥
१५५५
देह अवसानीं काळाची तों संधी । पोहोंचली आधीं येवोनियां ॥१॥ कोण सोडवील तुजलागीं बापा । श्रीराम जपा लवलाही ॥२॥ छाया जैशी हाले नाशिवंत खरी । तैशीच ही परी देहाचिया ॥३॥ एका जनार्दनीं भुलूं नको माया । काळ तो लवलाह्मा नेईल बापा ॥४॥
१५५६
देह अशाश्वत नाम हें शाश्वत । म्हणोनि विवादत श्रुति शास्त्रें ॥१॥ नाशिवंतासाठीं राननाम तुटी । ससाराची आटी करिती जन ॥२॥ जडत्व पाषाण नामेंचि तरले । अभेदें भरले देह ज्याचें ॥३॥ शुद्धभाव पोटीं वासना निर्मळ । संकल्प बरळ नव जाती ॥४॥ एका जनार्दनीं दृढ हा निश्चय । राम सखा होय तयालागीं ॥५॥
१५५७
देह आहे तुम्हां आधीन । तोंवरी करा भजन ॥१॥ पडोनि जाईल शरीर । मग कराल विचार ॥२॥ यातना यमाची अपार । कोण तेथें सोडविणार ॥३॥ आला नाहीं अंगीं घाव । तंव भजा पंढरीराव ॥४॥ एका जनार्दनीं सांगे । वाउगे मागें नका जाऊं ॥५॥
१५५८
देह ऐसें वोखटें । पृथ्वीमाजीं नाहीं कोठें ॥१॥ वोखटें म्हणोनि त्यागावें । मोक्ष सुखार्थ नागवावें ॥२॥ जैसें भाडियाचें घोडें । दिनु सरल्या पंथ मोडे ॥३॥ हेतु ठेवूनि परमार्था । एका जनार्दनीं ठेवीं माथा ॥४॥
१५५९
देह गेह कर्म सारुनी । शेजे पहुडली निज समाधानी । कृष्ण वेणु गीत ये श्रवणीं । वृत्ति उचलली भेटी लागुनी वो ॥१॥ जीवीं लागलें हरीचें ध्यान । कांही केलिया न राहें मन । प्रेम पडीभरें येतसे स्फुदोन । हरिचरणीं तें वेधिलें मन वो ॥२॥ लाज सांडोनि जालें निर्लज्ज । सासू सासर्‍यांसी नाहीं मज काज । माया माहेर अंतरलें सहज । हरिचरणीं तो वेधलें निज वो ॥३॥ चिदाकाशींचे स्वच्छ चंदिणे । कृष्ण प्रभा ते चंद्र परिपुर्ण । ध्येय ध्याता खुंटले तेणें गुणे । एका जनार्दनीं सहज एकपणें वो ॥४॥
१५६०
देह गेह चिंता । बाळासी नाठवे सर्वथा ॥१॥ न देखे तो दुजें स्थान । बाळका आपुले अंगीं जाण ॥२॥ माझें तुझें न म्हणे । उंच नीच कांहीं नेणें ॥३॥ एका जनार्दनीं अखंड । नाहीं तया वायां खंड ॥४॥
१५६१
देह जाईल तरी जावो राहील तरी राहो । दोराचिया सर्पा जिणें मरणें न वावो ॥१॥ आम्ही जिताची मेलों जिताची मेलों । मरोनियां जालों जीवेविण ॥२॥ मृगजळाचें जळ भरलें असतां नाहीं । आटलिया तेथें कोरडें होईल काई ॥३॥ एका जनार्दनीं जगाचि जनार्दन । जिणें मरणें तेथें सहज चैतन्यघन ॥४॥
१५६२
देह नाशिवंत अभ्राची साउली । तैशी परी बोली संसाराची ॥१॥ जळगारीं जैसें उदक नाथिलें । कां मृगजळ पसरलें चहुंकडे ॥२॥ परुषाची छाया वाउगाचि भास । चोराचा पैं लेश काय तेथें ॥३॥ रज्जु देखतांचि भासतसे सर्प । एका जनार्दनीं दर्प संसाराचा ॥४॥
१५६३
देह पाहतां दोषाची दिठी । वृत्ती दिसे तैं स्वरुपीं मिठीं ॥१॥ कैसेनी हरिदास भासती । देही असे तंव दोष दिसती ॥२॥ देह दिसतां न दिसे भावो । वृत्ती दिसे तंव समाधान पहा हो ॥३॥ एका जनार्दनाच्या पाही । वृत्ती दिसे तैं दोष नाहीं ॥४॥
१५६४
देह भोगितसे मुख्य गोडी । स्त्री भोगतो आवडी ॥१॥ स्त्री हातीं देख । वाढे प्रपंचाचें दुःख ॥२॥ जें जें आणि तें तें थोडें । धनधान्य आवडें कुडें ॥३॥ ऐसा भुलला संसारा । लक्ष चौर्‍यांयशीं वेरझारा ॥४॥ सोडविता नाहीं कोण्ही । एका जनार्दनावांचुनी ॥५॥
१५६५
देह लावी हरिकीर्तनीं । येर कारणीं पडुं नको ॥१॥ सोडी संसाराचा छंद । कीर्तनीं गोविंद आठवा ॥२॥ होई दास संतचरंणीं । पायवणी वंदी तूं ॥३॥ काया लावी देवाकडे । येर सांकडें वारिल ॥४॥ अनुमोदन सर्वाठायीं । मन देई हरिचरणीं ॥५॥ म्हणे जनार्दनाचा एका । काया वाचा भाविका सांगत ॥६॥
१५६६
देह सांडावा न मांडावा । येणें परमार्थुची साधावा ॥१॥ जेणें देहीं वाढें भावो । देहीं दिसतसे देवो ॥२॥ ऐसें देहीं भजन घडे । त्रिगुणात्मक स्वयें उडे ॥३॥ त्रिगुणात्मक देहो वावो । एका जनार्दनीं धरा भावो ॥४॥
१५६७
देह हा काळाचा जाणार शेवटीं । याची धरुनी मिठी गोडी काय ॥१॥ जाणार जाणार जाणार हें विश्व । वाउगाचि सोस करसी काय ॥२॥ प्रपंच काबाड एरंडाचे परी । रसस्वाद तरी कांहीं नाहीं ॥३॥ नाशिवंतासाठीं रडतोसी वायां । जनार्दनीं शरण निघे तूं पायां ॥४॥ एका जनार्दनीं भेटी होतां संतांची । मग जन्ममरनाची चिंता नाहीं ॥५॥
१५६८
देहतापें तापलों भारीं । संताघईं मागतसें ॥१॥ मज द्या कांहो जीवन । जेणें जीवाचें समाधान ॥२॥ एक जनार्दनीं सवें । सुखसागराची घातली पोहे ॥३॥
१५६९
देहनिशा क्रमोनि मी तंव आलिये । इहीं वैष्णवीं आणिलें पंढरीये ॥१॥ बाई वो मन ध्यान लागलें पंढरीचे । तें तंव जागृती स्वप्नी नवचे ॥२॥ नयन नाच्ती सुखाचा हा गोंधळू । साचे सन्मुख देखोनि श्रीविठ्ठल ॥३॥ आनंदु आसमाय होतीं मना पोटीं । नवल वालभों विठ्ठली जालीं भेटीं ॥४॥ मी आन न देखें वो नाइकें काणीं । ठासा ठसावला अभिन्नपणीं वो ॥५॥ जनीं न संता संचारू जाला देखा । एका जनार्दनीं धरिला एकी एका वो ॥६॥
१५७०
देहबुद्धि जयापाशीं । पाप वसे त्या मानसीं ॥१॥ दोष जाण अलंकार । तेणें सत्य हा संसार ॥२॥ समूळ अहंतेच्या नाशीं । ब्रह्माप्राप्ति होय त्यासी ॥३॥ एकाजनार्दनीं अहंकार । त्याग करावा सत्वर ॥४॥
१५७१
देहबुद्धि सांडीं कल्पना दंडी । वासनेची शेंडी वाढवूं नको ॥१॥ तूं तें तूंचि पाहीं तूं तें पाही । पाहूनियां राही जेथीच्या तेथें ॥२॥ तूं तें तूंचि पाही जेथें देहो नाहीं । मीपणे कां वायां गुंतलासी ॥३॥ एका जनार्दनीं मीपण तूंपण । नाहीं नाहीं मज तुझीच आण ॥४॥
१५७२
देहबुद्धी खुंटली येथें माया तुटली । देहाची स्थिती दैवाधीन ठेली ॥१॥ दैवाचेनी बळें देहींचे कर्म चळे । स्वसुखाचे सोहळे विदेह भावें ॥२॥ भोगी कां त्यांगी अथवा हो योगी । देहीं देहपण न लगे त्याच्या अंगीं ॥३॥ एका जनार्दनीं एकपणाच्या तुटी । सहज चैतन्यासी मिनला उठाउठी ॥४॥
१५७३
देहाचि तों देह जोडी । साधी परमार्थ घडी ॥१॥ हेंचि निकें रे साधन । येणें न घडे बंधन ॥२॥ देहीं देह शुद्ध पाहे । सहज परमार्थ होये ॥३॥ सांडोनियां देहीं आटी । एका जनार्दनीं तैं भेटी ॥४॥
१५७४
देहाचिया आशा पुत्रादिक धन । कासया बंधन घडे मग ॥१॥ सांडोनि उपाधी करावें भजन । तेणें जनार्दन कृपा करी ॥२॥ एका जनार्दनीं निराशी तो धन्य । तयाचें चरण वंदु आम्हीं ॥३॥
१५७५
देहाचिये माथां काळाची तों सत्ता । म्हणोनि सर्वथा घोका राम ॥१॥ आदि मध्य अंतीं काळ लागलाहे । क्षणक्षणां पाहे वास त्यासी ॥२॥ सर्व जाणोनियां अंधळें पैं होती । काळ नेतांचि देखतो ते दुजा ॥३॥ परि रामनामीं न धरिती विश्वास । निकट समयास धांवाधांवी ॥४॥ एका जनार्दनीं भुलले ते प्राणी । तया सोडवाणी कोण करी ॥५॥
१५७६
देहाची आशा टाकिली परती । केलीसे आरती प्रपंचाची ॥१॥ स्थूल सुक्ष्म यांची रचूनियां होळीं । दावाग्नि पाजळीं भक्तिमंत्रें ॥२॥ एका जनार्दनीं देहासी मरण । विदेहीं तो जाण जनार्दन ॥३॥
१५७७
देहाची ममता न धरी साचार । करी कां रें विचार पैलथडी ॥१॥ भरिला भरिला सागर भरिला । उतरीं का रे वाहिला संतसंगे ॥२॥ नामाची सांगडी बांधीत निर्धारें । तेणें पैलपार तरसी देखा ॥३॥ सांगड नामाची धरी प्रेमभावें । संता शरण जावें एकविधा ॥४॥
१५७८
देहाचें देऊळ देवळींच देव । जनार्दन स्वयमेव उभा असे ॥१॥ पुजन तें पुज्य पूजकु आपण । स्वयें जनार्दन मागेंपुढें ॥२॥ ध्यान तें ध्येय धारणा स्वयमेव । जनार्दनीं ठाव रेखियेला ॥३॥ एका जनार्दनीं समाधी समाधान । पडिलें मौन देहीं देहा ॥४॥
१५७९
देहिचेनि सुखें सुखावत । सुख सरतां दुःख पावत ॥१॥ ऐशी आहे बरोबरी । वायां शिणती निर्धारी ॥२॥ सुख दुःख ते समान । मुळींचेच हे दोन्हीं जाण ॥३॥ एकाजनार्दनीं सुखदुःख । अवघा जनार्दन एक ॥४॥
१५८०
देही असोनि देहातीत । भूतीं भूतात्मा भगवंत ॥१॥ भिन्न खाणी भिन्नाकार । चिदात्मा हा निर्विकार ॥२॥ एक निश्चयो नाहीं चित्तीं । एका जनार्दनीं वायां भक्ति ॥३॥
१५८१
देही धर्म विहित करी । अद्वैत भाव चित्तीं धरी । सर्वभावे नमस्कारी । एक आत्मा म्हणोनी ॥१॥ तेणें तुटे रे बंधन । वाचे जपे जनार्दन । आणिक नको रे साधन । रामकृष्ण स्मर सुखें ॥२॥ पवित्र त्याचें हे कुळ । आचार त्याचाचि सुशीळ । अखंड जे सर्वकाळ । नाम जपती ॥३॥ एका जनार्दनीं नाम । परब्रह्मा तें निष्काम । हरे भवश्रम । जन्मजराव्याधी ॥४॥
१५८२
देहीं असोनियां देव । वाउगा करिती संदेहो ॥१॥ जाय देवळासी स्वयें । मनीं आशा दुसरी वाहे ॥२॥ बैसोनीं कीर्तनीं । लक्ष लावी सदां धनीं ॥३॥ करुं जाय तीर्थयात्रा । गोविलें मन विचारा ॥४॥ ऐशियासी न भेटे देव । एका जनार्दनीं नाही भाव ॥५॥
१५८३
देहीं असोनियां विदेही प्रकार । रामनाम उच्चार ज्याचें मुखीं ॥१॥ तोचि तरेल ऐसा नाहीं बोल । दरुशनें तारील मूढ जनां ॥२॥ देहीं तो विदेहीं समाधिस्थ सर्वदा । रामनाम मुखीं सदा जया असे ॥३॥ एका जनार्दनीं नित्य गात । श्रोता वक्ता जनार्दन तेथें ॥४॥
१५८४
देहीं असोनी विदेही । चाले बोले सदा पाही ॥१॥ असे अखंड समाधी । नसे कांहीं आधिव्याधी ॥२॥ उपाधीचे तोडोनी लाग । देहीं देहपणें भरिलें जग ॥३॥ एका जनार्दनीं संग । सदा समाधान सर्वाग ॥४॥
१५८५
देहीं कैंचे सुख कैंचें दुःख । कैंचा बंध कैंचा मोक्ष ॥१॥ देहीं कोण देव कोण । भक्त कोण शांत कोण अशांत ॥२॥ देहीं कैंची क्रिया कैंचें कर्म । देहीं विरालें धर्माधर्म ॥३॥ देहीं कैचें शास्त्र कैंचा वेद । कैंची बुद्धि कैंचा बोध ॥४॥ एका जनार्दनीं देह । ब्रह्मीं ब्रह्मा होत आहे. ॥५॥
१५८६
देहीं न धरी जो आशा । चित्त पंढरीनिवासा । स्मरणाचा ठसा । रात्रंदिवस जयातें ॥१॥ तोचि होय हरीचा दास । तेणें पुरती सर्व सायास । नाहीं आशापाश । चिंतनावाचुनी सर्वथा ॥२॥ ध्यानीं मनींनारायण । सदा सर्वदा हें चिंतन । एका जनार्दन मन । जडलेंसे हरिपायीं ॥३॥
१५८७
देहीं वाढें जों जों शांती । तों तों विरक्ति बाणें अंगीं ॥१॥ ऐसा आहे अनुभव । देहीं देव प्रकाशे ॥२॥ देहीं आत्मा परिपुर्ण । भरला संपुर्न चौदेहीं ॥३॥ एका जनार्दनीं रिता ठाव । नाहीं वाव पाहतां जगीं ॥४॥
१५८८
देहीं शत्रु वसती दुर देशीं । येतां बहु दिवस लागती तयांसी ॥१॥ बाह्म शत्रुंचें अल्प दुःख । मनःशत्रुंचें वर्म अशेख ॥२॥ आसनीं शयनीं एकान्तीं । जपीं अथवा ध्यानस्थिती ॥३॥ ऐशिया पणाचे भुलले हावे । एका जनार्दनीं नेणती देवें ॥५॥
१५८९
देहींच देहीं बिंबला देवी । न कळेचि पामरा पडिला संदेहो ॥१॥ आहे नाहीं संशयबुद्धी । तेणें ते गुंतलें कर्माचे सिद्धि ॥२॥ एका जनार्दनीं भरला देव । तयाविण रिता नाहीं ठाव ॥३॥
१५९०
देहींची वासना अद्वैत निमालें । साधन साधिलें तोचि धन्य ॥१॥ द्वैताचा भाव अद्वैताचा ठाव । आठवा स्वयमेव नेणें कांहीं ॥२॥ एका जनार्दनीं अद्वैता वेगळा । राहिला निराळा सुखरुप ॥३॥
१५९१
देहींचे आयुष्य पूर्ण तें भरलें । मग नाहीं उरलें मागील कांहीं ॥१॥ देहीं देह आहे तोवरीं अहतां । निमाचिया तत्त्वतां वाव सर्व ॥२॥ देहीं देहपण मी मी माझें म्हणे । मिथ्या सर्व जाणे देहांअंतीं ॥३॥ एका जनार्दनीं मिथ्या देह आहे । रामनाम बा हे सबराभरीत ॥४॥
१५९२
देहींच्या अवसाना । कोणी कामा नये कोण्हा ॥१॥ हे तो मिळाले अपार । अवघा मायेचा बाजार ॥२॥ तुजसाठीं शोक । कोण्ही न करतीच दुःख ॥३॥ रडती पडती । पुढें कैसें होईल म्हणती ॥४॥ आपुलीया हिता । रडती जना देखतां ॥५॥ याचे मानूं नको खरें । एका जनार्दनीं त्वरें ॥६॥
१५९३
देहो जैं पासुनी झाला । तैं पासुनी मृत्यु लागला ॥१॥ साप बेडुकातें गिळी । बेडुक मुखें माशी कवळी ॥२॥ ऐसा काळ गिळितो जना । न कळेचि बुद्धिहीना ॥३॥ मरण जाणतो बापुडीं । धरिती प्रपंचीं आवडी ॥४॥ ऐसे पामर आत्मघाती । यासी महा होये फजिती ॥५॥ असा जनीं जनार्दन । एका जनार्दनीं शरण ॥६॥
१५९४
दोघें शरणागत आले श्रीरामासी । मारिलें वालीसी एका बाणें ॥१॥ बाणलीसे भक्ति अंगदाचे अंगी । श्रीरामें वोसंगीं धरियेले ॥२॥ धरियेलें हातें तारा सुग्रीवानें । वैराचें खंडण झालें तेव्हा ॥३॥ तेव्हा वानरांचीं बोलावली सेना । लंकेवरी ज्यांना पाठविलें ॥४॥ विळब न होता धाडी हनुमंता । जाळियेली वार्तां सीता सांगे ॥५॥ सांग लंकाजळीं सन्निधा उदधी । लंघुनियां शुद्धि रामा सांगे ॥६॥ सांगे रामा तेव्हा बांधवा सागर । आणुनि अपार पर्वतांसी ॥७॥ शिळासेतु रामचरणाची ख्याती । तारुनी पुढती ख्याती केली ॥८॥ बांधोनिया सेतु राम आला लंके । मारियेलें मुख्य राक्षसासी ॥९॥ मारी कुंभकर्ण इंद्रजित रावणा । होता लक्ष्मणा शक्तिपात ॥१०॥ आणियला गिरी दिव्य तो द्रोणादी । उठविली मादी वानरांची ॥११॥ शिरे उडविली लंकापतीचीं । मुख्य राक्षस साचे छेदियेलें ॥१२॥ लिगाड तोडिले वैरत्व खुटलें । लंकाराज्य दिलें बिभीषणा ॥१३॥ तोडियली बेडी नवग्रहं सोडी । उभविली गुढी रामराज्य ॥१४॥ इंद्रचंद्रपद ब्रह्मीयांचे । देउनी तयांचें सुखी केलें ॥१५॥ केलें समाधान आणविली सीता । अयोध्यें मागुता राम आला ॥१६॥ आलासे भरत लागला चरणीं । फिटलीं पारणीं लोचनांचीं ॥१७॥ चिंता दुःख द्वेष पळाले बाहेरी । एका जनार्दनीं करी राज्य सुखें ॥१८॥
१५९५
दोन्ही कर ठेवूनी कटीं । उभा भीवरेचे तटीं ॥१॥ रुप सांवळें सुंदर । गळां वैजंयती हार ॥२॥ कानां कुंडलें मकराकार । तेज न समाये अंबर ॥३॥ एका जनार्दनीं उदार । भीमातीरीं दिंगबर ॥४॥
१५९६
दोरा अंगीं जैसा नसतां सर्प दिसे । मिथ्या देह तैसा वस्तूवरी आभासे ॥१॥ देह मी नव्हे देह मी नव्हे । देह मी नव्हे माझेनी अनुभवें ॥२॥ घटीं वर्तूळ आकाश परि तें महदाकाश । विकारवंत देह चैतन्य विलास ॥३॥ एका जनार्दनीं दो नांवीं एक । देह झाला मेला समूळ मिथ्या देखा ॥४॥
१५९७
दोष दुरितांचें पाळें । पळती बळें नाम घेतां ॥१॥ नाम प्रताप गहन । भवतारण हरिनाम ॥२॥ आणीक नको दुजी चाड । नाम गोड विठ्ठल ॥३॥ एका जनार्दनीं नाम । तरले तरती निष्काम ॥४॥
१५९८
दोषी पापराशी नामाचे धारक । होतां तिन्हीं लोक वंदिती माथां ॥१॥ नामाचें महिमान नामांचे महिमान । नामाचे महिमान शिव जाणे ॥२॥ जाणती ते ज्ञानी दत्त कपिल मुनी । शुकादिक जनींधन्य जाहलें ॥३॥ एका जनार्दनीं नाम परिपुर्ण । सांपडली खुण गुरुकृपें ॥४॥
१५९९
दोषी यमदुत नेतसे बांधोनी । तंव अवचित नाम पडलें कानीं ॥१॥ तुटलें बंधन खुंटलें पतन । नाम जनार्दन ऐकतांची ॥२॥ तुटोनि बंधन पडता तळीं । तंव वरचेवर झेली वनमाळी ॥३॥ दुती अति दृढ नाम धरितां मनीं । यमदूतां देवदूत घालिती विमानीं ॥४॥ दोषी आणि दूता नामाचा परिपाठीं । भावबळें देव स्थापी वैकुंठी ॥५॥ एका जनार्दनीं नामोच्चारासाठीं । यमे यमदूतां नोहे भेटीं ॥६॥
१६००
द्रव्य घेऊनियां उपदेश देती । मार्जार ते होती जन्मोजन्मीं ॥१॥ द्रव्य घेऊनियां तीर्थयात्रा करिती । श्वान ते होती जन्मोजन्मीं ॥२॥ द्रव्य देऊनियां दान परतोनि घेती । सूकार ते होती जन्मोजन्मी ॥३॥ द्रव्य घेऊनियां रंगी जें नाचती । वैष्णव ते न होती जन्मोजन्मीं ॥४॥ एका जनार्दनीं निर्धन भजन । तेथें नारायण संतुष्टची ॥५॥
१६०१
द्रव्य घेऊनियां कथा जे करिती । उभयतां जाती नरकामध्यें ॥१॥ तयांचियां दोषां नाहीं परिहार । वेदाचा विचार कुंठितची ॥२॥ शास्त्रांची तो मती न चाले सर्वथा । पुराणे हो तत्त्वता मौनावलीं ॥३॥ एका जनार्दनीं दोषां नाहीं पार । रवरव निर्धारें भोगिताती ॥४॥
१६०२
द्रव्याचिया आशें । कथा करणें सायासे ॥१॥ उभयंता नरका जोडी । मेळविलीं तीं बापुडीं ॥२॥ निराश करुनी मन । करा कथा तें कीर्तन ॥३॥ देवा आवड भक्तीची । एका जनार्दनीं साची ॥४॥
१६०३
द्रव्याचिया लोभें । तीर्थामध्यें राहती उभे ॥१॥ सांगती संकल्प ब्राह्मण । तेणें निर्फण तीर्थ जाण ॥२॥ संकल्पानें नाड । उभयतां ते द्वाड ॥३॥ संकल्पाविरहित धन । एका जनार्दनीं पावन ॥४॥
१६०४
द्रव्याचिये आशे करी जो कथा । चांडाळ तत्त्वतां जाणावा तो ॥१॥ द्रव्याचिये आशे वेद जे पढती । रवरव भोगिती कल्पवरी ॥२॥ द्रव्याचिये आशे पुराण सांगती । सकुल ते जाती नरकामध्यें ॥३॥ द्रव्याचियें आशें कथेचा विकारा । प्रत्यक्ष तो खरा मातंगची ॥४॥ एका जनार्दनीं नैराश्य भजन । तो प्राणी उत्तम कलियुगीं ॥५॥
१६०५
द्वारका समुद्रांत बुडविली । परी पंढरी रक्षिली अद्यापि ॥१॥ द्वारकेहुनि बहुत सुख । पंढ रीये अधिक एक आहे ॥२॥ भीमातीरीं दिंगबर । करुणाकर विठ्ठल ॥३॥ भक्तांसाठीं निरंतर । एका जनार्दनी कटीं धरिले कर ॥४॥
१६०६
द्वारकेचा सोहळा । परणियत्नी भीमकबाळा ॥१॥ सोळा सहस्त्र युवती । अष्टनायका असती ॥२॥ पुर पौत्र अपार । भगवती तो विस्तार ॥३॥ करुनिया राधामीस । देव येती पंढरीस ॥४॥ रुक्मिनी रुसली । ती दिंडिर वनां आली ॥५॥ तया मागें मोक्षदानीं । येतां जाला दिंडीर वनीं ॥६॥ गाई गोपाळांचा मेळ । गोपाळपुरी तो ठिविला ॥७॥ आपण गोपवेष धरी । एका जनार्दनीं श्रीहरीं ॥८॥
१६०७
द्वारकेभीतरीं । कामधेनु घरोघरीं ॥१॥ कैशी बरवेपणाची शोभा । पाहतां नयनां निघती जिभा ॥२॥ घरोघरीं आनंद सदा । रामकृष्न वाचे गोविंदा ॥३॥ ऐशी द्वारकेपरी । एका शरण श्रीहरी ॥४॥
१६०८
द्वारकेमाजीं श्रीकृष्ण । एकदा करी देवार्चन । उद्धवें कर जोडोन । केला प्रश्न श्रीकृष्णा ॥१॥ सर्व देवाचा तुं देव । ईश्वर न कळे तुझी माव । शिवणे सर्व ऋषी गणगंधर्व । परी तुं नाकळा सर्वथा ॥२॥ तुम्हीं बैसोनि एकांतीं । काय करितां श्रीपती । हें होतें पुसणें माझे चित्तीं बहु दिवस श्रीहरीं ॥३॥ एकोनी उद्धवाची मात । तया बोले जगन्नाथ । एका जनार्दनीं विनवीत । सावधान परियेसा ॥४॥
१६०९
द्वारकेहुनी जगजेठी । आला पुंडलिकाचे भेटी । पाऊलें सरळ गोमटी । बाळ सुर्यापरी ॥१॥ धन्य धन्य पांडुरंग । मुर्ति सावळी सवेग । गाई गोप संवगडे लाग । मिळोनि सकळांसहित ॥२॥ पाहतां पुंडलिकांचें वदन । वेडावलें भक्तांचे भुषण । केलेंसे खेवण । समचरणीं विटेवरीं ॥३॥ न बैसे अद्यापि खालीं । ऐशी कॄपेची माउली । एका जनार्दनीं आली । भक्तिकाजा विठ्ठल ॥४॥ पुंडलिकाची जगदोद्धरार्थ विनवणी
१६१०
द्वारकेहुनी धांवणें । केलें पुंडलिकाकारणें ॥१॥ ऐसा कृपाळू उदार । उभा विटेश्यामसुंदर ॥२॥ न बोले म्हणोनि पाहे पुढें । चित्त ठेविलें तिकडे ॥३॥ एका म्हणे जनार्दनीं । धन्य पुंडलिक मुनी ॥४॥
१६११
द्वारकेहुनी विठु पंढरीये आला । नामयाचा पूर्वज दामशेटी वहिला ॥१॥ दामा आणि गोणाई नवसी विठूसी । पुत्र देईं आम्हां देवा भक्तराशी ॥२॥ तोचि नामदेव जन्म शिंपियाचे कुळीं । भक्तातें पाहुनी वेधला वनमाळी ॥३॥ एका जनार्दनीं परंपरा कथियेली । धन्य धन्य विठु अनाथाची माउली ॥४॥
१६१२
धन कामासाठीं देख । न मनीं दोष महा दोषी ॥१॥ कवडीये लोभें केला असे मूर्ख । नाठवेची नरक पतितासी ॥२॥ कवडी येकु लाभू होतां । तै श्राद्ध करी मातापिता ॥३॥ मी उत्तम पैलहीन । ही धनलोभ्या नाठवे आठवण ॥४॥ एका जनार्दनीं शरण । काय तया ब्रह्माज्ञान ॥५॥
१६१३
धन जयासीं मृत्तिका । जगीं तोचि साधु देखा ॥१॥ ज्यासी नाहीं लोभ आशा । तोचि प्रिय जगदीशा ॥२॥ निवारले क्रोधकाम । तोचि जाणा आत्माराम ॥३॥ एका जनार्दन पाय धरी । भुक्ति मुक्ति नांदे घरीं ॥४॥
१६१४
धन मानबळें नाठविसी देवा । अंतकाळीं तेव्हा कोण आहे ॥१॥ यमाचे ते दंद बैसतील माथां । मग तुज रक्षितां कोण आहे ॥२॥ माता पिता बंधु सोइरे धाईरे । जोंवरी इंद्रियें चालताती ॥३॥ सर्वस्व कामिनी म्हणविसी कांता । ती ही केश देतां रडुं लागे ॥४॥ एका जनार्दनीं जातांचि शरण । स्वप्नीं जन्ममरण नाहीं नाहीं ॥५॥
१६१५
धन वित्त आशा धरुनी स्मरती । तेही मुक्त होती विठ्ठलनामें ॥१॥ प्रपंच परमार्थ धरुनियां हाव । गाती विठ्ठल देव आवडीनें ॥२॥ तरती तरले हाचि भरंवसा । एका जनार्दनीं ठसा विठ्ठलनाम ॥३॥
१६१६
धनदारापुत्र अपत्यें म्हणसी माझें । परीं हे काळाचें खाजें बापा ॥१॥ गंगेलागीं पूर अवचित आला । लोटोनियां गेला मागुती जैसा ॥२॥ तैसा याचा विश्वास न धरीं तूं; मनीं । यमाची जांचणी तुजसी होय ॥३॥ एका जनार्दनीं सोडोनि देई संग । नाम तूं अभंग हरीचे वदे ॥४॥
१६१७
धनलोभ्याचें जाय धन । शोधितसे रात्रंदिन ॥१॥ त्याची निंदा करतील लोक । रांडा पोरें थुंकती देख ॥२॥ भिकेलागीं जेथें गेला । म्हणती काळतोंडी आला ॥३॥ हाता धनलोभें भुलला । संचित ते बरा नागविला ॥४॥ ऐसें धनाचें कारण । शरण एका जनार्दन ॥५॥
१६१८
धन्य आज दिन संतदरुशनाचा । अनंत जन्मांचा शीण गेला ॥१॥ मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे । कदा न सोडावे चरण त्याचे ॥२॥ त्रिविध तापांची जाहली बोळवण । देखिल्या चरण वैष्णवांचे ॥३॥ एका जनार्दनीं घडो त्यांचा संग । न व्हावा वियोग माझ्या चित्ता ॥४॥
१६१९
धन्य आजी डोळां । स्मामी निवृत्ति देखिला ॥१॥ कुशावर्ती करुं स्नान । घेऊं निवृत्तिदर्शन ॥२॥ प्रदक्षिणा ब्रह्मगिरी । चौ‍‍‍‍र्‍यांयशीची चुकली फ़ेरी ॥३॥ गंगाद्वारीं स्नान करतां । हारे पय पान व्यथा ॥४॥ ऐसीं तीन अक्षरें । एका जनार्दन स्मरे ॥५॥
१६२०
धन्य काशीपुरी धन्य काशीपुरी । जेथें वास करी विश्वनाथ ॥१॥ तयाच्या दर्शनें प्राणी मुक्त होय । चारी मुक्ती पायां लागताती ॥२॥ भागीरथी स्नान जयालागीं घडे । समूळ हें झडें पाप त्याचें ॥३॥ काळभैरवाचें दर्शन घेईल । तात्काळ जाईल वैकुंठासी ॥४॥ प्रदक्षणा पंचक्रोशीची जो करी । होईल अधिकारी सर्वस्वाचा ॥५॥ धुंडिराजस्वामी दृष्टी जो न्याहाळी । होईल त्या होळी सर्व पापा ॥६॥ तेथें जाउनियां करी अन्नदान । तया नारायण ह्रदयी वसे ॥७॥ एका जनार्दनीं नित्य काशीवास । परम सुखास पात्र झालों ॥८॥
१६२१
धन्य गुरु जनार्दन । स्वानंदाचें जें निधान ॥१॥ तेणें केला हा उपकार । दावियेलेंक परात्पर ॥२॥ त्याच्या कृपें करुनि जाण । प्राप्त झालें ब्रह्माज्ञान ॥३॥ एका जनार्दन सदगुरु । जनार्दन माझा पैं आधारु ॥४॥
१६२२
धन्य गुरुकृपा जाहली । अहंता ममता दुर गेली ॥१॥ घालुनि अंजन डोळां । दाविला स्वयं प्रकाश गोळा ॥२॥ बोधी बोधविलें मन । नाहीं संकल्पासी भिन्न ॥३॥ देह विदेह निरसले । एका जनार्दनीं धन्य केलें ॥४॥
१६२३
धन्य चंद्रभागा धन्य वाळूवंट । तेथें सभादाट वैष्णवांची ॥१॥ ठायीं ठायीं कीर्तन होत नामघोष । जळाताती दोष जन्मातरींचे ॥२॥ पहा तो नारद उभा चंद्रभगेंत । गायन करीत नामघोष ॥३॥ धन्य विष्णु पहा धन्य वेणुनाद । क्रीडा करी गोविंद सर्वकाळ ॥४॥ पौर्णिमेचा काला वेणुनादीं जाहला । वांटिती सकळीं पाडुरंग ॥५॥ स्वगींचे सुरवर प्रसाद इच्छिती । नाहीं त्यांसी प्राप्ति अद्यापवरी ॥६॥ तुम्हां आम्हां येथें कैसें सांपडले । उपकार केलें पुडलीके ॥७॥ धन्य ते पद्माई धन्य ते पद्माळ । येऊनी सकळ स्नाने करिती ॥८॥ धन्य दिंडीर वन रम्य स्थळ फर । रखुमाई सुंदर वास करिती ॥९॥ चोखोबानें वस्तीं केली ऐलथडी । उभारिली गुढी स्वानंदाचे ॥१०॥ धन्य पुंडलीक भक्त शिरोमणी । तेणें चक्रपाणी उभा केला ॥११॥ मायाबापाची सेवा तेणें केली सबळ । म्हणोनी घननीळा आतुडला ॥१२॥ लोह दंड क्षेत्र पंढरपुर । उभा विटेवर पांडुरंग ॥१३॥ त्रैलोक्याचा महिमा आणिला तया ठाया । तीर्थ व्रतें पायां विठोबाच्या ॥१४॥ तिहीं लोकीं पाहतीं ऐसें नाहीं कोठें । परब्रह्मा नीट विटेवरी ॥१५॥ एका जनार्दनीं ब्रह्मा पाठीं पोटीं । ब्रह्मानिष्ठा येती तया ठायां ॥१६॥
१६२४
धन्य जाहलों आतां । अवघी चिंता वारली ॥१॥ आजी देखिलीं पाउलें । सुख जाहलें समाधान ॥२॥ निवारला भाग शीण । पाहतां चरण गोमटे ॥३॥ भय निवारली खंती । दृष्टी मूर्ति पाहतां ॥४॥ समाधी सोहळा देखिला । एका जनार्दन सुखावला ॥५॥
१६२५
धन्य ते भाग्याचे । वास करिती पंढरीचे ॥१॥ करती नित्य प्रदक्षिणा । स्नान चंद्रभागे जाणा ॥२॥ पुंडलिकाची भेटी । वेणुनाद पाहती दृष्टी ॥३॥ करिती एकादशी । जाग्रण आनंदें मानसीं ॥४॥ तया पुण्या नाहीं लेखा । म्हणे जनार्दनीं एका ॥५॥
१६२६
धन्य ते भाग्याचे । वासुदेव नामीं नाचे ॥१॥ सदा राम नामावळी । पाप तापां होय होळी ॥२॥ सदा नामीं ज्याचें मन । जन नोहे जनार्दन ॥३॥ नामें रंगे ज्याची वाणी । एका जनार्दनीं तोचि जनीं ॥४॥
१६२७
धन्य तेचि संत भक्त भागवत । हृदयीं अनंत नित्य ज्यांच्या ॥१॥ धन्य त्यांची भक्ति धन्य त्यांचे ज्ञान । चित्त समाधान सर्वकाळ ॥२॥ धन्य तें वैराग्य धन्य उपासना । जयाची वासना पांडुरंगीं ॥३॥ एका जनार्दनीं धन्य तेचि संत । नित्य ज्यांचे आर्त नारायणीं ॥४॥
१६२८
धन्य दिवस जाहल । संतसमुदाय भेटला ॥१॥ कोडें फिटलें जन्माचें । सार्थक जाहलें पैं साचें ॥२॥ आज दिवाळी दसरा । संतपाय आले घरा ॥३॥ एका जनार्दनीं जाहला । धन्य तो दिवस भला ॥४॥
१६२९
धन्य धन्य कीर्तन जगीं । संत तेची सभागीं ॥१॥ गाती कीर्तनीं उल्हास । सदा प्रेमें हरिदास ॥२॥ नाहीं आणिक चिंतन । करती आदरें कीर्तन ॥३॥ एका जनार्दनीं शरण । जालों कीर्तनीं पावन ॥४॥
१६३०
धन्य धन्य जगीं संत । कृपावंत दीनबंधु ॥१॥ कृपादृष्टी अवलोकितां । परिपुर्ण समदृष्टी ॥२॥ अगाधा देणेंऐसें आहे । कल्पातीं हें न सरेची ॥३॥ एका जनार्दनींचित्त । जडो हेत त्या ठायीं ॥४॥
१६३१
धन्य धन्य ते जन । जया शिवाचें भजन ॥१॥ हो का नारी अथवा नर । वाचे वदे हरहर ॥२॥ हास्य विनोद कथा । तेणें मोक्ष प्राप्त सायुज्यता ॥३॥ एका जनार्दनीं जपा । शिव शिव मंत्र सोपा ॥४॥
१६३२
धन्य धन्य तें शरीर । जेथें कथा निरंतर ॥१॥ गुण गाती भगवंतांचे । तेचि जाणावें दैवाचे ॥२॥ स्वयें बोलिले जगज्जीवन । थोर कलियुगीं कीर्तन ॥३॥ एका जनार्दनीं भले । हरिभक्तीनें उद्धरीले ॥४॥
१६३३
धन्य धन्य तेचि नर । दत्तनामीं जे तत्पर ॥१॥ त्याचे होतां दरुशन । पतित होताती पावन ॥२॥ तयालागीं शरण जावें । काया वाचा आणि जीवें ॥३॥ शरण एका जनार्दनीं । त्याचें पाय आठवी मनीं ॥४॥
१६३४
धन्य धन्य तेचि संत । नाहीं मात दुसरी ॥१॥ वाचे सदा नारायण । तेंवदन मंगळ ॥२॥ सांदोनी घरदारा । जाती पंढरपुरा आवडी ॥३॥ एका जनार्दनीं नेम । पुरुषोत्तम न विसंबे त्या ॥४॥
१६३५
धन्य धन्य नामदेव । सर्व वैष्णवांचा राव ॥१॥ प्रत्यक्ष दाविली प्रचीत । वाळुवंटीं परीस सत्य ॥२॥ कवित्व केलें शतकोटी । तारिले जीव कल्पकोटी ॥३॥ देव जेवीं सवें । ऐशी ज्याची देवासवें ॥४॥ धन्य धन्य नामदेवा । एका जनार्दनीं चरणीं ठेवा ॥५॥
१६३६
धन्य धन्य निवृत्तिदेवा । काय महिमा वर्णावा ॥१॥ शिव अवतार तूंचि धरुन । केलें त्रैलोक्य पावन ॥२॥ समाधि त्र्यबंक शिखरीं । मागें शोभे ब्रह्मगिरी ॥३॥ निवृत्तिनाथाचे चरणीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥
१६३७
धन्य धन्य पंधरपुर । वाहे भीवरा समोर ॥१॥ म्हणोनि नेमें वारकरी । करती वारी अहर्निशीं ॥२॥ पुडलीकां दंडवत । पाहाती दैवत श्रीविठ्ठल ॥३॥ काला करती गोपाळापुरी । मिळोनि हरी सवंगडे ॥४॥ तया हरिदासाचे रजःकण शरण एका जनार्दन ॥५॥
१६३८
धन्य धन्य पुंडलिक । तारिले लोकां सकळां ॥१॥ तुझें भाकेंगुतुंनी येथें । तारीन पतीत युगायुगीं ॥२॥ भाळे भाळे येतील जैसे । दरुशनें ते तैसे वैकुंठीं ॥३॥ एका जनार्दनीं देऊनी वर । राहें विटेवर मग उभा ॥४॥
१६३९
धन्य धन्य भुमंडळी । वैष्णव बळीं वीर गाढें ॥१॥ कळिकाळाचे न चले बळ । नामें सबळ वज्रकवची ॥२॥ विठ्ठल देव पाठी उभा । तेथे लाभा काय उणें ॥३॥ एका जानर्दनीं मुक्ती । तेथें दास्यत्व करिती ॥४॥
१६४०
धन्य धन्य विठ्ठल देव । पाहतां निरसे भेव काळाचें ॥१॥ जाउनी घाला पायीं मिठी । उदार हा जगजेठी ॥२॥ दरुशनें तारी जडजीव । निवारी भेव यमाचें ॥३॥ शरण एका जनार्दनीं । ध्यानीं मनीं विठ्ठल ॥४॥
१६४१
धन्य धन्य श्रीगुरुभक्त । गुरुचें जाणती मनोगत ॥१॥ गुरुचरणीं श्रद्धा गाढी । गुरुभजनाची आवडी ॥२॥ गुरुचेंनाम घेतां वाचें । कैवल्य मुक्ति तेथें नाचे ॥३॥ गुरुचें घेतां चरणातीर्थ । भुक्ति मुक्ति पवित्र होत ॥४॥ गुरुकृपेचें महिमान । शरण एका जनार्दन ॥५॥
१६४२
धन्य धन्य श्रीहरीचे गुण । नाम पावन ऐकतां ॥१॥ जें जें अवतारचरित्र । वर्णीता पवित्र वाणी होय ॥२॥ कीर्ति वर्णिता उद्धार जीवां । कलीयुगीं सर्वा उपदेश ॥३॥ एका जनार्दनीं सोपें वर्म । गुण कर्म वर्णितां ॥४॥
१६४३
धन्य धन्य सदगुरुराणा । दाखिविलें ब्रह्मा भुवना ॥१॥ उपकार केला जगीं । पावन जालों आम्हीं वेगीं ॥२॥ पंढरीं पाहतां । समाधान जाले चित्ता ॥३॥ वेटेवरी समचरण । एका जनार्दनीं निजखुण ॥४॥
१६४४
धन्य पंढरीची वारी । सदा वसे जया घरीं ॥१॥ तोचि देवाचा आवडता । कळिकाळा मारी लाथा ॥२॥ आलिया आघात । निवारी स्वयें दिनानाथ ॥३॥ कळिकाळाची बाधा । नोहे तयासी आपदा ॥४॥ लक्ष्मी घरीं वसे । देव तेथें फिरतसे ॥५॥ ऐशी भाविकासी आवडी । एका जनार्दनीं घाली उडी ॥६॥
१६४५
धन्य पृथ्वी दक्षिन भाग । जेथें उभा पांडुरंग ।मधे शोभे पुंडलीकक लिंग । सन्मुख चांग भीमरथी ॥१॥ काय वानुं तो महिमा । दृष्टी पाहतांचि भीमा । पैलथडी परमात्मा । शिवास जो अगम्य ॥२॥ दोन्ही कर धरुनि जघनीं । वाट पाहे चक्रपाणी । एका शरण जनार्दनीं । भक्तांसाठीं घाबरा ॥३॥
१६४६
धन्य भाग्य गोकुळींचे राज्य । जेथें क्रीडा केली यादवराजें ॥१॥ काय तें वानुं सुख आनंदु । सुख संतोष गोकुळीं परमानंदु ॥२॥ एका जनार्दनीं जगाचे जीवन । मूर्ति पाहता दिसे सगुण निर्गुण ॥३॥
१६४७
धन्य भाग्याचे जन इहलोकीं । कीर्तनें जाले सुखी कृतकृत्य ॥१॥ पातकी घातकी यासी सोपा पंथ । कीर्तन तरती कलीमाजी ॥२॥ योगयोग व्रत तप कल्पकोडी । कीर्तन श्रवण गोडी तेथें नाहीं ॥३॥ वेदशास्त्र पुराण श्रुतीचें आनुमोदन । करा रे कीर्तन कलीमाजीं ॥४॥ एका जनार्दनीं आल्हादें कीर्तन । करितां श्रोते वक्तें जाण पावन होती ॥५॥
१६४८
धन्य माय व्याली सुकृताचें फळ । फळ तें निर्फळ हरीविण ॥१॥ वेदाचेंहि बीज हरि हरि अक्षरें । पवित्र सोपारें हेंचि एक ॥२॥ योगायाग व्रत नेम धर्म दान । न लगे साधन जपतां हरी ॥३॥ साधनाचे सार नाम मुखीं गातां । हरि हरि म्हणतां कार्यासिद्धि ॥४॥ नित्य मुक्त तोची एक ब्रह्माज्ञानी । एका जनार्दनें हरिबोला ॥५॥
१६४९
धन्य श्रीगुरुनाथें । दाखविलें पाय तुमचें ॥१॥ मी अभागी दातारा । मज तारिलें पामरा ॥२॥ करुनि दास्यत्व । राखियेलें माझें चित्त ॥३॥ ऐसा मी हीनदीन । शरण एका जनार्दनीं ॥४॥
१६५०
धन्य स्वामी माझा निवृत्ति । जडलासे चित्तवृत्तीं ॥१॥ अखंडित वाचे । नाम निवृत्ति हेंचि साचें ॥२॥ नामें पावन निवृत्ति । धन्य धन्य तो निवृत्ति ॥३॥ एका जनार्दनीं वाचे । नाम श्रीनिवृत्तीचें ॥४॥
१६५१
धन्य हरिहर भवभयाहर । आठव सत्वर करीं मना ॥१॥ तयांच्या चिंतनीं हरतील दोष । नित्य होय वास वैकुंठासी ॥२॥ नारदादि संता करावें नमन । धरावे चरण हृदयकमळीं ॥३॥ एका जनार्दनीं संतचरण ध्यातां । मुक्ति सायुज्यता हातं येते ॥४॥
१६५२
धरसी संसारासी हांव । माझें माझें म्हणशी सर्व । हें तंव कोणाचें वैभव । तुज न कळे पामरा ॥१॥ आयुष्यमान जंव आहे । तंव सर्वा होशी साह्म । अंतकाळीं जंव आहे । तंव सर्वा होशी साह्म ॥२॥ तुज जे म्हणती उत्तम । त्यांचा तुज मोठा भ्रम । अंतकांळीं पावशी श्रम । एकलाचि पामरा ॥३॥ म्हणोनि सर्व भावें हरी । स्मरण करी निरंतरीं । एका जनार्दनीं निर्धारी । नाम स्मरे वेळोवेळां ॥४॥
१६५३
धरा अंतरीं शुद्ध निष्ठा । पहा श्रेष्ठा विठ्ठला ॥१॥ वाचें उच्चरितां सहज । अधोक्षज तोषतो ॥२॥ सहज अमृत पडतां मुखीं । होय शेखीं अमर तो ॥३॥ नामामृत घेतां वाचे । कोटी जन्मांचे सार्थक ॥४॥ एका शरण जनार्दनीं । घेत नामामृत संजीवनीं ॥५॥
१६५४
धरा अधर जाली वोटंगणें काई । जळे मळें तें धावें कवणे ठायीं ॥१॥ ऐसा कोण्हीहा गुणीया मिळों कां निरुता । भूतें धरे धरी आपुलिया सत्ता ॥२॥ अग्नि हिवेला तापावें कोठें । पवना प्राणु नाहीं कवण लावी वाटे ॥३॥ गगन हारपलें पाहावेआं कवणे ठायीं । मन मुळीं लागलें शांतीक तें पाहीं ॥४॥ स्वादें जेवणार गिळिला पैं जाणा । चवी सांगावया सांग ते कवणा ॥५॥ एका जनार्दनीं जाणे एक खुणे । त्यासी भेटी कोणी घ्या एकपणें ॥६॥
१६५५
धरितां श्रीहरींचें ध्यान । समाधीस समाधान ॥१॥ तो सोपा आम्हांलागी । उघडा पहा धन्य जगीं ॥२॥ कीर्तनीं नाचतो भक्तामागें । मन वेधिलें या श्रीरंगें ॥३॥ एका जनार्दनीं सुखाची भेटी । झालिया होय जन्ममरण तुटी ॥४॥
१६५६
धरितां हातीं हात न सुटे चिकाटी । पडली ती मिटाही नोहे कदा सुटी ॥१॥ वायां काय बळ वेंचितोंसी मुढा । न सुटतां हातीं हात वायां जिनें दगडा ॥२॥ ऐशी मिठी घालीअं एकदां जनार्दन पायीं । न सुटेचि कालन्नयी सर्वत्र देती ग्वाही ॥३॥ कायावाचामनें शरण एका जनार्दनीं । मिठी पडली ते न सुटे भावें चरणीं ॥४॥
१६५७
धरिला देव आवाडी मिठी । नोहे तुटी जन्मोजन्मीं ॥१॥ हाचि मुख्य भाव साचा । तुटला जन्माचा विसर ॥२॥ एकपणें पाहतां पोटीं । एका जनार्दनीं जाहली भेटी ॥३॥
१६५८
धरिसी देहाची तूं आशा । तेणें फांसा पडशील ॥१॥ सोडविता नाहीं नाहीं कोण्ही । पाहें विचारुनी मनामाजी ॥२॥ येती तैसे सवेंचि जाती । व्यर्थ कुंथती माझें माझें ॥३॥ एका जनार्दनीं पैलपार । तरसी निर्धार विठ्ठलनामें ॥४॥
१६५९
धरी अवतार विश्व तारावया । अत्रीची अनूसुया गरोदर ॥१॥ ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी । शुक्लपक्ष दिनीं पूर्णतिथी ॥२॥ तिथि पूर्णिमा मास मार्गशीर्ष । गुरु तो वासर उत्सवकाळ ॥३॥ एका जनार्दनीं पूर्ण अवतार । निर्गुण निराकार आकारलें ॥४॥
१६६०
धर्म अर्थ काम । जिहीं अर्पिला संपुर्ण ॥१॥ तेचि जाती जा वाटा । पंढरी चोहटा नाचती ॥२॥ आणिकांसी नोहे प्राप्ती । संत गाती तो स्वादु ॥३॥ शीण आअदि अवसानीं । पंढरपूर न देखतां नयनीं ॥४॥ उभा विटे समचरणीं । एका शरण जनार्दनीं ॥५॥
१६६१
धर्म अर्थ काम मोक्ष । संतचरणीं ठेवी लक्ष ॥१॥ परा पश्यंती मध्यमा वैखरी । चरणीं निर्धारीं संतांच्या ॥२॥ योगयागादि साधनें संतचरणीं असो ध्यानें ॥३॥ आणिक नको त्या उपाधी । तोडा देहीं आधिव्याधी ॥४॥ एका जनार्दनीं मन । एकपणें जनार्दन ॥५॥
१६६२
धर्माचें वाट मोडे । अधर्माची शीग चढे । तैं आम्हां येणें घडे । संसारस्थिती ॥१॥ आम्हां कां ससारा येणें । हरिभक्ति नामस्मरणें । जडजीव उद्धरणें । नामस्मरणें करुनी ॥२॥ सर्व कर्म ब्रह्मास्थिती । प्रतिपादाव्या वेदोक्ती । हेंचि एक निश्चिती । कारण आम्हां ॥३॥ नाना मतें पाषांड । कर्मठता अति बंड । तयाचें ठेंगणें तोंड । हरिभजनें ॥४॥ विश्वरुप सृष्टी । अर्जुना दाविली दृष्टी । भिन्नं भेदाची गोष्टी । बोलुं नये ॥५॥ एका जनार्दनीं । धरिती भेद मनीं । दुर्‍हावले येथुनी । निंदक जाण ॥६॥
१६६३
धांव नारायण । माझ्या दुःखाच्या निरसना ॥१॥ संसारें मी कष्टलों । तुजलागीं शरण आलों ॥२॥ कोण सोडवील आतां । तुजविन जी अनंता ॥३॥ तूचि मायबापा । निवारिसी सर्व तापा ॥४॥ एका जनार्दनीं पाय । धरुनियां चित्तीं राहे ॥५॥
१६६४
धांव रे धांव आतां । दीनवत्सला रामा । संसारसंग गोष्टी । मी गुंतलों कामा ॥१॥ तारुण्य अभिमानें । अंगा भरला ताठा । विषयसंपतीचा । मज फुटला फाटा ॥२॥ विषय भोगितांना । देह पोसलें माझें । स्वाहित आठवेना । ध्यान चुकलों मी तुझें ॥३॥ विषया मिकलिलों । तुज शरण मी आलों । एका जनार्दनीं पायीं । लीन मी जाहलों ॥४॥
१६६५
धांवण्या धांवतां न लावा उशीर । हा श्रेष्ठाचार मागें आला ॥१॥ गुणदोष नाहीं पाहिले कवणाचे । केलें बहुतांचे धांवणें देवा ॥२॥ एका जनार्दनीं पतितपावन । हें तों तुम्हां वचन साजतसे ॥३॥
१६६६
धांवुनीं तिजी गोपिका म्हणे वो बाई । येथें रहावया लाग उरला नाहीं ॥१॥ जात होतें पाण्यां यमुने पहाटीं । अविचित येऊनियां पाठी थापटी ॥२॥ एका जनार्दनीं आणियला त्रास । नको हें गोकुळ आम्हीं जाऊ मथुरेस ॥३॥
१६६७
धांवू नको सैरा कर्माचियासाठीं । तेणें होय दृष्टी उफराटी ॥१॥ शुद्ध अशुद्धाच्या न पडे वेवादा । वाचे म्हणे सदा नारायण ॥२॥ एका जनार्दनीं ब्रह्मापर्ण कर्म । तेणें अवघे धर्म जोडतील ॥३॥
१६६८
धांवे धांवे श्रीहरी । निवारीं संसार बोहरीं ॥१॥ आडलियाचा विसांवा । धांवे पावे तुं केशवा ॥२॥ तूं दीनदयाळ हरी । आपुले आम्हां जतन करी ॥३॥ अंकित भक्तांचा । ऐसी बोले वेदवाचा ॥४॥ एकाएकीं जनार्दनीं । आठ सहस्त्र बोले वाणी ॥५॥
१६६९
धांवे पावे दत्तराजा । महाराजा गुरुराया ॥१॥ अनाथासी संभाळावें । ब्रीद पाळावें आपुलें ॥२॥ तुजविण सोडवितां । नाहीं त्राता दुसरा ॥३॥ महादोषी पतितालागीं । करा वेगी उद्धार ॥४॥ एका जनार्दनीं दत्ता । अवधुता माया बापा ॥५॥
१६७०
धोंड्यासी व्यापार कोणी नाहीं केला । आज म्यां ऐकिला वृत्तांत तुझा ॥१॥ उभयतां ऐसी बोलती पैं गोष्टी । तंव दामशेटी घरीं आला ॥२॥ गोणाईनें सर्व सांगितलें त्यासी । पुत्र व्यापारासी उत्तम जाहला ॥३॥ एका जनार्दनीं ऐका त्याचा व्यापार । बुडविलें घर सर्व आपुलें ॥४॥
१६७१
ध्यानाचे ध्यान ज्ञानाचें ज्ञान । ते सम चरण विटेवरी ॥१॥ भावाचा तो भाव देवाचा तो देव । वैकुंठीचा राव विटेवरी ॥२॥ कामाचा तो काम योगियां विश्राम । धामाचा तो धाम विटेवरी ॥३॥ वैराग्याचे वैराग्य मुक्तांचे माह्गेर । तो देव सर्वेश्वर विटेवरी ॥४॥ भोळीयाचा भोळा ज्ञानीयाचा डोळा । एका जनार्दनीं सोहळा विटेवरी ॥५॥
१६७२
ध्यानीं बैसोनी शंकर । जपे रामनाम सार ॥१॥ पार्वती पुसे आवडी । काय जपतां तांतडी ॥२॥ मंत्र तो मज सांगा । ऐसी बोलतसे दुर्गा ॥३॥ एकांतीं नेऊन । उपदेशी राम अभिधान ॥४॥ तेचि मच्छिद्रा लाधलें । पुढें परंपरा चालिलें ॥५॥ तोचि बोध जनार्दनीं । एका लागतसें चरणीं ॥६॥
१६७३
ध्येय ध्याता ध्यान । अवघा माझा जनार्दन ॥१॥ आसन शयनीं मुद्रा जाण । अवघा माझा जनार्दन ॥२॥ जप तप यज्ञ यागपण । अवघा माझा जनार्दन ॥३॥ भुक्ति मुक्ति स्थावर जाण । अवघा माझा जनार्दन ॥४॥ एका एकींवेगळा जाण । अवघा भरला जनार्दन ॥५॥
१६७४
ध्येय ध्याता ध्यान विठ्ठल संपुर्न । ज्ञेय ज्ञाता पुर्ण विठ्ठल माझा ॥१॥ योगयाग तप विठ्ठलनाम जप । पुण्य आणि पाप विठ्ठल बोला ॥२॥ उन्मनी समाधी विठ्ठल बोला वाणी । तारील निर्वाणीं विठ्ठल माझा ॥३॥ मज भरंवसा कायामनेंवाचा । एक जनार्दनीं त्याचा शरणांगत ॥४॥
१६७५
ध्येय ध्यातेविण ध्यान । ज्ञेय ज्ञातेविण ज्ञान ॥१॥ ऐसें जनार्दनाचें ध्यान । साधनांचें निज साधन ॥२॥ साध्य साधनेंविण साधणें । दृश्य द्रष्टत्वेंविण देखिणें ॥३॥ बोल बोलणेविण बोलणें । एकाएकी जनार्दनें ॥४॥
१६७६
ध्वज वज्रांकुश शोभती चरणीं । तो उभा रंगणीं वैष्णवांचें ॥१॥ झळकतसे हातीं पद्म आणि गदा । पुंडलिक वरदा उभा विटे ॥२॥ चरणीं भागीरथीं गंगा ती शोभली । भक्तांची क्षाळिलीं महात्पापें ॥३॥ एका जनार्दनीं सकळ तीर्थराव । उभा राह प्रभव विटेवरी ॥४॥
१६७७
न करी आळस रामनाम घेतां । वाचे उच्चारितां काय वेंचे ॥१॥ न लगे द्रव्य धन वेचणेंचि कांहीं । रामनाम गाई सदा मुखीं ॥२॥ सोहळे आचार न लगे विचार । पवित्र परिकर नाम मुखीं ॥३॥ शुद्ध याति कुळ अथवा चांडाळ । स्त्री अथवा बाळ हो कां नीच ॥४॥ एका जनार्दनीं नाहीं यातीचें कारण । वाचे उच्चारण तोचि शुचि ॥५॥
१६७८
न करी सायास आणिक संकल्प । वायांचि विकल्प न धरी मनीं ॥१॥ मनाचें जें मन करी ते स्वाधीन । तेणें नारायण कृपा करी ॥२॥ एका जनार्दनीं टाकूनि कल्पना । श्रीसंतचरणा शरण जाई ॥३॥
१६७९
न करीं तळतळ मना । चिंती चरणां विठोबाचें ॥१॥ राहे क्षणभरी निवांत । न करीं मात दुजीं कांहीं ॥२॥ संतचरण वंदी माथां । तेणें सर्वथा सार्थक ॥३॥ एका जनार्दनीं मात । मना ऐकें तूं निवांत ॥४॥
१६८०
न कळती भावेवीण रामकृष्ण । गोपिकांसी शीण बहुतची ॥१॥ बहुत मिळती बहुतांच्या मतां । तैशां गोपी तत्त्वतां शिणताती ॥२॥ एका जानार्दनीं प्रेमावीण देव । नकळे लाघव श्रीहरींचे ॥३॥
१६८१
न कळे जयांचे महिमान । वेदश्रुतीसी पंडिले मौन । वेडावलें दरुशन । जयालागीं पाहतां ॥१॥ तोचि उभा विटेवरी । भक्त करुणाकर । हरी रुक्मीणी निर्धारी । वामभागीं शोभती ॥२॥ गरुड सन्मुख उभा । शोभे चैतन्याचा गाभा । नभी लोपली तेजप्रभा । ऐसा उभा विठ्ठल ॥३॥ मन ध्यातां न धाये । दृष्टी पाहतां न समाये । एका जनार्दनीं पाय । वंदु त्याचे आवडीं ॥४॥
१६८२
न कळे जयाचें विंदान । हरिहर नेणती महिमान । शिणलें शेषाचें वदन । तो तटस्थ राहिला ॥१॥ ऐसा आकळ त्रिभुवनीं । न कळे वेद शास्त्रां मनीं । पुराणांची आयणी । कुंठीत जाहली ॥२॥ तो सोपा नाममंत्रें । वाचे वर्णितां पवित्रें । एका जनार्दनीं वक्त्रें । म्हणा रामकृष्ण हरी ॥३॥
१६८३
न कळे पामरा कांहीं हा विचार । भोगावे अघोर किती जन्म ॥१॥ मरूनी जन्मावें मरूनी जन्मावें । पुनरापि मरावें वेरझारी ॥२॥ एका जनार्दनीं न मानी विश्वास । दृढ धरी पाश संसाराचा ॥३॥
१६८४
न कळे लाघव तया मागें धांवे । तयांचे ऐकावे वचन देवें ॥१॥ देव तो अंकित भक्तजनांचा सदोदित साचा मागें धावें ॥२॥ गोपाळ आवडीं म्हणती कान्हया । बैसे याची छाया सुखरुप ॥३॥ सुखरुप बैसे वैकुंठींचा राव । भक्तांचा मनोभाव जणोनियां ॥४॥ जाणोनियां भाव पुरवी वासना । एका जनार्दनी शरण जाऊं ॥५॥
१६८५
न कळेची मूढा सुखाची ती गोडी । पायीं पडली बेडी प्रपंचाची ॥१॥ पान लागलिया गूळ न म्हणे गोड । तैसे ते मूढ विसरले नाम ॥२॥ शुद्ध वैराग्याचा मानिती कंटाळा । पाळिती अमंगळा प्रपंचासी ॥३॥ एका जनार्दनीं नाहीं भाव खरा । तया त्या पामरा सांगुनी काय ॥४॥
१६८६
न जायेचि ताठ नित्य खटाटोप । मंडुकीं वटवट तैसें ते गा ॥१॥ प्रेमाविण भजन नकाविण मोतीं । अर्थाविण पोथी वाचुनी कय ॥२॥ कुंकुवा नाहीं ठाव म्हणे मी आहेव । भावविण देव कैसा पावे ॥३॥ नुतापविण भाव कैसा राहे । अनुभवे पाहे शोधुनियां ॥४॥ पाहतां पाहणें गेलें तें शोधुनी । एका जनार्दनीं अनुभविलें ॥५॥
१६८७
न देखतां कृष्णवदन । उन्मळती तयांचे नयन । न घेती अन्नजीवन । कृष्णमुख न पाहतां ॥१॥ कोठें गुंतला आमुचा कृष्ण । ऐशी जया आठवण । गायी हुंबरती अधोवदन । कृष्णमुख न पाहतां ॥२॥ सवंगडे ठायीं ठायीं उभे । कृष्णीं दृष्टी ठेवुनी लोभें । आजी कृष्ण कांहो नये । आम्हांशी खेळावया ॥३॥ ऐशी जयांची आवडी । तयां पदो नेदी सांकडी । एका जनार्दनी उडी । अंगे घाली आपण ॥४॥
१६८८
न देतां दरुशन गेला चक्रपाणी । राजाई तों मनीं दु:ख करी ॥१॥ न कळे कवणासी अघटित करणी । करुनी चक्रपाणी कां हो गेला ॥२॥ एका जनार्दनीं राजाईचा हेत । नित्य आठवीत पांडुरंग ॥३॥
१६८९
न धरी लौकिकाची लाज । तेणे सहज नामगावें ॥१॥ अनायासेंदेव हातां । साधन सर्वथा दुजे नाहीं ॥२॥ साधन तें खटपट । नाम वरिष्ठ नित्य गावें ॥३॥ एका जनार्दनीं सोपा । विठ्ठलनाम मंत्र जपा ॥४॥
१६९०
न मानी सन्मानाचें कोडें । नाहीं चाड विषयाची ॥१॥ ऐसें मज शरण येती । तयांचे उणें न पडे कल्पांती ॥२॥ नाहीं संसाराची चाड । नाहीं भीड कवणाची ॥३॥ एका त्याचा म्हणवी दास । धरुनी आस जनार्दनीं ॥४॥
१६९१
न माये चराचरीं त्रैलोक्य उदरीं । तो यशोदेचे कडेवरी शोभतो कैसा ॥१॥ गोपवेष मिसें ब्रह्माया लाविलें पिसें । तो गोपावत्सवेंषेम शोभतो कैसा ॥२॥ एके घटिकेवरी सोळा सहस्त्र घरीं । नोवरा श्रीहरी शोभतो कैसा ॥३॥ आंगनंविण अंगे गोपी भोगिल्या श्रीरंगें । तो कृष्ण निजांगें शोभतो कैसा ॥४॥ सच्चिदानंदाघन तान्हुलें आपण । एका जनार्दन शोभतो कैसा ॥५॥
१६९२
न माये ध्यानीं योगिया चिंतनीं । नाचतो कीर्तनीं संतापुढें ॥१॥ डोळियाची धणी फिटलीं पारणीं । उभा तो सज्जनीं पंढरीये ॥२॥ एका जनार्दनीं देखियेला डोळां । परब्रह्मा पुतळा बाईये वो ॥३॥
१६९३
न ये मनासी अभागिया गोष्टी । म्हणे बोलती चावटी बहु बोल ॥१॥ सांगतां सांगतां बुडतसे डोहीं । पुढीलाची सोई नेणती ते ॥२॥ वाचेसि स्मरण नाहीं कधी जाण । सदा मद्यपान बडबडतसे ॥३॥ एका जनार्दनीं नायके सांगतां । कोण याच्या हिता हित करीं ॥४॥
१६९४
न लगे करा खटपट । धरा पंढरीची वाट । विठ्ठलीं बोभाट । अठ्ठहास्य करावा ॥१॥ धरा संतांचा समागम । मुखीं उच्चारा रे नाम । जाते क्रोध आणि काम । दिगंतरीं पळोनीं ॥२॥ आशा मनशांचे काज । सहज दुर होतें निज । घडतां सहज । विठ्ठलचेअं दरुशन ॥३॥ एका जनार्दनीं मन । राखा पायीं तें नेमून । काया वाचा शरण तया पदीं होईजे ॥१॥
१६९५
न लगे न लगे जीवाचा तो नाश । नाम गांता उल्हास माना चित्तीं ॥१॥ पंचाग्नि साधन नको धूम्रपान । योगयाग तपन नको कांहीं ॥२॥ सुखें वाजवा टाळी मुखीं नामघोष । पातकांचा नाश कल्पकोडी ॥३॥ एकाजनार्दनीं नाम एक समर्थ । तेणें स्वार्थ पुरे सर्व जीवां ॥४॥
१६९६
न लगें काहीं यासी मोल । वेंचितां बोल फुकाचै ॥१॥ विठ्ठल विठ्ठल वदा वाचे । नोहे आणिकांचें कारण ॥२॥ नाचा प्रेमें वाळूवंटी । घाला मिठी संतांची ॥३॥ एका जनार्दनीं उभा । विठ्ठ्ल शोभा अनुपम्य ॥४॥
१६९७
न लगो विषय गोपांच्या पाठीं । न संडु स्वत्मा घोंगडें काठी । विषयभोगें होईल तुटी । कृष्ण जगजेठी अंतरे ॥१॥ म्हणवोनि हुंबली बोधाची । कृष्णेची आमुची ॥धृ॥ न टाकूं प्रेम शिदोरी कुरुधनें । नेघों सायुज्य पळसपानें । विषय ताटीचें मिष्टान्न । तेणें जनार्दन न भेटें ॥२॥ ब्रह्मा सेवुं करुनी ठोमा । एका जनार्दनीं गोविलें कामा । अष्ट भोग भुलवी रमा । तोही आम्हां श्रीकृष्ण ॥३॥
१६९८
न सांपडे हाती वाउगी तळमळ । म्हणोनि विव्हळ गोपी होती ॥१॥ बैसती समस्ता धरु म्हणोनि धावे । तंव तो नेणवें हातालागीं ॥२॥ समस्ता मिळोनी बैसती त्या द्वारें । नेणेवेचि खरे येतो जातो ॥३॥ एका जनार्दनी न सांपडेचि तयां । बोभाट तो वायां वाउगाची ॥४॥
१६९९
न सुटेचि आशा गुंतें बळें पाशे । दुःखाचिया सरसें म्हणे देव ॥१॥ ऐसे अमंगळ गुंतले कर्दमीं । भोगिताती कर्मीं जन्मदशा ॥२॥ एका जनार्दनीं संतांसी शरण । गेलिया बंधन तुटे वेंगीं ॥३॥
१७००
न सोडी रे मना गुरुजनार्दना । संसार बंधना सोडविलें ॥१॥ संसार अजगर झोंबला विखार । धन्वंतरी थोर जनार्दन ॥२॥ जनार्दन ऐसी माउली परियेसी । बहु कष्टें सायासी जोडियेली ॥३॥ एका जनार्दनीं परब्रह्मा । हेंचि जाणा धर्म कर्म ॥४॥
१७०१
न सोदी रे मना गुरुजर्नादना । संसार बंधना सोडविलें ॥१॥ संसार अजगर झोंबला विखार । धन्वंतरी थोर जनार्दन ॥२॥ जनार्दन ऐसी माउली परियेसी । बहु कष्टें सायासीं जोडियेली ॥३॥ जनार्दनें रंक तारियेला एका । संसारी हा सखा जनार्दन ॥४॥
१७०२
न होता शुद्ध अंतःकरण । संतसेवा न घडे जाण ॥१॥ शुद्ध संकल्पावांचुन । संतसेवा न घडेचि जाण ॥२॥ कामक्रोध दुराचार । यांचा करुं नये अंगिकार ॥३॥ आशा मनींशांचें जाळें । छेदुनीं टाकी विवेकबळें ॥४॥ एका जनार्दनीं ध्यान । सहज तेणें संतपण ॥५॥
१७०३
नंदनवन मुरलीवाला । याच्या मुरलीचा वेध लागला ॥१॥ प्रपंच धंदा नाठवे कांहीं । मुरलीचा नाद भरला हृदयीं ॥२॥ पती सुताचा विसर पडिला । याच्यामुरलीचा छंद लागला ॥३॥ स्थावर जंगम विसरुनि गेले । भेदभाव हारपले ॥४॥ समाधि उन्मनी तुच्छ वाटती । मुरली नाद ऐक्तां मना विश्रांती ॥५॥ एका जनार्दनी मुरलीचा नाद । ऐकता होती त्या सदगद ॥६॥
१७०४
नंदे आणिविलें उभयंता राजबिंदी । गोवळे आणि गोवळी भोवंतीं जनांची मांदी ॥१॥ येवोनि चावडीये उभयंता रडती । म्हणे नंदराव कैशी कर्मांची गती ॥२॥ अकावरी बैसोनी सांवळा गदगदां हांसें । विंदान दाविले तुज बांधिलें असे ॥३॥ आमुची तूं शेडीं काल बांधीन म्हणसी । न कळे देवाची माव देवें बांधिलें तुजसी ॥४॥ आतां माझी गती कैशीं हरी ते सांगा । करुणाभरीत देखोनि गेलें लागह वेगा ॥५॥ एका जनार्दनी करूणाकर मोक्षदानी । सहज दृष्टी पाहतां सुटली ग्रंथी दोनी ॥६॥
१७०५
नका करुं वाद विवाद पसारा । वाउगा मातेरा नरदेहीं ॥१॥ आयुष्याचे अंतीं कामा नये कोणी । नेती ढकलुनी एकलेंचि ॥२॥ स्वजन स्वगोत्र न ये कोणी कामा । सांडी त्यांचा प्रेमा परता होई ॥३॥ एका जनार्दनीं मधाचिये मासी । तैसा सांपडसी यमफांशी कोण सोडी ॥४॥
१७०६
नका धावूं तुम्हीं सैरा । मना मागें या सत्वरा ॥१॥ मन करा पैं आधीन । तेणें जोडे संतचरण ॥२॥ मन आहे महापापी । लावावें तें हरिरुपी ॥३॥ मन स्थिर करूनी निश्चयें । एका जनार्दनीं पाहे ॥४॥
१७०७
नको आणिकांच्या पडुं हावभरी । वांयां रानभरी कां रे रहाशीं ॥१॥ चुकवी पतन उच्चारीं तुं नाम । आणिक नको धाम यापरतें ॥२॥ वेगळें वेगळें चहूं वाचांपरतें आहे । साहांचे तें पाहें न चले कांहीं ॥३॥ अठरांची मती कुंठीत राहिली । एका जनार्दनीं माऊली विठ्ठल देखा ॥४॥
१७०८
नको करुं आतां कृष्णा तु खोडीं । नाहीं म्हणोनियां दोनी हात जोडी ॥१॥ काल इचे गृहीं थोडें खादले नववीत । म्हणोनि राधिकेचे स्तनी ठेवी हात ॥२॥ येवढाचि गोळा कढिला बाहेरी । सत्य म्हणोनिया आण वाहतो हरी ॥३॥ एका जनार्दनीं विश्वव्यापक सांवळा । न कळे ब्रह्मादिकां याची अगम्य कळा ॥४॥
१७०९
नको करुं कर्माकर्म । तुम्हां सांगतों मी वर्म । श्रीरामाचें नाम । अट्टाहास्यें उच्चारा ॥१॥ तेणें तुटेल उपाधी । निरसेल भेदबुद्धी । होईल सत्वशुद्धी । भक्तिलागीं देवाच्या ॥२॥ त्रिविधतापांचें दहन । कामक्रोधांचें नाशन । होईल प्रसन्न । चित्त रामप्रसादें ॥३॥ एका जनार्दनीं नेम । नित्य वाचे रामनाम । कैवल्याचें धाम । प्राप्त होय तत्काळ ॥४॥
१७१०
नको कर्म धर्म वार्ता । सुखें करा हरिकथा । भवजन्मव्यथा । येणें तुटे तुमची ॥१॥ सोपें साधनाचें सार । वाचे नरहरी उच्चारी । भयें चुके येरझार । चौर्‍यांशींची ॥२॥ नका वेदशास्त्र पाठ । नामें धरा नीट वाट । पंढरी हे पेठ । भूवैकुंठ महीवरी ॥३॥ म्हणोनि करा करा लाहो । वाचे रामनाम गावो । एका जनार्दनी भावो । दृढ ठेवा विठ्ठलीं ॥४॥
१७११
नको कांही आणिक नेम । एक नाम घेई वाचे ॥१॥ तुटे जन्ममरण बाध । हृदयीं बोध ठसावे ॥२॥ न लगे गिरी कडे कपाट । गाम बोभाट करी सुखें ॥३॥ एका जनार्दनीं वर्म । धर्माधर्म घडे नामें ॥४॥
१७१२
नको गुंतूम मायाजाळी । काळ उभा हा जवळीं ॥१॥ नाहीं तुजलागीं तत्त्वतां । सोडविणार मातापिता ॥२॥ स्त्रिया पुत्र बंदीजन । करिती तुजलागीं बंधन ॥३॥ धनवित्त कुळें । सोडितील अमंगळें ॥४॥ एका जनार्दनीं मन । ठेवी गुरुपायीं बांधोन ॥५॥
१७१३
नको तु आमुचे संगतीं । बहु केलीसे फजिती । हें तुज सांगावें पा किती । ऐकती तुं नायकासी रे कान्होबा ॥१॥ जाई तु आपुली निवडी गोधनें । आम्हां न लगे तुझें येणें जाणे रे कान्होबा ॥धृ॥ तुझी संगती ठाउकी आम्हां । त्वां मारिला आपुला मामा । मावशी धाडिली निजधामा । जाणों ठावा आहेसी आम्हा रे कान्होबा ॥२॥ तुझें संगती नाश बहु । पुनः जन्मा न येऊं । एका जनार्दनीं तुज ध्याऊं । आवडीनें लोणीं खाऊं रे । कान्होबा ॥३॥
१७१४
नको तुझेम आम्हा कांहीं । वास पंढरीचा देई ॥१॥ दुजें कांहीं नको आम्हां । द्यावा चरणाचा महिमा ॥२॥ संतांची संगत । दुजा नाहीं कांहीं हेत ॥३॥ काकुलती येतो हरी । एका जनार्दनीं निर्धारीं ॥४॥
१७१५
नको दुजी रे वासना । मिठी घाली संतचरणा । पंढरीचा राणा । आपोआपा हृदयीं ॥१॥ हाचि धरी रे विश्वास । सांडी वाउगा हव्यास । नको आशा तृष्णा पाश । परतें टाकी सकळ ॥२॥ भवावदभक्तीचें लक्षण । सर्वांभुतीं समाधान । पाहता दोष आणि गुण । वाउगा शीण मना होय ॥३॥ सर्वांभुतीं देव आहें । सर्व भरुनी उरला पाहे । रिता नाहीं कोठें ठाव । देवाविण सर्वथा ॥४॥ म्हणोनि नको भेदभाव । एक वचनीं एक ठाव । एका जनार्दनीं स्वयमेव । देव उभा पंढरी ॥५॥
१७१६
नको नको आळस करुं । वाचे श्रीराम उच्चारुं । तेणें सुफळ संसारुं । होय जनीं जाणिजे ॥१॥ कां रे न करिसी उच्चार । किती सांगुं तुज विचार । न धरसी निर्धार । मनामाजीं पामरा ॥२॥ जासी भलतीया वाटा । पडसी दारीं आणि दरकुटा । नामावांचुनीं सुटका । एका जनार्दनीं नोहेची ॥३॥
१७१७
नको नको रे दुर देशीं । आम्हां ठेवी चरणापाशीं । मग या विरहा कोन पुसी । ऐसी इच्छा देई आम्हांसी ॥१॥ पुरे पुरे संसार विरह छंद । तेणें तुं अंतरासी गोविंद । द्वैताचा नसो देऊं बाधा । हृदयीं प्रगटोनी दावी बोध ॥२॥ विरह हरी सत्वर देवराया । परेपरता प्रगटोनि दावीं पायां । दुजें मागणें आणीक नाहीं काह्मा । एका जनार्दनीं शरण तुझिया पायां ॥३॥
१७१८
नग घडतां सोनें साचें । न घडतां सोनें पण न वचे ॥१॥ मेघापुर्वी शुद्ध गगन । मेघ सबाह्म गगनीं जाण ॥२॥ कुल्लाळ जें भांडें घडीत । त्यासी मृत्तिका नित्य व्याप्त ॥३॥ सागरीं जें जें उपजे लहरी । तैसा व्यापक श्रीहरीं ॥४॥ जन तोचि जनार्दन । एका जनार्दन व्यापक पूर्ण ॥५॥
१७१९
नमस्कारी जंव अष्टांगें । तंव देवाचि जाला अंगें ॥१॥ आतां जमन कैसें हो कीजे । देवपणा न येचि दुजें ॥२॥ स्तुतिस्तवन बोलों भावो । तंव वायांची जाली देवो ॥३॥ स्तवन करूं आतां कैसें । स्तवावया दुजें नसे ॥४॥ आतां भजन कैशापरी । संसारा नुरेचि उरी ॥५॥ एका जनार्दना शरण । तंव तो जाला जनार्दन ॥६॥
१७२०
नमावे हे नित्य नित्य सदगुरुचे पाय । आन तो उपाय करुं नये ॥१॥ गुरुचरनांविण मानुं नये कांहीं । वेद शास्त्र पाहीं हेंचि सांगे ॥२॥ एका जनार्दनीं गुरुचरण सेवा । प्रिय होय देवा सर्वभावें ॥३॥
१७२१
नमुं जाय तंव गुरुत्वा । तंव त्रैलोक्य आलें गुरुत्वा ॥१॥ तें आतां नमना नुरेचि गुरु । गुरुत्वा आला संसारु ॥२॥ वंद्यत्वें नमुं गुरुभेदे । तंव त्रैलोक्य गुरुत्वें नांदें ॥३॥ गुरुवांचुनीं न दिसे कांहीं । तंव सानथोर अवयवें गुरु पाहीं ॥४॥ थोर गुरुत्वा आलें गौरव । तरी गुरुनामें नेघें अहंभाव ॥५॥ एका जनार्दनाच्या पायीं । नमुं गेलों तो गुरुशिष्य नाहीं ॥६॥
१७२२
नमो अगणितगुणा देवाधिदेवा । माझ्या सोपानदेवा नमन तुज ॥१॥ संवत्सर ग्राम कर्‍हातटीं उत्तम । पुण्यपावन नाम सोपान देव ॥२॥ जग तारावया हरिलीला केली । प्रसिध्द ती झाली सोपानदेवा ॥३॥ तुमचा प्रसाद द्यावा माझे हातीं । एका जनार्दनीं विनंती करीतसे ॥४॥
१७२३
नमो ज्ञानराजा नमो ज्ञानराजा । निवृत्ति सहजा गुरुवर्या ॥१॥ नमो सोपानदेवा मुक्ताई परेशा । ठाव त्या सर्वेशा कर्‍हातटीं ॥२॥ समाधि वैभव पाहतां नयनीं । चुकतसे आयणी जन्मव्याधि ॥३॥ एका जनार्दनीं म्हणावा आपुला । अंकित अंकिला दास तुमचा ॥४॥
१७२४
नमो व्यासादिक कवी हे पावन । जे परिपूर्ण धन भांडाराचें ॥१॥ करुनी उपदेश तारिलें बहुतां । उपदेश तत्त्वतां चालतसे ॥२॥ एका जनार्दनीं तुमचा मी दास । येवढी ही आस पुरवावी ॥३॥
१७२५
नमो सदगुरुराया दीनाच्या वत्सला । पावावे दासाला ब्रीद तुझें ॥१॥ ब्रीद तुझें जगीं पतीतपावन । भक्तांसी रक्षणें सर्व काळीं ॥२॥ सर्व काळीं भक्त आठविती तुज । ब्रीदाची ते लाज धरणे लागे ॥३॥ धरणेंलागे तुज भक्तांचा अभिमान । आश्रम त्या कोन तुम्हाविणें ॥४॥ तुम्हाविणें त्यासी नाहीं कोणी सखा । संसार पारिखा पारिखा वाटे त्यासी ॥५॥ वाटे त्यांसी माझा आधार सदगुरु । इच्छा मी कां करुं आणिकांची ॥६॥ आणिकांची इच्छा कासया करावी । प्रपंचाची ते गोंवि जेणें होय ॥७॥ जेणे होय प्राण्या जन्ममरण दुःख । तया आत्सुख भेट नाहीं ॥८॥ भेट नाहीं जया आत्मा परमात्म्याची । हानी नरदेहाची केली तेणें ॥९॥ केली तेणें जरी जप तपें फार । नाहीं त्या आधार गुरुविणा ॥१०॥ गुरुविणा प्राण्या नव्हेंचि सद्गती । ऐसें वेदश्रुती बोलाताती ॥११॥ बोलताती सिद्ध साधु महानुभाव । गुरुविन वाव सत्कर्में तीं ॥१२॥ सत्कर्में ती वारा चित्त शुद्ध करा । तेणें पाय धरा सदगुरुचें ॥१३॥ सदगुरुचें पाय जयासी लाधलें । तेणें निरसिलेंक प्रपंचासी ॥१४॥ प्रपंचासी बाधा केली गुरुदासें । चरणीं विश्वास ठेविनियां ॥१५॥ ठेवोनियां जीवा सदगुरुचे पायां । प्रपंचव्यवसायीं वागतसें ॥१६॥ वागतसें जनी परी तो विजनीं । भेदभाव मनीं नाहीं जया ॥१७॥ नाही जया चिंती आणिक वासना । सदगुरुवचना विश्वासला ॥१८॥ विश्वासला मनें सदगुरुवचना । प्रेम अन्य स्थानीं नाहीं ज्यांचें ॥१९॥ नाहीं ज्याचें तन मन आणि धन । गुरुसी अर्पण केलें असे ॥२०॥ केलें असे जेणें निष्काम तें कर्म । चित्त शुद्धी वर्म हातां आलें ॥२१॥ हातां आलें जया चित्तांने तें स्थैर्य । सदगुरु आचार्य भेटले त्या ॥२२॥ भेटले त्या मायबाप गुरुराव । दयासिंधु नांव असे ज्यांसी ॥२३॥ असे ज्यांसी सर्व श्रुति अध्ययन । ब्रह्मापरायण अहर्निशीं ॥२४॥ अहर्निशीं चित्त ब्रह्मींचि रंगलें । विषय उरलें नाहीं जया ॥२५॥ नाहीं जया कामक्रोधाची भावना । आणिक वासना नानापरी ॥२६॥ नानापरी जग जरी देखियले । ब्रह्मा हें भरले ओतप्रोत ॥२७॥ ओतप्रोत आत्मा स्वरुप जयासी । तयासी द्वदांसी भेटी कैसी ॥२८॥ भेटी कैसी तया सुखदुह्ख द्वदां । लोभ मोह आपदा नाहीं त्यासी ॥२९॥ नाही त्यासी मनीं द्वैताद्वैत नांव । आत्मशिति भाव सर्व जगीं ॥३०॥ सर्व जगीं दिसे ब्रह्मारुप ज्यासी । उपमा तयासी काय देऊं ॥३१॥ काय देऊं जगीं नसे त्या समान । स्वयं प्रकाशमान सदगुरुराजा ॥३२॥ सदगुरुराजानें केली मज कृपा । ब्रह्मानंद सोपा केला मज ॥३३॥ केला मजवर उपकार गुरुनें । तयासी उत्तीर्ण काय होऊं ॥३४॥ काय उतराई होऊं गुरुराया । मस्तक हा पायां सदा असो ॥३५॥ सदा असो माझे अंतरी वसती । अखंड प्रेम प्रीति गुरुरुपीं ॥३६॥ गुरुरुपीं मज अत्यांतिक सुख । अवलोकी मुख सर्वकाळ ॥३७॥ सर्वकाळ मुखें सदगुरुचें नाम । आणिक ते काम नाहीं मज ॥३८॥ नाहीं मज प्रिय सदगुरुवांचुनी । दृढनिश्चय मनीं केला असे ॥३९॥ केला असे प्राण सखा सदगुरुराजा । मन त्यासी पूजा सदा करी ॥४०॥ सदा करी मन सदगुरु अर्चन । तेणें समाधान होय त्यासी ॥४१॥ होय त्यासी सुख मुखं वर्णवेना । षाडविध प्रणामा लाग नाहीं ॥४२॥ लाग नाहीं जेथें अग्नि चंद्र सुर्या । कारण त्या कार्या नाश जेथें ॥४३॥ नाश जेथें असे सकळ ब्रह्मांडा । त्या सुखा अखंडा काय वानुं ॥४४॥ काय वानुं जेथें श्रुती मौनावल्या प्रभा । त्या पावल्या लयो जेथें ॥४५॥ लय जेथें असे सकळ कल्पनांचा तेथें इंद्रियांच काय पाड ॥४६॥ काय पाड असे अंतर इंद्रियां । चारी देह वायां झालें जेथें ॥४७॥ झाले जेथें लीन मन इंद्रिय प्रमाण । त्या सुख वर्णन कैसें होय ॥४८॥ कैसे होय वक्ता वाच्य आणि वचन । त्रिपुटी हे क्षीण जया ठायीं ॥४९॥ जया ठायीं वसती तेहतीसं कोटी देव । तें सुख वैभव काय सांगुं ॥५०॥ काय सांगु मज मुखें वर्णवेना । तेणें मीतुपणां मावळला ॥५१॥ मावळला आतां जगदांधकार । समुळ संसार पारुषला ॥५२॥ पारुषला मज सकळ द्वैतभाव । दिसे भावाभाव ब्रह्मारुप ॥५३॥ ब्रह्मारुप जग व्यष्टी हे समष्टी । भासे कृपादृष्टी सदगुरुच्या ॥५४॥ सदगुरुच्या कृपें हरलें जीव शिव । ब्रह्मा एकमेवक अद्वितीय ॥५५॥ अद्वितीय ब्रह्मा प्रत्यक्ष हें दिसे । दृष्टी समरसें तदाकार ॥५६॥ तदाकार झाला सकळ हा देह । राहे तो संदेह कैशापरी ॥५७॥ कैशापरी राहें द्वैताची भावना । विपरित असंभावना निवर्तल्या ॥५८॥ निवर्तल्या जेथें शास्त्राचीया मती । मनादिक पंक्ति मावळली ॥५९॥ मावळली मज द्वैताद्वैत क्लृप्ती । सुखें सहज स्थिती भोगितसों ॥६०॥ भोगितसों आम्हीं सुखें परमानंद । कोटी हे आनंद वसती जेथें ॥६१॥ वसती जेथें सिद्ध महानुभाव संत । असे ते अनंत ब्रह्मसुख ॥६२॥ ब्रह्मासुख झालें सहज जयासी । तयाच्या भाग्यासी पार नाहीं ॥६३॥ पार नाहीं तया सुखा प्राप्त झाला । संदेह तो झाला चिंदानंद ॥६४॥ चिंदानंद नित्य अज निरामय । निर्विकार सबाह्म एकरुप ॥६५॥ एकरुप ब्रह्मा उपाधिरहित । तेथें तो वसत भाग्यवंत ॥६६॥ भाग्यवंत ऐसा असे गुरुदास । देहासी उदास सर्वकळ ॥६७॥ सर्वकाळीं करी सत्क्रिया भजन । आणिक उपासन सदगुरुचें ॥६८॥ सदगुरुचें पादतीर्थ सदा सेवी । प्रंपची त्या गोंवी कैशी होय ॥६९॥ कैशी होय गुरुभक्तां अधोगती । लागला सत्पथीं गुरुकृपें ॥७०॥ गुरुकृपें ज्यासी सत्पथ पावला । जीव सुखावला ब्रह्मासुखें ॥७१॥ ब्रह्मासुखें झालों मीसदा संपन्न । ब्रह्मापुर्ण अनुभविलें ॥७२॥ अनुभविलें ब्रह्मा अंतर सबाह्म । जग ब्रह्मामय झालें दिसे ॥७३॥ झाले दिसें ब्रह्मा चतुर्दश लोक । शुद्धशुद्ध विवेक नाहीं जेथें ॥७४॥ नाहीं जेथे द्वैताद्वैत ते उपाधी । ते सुखी समाधी दासां झालीं ॥७५॥ दासां झाली निद्रा शुन्य सारुनियां । वृत्ती पवलीया ब्रह्मसुखा ॥७६॥ ब्रह्मासुखा पावे ज्याचें अंतःकरण । सर्वकाळीं जाण ब्रह्मारुप ॥७७॥ ब्रह्मारुप झालें जयाचें तें अंग । तया नित्यसंग सज्जनाचा ॥७८॥ सज्जानाचा संग जयासी पैं होय । तया उणें काय निजसुखा ॥७९॥ निजसुखा प्राप्त झाला संतसंगे । तयाची सर्वांगें ब्रह्मा झालीं ॥८०॥ ब्रह्मा झालें त्याचें काया वाचा मन । साध्य आणि साधन सर्व ब्रह्मा ॥८१॥ सर्व ब्रह्मावीण नाहीं ज्यासी अनुभव । ऐसा तयचा भाव एकविध ॥८२॥ एकविध भाव जयाचिया मनीं । त्यासी चक्रपाणी अंकिलासे ॥८३॥ अंकिलासे देव तया सदगुरुकृपें । अहंकार पापें सोडियेलें ॥८४॥ सोडियेलें त्यासी कामादि षडविकारीं । वसतीं त्या अंतरीं देवें केली ॥८५॥ देवे केली त्यासीं आपुली अंकीत । तोचि त्याचे हित सत्य जणें ॥८६॥ सत्य जाणे एक सदगुरु दयाळ । चरण कमळ ज्याचें ध्यावें ॥८७॥ त्याचें ध्यावें चरण सदा सर्वकाळ । प्रपंच सकळ सांडुनियां ॥८८॥ सांडुनियां म्हणजे मिथ्या हा पहावा । सदगुरु करावा पाठीराखा ॥८९॥ पाठीराखा होय सदगुरु जयासी । कळिकाळ त्यासी बाधतीना ॥९०॥ बाधातीना त्यासी मुक्ति ऋद्धिसिद्धि । ज्याची सदा बुद्धि सदगुरुपायीं ॥९१॥ सदगुरुपायीं ज्यांचें चित्त स्थिर झालें । तयासी जोडलें मोक्षपद ॥९२॥ मोक्षपद त्याची इच्छा ते करीत । भक्तांचे मनांत गुरुपद ॥९३॥ गुरुपद योगें मुक्ति तुच्छ त्यासी । त्याचिया मानसी गुरु वसे ॥९४॥ गुरुवसे मनीं सदा सर्वकाळ । तुटली हळहळ प्रपंचाची ॥९५॥ प्रपंचाची चिंता गुरुदासा नये । योगक्षेम असे गुरुहातीं ॥९६॥ गुरुहातीं असे सर्व त्याचें काम । दासामुखीं नाम गुरुगुरु ॥९७॥ गुरुगुरु जप आज्ञाननाशक । भवसिंधुंतारक गुरुनाम ॥९८॥ गुरुनामासम आणिक नाहीं मंत्र । सांगताती शास्त्रें महानुभव ॥९९॥ एका जनार्दनीं गुरुपदीं मस्तक । ठेवुनी सम्यक ब्रह्मा झाला ॥१००॥
१७२६
नयन तान्हेलें पाजावें काई । मना खत झालें फाडुं कवण ठायीं ॥१॥ ऐसा कोणीहि वैद्य मिळता का परता । सुखरुप काढी मनाची का व्यथा ॥२॥ डोळ्यांची बाहुली पाहतां झडपली । तिसी रक्षा भली केविं करूं ॥३॥ निढळींची अक्षरें चुकलीं कानामात्रें । शुद्ध त्याहावें कैसें लिहिणारें ॥४॥ जीवीचिया डोळा पडळ आलें । अंजन सुदन केविं जाय ॥५॥ एका जनार्दनीं जाणे हातवटी । पुण्य घेउनी कोणी करा भेटी ॥६॥
१७२७
नरदेह उत्तम चांग । धरा लाग कीर्तनीं ॥१॥ वायां जाऊं नेदी घडी । करा जोडी कीर्तन ॥२॥ क्षणभंगुर हा देहो । करा लाहो कीर्तनीं ॥३॥ संसार अवघा नासे । खरें दिसे कीर्तन ॥४॥ म्हणे जनार्दनीं एका । उपाय निका कीर्तन ॥५॥
१७२८
नरदेह परम पावन । तरी साधी ब्रह्माज्ञान ॥१॥ ब्रह्माज्ञानविण । वायां होत असे शीण ॥२॥ ब्रह्माज्ञान प्राप्ति नाहीं । वायां देहत्व असोनि देहीं ॥३॥ एका जनार्दनीं ज्ञान । तेणें होय समाधान ॥४॥
१७२९
नरदेह प्रमाण शतवर्षे म्हणती । अभागी घालविती वायां जाण ॥१॥ न करी भजन न जाय पंढरीं । अभाविक दुराचारी सदा मनीं ॥२॥ जनार्दनाचा एक न पाहे त्याचें मुख । नरदेही देख पशुवत ॥३॥
१७३०
नरदेह श्रेष्ठ परमपावन । पावोन न करी संतसेवन ॥१॥ ऐसिया नराप्रती जाण । यम यातना करितसे ॥२॥ अपरोक्ष ज्ञान करसवटी । संतावीण नये पोटीं ॥३॥ जैसा अंधारीं खद्योत । तैसा संताविण नरदेह प्राप्त ॥४॥ मनीं विषयाचा अभिलाष । कोण सोडवी तयास ॥५॥ जनार्दनाचा एका म्हणे । संतापायीं देह ठेवणें ॥६॥
१७३१
नरदेहा येउनी करावें कीर्तन । वाचे नामस्मरण विठ्ठलाचें ॥१॥ आणिक सायास न करी आळस । सर्वकळ सोस हाचि वाहे ॥२॥ घटिका आणि पळ न वेंची वायां । नामस्मरणीं काया झिणवावी ॥३॥ प्रपंच परमार्थ करी का रें सारखा । संसार पारखा करुनी सांडी ॥४॥ माईक हें धन इष्टमित्र सखे । अंतकाळीं पारखे अवघे चोर ॥५॥ एका जनार्दनीं न धरी भरंवसा । कोण यमपाशा चुकवील ॥६॥
१७३२
नरदेहा येऊनि गमावी आयुष्य । धरीना विश्वास रामनामीं ॥१॥ अंतकाळीं तया कोणी न ये कामा । वाउगाचि श्रमा पडतो डोहीं ॥२॥ माझें माझें म्हणोनियां कवटाळीती बाहीं । प्रपंचप्रवाहीं धांव घाली ॥३॥ एका जनार्दनीं करितां कल्पना गेलासे पतना यमलोंकी ॥४॥
१७३३
नरदेही आलिया मुखीं नाम गाय । वायां आयुष्य न जाय ऐसें करी ॥१॥ प्रपंचमृगजळीं गुंतुं नको वायां । कन्या पुत्रादिक या सुख नोहे ॥२॥ सोईरे धाईरे वायांचि हांवभरी । पाडिती निर्धारी भोंवरजाळीं ॥३॥ एका जनार्दनीं संसाराचा छंद । वायांक मतिमंद भुललासे ॥४॥
१७३४
नरदेहीं आयुष्य गमाविलें सारें । परी रामभजन खरें केलें नाहीं ॥१॥ ऐसें जें अभागी पावती पतनीं । तया सोडवणी कोण करी ॥२॥ एका जनार्दनीं मानी हा विचार । राम चराचर जप करी ॥३॥
१७३५
नरदेहीं आयुष्य शत तें प्रमाण । अर्ध रात्र जाण जाय मध्यें ॥१॥ बाळत्व तारुण्य जरामय जाया । संपलें गणना होती त्याची ॥२॥ एका जनार्दनीं राहिलें भजन । सवेंचि मरण पावला वेगीं ॥३॥
१७३६
नरदेहीं येउनीं करी स्वार्थ । मुख्य साधी परमार्थ ॥१॥ न होतां ब्रह्माज्ञान । श्वान सूकरां समान ॥२॥ पशुवत जिणें । वायां जेवीं लाजिरवाणें ॥३॥ सायं प्रातर्चिता । नाहीं पशुंसी सर्वथा ॥४॥ मरणा टेकलें कलीवर । परी न सांडी व्यापार ॥५॥ एका जनार्दनीं पामर । भोगिती अघोर यातना ॥६॥
१७३७
नरदेहीं सुख सोहळा संस्कार । परितेथें विकार दैवयोगें ॥१॥ बालत्वाचें सुख अज्ञान दशेंत । रामनाम मुखांत न ये कधीं ॥२॥ तरुण अवस्था विषयांचे ध्यान । न ये तें भजन मुखीं कदा ॥३॥ जरेनें वेष्टिलें जालें वृद्धपण । एका जनार्दन भजन नेणें ॥४॥
१७३८
नरदेहीचा हाचि मुख्य स्वार्थ । संतसंग करी परमार्थ ॥१॥ आणिक नाहीं पां साधन । मुखीं हरि हरि स्मरण ॥२॥ सोडी द्रव्य दारा आशा संतसंगे दशा पावावी ॥३॥ जरी पोखालें शरीर । तरी तें केव्हाहीं जाणार ॥४॥ जनार्दनाचा एका म्हणे । संतापायी ठाव देणें ॥५॥
१७३९
नरनारी जातां पंढरीसी । सुकृतांची रासी ब्रह्मा नेणें ॥१॥ अभाव भावना न धरी कल्पना मस्तक चरणावरी ठेवी ॥२॥ एका जनार्दनीं पंढरी माहेर । आम्हांसी निर्धार देवें केली ॥३॥
१७४०
नलगे भुक्तिमुक्ति नलगे स्वर्गवास । नको वैकुंठावास देवराया ॥१॥ नलगे योगयाग अष्टांग साधन । न चुकें बंधन येणें कांहीं ॥२॥ नलगें इष्टमित्र सोईरें संबंधी । नको ही उपाधी पाठी लावूं ॥३॥ एका जनार्दनीं चुकवोनी पाल्हाळ । करी मज मोकळें गुरुराया ॥४॥
१७४१
नव लक्ष गोपाळ यमुनेतटीं । उभे राहुनी दृष्टी पाहताती ॥१॥ खल्लाळाचा शब्द कानीं तो ऐकिला । पेंदा पुढें झाला सरसाउनी ॥२॥ पेंदा म्हणे गडिया आपणा पाहुनी यमुना । हुंबरी घेती जाणा पहा पहा ॥३॥ एका जनार्दनीं पाहुनिया देव । करितां उपाव नवलाचा ॥४॥
१७४२
नवजों योगाचिया वाटा । न चढों आगम निगम ताठा । न लागों उपामाळा खटपटा । आत्मनिष्ठ होउनी असों ॥१॥ विठ्ठल उघड विराजित । साबाह्माभ्यंतर नांदत ॥२॥ कर्मे करुनीं नव्हों कर्मठा । निष्कर्माच्या न लागों झटा । संतरज आमुचा वांटा । मुक्ति फुकटा तेणें लाभे ॥३॥ न करूं दुस्तरें तीं तपें । न पडो अध्यात्म खरपें । एका जनार्दनीं कृपें । आत्मसुख अमुप विचरिजेक ॥४॥
१७४३
नवमास वरी वाहिलें उदरीं । तिसी दारोदारीं हिंडावितो ॥१॥ लालन पालन करीत आवडी । जोडली ती जोडी नेदी तिसी ॥२॥ सर्व भावें दास बाइलेचा जाहला । एका जनार्दनीं आबोला धरी माते ॥३॥
१७४४
नवल ती कळा दावी गोपिकांसी । लोणी चोरायासी जातो घरा ॥१॥ धाकुले संवगडे ठेवुनि बाहेरी । प्रवेशी भीतरीं आपणची ॥२॥ द्वारा झाकानियां बैसती गोपिका । देखियला सखा गोपाळांचा ॥३॥ एका जनार्दनीं धावुनि धरति । नवल ते रिती करितसे ॥४॥
१७४५
नवल दंभाचें कौतुक । अग्नहोत्री म्हणती याज्ञिक ॥१॥ मंत्रतंत्राची कथा कोण । मुख्य गायत्री विकिती ब्राह्मण ॥२॥ आम्ही स्वधर्मनिष्ठ पावन । दंभें म्हणती आपणा जाण ॥३॥ दांभिकांची भक्ति वाव । एका जनार्दनीं नाहीं ठाव ॥४॥
१७४६
नवल दावियेलें सोंग । अवघा एकक पांडुरंग ॥१॥ हें तों आलें अनुभवा । विठ्ठल देवा पाहतांची ॥२॥ मन पवनांची धारणा । तुटली वासना विषयाची ॥३॥ एका जनार्दनीं परिपुर्ण । एका एकपण देखतां ॥४॥
१७४७
नवल देखिलें संसाराचेंक बंड । त्याचे कोणी तोंड न ठेचिती ॥१॥ गुंतलेचि बळें चिखलें माखलें । कर्मा जन्मफळें भोगिताती ॥२॥ नाथिला पसारा मानिती वो साचा । वेध तो तयाचा वागविती ॥३॥ एका जनार्दनीं नाडलेसे मोहें । संदेह संदेह गोवियलें ॥४॥
१७४८
नवल भजनाचा भावो । स्वतां भक्तांची होय देवो ॥१॥ वाचे करिती हरिकीर्तन । उन्मनी मन निशिदिनीं ॥२॥ नाहीं प्रपंचाचें भान । वाचे सदा नारायण ॥३॥ एका जनार्दनीं मुक्त । सबाह्म अभ्यंतरीं पतीत ॥४॥
१७४९
नवल रोग पडिपाडु । गोड परमार्थ झाला कडु ॥१॥ विषय व्याधीचा उफाडा । हरिकथेचा घ्यावा काढा ॥२॥ ऐसा रोग देखोनि गाढा । एका जनार्दनीं धांवे पुढा ॥३॥
१७५०
नववा बैसे स्थिररूप । तया नाम बौद्धरुप ॥१॥ संत तया दारीं । तिष्ठताती निरंतरीं ॥२॥ पुंडलिकासाठीं उभा । धन्य धन्य विठ्ठल शोभा ॥३॥ शोभे चंद्रभागा तीर । गरुड हनुमंत समोर ॥४॥ ऐसा विठ्ठल मनीं ध्याऊं । एका जनार्दनीं त्याला पाहुं ॥५॥
१७५१
नवविधा भक्ति नव आचरती । त्याची नामकीर्ति सांगुं आतां ॥१॥ एक एक नाम घेतां प्रातःकाळीं । पापा होय होळी क्षणमात्रें ॥२॥ श्रवणें परीक्षिती तरला भूपति । सात दिवसां मुक्ति जाली तया ॥३॥ महाभागवत श्रवण करुनी । सर्वागाचें काम केलें तेणें ॥४॥ श्रीशुक आपण करूनी कीर्तन । उद्धरिला जाण परिक्षिती ॥५॥ हरिनाम घोषें गर्जें तो प्रल्हाद । स्वानंदें प्रबोध जाला त्यासी ॥६॥ स्तंभी अवतार हरि प्रगटला । दैत्य विदारिला तयालागीं ॥७॥ पायाचा महिमा स्वयें जाणे रमा । प्रिय प्ररुषोत्तमा । जाली तेणें ॥८॥ हरि पदांबुज सुकुमार कोवळें । तेथें करकमळें अखंडित ॥९॥ गाईचिया मागें श्रीकृष्ण पाउलें । अक्रुरें घातलें दंडवत ॥१०॥ करुनी वंदन घाली लोटांगण । स्वानंदें निमग्न जाला तेणें ॥११॥ दास्यत्व मारुती अचें देहास्थिती । सीताशुद्धि कीर्ति केले तेणें ॥१२॥ सेव्य सेवक भाव जाणें तो मारुती । स्वामी सीतापती संतोषला ॥१३॥ सख्यत्व स्वजाति सोयरा श्रीपति । सर्वभावें प्रीति अर्जुनासी ॥१४॥ उपदेशिली गीता सुखीं केलें पार्थां । जन्ममरण वार्ता खुंटविली ॥१५॥ आत्मानिवेदन करूनियां बळीं । जाला वनमाळी द्वारपाळ ॥१६॥ औट पाऊल भूमी घेऊनी दान । याचक आपण स्वयें जाला ॥१७॥ नवविधाभक्ति नवजणें केली । पूर्ण प्राप्ती जाली तयालागीं ॥१८॥ एका जनार्दनीं आत्मनिवेदन । भक्ति दुजेंपण उरलें नाहीं ॥१९॥
१७५२
नसे वैकुंठी हरी । नाचे कीर्तनीं परोपरी । भक्तांबरोबरी । पाठी धांवे तयाच्या ॥१॥ म्हणोनी करावें कीर्तन । तेणें तुष्टें नारायण । मनोरथ करी पुर्ण । इच्छिलें ते सर्वदा ॥२॥ आणा अनुभव मनीं । करा कीर्तन अनुदिनीं । एका जनार्दनीं । उभा असे कीर्तनीं ॥३॥
१७५३
नसे वैकुंठीं अणुमात्र । नाचतां पवित्र कीर्तनीं ॥१॥ त्याचा छंद माझे मनीं । अनुदिनीं कीर्तन ॥२॥ नेणें कांहीं दुजें आतां । कीर्तनापरता छंद नाहीं ॥३॥ एका जनार्दनीं वेध । कीर्तन छंद गोड देखा ॥४॥
१७५४
नांदतसें नाम आकाश पाताळीं ।सर्व भुमंडळीं व्याप्त असे ॥१॥ पाताळ भेदोनी व्याप्त ठेलें पुढें । नाहीं त्यासी आड कोठें कांहीं ॥२॥ चौर्‍याशीं भोगिती दुर्मती पामर । संतांसी साचार शरण न जाती ॥३॥ एका जनार्दनीं नाम अविनाश । संतसंगें दोष सर्व जाती ॥४॥
१७५५
नाकळे जो आकळ । भक्तिप्रेमाचा वत्सल । रूप धरूनि कोमळ । भीमातटीं उभा ॥१॥ त्याचा छंद असो जनी । काया वाचा आणि मनीं । संचिताची हानी । कदा काळीं न होवो ॥२॥ जें जें होत कर्माकर्म । अथवा उत्तम ते धर्म । प्राचीन ते कर्म । तयापासूनि सोडवी ॥३॥ एकविधि धरी भाव । मागें देवापदीं ठाव । संचिताची हाव । तयापाशीं नुरेचि ॥४॥ ऐसा बळकट करी नेम । धरी संतसमागम । एका जनार्दनीं धाम । पावसी तूं वैकुंठ ॥५॥
१७५६
नाकळें तें कळें कळे तें नाकळे । वळे तें नावळे गुरुविण ॥१॥ निर्गुणीं पावलें सगुणीं भजतां । विकल्प धरितां जिव्हा झडे ॥२॥ बहुरुपी धरी संन्याशाचा वेश । पाहोन तयास धन देती ॥३॥ संन्याशाल नाहीं बहुरुपीं याला । सगुणीं भजला तेथें पावे ॥४॥ अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणीं । एका जनार्दनीं ओळखिलें ॥५॥
१७५७
नागर गोमटें रुप तें गोजिरें । उभे तें साजिरें भीमातटीं ॥१॥ पहातां विश्रांति देहा होय शांती । अनुपम्य मूर्ति विठ्ठल देव ॥२॥ भक्ताचिया काजा राहिलासे उभा । कैवाल्याचा गाभा बालमूर्ति ॥३॥ आनंदाचा कंद उभा परमानंद । एका जनार्दनीं छंद मज त्याचा ॥४॥
१७५८
नाचेन आनंदें विठ्ठलनाम छंदें । परते भेदाभेद सांडोनियां ॥१॥ जाईन पंढरीं नाचेन महाद्वारी । वाचे हरि हरि रामकृष्ण ॥२॥ साधन आणीक नेणें मी सर्वथा । एका पंढरीनाथावांचुनी कांहीं ॥३॥ एका जनार्दनीं दृढ हा निश्चय । मुखीं नाम गाय सदोदित ॥४॥
१७५९
नाठवेचि दुजें कानड्यावांचुनी । कानडा तो मनींध्यानी वसे ॥१॥ कानडा कानडा विठ्ठल कानडा । कानडा विठ्ठल कानडा ॥२॥ कानाडियांचा वेधमनींतो कानडा । कानडाची कानडा विठ्ठल माझा ॥३॥ एकपणें उभा कानडा विठ्ठल । एका जनार्दनीं नवल कानड्यांचे ॥४॥
१७६०
नातुडे जो योगी ध्याना । तो समचरण पंढरीये ॥१॥ भोळा सुलभ भाविकासी । दर्शनें सर्वांसी सारखा ॥२॥ अभेदाच्या न धांवे मागें । भाविकां लागे पाठोपाठीं ॥३॥ शुद्ध देखतांचि भाव । एका जनार्दनीं उभा देव ॥४॥
१७६१
नाथाचे आश्रमीं समाधिरहित । मुक्तता मुक्त नाम तुम्हां ॥१॥ महाकल्पवरी चिरंजीव शरीर । कीर्ति चराचर त्रिभुवनीं ॥२॥ आनंदे समाधि सदा ती उघडी । नामस्मरण घडोघडीं मुखोद्नत ॥३॥ एका जनार्दनीं तुमचें नाम गोड । त्रैलोकीं उघड नामकीर्ती ॥४॥
१७६२
नाथिलाचि देह नाथिला प्रपंच । नाथिली कचकच अवघें वांव ॥१॥ नाथिलेंचि दान नाथिलाचि धर्म । नाथिलेंचि कर्म नाथिलें हें ॥२॥ नाथिला आचार नाथिला विचार । नाथिला अविचार सर्व देहीं ॥३॥ एका जनार्दनीं नाथिलाचि देह । नाथिला संदेह मिथ्या जाणा ॥४॥
१७६३
नाना अवतार घेशी भक्तासाठीं । कृपाळु जगजेठी म्हनोनियां ॥१॥ मत्स्य कूर्मरुप धरुनियां देवा । साधिलें केशवा भक्तकाज ॥२॥ एका जनार्दनीं भक्ताचा कैवारी । गाती वेद चारी तुम्हांलागीं ॥३॥
१७६४
नाना कर्माचियां लागतां पाठीं । भ्रमचि जगा होय शेवटीं ॥१॥ नोहे कर्म यथासांग वाउगाचि मग श्रम होय ॥२॥ जाय तळा येत वरी । बुडक्या परी बुडतसे ॥३॥ एका जनार्दनीं शरण । कर्म न करुं जाण ॥४॥
१७६५
नाना तें चरित्र श्रीहरीचे वाचे । आठवावें साचें अघहरणा ॥१॥ केशव माधव अच्युत गोपाळ । गोविंद गोकुळपाळ वाचे वदा ॥२॥ वामन श्रीरामकृष्णातें आठवा । हृदयीं साठवा वेळोवेळां ॥३॥ एका जनार्दनीं ऐसा जया हेत । तो वसे जगांत जगरूप ॥४॥
१७६६
नानापरी समजवितें न परी राहे श्रीहरी । दहींभात कालवोनि दिला वेगीं झडकरीं । कडेवरी घेऊनियां फिरलें मी द्वारोद्वारीं ।१॥ राधे राधे राधे राधे घेई शामसुंदरा । नेई आतां झडकरीं आपुलिया मंदिरा ॥धृ॥ क्षणभरी घरीं असतां करी खोडी शारंगपाणी । खेळावया बाहेरीं जातां आळ घेती गौळणी । थापटोनि निजवितां पळोनि जातो राजद्वारा ॥२॥ राधा घेउनि हरिला त्वरें जात मंदिरीं । हृदयमंचकीं पहुडाविला श्रीहरीं । एका जनार्दनीं हरीला भोगी राधा सुंदरीं ॥३॥
१७६७
नाभिस्थानीं ठेवा हृदयकमळीं पहावा । द्विदळीं अनुभवा एकभवा ॥१॥ अर्धमात्रा बिंदु पाहतां प्रकार । होऊनी साचार सुखी राहे ॥२॥ प्रणव ओंकारू विचार करितां । बिंदुची तत्त्वतां सर्वगत ॥३॥ कुंडलिनी गति सहजचि राहे । सहस्त्रदळीं पाहे आत्मरूप ॥४॥ भिन्नभिन्न नाहीं अवघेंचि स्वरुप । पाहतां निजरुप रुप होय ॥५॥ तेथें कैंचा विचारू कैंचा पा अनाचारू । एका जनार्दनीं साचारू सर्वा घटीं ॥६॥
१७६८
नाभीकमळी जन्मला ब्रह्मा । तया न कळे महिमा ॥१॥ पंढरी क्षेत्र हें जुनाट । भुवैकुंठ साजिरीं ॥२॥ भाळे भोळे येती आधीं । तुटती उपाधी तयांची ॥३॥ एकपणें रिगतां शरणा । एक जनर्दनीं तुटे बंधन ॥४॥
१७६९
नाभीकमळीं चतुरानन । न कळे तया महिमान । तो साबडे कीर्तन । तेथें नाचे सर्वदा ॥१॥ नातुडे जो सदा ध्यानीं । योगयाग यज्ञहवनीं । अष्टांग योग करिता साधनीं । न लाभेचि सर्वथा ॥२॥ भागले वेद गीती गाता । श्रमलीं शास्त्रें वेवादतां । पुराणें तो सर्वथा । तया न कळे महिमान ॥३॥ तो उभा भीमातीरीं । भक्त करुणाकर श्रीहरी । एका जनार्दनीं विनंति करी । वास देई हृदयीं ॥४॥
१७७०
नाम अनिरुद्ध जगीं तें प्रसिद्ध । ओहं सोहं बोध गिळोनि गाय ॥१॥ अहंकार सांडी नाम मुखें मांडी । साधन देशधडी करुनी जपें ॥२॥ जनार्दनाच एक साधन सारुनी । जनार्दनचरणीं विनटला ॥३॥
१७७१
नाम उत्तम चांगलें । त्रिभुवनीं तें मिरविलें । जें शंभुनें धरिलें । निजमानसीं आदरें ॥१॥ धन्य मंत्र रामनाम । उच्चारितं होय सकाम । जन्म कर्म आणि धर्म । होय सुलभ प्राणियां ॥२॥ एका जनार्दनीं वाचे । ध्यान सदा श्रीरामांचे । कोटाई तें यज्ञांचे । फळ तात्काळ जिव्हेसी ॥३॥
१७७२
नाम उत्तम चांगलें । मुक्त केलें पापियां ॥१॥ गातां मुखीं ज्याचीं कीर्ति । योगयाग घडती कोटी देखा ॥२॥ घडती सकळ तीर्थ प्रदक्षिणा । वाचे रामराणा स्मरताची ॥३॥ एका जनार्दनीं सोपें । सुलभ हरावया पापें ॥४॥
१७७३
नाम उत्तम पावन । शिव शिव वरिष्ठ जाण ॥१॥ ऐसा पुराणीं महिमा । न कळे वेदशास्त्रां सीमा ॥२॥ जयासाठीं वेवादती । तो शिव स्वयं ज्योती ॥३॥ रुपा अरुपावेगळा । एका जनार्दनीं पाहे डोळां ॥४॥
१७७४
नाम उपेंद्र सर्व देवांचा तो इंद्र । शुभ काळ वक्त्र जप सदा ॥१॥ तें नाम सोपें जपें कां रे वाचे । अहर्निशी साचें नाम जप ॥२॥ जनार्दनाचा एका एकाभावें नटला । हृदयीं सांठ विला जनार्दन ॥३॥
१७७५
नाम एक उच्चारितां । गणिका नेली वैकुंठपंथा । नामें पशु तो तत्त्वता । उद्धरिला गजेंद्र ॥१॥ ऐसा नामाचा बडिवार । जगीं सर्वांसी माहेर । नामापरतें थोर । योगयागादि न होती ॥२॥ नामें तरला कोळी वाल्हा । करा नामाचा गलबला । नामें एका जनार्दनीं धाला । कृत्यकृत झाला संसार ॥३॥
१७७६
नाम गातां करीं आळस । निंदा करी बहु उल्हास ॥१॥ कोणी गातसे हरिनाम । तयासी तो अधम उपहासी ॥२॥ आपणा घरीं नाहीं कण । भांडारिया म्हणे बुद्धिहीन ॥३॥ नेणें कधीं स्वप्नीं भाव । मानीं देव वेगळाची ॥४॥ एका जनार्दनीं तें पामर । भोगिती अघोर चौर्‍यायंशीं ॥५॥
१७७०
नाम गाये तो सर्वत्र क्षितीं । नामें उद्धार त्रिजगतीं ॥१॥ ज्यांचे उच्चारितां नाम । निवारे क्रोध आणि काम ॥२॥ वेदशास्त्र विवेकीसंपन्न । नामें होताती पावन ॥३॥ नामें उत्तम अधमा गती । एका जनार्दनीं ध्यान चिंत्ती ॥४॥
१७७८
नाम गोड श्रीरामांचें । अमृत फिकें जाहले साचें ॥१॥ हो कां उत्तम चांडळ । अधम खळांहुनी खळ ॥२॥ रामनाम वदतां वाचे । पवित्रपणें तोचि साचें ॥३॥ एका जनार्दनीं नाम । मुक्ति सायुज्य निष्काम ॥४॥
१७७९
नाम घेई सदा वाचे । अनंत जन्मांचें दोष जाती ॥१॥ सुलभ सुलभ एक नाम । नाम आराम जपतांची ॥२॥ रानीं वनीं बैसता जनीं । नाम वदनी तो धन्य ॥३॥ एका जनार्दनीं सोपें । हरती पापें जन्माचीं ॥४॥
१७८०
नाम घेतां रुप आठवलें सांवळें । हीं खुण गोपाळें दिली मज ॥१॥ येणें जन्में कृष्ण दाटोनी टाकणें । आडवस्ती पेणें चुकविली ॥२॥ चुकविली वस्ती एका जनार्दनीं । संसार सांडणें सांडोनियां ॥३॥
१७८१
नाम घेतां हे वैखरी । चित्त धांवें विषयांवरी ॥१॥ कैसें होता हें स्मरण । स्मरणामाजीं विस्मरण ॥२॥ नामरुपा नव्हता मेळा । नुसता वाचेचा गोंधळ ॥३॥ एका जनार्दनीं छंद । बोलामाजीं परमानंद ॥४॥
१७८२
नाम जनार्दन रुप जनार्दन । ध्यान जनार्दन सर्व मज ॥१॥ माय जनार्दन बाप जनार्दन । जन जनार्दन सर्व मज ॥२॥ जनार्दनाचा एका जनार्दन देखा । जनीं वनीं सखा जनार्दन ॥३॥
१७८३
नाम जनार्दन वाचे । भय नाहीं कळिकाळाचें । सार्थक जन्माचे । नाम गातां निश्चयें ॥१॥ सोपा मंत्र जनार्दन । जग व्यापक परिपुर्ण । जन वन जनार्दन । एका रुप नाम घेतां ॥२॥ एका शरण जनार्दन । जनार्दन एकपणीं । आदि मध्य अवासानी । दाता एका जनार्दनीं ॥३॥
१७८४
नाम जप वाचा प्रद्युम्न साचा । न करी नामाचा आळस कदा ॥१॥ संसारयातना जाती पां निर्धारें । नाम निरंतर जपें आधीं ॥२॥ जनार्दनाचा एका त्रैलोक्याचा सखा । झाली पूर्ण कृपा जनार्दन ॥३॥
१७८५
नाम जपतां निवृत्ति । न येचि पुनरावृत्ति ॥१॥ ऐसा अनुभव जीवा । चराचरीं सर्व देवां ॥२॥ एका जनार्दनीं शरण । निवृत्ति म्हणतां पावन ॥३॥
१७८६
नाम जपे सर्वकाळ । त्यासी भयभीत काळ ॥१॥ रामी लीन ज्याची वृत्ती । त्याच्या दासी चारी मुक्ती ॥२॥ रामनामी जिव्हा रंगे । तोचि परब्रह्मा अंगें ॥३॥ म्हणे एका जनार्दनीं । राम दिसे जनीं वनीं ॥४॥
१७८७
नाम तारक ये मेदिनी । नाम सर्वांचे मुगुटमणी । नाम जपे शुळपाणी । अहोरात्र सर्वदा ॥१॥ तें हें सुलभ सोपारें । कामक्रोध येणें सरे । मोह मद मत्सर । नुरे नाममात्रें त्रिजगतीं ॥२॥ घेउनी नामाचें अमृत । एका जनार्दनीं झाला तृप्त । म्हणोनि सर्वांते सांगत । नाम वाचे वदावें ॥३॥
१७८८
नाम तारक सांगडी । तेणे उतरुं पैलथडी ॥१॥ रामनाम जप सोपा । तेणें नेणों पुण्यपापा ॥२॥ सर्व साधनांचे सार । भवसिंधुसी उतार ॥३॥ ऐसा नामाचा प्रताप । एका जनार्दनी नित्य जप ॥४॥
१७८९
नाम तारक हें क्षितीं । तरलें आणि पुढे तरती ॥१॥ न लगे साधन मंडण । नामें सर्व पापदहन ॥२॥ योगयागांची परवडी । नामापुढें वायां गोडी ॥३॥ नाम वाचे आवडी घोका । म्हणे जनार्दनीं एका ॥४॥
१७९०
नाम तूं अधोक्षज घेई सर्वकाळ । महाकाळ काळ अधोक्षज ॥१॥ नामीं धरुनी प्रीति आठव सर्वदा । नाहीं तुज बाधा जन्मोजन्मीं ॥२॥ जनार्दनाचा एका प्रेमें विनटला । आपुलासा केला जनार्दन ॥३॥
१७९१
नाम तें उत्तम नाम तें सगुण । नाम तें निर्गुण सनातन ॥१॥ नाम तें ध्यान नाम तें धारणा । नाम तें हेंजना तारक नाम ॥२॥ नाम तें पावन नाम तं कारण । नामापरतें साधन आन नाहीं ॥३॥ नाम ध्यानीं मनीं गातसें वदनीं । एका जनार्दनीं श्रेष्ठ नाम ॥४॥
१७९२
नाम तें ब्रह्मा नाम तें ब्रह्मा । नामापाशीं नाहीं कर्म विकर्म ॥१॥ अबद्ध पढतां वेद बाधी निषिद्ध । अबद्ध नाम रटतां प्राणी होती शुद्ध ॥२॥ अबद्ध मंत्र जपतां जापक चळे । अबद्ध नाम जपतां जडमुढ उद्धरले ॥३॥ स्वधर्म कर्म करी पडे व्यंग । विष्णुस्मरणें तें समूळ होय सांग ॥४॥ मनापाशीं नाहीं विधिविधान । आसनीं शयनीं भोजनीं नाम पावन ॥५॥ एका जनार्दनीं नाम निकटीं । ब्रह्मानंदी भरली सृष्टी ॥६॥
१७९३
नाम तें सार श्रीधरांचे वाचे । कोटी जन्माचें दोष जाती ॥१॥ जपें तूं आवडी धरुनियां गोडी । युगाऐसीं धडी करुनियां ॥२॥ जनार्दनीं एका श्रीधर निजसखा । नोहे तो पारखा जनार्दनीं ॥३॥
१७९४
नाम तें सोपें पद्मनाभ पाठ । करी तूं बोभाट दिवसनिशीं ॥१॥ चौसष्ट घडियामाजीं जपें नामावली । कळिकाळ टाळी मारुं न शके ॥२॥ जनार्दनाचा एक नामीं तो निर्भय । कळिकाळ वंदी पाय जन्मोजन्मी ॥३॥
१७९५
नाम तें सोपें संकर्षण जपे । आणिक संकल्पें धरुं नको ॥१॥ धरितां संकल्प नाशिवंत बापा । नाम जप सोपा मंत्रमार्ग ॥२॥ जनार्दनाच एक बोले लडिवाळ । जनार्दन कृपाळ जगीं तोची ॥३॥
१७९६
नाम नारसिंह नाम नारसिंह । भक्तांसी तो सम सर्वकाळ ॥१॥ जपे तो प्रल्हाद आवडी तें नाम । पावला सर्वोत्तम तयालागीं ॥२॥ जनार्दनाचा एका रुप तें पाहुनी । नारसिंहचरणीं मिठी घाली ॥३॥
१७९७
नाम निजभावेंसमर्थ । जेथें नाम तेथें दत्त ॥१॥ वाचे म्हणता देवदत्त । दत्त करी गुणातीत ॥२॥ दत्तनामाचा सोहळा । धाक पडे कळिकाळां ॥३॥ दत्तनामाचा निजछंद । नामीं प्रगटे परमानंद ॥४॥ एका जनार्दनीं दत्त । सबाह्म स्वानंदें भरीत ॥५॥
१७९८
नाम निवृत्ति धन्य तो निवृत्ति । देह निवृत्ति पाहतां डोळां ॥१॥ संसार सारासार निवृत्ति । वेद निवृत्ति नाम गातां ॥२॥ शास्त्र निवृत्ति पुराणें निवृत्ति । अंतर्बाह्य कीर्ति निवृत्तिचीं ॥३॥ एका जनार्दनीं पाहतांचि निवृत्ति । होय सर्व शांति निवृत्तिनामें ॥४॥
१७९९
नाम पवित्र आणि परिकर । नामें तरले दोषी अपार । नामें हेंचि निजसार । आधार वेदशास्त्रांचे ॥१॥ तारक कलिमाजीं नाम । भोळ्याभाविकां सुगम । ज्ञाते पंडित सकाम । नामें तरती श्रीहरींच्या ॥२॥ मनीं माझ्या ऐक गोष्टी । नाम जपेंतुं सदा कंठीं । एका जनार्दनीं परिपाठीं । नाहीं गोष्टीं दुसरी ॥३॥
१८००
नाम पावन तिही लोकीं । मुक्त झालें महा पातकी ॥१॥ नाम श्रेष्ठांचें हें श्रेष्ठ । नाम जपे तो वरिष्ठ ॥२॥ नाम जपे नीलकंठ । वंदिताती श्रेष्ठ श्रेष्ठ ॥३॥ नाम जपे हनुमंत । तेणे अंगीं शक्तिवंत ॥४॥ नाम जपे पुंडलीक । उभा वैकुंठनायक ॥५॥ नाम ध्यानीं मनीं देखा । जपे जनार्दनीं एका ॥६॥
१८०१
नाम पावन पावन । नाम दोषांसि दहन । नाम पतीतपावन । कलीमाजीं उद्धार ॥१॥ गातां नित्य हरिकथा । पावन होय श्रोता वक्ता । नाम गाऊनि टाळी वाहतां । नित्य मुक्त प्राणी तो ॥२॥ एका जनार्दनीं नाम । भवसिंधु तारक नाम । सोपें सुगम वर्म । भाविकांसी निर्धारें ॥३॥
१८०२
नाम पावन श्रीरामांचे । घेतां वाचे शुभची ॥१॥ नाहीं तेथें गोवांगुतीं । नामेंची चढ ती वैकुंठीं ॥२॥ भ्रमलियासी उद्धार । नाम सोपें जपतां सार ॥३॥ दोचि अक्षरांचे काम । वाचे म्हणा रामनाम ॥४॥ नाम आवडीनें घोका । म्हणे जनार्दनीं एका ॥५॥
१८०३
नाम मंगळा मंगळ । झालें जन्माचें सफळ ॥१॥ दत्त जीवींचे जीवन । दत्त कारणा कारण ॥२॥ अनुसूयात्मजा पाही । देहभाव उरला नाहीं ॥३॥ एका जनार्दनीं दर्शन । चित्त झालें समाधान ॥४॥
१८०४
नाम मुखी सदां धन्य तो संसारीं । वायां हाव भरी होऊं नये ॥१॥ तारक तें नाम तारक तें नाम । तारक तें नाम विठोबाचे ॥२॥ जडजीवां तारी दोषियां उद्धरी । एका जनार्दनीं निर्धारी तारक नाम ॥३॥
१८०५
नाम मुखीं गातां विषयांची वार्ता । नोहेचि सर्वथा गातीयासी ॥१॥ नाम तें पावन नाम तें पावन । नामवांचूनि जाण श्रेष्ठ कोण ॥२॥ एका जनार्दनीं नाम तें पावन । त्रिभुवनीं मंडन नाम सत्य ॥३॥
१८०६
नाम मुखीं सदा वाचे । कांपती कळीकाळ साचे ॥१॥ दो अक्षरीं रामनाम । जपतां पावसी मोक्षधाम ॥२॥ नामावांचूनि परिपाठीं । साधन नाहीं नाहीं नेहटीं ॥३॥ नाममंत्र श्रेष्ठ सार । जड जिवांसी उद्धार ॥४॥ एका जनार्दनीं नाम । सुखधामाचा विश्राम ॥५॥
१८०७
नाम श्रीकृष्ण उद्धवें साधिलें । चोविस नामें झालें जप पवे ॥१॥ आठवा श्रीकृष्ण आठवा श्रीकृष्ण । आठवा श्रीकृष्ण वेळोवेळां ॥२॥ जनार्दनाचा एका श्रीकृष्ण निजसखा । जनार्दनें देखा दावियेला ॥३॥
१८०८
नाम श्रेष्ठ तिहीं लोकीं । म्हणोनि शिव नित्य घोकी ॥१॥ सदा समाधी शयनीं । राम चिंती ध्यानीं मनीं ॥२॥ अखंड वैराग्य बाणलें अंगी । म्हणोनि वंद्य सर्वा जगीं ॥३॥ एका जनार्दनीं वाचे । नाम वदे सर्वदा साचे ॥४॥
१८०९
नाम सुलभ इहलोकीं । तरले तरले महापातकी । म्हणोनि वाचे जो घोकी । नित्य नेमें आदरें ॥१॥ तयाचें तुटतें बंधन । होय जन्माचें खंडन । वाचे गातां जनार्दन । सोपें जाण साधन हें ॥२॥ नमन करुनी समाधान । आठवी रामनामाचें ध्यान । शरण एका जनार्दनीं । समाधान संतोष ॥३॥
१८१०
नाम सुलभ सोपें गातां । नाहीं भय आणि चिंता । पळती दोषांच्या चळथा । नाम गातां देशोधडीं ॥१॥ म्हणोनि धरियेली कास । जाहलों संतांचा मी दास । नाम गातां उल्हास । वारंवार मानसीं ॥२॥ उणें पुरें नको कांहीं । सोंवळें येथें नाहीं । एका जनार्दनीं देहीं । सुस्नात सर्वदा ॥३॥
१८११
नाम हरिहर संसार तो हरी । सबाह्म अभ्यंतरीं हरि माझा ॥१॥ हरिनाम जपें हरिनाम जपें । ते वर्म सोपें हरि जपें ॥२॥ जनार्दनाचा एका हरिचरणीं देखा । सुखासुख सुखा अनुभवला ॥३॥
१८१२
नाम हृषिकेश गाये सावकाश । धरुनि उदास देहाअशा ॥१॥ जाईल जाईल देह नाशिवंत । नाम तें शाश्वत हृषिकेश ॥२॥ जनार्दनाचा एका नाम गाय सदा । पंचभूत बाधा तेणे नोहे ॥३॥
१८१३
नाम हे नौका तारक भवडोहीं । म्हणोनि लवलाही वेग करा ॥१॥ बुडतां सागरीं तारुं श्रीहरी । म्हणोनि झडकरी लाहो करा ॥२॥ काळाचा तो फांसा पडला नाही देहीं । म्हणोनी लवलाही लाहो करा ॥३॥ एका जनार्दनीं लाहो कर बळें । सर्वदा सर्वकाळें लाहो करा ॥४॥
१८१४
नाम हें पावन नाम हें पावन । दुजा ठाव आन नाहीं येथें ॥१॥ देखेणाही झाला देखणाही झाला । देखणाही झाला अंधत्वेसी ॥२॥ द्वैत अद्वैत गेलेंक नेणें हारपलें । जाणणें तें गेलें जाणते ठायीं ॥३॥ एका जनार्दनीं नाम तें अनाम । सर्वोत्तम नाम सर्वा ठायीं ॥४॥
१८१५
नामचेनि पाठें जाती पैं वैकुंठी । आणिक खटपटी न तरती ॥१॥ आठवा नामपाठ आठवा नामपाठ । वाउगा बोभाट करुं नका ॥२॥ जनार्दनाचा एका नामपाठें तरला । जनार्दन जोडला गुरु मज ॥३॥
१८१६
नामधारक हो कां भलता । त्याचे चरणीं ठेवीन माथा ॥१॥ न म्हणे उत्तम अधम । मुखीं जपतां रामनाम ॥२॥ यातीकुळाचें कारण । नाहीं नामविण ॥३॥ नाम जपे तोचि श्रेष्ठ । एका जनार्दनीं वरिष्ठ ॥४॥
१८१७
नामधारकाचा । दास होईन मी साचा ॥१॥ आणिक नको थोरपण । वाचे वंदी त्याचे गुन ॥२॥ नामीं सदा वसो हेत । हेंचि मागणें मागत ॥३॥ हेंचि द्यावें कृपादान । एका जनार्दनीं शरण ॥४॥
१८१८
नामपाठ अंडज जारज स्वेदज । उद्भिज देख चार योनी ॥१॥ नामपाठ प्रेमें गाय तूं आवडीं । तुटेल सांकडीं कर्म धर्म ॥२॥ जनार्दनाचा एक नामपाठीं निका । तोडियेली शाखा द्वैताची ते ॥३॥
१८१९
नामपाठ करा नामपाठ करा । चवर्‍याशींचा फेरा चुकवा जगीं ॥१॥ नामपाठ गाये नामपाठ गाये । पुनरपी नये संसारासी ॥२॥ एका जनार्दनाचा नामपाठ गाय । आनंदी आनंद होय तयालागीं ॥३॥
१८२०
नामपाठ करितां आनंद मानसें । योगयाग राशीं पायां लागे ॥१॥ आनंदें आवडी नामपाठ गाय । उभा तारिता बाह्मा जना ॥२॥ जनार्दनाचा एका सांगे जगाप्राती । नामपाठें विश्रांती होईल जना ॥३॥
१८२१
नामपाठ करितां काळ वेळ नाहीं । उच्चारुनी पाहीं सर्वकाळ ॥१॥ सर्वभावें नामपाठ तूं गाये । आणिक न करी काय साधन तें ॥२॥ जनार्दनाचा एक भुलता नामपाठीं । आणिक न करी गोष्टी नामविण ॥३॥
१८२२
नामपाठ करितां जाईल पैं चिंता । मोक्ष सायुज्यता हातां येई ॥१॥ म्हणोनि सोपें वर्म सांगतसे तुज । नामपाठ गुज जपें सदा ॥२॥ जनार्दनाचा एक कुर्वंडी करुनी । लोळत चरणीं संताचिया ॥३॥
१८२३
नामपाठ कसवटी अखंड ज्याचे मुखीं । तोचि झाला इहीं जनीं ॥१॥ नामपाठ धन्य नामपाठ धन्य । नामपाठ धन्य कालीमाजीं ॥२॥ जनार्दनाचा एका नामपाठें मिरविला । श्रीरंग वरला नामपाठें ॥३॥
१८२४
नामपाठ कालीमाजीं सोपें वर्म । साधन तो श्रम न करीं वायां ॥१॥ नामपाठ गाये नामपाठ गाये । वायां तूं न जाय खटपटा ॥२॥ जनार्दनाचा एका नामपाठ गाये । जनार्दना पाहे काया वाचा ॥३॥
१८२५
नामपाठ किती सर्वात वरिष्ठ । नको साधन कष्ट आणिक कांहीं ॥१॥ नामपाठमाला हृदयीं ध्याई भावें । उगेंचि जपावें मौन्यरुप ॥२॥ जनार्दनाचा एक नाम गाय फुका । साधन तिहीं लोकां वरिष्ठ तें ॥३॥
१८२६
नामपाठ केशव वदा नित्य वाचे । सार्थक देहांचे सहजासहज ॥१॥ आठवी केशव आठवीं केशव । ठेवी तूं भाव केशवचरणीं ॥२॥ जनार्दनाचा एका केशवीं विनटला । प्रेमें तो दाटला हृदयामाजीं ॥३॥
१८२७
नामपाठ गंगा नामपाठ सरिता । सागर जाती भंगा नामपाठें ॥१॥ नामपाठ सरिता सागर संगम । देवभक्त नाम तिन्हीं बोध ॥२॥ जनार्दनाचा एका करितो मार्जन । त्रिवेणीं स्नान पुण्य जोडे ॥३॥
१८२८
नामपाठ गाय सदा नामपाठ गाय । धन्य त्याची माय त्रिभुवनीं ॥१॥ ब्रह्मादिक वंदिती शिवादिक ध्याती । नामपाठ कीर्ति मुखीं गातां ॥२॥ एका जनार्दनीं साराचें हें सार । नामपाठ निर्धार केला जगीं ॥३॥
१८२९
नामपाठ गाये धन्य तो संसारीं । काय त्याची थोरी वानूं जगीं ॥१॥ तयाचे चरणीं माझा दंडवत । नामपाठ गात सर्वभावें ॥२॥ जनार्दनाचा एका नामपाठ भावें । अखंड गात आहे जीवेंभावें ॥३॥
१८३०
नामपाठ गाये संतांचे संगती । नाही पुनरावृत्ति तया मग ॥१॥ नामपाठ गाय सर्व भावें मनीं । चुकेल आयणी गर्भवास ॥२॥ जनार्दनीचा एका नामपाठ गायें । जनार्दनीं पाहे जनीं वनीं ॥३॥
१८३१
नामपाठ गाये सदोदित मनीं । यमाची जाचणी नोहे तया ॥१॥ नामपाठ भावें आदरें जो गाये । सर्व सुख पाहे तया होय ॥२॥ जनार्दनाचा एका नामीं धरी आवडी । सर्वभावें जोडी नामपाठ ॥३॥
१८३२
नामपाठ गीता नामपाठ गीता । नाम पाठ गीता गाय सदा ॥१॥ हाचि बोध सोपा अर्जुना उपदेश । नामपाठें क्लेश सर्व गेले ।२॥ जनार्दनाचा एका वाचे गाये गीता । हारपली चिंता जन्मरण ॥३॥
१८३३
नामपाठ गोविंद हाचि लागो छंद । न करी भेदाभेद हृदयामाजीं ॥१॥ गोविंद नाम गाय गोविंद नाम गाय । गोविंद नाम गाय हृदयीं सदा ॥२॥ जनार्दनाचा एका हृदयीं ध्यायें सच्चित्ता । गोविंद गीतीं सुख जोडे ॥३॥
१८३४
नामपाठ जपे भोळा महादेव । देवाधि देव वंदी तया ॥१॥ विष तें अमृत नामपाठें झाले । दैन्य दुःख गेलें नाम जपतां ॥२॥ जनार्दनाचा एका उभारुनि बाह्या । नामपाठ गाय सर्वकाळ ॥३॥
१८३५
नामपाठ जया नाही पैं सर्वथा । तयासी तत्त्वतां यमदंड ॥१॥ मारिती तोडिती यमाचे ते दूत । नामपाठीं चित्त कां रें नेणें ॥२॥ जनार्दनाचा एका सांगे सर्व लोकां । नामपाठ घोका आळस नका ॥३॥
१८३६
नामपाठ जागीं सोपें तें साधन । म्हणोनि वर्णन वैष्णव करिती ॥१॥ आनंदे नाचती टाळी वाजविती । नामपाठ गाती सर्वभावें ॥२॥ जनार्दनाचा एक भुलला नामपाठीं । म्हणोनि वैकुंठी घर केलें ॥३॥
१८३७
नामपाठ ज्ञानदेवी नामपाठ तूं करीं । चुकें वेरझारी चौर्‍यांशीची ॥१॥ ऐसें वर्म सोपें सांगो जगा गुज । ज्ञानेश्वरी निजीं जपों आधीं ॥२॥ जनार्दनाचा एका चरणीं विनटला । धन्य धन्य झाला ज्ञानदेवी ॥३॥
१८३८
नामपाठ त्रिविक्रम वदे तूं रे वाचे । अनंत जन्माचे दोष जाती ॥१॥ बळीये द्वारी त्रिविक्रम उभा । नाम पाठें उभा तुजपुढें ॥२॥ जनार्दनाचा एका त्रिविक्रमीं वंदी । साधन उपाधी नेणें आन ॥३॥
१८३९
नामपाठ नारायण वदे सर्वकाळ । काळाच तो काळ नारायण ॥१॥ नारायण गाय नारायण ध्याय । नारायण पाहे सर्वाठायीं ॥२॥ जनार्दनाचा एका नारायणीं प्रेम । आणिक नाहीं प्रेम दुजा कांहीं ॥३॥
१८४०
नामपाठ नित्य एक नेमें गायें । हरिकृपा होय तयावरी ॥१॥ अंतरीं बाहेरी रक्षी नारायण । आलिया विघ्न निवारी साचें ॥२॥ जनार्दनाचा एका प्रचीत घेउनी । गात असे वाणी नामपाठ ॥३॥
१८४१
नामपाठ पसारा घे रे मुखें सदा । कळिकाळाची बाधा तुज नोहे ॥१॥ नाम तें सोपें नाम तें सोपें । नाम तें सोपें विठ्ठलाचें ॥२॥ जनार्दनाचा एका नामपाठ वाणी । कीर्ति त्रिभुवनी नाममाठें ॥३॥
१८४२
नामपाठ प्रेमें सांवता तो गाये । हृदयकमळी वाहे नारायण ॥१॥ नामपाठ निका नामपाठ निका । खुर्पु लागे देखा देव त्यासी ॥२॥ जनार्दनाचा एका ऐकोनियां बोल । सांगत नवल संतापुढें ॥३॥
१८४३
नामपाठ ब्रह्मा उघड बोले वाचा । वेदांतीं तो साच निर्णय असे ॥१॥ नामपाठ भावस भक्ति तें कारण । आणिक साधन नाहीं दुजें ॥२॥ जनार्दनाचा एक गाये तो आवडी । तोडियेली बेडी संसाराची ॥३॥
१८४४
नामपाठ मंत्र सर्वांत पैं श्रेष्ठ । तेणें तें वैंकुठ सरतें केलें ॥१॥ नामपाठें साधे साधन तत्त्वतां । मोक्ष सायुज्यता हातां लागें ॥२॥ जनार्दनाचा एका प्रेमें नाम गाय । उभारुनी बाह्म सांगतसे ॥३॥
१८४५
नामपाठ मच्छिद्र गोरक्षातें बोधी । तोडिली उपाधी चौदेहांची ॥१॥ नामपाठ मोक्ष मार्ग तो सर्वदा । वाचे गातां बाधा नोहे कांहीं ॥२॥ जनार्दनाचा एका द्वैताविरहित । नामपाठ गात सर्वभावें ॥३॥
१८४६
नामपाठ यश कीर्ति नामपाठें । तो जाय वैकुंठा हेळामात्रें ॥१॥ न करी रे जना आळस मानसीं । नामपाठ अहर्निशी जपे सदा ॥२॥ जनार्दनाच एका सांगतो आदरें । नामपाठ स्मरे वेळोवेळां ॥३॥
१८४७
नामपाठ युक्ति जगीं सोपी जाणा । म्हणोनि नारायण आठवावें ॥१॥ नामपाठ सोपा नामपाठ सोपा । जन्ममरण खेपा दुर होती ॥२॥ जनार्दनाचा एका आवडीनें गाये । नाशिवंत पाहें शरीर आहे ॥३॥
१८४८
नामपाठ युक्ति भाविकां प्रतीती । लोभिया विरक्ती नामपाठें ॥१॥ नामपाठें याग नामपाठ योग । नामपाठें भोग सरे आधीं ॥२॥ जनार्दनाचा एका भोगातीत झाला । म्हणोनि वोळला जनार्दन ॥३॥
१८४९
नामपाठ वर्म सोपें आहे जाणा । चिंती नारायणा नामपाठें ॥१॥ अष्टांग योग साधनें वरिष्ठ । नामपाठेंविण कष्ट होतीं जना ॥२॥ जनार्दनाचा एका करी विनवणी । नामपाठ निर्वाणीं शस्त्र आहे ॥३॥
१८५०
नामपाठ श्रेष्ठ तीर्थाचे तें तीर्थ । वदे तूं चितारहित सर्वकाळ ॥१॥ काळाचें तें काळ नामपाठ गात । काळ हा तयास नमस्कारी ॥२॥ जनार्दनाचा एका काळा बांधी चरणीं । म्हणोनी जनार्दनीं विनटला ॥३॥
१८५१
नामपाठ श्रेष्ठ तीर्थाचें तें तीर्थ । वदे तूं चितारहित सर्वकाळ ॥१॥ काळांचे तें काळ नामपाठ गात । काळ हा तयास नमस्कारी ॥२॥ जनार्दनाचा एका काळा बांधी चरणीं । म्हणोनी जनार्दनीं विनटला ॥३॥
१८५२
नामपाठ श्रेष्ठ नामपाठ श्रेष्ठ । पावें तो वैकुंठकलीमाजीं ॥१॥ नामपाठें गेलें नामपाठें गेले । जडजीव उद्धरिलें नामपाठें ॥२॥ जनार्दनाचा एका आणिक नेणें वर्म । सोपें होय कर्म नामपाठें ॥३॥
१८५३
नामपाठ सत्ता सर्वां वरिष्ठाता । यमधर्म माथां वंदी पाय ॥१॥ ऐसा नामपाठ भक्तियुक्त गाय । पुनरपि नये संसारासी ॥२॥ जनार्दनाचा एका सांगतसे फुका । नामपाठ घोका जीवेंभावें ॥३॥
१८५४
नामपाठ सदा एकांती जो करी । भुक्तिमुक्ती चारी घरीं त्याच्या ॥१॥ न लगे साधन व्युप्तत्ति पसारा । नामपाठ बरा संतसंगे ॥२॥ जनार्दनाचा एका नामपाठें निका । तारिले जडलोकां नामपाठें ॥३॥
१८५५
नामपाठ साधन याहुनी आहे कोण । कासयासी पेणें स्वर्गवास ॥१॥ जन्म देई देवा जन्म देई देवा । गाईन मी देवा नामपाठ ॥२॥ जनार्दनाचा एका बोलतसे वाणी । नामपाठें जनीं जनार्दन ॥३॥
१८५६
नामपाठ सार वेदांचें तें मूळ । शास्त्रांचे तें फळ नामपाठ ॥१॥ योगयाग विधि न लगे खटपट । नामपाठें स्पष्ट सर्व कार्य ॥२॥ जनार्दनाचा एका नामपाठ घोकी । गुढीं तिहीं लोकीं उभारिली ॥३॥
१८५७
नामपाठ सार सर्वामाजीं श्रेष्ठ । जो गाये तो वरिष्ठ कलियुगीं ॥१॥ चुकेल यातना नाना गर्भवास । भय आणि त्रास नव्हे मनीं ॥२॥ जनार्दनाचा एका नामपाठ भावें । आदरें गात आहे सदोदित ॥३॥
१८५८
नामपाठ सोपा भोळ्या भाविकांसी । मत वादीयांसी न रुचे नाम ॥१॥ नवज्वरिता दुग्ध प्राण जाय तत्त्वतां । अभाविकांसी सर्वथा गति तेंची ॥२॥ जनार्दनाचा एक सांगे प्रेमभावें । आदरें तें गावें नामपाठ ॥३॥
१८५९
नामपाठ सोपा हरावया पापें । आणीक संकल्प न करी दुजा ॥१॥ नामपाठें सिद्धि नामपाठें सिद्धि । तुटेल उपाधी नामपाठें ॥२॥ जनार्दनाचा एक गात नाचत । नामपाठ करीत सर्वकाळ ॥३॥
१८६०
नामपाठ स्नान नामपाठ दान । नामपाठ ध्यान जनार्दन ॥१॥ नामपाठ संध्या नामपाठ कर्म । नामपाठें धर्म सव जोडे ॥२॥ जनार्दनाचा एका करी नामपाठ । आणिक नाहें श्रेष्ठ नामेंविण ॥३॥ नामपाठ संध्येतील चोवीस नामांचा नामोच्चार
१८६१
नामपाठविठ्ठल पंचविसावा वाचे । सार्थक जन्माचेंजालें जालें ॥१॥ विठ्ठल विठ्ठल वदतां वो वाचे । सार्थक जन्माचें झालें साचें ॥२॥ जनार्दनाचा एका नामपाठ गाय । विठ्ठल विठ्ठल ध्याये वेळोवेळां ॥३॥
१८६२
नामपाठे ज्ञान नामपाठें ध्यान । नामपाठे मन स्थिर होय ॥१॥ जगांत हें सार नामपाठ भक्ती । आणिक विश्रांती नाहीं नाहीं ॥२॥ जनार्दनाचा एका अखंड नाम गाय । हर्ष नाचताहे प्रेमे रंगीं ॥३॥
१८६३
नामपाठे भक्ति हनुमंतें केली । सेवा रुजू झाली देवा तेणें ॥१॥ नामपाठें शक्ति अद्‌भुत ये अंगी । धन्य झाला जगीं कपीनाथ ॥२॥ जनार्दनाचा एका सेवोनि आदरें । नामपाठ स्मरे सर्व काळ ॥३॥
१८६४
नामपाठे युक्ती साधन समाप्ती । नोहे दुजी प्रीति नामपाठें ॥१॥ आणिक खटपट कासया बोभाट । नामपाठ वाट वैकुंठाची ॥२॥ जनार्दनाचा एका नामपाठें रंगला । आनंदें वहिला नाचतसे ॥३॥
१८६५
नामपाठें अक्रुर सर्व ब्रह्मारुप । भेदाभेद संकल्प मावळले ॥१॥ वंदी रजमाथां घाली लोटांगण । द्वैतांचे बंधन तुटोनी गेलें ॥२॥ जनार्दनाचा एका नामपाठें मुक्त । जालासे सतत संतचरणीं ॥३॥
१८६६
नामपाठें आपण होय अनामिक । नामपाठें देख न म्हणे कांहीं ॥१॥ उंच नीच ज्ञाती न करी विचार । नामपाठें निर्धार ऐसा ज्याचा ॥२॥ जनार्दनाचा एका सर्वभावे देखा । नामपाठ निका गात असे ॥३॥
१८६७
नामपाठें ओहं सोहं कोहं खादलें । परब्रह्मा लक्षिलें नामपाठें ॥१॥ अहं अहंपण सोहं सोहंपण । नाम हेंचि खूण नामपाठें ॥२॥ जनार्दनाचा एका कोहंपणा वेगळा । जनार्दनें कुर्वाळिला अभय दानीं ॥३॥
१८६८
नामपाठें क्रिया नामपाठें कर्म । नामपाठें वर्म हातां येत ॥१॥ तो हा सोपा योग नामपाठ वाचे । न करी सायासांचे वर्म कांहीं ॥२॥ जनार्दनाचा एका भक्तीसी भुलला । मोकळा मार्ग केला नामपाठें ॥३॥ नामपाठमार्ग-गीताज्ञानेश्वरीपाठ व एकाग्र मनानें अखंड नामोच्चार
१८६९
नामपाठें गणिका नेली मोक्षपदा । नामपाठें प्रल्हादा सुख झालें ॥१॥ नामपाठें ध्रुव अढळपदीं बैसें । नारद नाचतसे नामपाठे ॥२॥ जनार्दनाचा एक सांगे अनुभव । नामपाठ सर्व जपा आधी ॥३॥
१८७०
नामपाठें गहिनी निवृत्ति वोळला । उघड तो केला परब्रह्मा ॥१॥ नामपाठ ब्रह्मा नामपाठ ब्रह्मा । आणिक नेणें कर्म वर्म नामेंविण ॥२॥ जनार्दनाचा एका सेवेसी नटला । नामपाठें केला जनार्दन ॥३॥
१८७१
नामपाठें गीता ज्ञानेश्वरी होय । स्मरे तूं निर्भय ज्ञानदेवी ॥१॥ नामपाठें सोपीं अक्षरें ती उच्चार । ज्ञानेश्वरी उच्चार करी वाचे ॥२॥ जनार्दनाचा एका ज्ञानेश्वरवरी ध्याय । तेणें मुक्त होय युगायुगीं ॥३॥
१८७२
नामपाठें गुण झाले पैं त्रिगुण । अनाम लक्षण नामपाठें ॥१॥ सैरा सैराट धांवे जे वाटा । तयाच्या चेष्टा न चलती तेथें ॥२॥ जनार्दनाचा एका एकपणें बोधिला । जनार्दन वोळला कामधेनु ॥३॥
१८७३
नामपाठें गोरक्ष वोळगला गहिनी । दाविली उन्मनी सर्वकाळ ॥१॥ समाधि आसन सैरा ते बोल । नामपाठ मोल अभ्यासिलें ॥२॥ जनार्दनाचा एका नेणें तो उन्मनी । सदा संतचरणीं मिठी घाली ॥३॥
१८७४
नामपाठें गोरा कुंभार तरला । उद्धार तो झाला पूर्वजांचा ॥१॥ नामपाठ कीर्ति गाताती वैष्णव । धन्य तो अपूर्व नाममहिमा ॥२॥ जनार्दनाचा एका चरणरजरेण । नामपाठ संकीर्तन करा वेगीं ॥३॥
१८७५
नामपाठें जनाबाई बरोबरी । दळी कांडी हरि शेणी वेंची ॥१॥ भक्तांचे सकळ कार्य तें करणें । नये ऐसें उणें करी काम ॥२॥ जनार्दनाचा एक आवड पाहुनी । नाचतो कीर्तनीं नाम गाय ॥३॥
१८७६
नामपाठें ज्ञानियाची भिंत ओढी । भाविका तांतडी देव धांवे ॥१॥ बोलविला रेडा केलेंस कवित्व । नामपाठे मुक्त केलें जन ॥२॥ जनार्दनाचा एका लागतो चरणीं । जावे ओवाळीनी जन्मोजन्मीं ॥३॥
१८७७
नामपाठें तरला चोखा तो महार । भावें सर्वेश्वर स्थापीं तया ॥१॥ नामपाठ करुनि कीर्ति केली जगीं । उपमा तें अंगीं वाढविली ॥२॥ जनार्दनाचा एक वर्णितो संतांसी । नित्य नामपाठासी अनुसरला ॥३॥
१८७८
नामपाठें तारिलें पतित उद्धरिले । धांवणे तें केलें पांडवांचें ॥१॥ पडतां सकंटीं नामपाठ गाय । द्रौपदींती माय तारियेली ॥२॥ जनार्दनाचा एक सांगतसे लोकां । नामपाठ फुका जपा आधीं ॥३॥
१८७९
नामपाठें नक्र तारिला निर्धारें । गजेंद्र उद्धरे नामपाठे ॥१॥ तरले तरले नामेंचि तरले । वैकुंठासी नेले नामपाठें ॥२॥ जनार्दनाचा एका जोडोनियां हात । नामपाठ गात संतापुढे ॥३॥
१८८०
नामपाठें नक्र तारिला निर्धारें । गर्जेंद्र उद्धरें नामपाठें ॥१॥ तरले तरले नामेंचि तरले । वैकुंठासी नेले नामपाठें ॥२॥ जनार्दनाचा एका जोडोनियां हात । नामपाठ गात संतापुढें ॥३॥
१८८१
नामपाठें नामा शिंपी तो तरला तयाची देवाला आवड मोठी ॥१॥ जाऊनी जेवणें उच्छिष्ठ भक्षणें । नामपाठें देणें इच्छिलें तें ॥२॥ जनार्दनाचा एक सद्‍गदित होय । नामपाठ गाय आवडीनें ॥३॥
१८८२
नामपाठें निवृत्ति ज्ञानदेवा उपदेशी । ओहं सोहं कोहं साक्षी केले ॥१॥ तिन्हीपरता बोध तयासी बोधिला । नामपाठें झाला शांतरुप ॥२॥ जनार्दनाचा एक गमोनी मनासी । लागतो चरणांसी जनार्दना ॥३॥
१८८३
नामपाठें निवृत्ति पावला विश्रांती । नामपाठें शांति कर्माकर्मीं ॥१॥ म्हणोनि प्रेमभावें नामपाठ गावें । आलिंगन द्यावें संतचरण ॥२॥ जनार्दनाचा एका चिंता नामपाठ । मोक्षमार्ग वाट सोपा जगा ॥३॥
१८८४
नामपाठें बिभीषण सर्वांस वरिष्ठ । वंश तो स्पष्ट देशोधडी ॥१॥ जाउनी शरण चिरंजीव झाला । नामपाठें धाला कल्पवरी ॥२॥ जनार्दनाचा एक मिरवी बडिवार । नामपाठ सार युगायुगीं ॥३॥
१८८५
नामपाठें भीष्में कामातें जिंकीलें । सार्थक पैं केलें विहिताचें ॥१॥ आदरें आवडी नामपाठ गावें । सर्वावरी होय सत्ता त्याची ॥२॥ जनार्दनाचा एक होउनी शरण । घाली लोटांगण संतचरणीं ॥३॥
१८८६
नामपाठें मधुसुदन वाचे । अनंत जन्माचें दोष जाती ॥१॥ मधुनामे जैसा मोक्षकेशी वेधु । तैसा तूं बोधूं धरीं देहीं ॥२॥ जनार्दनाचा एका मधुर बोले वाणीं । मधुसूदन चरणीं देउनी दिठी ॥३॥
१८८७
नामपाठें मुक्त मुक्ताई पैं झाली । हृदयीं आटली नामपाठें ॥१॥ देहादेहे सर्व निरसिले चार्‍हीं । नामपाठ वरी मुक्त झाले ॥२॥ जनार्दनाचा एका बोले करुणावचनीं । नामपाठ झणीं विसरुं नका ॥३॥
१८८८
नामपाठें मोक्ष पाविजे तत्त्वतां । आणिक तें आतां साधन नाहीं ॥१॥ नामपाठ सार नामपाठ सार । न करी विचार आणिक दुजा ॥२॥ जनार्दनाचा एका नामपाठ गाय । आदरें नाचताहे संतापुढें ॥३॥
१८८९
नामपाठें वर्म वेदींचें तें कळे । नाम पाठबळें शास्त्रबोध ॥१॥ या दोहींचेंवर्म ज्ञानदेवी जाणा । जपें कां रे जना हृदयीं सदा ॥२॥ जनार्दनाचा एक विनित हो उनी । आठवितो मनी ज्ञानदेवा ॥३॥
१८९०
नामपाठें वामन अक्षरें तीं तीन । आणिक योगसाधन आन नाहीं ॥१॥ वदे तूं वामन वदे तूं वामन । विषय वमन करुनि सांडि ॥२॥ जनार्दनाचा एका नसे तो पारखा । वामन तेणें सखा जोडियेला ॥३॥
१८९१
नामपाठें संत पावले विसांवा । आणिक नाहीं ठेवा दुजा कांहीं ॥१॥ नामपाठें सिद्धि येईल हातां । मोक्षमार्ग तत्त्वतां नामपाठें ॥२॥ जनार्दनाचा एका नामपाठें तरला । उद्धार तो केला जडजीवां ॥३॥
१८९२
नामपाठें संदेह सर्व हा जाईल । गामपाठ गाईल प्रेमभावें ॥१॥ नामपाठ सोपा नामपाठ सोपा । अहर्निशीं बापा जप करी ॥२॥ जनार्दनाचा एका ठेउनी विश्वास । नामपाठ निजध्यास करीं सदा ॥३॥
१८९३
नामपाठें सर्व मुक्तत्त्व साधिती । नामपाठें विरक्ति हातां येत ॥१॥ नामपाठें उद्धव तरला तरला । नामपाठें झाला शापमुक्त ॥२॥ जनार्दनाचा एका बोले लडिवाळ । नामपाठ काळ काळाचाही ॥३॥
१८९४
नामपाठें सोपान समबुद्धि झाला । विश्रांती पावला संवत्सरीं ॥१॥ मुख्य ब्रह्मा तो नामपठ वंदी । इतर तरणे उपाधीपासोनियां ॥२॥ जनार्दनाचा एका कांही नेणें देखा । नामपाठें सुखा सुख झालें ॥३॥
१८९५
नामपाठें होय शुद्ध तें शरीर । आणिक विचार न करी कांहीं ॥१॥ नामपाठ भोळे नामपाठ भोळे । शंकर तो लोळे स्मशानीं तो ॥२॥ जनार्दनाचा एका प्रचीत घेउनी । नामपाठ वचनी जपतसे ॥३॥
१८९६
नामपुरुषोत्तम घेई तूं आवडी । यातना कल्पकोडी नाहीं तुज ॥१॥ नाम हें आठवी नाम हें आठवी । हृदयीं सांठवी पुरुषोत्तम ॥२॥ जनार्दनाचा एका पारखी नेटका । पुरुषोत्तम सखा जोडिलासे ॥३॥
१८९७
नामयाची आपदा संसारी होत । परि न सोडीच हेत पांडुरंगीं ॥१॥ म्हणोनियां प्रिय देवासी पैं जाहला । सांभाळी वेळोवेळां नामयासी ॥२॥ एका जनार्दनीं एकविधा भक्ति । तेथें राबे मुक्ति निशिदिनीं ॥३॥
१८९८
नामयाची कांता धुणें धुया गेली । परिसा भागवताची आली कन्या तेथें ॥१॥ उभयतां बैसोनि केलासे एकान्त । आपदा आमुची होत संसारात ॥२॥ तुम्हांसी तों देवें द्रव्य दिलें फ़ार । वस्त्र अलंकार शोभताती ॥३॥ एका जनार्दनीं बोलोनियां गोठी । होत असे कष्टी राजाई ते ॥४॥
१८९९
नामयाची जनी दासी पैं म्हणती । भावें तो श्रीपती वश केला ॥१॥ दासीचा हा शब्द पूर्वापार आहे । पुराणीं हा पाहे निवाडा तो ॥२॥ एका जनार्दनीं नामयाची दासी । प्रिय ते देवासी जाहली असे ॥३॥
१९००
नामयाचें घर मोडलें एके दिनीं । मजुर तयालागुनी मिळेचिना ॥१॥ हिंडतां भागलें मजूर न मिळे । आले ते सकळ गृहालागीं ॥२॥ पांडुरंग तेथें होउनी मजूर । शाकारिलें घर नामयाचें ॥३॥ एका जनार्दनीं उणें नेदी भक्ता । आपण तत्वतां अंगे राबें ॥४॥
१९०१
नामयासी बोलतसे दामशेटी । कोणाचे कर्णी गोठी सागूं नको ॥१॥ आपणांसी देवें द्रव्य हें दिधलें । तूं कां म्हणसी वहिलें द्यावें तया ॥२॥ एका जनार्दनीं भक्ताचा महिमा । वाढविणें पुरुषोत्तमा आपुलें काजा ॥३॥
१९०२
नामरुप मज आणिलें जिहीं । त्यांचिया उपकार नोहें उतराई ॥१॥ भक्तांचे उपकार कशानें फेडीं । यालागीं त्याचें उच्छिष्ट काढी ॥२॥ भक्ताचेनी पालटे येतो गर्भवास । उपकार उतराई नोहे कैसा ॥३॥ एका जनार्दनीं उतराई नोहे । यालागीं भक्तांसी न विसंबें जीवें ॥४॥
१९०३
नामविण मुख सर्पाचें तें बीळ । जिव्हा नव्हे काळसर्प आहे ॥१॥ वाचा नव्हे लांव जळो त्याचे जिणें । यातना भोगणें यमपुरी ॥२॥ वैष्णवांचें गुह्मा मोक्षाचा एकांत । अनंताचा अंत पाहतां नाहीं ॥३॥ आदि मध्य अंती अवघा हरि एक । एकचि अनेक एक हरि ॥४॥ एकाकार झाले जीव तेचि दोन्ही । एका जनार्दनीं ऐसें केलें ॥५॥
१९०४
नामस्मरण अहो जना । तेणें तुटें भवबंधना । येचि देहि येचि काळीं । भजीजे रे नाम जाण ॥१॥ ध्रुव अजामेळ गणिका । नाममात्रें तारिले देखा । आणिकाही भक्त देखा । मोक्ष पावले नामें एका ॥२॥ जो जो कोणी प्रेमें भजतां । पाविजेल सायुज्यता । ऐशी भाक घे रे आतां । जप तप नाम स्मरतां ॥३॥ दीनबंधु दयासिंधु । जेणें केला परमानदु । दृष्ट जना करी भेदु । एका जनार्दनीं नित्यानंदु ॥४॥
१९०५
नामा आणि दामा बाप लेक दोन्ही । राजाई गोणाई । सासु सुना ॥१॥ नारा महादा गोंदा विठा चवघे पुत्र । जन्मले पवित्र हरिभक्त ॥२॥ आउबाई लेकी नाउबाई बहिणी । तिहीं चक्रपाणी वेधियेला ॥३॥ लाडी आणि येसी बहिना साकराई । एका जनार्दनीं पाही वंशावळी ॥४॥
१९०६
नामा न जातां राउळासी । विठु जातसे घरासी ॥१॥ अरे नाम्या म्हणोनि बाहे । शिव्या देती बापमाय ॥२॥ आमुच्या पोरासी सवे । येणें लावियेली पाहें ॥३॥ करुं नेदी संसारकाम । एका जनार्दनीं हा निष्काम ॥४॥
१९०७
नामाचा उच्चार करितां कोण्ही हांसे । तयासी होतसे नरकवास ॥१॥ साबडे बोबडे गावोत भलते । परि ते सरते पांडुरंगा ॥२॥ अभाविकनें मांडिला पसारा । तया नाहीं थारा उभयलोकीं ॥३॥ एकाजनार्दनीं भावाचें भजन । दंभाचें कारण नाहीं देवा ॥४॥
१९०८
नामाचा धारक । हरिहरां त्याचा धाक ॥१॥ ऐसें नाम समर्थ । त्रिभुवनीं तें विख्यात ॥२॥ नामें यज्ञयाम घडती । नामें उत्तम लोकी गती ॥३॥ नामें भुक्ति मुक्ति तिष्ठें । नामें वरिष्ठा वरिष्ठें ॥४॥ नामें सर्व सत्ता हातीं । नामें वैकुंठीं वसती ॥५॥ नामें होती चतुर्भूज । एका जनार्दनीं सतेज ॥६॥
१९०९
नामाचा नित्य जया छंद । त्याचा तुटे भवबंध ॥१॥ ऐसा माना रे विश्र्वास । घाला रामनामीं कास ॥२॥ मागील पहा अनुभवें । नामें तारिलें दोषी वैभवें ॥३॥ स्त्रीपुत्रादिक अत्यंज । नामें पावन केलें सहज ॥४॥ यवनादि मोमीन । नामें तरले अधम जन ॥५॥ हाकारुन नाम घोका । सांगे जनार्दन एका ॥६॥
१९१०
नामाचे पोवाडे वर्णिती साबडे । हरिनामें बागडे रंगले ते ॥१॥ नामापरतें आन नेणती सर्वथा । साधन चळथा वायां जाय ॥२॥ नाम निजधीर मानुनी भरंवसा । गाती ते उल्हासा रात्रंदिन ॥३॥ एका जनार्दनीं ध्यानीं आणि मनीं । नाम संजीवनीं जपतसे ॥४॥
१९११
नामाचें धारक विष्णुरुप देख । त्रिभुवनीचें सुख तये ठायीं ॥१॥ ब्रह्मा विष्णु हर येताती सामोरे । नामधारक निर्धारे तया वंद्य ॥२॥ त्रिभुवनापरता नामाचा महिमा । जाणे शंकर उमा सत्य सत्य ॥३॥ एका जनार्दनीं पतीतपावन नाम । गातां निजधामा जोडे मुक्ति ॥४॥
१९१२
नामाचें महिमान सादर ऐका । तारियेले देखा महापापी ॥१॥ पापाची ते राशी अजामेळ जाण । जपतांचि पावन नामें जाहला ॥२॥ गणिका पांखिरूं नाम जपे सदा । नोहे तिसी बाधा गर्भवासा ॥३॥ एका जनार्दनीं कलीमाजीं नाम । उत्तम उत्तम जपा आधीं ॥४॥
१९१३
नामाच्या उच्चारें प्रल्हाद तारिला । अजामेळ गणिकेचा उद्धार केला ॥१॥ तें नाम सोपें श्रीरामाचें । निरंतर वाचे जप करी ॥२॥ करी सर्व भावें रामनाम बोभाट । कळिकाळाचे थाट पुढें पळती ॥३॥ पळतील पातकें नाम उच्चारितां । एका जनार्दनीं म्हणतां रामनाम ॥४॥
१९१४
नामापाठ माधव सदा तूं उच्चारी । माधव अंतरीं धरुनी राहे ॥१। माधवा माधवा आठवी यादवा । आणिक धांवा धांवा करुं नको ॥२॥ जनार्दनाचा एक माधवीं मुराला । वसंत तयाला जनार्दन ॥३॥
१९१५
नामापाशीं तिष्ठे देव । नामापाशीं वसे भाव । नामापाशी मुक्ति गौरव । अहर्निशीं वसतसे ॥१॥ नामापाशी ऋद्धिसिद्ध । नामापाशीं ते समाधी । नामें तुटती उपाधी । जन्मोजन्मीच्या ॥२॥ नामापाशीं भुक्ति मुक्ति । नामापाशी ते विरक्ती । नामें पातकें नासती । बहु जन्माचीं ॥३॥ एका जनार्दनीं नाम । गातां निरसे भवभ्रम । साधन उत्तम । कलियुगामाझारीं ॥४॥
१९९६
नामामृत गोडी वैष्णव जाणती । येर चरफडती काग जैसें ॥१॥ प्राकृत हे जन भुललें विषया । नामाविण वांया जाती देखा ॥२॥ नामें साधे मुक्ति नामें साधे भुक्ति । नामेंचि विरक्ति होत आहे ॥३॥ नाम तेंचि जालें वर्णरुपातीत । अनाम सतत उभे असे ॥४॥ एका जनार्दनीं पूर्ण नामबोध । विठ्ठलनामीं छंद सदा असो ॥५॥
१९९७
नामामृत पुढे । कायसें अमृत बापुडें ॥१॥ ऐसा नामाचा बडिवार । गोडी जाणे गिरिजावर ॥२॥ नामें जोडें ब्रह्माज्ञान । भुक्ति मुक्ति नामें जाण ॥३॥ एका जनार्दनीं सार । ब्रह्माज्ञानाचें हें घर ॥४॥
१९१८
नामीं धरा दृढ विश्वास । घाला कळिकाळावर फास । नाम हाचि निजध्यास । रात्रंदिवस स्मरण ॥१॥ सोपें वर्म कलिमाजीं । नामें तरती जन सहजीं । योगयाग तप साधनें जीं । तया प्राप्ती नामेंची ॥२॥ नाम साधनांचे सार । सोपा मंत्र हरि उच्चार । एका जनार्दनीं सार । निवडोनि काढिलें ॥३॥
१९९१
नामे प्राप्त नित्यानंद । नामें होय परम पद । नामें निरसे भकंद । नाम तारक निर्धार ॥१॥ हेंचि मना दृढ धरीं । वांया नको पंडु फेरी । तेणें होसी हाव भरी । मग पतनीं पडशील ॥२॥ म्हणे एका जनार्दनीं । नामें तरती अधम जन । नामें होय प्राप्त पेणें । वैकुंठचि निर्धारें ॥३॥
१९२०
नामे प्रायाश्चित्तांच्या कोटी । पळताती बारा वाटी ॥१॥ ऐसें नाम समर्थ जपा । तेणें सोपा सुपंथ ॥२॥ रामानामें पतित पावन । रामनामें उद्धरती जन ॥३॥ एका जनार्दनीं वाचे । घोका साचे रामनाम ॥४॥
१९२१
नामें घडे निज शांति । तेथें वसे भुक्ति मुक्ति । नाम तारक त्रिजगतीं । दृढभावें आठवितां ॥१॥ म्हणोनि घेतलासे लाहो । रात्रंदिवस नाम गावो । कळिकाळाचे भेवो । सहज तेथें पळतसे ॥२॥ मज मानला भरंवसा । नामीं आहे निजठसा । एका जनार्दनीं सर्वेशा । नाम जपे अंतरीं ॥३॥
१९२२
नामें तारिले पातकी । नाम थोर तिहीं लोकीं । नामें साधे भुक्ति मुक्ति । नाम कलीं तारक ॥१॥ नको जाऊं वनांतरीं । रानीं वनीं आणि डोंगरी । बैसोनियां करीं । स्थिर चित्त निमग्न ॥२॥ नामें साधलें साधन । तुटले बहुतांचे बंधन । एका जनार्दनीं शरण । नाम वाचे उच्चारी ॥३॥
१९२३
नामें तारिलें तारिले । महा पातकीं उद्धारिलें ॥१॥ ते हें सोपें रामनाम । जपतां निवारे क्रोध काम ॥२॥ नामें पावन जाले क्षिती । ऐसे पुराणे गर्जती ॥३॥ नाम सारांचे हें सार । एका जनार्दनीं निर्धार ॥४॥
१९२४
नामें धुवा अढळपद । नामें गणिका मोक्षपद । नामें अजामेळ शुद्ध । नामें वाल्हा उद्धरला ॥१॥ धन्य धन्य नाम बळी । महादोषां होय होळी । सोपें जपतां नामावळी । रामकृष्ण गोपाळ ॥२॥ नामें भुक्ती आणि मुक्ति । नामें एकचि सर्वा गती । एका जनार्दनीं शांती । नामें होय सकळां ॥३॥
१९२५
नामें पावन इये लोकीं । नामें पावन परलोकीं । नाम सदा ज्याचें मुखीं । धन्य तो नर संसारीं ॥१॥ नामें कलिमल दहन । नाम पतीतपावन । नाम दीनोद्भारण । नाम जनार्दन वदतां ॥२॥ नाम गातां सुख वाटे । प्रेमे प्रेम तें कोंदाटें । एका जनार्दनीं भेटें । नाम गातां निश्चयें ॥३॥
१९२६
नामें पावन हीन याती । नाम जपती अहोरात्रीं । नामापरती विश्रांती । दुजी नाहीं प्राणियां ॥१॥ नका भ्रमुं सैरावैरा । वाउगे तप साधन पसारा । योग याग अवधारा । नामें एका साधतसे ॥२॥ व्रत तप हवन दान । नामें घडे तीर्थ स्नान । एका जनार्दनीं मन । स्थिर करुनि नाम जपा ॥३॥
१९२७
नामें पाषाण तरले । महापापी उद्धरिले । राक्षसादि आसुर तरले । एका नामें हरिच्या ॥१॥ घेई नाम सदा । तेणें तुटेल आपदा । निवारेल बाधा । पंचभुतांची निश्चयें ॥२॥ हो कां पंडित ब्रह्माज्ञानीं । तरती तारिती मेदिनी । शरण एका जनार्दनीं । नाम उच्चरणीं आनंद ॥३॥
१९२८
नामें प्रायश्चिती शिक । हाचि देख परमार्थ ॥१॥ श्रेष्ठ नाम पावन जगीं । तरतीं अंगीं अधम जन ॥२॥ नेणती यांसी सोपें वर्म । जाणती कर्म सर्वही ॥३॥ कळाकुसरी कांहीं नका । वाचे घोका रामनाम ॥४॥ एका एकापणें मीनला । एका जनार्दनीं भेटला ॥५॥
१९२९
नामेंचि क्षितीं उद्धरले । मुक्त जाहले पातकी ॥१॥ अजामेळ गणिका नारी । मुक्त निर्धारी नामेंचि ॥२॥ वाटपाडा वाल्मीक । नामें तरला निश्चयो देख ॥३॥ राम स्मरा दिननिशीं । ऋद्धि सिद्धि होती दासी ॥४॥ नाम तारक त्रिभुवनीं । शरण एका जनार्दनीं ॥५॥
१९३०
नामेंचि तरलें नामेंचि तरले । जडजीव उद्धरिले कलियुगी ॥१॥ ऐसें नाम समर्थ नाम विख्यात । नामेंचि पवित्र नरनारी ॥२॥ पापांचे पर्वत नामाग्नीनें शांत । येरा कोण मात नामापुढें ॥३॥ एका जनार्दनीं तारक हें नाम । पावती निजधाम गातां वाचे ॥४॥
१९३१
नामेंचि पावलें पैलपार । शुकादि साचार नामें जगीं ॥१॥ तें नाम सोपें वाचे रामकृष्ण । उच्चिरतीं जाण वैकुंठ जोडे ॥२॥ नामें पावले मोक्षपद गती । नाम हे विश्रांती सर्व जीवां ॥३॥ एका जनार्दनीं नाम हें तारका । वेदाचा विवेक रामनाम ॥४॥
१९३२
नाम्या झडकरी जाई तूं घरासी । चिंता ती मानसीं करुं नको ॥१॥ तुझा छंद आहे माझिये मानसीं । तूं वेगीं घरासी जाय आतां ॥२॥ एका जनार्दनीं वंदुनी चरण । नामा आला जाण घरालागीं ॥३॥
१९३३
नाम्याचे लग्नासाठी । चिंता करी दामशेटी ॥१॥ नाहीं आपुले जवळी धन । कैसें होईल याचें लग्न ॥२॥ रात्रंदिवस गोणाईसी । निद्रा न ये पैं नेत्रांसी ॥३॥ माझ्या नामयाचें लग्न । एका जनार्दनीं करील कोण ॥४॥
१९३४
नाम्याचें कारण देवें नवल केले । धोंडोबाचे जाहलें सुवर्ण तें ॥१॥ गोणाई दामशेटीतें आनंद पैं जाहला । म्हणती भला भला नामा आमुचा ॥२॥ न कळे लाघव देवाचें सर्वथा । म्हणती नामा आमुचा कर्ता जाहला आतां ॥३॥ एका जनार्दनीं द्रव्याचिया आशा । विसरले सर्वेशा पांडुरंगा ॥४॥
१९३५
नाम्यासी सांगतां नायके विचार । येणें फ़जितखोर केला नामा ॥१॥ घेउनी जवळी बैसे एकान्तासी । सुचुं नेदी त्यासी कामधाम ॥२॥ शिकविलें नायके व्यापारा न जाये । धरले मनीं पाय विठोबाचे ॥३॥ एका जनार्दनीं यासी युक्ति काय । पुढे कार्य आहे नामयाचे ॥४॥
१९३६
नारद ब्रह्माचारी । रामनामें नाचे निर्धारी ॥१॥ ब्रह्मावीणा घेऊनी खांदीं । रामनाम मुखीं समाधिस्थ ॥२॥ एका जनार्दनीं नाम । श्रीरामें पाविजें निजधाम ॥३॥
१९३७
नारदादी वैष्णवजन । नामेंजि पावले समाधान । नामें जगासी मंडन । नाम पावन सर्वांसी ॥१॥ लाहो करा राम नाम । वावुगा सांडा भवभ्रम । अवघा कुळधर्म । नामें जाण साधतो ॥२॥ नाम जपा दिननिशीं । आळस नका करुं मानसीं । एका जनार्दनीं सायासीं । नका पडूं दुजिया ॥३॥
१९३८
नारदें केलासे प्रश्न । सांगतसे जगज्जीवन । कलीमाजी प्रमाण । कीर्तन करावें ॥१॥ महापापीया उद्धार । पावन करती हरिहर । ब्रह्मादि समोर । लोटांगण घालिती ॥२॥ श्रुति स्मृति वाक्यार्थ । कीर्तन तोचि परमार्थ । शास्त्रांचा मथितार्थ कीर्तनपसारा ॥३॥ एक शरण जनार्दन । किर्तनें तरती विश्वजन । हें प्रभुंचे वचन । धन्य धन्य मानावें ॥४॥
१९३९
नारा महादा गोंदा विठा चौघे पुत्र जाहले । आनंदे लागले हरिभजनीं ॥१॥ नित्यकाळ वाचे विठ्ठलाचा छंद । आठविती गोविंद वेळोवेळां ॥२॥ एका जनार्दनीं कायावाचामन । वेधलेंसे जाण विठ्ठलचरणीं ॥३॥
१९४०
नावडे जयासी पंढरी । तोचि जाणा दुराचारी ॥१॥ नावडे जया चंद्रभागा । तोचि अपवित्र पैं गा ॥२॥ नावडे पुंडलिका वंदन । तोचि चांडाळ दुर्जन ॥३॥ नावडे विठ्ठलाची मूर्ति । तोचि जगी पापमति ॥४॥ एका जनार्दनीं शरण । तोचि दुराचारी जाण ॥५॥
१९४१
नावडे वैकुंठ शेषशयन । वैष्णव संतजन आवडले ॥१॥ रमा म्हणे कैसी नवल परी । देव भुलले वैष्णवाघरीं ॥२॥ जो नातुडे ध्यानीं समाधीसाधनीं । तो स्वानंदें कीर्तनीं नाचतसें ॥३॥ जो यज्ञावदानीं कांहीं नेघे माये । तो द्वादशीं क्षीराब्धी उभ उभ्या खाये ॥४॥ लक्ष्मी म्हणे देव आतुडे कवणें बुद्धी । वैष्णवांची सेवा करावी त्रिशुद्धि ॥५॥ वैष्णवाघरें लक्ष्मी कामारी । एका जनार्दनीं देव दास्यत्व करी ॥६॥
१९४२
नावडे़चि आन । एका विठ्ठलावांचून ॥१॥ नावडे संसार सर्वथा । आवड बैसली पंढरीनाथा ॥२॥ नायके शिकविलें कोणाचें । विठ्ठल विठ्ठल साचें ॥३॥ एका जनार्दनीं मन । विठ्ठलीं लागलेसें ध्यान ॥४॥
१९४३
नाशिवंत देह जाणार जाणार । हा तो निराधार स्वप्नत ॥१॥ अभ्रींची छाया क्षणिक साचार । तैसा हा प्रकार नाशिवंत ॥२॥ मृगजळाचें जीवन क्षणिक निर्धार । तैसा हा विचार व्यर्क्थ सर्व ॥३॥ एका जनार्दनीं नाशिवंतासाठीं । केवढी आटाआटी प्राणी करती ॥४॥
१९४४
नाशिवंत देह नाशिवंत माया । नाशिवंत काया काया काज ॥१॥ यमाचा पाहुणा जाणार जाणार । काय उपचार करुनी वायां ॥२॥ छायेसी बैसला सवेंची तो गेला । वृक्ष रडूं लागला गेला म्हणोनी ॥३॥ पाथस्थ मार्गस्थ येऊनी राहिला । उदय होतां निघाला आपुल्या मार्गें ॥४॥ तो घरधनीं रडत धावें मागें । काय काज वेगें सांगा तुम्हीं ॥५॥ उसनें आणीतां सुख वाटे जीवा । देतां दुःख जीवा काय काज ॥६॥ पाहुणा हा देह जाईल टाकुनी । एका जनार्दनीं काय दुःख ॥७॥
१९४५
नाशिवंत देह नाशिवंत माया । नाशिवंत छाया वाया जैशी ॥१॥ म्रुगजळाचे परी नाशिवंत धन । यासी तुं भुलुन गुंतलासी ॥२॥ व्यापारी बाजारीं घातिलें दुकान । स्ती पुत्र स्वजन तैसे बापा ॥३॥ एका जनार्दनीं ऐशियाच्या छंद । भुलोनी गोविंदा विसरसी ॥४॥
१९४६
नाशिवंत धन नाशिवंत मान । नाशिवंत जाण काया सर्व ॥१॥ नाशिवंत देह नाशिवंत संसार । नाशिवंत विचार न करती ॥२॥ नाशिवंत स्त्रीपुत्रादिक बाळें । नाशिवंत बळें गळां पडती ॥३॥ एका जनार्दनीं सर्व नाशिवंत । एकचि शाश्वत हरिनाम ॥४॥
१९४७
नाशिवंत शरीर ओंगळ ओखंटें । परी तया भेटे कर्म धर्म ॥१॥ अशाश्वत शाश्वत हेंचि उमगा मनीं । तया चक्रपाणी धांवे मागें ॥२॥ देहींचे देहपण देहाचिये माथां । कर्म धर्म सत्ता देहालागीं ॥३॥ एका जनार्दनीं कर्म धर्म पाठीं । वायीं भ्रम पोटीं घेती जीव ॥४॥
१९४८
नाशिवंत सकळीक । शाश्वत माझा नायक ॥१॥ बरवें मजला कळलें । पूर्वपुण्य तें फळलें ॥२॥ प्रपंच अवघा दुःखरूप । सुखरुप आत्मस्वरुप ॥३॥ स्वरुपीं रमल्या भय नाहीं । एक जनार्दनाचे पायीं ॥४॥
१९४९
नाशिवंत सर्व एक नाम साचें । म्हणोनि वदा वाचे श्रीराम ॥१॥ शरीर नासे संपत्ति नासे । नाम न नासे श्रीरामाचें ॥२॥ आकार नसे निराकार नासे । नाम नासे श्रीरामाचें ॥३॥ स्थुळ नासे सुक्ष्म नासे । नाम न नासे श्रीरामांचे ॥४॥ जें न नासे तें नाम वाचे । एक जनार्दनीं साचें जप करीं ॥५॥
१९५०
नाही नामासी साधन । निरहार न उगे उपोषण । नको दंडन मुंडन । सुखे वाचे आठवी ॥१॥ काया कष्ट नको कांहीं । देश विदेशासी न जाई निवांतची ठायीं । बैसोनिया जपे ॥२॥ नको वित्त धन नाश । होउनी देहींच उदास । एका जनार्दनीं नाश । नको करूं शरीराचा ॥३॥
१९५१
नाहीं अटक काळ वेळ । सदा सोंवळें हरिनाम ॥१॥ भलते वेळीं भलते काळीं । वाचे वदा नामावळी ॥२॥ न लगे मुहूर्त अथवा योग । संकल्प सांग मनाचा ॥३॥ एका जनार्दनीं नेम । सोपें नाम जपतां ॥४॥
१९५२
नाहीं कधी वाचे नाम । तो अधम न पहाव ॥१॥ होतं त्याचे दरुशन । सचैल स्नान करावें ॥२॥ तयासी ते ऐकता मात । होय घात शरीराचा ॥३॥ ऐसा अधम तो जनीं । नामहीन असतो प्राणी ॥४॥ म्हणोनि नाम आठवावें । एका जनार्दनीं जीवेंभावें ॥५॥
१९५३
नाहीं जाय भाव पोटीं । तया चावटीं वाटे नाम ॥१॥ परी येतां अनुभव । चुकवी हाव संसार ॥२॥ वेरझारीं पडे चिरा । नाहीं थारा जन्माचा ॥३॥ एका जनार्दनीं खंडे कर्म । सोपें वर्म हातां लागें ॥४॥
१९५४
नाहीं ध्यान तें अंतरीं । सदा विषयी दुराचारी ॥१॥ स्वप्नीं नेणें नामस्मरण । करी विषय सेवन ॥२॥ अतीत अभ्यागत । जया नावडे चित्तांत ॥३॥ एका शरण जनार्दनीं । ऐसा पामर तो जनीं ॥४॥
१९५५
नाहीं नामरुप गुण कर्म । पाहतां अवघे परब्रह्मा ॥१॥ पिंडी आणि ब्रह्माडीं । भरला असे नवखंडीं ॥२॥ रिता नाहीं कोठें ठाव । जिकडे पाहे तिकडे देव ॥३॥ एका जनार्दनीं भाव । अवघा माझा गुरुराव ॥४॥
१९५६
नाहीं सायासाचें काम । वाचे वदा रामनाम ॥१॥ बहु कर्मा सोडवण । वाचेसि न घडे मौन ॥२॥ राम चिंता ध्यानीं मनीं । कळिकाळ वाहे पाणी ॥३॥ एका जनार्दनीं राम । वाचे उच्चारा निष्काम ॥४॥
१९५७
निःशेष कांहीं नेणिजे । तें शुद्ध ज्ञान म्हनिजे । मा सर्व जें जेणें जाणिजे । तें अज्ञान कैसें बा ॥१॥ ज्ञान तें कवण अज्ञान ते कवण । दोहोंचें लक्षण पाहतें पाहा ॥धृ॥ ज्ञानाचें जें ज्ञातेपण । तया नांवाची अज्ञान । अज्ञानाचें जे ज्ञान । तया नांव शुद्ध ज्ञान ॥२॥ ज्ञान तें अज्ञाना आलें । अज्ञान तें ज्ञाना गेलें । एका जनार्दनीं मुलें । बागुलाचीं दोनीं ॥३॥
१९५८
निकट असतांची देव । नेणती ते अहंभाव ॥१॥ ऐसे व्यापले मूढपणें । विसरले जनार्दनें ॥२॥ जे पासाव सर्व युक्ति । तयातें मुमुक्षु वदती ॥३॥ ऐसा ज्ञानियाचा भाव । तया देवपण दिसे वाव ॥४॥ ज्ञानविज्ञान नको देवा । मज चरणाजवळीं ठेवा ॥५॥ एका जनार्दनीं वाणी । दुजी नको अंतःकरणीं ॥६॥
१९५९
निकट सेवे धांऊनि आला । पृष्ठी राहिला उभाची ॥१॥ ऐसा क्षीरसिंधुवासी । भक्तापाशीं तिष्ठत ॥२॥ नाहीं मर्यादा उल्लंघन । समचरण विटेवरी ॥३॥ एका जनार्दनीं गोजिरें ठाण । धरुनी जघन उभा हरी ॥४॥
१९६०
निगुर्णाची प्राप्ति सगुणाचें योगें । वरि भक्ति अंगीं दृढ भाव ॥१॥ नलगे ध्यान प्रौढी योगयाग तपें । ज्ञानचियें बापें हातां नये ॥२॥ पाहिजे समता सर्वाभूती भाव । मुंगी आणि राव सारखेची ॥३॥ एका जनार्दनीं हेंचि हातवटीं । देवा तुझी भेटी तरीच होय ॥४॥
१९६१
निघतां उत्तम शकुन ते जाहले । तेणें संतोषलें चित्त त्याचे ॥१॥ तांतडीनें द्वारके येऊनि पावला । सभामंडप देखिला दृष्टी भरी ॥२॥ एका जनार्दनीं द्वारपाळ पुसती । तुम्ही कोण तें निश्चितीं सांगा द्विजा ॥३॥
१९६२
निज दृष्टीवरी जाण । काम निवारी दारून ॥१॥ याचा नको घेऊं वारा । सैर सांडीं हा पसारा ॥२॥ कामक्रोधाचें हें बंड । याचें छेदी विवेकें तोंड ॥३॥ शांति क्षमा धरूनि आधीं । ब्रह्माज्ञान मग साधीं ॥४॥ हेंचि भक्तीचें लक्षण । सांगे एका जनार्दन ॥५॥
१९६३
निज पैसा समरसें । गोकुळा आली द्वेषे । कृष्णामुखीं विषें । निर्विष जाली ॥१॥ सोडीं सोडीं बा कान्हा । आक्रंदे पुतना । मागुती जनार्दना । मी न ये येथें ॥२॥ कृष्ण स्वानंदाचा कंदु । कंसासी विरोधु । विषय विषा पाजुं । पुतना आली ॥३॥ मी म्हणे बाळ तान्हें । त्वा शोषिलें जीवें प्राणें । मागुतें येणें । खुटलें बापा ॥४॥ ऐसा कैसा रे होसी । मी तुझी रे माउशी । परतोनी गोकुळासी । मी नये बापा ॥५॥ ऐसा कैसा बाळ । माझ्या शोखिल्या जीवनकळा । यशोदा वेल्हाळा । वाचली कैसी बा ॥६॥ एका जनार्दनी । द्वेषाच्या भावना । सायुज्यसदना । अरि वर्ग ॥७॥
१९६४
नित्य कर्माचें लक्षण । स्नानसंध्या पितृतर्पण ॥१॥ ब्रह्मायज्ञ देवपूजा । करावी त्या अधोक्षजा ॥२॥ वैश्वदेव अतिथी पूजन । आचारांवें नित्य जाण ॥३॥ एका जनार्दनीं कर्म । तेंचि जाणा परब्रह्म ॥४॥
१९६५
नित्य काळ जेथें नामाचा घोष । तेथें जगन्निवास लक्ष्मीसहित ॥१॥ ब्रह्माज्ञान तेथें लोळती अंगणीं । सेवुनी पायवणी घरी राहे ॥२॥ विष्णुदास तयाकडे न पाहाती फुका । नाम मुखीं देखा रामकृष्ण ॥३॥ एका जनार्दनीं ऐसा ज्याचा नेम । तया घरीं पुरुषोत्तम सदा वसे ॥४॥
१९६६
नित्य काळ वाचे जया नाम छंद । तयासी गोविंद मागे पुढें ॥१॥ घात आघात निवारित । छाया पीतांबरी करीत ॥२॥ ऐसा भक्तांचा अंकीत । राहे उभाची तिष्ठत ॥३॥ एका जनार्दनीं वेध । वेधामाजीं परमानंद ॥४॥
१९६७
नित्य घडे चंद्रभागे स्नान । श्रीविठ्ठलदरुशन ॥१॥ त्याच्या पुण्या नोहे लेखा । पहा द्रुष्टी पुंडलिका ॥२॥ उजवें घेतां राऊळासी । जळती पातकांच्या रासी ॥३॥ संतांसवें कीर्तन करितां । आनंदे टाळी वाजवितां ॥४॥ मोक्ष जोडोनियां हात । तयाची वाट तो पहात ॥५॥ धन्य पंढरीचा संग । एक जनार्दनीं अभंग ॥६॥
१९६८
नित्य तो सोहळा करिताती सुरवर विचार पहावयाला देव येतो ॥१॥ अंतरी सुरवर विचार करिती । काला श्रीपती करित स्वयें ॥२॥ उच्छिष्ट प्रसाद सेवुम धणीवरी । मत्स्यरुप निर्धारी घेती सर्व ॥३॥ एका जनार्दनीं जाणतसे खुण । म्हणोनि विंदान आरंभिलें ॥४॥
१९६९
नित्य ध्यातां हरिचे चरण । करी भक्त दुःखहरण ॥१॥ चरणरज पवित्रता । सदा घ्यावेंचि माथा ॥२॥ लागला पाषाणा चरण । ती स्त्रीची जाली पावन ॥३॥ ऐसें चरणींचे मान । शरण एका जनार्दन ॥४॥
१९७०
नित्य नवा कीर्तनीं कैसा वोढवला रंग । श्रोता आणि वक्ता स्वयें जाला श्रीरंग ॥१॥ आल्हादें वैष्णव करती नामाचा घोष । हरिनाम गर्जतां गगनीं न माये हरुष ॥२॥ पदोपदीं कीर्तनीं निवताहे जन मन । आवडी भुकेली तिनें गिळिलें गगन ॥३॥ एका जनार्दनीं गातां हरीचें नाम । निमाली इंद्रियें विषय विसरली काम ॥४॥ संतमहिमा
१९७१
नित्य नूतन दीपज्वाळा । होती जाती देखती डोळा ॥१॥ जागृति आणि देखती स्वप्न । दोहींसी देखतां भिन्न भिन्न ॥२॥ भिन्नपणें नका पाहुं । एका जनार्दनीं पाहूं ॥३॥
१९७२
नित्य नैमित्तिक कर्म । जया न घडे हा धर्म । येणें उच्चारावें नाम । सत्य निर्धार जाणावा ॥१॥ नामें कर्माचा सुटे उपाधी । नामें तुटे आधी व्याधी । नामें शोक संदेह बुद्धी । नासतसे हरिनामें ॥२॥ नाना रोग तुटती नामें । घडती सर्व ब्रह्माकर्में । एका जनार्दनीं नामें । धर्म सकळ साधती ॥३॥
१९७३
नित्य नैमित्तिक कर्मे आचरावीं । तिहीं तें पावावी चित्तशुद्धि ॥१॥ चित्त स्थिर होण्या करी उपासना । भजे नारायणा एका भावें ॥२॥ विवेक वैराग्य प्राप्ति तत्प्रसादें । चित्ता लागे वेध सद्‍गुरूचा ॥३॥ सदगुरुकृपेनें पूण बोध होय । नित्य त्याचें हृदयीं धरी ॥४॥ एका जनार्दनीं ठेवूनियां मन । मनाचें उन्मन पावलासे ॥५॥
१९७४
नित्य वाचे वदे हरि । होय बाहेरी महापापा ॥१॥ ऐसा पुराणीचा बोध । वाचे गोविंदा आठवा ॥२॥ एका जनार्दनीं वेदवाणी । नारायणीं स्मरावें ॥३॥
१९७५
नित्य शिव शिव आठव । तुटेल जन्ममरण भेव ॥१॥ दुजें नाहीं पैं साधन । वाचे वादावा इशान ॥२॥ ऋद्धिसिद्धि पाया लागे । हृदयीं सदाशिव जागे ॥३॥ शंकर हा जया चित्तीं । जवळी तया भुक्ति मुक्ति ॥४॥ एका जनार्दनीं सर्वदा । महादेव वाचे वदा ॥५॥
१९७६
नित्य हरिकथा वैष्णव सांगात । तोचि परमार्थ शुद्ध त्याचा ॥१॥ नाहीं कधीं द्वैत सदा तें अद्वैत । अभेदरहित सर्वकाळक ॥२॥ परमार्थसाधनीं झिजवितसें अंग । वाउगा उद्योग न करी कांहीं ॥३॥ एका जनार्दनीं ऐसा ज्याचा हेत । त्याचे मनोरथ पूर्ण होती ॥४॥
१९७७
नित्य हाटपाय आचार सपाट । कारभार दाट असत्याचा ॥१॥ कैंचे सोवळें कैंचें ओवळें । प्रातःकाळीं शिळें भक्षिताती ॥२॥ कैंचे चोखटपण अंतरीं मळीन । दिसे कळाहीन पापिष्ठ तो ॥३॥ एका जनार्दनीं अवघा अनाचार । दाविती आचार वरीवरी ॥४॥
१९७८
निबलोण करुं पंढरीया सुखा । आणि पुडंलिका भक्तराया ॥१॥ परलोकींचे येती परतोनि मागुती । सर्व सुख येथें पहावया ॥२॥ अष्ट महासिद्धि जयाचिये द्वारीं । होऊनि कामारी वोळंगतीं ॥३॥ मुक्तिपद देतां न घे फुकासाठीं । ते हिंडे वाळुवंटी दीनरुप ॥४॥ एका जनार्दनीं करे निभलोण । विटेसहित चरण ओवाळावें ॥५॥
१९७९
निमालिया देहासाठीं । रांडा पोरें म्हणती होटीं ॥१॥ तयासाठीं न रडती । आपुलें म्हणीता कैसे होती ॥२॥ ऐसे भुलले पामर नरक भोगिती अघोर ॥३॥ एका शरण जनार्दनीं । रामनाम न घेती कोणी ॥४॥
१९८०
निमालें राहिलें गेले ऐसे म्हणती । वायां फजीत होती आपुल्या मुखें ॥१॥ नासलें कलेवर घेऊनियां मांडीं । वाउगे तें तोंडी बोलताती ॥२॥ स्वयें आत्मज्योति जया नाहीं आदिअंत । तो आत्मा प्रत्यक्ष निमाला म्हणती ॥३॥ एका जनार्दनीं उफराटी बोली । कैसी भ्रांती पडली त्यांचे मनीं ॥४॥
१९८१
निमासुर वदन । शंखचक्राकित भूषण । शोभवते राजीवनयन । राधेजवळी ॥१॥ नवल मांडिलें विंदान । वेदां न कळे महिमान । वेडावली दरुशने । न कळे तयां ॥२॥ रत्‍नजडित पर्यंकीं । पहुडले हर्ष सुखीं । नवल जाहलें तें ऐकीं । सासू आली घरां ॥३॥ वृद्धा म्हणे राधेशीं । दार उघड वेगेंशी । गुह्मा गोष्टी बोलसी । कवणाशीं आंत ॥४॥ राधा म्हणे मामिसे । गृहामध्यें कृष्ण असे । मज गमावया सरिसें । आणिला घरीं ॥५॥ क्षणभरी स्थिर रहा । भरले पायें आत न या । भोजन जाहलीया । उघडितें द्वार ॥६॥ म्हणे कृष्णा आतां कैसें । दारीं वृद्धा बैसलीसे । लज्जा जात अनायासें उभयतांची ॥७॥ कृष्ण म्हणे राधेसी । मंत्र नाठवे मजसी । काय उपाय गोष्टिसी । सांगे तूं मज ॥८॥ नेणो कैशी पडली भुली । मंत्र चळला या वेळीं ऐकोनि राधा घाबरली । दीनवदन ॥९॥ करुणा वचनें बोले राधा । विनोद नोहे हा गोविंदा । माझी होईल आपदा । जगमाजीं ॥१०॥ भक्तवत्सल मनमोहन । शरण एका जनार्दन । ऐकोनि राधेचें वचन । सान जाहला ॥११॥
१९८२
निरपेक्ष निर्द्वद तोचि ब्रह्माज्ञानी । नायकेचि कानीं परापवाद ॥१॥ सर्वदा सबाह्म अंतरीं शुचित्व । न देख न दावी महत्व जगीं वायां ॥२॥ एका जनार्दनीं पुर्णपणें धाला । शेजेचा मुरला रसीं उतरें ॥३॥
१९८३
निरभिमानें नामयासी देखिलें । सांवत्यानें वहिलें धरिलें पोटीं ॥१॥ सांवत्याचें अंतरीं झळके पीतांबर । नाम्यानें सत्वर वोळखिलें ॥२॥ धरुनियां दशी काढिला बाहेर । जाहला जयजयकार तया वेळीं ॥३॥ एका जनार्दनीं पाहूनियां देव । मिठी घाली नामदेव चरणासी ॥४॥
१९८४
निरसिया वरू आपरूपें । नुपजता लग्न लाविलें बापें ॥१॥ निरासिया वरू निरासिया वरू । निरासी गमला केला संसारू ॥२॥ निरासिया वरु साजिरा कैसा । अंगीचिया तेजें आरसा जैसा ॥३॥ निरासिया जोंवरी आस । संकल्पाशीं जो तोडितो पाश ॥४॥ आस निरास जाली पाही । एका जनार्दनीं सलग्न पायीं ॥५॥
१९८५
निरसुनी ज्ञान महविती विज्ञान । त्याहुनी अभिन्न स्वरुप माझें ॥१॥ पिंड आणि ब्रह्मांड म्हणिजे अखम्ड । याहुनी उदंड स्वरुप माझें ॥२॥ माया आणि ममत्व शोधुनी शुद्ध सत्व । सत्वाचें निज सत्व स्वरुप माझें ॥३॥ सद आणी चिद म्हणती आनंद । त्याहुनी अभेद स्वरुप माझें ॥४॥ एका जनार्दनीं एकपणातीत । चित्ताचें अचिंत्य स्वरुप माझें ॥५॥
१९८६
निराकाराचा आकार झाला । त्यांतच माझा पिंगा जन्मला । निराकारासी घेऊन आला ॥१॥ माझा पिंगा घालितो धिंगा ॥धृ॥ पिंग्यापासुन शंकर झाला । ढवळ्या नदींवर बसुन आला । माझ्या पिंग्यानें धक्का दिला । माझा ॥२॥ पिंग्यापासुन मच्छ झाला । शंकसुराचा प्राण घेतला । चारी वेद घेउनी आला ॥माझा ॥३॥ पिंग्यापासुन कूर्म झाला । पर्वत पाठीवर घेतला । चौदा रत्‍नें घेऊन आला ॥माझा ॥४॥ पिंग्यापासुन वराह झाला । हिरण्याक्षाचा प्राण घेतला । पृथ्वी वरती घेऊन आला ॥ माझा ॥५॥ पिंग्यापासुन नरसिंह झाला । हिरण्यकश्यप दैत्य वधिला । प्रह्लाद भक्त रक्षिला ॥ माझा ॥६॥ पिंग्यापासुन वामन झाला । बलीदान मांगु लागला ॥ बळी पाताळीं घातला ॥ माझा ॥७॥ पिंग्यापासुन भार्गव झाले । मातेचें शिर छेदियेलें । अवघे राजे नाहीसे केलें ॥ माझा ॥८॥ पिंग्यापासुन राम झाले । पितृवचन सांभाळिलें । रावण कुंभकर्ण मरिले ॥ माझा ॥९॥ पिंग्यापासुन कृष्ण झाला । कंसाचा प्राण घेतला ॥ गोकुळ सोडुन मथुरेसी आला ॥ माझा ॥१०॥ पिंग्यापासुन बौद्ध झाला । दिलें जगन्नाथ नांव त्याला । भक्तांनी दहींभात चारिला ॥ माझा ॥११॥ ऐसा निराकाराचा पिंगा । त्यांत माझा श्रीरंगा । एका जनार्दनीं पाडुरंग । माझा पिंगा घालितो धिंगा ॥१२॥
१९८७
निरालंब देशींचा गुरुराया । धरें कां रे भाव चरणकमळीं ॥१॥ धरितांचि भाव नासतसे माया । त्यांचें स्वरुप ठाया वोळखावें ॥२॥ भाव अभावा विरहित साचे । तें रुप जयाचें हृदयीं ध्यावें ॥३॥ एका जनार्दनीं ऐसें जें रुपडें । हृदयीं चोखडें ध्याई जना ॥४॥
१९८८
निरालंब सहज माय पहातां कैसें । सबाह्म अभ्यंतर व्यापुनी पुर्ण अखंड दिसे । लक्ष वो अलक्ष पाहतां देहीं देह न दिसे । निर्गुण गुणसी आलें अवघें ब्रह्माचि दिसें ॥१॥ ऐसा हा व्यापकु हरि आहे सर्वांठायीं । ज्ञानांजन लेऊनि पाहे देहींच्या देहीं ॥धृ०॥ पिंड ब्रह्मांड व्यापुनी अतीत कैसा । आदि अंत ज्याचा न कळे श्रुति मुरडल्या कैशा । नेति नेति शब्द बोलती हरि अगाध ऐसा । म्हणवोनि गुरुमुखें दृढ विश्वास धरीं ऐसा ॥२॥ प्रसिद्ध आत्मा देखोनि विरालें मन । मनचि उन्मन जालें तेथें कैचें ज्ञान । ज्ञान ध्यान हेंहि न कळें अवघा जनार्दन । एका जनार्दनीं शरण । कायावाचामनें जाण ॥३॥
१९८९
निराळा निराळा राहे तु सढळ । दृश्याचे पाल्हाळ मागें सारी ॥१॥ तेथे तीर्थ संन्यास घेई निश्चयाचा । मेरु होई सुखाचा सहजपणें ॥२॥ धृतीची धारणा नाद आणि मना । मेळवी गगना गुरुमुखें ॥३॥ तेथें पिंडापदा ग्रास स्वरुप चिदाकाश । एका जनार्दनीं वास एकपणें ॥४॥
१९९०
निराशियाचे भेटी पाहे । वैकुंठींचा राव धांवे ॥१॥ निराशेपायीं न ये व्याधीं । निराशेपायीं सकळ सिद्धी ॥२॥ निराशाचें जेथें नांव । तेथें देव घेतसे धांव ॥३॥ निराशेचा जिव्हाळा । एक जनार्दनीं पाहे डोळा ॥४॥
१९९१
निर्गुण निराकार अवयवरहित । जो शब्दरुपातीत शिव जाण ॥१॥ चहूं वांचांवेगळा पांचांसी निराळा । तो असे व्यापाला सर्वांघटी ॥२॥ ध्यानीं मनीं नये समाधी साधनीं । तो भक्तांचे ध्यानीं तिष्ठतसे ॥३॥ एका जनार्दनीं नामरुपा वेगळा । परब्रह्मा पुतळा शिव जाणा ॥४॥
१९९२
निर्गुण निराकार वृक्ष आकारला । पंचतत्त्वे व्यापक जाहला ॥१॥ कान्होबा हें बोलणें माझें कोडें । पंचाविसांचे ध्यानीं नातुडे रे ॥२॥ साठ ऐशीं शोभती शाखा । नवलक्ष पल्लव भोंवती रे ॥३॥ चौर्‍यांयशी लक्षांची मिळणी । वृक्षरूपीं एका जनार्दनीं देखा रे ॥४॥
१९९३
निर्गुण निर्विकारु । तोचि जगीं पैं इश्वर ॥१॥ नित्य निर्विकल्प देख । सदा वाहे समाधीसुख ॥२॥ ऐसें ब्रह्माज्ञान जोडे । तैं गुरुकृपा तेथें घडें ॥३॥ कापुर घातलीया जळीं । स्वयें नुरेची परिमळीं ॥४॥ एकपणें तो एकला । एका जनार्दनीं देखिला ॥५॥
१९९४
निर्गुण सगुण श्रुतीसी वेगळें । तें रुप सांवळें गोकुळीं वसे ॥१॥ डेळियांची धनी पाहतां न पुरे । तयालागीं झुरे चित्त माझें ॥२॥ वेडावलीं दरुशनें भांडती अखंड । वेदांचे तें तोंड स्तब्ध जाहलें ॥३॥ एका जनार्दनीं सांवळें सगुण । खेळतसे जाण वृदांवनीं ॥४॥
१९९५
निर्दय मानसी मारिताती दूत । कां रे चुकलेति रामनाम ॥१॥ प्रपंचाचे कामीं करूनि हव्यास। विसरला मुखास नाम घेतां ॥२॥ म्हणोनि वोढिती तोडिती निष्ठुर । दय ते अंतरा न ये त्यांच्या ॥३॥ एका जनार्दनीं निर्दय साचार । नाही आन विचार तये ठायीं ॥४॥
१९९६
निर्धन पुरुषाची देखा । स्त्री बोले अतिशय ऐका ॥१॥ दिवसा पोराची ताडातोडी । रात्रीं तुमची वोढावोढी ॥२॥ नाहीं घरीं खावया अन्न । संततीनें भरलें सदन ॥३॥ एका जनार्दनीं देवा । ऐसा स्त्रीचा हेलावा ॥४॥
१९९७
निर्धारीतां सुख पंढरीसी आहे । म्हणोनि उभारिती बाह्मा वेदशास्त्रें ॥१॥ साधन पसारा न करी सैरावैरा । जाया तु निर्धारा पंढरीये ॥२॥ एका जनार्दनीं धरुनी विश्वास । विठोबाचा दास होय वेगें ॥३॥
१९९८
निर्लज्ज होऊनि नाचे महाद्वारी । वाचें वदे हरी सर्वकाळ ॥१॥ व्रत करी सदा नामाचें पारणें । अखंड तें तेणें रामकृष्ण ॥२॥ पंढरीची वारी घडे सर्वकाळ । कीर्तन कल्लोळ मुखीं सदा ॥३॥ एका जनार्दनीं भजनीं सादर । सर्व वेरझार खुंटे त्याची ॥४॥
१९९९
निळा पंढरपूरचा लावण्यपुतळा । देखिलासे डोळां विठ्ठल देव ॥१॥ जीव वेधला वो वेधला वो । पाहतां पाहतां जीव वेधला वो ॥२॥ एका जनार्दनीं पाहातांचि देव । वेधिला जीव परतेना भाव ॥३॥
२०००
निळी कांच भूमीं खेळे वनमाळी । पाहिलें प्रतिबिंब कृष्णं तया न्याहाळीं ॥१॥ रडूं घेतलें रडूं घेतलें । समजावी यशोदा परी रडूं घेतलें ॥२॥ दे मज खेळावया भानु । आन नको कांही दुजा छंद मनु ॥३॥ एका जनार्दनीं देव छंद धरी गा । समजावी यशोदा परी न राहे उगा ॥४॥
२००१
निवंत बैसोनि सुखें गाय नाम । भेदाभेद काम परते सांडी ॥१॥ हेचि एक खुण परमार्थ पुरता । मोक्ष सायुज्यता हातां चढे ॥२॥ लौकिक वेव्हार आहे तैसा पाहे । जो जो होत जाये जे जे वेळ ॥३॥ कर्म धर्म त्तत्त्वतां बीज हें सर्वथा । एका जनार्दनीं पुरता योग साधे ॥४॥
२००२
निवांत बैसें तूं अचळ । मन करुनी निश्चळ । नको कांहीं तळमळ । नाम गाय सर्वदा ॥१॥ सोडीं मागिलाची आस । दृढ मना घालीं कास । भक्तिभाव समरस । रामनामीं तूं धरीं ॥२॥ नको समाधी उन्मनी । धांवूं नको सैरा रानीं । एका जनार्दनाचे चरणीं । दृढभावें विनटे ॥३॥
२००३
निवांत श्रीमुख पहावें डोळेभरी । तेणें नुरे अंतरीं इच्छा कांहीं ॥१॥ चरणीं ते मिठी घालावे दंडवत । तेणें पुरे आर्त सर्व मनींचें ॥२॥ ध्यान ते दृष्टी भरूनि पहावें । आलिंगन द्यावें वेळोवेळां ॥३॥ हृदयकमळीं पहावा तैसा ध्यावा । एका जनार्दनीं विसावा सहजची ॥४॥
२००४
निवांतपणें मना चित्तीं तूं चरण । आणिक कल्पना न करीं कांहीं ॥१॥ चिंतीं पां विठ्ठल कायावाचामनें । संसारबंधन तुटेल तेणें ॥२॥ संसाराची वार्ता नुरेचि पां कांही । आणिकक प्रवाहीं पडुं नको ॥३॥ एका जनार्दनीं विठ्ठलनामीं छंद । मना तूं गोविंद आठवीं कां रे ॥४॥
२००५
निवृत्ति निवृत्ति । म्हणतां पाप नुरे चित्तीं ॥१॥ निवृत्ति निवृत्ति नाम घेतां । जन्म सार्थक तत्वतां ॥२॥ निवृत्ति निवृत्ति । संसाराची होय शांति ॥३॥ निवृत्ति नामाचा निजछंद । एका जनार्दनीं आनंद ॥४॥
२००६
निवृत्ति शोभे मुगुटाकार । ज्ञान सोपान वटेश्वर ॥१॥ विठु पंढरीचे राणे । ल्याले भक्तांचीं भुषणें ॥२॥ खेचर विसा जगमित्र नागा । कुंडलें जोडा विठोबा जोगा ॥३॥ बहु शोभे बाहुवट । गोरा सांवता दिग्पाट ॥४॥ कंठीं जाणा एकविंद । तो हा जोगा परमानंद ॥५॥ गळां शोभे वैजयंती । तिसी मुक्ताई म्हणती ॥६॥ अखंड शोभे माझ्या बापा । पदकीं शोभें नामा शिंपा ॥७॥ कटीं सुत्र कटावरीं । तो हा सोनार नरहरी ॥८॥ कासें कसिला पीतांबर । तो हा जाणावा कबीर ॥९॥ जानु जघन सरळ । तेंही कान्हुपात्रा विशाळ ॥१०॥ दंतपंक्तीचा झळाळ । तो हा कान्हया रसाळ ॥११॥ चरणींच्या क्षुद्र घटा । नामयाचा नारा विठा ॥१२॥ वाम चरणीं तोडर । परसा रुळतो किंकर ॥१३॥ चरणीं वीट निर्मळ । तो हा जाला चोखामेळ ॥१४॥ चरणातळील ऊर्ध्वरेखा । जाला जनार्दन एका ॥१५॥
२००७
निवृत्तिनाथ तीन अक्षरें । सदा जप करी निर्धारें ॥१॥ पूर्वज उध्दरती साचार । वेदशास्त्रीं हा निर्धार ॥२॥ पुनरपि जन्माची । वार्ता नाहीं नाहीं साची ॥३॥ अनुभव धरावे वेगीं चित्तीं । एका जनार्दनीं करी विनंती ॥४॥
२००८
निष्ठा ते भजन वाचे नारायण । तया सत्य पेणें वैकुंठीचें ॥१॥ ऐसें वेदशास्त्रें पुराणें सांगतीं । नामें जोडे मुक्ति नारीनरां ॥२॥ भलतिया भावे मुखीं नाम गावें । तयासै राणिवे वैकुंठीचें ॥३॥ एक जनार्दनीं प्रेमाचा पुतळा । विठ्ठल देखिल डोळां धन्य झालों ॥४॥
२००९
नीच कामें न धरी लाज । धांवें देखोनि भक्तांचे काज । ऐसा सांवळां चतुर्भुज । रुप धरी गोजिरें ॥१॥ उच्छिष्ट गोपाळांचे खाये । वळत्या त्यांचे देणे आहे । राखुनी गोधनें माय । मागें मागें हिंडतसे ॥२॥ काला करी यमुनेतीरीं । स्वयें वाटितो शिदोरी । उच्छिषाटाचि भारी । हाव अंगें स्वीकारी ॥३॥ ऐसा कृपेचा कोंवळा । उभा यमुनेचे पाबळा । एका जनार्दनी लीळा । अगम्य ब्रह्मादिकां ॥४॥
२०१०
नीर मंथुनी मंथन पैं केले । सार असार तें चवीस आलें ॥१॥ ताक तेंहीं गोड दूध देंही गोड । रसनेची चाड पारुषली ॥२॥ मंथन करितां बुडाला रवी । सर्वांगी सर्व निज नाचवी ॥३॥ एका जानर्दनीं अवघेंचि सार । मानस मंथोनी पावलों पार ॥४॥
२०११
नीळवर्ण घनःश्याम । अत्माराम विटेवरी ॥१॥ चला जाऊं तया गांवा । उगवुं गोवां तांतडीं ॥२॥ भेटलिया मनोरथ । पुरती अर्थ मनाचें ॥३॥ साधे साधन फुकटचे । एका जनार्दनीं भाक साची ॥४॥
२०१२
नीळवर्ण वृक्ष तो अति दृश्य । पाहतां सावकाश दृष्टी न पडे ॥१॥ भलें कोडें कान्होबा हें तुझें । लय लक्षा न कळे म्हणती माझें आणि तुझें ॥२॥ हो वृक्षांची वोळख धरा बरी । निवृत्ति ज्ञानदेव सोपान अधिकारी ॥३॥ एका जनार्दनीं वृक्ष सगुण निर्गुण । जाहला पुंडलिकाकारणे ब्रह्मा सनातन ॥४॥
२०१३
नुपजे अनुताप ज्ञान । काय घेउनी विज्ञान ॥१॥ अनुतापाविण । व्यर्थ संन्यास ग्रहण ॥२॥ संन्यास घेतलिया पाठीं । काम नुपजावा पोटीं ॥३॥ ऐसे संन्यास लक्षण । एका जनार्दनीं खुण ॥४॥
२०१४
नेणतां नेणतां कां रे अंध होशी । माझें म्हणविशी कां रे बळें ॥१॥ तूं कोण कोठील आहेसी कोणाचा । शिणतोसी साचा मी माझें म्हणुनी ॥२॥ रहाट माळ जैसी जात येत वरी । तैशीच ये परी जन्म देहीं ॥३॥ एका जनार्दनीं करी कां विचार । वायां हांवभर फिरूं नको ॥४॥
२०१५
नेणतिया ठायीं पाहुं जाय देवा । तों अवघें या केशवा व्यापियेलें ॥१॥ नेणतपण गेलें पाहतां पाहणें पडियेलें टक । अवघाचि हरिख वोसंडला ॥३॥ एका जनर्दनीं पडियेलें टक । जाणतां नेणतां सर्वाभुतीं देख ॥४॥
२०१६
नेणतियासी नेणता तो सान । जाणतिया जाणपण धरुनी ठेला ॥१॥ योगियांचे मांदुस सज्जानाचें स्थळ । श्रम तो केवळ पाहतां जाय ॥२॥ जाणते नेणते येती बरवे परी । दरुशनें उद्धरी जड जीव ॥३॥ एका जनार्दनीं सगुण निर्गुण । जाणतां नेणतां सर्व आपणाचि जाण ॥४॥
२०१७
नेणती ब्रह्मादिक ऐसें याचें कर्म । दृढादृढा वर्म सबळ मागे ॥१॥ न चुके न चुके भोगिल्यावांचुनीं । वायांचि तो मनीं शीण वाहे ॥२॥ एका जनार्दनीं शरण एकपणीं । गाय चक्रपाणी एकभावें ॥३॥
२०१८
नेणतेपण पाडुरंगा ध्याई । सदोदित गाई रामनाम ॥१॥ मग तुज सोपे मार्ग ते असती । पांडुरंग चित्तीं दृढ धरी ॥२॥ एका जनार्दनीं काया वाचा मन । करी समर्पण देवापायीं ॥३॥
२०१९
नेणवेची बाळ कीं हे मृत्तिका । मन गुंतलेंसे देखा पांडुरंगीं ॥१॥ मृत्तिकेसम जाहला असे गोळा । बाळ मिसळला मृत्तिकेंत ॥२॥ रक्त मांस तेणें जाहला गोळा लाल । नेणवे तात्काळ गोरोबासी ॥३॥ एका जनार्दनीं उदक आणुनी कांता । पाहे तंव तत्वतां बाळ न दिसे ॥४॥
२०२०
नेणें मंत्र तंत्र बीजाचा पसारा । जनार्दन सोईरा घडला मज ॥१॥ भक्ति ज्ञान विरक्ति नेणें पैं सर्वथा । मोह ममता चिंता कांहीं नेणें ॥२॥ योगयाग कसवटी कांहीं नेणों आटी । सेव देखों सृष्टी जनार्दन ॥३॥ काया वाचा मन ठेविलें चरणीं । एका जनार्दनीं सर्वभावें ॥४॥
२०२१
नेणें वेदशास्त्र पुराण पठण । तेणें नामकिर्तन करावें ॥१॥ कलीमाजीं सोपा मार्ग । तरावया जग उत्तम हें ॥२॥ नोहे यज्ञ यागयोग व्रत । करावें व्रत एकादशी ॥३॥ एका जनार्दनीं सार । वाचे उच्चार हरिनाम ॥४॥
२०२२
नेणें साधन पसारा । व्रता तपाच्या निर्धारा ॥१॥ आवडी गाऊं तुझें नाम । तेणें पुरती सर्वकाम ॥२॥ आणिक न करुं चावटी । आगमनिगम आटाआटी ॥३॥ न करीं साधन कांहीं । एका जनार्दनीं पाहीं ॥४॥
२०२३
नेणों कळायुक्ती व्युप्तत्ती सर्वथा । करुं हरिकथा नाम गाऊं ॥१॥ कलियुगामाजीं साधन वरिष्ठ । श्रेष्ठांचे तें श्रेष्ठ नाम जपुं ॥२॥ हाचि अनुभव बहुतांसी आला । म्हणोनि वर्णिला नाममहिमा ॥३॥ एका जनार्दनीं नामयज्ञ कथा । पावन सर्वथा जड मूढा ॥४॥
२०२४
नेत्राचेनीं तेजें पोळला चंडाश । नभचि नाहीं तेथें कैंचे अवकाश ॥१॥ रात्र हारपली पाहुं मी कोठें । दिवस रुसुनी गेला पहातां न भेटे ॥२॥ अंगाचेनी तेजें डोळा आली चवी । पाहुं गेलों तंव बुडाला रवी ॥३॥ एका जनार्दनीं पाहतां पाहणें । रात्रंदिवस दोन्हीं गेलें हरपोन ॥४॥
२०२५
नेत्रींची बाहुली वस्तुरुप झाली । पाहतां सोहं मेळीं चिदांनंद ॥१॥ अर्ध मात्रा स्थान नयनाचें निधान । मसुरेप्रमाण महावर्ण तेथें ॥२॥ सुषुम्ना कुंडलिनी कासीया सांगती । नयनींच निश्चितीं बिंदुरुप ॥३॥ सर्वगत डोळा ती जगामाझारीं । जगाचिया हारी डोळियामाजीं ॥४॥ दाखवी संपुर्ण स्वामी जनार्दन । एका एकपण नाहीं जेथें ॥५॥
२०२६
नेम धरीं विठ्ठलामीं । पडुं नको वाउगा भ्रमीं । सांगतसे गृहस्थाश्रमीं । साधन सोपें ॥१॥ करी नामस्मरण । वाचे म्हणे नारायण । चुकेल पतन । यातायाती ॥२॥ इहलोक परलोक । धन्य होती सकळीक । उभय कुळ पावन देख । नाम स्मरतां ॥३॥ कलीमाजीं सोपें वर्म । उच्चारीं तूं श्रीराम । आणिक नको श्रम । वाउगाची ॥४॥ जाउनी पाहे तुं पंढरी । उभा असे विटेवरी । एका जनार्दनीं धरीं । चरण त्याचे ॥५॥
२०२७
नेमिला काळ लागला पाठीं । हे तों दिठी पाहती ॥१॥ एकापाठीं दुसरें जाय । वायां हाय हाय उरते ॥२॥ न सोडी तो लागला मागें । शिणते वाउगे मूर्ख ते ॥३॥ शरण एका जनार्दनीं । पडती वदनीं काळाचे ॥४॥
२०२८
नोहे ब्रह्माज्ञानी लेकुंरांचा खेळ । अवघाचि कोल्हाळ आशाबद्ध ॥१॥ वाढवुनी जटा म्हणती ब्रह्माज्ञान । परी पतनालागुनी न चुकेचि ॥२॥ लावुनी विभुती बांधुनियां मठा । ब्रह्मज्ञान चेष्ठा दाविताती ॥३॥ माळा आणि मुद्रा लेवुंनियां सांग । ब्रह्माज्ञान सोंग दाविताती ॥४॥ एका जनार्दनीं संतसेवेविण । ब्रह्माज्ञानखुण न कलेचि ॥५॥
२०२९
नोहे सायास रामनामीं । संसारासी गुंते प्राणी ॥१॥ आठवी वाचे म्हणे रामनाम । संसार नुरेची श्रम ॥२॥ नका करूं वायां श्रम । वाचे म्हणे रामनाम ॥३॥ आवडीनें नाम घोका । म्हणे जनार्दनाचा एका ॥४॥
२०३०
न्याय मीमांसा सांख्य पातंजली । व्याकरण वेदांत बोली सर्व एक ॥१॥ ते माझे सोई रे जिवलग जीवाचे । जे अधिकारी साचे संतजन ॥२॥ एका जनार्दनीं मन तया ठायीं । होऊनिया पायीं उतराई ॥३॥
२०३१
पंच वरुषी नामा जाहला । छंद विठूचा लागला ॥१॥ जाऊनियां राउळांत । तेथें सावकाश बैसत ॥२॥ विठ्ठल हरि वाचे छंद । विठ्ठलें लाविलासे वेध ॥३॥ एका जनार्दनीं सार । मंत्र जपे त्रिअक्षर ॥४॥
२०३२
पंचक पंचकाचा पसारा पांचाचा । खेळ बहुरूपियां पांचापासोनी ॥१॥ पृथ्वी आप तेज वायु आकाश जाण । पंचकप्राण मन पांचांमाजी ॥२॥ इंद्रियपंचक ज्ञान तें पंचक । कर्म तें पंचक जाणें बापा ॥३॥ धर्म तो पंचक स्नान तें पंचक । ध्यान तें पंचक जाणें बापा ॥४॥ एका जनार्दनीं पंचकावेगळा । पाहें उघडा डोळा विटेवरी ॥५॥
२०३३
पंचक्रोशी पाप नसे । ऐसा देव तेथें वसे ॥१॥ चला चला पंढरपुरा । दीन अनाथांच्या माहेरा ॥२॥ चंद्रभागे करितां स्नान । होती कोटी कुळें पावन ॥३॥ एक जनार्दनीं भेटी । तुटे जन्ममरण गांठीं ॥४॥
२०३४
पंचक्रोशीचें आंत । पावन तीर्थ हें समस्त ॥१॥ धन्य पंढरीचा महिमा । नाहीं द्यावया उपमा ॥२॥ तीर्थ क्षेत्र देव । ऐसा नाहीं कोठें ठव ॥३॥ नगर प्रदक्षिणा । शरण एका जनार्दना ॥४॥
२०३५
पंचभूतांचें हें शरीर खरें । निर्माणक तें बरें केलें देवें ॥१॥ पृथ्वी आप तेज वायु हें आकाश । यांचा हा सौरस आत्माराम ॥२॥ एका जनार्दनीं पंचभुत आत्मा । सर्व परमात्मा । नेणती ते ॥३॥
२०३६
पंचभूतें नव्हतीं जईं । तैं वृक्ष देखिला भाई । अधोभागीं शेंडा मूळ पाहीं । वरी वेंधली तिसी पाय नाहीं ॥१॥ सांगें तूं आमुचें कोडें कान्होबा सांग तूं आमुचें कोडें । नाहीं तरी जाऊं नको पुढें ॥धृ०॥ नवलक्ष जया शाखा । पत्रपुष्पें तेचि रेखा । पंचभूतें कोण लेखा । ऐसा वृक्ष देखिला देखा ॥२॥ तयावरी एक सर्पीण । तिनें खादलें त्रिभुवन । शरण एका जनार्दन । हें योगियांचें लक्षण रे ॥३॥
२०३७
पंचविसांचे दृष्टी । शिवा नाहीं तेथें भेटी ॥१॥ छत्तिसां वेगळा । भरला असें तो निराळा ॥२॥ चाळिसाचे ध्यानीं मनीं । कदा नये शुळपाणी ॥३॥ ऐसे विचारे भागले । तया नाहीं रुप कळलें ॥४॥ एका जनार्दनीं रुप । स्वयं प्रकाश अमूप ॥५॥
२०३८
पंचविसावा श्रीविठ्ठलु । चौविसांवेगळा तयाचा खेळू गे माय ॥१॥ तो पुंडलीका कारणें येथवरी आला । उभा उगा ठेला विटेवरी गे माय ॥२॥ जनीं जनार्दन करावय उद्धरण । एका जनार्दनी समचरण साजिरें गे माय ॥३॥
२०३९
पंचाननें मज घेतलें वेढुन । नेताती काढुन प्राण माझें ॥१॥ गजेंद्राकारणें त्वांघातलीं उडी । तैसा लडसवडीं धांवे देवा ॥२॥ तुजवांचून मजनाहीं आधार । एका जानर्दनीं पार उतरीं देवा ॥३॥
२०४०
पंडित शास्त्री होती नीच याती । त्यांचे ऐकताती नीति ते धर्म ॥१॥ स्वमुखें ब्राह्मण न करती अध्ययन । होती भ्रष्ट जाण मद्यपी ते ॥२॥ नीचाचें सेवक करती घरोघरीं । श्वानाचिये परी पोट भरती ॥३॥ एका जनार्दनीं आपुलीं स्वधर्म । सांडुनियां वर्म होती मुढ ॥४॥
२०४१
पंडितांच्या वचना द्यावें अनुमोदन । परि होत नोहे जाण तेणें कांहीं ॥१॥ शास्त्रीयाचे वचना द्यावें अनुमोदन । परि हित नोहे जाण तेणें कांहीं ॥२॥ वेदांताच्या वचना द्यावें अनुमोदन । परि हित नोहे जाण तेणें काहीं ॥३॥ पुराणिकांचे वचनीं द्यावें अनुमोदन । परि हित नोहे जाण तेणें काहीं ॥४॥ संताच्या वचना द्यावें अनुमोदन । एका जनार्दनीं तेणें हित होय ॥५॥
२०४२
पंढरीची मात सांगे नारदमुनी । संतांचे कीर्तनीं नाचे देव ॥१॥ नामाच्या गजरें नाचताती संत । सुरवरांचा तेथें काय पाड ॥२॥ तिहीं लोकां पाहतां ऐसें नाहीं कोठें । कैवल्याची पेठ पंढरी देखा ॥३॥ ऐकोनी अमरनाथ संतोषला मनीं । एका जनार्दनीं नारद सांगे ॥४॥
२०४३
पंढरीची वारी आहे ज्याचे घरीं । तोचि अधिकारीं धन्य जगीं ॥१॥ आपण तरुनी तारितसे लोकां । भुक्ति मुक्ति देखा तिष्ठताती ॥२॥ धर्म अर्थ काम हे त्याचे अंकित । एका जनार्दनीं मात धन्य त्याची ॥३॥
२०४४
पंढरीचें सुख पुंडलीक जाणें । येर सोय नेणें तेथील पैं ॥१॥ उत्तम हें स्थळ तीर्थ चंद्रभागा । स्नानें पावन जगा करितसे ॥२॥ मध्यभागीं शोभे पुंडलीक मुनीं । पैल ते जघनी कटीं कर ॥३॥ एका जनार्दनी विठ्ठल बाळरुप दरुशनें ताप हरे जगा ॥४॥
२०४५
पंढरीये अन्नादान । तिळभरी घडती जाण ॥१॥ तेणें घडती अश्वमेध । पाताकापासोनि होती शुद्ध ॥२॥ अठरा वर्न यती । भेद नाही तेथें जाती ॥३॥ अवघे रंगले चिंतनीं । मुर्खी नाम गाती कीर्तनीं ॥४॥ शुद्ध अशुद्धची बाधा । एका जनार्दनीं नोहे कदा ॥५॥
२०४६
पंढरीये देव आला । संतभारें तो वेष्टिला ॥१॥ गुळासवें गोडी जैसी । देवासंगें दाटी तैसी ॥२॥ झालें दोघां एकचित्त । म्हणोनि उभाचि तिष्ठत ॥३॥ एका जनार्दनीं भाव । संतापायीं ठेविला जीव ॥४॥
२०४७
पंढरीये पांडुरंग । भोवंता संग संतांचा ॥१॥ चंद्रभागा वाळुवंट । आहे नीट देव उभा ॥२॥ पुडलीक वेणुनाद । होतो आनंद अखंड ॥३॥ पद्मतळें गोपाळपुर । संत भार आहे तेथें ॥४॥ वैष्णवांचा गजर मोठा । आषाढी चोहटा नाचती ॥५॥ जाऊं तेथें लोतागणीं । फिटेल आयणीं गर्भवास ॥६॥ भाळे भोळे येती भक्त । आनंदें नाचत वाळुवंटी ॥७॥ लोंटागण घालूं चरणीं । शरण एका जनार्दनीं ॥८॥
२०४८
पंढरीस जावया । सदा हेत मानसीं जया । कळिकाळ वंदी पाया । तया हरिभक्तांतें ॥१॥ दृढ मनींच चिंतन । वाचे विठ्ठलचि जाण । होतु कां कोटी विघ्र । परी नेम नटळे सर्वथा ॥२॥ एका जनार्दनीं भाव । नपेक्षी तया देव । करुनि संसार वाव । निजपदी ठाव देतुसे ॥३॥
२०४९
पंढरीस ज्याचा नेम । तो न करी अन्य कर्म ॥१॥ सांडुनिया विठ्ठल राजा । आणिक देव नाहीं दुजा ॥२॥ सांडुनिया चंद्रभागा । कोणा जाय आणीके गंगा ॥३॥ सांडुनिया पुंडलीका । कोण आहें आणीक सखा ॥४॥ साडोनिया वेणुनाद । कोन आहे थोर पद ॥५॥ एका जनार्दनीं भाव । अवघा विठ्ठलाचि देव ॥६॥
२०५०
पंढरीसी जा रे आधीं । कृपानिधी तो पाहा ॥१॥ संसाराअचीअ तुटेल बेडी । उबगे घडी पंढरीये ॥२॥ गाताती भाळे भोळे । प्रेमें सांवळें नाचत ॥३॥ कुंचे पताका गरुड टके । वैष्णवा निके मेळ मिळे ॥४॥ दिंडी कथाजाग्रह । एका जनार्दनीं ते पावन ॥५॥
२०५१
पंढरीसी जा रे सदा । पुंडलीक वरदा येथें उभा ॥१॥ तुम्हीं कारा हाचि नेम । धरा संतसमागम ॥२॥ देतो सकळांसि मोक्ष । न लगी ध्येय ध्यान लक्ष ॥३॥ जनार्दनें शिकविलें । एका जनार्दनीं लाधलें ॥४॥
२०५२
पंधरा भागले सोळांसी न कळे । सतरा वेडावले न कळे माय ॥१॥ एकुणवीस भले विसांतें पुसती । तयांसी ती गति न कळे गे माय ॥२॥ एकवीस वेगळे विसीं मुराले । तयांचे तयां न कळे गे माय ॥३॥ तेवीस चोवीस वर्तें जगाकारीं । एका जनार्दनीं पंचविसावा हृदयीं गे माय ॥४॥
२०५३
पक्षी आंगणीं उतरती । तें कां पुरोनिया राहती ॥१॥ तैसें असावें संसारीं । जोंवरी प्राचीनाची दोरी ॥२॥ वस्तीकर वस्ती आला । प्रातःकाळीं उठोनि गेला ॥३॥ शरण एका जनार्दन । ऐसे असतां भय कवण ॥४॥
२०५४
पक्षी जाला स्वयें जें वायु लेकरुं । त्याच्या क्रिया पारुं केल्या रामें ॥१॥ शबरीची फळे उच्छिष्ट तीं खायें । कैसा राम होय सर्वपाणीं ॥२॥ एका जनार्दनीं श्रीराम सखा । भक्त अभक्तं निका सोडवण ॥३॥
२०५५
पटपट सांवली खेळूं या रे । सावध गड्यांनो कां वेळू लावा रे । भीड तया सोडोनी सहा गडी मारुं या रे ॥१॥ निजानंदी खेळोनी मित्रतनया हारुं या रे ॥धृ ॥ अवघे गडी एकवटोनी जाऊं दे या रे । बहु कष्टे फेरे फिरतां मन तेथें लावा रे ॥२॥ एका जनार्दनीं खेळतां ब्रह्मारुप काया रे । जेथें पाहे तेथें दिसे जनार्दनीं छाया रे ॥३॥
२०५६
पडलें मायावर्तीं शुध्दि नाहीं जया । म्हणोनि अवतार तयां धरणें लागे ॥१॥ धन्य गुरु माझा निवृत्ति दयाळ । दाखविले सोज्वळ पद जेणें ॥२॥ केला उपकार तारिले हे दीन । ज्ञानांज्ञानांजन घालूनियां ॥३॥ नेणती जाणती पडलीं जीं भुलीं । तयां शुध्दि केली त्रिअक्षरीं ॥४॥ एका जनार्दनीं त्रिभुवनीं प्रताप । उजळिला दीप ज्ञानदेवें ॥५॥
२०५७
पढरीचा महिमा । आणिक नाहीं त्या उपमा ॥१॥ धन्य धन्य जगीं ठाव । उभा असे देवराव ॥२॥ साक्ष ठेवुनी पुंडलिका । तारितसे मुढ लोकां ॥३॥ एका जनार्दनी देव । उभाउभीं निरसी भेव ॥४॥
२०५८
पतनाच्या भया नोळखे पामर । करी वेरझार नानापरी ॥१॥ नायके कीर्तन न पाहे पंढरी । वैष्णवाचे दारीं न जाये मूढ ॥२॥ नानापरीचे अर्थ दाखवी वोंगळ । सदां अमंगळ बोले जना ॥३॥ हिंडे दारोदारीं म्हणे पुराणिक । पोटासाठी देख सोंग करी ॥४॥ वाचळ आगाळा बोलों नेदी लोकां । एका जनार्दनीं देखा फजीत होय ॥५॥
२०५९
पतित पातकी खळ दुराचारी । पाहतां पंढरी मोक्ष तयां ॥१॥ स्वमुखं भक्तां सांगतों आपण । नका अनुमान धरुं कोणी ॥२॥ चंद्रभागा दृष्टी पाहतां नरनारी । मोक्ष त्यांचे घरीं मुक्तिसहित ॥३॥ चतुष्पाद पक्षी कीटकें अपार । वृक्ष पाषाण निर्धार उद्धरती ॥४॥ एका जनार्दनीं न घ्यावा संशय । दरुशनें जाय पापताप ॥५॥
२०६०
पतितपावन नाम श्रीविठ्ठलाचें । आणिक मी साचें नेणें कांहीं ॥१॥ पतितपावन नाम वाणी । विठ्ठलांवांचुनी कांहीं नेणें ॥२॥ पतीतपवान नामें तारिली गणिका । अजामेळ देखा सरता केला ॥३॥ पतितपावन नाम जनीं वनीं । एका जनार्दनीं नाम वाचे ॥४॥
२०६१
पतिव्रता सती उठोनि सकाळीं । शेजारिणी सदनीं येती जाहली ॥१॥ अहो माते पती जाती कृष्ण दरुशना । कांही तरी धान्य देईं मज ॥२॥ ऐकोनियां ऐसें पतिव्रतेचें वचन । जाहलें समाधान चित्त तेणें ॥३॥ एका जनार्दनीं हरिकृपा पूर्ण । पोहे दिले जाणा तीन मुष्टी ॥४॥
२०६२
पतीतपावन केलें असें संतीं । पुराणीं ती ख्याती वर्णियेली ॥१॥ सदोषी अदोषी तारिलें अपार । हाचि बडिवार धन्य जगीं ॥२॥ नाना वर्ण याती उत्तम चांडाळ । उद्धरिलें सकळ नाममात्रें ॥३॥ एका जनार्दनीं दयेचें सागर । संतकृपा धीर समुद्र ते ॥४॥
२०६३
परदारा परधन । येथें धांवतसे मन ॥१॥ मन जाए दुरदेशीं । वोढूनी आणा चरणापाशीं ॥२॥ दुर्बुद्धि मनाचें ठाणें । मोडोनी टाका पुरतेपणें ॥३॥ एका जनार्दनीं मन । आपुलें पदीं राखा जाण ॥४॥
२०६४
परपंरा कीर्तन चाली । मागुन आली अनिवार ॥१॥ उद्धवा सांगे जनार्दन । कीर्तन पावन कलीमाजीं ॥२॥ अर्जुना तोचि उपदेश । कीर्तन उद्देश सर्वथा ॥३॥ एका जनार्दनीं तत्पर । कीर्तन करावें निरंतर ॥४॥
२०६५
परपश्यंती मध्यमा वेगळा । वैखरीये निराळा शिव जाणा ॥१॥ आदि मध्य अंत न कळे रुपाचा । परता चहूं वांचा शिव जाणा ॥२॥ एका जनार्दनीं जीवांचें जीवन । सर्वां घटीं पूर्ण शिव जाणा ॥३॥
२०६६
परब्रह्मा पुतळा कौस्तुभ गळां । वैजयंती माळा कंठीं शोभे ॥१॥ शंख चक्र गदा पद्म शोभा करीं । पीतांबरधारी चतुर्भुज ॥२॥ कटीं कडदोरं वाळे वाक्या पायीं । सुंदर रुप कान्हाई शोभता ॥३॥ लेणीयाचें लेणे भुषण साजिरें । एका जनार्दनीं गोजिरें चरण दोन्हीं ॥४॥
२०६७
परब्रह्मा प्राप्तीलागीं । कर्मे आचरावी वेगीं ॥१॥ चित्त शुद्ध तेणें होय । भेटी सदगुर्चे पाय ॥२॥ कर्म नित्य नैमित्तिक । प्रायश्चित जाण एक ॥३॥ उपासन ते चवथें । आचरावें शुद्ध चित्तें ॥४॥ तेणें होय चित्त स्थिर । ज्ञानालागीं अधिकार ॥५॥ होय भेटी सदगुरुची । ज्ञानप्राप्ति तैंचि साची ॥६॥ प्राप्त झाल्या ब्रह्माज्ञान । आपण जग ब्रह्मा परिपूर्ण ॥७॥ एका जनार्दनीं भेटला । ब्रह्मास्वरुप स्वयें झाला ॥८॥
२०६८
परब्रह्मा मूर्ति विठ्ठल विटेवर । चंद्रभागेतीरीं उभा असे ॥१॥ तयाचे चरण आठवी वेळो वेळां । सर्व सुख सोहळा पावशील ॥२॥ अविनाश सुख देईल निश्चयें । करी पा लवलाहेंलाहो त्याचा ॥३॥ श्रीविठ्ठलचरणीं शरण तूं जाई । एका जनार्दनीं पाही अनन्यभावें ॥४॥
२०६९
परब्रह्मा सगुण असे परात्पर । वेदादिकां पार न कळे ज्याचा ॥१॥ पाहतां पाहतां वेधलेसें मन । नये अनुमोदन शास्त्रादिकां ॥२॥ एका जनार्दनी व्यापुनी वेगळा । त्यासी गौळणी बाळा झकविती ॥३॥
२०७०
परब्रह्मा सांवळा खेळे यमुना तीरीं । सर्वें घेउनी गायी गोपवत्स नानापरी ॥१॥ कान्होबा यमुनेसी जाऊं । आदरें दहीभात खाऊं ॥२॥ नाचती गोपाळ एक एकाच्या आवडी । परब्रह्मा सांवळा पहातसे संवगडी ॥३॥ एका जनार्दनी ब्रह्मा सारांचे सार । धन्य भाग्य गौळियांचे कृष्ण खेळे परिकर ॥४॥
२०७१
परमर्थीं राखितां भावो नवल नव्हे पहाहो । भक्त परिग्रहो चालवी दत्तदेवो ॥१॥ कृपाळु श्रीदत्त कृपाळु श्रीदत्त । अहर्निशीं स्वयें पाळिती निजभक्त ॥२॥ वत्सालागीं जैसी व्याली धेणु धांवे । निजभक्तांकारणें दता तैसा पावे ॥३॥ भक्त कीर्तनें तोषला दत्त संतोषला । हरिजागरीं स्वयें सिद्ध प्रगटला ॥४॥ निजात्मास्थिति लीला मनीं सुमनमाळा । एका जनार्दनीं दत्त घाली गळां ॥५॥
२०७२
परमात्मा एकला एक । एकपणें तोचि अनेक ॥१॥ तेथें जाती विजाती नाहीं देखा । महा सुखा सुखपात्र ॥२॥ म्हणे जनार्दनाचा एक । आत्मा सारिखा सर्व देहीं ॥३॥
२०७३
परमार्थ सोयरा अहोरात्र करीं । गाई निरंतरी रामकृष्ण ॥१॥ नरदेहा यातना चुकतील फेरे । वायां हावभरी होऊं नको ॥२॥ रात्रंदिवस करी नामाचाचि पाठ । मोक्षमार्ग फुकट प्राप्त होय ॥३॥ एका जनार्दनीं नामापरतें सार । न करीं विचार आन दुजा ॥४॥
२०७४
परमार्थाचा हाचि भाव । वाचे देव स्मरावा ॥१॥ नाहीं दुजा छंद मनीं । संतचरणीं विश्वास ॥२॥ न धांवे वायां कोठें मन । संतचरणांवाचुनी ॥३॥ एका जनार्दनीं नेम । सर्वोत्तम हृदयीं वसे ॥४॥
२०७५
परलोकींचा सखाक उभा विटेवरी । भक्त साहाकारी पांडुरंग ॥१॥ चंद्रभागे तटी शोभे वाळूवंटीं । देखिलासे दृष्टी पांडुरंग ॥२॥ एका जनार्दनीं भेटतां तयासी । ऋद्धिसिद्धि दासी होती मग ॥३॥
२०७६
परलोकींचे सखे । संत जाणावे ते देखे ॥१॥ तोडिती दरुशनें बंधन । करिती खंडन कर्मांचें ॥२॥ उत्तम जें नामामृत । पाजिती त्वरित मुखामाजीं ॥३॥ एका जनार्दनीं संतपाय । निरंतर हृदयीं ध्याय ॥४॥
२०७७
परा पश्यंती मध्यमा वैखरी । नमियेली खरी आदिमाया ॥१॥ वसोनिया जिव्हे वदावेम कवित्व । हरिनामीं चित्त निरंतर ॥२॥ आणिक संकल्प नाहीं माझे मनीं । एका जर्नादनीं वंदितसें ॥३॥
२०७८
परा पश्यांती मध्यमा । जो न कळे आगम निगमां । पुंडलिकालागीं धामा । पंढरीये आला तो ॥१॥ नीरेभीवरेचे तटीं । कास घालुनी गोमटी । वैजयंती शोभे कंठीं । श्रीवत्सलांछन ॥२॥ शंख चक्र मिरवे करीं । उटी चंदनाची साजिरी । खोप मिरवे शिरीं । मयूरपिच्छें शोभती ॥३॥ शोभे कस्तुरीचा टिळा । राजस सुंदर सांवळा । एका जनार्दनी डोळा । वेधिलें मन ॥४॥
२०७९
परा ही पश्यंती मध्यमा वैखरी । वसे तो श्रीहरी पंढरीये देखा ॥१॥ चारी वाच तय सदोदित गती । पुराणें भाडती अहोरात्र ॥२॥ वेद श्रुति नेति नेति म्हणताती । तो पुडंलिकापुढें प्रीती उभा असे ॥३॥ सनकसनंदन जयासी पै ध्याती । तो हरी बाळमूर्ति खेळतसे ॥४॥ योगियां ह्रुदयींचे ठेवणें सर्वथा । एक जनार्दनीं तत्त्वतां वोळखिलें ॥५॥
२०८०
पराचे ते दोष आणू नये मनीं । जयाची ते करणी त्याजसवें ॥१॥ विषाचिया अंगी नोहे अमृतकण । मारकक तें जाण विष होय ॥२॥ सर्पाचिये अंगीं शांतीचा कळवळा । कोणा पाहे डोळा भरूनि दृष्टी ॥३॥ एका जनार्दनीं जैसा ज्याचा गुण । तैसें तें लक्षण बद्धक त्यांसी ॥४॥
२०८१
परात्पर परिपुर्ण सच्चिदानंदघन । सर्वां अधिष्ठान दैवतांचें गे माय ॥१॥ तें लाधलें लाधलें पुंडलिकाचे प्रीती । येत पंढरीप्रती अनायासें गे माया ॥२॥ जगडंबर पसारा लपवोनि सारा गे माय । धरियेला थारा पुंडलिकाचेनि प्रेमें गे माय ॥३॥ ओहंअ मां न कळे कांहीं सोहं देती ग्वाहीं गे माय । कोहमाची तुटली बुंथी एका जनार्दनीं प्रीति गे माय ॥४॥
२०८२
परिपूर्णपणें उभा । दिसें कर्दळांची गाभा । अंगीचिया प्रभा । धवळलें विश्व ॥१॥ धन्य धन्य पांडुरंग । आम्हां जोडला वोसंग । कीर्ति गातां निसंग । अनुवाद तयाचा ॥२॥ तें सुख सांगतां कोडीं । पापें पळती बापुडीं । यमधर्म हात जोडी । न येचि तया गांवा ॥३॥ ऐसें एकविधभावाचे । संतचरण वंदिती साचे । एका जनार्दनीं त्यांचें । दर्शन दुर्लभ ॥४॥
२०८३
परिमळ गेलिया वोस फुल देठीं । आयुष्य शेवटीं देह तैसा ॥१॥ घदिघडी काळ वाट याची पाहे । अझुनि किती आहे अवकाश ॥२॥ हाचि अनुताप घेऊनि सावाध । कांहीं तरी बोध करीं मना ॥३॥ एक तास उरला खटवांगरायासी । भाग्यदशा कैसीप्राप्त झाली ॥४॥ सांपडला हरि तयाला साधनी । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
२०८४
परेंचें जें सुख पश्यंती भोगी । तोचि राजयोगी मुकुटमणी ॥१॥ सिद्धाची ही खुन साधक सुख जाण । सदगुरुसी शरण रिघोनिया ॥२॥ वैखरीं व्यापारी मध्यमेच्या घरीं । ओंकाराच्या शिरी वृत्ति ठेवी ॥३॥ आदिनाथ ठेवणें सिद्ध परंपरा । जनार्दनीं वेव्हारा एकनाथीं ॥४॥
२०८५
परेसी न कळे पार । पश्यंतीसी निर्धार । मध्यमा तो स्थिर वैखरीये ॥१॥ चहुं वाचा कुंठीत । ऐसें नाम समर्थ । आम्ही गाऊं सदोदित । सोपें नाम ॥२॥ ऋद्धिसिद्धि धांवे पायीं । मुक्तिसे तो अवसर नाहीं । मुक्तीचा तो उपाय काहीं । हरिदास ॥३॥ एका जनार्दनीं भाव । भावंचि तुष्टे देव । आणीक नको उपाव । नाम स्मरे ॥४॥
२०८६
परेहुनि परता वैखरिये कानडा । विठ्ठल उघडा भीतातटीं ॥१॥ शिणली दरुशनें भागली पुराणें । शास्त्राचियें अनुमानें न ये दृष्टी ॥२॥ नेति नेति शब्दे श्रुती अनुवादती । ते हे विठ्ठलामुर्ति विटेवरी ॥३॥ एका जनार्दनीं चहू वाचां वेगळा । तेणें मज चाळा लावियेला ॥४॥
२०८७
परेहूनी कैसें पश्यन्ती वोळलें । मध्यमीं घनावलें सोहंबीज ॥१॥ वैखारियेसी कैसें प्रगट पैं जालें । न वचे ते बोल एकविध ॥२॥ साक्षात्कारे कैसें निजध्यासा आलें । मननासी फावलें श्रवणद्वारे ॥३॥ सुखासुख तेथें जालीसे आटणी । एका जनार्दनीं निजमुद्रा ॥४॥
२०८८
पळ पळ आयुष्य खातसे काळ । कां रे होसी सबळक पोसणा तूं ॥१॥ वाढविसी देह काळाचें भातुकें । कां रे तुज कौतुकें सुख वाटे ॥२॥ नामस्मरण करितां लाजसी पामरा । भोगिसी अघोरा यमदंडा ॥३॥ एका जनार्दनी सांगतसे हित । कां रे न घ्या त्वरित हरिनाम ॥४॥
२०८९
पळभरी संतसंगती । कोटीयुगें तया विश्रांती । ऐसें बोलतसे श्रुती । पाहे पां जना ॥१॥ वेदशास्त्रा पुराण । महिमा संतांचाचि जाण । शुकादिक रंगून । रंगले रंगीं ॥२॥ अर्जुना उपदेशिलें । उद्धवातें बोधिलें । व्यासादिक रंगलें । हृदयीं सदा ॥३॥ तें दृढ हृदयीं धरी । आणीक नको पाहुं फेरी । एका जनार्दनीं धरीं । हृदयामाजीं ॥४॥
२०९०
पवित्र अंतर शुद्ध कर मन । तेणें घडें जाण सर्व कर्म ॥१॥ वेदयुक्त मंत्र जपतां घडें पाप । मी मी म्हणोनी संकल्प उठतसे ॥२॥ यज्ञादिक कर्में घडतां सांग । मी मी संसर्ग घडतां वायां ॥३॥ दानधर्मविधी धरितां शुद्ध मार्ग । मी मी म्हणतां याग वायां जाय ॥४॥ एका जनार्दनीं मीपणा टाकून । करी कृष्णार्पण सर्वफळ ॥५॥
२०९१
पवित्र तो देह सदा ज्याचा नेम । वाचे गाय राम सर्वभावें ॥१॥ धन्य ते भाग्याचा तरला संसार । परमार्थाचें घर नाम मुखीं ॥२॥ करितसे कथा कीर्तनीं आवडी । ब्रह्माज्ञान जोडी तया लाभे ॥३॥ एका जनार्दनीं धन्य तें शरीर । परमार्थ संसार एकरुप ॥४॥
२०९२
पशु आणि पक्षी तरले स्मरणें । तो तुम्हा कारणें उपेक्षीना ॥१॥ धरुनि विश्वास आळवावे नाम । सदगद तें प्रेम असो द्यावें ॥२॥ सुखदुःख कोटी येती आणि जाती । नामाविण विश्रांती नाहीं जगीं ॥३॥ एका जनार्दनीं नामाचा प्रताप । नुरेची तेथें पाप वोखदासी ॥४॥
२०९३
पशु पक्षी वनचरें । श्वान श्वापदादि सुकरें ॥१॥ पडतां नाम घोष कानीं । पावन होती इयें जनीं ॥२॥ चतुष्पाद आणि तरुवर । नामें उद्धार सर्वांसी ॥३॥ उंच नीच नको याती । ब्राह्मणादी सर्व तरती ॥४॥ एका जनार्दनीं अभेद । नामीं नाहीं भेदाभेद ॥५॥
२०९४
पहा ऋषि आले मागावया दान । शांति करुं यज्ञ ऋषीचिया ॥१॥ ऋषीलागीं पूजा सिद्धि नेऊं पैजा । राक्षसांच्या फौजा मारुं बळें ॥२॥ मारुं बळें आतां त्राटिका सुबाहु । द्विजालागीं देऊं सुख मोठें ॥३॥ भेटे पुढें कार्य ऋषिभार्या वनीं । लाउनी चरण उद्धरावी ॥४॥ उद्धरावे तृण पशु आणि पक्षी । जया जे अपेक्षी देऊं तया ॥५॥ तया ऋषिसंगें जनकाचा याग । एका जनार्दनीं मग धनुष्य भंगी ॥६॥
२०९५
पहा कैसा देवाचा नवलावो । पाहे तिकडे अवघा देवो ॥१॥ पहाणें परतलें देवें नवल केलें । सर्वही व्यापिलें काय पाहों ॥२॥ पाहाणियाचा ठाव समूळ फिटला । अवघा देहीं दाटला देव माझ्या ॥३॥ एका जनार्दनीं कैसें नवल जाहलें । दिशाद्रुम दाटले देहें सहजीं ॥४॥
२०९६
पहा कैसी नवलाची ठेव । स्वयमेव देही देखिला देव ॥१॥ नाहीं जप तप अनुष्ठान । नाहीं केलें इंद्रियाचें दमन ॥२॥ नाहीं दान धर्म व्रत तप । अवघा देहीं जालो निष्पाप ॥३॥ पापपुण्याची नाहीं आटणी । चौदेहासहित शरण एका जनार्दनीं ॥४॥
२०९७
पहा पहा उसां बैसलासे काळ । भरली ते वेळ न चुके मग ॥१॥ सर्वही संबंधीं असतां जवळी । नेईल तात्काळीं तुजलागीं ॥२॥ पाहे पां तो बोका बैसतो टपूनी । जातो उचलोनी घेउनी अंश ॥३॥ एका जनार्दनीं किती भाकूं कींव । नायकती जीव गुंतले ते ॥४॥
२०९८
पहा पहा विठ्ठलमुख । हरे जन्ममरण दुःख ॥१॥ पहातां राउळाची ध्वजा । पुर्वज उद्धरती सहजा ॥२॥ कळस देखतां नयनीं । होय पातकांची धुणी ॥३॥ चंद्रभागा करितां स्नान । कोटी तीर्थाचें मार्जन ॥४॥ पुंडलिका घेती भेटी । तयां वास तो वैकुंठी ॥५॥ एका जनार्दनीं प्रदक्षिणा । पार नाहीं त्यांच्या पुण्या ॥६॥
२०९९
पहा हो पहा वृदांवनीं आनंदु । क्रीडा करी यशोदेचा बाळ मुकुंद ॥१॥ गोपाळ गौळिणी मिळवोनि गोधनें । काला वाटी हमामा खेळे मांडोनि देहुंडें ठाणे ॥२॥ रासमंडळ रची आडवितसे गौळणी । जाऊनियां धरी राधिकेची वेणी ॥३॥ एका जनार्दनी विश्वव्यापक हा देव । एक एक पाहतां अवघें स्वप्नवत वाव ॥४॥
२१००
पहातां संतसमुदाय । भुक्ति मुक्ति तेथें देव ॥१॥ जातां लोटांगणीं भावें । ब्रह्माज्ञान अंगं पावें ॥२॥ तयाचे उच्छिष्टाचा कण । शरण एका जनार्दन ॥३॥
२१०१
पहाला तो दीन हरिखाचा आम्हां । सर्वाभुतीं अभिन्न सदा देखों श्रीरामा ॥१॥ काय सांगु गोविंदा तुझीं आवडी । जनीं वनीं नयनीं नीत नवी गोडी ॥२॥ निमिष्य जैसें वर्ष तैसें आम्हां गोडी । हरिरुप पाहता हरिखे मनबुद्धि वेडी ॥३॥ जनवनमन अवघें जालें जनार्दन । एकाएकी पाहतां तेथें हारपले मन ॥४॥
२१०२
पहालें रे मना पहालें रे । बुद्धिबोधें इंद्रियां सम जालें रें ॥१॥ नयनीं पहातां न दिसे बिंब । अवघा प्रकाश स्वयंभ ॥२॥ एका जनार्दनीं पहाट । जनीं वनीं अवनीं लखलखाट ॥३॥
२१०३
पहावया गेलों देव । तो मीची स्वयमेव ॥१॥ आतां पाहणेंचि नाहीं । देव भरला हृदयीं ॥२॥ पाहतां पाहतां खुंटलें । देवपण मजमाजीं आटलें ॥३॥ परतलें दृष्टीचें देखणें । अवघा देव ध्यानेंमनें ॥४॥ एका जनार्दनीं देव । नुरे रिता कोठें ठाव ॥५॥
२१०४
पांघुरला घोंगडे काळें । वृदांवनीं गोपाळा माजीं खेळे । काला वाटीं निजांगें गोपाळ । खेळ खेळे नानापरी ॥१॥ पाहती देव बैसोनि विमानीं । ब्रह्मादिक ध्याती जया मनीं । आराध्यदैवत सनकादिकांचे हृदयभुवनीं । शिवादि पायावणी वंदिती ॥२॥ नानापरी विटीदांडु चेंडु । हमामा हुमरी लगोर्‍या मांडुं । नव लक्ष मिळावे सवंगडु । यमुनेथडी कळंबातळीं ॥३॥ गोंधने ठाई ठाईं बैसविले । गोपाळ सवंगडे भोवते शोभले । मध्येम घननीळ ते सांवळें । नंदरायाचें गोठुलें गे माये ॥४॥ एका जनार्दनींशरण । पाहतां देहीं विरालें देहपण । संपुर्ण जनीं जनर्दन । पाहतां पाहतां गेलों भुलोन गे मायें ॥५॥
२१०५
पांच पांचाचा मिळोनि मेळु । सदाशिव म्हणती अमंगळू ॥१॥ कवणा न कळे याचा भावो । शिव साचार देवाधि न कळे याचा भावो ॥२॥ विरुपाक्ष म्हणती भेकणा । परी हा सर्वांग देखणा ॥३॥ एका जनार्दनीं प्रबोधु । शिव नित्य नवा आणि वृद्धु ॥४॥
२१०६
पांचा जाणाचें । आणिलें जयाचें । मिरवण तयाचें । कोण सुख ॥१॥ नवल विस्मयो कैसा । देखत देखत झांसा । मृगजळाची आशा । केवीं आहे ॥२॥ आतां नेती मग नेती । ज्याचें तें घेउनी जाती । मूढ जन म्हणती । माझें माझें ॥३॥ स्वप्नींचें निज भोज । कोल्हार मंडपीचें चोज । गंधर्व नगरीं राज्य । केवीं घडे ॥४॥ ऐसें जाणोनी अरे जना । भुललासि अज्ञाना । मी माझी कल्पना । करसी वायां ॥५॥ एका जनार्दनीं हरीं । व्यापक तो चराचरीं । तोची एक निर्धारी । वाउगे येर ॥६॥
२१०७
पांडवांचे गृहीं जाण । असंख्य जेविले ब्राम्हण । धर्माचें विस्मित मन । संख्येलागीं ॥१॥ तें कळलें वैकुंठा । निर्मिली तेव्हां घंटा । तेव्हां ते गर्जे देखा । संख्या नाद ॥२॥ तेथें व्यास देवाचा सुत । शुकदेव अवधूत । ब्राम्हण शेष व्हावे प्राप्त । म्हणोनि येतां जाहला ॥३॥ रात्रसमयीं सुखी एकीं । शीत घातलें मुखीं । घंटानाद सकळिकीं । ऐकिला कानीं ॥४॥ कृष्ण पाहे ध्यानीं । शुक्रदेव आणिला धुंडोनी । पूजा नमस्कार करुनी । गेलासे वना ॥५॥ एका जनार्दनीं जाण । धर्मे केला प्रश्न । तोचि सखा श्रीकृष्ण । सांगतसे ॥६॥
२१०८
पांथस्थ घरासी आला । प्रातःकाळीं उठोनि गेला ॥१॥ तैसें असावें संसारीं । जैसी प्राचीनाची दोरी ॥२॥ बाळीं घराचार मांडिला । तो सवेंचि मोडूनि गेला ॥३॥ एका विनवी जनार्दना । ऐसें करी गा माझ्या मना ॥४॥
२१०९
पांहता पाहता वेधलेंसे मन । तेणें समाधान जीवशिवां ॥१॥ जीवांचें जीवन मनाचें मोहन । वाचेसी मौन्य सदा पडे ॥२॥ परादिकां ज्याचा न कळेचि अंत । सर्व गुणातीत भेदरहित ॥३॥ एका जनार्दनीं त्रिगुण परता । ओतप्रोत सर्वथा भरलासे ॥४॥
२११०
पाउला पाउली चिंतावी माउली । विठाई साउली आदि अंती ॥१॥ नोहे परता भाव नोहे परता भाव । आतुडेचि देव हाति मग ॥२॥ बैसलासे दृढ हृदयमंदिरी । सब्राह्माभ्यंतरीं कोंडोनियां ॥३॥ एकाजनार्दनीं जडला विठ्ठल । नोहें तो निर्बळ आतां कधीं ॥४॥
२१११
पाउले गोजिरीं ध्यान विटे मिरवले । शोभते तान्हुले यशोदचे ॥१॥ न कळे पुरणां शास्त्रादि साम्यता ॥ तो हरी तत्त्वतां पढरीये ॥२॥ एका जनार्दनीं ऐक्यरुप होऊनी । भक्तांची आयणी पुरवितसे ॥३॥
२११२
पाजी प्रेमपान्हा लाऊनियां सोई । पुन्हा तो न गोवीं येरझारीं ॥१॥ येरझार दारीं घातलासे चिरा । ठेविलेंसे स्थिरा चरणाजवळीं ॥२॥ एका जनार्दनीं केलोंसे मोकळा । संतापायीं लळा लाऊनियां ॥३॥
२११३
पाणियाचा मासा जाला । नामरूपा नाहीं आला ॥१॥ तें पूर्वीच पाणी आहे । तेथें पारधी साधील काय ॥२॥ जंव पारधी घाली जाळें । तंव त्याचेंच तोंड काळें ॥३॥ एका जनार्दनीं सर्वही पाणी । माशियाची कैंची खाणी ॥४॥
२११४
पातला रे भवगजपंचानन । निरसूनियां जन झाला जनार्दन ॥१॥ नाभी नाभी नाभीसी काह्मा । नाथिला संसार लटकी ही माया ॥२॥ वचनाचेनि घायें संशय तोडिले । अनेकत्व मोडुनि एकत्व जोडिलें ॥३॥ वांझेचा पुत्र कळिकाळाचा वैरी । एक जनार्दनीं संसार तोडरीं ॥४॥
२११५
पापपुण्य दोन्हीं समानची गांठी । नाम जपा होटीं श्रीरामांचें ॥१॥ तुटेल बंधन खुटेल पतन । नाम तें पावन श्रीरामाचें ॥२॥ भोग रोग नासे कल्पना दूर देशे । श्रीराम मुखी वसे प्राणीयांसी ॥३॥ एका जनार्दनीं नामींच विश्वास । ठेवितां निश्चयास दोष भंगे ॥४॥
२११६
पापाची वस्ती जाणा । पंढरीसी नाहीं कोण्हा ॥१॥ अवघे भाग्याचे सदैव । तेथें वसे विठ्ठल देव ॥२॥ माहेर भाविका । देखिलीया पुडलिका ॥३॥ जनार्दनाचा एका म्हणे । पंढरी पेणें सुखवस्ती ॥४॥
२११७
पाया शोधोनियां बांधिताती घर । ऐसें या दुस्तर नरदेहीं ॥१॥ म्हणती पुत्र माझे नातु हें कलत्र । मिळती सर्व गोत्र तये ठाई ॥२॥ संपत्ति देखोनि गिवसिती तयासी । माझें माझें म्हणती रांडापोरें ॥३॥ चाले बरवा धंदा । बहिणी म्हणती दादा । आलिया दरिद्रबाधा पळुनी जाती ॥४॥ जनार्दनाचा एका करितसे विनंती । संतसंगें चित्तीं जीवीं धरा ॥५॥
२११८
पायांचें चिंतन । माझे हेंचि भजन ॥१॥ भजनाचा मुख्य भाव । चित्तीं चिंतन लवलाहीं ॥२॥ हेतु दुजा मनीं । ठेऊं नका चक्रपाणी ॥४॥ मज पायां परतें । नका ठेवुं जी निरुतें ॥५॥ कृपाळुंजी देवा । एका जनार्दनीं ठेवा ॥६॥
२११९
पायांवरी ठेवितां भाळ । कर्म सकळ सुफळ ॥१॥ ऐसा छंद जया मनीं । धन्य जननी तयाची ॥२॥ लोटांगण संतापुढा । घाली उघडा होउनी ॥३॥ एका जनार्दनीजं भेंटीं । जन्ममरणा होय तुटीं ॥४॥
२१२०
पायांवरी ठेवितां भाळ । गेली तळमळ सकळही ॥१॥ बैसलें रुप डोळां आधीं । गेली उपाधी सकळ ॥२॥ एका जनार्दनीं मंगल जाला । अवघा भरला हृदयीं ॥३॥
२१२१
पायांवरी ठेविती भाळ । तें प्रेमळ वारकरी ॥१॥ जन्मोजन्मीं त्यांचा संग । द्या अभंग सर्वदा ॥२॥ सर्वकाळ वाचे । दुजें साचें नाठविती ॥३॥ एका जनार्दनीं त्यांचा संग । घडावा सर्वांगें मजसी ॥४॥
२१२२
पायारीं घालीन मिठी । दाटेन कंठीं सदगद ॥१॥ वाहेन टाळी नाचेन रंगीं । दुजें संगीं नका कांहीं ॥२॥ पायवणीं वंदीन माथा । निवारेल चिंता मग सर्व ॥३॥ एका जनार्दनीं दान । द्यावे दोष गुण न पाहा ॥४॥
२१२३
पायाळसी अंजन असावें डोळां । मग धनाचा कोहळा हातां लागे ॥१॥ तैसें पायाळपणें पुडलीक धन्य । दाविलें निधान पंढरीसी ॥२॥ एका जनार्दनीं चहुं वाचांवेगळा। परापश्यंतीसी कळा न कळेची ॥३॥
२१२४
पायीं जडलें माझे मन । चित्त जालें समाधान ॥१॥ तुमच्या नामाचा महिमा । आजी पावन केलें आम्हां ॥२॥ कृपा केली तुम्हीं । लावियेलें आपुलें नामीं ॥३॥ एका जनार्दनीं पूर्ण कृपा । तेणें मार्ग जाला सोपा ॥४॥
२१२५
पार नाहीं जयाच्या गुणा । तो उभा श्रीपंढरीचा राणा ॥१॥ नवल गे माय भक्ताचेसाठीं । कटीं कर ठेवुनी उभा वाळुवंटीं ॥२॥ न म्हणे तया कोणते बोल । उगा राहिला न बोले बोल ॥३॥ एका जनार्दनीं भक्तांची आस । धरुनी उभा तिष्ठे जगदीश ॥४॥
२१२६
पालटे भावना संताचे संगती । अभाविकांहि भक्ति प्रगटतसे ॥१॥ ऐसा ज्याचा उपकार । मानिती निर्धार वेदशास्त्रें ॥२॥ तारितीं आणिकां देऊनि विठ्ठलमंत्र । एका जनार्दनीं पवित्र नाम गाती ॥३॥
२१२७
पाळतोनि जाती घरासी तात्काळ । खेळ तो अकळ सर्व त्याचा ॥१॥ गोपाळ संवगडे मेळावोनि मेळा । मध्ये तो सावळा लोणी खाये ॥२॥ निजलियाच्या मुखा माखिती नवनीत । नवल विपरित खेळताती ॥३॥ न कळे लाघव करी ऐशीं चोरी । एका जनार्दनी हरीं गोकुळांत ॥४॥
२१२८
पावन क्षेत्र पंढरपुर । पावन तीर चंद्रभागा ॥१॥ पावन संत पुडलीक । पावन देख श्री विठ्ठल ॥२॥ पावन देह गेलीया तेथें । होती जीवनमुक्त सर्व जीव ॥३॥ एका जनार्दानीं पावन । पावन पंढरी अधिष्ठिन ॥४॥
२१२९
पावला जनन मातेच्या उदरीं । संतोषली माता तयासी देखोनी ॥१॥ जो जो जो म्हणोनी हालविती बाळा । नानापरीं गाणें गाती करिती सोहळा ॥२॥ दिवसेंदिवस वाढला सरळ फोक । परि कर्म करी अचाट तयान सहावे दुःख ॥३॥ शिकवितां नायके पडे भलते वेसनीं । एका जनार्दनीं पुन्हा पडतसे पतनीं ॥४॥
२१३०
पावलों प्रसाद । अवघा निरसला भेद ॥१॥ द्वैताद्वैत दुर ठेलें । एकपणें एक देखिलें ॥२॥ जन वन समान दोन्हीं । जनार्दन एकपणीं ॥३॥ एका जनार्दनीं लडिवाळ । म्हणोनि करावा सांभाळ ॥४॥
२१३१
पाषाणाची करूनि मूर्ति । स्थापना करिती द्विजमुखें ॥१॥ तयां म्हणताती देव । विसरुनि देवाधिदेव ॥२॥ मारिती पशूंच्या दावणी । सुरापाणी आल्हाद जयां ॥३॥ आमुचा देव म्हणती भोळा । पहा सकळां पावतसे ॥४॥ ऐशा देवा देव म्हणे न कोणीही । एका विनवी जनार्दनीं ॥५॥
२१३२
पाहतां पाहतां कैसें पालटलें मन । देखणेचि दाविलेंक चोरुनी गगन ॥१॥ आनंदें जनार्दना लागलों मी पायां । गेली माझी माया नाहींपणे ॥२॥ देखणेंचि केवळ दिसताहे सकळक । सुखाचे निष्फळ वोतिलें जग ॥३॥ एक जनार्दनीं निमाला एकपणें । मोहाचें सांडणें माया घेऊनी ॥४॥
२१३३
पाहतां पाहतां नेत्र गेले । परी भुललेसे मेळे संसाराच्या ॥१॥ जाऊनि धरितो माझें म्हणोनियां । परी तें वायां जाती सर्व ॥२॥ विषय भोगितो गर्दभाचे रितीं । लाभ तो निश्चिती लत्ताप्रहर ॥३॥ एका जनार्दनीं मंडुकाचे परी । वटवट खरी संसारीं ते ॥४॥
२१३४
पाहतां पाहतां परतलें मन । जालें समाधान चित्तीं माझें ॥१॥ संताचें संगतीं लाभ येवढा झाला । पंढरीये पाहिला विठ्ठल देवो ॥२॥ एका जनार्दनीं मनींच बैसला । नवजे संचला दीपु जैसा ॥३॥
२१३५
पाहतां पाहतां वेधलें मन । झालें उन्मन समाधिस्था ॥१॥ ऐसा परब्रह्मा पुतळा देखिलासे डोळा । पाहिला सावळा डोळेभरी ॥२॥ तनु मन वेधलें तयाचे चरणीं । शरण एका एकपणें जनार्दनीं ॥३॥
२१३६
पाहतां पाहतांभुललें मन । धरिलें चरण हृदयीं ॥१॥ वेधें वेधिला जीव प्राण । ब्रह्माज्ञान नावडे ॥२॥ तीर्थाचे जें अधिष्ठान । पुण्यपावन चंद्रभागा ॥३॥ सकळ देवांचा देव उभा । एका जनार्दनीं गाभा लावण्याचा ॥४॥
२१३७
पाहतां विठ्ठल रुप । अवघा निवारिला ताप ॥१॥ ध्यानीं आणितां तें रुप । अवघा विराला संकल्प ॥२॥ बैसलासे डोंळा । एका जनार्दनीं सांवळा ॥३॥
२१३८
पाहतां विश्राम सुखवस्ती धाम । पंढरी पुण्यग्राम भुमीवरी ॥१॥ जावया उद्वेग धरिला माझा मने । उदंड शाहाणें तये ठायीं ॥२॥ एका जनार्दनीं मानिला विश्वास । नाहीं दुजीं आस पायांवीण ॥३॥
२१३९
पाहतो देखतो कानीं जें ऐकतो । परी सदाचि पाहतो संसार मनीं ॥१॥ मीनाचिये परी गुंतलासे जळीं । परी संसारा कवळी अधम तो ॥२॥ दानधर्म कांहीं न वेंचे आडका । रुक्यासाठीं थडका घेत असे ॥३॥ एका जनार्दनीं संसारावेगळा । कैं मी गोपाळा होईल साचा ॥४॥
२१४०
पाहिला नंदाचा नंदन । तेणें वेधियलेम मन ॥२॥ मोरमुकुट पितांबर । काळ्या घोंगडीचा भार ॥२॥ गोंधनें चारी आनंदे नाचत । करी काला दहीं भात ॥३॥ एका जनार्दनीं लडीवाळ बाळ तान्हा । गोपाळांशीं कान्हा खेळे कुंजवना ॥४॥
२१४१
पाहुं जातां नारायणा । पाहतां मुकिजे आपणा ॥१॥ ऐसा भेटीचा नवलाव । पाहतां नुरे भक्तदेव ॥२॥ पाहतां नाठवेचि दुजें । तेंचि होइजे सहजें ॥३॥ एका जनार्दनीं भेटी । जन्ममरण होय तुटी ॥४॥
२१४२
पाहुनियां पंढरीपुर । मना आनंद अपार ॥१॥ करितां चंद्रभागें स्नान । मना होय समाधान ॥२॥ जातां पुंडलीकाचे भेटीं । न माय आनंद त्या पोटीं ॥३॥ पाहतां रखुमादेवीवर । मन होय हर्षनिर्भर ॥४॥ पाहा गोपाळपूर वेणूनाद । एका जनार्दनी परमानंद ॥५॥
२१४३
पाहुनियां मनोगत । पुरवा हेत तुम्ही माझा ॥१॥ मग मी न सोडी चरणां । संत सुजाणा तुमचीया ॥२॥ दंडवत घालीन पायां । करा छाया कृपेची ॥३॥ शरण एका जनार्दनीं । मुगुटमणीं तुम्हीं संत ॥४॥
२१४४
पाहुनियां हरी गोपाळांचे चोज । म्हणे येणें तो निर्वाणीचें निज मांडियले ॥१॥ मेठा खुंटीं येउनी हुंबरी घालिती । खर तोंडाप्रती येती जाहली ॥२॥ कळवळला देव जाहालासे घाबरा । मुरली अधरा लावियेली ॥३॥ मुरलीस्‍वरे चराचरी नाद तो भरला । तेणें स्थिर झाला पवनवेंगीं ॥४॥ यमुनाहि शांत झाली तेच क्षणीं । म्हणे चक्रपाणी सावध व्हा रे ॥५॥ पेंदीयानें तो शब्द ऐकिला कानीं । एका जनार्दनीं स्थिर झाला ॥६॥
२१४५
पाहुनी कृष्णासी आनंद मानसी प्रेमभरित अहर्निशीं कृष्णनामें ॥१॥ आजीं कां वो कृष्ण आला नाहीं घरां । करती वेरझारा नंदगृहीं ॥२॥ भलतीया मिसें जातीं त्या घरासी । पाहतां कृष्णासी समाधान ॥३॥ एका जनार्दनीं वेधल्या गौळणी । तटस्थ त्या ध्यानीं कृष्णाचिया ॥४॥
२१४६
पाहुनी दशदिशा नामा रडूं लागे । कां बा पांडुरंगे ऐसे केलें ॥१॥ चरणाचा माग येथवरी आला । येथें गुप्त जाहला करुं काय ॥२॥ का हो केशिराजा अवकृपा केली । माझी सांडी सांडिली देवराया ॥३॥ एका जनार्दनीं रडतां नामदेव । पाहिलेंसे तेव्हां सांवत्यानें ॥४॥
२१४७
पाहूं गेलिये हरि जागरा । नयन लांचावले नंदकुमारा ॥१॥ तान्हया रे मनमोहना । देहगेहाची तुटली वासना ॥२॥ आदरें आवडी ऐकतां नाम । नाममात्रें जालों निष्काम ॥३॥ एका जनार्दनीं हरिकीर्तन । समाधीसी तेथें समाधान ॥४॥
२१४८
पाहूनियां गोरा दंडवत घाली । म्हणे कोण स्थळीं वस्ती तुम्हां ॥१॥ पंढरीसी राहतों परदेशी आम्ही । नाम तरी स्वामीं विठु माझें ॥२॥ सांगतो कांता आहे बरोबरी । परिवार तरी एवढाचि ॥३॥ ऐकोनियां मात गोरा संतोषला । रहावें कामाला माझे घरीं ॥४॥ विठु म्हणे हाचि हेतु धरुनी आलों । एका जनार्दनीं जाहलों निर्भय आतां ॥५॥
२१४९
पाहों गेलों देवालागीं । देवरुप झालों अंगीं ॥१॥ मीतुंपणा ठाव । उरला नाहीं अवघा देव ॥२॥ सुवर्णाचीं झाली लेणीं । देव झाला जगपणीं ॥३॥ घटीं मृत्तिका वर्तत । जगीं देव तैसा व्याप्त ॥४॥ एकानेक जनार्दन । एका जडला एकपणें ॥५॥
२१५०
पाहोनियां भक्तनाथा । स्वयें दे आपुली कांता ॥१॥ देतां न पाहे मागेंपुढें । उदार त्रिभुवन थोकडें ॥२॥ देणें जयाचें अचाट । म्हणोनि नाम नीलकंठ ॥३॥ एका जनार्दनीं भोळा । पाळों जाणें भक्तलळा ॥४॥
२१५१
पिंगा बाई पिंगा गे । अवघा धांगडधिंगा गे ॥१॥ सांडोनी संतांची गोडी गे । कासया पिंगा जोडी गे ॥१॥ नको घालूं पिंगा गे । तुम्हींरामरंगी रंगा गे ॥३॥ एका जनार्दनीं पिंगा गे । कायावाचा गुरुचरणीं रंगा गे ॥४॥
२१५२
पिंडिच्या प्रळयासी सांगेन तुम्हांसी जो कां या देहासी होत आहे. ॥१॥ पृथ्वी बोलिजे प्राणी प्राणरंध्र । परिमळ घेउनी जाये तें घर ॥२॥ मग तो नेणें सुमनाचा सुवास । पृथ्वी तें अंशें जीवन मिळे ॥३॥ रसनेसी स्वाद ते जनवृंदा खाद्य । जीवनाचा जो स्वाद तोचि मिळे ॥४॥ असोनियां नेत्र न देख मंत्र । नयनाते दीस पवन मिळे ॥५॥ नाडीचा तो त्वरीत निघोनि जाय मारुत । सेवितां तो कोलीत या शुद्धि नाहीं ॥६॥ कंठाखालता काळ तो धुंडित । मेळवोनि समस्त एक करी ॥७॥ एका जनार्दनीं मेळा जो झाला । काळ घेउनी गेला लिंगदेहा ॥८॥
२१५३
पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारा । हरिविण सारा व्यर्थ भ्रम ॥१॥ शुक याज्ञावल्क्या दत्त कपिल मुनी । हरीसी जाणोनी हरिच झाले ॥२॥ या रे या रे धरुं हरिनाम तारुं । भवाचा सागरु भय नाहीं ॥३॥ साधुसंत गेले आनंदीं राहिलें । हरिनामें झाले कृतकृत्य ॥४॥ एका जनार्दनीं मांडिलें दुकान । देतो मोलविण सर्व वस्तु ॥५॥
२१५४
पिकली पंढरी पिटिला धांडोरा । केणें आलें घरा सभागियांच्या ॥१॥ चंद्रभागे तीरीं उतरले बंदर । आले सवदागर साधुसंत ॥२॥ वैष्णव मिळोनि केला असे सांठा । न घेतो करंटा अभागीया ॥३॥ एका जनार्दनीं आलें गिर्‍हाईक । वस्तु अमोलिक सांठविली ॥४॥
२१५५
पिता पुत्र नातु सर्व काळें ग्रासिलें । उरले ते गेले काळमुखीं ॥१॥ सायास करूनि वाढविती माझें । परि काळाचें तें खाजें नेणती ते ॥२॥ बाळतरुण वृद्धदशातें पावती । परी न म्हणती रामराम ॥३॥ एका जनार्दनीं भुलला गव्हार । न करी स्वहिताचा ॥४॥
२१५६
पिता सांगतां गोष्टी । तयासी करितो चावटी ॥१॥ नायके शिकविलें । म्हणे म्हातार्‍यासी वेड लागलें ॥२॥ बाईल बोलताचि जाण । पुढें करून धांवे कान ॥३॥ ऐसें नसावें संतान । वायां भूमीभार जाण ॥४॥ एका जनार्दनीं अमंगळ । त्याचा होईल विटाळ ॥५॥
२१५७
पिसाळलें श्वान पाणीयासी बीहे । तैसा नरदेह संसारासी ॥१॥ वाउगाची शीण पावती पतन । नेणे आपुलें विंदान भुलला वायां ॥२॥ मर्कटासो जेवीं मदिरा पाजिली । भूतबाधा झाली तयावरी ॥३॥ सैरावैरा नाचे कोण तया हासे । एका जनार्दनीं तैसें मनुष्यदेहीं ॥४॥
२१५८
पीक पीकलें प्रेमाचें । सांठविलें गगन टांचें ॥१॥ भूमि शोधोनी पेरिजे बीज । सदगुरुकृपें उगवलें सहज ॥२॥ कामक्रोधाच्या उपटोनी पेंडी । कल्पनेच्या काशा काढीं ॥३॥ एका जनार्दनीं निजभाव । विश्वंभारित पिकला देव ॥४॥
२१५९
पुंडलिक संत भला । तेणें उद्धार जगाचा केला ॥१॥ तयाचे वंदावें चरण । कायावाचामनें करुन ॥२॥ उपाधिसंग तुटती व्याधी । एका जनार्दनीं समाधी ॥३॥
२१६०
पुंडलिकापुढें सर्वेश्वर । उभा कटीं ठेउनी कर ॥१॥ ऐसा पुंडलिकापुढें हरी । तो पुजावा षोडशोपचारी ॥२॥ संभोवता वेढा संतांचा । आनंद होतो हरिदासांचा ॥३॥ एका जनार्दनीं देव । उभा विटेवरी स्वयमेव ॥४॥
२१६१
पुंडलिकें उभा केला । भक्त भावाच्य आंकिला ॥१॥ युगें जालें अठठावीस । उभा मर्यादा पाठीस ॥२॥ सम पाउलीं उभा । कटीं कर कर्दळीगाभा ॥३॥ गळां वैजयंती माळ । मुगुट दिसतो तेजाळ ॥४॥ एकाजनार्दनीं शोभा । विठ्ठल विटेवरी उभा ॥५॥
२१६२
पुंडलीक म्हणतां वाचें । पाप जाते रें जन्माचे । जिहीं देखिलें पद यांचे । धन्य भग्याचे नर ते ॥१॥ जाती पंढरीसी आधीं । तुटे तयांची उपाधी । ऋद्धी सिद्धी मांदी । तिष्ठतसे सर्वदा ॥२॥ भुक्ति मुक्ति धांवती मागें । आम्हां अनुसारा वेगें । ऐसें म्हणोनि वेगें । चरणीं मिठी घालिती ॥३॥ शरण एका जनार्दनीं । विटें उभा मोक्षदानी । लागतां तयांचे चरणीं । पुनरावृत्ति न येतीं ॥४॥
२१६३
पुजा उपचार । मज पुरविले अपार ॥१॥ कळूं दिली नाहीं मात । अपराधी मी पतीत ॥२॥ जडजीवां उद्धरीलं । एका जनार्दनीं ऐसें केलें ॥३॥
२१६४
पुजी माझिया भक्तांतें । तेणें संतोष होत मातें ॥१॥ भक्त माझा मी भक्तांचा । ऐसी परंपरा साचा ॥२॥ देवभक्तपण । वेगळीक नाहीं जाण ॥३॥ भक्त जेवितांची धालो । एका जनार्दनीं लाधलो. ॥४॥
२१६५
पुढलीये जन्मीं नामा तो अंगद । भक्तिभावें तोषविला राम सदगद ॥१॥ परंपरा भक्ति हेचि असे भाक । देऊनियां देवें केलें कौतुक ॥२॥ एका जनार्दनीं भक्ताचे मनोरथ । स्वयें रमानाथ पुरवितसे ॥३॥
२१६६
पुढें कालीमाजीं होणार जे भक्त । ते मूर्तिमंत उद्धव पाहे ॥१॥ पाहतां पाहतां समाधि उन्मनीं । गेलासे बुडोनि सुखमाजीं ॥२॥ एका जनार्दनीं नाठवेचि कांहीं । देहीच्या विदेही होउनी ठेलों ॥३॥
२१६७
पुढें गेले हरीचे दास । त्यांची आस आम्हांसी ॥१॥ त्याची मार्गीं आम्हीं जाऊं । वाचे गाऊं विठ्ठला ॥२॥ संसाराचा न करुं धंदा । हरुषें सदा नाम गाऊं ॥३॥ एका जनार्दनीं डोळे । पहाती पाउलें कोंवळें ॥४॥
२१६८
पुरवा माझी एवढी आस । करा निजदास संतांचा ॥१॥ इच्छा पुरवा मनीचा हेत । सभाग्य संत दाखवा ॥२॥ आणिक मागणें तें नाहीं । दुजा नाहीं आठव नको ॥३॥ घालीन लोळणीं । संतचरणा निशिदिणीं ॥४॥ परलोकीचे तारुं । एका निर्धारु जनार्दनीं ॥५॥
२१६९
पुरवावया मनोरथ । उभा अनाथनाथ विठ्ठल ॥१॥ भोळेभाळे येती शरण । चुकवी त्यांचें जन्ममरण ॥२॥ एका जनार्दनीं भाव । अपुनिया भाका कींव ॥३॥
२१७०
पुरुष अथवा नारी । नाचती कीर्तन गजरीं ॥१॥ तया कोनी जें हासती । त्यांचें पूर्वज नरका जाती ॥२॥ आपुली आपण । कीर्तनीं सोडवण ॥३॥ देहीं असोनी विदेहता । कीर्तनीं होय पैं तत्त्वतां ॥४॥ ऐसा कीर्तनमहिमा । एका जनार्दनीं उपमा ॥५॥
२१७१
पुरुष अथवा नारी आलिया संसारीं । वाचे हरी हरी भलत्या भावें ॥१॥ सुफळ संसार एका रामनामें । वाउग्या त्या भ्रमें पतन घडे ॥२॥ जन्ममरणाचा तोडॊनियां फांसा । वेगीं हृषिकेशा भजा आधीं ॥३॥ एका जनार्दनीं किती हें सांगावें । गुंतलेती हावे वाउगें तें ॥४॥
२१७२
पुर्वपुण्य असतां गांठीं । संतभेटी होय ॥१॥ धन्य धन्य संतसंग । फिटे तग जन्माचा ॥२॥ चार सहा वंदिती पाय पैं । आणिकां ठाव कोठें नाहीं ॥३॥ एका जनार्दनीं संत । कृपावंत सुखासिंधु ॥४॥
२१७३
पुर्वीचिया मतांतरा । सांपडला बरा आम्हां मार्ग ॥१॥ नाहीं कोठें गोंवा गुंतीं । ऐसें गर्जती हरिदास ॥२॥ वाचें नाम करें टाळी । साधन कली उत्तम हें ॥३॥ धालों कीर्तनीं प्रेमानंदें । वाचें आनंदें गाऊं गीत ॥४॥ एका जनार्दनीं धरली कास । नाहें आस दुसरी ॥५॥
२१७४
पुष्पावती चंद्रभागे । करितां स्नान भंगे दोष ॥१॥ पाहतां पुंडलीक नयनीं । चुके जन्म नये अयनीं ॥२॥ घेतां विठ्ठलदरुशन । होती पातकी पावन ॥३॥ करितां प्रदक्षिना । पुन्हा जन्म नाहीं जांणा ॥४॥ एका जनार्दनीं शरण । कळस पाहतां मुक्त जाण ॥५॥
२१७५
पूजन तो एक पुरे । वाचे स्मरे रामनाम ॥१॥ नको गंधाक्षता तुळशी । मुखीं नाम अहर्निशीं ॥२॥ धूप दीप नैवेद्य तांबूल । सदा वाचे नाम बोल ॥३॥ आर्ती धूपार्ती अक्षता । राम गाऊं निःसीमता ॥४॥ एका जनार्दनीं शरण । सहज पूजा घडे जाण ॥५॥
२१७६
पूजा करुं कैशी देवा । वाचे आठवुं केशवा ॥१॥ हेचि माझी पूजाविधी । सर्व टाकिली उपाधी ॥२॥ घालूनि निर्मळ आसन । पूजुं संतांचें चरण ॥३॥ दृढ करूं भाव साचा । सदा छंद रामनामाचा ॥४॥ एका जनार्दनीं पूजा । सर्वभावें गरुडध्वजा ॥५॥
२१७७
पूजा करूं तरी पूजे नाहीं ठाव । भाव धरूं तरी देवचि देव ॥१॥ करुं तरी पूजा कवणाचि सांगा । देवाविण जागा रिती कोण ॥२॥ एका जनार्दनीं पूजेसी नाहीं ठाव । अवघा व्यापला देवाधिदेव ॥३॥
२१७८
पूजा यथासांग पूर्ण । न घडे तरी संतपूजन ॥१॥ करितां ऐसा संकल्प । तेणें जोडे महातप ॥२॥ ध्यानीं ध्यातां संतचरण । होईल मना समाधान ॥३॥ ऐसा पूजेचा सोहळा । एका जनार्दनीं पाहे डोळां ॥४॥
२१७९
पूजिती खंडेराव परत भरिती । विठ्ठल विठ्ठल न म्हणती अभागी ते ॥१॥ लावुनि भंडार दिवटा घेती हातीं । विठ्ठल म्हणतां लाजती पापमती ॥२॥ ऐसियासी भाव सांगावा तो कवण । एका जनार्दनी काय वाचा शरण ॥३॥
२१८०
पूजिला श्रीपती एकविध भावें । होऊनि स्थिरावें हृदयामाजीं ॥१॥ करितसे विनमाणी प्रेमाचें अंजुळ । तेणें घननीळ तुष्टमान ॥२॥ एका जनार्दनीं सर्व भावें पूजन । जनीं जनार्दन पूजियेला ॥३॥
२१८१
पूजेचे प्रकार असती सोळा बारा । ते मी दातारा नेणें कांहीं ॥१॥ म्हणवितां दास मनीं धरूनि आस । धरिलीसे कास जनार्दना ॥२॥ सायास संकट न करी व्रताचार । गाईन निरंतर जनार्दनु ॥३॥ एका जनार्दनीं शरआण मने वाचें । तया पूजनाचें सुख होय ॥४॥
२१८२
पूर्व सुकृताची गांठोडी पदरीं । तरीच पंढरी वास घडे ॥१॥ कोटी यज्ञफळ भीमरथी पाहतां । मोक्ष सायुज्यता ततक्षणीं ॥२॥ पृथ्वीचे दान असंख्या गोदानें । पंडलीक दरुशनें न तुळती ॥३॥ एका जनार्दनीं विठ्ठलाचे भेटी । वेरझारा तुटी जन्मोजन्मीं ॥४॥
२१८३
पूर्वापार परंपरा । संत सोयरा वानिती ॥१॥ सांगे कृष्ण उद्धावासी । सुखमिरासी पंढरी ॥२॥ स्वयें नांदे सहपरिवार । करीत गजर भक्तिचा ॥३॥ संत सनकादिक येती । भावें वंदिती श्रीचरण ॥४॥ एका जनार्दनीं वेधलें मन । नुठें बैसलें तें तेथुन ॥५॥
२१८४
पूर्वापार श्रीविठ्ठलमूर्ति । ऐसे वेद पै गर्जती ॥१॥ भक्त पुंडलीका निकट । वसतें केलें वाळुवंट ॥२॥ गाई गोपाळांचा मेळ । आनंदे क्रीडे तो गोपाळ ॥३॥ ऐसा स्थिरावला हरी का जनार्दनी निर्धारीं ॥४॥
२१८५
पूर्वी जो प्रल्हाद तोचि जाणा अंगद । तोचि उध्दव प्रसिध्द कृष्णावतारीं ॥१॥ कलीमाजीं जाणा नामदेव म्हणती । लडिवाळ श्रीपति लळा पाळी ॥२॥ तीर्थयात्रा सर्व केलासे उध्दार । सर्व त्याचा भार चालविला ॥३॥ लडिवाळ नामा विठ्ठलचरणीं । एका जनार्दनीं नमन त्यातें ॥४॥
२१८६
पूर्वी बहुतांचे धांवणें केलें । श्रमोनी ठेविले कर कटीं ॥१॥ भक्तांसाठीं मनमोहन धरिले जघन कर कटीं ॥२॥ भाविकांची इच्छा मनीं । उभा धरुनी कर कटीं ॥३॥ एका जनार्दनीं ध्यान । सांवळें ठेवून कर कटीं ॥४॥
२१८७
पूर्वी हिरण्यकश्यपाचे कुळीं । नामा जन्मे भूमंडळीं ॥१॥ तेथें हरिभक्ति करी । तेणें तोषला नरहरी ॥२॥ घेउनी अवतार । राखी भक्तासी सादर ॥३॥ भक्ताचा अंकित । एका जनार्दनीं शरणागत ॥४॥
२१८८
पूर्वीपासूनी ज्यांचें देणें । वाल्मीका पेणें रामनामें ॥१॥ अजामेळ पापराशी । नामेंची त्यासी उद्धार ॥२॥ गणिका व्याभिचारिणी नारी । सरती करी रामनामें ॥३॥ एका जनार्दनीं नाम । जया निष्काम गोमटें ॥४॥
२१८९
पृथ्वी आप तेज वायु गगन । हीं पंचभुतें भिन्नभिन्न ॥१॥ येथें न करीं ठाव । धरी गुरुचरणीं भाव ॥२॥ पंचभूतें पंचप्राण । अवघा एक परिपूर्ण ॥३॥ देहीं आसोनी विदेही । एका जनार्दनीं पाहीं ॥४॥
२१९०
पृथ्वीवरुता दुष्काळ पडला । न मिळे कोणाला धान्यकण ॥१॥ समर्थे तीं सत्व टाकिती बापुडीं । दुबळ्या तांतडीं कोण पुसे ॥२॥ एका जनार्दनीं काळाचें तें मान । सुदामा ब्राम्हण दैन्यवाणा ॥३॥
२१९१
पेंदा म्हणे देवा बाऊ तो पळाला । आमुचे भेणेम गेला देशोधडी ॥१॥ देव म्हणे गोपाळ धन्य तुम्हीं बळी । पळविला बळी बाऊ तुम्हीं ॥२॥ ऐसें समाधान करी मनमोहन । एका जनार्दनीं चरणीं लागे ॥३॥
२१९२
पैलनामें गर्जती वीर । हरीचे डिंगर लाडके ॥१॥ धन्य धन्य ते वैष्णव । सदा नामस्मरणीं जीव ॥२॥ महा वैष्णव निवृत्ती । नाम जपतां ह्य शांती ॥३॥ धन्य धन्य ज्ञानदेव । पातकी तारियेले जीव ॥४॥ धन्य सोपानदेव । म्हणता कळिकाळाचे नाहीं भेव ॥५॥ धन्य धन्य मुक्तबाई । एका जनार्दनीं वंदी पायीं ॥६॥
२१९३
पोट भरावया भांड । जैसा बडबडी तोंड ॥१॥ तेवीं विषयालागीं जाण । शास्त्र व्युत्पत्ती श्रवण ॥२॥ विषयवासना धरुनी थोर । दावी वरवर आचार ॥३॥ जेवीं काग विष्ठा देखे । तेंवीं विषय देखोनि पोखे ॥४॥ म्हणे जनार्दनाचा एक । सुटिका नोहे तया देखा ॥५॥
२१९४
पोटासाठी लागे नीचचियां पायां । करीना भलिया नमस्कार ॥१॥ स्वयंपाकीच्या करितो टवाळ्या । आपण खाये शिळ्या भाकरीतें ॥२॥ अग्निहोत्रादिक त्याची करी निंदा । आपण घेई सदा गुरगुडी ॥३॥ एका जनार्दनीं ऐशी याची मात । नको तयाचा संगात मज देवा ॥४॥
२१९५
पोटीं भय आतां तुजला कशाचें । ध्येय हेंशिवाचें अवतरलें ॥१॥ तरले अपार पापी मुढ जन । ऐकतां चिंतन देव तोषे ॥२॥ तोषोनिया गुरु म्हणे लागे पायां । कौसल्या ही जाया नोहे तुझी ॥३॥ तुझी भक्ति वाड केली आली फळा । तो सुखसोहळा पाहें आतां ॥४॥ आतां करुं स्तुति श्रीराम रक्षितां । तारी निजभक्ति सत्ताबळें ॥५॥ बळें गेला लग्ना सागरासे पोटीं । तेथें तो कपटी घात करी ॥६॥ करी विघ्न तारुं बुडविलें सागरीं । एका जनार्दनीं निर्धारी देव राखे ॥७॥
२१९६
पोटींचे बाळ अवगुणी वोखटें । परी मायबाप स्नेहो मोठें ॥१॥ तयापारी उदरा आलों जी स्वामी । अवगुणांच्यापरी नुपेक्षा तुम्हीं ॥२॥ गुण नाहीं तेथे कर्म कैंचे धड । परी मायाबाप वाटतसे कोड ॥३॥ एका जनार्दनीं उद्भव साचें । म्हणोनि हरिदासा कौतुक त्यांचे ॥४॥
२१९७
प्रकाश तरणी न बोले वेदवाणी । बोध विवेक दोन्ही तटस्थ झालीं ॥१॥ वेदासी अगोचर ध्यानासी कानडें । तें ब्रह्मा सांपडें सदगुरु चरणीं ॥२॥ काळासी नाकळें कर्मीं जे न मिळें । सर्वांसी न कळे असुनियां ॥३॥ जीवीं जीवा न कळे शिवपण वोविलें । नाम या वेगळें सच्चिदनंद ॥४॥ सदगुरु बोधें ब्रह्मा ब्रह्मार्पण । जीवासी सोडवण सदगुरुचरणीं ॥५॥ गुरुजप सदा नाम एक वस्ती । एका जनार्दनीं प्राप्त सहज नाम ॥६॥
२१९८
प्रकाश भासे सर्पाकार । सर्प नसोनि जेवीं दोर ॥१॥ कृष्ण वर्ण रक्त श्वेत । स्फटिकीं जेवीं भासत ॥२॥ ऐशी त्रिगुणांची मिळणी । शरण एका जनार्दनीं ॥३॥
२१९९
प्रतिमा देव ऐसा ज्याचा भाव । न करी निर्वाहो अंगो अंगीं ॥१॥ असतां सर्वत्र बाहेरी अंतरीं । संतुष्टा भीतरीं म्हणे देव ॥२॥ तेचि ते द्वारका तेचि हें पंढरी । सर्वत्र न धरी तोचि भाव ॥३॥ तीर्थयात्रा करी देवक असे क्षेत्रीं । येर काय सर्वत्री वोस पडलें ॥४॥ पुण्य क्षेत्रीं पुण्य अन्य क्षेत्रीं पाप । नवल संताप कल्पनेचा ॥५॥ एका जनार्दनीं स्वतः सिद्ध असे । नाथिलेंची पिसें मत वाद ॥६॥
२२००
प्रतिमाचि देवो ऐसा ज्याचा भावो । तो न करी निर्वाहो आम्हांलागीं ॥१॥ असतां सबराभरित बाहेर जो अंतरीं । तो संपुष्टामाझारी म्हणती देवो ॥२॥ द्वारका पंढरी देवयात्रा करी । सर्वत्र न धरी तोचि भावो ॥३॥ सुक्षेत्रीं पुण्य मा अन्यत्र तें पाप । नवल हा संकल्प कल्पनेचा मतवाद्या ॥४॥ द्वारका पंढरी देवयात्रा करी । येर काय भारी वोस पडे ॥५॥ एक जनार्दनीं स्वतः सिद्ध असे । विस्मरण स्मरण होत असे नाथिलें तें पिसें ॥६॥
२२०१
प्रतिमेचा देव केला । काय जाणें ती अबला ॥१॥ नवस करिती देवासी । म्हणती पुत्र देई वो मजसी ॥२॥ न कळेचि मुढा वर्म । कैसें जाहलेंसे कर्म ॥३॥ प्रतिमा केलीसे आपण । तेथें कैचे देवपण ॥४॥ देव खोटा नवस खोटा । एका जनार्दनीं रडती पोटा ॥५॥
२२०२
प्रत्यक्ष ती कथा जगासी माउली । विक्रयें करिती वहिली दोषी देखा ॥१॥ आपुली ती माता आपण भोगितां । प्रायश्चित सर्वथा काय द्यावें ॥२॥ पतिव्रतेनें जैसा पतीच वधिला । प्रायश्चित्त तिला कोणी द्यावें ॥३॥ मातें बाळकासी विषपान दिलें । प्रायश्चित या बोले कोणीं द्यावें ॥४॥ एका जनार्दनीं कथा ती माउली । विकितां घडली ब्रह्माहत्या ॥५॥
२२०३
प्रत्यक्ष देव असोनी नाहीं म्हणती । न कळे मुर्खा देशकपोर्ट धुंडिती ॥१॥ देहींच देहीं देव तो आहे । भ्रांतीचेनी लोभें नाहींसा होय ॥२॥ एका जनार्दनीं सबळ ती भ्रांती । देहीं देव असोनी वायां हुडकिती ॥३॥
२२०४
प्रत्यक्ष पहा रे जाऊन । विटेवरी ठेविले चरण ॥१॥ रुप सुंदर गोजिरें । कानीं कुंडलें मकराकारें ॥२॥ पुढें शोभे चंद्रभागा । मध्यें पुंडलीके उभा ॥३॥ ऐसें उत्तम हे स्थळ । भोळ्या भाविकां निर्मळ ॥४॥ तया ठायीं भेद नुरे । एका जनार्दनीं झुरे ॥५॥
२२०५
प्रथम मत्स्यावतारीं तुमचें अगाध चरित्र । न कळे ब्रह्मादिकां वैष्णव गाती पवित्र ॥१॥ उठोनि प्रातःकाळीं गौळणीं घुसळन घुसळिती । गाती कृष्णाचे पोवाडे हृदयीं परोपरी ध्याती ॥२॥ द्वितीय अवतारीं आपण कच्छरुप झाला । सृष्टी धरुनी पृष्ठी शेवटी सांभाळ केला ॥३॥ तृतीय अवतारीं आपण वराहरुप झाला । धरणी धरुनी दाढे हिरण्याक्ष वधिला ॥४॥ चतुर्थ अवतारीं आपण नरहरि रुप । रक्षुनि प्रल्हाद वधिला हिरण्यकश्यप ॥५॥ पांचवें अवतारीं आपाण वामन झाला । बळी घालुनि पाताळीं शेखीं द्वारपाळ ठेला ॥६॥ सहावे अवतारीं आपण परशुराम झाला । धरुनी परशु हातीं सहस्त्रभुजा वध केला ॥७॥ सातवें अवतारी आपण दाशरथी राम । वधोनी राव्ण कुंभकर्ण सुखी देव परम ॥८॥ आठवें अवतारी आपण अवसुदेवाघरीं । वधोनि कंसादिक असुर मारिले भारीं ॥९॥ नववे आवतारीं आपन बौद्धरुप झाला । धरुनियां मौन भक्तघरीं राहिला ॥१०॥ दहावए अवतारीं आपण झालासें वारु । एका जनार्दनीं वर्णिला त्याचा बडिवारु ॥११॥
२२०६
प्रपंच आमिष गुंतशील गळीं । शेवटीं तळमळी होइल रया ॥१॥ स्त्री पुत्र धन हें केवळ जाळें । गुंतशील बळे यांत रया ॥२॥ पुढील विचार धरी कांहीं सोय । संतसंग लाहें अरे मुढा ॥३॥ एका जनार्दनीं सत्संगावांचुनीं । कोण निर्वाणीं तारील तुज ॥४॥
२२०७
प्रपंच परमार्थ एकरुप होत । आहे ज्याचा हेत रामनामीं ॥१॥ परमर्थे साधें सहज संसार । येथेंक वेरझार नाहीं जना ॥२॥ सहज संसारें घडे परमार्थ । लौकिक विपरीत अपवाद ॥३॥ एका जनार्दनीं नाहीं तया भीड । लौकिकाची चाड कोण पुसे ॥४॥
२२०८
प्रपंच परमार्थ करीं कां रे सुखाचा । निरंतर वाचा निवृत्तिनाम ॥१॥ तुटेल बंधन खुंटेल पतन । निवृत्तिनाम जाण जपतांचि ॥२॥ योगयागादिक न लगे तीं साधनें । निवृत्तिनामें पेणें वैकुंठींचें ॥३॥ एका जनार्दनीं न करीं साधन । निवृत्ति म्हणतां जाण सर्व जोडे ॥४॥
२२०९
प्रपंचाचा कठिण लाग । नाशासी मूळ स्त्रीसंग ॥१॥ भोगाचे जें जें सुख । तें तें प्रत्यक्ष घेतो विख ॥२॥ दीपाचिया अंगसंगा । कोण सुख आहे पतंगा ॥३॥ पुढील निमाले देखती । पाहुनी पुढे उडी घालिती ॥४॥ ऐसे भुलले तया संगीं । एका जनार्दनीं जगीं ॥५॥
२२१०
प्रपंचाचा भाव वाहतसे खर । न कळे विचार साधनांचा ॥१॥ गुंतलासे मीन गळाचिये परी । अमीष देखोनी वरी गिळितसे ॥२॥ टाळी लावूनियां बैसलासे बक । तैसाचि तो देख नामहीन ॥३॥ आवडीं आदरें न ये नाम मुखीं । एका जनार्दनीं सुखी केवीं होय ॥४॥
२२११
प्रपंचाचें भान । आहे मृगजळासमान ॥१॥ नाथिलेंचि सत्य दिसे । सत्य आहे तें आभासे ॥२॥ मृगजळीम उप्तत्ति नाहीं । पाहतां अवघे मिथ्या पाहीं ॥३॥ एका जनार्दनीं शरण । मिथ्या अवघे देह जाण ॥४॥
२२१२
प्रपंची गुंतती । बळें माझें माझें म्हणती ॥१॥ ऐसें अभागी ते खर । नेणे विचार सारासार ॥२॥ चिखले रुतती । आणिकातें धांवा म्हणती ॥३॥ बळें कृशान पदरीं । बांधिताती दुराचारी ॥४॥ कुंथाकुंथी बळे । यम मारितसे सळें ॥५॥ शरण जनार्दना । कोण्हा नोहेचि वासना ॥६॥ जनार्दनाचा एका । बोल बोलतसे देखा ॥७॥
२२१३
प्रपंची सदा सक्त । रामनामीं नाहीं चित्त ॥१॥ तया म्हणावे तें काय । व्यर्थ शिणविली माय ॥२॥ वायां जिणें पैं तयाचें । सदा मान दंभीं नाचे ॥३॥ एका जनार्दनीं शरण । तया सोडवील कोण ॥४॥
२२१४
प्रभातेसी उठोनी । स्नान करिती अनुदिनीं । विठ्ठल दरुशनीं । प्राणी मुक्त संसार ॥१॥ धन्य पंढरीचा वास । सुख मिळे अविनाश । कुळीं वैष्णव निःशेष । रामकृष्ण उच्चार ॥२॥ करें नेमें एकादशे । जाय नेमें पंढरीसी । ऐसें या तीर्थासी नेमे करितां जोडें ॥३॥ सर्व पर्वकाळ घडे । कोटी अश्वमेध जोडे । पुण्य ते उघडें । विठठल रुपडे पाहतां ॥४॥ ऐसा जया नेमधर्म । न चुके वाचा नामस्मरण । एका जनार्दनीं स्मरण । विठ्ठलदेवी आवडी ॥५॥
२२१५
प्रभासादि क्षेत्रें सप्तपुर्‍या असती । परी सरी न पावती पंढरीची ॥१॥ दरुशनें चित्त निवे पाहतां बरवें । शंख चक्र मिरवे चहुं करीं ॥२॥ पीतांबर परिधान वैजयंती माळा । शोभे सोनसळा अंगावरी ॥३॥ एका जनार्दनीं पाहतां रुपडें । उभें तें उघडें विटेवरी ॥४॥
२२१६
प्रयागादि क्षेत्रें आहेत कल्पकोडी । तया आहे खोडी एक एक ॥१॥ मुंडन ती काया निराहार राहणें । येथेम न मुंडणें काया कांहीं ॥२॥ म्हणोनी सर्व तीर्थामाजी उत्तम ठाव । एका जनार्दनीं जीव ठसावला ॥३॥
२२१७
प्रयागादि तीर्थे आहेत समर्थ । परी पुरती मनोरथ पंढरीये ॥१॥ बहुत ते साक्ष देती या स्थळासी । सदा तो मनासी शिव ध्याये ॥२॥ आनंद सोहळा त्रैलोक्य अगाध । पंढरीये भेदाभेद नाहींसत्य ॥३॥ एका जनार्दनी क्षेत्रवासी जन । देवा ते समान सत्य होती ॥४॥
२२१८
प्राण रक्षणापुरतें । योगी मागती भिक्षेतें ॥१॥ तैसा साधावा हा योग । जेणें साधे अंतरंग ॥२॥ रिघोनी कमळिणीपाशीं । भ्रमर लोंधे अमोदासी ॥३॥ कोरडेंक काष्ठ भेदूनि जाय । तो कमळदळीं गुंतोनि राहे ॥४॥ एका जनार्दनीं योग । ऐसा साधावा अनुराग ॥५॥
२२१९
प्राणपानांची मिळणी । शक्ति चेतवी कुंडलिनी ॥१॥ ती आधारशक्ति अचाट । चढे पश्चिमेचा घाट ॥२॥ कुंडलिनी चालतां वाटा । चुकल्या आधिव्याधींच्या हाटा ॥३॥ साधितां उल्हाट शक्ति उलटे । उघडलें ब्रह्मारंध्राचें कपाट ॥४॥ शरीराकारें ते बोलिली । एका जनार्दनीं पुतळी ॥५॥
२२२०
प्राणियां उद्धार नाम मुखीं गातां । येरा तें करितां वायां जाय ॥१॥ पालथी घागरी घालितां वाउगी । नामाविण जगीं शीण तैसा ॥२॥ अमृतसागरीं राहुनी कोरडा । नाम धडपुडा नेघें प्राणीं ॥३॥ नाम संजीवनी भरलीसे जनी वनीं । एका जनार्दनीं तारक जगा ॥४॥
२२२१
प्राणियासी मंत्र सोपा । दत्त दत्त वाचे जपा ॥१॥ आणीक लगे साधन । दत्तनामें घडे ज्ञान ॥२॥ न लगे योगयाग पाही । दत्तावांचुन नेणें कांहीं ॥३॥ एका जनार्दनीं वेधलें मन । मनचि जालें उन्मन ॥४॥
२२२२
प्राणी गुंतले संसारश्रमा । न कळे महिमा नामाचा ॥१॥ नामें तरलें पातकी । मुक्त जाले तिन्ही लोकीं ॥२॥ व्यास शुकादिक पावन । नामेंचिक पावले बहुमान ॥३॥ वाल्हा कोली अजामेळ । गणिका दीन हा चांडाळ ॥४॥ एका जनार्दनीं नाम पावन । पातकी उद्धरीले परिपूर्ण ॥५॥
२२२३
प्रात:काळ जाहला मिळाल्या नायका । उष्णोदकें देखा अभ्यंगिती ॥१॥ सोळा सहस्त्र शत अष्ट त्या नाइका । विनोद तो देखा मेहुणपणें ॥२॥ घालूनियाम स्नान वस्त्र अलंकार देती । भोजन सारिती यादवपंक्ती ॥३॥ एका जनार्दनीं बैसले निवांत । मग कृष्णनाथ काय बोले ॥४॥
२२२४
प्रात:काळ झाला । स्नान करुनि नामा आला ॥१॥ जाऊनियां राउळासी । घाली लोटांगण देवासी ॥२॥ जेवूनियां जातों बाजारा । त्वरित येईन माघारा ॥३॥ ऐसें बोलोनि नामा आला । एका जनार्दनीं जेवला ॥४॥
२२२५
प्रात:काळ झालिया पाहती नरनारी । नोवरा आणि नोवरी व्याहीही ना ॥१॥ विठ्ठलशेटी नाहीं परिवारासहित । राजाई मनांत शोक करी ॥२॥ एका जनार्दनीं राजाईचा भाव । कांहो देवाधिदेवो ठकविलें ॥३॥
२२२६
प्रारब्ध क्रियमाण संचिताचा भोग । भोगिल्याची भोग तो न सुटे ॥१॥ ज्या जैसी कल्पना त्या तैशी भावना । अंती जे वासना जडोनी ठेली ॥२॥ एका जनार्दनीं वासना टाकुनी । हरीचे भजनी सावध होई ॥३॥
२२२७
प्रेमयुक्त नाम आदरें घेतां । तेथें नाहीं सुखदुःखवार्ता ॥१॥ नामीं धरुनी आवडी । उच्चारावें घडोघडी ॥२॥ योगयाग तपासाधान । नाम उच्चारितां संपुर्ण ॥३॥ ऐसा नामीं निजध्यास । एका जनार्दनीं त्याचा दास ॥४॥
२२२८
प्रेमयुक्त भजन करी सर्वकाळ । विठ्ठल विठ्ठल बोले वाचे सदा ॥१॥ मृत्तिका भिजवी भाजनाकारणें । प्रेमयुक्त नाचणें नाममुखीं ॥२॥ एके दिनीं कांता ठेवुनी जवळी बाळ । उदकालागीं उताविळ जाती जाहली ॥३॥ एका जनार्दनीं मूल तें रांगत । आलें असे त्वरित मृत्तिकेजवळीं ॥४॥
२२२९
प्रेमळ प्रेमळ अंतरीं प्रेमळ । नाहीं काळ वेळ तयालागीं ॥१॥ प्रेमभावें गाय विठ्ठलाचि ध्याय । मग सुखा उणें काय संसारीया ॥२॥ जनार्दनाचा एक रंगला चरणीं । निजरंगीं रंगोनि मिळोनि गेला ॥३॥
२२३०
प्रेमळांसी विश्रांतिस्थान । महा मुक्ति कर जोडोनी । ऋद्धि सिद्धि वोळंगण । तिष्ठती जाण पंढरीये ॥१॥ धन्य धन्य विठ्ठलराव । उभा देवांचा तो देव । दरुशनेम निरसे भेव । यम काळ दुतांचें ॥२॥ नाम न विटेवरी रसना । सुलभ हा पंढरीराणा । एका शरण जनार्दना । सदा वाचे उच्चारी ॥३॥
२२३१
प्रेमें पूजी मेसाबाई । सांडोनियां विठाबाई ॥१॥ काय देईल ती वोंगळा । सदा खाय अमंगळा ॥२॥ आपुलीये इच्छेसाठीं । मारी जीव लक्ष कोटी ॥३॥ तैसी नोहे विठाबाई । सर्व दीनाची ती आई ॥४॥ न सांडीची विठाबाई । एका जनार्दना पाहीं ॥५॥
२२३२
प्रेमें भक्तांची आवडी । म्हणोनियां धूतो घोडी ॥१॥ ऐसा प्रेमाचा भुकेला । सेवक जाहला बळीद्वारीं ॥२॥ उच्छिष्ट फळें भिल्लणींची । खायें सांची आवडीनें ॥३॥ एका जनार्दनीं उदार । तो हा सर्वेश्वर विटेवरी ॥४॥
२२३३
फजितखोरांचे जीवीं । लाज नाहीं सर्वथा ॥१॥ सांगता ते न धरती मनीं । नायकती कानीं शिकविलें ॥२॥ म्हैसा जैसा उन्मत्त मदें । काम छंदें तेवीं नाचे ॥३॥ एका जनार्दनीं ते पामर । जन्म वेरझार भोगिती ॥४॥
२२३४
फजितीचे देव मागती घुटीरोटी । आपणासाठीं जगा पीडितो काळतोंडें मोठीं ॥१॥ नको तया देवा आठवा मजसी । विठ्ठल मानसीं आम्हीं ध्याऊं ॥२॥ अविचारी देव अविचारी भक्त । देवाकारणें मारिती पशुघात ॥३॥ एका जनार्दनीं जळो जळो ऐसा देव तो भांड । विठ्ठल विठ्ठल न म्हणे त्याचें काळें तोंड ॥४॥
२२३५
फट गाढवाच्या लेका । संसार केला फूका ॥ध्रु०॥ खटपट करितां खटपट करितां गेला सारा वेळ । रामनाम घेतां तुझी बैसे दांतखीळ ॥१॥ कैंचा आपा कैंचा बापा मामा काका । कैंची आई कैंची ताई कैंची बहिण आका ॥२॥ कैंचें घर कैंचें दार भुललासी फुका । कैंची सासू कैंची बाईल त्यांनी नेला पैका ॥३॥ बारा सोळा मुलें झालीं त्यांला झालें नातु । द्रव्य होतें तें सरुनी गेलें कंबरेवर हातु ॥४॥ एका जनार्दनीं म्हणे हा संसार खोटा । हरिस्मरण करा कधीं न ये तोटा ॥५॥
२२३६
फणस खातां लागे गोड । तेथें अधिक खाय तोंड ॥१॥ सूर्या पूजितां पुण्य घडे । तेथें जे बेलपत्रीं चढे ॥२॥ ऐसा कर्माकर्म विनाश । गुण तेचि होती दोष ॥३॥ एका जनार्दनीं जाण । वायां दोषाचें हें चिन्ह ॥४॥
२२३७
फणस जंबीर कर्दळी दाटा । हातीं घेऊनि नांरगी फाटा ॥१॥ वारियाने कुंडलें हाले । डोळे मोडित राधा चाले ॥२॥ राधा पाहून भुललें हरी । बैल दुभें नंदाघरी ॥३॥ हरी पाहूनि भुलली चित्ता । राहा घुसळी पडेरा रिता ॥४॥ मन मिनलेंसें मना । एका भुलला जनार्दना ॥५॥
२२३८
फार बोलूं काय वांया । जाणवेल पाया चित्त माझें ॥१॥ धन्य धन्य तुम्ही संत । कॄपावंत संसारीं ॥२॥ उत्तीर्णपणें मज दासा । पुरवा इच्छा कृपाळुवा ॥३॥ शरण एका जनार्दनीं । कृपा करुना तुम्हीं संत ॥४॥
२२३९
फिरलों मीं दशादिशा । वायां सोसा हाव भरी ॥१॥ नाहीं जाहलें समाधान । वाउगा शीण जाहला पोटीं ॥२॥ उरला हेत पंढरीसी । सुखरासी लाधली ॥३॥ एका जनार्दनीं सुखाचें भांडार । जोडिलें निर्धार न सरेची ॥४॥
२२४०
फुगडी घाली मीपणाची । वेणी गुंफी त्रिगुणाची ॥१॥ चाड नाहीं कोनाची । आण सदगुरुचरणांची ॥२॥ फुगडी घाली आज गे । नाचू सहजा सहज गे ॥३॥ एका जनार्दनीं निज गे । वंदू संतचरणरज गे ॥४॥
२२४१
फुटलिया घट । नसे जीवन प्रगट ॥१॥ घटमाजीं जीवन । घट फूटतां नसे जाण ॥२॥ घटामाजीं आकाश । आकाश घटेंचि न नासे ॥३॥ एका जनार्दनीं मिथ्या । घट विरालिया सत्या ॥४॥
२२४२
फुले झडे तंव फळ सोसे । तया पाठीं तेंहीं नासे ॥१॥ एक मागें एक पुढें । मरण विसरलें बापुडें ॥२॥ शेजारीं निमाले कोणाचे खांदी । लपों गेला सापें खादली मांदी ॥३॥ मरण ऐकतां परता पळे । पळे तोही मसणीं जळे ॥४॥ प्रेत देखोनी वोझाच्या जाती । वोझें म्हणती तेही मरती ॥५॥ मरण म्हणतां थूं थूं म्हणती । थुंकते तोंडें मसणीं जळती ॥६॥ पळेना चळे तोचि सांपडें । जाणतां होताती वेडे ॥७॥ एका जनार्दनीं शरण । काळवेळ तेथें रिगे मरण ॥८॥
२२४३
बंधनाचा फांसा बैसलासे गळीं मीनापरि गिळी सर्वकाळ ॥१॥ आमीष विषया भुलला पामर । भोगिती अघोर चौर्‍यायंशी ॥२॥ गुंततांचि गळीं जाईल कीं प्राण । हें तो अधम जना न कळे कांहीं ॥३॥ एका जनार्दनीं न कळेंचि मूढा । सांगावें दगडा किती किती ॥४॥
२२४४
बकाचिये परि ध्यान नको धरुं । जीवेभावें धरुं संतचरण ॥१॥ मग ते तात्काळ करिती पावन । ऐसें अनुमोदन आहे शास्त्रीं ॥२॥ ध्यानाचें ध्यान संतांचे चरण । काया वाचा मन दृढ ठेवी ॥३॥ वाच्य ते वाचक संत ते व्यापक । एका जनार्दनीं देख अंतर्बाही ॥४॥
२२४५
बधिर जाले पैं श्रवण । जाले दंत उन्मळण ॥१॥ अझुनी काय धरिसी माया । गेलीं इंद्रियें विलया ॥२॥ नाकीं श्लेष्मांचा खाल्लोळ । तोंडावाटे पडे लाळ ॥३॥ टरपुर वाजे गुदद्वार । चरणीं सांडिली व्यापार ॥४॥ वृषण आलें गुडघ्यावरी । शिश्न लोंबें पीठचाचरी ॥५॥ कफवात पैं सुटला । शरीर कांपे चळवळा ॥६॥ लहान थोर ते हासती । फे फे वांकुल्या दाविता ॥७॥ वागतां चांचपडे भिंती । पोरें बाऊ म्हणोनी पळती ॥८॥ भार्या केली रे आवडी । तो तुजवर बोटें मोडी ॥९॥ स्त्रीये पाहिजे पुरुषभोग । तुज लगला खोकला रोग ॥१०॥ तुज जाणें निरयाकडे । ती काजळकुंका रडे ॥११॥ प्राण आला डोळियासी । कैसी स्वार्थ न सांडिसी ॥१२॥ आंगण जालें रे विदेश । किती करिसी विषयसोस ॥१३॥ आप्त म्हणती कां मरेना । पालटु जाला याचिया चिन्हा ॥१४॥ एका जनार्दनीं निष्काम । भजा भजा रे परब्रह्मा ॥१५॥
२२४६
बरवी ती पूजा । जेणें पावे अधोक्षजा ॥१॥ मुखीं नाम वाहे टाळी । पूजा केली उत्तम हे ॥२॥ तुळशीमाळा गोपिचंद । पूजा छंद हाची मनीं ॥३॥ व्रत करी एकादशी । जाग्रण निशीं सर्वदा ॥४॥ एका जनार्दनीं तुष्टें देव । पूजा भाव तेणें पावें ॥५॥
२२४७
बरवी श्रीहरीची मूर्ती । देव्हारा पूजिली होती । बारे हा लक्ष्मीचा पती । दुध मागे तयासी ॥१॥ ऐशीं तिघें उपवास करिती । मातापितरें चिंतेत पडती । जन मिळाले बहुती । तयासी उठवूं आदरिलें ॥२॥ बाळा रे तुज कारण । बांधूं सहस्त्र गोधन । येरु म्हणे नायके वचन । मज देईल श्रीहरी ॥३॥ माता म्हणतां हे वचन । दुध आणिलें ब्राम्हणाचे घरींहून । एका जनार्दनीं वचन । असंतोषित बाळ ते ॥४॥
२२४८
बरें वा वाईट नाम कोणी घोका । तो होय सखा विठोबाचा ॥१॥ कोणत्या सहावासें जाय पंढरीसी । मुक्ति दारापाशी तिष्ठे सदा ॥२॥ विनोदें सहज ऐके कीर्तन । तया नाहीं पतन जन्मोजन्मीं ॥३॥ एक जनार्दनीं ऐशीं माझी भाष । धरावा विश्वास विठ्ठलनामीं ॥४॥
२२४९
बळी आर्पिती देहासी । द्वारपाळ होसी तयासा ॥१॥ सांगा थोरपणा आहे कोण । घेतल्यावांचुन न देशी तूं ॥२॥ धर्म आधीं पूजा करीं । म्हणोनि घरीं राबसीं तूं ॥३॥ एका जनार्दनीं ऐसा उदार । घेतां निर्धार देशीं तूं ॥४॥
२२५०
बळी पृष्ठी जें शोभलें । तें विटेवरी देखिलें ॥१॥ पुंडलीके जें ध्याइलें । तें विटेवरी देखिलें ॥२॥ सनकादिकीं जें पाहिलें । तेंविटेवरे देखिलें ॥३॥ एका जनार्दनीं वंदिलें । तें विटेवरी देखिलें ॥४॥
२२५१
बहु उतावीळ । पाडुरंग तु दयाळ ॥१॥ मागेंतरिलें बहुतां । माझी असो द्यावी चिंता ॥२॥ दयाळ तूं पाडुरंगा । मज धरावें वोसंगा ॥३॥ सेवा तुम्हीं देवा । केली दुर्बळाची केशवा ॥४॥ उचिताउचित । एका जर्नादनीं मात ॥५॥
२२५२
बहु क्षेत्रें बहु तीर्थ । बहु दैवतें असतीं ॥१॥ परी नये पंढरीराम । वाउगा श्रम होय अंतीं ॥२॥ देव भक्त आणि नाम । ऐसें उत्तम नाहीं कोठें ॥३॥ एका जनर्दनी तिहींचा मेळ । पाहतां भूमंडळ पंढरीये ॥४॥
२२५३
बहु खेळतं खेळ । कळॊं आले सकळ । शेवटीं तें निर्फळ । जालें बाळकृष्ण ॥१॥ कान्होबा पुरे पुरे आतां खेळा । येता जातां श्रम जाला रे कान्होबा ॥धृ ॥ आम्हीं न खेळु विटिदांडुं । भोवरं लागोर्‍या रे चेंडु । एकीबेकीतें सांडुं । मीतूपण अवघें खंडुं रे कान्होबा ॥२॥ लक्ष लावुं तुझे खेळा । न गुंतु आणिका चाळा । एका जानर्दनीं पाहुं डोळां तुझ्या खेळाची अगम्य लीला रे कान्होबा ॥३॥
२२५४
बहु जन्मांचे सायास । विटे उभा हृशेकेश । पाहे पुंडलीकास । सम चरणीं ॥१॥ जाई जाई पंढरपुरा । स्नान करीं तूं भीवरा । जन्माचातो फेरा । तेणें चुके ॥२॥ व्रत करीं एकादशी । जागरण अहर्निशीं । संतसभे सरसी । टाळी वाहे ॥३॥ आळस तूं न करीं । वाचे म्हणे विठ्ठल हरी । सांडोनियां थोरीं । नाम घे आवडी ॥४॥ जनीं वसे जनार्दन । एका दृढ धरी चरण । अर्पियेल तनमन । विठ्ठल वाचे ॥५॥
२२५५
बहु पुण्य होय गांठीं । तरीच भेटी संतांची ॥१॥ पाप ताप दैन्य गेलें । संत पाउलें देखतां ॥२॥ मोक्ष मुक्ति साधे फुका । ऐशी देखा संतकृपा ॥३॥ नाहीं आणिकांचें भेव । संत सदैव भेटतां ॥४॥ एका जनार्दनीं संत । पुरविती हेत सर्वही ॥५॥
२२५६
बहु पुण्य होय गांठीं । तैच ऐशियाची भेटी । तयाचिये कृपादृष्टी । सहज ब्रह्मा लाभे मनुष्या ॥१॥ देही असोनि विदेहि । करुनी कर्म अकर्ते पाही । वैषम्याची नाहीं । वाटाघाटी तयांसी ॥२॥ देहीं कष्ट किंवा सुख । शीतौष्ण समान देख । वाउगाचि शोक । नाहीं जया मानसीं ॥३॥ तोचि जाणा ब्रह्माज्ञानी । वाया न बोले बोलोनि मौनी । लक्ष्मी सदा परध्यानीं । एका जनार्दनीं तो धन्य ॥४॥
२२५७
बहु बोलतां वो तोंडें । नायकती जाहले लंडे ॥१॥ करिती कुंथाकुंथीं । शिकविलें नायकती ॥२॥ फजितखोर खर । तैसा अभागी पामर ॥३॥ सुनी धांवे वसवसी । तैसी झोंबे विषयासी ॥४॥ एका जनार्दनीं शरण । शिकवितां नायके ज्ञान ॥५॥
२२५८
बहु बोलाचें नाहीं कारण । मी देह भक्ति आत्मा जाण ॥१॥ माझा देह शरीर जाण । भक्त आंत पंचप्राण ॥२॥ नांदे सहज भक्त आंत । मी देह भक्त देहातील ॥३॥ एका जनार्दनीं भक्त । देवपणा मी भक्तांकित ॥४॥
२२५९
बहु मतें बहु मतांतरें । आम्हा निर्धारें नावडती ॥१॥ अविनाश आहे सुख पंढरीसी । यालागीं तयासी न विसंबो ॥२॥ विठ्ठल देवो जेथे उभे । पुढें शोभे पुंडलीक ॥३॥ एकाजनार्दनीं भ्रमर । कमळ परिकर विठोबा ॥४॥
२२६०
बहु मार्ग बहु प्रकार । तेथें निर्धार न बैसे ॥१॥ उलट सुलट कासया करणें । जप तप अव्हान दैवतें ॥२॥ योग याग तप तीर्थे । साधन कष्ट ते पसारा ॥३॥ शरण एका जनार्दनीं । घडे निशिदिनीं संतसेवा ॥४॥
२२६१
बहु मार्ग बहुतापरी । परी न पावती सरी पंढरीची ॥१॥ ज्या ज्या मार्गे जातां वाता । कर्म कर्मथा लागती ॥२॥ जेथें नाहीं कार्माकार्मा । सोपें वर्म पंढरीये ॥३॥ न लगे उपास तीर्थविधी । सर्व सिद्धि चंद्रभागा ॥४॥ म्हणोनि पंढरीसी जावें । जीवेभावें एका जनार्दनी ॥५॥
२२६२
बहुत जन्मांचे सुकृत । तयांसी घडत संतसंग ॥१॥ धन्य वैष्णव भुमंडळी । दरुशन मेळीं जीव तरती ॥२॥ एका जनार्दनीं विश्वास । निजदास संताचा ॥३॥
२२६३
बहुत जन्में विरहें पीडली । नेणो कैसी स्थिर राहिली । मन अशा गोविंदी वेधिली । तो मध्यमा वैखारीये गुंतलो वो ॥१॥ चारी वाचा परता सावळां । विरहिनीसी छंद लागला । चौपरता कोठें गुंतला । तेंणों आम्हीं अबला वो ॥२॥ विरह जाईल कैशा परी । पुर्वपुण्या सुकृत पदरीं । एका जनार्दनीं भेटलें हरी । तैं विरह नोहे निर्धारी ॥३॥
२२६४
बहुत तीर्थ क्षेत्रें बहुतापरी । न पावती सरी पंढरीची ॥१॥ वाहे दक्षिणभाग भीमा । पैल परमात्मा विटेवरी ॥२॥ मध्य स्थळीं पुडंलीक । दरुशनें देख उद्धार ॥३॥ वाहे तीर्थ चंद्रभागा । देखतां भंग पातकां ॥४॥ एका जनार्दनीं सार । क्षराक्षर पंढरी हे ॥५॥
२२६५
बहुत दाविती खुणा । आमुच्या नये त्या मना । आजी आला पाहुणा । गुरुराव ॥१॥ सांगे बोधाचिया गोष्टी । म्हणे का रें होतां कष्टी । या संसाराची तुटी । करा करा लवलाहे ॥२॥ कां रे होता उगेच उदास । आशा मोह तोडा पाश । कां रे कासावीस । होतां वाउगे परदेशी ॥३॥ धरा धरा मंत्र मुखीं । जेणें शिवादिक जाहलें सुखीं । तुमचें तुम्हां न कळे शेखीं । वाउगें कां शिणतां ॥४॥ अरे नको वेरझारा । चुकवा जन्ममरणा सारा । एका जानर्दनीं म्हणे । धरा विश्वास संतवचनीं ॥५॥
२२६६
बहुत पुराणें बहुत मतांतरें । तयांच्या आदरें बोल नोहे ॥१॥ शाब्दिक संवाद नोहे हा विवाद । सबाह्म परमानंद हृदयामाजीं ॥२॥ नोहे हें कवित्व प्रेमरस काढा । भवरोग पीडा दुरी होय ॥३॥ नोहे हें कामानिक आहे पैं निष्कामनिक । स्मरतां नासे दुःख जन्मांतरीजें ॥४॥ एका जनार्दनीं माझा तो निर्धार । आणिक विचार दुजा नाहीं ॥५॥
२२६७
बहुत प्रकारें भक्तहि असती । देवहि भेटती तयां तैसे ॥१॥ तैसा नोहे माझा पंढरीचा राव । देवाधिदेव मुकुटमणी ॥२॥ एकविध तया शरण पैं जातां । मोक्ष सायुज्यता पाठीं लागे ॥३॥ ऐसा लावण्य पुतळा देखिला दृष्टी । जनार्दनीं सुख न समाये सृष्टीं ॥४॥
२२६८
बहुत मारग बहुत प्रकार । नागवले थोर थोर मागें ॥१॥ म्हणोनियां जीवें मानिला विश्वास । नाहीं दुजीं आस संताविण ॥२॥ मार्गाची आशा सांडिला बोभाट । धरली एक वाट संतसंग ॥३॥ एका जनार्दनीं जातां तयांमागें । हित लागवेगें जाहले माझें ॥४॥
२२६९
बहुत विचार करीत मानसीं । काय प्रारब्धासी करील कृष्ण ॥१॥ आम्हांसी तो पूर्ण दरिद्र भोगणें । तेथें नारायणें काय कीजे ॥२॥ एका जनार्दनीं करीत विचार । चालिला सत्वत ग्रामपंथे ॥३॥
२२७०
बहुता काळाचें हें क्षेत्र । सकळ देवांचें माहेर । सकळ संतांचे निजमंदिर । तें हें पंढरपुर जाणावें ॥१॥ धन्य पंढरीचा महिमा । नाहीं आणीक उपमा । जेथें वास पुरुषोत्तमा । रुक्मिणीसहित सर्वदा ॥२॥ धन्य भक्त पुंडलीक । सकळ संताचा नायक । एका जनार्दनीं देख । श्रीविठ्ठल आवडी ॥३॥
२२७१
बहुतां सुकृतां नरदेह लाधला । भक्तिवीण गेला अधोगती ॥१॥ बाप भाग्य कैसें न सरेचि कर्म । न कळेचि वर्म अरे मुढा ॥२॥ अनेका जन्माचें सुकृत पदरीं । त्याचें मुखा हरि पैठा होय ॥३॥ राव रंक हो कां उंच नीच याती । भक्ति विण माती मुखीं त्याच्या ॥४॥ एका जनार्दनीं हरि हरि म्हणतां । मुक्ति सायुज्यता पाठी लागे ॥५॥
२२७२
बहुतांची मतांतरें तीं टाकुनीं । विठ्ठलचरणीं बुडी दें कां ॥१॥ नव्हें तुज बाधा काळाची आपदा । ध्याई तु गोविंदा प्रेमभरीत ॥२॥ जनार्दनाचा एका लाहुन चरणीं । बोलतसे वाणी करूणाभरीत ॥३॥
२२७३
बहुतांच्या मता । आम्हीं न लागुं सर्वथा ॥१॥ धरुं संतांचा सांगात । तेणें होय आमुचें हित ॥२॥ जाऊं पढरीसी । नाम गाऊं अहर्निशी ॥३॥ करुं हाचि नित्य नेम । आणिक नको निजधाम ॥४॥ एका जनार्दनीं नाम । गाऊं आवडीनें राम ॥५॥
२२७४
बहुतापुण्यें करूनि जोडला नरदेह । नाहीं त्याचा वेवसाव घडला कांहीं ॥१॥ न करावें तें केलें मनामागें धांवणें । परि नारायणें करुणा केली ॥२॥ आवरुनि इंद्रियें धरियेलीं हातीं । कामक्रोधाची शांती केली सर्व ॥३॥ वायां जाये परि श्रीगुरु भेटला । एका जनार्दनीं जाहला कृतकत्य ॥४॥
२२७५
बहुती वर्णिला बहुतीं ध्याईला । परी तो पाहिल्यां पुंडलिका ॥१॥ करुनी कैवाड उभा केला नीट । धरुनी दोन्ही कट करीं देखा ॥२॥ पंचमहापातकी येताती ज्या भावें । दरुशनें त्या द्यावें वैकुंठ पद ॥३॥ एका जनार्दनीं भक्तांचा अंकीत । उभाचि तिष्ठत अठ्ठावीस युगें ॥४॥
२२७६
बह्मांडाची दोरी । हालवी जो एक्याकरीं ॥१॥ भूतीं परस्पर मैत्री । तीं ऐक ठायीं असतीं वरी ॥२॥ पंचप्राणांचें जें स्थान । तये कमळीं अधिष्ठान ॥३॥ एका जनार्दनीं सुत्रधारी । बाहुली नाचवी नानापरी ॥४॥
२२७७
बांधूनियां पर्णकुटी मुढी । त्यावरी गुढी अद्वैताची ॥१॥ ऐसें मिरविती सोंग वायां । नरका जावया उल्हासें ॥२॥ नेणें कधीं सतांचें पूजन । सदां सर्वदां परधनीं मन ॥३॥ शरण एका जनार्दनीं । ऐसें सोंग मिरवितींअ जनीं ॥४॥
२२७८
बाइलेआधीन होय ज्याचें जिणें । तया अधमा नरकीं पेणें ॥१॥ बाईल मनोगतें ऐसा चाले । नावडती कोणाचे तया बोल ॥२॥ बाईल देवाचाही देव । ऐसा ज्याचा दृढ भाव ॥३॥ एका जनार्दनीं म्हणे मूढाला । बाइलेनें भुलविला ॥४॥
२२७९
बाइलेचा जाहला दास । करी आस मातेची ॥१॥ माकड जैसा गारुड्याचे । तैसा बाइलेपुढें नाचे ॥२॥ पिता सांगतां हित गोष्टी । दुःख वाटे तया पोटीं ॥३॥ ऐसें बाइलेनें गोंविले । एका जनार्दनीं वायां गेले ॥४॥
२२८०
बाइलेचा जाहला दास । न करी आस मातेची ॥१॥ नव महिने वोझें वागवून । तिचा उतरी तो शीण ॥२॥ बाइलेच्या बोला । धरी मातेसी अबोला ॥३॥ एका जनादनीं पुत्र । जन्मला तो अपवित्र ॥४॥
२२८१
बाइलेच्या बोला । धरी मातेसी अबोला ॥१॥ बाइलेसी नेसवी धट्टी । माते न मिळे लंगोटीं ॥२॥ बाइलें षड्‌रास भोजन । माते न मिळे कोरान्न ॥३॥ बाईल बैसवी आपुलें घरीं । माते हिंडवीं दारोदारीं ॥४॥ एका जनार्दनीं शरण । ऐसें पुत्राचें अवगुण ॥५॥
२२८२
बाईल सांगतांचि गोठी । म्हणे मातेसी करंटी ॥१॥ जन्मापासुनी आमुचे मागें । अवदसा लागली सांगे ॥२॥ इचे उत्तम नाहींत गुण । ऐसा बोले अभागी जाण ॥३॥ नरदेही ते गाढव । एक जनार्दनीं नाहीं भाव ॥४॥
२२८३
बाजारीं बैसोनि सांगें ज्ञान गोष्टी । कथेचि राहाटी वोपावोपी ॥१॥ मेळवोनी जन सांगे निरूपण । वाचे ब्रह्मज्ञान पोटासाठीं ॥२॥ न कळे पामरा आपुला विचार । करी अनाचार जगामध्यें ॥३॥ एका जनार्दनीं ऐसें फजीतखोर । भोगिती अघोर नरक देखा ॥४॥
२२८४
बाप तोचि माय होउनी आला पोटीं । जातक वर्णितां गुंती पडली भेटी ॥१॥ बाप कीं माय म्हणावा पुत्र । भुललीया श्रुति करितां वृत्तान्त ॥२॥ मी बापापोटीं कीं बापु माझ्या पोटीं । वर्णितां ज्योतिषी विसरले त्रिपुटी ॥३॥ एका जनार्दनीं जातक मौनी । जन्मनाम ठेविलें निःशब्द देउनी ॥४॥
२२८५
बारा वर्ष बाळपणक गेलें । परि रामराम मुखीं नाहीं आलें ॥१॥ अहा रे मूढा जन्मलासी दगड । गमाविलेंक वाड आयुष्यासी ॥२॥ बारा वर्ष तारुण्य अवस्था । कामक्रोधें लाहो घेतला पुरता ॥३॥ बारा वरुषें वृद्धाप्य आलें समुळीं । जराव्याधीं देहासी कवळी ॥४॥ ऐसें आयुष्य गेलें वायांविण । एका जनार्दनीं म्हणे नाहीं घडले भजन ॥५॥
२२८६
बारा सोळा अठरा गडियांचा मेळा । मांडियेला डाव कोण आवरीं तयाला ॥१॥ खेळा भाई विटिदांडु । खेळा भाई विटिदांडु । खेळ खेळतां परी बरा नोहे सहज दांडु ॥२॥ पांच सात बारा नव तेरा यांची नका धरुं गोडी । खेळ खेळता दांत विचकुन पडाल घशींतोंडीं ॥३॥ एका जनार्दनीं काय वाचा शरण रिघां पायीं । खेळ तो अवघा सोपा मग प्रेमा उणें नाहीं ॥४॥
२२८७
बारा सोळाजणी हरीसी नेणती । म्हणोनी फिरती रात्रंदिवस ॥१॥ सहस्त्र मुखांचां वर्णितां भागला । हर्ष जया झाल तेणें सुखें ॥२॥ वेद जाणूं गेला पुढें मौनावला । तें गुह्मा तुजला प्राप्त कैंचें ॥३॥ पूर्व सुकृताचा पुर्ण अभ्यासाचा । दास सदगुरुचा तोचि जाणें ॥४॥ जाणते नेणते हरीचे ठिकाणीं । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
२२८८
बालका देखोनि संकटीं । माता कार्य टाकुनि उठी ॥१॥ ऐसें दयेचे ठायीं जाण । आपुलें जाणावें पारिखेपण ॥२॥ महापुरी बुडे तयातें । उडीं घाली कृपाळु तेथें ॥३॥ दीनाचिये लाभी । जो निघे जळतीये अंगीं ॥४॥ ऐसे दयेचे पाळी लळे । एका जनार्दनीं चरणीं लोले ॥५॥
२२८९
बाळ कृष्ण रांगे नंदाघरीं । चोरी करी घरोघरीं गौळणी धरूनिया करीं । घेऊन नंदमंदिरा आली ॥१॥ गार्‍हाणे सांगती अबला नवलविंदान तयाची ती कळा । हांसत उभा यशोदे जवळा पाहूनियां बाळा चाकाटली ॥२॥ राहिलें बोलणें चालणेंनिवांत । कृष्णरुपी वेधलें चित्त । एका जर्नादनीं समाधिस्त । द्वैताद्वैत विसरली ॥३॥
२२९०
बाळ तरुण वृद्ध ऐसे ते पाहिले । पाहुनी निमाले देखसी रया ॥१॥ प्रपंच काबाड कोंबड्याचे परी । पुढेंचि उकरी लाभ नाहीं ॥२॥ तुज सुख दुःख मागील आठव । आतां भाकी कींव कांहीं रया ॥३॥ एका जनार्दनी अहा रांदलेका । भोगिसी अनेका योनी रया ॥४॥
२२९१
बाळ रांगणें रांगतु । दुडदुडां पुढें पळतु ।धरितां तो न कळें मातु । वेदशास्त्रीं जया ॥१॥ तो बाळरुपें नंदाघरीं । खेळ खेळे नानापरी । न कळे लाघव निर्धारी । इंद्रादिकां गे माय ॥२॥ लोणी चोरावया घरोघरीं जाय । दहीं दूध तूप लोणी आपण खाय । त्यांचे सुनेचे मुखा हात पुशी वो माय । ऐसे करुनियां पळोनी जाय ॥३॥ वासुरें सोडी घरीं जाऊन । मुलांसि उठवी चिमटुन । माथणी रांजणा करी चुर्ण । ऐसे विंदान करुनी पळे ॥४॥ शेजे असता उभयतं । जाय सोवळ्यातुन तत्त्वतां । दाढी वेणी बांधी सर्वथा । जाय परता पळोनी ॥५॥ ऐशा खोडी करी नानापरी । नटनाटक वैकुंठ जिव्हारी । एक जनार्दनीं नवल परी आगमां निगमां न कळे परोपरी ॥६॥
२२९२
बाळकाची बोबडी वाणी । ऐकोनी जननी संतोषे ॥१॥ तैसे तुम्हीं कॄपाबळें । पाळिले लळे संतजनीं ॥२॥ बाळाचे जे जे अपराध । माता न करी तयासी कोध ॥३॥ शरण एका जनार्दनी । मिळविलें गुणी आपुलिया ॥४॥
२२९३
बाळाचें छंद जाण । माता पुरविती आपण ॥१॥ बोबडे बोलतां ते बोल । माते आनंद सखोल ॥२॥ मागे जें तें आपण । आळ पुरवी त्यासी देऊन ॥३॥ एकाजनार्दनीं ममत्व तें । नोहे लौकिकापुरतें ॥४॥
२२९४
बुडालिया जळीं धावतसे कोण । तैसे प्राणी जन बुडताती ॥१॥ संसार हा डोहो दुस्तर पारखा । सांगड ती देखा रामनाम ॥२॥ एका जनार्दनीं संतांचा आधार । उतरूं पैलपार भवडोहीं ॥३॥
२२९५
बुद्धि आणि मन सावध करुन । मन उघडीं लोचन मुल तत्त्वीं ॥१॥ सदगुरुचें दास्य करीं एकभावें । काया वाचा जीवें शरण रिघा ॥२॥ पंचभूतापर प्रकृतीचा वर । नामरुप विस्तार नाही जेथें ॥३॥ एका जनार्दनीं धारणा ही बळी । चतुर्थ शुण्यावरी चित्त यावें ॥४॥
२२९६
बैसतां निश्चळ । मन करी तळमळ ॥१॥ ध्यान धारण ते विधी । मनें न पावेचि सिद्धि ॥२॥ जप तप अनुष्ठान । अवघें मनेंची मळीन ॥३॥ दया शांती क्षमा । मनें न येती समा ॥४॥ ऐशा मना काय करावें । कोठें निवांत बैसावें ॥५॥ एका जनार्दनीं शरण । मन धांवें सहजपणें ॥६॥
२२९७
बैसल्या पंगती चोखियाच्या अंगणीं । जेवी शारंगपाणी आनंदानें ॥१॥ नामदेवासहित अवघे गणगंधर्व । इंद्रादिक देव नारदमुनी ॥२॥ चोखामेळा म्हणे दोन्ही जोडोनी कर । मज दुर्बळा पवित्र केलें तुम्हीं ॥३॥ यातीहीन मी अमंगळ महार । कृपा मजवर केली तुम्हीं ॥४॥ पंढरीचे ब्राम्हण देखतील कोण्ही । बरें मजलागुनी न पाहती जन ॥५॥ ऐसें एकोनियां हांसती सकळ । आनंदें गोपाळ हास्य करी ॥६॥ विडे देऊनियां देवें बोळविले । इंद्रिदिक गेले स्वस्थानासी ॥७॥ पंढरीचे ब्राम्हणी चोख्यासी छळिलें । तेंहीं संपादिलें नारायणे ॥८॥ एका जनार्दनीं ऐशी चोखियाची मात । जेवी पंढरीनाथ त्याचे घरीं ॥९॥
२२९८
बैसविती हरी अस्त्र घडीवरी । पूजा करती वरी पुष्पपत्रें ॥१॥ धाउनी गळां पाले माळा त्या वाहाती । गजरें नाचती पुढें येक ॥२॥ टिरीया माडिया वाजविती पाय । हरुषें नाचताहे देवराया ॥३॥ ऐसें नित्यानित्य क्रीडा ते करिती । देव ते पाहाती विमानीं तें ॥४॥ म्हणताती देव वंचलों या सुखा । एका जनार्दनीं देखा गोवियलें ॥५॥
२२९९
बैसोनि एकांतीं । सदा ध्यावी विठ्ठलमूर्ती ॥१॥ तेणें चुके रे बंधन । आन न करी साधने ॥२॥ हेंचि वेदशास्त्रांचें सार । आगमनिमांचा पसर ॥३॥ एका जनार्दनीं रुप । पाहतां आमुप उद्धार ॥४॥
२३००
बैसोनियां निवांत घालिसी उमान । एका हरिविण सर्व वायां न धरी गुमान ॥१॥ नको खेळ खोटा सांडीं मनाचा ताठा । उमान गुमान दोन्हीं न कळे होतील जगीं चेष्टा ॥२॥ उ म्हणनें उकार रे मा म्हणणें मकार रे । न म्हणणे नश्वर देह या तिहींचा आकार रे ॥३॥ एका जनार्दनीं उमार रें । सांगो जातां न कळे खुण तया म्हणिजे गुमान रे ॥४॥
२३०१
बैसोनियां हातवटी । सांगे गोष्टी लौकिक ॥१॥ तैसें नव्हें भक्तपण । घातला दुकान पसारा ॥२॥ वर्मांचे ते पाठांतर । केला भार बहुतची ॥३॥ एका जनार्दनीं सार । भुकें फार खर जैसा ॥४॥
२३०२
बैसोनी एकान्ती । सांगती कोरड्या त्या गोष्टी ॥१॥ म्हणती करा रे भजन । आपण नेणें जैसा श्वान ॥२॥ म्हणे करा पंढरीची वारी । आपण हिंडे दारोदारी ॥३॥ ऐशियाचा उपदेश । एका जनार्दनें म्हणे नाश ॥४॥
२३०३
बैसोनी कळंबातळीं । गडी मिळाले सकळीं । मिळोनी गोपाळीं । करती काला ॥१॥ नानापरीचीं पक्कान्नें । वाढिताती उत्तम गुणें । सर्वां परिपुर्ण । मध्ये शोभे सांवळा ॥२॥ वडजा वांकुडा पेंदा । आणि सवंगडी बहुधा । काल्याच्या त्या मुदा । घेती आपुलें करीं ॥३॥ लोणचें ते नानापरी । वाढिताती कुसरीं । सर्व वाढिलें निर्धारी । परिपुर्ण अवघीयां ॥४॥ एका जनार्दनीं म्हणे । कृष्ना कवळ तुं घेणे । गडियांसी देव म्हणे । तुम्हीं घ्यावा आधीं ॥५॥
२३०४
बैसोनी निकटीं सांवत्याजवळीं । कां हो वनमाळी न दिसे मज ॥१॥ कां हें कर्म आड आजी आलेंसें बाड । न दिसे उघड विठु माझा ॥२॥ कोणत्या लिगाडें पाडिलीसे तुटी । कां हो जगजेठी अंतरला ॥३॥ मजविण क्षण तयासी कंठेना । एका जनार्दनीं मना कठिण केलें ॥४॥
२३०५
बोधभानु तया नाहीं माध्यान्ह सायंप्रातर नाहीं तेथें कैंचा अस्तमान ॥१॥ कर्माचि खुंटलें करणेंचि हारपलें । अस्तमान गेलें अस्तमाना ॥२॥ जिकडे पाहे तिकडे उदयोचि दिसे । पूर्वपश्चिम तेथें कैंचा भासे ॥३॥ एका जनार्दनीं नित्य प्रकाशा । कर्माकर्म जालें दिवसा चंद्र जैसा ॥४॥
२३०६
बोल बोलता वाचें । नाम आठवींविठ्ठलाचें ॥१॥ व्यर्थ बोलणें चावटी । नामावांचुनी नको होटी ॥२॥ नाम हें परमामृत । नामें पावन तिन्हें लोक ॥३॥ नाम सोपें भूमंडळीं । महापापां होय होळी ॥४॥ एका जनार्दनीं शरण । नाम पतीतपावन ॥५॥
२३०७
बोलणें बोलतां हेंचि दुर्घट । नुपजत लेकासी लाविला पाट ॥१॥ बोलूं नये याचे सत्ते भेणें । मौनची राहणें हेंचि शहाणपण ॥२॥ तेथील संतति म्हणाल पवित्र । न म्हणतां तरी घात कुळगोत्र ॥३॥ कांहीं एक वेद बोलूं गेला बोली । चवंढाई चिरुनी तीन कोंडें गेलीं ॥४॥ श्लाघोनी भक्ती बोलूं गेलीं तोडें । बोल बोल तंव नवखंडे ॥५॥ लडिवाळ भक्त बोलोनी हांसे । बोल बोलें तंव लावियेलें पिसें ॥६॥ बोलावला येतो चढला अभिमाना । बोल बोले तंव दवडिलें राना ॥७॥ एका जनार्दनीं मौनचीं घोटी । एकपणें तेंही घातलें पोटीं ॥८॥
२३०८
बोला बोल विरहिणी बोले । गगनी चांदणे शुद्ध शोभलें । त्यामाजीं घनसांवळे खेळे । कर्मदशें वियोग जाला बळें ॥१॥ दावा गे दावा गे कृष्णवदन । विरहाचें दुःख् दारुण कोण्या कर्में झालें खंडन । कां हो यदुनंदन न बोले ॥२॥ विरहतांपे तापलं भारीं । कोण आता दुजा निवारी । श्रीगुरु भेटला झडकरी । एका जनार्दनी दाविला श्रीहरी ॥३॥
२३०९
बोलिजे तें नव्हें । बोलणें तेंही ती आहे । बोला आंतु बाहेर पाहे । पाहतां कवण आहे ॥१॥ हरि हरि हरि हरि । अहं सोहं नुरेचि उरी । आत्मा एक चराचरी । एकपण नाही निर्धारीं ॥२॥ दृश्य तो जाला नाहीं । दृश्यमात्रें त्यातेंच पाही । आहे नाहीं ऐसें जें कांहीं । प्रकाशे त्याच्याच ठायीं ॥३॥ एकपणें पाहे अनेक । अनेकीं आहे एक । एक ना नव्हे आणीक । एक जनार्दनींक तोचि देख ॥४॥
२३१०
बोलू नयें तें आले बोला । आमुचा बाप गरवार जाला ॥१॥ नवलही ऐकिलें ऐका जी तुम्ही चोज । ऐकूं जातां तोचि नाचे भोजें ॥२॥ प्रौढ जाली आमुची आईं । बापाची नांवें त्या ठेविलीं पाहीं ॥३॥ लेकीनें बापासी केलें सावेव । एका जनार्दनीं पहा नवलाव ॥४॥
२३११
ब्रहमस्थितीचें हें वर्म । तुज दावितों सुगम ॥१॥ सर्वांभूतीं भगवद्भाव । अभेदत्वें आपणचि देव ॥२॥ संसार ब्रह्मास्फूर्ति । सांडोनियां अंहकृति ॥३॥ शरण एका जनार्दनीं । कृपें पावला परिपुर्ण ॥४॥
२३१२
ब्रह्म सर्वगत सदा सम । जेथें आनु नाहीं विषम । ऐसें जाणती ते अति दुर्गम । तयांची भेटी जालिया भाग्य परम ॥१॥ ऐसें कैसियानें भेटती ते साधु । ज्यांचा अतर्क्य तर्कवेना बाधू । ज्यासी निजानंदी आनंदु । ज्यांचा परमनांदी उद्धोधु ॥२॥ पवना घालवेल पालाण । पायीं चढवेल गगन । भुत भविष्य कळों येईल वर्तमान । परी त्य साधूचें न कळे महिमान ॥३॥ चंद्रामृत सुखें सेववेल । रवि अस्ता जातां धरवेल । बाह्मा हेळा सागर तरवेल । परी त्या साधूची भेटी न होईल ॥४॥ जप तप करवेल अनुष्ठान । ध्येय ध्याता धरवेल निजध्यान । ज्ञेय ज्ञाता विवर्जित ज्ञान । ज्ञाना ध्यानाचे मुळ हे साधुजन ॥५॥ निजवृत्तीचा करवेल विरोधु । जीवाशिवाचा भोगवेल आनंदु । एका जनार्दनीं निजसाधु । त्याच्या दर्शनें तुटे भवबंधु ॥६॥
२३१३
ब्रह्मा एक परिपूर्ण । तेथें नाहीं दोष गुण ॥१॥ पराचा देखती जे दोष । तेचि दोषी महादोषी ॥२॥ ब्रह्मीं नाहें दोष गुण । पाहती ते मुर्ख जाण ॥३॥ जे गुणदोषी देखती । एका जनार्दनीं नाडती ॥४॥
२३१४
ब्रह्मा कैसें वेडावलें गे बाइये ॥धृ॥ निर्गुण होतें सगुणा आलें । त्रिभुवन उद्धारित्ने बाईयें ॥१॥ घेऊनि वसुदेव गोकुळा नेलें । यशोदेने खेळविलें गे बाईये ॥२॥ एका एकपण तेंही नेलें । जनीं जनार्दनें केलें गे बाईये ॥३॥
२३१५
ब्रह्मा जाणे ब्राह्मण याती । त्याची घडावी संगती ॥१॥ ब्राह्मण तयासी म्हणावे । त्याचे पायीं लीन व्हावें ॥२॥ गळां घालोनि सूत्रदोरी । म्हणविती ब्रह्माचारी ॥३॥ परी ब्रह्मा नाहीं ठावें । लोकां सांगतसे भावें ॥४॥ एका जनार्दनीं पूर्ण । ब्रह्मा जाणे तो ब्राह्मण ॥५॥
२३१६
ब्रह्मा धरुनी मुंगीवरी । रामव्यापक चराचरीं । तो रावणाचे शरीरीं । इंद्रियव्यापारीं नांदत ॥१॥ रामानुसंधान रावणीं । भजतां होय कोण हानी । हें सांगावें साजणी । प्रीति करुनी मजलागीं ॥२॥ हांसोनिया सीता सुंदरी । उत्तर देती अति कुसरीं । तें परिसोनि मंदोदरी । विश्रांति थोर पावेल ॥३॥ शरण एका जनार्दनीं । दृश्यादृश्य वचन । परिसोनी समाधान । देहस्थिति निरसे ॥४॥
२३१७
ब्रह्मा निर्गुण निर्विकार । ब्रह्मा सगुण साकार । ब्रह्मारुप चराचर । सच्चिदघन शुद्ध हें ॥१॥ ब्रह्मा अचिंत्य अव्यक्त । ब्रह्मा अच्छेद्य सदोदित । ब्रह्मा परात्पर पुर्ण भरित । समरस जाणिजे ॥२॥ एका जनार्दनीं ब्रह्मा । प्राप्तीलागीं हेंचि वर्म । सदगुरुचें पादपद्म । दृढ भावें धरावें ॥३॥
२३१८
ब्रह्मांडांचा धनी । तो संतीं केला ऋणी ॥१॥ म्हणोनि नाचे मागें मागें । वाहें अंगें भार त्याचा ॥२॥ सांकडें पडुं नेदी कांहीं व्यथा । आपणचि माथां वोढवी ॥३॥ एका जनार्दनीं संत । त्रैलोक्यांत मुकुटमणी ॥४॥
२३१९
ब्रह्माचारी म्हणती महंत । सदा विषयावरी चित्त ॥१॥ नेसोनियां कौपीन । अंतरीं तों विषयध्यान ॥२॥ बोले जैसा रसाळ । भाव अंतरीं अमंगळ ॥३॥ एका जनार्दनीं सोंग । तया न मिळे संतसंग ॥४॥
२३२०
ब्रह्माज्ञानाचा क्षण । विचारी ज्याचें मन । त्याची महत्पापें जळोन । गेलीं स्वयें ॥१॥ गंगादि सप्त सागर । पुष्करादि तीर्थे अपार । व्रतादि पवित्र । पर्वकाळ जे ॥२॥ वेदशास्त्र पुराण । त्यासी घडलें श्रवण । अश्वमेधादिक यज्ञ । केलें जेणें ॥३॥ मेरुसमान सुवर्णीं । अनर्ध्य रत्‍न मेळवोनी । भरुनी दिधलीं मेदीनी । ब्रह्माणासी ॥४॥ कामधेनुच्या थाटीं । कल्पतरु कोट्यानकोटी । कौस्तुभादि सृष्टी । दिधली तेणें ॥५॥ अमृतासमान । तेणें दिधलें अन्न त्रैलोकींचे ब्राह्मण । तृप्त केलें ॥६॥ सत्य कैलास वैकुंठ । सत्य पाताळादि श्रेष्ठ । गरुडादि वरिष्ठ । दिधलीं वहनें ॥७॥ ऐसें एक क्षणें प्राप्त । ज्याचें सोहंध्यानीं चित्त । तयासी सुकृत । इतुकें जोडे ॥८॥ जो अहोरात्र मनीं । ब्रह्माज्ञानीं चिंतनीम । एका जनार्दनीं । तोचि वंदा ॥९॥
२३२१
ब्रह्माज्ञानाची कसवटी । अनुभव नाहीं पोटीं । बोला चावटी । वाउगी बापा ॥१॥ शुद्ध ब्रह्माज्ञान । एक आत्मा भूतमात्रीं प्रमाण । विनोदें छळण । कवणाचें न करीं ॥२॥ जीव शिवा नाहीं भेद । अवघा नित्य परमानंद । आनंदाचा कंद तोचि ब्रह्माज्ञानीं ॥३॥ एका जनार्दनीं वर्म । भाविकांसी सुधर्म । अभाविकासी भ्रम । जाणीवेचा ॥४॥
२३२२
ब्रह्माज्ञानालागीं ब्रह्मादिक पिसें । तें तुम्हां आमहं कसें आकळेल ॥१॥ प्रत्यक्ष परब्रह्मा श्रीरामचंद्र । वसिष्ठ मनींद्र गुरु त्याचा ॥२॥ कृष्णा बळीराम संदीपना शरण । तेणें गुह्मा ज्ञान कथियेलें ॥३॥ प्रत्यक्ष वामांकी असोनी पार्वती । वेळोवेळां विनंती करितसे ॥४॥ सुलभ नव्हे देवा सुलभ नव्हे जीवा । सुलभे गौरवा न कळेचि ॥५॥ एका जनार्दनीं श्रीगुरुवांचुन । ब्रह्माज्ञान खूण न कळेचि ॥६॥
२३२३
ब्रह्माज्ञानासाठीं । हिंडताती पाठोपाठीं ॥१॥ नोहे नोहें बा फुकांचें । बोल बोलतां नये सांचें ॥२॥ ऐसें आहे तैसें आहे । वाउगा तो भ्रम पाहे ॥३॥ जनार्दन कृपा पुर्ण । तैंचि कळे ब्रह्माज्ञान ॥४॥ एका जनार्दनीं शरण । चालुन येईल ब्रह्माज्ञान ॥५॥
२३२४
ब्रह्माज्ञानासाठीं वेदशास्त्र पुराण । करितां श्रवण नातुडेची ॥१॥ नातुडेची कदा गीताभागवतीं । वाचितां हो पोथी जन्मवरी ॥२॥ द्वरकापट्टण क्षेत्र वाराणसी । करितां तीर्थाटनासी प्राप्त नोहे ॥३॥ प्राप्त नोहे गुरु मंत्रतंत्र घेतां । शब्दज्ञानाथितां प्राप्त नोहे ॥४॥ ज्यासी पुनरावृत्ति स्थिर नोहे बोध । अखंडित भेद मनामाजीं ॥५॥ ज्याचें जन्मांतर सरूनियां जाये । तेथें स्थिर होय गुरुबोध ॥६॥ एका जनार्दनीं ऐसा जो का पुरुष । कोटीमाजीं एक ब्रह्माज्ञानीं ॥७॥
२३२५
ब्रह्माज्ञानी वाचें सांगतां नये । जैं कृपा होये श्रीगुरुची ॥१॥ लाभेल लाभेल ब्रह्माज्ञान क्षणीं । वाउगी कहाणी बोलुनी काय ॥२॥ हृदयींचा बोध ठसतां अंतरीं । कामक्रोध वैरी पळताती ॥३॥ तैसें ब्रह्माज्ञान कळलियावरी । सर्वभावें वैखरी गुण वाणी ॥४॥ एका जनार्दनीं वंदूं गुरुपाय । आणीक उपाय नाहीं नाहीं. ॥५॥
२६२६
ब्रह्माडभरीं कीर्ति संतांचा महिमा । वर्णावया आम्हां मति थोडी ॥१॥ एक मुखें वानुं चतुरानन शीणु । सहस्त्र मुखेंगुणु वानितां नयें ॥२॥ एका जनार्दनीं वर्नीन पवाडे । उभा वाडेकोडें पंढरीये ॥३॥
२३२७
ब्रह्मादिक देव त्यांचें रंगीं नाचती । सनकादिक त्याचें ध्रुपद धरिती ॥१॥ त्यापुढें गीत नृत्य करिती । त्यापुढें मानव केवीं ताल धरिती ॥२॥ हरि हरि हरि म्हणतां वाचे । हरिरंगीं नाचे तोचि धन्य ॥३॥ शास्त्राची व्युप्तत्ती प्रसन्न वागेश्वरी । ती सारजा मुख्य करी नृत्य तेथें ॥४॥ शास्त्र अभिमानें चढला ताठा । मुक्ति ते फुकटा अंतराले ॥५॥ एका जनार्दनीं स्वहितीं तूं नाचे । बोलणें अभावाचें बोलुं नको ॥६॥
२३२८
ब्रह्मादिक वेडे जयासाठीं होती । तो गोकुळी श्रीपती लोणी चोरी ॥१॥ कवाड ते जैसें आहे तैशापरी । येतो जातो हरी न कळेचे ॥२॥ पाळती पाहतां ब्रह्मांड सकळ । तयाचा प्रतिकाळ करीतसे ॥३॥ एका जनार्दनीं चोरीचें तेंमीस । हरित सारांश नवनीत ॥४॥
२३२९
ब्रह्मादिकां न कळे तें रुप सुंदर । गोकुळीं परिकर नंदाघरीं ॥१॥ रांगणां रांगतु बाळलीले खेळतु । दुडदुडां धांवतु गायीपाठीं ॥२॥ गौळणीचे घरीं चोरुनि लोणी खाये । पिंलंगतां जाये हतीं न लगे ॥३॥ एका जनार्दनी त्रैलोक्यां व्यापक । गाई राखे कौतुक गौळियांसी ॥४॥
२३३०
ब्रह्मी स्फुरें जें स्फुरण शुद्ध सत्त्वाचें लक्षंण । तो तूं लक्षी लक्ष्यातीत परिपुर्ण रे ॥१॥ कान्हु सच्चिदानंदु शब्द अरुता रे । त्याही परता तुं निजानंदु रे ॥२॥ जेथें नाहीं गुणागुण नाहीं कायासी कारण । तो तुं गुणा गुणातीत परिपुर्न रे ॥३॥ एकाएकीं जनार्दन वेद भाष्य वचन । तो तुं शब्दादी गिळुन राहिलासी रे ॥४॥
२३३१
ब्रह्मीं नाहीं कर्म नाहीं उपासना । नाहीं ध्येय ध्याना ठाव जेथें ॥१॥ जाणीव नेणीव भगवंतीं नाहीं । विज्ञान जें तेंहीं लया जाय ॥२॥ नामरुपा ठाव नाहीं जया ठायीं । ज्ञेय ज्ञाता तेंही नाहीं जेथें ॥३॥ एका जनार्दनीं आहें एकरुप । सहज स्वरुप नित्य शुद्ध ॥४॥
२३३२
ब्रह्मीं नाहीं भवभ्रांति । ब्रह्मीं नाहीं दिवसराती ॥१॥ ब्रह्मीं नाहीं रूपवर्ण । ब्रह्मीं नाहीं काळकरण ॥२॥ ब्रह्मीं नाहीं ध्येयध्यान । ब्राह्मी नाहीं देवदेवता ॥४॥ ब्रह्मी नाहीं वर्णाश्रव । ब्रह्मीं नाहीं क्रियाकर्म ॥५॥ सर्व देहीं ब्रह्मा आहे । एका जनार्दनीं तें पाहे ॥६॥
२३३३
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र । चांडाळादि अधिकार ॥१॥ एका भावें गावें नाम । सोडोनियां क्रोधकाम ॥२॥ आशा मनशा टाका दुरी । मग इच्छा कल्पना काय करी ॥३॥ एका जनार्दनीं मन । करा देवासी अर्पण ॥४॥
२३३४
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र वर्ण चारी । हें स्थान मान निर्धारीं तो मी ॥१॥ ब्रह्माचारी गृहस्थ संन्यासी वानप्रस्थ । आश्रम धर्मक समस्त नेव्हे मीं ॥२॥ बावन मात्रा चौदा चक्रें सहा शत एकवेस हजार । स्थान मान पवित्र नाहीं मज ॥३॥ स्थूळ सुक्ष्म कारण महाकारणाचें ज्ञान । चहुं देहाचें बंधन नाहीं मज ॥४॥ सोहं सोहं दोन्हींक वेगळा यापासुनीं । चहुं मुद्रेंचे ध्यानीं नाहीं गा मी ॥५॥ या सकळातें जाणता विरळा पैं पाहतां । एका जनार्दनीं तत्त्वतां निजबोध तो मी ॥६॥
२३३५
ब्राह्मणवाक्यबळें वेदू नेमी जगा । येरव्ही राहे उगा थोटावला ॥१॥ ब्राह्मण तो ब्रह्मा ब्राह्मण तो ब्रह्मा । जयाचेनि कर्माकर्म दाटुगें जगीं ॥२॥ ब्रह्मावाक्याची राणीव तैं शास्त्राची जाणीव । येरव्हीं नुसतें पवे पाषाणाचें ॥३॥ ब्राह्मण वचनार्थ यागकर्म समर्थ । येरव्ही ते समस्त जीत ना मेली ॥४॥ जिवाचें जीवपण शिवाचें शिवपण । याहुनी ब्रह्मापुर्ण ब्राह्मणक वाक्य ॥५॥ पाठ नाहीं पोट नाहीं ब्रह्मा ते निघाट । हाही अनुभव स्पष्ट ब्राह्मणवचनें ॥६॥ ब्रह्मा तें निर्मळ संसार तो मृगजळ । हेंही होय विव्हळ ब्राह्मणवचनें ॥७॥ एका जनार्दनीं ब्राह्मण पूर्ण बोधु । जाणे तया बाधूं न शके कर्माकर्म ॥८॥
२३३६
ब्राह्मणा स्वधर्मक नित्य नैमित्तिक । व्हावे उपासक वेदांलांगीं ॥१॥ स्नानसंध्या वंदन हेंचि नित्य कर्म । तैसेचि हें वर्म पितृतृप्ति ॥२॥ ब्रह्मायज्ञ आणि अग्नीची ते पूजा । तेणें अधोक्षजा पाविजेत ॥३॥ अतिथी आलिया तया अन्नदान । करावें तर्पण द्रव्ययोगें ॥४॥ भूतदया गाई पशूतें पाळावें । मुखीं उच्चारावें रामनाम ॥५॥ एका जनार्दनीं हेंचि कम नित्य । तेणें परब्रह्मा हातां चढे ॥६॥
२३३७
ब्राह्मणाचें तीर्थ घेतां त्रास मोठा । प्रेमें पितो घोटा घटघटा ॥१॥ हातें मोर्‍या उपशी कष्ट करी नाना । देवाच्या पूजना कंटाळतो ॥२॥ गाईस देखुनी बदबदा मारी । घोड्याची चाकरी गोड वाटे ॥३॥ एका जनार्दनीं ऐसें झाले प्राणी । जन्मोनियां जनीं व्यर्थ आले ॥४॥
२३३८
ब्रीदावळी करे आपुली जतन । आलों मी शरण जनार्दन ॥१॥ राखीं माझी लाज पतित पतित । तुझा मुद्रांकित रंक एक ।२॥ काम क्रोध लोब दंभ अहंकार । हे हेहीं अनिवार सोसवेना ॥३॥ आशा मनीषा माया सखीया सांगातिणी । करिती गौसणी सदा जीवा ॥४॥ चित्त वित्त आशा लागलीसे पाठीं । इहीं जीवे साठी केली मज ॥५॥ जनार्दना शरण अनन्य पैं एका । काये वाचे देखा चरणीम विनटला ॥६॥
२३३९
भक्त अर्पितां सुमनमाळा । घाली आवडीनें गळां ॥१॥ ऐसा आवडीचा भुकाळू । श्रीविठ्ठल दीनदयाळु ॥२॥ भक्तें भावार्थें अर्पितां । तें आवडे पंढरीनाथा ॥३॥ भक्तासाठीं विटेवर । समपद कटीं करक ॥४॥ ऐशी कृपेची कोंवळी । एक जनार्दनीं माउली ॥५॥
२३४०
भक्त करुणाकर दीनाचा वत्सल । उभा श्रीविठ्ठल विटेवरी ॥१॥ मना जाय तेथें मना जाय तेथें । मना जाय तेथें पंढरीये ॥२॥ पुरतील काम निवारेल गुंती । आहे ती विश्रांति संतसंगें ॥३॥ आषाढी कार्तिकी सोहळा आनंद । मिळालासे वृंद वैष्णवांचा ॥४॥ एका जनार्दनीं आनंदी आनंद । तेणें परमानंद डुल्लतसे ॥५॥
२३४१
भक्त देव एके ठायीं ते आवडी । घेऊनिया गुढी जाऊं तेथें ॥१॥ पाहूं चरनकमळ वोवाळूं श्रीमुख । होईल तेणें सुख चौदेहांसी ॥२॥ संतांचे ते भार गाती नाचताती । आनंदे डुल्लती विठ्ठल वाचे ॥३॥ एका जनार्दनीं आनंदसोहळा । पाहोनि धालों डोळा डोळीयाचा ॥४॥
२३४२
भक्त देवातें भजती । देव भक्ती धरी प्रीती ॥१॥ ऐसा एकमेंकांचा ठावो । भक्ताअंगीं देव पहा हो ॥२॥ अलंकार एक सुवर्ण । तैसें नाहीं दुजेपण ॥३॥ एका आर्धी एक पाठीं । एका जनार्दनीं राहाटी ॥४॥
२३४३
भक्त नीच म्हणोनि उपहासिती । त्यांचे पूर्वज नरका जाती ॥१॥ भक्त समर्थ समर्थ । स्वयें बोले वैकुंठनाथ ॥२॥ भक्तासाठीं अवतार । मत्स्य कूर्मादि सुकर ॥३॥ यातिकुळ न पाहे मनीं । एका शरण जनार्दनीं ॥४॥
२३४४
भक्त रागेला तवकें । देव फोडोनि केलें कुटकें ॥१॥ कटकट मूर्ति मागुती करा । मेण लावुनी मूर्ति जडा ॥२॥ न तुटे न जळे कांहीं न मोडे । त्या देवाचे केलें तुकडे ॥३॥ रांडवा म्हणती आगे आई । कैसा देव फोडिला बाई ॥४॥ जवळींच शुद्ध असतां देवो । भक्तांसी पडीला सदेवो ॥५॥ शाळीग्रामक शुद्ध शिळा । हारपलीया उपवास सोळा ॥६॥ चवदा गांठींचा बांधिला दोरा । तोही अनंत नेला चोरा ॥७॥ अनंतासी अंतु आला । भक्ता तेथें खेदु जाहला ॥८॥ एका जनार्दनीं भावो । नाहीं तंव कैंचा देवो ॥९॥
२३४५
भक्तचरणींचे रजः कण । हृदयीं वाहे नारायण ॥१॥ भक्ता पडतां संकट । देव अंगें सोशी कष्ट ॥२॥ गांजितां प्रल्हादा नेहटीं । स्वयें प्रगटला कोरडें काष्ठीं ॥३॥ द्रौपदी गांजितां तात्काळीं । कौरवांचीं तोंडें केलीं काळीं ॥४॥ गोकुळीं गांजितां सुरपती । गोवर्धन धरिला हातीं ॥५॥ अर्जुनांतें संकटप्राप्ती । दिवसां लपवी गभस्ती ॥६॥ अंबऋषीचें गर्भवास । स्वयें सोशी हृषीकेश ॥७॥ एका जनार्दनीं दास । होय भक्तांचा सावकाश ॥८॥
२३४६
भक्तदशनें देव ते तोषती । तेणें आनंद चित्तीं देवाचिये ॥१॥ भक्ताची स्तुति देवासी आनंद । भक्तानिंदा होतां देवा येतसे क्रोध ॥२॥ भक्त संतोषतां देवासी सुख । एका जनार्दानीं देवा भक्तांचा संतोष ॥३॥
२३४७
भक्तपणा सान नव्हे रे भाई । भक्तीचें पाय देवाचे हृदयीं ॥१॥ भक्त तोचि देव भक्त तोचिक देव । जाणती हा भाव अनुभवीं ॥२॥ दान सर्वस्वे उदार बळी । त्यांचें द्वार राखे सदा वनमाळी ॥३॥ एका जनार्दनीं मिती नाहीं भावा । देवचि करितो भक्ताची सेवा ॥४॥
२३४८
भक्ता जैसा मनोरथ । पुरवी समर्थ गुरुराव ॥१॥ नित्य ध्यातां तयाचे चरण । करी संसारा खंडन ॥२॥ वानूं चरणांची पवित्रता । उद्धार जडजीवां तत्वतां ॥३॥ अवचट लागतांचि कर । एका जनार्दनीं उद्धार ॥४॥
२३४९
भक्तांचा पुरवी लळा । तो सांवळा श्रीकृष्ण ॥१॥ उचलिला पर्वतगिरी । नाथिला काळ्या यमुनेतीरीं ॥२॥ अगबग केशिया असुर । मारिला तो कंसासुर ॥३॥ उग्रसेन मथुरापाळ । द्वारका वसविलीं सकळ ॥४॥ द्वारकेमाजीं आनंदघन । शरण एका जनार्दनी ॥५॥
२३५०
भक्तांचिया गांवा येशी पै धांवत । न बोलतां तिष्ठत उभा पुढें ॥१॥ न बैससी खालीं न पाहे माघारें । मौन पं निर्धारें धरुनि उभा ॥२॥ एका जनार्दनी भक्त वचनाधीन । बोलती पुराणें सत्य देवा ॥३॥
२३५१
भक्तांचिया मनासरिसा । धांव घाली तो विश्वेशा ॥१॥ ऐसी कृपाळु माउली । शिव अनाथाची साउली ॥२॥ नामीं जडतां सदा मन । आनंदे शिवांचें भजन ॥३॥ एका जनार्दनीं प्रेम । शिवनामें निष्काम ॥४॥
२३५२
भक्तांच्या उपकारासाठीं । नोहे पालट उतराई ॥१॥ ज्ञानोबाची भिंत वोढी । उच्छिष्टपात्रें काढी धर्माघरीं ॥२॥ जेवी नामदेवासंगे साचें । सुदाम्याचें पोहे भक्षी ॥३॥ विष पितो मिराबाईसाठी । विदुराच्या हाटी कण्या स्वयें ॥४॥ एकजनार्दनीं अंकितपणें । द्वार राखणें बळींचें ॥५॥
२३५३
भक्तांवांचुनी देवा । कैचें रुप कैंचें नांवा ॥१॥ भक्तिं धरूनी आवडी । देवा लाविलीसे गोडी ॥२॥ भक्तांवाचुनीं पुसें कोण । देवा नाहीं महिमान ॥३॥ भक्ति करूनि निर्धार । देवा धरविला अवतार ॥४॥ उभयंता नोहे तुटी । एका जनार्दनीं मिठी ॥५॥
२३५४
भक्तांसी सान न धरीच मान । खाय भाजीपान भाविकांचें ॥१॥ उच्छिष्टांची आस धरुनिया जीवीं । गोकुळीं तें दावी चोज सर्व ॥२॥ खेळे विटिदांडुं हमामा हुंबरी । वाजवी मोहरी सवंगडियासी ॥३॥ एका जनार्दनीं भक्तांचा अंकित । म्हणोनि तिष्ठत उभा असे ॥४॥
२३५५
भक्ताचिया काजा । उभा पंढरीचा राजा ॥१॥ घेऊनियां परिवार । उभा तिष्ठे निरंतर ॥२॥ शोभे गोपाळांची मांदी । रूक्मिणी सत्यभामा आदि ॥३॥ शोभे पुढें भीवरा नीर । भक्त करती जयजयकार ॥४॥ एका जनार्दनीं ध्यान । चिमणें रूप गोजिरें ठाण ॥५॥
२३५६
भक्ताचिया घरीं । नीच काम देव करी ॥१॥ धर्माघरीं उच्छिष्ट काढी । अर्जुनाची धुतो घोडीं ॥२॥ विदुराच्या भक्षी कण्या । द्रौपदीधांवण्या धांवतु ॥३॥ एका जनार्दनीं शरण । एकपणें जनार्दन ॥४॥
२३५७
भक्ताचिये काजें । देव करितां न लाजेक ॥१॥ हा तो पहा अनुभव । उदार पंढरीचा राव ॥२॥ न विचारी यातीकुळ । शुची अथवा चांडाळ ॥३॥ एका जनार्दनीं शरण । एका भावें निंबलोण ॥४॥
२३५८
भक्ताची अणुमात्र व्यथा । न सहावे भगवंता ॥१॥ अंबऋषीसाठीं । गर्भवास येत पोटीं ॥२॥ प्रल्हादाकरणें । सहस्त्र स्तंभी गुरगुरणें ॥३॥ गोपाळ राखिलें वनांतरीं । तेथें उचलिला गिरी ॥४॥ राखिले पांडव जोहरीं । काढिलें बाहेरी विवरद्वारें ॥५॥ ऐसा भक्ताचा अंकित । एका जनार्दनीं तया ध्यात ॥६॥
२३५९
भक्ताचे मनोरथ पुरवी नारायण । अवतार म्हणोनी धरी स्वयें ॥१॥ नामदेवाप्रती जाहला अभिमान । लाडिकाचि पूर्ण मी तो भक्त ॥२॥ कौतुक दावावया माव देव करिती । नामदेवाप्रती काय बोले ॥३॥ एका जनार्दनीं परिसा सादर । देव भक्तांचा परिकर संवाद तो ॥४॥
२६६०
भक्ताद्वारीं उभाचि तिष्ठे । न बोले न बैसे खालुता ॥१॥ युगें जाहलीं अठ्ठावीस । धरुनी आस उभाची ॥२॥ जड मुढ हीन दीन । तारी दरुशनें एकाची ॥३॥ एका जनार्दनीं ऐसा वर । दिधला साचार भक्तांसी ॥४॥
२३६१
भक्तालांगीं अणुमात्र व्यथा । तें न साहवे भगवंता ॥१॥ करुनी सर्वांगाचा वोढा । निवारीतसे भक्तपीडा ॥२॥ होउनी भक्ताचा अंकितु । सारथीपण तो करीतु ॥३॥ प्रल्हादासी दुःख मोठें । होतांची काष्ठीं प्रगटे ॥४॥ ऐसा अंकित चक्रपाणी । एका शरण जनार्दनीं ॥५॥
२३६२
भक्ताविण देवा । कैंचें एकपण सेवा ॥१॥ भक्तांची सेवा देव करी । देव तिष्ठे भक्त द्वारें ॥२॥ भक्तांचे अंकित । लक्ष्मीसह देव होत ॥३॥ एका जनार्दनीं भक्त । देवा हृदयीं धरीत ॥४॥
२३६३
भक्तासी संकट पडतां । धांवे देव तत्त्वतां लवलाहे ॥१॥ ऐसा अनुभव आहे । देव लवलाहे धांवत ॥२॥ द्रौपदी पडता संकटीं । धांवे उठाउठी देव तेव्हां ॥३॥ पडतां संकट प्रल्हादासी । कोरडे काष्ठेंसी देव जाहला ॥४॥ पडतां संकट गजेंद्रासी । हाकेसरसी उडी घाली ॥५॥ एकाजनार्दनीं निर्धार । स्मरतां साचार धांवत ॥६॥
२३६४
भक्ति असो मुक्ति घाला रे बाहेरी । बहुतां चाळविलें चाळायाची थोरी ॥१॥ भक्ति ते राहो मुक्ति ते जावो । मुक्तिमाजीं भावो नाहीं नाहीं ॥२॥ मुक्ति चाळा लाउनी सेखीं वोसंडी । नेणें ऐसें किती केले पाषांडी ॥३॥ मुक्तिचेनी योगें नामदेव शुक । त्यांचाहीं विकल्प मानिताती लोक ॥४॥ नाम संकीर्तन भक्ति मुक्तीसी धाक । संवादें दोघेही राहो माझी भाक ॥५॥ उपजोनियां पोटी भक्ति ते ग्रासी । मातृहत्यारीं मुक्ति कवण पोसी ॥६॥ एका जनार्दनीं सेवितां चरणरज । मुक्ति सेवा करी सांडुनिया लाज ॥७॥
२३६५
भक्ति गोकुळी नवविधा नारी । गजरे चालती भारी वो । सुनीळ जळीं अति संतोषं । क्रीडाती यमुनातीरीं वो ॥१॥ स्थिर स्थिर माधवा विआर धरीं । आम्हीं परात्पर परनारी । वासना वास अलक्ष लक्षोणी । दह्माची करिसी चोरी रे ॥२॥ आकंठ मग्न सुनीळ निरी । घनसांवळा देखोनि वरी । येथोनि निघतां लाज मोठी । विनोद न करी रे ॥३॥ लाज सांडोन धरा चरण । तंव मी होईन प्रसन्न । एका जनार्दनीं निःशंक झाल्या । जीवींची जाणुनि खुण वो ॥४॥
२३६६
भक्ति नाहीं नामीं तो चांडाळ पतीत । तोचि जाणावा कुश्चित नष्ट येथें ॥१॥ प्रपंचकर्दमीं बुडोनियां ठेले । संताविण उगले फजीत होती ॥२॥ पुत्र मित्र कांता मानुनी भरंवसा । याचा मोह खासा जन्मवरी ॥३॥ एका जनार्दनीं अंतीं आहे कोण । न कळे संताविण निश्चयेंसी ॥४॥
२३६७
भक्ति माझी भोळी । भाव एकविध बळी ॥१॥ अहो परिसा नारायणा । जाणोनि अंतरीच्या खुणा ॥२॥ नाहीं तुम्हा सांकडें कायीं । भुक्तिमुक्ति मागणें तेंही ॥३॥ शरण एका जनार्दनीं । माझीं विनवणी परिसावी ॥४॥
२३६८
भक्तिप्रेमाविण ज्ञान नको देवा । अभिमान नित्य नवा तयामाजीं ॥१॥ प्रेम सुख देई सुख देई । प्रेमेंविण नाहीं समाधान ॥२॥ रांगवेनें जेवीं शृंगारु केला । प्रेमेविण जाला ज्ञानी तैसा ॥३॥ एका जनार्दनीं प्रेम अति गोड । अनुभवीं सुरवाड जाणतील ॥४॥
२३६९
भक्तिभावार्थ अर्पिला । देव सर्वांगीं धरिला ॥१॥ रानींच रानट वनमाला । भक्ति आणुनी घातली गळां ॥२॥ भक्त अर्पितां आवडीं । देव जाणें त्याची गोडी ॥३॥ भक्तभाव जाणोनि पाही । एका जनार्दनीं राहें देहीं ॥४॥
२३७०
भक्तिभावार्थे अर्पिलें । देवें आपनापाशीं ठेविले ॥१॥ नेदी कोणाचिये हातीं । भक्तावाचुनी निश्चितीं ॥२॥ जुनाट जुगादींचें । ठेवणें होतें ते संतांचें ॥३॥ पुंडलिकें करुनी वाद । ठेवणें केले तें प्रसिद्ध ॥४॥ नेदी म्हणोनि उभा केला । एका जनार्दनीं अबोला ॥५॥
२३७१
भक्तिविण पशू कशासी वाढला । सटवीनें नेला कैसा नाहीं ॥१॥ काय माय गेली होती भूतापाशीं । हरि नये मुखासी अरे मुढा ॥२॥ पातके करितां पुढें आहे पुसतां । काय उत्तर देता होशील तुं ॥३॥ अनेक यातना यम करवील । कोण सोडवील तेथें तुजला ॥४॥ एका जनार्दनीं सांगताहे तोंडे । आहा वांचा रडे बोलताची ॥५॥
२३७२
भक्तिहीन जन्मला पशु । केला नाशु आयुष्याचा ॥१॥ नाहीं कधीं संतसेवा । करी हेवा भूतांचा ॥२॥ मुखीं नये रामनाम । सदा काम प्रपंचीं ॥३॥ एका जनार्दनीं ते नर । जन्मोनी पामर भूभार ॥४॥
२३७३
भक्तीचे उदरीं जन्मलें ज्ञान । भक्तीनेंक ज्ञानासी दिधलें महिमान ॥१॥ भक्ति तें मुळ ज्ञान तें फळ । वैराग्य केवळ तेथीचें फुल ॥२॥ फुल फळ दोनी येरयेरा पाठीं । ज्ञान वैराग्य तेविं भक्तिचें पोटीं ॥३॥ भक्तिविण ज्ञान गिवसिती वेडे । मूळ नाहीं तेथें फळ केवी जोडे ॥४॥ भक्तियुक्त ज्ञान तेथें नाहीं पतन । भक्ति माता तया करितसें जतन ॥५॥ शुद्धभक्तिभाव तेथें तिष्ठे देव । ज्ञानासी तो ठाव सुख वस्तीसी ॥६॥ शुद्ध भाव तेथें भक्तियुक्त ज्ञान । तयाचेनी अंगें समाधी समाधान ॥७॥ एका जनार्दनीं शुद्ध भक्ति क्रिया । ब्रह्मज्ञान त्याच्या लागतसे पाया ॥८॥
२३७४
भक्तीच्या पोटा मुक्ति पैं आली । भक्तीनें मुक्तीतें वाढविलें ॥१॥ भक्ति ते माता भक्ति ते दुहिता । जाणोनि तत्त्वतां भजन करी ॥२॥ भक्ती सोडोनि मुक्ति वांछिती वेडी । गुळ सोडोनी कैसी जे गोडी ॥३॥ संतोषोनी भक्ति ज्यासी दे मुक्ति । तोचि लाभे येर व्यर्थ कां शिणती ॥४॥ एका जनार्दनीं एक भाव खरा । भक्ति मुक्ति दाटुनी आलिया घरा ॥५॥
२३७५
भगवंतांची नामकीर्ति । अखंड वाचे जे वदती ॥१॥ धन्य तेचि संसारी । वाचे उच्चारी हरिनाम ॥२॥ प्रपंचाचें नोहें कोड । पुरे चाड हरिनामें ॥३॥ एका जनार्दनीं नाम गोड । होय निवाड जन्माचा ॥४॥
२३७६
भगवद्भाव सर्वांभुतीं । हेंचि ज्ञान हेंचि भक्ति । विवेक विरक्ति । याचि नावें ॥१॥ हें सांडुनीं विषयध्यान । तेंचि मुख्यत्वें अज्ञान । जीवींजीवा बंधन । येनेंचि दृढ ॥२॥ आठव तो परब्रह्मा । नाठव तो भवभ्रम । दोहींचें निजवर्म । जाण बापा ॥३॥ आठव विसर चित्तीं । जेणें जाणिजेती । तेचि एक निश्चिती । निजरुप ॥४॥ स्मरण तेचि निजमुक्ति । विस्मरण तेचि अधोगति । ऐसें पुराणें गर्जती । बाह्मा उभारुनी ॥५॥ एका जनार्दनीं । सहज निजबोध मनीं । सबाह्माभ्यंतरीं । पूर्ण परमानंद ॥६॥
२३७७
भजतां भजन एका जनार्दन । ब्रह्मा परिपुर्ण सर्व एका ॥१॥ सांडुनी वासना भजतां भजन । ब्रह्मा परिपुर्ण सर्व एक ॥२॥ विषयवासना त्यागितां संपुर्ण । ब्रह्मा तें संपुर्ण सर्व एक ॥३॥ एका जनार्दनीं एकत्व भाव । तेथें नांदे देव संदेह नाहीं ॥४॥
२३७८
भजन करितां लाजतो पामर । संसारीं चित्त स्थिर सदा वाहे ॥१॥ तीर्थयात्रे जाये संसार चिंता वाहे । पुराण कीर्तनीये निद्रा बळें ॥२॥ ऐसा तो पापिष्ठ कर्म तें सबळ । एका जनार्दनीं म्हणें दोषी अमंगळ ॥३॥
२३७९
भजन चालिलें उफाराटें । कवण जाणें खरें खोटें ॥१॥ जवळी असतां देव । भक्तां उपजला संदेह ॥२॥ सचेतन तुळशी तोडा । वाहाती अचेतन दगडा ॥३॥ बेला केली ताडातोडी । लिंगा लाखोली रोकडी ॥४॥ आग्निहोत्राचा सुकाळ । शमी पिंपळासी काळ ॥५॥ तिन्हीं देव पिंपळांत । अग्निहोत्रीं केला घात ॥६॥ मुख बांधोनी बोकड मारा । म्हणती सोमयाग करा ॥७॥ चवदा गांठींचा अनंत दोरी । तो प्रत्यक्ष नेला चोरी ॥८॥ शालिग्राम शुद्ध शिळा । हारपलीया उपवास सोळा ॥९॥ एका जनार्दनीं एक भाव । कुभाविका कैंचा देव ॥१०॥
२३८०
भजन तें साचें भोळ्या भाविकासी । पैं अभाविकासी नरकवास ॥१॥ भोळियाचा देव अंकित भोळा । अभाविका चांडाळा जवळीं नसे ॥२॥ एका जनार्दनीं भावाचें कारण । अभाविका जाण दुःख पीडा ॥३॥
२३८१
भजन नाही मी अकार्मी वायां । अभिनव अवगति जाली देवराया ॥१॥ नीचानीच मीच एकु । मजवरी उपवरी वर्ते सकळ लोकु ॥२॥ अंधाअध अधोगत पाही । मजहुनी अंधाअंध कोनी नाहीं ॥३॥ एका जानर्दनीं नीच हा नेला । मुंगेयाचे पाई सगळा सामावला ॥४॥
२३८२
भजन भावातें उपजवी । देव भक्तांतें निपजवी ॥१॥ ऐसा भजनेंचि देव केला । भक्त वडिल देव धाकुला ॥२॥ भक्ताकारणे हां संकल्प । भक्त देवाचाहि बाप ॥३॥ देव भक्ताचीये पोटीं । जाला म्हणोनी आवड मोठी ॥४॥ एका जनार्दनीं नवलावो । भक्ताचि कैसा जाला देवो ॥५॥
२३८३
भजन भावें गाऊं भजन भावें ध्याऊं । भजन भावें पाहूं विठोबासी ॥१॥ भजन तें सोपें भजन तें सोपें । हरतील पापें जन्मांतरींची ॥२॥ घालूं तुळशीमाळा गोपीचंदन लल्लाटीं । देखतां हिंपुटी यम पळे ॥३॥ सांडूंनियां आशा जालों वारकरी । एका जनार्दनीं पंढरी पाहूं डोळा ॥४॥
२३८४
भय नाही हरीच्या दासा । शुभ काळ सर्व दिशा ॥१॥ नाहीं तयां गोंवागुंतीं । न लगे पुराण व्युत्पत्ती ॥२॥ नाहीं शास्त्रांचे कारण । वेदाभ्यासाचें नको मनन ॥३॥ एका जनार्दनीं शरण । परंपरा हेचि पूर्ण ॥४॥
२३८५
भरला तो हावे म्हणे माझें माझें । वाहतसें ओझें संसाराचें ॥१॥ कुंथत कुंथत वेरझारा करी । खराचीये परी पृष्ठीं वाहे ॥२॥ न मिळेचि अन्न बहुत आपदा । परी त्या गोविंदा स्मरेचिना ॥३॥ ऐसे जन्मोनियां दास संसाराचे । एका जनार्दनीं त्याचें तोंड काळें ॥४॥
२३८६
भलतीयासी म्हणती । अहो महाराज निश्चितीं ॥१॥ ऐसें अंधळे हे जन । गेले भुलोन संसारें ॥२॥ महराज जनार्दन । नेणती तयाचे चरण ॥३॥ दीना महाराज म्हणती । एका जनार्दनीं सांगूं किती ॥४॥
२३८७
भलते भावें शरण येतां । निवारी जन्ममरण चिंता । उदार लक्ष्मीचा दाता । साक्ष पुंडलीक करुनी सांगे ॥१॥ येथें या रे लहान थोर । भावें नारी अथवा नर । मोक्षाचा विचार नकरणें कवणाही ॥२॥ एका दरुशनें मुक्ति । पुन्हां नाहीं जन्मावृत्ती । एका जनार्दनीं चित्तीं । सदोदित तें सुख ॥३॥
२३८८
भवभयनाशक रामनाम तारक । शंकर राजा सुख जाणतसे ॥१॥ योगयाग नको आणिक साधनें । नामपरतें पेणें आणिक नाहीं ॥२॥ कालीमाजीं श्रेष्ठ रामनाम निज । यापरतें बीज आणिक नाहीं ॥३॥ एका जनार्दनीं नाम तारक थोर । तुटे वेरझार रामनामें ॥४॥
२३८९
भवरोगा औषध जाण । नाममात्रा नारायण ॥१॥ तेणें निरसे भवरोग । न लगे साधन अष्टांग ॥२॥ कामक्रोधाची झाडणी । नामें होय तत्क्षणीं ॥३॥ एका जनार्दनीं नाममात्रा । उद्धरील कुळगोत्रा ॥४॥
२३९०
भवरोगासी वोखद । रामनाम हेंचि शुद्ध ॥१॥ येणे तुटे रोग व्यथा । भुक्ति मुक्ति वंदिती माथा ॥२॥ न लगे आणिकाचे काम । वाचे वंदें रामनाम ॥३॥ पथ्य एक शुद्ध क्रिया । एका जनार्दनीं लागे पायां ॥४॥
२३९१
भवरोगियांसी औषध हें नाम । सेवावे परम आवडीनें ॥१॥ सर्वकाळ करा नामाचें चिंतन । सदा समाधान होय तेणें ॥२॥ एका जनार्दनीं रामनामीं वृत्ती । वृत्तीची निवृत्ती सहज होय ॥३॥
२३९२
भवरोगियासी उपाय । धरावें तें संतपाय ॥१॥ तेणें तुटे जन्मजराकंद । वायां छंद मना नये ॥२॥ उपसना जे जे मार्ग । दाविती अव्यंग भाविकां ॥३॥ निवटोनी कामक्रोध । देती बोध नाममुद्रा ॥४॥ शरण एका जनार्दनीं । धन्य धन्य संतजनीं ॥५॥
२३९३
भवसिंधु तराया नाम हें नौका । उतार तें लोका सोपा केली ॥१॥ न घडे न घडे आणिक साधन । नाम पंचानन नाम पुरे ॥२॥ क्षणीक आयुष्य न घडे जप तपें । नाम गांता सोपें सर्व साधे ॥३॥ मंत्र तंत्र हवन नोहे विधियुक्त । तैं होत अपघात शरीराचा ॥४॥ एका जनार्दनीं तैसें नोहें नाम । तारक निजधाम प्राणिमात्रां ॥५॥
२३९४
भवसिंधुसी उतार । हरिहर म्हणतां निर्धार ॥१॥ हीच घ्या रे प्रचीत । सर्व पुरती मनोरथ ॥२॥ संसाराचा धंदा । वाचे म्हणा हरि गोविंदा ॥३॥ एका जनार्दनीं नाम । वाचे जप सोपा सुगम ॥४॥
२३९५
भांडाचें तोंड भांड पुराण । वरी शिमग्याचा सण ॥१॥ काय उणें मग भांडा । बोलती वाउगें तें तोंडा ॥२॥ वेद शास्त्र नीति नाहीं । सैरावैरा बोलणें पाहीं ॥३॥ एका जनार्दनीं पाषांड । म्हणोनि फोडो त्याचें तोंड ॥४॥
२३९६
भांबावला देव संतामागें धावें । उघडाचि प्रभवे पंढरीये ॥१॥ युगें अठ्ठावीस पुंडलिकासाठीं । उभा जगजेठी विटेवर ॥२॥ यावे तया द्यावें क्षेमालिंगन । पुसावा तो शिणभाग त्यास ॥३॥ कुर्वाळुनी करें धरी हनुवटी । म्हणे मजसी भेटी तुमची झाली ॥४॥ लाघव तयासी दावी आपुले बळें । पुरवावे लळे सत्य त्याचे ॥५॥ जैशी त्याची भावना आपण पुरवी । एका जनार्दनीं गोंवी आपल्या कडे ॥६॥
२३९७
भांबावले जन म्हणती माझें माझें । वाउगेंचि वोझें वाहताती ॥१॥ खराचिये परी उकरडा सेविती । नोहे तयां गती अधम जाणा ॥२॥ स्तंभ असोनियां चोर म्हणती आला । नसोनि प्रपंच खरा भासिला ॥३॥ मृगजळवत् जाणार सर्व । अभ्रीचें सावेव वायां जैसें ॥४॥ एका जनार्दनीं धरीका रे सोय । पुनरपि न ये गर्भवासा ॥५॥
२३९८
भागीरथी आणि भीमरथी वदतां । समान तत्वतां कलीमाजीं ॥१॥ प्रातःकाळीं नमस्मरण जो गाय । तीर्थीं सदा न्हाये पुण्य जोडे ॥२॥ वदतां वाचें नाम घडतां एक स्नान । पुनरपि न आगमन मृत्यूलोकमें ॥३॥ एक जनार्दनीं भीमरथीं वदतां । प्रयागीं समता सरी न पवे ॥४॥
२३९९
भाग्य उजळलें आतां । संत सभाग्यता भेटले ॥१॥ पाप ताप दैन्य गेलें । संत पाउलें देखतां ॥२॥ तुटली बंधनाची गांठी । पाय पोटीं आठवितां ॥३॥ एका जनार्दनीं शरण । संतचरण दुर्लभ ॥४॥
२४००
भाग्यवंत श्रीहरीचे दास । धरितां कास तारिती ॥१॥ धन्य त्यांचा उपकार । पावविले पार बहुत ॥२॥ वर्णितां त्यांचें उत्तम गुण । होय जन्मांचेंखंडन ॥३॥ शरण एका जनार्दनीं । धन्य धन्य तुमची वाणी ॥४॥
२४०१
भाग्यवंत संत होती । दीन पतीत तारिती ॥१॥ नाहीं तया भाग्या पार । काय पामर मी बहूं ॥२॥ चुकविता जन्म जरा । संसारा यापासोनी ॥३॥ एका जनार्दनीं शरण । पतीतपावन संत तें ॥४॥
२४०२
भाग्यवंत होती संत । दीन पतीत तारिती ॥१॥ उपदेश विठ्ठल मंत्र । देती सर्वत्र सारिखा ॥२॥ स्त्रिया शुद्र अथवा बाळें । कृपा कल्लोळे एकचि ॥३॥ एका जनार्दनीं शरण । पतीतपावन संत होती ॥४॥
२४०३
भाग्यहीन बहु असती । कमळापती सांभाळणें ॥१॥ गर्जें ब्रीदाची तोडर । चराचर त्रिभुवनीं ॥२॥ शरणागतां वज्रपंजर । हा बडिवार त्रिजगतीं ॥३॥ शरण एका जनार्दनीम । कैवल्यदानीं उदार ॥४॥
२४०४
भाग्यांचें भाग्य धन्य तें संसारीं । सांठविती हरि हृदयामाजीं ॥१॥ धन्य त्यांचें कुळ धन्य त्याचें कर्म । धन्य त्याचा स्वधर्म नाम मुखा ॥२॥ संकटीं सुखात नाम सदा गाय । न विसंबे देवराया क्षण एक ॥३॥ एका जनार्दनीं धन्य त्यांचे दैव । उभा स्वयमेव देव घरीं ॥४॥
२४०५
भाग्याचा उदय झाला । संतसंग मज घडला ॥१॥ तेंणें आनंदाचे पुर । लोटताती निरंतर ॥२॥ प्रेम सप्रेम भरतें । अंगी उतार चढते ॥३॥ आली आनंदलहरी । एका जनार्दनीं निर्धारीं ॥४॥
२४०६
भाग्याचें ते नारीनार । गाती निरंतर मुखी नाम ॥१॥ धन्य धन्य त्याचा जन्म । सुफळ सर्व कर्म धर्म ॥२॥ उपासना त्यांची निकी । सदा नाम गातीं मुखीं ॥३॥ नामापरतें आन । त्यासी नाहीं पैं साधन ॥४॥ एका जनार्दनीं नामें गाय । त्यांचे वंदितसे पाय ॥५॥
२४०७
भाळे भोळे नरनारी । येती प्रती संसत्वरीं पंढरीये ॥१॥ करती स्नान वंदिती चरणां । क्षेत्र प्रदक्षिणा करिताती ॥२॥ आळविणे मृदंग मोहरी । गरुड टके शोभती करीं ॥३॥ करती आनंदे नामघोष । नाहीं आंस पायांवीण ॥४॥ एका जनार्दनीं कौतुकें । नाचतु सुखें भक्तराणा ॥५॥
२४०८
भाळे भोळे वारकरी । हरिनामागजरीं नाचती ॥१॥ त्यांचा संग देई देवा । नको हेवा दुजा कांहीं ॥२॥ त्यांचें चरणीं राहो मन । आणिक साधन दुजें नको ॥३॥ म्हणती हरि करिती वारी । याहुनी थोरी कोण आहे ॥४॥ तयांजवळी मज ठेवा । एका जनार्दनीं जीवा माझिया ॥५॥
२४०९
भाव धरी कां रें साचा । उच्चार करीं नामाचा । पंथ विठोबाचा । दृढ धरीं ॥१॥ विठ्ठल विठ्ठल वाचे । वदे कां रे तूं साचें । दोष जातील जन्माचें । संदेह नाहीं ॥२॥ आळस न करी क्षणभरी । वाचे उच्चार श्रीहरी । यमयातना बोहरी । तेणें होय ॥३॥ भक्ति दृढ धरीं नामीं । पडुं नको वाउगा श्रमीं । विठोबाचे नामीं । विश्वास धरीं ॥४॥ पतित पावन । नाम हें सत्व वचन । एका जनार्दनीं चरणं । दृढ धरीं ॥५॥
२४१०
भाव धरुनिया वाची ज्ञानेश्वरी । कृपा करी हरी तयावरी ॥१॥ स्वमुखें आपण सांगे तो श्रीविष्णु । श्रीगीता हा प्रश्न अर्जुनेसी ॥२॥ तोचि ज्ञानेश्वरी वाचे वदतां साचे । भय कळिकाळाचें नाहीं तया ॥३॥ एका जनार्दनीं संशय सांडोनी । दृढ धरा मनीं ज्ञानेश्वरी ॥४॥
२४११
भाव धरुनी शरण येती । तयां मोक्ष सायुज्यप्रांप्ती । ऐसी वेद आणि श्रुती । गर्जतसे सादर ॥१॥ म्हणोनी न करा आळस । सुखे जा रे पंढरीस । प्रेम कीर्तनाचा रस । सुखें आदरें सेविजे ॥२॥ पाहतां नीरा भीवरा दृष्टीं । स्नानें वास त्या वैकुंठीं । पुर्वजही कोटी । उद्धरती सर्वथा ॥३॥ एका जनार्दनीं सांगे । भाक दिधली पांडुरंगें । धन्य संचित जें भाग्य । तेंचि योग्य अधिकारी ॥४॥
२४१२
भाव भजनातें निपजवी । भक्त देवातें उपजवी ॥१॥ आतां भजनीं देव केला । भक्त वडील देव धाकुला ॥२॥ सेवा करणें हा संकल्प । भक्त देवाचाही बाप ॥३॥ भक्ता कळवळा देवाचा । देव झाला त्या भक्तांचा ॥४॥ देव भक्तांचे पोटीं । झाला म्हणोनी आवड मोठी ॥५॥ एका जनार्दनीं नवलाव । कैसा भक्तचि झाला देव ॥६॥
२४१३
भाव भावित भाव भावित भावित निजभाव भावना । निजबोध जालिया कैंची भाव भाविक भावना ॥१॥ भक्ति भावित शक्ति बोधीत शोधीत निजसत्त्व । भक्तिमुक्ति विरहित बोधिते निजसत्व ॥२॥ मायामोहित काय कामीते क्षोभती निजक्रोध । एक जनार्दनीं एकपणें आणिती निजबोधा ॥३॥
२४१४
भाव लागला भगवंतीं । हरिरुप पवित्र जगतीं । पाहता कर्माकर्म गति । ब्रह्मास्थिति अखंड ॥१॥ भक्ति म्हणे सोहंशक्ति । सांडिं भवभय आसक्ती । पाहतां निजभाव विरक्ति । सर्वाभूतीं भगवंत ॥२॥ करितां कर्मांचे देहाचरण । कर्म सबाह्म चैतन्य । देहविदेह अवसान । गमनागमन खुंटलें ॥३॥ एकाजनार्दनीं एकपण । अनन्यभावें पैं शरण । जन्ममरणा आलें मरण । ब्रह्मा परिपुर्ण पूर्णत्वे ॥४॥
२४१५
भावना अभावना निमाली अंतरीं । वायां हावभरी नाहीं मन ॥१॥ कामक्रोध ज्याचे दमोनियां गेलें । इंद्रियें समरसलीं एकें ठायीं ॥२॥ एकपणें सर्व होऊनियां मेळा । रतलें गोपाळाचरणीं मन ॥३॥ तोचि ब्रह्माज्ञानी जगामाजीं धन्य । एका जनार्दनीं चरण वंदी ॥४॥
२४१६
भावाचिये बळे होऊनि लहान । आपुलें थोरपण विसरला ॥१॥ न म्हणे यातिकुळ तें सुशीळ । उत्तम चांडाळ हो कां कोण्ही ॥२॥ अट्टाहास्यें करितां नामाचा उच्चार । उतरी पैलपार भवनदीचा ॥३॥ एका जनार्दनीं भक्तांची आवडी । घालीतसे उडी वैकुंठाहुनी ॥४॥
२४१७
भावाचेनी भक्ति थोर । भावें तुटे वेरझार ॥१॥ भावें अंकित देव भक्तांचा । वेदशास्त्रा बोले वाचा ॥२॥ भावें गुरुशिष्य दोन्हीं । भावयुक्त सर्व गुणीं ॥३॥ भावें जालें भक्तिपंथ । भावें पुरे मनोरथ ॥४॥ एका जनार्दनीं भाव । भावें दिसे देहीं देव ॥५॥
२४१८
भाविक हें संत कृपेचें सागर । उतरती पार भवनदी ॥१॥ तयांचियां नामें तरताती दोषी । नासती त्या राशी पातकांच्यां ॥२॥ दयेचें भांडार शांतीचें घर । एका जनार्दनीं माहेर भाविकांचें ॥३॥
२४१९
भाविका त्या गोपी येतो काकुळती । तुमचेनि विश्रांती मजलागीं ॥१॥ मज निराकारा आकारासी येणें । तुमचें तें ऋण फेडावया ॥२॥ दावितो लाघव भोळ्या भाविकांसी । शाहणे तयासी न सांपडे ॥३॥ एका जनार्दनीं भाविकांवांचूनी । प्राप्त नोहे जाण देव तया ॥४॥
२४२०
भाविकांची आवड मोठी । धांवे पाठीं रानोरान ॥१॥ कण्या खाये विदुराच्या । उच्छिष्ट गोवळ्यांचें परमप्रिय ॥२॥ उच्छिष्ट फळें भिल्लिणीचीं । खायें रुचे आदरें ॥३॥ पोहे खाये सुदाम्याचे । कोरडे फके मारी साचे ॥४॥ ऐशी भक्ताची आवडी देवा । एका जनार्दनीं करी सेवा ॥५॥
२४२१
भाविकांचें स्थान पंढरी पावन । अभाविकां जाण नावडे तें ॥१॥ म्हणोनि चिंतन विठ्ठलाचें वाचें । अभाविकां साचें नावडे नाम ॥२॥ वैष्णवांचा संग नावडे कीर्तन । अभाविकांचा दुर्गुण हाचि देखा ॥३॥ अभाविकांच्या संगें परमार्थ नावडे । एका जनार्दनीं न घडे सेवा कांहीं ॥४॥
२४२२
भाविकांच्या उदकासाठीं । रमा नावडे गोमटी ॥१॥ भाविकांचें उदक घेतां । मज समाधान चित्ता ॥२॥ भाविकांचें उदकापुढें । मज वैकुंठही नावडे ॥३॥ ऐशी भाविकांची गोडी । एकाजनार्दनीं घाली उडी ॥४॥
२४२३
भाविकांसी नित्य नवें हें सोपारें । पंढरी उच्चार करितां वाचें ॥१॥ हो कं अनामिक अथवा शुद्ध वर्ण । ज्ञातीसी कारण नाहीं देवा ॥२॥ एका जनार्दनीं भलती ज्ञाती असो । परी पांडुरंग वसो हृदयमाजीं ॥३॥
२४२४
भावें करा रे भजन । भावेंक करा नामस्मरण ॥१॥ भावें जावें पंढरीसी । भावें नाहावें भीमरथीसी ॥२॥ भावें करा प्रदक्षिणा । भावें करा जागरणा ॥३॥ भावें व्रत एकादशी । एका शरण जनार्दनासी ॥४॥
२४२५
भावें करितां माझी भक्ति । मी आतुडें भक्ताहातीं ॥१॥ माझें भक्तीपरतें । साधन नाहीं वों निरुतें ॥२॥ माझें भक्तीचें महिमान । भक्त जाणती सज्ञान ॥३॥ एका जनार्दनीं भाव । स्वयें बोलतसे देव ॥४॥
२४२६
भावें करितां माझी भक्ति । विषयवासना जळोनि जाती ॥१॥ चालतां माझे भक्तिपंथीं । सकळ साधनें जळोनि जातीं ॥२॥ माझिया निजभक्ता । न बाधेचि संसारव्यथा ॥३॥ प्रल्हादा गांजिता जगजेठी । मी प्रगटलों कोरडे काष्टीं ॥४॥ द्रौपदीं गांजिती तात्काळीं । कौरवांची तोंडे केली काळीं ॥५॥ गोकुळीं गांजितीं सुरपती । गोवर्धन धरिला हातीं ॥६॥ अर्जुन प्रतिज्ञेचे वेळीं । म्यां लपविला हेळीं ॥७॥ अंबऋषीचे गर्भवास । म्या सोशिलें सावकाश ॥८॥ भक्तचरणींची माती । एका जनार्दनीं वंदिती ॥९॥
२४२७
भावें घातली कास देव झाला दास । सोशी गर्भवास भाविकांचे ॥१॥ भावचि कारण भावचि कारण । यापरतें साधन आणिक नाहीं ॥२॥ भावाचेनि बळें जीवपणें वोवळें । मन हें सोंवळें ब्रह्मा साम्य ॥३॥ एका जनार्दनीं भावचि कारण । सच्चिदानंदावरी खूण दाविली ते ॥४॥
२७२८
भावें जनार्दन बोले उद्धवासी । बारे तूं परीयेसी गुह्मा गोष्टी ॥१॥ गुह्मा गोष्ट तुज सांगतों निभ्रांत । हृदयें फुटत आनंदेंसी ॥२॥ आनंदाचा रस न संडी प्रसंग । होसी जीवलग म्हणोनियां ॥३॥ म्हणोनी उद्धवा तुजसी बोलतां । भेदाचीये वार्ता नाहीं मज ॥४॥ मज तुज कांहीं नाहीं भिन्न भेद । कैवल्याचा सिद्ध तूंची एक ॥५॥ तूंची एक भक्तमाजीं शिरोमणी । आवडसी मनीं सर्वकाळ ॥६॥ सर्वकाळ तुज ध्याई अहर्निशीं । आनंद मानसीं समाधान ॥७॥ समाधीं विश्रांतीं मंडण ज्ञानाचा । नाहीं प्रपंचाचा लेश कांहीं ॥८॥ कांहीं एक क्रृष्णमुखीं गोष्टीलागीं । उद्धव सर्वांगी श्रवणार्थ ॥९॥ श्रवणीं सादर हरिमुख न्याहाळीं । सुखाचें कल्लोळीं प्रेमयुक्त ॥१०॥ प्रेमयुक्त पाहे सांवळें रूपडें । तेज चहूंकडे फांकतसे ॥११॥ फांकतसे तेज कुंडलाचे दाटी । वैजयंती कंठीं वनमाळा ॥१२॥ वनमाळा मुद्रिका चिद्रानें मुगुटा । कासेसी गोमटा पीतांबर ॥१३॥ पीतांबरधारी श्रीमुख सुंदर । चरणीं तोडर गर्जतसे ॥१४॥ गर्जती नेपुरें आरुणें रंगीला । टिळक रेखिला केशराचा ॥१५॥ केशराचा टिळक कुंकमाचीं पदें । उद्धव स्वानंदें लोळतसे ॥१६॥ लोळतां देखिला भक्त वेळाइते । आलिंगन देत उद्धवासी ॥१७॥ उद्धवा मज चाड नाही तपसाधनीं । नामसंकीर्तनीं प्रीत सदा ॥१८॥ सदा माझें नाम गाती जे भावेंसी । त्यासी मी मानसीं न विसंबें ॥१९॥ न विसंबें भक्ता नाम जया मुखीं । सरतां तिहीं लोकीं होय जाणा ॥२०॥ जाण नामासरी न पवे ब्रह्माज्ञान । तीर्थादि भ्रमण व्यर्थ पाहीं ॥२१॥ पाहे पां प्रल्हाद आसनीं शयनीं । नामाही वांचोनीं दुजें नेणें ॥२२॥ दुजें नेणें एक द्रौपदीं बहीणुली । हर्षें ते वेल्हाळी नाम स्मरे ॥२३॥ नाम स्मरतां गजेंद्रा तुटले बंधन । पतितपावन नाम श्रेष्ठ ॥२४॥ नाम सुखानंदें भवानीशंकर । जपे निरंतर नाम माझें ॥२५॥ माझ्या नामरंगीं गोपाळ गजरीं । घालती घुमरी आल्हादेंसी ॥२६॥ आल्हादें नाचती प्राण माझे ठायीं । सर्वांसी मी पाहीं त्यासारिखा ॥२७॥ सारिखाची होय थोरा आणि साना । जैसी हे वासना जनार्दनीं ॥२८॥ जनार्दना गातां धाक यमदूतां । येणें जाणें वार्ता तेथें कैंची ॥२९॥ कैंचा कळिकाळा पळे दशदिशा । माझ्या नामसरिता न राहेची तो ॥३०॥ चित्त मनें शुद्ध गाती माझें नाम । त्याचे दासीकाम करीन सत्य ॥३१॥ सत्य वोळंगणें भक्तांचें रंगणीं । वंदी पायवणी निजभावें ॥३२॥ भावाचा मी भोक्ता नावडेची कांहीं । नामालागीं पाही अंकीत मी ॥३३॥ अंकीत मी होय श्रवणीं संतुष्ट । तयासी वकुंठ आइतेंची ॥३४॥ आइताची ठेवी जीव तयावरी । निबलोण करी वेळोवेळां ॥३५॥ वेळोवेळां त्याचे द्वारींच तिष्ठत । नाहींच पाहत मानामान ॥३६॥ मानामान सर्व सांडिले उद्धवा । भक्तिप्रेमभावा लागोनियां ॥३७॥ लागवेग मज सप्रेम कीर्तनीं । लक्ष्मीं डावलोनि नामप्रेम ॥३८॥ प्रेम नाहीं मज योगी हृदयकमळीं । सवितां मंडळी स्थिर नव्हे ॥३९॥ नव्हे मी संतुष्ट महा यज्ञदानीं । पंचाग्नि साधनीं चाड नाहीं ॥४०॥ चाड असे तेथें हरिनाम गाती । त्याच्या पुण्या मिती ब्रह्मा नेणें ॥४१॥ ब्रह्मायाचा सुत नारद विख्यात । स्वबोधें डुल्लत नामबळें ॥४२॥ नामबळें देखा तरला चांडाळ । नेला आजामेळ मुक्तिपंथा ॥४३॥ मुक्तिपंथें नेलो नाम घेतां वाणी । तात्काळ कुंटणी तारियेली ॥४४॥ तारिल्या गोकुळीं गोपिकां सुंदरी । तयाचें शरीरीं मीच वसें ॥४५॥ वसे घरोघरीं प्राण माझे ठायीं । न विसंबती पाही क्षण मज ॥४६॥ मज आठविती उठतां बैसतां । दळितां कांडितां नाम माझें ॥४७॥ मज आठविती चालतां बोलतां । गाइते दुहिता नाम माझें ॥४८॥ माझिये स्मरणीं सुखाचे शेजारीं । प्रीति पडिभरी चित्त त्यांचें ॥४९॥ चिताचा चोरटा ज्यासी जैसा भाव । त्यासी मी वासुदेव तैसा होय ॥५०॥ ज्यासी माझे भजनीं संभ्रम । त्यासी मी आत्माराम प्रियकर ॥५१॥ प्रियकर आत्मा म्हणोनियां जाण । केलें निरूपण भक्तराया ॥५२॥ भक्तासी उपाव नामींच विस्तार । नाहीं आन थोर नामेंविण ॥५३॥ नाम सारासार ओंविया चौपन्न । करिती पठण निजभावें ॥५४॥ भावें उच्चारीं होय पाप धुणी । एका जनार्दनीं संकीर्तन ॥५५॥
२४२९
भावेंविण देव नयेचि पै हातां । वाउगें फीरतां रानोरान ॥१॥ मुख्य तें स्वरुप पाहिजे तो भाव । तेणें आकळे देह निःसंदेह ॥२॥ संतसमागम नाम तें पावन । वाचे नारायण हाचि भाव ॥३॥ एका जनार्दनीं सोपा मंत्र राम । गातां जोडे धाम वैकुंठींचें ॥४॥
२४३०
भावों देव कीं देवीं भाव । दोहींचा उगव करुनी दावा ॥१॥ भावा थोर कीं देव थोर । दोहींचा निर्धार करुनी दावा ॥२॥ जंव जंव भाव तंव तंव देव । भाव नाहीं तेथें देवाचि वाव ॥३॥ एका जनार्दनीं भावेंचि देव । लटिके म्हणाल तरी हृदयीं साक्ष पहा हो ॥४॥
२४३१
भासतसे दोर विखाराचे परी । तैसीच थोरी प्रपंचाची ॥१॥ भुलले भुलले प्रपंची गुंतले । वाया उगले बोल कां हे ॥२॥ श्वानाचियेपरी मागें पुढें पाहे । माझा म्हणोनी बाह्मा कवटाळिती ॥३॥ एका जनार्दनें अवकाळीं मेघ । तैसा प्रपंची दंभ लटिकाची ॥४॥
२४३२
भिंगाचे भिगुलें खांद्यावर आंगुलें । नाचत तान्हुलें यशोदेचें ॥१॥ येती गौळणी करीती बुझावणी । लागती चरणी कान्होबाच्या ॥२॥ गोविंद बाळिया वाजविती टाळिया । आमुचा कान्हया देवराज ॥३॥ कडदोरा बिंद्ली वाघनखें साजिरी । नाचत श्रीहरी यशोदेचा ॥४॥ पायीं घागरीया वाक्य साजरीया । कानीच्या बाळ्या ढाळ देती ॥५॥ एका जनार्दनी एकत्व शरण । जीवें निबंलोण उतरती ॥६॥
२४३३
भिक्षेलागीं पाणीपात्र । सांठवण उदर मात्र ॥१॥ सायंकाळीं प्रातःकाळासी । भिक्षा संग्रह नसावा निश्चयेंसी ॥२॥ संग्रह यत्‍नाचीया चाडा । मोहोळ अवघा कडा ॥३॥ मोहोळ झाडितां त्यासी । नाश होतो मासीयासी ॥४॥ सर्व मायीक पदार्थ । एका जनार्दनीं परमार्थ ॥५॥
२४३४
भिन्न माध्यान्हीं रात्रीं नारी । विरह करी बैसोनि अंतरीं । केधवा भेटले श्रीहरी । तो नवल जालें अंतरीं वो ॥१॥ अवचित घडला संतसंग । विरहाचा झाला भंग । तुटोनि गेला द्वैतसंग । फिटला जन्ममरणाचा पांग वो ॥२॥ एका जनादनीं संतसंग । फिटला संसारपांग । विरह गेला देहत्याग । सुखें सुख झालें अनुराग वो ॥३॥
२४३५
भिल्लिणी बाळा वनीं वेंचितां फळा । देखिला रामरावो ठक पाडिलें डोळां ॥१॥ गोडणी सोहंमार्गी गीती गाती रामा । आनंदें नाचती दृष्टी देखोनी रामा ॥२॥ देखोनी रामरावो कैसा झाला भावो । सेवितां कंदमुळें आम्हां दिसतो देवो ॥३॥ सफळिता तरुवरीं साचें राम आभासे । पहा जनी वनीं अवघा रामचि दिसे ॥४॥ चारा हरवेठीं बोरा भरुनियां पाटी । फळामाजीं फळ राम सफळीत दृष्टी ॥५॥ आसनी शयनीं आम्हां आणीक बोधु । एका जनार्दनीं गोड लाविला वेधू ॥६॥
२४३६
भीमरथीचे तीरी । उभा विठ्ठल विटेवरी ॥१॥ रुप सावळें सुंदर । कुंडलें कानीं मकराकार ॥२॥ गळां शोभें वैजयंती । चंद्र सुर्य तेजें लपती ॥३॥ कौस्तुभ हृदयावरी । उटी केशर साजिरी ॥४॥ एका जनार्दनीं निढळ । बरवें देखिलें साजिरें ॥५॥
२४३७
भीमा दक्षिनवाहिनी । मध्यें पुंडलीक मुनी । विठ्ठल विटे समचरणी । भक्तालांगीं तिष्ठत ॥१॥ न म्हणे लहान थोर कांहीं । याती वर्णा विचार नाहीं । प्रेम भाव पायीं । येवढेंचि पुरे तेथें ॥२॥ दृढ धरुनी विश्वास । पाहे पंढरीनिवास । एका जनार्दनी दास । सर्वभावें अंकित ॥३॥
२४३८
भीवरेचे तीरीं उभा । धन्य शोभा विठ्ठल ॥१॥ विटेवरी समचरण । तेथें मन गुंतलें ॥२॥ संत जाती तया ठाया । मजहि गांवा त्वां न्यावें ॥३॥ उपकार करा साचा । दाखवा दीनाचा सोयरा ॥४॥ एका जनार्दनीं बापमाय । वंदू पाय तयाचें ॥५॥
२४३९
भीष्में जया ध्याइलें । तें विटेवरे देखिलें ॥१॥ धर्मराये पुजियेलें । तें विटेवरी देखिलें ॥२॥ शिशुपाळा अंतक जाहलें । ते विटेवरी देखिलें ॥३॥ एका जनार्दनीं पुजिलें । ते विटेवरी देखिलें ॥४॥
२४४०
भुक्ति आणि मुक्ति फुकाचें ठेवणें । श्रीगुरु जनार्दनें तुच्छ केलें ॥१॥ येर ब्रह्माज्ञाना काय तेथें पाड । मोक्षाचे काबाड वारियेलें ॥२॥ साधन अष्टांग यज्ञ तप दान । तीर्था तीर्थाटन शीण वायां ॥३॥ एका जनार्दनीं दाविला आरिसा । शुद्धी त्या सरसा सहज झालो ॥४॥
२४४१
भुक्ति मुक्ति कारणें तुज न घाली सांकडें । संतासी रोकडे शरण जाऊं ॥१॥ हाचि माझा नेम उपासना भक्ति । आणिक विश्रांती मज नाहीं ॥२॥ एका जनार्दनीं सेवेवाचूनीं । आन नेनें जाण दुजें कांहीं ॥३॥
२४४२
भुक्ति मुक्तीचें कारण । नाहीं नाहीं आम्हां जाण ॥१॥ एक गाऊं तुमचें नाम । तेणें होय सर्व काम ॥२॥ धरलिया मूळ । सहज हातीं लागे फळ ॥३॥ बीजाची आवडी । एक जनार्दनीं गोडी ॥४॥
२४४३
भुक्तिमुक्तीचा पांग आमुचिये गांवीं । जनीं जनार्दन वागवी देह सर्व ॥१॥ भुक्ति आणि मुक्ति कासया तें वोझें । जनार्दनें सहजें निर्दाळिलें ॥२॥ कल्पिक कल्पना आवरुनी ठायीं । जनार्दन पाहीं सबराभरीत ॥३॥ त्याचियेनी सत्ते जाहलीसे मिळणी । एका जनार्दनीं एकमय ॥४॥
२४४४
भुक्तिमुक्तीचें सांकडें नाहीं विष्णुदासां । प्रपंचाची आशा मा तेथें कैची ॥१॥ वैकुंठ कैलास अमरपदें तिन्हीं । तुच्छवत मनी मानिताती ॥२॥ राज्य भोग संतती संपत्ति धन मान । विष्ठेंअ तें समान श्वान सुकर ॥३॥ मा ब्रह्माज्ञाना तेथें कोण पुसे तत्त्वतां । घर रिघोनि सायुज्यता येत असे ॥४॥ एका जनार्दनीं नामाची प्रौढी । ऋद्धिसिद्धि दडी घरीं देती ॥५॥
२४४५
भुक्तिमुक्तीस कारण । हरीचे जन्मकर्म गुण ॥१॥ हरिकीर्तनाची जोडी । सकळ साधनें होतीं बापुडीं ॥२॥ शिळा तारिल्या सागरीं । गोवर्धन उचलिला करीं ॥३॥ निमाला गुरुपुत्र आणिला । मुखें दावाग्नी प्राशिला ॥४॥ तो सांवळां श्रीहरी । एका जनार्दनीं चरण धरी ॥५॥
२४४६
भुक्तीमुक्तीचें माहेर । संत उदार असती ॥१॥ देव ज्यांचें करी काम । देतो धाम आपुलें ॥२॥ तया वचनाची पाहे वास । पुरवी सौसर मनींची ॥३॥ एका जनार्दनीं विनित । संतचरणरज वंदीत ॥४॥
२४४७
भुलले पामर नेणती ते शुद्धी । बुडतील भवनदीमाजीं जाणा ॥१॥ म्हणवोनि येत करूणा । परी संतचरनां न लागती ॥२॥ खरें खोटें ऐसें न कळेचि जीवा । कां न भीति भेवा यमाचिया ॥३॥ एका जनार्दनीं किती हें सागावेरं । उगवेना दावें गळां बंध ॥४॥
२४४८
भुललें ते प्राणी विसरले कीर्तना । अंतीं त्या पतना वारी कोण ॥१॥ जयांसी नावडे हरींचें किर्तन । ते जाणावे पाषाण कलीमाजीं ॥२॥ मागें सांगितलें संतीं अनुभवुनी । तयावया जनीं किर्तन नौका ॥३॥ एका जनार्दनीं सारांचें हें सार । कीर्तने भवपार मॄत्युलोकीं ॥४॥
२४४९
भुलाविलें वेणुनादें । वेणु वाजविला गोविंदें ॥१॥ पांगुळलें यमुनाजळ । पक्षी राहिले निश्चळ ॥२॥ तृणचरें लुब्ध जालीं । पुच्छ वाहुनियां ठेलीं ॥३॥ नाद न समाये त्रिभुवनीं । एका भुलला जनार्दनीं ॥४॥
२४५०
भूतमात्र आकृति एकचि मूर्ती । अवघा अंतर्गति व्यापुनी ठेला ॥१॥ जळीं स्थळीं कांष्ठीं स्थावर जंगम । अवघा आत्माराम पूर्णपणे ॥२॥ सायंप्रातर्मध्याह नाहीं अस्तमान । आणिक कारण नोहेंदुजें ॥३॥ एका जनार्दनीं सव्राह्म भरला । भरुनी उरला पंढरीये ॥४॥
२४५१
भूमी शोधोनी साधिलें काज । गुरुवचन बीज पेरियलें ॥१॥ कैसें पिक पिकलें प्रेमाचें । सांठवितां गगन टाचें ॥२॥ सहाचारी शिणले मापारी । कळला नव्हे अद्याप वरी ॥३॥ एकजनार्दनीं निजभाव । देहीं पिकला अवघा देव ॥४॥
२४५२
भूमीभर वायां । कां रें जन्मली ही काया ॥१॥ न घडे वाचे नामस्मरण । जिव्हा नव्हे चर्म जाण ॥२॥ न घडे करें दानधर्म । कर नोहेती सर्प जाण ॥३॥ पायीं तीर्थयात्रा न घडे । पाय नोहेते ते केवळ लाकडें ॥४॥ एका जनार्दनीं ते वेडे । नरदेहीं प्रत्यक्ष रेडे ॥५॥
२४५३
भूली भटकी आई कान्हा तोरे गांवछे । मारो नंदनंदन चित्त जडे तोरे पावछे लालना ॥१॥ चली आई परपंच हाटसे । तुं केव धरियों मेरे वाटछे ॥२॥ आब तूं नंदनंदन लालछे । मैं गारी देऊं तुजसे लालना ॥३॥ एका जनार्दन नाम तोरे गावछे । पीरीत वसे तारे चरणछे लालना ॥४॥
२४५४
भेदबुद्धि पालटली । कृपा या विठ्ठलीं केली मज ॥१॥ प्रकाश जाहला देहादेहीं । वासना प्रवाहीं वहावली ॥२॥ विषयांचें तें लिगाड । जाहलें देशोधडी आपोआप ॥३॥ एका जनार्दनीं शरण । काया वाचा आणि मन ॥४॥
२४५५
भोगितां काम भोगाचे सोहळे । परी अंतकाळीं कळे वर्म त्याचें ॥१॥ चालतां देह भोगातें भोगिती । अंतकाळीं होतीं दैन्यवाणे ॥२॥ भुलला पामर धरूनी भोग आशा । पुढे यमपाश कळेचिना ॥३॥ एका जनार्दनीं न कळेचि वर्म । कोण भवकर्म सोडवील ॥४॥
२४५६
भोगें चिताविसील नाना दुःखें । तो तूं भोगचि भोगसील सुखें ॥१॥ मीपण कैचें काये । हानी लाभ तुझा तूंचि पाहे ॥२॥ भोग जैं आले वाडवाड । तुझें आंख अंग आम्हां आड ॥३॥ एका जानर्दनींक एक वर्म । माझेनि नावें तूंचि भोगी कर्म ॥४॥
२४५७
भोगोनी नान योनी । आलासी आतां या जनीं ॥१॥ ऐसा धरी मागील आठव । करी देहाचें वाटीव ॥२॥ नाहीं तरी जाशील वायां । पुनरपि यमालया ॥३॥ येतां जातां शिणतोसी । एका जनार्दनीं कां न भजसी ॥४॥
२४५८
भोळा कर्पुरगौर भोळे ज्याचें मन । भोळ्या भक्ताधीन धांवेक भोळा ॥१॥ भोळे याचे गळां शोभे रुडमाळा । अर्धांगी तें बाळा पर्वताची ॥२॥ भोळें ज्याचें मन भोळें ज्यांचें ध्यान । भोळें ज्याचे वदन शोभतसे ॥३॥ एका जनार्दनीं प्रेमाचा पुतळा । भरो माझे डोळां सदोदित ॥४॥
२४५९
भोळा देव भोळा देव । उंच नीच नेणें भाव ॥१॥ चोखियाच्या मागें धांवे । शेलें कबिराचे विणावे ॥२॥ खुरपुं लागे सांवत्यासी । उणे येवो नेदी कोणासी ॥३॥ विष पिणेंक धाउनी जाणें । भाविकाची भाजी खाणें ॥४॥ कवण्याची तो आवडी मोठी । एकाजनार्दनीं लाळ घोटी ॥५॥
२४६०
भोळे ते साबडे गोपिका ते भावें । चुंबन बरवें देती तया ॥१॥ यज्ञमुखीं तोंड करी जो वाकुंडें । तो गोपिकांचे रोकडें लोणी खाये ॥२॥ घरां नेऊनियां घालिती भोजन । पंचामृत जाण जेवाविती ॥३॥ एका जनार्दनीं व्यापक तो हरी । गोकुळा माझारीं खेळ खेळे ॥४॥
२४६१
भोळ्या भाविकांसी देख । अवघा एक विठ्ठल ॥१॥ दुजा नाहीं आन कोण्ही । पाहतां तिहीं त्रिभुवनीं ॥२॥ जन्ममरणाचें सांकडें । नाहीं कोडें मुक्तीचें ॥३॥ मोक्ष तो उभा जोडोनी हात । एका जनार्दनीं तिष्ठत ॥४॥
२४६२
भ्रम धरुनियां वायां कासया खेळसी भोवरां । यम मारी कुच्चा फिरशील चौर्‍याशीं घरां ॥१॥ पुढे शुद्धी करीं वाचें स्मरे हरी । वायां भ्रमें फिरशी गरगरां पडसी मायाफेरी ॥२॥ एका वारी एक मारिताती घाय । दया नाही येत कोणाखाली न ठेविती पाय ॥३॥ एका शरण जनार्दनीं तरीच चुके फेरा । नाहींतरी फिरशी गरगरां ॥४॥ मेळवीं संवगंडे खेळतसे बिन्दी । शोभतसे मांदी गोपाळांची ॥१॥ सांवळा सुंदरा वैजयंती हार । चिन्मय परिकर पीतांबर ॥२॥ मुगुट कुंडलें चंदनाचा टिळा । झळके हृदयस्थळां कौस्तुभमणी ॥३॥ एका जनार्दनीं वेधलेसे मन । नाहीं भेद भिन्न गौळनींसी ॥४॥

Labels

Followers