1
ॐ तत्सदिति सूत्राचें सार । कृपेचा सागर पांडुरंग ॥१॥ हरिःॐ सहित उदत अनुदत । प्रचुरीश्वरासहित पांडुरंग ॥२॥ गोब्राम्हणहिता होऊनि निराळे । वेदाचें तें मूळ तुका म्हणे ॥३॥
2
अंगा भरला ताठा । नये वळणी जैसा खुंटा ॥१॥ कैसें न कळे त्या डेंगा । हित आदळलें अंगा ॥ध्रु.॥ जीव जाते वेळे । भरे लकडा ताठी डोळे ॥२॥ मुसळाचें धनु । तुका म्हणे नव्हे अनु ॥३॥
3
अंगीं घेऊनियां वारें दया देती । तया भक्ता हातीं चोट आहे ॥१॥ देव्हारा बैसोनि हालविती सुपें । ऐसीं पापी पापें लिंपताती ॥ध्रु.॥ एकीबेकीन्यायें होतसे प्रचित । तेणें लोक समस्त भुलताती ॥२॥ तयाचे स्वाधीन दैवतें असती । तरी कां मरती त्यांचीं पोरें ॥३॥ तुका म्हणे पाणी अंगारा जयाचा । भक्त कान्होबाचा तो ही नव्हे ॥४॥
4
अंगीं ज्वर तया नावडे साकर । जन तो इतर गोडी जाणे ॥१॥ एकाचिये तोंडीं पडिली ते माती । अवघे ते खाती पोटभरी ॥ध्रु.॥ चारितां बळें येत असे दांतीं । मागोनियां घेती भाग्यवंत ॥२॥ तुका म्हणे नसे संचित हें बरें । तयासि दुसरें काय करी ॥३॥
5
अंगीं देवी खेळे । कां रे तुम्हासी न कळे । कोणाचे हे चाळे । सुख दुःख न मनितां ॥१॥ मीं तों आतां येथें नाहीं । ओळखी वचनाच्या ठायीं । पालटाचा घेई । भाव खरें लोपे ना ॥ध्रु.॥ आपुलाले तुम्ही पुसा । सोवा एव्याच सरिसा । थिरावल्या कैसा काय । जाणों विचार ॥२॥ तुका म्हणे लाभकाळ । तेथें नसावें शीतळ । मग तैशी वेळ । कोठें जाते सांपडों ॥३॥
6
अंगीकार ज्याचा केला नारायणें । निंद्य तें हि तेणें वंद्य केलें ॥१॥ अजामेळ भिल्ली तारीली कुंटणी । प्रत्यक्ष पुराणीं वंद्य केली ॥ध्रु.॥ ब्रम्हहत्याराशी पातकें अपार । वाल्मीक किंकर वंद्य केला ॥२॥ तुका म्हणे येथें भजन प्रमाण । काय थोरपण जाळावें तें ॥३॥
7
अंगें अनुभव जाला मज । संतरजचरणांचा ॥१॥ सुखी जालों या सेवनें । दुःख नेणें यावरी ॥ध्रु.॥ निर्माल्याचें तुळसीदळ । विष्णुजळ चरणींचें ॥२॥ तुका म्हणे भावसार । करूनि फार मिश्रित ॥३॥
8
अंतरली कुटी मेटी । भय धरूनियां पोटीं । म्हणतां जगजेठी । धांवें करुणाउत्तरीं ॥१॥ बाप बळिया शिरोमणी । उतावळि या वचनीं । पडलिया कानीं । धांवा न करी आळस ॥ध्रु.॥ बळ दुनी शरणागता । स्वामी वाहों नेदी चिंता । आइतें चि दाता । पंगतीस बैसवी ॥२॥ वाहे खांदीं पाववी घरा । त्याच्या करी येरझारा । बोबड्या उत्तरा । स्वामी तुकया मानवे ॥३॥
9
अंतराय पडे गोविंदीं अंतर । जो जो घ्यावा भार तो चि बाधी ॥१॥ बैसलिये ठायीं आठवीन पाय । पाहीन तो ठाय तुझा देवा ॥ध्रु.॥ अखंड तें खंडे संकल्पीं विकल्प । मनोजन्य पाप रज्जुसर्प ॥२॥ तुका म्हणे विश्वीं विश्वंभर वसे । राहों ऐसे दशे सुखरूप ॥३॥
10
अंतरींची घेतो गोडी । पाहे जोडी भावाची ॥१॥ देव सोयरा देव सोयरा । देव सोयरा दीनाचा ॥ध्रु.॥ आपुल्या वैभवें । शृंगारावें निर्मळ ॥२॥ तुका म्हणे जेवी सवें । प्रेम द्यावें प्रीतीचें ॥३॥
11
अंतरींची ज्योती प्रकाशली दीप्ति । मुळींची जे होती आच्छादिली ॥१॥ तेथींचा आनंद ब्रम्हांडीं न माये । उपमेशीं काये देऊं सुखा ॥ध्रु.॥ भावाचे मथिलें निर्गुण संचलें । तें हें उभें केलें विटेवरी ॥२॥ तुरा म्हणे आम्हां ब्रम्हांड पंढरी । प्रेमाची जे थोरी सांठवण ॥३॥
12
अंतरींचें गोड । राहें आवडीचें कोड ॥१॥ संघष्टणें येती अंगा । गुणदोष मनभंगा ॥ध्रु.॥ उचिताच्या कळा । नाहीं कळती सकळा ॥२॥ तुका म्हणे अभावना । भावीं मूळ तें पतना ॥३॥
13
अंतरींचें जाणां । तरि कां येऊं दिलें मना ॥१॥ तुमची करावी म्यां सेवा । आतां अव्हेरितां देवा ॥ध्रु.॥ नव्हती मोडामोडी । केली मागें ते चि घडी ॥२॥ तुका म्हणे दिला वाव । पायीं लागों दिला भाव ॥३॥
14
अंतरींचें ध्यान । मुख्य या नांवें पूजन ॥१॥ उपाधि तें अवघें पाप । गोड निरसतां संकल्प ॥ध्रु.॥ आज्ञा पाळावी हा धर्म । जाणते हो जाणा वर्म ॥२॥ तुका म्हणे वृत्ति । अविट हे सहज स्थिति ॥३॥
15
अंतरीचा भाव जाणोनिया गुज । तैसे केले काज पांडुरंगा ॥१॥ घातले वचन न पडेचि खाली । तू आम्हा माउली अनाथांची ॥ध्रु.॥ मज याचकाची पुरवावी आशा । पंढरीनिवासा मायबापा ॥२॥ नाशिली आशंका माझिया जीवाची । उरली भेदाची होती काही ॥३॥ तुका म्हणे आतां केलो मी निर्भर । गाईन अपार गुण तुझे ॥४॥
16
अंधर्याची काठी । हिरोनियां कडा लोटी ॥१॥ हें कां देखण्या उचित । लाभ किंवा कांहीं हित ॥ध्रु.॥ साकर म्हणोनि माती । चाळवूनि द्यावी हातीं ॥२॥ तुका म्हणे वाटे । देवा पसरावे सराटे ॥३॥
17
अंधळें तें सांगे सांगितल्या खुणा । अनुभव देखणा प्रगट त्या ॥१॥ नांदणुक सांगे वडिलाचें बळ । कैसा तो दुर्बळ सुख पावे ॥२॥ तुका म्हणे नांदों आपल्या प्रतापें । तयासी लोकांपें स्तुती सांगों ॥३॥
18
अइकाल परी ऐसें नव्हे बाई । न संडा या सोई भ्रताराची ॥१॥ नव्हे आराणुक लौकिकापासून । आपुल्या आपण गोविलें तें ॥२॥ तुका म्हणे मन कराल कठीण । त्या या निवडोन मजपाशीं ॥३॥
19
अक्षई तें झालें । आतां न मोडे रचिलें ॥१॥ पाया पडिला खोले ठायीं । तेथें पुढें चाली नाहीं ॥ध्रु.॥ होतें विखुरलें । ताळा जमे झडती आलें ॥२॥ तुका म्हणे बोली । पुढें कुंटित चि जाली ॥३॥
20
अक्षरांचा श्रम केला । फळा आला तेणें तो ॥१॥ अवघियाचा तळ धरी । जीवा उरी नुरउनी ॥ध्रु.॥ फळलें तें लवे भारें । पीक खरें आलें तई ॥२॥ तुका म्हणे देवा । पुढें भाव सारावा ॥३॥
21
अखंड तुझी जया प्रीति । मज दे त्यांची संगति । मग मी कमळापति । तुज नानीं कांटाळा ॥१॥ पडोन राहेन ते ठायीं । उगा चि संतांचिये पायीं । न मगें न करीं कांहीं । तुझी आण विठोबा ॥ध्रु.॥ तुम्ही आम्ही पीडों ज्यानें । दोन्ही वारती एकानें । बैसलों धरणें । हाका देत दारेशीं ॥२॥ तुका म्हणे या बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला । न पाहिजे केला । अवघा माझा आव्हेर ॥३॥
22
अखंड मुडतर । सासुरवास करकर ॥१॥ याची जाली बोळवण । आतां न देखों तो शीण ॥ध्रु.॥ बहुतांची दासी । तये घरीं सासुरवासी ॥२॥ तुका म्हणे मुळें । खंड जाला एका वेळें ॥३॥
23
अखंड संत निंदी । ऐसी दुर्जनाची बुद्धि ॥१॥ काय म्हणावें तयासी । तो केवळ पापरासि ॥ध्रु.॥ जो स्मरे रामराम । तयासी म्हणावें रिकामें ॥२॥ जो तीर्थव्रत करी । तयासी म्हणावें भिकारी ॥३॥ तुका म्हणे विंच्वाची नांगी । तैसा दुर्जन सर्वांगीं ॥४॥
24
अगत्य ज्या नरका जाणें । कीर्तनीं तों वीट मानी ॥१॥ नावडेसा जाला बाप । आलें पाप वस्तीसि ॥ध्रु.॥ नारायण नाहीं वाचे । ते यमाचे अंदण ॥२॥ तुका म्हणे अभक्तासी । माता दासी जग झोडी ॥३॥
25
अगा ए सावर्यासगुणा । गुणनिधिनाम नारायणा । आमची परिसा विज्ञापना । सांभाळी दीना आपुलिया ॥१॥ बहु या उदराचे कष्ट । आम्हांसि केलें कर्मभ्रष्ट । तुमची चुकविली वाट । करीं वटवट या निमित्यें ॥ध्रु.॥ जालों पांगिला जनासी । संसाराची आंदणी दासी । न कळे कधीं सोडविसी । दृढपाशीं बहु बांधलों ॥२॥ येथें तों नये आठव कांहीं । विसावा तो क्षण एक नाहीं । पडिलों आणिके प्रवाहीं । हित तों कांहीं दिसे चि ना ॥३॥ जीवित्व वेचलों वियोगें । हिंडतां प्रवास वाउगें । कांहीं व्याधि पीडा रोगें । केलिया भोगें तडातोडी ॥४॥ माझा मीं च जालों शत्रु । कैचा पुत्र दारा कैचा मित्रु । कासया घातला पसरु । अहो जगद्गुरू तुका म्हणे ॥५॥
26
अगा करुणाकरा करितसें धांवा । या मज सोडवा लवकरि ॥१॥ ऐकोनियां माझीं करुणेचीं वचनें । व्हावें नारायणें उतावीळ ॥ध्रु.॥ मागें पुढें अवघा दिसे रिता ठाव । ठेवूनि पायीं भाव वाट पाहें ॥२॥ उशीर तो आतां न पाहिजे केला । अहो जी विठ्ठला मायबापा ॥३॥ उरलें तें एक हें चि मज आतां । अवघें विचारितां शून्य जालें ॥४॥ तुका म्हणे आतां करीं कृपादान । पाउलें समान दावीं डोळां ॥५॥
27
अगा पंढरीच्या राया । वेगीं येई तूं सावया ॥१॥ दीनबंधु तुझें नाम । देई आपुलें आम्हां प्रेम ॥ध्रु.॥ जीवनकळा तूं विश्वाची । तूं चि माउली अनाथाची ॥२॥ तुका म्हणे पुंडलिका । ठेवीं मस्तकीं पादुका ॥३॥
28
अगा ये उदारा अगा विश्वंभरा । रखुमाईंच्या वरा पांडुरंगा ॥१॥ अगा सर्वोत्तमा अगा कृष्णा रामा । अगा मेघश्यामा विश्वजनित्या ॥ध्रु.॥ अगा कृपावंता जीवन तूं दाता । अगा सर्वसत्ता धरितया ॥२॥ अगा सर्वजाणा अगा नारायणा । करुणवचना चित्ती द्यावें ॥३॥ तुका म्हणे नाहीं अधिकार तैसी । सरती पायांपाशीं केली मागें ॥४॥
29
अगा ये मधुसूदना माधवा । अगा ये कमळापती यादवा । अगा श्रीधरा केशवा । अगा बांधवा द्रौपदीच्या ॥१॥ अगा विश्वव्यापका जनार्दना । गोकुळवासी गोपिकारमणा । अगा गुणनिधि गुणनिधाना । अगा मर्दना कंसाचिया ॥ध्रु.॥ अगा सर्वोत्तमा सर्वेश्वरा । गुणातीता विश्वंभरा । अगा निर्गुणा निराकारा । अगा आधारा दीनाचिया ॥२॥ अगा उपमन्यसहाकारा । अगा शयना फणिवरा । अगा काळकृतांत असुरा । अगा अपारा अलक्षा ॥३॥ अगा वैकुंठनिवासा । अगा अयोध्यापति राजहंसा । अगा ये पंढरिनिवासा । अगा सर्वेशा सहजरूपा ॥४॥ अगा परमात्मा परमपुरुषा। अगा अव्यया जगदीशा । अगा कृपाळुवा आपुल्या दासा । तोडीं भवपाशा तुका म्हणे ॥५॥
30
अगा ये वैकुंटनायका । अगा ये त्रैलोक्यतारका । अगा जनार्दना जगव्यापका । अगा पाळका भक्तांचिया ॥१॥ अगा ये वसुदेवदेवकीनंदना । अगा ये गोपिकारमणा । अगा बळिबंध वामना । अगा निधाना गुणनिधी ॥ध्रु.॥ अगा ये द्रौपदीबांधवा । अगा ये सखया पांडवा । अगा जीवाचिये जीवा । अगा माधवा मधुसूदना ॥२॥ अगा महेश्वरा महाराजा । अगा श्रीहरी गरुडध्वजा । अगा सुंदरा सहस्रभुजा । पार मी तुझा काय वणूप ॥३॥ अगा अंबॠषिपरंपरा । निलारंभ निर्विकारा । अगा गोवर्धन धरणीधरा । अगा माहेरा दीनाचिया ॥४॥ अगा धर्मराया धर्मशीळा । कृपासिंधु कृपाळा । अगा प्रेमाचिया कल्लोळा । सकळकळाप्रवीणा ॥५॥ अगा चतुरा सुजाणा । मधुरागिरा सुलक्षणा । अगा उदारा असुरमर्दना । राखें शरणा तुकयाबंधु ॥६॥
31
अगी देखोनियां सती । अंगीं रोमांच उठती ॥१॥ हा तो नव्हे उपदेश । सुख अंतरीं उल्हासे ॥ध्रु.॥ वित्तगोतांकडे । चत्ति न घाली न रडे ॥२॥ आठवूनि एका । उडी घाली म्हणे तुका ॥३॥
32
अगोचरी बोलिलों आज्ञेविण आगळें । परी तें आतां न संडावें राउळें ॥१॥ जाईल रोकडा बोल न पुसती आम्हां । तुझा तुझें म्हणविलें पाहा पुरुषोत्तमा ॥ध्रु.॥ न व्हावा न वजावा न कळतां अन्याय । न धरावें तें मनीं भलता करा उपाय ॥२॥ म्हणे तुकयाबंधु हीन मी म्हणोनि लाजसी । वारा लागों पाहातोहे उंच्या झाडासी ॥३॥
33
अग्न तापलिया काया चि होमे । तापत्रयें संतप्त होती । संचित क्रियमाण प्रारब्ध तेथें । न चुके संसारिस्थति । राहाटघटिका जैसी फिरतां चि राहिली । भरली जाती एके रितीं । साधीं हा प्रपंच पंचाय अग्न । तेणें पावसील निजशांती रे ॥१॥ नारायणनाम नारायणनाम । नित्य करीं काम जिव्हामुखें । जन्मजराव्याधि पापपुण्य तेथें । नासती सकळ ही दुःखें ॥ध्रु.॥ शीत उष्ण वन सेवितां कपाट । आसनसमाधी साधीं । तप तीर्थ दान व्रत आचरण । यज्ञ नाना मन बुद्धी । भोगाभोग तेथें न चुकती प्रकार जन्मजरादुःखव्याधि । साहोनि काम क्रोध अहंकार । आश्रमीं अविनाश साधीं ॥२॥ घोकितां अक्षर अभिमानविधि । निषेध लागला पाठी । वाद करितां निंदा घडती दोष होय वज्रलेपो भविष्यति । दूषणाचें मूळ भूषण तुका म्हणे । सांडीं मिथ्या खंती । रिघोनि संतां शरण सर्वभावें । राहें भलतिया स्थिती ॥३॥
34
अग्नि हा पाचारी कोणासी साक्षेपें । हिंवें तो चि तापे जाणोनियां ॥१॥ उदक म्हणे काय या हो मज प्यावें । तृषित तो धांवे सेवावया ॥ध्रु.॥ काय वस्त्र म्हणे यावो मज नेसा । आपुले स्वइच्छा जग वोढी ॥२॥ तुक्यास्वामी म्हणे काय मज स्मरा । आपुल्या उद्धारा लागूनियां ॥३॥
35
अग्निकुंडामध्यें घातला प्रल्हाद । तरी तो गोविंद विसरेना ॥१॥ पितियासी म्हणे व्यापक श्रीहरि । नांदतो मुरारी सर्वां ठायीं ॥ध्रु.॥ अग्निरूपें माझा सखा नारायण । प्रल्हाद गर्जून हाक मारी ॥२॥ तुका म्हणे अग्नि जाहाला शीतळ । प्रताप सबळ विठो तुझा ॥३॥
36
अग्निमाजी गेलें । अग्नि होऊन तें च ठेलें ॥१॥ काय उरलें तया पण । मागील तें नाम गुण ॥ध्रु.॥ लोह लागेपरिसा अंगीं । तो ही भूषण जाला जगीं ॥२॥ सरिता वोहळा ओघा । गंगे मिळोनि जाल्या गंगा ॥३॥ चंदनाच्या वासें । तरु चंदन जालेस्पर्शे ॥४॥ तुका जडला संतां पायीं । दुजेपणा ठाव नाहीं ॥५॥
37
अग्नीमाजी पडे धातु । लीन होउनि राहे अतु । होय शुद्ध न पवे घातु । पटतंतुप्रमाण ॥१॥ बाह्यरंगाचें कारण । मिथ्या अवघें चि भाषण । गर्व ताठा हें अज्ञान । मरण सवें वाहातसे ॥ध्रु.॥ पुरें मातलिया नदी । लव्हा नांदे जीवनसंधी । वृक्ष उन्मळोनि भेदी । परि तो कधीं भंगेना ॥२॥ हस्ती परदळ तें भंगी । तया पायीं न मरे मुंगी । कोण जाय संगी । पाणोवाणी तयेच्या ॥३॥ पिटितां घणें वरि सैरा । तया पोटीं राहे हिरा । तैशा काय तगती गारा । तया थोरा होऊनि ॥४॥ लीन दीन हें चि सार । भव उतरावया पार । बुडे माथां भार । तुका म्हणें वाहोनि ॥५॥
38
अचळ न चळे ऐसें जालें मन । धरूनि निज खुण राहिलोंसें ॥१॥ आवडी बैसली गुणांची अंतरीं । करूं धणीवरी सेवन तें ॥ध्रु.॥ एकविध भाव नव्हे अभावना । आणिकिया गुणां न मळिवे ॥२॥ तुका म्हणे माझे पडिलें आहारीं । ध्यान विटेवरी ठाकले तें ॥३॥
39
अज्ञान हा देह स्वरूपीं मीनला । सर्व वोसावला देहपात ॥१॥ ज्ञानस्वरूपाची सांगड मिळाली । अंतरीं पाहिली ज्ञानज्योती ॥२॥ तुका म्हणे चत्ति स्वरूपीं राहिलें । देह विसावलें तुझ्या पायीं ॥३॥
40
अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती । तयाचिये मती बोध कैंचा ॥१॥ अज्ञानाची पूजा कामिक भावना । तयाचिया ध्याना देव कैंचा ॥ध्रु.॥ अज्ञानाचें कर्म फळीं ठेवी मन । निष्काम साधन तया कैंचें ॥२॥ अज्ञानाचें ज्ञान विषयावरी ध्यान । ब्रम्ह सनातन तया कैंचें ॥३॥ तुका म्हणे जळो ऐसियांचे तोंड । अज्ञानाचें बंड वाढविती ॥४॥
41
अझुनि कां थीर पोरा न म्हणसी किर । धरुनियां धीर लाजे बुर निघाला ॥१॥ मोकळा होतासि कां रे पडिलासि डाई । वरिलांचा भार आतां उतरेसा नाहीं ॥ध्रु.॥ मेळवूनि मेळा एकाएकीं दिली मिठी । कवळिलें एक बहु बैसविलीं पाठीं ॥२॥ तळील तें वरी वरील तें येतें तळा । न सुटे तोंवरी येथें गुंतलिया खेळा ॥३॥ सांडितां ठाव पुढें सईल धरी हात । चढेल तो पडेल ऐसी ऐका रे मात ॥४॥ तुका म्हणे किती आवरावे हात पाय । न खेळावें तोंच बरें वरी न ये डाय ॥५॥ कोडें - अभंग २
42
अडचणीचें दार । बाहेर माजी पैस फार ॥१॥ काय करावें तें मौन्य । दाही दिशा हिंडे मन ॥ध्रु.॥ बाहेर दावी वेश । माजी वासनेचे लेश ॥२॥ नाहीं इंद्रियां दमन । काय मांडिला दुकान ॥३॥ सारविलें निकें । वरि माजी अवघें फिकें ॥४॥ तुका म्हणे अंतीं । कांहीं न लगे चि हातीं ॥५॥
43
अणुरणीयां थोकडा । तुका आकाशाएवढा ॥१॥ गिळुनि सांडिलें कळिवर । भव भ्रमाचा आकार ॥ध्रु.॥ सांडिली त्रिपुटी । दीप उजळला घटीं ॥२॥ तुका म्हणे आतां । उरलों उपकारापुरता ॥३॥
44
अति जालें उत्तम वेश्येचें लावण्य । परि ते सवासीण न म्हणावी ॥१॥ उचित अनुचित केले ठाया ठाव । गुणां मोल वाव थोरपण ॥ध्रु.॥ शूरत्वावांचूनि शूरांमाजी ठाव । नाहीं आयुर्भाव आणिलिया ॥२॥ तुका म्हणे सोंग पोटाचे उपाय । कारण कमाईंविण नाहीं ॥३॥
45
अतित्याईं देतां जीव । नये कींव देवासि ॥१॥ थोड्यासाटीं राग आला । जीव दिला गंगेंत ॥ध्रु.॥ त्यासि परलोकीं नाहीं मुक्ति । अधोगति चुकेना ॥२॥ तुका म्हणे कृष्णराम । स्मरतां श्रम वारती ॥३॥
46
अतित्याईं बुडे गंगे । पाप लागे त्याचें त्या ॥१॥ हें तों आपुलिया गुणें । असे जेणें योजिलें ॥ध्रु.॥ अवचटें अग्नि जाळी । न सांभाळी दुःख पावे ॥२॥ जैसें तैंसें दावी आरसा । नकट्या कैसा पालटे ॥३॥
47
अतिवाद लावी । एक बोट सोंग दावी ॥१॥ त्याचा बहुरूपी नट । नव्हे वैष्णव तो चाट ॥ध्रु.॥ प्रतिपादी वाळी । एक पुजी एका छळी ॥२॥ तुका म्हणे नाहीं । भूतदया ज्याचे ठायीं ॥३॥
48
अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा । ओळखा जातीचा अंत्यज तो ॥१॥ वेद श्रुति नाहीं ग्रंथ ज्या प्रमाण । श्रेष्ठाचें वचन न मानी जो ॥ध्रु.॥ तुका म्हणे मद्यपानाचें मिष्टान्न । तैसा तो दुर्जन शिवों नये ॥२॥
49
अथॉविण पाठांतर कासया करावें । व्यर्थ चि मरावें घोकूनियां ॥१॥ घोकूनियां काय वेगीं अर्थ पाहे । अर्थरूप राहे होऊनियां ॥२॥ तुका म्हणे ज्याला अथाअ आहे भेटी । नाहीं तरी गोष्टी बोलों नका ॥३॥
50
अद्वय चि द्वय जालें चि कारण । धरिलें नारायणें भक्तिसुख ॥१॥ अपरोक्ष आकार जाला चतुर्भुज । एकतत्व बीज भिन्न नाहीं ॥ध्रु.॥ शून्य निरशुन्यी राहिलें निर्मळ । तें दिसे केवळ इटेवरी ॥२॥ सुखें घ्यावें नाम वदना ही चाड । सरिता वापी आड एक पाणी ॥३॥ तुका म्हणे मी च आहें तेणें सुखें । भेद नाहीं मुखें नाम गातों ॥४॥
51
अद्वैतीं तों माझें नाहीं समाधान । गोड हे चरण सेवा तुझी ॥१॥ करूनी उचित देई हें चि दान । आवडे कीर्तन नाम तुझें ॥ध्रु.॥ देवभक्तपण सुखाचा सोहळा । ठेवुनी निराळा दावी मज ॥२॥ तुका म्हणे आहे तुझें हें सकळ । कोणी एके काळें देई मज ॥३॥
52
अधमाची यारी । रंग पतंगाचे परी ॥१॥ विटे न लगतां क्षण । मोल जाय वांयां विण ॥ध्रु.॥ सर्पाचिया परी । विषें भरला कल्हारीं ॥२॥ तुका म्हणे देवा । मज झणी ऐसे दावा ॥३॥
53
अधमाचें चत्ति अहंकारीं मन । उपदेश शीण तया केला ॥१॥ पापियाचें मन न करी आचार । विधवे शृंगार व्यर्थ केला ॥ध्रु.॥ अधमाचें चत्ति दुश्चित्त ऐकेना । वांयां सीण मना करूं काय ॥२॥ गर्धबासी दिली चंदनाची उटी । केशर लल्हाटीं शुकराच्या॥३॥ पतिवंचकेसी सांगतां उदंड । परि तें पाषांड तिचे मनीं ॥४॥ तुका म्हणे तैसें अभावीं सांगतां । वाउगा चि चित्ति सीण होय ॥५॥
54
अधिक कोंडितां चरफडी । भलतीकडे घाली उडी ॥१॥ काय करूं या मना आतां । का विसरातें पंढरिनाथा । करी संसाराची चिंता । वेळोवेळां मागुती ॥ध्रु.॥ भजन नावडे श्रवण । धांवे विषय अवलोकून ॥२॥ बहुत चंचळ चपळ । जातां येतां न लगे वेळ ॥३॥ किती राखों दोनी काळ । निजलिया जागे वेळे ॥४॥ मज राखें आतां । तुका म्हणे पंढरिनाथा ॥५॥
55
अधिकाचा मज कांटाळा । तुम्हां गोपाळां संगति ॥१॥ काय नाहीं तुम्हापाशीं । सकळांविशीं संपन्न ॥ध्रु.॥ उद्योगाचा नेघें भार । लागल्या सार पुरतें ॥२॥ तुका म्हणे अधीर जिणें । नारायणें न करावें ॥३॥
56
अधिकार तैसा करूं उपदेश । साहे ओझें त्यास तें चि द्यावें ॥१॥ मुंगीवर भार गजाचें पालाण । घालितां तें कोण कार्यसिद्धी ॥२॥ तुका म्हणे फांसे वाघुरा कुर्हाडी । प्रसंगी तों काढी पारधी तो ॥३॥
57
अधिकार तैसा दावियेले मार्ग । चालतां हें मग कळों येतें ॥१॥ जाळूं नये नाव पावलेनि पार । मागील आधार बहुतांचा ॥२॥ तुका म्हणे रोग वैदाचे अंगीं । नाहीं करी जगीं उपकार ॥३॥
58
अधीरा माझ्या मना ऐक एकी मात । तूं कां रे दुश्चित निरंतर ॥१॥ हे चि चिंता काय खावें म्हणऊनि । भले तुजहूनि पक्षिराज ॥ध्रु.॥ पाहा ते चातक नेघे भूमिजळा । वरुषे उन्हाळा मेघ तया ॥२॥ सकळयातींमध्यें ठक हा सोनार । त्याघरीं व्यापार झारियाचा ॥३॥ तुका म्हणे जळीं वनीं जीव एक । तयापाशीं लेख काय असे ॥४॥
59
अनंत जुगाचा देव्हारा । निजबोधांचा घुमारा । अवचिता भरला वारा । या मल्लारी देवाचा ॥१॥ शुद्धसत्वाचा कवडा मोठा । बोधबिरडें बांधला गांठा । गळां वैराग्याचा पट्टा । वाटा दावूं या भक्तिच्या ॥२॥ हृदय कोटंबा सांगातें । घोळ वाजवूं अनुहातें । ज्ञानभांडाराचें पोतें । रितें नव्हे कल्पांतीं ॥३॥ लक्ष चौर्यांशी घरें चारी । या जन्माची केली वारी । प्रसन्न जाला देव मल्लारी । सोहंभावीं राहिलों ॥४॥ या देवाचें भरतां वारें । अंगीं प्रेमाचें फेंपरें। गुरुगुरु करी वेडे चारें । पाहा तुकें भुंकविलें ॥५॥ लळित - अभंग ११
60
अनंत ब्रम्हांडे उदरीं । हरि हा बाळक नंदा घरीं ॥१॥ नवल केव्हडें केव्हडें । न कळे कान्होबाचें कोडें ॥ध्रु.॥ पृथ्वी जेणें तृप्त केली । त्यासि यशोदा भोजन घाली ॥२॥ विश्वव्यापक कमळापती । त्यासि गौळणी कडिये घेती ॥३॥ तुका म्हणे नटधारी । भोग भोगून ब्रम्हचारी ॥४॥
61
अनंत ब्रम्हांडें । एके रोमीं ऐसें धेंडें ॥१॥ तो या गौळियांचे घरीं । उंबरा चढतां टेंका धरी ॥ध्रु.॥ मारी दैत्य गाडे । ज्यांचे पुराणीं पवाडे ॥२॥ तुका म्हणे कळा । अंगीं जयाच्या सकळा ॥३॥
62
अनंत लक्षणें वाणितां अपार । संताचें तें घर सांपडेना ॥१॥ जये घरीं संत राहती आपण । तें तुम्हां ठिकाण आतुडेना ॥ध्रु.॥ ठिकाण धरूनी पाहवे ते संत । उगा च अकांत करूं नये ॥२॥ संत होऊनियां संतांसी पाहावें । तरि च तरावें तुका म्हणे ॥३॥
63
अनंतजन्में जरी केल्या तपरासी । तरी हा न पवे म्हणे देह ॥१॥ ऐसें जें निधान लागलेंसे हातीं । त्याची केली माती भाग्यहीना ॥ध्रु.॥ उत्तमाचें सार वेदाचें भांडार । ज्याच्यानें पवित्र तीथॉ होती ॥२॥ तुका म्हणे तुकयाबंधु आणीक उपमा । नाहीं या तों जन्मा द्यावयासी ॥३॥
64
अनंतां जीवांचीं तोडिलीं बंधनें । मज हि येणें काळें कृपा कीजे ॥१॥ अनंत पवाडे तुझे विश्वंभरा । भक्तकरुणाकरा नारायणा ॥ध्रु.॥ अंतरींचें कळों देई गुह्य गुज । अंतरीं तें बीज राखईंन ॥२॥ समदृष्टी तुझे पाहेन पाउलें । धरीन संचले हृदयांत ॥३॥ तेणें या चित्ताची राहेल तळमळ । होतील शीतळ सकळ गात्रें ॥४॥ तुका म्हणे शांति करील प्रवेश । मग नव्हे नाश अखंड तो ॥५॥
65
अनंताचे मुखीं होसील गाइला । अमुप विठ्ठला दास तुम्हां ॥१॥ माझें कोठें आलें होईंल विचारा । तरीं च अव्हेरा योग्य जालों ॥ध्रु.॥ सर्वकाळ तुम्ही असा जी संपन्न । चतुरा नारायण शिरोमणि ॥२॥ तुका म्हणे ऐसे कलियुगींचे जीव । तरी नये कीव बहुपापी ॥३॥
66
अनंताच्या ऐकों कीर्ती । ज्याच्या चित्तीं हरिनाम । उलंघूनि गेले सिंधु । हा भवबंधु तोडोनियां ॥१॥ आतां हळुहळु ते चि वाहीं । चालों कांही अधिकारें ॥ध्रु.॥ खुंटूनियां गेले नावा । नाहीं हेवा खोळंबला । न लगे मोल द्यावा रुका । भावें एका कारणें ॥२॥ तुका म्हणे पाहतों वाट । उभा नीट पाउलीं । भीमातिरीं थडवा केला । उठा चला लवलाहें ॥३॥
67
अनन्यासी ठाव एक सर्वकाजें । एकाविण दुजें नेणे चित्ती ॥१॥ न पुरतां आळी देशधडी व्हावें । हें काय बरवें दिसतसे ॥ध्रु.॥ लेंकराचा भार माउलीचे शिरीं । निढळ तें दुरी धरिलिया ॥२॥ तुका म्हणे किती घातली लांबणी । समर्थ होउनि केवढ्यासाटीं ॥३॥
68
अनाथ परदेशी हीन दीन भोळें । उगलें चि लोळे तुझे रंगीं ॥१॥ आपुलें म्हणावें मज नुपेक्षावें । प्रेमसुख द्यावें मायबापा ॥ध्रु.॥ कासवीचे परि दृष्टी पाहें मज । विज्ञानीं उमज दावुनियां ॥२॥ तुका म्हणे तुझा जालों शरणागत । काया वाचा चित्त दुजें नाहीं ॥३॥
69
अनाथां जीवन । आम्हां तुमचे चरण । करूनि सांटवण। धरीयेले हृदयीं ॥१॥ पुष्ट जाली अंगकांति । आनंद न समाये चित्तीं । कवतुकें प्रीती । गाऊं नाचों उल्हासें ॥ध्रु.॥ करुणाउत्तरीं । करून आळवण हरी । जाऊं नेदूं दुरी । प्रेमप्रीतिपडिभरें ॥२॥ मोहो माते करी गोवा । ऐसें आहे जी केशवा । तुका म्हणे सेवा । आणीक नाहीं जाणत ॥३॥
70
अनाथांची तुम्हां दया । पंढरीराया येतसे ॥१॥ ऐसी ऐकोनियां कीर्ति । बहु विश्रांति पावलों ॥ध्रु.॥ अनाथांच्या धांवा घरा । नामें करा कुडावा ॥२॥ तुका म्हणे सवघड हित । ठेवूं चित्त पायांपें ॥३॥
71
अनाथाचा नाथ पतितपावन । दीनाचें रक्षण करीतसे ॥१॥ ऐसें जाणोनियां नामीं विश्वासलों । भीमातिरा आलों धांवत चि ॥ध्रु.॥ स्नान हें करितां त्रिताप निवाले । महाद्वारा आलें मन माझें ॥२॥ तेथें अनुमात्र रीग नव्हे याचा । परतलों साचा तेथूनियां ॥३॥ पुंडलिकापाशीं येऊनि पुसिलें । चिन्मय दाटलें जनार्दन ॥४॥ तुका म्हणे आतां दुजा देव नाहीं । बाप तरी आईं तो चि विठो ॥५॥
72
अनाथाचा सखा ऐकिला प्रताप । होसि कृपावंत मजवरि ॥१॥ माझिया गा चित्ति करिं शिकवण । जेणें तुझे चरण जोडतील ॥ध्रु.॥ जोडोनियां कर येतों काकुलती । रकुमाईंच्या पति कृपावंता ॥२॥ हरुषें निर्भर करीं माझें मन । दाखवीं चरण पांडुरंगा ॥३॥ तुझे भेटीविण जन्म गेलां वांयां । भजन कराया शक्ति नाहीं ॥४॥ न घडे तुझी सेवा न घडे पूजन । जन्मोनि निष्कारण जाऊं पाहे ॥५॥ तुका म्हणे हरि करावें या काय । भजनासि साहए होई बापा ॥६॥
73
अनुतापयुक्त गेलिया अभिमान । विसरूं वचन मागिलांचा ॥१॥ त्याचे पाय माझे लागोत कपाळीं । भोग उष्टावळी धन्यकाळ ॥ध्रु.॥ षड उर्मी जिंहीं हाणितल्या लाता । शरण या संता आल्या वेगीं ॥२॥ तुका म्हणे जाती वोळे लवकरी । ठायीं चि अंतरीं शुद्ध होती ॥३॥
74
अनुतापें दोष । जाय न लगतां निमिष ॥१॥ परि तो राहे विसावला । आदीं अवसानीं भला ॥ध्रु.॥ हें चि प्रायिश्चत । अनुतापीं न्हाय चित्त ॥२॥ तुका म्हणे पापा । शिवों नये अनुतापा ॥३॥
75
अनुभव ऐसा । मज लागला सरिसा ॥१॥ पाठी बैसली सेजारीं । नव्हे शांत कोणे परी ॥ध्रु.॥ कोठें न लगे जावें । कांहीं घालावया ठावें ॥२॥ तुका म्हणे कोटि । दुःखाच्या च तये पोटीं ॥३॥
76
अनुभव तो नाहीं अमुचिया दरषणें । अइकिलें कानें वदे वाणी । जेविल्याचा कैसा अनुभव अंतरीं । म्हणतां मांडे पुरी काय होतें ॥१॥ नाहींनाहीं गेली तळमळ दातारा । कां जी हरिहरा चाळविलें ॥ध्रु.॥ पत्रीं कुशळता भेटी अनादर । काय तें उत्तर येइल मानूं । अंतरीं सबाह्यी कां नाहीं सारिखें । धरूनि पारिखें वर्त्ततसां ॥२॥ आलों आलों ऐसी दाऊनियां आस । वाहों बुडतयास काय द्यावें । तुका म्हणे अहो चतुरा शिरोमणि । किती माझी वाणी तुम्ही कोठें ॥३॥
77
अनुभवा आलें । माझें चित्तींचें क्षरलें ॥१॥ असे जवळी अंतर । फिरे आवडीच्या फेरें ॥ध्रु.॥ खादलें चि वाटे । खावें भेटलें चि भेटे ॥२॥ तुका म्हणे उभें । आम्ही राखियेलें लोभें ॥३॥
78
अनुभवाचे रस देऊं आर्त्तभूतां । सोडूं चोजवितां पुढें पोतीं ॥१॥ देवाचा प्रसाद रत्नाच्या ओवणी । शोभतील गुणीं आपुलिया ॥ध्रु.॥ आधीं भाव सार शुद्ध ते भूमिका । बीज आणि पिका चिंता नाहीं ॥२॥ तुका म्हणे ज्याचें नाम गुणवंत । तें नाहीं लागत पसरावें ॥३॥
79
अनुभवावांचून सोंग संपादणें । नव्हे हें करणें स्वहिताचें ॥१॥ तैसा नको भुलों बाहिरल्या रंगें । हित तें चि वेगें करूनि घेई ॥ध्रु.॥ बहुरूपी रूपें नटला नारायण । सोंग संपादून जैसा तैसा ॥२॥ पाषाणाचें नाव ठेविलें देव । आणिका तारी भाव परि तो तैसा ॥३॥ कनक झाड म्ह वंदिलें माथां । परिं तें अर्था न मिळे माजी ॥४॥ तुका म्हणे त्याचा भाव तारी त्यास । अहंभावीं नास तो चि पावे ॥५॥
80
अनुभवें अनुभव अवघा चि साधिला । तरि स्थिरावला मनु ठायीं ॥१॥ पिटूनियां मुसे आला अळंकार । दग्ध तें असार होऊनियां ॥ध्रु.॥ एक चि उरलें कायावाचामना । आनंद भुवनामाजी त्रयीं ॥२॥ तुका म्हणे आम्ही जिंकिला संसार । होऊनि किंकर विठोबाचे ॥३॥
81
अनुभवें आलें अंगा । तें या जगा देतसें ॥१॥ नव्हती हाततुके बोल । मूळ ओल अंतरिंची ॥ध्रु.॥ उतरूनि दिलें कशीं । शुद्धरसीं सरे तें ॥२॥ तुका म्हणे दुसरें नाहीं । ऐसी ग्वाही गुजरली ॥३॥
82
अनुभवें कळों येतें पांडुरंगा । रुसावें तें कां गा तुम्हांवरी ॥१॥ आवरितां चत्ति नावरे दुर्जन । घात करी मन माझें मज ॥ध्रु.॥ अंतरीं संसार भक्ति बाह्यात्कार । म्हणोनि अंतर तुझ्या पायीं ॥२॥ तुका म्हणे काय करूं नेणें वर्म । आलें तैसें कर्म सोसूं पुढें ॥३॥
83
अनुभवें वदे वाणी । अंतर ध्यानीं आपुलें ॥१॥ कैंची चिका दुधचवी । जरी दावी पांढरें ॥ध्रु.॥ जातीऐसा दावी रंग । बहु जग या नावें ॥२॥ तुका म्हणे खद्योत ते । ढुंगाभोंवतें आपुलिया ॥३॥
84
अनुसरे तो अमर जाला । अंतरला संसारा ॥१॥ न देखती गर्भवास । कधीं दास विष्णूचे ॥ध्रु.॥ विसंभेना माता बाळा । तैसा लळा पाळावा ॥२॥ त्रिभुवनीं ज्याची सत्ता । तुक्या रक्षिता तो जाला ॥३॥
85
अनुसरे त्यासी फिरों नेदी मागें । राहें समागमें अंगसंगें ॥१॥ अंगसंगें असे कर्मसाक्ष देव । जैसा ज्याचा भाव तैसा राहे ॥२॥ फळपाकीं देव देतील प्राणीयें । तुका म्हणे नये सवें कांहीं ॥३॥
86
अनुहात ध्वनि वाहे सकळां पिंडीं । राम नाहीं तोंडीं कैसा तरे ॥१॥ सकळां जीवांमाजी देव आहे खरा । देखिल्या दुसरा विण न तरे ॥ध्रु.॥ ज्ञान सकळांमाजी आहे हें साच । भक्तीविण तें च ब्रम्ह नव्हे ॥२॥ काय मुद्रा कळल्या कराव्या सांगतां । दीप न लगतां उन्मनीचा ॥३॥ तुका म्हणे नका पिंडाचें पाळण । स्थापू नारायण आतुडेना ॥४॥
87
अनेक दोषांचे काट । जे जे गादले निघोंट । होती हरिनामें चोखट । क्षण एक न लगतां ॥१॥ तुम्ही हरि म्हणा हरि म्हणा । महादोषांचे छेदना ॥ध्रु.॥ अतिप्रीतीचा बांधला । नष्ट चांडाळीं रतला । क्षण न लगतां नेला । वैकुंठासी हरि म्हणतां ॥२॥ अमित्य दोषाचें मूळ । जालें वाल्मीकास सबळ । जाला हरिनामें निर्मळ । गंगाजळ पैं जैसा ॥३॥ हरि म्हणतां तरले । महादोषी गणिके नेलें । कुंटणी भिली उद्धरिलें । वैकुंठासी हरि म्हणतां ॥४॥ हरिविण जन्म नको वांयां । जैसी दर्पणींची छाया । म्हणोनि तुका लागे पायां । शरण तया हरीसी ॥५॥
88
अन्नाच्या परिमळें जरि जाय भूक । तरि कां हे पाक घरोघरीं ॥१॥ आपुलालें तुम्ही करा रे स्वहित । वाचे स्मरा नित्य राम राम ॥ध्रु.॥ देखोनि जीवन जरि जाय तान । तरि कां सांटवण घरोघरीं ॥२॥ देखोनियां छाया सुख न पवीजे । जंव न बैसीजे तया तळीं ॥३ ॥ हित तरी होय गातां अईकतां । जरि राहे चित्ता दृढ भाव ॥४॥ तुका म्हणे होसी भावें चि तूं मुक्त । काय करिसी युक्त जाणिवेची॥५॥
89
अन्यायासी राजा जरि न करितां दंड । बहुचक ते लंड पीडिती जना ॥१॥ ने करी निगा कुणबी न काढितां तण । कैंचे येती कण हातासी ते ॥२॥ तुका म्हणे संतां करूं नये अनुचित । पाप नाहीं नीत विचारिता ॥३॥
90
अपराध जाले जरी असंख्यात । तरी कृपावंत नाम तुझें ॥१॥ तुझें लडिवाळ तुज कृपा यावी । म्यां वाट पाहावी कवणाची ॥ध्रु.॥ मायबाप माझा रुक्मादेवीवर । हा दृढ निर्धार अंतरींचा ॥२॥ तुका म्हणे कोणे गोष्टीचें संकष्ट । न घालीं मज भेट नारायणा ॥३॥
91
अपराधी म्हणोनि येतों काकुलती । नाहीं तरी होती काय चाड ॥१॥ येइल तारूं तरी तारा जी देवा । नाहीं तरी सेवा घ्या वो भार ॥ध्रु.॥ कासया मी आतां वंचूं हे शरीर । आहें बारगीर जाई जनें ॥२॥ तुका म्हणे मन करूनि मोकळें । आहें साळेंढाळें उदार मी ॥३॥
92
अभक्त ब्राम्हण जळो त्याचें तोंड । काय त्यासी रांड प्रसवली ॥१॥ वैष्णव चांभार धन्य त्याची माता । शुद्ध उभयतां कुळ याती ॥ध्रु.॥ ऐसा हा निवाडा जालासे पुराणीं । नव्हे माझी वाणी पदरींची ॥२॥ तुका म्हणे आगी लागो थोरपणा । दृष्टी त्या दुर्जना न पडो माझी ॥३॥ नामदेव व पांडुरंग यांनी स्वप्नांत येऊन स्वामींस आज्ञा केली कीं कवित्व करणें - ते अभंग ॥२॥
93
अभक्ताचे गांवीं साधु म्हणजे काय । व्याघ्रें वाडां गाय सांपडली ॥१॥ कसाबाचे आळी मांडिलें प्रमाण । बस्वणाची आण तया काईं ॥ध्रु.॥ केळी आणि बोरी वसती सेजारी । संवाद कोणे परी घडे येथें ॥२॥ तुका म्हणे खीर केली का†हेळ्याची । शुद्ध गोडी कैची वसे तेथें ॥३॥
94
अभय उत्तर संतीं केलें दान । जालें समाधान चित्त तेणें ॥१॥ आतां प्रेमरसें न घडे खंडण । द्यावें कृपादान नारायणा ॥ध्रु.॥ आलें जें उचित देहविभागासी । तेणें पायांपासीं उभी असों ॥२॥ तुका म्हणे करी पूजन वैखरी । बोबडा उत्तरीं गातों गीत ॥३॥
95
अभयदान मज देई गा उदारा । कृपेच्या सागरा पांडुरंगा ॥१॥ देहभाव तुझ्या ठेवियेला पायीं । आणीक मी कांही नेणें दुजें ॥ध्रु.॥ सेवा भक्ति भाव नेणें मी पतित । आतां माझें हित तुझ्या पायीं ॥२॥ अवघा निरोपिला तुज देहभाव । आतां मज पाव पांडुरंगा ॥३॥ तुका म्हणे तुजें नाम दिनानाथ । तें मज उचित करीं आतां ॥४॥
96
अभयाचें स्थळ । तें हें एक अचळ ॥१॥ तरि धरिला विश्वास । ठेलों होउनियां दास ॥ध्रु.॥ पुरली आवडी । पायीं लागलीसे गोडी ॥२॥ तुका म्हणे कंठीं नाम । अंगीं भरलें सप्रेम ॥३॥
97
अभिन्नव सुख तरि या विचारें । विचारावें बरें संतजनीं ॥१॥ रूपाच्या आठवें दोन्ही ही आपण । वियोगें तो क्षीण होत नाहीं ॥ध्रु.॥ पूजा तरि चित्तें कल्पा तें ब्रम्हांड । आहाच तो खंड एकदेसी ॥२॥ तुका म्हणे माझा अनुभव यापरि । डोईं पायांवरि ठेवीतसें ॥३॥
98
अभिमानाची स्वामिनी शांति । महत्व घेती सकळ ॥१॥ कळोनि ही न कळे वर्म । तरि श्रम पावती ॥ध्रु.॥ सर्व सत्ता करितां धीर । वीर्यां वीर आगळा ॥२॥ तुका म्हणे तिखट तिखें । मृदसखें आवडी ॥३॥
99
अभिमानाचें तोंड काळें । दावी बळें अंधार ॥१॥ लाभ न्यावा हातोहातीं । तोंडी माती पाडोनि ॥ध्रु.॥ लागलीसे पाठी लाज । जालें काज नासाया ॥२॥ तुका म्हणे कुश्चळ मनीं । विटंबनीं पडिलीं तीं ॥३॥
100
अभिमानी पांडुरंग । गोवा काशाचा हो मग ॥१॥ अनुसरा लवलाहीं । नका विचार करूं कांहीं ॥ध्रु.॥ कोठें राहतील पापें । जालिया हो अनुतापें ॥२॥ तुका म्हणे ये चि घडी । उभ्या पाववील थडी ॥३॥
101
अमंगळ वाणी । नये ऐकों ते कानीं ॥१॥ जो हे दूषी हरिची कथा । त्यासि क्षयरोगव्यथा ॥ध्रु.॥ याति वर्ण श्रेष्ठ । परि तो चांडाळ पापिष्ठ ॥२॥ तुका म्हणे पाप । माय नावडे ज्या बाप ॥३॥
102
अमच्या कपाळें तुज ऐसी बुद्धि । धरावी ते शुद्धी योगा नये ॥१॥ काय या राहिलें विनोदावांचून । आपुलिया भिन्न केलें आम्हां ॥ध्रु.॥ कोठें मूर्तिमंत दावीं पुण्यपाप । काशासी संकल्प वाहाविसी ॥२॥ तुका म्हणे आतां आवरावा चेडा । लटिकी च पीडा पांडुरंगा ॥३॥
103
अमर आहां अमर आहां । खरें कीं पाहा खोटें हें ॥१॥ न म्हणां देह माझा ऐसा । मग भरवसा कळेल ॥ध्रु.॥ कैंचा धाक कैंचा धाक । सकिळक हें आपुलें ॥२॥ देव चि बरे देव चि बरे । तुका म्हणे खरे तुम्ही ॥३॥
104
अमर तूं खरा । नव्हे कैसा मी दातारा ॥१॥ चाल जाऊं संतांपुढें । वाद सांगेन निवाडें ॥ध्रु.॥ तुज नांव जर नाहीं । तर माझें दाव काईं ॥२॥ तुज रूप नाहीं । तर माझें दाव काईं ॥३॥ खळसी तूं लीळा । तेथें मी काय वेगळा ॥४॥ साच तूं लटिका । तैसा मी ही म्हणे तुका ॥५॥
105
अमृत अव्हेरें उचळलें जातां । विष आर्त्तभूतां आवश्यक ॥१॥ आदरासी मोल नये लावूं केजें । धीर शुद्धबीजें गोमटा तो ॥ध्रु.॥ खर्याचिये अंगीं आपणे चाली । लावणी लाविली काय लागे ॥२॥ तुका म्हणे चाडे करा वेवसाव । आम्हांसी तो वाव धीर आहे ॥३॥
106
अमृताचीं फळें अमृताची वेली । ते चि पुढें चाली बीजाची ही ॥१॥ ऐसियांचा संग देई नारायणा । बोलावा वचना जयांचिया ॥ध्रु.॥ उत्तम सेवन सितळ कंठासी । पुष्टी कांती तैसी दिसे वरी ॥२॥ तुका म्हणे तैसें होइजेत संगें । वास लागे अंगें चंदनाच्या ॥३॥
107
अरे कृष्णा आम्ही तुझे निज गडी । नवनीत आवडी देत होतों ॥१॥ अरे कृष्णा आतां राखेंराखें कैसें तरीं । संकटाभीतरीं पडियेलों ॥ध्रु.॥ वरुषला इंद्र जेव्हां शिळाधारीं । गोवर्धन गिरी उचलिला ॥२॥ तुका म्हणे तुझे पवाडे गोपाळ । वर्णिती सकळ नारायणा ॥३॥
108
अरे कृष्णा तुवां काळया नाथिला । दाढे रगडिला रिठासुर ॥१॥ अरे कृष्णा तुवां पुतना शोषिली । दुर्बुद्धि कळली अंतरींची ॥ध्रु.॥ गोपाळ करुणा ऐसी नानापरी । भाकिती श्रीहरी तुजपुढें ॥२॥ तुझें नाम कामधेनु करुणेची । तुका म्हणे त्यांची आली कृपा ॥३॥
109
अरे गिळिले हो संसारें । कांहीं तरि राखा खरें । दिला करुणाकरें । मनुष्यदेह सत्संग ॥१॥ येथें न घलीं न घलीं आड । संचितसा शब्द नाड । उठाउठीं गोड । बीजें बीज वाढवा ॥ध्रु.॥ केलें ते क्रियमाण । जालें तें संचित म्हण । प्रारब्ध जाण । उरवरित उरले तें ॥२॥ चित्त खोटें चालीवरि । रोग भोगाचे अंतरीं । रसने अनावरी । तुका म्हणे ढुंग वाहे ॥३॥
110
अरे हें देह व्यर्थ जावें । ऐसें जरी तुज व्हावें । द्यूतकर्म मनोभावें । सारीपाट खेळावा ॥१॥ मग कैचें हरिचें नाम । निजेलिया जागा राम । जन्मोजन्मींचा अधम । दुःख थोर साधिलें ॥ध्रु.॥ विषयसुखाचा लंपट । दासीगमनीं अतिधीट । तया तेचि वाट । अधोगती जावया ॥२॥ अणीक एक कोड । नरका जावयाची चाड । तरी संतनिंदा गोड । करीं कवतुकें सदा ॥३॥ तुका म्हणे ऐसें । मना लावी राम पिसें । नाहीं तरी आलिया सायासें । फुकट जासी ठकोनी ॥४॥
111
अर्भकाचे साटीं । पंतें हातीं धरिली पाटी ॥१॥ तैसे संत जगीं । क्रिया करुनी दाविती अंगीं ॥ध्रु.॥ बालकाचे चाली । माता जाणुनि पाउल घाली ॥२॥ तुका म्हणे नाव । जनासाटीं उदकीं ठाव ॥३॥
112
अल्प भाव अल्प मती । अल्प आयुष्य नाहीं हातीं । अपराधाची वोळिलों मूर्ती । अहो वेदमूर्ती परियेसा ॥१॥ किती दोषा देऊं परिहार । गुणदोषें मळिलें अंतर । आदि वर्तमान भविष्याकार । गेला अंतपार ऐसें नाहीं ॥ध्रु.॥ विविध कर्म चौर्यांशी फेरा । त्रिविध भोग या शरीरा । कर्मकोठार पांजरा । जन्मजरामरणसांटवण ॥२॥ जीवा नाहीं कुडीचें लाहातें । यें भिन्न पंच भूतें । रचतें खचतें संचितें । असार रितें फलकट ॥३॥ पुत्र पत्नी सहोदर । मायबाप गोताचा पसर । मळितां काष्ठें लोटतां पूर । आदळीं दूर होती खलाळीं ॥४॥ म्हणोनि नासावें अज्ञान । इतुलें करीं कृपादान । कृपाळु तूं जनार्दन । धरूनि चरण तुका विनवी ॥५॥
113
अल्प माझी मती । म्हणोनि येतों काकुलती ॥१॥ आतां दाखवा दाखवा । मज पाउलें केशवा ॥ध्रु.॥ धीर माझ्या मना । नाहीं नाहीं नारायणा ॥२॥ तुका म्हणे दया । मज करा अभागिया ॥३॥
114
अल्प विद्या परि गर्वशिरोमणि । मजहुनि ज्ञानी कोणी आहे ॥१॥ अंगीं भरे ताठा कोणासी मानीना । साधूची हेळणा स्वयें करी ॥ध्रु.॥ सज्जनाच्या देहीं मानी जो विटाळ । त्रैलोकीं चांडाळ तो चि एक ॥२॥ संतांची जो निंदा करी मुखीं जप । खतेलें तें पाप वज्रलेप ॥३॥ तुका म्हणे ऐसे मावेचे मइंद । त्यांपाशीं गोविंद नाहीं नाहीं ॥४॥
115
अल्ला करे सो होय बाबा करतारका सिरताज । गाउ बछरे तिस चलावे यारी बाघो न सात ॥१॥ ख्याल मेरा साहेबका । बाबा हुवा करतार । व्हांटें आघे चढे पीठ । आपे हुवा असुवार ॥२॥ जिकिर करो अल्लाकी बाबा सबल्यां अंदर भेस । कहे तुका जो नर बुझे सो हि भया दरवेस ॥३॥ वैद्यगोळी - अभंग १
116
अल्ला देवे अल्ला दिलावे अल्ला दारु अल्ला खलावे । अल्ला बगर नही कोये अल्ला करे सो हि होये ॥१॥ मर्द होये वो खडा फीर नामर्दकुं नहीं धीर । आपने दिलकुं करना खुसी तीन दामकी क्या खुमासी ॥ध्रु.॥ सब रसोंका किया मार । भजनगोली एक हि सार । इमान तो सब ही सखा । थोडी तो भी लेकर ज्या ॥२॥ जिन्हो पास नीत सोये । वो हि बसकर तिरोवे । सांतो पांचो मार चलावे । उतार सो पीछे खावे ॥३॥ सब ज्वानी निकल जावे । पीछे गधडा मटी खावे । गांवढाळ सो क्या लेवे । हगवनि भरी नहि धोवे ॥४॥ मेरी दारु जिन्हें खाया । दिदार दरगां सो हि पाया । तल्हे मुंढी घाल जावे । बिगारी सोवे क्या लेवे ॥५॥ बजारका बुझे भाव । वो हि पुसता आवे ठाव । फुकट बाटु कहे तुका । लेवे सोहि लें हिसखा ॥६॥ गोंधळ - अभंग ३
117
अवगुण तों कोणीं नाहीं प्रतिष्ठिले । मागें होत आले शिष्टाचार ॥१॥ दुर्बळाच्या नांवें पिटावा डांगोरा । हा तों नव्हे बरा सत्यवाद ॥ध्रु.॥ मद्य आणि मधु एकरासी नांवें । तरि कां तें खावें आधारें त्या ॥२॥ तुका म्हणे माझा उच्छिष्ट प्रसाद । निवडी भेदाभेद वृष्टीन्यायें ॥३॥
118
अवगुणांचे हातीं । आहे अवघी फजीती ॥१॥ नाहीं पात्रासवें चाड । प्रमाण तें फिकें गोड ॥ध्रु.॥ विष तांब्या वाटी । भरली लावूं नये होटीं ॥२॥ तुका म्हणे भाव । शुद्ध बरा सोंग वाव ॥३॥
119
अवघा च अन्यायी । तेथें एकल्याचें काईं ॥१॥ आतां अवघें एकवेळें । जळोनि सरो तें निराळें ॥ध्रु.॥ काय माझें खरें । एवढें च राखों बरें ॥२॥ तुका म्हणे आतां । परिहार न लगे चित्ता ॥३॥
120
अवघा चि आकार ग्रासियेला काळें । एक चि निराळें हरिचें नाम ॥१॥ धरूनि राहिलों अविनाश कंठीं । जीवन हें पोटीं सांटविलें ॥ध्रु.॥ शरीरसंपित्त मृगजळभान । जाईल नासोन खरें नव्हे ॥२॥ तुका म्हणे आतां उपाधीच्या नांवें । आणियेला देवें वीट मज ॥३॥
121
अवघा तो शकुन । हृदयीं देवाचे चरण ॥१॥ येथें नसतां वियोग । लाभा उणें काय मग ॥ध्रु.॥ संग हरिच्या नामाचा । शुचिर्भूत सदा वाचा ॥२॥ तुका म्हणे हरिच्या दासां । शुभकाळ अवघ्या दिशा ॥३॥
122
अवघा भार वाटे देवा । संतसेवा न घडतां ॥१॥ कसोटी हे असे हातीं । सत्य भूतीं भगवंत ॥ध्रु.॥ चुकलोंसा दिसें पंथ । गेले संत तो ऐसा ॥२॥ तुका म्हणे सोंग वांयां । कारण या अनुभवें ॥३॥
123
अवघा वेंचलों इंद्रियांचे ओढी । जालें तें तें घडी निरोपिलें ॥१॥ असावा जी ठावा सेवेसी विचार । आपुला म्यां भार उतरिला ॥ध्रु.॥ कायावाचामनें तो चि निजध्यास । एथें जालों ओस भक्तिभावें ॥२॥ तुका म्हणे करूं येईल धावणें । तरि नारायणें सांभाळावें ॥३॥
124
अवघिया चाडा कुंटित करूनि । लावीं आपुली च गोडी । आशा मनसा तृष्णा कल्पना । करूनियां देशधडी । मीतूंपणापासाव गुंतलों । मिथ्या संकल्प तो माझा तोडीं । तुझिये चरणीं माझे दोन्ही पक्ष । अवघी करुनि दाखवीं पिंडी रे रे ॥१॥ माझें साच काय केलें मृगजळ । वर्णा याती कुळ अभिमान । कुमारी भातुकें खेळती कवतुकें । काय त्यांचें साचपण ॥ध्रु.॥ वेगळाल्या भावें चित्ती तडातोडी । केलों देशधडी मायाजाळें । गोत वत्ति माय बाप बहिणी सुत । बंधुवर्ग माझीं बाळें । एका एक न धरी संबंध पुरलिया । पातलिया जवळी काळें । जाणोनियां त्याग सर्वस्वें केला । सांभाळीं आपुलें जाळें ॥२॥ एकां जवळी धरी आणिकां अंतरीं । तीं काय सोयरीं नव्हतीं माझीं । एकांचे पाळण एकांसी भांडण । चाड कवणिये काजीं । अधिक असे उणें कवण कवण्या गुणें । हे माव न कळे चि तुझी । म्हणोनि चिंतनीं राहिलों श्रीपती । तुका म्हणे भाक माझी ॥३॥
125
अवघियां दिला गोर । मजकरे पाहीना ॥१॥ फुंदे गोपाळ डोळे चोळी । ढुंगा थापली हाणे तोंडा ॥ध्रु.॥ आवडती थोर मोटे । मी रे पोरटें दैन्यवाणे ॥२॥ तुका म्हणे जाणों भाव । जीविंचा देव बुझावी ॥३॥ मृदंग पाटया - अभंग
126
अवघियांच्या आलों मुळें । एका वेळे न्यावया ॥१॥ सिद्ध व्हावें सिद्ध व्हावें । आधीं ठावें करितों ॥ध्रु.॥ जोंवरि ते घटिका दुरी । आहे उरी तो काळ ॥२॥ मंगळाचे वेळे उभे । असों शोभे सावध ॥३॥ अवघियांचा योग घडे । तरी जोडे श्लाघ्यता ॥४॥ तुका म्हणे पाहें वाट । बहु आट करूनि ॥५॥
127
अवघी मिथ्या आटी । राम नाहीं तंव कंठीं ॥१॥ सावधान सावधान । उगवीं संकल्पीं हें मन ॥ध्रु.॥ सांडिलें तें मांडे । आघ्र उरल्या काळें दंडे ॥२॥ तुका म्हणे आलें भागा । देउनि चिंतीं पांडुरंगा ॥३॥
128
अवघीं च तीथॉ घडलीं एकवेळा । चंद्रभागा डोळां देखिलिया ॥१॥ अवघीं च पापें गेलीं दिगांतरीं । वैकुंठ पंढरी देखिलिया ॥ध्रु.॥ अवघिया संतां एकवेळा भेटी । पुंडलीक दृष्टी देखिलिया ॥२॥ तुका म्हणे जन्मा आल्याचें सार्थक । विठ्ठल चि एक देखिलिया ॥३॥
129
अवघीं तुज बाळें सारिखीं नाहीं तें । नवल वाटतें पांडुरंगा ॥१॥ म्हणतां लाज नाहीं सकळांची माउली । जवळी धरिलीं एकें दुरी ॥ध्रु.॥ एकां सुख द्यावें घेऊनि वोसंगा । एक दारीं गळा श्रमविती ॥२॥ एकां नवनीत पाजावें दाटून । एकें अन्न अन्नें करितील ॥३॥ एकें वाटतील न वजावीं दुरी । एकांचा मत्सर जवळी येतां ॥४॥ तुकयाबंधु म्हणे नावडतीं त्यांस । कासया व्यालास नारायणा ॥५॥
130
अवघीं भूतें साम्या आलीं । देखिलीं म्यां कैं होतीं ॥१॥ विश्वास तो खरा मग । पांडुरंगकृपेचा ॥ध्रु.॥ माझी कोणी न धरो शंका । हो कां लोकां निद्वपद्व ॥२॥ तुका म्हणे जें जें भेटे । तें तें वाटे मी ऐसें ॥३॥
131
अवघीं मिळोनि कोल्हाळ केला । आतां होता म्हणती गेला ॥१॥ आपलिया रडती भावें । जयासवें जयापरी ॥ध्रु.॥ चुकलों आम्ही खेळतां खेळ । गेला गोपाळ हातींचा ॥२॥ तुका म्हणे धांवती थडी । न घली उडी आंत कोणी ॥३॥
132
अवघे गोपाळ म्हणती या रे करूं काला । काय कोणाची सिदोरी ते पाहों द्या मला । नका कांहीं मागें पुढें रे ठेवूं खरें च बोला । वंची वंचला तो चि रे येथें भोवंडा त्याला ॥१॥ घेतल्या वांचून झाडा रे नेदी आपुलें कांहीं । एकां एक ग्वाही बहुत देती मोकळें नाहीं । ताक सांडी येर येर रे काला भात भाकरी दहीं । आलें घेतो मध्यें बैसला नाहीं आणवीत तें ही ॥ध्रु.॥ एका नाहीं धीर तांतडी दिल्या सोडोनि मोटा । एक सोडितील गाठी रे एक चालती वाटा । एक उभा भार वाहोनि पाहे उगाचि खोटा । एक ते करूनि आराले आतां ऐसें चि घाटा ॥२॥ एकीं स्थिराविल्या गाई रे एक वळत्या देती । एकांच्या फांकल्या वोढाळा फेरे भोंवतीं घेती । एकें चाराबोरा गुंतलीं नाहीं जीवन चित्तीं । एक एका चला म्हणती एक हुंबरी घेती ॥३॥ एकीं एकें वाटा लाविलीं भोळीं नेणतीं मुलें । आपण घरींच गुंतले माळा नासिलीं फुलें । गांठीचें तें सोडूं नावडे खाय आइतें दिलें । सांपडलें वेठी वोढी रे भार वाहातां मेलें ॥४॥ एक ते माया गुंतले घरीं बहुत काम । वार्ता ही नाहीं तयाची तया कांहीं च ठावें । जैसें होतें शिळे संचित तैसें लागलें खावें । हातोहातीं गेलें वेचुनि मग पडिलें ठावें ॥५॥ एकीं हातीं पायीं पटे रे अंगीं लाविल्या राखा । एक ते सोलिव बोडके केली सपाट शिखा । एक ते आळसी तळीं रे वरी वाढिल्या काखा । सिदोरी वांचून बुद्धि रे केला अवघ्यां वाखा ॥६॥ तुका म्हणे आतां कान्होबा आम्हां वांटोनि द्यावें । आहे नाहीं आम्हांपाशीं तें तुज अवघें चि ठावें । मोकलितां तुम्ही शरण आम्ही कवणासि जावें । कृपावंते कृपा केली रे पोट भरे तों खावें ॥७॥
133
अवघे चि निजों नका अवघिये ठायीं । वेळ अवेळ तरी सांभाळावी कांहीं ॥१॥ जतन करा रे जतन करा । घालूं पाहे घरावरी घाला चोरटें ॥ध्रु.॥ सीतरिलीं फार खाती भोंवताले फेरे । गेलें नये हातां सेकीं तळमळ उरे ॥२॥ तुका म्हणे आम्ही करूं आपलें जतन । न लगे कांहीं कोणां द्यावें उघडा रे कान ॥३॥
134
अवघे चुकविले सायास । तप रासी जीवा नास ॥१॥ जीव देऊनियां बळी । अवघीं तारिलीं दुर्बळीं । केला भूमंडळीं । माजी थोर पवाडा ॥ध्रु.॥ कांहीं न मगे याची गती । लुटवितो जगा हातीं ॥२॥ तुका म्हणे भक्तराजा । कोण वर्णी पार तुझा ॥३॥
135
अवघे देव साध । परी या अवगुणांचा बाध ॥१॥ म्हणउनी नव्हे सरी । राहे एका एक दुरी ॥ध्रु.॥ ऊंस कांदा एक आळां । स्वाद गोडीचा निराळा ॥२॥ तुका म्हणे नव्हे सरी । विष अमृताची परी ॥३॥
136
अवघें अवघीकडे । दिलें पाहे मजकडे । अशा सवंगडे । सहित थोरी लागली ॥१॥ कां रे धरिला अबोला । माझा वांटा देईं मला । सिदोरीचा केला । झाडा आतां निवडे ना ॥ध्रु.॥ भूक लागली अनंता । कां रे नेणसी जाणतां । भागलों वळितां । गाई सैरा ओढाळा ॥२॥ तुका करुणा भाकी । हरि पाहे गोळा टाकी । घेता जाला सुखी । भीतरी वांटी आणीकां ॥३॥
137
अवघें चि गोड जालें । मागीलये भरी आलें ॥१॥ साहय जाला पांडुरंग । दिला अभ्यंतरीं संग ॥ध्रु.॥ थडिये पावतां तो वाव । मागें वाहावतां ठाव ॥२॥ तुका म्हणे गेलें । स्वप्नींचें जागें जालें ॥३॥
138
अवघें जेणें पाप नासे । तें हें असे पंढरीसी ॥१॥ गात जागा गात जागा । प्रेम मागा विठ्ठला ॥ध्रु.॥ अवघी सुखाची च राशी । पुंडलिकाशीं वोळली हे ॥२॥ तुका म्हणे जवळी आलें । उभे ठालें समचरणीं ॥३॥
139
अवघें ब्रम्हरूप रिता नाहीं ठाव । प्रतिमा तो देव कैसा नव्हे ॥१॥ नाहीं भाव तया सांगावें तें किती । आपुल्याला मतीं पाषांडिया ॥ध्रु.॥ जया भावें संत बोलिले वचन । नाहीं अनुमोदन शाब्दिकांसि ॥२॥ तुका म्हणे संतीं भाव केला बळी । न कळतां खळीं दूषिला देव ॥३॥
140
अवघ्या उपचारा । एक मनें चि दातारा ॥१॥ घ्यावी घ्यावी हे चि सेवा । माझी दुर्बळाची देवा ॥ध्रु.॥ अवघियाचा ठाव । पायांवरि जीवभाव ॥२॥ चित्ताचें आसन । तुका करितो कीर्तन ॥३॥
141
अवघ्या कोल्ह्यांचें वर्म अंडीं । धरितां तोंडीं खीळ पडे ॥१॥ भुंकुं नका भुंकुं नका । आला तुका विष्णुदास ॥ध्रु.॥ कवणे ठायीं सादर व्हावें । नाहीं ठावें गाढवा ॥२॥ दुर्जनासि पंचानन । तुका रजरेणु संतांचा ॥३॥
142
अवघ्या जेष्ठादेवी । कोण पूजनाचा ठाव । धरितां चि भाव । कोठें नाहींसें जालें ॥१॥ दिसे सारिखें सारिखें । परि तें कारणीं पारिखें । तळीं गेलें देखें । वरी टोले न साहाती ॥ध्रु.॥ पट एका शिरीं । यथाविधीनें त्या येरी । बसकोळ्या घागरी । डेरे रांझण गाडगीं ॥२॥ तुका म्हणे माना । येथें कोणीं रुसावें ना । आपुलाल्या स्थानां । जेथें त्या चि शोभल्या ॥३॥
143
अवघ्या दशा येणें साधती । मुख्य उपासना सगुणभक्ति। प्रगटे हृदयींची मूर्ती । भावशुद्धी जाणोनियां ॥१॥ बीज आणि फळ हरींचे नाम । सकळ पुण्य सकळ धर्म । सकळां कळांचें हे वर्म । निवारी श्रम सकळ ही ॥ध्रु.॥ जेथें कीर्तन हें नामघोष । करिती निर्लज्ज हरीचे दास । सकळ वोथंबले रस । तुटती पाश भवबंधाचे ॥२॥ येती अंगा वसती लक्षणें । अंतरीं देवें धरिलें ठाणें । आपण चि येती तयाचा गुण । जाणें येणें खुंटे वस्तीचें ॥३॥ न लगे सांडावा आश्रम । उपजले कुळींचे धर्म । आणीक न करावे श्रम । एक पुरे नाम विठोबाचें ॥४॥ वेदपुरुष नारायण । योगियांचें ब्रम्ह शून्य । मुक्ता आत्मा परिपूर्ण । तुका म्हणे सगुण भोळ्या आम्हां ॥५॥
144
अवघ्या पापें घडला एक । उपासक शक्तीचा ॥१॥ त्याचा विटाळ नको अंगा । पांडुरंगा माझिया ॥ध्रु.॥ काम क्रोध मद्य अंगीं । रंगला रंगीं अवगुणी ॥२॥ करितां पाप न धरी शंका । म्हणे तुका कोणी ही ॥३॥
145
अवघ्या भूतांचें केलें संतर्पण । अवघी च दान दिली भूमि ॥१॥ अवघा चि काळ दिनरात्रशुद्धी । साधियेली विधि पर्वकाळ ॥ध्रु.॥ अवघीं च तीथॉ व्रतें केले याग । अवघें चि सांग जालें कर्म ॥२॥ अवघें चि फळ आलें आम्हां हातां । अवघें चि अनंता समर्पिलें ॥३॥ तुका म्हणे आतां बोलों अबोलणें । कायावाचामनें उरलों नाहीं ॥४॥
146
अवघ्या वाटा झाल्या क्षीण कळीं न घडे साधन । उचित विधि विधान न कळे न घडे सर्वथा ॥१॥ भक्तिपंथ बहु सोपा पुण्य नागवया पापा । येणें जाणें खेपा येणें चि एक खंडती ॥ध्रु.॥ उभारोनि बाहे विठो पालवीत आहे । दासां मी चि साहे मुखें बोले आपुल्या ॥२॥ भाविक विश्वासी पार उतरिलें त्यांसी । तुका म्हणे नासी कुतर्क्याचे कपाळीं ॥३॥
147
अवघ्यां पातकांची मी एक रासी । अवघा तूं होसी सर्वोत्तमु ॥१॥ जैसा तैसा लागे करणें अंगीकार । माझा सर्व भार चालविणें ॥ध्रु.॥ अवघें चि मज गिळियेलें काळें । अवघीं च बळें तुझे अंगीं ॥२॥ तुका म्हणे आतां खुंटला उपाय । अवघे चि पाय तुझे मज ॥३॥
148
अवचित त्यांणीं देखिला भुजंग । पळतील मग हाउ आला ॥१॥ आला घेऊनियां यमुनेबाहेरी । पालवितो करीं गडियांसि ॥२॥ गडियांसि म्हणे वैकुंठनायक । या रे सकळिक मजपाशीं ॥३॥ मजपाशीं तुम्हां भय काय करी । जवळि या दुरी जाऊं नका ॥४॥ कानीं आइकिले गोविंदाचे बोल । म्हणती नवल चला पाहों ॥५॥ पाहों आले हरीजवळ सकळ । गोविंदें गोपाळ आळिंगिले ॥६॥ आल्या गाईं वरी घालितील माना । वोरसलें स्तना क्षीर लोटें ॥७॥ लोटती सकळें एकावरी एक । होउनि पृथक कुर्वाळलीं ॥८॥ कुर्वाळलीं आनंदें घेती चारापाणी । तिहीं चक्रपाणी देखियेला ॥९॥ त्यां च पाशीं होता परि केली माव । न कळे संदेह पडलिया ॥१०॥ याति वृक्ष वल्ली होत्या कोमेलिया । त्यांसि कृष्णें काया दिव्य दिली ॥११॥ दिलें गोविंदें त्या पदा नाहीं नाश । तुका म्हणे आस निरसली ॥१२॥
149
अवचित या तुमच्या पायां । देवराया पावलों ॥१॥ बरवें जालें देशाउर । आल्या दुर सारिखें ॥ध्रु.॥ राहोनियां जातों ठाया । आलियाची निशानी ॥२॥ तुका म्हणे चरणसेवा । जोडी हेवा लाधली ॥३॥
150
अवचिता चि हातीं ठेवा । दिला सेवा न करितां ॥१॥ भाग्य फळलें जाली भेटी । नेघें तुटी यावरी ॥ध्रु.॥ दैन्य गेलें हरली चिंता । सदैव आतां यावरी ॥२॥ तुका म्हणे वांटा जाला । बोलों बोली देवासीं ॥३॥
151
अवतार केला संहारावे दुष्ट । करिती हे नष्ट परपीडा ॥१॥ परपीडा करी दैत्य कंसराव । पुढें तो ही भाव आरंभिला ॥२॥ लाविलें लाघव पाहोनियां संधी । सकळांही वधी दुष्टजना ॥३॥ दुष्टजन परपीडक जे कोणी । ते या चक्रपाणी न साहति ॥४॥ न साहवे दुःख भक्तांचें या देवा । अवतार घ्यावा लागे रूप ॥५॥ रूप हें चांगलें रामकृष्ण नाम । हरे भवश्रम उच्चारितां ॥६॥ उच्चारितां नाम कंस वैरभावें । हरोनियां जीवें कृष्ण केला ॥७॥ कृष्णरूप त्यासि दिसे अवघें जन । पाहे तों आपण कृष्ण जाला ॥८॥ पाहिलें दर्पणीं आधील मुखासि । चतुर्भुज त्यासि तो चि जाला ॥९॥ जालीं कृष्णरूप कन्या पुत्र भाज । तुका म्हणे राज्य सैन्य जन ॥१०॥
152
अवतार गोकुळीं हो जन तारावयासी । लावण्यरूपडें हे तेजपुंजाळरासी । उगवतां कोटि बिंबें रवि लोपले शशी । उत्साव सुरवरां मही थोर मानसीं ॥१॥ जय देवा कृष्णनाथा जय रखुमाईंकांता । आरती ओंवाळीन तुम्हां देवकीसुता । जय देवा कृष्णनाथा ॥ध्रु.॥ वसुदेवदेवकीची बंद फोडुनी शाळ । होउनि विश्वजनिता तया पोटिंचा बाळ । दैत्य हे त्रासियेले समूळ कंसासी काळ । राजया उग्रसेना केला मथुरापाळ ॥२॥ राखतां गोधनें हो इंद्र कोपला वरि । मेघ जो कडाडिला शिळा वर्षतां धारीं । राखिलें गोकुळ हें नखीं धरिला गिरी । निर्भय लोकपाळ अवतरले हरी ॥३॥ कौतुक पाहावया माव ब्रम्ह्यानें केली । वत्सें चोरोनियां सत्यलोकासि नेलीं । गोपाळ गाईंवत्सें दोहीं ठायीं राखीलीं । सुखाचा प्रेमसिंधु अनाथांची माउली ॥४॥ तारिलें भक्तजना दैत्य निर्दाळूनि । पांडवां साहकारी आडल्यां निर्वाणी । गुण मी काय वर्णू मति केवढी वाणी । विनवितो दास तुका ठाव देई चरणीं ॥५॥
153
अवतारनामभेद गणा आदि अगाद । जयासि पार नाहीं पुढें खुंटला वाद । एक चि दंत शोभे मुख विक्राळ दोंद । ब्रम्हांडामाजि दावी अनंत हे छंद ॥१॥ जय जया गणपती ओंवाळित आरती । साजिर्या सरळ भुजा फरशकमळ शोभती ॥ध्रु.॥ हे मही ठेंगणी हो तुज नृत्यनायका । भोंवरि फेर देतां असुर मदिले एकां । घातले तोडरीं हो भक्तजनपाळका । सहस्र नाम तुज भक्तिमुक्तिदायका ॥२॥ सुंदर शोभला हो रूपें लोपलीं तेजें । उपमा काय देऊं असे आणिक दुजें । रविशशितारागणें जयामाजी सहजें । उदरी सामावलीं जया ब्रम्हांडबीजें ॥३॥ वर्णिता शेष लीळा तया भागलीं मुखें । पांगुळले वेद चारी कैसे राहिले सुखें । अवतार जन्मला हो लिंगनाभी या मुखें । अमूर्त मूर्तिमंत होय भक्तीच्या सुखें ॥४॥ विश्व हें रूप तुझें हस्त पाद मुखडें । ऐसा चि भाव देई तया नाचतां पुढें । धूप दीप पंचारति ओंवाळिन निवाडें । राखें या शरणागता तुका खेळतां लाडें ॥५॥
154
अविट हें क्षीर हरिकथा माउली । सेविती सेविली वैष्णवजनीं ॥१॥ अमृत राहिलें लाजोनि माघारें । येणें रसें थोरें ब्रम्हानंदे ॥ध्रु.॥ पतित पातकी पावनपंगती । चतुर्भुज होती देवाऐसे ॥२॥ सर्व सुखें तया मोहोरती ठाया । जेथें दाटणी या वैष्णवांची ॥३॥ निर्गुण हें सोंग धरिलें गुणवंत । धरूनियां प्रीत गाये नाचे ॥४॥ तुका म्हणे केलीं साधनें गाळणी । सुलभ कीर्तनीं होऊनी ठेला ॥५॥
155
अविश्वासीयाचें शरीर सुतकी । विटाळ पातकी भेद वाही ॥१॥ काय त्याचे वेल जाईंल मांडवा । होता तैसा ठेवा आला पुढें ॥ध्रु.॥ मातेचा संकल्प व्हावा राजबिंडा । कपाळीचें धोंडा उभा ठाके ॥२॥ तुका म्हणे जैसा कुचराचा दाणा । परिपाकीं अन्ना न मिळे जैसा ॥३॥
156
अवो कृपावंता । होई बुद्धीचा ये दाता ॥१॥ जेणें पाविजे उद्धार । होय तुझे पायीं थार ॥ध्रु.॥ वदवीं हे वाचा । भाव पांडुरंगीं साचा ॥२॥ तुका म्हणे देवा । माझे अंतर वसवा ॥३॥
157
अशक्य तों तुम्हां नाहीं नारायणा । निर्जीवा चेतना आणावया ॥१॥ मागें काय जाणों स्वामीचे पवाडे । आतां कां रोकडे दावूं नये ॥ध्रु.॥ थोर भाग्य आम्ही समर्थाचे कासे । म्हणवितों दास काय थोडें ॥२॥ तुका म्हणे माझे निववावे डोळे । दावूनि सोहळे सामर्थ्याचे ॥३॥
158
अशोकाच्या वनीं सीता शोक करी । कां हों अंतरले रघुनाथ दुरी । येउनि गुंफेमाजी दुष्टें केली चोरी । कांहो मज आणिले अवघड लंकापुरी ॥१॥ सांगा वो त्रीजटे सखिये ऐसी मात । देईल कां नेदी भेटी रघुनाथ । मन उतावळि जाला दुरी पंथ । राहों न सके प्राण माझा कुडी आंत ॥ध्रु.॥ काय दुष्ट आचरण होतें म्यां केलें । तीर्थ व्रत होतें कवणाचें भंगीलें । गाईवत्सा पत्नीपुरुषा विघडिलें । न कळे वो संचित चरण अंतरले ॥२॥ नाडियेलें आशा मृगकांतिसोने । धाडिलें रघुनाथा पाठिलागे तेणें । उलंघिली आज्ञा माव काय मी जाणें । देखुनी सूनाट घेउनि आलें सुनें ॥३॥ नाहीं मूळ मारग लाग अणीक सोये । एकाविण नामें रघुनाथाच्या माये । उपटी पक्षिया एक देउनि पाये । उदकवेढ्यामध्यें तेथें चाले काये ॥४॥ जनकाची नंदिनी दुःखें ग्लानी थोरी । चुकली कुरंगिणी मेळा तैशा परी । संमोखी त्रीजटा स्थिर स्थिर वो करी । घेइल तुकयास्वामी राम लंकापुरी ॥५॥
159
असंत लक्षण भूतांचा मत्सर । मनास निष्ठ अतिवादी ॥१॥ अंतरीचा रंग उमटे बाहेरी । वोळखियापरी आपेंआप ॥ध्रु.॥ संत ते समय वोळखती वेळ । चतुष्ट निर्मळ चित्त सदा ॥२॥ तुका म्हणे हित उचित अनुचित । मज लागे नित आचरावें ॥३॥
160
असंतीं कांटाळा हा नव्हे मत्सर । ब्रम्ह तें विकारविरहित ॥१॥ तरि म्हणा त्याग प्रतिपादलासे । अनादि हा असे वैराकार ॥ध्रु.॥ सिजलें हिरवें एका नांवें धान्य । सेवनापें भिन्न निवडे तें ॥२॥ तुका म्हणे भूतीं साक्ष नारायण । अवगुणीं दंडण गुणीं पुजा ॥३॥
161
असत्य वचन होतां सर्व जोडी । जरी लग्नघडी परउपकार ॥१॥ जाईंल पतना यासि संदेह नाहीं । साक्ष आहे कांहीं सांगतों ते ॥ध्रु.॥ वदविलें मुखें नारायणें धर्मा । अंगुष्ठ त्या कर्मासाटीं गेला ॥२॥ तुका म्हणे आतां सांभळा रे पुढें । अंतरिंचे कुडें देइल दुःख ॥३॥
162
असा जी सोंवळें । आहां तैसे चि निराळे ॥१॥ आम्हीं नयों तुमच्या वाटा । काय लटिका चि ताठा ॥ध्रु.॥ चिंतन चि पुरे । काय सलगी सवें धुरे ॥२॥ तुका म्हणे देवा । नका नावडे ते सेवा ॥३॥
163
असाल ते तुम्ही असा । आम्ही सहसा निवडों ना ॥१॥ अनुसरलों एका चित्तें । हातोंहातें गींवसित ॥ध्रु.॥ गुणदोष काशासाटीं । तुमचे पोटीं वागवूं ॥२॥ तुका म्हणे दुजें आतां । कोठें चित्ता आतळों ॥३॥
164
असे नांदतु हा हरी सर्वजीवीं । असे व्यापुनी अग्नि हा काष्ठ तेवीं । घटीं बिंबलें बिंब हें ठायिठायीं । तया संगती नासु हा त्यासि नाहीं ॥१॥ तन वाटितां क्षीर हें होत नाहीं । पशू भिक्षतां पालटे तें चि देहीं । तया वर्म तो जाणता एक आहे । असे व्यापक व्यापुनी अंतर्बाहे ॥२॥ फळ कर्दळीं सेवटीं येत आहे । असे शोधितां पोकळीमाजि काये । धीर नाहीं त्यें वाउगें धीग जालें । फळ पुष्पना यत्न व्यर्थ गेले ॥३॥ असे नाम हें दर्पणें सिद्ध केलें । असे बिंब तें या मळा आहे ठेलें । कैसें शुद्ध नाहीं दिसे माजिरूप। नका वाढवूं सीण हा पुण्यपाप ॥४॥ करा वर्म ठावें नका सोंग वांयां । तुका वीनवीतो पडों काय पायां । तुज पुत्र दारा धन वासना हे । मग ऊरलें शेवटीं काय पाहें ॥५॥
165
असें येथींचिया दिनें । भाग्यहीन सकळां ॥१॥ भांडवल एवढें गांठी । नाम कंठीं धरियेलें ॥ध्रु.॥ आणिक तें दुजें कांहीं । मज नाहीं यावरी ॥२॥ तुका म्हणे केली कोणें । एवढा नेणें लौकिक ॥३॥
166
असो आतां ऐसा धंदा । तुज गोविंदा आठवूं ॥१॥ रक्षिता तूं होसी जरी । तरि काय येरीं करावें ॥ध्रु.॥ काया वाचा मन पायीं । राहे ठायीं करूं तें ॥२॥ तुका म्हणे गाइन गीतीं । रूप चित्तीं धरूनियां ॥३॥
167
असो आतां कांहीं करोनियां ग्लांती । कोणा काकुलती येइल येथें ॥१॥ करूं कांहीं दिस राहे तों सायास । झोंबों त्या लागास भावाचिये ॥ध्रु.॥ करितां रोदना बापुडें म्हणती । परि नये अंतीं कामा कोणी ॥२॥ तुकयाबंधु म्हणे पडिलिया वनीं । विचार तो मनीं बोलिला हे ॥३॥
168
असो आतां किती । तुज यावें काकुलती ॥१॥ माझें प्रारब्ध हें गाढें । तूं बापुडें तयापुढें ॥ध्रु.॥ सोडवीन आतां । ब्रीदें तुझीं पंढरीनाथा ॥२॥ तुका म्हणे बळी । तो गांढ्याचे कान पिळी ॥३॥
169
असो खटपट । आतां वाउगे बोभाट ॥१॥ परिसा हे विनवणी । असो मस्तक चरणीं ॥ध्रु.॥ अपराध करा । क्षमा घडले दातारा ॥२॥ तुका म्हणे वेथा । तुम्हा कळे पंढरिनाथा ॥३॥
170
असो खळ ऐसे फार । आम्हां त्यांचे उपकार ॥१॥ करिती पातकांची धुनी । मोल न घेतां साबनीं ॥ध्रु.॥ फुकाचे मजुर । ओझें वागविती भार ॥२॥ पार उतरुन म्हणे तुका । आम्हां आपण जाती नरका ॥३॥
171
असो तुझें तुजपाशीं । आम्हां त्यासी काय चाड ॥१॥ निरोधें कां कोंडूं मन । समाधान असोनी ॥ध्रु.॥ करावा तो उरे आट । खटपट वाढतसे ॥२॥ तुका म्हणे येउनि रागा । कां मी भागा मुकेन ॥३॥
172
असो मंत्रहीन क्रिया । नका चर्या विचारूं ॥१॥ सेवेमधीं जमा धरा । कृपा करा शेवटीं ॥ध्रु.॥ विचारूनि ठाया ठाव । येथें भाव राहिला ॥२॥ आतां तुकयापाशीं हेवा । नाहीं देवा तांतडी ॥३॥
173
असो मागें जालें । पुडें गोड तें चांगलें ॥१॥ आतां माझे मनीं । कांहीं अपराध न मनीं ॥ध्रु.॥ नेदीं अवसान । करितां नामाचें चिंतन ॥२॥ तुका म्हणे बोले । तुज आधीं च गोविलें ॥३॥
174
असोत लोकांचे बोल शिरावरी । माझी मज बरी विठाबाईं ॥१॥ आपंगिलें मज आहे ते कृपाळु । बहुत कनवाळु अंतरींची ॥ध्रु.॥ वेदशास्त्रें जिसी वर्णिती पुराणें । तिचें मी पोसणें लडिवाळ ॥२॥ जिचें नाम कामधेनु कल्पतरू । तिचें मी लेंकरूं तुका म्हणे ॥३॥
175
असोत हे तुझे प्रकार सकळ । काय खळखळ करावी हे ॥१॥ आमुचें स्वहित जाणतसों आम्ही । तुझें वर्म नामीं आहे तुझ्या ॥ध्रु.॥ विचारितां आयुष्य जातें वांयांविण । रोज जन्मा गोवण पडतसे ॥२॥ राहेन मी तुझे पाय आठवूनी । आणीक तें मनीं येऊं नेदीं ॥३॥ तुका म्हणे येथें येसी अनायासें । थोर तुज पिसें कीर्तनाचें ॥४॥
176
असोत हे बोल । अवघें तूं चि भांडवल ॥१॥ माझा मायबाप देवा । सज्जन सोयरा केशवा ॥ध्रु.॥ गाळियेले भेद । सारियेले वादावाद ॥२॥ तुका म्हणे मधीं । आतां न पडे उपाधि ॥३॥
177
असोनि न कीजे अलिप्त अहंकारें । उगी च या भारें कुंथाकुंथी ॥१॥ धांवा सोडवणें वेगीं लवकरी । मी तों जालों हरी शक्तिहीन ॥ध्रु.॥ भ्रमल्यानें दिसें बांधल्याचेपरी । माझें मजवरी वाहोनियां ॥२॥ तुका म्हणे धांव घेतलीसे सोईं । आतां पुढें येई लवकरी ॥३॥
178
अस्त नाहीं आतां एक चि मोहोरा । पासूनि अंधारा दुरि जालों ॥१॥ साक्षत्वें या जालों गुणाचा देखणा । करीं नारायणा तरी खरें ॥ध्रु.॥ आठवें विसरु पडियेला मागें । आलें तें चि भागें यत्न केलें ॥२॥ तुका म्हणे माझा विनोद देवासी । आम्ही तुम्हां ऐसीं दोन्ही नव्हों ॥३॥
179
अहंकार तो नासा भेद । जगीं निंदे ओंवळा ॥१॥ नातळे तो धन्य यासी । जाला वंषीं दीपक ॥ध्रु.॥ करवितो आत्महत्या । नेदी सत्या आतळों ॥२॥ तुका म्हणे गुरुगुरी । माथां थोरी धरोनि ॥३॥
180
अहल्या जेणें तारिली रामें । गणिका परलोका नेली नामें ॥१॥ रामहरे रघुराजहरे । रामहरे महाराजहरे ॥ध्रु.॥ कंठ शीतळ जपतां शूळपाणी । राम जपतां अविनाश भवाणी ॥२॥ तारकमंत्रश्रवण काशी । नाम जपतां वाल्मीक ॠषि ॥३॥ नाम जपें बीज मंत्र नळा । सिंधु तरती ज्याच्या प्रतापें शिळा ॥४॥ नामजप जीवन मुनिजना । तुकयास्वामी रघुनंदना ॥५॥
181
अहो कृपावंता । हाई बुद्धीचा ये दाता ॥१॥ जेणें पाविजे उद्धार । होय तुझे पायीं थार ॥ध्रु.॥ वदवी हे वाचा । भाव पांडुरंगीं साचा ॥२॥ तुका म्हणे देवा । माझें अंतर वसवा ॥३॥
182
अहो पुरुषोत्तमा । तुम्हां काशाची उपमा ॥१॥ सतंत तो नाहीं बुद्धी । नाळवितां नाहीं शुद्धि ॥ध्रु.॥ जागविलें तरी । तुम्हां वेक्तियेणें हरी ॥२॥ तुका म्हणे देवा । तुम्हा नित्य दिस नवा ॥३॥
183
आंत हरि बाहेर हरि । हरिनें घरीं कोंडिलें ॥१॥ हरिनें कामा घातला चिरा । वित्तवरा मुकविलें ॥ध्रु.॥ हरिने जीवें केली साटी । पाडिली तुटी सकळांसी ॥२॥ तुका म्हणे वेगळा नव्हे । हरि भोवे भोंवताला ॥३॥
184
आंधळ्यापांगळ्यांचा एक विठोबा दाता । प्रसवला विश्व तो चि सर्व होय जाणता । घडी मोडी हेळामात्रें पापपुण्यसंचिता । भवदुःख कोण वारी तुजवांचुनि चिंता ॥१॥ धर्म गा जागो तुझा तूं चि कृपाळू राजा । जाणसी जीवींचें गा न सांगतां सहजा ॥ध्रु.॥ घातली लोळणी गा पुंडलीकें वाळवंटीं । पंढरी पुण्य ठाव नीरे भीवरे तटीं । न देखे दुसरें गा । जाली अदृश्यदृष्टी । वोळला प्रेमदाता केली अमृतवृष्टी ॥२॥ आणीक उपमन्यु एक बाळ धाकुटें । न देखे न चलवे जना चालते वाटे । घातली लोळणी गा हरिनाम बोभाटे । पावला त्याकारणें धांव घातली नेटें ॥३॥ बैसोनि खोळी शुक राहे गर्भ आंधळा । शीणला येरझारी दुःख आठवी वेळा । मागील सोसिलें तें ना भीं म्हणे गोपाळा । पावला त्याकारणें । लाज राखिली कळा ॥४॥ न देखे जो या जना तया दावी आपणा । वेगळा सुखदुःखा मोहो सांडवी धना । आपपर तें ही नाहीं बंधुवर्ग सज्जना । तुकया ते चि परी जाली पावें नारायणा ॥५॥
185
आंधळ्यासि जन अवघे चि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाहीं ॥१॥ रोग्या विषतुल्य लागे हें मिष्टान्न । तोंडासि कारण चवी नाहीं ॥२॥ तुका म्हणे शुद्ध नाहीं जो आपण । तया त्रिभुवन अवघें खोटें ॥३॥
186
आइक नारायणा वचन माझें खरें । सांगतों निर्धारें तुजपासीं ॥१॥ नाहीं भाव मज पडिली लोककाज । राहिलेंसे काज तुझे पायीं ॥२॥ जरि तुज कांहीं करणें उचित । तारीं तूं पतित तुका म्हणे ॥३॥
187
आइका माझीं कवतुकउत्तरें । देउनी सादरें चित्त देवा ॥१॥ वोरसें आवडी आलों पायापासीं । होय तें मनेसीं सुख कीजे ॥ध्रु.॥ तुमचें न भंगे सवाौत्तमपण । करितां समाधान लेंकराचें॥२॥ तुका म्हणे जरी बोलतों बोबडें । तरी वाडे कोडें कवतुक ॥३॥
188
आइकिली मात । पुरविले मनोरथ ॥ प्रेम वाढविलें देवा । बरवी घेऊनियां सेवा ॥ध्रु.॥ केली विनवणी । तैसी पुरविली धणी ॥२॥ तुका म्हणे काया । रसा कुरोंडी वरोनियां ॥३॥
189
आइत्या भाग्या धणी व्हावे । केनें घ्यावें न सरे तें ॥१॥ केणें आहे पंढरपुरीं । उधाराचें लाभीक ॥ध्रु.॥ बाखराची करुनी रीती । भरा पोतीं लवलाहीं ॥२॥ तुका म्हणे संतांपाडें । करूं पुढें वाखती ॥३॥
190
आइत्याची राशी । आली पाकसिद्धीपाशीं ॥१॥ आतां सांडोनि भोजन । भिके जावें वेडेपणें ॥ध्रु.॥ उसंतिली वाट । मागें परतावें फुकट ॥२॥ तुका म्हणे वाणी । वेचों बैसोन ठाकणीं ॥३॥
191
आकारवंत मूर्ति । जेव्हां देखेन मी दृष्टी ॥१॥ मग मी राहेन निवांत । ठेवूनियां तेथें चित्त ॥ध्रु.॥ श्रुति वाखाणिती । तैसा येसील प्रचिती ॥२॥ म्हणे तुकयाचा सेवक । उभा देखेन सन्मुख ॥३॥
192
आगी लागो तया सुखा । जेणें हरि नये मुखा ॥१॥ मज होत कां विपत्ति । पांडुरंग राहो चित्तीं ॥ध्रु.॥ जळो तें समूळ । धन संपत्ति उत्तम कुळ ॥२॥ तुका म्हणे देवा । जेणें घडे तुझी सेवा ॥३॥
193
आग्रहा नांवें पाप । योगीं सारावे संकल्प ॥१॥ सहजा ऐसें भांडवल । असोनि कां सारा बोल ॥ध्रु.॥ तैं न भेटे तें काय । मना अंगींचे उपाय ॥२॥ तुका म्हणे धरीं सोय । वासनेची फोडा डोय ॥३॥
194
आचरणा ठाव । नाहीं अंगीं स्वता भाव ॥१॥ करवी आणिकांचे घात । खोडी काढूनि पंडित ॥ध्रु.॥ श्वानाचियापरी । मिष्टान्नासि विटाळ करी ॥२॥ तुका म्हणे ऐसा । सटवे चि ना पांचा दिसां ॥३॥
195
आचरती कर्में । तेथें काळें कर्मधर्में ॥१॥ खेळे गोविळयांसवें । करिती तें त्यांचें साहावें ॥ध्रु.॥ यज्ञामुखें घांस । मंत्रपूजेसी उदास ॥२॥ तुका म्हणे चोरी । योगियां ही सवें करी ॥३॥
196
आचरे दोष न धरी धाक । परीपाक दुःखाचा ॥१॥ चांडाळ तो दुराचारी । अंगीकारी कोण त्या ॥ध्रु.॥ नव्हे संतान वोस घर । अंधकार कुळासी ॥२॥ तुका म्हणे त्याचें दान । घेतां पतन दुःखासी ॥३॥
197
आजामेळा अंत मरणासी आला । तोंवरि स्मरला नाहीं तुज ॥१॥ प्राण जातेवेळे म्हणे नारायण । त्यासाटीं विमान पाठविलें ॥ध्रु.॥ बहुत कृपाळु होसी जगन्नाथा । त्रैलोक्यसमर्था सोइरिया ॥२॥ तुका म्हणे भक्तकाज तूं कैवारी । तुज साही चारी वणिऩताती ॥३॥
198
आजि आनंदु रे एकी परमानंदु रे । जया श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे ॥१॥ विठोबाचीं वेडीं आम्हां आनंदु सदा । गाऊं नाचों वाऊं टाळी रंजवूं गोविंदा ॥ध्रु.॥ सदा सन सांत आम्हां नित्य दिवाळी । आनंदें निर्भर आमचा कैवारी बळी ॥२॥ तुका म्हणे नाहीं जन्ममरणांचा धाक । संत सनकादिक तें आमचें कवतुक ॥३॥
199
आजि ओस अमरावती । काला पाहावया येती । देव विसरती । देहभाव आपुला ॥१॥ आनंद न समाये मेदिनी । चारा विसरल्या पाणी । तटस्थ त्या ध्यानीं । गाई जाल्या श्वापदें ॥ध्रु.॥ जें या देवांचें दैवत । उभें आहे या रंगांत । गोपाळांसहित । क्रीडा करी कान्होबा ॥२॥
200
आजि का वो तूं दिससी दुश्चिती । म्हणी एका मन लगे तुझ्या चित्तीं । दिलें ठेवूं तें विसरसी हातीं । नेणों काय बैसला हरि चित्तीं वो ॥१॥ सर सर परती जालीस आतां भांड । कैसें दाखविसी जगासी या तोंड । व्याली माय ते लाजविली रांड । नाहीं थार दो ठायीं जाला खंड वो ॥धृ ॥ होतें तैसें तें उमटलें वरी । बाह्य संपादणी अंतरींची चोरी । नाहीं मर्यादा निःसंग बावरी । मन हें गोविंदीं देह काम करी वो ॥२॥ नाहीं करीत उत्तर कोणासवें । पराधीन भोजन दिलें खावें । नाहीं अचळ सावरावा ठावे । देखों उदासीन तुज देहभावें वो ॥३॥ कोठें नेणों हा फावला एकांत । सदा किलकिल भोंवतीं बहुत । दोघे एकवाटा बोलावया मात । नाहीं लाज धरिली दिला हात वो ॥४॥ करी कवतुक खेळ खेळे कान्हा । दावी लाघव भांडवी सासासुना । परा भक्ति हे शुद्ध तुम्ही जाणा । तुका म्हणें ऐसें कळों यावें जना वो ॥५॥
201
आजि दिवस धन्य । तुमचें जालें दरुषण ॥१॥ सांगा माहेरींची मात । अवघा विस्तारीं वृत्तांत ॥ध्रु.॥ आइकतों मन । करूनि सादर श्रवण ॥२॥ तुका म्हणे नाम । माझा सकळ संभ्रम ॥३॥
202
आजि नवल मी आलें येणे राणें । भेटी अवचिती नंदाचिया कान्हें । गोवी सांगती वो सकळ ही जन । होतें संचित आणियेलें तेणें वो ॥१॥ गेलें होउनि न चले आतां कांहीं । साद घालितां जवळी दुजें नाहीं । अंगीं जडला मग उरलें तें काई । आतां राखतां गुमान भलें बाई वो ॥ध्रु.॥ बहुत कामें मज नाहीं आराणूक । एक सारितां तों पुढें उभें एक । आजि मी टाकोनि आलें सकळिक । तंव रचिलें आणिक कवतुक वो ॥२॥ चिंता करितां हरिली नारायणें । अंगसंगें मिनतां दोघेजणें । सुखें निर्भर जालियें त्याच्या गुणें । तुका म्हणे खुंटलें येणें जाणें वो ॥३॥
203
आजि बरवें जालें । माझें माहेर भेटलें ॥१ डोळां देखिले सज्जन । निवारला भाग सीण ॥ध्रु.॥ धन्य जालों आतां । क्षेम देऊनियां संतां ॥२॥ इच्छेचें पावलों । तुका म्हणे धन्य जालों ॥३॥
204
आजि शिवला मांग । माझें विटाळलें आंग ॥१॥ यासी घेऊं प्रायश्चित्त । विठ्ठलविठ्ठल हृदयांत ॥ध्रु.॥ जाली क्रोधासी भेटी । तोंडावाटे नर्क लोटी ॥२॥ अनुतापीं न्हाऊं । तुका म्हणे रवी पाहूं ॥३॥
205
आजिचिया लाभें ब्रम्हांड ठेंगणें । सुखी जालें मन कल्पवेना ॥१॥ आर्तभूत माझा जीव जयांसाटीं । त्यांच्या जाल्या भेटी पायांसवें ॥ध्रु.॥ वाटुली पाहातां सिणले नयन । बहु होतें मन आर्तभूत ॥२॥ माझ्या निरोपाचें आणिलें उत्तर । होइल समाचार सांगती तो ॥३॥ तुका म्हणे भेटी निवारला ताप । फळलें संकल्प संत आले ॥४॥
206
आजिचें हें मज तुम्हीं कृपादान । दिलें संतजन मायबापीं ॥१॥ आलीं मुखावाटा अमृतवचनें । उत्तीर्ण तीं येणें नव्हे जन्में ॥२॥ तुका म्हणे तुम्हीं उदार कृपाळ । शृंगारिलें बाळ कवतुकें ॥३॥
207
आजिवरि होतों तुझे सत्ते खालीं । तोंवरी तों केली विटंबणा ॥१॥ आतां तुज राहों नेदीं या देशांत । ऐसा म्यां समर्थ केला धणी ॥ध्रु.॥ सापें रिग केला कोठें बाळपणीं । होतीसी पापिणी काय जाणों ॥२॥ तुका म्हणे म्यां हा बुडविला वेव्हार । तुझे चि ढोपर सोलावया ॥३॥
208
आजिवरी तुम्हां आम्हां नेणपण । कौतुकें खेळणें संग होता ॥१॥ आतां अनावर जालें अगुणाची । करूं नये तें चि करीं सुखें ॥२॥ तुका म्हणे आतां बुडविलीं दोन्ही । कुळें एक मनीं नारायण ॥३॥
209
आजिवरी होतों संसाराचे हातीं । आतां ऐसें चित्तीं उपजलें ॥१॥ तुला शरणागत व्हावें नारायणा । अंगीकारा दिना आपुलिया ॥ध्रु.॥ विसरलों काम याजसाठीं धंदा । सकळ गोविंदा माझें तुझें ॥२॥ तुका म्हणे विज्ञापना परिसावी । आवडी हे जीवीं जाली तैसी ॥३॥
210
आजी दिवस जाला । धन्य सोनियाचा भला ॥१॥ जालें संताचे पंगती । बरवें भोजन निगुती ॥ध्रु.॥ रामकृष्णनामें । बरवीं मोहियेलीं प्रेमें ॥२॥ तुका म्हणे आला । चवी रसाळ हा काला ॥३॥
211
आज्ञा पाळुनियां असें एकसरें । तुमचीं उत्तरें संतांचीं हीं ॥१॥ भागवूनि देह ठेवियेला पायीं । चरणावरि डोईं येथुनें चि ॥ध्रु.॥ येणें जाणें हें तों उपाधीचे मूळ । पूजा ते सकळ अकर्तव्य ॥२॥ तुका म्हणे असें चरणींचा रज । पदीं च सहज जेथें तेथें ॥३॥
212
आठवे देव तो करावा उपाव । येर तजीं वाव खटपटा ॥१॥ होई बा जागा होई वा जागा । वाउगा कां गा सिणसील ॥ध्रु.॥ जाणिवेच्या भारें भवाचिये डोहीं । बुडसी तों कांहीं निघेसि ना ॥२॥ तुका म्हणे देवा पावसील भावें । जाणतां तें ठावें कांहीं नव्हे ॥३॥
213
आठवों नेंदी आवडी आणीक । भरूनियां लोक तिन्ही राहे ॥१॥ मन धांवे तेथें तिचें चि दुभतें । संपूर्ण आइतें सर्वकाळ ॥ध्रु.॥ न लगे वोळावीं इंद्रियें धांवतां । ठाव नाहीं रिता उरों दिला ॥२॥ तुका म्हणे समपाउलाचा खुंट । केला बळकट हालों नेदी ॥३॥
214
आड पडे काडी । तरि ते बहुत पाणी खोडी ॥१॥ दुर्जनाचे संगती । बहुतांचे घात होती ॥ध्रु.॥ एक पडे मासी । तरी ते बहु अन्न नासी ॥२॥ तुका म्हणे रांड । ऐसी कां ते व्याली भांड ॥३॥
215
आडकलें देवद्वार । व्यर्थ काय करकर ॥१॥ आतां चला जाऊं घरा । नका करूं उजगरा ॥ध्रु.॥ देवा लागलीसे निज । येथें उभ्या काय काज ॥२॥ राग येतो देवा । तुका म्हणे नेघे सेवा ॥३॥
216
आडलिया जना होसी सहाकारी । अंधळियाकरीं काठी तूं चि ॥१॥ आडिले गांजिले पीडिले संसारीं । त्यांचा तूं कैवारी नारायणा ॥ध्रु.॥ प्रल्हाद महासंकटीं रक्षिला । तुम्ही अपंगिला नानापरी ॥२॥ आपुलें चि अंग तुम्ही वोडविलें । त्याचें निवारलें महा दुःख ॥३॥ तुका म्हणे तुझे कृपे पार नाहीं । माझे विठाबाईं जननीये ॥४॥
217
आडवा तो उभा । असे दाटोनियां प्रभा ॥१॥ देव नाहीं एकविध । एक भाव असे शुद्ध ॥ध्रु.॥ भेदाभेद आटी । नाहीं फार कोठें तुटी ॥२॥ तुका म्हणे गोवा । उगवा वेव्हाराचा हेवा ॥३॥
218
आण काय सादर । विशीं आम्हां कां निष्ठ ॥१॥ केलें भक्त तैसें देई । तुझें प्रेम माझ्याठायीं ॥ध्रु.॥ काय पंगतीस कोंडा । एकांतासी साकरमांडा ॥२॥ काय एकपण । पोतां घालूनि गांठी खूण ॥३॥ काय घ्यावें ऐसें । त्या आपण अनारिसें ॥४॥ तुका म्हणे मधीं । आतां तोडूं भेद बुद्धी ॥५॥
219
आणिक मात माझ्या नावडे जीवासी । काय करूं यासी पांडुरंगा ॥१॥ मुखा तें चि गोड श्रवणां आवडी । चित्ती माझें ओढी तुझे पायीं ॥ध्रु.॥ जये पदीं नाहीं विठ्ठलाचें नाम । मज होती श्रम आइकतां ॥२॥ आणिकाचें मज म्हणवितां लाज । वाटे हें सहज न बोलावें ॥३॥ तुका म्हणे मज तूं च आवडसी । सर्वभावेंविसीं पांडुरंगा ॥४॥
220
आणिकां उपदेशूं नेणें नाचों आपण । मुंढा वांयां मारगेली वांयां हांसे जन ॥१॥ तैसा नव्हे चाळा आवरीं मन डोळा । पुढिलांच्या कळा कवतुक जाणोनी ॥ध्रु.॥ बाहिरल्या वेषें आंत जसें तसें । झाकलें तों बरें पोट भरे तेणें मिसें ॥२॥ तुका म्हणे केला तरी करीं शुद्ध भाव । नाहीं तरी जासी वांयां हा ना तोसा ठाव ॥३॥
221
आणिकां छळावया जालासी शाहाणा । स्वहिता घातले खानें । आडिके पैके करूनि सायास । कृपणें सांचलें धन । न जिरे क्षीर श्वानासी भिक्षतां । याती तयाचा गुण । तारुण्यदशे अधम मातला । दवडी हात पाय कान ॥१॥ काय जालें यांस वांयां कां ठकले । हातीं सांपडलें टाकीतसे । घेउनि स्फटिकमणी टाकी चिंतामणी । नागवले आपुले इच्छे ॥ध्रु.॥ सिद्धीं सेविलें सेविती अधम । पात्रासारिखे फळ । सिंपिला मोतीं जन्मलें स्वाती । वरुषलें सर्वत्र जळ । कापुस पट नये चि कारणा । तयास पातला काळ । तें चि भुजंगें धरिलें कंठीं । मा विष जालें त्याची गरळ ॥२॥ भक्षूनि मिष्टान्न घृतसाकर । सहित सोलुनि केळें । घालुनियां घसां अंगोळिया । हाते वांत करू बळें । कुंथावयाची आवडी बोंबा । उन्हवणी रडवी बाळें । तुका म्हणे जे जैसें करिती । ते पवती तैसीं च फळें ॥३॥
222
आणिकांची सेवा करावी शरीरें । तीं येथें उत्तरे कोरडीं च ॥१॥ ऐसा पांडुरंग सुलभ सोपारा । नेघे येरझारा सेवकाच्या ॥ध्रु.॥ आणिकांचे भेटी आडकाठी पडे । येथें तें न घडे वचन ही ॥२॥ आणिकांचे देणें काळीं पोट भरे । येथील न सरे कल्पांतीं ही ॥३॥ आणिकें दंडिती चुकलिया सेवा । येथें सोस हेवा नाहीं दोन्ही ॥४॥ तुका म्हणे करी आपण्यासारिखें । उद्धरी पारिखें उंच निंच ॥५॥
223
आणिकांची स्तुति आम्हां ब्रम्हहत्या । एका वांचूनि त्या पांडुरंगा ॥१॥ आम्हां विष्णुदासां एकविध भाव । न म्हणों या देव आणिकांसि ॥ध्रु.॥ शतखंड माझी होईल रसना । जरी या वचना पालटेन ॥२॥ तुका म्हणे मज आणिका संकल्पें । अवघीं च पापें घडतील ॥३॥
224
आणिकांच्या कापिती माना । निष्ठपणा पार नाहीं ॥१॥ करिती बेटे उसणवारी । यमपुरी भोगावया ॥ध्रु.॥ सेंदराचें दैवत केलें । नवस बोले तयासि ॥२॥ तुका म्हणे नाचति पोरें । खोडितां येरें अंग दुखे ॥३॥
225
आणिकांच्या घातें । ज्यांचीं निवतील चित्तें ॥१॥ ते चि ओळखावे पापी । निरयवासी शीघ्रकोपी ॥ध्रु.॥ कान पसरोनी । ऐके वदे दुष्ट वाणी ॥२॥ तुका म्हणे भांडा । धीर नाहीं ज्याच्या तोंडा॥३॥ हनुमंतस्तुति - अभंग ४
226
आणिकांच्या घातें मानितां संतोष । सुखदुःख दोष अंगीं लागे ॥१॥ ऐसें मनीं वाहूं नयेती संकल्प । करूं नये पाप भांडवल ॥ध्रु.॥ क्लेशाची चित्तीं राहाते कांचणी । अग्नींत टाकोनी ठाव जाळी ॥२॥ तुका म्हणे येणें घडे पुण्यक्षय । होणार तें होय प्रारब्धें चि ॥३॥
227
आणिकांसी तारी ऐसा नाहीं कोणी । धड तें नासोनि भलता टाकी ॥१॥ सोनें शुद्ध होतें अविट तें घरीं । नासिलें सोनारीं अळंकारीं ॥ध्रु.॥ ओल शुद्ध काळी काळें जिरें बीज । कैंचें लागे निज हाता तेथें ॥२॥ एक गहू करिती अनेक प्रकार । सांजा दिवसीं क्षीर घुगरिया ॥३॥ तुका म्हणे विषा रुचि एका हातीं । पाधानी नासिती नवनीत ॥४॥
228
आणितां त्या गती । हंस काउळे न होती ॥१॥ सांडा सांडा रे मठारे । येथें गांठीसवें धुरें ॥ध्रु.॥ नाकेंविण मोती । उभ्या बाजारें फजिती ॥२॥ हुकुमदाज तुका । येथें कोणी फुंदो नका ॥३॥
229
आणिलें सेवटा । आतां कामा नये फांटा ॥१॥ मज आपुलेंसें म्हणा । उपरि या नारायणा ॥ध्रु.॥ वेचियेली वाणी । युक्ति अवघी चरणीं ॥२॥ तुका धरी पाय । क्षमा करवूनि अन्याय ॥३॥
230
आणीक ऐसें कोठें सांगा । पांडुरंगा सारिखें ॥१॥ दैवत ये भूमंडळीं । उद्धार कळी पावितें ॥ध्रु.॥ कोठें कांहीं कोठें कांहीं । शोध ठायीं स्थळासी ॥२॥ आनेत्रींचें तीर्थी नासे । तीर्थी वसे वज्रलेप ॥३॥ पांडुरंगींचें पांडुरंगीं । पाप अंगीं राहेना ॥४॥ ऐसें हरें गिरिजेप्रति । गुह्य स्थिती सांगितली ॥५॥ तुका म्हणे तीर्थ क्षेत्र । सर्वत्र हें दैवत ॥६॥
231
आणीक कांहीं नेणें । असें पायांच्या चिंतनें ॥१॥ माझा न व्हावा विसर । नाहीं आणीक आधार ॥ध्रु.॥ भांडवल सेवा । हा चि ठेवियेला ठेवा ॥२॥ करीं मानभावा । तुका विनंती करी देवा ॥३॥
232
आणीक कांहीं मज नावडे मात । एक पंढरिनाथ वांचुनिया ॥१॥ त्याची च कथा आवडे कीर्तन । तें मज श्रवणें गोड लागे ॥२॥ तुका म्हणे संत म्हणोत भलतें । विठ्ठलापरतें न मनी कांहीं ॥३॥
233
आणीक कांहीं या उत्तराचें काज । नाहीं आतां मज बोलावया ॥१॥ भिन्न भेद हे भावनास्वभाव । नव्हे कांहीं देव एकविध ॥ध्रु.॥ गुण दोष कोणें निवडावे धर्म । कोण जाणे कर्म अकर्म तें ॥२॥ तरिच भलें आतां न करावा संग । दुःखाचा प्रसंग तोडावया ॥३॥ तुका म्हणे गुण गाई या देवाचे । घेई माझे वाचे हे चि धणी ॥४॥
234
आणीक काय थोडीं । परि तें फार खोटीं कुडीं ॥१॥ सदा मोकळीं च गुरें । होती फजीत तीं पोरें ॥ध्रु.॥ सदा घालिता हुंबरी । एक एकांचे न करी ॥२॥ तुका म्हणे घरीं माय । वेळोवेळां मारी ॥३॥
235
आणीक काळें न चले उपाय । धरावे या पाय विठोबाचे ॥१॥ अवघें चि पुण्य असे तया पोटीं । अवघिया तुटी होय पापा ॥ध्रु.॥ अवघें मोकळें अवघिया काळें । उद्धरती कुळें नरनारी ॥२॥ काळ वेळ नाहीं गर्भवासदुःखें । उच्चारितां मुखें नाम एक ॥३॥ तुका म्हणे कांहीं न लगे सांडावें । सांगतसें भावें घेती तयां ॥४॥
236
आणीक कोणाचा न करीं मी संग । जेणें होय भंग माझ्या चित्ता ॥१॥ विठ्ठलावांचूनि आणीक जे वाणी । नाइकें मी कानीं आपुलिया ॥ध्रु.॥ समाधानासाटीं बोलावी हे मात । परि माझें चित्त नाहीं कोठें ॥२॥ जिवाहूनि मज ते चि आवडती । आवडे ज्या चित्तीं पांडुरंग ॥३॥ तुका म्हणे माझें तो चि जाणे हित । आणिकांच्या चित्त नेदीं बोला ॥४॥
237
आणीक कोणापुढें वासूं मुख सांग । कीं माझें अंतरंग कोण जाणे ॥१॥ पाहें तुजकडे येऊनि जाऊनी । पांडुरंगा मनीं विचारावें ॥ध्रु.॥ भय चिंता अवघे उद्योग सांडिले । आठवुनी पाउलें असें तुझीं ॥२॥ नका विसरूं मज वैकुंठनायका । विनवितो तुका बंदीजन ॥३॥
238
आणीक दुसरें मज नाहीं आतां । नेमिलें या चित्तीपासुनियां ॥१॥ पांडुरंग मनीं पांडुरंग ध्यानीं । जाग्रतीं स्वप्नीं पांडुरंग ॥ध्रु.॥ पडिलें वळण इंद्रियां सकळां । भाव तो निराळा नाहीं दुजा ॥२॥ तुका म्हणे नेत्रीं केलें ओळखण । साजिरें तें ध्यान विटेवरी ॥३॥
239
आणीक नका करूं चेष्टा । व्हाल कष्टा वरपडी ॥१॥ सुखें करा हरिकथा । सर्वथा हे तारील ॥ध्रु.॥ अनाथाचा नाथ देव । अनुभव सत्य हा ॥२॥ तुका म्हणे बहुतां रिती । धरा चित्तीं सकळ ॥३॥
240
आणीक पाखांडें असती उदंडें । तळमळिती पिंडें आपुलिया ॥१॥ त्याचिया बोलाचा नाहीं विश्वास । घातलीसे कास तुझ्या नामीं ॥ध्रु.॥ दृढ एक चित्तें जालों या जीवासी । लाज सर्वविशीं तुम्हांसी हे ॥२॥ पीडों नेदी पशु आपुले अंकित । आहे जें उचित तैसें करा ॥३॥ तुका म्हणे किती भाकावी करुणा । कोप नारायणा येइल तुम्हां ॥४॥
241
आणीक म्यां कोणा यावें काकुळती । कोण कामा येती अंतकाळीं ॥१॥ तूं वो माझी सखी होसी पांडुरंगे । लवकरी ये गे वाट पाहें ॥ध्रु.॥ काया वाचा मनें हें चि काम करीं । पाउलें गोजिरीं चिंतीतसें ॥२॥ तुका म्हणे माझी पुरवीं हे आस । घालीं ब्रम्हरस भोजन हें ॥३॥
242
आणूनियां मना । आवघ्या धांडोळिल्या खुणा । देखिला तो राणा । पंढरपूरनिवासी ॥१॥ यासी अनुसरल्या काय । घडे ऐसें वांयां जाय । देखिले ते पाय । सम जीवीं राहाती ॥ध्रु.॥ तो देखावा हा विध । चिंतनें तें कार्य सद्धि । आणिकां संबंध । नाहीं पर्वकाळासी ॥२॥ तुका म्हणे खळ । हो क्षणें चि निर्मळ । जाऊनियां मळ । वाळवंटीं नाचती ॥३॥
243
आता न यें मागें । मी आलें याच्या रागें । काय माझें जगें । कोपोनियां करावें ॥१॥ कां गो कलित्यां कोल्हाल । तुम्ही भलत्या च सकल । वेचाल ते बोल । झुटे होती बोलिले ॥ध्रु.॥ याचे भेटी माझें मन । स्वरुपीं ठाकले लोचन । वेगळें तें क्षण आतां होऊं नावरे ॥२॥ काज काम नको जालें । बीजें नावरे बोलिलें । याचिया भेदिलें । कामबाणीं अंतर ॥३॥ या वेगळें होणें । आतां जळो तैसें जिणें । घेतलें तें मनें । आतां मागें न फिरे ॥४॥ आतां मोटी वार । माझी नका धरूं चार । तुकयाचा दातार । शेजे तो मी सुतलों ॥५॥
244
आता पंढरीराया । माझ्या निरसावें भया ॥१॥ मनीं राहिली आशंका । स्वामिभयाची सेवका ॥ध्रु.॥ ठेवा माथां हात । कांहीं बोला अभयमात ॥२॥ तुका म्हणे लाडें । खेळें ऐसें करा पुढें ॥३॥
245
आतां असों मना अभक्तांची कथा । न होई दुश्चिता हरिनामीं ॥१॥ नये त्याची कदा गोष्टी करूं मात । जिव्हे प्रायश्चित्त त्याच्या नांवें ॥ध्रु.॥ प्रभातें न घ्यावें नांव माकडाचें । तैसें अभक्ताचें सर्वकाळ ॥२॥ तुका म्हणे आतां आठवूं मंगळ । जेणें सर्व काळ सुखरूप ॥३॥
246
आतां आम्हां भय नाहीं बा कोणाचें । बळ विठोबाचें जालें असे ॥१॥ धीर दिला आम्हां येणें पांडुरंगें । न पांगों या पांगें संसाराच्या ॥२॥ तुका म्हणे माझा कैवारी हा देव । नाहीं भय भेव त्याच्या संगें ॥३॥
247
आतां आम्हां हें चि काम । न विसंभावें तुझें नाम । वाहुनियां टाळी । प्रेमसुखें नाचावें ॥१॥ अवघी जाली आराणूक । मागें पुढें सकिळक । त्रिपुटीचें दुःख । प्रारब्ध सारिलें ॥ध्रु.॥ गोदातटें निर्मळें । देव देवांचीं देवळें । संत महंत मेळें । दिवस जाय सुखाचा ॥२॥ तुका म्हणे पंढरीनाथा । आणिक नाहीं मज चिंता । योगक्षेम माथां । भार तुझ्या घातला ॥३॥
248
आतां आम्हां हें चि काम । वाचे स्मरूं रामराम ॥१॥ ऐसी मोलाची हे घडी । धरूं पायांची आवडी ॥ध्रु.॥ अमृताची खाणी । तये ठायीं वेचूं वाणी ॥२॥ तुका म्हणे पांडुरंगा । माझ्या जीवींच्या जिवलगा ॥३॥
249
आतां आवश्यक करणें समाधान । पाहिलें निर्वाण न पाहिजे ॥१॥ केलें तरीं आतां शुशोभें करावें । दिसतें बरवें संतांमधीं ॥ध्रु.॥ नाहीं भक्तराजीं ठेविला उधार । नामाचा आकार त्यांचियानें ॥२॥ तुका म्हणे माझ्या वडिलांचें ठेवणें । गोप्य नारायणें न करावें ॥३॥
250
आतां आशीर्वाद । माझा असो सुखें नांद ॥१॥ म्हणसी कोणा तरी काळें । आहेतसी माझीं बाळें ॥ध्रु.॥ दुरी दूरांतर । तरी घेसी समाचार ॥२॥ नेसी कधीं तरी । तुका म्हणे लाज हरी ॥३॥
251
आतां आहे नाहीं । न कळे आळी करा कांहीं ॥१॥ देसी पुरवुनी इच्छा । आतां पंढरीनिवासा ॥ध्रु.॥ नेणे भाग सीण । दुजें कोणी तुम्हांविण ॥२॥ आतां नव्हे दुरी । तुका पायीं मिठी मारी ॥३॥
252
आतां उघडीं डोळे । जरी अद्यापि न कळे ॥ तरी मातेचिये खोळे । दगड आला पोटासि ॥१॥ मनुष्यदेहा ऐसा निध । साधिली ते साधे सिद्ध ॥ करूनि प्रबोध । संत पार उतरले ॥ध्रु.॥ नाव चंद्रभागे तीरीं । उभी पुंडलीकाचे द्वारीं ॥ कट धरूनियां करीं । उभाउभी पालवी ॥२॥ तुका म्हणे फुकासाठीं । पायीं घातली या मिठी ॥ होतो उठाउठी । लवकरी च उतार ॥३॥
253
आतां ऐसें करूं । दोघां धरूनियां मारूं ॥१॥ मग टाकिती हे खोडी । तोंडीं लागली ते गोडी ॥ध्रु.॥ कोंडूं घरामधीं । न बोलोनि जागों बुद्धी ॥२॥ बोलावितो देवा । तुका गडियांचा मेळावा ॥३॥
254
आतां करावा कां सोंस वांयांविण । लटिका चि सीण मनासी हा ॥१॥ असेल तें कळों येईंल लौकरी । आतां वारकरी आल्यापाठी ॥ध्रु.॥ बहु विलंबाचें सन्निध पातलें । धीराचें राहिलें फळ पोटीं ॥२॥ चालिलें तें ठाव पावेल सेवटीं । पुरलिया तुटी पाउलांची ॥३॥ तुका म्हणे आसे लागलासे जीव । म्हणऊनि कींव भाकीतसें ॥४॥ संत परत आले त्यांची भेट झाली ते अभंग ११
255
आतां कळों आले गुण । अवघे चि यावरोन । चोखट लक्षण । धरिलें हें घरघेणें ॥१॥ या नांवें कृपासिंधु । म्हणवितोसी दीनबंधु । मज तरी मैंदु । दिसतोसी पाहातां ॥ध्रु.॥ अमळ दया नाहीं पोटीं । कठीण तैसाचि कपटी । अंधर्याची काठी । माझी गुदरसी च ना ॥२॥ तुकयाबंधु म्हणे पुरता । नाहीं म्हुण बरें अनंता । एरवीं असतां । तुझा घोंट भरियेला ॥३॥
256
आतां कांहीं सोस न करीं आणीक । धरीन तें एक हें चि दृढ ॥१॥ जेणें भवसिंधु उतरिजे पार । तुटे हा दुस्तर गर्भवास ॥ध्रु.॥ जोडीन ते आतां देवाचे चरण । अविनाश धन परमार्थ ॥२॥ तुका म्हणे बरा जोडला हा देह । मनुष्यपणें इहलोका आलों ॥३॥
257
आतां काढाकाढी करीं बा पंढरिराया । नाहीं तरी वांयां गेलों दास ॥१॥ जाणतां बैसलों दगडाचे नावे । तिचा धर्म घ्यावे प्राण हा चि ॥ध्रु.॥ मनाचा स्वभाव इंद्रियांचे ओढी । पतनाचे जोडी वरी हांव ॥२॥ तुका म्हणे जाली अंधळ्याची परी । आतां मज हरी वाट दावीं ॥३॥
258
आतां काशासाटीं दुरी । अंतर उरी राखिली ॥१॥ करीं लवकरी मुळ । लहानें तीळ मुळीचिया ॥ध्रु.॥ दोहीं ठायीं उदेगवाणें । दरुषणें निश्चिंती ॥२॥ तुका म्हणे वेग व्हावा । ऐसी जीवा उत्कंठा ॥३॥
259
आतां केशीराजा हे चि विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥ देह असो माझा भलतिये ठायीं । चत्ति तुझ्या पायीं असों द्यावें ॥ध्रु.॥ काळाचें खंडण घडावें चिंतन । धनमानजनविन्मुख तो ॥२॥ कफवातपत्ति देहअवसानीं । ठेवावीं वारूनि दुरितें हीं ॥३॥ सावध तों माझीं इंद्रियें सकळें । दिलीं एका वेळे हाक आधीं ॥४॥ तुका म्हणे तूं या सकळांचा जनिता । येथें ऐकता सकळांसी ॥५॥
260
आतां कोठें धांवे मन । तुझे चरण देखिलिया ॥१॥ भाग गेला सीण गेला । अवघा जाला आनंदु ॥ध्रु.॥ प्रेमरसें बैसली मिठी । आवडी लाठी मुखासी ॥२॥ तुका म्हणे आम्हां जोगें । विठ्ठल घोगें खरें माप ॥३॥
261
आतां गाऊं तुज ओविया मंगळीं । करूं गदारोळी हरिकथा ॥१॥ होसि निवारिता आमुचें सकळ । भय तळमळ पापपुण्य ॥ध्रु.॥ भोगिले ते भोग लावूं तुझे अंगीं । अलिप्त या जगीं होउनि राहों ॥२॥ तुका म्हणे आम्ही लाडिकीं लेंकरें । न राहों अंतरे पायांविण ॥३॥
262
आतां गुण दोष काय विचारिसी । मी तों आहे रासी पातकांची ॥१॥ पतितपावनासवें समागम । अपुलाला धर्म चालवीजे ॥ध्रु.॥ घनघायें भेटी लोखंडपरिसा । तरी अनारिसा न पालटे ॥२॥ तुका म्हणे माती कोण पुसे फुका । कस्तुरीच्या तुका समागमें ॥३॥
263
आतां घेई माझें । भार सकळ ही ओझें ॥१॥ काय करिसी होईं वाड । आलों पोटासीं दगड ॥ध्रु.॥ तूं चि डोळे वाती । होईं दीपक सांगातीं ॥२॥ तुका म्हणे कांहीं । विचाराया चाड नाहीं ॥३॥
264
आतां चक्रधरा । झणी आम्हांस अव्हेरा ॥१॥ तुमचीं म्हणविल्यावरी । जैसीं तैसीं तरी हरी ॥ध्रु.॥ काळ आम्हां खाय । तरी तुझें नांव जाय ॥२॥ तुका म्हणे देवा । आतां पण सिद्धी न्यावा ॥३॥
265
आतां चुकलें देशावर । करणें अकरणें सर्वत्र । घरासी आगर । आला सकळसद्धिींचा ॥१॥ जालों निधाईं निधानें। लागलें अनंतगुणरत्न । जन्माचें विच्छिन्न । दुःख जालें दारिद्र ॥ध्रु.॥ तारूं सागरिंचें अवचितें । हेंदोवलें आलें येथें । ओढिलें संचितें । पूर्वदत्तें लाधलें ॥२॥ तुकयाबंधु म्हणे सीमा । नाहीं आमुचिया दैवा । आतां पुरुषोत्तमा । ऐसा सवदागर सांपडला ॥३॥
266
आतां चुकलें बंधन गेलें विसरोनि दान । आपुले ते वाण सावकाश विकावे ॥१॥ लाभ जोडला अनंत घरीं सांपडलें वित्त । हातोहातीं थीत उरों तळ नल्हाचि ॥ध्रु.॥ होतें गोविलें विसारें माप जालें एकसरें । होतें होरें वारें तों चि लाहो साधिला॥२॥ कराया जतन तुका म्हणे निजधन । केला नारायण साहए नेदी विसंबों ॥३॥
267
आतां जावें पंढरीसी । दंडवत विठोबासी ॥१॥ जेथें चंद्रभागातिरीं । आम्ही नाचों पंढरपुरीं ॥ध्रु.॥ जेथें संतांची दाटणी । त्याचें घेऊं पायवणी ॥२॥ तुका म्हणे आम्ही बळी । जीव दिधला पायां तळीं ॥३॥
268
आतां तरी पुढें हाचि उपदेश । नका करूं नाश आयुष्याचा ॥१॥ सकळांच्या पायां माझें दंडवत । आपुलालें चित्त शुद्ध करा ॥ध्रु.॥ हित तें करावे देवाचें चिंतन । करूनियां मन एकविध ॥२॥ तुका म्हणे लाभ होय तो व्यापार । करा काय फार शिकवावें ॥३॥
269
आतां तरी मज सांगा साच भाव । काय म्यां करावें ऐसें देवा ॥१॥ चुकावया कर्म नव्हतें कारण । केला होय सीण अवघा चि ॥२॥ तुका म्हणे नको पाहूं निरवाण । देई कृपादान याचकासी ॥३॥
270
आतां तरी माझी परिसा वीनवती । रखुमाईंच्या पति पांडुरंगा ॥१॥ चुकलिया बाळा न मारावें जीवें । हित तें करावें मायबापीं ॥२॥ तुका म्हणे तुझा म्हणताती मज । आतां आहे लाज हे चि तुम्हां ॥३॥
271
आतां तळमळ । केली पाहिजे सीतळ ॥१॥ करील तें पाहें देव । पायीं ठेवुनियां भाव ॥ध्रु.॥ तो चि अन्नदाता । नाहीं आणिकांची सत्ता ॥२॥ तुका म्हणे दासा । नुपेक्षील हा भरवसा ॥३॥
272
आतां तुज कळेल तें करीं । तारिसी तरि तारीं मारीं । जवळी अथवा दुरी धरीं । घाली संसारीं अथवा नको ॥१॥ शरण आलों नेणतपणें । भाव आणि भक्ति कांहीं च नेणें । मतिमंद सर्वज्ञानें । बहु रंक उणें रंकाहुनी ॥ध्रु.॥ मन स्थिर नाहीं माझिये हातीं । इंद्रियें धांवतां नावरती । सकळ खुंटलिया युक्ति । शांति निवृत्ति जवळी नाहीं ॥२॥ सकळ निवेदिला भाव । तुझिये पायीं ठेविला जीव । आतां करीं कळे तो उपाव । तूं चि सर्व ठाव माझा देवा ॥३॥ राहिलों धरूनि विश्वास । आधार नेटीं तुझी कास । आणीक नेणें मी सायास । तुका म्हणे यास तुझें उचित ॥४॥
273
आतां तुज मज नाहीं दुजेपण । दाखवीं चरण पांडुरंगा ॥१॥ तुज रूप रेखा नाम गुण नाहीं । एक स्थान पाहीं गांव सिंव ॥ध्रु.॥ नावडे संगाति तुजा दुजयाची । आपुल्या भक्तांची प्रीति तुम्हां ॥२॥ परि आम्हांसाटीं होसील सगुण । स्तंभासी फोडून जयापरि ॥३॥ तुका म्हणें तैसें तुज काय उणें । देई दरुषण चरणांचें ॥४॥
274
आतां तुझा भाव कळों आला देवा । ठकूनियां सेवा घेसी माझी ॥१॥ टाकूनि सांकडें आपुलिये माथां । घातला या संतावरी भार ॥ध्रु.॥ स्तुती करवूनि पिटिला डांगोरा । तें कोण दातारा साच करी ॥२॥ जातीचें वाणी मी पोटींचे कुडें । नका मजपुढें ठकाठकी ॥३॥ तुका म्हणे नाहीं आलें अनुभवा । आधीं च मी देवा कैसें नाचों ॥४॥
275
आतां तुझें नाम गात असें गीतीं । म्हणोनी मानिती लोक मज ॥१॥ अन्नवस्त्रचिंता नाहीं या पोटाची । वारिली देहाची थोर पीडा ॥ध्रु.॥ सज्जन संबंधी तुटली उपाधी । रोकडी या बंदीं सुटलोंसें ॥२॥ घ्यावा द्यावा कोणें करावा सायास । गेली आशापाश वारोनियां ॥३॥ तुका म्हणे तुज कळेल तें आतां । करा जी अनंता मायबापा ॥४॥
276
आतां तुम्ही कृपावंत । साधु संत जिवलग ॥१॥ गोमटें तें करा माझें । भार ओझें तुम्हांसी ॥ध्रु.॥ वंचिलें तें पायांपाशीं । नाहीं यासी वेगळें ॥२॥ तुका म्हणे सोडिल्या गांठी । दिली मिठी पायांसी ॥३॥
277
आतां तूं तयास होईं वो उदास । आरंभला नास माझ्या जीवा ॥१॥ जरूर हें जालें मज कां नावडे । उपास रोकडे येती आतां ॥ध्रु.॥ बरें म्या तुझिया जीवाचें तें काय । व्हावें हें तें पाहें विचारूनि ॥२॥ तुज मज तुटी नव्हे या विचारें । सहित लेकुरें राहों सुखें ॥३॥ तुका म्हणे तरी तुझा माझा संग । घडेल वियोग कधीं नव्हे ॥४॥
278
आतां दुसरें नाहीं वनीं । निरांजनी पडिलों ॥१॥ तुमची च पाहें वास । अवघी आस निरसली ॥ध्रु.॥ मागिलांचा मोडला माग । घडला त्याग अरुची ॥२॥ तुका म्हणे करुणाकरा । तूं सोयरा जीवींचा ॥३॥
279
आतां देवा मोकळिलें । तुम्ही भलें दिसेना ॥१॥ आतां नाहीं जीवभाव । उरला ठाव वेगळा ॥ध्रु.॥ सांभाळुन घ्यावें देवा । आपणासवा यावरि ॥२॥ तुका म्हणे नग्न भाज । तरि ते लाज स्वामीसी ॥३॥
280
आतां देह अवसान । हें जतन तोंवरी ॥१॥ गाऊं नाचों गदारोळें । जिंकों बळें संसार ॥ध्रु.॥ या चि जीऊं अभिमानें । सेवाधनें बळकट ॥२॥ तुका म्हणे न सरें मागें । होईंन लागें आगळा ॥३॥
281
आतां दोघांमध्ये काय । उरलें होय वाणीजेसें ॥१॥ निष्ठ हें केलें मन । समाधान न करूनि ॥ध्रु.॥ झुरावें तें तेथींच्या परी । घरिच्याघरीं अवघिया ॥२॥ तुका म्हणे देवपण । गुंडाळून असों दे ॥३॥
282
आतां द्यावें अभयदान । जीवन ये कृपेचें ॥१॥ उभारोनी बाहो देवा । हात ठेवा मस्तकीं ॥ध्रु.॥ नाभी नाभी या उत्तरें । करुणाकरें सांतवीजे ॥२॥ तुका म्हणे केली आस । तो हा दिस फळाचा ॥३॥
283
आतां धरितों पदरीं । तुज मज करीन सरी ॥१॥ जालों जीवासी उदार । उभा ठाकलों समोर ॥२॥ तुका विनवीतसे संतां । ऐसें सांगा पंढरिनाथा ॥३॥
284
आतां धर्माधर्मी कांहीं उचित । माझें विचारावें हित । तुज मी ठाउका पतित । शरणागत परि जालों ॥१॥ येथें राया रंका एकी सरी । नाहीं भिन्नाभिन्न तुमच्या घरीं । पावलों पाय भलत्या परी । मग बाहेरी न घालावें ॥ध्रु.॥ ऐसें हें चालत आलें मागें । नाहीं मी बोलत वाउगें । आपुलिया पडिल्या प्रसंगें । कीर्ति हे जगे वाणिजेते ॥२॥ घालोनियां माथां बैसलों भार । सांडिला लौकिक वेव्हार । आधीं हे विचारिली थार । अविनाश पर पद ऐसें ॥३॥ येथें एक वर्म पाहिजे धीर । परि म्यां लेखिलें असार । देह हें नाशिवंत जाणार । धरिलें सार नाम तुझें ॥४॥ केली आराणुक सकळां हातीं । धरावें धरिलें तें चित्ती । तुका म्हणें सांगितलें संतीं । देई अंतीं ठाव मज देवा ॥५॥
285
आतां न करीं सोस । सेवीन हा ब्रम्हरस ॥१॥ सुखें सेवीन अमृत । ब्रम्हपदींचें निश्चित ॥ध्रु.॥ तुमचा निज ठेवा । आम्ही पाडियेला ठावा ॥२॥ तुका म्हणे देवरांया । आतां लपालेती वांयां ॥३॥
286
आतां न म्हणे मी माझें । नेघें भार कांहीं ओझें ॥१॥ तूं चि तारिता मारिता । कळों आलासी निरुता ॥ध्रु.॥ अवघा तूं चि जनार्दन । संत बोलती वचन ॥२॥ तुका म्हणे पांडुरंगा । तुझ्या रिगालों वोसंगा ॥३॥
287
आतां न राहें क्षण एक । तुझा कळला रे लौकिक । नेदीं हालों एक । कांहीं केल्यावांचूनि ॥१॥ संबंध पडिला कोणाशीं । काय डोळे झांकितोसी । नेईंन पांचांपाशीं । दे नाहींतरी वोढूनि ॥ध्रु.॥ सुखें नेदीस जाणवलें । नास केल्याविण उगलें । तरि तें ही विचारिलें । आम्ही आहे तुज आधीं ॥२॥ असें च करूनि किती । नागविलीं नाहीं नीती । तुकयाबंधु म्हणे अंतीं । न सोडिसी ते खोडी ॥३॥
288
आतां नको चुकों आपुल्या उचिता । उदारा या कांता रखुमाईंच्या ॥१॥ आचरावे दोष हें आम्हां विहित । तारावे पतित तुमचें तें ॥ध्रु.॥ आम्ही तों आपुलें केलेसें जतन । घडो तुम्हांकून घडेल ते ॥२॥ तुका म्हणे विठो चतुराच्या राया । आहे ते कासया मोडों देसी ॥३॥
289
आतां नये बोलों अव्हेराची मात । बाळावरि चित्त असों द्यावें ॥१॥ तुज कां सांगणें लागे हा प्रकार । परि हें उत्तर आवडीचें ॥ध्रु.॥ न वंचीं वो कांहीं एकही प्रकार । आपणां अंतर नका मज ॥२॥ तुका म्हणे मोहो राखावा सतंत । नये पाहों अंत पांडुरंगा ॥३॥
290
आतां नव्हे गोड कांहीं करितां संसार । आणीक संचार जाला माजी ॥१॥ ब्रम्हरसें गेलें भरूनियां अंग । आधील तो रंग पालटला ॥ध्रु.॥ रसनेचिये रुची कंठीं नारायण । बैसोनियां मन निवविलें ॥२॥ तुका म्हणे आतां बैसलों ठाकणीं । इच्छेची ते धणी पुरईंल ॥३॥
291
आतां नेम जाला । या च कळसीं विठ्ठला ॥१॥ हातीं न धरीं लेखणी । काय भुसकट ते वाणी ॥ध्रु.॥ जाणें तेणें काळ । उरला सारीन सकळ ॥२॥ तुका म्हणे घाटी । चाटू कोरडा शेवटीं ॥३॥
292
आतां पहाशील काय माझा अंत । आलों शरणागत तुज देवा ॥१॥ करीं अंगीकार राखें पायांपाशीं । झणीं दिसों देसी केविलवाणें ॥ध्रु.॥ नाहीं आइकिली मागें ऐसी मात । जे त्वां शरणागत उपेक्षिले ॥२॥ तुका म्हणे आतां धरीं अभिमान । आहेसी तूं दानशूर दाता ॥३॥
293
आतां पावन सकळ सुखें । खादलें कदा तें नखें । अवघे सरलें पारिखें । सकळ देखें माहियरें ॥१॥ जवळी विठ्ठल रखुमाई । बहिणी बंधु बाप आई । सकळ गोताची च साई । पारिखें काई ऐसें नेणिजे ॥ध्रु.॥ जगदाकारीं जाली सत्ता । वारोनी गेली पराधीनता । अवघे आपुलें चि आतां । लाज आणि चिंता दुर्हावली ॥२॥ वावरे इच्छा वसे घरीं । आपुले सत्तेचे माहेरीं । करवी तैसें आपण करी । भीड न घरी चुकल्याची ॥३॥ सोसिला होता सासुरवास । बहुतांचा बहुत दिवस । बहु कामें पुरविला सोस । आतां उदास आपुल्यातें ॥४॥ करिती कवतुक लाडें । मज बोलविती कोडें । मायबाप उत्तरें गोडें । बोले बोबडें पुढें तुका ॥५॥
294
आतां पाविजेल घरा । या दातारा संगती ॥१॥ पायावरि ठेवूं माथा । सर्वथा हा नुपेक्षी ॥ध्रु.॥ येथून तेथवरि आतां । नाहीं सत्ता आणिकांची ॥२॥ तुका म्हणे चक्रपाणी । शिरोमणी बळियांचा ॥३॥
295
आतां पाहों पंथ माहेराची वाट । कामाचा बोभाट पडो सुखें ॥१॥ काय करूं आतां न गमेसें जालें । बहुत सोसिलें बहु दिस ॥ध्रु.॥ घर लागे पाठी चित्ती उभे वारे । आपुलें तें झुरे पाहावया ॥२॥ तुका म्हणे जीव गेला तरी जाव । धरिला तो देव भाव सिद्धी ॥३॥
296
आतां पुढें धरीं । माझे आठव वैखरी ॥१॥ नको बडबडूं भांडे । कांहीं वाउगें तें रांडें ॥ध्रु.॥ विठ्ठल विठ्ठल । ऐसे सांडुनियां बोल ॥२॥ तुका म्हणे आण । तुज स्वामीची हे जाण ॥३॥
297
आतां पुढें मना । चाली जाली नारायणा ॥१॥ येथें राहिलें राहिलें । कैसें गुंतोनि उगलें ॥ध्रु.॥ भोवतें भोंवनी । आलियांची जाली धणी ॥२॥ तुका म्हणे रंग रंग । रंगलें पांडुरंगे ॥३॥
298
आतां पोरा काय खासी । गोहो जाला देवलसी ॥१॥ डोचकें तिंबी घातल्या माळा । उदमाचा सांडी चाळा ॥ध्रु.॥ आपल्या पोटा केली थार । आमचा नाहीं येसपार ॥२॥ हातीं टाळ तोंड वासी । गाय देउळीं । देवापासीं ॥३॥ आतां आम्ही करूं काय । न वसे घरीं राणा जाय ॥४॥ तुका म्हणे आतां धीरी । आझुनि नाहीं जालें तरी ॥५॥
299
आतां बरें घरिच्याघरीं । आपली उरी आपणापें ॥१॥ वाइटबरें न पडे दृष्टी । मग कष्टी होइजेना ॥ध्रु.॥ बोलों जातां वाढे बोल । वांयां फोल खटखट ॥२॥ काकुलती यावें देवा । तो तों सेवा इच्छितो ॥३॥ हिशोबाचे खटखटे । चढे तुटे घडेना ॥४॥ तुका म्हणे कळों आलें । दुसरें भलें तों नव्हे ॥५॥
300
आतां बरें जालें । माझे माथांचें निघालें ॥१॥ चुकली हे मरमर । भार माथांचे डोंगर ॥ध्रु.॥ नसतां कांहीं जोडी । करिती बहुतें तडातोडी ॥२॥ जाला झाडापाडा । तुका म्हणे गेली पीडा ॥३॥
301
आतां बरें जालें । माझें मज कळो आलें ॥१॥ खोटा ऐसा संवसार । मज पायीं द्यावी थार ॥ध्रु.॥ उघडले डोळे । भोग देताकाळीं कळे ॥ तुका म्हणे जीवा । होतां तडातोडी देवा ॥३॥
302
आतां बरें जालें । सकाळीं च कळों आलें ॥१॥ मज न ठेवीं इहलोकीं । आलों तेव्हां जाली चुकी ॥ध्रु.॥ युगमहिमा ठावा । नव्हता ऐसा पुढें देवा ॥२॥ तुका म्हणे ठेवीं । भोगासाटीं निरयगांवीं ॥३॥
303
आतां भय नाहीं ऐसें वाटे जीवा । घडलिया सेवा समर्थाची ॥१॥ आतां माझ्या मनें धरावा निर्धार । चिंतनीं अंतर न पडावें ॥ध्रु.॥ येथें नाहीं जाली कोणांची निरास । आल्या याचकास कृपेविशीं ॥२॥ तुका म्हणे येथें नाहीं दुजी परी । राया रंका सरी देवा पायीं ॥३॥
304
आतां मज तारीं । वचन हें साच करीं ॥१॥ तुझें नाम दिनानाथ । ब्रिदावळी जगविख्यात ॥ध्रु.॥ कोण लेखी माझ्या दोषा । तुझा त्रिभुवनीं ठसा ॥२॥ वांयां जातां मज । तुका म्हणे तुम्हां लाज ॥३॥
305
आतां मज देवा । इचे हातींचें सोडवा ॥१॥ पाठी लागलीसे लांसी । इच्छा जिते जैसी तैसी ॥ध्रु.॥ फेडा आतां पांग । अंगीं लपवुनी अंग ॥२॥ दुजें नेणें तुका । कांहीं तुम्हासी ठाउका ॥३॥
306
आतां मज धरवावी शुद्धी । येथुनी परतवावी बुद्धी । घ्यावें सोडवुनि कृपानिधि । सांपडलों संधीं काळचक्रीं ॥१॥ करिसील तरि नव्हे काई । राईचा डोंगर पर्वत राई । आपुले करुणेची खाई । करीं वो आई मजवरी ॥ध्रु.॥ मागील काळ अज्ञानपणें । सरला स्वभावें त्या गुणें । नेणे आयुष्य जालें उणें । पुढील पेणें अंतरलें ॥२॥ आतां मज वाटतसे भय । दिवसेंदिवस चालत जाय । येथें म्या येउनि केलें काय । नाहीं तुझे पाय आठविले ॥३॥ करूनि अपराध क्षमा । होतील केले पुरुषोत्तमा । आपुले नामीं घ्यावा प्रेमा । सोडवीं भ्रमापासुनिया ॥४॥ हृदय वसो तुमच्या गुणीं । ठाव हा पायांपें चरणीं । करूं हा रस सेवन वाणी । फिटे तों धणी तुका म्हणे ॥५॥
307
आतां मागतों तें ऐक नारायणा । भावपूर्वक मनापासूनियां ॥१॥ असों दे मोकळी जिव्हा जरि गाइल गुण । नाहीं तरी खिळुन टाकीं परती ॥ध्रु.॥ मातेचिया परी देखती परनारी । ठेवीं नेत्र तरी नाहीं तरि नको ॥२॥ तरी बरें कांटाळा करिती निंदास्तुतीचा । नाहीं तरि कानांचा ही देख प्रेत्न ॥३॥ सकळ इंद्रियांचा निग्रह करूनि एक । राखवीं पृथक तोडोनि भ्रम ॥४॥ तुकयाबंधु म्हणे ते चि वाट प्राणां । पडता नारायणा विसर तुझा ॥५॥
308
आतां माझा नेणों परतों भाव । विसावोनि पायीं ठेविला जीव । सकळां लाभांचा हा ठाव । ऐसा वाव जाला चित्तीठायीं ॥१॥ भांडवल गांठी तरि विश्वास । जालों तों जालों निश्चय दास । न पाहें मागील ते वास । पुढती सोस सेवेचा ची ॥ध्रु.॥ आहे तें निवेदिलें सर्व । मी हें माझें मोडियला गर्व । अकाळीं काळ अवघें पर्व । जाला भरवसा कृपेलाभाचा ॥२॥ वेव्हारीं वेव्हारा अनंत । नाहीं यावांचुनी जाणत । तरी हें समाधान चत्ति । लाभहानी नाहीं येत अंतरा ॥३॥ करूनि नातळों संसारा । अंग भिन्न राखिला पसारा । कळवळा तो जीवनीं खरा । बीजाचा थारा दुरी आघात ॥४॥ बहु मतापासूनि निराळा । होऊनि राहिलों सोंवळा । बैसल्या रूपाचा कळवळा । तुका म्हणे डोळां लेइलों तें ॥५॥
309
आतां माझा सर्वभावें हा निर्धार । न करीं विचार आणिकांसी ॥१॥ सर्वभावें नाम गाईंन आवडी । सर्व माझी जोडी पाय तुझे ॥ध्रु.॥ लोटांगण तुझ्या घालीन अंगणीं । पाहीन भरोनि डोळे मुख ॥२॥ निर्लज्ज होऊनि नाचेन रंगणीं । येऊं नेदी मनीं शंका कांहीं ॥३॥ अंकित अंकिला दास तुझा देवा । संकल्प हा जीवा तुका म्हणे ॥४॥
310
आतां माझे नका वाणूं गुण दोष । करितों उपदेश याचा कांहीं ॥१॥ मानदंभासाठीं छळीतसें कोणा । आण या चरणां विठोबाची ॥२॥ तुका म्हणे हें तों ठावें पांडुरंगा । काय कळे जगा अंतरींचें ॥३॥
311
आतां माझे सखे येती वारकरी । जीवा आस थोरी लागली ते ॥१॥ सांगतील माझ्या निरोपाची मात । सकळ वृत्तांत माहेरींचा ॥ध्रु.॥ काय लाभ जाला काय होतें केणें । काय काय कोणे सांटविलें ॥२॥ मागणें तें काय धाडिलें भातुकें । पुसेन तें सुखें आहेतसीं ॥३॥ तुका म्हणे काय सांगती ते कानीं । ऐकोनियां मनीं धरुनि राहें ॥४॥
312
आतां माझ्या दुःखा कोण हो सांगाती । रखुमाईचा पति पावे चि ना ॥१॥ कायविधा त्यानें घातलीसे रेखा । सुटका या दुःखा न होय चि ॥२॥ तुका म्हणे माझी विसरूं नको चिंता । अगा पंढरिनाथा पाव वेगी ॥३॥
313
आतां माझ्या भावा । अंतराय नको देवा ॥१॥ आलें भागा तें करितों । तुझें नाम उच्चारितों ॥ध्रु.॥ दृढ माझें मन । येथें राखावें बांधोन ॥२॥ तुका म्हणे वाटे । नको फुटों देऊं फांटे ॥३॥
314
आतां माझ्या मना । इची घडो उपासना ॥१॥ ऐसें करींपांडुरंगा । प्रेमवोसंडेसेंअंगा ॥ध्रु.॥ सर्व काळ नये । वाचेविट आड भये ॥२॥ तुका वैष्णवांसंगती । हें चि भजन पंगती ॥३॥
315
आतां माझ्या मायबापा । तूं या पापा प्रायिश्चत्त ॥१॥ फजित हे केले खळ । तो विटाळ निवारीं ॥ध्रु.॥ प्रेम आतां पाजीं रस । करीं वास अंतरीं ॥२॥ तुका म्हणे पांडुरंगा । जिवलगा माझिया ॥३॥
316
आतां मी अनन्य येथें अधिकारी । होइन कोणे परी नेणें देवा ॥१॥ पुराणींचा अर्थ ऐकतां मानस । होतो कासावीस जीव माझा ॥ध्रु.॥ इंिद्रयांचे आम्ही पांगिलों अंकित । त्यांच्यासंगें चित्त रंगलें तें ॥२॥ एकाचें ही जेथें न घडे दमन । अवघीं नेमून कैसीं राखों ॥३॥ तुका म्हणे जरी मोकळिसी आतां । तरी मी अनंता वांयां गेलों ॥४॥
317
आतां मी देवा पांघरों काईं । भिकेचें तें ही उरे चि ना ॥१॥ सदैव दुबळें नेणें चोर । देखोनि सुनाट फोडितो घर ॥ध्रु.॥ नाहीं मजपाशीं फुटकी फोडी । पांचांनीं घोंगडी दिली होती ॥२॥ तुका म्हणे जना वेगळें जालें । एक चि नेलें एकल्याचें ॥३॥
318
आतां मी न पडें सायासीं । संसारदुःखाचिये पाशीं । शरण रिघेन संतांसी । ठाव पायांपाशीं मागेन त्यां ॥१॥ न कळे संचित होतें काय । कोण्या पुण्यें तुझे लाधती पाय । आतां मज न विसंबें माय । मोकलूनि धाय विनवीतसें ॥२॥ बहुत जाचलों संसारें । मोहमायाजाळाच्या विखारें । त्रिगुण येतील लहरें । तेणें दुःखें थोरें आक्रंदलों ॥३॥ आणीक दुःखें सांगों मी किती । सकळ संसारिस्थती । न साहे पाषाण फुटती । भय चित्ति कांप भरलासे ॥४॥ आतां मज न साहवे सर्वथा । संसारगंधीची हे वार्ता । जालों वेडा असोनि जाणता । पावें अनंता तुका म्हणे ॥५॥
319
आतां मी पतित ऐसा साच भावें । कळों अनुभवें आलें देवा ॥१॥ काय करावें तें रोकडें चि करीं । राहिली हे उरी नाहीं दोघां ॥ध्रु.॥ येर येरा समदृष्टी द्यावें या उत्तरा । यासी काय करा गोही आतां ॥२॥ तुका म्हणे मेलों सांगतसांगतां । तें चि आलें आतां कळों तुम्हां ॥३॥
320
आतां मी सर्वथा नव्हें गा दुर्बळ । यातिहीनकुळ दैन्यवाणा ॥१॥ माय रखुमाईं पांडुरंग पिता । शुद्ध उभयतां पक्ष दोन्ही ॥ध्रु.॥ बापुडा मी नव्हें दुर्बळ ठेंगणा । पांगिला हा कोणा आणिकांसी ॥२॥ दृष्ट नव्हों आम्ही अभागी अनाथ । आमुचा समर्थ कैवारी हा ॥३॥ संवसार आम्हां सरला सकळ । लपोनियां काळ ठेला धाकें ॥४॥ तुका म्हणे जालों निर्भर मानसीं । जोडलिया रासी सुखाचिया ॥५॥
321
आतां मोकलावें नव्हे हें उचित । तरी कृपावंत म्हणवावें ॥१॥ पूर्वा भक्त जाले सर्व आपंगिले । नाहीं उपेक्षिले तुम्हीं कोणी ॥ध्रु.॥ माझिया वेळेसि कां गा लपालासी । विश्व पोसितोसि लपोनियां ॥२॥ करावी म्हणावी सर्वां भूतीं दया । तरी भेटावया येईंन मी ॥३॥ तरी माझे हाती देई मनबुद्धि । जरि दयानिधि येशील तूं ॥४॥ तुका म्हणे तूं चि अवघा सूत्रधारी । माझी सत्ता हरी काय आहे ॥५॥
322
आतां येणें पडिपाडें । रस सेवूं हा निवाडें । मुंगी नेली गोडें । ठेविलिये अडचणी ॥१॥ तैसें होय माझ्या जीवा । चरण न सोडीं केशवा । विषयबुद्धि हेवा । वोस पडो सकळ ॥ध्रु.॥ भुकेलिया श्वाना । गांठ पडे सवें अन्ना । भुकों पाहे प्राणा । परि तोंडिंची न सोडी ॥२॥ काय जिंकियेलें मन । जीवित्व कामातुरा तृण । मागे विभिचारिण । भक्ती तुका ये जाती ॥३॥
323
आतां येणें बळें पंढरीनाथ । जवळी राहिला तिष्ठत । पाहातां न कळे जयाचा अंत । तो चि हृदयांत घालूं आतां ॥१॥ विसरोनि आपुला देहपणभाव । नामें चि भुलविला पंढरीराव । न विचारी याती कुळ नांव । लागावया पाव संतांचे ॥२॥ बरें वर्म आलें आमुचिया हातां । हिंडावें धुंडावें न लगतां । होय अविनाश सहाकारी दाता । चतुर्भुज संता परि धाकें ॥३॥ होय आवडी सानें थोर । रूप सुंदर मनोहर । भक्तिप्रिय लोभापर । करी आदर याचकपणें ॥४॥ तें वर्म आलें आमुच्या हाता । म्हणोनि शरण निघालों संतां । तुका म्हणे पंढरीनाथा । न सोडी आतां जीवें भावें ॥५॥
324
आतां येणेंविण नाहीं आम्हां चाड । कोण बडबड करी वांयां ॥१॥ सुख तें चि दुःख पुण्यपाप खरें । हें तों आम्हां बरें कळों आलें ॥ध्रु.॥ तुका म्हणे वाचा वाईली अनंता । बोलायाचें आतां काम नाहीं ॥३॥
325
आतां येथें खरें । नये फिरतां माघारें ॥१॥ होइल हो तैसी आबाळी । देहनिमित्य या बळी ॥ध्रु.॥ तुम्हांसवें गांठी । देवा जीवाचिये साटीं ॥२॥ तुका नव्हे लंड । करूं चौघांमध्यें खंड॥३॥
326
आतां येथें जाली जीवासवेंसाटी । होतें तैसें पोटीं फळ आलें ॥१॥ आतां धरिले ते नो सोडीं चरण । सांपडलें धन निजठेवा ॥ध्रु.॥ आतां हा अळस असो परता दुरी । नेदावी तें उरी उरों कांहीं ॥२॥ आतां याचा मज न व्हावा विसर । भरोनि अंतर राहों रूप ॥३॥ आतां लोकलाज नयो येथें आड । बहु जालें गोड ब्रम्हरस ॥४॥ तुका म्हणे आतां जन्म हा सफळ । अंतरीं गोपाळ स्थिरावला ॥५॥
327
आतां येथें लाजे नाहीं तुझें काम । जाय मज राम आठवूं दे ॥१॥ तुझे भिडे माझे बहु जाले घात । केलों या अंकित दुर्जनाचा ॥ध्रु.॥ माझें केलें मज पारिखें माहेर । नटोनी साचार चाळविलें ॥२॥ सुखासाटीं एक वाहियेलें खांदीं । तेणें बहु मांदी मेळविली ॥३॥ केला चौघाचार नेलों पांचांमधीं । नाहीं दिली शुद्धी धरूं आशा ॥४॥ तुका म्हणे आतां घेईंन कांटीवरी । धनी म्यां कैवारी केला देव ॥५॥
328
आतां वांटों नेदीं आपुलें हें मन । न सोडीं चरण विठोबाचे ॥१॥ दुजियाचा संग लागों नेदीं वारा । आपुल्या शरीरावरूनियां ॥ध्रु.॥ यावें जावें आम्हीं देवा च सांगातें । मागूनी करीत हें चि आलों ॥२॥ काय वांयां गेलों तो करूं उद्वेग । उभा पांडुरंग मागें पुढें ॥३॥ तुका म्हणे प्रेम मागतों आगळें । येथें भोगूं फळें वैकुंठींचीं ॥४॥
329
आतां सांडूं तरी हातीं ना पदरीं । सखीं सहोदरीं मोकळिलों ॥१॥ जनाचारामध्यें उडाला पातेरा । जालों निलाजिरा म्हणऊनि ॥ध्रु.॥ कोणाचिया दारा जावेनासें जालें । म्यां च विटंबिलें आपणासी ॥२॥ कां न जाला माझे बुद्धीसी संचार । नाहीं कोठें थार ऐसें जालें ॥३॥ तुका म्हणे तुज भक्त जाले फार । म्हणोनियां थार नाहीं येथें ॥४॥
330
आतां सोडवणें न या नारायणा । तरि मी न वंचे जाणा काळा हातीं ॥१॥ ऐसें सांगोनिया जालों उतराईं । आणीक तें काईं माझे हातीं ॥ध्रु.॥ केलियाचें माप नये सेवटासी । करितील नासि अंतराय ॥२॥ तुका म्हणे भय वाटतसे जीवा । धांवणिया धांवा लवकरी ॥३॥
331
आतां हे सेवटीं । माझी आइकावी गोष्टी ॥१॥ आतां द्यावा वचनाचा । जाब कळे तैसा याचा ॥ध्रु.॥ आतां करकर । पुढें न करीं उत्तर ॥२॥ तुका म्हणे ठसा । तुझा आहे राखें तैसा ॥३॥
332
आतां हें उचित माझें जना हातीं । पाहिजे फजीती केली कांहीं ॥१॥ मग हे तुमचे न सोडीं चरण । त्रासोनियां मन येइल ठाया ॥ध्रु.॥ वाउगे वाणीचा न धरीं कांटाळा । ऐसी कां चांडाळा बुद्धि मज ॥२॥ तुका म्हणे जरि माथां बैसे घाव । तरि मग वाव नेघे पुढें ॥३॥
333
आतां हें चि जेऊं हेंचि जेऊं । सवें घेऊं सिदोरी ॥१॥ हरिनामाचा खिचडा केला । प्रेमें मोहिला साधनें ॥ध्रु.॥ चवीं चवीं घेऊं घास । ब्रम्हरस आवडी ॥२॥ तुका म्हणे गोड लागे । तों तों मागे रसना ॥३॥
334
आतां हें चि सार हें चि सार । मूळबीज रे आइका ॥१॥ आवडीनें आवडी उरे । जें ज्या झुरे तें त्यासी ॥ध्रु.॥ प्रेमाचिया सूत्रदोरी । नाहीं उरी उरवी ॥२॥ तुका म्हणे चिंतन बरें । आहे खरें ख†यापें ॥३॥
335
आतां हें न सुटे न चुके । बोल कां दवडिसी फिके । जन लोक पारिखें । अवघें केलें म्यां यासाटीं ॥१॥ नये सरतां नव्हे भलें । तुझें लक्षण कळलें । बैसलासी काढिलें । देहाचें मुळीं दिवाळें ॥ध्रु.॥ दिसतोसी बरा बोल कोंवळे । गुण मैंदाचे चाळे । दिसताती ये वेळे । काय करूं विसंबोनि ॥२॥ तुकयाबंधु म्हणे देखतां । अंध बहिर ऐकतां । कैसें व्हावें आतां । इतकियाउपरी ॥३॥
336
आतां हें सेवटीं असों पायांवरी । वदती वैखरी वागपुष्प ॥१॥ नुपेक्षावें आम्हां दीना पांडुरंगा । कृपादानीं जगामाजी तुम्हीं ॥ध्रु.॥ वोळवुनी देह सांडियेली शुद्ध । सारियेला भेद जीव शिव ॥२॥ तुका म्हणे मन तुमचे चरणीं । एवढी आयणी पुरवावी ॥३॥
337
आतां होइन धरणेकरी । भीतरीच कोंडीन ॥१॥ नाही केली जीवेंसाटी । तों कां गोष्टी रुचे तें ॥ध्रु.॥ आधी निर्धार तो सार । मग भार सोसीन ॥२॥ तुका म्हणे खाऊं जेवूं । नेदूं होऊं वेगळा ॥३॥
338
आतां होई माझे बुद्धीचा जनिता । अवरावें चित्ती पांडुरंगा ॥१॥ येथूनियां कोठें न वजें बाहेरी । ऐसें मज धरीं सत्ताबळें ॥ध्रु.॥ अनावर गुण बहुतां जातींचे । न बोलावें वाचे ऐसें करीं ॥२॥ तुका म्हणे हित कोणिये जातीचें । तुज ठावें साचें मायबापा ॥३॥
339
आत्मस्थिति मज नको हा विचार । देईं निरंतर चरणसेवा ॥१॥ जन्मोजन्मीं तुझा दास पुरुषोत्तमा । हे चि गोडी माझ्या देई जीवा ॥ध्रु.॥ काय सायुज्यता मुक्ति हे चि गोड । देव भक्त कोड तेथें नाहीं ॥२॥ काय तें निर्गुण पाहों कैशा परी । वर्णू तुझी हरी कीर्ती कैसी ॥३॥ गोड चरणसेवा देवभक्तपण । मज देवा झणें दुराविसी ॥४॥ जाणिवेपासूनि सोडवीं माझ्या जीवा । देईं चरणसेवा निरंतर ॥५॥ तुका म्हणे गोडा गोड न लगे प्रीतिकर । प्रीति ते ही सार सेवा हे रे ॥६॥
340
आदि मध्य अंत दाखविला दीपें । हा तों आपणापें यत्न बरा ॥१॥ दाशत्वे दाविलें धन्याचें भांडार । तोंतों नव्हे सार एथुनियां ॥ध्रु.॥ उपायानें सोस नासला सकळ । सत्ते सत्ताबळ अंगा आलें ॥२॥ तुका म्हणे दृष्टी सकळांचे शिरीं । वचन चि करी बैसोनियां ॥३॥
341
आदि वर्तमान जाणसी भविष्य । मागें पुढें नीस संचिताचा ॥१॥ आतां काय देऊं पायांपें परिहार । जाणां तो विचार करा देवा ॥ध्रु.॥ आपुलें तें येथें काय चाले केलें । जोडावे ते भले हात पुढें ॥२॥ तुका म्हणे फिके बोल माझे वारा । कराल दातारा होईंल तें ॥३॥
342
आधार तो व्हावा । ऐसी आस करीं देवा ॥१॥ तुम्हांपाशीं काय उणें । काय वेचे समाधानें ॥ध्रु.॥ सेवेच्या अभिळासें । मन बहु जालें पिसें ॥२॥ अरे भक्तापराधीना । तुका म्हणे नारायणा ॥३॥
343
आधारावांचुनी । काय सांगसी काहाणी ॥१॥ ठावा नाहीं पंढरीराव । तोंवरी अवघें चि वाव ॥ध्रु.॥ मानिताहे कोण । तुझें कोरडें ब्रम्हज्ञान ॥२॥ तुका म्हणे ठेवा । जाणपण एक सवा ॥३॥
344
आधिल्या भ्रतारें काम नव्हे पुरा । म्हणोनि व्यभिचारा टेकलियें ॥१॥ रात्रंदिस मज पाहिजे जवळी । क्षण त्यानिराळी न गमे घडी ॥२॥ नाम गोष्टी माझी सोय सांडा आतां । रातलें अनंता तुका म्हणे ॥३॥
345
आधी नाहीं कळों आला हा उपाय । नाहीं तरी काय चुकी होती ॥१॥ घालितो पायांसी मिठी एकसरें । नेदीं तो दुसरें आड येऊं ॥ध्रु.॥ कासया पडतों लटिक्याचे भरी । नव्हता का शिरीं भार घेतों ॥२॥ तुका म्हणे कां हे घेतों गर्भवास । कां या होतों दास कुटुंबाचा ॥३॥
346
आधीं कां मज लावियेली सवे । आतां न राहावे तुजविण ॥१॥ पहिलें चि तोंडक कां गा नाहीं केलें । आतां उपेक्षिलें न सोडीं मी ॥ध्रु.॥ कृपेच्या सागरा न पाहें निर्वाण । जालों तुजवीण कासावीस ॥२॥ तुका म्हणे कोठें गुंतलेति हरी । येई झडकरी पांडुरंगा ॥३॥
347
आधीं च आळशी । वरी गुरूचा उपदेशी ॥१॥ मग त्या कैंची आडकाठी । विधिनिषेधाची भेटी ॥ध्रु.॥ नाचरवे धर्म । न करवे विधिकर्म ॥२॥ तुका म्हणे ते गाढव । घेती मनासवें धांव ॥३॥
348
आधीं देह पाहता वाव । कैचा प्रारब्धासी ठाव ॥१॥ कां रे रडतोसी माना । लागें विठ्ठलचरणा ॥ध्रु.॥ दुजेपण जालें वाव । त्रिभुवनासि नाहीं ठाव ॥२॥ तुका म्हणे खरे पाहें । विठ्ठल पाहोनियां राहें ॥३॥
349
आधीं सोज्वळ करावा मारग । चालतां तें मग गोवी नाहीं ॥१॥ ऐसा चालोनियां आला शिष्टाचार । गोवीचा वेव्हार पापपुण्य ॥ध्रु.॥ पळणें तों पळा सांडुनि कांबळें । उपाधीच्या मुळें लाग पावे ॥२॥ तुका म्हणे येथें शूर तो निवडे । पडिले बापुडे कालचक्रीं ॥३॥
350
आनंदले लोक नरनारी परिवार । शंखभेरीतुरें वाद्यांचे गजर ॥१॥ आनंद जाला अयोध्येसी आले रघुनाथ । अवघा जेजेकार आळंगिला भरत ॥ध्रु.॥ करिती अक्षवाणें ओंवाळिती रघुवीरा । लक्ष्मीसहित लक्ष्मण दुसरा ॥२॥ जालें रामराज्य आनंदलीं सकळें । तुका म्हणे गाईंवत्सें नरनारीबाळें ॥३॥
351
आनंदाचा कंद गाइयेला गीतीं । पाहियेला चित्ती देवराव ॥१॥ देवराव तो ही आहे नश्चियेसीं । अखंड नामासी बोलवितो ॥२॥ बोलवितो मज कृपा तो करूनि । तुका म्हणे मनीं धरा भाव ॥३॥
352
आनंदाचा थारा । सुखें मोहरला झरा ॥१॥ ऐसी प्रभुची ज्या कळा । त्याच्या कोण पाहे बळा ॥ध्रु.॥ अंकिता ऐसया । होइल पावविलें ठाया ॥२॥ तुका म्हणे ऐसें । दिलें आभंड प्रकासे ॥३॥
353
आनंदाचे डोहीं आनंदतरंग । आनंद चि अंग आनंदाचें ॥१॥ काय सांगों जालें कांहीचियाबाही । पुढें चाली नाहीं आवडीनें ॥ध्रु.॥ गर्भाचे आवडी मातेचा डोहळा । तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥२॥ तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा । अनुभव सरिसा मुखा आला ॥३॥
354
आनंदाच्या कोटी । सांटवल्या आम्हां पोटीं ॥१॥ प्रेम चालिला प्रवाहो । नामओघ लवलाहो ॥ध्रु.॥ अखंड खंडेना जीवन । राम कृष्ण नारायण ॥२॥ थडी आहिक्य परत्र । तुका म्हणे सम तीर ॥३॥
355
आनंदें एकांतीं प्रेमें वोसंडत । घेऊं अगणित प्रेमसुख ॥१॥ गोप्य धन वारा लागों यास । पाहों नेदूं वास दुर्जनासी ॥ध्रु.॥ झणी दृष्टि लागे आवडीच्या रसा । सेवूं जिरे तैसा आपणासी ॥२॥ तुका म्हणे हें बहु सकुमार । न साहावे भार वचनाचा ॥३॥
356
आनंदें कीर्तन कथा करीं घोष । आवडीचा रस प्रेमसुख ॥१॥ मज या आवडे वैष्णवांचा संग । तेथें नाहीं लाग कळिकाळा ॥ध्रु.॥ स्वल्प मात्र वाचे बैसलासे निका । राम कृष्ण सखा नारायण ॥२॥ विचारितां मज दुजें वाटे लाज । उपदेशें काज आणीक नाहीं ॥३॥ तुका म्हणे चित्त रंगलेंसे ठायीं । माझें तुझ्या पायीं पांडुरंगा ॥४॥
357
आनुहातीं गुंतला नेणे बाह्य रंग । वृत्ति येतां मग बळ लागे ॥१॥ मदें माते तया नाहीं देहभाव । आपुले आवेव आवरितां ॥ध्रु.॥ आणिकांची वाणी वेद तेणें मुखें । उपचारदुःखें नाठवती ॥२॥ तें सुख बोलतां आश्चर्य या जना । विपरीत मना भासतसे ॥३॥ तुका म्हणे बाह्य रंग तो विठ्ठल । अंतर निवालें ब्रम्हरसें ॥४॥
358
आपटा संवदड रानचारा । दसर्याचा होय तुरा ॥१॥ तैसा देवामुळें मान । नाहीं तरी पुसें कोण ॥ध्रु.॥ मृत्तिकेची ते घागरी । पाण्यासाटीं बैसे शिरी ॥२॥ तुका म्हणे माप जाण । दाण्यासवें घेणें देणें ॥३॥
359
आपण चाळक बुद्धीच्या संचारा । आम्हांसी वेव्हारा पात्र केलें ॥१॥ काय जालें तरी नेघा तुम्हीं भार । आणीक कोणां थोर म्हणों सांगा ॥ध्रु.॥ पंच भूतें तंव कर्माच्या या मोटा । येथें खरा खोटा कोण भाव ॥२॥ तुका म्हणे नाहीं बोलावया जागा । कां देवा वाउगा श्रम करूं ॥३॥
360
आपण चि व्हाल साहे । कसियाला हे धांवणी ॥१॥ भाकिली ते उरली कींव । आहे जीव जीवपणें ॥ध्रु.॥ आहाच कैंचा बीजा मोड । प्रीति कोड वांचूनि ॥२॥ तुका म्हणे दंडिन काया । याल तया धांवणिया ॥३॥
361
आपण तों असा । समर्थ जी हृषीकेशा ॥१॥ करा करा बुझावणी । काय विलंब वचनीं ॥ध्रु.॥ हेंगे ऐसें म्हणा । उठूनि लागेन चरणा ॥२॥ घेऊनियां सुखें । नाचेल तुका कवतुकें ॥३॥
362
आपणा लागे काम वाण्याघरीं गुळ । त्याचे याति कुळ काय कीजे ॥१॥ उकरड्यावरी वाढली तुळसी । टाकावी ते कैसी ठायागुणें ॥ध्रु.॥ गाईंचा जो भक्ष अमंगळ खाय । तीचें दूध काय सेवूं नये ॥२॥ तुका म्हणे काय सलपटासी काज । फणसांतील बीज काढुनि घ्यावें ॥३॥
363
आपला तो एक देव करुनि घ्यावा । तेणेंविण जीवा सुख नव्हे ॥१॥ तें तीं माइकें दुःखाचीं जनितीं । नाहीं आदिअंतीं अवसान ॥ध्रु.॥ अविनाश करी आपुलिया ऐसें । लावीं मना पिसें गोविंदाच्या ॥२॥ तुका म्हणे एका मरणें चि सरें । उत्तम चि उरे कीर्ति मागें ॥३॥
364
आपलाल्या तुम्ही रूपासी समजा । कासया वरजा आरसिया ॥१॥ हें तों नव्हे देहबुद्धीचें कारण । होइल नारायणें दान केलें ॥ध्रु.॥ बब्रूचिया बाणें वर्मासि स्पर्शावें । हें तों नाहीं ठावें मोकलित्या ॥२॥ तुका म्हणे बहु मुखें या वचना । सत्याविण जाणा चाल नाहीं ॥३॥
365
आपलें तों कांहीं । येथें सांगिजेसें नाहीं ॥१॥ परि हे वाणी वायचळ । छंद करविते बरळ ॥ध्रु.॥ पंचभूतांचा हा मेळा । देह सत्यत्वें निराळा ॥२॥ तुका म्हणे भुली । इच्या उफराट्या चाली ॥३॥
366
आपल्या च स्फुंदे । जेथें तेथें घेती छंदें ॥१॥ पडिला सत्याचा दुष्काळ । बहु फार जाली घोळ ॥ध्रु.॥ विश्वासाचे माठ । त्याचे कपाळीं तें नाट ॥२॥ तुका म्हणे घाणा । मूढा तीर्थी प्रदिक्षणा ॥३॥
367
आपुला तो देह आम्हां उपेक्षीत । कोठें जाऊं हित सांगों कोणा ॥१॥ कोण नाहीं दक्ष करितां संसार । आम्हीं हा विचार वमन केला ॥ध्रु.॥ नाहीं या धरीत जीवित्वाची चाड । कोठें करूं कोड आणिकांचें ॥२॥ तुका म्हणे असों चिंतोनियां देवा । मी माझें हा हेवा सारूनियां ॥३॥ ॥२॥
368
आपुलाला लाहो करूं । केणें भरूं हा विठ्ठल ॥१॥ भाग्य पावलों या ठाया । आतां काया कुरवंडी ॥ध्रु.॥ पुढती कोठें घडे ऐसें । बहुतां दिसें फावलें ॥२॥ तुका म्हणे जाली जोडी । चरण घडी न विसंभें ॥३॥
369
आपुलाल्यापरी करितील सेवा । गीत गाती देवा खेळवूनि ॥१॥ खेळु मांडियेला यमुने पाबळीं । या रे चेंडुफळी खेळूं आतां ॥२॥ आणविल्या डांगा चवगुणां काठी । बैसोनिया वांटी गडिया गडी ॥३॥ गडी जंव पाहे आपणासमान । नाहीं नारायण म्हणे दुजा ॥४॥ जाणोनि गोविंदें सकळांचा भाव । तयांसि उपाव तो चि सांगे ॥५॥ सांगे सकळांसि व्हा रे एकीकडे । चेंडू राखा गडे तुम्ही माझा ॥६॥ मज हा न लगे आणीक सांगाती । राखावी बहुतीं हाल माझी ॥७॥ माझे हाके हाक मेळवा सकळ । नव जा बरळ एकमेकां ॥८॥ एका समतुकें अवघेचि राहा । जाईंल तो पाहा धरा चेंडू ॥९॥ चेंडू धरा ऐसें सांगतो सकळां । आपण निराळा एकला चि ॥१०॥ चिंडुनियां चेंडू हाणे ऊर्ध्वमुखें । ठेलीं सकळिक पाहात चि ॥११॥ पाहात चि ठेलीं न चलतां कांहीं । येरू लवलाहीं म्हणे धरा ॥१२॥ धरावा तयानें त्याचें बळ ज्यासि । येरा आणिकांसि लाग नव्हे ॥१३॥ नव्हे काम बळ बुद्धि नाहीं त्याचें । न धरवे निंचें उंचाविण ॥१४॥ विचारीं पडिले देखिले गोपाळ । या म्हणे सकळ मजमागें ॥१५॥ मार्ग देवाविण न दिसे आणिका । चतुर होत का बहुत जन ॥१६॥ चतुर चिंतिती बहुत मारग । हरि जाय लाग पाहोनियां ॥१७॥ या मागें जे गेले गोविंदा गोपाळ । ते नेले सीतळ पंथ ठायां ॥१८॥ पंथ जे चुकले आपले मतीचे । तयांमागें त्यांचे ते चि हाल ॥१९॥ हाल दोघां एक मोहरां मागिलां । चालतां चुकलां वाट पंथ ॥२०॥ पंथ पुढिलांसी चालतां न कळे । मागिलांनीं डोळे उघडावे ॥२१॥ वयाचा प्रबोध विचार ज्या नाहीं । समान तो देहीं बाळकांसी ॥२२॥ सिकविलें हित नायिके जो कानीं । त्यामागें भल्यांनीं जाऊं नये ॥२३॥ नये तें चि करी श्रेष्ठाचिया मना । मूर्ख एक जाणा तो चि खरा ॥२४॥ रानभरी जाले न कळे मारग । मग तो श्रीरंग आठविला ॥२५॥ लाज सांडूनियां मारितील हाका । कळलें नायका वैकुंठींच्या ॥२६॥ चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणीती । तया अति प्रीति गोपाळांची॥२७॥ गोपाळांचा धांवा आइकिला कानीं । सोयी चक्रपाणि पालविलें॥२८॥ साया धरूनियां आले हरिपासीं । लहान थोरांसी सांभाळिलें ॥२९॥ सांभाळिलें तुका म्हणे सकळ हि । सुखी जाले ते ही हरिमुखें ॥३०॥
370
आपुलिया आंगें तोडी मायाजाळ । ऐसें नाहीं बळ कोणापाशीं ॥१॥ रांडापोरें त्याग करी कुटुंबाचा । नावरे हे वाचा आणि मन ॥ध्रु.॥ हर्षामर्ष जों हे नाहीं जों जिराले । तोंवरि हे केले चार त्यांनीं ॥२॥ मुक्त जालों ऐसें बोलों जाये मुखें । तुका म्हणे दुःखें बांधला तो ॥३॥
371
आपुलिया ऐसें करी । संग धरी ज्याचा हो ॥१ ॥ म्हणउनि परपरते । वरवरते पळतसें ॥ध्रु.॥ लोभिक तें लोभा लावी । बांधल्या गोवी वांचूनि ॥२॥ तुका म्हणे नामगोठी । पुरे भेटी तुझी देवा ॥३॥
372
आपुलिया काजा । आम्हीं सांडियेलें लाजा ॥१॥ तुम्हां असों जागवीत । आपुलें आपुले हित ॥ध्रु.॥ तुम्ही देहशून्य । आम्हां कळे पाप पुण्य ॥२॥ सांगायासी लोकां । उरउरीत उरला तुका ॥३॥
373
आपुलिया बळें नाहीं मी बोलत । सखा भगवंत वाचा त्याची ॥१॥ साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी । शिकविता धणी वेगळाची ॥ध्रु.॥ काय म्यां पामरें बोलावीं उत्तरें । परि त्या विश्वंभरें बोलविलें ॥२॥ तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा । चालवी पांगळा पायांविण ॥३॥
374
आपुलिया लाजा । धांवे भक्तांचिया काजा ॥१॥ नाम धरिलें दिनानाथ । सत्य करावया व्रत ॥ध्रु.॥ आघात निवारी । छाया पीतांबरें करी ॥२॥ उभा कर कटीं । तुका म्हणे याजसाटीं ॥३॥
375
आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥१॥ कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक । तयाचा हरिख वाटे देवा ॥ध्रु.॥ गीता भागवत करिती श्रवण । आणीक चिंतन विठोबाचें ॥२॥ तुका म्हणे मज घडो त्याची सेवा । तरी माझ्या दैवा पार नाहीं ॥३॥
376
आपुलिये टाकीं । करीन कांहीं तरी एकी ॥१॥ करीन पायांशीं वोळखी । करिसी तें करीं सुखीं ॥ध्रु.॥ कायाक्लेशगंगाजळ । समर्पीन तुळसीदळ ॥२॥ तुका म्हणे देवा । कर जोडीन ते सेवा ॥३॥
377
आपुली कसोटी शुद्ध राखी कारण । आगीनें भूषण अधिक पुट ॥१॥ नाहीं कोणासवें बोलणें लागत । निश्चिंतीनें चित्तसमाधान ॥ध्रु.॥ लपविलें तें ही ढेंकरें उमटे । खोटियाचें खोटें उर फोडी ॥२॥ तुका म्हणे निंदा स्तुति दोन्ही वाव । आपुलाला भाव फळा येतो ॥३॥
378
आपुली बुटबुट घ्यावी । माझी परताप द्यावी ॥१॥ आपुला मंत्र नव्हे बरा । माझा बईल चुकला मोरा ॥२॥ तुका म्हणे ऐशा नरा । परिस न झोंबे खापरा ॥३॥
379
आपुले गांवींचें न देखेसें जालें । परदेसी एकलें किती कंठूं ॥१॥ म्हणऊनि पाहें मूळ येतां वाटे । जीवलग भेटे कोणी तरी ॥ध्रु.॥ पाहातां अवघ्या दिसतील दिशा । सकळ ही वोसा दृष्टीपुढें ॥२॥ तुका म्हणे कोणी न संगे वारता । तुझी वाटे चिंता पांडुरंगा ॥३॥
380
आपुले वरदळ नेदा । एवढी गोविंदा कृपणता ॥१॥ यावर बा तुमचा मोळा । हा गोपाळा कळेना ॥ध्रु.॥ सेवा तरी घेतां सांग । चोरिलें अंग सहावेना ॥२॥ तुका जरी क्रियानष्ट । तरी कां कष्ट घेतसां ॥३॥
381
आपुलें आपण जाणावें स्वहित । जेणें राहे चत्ति समाधान ॥१॥ बहुरंगें माया असे विखरली । कुंटित चि चाली होतां बरी ॥ध्रु.॥ पूजा ते अबोला चित्तीच्या प्रकारीं । भाव विश्वंभरीं समर्पावा ॥२॥ तुका म्हणे गेला फिटोनियां भेव । मग होतो देव मनाचा चि ॥३॥
382
आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां । तो जाला सोहळा अनुपम्य ॥१॥ आनंदे दाटलीं तिन्ही त्रिभुवनें । सर्वात्मकपणें भोग जाला ॥ध्रु.॥ एकदेशीं होतों अहंकारें आथिला । त्याच्या त्यागें जाला सुकाळ हा ॥२॥ फिटलें सुतक जन्ममरणाचें । मी माझ्या संकोचें दुरी जालों ॥३॥ नारायणें दिला वस्तीस ठाव । ठेवूनियां भाव ठेलों पायीं ॥४॥ तुका म्हणे दिलें उमटूनि जगीं । घेतलें तें अंगीं लावूनियां ॥५॥
383
आपुलें मागतां । काय नाहीं आम्हां सत्ता ॥१॥ परि या लौकिकाकारणें । उरीं ठेविली बोलणें ॥ध्रु.॥ ये चि आतां घडी । करूं बैसों ते ची फडी ॥२॥ तुका म्हणे करितों तुला । ठाव नाहींसें विठ्ठला ॥३॥
384
आपुलें वेचूनि खोडा घाली पाव । ऐसे जया भाव हीनबुद्धि तो ॥१॥ विषयांच्या संगें आयुष्याचा नास । पडियेलें ओस स्वहितांचे ॥ध्रु.॥ भुलल्यांचें अंग आपण्या पारिखें । छंदा च सारिखें वर्ततसे ॥२॥ तुका म्हणे दुःख उमटे परिणामीं । लंपटासी कामीं रतलिया ॥३॥
385
आपुलेंसें करुनी घ्यावें । आश्वासावें नाभींसें ॥१॥ ह्णउनि धरिले पाय । आवो माय विठ्ठले ॥ध्रु.॥ कळलासे सीन चिंता । शम आतां करावा ॥२॥ तुका म्हणे जीवीं वसें । मज नसें वेगळे ॥३॥
386
आपुल्या आपण उगवा लिगाड । काय माझें जड करुन घ्याल ॥१॥ उधारासी काय उधाराचें काम । वाढवूं चि श्रम नये देवा ॥ध्रु.॥ करा आतां मजसाटीं वाड पोट । ठाव नाहीं तंटे जालें लोकीं ॥२॥ तुका म्हणे बाकी झडलियावरी । न पडें वेव्हारीं संचिताचे ॥३॥
387
आपुल्या आम्ही पुसिलें नाही । तुज कांहीं कारणें ॥१॥ मागें मागें धांवत आलों । कांहीं बोलों यासाटीं ॥ध्रु.॥ बहुत दिस होतें मनीं । घ्यावी धणी एकांतीं ॥२॥ तुका म्हणे उभा राहें । कान्हो पाहें मजकडे ॥३॥
388
आपुल्या पोटासाटीं । करी लोकांचिया गोष्टी ॥१॥ जेणें घातलें संसारीं । विसरला तो चि हरी ॥ध्रु.॥ पोटा घातलें अन्न । न म्हणे पतितपावन ॥२॥ मी कोठील आणि कोण । हें न कळे ज्यालागून ॥३॥ तुका म्हणे नरस्तुति । करितो भाट त्रिजगतीं ॥४॥
389
आपुल्या महिमानें । धातु परिसें केलें सोनें ॥१॥ तैसें न मनीं माझे आतां । गुणदोष पंढरिनाथा ॥ध्रु.॥ गांवाखालील वाहाळ । गंगा न मनी अमंगळ ॥२॥ तुका म्हणे माती । केली कस्तुरीनें सरती ॥३॥
390
आपुल्या माहेरा जाईंन मी आतां । निरोप या संतां हातीं आला ॥१॥ सुख दुःख माझें ऐकिलें कानीं । कळवळा मनीं करुणेचा ॥ध्रु.॥ करुनी सिद्ध मूळ साउलें भातुकें । येती दिसें एकें न्यावयासी ॥२॥ त्या चि पंथें माझें लागलेंसे चत्ति । वाट पाहें नित्य माहेराची ॥३॥ तुका म्हणे आतां येतील न्यावया । अंगें आपुलिया मायबाप ॥४॥
391
आपुल्या विचार करीन जीवाशीं । काय या जनाशीं चाड मज ॥१॥ आपुलें स्वहित जाणती सकळ । निरोधितां बळें दुःख वाटे ॥ध्रु.॥ आइको नाइको कथा कोणी तरी । जाऊनियां घरीं निजो सुखें ॥२॥ माझी कोण वोज जाला हा शेवट । देखोनियां वाट आणिकां लावूं ॥३॥ तुका म्हणे भाकुं आपुली करुणा । जयाची वासना तथा फळे ॥४॥
392
आपुल्यांचा करीन मोळा । माझ्या कुळाचारांचा ॥१॥ अवघियांचे वंदिन पाय । ठायाठाय न देखें ॥ध्रु.॥ नेदीं तुटों समाधान । थांबों जन सकळ ॥२॥ तुका म्हणे झाडा होय । तों हे सोय न संडीं ॥३॥
393
आपुल्याचा भोत चाटी । मारी करंटीं पारिख्या ॥१॥ ऐसें जन भुललें देवा । मिथ्या हेवा वाढवी ॥ध्रु.॥ गळ गिळी आविसें मासा । प्राण आशा घेतला ॥२॥ तुका म्हणे बोकडमोहो । धरी पहा हो खाटिक ॥३॥
394
आपे तरे त्याकी कोण बराईं । औरनकुं भलो नाम घराईं ॥ध्रु.॥ काहे भूमि इतना भार राखे । दुभत धेनु नहिं दुध चाखे ॥१॥ बरसतें मेघ फलतेंहें बिरखा । कोन काम अपनी उन्होति रखा ॥२॥ काहे चंदा सुरज खावे फेरा । खिन एक बैठन पावत घेरा ॥३॥ काहे परिस कंचन करे धातु । नहिं मोल तुटत पावत घातु ॥४॥ कहे तुका उपकार हि काज । सब कररहिया रघुराज ॥५॥
395
आमचा तूं ॠणी ठायींचा चि देवा । मागावया ठेवा आलों दारा ॥१॥ वर्म तुझें आम्हां सांपडलें हातीं । धरियेले चित्तीं दृढ पाय ॥ध्रु.॥ बैसलों धरणें कोंडोनियां द्वारीं । आंतूनि बाहेरी येओं नेदी ॥२॥ तुज मज सरी होइल या विचारें । जळो भांडखोरें निलाजिरीं ॥३॥ भांडवल माझें मिरविसी जनीं । सहजर वोवनी नाममाळा ॥४॥ तुका म्हणे आम्ही केली जिवें साटी । तुम्हां आम्हां तुटी घालूं आतां ॥५॥
396
आमचा विनोद तें जगा मरण । करिती भावहीण देखोवेखीं ॥१॥ न कळे सतंत हिताचा विचार । तों हे दारोदार खाती फेरे ॥ध्रु.॥ वंदिलें वंदावें निंदिलें निंदावें । एक गेलें जावें त्याचि वाटा ॥२॥ तुका म्हणे कोणी नाइके सांगतां । होती यमदूता वरपडे ॥३॥
397
आमचा स्वदेश । भुवनत्रयामध्यें वास ॥१॥ मायबापाचीं लाडकीं । कळों आलें हें लौकिकीं ॥ध्रु.॥ नाहीं निपराद । कोणां आम्हांमध्यें भेद ॥२॥ तुका म्हणे मान । अवघें आमचें हें धन ॥३॥
398
आमची कां नये तुम्हासी करुणा । किती नारायणा आळवावें ॥१॥ काय जाणां तुम्ही दुर्बळाचें जिणें । वैभवाच्या गुणें आपुलिया ॥ध्रु.॥ देती घेती करिती खटपटा आणिकें । निराळा कौतुकें पाहोनियां ॥२॥ दिवस बोटी आम्हीं धरियेलें माप । वाहातों संकल्प स्वहिताचा ॥३॥ तुका म्हणे मग देसी कोण्या काळें । चुकुर दुर्बळें होतों आम्ही ॥४॥
399
आमची जोडी ते देवाचे चरण । करावें चिंतन विठोबाचें ॥१॥ लागेल तरीं कोणी घ्यावें धणीवरी । आमुपचि परी आवडीच्या ॥ध्रु.॥ उभारिला कर प्रसद्धि या जग । करूं केला त्याग मागें पुढें ॥२॥ तुका म्हणे होय दरद्रि विच्छिन्न । ऐसे देऊं दान एकवेळे ॥३॥
400
आमचे गोसावी अयाचितवृत्ती । करवी शिष्याहातीं उपदेश ॥१॥ दगडाची नाव आधींच ते जड । ते काय दगड तारूं जाणे ॥१॥ तुका म्हणे वेष विटंबिला त्यांनी । सोंगसंपादणी करिती परी॥३॥
401
आमच्या हें आलें भागा । जीव्हार या जगाचें ॥१॥ धरूनियां ठेलों जीवें । बळकट भावें एकविध ॥ध्रु.॥ आणूनियां केला रूपा । उभा सोपा जवळी ॥२॥ तुका म्हणे अंकित केला । खालीं आला वचनें ॥३॥
402
आमुचि मिरास पंढरी । आमुचें घर भीमातिरीं ॥१॥ पांडुरंग आमुचा पिता । रकुमाबाईं आमुचि माता ॥ध्रु.॥ भाव पुंडलीक मुनि । चंद्रभागा आमुची बहिणी ॥२॥ तुका जुन्हाट मिराशी । ठाव दिला पायांपाशीं ॥३॥
403
आमुचिया भावें तुज देवपण । तें कां विसरोन राहिलासी ॥१॥ समर्थासी नाहीं उपकारस्मरण । दिल्या आठवण वांचोनियां ॥ध्रु.॥ चळण वळण सेवकाच्या बळें । निर्गुणाच्यामुळें सांभाळावें ॥२॥ तुका म्हणे आतां आलों खंडावरी । प्रेम देउनि हरी बुझवावें ॥३॥
404
आमुची कृपाळू तूं होसी माउली । विठ्ठले साउली शरणागता ॥१॥ प्रेमपान्हा स्तनीं सदा सर्वकाळ । दृष्टि हे निर्मळ अमृताची ॥ध्रु.॥ भूक तान दुःख वाटों नेदीं सीण । अंतरींचा गुण जाणोनियां ॥२॥ आशा तृष्णा माया चिंता दवडीं दुरी । ठाव आम्हां करीं खेळावया ॥३॥ तुका म्हणे लावीं संताचा सांगात । जेथें न पवे हात किळकाळाचा ॥४॥
405
आमुची विश्रांति । तुमचे चरण कमळापती ॥१॥ पुढती पुढती नमन । घालूंनियां लोटांगण ॥ध्रु.॥ हें चि एक जाणें । काया वाचा आणि मनें ॥२॥ नीच जनालोकां । तळिले पायेरीस तुका ॥३॥
406
आमुचे ठाउके तुम्हां गर्भवास । बळिवंत दोष केले भोग ॥१॥ काय हा सांगावा नसतां नवलावो । मैंदपणें भाव भुलवणेचा ॥ध्रु.॥ एका पळवूनि एका पाठी लावा । कवतुक देवा पाहावया ॥२॥ तुका म्हणे ज्याणें असें चेतविलें । त्याच्यानें उगळें कैसें नव्हे ॥३॥
407
आमुचें उचित हे चि उपकार । आपला चि भार घालूं तुज ॥१॥ भूक लागलिया भोजनाची आळी । पांघुरणें काळीं शीताचिये ॥ध्रु.॥ जेणें काळें उठी मनाची आवडी । ते चि मागों घडी आवडे तें ॥२॥ दुःख येऊं नेदी आमचिया घरा । चक्र करी फेरा भोंवताला ॥३॥ तुका म्हणे नाहीं मुक्तीसवें चाड । हें चि आम्हां गोड जन्म घेतां ॥४॥
408
आमुचें जीवन हें कथाअमृत । आणिक ही संतसमागम ॥१॥ सारूं एके ठायीं भोजन परवडी । स्वादरसें गोडी पदोपदीं ॥ध्रु.॥ धालिया ढेंकर येती आनंदाचे । वोसंडलें वाचे प्रेमसुख ॥२॥ पिकलें स्वरूप आलिया घुमरि । रासी ते अंबरीं न समाये ॥३॥ मोजितां तयाचा अंत नाहीं पार । खुंटला व्यापार तुका म्हणे ॥४॥
409
आमुचें दंडवत पायांवरि डोईं । व्हावें उतराईं ठेवूनियां ॥१॥ कराल तें काय नव्हे जी विठ्ठला । चत्ति द्यावें बोला बोबडिया ॥२॥ तुका म्हणे आम्ही लडिवाळें अनाथें । म्हणोनि दिनानाथें सांभाळावें ॥३॥
410
आमुप जोडल्या सुखाचिया रासी । पार त्या भाग्यासी नाहीं आतां ॥१॥ काय सांगों सुख जालें आलिंगन । निवाली दर्शनें कांति माझी ॥२॥ तुका म्हणे यांच्या उपकारासाटीं । नाहीं माझे गांठी कांहीं एक ॥३॥
411
आम्हां अराणूक संवसारा हातीं । पडिली नव्हती आजिवरी ॥१॥ पुत्रदाराधन होता मनी धंदा । गोवियेलों सदा होतों कामें ॥ध्रु.॥ वोडवलें ऐसें दिसतें कपाळ । राहिलें सकळ आवरोनि ॥२॥ मागें पुढें कांहीं न दिसे पाहातां । तेथूनियां चिंता उपजली ॥३॥ तुका म्हणे वाट पाह्याचें कारण । येथीचिया हिंणें जालें भाग्य ॥४॥
412
आम्हां अळंकार मुद्रांचे शृंगार । तुळसीचे हार वाहों कंठीं ॥१॥ लाडिके डिंगर पंढरिरायाचे । निरंतर वाचे नामघोष ॥ध्रु.॥ आम्हां आणिकांची चाड चि नाहीं । सर्व सुखें पायीं विठोबाच्या ॥२॥ तुका म्हणे आम्ही नेघों या मुक्ती । एकविण चित्ती दुजें नाहीं ॥३॥
413
आम्हां अवघें भांडवल । येथें विठ्ठल एकला ॥१॥ कायावाचामनोभावें । येथें जीवें वेचलों ॥ध्रु.॥ परतें कांहीं नेणें दुजें । तत्वबीजें पाउलें ॥२॥ तुका म्हणे संतसंगें । येणें रंगें रंगलों ॥३॥
414
आम्हां आपुलें नावडे संचित । चरफडी चत्ति कळवळ्यानें ॥१॥ न कळतां जाला खोळंब मारगा । जगीं जालों जगा बहुरूपी ॥ध्रु.॥ कळों आलें बरें उघडले डोळे । कर्णधार मिळे तरि बरें ॥२॥ तुका म्हणे व्हाल ऐकत करुणा । तरि नारायणा उडी घाला ॥३॥
415
आम्हां आम्ही आतां वडील धाकुटीं । नाहीं पाठीं पोटीं कोणी दुजें ॥१॥ फावला एकांत एकविध भाव । हरि आम्हांसवें सर्व भोगी ॥२॥ तुका म्हणे अंगसंग एके ठायीं । असों जेथें नाहीं दुजें कोणी ॥३॥
416
आम्हां आवडे नाम घेतां । तो ही पिता संतोषे ॥१॥ उभयतां एकचित्त । तरी प्रीत वाढली ॥ध्रु.॥ आम्ही शोभों निकटवासें। अनारिसें न दिसे ॥२॥ तुका म्हणे पांडुरंगे । अवघीं अंगें निवालीं॥३॥
417
आम्हां एकविधा पुण्य सर्वकाळ । चरणसकळ स्वामीचे ते ॥१॥ चित्ताचे संकल्प राहिलें चळण । आज्ञा ते प्रमाण करुनी असों ॥ध्रु.॥ दुजियापासून परतलें मन । केलें द्यावें दान होईंल तें ॥२॥ तुका म्हणे आतां पुरला नवस । एकाविण ओस सकळ ही ॥३॥
418
आम्हां कथा आवश्यक । येर संपादूं लौकिक ॥१॥ जैसी तैसी माय बरी । मानिल्या त्या माना येरी ॥ध्रु.॥ व्यालीचा कळवळा । जीव बहुत कोंवळा ॥२॥ कवतुकें वावरें । तुका म्हणे या आधारें ॥३॥
419
आम्हां कांहीं आम्हां कांहीं । आतां नाहीं या बोलें ॥१॥ मोल सांगा मोल सांगा । घेणें तिंहीं गा पुसावें ॥ध्रु.॥ कैसें घडे कैसें घडे । बडबड तुज मज ॥२॥ मुदलें साटी मुदलें साटी । लाभ पोटीं त्या च मधीं ॥३॥ तुका म्हणे साटवूं घरीं । आडल्या काळें पुसती तरी ॥४॥
420
आम्हां केलें गुणवंत । तें उचित राखावें ॥१॥ तुम्हांसी तों चाड नाहीं । आणिकां कांहीं सुखदुःखां ॥ध्रु.॥ दासांचें तें देखों नये । उणें काय होइल तें ॥२॥ तुका म्हणे विश्वंभरा । दृष्टि करा सामोरी ॥३॥
421
आम्हां गांजी जन । तरि कां मेला नारायण ॥१॥ जालों पोरटीं निढळें । नाहीं ठाव बुड आळें ॥ध्रु.॥ आम्हीं जना भ्यावें। तरि कां न लाजिजे देवें ॥२॥ तुका म्हणे देश । जाला देवाविण ओस ॥३॥
422
आम्हां घरीं एक गाय दुभता हे । पान्हा न समाये त्रिभुवनीं ॥१॥ वान ते सांवळी नांव ते श्रीधरा । चरे वसुंधरा चौदा भुवनें ॥ध्रु.॥ वत्स नाहीं माय भलत्या सवें जाय । कुर्वाळी तो लाहे भावभरणा ॥२॥ चहूं धारीं क्षीर वोळली अमुप । धाले सनकादिक सिद्ध मुनी ॥३॥ तुका म्हणे माझी भूक तेथें काय । जोगाविते माय तिन्ही लोकां ॥४॥ कांडण - अभंग २
423
आम्हां घरीं धन शब्दाचीं रत्नें । शब्दाचीं शस्त्रें यत्न करूं ॥१॥ शब्द चि आमुच्या जीवाचें जीवन । शब्दें वांटूं धन जनलोकां ॥२॥ तुका म्हणे पाहा शब्द चि हा देव । शब्दें चि गौरव पूजा करूं ॥३॥
424
आम्हां देणें धरा सांगतों तें कानीं । चिंता पाय मनीं विठोबाचे ॥१॥ तेणें माझें चित्त होय समाधान । विलास मिष्टान्न न लगे सोनें ॥ध्रु.॥ व्रत एकादशी दारीं वृंदावन । कंठीं ल्या रे लेणें तुळसीमाळा ॥२॥ तुका म्हणे त्याचे घरींची उष्टावळी । मज ते दिवाळी दसरा सण ॥३॥
425
आम्हां निकट वासें । कळों आलें जैसें तैसें । नाहीं अनारीसें । कान्होबाचे अंतरीं ॥१॥ पीडती आपुल्या भावना । जैसी जयाची वासना । कर्माचा देखणा । पाहे लीळा कौतुक ॥ध्रु.॥ खेळ खेळे न पडे डाईं । ज्याचा भार त्याच्या ठायीं । कोणी पडतील डाईं । कोणी कोडीं उगवीती ॥२॥ तुका म्हणे कवळ । हातीं घेऊनि गोपाळ । देतो ज्यांचें बळ । त्यांसि तैसा विभाग ॥३॥
426
आम्हां बोल लावा । तुम्हां अनुचित हें देवा ॥१॥ ऐसें सांगा कां व्यालेती । काय नाहीं तुम्हां हातीं ॥ध्रु.॥ आतां धरा दुरी । वांयां दवडाया थोरी ॥२॥ तुका म्हणे ठायीं । ऐसें विचारावें पायीं ॥३॥
427
आम्हां भय धाक कोणाचा रे पाहें । काळ मशक काय मानव हे ॥१॥ आम्हांसी ते काय चिंता या पोटाची । माउली आमुची पांडुरंग ॥ध्रु.॥ काय करावी हे कोणाची मान्यता । करितां अनंता कोण वारी ॥२॥ नाहीं शीण आम्हां जालें कवतुक । पुनीत हे लोक करावया ॥३॥ तुका म्हणे खातों आनंदाचे लाडू । नका चरफडूं घ्या रे तुम्ही ॥४॥
428
आम्हां भाविकांची जाती । एकविध जी श्रीपती । अळंकारयुक्ति । सरों शके चि ना ॥१॥ जाणें माउली त्या खुणा । क्षोभ उपजों नेदी मना । शांतवूनि स्तना । लावीं अवो कृपाळे ॥ध्रु.॥ तुज अवघे होऊं येते । मज वाटों नये चित्त । उपासने परतें । नये कांहीं आवडों ॥२॥ करूं रूपाची कल्पना । मुखीं नाम उच्चारणा । तुका म्हणे जना । जल स्थल देखतां ॥३॥
429
आम्हां विष्णुदासां हें चि भांडवल । अवघा विठ्ठल धन वत्ति ॥१॥ वाणी नाहीं घ्यावें आपुलिया हातें । करोनियां चित्ती समाधान ॥२॥ तुका म्हणे द्रव्य मेळविलें मागें । हें तों कोणासंगें आलें नाहीं ॥३॥
430
आम्हां वैष्णवांचा । नेम काया मनें वाचा ॥१॥ धीर धरूं जिवासाटीं । येऊं नेदूं लाभा तुटी ॥ध्रु.॥ उचित समय । लाजनिवारावें भय ॥२॥ तुका म्हणे कळा । जाणों नेम नाहीं बाळा ॥३॥
431
आम्हां वैष्णवांचा कुळधर्म कुळींचा । विश्वास नामाचा एका भावें ॥१॥ तरी च हरिचेदास म्हणवितां श्लाघीजे । निर्वासना कीजे चित्त आधी ॥ध्रु.॥ गाऊं नाचूं प्रेमें आनंदें कीर्तनीं । भक्ति मुक्ति दोन्ही न मगों तुज ॥२॥ तुका म्हणे देवा ऐसी यांची सेवा । द्यावी जी केशवा जन्मोजन्मीं ॥३॥
432
आम्हां शरणागतां । एवढी काय करणें चिंता ॥१॥ परि हे कौतुकाचे खेळ । अवघे पाहातों सकळ ॥ध्रु.॥ अभयदानवृंदें । आम्हां कैंचीं द्वंदें ॥२॥ तुका म्हणे आम्ही । हरिजन साधनाचे स्वामी ॥३॥
433
आम्हां सर्वभावें हें चि काम । न विसंभावें तुझें नाम ॥१॥ न लगे करावी हे चिंता । तरणें करणें काय आतां ॥ध्रु.॥ आसनीं भोजनीं शयनीं । दुजें नाहीं ध्यानीं मनीं ॥२॥ तुका म्हणे कृपानिधी । माझी तोडिली उपाधी ॥३॥
434
आम्हां सुकाळ सुखाचा । जवळी हाट पंढरीचा । सादाविती वाचा । रामनामें वैष्णव ॥१॥ घ्या रे आपुलाल्या परी । नका ठेवूं कांही उरी । ओसरतां भरी । तोंडवरी अंबर ॥ध्रु.॥ वाहे बंदर द्वारका । खेप आली पुंडलिका । उभे चि विकिलें एका । सनकादिकां सांपडलें ॥२॥ धन्य धन्य हे भूमंडळी । प्रगटली नामावळी । घेती जीं दुबळीं । तीं आगळीं सदैव ॥३॥ माप आपुलेनि हातें । कोणी नाहीं निवारितें । पैस करूनि चित्ती । घ्यावें हितें आपुलिया ॥४॥ नाहीं वाटितां सरलें । आहे तैसें चि भरलें । तुका म्हणे गेलें । वांयांविण न घेतां ॥५॥
435
आम्हां सोइरे हरिजन । जनीं भाग्य निकंचन ॥१॥ ज्याच्या धैर्या नाहीं भंग । भाव एकविध रंग ॥ध्रु.॥ भुके तान्हे चत्तिीं । सदा देव आठविती ॥२॥ तुका म्हणे धन । ज्याचें वत्ति नारायण ॥३॥
436
आम्हां हरिच्या दासां कांहीं । भय नाहीं त्रैलोकीं ॥१॥ देव उभा मागें-पुढें । उगवी कोडें संकट ॥ध्रु.॥ जैसा केला तैसा होय । धांवे सोय धरोनि ॥२॥ तुका म्हणे असों सुखें । गाऊं मुखें विठोबा ॥३॥
437
आम्हां हें कवतुक जगा द्यावी नीत । करावे फजित चुकती ते ॥१॥ कासयाचा बाध एकाच्या निरोपें । काय व्हावें कोपें जगाचिया ॥ध्रु.॥ अविद्येचा येथें कोठें परिश्रम । रामकृष्णनाम ऐसे बाण ॥२॥ तुका म्हणे येथें खर्यांचा विकरा । न सरती येरा खोट्या परी ॥३॥
438
आम्हां हें चि काम । वाचे गाऊं तुझें नाम ॥१॥ आयुष्य मोलाची हे घडी । धरूं पायांची आवडी ॥ध्रु.॥ अमृताची खाणी । याचे ठायीं वेचूं वाणी ॥२॥ तुका म्हणे पांडुरंगा । माझ्या जिवाच्या जिवलगा ॥३॥
439
आम्हां हें चि भांडवल । म्हणों विठ्ठल विठ्ठल ॥१॥ सुखें तरों भवनदी । संग वैष्णवांची मांदी ॥ध्रु.॥ बाखराचें वाण । सांडूं हें जेवूं जेवण ॥२॥ न लगे वारंवार । तुका म्हणे वेरझार ॥३॥
440
आम्हां हें सकळ । तुझ्या पायांचें चि बळ ॥१॥ करूं अमृताचें पान । दुजें नेणों कांहीं आन ॥ध्रु.॥ जयाचा जो भोग । सुख दुःख पीडा रोग ॥२॥ तुका म्हणे देवा । तुझे पायीं माझा ठेवा ॥३॥
441
आम्हांपाशीं याचें बळ । कोण काळवरी तों ॥१॥ करूनि ठेलों जीवेंसाटीं । होय भेटी तोंवरि ॥ध्रु.॥ लागलों तों न फिरें पाठी । पडिल्या गांठी वांचूनि ॥२॥ तुका म्हणे अवकाशें । तुमच्या ऐसें होवया ॥३॥
442
आम्हांपाशीं सरे एक शुद्ध भाव । चतुराईं जाणींव न लगे कळा ॥१॥ सर्वजाण माझा स्वामी पांडुरंग । तया अंगसंगें गोपाळासी ॥२॥ तुका म्हणे कर्मधर्में नये हातां । तयावरि सत्ता भाविकांची ॥३॥
443
आम्हांसी तों नाहीं आणीक प्रमाण । नामासी कारण विठोबाच्या ॥१॥ घालूनियां कास करितो कैवाड । वागों नेदीं आड किळकाळासी ॥ध्रु.॥ अबद्ध वांकडें जैशातैशा परी । वाचे हरि हरि उच्चारावें ॥२॥ तुका म्हणे आम्हां सांपडलें निज । सकळां हें बीज पुराणांचें ॥३॥
444
आम्हांसी सांगाती । होती अराले ते होती ॥१॥ येती आइकतां हाक । दोन मिळोन म्हणती एक ॥ध्रु.॥ आणिकां उत्तरीं । नसे गोवी वैखरी ॥२॥ तुका म्हणे बोल । खूण पहाती विठ्ठल ॥३॥
445
आम्हासाठीं अवतार । मत्स्यकूर्मादि सूकर ॥१॥ मोहें धांवे घाली पान्हा । नांव घेतां पंढरीराणा ॥ध्रु.॥ कोठें न दिसे पाहतां । उडी घाली अवचिता ॥२॥ सुख ठेवी आम्हासाठीं । दुःख आपणची घोंटी ॥३॥ आम्हां घाली पाठीकडे । पुढें कळिकाळाशीं भिडे ॥४॥ तुका म्हणे कृपानीधी । आम्हां उतरीं नांवेमधीं ॥५॥
446
आम्ही असों निश्चिंतीनें । एक्या गुणें तुमचिया ॥१॥ दुराचारी तरले नामें । घेतां प्रेम म्हणोनि ॥ध्रु.॥ नाहीं तुम्हां धांव घेता । कृपावंता आळस ॥२॥ तुका म्हणे विसरूं कांहीं । तुज वो आईं विठ्ठले ॥३॥
447
आम्ही आइते जेवणार । न लगे सोसावे डोंगर । सुखाचा वेव्हार । तेणें चि वाढलें ॥१॥ ठेवा जोडला मिरासी । ठाव जाला पायांपासी । नव्हे आणिकांसी । रीघ तेथें यावया ॥ध्रु.॥ बळी दिला जीवभाव । नेणें आणिकांचे नांव । धरिला एक भाव । तो विश्वास फळला ॥२॥ तुका म्हणे जालों बळी । आम्ही निकट जवळी । बोलिलों तें पाळीं । वचन स्वामी आमचें ॥३॥
448
आम्ही आर्तभूत जिवीं । तुम्ही गोसावी तों उदास ॥१॥ वादावाद समर्थाशीं । काशानशीं करावा ॥ध्रु.॥ आम्ही मरों वेरझारीं । स्वामी घरीं बैसले ॥२॥ तुका म्हणे करितां वाद । कांहीं भेद कळेना ॥३॥
449
आम्ही आळीकरें । प्रेमसुखाचीं लेंकुरें ॥१॥ पायीं गोविली वासना । तुश केलें ब्रम्हज्ञाना ॥ध्रु.॥ येतां पाहें मुळा । वाट पंढरीच्या डोळां ॥२॥ तुका म्हणे स्थळें । मग मी पाहेन सकळें ॥३॥
450
आम्ही उतराईं । भाव निरोपूनि पायीं ॥१॥ तुम्ही पुरवावी आळी । करावी ते लडिवाळीं ॥ध्रु.॥ आमचा हा नेम । तुम्हां उचित हा धर्म ॥२॥ तुका म्हणे देवा । जाणों सांगितली सेवा ॥३॥
451
आम्ही क्षेत्रींचे संन्यासी । देहभरित हृषीकेशी । नाहीं केली ऐशी । आशाकामबोहरी ॥१॥ आलें अयाचित अंगा । सहज तें आम्हां भागा । दाता पांडुरंगा । ऐसा करितां निश्चिंती ॥ध्रु.॥ दंड धरिला दंडायमान । मुळीं मुंडिलें मुंडण । बंदी बंद कौपीन । बहिरवास औठडें ॥२॥ काळें साधियेला काळ । मन करूनि निश्चळ । लौकिकीं विटाळ । धरूनि असों ऐकांत ॥३॥ कार्यकारणाची चाली । वाचावाचत्वें नेमिली । एका नेमें चाली । स्वरूपीं च राहाणें ॥४॥ नव्हे वेषधारी । तुका आहाच वरवरी । आहे तैसीं बरीं । खंडें निवडितों वेदांची ॥५॥
452
आम्ही गोवळीं रानटें । नव्हों जनांतील धीटें ॥१॥ सिदोरीचा करूं काला । एक वांटितों एकाला ॥ध्रु.॥ खेळों आपआपणांशीं । आमचीं तीं आम्हांपाशीं ॥२॥ मिळालों नेणते । तुका कान्होबा भोंवते ॥३॥
453
आम्ही घ्यावें तुझें नाम । तुम्ही आम्हां द्यावें प्रेम ॥१॥ ऐसें निवडिलें मुळीं । संतीं बैसोनि सकळीं ॥ध्रु.॥ माझी डोईं पायांवरी । तुम्ही न धरावी दुरी ॥२॥ तुका म्हणे केला । खंड दोघांचा विठ्ठला ॥३॥
454
आम्ही जरी आस । जालों टाकोनि उदास ॥१॥ आतां कोण भय धरी । पुढें मरणाचें हरी ॥ध्रु.॥ भलते ठायीं पडों । देह तुरंगीं हा चढो ॥२॥ तुमचें तुम्हांपासीं । आम्ही आहों जैसीं तैसीं ॥३॥ गेले मानामान । सुखदुःखाचें खंडन ॥४॥ तुका म्हणे चित्तीं । नाहीं वागवीत खंती ॥५॥
455
आम्ही जाणों तुझा भाव । कैंचा भक्त कैंचा देव । बीजा नाहीं ठाव । कैंचें फळ शेवटीं ॥१॥ संपादिलें बहु रूप । कैंचें पुण्य कैंचें पाप । नव्हतों आम्ही आप । आपणासी देखिलें ॥ध्रु.॥ एके ठायीं घरिच्याघरीं । न कळतां जाली चोरी । तेथें तें चि दुरी । जाणें येणें खुंटलें ॥२॥ तुका म्हणे धरूनि हातीं । उर ठेविली मागुती । एकांतीं लोकांतीं । देवभक्तिसोहळा ॥३॥
456
आम्ही जाणों तुझा भाव । दृढ धरियेले पाव ॥१॥ फांकुं नेदूं चुकावितां । नेघों थोडें बहु देतां ॥ध्रु.॥ बहुता दिसाचें लिगाड । आलें होत होत जड ॥२॥ तुका म्हणे आतां । नेघें सर्वस्व ही देतां ॥३॥
457
आम्ही जातों आपुल्या गांवा । आमुचा रामराम घ्यावा ॥१॥ तुमची आमची हे चि भेटी । येथुनियां जन्मतुटी॥ध्रु.॥ आतां असों द्यावी दया । तुमच्या लागतसें पायां ॥२॥ येतां निजधामीं कोणी । विठ्ठलविठ्ठल बोला वाणी ॥३॥ रामकृष्ण मुखीं बोला । तुका जातो वैकुंठाला ॥४॥
458
आम्ही जातों तुम्ही कृपा असों द्यावी । सकळा सांगावी विनंती माझी ॥१॥ वाडवेळ जाला उभा पांडुरंग । वैकुंठा श्रीरंग बोलावितो ॥२॥ अंतकाळीं विठो आम्हांसी पावला । कुडीसहित जाला गुप्त तुका ॥३॥
459
आम्ही जालों एकविध । सुद्या सुदें असावें ॥१॥ यावरी तुमचा मोळा । तो गोपाळा अकळ ॥ध्रु.॥ घेतलें तें उसणें द्यावें । कांहीं भावें विशेषें ॥२॥ तुका म्हणे क्रियानष्ट । तरी कष्ट घेतसां ॥३॥
460
आम्ही जालों गांवगुंड । अवघ्या पुंड भूतांसी ॥१॥ दुसरें तें खेळों आलें । एका बोले तो मियां ॥ध्रु.॥ अवघियांचा येऊं लाग । नेदूं अंग शिवाया ॥२॥ तुका म्हणे खुंटूं नाद । जिंतूं वाद सर्तीनें ॥३॥ जोगी - अभंग १
461
आम्ही जालों बळिवंत । होऊनियां शरणागत ॥१॥ केला घरांत रिघावा । ठायीं पडियेला ठेवा ॥ध्रु.॥ हातां चढलें धन । नेणं रचिलें कारण ॥२॥ तुका म्हणे मिठी । पायीं देउनि केली सुटी ॥३॥
462
आम्ही ज्याचे दास । त्याचा पंढरिये वास ॥१॥ तो हा देवांचा ही देव । काय कळिकाळाचा भेव ॥ध्रु.॥ वेद जया गाती । श्रुति म्हणती नेति नेति ॥२॥ तुका म्हणे निज । रूपडें हें तत्वबीज ॥३॥
463
आम्ही तुझ्या दासीं । जरि जावें पतनासी ॥१॥ तरि हें दिसे विपरीत । कोठें बोलिली हे नीत ॥ध्रु.॥ तुझें नाम कंठीं । आम्हां संसार आटी ॥२॥ तुका म्हणे काळ । करी आम्हांसी विटाळ ॥३॥
464
आम्ही तेणें सुखी । म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखीं ॥१॥ तुमचें येर वत्ति धन । तें मज मृत्तिकेसमान ॥ध्रु.॥ कंटीं मिरवा तुळसी । व्रत करा एकादशी ॥२॥ म्हणवा हरिचे दास । तुका म्हणे मज हे आस ॥३॥
465
आम्ही देव तुम्ही देव । मध्यें भेव अधीक ॥१॥ कैवाडाच्या धांवा लागें । मागें मागें विठ्ठले ॥ध्रु.॥ भेडसाविलें हाके नादें । वोळखी भेदें मोडिली ॥२॥ तुका म्हणे उभा राहे । मागें पाहे परतोनि ॥३॥
466
आम्ही न देखों अवगुणां । पापी पवित्र शाहाणा ॥१॥ अवघीं रूपें तुझीं देवा । वंदूं भावें करूं सेवा ॥ध्रु.॥ मज मुक्ती सवें चाड । नेणें पाषाण धातु वाड ॥२॥ तुका म्हणे घोटीं । विष अमृत तुजसाटीं ॥३॥
467
आम्ही नरका जातां काय येइल तुझ्या हाता । ऐसा तूं अनंता विचारीं पां ॥१॥ तुज शरण आलियाचें काय हें चि फळ । विचारा दयाळ कृपानिधी ॥ध्रु.॥ तुझें पावनपण न चले आम्हांसीं । ऐसें हृषीकेशी कळों आलें ॥२॥ आम्ही दुःख पावों जन्ममरण वेथा । काय तुझ्या हाता येत असे ॥३॥ तुका म्हणे तुम्ही खादली हो रडी । आम्ही धरली सेंडी नाम तुझें ॥४॥
468
आम्ही नाचों तेणें सुखें । वाऊं टाळी गातों मुखें ॥१॥ देव कृपेचा कोंवळा । शरणागता पाळी लळा ॥ध्रु.॥ आम्हां जाला हा निर्धार । मागें तारिलें अपार ॥२॥ तुका म्हणे संतीं । वर्म दिलें आम्हां हातीं ॥३॥
469
आम्ही पतित म्हणोनि तुज आलों शरण । करितों चिंतन दिवस रात्रीं । नाहीं तरी मज काय होती चाड । धरावया भीड तुज चित्ती ॥१॥ आम्हां न तारावें तुम्ही काय करावें । सांगीजोजी भावें नारायणा ॥ध्रु.॥ अन्याय एकाचा अंगीकार करणें । तया हातीं देणें लाज ते चि । काय ते शूरत्व मिरवूनि बोलणें । जनामाजी दावणें बळरया ॥२॥ पोह्या अन्नछत्र घालूनियां घरीं । दंडितो बाहेरी आलियासी । नव्हे कीर्त कांहीं न माने लोकां । काय विटंबणा तैसी ॥३॥ प्रत्यक्षासी काय द्यावें हें प्रमाण । पाहातां दर्पण साक्ष काईं । तुका म्हणे तरी आम्हां का न कळे । तरलों किंवा आम्ही नाहीं ॥४॥
470
आम्ही पापी तूं पावन । हें तों पूर्वापार जाण ॥१॥ नवें करूं नये जुनें । सांभाळावें ज्याचें तेणें ॥ध्रु.॥ राखावा तो ठाव । मिरासी करोनि उपाव ॥२॥ वादें मारी हाका । देवा आइकवी तुका ॥३॥
471
आम्ही पाहा कैसीं एकतत्व जालों । राखणे लागलों वासनेसी ॥१॥ तुम्हांविण कांहीं नावडावें जीवा । केला तो चि देवा केला पण ॥ध्रु.॥ वर्म नेणों परि वृत्ती भंगों नेदुं । वंदिलें चि वंदूं आवडीनें ॥२॥ तुका म्हणे कळे नामाचें जीवन । वारता ही भिन्न नेणों आतां ॥३॥
472
आम्ही बळकट जालों फिराउनी । तुमच्या वचनीं तुम्हां गोऊं ॥१॥ जालें तेव्हां जालें मागील तें मागें । आतां वर्मलागें ठावीं जालीं ॥ध्रु.॥ तोडावया अवघ्या चेष्टांचा संबंध । शुद्धापाशीं शुद्ध बुद्ध व्हावें ॥२॥ तुका म्हणे आम्हां आत्मत्वाची सोय । आपण चि होय तैसा चि तूं ॥३॥
473
आम्ही बोलों तें तुज कळे । एक दोहीं ठायीं खेळे ॥१॥ काय परिहाराचें काम । जाणें अंतरींचें राम ॥ध्रु.॥ कळोनियां काय चाड । माझी लोकांसी बडबड ॥२॥ कारण सवें एका । अवघें आहे म्हणे तुका ॥३॥
474
आम्ही भांडों तुजसवें । वर्मी धरूं जालें ठावें ॥१॥ होसी सरड बेडुक । बाग गांढव्या ही पाईंक ॥ध्रु.॥ बळ करी तया भ्यावें । पळों लागे तया घ्यावें ॥२॥ तुका म्हणे दूर परता । नर नारी ना तूं भूता ॥३॥
475
आम्ही भाग्याचे भाग्याचे । आम्हां तांबे भोपळ्याचे॥१॥ लोकां घरीं गाईं म्हैसी । आम्हां घरीं उंदीरघुसी ॥ध्रु.॥ लोकां घरीं हत्ती घोडे । आम्हां आधोडीचे जोडे ॥२॥ तुका म्हणे आम्ही सुडके । आम्हां देखोन काळ धाके ॥३॥
476
आम्ही भाव जाणों देवा । न कळती तुझिया मावा । गणिकेचा कुढावा । पतना न्यावा दशरथ ॥१॥ तरी म्यां काय गा करावें । कोण्या रीती तुज पावें । न संगतां ठावें । तुम्हांविण न पडे ॥ध्रु.॥ दोनी फाकलिया वाटा । गोवी केला घटापटा । नव्हे धीर फांटा । आड रानें भरती ॥२॥ तुका म्हणे माझे डोळे । तुझे देखती हे चाळे । आतां येणें वेळे । चरण जीवें न सोडीं ॥३॥
477
आम्ही भाविकें हे काय जाणों खोडी । आइकोनि प्रौढी विनविलें ॥१॥ नाहीं ऐसें येथें जालेती असतां । वाढविली चिंता अधिक सोसें ॥ध्रु.॥ न कळे चि आधीं करितां विचार । न धरितां धीर आहाचता ॥२॥ तुका म्हणे आतां वचनें वचन । वाढले तिक्षिण बुद्धि जाली ॥३॥
478
आम्ही मागों ऐसें नाहीं तुजपाशीं । जरीं तूं भीतोसि पांडुरंगा ॥१॥ पाहें विचारूनि आहे तुज ठावें । आम्ही धालों नावें तुझ्या एका ॥ध्रु.॥ ॠद्धिसिद्धि तुझें मुख्य भांडवल । हें तों आम्हां फोल भक्तीपुढें ॥२॥ तुका म्हणे जाऊं वैकुंठा चालत । बैसोनि निश्चिंत सुख भोगू ॥३॥
479
आम्ही मेलों तेव्हां देह दिला देवा । आतां करूं सेवा कोणाची ॥१॥ सूत्रधारी जैसा हालवितो कळा । तैसा तो पुतळा नाचे छंदें ॥ध्रु.॥ बोलतसें जैसें बोलवितो देव । मज हा संदेह कासयाचा ॥२॥ पाप पुण्य ज्याचें तो चि जाणें कांहीं । संबंध हा नाहीं आम्हांसवें ॥३॥ तुका म्हणे तुम्ही आइका हो मात । आम्ही या अतीत देहाहूनी ॥४॥
480
आम्ही म्हणों कोणी नाहीं तुज आड । दिसतोसी भ्याड पांडुरंगा ॥१॥ हागे माझ्या भोगें केलासी परता । विश्वंभरीं सत्ता नाहीं ऐसी ॥ध्रु.॥ आम्ही तुज असों देऊनि आधार । नाम वारंवार उच्चारितों ॥२॥ तुका म्हणे मज धरियेलें बळें । पंचभूतीं खळें करूनियां ॥३॥
481
आम्ही रामाचे राऊत । वीर जुंझार बहुत ॥१॥ मनपवनतुरंग । हातीं नामाची फिरंग ॥ध्रु.॥ वारू चालवूं चहूंखुरीं । घाला घालूं यमपुरी ॥२॥ तुका म्हणे पेणें । आम्हां वैकुंठासी जाणें ॥३॥
482
आम्ही विठ्ठलाचे दास जालों आतां । न चले हे सत्ता आणिकांची ॥१॥ नावरे तयासी ऐसें नाहीं दुजें । करितां पंढरिराजें काय नव्हे ॥ध्रु.॥ कोठें तुज ठाव घ्यावयासी धांवा । मना तूं विसावा घेईं आतां ॥२॥ इंिद्रयांची वोढी मोडिला व्यापार । ज्या अंगें संचार चाळी तुज ॥३॥ तुका म्हणे आम्ही जिंकोनियां काळ । बैसलों निश्चळि होऊनियां ॥४॥
483
आम्ही वीर जुंझार । करूं जमदाढे मार । तापटिले भार । मोड जाला दोषांचा ॥१॥ जाला हाहाकार । आले हांकीत जुंझार । शंखचक्रांचे शृंगार । कंठीं हार तुळसीचे ॥ध्रु.॥ रामनामांकित बाण । गोपी लाविला चंदन । झळकती निशाणें । गरुडटके पताका ॥२॥ तुका म्हणे काळ । जालों जिंकोनि निश्चळ । पावला सकळ । भोग आम्हां आमचा ॥३॥
484
आम्ही वैकुंठवासी । आलों या चि कारणासी । बोलिले जे ॠषी । साच भावें वर्ताव्या ॥१॥ झाडूं संतांचे मारग । आडरानें भरलें जग । उच्छिष्टाचा भाग । शेष उरलें तें सेवूं ॥ध्रु.॥ अर्थे लोपलीं पुराणें । नाश केला शब्दज्ञानें । विषयलोभी मन । साधनें बुडविलीं ॥२॥ पिटूं भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा । तुका म्हणे करा । जेजेकार आनंदें ॥३॥
485
आम्ही शक्तिहीनें । कैसें कराल तें नेणें । लिगाडाच्या गुणें । खोळंबला राहिलों ॥१॥ माझें मज देई देवा । असे ठेविला तो ठेवा । नाहीं करीत हेवा । कांहीं अधीक आगळा ॥ध्रु.॥ नाहीं गळां पडलों झोंड । तुमचें तें चि माझें तोंड । चौघां चार खंड । लांबणी हे अनुचित ॥२॥ नाहीं येत बळा । आतां तुम्हासी गोपाळा । तुका म्हणे गळा । उगवा पायां लागतों ॥३॥
486
आम्ही सदैव सुडके । जवळीं येतां चोर धाके ॥ जाऊं पुडी भिकें । कुतरीं घर राखती ॥१॥ नांदणूक ऐसी सांगा । नाहीं तरी वांयां भागा ॥ थोरपण अंगा । तरी ऐसें आणावें ॥ध्रु.॥ अक्षय साचार । केलें सायासांनी घर ॥ एरंडसिंवार । दुजा भार न साहती ॥२॥ धन कण घरोघरीं । पोट भरे भिकेवरी ॥ जतन तीं करी । कोण गुरें वासरें ॥३॥ जाली सकळ निश्चिंती । भांडवल शेण माती ॥ झळझळीत भिंती । वृंदावनें तुळसीचीं ॥४॥ तुका म्हणे देवा । अवघा निरविला हेवा ॥ कुटुंबाची सेवा । तो चि करी आमुच्या ॥५॥
487
आम्ही सर्वकाळ कैंचीं सावधानें । वेवसायें मन अभ्यासलें ॥१॥ तरी म्हणा मोट ठेविली चरणीं । केलों गुणागुणीं कासावीस ॥ध्रु.॥ याचे कानसुळीं मारीतसे हाका । मज घाटूं नका मधीं आतां ॥२॥ तुका म्हणे निद्रा जागृति सुषुप्ति । तुम्ही हो श्रीपती साक्षी येथें ॥३॥
488
आम्ही हरिचे सवंगडे जुने ठायींचे वेडे बागडे । हातीं धरुनी कडे पाठीसवें वागविलों ॥१॥ म्हणोनि भिन्न भेद नाहीं देवा आम्हां एकदेहीं । नाहीं जालों कहीं एका एक वेगळे ॥ध्रु.॥ निद्रा करितां होतों पायीं सवें चि लंका घेतली तई । वान्नरें गोवळ गाईं सवें चारित फिरतसों ॥२॥ आम्हां नामाचें चिंतन राम कृष्ण नारायण। तुका म्हणे क्षण खातां जेवितां न विसंभों ॥३॥
489
आम्ही हरिचे हरिचे । सुर कळिकाळा यमाचे ॥१॥ नामघोष बाण साचे । भाले तुळसी मंजुरेचे ॥ध्रु.॥ आम्ही हरिचे हरिचे दास । कलिकाळावरि घालूं कास ॥२॥ आम्ही हरिचे हरिचे दूत । पुढें पळती यमदूत ॥३॥ तुका म्हणे आम्हांवरी । सुदर्शन घरटी करी ॥४॥
490
आम्हीं गावें तुम्हीं कोणीं कांहीं न म्हणावें । ऐसें तंव आम्हां सांगितलें नाहीं देवें ॥१॥ म्हणा रामराम टाळी वाजवा हातें । नाचा डोला प्रेमें आपुलिया स्वहितें ॥ध्रु.॥ सहज घडे तया आळस करणें तें काई । अग्नीचें भातुकें हात पाळितां कां पायीं ॥२॥ येथें नाहीं लाज भक्तिभाव लौकिक । हांसे तया घडे ब्रम्हहत्यापातक ॥३॥ जया जैसा भाव निरोपण करावा । येथें नाहीं चाड ताळविताळ या देवा ॥४॥ सदैव ज्यां कथा काळ घडे श्रवण । तुका म्हणे येर जन्मा आले पाषाण ॥५॥
491
आम्हीं जाणावें तें काईं तुझें वर्म कोणे ठायीं । अंतपार नाहीं ऐसें श्रुति बोलती ॥१॥ होई मज तैसा मज तैसा साना सकुमार रुषीकेशा । पुरवीं माझी आशा भुजा चारी दाखवीं ॥ध्रु.॥ खालता सप्त ही पाताळा वरता स्वर्गाहूनि ढिसाळा । तो मी मस्यक डोळां कैसा पाहों आपला ॥२॥ मज असे हा भरवसा पढीयें वोसी तयां तैसा । पंढरीनिवासा तुका म्हणे गा विठोबा ॥३॥
492
आम्हीं देतों हाका । कां रे जालासी तूं मुका ॥१॥ न बोलसी नारायणा । कळलासी क्रियाहीना ॥ध्रु.॥ आधीं करूं चौघाचार। मग सांडूं भीडभार ॥२॥ तुका म्हणे सेवटीं । तुम्हां आम्हां घालूं तुटी ॥३॥
493
आम्हीं नामाचें धारक नेणों प्रकार आणीक । सर्व भावें एक विठ्ठल चि प्रमाण ॥१॥ न लगे जाणावें नेणावें गावें आनंदें नाचावें । प्रेमसुख घ्यावें वैष्णवांचे संगती ॥ध्रु.॥ भावबळें घालूं कास लज्जा चिंता दवडूं आस । पायीं निजध्यास म्हणों दास विष्णूचे ॥२॥ भय नाहीं जन्म घेतां मोक्षपदा हाणों लाता । तुका म्हणे सत्ता धरूं निकट सेवेची ॥३॥
494
आम्हीं पतितांनीं घालावें सांकडें । तुम्हां लागे कोडें उगवणें ॥१॥ आचरतां दोष न धरूं सांभाळ । निवाड उकल तुम्हां हातीं ॥ध्रु.॥ न घेतां कवडी करावा कुढावा । पाचारितां देवा नामासाठीं ॥२॥ दयासिंधु नाम पतितपावन । हें आम्हां वचन सांपडलें ॥३॥ तुका म्हणे करूं अन्यायाच्या कोटी । कृपावंत पोटीं तूं चि देवा ॥४॥
495
आम्हीं याची केली सांडी । कोठें तोंडीं लागावें ॥१॥ आहे तैसा असो आतां । चिंतें चिंता वाढते ॥ध्रु.॥ बोलिल्याचा मानी सीण । भिन्न भिन्न राहावें ॥२॥ तुका म्हणे आम्हांपाशीं । धीराऐसी जतन ॥३॥
496
आयुष्य गेलें वांयांविण । थोर झाली नागवण ॥१॥ आतां धांवें धांवें तरी । काय पाहातोसि हरी ॥ध्रु.॥ माझे तुझे या चि गती । दिवस गेले तोंडीं माती ॥२॥ मन वाव घेऊं नेदी । बुडवूं पाहे भवनदी ॥३॥ पडिला विषयाचा घाला । तेणें नागविलें मला ॥४॥ शरण आलों आतां धांवें । तुका म्हणे मज पावें ॥५॥
497
आयुष्य मोजावया बैसला मापारी । तूं कां रे वेव्हारी संसाराचा ॥१॥ नेईंल ओढोनि ठाउकें नसतां । न राहे दुश्चिता हरिविण ॥ध्रु.॥ कठीण हें दुःख यम जाचतील । कोण सोडवील तया ठायीं ॥२॥ राहतील दुरी सज्जन सोयरीं । आठवीं श्रीहरी लवलाहीं ॥३॥ तुका म्हणे किती करिसी लंडायी । होईंल भंडाईं पुढें थोर ॥४॥
498
आयुष्य वेचूनि कुटुंब पोसिलें । काय हित केलें सांग बापा ॥१॥ फुकाचा चाकर जालासी काबाडी । नाहीं सुख घडी भोगावया ॥ध्रु.॥ दुर्लभ मनुष्यजन्म कष्टें पावलासी । दिला कुटुंबासी कामभोग ॥२॥ तुका म्हणे ऐसें आयुष्य नासिलें । पाप तें सांचिलें पतनासी ॥३॥
499
आरुश माझी वाणी बोबडीं उत्तरें । केली ते लेकुरें सलगी पायीं ॥१॥ करावें कवतुक संतीं मायबापीं । जीवन देउनि रोपीं विस्तारिजे ॥ध्रु.॥ आधारें वदली प्रसादाची वाणी । उच्छिष्टसेवणी तुमचिया ॥२॥ तुका म्हणे हे चि करितों विनंती । मागोनि पुढती सेवादान ॥३॥
500
आरुष शब्द बोलों मनीं न धरावें कांहीं । लडिवाळ बाळकें तूं चि आमुचि आई ॥१॥ देई गे विठाबाई प्रेमभातुकें । अवघियां कवतुकें लहानां थोरां सकळां ॥ध्रु.॥ असो नसो भाव आलों तुझिया ठाया । पाहे कृपादृष्टी आतां पंढरीराया ॥२॥ तुका म्हणे आम्ही तुझीं वेडीं वांकुडीं । नामें भवपाश आतां आपुलिया तोडीं ॥३॥
501
आरुषा वचनीं मातेची आवडी । म्हणऊनि तांतडी घेती नाहीं ॥१॥ काय होइल माझें मांडिलें कवतुक । आदराची भूक रडारोवी ॥ध्रु.॥ लपोनियां करी चुकुर माऊली । नाहीं होती केली निष्ठासांडी ॥२॥ तुका म्हणे करी पारखीं वचनें । भेवउनि तान्हें आळवावें ॥३॥
502
आरोनियां पाहे वाट । कटकट सोसेना ॥१॥ आलियांस पुसें मात । तेथें चत्ति लागलें ॥ध्रु.॥ दळीं कांडीं लोकांऐसें । परि मी नसें ते ठायीं ॥२॥ तुका म्हणे येथें पिसें । तेथें तैसें असेल ॥३॥
503
आर्त माझ्या बहु पोटीं । व्हावीं भेटी पायांशी ॥१॥ यासी तुम्ही कृपावंता । माझी चिंता असों द्या ॥ ।ध्रु.॥ तळमळ करी चित्त । अखंडित वियोगें ॥२॥ तुका म्हणे पंढरिनाथा । जाणें वेथा अंतरिंची ॥३॥
504
आर्तभूतां द्यावें दान । खरें पुण्य त्या नांवें ॥१॥ होणार तें सुखें घडो । लाभ जोडो महाबुद्धि ॥ध्रु.॥ सत्य संकल्प च साटीं । उजळा पोटीं रविबिंब ॥२॥ तुका म्हणे मनीं वाव । शुद्ध भाव राखावा ॥३॥
505
आर्तभूतांप्रति । उत्तम योजाव्या त्या शक्ति ॥१॥ फळ आणि समाधान । तेथें उत्तम कारण ॥ध्रु.॥ अल्पें तो संतोषी । स्थळीं सांपडे उदेसीं ॥२॥ सहज संगम । तुका म्हणे तो उत्तम ॥३॥
506
आला भागासी तो करीं वेवसाव । परि राहो भाव तुझ्या पायीं ॥१॥ काय चाले तुम्हीं बांधलें दातारा । वाहिलिया भारा उसंतितों ॥ध्रु.॥ शरीर तें करी शरीराचे धर्म । नको देऊं वर्म चुकों मना ॥२॥ चळण फिरवी ठाव बहुवस । न घडो आळस चिंतनाचा ॥३॥ इंद्रियें करोत आपुले व्यापार । आवडीसी थार देई पायीं ॥४॥ तुका म्हणे नको देऊं काळा हातीं । येतों काकुलती म्हणऊनि ॥५॥
507
आला यांचा भाव देवाचिया मना । अंतरीं कारणांसाठीं होता ॥१॥ होता भाव त्यांचा पाहोनि निराळा । नव्हता पाताळा गेला आधीं ॥२॥ आधीं पाठीमोरीं जालीं तीं सकळें । मग या गोपाळें बुडी दिली ॥३॥ दिली हाक त्याणें जाऊनि पाताळा । जागविलें काळा भुजंगासि ॥४॥ भुजंग हा होता निजला मंदिरीं । निर्भर अंतरीं गर्वनिधि ॥५॥ गर्व हरावया आला नारायण । मिस या करून चेंडुवाचें ॥६॥ चेंडुवाचे मिसें काळया नाथावा । तुका म्हणे देवा कारण हें ॥७॥
508
आलिंगन कंठाकंठीं । पडे मिठी सर्वांगें ॥१॥ न घडे मागें परतें मन । नारायण संभोगी ॥ध्रु.॥ वचनासी वचन मिळे । रिघती डोळे डोळियांत ॥२॥ तुका म्हणे अंतर्ध्यानीं । जीव जीवनीं विराल्या ॥३॥
509
आलिंगनें घडे । मोक्ष सायुज्यता जोडे ॥१॥ ऐसा संताचा महिमा । जाली बोलायाची सीमा ॥ध्रु.॥ तीर्थे पर्वकाळ । अवघीं पायांपें सकळ ॥२॥ तुका म्हणे देवा । त्यांची केली पावे सेवा ॥३॥
510
आलिया अतीता म्हणतसां पुढारें । आपुलें रोकडें सत्व जाय ॥१॥ काय त्याचा भार घेऊनि मस्तकीं । हीनकर्मी लोकीं म्हणावया ॥ध्रु.॥ दारीं हाका कैसें करवतें भोजन । रुची तरि अन्न कैसें देतें ॥२॥ तुका म्हणे ध्वज उभारिला कर । ते शिक्त उदार काय जाली ॥३॥
511
आलिया भोगासी असावें सादर । देवावरी भार घालूनियां ॥१॥ मग तो कृपासिंधु निवारी सांकडें । येर तें बापुडें काय रंके ॥ध्रु.॥ भयाचिये पोटीं दुःखाचिया रासी । शरण देवासी जातां भले ॥२॥ तुका म्हणे नव्हे काय त्या करितां । चिंतावा तो आतां विश्वंभर ॥३॥
512
आलिया संसारा उठा वेग करा । शरण जा उदारा पांडुरंगा ॥१॥ देह हें देवाचें धन कुबेराचें । तेथें मनुष्याचें काय आहे ॥ध्रु.॥ देता देवविता नेता नेवविता । येथ याची सत्ता काय आहे ॥२॥ निमित्याचा धनी केला असे झणी । माझेंमाझें म्हणोनि व्यर्थ गेला ॥३॥ तुका म्हणे कां रे नाशवंतासाटीं । देवासवें आटी पाडितोसी ॥४॥
513
आलिया संसारीं देखिली पंढरी । कीर्ति महाद्वारीं वानूं तुझी ॥१॥ पताकांचे भार नामाचे गजर । देखिल्या संसार सफळ जाला ॥ध्रु.॥ साधुसंतांचिया धन्य जाल्या भेटी । सांपडली लुटी मोक्षाची हे ॥२॥ तुका म्हणे आतां हें चि पैं मागणें । पुढती नाहीं येणें संसारासी ॥३॥
514
आलियें धांवति धांवति भेट होइल म्हुण । तंव ते टळली वेळ वो माझा उरला सीण ॥१॥ आतां काय करूं सांग वो मज भेटेल कैसा । हरिलागीं प्राण फुटे वो थोरी लागली आशा ॥ध्रु.॥ लाविला उशीर बहुतीं बहु ओढिती ओढा । सांभाळितां सांग असांग दुःख पावल्यें पीडा ॥२॥ जळो आतां संसारु वो कई शेवट पुरे । तुकयाच्या स्वामी गोपाळालागीं जीव झुरे ॥३॥
515
आली लळिताची वेळ । असा सावध सकळ ॥१॥ लाहो करा वेगीं स्मरा । टाळी वाउनि विश्वंभरा ॥ध्रु.॥ जालिया अवसान । न संपडती चरण ॥२॥ तुकयाबंधु म्हणे थोडें । अवधि उरली आहे पुढें ॥३॥
516
आली सलगी पायांपाशीं । होइल तैसी करीन ॥१॥ आणीक आम्हीं कोठें जावें । येथें जीवें वेचलों ॥ध्रु.॥ अवघ्या निरोपणा भाव । हा चि ठाव उरलासे ॥२॥ तुका म्हणे पाळीं लळे। कृपाळुवे विठ्ठले ॥३॥
517
आली सिंहस्थपर्वणी । न्हाव्या भटा जाली धणी॥१॥ अंतरीं पापाच्या कोडी । वरिवरि बोडी डोईं दाढी ॥ध्रु.॥ बोडिलें तें निघालें । काय पालटलें सांग वहिलें ॥२॥ पाप गेल्याची काय खुण । नाहीं पालटले अवगुण ॥३॥ भक्तिभावें विण । तुका म्हणे अवघा सीण ॥४॥
518
आले भरा केणें । येरझार चुके जेणें ॥१॥ उभें केलें विटेवरी । पेंठ इनाम पंढरी ॥ध्रु.॥ वाहाती मारग । अवघें मोहोरलें जग ॥२॥ तुका म्हणे माप । खरें आणा माझे बाप ॥३॥
519
आले संत पाय ठेविती मस्तकीं । येहीं उभयलोकीं सरता केलों ॥१॥ वंदीन पाउलें लोळेन चरणीं । आजि इच्छाधणी फिटईंल ॥ध्रु.॥ अवघीं पूर्व पुण्यें जालीं सानुकूळ । अवघें चि मंगळ संतभेटी ॥२॥ तुका म्हणे कृतकृत्य जालों देवा । नेणें परि सेवा डोळां देखें ॥३॥
520
आले सुरवर नानापक्षी जाले । सकळ अवतरले श्वापदवेषें ॥१॥ श्वानखररूपी होऊनियां आले । उच्छष्टि कवळ वेचिताति ॥ध्रु.॥ होऊनियां दीन हात पसरिती । मागोनियां घेती उष्टावळी ॥२॥ अभिमान आड घालोनि बाहेरि । तयां म्हणे घ्या रे धणी ॥३॥ तुका म्हणे धणी लाधली अपार । तया सुखा पार काय सांगों ॥४॥
521
आले हो संसारा तुम्ही एक करा । मुक्तिमार्ग हळू चि धरा । काळदंड कुंभयातना थोरा । कां रे अघोरा देखसी ना ॥१॥ नाहीं त्या यमासि करुणा । बाहेर काढितां कुडी प्राणा । ओढाळ सांपडे जैं धान्या । चोर यातना धरिजेतां ॥२॥ नाहीं दिलें पावइल कैसा । चालतां पंथ तेणें वळसा । नसेल ठाउकें ऐकतो कैसा । नेती बंद जैसा धरोनियां ॥३॥ क्षण एक नागीवा पायीं । न चलवे तया करितां कांहीं । वोढितां कांटवणा सोई । अग्निस्तंभीं बाही कवटाळविती ॥४॥ देखोनि अंगें कांपती । तये नदीमाजी चालविती । लागे ठाव न लगे बुडविती । वरि मारिती यमदंड ॥५॥ तानभूक न साहावे वेळ । तो राखिती कितीएक काळ । पिंड पाळूनि कैसा सीतळ । तो तप्तभूमीं ज्वाळ लोळविती ॥६॥ म्हणउनी करा कांहीं सायास । व्हावेल तर व्हा रे उदास । करवेल तर करा नामघोष । सेवा भक्तिरस तुका म्हणे ॥७॥
522
आलें तें आधीं खाईंन भातुकें । मग कवतुकें गाईंन ओव्या ॥१॥ सांगितला आधीं आइकों निरोप । होइल माझा बाप पुसें तों तें ॥२॥ तुका म्हणे माझे सखे वारकरी । आले हे माहेरीहून आजि ॥३॥
523
आलें देवाचिया मना । तेथें कोणाचें चालेना ॥१॥ हरिश्चंद्र ताराराणी । वाहे डोंबा घरीं पाणी ॥ध्रु.॥ पांडवांचा साहाकारी । राज्यावरोनि केले दुरी ॥२॥ तुका म्हणे उगेचि राहा । होईंल तें सहज पाहा ॥३॥
524
आलें धरायच पेट । पुढें मागुतें न भेटे ॥१॥ होसी फजीती वरपडा । लक्ष चौर्यासीचे वेढां ॥ध्रु.॥ नाहीं कोणांचा सांगात । दुःख भोगितां आघात ॥२॥ एका पाउलाची वाट । कोणां सांगावा बोभाट ॥३॥ जुंतिजेसी घाणां । नाहीं मारित्या करुणा ॥४॥ तुका म्हणे हित पाहें । जोंवरि हें हातीं आहे ॥५॥
525
आलें फळ तेव्हां राहिलें पिकोन । जरी तें जतन होय देंठीं ॥१॥ नामें चि सिद्धी नामें चि सिद्धी । व्यभिचारबुद्धी न पवतां ॥ध्रु.॥ चालिला पंथ तो पावईल ठाया । जरि आड तया नये कांहीं ॥२॥ तुका म्हणे मध्यें पडती आघात । तेणें होय घात हाणी लाभ ॥३॥
526
आलों उल्लंघुनि दुःखाचे पर्वत । पायांपाशीं हित तुमच्या तरी ॥१॥ न देखेल लासा दुःखी होतें मन । कठिणें कठिण वाटतसे ॥ध्रु.॥ नव्हे सांडी परि वाटतें निरास । न ये माझा दिस संकल्पाचा ॥२॥ तुका म्हणे तुम्हीं सदैव जी देवा । माझ्या हा चि जीवा एक ठाव ॥३॥
527
आळणी ऐसें कळों आलें । त्यासी भलें मौन्य चि ॥१॥ नये कांहीं वेचूं वाणी । वेडे घाणीसांगातें ॥ध्रु.॥ वेगळें तें देहभावा । भ्रम जीवा माजिरा ॥२॥ तुका म्हणे कवतुक केलें । किंवा भलें दवडितां ॥३॥
528
आळवितां कंठ शोकला भीतर । आयुष्य वेचे धीर नाहीं मना ॥१॥ अझून कां नये हें तुझ्या अंतरा । दिनाच्या माहेरा पांडुरंगा ॥ध्रु.॥ धन दिसे डोळा दगडाचे परी । भोग ते शरीरीं विष जालें ॥२॥ चुकलों काय तें मज क्षमा करीं । आळिंगूनि हरी प्रेम द्यावें ॥३॥ अवस्था राहिली रूपाची अंतरीं । बाहेर भीतरी सर्व काळ ॥४॥ तुका म्हणे माजे सकळ उपाय । पांडुरंगा पाय तुझे आतां ॥५॥ ॥ शिवाजी राजे यांनीं स्वामींस अबदागिरी, घोडा, कारकून असे न्यावयास पाठविले ते अभंग ॥ १४ ॥
529
आळवितां बाळें । मातेतें सुख आगळें ॥१॥ द्यावें आवडी भातुकें । पाहे निवे कवतुकें ॥ध्रु.॥ लेववूनि अळंकार । दृष्टी करावी सादर ॥२॥ आपुलिये पदीं । बैसवूनि कोडें वंदी ॥३॥ नेदी लागों दिठी । उचलोनि लावी कंठीं ॥४॥ तुका म्हणे लाभा । वारी घ्या वो पद्मनाभा ॥५॥
530
आळवीन स्वरें । कैशा मधुरा उत्तरें ॥१॥ यें वो यें वो पांडुरंगे । प्रेमपान्हा मज दें गे ॥ध्रु.॥ पसरूनि चोंची । वचन हें करुणेची ॥२॥ तुका म्हणे बळी । आम्ही लडिवाळें आळीं ॥३॥
531
आळस आला अंगा । धांव घालीं पांडुरंगा ॥१॥ सोसूं शरीराचे भाव । पडती अवगुणाचे घाव ॥ध्रु.॥ करावीं व्यसनें । दुरी येउनि नारायणें ॥२॥ जवळील दुरी । जालों देवा धरीं करीं ॥३॥ म्हणउनि देवा । वेळोवेळां करीं धावा ॥४॥ तुका म्हणे पांडुरंगा । दुरी धरूं नका अंगा ॥५॥
532
आळस पाडी विषयकामीं । शक्ती देई तुझ्या नामीं ॥१॥ हे चि विनवणी विनवणी । विनविली धरा मनीं ॥ध्रु.॥ आणिक वचना मुकी वाणी । तुमच्या गर्जो द्यावी गुणीं ॥२॥ तुका म्हणे पाय डोळां । पाहें एरवी अंधळा ॥३॥
533
आळिकरा कोठें साहातें कठिण । आपुला तें प्राण देऊं पाहे ॥१॥ सांभाळावें मायबापें कृपादृष्टी । पीडितां तो दृष्टी देखों नये ॥ध्रु.॥ अंतरलों मागें संवसारा हातीं । पायांपें सरतीं जालों नाहीं ॥२॥ तुका म्हणे तुम्ही विचारा जी देवा । ठेवाल तें ठेवा कोणे परी ॥३॥
534
आळी करावी ते कळतें बाळका । बुझवावें हें कां नेणां तुम्ही ॥१॥ निवाड तो तेथें असे पायांपाशीं । तुम्हांआम्हांविशीं एकेठायीं ॥ध्रु.॥ आणीक तों आम्ही न देखोंसें जालें । जाणावें शिणलें भागलेंसें ॥२॥ तुका म्हणे तुम्हां लागतें सांगावें । अंतरींचें ठावें काय नाहीं ॥३॥
535
आवडी कां ठेवूं । बैसोनियां संगें जेवूं ॥१॥ मागें नको ठेवूं उरी । माझी आण तुजवरी ॥ध्रु.॥ देखिले प्रकार । त्याचे पाहेन साचार ॥२॥ तुका म्हणे बाळीं । केली चाहाडी सकळीं ॥३॥
536
आवडी धरूनि करूं गेलों लाड । भक्तिप्रेमकोड न पुरे चि ॥१॥ म्हणऊनि जीव ठेला असावोनि । खेद होतो मनीं बहु साल ॥ध्रु.॥ वेठीऐसें वाटे निर्फळ कारण । शीतळ होऊन खोडावलों ॥२॥ तुका म्हणे सरतें नव्हें चि पायांपें । बळ केलें पापें नव्हें चि भेटी ॥३॥
537
आवडी धरोनी आलेती आकारा । केला हा पसारा याजसाटीं ॥१॥ तें मी तुझें नाम गाईंन आवडी । क्षण एक घडी विसंबेना ॥ध्रु.॥ वर्म धरावें हा मुख्यधर्मसार । अवघे प्रकार तयापासीं ॥२॥ वेगळ्या विचारें वेगळाले भाव । धरायासी ठाव बहु नाहीं ॥३॥ तुका म्हणे घालूं इच्छेचिये पोटीं । कवळुनी धाकुटी मूर्ती जीवें ॥४॥
538
आवडी न पुरे मायबापापासीं । घडों का येविसीं सकईंल ॥१॥ होईंल नेमलें आपुलिया काळें । आलीयाचा बळें आघ्रो उरे ॥ध्रु.॥ जाणविलें तेथे थोडें एकवेळा । सकळ ही कळा सर्वोत्तमीं ॥२॥ तुका म्हणे निवेदिलें गुह्य गुज । आतां तुझी तुज सकळ चिंता ॥३॥
539
आवडी न पुरे सेवितां न सरे । पडियेली धुरेसवें गांठी ॥१॥ न पुरे हा जन्म हें सुख सांटितां । पुढती ही आतां हें चि मागों ॥ध्रु.॥ मारगाची चिंता पालखी बैसतां । नाहीं उसंतितां कोसपेणी ॥२॥ तुका म्हणे माझी विठ्ठल माउली । जाणे ते लागली भूक तान ॥३॥
540
आवडी येते कळों । गुणें चिन्हें उमटती ॥१॥ पोटीचें ओठीं उभें राहे । चत्ति साहे मनासी ॥ध्रु.॥ डाहोळे याची भूक गर्भा । ताटीं प्रभा प्रतिबिंबे ॥२॥ तुका म्हणे मानोन घ्यावें । वाटे खावें वाटतें ॥३॥
541
आवडीची न पुरे धणी । प्रीत मनीं बैसली ॥१॥ नित्य नवा कळवळा । मायबाळामध्यें तों ॥ध्रु.॥ सुख सुखा भेटों आलें । होय वाल्हें पोटींचे ॥२॥ तुका म्हणे ब्रम्हानंदें । संतवृंदें चरणापें ॥३॥
542
आवडीची सलगी पूजा । विषम दुजा भाव तो ॥१॥ ऐसीं उफराटीं वर्में । कळों भ्रमें न येती ॥ध्रु.॥ न लगे समाधान मोल । रुचती बोल प्रीतीचे ॥२॥ तुका म्हणे एका जीवें । सूत्र व्होवें गुंतलें ॥३॥
543
आवडीचे भेटी निवे । चित्त पावे विश्रांती ॥१॥ बरवियाचा छंद मना । नारायणा अवीट ॥ध्रु.॥ तळणे कांहीं साम्या पुरे । हें तों नुरे ये रुचि ॥२॥ तुका म्हणे बरवें जालें । फावलें हें कळे त्या ॥३॥
544
आवडीचें दान देतो नारायण । बाहे उभारोनि राहिलासे ॥१॥ जें जयासी रुचे तें करी समोर । सर्वज्ञ उदार मायबाप ॥ध्रु.॥ ठायीं पडिलिया तें चि लागे खावें । ठायींचे चि घ्यावें विचारूनि ॥२॥ बीज पेरूनियां तें चि घ्यावें फळ । डोरलीस केळ कैंचें लागे ॥३॥ तुका म्हणे देवा कांहीं बोल नाहीं । तुझा तूं चि पाहीं शत्रु सखा ॥४॥
545
आवडीच्या ऐसें जालें । मुखा आलें हरिनाम ॥१॥ आतां घेऊं धणीवरि । मागें उरी नुरेतों ॥ध्रु.॥ सांटवण मनाऐसी । पुढें रासी अमुप ॥२॥ तुका म्हणे कारण जालें । विठ्ठल तीं अक्षरीं ॥३॥
546
आवडीच्या मतें करिती भजन । भोग नारायणें म्हणती केला ॥१॥ अवघा देव म्हणे वेगळें तें काय । अर्थासाठीं डोय फोडूं पाहे ॥ध्रु.॥ लाजे कमंडल धरितां भोपळा । आणीक थीगळा प्रावरणा ॥२॥ शाला गडवे धातुद्रव्यइच्छा चित्तीं । नैश्वर्य बोलती अवघें मुखें ॥३॥ तुका म्हणें यांस देवा नाहीं भेटी । ऐसे कल्पकोटि जन्म घेतां ॥४॥
547
आवडीनें धरिलीं नांवें । प्रियभावें चिंतन ॥१॥ वेडा जाला वेडा जाला । लांचावला भक्तीसी ॥ध्रु.॥ निचाड्या चाड धरी । तुळसी करीं दळ मागे ॥२॥ धरिला मग न करी बळ । तुका म्हणे कळ पायीं ॥३॥
548
आवडीभोजन प्रकार परवडी । भिन्नाभिन्न गोडी एक रसा ॥१॥ भोगित्या पंगती लाधलों प्रसाद । तिंहीं नाहीं भेद राखियेला ॥ध्रु.॥ पाकसिद्धि स्वहस्तकें विनियोग। आवडीचे भाग सिद्ध केले ॥२॥ तुका म्हणे आला उच्छिष्ट प्रसाद । तेणें हा आनंद माझ्या जीवा ॥३॥
549
आवडीसारिखें संपादिलें सोंग । अनंत हें मग जालें नाम ॥१॥ कळे ऐशा वाटा रचिल्या सुलभा । दुर्गम या नभाचा ही साक्षी ॥ध्रु.॥ हातें जेवी एक मुखीं मागे घांस । माउली जयास तैसी बाळा ॥२॥ तुका म्हणे माझें ध्यान विटेंवरी । तैसी च गोजिरी दिसे मूर्ति ॥३॥
550
आवडे पंढरी भीमा पांडुरंग । चंद्रभागा लिंग पांडुरंग ॥१॥ कामधेनु कल्पतरु चिंतामणी । आवडीची धणी पुरवीती ॥२॥ तुका म्हणे जीवा थोर जालें सुख । नाठवे हे भूक तान कांहीं ॥३॥
551
आवडे सकळां मिष्टान्न । रोग्या विषा त्यासमान ॥१॥ दर्पण नावडे तया एका । ठाव नाहीं ज्याच्या नाका ॥२॥ तुका म्हणे तैशा खळा । उपदेशाचा कांटाळा ॥३॥
552
आवडे हें रूप गोजिरें सगुण । पाहातां लोचन सुखावलें ॥१॥ आतां दृष्टीपुढें ऐसा चि तूं राहीं । जों मी तुज पाहें पांडुरंगा ॥ध्रु.॥ लाचावलें मन लागलीसे गोडी । तें जीवें न सोडीं ऐसें जालें ॥२॥ तुका म्हणे आम्ही केली जे लडिवाळी । पुरवावी आळी मायबापें ॥३॥
553
आवडेल तैसें तुज आळवीन । वाटे समाधान जीवा तैसें ॥१॥ नाहीं येथें कांहीं लौकिकाची चाड । तुजविण गोड देवराया ॥ध्रु.॥ पुरवीं मनोरथ अंतरींचें आर्त । धायेवरि गीत गाई तुझे ॥२॥ तुका म्हणे लेंकी आळवी माहेरा । गाऊं या संसारा तुज तैसें ॥३॥
554
आवल नाम आल्ला बडा लेते भुल न जाये । इलाम त्याकालजमुपरताही तुंब बजाये ॥१॥ आल्ला एक तुं नबी एक तुं ॥ध्रु.॥ काटतें सिर पावों हात नहीं जीव उराये । आगले देखे पिछले बुझे । आपें हजुर आयें ॥२॥ सब सबरी नचाव म्याने । खडा आपनी सात । हात पावों रखते जबाब । नहीं आगली बात ॥३॥ सुनो भाई बजार नहीं । सब हि निरचे लाव । नन्हा बडा नहीं कोये एक ठोर मिलाव ॥४॥ एक तार नहीं प्यार । जीवतनकी आस । कहे तुका सो हि मुंढा । राखलिये पायेनपास ॥५॥ डोई फोडा - अभंग १
555
आविसाचे आसे गळ गिळी मासा । फुटोनियां घसा मरण पावे ॥१॥ मरणाचे वेळे करी तळमळ । आठवी कृपाळ तये वेळीं ॥२॥ अंतकाळीं ज्याच्या नाम आलें मुखा । तुका म्हणे सुखा पार नाहीं ॥३॥
556
आशा तृष्णा माया अपमानाचें बीज । नासिलिया पूज्य होईजेतें ॥१॥ अधीरासी नाहीं चालों जातां मान । दुर्लभ दरुषण धीर त्याचें ॥२॥ तुका म्हणे नाहीं आणिकांसी बोल । वांयां जाय मोल बुद्धीपाशीं ॥३॥
557
आशा ते करविते बुद्धीचा लोप । संदेह तें पाप कैसें नव्हे ॥१॥ आपला आपण करावा विचार । प्रसन्न तें सार मन गोही ॥ध्रु.॥ नांवें रूपें अंगीं लाविला विटाळ । होतें त्या निर्मळ शुद्ध बुद्ध ॥२॥ अंधळ्यानें नये देखण्याची चाली । चालों ऐसी बोली तुका बोले ॥३॥
558
आशा हे समूळ खाणोनि काडावी । तेव्हां चि गोसावी व्हावें तेणें ॥१॥ नाहीं तरी सुखें असावें संसारीं । फजिती दुसरी करूं नये ॥ध्रु.॥ आशा मारूनिया जयवंत व्हावें । तेव्हां चि निघावें सर्वांतूनि ॥२॥ तुका म्हणे जरीं योगाची तांतडी । आशेची बीबुडी करीं आधीं ॥३॥
559
आशाबद्ध आम्ही भाकितसों कींव । तत्पर हा जीव कार्यापाशीं ॥१॥ प्रतिउत्तराची पाहातसें वाट । करूनि बोभाट महाद्वारीं ॥ध्रु.॥ आपुल्या उचितें करूनियां ठेवीं । संबंध गोसावी तोडोनियां ॥२॥ तुका म्हणे एक जालिया निवाड । कोण बडबड करी मग ॥३॥
560
आशाबद्ध जन । काय जाणे नारायण ॥१॥ करी इंद्रियांची सेवा । पाहे आवडीचा हेवा ॥ध्रु.॥ भ्रमलें चावळे । तैसें उचित न कळे ॥२॥ तुका म्हणे विषें । अन्न नाशियलें जैसें ॥३॥
561
आशाबद्ध तो जगाचा दास । पूज्य तो उदास सर्वजना ॥१॥ आहे तें अधीन आपुले हातीं । आणिकां ठेविती काय बोल ॥ध्रु.॥ जाणतिया पाठीं लागला उपाध । नेणता तो सद्धि भोजनासी ॥२॥ तुका म्हणे भय बांधलें गांठीं । चोर लागे पाठी दुम तया ॥३॥
562
आशाबद्ध बहु असे निलाजिरें । होय म्हणें धीरें फळ टोंकें ॥१॥ कारणापें चित्त न पाहें अपमान । चित्त समाधान लाभासाटीं ॥२॥ तुका म्हणे हातें लोटिलें न कळे । झांकितसें डोळे पांडुरंगा ॥३॥
563
आशाबद्ध वक्ता । धाक श्रोतयाच्या चित्ता ॥१॥ वांयां गेलें तें भजन । उभयतां लोभी मन ॥ध्रु.॥ बहिर्मुख एके ठायीं । तैसें जालें तया दोहीं ॥२॥ माप तैसी गोणी । तुका म्हणे रितीं दोन्ही ॥३॥
564
आशाबद्ध वक्ता । भय श्रोतयाच्या चित्ता ॥१॥ गातो तें चि नाहीं ठावें । तोंड वासी कांहीं द्यावें ॥ध्रु.॥ जालें लोभाचें मांजर । भीक मागे दारोदार ॥२॥ तुका म्हणे गोणी । माप आणि रितीं दोन्ही ॥३॥
565
आशीर्वाद तया जाती । आवडी चित्तीं देवाची ॥१॥ कल्याण ती असो क्षेम । वाढे प्रेम आगळें ॥ध्रु.॥ भक्तिभाग्यगांठी धन । त्या नमन जीवासी ॥२॥ तुका म्हणे हरिचे दास । तेथें आस सकळ ॥३॥
566
आश्चर्य तें एक जालें । मना आलें माझिया ॥१॥ मढ्यापाशीं करुणा केली । तैसी गेली वृथा हे ॥ध्रु.॥ न यावा तो कैसा राग । खोटें मग देखोनि ॥२॥ तुका म्हणे कैंचा बोला । शोध विठ्ठला माझिया ॥३॥
567
आश्चर्य या वाटे नसत्या छंदाचें । कैसें दिलें साचें करोनियां ॥१॥ दुजियासी तंव अकळ हा भाव । करावा तो जीव साक्ष येथें ॥ध्रु.॥ एकीं अनेकत्व अनेकीं एकत्व । प्रकृतिस्वभाव प्रमाणें चि ॥२॥ तुका म्हणे करूं उगवूं जाणसी । कुशळ येविशीं तुम्ही देवा ॥३॥
568
आश्वासावें दास । तरी घडे तो विश्वास ॥१॥ नाहीं चुकत चाकरी । पुट लाडे शोचे थोरी ॥ध्रु.॥ स्वामीच्या उत्तरें । सुख वाटे अभयें करें ॥२॥ न मगें परि भातें । तुका म्हणे निढळि रितें ॥३॥
569
आषाढी निकट । आणी कार्तिकीचा हाट ॥१॥ पुरे दोन्ही च बाजार । न लगे आणीक व्यापार ॥ध्रु.॥ तें चि घ्यावें तें चि घ्यावें । कैवल्याच्या रासी भावें ॥२॥ कांहीं कोणा नेणे । विठो वांचूनि तुका म्हणे ॥३॥
570
आस निरसली गोविंदाचे भेटी । संवसारा तुटी पुढिलिया ॥१॥ पुढें पाठविलें गोविंदें गोपाळां । देउनि चपळां हातीं गुढी ॥२॥ हाका आरोळिया देउनि नाचती । एक सादाविती हरि आले ॥३॥ आरंधीं पडिलीं होतीं तयां घरीं । संकीर्ण त्या नारी नरलोक ॥४॥ लोका भूक तान नाहीं निद्रा डोळा । रूप वेळोवेळां आठविती ॥५॥ आहाकटा मग करिती गेलिया । आधीं ठावा तयां नाहीं कोणा ॥६॥ आधीं चुकी मग घडे आठवण । तुका म्हणे जन परिचयें ॥७॥
571
आसन शयन भोजन गोविंदें । भरलें आनंदें त्रिभुवन॥१॥ अवघियां केली काळें तडातोडी । अवश्वरु घडी पुरों नये ॥ध्रु.॥ वांटणी घातले शरीराचे भाग । दुजियाचा लाग खंडियेला ॥२॥ आवडीच्या आलें आहारासी रूप । पृथक संकल्प मावळले ॥३॥ काम तरी क्रोध बुद्धि मन नासे । भ्रमाचे वोळसे गिळिले शांती ॥४॥ तुका म्हणे मना श्रीरंगाचा रंग । बैसला अभंग एकविध ॥५॥
572
आसावलें मन जीवनाचें ओढी । नामरूपीं गोडी लावियेली ॥१॥ काय तुझे पायीं नाहीं भांडवल । माझे मिथ्या बोल जाती ऐसे ॥ध्रु.॥ काय लोखंडाचे पाहे गुणदोष । सिवोन परीस सोनें करी ॥२॥ तुका म्हणे माझें अवघें असों द्यावें । आपुलें करावें ब्रीद साच ॥३॥
573
आसुरी स्वभाव निर्दय अंतर । मानसीं निष्ठ अतिवादी ॥१॥ याति कुळ येथें असे अप्रमाण । गुणाचें कारण असे अंगीं ॥ध्रु.॥ काळकुट पितळ सोनें शुद्ध रंग । अंगाचेंच अंग साक्ष देतें ॥२॥ तुका म्हणे बरी जातीसवें भेटी । नवनीत पोटीं सांटविलें ॥३॥
574
आहा आहा रे भाई । हें अन्नदानाचें सत्र । पव्हे घातली सर्वत्र । पंथीं अवघे पंथ मात्र । इच्छाभोजनाचें आर्त पुरवावया ॥१॥ यावें तेणें घ्यावें । न सरेसें केलें सदाशिवें । पात्र शुद्ध पाहिजे बरवें । मंगळभावें सकळ हरि म्हणा रे ॥२॥ नव्हे हें कांहीं मोकळें । साक्षी चौघांचिया वेगळें । नेदी नाचों मताचिया बळें । अणु अणोरणीया आगळें । महदि महदा साक्षित्वें हरि म्हणा रे ॥३॥ हे हरि नामाची आंबिली । जगा पोटभरी केली । विश्रांति कल्पतरूची साउली । सकळां वर्णां सेवितां भली । म्हणा हर हर महादेव ॥४॥ तुका हरिदास तराळ । अवघे हाकारी सकळ । या रे वंदूं शिखरातळ । चैत्रमास पर्वकाळ महादेवदर्शनें ॥५॥
575
आहा रे भाई । गंगा नव्हे जळ । वृक्ष नव्हे वड पिंपळ । तुळसी रुद्राक्ष नव्हे माळ । श्रेष्ठ तनु देवाचिया ॥१॥ समुद्र नदी नव्हे पैं गा । पाषाण म्हणों नये लिंगा । संत नव्हती जगा । मानसा त्या सारिखे ॥२॥ काठी म्हणों नये वेतु । अन्न म्हणों नये सांतु । राम राम हे मातु । नये म्हणों शब्द हे ॥३॥ चंद्र सूर्य नव्हती तारांगणें । मेरु तो नव्हे पर्वता समान । शेष वासुकी नव्हे सर्प जाण । विखाराच्या सारिखे ॥४॥ गरुड नव्हे पाखरूं । ढोर नव्हे नंदिकेश्वरू । झाड नव्हे कल्पतरू । कामधेनु गाय न म्हणावी ॥५॥ कूर्म नव्हे कासव । डुकर नव्हे वराह । ब्रम्हा नव्हे जीव । स्त्री नव्हे लक्ष्मी ॥६॥ गवाक्ष नव्हे हाड । पाटाव नव्हे कापड । परीस नव्हे दगड । सगुण ते ईश्वरीचे ॥७॥ सोनें नव्हे धातु । मीठ नव्हे रेतु । नाहीं नाहीं चर्मांतु । कृष्णजिन व्याघ्रांबर ॥८॥ मुक्ताफळें नव्हेति गारा । खड्याऐसा नव्हे हिरा । जीव नव्हे सोइरा । बोळवीजे स्वइच्छेनें ॥९॥ गांव नव्हे द्वारावती । रणसोड नव्हे मूर्ति । तीर्थ नव्हे गोमती । मोक्ष घडे दर्शनें ॥१०॥ कृष्ण नव्हे भोगी । शंकर नव्हे जोगी । तुका पांडुरंगीं । हा प्रसाद लाधला ॥११॥ सौर्या - अभंग ११
576
आहा रे भाई । तयावरी माझी ब्रीदावळी । भ्रष्ट ये कळी क्रियाहीन ॥१॥ थुंका थुंका रे त्याच्या तोंडावरी । वाणिली ते थोरी दवडा वांयां बाहेरी ॥ध्रु.॥ बाइलेचा दास पित्रांस उदास । भीक भिकार्यास नये दारा ॥२॥ विद्याबळें वाद सांगोनियां छळी । आणिकांसि फळी मांडोनियां ॥३॥ गांविंचिया देवा नाहीं दंडवत । ब्राम्हण अतीत घडे चि ना ॥४॥ सदा सर्वकाळ करितो चि निंदा । स्वप्नीं ही गोविंदा आठवीना ॥५॥ खासेमध्यें धन पोटासि बंधन । नेणें ऐसा दानधर्म कांहीं ॥६॥ तुका म्हणे नटे दावुनियां सोंग । लवों नेदी अंग भक्तिभावें ॥७॥
577
आहा रे भाई । नमो उदासीन जाले देहभावा । आळविती देवा तया नमो ॥१॥ नमो तीर्थपंथें चालती तयांसी । येती त्यांसी बोळविती त्यां नमो ॥२॥ नमो तयां संतवचनीं विश्वास । नमो भावें दास्य गुरुचें त्यां ॥३॥ नमो तया मातापित्यांचें पाळण । नमो त्या वचन सत्य वदे ॥४॥ नमो तया जाणे आणिकाचें सुखदुःख । राखे तान भुक तया नमो ॥५॥ परोपकारी नमो पुण्यवंता । नमो त्या दमित्या इंद्रियांसि ॥६॥ तुका म्हणे नमो हरिचिया दासा । तेथें सर्व इच्छा पुरलीसे ॥७॥
578
आहा रे भाई । प्रथम नमूं तो विनायक । ठेवुनि गुरुचरणीं मस्तक । वदेल प्रसादिक वाणी । हरिहरांचे पवाडे ॥१॥ माझी ऐसी ब्रीदावळी । दासें दासत्वें आगळी । पान्हेरीनें मार्ग मळी । जीवन घ्या रे कापडि हो ॥२॥ जें या सीतळाहुनि सीतळ । पातळाहुनि जें पातळ । प्रेमामृत रसाळ । तें हें सेवा अहो भाग्याचे ॥३॥ जिंकाल तरी जिंका रे अभिमान । दवडाल तरी दवडा लज्जा आणि मान । धराल ते धरा शंभूचे चरण । दावाल पण ऐसा दावा तो ॥४॥ काळा घेऊं नेदीं वाव । आला तो राखें घावडाव । शुद्ध सत्वीं राखोनि भाव । म्हणा महादेव हरिहर वाणी गर्जो द्या ॥५॥ पराविया नारी माउली समान । परधनीं बाटों नेदीं मन । जीवित्व तें तृणासमान । स्वामिकाजीं जाण शूर म्हणों तया ॥६॥ शक्ति वेचाविया परउपकारा । खोटें खोट्याचा पसारा । सत्य तें भवनदीचा तारा । आळस तो न करा येथे अहो सांगतों ॥७॥ व्रत करा एकादशी सोमवार । कथा पूजन हरिजागर । पुण्य तें असे गातां नाचतां बहु फार । पुन्हा बोलिला संसार नाहीं नाहीं सत्यत्वें ॥८॥ संग संतांचा करितां बरवा । उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा । पंथ तो सुपंथें चालावा । उगवा वासना लिगाड ॥९॥ तुका चालवितो कावडी । प्रवृत्ति निवृत्ति चोखडी । पुढती पुढती अधिक गोडी । भरुनि कळस भजन आवडी केशवदास नटतसे ॥१०॥
579
आहांच वाहांच आंत वरी दोन्ही । न लगा गडणी आम्हां तैशा ॥१॥ भेऊं नये तेथें भेडसावूं कोणा । आवरूनि मना बंद द्यावा ॥२॥ तुका म्हणे कांहीं अभ्यासावांचुनी । नव्हे हे करणी भलतीची ॥३॥
580
आहाकटा त्याचे करिती पितर । वंशीं दुराचार पुत्र जाला ॥१॥ गळे चि ना गर्भ नव्हे चि कां वांज । माता त्याची लाजलावा पापी ॥ध्रु. ॥ परपीडें परद्वारीं सावधान । सादर चि मन अभाग्याचें ॥२॥ न मळितां निंदा चाहडी उपवास । संग्रहाचे दोष सकळ ही ॥३॥ परउपकार पुण्य त्या वावडें । विषाचें तें कीडें दुग्धीं मरे ॥४॥ तुका म्हणे विटाळाचीच तो मूर्ति । दया क्षमा शांति नातळे त्या ॥५॥
581
आहाच तो मोड वाळलियामधीं । अधीराची बुद्धि तेणें न्यायें ॥१॥ म्हणऊनि संग न करीं दुसरें । चित्त मळीन द्वारें दोड पडे ॥ध्रु.॥ विषासाटीं सर्पां भयाभीत लोक । हें तों सकळीक जाणतसां ॥२॥ तुका म्हणे काचें राहे कुळांकुड । अवगुण तो नाड ज्याचा तया ॥३॥
582
आहारनिद्रे न लगे आदर । आपण सादर ते चि होय ॥१॥ परमितेविण बोलणें ते वांयां । फार थोडें काया पिंड पीडी ॥ध्रु.॥ समाधान त्याचें तो चि एक जाणे । आपुलिये खुणे पावोनियां ॥२॥ तुका म्हणे होय पीडा ते न करीं । मग राहें परी भलतिये ॥३॥
583
आहे ऐसा देव वदवावी वाणी । नाहीं ऐसा मनीं अनुभवावा ॥१॥ आवडी आवडी कळिवराकळिवरी । वरिली अंतरी ताळी पडे ॥ध्रु.॥ अपूर्व दर्शन मातेपुत्रा भेटी । रडूं मागे तुटी हर्षयोगें ॥२॥ तुका म्हणे एकें कळतें दुसरें । बरियानें बरें आहाचाचें आहाच ॥३॥
584
आहे तरिं सत्ता । ऐशा करितों वारता ॥१॥ अंगसंगाचीं उत्तरें । सलगीसेवेनें लेंकरें ॥ध्रु.॥ तरी निकटवासें । असों अशंकेच्या नासें ॥२॥ तुका म्हणे रुची । येथें भिन्नता कैची ॥३॥
585
आहे तें चि आम्ही मागों तुजपाशीं । नव्हों तुज ऐसीं क्रियानष्टें ॥१॥ न बोलावीं तों च वर्में बरें दिसे । प्रकट ते कैसे गुण करूं ॥ध्रु.॥ एका ऐसें एका द्यावयाचा मोळा । कां तुम्हां गोपाळा नाहीं ऐसा ॥२॥ तुका म्हणे लोकां नाहीं कळों आलें । करावें आपुलें जतन तों ॥३॥
586
आहे तें चि पुढें पाहों । बरे आहों येथें चि ॥१॥ काय वाढवूनि काम । उगा च श्रम तृष्णेचा ॥ध्रु.॥ स्थिरावतां ओघीं बरें । चाली पुरें पडेना ॥२॥ तुका म्हणे विळतां मन । आम्हां क्षण न लगे ॥३॥
587
आहे तें सकळ कृष्णा चि अर्पण । न कळतां मन दुजें भावी ॥१॥ म्हणउनी पाठी लागतील भूतें । येती गवसीत पांचजणें ॥ध्रु.॥ ज्याचे त्या वंचलें आठव न होतां । दंड या निमित्ताकारणें हा ॥२॥ तुका म्हणे काळें चेंपियेला गळा । मी मी वेळोवेळा करीतसे ॥३॥
588
आहे तैसा आतां आहे ठायीं बरा । ठेविलों दातारा उचितें त्या ॥१॥ वचनाचा भार पडिलिया शिरीं । जालें मग भारी उतरेना ॥ध्रु.॥ अबोल्याची सवे लावुनियां मना । फाकों नेदीं गुणा ऐसें करूं ॥२॥ तुका म्हणे आम्हां गोंवळ्याचा संग । राखतें तें अंग जाणतसों ॥३॥
589
आहे सकळां वेगळा । खेळे कळा चोरोनि ॥१॥ खांबसुत्राचिये परी । देव दोरी हालवितो ॥ध्रु.॥ आपण राहोनि निराळा । कैसी कळा नाचवी ॥२॥ जेव्हां असुडितो दोरी । भूमीवरी पडे तेव्हां ॥३॥ तुका म्हणे तो जाणावा । सखा करावा आपुला ॥४॥
590
आहेतें सकळ प्रारब्धा हातीं । यावें काकुलती यासी आतां ॥१॥ ऐसा माझ्या मनें सांगितला भाव । तोंवरीच देव दुजा नाहीं ॥ध्रु.॥ अवघियांची जेव्हां सारावी करकर । भावबळें थार धरूं येसी ॥२॥ तुका म्हणे तुज ठेवावें पुजून । आणीक ते गुण नाहीं येथें ॥३॥
591
आहो उभा विटेवरी । भरोवरी चुकविली ॥१॥ निवारलें जाणें येणें । कोणा कोणें रुसावे ॥ध्रु.॥ संकल्पासी वेचे बळ । भारे फळ निर्माण ॥२॥ तुका म्हणे उभयतां । भेटी सत्ता लोभाची ॥३॥
592
इंद्रावणा केलें साकरेचें आळें । न सांडी वेगळें कडुपण ॥१॥ कावळ्याचें पिलूं कौतुकें पोशिलें । न राहे उगलें विष्ठेविण ॥ध्रु.॥ क्षेम देतां अंगा गांधेलाची पोळी । करवी नादाळी महाशब्द ॥२॥ तुका म्हणे ऐसे न होती ते भले । घालिती ते घाले साधुजना ॥३॥
593
इंद्रियांचीं दिनें । आम्ही केलों नारायणें ॥१॥ म्हणऊनि ऐसें सोसीं । काय सांगों कोणांपाशी ॥ध्रु.॥ नाहीं अंगीं बळ । त्याग करींसा सकळ ॥२॥ तुका म्हणे मोटें । प्रारब्ध होतें खोटें ॥३॥
594
इंद्रियांसी नेम नाहीं । मुखीं राम म्हणोनि काई ॥१॥ जेविं मासीसंगें अन्न । सुख नेदी तें भोजन ॥ध्रु.॥ कीर्तन करावें । तैसें करूनी दावावें ॥२॥ हें तों अंगीं नाहीं चिन्हें । गाइलें वेश्येच्या ढव्यानें ॥३॥ तुका म्हणे नका रागा । संत शिवूं नेदिती अंगा ॥४॥
595
इंिद्रयाचें पुरे कोड । तें चि गोड पुढती ही ॥१॥ जावें म्हणती पंढरपुरा । हा चि बरा संसार ॥ध्रु.॥ बैसलें तें मनामुळीं । सुख डोळीं देखिलें ॥२॥ तुका म्हणे देती कान । वाणावाण निवडूनी ॥३॥
596
इच्छा चाड नाहीं । न धरी संकोच ही कांहीं ॥१॥ उदका नेलें तिकडे जावें । केलें तैसें सहज व्हावें ॥ध्रु.॥ मोहरी कांदा ऊंस । एक वाफा भिन्न रस ॥२॥ तुका म्हणे सुख । पीडा इच्छा पावे दुःख ॥३॥
597
इच्छावें तें जवळी आलें । काय बोलें कारण ॥१॥ नामरूपीं पडिली गांठी । अवघ्या गोष्टी सरल्या ॥ध्रु.॥ मुकियाचे परी जीवीं । साकर जेवों खादली ॥२॥ तुका म्हणे काय बोलें । आतां भलें मौन्य ची ॥३॥
598
इच्छिती तयांसी व्हावें जी अरूप । आम्हांसी स्वरूपस्थिती चाड ॥१॥ आतां नव्हे माझा भाव अनारिसा । पाउलांनी इच्छा गोवियेली ॥ध्रु.॥ लेंकरासी कोठें जाणत्याची परी । करूं येते दुरी धरावया ॥२॥ लागली न सुटे नामाची आवडी । माझी भावजोडी भंगूं नका ॥३॥ घेसील वेढे मुक्तीच्या अभिळासें । चाळवीं जा पिसे ब्रम्हज्ञानी ॥४॥ तुका म्हणे माझा कोठें भक्तिरस । पाडावया ओस चाळविसी ॥५॥
599
इच्छिलें ते शकुनवंती । होय देती तात्काळ ॥१॥ क्षीरा नीरा निवाड करी । वरावरी विठ्ठल ॥ध्रु.॥ भाग्याविण कैचें फळ । अंतर मळमूत्राचें ॥२॥ तुका म्हणे संचित कुडें । तें बापुडें करीतसे ॥३॥
600
इच्छेचें पाहिलें । डोळीं अंतीं मोकलिलें ॥१॥ यांचा विश्वास तो काईं । ऐसें विचारूनि पाहीं ॥ध्रु.॥ सुगंध अभ्यंगें पाळितां । केश फिरले जाणतां ॥२॥ पिंड पाळितां ओसरे । अवघी घेऊनि मागें सरे ॥३॥ करितां उपचार । कोणां नाहीं उपकार ॥४॥ अल्प जीवन करीं । तुका म्हणे साधीं हरी ॥५॥
601
इच्छेपाशीं आलों फिरोनि मागुता । स्वामीसेवकता आवडीचे ॥१॥ द्यावें लवकरी मागितलें दान । मुळींचें जतन करूनि असें ॥ध्रु.॥ उपाय हे करीं एका चि वचना । दावूनियां खुणा ठाया येतों ॥२॥ तुका म्हणे गांठी किती तुजपाशीं । जगाच्या तोडिसी चिंतनानें ॥३॥
602
इतुलें करीं देवा ऐकें हें वचन । समूळ अभिमान जाळीं माझा ॥१॥ इतुलें करीं देवा ऐकें हे गोष्टी । सर्व समदृष्टी तुज देखें ॥ध्रु.॥ इतुलें करीं देवा विनवितों तुज । संतांचे चरणरज वंदीं माथां ॥२॥ इतुलें करीं देवा ऐकें हे मात । हृदयीं पंढरीनाथ दिवसरात्रीं ॥३॥ भलतिया भावें तारीं पंढरीनाथा । तुका म्हणे आतां शरण आलों ॥४॥
603
इतुलें करीं भलत्या परी । परद्रव्य परनारी । सांडुनि अभिलाष अंतरीं । वर्तें वेव्हारीं सुखरूप ॥१॥ न करीं दंभाचा सायास । शांती राहें बहुवस । जिव्हे सेवीं सुगंधरस । न करीं आळस रामनामीं ॥२॥ जनमित्र होई सकळांचा । अशुभ न बोलावी वाचा । संग न धरावा दुर्जनाचा । करीं संतांचा सायास ॥३॥ करिसी देवाविण आस । अवघी होईल निरास । तृष्णा वाढविसी बहुवस । कधीं सुखास न पवसी ॥४॥ धरूनि विश्वास करीं धीर । करितां देव हा चि निर्धार । तयाचा वाहे योगक्षेमभार । नाहीं अंतर तुका म्हणे ॥५॥
604
इनामाची भरली पेठ । वाहाती दाट मारग ॥१॥ अवघेची येती वाण । अवघे शकुन लाभाचे ॥ध्रु.॥ अडचणी त्या केल्या दुरी । देण्या उरी घेण्याच्या ॥२॥ तुका म्हणे जोडी जाली । ते आपुली आपणा ॥३॥
605
इहलोकीं आम्हां भूषण अवकळा । भोपळा वाकळा आणि भिक्षा ॥१॥ निमोली संपदा भयविरहित । सर्वकाळ चत्ति समाधान ॥ध्रु.॥ छिद्राचा आश्रम उंदीरकुळवाडी । धन नाम जोडी देवाचें तें ॥२॥ तुका म्हणे एक सेवटीं राहाणें । वर्ततों या जना विरहित ॥३॥
606
इहलोकींचा हा देहे । देव इच्छिताती पाहें ॥१॥ धन्य आम्ही जन्मा आलों । दास विठोबाचे जालों ॥ध्रु.॥ आयुष्याच्या या साधनें । सच्चिदानंद पदवी घेणें ॥२॥ तुका म्हणे पावठणी । करूं स्वर्गाची निशाणी ॥३॥
607
उंच निंच कैसी पाइकाची वोळी । कोण गांढे बळी निवडिले ॥१॥ स्वामिकाजीं एक सर्वस्वें तत्पर । एक ते कुचर आशाबद्ध ॥ध्रु.॥ प्रसंगावांचूनि आणिती आयुर्भाव । पाईंक तो नांव मिरवी वांयां ॥२॥ गणतीचे एक उंच निंच फार । तयांमध्यें शूर विरळा थोडे ॥३॥ तुका म्हणे स्वामी जाणे त्यांचा मान । पाईंक पाहोन मोल करी ॥४॥
608
उंचनिंच नेणे कांहीं भगवंत । तिष्ठे भाव भक्त देखोनियां ॥१॥ दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी । दैत्या घरीं रक्षी प्रल्हादासी ॥ध्रु.॥ चर्म रंगूं लागे रोहिदासा संगीं । कबिराचे मागीं विणी शेले ॥२॥ सजनकसाया विकुं लागे मास । मळा सांवत्यास खुरपूं लागे ॥३॥ नरहरिसोनारा घडों फुंकू लागे । चोख्यामेर्या संगें ढोरें ओढी ॥४॥ नामयाची जनी सवें वेची शेणी । धर्मा घरीं पाणी वाहे झाडी ॥५॥ नाम्यासवें जेवी नव्हे संकोचित । ज्ञानियाची भिंत अंगीं ओढी ॥६॥ अर्जुनाचीं घोडीं हाकी हा सारथी । भक्षी पोहे प्रीती सुदाम्याची ॥७॥ गौळियांचे घरीं गाईं अंगें वळी । द्वारपाळ बळीद्वारीं जाला ॥८॥ यंकोबाचें ॠण फेडी हृषीकेशी । आंबॠषीचे सोशी गर्भवास ॥९॥ मिराबाईं साटीं घेतो विषप्याला । दामाजीचा जाला पाडेवार ॥१०॥ घडी माती वाहे गोर्या कुंभाराची । हुंडी महत्याची अंगें भरी ॥११॥ पुंडलिकासाटीं अझूनि तिष्ठत । तुका म्हणे मात धन्य याची ॥१२॥
609
उंबरांतील कीटका । हें चि ब्रम्हांड ऐसें लेखा ॥१॥ ऐसीं उंबरें किती झाडीं । ऐशीं झाडें किती नवखडीं ॥ध्रु.॥ हें चि ब्रम्हांड आम्हांसी । ऐसीं अगणित अंडें कैसीं ॥२॥ विराटाचे अंगी तैसे । मोजूं जातां अगणित केंश ॥३॥ ऐशा विराटाच्या कोटी । सांटवल्या ज्याच्या पोटीं ॥४॥ तो हा नंदाचा बाळमुकुंद । तान्हा म्हणवी परमानंद ॥५॥ ऐशी अगम्य ईंश्वरी लीळा । ब्रम्हानंदीं गम्य तुक्याला ॥६॥
610
उकरडा आधीं अंगीं नरकाडी । जातीची ते जोडी ते चि चित्ती ॥१॥ कासयानें देखे अंधळा माणिकें । चवीविण फिके वांयां जाय ॥ध्रु.॥ काय जाणे विष पालटों उपचारें । मुखासी अंतर तों चि बरें ॥२॥ तुका म्हणे काय उपदेश वेड्या । संगें होतो रेड्यासवें कष्ट ॥३॥
611
उखतें आयुष्य जायांचें कळिवर । अवघें वोडंबर विषयांचें ॥१॥ कोणासी हा लागे पुसणें विचार । मनें चि सादर करूं आतां ॥ध्रु.॥ उत्पित्त प्रळय पडिलें दळण । पाकाचें भोजन बीज वाढे ॥२॥ तुका म्हणे जाऊं अभयाच्या ठायां । रिघों देवराया शरण वेगीं ॥३॥
612
उगविल्या गुंती । ऐशा मागें नेणों किती ॥१॥ ख्यात केली अजामेळें । होतें निघालें दिवाळें ॥ध्रु.॥ मोकलिला प्रायश्चित्ती । कोणी न धरिती हातीं ॥२॥ तुका म्हणे मुक्त वाट । वैकुंठीची घडघडाट ॥३॥
613
उगें चि हें मन राहातें निश्चळ । तरि कां तळमळ साट होती ॥१॥ काय तुमचीं नेणों कवतुक विंदानें । सर्वोत्तमपणें खेळतसां ॥ध्रु.॥ नानाछंदें आम्हां नाचवावें जीवां । वाढवाव्या हांवा भलत्यापुढें ॥२॥ तुका म्हणे तुम्ही आपुली प्रतिष्ठा । वाढवावया चेष्टा करीतसां ॥३॥
614
उचित जाणावें मुख्य धर्म आधीं । चित्तशुद्ध बुद्धी ठायीं स्थिर ॥१॥ न घलावी धांव मनाचिये ओढी । वचन आवडी संताचिये ॥२॥ अंतरीं या राहे वचनाचा विश्वास । न उगे उपदेश तुका म्हणे ॥३॥
615
उचित तें काय जाणावें दुर्बळें । थोरिवेचें काळें तोंड देवा ॥१॥ देतों हाका कोणी नाइकती द्वारीं । ओस कोणी घरीं नाहीं ऐसें ॥ध्रु.॥ आलिया अतीता शब्द समाधान । करितां वचन कायवेंचे॥२॥ तुका म्हणे तुम्हां साजे हें श्रीहरी । आम्ही निलाजिरीं नाहीं ऐसीं ॥३॥
616
उचित न कळे इंद्रियाचे ओढी । मुखें बडबडी शिकलें तें ॥१॥ आपण जाऊन न्यावीं नरकास । बळें बेताळीस कुळें जग ॥ध्रु.॥ अबोलणें बोले डोळे झांकुनियां । बडबडी वांयां दंभासाटीं ॥२॥ तुका म्हणे आम्ही तेथील पारखी । नाचे देखोवेखीं जाणों खरें ॥३॥
617
उचिताचा काळ । साधावया युक्तिबळ । आपलें सकळ । ते प्रसंगीं पाहिजे ॥१॥ नेम नाहीं लाभ हानि । अवचित घडती दोनी । विचारूनि मनीं । पाहिजे तें प्रयोजावें ॥ध्रु.॥ जाळ जाळा काळें । करपों नेदावें आगळें । जेवितां वेगळें । ज्याचें त्याचें तेथें तें शोभे ॥२॥ पाळी नांगर पाभारीं । तन निवडूनि सोंकरी । तुका म्हणे धरी । सेज जमा सेवटीं ॥३॥
618
उचिताचा दाता । कृपावंता तूं अनंता ॥१॥ कां रे न घालिसी धांव । तुझें उच्चारितां नांव ॥ध्रु.॥ काय बळयुक्ति । नाहीं तुझे अंगीं शक्ति ॥२॥ तुका म्हणे तूं विश्वंभर । ओस माझें कां अंतर ॥३॥
619
उचिताचा भाग होतों राखोनियां । दिसती ते वांयां कष्ट गेले ॥१॥ वचनाची कांहीं राहे चि ना रुचि । खळाऐसें वाची कुची जालें ॥ध्रु.॥ विश्वासानें माझें बुडविलें घर । करविला धीर येथवरी ॥२॥ तुका म्हणे शेकीं थार नाहीं बुड । कैसें तुम्हीं कोड पुरविलें ॥३॥
620
उच्चारूं यासाटीं । आम्ही नाम तुझें कंठीं ॥१॥ येसी धांवत धांवत । माउलिये कृपावंते ॥ध्रु.॥ पाय चित्तीं धरूं । क्रिडा भलते ठायीं करूं ॥२॥ तुका म्हणे माझे गंगे । प्रेमभरित पांडुरंगे ॥३॥
621
उजळलें भाग्य आतां । अवघी चिंता वारली ॥१॥ संतदर्शनें हा लाभ । पद्मनाभ जोडला ॥ध्रु.॥ संपुष्ट हा हृदयपेटी । करूनि पोटीं सांटवूं ॥२॥ तुका म्हणे होता ठेवा । तो या भावा सांपडला ॥३॥
622
उजळावया आलों वाटा । खरा खोटा निवाड ॥१॥ बोलविले बोल बोलें । धनीविठ्ठला सन्निध ॥ध्रु.॥ तरी मनीं नाहीं शंका । बळें एका स्वामीच्या ॥२॥ तुका म्हणे नये आम्हां । पुढें कामा गबाळ ॥३॥
623
उजळितां उजळे दीपकाची वाती । स्वयंभ ते ज्योति हिर्या अंगीं ॥१॥ एकीं महाकष्टें मेळविलें धन । एकासी जतन दैवयोगें ॥ध्रु.॥ परिमळें केलें चंदनाचे चिन्ह । निवडी ते भिन्न गाढव तो ॥२॥ तुका म्हणे जया अंगीं हरिठसा । तो तरे सहसा वंद्य होय ॥३॥
624
उठा भागलेती उजगरा । जाला स्वामी निद्रा करा ॥१॥ वाट पाहाते रुक्मिणी । उभी मंचक संवारुणी ॥ध्रु.॥ केली करा क्षमा । बडबड पुरुषोत्तमा ॥२॥ लागतो चरणा । तुकयाबंधु नारायणा ॥३॥
625
उठा सकळ जन उठिले नारायण । आनंदले मुनिजन तिन्ही लोक ॥१॥ करा जयजयकार वाद्यांचा गजर । मृदंग विणे अपार टाळ घोळ ॥ध्रु.॥ जोडोनि दोन्ही कर मुख पाहा सादर । पायावरी शिर ठेवूनियां ॥२॥ तुका म्हणे काय पढियंतें तें मागा । आपुलालें सांगा सुख दुःखें ॥३॥
626
उठाउठीं अभिमान । जाय ऐसें स्थळ कोण ॥१॥ तें या पंढरीस घडे । खळां पाझर रोकडे ॥ध्रु.॥ अश्रूचिया धारा । कोठें रोमांच शरीरा ॥२॥ तुका म्हणे काला । कोठें अभेद देखिला ॥३॥
627
उठोनियां तुका गेला निजस्थळा । उरले राउळा माजी देव ॥१॥ निउल जालें सेवका स्वामींचें । आज्ञे करुनी चित्त समाधान ॥ध्रु.॥ पहुडलिया हरी अनंतशैनावरी । तेथें नाहीं उरी कांहीं काम ॥२॥ अवघी बाहेर घालूनि गेला तुका । सांगितलें लोकां निजले देव ॥३॥ दसरा - अभंग १
628
उतरलों पार । सत्य झाला हा निर्धार ॥१॥ तुझें नाम धरिलें कंठीं । केली संसारासी तुटी ॥ध्रु.॥ आतां नव्हे बाधा । कोणेविशीं कांहीं कदा ॥२॥ तुका म्हणे कांहीं । आतां उरलें ऐसें नाहीं ॥३॥
629
उत्तम घालावें आमुचिये मुखीं । निवारावें दुःखी होऊनि तें ॥१॥ न बैसे न वजे जवळूनि दुरी । मागें पुढें वारी घातपात ॥ध्रु.॥ नाहीं शंका असो भलतिये ठायीं । मावळलें पाहीं द्वैताद्वैत ॥२॥ तुका म्हणे भार घेतला विठ्ठलें । अंतरीं भरलें बाहए रूप ॥३॥
630
उत्तम त्या याति । देवा शरण अनन्यगति ॥१॥ नाहीं दुजा ठाव । कांहीं उत्तम मध्यम भाव ॥ध्रु.॥ उमटती ठसे । ब्रम्हप्राप्ति अंगीं दिसे ॥२॥ भाविक विश्वासी ।तुका म्हणे नमन त्यांसी ॥३॥
631
उदंड शाहाणे होत तर्कवंत । परि या नेणवे अंत विठोबाचा ॥१॥ उदंडा अक्षरां करोत भरोवरी । परि ते नेणवे थोरी विठोबाची ॥२॥ तुका म्हणे नाहीं भोळेपणाविण । जाणीव ते सिण रितें माप ॥३॥
632
उदकीं कालवी शेण मलमूत्र । तो होय पवित्र कासयानें ॥१॥ उद्धारासी ठाव नाहीं भाग्यहीना । विन्मुख चरणां संतांचिया ॥ध्रु.॥ दुखवी तो बुडे सांगडीचा तापा । अतित्याईं पापाची च मूर्ति ॥२॥ तुका म्हणे जेव्हां फिरतें कपाळ । तरी अमंगळ योग होतो ॥३॥
633
उदार कृपाळ अनाथांचा नाथ । ऐकसी मात शरणागतां ॥१॥ सर्व भार माथां चालविसी त्यांचा । अनुसरलीं वाचा काया मनें ॥ध्रु.॥ पाचारितां उभा राहासी जवळी । पाहिजे ते काळीं पुरवावें ॥२॥ चालतां ही पंथ सांभाळिसी वाटे । वारिसील कांटे खडे हातें ॥३॥ तुका म्हणे चिंता नाहीं तुझ्या दासां । तूं त्यांचा कोंवसा सर्वभावें ॥४॥
634
उदार कृपाळ पतितपावन । ब्रिदें नारायणा जाती वांयां ॥१॥ वर्णिलासि श्रुति नेणे तुझा पार । राहे मौनाकार नेति ऐसें ॥ध्रु.॥ तेथें माझा धांवा पावे कोणीकडे । अदृष्ट हें पुढें वोडवलें ॥२॥ कोण ऐसा भक्त लाधला भाग्यासी । आठवण ऐसी द्यावी तुज ॥३॥ तुका म्हणे नको पाहों माझा अंत । जाणोनि हे मात उडी घालीं ॥४॥
635
उदार कृपाळ सांगसी जना । तरी कां त्या रावणा मारियेलें । नित्य नित्य पूजा करी श्रीकमळीं । तेणें तुझें काय केलें ॥१॥ काय बडिवार सांगसी वांयां । ठावा पंढरिराया आहेसि आम्हां । एकला चि जरी देऊं परिहार । आहे दुरिवरी सीमा ॥ध्रु.॥ कर्णाऐसा वीर उदार जुंझार । तो तुवां जर्जर केला वाणीं । पडिला भूमी परी नयेची करुणा । दांत पाडियेले दोन्ही ॥२॥ श्रीयाळ बापुडे सात्विकवाणी । खादलें कापूनि त्याचें पोर । ऐसा कठिण कोण होईंल दुसरा । उखळीं कांडविलें शिर ॥३॥ सिभ्री चक्रवर्ती करितां यज्ञयाग । त्याचें चिरिलें अंग ठायीं ठायीं । जाचऊनि प्राण घेतला मागें । पुढें न पाहतां कांहीं ॥४॥ बळीचा अन्याय सांग होता काय । बुडविला तो पाय देऊनि माथां । कोंडिलें दार हा काय कहार । सांगतोसी चित्त कथा ॥५॥ हरश्चिंद्राचें राज्य घेऊनियां सर्व । विकविला जीव डोंबाघरीं । पाडिला विघड नळा दमयंतीमधीं । ऐसी तुझी बुद्धि हरि ॥६॥ आणिकही गुण सांगावे किती । केलिया विपित्त माउसीच्या । वधियेला मामा सखा पुरुषोत्तमा । म्हणे बंधु तुकयाचा ॥७॥
636
उदार चक्रवर्ती । वैकुंठीचा भूपति । पुंडलिकाचिया प्रीती । विटेवरी राहिला ॥१॥ सर्वसिद्धीचा दातार । सवें आणिला परिवार । भक्त अभयंकर । घ्याघ्या ऐसें म्हणतसे ॥ध्रु.॥ जेणें हें विश्व निमिऩलें । महर्षीदेवा संस्थापिलें । एकवीस स्वर्गांतें धरिलें । सत्तामात्रें आपुलिया ॥२॥ तुका म्हणे कृपावंत । इच्छिले पुरवी अर्थ । रिद्धिसिद्धिमुक्ती देतसे । शेखीं संग आपुला ॥३॥
637
उदार तूं हरी ऐसी कीर्ति चराचरीं । अनंत हे थोरी गर्जतील पवाडे ॥१॥ तुझे लागों पायीं माझा भाव पुसी जन्ममरणां ठाव । देवाचा तूं देव स्वामी सकळा ब्रम्हांडा ॥ध्रु.॥ मागणें तें तुज मागों जीवभाव तुज सांगों । लागों तरी लागों पायां तुमच्या दातारा ॥२॥ दिसों देसी कीविलवाणें तरी तुज चि हें उणें । तुका म्हणे जिणें माझें तुज अधीन ॥३॥
638
उदारा कृपाळा अंगा देवांच्या देवा । तुजसवें पण आतां आमुचा दावा ॥१॥ कैसा जासी सांग आतां मजपासुनी । केलें वाताहात दिले संसारा पाणी ॥ध्रु.॥ अवघीं आवरूनि तुझे लाविलीं पाठीं । आतां त्या विसर सोहंकोहंच्या गोष्टी ॥२॥ तुका म्हणे आतां चरणीं घातली मिठी । पडिली ते पडो तुम्हा आम्हांसी तुटी ॥३॥
639
उदारा कृपाळा पतितपावना । ब्रिदें नारायणा साच तुझीं ॥१॥ वर्णिलासी जैसा जाणतां नेणतां । तैसा तूं अनंता साच होसी ॥ध्रु.॥ दैत्यां काळ भक्तां मेघश्याममूर्ति । चतुर्भुज हातीं शंख चक्र ॥२॥ काम इच्छा तयां तैसा होसी राणीं । यशोदेच्या स्तनीं पान करी ॥३॥ होऊनि सकळ कांहींच न होसी । तुका म्हणे यासी वेद ग्वाही ॥४॥
640
उदासीना पावल्या वेगीं । अंगा अंगीं जडलिया ॥१॥ वेटाळिला भोंवता हरी । मयोरफेरीं नाचती ॥ध्रु.॥ मना आले करिती चार । त्या फार हा एकला ॥२॥ तुका म्हणे नारायणीं । निराजनी मीनलिया ॥३॥
641
उदासीनाचा देह ब्रम्हरूप । नाहीं पुण्य पाप लागत त्या ॥१॥ अनुताप अंगीं अग्निचिया ज्वाळा । नाहीं मृगजळा विझों येत ॥ध्रु.॥ दोष ऐशा नावें देहाचा आदर । विटलें अंतर अहंभावें ॥२॥ तुका म्हणे जाय नासोनियां खंती । तंव चि हे चित्तीं बद्धता ते ॥३॥
642
उद्धत त्या जाती । द्रवें रंगल्या उद्धती ॥१॥ म्हणऊनि बहु फार । त्यांसी असावें अंतर ॥ध्रु.॥ कैंचें पाठी पोट । गोडविषासी सेवट ॥२॥ तुका म्हणे सापा । न कळे कुरवाळिलें बापा ॥३॥
643
उद्धवअक्रूरासी । आणीक व्यासआंबॠषी । रुक्मांगदाप्रल्हादासी । दाविलें तें दाखवीं ॥१॥ तरि मी पाहेन पाहेन । तुझे श्रीमुखचरण । उतावळि मन । तयाकारणें तेथें ॥ध्रु.॥ जनकश्रुतदेवा करीं । कैसा शोभलासी हरी । विदुराच्या घरीं । कण्या धरी कवतुकें ॥२॥ पांडवा अकांतीं । तेथें पावसी स्मरती । घातलें द्रौपदी । यागीं बिरडें चोळीचें ॥३॥ करी गोपीचें कवतुक । गाईंगोपाळांसी सुख । दावीं तें चि मुख । दृष्टी माझ्या आपुलें ॥४॥ तरि तूं अनाथाचा दाता । मागतियां शरणागतां । तुका म्हणें आतां । कोड पुरवीं हें माझें ॥५॥
644
उद्वेगाची धांव बैसली आसनीं । पडिलें नारायणीं मोटळें हें ॥१॥ सकळ निश्चिंती जाली हा भरवसा । नाहीं गर्भवासा येणें ऐसा ॥ध्रु.॥ आपुलिया नांवें नाहीं आम्हां जिणें । अभिमान तेणें नेला देवें ॥२॥ तुका म्हणे चेळें एकाचिया सत्ता । आपुलें मिरवितां पणें ऐसें ॥३॥
645
उद्वेगासी बहु फाकती मारग । नव्हे ऐसें अंग माझें होतें ॥१॥ आतां कोण यासी करणें विचार । तो देखा साचार पांडुरंगा ॥ध्रु ॥ मज तो अत्यंत दर्शनाची आस । जाला तरि हो नाश जीवित्वाचा ॥२॥ तुका म्हणे आहे वचनाची उरी । करितों तोंवरि विज्ञापना ॥३॥
646
उधानु काटीवरि चोपडुची आस । नवरा राजस मिरवतसे ॥१॥ जिव्हाळ्याचा काठी उबाळ्याच्या मोटा । नवरा चोहटा मिरवतसे ॥ध्रु.॥ तुळसीची माळ नवरीचे कंठीं । नोवरा वैकुंठीं वाट पाहे ॥२॥ तुका म्हणे ऐसी नोवर्याची कथा । परमार्थ वृथा बुडविला ॥३॥
647
उधाराचा संदेह नाहीं । याचा कांहीं सेवकां ॥१॥ पांडुरंग अभिमानी । जीवदानी कोंवसा ॥ध्रु.॥ बुडतां जळीं जळतां अंगीं । ते प्रसंगीं राखावें ॥२॥ तुका म्हणे आम्हांसाटीं । कृपा पोटीं वागवी ॥३॥
648
उपकारासाटीं बोलों हे उपाय । येणेंविण काय आम्हां चाड ॥१॥ बुडतां हे जन न देखवे डोळां । येतो कळवळा म्हणउनि ॥२॥ तुका म्हणे माझे देखतिल डोळे । भोग देते वेळे येईल कळों ॥३॥
649
उपकारी असे आरोणि उरला । आपुलें तयाला पर नाहीं ॥१॥ लाभावरि घ्यावें सांपडलें काम । आपला तो श्रम न विचारी ॥ध्रु.॥ जीवा ऐसें देखे आणिकां जीवांसी । निखळ चि रासि गुणांची च ॥२॥ तुका म्हणे देव तयांचा पांगिला । न भंगे संचला धीर सदा ॥३॥
650
उपचारासी वांज जालों । नका बोलों यावरी ॥१॥ असेल तें असो तैसें । भेटीसरिसें नमन ॥ध्रु.॥ दुसर्यामध्यें कोण मिळे । छंद चाळे बहु मतें ॥२॥ एकाएकीं आतां तुका । लौकिका या बाहेरी ॥३॥
651
उपजला प्राणी न राहे संसारीं । बैसला सेजारी काळ उसां ॥१॥ पाहा तो उंदीर घेउनि जाय बोका । तैसा काळ लोका नेत असे ॥ध्रु.॥ खाटिकाचे घरीं अजापुत्र पाहें । कसाबाची गाय वांचे कैसी ॥२॥ तुका म्हणे कांहीं करा काढाकाढी । जाती ऐसी घडी पुन्हा नये ॥३॥
652
उपजलों मनीं । हे तों स्वामीची करणी ॥१॥ होइल प्रसादाचें दान । तरि हें कवुतक पाहेन ॥ध्रु.॥ येइल अभय जरि । तरि हे आज्ञा वंदिन शिरीं ॥२॥ भक्तीप्रयोजना । प्रयोजावें बंदिजना ॥३॥ यश स्वामिचिये शिरीं । दास्य करावें किंकरीं ॥४॥ तुका म्हणे आळीकरा । त्यासी योजावें उत्तरा ॥५॥
653
उपजल्या काळें शुभ कां शकुन । आतां आवरोन राहिलेती ॥१॥ नाहीं मागितली वचनाची जोडी । निष्काम कोरडी वरिवरि ॥ध्रु.॥ सत्याविण काय उगी च लांबणी । कारियाची वाणी येर भूस ॥२॥ तुका म्हणे ऐसी कोणा चाळवणी । न विचारा मनीं पांडुरंगा ॥३॥
654
उपजों मरों हे तों आमुची मिरासी । हें तूं निवारिसी तरी थोर ॥१॥ उभा राहीं करीं खरा खोटा वाद । आम्ही जालों निंद लंडीपणें ॥ध्रु.॥ उभयतां आहे करणें समान । तुम्हां ऐसा म्हणें मी ही देवा ॥२॥ तुका म्हणे हातीं सांपडलें वर्म । अवघाची भ्रम फेडिन आतां ॥३॥
655
उपजोनियां पुढती येऊं । काला खाऊं दहींभात ॥१॥ वैकुंठीं तों ऐसें नाहीं । कवळ कांहीं काल्याचें ॥ध्रु.॥ एकमेकां देऊं मुखीं । सुखीं घालूं हुंबरी ॥२॥ तुका म्हणे वाळवंट । बरवें नीट उत्तम ॥३॥
656
उपजोनियां मरें । परि हें चि वाटे बरें ॥१॥ नाहीं आवडीसी पार । न म्हणावें जालें फार ॥ध्रु.॥ अमृताची खाणी । उघडली नव्हे धणी ॥२॥ तुका म्हणे पचे । विठ्ठल हें मुखा साचें ॥३॥
657
उपदेश किती करावा खळासी । नावडे तयासी बरें कांहीं ॥१॥ शुद्ध कां वासना नव्हे चांडाळाची । होळी संचिताची केली तेणें ॥ध्रु.॥ नाहीं भाव मनीं नाइके वचन । आपला आपण उणें घेतों ॥२॥ तुका म्हणे त्यासी काय व्याली रांड । करी बडबड रिती दिसे ॥३॥
658
उपदेश तो भलत्या हातीं । जाला चित्तीं धरावा ॥१॥ नये जाऊं पात्रावरी । कवटी सारी नारळें ॥ध्रु.॥ स्त्री पुत्र बंदीजन । नारायण स्मरविती ॥२॥ तुका म्हणे रत्नसार । परि उपकार चिंधीचे ॥३॥
659
उपाधिवेगळे तुम्ही निविऩकार । कांहीं च संसार तुम्हां नाहीं ॥१॥ ऐसें मज करूनि ठेवा नारायणा । समूळ वासना नुरवावी ॥ध्रु.॥ निसंग तुम्हांसी राहणें एकट । नाहीं कटकट साहों येक ॥२॥ तुका म्हणे नाहीं मिळों येत शिळा । रंगासी सकळा स्पटिकाची ॥३॥
660
उपाधीच्या नांवें घेतला सिंतोडा । नेदूं आतां पीडा आतळों ते ॥१॥ काशासाठीं हात भरूनि धुवावे । चालतिया गोवे मारगासि ॥ध्रु.॥ काय नाहीं देवें करूनि ठेविलें । असें तें आपुलें ते ते ठायीं ॥२॥ तुका म्हणे जेव्हां गेला अहंकार । तेव्हां आपपर बोळविले ॥३॥
661
उपाधीजें बीज । जळोनि राहिलें सहज ॥१॥ आम्हां राहिली ते आतां । चाली देवाचिया सत्ता ॥ध्रु.॥ प्राधीन तें जिणें । केलें सत्ता नारायणें ॥२॥ तुका म्हणे जाणें पाय । खुंटले आणीक उपाय ॥३॥
662
उपास कराडी । तिहीं करावीं बापुडीं ॥१॥ आम्ही विठोबाचे दास । चिंता झुगारावी आस ॥ध्रु.॥ भक्तीच्या उत्कषॉ । नाहीं मुक्तीचें तें पिसें ॥२॥ तुका म्हणे बळ । अंगीं आमुच्या सकळ ॥३॥
663
उपासा सेवटीं अन्नासवें भेटी । तैसी माझी मिठी पडो पायीं ॥१॥ पुरवीं वासना साच सर्वजाणा । आम्हां नारायणा अंकिताची ॥ध्रु.॥ बहुदिसां पुत्रामातेमध्यें भेटीं । तैसा दाटो पोटीं प्रीतिउभोड ॥२॥ तुका म्हणे धन कृपणा सोयरें । यापरि दुसरें नहो आतां ॥३॥
664
उपेक्षिला येणें कोणी शरणागत । ऐसी नाहीं मात आईंकिली ॥१॥ आतां काय ब्रीद सांडील आपुलें । ठायींचें धरिलें जाणोनियां ॥ध्रु.॥ माझ्या दोषासाटीं होइल पाठमोरा । ऐसा कोण पुरा भोग बळी ॥२॥ तुका म्हणे रूप आमुच्या कैवारें । धरिलें गोजिरें चतुर्भुज ॥३॥
665
उभय भाग्यवंत तरी च समान । स्थळीं समाधान तरी च राहे ॥१॥ युक्तीचें गौरव नसतां जिव्हाळा । सांचवणी जळा परी नाश ॥ध्रु.॥ लोखंडा परीस ज्ञानिया तो शठ । नांवाचा पालट दगड खरा ॥२॥ तुका म्हणे अवघे विनोदाचे ठाव । एकात्मक भाव नाहीं तेथें ॥३॥
666
उभा ऐल थडी । तेणें घालूं नये उडी ॥१॥ पुढें गेल्याचे उपाय । करावे ते केले काय ॥ध्रु.॥ दिसतें आहारीं । नये जाऊं ऐशावरी ॥२॥ अळसाची धाडी । तुका म्हणे बहु नाडी ॥३॥
667
उभा देखिला भीमातीरीं । कर मिरवले कटावरी । पाउलें तरी सम चि साजिरीं । नाम तरी अनंत अतिगोड ॥१॥ शंखचक्रांकित भूषणें । जडितमेखळा चिद्रत्नें । पितांबर उटी शोभे गोरेपणें । लोपलीं तेणें रवितेजें ॥२॥ श्रवणीं कुंडलें देती ढाळ । दशांगुळीं मुद्रिका माळ । दंतओळी हिरे झळाळ । मुख निर्मळ सुखरासी ॥३॥ कडीं कडदोरा वांकी वेळा । बाहीं बाहुवटे पदक गळां । मृगनाभी रेखिला टिळा । लवती डोळां विद्युल्लता ॥४॥ सुंदरपणाची साम्यता । काय वणूप ते पावे आतां । तुकयाबंधु म्हणे रे अच्युता । धन्य ते मातापिता प्रसवली ॥५॥
668
उभा भींवरेच्या तिरी राहिलाहे । असे सन्मुख दिक्षणे मूख वाहे । महापातकांसी पळ कांप थोर । कैसे गर्जती घोष हे नामवीर ॥१॥ गुणगंभीर हा धीर हास्यमुख । वदे वदनीं अमृत सर्वसुख । लागलें मुनिवरां गोड चित्तीं । देहभावना तुटलियासि खंती ॥२॥ ठसा घातला ये भूमिमाजी थोर । इच्छादाना हा द्यावयासी उदार । जया वोळगती सिद्धि सर्वठायीं । तुझें नाम हें चांगलें गे विठाईं ॥३॥ असे उघडा हा विटेवरि उभा । कटसूत्र हें धरुनि भक्तिलोभा । पुढें वाट दावी भवसागराची । विठो माउली हे सिद्धीसाधकांची ॥४॥ करा वेगु हा धरा पंथ आधीं । जया पार नाहीं सुखा तें च साधीं । म्हणे तुका पंढरीस सर्व आलें । असे विश्व हें जीवनें त्याचि ज्यालें ॥५॥
669
उभाउभी फळ । अंगीं मंत्राचे या बळ ॥१॥ म्हणा विठ्ठल विठ्ठल । गोड आणि स्वल्प बोल ॥ध्रु.॥ किळकाळाची बाधा । नव्हे उच्चारितां सदा ॥२॥ तुका म्हणे रोग । वारे भवाऐसा भोग ॥३॥
670
उभारिला हात । जगीं जाणविली मात ॥१॥ देव बैसले सिंहासनीं । आल्या याचका होय धनी ॥ध्रु.॥ एकाच्या कैवाडें । उगवे बहुतांचें कोडें ॥२॥ दोहीं ठायीं तुका । नाहीं पडों देत चुका ॥३॥ आशीर्वाद - अभंग ५
671
उभें चंद्रभागे तीरीं । कट धरोनियां करीं । पाउलें गोजिरीं । विटेवरी शोभलीं ॥१॥ त्याचा छंद माझ्या जीवा । काया वाचा मनें हेवा । संचिताचा ठेवा । जोडी हातीं लागली ॥ध्रु.॥ रूप डोळियां आवडे । कीर्ति श्रवणीं पवाडे । मस्तक नावडे । उठों पायांवरोनि ॥२॥ तुका म्हणे नाम । ज्याचें नासी क्रोध काम । हरी भवश्रम । उच्चारितां वाचेसी ॥३॥
672
उभ्या बाजारांत कथा । हे तों नावडे पंढरिनाथा ॥१॥ अवघें पोटासाटीं ढोंग । तेथें कैंचा पांडुरंग ॥ध्रु.॥ लावी अनुसंधान । कांहीं देईंल म्हणऊन ॥२॥ काय केलें रांडलेंका । तुला राजी नाहीं तुका ॥३॥
673
उमटती वाणी । वाटे नामाचिया ध्वनी ॥१॥ बरें सेवन उपकारा । द्यावें द्यावें या उत्तरा ॥ध्रु.॥ सरळ आणि मृद । कथा पाहावी तें उर्ध ॥२॥ गात जात तुका । हा चि उपदेश आइका ॥३॥
674
उमटे तें ठायीं । तुझे निरोपावें पायीं ॥१॥ आम्हीं करावें चिंतन । तुझें नामसंकीर्तन ॥ध्रु.॥ भोजन भोजनाच्या काळीं । मागों करूनियां आळी ॥२॥ तुका म्हणे माथां । भार तुझ्या पंढरिनाथा ॥३॥
675
उमा रमा एके सरी । वाराणसी ते पंढरी ॥१॥ दोघे सारिखे सारिखे । विश्वनाथ विठ्ठल सखे ॥ध्रु.॥ तेथें असे भागीरथी । येथें जाणा भीमरथी ॥२॥ वाराणशी त्रिशुलावरी । सुदर्शनावरि पंढरी ॥३॥ मनकणिऩका मनोहर । चंद्रभागा सरोवर ॥४॥ वाराणशी भैरवकाळ । पुंडलीक क्षेत्रपाळ ॥५॥ धुंडिराज दंडपाणी । उभा गरुड कर जोडुनी ॥६॥ गया ते चि गोपाळपुर । प्रयाग निरानरसिंपुर ॥७॥ तेथें असती गयावळ । येथें गाई आणि गोपाळ ॥८॥ शमीपत्रपिंड देती । येथें काला निजसुखप्राप्ति ॥९॥ संतसज्जनीं केला काला । तुका प्रसाद लाधला ॥१०॥
676
उरलें तें भक्तिसुख । डोळां मुख पाहावें । अंतरींचें कां हों नेणां । नारायणा माझिये ॥१॥ पुरवां तैसी केली आळी । बळी जगदानियां ॥ध्रु.॥ हातीं घेउनि चोरां भातें । दावां रितें बाळका । साजतें हें थोरपण । नाहीं विण वत्सळा ॥२॥ शाहणें तरीं लाड दावी । बाळ जेवीं मातेसी । तुका म्हणे पांडुरंगा । ऐसें पैं गा आहे हें ॥३॥
677
उरा लावी उर आळंगितां कांता । संतासी भेटतां अंग चोरी ॥१॥ अतीत देखोनि होय पाठमोरा । व्याह्यासी सामोरा जाय वेगीं ॥ध्रु.॥ द्विजा नमस्कारा मनीं भाव कैचा । तुकाऩचे दासीचा लेंक होय ॥२॥ तुका म्हणे तुम्ही क्रोधासी न यावें । स्वभावा करावें काय कोणीं ॥३॥
678
उलंघिली लाज । तेणें साधियेलें काज ॥१॥ सुखें नाचे पैलतीरीं । गेलों भवाचे सागरीं ॥ध्रु.॥ नामाची सांगडी । सुखें बांधली आवडी ॥२॥ तुका म्हणे लोकां । उरली वाचा मारीं हाका ॥३॥
679
उशीर कां केला । कृपाळुवा विठ्ठला ॥१॥ मज दिलें कोणा हातीं । काय मानिली निश्चिंती ॥ध्रु.॥ कोठवरी धरूं धीर । आतां मन करूं स्थिर ॥२॥ तुका म्हणे जीव । ऐसी भाकितसे कींव ॥३॥
680
उष्ट्या पत्रावळी करूनियां गोळा । दाखविती कळा कवित्वाची ॥१॥ ऐसे जे पातकी ते नरकीं पचती । जोंवरी भ्रमती चंद्रसूर्य ॥२॥ तुका म्हणे एक नारायण घ्याईं । वरकडा वाहीं शोक असे ॥३॥
681
उसंतिल्या कर्मवाटा । बहु मोटा आघात ॥१॥ शीघ्र यावें शीघ्र यावें । हातीं न्यावें धरूनि ॥ध्रु.॥ भागलों या खटपटे । घटपटें करितां ॥२॥ तुका म्हणे कृपावंता । माझी चिंता खंडावी॥३॥
682
ऊंस वाढवितां वाढली गोडी । गुळ साकर हे त्याची परवडी ॥१॥ सत्यकर्में आचरें रे । बापा सत्यकर्में आचरें रे । सत्यकर्में आचरें होईंल हित । वाढेल दुःख असत्याचें ॥ध्रु.॥ साकरेच्या आळां लाविला कांदा । स्थूळसानापरि वाढे दुगपधा ॥२॥ सत्य असत्य हें ऐसिया परी । तुका म्हणे याचा विचार करीं ॥३॥
683
ॠणाच्या परिहारा जालों वोळगणा । द्यावी नारायणा वासलाती ॥१॥ जालों उतराईं शरीरसंकल्पें । चुकों द्यावीं पापें सकळ ही ॥ध्रु.॥ आजिवरि होतों धरूनि जिवासी । व्याजें कासाविसी बहु केलें ॥२॥ तुका म्हणे मना आणिला म्यां भाव । तुमचा तेथें ठाव आहे देवा ॥३॥
684
एक आतां तुम्ही करा । मज दातारा सत्तेनें ॥१॥ विश्वास तो पायांवरी । ठेवुनि हरी राहिलों ॥ध्रु.॥ जाणत चि दुजें नाहीं । आणिक कांहीं प्रकार ॥२॥ तुका म्हणे शरण आलों । काय बोलों विनवितों ॥३॥
685
एक एका साह्य करूं । अवघें धरूं सुपंथ ॥१॥ कोण जाणे कैसी परी । पुढें उरी ठेवितां ॥ध्रु.॥ अवघे धन्य होऊं आता । स्मरवितां स्मरण ॥२॥ तुका म्हणे अवघी जोडी । ते आवडा चरणांची ॥३॥
686
एक तटस्थ मानसीं । एक सहज चि आळसी ॥१॥ दोन्ही दिसती सारिखीं । वर्म जाणे तो पारखी ॥ध्रु.॥ एक ध्यानीं करिती जप । एक बैसुनि घेती झोप ॥२॥ एकां सर्वस्वाचा त्याग। एकां पोटासाठीं जोग ॥३॥ एकां भक्ति पोटासाठीं । एकां देवासवें गांठी ॥४॥ वर्म पोटीं एका । फळें दोन म्हणे तुका ॥५॥
687
एक ते गाढव मनुष्याचे वेष । हालविती पुस पुढें दाढी ॥१॥ निंदा हें भोजन जेवण तयांसी । जोडी घरीं रासी पातकांच्या ॥२॥ तुका म्हणे सुखें बैसोनियां खाती । कुंभपाकीं होती नर्कवासी ॥३॥
688
एक धरिला चित्तीं । आम्हीं रखुमाईंचा पती ॥१॥ तेणें जालें अवघें काम । निवारला भवश्रम ॥ध्रु.॥ परद्रव्य परनारी । जालीं विषाचिये परी ॥२॥ तुका म्हणे फार । नाहीं लागत वेव्हार ॥३॥
689
एक नेणतां नाडली । एकां जाणिवेची भुली ॥१॥ बोलों नेणें मुकें । वेडें वाचाळ काय निकें ॥ध्रु.॥ दोहीं सवा नाड । विहीर एकीकडे आड ॥२॥ तुका म्हणे कर्म । तुझें कळों नेदी वर्म ॥३॥
690
एक परि बहिर बरें । परि तीं ढोरें ग्यानगडें ॥१॥ कपाळास लागली अगी । अभागी कां जीतसे ॥ध्रु.॥ एक परि बरें वेडें । तार्किक कुडें जळो तें ॥२॥ तुका म्हणे खातडवासी । अमृतासी नोळखे ॥३॥
691
एक पाहातसां एकांचीं दहनें । सावध त्या गुणें कां रे नव्हा ॥१॥ मारा हाक देवा भय अटाहासें । जंव काळाऐसें जालें नाहीं ॥ध्रु.॥ मरणांची तंव गांठोडी पदरीं । जिणें तो चि वरि माप भरी ॥२॥ तुका म्हणे धींग वाहाती मारग । अंगा आलें मग हालों नेदी ॥३॥
692
एक प्रेमगुज ऐकें जगजेठी । आठवली गोष्टी सांगतसें ॥१॥ एक मृग दोन्ही पाडसांसहित । आनंदें चरत होती वनी ॥ध्रु.॥ अवचिता तेथें पारधी पावला । घेऊनियां आला श्वानें दोन्ही ॥२॥ एकीकडे त्याणें चिरिल्या वाघुरा । ठेविलें श्वानपुत्रा एकीकडे ॥३॥ एकीकडे तेणें वोणवा लाविला । आपण राहिला एकीकडे ॥४॥ चहूंकडोनियां मृगें वेढियेलीं । स्मरों तें लागलीं नाम तुझें ॥५॥ रामा कृष्णा हरी गोविंदा केशवा । देवाचिया देवा पावें आतां ॥६॥ कोण रक्षी आतां ऐसिये संकटीं । बापा जगजेठी तुजविण ॥७॥ आइकोनि तुम्ही तयांचीं वचनें । कृपाअंतःकरणें कळवळिलां ॥८॥ आज्ञा तये काळीं केली पर्जन्यासी । वेगीं पावकासी विझवावें ॥९॥ ससें एक तेथें उठवुनी पळविलें । तया पाठीं गेली श्वानें दोन्ही ॥१०॥ मृगें चमकोनी सत्वर चाललीं । गोविंदें रिक्षलीं म्हणोनियां ॥११॥ ऐसा तूं कृपाळु दयाळु आहेसी । आपुल्या भक्तांसी जीवलग ॥१२॥ ऐसी तुझी कीर्ती जीवीं आवडती । रखुमाईच्या पती तुका म्हणे ॥१३॥
693
एक भाव चित्तीं । तरीं न लगे कांहीं युक्ती ॥१॥ कळों आलें जीवें । मज माझियाचि भावें ॥ध्रु.॥ आठव चि पुरे । सुख अवघें मोहो रे ॥२॥ तुका म्हणे मन । पूजा इच्छी नारायण ॥३॥
694
एक मन तुझ्या अवघ्या भांडवला । वांटितां तें तुला येई कैसें ॥१॥ म्हणउनि दृढ धरीं पांडुरंग । देहा लावीं संग प्रारब्धाचा ॥ध्रु.॥ आणिका संकल्पा नको गोऊं मन । तरी च कारण साध्य होय ॥२॥ तुका म्हणे ऐसें जाणावें उचित । तरी सहज स्थित येईल कळों ॥३॥
695
एक मागणें हृषीकेशी । चत्ति द्यावें सांगतों वचनासी । मज अंतर तुझ्या चरणासी । न पडे ऐसी कृपा करीं ॥१॥ नको दुजी बुद्धी आणीक । रिद्धीसिद्धी परलोक । तूं स्वामी मी सेवक । खंडणा नको करूं ऐसी ॥ध्रु.॥ मना येईल तो जन्म देई । भलते कुळीं भलते ठायीं । तें मी सांकडें घालीत नाहीं । हृदयींहुनीं तूं न वजें ॥२॥ इतुलें करीं भलत्या परी । भलत्या भावें तुझें द्वारीं । राहेन दास होऊनि कामारी । वदो वैखरी नित्य नाम ॥३॥ नको विचारूं दुसरें आतां । शरण आलों जी पंढरीनाथा । तुकयाबंधु म्हणे रे अच्युता । आहेसि तूं दाता दानशूर ॥४॥
696
एक म्हणती कृष्णा वासिलें त्वां मुख । तेव्हां थोर धाक पडिला आम्हां ॥१॥ गिळो लागलासी अग्नीचे कल्लोळ । आम्ही चळचळां कांपतसों ॥ध्रु.॥ ज्वाळांबरोबरि गळिशील आम्हां । ऐसें मेघशामा भय वाटे ॥२॥ तुका म्हणे ऐसे भाग्याचे गोपाळ । फुटकें कपाळ आमुचें चि ॥३॥
697
एक म्हणती मुख वासीं नारायणा । पाहों दे वदना डोळेभरि ॥१॥ वासुनियां मुख पहाती सकळ । अवघे गोपाळ व्योमाकार ॥ध्रु.॥ म्हणती गोपाळ बेटे हो हा देव । स्वरूपाचा ठाव न कळे याच्या ॥२॥ तुका म्हणे अवघे विठोबाभोंवते । मळिाले नेणते लहानथोर ॥३॥
698
एक वेळ प्रायश्चित्त । केलें चित्त मुंडण ॥१॥ अहंकारा नांवें दोष । त्याचें ओस पाडिले ॥ध्रु.॥ अनुतापें स्नानविधि । यज्ञसिद्धी देहहोम ॥२॥ जीवशिवा होतां चुका । तेथें तुका विनटला ॥३॥
699
एक वेळे तरी जाईन माहेरा । बहुजन्म फेरा जाल्यावरी ॥१॥ चित्ता हे बैसली अविट आवडी । पालट ती घडी नेघे एकी ॥ध्रु.॥ करावें ते करी कारणशरीर । अंतरीं त्या धीर जीवनाचा ॥२॥ तुका म्हणे तरि होइल विलंब । परि माझा लाभ खरा जाला ॥३॥
700
एक शेरा अन्ना चाड । येर वाउगी बडबड ॥१॥ कां रे तृष्णा वाढविसी । बांधवूनि मोहपाशीं ॥ध्रु.॥ ओठ हात तुझा जागा । येर सिणसी वाउगा ॥२॥ तुका म्हणे श्रम । एक विसरतां राम ॥३॥
701
एकमेकीं घेती थडका । पाडी धडका देऊनि ॥१॥ एकमेका पाठीवरि । बैसोनि करिती ढवाळी ॥ध्रु.॥ हाता हात हाणे लाही । पळतां घाईं चुकविती ॥२॥ तुका म्हणे लपणी चपणी । एका हाणी पाठीवरी ॥३॥
702
एकली राणागोविंदा सवें । गेलें ठावें तें जालें ॥१॥ मज न म्हणा न म्हणा शिंदळी । नाहीं विषम जवळीं आतळलें ॥ध्रु.॥ नव्हती देखिली म्यां वाट । म्हणोनि हा धीट संग केला ॥२॥ भेणें मिठी दिधली गळां । सेजे जवळ दडालें ॥३॥ सलगी धरी पयोधर । साहाती करमुर सवें ॥४॥ आहेव मी गर्भीणपणें । हें सांगणें कां लागे ॥५॥ तुका म्हणे सेवटा नेलें । संपादिलें उभयतां ॥६॥
703
एकली वना चालली राना । चोरुनि जना घराचारी ॥१॥ कोणी नाहीं संगीसवें । देहभावें उदास ॥ध्रु.॥ जाउनि पडे दुर्घटवनीं । श्वापदांनीं वेढिली ॥२॥ मार्ग न चले जातां पुढें । भय गाढें उदेलें ॥३॥ मागील मागें अंतरलीं । पुढील चाली खोळंबा ॥४॥ तुका म्हणे चित्ती यासि । हृदयस्थासी आपुल्या ॥५॥
704
एकल्या नव्हे खेळ चांग । धरिला संग म्हणऊनि ॥१॥ उमटे तेव्हां कळे नाद । भेदाभेद निवडेना ॥ध्रु.॥ दुसरा परी एक ऐसा । वजे रिसा निकुरें ही ॥२॥ तुका म्हणे कळत्यां कळे । येर खेळे खेळ म्हुण ॥३॥
705
एकविध आम्ही न धरूं पालट । न संडूं ते वाट सांपडली ॥१॥ म्हणवूनि केला पाहिजे सांभाळ । माझें बुद्धीबळ पाय तुझे ॥ध्रु.॥ बहुत न कळे बोलतां प्रकार । अंतरा अंतर साक्ष असे ॥२॥ तुका म्हणे आगा जीवांच्या जीवना । तूं चि नारायणा साक्षी माझा ॥३॥
706
एकविध नारायण । तेथें विषमाचा सीण । पालटों चि भिन्न । नये अणुप्रमाण ॥१॥ अवघें सारावें गाबाळ । चुकवूनियां कोल्हाळ । आनंदाचें स्थळ । एकाएकीं एकांत ॥ध्रु.॥ कायावाचामन । स्वरूपीं च अनुसंधान । लक्ष भेदी बाण । येणे पाडें लवलाहो ॥२॥ तुका म्हणे आळस निद्रा । येथें देउनियां चिरा । देउनियां धीरा । मिठी जाणा जागृतीं ॥३॥
707
एकविध वृित्त न राहे अंतरीं । स्मरणीं च हरी विस्मृति ॥१॥ कैसा हा नवलाव वाटतो अनुभवें । मज माझ्या जीवें साक्षित्वेसी ॥ध्रु.॥ न राहे निश्चळि जागवितां मन । किती क्षीणेंक्षीणें सावरावें ॥२॥ तुका म्हणे बहु केले वेवसाव । तेणें रंगें जीव रंगलासे ॥३॥
708
एकवेळ करीं या दुःखावेगळें । दुरिताचें जाळें उगवूनि॥१॥ आठवीन पाय हा माझा नवस । रात्री ही दिवस पांडुरंगा ॥ध्रु.॥ बहु दूरवरी भोगविले भोग । आतां पांडुरंगा सोडवावें ॥२॥ तुका म्हणे काया करीन कुरवंडी । ओंवाळूनि सांडीं मस्तक हें ॥३॥
709
एका एक वर्में लावूनियां अंगीं । ठेवितों प्रसंगीं सांभाळीन ॥१॥ नेघावा जीं तुम्ही वाव बहु फार । धरूनि अंतर ठायाठाव ॥ध्रु.॥ वेव्हारें आलें तें समानें चि होतें । बळ नाहीं येथें चालों येत ॥२॥ तुका म्हणे आतां निवाडा च साटीं । संवसारें तुटी करुनि ठेलों ॥३॥
710
एका ऐसें एक होतें कोणां काळें । समर्थाच्या बळें काय नव्हे ॥१॥ घालूनि बैसलों मिरासीस पाया । जिंकों देवराया संदेह नाहीं ॥ध्रु.॥ केला तो न संडीं आतां कइवाड । वारीन हे आड कामक्रोध ॥२॥ तुका म्हणे जाळीं अळसाची धाडी । नव्हती आली जोडी कळों साच ॥३॥
711
एका गा ए भाई । सरवदा सांगतो काई । येथें नाडेल माई । दोघां पुत्रांची । ते करिती तिची विटंबना । अवघ्या प्रसद्धि जना । एक न मारितां शाहाणा । तो जाणा सुख न पवे ॥१॥ आणीक ऐका गा ए । सरवदा सांगतो काय । खरें चि बोले तो जाय । नरकामध्यें अधोगती । हें चौघांच्या मुखें । मना आणावें सुखें । अवघीं चुकती दुःखें । खोटें बोला नरनारी ॥ध्रु.॥ आणीक नाडेल एक जाण । सरवदा बोलतो वचन । जागें माझें म्हणोन । पडिलें खान तया घरीं । म्हणोन न म्हणा माझें कांहीं । निजीं निजा सुखें ठायीं । यत्न होईल तई । चोराठायीं विश्वास ॥२॥ आणीक एकी परी । सरवदा सांगतो थोरी । दुःख पावेल नारी । पतिव्रता यामधीं । पांचांनीं दिधली हातीं । म्हणोनि न मनावी निश्चिती । परपुरुषीं होय रती । सुखगती ते पावे ॥३॥ एकी परी । सरवदा सांगतो तें करीं । दान देतां जो न वारी । नव्हे भला भला तो तुका म्हणे आई । येथें नांव काई । सांगसी तें ठायीं । मरो रांडेचें ॥४॥ मुंढा - अभंग ३
712
एका गावें आम्हीं विठोबाचे नाम । आणिकांपें काम नाहीं आतां ॥१॥ मोडूनियां वाटा सूक्ष्म सगर । केला राज्यभार चाले ऐसा ॥ध्रु.॥ लावूनि मृदांग टाळश्रुतिघोष । सेवूं ब्रम्हरस आवडीनें ॥२॥ तुका म्हणे महापातकी पतित । ऐसियांचे हित हेळामात्रें ॥३॥
713
एका च स्वामीचे पाईंक सकळ । जैसें बळ तैसें मोल तया ॥१॥ स्वामिपदीं एकां ठाव उंच स्थळीं । एक तीं निराळीं जवळी दुरी ॥ध्रु.॥ हीन कमाईंचा हीन आन ठाव । उंचा सर्व भाव उंच पद ॥२॥ पाइकपणें तो सर्वत्र सरता । चांग तरी परता गांढ्या ठाव ॥३॥ तुका म्हणे मरण आहे या सकळां । भेणें अवकळा अभयें मोल ॥४॥
714
एका जिवें आतां जिणें जालें दोहीं । वेगळीक कांहीं नव्हे आतां ॥१॥ नारायणा आम्हां नाहीं वेगळीक । पुरविली हे भाक सांभाळिली ॥२॥ तुका म्हणे जालें सायासाचें फळ । सरली ते वेळ काळ दोन्ही ॥३॥
715
एका पुरुषा दोघी नारी । पाप वसे त्याचे घरीं ॥१॥ पाप न लगे धुंडावें । लागेल तेणें तेथें जावें ॥ध्रु.॥ कांहीं दुसरा विचार । न लगे करावा चि फार ॥२॥ असत्य जे वाणी । तेथें पापाची च खाणी ॥३॥ सत्य बोले मुखें । तेथें उचंबळती सुखें ॥४॥ तुका म्हणे दोन्ही । जवळी च लाभहानी ॥५॥
716
एका बीजा केला नास । मग भोगेल कणीस ॥१॥ कळे सकळां हा भाव । लाहानथोरांवरी जीव ॥ध्रु.॥ लाभ नाहीं फुकासाठीं । केल्यावीण जीवासाठीं ॥२॥ तुका म्हणे रणीं । जीव देतां लाभ दुणी ॥३॥
717
एका बोटाची निशाणी । परीपाख नाहीं मनीं ॥१॥ तरिं तें संपादिलें सोंग । कारणावांचूनियां वेंग ॥ध्रु.॥ वैष्णवांचा धर्म । जग विष्णु नेणे वर्म ॥२॥ अतिशयें पाप । तुका सत्य करी माप ॥३॥
718
एका म्हणे भलें । आणिका सहज चि निंदिलें ॥१॥ कांहीं न करितां आयास । सहज घडले ते दोष ॥ध्रु.॥ बरें वाइटाचें । नाहीं मज कांहीं साचें ॥२॥ तुका म्हणे वाणी । खंडोनि राहावें चिंतनीं ॥३॥
719
एका वेळे केलें रितें कलिवर । आंत दिली थार पांडुरंगा ॥१॥ पाळण पोषण लागलें ते सोईं । देहाचें तें काईं सर्वभावें ॥ध्रु.॥ माझिया मरणें जाली हे वसति । लागली ते ज्योती अविनाशा ॥२॥ जाला ऐसा एका घायें येथें नाहीं । तुका म्हणे कांहीं बोलों नये ॥३॥
720
एका हातीं टाळ एका हातीं चिपळिया । घालिती हुंमरी एक वाताती टाळिया ॥१॥ मातले वैष्णव नटती नाना छंदें । नाहीं चाड मोक्षपदें भजनीं आवडी ॥ध्रु.॥ हाका अरोळिया गीतवादें सुखसोहळे । जाय तें न कळे केव्हां रजनी दिवस ॥२॥ तीर्थी नाहीं चाड न लगे जावें वनांतरा । तुका म्हणे हरिहरात्मक चि पृथुवी ॥३॥
721
एकांचीं उत्तरें । गोड अमृत मधुरें ॥१॥ ऐशा देवाच्या विभुती । भिन्न प्रारब्धाची गती ॥ध्रु.॥ एकांचीं वचनें । कडु अत्यंत तीक्षणें ॥२॥ प्रकाराचें तीन । तुका म्हणे केलें जन ॥३॥
722
एकांतांचे सुख देई मज देवा । आघात या जीवा चुकवूनि ॥१॥ ध्यानीं रूप वाचे नाम निरंतर । आपुला विसर पडों नेदीं ॥ध्रु.॥ मायबाळा भेटी सुखाची आवडी । तैशी मज गोडी देई देवा ॥२॥ कीर्ती ऐकोनियां जालों शरणांगत । दासाचें तूं हित करितोसी ॥३॥ तुका म्हणे मी तों दीन पापराशी । घालावें पाठीशी मायबापा ॥४॥
723
एकांतीं लोकांतीं करूं गदारोळ । लेश तो ही मळ नाहीं येथें ॥१॥ घ्यावें द्यावें आम्हीं आपुलिया सत्ता । न देखों पुसता दुजा कोणी ॥ध्रु.॥ भांडाराची किली माझे हातीं आहे । पाहिजे तो पाहें वान येथें ॥२॥ तुका म्हणे आम्हां विश्वासाच्या बळें । ठेविलें मोकळें देवें येथें ॥३॥
724
एकाएकीं आतां असावेंसें वाटे । तरि च हे खोटे चाळे केले ॥१॥ वाजवूनि तोंड घातलों बाहेरी । कुल्प करुनी दारीं माजी वसा ॥ध्रु.॥ उजेडाचा केला दाटोनि अंधार । सवें हुद्देदार चेष्टाविला ॥२॥ तुका म्हणे भय होतें तों चि वरी । होती कांहीं उरी स्वामिसेवा ॥३॥
725
एकाएकीं हातोफळी । ठाया बळी पावले ते ॥१॥ आम्ही देवा शक्तिहीनें । भाकुं तेणें करुणा ॥ध्रु.॥ पावटणी केला काळ । जया बळ होतें तें ॥२॥ तुका म्हणे वीर्यावीर । संतधीर समुद्र ॥३॥
726
एकाचिया घाट्या टोके । एक फिके उपचार ॥१॥ ऐसी सवे गोविळया । भाव तया पढियंता ॥ध्रु.॥ एकाचेथें उच्छिष्ट खाय । एका जाय ठकोणि ॥२॥ तुका म्हणे सोपें । बहु रूपें अनंत ॥३॥
727
एकाचिये वेठी । सांपडलों फुकासाटीं ॥१॥ घेतों काम सत्ताबळें । माझें करूनि भेंडोळें ॥ध्रु.॥ धांवे मागें मागें । जाय तिकडे चि लागे ॥२॥ तुका म्हणे नेलें । माझें सर्वस्वें विठ्ठलें ॥३॥
728
एकाचिये सोईं कवित्वाचे बांधे । बांधिलिया साध्य काय तेथें ॥१॥ काय हातीं लागे भुसाचे कांडणीं । सत्यासी दाटणी करुनि काय ॥ध्रु.॥ कवित्वाचे रूढी पायां पाडी जग । सुखावोनि मग नरका जाय ॥२॥ तुका म्हणे देव केल्याविण साहे । फजिती आहे लटिक्या अंगीं ॥३॥
729
एकादशीव्रत सोमवार न करिती । कोण त्यांची गति होइल नेणों ॥१॥ काय करूं बहु वाटे तळमळ । आंधळीं सकळ बहिर्मुख ॥ध्रु.॥ हरिहरां नाहीं बोटभरी वाती । कोण त्यांची गति होईल नेणों ॥२॥ तुका म्हणे नाहीं नारायणीं प्रीति । कोण त्यांची गति होइल नेणों ॥३॥
730
एकादशीस अन्न पान । जे नर करिती भोजन । श्वानविष्ठे समान । अधम जन तो एक ॥१॥ ऐका व्रताचें महिमान। नेमें आचरती जन । गाती ऐकतीं हरिकीर्तन । ते समान विष्णूशीं ॥ध्रु.॥ अशुद्ध विटाळसीचें खळ । विडा भिक्षतां तांबूल । सांपडे सबळ । काळाहातीं न सुटे ॥२॥ सेज बाज विलास भोग । करी कामिनीशीं संग । तया जोडे क्षयरोग । जन्मव्याधी बळिवंत ॥३॥ आपण न वजे हरिकीर्तना । अणिकां वारी जातां कोणा । त्याच्या पापें जाणा । ठेंगणा महा मेरु ॥४॥ तया दंडी यमदूत । जाले तयाचे अंकित । तुका म्हणे व्रत । एकादशी चुकलीया ॥५॥
731
एकीं असे हेवा । एक अनावड जीवां ॥१॥ देवें केल्या भिन्न जाती । उत्तम कनिष्ठ मध्यस्ती ॥ध्रु.॥ प्रीतिसाटीं भेद । कोणी पूज्य कोणी निंद्य ॥२॥ तुका म्हणे कळा । त्याचा जाणे हा कळवळा ॥३॥
732
एके घाई खेळतां न पडसी डाई । दुचाळ्याने ठकसील भाई रे । त्रिगुणांचे फेरी थोर कष्टी होसी । या चौघांसी तरी धरीं सोई रे ॥१॥ खेळ खेळोनियां निराळा चि राही । सांडी या विषयाची घाई रे । तेणें चि खेळें बसवंत होसी । ऐसें सत्य जाणें माझ्या भाई रे ॥ध्रु.॥ सिंपियाचा पोर एक खेळिया नामा । तेणें विठ्ठल बसवंत केला रे । आपुल्या सवंगडिया सिकवूनि घाई । तेणें सतत फड जागविला रे । एक घाई खेळतां तो न चुके चि कोठें । तया संत जन मानवले रे ॥२॥ ज्ञानदेव मुक्ताबाई वटेश्वर चांगा । सोपान आनंदें खेळती रे । कान्हो गोवारी त्यांनीं बसवंत केला । आपण भोंवतीं नाचती रे । सकळिकां मिळोनि एकी च घाई । त्याच्या ब्रम्हादिक लागती पायीं रे ॥३॥ रामा बसवंत कबिर खेळिया । जोडा बरवा मिळाला रे । पांचा सवंगडियां एकचि घाई । तेथें नाद बरवा उमटला रे । ब्रम्हादिक सुरवर मिळोनियां त्यांनीं । तो ही खेळ निवडिला रे ॥४॥ ब्राम्हणाचा पोर खेळिया एक भला । तेणें जन खेळकर केला रे । जनार्दन बसवंत करूनियां । तेणें वैष्णवांचा मेळ मेळविला रे । एक चि घाई खेळतां खेळतो । आपणचि बसवंत जाला रे ॥५॥ आणीक खेळिये होउनियां गेले । वर्णावया वाचा मज नाहीं रे । तुका म्हणे गडे हो हुशारूनि खेळा । पुढिलांची धरूनियां सोई रे । एक चि घाई खेळतां जो चुकला । तो पडेल संसारडाई रे ॥६॥
733
एके ठायीं अन्नपाणी । ग्रासोग्रासीं चिंतनीं ॥१॥ वेळोवेळां जागवितों । दुजें येइल म्हुण भीतों ॥ध्रु.॥ नाहीं हीं गुंतत उपचारीं । मानदंभाचे वेव्हारीं ॥२॥ तुका जालासे शाहाणा । आड लपे नारायणा ॥३॥
734
एवढा प्रभु भावें । तेणें संपुष्टी राहावें ॥१॥ होय भक्तीं केला तैसा । पुरवी धरावी ते इच्छा ॥ध्रु.॥ एवढा जगदानी । मागे तुळसीदळ पाणी ॥२॥ आला नांवा रूपा । तुका म्हणे जाला सोपा ॥३॥
735
एवढा संकोच तरि कां व्यालासी । आम्ही कोणांपाशीं तोंड वासूं ॥१॥ कोण मज पुसे सिणलें भागलें । जरी मोकलिलें तुम्हीं देवा ॥ध्रु.॥ कवणाची वाट पाहों कोणीकडे । कोण मज ओढे जीवलग ॥२॥ कोण जाणे माझे जीवींचें सांकडें । उगवील कोडें संकटाचें ॥३॥ तुका म्हणे तुम्ही देखिली निश्चिंती । काय माझे चित्ती पांडुरंगा ॥४॥
736
एवढी अपकीर्ती । ऐकोनियां फजीती ॥१॥ जरि दाविल वदन । थुंका थुंका तो देखोन ॥ध्रु.॥ काळिमेचें जिणें । जीऊनियां राहे सुनें ॥२॥ तुका म्हणे गुण । दरुषणें अपशकुन ॥३॥
737
ऐक पांडुरंगा एक मात । कांहीं बोलणें आहे एकांत । आम्हां जरी तारील संचित । तरी उचित काय तुझें ॥१॥ उसनें फेडितां धर्म तो कोण । काय तया मानवेल जन । काय गा मिरवूनि भूषण । वांयां थोरपण जनांमध्यें ॥ध्रु.॥ अन्न जरी न मिळे तयासी देणें । आगांतुक पात्र उचित दान । उपकार तरी धनमंत्रीपणें । जरी देणेंघेणें नाहीं आशा ॥२॥ शूर तों तयासी बोलिजे जाणा । पाठीशीं घालूनि राखे दीना । पार पुण्य नाहीं त्या भूषणा । ऐक नारायणा वचन हें ॥३॥ आतां पुढें बोलणें तें काई । मज तारिसी तरी च सही । वचन आपुलें सिद्धी नेई । तुका म्हणे तई मज कळसी ॥४॥
738
ऐक बाई तुज वो कांहीं सांगतें शकुन । निजलिया भुर होसी जागें म्हणउन ॥१॥ मान्य माझें केलें सांगतें एका बोलें । न येतां हे भलें कळों कोणा लोकांसि ॥ध्रु.॥ सांगतें गुण जीवीची खुण ऐक माझी मात । बैस एका भावें माझे हातीं दे वो हात ॥२॥ बरवा घरचार तुज सांपडला ठाव । फळ नाहीं पोटीं येथें दिसे खोटा भाव ॥३॥ आहे तुझे हातीं एका नवसाचें फळ । भावा करीं साहए चहूं अठरांच्या बळें ॥४॥ करीं लागपाठ चित्त वित्त नको पाहों । अखई तो चुडा तुज भोगईल ना हो ॥५॥ कुळींची हे मुळी तुझे लागलीसे देवी । पडिला विसर नेदी फळ नाहीं ठावी ॥६॥ तुका म्हणे नांद सुखें धरीं आठवण । माझ्या येती कोणी त्यांचा राख बरा मान ॥७॥ कावडे - अभंग ५
739
ऐक हें सुख होईंल दोघांसी । सोहळा हे ॠषि करिती देव ॥१॥ जडितविमानें बैसविती मानें । गंधर्वांचें गाणें नामघोष ॥ध्रु.॥ संत महंत सद्धि येतील सामोरे । सर्वसुखा पुरे कोड तेथें ॥२॥ आलिंगूनि लोळों त्यांच्या पायांवरी । जाऊं तेथवरी मायबापें ॥३॥ तुका म्हणे तया सुखा वर्णू काय । जेव्हां बापमाय देखें डोळां ॥४॥
740
ऐकतों दाट । आले एकांचें बोभाट ॥१॥ नका विश्वासों यावरी । चोर देहाचे खाणोरी ॥ध्रु.॥ हे चि यांची जोडी । सदा बोडकीं उघडीं ॥२॥ तुका म्हणे न्यावें । ज्याचे त्यासी नाहीं ठावें ॥३॥
741
ऐका ऐका भाविकजन । कोण कोण व्हाल ते ॥१॥ ताकिकांर्चा टाका संग । पांडुरंग स्मरा हो ॥ध्रु.॥ नका शोधूं मतांतरें । नुमगे खरें बुडाल ॥२॥ कलिमध्यें दास तुका । जातो लोकां सांगत ॥३॥
742
ऐका कलीचें हें फळ । पुढें होइल ब्रम्हगोळ ॥१॥ चारी वर्ण अठरा याती । भोजन करिती एके पंक्ती ॥ध्रु.॥ पूजितीअसुरा रांडा । मद्य प्राशितील पेंढा ॥२॥ वामकवळ मार्जन । जन जाईंल अधोपतन ॥३॥ तुका हरिभक्ति करी । शक्ति पाणी वाहे घरीं ॥४॥
743
ऐका गा ए अवघे जन । शुद्ध मन तें हित ॥१॥ अवघा काळ नव्हे जरी । समयावरी जाणावें ॥ध्रु.॥ नाहीं कोणी सवें येता । संचिता या वेगळा ॥२॥ बरवा अवकाश आहे । करा साहे इंद्रियें ॥३॥ कर्मभूमीऐसा ठाव । वेवसाव जाणावा ॥४॥ तुका म्हणे उत्तम जोडी । जाती घडी नरदेह ॥५॥
744
ऐका जी देवा माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥ सन्निध पातलों सांडूनियां शंका । सन्मुख चि एकाएकीं पुढें ॥ध्रु.॥ जाणविलें कोठें पावे पायांपाशीं । केली या जिवासी साटी म्हुण ॥२॥ तुका म्हणे माझे हातीं द्या उद्धार । करीं करकर म्हणवूनि ॥३॥
745
ऐका जी संतजन । सादर मन करूनि ॥१॥ सकळांचें सार एक । कंटक ते तजावे ॥ध्रु.॥ विशेषता कांद्याहूनि । सेवित्या घाणी आगळी ॥२॥ तुका म्हणे ज्याची जोडी । ते परवडी बैसीजे ॥३॥
746
ऐका पंडितजन । तुमचे वंदितों चरण ॥१॥ नका करूं नरस्तुति । माझी परिसा हे विनंती ॥ध्रु.॥ अन्न आच्छादन । हें तों प्रारब्धा अधीन ॥२॥ तुका म्हणे वाणी । सुखें वेचा नारायणीं ॥३॥
747
ऐका महिमा आवडीचीं । बोरें खाय भिलटीचीं ॥१॥ थोर प्रेमाचा भुकेला । हा चि दुष्काळ तयाला । अष्टमा सिद्धींला । न मनी क्षीरसागराला ॥ध्रु.॥ पव्हे सुदामदेवाचे । फके मारी कोरडे च ॥२॥ न म्हणे उच्छिष्ट अथवा थोडे । तुका म्हणे भक्तीपुढें ॥३॥
748
ऐका वचन हें संत । मी तों आगळा पतित । काय काजें प्रीत । करीतसां आदरें ॥१॥ माझें चित्त मज ग्वाही । सत्य तरलों मी नाहीं । एकांचिये वांहीं । एक देखीं मानिती ॥ध्रु.॥ बहु पीडिलों संसारें । मोडीं पुसें पिटीं ढोरें । न पडतां पुरें । या विचारें राहिलों ॥२॥ सहज सरलें होतें कांहीं । द्रव्य थोडें बहु तें ही । त्याग केला नाहीं । दिलें द्विजां याचकां ॥३॥ प्रियापुत्रबंधु । यांचा तोडिला संबंधु । सहज जालों मंदु । भाग्यहीन करंटा ॥४॥ तोंड न दाखवे जना । शिरें सांदी भरें राणां । एकांत तो जाणां । तयासाटीं लागला ॥५॥ पोटें पिटिलों काहारें । दया नाहीं या विचारें । बोलावितां बरें । सहज म्हणें यासाटीं ॥६॥ सहज वडिलां होती सेवा । म्हणोनि पूजितों या देवा । तुका म्हणे भावा । साटीं झणी घ्या कोणी ॥७॥
749
ऐका संतजन उत्तरें माझे बोबडे बोल । करीं लाड तुम्हांपुढें हो कोणी झणी कोपाल ॥१॥ उपाय साधन आइका कोण गति अवगति । दृढ बैसोनि सादर तुम्ही धरावें चित्तीं ॥ध्रु.॥ धर्म तयासी घडे रे ज्याचे स्वाधीन भाज । कर्म तयासी जोडे रे भीत नाहीं लाज ॥२॥ पुण्य तें जाणां रे भाइनो परउपकाराचें । परपीडा परनिंदा रे खरें पाप तयाचें ॥३॥ लाभ तयासी जाला रे मुखीं देव उच्चारी । प्रपंचापाठी गुंतला हाणी तयासी च थोरी ॥४॥ सुख तें जाणा रे भाइनो संतसमागम । दुःख तें जाणारे भाइनो शम तेथे विशम ॥५॥ साधन तयासी साधे रे ज्याची स्वाधीन बुद्धि । पराधीनासी आहे घात रे थोर जाण संबंधी ॥६॥ मान पावे तो आगळा मुख्य इंद्रियें राखे । अपमानी तो अधररसस्वाद चाखे ॥७॥ जाणता तयासी बोलिजे जाणे समाधान । नेणता तयासी बोलिजे वाद करी भूषण ॥८॥ भला तो चि एक जाणा रे गयावर्जन करी । बुरा धन नष्ट मेळवी परद्वार जो करी ॥९॥ आचारी अन्न काढी रे गाईं अतितभाग । अनाचारी करी भोजन ग्वाही नसतां संग ॥१०॥ स्वहित तेणें चि केलें रे भूतीं देखिला देव । अनहित तयाचें जालें रे आणी अहंभाव ॥११॥ धन्य जन्मा ते चि आले रे एक हरिचे दास । धिग ते विषयीं गुंतले केला आयुष्या नास ॥१२॥ जोहोरि तो चि एक जाणा रे जाणे सद्धिलक्षणें । वेडसरु तो भुले रे वरदळभूषणें ॥१३॥ बिळयाढा तो चि जाणा रे भक्ति दृढ शरीरीं । गांढव्या तयासी बोलिजे एक भाव न धरी ॥१४॥ खोल तो वचन गुरूचें जो गिळूनि बैसे । उथळ धीर नाहीं अंगीं रे म्हणे होईंल कैसें ॥१५॥ उदार तो जीवभाव रे ठेवी देवाचे पायीं । कृपण तयासी बोलिजे पडे उपाधिडाई ॥१६॥ चांगलेंपण तें चि रे ज्याचें अंतर शुद्ध । वोंगळ मिळन अंतरीं वाणी वाहे दुगपध ॥१७॥ गोड तें चि एक आहे रे सार विठ्ठलनाम । कडु तो संसार रे लक्षचौर्याशी जन्म ॥१८॥ तुका म्हणे मना घरी रे संतसंगतिसोईं । न लगे कांहीं करावें राहें विठ्ठलपायीं ॥१९॥
750
ऐका हें वचन माझें संतजन । विनवितों जोडुन कर तुम्हां ॥१॥ तर्क करूनियां आपुल्या भावना । बोलतिया जना कोण वारी ॥ध्रु.॥ आमुच्या जीवींचा तो चि जाणे भावो । रकुमाईंचा नाहो पांडुरंग ॥२॥ चित्त माझें त्याचे गुंतलेंसे पायीं । म्हणऊनि कांहीं नावडे त्या ॥३॥ तुका म्हणे मज न साहे मीनती । खेद होय चित्तीं भंग मना ॥४॥
751
ऐकिली कीर्ति संतांच्या वदनीं । तरि हें ठाकोनि आलों स्थळ ॥१॥ मागिला पुढिला करावें सारिखें । पालटों पारिखें नये देवा ॥ध्रु.॥ आम्हासी विश्वास नामाचा आधार । तुटतां हे थार उरी नाहीं ॥२॥ तुका म्हणे येथें नसावें चि दुजें । विनंती पंढरिराजें परिसावी हे ॥३॥
752
ऐकें पांडुरंगा वचन माझें एक । जालों मी सेवक दास तुझा ॥१॥ कळे तैसा आतां करावा उद्धार । खुंटला विचार माझा पुढें ॥ध्रु.॥ दंभ मान माझा करूं पाहे घात । जालिया ही थीत कारणाचा ॥२॥ हीन बुद्धि माझी अधम हे याती । अहंकार चित्तीं वसों पाहे ॥३॥ तुका म्हणे मज विघडतां क्षण । न लगे जतन करीं देवा ॥४॥
753
ऐकें रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा । पंढरीचा राणा मनामाजी स्मरावा ॥१॥ मग कैचें रे बंधन वाचे गातां नारायण । भवसिंधु तो जाण ये चि तीरी सरेल ॥ध्रु.॥ दास्य करील किळकाळ बंद तुटेल मायाजाळ । होतील सकळ रिद्धिसिद्धि म्हणियारीं ॥२॥ सकळशास्त्रांचें सार हें वेदांचें गव्हर । पाहातां विचार हा चि करिती पुराणें ॥३॥ ब्राम्हण क्षेत्री वैश्य शूद्र चांडाळां आहे अधिकार । बाळें नारीनर आदि करोनि वेश्या ही ॥४॥ तुका म्हणे अनुभवें आम्हीं पाडियलें ठावें । आणीक ही दैवें सुख घेती भाविकें ॥५॥
754
ऐकें वचन कमळापती । मज रंकाची विनंती ॥१॥ कर जोडितों कथाकाळीं । आपण असावें जवळी ॥ध्रु.॥ घेई ऐसी भाक । मागेन जरि कांहीं आणिक ॥२॥ तुकयाबंधु म्हणे देवा । शब्द इतुका राखावा ॥३॥
755
ऐकोनियां कीर्ती । ऐसी वाटती विश्रांती ॥१॥ माते सुख डोळां पडे । तेथें कोण लाभ जोडे ॥ध्रु.॥ बोलतां ये वाचे । वीट नये जिव्हा नाचे ॥२॥ तुका म्हणे धांवे । वासना ते रस घ्यावे ॥३॥
756
ऐशा भाग्यें जालों । तरी धन्य जन्मा आलों ॥१॥ रुळें तळीले पायरी । संत पाय देती वरी ॥ध्रु.॥ प्रेमामृतपान । होईंल चरणरजें स्नान ॥२॥ तुका म्हणे सुखें । तया हरतील दुःखें ॥३॥
757
ऐसा कर घर आवे राम । और धंदा सब छोर हि काम ॥ ध्रु॥ इतन गोते काहे खाता । जब तूं आपणा भूल न होता ॥१॥ अंतरजामी जानत साचा । मनका एक उपर बाचा ॥२॥ तुकाप्रभु देसबिदेस । भरिया खाली नहिं लेस ॥३॥
758
ऐसा कोणी नाहीं हें जया नावडे । कन्या पुत्र घोडे दारा धन ॥१॥ निंब घेतें रोगी कवणिया सुखें । हरावया दुःखें व्याधि पीडा ॥ध्रु.॥ काय पळे सुखें चोरा लागे पाठी । न घलावी काठी आड तया ॥२॥ जयाचें कारण तो चि जाणे करूं । नये कोणां वारूं आणिकासी ॥३॥ तुका म्हणे तरी सांपडे निधान । द्यावा ओंवाळून जीव बळी ॥४॥
759
ऐसा घेई कां रे संन्यास । करीं संकल्पाचा नास ॥१॥ मग तूं राहें भलते ठायीं । जनीं वनीं खाटे भोईं ॥ध्रु.॥ तोडीं जाणिवेची कळा । होई वृत्तीसी वेगळा ॥२॥ तुका म्हणणे नभा । होई आणुचा ही गाभा ॥३॥
760
ऐसा चि तो गोवा । न पाहिजे केला देवा ॥१॥ बहु आली दुरिवरी । ओढत हे भरोवरी ॥ध्रु.॥ आम्हांसी न कळे । तुम्ही झाकुं नये डोळे ॥२॥ तुका म्हणे संगें । असों एक एका अंगें ॥३॥
761
ऐसा तंव मोळा । तुमचा नसेल गोपाळा ॥१॥ मागत्याची टाळाटाळी । झिंज्या ओढोनि कपाळीं ॥ध्रु.॥ नसेल ना नवें । ऐसें धरियेलें देवें ॥२॥ तुका म्हणे जाला । उशीर नाहीं तो विठ्ठला ॥३॥
762
ऐसा दुस्तर भवसागर । नेणों कैसा उतरूं पार ॥१॥ कामक्रोधादि सावजें थोर । दिसताती भयंकर ॥ध्रु.॥ मायाममतेचे भोवरे । घेती भयानक फेरे ॥२॥ वासनेच्या लहरा येती । उद्योगहेलकावे बसती ॥३॥ तरावया एक युक्ति असे । तुका नामनावेमधीं बैसे ॥४॥
763
ऐसा माझा आहे भीडभार । नांवाचा मी फार वांयां गेलों ॥१॥ काय सेवा रुजु आहे सत्ताबळ । तें मज राउळ कृपा करी ॥ध्रु.॥ काय याती शुद्ध आहे कुळ कर्म । तेणें पडे वर्म तुझे ठायीं ॥२॥ कोण तपोनिध दानधर्मसीळ । अंगीं एक बळ आहे सत्ता ॥३॥ तुका म्हणे वांयां जालों भूमी भार । होईंल विचार काय नेणों ॥४॥
764
ऐसा मी अपार पार नाहीं अंत । परि कृपावंत भाविकांचा ॥१॥ दुर्जनां चांडाळां करीं निर्दाळण । करीं संरक्षण अंकितांचें ॥ध्रु.॥ भक्त माझे सखे जिवलग सांगाती । सर्वांग त्यांप्रति वोडवीन ॥२॥ पीतांबरछाया करीन त्यांवरी । सदा त्यांचे घरीं दारी उभा ॥३॥ माझे भक्त मज सदा जे रातले । त्यांघरीं घेतलें धरणें म्यां ॥४॥ कोठें हें वचन ठेविलें ये वेळे । तुका म्हणे डोळे झांकियेले ॥५॥
765
ऐसा सर्व भाव तुज निरोपिला । तूं मज एकला सर्वभावें ॥१॥ अंतरींची कां हे नेणसील गोष्टी । परि सुखासाटीं बोलविसी ॥ध्रु.॥ सर्व माझा भार तुज चालवणें । तेथें म्यां बोलणें काय एक ॥२॥ स्वभावें स्वहित हिताचें कारण । कौतुक करून निवडिसी ॥३॥ तुका म्हणे तूं हें जाणसी गा देवा । आमुच्या स्वभावा अंतरींच्या ॥४॥
766
ऐसा हा लौकिक कदा राखवेना । पतितपावना देवराया ॥१॥ संसार करितां म्हणती हा दोषी । टाकितां आळसी पोटपोसा ॥ध्रु.॥ आचार करितां म्हणती हा पसारा । न करितां नरा निंदिताती ॥२॥ संतसंग करितां म्हणती हा उपदेशी । येरा अभाग्यासि ज्ञान नाहीं ॥३॥ धन नाहीं त्यासि ठायींचा करंटा । समर्थासि ताठा लाविताती ॥४॥ बहु बोलों जातां म्हणति हा वाचाळ । न बोलतां सकळ म्हणती गर्वी ॥५॥ भेटिसि न वजातां म्हणती हा निष्ठ । येतां जातां घर बुडविलें ॥६॥ लग्न करूं जातां म्हणती हा मातला । न करितां जाला नपुंसक ॥७॥ निपुत्रिका म्हणती पहा हो चांडाळ । पातकाचें मूळ पोरवडा ॥८॥ लोक जैसा लोक धरितां धरवे ना । अभक्ता जिरे ना संतसंग ॥९॥ तुका म्हणे आतां ऐकावें वचन । त्यजुनियां जन भक्ति करा ॥१०॥
767
ऐसिया संपत्ती आम्हां संवसारी । भोगाचिया परि काय सांगों ॥१॥ काम तो कामना भोगीतसे देवा । आळिंगणें हेवा चरण चुंबीं ॥ध्रु.॥ शांतीच्या संयोगें निरसला ताप । दुसरें तें पाप भेदबुद्धि ॥२॥ तुका म्हणे पाहें तिकडे सारिखें । आपुलें पारिखें निरसलें ॥३॥
768
ऐसी एकां अटी । रीतीं सिणती करंटीं ॥१॥ साच आपुल्या पुरतें । करून नेघेती कां हितें ॥ध्रु.॥ कां हीं वेचितील वाणी । निरर्थक चि कारणीं ॥२॥ तुका म्हणे देवा । कांहीं समर्पूनि सेवा ॥३॥
769
ऐसी जिव्हा निकी । विठ्ठल विठ्ठल कां न घोकी ॥१॥ जेणें पाविजे उद्धार । तेथें राखावें अंतर ॥ध्रु.॥ गुंपोनि चावटी । तेथें कोणा लाभें भेटी ॥२॥ तुका म्हणे कळा । देवाविण अमंगळा ॥३॥
770
ऐसी जोडी करा राम कंठीं धरा । जेणें चुके फेरा गर्भवास ॥१॥ नासिवंत आटी प्रियापुत्रधन । बीज ज्याचा सीण तें चि फळ ॥ध्रु.॥ नाव धड करा सहजरा नामांची । जे भवसिंधूची थडी पावे ॥२॥ तुका म्हणे काळा हाणा तोंडावरी । भाता भरा हरिरामबाणीं ॥३॥
771
ऐसी ते सांडिली होईंल पंढरी । येते वारकरी होत वाटे ॥१॥ देखिले सोहळे होती आठवत । चालती ते मात करूनियां ॥ध्रु.॥ केली आइकिली होईंल जे कथा । राहिलें तें चित्ती होइल प्रेम ॥२॥ गरुडटके टाळ मृदांग पताका । सांगती ते एकां एक सुख ॥३॥ तुका म्हणे आतां येती लवलाहीं । आलिंगूनि बाहीं देइन क्षेम ॥४॥
772
ऐसी वाट पाहे कांहीं निरोप कां मूळ । कां हे कळवळ तुज उमटे चि ना ॥१॥ आवो पांडुरंगे पंढरीचे निवासे । लावूनियां आस चाळवूनी ठेविलें ॥ध्रु.॥ काय जन्मा येवूनियां केली म्यां जोडी । ऐसें घडीघडी चित्तां येतें आठवूं ॥२॥ तुका म्हणे खरा न पवे चि विभाग । धिकारितें जग हें चि लाहों हिशोबें ॥३॥
773
ऐसी हे गर्जवूं वैखरी । केशव मुकुंद मुरारी । राम कृष्ण नामें बरीं । हरी हरी दोष सकळ ॥१॥ जनार्दना जगजीवना । विराटस्वरूपा वामना । महदादि मधुसूदना । भवबंधना तोडितिया ॥ध्रु.॥ चक्रपाणी गदाधरा । असुरमर्दना वीर्यवीरा । सकळमुगुटमणि शूरा । अहो दातारा जगदानिया ॥२॥ मदनमूर्ती मनमोहना । गोपाळगोपिकारमणा । नटनाट्यकौशल्य कान्हा । अहो संपन्ना सर्वगुणें ॥३॥ गुणवंता आणि निर्गुणा । सर्वसाक्षी आणि सर्वजाणा । करोनि अकर्ता आपणा । नेदी अभिमाना आतळों ॥४॥ कासयानें घडे याची सेवा । काय एक समर्पावें या देवा । वश्य तो नव्हे वांचुनि भावा । पाय जीवावेगळे न करी तुका ॥५॥
774
ऐसीं ठावीं वर्में । तरी सांडवलों भ्रमें ॥१॥ सुखें नाचतों कीर्तनीं । नाहीं आशंकित मनीं ॥ध्रु.॥ ऐसें आलें हाता । बळ तरी गेली चिंता ॥२॥ सुखे येथें जालें तरी । नाहीं आणिकांची उरी ॥३॥ ऐसें केलें देवें । पुढें कांहीं चि न व्हावें ॥४॥ तुका म्हणे मन । आतां जालें समाधान ॥५॥
775
ऐसीं वर्में आम्हां असोनियां हातीं । कां होऊं नेणतीं दिशाभुली ॥१॥ पोटाळुनी पाय कवळीन उभा । कृपे पद्मनाभा हालों नेदीं ॥ध्रु.॥ आपुले इच्छेसी घालीन संपुष्टीं । श्रीमुख तें दृष्टी न्याहाळीन ॥२॥ तुका म्हणे बहु सांडियेलीं मतें । आपुल्या पुरतें धरुनी ठेलों ॥३॥
776
ऐसे ऐसियानें भेटती ते साधु । ज्याच्या दरशनें तुटे भवबंदु । जे कां सिच्चदानंदीं नित्यानंदु । जे कां मोक्षसिद्धी तीर्थ वंदूं रे ॥१॥ भाव सर्वकारण मूळ वंदु । सदा समबुद्धि नास्ति भेदु। भूतकृपा मोडीं द्वेषकंदु । शत्रु मित्र पुत्र सम करीं बंधु रे ॥ध्रु.॥ मन बुद्धि काया वाचा शुद्ध करीं । रूप सर्वत्र देखोनि नमस्कारीं । लघुत्व सर्वभावें अंगीकारीं । सांडीमांडी मीतूंपण ऐसी थोरी रे ॥२॥ अर्थकामचाड नाहीं चिंता । मानामान मोह माया मिथ्या । वर्ते समाधानीं जाणोनि नेणता । साधु भेट देती तया अवचिता रे ॥३॥ मनीं दृढ धरीं विश्वास । नाहीं सांडीमांडीचा सायास । साधुदर्शन नित्यकाळ त्यास । तुका म्हणे जो विटला जाणीवेस रे ॥४॥
777
ऐसे कुळीं पुत्र होती । बुडविती पूर्वजा ॥१॥ चाहाडी चोरी भांडवला । वांटा आला भागासी ॥ध्रु.॥ त्याचियानें दुःखी मही । भार तेही न साहे ॥२॥ तुका म्हणे ग्रामपशु । केला नाशु अयुषा ॥३॥
778
ऐसे कैसे जाले भोंदू । कर्म करोनि म्हणति साधु ॥१॥ अंगा लावूनियां राख । डोळे झांकुनी करिती पाप ॥ध्रु.॥ दावुनि वैराग्याची कळा । भोगी विषयाचा सोहळा ॥२॥ तुका म्हणे सांगों किती । जळो तयांची संगती ॥३॥
779
ऐसे नाना भेष घेऊनी हिंडती । पोटासाटीं घेती प्रतिग्रह ॥१॥ परमार्थासी कोण त्यजी संवसार । सांगापां साचार नांव त्याचें ॥२॥ जन्मतां संसार त्यजियेला शुकें । तोचि निष्कळंक तुका म्हणे ॥३॥
780
ऐसे पुढती मिळतां आतां । नाहीं सत्ता स्वतंत्र ॥१॥ म्हणउनि फावलें तें घ्यावें । नाम गावें आवडी ॥ध्रु.॥ संचित प्रारब्ध गाढें । धांवे पुढें क्रियमाण ॥२॥ तुका म्हणे घुबडा ऐसें । जन्म सरिसे शुकराचें ॥३॥
781
ऐसे संत जाले कळीं । तोंडीं तमाखूची नळी ॥१॥ स्नानसंध्या बुडविली । पुढें भांग वोडवली ॥ध्रु.॥ भांगभुर्का हें साधन । पची पडे मद्यपान ॥२॥ तुका म्हणे अवघें सोंग । तेथें कैचा पांडुरंग ॥३॥
782
ऐसे सांडुनियां घुरे । किविलवाणी दिसां कां रे । कामें उर भरे । हातीं नुरे मृत्तिका ॥१॥ उदार हा जगदानी । पांडुरंग अभिमानी । तुळसीदळ पाणी । चिंतनाचा भुकेला ॥ध्रु.॥ न लगे पुसावी चाकरी । कोणी वकील ये घरीं । त्याचा तो चाकरी । पारपत्य सकळ ॥२॥ नाहीं आडकाटी । तुका म्हणे जातां भेटी । न बोलतां मिठी । उगी च पायीं घालावी ॥३॥
783
ऐसें कलियुगाच्या मुळें । जालें धर्माचें वाटोळें ॥१॥ सांडुनियां रामराम । ब्राम्हण म्हणती दोमदोष ॥ध्रु.॥ शिवों नये तीं निळी । वस्त्रें पांघरती काळीं ॥२॥ तुका म्हणे वृत्ति । सांडुनि गदा मागत जाती ॥३॥
784
ऐसें कां जालें तें मज ही न कळे । कीर्तनाचे रळेपळे जगीं ॥१॥ कैसें तुम्हां देवा वाटतसे बरें । संतांचीं उत्तरें लाजविलीं ॥ध्रु.॥ भाविकां कंटक करिताती पीडा । हा तंव रोकडा अनुभव ॥२॥ तुका म्हणे नाम निर्वाणीचा बाण । याचा अभिमान नाहीं तुम्हां ॥३॥
785
ऐसें कां हो न करा कांहीं । पुढें नाहीं नास ज्या ॥१॥ विश्वंभरा शरणागत । भूतजात वंदूनि ॥ध्रु.॥ श्रुतीचें कां नेघा फळ । सारमूळ जाणोनि ॥२॥ तुका म्हणे पुढें कांहीं । वाट नाहीं यावरी ॥३॥
786
ऐसें काय उणें जालें तुज देवा । भावेंविण सेवा घेसी माझी ॥१॥ काय मज द्यावा न लगे मुशारा । पहावें दातारा विचारूनि ॥ध्रु.॥ करितों पाखांडें जोडूनि अक्षरें । नव्हे ज्ञान खरें भक्तिरस ॥२॥ गुणवाद तुझे न बोलवे वाणी । आणिका छळणी वाद सांगें ॥३॥ तरी आतां मज राखें तुझे पायीं । देखसील कांहीं प्रेमरस ॥४॥ तुका म्हणे तुज हांसतील लोक । निःकाम सेवक म्हणोनियां ॥५॥
787
ऐसें कोण पाप बळी । जें जवळी येऊं नेदी ॥१॥ तुम्हां तंव होइल ठावें । नेदावें कां कळों हें ॥ध्रु.॥ कोण जाला अंतराय । कां ते पाय अंतरले ॥२॥ तुका म्हणे निमित्याचा । आला सुच अनुभव ॥३॥
788
ऐसें ठावें नाहीं मूढा । सोस काकुलती पुढां ॥१॥ माझीं नका जाळूं भांडीं । पोटीं भय सोस तोंडीं ॥ध्रु.॥ पातलिया काळ । तेव्हां काय चाले बळ ॥२॥ संचित तें करी । नरका जाया मेल्यावरी ॥३॥ परउपकार । न घडावा हा विचार ॥४॥ तुका म्हणे लांसी । आतां भेटों नये ऐसी ॥५॥
789
ऐसें भाग्य कई लाहाता होईंन । अवघें देखें जन ब्रम्हरूप ॥१॥ मग तया सुखा अंत नाहीं पार । आनंदें सागर हेलावती ॥ध्रु.॥ शांति क्षमा दया मूर्तिमंत अंगीं । परावृत्त संगीं कामादिकां ॥२॥ विवेकासहित वैराग्याचें बळ । धग्धगितोज्ज्वाळ अग्नि जैसा ॥३॥ भक्ती नवविधा भावशुद्ध बरी । अळंकारावरी मुगुटमणि ॥४॥ तुका म्हणे माझी पुरवी वासना । कोण नारायणा तुजविण ॥५॥
790
ऐसें सत्य माझें येईंल अंतरा । तरि मज करा कृपा देवा ॥१॥ वचनांसारिखें तळमळी चत्ति । बाहेरि तो आंत होइल भाव ॥ध्रु.॥ तरि मज ठाव द्यावा पायांपाशीं । सत्यत्वें जाणसी दास खरा ॥२॥ तुका म्हणे सत्य निकट सेवकें । तरि च भातुकें प्रेम द्यावें ॥३॥
791
ओनाम्याच्या काळें । खडें मांडविलें बाळें ॥१॥ तें चि पुढें पुढें काई । मग लागलिया सोई ॥ध्रु.॥ रज्जु सर्प होता । तोंवरी चि न कळतां ॥२॥ तुका म्हणे साचें । भय नाहीं बागुलाचें ॥३॥
792
ओले मातीचा भरवसा । कां रे धरिशी मानसा ॥१॥ डोळे चिरीव चांगले । वृद्धपणीं सरवया जाले ॥ध्रु.॥ नाक सरळ चांगलें । येउन हनवटी लागलें ॥२॥ तुका म्हणे आलें नाहीं । तंव हरिला भज रे कांहीं ॥३॥
793
ओलें मूळ भेदी खडकाचें अंग । आभ्यासासी सांग कार्यसिद्धि ॥१॥ नव्हे ऐसें कांहीं नाहीं अवघड । नाहीं कईवाड तोंच वरि ॥ध्रु.॥ दोरें चिरा कापे पडिला कांचणी । अभ्यासें सेवनीं विष पडे ॥२॥ तुका म्हणे कैंचा बैसण्यासी ठाव । जठरीं बाळा वाव एकाएकीं ॥३॥
794
ओळखी तयांसी होय एका भावें । दुसरिया देवें न पविजे ॥१॥ न पविजे कदा उन्मत्त जालिया । डंबु तो चि वांयां नागवण ॥२॥ वनवास देवाकारणें एकांत । करावीं हीं व्रततपें याग ॥३॥ व्रत याग यांसी फळलीं बहुतें । होतीं या संचितें गौळियांची ॥४॥ यांसी देवें तारियेलें न कळतां । मागील अनंता ठावें होतें ॥५॥ होतें तें द्यावया आला नारायण । मायबापां रीण गौळियांचें ॥६॥ गौळियांचें सुख दुर्लभ आणिकां । नाहीं ब्रम्हादिकां तुका म्हणे ॥७॥
795
ओवाळूं आरती पंढरीराया । सर्वभावें शरण आलों तुझिया पायां ॥१॥ सर्व व्यापून कैसें रूप आकळ । तो हा गौळ्या घरीं जाला कृष्ण बाळ ॥ध्रु.॥ स्वरूप गुणातीत जाला अवतारधारी । तो हा पांडुरंग उभा विटेवरी ॥२॥ भक्तिचिया काजा कैसा रूपासि आला । ब्रिदाचा तोडर चरणीं मिरविला ॥३॥ आरतें आरती ओवाळिली । वाखाणितां कीर्ति वाचा परतली ॥४॥ भावभक्तिबळें होसी कृपाळु देवा । तुका म्हणे पांडुरंगा तुझ्या न कळती मावा ॥५॥
796
ओस जाल्या मज भिंगुळवाणें । जीवलग नेणें मज कोणी ॥१॥ भय वाटे देखें श्वापदांचे भार । नव्हे मज धीर पांडुरंगा ॥ध्रु.॥ अंधकारापुढे न चलवे वाट । लागतील खुंटे कांटे अंगा ॥२॥ एकला निःसंग फांकती मारग । होतों नव्हे लाग चालावया ॥३॥ तुका म्हणे वाट दावूनि सद्गु । राहि हा दुरू पांडुरंग ॥४॥
797
कंठ नामसिका । आतां कळिकाळासी धका ॥१॥ रोखा माना कीं सिका माना । रोखा सिका तत्समाना ॥ध्रु.॥ रोखा न मना सिका न मना । जतन करा नाककाना ॥२॥ सिका न मनी रावण । त्याचें केलें निसंतान ॥३॥ सिका मानी हळाहळ । जालें सर्वांगीं शीतळ ॥४॥ तुका म्हणे नाम सिका । पटीं बैसलों निजसुखा ॥५॥
798
कंठीं कृष्णमणी । नाहीं अशुभ ते वाणी ॥१॥ हो का नर अथवा नारी । रांड तयें नावें खरी ॥ध्रु.॥ नाहीं हातीं दान । शूरपणाचें कांकण ॥२॥ वाळियेली संतीं । केली बोडोनि फजिती ॥३॥ तुका म्हणे ताळा । नाहीं त्याची अवकळा ॥४॥
799
कंठीं धरिला कृष्णमणी । अवघा जनीं प्रकाश ॥१॥ काला वांटूं एकमेकां । वैष्णवा निका संभ्रम ॥ध्रु.॥ वांकुलिया ब्रम्हादिकां । उत्तम लोकां दाखवूं ॥२॥ तुका म्हणे भूमंडळीं । आम्ही बळी वीर गाडे ॥३॥
800
कंठीं राहो नाम । अंगीं भरोनियां प्रेम ॥१॥ ऐसें द्यावें कांहीं दान । आलों पतित शरण ॥ध्रु.॥ संतांचिये पायीं । वेळोवेळां ठेवीं डोईं ॥२॥ तुका म्हणे तरें । भवसिंधु एका सरें ॥३॥
801
कंसरायें गर्भ वधियेले सात । म्हणोनि गोकुळासी आले अनंत । घ्यावया अवतार जालें हें चि निमित्य । असुर संहारूनि तारावे भक्त ॥१॥ जय देव जय देव जय विश्वरूपा । श्रीविश्वरूपा । ओवाळीन तुज देहदीपें बापा ॥ध्रु.॥ स्थूळरूप होऊनि धरितसे सानें । जैसा भाव तैसा तयांकारणें । दैत्यांसी भासला सिहीं गजान । काळासी महाकाळ यशोदेसी तान्हें ॥२॥ अनंत वर्णी कोणा न कळे चि पार । सगुण कीं निर्गुण हा ही निर्धार । पांगलीं साईं अठरा करितां वेव्हार । तो वळितसे गौळियांचें खिल्लार ॥३॥ तेहतिस कोटि तिहीं देवांसी श्रेष्ठ । पाउलें पाताळीं नेणती स्वर्ग मुगुट । गिळिलीं चौदा भूवनें तरि न भरे चि पोट । तो खाउन धाला गोपाळाचें उच्छिष्ट ॥४॥ महिमा वर्णू तरि पांगलिया श्रुति । सिणला शेष चिरल्या जिव्हा करितां स्तुती । भावेंविण कांहीं न चले चि युक्ति । राखें शरण तुकयाबंधु करी विनंती ॥५॥
802
कइं तो दिवस देखेन डोळां । कल्याण मंगळामंगळाचें ॥१॥ आयुष्याच्या शेवटीं पायांसवे भेटी । कळिवरें तुटी जाल्या त्वरे ॥ध्रु.॥ सरो हें संचित पदरींचा गोवा । उताविळे देवा मन जालें ॥२॥ पाउलापाउलीं करितां विचार । अनंतविकार चित्ता अंगीं ॥३॥ म्हणउनि भयाभीत होतो जीव । भाकितसें कींव अटाहासें ॥४॥ तुका म्हणे होइल आइकिलें कानीं । तरि चक्रपाणी धांव घाला ॥५॥ दुःखाच्या उत्तरीं आळविले पाय । पाहणें तों काय अजून अंत ॥६॥
803
कइंचें कारण । तृष्णा वाढविते सीण ॥१॥ काय करूनि ऐसा संग । सोसें चि तूं पांडुरंग ॥ध्रु.॥ रूपीं नाहीं गोडी । हांवे हांवे उर फोडी ॥२॥ तुका न पडे भरी । ऐशा वरदळाचे थोरी ॥३॥
804
कई ऐसी दशा येइल माझ्या आंगा । चत्ति पांडुरंगा झुरतसे ॥१॥ नाठवुनि देह पायांचें चिंतन । अवसान तें क्षण नाहीं मधीं ॥ध्रु.॥ काय ऐसा पात्र होईंन लाभासी । नेणों हृषीकेशी तुष्टईंल ॥२॥ तुका म्हणे धन्य मानीन संचित । घेईंन तें नित्य प्रेमसुख ॥३॥
805
कई देखतां होईन डोळीं । सकळां भूतीं मूर्ति सांवळी । जीवा नांव भूमंडळीं । जळीं स्थळीं काष्ठीं पाषाणीं ॥१॥ ऐसा कृपा करील नारायण । जीव जगाचा होईन । प्रेमसागरीं बुडईन । होईल स्नान अनुतापीं ॥ध्रु.॥ ऐसा कई येईन दैवास । दृश्य नासोनि जाईल आस । सदा संतचरणीं देहाचा वास । सेवीन शेष धणीवरी ॥२॥ कई नवसा येतील अंकुर । सुखा नाहींसा होईल पार । अमृत तें पृथ्वीजळ सागर । वाहाती पूर आनंदाचे ॥३॥ प्रसन्न दया क्षमा शांति । कई नवविधा होईल भक्ति । भोगीन वैराग्यसंपत्ति । मनोरथ कळती तई पुरले ॥४॥ तुकयाबंधु म्हणे सांग । नव्हे तुजविण निरसेना पांग । म्हणोनि घातलें साष्टांग । पांडुरंगा वरी चरणा ॥५॥
806
कईं मात माझे ऐकती कान । बोलतां वचन संतां मुखीं ॥१॥ केला पांडूरंगें तुझा अंगीकार । मग होइल धीर माझ्या जीवा ॥ध्रु.॥ म्हणऊनि मुख अवलोकितों पाय । हे चि मज आहे थोरी आशा ॥२॥ माझिया मनाचा हा चि विश्वास । न करीं सायास साधनांचे ॥३॥ तुका म्हणे मज होईल भरवसा । तरलों मी ऐसा साच भाव ॥४॥
807
कटावरी कर कासया ठेविले । जननी विठ्ठले जीवलगे॥१॥ शंखचक्रगदाकमळमंडित । आयुधें मंडित कृष्णाबाईं ॥ध्रु.॥ क्षण एक धीर होत नाहीं चित्ति । केव्हां पंढरिनाथा भेटशील ॥२॥ तुका म्हणे हें चि करीं देई । तई च विश्रामा पावईंन ॥३॥
808
कठिण नारळाचें अंग । बाहेरी भीतरी तें चांग ॥१॥ तैसा करी कां विचार । शुद्ध कारण अंतर ॥ध्रु.॥ वरि कांटे फणसफळा । माजि अंतरीं जिव्हाळा ॥२॥ ऊंस बाहेरी कठिण काळा । माजी रसाचा जिव्हाळा ॥३॥ मिठें रुचविलें अन्न । नये सतंत कारण ॥४॥
809
कडसणी धरितां अडचणीचा ठाव । म्हणऊनि जीव त्रासलासे ॥१॥ लौकिकाबाहेरि राहिलों निराळा । तुजविण वेगळा नाहीं तुजा ॥ध्रु.॥ संकोचानें नाहीं होत धणीवरी । उरवूनि उरी काय काज ॥२॥ तुका म्हणे केलें इच्छे चि सारिखें । नाहींसें पारिखें येथें कोणी ॥३॥
810
कण भुसाच्या आधारें । परि तें निवडितां बरें ॥ काय घोंगालि पाधाणी । ताकामध्यें घाटी लोणी ॥ध्रु.॥ सुइणीपुढें चेंटा । काय लपविसी चाटा ॥२॥ तुका म्हणे ज्ञान । दिमाकाची भनभन ॥३॥
811
कथनी पठणी करूनि काय । वांचुनि रहणी वांयां जाय ॥१॥ मुखीं वाणी अमृतगोडी । मिथ्या भुकें चरफडी ॥ध्रु.॥ पिळणी पाक करितां दगडा । काय जडा होय तें ॥२॥ मधु मेळवूनि माशी । आणिका सांसी पारधिया ॥३॥ मेळऊनि धन मेळवी माती । लोभ्या हातीं तें चि मुखीं ॥४॥ आपलें केलें आपण खाय । तुका वंदी त्याचे पाय ॥५॥
812
कथा करोनिया द्रव्य घेती देती । तयां अधोगति नरकवास ॥१॥ रवरव कुंभपाक भोगिती यातना । नये नारायणा करुणा त्यांची ॥ध्रु.॥ असिखड्गधारा छेदिती सर्वांग । तप्तभूमी अंग लोळविती ॥२॥ तुका म्हणे तया नरक न चुकती । सांपडले हातीं यमाचिया ॥३॥
813
कथा करोनियां मोल ज्यापें घेती । ते ही दोघे जाती नरकामध्यें ॥१॥ ब्रम्ह पूर्ण करा ब्रम्ह पूर्ण करा । अखंड स्मरा रामराम ॥ध्रु.॥ मधुरवाणीच्या नका पडों भरी । जाल यमपुरी भोगावया ॥२॥ तुका म्हणे करीं ब्रम्हांड ठेंगणें । हात पसरी जिणें धिग त्याचें ॥३॥
814
कथा त्रिवेणीसंगम देव भक्त आणि नाम । तेथींचें उत्तम चरणरज वंदितां ॥१॥ जळती दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नर । गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा ॥ध्रु.॥ तीर्थी तया ठाया येती पुनीत व्हावया । पर्वकाळ पायां तळीं वसे वैष्णवां॥२॥ अनुपम्य हा महिमा नाहीं द्यावया उपमा । तुका म्हणे ब्रम्हा नेणे वर्णू या सुखा ॥३॥
815
कथा दुःख हरी कथा मुक्त करी । कथा याची बरी विठोबाची ॥१॥ कथा पाप नासी उद्धरिले दोषी । समाधि कथेसी मूढजना ॥ध्रु.॥ कथा तप ध्यान कथा अनुष्ठान । अमृत हे पान हरिकथा ॥२॥ कथा मंत्रजप कथा हरी ताप । कथाकाळी कांप किळकाळासी ॥३॥ तुका म्हणे कथा देवाचें ही ध्यान । समाधि लागोन उभा तेथें ॥४॥
816
कथा देवाचें ध्यान । कथा साधना मंडण । कथे ऐसें पुण्य आणीक नाहीं सर्वथा ॥१॥ ऐसा साच खरा भाव । कथेमाजी उभा देव ॥ध्रु.॥ मंत्र स्वल्प जना उच्चारितां वाचे मना । म्हणतां नारायणा क्षणें जळती महा दोष ॥२॥ भावें करितां कीर्तन तरे तारी आणीक जन । भेटे नारायण संदेह नाहीं म्हणे तुका ॥३॥
817
कथा पुराण ऐकतां । झोंप नाथिलि तत्वता । खाटेवरि पडतां । व्यापी चिंता तळमळ ॥१॥ ऐसी गहन कर्मगति । काय तयासी रडती । जाले जाणते जो चित्ती । कांहीं नेघे आपुला ॥ध्रु.॥ उदक लावितां न धरे । चिंता करी केव्हां सरे । जाऊं नका धीरें । म्हणे करितां ढवाळ्या ॥२॥ जवळी गोंचिड क्षीरा । जैसी कमळणी ददुऩरा । तुका म्हणे दुरा । देशत्यागें तयासी ॥३॥
818
कथा प्रावर्ण । नव्हे भिक्षेचें तें अन्न ॥१॥ करीं यापरी स्वहित । विचारूनि धर्म नीत ॥ध्रु.॥ देऊळ नव्हे घर । प्रपंच परउपकार ॥२॥ विधिसेवन काम । नव्हे शब्द रामराम ॥३॥ हत्या क्षत्रधर्म । नव्हे निष्काम तें कर्म ॥४॥ तुका म्हणे संतीं । करूनि ठेविली आइती ॥५॥
819
कथा हें भूषण जनामध्यें सार । तरले अपार बहुत येणें ॥१॥ नीचिये कुळींचा उंचा वंद्य होय । हरीचे जो गाय गुणवाद ॥ध्रु.॥ देव त्याची माथां वंदी पायधुळी । दीप झाला कुळीं वंशाचिये ॥२॥ त्याची निंदा करी त्याची कुष्ठ वाणी । मुख संवदणी रजकाची ॥३॥ तुका म्हणे नाहीं चोरीचा व्यापार । विठ्ठलाचें सार नाम ध्यावें ॥४॥
820
कथाकाळींची मर्यादा सांगतों ते भावें वंदा । प्रीतीने गोविंदा हें चि एक आवडे ॥१॥ टाळ वाद्या गीत नृत्य अंतःकरणें प्रेमभरित । वाणिता तो कीर्त तद्भावने लेखावा ॥ध्रु.॥ नये अळसें मोडूं अंग कथे कानवडें हुंग । हेळणेचा रंग दावी तो चांडाळ ॥२॥ तोंडी विडा माने ताठा थोरपणे धाली गेंठा । चित्ती नेदी नामपाठा गोष्टी लावी तो चांडाळ ॥४॥ कथे इच्छी मान दावूनियां थोरपण रजा । संकोच न लुगडी सांवरी तो चांडाळा ॥५॥ आपण बैसे बाजेवरी सामान हरिच्या दासां धरी । तरि तो सुळावरि वाहिजे निश्चयेसीं ॥६॥ येतां नकरी नमस्कार कर जोडोनियां नम्र । न म्हणवितां थोर आणिकां खेटी तो चांडाळ ॥७॥ तुका विनवी जना कथे नाणावें अवगुणा । करा नारायणा ॠणी समर्पक भावें ॥८॥
821
कथे उभा अंग राखे जो कोणी । ऐसा कोण गणी तया पापा ॥१॥ येथें तो पातकी न येता च भला । रणीं कुचराला काय चाले ॥ध्रु.॥ कथे बैसोनी आणीक चर्चा । धिग त्याची वाचा कुंभपाक ॥२॥ तुका म्हणे ऐलपैल ते थडीचे । बुडतील साच मध्यभागीं ॥३॥
822
कथे बैसोनि सादरें । सुखचर्चा परस्परें । नवल काय तो उद्धरे । आणीक तरे सुगंधें ॥१॥ पुण्य घेई रे फुकाचें । पाप दुष्टवासनेचें । पेरिल्या बीजाचें । फळ घेई शेवटीं ॥ध्रु.॥ कथा विरस पाडी आळसें । छळणा करूनि मोडी रस । बुडवी आपणासरिसें । विटाळसें नावेसी ॥२॥ सज्जन चंदनाचिये परी । दुर्जन देशत्यागें दुरी । राहो म्हणे हरि । विनंती करी तुका हे ॥३॥
823
कथेचा उलंघ तो अधमां अधम । नावडे ज्या नाम ओळखा तो ॥१॥ कासया जीऊन जाला भूमी भार । अनउपकार माते कुंसी ॥ध्रु.॥ निद्रेचा आदर जागरणीं वीट । त्याचे पोटीं कीट कुपथ्याचें ॥२॥ तुका म्हणे दोन्ही बुडविलीं कुळें । ज्याचें तोंड काळें कथेमाजी ॥३॥
824
कथेची सामुग्री । देह अवसानावरी ॥१॥ नको जाऊं देऊं भंगा । गात्रें माझीं पांडुरंगा ॥ध्रु.॥ आयुष्य करीं उणें । परी मज आवडो कीर्तन ॥२॥ तुका म्हणे हाणी । या वेगळी मना नाणीं ॥३॥
825
कधीं कृपा करिसी नेणें । मज दीनाचें धांवणें ॥१॥ भेटी लागीं पंढरीनाथा । जीवीं लागली तळमळ व्यथा ॥ध्रु.॥ सिणलें माझें मन । वाट पाहतां लोचन ॥२॥ तुका म्हणे लागली भूक । तुझें पहावया श्रीमुख ॥३॥
826
कनकाच्या परियेळीं उजळूनि आरती । रत्नदीपशोभा कैशा पाजळल्या ज्योती ॥१॥ ओंवाळूं गे माये सबाह्य साजिरा । राहिरखुमाईंसत्यभामेच्या वरा ॥ध्रु.॥ मंडितचतुर्भुज दिव्य कानीं कुंडलें । श्रीमुखाची शोभा पाहातां तेज फांकलें ॥२॥ वैजयंती माळ गळां शोभे श्रीमंत । शंखचक्रगदापद्म आयुधें शोभत ॥३॥ सांवळा सकुमार जैसा कर्दळीगाभा । चरणीचीं नेपुरें वांकी गर्जती नभा ॥४॥ ओंवाळितां मन हें उभें ठाकलें ठायीं । समदृष्टि समाधि तुकया लागली पायीं ॥५॥
827
कनवाळ कृपाळ । उदार दयाळ मायाळ । म्हणवितोसी परि केवळ । गळेकाटू दिसतोसी ॥१॥ काय केलें होतें आम्हीं । सांग तुझें एकये जन्मीं । जालासी जो स्वामी । एवढी सत्ता करावया ॥ध्रु.॥ भलेपणाचा पवाडा । बरा दाविला रोकडा । करूनि बंधु वेडा । जोडा माझा विखंडिला ॥२॥ तुकयाबंधु म्हणे भला । कैसें म्हणताती तुजला । जीव आमुचा नेला । अंत पाहिला कांहींतरी ॥३॥
828
कनवाळू कृपाळू भक्तांलागीं मोही । गजेंद्राचा धांवा तुवां केला विठाईं ॥१॥ पांडुरंगे ये वो पांडुरंगे । जीवाचे जिवलगे ये वो पांडुरंगे ॥ध्रु.॥ भक्तांच्या कैवारें कष्टलीस विठ्ठले । आंबॠषीकारणें जन्म दाहा घेतले ॥२॥ प्रल्हादाकारणें स्तंभीं अवतार केला । विदारूनि दैत्य प्रेमपान्हा पाजिला ॥३॥ उपमन्याकारणें कैसी धांवसी लवलाहीं । पाजी प्रेमपान्हा क्षीरसागराठायीं ॥४॥ कौरवीं पांचाळी सभेमाजी आणिली । वस्त्रहरणीं वस्त्रें कैसी जाली माउली ॥५॥ दुर्वास पातला धर्मा छळावया वनीं । धांवसी लवलाहीं शाखादेठ घेऊनि ॥६॥ कृपाळू माउली भुक्तिमुक्तिभांडार । करीं माझा अंगीकार तुका म्हणे विठ्ठले ॥७॥
829
कन्या गो करी कथेचा विकरा । चांडाळ तो खरा तया नांवें ॥१॥ गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण । यातिशीं कारण नाहीं देवा ॥२॥ आशाबद्ध नये करूं तें करिती । तुका म्हणे जाती नरकामधीं ॥३॥
830
कन्या सासुर्यासि जाये । मागें परतोनी पाहे ॥१॥ तैसें जालें माझ्या जिवा । केव्हां भेटसी केशवा ॥ध्रु.॥ चुकलिया माये । बाळ हुरू हुरू पाहे ॥२॥ जीवना वेगळी मासोळी । तुका म्हणे तळमळी ॥३॥
831
कपट कांहीं एक । नेणें भुलवायाचें लोक ॥१॥ तुमचें करितों कीर्त्तन । गातों उत्तम ते गुण ॥ध्रु.॥ दाऊं नेणें जडीबुटी । चमत्कार उठाउठी ॥२॥ नाहीं शिष्यशाखा । सांगों अयाचित लोकां ॥३॥ नव्हें मठपति । नाहीं चाहुरांची वृत्ति ॥४॥ नाहीं देवार्चन । असे मांडिलें दुकान ॥५॥ नाहीं वेताळ प्रसन्न । कांहीं सांगों खाण खुण ॥६॥ नव्हें पुराणिक । करणें सांगणें आणीक ॥७॥ नेणें वाद घटा पटा । करितां पंडित करंटा ॥८॥ नाहीं जाळीत भणदीं । उदो म्हणोनि आनंदी ॥९॥ नाहीं हालवीत माळा । भोंवतें मेळवुनि गबाळा ॥१०॥ आगमीचें कुडें नेणें । स्तंभन मोहन उच्चाटणें ॥११॥ नव्हें यांच्या ऐसा । तुका निरयवासी पिसा ॥१२॥
832
कब मरूं पाऊं चरन तुम्हारे । ठाकुर मेरे जीवन प्यारे ॥१॥ जग रडे ज्याकुं सो मोहि मीठा । मीठा दर आनंदमाहि पैठा ॥ध्रु.॥ भला पाऊं जनम ईंक्तहे बेर । बस मायाके असंग फेर ॥२॥ कहे तुका धन मानहि दारा । वोहिलिये गुंडलीयें पसारा ॥३॥
833
कमोदिनी काय जाणे तो परिमळ । भ्रमर सकळ भोगीतसे ॥१॥ तैसें तुज ठावें नाहीं तुझें नाम । आम्ही च तें प्रेमसुख जाणों ॥ध्रु.॥ माते तृण बाळा दुधाची ते गोडी । ज्याची नये जोडी त्यासी कामा ॥२॥ तुका म्हणे मुक्ताफळ शिंपीपोटीं । नाहीं त्याची भेटी भोग तिये ॥३॥
834
कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥१॥ ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसें रूप हरी दावीं डोळां ॥ध्रु.॥ कटीं पीतांबर कास मिरवली । दाखवीं वहिली ऐसी मूर्ती ॥२॥ गरुडपारावरी उभा राहिलासी । आठवें मानसीं तें चि रूप ॥३॥ झुरोनी पांजरा होऊं पाहें आतां । येईं पंढरीनाथा भेटावया ॥४॥ तुका म्हणे माझी पुरवावी आस । विनंती उदास करूं नये ॥५॥
835
करणें तें देवा । हे चि एक पावे सेवा ॥१॥ अवघें घडे येणे सांग । भक्त देवाचें तें अंग ॥ध्रु.॥ हें चि एक वर्म । काय बोलिला तो धर्म ॥२॥ तुका म्हणे खरें । खरें त्रिवाचा उत्तरें ॥३॥
836
करणें तें हें चि करा । नरका अघोरा कां जातां ॥१॥ जयामध्यें नारायण । शुद्धपण तें एक ॥ध्रु.॥ शरणागतां देव राखे । येरां वाखे विघ्नाचे ॥२॥ तुका म्हणे लीन व्हावें । कळे भावें वर्म हें ॥३॥
837
करणें न करणें वारलें जेथें । जातों तेणें पंथें संतसंगें ॥१॥ संतीं हें पहिलें लाविलें निशाण । ते खुणा पाहोन गर्जें नाम ॥२॥ तुका म्हणे तुम्हीं चला या चि वाटे । भरवशानें भेटे पांडुरंग ॥३॥
838
करवितां व्रत अर्धे पुण्य लाभे । मोडवितां दोघे नरका जाती ॥१॥ शुद्धबुद्धि होय दोघां एक मान । चोरासवें कोण जिवें राखे ॥ध्रु.॥ आपुलें देऊनी आपुला चि घात । न करावा थीत जाणोनियां ॥२॥ देऊनियां वेच धाडी वाराणसी । नेदावें चोरासि चंद्रबळ ॥३॥ तुका म्हणे तप तीर्थ व्रत याग । भक्ति हे मारग मोडूं नये ॥४॥
839
करविली तैसी केली कटकट । वांकडें कीं नीट देव जाणे ॥१॥ कोणाकारणें हें जालेंसे निर्माण । देवाचें कारण देव जाणे ॥२॥ तुका म्हणे मी या अभिमाना वेगळा । घालुनि गोपाळा भार असें ॥३॥
840
करा करा लागपाट । धरा पंढरीची वाट । जंव नाहीं चपेट । घात पडिला काळाचा ॥१॥ दुजा ऐसा नाहीं कोणी । जो या काढी भयांतूनि । करा म्हणऊनि । हा विचार ठायींचा ॥ध्रु.॥ होती गात्रें बेंबळीं । दिवस अस्तमाना काळीं । हातपायटाळीं । जें मोकळी आहेती ॥२॥ कां रे घेतलासी सोसें । तुज वाटताहे कैसें । तुका म्हणे ऐसें । पुढें कैं लाहासी ॥३॥
841
करा नारायणा । माझ्या दुःखाची खंडणा ॥१॥ वृत्ति राखा पायांपाशीं । वस्ती धरूनि मानसीं ॥ध्रु.॥ पाळोनियां लळा । आतां पाववावें फळा ॥२॥ तुका म्हणे दीनें । त्यांचा हरतिया सीण ॥३॥
842
कराल तें करा । हातें आपुल्या दातारा ॥१॥ बळियाचीं आम्ही बाळें । असों निर्भर या सळे ॥ध्रु.॥ आतां कोठें काळ । करील देवापाशीं बळ ॥२॥ तुका म्हणे पंढरीराया । थापटितों ठोक बाह्या ॥३॥
843
कराल तें काय नव्हे जी विठ्ठला । चत्ति द्यावें बोला बोबडिया ॥१॥ सोडवूनि घ्यावें काळचक्रा हातीं । बहुत विपत्ती भोगविल्या ॥ध्रु.॥ ज्यालें जेऊं नेदी मारिलें चि मरो । प्रारब्धा उरो मागुतालीं ॥२॥ तुका म्हणे दुजा खुंटला उपाय । म्हणऊनि पाय आठविले ॥३॥
844
करावा उद्धार किंवा घ्यावी हारी । एका बोला स्थिरी राहें देवा ॥१॥ निरसनें माझा होईंल संदेह । अवघें चि आहे मूळ पायीं ॥ध्रु.॥ राहिलों चिकटूण कांहीं चि न कळे । कोणा नेणों काळे उदय भाग्य ॥२॥ तुका म्हणे बहु उद्वेगला जीव । भाकीतसें कीव देवराया ॥३॥
845
करावा उद्धार हें तुम्हां उचित । आम्ही केली नीत कळली ते ॥१॥ पाववील हाक धांवा म्हणऊन । करावें जतन ज्याचें तेणें ॥ध्रु.॥ दुश्चितासी बोल ठेवायासी ठाव । ऐसा आम्ही भाव जाणतसों ॥२॥ तुका म्हणे माझें कायावाचामन । दुसरें तें ध्यान करित नाही ॥३॥
846
करावा कांटाळा नव्हे हें उचित । आधीं च कां प्रीत लावियेली ॥१॥ जाणतसां तुम्हीं रूपाचें लाघव । आपुलें तें जीव घेतें ऐसा ॥ध्रु.॥ काय म्हणऊनि आलेती आकारा । आम्हां उजगरा करावया ॥२॥ तुका म्हणे भीड होती आजिवरी । आतां देवा उरी कोण ठेवी ॥३॥
847
करावा कैवाड । नाहीं तरी आला नाड ॥१॥ स्मरा पंढरीचा देव । मनीं धरोनिया भाव ॥ध्रु.॥ खचविलें काळें । उगवा लवलाहें जाळें ॥२॥ गजर नामाचा । करा लवलाहे वाचा ॥३॥ घरटी चक्रफेरा । जन्ममृत्याचा भोंवरा ॥४॥ नानाहव्यासांची जोडी । तृष्णा करी देशधडी ॥५॥ चरणीं ठेवा चित्ती । म्हणवा देवाचे अंकित ॥६॥ छंद नानापरी । कळा न पविजे हरी ॥७॥ जगाचा जनिता । भक्तिमुक्तींचा ही दाता ॥८॥ झणी माझें माझें । भार वागविसी ओझें ॥९॥ यांची कां रे गेली बुद्धि । नाहीं तरायाची शुद्धि ॥१०॥ टणक धाकुलीं । अवघीं सरती विठ्ठलीं ॥११॥ ठसा त्रिभुवनीं । उदार हा शिरोमणि ॥१२॥ डगमगी तो वांयां जाय । धीर नाहीं गोता खाय ॥१३॥ ढळों नये जरी । लाभ घरिचिया घरीं ॥१४॥ नाहीं ऐसें राहे । कांहीं नासिवंत देहे ॥१५॥ तरणा भाग्यवंत । नटे हरिकीर्तनांत ॥१६॥ थडी टाकी पैलतीर । बाहे ठोके होय वीर ॥१७॥ दया तिचें नांव । अहंकार जाय जंव ॥१८॥ धनधान्य हेवा । नाडे कुटुंबाची सेवा ॥१९॥ नाम गोविंदाचें । घ्या रे हें चि भाग्य साचें ॥२०॥ परउपकारा । वेचा शक्ति निंदा वारा ॥२१॥ फळ भोग इच्छा । देव आहे जयां तैसा ॥२२॥ बरवा ऐसा छंद । वाचे गोविंद गोविंद ॥२३॥ भविष्याचे माथां । भजन न द्यावें सर्वथा ॥२४॥ माग लागला न संडीं । अळसें माती घालीं तोंडीं ॥२५॥ यश कीर्ति मान । तरी जोडे नारायण ॥२६॥ रवि लोपे तेजें । जरी हारपे हें दुजें ॥२७॥ लकार लाविला । असतां नसतां चि उगला ॥२८॥ वासने चि धाडी । बंद खोड्या नाड्या बेडी ॥२९॥ सरतें न कळे । काय झांकियेले डोळे ॥३०॥ खंती ते न धरा । होणें गाढव कुतरा ॥३१॥ सायासाच्या जोडी । पिके काढियेल्या पेडी ॥३२॥ हातीं हित आहे । परि न करिसी पाहें ॥३३॥ अळंकार लेणें । ल्या रे तुळसीमुद्राभूषणें ॥३४॥ ख्याति केली विष्णुदासीं । तुका म्हणे पाहा कैसी ॥३५॥
848
करावा वर्षाव । तृषाक्रांत जाला जीव ॥१॥ पाहें आकाशाची वास । जाणता तूं जगनिवास ॥ध्रु.॥ संयोगें विस्तार । वाढी लागे तो अंकूर ॥२॥ तुका म्हणे फळें । चरणांबुजें तीं सकळें ॥३॥
849
करावी ते पूजा मनें चि उत्तम । लौकिकाचें काम काय असे ॥१॥ कळावें तयासि कळे अंतरींचें । कारण तें साचें साचा अंगीं ॥ध्रु.॥ अतिशया अंतीं लाभ किंवा घात । फळ देतें चित्त बीजा ऐसें ॥२॥ तुका म्हणे जेणें राहे समाधान । ऐसें तें भजन पार पावी ॥३॥
850
करावें कीर्तन । मुखीं गावे हरिचे गुण ॥१॥ मग कांहीं नव्हे बाधा । काम दुर्जनाच्या क्रोधा ॥ध्रु.॥ शांतिखड्ग हातीं । काळासी ते नागविती ॥२॥ तुका म्हणे दाता सखा । ऐसा अनंतासारिखा ॥३॥
851
करावें गोमटें । बाळा माते तें उमटे ॥१॥ आपुलिया जीवाहूनी । असे वाल्हें तें जननी ॥ध्रु.॥ वियोग तें तिस । त्याच्या उपचारें तें विष ॥२॥ तुका म्हणे पायें । डोळा सुखावे ज्या न्यायें ॥३॥
852
करावें चिंतन । तें चि बरें न भेटून ॥१॥ बरवा अंगीं राहे भाव । तो गे तो चि जाणा देव ॥ध्रु.॥ दर्शणाची उरी । अवस्था चि अंग धरी ॥२॥ तुका म्हणे मन । तेथें सकळ कारण ॥३॥
853
करावें तें काम । उगाच वाढवावा श्रम ॥१॥ अवघें एकमय । राज्य बोलों चालों नये ॥ध्रु.॥ दुजयाची सत्ता । न चलेसी जाली आतां ॥२॥ आतां नाहीं तुका । पुन्हा हारपला लोकां ॥३॥
854
करितां कोणाचें ही काज । नाहीं लाज देवासी ॥१॥ बरे करावें हें काम । धरिलें नाम दीनबंधुस ॥ध्रु.॥ करुनि अराणूक पाहे । भलत्या साह्य व्हावया ॥२॥ बोले तैसी करणी करी । तुका म्हणे एक हरि ॥३॥
855
करितां तडातोडी । वत्सा माते सोईं ओढी ॥१॥ करित्याचा आग्रह उरे । एक एकासाटीं झुरे ॥ध्रु.॥ भुके इच्छी अन्न । तें ही त्यासाटीं निर्माण ॥२॥ तुका म्हणे जाती । एक एकाचिये चित्तीं ॥३॥
856
करितां देवार्चन । घरा आले संतजन ॥१॥ देव सारावे परते । संत पूजावे आरते ॥ध्रु.॥. शाळिग्राम विष्णुमूर्ती । संत हो का भलते याती ॥२॥ तुका म्हणे संधी । अधिक वैष्णवांची मांदी ॥३॥
857
करितां या सुखा । अंतपार नाहीं लेखा ॥१॥ माथां पडती संतपाय । सुख कैवल्य तें काय ॥ध्रु.॥ ऐसा लाभ नाहीं । दुजा विचारितां कांहीं ॥२॥ तुका म्हणे गोड । तेथें पुरे माझें कोड ॥३॥
858
करितां विचार अवघें एक राज्य । दुजा कोण मज पाठी घाली ॥१॥ कोण्या रीती जावें आम्ही वो पळोनि । मोकळ अंगणीं मागें पुढें ॥ध्रु.॥ काय तें गव्हाणें हिंडावीं वो किती । दूत ते लागती याच पाठी ॥२॥ कोठें याची करूं केलों कुळवाडी । आतां हा न सोडी जीवें आम्हां ॥३॥ होऊनि बेबाख येथें चि राहावें । देईंल तें खावें तुका म्हणे ॥४॥
859
करितां विचार तो हा दृढ संसार । ब्रम्हांदिकां पार नुलंघवे सामर्थ्ये ॥१॥ शरण शरण नारायणा मज अंगीकारीं दीना । आलें तें वचनांपासीं माझ्या सामर्थ्य ॥ध्रु.॥ पाठीवरी मोळी तो चि कळवा पायीं तळीं । सांपडला जाळीं मत्स्य जाला तो न्याय ॥२॥ आतां करीन तांतडी लाभाची ते याच जोडी । तुका म्हणे ओढी पायां सोईं मनाची ॥३॥
860
करितां विचार सांपडलें वर्म । समूळ निश्रम परिहाराचें ॥१॥ मज घेऊनियां आपणांसी द्यावें । साटी जीवें जीवें नारायणा ॥ध्रु.॥ उरी नाहीं मग पडदा कां आला । स्वमुखें चि भला करितां वाद ॥२॥ तुका म्हणे माझें खरें देणें घेणें । तुम्ही साक्षी जाणें अंतरींचें ॥३॥
861
करितां वेरझारा । उभा न राहासी वेव्हारा ॥१॥ हे तों झोंडाईंचे चाळे । काय पोटीं तें न कळे ॥ध्रु.॥ आरगुणी मुग । बैसलासी जैसा बग ॥२॥ तुका म्हणे किती । बुडविलीं आळवितीं ॥३॥
862
करितां होया व्हावें चित्ती चि नाहीं । घटापटा कांहीं करूं नये ॥१॥ मग हालत चि नाहीं जवळून । करावा तो सीण सीणवितो ॥ध्रु.॥ साहत चि नाहीं कांहीं पांकुळलें । उगल्या उगलें ढळत आहे ॥२॥ तुका म्हणे तरी बोलावें झांकून । येथें खुणे खूण पुरतें चि ॥३॥
863
करिती तया वेवसाव आहे । येथें व्हा रे साहे एकां एक ॥१॥ गातां आइकतां समान चि घडे । लाभें लाभ जोडे विशेषता ॥ध्रु.॥ प्रेमाचें भरतें भातें घ्यावें अंगीं । नटे टाळी रंगीं शूरत्वेंसी ॥२॥ तुका म्हणे बहुजन्मांचे खंडण । होइल हा सीण निवारोनि ॥३॥
864
करितों कवित्व म्हणाल हें कोणी । नव्हे माझी वाणी पदरींची ॥१॥ माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥ध्रु.॥ काय मी पामर जाणे अर्थभेद । वदवी गोविंद तें चि वदें ॥२॥ निमित्त मापासी बैसविलों आहें । मी तों कांहीं नव्हे स्वामिसत्ता ॥३॥ तुका म्हणे आहें पाईक चि खरा । वागवितों मुद्रा नामाची हे ॥४॥
865
करिसी कीं न करिसी माझा अंगीकार । हा मज विचार पडिला देवा ॥१॥ देसी कीं न देसी पायांचें दर्शन । म्हणऊनि मन स्थिर नाहीं ॥ध्रु.॥ बोलसी कीं न बोलसी मजसवें देवा । म्हणोनियां जीवा भय वाटे ॥२॥ होईंल कीं न होय तुज माझा आठव । पडिला संदेह हा चि मज ॥३॥ तुका म्हणे मी कमाईंचे हीण । म्हणऊनि सीण करीं देवा ॥४॥
866
करिसी तें देवा करीं माझें सुखें । परी मी त्यासी मुखें न म्हणें संत ॥१॥ जया राज्य द्रव्य करणें उपार्जना । वश दंभमाना इच्छे जाले ॥ध्रु.॥ जगदेव परी निवडीन निराळे । ज्ञानाचे आंधळे भारवाही ॥२॥ तुका म्हणे भय न धरीं मानसीं । ऐसियाचे विशीं करितां दंड ॥३॥
867
करिसी लाघवें । तूं हें खेळसी आघवें ॥१॥ अहंकार आड । आम्हां जगासी हा नाड ॥ध्रु.॥ येथें भुतें यावें । दावूं लपों ही जाणावें ॥२॥ तुका म्हणे हो श्रीपती । आतां चाळवाल किती ॥३॥
868
करिसी लाघवें । तूं हें खेळसी आघवें ॥१॥ केला अहंकार आड । आम्हां जगासी हा नाड ॥ध्रु.॥ यथंभुतें यावें । दावूं लपों ही जाणावें ॥२॥ तुका म्हणे हो श्रीपती । आतां चाळवाल किती ॥३॥
869
करी आणिकांचा अपमान । खळ छळवादी ब्राम्हण। तया देतां दान । नरका जाती उभयतां ॥१॥ तैसें जालें दोघांजणां । मागतिया यजमाना । जाळियेलें वनां । आपणासहित कांचणी ॥ध्रु.॥ घडितां दगडाची नाव । मोल क्लेश गेले वाव । तरता नाहीं ठाव । बुडवी तारूं तरतीया ॥२॥ चोरा दिधला सांटा । तेणें मारियेल्या वाटा । तुका म्हणे ताठा । हें तंव दोघे नाडती ॥३॥
870
करी संध्यास्नान । वारी खाउनियां अन्न ॥१॥ तया नाहीं लाभहानी । आदा वेंचाचिये मानीं ॥ध्रु.॥ मजुराचें धन । विळा दोर चि जतन ॥२॥ तुका म्हणे नाहीं । अधीरासी देव कांहीं ॥३॥
871
करीं ऐसी धांवाधांवी । चित्त लावीं चरणापें ॥१॥ मग तो माझा मायबाप । घेइल ताप हरूनी ॥ध्रु.॥ बहुतांच्या मतें गोवा । होऊं जीवा नेदावा ॥२॥ तुका म्हणे करुणाबोलें । धीर विठ्ठलें निघेना ॥३॥
872
करीं ऐसें जागें । वेळोवेळां पायां लागें ॥१॥ प्रेम झोंबो कंठीं । देह धरणिये लोटीं ॥ध्रु.॥ राहे लोकाचार पडे । अवघा विसर ॥२॥ तुका म्हणे ध्यावें । तुज विभीचारभावें ॥३॥
873
करीं धंदा परि आवडती पाय । प्रीती सांगों काय नेणां देवा ॥१॥ रूप डोळां देखें सदा सर्वकाळ । संपादितों आळ प्रपंचाचा ॥ध्रु.॥ नेमून ठेविली कारया कारणीं । आमुचिये वाणी गुण वदे ॥२॥ मनासीं उत्कंठा दर्शनाचा हेवा । नाहीं लोभ जीवा धन धान्य ॥३॥ उसंतितों पंथ वेठीचिया परी । जीवनसूत्र दोरीपाशीं ओढ ॥४॥ तुका म्हणे ऐसें करितों निर्वाण । जीव तुम्हां भिन्न नाहीं माझा ॥५॥
874
करीं हें चि काम । मना जपें राम राम ॥१॥ लागो हा चि छंद । मना गोविंद गोविंद ॥२॥ तुका म्हणे मना । मज भीक द्यावी दीना ॥३॥
875
करीन कोल्हाळ । आतां हा चि सर्वकाळ ॥१॥ आतां ये वो माझे आईं । देई भातुकें विठाईं ॥ध्रु.॥ उपायासी नाम । दिलें याचें पुढें क्षेम ॥२॥ बीज आणि फळ । हें चि तुका म्हणे मूळ ॥३॥
876
करील आबाळी । माझ्या दांताची कसाळी ॥१॥ जासी एखादा मरोन । पाठी लागेल हें जन ॥ध्रु.॥ घरीं लागे कळहे । नाहीं जात तो शीतळ ॥२॥ तुका म्हणे पोरवडे । मज येतील रोकडे ॥३॥
877
करुणा बहुत तुझिया अंतरा । मज विश्वंभरा कळों आलें ॥१॥ पक्षीयासी तुझें नाम जें ठेविलें । तयें उद्धरिलें गणिकेसी ॥ध्रु.॥ कुंटिणी ते दोष बहु आचरली । नाम घेतां आली करुणा तुज ॥२॥ हृदय कोमळ तुझें नारायणा । ऐसें बहुता जनां तारियेलें ॥३॥ तुका म्हणे सीमा नाहीं तुझे दये । कोमळ हृदय पांडुरंगा ॥४॥
878
करुनि उचित । प्रेम घालीं हृदयांत ॥१॥ आलों दान मागायास । थोरी करूनियां आस ॥ध्रु.॥ चिंतन समयीं । सेवा आपुली च देई ॥२॥ तुकयाबंधु म्हणे भावा । मज निरवावें देवा ॥३॥
879
करूं कवि काय आतां नाही लाज । मज भक्तराज हांसतील ॥१॥ आतां आला एका निवाड्याचा दिस । सत्याविण रस विरसला ॥ध्रु.॥ अनुभवाविण कोण करी पाप । रिते चि संकल्प लाजलावे ॥२॥ तुका म्हणे आतां न धरवे धीर । नव्हे जीव स्थिर माझा मज ॥३॥
880
करूं जातां सन्निधान । क्षणि जन पालटे ॥१॥ आतां गोमटे ते पाय । तुझे माय विठ्ठले ॥ध्रु.॥ हें तों आलें अनुभवा । पाहावें जीवावरूनि ॥२॥ तुका म्हणे केला त्याग । सर्वसंग म्हणऊनि ॥३॥
881
करूं तैसें पाठांतर । करुणाकर भाषण ॥१॥ जिहीं केला मूर्तिमंत । ऐसे संतप्रसाद ॥ध्रु.॥ सोज्ज्वळ केल्या वाटा । आइत्या नीटा मागीलां ॥२॥ तुका म्हणे घेऊं धांवा । करूं हांवा ते जोडी ॥३॥
882
करूं याची कथा नामाचा गजर । आम्हां संवसार काय करी ॥१॥ म्हणवूं हरिचे दास लेऊं तीं भूषणें । कांपे तयाभेणें कळिकाळ ॥ध्रु.॥ आशा भय लाज आड नये चिंता । ऐसी तया सत्ता समर्थाची ॥२॥ तुका म्हणे करूं ऐसियांचा संग । जेणें नव्हे भंग चिंतनाचा ॥३॥
883
करूं स्तुती तरि ते निंदा । तुम्ही जाणां हे गोविंदा ॥१॥ आम्हां लडिवाळांचे बोल । करा कवतुकें नवल ॥ध्रु.॥ बोबड्या उत्तरीं । तुम्हा रंजवितों हरी ॥२॥ मागतों भातुकें । तुका म्हणे कवतुकें ॥३॥
884
करूंनियां शुद्ध मन । नारायण स्मरावा ॥१॥ तरीच हा तरिजे सिंधु । भवबंधू तोडोनिया ॥ध्रु.॥ तेथे सरे शुद्ध साचें । अंतरींचे बीज तें ॥२॥ तुका म्हणे लवणकळी । पडतां जळीं तें होय ॥३॥
885
करूनि आरती । आतां ओवाळूं श्रीपती ॥१॥ आजि पुरले नवस । धन्य जाला हा दिवस ॥ध्रु.॥ पाहा वो सकळा । पुण्यवंता तुम्ही बाळा ॥२॥ तुका वाहे टाळी । होता सन्निध जवळी ॥३॥
886
करूनि कडविड । जमा घडिली लगड ॥१॥ आतां होतें तें चि जालें । नाम ठायींचें चांगलें ॥ध्रु.॥ उतरलें डाई । उत्तम ते सुलाख ताईं ॥२॥ हिंडवितां देश । तुका म्हणे नाहीं नाश ॥३॥
887
करूनि चाहाडी । अवघी बुडवीन जोडी ॥१॥ जरि तूं होऊनि उदास । माझी बुडविसी आस ॥ध्रु.॥ येथें न करी काम । मुखें नेघें तुझें नाम ॥२॥ तुका म्हणे कुळ । तुझें बुडवीन समूळ ॥३॥
888
करूनि जतन । कोणा कामा आलें धन ॥१ ॥ ऐसें जाणतां जाणतां । कां रे होतोसी नेणता ॥ध्रु.॥ प्रिया पुत्र बंधु । नाहीं तुज यांशीं संबंधु ॥२॥ तुका म्हणे एका । हरीविण नाहीं सखा ॥३॥
889
करूनि राहों जरी आत्मा चि प्रमाण । नश्चिळ नव्हे मन काय करूं ॥१॥ जेवलिया विण काशाचे ढेंकर । शब्दाचे प्रकार शब्द चि ते ॥ध्रु.॥ पुरे पुरे आतां तुमचें ब्रम्हज्ञान । आम्हासी चरण न सोडणें ॥२॥ विरोधें विरोध वाढे पुढतोपुढती । वासनेचे हातीं गर्भवास ॥३॥ सांडीमांडीअंगीं वसे पुण्यपाप । बंधन संकल्प या चि नांवें ॥४॥ तुका म्हणे नाहीं मुक्तता मोकळी । ऐसा कोण बळी निरसी देह ॥५॥
890
करूनि विनवणी । माथा ठेवितों चरणीं ॥१॥ होतें तें चि असों द्यावें । रूप सौम्य चि बरवें ॥ध्रु.॥ भया भेणें तुमचा ठाव । तुमच्या कोपें कोठें जावें ॥२॥ तुका पायां लागे । दान समुदाय मागे ॥३॥
891
करूनी आइत सत्यभामा मंदिरीं रे । वाट पाहे टळोनि गेली रात्री रे । न येचि देव येतील कामलहरी रे । पडिली दुश्चिती तंव तो कवाड टिमकारी रे ॥१॥ सर गा परता कळला तुझा भाव रे । कार्या पुरतें हें दाविसी लाघव रे । बोलतोसी तें अवघी तुझी माव रे । जाणोनि आलासी उजडता समयो रे ॥ध्रु.॥ मीच वेडी तुजला बोल नाहीं रे । दानावेळे विटंबणा जाली काय रे । मागुती रुद्रासि भेटी दिली तई रे । विश्वास तो तुझ्या बोला आझुनि तरी रे ॥२॥ भ्रम होता तो अवघा कळों आला रे । मानवत होतें मी भला भला रे । नष्टा क्रिया नाहीं मां तुझ्या बोला रे । तुकयाबंधु स्वामी कानडया कौसाल्या रे ॥३॥
892
करूनी चिंतन खेळों भोवतालें । चित्त येथें आलें पायांपाशीं ॥१॥ येथें नाहीं खोटा चालत परिहार । जाणसी अंतर पांडुरंगा ॥ध्रु.॥ सुखदुःखें तुज देऊनी सकळ । नाहीं ऐसा काळ केला आम्ही ॥२॥ तुका म्हणे जाला देहाचा विसर । नाहीं आतां पर आप दोन्ही ॥३॥
893
करूनी विनवणी पायीं ठेवीं माथा । परिसावी विनवणी माझी पंढरीनाथा ॥१॥ अखंडित असावेंसें वाटतें पायीं । साहोनि संकोच ठाव थोडासा देई ॥ध्रु.॥ असो नमो भाव आलों तुझिया ठाया । पाहें कृपादृष्टी मज पंढरीराया ॥२॥ तुका म्हणे आम्हीं तुझीं वेडीं वांकडीं । नामें भवपाश हातें आपुल्या तोडीं ॥३॥
894
करोत तपादि साधनें । कोणी साधो गोरांजनें ॥१॥ आम्ही न वजों तया वाटा । नाचूं पंढरीचोहटां ॥ध्रु.॥ पावोत आत्मिस्थति । कोणी म्हणोत उत्तम मुक्ति ॥२॥ तुका म्हणे छंद । आम्हां हरिच्या दासां निंद्य ॥३॥ ॥ स्वामीस सद्गुरूची कृपा जाली ॥ - अभंग ४
895
करोनि स्नानविधि आणि देवधर्म । क्रिया नित्यनेम तुजसाटीं ॥१॥ तुजलागीं दानें तुजलागीं तीर्थे । सकळ ही व्रतें तुजलागीं ॥ध्रु.॥ सकळ चित्तवृत्ति दिवस आणि राती । आवडशी प्रीती नारायणा ॥२॥ तुका म्हणे याहो पवित्राच्या राया । प्राणविसावया पांडुरंगा ॥३॥
896
कर्कशसंगति । दुःख उदंड फजिती ॥१॥ नाहीं इह ना परलोक । मजुर दिसे जैसें रंक ॥ध्रु.॥ वचन सेंटावरी । त्याचें ठेवूनि धिक्कारी ॥२॥ तुका म्हणे पायीं बेडी । पडिली कपाळीं कुर्हाडी ॥३॥
897
कर्म धर्म नव्हती सांग । उण्या अंगें पतन ॥१॥ भलत्या काळें नामावळी । सुलभ भोळी भाविकां ॥ध्रु.॥ प्रायिश्चत्तें पडती पायां । गाती तयां वैष्णवां ॥२॥ तुका म्हणे नुपजे दोष । करा घोष आनंदे ॥३॥
898
कलयुगामाजी थोर जालें बंड । नष्ट लोक लंड जाले फार ॥१॥ न धरिती सोय न पुसती कोणा । येतें जैसें मना तैसें चाले ॥ध्रु.॥ सज्जनाचा वारा टेकों नेदी द्वारा । ऐसिया पामरा तारी कोण ॥२॥ विश्वास तयाचा बैसेना कोठें ही । स्तुति निंदा पाहीं जीवीं धरी ॥३॥ तुका म्हणे कैसें केलें नारायणें । जाणावें हें कोणें तयाविण ॥४॥
899
कलिधर्म मागें सांगितले संतीं । आचार सांडिती द्विजलोक ॥१॥ ते चि कळों आतां येतसे प्रचिती । अधर्मा टेंकती धर्म नव्हे ॥ध्रु.॥ तप व्रत करितां लागती सायास । पाळितां पिंडास गोड वाटे ॥२॥ देव म्हणऊनी न येती देऊळा । संसारा वेगळा तरी कां नव्हे ॥३॥ तुका म्हणे मज धरितां गुमान । ऐसे कोणी जन नरका जाती ॥४॥
900
कलियुगीं कवित्व करिती पाषांड । कुशळ हे भांड बहु जाले ॥१॥ द्रव्य दारा चित्तीं प्रजांची आवडी । मुखें बडबडी कोरडा चि ॥ध्रु.॥ डंव करी सोंग मानावया जग । मुखें बोले त्याग मनीं नाहीं ॥२॥ वेदाज्ञे करोनि न करिती स्वहित । नव्हती अलिप्त देहाहुनी ॥३॥ तुका म्हणे दंड साहील यमाचे । न करी जो वाचे बोले तैसें ॥४॥
901
कल्पतरु रुया नव्हती बाभुळा । पुरविती फळा इच्छितिया ॥१॥ उदंड त्या गाई म्हैसी आणि शेळ्या । परि त्या निराळ्या कामधेनु ॥२॥ तुका म्हणे देव दाखवील दृष्टी । तया सवें भेटी थोर पुण्य ॥३॥
902
कल्पतरूअंगीं इच्छिलें तें फळ । अभागी दुर्बळ भावें सिद्धी ॥१॥ धन्य त्या जाती धन्य त्या जाती । नारायण चित्ती सांठविला ॥ध्रु.॥ बीजाऐसा द्यावा उदकें अंकुर । गुणाचे प्रकार ज्याचे तया ॥२॥ तुका म्हणे कळे पारखिया हिरा । ओझें पाठी खरा चंदनाचें ॥३॥
903
कल्पतरूखालीं । फळें येती मागीतलीं ॥१॥ तेथें बैसल्याचा भाव । विचारूनि बोलें ठाव ॥ध्रु.॥ द्यावें तें उत्तर । येतो प्रतित्याचा फेर ॥२॥ तुका म्हणे मनीं । आपुल्या च लाभहानि ॥३॥
904
कल्याण या आशीर्वादें । जाती द्वंद्वें नासोनि ॥१॥ आश्वासिलें नारायणें । प्रेमदानें अंतरिंच्या ॥ध्रु.॥ गेली निवारोनि आतां । सकळ चिंता यावरि ॥२॥ तुका म्हणे गातां गीत । आलें हित सामोरें ॥३॥
905
कळल हे खुण । तरि दावी नारायण ॥१॥ सत्य संतांपाशीं राहे । येरां भय आड आहे ॥ध्रु.॥ अनुचिया ऐसें । असे भरलें प्रकाशें ॥२॥ इंद्रियांचें धनी । ते हे जाती समजूनि ॥३॥ तर्क कुतर्क वाटा । नागवण घटापटा ॥४॥ तुका म्हणे ल्यावें । डोळां अंजन बरवें ॥५॥
906
कळलें माझा तुज नव्हे रे आठव । काय काज जीव ठेवूं आतां ॥१॥ तूं काय करिसी माझिया संचिता । धिग हे अनंता जालें जिणें ॥ध्रु.॥ पतितपावन राहिलों या आशा । आइकोनि ठसा कीर्ती तुझी ॥२॥ आतां कोण करी माझा अंगीकार । कळलें निष्ठ जालासी तूं ॥३॥ तुका म्हणे माझी मांडिली निरास । करितों जीवा नास तुजसाटीं ॥४॥
907
कळस वाहियेला शिरीं । सहस्रनामें पूजा करीं ॥१॥ पीक पिकलें पिकलें । घन दाटोनियां आलें ॥ध्रु.॥ शेवटीचें दान । भागा आला नारायण ॥२॥ तुका म्हणे पोट । भरलें वारले बोभाट ॥३॥
908
कळे न कळे त्या धर्म । ऐका सांगतों रे वर्म । माझ्या विठोबाचें नाम । अटाहासें उच्चारा ॥१॥ तो या दाखवील वाटा । तया पाहिजे त्या नीटा । कृपावंत मोटा । पाहिजे तो कळवळा ॥ध्रु.॥ पुसतां चुका होतो वाटा । सवें बोळावा गोमटा । मोडों नेदी कांटा । घेऊं सांटा चोरासी ॥२॥ तुका म्हणे मोल । न लगें द्यावें वेचावे बोल । विठ्ठल विठ्ठल । ऐसा छंद मनासी ॥३॥
909
कळे परि न सुटे गांठी । जालें पोटीं कुपथ्य ॥१॥ अहंकाराचें आंदणें जीव । राहे कींव केली ते ॥ध्रु.॥ हेंकडाची एकी च वोढी । ते ही खोडी सांगती ॥२॥ तुका म्हणे सांगों किती । कांहीं चित्तीं न राहे ॥३॥
910
कळेल हें तैसें गाईंन मी तुज । जनासवें काज काय माझें ॥१॥ करीन मी स्तुती आपुले आवडी । जैसी माझ्या गोडी वाटे जीवा ॥ध्रु.॥ होऊनी निर्भर नाचेन मी छंदें । आपुल्या आनंदें करूनियां ॥२॥ काय करूं कळा युक्ती या कुसरी । जाणिवेच्या परी सकळिका ॥३॥ तुका म्हणे माझें जयासवें काज । भोळा तो सहज पांडुरंग ॥४॥
911
कळों आला भाव माझा मज देवा । वांयांविण जीवा आठविलें ॥१॥ जोडूनि अक्षरें केलीं तोंडपिटी । न लगे सेवटीं हातीं कांहीं ॥२॥ तुका म्हणे माझे गेले दोन्ही ठाय । सवसार ना पाय तुझे मज ॥३॥
912
कळों आलें ऐसें आतां । नाहीं सत्ता तुम्हांसी ॥१॥ तरी वीर्य नाहीं नामा । जातो प्रेमा खंडत ॥ध्रु. ॥ आड ऐसें येतें पाप । वाढे ताप आगळा ॥२॥ तुका म्हणे गुण जाला । हा विठ्ठला हीनशिक्त ॥३॥
913
कळों आलें तुझें जिणें । देवा तूं माझें पोसनें ॥१॥ वाट पाहासी आठवाची । सत्ता सतंत कईची ॥ध्रु.॥ बोलावितां यावें रूपा । सदा निर्गुणीं चि लपा ॥२॥ तुका म्हणे तूं परदेशी । येथें आम्हां अंगेजिसी ॥३॥
914
कळों नये तों चि चुकावितां बरें । मग पाठमोरें काय काज ॥ १॥ धरिलेती आतां द्या जी माझा डाव । सांपडतां भाव ऐसा आहे ॥ ध्रु.॥ होतासी अंतरें झाकिलिया डोळीं । तो मी हा न्याहाळीं धरुनी दृष्टी ॥ २॥ तुका म्हणे तुज रडीची च खोडी । अहाच बराडी तो मी नव्हे ॥.३॥
915
कळों येतें तरि कां नव्हे । पडती गोवें भ्रमाचे ॥१॥ जाणतां चि होतो घात । परिसा मत देवा हें ॥ध्रु.॥ आंविसासाटीं फासा मान । पाडी धनइच्छा ते ॥२॥ तुका म्हणे होणार खोटें । कर्म मोटें बिळवंत ॥३॥
916
कळों येतें वर्म । तरी न पवतों श्रम ॥१॥ तुम्हां शिरीं होता भार । आम्हां कैचा संचार ॥ध्रु.॥ होतें अभयदान । तरी स्थिर होतें मन ॥२॥ तुका म्हणे पाहें । ऐसी वाट उभा आहे ॥३॥
917
कवण जन्मता कवण जन्मविता । न कळे कृपावंता माव तुझी ॥१॥ कवण हा दाता कवण हा मागता । न कळे कृपावंता माव तुझी ॥ध्रु.॥ कवण भोगिता कवण भोगविता । न कळे कृपावंता माव तुझी ॥२॥ कवण ते रूप कवण अरूपता । न कळे कृपावंता माव तुझी ॥३॥ सर्वां ठायीं तूं चि सर्व ही जालासी । तुका म्हणे यासी दुजें नव्हे ॥४॥
918
कवणदिस येइल कैसा । न कळे संपत्तीचा भरंवसा ॥१॥ चौदा चौकडिया लंकापति । त्याची कोण जाली गती ॥ध्रु.॥ लंकेसारिखें भुवन । त्याचें त्यासी पारखें जाण ॥२॥ तेहतीस कोटि बांदवडी । राज्य जातां न लगे घडी ॥३॥ ऐसे अहंतेनें नाडिले । तुका म्हणे वांयां गेले ॥४॥
919
कवणा पाषाणासी धरूनि भाव । कवणावरी पाव ठेवूं आतां । म्हणऊनि निश्चित राहिलों मनीं । तूं चि सर्वां खाणी देखोनियां ॥१॥ कवणाचें कारण न लगे कांहीं । सर्वांठायीं तूं एक। कायावाचामन ठेविलें तुझ्या पायीं । आता उरलें काईं न दिसे देवा ॥ध्रु.॥ जळें जळ काय धोविलें एक । कवण तें पातक हरलें तेथें । पापपुण्य हे वासना सकळ । ते तुज समूळ समर्पिली ॥२॥ पितरस्वरूपी तूं चि जनार्दन । सव्य तें कवण अपसव्य । तुका म्हणे जीत पिंड तुम्हां हातीं । देऊनि निश्चिंती मानियेली ॥३॥
920
कवणांशीं भांडों कोण माझें साहे । कोण मज आहे तुजविण ॥१॥ धरिलें उदास दुरदुरांतरें । सांडी एकसरें केली माझी ॥ध्रु.॥ आइकोन माझे नाइकसी बोल । देखोनियां खोळ बुंथी घेसी ॥२॥ तुका म्हणे एके गांवींची वसती । म्हणऊनि खंती वाटे देवा ॥३॥
921
कवतुकवाणी बोलतसें लाडें । आरुष वांकडें करुनि मुख ॥१॥ दुजेपणीं भाव नाहीं हे आशंका । जननीबाळकामध्यें भेद ॥ध्रु.॥ सलगी दुरूनि जवळी पाचारूं । धांवोनियां करूं अंगसंग ॥२॥ धरूनि पालव मागतों भातुकें । आवडीचें निकें प्रेमसुख ॥३॥ तुका म्हणे तुज आमची च गोडी । ऐसी हे आवडी कळों आली ॥४॥
922
कवतुकवाणें । बोलों बोबड्या वचनें ॥१॥ हें तों नसावें अंतरीं । आम्हां धरायाचें दुरी ॥ध्रु.॥ स्तुति तैसी निंदा । माना सम चि गोविंदा ॥२॥ तुका म्हणे बोलें । मज तुम्ही शिकविलें ॥३॥
923
कवळाचिया सुखें । परब्रम्ह जालें गोरखें । हात गोऊनि खाय मुखें । बोटासांदी लोणचें ॥१॥ कोण जाणे तेथें । कोण लाभ कां तें । ब्रम्हादिकां दुर्लभ ॥ध्रु.॥ घाली हमामा हुंबरी । पांवा वाजवी छंदें मोहरी । गोपाळांचे फेरी । हरि छंदें नाचतसे ॥२॥ काय नव्हतें त्या घरीं खावया । रिघे लोणी चोरावया । तुका म्हणे सवें तया । आम्ही ही सोंकलों ॥३॥
924
कवेश्वरांचा तो आम्हांसी विटाळ । प्रसाद वोंगळ चिवडिती ॥१॥ दंभाचे आवडी बहिराट अंधळे । सेवटासि काळें होइल तोंड ॥ध्रु.॥ सोन्यासेजारी तों लाखेची जतन । सतंत ते गुण जैसेतैसे ॥२॥ सेव्य सेववता न पडतां ठावी । तुका म्हणे गोवी पावती हीं ॥३॥
925
कस्तुरी भिनली जये मृत्तिके । तयेसी आणिके कैसी सरी ॥१॥ लोखंडाचे अंगीं लागला परिस । तया आणिकास कैसी सरी ॥२॥ तुका म्हणे मी न वजें यातीवरी । पूज्यमान करीं वैष्णवांसी ॥ ।३॥
926
कस्तुरीचें अंगीं मीनली मृत्तिका । मग वेगळी कां येईंल लेखूं ॥१॥ तयापरि भेद नाहीं देवभक्तीं । संदेहाच्या युक्ति सरों द्याव्या ॥ध्रु.॥ इंधनें ते आगी संयोगाच्या गुणें । सागरा दरुषणें वाहाळ तों चि ॥२॥ तुका म्हणे माझें साक्षीचें वचन । येथें तों कारण शुद्ध भाव ॥३॥
927
कस्तूरीचें रूप अति हीनवर । माजी असे सार मोल तया ॥१॥ आणीक ही तैसीं चंदनाचीं झाडें । परिमळें वाढे मोल तयां ॥ध्रु.॥ काय रूपें असे परीस चांगला । धातु केली मोला वाढ तेणें ॥२॥ फिरंगी आटितां नये बारा रुके । गुणें मोलें विकें सहस्रवरी ॥३॥ तुका म्हणे नाहीं जातीसवें काम । ज्याचे मुखीं नाम तो चि धन्य ॥४॥
928
कहे तुका जग भुला रे । कह्या न मानत कोय । हात परे जब कालके । मारत फोरत डोय ॥१॥
929
कहे तुका भला भया । हुं हुवा संतनका दास । क्या जानूं केते मरता । जो न मिटती मनकी आस ॥१॥
930
कहे तुका में सवदा बेचूं । लेवेके तन हार । मिठा साधुसंतजन रे । मुरुखके सिर मार ॥१॥
931
कां गा किविलवाणा केलों दीनाचा दीन । काय तुझी हीन शक्ति जालीसी दिसे ॥१॥ लाज येते मना तुझा म्हणवितां दास । गोडी नाहीं रस बोलिली यासारिखी ॥ध्रु.॥ लाजविलीं मागें संतांची हीं उत्तरें । कळों येतें खरें दुजें एकावरूनि ॥२॥ तुका म्हणे माझी कोणें वदविली वाणी । प्रसादावांचूनि तुमचिया विठ्ठला ॥३॥
932
कां गा कोणी न म्हणे पंढरीची आई । बोलावितें पाहीं चाल नेटें ॥१॥ तेव्हां माझ्या मना होइल समाधान । जाइल सर्व शीण जन्मांतरिंचा ॥२॥ तुका म्हणे माझी होशील माउली । वोरसोनि घाली प्रेमपान्हा ॥३॥
933
कां गा धर्म केला । असोन सत्तेचा आपुला ॥१॥ उभाउभीं पाय जोडीं । आतां फांकों नेदीं घडी ॥ध्रु.॥ नको सोडूं ठाव । आतां घेऊं नेदीं वाव ॥२॥ तुका म्हणे इच्छा । तैसा करीन सरिसा ॥३॥
934
कां जी आम्हां होतें दोषाचें दर्शन । तुज समर्पून देहभाव ॥१॥ पांडुरंगा कृपाळुवा दयावंता । धरसील सत्ता सकळ ही ॥ध्रु.॥ कां जी आम्हांवरि आणिकांची सत्ता । तुम्हांसी असता जवळिकें ॥२॥ तुका म्हणे पायीं केलें निवेदन । उचित तें दान करीं सत्ता ॥३॥
935
कां जी तुम्हीं ऐसे नव्हा कृपावंत । निवे माझें चित्त ठायिंच्या ठायीं ॥१॥ कांही शम नये विषम अंतरा । शांतीचा तो बरा ऐसा योग ॥ध्रु.॥ दुःखी होतों पंचभूतांच्या विकारें । जडत्वें दातारें राखावीं तीं ॥२॥ तुका म्हणे मोडा अहंकाराची मान । धरितों चरण म्हणऊनि ॥३॥
936
कां जी धरिलें नाम । तुम्ही असोनि निष्काम ॥१॥ कोणां सांगतसां ज्ञान । ठकाठकीचें लक्षण ॥ध्रु.॥ आवडीनें नाचें । आहे तरी पुढें साचें ॥२॥ तुका म्हणे प्रेम । नाहीं भंगायाचें काम ॥३॥
937
कां जी माझे जीवीं । आळस ठेविला गोसावीं ॥१॥ येवढा घात आणीक काय । चिंतनासी अंतराय ॥ध्रु.॥ देहआत्म वंदी । केला घात कुबुद्धी ॥२॥ तुका म्हणे मन । कळवळी वाटे सीण ॥३॥
938
कां जी वाढविलें । न लगतां हें उगलें ॥१॥ आतां मानितां कांटाळा । भोवतीं मिळालिया बाळा ॥ध्रु.॥ लावूनियां सवे । पळतां दिसाल बरवे ॥२॥ तुका म्हणे बापा । येतां न कळा चि रूपा ॥३॥
939
कां न वजावें बैसोनि कथे । ऐसें ऐका हो श्रोते । पांडुरंग तेथें । उभा असे तिष्ठत ॥१॥ म्हणऊनि करी धीर । लक्ष लावूनि सादर । भवसिंधुपार । असेल ज्या तरणें ॥ध्रु.॥ कथे कांहीं अणुमात्र। नो बोलावें हा वृत्तांत । देवभक्तां चत्ति । समरसीं खंडणा ॥२॥ कां वैष्णवा पूजावें । ऐका घेईंल जो भावें । चरणरजा शिवें । वोडविला मस्तक ॥३॥ ऐसें जाणा हे निभ्रांत । देव वैष्णवांचा अंकित । अलिप्त अतीत । परमित त्यासाठीं ॥४॥ घालोनि लोळणा। तुका आला लोटांगणीं । वंदी पायवणीं । संतचरणींचें माथां ॥५॥
940
कां माझा विसर पडिला मायबाप । सांडियेली कृपा कोण्या गुणें ॥१॥ कैसा कंठूनियां राहों संवसार । काय एक धीर देऊं मना ॥ध्रु.॥ नाहीं निरोपाची पावली वारता । करावी ते चिंता ऐसी कांहीं ॥२॥ तुका म्हणे एक वेचूनि वचन । नाहीं समाधान केलें माझें ॥३॥
941
कां माझे पंढरी न देखती डोळे । काय हें न कळे पाप यांचें ॥१॥ पाय पंथें कां हे न चलती वाट । कोण हें अदृष्ट कर्म बळी ॥ध्रु.॥ कां हें पायांवरी न पडे मस्तक । क्षेम कां हस्तक न पवती ॥२॥ कां या इंद्रियांची न पुरे वासना । पवित्र होईंना जिव्हा कीर्ती ॥३॥ तुका म्हणे कई जाऊनि मोटळें । पडेन हा लोळें महाद्वारीं ॥४॥
942
कां रे गमाविल्या गाई । आली वळती तुझी जाई । मागें जालें काई । एका तें का नेणसी ॥१॥ केलास फजित । मागें पुढें ही बहुत । लाज नाहीं नित्य । नित्य दंड पावतां ॥ध्रु.॥ वोला खोडा खळि गाढी । ऐसा कोण तये काढी । धांवेल का पाडी । तुझी आधीं वोढाळा ॥२॥ चाल धांवें । मी ही येतों तुजसवें । तुका म्हणे जंव । तेथें नाहीं पावली ॥३॥
943
कां रे तुम्ही निर्मळ हरिगुण गा ना । नाचत आनंदरूप वैकुंठासी जा ना ॥१॥ काय गणिकेच्या याती अधिकार मोटा । दोषी अजामेळ ऐसीं नेलीं वैकुंठा ॥ध्रु.॥ ऐसे नेणों मागें किती अनंत अपार । पंच महादोषी पातकां नाहीं पार ॥२॥ पुत्राचिया लोभें नष्ट म्हणे नारायण । कोण कर्तव्य तुका म्हणे त्याचें पुण्य ॥३॥
944
कां रे तुम्हीं ठेवा बहुतां निमित्ती । माझिया संचितें वोडवलें ॥१॥ भक्तिप्रेमगोडी बैसली जिव्हारीं । आनंद अंतरीं अंतरीं येणें झाला ॥ध्रु.॥ पुसिलें पडळ त्रिमिर विठ्ठलें । जग चि भरलें ब्रम्हानंदें ॥२॥ तुका म्हणे केलों कामनेवेगळा । आवडी गोपाळावरी वसे ॥३॥
945
कां रे दाटोन होतां वेडे । देव आहे तुम्हांपुढें ॥१॥ ज्यास पाठ नाहीं पोट । करी त्रैलोक्याचा घोंट ॥ध्रु.॥ तुमची तुम्हां नाहीं सोय । कोणाचें काय जाय ॥२॥ तुका गातो नामीं । तेथें नाहीं आम्ही तुम्ही ॥३॥
946
कां रे दास होसी संसाराचा खर । दुःखाचे डोंगर भोगावया ॥१॥ मिष्टान्नाची गोडी जिव्हेच्या अगरीं । मसक भरल्यावरी स्वाद नेणे ॥ध्रु.॥ आणीक ही भोग आणिकां इंद्रियांचे । नाहीं ऐसे साचे जवळी कांहीं ॥२॥ रूप दृष्टि धाय पाहातां पाहातां । न घडे सर्वथा आणि तृष्णा ॥३॥ तुका म्हणे कां रे नाशिवंतासाटीं । देवासवें तुटी करितोसी ॥४॥
947
कां रे न पवसी धांवण्या । अंगराख्या नारायणा ॥१॥ अंगीं असोनियां बळ । होसी खट्याळ नाठाळ ॥ध्रु.॥ आम्हां नरकासी जातां । काय येइल तुझ्या हातां ॥२॥ तुका म्हणे कान्हा। क्रियानष्टा नारायणा ॥३॥
948
कां रे न भजसी हरी । तुज कोण अंगीकारी ॥१॥ होइल यमपुरी । यमदंड यातना ॥ध्रु.॥ कोण जाली लगबग । काय करिसि तेथें मग ॥२॥ कां रे भरला ताठा । करिती वोज नेतां वाटा ॥३॥ तोंडा पडिली खळिणी । जिव्हा पिटिती वोढूनि ॥४॥ कां रे पडिली जनलाज । कोण सोडवील तुज ॥५॥ लाज धरीं म्हणे तुका । नको वांयां जाऊं फुका ॥६॥
949
कां रे नाठविसी कृपाळु देवासी । पोसितो जनासी एकला तो ॥१॥ बाळा दुधा कोण करितें उत्पत्ती । वाढवी श्रीपति सवें दोन्ही ॥ध्रु.॥ फुटती तरुवर उष्णकाळमासीं । जीवन तयांसी कोण घाली ॥२॥ तेणें तुझी काय नाहीं केली चिंता । राहे त्या अनंता आठवूनि ॥३॥ तुका म्हणे ज्याचें नाम विश्वंभर । त्याचें निरंतर ध्यान करीं ॥४॥
950
कां रे पुंड्या मातलासी । उभें केलें विठ्ठलासि ॥१॥ विस्त क्षीरसागरवासीं । आला उभा पंढरीसि ॥ध्रु.॥ भक्ती देखोनि निकट । देवें सोडिलें वैकुंठ ॥२॥ तुका म्हणे बळी । तूं चि एक भूमंडळीं ॥३॥
951
कां रे पुंड्या मातलासी । उभें केलें विठ्ठलासी ॥१॥ ऐसा कैसा रे तूं धीट । मागें भिरकाविली वीट ॥ध्रु.॥ युगें जालीं अठ्ठावीस । अजुनी न म्हणसी बैस ॥२॥ भाव देखोनि निकट । देवें सोडिलें वैकुंठ ॥३॥ तुका म्हणे पुंडलिका । तूं चि बळिया एक निका ॥४॥
952
कां रे माझा तुज न ये कळवळा । असोनि जवळा हृदयस्था ॥१ ॥ अगा नारायणा निष्ठा निर्गुणा । केला शोक नेणां कंठस्फोट ॥ध्रु.॥ कां हें चित्त नाहीं पावलें विश्रांती । इंद्रियांची गति कुंटे चि ना ॥२॥ तुका म्हणे कां रे धरियेला कोप । पाप सरलें नेणों पांडुरंगा ॥३॥
953
कां रे माझीं पोरें म्हणसील ढोरें । मायबाप खरें काय एक ॥१॥ कां रे गेलें म्हणोनि करिसी तळमळ । मिथ्याचि कोल्हाळ मेलियाचा ॥ध्रु.॥ कां रे माझें माझें म्हणसील गोत । नो संडविती दूत यमा हातीं ॥२॥ कां रे मी बळिया म्हणविसी ऐसा । सरणापाशीं कैसा उचलविसी ॥३॥ तुका म्हणे न धरीं भरवसा कांहीं । वेगीं शरण जाई पांडुरंगा ॥४ ॥
954
कां हो आलें नेणों भागा । पांडुरंगा माझिया ॥१॥ उफराटी तुम्हां चाली । क्रिया गेली सत्याची ॥ध्रु.॥ साक्षी हेंगे माझें मन । आर्त कोण होतें तें ॥२॥ तुका म्हणे समर्थपणे । काय नेणें करीतसां ॥३॥
955
कां हो एथें काळ आला आम्हां आड । तुम्हांपाशीं नाड करावया ॥१॥ कां हो विचाराचें पडिलें सांकडें । काय ऐसें कोडें उपजलें ॥ध्रु.॥ कां हो उपजेना द्यावी ऐशी भेटी । काय द्वैत पोटीं धरिलें देवा ॥२॥ पाप फार किंवा जालासी दुर्बळ । मागिल तें बळ नाहीं आतां ॥३॥ काय जालें देणें निघालें दिवाळें । कीं बांधलासि बळें ॠणेंपायीं ॥४॥ तुका म्हणे कां रे ऐसी केली गोवी । तुझी माझी ठेवी निवडुनियां ॥५॥
956
कां हो तुम्ही माझी वदविली वाणी । नेदा हे निवडूनि पांडुरंगा ॥१॥ आणीक म्यां कोणां पुसावा विचार । मुळीं संवसार दुराविला ॥ध्रु.॥ स्वामिसेवा म्हुण घेतली पदरीं । सांगितलें करीं कारण तें ॥२॥ तुका म्हणें नाहीं शिकविलें जेणें । तो याच्या वचनें उगा राहे ॥३॥
957
कां हो देवा कांहीं न बोला चि गोष्टी । कां मज हिंपुटी करीतसा ॥१॥ कंठीं प्राण पाहें वचनाची आस । तों दिसे उदास धरिलें ऐसें ॥ध्रु.॥ येणें काळें बुंथी घेतलीसे खोल । कां नये विटाळ होऊं माझा ॥२॥ लाज वाटे मज म्हणवितां देवाचा । न पुससी फुकाचा तुका म्हणे ॥३॥
958
कां हो पांडुरंगा न करा धांवणें । तरि मज कोणें सोडवावें ॥१॥ तुझा म्हणऊनि आणिकापें उभा । राहों हें तों शोभा नेदी आतां ॥ध्रु.॥ काळें पुरविली पाठी दुरवरी । पुढें पायां धीरी राहों नेदी ॥२॥ नको आणूं माझें संचित मनासी । पावन आहेसी पतितां तूं ॥३॥ तुका म्हणे चाले आणिकांची सत्ता । तुज आळवितां नवल हें ॥४॥
959
कां हो माझा मानियेला भार । ऐसा दिसे फार । अनंत पावविलीं उद्धार । नव्हे चि थार मज शेवटीं ॥१॥ पाप बळिवंत गाढें । तुज ही राहों सकतें पुढें । मागील कांहीं राहिलें ओढें । नवल कोडें देखियेलें ॥२॥ काय मानिती संतजन । तुमचें हीनत्ववचन । कीं वृद्ध जाला नारायण । न चले पण आधील तो ॥३॥ आतां न करावी चोरी । बहुत न धरावें दुरी । पडदा काय घरच्याघरीं । धरिलें दुरी तेव्हां धरिलें ॥४॥ नको चाळवूं अनंता । कासया होतोसि नेणता । काय तूं नाहीं धरीत सत्ता । तुका म्हणे आतां होई प्रगट ॥५॥
960
कां हो वाडवितां देवा । मज घरी समजावा । केवडा हो गोवा । फार केलें थोडएाचें ॥१॥ ठेविन पायांवरी डोईं । यासी तुमचें वेचे काईं । जालों उतराईं । जाणा एकएकांचे ॥ध्रु.॥ निवाड आपणियांपाशीं । असोन कां व्हावें अपेसी । होती गांठी तैसी । सोडूनियां ठेविली ॥२॥ तुका म्हणे गोड । होतें जालिया निवाड । दर्शनें ही चाड । आवडी च वाढेल ॥३॥
961
कां होती कां होती । देवा एवढी फजीती ॥१॥ मुळीं वर्म नसतों चुकलों । तो मी ऐसें चित्तीं ॥ध्रु.॥ होणार होऊनि गेलें । मिथ्या आतां खंती रे ॥२॥ तुका म्हणे पुरे आतां । दुर्जनाची संगती रे ॥३॥
962
कांद्यासाठी जालें ज्ञान । तेणें जन नाडिलें ॥१॥ ऐकाकाम क्रोध बुचबुची । भुंके पुची व्यालीची ॥ध्रु.॥ पूजेलागीं द्रव्य मागे । काय सांगे शिष्यातें ॥२॥ तुका म्हणे कैंचें ब्रम्ह । अवघा भ्रम विषयांचा ॥३॥
963
कांहीं एक तरी असावा आधार । कासयानें धीर उपजावा ॥१॥ म्हणविल्यासाटीं कैसें पडे रुजु । धणी नाहीं उजू सन्मुख तो ॥ध्रु.॥ वेचल्या दिसांचा कोणावरी लेखा । घालावा हा सुखासुखा आम्हीं ॥२॥ नाहीं मनोगत तोंवरि हे देवा । तुका म्हणे सेवा नेघीजे तों ॥३॥
964
कांहीं च न लगे आदि अवसान । बहुत कठीण दिसतसां ॥१॥ अवघ्याच माझ्या वेचविल्या शक्ती । न चलेसी युक्ति जाली पुढें ॥ध्रु.॥ बोलिलें वचन हारपलें नभीं । उतरलों तों उभीं आहों तैसीं ॥२॥ तुका म्हणे कांहीं न करावेंसें जालें । थकित चि ठेलें वित्त उगें ॥३॥
965
कांहीं च मी नव्हें कोणिये गांवींचा । एकट ठायींचा ठायीं एक ॥१॥ नाहीं जात कोठें येत फिरोनियां । अवघें चि वांयांविण बोलें ॥ध्रु.॥ नाहीं मज कोणी आपुलें दुसरें । कोणाचा मी खरें कांहीं नव्हे ॥२॥ नाहीं आम्हां ज्यावें मरावें लागत । आहों अखंडित जैसे तैसे ॥३॥ तुका म्हणे नांवरूप नाहीं आम्हां । वेगळा ह्या कर्मा अकर्मासी ॥४॥ लोहगावांस परचक्रवेढा पडला - अभंग ३
966
कांहीं चिंता कोणा नाहीं कोणेविशीं । करी द्वारकेसि राज्य देव ॥१॥ द्वारकेसि राज्य करी नारायण । दुष्ट संहारून धर्म पाळी ॥२॥ पाळी वेदआज्ञा ब्राम्हणांचा मान । अतीतपूजन वैष्णवांचें ॥३॥ अतीत अलिप्त अवघियां वेगळा । नाहीं हा गोपाळा अभिमान ॥४॥ अभिमान नाहीं तुका म्हणे त्यासि । नेदी आणिकांसि धरूं देव ॥५॥
967
कांहीं चिंतेविण । नाहीं उपजत सीण ॥१॥ तरी हा पडिला विसर । माझा तुम्हां जाला भार ॥ध्रु.॥ आली कांहीं तुटी । गेली सुटोनियां गांठी ॥२॥ तुका म्हणे घरीं । बहु बैसले रिणकरी ॥३॥
968
कांहीं जडभारी । पडतां ते अवश्वरी ॥१॥ तुज आठवावे पाय । आम्हीं मोकलूनि धाय ॥ध्रु.॥ तान पीडी भूक । शीत उष्ण वाटे दुःख ॥२॥ तुका म्हणे लाड । तेथें पुरे माझें कोड ॥३॥
969
कांहीं जाणों नये पांडुरंगाविण । पाविजेल सीण संदेहानें ॥१॥ भलतिया नावें आळविला पिता । तरि तो जाणता कळवळा ॥ध्रु.॥ अळंकार जातो गौरवितां वाणी । सर्वगात्रा धणी हरिकथा ॥२॥ तुका म्हणे उपज विल्हाळे आवडी । करावा तो घडी घडी लाहो ॥३॥
970
कांहीं दुसरा विचार । न लगे करावा चि फार ॥१॥ सेट्या ना चौधरी । पांडेपण वाहे शिरीं ॥ध्रु.॥ पाप न लगे धुंडावें । पाहिजे तरि तेथें जावें ॥२॥ जकातीचा धंदा । तेथें पाप वसे सदा ॥३॥ गाई म्हसी हेड । तुप विकी महा द्वाड ॥४॥ तुका म्हणे पाहीं । तेथें पुण्या रीघ नाहीं ॥५॥
971
कांहीं न मागती देवा । त्यांची करूं धांवे सेवा ॥१॥ हळूहळू फेडी ॠण । होऊनियां रूपें दीन ॥ध्रु.॥ होऊं न सके वेगळा । क्षण एक त्यां निराळा ॥२॥ तुका म्हणे भक्तिभाव । हा चि देवाचा ही देव ॥३॥
972
कांहीं न मागे कोणांसी । तो चि आवडे देवासी ॥१॥ देव तयासी म्हणावें । त्याचे चरणीं लीन व्हावें ॥ध्रु.॥ भूतदया ज्याचे मनीं । त्याचे घरीं चक्रपाणी ॥२॥ नाहीं नाहीं त्यासमान । तुका म्हणे मी जमान ॥३॥
973
कांहीं नित्यनेमाविण । अन्न खाय तो श्वान ॥ वांयां मनुष्यपण । भार वाहे तो वृषभ ॥१॥ त्याचा होय भूमी भार । नेणे यातीचा आचार ॥ जाला दावेदार । भोगवी अघोर पितरांसि ॥ध्रु.॥ अखंड अशुभ वाणी । खरें न बोले स्वप्नीं ॥ पापी तयाहुनी । आणीक नाहीं दुसरा ॥२॥ पोट पोसी एकला । भूतीं दया नाहीं ज्याला ॥ पाठीं लागे आल्या । अतिताचे दाराशीं ॥३॥ कांहीं संतांचे पूजन । न घडे तीर्थांचें भ्रमण ॥ यमाचा आंदण । सीण थोर पावेल ॥४॥ तुका म्हणे त्यांनीं । मनुष्यपणा केली हानी ॥ देवा विसरूनी । गेलीं म्हणतां मी माझें ॥५॥
974
कांहीं बोलिलों बोबडें । मायबापा तुम्हांपुढें । सलगी लाडें कोडें । मज क्षमा करावी ॥१॥ काय जाणावा महिमा । तुमचा म्यां पुरुषोत्तमा । आवडीनें सीमा । सांडविली मज हातीं ॥ध्रु.॥ घडे अवज्ञा सख्यत्वें । बाळें बापासी न भ्यावें । काय म्यां सांगावें । आहे ठावें तुम्हासी ॥२॥ तुका म्हणे देवा । प्रेम लोभ न संडावा । पाळिला पाळावा । लळा पुढती आगळा ॥३॥
975
कांहीं मागणें हें आम्हां अनुचित । वडिलांची रीत जाणतसों ॥१॥ देह तुच्छ जालें सकळ उपाधी । सेवेपाशीं बुद्धि राहिलीसे ॥ध्रु.॥ शब्द तो उपाधि अचळ निश्चय । अनुभव हो काय नाहीं अंगीं ॥२॥ तुका म्हणे देह फांकिला विभागीं । उपकार अंगीं उरविला ॥३॥
976
कांहीं माझे कळों आले गुणदोष । म्हणऊनि उदास धरिलें ऐसें ॥१॥ नाहीं तरी येथें न घडे अनुचित । नाहीं ऐसी रीत तया घरीं ॥ध्रु.॥ कळावें तें मना आपुलिया सवें । ठायींचे हें घ्यावें विचारूनि ॥२॥ मज अव्हेरिलें देवें । माझिया कर्तव्यें बुद्धीचिया ॥३॥
977
कांहीं विपत्ति अपत्यां । आतां अमुचिया होतां । काय होईंल अनंता । पाहा बोलों कासया ॥१॥ बरें अनायासें जालें । सायासेंविण बोले चाले । काबाड चुकलें । केलें कष्टावेगळें ॥ध्रु.॥ बरा सांपडलासी वोजा । वर्मावरी केशीराजा । बोलायासी तुझा । उजुरचि नाहींसा ॥२॥ तुकयाबंधु म्हणे दगा । बरा दिला होता बागा । झडकरी चलागा । चांग दैवें पावलों ॥३॥
978
काकुलती एकें पाहाती बाहेरी । तया म्हणे हरि वोसरला ॥१॥ वोसरला मेघ आला होता काळ । बाहेरी सकळ आले लोक ॥२॥ कवतुक जालें ते काळीं आनंद । कळला गोविंद साच भावें ॥३॥ भावें तयापुढें नाचती सकळें । गातील मंगळें ओंव्या गीत ॥४॥ गीत गाती ओंव्या रामकृष्णावरी । गोपाळ मोहोरी वाती पांवे ॥५॥ वत्सें गाईं पशू नाचती आनंदें । वेधलिया छंदें गोविंदाच्या ॥६॥ चत्ति वेधियेलें गोविंदें जयाचें । कोण तें दैवाचें तयाहुनि ॥७॥ तयाहुनि कोणी नाहीं भाग्यवंत । अखंड सांगात गोविंदाचा ॥८॥ गोविंदाचा संग तुका म्हणे ध्यान । गोविंद ते जन गोकुळींचे ॥९॥
979
काकुलती येतो हरी । क्षणभरी निवडितां ॥१॥ तुमची मज लागली सवे । ठायींचे नवे नव्हों गडी ॥ध्रु.॥ आणीक बोलाविती फार । बहु थोर नावडती ॥२॥ भाविकें त्यांची आवडी मोठी । तुका म्हणे मिठी घाली जिवें ॥३॥
980
काखे कडासन आड पडे । खडबड खडबडे हुसकलें ॥१॥ दादकरा दादकरा । फजितखोरा लाज नाहीं ॥ध्रु.॥ अवघा जाला राम राम । कोणी कर्म आचरे ना ॥२॥ हरिदासांच्या पडती पायां । म्हणती तयां नागवावें ॥३॥ दोहीं ठायीं फजीत जालें । पारणें केलें अवकळा ॥४॥ तुका म्हणे नाश केला । विटंबिला वेश जिहीं ॥५॥
981
काग बग रिठा मारिले बाळपणीं । अवघी दैत्यखाणी बुडविली ॥१॥ तो मज दावा तो मज दावा । नंदनंदन जीवा आवडे तो ॥ध्रु.॥ गोवर्धन गिरी उचलिला करीं । गोकुळ भीतरी राखियेलें ॥२॥ बघुनि भौमासुरा आणिल्या गोपांगना । राज्य उग्रसेना मथुरेचें ॥३॥ पांडव जोहरीं राखिले कुसरी । विवराभीतरीं चालविले ॥४॥ तुका म्हणे हा भक्तांचा कृपाळ । दुष्टजना काळ नारायण ॥५॥
982
कान फाडूनियां मुद्रा तें घालिती । नाथ म्हणविती जगामाजी ॥१॥ घालोनियां फेरा मागती द्रव्यासी । परि शंकरासी नोळखती ॥२॥ पोट भरावया शिकती उपाय । तुका म्हणे जाय नर्क लोका ॥३॥
983
कानडीनें केला मर्हाटा भ्रतार । एकाचें उत्तर एका न ये ॥१॥ तैसें मज नको करूं कमळापति । देई या संगति सज्जनांची ॥ध्रु.॥ तिनें पाचारिलें इल बा म्हणोन । येरु पळे आण जाली आतां ॥२॥ तुका म्हणे येर येरा जें विच्छिन्न । तेथें वाढे सीण सुखा पोटीं ॥३॥
984
कानीं धरी बोल बहुतांचीं मतें । चाट त्यापरतें आणीक नाहीं ॥१॥ पावेल गौरव वोढाळाचे परी । दंड पाठीवरी यमदूतां ॥ध्रु.॥ शब्दज्ञानी एक आपुल्याला मतें । सांगती वेदांत भिन्नभावें ॥२॥ तुका म्हणे एक भाव न धरिती । पडिली हे माती त्यांचे तोंडीं ॥३॥
985
कान्हया रे जगजेठी । देई भेटी एकवेळे ॥१॥ काय मोकलिलें वनीं । सावजांनीं वेढिलें ॥ध्रु.॥ येथवरी होता संग । अंगें अंग लपविलें ॥२॥ तुका म्हणें पाहिलें मागें । एवढ्या वेगें अंतरला ॥३॥
986
कान्हो एकली रे एकली रे । तुजसवें चुकलें रे । भय वाटे वनीं मज अबळा धाकली रे ॥१॥ निघतां घरीं आई बा वारी । तुजसवें कां आलियें हरी ॥ध्रु.॥ लोक वाटा सांगती खोटा । परी मी चटा लागलियें ॥२॥ पिकल्या बोरी जालें सामोरी । काय जाणें कोठें राहिला हरी ॥३॥ आड खुंट जालिया जाळी । काय जाणों कान्हें मांडिली रळी ॥४॥ तुका म्हणे जाऊं आलिया वाटा । पाहों हरी पायीं न मोडे कांटा ॥५॥
987
कान्होबा आतां तुम्ही आम्ही च गडे । कोणाकडे जाऊं नेदूं ॥१॥ वाहीन तुझी भारशिदोरी । वळतीवरी येऊं नेदीं ॥ध्रु.॥ ढवळे गाईचें दूध काढूं । एकएकल्यां ठोंबे मारूं ॥२॥ तुका म्हणे टोकवूं त्यांला । जे तुझ्या बोला मानीत ना ॥३॥
988
कान्होबा तूं आलगट । नाहीं लाज बहु धीट । पाहिलें वाईट । बोलोनियां खोटें ॥१॥ परि तूं न संडिसी खोडी । करिसी केली घडीघडी । पाडिसी रोकडी । तुटी माये आम्हांसी ॥ध्रु.॥ तूं ठायींचा गोवळ । अविचारी अनर्गळ । चोरटा शिंदळ । ऐसा पिटूं डांगोरा ॥२॥ जरी तुझी आई । आम्ही घालूं सर्वा ठायीं । तुका म्हणे तें ही । तुज वाटे भूषण ॥३॥
989
कापो कोणी माझी मान सुखें पीडोत दुर्जन । तुज होय सीण तें मी न करीं सर्वथा ॥१॥ चुकी जाली एकवेळा मज पासूनि चांडाळा । उभें करोनियां जळा माजी वह्या राखिल्या ॥ध्रु.॥ नाहीं केला हा विचार माझा कोण अधिकार । समर्थासी भार न कळे कैसा घालावा ॥२॥ गेलें होऊनियां मागें नये बोलों तें वाउगें । पुढिलिया प्रसंगें तुका म्हणे जाणावें ॥३॥
990
काफर सोही आपण बुझे । आला दुनियां भर । कहे तुका तुम्हें सुनो रे भाईं । हिरिदा जिन्होका कठोर ॥१॥
991
काम क्रोध अहंकार नको देहीं । आशा तृष्णा माया लज्जा चिंता कांहीं । वास पंढरीचा जन्म सदा देई । आणीक दुजें मागणें तुज नाहीं ॥१॥ कृपा देई दान हरि मज कृपा देई दान । नासीं त्रिमिर दाखवीं चरण । आर्त पुरवावें भेटी देऊन । नको उपेक्षूं आलिया शरण ॥ध्रु.॥ नाम अखंड हृदयीं राहो वाणी । न पडो विसर क्षण ज्यागृतिं स्वप्नीं । संतसमागम ऐसा दे लावुनि । आणीक दुजें कांहीं नेणें तुजवांचूनि ॥२॥ पंथपुरिंचा रविसुत पुरे आतां । आड करावा भवसिंधु ऐसा नव्हता । नाहीं आडताळा त्रैलाक्यामाजी सरता । विनवी तुकयाबंधु चरणीं ठेवूनि माथा ॥३॥
992
काम क्रोध आड पडले पर्वत । राहिला अनंत पलीकडे ॥१॥ नुलंघवे मज न सांपडे वाट । दुस्तर हा घाट वैरियांचा ॥ध्रु.॥ आतां कैंचा मज सखा नारायण । गेला अंतरोन पांडुरंगा ॥२॥ तुका म्हणे व्यर्थ मोलाचें शरीर । गेलें हा विचार कळों आला ॥३॥
993
काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठलीं । आवडी धरिली पायांसवें ॥१॥ आतां कोण पाहे मागें परतोनि । गेले हारपोनि देहभाव ॥ध्रु.॥ रिद्धिसिद्धी सुखें हाणितल्या लाता । तेथें या प्राकृता कोण मानी ॥२॥ तुका म्हणे आम्ही विठोबाचे दास । करूनि ठेलों ग्रास ब्रम्हांडाचा ॥३॥
994
काम क्रोध माझे जीताती शरीरीं । कोवळें तें वरी बोलतसें ॥१॥ कैसा सरतां जालों तुझ्या पायीं । पांडुरंगा कांहीं न कळे हें ॥ध्रु.॥ पुराणींची ग्वाही वदतील संत । तैसें नाहीं चित्त शुद्ध जालें ॥२॥ तुका म्हणे मज आणूनि अनुभवा । दाखवीं हें देवा साच खरें ॥३॥
995
काम घातला बांदोडी । काळ केला देशधडी ॥१॥ तया माझें दंडवत । कपिकुळीं हनूमंत ॥ध्रु.॥ शरीर वज्रा ऐसें । कवळी ब्रम्हांड जो पुच्छे ॥२॥ रामाच्या सेवका । शरण आलों म्हणे तुका ॥३॥
996
काम नाहीं काम नाहीं । जालों पाहीं रिकामा ॥१॥ फावल्या या करूं चेष्टा । निश्चळ दृष्टा बैसोनि ॥ध्रु.॥ नसत्या छंदें नसत्या छंदें । जग विनोदें विर्हडतसे ॥२॥ एकाएकीं एकाएकीं । तुका लोकीं निराळा ॥३॥
997
काम सारूनि सकळ । आले अवघे गोपाळ । जाली आतां वेळ । म्हणती आणा सिदोर्या ॥१॥ देती आपुलाला झाडा । गाई बैसविल्या वाडां । दोंदिल बोबडा । वांकड्याचा हरि मेळीं ॥ध्रु.॥ आपुलालिये आवडी । मुदा बांधल्या परवडी । निवडूनियां गोडी । हरि मेळवी त्यांत तें ॥२॥ भार वागविला खांदीं । नव्हती मिळाली जों मांदी । सकाळांचे संदी । वोझीं अवघीं उतरलीं ॥३॥ मागे जो तांतडी । त्यासि रागा येती गडी । तुझी कां रे कुडी । येथें मिथ्या भावना ॥४॥ एक एकाच्या संवादें । कैसे धाले ब्रम्हानंदें । तुका म्हणे पदें । या रे वंदूं हरीचीं ॥५॥
998
कामक्रोध माझे लावियेले पाठीं । बहुत हिंपुटीं जालों देवा ॥१॥ आवरितां तुझे तुज नावरती । थोर वाटे चित्तीं आश्चर्य हें ॥ध्रु.॥ तुझिया विनोदें आम्हां प्राणसाटी । भयभीत पोटीं सदा दुःखी ॥२॥ तुका म्हणे माझ्या कपाळाचा गुण । तुला हांसे कोण समर्थासी ॥३॥
999
कामधेनूचें वासरूं । खाया न मिळे काय करूं ॥१॥ ऐसें आम्हां मांडियेलें । विठो त्वां कां सांडियेलें ॥ध्रु.॥ बैसोनि कल्पद्रुमातळीं । पोटासाटीं तळमळीं ॥२॥ तुका म्हणे नारायणा । बरें लोकीं हें दीसेना ॥३॥
1000
कामांमध्यें काम । कांहीं म्हणा रामराम । जाइल भवश्रम । सुख होईल दुःखाचें ॥१॥ कळों येईल अंतकाळीं । प्राणप्रयाणाचे वेळीं । राहाती निराळीं । रांडापोरें सकळ ॥ध्रु.॥ जीतां जीसी जैसा तैसा । पुढें आहे रे वोळसा । उगवुनि फांसा । काय करणें तें करीं ॥२॥ केलें होतें या चि जन्में । अवघें विठोबाच्या नामें । तुका म्हणे कर्म । जाळोनियां तरसी ॥३॥
1001
कामाचा अंकित कांतेतें प्रार्थित । तूं कां हो दुश्चित्त निरंतर ॥१॥ माझीं मायबापें बंधु हो बहिण । तुज करी सीण त्यागीन मी ॥ध्रु.॥ त्यांचें जरि तोंड पाहेन मागुता । तरि मज हत्या घडो तुझी ॥२॥ सकाळ उठोन वेगळा निघेन । वाहातों तुझी आण निश्चयेंसी ॥३॥ वेगळें निघतां घडीन दोरे चुडा । तूं तंव माझा जोडा जन्माचा कीं ॥४॥ ताईंत सांकळी गळांचि दुलडी । बाजुबंदजोडी हातसर ॥५॥ वेणीचे जे नग सर्व ही करीन । नको धरूं सीण मनीं कांहीं ॥६॥ नेसावया साडी सेलारी चुनडी । अंगींची कांचोळी जाळिया फुलें ॥७॥ तुका म्हणे केला रांडेनें गाढव । मनासवें धांव घेतलीसे ॥८॥
1002
कामातुर चवी सांडी । बरळ तोंडीं बरळे ॥१॥ रंगलें तें अंगीं दावी । विष देववी आसडे ॥ध्रु.॥ धनसोसें लागे वेड । ते बडबड शमेना ॥२॥ तुका म्हणे वेसनें दोन्ही । नर्कखाणी भोगावया ॥३॥
1003
कामातुरा भय लाज ना विचार । शरीर असार तृणतुल्य ॥१॥ नवल हे लीळा करात्याचें लाघव । प्रारब्धें भाव दाखविले ॥ध्रु.॥ लोभालोभ एका धनाचिये ठायीं । आणिकांची सोईं चाड नाहीं ॥२॥ तुका म्हणे भूक न विचारी प्रकार । योजे तें चि सार यथाकाळें ॥३॥
1004
कामिनीसी जैसा आवडे भ्रतार । इच्छीत चकोर चंद्र जैसा ॥१॥ तैसी हे आवडी विठ्ठलाचे पायीं । लागलिया नाहीं गर्भवास ॥ध्रु.॥ दुष्काळें पीडिल्या आवडे भोजन । आणिक जीवन तृषाक्रांता ॥२॥ कामातुर जैसा भय लज्जा सांडोनि । आवडे कामिनी सर्वभावें ॥३॥ तुका म्हणे तैसी राहिली आवडी । पांडुरंग थडी पाववील ॥४॥
1005
कामें नेलें चित्त नेदी अवलोकुं मुख । बहु वाटे दुःख फुटों पाहे हृदय ॥१॥ कां जी सासुरवासी मज केलें भगवंता । आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाहीं ॥ध्रु.॥ प्रभातेसि वाटे तुमच्या यावें दर्शना । येथें न चले चोरी उरली राहे वासना ॥२॥ येथें अवघे वांयां गेले दिसती सायास । तुका म्हणे नास दिसे जाल्या वेचाचा ॥३॥
1006
कामें पीडिलों माया । बहु मारी नाहीं दया ॥१॥ तुझ्या राहिलों आधारें । जालें अवघें चि बरें ॥ध्रु.॥ तुझे लागलों संगती । आतां येतों काकुळती ॥२॥ तुका म्हणे तुझ्या भिडा । कान्होबा हे गेली पीडा ॥३॥ टिपरी - अभंग ७
1007
काय आतां आम्हीं पोट चि भरावें । जग चाळवावें भक्त म्हुण ॥१॥ ऐसा तरि एक सांगा जी विचार । बहु होतों फार कासावीस ॥ध्रु.॥ काय कवित्वाची घालूनियां रूढी । करूं जोडाजोडी अक्षरांची ॥२॥ तुका म्हणे काय गुंपोनि दुकाना । राहों नारायणा करुनी घात ॥३॥
1008
काय आतां यासि म्हणावें लेंकरूं । जगाचा हा गुरु मायबाप ॥१॥ माया याची यासि राहिली व्यापून । कळों नये क्षण एक होतां ॥२॥ क्षण एक होतां विसरलीं त्यासि । माझेंमाझें ऐसें करी बाळा ॥३॥ करी कवतुक कळों नेदी कोणा । योजूनि कारणा तें चि खेळे ॥४॥ तें सुख लुटिलें घरिचिया घरीं । तुका म्हणे परी आपुलाल्या ॥५॥
1009
काय आम्हां चाळविसी वायांविण । म्हणसी दुरून देखिलासि ॥१॥ लावूनियां डोळे नव्हतों दुश्चित । तुज परचत्ति माव होती ॥२॥ होती दृष्टि आंत उघडी आमची । बाहेरी ते वांयां चि कुंची झाकुं ॥३॥ जालासि थोरला थोरल्या तोंडाचा । गिळियेला वाचा धूर आगी ॥४॥ आगी खातो ऐसा आमचा सांगाती । आनंदें नाचती भोंवताली ॥५॥ भोंवतीं आपणा मेळविलीं देवें । तुका म्हणे ठावें नाहीं ज्ञान ॥६॥
1010
काय आम्ही भक्ति करणें कैसी । काय एक वाहावें तुम्हांसी । अवघा भरोनि उरलासी । वाणीं खाणीं रसीं रूपगंधी ॥१॥ कसें करूं इंद्रियां बंधन । पुण्यपापाचें खंडण । काय व्रत करूं आचरण । काय तुजविण उरलें तें ॥२॥ काय डोळे झांकुनियां पाहूं । मंत्रजप काय ध्याऊं । कवणें ठायीं धरूनि भाव । काय तें वाव तुजविण ॥३॥ काय हिंडों कवण दिशा । कवणे ठायीं पाय ठेवूं कैसा । काय तूं नव्हेसि न कळे तैसा । काय मी कैसा पाहों आतां ॥४॥ तुझिया नामाची सकळ । पूजा अर्चन मंत्र माळ । धूप दीप नैवेद्य फळ तांबूल । घेऊं पुष्पांजुळ तुका म्हणे ॥५॥
1011
काय आम्हीं केलें ऐसें । नुद्धरीजेसें सांगावें ॥१॥ हरण कोल्हें वैकुंठवासी । कोण त्यासी अधिकार ॥ध्रु.॥ गजा नाड्या सरोवरीं । नाहीं हरी विचारिलें ॥२॥ तुका म्हणे गणिका नष्ट । माझे कष्ट त्याहूनि ॥३॥
1012
काय उणें आम्हां विठोबाचे पाई । नाहीं ऐसें काई येथें एक ॥१॥ ते हें भोंवतालें ठायीं वांटूं मन । बराडी करून दारोदारीं ॥ध्रु.॥ कोण बळी माझ्या विठोबा वेगळा । आणीक आगळा दुजा सांगा ॥२॥ तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गावीं । फुकाचीं लुटावीं भांडारें तीं ॥३॥
1013
काय उणें कां करिशील चोरी । किती सांगों तुज नाइकसी हरी । परपरता तूं पळोनि जासी दुरी । अनावर या लौकिका बाहेरी वो ॥१॥ माया करुणा हे करिते बहुत । किती सोसूं या जनांचे आघात । न पुरे अवसरु हें चि नित्यानित्य । तूं चि सोडवीं करूनि स्थिर चित्त ॥ध्रु.॥ बहुत कामें मी गुंतलियें घरीं । जासी डोळा तूं चुकावूनि हरी । करितां लाग न येसी च पळभरी । नाहीं सायासाची उरों दिली उरी वो ॥२॥ तुज म्हणीयें मी न संगें अनंता । नको जाऊं या डोळियां परता । न लगे जोडी हे तुजविण आतां । तुकयास्वामी कान्होबा गुणभरिता वो ॥३॥
1014
काय उणें जालें तुज समर्थासी । ऐसा मजपाशीं कोण दोष ॥१॥ जो तूं माझा न करिसी अंगीकार । सांगेन वेव्हार संतांमधीं ॥२॥ तुजविण रत आणिकांचे ठायीं । ऐसें कोण ग्वाही दावीं मज ॥३॥ तुका म्हणे काय धरूनी गुमान । सांग उगवून पांडुरंगा ॥४॥
1015
काय उणें मज पांडुरंगा पायीं । रिद्धिसिद्धी ठायीं वोळगती ॥१॥ कोण पाहे सुखा नासिवंताकडे । तृष्णेचें बापुडें नहों आम्ही ॥ध्रु.॥ स्वर्गसुखें आम्हीं केलीं पावटणी । पापपुण्यें दोन्ही उलंडिलीं ॥२॥ तुका म्हणे घरीं आणिलें वैकुंठ । वसविली पेठ वैष्णवांची ॥३॥
1016
काय उरली ते करूं विनवणी । वेचलों वचनीं पांडुरंगा ॥१॥ अव्हेरलों आतां कैचें नामरूप । आदर निरोप तरि तो नाहीं ॥ध्रु.॥ माझा मायबाप ये गेलों सलगी । तों हें तुम्हां जगीं सोयइरिका ॥२॥ तुका म्हणे आतां जोडोनियां हात । करी दंडवत ठायिंचाठायीं ॥३॥
1017
काय एकां जालें तें कां नाहीं ठावें । काय हें सांगावें काय म्हुण ॥१॥ देखतील डोळां ऐकती कानीं । बोलिलें पुराणीं तें ही ठावें ॥ध्रु.॥ काय हें शरीर साच कीं जाणार । सकळ विचार जाणती हा ॥२॥ कां हें कळों नये आपुलें आपणा । बाळत्व तारुण्य वृद्धदशा ॥३॥ कां हें आवडलें प्रियापुत्रधन । काय कामा कोण कोणा आलें ॥४॥ कां हें जन्म वांयां घातलें उत्तम । कां हे रामराम न म्हणती ॥५॥ काय भुली यांसी पडली जाणतां । देखती मरतां आणिकांसी ॥६॥ काय करिती हे बांधलिया काळें । तुका म्हणे बळें वज्रपाशीं ॥७॥
1018
काय ऐसा जन्म जावा वांयांविण । कांहीं तरी ॠण असो माथां ॥१॥ कोणे तरी काळें होईंल आठव । नाहीं जरी भाव भार खरा ॥ध्रु.॥ शता एकातरी जन्माच्या शेवटीं । कृपाळुवा पोटीं होइल दया ॥२॥ तुका म्हणे नाहीं फांकों तरी देत । सर्वांचें उचित सांपडलें ॥३॥
1019
काय ऐसा सांगा । धर्म मज पांडुरंगा ॥१॥ तुझे पायीं पावें ऐसा । जेणें उगवे हा फांसा ॥ध्रु.॥ करीं कृपादान । तैसें बोलवीं वचन ॥२॥ तुका म्हणे देवा । माझें हृदय वसवा ॥३॥
1020
काय ऐसी वेळ । वोडवली अमंगळ ॥१॥ आजि दुखवलें मन । कथाकाळीं जाला सीण ॥ध्रु.॥ पापाचिया गुणें । त्यांचिया वेळे दर्षणें ॥२॥ तुका म्हणे कानीं । घालूं आले दुष्टवाणी ॥३॥
1021
काय करावें तें आतां । जालें नयेसें बोलतां ॥१॥ नाहीं दोघांचिये हातीं । गांठी घालावी एकांतीं ॥ध्रु.॥ होय आपुलें काज । तों हे भीड सांडूं लाज ॥२॥ तुका म्हणे देवा । आधीं निवडूं हा गोवा ॥३॥
1022
काय करावें म्यां केले ते विचार । घडेल साचार काय पाहों ॥१॥ काय मन नाहीं धरीत आवडी । प्रारब्धीं जोडी ते चि खरी ॥ध्रु.॥ काय म्यां तेथींचें रांधिलें चाखोनि । तें हें करीं मनीं विवंचना ॥२॥ आणीक ही त्यासी बहुत कारण । बहु असे जिणें ओढीचें ही ॥३॥ तुका म्हणे आम्हां बोळविल्यावरी । परती माघारी केली नाहीं ॥४॥
1023
काय करिती केलीं नित्य पापें । वसे नाम ज्यापें विठोबाचें ॥१॥ तृणीं हुताशन लागला ते रासी । जळतील तैसीं क्षणमात्रें ॥ध्रु.॥ विष्णुमूर्तिपाद पाहतां चरण । तेथें कर्म कोण राहूं शके ॥२॥ तुका म्हणे नाम जाळी महादोष । जेथें होय घोष कीर्तनाचा ॥३॥
1024
काय करील तें नव्हे विश्वंभर । सेवका दारद्रि लाज नाहीं ॥१॥ मजपासूनि हें पडिलें अंतर । काय तो अव्हेर करूं जाणे ॥ध्रु.॥ नामाच्या चिंतनें नासी गर्भवास । नेदी करूं आस आणिकांची ॥२॥ तुका म्हणे नेणों किती वांयां गेले । तयां उद्धरिलें पांडुरंगें ॥३॥
1025
काय करूं आतां धरुनियां भीड । निःशंक हें तोंड वाजविलें ॥१॥ नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण । सार्थक लाजोनी नव्हे हित ॥ध्रु.॥ आलें तें उत्तर बोलें स्वामीसवें । धीट नीट जीवें होऊनियां ॥२॥ तुका म्हणे मना समर्थासीं गांठी । घालावी हे मांडी थापटूनि ॥३॥
1026
काय करूं आतां माझिया संचिता । तेणें जीववित्ती साटी केली ॥१॥ न म्हणावें कोणी माझें हें करणें । हुकुम तो येणें देवें केला ॥ध्रु.॥ करूनि मोकळा सोडिलों भिकारी । पुरविली तरी पाठी माझी ॥२॥ पाणिया भोंपळा जेवावया पानें । लाविलीं वो येणें देवें आम्हां ॥३॥ तुका म्हणे यासी नाहीं वो करुणा । आहे नागवणा ठावा मज ॥४॥
1027
काय करूं आतां या मना । न संडी विषयांची वासना । प्राथिऩतां ही राहेना । आदरें पतना नेऊं पाहे ॥१॥ आतां धांवधावें गा श्रीहरी । गेलों वांयां नाहीं तरी । न दिसे कोणी आवरी । आणीक दुजा तयासी ॥ध्रु.॥ न राहे एके ठायीं एकी घडी । चित्त तडतडा तोडी । घालूं पाहे बा हे उडी या भवडोहीं ॥२॥ आशा तृष्णा कल्पना पापिणी । घात मांडला माझा यांणीं । तुका म्हणे चक्रपाणी । काय अजोनि पाहातोसी ॥३॥
1028
काय करूं आन दैवतें । एका विण पंढरीनाथें ॥१॥ सरिता मिळाली सागरीं । आणिकां नांवां कैची उरी ॥ध्रु.॥ अनेक दीपीचा प्रकाश । सूर्य उगवतां नाश ॥२॥ तुका म्हणे नेणें दुजें । एका विण पंढरीराजें ॥३॥
1029
काय करूं कर्माकर्म । बरें सांपडलें वर्म ॥१॥ होसी नामा च सारिका । समजाविली नाहीं लेखा ॥ध्रु.॥ नाहीं वेचावेच जाला । उरला आहेसी संचला ॥२॥ तुका म्हणे माझें । काय होईंल तुम्हां ओझें ॥३॥
1030
काय करूं जी दातारा । कांहीं न पुरे संसारा ॥१॥ जाली माकडाची परि । येतों तळा जातों वरी ॥ध्रु.॥ घालीं भलते ठायीं हात । होती शिव्या बैस लात ॥२॥ आदि अंतीं तुका । सांगे न कळे झाला चुका ॥३॥
1031
काय करूं जीव होतो कासावीस । कोंडलिये दिस गमे चि ना ॥१॥ पडिलें हें दिसे ब्रम्हांड चि वोस । दाटोनि उच्छ्वास राहातसे ॥२॥ तुका म्हणे आगा सर्वजाणतिया । विश्वंभरें काया निववावी ॥३॥
1032
काय करूं पोरा लागली चट । धरी वाट देउळाची ॥१॥ सांगितलें नेघे कानीं । दुजें मनीं विठ्ठल ॥ध्रु.॥ काम घरीं न करी धंदा । येथें सदा दुश्चित ॥२॥ आमचे कुळीं नव्हतें ऐसें । हें च पिसें निवडलें ॥३॥ लौकिकाची नाहीं लाज । माझें मज पारिखें ॥४॥ तुका म्हणे नरका जाणें । त्या वचनें दुष्टांचीं ॥५॥
1033
काय करूं मज नागविलें आळसें । बहुत या सोसें पीडा केली ॥१॥ हिरोनियां नेला मुखींचा उच्चार । पडिलें अंतर जवळी च ॥ध्रु.॥ द्वैताचिया कैसा सांपडलों हातीं । बहुत करती ओढाओढी ॥२॥ तुका म्हणे आतां आपुलिया सवें । न्यावें मज देवें सोडवूनि ॥३॥
1034
काय करूं सांगतां ही न कळे वर्म । उपस्थित भ्रम उपजवितो ॥१॥ मन आधीं ज्याचें आलें होईंल हातां । तयावरी सत्ता केली चाले ॥ध्रु.॥ अभुकेचे अंगीं चवी ना सवाद । मिथ्या ऐसा वाद दुराग्रह ॥२॥ तुका म्हणे आप राखावें आपणा । संकोचों चि कोणा नये आतां ॥३॥
1035
काय कळे बाळा । बाप सदैव दुबळा ॥१॥ आहे नाहीं हें न कळे । हातीं काय कोण्या वेळे ॥ध्रु.॥ देखिलें तें दृष्टी । मागे घालूनियां मिठी ॥२॥ तुका म्हणे भावें । माझ्या मज समजावें ॥३॥
1036
काय कशी करिती गंगा । भीतरिं चांगा नाहीं तो ॥१॥ अधणीं कुचर बाहेर तैसा । नये रसा पाकासि ॥ध्रु.॥ काय टिळे करिती माळा । भाव खळा नाहीं त्या ॥२॥ तुका म्हणे प्रेमें विण । बोले भुंके अवघा शीण ॥३॥
1037
काय काय करितों या मना । परी नाइके नारायणा । करूं नये त्याची करी विवंचना । पतना नेऊं आदरिलें ॥१॥ भलतिये सवें धांवे सैराट । वाट आडवाट दरे दरकुट । न विचारी कुडें कांहीं कपट । घात बळकट मांडियेला ॥२॥ न पुरती भ्रमणा दाही दिशा । सप्त ही पाताळ आकाशा । घाली उडी बळें चि देखोनि फांसा । केलों या देशा पाहुणा ॥३॥ चेतवूनि इंद्रियें सकळ । आशा तृष्णा कल्पना काम क्रोध काळ । दुराविली शुद्ध बुद्धी केली राळ । ऐसें चांडाळ अनिवार हें ॥४॥ आतां काय ऐसें करावें यासी । बहु जाचिलों केलों कासाविसी । तुकयाबंधु म्हणे हृषीकेशी । धांव मज ऐसी परी जाली ॥५॥ नाटाचे अभंग समाप्त ६३
1038
काय कीर्ती करूं लोक दंभ मान । दाखवीं चरण तुझे मज ॥१॥ मज आतां ऐसें नको करूं देवा । तुझा दास जावा वांयां विण ॥ध्रु.॥ होइल थोरपण जाणीवेचा भार । दुरावेन दूर तुझा पायीं ॥२॥ अंतरींचा भाव काय कळे लोकां । एक मानी एकां देखोवेखीं ॥३॥ तुका म्हणे तुझे पाय आतुडती । ते मज विपित्त गोड देवा ॥४॥
1039
काय कृपेविण घालावें सांकडें । निश्चिंती निवाडें कोण्या एका ॥१॥ आहों तैसीं पुढें असों दीनपणें । वेचूनि वचनें करुणेचीं ॥ध्रु.॥ धरूं भय आतां काय वाहों चिंता । काय करूं आतां आप्तपण ॥२॥ तुका म्हणे आम्ही भावहीन जीव । म्हणउनी देव दुरे दुरी ॥३॥
1040
काय केलें जळचरीं । ढीवर त्यांच्या घातावरी ॥१॥ हा तों ठायींचा विचार । आहे यातिवैराकार ॥ध्रु.॥ श्वापदातें वधी । निरपराधें पारधी ॥२॥ तुका म्हणे खळ । संतां पीडिती चांडाळ ॥३॥
1041
काय खावें आतां कोणीकडे जावें । गांवांत राहावें कोण्या बळें ॥१॥ कोपला पाटील गांवचे हे लोक । आतां घाली भीक कोण मज ॥ध्रु.॥ आतां येणें चवी सांडिली म्हणती । निवाडा करिती दिवाणांत ॥२॥ भल्या लोकीं यास सांगितली मात । केला माझा घात दुर्बळाचा ॥३॥ तुका म्हणे याचा संग नव्हे भला । शोधीत विठ्ठला जाऊं आतां ॥४॥
1042
काय जाणें मी पामर पांडुरंगा तुझा पार । धरिलिया धीर काय एक न करिसी ॥१॥ उताविळ जालों आधीं मतिमंद हीनबुद्धि । परि तूं कृपानिधी नाहीं केला अव्हेर ॥ध्रु.॥ तूं देवांचा ही देव अवघ्या ब्रम्हांडाचा जीव । आम्हां दासां कींव कां भाकणें लागली ॥२॥ तुका म्हणे विश्वंभरा मी तों पतित चि खरा । अन्याय दुसरा दारीं धरणें बैसलों ॥३॥
1043
काय जाणों वेद । आम्ही आगमाचे भेद ॥१॥ एक रूप तुझें मनीं । धरूनि राहिलों चिंतनी ॥ध्रु.॥ कोठें अधिकार । नाहीं रानट विचार ॥२॥ तुका म्हणे दीना । नुपेक्षावें नारायणा ॥३॥
1044
काय जालें नेणों माझिया कपाळा । न देखीजे डोळां मूळ येतां ॥१॥ बहु दिस पाहें वचनासी वास । धरिलें उदास पांडुरंगा ॥ध्रु.॥ नाहीं निरोपाचें पावलें उत्तर । ऐसें तों निष्ठ न पाहिजे ॥२॥ पडिला विसर किंवा कांहीं धंदा । त्याहूनि गोविंदा जरूरसा ॥३॥ तुका म्हणे आलें वेचाचें सांकडें । देणें घेणें पुढें तो ही धाक ॥४॥
1045
काय ज्ञानेश्वरीं उणें । तिंहीं पाठविलें धरणें ॥१॥ ऐकोनियां लिखित । म्हुण जाणवली हे मात ॥ध्रु.॥ तरी जाणे धणी । वदे सेवकाची वाणी ॥२॥ तुका म्हणे ठेवा । होतां सांभाळावें देवा ॥३॥
1046
काय ढोरापुढें घालूनि मिष्टान्न । खरा विलेपन चंदनाचें ॥१॥ नको नको देवा खळाची संगति । रस ज्या पंगती नाहीं कथे ॥ध्रु.॥ काय सेज बाज माकडा विलास । अळंकारा नास करुनी टाकी ॥२॥ तुका म्हणे काय पाजूनि नवनीत । सर्पा विष थीत अमृताचें ॥३॥
1047
काय तीं करावीं मोलाचीं माकडें । नाचत ती पुढें संसाराच्या ॥१॥ झाडा देतेवेळे विचकिती दांत । घेती यमदूत दंडवरी ॥ध्रु.॥ हात दांत कान हलविती मान । दाखविती जन मानावया ॥२॥ तुका म्हणे किती जालीं हीं फजित । मागें नाहीं नीत भारवाही ॥३॥
1048
काय तुज कैसें जाणवेल देवा । आणावें अनुभवा कैशा परी ॥१॥ सगुण निर्गुण थोर कीं लहान । न कळे अनुमान मज तुझा ॥ध्रु.॥ कोण तो निर्धार करूं हा विचार । भवसिंधु पार तरावया ॥२॥ तुका म्हणे कैसे पाय आतुडती । न पडे श्रीपती वर्म ठावें ॥३॥
1049
काय तुज मागें नाहीं जाणवलें । माझें नाहीं केलें हित कांहीं ॥१॥ डोळे झांकुनियां होसी अबोलणा । तेव्हां नारायणा आतां कैसा ॥ध्रु.॥ न कळे उचित न संगतां स्पष्ट । ऐसा क्रियानष्ट काय जाणे ॥२॥ तुका म्हणे माझा घात तुम्हां ठावा । तरि कां आधीं देवा वारूं नये ॥३॥
1050
काय तुझा महिमा वर्णू मी किती । नामें मात्रे भवपाश तुटती । पाहातां पाउले हे विष्णुमूर्ती । कोटिकुळां सहित जे उद्धरती ॥१॥ जय देव जय देव जय पंढरिराया । श्रीपंढरिराया। करुनियां कुरवंडी । सांडीन काया ॥ध्रु.॥ मंगळआरतीचा थोर महिमा । आणीक द्यावया नाहीं उपमा । श्रीमुखासहित देखे जो कर्मा । पासुन सुटे जैसा रवि नासी तमा ॥२॥ धन्य व्रतकाळ हे एकादशी । जागरण उपवास घडे जयांसी । विष्णूचें पूजन एकाभावेंसी । नित्यमुक्त पूज्य तिहीं लोकांसी ॥३॥ न वजे वांयां काळ जे तुज ध्याती । असे तुझा वास तयांच्या चित्ती । धालें सुखें सदा प्रेमें डुल्लती । तीर्थे मळिन वास तयांचा वाहाती ॥४॥ देव भक्त तूं चि जालासी दोन्ही । वाढावया सुख भक्ति हे जनीं । जड जीवां उद्धार होय लागोनि । शरण तुका वंदी पाउलें दोन्ही ॥५॥
1051
काय तुझी ऐसी वेचते गांठोळी । मांहे टाळाटाळी करीतसां ॥१॥ चतुराच्या राया आहो पांडुरंगा । ऐसें तरि सांगा निवडूनि ॥ध्रु.॥ कोण तुम्हां सुख असे या कवतुकें । भोगितां अनेकें दुःखें आम्ही ॥२॥ तुका म्हणे काय जालासी निर्गुण । आम्हां येथें कोण सोडवील ॥३॥
1052
काय तुझी थोरी वणूप मी पामर । होसी दयाकर कृपासिंधु ॥१॥ तुज ऐसी दया नाहीं आणिकासी । ऐसें हृषीकेशी नवल एक ॥ध्रु.॥ कुरुक्षेत्रभूमीवरी पक्षी व्याले । तृणामाजी केलें कोठें त्यांनीं ॥२॥ अकस्मात तेथें रणखांब रोविला । युद्धाचा नेमिला ठाव तेथें ॥३॥ कौरव पांडव दळभार दोन्ही । झुंजावया रणीं आले तेथें ॥४॥ तये काळीं तुज पक्षी आठविती । पाव बा श्रीपती म्हणोनियां ॥५॥ हस्ती घोडे रथ येथें धांवतील । पाषाण होतील शतचूर्ण ॥६॥ ऐसिये आकांतीं वांचों कैसे परी । धांव बा श्रीहरी लवलाहें ॥७॥ टाकोनियां पिलीं कैसें जावें आतां । पावें जगन्नाथा लवलाहीं ॥८॥ आली तिये काळीं कृपा तुझ्या चित्ता । अनाथांच्या नाथा नारायणा ॥९॥ एका गजाचिया कंठीं घंटा होती । पाडिली अवचिती तयांवरी ॥१०॥ अठरा दिवस तेथे द्वंदजुंज जालें । वारा ऊन लागलें नाहीं तयां ॥११॥ जुंज जाल्यावरी दाविलें अर्जुना । तुम्हीं नारायणा पिक्षयांसी ॥१२॥ पाहें आपुलिया दासां म्यां रिक्षलें । रणीं वांचविलें कैशा परी ॥१३॥ ऐसी तुज माया आपुल्या भक्तांची । माउली आमुची तुका म्हणे ॥१४॥
1053
काय तुझे उपकार पांडुरंगा । सांगों मी या जगामाजी आतां ॥१॥ जतन हें माझें करूनि संचित । दिलें अवचित आणूनियां ॥ध्रु.॥ घडल्या दोषांचें न घली च भरी । आली यास थोरी कृपा देवा ॥२॥ नव्हतें ठाउकें आइकिलें नाहीं । न मगतां पाहीं दान दिलें ॥३॥ तुका म्हणे याच्या उपकारासाटीं । नाहीं माझें गाठीं कांहीं एक ॥४॥
1054
काय तुझें वेचे मज भेटी देतां । वचन बोलतां एक दोन ॥१॥ काय तुझें रूप घेतों मी चोरोनि । त्या भेणें लपोनि राहिलासी ॥ध्रु.॥ काय तुझें आम्हां करावें वैकुंठ । भेवों नको भेट आतां मज ॥२॥ तुका म्हणे तुझी नलगे दसोडी । परि आहे आवडी दर्शनाची ॥३॥
1055
काय तुमचिया सेवे न वेचते गांठोळी । मोहें टाळाटाळी करीतसां ॥१॥ चतुराच्या राया आहो पांडुरंगा । ऐसें तरी सांगा निवडूनि ॥ध्रु.॥ कोण तुम्हां सुख असे या कौतुकें । भोगितां अनेकें दुःखें आम्हा ॥२॥ तुका म्हणे काय जालासी निर्गुण । आम्हां येथें कोण सोडवील ॥३॥
1056
काय तुम्ही जाणां । करूं अव्हेर नारायणा ॥१॥ तरी या लटिक्याची गोही । निवडली दुसरे ठायीं ॥ध्रु.॥ कळों अंतरींचा गुण । नये फिटल्यावांचून ॥२॥ आणिलें अनुभवा । जनाच्या हें ज्ञानदेवा ॥३॥ आणीक कोणी मिती । त्यांच्या चिंतनें विश्रांति ॥४॥ तुका म्हणे बीज पोटीं । फळ तैसें चि सेवटीं ॥५॥
1057
काय तें सामर्थ्य न चले या काळें । काय जालीं बळें शक्तिहीण ॥१॥ माझिया संचितें आणिलासी हरी । जालें तुजवरी वरिष्ठ तें ॥ध्रु.॥ काय गमाविली सुदर्शन गदा । नो बोला गोविंदा लाजतसां ॥२॥ तुका म्हणे काय ब्रिदाचें तें काम । सांडा परतें नाम दिनानाथ ॥३॥
1058
काय तो विवाद असो भेदाभेद । साधा परमानंद एका भावें ॥१॥ निघोनि आयुष्य जातें हातोहात । विचारीं पां हित लवलाहीं ॥२॥ तुका म्हणे भावभक्ति हे कारण । नागवी भूषण दंभ तो चि ॥३॥
1059
काय त्या दिवस उचिताचा आला । मागील जो केला श्रम होता ॥१॥ ठेवियेला पूर्ण करूनि संकेत । तयापाशीं चित्त लागलें से ॥ध्रु.॥ जाणसी गे माते लेंकराचें लाड । नये पडों आड निष्ठता ॥२॥ तुका म्हणे आम्हीं करावें वचन । तुम्हांसी जतन करणें तें ॥३॥
1060
काय दरा करील वन । समाधान नाहीं जंव ॥१॥ तरी काय तेथें असती थोडीं । काय जोडी तयांसी ॥ध्रु.॥ रिगतां धांवा पेंवामध्यें । जोडे सिद्धी ते ठायीं ॥२॥ काय भस्म करील राख । अंतर पाख नाहीं तों ॥३॥ वर्णाआश्रमाचे धर्म । जाती श्रम जालिया ॥४॥ तुका म्हणे सोंग पाश । निरसे आस तें हित ॥५॥
1061
काय दिनकरा । केला कोंबड्यानें खरा ॥१॥ कां हो ऐसा संत ठेवा । भार माझे माथां देवा ॥ध्रु.॥ आडविलें दासीं । तरि कां मरती उपवासी ॥२॥ तुका म्हणे हातीं । कळा सकळ अनंतीं ॥३॥
1062
काय दिला ठेवा । आम्हां विठ्ठल चि व्हावा ॥१॥ तुम्ही कळलेती उदार । साटीं परिसाची गार ॥ध्रु.॥ जीव दिला तरी । वचना माझ्या नये सरी ॥२॥ तुका म्हणे धन । आम्हां गोमासासमान ॥३॥
1063
काय दिवस गेले अवघे चि वर्हाडें । तें आलें सांकडें कथेमाजी ॥१॥ क्षण एके ठायीं मन स्थिर नाहीं । अराणूक कइं होईंल पुढें ॥ध्रु.॥ कथेचे विरसें दोषा मूळ होय । तरण उपाय कैचा माती ॥२॥ काय तें सांचवुनि उरलें हें मागें । घटिका एक संगें काय गेलें ॥३॥ ते चि वाणी येथें करा उजळणी । काढावी मथूनि शब्दरत्नें ॥४॥ तुका म्हणे हें चि बोलावया चाड । उभयतां नाड हित असे ॥५॥
1064
काय देवापाशीं उणें । हिंडे दारोदारीं सुनें ॥१॥ करी अक्षरांची आटी । एके कवडी च साटीं ॥ध्रु.॥ निंदी कोणां स्तवी । चिंतातुर सदा जीवीं ॥२॥ तुका म्हणे भांड । जलो जळो त्याचें तोंड ॥३॥
1065
काय देवें खातां घेतलें हातींचें । आलें हें तयाचें थोर भय ॥१॥ म्हणतां गजरें राम एकसरें । जळती पापें थोरें भयधाकें ॥ध्रु.॥ काय खोळंबले हात पाय अंग । नाशिलें हें सांग रूप काय ॥२॥ कोण लोकीं सांगा घातला बाहेरी । म्हणतां हरि हरि तुका म्हणे ॥३॥
1066
काय देह घालूं करवती करमरी । टाकुं या भितरी अग्नीमाजी ॥१॥ काय सेवूं वन शीत उष्ण तान । साहों कीं मोहन धरुनी बैसों ॥ध्रु.॥ काय लावूं अंगीं भस्म उधळण । हिंडूं देश कोण खुंट चारी ॥२॥ काय तजूं अन्न करूनि उपास । काय करूं नास जीवित्वाचा ॥३॥ तुका म्हणे काय करावा उपाव । ऐसा देई भाव पांडुरंगा ॥४॥
1067
काय धर्म नीत । तुम्हां शिकवावें हित ॥१॥ अवघें रचियेलें हेळा । लीळा ब्रम्हांड सकळा ॥ध्रु.॥ नाम महादेव । येथें निवडला भाव ॥२॥ तुका म्हणे वेळे । माझें तुम्हां कां न कळे ॥३॥
1068
काय धोविलें कातडें । काळकुट भीतरि कुडें ॥१॥ उगा राहें लोकभांडा । चाळविल्या पोरें रांडा ॥ध्रु.॥ घेसी बुंथी पानवथां । उगा च हालविसी माथा ॥२॥ लावूनि बैसे टाळी । मन इंद्रियें मोकळीं ॥३॥ हालवीत बैस माळा । विषयजप वेळोवेळां ॥४॥ तुका म्हणे हा व्यापार । नाम विठोबाचें सार ॥५॥
1069
काय धोविलें बाहेरी मन मळलें अंतरीं । गादलें जन्मवरीं असत्यकाटें काटलें ॥१॥ सांडी व्यापार दंभाचा शुद्ध करीं रे मन वाचा । तुझिया चित्तीचा तूं च ग्वाही आपुला ॥ध्रु.॥ पापपुण्यविटाळ देहीं भरितां न विचारिसी कांहीं । काय चाचपसी मही जी अखंड सोंवळी ॥२॥ कामक्रोधा वेगळा ऐसा होई कां सोंवळा । तुका म्हणे कळा गुंडुन ठेवीं कुसरी ॥३॥
1070
काय नव्हे करितां तुज । आतां राखें माझी लाज ॥१॥ मी तों अपराधाची राशी । शिखा अंगुष्ट तोंपाशीं ॥ध्रु.॥ त्राहें त्राहें त्राहें । मज कृपादृष्टी पाहें ॥२॥ तुका म्हणे देवा । सत्या घ्यावी आतां सेवा ॥३॥
1071
काय नव्हे केलें । एका चिंतितां विठ्ठलें ॥१॥ सर्व साधनांचें सार । भवसिंधु उतरी पार ॥ध्रु.॥ योगायागतपें । केलीं तयानें अमुपें ॥२॥ तुका म्हणे जपा । मंत्र तीं अक्षरी सोपा ॥३॥
1072
काय नव्हेसी तूं एक । देखों कासया पृथक ॥१॥ मुंग्या कैंचे मुंगळे । नटनाट्य तुझे चाळे ॥ध्रु.॥ जाली तरी मर्यादा । किंवा त्रासावें गोविंदा ॥२॥ तुका म्हणे साचा । कोठें जासी हृदयींचा ॥३॥
1073
काय नाहीं माझे अंतरीं वसति । व्यापक हा भूतीं सकळां नांदे ॥१॥ चत्तिासी प्रसाद होईंल चळण । तें चि तें वळण मनासही ॥ध्रु.॥ सर्व शक्ति जीवीं राहिल्या कुंटित । नाहीं केलें होत आपुलें तें ॥२॥ तुका म्हणे दोरी खांब सूत्र्या हातीं । नाचवी नाचती जडें तैसीं ॥३॥
1074
काय नाहीं माता गौरवीत बाळा । काय नाहीं लळा पाळीत ते ॥१॥ काय नाहीं त्याची करीत ते सेवा । काय नाहीं जीवा गोमटें तें ॥ध्रु.॥ अमंगळपणें कांटाळा न धरी । उचलोनि करीं कंठीं लावी ॥२॥ लेववी आपुले अंगें अळंकार । संतोषाये फार देखोनियां ॥३॥ तुका म्हणे स्तुति योग्य नाहीं परी । तुम्हां लाज थोरी अंकिताची ॥४॥
1075
काय नाहीं लवत झाडें । विसरे वेडें देहभाव ॥१॥ जया न फळे उपदेश । धस ऐसा त्या नांवें ॥ध्रु.॥ काय नाहीं असत जड । दगड तो अबोलणा ॥२॥ तुका म्हणे कुचर दाणा । तैसा म्हणा डेंग हा ॥३॥
1076
काय नेणों होता दावेदार मेला । वैर तो साधिला होउनि गोहो ॥१॥ किती सर्वकाळ सोसावें हें दुःख । किती लोकां मुख वासूं तरीं ॥ध्रु.॥ झवे आपुली आई काय माझें केलें । धड या विठ्ठलें संसाराचें ॥२॥ तुका म्हणे येती बाईले असडे । फुंदोनियां रडे हांसे कांहीं ॥३॥
1077
काय न्यून आहे सांगा । पांडुरंगा तुम्हांपें ॥१॥ आमुची तों न पुरे इच्छा । पिता ऐसा मस्तकीं ॥ध्रु.॥ कैसी तुम्हां होय सांडी । करुणा तोंडीं उच्चारें ॥२॥ आश्चर्य चि करी तुका । हे नायका वैकुंठिंचिया ॥३॥
1078
काय पाठविलें । सांगा भातुकें विठ्ठलें ॥१॥ आसे लागलासे जीव । काय केली माझी कींव ॥ध्रु.॥ फेडिलें मुडतर । किंवा कांहीं जरजर ॥२॥ तुका म्हणे सांगा । कैसें आर्त पांडुरंगा ॥३॥
1079
काय पाहतोसि कृपेच्या सागरा । नराच्या नरेंद्रा पांडुरंगा ॥१॥ नामाचा प्रताप ब्रिदाचा बडिवार । करावा साचार नारायणा ॥ध्रु.॥ कलीमाजी देव बौध्यरूप जाला । जगाचिया बोला लागूं नका ॥२॥ माय पुत्रा काय मारूं पाहे कळी । जगाची ढवाळी काय काज ॥३॥ तुका म्हणे या हो कृपेच्या सागरा । रुकुमादेवीवरा मायबापा ॥४॥
1080
काय पुण्य ऐसें आहे मजपाशीं । तांतडी धांवसी पांडुरंगा ॥१॥ काय ऐसा भक्त वांयां गेलों थोर । तूं मज समोर होसी वेगा ॥ध्रु.॥ काय कष्ट माझे देखिली चाकरी । तो तूं झडकरी पाचारिशी ॥२॥ कोण मी नांवाचा थोर गेलों मोटा । अपराधी करंटा नारायणा ॥३॥ तुका म्हणे नाहीं ठाउकें संचित । येणें जन्महित नाहीं केलें ॥४॥
1081
काय पुण्यराशी । गेल्या भेदूनि आकाशीं ॥१॥ तुम्ही जालेति कृपाळ । माझा केला जी सांभाळ ॥ध्रु.॥ काय वोळलें संचित । ऐसें नेणें अगणित ॥२॥ तुका म्हणे नेणें । काय केलें नारायणें ॥३॥
1082
काय पोरें जालीं फार । किंवा न साहे करकर ॥१॥ म्हणऊनि केली सांडी । घांस घेऊं न ल्हां तोंडीं ॥ध्रु.॥ करूं कलागती । तुज भांडणें भोंवतीं ॥२॥ तुका म्हणे टांचें । घरीं जालेंसे वरोचें ॥३॥
1083
काय फार जरी जालों मी शाहाणा । तरी नारायणा नातुडसी ॥१॥ काय जालें जरी मानी मज मन । परि नातुडति चरण तुझे देवा ॥ध्रु.॥ काय जालें जरी जालों उदासीन । परि वर्म भिन्न तुझें देवा ॥२॥ काय जालें जरी केले म्यां सायास । म्हणवितों दास भक्त तुझा ॥३॥ तुका म्हणे तुज दाविल्यावांचून । तुझें वर्म कोण जाणे देवा ॥४॥
1084
काय बा करिशी सोवळें ओवळें । मन नाहीं निर्मळ वाउगें चि ॥१॥ काय बा करीसी पुस्तकांची मोट । घोकितां हृदयस्फोट हाता नये ॥ध्रु.॥ काय बा करीसी टाळ आणि मृदंग । जेथें पांडुरंग रंगला नाहीं ॥२॥ काय बा करीसी ज्ञानाचिया गोष्टी । करणी नाहीं पोटीं बोलण्याची ॥३॥ काय बा करीसी दंभलौकिकातें । हित नाहीं मातें तुका म्हणे ॥४॥
1085
काय बोलों सांगा । याउपरी पांडुरंगा ॥१॥ कांहीं आधारावांचून । पुढें न चले वचन ॥ध्रु.॥ वाढे ऐसा रस । कांहीं करावा सौरस ॥२॥ भक्तिभाग्यसीमा । द्यावा जोडोनियां प्रेमा ॥३॥ कोरड्या उत्तरीं । नका गौरवूं वैखरी ॥४॥ करी विज्ञापना । तुका प्रसादाची दाना ॥५॥
1086
काय मज एवढा भार । हे वेव्हार चाळवाया ॥१॥ उकल तो जाणे धणी । मज भोजनीं कारण ॥ध्रु.॥ चिंता ज्याची तया शिरीं । लेंकरीं तें खेळावें ॥२॥ तुका म्हणे सेवट झाल । देव या बोला भोगिता ॥३॥
1087
काय मागावें कवणासी । ज्यासी मागों तो मजपाशीं ॥१॥ जरी मागों पद इंद्राचें । तरी शाश्वत नाहीं त्याचें ॥ध्रु.॥ जरी मागों ध्रुवपद । तरी त्यासी येथील छंद ॥२॥ स्वर्गभोग मागों पूर्ण । पुण्य सरल्या मागुती येणें ॥३॥ आयुष्य मागों चिरंजीव । जीवा मरण नाहीं स्वभावें ॥४॥ तुका म्हणे एक मागें । एकपणे नाहीं भंग ॥५॥
1088
काय मागें आम्ही गुंतलों काशानीं । पुढें वाहों मनीं धाक देवा ॥१॥ कीर्ति चराचरीं आहे तैसी आहे । भेटोनियां काय घ्यावें आम्हां ॥ध्रु.॥ घेउनी धरणें बैसती उपवासी । हट आम्हांपासीं नाहीं तैसा ॥२॥ तातडी तयांनीं केली विटंबणा । आम्हां नारायणा काय उणें ॥३॥ नाहीं मुक्तिचाड वास वैकुंठींचा । जीव भाव आमुचा देऊं तुज ॥४॥ तुका म्हणे काय मानेल तें आतां । तूं घेई अनंता सर्व माझें ॥५॥
1089
काय माझा पण होईंल लटिका । ब्रिदावळी लोकां दाविली ते ॥१॥ खरी करूनियां देई माझी आळी । येऊनि कृवाळी पांडुरंगे ॥ध्रु.॥ आणीक म्यां कोणा म्हणवावें हातीं । नये काकुलती दुजियासी ॥२॥ तुका म्हणे मज येथें चि ओळखी । होईंन तो सुखी पायांनीं च ॥३॥
1090
काय माझी संत पाहाती जाणीव । सर्व माझा भावत्यांचे पायीं ॥१॥ कारण सरतें करा पांडुरंगीं । भूषणाची जगीं काय चाड ॥ध्रु.॥ बोबडा उत्तरीं म्हणें हरिहरि । आणीक भीकारी नेणें दुजें ॥२॥ तुका म्हणे तुम्ही विठ्ठलाचे दास । करितों मी आस उच्छिष्टाची॥३॥
1091
काय माझें नेती वाईंट म्हणोन । करूं समाधान कशासाटीं ॥१॥ काय मज लोक नेती परलोका । जातां कोणा एका निवारेल ॥ध्रु.॥ न म्हणें कोणासी उत्तम वाईंट । सुखें माझी कूट खावो मागें ॥२॥ सर्व माझा भार असे पांडुरंगा । काय माझें जगासवें काज ॥३॥ तुका म्हणे माझें सर्व ही साधन । नामसंकीर्त्तन विठोबाचें ॥४॥ देवांनीं स्वामींस चिंचवडास नेलें होतें ते अभंग, आरत्या ॥ १३ ॥
1092
काय माता विसरे बाळा । कळवळा प्रीतीचा ॥१॥ आवडीनें गळां मिठी । घाली उठी बैसवी ॥ध्रु.॥ लावूं धांवे मुख स्तना । नये मना निराळें ॥२॥ भावंडाचें भातें दावी । आपुलें लावी त्यास जी ॥३॥ माझें थोडें त्याचें फार । उत्तर हें वाढवी ॥४॥ तुका म्हणे नारायणा । तुम्ही जाणां बुझावूं ॥५॥
1093
काय मी अन्यायी तें घाला पालवीं । आणीक वाट दावीं चालावया ॥१॥ माग पाहोनियां जातों ते च सोयी । न वजावें कायी कोण सांगा ॥ध्रु.॥ धोपट मारग लागलासे गाढा । मज काय पीडा करा तुम्ही ॥२॥ वारितां ही भय कोण धरी धाक । परी तुम्हां एक सांगतों मी ॥३॥ तुका म्हणे शूर दोहीं पक्षीं भला । मरतां मुक्त जाला मान पावे ॥४॥
1094
काय मी उद्धार पावेन । काय कृपा करील नारायण । ऐसें तुम्ही सांगा संतजन । करा समाधान चित्त माझें ॥१॥ काय हें खंडईल कर्म । पारुषतील धर्माधर्म । कासयानें तें कळे वर्म । म्हणउनी श्रम वाटतसे ॥ध्रु.॥ काय हो स्थिर राहेल बुद्धी । कांहीं अरिष्ट न येल मधीं । धरिली जाईल ते शुद्धी । शेवट कधीं तो मज न कळे ॥२॥ काय ऐसें पुण्य होईल गांठीं । घालीन पायीं देवाचे मिठी । मज तो कृवाळील जगजेठी । दाटइन कंठीं सद्गदित ॥३॥ काय हे निवतील डोळे । सुख तें देखोनी सोहळे । संचित कैसें तें न कळे । होतील डोहळे वासनेसी ॥४॥ ऐसी चिंता करीं सदा सर्वकाळ । रात्रिदिवस तळमळ । तुका म्हणे नाहीं आपुलें बळ । जेणें फळ पावें निश्चयेंसी ॥५॥
1095
काय मी जाणता । तुम्हांहुनि अनंता ॥१॥ जो हा करूं अतिशय । कां तुम्हां दया नये ॥ध्रु.॥ काय तुज नाहीं कृपा । विश्वाचिया मायबापा ॥२॥ तुका म्हणे वाणी । माझी वदे तुम्हांहुनि ॥३॥
1096
काय म्यां मानावें हरिकथेचें फळ । तरिजे सकळ जनीं ऐसें ॥१॥ उच्छेद तो असे हा गे आरंभला । रोकडें विठ्ठला परचक्र ॥ध्रु.॥ पापाविण नाहीं पाप येत पुढें । साक्षसी रोकडें साक्ष आलें ॥२॥ तुका म्हणे जेथें वसतील दास । तेथें तुझा वास कैसा आतां ॥३॥
1097
काय या संतांचे मानूं उपकार । मज निरंतर जागविती ॥१॥ काय देवा यांसि व्हावें उतराई । ठेवितां हा पायीं जीव थोडा ॥ध्रु.॥ सहज बोलणें हित उपदेश । करूनि सायास शिकविती ॥२॥ तुका म्हणे वत्स धेनुचिया चित्तीं । तैसें मज येती सांभाळित ॥३॥
1098
काय लवण कळिकेविण । एके क्षीण सागरा ॥१॥ मां हे येवढी अडचण । नारायणीं मजविण ॥ध्रु.॥ कुबेरा अटाहासे जोडी । काय कवडी कारणें ॥२॥ तुका म्हणे काचमणि । कोण गणी भांडारी ॥३॥
1099
काय वांचोनियां जालों भूमिभार । तुझ्या पायीं थार नाहीं तरि ॥१॥ जातां भलें काय डोळियांचें काम । जरि पुरुषोत्तम न देखती ॥ध्रु.॥ काय मुख बळि श्वापदाचे धांव । नित्य तुझें नांव नुच्चारितां ॥२॥ तुका म्हणे पैं या पांडुरंगाविण । न वचे चि क्षण जीव भला ॥३॥
1100
काय वाणूं आतां न पुरे हे वाणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥ थोरींव सांडिली आपुली परिसें । नेणे सिवों कैसें लोखंडासी ॥ध्रु.॥ जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति । देह कष्टविती उपकारें ॥२॥ भूतांची दया हे भांडवल संतां । आपुली ममता नाहीं देहीं ॥३॥ तुका म्हणे सुख पराविया सुखें । अमृत हें मुखें जरवतसे ॥४॥
1101
काय विनवावें कोणें तो निवाड । केलें माझ्या कोड वचनाचें ॥१॥ आहो कृपनिधी गुणांच्या निधाना । माझ्या अनुमाना नये चि हें ॥ध्रु.॥ बहुत करुणा केलेंसे भासेन । एक ही वचन नाहीं आलें ॥२॥ माझी कांहीं सेवा होईंल पावली । निश्चिंती मानिली होती ऐसी ॥३॥ तुका म्हणे माझी उरली ते आटी । अभय कर कटी न देखें चि ॥४॥
1102
काय विरक्ति कळे आम्हां । जाणों एका नामा विठोबाच्या ॥१॥ नाचों सुखें वैष्णवमेळीं । टाळघोळीं आनंदें ॥ध्रु.॥ शांति क्षमा दया मी काय जाणें । गोविंद कीर्तनेंवांचूनियां ॥२॥ कासया उदास असों देहावरी । अमृतसागरीं बुडोनियां ॥३॥ कासया एकांत सेवूं तया वना । आनंद तो जनामाजी असे ॥४॥ तुका म्हणे आम्हां ऐसा भरवसा । विठ्ठल सरसा चालतसे ॥५॥
1103
काय वृंदावन मोहियेलें गुळें । काय जिरें काळें उपचारिलें ॥१॥ तैसी अधमाची जाती च अधम । उपदेश श्रम करावा तो ॥ध्रु.॥ न कळे विंचासी कुरवाळिलें अंग । आपले ते रंग दावीतसे ॥२॥ तुका म्हणे नये पाकासी दगड । शूकरासी गोड जैसी विष्ठा ॥३॥
1104
काय शरीरापें काम । कृपा साधावया प्रेम । उचिताचे धर्म । भागा आले ते करूं ॥१॥ देईन हाक नारायणा । तें तों नाकळे बंधना । पंढरीचा राणा । आइकोन धांवेल ॥ध्रु.॥ सातांपांचांचें गोठलें । प्रारब्धें आकारलें । आतां हें संचलें । असो भोगा सांभाळीं ॥२॥ फावली ते बरवी संधि । सावधान करूं बुद्धी । तुका म्हणे मधीं । कोठें नेघें विसावा ॥३॥
1105
काय सर्प खातो अन्न । काय ध्यान बगाचें ॥१॥ अंतरींची बुद्धि खोटी । भरलें पोटीं वाईंट ॥ध्रु.॥ काय उंदीर नाहीं धांवीं । राख लावी गाढव ॥२॥ तुका म्हणे सुसर जळीं । काउळीं कां न न्हाती ॥३॥
1106
काय सांगों तुझ्या चरणांच्या सुखा । अनुभव ठाउका नाहीं तुज ॥१॥ बोलतां हें कैसें वाटे खरेपण । अमृताचे गुण अमृतासी ॥ध्रु.॥ आम्ही एकएका ग्वाही मायपुतें । जाणों तें निरुतें सुख दोघें ॥२॥ तुका म्हणे आम्हां मोक्षाचा कांटाळा । कां तुम्ही गोपाळा नेणां ऐसें ॥३॥
1107
काय सांगों या संतांचे उपकार । मज निरंतर जागविती ॥१॥ काय द्यावें त्यांचें व्हावें उतराईं । ठेवितां हा पायीं जीव थोडा ॥ध्रु.॥ सहज बोलणें हितउपदेश । करूनि सायास शिकविती ॥२॥ तुका म्हणे वत्स धेनुवेचा चित्तीं । तैसे मज येती सांभाळीत ॥३॥
1108
काय सांगों हृषीकेशा । आहे अनुताप आला ऐसा । गिळावासी निमिषा । निमिष लागों नेदावें ॥१॥ माझें बुडविलें घर । लेंकरें बाळें दारोदार । लाविलीं काहार । तारातीर करोनि ॥ध्रु.॥ जीव घ्यावा कीं द्यावा । तुझा आपुला केशवा । इतुकें उरलें आहे । भावाचिया निमित्यें ॥२॥ तुकयाबंधु म्हणें जग । बरें वाईंट म्हणो मग । या कारणें परी लाग । न संडावा सर्वथा ॥३॥
1109
काय साधनाच्या कोटी । केल्या आटी होती त्या ॥१॥ देव कृपा करी जरी । होय उजरी स्वरूपीं ॥ध्रु.॥ केले होते चिंता श्रम । उपरम न होतां ॥२॥ तुका म्हणे कळों आलें । सर्व जालें आपरूप ॥३॥
1110
काय साहतोसी फुका । माझा बुडविला रुका ॥१॥ रीण घराचें पांगिलें । तें न सुटे कांहीं केलें ॥ध्रु.॥ चौघांचिया मतें । आधीं खरें केलें होते ॥२॥ तुका म्हणे यावरी । आतां भीड कोण धरी ॥३॥
1111
काय सुख आहे वाउगें बोलतां । ध्यातां पंढरिनाथा कष्ट नाहीं ॥१॥ सर्वकाळ वाचे उच्चारितां हरि । तया सुखा सरि पाड नाहीं ॥ध्रु.॥ रामकृष्णरंगीं रसना रंगली । अमृताची उकळी नाम तुझें ॥२॥ तुका म्हणे धन्य तयाचें वदन । जया नारायण ध्यानीं मनीं ॥३॥
1112
काय ह्याचें घ्यावें । नित्य नित्य कोणें गावें ॥१॥ केलें हरिकथेनें वाज । अंतरोनी जाते निज ॥ध्रु.॥ काम संसार । अंतरीं हे करकर ॥२॥ तुका म्हणे हेंड । ऐसे मानिती ते लंड ॥३॥
1113
काया वाचा मनें श्रीमुखाची वास । आणीक उदास विचारासी ॥१॥ काय आतां मोक्ष करावा जी देवा । तुमचिया गोवा दर्शनासी ॥ध्रु.॥ केलिया नेमासी उभें ठाडें व्हावें । नेमलें तें भावें पालटेना ॥२॥ तुका म्हणे जों जों कराल उशीर । तों तों मज फार रडवील ॥३॥
1114
कायावाचामन ठेविलें गाहाण । घेतलें तुझें रिण जोडीलागीं ॥१॥ अवघें आलें आंत पोटा पडिलें थीतें । सारूनि निश्चिंत जालों देवा ॥ध्रु.॥ द्यावयासी आतां नाहीं तोळा मासा । आधील मवेशा तुज ठावी ॥२॥ तुझ्या रिणें गेले बहुत बांधोन । जाले मजहून थोरथोर ॥३॥ तुका म्हणे तुझे खतीं जें गुंतलें । करूनि आपुलें घेईं देवा ॥४॥
1115
कायावाचामनें जाला विष्णुदास । काम क्रोध त्यास बाधीतना ॥१॥ विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता । सकळ भोगिता होय त्याचें ॥२॥ तुका म्हणे चत्ति करावें निर्मळ । येऊनि गोपाळ राहे तेथें ॥३॥
1116
कारणापें असतां दृष्टी । शंका पोटीं उपजेना ॥१॥ शूर मिरवे रणांगणीं । मरणीं च संतोष ॥ध्रु.॥ पाहिजे तो कळवळा । मग बळा काय उणे ॥२॥ तुका म्हणे उदारपणें । काय उणें मनाचें ॥३॥
1117
कार्तिकीचा सोहळा । चला जाऊं पाहूं डोळां । आले वैकुंठ जवळां । सन्निध पंढरीये ॥१॥ पीक पिकलें घुमरी । प्रेम न समाये अंबरीं । अवघी मातली पंढरी । घरोघरीं सुकाळ ॥ध्रु.॥ चालती स्थिर स्थिर । गरुड टकयांचे भार । गर्जती गंभीर । टाळ श्रुति मृदंग ॥२॥ मळिालिया भद्रजाती । कैशा आनंदें डुलती । शूर उठावती । एका एक आगळे ॥३॥ नामामृत कल्लोळ । वृंदें कोंदलीं सकळ । आले वैष्णवदळ । कळिकाळ कांपती ॥४॥ आस करिती ब्रम्हादिक । देखुनि वाळवंटीचें सुख । धन्य धन्य मृत्युलोक । म्हणती भाग्याचे कैसे ॥५॥ मरण मुक वाराणसी । पितृॠण गया नासी । उधार नाहीं पंढरीसि । पायापाशीं विठोबाच्या ॥६॥ तुका म्हणे आतां । काय करणें आम्हां चिंता । सकळ सिद्धींचा दाता । तो सर्वथा नुपेक्षी ॥७॥
1118
कार्य चि कारण । तृष्णा पावविते सीण ॥१॥ काय करुनि ऐसा संग । सोसें चि तूं पांडुरंग ॥ध्रु.॥ रूपीं नाहीं गोडी । हांवें हांवें ऊर फोडी ॥२॥ तुका म्हणे पडे भारी । ऐशा वरदळाचे थोरी ॥३॥
1119
कालवूनि विष । केला अमृताचा नास ॥१॥ ऐशा अभाग्याच्या बुद्धि । सत्य लोपी नाहीं शुद्धि ॥ध्रु.॥ नाक कापुनि लावी सोनें । कोण अळंकार तेणें ॥२॥ तुका म्हणे बावी । मोडूनि मदार बांधावी ॥३॥
1120
काल्याचिये आसे । देव जळीं जाले मासे । पुसोनियां हांसे । टिरीसांगातें हात ॥१॥ लाजे त्यासि वांटा नाहीं । जाणे अंतरीचें तें ही । दीन होतां कांहीं । होऊं नेदी वेगळें ॥ध्रु.॥ उपाय अपाय यापुढें । खोटे निवडितां कुडे । जोडुनियां पुढें । हात उभे नुपेक्षी ॥२॥ तें घ्या रे सावकाशें । जया फावेल तो तैसें । तुका म्हणे रसें । प्रेमाचिया आनंदें ॥३॥
1121
काळ जवळि च उभा नेणां । घाली झांपडी खुंटी कानां ॥१॥ कैसा हुशार सावध राहीं । आपुला तूं अपुलेठायीं ॥ध्रु.॥ काळ जवळिच उभा पाहीं । नेदी कोणासि देऊं कांहीं ॥२॥ काळें पुरविली पाठी । वरुषें जालीं तरी साठी ॥३॥ काळ भोंवताला भोंवे । राम येऊं नेदी जिव्हे ॥४॥ तुका म्हणे काळा । कर्म मळितें तें जाळा ॥५॥
1122
काळ सारावा चिंतनें । एकांतवासीं गंगास्नानें । देवाचें पूजन । प्रदक्षणा तुळसीच्या ॥१॥ युक्त आहार वेहार । नेम इंद्रियांचा सार । नसावी वासर । निद्रा बहु भाषण ॥ध्रु.॥ परमार्थ महाधन । जोडी देवाचे चरण । व्हावया जतन । हे उपाय लाभाचे ॥२॥ देह समर्पिजे देवा । भार कांहीं च न घ्यावा । होईल आघवा । तुका म्हणे आनंद ॥३॥
1123
काळ सार्थक केला त्यांणी । धरिला मनीं विठ्ठल ॥१॥ नाम वाचे श्रवण कीर्ति । पाउलें चित्ती समान ॥ध्रु.॥ कीर्तनाचा समारंभ । निर्दंभ सर्वदा ॥२॥ तुका म्हणे स्वरूपसिद्धि । नित्य समाधि हरिनामीं ॥३॥
1124
काळतोंडा सुना । भलतें चोरुनि करी जना ॥१॥ धिग त्याचें साधुपण । विटाळुनि वर्ते मन ॥ध्रु.॥ मंत्र ऐसे घोकी । वश व्हावें जेणें लोकीं ॥२॥ तुका म्हणे थीत । नागवला नव्हे हित ॥३॥
1125
काळयाचे मागे चेंडु पत्नीपाशीं । तेजःपुंज राशी देखियेला ॥१॥ लावण्यपूतळा मुखप्रभाराशी । कोटि रवि शशी उगवले ॥२॥ उघवला खांब कर्दळीचा गाभा । ब्रीदें वांकी नभा देखे पायीं ॥३॥ पाहिला सकळ तिनें न्याहाळूनि । कोण या जननी विसंबली ॥४॥ विसरु हा तीस कैसा याचा जाला । जीवाहुनि वाल्हा दिसतसे ॥५॥ दिसतसे रूप गोजिरें लाहान । पाहातां लोचन सुखावले ॥६॥ पाहिलें पर्तोनि काळा दुष्टाकडे । मग म्हणे कुडें जालें आतां ॥७॥ आतां हा उठोनि खाईंल या बाळा । देईंल वेल्हाळा माय जीव ॥८॥ जीव याचा कैसा वांचे म्हणे नारी । मोहिली अंतरीं हरिरूपें ॥९॥ रूपे अनंताचीं अनंतप्रकार । न कळे साचार तुका म्हणे ॥१०॥
1126
काळा च सारिखीं वाहाती क्षेत्रें । करितां दुसरें फळ नाहीं ॥१॥ ऐसें करत्यानें ठेविलें करून । भरिलें भरून माप नेमें॥ध्रु.॥ शीतउष्णकाळीं मेघ वरुषावे । वरुषतां वाव होय शीण ॥२॥ तुका म्हणे विष अमृताचे किडे । पालट न घडे जीणें तया ॥३॥
1127
काळाचिया सत्ता ते नाहीं घटिका । पंढरीनायका आठवितां ॥१॥ सदाकाळ गणना करी आयुष्याची । कथेचे वेळेची आज्ञा नाहीं ॥ध्रु.॥ याकारणें माझ्या विठोबाची कीर्ति । आहे हे त्रिजगतीं थोर वाट ॥२॥ तुका म्हणे जन्मा आलियाचें फळ । स्मरावा गोपाळ तें चि खरें ॥३॥
1128
काळाचे ही काळ । आम्ही विठोबाचे लडिवाळ ॥१॥ करूं सत्ता सर्वां ठायी । वसों निकटवासें पायीं ॥ध्रु.॥ ऐसी कोणाची वैखरी । वदे आमुचे समोरी ॥२॥ तुका म्हणे बाण । हातीं हरिनाम तीक्ष्ण ॥३॥
1129
काळावरि घालूं तरि तो सरिसा । न पुरतां इच्छा दास कैसे ॥१॥ आतां नाहीं कांहीं उसिराचें काम । न खंडावें प्रेम नारायणा ॥ध्रु.॥ देणें लागे मग विलंब कां आड । गोड तरि गोड आदि अंत ॥२॥ तुका म्हणे होइल दरुषणें निश्चिंती । गाईंन तें गीतीं ध्यान मग ॥३॥
1130
काळावरी सत्ता । ऐशा करितो वारता ॥१॥ तो मी हीणाहूनि सांडें । देवे दुर्हे काळतोंडें ॥ध्रु.॥ मानूनी भर्वसा । होतों दासा मी ऐसा ॥२॥ तुका म्हणे मान । गेलों वाढवूं थोरपण ॥३॥
1131
काळिया नाथूनि आला वरी । पैल हरी दाखविती ॥१॥ दुसरिया भावें न कळे कोणा । होय नव्हेसा संदेह मना ॥ध्रु.॥ रूपा भिन्न पालट जाला । गोरें सांवळेंसा पैं देखिला ॥२॥ आश्वासीत आला करें । तुका खरें म्हणे देव ॥३॥
1132
काळें खादला हा अवघा आकार । उत्पित्तसंहारघडमोडी ॥१॥ वीज तो अंकुर आच्छादिला पोटीं । अनंता सेवटीं एकाचिया ॥२॥ तुका म्हणे शब्दें व्यापिलें आकाश । गुढार हें तैसें कळों नये ॥३॥
1133
काळोखी खाऊन कैवाड केला धीर । आपुलिया हितें जाले जनामध्यें शूर ॥१॥ कां रें तुम्ही नेणां कां रे तुम्ही नेणां । अल्पसुखासाटीं पडशी विपत्तीचे घाणां ॥ध्रु.॥ नाहीं ऐसी लाज काय तयांपें आगळें । काय नव्हे केलें आपुलिया बळें ॥२॥ तुका म्हणे तरी सुख अवघें चि बरें । जतन करून हे आपुलालीं ढोरें ॥३॥
1134
कावळ्याच्या गळां मुक्ताफळमाळा । तरी काय त्याला भूषण शोभे ॥१॥ गजालागीं केला कस्तुरीचा लेप । तिचें तो स्वरूप काय जाणे ॥ध्रु.॥ बकापुढें सांगे भावार्थे वचन । वाउगा चि सीण होय त्यासी ॥२॥ तुका म्हणे तैसे अभाविक जन । त्यांसी वांयां सीण करूं नये ॥३॥
1135
काविळयासी नाहीं दया उपकार । काळिमा अंतर विटाळसें ॥१॥ तैसें कुधनाचें जिणें अमंगळ । घाणेरी वोंगळ वदे वाणी ॥ध्रु.॥ कडु भोंपळ्याचा उपचारें पाक । सेविल्या तिडीक कपाळासी ॥२॥ तुका म्हणे विष सांडूं नेणे साप । आदरें तें पाप त्याचे ठायीं ॥३॥
1136
काशासाटीं बैसों करूनियां हाट । वाउगा बोभाट डांगोरा हा ॥१॥ काय आलें एका जिवाच्या उद्धारें । पावशी उच्चारें काय हो तें ॥ध्रु.॥ नेदी पट परी अन्नें तों न मरी । आपुलिये थोरीसाटीं राजा ॥२॥ तुका म्हणे आतां अव्हेरिलें तरी । मग कोण करी दुकान हा ॥३॥
1137
काशासाठीं आम्ही जाळिला संसार । न करा विचार ऐसा देवा ॥१॥ कैसें नेणों तुम्हां करवतें उदास । माझा प्रेमरस भंगावया ॥ध्रु.॥ समर्पूनि ठेलों देह हा सकळ । धरितां विटाळ न लजा माझा ॥२॥ तुका म्हणे अवघी मोकलूनि आस । फिरतों उदास कोणासाटीं ॥३॥
1138
काशीयात्रा पांच द्वारकेच्या तीन । पंढरीची जाण एक यात्रा ॥१॥ काशी देह विटंबणें द्वारकें जाळणें । पंढरीशी होणें ब्रम्हरूप ॥ध्रु.॥ अठरापगडयाती सकळ हि वैष्णव । दुजा नाहीं भाव पंढरीसि ॥२॥ तुका म्हणे असो अथवा नसो भाव । दर्शनें पंढरिराव मोक्ष देतो ॥३॥
1139
कास घालोनी बळकट । झालों कळिकाळासी नीट । केली पायवाट । भवसिंधूवरूनि ॥१॥ या रे या रे लाहान थोर । याति भलते नारीनर । करावा विचार । न लगे चिंता कोणासी ॥ध्रु.॥ कामी गुंतले रिकामे । जपी तपी येथें जमे । लाविले दमामे । मुक्त आणि मुमुक्षा ॥२॥ एकंदर शिका । पाठविला इहलोका । आलों म्हणे तुका । मी नामाचा धारक ॥३॥
1140
कासया करावे तपाचे डोंगर । आणीक अपार दुःखरासी॥१॥ कासया फिरावे अनेक ते देश । दावितील आस पुढें लाभ ॥ध्रु.॥ कासया पुजावीं अनेक दैवतें । पोटभरे तेथें लाभ नाहीं ॥२॥ कासया करावे मुक्तीचे सायास । मिळे पंढरीस फुका साटीं ॥३॥ तुका म्हणे करीं कीर्तन पसारा । लाभ येईंल घरा पाहिजे तो ॥४॥
1141
कासया गा मज घातलें संसारीं । चत्ति पायांवरी नाहीं तुझ्या ॥१॥ कासया गा मज घातलें या जन्मा । नाहीं तुझा प्रेमा नित्य नवा ॥ध्रु.॥ नामाविण माझी वाचा अमंगळ । ऐसा कां चांडाळ निमिऩयेलें ॥२॥ तुका म्हणे माझी जळो जळो काया । विठ्ठला सखया वांचूनियां ॥३॥
1142
कासया गुणदोष पाहों आणिकांचे । मज काय त्यांचें उणें असे ॥१॥ काय पापपुण्य पाहों आणिकांचें । मज काय त्यांचें उणें असें ॥ध्रु.॥ नष्टदुष्टपण कवणाचें वाणू । तयाहून आनु अधिक माझें ॥२॥ कुचर खोटा मज कोण असे आगळा । तो मी पाहों डोळां आपुलिये ॥३॥ तुका म्हणे मी भांडवलें पुरता । तुजसी पंढरिनाथा लावियेलें ॥४॥
1143
कासया जी ऐसा माझे माथां ठेवा । भार तुम्ही देवा संतजन ॥१॥ विचित्र विंदानी नानाकळा खेळ । नाचवी पुतळे नारायण ॥ध्रु.॥ काय वानरांची अंगींची ते शक्ति । उदका तरती वरी शिळा ॥२॥ तुका म्हणे करी निमित्य चि आड । चेष्टवूनि जड दावी पुढें ॥३॥
1144
कासया या लोभें केलें आर्तभूत । सांगा माझें चित्त नारायणा ॥१॥ चातकाचे परी एक चि निर्धार । लक्षभेदीतीर फिरों नेणे ॥ध्रु.॥ सांवळें रूपडें चतुर्भुज मूर्ति । कृष्णनाम चित्तीं संकल्प हा ॥२॥ तुका म्हणे करीं आवडीसी ठाव । नको माझा भाव भंगों देऊं ॥३॥
1145
कासया लागला यासी चौघाचार । मुळींचा वेव्हार निवडिला ॥१॥ ग्वाही बहुतांची घालूनियां वरि । महजर करीं आहे माझ्या ॥ध्रु.॥ तुम्हां वेगळा लागें आपल्या च ठायीं । होतें करुनि तें ही माझें माझें ॥२॥ भांडण सेवटीं जालें एकवट । आतां कटकट करूं नये ॥३॥ ठेविला ठेवा तो आला माझ्या हाता । आतां नाहीं सत्ता तुज देवा ॥४॥ तुका म्हणे वांयांविण खटपटा । राहिलों मी वांटा घेऊनियां ॥५॥
1146
कासया वांचूनि जालों भूमी भार । तुझ्या पायीं थार नाहीं तरी ॥१॥ जातां भलें काय डोळियांचें काम । जंव पुरुषोत्तम न देखती ॥ध्रु.॥ काय मुख पेंव श्वापदाचें धांव । नित्य तुझें नांव नुच्चारितां ॥२॥ तुका म्हणे आतां पांडुरंगाविण । न वांचतां क्षण जीव भला ॥३॥
1147
कासया व्हावें जीतांचि मुक्त । सांडुनियां थीतें प्रेमसुख ॥१॥ वैष्णवांचा दास जाला नारायण । काय त्या मिळोन असे काम ॥ध्रु.॥ काय त्या गांठीचें पडलें सुटोन । उगला चि बैसोन धीरु धरीं ॥२॥ सुख आम्हांसाटीं केलें हें निर्माण । निर्दैव तो कोण हाणे लाता ॥३॥ तुका म्हणे मज न लगे सायोज्यता । राहेन या संतां समागमें ॥४॥
1148
कासया हो माझा राखिला लौकिक । निवाड कां एक केला नाहीं ॥१॥ मग तळमळ न करितें मन । जालें तें कारण कळों येतें ॥२॥ तुका म्हणे केला पाहिजे निवाड । वइदासी भीड मरणें रोग्या ॥३॥
1149
कासयासि व्यर्थ घातलें संसारीं । होतें तैसें जरी तुझे चित्ती ॥१॥ तुझिये भेटीची थोर असे आस । दिसोनी निरास आली मज ॥ध्रु.॥ आतां काय जिणें जालें निरर्थक । वैकुंठनायक भेटे चि ना ॥२॥ आडलासि काय कृपेच्या सागरा । रकुमादेवीवरा सोइरिया ॥३॥ तुका म्हणे देई चरणाची सेवा । नुपेक्षीं केशवा मायबापा ॥४॥
1150
कासिया पाषाण पूजिती पितळ । अष्ट धातु खळ भावें विण ॥१॥ भाव चि कारण भाव चि कारण । मोक्षाचें साधन बोलियेलें ॥ध्रु.॥ काय करिल जपमाळा कंठमाळा । करिशी वेळोवेळां विषयजप ॥२॥ काय करिशील पंडित हे वाणी । अक्षराभिमानी थोर होय ॥३॥ काय करिशील कुशल गायन । अंतरीं मळीण कुबुद्धि ते ॥४॥ तुका म्हणे भाव नाहीं करी सेवा । तेणें काय देवा योग्य होशी ॥५॥
1151
कासियानें पूजा करूं केशीराजा । हा चि संदेह माझा फेडीं आतां ॥१॥ उदकें न्हाणूं तरी स्वरूप तुझें । तेथें काय माझें वेचे देवा ॥ध्रु.॥ गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ । तेथें मी दुर्बळ काय करूं ॥२॥ फळदाता तूंच तांबोल अक्षता । तरी काय आतां वाहों तुज ॥३॥ वाहूं दक्षिणा जरी धातु नारायण । ब्रम्ह तें चि अन्न दुजें काईं ॥४॥ गातां तूं ओंकार टाळी नादेश्वर । नाचावया थार नाहीं कोठें ॥५॥ तुका म्हणें मज अवघें तुझें नाम । धूप दीप रामकृष्णहरि ॥६॥
1152
काहे भुला धनसंपत्तीघोर । रामराम सुन गाउ हो बाप रे ॥ध्रु.॥ राजे लोक सब कहे तूं आपना । जब काल नहीं पाया ठाना ॥१॥ माया मिथ्या मनका सब धंदा । तजो अभिमान भजो गोविंदा ॥२॥ राना रंग डोंगरकी राईं । कहे तुका करे इलाहि ॥३॥
1153
काहे रोवे आगले मरना । गंव्हार तूं भुला आपना ॥ध्रु.॥ केते मालुम नहिं पडे । नन्हे बडे गये सो ॥१॥ बाप भाईं लेखा नहिं । पाछें तूं हि चलनार ॥२॥ काले बाल सिपत भये । खबर पकडो तुका कहे ॥३॥
1154
काहे लकडा घांस कटावे । खोद हि जुमीन मठ बनावे ॥१॥ देवलवासी तरवरछाया । घरघर माईं खपरिबसमाया ॥ध्रु.॥ कां छांडियें भार फेरे सीर भागें । मायाको दुःख मिटलिये अंगें ॥२॥ कहे तुका तुम सुनो हो सिद्धी । रामबिना और झुटा कछु धंदा ॥३॥
1155
किडा अन्नाचें मानुस । त्याचा म्हणविल्या दास ॥१॥ तें ही त्यासी उपेक्षीना । बोल आपुला सांडीना ॥ध्रु.॥ तो तूं नराचा नरेंद्र । तुजपासूनि इंद्र चंद्र ॥२॥ तुका म्हणे विश्वंभर । तुज वर्णी फणीवर ॥३॥
1156
किती उपदेश करावा खळासी । नावडे तयासी बरें कांहीं ॥१॥ शुद्ध हे वासना नाहीं चांडाळाची । होळी आयुष्याची केली तेणें ॥ध्रु.॥ नाहीं शुद्ध भाव नायके वचन । आपण्या आपण नाडियेलें ॥२॥ तुका म्हणे त्यासी काय व्याली रांड । करितो बडबड रात्रदिस ॥३॥
1157
किती एका दिसीं । बुद्धि जाली होती ऐसी ॥१॥ कांहीं करावें स्वहित । तों हें न घडे उचित ॥ध्रु.॥ अवलंबुनी भीक । लाज सांडिली लौकिक ॥२॥ तुका म्हणे दीन । जालों मनुष्यपणा हीन ॥३॥
1158
किती करूं शोक । पुढें वाढे दुःखें दुःख ॥१॥ आतां जाणसी तें करीं । माझें कोण मनीं धरी ॥ध्रु.॥ पुण्य होतें गांठी । तरि कां लागती हे आटी ॥२॥ तुका म्हणे बळ । माझी राहिली तळमळ ॥३॥
1159
किती चौघाचारें । येथें गोविलीं वेव्हारें ॥१॥ असे बांधविले गळे । होऊं न सकती निराळे ॥ध्रु.॥ आपलें आपण । केलें कां नाहीं जतन ॥२॥ तुका म्हणे खंडदंडें । येरझारीं लपती लंडें ॥३॥
1160
किती तुजपाशीं देऊं परिहार । जाणसी अंतर पांडुरंगा ॥१॥ आतां माझें हातीं देई हित । करीं माझें चित्ती समाधान ॥ध्रु.॥ राग आला तरी कापूं नये मान । बाळा मायेविण कोण दुजें ॥२॥ तुका म्हणे ऐसा होईंल लौकिक । मागे बाळ भीक समर्थाचें ॥३॥
1161
किती या काळाचा सोसावा वळसा । लागला सरिसा पाठोवाठीं ॥१॥ लक्ष चौर्याशीची करा सोडवण । रिघा या शरण पांडुरंगा ॥ध्रु.॥ उपजल्या पिंडा मरण सांगातें । मरतें उपजतें सवें चि तें ॥२॥ तुका म्हणे माळ गुंतली राहाटीं । गाडग्याची सुटी फुटलिया ॥३॥
1162
किती रांडवडे । घालूनि व्हाल रे बापुडे । संसाराचे भिडे । कासावीस जालेती ॥१॥ माझ्या स्वामी शरण रिघा । कृपाळुवा पांडुरंगा । ठेवी अंगसंगा । विश्वासियां जवळी ॥ध्रु.॥ कांहीं न मागतां भलें । होईंल तें चि काम केलें । नसावें आथिलें । कांहीं एका संकल्पें ॥२॥ तुका म्हणे भाव । पाववील ठायाठाव । एकविध जीव । ठेविलिया सेवेसी ॥३॥
1163
किती लाजिरवाणा । मरे उपजोनि शाहाणा ॥१॥ एका घाई न करीं तुटी । न निघें दवासोई भेटी ॥ध्रु.॥ सोसूनि आबाळी । घायाळ तें ढुंग चोळी ॥२॥ सावध करी तुका । म्हणे निजले हो आइका ॥३॥
1164
किती विवंचना करीतसें जीवीं । मन धांवडवी दाही दिशा ॥१॥ कोणा एका भावें तुम्ही अंगीकार । करावा विचार या च साटीं ॥ध्रु.॥ इतर ते आतां लाभ तुच्छ जाले । अनुभवा आले गुणागुण ॥२॥ तुका म्हणे लागो अखंड समाधि । जावें प्रेमबोधीं बुडोनियां ॥३॥
1165
किती वेळा खादला दगा । अझून कां जागसी ना ॥१॥ लाज नाहीं हिंडतां गांवें । दुःख नवें नित्य नित्य ॥ध्रु.॥ सवें चोरा हातीं फांसे । देखतां कैसे न देखसी ॥२॥ तुका म्हणे सांडिती वाट । तळपट करावया ॥३॥
1166
किती वेळां जन्मा यावें । नित्य व्हावें फजीत ॥१॥ म्हणऊनि जीव भ्याला । शरण गेला विठोबासी ॥ध्रु.॥ प्रारब्ध पाठी गाढें । न सरें पुढें चालत ॥२॥ तुका म्हणे रोकडीं हे । होती पाहें फजीती ॥३॥
1167
किती सांगों तरि नाइकति बटकीचे । पुढें सिंदळीचे रडतील ॥१॥ नका नका करूं रांडेची संगती । नेवोनी अधोपाती घालिल यम ॥२॥ तुका म्हणे जरी देवीं नाहीं चाड । हाणोनि थोबाड फोडिल यम ॥३॥
1168
किती सोसिती करंटीं । नेणों संसाराची आटी । सर्वकाळ पोटीं । चिंतेची हळहळ ॥१॥ रिकामिया तोंडें राम । काय उच्चारितां श्रम । उफराटा भ्रम । गोवी विषय माजिरा ॥ध्रु.॥ कळतां न कळे । उघडे झाकियेले डोळे । भरलें त्याचे चाळे । अंगीं वारें मायेचें ॥२॥ तुका म्हणे जन । ऐसें नांवबुद्धिहीन । बहुरंगें भिन्न । एकीं एक निमलें ॥३॥
1169
कीर्तन ऐकावया भुलले श्रवण । श्रीमुख लोचन देखावया ॥१॥ उदित हें भाग्य होईंल कोणे काळीं । चित्ती तळमळी म्हणऊनि ॥ध्रु.॥ उतावीळ बाह्या भेटिलागीं दंड । लोटांगणीं धड जावयासी ॥२॥ तुका म्हणे माथा ठेवीन चरणीं । होतील पारणी इंद्रियांची ॥३॥
1170
कीर्तन चांग कीर्तन चांग । होय अंग हरिरूप ॥१॥ प्रेमाछंदें नाचे डोले । हारपला देहभाव ॥ध्रु.॥ एकदेशीं जीवकळा । हा सकळां सोयरा ॥२॥ तुका म्हणे उरला देव । गेला भेव त्या काळें ॥३॥
1171
कीर्तनाचा विकरा मातेचें गमन । भाड खाईं धन विटाळ तो ॥१॥ हरिभक्ताचि माता हे हरिगुणकीर्ति । इजवर पोट भरिती चांडाळ ते ॥ध्रु.॥ अंत्यज हा ऐसें कल्पांतीं करीना । भाड हे खाईंना जननीची ॥२॥ तुका म्हणे त्याचें दर्शन ही खोटें । पूर्वजांसि नेटें नरका धाडी ॥३॥
1172
कीर्तनाची गोडी । देव निवडी आपण ॥१॥ कोणी व्हा रे अधिकारी । त्यासी हरि देईल ॥ध्रु.॥ वैराग्याचे बळें । साही खळ जिणावे ॥२॥ उरेल ना उरी । तुका करी बोभाट ॥३॥
1173
कीर्तनाच्या सुखें सुखी होय देव । पंढरीचा राव संगीं आहे ॥१॥ भक्त जाय सदा हरि कीर्ति गात । नित्यसेवें अनंत हिंडतसे ॥ध्रु.॥ त्रैलोक्य भ्रमण फिरत नारद । त्यासंगें गोविंद फिरतसे ॥२॥ नारद मंजुळ सुस्वरें गीत गाये । मार्गा चालताहे संगें हरि ॥३॥ तुका म्हणे त्याला गोडी कीर्तनाची । नाहीं आणिकांची प्रीति ऐसी ॥४॥
1174
कीविलवाणा जाला आतां । दोष करितां न विचारी ॥१॥ अभिळाषी नारी धन । झकवी जन लटिकें चि ॥ध्रु.॥ विश्वासिया करी घात । न धरी चित्ति कांटाळा ॥२॥ तुका म्हणे नाहीं आला । वृथा गेला जन्मासी ॥३॥
1175
कुंकवाची ठेवाठेवी । बोडकादेवी काशाला ॥१॥ दिवस गमा भरा पोट । कां गे नेटनेटावा ॥ध्रु.॥ दिमाख हा कोणां दावा । लटकी जीवा चरफड ॥२॥ तुका म्हणे झोंडगीं हो । फुंदा कां हो कोरडी ॥३॥
1176
कुंभ अवघा एक आवा । पाकीं एकीं गुफे डावा ॥१॥ ऐसे भिन्न भिन्न साटे । केले प्रारब्धानें वांटे ॥ध्रु.॥ हिरे दगड एक खाणी । कैचें विजातीसी पाणी ॥२॥ तुका म्हणे शिरीं । एक एकाची पायरी ॥३॥
1177
कुंभपाक लागे तयासि भोगणें । अवघा चि नेणे देव ऐसा ॥१॥ देव ऐसा ठावा नाहीं जया जना । तयासि यातना यमकरी ॥२॥ कळला हा देव तया साच खरा । गाईं वत्सें घरा धाडी ब्रम्हा ॥३॥ ब्रम्हादिकां ऐसा देव अगोचर । कैसा त्याचा पार जाणवेल ॥४॥ जाणवेल देव गौळियांच्या भावें । तुका म्हणे सेवे संचित हें ॥५॥
1178
कुचराचे श्रवण । गुणदोषांवरि मन ॥१॥ असोनियां नसे कथे । मूर्ख अभाग्य तें तेथें ॥ध्रु.॥ निरर्थक कारणीं । कान डोळे वेची वाणी ॥२॥ पापाचे सांगाती । तोंडीं ओढाळांचे माती ॥३॥ हिताचिया नांवें । वोस पडिले देहभावें ॥४॥ फजीत करूनि सांडीं । तुका करी बोडाबोडी ॥५॥
1179
कुटल्याविण नव्हे मांडा । अळसें धोंडा पडतसे ॥१॥ राग नको धरूं मनीं । गांडमणी सांगतों ॥ध्रु.॥ तरटापुढें बरें नाचे । सुतकाचें मुसळ ॥२॥ तुका म्हणे काठी सार । करी फार शाहाणें ॥३॥
1180
कुटुंबाचा केला त्याग । नाहीं राग जंव गेला ॥१॥ भजन तें वोंगळवाणें । नरका जाणें चुके ना ॥ध्रु.॥ अक्षराची केली आटी । जरी पोटीं संतनिंदा ॥२॥ तुका म्हणे मागें पाय । तया जाय स्थळासि ॥३॥
1181
कुतर्याऐसें ज्याचें जिणें । संग कोणी न करीजे ॥१॥ जाय तिकडे हाडहाडी । गोर्हावाडी च सोइरीं ॥ध्रु.॥ अवगुणांचा त्याग नाहीं । खवळे पाहीं उपदेशें ॥२॥ तुका म्हणे कैंची लवी । ठेंग्या केवीं अंकुर ॥३॥
1182
कुरंगीपाडस चुकलेसे वनीं । फुटे दुःखेंकरोनि हृदय त्याचें ॥१॥ तैसा परदेशी जालों तुजविण । नको हो निर्वाण पाहूं माझें ॥ध्रु.॥ अपराध्याच्या कोटि घालीं सर्व पोटीं । नको या शेवटीं उपेक्षूं गा ॥२॥ तुका म्हणे असों द्यावी माझी चिंता । कृपाळु अनंता पांडुरंगा ॥३॥
1183
कुरुवंडी करीन काया । वरोनि पायां गोजिरिया ॥१॥ बैसलें तें रूप डोळां । मन चाळा लागलें ॥ध्रु.॥ परतें न सरवे दुरि । आवडी पुरी बैसली ॥२॥ तुका म्हणे विसावलों । येथें आलों धणीवरि ॥३॥
1184
कुळधर्म ज्ञान कुळधर्म साधन । कुळधर्में निधान हातीं चढे ॥१॥ कुळधर्म भक्ति कुळधर्म गति । कुळधर्म विश्रांति पाववील ॥ध्रु.॥ कुळधर्म दया कुळधर्म उपकार । कुळधर्म सार साधनाचें ॥२॥ कुळधर्म महत्व कुळधर्म मान । कुळधर्म पावन परलोकींचें ॥३॥ तुका म्हणे कुळधर्म दावी देवीं देव । यथाविध भाव जरीं होय ॥४॥
1185
कुळींची हे कुळदेवी । केली ठावी संतांनीं ॥१॥ बरवें जालें शरण गेलों । उगविलों संकटीं ॥ध्रु.॥ आणिला रूपा ही बळें । करूनि खळें हरिदासीं ॥२॥ तुका म्हणे समागमें । नाचों प्रेमें लागलों ॥३॥
1186
कुळींचे दैवत ज्याचें पंढरीनाथ । होईंन दासीसुत त्याचे घरीं ॥१॥ शुद्ध यातिकुळवर्णा चाड नाहीं । करीं भलते ठायीं दास तुझा ॥ध्रु.॥ पंढरीस कोणी जाती वारेकरी । होईंन त्यांचे घरीं पशुयाति ॥२॥ विठ्ठलचिंतन दिवसरात्रीं ध्यान । होईंन पायतन त्याचे पायीं ॥३॥ तुळसीवृंदावन जयाचे अंगणीं । होइन केरसुणी त्याचे घरीं ॥४॥ तुका म्हणे हा चि भाव माझ्या चित्ती । नाहीं आणिकां गती चाड मज ॥५॥
1187
कुशळ गुंतले निषेधा । वादी प्रवर्तले वादा ॥१॥ कैसी ठकलीं बापुडीं । दंभविषयांचे सांकडीं ॥ध्रु.॥ भुस उपणुनि केलें काय । हारपले दोन्ही ठाय ॥२॥ तुका म्हणे लागे हातां । काय मथिलें घुसळितां ॥३॥
1188
कुशळ वक्ता नव्हे जाणीव श्रोता । राहे भाव चित्ता धरूनियां ॥१॥ धन्य तो जगीं धन्य तो जगीं । ब्रम्ह तया अंगीं वसतसे ॥ध्रु.॥ न धोवी तोंड न करी अंघोळी । जपे सदाकाळीं रामराम ॥२॥ जप तप ध्यान नेणे याग युक्ती । कृपाळु जो भूतीं दयावंत ॥३॥ तुका म्हणे होय जाणोनि नेणता । आवडे अनंता जीवाहूनि ॥४॥
1189
कृपा करावी भगवंतें । ऐसा शिष्य द्यावा मातें ॥१॥ माझें व्रत जो चालवी । त्यासि द्यावें त्वां पालवी ॥ध्रु.॥ व्हावा ब्रम्हज्ञानी गुंडा । तिहीं लोकीं ज्याचा झेंडा ॥२॥ तुका तुका हाका मारी । माझ्या विठोबाच्या द्वारीं ॥३॥
1190
कृपा करुनी देवा । मज साच तें दाखवा ॥१॥ तुम्ही दयावंत कैसे । कीर्ति जगामाजी वसे ॥ध्रु.॥ पाहोनियां डोळां । हातीं ओढवाल काळा ॥२॥ तुका म्हणे देवा । माझा करावा कुठावा ॥३॥
1191
कृपाळु भक्तांचा । ऐसा पति गोपिकांचा ॥१॥ उभा न पाचारितां दारीं । न संगतां काम करी ॥ध्रु.॥ भाव देखोनि निर्मळ । रजां वोडवी कपाळ ॥२॥ तुकयाबंधु म्हणे न भजा । कां रे ऐसा भोळा राजा ॥३॥
1192
कृपाळु म्हणोनि बोलती पुराणें । निर्धार वचनें यांचीं मज ॥१॥ आणीक उपाय नेणें मी कांहीं । तुझें वर्म ठायीं पडे तैसें ॥ध्रु.॥ नये धड कांहीं बोलतां वचन । रिघालों शरण सर्वभावें ॥२॥ कृपा करिसी तरि थोडें तुज काम । माझा तरि श्रम बहु हरे ॥३॥ तुका म्हणे मज दाखवीं श्रीमुख । हरेल या भूक डोळियांची ॥४॥
1193
कृपाळू सज्जन तुम्ही संतजन । हें चि कृपादान तुमचें मज ॥१॥ आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा । कींव माझी सांगा काकुलती ॥ध्रु.॥ अनाथ अपराधी पतिताआगळा । परि पायांवेगळा नका करूं ॥२॥ तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरि । मग मज हरि उपेक्षीना ॥३॥
1194
कृपावंत किती । दीनें बहु आवडती ॥१॥ त्यांचा भार वाहे माथां । करी योगक्षेमचिंता ॥ध्रु.॥ भुलें नेदी वाट । करीं धरूनि दावी नीट ॥२॥ तुका म्हणे जीवें । अनुसरतां एका भावें ॥३॥
1195
कृपावंता कोप न धरावा चित्ती । छळूं वक्रोक्ति स्तुती करूं ॥१॥ आम्ही तुझा पार काय जाणों देवा । नेणों कैसी सेवा करावी ते ॥ध्रुर्वो.॥ अनंता अरूपा अलक्षा अच्युता । निर्गुणा सचिता सवाौत्तमा ॥२॥ चांगलीं हीं नामें घेतलीं ठेवून । जालासी लाहान भक्तिकाजा ॥३॥ तुका म्हणे तुझ्या पायांवरी सदा । मस्तक गोविंदा असो माझा ॥४॥
1196
कृपावंता दुजें नाहीं तुम्हां पोटीं । लाडें बोलें गोठी सुख मातें ॥१॥ घेउनि भातुकें लागसील पाठी । लाविसील ओंठीं ब्रम्हरस ॥ध्रु.॥ आपुलिये पांख घालिसी पाखर । उदार मजवर कृपाळू तूं ॥२॥ तुका म्हणे आम्हांकारणें गोविंदा । वागविसी गदा सुदर्शन ॥३॥
1197
कृपावंतें हाक दिली सकळिकां । माजिया रे नका राहों कोणी ॥१॥ निघाले या भेणे पाउसाच्या जन । देखे गोवर्धन उचलिला ॥२॥ लाविले गोपाळ फेरीं चहूंकडे । हांसे काफुंदे रडे कोणी धाकें ॥३॥ धाकें हीं सकळ निघालीं भीतरी । उचलिला गिरी तयाखालीं ॥४॥ तयाखालीं गाईं वत्सें आलीं लोक । पक्षी सकळिक जीवजाति ॥५॥ जिहीं म्हणविलें हरीचे अंकित । जातीचे ते होत कोणी तरी ॥६॥ जाति कुळ नाहीं तयासि प्रमाण । अनन्या अनन्य तुका म्हणे ॥७॥
1198
कृपेचा ओलावा । दिसे वेगळा चि देवा ॥१॥ मी हें इच्छीतसें साचें । न लगे फुकटशाईं काचें ॥ध्रु.॥ जेणें जाय कळसा । पाया उत्तम तो तैसा ॥२॥ तुका म्हणे घरीं । तुझ्या अवघिया परी ॥३॥
1199
कृपेचे सागर हे साधुजन । तिंहीं कृपादान केलें मज ॥१॥ बोबडे वाणीचा केला अंगीकार । तेणें माझा स्थिर केला जीव ॥ध्रु.॥ तेणें सुखें मन स्थिर जालें ठायीं । संतीं दिला पायीं ठाव मज ॥२॥ नाभी नाभी ऐसें बोलिलों वचन । तें माझें कल्याण सर्वस्व ही ॥३॥ तुका म्हणे जालों आनंदनिर्भर । नाम निरंतर घोष करूं ॥४॥
1200
कृपेचें उत्तर देवाचा प्रसाद । आनंदीं आनंद वाढवावा ॥१॥ बहुतांच्या भाग्यें लागलें जाहाज । येथें आतां काज लवलाहें ॥ध्रु.॥ अलभ्य तें आलें दारावरी फुका । येथें आता चुका न पाहिजे ॥२॥ तुका म्हणे जिव्हाश्रवणाच्या द्वारें । माप भरा वरें सिगेवरि ॥३॥
1201
कृष्ण गातां गीतीं कृष्ण ध्यातां चित्ती । ते ही कृष्ण होती कृष्णध्यानें ॥१॥ आसनीं शयनीं भोजनीं जेवितां । म्हणारे भोगिता नारायण ॥ध्रु.॥ ओविये दळणीं गावा नारायण । कांडितां कांडण करितां काम ॥२॥ नर नारी याति हो कोणी भलतीं । भावें एका प्रीती नारायणा ॥३॥ तुका म्हणे एका भावें भजा हरी । कांति ते दुसरी रूप एक ॥४॥
1202
कृष्ण गोकुळीं जन्मला । दुष्टां चळकांप सुटला ॥१॥ होतां कृष्णाचा अवतार । आनंद करिती घरोघर ॥ध्रु.॥ प्रेम नाम वाचें गाती । सदा आनंदें नाचती ॥२॥ तुका म्हणे हरती दोष । आनंदानें करिती घोष ॥३॥
1203
कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता । बहिणी बंधु चुलता कृष्ण माझा ॥१॥ कृष्ण माझा गुरू कृष्ण माझें तारूं । उतरी पैल पारू भवनदीची ॥ध्रु.॥ कृष्ण माझें मन कृष्ण माझें जन । सोइरा सज्जन कृष्ण माझा ॥२॥ तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा । वाटे न करावा परता जीवा ॥३॥
1204
कृष्ण हा परिचारी कृष्ण हा वेव्हारी । कृष्ण घ्या वो नारी आणिकी म्हणे ॥१॥ म्हणे कृष्णाविण कैसें तुम्हां गमे । वळि हा करमे वांयांविण ॥२॥ वांयांविण तुम्हीं पिटीत्या चाकटी । घ्या गे जगजेठी क्षणभरी ॥३॥ क्षणभरी याच्या सुखाचा सोहळा । पहा एकवेळा घेऊनियां ॥४॥ याचें सुख तुम्हां कळलियावरि । मग दारोदारीं न फिराल ॥५॥ लटिकें हें तुम्हां वाटेल खेळणें । एका कृष्णाविणें आवघें चि ॥६॥ अवघ्यांचा तुम्हीं टाकाल सांगात । घेऊनि अनंत जाल राना ॥७॥ नावडे तुम्हांस आणीक बोलिलें । मग हें लागलें हरिध्यान ॥८॥ न करा हा मग या जीवा वेगळा । टोंकवाल बाळा आणिका ही ॥९॥ आणिका ही तुम्हा येती काकुलती । जवळी इच्छिती क्षण बैसों ॥१०॥ बैसों चला पाहों गोपाळाचें मुख। एकी एक सुख सांगतील ॥११॥ सांगे जंव ऐसी मात दसवंती । तंव धरिती चित्ती बाळा ॥१२॥ बाळा एकी घरा घेउनियां जाती । नाहीं त्या परती तुका म्हणे ॥१३॥
1205
कृष्णरामनाम मांडीं पां वोळी । तेणें होइल होळी पापा धुनी ॥१॥ ऐसा मना छंद लावीं रे अभ्यास । जया नाहीं नास ब्रम्हरसा ॥ध्रु.॥ जोडी तरी ऐसी करावी न सरे । पुढें आस नुरे मागुताली ॥२॥ तुका म्हणे ऐसें धरा कांहीं मनीं । यातायाती खाणीं चुकतील ॥३॥
1206
कृष्णांजनें जाले सोज्वळ लोचन । तेणें दिले वान निवडुनी ॥१॥ निरोपाच्या मापें करीं लडबड । त्याचें त्यानें गोड नारायणें ॥ध्रु.॥ भाग्यवंतांघरीं करितां विश्वासें । कार्य त्यासरिसें होईजेतें ॥२॥ तुका म्हणे पोट भरे बरे वोजा । निज ठाव निजा निजस्थानीं ॥३॥
1207
कृष्णाचिया सुखें भुक नाहीं तान । सदा समाधान सकळांचें ॥१॥ कळलें चि नाहीं जाले किती दिस । बाहेरिल वास विसरलीं ॥२॥ विसरु कामाचा तुका म्हणे जाला । उद्वेग राहिला जावें यावें ॥३॥
1208
केला अंगीकार पंढरीच्या देवें । आतां काय करिती काळ मशक मानवें ॥१॥ घातलीं बाहेर तीं भय होतें ज्यानें । बैसला आपण तेथें घालुनियां ठाणें ॥ध्रु.॥ लागों नेदी वारा दुजियाचा अंगासी । हा पुरता निर्धार कळों आला आम्हांसी ॥२॥ म्हणे तुकयाबंधु न लगे करावी चिंता । कोणेविशीं आतां बैसलों हस्तीवरी माथां ॥३॥
1209
केला कैवाड संतांच्या आधारें । अनुभवें खरें कळों आलें ॥१॥ काय जीवित्वाची धरुनियां आशा । व्हावें गर्भवासा पात्र भेणें ॥ध्रु.॥ अबाळीनें जावें निचिंतिया ठायां । रांडा रोटा वांयां करूं नये ॥२॥ तुका म्हणे बळी देतां तें निधान । भिकेसाटीं कोण राज्य देतो ॥३॥
1210
केला तैसा अंगीकार । माझा भार चालवीं ॥१॥ होऊं अंतराय बुद्धी । कृपानिधी नेदावी ॥ध्रु.॥ आम्ही तरी जड जीव । कैंचा भाव पुरता ॥२॥ अनन्यभावें घ्यावी सेवा । आम्हां देवा घडेसी ॥३॥ तुम्हीं आम्ही शरणागतें । कृपावंतें रक्षीजे ॥४॥ तुका म्हणे भाकुं कींव । असों जीव जड आम्ही ॥५॥
1211
केला पण सांडी । ऐसियासी म्हणती लंडी ॥१॥ आतां पाहा विचारून । समर्थासी बोले कोण ॥ध्रु.॥ आपला निवाड । आपणें चि करितां गोड ॥२॥ तुम्हीं आम्हीं देवा । बोलिला बोल सिद्धी न्यावा ॥३॥ आसे धुरे उणें । मागें सरे तुका म्हणे ॥४॥
1212
केला पुढें हरि अस्तमाना दिसा । मागें त्यासरिसे थाट चाले ॥१॥ थाट चाले गाईं गोपाळांची धूम । पुढें कृष्ण राम तयां सोयी ॥२॥ सोयी लागलिया तयांची अनंती । न बोलवितां येती मागें तया ॥३॥ तयांचिये चित्ती बैसला अनंत । घेती नित्यनित्य तें चि सुख ॥४॥ सुख नाहीं कोणा हरिच्या वियोगें । तुका म्हणे जुगें घडी जाय ॥५॥
1213
केला मातीचा पशुपति । परि मातीसि काय म्हणती । शिवपूजा शिवासी पावे । माती मातीमाजी सामावे ॥१॥ तैसे पूजिती आम्हां संत । पूजा घेतो भगवंत । आम्ही किंकर संतांचे दास । संतपदवी नको आम्हांस ॥ध्रु.॥ केला पाषाणाचा विष्णु । परी पाषाण नव्हे विष्णु । विष्णुपूजा विष्णुसि अर्पे । पाषाण राहे पाषाणरूपें ॥२॥ केली कांशाची जगदंबा । परि कांसें नव्हे अंबा । पूजा अंबेची अंबेला घेणें । कांसें राहे कांसेंपणें ॥३॥ ब्रम्हानंद पूर्णामाजी । तुका म्हणे केली कांजी । ज्याची पूजा त्याणें चि घेणें। आम्ही पाषाणरूप राहणें ॥४॥
1214
केला रावणाचा वध । अवघा तोडिला संबंध ॥१॥ लंकाराज्यें बिभीषणा । केली चिरकाळ स्थापना ॥ध्रु.॥ उदार्याची सीमा । काय वर्णू रघुरामा ॥२॥ तुका म्हणे माझा दाता । रामें सोडविली सीता ॥३॥
1215
केलियाचें दान । करा आपुलें जतन ॥१॥ माझी बुद्धि स्थिर देवा । नाहीं विषयांचा हेवा ॥ध्रु.॥ भावा अंतराय । येती अंतरती पाय ॥२॥ तुका म्हणे जोडी । आदीं अंतीं राहो गोडी ॥३॥
1216
केली कटकट गाऊं नाचों नेणतां । लाज नाहीं भय आम्हां पोटाची चिंता ॥१॥ बैसा सिणलेती पाय रगडूं दातारा । जाणवूं द्या वारा उब जाली शरीरा ॥ध्रु.॥ उशिरा उशीर किती काय म्हणावा । जननिये बाळका कोप कांहीं न धरावा ॥२॥ तुझिये संगतीं येऊं करूं कोल्हाळ । तुका म्हणे बाळें अवघीं मिळोन गोपाळ ॥३॥
1217
केली प्रज्ञा मनाशीं । तई मी दास सत्यत्वेशीं । नेईंन पायांपाशीं । स्वामी मूळ पंढरिये ॥१॥ तोंवरी हें भरीं पोट । केला तो मिथ्या बोभाट । नाहीं सांपडली वाट । सइराट फिरतसें ॥ध्रु.॥ ज्यावें आदराचें जिणें । स्वामी कृपा करी तेणें । पाळिल्या वचनें । सख्यत्वाचा अनुभव ॥२॥ घडे तैसें घडो आतां । मायबापाची सत्ता । तुका म्हणे चिंता । काय पाहें मारगा ॥३॥
1218
केली सलगी तोंडपिटी । आम्ही लडिवाळें धाकुटीं ॥१॥ न बोलावें तें चि आलें । देवा पाहिजे साहिलें ॥ध्रु.॥ अवघ्यांमध्यें एक वेडें । तें चि खेळविती कोडें ॥२॥ तुका म्हणे मायबापा । मजवरि कोपों नका ॥३॥
1219
केली सीताशुद्धी । मूळ रामायणा आधीं ॥१॥ ऐसा प्रतापी गहन । सुरां सकळ भक्तांचें भूषण ॥ध्रु.॥ जाऊनि पाताळा । केली देवाची अवकळा ॥२॥ राम लक्षुमण । नेले आणिले चोरून ॥३॥ जोडूनियां कर । उभा सन्मुख समोर ॥४॥ तुका म्हणे जपें । वायुसुता जाती पापें ॥५॥
1220
केली हार्णाळां अंघोळी । येऊनि बैसलों राउळीं॥१॥ अजिचें जाले भोजन । राम कृष्ण नारायण ॥२॥ तुकयाबंधु म्हणे नास । नाहीं कल्पांती जयास ॥३॥
1221
केलें तरी आता साच चि करावें । विचारिलें द्यावें कृपादान ॥१॥ संकल्पासी नाहीं बोलिला विकल्प । तुम्हां पुण्यपाप कळे देवा ॥ध्रु.॥ उदार शक्ति तंव तुमची भूमंडळीं । ऐसी ब्रिदावळी गर्जतसे ॥२॥ तुका म्हणे अहो रकुमादेवीवरा । उपरोध कां धरा माझा आतां ॥३॥
1222
केलें नाहीं मनीं तया घडे त्याग । उबगें उद्वेग नाहीं चित्ती ॥१॥ देव चि हा जाणे अंतरींचा भाव । मिथ्या तो उपाव बाह्य रंग ॥ध्रु.॥ त्यागिल्याचें ध्यान राहिलें अंतरीं । अवघी ते परी विटंबना ॥२॥ तुका म्हणे आपआपण्यां विचारा । कोण हा दुसरा सांगे तुम्हां ॥३॥
1223
केलें पाप जेणें दिलें आन्मोदन । दोघांसी पतन सारिके चि ॥१॥ विष नवनीता विष करी संगें । दुर्जनाच्या त्यागें सर्व हित ॥ध्रु.॥ देखिलें ओढाळ निघालिया सेता । टाळावें निमित्या थैक म्हुण ॥२॥ तुका म्हणे जोडे केल्याविण कर्म । देखतां तो श्रम न मानितां ॥३॥
1224
केलें शकुनें प्रयाण । आतां मागें फिरे कोण ॥१॥ होय तैसें होय आतां । देह बळी काय चिंता ॥ध्रु.॥ पडिलें पालवीं । त्याचा धाक वाहे जीवीं ॥२॥ तुका म्हणे जीणें । देवा काय हीनपणें ॥३॥
1225
केल्यापुरती आळी । कांहीं होते टाळाटाळी ॥१॥ सत्यसंकल्पाचें फळ । होतां न दिसे चि बळ ॥ध्रु.॥ दळणांच्या ओव्या । रित्या खरें मापें घ्याव्या ॥२॥ जातीं उखळें चाटूं । तुका म्हणे राज्य घाटूं ॥३॥
1226
केवढा तो अहंकार । माझा तुम्हां नव्हे दूर ॥१॥ आतां कोण पडे पायां । तुमच्या अहो पंढरिराया ॥ध्रु.॥ कां जी कृपेनें कृपण । वेचत असे ऐसें धन ॥२॥ तुका म्हणे देवें । दुजियाचें पोतें न्यावें ॥३॥
1227
कैं वाहावें जीवन । कैं पलंगीं शयन ॥१॥ जैसी जैसी वेळ पडे । तैसें तैसें होणें घडे ॥ध्रु.॥ कैं भौज्य नानापरी । कैं कोरड्या भाकरी ॥२॥ कैं बसावें वहनीं । कैं पायीं अन्हवाणी ॥३॥ कैं उत्तम प्रावणॉ । कैं वसनें तीं जीर्णे ॥४॥ कैं सकळ संपत्ती । कैं भोगणें विपत्ती ॥५॥ कैं सज्जनाशीं संग । कैं दुर्जनाशीं योग ॥६॥ तुका म्हणे जाण । सुख दुःख तें समान ॥७॥
1228
कैंचा मज धीर । कोठें बुद्धि माझी स्थिर ॥१॥ जें या मनासी आवरूं । आंत पोटीं वाव धरूं ॥ध्रु.॥ कैंची शुद्ध मति । भांडवल ऐसें हातीं ॥२॥ तुका म्हणे कोण दशा आली सांगा ॥३॥
1229
कैचें भांडवल खरा हातीं भाव । कळवळ्यानें माव दावीतसें ॥१॥ आतां माझा अंत नको सर्वजाणा । पाहों नारायणा निवडूनि ॥ध्रु.॥ संतांचें उच्छष्टि मागिले पंगती । करावें संगती लागे ऐसें ॥२॥ तुका म्हणे आलों दावूनि विश्वास । संचित तें नास पावे ऐसें ॥३॥
1230
कैवल्याच्या तुम्हां घरीं । रासी हरी उदंड ॥१॥ मजसाठीं कां जी वाणी । नव्हे धणी विभागा ॥ध्रु.॥ सर्वा गुणीं सपुरता । ऐसा पिता असोनी ॥२॥ तुका म्हणे पांडुरंगा । जालों सांगा सन्मुख ॥३॥
1231
कैसा कृपाळु हें न कळसी देवा । न बोलसी सेवा घेसी माझी ॥१॥ काय ऐसें बळ आहे तुजपाशीं । पाहों हा रिघेसी कोणा आड ॥ध्रु.॥ पाडियेला ठायीं तुझा थारा मारा । अवघा दातारा लपसी तो ॥२॥ आतां तुम्हां आम्हां उरी तों चि बरें । काय हें उत्तरें वाढवूनि ॥३॥ तुका म्हणे मज साहए झाले संत । म्हणऊनि मात फावली हे ॥४॥
1232
कैसा तीं देखिला होसील गोपाळीं । पुण्यवंतीं डोळीं नारायणा ॥१॥ तेणें लोभें जीव जालासे बराडी । आम्ही ऐशी जोडी कई लाभों ॥ध्रु.॥ असेल तें कैसें दर्शनाचें सुख । अनुभवें श्रीमुख अनुभवितां ॥२॥ तुका म्हणे वाटे देसी आलिंगन । अवस्था ते क्षणाक्षणां होते ॥३॥
1233
कैसा सिंदळीचा । नव्हे ऐसी ज्याची वाचा ॥१॥ वाचे नुच्चारी गोविंदा । सदा करी परनिंदा ॥ध्रु.॥ कैसा निरयगांवा । जाऊं न पवे विसावा ॥२॥ तुका म्हणे दंड । कैसा न पवे तो लंड ॥३॥
1234
कैसा होतो कृपावंत । बहुसंत सांगती । पुसणें नाहीं यातीकुळ । लागों वेळ नेदावा ॥१॥ ऐसी काय जाणों किती । उतरती उतरले ॥ध्रु.॥ दावी वैकुंठींच्या वाटा । पाहातां मोठा संपन्न । अभिमान तो नाहीं अंगी । भक्तालागी न बैसे ॥२॥ तुका म्हणे आळस निद्रा । नाहीं थारा त्या अंगीं । आलें द्यावें भलत्या काळें । विठ्ठल बळें आगळा ॥३॥
1235
कैसी करूं आतां सांग तुझी सेवा । शब्दज्ञानें देवा नाश केला ॥१॥ आतां तुझें वर्म न कळे अनंता । तुज न संगतां बुडूं पाहें ॥ध्रु.॥ संध्या स्नान केली आचाराची नासी । काय तयापासीं म्हणती एक ॥२॥ बुडविली भक्ती म्हणीते पाषाण । पिंडाचें पाळण स्थापुनियां ॥३॥ न करावी कथा म्हणती एकादशी । भजनाची नासी मांडियेली ॥४॥ न जावें देउळा म्हणती देवघरीं । बुडविलें या परी तुका म्हणे ॥५॥
1236
कैसी करूं तुझी सेवा । ऐसें सांगावें जी देवा । कैसा आणूं अनुभवा । होशी ठावा कैशापरी ॥१॥ कर्मभ्रष्ट माझें मन । नेणें जप तप अनुष्ठान । नाहीं इंिद्रयांसि दमन । नव्हे मन एकविध ॥ध्रु.॥ नेणे यातीचा आचार । नेणें भक्तीचा विचार । मज नाहीं संतांचा आधार । नाहीं स्थिर बुद्धि माझी ॥२॥ न सुटे मायाजाळ । नाहीं वैराग्याचें बळ । न जिंकवती सबळ । काम क्रोध शरीरीं ॥३॥ आतां राख कैसें तरि । मज नुपेक्षावें हरी । तुझीं ब्रिदें चराचरीं । तैसीं साच करीं तुका म्हणे ॥४॥
1237
कैसीं दिसों बरीं । आम्ही आळवितां हरि ॥१॥ नाहीं सोंग अळंकार । दास जाला संवसार ॥ध्रु.॥ दुःख आम्हां नाहीं चिंता । हरिचे दास म्हणवितां ॥२॥ तुका म्हणे देवा । ऐसीं जळो करितां सेवा ॥३॥
1238
कैसें असोनि ठाउकें नेणां । दुःख पावाल पुढिले पेणा ॥१॥ आतां जागें रे भाईं जागें रे । चोर निजल्या नाडूनि भागे रे ॥ध्रु.॥ आतां नका रे भाई नका रे । आहे गांठीं तें लुटवूं लोकां रे ॥२॥ तुका म्हणे एकांच्या घायें । कां रे जाणोनि न धरा भये ॥३॥
1239
कैसें करूं ध्यान कैसा पाहों तुज । वर्म दावीं मज याचकासी ॥१॥ कैसी भक्ति करूं सांग तुझी सेवा । कोण्या भावें देवा आतुडसी ॥ध्रु.॥ कैसी कीर्ती वाणूं कैसा लक्षा आणूं । जाणूं हा कवण कैसा तुज ॥२॥ कैसा गाऊं गीतीं कैसा ध्याऊं चित्ती । कैसी स्थिती मती दावीं मज ॥३॥ तुका म्हणे जैसें दास केलें देवा । तैसें हें अनुभवा आणीं मज ॥४॥
1240
कैसें भलें देवा अनुभवा कां नये । उसीर तो काय तुम्हांपाशीं ॥१॥ आहे तें मागों तों दिसातें जवळी । केल्यामध्यें कळि कोण साध्य ॥ध्रु.॥ नाहीं सांडीत मी सेवेची मर्यादा । लाविला तो धंदा नित्य करीं ॥२॥ तुका म्हणे हात आवरिला गुंती । माझे तंव चित्तीं नाहीं दुजें ॥३॥
1241
कोंडिला गे माज । निरोधुनी द्वार । राखण तें बरें । येथें करा कारण ॥१॥ हा गे हा गे हरि । करितां सांपडला चोरी । घाला गांठी धरी । जीवें माय त्रासाया ॥ध्रु.॥ तें चि पुढें आड । तिचा लोभ तिला नाड । लावुनी चरफड । हात गोउनी पळावें॥२॥ संशयाचें बिर्हडें । याचे निरसले भेटी । घेतली ते तुटी । आतां घेतां फावेल ॥३॥ तुका येतो काकुलती । वाउगिया सोड । यासी चि निवाड । आम्ही भार वाहिका ॥४॥
1242
कोटिजन्म पुण्यसाधन साधिलें । तेणें हाता आलें हरिदास्य ॥१॥ रात्रीं दिवस ध्यान हरीचें भजन । कायावाचामन भगवंतीं ॥ध्रु.॥ ऐसिया प्रेमळा म्हणताती वेडा । संसार रोकडा बुडविला ॥२॥ एकवीस कुळें जेणें उद्धरिलीं । हे तों न कळे खोली भाग्यमंदा ॥३॥ तुका म्हणे त्याची पायधुळी मळिे । भवभय पळे वंदितां चि ॥४॥
1243
कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया । वेळ कां सखया लावियेला ॥१॥ दिनानाथ ब्रीद सांभाळीं आपुले । नको पाहों केलें पापपुण्य ॥ध्रु.॥ पतितपावन ब्रीदें चराचर । पातकी अपार उद्धरिले ॥२॥ तुकयाबंधु म्हणे द्रौपदीचा धांवा । केला तैसा मला पावें आतां ॥३॥
1244
कोठें आतां आम्ही वेचावी हे वाणी । कोण मना आणी जाणोनियां ॥१॥ न करावी सांडी आतां टाळाटाळी । देइन ये कळी होइल माजी ॥ध्रु.॥ घरोघरीं जाल्या ज्ञानाचिया गोष्टी । सत्यासवें गांठी न पडवी ॥२॥ तुका म्हणे आम्हां भाकितां करुणा । भलता चि शाहाणा शोध काढी ॥३॥
1245
कोठें गुंतलासी कोणांच्या धांवया । आली देवराया निद्रा तुज ॥१॥ कोठें गुंतलासी भक्तिप्रेमसुखें । न सुटेती मुखें गोपिकांचीं ॥ध्रु.॥ काय पडिलें तुज कोणाचें संकट । दुरी पंथ वाट न चालवे ॥२॥ काय माझे तुज गुण दोष दिसती । म्हणोनि श्रीपती कोपलासी ॥३॥ काय जालें सांग माझिया कपाळा । उरला जीव डोळां तुका म्हणे ॥४॥
1246
कोठें गुंतलासी योगीयांचे ध्यानीं । आनंदकीर्तनीं पंढरीच्या ॥१॥ काय काज कोठें पडलीसे गुंती । कानीं न पडती बोल माझे ॥ध्रु.॥ काय शेषनशयनीं सुखनिद्रा आली । सोय कां सांडिली तुम्ही देवा ॥२॥ तुका म्हणे कोठें गुंतलेती सांगा । किती पांडुरंगा वाट पाहूं ॥३॥
1247
कोठें देवा आलें अंगा थोरपण । बरें होतें दीन होतों तरीं ॥१॥ साधन ते सेवा संतांची उत्तम । आवडीनें नाम गाईन तें ॥ध्रु.॥ न पुसतें कोणी कोठें ही असतां । समाधान चित्ताचिया सुखें ॥२॥ तुका म्हणे जन अव्हेरितें मज । तरी केशीराज सांभाळिता ॥३॥
1248
कोठें देवा बोलों । तुम्हां भीड घालूं गेलों ॥१॥ करावाया सत्वहाणी । भांडवलाची टांचणी ॥ध्रु.॥ दुर्बळा मागतां । त्याच्या प्रवर्तला घाता ॥२॥ तुका म्हणे नाहीं । मज कळलें ऐसें कांहीं ॥३॥
1249
कोठें नाहीं अधिकार । गेले नर वांयां ते ॥१॥ ऐका हें सोपें वर्म । न लगे श्रम चिंतना ॥ध्रु.॥ मृत्याचिये अंगीं छाये । उपाये चि खुंटतां ॥२॥ तुका म्हणे अवघे जन । येथें मन असों द्या ॥३॥
1250
कोठें भोग उरला आतां । आठवितां तुज मज ॥१॥ आड कांहीं नये दुजें । फळ बीजें आणिलें ॥ध्रु.॥ उद्वेग ते वांयांविण । कैंचा सीण चिंतनें ॥२॥ तुका म्हणे गेला भ्रम । तुमच्या धर्में पायांच्या ॥३॥