1 ॐ नमो शिवा आदि । कावडि घेतली खांदी मिळाली संतमांदी । त्याचे रज रेणु वंदी ॥ध्रु०॥ शिवनाम शीतळ मुखीं । सेविं पां कापडियारे दडदडदडदड दुडुदुडुदुडुदुडु । पळ सुटला कळिकाळा बापुडीयारे ॥१॥ गुरुलिंग जंगम । त्यानें दाविला आगम । अधिव्याधि झाली सम । तेणें पावलों विश्रामरे ॥२॥ जवळीं असतां जगजीवन । कां धांडोळिसी वन । एकाग्र करी मन । तेणें होईल समाधानरे ॥३॥ देहभाव जेथं विरे । ते साधन दिधलें पुरे । बापरखुमादेविवरे विठठलुरे विठ्ठलुरे विठ्ठलुरे ॥४॥
2 अंजनाचें अंजन सदोदीत पाहिलें । पाहाणें होऊनी ठेलें सर्वाठायीं ॥१॥ आतां बोलाबोली नको बा आणिक । बिंदु तो नि:शंक ब्रह्म रया ॥२॥ अनुहात उन्मनी म्हणोनी व्यर्थ काय । मुखीं धरी सोय ब्रह्मरंध्री ॥३॥ ज्ञानदेव म्हणे न बोले आणिक । डोळीयांची वाल पाहतांची ॥४॥
3 अंबुला विकुनी पवित्र झाली । पोटीचीं बाळें कौतुकीं मारिलीं ॥१॥ पापा वेगळी मी जाले वो नारी । विठ्ठला घरीं नादंतसे ॥२॥ आशा तृष्णा नणंदा मारिल्या । शेजारीं राहविल्या संतसंगें ॥३॥ बापरखुमादेवीवर विठ्ठल भोगिला । मज पैं लाधला गुणेविण ॥४॥
4 अकराव्या खणावरी मंदीर धुपविलें । तेथें एक देखिले रुपेंविण ॥१॥ न बोले यासि बोलावया गेलें । मीहि न बोलती झालें गे माये ॥२॥ बापरखुमादेविवरेंसि ठक पडिलें । मी चित्त ठसावलें ब्रह्माकारें ॥३॥
5 अकार उकार मकार ओंकार । प्रणव हा साकार सुरेख रे ॥१॥ सुरामात्र मसार योगी ध्याती देहीं । निरंजन पाहीं ब्रह्म तेची ॥२॥ ज्ञानदेव म्हणे देह झालें देव । प्रणवची शिव अनुभवें ॥३॥
6 अकारी अर्धामात्रा कवण रीति दिसे । उकारीही घसे कवणे परी ॥१॥ मकारी संयुक्त झाली कैशापरी । अर्धमात्रेवरी अर्धमात्रा ॥२॥ अर्धमात्रेचा अर्थ अवचटची दिसे । गुरुगम्य सोय जाणती पैं ॥३॥ ज्ञानदेवें अर्थ शोधुनी घेतला । महाशून्यीं संचला निवृत्तीराज ॥४॥
7 अखंड तमासा डोळा देख निका । काळा निळा परिवा बाईयानो ॥१॥ सदोदीत नयनीं नयन हारपे । निळ्याचे स्वरुपें मनीं वसो ॥२॥ अकरा वेगळें नाहीं बा आणिक । माझे नेत्रीं देख शुध्द ज्योती ॥३॥ ज्ञानोबाची वाणी पूर्ण रुपी घ्यावी । देहींच पाहावी आत्मज्योती ॥४॥
8 अग्नीचे पोटीं पुरुष उध्दवला अवचट । सत्रावी लंपट निशिदिनीं ॥१॥ आधार नाहीं जेथ निराधार वर्तती । निराधार न म्हणती आपणा लागीं ॥२॥ ज्ञानदेव म्हणे निवृत्तीने दाविलें । या नयनीं पाहिलें अविनाश ॥३॥
9 अनुपम्य मनोहर । कांसे शोभे पितांबर । चरणीं ब्रिदाचा तोडर । देखिला देवो ॥१॥ योगियाची कसवटी । दावितसे नेत्रपुटीं । उभा भीवरेच्या तटी । देखिला देवो ॥२॥ बापरखुमादेविवरु । पुंडलिका अभयकरु । परब्रह्म साहाकारु देखिला देवो ॥३॥
10 अनुहत ध्वनी वरि चंद्रमा वर्तुळ । तेजाचे उमाळे अनंत तेथें ॥१॥ ब्रह्मशिखरीं निराळ्या मार्गावरी । अविनाश कर्णकुमारी एकलीच ॥२॥ तेथुनी महाद्वार उन्मनीचें वर्ता । त्यावरी चढता रीग नसें ॥३॥ अणुचें जै अग्र ऐसा तेथ मार्ग । औटपीठीं सवेग जावें वरी ॥४॥ पंचदेव तेथें एकरुपां देखती । औटपीठीं वसती आरुते तेही । तयाचेही वर रश्मिअग्रामधुनी । शुध्द ब्रह्म निर्वाण असे तेथ ॥६॥ ज्ञानदेव म्हणे ब्रह्मांडींचा अंत । नाही ऐसी मात बोलतसे ॥७॥
11 अमृताची कुंडी निद्रिस्तां मरण । झणे त्या दुषण बोलसी रया ॥१॥ वासना संग धीट प्रकृति कनिष्ठ । भोगुनि वैकुंठ जन्म घेती ॥२॥ तैसें नव्हे सारासार तत्त्व निवृत्ती । बुडउनि प्रवृत्ति आपण नांदे ॥३॥ ज्ञानदेव बोले अमृत सरिता सर्वाघटीं पुरता हरि नांदे ॥४॥
12 अमृताची क्षीर ब्रह्मांडभुवनीं । पाहाती त्रिभुवनीं नवल झालें ॥१॥ नाद विंदा भेटी झाली कवण्या रीती । शुध्द ब्रह्म ज्योती संचलीसे ॥२॥ प्रकृति पुरुष शिव शक्ती भेद । त्याचे शरीरीं द्वंद देह जाणा ॥३॥ ज्ञानदेव म्हणे पिंडी शोध घ्यावा । ब्रह्मांडी पाहावा ब्रह्म ठसा ॥४॥
13 अवघाचि श्रृंगारु डोईचे दुरडी । डोळेचि मुरडी परतोनिया ॥१॥ देखिलें स्वरुप विठ्ठल नामरुप । पारुषेना चित्त त्याचे चरणाहुनी ॥२॥ बापरखुमादेवीवरु विठ्ठल सुखनिधी । अवघीची उपाधी तुटली माझी ॥३॥
14 अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्हीं लोक ॥१॥ जाईन गे माय तया पंढरपुरा । भेटेन माहेरा आपुलिया ॥२॥ सर्व सुकृताचें फ़ळ मी लाहीन । क्षेम मीं देईन पांडुरंगी ॥३॥ बापरखुमादेवीवरु विठ्ठलेंसी भेटी । आपुले संवसाटी करुनि ठेला ॥४॥
15 अवचित वरपडी जालिये अंबुलिया । लाजिले आपुलिया सकळ गोता ॥१॥ एकांतीचें सुख भोगी आपुलिया सरीसी । दोहीचि सरसी गती झाली ॥२॥ बापरखुमादेवीवर विठ्ठल लाधला । मज घेऊनि गेला बाईये वो ॥३॥
16 अव्यक्त मसुराकार पूर्वार्ध संचलें । लक्षा सरीसें झालें लक्षासी पैं ॥१॥ अव्यक्त रेखणें देखण्या आलें व्यक्त । पहातां व्यक्तअव्यक्त दोनी नाहीं ॥२॥ जागृतीच्या ठायी निजतो सहस्त्रदळीं बिंदुच्या समेळीं उच्चार होतो ॥३॥ ज्ञानदेव शरण निवृत्तीच्या चरणा । समजुनी खुणा तटस्थ झालें ॥४॥
17 आकाश जें दिसे दृष्टिचिया पोटीं शून्यत्त्वासी घोटी चैतन्यांत ॥१॥ अर्थ पाहतां सांकडें ऐकतां । कैसें करुं आतां निवृत्ति सांगे ॥२॥ सांगतांची गुज देखिलें नयनीं । हिंडताती मौनी याची लागी ॥३॥ ज्ञानदेवाचा अर्थ कूटस्थ परिपूर्ण । पूर्णही अपूर्ण होय जेथें ॥४॥
18 आकाश हें असें माझें शिर बापा । कर्ण दिशा चिद्रूपा नाद उठती ॥१॥ आधारापासूनी सहस्त्रदळावरी । नि:शब्द निरंतरी नारी एक ॥२॥ ज्ञानदेव म्हणे अनुभव ऐसा जेथें । तोचि जीवन्मुक्त संत योगी ॥३॥
19 आकाशाचा शेंडा कमळ निराळें । त्यासी चार दळें शोभताती ॥१॥ औट हात एक अंगुष्ठ दुसरें । पर्वार्ध मसुरे प्रमाण हें ॥२॥ रक्त श्वेत शाम निळवर्ण आहे । पीत केशर हे माजी तेथें ॥३॥ तयाचा मकरंद स्वरुप तें शुध्द । ब्रह्मादिका बोध हाची जाहला ॥४॥ ज्ञानदेव म्हणे निवृत्तीप्रसादें । निजरुप गोविंदें जनीं पाहतां ॥५॥
20 आकाशाचे ठायीं चंद्र सूर्य तारा । सूक्ष्माचा फेरा सर्वा ठायीं ॥१॥ बिंदुस्थान तेथें ब्रह्मरंध्र ज्योती । तेथे योगी वसती दिवस रात्र ॥२॥ ज्ञानदेव म्हणे सर्वची हें शून्य । वस्तु परी पूर्णं सर्वाठायीं ॥३॥
21 आकाशाचें अंतीं प्रणवाचें गुज । निरंजन बीज साधूं पाहाती ॥१॥ सद्रूप चिद्रूप अद्वय एक कळा । संसारीं वाहिला निर्विकार ॥२॥ प्रणवीं बीज अणुरेणु आंत । दशमद्वाराची मात अपूर्व बा रे ॥३॥ बापरखुमादेवी प्रणवे निखिळ । शब्दाचें पाल्हाळ प्रणवीं रीघे ॥४॥
22 आकाशासी गुंफा अंत नाहीं जिचा । शोध करा तिचा सर्वभावें ॥१॥ अनंत ब्रह्मांडाचा खेळ जिच्या योगें चाले । चांग्यासी मिनलें तयां ठायीं ॥२॥ गुंफेच्या आधारें चंद्र सूर्य चालती । विश्रांतिसी येती तये जवळी ॥३॥ ज्ञानदेव नयन धरितां समभावें । सोहं स्वरुप भावें लाधलेंसें ॥४॥
23 आकाशीं मळा लाविला बा एक । वांझेचे बाळक शिंपीतसे ॥१॥ अग्नीकुंड मनें बाळकें निर्मिले । प्रत्ययासी देखिलें मीया लागीं ॥२॥ ज्ञानदेव म्हणे उफराटें पाहातां । सर्व सौख्यदाता निवृत्ति एक ॥३॥
24 आठवितों तूंचि जवळिके । नाठवशी तरी निजसुखें । आठऊं ना विसरु पाहे । तंव सगुणचि ह्रदयी एक रया ॥१॥ तुझ्या नामाचा आठऊ रुपाचा आठऊ । ध्यानांचा आठऊ । असे मना रया ॥२॥ विसर पडावा संसाराचा । आठऊ हो तुझिया रुपाचा । येथें नाम रुप ठसा ह्रदयीं राहो । जिवाचिया जिवलगा । माझिया श्रीरंगा । गोडी घेऊनियां । द्वैत नाहीं पाहो रया ॥३॥ बापरखुमादेविवरा विठ्ठला । सगुणी सुमन गुंफिली प्रीति । आवडे तो कोंदाटले सुमन हें विरालें । जाली नामरुपीं ऐक्य भेटी । नाम रुप सार जाणोनि जीवन । संसारा जालिसे तुटी रया ॥४॥
25 आतसिकुसुमकोशशामघनु । तुळशीवृंदावनामाजी मुनीमनोपद्मदळविशाळजिरे आयो ॥ध्रु०॥ जलधीशयन कमलालयाजीवनु । बापरखुमादेविवरु विठ्ठलु घनानंदुमुर्ति ॥१॥
26 आतां आपणया आपण विचरी । सेखी प्रकृती ना पुरुष निर्धारी रया ॥१॥ आता प्रेतांचे अलंकार सोहोळले । कीं शब्दज्ञानें जे डौरले । दीप न देखतीं कांही केले । ऐसें जाणोनियां सिण न मानिती प्रतिष्ठा भोगिती भले रया ॥२॥ बापरखुमादेविवरा विठ्ठला देखतांचि जे बोधले । तेणें सुखें होउनि सर्वात्मक जे असतांचि देहीं विस्तारलें । येणें निवृत्तीरायें खुणा दाउनि सकळ बोलतां सिण झणें होईल रया ॥३॥
27 आतां औटपिठींचा मार्ग एक बाई । निशिदिनीं पाहीं शोध करा ॥१॥ औटहात प्रमाण सत्य कीं हे जाण । त्यांतील जें स्थान ऐकें एक ॥२॥ महालिंग स्थान टाळू एके संधीं । तेथें एक सिध्दि तेजोमय ॥३॥ मार्ग तेथ परतले दोहीं भागीं । पश्चिमीं महालिंगी मार्ग ऐसा ॥४॥ सत्रावीचे शिखरीं मार्ग एक गेला । तो म्यां देखियेला याच देहीं ॥५॥ महालिंगीं मार्ग अंत नाहीं ज्याचा । शोध करितां वाचा कुंठीतची ॥६॥ ज्ञानदेव म्हणे हा विचार पाहा । जाणता दाविता विरळा एक ॥७॥
28 आत्मज्ञान जया न देखा निजदृष्टी । तया नरा गोष्टी करुं नये ॥१॥ तूर्यारुपें जाण प्रभा हे नि:सिम । तया परत राम असे बापा ॥२॥ ज्ञानदेवा गुज दाविलें गुरुनें । मनें अनन्यें कल्पीतांची ॥३॥
29 आत्मा एक बाई स्थिरचरव्यापक । सृष्टी तैसी देख एकलीच ॥१॥ पचंमहाभूतें व्यापूनी निराळा । सौंदर्य पुतळा काळाबाई ॥२॥ ज्ञानदेव ध्यान धरिले पुढती । त्रैलोक्याची वस्ती असे जेथें ॥३॥
30 आत्मा पूर्णपणीं लक्ष सोहं स्मरणीं । लक्षासी उन्मनी आणा बारे ॥१॥ नरदेहाचें सार्थक सदगुरुचरणीं । महाकारणासरी चौथा देह ॥२॥ ज्ञानदेव म्हणे सदगुरुकृपेचें । नित्यानित्य क्रृपें शोध करा ॥३॥
31 आत्माराम देखे सहस्त्रदळावरी । उन्मनी हे पाहीं आरुते तेहीं ॥१॥ चक्षुचे अंतरी चक्षु देखे पूर्ण । हेचि कीरे खुण तुझें ठायीं ॥२॥ मी ब्रह्म सोई ज्ञानपद तें साजिरें । ते ठायीं निर्धारें तुझा तूंचि ॥३॥ बाप रखुमादेवीवरा तुझा तूं आपण । सर्व हें चैतन्य तुझे ठायीं ॥४॥
32 आत्माराम नयनीं निरखुनी देखिला । निळा रंग ओतीला आदी अंती ॥१॥ गोल्हाट त्रिकूट ब्रह्मरंध्रीं वस्तु । तुर्येची ऐसी मातु याच ज्ञानें ॥२॥ ज्ञानदेव म्हणे सर्वा अंतरीं तुर्या । निवृत्ती योगी वेगीं गुज बोले ॥३॥
33 आनंदाच्या ताटीं अमृताची वाटी । विवेकतारुं घोटी रसनाबळें ॥१॥ तें हें रुपडें रुपस विठ्ठल । पुंडलिकें बहु साल प्रार्थियलें ॥ध्रु०॥ तारावया जन व्हावया पावन । जड मूढ अज्ञान हरीपाठें ॥२॥ कर्म धर्म करितां शिणली येतां जातां । मग पुंडलिकें अनंता प्रर्थियलें ॥३॥ येउनिया श्रीहरी भीमेच्या तीरीं । सुदर्शनावरी पंढरी उभाविली ॥४॥ अमरतरुवर तीर्थ सरोवर । वेणुनादीं श्रीधर खेळताती ॥५॥ बागडे गाती हरि वाकुल्या कुसरी । तेथें पुंडलिक परोपरी स्तवन करी ॥६॥ धन्य पंढरीनगरी फ़ावली चराचरीं । धन्य जो भूमीवरी दृष्टीभरी हरी देखे ॥७॥ ज्ञानदेवा बीज विठ्ठल केशीराज । नव्हे ते नवल चोज प्रत्यक्ष हरी ॥८॥
34 आम्हीं कापडीरे आम्ही कापडीरे । पापें बारा ताटा पळती बापडिरे ॥१॥ पंढरपुरीचे कापडिरे । उत्तरपंथीचे कापडिरे ॥२॥ आणि पाहालेरे । संतसंगति सुख जालेरे ॥३॥ समता कावडिरे समता कावडिरे । माजि नामामृत भरिलें आवडिरे ॥४॥ येणें न घडेरे जाणे न घडेरे निजसुख कोंदलें पाहातां चहूंकडेरे ॥५॥ नलगे दंडणेरे नलगे मुंडणेरे । नाम म्हणोनि कर्माकर्मखंडणेरे ॥६॥ दु:ख फिटलेरे । दु:ख फिटलेरे बापरखुमादेविवर विठ्ठलरे ॥७॥
35 इडा वाम दक्षिणे पिंगला । दोहींत या कळा ब्रह्मस्थानीं ॥१॥ प्रणव सैरा बापा धांवे अवघड वाटे । रीघा नवपाटे जीव जीवना ॥२॥ ज्ञानदेव म्हणे स्वरुप जो जाणे । त्यासी शरण होणें अनन्य भावें ॥३॥
36 उन्मनी संयोगें गोसावी विराजे । चहूं देहाचें ओझें निवारोनी ॥१॥ सोहमस्मीचे छंदे परिपूर्ण । विज्ञान हे खुण जेथें नाहीं ॥२॥ चंद्रसूर्याहुनी तेज तें आगळें । अव्यक्तें व्यापिलें अनुभवें ॥३॥ अनुभवाची खुण गुरुगम्य जाणती । ज्ञानदेवें विनंति हेचि केली ॥४॥
37 उपजोनी नरदेहीं । जयाशी हरिभक्ति नाहीं । तोचि भूमिभारु पाही । व्यर्थ जन्म त्याचा गेला ॥१॥ पशुप्राणी तया जोडी । नेघेचि हरिनाम कावडी । तो कैसेनि परथडी । नामेवीण पावेल ॥२॥ जिव्हा बेडुकी चावट । विसरली हरिनाम पाठ । ते चुकले चुकले वाट । वैकुंठीची जाण रया ॥३॥ बापरखुमादेवी निर्धार । नामें तरले सचराचर । जो रामकृष्णीं निरंतर । जिवें जपु करील रया ॥४॥
38 एक नाम हरी द्वैत नाम दुरी । अद्वैत कुसरीं विरळा जाणे ॥१॥ समबुध्दि घेता समान श्रीहरि । शम दमा वैरी हरि झाला ॥२॥ सर्वाघटीं राम देहादेहीं एक । सूर्य प्रकाशक सहस्त्ररश्मीं ॥३॥ ज्ञानदेवा चित्तीं हरिपाठ नेमा । मागिलिया जन्मा मुक्त झालो ॥४॥
39 एकतत्त्व नाम दृढ धरी मना । हरिसि करुणा येइल तुझी ॥१॥ तें नाम सोपेरे रामकृष्णगोविंद । वाचेशी सदद जपे आधीं ॥२॥ नामापरतें तत्त्व नाहीरे अन्यथा । वायां आणिका पंथा जाशी झणी ॥३॥ ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी । धरोनी श्रीहरि जपे सदां ॥४॥
40 एका एक गुज बोलतों निर्वाण । निवृत्ति चरण आठऊनी ॥१॥ अर्धमात्राक्षरीं अक्षरें पाहाती । अनाक्षरा परती बाईयानो ॥२॥ रज तम सत्त्व याहुनी निराळी । लक्षाही वेगळी निवृत्ति जाणे ॥३॥ ध्येय ध्याता ध्यान परता जिचा खेळ । ज्ञेय ज्ञाता ज्ञान याची साक्ष ॥४॥ सतचितआनंद ब्रह्मा हरी हर । तेही जिचा पार नेणविती ॥५॥ सलोकता मुक्ती आदी तिन्ही वर । वसतें जें घर योगीयांचें ॥६॥ त्त्वंपद तत्पद असिपदाचा रंग । त्याचा अंतरंग देखा बाईयानो ॥७॥ निवृत्ति सोपान मुक्ताबाईची खुण । ज्ञानदेव साधन बोलीले हे ॥८॥
41 एकांति बाळा । कीं सोहंसुखशयन वेळा । पाहे चरणकमळा । सुंदराचे ॥ तेथें अरुण उदेला । कीं सुमन प्रगटला । कमळणी जाला । अंतरीं विकासु ॥ तें चरण कमळकेवळ । भक्त आळिउळ । सेविती सकळ । योगिजन । तेणें तृप्त जालें । कीं ह्रदय वोसंडले । म्हणोनि वाहावलें । ज्ञानडोहीं । तेचि ते परमानंद गे माय ॥१॥ न संगवे माय । परा पारुषली । दोंदिल दृष्टी जाली देखणेंपणें ॥ मनाचा अंकुर उगीच मुराला । तो कृष्णचि होऊन ठेला । अनुभविया ॥ध्रु०॥ तये पदांघ्रीचे रज । तेणें तृप्ति वो सहज । वरि त्रिवेणी ऊर्ध्व व्रज । मज पाहतां ॥ ते तंव रेखा । वरि सखोल देखा । त्यावरी वोळले पीयूषपाणी ॥ तयेचेनि मागें । उध्दरणें जगें । म्हणोनि संतसंगें । तया सोई ॥ ते दोहीं भागीं । विस्तारलें जगीं । म्हणोनि तया भागीं । चरणांगुष्ठ ॥ दृष्टीचा डोळा । न निवडेच बाळा । तेथें जाला एकवेळा । मुनिजनां गे माये ॥२॥ तेथें बिंबलीं नखें । कीं विवळणी विशेखें । काळेपणाचेनि द्वेषें । वाहावलीं पुढां ॥ उगमींच संचले । कीं वियोगें वाहावले । पुनरपि जडले । कृष्णपदीं ॥ गंगा अंगुष्ठधार । कीं वांकिचा बडिवार । तेथें सप्तही स्वर । उमटताती ॥ स्वरुपीं रमली । म्हणोनि अधोमुख जाली । शोभती घाघुरली । पायीं प्रभावळी गे माये ॥३॥ तंव ते निजानंद भरितें । नेणती आणिकांतें । विसरली आपणातें । हास्यवदनें ॥ म्हणती नेति नेति गर्जना । कीं माणिका खेवणा । घोट्या अनुमाना । बाळसूर्यो । पोटरिया निवाळा । कीं उभलिया सरळा । जानुद्वय सोज्वळा । उच्चस्तंभ ॥ उंच युगुळ कटीं । माज सामावे मुष्टीं । सोहं समदृष्टी । दोहीं भांगीं गे माये ॥४॥ वरि वेढिला पिंवळा । कीं मिरवे सोनसळा । कीं कल्पतरु फ़ुलेला । नाभिस्थानीं ॥ तेथें वेधु गोपिबाळा । कीं अंतरीं सांवळा । पालवी मेखळा । अभिळाखिया ॥ तेथें मदनु गूढपणें । रतिशये रमणे । दुजे अनुभउ अनुभवणें । न निवडे केंही ॥ सखोल नभमंडळ । तै ब्रह्मस्थान केवळ । कैसे पाहाले विवळ । तेथें जगामागी गे माये ॥५॥ रोमराजवेळा । कीं वेणी एकवळा । दावि निराळा । उदरामध्यें ॥ ह्रदय निर्मळ । तेथें ध्येय ध्यान केवळ । वरि चरणकमळ । द्विजोत्तम ॥ वैजयंति माळा । शोभतसे गळां । उभलेनि वक्षस्थळा । उभारली ॥ सरळ बाहुदंड । न कळे कानवड । अंगोळिया धडफ़ुड । खुणा दावितो गे माये ॥६॥ ऐसा खुणा दावितसे एका । तंव दावी अनेका । अंगोळिया देखा । दशावतावरी ॥ नखाची मंडणी । तेथें तेज तारांगणी । होत असे प्रवणी ॥ त्रिमिर द्वैत ॥ शुक्लपक्ष । कीं अंतरीं लक्ष । सारुनियां साक्ष । दृशदिसर्वी ॥ एकाएकीं संचरे कीं माजिघरीं दुसरे । स्वयें एकसरे । नवल चोज गे माये ॥७॥ तेथ सानुसान स्वर । दोहिलें अंबर । हास्यवदन सुंदर । पावया छंदें ॥ निमासुरा नेटका । न कळे ब्रह्मादिका । वेधुनि गोपिका । मोहियलें जग ॥ समदृष्टी नासापुटीं । नेत्रद्वय निघाले भेटी । रविशशि कोटी । लोपले तेथें ॥ मना मारुनि मेळा । कीं कुंडलें शोभे किळा । तेथें जाला एकवळा । योगिजना गे माये ॥८॥ व्योमींचा मणीं । तया तळीं सहस्त्रफ़णी । तो लाधला निर्वाणी । आराधितां ॥ शेष वर्णिता श्रमला । ह्मणोनि शरण आला । शयन होऊनि ठेला । तया तळीं ॥ ऐसी सुमन सेजा । कीं मवाळपण बरविया वोजा । तेथें रातली रमा भाजा । न निवडे केंही ॥ ऐसा झाला एकवळा । शेष म्हणे दैव आलें फ़ळा । आतां पाहेल सुनीळा । कायें सेज माजी ॥९॥ ऐसयाचें ध्यान । जरि हें न करी मन । तरीच पतन । जन्ममरण ॥ चिंता साठीं फ़ेडी । कीं उभारुनियां गुढी । स्वयें सुखाचिया आवडी । कां सांडितासी ॥ आतां करुं पाहे ध्यान । तरि सहजेंचि उन्मन । म्हणोनि समाधान । होय जीवा ॥ तीर्थ व्रत तप दान । जरी न करी हें मन । तरि सहजचि साधन । गोपिनाथु ॥१०॥ तीर्था जातां सायासी । तूं काय एक देसि । म्हणोनि स्तविलासी । बहुतांपरी ॥ तंव परापश्यंती मध्यमावैखरी । या युक्तिनो बोलवेसी ॥ निवृत्ति म्हणे लीळा । विश्वव्यापक निराळा । पाहे उघडा डोळां परब्रह्म ॥ ज्ञानदेवा मीपणीं । निवृत्ति ऐक्य चरणीं । सरो दुजेपणीं । हांव जीवा ॥११॥
42 एकी म्हणे भाव धरुं नेदी मौन । तेथींचे वो ज्ञान मज सांगे ॥१॥ एकीनें सांगितलें दुजीनें परिसलें । प्रपंचा पुसलें तेणें रुपें ॥२॥ तें घरटीं कडी सोकरी बागडी । सोहं कथा उघडी पंढरीये ॥३॥ ज्ञानदेव म्हणे निवृत्तीस मनें । नयनांसी पारणें देखतांची ॥४॥
43 ऐका हा शेवट अभंगमाळा झाली । तूर्या हेच आली प्रत्यया गा ॥१॥ तूर्या तेचि उन्मनी क्षर तें अक्षर । निर्गुण साकार ऐसें देखा ॥२॥ देह तें विदेह महाकारण ब्रह्म । हें निश्चयाचें वर्म ऐसें जाणा ॥३॥ कनक तेंची नग समुद्र तरंगीं । देह हा सर्वागीं ब्रह्म जाणा ॥४॥ अभंगा शेवट जाणे निवृत्ति एक । त्यानें मज देख कृपा केली ॥५॥ मूर्खासी हा बोध सांगों नये बापा । अभंग कृत्याचा लेश नसो हातीं ॥६॥ ज्ञानदेव म्हणे हें कृत्य हातां नये । माय देऊं नये कोणासही ॥७॥
44 ऐशिया माजी तो निज एकांती राहिला । विठ्ठल अनुसरला भावें एके ॥१॥ नित्य प्रळय निद्रिस्त नित्य पळय मृत्यु । कल्पांती जीव जात मायाहीं नाहीं तेथ ॥२॥ तेचि तूं होउनि राहे विश्वासी । ठायींच्या ठायीं निवशी अरे जना ॥३॥ तेथें नाहीं दु:ख नाहीं तहान भूक । विवेका विवेक नाहीं तेथें ॥४॥ ऐसें तें पाहोनी तये तृप्ति राहोनी । तेंचि तूं जाणोनी होई बापा ॥५॥ बापरखुमादेवीवरु विठ्ठलुगे माये । स्वस्वरुपीं राहे तये कृपा ॥६॥
45 ऐसा अवतार नरहरिस्तंभामाझारी । भक्तांपरोपरी धरी रुपें ॥१॥ धरुनिया महीत्व झाला नृसिंहरुप । वेदशास्त्रांसी अमूर्त मूर्तीस आला ॥२॥ बापरखुमादेविवरु नरहरी अवतारु । वर्ण सारड्ग.धरु निजरुप ॥३॥
46 ऐसा योगीराज देखिता अवचट । उन्मनी लंपट रात्रंदिवस ॥१॥ सत्रावीची शिव टाकुनी राहिला । पहाण्यातील झाला सर्वाठायीं ॥२॥ असिपदीं आनंद प्रियरुप जाण । ध्यानाचें कारण जेथें नाहीं ॥३॥ ज्ञानदेव म्हणे ऐसा योगीराणा । तयाचीया चरणा प्रणिपात ॥४॥
47 औट पिठावरी निरंतर देश । तेथ मी जगदीश असे बाई ॥१॥ त्रिकुटाचा फेरा टाकीला माघारा । अर्धमात्रेवरा वरी गेलों ॥२॥ अर्धनारी पुरुष एकरुप दीसे । तेची ब्रह्म ऐसें जाण बाई ॥३॥ ज्ञानदेवी शून्य नयनी देखिलें । सर्वत्रीं संचलें शून्य एक ॥४॥
48 औटपीठ डोंगरी गाय एक वसे । क्षीर सेवितसे निजयोगी ॥१॥ धाले पूर्णपदीं समान लक्षिती । क्षुधा चाड चित्तीं नाहीं नाहीं ॥२॥ भ्रुवांतरीं लक्ष लाऊनी बैसा ध्यानीं । ऐक्यासी उन्मनी होऊनी रहा ॥३॥ ज्ञानदेव नमितो आदी देवी प्रति । नेत्रीं पाहे ज्योती शुध्दरुप ॥४॥
49 कल्पना वृक्षासी देखिलें । चिंतामणीस चिंतिलें । कामधेनुसी आपेक्षिलें । जीण्या जिवविलें तेंचि हरिरुप पंढरिये ॥१॥ धन्य कुळ धन्य जन्म । जयासि पंढरीचा नेम । चित्तीं अखंड विठ्ठल प्रेम । ते धन्य भक्त भूमंडळी ॥ध्रु०॥ तोचि तीर्थरुप सदा । तया दोष न बाधिती कदां । जो रातला परमानंदा । तेथें सर्व सिध्दि वोळंगती ॥२॥ ऐशीं वेदशास्त्रीं पुराणीं । जो रातला नामस्मरणीं । धन्य तया तीर्थ पर्वणी । धन्य वाणी तयाची ॥३॥ पंढरीसी कीर्तन करी । पुंडलिकासी नमस्कारी । विठ्ठल चरण अंतरी धरी । धन्य जन्म तयाचा ॥४॥ सकळ कुळाचा तारकु । तोचि जाणावा पुण्यश्लोकु । पांडुरंगी रंगला निशंकु । धन्य जन्म तयाचा ॥५॥ त्यासी अंतीं वैकुंठप्राप्ती । ऐसें शुकें सांगितलें परीक्षिती । जे जे हरिचरणीं भजती । ते ते पावती वैकुंठ ॥६॥ मानें स्फ़ुंदत नाचत रंगणीं । प्रेम विठ्ठल चरणीं । सर्व सुख खाणी । बाप रखुमादेवीवर विठ्ठल ॥७॥
50 कांही नव्हे तो । अमूर्ता मूर्ति तो गे बाई ॥१॥ सहजा सहज तो । सहज सुखनिधान तो गे बाई ॥ध्रु०॥ रखुमादेविवरु तो । पुंडलिकवरद तो गे बाई ॥२॥
51 कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हांसी कां दिली वांगली ॥ध्रु०॥ स्वगत सच्चिदानंदें मिळोनी शुध्दसत्त्व गुण विणलीरे । षडगुण गोंडे रत्नजडित तुज श्याम सुंदरा शोभलीरे ॥१॥ काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभुतांनी विणलीरे । रक्त रेत दुर्गंधी जंतु नरक मुतानें भरलीरे ॥२॥ षडविकार षडवैरी मिळोनि तापत्रयानें विणलीरे । नवाठायीं फाटुनी गेली ती त्त्वां आम्हांसि दिधलीरे ॥३॥ ऋषि मुनि ध्यातां मुखि नाम गातां संदेह वृत्ती विरलीरे । बापरखुमादेविवर विठ्ठले त्त्वत्पादी वृत्ति मुरलीरे ॥४॥
52 काय सांगू तूतें बाई । काय सांगू तूतें ॥ध्रु०॥ जात होते यमुने पाणिया वातत भेतला सावला । दोईवल तोपी मयुल पुछाची खांद्यावरी कांबला ॥१॥ तेणें माझी केली तवाली मग मी तिथुन पलाली । पलतां पलतां घसलून पलली । दोईची घागल फुतली ॥२॥ माझे गुलघे फुतले मग मी ललत बथले । तिकुन आले शालंगपानी मला पोताशीं धलिलें ॥३॥ मला पोताशीं धलिलें माझें समाधान केलें । निवृत्तीचे कृपें सुख हें ज्ञानदेवा लाधले ॥४॥
53 काळ केळ नाम उच्चारितां नाहीं । दोन्ही पक्ष पाही उध्दरती ॥१॥ रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण । जड जीवां तारण हरि एक ॥२॥ हरि नाम सार जिव्हा या नामची । उपमा त्या दैवाची कोण वानी ॥३॥ ज्ञानदेवा सांग झाला नामपाठ । पूर्वजां वैकुंठ मार्ग सोपा ॥४॥
54 काळा पुरुष तो हा गगनांत जो नांदे । अनुभवाच्या भेदें भेदला जो ॥१॥ भेदून अभेद अभेदूनी भेद । सच्चिदानंद जेथ नाहीं ॥२॥ ज्ञानदेव म्हणे तेथें अक्षय राहिला । आत्मा म्यां पाहिला या दृष्टिसी ॥३॥
55 काळेपणाचा आवो अंबरीं बाणला । तो एकु दादुला देखिला डोळां ॥१॥ काळें मनुष्य मानव जालें । अरुप रुपा आलें गोविंदपणें ॥ध्रु०॥ रखुमादेविवरु विठ्ठलु सोहंधरु । त्यानें माझा वेव्हारु बहु काळें नेलागे माये ॥२॥
56 कासवीचें तूप जेवी । आकाश घालीपां पेवीं । वांजेंचें बाळ खेळवी । रुदना करी रया ॥१॥ पाहे पा नवल चोज । म्या देखिलें पा मज । गुह्यांचे गुज । जाणरे मना ॥२॥ मृगजळ सागर भला । डोंगरें ओणवा विझविला । समुद्र तान्हेला । जीवनालागी ॥३॥ ज्ञानदेव ऐसें म्हणे । कापुराची मैस घेणें । दुधावीण सांजवणे । भरलें दिसे ॥४॥
57 कैसे बोटानें दाखवूं तुला । पाहे अनुभव गुरुच्या मुला । नको सोडूं देठीच्यां मुळा । सोडी अंजुळी आपुल्या कुलारे ॥१॥ ज्या ठायीं चळना ढळ । विश्व जयाचें सत्तेनें खेळ । अणुरेणु व्यापक सकळ । तेथें चळ ना अचळरे ॥२॥ जेथें डोळिया दृष्टि पुरेना । तेथें वृत्तीचें कांही चालेना । तेथें बुध्दीचा रीघ होईना । तेथें मनाची धांव पुरेना गा ॥३॥ काय पहाशी तूं भोंवतें । येतां जातां जवळी असते ॥ तुझ्या पायाखालीं तुडवतें । तुझ्या डोळ्यामध्यें दिसतें गा ॥४॥ ही खुण त्त्वां ओळखुनी घ्यावी । गुरुपुत्रा जाउनी पुसावी । तो नेऊनी तुला दाखवी । सोय सांगितली ज्ञानदेवी गा ॥५॥
58 कोणाचे हें रुप देह हा कोणाचा । आत्माराम साचा सर्व जाणे ॥१॥ मीतूं हा विचार विवेकें शोधावा । गोविंद हा ध्यावा याच देहीं ॥२॥ ध्येये ध्याता ध्यान त्रिपुटीं वेगळां । सहस्त्रदळीं उगवला सूर्य जैसा ॥३॥ ज्ञानदेव म्हणे नयनातींल रुप । या नांव चितपद तुम्ही जाणा ॥४॥
59 गगनमंडळीं नारी सुकुमार दिसे । तिन्ही लोक वसे तिचे उदरीं ॥१॥ परादी वाचा तन्मय ते झाली । साक्षीत्त्वासी आली ब्रह्मरंध्री ॥२॥ ज्ञानदेव म्हणे नयनांतील ज्योती । पाहातां वृत्ति हरे विषयांचीं ॥३॥
60 गरुवार जाली अंबुला व्याली । व्येउनिया मेली माझ्या ठाई ॥१॥ जेथें ठाव ना ठेवणी निघाली कोनी । तेथें सुईणी हात नाहीं ॥२॥ बापरखुमादेवीवरा विठ्ठली शेजबाज । सहज सहजाकार अंबुला देखा ॥३॥
61 गुजगुजीत रुप सावळे सगुण । अनुभवितां मन वेडें होय ॥१॥ भ्रमर गुंफा ब्रह्मरंध्र तें सुरेख । पाहतां कवतुक त्रैलोकीं ॥२॥ आनंद स्वरुप प्रसिध्द देखिलें । निजरुप संचलें सर्वा ठायीं ॥३॥ ज्ञानदेव म्हणे या सुखाची गोडी । अनुभवाची आवडी सेवीं रया ॥४॥
62 गुरु हा संतकुळीचा राजा । गुरु हा प्राणविसांवा माझा । गुरुवीण देव दुजा । पाहातां नाहीं त्रिलोकीं ॥१॥ गुरु हा सुखाचा सागर । गुरु हा प्रेमाचा आगर । गुरु हा धैर्याचा डोंगर । कदाकाळी डळमळीना ॥२॥ गुरु वैराग्याचें मूळ । गुरु हा परब्रह्म केवळ । गुरु सोडवी तात्त्काळ । गांठ लिंगदेहाची ॥३॥ गुरु हा साधकाशीं साह्य । गुरु हा भक्तालागी माय । गुरु हा कामधेनु गाय । भक्ताघरीं दुभतसे ॥४॥ गुरु घाली ज्ञानाजंन । गुरु दाखवी निज धन । गुरु सौभाग्य देउन । साधुबोध नांदवी ॥५॥ गुरु मुक्तीचें मंडन । गुरु दुष्टाचें दंडन । गुरु पापाचे खंडन । नानापरी वारितसे ॥६॥ काया काशी गुरु उपदेशी । तारक मंत्र दिला आम्हाशीं । बापरखुमादेवीवराशी । ध्यान मानसी लागलें ॥७॥
63 चंचळ चांदिणें सोमविणें भासलें । तेज निमालें रविबिंबेंविणें ॥१॥ जगत्रजीवनु ह्मणे जगासी कारण । तें अणुप्रमाण तेथे दिसे ॥२॥ बापरखुमा-देविवरु अणुप्रमाण भासला । सगुण निर्गुण जाला बाईये वो ॥३॥
64 चंहूं वेदीं जाण साहिशास्त्री कारण अठराहीं पुराणें हरिसी गाती ॥१॥ मंथुनि नवनीता तैसें घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्गु ॥२॥ एक हरि आत्मा जीवशिवसमा । वायां तूं दुर्गमा न घाली मन ॥३॥ ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥
65 चतुरपणें चतुराननु पैं भागला । शिवुपणें शिवरुपु पैं जाहला ॥१॥ हरिपणें हरि अंग रिघाला । या तिहींचा मेळा न दिसे गे माये ॥ध्रु०॥ रखुमादेविवरु तिहीं गुणां वेगळा । शक्ति नव्हे दादुला गे माये ॥२॥
66 चहूं शून्याआरुतें महाशून्यापरुतें । सर्वांसी पहातें तेंची तें गा ॥१॥ दिसे तेंही शून्य पहा तेही शून्य देहामजी निरंतर भिन्न रुप ॥२॥ शून्य निरशून्य दोन्ही हारपलीं । तेथूनी पाहिली निजवस्तु ॥३॥ ध्येय ध्यान ध्याता निरसुनी तिन्ही । झालों निरंजनी अति लीन ॥४॥ ज्ञानदेव म्हणे अनुभवी तो जाणें । गुरुमुखें खुण सांगितली ॥५॥
67 चहूं शून्याचा भेद कैसा पहावा देहीं । ब्रह्मरंध्री निसंदेहीं निजवस्तु ॥१॥ साकळें सकुमार बिंदूचे अंतरीं । अर्धमात्रेवरी विस्तारलें ॥२॥ त्रिकूट श्रीहाट गोल्हाट तिसरें । औठपिठादी सारे ब्रह्मांडासी ॥३॥ स्थूळ सूक्ष्म कारणी माया । महाकारणाच्या ठायां रिघ करा ॥४॥ निवृत्ति ज्ञानदेव उभयतांचे बोल । आकाश बुबुळीं पाहा असे ॥५॥
68 चिदानंद रुप चेतवितें एक । एकपणें गुणागुणीं दावी अनेक ॥१॥ आदि अंतीं गुण सर्वत्र निर्गुण । गुणासी अगुण भासतीना ॥ध्रु०॥ कैसें जालें अरुपीं गुणीं गुणवृत्ती । सगुण पाहतां अंतरलें गती ॥२॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलु नंदनंदनु । आदिअंतु एकु पूर्ण सनातनु गे माये ॥३॥
69 चैतन्य तें दिसें उघडेया डोळां । नयनाचा सोहळा निवृत्ति जाणे ॥१॥ मसुरांतील सूक्ष्म अनुभवें दिसे । तेथ तेज असे कवण्या रीती ॥२॥ ज्ञानदेव म्हणे ऐसे तेथे तेज । असे गुजगुजीत निर्मळ तें ॥३॥
70 जडांतील शुध्दांश कौतुकें रिघाला । निवृत्तीने दाविला कृपा करुनी ॥१॥ अनुहात भेद दाविला कृपनें । सर्व हें चैतन्य गमलें तेव्हां ॥२॥ ज्ञानदेव नमनीं निवृत्तीचे पदीं । आनंद ब्रह्मपदीं एक झाला ॥३॥
71 जप तप कर्म क्रिया नेम धर्म । सर्वाघटीं राम भावशुध्द ॥१॥ न सोडी रे भावो टाकीरे संदेहो । रामकृष्णीं टाहो नित्य फोडी ॥२॥ जाती वित्त गोत कुळ शीळ मात । भजे कां त्त्वरित भावना युक्त ॥३॥ ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । तेणें वैकुंठभुवनीं घर केलें ॥४॥
72 जरासंदुमल्लमर्दनु तो । गजपित्राहटणु तो गे बाई ॥१॥ कुब्जकपान तो । सुदाम्या अनुसंधान तो गे बाई ॥ध्रु०॥ रखुमादेविवरु तो । कंसचाणूरमर्दन तो गे बाई ॥२॥
73 जाणीव नेणीव भगवंती नाहीं । हरि उच्चारणीं पाही मोक्ष सदां ॥१॥ नारायणहरी उच्चार नामाचा । तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥२॥ तेथील प्रमाण नेणवे वेदांसी । तें जीव जंतूंसी केंवि कळे । ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केलें असे ॥३॥
74 जीवन कैसें तान्हेजत आहे । मन धाले परि न धाये ॥१॥ पुढती पुढती राजा विठ्ठल पाहे । निरंजनी अंजन लेईजत आहे ॥२॥ आपुलें निधान आपण पाहे । निवृत्ति गार्हाणें मांडले आहे ॥३॥ बापरखुमादेवीवर विठ्ठलाचे पाये । विसंबला क्षण माझा जीव जाऊं पाहे ॥४॥
75 जोहार माय बाप जोहार । मी कृष्णाजी घरंचा पाडेवार । त्याचे घरांतला सर्व कारभार । माझे शिरावर की जी माय बाप ॥१॥ कामाजी बाजी हुद्देदार । तेणें रयतेचा केला मार । रयत फार नागविली की जी माय बाप ॥२॥ क्रोधाजी बाबा शेखदार झाले । त्याजकडे हुजूरचें काम आलें । तेणें कामाजीचें छळण केलें की जी माय बाप ॥३॥ मनाजी बखेडा झाला । गांव सगळा नाशिला की जी मायबाप ॥४॥ बुधाजी पाटील कायापूरचे । ममताईचे हाताखालचे । त्यांत जीवाजी भुलले की जी माय बाप ॥५॥ या उभयतांचा विचार वागला । त्यामुळें आम्हांस राग आला । बुधाजी आवरी आपल्या पोराला की जी माय बाप ॥६॥ सदगुरुचा मी पाडेवार । निवृत्तीशीं असे माझा जोहार । ज्ञानदेवा सफळ संसार झाला की जी माय बाप ॥७॥
76 ज्ञानविज्ञान हरि । नांदे आमुच्या घरीं । बाह्यजु अभ्यंतरी जाला देव ॥१॥ काय सांगूं माय । त्रिभुवन धाय । पाहातां न समाय । नाना रुपीं ॥ध्रु०॥ चढत्या वाढत्या गोष्टी । प्रगट दिसे घटीं । नामरुपें वैकुंठीं । नेऊनि घाली रया ॥२॥ ज्ञानदेवा गोडी । हरिपदीं आवडी । प्रवृत्तीची थडी । उलंडिली ॥३॥
77 ज्याचें गुणनाम आठवितां मनचि नाहीं होय । अनुभवाचे पाय पुढें चालती ॥१॥ निर्गुणगे माय गुणवंत जाला । प्रतिबिंबीं बिंबतसे चैतन्याचें मुसे । प्रति ठसावत तें वृंदावनीं ब्रह्म असेगे माये ॥२॥ बापरखुमादेविवरु डोळसु सावळा । द्वैत अद्वैत सोहळा भोगविगे माये ॥३॥
78 डोळा माझा बाप त्रिभुवना परता । जो देखे मुक्तता तोचि लाहे ॥१॥ जीव जंतु कृमी मुंगी नेत्रामध्यें । वास्तव्य गोविंदे केलें पाहा ॥२॥ ज्ञानदेवाचें बोल उघड निर्मळ । जान्हवीचें जळ स्थिर वाहे ॥३॥
79 डोळांची पाहा डोळां शून्याची शेवट । निळबिंदु नीट लखलखीत ॥१॥ विसावों आलें पातलें चैतन्य तेथें । पाहे पा निरुतें अनुभवे ॥२॥ पार्वतिलागीं आदीनाथें दाविलें । ज्ञानदेवा फावलें निवृत्तिकृपा ॥३॥
80 डोळियांत डोळा काळियांत काळा । देखण्या निराळा निळारुप ॥१॥ ब्रह्म तत्त्व जाणे ज्योतिरुपें सगळा । ज्योतीही वेगळा ज्योती वसे ॥२॥ ज्ञानदेव म्हणे देवा ऐसी ज्योती । अर्थमात्रा उत्पत्ति सर्वाजीवां ॥३॥
81 तत्त्वें तत्त्व धरी कोहंभाव होकारी । सोहं सोहं करी कोण सये ॥१॥ सोकरी पुंडलिकु ज्ञान पुण्यश्लोकु । विठ्ठलु त्रैलोकु उध्दरिले ॥२॥ सखी जाय तेथें भाव बळिवंत । प्रपंच देहांत नाहीं तुज ॥३॥ ज्ञानदेव पुसे निवृत्ति सौरसें । पुंडलिकें कैसें पुण्य केलें ॥४॥
82 तीर्थ व्रत नेम भावेंविण सिध्दि । वायांचि उपाधी करिसी जना ॥१॥ भावबळे आकळे येर्हवीं नाकळे । करतळीं आंवळे तैसा हरि ॥२॥ पारियाचा रवा घेतां भूमीवरी । यत्न परोपरी साधन तैसें ॥३॥ ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण । दिधलें संपूर्ण माझ्यां हातीं ॥४॥
83 तुज सगुण म्हणों की निर्गुणरे । सगुण निर्गुण एकु गोविंदुरे ॥१॥ अनुमाने ना अनुमाने ना । श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे ॥ध्रु०॥ तुज स्थूळ म्हणों कीं सूक्ष्म रे । स्थूलसूक्ष्म एक गोविंदुरे ॥२॥ तुज आकार म्हाणों की निराकररे । साकारु निरुकारु एकु गोविंदुरे ॥३॥ तुज दृश्य म्हणों कीं अदृश्यरे । दृश्यअदृश्य एकु गोविंदुरे ॥४॥ निवृत्तिप्रसाद ज्ञानदेव बोले । बाप रखुमादेविवरु विठ्ठलुरे ॥५॥
84 तुरे कांबळा डांगेवरी विषाण वेणु घेऊनि करीं । वैजंयति रुळे कैशी वक्षस्थळावरी ॥१॥ गोविंदु वो पैल गोपाळु माये । सुरतरु तळवटीं देखे कैसा उभा राहे ॥ध्रु०॥ आडत्रिपुंड्र शोभत दूमिळ भारेंसि जे जात । नागर केशरिचीं पुष्पें कैसा खोप मिरवत ॥२॥ हिरिया ऐशा दंतपंक्ति अधर पोंवळ वेली । श्रवणीं कुंडलें ब्रह्म रसाचीं वोतलीं ॥३॥ विश्वाचें जीवन तें म्यां सार देखियलें । योगी ध्याती ध्यानीं ब्रह्म तेंचि गोकुळासि आलें ॥४॥ आजि धन्य धन्य जालें राया कृष्णासि देखिलें । निवृत्तिमुनिरायप्रसादें ध्यान तें ह्रदयासि आलें ॥५॥
85 तुर्येमध्यें माझा अखंड रहीवास । निवृत्ति म्हणे अविनाश तूर्या करी ॥१॥ स्थुळदेह निमतां सूक्ष्म उरतां । कारणीं हारपतां कैसें झाले ॥२॥ ज्ञानदेव म्हणे महाकारणीं नांदे । निवृत्तीने आनंदे दाखविलें तें ॥३॥
86 तूं विटेवरी सखये बाई हो करी कृपा । माझें मन लागो तुझ्या पायीं हो करी कृपा । तूं सावळे सुंदरी हो करी कृपा । लावण्य मनोहरी हो करी कृपा । निजभक्ता करुणा करी हो करी कृपा ॥१॥ पंढरपुरीं राहिली । डोळा पाहिली । संतें देखिली । वरुनी विठाई वरुनी विठाई । सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा । उजळकुळ दीपा । बोध करी सोपा । येउनी लवलाही येउनी लवलाही ॥ध्रु०॥ तुझा देव्हारा मांडिला हो करी कृपा । चौक आसनीं कळस ठेविला हो करी कृपा । प्रेम चांदवा वर दिधला हो करी कृपा । ज्ञान गादी दिली बैसावया हो करी क्रृपा । काम क्रोध मदमत्सर दंभ अहंकार । त्याचे बळ फार । सर्व सुख देई सर्व सुख देई ॥२॥ शुक सनकादिक गोंधळी हो करी कृपा । नाचताती प्रेम कल्लोळीहो करी कृपा । उदे उदे शब्द आरोळी हो करी कृपा । पुढें पुंडलिक दिवटा हो करी कृपा । त्याने मार्ग दाविला निटा हो करी कृपा । आई दाविली मूळपीठा हो करी कृपा । बापरखुमादेवीवरु । सुख सागरु । त्याला नमस्कारु । सर्व सुख देई सर्व सुख देई ॥३॥
87 तूर्या तें महाकारण नाहीं नाहीं जेथें । दर्शनाचे मतें माझा मीच ॥१॥ गोल्हाट त्रिकूट श्रीहाटातीत । महाकारणाची मात जेथ नाहीं ॥२॥ क्षर अक्षर अनाक्षर नाहीं । कूटस्थ सर्वही प्रसवला ॥३॥ ज्ञानदेव म्हणे ऐसें हें पाहातां । निवृत्तीनें तत्त्वता कथनी केली ॥४॥
88 त्रिगुण असार निर्गुण हें सार । सारासार विचार हरिपाठ ॥१॥ सगुण निर्गुण गुणाचें अगुण । हरिवीण मन व्यर्थ जाय ॥२॥ अव्यक्त निराकार नाहीं त्या आकार । जेथोनि चराचर हरिसी भजे ॥३॥ ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । अनंत जन्मोनि पुण्य होय ॥४॥
89 त्रिगुणाचें मूळ सत्रावीचें सार । उन्मनीचें बीज जाण रया ॥१॥ शून्य ब्रह्म पूर्ण चक्षूचे अंतरीं । निर्विकार निरंजन तोची तें गा ॥२॥ सूर्य चंद्र दोनी प्रकाशले साजिरे । त्रिकूट संचरे आत्मठसा ॥३॥ ज्ञानदेव म्हणे निवृत्तिप्रसादें । राहा रे निजबोधें निरंतर ॥४॥
90 त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये । कल्पद्रुमातळीं वेणु वाजवित आहे ॥१॥ गोविंदु वो माये गोपाळु वो । सबाह्य अभ्यंतरीं अवघा परमनंदुवो ॥ध्रु०॥ सांवळे सगुण सकळा जिवांचें जीवन । घनानंद मूर्ति पाहतां हारपलें मन ॥२॥ शून्य स्थावर जंगम व्यापूनि राहिला अकळ । बाप रखुमादेविवरु विठ्ठलु सकळ ॥३॥
91 त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं नामीं तरि तें व्यर्थ ॥१॥ नामासि विन्मुख तो नर पापीया । हरिविण धावया नपवे कोणी ॥२॥ पुराणप्रसिध्दि बोलिले वाल्मीक । नामें तिन्ही लोक उध्दरती ॥३॥ ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचें । परंपरा त्याचें कुळ शुध्द ॥४॥
92 दशमद्वार अग्रशून्य सूक्ष्म गगनीं । जेथ आसे उन्मनी निखिल रुपे ॥१॥ द्विविध भाग पिंडी द्विविध ब्रह्मांडी । या तीं पडीपाडीं ब्रह्मरंध्रीं ॥२॥ ज्ञानदेव म्हणे शून्यांतील रुप । अनंत ब्रह्मांणे जेथ आहाती ॥३॥
93 दिव्यरुप चक्षु कैशापरि झाला । ठसा हा उमटला कवण्यापरी ॥१॥ चहुं देहांचा वर्ण अवर्ण देखिलें । विश्व म्यां पाहिलें तयामध्यें ॥२॥ ज्ञानदेव म्हणे सर्वाचे जें मूळ । सत्रावी केवळ शुध्दरुप ॥३॥
94 दुजे द्वैत सांडी एक तत्त्व मांडी । अद्वैत ब्रह्मांडीं पै सुकीजे ॥१॥ तें रुप पंढरी पुंडलीका द्वारीं । मुक्ति मार्ग चारी वश्य रया । अनंतीं अनंत वोतलें संचीत । वैकुंठ अदभुत उभें असे ॥२॥ ज्ञानदेवीं ध्यान मन मौन चरण । आपणची मग्न तेथें जाले ॥३॥
95 देव आहे जैसा तैसा नेणवे सहसा । भांबावला कैसा विश्वजनु ॥ तया रुप ना रेखा लय ना लक्षण । ते प्रतिमें आणून वासना रुपें ॥१॥ देखा सर्वगत निराळा अद्वैत । तया मूर्तिमंत ध्याय जनु ॥ तिहीं देवासि आरु जेथुनि विस्तारु । तो ध्वनि ओंकारु त्या आरु । आतां तो नाद ना बिंदु काळा ना छंदु । अक्षय परमानंदु सदोदितु ॥२॥ अवतरे तैसाच नव्हे होय तें न संभवे । आहे तें आघवें लाघव रया ॥ तो येकट एकला रचला न वेचला । आदिअंतीं संचला अनंतपणें ॥ पृथ्वी आप तेज वायु आकाश । हीं सकळही हारपती प्रळयांती ॥ तो निरशून्य निरुपम निरंजन निर्वाण । ते दशा पाषाण केंवि पावती ॥३॥ पाहातां या डोळां परि न दिसे कांहीं केल्या । व्यापुनियां ठेला बाहिजु भीतरि ॥ तो पदपिंडा अतीतु भवभावरहितु । बापरखुमादेविवर विठ्ठलु ह्रदयांतु रया ॥४॥
96 देवाचिया द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥ हरि मुखें म्हणा हरिमुखें म्हणा ॥२॥ पुण्याची गणना कोण करि ॥३॥ असोनि संसारी जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदां ॥४॥ ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणें । द्वारकेचे राणे पांडवां घरीं ॥५॥
97 दोन्ही बाहीं संतांची सभा । सिंहासनी उभा श्रीविठ्ठल ॥१॥ गाती नारद तुंबर प्रेमें । हरीचें नाम गर्जती ॥२॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलु उभा । त्रैलोक्याची शोभा शोभतसे ॥२॥
98 धांवत धांवत आलों नयनांजनीं । प्रकाश दिनमणी उणा वाटे ॥१॥ निशी दिवस दोन्हीं नाहीं जेथ बारे । अर्धमात्रेवरी लक्ष ठेवीं ॥२॥ अक्षय अक्षर क्षरविरंहीत साजे । ज्ञानाचे जें ओझें चालेचीना ॥३॥ ज्ञानदेव चक्षु झाला परेवरी । यापरती बरोबरी नाहीं बापा ॥४॥
99 न चलति शब्द खुंटले पै वाद । एक तत्त्व भेद नाहीं रुपा ॥१॥ तें रुप पंढरी भरलें चराचरीं । माझा माजी घरीं बिंबलेंसे ॥२॥ रखुमादेविवरु पुंडलीकवरु । निळियेचा आगरु पंढरीये ॥३॥
100 नभ नभाचेनि सळें । क्षोभु वाहिजे काळिंदी जळें । सासिंनले जगाचे डोळे । तें रुप पाहावया । भलतैसी हांव । मना न पुरे तेथींची धांव । लावण्यसिंधु सिंव सांडूनि जातो गे माये ॥१॥ सुलभ परमात्मा गे माये । मन मुरोनि देखणेपणा उरी । याचि कारणें उभा भिवरेतीरीं । अनुपम्य जयाची थोरी गे माये ॥ध्रु०॥ काळिंदीजळाचा भोंवरा । कीं माजी वेढूनि इंदीवरा । माळ बांधोनियां मधुकरा । रोमांमाजी ॥२॥ सकल सिध्दिंचा मेळां । तेंवि विभूति शोभे भाळा । मुगुटीं रत्नकिळा । लिंग अनुपम्य गे माये ॥३॥ क्षीरसागरींचें । निवांत सुख । असो हें निमासुरें मुख । श्रीयेचें मनोहर देख । टवकारलें दोंभागीं ॥ पहावया ऊरंचीं शोभा । सकळ देवाची प्रभा । तेथें तारांगणें कैंचीं नभा । लेइला गे माये ॥४॥ कटावरी ठेवूनि हात । जनां दावी संकेत । भवजलाब्धीचा अंत । इतुलाची ॥ सम चरणींच्या खुणा । उभा पंढरीचा राणा । तो आवडे जनांमना । दुर्लभ गे माये ॥५॥ कैवल्याचा गाभा । कीं ब्रह्मविद्येचा वालभा । निकटपणाचिया लोभा । कैसा उभा असे ॥ देवा पायींची वीट । तेचि माये नीट । वरि येऊनि भीमातटी । वोळग दावी गे माये ॥६॥ नेति नेतिचेनि बिरारें । उभऊनि श्रीकरारें । श्रुंगाराचेनि पडिभरें । चराचरें वोळगती ॥ हा मेखळेचा मध्यमणी । उदो केला ग्रहगणीं । मध्य नायकु तरणी किरणीं । विरजितु गे माये ॥७॥ आमुची ह्रदयींची श्रीमूर्ति । घेऊनि विठ्ठलवेषाची बुंथी । आतां चाळविसी किती । बापा पालटु नेघे ॥ बाप रखुमादेविवरा विठ्ठला । त्वां मजशीं अबोला कां धरिला । जीवीं जीव आहे उरला । तो निघों पाहे ॥८॥
101 नयनांतील रुप जो हें देखे पुरुष । त्याचे चरणीं वास असे माझा ॥१॥ नयनांतील ज्योती देखे गुह्यभावें । त्याचें स्वरुप भावें वंदावें गा ॥२॥ ज्ञानदेव म्हणे नयनांतील शून्य । देखे तोची धन्य भाग्यवंत ॥३॥
102 नयनाचे आंगणीं तुर्येचा प्रकाश । उन्मनी उल्हास तयावरी ॥१॥ श्वेत शाम कळा प्रकाश आगळा । स्वयंज्योति बाळा लक्ष लांवी ॥२॥ ज्ञानदेव म्हणे कैसे हे नयन । चैतन्याची शून्य आन नाहीं ॥३॥
103 नयनाचे शेजारीं दशवें द्बार बापा । एक मार्ग सोपा बोलतसें ॥१॥ आधारीं पवन अपान विराजे । आंगुळें चार साजे तयां ठायीं ॥२॥ मणीपुर चक्र नाभिस्थान कमळ । सहा अंगुळांचा खेळ असे तेथें ॥३॥ वायुचक्र अनुहात ह्रदय असे एक । प्राणासी नि:शंक जेथे नेई ॥४॥ अग्नीचक्र भ्रुवांग शोभतें प्रकाशत्त्व । प्राणासी उलथावें तयावरी ॥५॥ सहस्त्रदळीं ब्रह्मरंध्र शोभतसे निळें । प्रकाशाचे उमाळे जेथें असती ॥६॥ ज्ञानदेव म्हणे ऐका प्राणायाम । या अभंगीं नि:सीम अर्थ झाला ॥७॥
104 नयनाचें अंजन मनाचें रंजन । ठसा हा साधन बाईयानो ॥१॥ ॐकार अक्षर अक्षरीं हारपे । अनुभवाच्या मापें मोजूं बापा ॥२॥ बिंदूचें जें मूळ प्रणवाचें फळ । योगियाचें खेळ तेच ठायीं ॥३॥ ज्ञानदेव म्हणे निवृत्तिप्रसादें । स्वरुपाच्या विनोदें बोलिलें हें ॥४॥
105 नवल देखिलें कृष्णरुपीं बिंब । सांवळी स्वयंभ मूर्ति हरिची ॥१॥ मन निवालें बिंबलें समाधान जालें । कृष्णरुपें बोधलें मन माझें ॥ध्रु०॥ बापरखुमादेविवरु सांवळा सर्व घटीं । चित्तें चैतन्या मिठी घालिताखेवों ॥२॥
106 नवा आंत ओवरी औठपिठा जवळी । शून्यातीत काळी सुकुमार ॥१॥ अंगुष्ट पर्वार्ध मसुरा मात्र दीर्घ । उन्मनीचा मार्ग तेच ठायीं ॥२॥ ज्ञानदेव म्हणे पर्वार्धातील नीर । सर्व हें साचार विश्व दिसे ॥३॥
107 नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी । पापें अनंत कोडी गेलीं त्याचीं ॥१॥ अनंत जन्माचें तप एक नाम । सर्व मार्ग सुगम हरिपाठ ॥२॥ योग याग क्रिया धर्माधर्म माया । गेले ते विलया हरिपाठें ॥३॥ ज्ञानदेवीं यज्ञ याग क्रिया धर्म । हरिविण नेम नाहीं दुजा ॥४॥
108 नासिकाचा प्राण कोणीं मार्गी येत । नाद दुमदुमित अनुहातीं ॥१॥ इडे पिंगळेचा ओघ सैरां दिसतसे । त्यावरी प्रकाशे आत्मतेज ॥२॥ ज्ञानदेव म्हणे अष्टांग योगीया । साधितो उपाया याची मार्गे ॥३॥
109 नाहीं जाती कूळ तुझें म्या पुसिले । परि मन मावळलें देखोनिया ॥१॥ तुझेंचि कुवाडें संगिन तुजपुढें । तेणें मुक्तीची कवाडे उघडती ॥२॥ दुजापाशी सांगतां वाटे लाजिरवाणें । हांसतील पिसुणें प्रपंचाची ॥३॥ आतां उगवितांचि भले नुगवितां सापंडलें । ज्ञानदेव बोले निवृत्तीशीं ॥४॥
110 निज ब्रह्मा ब्रह्म तो । ब्रह्मादिकां वंद्य तो गे बाई ॥१॥ अचिंतचिंतन तो । सारासार गुह्य तो गे बाई ॥ध्रु०॥ बाप रखुमादेविवरु विठ्ठलु तो । जनीं वनीं कृपाळु तो गे बाई ॥२॥
111 निजगुजा गूज तो । मोहना मोहन तो गे बाई ॥१॥ बोधा बोध बोधविता तो । द्वैता-द्वैत अद्वैत तो गे बाई ॥ध्रु०॥ रखुमादेविवरु तो । सर्वादि सर्वेश्वरु तो गे बाई ॥२॥
112 नित्य धर्म नाम पाठ । तोचि वैकुंठीची वाट । गुरु भजनी जो विनट । तोचि हरिभक्तु जाणावा ॥१॥ धन्य धन्य त्याचा वंश । धन्य तो आला जन्मास । तयाजवळी ह्रषीकेश । सर्वकाळ नांदतु असे ॥२॥ रामकृष्ण स्मरण जप । तेंचि तयाचें अमुप तप । तो वास करील कोटी कल्प । वैकुंठ पीठ नगरीशी ॥३॥ ज्ञानदेवी जप केला । हरि समाधीसी साधिला । हरिमंत्रें प्रौक्षिला । सर्व संसार निर्धारे ॥४॥
113 नित्य नेम नामीं ते प्राणी दुर्लभ । लक्ष्मीवल्लभ तयां जवळी ॥१॥ नारायणहरि नारायणहरि । भक्ति मुक्ति चारी घरीं त्यांच्या ॥२॥ हरिवीण जन्म नरकचि पै जाणा । यमाचा पाहुणा प्राणी होय ॥३॥ ज्ञानदेव पुसे निवृत्तिसी चाड । गगनाहूनि वाड नाम आहे ॥४॥
114 नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी । कळिकाळ त्यासी न पाहे दृष्टि ॥१॥ रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप । पापाचे कळप पळती पुढें ॥२॥ हरि हरि हरि हा मंत्र शिवाचा । म्हणती जे वाचा तयां मोक्ष ॥३॥ ज्ञानदेवा पाठ नारायण नाम । पावीजे उत्तम निजस्थान ॥४॥
115 निर्गुणाचे रंगीं रंगले हें मन । सांवळे सगुण ब्रह्म तेंची ॥१॥ मताभिमानी ऐसा विश्वास न धरिती । वचनीं निर्गुण सगुण दोन्ही भिन्न असती ॥२॥ असिपदीं जैसें तत्पद तें नाहीं । सांवळे ब्रह्म तेंचि खरें । सांवळें निर्धारे जाण रया ॥४॥
116 निळावर्ण ब्रह्मरंध्र येकनिकें । पहा माझे सखे भाविक हो ॥१॥ उन्मनि सदैव वसे अक्षय पंथें । लाउनियां चित्त तया ठायीं ॥२॥ ज्ञानदेव म्हणे यापरती खूण । नाहीं ऐसी आण वाहातसें ॥३॥
117 निळिये पेरणी । निळिये वाहाणी । गुणाचीं लेणीं । कृष्णवर्ण ॥१॥ नवलाव गे माय । नवलाव चोज । निळीं निळिमा काज । आकारलें ॥ध्रु०॥ नीळवर्ण तनु । नीळवर्ण गुणू । निळिमा पूर्णू । ह्रदयीं नांदे ॥२॥ ज्ञानदेवीं लीला । मननीं निवाला । निळिये अवलीळा । हरपला ॥३॥
118 निळिये मंडळीं । निळवर्ण सांवळी । तेथें वेधलिसे बाळी । ध्यानरुपा ॥१॥ वेधु वेधला निळा । पाहे घननीळा । विरहणीं केवळा । रंग रसनें ॥ध्रु०॥ नीळवर्ण अंभ । नीळवर्ण स्वयंभ । वेधें वेधु न लभे । वैकुंठींचा ॥२॥ ज्ञानदेव निळी । ह्रदयीं सांवळी । प्रेमरसें कल्लोळीं । बुडी देत ॥३॥
119 निळिये रजनी वाहे मोतिया सारणी । निळेपणें खाणीं सांपडली ॥१॥ आंगणीं चिंतामणि जळधरु सिंपणी । अमृतसाजणी जीवनकळा ॥२॥ सुमनाचे शेजे विरहिणी विराजे । शयनीं सुलजे आरळ सेज ॥३॥ माजयानें हटीं मुखकमळ टेंकी । निळिये अवलोकी कृष्णमूर्ति ॥४॥ कमळणी आमोद सुस्वाद मकरंद । चंदनाची अभेद उटी अंगी ॥५॥ कर्पूरपरिमळें दिव्य खाद्य फ़ळें । ठेऊनि सोज्वळें वाट पाहे ॥६॥ मन तो निळिये गोविंदाचिये सोसे । विरहिणी पाहे वाटुलि ऐसी ॥७॥ ज्ञानदेवी निळिये वाटुले गोविंदीं । कृष्ण निळिये पदीं ठाव जाला ॥८॥
120 निळें हें व्योम निळें हें सप्रेम । निळेपणें सम आकारलें ॥१॥ नीळवर्ण ब्रह्म नीळवर्ण कर्म । नीळवर्ण आश्रम गुरु देखे ॥ध्रु०॥ निळेपणें वर्तो नीळेपणें खातों । निळपण पाहातो निळे पणें ॥२॥ ज्ञानदेव आला नीळवर्ण शाळा । निळे पण गोंवळा रातलीये ॥३॥
121 निशी दिवस दोघे लोपलें तें ठायीं । निरंजन ते ठायीं लक्षुनी पाहा ॥१॥ रवी शशी ज्याचें तेजें प्रकाशले । नवल म्यां देखिलें एक तेथें ॥२॥ नारी पुरुष दोघे एक रुपें दिसती । देखणें पारुखे तया ठायी ॥३॥ ज्ञानदेव म्हणे शि तेचि शक्ती । पाहातां व्यक्तीं व्यक्त नाहीं ॥४॥
122 नीळवर्ण रज । नीळवर्ण बुझे । निळिमा सहजे । आकारली ॥१॥ नीळ प्रभा दिसे । नीळपणें वसे । निळिये आकाश । हरपलें ॥ध्रु०॥ निळेपण ठेलें । निळिये गोंविलें । निळपण सोंविळें । आम्हां जालें ॥२॥ ज्ञानदेवी निळा । परब्रह्मीं गोविला । कृष्णमूर्तिं सांवळा । ह्रदयीं वसे ॥३॥
123 पंढरीचे वाटे अनंत घडती याग । वैकुंठीचा मार्ग तेणें संगें ॥१॥ जपतप अनुष्ठान क्रिया कर्म धर्म । हें जाणताती वर्म संतजन ॥२॥ भक्तिमार्ग फ़ुकटा आनंदाची पव्हे । लागलीसे सवे पुंडलीका ॥३॥ दिंडी टाळ घोळ गरुडटकियाचे भार । वैष्णवांचे गजर जये नगरीं ॥४॥ तिहीं लोकीं दुर्लभ अमर नेणती । होउनी पुढती सेविती ॥५॥ सनकादिक मुनी ध्यानस्त पै सदा । ब्रह्मादिकां कदा न कळे महिमा ॥६॥ ज्ञानदेव निवृत्ती पुसतसें कोडें । पुंडलिकें केवढें भाग्य केलें ॥७॥
124 पदत्रयादि विलक्षण नातळे वर्णावर्ण । पंचभूतिकपण नातळे ज्यासि ॥१॥ ते स्वयंभ प्रमाणें घनावलेन पणें । द्वैताद्वैत नेणें तैसें आहे ॥२॥ नामरुपाचा भेद तुटलासें संबंध । स्वयें निजानंद भोगी बापा ॥३॥ सारुनि लक्ष लक्षणा शास्त्राचा उगाणा । तेथ वेदांदि षडदर्शना नुमगे पाही ॥४॥ तयामाजि तें असतसे निरुतें । न चोजवें पंथें नवल ज्याचें ॥५॥ म्हणौनिया परिसा चौंचीचि उजरीं । तेंचि निर्विकारी प्रकाशले ॥६॥ निवृत्तिदास म्हणे हा निजभाव । बोलो नये ठाव तैसे जाले ॥७॥
125 परमानंद आजि मानसिरे । भेंटि जाली संतासिरे ॥१॥ पूर्वजन्मीं सुकृते केलीं । तीं मज आजि फळासी आलीरे ॥२॥ मायबाप सकळ सोयरे यातें । भेटावया मन न धरेरे ॥३॥ एक तीर्थहूनि आगळे । त्यामाजि परब्रह्म सांवळेरे ॥४॥ निर्धनासी धनलाभ जालारे । जैसा अचेतनीं प्रगटलारे ॥५॥ वत्स विघडलिया धेनु भेटलीरे । जैसी कुरंगिणी पाडसा मिनलीरे ॥६॥ पियूशापरतें गोड वाटतेरे । पंढरीरायाचे भक्त भेटतारे ॥७॥ बापरखुमादेविवरा विठ्ठलेरे । संत भेटता भवदु:ख तुटलेरे ॥८॥
126 परेचे शिखरावरी वस्ती माझी झाली । समरसें विराली मज माजी ॥१॥ आत्मदशे योगी लक्ष लाविती देहीं । ब्रह्मरंध्रु पाहीं सतपद तें ॥२॥ अणुरेणु शून्य गगना तेजें दिसे । निरंतर वसे निरंतर ॥३॥ ज्ञानदेव म्हणे वृत्ति सहस्त्रदळीं लावा । मसुरा मात्रा बरवा ध्यायी जाई ॥४॥
127 पर्वताप्रमाणे पातक करणें । वज्रलेप होणें अभक्तांसी ॥१॥ नाहीं ज्यासी भक्ति तो पतित अभक्त । हरिसी न भजत दैवहत ॥२॥ अनंत वाचाळ बरळती बरळ । त्यां कैसेनि गोपाळ पावे हरि ॥३॥ ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान । सर्वाघटीं पूर्ण एक नांदे ॥४॥
128 पश्चिम मार्गी खूण बीजें दोन साजिरीं । अविनाश ओवरी योगीयांची ॥१॥ त्रिकूट श्रीहाट चंद्रसूर्य जाणा । पश्चिम मार्गी खूण याची की रे ॥२॥ ज्ञानदेव म्हणे बीजे दोन बापा । पाहें आत्मरुपा तेथे बा रे ॥३॥
129 पश्चिममार्ग बापा प्रणव कीं दे सांग । जेथें असे महालिंग तेजोमय ॥१॥ चंद्रांतील जल ते सत्रावी केवळ । नादबिंदा कल्होळ गर्भी झाला ॥२॥ ज्ञानदेव म्हणे देह हा दुर्लभ । त्रैलोकीं सुलभ भजनाचा ही ॥३॥
130 पहा त्रिभुवनीं न दिसे बाइये । नयनांजनीं पाहें आत्मरुप ॥१॥ मन बुध्दि चित्त अंत:करण जाण । या वेगळें निर्वाण ब्रह्म तेंचि ॥२॥ ज्ञानदेवा ब्रह्म लाधलें अवचटें । उन्मनीचा घांट चढतांची ॥३॥
131 पांचही वर्हाडी पांच ठायीं बोळविली । येरा दिधली मिठी देखा ॥१॥ आंबुलियाचें सुख माझें मी भोगी । सेवेशीं रिघे अंगोअंगी ॥२॥ बापरखुमादेवीवरु विठ्ठल जोडला । वेव्हारा मुकला बाईये वो ॥३॥
132 पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती । रत्नकीळ फांकती प्रभा । अगणित लावण्य तेज पुंजाळलें । न वर्णवे तेथींची शोभा ॥१॥ कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु । त्यानें मज लाविलें वेधी । खोळ बुंथी घेऊनी खुणेची पालवी । आळविल्या साधुनेदी ॥२॥ शब्देंवीण संवादु दुजेवीण अनुवादु हें तव कैसेनि गमे । परेहि परते बोलणे खुंटले । वैखरी कैसेनि सांगे ॥३॥ पायां पडू गेलों तंव पाउलचि न दिसे । उभाची स्वयंभु असे । समोर कीं पाठीमोरा न कळे । ठकचि पडिले कैसें ॥४॥ क्षेमालागीं जीव उतावीळ माझा । म्हणवुनि स्फुरताती बाहो । क्षेम देऊं गेलें तव मीची मी एकली । आसवला जीव राहो ॥५॥ बापरखुमादेविवरु ह्रदयींचा जाणुनी अनुभवु सौरसु केला । दृष्टीचा डोळा पाहूं गेलें । तंव भीतरी पालटु झाला ॥६॥
133 पाणियाचें मोतीं ज्योती वसे जेथ । महाकारण साद्यंत पाहा तुह्मीं ॥१॥ जागृति स्वप्न सुषुप्ति जेथें उध्दव तीचा । योगी राम ज्याचा अधिकारी ॥२॥ गोल्हाटाचे मुळीं ज्ञानदेव बैसला । सहस्त्रदळीं शोभला काळा बाई ॥३॥
134 पातेजोनि खेंवासि आणिलें । येणें आपणिया समान मज केलें गे माये ॥१॥ पाहेपां नवल कैसें बितलें । मन उन्मनीं उन्मन ग्रासिलें ॥२॥ पाहेपां येणें रखुमादेविवरा विठ्ठले । पाहेपां राहणें पंढरपुरीं केलें ॥३॥
135 पूर्वप्राप्ती दैवयोगें पंगु जालो मी अज्ञान । विषय बुंथी घेउनिया त्याचें केलें पोषण । चालतां धर्म बापा विसरलों गुह्य ज्ञान । अवचटें गुरुमार्गे प्रगट ब्रह्मज्ञान ॥१॥ दाते हो वेग करा कृपाळुवा श्रीहरि । समता सर्व भावीं शांति क्षमा निर्धारी । सुटेल विषयग्रंथी विहंगम आचारी ॥२॥ शरण रिघे सदगुरु पाया पांग फिटेल पांचाचा । पांगुळलें आपेआप हा निर्धारु पै साचा । मनामाजी रुप घाली मी माजी तेथें कैचा । हरपली देहबुध्दि एकाकार शिवाचा ॥३॥ निजबोध धवळा शुध्द यावरी आरुढ पै गा । क्षीराब्धि वोघ वाहे तेथें जायपा वेगा । वासना माझी ऐसी करी परिपूर्ण गंगा । नित्य हें ज्ञान घेई अद्वैत रुपलिंगा ॥४॥ पावन होशी आधीं पांग फिटेल जन्माचा । अंधपंग विषयग्रंथीं पावन होशील साचा । पाडुरंग होसी आधी फळ पीक जन्माचा । दुष्ट बुध्दि टाकी वेगी टाहो करी नामाचा ॥५॥ ज्ञानदेव पंगपणें पांगुळली वासना । मुरालें ब्रह्मीं मन ज्ञेय ज्ञाता पुरातना । दृश्य हें लोपलें बापा परती नारायणा । निवृत्ती गुरु माझा लागो त्याच्या चरणा ॥६॥
136 पृथ:कारे कर्म आचरितां । विधि जिज्ञाशीं काय सत्ता । अष्टादश पुराणें नानामतें आचरतां । परि तयासी विधि विवेक न कळे तत्त्वता । कर्म कळा जयाची वाचा उच्चारिता । ऐशी नाना द्वंद्वें उपाधिकें जल्पती परि एकही नेणे तेथींची वार्ता रया ॥१॥ ऐशी भ्रांती साम्य बोलती सकळे । परि नकळे नकळे पूर्ण सत्ता रया ॥२॥ निजब्रह्म बुध्दि नेणसी । गव्हारा वाउगा का शिणशी । या साठीं भ्रमुनिया बरळशी । पहिलें नव्हे तुजसंकल्पें करिशी । नाना गोष्ठी रया ॥३॥ आतां अथातो धर्मजिज्ञासा ब्रह्म जिज्ञासिक वचन । हें तंव वेदीचें प्रमाण । तरी वेदे जें वदवितें नकळे वेद कळा लय लक्ष धारण । पूजा समाधीचेनि यज्ञ यागादिके कर्मे । जपतप अनुष्ठान नाना उपासना मंत्रयंत्रादि साधनें । धांडोळितां परि ते एकही न घडे ब्रह्म जिज्ञासिक वचन । येणें सुखासाठीं बापा होशी पै हिंपुष्टी स्वानंद जीवन सुख आहे अन रया ॥४॥ नाना अर्थवाद उपाधि शब्दज्ञानें तेणें । केविं शुध्द होती याचीं मनें । नाना मुद्रा संकल्पाचिया वाढविंता तेणें । केंवि पाविजे ब्रह्मस्त्रानें । मी ब्रह्म ऐसें शब्दें वाखाणु जाशी तरी तेणे । ब्रह्म ऐसें केंवि होणें । ब्रह्माहमस्मि बोध वाचे उच्चारितां हेहीं अहंकाराचें लेणें । आतां परतें सकळही वाव जाणोनिया कांही आपलें स्वहित करणे । बापरखुमादेवीवर विठ्ठल चिंतिता निजसुखाशीं येऊं नेदी उणें ॥५॥
137 पैल गोल्हाटमंडळ तो । त्रिकुटा वेगळा तो गे बाई ॥१॥ सहजबोधीं अनुभव तो । परमतत्त्वीं अनुराग तो गे बाई ॥ध्रु०॥ रखुमादेविवरु तो । ब्रह्म विटेवरी तो गे बाई ॥२॥
138 पैल सुखाचेनि माये सुकाळु । नवल पाहिजे हो गोपाळु । म्हणोनि योगयाग तप साधन । व्रत दान उद्यापन । पंचाग्नि गोरांजन अनुष्ठान । परि पद निर्वाण नकळें हें ॥१॥ तुझ्या नामाचिनि आनंदे । गातांवातां जोडसी विनोदें रया ॥ध्रु०॥ या गोंवळेनि जग । न दिसे जगपण भाग । पाहेपां सकळीं योग । तुझा तूंचि ॥२॥ अर्थुनि पाहे दृष्टि । तंव तुझ्यापायीं पडे मिठी । आवडी नोसंडी गांठी । तुझिया पायाची ॥३॥ आतां जरि निरुतें । तूंचि आत्मा तूंतें । सुखी सुखाचेनि निजप्राप्ति रया ॥४॥ तुझें स्वरुप अदृष्य । तो मुनिमानसींचा प्रकाश । इंदु तूं पूर्णांश । चैतन्यघन ॥५॥ बाप रखुमादेविवरा विठ्ठला पाहतां उघडा डोळा । दाविलें निधान रया ॥६॥
139 प्रणवच देह देह हा प्रणव । कल्पनेचा भाव कल्पूं नये ॥१॥ अंजनाचें सार तेंच देह बा रे । आत्मा परिपूर्ण सारे पाहती ज्ञानी ॥२॥ ज्ञानदेव म्हणे प्रणव माझा पिता । अक्षर तेच माता याच भेदें ॥३॥
140 प्रणवाची शक्ती शिव प्रणवची । क्षर अक्षर साची प्रणव ते ॥१॥ त्रिकूट श्रीहाट गोल्हाट ब्रह्मरंध्र । प्रणव निरंतर ऐक्य झाला ॥२॥ ज्ञानदेव आपण प्रणव झाला आधीं । ध्याता ब्रह्मपदीं प्रणवची ॥३॥
141 प्रणवाचे भेद उकलावें देहांत । चंद्राची मी मात सांगतसें ॥१॥ सहस्त्र दळावरी तेज शुध्द असे । त्या तेजे प्रकाशे चंद्र बापा ॥२॥ उन्मनीचे ध्यासें सहस्त्रदळ गाजे । पश्चिम मार्गी बीजें दोन असती ॥३॥ लक्ष लावी ज्ञानदेव एकलाची । शुध्द ज्योती तोचि जाणे एक ॥४॥
142 प्रणवाचें आकाश असे सर्वावरी । आकाशीं भरोवरी प्रणवाची ॥१॥ प्रणव जें गुह्य ऋषि योगीयांचे । सर्वावरिष्टा साचें वेद आज्ञा ॥२॥ एक वेदांत सिध्दांती प्रणव तो तत्त्वता । ज्ञानदेव वक्ता सांगतसे ॥३॥
143 प्रणवाचें रुप कोणें देहें देखिलें । निवृत्तिनें दाविले याच देहीं ॥१॥ सकार हकार तुर्या उन्मनी भेद । अभेदुनी भेद केले मज ॥२॥ ज्ञानदेव म्हणे प्रणवाची खोली । अक्षरीची बोली देह सार ॥३॥
144 प्रणवासी रुप नाहीं कांही छाया । दशवे द्वारीं मूळमाया असे कीं रे ॥१॥ सहस्त्रद्ळीं वृत्ति लावितां नि:शंक । मनासीं भवासी ऐक्यता तेथें ॥२॥ ज्ञानदेव म्हणे या परतें नाहीं । बोलण्याची सोयी अनुभव जाणे ॥३॥
145 बरवा वो हरि बरवा बो । गोविंद गोपाळ गुण गरुवा वो ॥१॥ सावळा वो हरि सावळा वो । मदनमोहन कान्हो गोवळा वो ॥ध्रु०॥ पाहतां वो हरि पाहतां वो । ध्यान लागलें या चित्ता वो ॥२॥ पढिये वो हरि पढिये वो । बाप रखुमादेविवरु घडिये वो ॥३॥
146 ब्रह्मज्ञानी पुरुष तोचि ओळखावा । नयनांजनीं पाहावा ब्रह्मठसा ॥१॥ देखतसे देहीं द्वैत भेदातीत । तोची धन्य संत माझे मनीं ॥२॥ त्याचे चरणोदकीं जान्हवी पवित्र । सहस्त्रदळावर लक्ष ज्याचें ॥३॥ ज्ञानदेव म्हणे ऐशा योगीयाला । देखतां तयाला नमन माझें ॥४॥
147 ब्रह्मांडाचे भुवनीं कमळ तें सुंदर । पाकोळ्या साचार चार तेथें ॥१॥ औट हात स्थूळ अंगुष्ठ । सूक्ष्म पर्वार्ध कारण जाण रया ॥२॥ महाकारण मसुरामात्र सदोदित । ब्रह्मरंध्र साद्यंत वसतसे ॥३॥ चहूं शून्यवर्ण देह चार पहा । कृष्ण निळ शोभा विकासली ॥४॥ ज्ञानदेव म्हणे आतां फार म्हणो काय । सहस्त्रदळीं निश्चय आत्मा असे ॥५॥
148 ब्रह्मादिका आठकु तो । शिवध्यान ध्यानकु तो गे बाई ॥१॥ गौरीजाप्यसहस्त्रनामीं तो । पुण्यपावन त्रैलोक्य तो गे बाई ॥२॥ रखुमादेविवरु तो । सहजपूर्ण तो गे बाई ॥२॥
149 भगवदीता हेचि थोर । येणें चुके जन्म वेरझार । वैकुंठवासी निरंतर । भवसागर उतरेल ॥१॥ राम नाम सार धरी । तूंचि तारक सृष्टीवरी । त्याचेनि संगें निरंतर । भवसागर तरसील ॥२॥ व्यर्थ प्रंपच टवाळ । येणें साधिली काळवेळ । नाम तुझें जन्म मूळ । हें केवळ परिसावें ॥३॥ विक्राळ साधिलें नाम । दूर होतील विघ्न कर्म । साधितील धर्म नेम । हे पुरुषोत्तम बोलियले ॥४॥ तंव अनुष्ठान सुगम । साधिले सर्व सिध्दि नेम । क्षेम असेल सर्व धर्म । सर्वकाळ फळले ॥५॥ ज्ञानदेव कर्म अकर्ता । पावन झाला श्रीअनंता । सुखदु:खाचा हरी भोक्ता । सर्वकाळ आम्हा आला ॥६॥
150 भावेवीण भक्ति भक्तिवीण मुक्ति । बळेंवीण शक्ति बोलूं नये ॥१॥ कैसेनि दैवत प्रसन्न त्त्वरित । उगा राहे निवांत शिणसी वाया ॥२॥ सायास करिसी प्रपंच दिननिशीं । हरीसी न भजती कोण्या गुणें ॥३॥ ज्ञानदेव म्हणे हरि जप करणें । तुटेल धरणें प्रपंचाचें ॥४॥
151 भ्रुवामध्यें तेज चंद्रसूर्यविरहित । आदी मध्य अंत संचलेंसे ॥१॥ तुर्यारुपें ते सुषुम्ना प्रकाशली । नवविध अमृतजळीं तया तेजा ॥२॥ ज्ञानदेव वदे अष्टांग योग साध । पावाल ब्रह्मपद याचा भेद ॥३॥
152 मदनमूर्ति विश्वीं अळंकारिली । ते डोळ्यां असुमाय जाली । पाहतां मनाची वृत्ति नुपुरे तेथिची सोय । तेथें भरोनि वोसंडिली गे माये ॥१॥ अभिनव रुप कैसें मना अगोचर अरुप रुपासि आलें । तें हें कल्पद्रुमातळीं ठाण मांडूनि देहुडें । तेणें आनंदघनें निवविलेंगे माये ॥ध्रु०॥ चिदानंदाची मांदुस किंचिदघन चिदाकाश । तेज: पुंज प्रकाश चरणीं शोभा ॥ निडारलें दृष्टि पाहतां रुपाचा एकवळा । कैसा साकारे सोहळा भोगीतसे गे माये ॥२॥ सकळ तीर्थ अर्तिलीं । तीं ऋषिवृंदें घेऊनि बैसलीं । पावन झालीं । चरणांगुष्ठीं ॥ वाकी तोडरु गजरीं । गर्जतसे नानापरी तो श्रुतिनादु अंबरीं । सांठवलागे माये ॥३॥ उपनिषदाचा गाभा । परी देहुडा पाउलीं उभा । जानुजघनींच्या प्रभा । नभ धवळलें ॥ सुरंग सोनसळा । वरी वेढिला पिंवळा । त्यावरी गाठियला मेखळा । रत्नखचितगे माये ॥४॥ हा जगडंबरु जगदाभासु । कीं ठसावला आभासु । नाभिकमळीं प्रकाशु । चतुरानना ॥ पाहता तेथींची हाव । मना न पुरे तेथींची थाव । म्हणउनि सगुण ध्यान । करी तुझेगे माये ॥५॥ ब्रह्मांडाचिया कोडी । रोमरंध्रीं उतरंडी । मदन सांडुनिया प्रौढी । उदरा आला ॥ सुघटित वक्षस्थळ । निरोपम केवळ । वरी पदयुगुळ । द्विजोत्तमगे माये ॥६॥ चहूं पुरुषार्थांचें साधन । तोचि आयुधें मंडन । बाहीं बाहुवटे मंडन । मंडना आलें ॥ वीर कंकण मनगटीं । कांडोवांडीं मुद्रा दाटी । कैसा अलोहित नखें बोटीं ।वेणु वाहे वो माये ॥७॥ ब्रह्म ऐसें धेनु आतला । कीं सुधारसु मुराला । तोचि नादु सुस्वर आला । पावया छंदें ॥ अधरीचें अमृत । पिकलेंसे ब्रह्मरस । तेणें जाला सौरसु । गोपिजनागे माये ॥८॥ नयनींचे तारे । दो पक्षीं प्रेम पुरे । द्वैताद्वैत एकसरें । ठकलें ठेलें ॥ कुंडलाचिये दीप्ती । लोपला गभस्ती । सुखस्वरुपाची शांति । येणे सुखेंगे माये ॥९॥ आतां पाहतां पाहतया दृष्टी नपुरे । ध्यातां मनचि नुरे । आंत बाहेरी पुरे । व्यपूनि ठेला ॥ मावळलिया दृष्टि पाहातां देखणें ठसावलें । निर्गुण गुणासि आलें । सदोदित गे माये ॥१०॥ आतां हा केंवि पाहावा । पाहातयेचि दृष्टि । मन मनेंचि दिधली मिठी । तेथील ते गोडी रुपासी आली ॥ म्हणती निवृत्ति । ज्ञानदेवा पाहे चित्तीं । आतां जागृतीच्या अंती । सुखशातिं रया ॥११॥
153 मन मारुनि डोळां लेईलें । काळेपणें मिरवलें रुप त्यांचें ॥१॥ बरवें हें रुप काळें अमोलिक । म्हणोनि सांग जें शुध्दभावें ॥२॥ रखुमादेविवरु अगाध काळें रुप । म्हणोनि सर्वत्र व्योम व्यापियेलें ॥३॥
154 मन मुरडोनि डोळां लेइलें । काळेपणें मिरवलें रुप त्याचें ॥१॥ बरवें रुप काळें अमोलिक । म्हणोनियां सांगतसे शुध्द भावें ॥ध्रुव॥ रखुमादेविवरु अगाध काळें । म्हणोनि सर्वत्र अर्पियलें ॥२॥
155 मन मुरुऊनी करी राज रया । प्रणवासी सखया साक्ष होई ॥१॥ देहीं स्थानमान विवरण करीं आधीं । पिंडींची ही शुध्दि प्रथम करी ॥२॥ औट हात हा देह ब्रह्मांड सगळें यांत । तयाचा निश्चित शोध करा ॥३॥ ज्ञानदेव म्हणे विवरण करी वेगे । निवृत्तिच्या संगे साधिलें हेचि ॥४॥
156 मन हें धालें मन हें धालें पूर्ण विठ्ठलचि झालें । अंतरबाह्य रंगुनि गेलें विठ्ठलची ॥१॥ विठ्ठल म्हणतां हरलें पाप पदरीं आलें पुण्य माप । धाला दिनाचा मायबाप विठ्ठलची ॥२॥ विठ्ठल जळीं स्थळीं भरला ठाव कोठें नाहीं उरला । आज म्या दृष्टीनें पाहिला विठ्ठलची ॥३॥ ऐसा भाव धरुनी मनीं विठ्ठल आणिला निजध्यानीं । अखंड वदो माझी वाणी विठ्ठलची ॥४॥ तो हा चंद्रभागे तीरा पुंडलिकें दिधला थारा । बापरखुमादेवीवरा जडले पायीं विठ्ठलची ॥५॥
157 मन हें लावा हें सालयीं निरुतें । सहस्त्रदळा वरुतें परे जवळी ॥१॥ अनुहात नाद ब्रह्मस्थानीं असे । तेथें रुप कैसें सांगा मज ॥२॥ ज्ञानदेव म्हणे स्वरुप जो जाणे । त्यासी शरण होणें अनन्य भावें ॥३॥
158 मनाचा भाव माझा खुंटला हरिध्यानें । अवघेंचि येणें मनें काळापिवन केलें ॥१॥ लघु म्हणो तरी सूक्ष्मही नव्हे । सूक्ष्म ह्मणो तरि अगाधही नव्हे ॥ या काळियाची जाली गे माये ॥ध्रु॥ बाप रखुमादेविवरु सुनीळ नीळकाळा । अवघ्या सहित गोपाळा बुडी दिधली गे माये ॥२॥
159 महा तेजा आंत बिंदू कोणे परी । उष्ण तेजा माझारीं साक्ष पाहा ॥१॥ कुंडलनी उर्ध्वमुखें अग्नी सोडी । तयाची हे जोडी संत जना ॥२॥ ज्ञानेश्वर म्हणे आत्मयातें जाणे । सुनिळ अनुभवणें निवृत्ती पाहा ॥३॥
160 महावाक्यार्थ तें शून्य कैसें बापा । सत्त्वर नयनीं पहा आत्मप्रभा ॥१॥ प्रभा शीत उष्ण दोहीचेही सार । प्रणव हा सारासार आरुता रया ॥२॥ ज्ञानदेव म्हणे सोपानातें ऐसें । निराकार असे अकारेसी ॥३॥
161 माझे जिवींची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ॥१॥ पांडुरंगी मन रंगले । गोविंदाचे गुणीं वेधलें ॥२॥ जागृति स्वप्न सुषुप्ति नाठवे । पाहतां रुप आनंदी आनंद साठवे ॥३॥ बापरखुमादेविवर सगुण निर्गुण । रुप विटेवरी दाविली खुण ॥४॥
162 मीच माझा डोळा मीच शून्यांत निळा । माझा मी वेगळा तयामध्यें ॥१॥ उफराटी दृष्टी लावितां नयनीं । ते दृष्टीची वाणी किंचित ऐका ॥२॥ उफराटी दृष्टि देखे उन्मनीवरी । तेव्हां निर्विकारी मीच मग ॥३॥ ज्ञानदेव म्हणे देहा डोळां दिठी । पाहातां सर्व सृष्टि निवृत्ती एका ॥४॥
163 मूळ ना डाळ शाखा ना पल्लव । तो हा कैसा देव आलां घरीं ॥१॥ निर्गुणपणें उभा सगुणपणें शोभा । जिवाशिवा प्रभा दाविताहे ॥ध्रु०॥ नकळे याची गती नकळे याची लीळा । आपिआप सोहळा भोगीतसे ॥२॥ ज्ञानदेव म्हणे न कळे याची थोरी । आपण चराचरीं नांदतसे ॥३॥
164 योग याग विधी येणें नव्हे सिध्दि । वायाचि उपाधि दंभ धर्म ॥१॥ भावेंवीण देव नकळे नि:संदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे ॥२॥ तपेविण दैवत दिधल्यावीण प्राप्त । गुजेवीण हीत कोण सांगे ॥३॥ ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात । साधुंचे संगती तरुणोपाय ॥४॥
165 रक्तवर्ण स्थूळ श्वेत हें सूक्ष्म । कारण तें श्याम ऐसें देखा ॥१॥ निळावर्ण देह महाकारण साजिरा । ज्योतीचा मोहरा अलक्ष लक्ष्मी ॥२॥ ज्ञानदेव म्हणे सर्व हें चैतन्य । मन हेंची धन्य धन्याचेनी ॥३॥
166 राम बरवा कृष्ण बरवा । सुंदर बरवा बाइयांनो ॥१॥ केशव बरवा माधव बरवा । गोपाळ बरवा बाइयांनों ॥२॥ बाप रखुमादेविवरु त्रिभुवनीं गरुवा । विठ्ठलु बरवा बाइयांनो ॥३॥
167 रामकृष्ण जप सोपा । येणें हरती जन्म खेपा । संसारु तुटेल महा पापा । धन्य भक्त तो धरातळीं ॥१॥ जया हरीची जपमाळी । तोचिं पडिला सर्व सुकाळी । तया भय नाहीं कदा काळीं । ऐसें ब्रह्मा बोलियला ॥२॥ बापरखुमादेवी हरी । नामें भक्ताशी अंगीकारी । नित्य सेवन श्रीहरि । तोचि हरीचा भक्त जाणावा ॥३॥
168 रुप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥१॥ तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥ध्रु०॥ बहुता सकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥२॥ सर्व सुखाचें आगरु । बापरखुमादेविवरु ॥३॥
169 लाउनि मनगणीची दोरी विपरीत तयाची कुसरी । अकळून न कळे श्रीहरी । अवघे वोडंबर तुझें ॥१॥ अष्टदळकमळाची वोवरी । विपरीत तयाची कुसरी । एकविस खणांचे उपरी । बाहीजु कां हरी दाखविली ॥ध्रु०॥ तेथ रात्र दिवस नेणिजे । सोहं प्रकाश सहजे । नाचविसी पंचभूतें वोजे । कवतुक तुझें तूं पाहसी ॥२॥ भानु निसियेचा कुवासा । येक राहिले याचिये आशा ॥ येक ह्मणति अढळ धुरु कैसा । तयाचा भरंवसा त्यासिं नाही ॥३॥ ऐसीं तयाचीं बोलणीं । अंगीं राहिलीं खेळणीं । साही पावटणी करुनि । सातावरि घातु मांडिला ॥४॥ करीं घेऊनि आळवणी । करु नेणें वोवाळणी । बाप रखुमादेविवरा विठ्ठला चरणीं । चौघी जणी निमालिया ॥५॥
170 वर मुळें शेंडा खालीं दिसे बानो । प्रपंची रानोरान वृक्ष बारे ॥१॥ त्रिगुणाच्या शाखा उपशाखा बहुत । नाना याती येत पत्रें ज्यास ॥२॥ पक्व फळ अहं सोहं गोडी त्याची । सेवितां जीवाची आस पूरे ॥३॥ ज्ञानदेव म्हणे वृक्ष परिपूर्ण झाला । बीज रुढला जाणीवेचा ॥४॥
171 वाजतसे बोंब कोण्ही नायकती कानीं । हरि हरि न म्हणती तयांसी थोर जाली हानी ॥१॥ उठा उठा जागा पाठीं भय आलें मोठें । पंढरिवांचुनी दुजा ठाव नाहीं कोठें ॥ध्रु०॥ तापत्रयाग्नीचा लागला वोणवा । कवण रिघे आड कवण करी सावाधावा ॥२॥ देखोनि ऐकोनि एक बहिर अंध जाले । विषयाचे लंपट बांधोनि यमपुरीस नेले ॥३॥ आजा मेला पणजा मेला बाप मसणा नेला । देखत देखत नातु पणतु तोही वेडा जाला ॥४॥ व्याघ्र लासी भूतें हीं लागताती पाठीं । हरिभजन न करितां सगळें घालूं पाहे पोटीं ॥५॥ संतसंग धरा तुम्ही हरिभजन करा । पाठीं लागलासे काळ दांत खातो करकरां ॥६॥ बापरखुमादेविवरा विठ्ठला शरण । भावे न निघतां न चुके जन्ममरण ॥७॥
172 विज्ञानाचे ज्ञान अज्ञानीं घनवट । ज्ञानें अज्ञान नीट लाविलें दिसें ॥१॥ मी तूं हे मात हरपले दृष्टांत । ह्रदयीं ह्रदयस्थ निजतेजें ॥ध्रु०॥ साकार निराकार शून्याशून्य दिठा । रुपीं रुपवाटा हरि माझा ॥२॥ बापरखुमादेविवरु ह्रदयस्थ घटीं । बिंबोनि उफ़राटी कळा दिसे ॥३॥
173 विश्व ब्रह्म भासे ऐक्य येतां देहीं । अनुहातीं पाहीं अपार नाद ॥१॥ देखिला परी संयोगें व्यापला । विश्व तरीच झाला बाईयानो ॥२॥ पिंड ब्रह्मांडाचा विस्तार विस्तारला । माझा मीच झाला कोणकरी ॥३॥ ज्ञानदेव म्हणे या अर्थाची सोय । धरी माझी माय मुक्ताबाई ॥४॥
174 विश्व भुलवी योगमाया तो । गोकुळीं रहिवासु तो गे बाई ॥१॥ वसुदेवकुमरु तो । देवकीनंदनु तो गे बाई ॥ध्रु०॥ रखुमादेविवरु तो । शुकादिकां चिंतन तो गे बाई ॥२॥
175 विष्णुवीण जप व्यर्थ त्याचें ज्ञान । रामकृष्णीं मन नाहीं ज्याचें ॥१॥ उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा । रामकृष्णी पैठा कैसेनि होय ॥२॥ द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । तया कैचें कीर्तन घडेल नामीं ॥३॥ ज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान । नामपाठ मौन प्रपचाचें ॥४॥
176 वेद प्रमाण करावया गोकुळासि आला । कीं नाटळिचा कुवांसा जाला । ब्रह्म आणि गोवळा । ब्रह्मादिका वंद्यु ऐसा निगमु । पैं लाजविला ॥ गणिका स्वीकारि राहो मांडला । कीं दशरथ पतनीं चुकविला । एका तें म्हणे जागा । एका तें म्हणेरे निजा । तैं मुचूकुंदापें काळयवनु आणिला रया ॥१॥ विरोचनसुत । बळी बांधोनि जेणें । निगड निबध्द गजा सोडविलें । एकाचीं बालकें काळापासूनियां हिरे । एका बाळाचे बाप विदारिले । शिशुपाळा जैत देऊनियां शेखिं पाहेपां आपणचि जिंकीलें रया ॥ध्रु०॥ गुरुदुर्वास याचिये भक्ति आणि त्याचियेची रथीं देविरुक्मिणीसहित खांदु चालविला । तो तेणें मानें फ़ुंदो पाहे तंव कोलतिया भेणें त्रैलोक्य हिंडविला । पैजा सारुनि हातीं सुदर्शन वसविलें कीं भीष्मपण । साचू केला । जितुकाचि कौरवा तितुकाचि पांडवां अचोज हा अमुलारया ॥२॥ जमदग्नी जनकाचा वोल भूमीं न पडावा । हाठावो वरि पितृभक्तीची आवडी । जेणें साचपणा कारणें माता वधिली । कीं पुराणें खोचिलीं तोंडीं ॥ असुरदैत्य संहारितां बापु तयांची पातकें दवडी । प्रजासि रायाची आण रायासी कवण नेमु हे तों संततपणाची प्रौढी रया ॥३॥ या परि चराचरींचे दानव गिंवसूनि पुसिले परोपरी । तंव यादवांसि अंबुलेपणची आस जाली थोरी । प्रभास क्षेत्रीं अवघियातें केली एकसरी । देवकी पुतना नोळखिजे । वैर भक्तीसी एकिची वोवरी । पवनु काय हा पंथु शोधूनियां चाले समर्थु करिल तें उजरि रया ॥४॥ या गोविंदाची माव । हे तों ब्रह्मदिकांसी कुवाडें । तो हा मायेचेनि साचपणें न घेपवे । प्रकृतीचे गुण ते याचिये गांवीचे । तो करील तें अनुचित बरवें ॥ लाघावियाचे भ्रमु लाघवीच जाणे यांसि कांही नवल नव्हे । बाप रखुमादेविवरु जाणीतला तरि उकलेल आघवें रया ॥५॥
177 वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचें वचन एक नारायण सार जप ॥१॥ जप तप कर्म हरिविण धर्म । वाऊगाचि श्रम व्यर्थ जाय ॥२॥ हरिपाठें गेलें ते निवांतचि ठेले । भ्रमर गुंतले सुमन-कळिके ॥३॥ ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र । यमे कुळ गोत्र वर्जियेलें ॥४॥
178 व्यर्थ प्रपंच टवाळ । सार एक निर्मळ कृपा करी हरि कृपाळ । दीन दयाळ हरी माझा ॥१॥ क्षमा शांति दया रुपी । तोचि तरेल स्वरुपीं । नामें तरलें महापापी । ऐसा ब्रह्मा बोलिला ॥२॥ गीतेमाजी अर्जुनाशीं हरी सांगे साक्षी जैशी । जो रत होतसे हरिभक्ताशी । तो नेमेशी तरेल ॥३॥ ज्ञानदेव भाष्यें केले । गीता ज्ञान विस्तारलें । भक्ति भाग्यवंती घेतलें । भाष्येंकरुनी गीतेच्या ॥४॥
179 शास्त्रार्थाची वाणी निरंजणी दीसे । औटपिठीं वसे निर्विकार ॥१॥ अहं सोहं मग ॐकाराचे देठीं । अहंतेचे शेवटीं सोहं वस्तू ॥२॥ सोहं वस्तु निळी अहं गेलीया । आनंद झालीया महाकरणीं ॥३॥ ज्ञानदेव म्हणे निवृत्तीची आण । या वेगळी खूण आणिक नाहीं ॥४॥
180 शिवशक्तीचा भेद अर्धनारी पुरुष । याचा हा सौरस आणा चित्ता ॥१॥ जागृति स्थूळ तुर्या महाकारण । हेचि कीर खुण तेझे ठायीं ॥२॥ ज्ञानदेव म्हणे कैसे हें जाणिजे । देही नाद गाजे परेवरी ॥३॥
181 शून्य शोधिलें नाहीं जेणें । काय विवरण केले तेणें । अज्ञानपणें फुगणें । गाढव जीणें पशूचें ॥१॥ वर्णाकृति शून्याचार । हा नाहीं ज्या विचार । न घडे न घडे साक्षात्कार । जाण सर्वथा तया नरा ॥२॥ आधीं शून्याची शोधणी केली । मग सदवस्तू प्राप्ति झाली । अमृत वेळाची बोली । बोलतां नये ॥३॥ आधीं शून्य तें शुभ्रवर्ण । मध्यें श्वेत रचिलें जाण । अर्ध्य शून्य तें ताम्रवर्ण प्रत्यक्ष जाण दिसतसे ॥४॥ महाशून्याचा वर्ण निळा । अव्यक्त तेजाचा ओतिला गोळा । ग्रासूनी ठेला भूगोळा । योगी डोळा पाहती ॥५॥ ऐसें शून्याचें नाहीं ज्ञान । तंववरी अवघेंच अज्ञान जनीं अवघा जनार्दन । अज्ञान सज्ञान काय बोलूं ॥६॥ निवृत्तिराजें बोलाविली बोली । तेंची बोलीं बोलिलों ॥७॥
182 शून्य हे चार महा शून्य दिसतसें । निजरंग वसे सर्व त्यांत ॥१॥ ऐसा रंग जया लाधतांचि पाही । मनाची ही सोइ हारपली ॥२॥ ज्ञानदेवाचा बोल बोलण्याचें रुप । निवृत्तिस्वरुप सर्वत्र हें ॥३॥
183 शून्याचा उदभव सांगतों या बोला । औटापिठीं वहिला सूक्ष्म मार्ग ॥१॥ मनपुराचे वरी द्वादश आंगुळें । तयावरी गेले अव्हाटेने ॥२॥ आतां तया सदनीं उफराटें मार्गे । वळंघिता सवेग पश्चिम पंथीं ॥३॥ पश्चिमपंथीं नाडी घोष वाहे जीचा । तेथुन ध्वनीचा विस्तार गा ॥४॥ ध्वनीचेंही वरी शुध्द तेज असे । चंद्रमा प्रकाशे तेच ठायीं ॥५॥ चंद्राचे वरी एक निराळाच मध्य । स्त्रियेचें निजबोधें निजरुप ॥६॥ निखिल जें तेज ज्याचेनी अमृत । जीववी देहींत देह दैव ॥७॥ औटापिठातळीं सर्व तें दीसे । सूर्य हा प्रकाशे तेच ठायीं ॥८॥ ज्ञानदेव म्हणे मज त्रिकुटाची गोडी । धरितां आवडी ब्रह्म लाभे ॥९॥
184 शून्याचा शेवट डोळा पाहा निराळा । निळबिंदु सावळा प्रकाशला ॥१॥ ब्रह्म ज्योतिरुप विसावले जेथ । अनुभव साद्यंत पहा तुम्ही ॥२॥ ऐसे कैलासनाथें सांगितलें पार्वती । ज्ञानदेवा निवृत्ति तेंचि सांगे ॥३॥
185 शून्याचें जें बीज योगीयांचें गुज । स्वानंदाचें निज ब्रह्म रया ॥१॥ त्रिगुण त्रिविध तो सच्चिदानंद । शब्दाचा अनुवाद नसे जेथें ॥२॥ ज्ञानदेव म्हणे सदगुरु जाणती । इतरांची वृत्ति चालेचीना ॥३॥
186 शून्याचें भुवनी स्वरुप अविनाश । प्रणवीं पुरुष दिसतसे ॥१॥ निळा रंग देखें सर्वाचे देखणीं । चैतन्य भुवनीं समरस ॥२॥ ज्ञानदेवा ध्यान सच्चिदानंदाचें । सर्व ब्रह्म साचे येणें येथें ॥३॥
187 श्रुतिस्मृतिवचन तो । गुह्यागुह्य तो गे बाई ॥१॥ जागता निजता तो । निज चेवविता तो तो गे बाई ॥ध्रु०॥ परात्पर तो । रखुमादेविवरु तो गे बाई ॥२॥
188 षटचक्रें बंद निघूनियां गेली । पाहों जो लागलीं तयां गांवा ॥१॥ निरंजन सभराभरीत वस्तू कोंदली । साक्षत्वासी आली आत्मदशा ॥२॥ वृत्ति झेंपावली आनंद झाला सैरा । सत्रावी येरझारा करी जेथं ॥३॥ ज्ञानदेव म्हणे लक्ष लावीं आकाशीं । ब्रह्म पावसि लौकरी तूं ॥४॥
189 संताचे संगती मनोमार्गगती । आकळावा श्रीपती येणें पंथे ॥१॥ राकृष्ण वाचा भाव हा जिवाचा । आत्मा जो शिवाचा रामजप ॥२॥ एकतत्त्वनाम साधिती साधन । द्वैताचें बंधन न बाधिजे ॥३॥ नामामृत गोडी वैष्णवां लाधली । योगियां साधली जीवनकळा ॥४॥ सत्त्वर उच्चार प्रल्हादीं बिंबला । उध्दवा लाधला कृष्णदाता ॥५॥ ज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥६॥
190 संसार वो ग्रामीं गेला सांडुनी । माझे अंत:करणीं माहियेर ॥१॥ सासुरवासिनी मी वो परदेशिनी । कां नये अझुनी मूळ मज ॥२॥ आणिक एक अवधारा । मज दिधलें हीनवरा । माझें कांहीं सर्वेश्वरा न विचारिशी ॥३॥ व्याली वेदना जाणे वांझ कांही नेणें । बालक काय जाणे तहान भूक ॥४॥ तैसी ते नव्हे लेकुराची माये । कृष्ण माझी धाये मोकलिते ॥५॥ आशा मनशा तृष्णा कल्पना चौघी नणंदा । पापीण रे चिंता सासू माझी ॥६॥ सासुरा हा स्वार्थ कांही न विचारी परमार्थ । आतां करीन घात तयावरी ॥७॥ दुरळ हा प्रपंच दुष्ट भावे आणि दीर । इहीं मज थोर कष्टविले ॥८॥ काम क्रोध थोर बोलती बडिवार । मज म्हणती पोर निर्देवाचे ॥९॥ नैश्वर गहिवरु दाटतसे गळा । आसुवें ढळढळा गळताती ॥१०॥ सासुरयाचे घरीं करित होते काम । अवचित विंदान मांडियेलें ॥११॥ घरा सोळा सांधी बहात्तर कोठे । नवही दारवंटे झाडीत होते ॥१२॥ चोळी व साउले हिरोनि घेतलें । उघडे पाठविलें माहेराशी ॥१३॥ समर्थाची लेकी परि मी संताची पोसणी । विमानीं बैसोनि जाते देखा ॥१४॥ बाप चक्रधरा रुक्मादेवीवरा । उबगला संसारा येऊं नेदी ॥१५॥
191 सकार हकारीं नाडी दिसती कैशा । उलटल्या दशदिशा अमुपचि ॥१॥ सूक्ष मूळ सर्व बीजाचा उध्दव । हाची अनुभव देहामध्यें ॥२॥ समान जैसा अर्क स्थिरचर एकला । आत्मा हा संचला तैशा परि ॥३॥ ज्ञानदेव म्हणे याहुनी आणिक । बोलाचें कवतुक जेथ नाहीं ॥४॥
192 सखीप्रती सखी आदरे करी प्रश्न । जीव शिव पूर्ण कैसा दिसे ॥१॥ सखी सांगे मात उभयतां ब्रह्म । नाहीं हो विषम हरीवीण ॥२॥ सूर्य प्रकाश मही घटमठीं समता । तैसा हा उभयतां बिंब एका ॥३॥ बापरखुमादेवीवर विठ्ठल जिवाचा । व्यापक शिवाचा शिवपणें ॥४॥
193 सगुण देह बापा निर्गुण माझें शीर । हा तो भेदाकार कैशापरी ॥१॥ दैवी आसुरी पूर्व पश्चिम मार्ग किरे । शून्यांतील सारे चराचर हें ॥२॥ ज्ञानदेव म्हणे भेद ऐक गुरुपुत्रा । नयनीं अर्धमात्रा सर्व जन ॥३॥
194 सत्त्व रज तम त्रिगुण तें ब्रह्म । अर्धमात्रा नि:सीम ॐकार हा ॥१॥ सहज हा प्रणव सर्वातीत साजे । मीपणास तेथ ठाव नाहीं ॥२॥ अक्षर कूटस्थ सर्वातीत असे । अक्षर अविनाश ऐसें जाणा ॥३॥ ज्ञानदेव म्हणे सर्वाचे शेवटीं । अविनाश दृष्टी असे कीं रे ॥४॥
195 सत्त्व रज तम शुध्द सत्त्व चौथा । निर्गुणी गुणापरता बाईयानो ॥१॥ स्थूळ देह सूक्ष्म कारणाचे वरी । महाकारण सरी चौथा देह ॥२॥ कैवल्य देह तो ज्ञानदेवें पाहिला । पहाणें होऊनी ठेला चराचरी ॥३॥
196 सत्य ज्ञानानंद गगनाचें प्रावर्ण । नाहीं रुप वर्ण गुण जेथे ॥१॥ तो हारे श्रीहरी पाहिला डोळेभरी । पाहते पाहणें दुरी सारोनिया ॥२॥ ज्ञानदेव म्हणे ज्योतिची निजज्योती । ते हे उभी मूर्ती विटेवरी ॥३॥
197 सत्रावीचा खेळ लक्षवेना कवणा । ब्रह्मादिकां जाणा अगम्य तें ॥१॥ रात्रंदिवस मन चपळत्त्वें धांवतें । तेंही सत्रावीतें नपवेची ॥२॥ सत्रावी अगम्य विधि हरिहरां । लक्षूं पहातां वरा गोविंदु गे ॥३॥ ज्ञानदेव दर्शन सत्रावीचें घेतां । उन्मनी ठसवी निवृत्तिराज ॥४॥
198 सत्रावीचे गांवी शून्याचा विस्तार । प्रणव निराकार सदैव असे ॥१॥ पश्चिम पूर्व असे शुक्ल कृष्ण नारी । दैवी आणि आसुरी वेगें शोधा ॥२॥ ज्ञानदेव म्हणे अर्धमात्र कोणती । मसुरा मात्रा आहे ती दोन्ही भाव ॥३॥
199 सदगुरु निवृत्ति दिसतो घनदाट । सुषुप्तीचा घांट वेधतांची ॥१॥ आत्मामाया शिव शक्तीचे हें रुप । दिसतें चिद्रुप अविनाश ॥२॥ ज्ञानदेव चढे ऐसी वाट देख । आकाशीं असे मुख तिचें कैसें ॥३॥
200 समाधी हरीची समसुखेंवीण । न साधेल जाण द्वैतबुध्दी ॥१॥ बुध्दिचें वैभव अन्य नाहीं दुजें । एक्या केशीराजें सकळ सिध्दि ॥२॥ ऋध्दि सिध्दि निधी अवघीच उपाधी । जंव त्या परमानंदी मन नाहीं ॥३॥ ज्ञानदेवीं रम्य रमलें समाधान । हरीचें चिंतन सर्वकाळ ॥४॥
201 सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी । रिकामा अर्धघडी राहूं नको ॥१॥ लटिका व्यवहार सर्व हा संसार । वायां येरझार हरिवीण ॥२॥ नाम मंत्र जप कोटी जाइल पाप । कृष्णनामी संकल्प धरुनि राहे ॥३॥ निजवृत्ति काढी सर्व माया तोडीं । इंद्रिया सवडी लपु नको ॥४॥ तीर्थव्रतीं भाव धरी ते करुणा । दया शांति दया पाहुणा हरि करी ॥५॥ ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवी ज्ञान । समधि संजीवन हरिपाठ ॥६॥
202 सर्वादि सर्वसाक्षी तो । विश्वंभर खल्विद तो गे बाई ॥१॥ आनंदा आनंद तो । प्रबोधा प्रबोध तो गे बाई ॥ध्रु०॥ रखुमदेविवरु तो । विटेवरी उभा तो गे बाई ॥२॥
203 सहस्त्र दळ बिंदु त्यांत तेज दिसे । तें हो काय ऐसें सांगा मज ॥१॥ जेथ नाम रुप वर्ण नाहीं बारे । तें हें रुप बारे चैतन्य बा ॥२॥ ज्ञानदेव म्हणे अनुभवाची खूण । जाणे तो सुजाण अनुभविया ॥३॥
204 सहस्त्रदळ ब्रह्मरंध्र एके नेत्री देखे । देखणा पारुखे ते ठायीं बा ॥१॥ नादीं नाद भेद भेदुनी अभेद । पश्चिम मार्गी आनंद देखुनी राहें ॥२॥ मन पवन निगम आगम सुरेख । आधार सहस्त्रदळ देख देहीं नयनीं ॥३॥ ज्ञानदेव म्हणे डोळां हा प्रणव । निवृत्तीनें अनुभव मज दिधला ॥४॥
205 सहस्त्रदळ ब्रह्मरंध्र ज्याचें घर । सत्रावी निरंतर वसे जेथें ॥१॥ रक्त शुभ्रवर्ण निळा पीत दिसे । दृष्टी शुध्द असे त्यामध्यें ॥२॥ फार किती सांगों सज्ञान तुम्ही जन । अर्थ हा समजोन मौन्य धरा ॥३॥ गुह्याचें ही गुह्य निवृत्तिनें दाविलें । मीच याचाहो बोलें बोलतसे ॥४॥
206 सहस्त्रदळ साजिरें नयनाचे शेजारी । अर्ध मातृका अंतरी चिन्मय वस्तू ॥१॥ ॐकार नादीं कीं नाद ॐकारीं । दैवीं निरंतर प्रणवीं पहा ॥२॥ मकार अर्धमात्रा शून्याचा निश्चय । आत्मा एक असे स्वयें रया ॥३॥ ज्ञानदेव म्हणे कैवल्याचा दाता । कोण पत्री हे कविता नाहीं ऐसी ॥४॥
207 सांग सखिये बाई मज हें न कळे । कैसा हा अकळे सम तेजें ॥१॥ भाव दृढ धरी चित्ताची लहरी । प्रकृती कामारी सत्रावीची ॥२॥ येरी म्हणे वाजट झाली हो पुराणें । समरस जाणे कोणे घरीं ॥३॥ ज्ञानदेव म्हणे आदिमध्य समता । सुखें पहातां चढे हातां ॥४॥
208 सांवळियाचें तेज सांवळा श्रीहरि । शेज बाज वोवरी ब्रह्मांडाची ॥१॥ गृहदारा दिनमणि तेज देऊनि मेदिनी । मेरु प्रदक्षणि आप होय ॥ध्रु०॥ ऐसा हा सांवळा सतेज साजणी । म्यां आपुल्या आंगणी देखीयला ॥२॥ ज्ञानदेवा साजण सांवळिये प्रभेचें । मी माझें मोहाचें हरिरुप ॥३॥
209 सांवळेचें तेज सांवळे बिंबलें । प्रेम तें घातलें ह्रदयघटीं ॥१॥ निरालंब बाज निरालंब तेज । चित्तरस निज निजतेजें ॥ध्रु०॥ आदिमध्यंअत राहिला अनंत । न दिसे द्वैताद्वैत आम्हां रया ॥२॥ ज्ञानदेवीं सोय अवघाचि सामाय । सुखदु:ख माय आम्हां नाहीं ॥३॥
210 साखरेचा ऊंस जरी होय पुढती । मथितां घृतीं काय क्षीर निवडे ॥१॥ माघारे जीवन जरी वाहे सरिता । तरिच जन्मां येती हरिचे दास ॥२॥ विविधा मति भक्ति जे करिती । ते अंती नव्हती संसार बापा ॥३॥ कापुराचे मसि जरी लिहिजे लिखित । जरि छाये पडे हात प्रकृतीचे ॥४॥ पवना पाठीं पांगुळें लागती । तैं जन्मा येति हरिचे दास ॥५॥ संत वैष्णव हरिदासा जे नर निंदिती । आणि नमनिती ते वरपडे होती प्रेम किंकर ॥६॥ निवृत्तिदास म्हणे विव्हळी जे भजती । ते जन्मा न येती भाक माझी ॥७॥
211 सात पांच तीन दशकांचा मेळा । एकतत्त्वीं कळा दावी हरी ॥१॥ तैसें नव्हे नाम सर्वमार्गा वरिष्ठ । तेथें कांहीं कष्ट नलगती ॥२॥ अजपाजपणें उलट प्राणाचा । तेथे ही मनाचा निर्धारु असे ॥३॥ ज्ञानदेवा जिणें नामेंविण व्यर्थ । रामकृष्णी पंथ क्रमीयेला ॥४॥
212 साती बारी दोन्ही आपणचि होऊनि । सुरतरु माझारी वोळगे ॥ तळीं त्रिभंगी मांडूनि ठाण घेऊनि मेघाचें मान । विजु एकी वेढुन बरवे गर्जतुगे माये ॥१॥ नवलावोगे माये न्याहाळितां कैसे मनाचे नयन उमलताती ॥ तीही एक दृष्टि जिव्हा लाभती तरी । सुलभु देखतां बोलतीगे माये ॥ध्रु०॥ पाहो याचे पाय । शंभूचिया माथां माये । सासिन्नली चंद्रदाहें गंगेतें ॥ तेथ असुराची शिरें । येथे सकळ शरीरें । तोडराचेनि बडिवारें । बरीजतुगे माये ॥२॥ तेज सांवळें । रुप लाधलें परिमळें । अनंगाचेनि सळें । कासीं कासियेला ॥ तो पालउ पांढर गळे । होतुकां जगाचे डोळे । दुरुनियां सुनिळें । रोविलेंगे माये ॥३॥ उपनिषदाचा गाभा । माजी सौंदर्याची शोभा । मांडिला दोखांबा । तैसा दिसे देखा ॥ वेगळालिया कुंभस्थळा । परि हातु सरळा । पालटु बांधला माळा । मेखळा मिसेंगे माये ॥४॥ भलतेउते वाहे न वाहे नदी । जेंवीं स्थिरावे अगाधीं । तैसी पुंजालता हे मंदी । दोही वेदांची ॥ वरिलिया वक्षस्थळा । नुपुरे स्थानीचा डोळा । मागुन निघे कमळा । नव्हे रोमराजी ॥५॥ लावण्य उदधी वेळा । तेंचि पै वैजयंती माळा । वरी शोभतसे सोहळा । साहकारवेचा ॥ म्हणे प्रेम पुष्कळा । थडिये लाभे सकळा । नयनसुखाच्या सुकाळा । जग मेळवितुगे माये ॥६॥ भोंवतीं तारागणें पुंजु । मांजी अचळ सुरिजु । आला वक्षस्थळा उजु । तैसा दिसे देखा ॥ जेवणे न अंगें । उभऊनि श्रीकरायोगें । योगनादातटी रंगे । नभु दुमदुमितवो माये ॥७॥ इंद्रधनुष्य काढिलें । तया तळीं बहुडलें । तेचि कुरुळीं वेढिलें । समाधिसुख देखा ॥ आवारीचा गुणु । श्रुतीगर्भी समवर्णु । दोही स्वरीं गोडी वेणु । जग निववीतुवो माये ॥८॥ या वेधितां कांहींच नुरे । रुपा आले हेंचि खरें । वरी दाविता हे माजिरें । गोपवेशाचें ॥ तमावरी हातियारे । रविकाज काईयेरे । तैसा रखुमादेविवरें । विरें घेतलेंगे माये ॥९॥
213 साधु बोध झाला तो निरोनिया ठेला । ठायींच मुराला अनुभव ॥१॥ कापुराची वाती उजळली ज्योति । ठायीच समाप्ती झाली जैशी ॥२॥ मोक्ष रेखें आला भाग्यें विनटला । साधूंचा अंकिला हरिभक्त ॥३॥ ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनीं । हरि दिसे जनीं वनीं आत्मतत्त्वीं ॥४॥
214 सारंगधरु तो । चक्रा आधारु हरि तो गे बाई ॥१॥ सुलभा सुलभ तो । आटकु नटके तो गे बाई ॥ध्रु०॥ रखुमादेविवरु तो । द्वैताद्वैतातीत तो गे बाई ॥२॥
215 सारसार दोन्ही । न दिसती नयनीं । अवचिता गगनीं । बिंबलासे ॥१॥ लोपले रविशशि । तेज न माये आकाशीं । मेघ:श्याम मेघाशीं । लपविलें ॥ध्रु०॥ दिव्यरुप तेज । तीव्र ना तेजबीज । कुंडलि विराजे । लोपलें सूर्यो ॥२॥ ज्ञानदेवा ध्यान । मनाचेंही मन । हरिचरण स्थान । दृढ केलें ॥३॥
216 सुंदर सुरेख वोतिलें । परब्रह्म तेज फ़ांकलें । तें व्योमीं व्योम सामावलें । नयनीं वो माय ॥१॥ कमळनयन सुमन फ़ांकलें । त्या परिमळा आथिलें । मकरंदीं वो माय ॥ध्रु०॥ संकोचला संसार । पारुषला व्यवहार । ब्रह्मानंद अपार । जहाला वो माय ॥२॥ मधुर वेदवाणी । न पवे ज्याच्या गुणीं । तें ठकावलें निर्वाणीं । नेति मुखें वो माय ॥३॥ यापरतें बोलणें । न बोलणें होणें । तें म्यां आपुल्या अंगवणें । केलें वो माय ॥४॥ ऐसियाते वोटी । लागलें तयाचे पाठी । रखुमादेविवरा भेटी । विठ्ठलीं वो माय ॥५॥
217 सुनीळ गगना पालटु । तैसा दिसे अंगीं नटु । कृष्णी बाणलासे नीळवर्णु गे माये ॥१॥ यमुनेच्या पाबळीं । तनु घेउनि सांवळि । पावा वनमाळी वाजतु आसे ॥ध्रु०॥ पांवयाचेनि नादें । कृष्णाचेनि वेधें अमृतघनु वोळला । आकाश वोळुनि वर्षाव झाला ब्रह्मरसपूर आलारे ॥२॥ कान्हा अति सुंदर वदनारविंद आळी सेविती अनिवाररे आयो ॥३॥ चंदनादिटिळकुलल्लाटीं जया साजे मोर विसावेटी रेआयो । सुरतरु कुसुमें कबरीं भारुरे कुंडलें झळकति कपोळीं रे आयो ॥४॥ बाप रखुमादेविवरु विठ्ठलुरे । त्रिभुवनजनमोहन रे आयो ॥५॥
218 सुनीळ जें ब्रह्म बिंब सत्रावीचें । विश्वरुप चैतन्य महाकारणीं ॥१॥ ब्रह्मज्योतीचिये प्रकाशें करुनी । देखे त्रिभुवनीं एक वस्तु ॥२॥ ज्ञानदेव म्हणे ज्यीतीची जे ज्योती । ब्रह्मरंध्री वस्ती परमात्मयाची ॥३॥
219 सोहंकारीं माया लक्ष आणीं देहीं । निरंजनीं पाहीं मायाकार ॥१॥ निर्गुण सगुण माया तेची खरी । प्रसऊनी निर्धारी वांझ असे ॥२॥ ज्ञानदेव म्हणे मज माया कृपाळु झाली । तिणें उजळली माझी काया ॥३॥
220 स्थावर जंगम प्रणव प्रसवला । आत्मा स्वय संचला प्रणवा ठायीं ॥१॥ अवस्था भुक्ती मुक्ती प्रणवची जन्मता । अर्धमातृके परता प्रणवची ॥२॥ ज्ञानदेव म्हणे प्रणवाचे ठायीं । प्रणवीं प्रणव पाहीं निराळा तो ॥३॥
221 स्थूलदेह सूक्ष कारण तिसरा देह । चौथा महाकारण देह ऐक बापा ॥१॥ औट पीठाचे दरीं कर्पूर वर्णावरी । शामाचे अंतरी महाकारण ॥२॥ महाकारणीं आतुला लक्षाचा पुतळा । उन्मनी हे कळा दैवी वरी ॥३॥ सहस्त्रदळ तेंच कीं आन नाहीं ऐसें । महा तेज वसे ज्याचे आंत ॥४॥ पश्चिम मार्ग तेथुनी ऊर्ध्व उंच गगनी । जेथें एक कामिनी एकलीच ॥५॥ मार्ग नहीं तेथ कोणे रीती जावें । सुषम्नेवरी वळघावें सामर्थेसी ॥६॥ तेथूनी ऊर्ध्व छिद्र मुंगी नेत्रातुल्य । त्यांतून उडणें भले चपलत्त्वेंसी ॥७॥ जडतां वळंघितां बरी नारी आपण एक । रनानारी नपुंसक एक रुप ॥८॥ ज्ञानदेव म्हणे जो उडनी जाय तेथ । परब्रह्मीचि मात तोचि जाणे ॥९॥
222 स्वरुपाचें ध्यानीं निरंजन पाहिलें । डोळ्यानें दाविलें चराचर ॥१॥ आतां माझें नयन नयनीं रिघों पाहे । नयना नयनीं राहे नयनची ॥२॥ ज्ञानदेवा नयन निवृत्तिने दाविला । सर्वा ठायीं झाला डोळा एक ॥३॥
223 स्वरुपीं पाहतां बिंबीं बिंब उमटे । तें मेघ:श्याम दाटे बुंथि मनीं ॥१॥ चित्त वित्त हरि जाला वो साजणी । अवचिता आंगणीं म्यां देखियला ॥ध्रु०॥ सांवळा डोळसु चतुर्भुज रुपडें । दिसे चहूंकडे एक तत्त्व ॥२॥ ज्ञानदेव म्हणे द्वैत निरसूनि बाही । एका रुपें बाही तरशील ॥३॥
224 स्वर्ग जयाची साळोंखा । समुद्र पाळी पिंड देखा । शेषासरिखी बैसका । जो आधार तिही लोकीं ॥१॥ लिंग देखिलें देखिलें । त्रिभुवनीं विस्तारलें ॥२॥ मेघधारीं तपन केलें । तारापुष्पीं वरी पूजिलें । चंद्रफ़ळ ज्या वाहिलें । वोवाळिलें रविदीपें ॥३॥ आत्मनैवेद्य समर्पिलें । ब्रह्मानंद मग वंदिलें । ज्योतिर्लिंग मग ध्याईलें । ज्ञानदेवीं ह्रदयीं ॥४॥
225 हरपली सत्ता मुराली वासना । सांवळाचि नयना दिसतसे ॥१॥ काय करुं माय सांवळा श्रीकृष्ण । सांगितला प्रश्न निवृत्तीनें ॥ध्रु०॥ बापरखुमादेविवरु सांवळीये तेज । सेजबाज निज कृष्ण सुखें ॥२॥
226 हरि उच्चारणीं अनंत पापराशी । जातील लयासी क्षणमात्रें ॥१॥ तृण अग्निमेळें समरस झालें । तैसे नामें केलें जपतां हरि ॥२॥ हरि उच्चारण मंत्र हा अगाध । पळे भूतबाधा भेणें तेथें ॥३॥ ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदां ॥४॥
227 हरि बुध्दि जपे तो नर दुर्लभ । वाचेसि सुलभ रामकृष्ण ॥१॥ रामकृष्ण नामीं उन्मनी साधिली । तयासी लाधली सकळ सिध्दि ॥२॥ सिध्दि बुध्दि धर्म हरिपाठीं आले । प्रपंची निवाले सांधुसंगें ॥३॥ ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा । येणें दशदिशा आत्माराम ॥४॥
228 हरिपाठ कीर्ति मुखें जरी गाय । पवित्रचि होय देह त्याचा ॥१॥ तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमुप । चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे ॥२॥ मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार । चतुर्भुज नर होऊनि ठेले ॥२॥ ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधलें । निवृत्तीनें दिलें माझ्या हातीं ॥४॥
229 हरिभक्त संत झाले हो अनेक । त्यामाजी निष्टंक कांही ऐक ॥१॥ शुक वामदेव शौनक नारद । अजामेळ प्रल्हाद बिभीषण ॥२॥ ध्रुव पराशर व्यास पुंडलिक । अर्जुन वाल्मिक अंबरीष ॥३॥ रुक्मांगद भीष्म बगदालभ्यसूत । सिभ्री हनुमंत परिक्षिती ॥४॥ कश्यपादि अत्री गौतम वशिष्ठ । भारव्दाज श्रेष्ठ मार्कंडेयो ॥५॥ बळी कृपाचार्य इंद्र सूर्य चंद्र । ब्रह्माआदि रुद्र पूर्ण भक्त ॥६॥ सर्वांचा एक आहे मी किंकर । म्हणे ज्ञानेश्वर वैष्णवांसी ॥७॥
230 हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन । हरिवीण सौजन्य नेणें कांही ॥१॥ तया नरा लाधलें वैकुंठ जोडलें । सकळही घडलें तीर्थाटन ॥२॥ मनोमार्गे गेला तो तेथें मुकला । हरिपाठीं स्थिरावला तोचि धन्य ॥३॥ ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी । रामकृष्णीं आवडी सर्व काळ ॥४॥
231 हें नव्हे आजिकालिचें । युगां अठ्ठाविसांचें । मज निर्धारितां साचें ।हा मृत्युलोकुचि नव्हे ॥ हाचि मानिरे निर्ध्दारु । येर सांडिरे विचारु । जरी तूं पाहासि परात्परु । तरि तूं जारे पंढरिये ॥१॥ बाप तीर्थ पंढरी । भूवैकुंठ महीवरी । भक्त पुंडलिकाचे द्वारीं । कर कटावरी राहिला ॥ध्रु०॥ काशी अयोध्या आवंति कांति । मथुरा माया गोमती । ऐशीं तीर्थे इत्यादि आहेति । परि सरी न पवती पांडुरंगी ॥२॥ हाचि मानिपारे विश्वासु । येर सांडिरे हव्यासु । जरि तूं पाहासि वैकुंठवासु । तरि तूं जाये पंढरिये ॥३॥ आड वाहे भीमा । तारावया देह आत्मा । पैल थडीय परमात्मा । मध्य राहिला पुंडलिकु ॥४॥ या तिहींचें दरुशन । प्राण्या नाहीं जन्ममरण । पुनरपि आगमन येथें बोलिलेंचि नाहीं ॥५॥ पंढरपुरी ह्मणिजे भूवैकुंठ । ब्रह्म तंव उभेचि दिसताहे नीट । या हरिदासासी वाळुवंट । जागरणासी दीधलें । म्हणोनि करा करारे क्षीरापति । नटा नटा कीर्तनवृत्ती । ते नर मोक्षातें पावती । ऐसें बोलती सुरनर ॥६॥ हें चोविसा मूर्तींचें उध्दरण । शिवसहस्त्रनामासी गहन । हेंचि हरिहराचें चिंतन । विश्ववंद्य हे मूर्तितें । तो हा देवादि देव बरवा । पांडुरंग सदाशिवाचा निज ठेवा । बापरखुमादेवीवरु पंचविसावा । चोविसा मूर्ति वेगळा ॥७॥
232 होय सौरी आतां उघडा घाली माथा । परपुरुषीं रमल्या बाई त्याची पतिव्रता ॥१॥ कर्मेवीण सौरी झाले आले संतापाशी । ज्ञान डौर घेऊनि करीं लिंग देह नाशी ॥२॥ रांडव राहूं नका बाई पाहुनि करा वर । तेचि तुम्ही सुखी व्हाल आह्यव मरण बर ॥३॥ रांडवा ज्या ज्या मरती बाई त्यासी नाना योनी । स्वामी करुनि सूखी होई खुंटती येणीं जाणीं ॥४॥ निवृत्तीप्रसादें ज्ञानदेव बोले । स्वामी करुनी सुखी होई निजानंदीं डोले ॥५॥