संत भानुदास

Sant Bhanudas abhang

अगा पंढरिनाथा ऐसें काय केलें । मज उपक्षिलें अनाथासी ॥१॥ त्रैलोक्याचे ठायी मज नसे कोणीं । ऐसें चक्रपाणी ठावें तुज ॥२॥ कोणाचे आधारे असावें म्यां येथें । जन्मविलें व्यर्थ कां गा मज ॥३॥ आम्हांसी क्लेशांत बहु पाडियेलें । काय हातां आलें तुझ्या देवा ॥४॥ आमुच्या मनीचे अर्थ करितां पूर्ण । भानुदास म्हणे जाण दुजा कोण ॥५॥

अद्वय आनंद तो हा परमानंद । शोबहे सच्चिदानंद विटेवरी ॥१॥ सांवळें रूपडें गुणा आगोचर । उभा कटीं ठेऊनी विटे ॥२॥ पीतांबर परिधान चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती ॥३॥ भानुदास म्हणे ब्रह्मा अगोचर । नेणवे विचार ब्रह्मादिकां ॥४॥

अधोगती आम्हीं जावें पंढरीनाथा । ऐसें तुझ्या चित्ता आलें काय ॥१॥ पडिलों पदरीं अन्यायी अन्यायी मी दीन । नेई सांभळुन कैसें तरी ॥२॥ मज अनाथाची परिसावी विनंती भानुदास स्तुति करीतसे ॥३॥

अनाथाचा नाथ भक्तांचा कैवारी । ऐसें चराचरी ब्रीद गाजे ॥१॥ तें आम्हां सांपडले सोपें वर्म हातां । म्होणोनि अच्युता बोलतसों ॥२॥ आम्हीं पतितांनीं घालावें सांकडें । उगवणें कोडें तुमचें हातीं ॥३॥ भानुदास विनवी चरणीं ठेवुनि माथा । सांभाळी अनाथनाथा आम्हांलागीं ॥४॥

अनादि परब्रह्मा जें कां निजधाम । तें ही मूर्तिं मेघः श्याम विटेवरी ॥१॥ जें दुर्लभ तिहिं लोकां न कळे ब्रह्मादिकां । तपें पुंडलिका जोड़लेंसे ॥२॥ जयातें पहातं श्रुती परतल्या नेति नेति । ती हे परब्रह्मा मूर्तिं विटेवरी ॥३॥ वेदं मौन्य पड़े श्रुतीसी सांकड़े । वर्णितां कुवाड़ें पुरणांसी ॥४॥ ज्ञानियांचें ज्ञान मुनीजनांचे ध्यान । ते परब्रह्मा निधान विटेवरी ॥५॥ पुंडलिकाचे तपें जोडलासे ठेवा । भानुदास देवा सेवा मागे ॥६॥

अवघ्या सोडियेल्या मोटा । आजीचा दहिंकाला गोमट ॥१॥ घ्या रे घ्या रे दहींभात । आम्हां देतो पंढरीनाथ ॥२॥ मुदा घेऊनियां करीं पेंद्या वांटितो शिदोरी ॥३॥ भानुदास गीतीं गात । प्रसाद देतो पंढरीनाथ ॥४॥

अवतारादिक जाले कर्मभूमीं आले । विश्व जनीं दोखिलें आपुले डोळां ॥१॥ देखिल्या स्वरुपा नुद्धरे काय जन । तें काय म्हणोन सांगों स्वामीं ॥२॥ उद्धरत काय नहीं आत्मज्ञान । देखिलें तें जाण सर्व वाव ॥३॥ वाव म्हणों तरी कोंदलें स्वरुप । लावलिया माप मोजवेना ॥४॥ देखत देखत वेडावल जन । रूप डोळेवीन पाहूं जाती ॥५॥ भानुदास म्हणे सदगुरुच्या लोभें । आहेचि तें उभें विटेवरी ॥६॥

अहो पांडुरंग पतीतपावना । आमुची विज्ञापना एक असे ॥१॥ नामाचा उच्चार संताचा सांगात । पुरवावा हेत जन्मोजन्मीं ॥२॥ भलतीये याती भलतीये कुळीं । जन्म दे निर्धारी देवराया ॥३॥ भानुदास म्हणे दुजा नको धंदा । रात्रंदिवस गोविंदा वाचे नाम ॥४॥

अहो श्रीराम पतीतपावना । तारी मज दीना रंकपणें ॥१॥ गाजे त्रिभुवनीं उदार ती ख्याती । वेदही वर्णिती महिमा तुझा ॥२॥ भानुदास म्हणे श्रीराम दयाळ । पाळा बरवा लळा उदारपणें ॥३॥
१०
आगम निगमांचे स्थान । सर्वां हेंचि प्रमाण । मुनिजनांचे ध्यान । ती ही मूर्ति विटेवरी ॥१॥ धन्य धन्य पंढरपुर । सर्व तिर्थांचे माहेर । जडजीवा उद्धार । पांडुरंग पाहतांची ॥२॥ उत्तम तीर्थ चंद्रभागा । स्नान करितां दोषभंगा । मध्ये पुंडलीक उभा । दारुशनें तारीं जगत्र ॥३॥ भानुदास विनंती करी । प्रेमें नाचा महाद्वारीं । विठ्ठल डोळेभरी । पाहातां मुक्ति प्राणियों ॥४॥
११
आमुचिये कूळीं पंढरीचा नेम । मुखीं सदा नाम विठ्ठलांचें ॥१॥ न कळे आचार न कळे विचार । न कळे वेव्हार प्रपंचाचा ॥२॥ असों भलते ठायीं जपूं नामावळी । कर्माकर्म होळी होय तेणें ॥३॥ भानुदास म्हणे उपदेश आम्हां । जोडिला परमात्मा श्रीराम हा ॥४॥
१२
आलें वारकरी करिती जयजयकार । गरुडटके भार असंख्यात ॥१॥ त्या सुखाचा पार जाणें तोचि एक । भक्त पुंडलिक भाग्यवंत ॥२॥ प्रेमे महाद्वारी घालुनी लोटांगण । देती आलिंगन एकमेंकां ॥३॥ निडारले नयन पीतांबरधारी । देखिले विटेवरी पांडुरंग ॥४॥ शिवणी सासुरवासी माउली देखे । तये चित्त पोखे जीवनकळा ॥५॥ तैसें तें श्रीमुख देखोनि निवालें । आलिंगना निघाले लवडसवडीं ॥६॥ विटेसहित मिठी घातलीसे पायीं । शरीरीं शुद्धी नाहीं मीपणाची ॥७॥ अनंता जन्मीचे विसरलों संताप । विठोबा मायबाप देखियेला ॥८॥ एक म्हणती स्वामी देवा दीनवत्सला । कृपेचा कोंवळा पाडुंरंग ॥९॥ म्हणती कूर्मदास आर्त करुनियां । तुम्हां भेटवाया बोलाविलें ॥१०॥ माझिये हातींचा चरणीं माथा ठेवा । निरोप सांगावा पंढरीनाथा ॥११॥ कृपेचा कोंवळा दीन दयानिधी । येऊनि मज आधीं सांभाळावें ॥१२॥ नाहीं कर चरण न घडे दर्शनें । मन आहे शरण तुमचे पायीं ॥१३॥ चातक जलधरा चिंतितां मानसीं । चकोर चंद्रासी भावें जैसा ॥१४॥ तैसी मनीं आवडी उचलली तुंतें । ध्यातसे तुमचें देवराया ॥१५॥ स्मरे वत्स जैसें माउली लागुनी । पिलीं ते पक्षिणी लागीं जैसीं ॥१६॥ तैसा मी तुमतें चिंती वेळोवेळां । देखावया डोळां चरण स्वामी ॥१७॥ गोत वित्त धन मज नाहीं आधारु । तुमचा निर्धारु आहे देवा ॥१८॥ करुणासिंधु ऐसें म्हणवितां जनीं । येऊन मजलागुनी सांभाळावें ॥१९॥ अनाथांचा नाथ सर्वज्ञाचा रावो । जाणसी निजभावो अंतरींचा ॥२०॥ ऐसें कूर्मदासेंविनविलें आहे । अहर्निश पाहें वात तुझी ॥२१॥ ऐकोनी पंढरीराव झाला उत्कंठित । केव्हा तो निजभक्त आलिंगीन ॥२२॥ अंतरीचें मनोरथ होती परिपुर्ण । उल्हासाती नयन देखलिया ॥२३॥ भक्त इष्टमित्र भक्त सुखसिंधु । भक्त आर्तबंधु थोर मज ॥२४॥ बोलाविला नामा आणि ज्ञानदेवो । सांगतला भावे तयाप्रती ॥२५॥ आर्तें करुनी वात पाहातसे कुर्मा । बोलाविलें आम्हां भेटीलागीं ॥२६॥ जाऊं समागमें तुम्ही आम्हीं तेथ । करणें सनाथ भक्तराया ॥२७॥ म्हणोनी दोघाजणां धरुनियां हातीं । चालिले श्रीपाति चरणें चालीं ॥२८॥ महिमा ज्ञानदेवो अहो जी पूर्णकामा । जाणा तुमचा महिमा तुम्ही देवा ॥२९॥ करता करविता सर्व तुझी सत्ता । सकळांची चाळीता चित्तवृत्ति ॥३०॥ नामदेवें चरणीं ठेवियेला माथा । बरवें दिनानाथा विचारिलें ॥३१॥ संतांचें दर्शन होईल संयोग । निवतीं अष्टांग चरण स्पर्शें ॥३२॥ विकासिले नयन स्फुरण आलें बाहीं । दाटलें हृदयीं करुणाभरतें ॥३३॥ जातां मार्गीं भक्त देवाचा आवाडता । होता तो सांवता जीवन्मुक्त ॥३४॥ त्यांचे सुख घ्यावें म्हणोनि माव केली देवें । कौतुक दाखवावें नामयासी ॥३५॥ तयांप्रती काय बोले केशवराज । लागलीसे मज थोर तृषा ॥३६॥ नामा ज्ञानदेव राहिले बाहेरी । मळीयाभीतरीं देव गेला ॥३७॥ तंव तो परमानंद बोधे नित्य तृप्त । केलेविण करीत न ये काया ॥३८॥ माथा ठेवोनि हात केला सावधान । दिधलें आलिंगन चहूभुजीं ॥३९॥ देखोनियां मिठी घातली चरणीं । वोसंडलें नयनी प्रमजळे ॥४०॥ करितसे विनवणी स्वामी चक्रपाणी । जनक जननी तुंचि माझी ॥४१॥ तुंचि माझे सर्व वैभव गौरव । हृदयींचा भाव जाणसी तुं ॥४२॥ चरणीं ठेउनी माथा विनवितसे सांवता । बैस पंढरीनाथा करीत पूजा ॥४३॥ म्हणती देवराज कैंचे पूजन तुझें । राख राख माझे प्राण आतां ॥४४॥ तस्काराची मांदी लागलीसे पाठीं । चुकवीं त्याची दृष्टी लपवीं मज ॥४५॥ कोठें तुज लपवुं अगा सगुणरुपा । माझ्या मायाबापा पाडुंरंगा ॥४६॥ ऐसा कोणरिता ठाव न दिसे मज । तेथें तुझें तेज झांकोळेल ॥४७॥ बाहेर भीतरीं तुझाचि प्रकाश । गगनासी अवकाश तुझे पोटीं ॥४८॥ मग कटीचें खुरपें सत्वर काढिलें । हृदय फाडिलें तत्क्षणी ॥४९॥ यावें पंढरीनाथा रिघावें भीतरीं । सुखरुप निर्धारी रहावें येथें ॥५०॥ बैसोनियां देव ह्रुदयसंपुटीं । करी सुखगोष्टी स्वभक्तासी ॥५१॥ एवढ्या उपकारा काय तुज द्यावें । कैसें तुज व्हावें उतराई ॥५२॥ अवघा मीचि घेई अवथा मीचि घेई । यापरतें कांहीं न दिसे मज ॥५३॥ तंव म्हणे सांवता जीवाहुनि परता । न करीं तुं चिंता विठ्ठलास्वामी ॥५४॥ नामदेव मनीं करीतसे चिंतनी । नयेचि अझूनि विठ्ठल माझा ॥५५॥ वाट पाहता बहू वाडवेळ झाला । कोठें गुंतयेला स्वामी माझा ॥५६॥ माझा पांडुरंग सर्व सुखधन । दाखविला कोण प्राणसखा ॥५७॥ अवस्थे भरे प्रेम बहुअ आसे स्फुंदतु । विठ्ठल विठ्ठल म्हणतु वेळोवेळां ॥५८॥ अदेह जातो चाचरी भेटीलागीं आर्त । पाउलें उमगीत विठोबाची ॥५९॥ तृषाक्रांत कैसें जीवनातें गिवसी । कीं बाळ मातेसी क्षुधातुर ॥६०॥ हरिणीचे पांडस चुकलें हरिणीसी । जैसेंअ दाही दिशा पाहे देखा ॥६१॥ पाझर सुटला दृष्टी वोसंडला पोटीं । हृदय तें पिटीं करकमळीं ॥६२॥ देह टाकी धरणीं नामाचे बोभाटी । म्हणे देई भेटी प्राण जातो ॥६३॥ सांडोनि जातोसी ऐसें जरी जाणतें । तरी कां विसंबतें तुजलागीं ॥६४॥ मिठीं पीतांबरी घालुनी मुरारी । येतो चरणावरी रुळत सरसा ॥६५॥ ऐसें विलपत अंतर अवस्था । देखिला सांवता सुखराशि ॥६६॥ चरणीं घालुणी मिठी पुसतसे मातु । माझा पंढरीनाथु केउता गेला ॥६७॥ तो विसरला देहभावा आर्तभुतमनें । होउनी संधानें हरिच्या रुपा ॥६८॥ प्रेम उंचबळतु आनंदे डुल्लतुअ । वाचेसी जपतु रामकृष्ण ॥६९॥ देखोनि त्यांची स्थिती विठ्ठल माझा आहे । त्याजपाशीं पाहे पुढतोपुढती ॥७०॥ त्यांचे पुर्ण सुख देखियलेंमनें । हर्षयुक्त चिन्हें याचे देहीं ॥७१॥ मज दुबळ्याचा ठेवा गिळियेला तुवां । सुखाचा विसांवा पंढरीराव ॥७२॥ क्षणभरी दाखवी धरीन मी जीवीं । जाताती वांचवीं प्राण माझे ॥७३॥ वेंगी मजसी भेटे करी सुख गोष्टी । म्हणे करीन भेटी विठोबाची ॥७४॥ तेचि शकुन गांठी बांधली पालवीं । माझ्या माथां ठेवीं अभयकर ॥७५॥ ऐकोनि पंढरीनाथ म्हणे सांवत्यांतें । मज माझ्या नाम्यातें भेटी करें ॥७६॥ शिणलें बाळक होत कासाविसी । दिसतें परदेशी मजवीण ॥७७॥ मग म्हणे सांवता परिसी हरिभक्ता । कृपा पंढरीनाथा आली तुझी ॥७८॥ म्हाणोनि उतावेळ झाले कमळापति । भेटोनि विश्रांति द्यावी मज ॥७९॥ जवळींच देखनी सावधान पाहे । देती पंधरीराय आलिंगना ॥८०॥ न कळेअ तुवांकाय केल्या पुण्यराशी । वाटे भजिन्नलासी सर्वांभूतीं ॥८१॥ जेणें सुख पावोनि माझा पंढरीनाथ । झाला वेळाईत तुजलागीं ॥८२॥ खांदी गरुड टका घेऊनी निरंतरीं । चालविली वारी पंढरीची ॥८३॥ संतचरणरज वंदियेले माथां । म्हणोनि पंढरीनाथा आर्त तुझें ॥८४॥ दशमी दिंडीपुढें नाचती बागडे । गाईल साबडें हरीचें नाम ॥८५॥ तेणें पंढरीनाथा वाटला आनंदु । मग तो कृपासिंधु बोलला तुज ॥८६॥ कायावाचामनें होऊन तल्लीन । केलें हरीकीर्तन एकादशीं ॥८७॥ तेथें तिष्ठत होता पंढरीचा रावो । प्रसन्न हा देव झाला तुज ॥८८॥ अनंत जन्मींदेह कर्वती घातले । कां उग्र तप सांधिलें महातीर्थीं ॥८९॥ परोपकारी प्राण वेंचियेला तुवां । पंढरी येतां केशव धाला तेणें ॥९०॥ आतां तुझें भाग्य महिमा तोअ अद्भुत । जाणें पैं समर्थ पंधरीराव ॥९१॥ म्हणोनियां चरणीं ठेऊंनियां माथा । गहिंवरें सांवता भक्तराज ॥९२॥ प्रेमें आलिंगन झालें उभयतां । मग झाला बोलता विष्णुदास ॥९३॥ सुखाचा सोयरा तुंचि या तत्त्वता । माझा प्राणदाता भक्तराज ॥९४॥ सांगितला शकुन साच करी वहिअला । मज माझ्या विठ्ठला भेटी करीं ॥९५॥ आतां मज धीरु न धरवे सर्वथा । स्फुंदता हे अवस्था चित्त माझें ॥९६॥ कडप्याचे खुरपे काढुनिया येरे ।हृदय फाडिलें तये वेळीं ॥९७॥ तंव तो पाडुरंग निघाला बाहेरी । नामा पाय धरी धाऊनियां ॥९८॥ येरें संबोखुनी पितांबर आंचळें । पुसलें मुखकमळ नामयाचें ॥९९॥ देउनि आलिगन हांसे पांढरीनाथ । पुसतसे वृत्तांत काय झालें ॥१००॥ येरे तंव मिठी घातली चरणीं । म्हणे जनकजननी तुंचि देवा ॥१०१॥ कवण्या मोहे माझे पाळिसी तुं लळे । हें मज न कळे केशवराजा ॥२॥ भेटोनियां मातें म्हणे ज्ञानदेव । कूर्माही पहावो लवलाही ॥३॥ तरीच माझ्या मना वाटे समाधान । निवती लोचन देखिलिया ॥४॥ भेटीचें पैं आर्त आहे माझे मनी । चाल वेगें करुनि करुणारसे ॥५॥ आनंदाचा मर्ग संताचे संगतीं । आनंदें नाचती पांडुरंग ॥६॥ स्फुरती भुजा दंड आणि वक्षस्थळ । सुखाब्धी मिळेल मना आजी ॥७॥ नामा ज्ञानदेव नवल करिती कैसें । कूर्म्याचें पैं ऐसें प्रेम देवा ॥८॥ वोसरली धेनु वत्सालागीं जाय । तैसें पंढरीराय चालियेले ॥९॥ लवताती लोचन स्फुरताती बाहे । येती माझी माय भेटीलागीं ॥११०॥ आला पंढरीराव कूर्मा घाली लोटांगण । दिधलेम आलिंगन चहुभूर्जीं ॥११॥ पडियेली मिठी न सोडी सर्वथा । मीळाला पंढरीनाथा सद्भावेसी ॥१२॥ कूर्मा म्हणे माझे थोर भाग्य आतां । म्हणोनि पंढरीनाथा भेटी तुझी ॥१३॥ तरीं आतां तुवां न जावें येथुनी । जोडला चरणीं स्थिर राहे ॥१४॥ देव आणि भक्त एकरुप झाले । मग दोघे आले आश्रमासी ॥१५॥ देव म्हाणे भक्तां कष्टी तूं झालासी । तुझीये उपकारासी काय वानुं ॥१६॥ भानुदासा नयनीं पुर्ण जळें दाटलें । मग आलिंगिलें पांडुरंगें ॥११७॥ श्रीभानुदासाचे अभंग समाप्त
१३
आलों दृढ धरुनी जीवीं । तो गोसावी भेटला ॥१॥ जन्ममरण हरला पांग । तुटला लाग प्रपंच ॥२॥ इच्छा केली ती पावलों । धन्य जाहलों कृतकृत्य ॥३॥ भानुदास म्हणे देवा । घ्यावी सेवा जन्मोजन्मीं ॥४॥
१४
आवडोनि कर कटीं । पाऊलें नेंहटीं विटेवरी ॥१॥ त्याचा छंद माझे जीवा । नाहीं देवा आणिक ॥२॥ काया वाचा आणि मन । लोभलें सगुण रुप देखतां ॥३॥ भानुदास म्हणे दृष्टी । पहातां गोमटी मूर्ति ते ॥४॥
१५
आशीर्वाद देती भार्गव तो राम । विजय मेघःश्याम होई सुखें ॥१॥ राज्य करीं बळें सर्वत्रीं आनंद । नाहीं दुजा शब्द रामा तुशीं ॥२॥ भानुदास म्हणे आनंदे श्रीराम । सुखरुप आत्माराम अयोध्याधीश ॥३॥
१६
आशेचिया सोसें गुंतसी पामरा । न चुकती वेरझारा चौर्‍याशींच्या ॥१॥ मदाचिया सोसें गुंतसी पामरा । न चुकती वेरझारा चौर्‍यांशींच्या ॥२॥ तृष्णेचिया सोंसे धांवंशी पामरा । न चुकती वेरझारा चौर्‍याशींच्या ॥३॥ कल्पनेच्या मागे धांवशी कल्पका । न पावसीं सुखा बुडसी वायां ॥४॥ भानुदास म्हणे सर्व हें सोडुनी । एक चक्रपाणी सखा करीं ॥५॥
१७
इहीं श्रवणीं तुझें गुणगान ऐकेन । इहीं चरणीं तीर्थपथेम चालेन । नाशिवंत देह कवणीये काजा । ऐसी प्रेमभक्ति देई सहजा ॥१॥ अखंड तुझे नाम उच्चारी । तेणें संसारा होय उजरी ॥धृ० ॥ शालीग्राम तीर्थे करीन आंघोळी । हरिदासाचें चरणरज लावीन कपाळीं । कंठमंडित तुळशी माळी । तन मन प्राण तुमचे वोवाळी ॥२॥ उदयव्यथेलागीं मी न करी धंदा । उच्छिष्ट प्रसादें हरावीं हे क्षुधा । आपली स्तुति आणि पारावीया निंदा । हे दोन्हीं आतळों नेदी गोविंदा ॥३॥ सर्वाभूती रामा तूतेंचि देखे । तुझेनि प्रसादें सदा संतोषे । देवा भानुदास मागे इतुकें । चाड नाहीं आम्हां वैकुंठ लोकें ॥४॥
१८
उठी तात मात भये प्रात रजनी सो तीमीर गई । मीलत बाल सकल ग्वाल सुंदर कान्हाई ॥१॥ जागों गोपाल लाल जागो गोविंदलाला जाननी बल जाई ॥धृ०॥ संगीत सब फीरत बयन तुमबीन नहीं छुटत नहीं दयन । त्यजो शयन कमलनयन सुंदर मुख भई ॥२॥ मुखती पट दूर किजो जननीकु दर्श दीजो । दधीं खीर मांगलीं जो खीर खांड मिठाई ॥३॥ जमत जमत शामराम सुंदरमुख सदा राम । थाथी कीं छुट कछु भानुदास पायीं ॥४॥
१९
उद्भवला ॐकार त्रिमातृकेसहित । अर्थ मातृके परतें प्रणवबीज ॥१॥ माया महत्तत्त्व जाले तिन्ही गुण । चौ देहांची खूण ओळखावी ॥२॥ अंतःकरणीं जाला तत्त्वांचा प्रसव । पंचतत्त्वें सर्व रुपा आलीं ॥३॥ पांचहि गुण जाले पंचवीस । परि भानुदास वेगळाची ॥४॥
२०
उन्मनीं समाधीं नाठवे मनासी । पहातां विठोबासी सुख बहु ॥१॥ आनंदाआनंद अवघा परमानंद । आनंदाचा कंद विठोबा दिसे ॥२॥ जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे । पाहतां साठवे रूप मनीं ॥३॥ नित्यता दिवाळी नित्यता दसरा । पाहतां साजिरा विठ्ठलदेव ॥४॥ भानुदास म्हणे विश्रांतींचें स्थान । विठ्ठल निधान सांपडलें ॥५॥
२१
एक नामापरतें साधन । नाहीं नाहीं दुजें आन ॥१॥ वाया धावतीं बराडी । करती संसाराची जोडी ॥२॥ न चुकें जन्ममरण वेरझारा । हे तो नकळे पामरा ॥३॥ नामा वांचुनि जें जें कर्म । अवघा जाण तो अधर्म ॥४॥ भानुदास प्रेमें नाचे । सदा नाम घोष वाचे ॥५॥
२२
एकाचिये घरीं द्वारपाळ होय । एकासि ते पाहे खांदा वाहे ॥१॥ एकाचिया घरीं उच्छिष्ठ ते काढी । एकाची आवडी उभा राहे ॥२॥ एका घरी कण्या आवडीनें खाय । एका घरीं न जाय बोलावितां ॥३॥ एकाचिये घरीं उच्छिष्ट भातुंके । खाय कौतुकें मिटक्या मारी ॥४॥ भानुदास म्हणे आवडीच्या सुखा भुलोनियां देखा लोणी खाये ॥५॥
२३
ऐक साजनी वो बाई । तुम्हा एवढें थोर नहीं । भाव केला घरजांवाई । खावयासी तूप सेवाई ॥१॥ फु फु फु फु फुगडी गे । तुम्ही आम्ही खेळु दोघी गे ॥ध्रु०॥ प्रपंच केला गोड सगळा गे । ज्ञान फुगडीवर समला गे । प्रेम तिचा चांगट गे सुदंर पहाता अलगट गे ॥२॥ शांती सोयरी सखी माझी गे । तिची बरी संगत काजी गे । तिचा हात धरितां गेली माझी गे । मोह ममतेची बीज माजी गे ॥३॥ फुगडी खेळतां हाता शिणला गे । अंतरीचा द्वैत भेद गेला गे । हृदयीं प्रकटला ज्ञानदीप गे । गेली अज्ञानाची झोंप गे ॥४॥ दया क्षमा तिची बहीण गे । तिशी म्यां धरीले कवळुन गे । फुगडी खेळतां आला शीण गे । गरगर भोंड गेली जिरुन गे ॥५॥ ऐशी फुगडी खेळले गे । परब्रह्मी सुख आगविले गे । भानुदास म्हणे रंगलों गे । जन्ममरण हरलों गे ॥६॥
२४
ऐसियासी कृपा करावी त्वरित । पुरवा मनोरथ सर्व माझे ॥१॥ काकुळती कवणा येऊ तुजविण । दुःख निवारण कोण करी ॥२॥ त्रैलोक्य पालन करिसी सर्वकळ । त्याहुनि आगळें हेंचि काय ॥३॥ तुझिया पायांचा मजला आधार । केविं तुं निष्ठूर जाहलासी ॥४॥ आमुचे अन्याय न धरावे चित्तीं । सर्व कृपामूर्ति पोटीं घाली ॥५॥ कर्म धर्म माझें उत्तम आवरण । न न पाहें पावन करी मज ॥६॥ भानुदास म्हणे कृपेचें पोसणें । परि नारायणें सांभाळावें ॥७॥
२५
कंसराव चिंता करी । नवल बालकाची परी । या गोकुळामाझारीं एक अरिष्ट वर्तलें ॥१॥ आमुच्या सकळिका प्रधाना । माजी बलिवंत पूतना । विष भरोनियां स्तना । पांजुं तया पाठविली ॥२॥ तवं तो वेताळ कीं पिशाच्च । काळभैरव कीं राक्षस । त्याने केला तिचा ग्रास । विषासहित शोषिलें ॥३॥ तों अवतरला गोकुळीं । दैत्य दानव मर्दन बळी । जिनें बाळकें शोषिलीं । तेहि शोषिली पूतना ॥४॥ आम्हीं दुष्टबुद्धि केली । बहिण देवकी पीडिली । तेची बाळकें वधिलीं । आपुलें अरिष्ट चुकवावया ॥५॥ तंव ते न चुकतां पातले । विघ्न नसतांचि उगवलें । आम्हीं जाणतों इतुलें । तरी कृश्ण आणा बांधुनी ॥६॥ एवं माभळभट उठिला । तेणे विडा मागितला । निरंजनीं सांडवीन तान्हुला । जो गोकुळीं वाढतसे ॥७॥ ऐसें वचन ऐकोनी । विडा दिधला ततक्षणीं । आपुल्या आश्रमा जाऊनी । काय करिता जाहला ॥८॥ मग बोले स्त्रियेसी । आम्ही जातों गोकुळासी । बाळक जालें यशदेसी । तें सांडवीन निरंजनी ॥९॥ ऐसें बोलोनी निघाला । मार्गीं जातसे एकला । तंव श्रीकृष्ण हासिन्नला । हा विप्र भ्रमित जालासे ॥१०॥ गोकुळ ठाकिलें बिडालें । देखे उपलिया धवलारे । तेथीचीं माणसें अति नांगरें । लेणीं लुगड़ी मिरवती ॥११॥ कृष्ण अवेधें वेधलीं । अवघीं देवरुप जाहलीं ॥ वाचेसी सरस्वती आली । तैसें मधुर बोलती ॥१२॥ आला नंदाच्या मंदीरा । उपमा दिसे क्षीणसागरा । तेथीच्या गौळणी असती सुंदरा । परिये देती कृष्णातें ॥१३॥ वृद्ध बहुकाळ ज्योतिषी । देखोनि हारिखली मानसीं । यशोदा लागली पायासी । साउमेयासी म्हणीतलें ॥१४॥ पाट बैसकेचा घातला । पुढें तिसरा ठेविला । येरें आशिर्वाद दिधला । मग कुशलता पुसिली ॥१५॥ तंव त्या कृष्णातें दाविती । पहा हो याची जन्मतिथी । येरें उकलिती प्रीती । चंक्रांकिता साजिरी ॥१६॥ शनि मंगळराहु केतु । दुष्ट ग्रह ऐसें सांगतु । रोहिणी नक्षत्रु अष्टमी आंतु । भिन्नरात्री उपजला ॥१७॥ पुढें विघ्न असें थोर । मागें एक चुकलें गंडांतर । कंसरायाचे भय फार । या बाळकासी असे ॥१८॥ दैत्य करिती वळवळा । मेघ वर्षती शिळा । गोकुळ सांडुन अवघे पळा । ऐसा अनर्थ होईल ॥१९॥ पुत्र नव्हें हो लहाणा । हा तुम्हे वोपा कां पोसणा । हासिन्नला यादवराणा । मग विंदान मांडिलें ॥२०॥ होता बैसकेचा पाटु । तेणें घेतला उचाटु । पिढीयाचा खडखडाटु । घरोघरीं सुटला ॥२१॥ भट वाचित होता पाताडें । तें तंव मुखीं आदळालें पिढें । येर सुजविलें थोबाडे । मग भयबीत पळतु ॥२२॥ रागे सुजविलें पाताडें । म्हणे गौळिये लाताडें । आम्हां जोशिया केव्हडे । पिढेंदान दिधलें ॥२३॥ तंव त्या विशाळ काठवटी । लागती माभळभटापाठीं । तिवया सिराळीं तिखटीं । पाठीं पोटीं रुपताती ॥२४॥ तेला तुपाचींमापें । डवले खोडवे आमुपें । बडगे खुंटे खुटें भलिया कोपें । पूजा बांधती मस्तकीं ॥२५॥ थोर आवेशा चढले चाटु । म्हणती यातें सगळें घाटु । लाटणें म्हणती भोईसी लाटुं । ऐसा दृष्ट काय किजे ॥२६॥ शाळिग्राम गडबडिले । देवपाट साह्र आले । अर्गळांचे सळ सुटले । खिळखिंळिलें खिळखंबे ॥२७॥ थोर विसुरा केला डांगीं । मार्ग रुंधिला चौरंगीं । मुसळें कांडावयालागीं । भोंवता वेढा घातला ॥२८॥ होते रवियांचे नाथलें । देह नवनीतें माखिलें । तें येऊन सर्वागी बैसलें । हिवें ऐसें मवाळ ॥२९॥ नव्हे नव्हे गा जोशी । राख राख हृषीकेशी । उखळा मुसळांचिया राशी । दाही दिशा व्यापिल्या ॥३०॥ पाठीं पिढियाम्छॆ मेळ । तिहीं झांकिलें रविमंडळ । गजबजिलें लोकपाळ । नव्हें गोकूळ सोपारें ॥३१॥ माभळभटाचिया झडपणीं । देखोनि पळालिया गौळणी । दह्मा दुधाचिया सांजवणीं । पिढा भरणी फुटती ॥३२॥ देखे मांदियाचे थाट । त्यामाजीं शीरे माभळभट । म्हणे गोकुळींचा शेवट । दैवयोगें पातलों ॥३३॥ शेतीं होती तिफणीं । नांगर कुळवांची रुमणीं । पाठीं लागलिया दणाणी । भटजी आमुचा स्वयंपाक ॥३४॥ ब्राह्मण म्हणोनि राखिला । धोत्रे पाताड्या मुकला । मथुरा प्रांत ठाकिला । नग्न हिंडे राजबिंदीं ॥३५॥ देखोनि दैत्यसभा घन दाट । उठा उठा आले पाट । धापा फुटो पाहे पोट । पुसे वाट घराची ॥३६॥ कंसासी सांगतिला वृत्तांतु । अझून काय रे निश्चितु । बळिया वैकुंठीचा नाथु । तो गोकुळीं वाढतसे ॥३७॥ ते वेळी कागासुर बकासुर । तृणावर्त दैत्य आघासुर । मुष्टिक चाणुर वीर । तिहीं विडे मागितले ॥३८॥ थोर बोलती पैजा । आम्ही निर्दाळुं बोजा । ये कथेसीचित्त दीजा । विनवो तुम्हा संतानोम ॥३९॥ देवा भानुदास म्हणें । श्रोतें कोपतील झणें । पंढरीरायाचे योगाने । हा विनोद गाइला ॥४०॥
२६
कल्पना अविद्या सांदोनिया । गोडी रामनाम जोडी करी बापा ॥१॥ येर ते मायीक नको पडूं छंदा । आठवीं गोविंदा एकपणें ॥२॥ द्वैताची ते वाढ़ी छेदूनियां काढी । नामाची तुं गुढ़ी उभवीं सदा ॥३॥ भानुदास म्हणे सांडोनी कल्पना । चिंतीं तूं चरणा विठोबाच्या ॥४॥
२७
कामाचिया सोसें पडशी पतनीं । यमाची जाचणी बहु असे ॥१॥ क्रोधाचिया सोसें पडशी पतनीं । यामाची जाचणी बहु असे ॥२॥ मदाचिया सोंसे पडशी पतनीं । यमाची जाचणी बहु असे ॥३॥ लोभाचिया सोसें पडशीं पतनीं । यमाची जाचणी बहु असें ॥४॥ भानुदास म्हणे सांडोनियां सोस । होई रे उदास सर्व भावें ॥५॥
२८
कोठवरी धांवा करुं तुझा देवा । श्रमा झाले जीवा फार माझ्या ॥१॥ अझुनियां कां गा न येसी त्वरित । दुःखानें बहुत जाकळिलों ॥२॥ कंठ रोधियेला श्वासावरी श्वास । घालुनी नेत्रास नीर वाहे ॥३॥ दाही दिशा मज वाटती उदास । झाला कासाविस प्राण माझा ॥४॥ हीन कर्म माझें फुटकें अदृष्ट । म्हणवोनि संकट ऐसें झालें ॥५॥ भानुदान म्हणे पहातां चरण । तळमळ जाण शांत झाली ॥६॥
२९
कोरडिया काष्ठीं अंकूर फुटले । येणें येथें जालें विठोबाचे ॥१॥ समर्थाचा आम्हीं धरिला आधार । जाणोंनी सत्वर आला येथें ॥२॥ माझिये संकटीं आलासी धांऊनी । भानुदास चरणीं लागतसे ॥३॥
३०
गाई गोप विप्राचार संध्यावंदन । अपूज्य लिंगा पूजन साधू दरुशन ॥१॥ जयजय सुशब्द बोलती जन । कोटि युगें राज्य करीं रघुनंदन ॥२॥ भरत शत्रुघ्र जवळी लक्ष्मण । शौर्य विद्या साजे रघुनंदन ॥३॥ कौसल्या सुमित्रा वोवाळिती रामातें । देवा भानुदास गुण गातसे तेथें ॥४॥
३१
गूढीयेसी सांगु आलें । कंस चाणूर मर्दिले ॥१॥ हर्ष नाचताती भोजें । जिंकियेले यादवराजें ॥२॥ गुढी आली वृंदावना । मथुरा दिली उग्रसेना ॥३॥ जाला त्रिभुवनीं उल्हास । लळीत गाये भानुदास ॥४॥
३२
गोंड साजिरें रूपस । उभा आहे हृषिकेश । योगी ध्याती जयास । तो हा सर्वेश साजिरा ॥१॥ रूप मंडीत सगुण । शंख चक्र पद्म जाण । गळा वैजयंती भूषण । पीतांबर मेखळा ॥२॥ कस्तुरी चंदनाचा टिळा । मस्तकीं मुकुट रेखिला । घवघवीत वनसावळा । नंदरायाचा नंदनु ॥३॥ हरूषे भानुदास नाचे । नाम गातसे सदा वाचे । प्रेम विठोबाचें । अंगीं वसे सर्वदा ॥४॥
३३
चंचळ हें मन नावरे माझ्यानें । कामाच्या व्यसनें पीडीतसे ॥१॥ अविवेकांचे बळ झालें असे फार । धांवती षडविकार सैरावैरां ॥२॥ विवेकाची शक्ति होऊनिया क्षीण । सत्कार्मासी हीन बुद्धी झाली ॥३॥ चित्ताचा चालक अगा सुत्रधारी । भानुदासा हरी कृपा करी ॥४॥
३४
चंद्रभागेतीरीं उभा विटेवरी । विठ्ठल राज्य करी पंढरीये ॥१॥ ऋद्धिसिद्धि धृति वोळंगती परिवार । न साहती अवसर बह्मादिकां ॥२॥ सांडोनि तितुलें यथाबीजें केलें । कवणें चाळविलें कानडीयासी ॥३॥ उष्णोदक मार्जन सुगंधचर्चन । भीवरा चंदन पाट वाहे ॥४॥ रंभा तिलोत्तमा ऊर्वशी मेनिका । कामारी आणिका येती सर्वे ॥५॥ कनकाचे परयेंळीं रत्नाचे दीपक । सुंदर श्रीमुख ओवाळिती ॥६॥ संत भागवत सकळ पारुषले । निःशब्द होऊनि ठेले तुजविण ॥७॥ रुक्माबाई ती जाहलीसे उदार । पुंडलीअका कैसे पंडिले मौन ॥८॥ येसी तरी येई पंढरीच्या राया । अगा कृपावर्या पांडुरंगा ॥९॥ धन्य पंढरपूर विश्रांती माहेर । धन्य भीमातीर वाळुवंट ॥१०॥ भानुदास म्हणे चला आम्हांसवें । वाचा ऋन देव आठवावें ॥११॥
३५
चतुर्भुज मूर्ति लावण्य रुपड़े । पाहतां आवडे जीवा बहू ॥१॥ वैंजयंती माळा कीरीट कुंडलें । भुषण मिरवलें मकराकार ॥२॥ कासे सोनसळा पितांबर पिवळा । कस्तुरीचा टिळा शोभे माथे ॥३॥ शंख चक्र हातीं पद्म तें शोभलें । भानुदासें वंदिलें चरणकमळ ॥४॥
३६
चार युगांमांजीं पावन । कलिमांजीं सोपें भजन ॥१॥ मना दृढ करुणि साचा । विठ्ठल विठ्ठल वदे वाचा ॥२॥ संकल्प विकल्प नको भिन्न । तेणें पावे हरिचरण ॥३॥ नामें जीवींचा जिव्हाळा । भानुदास जीवनकळा ॥४॥
३७
जन्मोजन्मीं आम्हीं बहु पुण्य केलें । म्हणोनि विठ्ठलें कृपा केली ॥१॥ जन्मोनी संसारीं जाहलों त्यांचा दास । माझा तो विश्वाचा पांडुरंगीं ॥२॥ आणिका दैवता नेघे माझें चित्त । गोड गातां गीत विठोबाचें ॥३॥ भ्रमर मकरंदा मधासी ती माशी । तैसें या देवासी मन माझें ॥४॥ भानुदास म्हणे मज पंढरीची न्या रे । सुखें मिरवा रे विठोबासी ॥५॥
३८
जपतां नाम विठठलांचे । भय नाहीं हो काळांचे ॥१॥ नाममंत्र त्रिअक्षर । करी सदा तो उच्चार ॥२॥ विठ्ठलनामें सुख आनंद । भानुदासा परमानंद ॥३॥
३९
जमुनाके तट धेनु चरावत । राखत हैं गईया ॥१॥ मोहन मेरा सांइया ॥ध्रु०॥ मोरपंत्र शिरी छत्र सुहावे । गोपी धरत बहीया ॥२॥ भानुदास प्रभु भगतनको बछल । करत छत्र छाइया ॥३॥
४०
जें सुख क्षीरसागरीं ऐकिजे । तें या वैष्णवा मंदिरीं देखिजे ॥१॥ धन्य धन्य ते वैष्णवमंदिर । जेथें नाम घोष होय निरंतर ॥२॥ दिंडीपताका द्वारी तुळशीवृदांवनें । मन निवताहे नाम संकीर्तने ॥३॥ ज्याच्या दरुशनें पापताप जाय । भानुदास तयासी गीतीं गायें ॥४॥
४१
जैं आकाश वर पडों पाहे । ब्रह्मागोळ भंगा जाये । वडवानळ त्रिभुवन खाये । तरी तुझीच वाट पाहें गा विठोबा ॥१॥ न करी आणिकांचा पांगिला । नामधारक तुझाचि अंकिला ॥धृ०॥ सप्त सागर एकवट होती । जैं हे विरुनी जाय क्षिती । पंचमहाभुतें प्रलय पावती । परि मी तुझाचि सांगातीं गा विठोबा ॥२॥ भलतैसें वरपडों भारी । नाम न संडों टळों निर्धारी । जैसी पतिव्रता प्राणेश्वरी । विनवी भानुदास म्हणे अवधारी गा विठोबा ॥३॥
४२
जैसा उपनिषदंचा गाभा । तैसा विटेवरी उभा । अंगीचिया दिव्य प्रभा । धवळिलें विश्व ॥१॥ उगवती या सुरज्या । नवरत्‍नें बांधू पूजा । मुगुटीं भाव पैं दुजा । उपमा नाहीं ॥२॥ दोन्हीं कर कटीं । पीतांबर माळ गांठी । माळ वैजयंती कंठीं । कौस्तुंभ झळके ॥३॥ कल्पदुम छत्राकार । तळीं त्रिभंगीं बिढार । मुरली वाजवी मधुर । श्रुति अनुरागें ॥४॥ वेणुचेनि गोडपणें । पवन पांगुळला तेणें । तोही निवे एक गुणें । अमृतधारीं ॥५॥ अहो लेणियाचे लेणें । नादसुखासी पैं उणें । विश्व बोधिले येणें । गोपाळवेषें ॥६॥ पुंडलिकाचेनि भावें । श्रीविठ्ठला येणें नावें । भानुदास म्हणे दैवें । जोडले आम्हां ॥७॥
४३
जोडीचे घोंगडें येव्हढीये राती । कानींची कुंडले करी जगा ज्योति ॥१॥ वोळखिला वोळखिला खुणा । वोळखिला माय पंढरीचा राणा ॥२॥ होये न होये ऐसा संशय गमला । निर्धारितां विश्वव्यापक देखिला ॥३॥ हृदयमंदिरीं दाटोनी धरावा । ही खुण सांगे भानुदास देवा ॥४॥
४४
तारक नाम सोपें साचें । विठ्ठल विठ्ठल वदतां वांचे ॥१॥ जन्ममृत्यूचें खंडन । पापातापाचें दहन ॥२॥ नामें निजध्यास देखा । भानुदासा सुखें सुखा ॥३॥
४५
तुज पाहूं जाता नये कांहीं हातां । अससी तत्त्वतां साध्य नाहीं ॥१॥ तुझा तूंचि मागें परतोनि पाहें । तुजपाशीं आहे भुलुं नको ॥२॥ पिंडीं तें ब्रह्मांडी बोलताती वेद । होई तूं सावध भुलूं नको ॥३॥ भुललिया माया श्रम तुज झाला । फिरसी वेळोवेळां चौर्‍यायंशी ॥४॥ चौर्‍यायंशी आवर्तनें होती गा तुज । सांगतसे गुज जीवीं धरा ॥५॥ भानुदास म्हणें सदगुरु कारणें । पुरवील तुमचें पेणें निश्चयेंसीं ॥६॥
४६
तुजपासाव सर्व परी तूं नोहेसि । ऐसें आपणासी बुझे बापा ॥१॥ कर्तृत्व करुनि आहे तो निराळा । परब्रह्मा निर्मळ मळ नाहीं ॥२॥ देहाचिये ऐसी कारुनी निराळा । स्वस्वरुपीं ठसा ठसलासि ॥३॥ चिन्मयरुप मूळ ॐकार बीज । भानुदासीं निज लाधलें तें ॥४॥
४७
तुझिया रुपाची आवडी मज देवा वाचेसी तो हेवा रामनाम ॥१॥ श्रवनीं ऐकेन तुमचे पोवाडे । दुजे वाडेंकोंडें न करीं कांहीं ॥२॥ चरणें प्रदक्षिणा घालीन लोंटागणा । वंदीन चरणा संताचिया ॥३॥ भानुदास म्हणे हीच मति स्थिर । रामराम निर्धार गाईन मुखीं ॥४॥
४८
तुमचें नाम गोड नाम गोड । पुरवी कोड जीवांचें ॥१॥ वाचे सुलभ नामावळी । महादोषां होय होली ॥२॥ सुख अनुपम्य गातां नाम । भानूदास म्हणे आम्हां विश्राम ॥३॥
४९
तुम्हीं कराल जें काय एक नोहे । ब्रह्मांड अवघे हें उभाराल ॥१॥ तुझिया सत्तेनें सकळांचा प्राण । चालतसे जाण ब्रह्मांड हैं ॥२॥ तुझिया सामर्थ्या नाहीं अंतपार । तेथें मी किंकर काय जाणे ॥३॥ सर्व अपराधी शरण मी पतित । उपेक्षा त्वा मातें न करावी ॥४॥ भानुदास म्हणे पुरवा मनोरथ । तुम्हीं अनाथनाथ पांडुरंगा ॥५॥
५०
तुम्हीं कृपानिधी संत । मी पतीत अन्यायी ॥१॥ सलगी बोलयेलों फार । न कळे निर्धार योग्यता ॥२॥ म्हणवीं दास तुमचा देवा । करितों हेवा पुढील्याचा ॥३॥ उच्छीष्ट प्रसादांची आस । म्हणे भानुदास तुमचा ॥४॥
५१
दांभिकाचा देव प्रतिमा धातुची । अज्ञान जनांची निष्ठा तेथें ॥१॥ योगियांचा देव हातां पायांविणं । भक्तांचा सगुण विटेवरी ॥२॥ मानसिक पूजा कर्मठालागीं । केले कर्म भोगी निश्चयेसी ॥३॥ आमुचा हा देव दोहीं विलक्षण । विरांलंब खूण आहे त्यांची ॥४॥ साक्षीचाही साक्षी आनंद जिव्हाळा । भानुदास लीळा गुज सांगे ॥५॥
५२
दीन आम्हीं रंक पतीत पतीत । पावन तूं अनंत स्वामी माझा ॥१॥ धरला भरवसा नामावरी चित्त । नाहें दुजा हेत मनीं कांहीं ॥२॥ देणें घेणें नको पुरला मनोरथ । बोलणें ती मात वेगळी असे ॥३॥ भानुदास म्हणे अहो पंढरीराया । कृपा करी सखया धरी हातीं ॥४॥
५३
दीनबंधु ब्रीद भले । जरी त्वां चरणीं बांधिलें । तरी कां आम्हा उपेक्षिले । संगे पंढरीराया ॥१॥ जळ बुडवीं पाषाण । जडकाष्ठा तारी पूर्ण । आपण वाढविलें म्हणोन । सांगे पंढरीराया ॥२॥ जीवानीं हा अभिमानी । तुं तंव जगाचें जीवन । ब्रीद आपुलें सांभळी पूर्ण । पंढ रीराया ॥३॥ माता ती क्रोध दृष्टी । परते बाळकासी लोटी । तरी तें चरणी घाली मिठी । पंढरीराया ॥४॥ सबळ काष्ठा कोरी भ्रमर । परि कमळ रक्षी निर्धार तैसा तुं प्रीतिकर । पंढारीराया ॥५॥ शारण निजभावेसी । भानुदास सेवेसी । तया तु नुपेक्षिसी सांगे पंढारीराया ॥६॥
५४
देखितांचि रूप विटेवरी गोजिरें । पाहतां साजिरें चरणकमळ ॥१॥ पाहतां पाहतां दृष्टीं धाये जेणें । वैकुंठीचें पेणें सहज हातीं ॥२॥ भानुदास म्हणे लावण्य पुतळा । देखियेल डोळा पांडुरंग ॥३॥
५५
देखोनियां पंढरपुर । जीवा आनंद अपार ॥१॥ टाळ मृदंग वाजती । रामकृष्ण उच्चरिती ॥२॥ दिड्यापताकाचा मेळ । नाचती हरुषें गोपाळ ॥३॥ चंद्रभागा उत्तम । स्थानास्नानं पतीतपावन ॥४॥ पुंडलिका लागतां पायां । चुकें येरझार वायां ॥५॥ पाहतां विठ्ठलमूर्ति । भानुदासांसी विश्रांती ॥६॥
५६
देवा कोठवरीं अंत पाहतोसी । प्राण कंठापाशीं ठेवियेला ॥१॥ पळमात्र चित्ता नाहीं समाधान । चित्तेंनें व्यापुन घेतलेंसे ॥२॥ नानापरीचें दुःख येवोनी आदळत । शोकें व्याकुळ चित्त होत असे ॥३॥ यासी तो उपाय न कळेचि मज । शरण आलों तुज देवराया ॥४॥ इच्छा पुरवुनी सुखरुप ठेवी । भानुदास पायीं ठाव मागे ॥५॥
५७
धन्य धन्य हें नगर । भुवैकुंठ पंढरपूर ॥१॥ धन्य धन्य चंद्रभागा । मध्यें पुंडलिक उभा ॥२॥ धन्य धन्य वेणुनाद । क्रीडा करितो गोविंद ॥३॥ धन्य पद्माळ्यांची पाळी । गाई चारी वनमाळी ॥४॥ धन्य पंढरीचा वास । देवा गाये भानुदास ॥५॥
५८
धर्मशास्त्रीं आहे नीत । पुनीत क्षेत्र सप्तपुर्‍या ॥१॥ काशी आदि असती सप्त । परि पवित्र पंढरी ॥२॥ न बाधीच पापलेश । ऐसा उल्हास नामाचा ॥३॥ सदाकाळीं वैष्णवजन । गातीं पावन रामहरी ॥४॥ धन्य त्यांचा रहिवास । नित्य गातो भानुदास ॥५॥
५९
न मागतां कांहीं न करिता सेवा । आलासी या देवी पंढरीये ॥१॥ तुं गा मायबाप विश्वासी तारक । तुवा पुंडलिक सुखी केली ॥२॥ चारिता गोधनें आलासी बा पायीं । पुंडलिक काहीं न बोलेची ॥३॥ चिन्मयाचा दीप साक्षीत्वासी आला । भानुदास त्याला नाम झालें ॥४॥
६०
न येसी योगियांच्या ध्याना । अन बैसरसी मुनीजनांच्या मना । तो तुं पंढरीचा राणा । भीमातीर निवासी ॥१॥ साक्ष अससीं सर्वाभूतिं । असुनीं न दिसे जगतीं । पांडुरंग बालमूर्ति । प्रगट उभी विटेवरी ॥२॥ न कळे शास्त्रिकां संवाद । शब्दीं न सापडे बोधा । तो तुं उभा परमानंद । पुंडलिक द्वारीं ॥३॥ वेद अचोज आंबुला । श्रुति करती गलबला । तो तु घननीळ सांवळा । भानूदासा अंतरीं ॥४॥
६१
नको फिरूं रानीं वनीं तूं दुर्गघाट । सोपीं आहे वाट पंढरीची ॥१॥ नको करुं जप तप अनुष्टाहान । सोपी आहे जाण पंढरी हे ॥२॥ नको जाऊं तीर्था मनाच्या हव्यासें । जाई तुं उल्हासें पंढरीसी ॥३॥ नको करुं योग अष्टांग निर्वाण । सोपें तें भुवन पंढरी जगीं ॥४॥ भानुदास म्हणे सोपें वर्म राम । कासयासी श्रम करिसी बहु ॥५॥
६२
नामाचा महिमा शुक सांगे । परिक्षिती राजा जाणे अंगें ॥१॥ जपतांचि रामकृष्ण नामें । दहन होतीं कर्माकर्में ॥२॥ नामें दया शांति क्षमा । नामें शीतळ शंकर उमा ॥३॥ नाम जप ध्यानीं मनीं । भानुदास वंदितो चरणीं ॥४॥
६३
पंढरींचें सुख पाहतां अलौकिक । वैकुंठनायक उभा जेथें ॥१॥ देवां जें दुर्लभ भक्तांसी सुलभ । रुक्मिणीवल्लभ उभा विटे ॥२॥ वैष्णवांचा मेळ करिती गदारोळ । त्यामाजीं गोपाळ सप्रेमें नाचे ॥३॥ जिकडे पाहे तिकडे होय ब्रह्मानंद । भानुदास आनंदे गात असे ॥४॥
६४
पंढरीचें सुख पुंडलिकासी झालें तेणेंही वांटिलें भक्तलांगी ॥१॥ भुक्तिमुक्ति वरदान दिधलें । तें नाहीं ठेविलें आपणापाशी ॥२॥ चंद्रभागे तीरीं आश्रम पुंडलिकाचा । तो विसाव तीर्थाचा तीर्थराव ॥३॥ एकें गुप्तरुप म्हणोनी मौनाचि धरिलें । एकीं चोहटा उभें केलें परब्रह्मा ॥४॥ कटीं कर विराजित उभा असे निवांत । समचरणशोभत ध्यान मुद्रे ॥५॥ समदृष्टी साजिरी कमळनयन वरी । पितांबरधारी शामप्रभा ॥६॥ ऐसा बरवाया बरवंट उभा असे नीट । मस्तकीं मुगुट तेजः पुंज ॥७॥ भक्तिज्ञानवैराग्य दिधलें भजना । वैकुंठींचा राणा भाग्यवंतु ॥८॥ ऐसा सुखाचा सागरु । विठ्ठल कल्पतरु । पुंडलिक थोरु । भक्तराज ॥९॥ भानुदासस्वामी तपें पुर्ण झाला । तो भक्तजना झाला मायबाप ॥१०॥
६५
पतित म्हणोनि जाहलों शरणागत । अनाथाचा नाथ म्हणती तुम्हा ॥१॥ तें आपुलें ब्रीद साभाळी अनंता । नको पा परता दास तुझा ॥२॥ तुझा दास म्हाणोनि जगीं जाहली मात । अनथांचा नाथ तूते म्हणती ॥३॥ भानुदास म्हणे सांभळी वचन । पतीतपावन ब्रीद जगीं ॥४॥
६६
परलोकींची वस्तु पंढरीसी आली । ती दैवे फावली पुंडलिका ॥१॥ घेतां देतां लाभ बहुतांसी जाला । विसावा जोडला पांडुरंग ॥२॥ न करितां सायास वस्तुची आयती । वैष्णवीं बहुतीं वेटाळिलीं ॥३॥ भानुदासस्वामी कृपेचा सागरु । विठ्ठल कल्पतरु वोळला आम्हां ॥४॥
६७
पशुपक्षी श्वापद कीटक भ्रमर । रामनामें उद्धार एकचि होय ॥१॥ म्हणोनियां करा नामाचें चिंतन । तुटेल बंधन यमपाश ॥२॥ सोपें वर्म तुम्हां सांगितलें गुज । भानुदास निज जप करी ॥३॥
६८
बैसोनी अनुष्ठान रामनाम ध्यान । यापारि साधन नेणें कांहीं ॥१॥ एकविध भाव दृढता हें मन । यापरि साधन आन नाहीं ॥२॥ परद्रव्य परदारेचा विटाळ । यावीण निर्मळ तप नाहीं ॥३॥ भानुदास म्हणे रामनाम गुढी । लावली चोखडी कलियुगी ॥४॥
६९
भवसिंधू तरावया सोपें हे वर्म । मुखीं तो श्रीराम जप सदा ॥१॥ यमाची यातना न घडे बंधन । तुटेल हें जाणा कर्माकर्म ॥२॥ योग याग तपें घडती तीर्थाटन । मुखीं गातां नारायण जोडे सर्व ॥३॥ भानुदास म्हणे कलिमाजी सोपें । नामस्मरण जपे श्रीविठ्ठलाचें ॥४॥
७०
भाकितों करुणा पंढरीच्या राया । अगा यादवराया श्रीकृष्णरामा ॥१॥ तूं माय माउली जीवीं जीवनकळा । भक्ताचा लळा पुरविसि ॥२॥ आवडे साबडे भक्ताचें कीर्तन । नाचसी येऊन निरभिमानें ॥३॥ भानुदास म्हणे पुरवीं माझे लळे । विठठले सांवळे माऊलीये ॥४॥
७१
भाबांवसी कां रे माझें म्हणसी । कोण हे कोणासी कामा आले ॥१॥ घेई तूं अनुभव कोणाचे ते कोण । अंतकाळीं जाण पारखे होती ॥२॥ जवळी असतां धन कांही रुका । तेव्हा म्हणती सखा दादा भाई ॥३॥ हीनपणें म्हणती अभागी करंटा । जन्मला फुकटा मारतां बरें ॥४॥ भानुदास म्हणे ऐसें हे जन । परी माझें जाण करिती वायां ॥५॥
७२
भाविकासाठीं उभा । विठु कैवल्याचा गाभा ॥१॥ युगें झालीं अठ्ठाविस । उभा पुंडलिका पाठीसा ॥२॥ न मानी कांही शीण । उभा तिष्ठत अज्ञोन ॥३॥ ऐसा कृपाळु दीनाचा । भानुदास म्हणे साचा ॥४॥
७३
मज निरविलें कोनाचिये हातीं । वैकुंठीं श्रीपति राहिलासी ॥१॥ कोणी नाहीं मज ठाऊक तुजला । संकटाचा घाला कैसा केला ॥२॥ दुरी टाकूनियां केलेसे निष्ठूर । दुःखाने बेजार केलें मज ॥३॥ काय राग आला तुझिया मनांत । तयामुळें शोंकांत पाडियलें ॥४॥ अन्यायाची राशी देहचि सगळा । हा राग गोपाळा न मानावा ॥५॥ क्षमा करीं माझे सर्व अपराध । धरावा भेद कांही देवा ॥६॥ भानुदास म्हणे अंगिकारा त्वरित । करुनि आनंदात ठेवा पायीं ॥७॥
७४
मनासी करीं पां रे बोध । आतां लवकरी होई सावध । सांडी द्वैत भेदाभेद । वाचे उच्चारी रामकृष्ण गोविंद ॥१॥ व्रत करी एकादशी । नेमे जाई पंढरीसी । आषाढी आणि कार्तिकीसी । दोहीं वारींसी चुकों नको ॥२॥ सोपे वर्म म्हणे भानुदास । नाचा गातां माना उल्हास । आणिक नको बा हव्यास । साधीं साधन हेंचि सोपे ॥३॥
७५
माझा तो भरंवसा तुझे नामीं आहे । येणें कार्य होय आमुचें देवा ॥१॥ तूं जगाचें जीवन मनाचें मोहन । ब्रह्मा सनातन तूंचि देवा ॥२॥ जंगम जगीं प्रकाशला । हा अचोज अबोला दिसे देवा ॥३॥ भानुदास म्हणे विश्रांतीसी स्थान । पंढरीवांचून दुजें नाहीं ॥४॥
७६
माणिकांचें तारू चंद्रभागे आले । भूषण तें जालें सनकादिका ॥१॥ पंढरपूर हें नीळियाची खाणी । नवलाव साजणी देखियेला ॥२॥ अवघिया देशांसी न्यावया पुरलें । आगरीं उरलें जैसे तैंसें ॥३॥ भानुदास म्हणे नीळ हा चोखड़ा । सुजडु हा जड़ा जीवन मुद्रा ॥४॥
७७
ये संसारी बहूता वाटा । सिद्ध साधका सुभटा । दीप देहींचा गोमटा । तवंची ठाका सुपंथू ॥१॥ मग आयुष्यांच्या अस्तमानीं । पडलिया काळाच्या वदनीं । तें वेळें न राखे मायाराणी । वडवा जंखिणीं प्राणियां ॥२॥ मार्गु सांपडला निगुती । ध्रुव प्रल्हाद परीक्षिती । आम्हीं तयाचे सांगाती ॥ भावें भक्ति अनुसरलों ॥३॥ लहाना आनि सहाना । इडा पिंगळा सुषुम्ना । पवनपंथे योगी जाणा । ब्रह्मास्थान न्यावया ॥४॥ तेथें सप्त धातूंची आटणी । या नांव बोलिजे कुंडलिनी । ती तंव असाध्य कहाणी । तुम्हीं त्या पंथें नव जावें ॥५॥ एक यज्ञाचोनि बळें । इच्छी स्वर्गांची फळे । दिवस चारी सोहळे । पुरती इंद्रियांचे ॥६॥ तप वेंचिलिया पुढती । मागुती मृत्युलोकी लोटतीं । तेथें आहे पुनरावृत्ती । तुम्ही त्या पंथें नव जावे ॥७॥ नाना बळिदानें देती । गळां वोखदें बांधिती । क्रूर दैवतें पूजिती । ते काय पुरविती इच्छिलें ॥८॥ तैसा नव्हें लक्ष्मीपती । त्याची कोणी न करिती भक्ति । मुढ सिंतरले नेणों किती । तया होय गती यमापंथु ॥९॥ तीर्थें तीर्थ प्रदक्षिणा । क्षमा नाहीं अंतःकरणा । कोप आलिया उगाणा । होय केलीया पुण्याचा ॥१०॥ तैसीच प्रतिज्ञा मतें । गर्वें वाहवालीं बहूतें । तुम्हीं नव जावें तया पंथें । साधुसंगती अनुसारा ॥११॥ हरिश्चर्द्रं सूर्यवंशी । तेणें ठीकिली हो काशी । अर्थ दिधला महंतासी । स्त्रीपुत्रांसी विकुनी ॥१२॥ तैसेंच बळी बिभीषण । हनुमंत उद्धव अक्रूर जाण । रुक्मागंद सुलक्षण । येणेंचि पंथे उद्धरले ॥१३॥ मेघ वर्षाती धारा प्रबळा । तेणें वाहाती नदी नद वोहळा । त्या मीनलीया सिधुं जळा । आगाधपण पावती ॥१४॥ तैसी ही विद्या पाहा हो । श्रीगुरुचरणीं प्रेमभावो । भानुदास म्हणे हा उपावो । संसार वावो निस्तरेल ॥१५॥
७८
योगाचिया आटी नको धरुं पोटीं । वायीं शीण तळवटीं तुज होय ॥१॥ यज्ञाचिया आटी नको धरुं पोटीं । वायां शीण तळवटीं तुज होय ॥२॥ जपाचिया आटी नको धरुं पोटीं । वायां शीण तळवटीं तुज होय ॥३॥ तपाचिया आटी धरुं नको पोटीं । वायां शीण तळवटीं तुज होय ॥४॥ अनुष्ठानाचिया आटी नको धरु पोटीं । वायां शीण तळवटीं तुज होय ॥५॥ भानुदास म्हणे रामनामें गोष्टी । धन्य तूं सृष्टिमाजीं होई ॥६॥
७९
रायें कंठमाळ देवासी घातली । देवं त्या दिधली भानुदासा ॥१॥ कोणी नेली माळ करती त्याचा शोध । देखिली प्रसिद्ध याचे गळां ॥२॥ राजदुतीं नेला म्हणती गे हे चोर । रायानें विचार नाहीं केला ॥३॥ सुळीं द्यावया भानुदास नेला । तेणें आठविला पांडुरंग ॥४॥
८०
लावण्य रुपड़े पहा डोळेभरी । मूर्ति हे गोजिरी विटेवरी ॥१॥ राही रखुमाई सत्यभामा आई । गरुड हनुमंत ठायीं उभे असती ॥२॥ चंद्रभागा तीर्थ पुंडलीक मुनी । दक्षिणवाहिनी शोभतसे ॥३॥ वेणुनादीं काला गोपाळ करिती । भानुदासा तृप्ति पाहूनिया ॥४॥
८१
वाचा आणि अवस्था भोग अभिमानी । पुरुषार्थ खाणी चारी मुख्य ॥१॥ कीटक भ्रमर जंगम स्थावरत्व । भरलें महतत्त्व कोंदाटोनी ॥२॥ चेताविता याला कोण आहे येथें । ओहं सोहं भाते लाऊनियां ॥३॥ फुंकितो तो कोण आणिक दुसरा । वर्म गुरुपुत्रा न कळेचि ॥४॥ सृष्टिचा उभारा केला तो संकल्प । भानुदास दीप प्रज्वळिला ॥५॥
८२
वृदांवनीं वेणू कवणाच माये वाजे । वेणुनादें गोवर्धनू गाजे । पुच्छु पसरुनि मयोर विराजे । मज पाहतां भासती यादवराजे ॥१॥ तृण चारा चरूं विसरली । गाई व्याघ्र एके ठायीं जालीं । पक्षीं कुळें निवांत राहिली । वैरभाव समुळ विसरली ॥२॥ यमुना जळ स्थिर स्थिर वाहे । रविमंडळ चालतां स्तब्ध होये । शेषकूर्म वराह चकित राहे । बाळा स्तन देऊ विसरली माये ॥३॥ ध्वनी मजुंळ मंजुळ उमटती । वांकी रुणझुण रुणझूण वाजती । देव विमानीं बैसानि स्तुती गाती । भानुदासा फावली प्रेम भक्ति ॥४॥
८३
वेदशास्त्राचें सार । तो हा विठ्ठल विटेवर ॥१॥ पुढें शोभे चंद्रभागा । स्नाने उद्धार या जगा ॥२॥ पद्मतळें गोपाळपुर । भक्त आणि हरिहर ॥३॥ भानुदास जोडोनी हात । उभा समोर तिष्ठत ॥४॥
८४
वेदांत सिद्धांत ऐकोनियां गोष्टी । मन जाहलें चावटी देवराया ॥१॥ परि त्याचा बोध नये काहीं चित्ता । फजिती तत्त्वतां मागें पुढें ॥२॥ संसाराचें जाळें पडतसे गुंती । करितां कुंथाकुंथी न ॥३॥ निघेची भानुदास म्हणे सांवळ्या श्रीरामा । तुझा देई प्रेमा दुजें नको ॥४॥
८५
वेदीं संगितलें श्रुतिं अनुवादिलें । तें ब्रह्मा कोंदलें पढंरीये ॥१॥ वाळंवंटीं बुंथीं श्रीविठठ्लनामें । सनकादिक प्रेमें गाती जया ॥२॥ भानुदास म्हणे तो हरि देखिला । हृदयीं सांठविला आनंदभरित ॥३॥
८६
शंख चक्र गदाधरु । कासे सुरंग पीतांबरु । चरणीं ब्रीदाचा तोडरु । असुरावरी काढितसे ॥१॥ बरवा बरवा केशिराजु । गरुडवहन चतुर्भूजु । कंठी कौस्तुभ झळके बिजु । मेघःशाम देखोनी ॥२॥ करी सृष्टिची रचना । नाभी जन्म चतुरानाना । जग हें वाखाणी मदना । तें लेंकरुं तयाचें ॥३॥ कमळा विलासली पायीं । आर्तं तुळशीचे ठायीं । ब्रह्मादिकां अवसरु नाहीं । तो यशोदे वोसंगा ॥४॥ उपमा द्यावी कवणे अंगा । चरणीं जन्मली पै गंगा । सोळा सहस्त्र संभोगा । नित्य न पुरती कामिनी ॥५॥ आधिष्ठान गोदातीरीं । श्रुद्धिसिद्धि तिष्ठती द्वारीं । भानुदास पूजा करी । वाक् पुष्पें अनुपम्य ॥६॥
८७
शरणागत जाहलिया उपेक्षीना देव । हा आहे अनुभव माझे देहीं ॥१॥ हो का राव रंक कुळ यातिहीन । करतां नामस्मरण न वंची देव ॥२॥ भानुदास म्हणे स्मरा त्या रामासी । चुकेल चौर्‍यांयंशी वेरझार ॥३॥
८८
शेबंडी वाकूडीं गौळियांची पोरं । तेथें नाचे निर्धारें आवडीनें ॥१॥ जाणते वेदांती न करिती तिकडे तोंड । म्हणे हे तों होती भांड शाब्दीक ते ॥२॥ चोरितानां लोणी बांधिती गौळणी । तेथें काकळुनि पाय धरी ॥३॥ यज्ञाचे ठायीं अवदान नेघे । विदुरासी मागे आणि कण्या ॥४॥ भानुदास म्हणे जाणते नेणते । दोनी ते सरते होता पायीं ॥५॥
८९
श्रवणीं कीर्तीं ऐकेन मुखें नाम गाईन । डोळेभर पाहीन श्रीमुख देवा ॥१॥ चरणें करीन प्रदक्षिणा नमन चरणा । घालीन लोटांगणा संतद्वारीं ॥२॥ एकादशीं व्रत जागर निराहारी । द्वादशीं क्षीरापती निर्धारी सेवीन मी ॥३॥ भानुदास म्हणे हाचि माझा प्रेम । दुजा कांही श्रम न करी आन ॥४॥
९०
श्रीराम आम्हां सोयरा सांगाती । नाहीं पुनरवृत्ति जन्म कर्म ॥१॥ तुटती यातना देहाचा संबध । श्रीराम बोध ठसतां जीवीं ॥२॥ वेरझार खुटली वासना तुटली । वॄत्ती हे जडली श्रीरामपायीं ॥३॥ भानुदास म्हणे कुळींचे दैवत । श्रीराम समर्थ अयोध्येचा ॥४॥
९१
षड्विकार आणि सप्त चक्रावळी । अष्ट भिन्न जाली प्रकृत ते ॥१॥ नावनाडी रचन दश इंद्रियांची । अकराव्या मनाची गति तूंचि ॥२॥ विषय इंद्रिय वासना उप्तत्ती । तुजमाजी येती जाती सर्व ॥३॥ चिन्मयाचा दीप साक्षित्वासी आला । भानुदास त्याला नाम जालें ॥४॥
९२
सांडोनि तितुकें यथाबीज केलें । कैंसे चाळविलें कानडीयाने ॥१॥ रखुमाई आई ती जालीसे उदास । पुंडलिका कैसें पडिलें मौन ॥२॥ कनकाचें ताटीं रत्‍नाचे दीपक । सुंदर श्रीमुख वोवाळती ॥३॥ भानुदास म्हणे चला मजसवें । वाचा ऋणदेवें सांभाळावें ॥४॥
९३
साधनाच्या आटी नको रे कपाटीं । पंढरी वैकुंठ पाहें डोळां ॥१॥ मंत्राचा आटी पडशील व्यसनीं । पंढरी जाउनी पाहे डोळां ॥२॥ तपाचिया आटी पडशी डोंगरीं । पाहें पां पंढरी डोळेभरी ॥३॥ यज्ञाच्या आटी फिरुं नको देशा । पंढरीनिवास पाहे डॊळां ॥४॥ भानुदास म्हणे नामाचा हव्यास । पंढरी सुखास पात्र होशी ॥५॥
९४
हेंचि साधकांचें स्थळ । भोळें वंदिती निर्मळ । अभाविक जे खळ । तयां नावडे सर्वथा ॥१॥ तें हें जाणा पंढरीपुर । मोक्ष मुक्तिचें माहेर । करती जयजयकार । वैष्णव ते आनंदे ॥२॥ टाळघोळ चिपुळ्या नाद । दिंड्या पताका मकरंद । गाती विठ्ठलनाम आल्हाद । अट्टहास्य करुणी ॥३॥ भानुदास अहोरातीं । देवा करितसे विनंती । या वैष्णावांचे सांगाती । मज जन्म देई देवा ॥४॥

Labels

Followers