श्री ज्ञानेश्वर माऊली हरिपाठ


ॐ नमो ज्ञानेश्वराय नमः॥
ॐ नमो ज्ञानेश्वराय नमः॥
ॐ नमो ज्ञानेश्वराय नमः॥
ॐ नमो ज्ञानेश्वराय नमः॥
ॐ नमो ज्ञानेश्वराय नमः॥


जय जय राम कृष्ण हरी॥

रूप पाहता लोचनी |
सुख झाले वो साजणी॥१॥
तो हा विठ्ठल बरवा |
तो हा माधव बरवा॥२॥
बहुत सुकृतांची जोडी |
म्हणून विठ्ठले आवडी॥३॥
सर्व सुखांचे आगर |
बाप रखुमादेवी वर॥४॥

जय जय राम कृष्ण हरी॥

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी |
कर कटावरी ठेवोनिया॥१॥
तुळसी हार गळा कासे पितांबर |
आवडे निरंतर हेचि ध्यान ॥२॥
मकर कुंडले तळपती श्रवणी |
कंठी कौस्तुभ मणी विराजित॥३॥
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख |
पाहीन श्रीमुख आवडीने॥४॥

जय जय विठोबा रखुमाई॥


देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ।
तेणे मुक्‍ति चारी साधियेल्या॥१॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी॥२॥
असोनि संसारी जिव्हे वेगु करी ।
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा॥३॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा ।
द्वारकेचा राणा पांडवा घरी॥४॥

चहू वेदी जाण साही शास्त्र कारण ।
अठराही पुराणे हरीसी गाती॥१॥
मंथुनी नवनीता तैसे घे अनंता ।
वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग॥२॥
एक हरि आत्मा जीवशिव सम ।
वाया तू दुर्गमा न घाली मन॥३॥
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ ।
भरला घनदाट हरि दिसे॥४॥

त्रिगुण असार निर्गुण हे सार ।
सारासार विचार हरिपाठ ॥१॥
सगुण निर्गुण गुणांचे अगुण ।
हरिविणे मत व्यर्थ जाय॥२॥
अव्यक्‍त निराकार नाही ज्या आकार ।
जेथुनी चराचर हरीसी भजे॥३॥
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी ।
अनंत जन्मांनी पुण्य होय॥४॥

भावेवीण भक्‍ति भक्‍तिवीण मुक्‍ति ।
बळेवीण शक्‍ति बोलू नये॥१॥
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित ।
उगा राहे निवांत शिणसी वाया॥१॥
सायासे करिसी प्रपञ्च दिननिशी ।
हरिसी न भजसी कवण्या गुणॆ ॥३॥
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे ।
तुटेल धरणे प्रपंचाचे॥४॥

योग याग विधी येणे नोहे सिद्धि ।
वायाचि उपाधि दंभधर्म॥१॥
भावेवीण देव न कळे निःसंदेह ।
गुरुवीण अनुभव कैसा कळे॥२॥
तपेवीण दैवत दिधल्यावीण प्राप्त ।
गुजेवीण हित कोण सांगे॥३॥
ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात ।
साधूचे संगती तरुणोपाय॥४॥

साधुबोध झाला नुरोनिया ठेला ।
ठायीच मुराला अनुभवे॥१॥
कापुराची वाती उजळली ज्योती ।
ठायींच समाप्ती झाली जैसी॥२॥
मोक्षरेखे आला भाग्ये विनटला ।
साधूचा अंकिला हरिभक्‍त॥३॥
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी ।
हरि दिसे जनी आत्मतत्त्वी॥४॥

पर्वताप्रमाणे पातक करणे ।
वज्रलेप होणे अभक्‍तांसी॥१॥
नाही ज्यासी भक्‍ति ते पतित अभक्‍त ।
हरीसी न भजत दैवहत॥२॥
अनंत वाचाळ बरळती बरळ ।
त्या कैचा दयाळ पावे हरी॥३॥
ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान ।
सर्वाघटी पूर्ण एक नांदे॥४॥

संतांचे संगती मनोमार्ग गती ।
आकळावा श्रीपति येणें पंथें॥१॥
रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा ।
आत्मा जो शिवाचा राम जप॥२॥
एकतत्त्व नाम साधिती साधन ।
द्वैताचें बंधन न बाधिजे॥३॥
नामामृत गोडी वैष्णवां लाधली ।
योगियां साधली जीवनकळा॥४॥
सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला ।
उद्धवा लाधला कृष्णदाता॥५॥
ज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ ।
सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे॥६॥

विष्णुविणें जप व्यर्थ त्याचें ज्ञान ।
रामकृष्णीं मन नाहीं ज्याचे॥१॥
उपजोनी करंटा नेणे अद्वय वाटा ।
रामकृष्णी पैठा कैसा होय॥२॥
द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान ।
तया कैचे कीर्तन घडे नामी॥३॥
ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान ।
नामपाठ मौन प्रपंचाचे॥४॥



जय जय राम कृष्ण हरी॥

१०
त्रिवेणीसंगमीं नाना तीर्थें भ्रमीं ।
चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ॥१॥
नामासी विन्मुख तो नर पापिया ।
हरीविण धांवया न पावे कोणी॥२॥
पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मिक ।
नामे तिन्ही लोक उद्धरती॥३॥
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरिचे ।
परंपरा त्याचें कुळ शुद्ध॥४॥
११
हरिउच्चारणी अनंत पापराशी ।
जातील लयासी क्षणमात्रे॥१॥
तृण अग्निमेळे समरस झाले ।
तैसे नामे केले जपता हरी॥२॥
हरिउच्चारण मंत्र पैं अगाध ।
पळे भूतबाधा भेणे तेथे ॥३॥
ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ ।
न करवे अर्थ उपनिषदां॥४॥
१२
तीर्थ व्रत नेम भावेवीण सिद्धी ।
वायाची उपाधी करिसी जना॥१॥
भावबळें आकळे येरवी नाकळे ।
करतळीं आंवळे तैसा हरी॥२॥
पारियाचा रवा घेतां भूमीवरी ।
यत्न परोपरी साधन तैसें॥३॥
ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण ।
दिधले संपूर्ण माझे हाती॥४॥
१३
समाधि हरीची सम सुखेंवीण ।
न साधेल जाण द्वैतबुद्धि॥१॥
बुद्धीचें वैभव अन्य नाहीं दुजें ।
एका केशवराजे सकळ सिद्धि॥२॥
ऋद्धि सिद्धि निधि अवघीच उपाधी ।
जंव त्या परमानंदी मन नाहीं॥३॥
ज्ञानदेवीं रम्य रमलें समाधान ।
हरीचे चिंतन सर्वकाळ॥४॥
१४
नित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी ।
कळिकाळ त्यासी न पाहे दृष्टी॥१॥
रामकृष्णीं उच्चार अनंतराशी ।
पापाचे कळप पळती पुढें॥२॥
हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा ।
म्हणती जे वाचा तया मोक्ष॥३॥
ज्ञानदेवा पाठ नारायण नाम ।
पाविजे उत्तम निजम स्थान॥४॥
१५
एक नाम हरि द्वैतनाम दूरी ।
अद्वैत कुसरी विरळा जाणे॥१॥
समबुद्धि घेतां समान श्रीहरी ।
शमदमां वरी हरि झाला॥२॥
सर्वांघटी राम देहादेहीं एक ।
सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी॥३॥
ज्ञानदेवा चित्तीं हरिपाठ नेमा ।
मागिलिया जन्मा मुक्‍त झालों॥४॥
१६
हरिनाम जपे तो नर दुर्लभ ।
वाचेसी सुलभ राम कृष्ण॥१॥
राम कृष्ण नामीं उन्मनी साधली ।
तयासी लाधली सकळ सिद्धि॥२॥
सिद्धि बुद्धि धर्म हरिपाठीं आले ।
प्रपंची निमाले साधुसंगे॥३॥
ज्ञानदेवीं नाम रामकृष्ण ठसा ।
तेणे दशदिशा आत्माराम॥४॥
१७
हरिपाठकीर्ति मुखें जरी गाय ।
पवित्रचि होय देह त्याचा॥१॥
तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप ।
चिरंजीव कल्प वैकुंठीं नांदे॥२॥
मातृपितृभ्रात सगोत्र अपार ।
चतुर्भुज नर होऊनि ठेले॥३॥
ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवा लाधलें ।
निवृत्तीने दिधले माझे हाती॥४॥
१८
हरिवंशपुराण हरिनाम संकीर्तन ।
हरिविण सौजन्य नेणे काही ॥१॥
त्या नरा लाधले वैकुंठ जोडलें ।
सकळही घडले तीर्थाटण॥२॥
मनोमार्गें गेला तो तेथें मुकला ।
हरिपाठी स्थिरावला तोचि धन्य॥३॥
ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी ।
रामकृष्णी आवडी सर्वकाळ॥४॥


जय जय विठोबा रखुमाई॥

१९
नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी ।
पापें अनंत कोटी गेलीं त्यांची॥१॥
अनंत जन्मांचें तप एक नाम ।
सर्व मार्ग सुगम हरिपाठ॥२॥
योग याग क्रिया धर्माधर्म माया ।
गेले ते विलया हरिपाठी॥३॥
ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म ।
हरीविण नेम नाहीं दुजा॥४॥

२०
वेदशास्त्रपुराण श्रुतीचें वचन ।
एक नारायण सारा जप॥१॥
जप तप कर्म हरीविण धर्म ।
वाउगाचि श्रम व्यर्थ जाय॥२॥
हरीपाठी गेले ते निवांताचि ठेले ।
भ्रमर गुंतले सुमन कळिके॥३॥
ज्ञानदेवीं मंत्र हरिनामाचें शस्त्र ।
यमें कुळगोत्र वर्जियेलें॥४॥

२१
काळ वेळ नाम उच्चारितां नाहीं ।
दोन्ही पक्ष पाहीं उद्धरती॥१॥
रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण ।
जडजीवां तारण हरि एक॥२॥
हरिनाम सार जिव्हा या नामाची ।
उपमा त्या देवाची कोण वानी॥३॥
ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ ।
पूर्वजां वैकुंठ मार्ग सोपा॥४॥

२२
नित्यनेम नामीं ते प्राणी दुर्लभ ।
लक्षुमीवल्लभ तयां जवळी॥१॥
नारायण हरी नारायण हरी ।
भुक्‍ति मुक्‍ति चारी घरीं त्यांच्या॥२॥
हरिविण जन्म नर्कचि पैं जाणा ।
यमाचा पाहुणा प्राणी होय॥३॥
ज्ञानदेव पुसे निवृत्तिसी चाड ।
गगनाहूनि वाड नाम आहे॥४॥

२३
सात पांच तीन दशकांचा मेळा ।
एक तत्त्वी कळा दावी हरी॥१॥
तैसें नव्हे नाम सर्वत्र वरिष्ठ ।
तेथें कांहीं कष्ट न लागती॥२॥
अजपा जपणें उलट प्राणाचा ।
येथेंही मनाचा निर्धारु असॆ ॥३॥
ज्ञानदेवा जिणें नामेंविण व्यर्थ ।
रामकृष्णीं पंथ क्रमियेला॥४॥

२४
जप तप कर्म क्रिया नेम धर्म ।
सर्वांघटीं राम भाव शुद्ध॥१॥
न सोडी हा भावो टाकी रे संदेहो ।
रामकृष्ण टाहो नित्य फोडी॥२॥
जाति वित्त गोत्र कुळ शीळ मात ।
भजका त्वरित भावनायुक्‍त॥३॥
ज्ञानदेव ध्यानीं रामकृष्ण मनीं ।
वैकुंठ भुवनी घर केलें॥४॥

२५
जाणीव नेणीव भगवंतीं नाही ।
हरिउच्चारणी पाही मोक्ष सदा॥१॥
नारायण हरी उच्चार नामाचा ।
तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं॥२॥
तेथील प्रमाण नेणवे वेदांसी ।
तें जीवजंतूंसीं केवीं कळे॥३॥
ज्ञानदेव फळ नारायण पाठ ।
सर्वत्र वैकुंठ केलें असे॥४॥

२६
एक तत्त्व नाम दृढ धरी मना ।
हरीसी करुणा येईल तुझी॥१॥
ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद ।
वाचेसी सद्गद जपे आधी॥२॥
नामापरते तत्त्व नाही रे अन्यथा ।
वाया आणिक पंथा जाशी झणी॥३॥
ज्ञानदेव नाम जपमाळ अंतरी ।
धरोनी श्रीहरी जपे सदा॥४॥

२७
सर्व सुख गोडी साही शास्त्रें निवडी ।
रिकामा अर्धघडी राहूं नको॥१॥
लटिका व्यवहार सर्व हा संसार ।
वायां येरझार हरीविण॥२॥
नाममंत्र जप कोटी जाईल पाप ।
रामकृष्णीं संकल्प धरूनी राहे॥३॥
निजवृत्ति काढी सर्व माया तॊडी ।
इंद्रियांसवडी लपूं नको॥४॥
तीर्थीं व्रतीं भाव धरीं रे करुणा ।
शांति दया पाहुणा हरि करीं॥५॥


ज्ञानदेव प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान ।
समाधि संजीवन हरिपाठ॥६॥

नामसंकीर्तन साधन पैं सोपें ।
जळतील पापें जन्मांतरींची॥१॥
न लगे सायास जावे वनांतरा ।
सुखें येतो घरा नारायण॥२॥
ठायींच बैसोनि करा एकचित्त ।
आवडी अनंत आळवावा॥३॥
रामकृष्णहरि विठ्ठल केशवा ।
मंत्र हा जपावा सर्वकाळ॥४॥
यावीण असतां आणीक साधन ।
वाहातसें आण विठोबाची॥५॥
तुका म्हणे सोपें आहे सर्वांहूनि ।
शहाणा तो धणी घेतो येथें॥६॥

देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी ।
तेणें मुक्‍ति चारी साधियेल्या॥१॥
हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी॥२॥
असोनि संसारीं जिव्हे वेगु करी ।
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा॥३॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा ।
द्वारकेचा राणा पांडवां घरीं॥४॥


ज्ञानोबा माऊली तुकाराम |॥

गुरुपरंपरेचे अभंग

-1
सत्यगुरुराये कृपा मज केली ।
परी नाही घडली सेवा काही॥१॥
सापडविले वाटे जाता गंगा स्नान ।
मस्तकी तो जाण ठेविला कर॥2॥
भोजना मागती तूप पावशेर ।
पडिला विसर स्वप्नामाजी॥3॥
काही कळे उपजला अंतराय ।
म्हणोनिया काय त्वरा झाली॥4॥
राघवचेतन्य केशवचैतन्य् ।
सांगितली खुण मालीकेची॥5॥
बाबाजी आपुले सांगितले नाम ।
मंत्र दिला रामकृष्ण हरी॥6॥
माघ शुध्द दशमी पाहुनी गुरुवार ।
केला अंगिकार तुका म्हणे॥7॥
-2
माझिये मनीचा जाणोनिया भाव ।
तो करी उपाव गुरुराव॥१॥
आवडीचा मंत्र सांगितला सोपा ।
जेणे नोहे गुंफा कोठे काही॥2॥
जाती पुढे एक उतरले पार ।
हा भवसागर साधुसंत॥3॥
जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी ।
उतार सांगडी तापे पेठे॥4॥
तुका म्ह‍णे संती दावियेला तारु ।
कृपेचा सागरु पांडूरंग॥5॥
-3
घालुनिया भार राहीलो निश्चिंती ।
निरविले संती विठोबासी॥१॥
लावूनिया हात कुरवाळीला माथा ।
सांगितली चिंता न करावी॥2॥
कटीकर समचरण साजिरे ।
राहीला भीवरे तीरी उभा॥3॥
खुंटले सायास अणिक या जीवा ।
धरीले केशवा पाय तुझे॥4॥
तुज वाटे आता ते करी अनंता ।
तुका म्हणे संता लाज माझी॥5॥
-4
माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव ।
आपणची देव होय गुरु॥१॥
पढिये देहभाव पुरवी वासना ।
अंती ते आपणापाशी न्यावे॥2॥
मागे पुढे उभा राहे सांभाळीत ।
आलीया आघात निवाराया॥3॥
योगक्षेम त्याहचा जाणे जडभारी ।
वाट दावी करी धरुनिया॥4॥
तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी ।
पहावे पुराणी विचारुनी॥5॥
-5
आदिनाथ उमा बीज प्रगटले ।
मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती॥१॥
तेचि प्रेममुद्रा गोरक्षा दिधली ।
पूर्ण कृपा केली गहीनीनाथा॥2॥
वैराग्ये तापला सप्रेमे निवाला ।
ठेवा जो लाधला शांतीसुख॥3॥
निर्द्वंद्व नि:शंक विचरता मही ।
सुखानंद –हदयी स्थिरावला॥4॥
विरक्तिचे पात्र अन्वंयाचे मुख ।
येवुनी सम्यक् अनन्यता॥5॥
निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण ।
कुळ हे पावन कृष्ण्नामे॥6॥
-6
अदिनाथ गुरु सकळ सिध्दांचा ।
मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य॥१॥
मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला ।
गोरक्ष वोळला गहीनीप्रती॥2॥
गहीनी प्रसादे निवृत्‍ती दातार ।
ज्ञानदेवा सार चोजविले॥3॥
-7
अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आंता ।
चरणी जगन्नाथा चित्त ठेले॥१॥
माय जगन्नाथ बाप जगन्नाथ ।
अनाथाचा नाथ जनार्दन॥2॥
एका जनार्दनी एकपणे उभा ।
चैतन्या‍ची शोभा शोभतसे॥3॥
-8
अवघाची संसार सुखाचा करीन ।
आनंदे भरीन तिन्ही लोक॥१॥
जाईन गे माये तया पंढरपूरा ।
भेटन माहेरा आपुलिया॥2॥
सर्व सुकृताचे फळ मी लाहीन ।
क्षेम मी देईन पांडूरंगा॥3॥
बापरखुमादेवीवरु विठ्ठलाची भेटी ।
आपुल्या संवसाठी करुनी ठेला॥4॥
-9
श्रीगुरु सारीखा असता पाठीराखा ।
इतरांचा लेखा कोण करी॥१॥
राजयाची कांता काय भीक मागे ।
मनाचिया जोगे सिध्दी पावे॥2॥
कल्पतरु तळवटी जो कोणी बैसला ।
काय वाणी त्याणला सांगा जोजी॥3॥
ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ।
साच उध्दारलो गुरुकृपे॥4॥
-10
इवलेसे रोप लावियले द्वारी ।
त्याचा वेलू गेला गगनावरी॥१॥
मोगरा फुलला मोगरा फुलला ।
फुलेवेचिताची बहरु कळीयासी आला॥2॥
मनाचिये मनी गुंफीयेला शेला ।
बापरखुमादेवी वरु विठ्ठलु अर्पिला॥3॥
-11
कृपाळू सज्जन तुम्ही संतजन |
एकढे कृपादान तुमचे मज ...॥धृ॥
आठवण तुम्ही घ्यावी पांडुरंगा |
किव माझी सांगा काकुळती ....॥१॥
अनाथ अपराधी पतित आगळा |
परी पायां वेगळा नका करू....॥२॥
तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी |
मग मज हरी उपेक्षीना ....॥३॥

॥ज्ञानेश्वर माऊली।
ज्ञानराज माऊली तुकाराम॥

झाले समाधान ।
तुमचे देखिले चरण॥१॥
आता ऊठावेसे मना ।
येत नाही नारायणा॥२॥
सुरवाडीकपणे ।
येथे सापडले केणे॥३॥
तुका म्हणे भोग ।
गेला निवारला लाग॥४॥

करुणी आरती ।
चक्रपाणी ओवाळीती॥१॥
आजी पुरले नवस ।
धन्य काळ हा दिवस॥२॥
पहा ओ सकळा ।
पुण्यवंता तुम्ही बाळा॥३॥
तुका वाहे टाळी ।
उभा सन्निध जवळी॥४॥

प्रेम सप्रेम आरती ।
गोविंदाते ओवाळीती॥१॥
धन्य धन्य ते लोचन ।
नित्य करिती अवलोकन॥२॥
बाळा पौढा आणि मुग्धा ।
ओवाळिती परमानंदा॥३॥
नामा म्हणे केशवाते ।
देखोनि राहिलो तटस्थे॥४॥

॥आरती॥
युगे अठ्ठाविस विटेवरी उभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा॥
पुंडलीकाचे भेटी परब्रम्ही आलेगा ।
चरणी वाहे भीमा उध्दरी जगा॥१॥
जय देव जय देव जय पांडूरंगा ।
रखुमाई वल्लभा पावे जीवलगा॥धृ॥
तुळशीमाळा गळा कर ठेऊनी कटी ।
कासे पीतांबर कस्तुवरी लल्ला्टी॥
देव सुरवर नित्य येती भेटी ।
गरुड हनुमंत पुढे उभे राहती॥2॥
आषाढी कार्तीकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमाजी स्नान जे करिती ।

दर्शन हेळामात्रे तया होय मुक्ती ।
केशवासी नामदेव भावे ओवाळीती॥3॥

आरती ज्ञानराजा॥महाकैवल्यतेजा॥
सेविती साधुसंत॥मनु वेधला माझा॥ध्रु०॥
लोपलें ज्ञान जगीं॥त नेणती कोणी॥
अवतार पांडुरंग॥नाम ठेविलें ज्ञानी॥आरती॥१॥
कनकांचे ताट करीं॥उभ्या गोपिका नारी॥
नारद तुंबरु हो॥साम गायन करी॥आरती०॥२॥
प्रगट गुह्य बोले॥विश्व ब्रह्मची केलें॥
रामा जनार्दनीं॥पायीं ठकचि ठेलें॥आरती०॥३॥

आरती तुकारामा।
स्वामी सद्गुरुधामा।

सच्चिदानंदमूर्ती।
पाय दाखवी आम्हा॥धृ॥
राघवे सागरात।
पाषाण तारिले
तैसे हे तुकोबाचे।
अभंग उदकी रक्षिले॥१॥
तुकिता तुलनेसी।
ब्रह्म तुकासी आले॥
म्हणोनि रामेश्वरे।
चरणी मस्तक ठेविले॥२॥

आरती एकनाथा।
महाराजा समर्था॥
त्रिभुवनी तूचि थोर।
जगद्गुरु जगन्नाथा॥धृ॥
एकनाथ नामसार।
वेदशास्त्रांचे गूज॥
संसारदु:ख नासे।
महामंत्राचे बीज॥१॥
एकनाथनाम घेता।
सुख वाटले चित्ता।

अनंत गोपाळदासा।
धणी न पुरे आता॥२॥

घालीन लोटांगण, वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहीन रुप तुझें ।

प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन ।
भावें ओवाळीन म्हणे नामा॥१॥
त्वमेव माता च पिता त्वमेव।
त्वमेव बंधुक्ष्च सखा त्वमेव ।

त्वमेव विध्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वं मम देवदेव॥२॥
कायेन वाचा मनसेंद्रीयेव्रा, बुद्धयात्मना वा प्रकृतिस्वभावात ।

करोमि यध्य्त सकलं परस्मे, नारायणायेति समर्पयामि॥३॥
अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम।

श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचंद्र भजे॥४॥
हरे राम हर राम, राम राम हरे हरे ।

हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ।


हेचि माझी व्हावी आस ।
जन्मोजन्मी तुझा दास॥१॥
पंढरीचा वारकरी ।
वारी चुको नेदी हरी॥२॥
संतसंग सर्वकाळ ।
अखंड प्रेमाचा कल्लोळ॥३॥
चंद्रभागे स्नान ।
तुका मागे हेचि दान॥४॥

आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा ।
माझिया सकळा हरीच्या दासा॥१॥
कल्पनेची बाधा न हो कवणे काळी ।
ही संत मंडळी सुखी असो॥२॥
अहंकाराचा वारा न लागो राजासा ।
माझिया विष्णुदासा भाविकांशी॥३॥
नामा म्हणे तया असावे कल्याण ।
ज्या मुखी निधान पांडुरंग॥४॥

मागणे ते एक तुजप्रती आहे ।
देशील तरी पाहे पांडुरंग॥१॥
या संतांशी निरवि हेचि मज देई ।
आणिक दुजे काही न मागो देवा॥२॥
तुका म्हणे आता उदार तू होई ।
मज ठेवी पायी संतांचीया॥३॥

ठाकलोसे द्वारी ।
उभा याचक भिकारी॥१॥
मज भीक काही देवा ।
प्रेम भातुके पाठवा॥२॥
याचकाचा भार ।
घेऊं नये येरझार॥३॥
तुका म्हणे दान ।
सेवा घेतल्यावाचून॥४॥

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Labels

Followers