संत निळोबा अभंग



1
ॐनमोजि विश्वतीता । विश्वव्यापका श्रीअनंता । परात्परा सद्‍गुरुनाथा । ईश्‍वरनियंता सकळादी ॥१॥ तुमचा अनुग्रहो झालिया । निरसे मोह ममता माया । करुनी उपदेशी ब्रह्मया । निजात्मपदीं स्थापिसी ॥२॥ सनकादिकांचें चिंतन । नाम तुमचें अनुसंधान । त्यातें स्वरूप स्थिति पाव‍उन । ठेविसी निमग्न निजानंदीं ॥३॥ शुक प्रल्हाद नारद । पावोनियां तुमचा बोध । कारिता सदा ब्रह्मानंद । तारिती कीर्तनें आणिकां ॥४॥ निळाह्यणे परमानंदा । परात्परा सच्चिदानंदा । सद्‌गुरुराया निजात्माबोधा । कृपेस्तव लाहीज तुमचिये ॥५॥

2
अंगकांति प्रकाशली । सूर्या दिधली किंचितसी ॥१॥ तेणेंचि प्रकाशला भानु । झाला तो नयनु त्रैलोक्या ॥२॥ तैसेंची चंद्रा जीवनमृत । दिधलें किंचित श्रीहरी ॥३॥ निळा म्हणे तेणेंचि जगें । निववित अंगें मयंकु ॥४॥

3
अंतर कोणा नेदी सहसा । आपुलिया दासां सांभाळी ॥१॥ परम कृपावंत हरी । नामोच्चारी प्रगट होय ॥२॥ यांची निष्ठा बाणली ज्यासी । कदाही त्यासी न विसंबे ॥३॥ निळा म्हणे जवळचि राहे ऐसा भक्त मोहें मोहितु ॥४॥

4
अंतरीं नमप एकनाथ करी । धन्य धन्य वैखरी वदलिसे ॥१॥ लटिका व्यवहार सव्र हा संसार । मायेचा प्रसर मृगजळ ॥२॥ हिशोब मिळतां न बैसे क्षणभरी । आठवीं श्रीगुरु ॥३॥ निळा म्हणे तेव्हां सांपडला रुका । श्रीहरि सखा संतोषला ॥४॥

5
अंतरींचे जाणा वर्म । कर्माकर्म फळदातें ॥१॥ तरि कां माझा अव्हेर केला । काय तो देखिला स्वभाव दुष्ट ॥२॥ नेणें करुं तुमची सेवा । परि मी देवा नाम जपें ॥३॥ निळा म्हणे यावरी आतां । येईल चित्ता तैसें करा ॥४॥

6
अंतरींचे मनोगत । तुम्ही तों सतत जाणतसां ॥१॥ तरी वियोग नका आतां । तुमच्या भजना भजनासी ॥२॥ आठव करितां दिवसरात्री । उल्हास चित्तीं मना दयावा ॥३॥ निळा म्हणे कृपाघना । विज्ञापना हे माझी ॥४॥

7
अंधकारीं प्रकाश दावी । दिप रवीपुढें मिथ्या ॥१॥ तैशीं प्राप्तापुढें ज्ञानें । युक्तिचीं दिनें लेवासे ॥२॥ जिवे मेवे गोडिये निके । परि ते फिके परमामृतीं ॥३॥ निळा म्हणे दाविती भाव । परि ते स्वमेव संत भिन्न ॥४॥

8
अगा ये षड्‌गुण भाग्यवंत । समग्र लक्ष्मीचिया कांता । समग्र यशातें तूं धरिता । समग्र ऐश्वर्यता तुज अंगीं ॥१॥ समग्र औदार्य लक्षणीं । समग्र वैराग्याची खाणी । समग्र ज्ञानशिरोमणी । समग्र षड्‌गुणी संपन्ना ॥२॥ यशें थोरविला मारुति । बिभीषण केला लंकापती । औदार्य देऊनि कर्णा हातीं । कीर्ति दिगांतीं फिरविली ॥३॥ ज्ञानें उपदेशिला चतुरानन । ऐश्‍वर्य वाढविला अर्जुन । वैराग्यशुकातें बोधून । ब्रह्म सनातन पावविला ॥४॥ निळा म्हणे इहीं अगाध लक्षणीं । वंद्य सुरासुरां तुं त्रिभुवनीं । माझी अलंकारूनियां वाणी । प्रवर्तवावी स्तवनीं आपुलिया ॥५॥ बालक्रीडा

9
अनुरागें भजती देवा । त्यांच्या भावा साक्षी तो ॥१॥ म्हणोनियां मागें पुढें । धांवे कोडें सांभाळी ॥२॥ भुके तानें करी चिंता । लागों नेदी त्या ऊनवारा ॥३॥ निळा म्हणे अंतरसाक्षी । सदा कैंपक्षी दासाचा ॥४॥

10
अमृत गोडिये नाहीं भिन्नपण । प्रभा रविकीर्ण जयापरी ॥१॥ अळंकार सोनें काय तें वेगळें । डोळियां बुबळें वेगळिक ॥२॥ नभा अवकाशा कोण भिन्न करी । वस्त्रतंतुपरी देव भक्त ॥३॥ निळा म्हणे प्राण तोचि प्रभंजन । नव्हती ते भिन्न एकएका ॥४॥

11
अवघियांचे असोनि देहीं । अंतर्बाहीं न दिसेचि ॥१॥ जेवीं साखरमाजीं गोडी । न दिसे उघडी असतांही ॥२॥ वादय दिसती न दिसे नाद । जेविं कां स्वाद भोजनीं ॥३॥ निळा म्हणे तैसा आत्मा । न दिसेचि भूतग्रामा कवळुनी ॥४॥ ज्ञानें अवघेंचि जाणें । परि एक नेणे आत्मज्ञाल ॥१॥ बोल तितुके बोलचि वरी । परि न चढे पायरी प्राप्तीची ॥२॥ आपुलेंचि हित आपण नेणे । वरी आणिकां शाहाणें करुं धांवे ॥३॥ निळा म्हणे ठाकुनी लोकां । आपणहि नर्का जात सवें ॥४॥

12
अवघे करूनि जयजयकार । हर्षें झाले सुखनिर्भर । म्हणती आतां वारंवार । भय संकोच न धरावा ॥१॥ तंव यशोदा म्हणे पूर्वीही ऐसें । गर्गाचार्यें कथिलें विन्यासें । राशिनक्षत्राचेनियां मिसे । उदंड भाषार्थ सांगितला ॥२॥ पुढें वधील कंसासुरा । सोडवील हा मातापितरां । मथुरेसी उग्रसेना नृपवरा । भद्रा सिंहासनी बैसवील ॥३॥ करील धर्माचें पाळण । सकळ पांडवाचें संरक्षण । भीमकीचेंही पाणिग्रहण । करील अरिवीरां मर्दुनी ॥४॥ वधूनियां भोमासुरा । सोळा सहस्त्र अंतःपुरा । प्राणूनियां हा एकसरा । पुत्रपौत्रीं नांदेल ॥५॥ कौरवां वधील पांडवाहातें । राज्यीं स्थापील हा धर्मातें । उतरुनी भूभारातें । अवनी उत्फुल्लित करील ॥६॥ गोकुळींचिया नगरनारी । रंजवील हा नानापरी । गोवळ गाईचा मनोहरी । क्रीडा करील हा कौतुकें ॥७॥ अतुर्बळिया नारायणु । यशोदे तुझा हा नंदनु । नाटकी कौसाल कान्हु । करील पवाडे अगणित ॥८॥ निळा म्हणे ते प्रसंगीं । स्मरलें अवघें यशोदेलागीं । मग नाना वस्तु पदार्थ चांगी । वरुनी सांडी श्रीकृष्णा ॥९॥

13
अवघे वर्ण बावन्न परी । शब्दीं शब्दांच्या कुसरी ॥१॥ आयते दिल जोडूनियां । स्वामी सद्गुरु तुकया ॥२॥ न लगे करणेंचि घडामोडी । अर्थी अक्षरें उघडीं ॥३॥ निळा म्हणे कृपावंत । कैसेनि उत्तीर्ण होऊं आतां ॥४॥

14
अवघें देखे ब्रम्हरुप । गुण दोष पाप नातळे ॥१॥ त्याची झाली चित्तशुध्दी । कृपानिधी तोषला ॥२॥ हरीच्या भजनीं अत्यादर । पडेल विसर संसारें ॥३॥ निळा म्हणे विठ्ठल ध्यानीं । चित्तीं मनीं बैसला ॥४॥

15
अवघें होऊनि कांहींचि नव्हे । आपुल्या स्वाभावें आपण ॥१॥ तया नांव आत्मतत्व । शुध्द सत्व मायादी ॥२॥ ध्वनि बीज ओंकार रुप । तेंही स्वरुप ऐलाडी ॥३॥ निळा म्हणे जाणों जातां । जाणोनि नेणता वेद जेथें ॥४॥

16
अवघ्या कळा याचे हातीं । न करी काय एक श्रीपती । विष पाजितां अमृतीं । केली तृप्ती प्रल्हादा ॥१॥ चंद्रहास्याचा कैवारी । रक्षिलें त्या महामारी । राज्य देऊनियां मुरारी । वैष्णवांमाजी श्रेष्ठ केला ॥२॥ अर्जुनाची प्रतिज्ञा गहनु । देखोनि दिवसा लोपिला भानु । जयद्रथासि यमसदनु । प्राप्त केला तात्काळीं ॥३॥ गर्भी रक्षिला परीक्षिती । सुदर्शन चक्र घेउनि हातीं । उदरी प्रवेशोनियां श्रीपती । छेदिलीं शक्ति अनिवार ॥४॥ द्रौपदीच्या वस्त्रहरणीं । उडी घालूनियां ततक्षणीं । केली वस्त्राची पुरवणी । लाजविलीं कौरवें ॥५॥ गजेंद्रें संकटीं धांवा केला । वैकुंठीं यातें तो जाणों आला येऊनि तांतडी मग सोडविला । विमानीं नेला बैसवूनी ॥६॥ निळा म्हणे ऐसीं किती । तारिलीं ताराल तुम्ही पुढती । जयां तुमच्या नामीं प्रीति । ते ते होती आप्त तुम्हां ॥७॥

17
अवघ्याचि संपत्ती आलीया घरा । तुमचिया दातारा आगमनें ॥१॥ शीतळ झालों पावन झालों । तुमचिया लागलों चरणांसी ॥२॥ धरिलीया जन्माचें सार्थक झालें । तुम्हीं अवलोकिलें म्हणोनियां ॥३॥ निळा म्हणे धरिलें हातीं । जेव्हांचि संतीं तुम्हीं मज ॥४॥

18
असोनि अलिप्त सर्वसंगी । आत्मा भोगी ना विरागी ॥१॥ ऐसें जाणती ते ज्ञानी । नित्यमुक्त त्रिभुवनीं ॥२॥ मी हें स्फुरे जेथूनियां । आत्मा परचि त्याहूनियां ॥३॥ निळा म्हणे मी हे वदती । मूर्ख देहातेंचि कल्पिती ॥४॥

19
आंतु बाहेरी देखणाचि दिसे । परि तो आभासे दृश्य ऐसा ॥१॥ ज्ञानेंचिविण वांयां गेला । बोध मावळला सत्याचा ॥२॥ त्याविण दिसतें देखतें देखतें कोण । परि ये नागवण भ्रांतीची ॥३॥ निळा म्हणे आठव न धरे । तेणोंचि अंतरे हातोहातीं ॥४॥

20
आईका हो संत तुम्ही मुनेश्वर । माझिये निर्धार अंतारींचा ॥१॥ विठोबावांचूनि न मनींचि दैवत । न धरी माझें चित्त भाव कोठें ॥२॥ काय मतांतरें करुं ते साधनें । हरीनामकीर्तनें वांचूनियां ॥३॥ निळा म्हणे न लगे वायूची धारण । तत्वसंख्या कोण कामा आली ॥४॥

21
आणिक तों युक्ति नाहीं माझया हातीं । आहें मूढमति म्हणूनियां ॥१॥ वारंवार तुम्हां करितों सूचना । नामें दयाघना उच्चारुनी ॥२॥ पतितपावन ऐसी ब्रिदावळी । रुळते पायांतळीं प्रतिज्ञेची ॥३॥ निळा म्हणे तिचा प्रताप दाखवा । माझा हा निरसावा अहंभाव ॥४॥

22
आणिक हे ग्रंथ प्रमाण अष्टोतरशे । वदले स्वरसे गुरुकृपे ॥१॥ रामायण अदभूत सप्तकांड साचार । तंव प्रयाण विचार आरंभिला ॥२॥ समाधी सुखाचा सोहळा अपार । होतो जयजयकार प्रतिष्ठानी ॥३॥ निळा म्हणे एैसा ब्रहमानंद झाला । आनंदी लोटला आनंदचि ॥४॥

23
आणिक हे ग्रंथ प्रमाण अष्टोतरशें । वदिलें स्वरसें गुरुकृपें ॥१॥ रामायण अदभुत सप्तकांड साचार । तंव प्रयाण विचार आरंभिला ॥२॥ समाधि सुखाचा सोहळा अपार । होता जयजयकार प्रतिष्ठानीं ॥३॥ निळा म्हणे ऐसा ब्रम्हानंद झाला । आंनदी लोटला आनंदचि ॥४॥

24
आणिकांते उपदेशी । आपण मळिन मानसीं ॥१॥ बोले ते ते धूर्त वादें द लटिक्याचि प्रेमें रडे स्फुंदे ॥२॥ सोंग परमार्थ हा सार । आशा अंतरी विखार ॥३॥ निळा म्हणे देहाभिमानें । गेलीं भोगिती ते पतनें ॥४॥

25
आतां अभक्त कातर । मळिन जयाचें अंतर ॥१॥ दाऊनियां वरदळ वेष । मना अंगी आशापाश ॥२॥ वाचे सात्विक बोलणें । विषयीं वासनेचें ठाणें ॥३॥ निळा म्हणे घेउनी सोंगें । निरवे चार करीत उगे ॥४॥

26
आतां अवघे हरिचे जन । करा हो चिंतन नामाचें ॥१॥ देव नुपेक्षील सर्वथा । करा कथा कीर्तनें ॥२॥ टाळ मृदंग लावा भेरी । नाचा गजरी हरिनामें ॥३॥ निळा म्हणे वैकुंठवासी । येती भेटीसी तुमचीये ॥४॥

27
आतां तरी बाळका आणीं । आपल्या करें मी लेववीन लेणीं । यशोदा म्हणे मांडिली हाणी । निवांत पोरटें नसेची ॥१॥ मग जाऊनियां पालखाजवळी । म्हणे मत्यु पाचारितो तूंतें वनमाळी । उगाचि असतासि जरि ये काळीं । तरि वांचतासी काय करूं ॥२॥ ऐसें बोलोनिया आणिला । पूतने वोसंगा बैसविला । देखतांचि पूतने वोसंडला । उभंड प्रेमाचा न सांवरे ॥३॥ सुंदरपणाची झाली सीमा । उपदेशी मदना अंगीं काळिया । अवलोकूनियां पुरुषोत्तमा । तनुमनप्राणें निवालीं ॥४॥ म्हणे गे यशोदे साजणी । परमसुखाची हे लाधलीसी धणी । जतन करी पुत्रमणी । दुर्लभ भाग्येंचि पावलिसी ॥५॥ पूतना राक्षसी अति क्रूर । तेहि देखोनियां कृष्णचंद्र । नयनीं अश्रु आणुनियां वारंवार । श्रीमुखकमळ अवलोकी ॥६॥ निळा म्हणे अगाध बुद्धी । हो‍उनी परतली प्रारब्ध सिद्धी । म्हणे कार्य साधूनियां त्रिशुद्धी । जावें सत्वर राजभुवना ॥७॥

28
आतां पुढें बाळचरित्र । कृष्णक्रीडा अति विचित्र । ऐकतां श्रवणीं होती पवित्र । गातां वक्र शुचिर्भूत ॥१॥ एक अजर एक अक्षर हे भगवत्कथा । श्रवणीं पडतांचि अवचिता । कैवल्यपदप्रप्तीची योग्यता । पावे श्रोता वक्ता तात्काळ ॥२॥ श्रीकृष्णाची बाललीळा । अद्‌भुत सुखाचा सोहळा । वेधुनियां नरनारी बाळा । गाई आणि गोवळा ब्रह्मप्राप्ती ॥३॥ ब्रह्मादिक दर्शना येती । सकळही देव आणि सुरपती । गगनीं विमानें दाटती । सुमनें वरुषति सुरवर ॥४॥ श्रीकृष्णाचें नामकरण । विधिविधानें द्विजभोजन । नंदयशोदे उल्हास पूर्ण । सुवासिनी ब्राह्मण सर्व जना ॥५॥ मंगळघोषाचिया गजरीं । निशाणें दुमदुमलिया भेरीं । टाळ मृदंग झणत्कारी । नाचतीं वैष्णव पदें गाती ॥६॥ निळा म्हणे नगरवासी । प्रांतवासी देशवासी । आले द्विपांतरनिवासी । कृष्ण सोहळा पहावया ॥७॥

29
आत्मा करी ना करवी । अलिप्तपणें वर्ते जीविं ॥१॥ साक्ष नव्हे ना असाक्ष । उपेक्षा करीना कैंपक्ष ॥२॥ जैसें गगनीं अभ्र गळें । गगन अलिप्त त्यावेगळें ॥३॥ निळा म्हणे सन्निधानें । लोह चाले चुंबक नेणें ॥४॥

30
आत्मा नाहींचि देखिजे ऐसा । उजळितां प्रकाशा रविकीर्णा ॥१॥ असोनियां पाठीं पोटीं । न देखेचि दृष्‍टी देखण्या ॥२॥ लेऊनियां सर्वांभरी । असोनि बाहेरी नाढळे ॥३॥ निळा म्हणे उगम जैसा । न देखेचि सहसा सागर ॥४॥

31
आत्मा निघोट निर्मळ । नातळे तो मायामळ ॥१॥ जेवीं मृगजळातें भानु । प्रगटूनियां वेगळा भिन्नु ॥२॥ आत्मबिंब नव्हे छाया । तैसीं स्वरुपीं मिथ्या माया ॥३॥ निळा म्हणे हें स्वानुभवें । विचारितां होईल ठावें ॥४॥

32
आनंदे वैष्णव गाती पै नाचती । जयजयकार करिती ऋषीमुनी ॥१॥ विमानांची दाटी पुष्पांचा वरुषाव । स्वर्गीहूनि देव करिताती ॥२॥ स्वये परब्रहम करीत सोहळा । सकळ भक्तमेळा प्रतिष्ठान ॥३॥ निळा म्हणे हरि निघाले पंढरी । आनंदे भीतरी ब्रहमादिकां ॥४॥

33
आनंदे वैष्णव गाती पै नाचती । जयजयकार करिती ऋषीमुनी ॥१॥ विमानांची दाटी पुष्पांचा वरुषाव । स्वर्गीहूनि देव करिताती ॥२॥ स्वयें परब्रम्ह करीत सोहळा । सकळ भक्तमेळा प्रतिष्ठान ॥३॥ निळा म्हणे हरि निघाले पंढरी । आनंद भीतरीं ब्रम्हादिकां ॥४॥

34
आपणा दाउनी भुरळे केले । ठकुनि माझें मीपण नेलें ॥१॥ आतां जाऊं कोणीकडे । पळों तरी तो मागें पुढें ॥२॥ धांवा म्हणोनि बोलो जाय । तंव बोलातें गिळूनी आपणाचि ठाये ॥३॥ ऐकों जाय याच्या गोठी । तंव तो शब्दा पाठीं पोटीं ॥४॥ देखों जातां देखणेंचि होय । दृश्यादृश्‍य हा नुरवीचि माये ॥५॥ सुगंध घेतां आपणचि नाक । गंधाचा गंध हाचि हा एक ॥६॥ मी माझें मज न दिसेची कोठें । बहुता जुगांचे हरिले सांठे ॥७॥ ठकूनियां निळा अवघाचि नेला । सकळही त्याचें आपणचि झाला ॥८॥

35
आपणा समान केलें त्यासी । धरिलें ज्यासी निजहातीं ॥१॥ ऐसा देवो कृपासिंधु । म्हणोनि बंधु दीनांचा ॥२॥ हीनत्व देखोनि भक्तां अंगीं । लाजे जगीं त्याचेनि ॥३॥ निळा म्हणे करुनी थोर । चालवी बडिवार निजांगें ॥४॥

36
आमोद न सोडी कर्पुर । किंवा प्रभेतें रविकर ॥१॥ तैसेचि देव आणि भक्त । येरयेरीं विराजित ॥२॥ जेंवि साखरेतें गोडी । चंदन सौरभ्या न सोडी ॥३॥ निळा म्हणे अवकाश नभ । दोन्ही एकचि ते स्वयंभ ॥४॥

37
आम्ही तों जिवें वेंच केला । तुमच्या बोलावरी देवा तंव तें तुम्हासी ठावे ॥ १॥ किती वेळ दावावें बोलोनि ॥२॥ जैसी असो तैसींचि तरी । कायसी थोरी मग तुमची ॥३॥ निळा म्हणे वांयांचि शीण । केला यावरुन दिसतसें ॥४॥

38
आलें शरण त्याचा करी प्रतिपाळ । न म्हणे हा दुर्बळ सदैव कांहीं ॥१॥ नेदी लागों वारा कल्‍पनेचा तया । न वजे पासोनियां दुरी कोठें ॥२॥ ब्रम्हरस मुखीं घालीं नामामृत । नेदी तुटों आर्त आवडीचें ॥३॥ निळा म्हणे यासी भक्ताचा अभिमान । उभा म्हणऊन युगें जातां ॥४॥

39
आळी करितां नामदेव । जेविती स्वयमेव सांगातें ॥१॥ सांवत्याचें उदरीं बैसे । पुंडलिका वसे दृष्टीपुढें ॥२॥ कूर्म्याचिये धांवे भेटीं । मेहत्या कंठीं माळ ओपी ॥३॥ निळा म्हणे निर्जनवासी । संतोबासी न विसंबे ॥४॥

40
आवडोनी रुप मनीं ॥३॥ धरिले वदनीं हरिनाम ॥१॥ त्याचें सांग झाले सफळ । आलियाचें फळ नरदेहा ॥२॥ रुचला संतसमागम । आपुलिया धर्म कुळाचा ॥३॥ निळा म्हणे भगवत्कथा । गातां ऐकतां निज मोक्ष ॥४॥

41
इंद्रियांची पुरली धांव । मनासी ठाव विश्रांति ॥१॥ तया नांव ब्रम्हप्राप्ती । जेथे उपरति चित्ताचीं ॥२॥ बुध्दीचीहि जाणीव विरे । तर्क मतांतरें मुरडलीं ॥३॥ निळा म्हणे कुंठित गती । पांगुळले ठाती पंचप्राण ॥४॥

42
उंच पदीं ठाव । करा स्वीकारुनी भाव ॥१॥ अवघी कृपा तयावरी । दासांविशी उदार हरी ॥२॥ न नमूनियां याती कुळ । करुं धांवता सांभाळ ॥३॥ निळा म्हणे हाचि धंदा । तुम्हां सर्वदा गोविंदा ॥४॥

43
उत्तम संचित होतें गांठीं । तेणेंचि या भेटी संतांसवें ॥१॥ सुकृतासी आलीं फळें । भावबळें लगटोनी ॥२॥ त्याच्या भाग्या आले भाग्य । लाधले संग संतांचा ॥३॥ निळा म्हणे पूर्णते आले । जिहीं या सेविलें संतचरणा ॥४॥

44
उत्तीर्ण त्यांचे काय व्हावें । न कळे भावें वंदितों ॥१॥ जीव पायीं ठेवूं म्हणे । लटिकेपणें तो मिथ्या ॥२॥ देह मांस चर्म हाडें । अर्पिता अपाडें नैश्वर तीं ॥३॥ निळा म्हणे चरणीं माथा । ठेवूं आतां संतांचिये ॥४॥

45
उत्तीर्ण त्याचें नव्हिजे आतां । जिवही अर्पितां थोडाची ॥१॥ ओंवाळूनि सांडूं काया । वरुनी पायां संतांच्या ॥२॥ मायबापा काय दयावें । कैसें व्हावें उताराई ॥३॥ निळा म्हणे ज्यांची कृपा । जन्म खेपा निवारी ॥४॥

46
उदयी उदयी होता कृपा दृष्टी । स्वये जगजेठी सेवा करी ॥१॥ सडासंमार्जन स्वये करी हरि । उदकते भरी गंध घासी ॥२॥ स्वार्थ परमार्थ दोन्ही ही साधन । साधियेले जाण क्षणमात्रे ॥३॥ करोनि कवित्व एकादशी टीका । भागवत देखा हरिलीला ॥४॥ निळा म्हणे अपार करोनि अभंग । तोडिता उव्देग संसाराचा ॥५॥

47
उदयीं उदय होतां कृपादृष्टी । स्वयें जगजेठी सेवा करी ॥१॥ सडा समार्जन स्वयें करी हरि । उदक तें भरी गंध घासी ॥२॥ स्वार्थ परमार्थ दोन्ही ही साधन । साधियेलें जाण क्षणमात्रें ॥३॥ करोनि कवित्व एकादशी टीका । भागवत देखा हरिलीला ॥४॥ निळा म्हणे अपार करोनि अभंग । तोडीला उव्देग संसाराचा ॥५॥

48
उपरम झाला सर्वकाळ इंद्रियां । स्वरुपीं विलया मन गेलें ॥१॥ ऐशिया स्वानंदे बुझाविलें चित्त । राहिली अचिंत वदनीं वाचा ॥२॥ अष्ट अविर्भाव डवरले अंगीं । प्राणी प्राणरंगीं निजवासें ॥३॥ त्रयबंध ठसा पडिला शरीरा । वृत्ति गेली घरा निजाचिया ॥४॥ निमोनियां गेलें शब्दाचें बोलणें । पवनचि प्राणें शोषियेला ॥५॥ निळा सुखासुखीं पावला विश्रांती । पद पिंडा समाप्ति करुनियां ॥६॥

49
उपायाच्या करितां श्रेणी । परि जेथ कोणी न पवेचि ॥१॥ तया पावविलों ठायां । संतीं करुनियां निज कृपा ॥२॥ ज्याचे प्राप्ती लागीं योगी । धांवती मागीं सुषुम्नेच्या ॥३॥ निळा म्हणे सिध्द मुनीं । ज्यांतें अनुदिनीं चिंतिती ॥४॥

50
उष्में न तपेचि सुधाकर । सीतें न पीडे वैश्वानर ॥१॥ तेंवि हरिभक्तांतें हरी । नेदी बुडों भवसागरीं ॥२॥ गगन न पडे सतंभेविण । तान्हा न फुटेचि जीवन ॥३॥ निळा म्हणे उदया येतां । न देखे अंध:कारातें सविता ॥४॥

51
एक बैसे सिंहासनीं । कर जोडोनी एक उभा ॥१॥ एक पूजा स्वीकारित । एक करित निजांगे ॥२॥ मुळीं पाहतां दोघे एक । परि कौतुक दाखविलें ॥३॥ निळा म्हणे सेवक स्वामी । पुरुषोत्तमीं हे मिथ्या ॥४॥

52
एकाक्षरीं विस्तार करा । कर्थांतरा मेळवुनी ॥१॥ हे तों माझी नव्हे युक्ति । चेतवणें स्फूर्ति तुमची हे ॥२॥ वसंताच्या ईक्षण मात्रें । पल्लव पत्रें फळें वृक्षा ॥३॥ निळा म्हणे रविकीणें । विकाशवणें कमळासी ॥४॥

53
एकाचिया हुंडया भरी । एका दास्यत्व ॥१॥ एकाचीं हा पेरी शेतें । घरें हातें शाकारी ॥२॥ एकीं केलीं फेडी ऋणें । गोणिया दाणे एका घरीं ॥३॥ निळा म्हणे पुरला सर्वां । देखोनि भावा अंतरींच्या ॥४॥

54
एकापासूनी झालें विश्व । विश्वामाजीं एकचि अंश ॥१॥ जैसे शून्यापासुनी अंक । झाले भांदितां नुरेचि लेख ॥२॥ शून्या नुठितां शून्यपणें । कैंचें एका एक होणें ॥३॥ निळा म्हणे भक्तचि नाहीं । कैचा देवहि तये ठायीं ॥४॥

55
एकीं एकपणा ठाव । नसोनि झाला सर्वा सर्व ॥१॥ जैसें गगन घटीं मठीं । दिसोन आपण आपल्या पोटीं ॥२॥ येणें होणें नाणीं मनें । आपींआप संचलेपणें ॥३॥ निळा म्हणे याची कळा । नेणे हाहि न देखे डोळां ॥४॥

56
एकींच नसतां एकपण दुजेपण कैचें । म्हणउनियां न चले कांही तेथें शब्दाचें ॥१॥ पहातें पहाणें जेथें विरमोनि जाय । घेणें देणें कैंचें तेथें सांगावे काय ॥२॥ दृश्याचि नाहीं द्रष्टत्वाचा फिटला पांग । काया वाचा मनचि नाहीं धारणा योग ॥३॥ निळा म्हणे जेथें सुख सुखपणा नये । निजानंदी निजानंद हारपले ठाय ॥४॥

57
एकोनियां संतवाणी । चक्रपाणी संतोषे ॥१॥ म्हणे यारे भिऊं नका । माझिया सेवका भय नाहीं ॥२॥ नाम मुखीं न संडावें । भजा भावें संतोशीं ॥३॥ निळा म्हणे ऐसी हरी ।आज्ञा करी निजदासा ॥४॥

58
एकोबाची सेवा करी । वाहे घरी जीवन ॥१॥ गंधाक्षता तुळसीमाळा । पुरवी सोहळा करी ऐसा ॥२॥ करुनि सडासंमार्जन । पाळित वचन आज्ञेचे ॥३॥ निळा म्हणे यापरिहरि । विराजे घरी दासांचे ॥४॥

59
एकोबाची सेवा करी । वाहे घरीं जीवन ॥१॥ गंधाक्षता तुळशीमाळा । पुरवी सोहळा करी ऐसा ॥२॥ करुनी सडासंमार्जन । पाळित वचन आज्ञेचें ॥३॥ निळा म्हणे यापरि हरी । विराजे घरीं दासांचे ॥४॥

60
एक्या जिवें एक्या भावें । एकचि एकलें एक्या देवें ॥१॥ एकाएकीं एकचि झालें । एका अंगी विरोनी गेलें ॥२॥ एकचि केलें निजानुभवें । एकाचि झालें एक्या नांवें ॥३॥ निळा म्हणे एकाएकीं । एकचि झालें तिहीं लोकीं ॥४॥

61
एवढा मनींचा पुरवा हेत । पंढरीनाळा भेटवा ॥१॥ मग मी तुमच्या न सोडीं पायां । करीन काया कुरवंडी ॥२॥ कृपासिंधु तुम्ही संत । पुरवा आर्त हें माझें ॥३॥ निळा म्हणे झालों दास । नका उदास धरुं आतां ॥४॥

62
ऐकतां श्रवणीं परमानंद । उपमर्दे कंद मायेचा ॥१॥ घोशगजरें गजें वाचा । जो श्रुतिशास्त्राचा गुह्यार्थ ॥२॥ परम रसाळ मधुराक्षरें । चालती सुस्वरें हरिभजनें ॥३॥ निळा म्हणे सुमंगळ। ऐश्वर्य कल्लोळ प्रेमाचे ॥४॥

63
ऐकिला तुमचा अगाध महिमा । दोषियां अधमां तारितसां ॥१॥ म्हणोनियां जी आलों शरण । सत्य मानूं संतवाणी ॥२॥ यावरी कराल अव्हेर तरी । लागेल श्रीहरी बोल तुम्हां ॥३॥ निळा म्हणे आमुचें जिणें । आहें हें वांया ये ठायींचेंचि ॥४॥

64
ऐकोनि संत हांसतील । तुम्हांसी येईल मग लाज ॥१॥ कौल दिला राहे सुखें । न म्हणो मुखें दे ऐसें ॥२॥ मागावें तें आम्हांचि जवळी । आहे नामावळीं पढों सुखें ॥३॥ आणिखी तुमची नाहीं आशा । ठेवा कैशा मुक्तिहि त्या ॥४॥ निळा म्हणे आपुल्याचि सुखें । असों हरिखें अखंडित ॥५॥

65
ऐकोनियां दासवाणी । चक्रपाणी संतोषे ॥१॥ म्हणे तुम्ही प्राणसखे । बोलतां मुखें प्रीतीवादें ॥२॥ सर्वही काळ माझीचि चाड । तरि मजहि कोड तुमचेंचि ॥३॥ निळा म्हणे न फिटे धणी । भक्ता आणि देवाची ॥४॥

66
ऐकोनियां भक्तवचनें । देव संतोषलें मनें ॥१॥ म्हणती आहे नामापासीं । संदेह न धरावा मानसीं ॥२॥ संत बोलिले ते खरें । साचचि मानावें उत्तरें ॥३॥ निळा म्हणे संतोषविलें । कृपावचनीं या विठठलें ॥४॥

67
ऐकोनी गजबजिली दैत्यसभा । धाकेंचि कंसही ठाकला उभा । तंव बीभत्स माभळभटाची शोभा । देखते झाले सकळही ॥१॥ नागवा उघडा आणि बोडका । जीवत्वपांगें बुडाली शंका । भोंवते देखतांही विषयालोकां । म्हणे धांवा धांवा सोडवा ॥२॥ पाटेंचि पुरविली माझी पाठी । लक्षानुलक्ष आले कोटी । उठा उठा पळारे शेवटीं । मारिले जाल व्यर्थची ॥३॥ दैत्य पाहाती चहूंकडे । शस्त्रपाणी वेधल हुडे । दुर्गा सांभाळिती चहूंकडे । म्हणती न दिसे विघ्न डोळियां ॥४॥ राजा म्हणे झांका त्यासी । पुसा काय अते वार्तेसी । मग नेसऊनियां वस्त्रासी । आणिला सभेसी पुसती ॥५॥ तो म्हणे राया बळिया बाळ । उजपला तो आमुचा काळ । विचित्र पाहतां त्याचा खेळ । लाविलीं पिढींची मज पाठीं ॥६॥ निळा म्हणे रूपाकृती । सुंदरपणाची ओतली मूर्ती । कोटी मदनाची अंगीं दीप्ती । न ढळती पातीं अवलोकितां ॥७॥

68
ऐशीं अगाध चरित्रें याचीं । वर्णितां भागला शेष विरंची । लोक म्हणती हा सर्प बिलेंचि । कैसेनि पां वांचला ॥१॥ मग त्यां सांगे नारायण । यासी नेलें वर्ष होऊन । गोवळ वत्सें ब्रह्मसदन । पावोनि होते बैसले ॥२॥ कालिचि ते आले येथें । म्हणोनि सांगती नुतन वार्ते । द्विगुणपणें हे कैसेनि तुमतें । प्राप्त झाले कां नेणां ॥३॥ ऐसें सांगतां श्रीहरी । अवघ्यां जाणवलें अंतरीं । परम लाघविया मुरारी । खेळ खेळे विचित्र ॥४॥ अघासुरा वधिल्यावरी । पुढें धेनुका बोहरी । कैसी केली याची परी । तेहि सुजाण परिसतु ॥५॥ एकैक याचें कथनक । श्रवण भवबंधा मोचक । म्हणोनियां सात्त्विक लोक । हेंचि ऐकती अनुदिनीं ॥६॥ निळा म्हणे हे बाळक्रीडा । परी परमार्थ साधनाचा हुंडा । श्रवण मनन होतांचि फुडा । ब्रह्मसाक्षात्कार पाविजे ॥७॥

69
ऐसा चिंतावोनियां मनीं । म्हणे निमाली पूतना भगिनी । माझिया राज्या आली हानि । म्हणोनि माभळपट पाठविला ॥१॥ तंव पिढेदान त्या प्राप्त झालें । नवलचि हें अपूर्व ऐकिलें । येऊनि आम्हांतें जाणविलें । नव्हे बाळ हें तान्हुलें श्रीहरी ॥२॥ मग म्हणे वो रिठासुरा । जाऊनि तुह्नी बाळकासि मारा । देईन अर्धराज्य भारा । कार्यसिद्धि झालिया ॥३॥ मग रिठासुर तो मायावी । गुंफिली रिठेमाळ अति बरवी । करीं घेऊनियां सादावी । नंद चौबारा जाऊनि ॥४॥ म्हणे हें बाळका लेववितां । सर्वकाळ कंठीं असतां । कोण्याही भयाची तया वार्ता । स्पर्शोचि नेणे सामर्थ्यगुणें ॥५॥ कदापिही नव्हे भूतबाधा । दिठीचें भय नाहीं त्या कदा । ऐसें ऐकोनियां यशोदा । आवडी घाली हरिकंठीं ॥६॥ निळा म्हणे पालखीं बाळ । निजऊनियां यशोदा वेल्हाळ । मेळऊनिया स्त्रिया सकळ । हास्यविनोदें बैसली ॥७॥

70
ऐसा वैरिया मुक्तिदानीं । कृपावंत हा सारंगपाणी । कैसें ऐकूनियां श्रवणीं । परम खेद मानिजे ॥१॥ कृष्णाजवळी होतीं मुलें । तिहीं तें आश्‍चर्य देखिलें । वडिलां सांगती नवल झालें । कृष्णें मर्दिले अपार दैत्यां ॥२॥ कोट्यावत पसरूनि मुखें । आले कृष्णासन्निध तंव ते । तेणें अति लाघवें कवतुकें । भूमिसी आपटूनि मारिलें ॥३॥ त्याचीं शरीरें पर्वताशी । पडिल्या आहेत गांवापाशीं । चला दाखवितो तुम्हांसी । म्हणवूनि सकळिकांसी हाकारिलें ॥४॥ तिहीं ते देखोनियां दिठी । भयें कांपती आपुल्या पोटीं । म्हणती अतुर्बळी हा जगजेठी । लेकरूं कैसा म्हणावा ॥५॥ नंदहि विस्मयापन्न चित्तीं । म्हणे हे कोठूनि असुर येती । याचिया हातें पावोनि शांति । जाताती मुक्तिपदातें ॥६॥ निळा म्हणे गांवींचे लोक । करिती अवघेंचि कौतुक । परी कंसा अधिकाधिक क्षतें उमटती दुःखाचीं ॥७॥

71
ऐसा संतांच उपकार । काय मी पमार आठवूं ॥१॥ करुनियां अनुमोदन । दिधलें वचन अभयाचें ॥२॥ म्हणती करीं नामपाठ ॥ न करीं खटपट यावीण ॥३॥ निळा म्हणे कृपावंत । करिल सनाथ श्रीहरी ॥४॥

72
ऐसींचि देखिलीं उंदडें । जळो त्यांची काळीं तोंडें ॥१॥ मुखें सांगती परमार्थ । स्वार्थ अंतरी अनर्थ ॥२॥ अनुताप दाविती वैराग्य । वरी आंतर्बाह्य रंगे ॥३॥ निळा म्हणे उगीचि रीति । पडलीं संसारीं कुंथितां ॥४॥

73
ऐसे देव आणि ऋषेश्वर । हर्षे होऊनियां निर्भर । नंदयशोदेचें वारंवार । वर्णिती भाग्य निजमुखें ॥१॥ न संपडे जो योगसाधनें । नाना तपें वेदाध्ययनें । तो हा सगुणरूपें नारायण । क्रीडा करी याच्या घरीं ॥२॥ यावरी गौळणीही अति सुंदर । कडिये घेउनी शारंगधरा । नेती उल्हासें निजमंदिरा । चुंबनें देऊनि खेळविती ॥३॥ म्हणती कृष्णा रामा मेघःशामा । योगी मुनिजन मनोरमा । सुलभ झालासी आजि तूं आम्हां । आवडी ऐसा वर्तसी ॥४॥ पूर्वीर्जितें उत्तमें होती । सकृतें त्यांचिया फळनिष्पत्ती । मोडोनी आलिया तुझी हे मूर्ती । डोळेभरी अवलोकूं ॥५॥ ऐशिया उत्साहे त्या प्रमदा । नेती खेळविती गोविंदा । मग पावोनियां परमानंदा । शयनीं पर्यकीं निजविती ॥६॥ निळा म्हणे सुख विश्रांति । पावल्या ऐशिया सत्संगती । पुढती कथा अपूर्व ख्याती । बाळपणींची हरिकीर्ती ॥७॥

74
ऐसें ऐकोनियां उत्तर । देव म्हणे उदर धीर तुम्ही ॥१॥ तुमच्याचि काजा रुपासि येणें । मजलागीं धरणें अवतार ॥२॥ तुम्ही माझें मी तुमचा । आहेचि ठायींचा ऋणनुबंध ॥३॥ निळा म्हणे देवभक्तां । ऐसी एकात्मका हो सरली ॥४॥

75
ऐसें जाणोनियां श्रीहरी । पालखीं निजविल्या रुदन करी । न राहे अंकींही क्षणभरी । निजवितां शेजारी तैसाची ॥१॥ काय करूं गे यशोदा म्हणे । कां हें करिताहे रुदनें । दिठावलें माझें तान्हें । निंबलोण उतरीं तया ॥२॥ तरी न राहे रुदतां । अधिक अधिक आक्रंदतां । यशोदा म्हणे बाहेरी आतां । नेऊ तरी कोणाकडे ॥३॥ मग घेऊनियां कडियेवरी । काग दाविला निंबावरी । तया देखोनियां हास्य करी । मग ते सुंदरी हरिखली ॥४॥ म्हणे निजऊनियां येथें । करीन कामकाज ऐसें । विचारूनियां चित्तें । म्हणे कागातें अवलोकीं ॥५॥ ऐशापरी निजविला । क्षण एक काजकामीं गेला । तंव काग तेथूनियां उठिला । झडपूं आला गोविंदा ॥६॥ देखोनी यशोदा घाबरी । हाहाकार केला इतरीं । निळा म्हणे तो असुरी । हरीचीवरी झेंपावला ॥७॥

76
ऐसें वासुनी मुख अमूप । अघासुर पसरलासे सर्प । गाई गोवळे आपोआप । जाती वदनामाजी त्याच्या ॥१॥ पुढे चालतां मार्ग न दिसे । अंधःकारीं पडिलें ऐसें । मागें फिरावें तंव तो श्वासें । ओढूनि नेतसे पैलीकडे ॥२॥ मग म्हणती येर येरासी । प्रातःकाळींचि झाली निशी । गडदे पडिले न दिसे शशी । ग्रह तारांगणें ना भानु ॥३॥ पडिलों दरकुटिमाझारी । किंवा धुई दाटली भारी । अथवा मेहुडे आले वरी । कांहींचि दिसे न तर्क ॥४॥ जाभडीं मेळवितां आघासुर । परि मागें राहिला शारंगधर । म्हणोनियां तो झाला स्थिर । तयाही सगट गिळावया ॥५॥ तंव दिवस घटिका चारी । आला चढोनियां वरी । गाई गोवळे भिन्न अंधारीं । पडिली अघासुरा पोटीं ॥६॥ निळा म्हणे यावरी आतां । जागृत झालिया कृष्णनाथा । पुढें कैशी वर्तली कथा । ते परिसावी सात्विकीं ॥७॥

77
ऐसें विचारूनिया मनीं । म्हणे सौंगडियां सारंगपाणी । बैल चांगला दिसतो नयनीं । परी धरूं कैसा देईल ॥१॥ तुम्ही व्हारे पैलीकडे । दुरी परते वेंघोनि हुडे । चौताळतां हा चहुंकडे । करील रगडा सकाळांचा ॥२॥ ते म्हणती बरें कृष्णा । परी तूं सांभाळी हो आपणा । ऐसें म्हणोनियां पळती राणा । गिरीशिखरीं बैसले ॥३॥ मग कास घालूनि गोपीनाथ । चालिला पुढें चुचकारित । तंव तो म्हणे आजी कार्यार्थ । बरा साधला एकांतीं ॥४॥ जवळीं यावयाची वाट पाहे । उगाचि स्तब्ध उभा राहे । हें जाणोनियां यादवराया । अंग राखोनि चमकतु ॥५॥ ऐसा आटोपिला हरी । तंव ते मायावी असुरी । धांविन्नला तयावरी । शिंगें पसरूनि विस्तीर्णें ॥६॥ निळा म्हणे फुंपात उठी । चौताळ लागे पाठीं । तव हा परमात्मा जगजेठी । गांठी पडों नेदीचि ॥७॥

78
ऐसें सांगता माभळभटा । राया दचक बैसला मोठा । मग पाचारूनियां सुभटा । दैत्याप्रती काय बोले ॥१॥ म्हणे वाढविलेंती बहुता मानें । अपार संपदा देऊनियां धनें । आजि माझिया उपेगा येणें । बाळ कृष्ण वधणें भलत्यापरी ॥२॥ नाना विद्या तुमच्या अंगीं । रूपें पालटुनी विचरतां जगीं । मायारूपी म्हणऊनियां स्वर्गी । देवही भिती तुह्मांसीं ॥३॥ ऐसें असोनि माझिये गांठी । कायसी बाळका जळूची गोठी । तुमचेनी बळें हे सकळही सृष्टी । आर्चित झाली मजलागीं ॥४॥ पूतना गेलीते तंव नारी । दुसरा भट तोहि भिकारी । काय जाणों कैशापरी । देखोनी कळली तयासी ॥५॥ तो तंव अत्यंत सुकुमार । सांगती अवघे लहान थोर । सुंदरपणा चीही बहार । रूपा आली कृष्णाकृती ॥६॥ तरी तुह्मी जाऊनियां तेथें । प्रेतरूपचि आणावा येथें । निळा म्हणे पाहोनियां त्यातें । कारऊं अक्षवाणे अपणा ॥७॥

79
कंसा मनीं भय संचारु । झाला तेणें चितातुरु । बैसोनियां करी विचारु । कृष्णवधार्थ प्रयोग ॥१॥ तें एकोनी उत्पात वार्ता । गोकुळींचिया लोकां समस्ता । धैर्य नुपजेति म्हणती आतां । जावें पळोनी दूरदेशा ॥२॥ तंव नंद म्हणे ऐका मात । जावोनी वसों दरकुटी आंत । सोडूनिया जातां आपुला प्रांत । घरें दारें नुरतील ॥३॥ विचार मानला सकळांसी । गेली पळोनी दरकुटीयेसी । गांवीं नाहीं मुंगी माशी । ऐसे ओस पडियेले ॥४॥ उष्णा बारियांचे आघात । साउली न मिळोचि त्या वनांत । तंव देखिल्या अकस्मात् । माईक गाडा शंकटासुर ॥५॥ यशोदा देखोनियां ते वेळीं । बाळकृष्ण निजवी गाडियातळीं । तंव हा लाघविया वनमाळी । पद घातेंचि उडविला ॥६॥ तेणें तो अक्रंदला । घोषें दणाणिला । जाउनी मथुरेमजि पडिला । कंस सन्मुख शतचूर्ण ॥७॥ झाला शोणिताचा सडा । मांस विखुरलें चहूं कडा । कंस म्हणेरे शकटहि गाढा । आजि लाविला मृत्युपंथें ॥८॥ निळा म्हणे गौळिये म्हणती । गाडा उडाला कैसिया रिती । तळीं होता हा श्रीपती । थोर भाग्यें वांचला ॥९॥

80
कंसें बैसोनियां सभेसी । विडा मांडिला पैजेसी । म्हणे जो वधील बाळकासी । जाऊनियां गोकुला ॥१॥ त्यासी देईन हें अर्धराज्य । न करीं अन्यथा आपुली पैज । जया साधेल हें काज । तेणें विलंब न करावा ॥२॥ भागिनी पुतना प्रधानरासी । ऐकतांचि उठियेला अति आवेशी । म्हणे जाऊनियां गोकुळासी । निर्दाळीन कुमर नंदाचा ॥३॥ आज्ञा घेऊनियां ते त्वरित । विष स्तनामाजी भरित । म्हणे पाजूनियां कृष्णनाथ । करीन घात शस्त्रेंविण ॥४॥ घेऊनियां बाळलेणीं । मनगटीं बांधिलीं खेळणीं । जिवती वाघनखें माळा मणी । आंगडें टोपडें बाळंतविडा ॥५॥ मग सुखासनीं विराजीत । दासी परिचारिका विष्टित । येऊनियां गोकुळा आंत । यशोदेगृहीं प्रवेशली ॥६॥ निळा म्हणे नवलकथा । वर्तेल ते येथें आतां । पूतना पावेल सायोज्यता । श्रीकृष्णनाथादर्शनें ॥७॥

81
कथा श्रवणें स्वरुप सिध्दी । लागे समाधि सात्विका ॥१॥ ऐसा लाभ जोडे जोडी । बैसतां आवडे हरिकथे ॥२॥ कथा श्रवणें परिहार दोषां । होताति पाशमुक्त पापी ॥३॥ निळा म्हणे हरिकथा श्रवण । करी बोळवण जन्ममृत्या ॥४॥

82
कथाश्रवणें उपजे विरक्ति । कथाश्रवणें वाढे शांति । कथाश्रवणें परमानंद प्रप्ति । कथा श्रवणें ॥१॥ पापी उध्दरती । कथा श्रवणें उपाधी तुटे । कथाश्रवणें भवाब्धि आटे । कथाश्रवणें सच्चिदानंद भेटे । समुळ तुटे मायाजाळ ॥२॥ कथाश्रवणें स्वरुप स्थिति । कथाश्रवणें विषय समाप्ती ॥३॥ कथाश्रवणें मीपण नुरे । कथाश्रवणें अभिमान विरे । कथाश्रवणें कल्पनाहि चुरे । ब्रम्ह साक्षात्कारें भेटिसी ये ॥४॥ निळा म्हणे प्रथम पायरी । हरिकथा श्रवण मनन वरी । निजघ्यासें आत्मया हरी । भेटीजे निर्धारी साक्षात्कारें ॥५॥

83
कथाश्रवणें विरक्ति जोडे । निजशांती वाढे उल्हासें ॥१॥ कथाश्रवणें परमानंद । प्रगटे स्वानंद निज ह्रदयीं ॥२॥ कथाश्रवणें उपाधी तुटे । भवाब्धी आटे नि:शेष ॥३॥ निळा म्हणे कथाश्रवणें । हरती मरणें जन्म जरा ॥४॥

84
करा माझा अंगिकार । पतीतपावन थोर ब्रीदा ॥१॥ उपेक्षितां हांसती लोक । म्हणती सेवक जड झाले ॥२॥ मग ते तुम्हां होईल लाज । अंतरेल काज पुढील ही ॥३॥ निळा म्हणे अपकीर्ती अंगा । न ये पांडुरंगा करावें तें ॥४॥

85
कर्मे वांटिलीं चहूं वर्णा । क्षत्रिय वैष्य आदि ब्राम्हणा । वेदपुरुषा नारायणा । गुणविवंचना तुज हातीं ॥१॥ यज्ञ षटकर्मे ब्राहमाणांसी । क्षात्रदान क्षत्रियांसी । कृषीगोरक्षवाणिज्य वैश्यासी । सेवा शूद्रासि याचिते ॥२॥ नामें स्तोत्रें स्त्रियांदिकांसी । सेवा वांटिली अधिकारेंसी । संतसनकादिक योगियांसी । स्वानुभव सिध्दांत दिधले ॥३॥ कथा कीर्तन सकळ लोकां । आधिलांपासुनि अनामिकां । तरणोपाय विश्वव्यापका । केला नेटका विधिमागें ॥४॥ निळा म्हणे ऐसियापरी । कृपा करुनियां श्रीहरी । जीव तारिले भवसागरीं । भक्तकैवारी म्हणोनियां ॥५॥

86
कल्पनातीत झालें मन । जैसें गगन निरभ्र ॥१॥ म्हणोनिां ऐक्य आलें । स्वरुपीं ठेलें निश्चळ ॥२॥ नित्यानंदे झाली तृप्ती । देखतां भूती भगवंत ॥३॥ निळा म्हणे जडलें पदीं । निरावधी विठठलीं ॥४॥

87
कल्पोकल्पीं युगायुगीं । व्यवसाय हाचि तुम्हांलागीं ॥१॥ करावें दासाचें पाळण । निवारुनि त्यांचा शिण ॥२॥ निद्रा आळस कांही नेणां । येचि वाहीं नारायणा ॥३॥ निळा म्हणे करुणा पोटीं । धरिली नित्य याची साठीं ॥४॥

88
कळासलेती युगायुगीं । नेणां शीणभाग अंगी ॥१॥ भक्तांचिये हांकसवें । क्षणें तेथेंचि प्रगट व्हावें ॥२॥ निरसूनियां मोहमळ । पदीं रक्षावें निश्चळ ॥३॥ निळा म्हणे यश कीर्ति । देउनी सुखाची संपत्ती ॥४॥

89
कां जी कृपावंत झालेति निष्ठूर । नाईका उत्तर करुणेचें ॥१॥ काय अजामेळा होती पुण्यरासी । नेला वैकुंठासी नामोच्चारें ॥२॥ गणिका ते वेश्या काय आचरली । राम म्हणतां नेली निजधामा ॥३॥ जराव्याधें पायीं विधीयला बाण । तो तुम्ही आपण तारियेला ॥४॥ निषाद तो कोळी श्रीरामासन्मुख । येतां दिलें सुख निवविला ॥५॥ पूतना ते पाजी विष स्तनपानीं । ते सायोज्यसदनीं बैसविली ॥६॥ गजेंद्र तो काय तप आचरला । धांवा म्हणतां नेला सोडवुनी ॥७॥ वैरियाचा बंधु केला लंकापती । चिरंजीव पध्दती बैसउनी ॥८॥ निळा म्हणे माझा नाहीं पुरविला । हेतचि राहिल दर्शनाचा ॥९॥

90
कांही कार्य मांडेल जेव्हां । मजचि प्रगट होणें तेव्हां ॥१॥ जवळिच आहे भेऊं नका । माझिया बळें दुर्जन लोकां ॥२॥ तुम्हां गांजिती व्देषिती । त्यांची समूळ विनशति ॥३॥ निळा म्हणे भगवदवाणी । ऐसी प्रविष्ट झाली श्रवणीं ॥४॥

91
कांहींच न होऊनि विस्तारला । बहुरुपी हा एकला ॥१॥ नवल विचित्र हेंचि वाटे । कैसा नेटोनि ठेला नटें ॥२॥ एका ऐसा न होऊनि एक । नानाकोंरे हा अनेक ॥३॥ निळा म्हणे नट लाघवी । शेखीं वेगळा गोसावी ॥४॥

92
काय वर्णूं याचे गुण । ज्याचें त्रिभुवन रुपस ॥१॥ चंद्र सूर्य तारांगणा । दीप्ति हुताशना ज्याचेनी ॥२॥ जेणें वाड केलें गगन । दिधलें आसन वसुंधरे ॥३॥ निळा म्हणे धरिला मेरु । भरिला सागरु दिव्य क्षीरें ॥४॥

93
किती तरी चिंता करुं । धीर धरुं कोठवरी ॥१॥ आला दिवस बुडोनी जातो । अतिशयचि राहतो केला तो ॥२॥ निश्चयें माझा अव्हेर केला । यावरी विठठला कळों आलें ॥३॥ निळा म्हणे आधार नेदा । कांहिचि गोविंदा चित्तसी ॥४॥

94
किर्तनाचा घोष गजर । ऐकतां अपार उध्दरले ॥१॥ ऐसे किती सांगावे ते । कीतनें सरते वैकुंठी ॥२॥ आदिकरुनी स्त्रिया बाळें । कीर्तनकल्लोळें हरिपदीं ॥३॥ निळा म्हणे श्रोते वक्ते । एकात्मतेतें पावले ॥४॥

95
कीर्तन केलें ब्रम्हानंदे । ध्रुव प्रल्हादें एकनिष्ठ ॥१॥ तयां केलें सुखसंपन्न । त्रैलाक्यीं मान वाढवुनी ॥२॥ तैसेचि शुक नारदमुनी । पावले कीर्तनीं समाधिसुख ॥३॥ निळा म्हणे बहुतां संतां । कीर्तन अव्दैता मेळविलें ॥४॥

96
कीर्तनरगें जे जे । ते ते सहजें हरिप्रीय ॥१॥ येर मुमुक्ष्रू जे जे होती । कीर्तनें पावती ते लाभा ॥२॥ महा अनुष्ठान हरिची कथा । नित्य जोडतां सुखप्राप्ती ॥३॥ निळा म्हणे कैवल्यपद । पावती अभेद हरिकीर्ति ॥४॥

97
कीर्तनाची आवडी मोठा । धांवे पाठीं वेष्णवा ॥१॥ जेथें होती नामघोष । नाचें उदास ते ठायां ॥२॥ ऐकोनियां आपुली कीर्ति । सुखें जगपती सुखावें ॥३॥ निळा म्हणे टाळिया छंदे । डुले आनंदे सुप्रेमें ॥४॥

98
कीर्तनें धुवट केलें लोकां । दोष कळंकापासुनी ॥१॥ टाळिया हरिनामाच्या घोषें । पळती त्रासे कलिमल ॥२॥ स्वानुभवें वेधल्या वृत्ती । श्रोतेहि होती चतुभुर्ज ॥३॥ निळा म्हणे श्रोते वक्ते । एकात्मतेतें पावले ॥४॥

99
कृपा केली संतजनीं । अर्थ दाविले उघडुनि ॥१॥ तेचि प्रगट केलें आतां । नाहीं बोलिलों मी स्वतां ॥२॥ नेणों काय केलें संतीं । माझी चेतवुनियां मती ॥३॥ निळा म्हणे वोढावारा । नाहीं तोंडा ना अक्षरा ॥४॥

100
कृपा केली संतजनीं । लाविलों भजनीं श्रीहरीच्या ॥१॥ नाहीं तरी जातों वायां । लक्ष भोगावया चौर्‍यांयशीं ॥२॥ आणिकां साधनीं गुंताचि पडतां । अभिमान वाढतां नित्य नवा ॥३॥ निळा म्हणे धांवणें केलें । सुपंथें लादिलें नीट वाटें ॥४॥

101
कृपावंत सद्गुरुराया । केला जो माझीया मना बोध ॥१॥ तो काय बोलोनि दाखवूं आतां । बोलणें बोलतां आरौतें पडे ॥२॥ शब्दांतील पराप्तर । ध्वनि १कार न पवेचि ॥३॥ निळा म्हणे आनंद कोटी । उथळोनी सृष्टी गगनीं भरे ॥४॥

102
कृष्ण बळराम उठिले । मुखार्जनें सारिलें । तंव दसवंतिया बोले । जेउनी जावें गोधनापाठीं ॥१॥ गाई गोवळ खोळंबले होते । पुढें गेले ते निरुते । मग आणूनियां भोजनातें । पुढें ठेविलीं रत्‍नताटें ॥२॥ उभयतां जेऊनियां उठिले । गोपश्रृंगा आणविले । विचित्र चोळणे कसिले । काचे वेष्टिले सुरंग ॥३॥ शिरीं मोरपिसा टोप । कर्णी कुंडला तेज अमूप । केशर चंदनाचे विलेप । टिळे लल्लाटीं रेखियेले ॥४॥ गुंजाहार घातले कंठीं । खांदीं कांबळीं हातीं वेताटी । मोहरी पावा गांजिवा पाठीं । माजि दिव्यान्नें भरियेलीं ॥५॥ दंडीं रुमाल करी कंकणें । पायीं वाहाण शोभलें लेणें । ऐसे चालतां अतिसत्राणें । पुढें अघयतें ओळखिलें ॥६॥ एक जाभाडें गगनावरी । दुजें पृथ्वीची ऐसें निर्धारी । गाई गोपाळ गेले भीतरीं । निळा म्हणे हें जाणवलें ॥७॥

103
केला जिहीं नामपाठ । तयां वैकुंठ मोकळें ॥१॥ न साधे जें योगयागें । कथाप्रसंगे सुलभ तें ॥२॥ कीर्तनाचे घोष जेथें । होती तेथें हरि उभा ॥३॥ निळा म्हणे सुलभ ऐसें । आन साधनचि नसे कलियुगीं ॥४॥

104
कैंचि आतां जीवा उरी । आंत बाहेरी कोंदला ॥१॥ नेदी पडों कोठें उणें । वाचा करणें चाळितु ॥२॥ भोग भोक्ता आपण झाला । वांटुनी प्याला अभिमाना ॥३॥ निळा नामें रुपें नाहीं । भसे देहीं विठ्ठल ॥४॥

105
कैंचि याला बाईल आई । नामरुपें तेंही लटिकेंचि ॥१॥ मूळचि नाहीं डाळ तें कैंचे । लटिकें साचें काय म्हणों ॥२॥ हात पाय नाक ना डोळे । देखणें आंधळें नातळेचि निळा म्हणे कांहींचि नव्हे । तोचि हा अवघे श्रुति बोले ॥३॥

106
कैसा याचा वेध जाणती अनुभवी । जयां आहे ठावी कृपा याची ॥१॥ न ये तें दावितां सांगतांहि परी । वर्ते जें माझारीं भुलवूनियां ॥२॥ नेदीचि बाहेरीं उमसों बुध्दि मना । भरुनियां भावना झांकोळिली ॥३॥ निळा म्हणे तोचि साक्ष माझया जिवीं । चाळक गोसावी ब्रम्हांडाचा ॥४॥

107
कोटी मदनाचा बाप । प्रभा फांकली तेज अमूप । भूषणें विराजलीं दिव्य स्वरूप । नंदें पाहिला निज नयनीं ॥१॥ मग यशोदपशीं आणिला । म्हणे हा वसुदेव दिधला । येरी म्हणे हा चोरियेला । कोणाचा तानुला न कळे हें ॥२॥ वसुदेव सदाचा भिकारी । बंदीं कंसाचिये चिरकाळ वरी । बालक सुलक्षण हा निर्धारी । असेल सभाग्या समर्थाचा ॥३॥ येरु म्हणे आहे पोटींचा । आत्मा जिवलगु हा आमुचा । नाहीं व आणीला लोकांचा । म्हणोनियां देतों तुम्हांप्रती ॥४॥ येरी म्हणे आमुचें कन्यारत्‍न । याच्या पालटा न्या करा यत्‍न । कंसा पुसतांचि तया दाउन । चुकवा अरिष्ट सकळांचें ॥५॥ यावरी कृष्णातें निरवून । वसुदेव निघाला माया घेऊन । पुढती बंधनें पावला बंदिखाना । विचित्र विंदान शक्तीचें ॥६॥ श्रीकृष्णदेवेसी अंतरावो । होतांचि प्राप्त झाला मोहो । अविद्यायोगें चिंताप्रवाहो । महार्णवीं पडियेला ॥७॥ निळा म्हणे हिताचित । नाठवेहि कांहीं झाला भ्रांत । मायदेवाची हा प्रघात । झाला आप्त वसुदेवा ॥८॥

108
कोठें ग्रामीं कोठें पुरीं । कोठें सागरीं तरियांत ॥१॥ कोठें सांदी कोंदी बिळीं । कोठें वारुळीं धुळीमाजी ॥२॥ कोठें वोले वोलवंटी । वसे तळवटीं शिखरांवरीं ॥३॥ निळा म्हणे वसे शिरीं । केशाभीतरीं कोठे वस्त्रीं ॥४॥

109
कोठें फावो येतां मग । निश्चळ ऐसा हा प्रसंग ॥१॥ आजि संतसंगगुणें । हरिचीं नामें उच्चारणें ॥२॥ अनायासेंचि कथा कीर्ति । जोडली याचि संगती ॥३॥ निळा म्हणे फळोन्मुख । झालें परमार्थिक सुख ॥४॥

110
कोठें वसे झाडाचिवरी । कोठें पोखरीं विवरांत ॥१॥ कोठें जळीं वसे स्थळीं । कोठे अंतराळी अंतरिक्ष ॥२॥ कोठें पर्वतीं दरकुटीआंत । कोठें वनांत झाडखंडीं ॥३॥ निळा म्हणे चिखलीं शेणीं । वसे पाषाणीं काष्ठांत ॥४॥

111
कोठेंचि हा नसे कोठेंही न दिसे । कोठेंचि अमुकासे न म्हणे कोणी ॥१॥ कोठें याचें होणें कोठें याचें निमणें । कोठूनि येणें जाणें न तर्केचि ॥२॥ कोठें याची स्थिति कोठें याची प्रीति । कोठें याची वसती न कळे कोणा ॥३॥ कोठूनि याचें कूळ । वर्णावयास आढळ न कळे गोत्र ॥४॥ निळा म्हणे याती न दिसे रुपाकृती । नयेचि कोणे व्यक्ती विचार करितां ॥५॥

112
कोण तया लेखी । नाहीं विठठलीं ओळखी ॥१॥ करिती तितकें पोटासाठीं । गाणें नाचणें आटाआटी ॥२॥ कळा दाविती व्युत्पत्ति । चातुर्य जाणिवेची संपत्ती ॥३॥ निळा म्हणे संतापुढें । येतां लाजती ती माकडें ॥४॥

113
कोणाचीहि न धरुनी आशा । भजावें जगदीशा कीर्तनें ॥१॥ मग तो कृपेचा सागर । उतरील पार भवसिंधू ॥२॥ तोडूनियां ममता जाळ । करील कृपाळ वरी कृपा ॥३॥ निळा म्हणे आवडी त्यासी । कीर्तनापाशी तिष्ठतु ॥४॥

114
खांबसूत्रीं खेळवीं दोरी । नाचती पुतळया दिसती वरी ॥१॥ तैसा बोलवी बोलतां । न दिसे परि तो मज आतौता ॥२॥ किनरी वाजे नानापरी । वाजवी त्याची ते कुसरी ॥३॥ निळा म्हणे तैसा माझा । वाच्यवाचकु सद्गुरुराजा ॥४॥

115
खाती आपण जें जेविती । तेंचि आणिकांही वाढिती ॥१॥ आजि बहुता भाग्यें भेटी । झाली चरणीं पडली मिठी ॥२॥ नाहींचि आम्हांसी वंचिलें । निज गुज अवघेंचि आपुलें ॥३॥ निळा म्हणे कृपावंत । केलें अनाथा सनाथ ॥४॥

116
गंगा पवित्र सर्वागुणी । स्पर्शे विटाळे रांजणीं ॥१॥ तेविं चैतन्य अवघें एक । भूतभेदें त्या कळंक ॥२॥ भूमिका नाहीं खंडण केली । उत्तम अधम संगें झाली ॥३॥ निळा म्हणे धर्माधर्म । वर्णानुरुप क्रियाकर्म ॥४॥

117
गगनीं वसोनियां रवी । प्रकाश भूमंडला पुरवी ॥१॥ तैसे तुम्ही जेथिल तेथें । असोनियां चाळा भूतें ॥२॥ नभ न सांडुनी आपुला ठावो । पुरवी वावो जगातें ॥३॥ निळा म्हणे सन्निधानें । चुंबक चालवी अचेतनें ॥४॥

118
गवळी होते राखणाईत । ते ते म्हणती झाला घात । गाई बुजाल्या आकस्मात् । पडणपात त्या झाला ॥१॥ मग ते आले पायवाट । पाहाती गाई तंव सुभटा । वत्सें पान्हा घेती घटघटा । पूर लोटले क्षीराचे ॥२॥ नेणों क्षीरसिंधु सोहळा । पाहों आला कृष्णलीला । तेणें क्षीराचिया सुकाळा । केलें वत्सां आणि गौळियां ॥३॥ ऐसा झाला संध्याकाळ । तंव पातले गौळणींचे मेळ । सांजवणी दुडिया घेऊनि सकळ । करित गायनें सुस्वरें ॥४॥ गौळीं म्हणती पिंजल्या गाई । गोविंद म्हणे दोहाते त्याही । आजि दुधासी उणेंचि नाहीं । न पुरती पात्रे तैसिचि क्षीरें ॥५॥ गोवळ आपुलालिये घरीं । रात्रीं वसती सुखशेजारीं । दिवसा जाती वनांतरीं । वत्सापाठीं हरिसंगें ॥६॥ निळा म्हणे चतुरानन । आला गोवत्सें घेऊन । म्हणे नेणता महिमान । चुकी झाली क्षमा कीजे ॥७॥

119
गेलें वेंचोनियां वय याचिपरी । चिंता महापुरीं वाहवलों ॥१॥ धरियेला होता तो विश्वास मानसीं । येणें काळें त्यासीं क्षय आला ॥२॥ आतां कोठवरीं धरावा तो धीर । न दिसे पायीं थार तुमचिये ॥३॥ मागें कित्येकांसी तुम्ही उठाउठी । येऊनि धरिलें पोटीं निवविलें ॥४॥ माझे वेळे कांहो पडिला ऐसा फेर । कर्म बलोत्तर ओढवलें ॥५॥ निळा म्हणे करुं किती तरी शोक । वचनाचाहि एक आश्रय नये ॥६॥

120
गेलेती आपुल्या ब्रिदातें विसरोनी । ऐसें धरिलें मनी निष्ठुरपण ॥१॥ येरवी ऐकोनि धांवतसां धांवा । तें आजि केशवा काय झालें ॥२॥ आटाहास्य तुम्हां मारितां आरोळी । नाईकाची टाळी बैसउनी ॥३॥ निळा म्हणे माझें कर्म आलें आड । न चलेचि कैवाड तुमचा देवा ॥४॥

121
गोमटा म्हणती मानवदेहो । केला उपाव फळ देतो ॥१॥ तरी कां माझा विफळ गेला । धांवा केला तुमचा तो ॥२॥ कांहीच न करा आश्वासन । उध्दिग्न मन यासाठीं ॥३॥ निळा म्हणे यावरी काय । किजे उपाय तो नेणें ॥४॥

122
घंडु जातां अळकांर । होती अवघेचि श्रुंगार ॥१॥ नलगे उजळाही देणें । शोभती अंगीच्या बरवेंपणें ॥२॥ आंतु बाहेरी सारिखें । न ये हीनपणा बीकें ॥३॥ निळा म्हणे सुधा माल । हातीं लागला सुढाळ ॥४॥

123
घरोघरीं हेचि कथा । येरयेरां सांगती वार्ता । म्हणती रायासी पडिली थोर चिंता । पूतनाबाई निमालिया ॥१॥ नवलचि तें ऐकतां परी । कैसी शोषिली निमिषावरी । सांगती दासी त्या परिचारी । एका अपूर्व हे कथा ॥२॥ म्हणती स्तना लावितांची वदन । शोषियलें जीव प्राण । पूतना रडे आक्रंदोन । म्हणे धांव धांव ओढीं यशोदे ॥३॥ ओढितां न सुटेचि शोषिली । मुक्तिपंथेंचि ते लाविली । अवघीं देखोनियां तेथ भ्यालीं । सेवकें आलीं पळोनियां ॥४॥ येउनी रायातें जाणवलें । पूतनाबाइतें बोळविलें । बाळें शोषूनियां घेतलें । परम आश्चर्य हें वाटे ॥५॥ राया घरीं दुःख थोर । वाढलें झाला चिंतातुर । पुढें काय करील विचार । तें पाहावें नारीनर बोलती ॥६॥ निळा म्हणे यावरी आतां । अपूर्व आहे पुढील कथा । माभळभटासी गोकुळा जातां । होईल पूजा पिढीयांची ॥७॥

124
घेऊनियां कृत्रिम सोंगे । नानापरींच्या नटती रंगें ॥१॥ आपण बुडवीती । लाउनि आणिकांही संगती ॥२॥ जाउनि एकांतीं बैसणें । करुनी चावटी बोलणें ॥३॥ निळा म्हणे उपदेशिती । विषय आत्मरुप शिष्याप्रती ॥४॥

125
घेऊनियां कृत्रिम सोंगे । नानापरींच्या नटती रंगें ॥१॥ आपण बुडवीती । लाउनि आणिकांही संगती ॥२॥ जाउनि एकांतीं बैसणें । करुनी चावटी बोलणें ॥३॥ निळा म्हणे उपदेशिती । विषय आत्मरुप शिष्याप्रती ॥४॥

126
चर्‍हाटिया दंतकथा । माजी अनर्था कारण ते ॥१॥ शुध्द भावें हरि कीर्तन । करितां जनार्दन संतोषे ॥२॥ चातुर्यवाणी रंजवण । थित्या खंडण प्रेमाचें ॥३॥ निळा म्हणे घडती दोष । निंदा उपहास इतरांचे ॥४॥

127
चाडियामुखें दाणा पडे । तरि तो निवडे कणभारें ॥१॥ तैसें कडवळ फोकिलें नोव्हे । सोपटाचि राहे वाढोनियां ॥२॥ सद्गुरुमुखींचें वचन । पाववी निस्थानपदातें ॥३॥ वाचाळ ज्ञानें ऐकतां गौष्टी । वाउग्याचि शेवटीं भरोवरी ॥४॥ निळा म्हणे सांप्रदाय शुध्द । उपजवी बोध गुरु शिष्या ॥५॥

128
चातुर्य मिरवी । कळा व्युत्पत्ति दाखवी ॥१॥ परी तें अवघें वांयां गेलें । एका न भजतां विठठलें ॥२॥ गायनाची कळा । आसनें मुद्रेचा सोहळा ॥३॥ निळा म्हणे जें जें करी । सोंगींचि तें तें अवघें वरी ॥४॥

129
छायामंडपींचीं चित्रें दिसती । तैसी सृष्टी भासतसे ॥१॥ परि त्या आधार दीपज्योति । कातडी नुसती येहवीं ते ॥२॥ तेविं आत्मप्रभा भासे । जग हें विलसे नानाकृती ॥३॥ निळा म्हणे गगनीं रवि । दावूनि जेविं अलिप्त ॥४॥

130
जया जो वाटां भागा आला । पाहिजे केला जतन तोचि ॥१॥ आम्हीं कराव्या पापराशी । निरसन तयासी तुम्ही कीजे ॥२॥ लोहें न संडितां लोहपणा । परिसें तत्‍क्षणा पालटावें ॥३॥ निळा म्हणे अंधार निशीं । रवी त्या प्रकाशी निजतेजें ॥४॥

131
जयाची तुम्हांसी करणें चिंता । तयातें पुरवितां आनकळित ॥१॥ आलिया गेलियाचेनी हातें । सभाग्य तयातें धरुं धांवा ॥२॥ कांहीचि उणें त्याचिये घरीं । न पडावें अंतरीं हे इच्छा ॥३॥ निळा म्हणे ऋणवईपणा । होतसां नारायणा उत्तीर्ण ॥४॥

132
जागे आपुल्या उचितावरी । सावधान हरि सर्वदा ॥१॥ परि हा कळों नेदी भेद । वाटे प्रालब्ध फळ देतें ॥२॥ आसुमाई चिन्ह पडे दृष्टी । वाटे पोटीं नवल तेव्हां ॥३॥ निळा म्हणे ऐशिया परी । दासांचा करी प्रतिपक्ष ॥४॥

133
जाणीवेचा झाला फुंद । भाग्य मंद नेणे तो ॥१॥ सांगतांहि न मानी हीत । करी आघात आपुल ॥२॥ मना आला अर्थ काढी । ओढे ओढे अहंतेचे ॥३॥ निळा म्हणे व्दैतबुध्दि । नये तो कधीं परिपाका ॥४॥

134
जाणे सकळां अंतरींचा । भाव साचा मिथ्या तो ॥१॥ तया करी तैसाचि मान । जैसें भजन ज्यापाशीं ॥२॥ जेविं एकचि स्वातीजळ । सर्पी गरळ हिरा भूमीं ॥३॥ निळा म्हणे एकचि हरी । जैशापरी तैसाचि ॥४॥

135
जिकडे जिकडे भासे रवी । प्रभा नीच नवी सांगातें ॥१॥ तैसें केलें माझें वाचें । तुम्हीं सामार्थ्याचें बोलणें ॥२॥ उजळिल्या दाहीं दिशा । करुनी प्रकाशा निजबोधें ॥३॥ निळा म्हणे सत्या चाली । वाट दाविली तुम्हीं ते ॥४॥

136
जिहीं धरुनी हरि मनीं । ह्रदयीं वदनीं रंजविला ॥१॥ त्यांचा झाला अंकित ऐसा । घरिंचा जैसा म्हणियारा ॥२॥ न सांगतां करी सर्व जाणे गौरव दासाचें ॥३॥ निळा म्हणे दिवसनिशीं । त्याजपाशीं सर्वदा ॥४॥

137
जें जें कांहीं होय जाय । त्या त्या लय अव्दैतीं ॥१॥ तें अव्दैतही लोपल्या पाठीं । आपणाचि पोटीं आपण ॥२॥ तया नांव स्वरुप म्हणती । जें निज एकांतीं एकलें ॥३॥ निळा म्हणे दावूनियां नामरुपा । नयेचि पडपा विश्वाकृती ॥४॥

138
जेणें कीर्तनीं धरिली निष्ठा । झाला वरिष्ठा तो ॥१॥ पहा प्रल्हाद दैत्यवंशी । झाला देवासी परम पूज्य ॥२॥ नामा शिंपी विष्णुदास । यवन कबिरास बहुमान ॥३॥ निळा म्हणे कीर्तनरंगी । रंगले जगीं धन्य झाले ॥४॥

139
जेविं देखोनि सकळां । आपणा न देखे हा डोळा ॥१॥ परि तो न म्हणावा कीं अंध । देखणाचि तो शुध्दबुध्द ॥२॥ अवधियांतें जाणे । जाणीव जेवी आपणा नेणे ॥३॥ निळा म्हणे आहे तैसा । आत्मा आपआपणा ऐसा ॥४॥

140
जैशिया तैसा मिळोनियां । नेणवे म्हणोनियां कोणसी ॥१॥ गोडी साखर करितां भिन्न । वेगळी कैसेनि रुप धरी ॥२॥ डोळा देखतां एकचि दिसे । करितां जैसे भिन्न नये ॥३॥ निळा म्हणे वाचा वदतां । दिसती ऐक्यता परि भिन्न ॥४॥

141
जो जो काळ कीर्तनीं जाय । तो तो हाय सार्थक ॥१॥ घटिका पळही न वचे वांयां । चुकवी आपायापासुनी ॥२॥ न लगे जन्मांतरा येणें । पुढती मरणें मागुती ॥३॥ निळा म्हणे ऐसा निका । उपाय नेटका सकळांसी ॥४॥

142
ज्या ज्या भक्तीं जेथें जेथें । पाचारिलें ज्या ज्या आर्थे । तुम्ही जाउनियां तेथें । साह्य केलें श्रीहरी ॥१॥ आर्तें गजेद्राचें स्तवन । ऐकतांचि पदाभिगमन । करुनियां त्याची अर्ति हरण । निजधामाप्रती पाठविला ॥२॥ जिज्ञासता जनका अंगीं । तुमचे जाणवयालागीं । त्यासि ज्ञान देऊनियां विषय भोगीं । विदेही करुनि ठेविला ॥३॥ अर्थार्थी तो विभीषण । त्यासि लंकापति करुनि पूर्ण । स्थापिला चिरंजीवपद देऊन । अर्थदान त्या दीधलें ॥४॥ शुकसनकादिक ज्ञानें । अनुसरले आत्माचिंतनें । त्यासि देऊनियां निजात्मज्ञान । जीवन्मुक्तपदीं बैसविलें ॥५॥ चतुर्विधा मुक्ति चारी भक्त । तुमचे कृपें परम मुक्त । उपमन्या क्षुधार्ती आळवीत । तया क्षीरसिंधु दिधला ॥६॥ ध्रुवें केलें तुमचें स्तवन । मागें बैसावया निजस्थान । तयातें ध्रुवपदीं बैसवून । केला वरिष्ठ सकळांसी ॥७॥ सुदाम देव तो लाचारी । तीनचि मुष्टी पोहे हरी । तेचि घालुनियां मुखाभीतरीं । सुवर्ण नगरी दिधली त्या ॥८॥ स्तंभी प्रल्हाद पाचारी । तत्काळ प्रगटोनियां नरहरि । हिरण्यकश्यपातें विदारी । आणि कुरवाळी निजभक्तां ॥९॥ निळा म्हणे ऐशी कीर्ति । केली चरित्रें श्रीपती । अपार हरिभक्तां अपार हस्तीं । अपार दिधलीं वरदानें॥१०॥

143
ज्याचा केला अंगिकार । चालवी भार त्याचा हा ॥१॥ ऐसा आहे कृपावंत । सद्गुरुनाथ दीनांचा ॥२॥ देऊनियां बोधबुध्दी । निरसी उपाधी ममतेच्या ॥३॥ निळा म्हणे मेळवी सुखा । न म्हणे परिखा जीवजंतु ॥४॥

144
ज्याचा केला अंगिकार । न मानी भार त्याचा हा ॥१॥ चंद्रहास्य अर्जुनाचा । पुंडलिकाचा कैवारी ॥२॥ नामदेवा कबिरासी । वागवी सांवत्यासी निजअंकीं ॥३॥ निळा म्हणे एकनाथा । न विसंबे सर्वथा तुकयासी ॥४॥

145
ठायींचा हा ऋणानुबंध । प्रीतिवाद उभयतां ॥१॥ म्हणोनि एक एकाधीन । जाणती उणखूण येरयेरां ॥२॥ देव जाणे अंतरींचे । केलें भक्ताचें प्रतिपादी ॥३॥ निळा म्हणे भिन्न भाव । नाहीं देवभक्तांचा ॥४॥

146
तंव कृष्णाभोंवते गोवळ । भासती चतुर्मुखचि सकळ । करीत वेदघोष कल्लोळ । पदें क्रमें निरुक्तें ॥१॥ ब्रह्मा म्हणे हें नवल झालें । ते तेथिल येथें हे कोठुनि आले । चतुर्मुखहि दिसती भले । न कळे महिमान श्रीहरीचें ॥२॥ मग जोडुनियां प्राणीतळ । चरणीं ठेवूं इच्छी निढळ । त्राहें त्राहें जी मी केवळ । दास डिंगर कृष्णा तुझा ॥३॥ ऐसा एक संवत्सर । करीत होता नमस्कार । म्हणे वत्सें आणि कुमर । आणवाल तरी आणितों ॥४॥ इकडे कृष्ण गोवळेमळीं । आपणसवें आपण धुमाळी । खेळत आला पर्वतातळीं । आणि वत्समुखें हुंबरला ॥५॥ चरतां पर्वत मस्तकीं गाई । ऐकोनी हुंकारिल्या ते ठायीं । मग उड्या घालूनियां पाही । पाजविती पान्हा वत्सांसी ॥६॥ निळा म्हणे जगत्रयजीवन । वत्सें झाला असे आपण । यालागीं स्नेहाचें महिमान । अधिकाधिक गाईपोटीं ॥७॥

147
तंव ते आणिले मागिले गोपाळ । सारिसेंचि धैर्य वीर्य प्रताप बळ । हें देखोनियां विस्मित सकळ । म्हणती द्विविध कैसेनि हे झाले ॥१॥ तैसेचि वत्सें दोनी दोनी । एकएक गाईलागुनी । सुखें पिंऊ देती स्तनीं । आणि दुमती वोरसोनि यथेष्ट ॥२॥ तंव ते असुमाई गोटा । होतां आघासुराचे पोटीं । तेचि सांगती वडिला वोटीं । म्हणती नवल वितलें ॥३॥ आजि आम्हां अवघिया वनीं । घातले होते सर्पें वदनीं । मागें होता शारंगपाणी । तेणे तो चिरुनी टाकिला ॥४॥ मग वत्सें आणि गोवळ । आम्ही बाहेरी पडिलों सकळ । त्याचे पहाहो करवाळ । रक्तें पूर वाहाती ॥५॥ नवल तें ऐकोनि कानीं । लोक चालिले पहावया नयनीं । तंव ते पडिले बाळोनी । गंगाओघासारिखे ॥६॥ ये गोष्टीसी झालें वर्ष । गोवळां वाटे एकचि निमिष । निळा म्हणे सेविलें शेष । तेणें सर्वदा समाधी ॥७॥

148
तंव त्या करिती शंखस्फुरण । दीर्घस्वरें आक्रंदन । तें ऐकोनियां नागरीक जन । हाहाभूत वोरसले ॥१॥ तयांतें पुसतां त्या म्हणती दुःखार्णवीं पडिलों हो भूपती । सांगता पूतनेची गती । मूर्च्छित पडती धरणीये ॥२॥ म्हणती जातांचि गोकुळाभीतरी । प्रवेशतां नंद यशोदे घरीं । उभयतां येऊनियां सामोरीं । बहुत सन्मानें गौरविलें ॥३॥ विडे उपचार भोजन । पूजनाबाईतें तोषवून । मग आणिले राजीवनयन । बाळ तान्हुलें दाखविती ॥४॥ तंव तें घनःश्याम सांवळें । राजीवाक्ष रूप देखिलें । बाळलेणे विराजलें । नयनचि गोविलें देखतां ॥५॥ मग तें घेऊनियां जवळी । स्तनीं लावितांचि तात्काळीं । सुरासुरा शोषूनियां वेल्हाळी । न सोडी जिवें प्राण जातां ॥६॥ निळा म्हणे त्या सोडवितां । न सुटे पूतना आक्रंदतां । आम्हीही स्वशक्ती ओढितां । हरिले तत्त्वतां प्राण तिचे ॥७॥

149
तंव त्या रिठीयासी निघाली वदनें । अति विक्राळ दाढा दशनें । श्रीकृष्ण कंठीचें रुधिरपान । करावया उदितें ॥१॥ कृत्रिमें जाणोनियां ते श्रीहरी । कवळूनि धरिलीं दोन्हीं करीं । आणि घालूनियां मुखाभीतरीं । चावुनी धरणिये टाकिलीं ॥२॥ त्याचें स्विष्टकृत केलियावरी । अक्रोशें पाळवियांत रुदन करी । तें ऐकोनि यशोदा सुंदरी । धांवली झडकरी काय झालें ॥३॥ तंव देखे शोणिताचे पूर । मांस मेदाचे संभार । मग म्हणे गे मरमर । बाळ महासर्पें खादलें ॥४॥ धांविल्या नरनारी बाळ । घात केला म्हणती सकळ । ऐशी कैशीगे तूं वेल्हाळ । यशोदे मारविलें बाळका ॥५॥ वाहाती शोणिताचे पुर । इतुकें कैंचे गे त्या रुधिर । काढूनियां पहा गे सत्वर । आहे प्राण कीं गेलासा ॥६॥ निळा म्हणे जाउनी जवळी । काढूनि आणिला जो वनमाळी । तंव हास्यवदन नित्य काळीं । नाहीं कोमाइला न दचकला ॥७॥

150
तंव पातला माध्यान्हकाळ । गोवळा भुकेची झाली वेळ । मग पाहोनियाम उत्तम स्थळ । सुरतरू शीतळ छायातळीं ॥१॥ तेथें बैसविल्या पंगती । घोंगडी घालुनियां खालती । कृष्ण म्हणे गडियांप्रती । शिदोर्‍या एकत्र कालवूं ॥२॥ गोवळ म्हणती बहुत बरें । कृष्णा तुझिया निजकरें । होईल अमृतचि तें दुसरें । जेवूं आदरें शेष तुझें ॥३॥ नारदें तें ऐकिलें कानीं । सांगे सत्यलोका जाउनी । ब्रह्मयातें म्हणे चक्रपाणी । आजि ब्रह्मरस वांटितो ॥४॥ देवा जाऊनियां तेथें । शेष घ्यावेंजी कृष्णहातें । तरी हें पद राहेल निरुतें । नाहीं तरी अल्पायु ॥५॥ कृष्णशेषाचा हा महिमा । सांगतां अति निरुपमा । पावोनियां निष्काम कामा । पद अच्युत सुखप्राप्ती ॥६॥ निळा म्हणे नारदवचनीं । ब्रह्मदेव चालिले तेथुनी । पाहाती तंव वृंदावनी । गोवळ नाचती चौफेरीं ॥७॥

151
तत्वतां न कळे । आलें मना तें चावळे ॥१॥ खरियासी मानी खोटें । खोटें खया ऐसें वाटे ॥२॥ अंध न देखे निवाडू । तम तैसा हाचि उजिवडू ॥३॥ निळा म्हणे बुध्दिमळीन । नेणें पाप कीं हें पुण्य ॥४॥

152
तयाचें चरित्र तोचि वदवीत । वैकुंठ समर्थ नांदे घरीं ॥१॥ प्रतिष्ठानालागी स्वयें जनार्दन । राहिले कारण दोन मास ॥२॥ नित्यनेम ज्याचा करी प्रात:स्नान । विधियुक्त जाण्‍ वेदमार्गे ॥३॥ निळा म्हणे जातां गोदेचिया स्नाना । नवल विंदाना देखियेलें ॥४॥

153
तुकोबाचें कीर्तनमेळीं । नाचे कल्लोळीं स्वानंदें ॥१॥ क्षिरापती वांटी हातें । कालाही सांगातें करुं धांवे ॥२॥ उदकामाजीं रक्षी वह्या आलिंगी बाह्या पररुनी ॥३॥ निळा म्हणे ऐशा कीर्ति । वाढवी श्रीपती दासांच्या ॥४॥

154
तुमच्या पायीं ठेविलें मन । एवढेंचि धन मजपाशीं ॥१॥ जरी हा देव दाखवाल । अभय दयाल वचनाचें ॥२॥ तरी हा प्राण ओंवाळीन । जीवें चरण न सोडीं ॥३॥ निळा म्हणे कृपा करा । यावरी धरा मजहातीं ॥४॥

155
तुम्ही जाणा अंतरींचे । लटिकें साचें श्रीहरी ॥१॥ आतां माझी कांहीं नका । मनीं शंका वागवूं ॥२॥ नाहीं पदरा घालित पिळा । दया जी गोपाळा म्हणउनी ॥३॥ निळा म्हणे वदनीं राहो । नाम अहो विठठला ॥४॥

156
तुम्ही तों कृपेचे सागर । परि दुस्तर कर्म माझें ॥१॥ म्हणेनियां नये करुणा । माझिया दुर्गुणा देखोनी ॥२॥ नेणें जप तप ध्यान कांहीं । पडिलों प्रवाहीं प्रपंचा ॥३॥ निळा म्हणे केली सेवा । माझी हे देवा न पावेचि ॥४॥

157
तुम्ही दिधलें वैकुंठभुवन । शेषशयन मजलागीं ॥१॥ नाहीं तरी जाणता कोण । होतों निर्गुण निराभास ॥२॥ नामरुप कैचें मज । तुम्ही चित्तें सहज वाढविलें ॥३॥ निळा म्हणे आपुल्या दासां । देतो ऐसा बडिवार ॥४॥

158
तुम्ही देवा कृपावंत । आम्ही अनाथ दुर्बळें ॥१॥ म्हणोनियां थोरपण तुम्हां । येतें पुरुषत्तमा आमुचेनि ॥२॥ समानपणें असतों तरी । तुमची थोरी न दिसती ॥३॥ निळा म्हणे लोखंडें जैसा । दिधला परिसा बडिवार ॥४॥

159
तुम्ही संत दयाघन । आम्हां म्हणऊन विनवितों ॥१॥ सलगी केंली पायांपाशीं । करा अपराधासी क्षमा त्या ॥२॥ मी तों नेणतेंचि अपत्य । तुम्ही संत मायबाप ॥३॥ निळा म्हणे बोबडे बोल । बोलेन शिकवाल तुम्ही ते ॥४॥

160
तैशीच वत्सें जिचीं जैसीं । होतीं हो‍उनी ठेला तैसीं । बांडीं खैरीं मोरीं जांबुळसीं । तांबडीं धवळीं कपिलवर्णे ॥१॥ बुजगीं मिसकिणें लातिरीं । एके खाविरीं डिंबरी । एके अचपळें काविरीं । झाला श्रीहरी सर्व रूपें ॥२॥ देखतां गाईसी फुटे पान्हा । घरींचिया लोभ उपजे मना । ऐशीं स्वरूपें हो‍उनी नाना । खेळे वृंदावना चौपासीं ॥३॥ येउनी ब्रह्मा पाहे डोळां । तंव पहिलिय ऐसाचि सोहळा । ध्वजा कुंचे घागरमाळा । तोरणें पताका उभविलीया ॥४॥ शिंग काहाळा मोहर्‍या पावे । गोवळ नाचताती सुहावे । वरी धरूनियां चांदिवे । भोंवतीं खिल्लारें वत्सांचीं ॥५॥ ब्रह्मा म्हणे आणिलीं केव्हां । म्यां तों लपविली होतीं एकीसवा । जाऊनियां पाहे तंव तो मेळावा । जोथिल तेथें तैसाचि ॥६॥ निळा म्हणे लाविलें पिसें । ब्रह्मया येण्याजाण्याचाचि वळसे । मग लज्जित होऊनियां मानसें करीत स्तवनें श्रीहरीचीं ॥७॥

161
तोचि ब्रम्हविद जाण । परब्रहमीं वृत्ति लीन ॥१॥ व्दैताव्दैत मावळलें । पूर्णब्रम्ह अनुभविलें ॥२॥ जन वन तें समान । मन झालें पैं उन्मन ॥३॥ निळा म्हणे त्यांच्या नांवे । दोष नाशती स्वभावें ॥४॥

162
त्रास उपजे माझिया मना । अवलोकितां त्यांच्या वदना ॥१॥ जे या दुषिती नामासी । कृत्रिम करिती उपदेशासी ॥२॥ सांगती पाखंड । बोल बोलोनियां वितंड ॥३॥ निळा म्हणे जाती । घेउनी नरका शिष्यांप्रती ॥४॥

163
दळणीं कांडणीं गाइन मंगळीं । कान्हों वनमाळी प्राणसखा ॥१॥ हरीचिया नामें हरती महादोष । तुटती कर्मपाश निमिषमात्रें ॥२॥ सद्गुरुरायाचीं पाउलें गोमटीं । वंदितांची भेटे हदयस्थ ॥३॥ माझया सद्गुरुचें अवलोकितां मुख । समाधिचें सुख तुच्छ वाटें ॥४॥ सद्गुरुरायाचें स्वरुप पहातां । विश्वीं एकात्मता भासों लागे ॥५॥ नित्य सद्गुरुचीं आळवितां नामें । येती निजधामें भेटों सये ॥६॥ सद्गुरु स्वामीचा महिमा अगाध । वचनेंचि बोध करी शिष्यां ॥७॥ सद्गुरु सद्गुरु करितां उच्चार । येती हरीहर भेटों सये ॥८॥ सद्गुरुच्या नामें पोट माझें धाय । आनंदाचा होय पाहुणेरु ॥९॥ निळा म्हणे माझया सद्गुरुची मूर्ति । सकळांही विश्रांति विश्रातीसी ॥१०॥

164
दाटलिया धुई आच्छादी रवितेजा । त्याचिपरी माझा दोष बळी ॥१॥ न चलेचि पुढें तुमची ही युक्ति । सुदर्शन हातीं असोनियां ॥२॥ काय चाले बळ सागराचें वडवानळीं । करित उठी होळी जीवनाची ॥३॥ निळा म्हणे तैशापरी जी अनंता । माझिया संचिता न जिंकावें ॥४॥

165
दासोपंतांचा अभिमान । गेला घेताचि दर्शन ॥१॥ धन्य धन्य एकनाथा । तुमचे चरणी माझा माथा ॥२॥ दत्तात्रय चोपदार । येथे उभे काठीकर ॥३॥ यवन अंगावरी थुंकला । प्रसाद देवुनी मुक्त केला ॥४॥ निळा शरण तुमच्या पायां । अनन्यभावे नाथराया ॥५॥

166
दुरी फांकला हा श्रीहरी । ब्रह्मया जाणवलें अंतरीं । मग धांवोनि झडकरी । वत्सें गोवळें उचलिलीं ॥१॥ तें तों होती समाधिस्थ । ब्रह्मा नेतो हे नेणतीचि मात । मग ते नेऊनियां समस्त । सत्यलोकीं बैसविलीं ॥२॥ यावरी येऊनियां श्रीरंग । पाहे तंव न दिसे संग । भलें झालें म्हणतुसे मग । अवघे आपणाचि हो सरला ॥३॥ ब्रह्मा आडवूं पाहे मज । तरी मी सांडीन त्याची पैज । ऐसें म्हणोनियां श्रीराज । वैष्णवी माया विस्तारिली ॥४॥ आपण वत्सें आपण गोवळ । मोहर्‍या पावे घोंगडी सकळ । काठ्या पावे पाईतपणें मेळ । झाला ते केवळ एकला एक ॥५॥ लुडे खुडे मुडके कान । गोरे सांवळे राजीव नयन । बोलिले तोतिरे म्लान वदन । देदीप्यमान तोही झाला ॥६॥ निळा म्हणे होतें तैसें । हो‍उनी ठेला तेवढेंचि जैसें । नव्हती पहिले कोणी ऐसें । ओळखेंचि नेणती अवलोकित ॥७॥

167
दृष्टीविण देखणें रसनेविण चाखणें । शब्देंविण बोलणें ऐसें आहे ॥१॥ चरणेंविण चालणें निजकरोंविण घेणें । श्रवणेंविण ऐकणें तेथींचें चालणें निजकरोंविण घेणें । श्रवणेंविण ऐकणें तेथींचें गुज ॥२॥ चित्तेंविण चिंतणें बुध्दीविण जाणणें । मनेंविण अनुभवणें अनुभव्यातें ॥३॥ निळा म्हणे गगनें गगना आलिंगन । पवनासवें गमन पवना जेवीं ॥४॥

168
देऊनियां आपुलें प्रेम । करी भक्तांचा संभ्रम ॥१॥ आधीं निष्काम संपत्ती । तया वोपी भुक्ति मुक्ति ॥२॥ निश्चळ शांति क्षमा दया । सेवेलागीं अर्पी तया ॥३॥ निळा म्हणे महा भाग्य । तें त्या समर्पी वैराग्य ॥४॥

169
देखोनियां संतमेळा । कीर्तन सोहळा धांव घाली ॥१॥ ऐकावया आपुलीं नामें । गुणसंभ्रमें नित्य नवे ॥२॥ बैसोनियां प्रेम वांटी । नाचे परवडी मग सवें ॥३॥ निळा म्हणे आपुल्या सुखें । वांटी हारिखें भुक्ति मुक्ति ॥४॥

170
देव आदरें म्हणे भक्तां । घ्या हो भुक्ति मुक्ति आतां ॥१॥ भक्त म्हणती नेघों देवा । पुरे आम्हां तुझीचि सेवा ॥२॥ रिध्दिध्दी तरी घ्या रे । भक्त त्यागिती धिक्कारें ॥३॥ निळा म्हणे करुनी साठीं । बैसलें चरणीं घालुनी मिठी ॥४॥

171
देव घरा आला । भक्तिं सन्मानें पूजिला ॥१॥ पाहुणेर पंगती । संत व्दिजवृंदें शोभती ॥२॥ पुढें आरंभूनी कथा । बुका माळा गंधाक्षता ॥३॥ निळा म्हणे ब्रम्हानंदें । नाचती उभयतां आनंदें ॥४॥

172
देव चालिला सांगातें । भक्त जाती ज्या ज्या पंथे ॥१॥ परम आनंद उभयतांसी । देवभक्तां सुखाच्या रासी ॥२॥ चालतां मारगीं । कथा कीर्तन प्रसंगीं ॥३॥ निळा म्हणे देवभक्तां । परमविश्रांती चालतां ॥४॥

173
देव तोचि भक्त नाहीं वेगळीक । जल गार उदक जयापरि ॥१॥ येरयेरामाजिं येकपणीं भिन्न । करुनि सौजन्य भोगिताती ॥२॥ सौरभ्य चंदन परिमळ सुमन । नव्हति ते भिन्न्‍ येक येका ॥३॥ निळा म्हणे रत्ना जेंवि रत्न कीळ । दोंनावी निर्मळ एकी शिळा ॥४॥

174
देव प्रगटचि लपला । आड आपण बैसला ॥१॥ काय नवल सांगो कैसें । सूर्य झांकिला प्रकाशें ॥२॥ निज ज्वाळें वैश्वानर । लह्या लोपिला सागर ॥३॥ निळा म्हणे धुळी । आड ठेली महीतळीं ॥३॥

175
देव म्हणे भक्तराजा । अव्हेर माझा न करावा ॥१॥ भोजनकाळीं पाचारावें । मजही घ्यावें सांगातें ॥२॥ भोजनीं तुमच्या तृप्ती मज । काजें काज तुमचिया ॥३॥ निळा म्हणे अंतर नका । असो एकएका माझारीं ॥४॥

176
देव म्हणे भक्तहो कांही तरी घ्यारे । ते म्हणती उरे शीणचि घेतां ॥१॥ याल तरि नेईन वैकुंठलोकां । ते म्हणती नका बंदीखान तें ॥२॥ रिध्दिसिध्दी देईन तुम्हां । ते म्हणती आम्हां विटाळ तो ॥३॥ विचारी देव करावें कैसें । कैवल्याही ऐसें नेघों म्हणती ॥४॥ आतां आवडेल तरी तें मागा । देईन सांगा जीवींचें तें ॥५॥ निळा म्हणे ह्रदयीं ध्यान । दयाहो जीवन नाम तुमचें ॥६॥

177
देव हांसोनि बोलती । नको येऊं काकुलती ॥१॥ आम्ही रंजवु आपणीयां । तुझिये वाचे चेतवूनियां ॥२॥ नलगें कांहीं परिहार । देणें तुज धरीं धीर ॥३॥ निळा म्हणे चरणांवरी माथा । ठेवूनी करी पुढें कथा ॥४॥ तुमच्या शेतमालाची जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांतीला भेट द्या . संत निळोबाराय देवभक्तांचा संवाद | संत निळोबाराय देवभक्तांचा संवाद

178
देवचि झाले अंगे । देवा भजतां अनुरागें ॥१॥ शुक प्रल्हाद नारद । अंबरिष रुकमांगद ॥२॥ निवृत्ति ज्ञानेश्वर सोपान । नामा सजना आणि जाल्हाण्‍ ॥३॥ कूर्मा विसोबा खेचर । सावता चांगा वटेश्वर ॥४॥ कबीर सेना सूरदास । नरसीमेहता भानुदास ॥५॥ निळा म्हणे जनार्दन एका । देवचि होउनी ठेला तुका ॥६॥

179
देवपण तुम्ही गमाविलें देवा । नाईकोनी धांवा येणें काळें ॥१॥ न करा धांवणे केल्या कंठस्फोट । क्रीया ऐशी नष्ट धरियेली ॥२॥ प्रेतापाशीं हाकां देतां तें नाईके । थोठाववला ठाके शोक नाना ॥३॥ निळा म्हणे नये करुं आतां आस । तुमची हे चित्तास कळों आलें ॥४॥

180
देवां भक्तां भिन्नपण । देखती जन मूर्ख ते ॥१॥ सविता तोचि नारायण । वेदप्रमाण हा अर्थ ॥२॥ व्यासोनारायण म्हणती । मिथ्या वदंती हें काय ॥३॥ निळा म्हणे अर्जुन कृष्ण । नरनारायण भिन्न तनु ॥४॥

181
देवाधिदेव मुगुटमणी । करी टेहणी दासाघरीं ॥१॥ शीण त्या होऊं नेदी भाग । वोडवी अंग त्या अंगी ॥२॥ शुभाशुभ त्याचीं कर्मे । वारुनी दुर्गमें सुखी करी ॥३॥ निळा म्हणे आपणासरी । करुनियां करी बहुमान ॥४॥

182
देवाभेटीं संतपण विरे । देवपण नुरे संतभेटीं ॥१॥ ब्रम्हानंदे निमग्न झाले । आप विसरले आपणां ॥२॥ भक्तीचे आवडीं झाले भिन्न । एकचि जीव प्राण उभयतां ॥३॥ निळा म्हणे स्वसुखा लोभा । एकचि प्रभा दो ठायीं ॥४॥

183
देवामाजीं भक्त असे । भक्ता अंगीं देव दिसे ॥१॥ ऐशी परस्पंरे मिळणी । जेवीं प्रभा आणि तरणी ॥२॥ भक्त देवातेंचि भजती । देवें भक्तीं ठेविली प्रीती ॥३॥ निळा म्हणें एकवंकीं । जैसा अळंकार कनकीं ॥४॥

184
देवासी दासाचा कळवळा । माये बाळावरी जैसा ॥१॥ नेदी मोडों भूक तहान । करें कुरुवाळोनि स्तन पाजी ॥२॥ दिठावेल म्हणोनि प्राण । निंबलोण उतरी त्या ॥३॥ निळा म्हणे करोनी कोड । पाळी लाड प्रीतीनें ॥४॥

185
दोष वसे पात्रांतरीं । आत्मा निर्मल चराचरीं ॥१॥ सर्पामुखीं वसे विष । मधुमक्षिके सारांश रस ॥२॥ स्वातिजळें मुक्ताफळ । शुक्तीं सपीं हाळाहळ ॥३॥ निळा म्हणे उपाधिभेदें । दावित निवाड शुध्दाशुध्दें ॥४॥

186
धन वित्त दारा सुत । गणगोत मृगांबु हें ॥१॥ आणणचि स्वयें दृश्यत्वा येतां । भासवी तत्वतां दृश्यजाता ॥२॥ निजांगे जेवीं विलसे छाया । तेवीं हे माया मिथ्यत्वें ॥३॥ निळा म्हणे मुख्य बिबेंवीण । भासविती कोण प्रतिबिंबा ॥४॥

187
धन्य काळ आजिचा दिवस । हरिचे दास भेटले ॥१॥ दंडवत घालीन पायां । करीन काया कुरवंडी ॥२॥ पाप ताप दैन्य गेलें । येथुनी पाउलें देखतां ॥३॥ निळा म्हणे पावलों फळ । केलिया निर्मळ सुकृतातें ॥४॥

188
धन्य गोदातीर धन्य प्रतिष्ठान । धन्य तेथील जन रहिवासी ॥१॥ कृष्णकमलातीर्थी चरण नाथांचे । उध्दरी जगाचे कलिदोष ॥२॥ जयातीर्थी स्नान तत्पदी दर्शन । पूर्वज उध्दरण कुळासहित ॥३॥ निळा म्हणे जया धडो तेथील वारी । तया पुण्यासही न वर्णवे ॥४॥

189
धन्य झालों कृपा केली । भेटी दिधलीं अवचिती ॥१॥ सांभाळिलें तुम्ही संती । केल्या आर्ती परिपूर्ण ॥२॥ मी तो दीन तुमचा रंक । घातली भीक अभयाचि ॥३॥ निळा म्हणे न भेणें आतां । सन्मुख येतां किळिकाळ ॥४॥

190
धन्य धन्य एकनाथा । तुमचें पायीं माझा माथा ॥१॥ दासोपंताचा अभिमान । गेला होताचि दरुशन ॥२॥ दत्तात्रय चोपदार । पुढें उभे कांठीकर ॥३॥ यवन अंगावरीं थुंकला । प्रसाद देऊनि मुक्त केला ॥४॥ निळा शरण तुमच्या पायां । अनन्य भावें नाथराया ॥५॥

191
धन्य प्रतिष्ठान क्षेत्र महिवरी । गोदेचियें तिरीं पुण्यभूमि ॥१॥ धन्य तो श्रीगुरु जनार्दन सखा । त्रैलोक्य देखा पावन केलें ॥२॥ धन्य तो अवधूत प्रसादें तारीलें । कृतकृत्य केले सुफळ जन्म ॥३॥ निळा म्हणे त्याचा न कळेचि पार । कोण बडीवार माझा तेथें ॥४॥

192
धन्यरुप झाला काळ । करितां कथा गदारोळ ॥१॥ आजि पोखल्या आयणी । प्रेमसुखाचिया जेवणीं ॥२॥ होउनी ठेला दिव्यरुप । पुण्य निरासेनियां पाप ॥३॥ निळा म्हणे निमग्नता । झाली मन बुध्दि चित्ता ॥४॥

193
धांवोनियां झोंबे कंठी । कृपादृष्टी अवलोकी ॥१॥ म्हणे श्रमलेती मर्गें येतां । बैसा आतां अविश्रम ॥२॥ घडीघडीं जिवींची मात । सांगे पुसे आर्त आवडीचें ॥३॥ निळा म्हणे कृपाघनें । बहुत मानें गौरविलें ॥४॥

194
ध्यानीं चिंतनी मानसीं । हरितें ध्याता अहर्निशीं । तोचि होऊनिया भक्तरासी । झाले विठठलिं विठ्ठल ॥१॥ कीटकी भृंगी ऐशी रुप । तीव्र ध्यानें ते तद्रुप । विष्णु जेवीं शिवस्वरुप । शिवहि विष्णु चिंतनें ॥२॥ नर तोचि नारायण । अर्जुनरुपें विलसे कृष्ण । येरे येरे विराजमान । करितां ध्यान तद्रुपता ॥३॥ निरसोनियां अविदयाजात । देव तैसेचि झाले भक्त । मोहममता कामातीत । जाले सतत निजध्यासें ॥४॥ निळा म्हणे अर्धनारी । रुप विलसें नटेश्वरीं । दोनि दाउनी एक शरीरीं । दोघां नाहीं दोनिपणें ॥५॥

195
न कळेचि अदृष्टाची गती । न कळे कर्माकर्माची संभूती । न कळे मृत्यूचीही रीती । कैशी घडवील कोण वेळ ॥१॥ न कळे होणार तें बळिवंत । भोगणें भोगवील अकस्मात् । न कळे विधीचेंही लिखित । जें कां रेखियेलें निढळीं ॥२॥ कंसराव चिंताग्रस्त । उठुनी बैसला सभेआंत । प्रधान सेनाधिप समस्त । म्लान वदनें भासती ॥३॥ पुढील विचार सुचितां । न सुचे कांहींची त्या तत्वतां । कृष्ण धाकेंची त्याचिया चित्ता । धरचि कोठें न सांपडे ॥४॥ मग बोले कंसासुर । सेना सिद्ध करा भार । जाऊनिया अति सत्वर । वधा हो कुमर नंदाचा ॥५॥ तंव हे म्हणती रायाप्रती । बळाची तेथें न चले युक्ति । पहा ते पूतनेची शक्ति । इंद्रादिकासी अलोट ॥६॥ निमिषमात्रें तिची शांती । ठेला करूनियां श्रीपती । तंव त्या मांभळभट बोलती । नव्हे हें कार्य स्त्रियाचें ॥७॥ आम्हां ब्राह्मणाचें हें कृत्य । जाणें सकळाचेंही घटित । द्याल आज्ञा तरी मी तेथें । जाऊनिया साधीन कार्यार्थ ॥८॥ निळा म्हणे बोलतां ऐसें । अवघें उल्हासले मानसें । म्हणती यथार्थ हें ऐसें । ऋषी बोलिले मांभळ ॥९॥

196
न पडे विसर । याचा जया निरंतर ॥१॥ हाही न विसंबे तयासी । जवळीं राहे अहर्निशीं ॥२॥ चर्चा करिती याच्या गोष्टी । देव तया पाठींपोटीं ॥३॥ निळा म्हणे अन्नपान । तया पुरवी आच्छादन ॥४॥

197
न राहेचि क्षणहि भरी । कदा निश्चळ अंतरी ॥१॥ वाचाळ धोवे तैसें । कार्येविण निरुददेशें ॥२॥ करी बोलतां प्रमाद । वाढवुनि वादावाद ॥३॥ निळा म्हणे महा मूर्ख । करी सकळां सर्वे दु:ख ॥४॥

198
न वजों यावरी आतां कोठें । सांडुनि चरण हे गोमटे ॥१॥ जोडलें ते भाग्ययोगें । येणे काळें संतसंगें ॥२॥ दुभिन्नले वरुषोनी वरी । प्रेमअमृताच्या धारीं ॥३॥ निळा म्हणोनी सांठी । केली जिवें देउनी मिठी ॥४॥

199
न विसंबे त्या घटिकां पळ । त्याचिपाशीं सर्वकाळ ॥१॥ उत्तीर्णत्वालागीं हरि । त्याची परिचर्या करी ॥२॥ न म्हणे दिवस रात्रीं कांही । संचरोनि वसे त्याच्या देहीं ॥३॥ निळा म्हणे भक्तांघरीं । गुणें नामें रुपें हरी ॥४॥

200
नमियेलीं घरांत घरें । शिवशक्ति वधुवरें ॥१॥ आदिगुरु चराचरा । पासुनी ज्या परंपरा ॥२॥ प्रसवोनियां दृश्यजाता । सुरासुरा मातापिता ॥३॥ निळा म्हणे वरद हस्तें । पावविती जे परमार्थातें ॥४॥

201
नरसिंह मेहता गुजराथी ब्राम्हण । धरिला अभिमान त्याचा तुम्हीं ॥१॥ व्दारकेसी त्याच्या हुंडया भरियेल्या । शोभनासी नेल्या वस्त्रें पेटया ॥२॥ जनजसवंत रायराजेश्वर । केला त्याचा थोर बहुमान ॥३॥ निळा म्हणे कुवा कुल्‍लाल हरिभक्त । पीपा रजपुत प्रिय तुम्हां ॥४॥

202
नवल हा प्रकाशवेगळा । झांकिलियाही डोळा पुढें दिसे ॥१॥ नव्हे हा उजळिला सवेंचि मावळला । आत्मतेजें केला उदो नित्य ॥२॥ ढवळा ना काळा पिंवळा ना जांभळा । जीवींच्या जीवनकळा प्रकाशितु ॥३॥ निळा म्हणे आजि आरतीचेनि व्याजें । कृपें पंढरीराजें कळलें मज ॥४॥

203
नवल हे कृपा घनवट । उडवूनी मायेचें फळकट । आप आपणां केलें प्रगट । मोडिली वाट दुसयाची ॥१॥ आपणांसवें आपण खेळे । आपआपणासी चावळे । शेखीं आपण आपणा मिेळे । खेळतां वेगळें दाउनि ॥२॥ ऐसा आपुलिया संतोषा । एकी भिन्नत्वाची आशा । अनेकत्वाचा मिरउनी ठसा । एकी येकला शेवटीं ॥३॥ दाऊनियां नानाकार । नानाकृति नारीनर । तेचि करुनियां निराकार । आपणाअंगी आपण ॥४॥ निळा म्हणे कृपातरणी । प्रगटोनियां माझिये वाणी । प्रकाशी आपुला किणीं । लाविली गुणीं वर्णावया ॥५॥

204
नवलचि एक वाटे मज । कैसें गुज अनुवादों ॥१॥ आपुली आपण बाईल जाला । आपणाचि व्याला आपणाशीं ॥२॥ मागें पुढें एकला एक । दाविले अनेक परी मिथ्या ॥३॥ निळा म्हणे हा चराचरा । वसउ आंतरा बाहेरी ॥४॥

205
नव्हती माझे फुकट बोल । जाणे विठ्ठल सत्य मिथ्या ॥१॥ संतकृपेची हे जाती । ओघेंचि चालती अक्षरें ॥२॥ कैंची मती बोलावया । ठायींचि पायां विदित तें ॥३॥ निळा म्हणे बाहेरी आलें । होतें सांठविलें ह्रदयीं जें ॥४॥

206
नसता गुण स्वाभाविक । वस्तूचि तरि निरर्थक ॥१॥ तेवीं देवा देवपण । नसतां अंगीं तो पाषाण ॥२॥ विना परिमळें । कस्तुरी मृतिकाचि तें निजनिर्धारीं ॥३॥ निळा म्हणे न मारी जिवा । तरी तें विषचि नव्हे तेव्हां ॥४॥

207
नातळोनियां नामरुपा । येवढया वाढविलें संकल्पा ॥१॥ न कळे याची माव कोण । देवां दैव्यां विचक्षणा ॥२॥ वेदश्रुति धांडोळितां । कार्यकारणही हा परता ॥३॥ निळा हा अनुमाना । न ये योगिया मुनिजनां ॥४॥

208
नामें आळवितां आठी । तुम्हां पोटीं भय वाटें ॥१॥ नेणों कांहीं मागतील । किंवा येतील वैकुंठा ॥२॥ काय वाटूं किती देऊं । म्हणोनियां जिऊ निर्बुजला ॥३॥ ऐसें जाणोनी लपालेती । घेतलें चित्तीं भय वाटे ॥४॥ याचि लागीं उत्तर न दया । कळलें गोविंदा मनोगत ॥५॥ निळा म्हणे सुखी असा । न मागों सहसा आण तुमची ॥६॥

209
नारद वैष्णवांचा शिरोमणी । नाचे कीर्तनीं सर्वदा ॥१॥ देवोचि त्याची पूजा करी । आणि नमस्कारी भेटतां ॥२॥ दैत्यां घरीं बहुमान त्याचा । ऐसा कीर्तनाचा बडिवार ॥३॥ निळा म्हणे तिहीं लोकांत । कीर्तनें विख्यात हरिभक्त ॥४॥

210
नाहीं कोणा उपेक्षिलें । सकळां सन्मानें स्थापिलें । आपुलिये पदीं बैसविलें । देणे दिधलें अपार ॥१॥ चुळा एका दुधासाठीं । स्तवितांचि उपमन्यें जगजेठी । करुनियां क्षिराब्धीची वाटी । लाविली ओठी तयाचिये ॥२॥ बापा अंकीं बैसावया । ध्रुवानें स्तविलें विनवूनियां । निश्चळ पद त्यासी देऊनियां । अक्षयपदीं बैसविलें ॥३॥ सुदामदेव तो वरासाठी । आला मागावया व्दारके भेटी । त्यासी रचूनियां गोमटी । सुवर्ण नगरी समर्पिली ॥४॥ पक्षियासी पाचारिलें । तिये गणिकेशीं विमानीं वाहिलें । नका भेणें हांकारिलें । त्या गजेंद्रा नेलें निजधामा ॥५॥ बिभीषण भेटी धांवोनी आला । लंकेचें राज्य दिधलें त्याला । चिरंजीव करुनियां बैसविला । आपुला शरणांगत म्हणवुनी ॥६॥ पहा हो वनींची तें वनचरें । निळा म्हणे रिसें आणि वानरें । आलिंगुनियां रघुवीरें । आपलें पंगतीं जेवविलीं ॥७॥

211
नाहीं तेंचि आणूनि ठेवी । चाड जिवीं जें वाटे ॥१॥ समयाचे समया वरीं । निर्माण करी आणि पुरवी ॥२॥ नेदी दिसों केविलवाणें । मिरवी भूषणें निजांगीचीं ॥३॥ निळा म्हणे गुंतला भाके । धांवे हाके पाचारितां ॥४॥

212
नाहीं म्हणतां अवघें तेंचि । आहे म्हणतांचि दावितां नये ॥१॥ म्हणोनियां न चले शब्द । राहे विवाद ऐलाडी तो ॥२॥ डोळा देखणा देखे सर्व । न देखे बरव आपुली तो ॥३॥ निळा म्हणे तेवीं जाणों जातां । जाणणेंचि तत्त्वतां वस्तु होये ॥४॥

213
नाहींचि उरला रिता । ठावो याविण तत्वतां ॥१॥ अणु रेणु महदाकाश । त्याहीमाजीं याचा वास ॥२॥ होतां जातां सहस्त्रवरी । ब्रम्हांडाच्या भरोवरी ॥३॥ निळा अखंडता । नव्या जुन्याही हा परता ॥४॥

214
नाहींचि केलें समाधान । माझें म्हणवून क्षिती वाटे ॥१॥ आतां कधीं समोखाल । हातीं धरा प्रीतीनें ॥२॥ मागें बहुतां सांभाळिलें । आजीं तें केलें ब्रिद मिथ्या ॥३॥ निळा म्हणे निवडलें खोटें । माझेंचि वोखटें अदृष्ट ॥४॥

215
नाहींचि या डाळ मूळ । पाहातां यासी जाती कुळ ॥१॥ रुप नाम न दिसे वर्ण । पाय डोळे हात कान ॥२॥ बाळ तरुण वयसा वृध्द । जिण्यामरणापरता शुध्द ॥३॥ निळा म्हणे धरिला चित्तीं । कैंसा नेणों पूर्वी संतीं ॥४॥

216
निज भक्ताची आवडी । सांभाळी त्या घडी घडीं ॥१॥ राखोनियां भूक तहान । करी त्याचा बहुमान ॥२॥ वस्त्रें भूषणें पूरवी । चिंता त्याची वाहे जिवीं ॥३॥ निळा म्हणे त्याचें उणें । नेदी पडों कवण्या गुणें ॥४॥

217
निज सायासें जोडुनी । होतें निक्षेपुनी ठेविलें ॥१॥ तेंचि दिधलें माझया हातीं । आजीं संतीं कृपादान ॥२॥ कल्पादीचें पुरातन । जें महा धन परमार्थिक ॥३॥ निळा म्हणे पोटा आलों । म्हणोनि झालों अधिकारी ॥४॥

218
नित्यानंदे घोषें करितां हरीचें कीर्तन । श्रोते आणि वक्ते होती परम पावन ॥१॥ आणिकहि लोक तरती त्यांच्या सहवासें । भाळया भोळया भाविकांसी लाभ अनायासें ॥२॥ जेथें नित्य नामघोष टाळिया गजर । तेथें रंगी नृत्य करी रुक्मिणीवर ॥३॥ निळा म्हणे तोचि प्रसन्न होउनी दासासी । भुक्ति आणि मुक्ति ठेवी त्यांच्या सहवासीं ॥४॥

219
निभर्य असा माझया बळें । कळिकाळें ती रंकें ॥१॥ सुखें करा हरिची कथा । तुमची चिंता मज आहे ॥२॥ पाचाराल तेचि घडीं । येईन तांतडीं धांवत ॥३॥ निळा म्हणे अमृतवंचनें । दे वरदानें दासांसी ॥४॥

220
निरंतर नाम वदनीं । निजरुप ध्यानीं आठवितों ॥१॥ आणीक देवा कांही नेणें । मिरवूं भूषणें भक्तीचीं ॥२॥ योगसाधन न कळें मंत्र । निगमशास्त्र व्युत्पत्ती ॥३॥ निळा म्हणे अज्ञान हरि । आहे परी सर्व मी ॥४॥

221
निरवूनियां विठ्ठल देवा । हातीं धरावा मज आतां ॥१॥ तुमचिया भिडा अंगिकार । करील साचार तत्क्ष्णी ॥२॥ जरी मी अन्यायी अपराधी । तरी कृपानिधी तुम्ही संत ॥३॥ निळा म्हणे विनऊं काय । तुम्ही मायबाप अपत्य मी ॥४॥

222
निर्भीड बोलणें । ज्याचें अपस्वार्थी जिणें ॥१॥ त्याचिये संगतीचे फळ । होय चित्तसी खळबळ ॥२॥ परदु:ख नेणतां । कर परान्नें पुष्टता ॥३॥ निळा म्हणे दावी सोंग । ऐसा त्यजावा मातंग ॥४॥

223
निर्माणचि नाहीं त्याचें काय वर्णावें । जाणीवचि न रिघे तेथें काय जाणावें ॥१॥ म्हणऊनियां येथें अवघा खुंटला वाद । विरोनियां गेला अवघा अभेदीं भेद ॥२॥ जागृति ना निद्रा जेथें नाहीं सुषुप्ती । तुर्या ना उन्मनी कैंची स्वप्नाची भ्रांती ॥३॥ निळा म्हणे अनुभव तेथें अनुभवितें कैंचे । निमोनियां गेलें ऐक्य उरलें मुळींचे ॥४॥

224
निर्विकार असोनि आत्मा । अवघ्या भूतग्रामा प्रकाशी ॥१॥ एरवीं करी ना करवी । जेवीं रवि निज व्योमीं ॥२॥ लोह चळे चुंबकयोगें । परि तो अंगे न शिवे त्या ॥३॥ निळा म्हणे आत्मसत्ता । वर्तणें भूतां कर्मतंत्रीं ॥४॥

225
निवृत्तीनाथासीं ठेविलें उन्मनीं । सोपानदेवा नामसंकीर्तनी । मुक्ताबाई निजमुक्तिस्थानीं । निजानंदीं गौरविलें ॥१॥ ज्ञानदेवा दिधली समाधी । नामदेवा स्थापिलें निजपदीं ॥ परसा भागवताची वाडनदी । सुस्नात केली कीर्तनें ॥२॥ वच्छरा आणि विसोबा खेंचर । कानुपात्रा मिराबाई परम सुंदर । अंतोबा नरहरी सोनार । चरणीं थारा दिधला त्या ॥३॥ गोरा सांवता कूर्मदास । सगुण स्वरुप भेटलें त्यास । नरसी मेहता पिपा भानुदास । केला वास त्यांच्या ह्रदयीं ॥४॥ एका जनार्दन स्वरुपस्थिती । जनजसवंताची परम प्रीति । कबिराचीं पुष्पें करुनी अंतीं । निजधामाप्रती पाठविलें ॥५॥ तुकयासी विमानीं वाहिलें । संतोबासी वैराग्यें न्हाणिले । निजस्थान पालखीं निजवलें । निजभुवनीं आपुलिये ॥६॥ निळा म्हणे आपुलीं बाळें । कडिये घेउनी पुरवी लळे । स्नेहाळु माउली कळवळे । प्रेम देउनी वाढवी ॥७॥

226
नीच कामीं न धरीं लाज । भक्तकाजकैवारी ॥१॥ सेवकांचा हा शिरोमणी । म्हणवी करुनी दास्यत्व ॥२॥ उगाळी गंधे पुरवी माळा । वाहे जळा मस्तकीं ॥३॥ निळा म्हणे होउनी वाणी । आणि गोणी भक्तां घरी ॥४॥

227
नेणे आपुल्या हितावरी । बोले त्यांसीचि विरुध्द करी ॥१॥ जाणावा तो जन्मांतर । पूर्व दोषाचा विकार ॥२॥ सर्व काळ अल्प बुध्दी । नेणे बोलों सभासंधी ॥३॥ निळा म्हणे तया दिसे । अवघें जगचि वेडें ऐसें ॥४॥

228
नेणें मी परिहार । देऊं कोणासीं उत्तर ॥१॥ म्हणोनियां हें खरें खोटें । ठेवा बांधोनियां मोटे ॥२॥ नेणोनियां तुमची गती । तंटा माझयाचि नांवे करिती ॥३॥ निळा म्हणे प्रत्युत्तर । मज तों न सुचे उत्तर ॥४॥

229
नेणोनिया आपपर । होतें सुकर निक्षेपींचें ॥१॥ तेणें हातीं धरोनिया । संतीं ठाया पावविलों ॥२॥ विटेवरी दाविलें धन । होतें पोटाळून महर्षी ज्या ॥३॥ निळा म्हणे बैसला ध्यानीं । ज्याचिये चिंतनीं सदाशिव ॥४॥

230
नेणोनियां आत्महित । करिती घात अभिमानी ॥१॥ नसतीच वाढवूनियां उपाधी । पडती मधीं संदेहा ॥२॥ नाठवूनियां विठ्ठल देवा । करिती सेवा भूतांची ॥३॥ निळा म्हणे जन्मोनि गेला । वृथाचि पडिला निरयांत ॥४॥

231
नेदी त्या दुसरें । लागीं आणिकाचें वारें ॥१॥ युगायुगीं त्याचा । म्हणवी सोयरा निजाचा ॥२॥ लेववुनी लेणीं । मिरवी अंलंकारभूषणीं ॥३॥ निळा म्हणे शांति दया । वोपी भुक्ति मुक्ति तया ॥४॥

232
पतना न्यावें जिहीं दोषीं । कीर्तनीं तयांसी हा रस ॥१॥ जैसें बीज भाजल्याअंतीं । नुगवेचि शेतीं पेरिल्य ॥२॥ तैशीं जळती कर्माकर्मे । एका हरिनामें गर्जतां ॥३॥ निळा म्हणे श्रोता वक्ता । होती उभयतां शुचिर्भूत ॥४॥

233
पताकांचे भार वैष्णव नाचती । रामकृष्ण गाती नामावळी ॥१॥ शालीवाहन शके पंधराशे अकरा । विजय संवत्सरा फाल्गुन मास ॥२॥ उत्तम हे तिथी षष्टी रविवार । प्रयाण्‍ साचार दोन प्रहरीं ॥३॥ निळा म्हणे ऐशा नामाच्या गजरीं । समाधि गोजिरी प्रतिष्ठानी ॥४॥

234
पदार्थमात्रीं आठवे जरी । नलगेचि तरी साधन ॥१॥ एरवीं दिसे देखणा तोचि । पाहिजे त्याची परि कृपा ॥२॥ अवघाचि वसोनि अवघे ठायीं । दिसे दाखवीही अवघ्यांतें ॥३॥ निळा म्हणे भोगी त्यागी । तोचि जगीं जगदात्मा ॥४॥

235
परम कृपावंत हरी । दीनोध्दारीं तिष्ठतु ॥१॥ भुक्तिमुक्ति घेऊन हातीं । दयावया प्रति निजदासा ॥२॥ चारी मार्ग अवलोकित । येती वागवित आर्त त्यांचे ॥३॥ निळा म्हणे सगुणवेषें । उभाचि असे विटेवरी ॥४॥

236
परम कृपेचा सागर । भक्तवत्सल करुणाकर ॥१॥ ऐसीं वागवितो नांवें । भक्तिलागीं निजवैभवें ॥२॥ म्हणवी दासाचा अंकित । शरणागता शरणांगत ॥३॥ निळा म्हणे साचचि करी । न वजे पासुनी तया दुरी ॥४॥

237
परम विश्रांति पावली । अवघीं येणें सुखी केलीं ॥१॥ आवडी वंदिती पूजिती । दर्शना जे याच्या येती ॥२॥ नाम उच्चारिती वाचे । नित्य कोड करी त्यांचे ॥३॥ निळा म्हणे भक्तांसाठी । धरी रुपे अनंतकोटी ॥४॥

238
परम सुखाचा सुकाळ । चित्तीं वसे सर्वही काळ ॥१॥ ऐसें केले कृपादान । तुम्हीं मनातें मोहुन ॥२॥ जिवा पैलाडिये खुणे । पावविलें सामथ्यें गुणें ॥३॥ निळा म्हणे ऐसे किती । उपकार वानूं पुढतोपुढतीं ॥४॥

239
परात्परा सच्चिदानंदा । परिपूर्णा जी आनंदाकंदा । जगदीशा विश्ववंद्या । विश्वव्यापका अनंता ॥१॥ भक्तवत्सला कृपासिंधु । तापत्रयहरणा दीनबंधु । तुझ्या नामीं अगाध बोधु । भक्त पावती भाविक ॥२॥ परमपुरुषा गुणातीता । अव्यया अक्षरा जी अव्यक्ता । विश्वंमंगळा रुक्मिणी कांता । पुंडलिक वरदा पंढरीशा ॥३॥ निरंजना निर्विकारा । निर्विकल्पा जगदोद्धारा । वेदवेदांतसागरा । विश्वंभरा कल्पादि ॥४॥ भावाभावविवर्जिता । सगुणनिर्गुणा गुणातीता । निळया स्वामी कृपावंता । चरणीं माथा तुमचिये ॥५॥

240
परी तें कर्म बळोत्तर । नेदी राहों वृत्ति स्थिर । स्वार्थ झोंबोंनियां विखार । आणिला ओढोनि लोभावरी ॥१॥ मग म्हणे वो सुंदर बाळ । यशोदे नागर हें वेल्हाळ । परि याचा जन्मकाळ । कैसा असेल पाहों तो ॥२॥ कृष्णपक्ष श्रावण मास रोहिणी नक्षत्र अष्टमी दिवस । मध्यरात्रीचा जन्म यास । दशा तों क्रूर दिसताहे ॥३॥ जन्मकाळीं या बारावा गुरु । शनी भोग हानिस्थानीं स्थिरू । राहो केतु आणि दिनकरु । देशत्यागातें सूचिती ॥४॥ याचेन सकर वंश हानि । करील कुळाची बुडवणी । नये अवलोकु यातें नयनीं । टाकावा नेऊनि अरण्यांत ॥५॥ यशोदे न लावीं यासि उशीर । बाळ नव्हे या मायावी खेचर । कालचि पाहेपां केला संहार । पूतनेचा क्षणही न लागतां ॥६॥ निळा म्हणे ऐकोनि ऐसें । मांडिलें विंदान परमपुरुषें । जयाचें कर्म देखिलें जैसें । दिल्हें तया तैसें दानफळ ॥७॥

241
पशुमुखें ज्ञानेश्वर । करविलां उच्चार वेदघोषु ॥१॥ तैसेचि तुम्हीं मजही केलें । सामथ्यें वदविलें आपुलिया ॥२॥ मी तों मुळींचाचि मतिमंद । जाणोनियां भेद अंतरींचा ॥३॥ निळा म्हणे अंगिकार । केला जी वर देऊनियां ॥४॥

242
पहा ज्याचें तयाची परी । जीवनभातें याच्या करीं ॥१॥ देऊं जाणे यथाविधी । जैसा भाव तैशी सिध्दी ॥२॥ उंच नीच अधिकारें पावती आपुलाल्या व्यापारें ॥३॥ निळा म्हणे ज्यापरी रवी । ज्याचे वेवसाय तया दावी ॥४॥

243
पायीं चित्त हें राहिलें । ब्रम्हरुप पैं जाहलें ॥१॥ मन झालें हें उन्मन । स्वरुपीं झालें तें लीन ॥२॥ बुध्दि बोध्दव्या मुकली । एकाकारता पावली ॥३॥ निळा म्हणे नाहीं देह । तेथें कैंचा तो संदेह ॥४॥

244
पासुनी तुम्हां न वेजे दुरी । क्षण घटिकाभरी वेगळा ॥१॥ चालातां तुम्हां धांवे पुढें । मागेंही वोढे सरिसाचि ॥२॥ निजल्या जवळी तुम्हां उभा । भक्तिलोभा गुंतलों ॥३॥ निळा म्हणे करुनि साठी । तुम्हां कल्प कोटी न विसंबें ॥४॥

245
पाहणें पाहातें । गेलें हारपोनियां निरुतें ॥१॥ मीहि नाहीं तूंही नाहीं । आपींआप अंतरबाहीं ॥२॥ उदो अस्तु सविता नेणें । जेथें तेथें आपुलेपणें ॥३॥ निळा म्हणे नर्भी नभ । जेवीं दावूनियां प्रतिबिंब ॥४॥

246
पाहों जातां देखणे तेंचि । जाणता जाणणेंचि होईजे अंगें ॥१॥ आतां कैसें सांगावें यावरी । बोलतांचि वैखरी गिळूनि जाये ॥२॥ बुध्दीच्या प्रवेशें हरपे । मन जेथें संकल्पेंसहित विरे ॥३॥ निळा म्हणे चित्ता नुरे चित्तपण । आनंदा मुरवण आनंदें त्या ॥४॥

247
पाहों जातां हा न दिसे । झांकोळिला विश्वाभासें ॥१॥ आतां पाहों कोणीकडे । आड आपणा हा दडे ॥२॥ डाहाळी आड आंबा । असोनि न दिसेचि उभा ॥३॥ साखर दिसे खडा । गोडी पाहों काणीकडा ॥४॥ निळा म्हणे सोनें । न दिसे झांकिलें भूषणें ॥५॥

248
पाहोनियां हरिकीर्तन । होती प्रसन्न देव तुम्हा ॥१॥ संनकादिक येती भेटी । कथा गोमटी ऐकावया ॥२॥ संत महंत येउनी पुढें । बैसती गाढे कीर्तनीं ॥३॥ निळा म्हणे पांडुरंग । रंगी रंग मेळचीन ॥४॥

249
पुढें ऋषीश्वरांची मांदी । बैसली होती सभासंधीं । तेही आशिर्वाद शब्दीं । मंत्रघोषीं गर्जिन्नले ॥१॥ मंघळतुर्‍यांचे घोषगजर । दुंदुभी वाजविती सुरवर । नंदरायाचें भाग्य थोर । देव वर्णिती निज मुखें ॥२॥ निगम येउनी मूर्तिमंत । श्रीकृष्णाचीं स्तवनें करीत । कामधेनुही क्षीरें स्त्रवत । तृप्ति सकळांसी द्यावया ॥३॥ देवगुरु जे बृहस्पति । तेहि आशिर्वादें कृष्णातें स्तविती । शुक्राचार्यही प्रज्ञामूर्ति । कृष्णाचे वर्णिती कीर्तिघोष ॥४॥ उमा रमा रेणुका सती । लोपामुद्रा अरुंधती । अक्षवाणें घेऊनियां हातीं । आत्मया ओवाळिती श्रीकृष्णा ॥५॥ अनसूया परम पवित्रता । अत्रिदेवाची जे कांता । जिचिये उदरीं श्रीअवधूता । दत्तात्रय जन्म महामुनि ॥६॥ निळा म्हणे तेहि येउनी । हरीतें वोसंगा घेउनी । आशिर्वादें अमृतवचनीं । गौरविती यशोदे ॥७॥

250
पुतना म्हणे भुकेला कान्हा । मग झडकरी उघडुनी लाविला स्तना । यशोदा म्हणे वो राजीवनयना । न सोसे दूध आणिकीचें ॥१॥ स्तनीं लागतांचि त्याचें वदन । विष तें अमृतसमान । शोषूनियां रक्त मांस जीवन । पंचहि प्राण आकर्षिले ॥२॥ न सोसवे वेदना ते पूतने । म्हणे ओढीं ओढीं यशोदे तान्हें । ऐसें बाळ हें ही काय जाणें । वेंचलें प्राण धांव धांव ॥३॥ तंव तो न सुटेचि सर्वथा । शिणल्या दासी परिचारिकाही ओढितां । नानाशब्दें आक्रंदतां । बिहालीं तत्त्वतां पळती लोकें ॥४॥ रक्त मांस आस्थींचें उदक । करूनियां चर्मही शोषियलें निशेष । देऊनियां सायुज्यसुख । महामुक्तस्थानीं स्थापियली ॥५॥ हें देखोनि दासी परिचारिका । भेणेंचि पळती अधो मुखा । जाऊनिया मथुरा लोकां । सांगती वार्ता रायासी ॥६॥ निळा म्हणे ऐकतां कानीं । राजा चिंतावला बहुत मनीं । पुसे वर्तमान तया लागुनी । कैसें वर्तलें तें सांगा ॥७॥

251
पुसे क्षेम भक्तांलागीं । म्हणतसे मार्गी श्रमलेती ॥१॥ प्रतिवरुषीं भेटी देतां । सांभाळितां येउनी ॥२॥ नाहीं तुमचे उत्तीर्ण झालों । कधीं आलों गांवासी ॥३॥ निळा म्हणे आभारला । प्रसन्न झाला दासासी ॥४॥

252
पूर्ण केला पूर्ण केला । पूर्ण केला मनोरथ ॥१॥ घरा आले घरा आले । घरा आले कृपाळू ॥२॥ सांभाळिलें सांभाळिलें । सांभाळिलें अनाथा ॥३॥ केला निळा केला निळा । केला निळा पावन ॥४॥

253
पूर्णापासुनी आले आंख । शेखी पूर्णचि नुरे लेख ॥१॥ पूर्णी असतां पूर्णपण । नेणें आपणा आपण ॥२॥ दशक वाढवूनी शेवटीं । पूर्णपणें घाली पोटीं ॥३॥ निळा म्हणे कांहीचि नाहीं । तेंचि या बीज विश्वा पाहीं ॥४॥

254
पूर्वार्जित होतें पुण्य । तेणें हे चरण आतुडलों ॥१॥ आतां सुखा नाहीं उणें । इहलोकीं भोगणें परत्रींचें ॥२॥ ऐशिया सुखा पात्र केलें । तुम्हीं अवलोकिलें कृपादृष्टीं ॥३॥ निळा म्हणे पूर्ण काम । पावलों संभ्रम सुखाचा ॥४॥

255
पूर्वील कथा अनुसंधान । राहिलें होतें करितां कथन । मतिविस्ताराचे महिमान । स्फुर्ती फांकोन वाहावली ॥१॥ माभळभट गेलिया वरी । कागासुर तो माव करी । येऊनियां गोकुळा भीतरी । बिंबवृक्षावरी बैसला ॥२॥ म्हणे फोडूनियां दोन्ही डोळे । बाळका करीन मी आंधळे । चुंचिघातें कंठनाळें । फोडीन वक्षस्थळीं बैसोनी ॥३॥ काय करील तें लेंकरूं । मनुष्य मानवी ते इतरु । आम्हां दैत्यांचा आहारु । कैसेनि येती ते मजपुढें ॥४॥ कंसाचिये आज्ञे भेणें । करितो मनुष्यांचीं संरक्षणें । आतां तों प्रेरिलेंसें तेणें । आड आलिया निवटीन ॥५॥ आलिया त्याचिया कैवारा । आकळूं शकें मी इंद्रादिसुरां । मज कोपलिया कृतांतवीरा । कोण सामोरा येऊं शके ॥६॥ निळा म्हणे ऐशिया मदें । मातला मनेशींचि अनुवादें । कंसा तोषवीन आनंदें । प्रतीक्षाकरी कृष्णाची ॥७॥

256
प्रत्यक्ष जनीं जनार्दन । नूणोनियां कथी ज्ञान ॥१॥ काय तैसी ते वाचाळें । करिती चावटी तोंडबळें ॥२॥ नाहीं अंगी हरिची भक्ति । दाविती कोरडीच विरक्ति ॥३॥ निळा म्हणे नेणतां वर्म केलें पाठी लागे कर्म ॥४॥

257
प्रत्यक्ष परब्रहम भानुदासाचे कुळी । स्वये वनमाळी अवतरले ॥१॥ भक्तिमार्ग लोपे अधर्म संचला । कलि उदय झाला प्रथमचरण ॥२॥ नानापरि जन वर्ततसे सैरा । नभें व्याभिचारा नारीनर ॥३॥ निळा म्हणे इही अवतार केले । जग उध्दारिले महादेवी ॥४॥

258
प्रत्यक्ष्‍ भानुदासाचें कुळीं । स्वयें वनमाळी अवतरले ॥१॥ भक्तीमार्ग लोपे अधर्म संचला । कली उदय झाला प्रथम चरण ॥२॥ नानापरी जन वर्ततसे सैरा । न भें व्यभिचारा नारी नर ॥३॥ निळा म्हणे इहीं अवतार केले । जग उध्दरिलें महादोषी ॥४॥

259
प्रपंचरचना सर्वहि भोगुनि त्यागीली । अनुतापाचे ज्वाळीं देहबुध्दी हविली । वैराग्याची निष्ठा प्रगटूनि दाखविली । अहंता ममता दवडुनि निजशांति वरिली ॥१॥ जयजयाजी सदगुरुतुकया दातारा । तारक तूं सकळांचा जिवलग सोयरा ॥ध्रु॥ हरिभक्तिचा महिमा विशेष वाढविला । विरक्तिज्ञानाचा ठेवा उघडुनि दाखविला । जगदोध्दारालागीं उपाय सुचविला । निंदक दुर्जनांचा संदेह निरसिला ॥जय ॥२॥ तेरा दिवस बह्या रक्षूनियां उदकीं । कोरडयाची काढूनी दाखविल्या शेखीं । अपार कविताशक्ति मिरवुनि इहलोकीं । कीर्तनश्रवणें तुमच्या उध्दरती जन लोकीं । जय ॥३॥ बाळवेष घेऊनि श्रीहरी भेटला । विधिचा जनिता तोचि आठवा हा दिधला । तेणें ब्रहमानंदें प्रेमा डोलविला । न तुके म्हणुनी तुका नामहं गौरविला ॥ जय ॥ ॥४॥ प्रयाणकाळीं देवें विमान पाठविलें । कलिच्या काळामाजीं अदभुत वर्तविले । मानवदेह घेऊनि निजधामा गेले । निळा म्हणे सकळ संत तोषविले ॥ जय ॥ ॥५॥

260
प्रपंचरचना सर्वहि भोगुनि त्यागीली । अनुतापाचे ज्वाळीं देहबुध्दी हविली । वैराग्याची निष्ठा प्रगटूनि दाखविली । अहंता ममता दवडुनि निजशांति वरिली ॥१॥ जयजयाजी सदगुरुतुकया दातारा । तारक तूं सकळांचा जिवलग सोयरा ॥ध्रु॥ हरिभक्तिचा महिमा विशेष वाढविला । विरक्तिज्ञानाचा ठेवा उघडुनि दाखविला । जगदोध्दारालागीं उपाय सुचविला । निंदक दुर्जनांचा संदेह निरसिला ॥जय ॥२॥ तेरा दिवस बह्या रक्षूनियां उदकीं । कोरडयाची काढूनी दाखविल्या शेखीं । अपार कविताशक्ति मिरवुनि इहलोकीं । कीर्तनश्रवणें तुमच्या उध्दरती जन लोकीं । जय ॥३॥ बाळवेष घेऊनि श्रीहरी भेटला । विधिचा जनिता तोचि आठवा हा दिधला । तेणें ब्रहमानंदें प्रेमा डोलविला । न तुके म्हणुनी तुका नामहं गौरविला ॥ जय ॥ ॥४॥ प्रयाणकाळीं देवें विमान पाठविलें । कलिच्या काळामाजीं अदभुत वर्तविले । मानवदेह घेऊनि निजधामा गेले । निळा म्हणे सकळ संत तोषविले ॥ जय ॥ ॥५॥

261
प्रवृत्तिनिवृत्तीचे आटुनिया भाग । उतरिलें चांग रसायण ॥१॥ ज्ञानाग्रीहुतासी कडशिलें वोजा । आत्मसिध्दीकाजा लागोनियां ॥२॥ ब्रम्हरस ब्रहमीं सिध्द झाला पाक । घेतला रुचक प्रतितीमुखीं ॥३॥ स्वानुभवें अंगीं झाला समरस । साधननिजध्यास ग्रासोग्रासीं ॥४॥ आरोगयता निळा पावला आष्टांगीं । मिरवला रंगीं निजात्मरंगें ॥५॥

262
प्रसाद तुमचा लाधलों आतां । झालों कृतकृत्यता सनाथ ॥१॥ पुरविला जीवींचा हेत । होतो चिंतीत मानसीं तो ॥२॥ कृपा करुनियां दाविला देवा । आपुला ठेवा उघडुनी ॥३॥ निळा म्हणे सद्गुरुनाथा । गाऊं आतां ओंविया गीतीं ॥४॥

263
प्राणी प्राण अर्पे । तेणें अपीं तें समपें ॥१॥ ऐशा आहे प्रेमाकळा । परी तो बोधक विरळा ॥२॥ दृश्याचिया पाठीं । दृश्य लोपे द्रष्टाचि उठी ॥३॥ निळा म्हणे ज्ञानें । ज्ञेय राहिले होऊन ॥४॥

264
बरें जाणवलें मग । करी येऊनियां लगबग ॥१॥ अवलोकुनी कृपादृष्टीं । धरी कवळूनियां पोटीं ॥२॥ वोरसली माहें । लावी स्तनीं पाजी पेहे ॥३॥ निळा म्हणे दुरी । नवजे बैसोनियां घरीं ॥४॥

265
बरें होणार ते झाली माझी गती । हळहळ किती वाढवावी ॥१॥ परी तुमच्या ब्रीदा लागला कळंक । दुराविल्या एक मशक मी ॥२॥ होती वाढविली कीर्ति तिहीं लोकीं । ते आजी निष्टंकीं वाहविली ॥३॥ म्हणती शरणांगत येणें उपेक्षिला । लौकिक हा झाला भला काय ॥४॥ समर्था चुकल्या भला कोणीही हांसे । अनाथासी नसे शंका कांहीं ॥५॥ निळा म्हणे जागा आपुल्या उचिता । आम्ही तो संचिताधीन झालों ॥६॥

266
बहुता देऊनी अभयदानें । गौरविलें आपल्या मनें । घालूनी शांतीचीं आसनें । ब्रम्हसाम्राज्यीं बैसविलें ॥१॥ ध्यानतन्मयाचीं छत्रें । माथां झळकतीं विचित्रें । अगाध कीर्तीचीं दिव्य वस्त्रें । प्रल्हादादिकां समर्पिलीं ॥२॥ नारदा निर्लोभ वागेश्वरी । नामस्मरणाची वैखरी । देउनी दिव्य अळंकारीं । दैवांदैत्यांमाजीं मिरविला ॥३॥ व्यासा वाल्मिका अगाध मती । देउनी वंदय केलें त्रिजगतीं । जनक पृथु हे भूपती । आपुले पंगती बैसविले ॥४॥ अर्जुनादिकांसी आपुलें । ऐश्वर्य देउनी थोराविलें । सांख्य सिध्दांत उपदेशिले । रणीं वागविले रथवारु ॥५॥ उध्दवा मैत्रेया कृपा वोगरिली । निजात्मज्ञानें तृप्ति केली । भक्त कृपाळु माउली । गौरविलीं निज बाळकें ॥६॥ निळा नेणतें निपटणें । कांहीचि खाऊं जेऊं नेणें । वाढविलें ते स्तनपानें । नामचिंतनें आपुलिया ॥७॥

267
बहुतें आळीकरें । इनें वाढविलीं लेंकुरें ॥१॥ आहे आधिलाचि अभ्यास । नव्हे कोणाही उदास ॥२॥ अपत्य पाळवी । तया खाववी जेववी ॥३॥ निळा म्हणे घरीं । तया न विसंबे दारीं ॥४॥

268
बहुरुपी हा एकला । नानाकारें नटें नटला ॥१॥ पुरुषाकृति स्त्रिया बाळें । होउनी कोणाही नातळे ॥२॥ नामें रुपें वस्त्राभरणें । रसस्वाद नाना खाणें ॥३॥ निळा म्हणे फळें पुष्पें । पर्णे मूळें भिन्नचि रुपें ॥४॥

269
बांधोनियां शिखा हिशोबाचे मिसें । एकनाथ बैसे महाव्दारीं ॥१॥ जातां मार्गावरोनि पाहे निजदृष्टी । होतसे कष्टी रुक्यालागी ॥२॥ स्वभावें बोलिलें हास्यमुख वचन । प्रपंच्या कारण महादु:ख ॥३॥ निळा म्हणे ऐसा उपदेश शब्द । ऐकतांचि बोध मना झाला ॥४॥

270
बैसला होता पाटावरी । तोचि थराविला ते अवसरीं । निसटोनियां पृष्ठीवरी । बैसला अवचिता निघातें ॥१॥ पडिला पुढें दांतघशी । उठितां बळी अति आवेशी । तवं वेढिला येऊनियां चौपाशीं । घरोघरींच्या पिढियांनीं ॥२॥ मग म्हणे धांवा धांवा याचिये हातींचें मज सोडवा । नाडलों आपुल्या कापट्याभावा । नाहीं जन्मलों चांडाळ ॥३॥ अचेतन हे धांवती काष्ठें । लक्षानुलक्ष कोट्यानुकोटें । आतां कैचें जिणें येथें अदृष्टें । मारावया आणिलें ॥४॥ लोक हांसतातीं भोंवताले । म्हणती कैसें हें नवल झालें । आमुचेही पाट येथें आले । मारूंचि बैसले मांभळभटा ॥५॥ येथें न चले कोणाचेंचि कांहीं । ईश्वर‍इच्छेची हे नवाई । ब्राह्मण म्हणोनी सोडिला पाहीं । नागवा उघडा मांभळभट ॥६॥ निळा म्हणे लवडसवडी । पळतां भूई त्या झाली थोडी । येऊनियां कंसाचिये देवडीं । शंखस्फुरणें उभा ठेला ॥७॥

271
बोलणें परमार्थ आशा अतरीं अनर्य ॥१॥ काय करुं ते व्युत्पत्ति । बहुरुप्याची संपत्ती ॥२॥ रसाळ वाचेसी बोलणें । माळा मुद्रांची भूशणें ॥३॥ निळा म्हणे गेलीं द वांयां न भजतां विठठलीं ॥४॥

272
बोलिले शब्द निश्चयाचें । प्रतीति साचे आले ते ॥१॥ माझा मजचि परिचय झाला । संती दाविला हितार्थ ॥२॥ निमिषमात्रें सावध केलें । आपुलिये लाविलें निजसेवें ॥३॥ निळा म्हणे उपकार त्यांचा । सहस्त्र वाचा न वर्णवे ॥४॥

273
बोलिलों तें क्षमा करा । विश्वंभरा अपराध ॥१॥ सेवकांनीं कीजे सेवा । तुम्ही तों देवा देवोचि ॥२॥ चावळलों ते सलगी केली । उपहासिली पाहिजे ॥३॥ निळा म्हणे न कळे लीला । अकळ कळा तुमची ते ॥४॥

274
बोलिलों तें तुम्हां उणें । कीजे क्षमा नारायणें ॥१॥ आपुलिये मी तळमळें । दु:खें चावळलों तें कळे ॥२॥ समर्थाची गतिमति । कोण जाणें कैसी रीति ॥३॥ निळा म्हणे उचित करा । जैसें आपुलें तें दातारा ॥४॥

275
ब्रम्हानंद मुसावला । अंगी बाणला आविर्भावो ॥१॥ संतवचनामृतें तृप्ति । झाली विश्रांति इंद्रियां ॥२॥ मन बैसलें ऐक्यासनीं । निश्चळ आसनीं सुखाचिये ॥३॥ निळा म्हणे लाभ ऐसा । जोडे सरिसा संतसंगे ॥४॥

276
ब्रह्मा विचार करी मनीं । ठकडा मोठा हा चक्रपाणी । आतां येईल आंचवणीं । तेथें उच्छिष्ट स्वीकारूं ॥१॥ एकचि सीत उदंड याचें । पोट भरणें नाहीं साचें ॥ वचन पूजणें नारदाचें । म्हणोनि विरोळा डोहीं ॥२॥ तंव गोवळासी म्हणे श्रीकृष्ण । आजिचिया जेवणा आंचरण । न घेई तो आम्हां सज्जन । जिवलग प्राण निजाचा ॥३॥ गोंवळ म्हणती भलाभला । मनींचाचि हेत जाणितला । आजीचिया धणी जो जो धाला । तो तो पावला समाधीसुखा ॥४॥ ऐसें बोलोनियां गोंवळ । बैसले आत्मस्थितीचि निश्चळ । तंव ब्रह्मा डोहीं करी तळमळ । कां पां न येतिची आझुनी ॥५॥ मग डोकाउनी बाहेरी पाहे । मागुती जळीं लीन होये । म्हणे मी ब्रह्मा आणि विचंवला ठाय । धिग् महत्त्व तें माझें ॥६॥ चोरूनियां वत्सें गोंवळ । नेऊं आडवूं हा गोपाळ । सत्ता बळें घेऊनि कवळ । मग ते देऊं याचें या ॥७॥ ऐसें विचारूनियां परमेष्ठी । राहिला निश्चळ कातरदृष्टी । म्हणे हेंही जगजेठी । कळलें हृद्गतयाचें ॥८॥

277
भक्त उत्तीर्णत्वालागीं । राहिला युगीं युगें जातां ॥१॥ न फिटेचि तरी त्यांचे ऋण । भक्त संपन्न वैभवें ॥२॥ देती अन्न आच्छादन । म्हणती येथून नव जावें ॥३॥ निळा म्हणे केला उभा । जो या नभ व्यापका ॥४॥

278
भक्त करिती तैसा होय । ठेविला ठाय तया स्थळीं ॥१॥ पाचारिती भाविती जेथें । प्रगटे तेथें रुप धरी ॥२॥ जें जे उपचार करिती भक्त । ते ते स्वीकारित बाळापरी ॥३॥ निळा म्हणे भक्तांपाशीं । नाहीं यासी दुराग्रह ॥४॥

279
भक्त देव देवतार्चन । भक्त माझें पूजाध्यान ॥१॥ भक्ताविणें भजों कोणा । म्हणे वैकुंठीचा राणा ॥२॥ भक्त माझा विधि जप भक्तचि योग याग तप ॥३॥ निळा म्हणे भक्तावरी । ऐसी निष्ठा सांगे हरी ॥४॥

280
भक्त पहावया तांतडी । नामचि ऐकोनि घाली उडी । निजदासाचीं सांकडीं । न देखे नाईके सर्वथा ॥१॥ ऐसा भक्तां ऋणाईत । सर्वदा सेवेसी तिष्ठत । मागें पुढें सांभाळित । त्यांच्या प्रेमासी भुलला ॥२॥ गजेंद्रा संकटीं सोडविलें । इच्छित उपमन्या दीधलें । ध्रवासी नेऊनियां स्थापिलें गगणीं बैसविलें अढळपदीं ॥३॥ गणिका पक्षियातें वोभातां । घालूनि विमानी ते तत्वतां । नेली वैकुंठासी त्वरितां । निज भुवनीं सन्मानिली ॥४॥ तैसाचि पुंडलिकासाठीं । उभाचि इटेच्या नेहटी । युगें गेली परि हा गोठी । न करीची कदाही वैकुंठींची ॥५॥ बळीचा झाला व्दारपाळ । यशोदे नंदाचा हा बाळ । कंसचाणूरादिकां काळ । सारथी कृपाळ अर्जुनाचा ॥६॥ धर्मा घरीं तरी हा मंत्री । विवेक युक्ती प्रमाण सूत्रीं । गुण लावण्याचा धात्री । विचार सांगे सवहिताचा ॥७॥ भीष्म द्रोणाचा हा प्राण । सांगती विदुराचा भगवान । दौपदी लज्जेचें निवारण । वस्त्रें अपार पुरविलीं ॥८॥ निळा म्हणे भक्तासाठीं । नित्य करुणा वाहे पोटीं । शंखचक्रादि आयुधें मुष्टी । भक्तारक्षण्‍ करावया ॥९॥

281
भक्त म्हणती अहो देवा । वियोग न व्हावा तुम्हां आम्हां ॥१॥ इतुकेनिचि दोघेहि सुखी । मिसळतां एकाएकीं संतुष्ट ॥२॥ आम्ही गाऊं तुमचे गुण । करावें श्रवण सादर तुम्हीं ॥३॥ निळा म्हणे कमळापती । आहे हातीं तुमच्या हें ॥४॥

282
भक्त व्देषाचीं उत्तरें । ऐकतांचि कर्णव्दारें ॥१॥ त्यांचे करी निर्दाळण । हरुनियां जीवप्राण ॥२॥ दुर्योधन दु:शासना । ससैन्य नि:पातिलें कर्णा ॥३॥ निळा म्हणे भक्तव्देषें । हिरण्यकश्यपा झालें कैसें ॥४॥

283
भक्त स्तवनें जें जें करिती । तें जें ऐकोनियां श्रीपती । सुखें संतोषोनियां चित्तीं । दासा देती वरदानें ॥१॥ ध्रुवानें वनीं आराधिला । तैसाचि उपमन्यें स्तविला ।एक तो अढळपदीं स्थपिला । एका दिधला क्षीरसिंधु ॥२॥ प्रल्हादाचें स्तवन गोड । त्याचें पुरवी अवघेंचि कोड । अग्निविषाचें सांकड । नेदी पडों शस्त्राचें ॥३॥ द्रौपदीनें स्तवितांचि तातडीं । नेसतीं झाला तिचीं लुगडीं । कौरवें लाजविलीं बापुडीं । अंगुष्ट तोही दिसों नेदी ॥४॥ गजेंद्राचिया स्तवनासाठीं । धांवे वैकुंठीहुनी उठाउठी । निजकरें घालूनियां मिठी । सोडवी संकटी स्वामी माझा ॥५॥ रुक्मिणीचें प्राणिग्रहण । करी ऐकोनियां तिचें स्तवन । पांचाळिये हातींचें भाजीपान । करी भोजन स्तवनें तिच्या ॥६॥ निळा म्हणे कृपामूर्ति । अपार भक्तांचिये स्तुती । ऐकोनियां तोषलेती । मी ही बाळमती विनवितों ॥७॥

284
भक्तांचिया घरा आला । सुख विश्रांति पावला ॥१॥ उपकार ते वेळोवेळां । आठवि घननीळ सांवळा ॥२॥ नाहीं कळिकाळा हे भ्याले । अग्नि विष वांटूनि प्याले ॥३॥ निळा म्हणे आभारला । म्हणवी भक्तांचा अंकिला ॥४॥

285
भक्तांचिये भुके । प्रेम वागविसी भातुकें ॥१॥ घालूनियां निज मुखीं एकाएकीं करिसी सुखी ॥२॥ पुरवुनी आळी । घेसी कडिये तेचि काळीं ॥३॥ निळा म्हणे बापमाय । एका अंगें दोन्ही होय ॥४॥

286
भक्तांचिये मनीं जैसें । करि हा तैसें वर्तन ॥१॥ नेदी होऊं आज्ञें भंग । वोडवी सर्वांग सेवेसी ॥२॥ स्तंभी पाचारितां हाके । होऊनी ठाके नरहरी ॥३॥ निळा म्हणे उभा व्दारीं । केला विटेवरी मग ठाके ॥४॥

287
भक्तांचिसाठीं रुपें धरी । पवाडे करी असंख्य ॥१॥ भक्तांसी मानी आपुले सखे । नेदी पारखें दिसों त्यां ॥२॥ कृपावस्त्र पांघुरवी । जवळी बैसवी आपणा ॥३॥ निळा म्हणे तृप्तीवरी । ब्रम्हरस भरी मुखांत ॥४॥

288
भक्ताघरींचें करीन काम । त्यांचेंच नाम वागवीन ॥१॥ भक्तरुपें विराजलों । स्थिरावलों ह्रदयीं त्यां ॥२॥ भक्तसुखें सुखावत । त्यांच्याचि क्रीडत देहसंगे ॥३॥ निळा म्हणे ऐसा देव । दाखवी प्रभाव आपुला ॥४॥

289
भक्ताचांचि वोरस देवा धांवे सेवा करुं त्यांची ॥१॥ जें जें गोड वाटें मनीं । तें तें वदनीं भरीं तयां ॥२॥ अपूर्ण तेथें पूर्ण करी । पुरवी कामारी होउनी ॥३॥ निळा म्हणे रक्षी हेत । उभा तिष्ठत त्यांपाशीं ॥४॥

290
भक्ति भाव बळकाविला । देव धंविला सोडवणें ॥१॥ म्हणे मज घ्या पाटलासी । सोडा भावासी जाऊं दया ॥२॥ ते म्हणती तूं लटिका देवो । आम्ही धरिला भावो न सोडूं ॥३॥ निळा म्हणे भावासाठीं । पडली मिठी देव न सुटे ॥४॥

291
भक्तिं भावचि बांधिला गांठी । आला उठाउठीं देव तेथें ॥१॥ म्हणे मज घ्या सोडायसी । ते म्हणती ठकिसी नेघों तुज ॥२॥ लटिकीच माया धरिशील रुपें । लपशील खोपें रिघोनियां ॥३॥ न सोडूं भाव जांई तूं आतां । विनवी देवभक्तां काकुळती ॥४॥ भावही घ्यारे भक्तिही घ्या रे । मजही घ्यारे तुमचाचि मी ॥५॥ निळा म्हणे साधिलें काज । भक्तिं आपुली पैज जिंकियेली ॥६॥

292
भक्तिपंथें न चले कोणी । वाट जाईल मोडोनी ॥१॥ जरि अनाथा धांवणें । न कराल तुम्ही थोरपणें ॥२॥ आमचा जन्म वायां गेला । शब्द तुम्हांसी लागला ॥३॥ निळा म्हणे नव्हे भली । पुढें वाट खोळंबली ॥४॥

293
भक्तिांचिया मनोभावा । सारिखे देवा तुम्ही वर्ता ॥१॥ आवडीचा न करा भंग । अंतरंग म्हणोनियां ॥२॥ धर्माघरीं उच्छिष्ठकाढा । अर्जुना पुढा सारथ्य ॥३॥ निळा म्हणे बळीच्या व्दारीं । होउनी भिकारी भीकमागा ॥४॥

294
भक्तीं आराधिला देव । जाणवला भाव देवासीं तो ॥१॥ बहुत बरवें म्हणती भक्ता । न वजे परता जवळूनियां ॥२॥ सुखी असा माझया बळें । पुरवीन लळे इच्छाल ते ॥३॥ निळा म्हणे कृपाळु हरी । भक्तावरी तुष्टमान ॥४॥

295
भक्तीं देवातें पूजिलें । देवें भक्तां सन्मानिलें ॥१॥ ऐसें भजती येरयेरां । जैसें जळ आणि जळगारा ॥२॥ भक्त देवाजवळी बैसे । देव भक्तां घरी वसे ॥३॥ निळा म्हणे देवा भक्तां । सर्वकाळीं एकात्मता ॥४॥

296
भक्त्‍ देवालागीं झुरे । देव भक्तातेंचि स्मरे ॥१॥ जेंवि माउलियेतें बाळ । माय बाळातें स्नेहाळ ॥२॥ येरेयेरां नव्हती भिन्न । सर्वकाळीं सन्निधान ॥३॥ निळा म्हणें लवणा नीरा । जेवि सोनें अळंकारा ॥४॥

297
भक्त् पूजिती भगवंता । भगवंत पूजी आपुल्या भक्तां ॥१॥ ऐसा प्रीतीचा कळवळा । परस्परें हा सोहळा ॥२॥ भक्ता देवातेंचि उमगी । देवहि धांवे तयालागीं ॥३॥ निळा म्हणे एकीं एक । वसोनि भिन्नत्वाचें बीक ॥४॥

298
भक्त्‍ाहांका ऐकावया । पसरुनियां कान उभा ॥१॥ कोणी गांजीळ एखादा । म्हणोनि गदा सांभाळी ॥२॥ सर्वकाळ सावधान । निजजनरक्षणा ॥३॥ निळा म्हणे घालीं उडी । भक्ततांतडी देखोनी ॥४॥

299
भवरोगें जे पिडले लोक । तिहीं आवश्यक सेवावें ॥१॥ महा मात्रा हरिकीर्तन । उरलें रसायन निज निगुतीं ॥२॥ मागें बहुतां गुणसी आलें । आरोग्यचि ठेविलें करुनियां ॥३॥ निळा म्हणे सांगता फार । होईल विस्तार नामें त्यांची ॥४॥

300
भाग्य माझें उभें ठेलें । संती दाविलें निधान ॥१॥ आतां उणें कोठें कांही । न पडे ठायीं भरलेंसें ॥२॥ जेथें पाहे तेथें आहे । न पाहतांही राहे कवळुनी ॥३॥ निळा म्हणे व्यापुनी अंतरी । गगनाही बाहेरीं तेंचि दिसे ॥४॥

301
भाग्याची उजरी । दिसे यावरी वोडवली ॥१॥ म्हणोनियां कृपावंत । झाले संत मायबाप ॥२॥ पाचारुनी देत मोहें । प्रेमपेहे पाजिती ॥३॥ निळा म्हणे सांगती कानीं । माझें मजलागुनी स्वहित ॥४॥

302
भानुदासाचे कुळी महाविष्णुचा अवतार । आदी क्षेत्री स्थान वस्ती गोदातीर ॥१॥ ओवाळु आरती स्वामी एकनाथा । तुमचे नाम घेता हरे भवभ्य चिंता ॥२॥ जनार्दनाची कृपा दत्तात्रयाचा प्रसाद । भागवती टीका नारायण आत्मबोध ॥३॥ ब्रहमाविष्णु महेश ज्यासी छळावया येती । न ढळे ज्याची निष्ठा होसी एकात्मता भक्ति ॥४॥ कावडीने पाणी ज्याघरी चक्रपाणि वाहे । अनन्य भक्तिभावे निळा वंदी त्याचे पाय ॥५॥

303
भानुदासाच्या कुळीं महाविष्णूचा अवतार । आदि क्षेत्रीं स्थान वस्ती गोदातीर ॥१॥ ओवाळूं आरती स्वामी एकनाथा । तुमचे नाम घेतां हरे भवभयचिंता ॥२॥ जनार्दनाची कृपा दत्तात्रयाचा प्रसाद । भागवती टीका नारायण्‍ आत्मबोध ॥३॥ ब्रहमा विष्णु महेश ज्यासी छळवया येती । न ढळे ज्याची निष्ठा होशीं एकात्मता भक्ति ॥४॥ कावडीनें पाणी ज्या घरीं चक्रपाणी वाहे । अनन्यभक्तिभावें निळा बंदी त्याचे पाय ॥५॥

304
भानुदासाच्या कुळीं महाविष्णूचा अवतार । आदि क्षेत्रीं स्थान वस्ती गोदातीर ॥१॥ ओवाळूं आरती स्वामी एकनाथा । तुमचे नाम घेतां हरे भवभयचिंता ॥२॥ जनार्दनाची कृपा दत्तात्रयाचा प्रसाद । भागवती टीका नारायण्‍ आत्मबोध ॥३॥ ब्रहमा विष्णु महेश ज्यासी छळवया येती । न ढळे ज्याची निष्ठा होशीं एकात्मता भक्ति ॥४॥ कावडीनें पाणी ज्या घरीं चक्रपाणी वाहे । अनन्यभक्तिभावें निळा बंदी त्याचे पाय ॥५॥

305
भाव भक्ति विलासिया । परिसा विनंती पंढरीराया ॥१॥ आम्हां दासां सांभाळिजे । देउनी प्रेम गौरविजे ॥२॥ जैसी तुमची आहे ख्याती । तैसीचि चालों दया जी पुढती ॥३॥ नाहीं तरि होईल हांसें । लोकीं ब्रीद लटिकें दिसे ॥४॥ तुम्ही आम्हां उपेक्षिलें । तरी हीनत्व सांगा कोणा आलें ॥५॥ निळा म्हणे पुढीला चाली । वाट पाहिजे रक्षिली ॥६॥

306
भाव भक्तीचा भुकेला । दास दासांचा अंकिला । न वजे दुरी उभा ठेला । अवघा झाला त्यांचाचि ॥१॥ भक्तवचनें ऐके कानीं । भक्त आवडी पाहे नयनीं । भक्त ह्रदयीं आलिंगुनी । निज ऐश्वर्य अर्पी त्यां ॥२॥ भक्त मानी जीवप्राण । त्यांसी न त्यां विसंबे एकही क्षण । त्यांचें वागवी हा भूषण । निंबलोण उतरी त्यां ॥३॥ जीव भाव देवावरी । जिहीं ठेविला निजनिर्धारीं । देवावीण दुसरी परी । तुच्छ मानिलें संसारा ॥४॥ न लगे वैकुंठ त्यांचिये चित्तीं । कैवल्यातें परतें करिती । देवावीण ते नेघों म्हणती । मोक्ष मुक्ती फुकटा ॥५॥ देवाविण रिध्दीसिध्दी । ओंवाळुनी सांडिती त्या उपाधी । देवा वेगळी त्यांचिये बुध्दी । नाहींचि विश्रांति आणिक ॥६॥ निळा म्हणे त्यांचिये घरीं । राहे होउनी अंकित हरि । भक्त काज हा कैवारी । ब्रीदें वागवी सर्वदां ॥७॥

307
भाव शुध्द तरी । प्रगटे येऊनि अंतरीं ॥१॥ उरों नेदी तया भिन्न । करी आपणा समान ॥२॥ भरोनियां सृष्टीं । आपणाचि त्या पाठीपोटीं ॥३॥ निळा म्हणे राहे । कवळूनियां अंतर्बाहे ॥४॥

308
भाविकाची आवडी देवा । करी सेवा निज प्रीतीं ॥१॥ हिंडे तया मागें पुढें । नाशी कोडे सकळही ॥२॥ घरीं दारीं वसे हरी । विश्वंभरी भाव ज्या ॥३॥ निळा म्हणे संदेह नाहीं । भक्तां पाही यावरीं ॥४॥

309
भिन्न दावूनियां एक । एकीं भिन्नत्वाचें बीक ॥१॥ जेंवि बिंब प्रतिबिंब । दोन्हीं एकचि ते स्वंयभ ॥२॥ जैसी गोडी आणि गूळ । कापूर तोचि परिमळ ॥३॥ निळा म्हणे देवां भक्ता । निवडी कोण भिन्न आतां ॥४॥

310
भूतीं उपद्रव दिधला । ताडिला अथवा निस्तेजिला । तेणें चित्ती दाहो जाला । अधिभौतिक बोलिला तो ताप ॥१॥ देहीं प्रगटे रोगव्याधी । तेणें आहाळली तापे बुध्दी । लोळे न पुरे दु:खावधी । आध्यात्मिक त्रिशुध्दि तो ताप ॥२॥ दैवें अतिवृष्टि का अनावृष्टि । रजीकें लुटिलें जाला कष्टी । आगीनें जळतां नावरें संकटीं । तो अधिदैव ताप बोलिजे ॥३॥ ऐसे त्रिविधताप सत्संगती । विवकेश्रवणें विलया जाती । म्हणोनि कीर्तनी बुध्दिमंतीं । आवश्य श्रवणार्थी बैसावें ॥४॥ निळा म्हणे होईल लाभ । ब्रम्हानंदा निघती कोंभ । प्रसन्न होउनी पद्मनाभ । शीतळ करील सर्वार्थीं ॥५॥

311
भेटवाल पंढरीनाथ । तुम्हीचि संत कृपाळु ॥१॥ म्हणोनि येतों काकुळती । पुढतोंपुढती कींव भाकीं ॥२॥ इतरांची मी न करीं आस । झालों दास तुमचाची ॥३॥ निळा म्हणे ठेवा पायीं । यावरी कायी विनवूं मी ॥४॥

312
भेदचि याचा नये हातां । जाणिवा जाणतां नानापरी ॥१॥ मतमतांतरें वृथाचि होती । याच्या न पवती दारवंटा ॥२॥ पाहों जातां बुध्दीचे डोळे । होताती आंधळे समोर या ॥३॥ निळा म्हणे नेदीचि कोणा । देखों आपणा लपवितसे ॥४॥

313
भोळा देव । दाखविला आम्हां केला सन्मुख ॥१॥ पंढरियें विटेवरीं । उभा व्दारीं पुंडलिका ॥२॥ संती केला परोपकार । आम्हां उध्दार दीनांचा ॥३॥ निळा म्हणे जवळी नेलें । हातीं दिलें निरवुनी ॥४॥

314
भ्याला देव देखोनि भक्तां । म्हणे मी आतां केउता पळों ॥१॥ जीवेंसीचि इहीं केली साठी । सांडवितां मिठी न सोडिती ॥२॥ भुक्ति मुक्ति देतों यासी । परि हे उदासी न घेती त्यां ॥३॥ निळा म्हणे भक्तीं मोकलितां आशा । देवचि फांसा पडिलों म्हणे ॥४॥

315
मग ओंवाळूनियां मृत्तिका । घेतलें उचलूनि यदुनायका । यशोदा म्हणे हें बाळका वरूनि अरिष्ट चुकलें ॥१॥ नव्हे शकट तो मायावी दैत्य । आला होता करावया घात । कृष्णें ताडिला तो यथार्थ । पूतनेऐसी परी केली ॥२॥ तेणें दिधली आरोळी । न्या हा उठे तो अंतराळीं । परी नाहीं भयाची काजळी । सावध वनमाळी सर्व गुणें ॥३॥ ऐसे क्रमिले कांहीं दिवस । तंव रायें पाठविलें लोकांस । मग येऊनि गोकुळास । पुनरपि वस्ती राहिले ॥४॥ कृष्ण खेळतां आंगणीं । गडी म्हणती सांरगपाणी । हाराळी नूतन हे कापुनी । चारूं वत्सासि आपुलीया ॥५॥ तंव तो तृणावृत दैत्य । हाराळी रूपें होता तेथ । इच्छूनियां कृष्ण घात । तंव तो हरीनें ओळखिला ॥६॥ म्हणे पळारे तुह्मी अवघे गडे । येथें दिसत असें हें कुंडें । रहा अवघे मागिलीकडे । आपण पुढे संचरला ॥७॥ तेणें देखतांचि श्रीहरी । वदनें काढिलीं तृणांकुरीं । शतें सहस्त्र लक्षवरी । रूपें धरूनी ठाकला ॥८॥ भयानकें अती विक्राळें । दाढा दंत दीर्घ शिसाळे । आवळुवे चाटीत आवेश बळें । कृष्णा अंगीं झगटला ॥९॥ निळा म्हणे कवळुनि मुष्टी । मुख्य तृणासुराची झोटी । उपटूनियां भूमी नेहटीं । शतचूर्ण करूनि सांडिला ॥१०॥

316
मग चरणीं कवळूनियां करतळें । आफळूं गेला प्रचंड शिळें । तंव ते गर्जोनियां अंतराळें । गेली निसटोनी हातींची ॥१॥ घोष गर्जनें बोले गगनीं । असुरा कंसा ऐकेंरे कानीं । तुझिया निर्मुळा लागुनी । चक्रपाणी गोकुळीं वाढे ॥२॥ नंदयशोदेच्या घरीं । बालकृष्ण बाळ ब्रह्मचारी । येउनी तो मथुरे भीतरीं । करील संहार असुरांचा ॥३॥ तुजसहित दैत्यबळी । मर्दुनी सांडील महितळीं । ऐशीं अक्षरें कर्णबिळीं । प्रविष्ट होतांचि कंसाच्या ॥४॥ रायें घातली घातली लोळणी । अकस्मात् पडियेला धरणीं । मुगुट माथांचा उडोनी । गेला वदनीं धुळी भरे ॥५॥ नेत्र झाले पांडुरवर्ण । कंठीं वाष्प दाटला पूर्ण । प्राण सांडीत सेवक जन । सावध करिती विलापें ॥६॥ एक घालिती विंजणवारा । वदनीं प्रोक्षिती आंबुतुषारा । निळा म्हणे नावेक शरीरा । कंपही सुटला हरिधाकें ॥७॥

317
मग धांवोनिया यशोदा । हृदयीं आळंगी गोविंदा । बारे तूंतें अरिष्टेंचि सदा । जैम पासुना जन्मलासी ॥१॥ प्रथम पूतनेचा घात । दुजा भटाचा विपरीतार्थ । तिजा कागदाचा हा अनर्थ । आम्हीं देखिला समस्ती ॥२॥ यावरी काय काय होईल । नकळे आम्हांतें तें पुढील । मागें शकटाचेंहि नवल । मारिलेंचि होतें तुज कृष्णा ॥३॥ कैसें घरासचि पुसती । नानापरीचे उत्पात येती । काय करूं रे श्रीपती । कैसा वांचसील काय जाणं ॥४॥ किती चिंता करूं खेद । मज हे न देखवती प्रमाद । तंव गगनवाणीचे शब्द । ऐकती झाली निज कर्णीं ॥५॥ परमात्मा हा पूर्ण अवतार । उतरावया धराभार । तुझिये उदरीचा कुमर । निवटेल असुरीं अपरिमित ॥६॥ जे जे पापी अतुर्बळी । आहेत हे भूमंडळीं । तितुकियांसिही मांडुनी कळी । पाठवील त्या यमपंथें ॥७॥ निळा म्हणे ऐकोनि कानीं । यशोदा संतोषली मनीं । टाळी पिटिली सकळही जनीं । थोर आश्चर्य वाटलें ॥८॥

318
मग बोले मंजुळा उत्तरीं । मज न्या जी गोकुळभितरीं । ठेवुनी नंदयशोदेच्या घरीं । तुम्हीं यावें तेच क्षणीं ॥१॥ ऐकोनी तयाचें उत्तर । वसुदेव विस्मित आणि चिंतातुर । म्हणे कैसा करावा विचार । बंधनें गोविलें मजलागीं ॥२॥ ऐशिया मोहें त्या कवळित । तंव तुटलीं बंधनें झाला मुक्त । म्हणे आतां हा कृष्णनाथ । नेईन गोकुळांत ठेवीन ॥३॥ मग घेऊनियां निज बोधेशीं । आला वसुदेव गोकुळासीं । देऊनियां त्या नंदापाशीं । म्हणे हें स्वीकारा बाळक ॥४॥ जन्मलें देवकीचिये उदरीं । परि हें ठेवितां नये घरीं । आहे कंसाचें भय थोरी । यालागीं तुम्हां हें कृष्णार्पण ॥५॥ ऐशिया उत्तरीं बोलिला । बाळक त्यापाशीं दिधला । उघडोनि नंदें जो पाहिला । तंव तो देखिला चतुर्भुज ॥६॥ निळा म्हणे वोळलें भाग्य । घरां आले पुसत चांग । उद्धरावया सात्विक जग । केला वास तया घरीं ॥७॥

319
मग म्हणती अवघ्या जणी । धांवोनि पहागे आणा पाणी । डास वरखडला न्याहाळुनी । रक्त कोठुनी स्त्रवलें हो ॥१॥ पहाती तंव तो उत्तम अंगे । जेंवि का उठियेलें अनंगें । नभापरी अलिप्त संगें । काय करिती अघात त्या ॥२॥ नानापरींची अक्षवाणें । करी यशोदा वांटी दानें । यथाविधी द्विजभोजनें । केलें जिताणें श्रीहरीचें ॥३॥ ह्यणती नवीची रिठीयाची माळा । घातली होती त्वां याचिया गळां । ते काय झाली गे याची वेळा । तेचि अरिष्ट यासी होतें ॥४॥ ऐसा झाला घोषगजर । ऐकोनियां तों कंसासुर । म्हणे बोळविला महावीर । केला चकाचुर रिठाही ॥५॥ करितां उपाय न चले यासी । कंस भयाभीत मानसीं । म्हणे काळ ह जन्मला आम्हांसी । करील संहार काळाचा ॥६॥ निळा म्हणे न चले युक्ती । यापुढें कापट्या समाप्ती । सर्वांतरवासी हा श्रीपती । कर्मफळदाता निजसत्तें ॥७॥

320
मग वस्त्रें देउनी गौरविला । राये बहुत सन्मानिला । चालतां मार्गीं विचार सुचला । म्हणे टाकवीन तान्हुला निर्जनीं ॥१॥ टिळे माळा टोपी शिरीं । श्रीमुद्रांची वोळी पंचांग करीं । ध्योकटी घेऊनियां खांदियावरी । शुद्ध मुहूर्तें चालिला ॥२॥ आला गोकुळासन्निधीं । शुद्धाचमन केलें विधीं । मनीं कापट्याची बुद्धी । साक्षी तियेचा परमात्मा ॥३॥ नंदगृही प्रवेशला । येतां यशोदेनें देखिला । पाट बसावयाला दिधला । नमूनि पूजिला उपचारीं ॥४॥ स्वस्थ स्वस्थानीं बैसले । पंचांग काढूनियां उकलिलें । वाचुनी चंद्रबळ दाविलें । आणि दिधलें आशिर्वादा ॥५॥ मग पुसे यशोदेप्रती प्रसूतिकाळ नेणती तिथी । तंव ते आणूनियां श्रीपती । द्विजातें दाखवी उल्हासें ॥६॥ देखतांचि तो मदनमूर्ती । ठकल्या ठेल्या इंद्रियवृत्ती । निळा म्हणे समाधिस्थिती । पावली प्रतीति ब्राह्मणां ॥७॥

321
मग हळूचि बोले अमृतवाणी । मागा म्हणोनी निजभक्तां ॥१॥ मुक्त होईन सेवाऋणा । घ्या हो वरदाना इच्छेच्या ॥२॥ तुम्हांसी जें जें वाटे गोड । मागा कोड पुरतें ॥३॥ निळा म्हणे भक्त त्या म्हणती । आम्हांसी प्रीति तुमचीच ॥४॥

322
मग हांसोनियां बोलिजे कृष्णें । बेटे हो तुम्ही अवघेचि शहाणे । सर्पें गिळिले होतेती प्राणें । कैसे तरी वांचलेती ॥१॥ बरें झालें होतों मागें । तेणें वांचलेतीरे प्रसंगें । पैल पहारे महा भुजंगें । चिरुनी सांडिला त्याच्या फाळी ॥२॥ पहाती तंव भरोनिया दरा । पडिला वाहती शोणिती धारा । म्हणती नवल हें शारंगधरा । कैसा चिरूनियां टाकिला ॥३॥ येणेंचि आह्मां गिळिलें होतें । नेणें देखोनी अंधकारातें । थोर विस्मय करिती तेथें । म्हणती दाऊं वडिलातें नवल हें ॥४॥ ऐसा अघासुर मर्दिला । कृष्णें पवाडा हा केला । गोवळा नाचती विजये झाला । श्रीहरी आला आमुच्या सांगाती ॥५॥ कंसातेंहि विदित झालें । जाउनी वार्तिकीं सांगितलें । तेणें चपपक त्याचें गेलें । ह्मणे ओढवलें दुर्मरण ॥६॥ निळा म्हणे इकडे गाई चरतां फांकल्या दिशा दाही । वळत्या करूनियां त्या लवलाही । आणिल्या वृंदावनासमीप ॥७॥

323
मग होणे गिळिले गोप । गाई खिल्लरांचे कळप । तरि हा चिरूनियां सांडीन सर्प । घेईन सूड य सकळांचा ॥१॥ कृष्ण शिरतां त्याच्या वदनीं । अघासुरा हर्ष न समाय मेदिनी । ह्यणे कार्य साधिलें हा चक्रपाणी । गिळिलियावरी सर्व माझें ॥२॥ ऐसा आनंदला अघ । तंव लाघविया श्रीरंग । वाढला पाताळवरी स्वर्ग । नेदी जाभाडी मेळवूं त्या ॥३॥ नुगळवेचि तो उगळूं जातां । पुढेंहि न चलेचि तत्वतां । फाडूनि वदन केल्या चळथा । द्विभाग करूनि सांडियेले ॥४॥ तेणें उघड्या पडल्या गाई । गोवळ म्हणती थोर नवाई । निमिषामात्रेंचि गेली धुई । पहारे प्रकश पडियेला ॥५॥ कान्हो आतां येईल केव्हां । वृत्तांत तया हा नाहीं ठावा । ऐसें स्मरणचि खेवा । देखिला श्रीहरी दृष्टिपुढें ॥६॥ निळा म्हणे सांगती नव । आजीं अंधारिमाजी गाई गोवळ । पडिले होते आणि वायो प्रबळ । माघारेंही सरों नेदी ॥७॥

324
मज तों माझें न कळोचि हित । पतिता पतित आगळा ॥१॥ परी तुम्हीं लाविले कांसे । उतरा जैसें उतराल ॥२॥ कर्महीन मतिहीन । न कळेचि ज्ञान विहिताचें ॥३॥ निळा म्हणे धरिलें हातीं । हेचि निश्चिती मानियेली ॥४॥

325
मज तों सांभाळिलें संती । धरिलें हातीं दीन म्हणुनी ॥१॥ सांगतां नये विश्वास लोकां । बाधी अशंका ज्याची त्या ॥२॥ मी तों बोलें त्याचिया सत्ता । पुढें विचारितां कळेल ॥३॥ निळा म्हणे जुनाट नाणें । नव्हे हें उणें पारखितां ॥४॥

326
मध्यें परमात्मा श्रीहरी । दधिओदन घेऊनि करीं । कवळ त्याचिये मुखीं भरी । आणि स्वीकारी आपणही ॥१॥ हें देखोनियां चतुराननें । परम संकोच मानिला मनें । मग म्हणे हें संध्यास्नानें । कांहींची न करिती गोंवळ ॥२॥ आम्ही याचें शेष घेणें । तैं ब्रह्मत्वा मुकणें । यज्ञीं अग्रपूजेचें आंवतणें । कैंचें येईल मग आम्हां ॥३॥ यातें नाहीं यज्ञाचार । दीक्षा अथवा शिखासूत्र । आह्मीं सोवळें निरंतर । करूं उच्चारू वेदाचा ॥४॥ सोंवळें ओवळें नाहीं यांसी । केलें अपोषणे कर्मासी । सेवितां याचिया उच्छिष्टासी । होईल प्रत्यवायासी निजमूळ ॥५॥ मग प्रायश्चित्तेंही घेतां । न फिटे विटाळ तत्वतां । ऐसें विचारूनियां विधाता । पालटी तत्वतां ब्रह्मपण ॥६॥ निळा म्हणे ज्याचा तया । संदेह बाधी त्या नांव माया । मग तो रूप पालटूनियां । झाला गोंवळ वेषधारी ॥७॥

327
मन विश्रांति पावलें । गुरुचरणीं स्थिरावलें ॥१॥ ज्ञानयुक्त होतां मन । ब्रम्हभूत झालें जाण ॥२॥ जिकडे जिकडे जाय मन । तिकडे तिकडे अधिष्ठान ॥३॥ निळा म्हणे मन । होऊनि ठेलें तें उन्मन ॥४॥

328
महा वैरी निर्दाळिला । पैल वत्सासूर निवटिला । म्हणती अचोज हा बळिया झाला । नंदरायाचा कुमरु ॥१॥ मात गेली कंसासुरा । ऐकोनि झाला तो घाबरा । विचारी आपुलिया कैवारा । न दिसे दुसरा ऐसा बळी ॥२॥ जो तो जाउनी घाताचि पावे । नये परतोनियां जीवें । यावरी आतां शरण जावें । कवणिया वीरा महीतळीं ॥३॥ तंव तो उठोनि अघासुर । करी रायसी जोहार । म्हणे न व्हावें चिंतातुर । विद्या अपार मजपाशीं ॥४॥ राया तुझिया हितावरी । करीन गोकुळाची बाहरी । अवघेचि घालूनियां उदरीं । येईन कृष्णासमवेत ॥५॥ ऐसें तोषवूनियां राया । म्हणे न धरीं आतां भया । तैशा रचूनियां माया । करितो संहार सकळांचा ॥६॥ निळा म्हणे गर्वारूढ । यावरी होऊनियां मूढ । काळासवें मांडूनियां होड । खेळों पाहे मश्यक ॥७॥

329
मागें ऐकिले पवाडे याचे । आजीं ते साचे कळों आले ॥१॥ आपुलियाचि स्वानुभवा । आलें तेव्हां साच कळलें ॥२॥ आणुनी मोहरा संकट टाळी । गोणी दुष्काळीं दाणियाची ॥३॥ निळा म्हणे प्रयोजनीं । साहित्य घेउनी संपादिलें ॥४॥

330
मागें पाळिलीं पोशिली । अपत्यें त्वां वाढविलीं ॥१॥ ऐसें बोलियले संत । लटिकी वाटे ते ते मात ॥२॥ हें गे मजचि उपेक्षिलें । नाहीं समाधान केलें ॥३॥ निळा म्हणे येऊनियां । भेटें पुरवीं माझा थाया ॥४॥

331
मागें पुढे उभा राहे । भरुनि पाहे डोळे त्या ॥१॥ प्रेमासी दृष्टी लागेल झणें । उतरीं निंबलोण वरुनियां ॥२॥ पोटातुला परम प्रीती । आलिंगी श्रीपती हदयेंसी ॥३॥ निळा म्हणे करुणा बहुत । झाला या मोहित भक्तांसी ॥४॥

332
माझिये मनीं बैसला हरी । नयनामाझारीं कोंदला ॥१॥ भरोनियां मना बुध्दी । राहिला संधीं इंद्रियांच्या ॥२॥ पाहे तेथें आपणचि दिसे । स्वरुप विलसे पदार्थी ॥३॥ निळा म्हणे जें जें कांहीं । भासे तेंही त्याचीं रुपें ॥४॥

333
माझेंचि मज नवल वाटे । मीचि भेटें मजलागीं ॥१॥ निजात्मबोधें उदो केला । प्रकाश दाटला कोंदोनी ॥२॥ कोठें कांहिंचि न दिसे दुजें । निजात्मतेजें जग भासे ॥३॥ निळा म्हणे अवघे ठायीं । मीचि नाहीं दुजी परी ॥४॥

334
मातापिता समर्थ । स्वामी माझा एकनाथ ॥१॥ काळ रुळतो चरणी । देवघरी वाहे पाणी ॥२॥ ज्यांचे अनुग्रहे करुन । झालो पतित पावन ॥३॥ जो वसे प्रतिष्ठानी । निळा त्यासी लोटांगणी ॥४॥

335
मायबाप उत्तीर्ण होणें । न घडे देणें अपत्या ॥१॥ जरी लक्ष जोडी दिली । ॥२॥ जैसा आत्मा विश्व प्रसवे । तेणें त्या व्हावें उत्तीर्ण के ॥३॥ निळा म्हणे शुध्द भावे । चरणा जावें लिगटोनी ॥४॥

336
माया ब्रहमींचा आभास । नाहीं ते ब्रम्ही नि:शेष ॥१॥ यालागीं दिसे ते टवाळ । रत्नचि ते रत्नकीळ ॥२॥ सूर्यचि सूर्यातें प्रकाशी । न देखोनियां तम तेजासी ॥३॥ निळा म्हणे स्वसंवेदया । नातळे विदया ना अविदया ॥४॥

337
मी ज्या बोलिलों निगुती । संतकृपेच्या त्या युक्ती ॥१॥ येरवीं हें काय जाणें । प्रसादाचें करणें त्यांचिया ॥२॥ छायाचित्र नाचवितां । प्रकाशितां दिप त्यासी ॥३॥ निळा म्हणें माझे कर्म । जाणती वर्म ते संत ॥४॥

338
मी तों संतांचें पोसणें । देती समयीं तेंचि खाणें ॥१॥ अवघी चुकली जाचणी । उण्यापुयाची सोसणी ॥२॥ करुं सांगितलें काज । चिंता दवडूनियां लाज ॥३॥ निळा म्हणे फिटली खंती । जिणें मरणें त्यांचे हातीं ॥४॥

339
मी माझें पाहतां न देखेचि दिठी । आदि मध्य शेवटीं विचारितां ॥१॥ टवाळ हें मिथ्या अविदयेचें भान । चेईलिया स्वप्न जैसें होय ॥२॥ मृगजळनदी आभासला पूर । न भिजे उखर कोरडेंचि ॥३॥ निळा म्हणे कांति दिसे ते वाउगी । वेगळा उरगीं पासुनी त्या ॥४॥

340
मुख्य महाविष्णु चैतन्याचें मूळ । सांप्रदाय फळ तथोनियां ॥१॥ हंसरुपी ब्रम्हा उपदेशी श्रीहरी । चतुश्लोकी चारी भागवत ॥२॥ तें गुज विधाता सांगे नारदासी । नारदें व्यासासी उपदेशिलें ॥३॥ राघव चैतन्य केलें अनुष्ठान । त्यासी व्दैपायनें कृपा केली ॥४॥ कृपा करुनि हस्त ठेवियेला शिरीं । बोध तो अंतरी ठसावला ॥५॥ राघवा चरणीं केशव शरण । बाबाजीशीं पूर्ण कृपा त्याची ॥६॥ बाबाजीनें स्वप्नीं येऊनि तुक्याला । अनुग्रह दिला निज प्रीति ॥७॥ जगदगुरु तुका अवतार नामयाचा । संप्रदाय सकळांचा येथुनियां ॥८॥ निळा म्हणे मज उपदेश केला । संप्रदाय दिला सकळ जना ॥९॥

341
मृत्युची अवस्था नेणेंचि अमृत नेणेचि अमृत । पीडा भाग्यवंत दरिद्राची ॥१॥ तैसें तुम्ही नेणा आमुचे तळमळे । भोगितां सोहळे आपुलेचि ॥२॥ सिंधु काय जाणे तहानेचि बाधा । पयोनिधि क्षुघा कैसी असे ॥३॥ निळा म्हणे रवी न देखे अंधारें । उष्मा सुधाकारें कवणे काळीं ॥४॥

342
मोकलितां धाय । नाईकसी कैसी माय ॥१॥ सांडियले दूर देशीं । नये करुणा कांहीं ऐशी ॥२॥ वेष्टीलें श्वापदीं । अहंकार मोहमदीं ॥३॥ निळा म्हणे यावरी आई ॥ धांव घालीं वो विठाई ॥४॥

343
म्हणती कामारी । दास्य करी त्यांच्या व्दारीं ॥१॥ ऐसा भक्तांसीं भुलला । नाम गातां आतुडला ॥२॥ नेणें त्यांविण आणीक । शेषशायी वैकुंठलोक ॥३॥ निळा म्हणे नि:सीम भावें । भजले विके त्यांच्या नांवें ॥४॥

344
म्हणवूनि तुम्हा नित्य आठविती । या हो या हो म्हणती पांडुरंगा ॥१॥ तुम्हीं धांवोनियां येतां वरावरी । पुरवितां श्रीहरि आर्त त्यांचें ॥२॥ न साहे वियोग तुम्हां उभयतां । देवां आणि भक्तां एकवंकी ॥३॥ निळा म्हणे दोन्ही पिंड एक जीव । जाणती हा भाव निगमादिक ॥४॥

345
म्हणे मी येईन तुम्हांसवें । गावा न्यावें आपुलिया ॥१॥ ठाकेल ते करीन सेवा । माझा न करावा अव्हेर ॥२॥ राहेन तुमचिये संगतीं । सुख विश्रांती कारणें ॥३॥ निळा म्हणे येणें रुपा । तुमची कृपा देव म्हणे ॥४॥

346
यज्ञोपवित सांडिलें दुरी । शिखासूत्राची बोहरि । करूनियां मोहरी करीं । कांठी कांबळा गांजिवा ॥१॥ उफराटी दडदणी खोवली टिरी । सूक्ष्म शेंडी बोडक्यावरी । दृष्टि चोरूनियां माझारी । माजी गोवळांच्या नाचतो ॥२॥ येऊनियां कृष्णाजवळा । मुख पसरीं इच्छूनि कवळा । तंव हा दावूनियां आणिका गोवळां । मुखीं भरी स्वानंदें ॥३॥ सर्वांग देखणा श्रीहरी । व्यापक सकळांचें अंतरीं । ब्रह्मा पाडियला फेरी । नेदी शितबोटी आतळों ॥४॥ म्हणे ठाकूनियां घेऊं आला । कैसेनि अधिकारी तो झाला । नव्हे सोंगादिन मी दादुला । भला कोणाचा सांगाती ॥५॥ मग म्हणे वांकुल्या दावा यासी । न पवे भाग कृत्रिमवेषीं । तुह्मी सेवारे सावकाशी । आजिचिया सुखासी पार नाहीं ॥६॥ ऐसे जेविले सतस्त । बह्मा राहिला टोकत । निळा म्हणे हा हृद्‌गत । जाणे सकळां अंतरींचें ॥७॥

347
यशोदा म्हणे हे राजभगिनी । कां पां आलिसे धांवोनी । जाईल बाळका झडपोनी । कैसें करूं हे राक्षसी ॥१॥ बहुत उपचारेंसी पूजिली । पुतना सन्मानें बैसविली । मग ते म्हणे गे यशोदे भली । पुत्रवंती झालिसी ॥२॥ आणि नाहीं सांगोनियां धाडिलें । ऐसें निष्ठुरपण त्वां धरिलें । श्रवणी ऐकतांचि धांवोनी आलें । आनंदलें हदयांत ॥३॥ आणिली विचित्र बाळलेणीं । बाळंतविडाही तुजलागुनी । आणींगे तान्हुलें पाहों दे नयनीं । ऐकोनीं यशोदा मनीं गजबजिली ॥४॥ म्हणे कैसें तरी करूं ईसी । राजभगिनी हे राक्षसी । दिठाविल माझिया सुकुमारासी । दिठीची कठिण इयेची ॥५॥ मग म्हणे आतांचि न्हाणिलें । बाळक पालखीं निजविलें । हें ऐकतांचि नवल केलें । बाळक उठलें न राहेचि ॥६॥ निळा म्हणे पूतना येथें । रोषें बोले यशोदेतें । काय गे नष्टपण हें तूंतें । मिथ्याचि झकविशी मजलागीं ॥७॥

348
याचिया ध्यानें हें चराचर । अवघें तदाकार मज भासे ॥१॥ मही अंबु मारुत गगन । भासे हुताशन हाचि झाला ॥२॥ चंद्रसूर्य तारांगणे । सुरासुरागण मनुष्यादी ॥३॥ निळा म्हणे जनीं वनीं । हाचि भरोनि राहिला ॥४॥

349
यावरी कंस म्हणे दैत्यादिक । वधूनि येईल जो बाळका । त्यासी अर्ध राज्याची टीका । देईल छत्र सिंहासन ॥१॥ मग तृणावर्त धेनुकासुर । बग केशिया शकटासुर । अघासुर सर्प विखार । चालिले भार दैत्यांचे ॥२॥ कृष्णें ते ते संहारिलें । नवल अद्‌भुतचि वो केलें । निळा म्हणे आहे वर्णिलें । श्रीवेदव्यासें पुराणीं ॥३॥

350
यावरी कोणे एके दिवशीं । कृष्णें घेउनी सौंगडियांशी । आला यमुनेचे प्रदेशीं । तंव गाई खिल्लारे देखिलीं ॥१॥ तयामाजी अति चोखडें । वत्स गाईचे ते पाडे । त्याचे ऐसें धरूनी रूपडें । वत्सासुर तेथ उभा ॥२॥ कृष्ण म्हणेरे हो गडिही ऐका । एक एक वत्स धरा नेटका । मीही धरितों म्हणवूनि तंव कां । धांवला वत्सासूरावरी ॥३॥ तंव तो मायावी असुर । शिंगें पसरूनि पातला समोर । मागें करित लत्ताप्रहार । आडवाचि उडे हाणावया ॥४॥ गौळी करिताती हाहाकार । मारिला नंदकुमार । अचपळ हा नव्हेचि स्थिर । कासया वत्स धरूं गेला ॥५॥ याचिये वदनीं निघती ज्वाळ । नासापूटींहुनी धूम्रकल्लोळ । बरें नव्हे हा पातला काळ । प्राण घ्यावया प्रगटला ॥६॥ निळा म्हणे धरिला कर्णी । मुरगाळूनि पाडिला धरणीं । मुष्टीघातेंचि चक्रपाणी । मोक्षपदातें पाठवी त्या ॥७॥

351
यावरी म्हणे संवगडियांसी । वत्सें फांकलीरे चौपासीं । वळूनी आणा धांवा त्यासी । मग सावकाशीं बैसा सुखें ॥१॥ तंव ते म्हणती हो वनमाळी । आजीचि वळती तुमची पाळी । जाऊनियां तूंचि सांभाळीं । आम्ही निष्काम आजिचेनि ॥२॥ तुझिया शेषाची हे नवलाई । देहभाव आम्हां नुरेचि देहीं । जाणें येणें कैंचें काईं । राहिलो ठायीं निश्चळपणें ॥३॥ देव म्हणे हे पावले खुणे । गडी माझे झाले शहाणे । समाधी सर्वहि गुणें । काय चतुराननें कीजे यांचें ॥४॥ यांचिये संगतीं वत्सें धालीं । ब्रह्मसुखातें पावलीं । वियोगवार्ता नेणती भुली । निजस्थिती राहिली स्वरूपींची ॥५॥ ऐसें जाणोनियां श्रीपती । म्हणे मी जातों आजिचे वळती । तुम्ही निश्चळ रहा वृत्ती । कोणी सांगाती फांकोंनका ॥६॥ निळा म्हणे सांगोनि ऐसें । मोहरी पावा घेतला हर्षे । वादत करितांचि पूर्व दिशे । वत्सेंहि सांडूनि चालिला ॥७॥

352
येईल चित्तासी तें करा । तुम्ही आतां विश्वंभरा ॥१॥ आमुचें वायां गेलें जिणें । नांदा तुम्ही देवपणें ॥२॥ केली आम्ही तोंडपिटी । फजिती व्हावया शेवटीं ॥३॥ निळा म्हणे निजाभिमान । तुम्हीं सांडिला इमान ॥४॥

353
येईल चित्तासी तें तुम्हां उचित । आपुलें संचित भोगूं आम्ही ॥१॥ काय समर्थासी विनवावें रंकें । कोण त्याचें ऐके वचन तेथें ॥२॥ थोरा घरीं थोरा होतो बहुमान । कोण पुसे दीन याचकासी ॥३॥ निळा म्हणे आम्हीं मानिला विश्वास । तो दिसे निरास अवघी येथें ॥४॥

354
येऊनियां कृपावंतें । तुकयास्वामी सुदुरुनाथें ॥१॥ हात ठेविला मस्तकीं । देउनी प्रसाद केलें सुखी ॥२॥ माझी वाढविली मती । गुण वर्णावया स्फूर्ती ॥३॥ निळा म्हणे मी बोलता । दिसे परी हे त्याची सत्ता ॥४॥

355
येती जाती वर्षती मेघ । गगन तें अभंग जैसें तैसें ॥१॥ तैसींच ब्रम्हांडे अनेक होती जाती । स्वरुप तें अव्दैतीं अव्दैत ॥२॥ नाना नटिया नटवेष । परि तो आपणास भिन्न नव्हे ॥३॥ निळा म्हणे नानावस्त्राकार तंतु । दाउनी आपणांतु आपण ॥४॥

356
येरीकडे आनंद गोकुळीं । गोप उठोनि प्रातःकाळीं । मिळाले नंदाच्या राउळीं । करिती जागे श्रीकृष्णा ॥१॥ दसवंती म्हणे गोकुळांसी । निद्रित आहे हृषीकेशी । पुढें जा घेउनी गोधनासी । जाग झालिया येईल ॥२॥ काल बहुत श्रमला कृष्ण । वत्ससीं करितां संघटण । बळें वांचला सांगती जन । केलें मर्दन मग त्याचें ॥३॥ तेव्हां कळला तो असुर । हो‍उनी वत्स झाला क्रूर । कृष्णें ताडिती निशाचर एक योजन पडियेला ॥४॥ ऐकोनि म्हणती गोरक्षक । सत्वर पाठवीं यदुनायक । आम्ही जाती अवश्यक । पश्चिमे दिशेसी सांगावें ॥५॥ मग ते हांकूनियां खिल्लारें । सवेग चालिले एकाचि भारें । चौताळती गोधनें थोरें । आवेशेंसी धांवती ॥६॥ निळा म्हणे नेणती पुढें । अर्धे पसरिलें ते जाभाडें । तळीं महीवरी जेवढें । मेघमंडपापर्यंत ॥७॥

357
येरीकडे गोकुळाभीतरी । येतांचि परमात्मा श्रीहरी । विश्वकर्मा येऊनिया निमिषावरी । नगर श्रृंगारी कौतुकें ॥१॥ निजेलीचि असतां नारीकुमरें । श्रृंगारिलीं वस्त्रें अळंकारें । वृद्ध होताती ते निमासुरें । रूपें मंडित योजिलीं ॥२॥ धन कनक घरोघरीं । नाना धान्याचिया परी । सुख सोहळा वर्ते शरीरीं । पलंग सुपत्या न्याहालीया ॥३॥ नाना फळफळावळी । सुमनें वरुषती वृक्षातळीं । एकैक सुखाची नन्हाळी । वर्ते गोकुळीं निजानंदें ॥४॥ कामधेनु ऐशीं गुरें । नंदिनीचिया परीची वासुरें । प्रातःकाळीं देखती नारीनरें । परम विस्मयें दाटलीं ॥५॥ लक्ष्मी न समाय गोकुळांत । लेणीं लुगडीं अळंकारमंडित । धन संपत्ती नाहीं गणित । जेथें श्रीकांत वस्ती आला ॥६॥ निळा म्हणे सुखाची भरणी । गाई गोवळा आली गौळणी । सारस्वतें घोकिली तैशी वाणी । मधुर शब्दें अनुवादती ॥७॥

358
रत्‍नखचित पालख । सुर्या ऐसा निर्मियेला चोख । विरालंबी गोऊनि देख । मोहें उत्साह मांडियेला ॥१॥ महर्षि ऋषिही सकळिक । आले पहावया कवतुक । अवलोकूनियां यदुनायक । करिती प्राणें कुरवंडिया ॥२॥ आले गौळियांचे भार । नाना याति नारीनर । नानापरीचे श्रृंगार । लेणीं लुगडीं मिरविती ॥३॥ वाणें घेऊनियां नारी । रत्‍नजडितें तबकें करीं । देवांगना तैसियापरी । कृष्णवैभवें मंडिता ॥४॥ पालखीं घालितां चक्रपाणी । नाना आल्हादें गाती गाणीं । नाना स्वरें उमटल्या ध्वनी । उठती गगनीं पडिसाद ते ॥५॥ नामें ठेकूनियां पाचांरिती । गोविंदा गोपाळा यदुपति । सच्चिदानंद आनंदमूर्ती । जगपति श्रीपति अमरपिता ॥६॥ अच्युता अनंता अपारा । देवकीनंदना जगदोद्धारा । मुनिमनमोहना सर्वेश्वरा । आत्मया श्रीवरा सर्वगता ॥७॥ सुंदरा राजीवलोचना । जगदादीशा पंकजवदना । योगीमानसमनोरंजना । सुखनिधाना सुखमूर्ती ॥८॥ मधुमाधवा मधुसूदना । त्रिविक्रमा वामना संकर्षणा । मुकुंदा मंदार शेषशयना । राजीवाक्षा जनार्दन श्रीकृष्णा ॥९॥ निळा म्हणे ऐशिया नामें । गर्जती गौळणी सप्रेमा प्रेमें । ऐकोनियां ते पुरुषोत्तमें । केलिया संभ्रमें अति वाड ॥१०॥

359
राग आला तरी । माय बाळातें नाव्हेरी ॥१॥ राखे त्याची भूक तान । न मारी कापूनियां मान ॥२॥ शांतवुनी स्तनी । लावी तया न्याहाळुनी ॥३॥ निळा म्हणे धरी । अंकी तया माया करी ॥४॥

360
राहेन आतां तुमच्या संगें । हेंचि मागें भक्तांसी ॥१॥ हेंचि दया आतां उदारपणें । माझें करणें रुप नांव ॥२॥ विश्रांतीचें माझें घर । तुम्हीं जें शरीर धरिलें तें ॥३॥ निळा म्हणे भक्तांपाशीं । भाकी ऐशी कींव देव ॥४॥

361
रूप विक्राळ भयानक । चुंचु वाढिलें अधिकाधिक । पक्ष पसरोनियां अधोमुख । रक्तवर्ण द्विनेत्र ॥१॥ क्रोधें झगडतां कृष्ण शरीरीं । येरें पक्ष धरिलें करीं । उपटूनियां सांडी पृथ्वीवरी । अपार वातें उसळलें ॥२॥ लोक मिळाले भोंवतें । परी भिताती देखोनियां त्यातें । मग धरूनियां चंचूतें । दोन्ही फाळी करूं पाहें ॥३॥ अनंत हस्तांचा श्रीधर । काय ते काउळे किंकर । परी तो मायावी असुर । खग वोडणेंसी ठाकला ॥४॥ कृष्णें लत्ताप्रहरें त्यांसी । पाडियेलें तोंडघसी । धरूनियां निजकशीं । आपणासी ओढि येला ॥५॥ दक्षिणकरें मुष्टीप्रहरीं । हाणितलें त्या शिरावरी । मस्तक फुटतां मेंदूवरी । शोणित वाहे भडभडा ॥६॥ निळाम्हणे दीर्घपापी । कागरूपीया अति विकल्पी । परि हा परमात्मा पुण्यप्रतापी । मोक्षपदासी पाठविला ॥७॥

362
लाज वाटे जीव करी तळमळ । चिंते वक्षस्थळ व्यापियेलें ॥१॥ पडिलों निढळ न सुचेचि विचार । तुम्हीं तों निष्ठुर धरियेलें ॥२॥ कैसेनि भेटी होईल पायांसी । उघडल्या त्या राशी पापाचिया ॥३॥ काय नेणों पूर्वी केलें आचरण । तें आलें मोडोन फळभारें ॥४॥ नामाच्या चिंतनें नव्हे त्याची शांती । ऐशी काळगती विपरित ॥५॥ निळा म्हणे नेणें आपुलिया मती । परी तुम्ही श्रीपति सर्व जाणा ॥६॥

363
लाजविली सेवा लाजाविली भक्ति । वैराग्य विरक्ति लाजविली ॥१॥ ऐसाचि घडोनि आला हा प्रसंग । हांसविलें जग आपुल्या ब्रीदा ॥२॥ आमुचें होणार तेंचि वाढविलें । तुमचें कीर्ति आलें हीनपण ॥३॥ कैसे दीनानाथ म्हणवाल जी आतां । आम्हां उपोक्षितां अनाथांसी ॥४॥ शिणलों भागलों संसारें गांजिलों । म्हणोनियां आलों शरण तुम्हां ॥५॥ निळा म्हणे काय जाणोनि नेणते । झालेति यशातें दवडूनियां ॥६॥

364
लाटिक्या भूताची लटिकी भूतबाधा । झाली करवी खेदा जाणतिया ॥१॥ तैसें तुम्हां केलें माझिया संचितें । देवपणहि थितें ही रचिलें ॥२॥ लटिकीचि जळीं दाऊनियां छाया । झकविलें राया श्वापदाच्या ॥३॥ निळा म्हणे स्वप्नीं सिहांचें रुपडें । देखोनियां पडे मदोन्मत्त ॥४॥

365
लाभ अथवा हानी करितां व्यवसाय । आम्हां कते विपाय फळां आले ॥१॥ एका लाभा पात्र केलें तिहीं लोकीं । आम्हां नेलेंशेखीं ऐशा थरा ॥२॥ फजितीसी उणें नाहीं लोकांमाजी । अंतरविलें काजीं संसारिकां ॥३॥ नव्हता कळों आला निश्च्‍याचा भावो । येणें काळें देवो निष्ठुरसा ॥४॥ गेलें होऊनियां न चले या युक्ति । होणार ते गती हो कां सुखें ॥५॥ निळा म्हणे लाजे झाली प्राणसंधी । न ये करुणानिधी कृपा तुम्हां ॥६॥

366
लेवविले अळंकार केलें थोर वाढवुनी ॥१॥ आपुली दृष्टी निववितां । मी तो नेणतां लळेवाड ॥२॥ गोड घांस मुखीं भरा। जेविता पाचारा आवडी ॥३॥ निळा म्हणे शिकवा बोलों । पुढें चालों आपणा ॥४॥

367
लोंढा आला सात्विकचा । पूर अदभूत या प्रेमाचा ॥१॥ तेणें लागती वोसाणें । स्वानंदचि नामस्मरणें ॥२॥ मनोमीन तळपताती । गोड अर्थातें कवळिती ॥३॥ निळा म्हणे उभय तीरें । श्रोते वक्ते निर्मळ नीरें ॥४॥

368
लोभियानें धन केलें भूमिगत । दगडही थित घालूनी वरी ॥१॥ तैसे तुम्हीं देवा केलें आपणांसी । कळंक यशासी लावियला ॥२॥ बुडविलें राज्य रायें सुरापानें । नसतां सावधान राज्यकार्या ॥३॥ निळा म्हणे आळसें बुडविला संसार । न गमतां व्यवहार साउकारें ॥४॥

369
वत्सें वत्सप वनांतरीं । माजी परमात्मा श्रीहरी । खेळतां खेळ नानापरी । पुढें धेनुक देखिला ॥१॥ सांगता अंगींची बरव । मृणालिके ऐसी लव । शृंगें सुवर्णाची ठेव । रत्‍नापरी नयन दोन्ही ॥२॥ कर्ण जैसीं केंतकी दळें । अती राजस पादतळें । खुर शोभति रातोत्पळें । जेवीं जडूनि ठेविलीं ॥३॥ चारी चरण कर्दळीस्तंभ । हृदयावकाशीं सूक्ष्म नभ । पाठीवरी त्रिवेणी भांब । पुच्छ स्वयंभ शेषफणी ॥४॥ कांबळी लोबें कंठातळीं । विद्युतप्राय टिळकू भाळीं । वोसंड लवथवित मांस मोळीं । देखतां नव्हाळी डोळियां ॥५॥ गोंवळ म्हणती कृष्णा पाहें । नवल वृषभ आला आहे । चुकारिचाचि नवल नाहे । न्यावा धरुनि मंदिरा ॥६॥ निळा म्हणे ऐकोनि हरी । दृष्टी घालोनियां सामोरी । म्हणे धेनुक हा निर्धारी । आलासे मुक्ति मागावया ॥७॥

370
वसुदेव देवकिचिये उदरीं । कृष्ण जन्मले मथुरेभितरीं । कंसाचिये बंदिशाळे माझारीं । श्रावन कृष्णाष्टमीं मध्यरात्री ॥१॥ अयोनिसंभव चतुर्भुज । शंख चक्र गदांबुज । चहुं करीं आयुधें सुतेज । मुगुट कुंडलें वनमाळा ॥२॥ कासे पीतांबर कसिला । कंठीं कौस्तुभ तेजागळा । श्रीवत्सलांछन शोभला । माजीं मेखळा जडिताची ॥३॥ मस्तकीं मुगुट रत्‍नखेवणी । रत्‍नमय कुंडलें उभय कर्णी । देखोनियां देवकी नयनीं । म्हणे या कैसेनि आच्छादूं ॥४॥ देखतां वसुदेवहि विस्मित । म्हणे बाळ नव्हे हा जगन्नाथ । सायुधें भूषणें घवघवित । तेजःपुंज निजात्मा ॥५॥ देवकी लागोनियां पायांशीं । म्हणे गोकुलां नेऊनि लपवा यासी । विदित झालिया रायासी । नेदी वांचो य बाळका ॥६॥ निळा म्हणे ऐसी चिंता । आकुळनी ठेला तया उभयतां । हें देखोनिया कृष्णनाथा । कळों सरलें हृद्गत ॥७॥

371
वांयां संतांची ही बोली । वचनें त्यांचीं लाजविलीं ॥१॥ लटिकाचि केला कीर्तिघोष । येथें तो अवघीच निरास ॥२॥ माझाचि मज अनुभव झाला । नाहीं सावाधांवा केला ॥३॥ निळा म्हणे पालट बुध्दि । दिसे तुमची कृपानिधी ॥४॥

372
विनंती माझी एकीं ऐका । अहो पुंडलिका महामुनी ॥१॥ ठाव दयावा चरणांपाशीं । मज विठोबासी विनवुनी ॥२॥ अंगिकारा रंका दीना । विज्ञापना हे माझी ॥३॥ निळा म्हणे सांभाळावें । मज हें दयावें वरदान ॥४॥

373
विश्व अवघें मायाभास । माया ब्रहमीं नाहींची मोस ॥१॥ जेविं वन्हि सूर्यकांतीं । प्रगटतां कीर्ण त्या नेणति ॥२॥ शुक्तिका प्रसवें मुक्ताफळ । जळींचें परि त्या नेणेचि जळ ॥३॥ निळा म्हणे धूम्री वन्हीं । नाहींचि तयातें प्रसवोनी ॥४॥

374
वैराग्याचा मेरु तो गोरा कुंभार । तोडियले कर आणेसाठीं ॥१॥ महाव्दारीं कथा श्रवण करितां । टाळी वाजवितां निघती नवे ॥२॥ तुम्ही देवा कृपादृष्टी अवलोकिला । ह्रदयीं तो धरिला प्रीतिकरीं ॥३॥ निळा म्हणे तुम्हां दासाचा अभिमान । अवतार म्हणूवन धरणें लागे ॥४॥

375
व्दारकेचि मूर्ती एकनाथा घरी । पाणी वाहे हरि कावडीने ॥१॥ श्रीखंडया चंदन उगाळूनि करी । वस्त्र गंगातीरी धूत असे ॥२॥ सेवेसी तत्पर उभा ठायी ठायी । देवपूजेसमयी तिष्ठतसे ॥३॥ निळा म्हणे देव रावे ज्याचे घरी । दत्तचोपदारी करितसे ॥४॥

376
शिंपी सोनार चांभार । ब्रम्हणादि नारी नर ॥१॥ हरीच्या कीर्तनें हरीचे भक्त । होऊनि ठेले जीवन्मुक्त ॥२॥ सुतार कुंभार यवन । अंत्यजादी हीन जन ॥३॥ निळा म्हणे क्षेत्री शूद्र । वैश्यहि पावले मुक्तिपद ॥४॥

377
शृंगे पसरिले जैसे शूळ । नेत्रींहूनि निघती ज्वाळ । श्वास रंघ्‍रीं धूम्रकल्लोळा । डरकिया अंतराळ दुमदुमितो ॥१॥ मागें सरे पुढें धांवे । आडवाचे उडे उंच उंचावे । ऐशीं दावूनियां लाघवें । हरिसन्निध पातला ॥२॥ देव हाणे मुष्टी घातें । तेणें आर्डाय दुखवोनि तेथें । सवेंचि सरसावोनियां वरिते । उपसों धांवे गोविंदा ॥३॥ दोघां मांडलें महार्णव । दाविती बळ प्रौढीगौरव । मग धेनुकें करूनियां माव । कृष्णातळीं संचरला ॥४॥ येरें रगडूनि तेथेंचि धरिला । दोहीं शिंगीं हाता घातला । मग ते उपटुनी त्राहाटिला । निघात घातें खडकावरी ॥५॥ ऐसा करूनियां शतचूर्ण । रक्त मांस त्वचा भिन्न । अस्थि तिळप्राय होऊन । गेल्या उडोनि दाहीदिशा ॥६॥ निळा म्हणे ऐशियापरी । धेनुका मुक्तीची शिदोरी । देऊनि पाठविला श्रीहरी । आपुलिया निजधामा सुखवस्ती ॥७॥

378
शोकार्णवीं पडलें मन । तुमचें न देखोन स्वागत ॥१॥ उदासीन धरिलें देवा । तुम्ही बांधवा दीनांच्या ॥२॥ माझेंचि कर्म बलवोत्तर । नेघा समाचार म्हणोनी ॥३॥ निळा म्हणे पडलों सांदीं । संसारबंदी न सुटेची ॥४॥

379
श्रवण कथेचें सादर । करिती नर सभाग्य ते ॥१॥ सुख पावोनियां विश्रांती । मोक्षपदां जाती सुखरुप ॥२॥ अगाध महिमा भगवदगुणीं । संत पुराणीं गर्जती ॥३॥ निळा म्हणे हरिचें नाम । सकळां भस्म करी पापा ॥४॥

380
श्रीकृष्ण सांडूनि जातांचि दुरीं । वसुदेवातें दैन्य अवदसा वरी । मग देवकीजवळी देतां ते कुमरी । महाआक्रोशें गर्जिन्नली ॥१॥ ऐकूनि कंस भयचकित । असुरसैन्यक भयें कांपत । सेवक धांवोनि रायातें म्हणत । जन्मला सूत देवकीये ॥२॥ म्हणे हा आमुच्या वंशा । निर्दाळील निश्चयें आठवा ॥३॥ घेऊनियां मग निशाचरभारा । आला बंदिशाळे सत्वरा । सावध करिताती येरयेरां । म्हणती विकळ जाऊं नका ॥४॥ भयभीत देवकीतें हांकारी । म्हणें आठवा आणी वो बाहेरी । येरी करुणा भाकूनियां भारी । विनवी येवढें तरी वांचवा ॥५॥ ऐसे बोलोनियां सुंदरी । आणोनि दिधली कंसा करीं । येरु पाहे तंव ते कुमारी । म्हणे आठवा लपविला ॥६॥ तोहि आणोनिया देईं । येरी म्हणे दुसरें नाहीं । झाडा घेरूनियां पाहीं । आण तुझीचि वाहतसे ॥७॥ येरु म्हणे ईतें सोडूं । मग तयाचीहि सूड काढूं । निळा म्हणे गर्वारुढू । नेणे मंदाध हरि महिमा ॥८॥

381
श्रीहरिच्या संकीर्तनें । तुटलीं बंधनें बहुतांची ॥१॥ होऊनियां उपरती । राजा परीक्षिती उध्दरला ॥२॥ कीर्तनें नारद मुक्त शुक । आणि सनकादिक प्रल्हाद ॥३॥ निळा म्हणे हरीची कथा । एकात्मता देवाभक्तां ॥४॥

382
संतवचनें खरीं होतीं । वाढेल जगीं तुमची कीर्ति ॥१॥ जरी माझे समाधान । कराल देउनी आलिंगन ॥२॥ नाहीं तुम्हां जाणें येणें । कांहीं कोठूनियां धांवणें ॥३॥ निळा म्हणे विश्वंभरा । प्रकटा ह्रदयीं वास करा ॥४॥

383
संतापाशीं आर्त याचें । सांगे जिवीचें निज गुज ॥१॥ उपदेशिला चतुरानन । तेंचि ब्रम्हज्ञान अनुवादें ॥२॥ उध्दवा आणि अर्जुनासी । सांगितलें संतांसी तें देत ॥३॥ निळा म्हणे भुलला भक्ति । वाढवी प्रीति यालागीं ॥४॥

384
संतोषतरुचें हें फळ । आलें रसाळ पक्कदशे ॥१॥ सेविती ते तृप्त होती । ब्रम्हता पावती सनातन ॥२॥ रुची ऐसें आवडे तया । विरक्ता संसारिया सुखदाते ॥३॥ निळा म्हणे श्रवणपुटीं । लावितांचि पुष्टीकारक ॥४॥

385
सकल संतांचा हा राजा । स्वामी एकनाथ माझा ॥१॥ ज्यांचे घेताचि दरुषण । पुन्हा नाही जन्म मरण ॥२॥ ज्यांचे वचिता भागवत । प्राणी होय जीवनमुक्त ॥३॥ निळा म्हणे लीन व्हावे । शरण एकनाथा जावे ॥४॥

386
सगुण निर्गुण कल्पनेचा भास । वस्तु अविनाश व्यापकत्वें ॥१॥ स्वानुभवें पाहीं लटिकें साच नाहीं । परिपूर्ण अवघाही आत्माराम ॥२॥ आपलाचि सादु अंतराळीं जेवीं । दुजेंवीण दावी दुजेंपण ॥३॥ लटिकें म्हणों जातां साच तया पोटीं । दर्पणींची भेटी आपणासवें ॥४॥ स्वप्नमाजी जेवीं नाना परिवार । प्रबोधीं साचार एकलाचि ॥५॥ निळा म्हणे रज्जू भासे सर्पपणें । झकविलें तेणें नेणतीया ॥६॥

387
सत्य भोळा देव कृपेचा सागर । न मोडी उत्तर संतआज्ञा ॥१॥ भाविकाची सेवा न म्हणे फार थोडी । स्वीकारी आवडी आपुलिये ॥२॥ अनन्य प्रीतीचें तुळसीपत्र जळ । मानी सर्वकाळ तृप्ती तेणें ॥३॥ निळा म्हणे त्याचा करी बहुमान । अनाथ म्हणऊन सांभाळी त्या ॥४॥

388
सदगदित झाले कंठ । नेत्री अश्रु चालती लोट ॥१॥ एकचि परि देवा भक्तां । बाधी वियोगाची व्यथा ॥२॥ देव स्फुंदे भक्त रडे । एक पाहति एकाकडे ॥३॥ निळा म्हणे न सुटे मिठी । येरेयेरां पडली गांठी ॥४॥

389
सदा सेवकांचा लाड । पुरवा करुनियां कोड ॥१॥ जेंवि कृपावंत माय । तान्हयाच्या धणी धाय ॥२॥ खाववा जेवव । लेणी लुगडींहि त्या पुरवा ॥३॥ निळा म्हणे दिवानिशीं । नेणा विसंबों तयासीं ॥४॥

390
सनकादिक म्हणती देवा । भुललेति भावा भक्तांच्या ॥१॥ तरी जे येथें दर्शना येती । दयावी त्यां मुक्ति सायुज्यता ॥२॥ देव म्हणती बहुत बरें । करुं आदरें मान त्यांचा ॥३॥ निळा म्हणे ऐशी मात । ऐकिली सादयंत संतमुखें ॥४॥

391
समोर सदा संर्वाकडे । मागें पुढें वेष्टीत ॥१॥ कां हो नेणों हरी ऐसा । जैसा तैसा परिपूर्ण ॥२॥ उदका अंगी जैसा रसु । गगनीं अवकाशु घनदाट ॥३॥ निळा म्हणे अंतर्बाह्य । त्याविण आहे कोण दुजें ॥४॥

392
सर्वकाळ खंती वाटे । कैं तो भेटे मज आतां ॥१॥ न लोटे पळ युगा ऐसें । रात्री दिवसें सम झालीं ॥२॥ करुणामुखें भाकी कींव । ये वो ये वो म्हणउनी ॥३॥ निळा म्हणे जाणवा मात । तुम्ही संत एकांती ॥४॥

393
सर्वांमाजी गगन आहे । परि धरितांचि नये काय करुं ॥१॥ तैसें नाकळेचि तें शंब्दातें । जेविं खदयोतें रवीभेटी ॥२॥ सागरीं पडतांचि लवणकण । निवडितां भिन्न न निवडे ॥३॥ निळा म्हणे तैशा परी । बोलतांचि वैखरी लीन तेथें ॥४॥

394
सर्वी असतां सर्वपणें । मी हें म्हणे अविदया गुणें ॥१॥ पाहातां आधीं अविदया‍चि वावो । तेथें मीपणाचा कैंचा ठावो ॥२॥ मीहि नाहीं तूंहि नाहीं । येकीं येकत्व नुपसें पाही ॥३॥ निळा म्हणे नहोनी कांहीं । नसोन असे आपुला ठांई ॥४॥

395
सहजचि तुमचीं वंदिली पाऊलें । तवं मी माझें हें हिरोनि घेतलें ॥१॥ आतां कोण दर्शना येईल सांगा । स्वभाव कळल्यावरी तुमचा पांडुरंगा ॥२॥ हें काय तुम्हांसी बोलिलें विहीत । चोरोनियां घ्यावें आमुचें संचित ॥३॥ प्रारब्धें भोग जे दयावयासी येती । अभिलाषूनि तेहि भोगितां श्रीपती ॥४॥ आतां क्रियमाण संग्रह जो करावा । तोही वरिच्यावरी तुम्हांचि हरावा ॥५॥ अवघेंचि आमुचें घेऊनियां अंतीं । जीवभाव तेहि बुडवावें पुढती ॥६॥ निळा म्हणे सर्वस्वें उघडाच केला । तुमचिये संगतीं दैव हा लाधला ॥७॥

396
सांगो जातां न कळे वाचा । महिमा कथेचा अपार ॥१॥ श्रवणें पठणें हरिची कीर्ती । नाना याति उध्दारल्या ॥२॥ चतुष्पदें श्वानसूकरें । श्रवणवदारें मुक्ति त्यां ॥३॥ निळा म्हणे कीटक पक्षां । कीर्तनें वृक्षा हरिप्राप्ती ॥४॥

397
सांडियलें बाळा । कैसी निष्ठुर वेल्हाळा ॥१॥ ऐसीं बोलतील सकळें । नारी नर हांसती बाळें ॥२॥ माय नव्हे म्हणती लांव । ऐसें उपहासिती सर्व ॥३॥ निळा म्हणें सर्व जनीं । ऐसी होईल टेहणी ॥४॥

398
सांडूनि गुणदोषांची मात । करावा संघात संतांचा ॥१॥ साधकां हे सुगम वाट । वस्ती वैकुंठ पावावया ॥२॥ नित्य करितां हरीचीं कथा । दोषा दुरिता संहार ॥३॥ निळा म्हणे धरिल्या चित्तीं । भाविकां लाभती स्वानुभाव ॥४॥

399
सुखें भिक्षा मागोन खावें । हरीचें करावें कीर्तन ॥१॥ कलियुगीं हें साधन सार । भवसिंधू पार पाववितं ॥२॥ नेघोनियां गुणदोष । करावें घोष हरिनामें ॥३॥ निळा म्हणे सुगम सिध्दी । तुटती उपाधी सकळही ॥४॥

400
सेवेलागीं सेवक जालों । तुमच्या लागलों निज चरणा ॥१॥ अहो स्वामी तुकयादेवा । यावरी न करावा अव्हेर ॥२॥ सहज लीळे उदकीं वह्या । तुम्ही रक्षिलीया निजसत्तें ॥३॥ निळा म्हणे धराल हातीं । तरी दयाल मति निरुपम ॥४॥

401
सोंवळया नांव क्षीरसागर । वृथाचि मांजर गाजरीं ॥१॥ काय तैसी तें वायाणें । लटिकीं भूषणें मिरविती ॥२॥ शुभा नांवे विकती शेणी । मृगजळ पाणी काय खरें ॥३॥ निळा म्हणे पाखांड करिती । जगीं म्हणविती गोसावी ॥४॥

402
सोडुनी तया न वचे दुरी । त्यांचा करी प्रतिपक्ष ॥१॥ म्हणे मी त्यांचा तेही माझे । नव्हती दुजे कल्पांतीं ॥२॥ मी तूं म्हणतां वेगळे न हों । मुळींचे आहों एकाएकीं ॥३। निळा म्हणे देवभक्तां । एकात्मता ठायींची ॥४॥

403
सोनें असे सोनेपणें । अलंकार लेणें होय जाय ॥१॥ तैसें चराचर होतां जातां । वस्तु अखंडता अखंड ॥२॥ नाना मृगजळ दिसे भासे । भूमिका ते असे कोरडीच ॥३॥ निळा म्हणे घटमठ मोडी । अवकाश परवडी नाहीं तया ॥४॥

404
सोयरा श्रीहरी । आत्मा एक चराचरीं ॥१॥ नाहीं तया आपपर । वसवी सकळांचे अंतर ॥२॥ देवां दानवां मानवां । स्थूळ सूक्ष्मादिकां सर्वां ॥३॥ निळा म्हणे जीवमात्रीं । व्यापकपणें तोचि धात्री ॥४॥

405
सोहळा तो देखोनियां । लागती पाया मोक्ष मुक्ति ॥१॥ जये रंगीं नाचे हरी । कीर्तनगजरीं सत्संगें ॥२॥ तेथें कोण पाड येरा । साधनसंभारा तर्कवादा ॥३॥ निळा म्हणे योगायाग । ठाकती मृग आरोगुनी ॥४॥

406
स्थिरावल्या वृत्ती पांगुळला प्राण । अंतरिची खूण पावोनियां ॥१॥ पुंजाळले नेत्र जाले अर्धोन्मिलित । कंठ सद्रदित रोमांच आले ॥२॥ चित्त चाकाटलें स्वरुपामाझारीं । न निघे बाहेरि सुखावलें ॥३॥ सुनीळ प्रकाशें उदेजला दिन । अमृताचें पान जीवनकळा ॥४॥ शशीसूर्या जाली जीवें ओंवाळणी । आनंदा दाटणी आनंदाची ॥५॥ निळा सुखासनीं प्रेमेसी डुल्लत । विराजला निश्चित निश्चिंतीनें ॥६॥

407
स्नेह सरतां जैसा दीप । सूक्ष्म होतचि हारप । तयापरी बाईचें स्वरूप । तेणें शोषूनि घेतलें ॥१॥ नाहीं उरविलें शरीर । अवघेंचि केले निराकार । ऐसें देखोनियां सत्वर । आम्ही निघालों तेथुनी ॥२॥ राया त्याची भेटी गोष्टी । न व्हावी तुम्हांसी शेवटीं । अकस्मात् झालिया राहाटी । करील पूतनाबाई सारिखी ॥३॥ ऐसें ऐकतांचि श्रवणीं । राजा पडे मूर्छीत धरणीं । म्हणे गेली गेलीरे मायबहिणी । माझी पूतनेसारिखी ॥४॥ महाबळें अति उत्कंठ । मंत्रियांमाजी परमश्रेष्ठ । आतां कायसी पाहों वाट । गेली नये त्या निरपंथें ॥५॥ मग रायातें संबोधून । प्रधान आणि नागारीक जन । म्हणती नव्हे भलें हें महा विघ्न । उदेलें देखत देखत ॥६॥ निळा म्हणे याहीवरी । श्रीहरीचरित्राची थोरी । अधिकें अधिक ते कुसरी । परिसावी सज्जनीं सादर ॥७॥

408
स्वामी एक म्हणवी दास । आवडीस रुप केलें ॥१॥ मुळींचे दोघां एकपण । परीं हें भिन्न्‍ दाखविलें ॥२॥ एक म्हणे धांवा धांवा । एक कुडावा करी त्याचा ॥३॥ निळा म्हणे नवल वाटे । साने मोठे नव्हती हे ॥४॥

409
हरीची कथा अमृतरस । गोड ग्रास नामावळी ॥१॥ तेणें करुं सर्वदा तृप्ती । क्षुघे निवृत्ती तृषेची ॥२॥ अजर अमर होते काया । अविदया माया निरसोनी ॥३॥ निळा म्हणे कीर्तनीं सिध्दी । लाभे समाधी हरिभक्तां ॥४॥

410
हरीचें मनोहर कीर्तन । हेंचि साधन कलियुगीं ॥१॥ नको आणिकां मतांतरी । पडो भवसागरीं वहावसी ॥२॥ निश्चयाचें उत्तर हेंचि । करावी हरीची हरीभक्ती ॥३॥ निळा म्हणे ऐसें कानीं । सांगितले येऊनि गुरुदेवें ॥४॥

411
हरीच्या भजनें हरीचे भक्त हरीचे भक्त । झाले विख्यात भूमंडळीं ॥१॥ तरोनि आपण तारिले आणिका । वैकुंठनायका प्रिय झाले ॥२॥ ज्यांचे ध्यानी मनीं हरी । राहिला निरंतरीं दृष्टीपुढें ॥३॥ निळा म्हणे अवघेचि सांग । केले उभय भोग भोगुनियां ॥४॥

412
हरुनियां घ्यावें चित्त । आवघेंचि वित्त धन माझें ॥१॥ हें तों नव्हे उचित तुम्हां । पुरुषेत्तमा विचारा ॥२॥ दर्शनाचें हेंचि फळ । सोडावें निढळ करुनियां ॥३॥ निळा म्हणे हाईल टीका । माजीं या लोका तुमचीच ॥४॥

413
हातीं घेतला चितांक । दिठी न दिेसेंची कनक ॥१॥ तैसा देव पाहों जातां । विश्वाभासुचि भोंवतां ॥२॥ न दिसेचि दोरा । माजी लपांला अंबरा ॥३॥ निळा म्हणे मारा । ठेल्या लपवूनियां नीरा ॥४॥

414
हातीं चक्र सुदर्शन । वागवितां न मनीं त्याचा शीण । आपुल्या भक्तांचे रक्षण । आणि निर्दाळण अरीवर्गा ॥१॥ भक्तस्तवनीं ठेविेले कान । भक्तांपाशीं जीवप्राण । भक्तांकडे लाविलें मन । कोणीं गांजिलें यासाठीं ॥२॥ नेणे भक्तांविण आणिक । करी दास्य होउनी सेवक । त्यांचे वचनाचें कौतुक । श्रवणीं मिरची भूषणें ॥३॥ भक्त पाहनि वाडेंकोडे । होऊनि ठाके तेचि पुढें । भक्त वनिती जे पवाडे । ऐके निवाडे बैसोनी ॥४॥ त्यांचि वचनें स्तवनमाळा । आवडी मिरवी आपुल्या गळां । त्यासि अवलोकितां डोळां । झाला देखण सर्वांगे ॥५॥ भक्तांच्या नामें नामांकित । त्यांचिया क्रिया कर्मे करित । त्यांचिया रुपें रुपमंडित । झाला भगवंत भक्तसुखें ॥६॥ निळा म्हणे भक्तांचिसाठीं । नाना स्वरुपें नटला नटीं । नाना अवतार त्यांचिये संकटी । नाना नामें धरियेलीं ॥७॥

415
हिशोबी हिशोब अवघाचि मिळाला । सूर्य उदय झाला अंतरदृष्टी ॥१॥ देऊनियां गांठ लाविलें कपाट । साधिलें अचाट गुरुसेवा ॥२॥ ठेऊनियां हात स्वयें ब्रम्ह केले । नाहीं तें उरलें मी तूं पण ॥३॥ निळा म्हणे ऐसा गुरुकृपेचा कोंवळा । डोळियांचा डोळा दाखविला ॥४॥

416
हें देखोनियां गोवळ । आले धावोनियां सकळ । कृष्णासी म्हणती युद्ध बळ । केलें तुवां वृषभेंसी ॥१॥ आम्हीं देखिलें दुरोनी । होतों डोंगरीं बसोनि । तो बैल आम्हांलागुनी । कृष्णा कोण तो सांग पा ॥२॥ येरु म्हणे तो असुर । तुम्हां भासला होता ढोर । कंसरायाचा तो हेर । जाता वधुनी सकाळांतें ॥३॥ ऐसा जाणोनियां निभ्रांता । शांति पावविला तो आतां । तुम्ही भयातें न धरितां । सुखें विचरा मत्संगें ॥४॥ माझिये भजनीं जे राहाती । त्यांचिया विघ्नाची शांती । करूनिया सुखविश्रांती । तया अर्पी सर्व सिद्धी ॥५॥ ऐसें ऐकोनियां हरिवचन । संतोषले सकळही जन । मग नमस्कारूनियां उभय चरण । गोकुळांप्रती चालिले ॥६॥ निळा म्हणे सांगती वडिलां । वनीं वर्तमान जो देखिला । धेनुकासुर तो निपातिला । आजीं कृष्णें युद्धसंधीं ॥७॥

417
हो तुम्ही कृपावंता । किती आतां विनवावें ॥१॥ न दयाचि कांही प्रत्युतर । ऐसे निष्ठुर केवि तरी ॥२॥ नेणों दासाचा त्रास आला । दिसे मांडिला अव्हेर ॥३॥ काय करुणाचि हारविली । विपरीत झाली दशा दिसे ॥४॥ निळा म्हणे म्हातारपण । आलें दारुण नुठवेसें ॥५॥

418
होतें तैसें पांई केलें निवेदन । अंतरलों दीन बहुत होतों ॥१॥ संबोखून केले समाधान चित्ता । वोगरुनि भाता प्रेमरस ॥२॥ नामरत्नमणी करुनि भूषण । अळंकारीं मंडण माळा दिली ॥३॥ निळा तेणें सुखें झाला निरामय । नामीं नाम सोये निमग्नता ॥४॥

Labels

Followers