तुकारामगाथा-३

Sant Tukaram Abhag bhag 3
2501
नरस्तुति आणि कथेचा विकरा । हें नको दातारा घडों देऊं ॥१॥ ऐसिये कृपेचि भाकितों करुणा । आहेसि तूं राणा उदाराचा ॥ध्रु.॥ पराविया नारी आणि परधना । नको देऊं मनावरी येऊं ॥२॥ भूतांचा मत्सर आणि संतनिंदा । हें नको गोविंदा घडों देऊं ॥३॥ देहअभिमान नको देऊं शरीरीं । चढों कांहीं परी एक देऊं ॥४॥ तुका म्हणे तुझ्या पायांचा विसर । नको वारंवार पडों देऊं ॥५॥
2502
नव जातां घरा । आम्ही कोणाच्या दातारा ॥१॥ कां हे छळूं येती लोक । दाट बळें चि कंटक ॥ध्रु.॥ नाहीं आम्ही खात । कांहीं कोणाचें लागत ॥२॥ कळे तैसी सेवा । तुका म्हणे करूं देवा ॥३॥
2503
नवां नवसांचीं । जालों तुम्हासी वाणीचीं ॥१॥ कोण तुझें नाम घेतें । देवा पिंडदान देतें ॥ध्रु.॥ कोण होतें मागें पुढें । दुजें बोलाया रोकडें ॥२॥ तुका म्हणे पांडुरंगा । कोणा घेतासि वो संगा ॥३॥
2504
नव्हतियाचा सोस होता । झडो आतां पदर ॥१॥ देखणें तें देखियेलें । आतां भलें साक्षित्वें ॥ध्रु.॥ लाभें कळों आली हानि । राहों दोन्हीं निराळीं ॥२॥ तुका म्हणे एकाएकीं । हा कां लोकीं पसारा ॥३॥
2505
नव्हती आली सीसा सुरी अथवा घाय पाठीवरी । तो म्यां केला हरी एवढा तुम्हां आकांत ॥१॥ वांटिलासी दोहीं ठायीं मजपाशीं आणि डोहीं । लागों दिला नाहीं येथें तेथें आघात ॥ध्रु.॥ जीव घेती मायबापें थोड्या अन्याच्या कोपें । हें तों नव्हे सोपें साहों तों चि जाणीतलें ॥२॥ तुका म्हणे कृपावंता तुज ऐसा नाहीं दाता । काय वाणूं आतां वाणी माझी कुंटली ॥३॥
2506
नव्हती ते संत करितां कवित्व । संताचे ते आप्त नव्हती संत ॥१॥ येथें नाहीं वेश सरतें आडनांवें । निवडे घावडाव व्हावा अंगीं ॥ध्रु.॥ नव्हती ते संत धरितां भोंपळा । करितां वाकळा प्रावरण ॥२॥ नव्हती ते संत करितां कीर्तन । सांगतां पुराणें नव्हती संत ॥३॥ नव्हती ते संत वेदाच्या पठणें । कर्म आचरणें नव्हती संत ॥४॥ नव्हती संत करितां तप तीर्थाटणें । सेविलिया वन नव्हती संत ॥५॥ नव्हती संत माळामुद्रांच्या भूषणें । भस्म उधळणें नव्हती संत ॥६॥ तुका म्हणे नाहीं निरसला देहे । तों अवघे हे सांसारिक ॥७॥
2507
नव्हती भेटी तों चि बरें । होतां चोरें नाडिलें ॥१॥ अवाघियांचा केला झाडा । रिता वाडा खोंकर ॥ध्रु.॥ चिंतनांचें मूळ चत्ति । नेलें वृत्ति हरूनि ॥२॥ तुका म्हणे मूळा आलें । होतें केलें तैसें चि ॥३॥
2508
नव्हती माझे बोल । अवघें करितो विठ्ठल ॥१॥ कांहीं न धरावी खंती । हित होइल धरा चित्तीं ॥ध्रु.॥ खोटी ते अहंता । वाट टाकिली सांगतां ॥२॥ ज्याचें तो चि जाणें । मी मापाडें तुका म्हणे ॥३॥
2509
नव्हती माझे बोल जाणां हा निर्धार । मी आहें मजूर विठोबाचा ॥१॥ निर्धारा वचन सोडविलें माझ्या । कृपाळुवें लज्जा राखियेली ॥ध्रु.॥ निर्भर मानसीं जालों आनंदाचा । गोडावली वाचा नामघोषें ॥२॥ आतां भय माझें नासलें संसारीं । जालोंसें यावरी गगनाचा ॥३॥ तुका म्हणे हा तों संतांचा प्रसाद । लाधलों आनंद प्रेमसुख ॥४॥
2510
नव्हती हीं माझीं जायाचीं भूषणें । असे नारायणें उचित केलें ॥१॥ शब्दाच्या वोवोनी रत्नाचिया माळा । मुळींच जिव्हाळा झरवणी ॥ध्रु.॥ अर्थांतरीं असे अनुभवसेवन । परिपाकीं मन साक्ष येथें ॥२॥ तुका म्हणे मज सरतें परतें । हें नाहीं अनंतें उरों दिलें ॥३॥
2511
नव्हती हे उसणे बोल । आहाच फोल रंजवण ॥१॥ अनुभव तो वरावरी । नाहीं दुरी वेगळा ॥ध्रु.॥ पाहिजे तें आलें रुची । काचाकुची काशाची ॥२॥ तुका म्हणे लाजे आड । त्याची चाड कोणासी ॥३॥
2512
नव्हतील जपें नव्हतील तपें । आम्हांसी हें सोपें गीतीं गातां ॥१॥ न करितां ध्यान न करितां धारणा । तो नाचे कीर्तनामाजी हरि ॥ध्रु.॥ जयासी नाहीं रूप आणि आकार । तो चि कटी कर उभा विटे ॥२॥ अनंत ब्रम्हांडें जयाचिया पोटीं । तो आम्हां संपुष्टीं भक्तिभावें ॥३॥ तुका म्हणे वर्म जाणती लडिवाळें । जें होतीं निर्मळें अंतर्बाहीं ॥४॥
2513
नव्हतें तें कळों आलें । तरी बोलें अबोला ॥१॥ तुज मज घातली तुटी । एके भेटीपासूनि ॥ध्रु.॥ आतां याची न धरीं चाड । कांहीं कोड कवतुकें ॥२॥ तुका म्हणे यावें जावें । एका भावें खंडलें ॥३॥
2514
नव्हतों सावचित । तेणें अंतरलें हित ॥१॥ पडिला नामाचा विसर । वाढविला संवसार ॥ध्रु.॥ लटिक्याचे पुरीं । वाहोनियां गेलों दुरी ॥२॥ तुका म्हणे नाव । आम्हां सांपडला भाव ॥३॥
2515
नव्हावा तो बरा मुळीं च संबंध । विश्वासिकां वध बोलिलासे ॥१॥ आतां माझें हित काय तें विचारा । सत्यत्वें दातारा पांडुरंगा ॥ध्रु ॥ नाहीं भाव परी म्हणवितों दास । नका देऊं यास उणेंयेऊं ॥२॥ तुका म्हणे कां हो उद्धरितां दीन । मानीतसां सीण मायबापा ॥३॥
2516
नव्हे आराणूक परि मनीं वाहे । होईल त्या साहे पांडुरंग ॥१॥ पंढरीसि जावें उदेग मानसीं । धरिल्या पावसी संदेह नाहीं ॥ध्रु.॥ नसो बळ देह असो पराधीन । परि हें चिंतन टाकों नको ॥२॥ तुका म्हणे देह पडो या चिंतनें । पुढें लागे येणें याजसाटीं ॥३॥
2517
नव्हे आराणूक संवसारा हातीं । सर्वकाळ चित्तीं हा चि धंदा ॥१॥ देवधर्म सांदीं पडिला सकळ । विषयीं गोंधळ गाजतसे ॥ध्रु. ॥ रात्रि दीस न पुरे कुटुंबाचें समाधान । दुर्लभ दर्शन ईश्वराचें ॥२॥ तुका म्हणे आत्महत्या रे घातकी । थोर होते चुकी नारायणीं ॥३॥
2518
नव्हे खळवादी मता च पुरता । सत्याची हे सत्ता उपदेश ॥१॥ साक्षत्वेंसी मना आणावीं उत्तरें । परिपाकीं खरें खोटें कळे ॥ध्रु.॥ नव्हे एकदेशी शब्द हा उखता । ब्रम्हांडापुरता घेईल त्यासी ॥२॥ तुका विनवणी करी जाणतियां । बहुमतें वांयां श्रमों नये ॥३॥
2519
नव्हे गुरुदास्य संसारियां । वैराग्य तरी भेणें कांपे विषयां । तैसें नाम पंढरीराया । जया सायास न लगती ॥१॥ म्हणोनि गोड सर्वभावें । आंघोळी न लगे तोंड धुवावें । अर्थचाड जीवें । न लगे भ्यावें संसारा ॥ध्रु.॥ कर्मा तंव न पुरे संसारिक । धर्म तंव फळदायक । नाम विठ्ठलाचें एक । नाशी दुःख भवाचें ॥२॥ न लगे सांडणें मांडणें । आगमनिगमाचें देखणें । अवघें तुका म्हणे । विठ्ठलनामें आटलें ॥३॥
2520
नव्हे जोखाईं जोखाईं । मायराणी मेसाबाईं ॥१॥ बिळया माझा पंढरिराव । जो या देवांचा ही देव ॥ध्रु.॥ रंडी चंडी शक्ति । मद्यमांस भिक्षती ॥२॥ बहिरव खंडेराव । रोटीसुटीसाटीं देव ॥३॥ गणोबा विक्राळ । लाडुमोदकांचा काळ ॥४॥ मुंज्या म्हैसासुरें । हें तों कोण लेखी पोरें ॥५॥ वेताळें फेताळें । जळो त्यांचें तोंड काळें ॥६॥ तुका म्हणे चित्तीं । धरा रखुमाईंचा पती ॥७॥
2521
नव्हे तुम्हां सरी । येवढें कारण मुरारी ॥१॥ मग जैसा तैसा काळ । दाट सारावा पातळ ॥ध्रु.॥ स्वामींचें तें सांडें । पुत्र होतां काळतोंडें ॥२॥ शब्दा नाहीं रुची । मग कोठें तुका वेची ॥३॥
2522
नव्हे धीर कांहीं पाठवूं निरोप । आला तरीं कोप येऊ सुखें ॥१॥ कोपोनियां तरी देईंल उत्तर । जैसें तैसें पर फिरावूनि ॥ध्रु.॥ नाहीं तया तरी काय एक पोर । मज तों माहेर आणीक नाहीं ॥२॥ तुका म्हणे असे तयामध्यें हित । आपण निवांत असों नये ॥३॥
2523
नव्हे नरनारी संवसारीं अंतरलों । निर्लज्ज निष्काम जना वेगळे चि ठेलों ॥१॥ चाल रघुरामा न आपुल्या गांवा । तुजविण आम्हां कोण सोयरा सांगाती ॥ध्रु.॥ जनवाद लोकनिंद्य पिशुनाचे चेरे । साहूं तुजसाठीं अंतरलीं सहोदरें ॥२॥ बहुता पाठीं निरोप हाटीं पाठविला तुज । तुका म्हणे आतां सांडुनि लौकिक लाज ॥३॥
2524
नव्हे निष्ठावंत तुज काय बोल । सेवेविण मोल मागतसें ॥ध्रु.॥ न घडे भजन शुद्ध भावनिष्ठा । आपुल्या अदृष्टावरी बोल ॥ध्रु.॥ पूवाअ जाले भक्त असंख्य विरक्त । काम क्रोध अहंते निर्दाळिलें ॥२॥ ऐसी अंगवण नाहीं मज देवा । करीतसें हेवा भेटावयाचा ॥३॥ कृपा करोनियां पुरवीं असोसी । आपुल्या ब्रिदासी राखावया ॥४॥ तुका म्हणे एक बाळक अज्ञातें । त्यासि हे पोसित मायबापें ॥५॥ नाटाचे २
2525
नव्हे ब्रम्हचर्य बाइलेच्या त्यागें । वैराग्य वाउगें देशत्यागें ॥१॥ काम वाढे भय वासनेच्या द्वारें । सांडावें तें धीरें आचावाचे ॥ध्रु.॥ कांपवूनि टिरी शूरत्वाची मात । केलें वाताहात उचित काळें ॥२॥ तुका म्हणे करी जिव्हेसी विटाळ । लटिक्याची मळ स्तुति होतां ॥३॥
2526
नव्हे ब्रम्हज्ञान बोलतां सिद्ध । जंव हा आत्मबोध नाहीं चित्ती ॥१॥ काय करिसी वांयां लटिका चि पाल्हाळ । श्रम तो केवळ जाणिवेचा ॥ध्रु.॥ मी च देव ऐसें सांगसी या लोकां । विषयांच्या सुखा टोंकोनियां ॥२॥ अमृताची गोडी पुढिलां सांगसी । आपण उपवासी मरोनिया ॥३॥ तुका म्हणे जरि राहील तळमळ । ब्रम्ह तें केवळ सदोदित ॥४॥
2527
नव्हे भिडा हें कारण । जाणे करूं ऐसे जन ॥१॥ जों जों धरावा लौकिक । रडवितोसी आणीक ॥ध्रु.॥ चाल जाऊं संतांपुढें । ते हें निवडिती रोकडें ॥२॥ तुका म्हणे तूं निर्लज्ज । आम्हां रोकडी गरज ॥३॥
2528
नव्हे मतोळ्याचा वाण । नीच नवा नारायण ॥१॥ सुख उपजे श्रवणें । खरें टांकसाळी नाणें ॥ध्रु.॥ लाभ हातोहातीं । अधिक पुढतोंपुढती ॥२॥ तुका म्हणे नेणों किती । पुरोनि उरलें पुढती ॥३॥
2529
नव्हे मी शाहाणा । तरी म्हणा नारायणा ॥१॥ तुम्हां बोलवाया कांहीं । ये च भरलोंसे वाहीं ॥ध्रु.॥ आणावेति रूपा । कोपलेती तरी कोपा ॥२॥ कळोनि आवडी । तुका म्हणे जाते घडी ॥३॥
2530
नव्हे शब्द एक देशी । सांडी गवशी कोणाला ॥१॥ जाली माझी वैखरी । विश्वंभरी व्यापक ॥ध्रु.॥ मोकलिलें जावें बाणें । भाता जेणे वाइलें ॥२॥ आतां येथें कैचा तुका । बोले सिका स्वामीचा ॥३॥
2531
नव्हे हें कवित्व टांकसाळी नाणें । घेती भले जन भले लोक ॥१॥ लागलासे झरा पूर्ण नवनीतें । सेविलियां हित फार होय ॥२॥ तुका म्हणे देवा केला बलात्कार । अंगा आलें फार महंतपण ॥३॥
2532
नव्हें कांहीं कवणाचा । भाव जाणवला साचा ॥१॥ म्हणोनि तुझ्या पायीं । जीव ठेविला निश्चयीं ॥ध्रु.॥ शरीर जायाचें कोंपट । याची काय खटपट ॥२॥ तुका म्हणे वांयांविण । देवा कळों आला सीण ॥३॥
2533
नव्हें दास खरा । परि जाला हा डांगोरा ॥१॥ यासी काय करूं आतां । तूं हें सकळ जाणता ॥ध्रु.॥ नाहीं पुण्यगाठीं । जे हें वेचूं कोणासाठीं ॥२॥ तुका म्हणे कां उपाधी । वाढविली कृपानिधी ॥३॥
2534
नव्हें परि म्हणवीं दास । कांहीं निमित्तास मूळ केलें ॥१॥ तुमचा तो धर्म कोण । हा आपण विचारा ॥धृ. ॥ नाहीं शुद्ध आचरण । परी चरण चिंतितों ॥२॥ तुका म्हणे पांडुरंगा । ऐसें कां गा नेणां हें ॥३॥
2535
नव्हें मी आहाच आशेचें बांधलें । जें हें टोंकविलें नारायणा ॥१॥ अंतर तों तुम्हां बरें कळों येतें । वेव्हार उचितें चाळवीजे ॥ध्रु.॥ मनें कल्पीलें आवरितां पाप । संकल्पीं विकल्प याचि नांवें ॥२॥ तुका म्हणे आम्हां न सोसे जळजळ । सिजल्यावरी जाळ कढ खोटा ॥३॥
2536
नव्हें मी स्वतंत्र अंगाचा पाईंक । जे हे सकळिक सत्ता वारूं ॥१॥ तुम्हां आळवावें पाउला पाउलीं । कृपेची साउली करीं मज ॥ध्रु.॥ शक्तिहीन तरी जालों शरणागत । आपुला वृत्तांत जाणोनियां ॥२॥ तुका म्हणे भवाभेणें धरिलें पाय । आणीक उपाय नेणें कांहीं ॥३॥
2537
नव्हें हें गुरुत्व मेघवृष्टि वाणी । ऐकावी कानीं संतजनीं ॥१॥ आरुष हा शब्द देवाचा प्रसाद । करविला वाद तैसा केला ॥ध्रु.॥ देहपिंड दान दिला एकसरें । मुळिचें तें खरें टांकसाळ ॥२॥ तुका म्हणे झरा लागला नवनीत । सेविलिया हित पोट धाय ॥३॥
2538
नव्हेव निग्रह देहासी दंडण । न वजे भूकतान सहावली ॥१॥ तरि नित्य नित्य करीं आळवण । माझा अभिमान असों द्यावा ॥ध्रु.॥ नाहीं विटाळिलें कायावाचामन । संकल्पासी भिन्न असें चि या ॥२॥ तुका म्हणे भवसागरीं उतार । कराया आधार इच्छीतसें ॥३॥
2539
नव्हेसी तूं लांसी । मायां आणिकां त्या ऐसी ॥१॥ जे हे वांयां जाती बोल । होती निर्फळ चि फोल ॥ध्रु.॥ नव्हेसी दुबळी । कांहीं नाहीं तें जवळी ॥२॥ तुका म्हणे खोटी । कांहीं नव्हेसी करंटी ॥३॥
2540
नव्हो आतां जीवीं कपटवसती । मग काकुळती कोणा यावें ॥१॥ सत्याचिये मापें गांठीं नये नाड । आदि अंत गोड नारायण ॥ध्रु.॥ चोखटिया नाहीं विटाळाचा आघात । साच ते साचांत सांचा पडे ॥२॥ विचारिली वाट उसंत सीतळ । बुद्धीपुढें बळ तृणतुल्य ॥३॥ आहाराच्या घासें पचोनियां जिरे । वासना ही उरे उर्वरीत ॥४॥ तुका म्हणे ताळा घालावा वचनीं । तूं माझी जननी पांडुरंगे ॥५॥
2541
नव्हों आम्ही आजिकालीचीं । काचीं कुचीं चाळवणी ॥१॥ एके ठायीं मूळडाळ । ठावा सकळ आहेसी ॥ध्रु.॥ तुमचें आमचेंसें कांहीं । भिन्न नाहीं वांटलें ॥२॥ तुका म्हणे जेथें असें । तेथें दिसें तुमचासा ॥३॥
2542
नव्हों गांढे आळसी । जो तूं आम्हांपुढें जासी ॥१॥ अरे दिलें आम्हां हातीं । वर्म वेवादाचें संतीं ॥ध्रु.॥ धरोनियां वाट । जालों शिरोमणि थोंट ॥२॥ तुका म्हणे देवा । वाद करीन खरी सेवा ॥३॥
2543
नव्हों वैद्य आम्ही अर्थाचे भुकेले । भलते द्यावे पाले भलत्यासी ॥१॥ कुपथ्य करूनि विटंबावे रोगी । का हे सलगी भीड त्याची ॥२॥ तुका म्हणे लांसू फांसुउं देऊं डाव । सुखाचा उपाव पुढें आहे ॥३॥
2544
नव्हों सभाधीट । समोर बोलाया नीट । एकलीं एकट । दुजें नाहीं देखिलें ॥१॥ आतां अवघें तुम्हीं जाणां । तुमचें माझें नारायणा । येईंल करुणा । ते चि पहा तुम्हांसी ॥ध्रु.॥ ताळ नाहीं माझे बुद्धी । धरली न धरवे शुद्धी । आतां बळें कधीं । कोण्या जन्में निवाड ॥२॥ आतां शेवटीचें । उत्तर तें हें चि साचें । शरण आलें त्याचें । तुका म्हणे सांभाळा ॥३॥
2545
नसता चि दाउनि भेव । केला जीव हिंपुटी ॥१॥ जालों तेव्हां कळलें जना । वाउगा हा आकांत ॥ध्रु.॥ गंवसिलों पुढें मागें लागलागे पावला ॥२॥ तुका म्हणे केली आणि । सलगीच्यांनी सन्मुख ॥३॥
2546
नसतां अधिकार उपदेशासी बळत्कार । तरि ते केले हो चार माकडा आणि गारूडी ॥१॥ धन धान्य राज्य बोल वृथा रंजवणें फोल । नाहीं तेथें ओल बीज वेची मूर्ख तो ॥ध्रु.॥ नये बांधों गांठी पदरा आण ऐसी तुटी । असोन कसोटी शिष्टाचार अनुभव ॥२॥ उपदेसी तुका मेघ वृष्टीनें आइका । संकल्पासी धोका सहज तें उत्तम ॥३॥
2547
नसतों किविलवाणें । कांहीं तुमच्या कृपादानें ॥१॥ हे चि तयाची ओळखी । धालें टवटवित मुखीं ॥ध्रु.॥ वांयां जात नाहीं । वचन प्रीतीचें तें कांहीं ॥२॥ तुका म्हणे देवा । सत्य येतें अनुभवा ॥३॥
2548
नसावें ओशाळ । मग मानिती सकळ ॥१॥ जाय तेथें पावे मान । चाले बोलिलें वचन ॥ध्रु.॥ राहों नेदी बाकी । दान ज्याचें त्यासी टाकी ॥२॥ होवा वाटे जना । तुका म्हणे साटीं गुणां ॥३॥ अनघडसिद्धाच्या शब्देंकरून रामेश्वरभटाच्या शरीरीं दाह जाला तो ज्यानें शमला तो अभंग ॥ १ ॥
2549
नसे तरी मनो नसो । परी वाचे तरी वसो ॥१॥ देह पडो या चिंतनें । विठ्ठलनामसंकीर्तनें ॥ध्रु.॥ दंभस्थिती भलत्या भावें । मज हरिजन म्हणावें ॥२॥ तुका म्हणे काळें तरी । मज सांभाळील हरी ॥३॥
2550
नाइकावे कानीं तयाचे ते बोल । भक्तीविण फोल ज्ञान सांगे ॥१॥ वाखाणी अद्वैत भक्तिभावेंविण । दुःख पावे सीण श्रोता वक्ता ॥ध्रु.॥ अहं ब्रम्ह म्हणोनि पाळित पिंडा । नो बोलावें भांडा तया सवें ॥२॥ वेदबाह्य लंड बोले जो पाषांड । त्याचें काळें तोंड संतांमध्ये ॥३॥ तुका म्हणे खंडी देवभक्तपण । वरिष्ठ त्याहूनि श्वपच तो ॥४॥
2551
नागर गोडें बाळरूप । तें स्वरूप काळीचें ॥१॥ गाईंगोपाळांच्या संगें । आलें लागें पुंडलीका ॥ध्रु.॥ तें हें ध्यान दिगांबर । कटीं कर मिरवती ॥२॥ नेणपणे उगें चि उभें । भक्तिलोभें राहिलें ॥३॥ नेणे वरदळाचा मान । विटे चरण सम उभें ॥४॥ सहज कटावरी हात । दहींभात शिदोरी ॥५॥ मोहरी पांवा गांजिवा पाठीं । धरिली काठी ज्या काळें ॥६॥ रम्य स्थळ चंद्रभागा । पांडुरंगा क्रीडेसी ॥७॥ भीमा दक्षणमुख वाहे । दृष्टी पाहे समोर ॥८॥ तारावेसे मूढ लोक । दिली भाक पुंडलिका ॥९॥ तुका म्हणे वैकुंठवासी । भक्तांपासीं राहिला ॥१०॥
2552
नागलें देखोनि चांगलें बोले । आपुलें वेचूनि त्याजपुढें खुले ॥१॥ अधमाचे ओंगळ गुण । उचित नेणें तो धर्म कोण ॥ध्रु.॥ आर्तभूता न घली पाण्याचा चुळ । न मागे त्यासी घाली साखर गुळ ॥२॥ एकासी आड पडोनि होंकरी । एकासी देखोनि लपवी भाकरी ॥३॥ एकासी धड न बोले वाचा । एकासी म्हणे मी तुझे बांदीचा ॥४॥ तुका म्हणे ते गाढवपशु । लाभेंविण केला आयुष्यनाशु ॥५॥
2553
नागवूनि एकें नागवीं च केली । फिरोनियां आलीं नाहीं येथें ॥१॥ भेणें सुती कोणी न घेती पालवीं । करूनियां गोवी निसंतान ॥ध्रु.॥ एकें तीं गोविलीं घेऊनि जमान । हांसतील जन लोक तयां ॥२॥ सरले तयांसी घाली वैकुंठीं । न सोडी हे साटी जीवें जाली ॥३॥ तुका म्हणे जालों जाणोनि नेणती । सांपडलों हातीं याचे आम्ही ॥४॥
2554
नाच गाणें माझा जवळील ठाव । निरोपीन भाव होईल तो ॥१॥ तुम्हां निद्रा मज आज्ञा ते स्वभावें । उतरूनि जीवें जाईन लोण ॥ध्रु.॥ एकाएकीं बहु करीन सुस्वरें । मधुर उत्तरें आवडीनें ॥२॥ तुका म्हणे तूं जगदानी उदार । फेडशील भार एका वेळा ॥३॥
2555
नाचतां देखिलीं गाईं वत्सें जन । विस्मित होऊन इंद्र ठेला ॥१॥ लागला पाऊस शिळांचिये धारीं । वांचलीं हीं परी कैसीं येथें ॥२॥ येथें आहे नारायण संदेह नाहीं । विघ्न केलें ठायीं निर्विघ्न तें ॥३॥ विचारितां उचलिला गोवर्धन । अवतार पूर्ण कळों आला ॥४॥ आला गौळियांच्या घरा नारायण । करितो स्तवन इंद्र त्यांचें ॥५॥ त्यांच्या पुण्या पार कोण करी लेखा । न कळे चतुर्मुखा ब्रम्हयासि ॥६॥ सीणतां जो ध्याना न ये एकवेळा । तो तया गोपाळां समागमें ॥७॥ समागमें गाईं वत्स पुण्यवंता । देह कुर्वाळितां अंगसंग ॥८॥ संग जाला मायबापां लोकपाळां । आळिंगिती गळा कंठाकंठ ॥९॥ करिते हे जाले स्तुती सकळिक । देव इंद्रादिक गोविंदाची ॥१०॥ करितील वृष्टी पुष्पवरुषाव । देवआदिदेव पूजियेला ॥११॥ पुष्पांजुळी मंत्र घोष जयजयकार । दुमदुमी अंबर नेणें नादें ॥१२॥ नामाचे गजर गंधर्वांचीं गाणीं । आनंद भुवनीं न माये तो ॥१३॥ तो सुखसोहळा अनुपम्य रासी । गोकुळीं देवासी दोहीं ठायीं ॥१४॥ दोहीं ठायीं सुख दिलें नारायणें । गेला दरुषणें वैरभाव ॥१५॥ भावना भेदाची जाय उठाउठी । तुका म्हणे भेटी गोविंदाचे ॥१६॥
2556
नाचावेंसें वाटे मना । छंद गुणा अधीन ॥१॥ चेष्टविलीं माझीं गात्रें । सत्तासूत्रें हालती ॥ध्रु.॥ नामरूपें रंगा आलीं । ते चि चाली स्वभावें ॥२॥ तुका म्हणे पांडुरंगे । अंग संगें कवळिलें ॥३॥
2557
नाचे टाळी पिटी । प्रेमें अंग धरणीं लोटी ॥१॥ माझे सखे ते सज्जन । भोळे भाविक हरिजन ॥ध्रु.॥ न धरिती लाज । नाहीं जनासवें काज ॥२॥ तुका म्हणे दाटे । कंठ नेत्रीं जळ लोटे ॥३॥
2558
नातुडे जो कवणे परी । उभा केला विटेवरी ॥१॥ भला भला पुंडलिका । मानलासी जनलोकां ॥ध्रु.॥ कोण्या काळें सुखा । ऐशा कोण पावता ॥२॥ अवघा आणिला परिवार । गोपी गोपाळांचा भार ॥३॥ तुका म्हणे धन्य जालें । भूमी वैकुंठ आणिलें ॥४॥
2559
नाना मतांतरें शब्दाची वित्पत्ति । पाठांतरें होती वाचाळ ते ॥१॥ माझ्या विठोबाचें वर्म आहे दुरी । कैंची तेथें उरी देहभावा ॥ध्रु.॥ यज्ञयाग जप तप अनुष्ठान । राहे ध्येय ध्यान आलीकडे ॥२॥ तुका म्हणे होय उपरति चित्ति । अंगीं सप्रेमता येणें लागें ॥३॥
2560
नाम आठवितां सद्गदित कंठीं । प्रेम वाढे पोटीं ऐसें करीं ॥१॥ रोमांच जीवन आनंदाश्रु नेत्रीं । अष्टांग ही गात्रीं प्रेम तुझें ॥ध्रु.॥ सर्व ही शरीर वेचो या कीर्तनीं । गाऊं निशिदिनीं नाम तुझें ॥२॥ तुका म्हणे दुजें न करीं कल्पांतीं । सर्वदा विश्रांति संतां पाई ॥३॥
2561
नाम आहे जयापाशीं । जेथें राहे तेथें चि काशी ॥१॥ ऐसा नामाचा महिमा । जाणे वाल्मीक शंकर उमा ॥ध्रु.॥ नाम प्रल्हादबाळ । जाणे पापी आजामेळ ॥२॥ नाम जाणे तो नारद । नामें ध्रुवा अक्षय पद ॥३॥ नाम गणिकेतें तारी । पशु गजेंद्र उद्धारी ॥४॥ नाम जाणे हणुमंत । जाणताति महासंत ॥५॥ नाम जाणे शुकमूर्ति । जाणे राजा परिक्षिती ॥६॥ नाम जाणे तुका । नाहीं संसाराचा धोका ॥७॥
2562
नाम उच्चारितां कंटीं । पुढें उभा जगजेठी ॥१॥ ऐसें धरोनियां ध्यान । मनें करावें चिंतन ॥ध्रु.॥ ब्रम्हादिकांच्या ध्याना नये । तो हा कीर्तनाचे सोये ॥२॥ तुका म्हणे सार घ्यावें । मनें हरिरूप पाहावें ॥३॥
2563
नाम घेतां उठाउठीं । होय संसारासी तुटी ॥१॥ ऐसा लाभ बांधा गांठी । विठ्ठलपायीं पडे मिठी ॥ध्रु.॥ नामापरतें साधन नाहीं । जें तूं करिशी आणिक कांहीं ॥२॥ हाकारोनि सांगे तुका । नाम घेतां राहों नका ॥३॥
2564
नाम घेतां कंठ शीतळ शरीर । इंद्रियां व्यापार नाठवती ॥१॥ गोड गोमटें हें अमृतासी वाड । केला कइवाड माझ्या चित्ती ॥ध्रु.॥ प्रेमरसें जाली पुष्ट अंगकांति । त्रिविध सांडिती ताप अंग ॥२॥ तुका म्हणे तेथें विकाराची मात । बोलों नये हित सकळांचें ॥३॥
2565
नाम घेतां न लगे मोल । नाममंत्र नाहीं खोल ॥१॥ दों अक्षरांचें काम । उच्चारावें राम राम ॥ध्रु.॥ नाहीं वर्णाधमयाती । नामीं अवघीं चि सरतीं ॥२॥ तुका म्हणे नाम । चैतन्य निजधाम ॥३॥
2566
नाम घेतां मन निवे । जिव्हे अमृत चि जरवे । होताती बरवे । ऐसे शकुन लाभाचे ॥१॥ मन रंगलें रंगलें । तुझ्या चरणीं स्थिरावलें । केलिया विठ्ठलें । ऐसी कृपा जाणावी ॥ध्रु.॥ जालें भोजनसें दिसे । चिरा पडोनि ठेला इच्छे । धालियाच्या ऐसें । अंगा येती उद्गार ॥२॥ सुख भेटों आलें सुखा । निध सांपडला मुखा । तुका म्हणे लेखा । आतां नाहीं आनंदा ॥३॥
2567
नाम घेतां वांयां गेलां । ऐसा कोणें आईंकिला ॥१॥ सांगा विनवितों तुम्हांसी । संत महंत सद्धि ॠषी ॥ध्रु.॥ नामें तरला नाहीं कोण । ऐसा द्यावा निवडून ॥२॥ सलगीच्या उत्तरा । तुका म्हणे क्षमा करा ॥३॥
2568
नाम तारक भवसिंधु । विठ्ठल तारक भवसिंधु ॥१॥ नामधारक तया अरि मित्रु । समता त्यागुनियां क्रोधु ॥ध्रु.॥ नामधारक तया । कदापि न घडे विषयाचा बाधु ॥२॥ ज्या नामें तरले शुकादिक । नारद संत मुनिजन साधु ॥३॥ जाणूनियां जे नसरें । ते नेणति जैसा गज अंधु ॥४॥ सहज तुकया । नाम चि जपतां स्वरुपीं वेधु ॥५॥
2569
नाम दुसी त्याचें नको दरषण । विष तें वचन वाटे मज ॥१॥ अमंगळ वाणी नाइकवे कानीं । निंदेची पोहोणी उठे तेथें ॥ध्रु.॥ काय लभ्य त्याचिये वचनीं । कोणत्या पुराणीं दिली ग्वाही ॥२॥ काय आड लावूं त्याचिया तोंडासी । आतां या जिभेसी काय करूं ॥३॥ तुका म्हणे संत न मनिती त्यांस । घेऊं पाहे ग्रास यमदूत ॥४॥
2570
नाम न वदे ज्याची वाचा । तो लेंक दो बापांचा ॥१॥ हे चि ओळख तयाची । खूण जाणा अभक्ताची ॥ध्रु.॥ ज्याची विठ्ठल नाहीं ठावा । त्याचा संग न करावा ॥२॥ नाम न म्हणे ज्याचें तोंड । तें चि चर्मकाचें कुंड ॥३॥ तुका म्हणे त्याचे दिवशीं । रांड गेली महारापाशीं ॥४॥
2571
नाम पावन पावन । त्याहून पवित्र आहे कोण ॥१॥ शिव हालाहालें तापला । तो ही नामें शीतळ जाला ॥ध्रु.॥ शिवास नामाचा आधार । केला कळिकाळ किंकर ॥२॥ मरण जालें काशीपुरी । तेथें नाम चि उद्धरी ॥३॥ तुका म्हणे अवघीं चोरें। एक हरिनाम सोइरें ॥४॥
2572
नाम म्हणतां मोक्ष नाहीं । ऐसा उपदेश करिती कांहीं । बधिर व्हावें त्याचे ठायीं । दुष्ट वचन वाक्य तें ॥१॥ जयाचे राहिलें मानसीं । तें चि पावले तयासी । चांचपडतां मेलीं पिसीं । भलतैसीं वाचाळें ॥ध्रु.॥ नवविधीचा निषेध । जेणें मुखें करिती वाद । जन्मा आले निंद्य । शूकरयाती संसारा ॥२॥ काय सांगों वेळोवेळां । आठव नाहीं चांडाळा । नामासाठीं बाळा । क्षीरसागरीं कोंडिलें ॥३॥ आपुलिया नामासाठीं । लागे शंखासुरापाठीं । फोडोनियां पोटीं । वेद चारी काढिले ॥४॥ जगीं प्रसद्धि हे बोली । नामें गणिका तारिली । आणिकें ही उद्धरिलीं । पातकी महादोषी ॥५॥ जे हे पवाडे गर्जती । नाम प्रल्हादाचा चित्तीं । जळतां बुडतां घातीं । राखे हातीं विषाचे ॥६॥ काय सांगों ऐशीं किती । तुका म्हणे नामख्याती । नरकाप्रती जाती । निषेधिती तीं एकें ॥७॥
2573
नाम साराचें ही सार । शरणागत यमकिंकर ॥१॥ उतमातम । वाचे बोला पुरुषोत्तम ॥ध्रु.॥. नाम जपतां चंद्रमौळी । नामें तरला वाल्हा कोळी ॥२॥ तुका म्हणे वणूप काय । तारक विठोबाचे पाय ॥३॥
2574
नामदेवें केलें स्वप्नामाजी जागें । सवें पांडुरंगें येऊनियां ॥१॥ सांगितलें काम करावें कवित्व । वाउगें निमित्य बोलों नको ॥ध्रु.॥ माप टाकी सळ धरिली विठ्ठलें । थापटोनि केलें सावधान ॥२॥ प्रमाणाची संख्या सांगे शत कोटी । उरले शेवटीं लावी तुका ॥३॥
2575
नामधारकासी नाहीं वर्णावर्ण । लोखंड प्रमाण नाना जात ॥१॥ शस्त्र अथवा गोळे भलता प्रकार । परिसीं संस्कार सकळ ही हेम ॥ध्रु.॥ प्रजन्य वर्षतां जीवना वाहावट । तें समसकट गंगे मिळे ॥२॥ सर्व तें हें जाय गंगा चि होऊन । तैसा वर्णावर्ण नाहीं नामीं ॥३॥ महांपुरीं जैसें जातसे उदक । मध्यें तें तारक नाव जैसी ॥४॥ तये नावेसंगें ब्राम्हण तरती । केवीं ते बुडती अनामिक ॥५॥ नाना काष्ठजात पडतां हुताशनीं । ते जात होउनी एकरूप ॥६॥ तेथें निवडेना घुरे कीं चंदन । तैसा वर्णावर्ण नामीं नाहीं ॥७॥ पूर्वानुवोळख तें चि पैं मरण । जरि पावे जीवन नामामृत ॥८॥ नामामृतें जालें मुळीचें स्मरण । सहज साधन तुका म्हणे ॥९॥
2576
नामपाठ मुक्ताफळांच्या ओवणी । हें सुख सगुणीं अभिनव ॥१॥ तरी आम्ही जालों उदास निर्गुणा । भक्तांचिया मना मोक्ष नये ॥ध्रु.॥ द्यावें घ्यावें ऐसें येथें उरे भाव । काय ठाया ठाव पुसोनियां ॥२॥ तुका म्हणे आतां अभयदान करा । म्हणा विश्वंभरा दिलें ऐसें ॥३॥
2577
नामसंकीर्तन साधन पैं सोपें । जळतील पापें जन्मांतरें ॥१॥ न लगे सायास जावें वनांतरा । सुखें येतो घरा नारायण ॥ध्रु.॥ ठायींच बैसोनि करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा ॥२॥ रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा । मंत्र हा जपावा सर्वकाळ ॥३॥ याहूनि आणीक नाहीं पैं साधन । वाहातसें आण विठोबाची ॥४॥ तुका म्हणे सोपें आहे सर्वांहूनि । शाहाणा तो धणी घेतो येथें ॥५॥
2578
नामांचा डांगोरा फिरवीं घरोघरीं । म्हणा हरीहरी सर्वभावें ॥१॥ नामें हरती कर्में वैकुंठींची पै विस्त । संनिध श्रीपति सदोदित ॥ध्रु.॥ नामाचा महिमा बहुतां कळला । नामें उद्धरिला अजामेळ ॥२॥ गजेंद्राची स्थिति पुराणीं बोलती । नामें चि श्रीपति पावलासे ॥३॥ तुका म्हणे घेतां मुक्ति आहे । नामें सर्व पाहें आकळिलें॥४॥
2579
नामाचा महिमा बोलिलों उत्कर्ष । अंगा कांहीं रस न ये चि तो ॥१॥ कैसें समाधान राहे पांडुरंगा । न लगे चि अंगा आणी कांहीं ॥ध्रु.॥ लाभाचिये अंगीं सोस कवतुकें । फिक्याचें तें फिकें वेवसाव ॥२॥ तुका म्हणे करा आपुला महिमा । नका जाऊं धर्मावरि माझ्या ॥३॥
2580
नामाची आवडी तो चि जाणा देव । न धरीं संदेह कांहीं मनीं ॥१॥ ऐसें मी हें नाहीं बोलत नेणतां । आनुनि संमता संतांचिया ॥ध्रु.॥ नाम म्हणे तया आणीक साधन । ऐसें हें वचन बोलों नये ॥२॥ तुका म्हणे सुख पावे या वचनीं । ज्याचीं शुद्ध दोन्ही मायबापें ॥३॥
2581
नामाचे पवाडे बोलती पुराणें । होऊनि कीर्तन तो चि ठेला ॥१॥ आदिनाथा कंठीं आगळा हा मंत्र । आवडीचें स्तोत्र सदा घोकी ॥ध्रु.॥ आगळें हे सार उत्तमा उत्तम । ब्रम्हकर्मा नाम एक तुझें ॥२॥ तिहीं त्रिभुवनीं गमन नारदा । हातीं विणा सदा नाम मुखीं ॥३॥ परिक्षिती मृत्यु सातां दिवसांचा । मुक्त जाला वाचा उच्चारितां ॥४॥ कोळियाची कीर्ति वाढली गहन । केलें रामायण रामा आधीं ॥५॥ सगुण निर्गुण तुज म्हणे वेद । तुका म्हणे भेद नाहीं नांवा ॥६॥
2582
नामाचें चिंतन प्रगट पसारा । असाल तें करा जेथें तेथें ॥१॥ सोडवील माझा स्वामी निश्चयेसीं । प्रतिज्ञा हे दासीं केली आम्हीं ॥ध्रु.॥ गुण दोष नाहीं पाहात कीर्तनीं । प्रेमें चक्रपाणी वश्य होय ॥२॥ तुका म्हणे कडु वाटतो प्रपंच । रोकडे रोमांच कंठ दाटे ॥३॥
2583
नामाचें सामर्थ्य कां रे दवडीसी । कां रे विसरसी पवाडे हे ॥१॥ खणखणां हाणती खर्ग प्रल्हादासी । न रुपे आंगासी किंचित ही ॥ध्रु.॥ राम कृष्ण हरी ऐसी मारी हाक । तेणें पडे धाक बळियासी ॥२॥ असों द्यावीं सामर्थ्या ऐसिया कीर्तीचीं । आवडी तुक्याची भेटी देई ॥३॥
2584
नामाविण काय वाउगी चावट । वांयां वटवट हरीविण ॥१॥ फुकट चि सांगे लोकाचिया गोष्टी । राम जगजेठी वाचे नये ॥ध्रु.॥ मेळवूनि चाट करी सुरापान । विषयांच्या गुणें माततसे ॥२॥ बैसोनि टवाळी करी दुजयाची । नाहीं गोविंदाची आठवण ॥३॥ बळें यम दांत खाय तयावरी । जंव भरे दोरी आयुष्याची ॥४॥ तुका म्हणे तुला सोडवील कोण । नाहीं नारायण आठविला ॥५॥
2585
नामासारिखी करणी । हे तों न दिसे त्रिभुवनीं ॥१॥ सिलंगणीचें सोनें । ठेवूं नये तें गाहाण ॥ध्रु.॥ आदित्याचीं झाडें । काय त्याचा उजड पडे ॥२॥ तुका म्हणे देवा । ब्रिदें सोडोनियां ठेवा ॥३॥
2586
नारायण आले निजमंदिरासि । जाले या लोकांसि बहुडविते ॥१॥ बहुडविले बहु केलें समाधान । विसरु तो क्षण नका माझा ॥२॥ मात सांगितली सकळ वृत्तांत । केलें दंडवत सकळांनीं ॥३॥ सकळां भातुकें वांटिल्या साखरा । आपलाल्या घरा लोक गेले ॥४॥ लोक गेले कामा गाईंपें गोपाळ । वारली सकळ लोभापाठी ॥५॥ लोभ दावुनियां आपला विसर । पाडितो कुमर धनआशा ॥६॥ आशेचे बांधले तुका म्हणे जन । काय नारायण ऐसा जाणे ॥७॥
2587
नारायण भूतीं न कळे जयांसि । होय गर्भवासीं येणें जाणें ॥१॥ येणें जाणें होय भूतांच्या मत्सरें । न कळतां खरें देव ऐसा ॥२॥ देव ऐसा जया कळला सकळ । गेली तळमळ द्वेषबुद्धि ॥३॥ बुद्धीचा पालट नव्हे कोणे काळीं । हरि जळीं स्थळीं तया चित्ती ॥४॥ चित्त तें निर्मळ जैसें नवनीत । जाणिजे अनंत तयामाजी ॥५॥ तयामाजी हरि जाणिजे त्या भावें । आपलें परावें सारिखें चि ॥६॥ चिंतनें तयाच्या तरती आणीक । जो हें सकळिक देव देखे ॥७॥ देव देखे तो ही कसा देव नव्हे । उरला संदेहे काय त्यासि ॥८॥ काया वाचा मनें पूजावे वैष्णव । म्हणउनि भाव धरूनियां ॥९॥ यांसि कवतुक दाखविलें रानीं । वोणवा गिळूनि गोपाळांसि ॥१०॥ गोपाळांसि डोळे झांकविले हातें । धरिलें अनंतें विश्वरूप ॥११॥ पसरूनि मुख गिळियेलें ज्वाळ । पहाती गोपाळ बोटां सांदी ॥१२॥ संधि सारूनियां पाहिलें अनंता । म्हणती ते आतां कळलांसी ॥१३॥ कळला हा तुझा देह नव्हे देवा । गिळिला वोणवा आणीक तो ॥१४॥ तो तयां कळला आरुषां गोपाळां । दुर्गम सकळां साधनांसि ॥१५॥ सीण उरे तुका म्हणे साधनाचा । भाविकांसि साचा भाव दावी ॥१६॥
2588
नारायणा ऐसा । सेवूं नेणतील रसा ॥१॥ जेणें भवव्याध तुटे । दुःख मागुतें न भेटे ॥ध्रु.॥ न लगे कांहीं आटी । बाधा राहों न सके पोटीं ॥२॥ कैवल्य तें जोडे । पालट लवकरी घडे ॥३॥ जन्ममरणदुःख अटे । जाळें अवघेंचि तुटे ॥४॥ तुका म्हणे जाला । याचा गुण बहुतांला ॥५॥
2589
नारायणें कंस चाणूर मदिला । रार्ज्यीं बैसविला उग्रसेन ॥१॥ उग्रसेन स्थापियेला शरणागत । पुरविला अंत अभक्ताचाम ॥२॥ अवघें चि केलें कारण अनंतें । आपुलिया हातें सकळ ही ॥३॥ सकळ ही केलीं आपुलीं अंकित । राहे गोपीनाथ मथुरेसि ॥४॥ मथुरेसि आला वैकुंठनायक । जालें सकळिक एक राज्य ॥५॥ राज्य दिलें उग्रसेना शरणागता । सोडविलीं माता पिता दोन्हीं ॥६॥ सोडवणे धांवे भक्ताच्या कैवारें । तुका म्हणे करें शस्त्र धरी ॥७॥
2590
नारे तरि काय नुजेडे कोंबडें । करूनियां वेडें आघ्रो दावी ॥१॥ आइत्याचें साहे फुकाचा विभाग । विक्षेपानें जग ची थू करी ॥ध्रु.॥ नेमून ठेविला करत्यानें काळ । नल्हायेसें बळ करूं पुढें ॥२॥ तुका म्हणे देव साहे जाल्यावरी । असांग चि करी सर्व संग ॥३॥
2591
नावडावें जन नावडावा मान । करूनि प्रमाण तूं चि होई ॥१॥ सोडुनि देहसंबंध वेसनें । ऐसी नारायणें कृपा कीजे ॥ध्रु.॥ नावडावें रूप नावडावे रस । अवघी राहो आस पायांपाशीं ॥२॥ तुका म्हणे आतां आपुलिया सत्ता । करूनि अनंता ठेवा ऐसें ॥३॥
2592
नावडे जें चित्ती । तें चि होसी पुरविता ॥१॥ कां रे पुरविली पाठी । माझी केली जीवेसाटीं ॥ध्रु.॥ न करावा संग । वाटे दुरावावें जग ॥२॥ सेवावा एकांत । वाटे न बोलावी मात ॥३॥ जन धन तन । वाटे लेखावें वमन ॥४॥ तुका म्हणे सत्ता । हातीं तुझ्या पंढरिनाथा ॥५॥
2593
नावडे ज्या कथा उठोनियां जाती । ते यमा फावती बरे वोजा ॥१॥ तो असे जवळी गोंचिडाच्या न्यायें । देशत्यागें ठायें तया दुरी ॥ध्रु.॥ नव्हे भला कोणी नावडे दुसरा । पाहुणा किंकरा यमा होय ॥२॥ तुका म्हणे तया करावें तें काईं । पाषाण कां नाहीं जळामध्यें ॥३॥
2594
नावडे तरि कां येतील हे भांड । घेउनियां तोंड काळें येथें ॥१॥ नासोनियां जाय रस यासंगती । खळाचे पंगती नारायणा ॥ध्रु.॥ तोंडावाटा नर्क काढी अमंगळ । मिष्टान्ना विटाळ करी सुनें ॥२॥ तुका म्हणे नाहीं संतांची मर्यादा । निंदे तो चि निंदा मायझवा ॥३॥
2595
नाशवंत देह नासेल हा जाणा । कां रे उच्चाराना वाचे नाम ॥१॥ नामें चि तारिले कोटट्या हे कोटी । नामें हे वैकुंठी बैसविले ॥ध्रु.॥ नामापरतें सार नाहीं त्रिभुवनीं । तें कां तुम्ही मनीं आठवाना ॥२॥ तुका म्हणे नाम वेदांसी आगळें । तें दिलें गोपाळें फुकासाटीं ॥३॥
2596
नाही काष्ठाचा गुमान । गोवी भ्रमरा सुमन ॥१॥ प्रेम प्रीतीचे बांधलें । तें न सुटे कांहीं केलें ॥ध्रु.॥ पदरीं घालीं पिळा । बाप निर्बळ साटी बाळा ॥२॥ तुका म्हणे भावें । भेणें देवा आकारावें ॥३॥
2597
नाही दुकळलों अन्ना । परि या मान जनार्दना ॥१॥ देव केला सकळसाक्षी । काळीं आणि शुद्धपक्षीं ॥ध्रु.॥ भोगी भोगविता । बाळासवें तो चि पिता ॥२॥ कर्म अकर्म जळालें । प्रौढें तुका तें उरले ॥३॥ नाटाचे अभंग समाप्त ६३
2598
नाही बळयोग अभ्यास कराया । न कळे ते क्रिया साधनाची ॥१॥ तुझिये भेटीचें प्रेम अंतरंगीं । नाहीं बळ अंगीं भजनाचें ॥ध्रु.॥ काय पांडुरंगा करूं बा विचार । झुरतें अंतर भेटावया ॥२॥ तुका म्हणे सांगा वडिलपणें बुद्धी । तुजविण दयानिधी पुसों कोणां ॥३॥
2599
नाहीं आइकत तुम्ही माझे बोल । कासया हें फोल उपणूं भूस ॥१॥ येसी तें करीन बैसलिया ठाया । तूं चि बुझावया जवळी देवा ॥ध्रु.॥ करावे ते केले सकळ उपाय । आतां पाहों काय अझुनि वास ॥२॥ तुका म्हणे आला आज्ञेसी सेवट । होऊनियां नीट पायां पडों ॥३॥
2600
नाहीं आम्हां शत्रु सासुरें पिसुन । दाटलें हें घन माहियेर ॥१॥ पाहें तेथें पांडुरंग रखुमाईं । सत्यभामा राही जननिया ॥ध्रु.॥ लज्जा भय कांही आम्हां चिंता नाहीं । सर्वसुखें पायीं वोळगती ॥२॥ तुका म्हणे आम्ही सदैवाचीं बाळें । जालों लडिवाळें सकळांचीं ॥३॥
2601
नाहीं आम्ही विष्णुदास । करीत आस कोणांची ॥१॥ कां हे नष्ट करिती निंदा । नेणों सदा आमुची ॥ध्रु.॥ असों भलते ठायीं मनें । समाधानें आपुलिया ॥२॥ तुका म्हणे करूं देवा । तुझी सेवा धंदा तो ॥३॥
2602
नाहीं आलें भक्तिसुख अनुभवा । तो मी ज्ञान देवा काय करूं ॥१॥ नसावें जी तुम्ही कांहीं निश्चिंतीनें । माझिया वचनें अभेदाच्या ॥ध्रु.॥ एकाएकीं मन नेदी समाधान । देखिल्या चरण वांचूनियां ॥२॥ तुका म्हणे वाचा गुणीं लांचावली । न राह उगली मौन्य मज ॥३॥
2603
नाहीं उल्लंघिले कोणाचे वचन । मज कां नारायण दुरी जाला ॥१॥ अशंकितें मनें करीं आळवण । नाहीं समाधान निश्चिंतीचें ॥ध्रु.॥ दासांचा विसर हें तों अनुचित । असे सर्व नीत पायांपाशीं ॥२॥ तुका म्हणे तुम्हां लाज येत नाहीं । आम्हां चिंताडोहीं बुडवितां ॥३॥
2604
नाहीं कंटाळलों परि वाटे भय । करावें तें काय न कळतां ॥१॥ जन वन आम्हां समान चि जालें । कामक्रोध गेले पावटणी ॥ध्रु.॥ षडऊर्मी शत्रु जिंतिले अनंता । नामाचिया सत्ताबळें तुझ्या ॥२॥ म्हणऊनिं मुख्य धर्म आम्हां सेवकांचा ऐसा । स्वामी करी शिरसा पाळावें तें ॥३॥ म्हणऊनिं तुका अवलोकुनी पाय । वचनाची पाहे वास एका ॥४॥
2605
नाहीं काम माझें काज तुम्हांसवें । होतें गुप्त ठावें केलें आतां ॥१॥ व्यभिचार माझा पडिला ठाउका । न सर ती लोकांमाजी जालें ॥२॥ न धरावा लोभ कांहीं मजविशीं । जालें देवपिशी तुका म्हणे ॥३॥
2606
नाहीं कोणी दिस जात वांयांविण । साध्य नाहीं सीण लटिका चि ॥१॥ एकाचिये माथां असावें निमत्ति । नसो नाहीं हित कपाळीं तें ॥ध्रु.॥ कांहीं एक तरी बोलायाचा जागा । नेदिती वाउगा उभा ठाकों ॥२॥ तुका म्हणे वर्में कळों येती कांहीं । ओळखी जे नाहीं होईंल ते ॥३॥
2607
नाहीं खंड जाला । माझा तुमचा विठ्ठला ॥१॥ कैसें कैसें हो दुश्चित । आहे चौघांपाशीं नीत ॥ध्रु.॥ मुळींचे लिहिलें । मज आतां सांपडलें ॥२॥ तुका म्हणे मज । न लगे बोलणें सहज ॥३॥
2608
नाहीं गुणदोष लिंपों देत अंगीं । झाडितां प्रसंगीं वरावरी ॥१॥ निकटवासिया आळवितों धांवा । तेथूनियां देवा सोडवूनी ॥ध्रु.॥ उमटे अंतरीं तें करूं प्रगट । कळोनी बोभाट धांव घालीं ॥२॥ तुका म्हणे तरि वांचलों या काळें । समर्थाचे बळें सुखी असों ॥३॥
2609
नाहीं घटिका म्हणसी । लाग लागला तुजपाशीं । पडिला हृषीकेशी । जाब सकळ करणें ॥१॥ माझें नेलें पांघरुण । ठावें असोन दुर्बळ दीन । माणसांमधून । उठविलें खाणोर्‍या ॥ध्रु.॥ आम्हीं हें जगऊनि होतों पाणी । संदीं देवदेव करूनि । जालासी कोठोनि । पैदा चोरा देहाच्या ॥२॥ तुकयाबंधु म्हणे केलें । उघडें मजचि उमगिलें । ऐसें काय गेलें । होतें तुज न पुरतें ॥३॥
2610
नाहीं घाटावें लागत । एका सितें कळें भात ॥१॥ क्षीर निवडितें पाणी । चोंची हंसाचिये आणी ॥ध्रु.॥ आंगडें फाडुनि घोंगडें करी । अवकळा तये परी ॥२॥ तुका म्हणे कण । भुसीं निवडे कैंचा सीण ॥३॥ स्वामीचें अभंगींचें नांव काढून सालोमालो आपलें नांव घालीत त्यावर अभंग ॥ ८ ॥
2611
नाहीं जप तप जीवाची आटणी । मनासी दाटणी नाहीं केली ॥१॥ निजलिया ठायीं पोकारिला धांवा । सांकडें तें देवा तुझें मज ॥ध्रु.॥ नाहीं आणूनियां समपिऩलें जळ । सेवा ते केवळ चिंतनाची ॥२॥ तुका म्हणे आम्हीं वेचिलीं उत्तरें । घेतलीं उदारें साच भावें ॥३॥
2612
नाहीं जालें मोल कळे देतां काळीं । कोण पाहों बळी दोघांमध्यें ॥१॥ आम्ही तरी जालों जीवासी उदार । कैंचा हा धीर तुजपाशीं ॥ध्रु.॥ बहु चाळविलें मागें आजिवरी । आतां पुढें हरि जाऊं नेदीं ॥२॥ नव्हती जों भेटी नामाची ओळखी । म्हणऊनि दुःखी बहु जालें ॥३॥ तुका म्हणे कांहीं राहों नेदीं बाकी । एकवेळा चुकी जाली आतां ॥४॥
2613
नाहीं जों वेचलों जिवाचिया त्यागें । तोंवरी वाउगें काय बोलों ॥१॥ जाणिवलें आतां करीं ये उदेश । जोडी किंवा नाश तुमची जीवें ॥ध्रु.॥ ठायींचे चि आलें होतें ऐसें मना । जावें ऐसें वना दृढ जालें ॥२॥ तुका म्हणे मग वेचीन उत्तरें । उद्धेसिलें खरें जाल्यावरी ॥३॥
2614
नाहीं तरी आतां कैचा अनुभव । जालासीं तूं देव घरघेणा ॥१॥ जेथें तेथें देखें लांचाचा पर्वत । घ्यावें तरि चत्ति समाधान ॥ध्रु.॥ आधीं वरी हात या नांवें उदार । उसण्याचे उपकार फिटाफीट ॥२॥ तुका म्हणे जैसी तैसी करूं सेवा । सामर्थ्य न देवा पायांपाशीं ॥३॥
2615
नाहीं तुज कांहीं मागत संपत्ती । आठवण चित्ती असों द्यावी ॥१॥ सरलिया भोग येईंन सेवटीं । पायापें या भेटी अनुसंधानें ॥ध्रु.॥ आतां मजसाटीं याल आकारास । रोकडी हे आस नाहीं देवा ॥२॥ तुका म्हणे मुखीं असो तुझें नाम । देईंल तो श्रम देवो काळ ॥३॥
2616
नाहीं तुझे उगा पडत गळां । पुढें गोपाळा जाऊं नको ॥१॥ चाहाड तुझे दाविन घरीं । बोलण्या उरी नाहीं ऐसी ॥ध्रु.॥ तुम्हां आम्हां पडदा होता । सरला आतां सरोबरी ॥२॥ तुका म्हणे उरती गोठी । पडिली मिठी न सुटे ॥३॥
2617
नाहीं तुम्हां कांहीं लाविलें मागणें । कांटाळ्याच्या भेणें त्रासलेती ॥१॥ एखादिये परी टाळावीं करकर । हा नका विचार देखों कांहीं ॥ध्रु.॥ पायांच्या वियोगें प्राणासवें साटी । ने घवेसी तुटी जाली आतां ॥२॥ तुका म्हणे तुम्हां मागेन तें आतां । हें चि कृपावंता चरणीं वास ॥३॥
2618
नाहीं तुम्ही केला । अंगीकार तो विठ्ठला ॥१॥ सोंगें न पवीजे थडी । माजी फुटकी सांगडी ॥ध्रु.॥ प्रेम नाही अंगीं । भले म्हणविलें जगीं ॥२॥ तुका म्हणे देवा । मज वांयां कां चाळवा ॥३॥
2619
नाहीं त्याची शंका वैकुंठनायका । नेणती ते एकाविण दुजा ॥१॥ जाणतियां सवें येऊं नेदी हरि । तर्कवादी दुरी दुराविले ॥२॥ वादियासि भेद निंदा अहंकार । देऊनियां दूर दुराविले ॥३॥ दुरावले दूर आशाबद्ध देवा । करितां या सवा कुटुंबाची ॥४॥ चित्ती द्रव्यदारा पुत्रादिसंपत्ती । समान ते होती पशु नर ॥५॥ नरक साधिले विसरोनि देवा । बुडाले ते भवा नदीमाजी ॥६॥ जीहीं हरिसंग केला संवसारीं । तुका म्हणे खरी खेप त्यांची ॥७॥
2620
नाहीं त्रिभुवनीं सुख या समान । म्हणऊनि मन स्थिरावलें ॥१॥ धरियेलीं जीवीं पाउलें कोमळीं । केली एकावळी नाममाळा ॥ध्रु.॥ शीतळ होऊनियां पावलों विश्रांती । न साहे पुढती घाली चित्ती ॥२॥ तुका म्हणे जाले सकळ सोहळे । पुरविले डोहळे पांडुरंगें ॥३॥
2621
नाहीं दिलें कधीं कठिण उत्तर । तरी कां अंतर पडियेलें ॥१॥ म्हणऊनि आतां वियोग न साहे । लांचावलें देहे संघष्टणें ॥ध्रु.॥ वेळोवेळां वाचे आठवितों नाम । अधिक चि प्रेम चढे घेतां ॥२॥ तुका म्हणे पांडुरंगे जननिये । घेऊनि कडिये बुझाविलें ॥३॥
2622
नाहीं देणें घेणे । गोवी केली अभिमानें ॥१॥ आतां कां हो निवडूं नेदां । पांडुरंगा येवढा धंदा ॥ध्रु.॥ पांचांमधीं जावें । थोड्यासाटीं फजित व्हावें ॥२॥ तुज ऐसी नाहीं । पांडुरंगा आम्ही कांहीं ॥३॥ टाकुं तो वेव्हार । तुज बहू करकर ॥४॥ तुका म्हणे आतां । निवडूं संतां हें देखतां ॥५॥
2623
नाहीं देवाचा विश्वास । करी संतांचा उपहास ॥१॥ त्याचे तोंडी पडे माती । हीन शूकराची जाती ॥ध्रु.॥ घोकुनी अक्षर । वाद छळणा करीत फिरे ॥२॥ म्हणे देवासी पाषाण । तुका म्हणे भावहीन ॥३॥
2624
नाहीं देवापाशीं मोक्षाचे गांठोळें । आणूनि निराळें द्यावें हातीं ॥१॥ इंद्रियांचा जय साधुनियां मन । निर्विषय कारण असे तेथें ॥ध्रु.॥ उपास पारणीं अक्षरांची आटी । सत्कर्मां शेवटीं असे फळ ॥२॥ आदरें संकल्प वारीं अतिशय । सहज तें काय दुःख जाण ॥३॥ स्वप्नींच्या घायें विळवसी वांयां । रडे रडतियासवें मिथ्या ॥४॥ तुका म्हणे फळ आहे मूळापाशीं । शरण देवासीं जाय वेगीं ॥५॥
2625
नाहीं नाश हरि आठवितां मुखें । जोडतील सुखें सकळ ही ॥१॥ सकळी ही सुखें वोळलीं अंतरीं । मग त्याबाहेरी काय काज ॥२॥ येऊं विसरलीं बाहेरी गोपाळें । तल्लीन सकळें कृष्णसुखें ॥३॥ सुख तें योगियां नाहीं समाधीस । दिलें गाईं वत्स पशु जीवां ॥४॥ वारला पाऊस केव्हां नाहीं ठावा । तुका म्हणे देवावांचूनियां ॥५॥
2626
नाहीं निर्मळ जीवन । काय करील साबण ॥१॥ तैसी चत्तिशुद्धी नाहीं । तेथें बोध करील काई ॥ध्रु.॥ वृक्ष न धरी पुष्पफळ । काय करील वसंतकाळ ॥२॥ वांजे न होती लेकरें । काय करावें भ्रतारें ॥३॥ नपुंसका पुरुषासी । काय करील बाइल त्यासी ॥४॥ प्राण गेलिया शरीर । काय करील वेव्हार ॥५॥ तुका म्हणे जीवनेंविण । पीक नव्हे नव्हे जाण ॥६॥
2627
नाहीं पाक होत उफराटे चाली । बोलिली ते केली व्हावी नीत ॥१॥ नाहीं मानूं येत वांजटाचे बोल । कोरडे च फोल चवी नाहीं ॥ध्रु.॥ तरुवरा आधीं कोठें आहे फळ । चावटा बरळ म्हणा त्यासी ॥२॥ तुका म्हणे किती ठकलीं बापुडीं । गव्हा आहे गोडी मांडे पुर्‍या ॥३॥
2628
नाहीं भ्यालों तरी पावलों या ठाया । तुम्हां आळवाया जवळिकें ॥१॥ सत्ताबळें आतां मागेन भोजन । केलें तें चिंतन आजिवरी ॥ध्रु.॥ नवनीतासाटीं खादला हा जीव । थोड्यासाटीं कीव कोण करी ॥२॥ तुका म्हणे ताक न लगे हें घाटे । पांडुरंगा खोटें चाळवण ॥३॥
2629
नाहीं मज कृपा केली पांडुरंगें । संताचिया संगें पोट भरीं ॥१॥ चतुराचे सभे पंडित कुशळ । मी काय दुर्बळ विष्णुदास॥२॥ तुका म्हणे नेणें करूं समाधान । धरिले चरण विठोबाचे ॥३॥
2630
नाहीं मज कोणी उरला दुर्जन । मायबापाविण ब्रम्हांडांत ॥१॥ कासया जी माझी करणें येविसीं । भयाची मानसीं चिंता संतीं ॥ध्रु.॥ विश्वंभराचिये लागलों सांभाळीं । सत्तेनें तो चाळी आपुलिये ॥२॥ तुका म्हणे माझें पाळणपोषण । करितां आपण पांडुरंगा ॥३॥
2631
नाहीं मागितला । तुम्हां मान म्यां विठ्ठला ॥१॥ जे हे करविली फजिती । माझी एवढी जना हातीं ॥ध्रु.॥ नाहीं केला पोट । पुढें घालूनि बोभाट ॥२॥ तुका म्हणे धरूनि हात । नाहीं नेले दिवानांत ॥३॥
2632
नाहीं माथां भार । तुम्ही घेत हा विचार ॥१॥ जाणोनियां ऐसें केलें । दुरिल अंगेसी लाविलें ॥ध्रु.॥ आतां बोलावें आवडी । नाम घ्यावें घडी घडी ॥२॥ तुका म्हणे दुरी । देवा खोटी ऐसी उरी ॥३॥
2633
नाहीं म्या वंचिला मंत्र कोणापाशीं । राहिलों जीवासीं धरूनि तो ॥१॥ विटेवरी भाव ठेवियेलें मन । पाउलें समान चिंतीतसें ॥ध्रु.॥ पावविला पार धरिला विश्वास । घालूनियां कास बळकट ॥२॥ तुका म्हणे मागें पावले उद्धार । तिहीं हा आधार ठेविलासे ॥३॥
2634
नाहीं येथें वाणी । सकळां वर्णी घ्यावी धणी ॥१॥ जालें दर्पणाचें अंग । ज्याचा त्यासी दावी रंग ॥ध्रु.॥ एका भावाचा एकांत । पीक पिकला अनंत ॥२॥ तुका खळे दाणीं । करी बैसोनी वांटणी ॥३॥
2635
नाहीं रिकामीक परी वाहे मनीं । तया चक्रपाणि साह्य होय ॥१॥ उद्वेग जीवासि पंढरीचें ध्यान । तया नारायण साह्य करी ॥ध्रु.॥ शरीरासि बळ नाहीं स्वता भाव । तया पंढरिराव साह्य करी ॥२॥ असो नसो बळ राहे पराधीन । तरी अनुमान करूं नका ॥३॥ तुका म्हणे येणें करोनि चिंतनीं । तया नारायण जवळीक ॥४॥
2636
नाहीं रूप नाहीं नांव । नाहीं ठाव धराया ॥१॥ जेथें जावें तेथें आहे । विठ्ठल मायबहीण ॥ध्रु.॥ नाहीं आकार विकार । चराचर भरलेंसे ॥२॥ नव्हे निर्गुण सगुण । जाणे कोण तयासी ॥३॥ तुका म्हणे भावाविण । त्याचें मन वोळेना ॥४॥
2637
नाहीं लाग माग । न देखेंसें केलें जग ॥१॥ आतां बैसोनियां खावें । दिलें आइतें या देवें ॥ध्रु.॥ निवारिलें भय । नाहीं दुसर्‍याची सोय ॥२॥ तुका म्हणे कांहीं । बोलायाचें काम नाहीं ॥३॥
2638
नाहीं लोपों येत गुण । वेधी आणीकें चंदन ॥१॥ न संगतां पडे ताळा । रूप दर्पणीं सकळां ॥ध्रु.॥ सारविलें वरी । आहाच तें क्षणभरी ॥२॥ तुका म्हणे वोहळें । सागराच्या ऐसें व्हावें ॥३॥
2639
नाहीं वागवीत जाणिवेचें ओझें । स्वामिसेवेकाजे निर्धारु हा ॥१॥ आज्ञा ते प्रमाण हा मनीं निर्धार । येणें फिटे भार निश्चयेसी ॥ध्रु.॥ आळीकरें आम्ही एकविध चित्ते । तैसें होऊं येतें मायबापें ॥२॥ तुका म्हणे माझी ये जातीची सेवा । घातलासे देवावरी भार ॥३॥
2640
नाहीं विचारीत । मेघ हागनदारी सेत ॥१॥ नये पाहों त्याचा अंत । ठेवीं कारणापें चत्ति ॥ध्रु.॥ वर्जीत गंगा । नाहीं उत्तम अधम जगा ॥२॥ तुका म्हणे मळ । नाहीं अग्नीसी विटाळ ॥३॥
2641
नाहीं शब्दाधीन वर्म आहे दुरी । नव्हे तंत्रीं मंत्रीं अनुभव तो ॥१॥ हर्षामर्षा अंगीं आदळती लाटा । कामक्रोधें तटा सांडियेलें ॥ध्रु.॥ न सरे ते भक्ति विठोबाचे पायीं । उपरति नाहीं जेथें चित्ति ॥२॥ तुका म्हणे सुख देहनिरसनें । चिंतनें चिंतन तद्रूपता ॥३॥
2642
नाहीं संतपण मिळतें हें हाटीं । हिंडतां कपाटीं रानीं वनीं ॥१॥ नये मोल देतां धनाचिया राशी । नाहीं तें आकाशीं पाताळीं तें ॥१॥ तुका म्हणे मिळे जिवाचिये साटीं । नाहीं तरी गोष्टी बोलों नये ॥३॥
2643
नाहीं संतांशीं शरण । काय वाचोनि पुराण ॥१॥ म्हणे विठ्ठलाचा दास । देखोनी परनारीस हांसे ॥ध्रु.॥ करिती विठोबाची भक्ति । दयाधर्म नाहीं चित्ती ॥२॥ तेथें नाहीं माझा देव। व्यर्थ श्रमवी हा जीव ॥३॥ अंगीं नाहीं क्षमा दया । म्हणती भेट पंढरीराया ॥४॥ नाहीं धर्माची वासना । काय करोनि प्रदक्षिणा ॥५॥ ऐसें नव्हे भक्तिवर्म । तेथें नाहीं माझा राम ॥६॥ नये कृपा कांहीं केल्या । नये घाम जीव गेल्या ॥७॥ जैसी खड्गाची धार । विठ्ठलचरणीं तुका शूर ॥८॥
2644
नाहीं संसाराची चाड । गाऊं हरिचें नाम गोड ॥१॥ हो का प्राणाचा ही घात । परि हा न सोडीं अनंत ॥ध्रु.॥ जन्मोजन्मीं हा चि धंदा । संतसंग राहो सदा ॥२॥ तुका म्हणे भाव । तो हा जाणा पंढरिराव ॥३॥
2645
नाहीं सरो येत जोडिल्या वचनीं । कवित्वाची वाणी कुशळता ॥१॥ सत्याचा अनुभव वेधी सत्यपणें । अनुभवाच्या गुणें रुचों येतों ॥ध्रु.॥ काय आगीपाशीं शृंगारिलें चाले । पोटींचें उकले कसापाशीं ॥२॥ तुका म्हणे येथे करावा उकल । लागे चि ना बोल वाढवूनि ॥३॥
2646
नाहीं सरों येत कोरडएा उत्तरीं । जिव्हाळ्याची बरी ओल ठायीं ॥१॥ आपुलिया हिता मानिसी कारण । सत्या नारायण साहे असो ॥ध्रु.॥ निर्वाणीं निवाड होतो आगीमुखें । तप्त लोह सुखें धरितां हातीं ॥२॥ तुका म्हणे नेम न टळतां बरें । खर्‍यासी चि खरें ऐसें नांव ॥३॥
2647
नाहीं साजत हो मोठा । मज अळंकार खोटा ॥१॥ असें तुमचा रजरेण । संतां पायींची वाहाण ॥ध्रु.॥ नाहीं स्वरूपीं ओळखी । भक्तिभाव करीं देखीं ॥२॥ नाहीं शून्याकारीं । क्षर ओळखी अक्षरीं ॥३॥ नाहीं विवेक या ठायीं । आत्मा अनात्मा काई ॥४॥ कांहीं नव्हें तुका । पांयां पडने हें ऐका ॥५॥
2648
नाहीं सुख मज न लगे हा मान । न राहे हें जन काय करूं ॥१॥ देहउपचारें पोळतसे अंग । विषतुल्य चांग मिष्टान्न तें ॥ध्रु.॥ नाइकवे स्तुति वाणितां थोरीव । होतो माझा जीव कासावीस ॥२॥ तुज पावें ऐसी सांग कांहीं कळा । नको मृगजळा गोवूं मज ॥३॥ तुका म्हणे आतां करीं माझें हित । काढावें जळत आगींतूनि ॥४॥
2649
नाहीं सुगंधाची लागती लावणी । लावावी ते मनीं शुद्ध होतां ॥१॥ वार्‍या हातीं माप चाले सज्जनाचें । कीर्ति मुख त्याचें नारायण ॥ध्रु.॥ प्रभा आणि रवि काय असे आन । उदयीं तंव जन सकळ साक्षी ॥२॥ तुका म्हणे बरा सत्याचा सायास । नवनीता नाश नाहीं पुन्हा ॥३॥
2650
नाहीं हानि परी न राहावे निसुर । न पडे विसर काय करूं ॥१॥ पुसाविसी वाटे मात कापडियां । पाठविती न्याया मूळ मज ॥ध्रु.॥ आणीक या मना नावडे सोहळा । करितें टकळा माहेरींचा ॥२॥ बहु कामें केलें बहु कासावीस । बहु जाले दिस भेटी नाहीं ॥३॥ तुका म्हणे त्याचें न कळे अंतर । अवस्था तों फार होते मज ॥४॥
2651
नाहीं हित ठावें जननीजनका । दाविले लौकिकाचार तींहीं ॥१॥ अंधळ्याचे काठी अंधळें लागलें । घात एकवेळे मागेंपुढें ॥ध्रु.॥ न ठेवावी चाली करावा विचार । वरील आहार गळी लावी ॥२॥ तुका म्हणे केला निवाडा रोकडा । राऊत हा घोडा हातोहातीं ॥३॥
2652
नाहीं होत भार घातल्या उदास । पुरवावी आस सकळ ही ॥१॥ ऐसा नाहीं मज एकाचा अनुभव । धरिला तो भाव उद्धरलें ॥ध्रु.॥ उतावीळ असे शरणागतकाजें । धांव केशीराजे आइकतां ॥२॥ तुका म्हणे हित चिंतन भरवंसा । नेदी गर्भवासा येऊं देवा ॥३॥
2653
निंचपण बरवें देवा । न चले कोणाचा ही दावा ॥१॥ महा पुरें झाडें जाती । तेथें लव्हाळे राहाती ॥ध्रु.॥ येतां सिंधूच्या लहरी । नम्र होतां जाती वरि ॥२॥ तुका म्हणे कळ । पाय धरिल्या न चले बळ ॥३॥
2654
निंदक तो परउपकारी । काय वणूप त्याची थोरी । जे रजकाहुनि भले परि । सर्व गुणें आगळा ॥१॥ नेघे मोल धुतो फुका । पाप वरच्यावरि देखा । करी साधका । शुद्ध सरते तिहीं लोकीं ॥ध्रु.॥ मुखसंवदणी सांगते । अवघें सांटविलें तेथें । जिव्हा साबण निरुतें । दोष काढी जन्माचे ॥२॥ तया ठाव यमपुरीं । वास करणें अघोरीं । त्यासी दंडण करी । तुका म्हणे न्हाणी ते ॥३॥
2655
निंदा स्तुती करवी पोट । सोंग दाखवी बोभाट ॥१॥ जटा राख विटंबना । धीर नाहीं क्षमा मना ॥ध्रु.॥ शृंगारिलें मढें । जीवेंविण जैसें कुडें ॥२॥ तुका म्हणे रागें । भलतें चावळे वाउगें ॥३॥
2656
निंदावें हें जग । ऐसा भागा आला भाग ॥१॥ होतें तैसें आलें फळ । गेलें निवडूनि सकळ ॥ध्रु.॥ दुसर्‍याच्या मता । मिळेनासें जालें चित्ता ॥२॥ तुका जाला सांडा । विटंबिती पोरें रांडा ॥३॥
2657
निंदी कोणी मारी । वंदी कोणी पूजा करी ॥१॥ मज हें ही नाहीं तें ही नाहीं । वेगळा दोहीं पासुनी ॥ध्रु.॥ देहभोग भोगें घडे । जें जें जोडे तें बरें ॥२॥ अवघें पावे नारायणीं । जनार्दनीं तुक्याचें ॥३॥
2658
निंबाचिया झाडा साकरेचें आळें । आपलीं ती फळें न संडी च ॥१॥ तैसें अधमाचें अमंगळ चित्त । वमन तें हित करुनि सांडी ॥ध्रु.॥ परिसाचे अंगीं लाविलें खापर । पालट अंतर नेघे त्याचें ॥२॥ तुका म्हणे वेळू चंदना संगतीं । काय ते नसती जवळिकें ॥३॥
2659
निगमाचें वन । नका शोधूं करूं सीण ॥१॥ या रे गौळियांचे घरीं । बांधलें तें दावें वरी ॥ध्रु.॥ पीडलेती भ्रमें । वाट न कळतां वर्में ॥२॥ तुका म्हणे भार । माथा टाका अहंकार ॥३॥
2660
निघालें तें अगीहूनि । आतां झणी आतळे ॥१॥ पळवा परपरतें दुरी । आतां हरी येथूनि ॥ध्रु.॥ धरिलें तैसें श्रुत करा हो । येथें आहो प्रपंचीं ॥२॥ अबोल्यानें ठेला तुका । भेउनि लोकां निराळा ॥३॥
2661
निघालें दिवाळें । जालें देवाचें वाटोळें ॥१॥ आतां वेचूं नये वाणी । विचारावें मनिच्या मनीं ॥ध्रु.॥ गुंडाळिलीं पोतीं । भीतरी लावियेली वाती ॥२॥ तुका म्हणे करा । ऐसा राहे माजी घरा ॥३॥
2662
निजदास उभा तात्काळ पायापें । स्वामी देखे सर्पें वेष्टियेला ॥१॥ लहानथोरें होतीं मिळालीं अपारें । त्याच्या धुदकारें निवारिलीं ॥२॥ निघतां आपटी धरूनि धांवामधीं । एकाचें चि वधी माथें पायें ॥३॥ एकीं जीव दिले येतां च त्या धाकें । येतील तीं एकें काकूलती ॥४॥ यथेष्ट भक्षिलीं पोट धाये वरी । तंव म्हणे हरि पुरे आतां ॥५॥ आतां करूं काम आलों जयासाटीं । हरी घाली मिठी काळयासि ॥६॥ यासि नाथूनियां नाकीं दिली दोरी । चेंडू भार शिरीं कमळांचा ॥७॥ चालविला वरी बैसे नारायण । गरुडा आळंगुन बहुडविलें ॥८॥ विसरु न पडे संवगड्या गाईं । यमुनेच्या डोहीं लक्ष त्यांचें ॥९॥ त्याच्या गोष्टी कांठीं बैसोनि सांगती । बुडाला दाविती येथें हरि ॥१०॥ हरीचें चिंतन करितां आठव । तुका म्हणे देव आला वरी ॥११॥
2663
निजल्यानें गातां उभा नारायण । बैसल्या कीर्तन करितां डोले ॥१॥ उभा राहोनियां मुखीं नाम वदे । नाचे नाना छंदें गोविंद हा ॥ध्रु.॥ मारगीं चालतां मुखीं नाम वाणी । उभा चक्रपाणी मागें पुढें ॥२॥ तुका म्हणे यासी कीर्तनाची गोडी । प्रेमे घाली उडी नामासाटीं ॥३॥
2664
निजसेजेची अंतुरी । पादलिया कोण मारी ॥१॥ तैसा आम्हासी उबगतां । तुका विनवितो संतां ॥ध्रु.॥ मूल मांडीवरी हागलें । तें बा कोणे रें त्यागिलें ॥२॥ दासी कामासी चुकली । ते बा कोणें रें विकली ॥३॥ पांडुरंगाचा तुका पापी । संतसाहें काळासि दापी ॥४॥
2665
निजों नव्हें सकाळवेळीं । रातीकाळी चिंन चिंनी॥१॥ वोंगळानें घेतली पाठी । केली आटी जीवासी ॥ध्रु.॥ मेळऊनि सवें जन । चिंता नेणे देवळीं च ॥२॥ तुका म्हणे आलों घरा । तोंडा घोरा बाइलेच्या ॥३॥
2666
नित्य उठोनियां खायाची चिंता । आपुल्या तूं हिता नाठवीसी ॥१॥ जननीचे पोटीं उपजलासी जेव्हां । चिंता तुझी तेव्हां केली तेणें ॥ध्रु.॥ चातकां लागूनि मेघ नित्य वर्षे । तो तुज उदास करील केवीं ॥२॥ पक्षी वनचरें आहेत भूमीवरि । तयांलागीं हरि उपेक्षीना ॥३॥ तुका म्हणे भाव धरुन राहें चित्तीं । तरि तो श्रीपति उपेक्षीना ॥४॥
2667
नित्य मनासी करितों विचार । तों हें अनावर विषयलोभी ॥१॥ आतां मज राखें आपुलिया बळें । न देखें हे जाळें उगवतां ॥ध्रु.॥ सांपडलों गळीं नाहीं त्याची सत्ता । उगळी मागुता घेतला तो ॥२॥ तुका म्हणे मी तों अज्ञान चि आहें । परि तुझी पाहें वास देवा ॥३॥
2668
निदऩयासी तुम्ही करितां दंडण । तुमचें गार्‍हाणें कोठें द्यावें ॥१॥ भाकितों करुणा ऐकती कान । उगलें चि मौन्य धरिलें ऐसें ॥ध्रु.॥ दीनपणें पाहें पाय भिडावोनि । मंजुळा वचनीं विनवीतसें ॥२॥ तुका म्हणे गांठी मनाची उकला । काय जी विठ्ठला पाहातसां ॥३॥
2669
निनांवा हें तुला । नांव साजे रे विठ्ठला । बरा शिरविला । फाटक्यामध्यें पाव ॥१॥ कांहीं तरी विचारिलें । पाप पुण्य ऐसें केलें । भुरळें घातलें । एकाएकीं भावासी ॥ध्रु.॥ मुद्राधारणें माळ माळा टिळे । बोल रसाळ कोंवळे । हातीं फांशाचे गुंडाळे । कोण चाळे गृहस्था हे ॥२॥ तुकयाबंधु म्हणे मिस्किन । करितोसी देखोन । पाहा दुरिवरी विच्छिन्न । केला परी संसार ॥३॥
2670
निरंजनीं आम्हीं बांधियेलें घर । निराकारीं निरंतर राहिलों आम्ही ॥१॥ निराभासीं पूर्ण जालों समरस । खंड ऐक्यास पावलों आम्ही ॥२॥ तुका म्हणे आतां नाहीं अहंकार । जालों तदाकार नित्य शुद्ध ॥३॥
2671
निरांजनीं एकटवाणें । संग नेणें दुसरा ॥१॥ पाहा चाळविलें कैसें । लावुनि पिसें गोवळें ॥ध्रु.॥ लपलें अंगें अंग । दिला संग होता तो ॥२॥ तुका म्हणे नव्हतें ठावें । जालें भावें वाटोळें ॥३॥
2672
निरोधती परि न मोडे विकार । बहु हीं दुस्तर विषयद्वारें ॥१॥ राहातेति तुम्ही भरोनि अंतरीं । होतों तदाकारी निर्विषचि ॥ध्रु.॥ कृपेचिया साक्षी असती जवळी । वचनें मोकळीं सरत नाहीं ॥२॥ तुका म्हणे ताळा मेळवणीपाशीं । विनंती पायापाशीं हे चि करीं ॥३॥
2673
निरोधाचें मज न साहे वचन । बहु होतें मन कासावीस ॥१॥ म्हणऊनि जीवा न साहे संगति । बैसतां एकांतीं गोड वाटे ॥ध्रु.॥ देहाची भावना वासनेचा संग । नावडे उबग आला यांचा ॥२॥ तुका म्हणे देव अंतरे ज्यामुळें । आशामोहोजाळें दुःख वाढे ॥३॥
2674
निरोप सांगतां । न धरीं भय न करीं चिंता ॥१॥ असो ज्याचें त्याचे त्याचे माथां । आपण करावी ते कथा ॥ध्रु.॥ उतरावा भार । किंवा न व्हावें सादर ॥२॥ तुका म्हणे धाक । तया इह ना परलोक ॥३॥
2675
निरोपासी वेचे । काय बोलतां फुकाचें ॥१॥ परी हें नेघेवे चि यश । भेओं नको सुखी आस ॥ध्रु.॥ सुख समाधानें । कोण पाहे देणें घेणें ॥२॥ न लगे निरोपासी मोल । तुका म्हणे वेचे बोल ॥३॥
2676
निर्गुणाचे घ्यावें गुणासी दर्शन । एकाएकीं भिन्न भेद घडे ॥१॥ तुम्हां आम्हां आतां न पडे यावरी । आहों तें चि बरी जेथें तेथें ॥ध्रु.॥ आपणापासुनी नसावें अंतर । वेचिलें उत्तर म्हणउनि ॥२॥ तुका म्हणे अंगा आली कठिन्यता । आमच्या अनंता तुम्हां ऐसी ॥३॥
2677
निर्धाराचें अवघें गोड । वाटे कोड कौतुक ॥१॥ बैसलिया भाव पांयीं । बरा तई नाचेन ॥ध्रु.॥ स्वामी कळे सावधान । तरि मन उल्हासे ॥२॥ तुका म्हणे आश्वासावें । प्रेम द्यावें विठ्ठले ॥३॥
2678
निर्वाहापुरतें अन्न आच्छादन । आश्रमासी स्थान कोंपी गुहा ॥१॥ कोठें ही चित्तासी नसावें बंधन । हृदयीं नारायण सांटवावा ॥ध्रु.॥ नये बोलों फार बैसों जनामधीं । सावधान बुद्धी इंद्रियें दमी ॥२॥ तुका म्हणे घडी घडीनें साधावी । त्रिगुणांची गोवी उगवूनि ॥३॥
2679
निर्वैर व्हावें सर्वभूतांसवें । साधन बरवें हें चि एक ॥१॥ तरी च अंगीकार करिल नारायण । बडबड तो सीण येणेंविण ॥ध्रु.॥ सोइरें पिशुन समान चि घटे । चित्ती पर ओढे उपकारी ॥२॥ तुका म्हणे चित्ती जालिया निर्मळ । तरि च सकळ केलें होय ॥३॥
2680
निर्वैर होणें साधनाचें मूळ । येर ते विल्हाळ सांडीमांडी ॥१॥ नाहीं चालों येती सोंगसंपादणी । निवडे अवसानीं शुद्धाशुद्ध ॥ध्रु.॥ त्यागा नांव तरी निर्विषयवासना । कारीयेकारणांपुरते विधि ॥२॥ तुका म्हणे राहे चिंतनीं आवडी । येणें नांवें जोडी सत्यत्वेंशीं ॥३॥
2681
निवडावें खडे । तरी दळण वोजें घडे ॥१॥ नाहीं तरि नासोनि जाय । कारण आळस उरे हाय ॥ध्रु.॥ निवडावें तन । सेतीं करावें राखण ॥२॥ तुका म्हणे नीत । न विचारितां नव्हे हित ॥३॥
2682
निवडुनि दिलें नवनीत । संचित ते भोगीत ॥१॥ आतां पुढें भावसार । जीवना थार पाहावया ॥ध्रु.॥ पारखियाचे पडिलें हातीं । चांचपती आंधळीं ॥२॥ तुका म्हणे सेवन घडे । त्यासी जोडे लाभ हा ॥३॥
2683
निवडे जेवण सेवटींच्या घांसें । होय त्याच्या ऐसें सकळ ही ॥१॥ न पाहिजे जाला बुद्धीचा पालट । केली खटपट जाय वांयां ॥ध्रु.॥ संपादिलें होय धरिलें तें सोंग । विटंबणा वेंग पडियाली ॥२॥ तुका म्हणे वर्म नेणतां जें रांधी । पाववी ते बुद्धि अवकळा ॥३॥
2684
निवडोनि वाण काढिले निराळे । प्रमाण डोहळे यावरि ते ॥१॥ जयाचा विभाग तयासी च फळे । देखणें निराळें कौतुकासी ॥ध्रु.॥ शूर तो ओळखे घायडायहात । येरां होइल मात सांगायासी ॥२॥ तुका म्हणे माझी केळवते वाणी । केला निजस्थानीं जाणवसा ॥३॥
2685
निश्चितीनें होतों करुनियां सेवा । कां जी मन देवा उद्वेगिलें ॥१॥ अनंत उठती चित्ताचे तरंग । करावा हा त्याग वाटतसे ॥ध्रु.॥ कोण तुम्हांविण मनाचा चाळक । दुजें सांगा एक नारायणा ॥२॥ तुका म्हणे माझा मांडिला विनोद । करऊं नेणें छंद कराल काइ ॥३॥
2686
निष्ठ‍ तो दिसे निराकारपणें । कोंवळा सगुणें प्रतिपाळी ॥१॥ केला च करावा केला कइवाड । होईंल तें गोड न परेते ॥ध्रु.॥ मथिलिया लागे नवनीत हातां । नासे वितळितां आहाच तें ॥२॥ तुका म्हणे आतां मनाशीं विचार । करावा तो सार एकचित्त ॥३॥
2687
निष्ठ‍ मी जालों अतिवादागुणें । हें कां नारायणें नेणिजेल ॥१॥ सांडियेली तुम्ही गोत परिसोय । फोडविली डोय कर्मा हातीं ॥ध्रु.॥ सांपडूनि संदी केली जीवेंसाटीं । घ्यावयासि तुटी कारण हें ॥२॥ तुका म्हणे तुज काय म्हणों उणें । नाहीं अभिमानें चाड देवा ॥३॥
2688
निष्ठ‍ यासाटीं करितों भाषण । आहेसी तूं सर्वजाण दाता ॥१॥ ऐसें कोण दुःख आहे निवारिता । तो मी जाऊं आतां शरण त्यासी ॥ध्रु.॥ बैसलासी केणें करुनि एक घरीं । नाहीं येथें उरी दुसर्‍याची ॥२॥ तुका म्हणे आलें अवघें चि पायापें । आतां मायबापें नुपेक्षावें ॥३॥
2689
निष्ठ‍ा उत्तरीं न धरावा राग । आहे लागभाग ठायींचा चि ॥१॥ तूं माझा जनिता तूं माझा जनिता । रखुमाईंच्या कांता पांडुरंगा ॥ध्रु.॥ मुळींच्या ठेवण्यां आहे अधिकार । दुरावोनि दूर गेलों होतों ॥२॥ पोटींच्या आठवा पडिला विसर । काहीं आला भार माथां तेणें ॥३॥ राखिला हा होता बहु चौघां चार । साक्षीने वेव्हार निवडिला ॥४॥ तुका म्हणे कांहीं बोलणें न लगे । आतां पांडुरंगे तूं मी ऐसें ॥५॥
2690
निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म । निर्धार हें वर्म चुकों नये ॥१॥ निष्काम निश्चळ विठ्ठलीं विश्वास । पाहों नये वास आणिकांची ॥२॥ तुका म्हणे ऐसा कोणें उपेक्षिला । नाहीं ऐकिला ऐसा कोणीं ॥३॥
2691
निसुर संसार करून । होतों पोट भरून । केली विवसी निर्माण । देवपण दाखविलें ॥१॥ ऐसा काढियेला निस । काय म्हुण सहित वंश । आणिलें शेवटास । हाउस तरी न पुरे ॥ध्रु.॥ उरलों पालव्या सेवटीं । तें ही न देखवे दृष्टी । दोघांमध्ये तुटी । रोकडीचि पाडीली ॥२॥ तुकयाबंधु म्हणे गोड । बहु जालें अति वाड । म्हणोनी कां बुड । मुर्‍यांसहित खावें ॥३॥
2692
नीट पाट करूनि थाट । दावीतसे तोरा । आपणाकडे पाहो कोणी । निघाली बाजारा ॥१॥ ते सौरी नव्हे निकी । भक्तीविण फिकी ॥ध्रु.॥ चांग भांग करूनि सोंग । दावी माळा मुदी । रुक्याची आस धरूनि । हालवी ती फुदी ॥२॥ थोरे घरीं करी फेरी । तेथें नाचे बरी । जेथें निघे रुका । तेथें हालवी टिरी ॥३॥ आंत मांग बाहेर चांग । सौरी ती नव्हे तेग । तुका दास नटतसे । न करी त्याचा संग ॥४॥
2693
नीत सांडोनि अवनीत चाले । भंडउभंड भलतें चि बोले ॥१॥ त्यांत कोणाचें काय बा गेलें । ज्याचें तेणें अनहित केलें ॥ध्रु.॥ ज्यासि वंदावें त्यासी निंदी । मैत्री सांडोनि होतसे दंदी ॥२॥ आन यातीचे संगती लागे । संतसज्जनामध्यें ना वागे ॥३॥ केल्याविण पराक्रम सांगे । जेथें सांगे तेथें चि भीक मागे ॥४॥ करी आपुला चि संभ्रम । परि पुढें कठीण फार यम ॥५॥ तुका म्हणे कांहीं नित्यनेम । चित्ती न धरी तो अधम ॥६॥
2694
नुगवे तें उगवून सांगितलें भाई । घालुनियां ताळा आतां शुद्ध राखा घाई ॥१॥ आतां कांहीं नाहीं राहिलें । म्यां आपणा आपण पाहिलें ॥ध्रु.॥ कमाईस मोल येथें नका रीस मानू। निवडूं नये मज कोणा येथें वानूं ॥२॥ तुका म्हणे पदोपदीं कान्हो वनमाळी । जयेजत मग सेवटिला एक वेळीं ॥३॥
2695
नेघें तुझें नाम । न करीं सांगितलें काम ॥१॥ वाढे वचनें वचन । दोष उच्चारितां गुण ॥ध्रु.॥ आतां तुझ्या घरा । कोण करी येरझारा ॥२॥ तुका म्हणे ठायीं । मजपाशीं काय नाहीं ॥३॥
2696
नेणतियांसाटीं नेणता लाहान । थिंकोनि भोजन मागे माये ॥१॥ माया दोनी यास बाप नारायणा । सारखी भावना तयांवरी ॥२॥ तयांवरी त्याचा समचित्त भाव । देवकीवसुदेव नंद दोघे ॥३॥ घेउनियां एके ठायीं अवतार । एकीं केला थोर वाढवूनि ॥४॥ उणा पुरा यासी नाहीं कोणी ठाव । सारिखा चि देव अवघियांसी ॥५॥ यासी दोनी ठाव सारिखे अनंता । आधील मागुता वाढला तो ॥६॥ वाढला तो सेवाभक्तिचिया गुणें । उपचारमिष्टान्नें करूनियां ॥७॥ करोनियां सायास मेळविलें धन । तें ही कृष्णार्पण केलें तीहीं ॥८॥ कृष्णासी सकळ गाईं घोडे म्हैसी । समर्पिल्या दासी जीवें भाव ॥९॥ जीवें भावें त्याची करितील सेवा । न विसंबती नांवा क्षणभरी ॥१०॥ क्षणभरी होतां वेगळा तयांस । होती कासावीस प्राण त्यांचे ॥११॥ त्यांचे ध्यानीं मनीं सर्वभावें हरि । देह काम करी चत्ति त्यापें ॥१२॥ त्याचें चि चिंतन कृष्ण कोठें गेला । कृष्ण हा जेविला नाहीं कृष्ण ॥१३॥ कृष्ण आला घरा कृष्ण गेला दारा । कृष्ण हा सोयरा भेटों कृष्णा ॥१४॥ कृष्ण गातां ओंव्या दळणीं कांडणीं । कृष्ण हा भोजनीं पाचारिती ॥१५॥ कृष्ण तयां ध्यानीं आसनीं शयनीं । कृष्ण देखे स्वपनीं कृष्णरूप ॥१६॥ कृष्ण त्यांस दिसे आभास दुश्चितां । धन्य मातापिता तुका म्हणे ॥१७॥
2697
नेणती तयांसि साच भाव दावी हरी । लाज नाहीं नाचे पांवा वाजवी मोहरी ॥१॥ चला रे याच्या पायां लागों आतां । राखिलें जळतां महा आगीपासूनि ॥ध्रु.॥ कैसी रे कान्होबा एवढी गिळियेली आगी । न देखों पोळला तुज तोंडीं कोठें अंगी ॥२॥ तुका म्हणे तुम्ही कां रे करितां नवल । आमची सिदोरी खातो त्याचें आलें बळ ॥३॥
2698
नेणती वेद श्रुति कोणी । आम्हां भाविकां वांचुनी ॥१॥ रूप आवडे आम्हांशी । तैसी जोडी हृषीकेशी ॥ध्रु.॥ आम्हीं भावें बळिवंत । तुज घालूं हृदयांत ॥२॥ तुका म्हणे तुज धाक । देतां पावसील हाक ॥३॥
2699
नेणपणें नाहीं केला हा बोभाट । आतां आली वाट कळों खरी ॥१॥ आतां बहुं शीघ्र यावें लवकरी । वाट पाहें हरी भेटी देई ॥ध्रु.॥ समर्थाच्या बाळा करुणेचें भाषण । तरी त्याची कोण नांदणूक ॥२॥ तुका म्हणे बहु बोलिले बडिवार । पडिलें अंतर लौकिकीं तें ॥३॥
2700
नेणे करूं सेवा । पांडुरंगा कृपाळुवा ॥१॥ धांवें बुडतों मी काढीं । सत्ता आपुलिया ओढीं ॥ध्रु.॥ क्रियाकर्महीन । जालों इंद्रियां अधीन ॥२॥ तुका विनंती करी । वेळोवेळां पाय धरी ॥३॥
2701
नेणे गति काय कवण अधोगति । मानिली निश्चिंती तुझ्या पायीं ॥१॥ कर्म धर्म कोण नेणें हा उपाव । तुझ्या पायीं भाव ठेवियेला ॥ध्रु.॥ नेणें निरसं पाप पुण्य नेणें काय । म्हणऊनि पाय धरिले तुझे ॥२॥ वेडा मी अविचार न कळे विचार । तुज माझा भार पांडुरंगा ॥३॥ तुका म्हणे तुज करितां नव्हे काय । माझा तो उपाय कवण तेथें ॥४॥
2702
नेणे सुनें चोर पाहुणा मागता । देखून भलता भुंकतसे ॥१॥ शिकविलें कांहीं न चले तया । बोलियेले वांयां बोल जाती ॥ध्रु.॥ क्षीर ओकुनियां खाय अमंगळ । आपुली ते ढाळ जाऊं नेदी ॥२॥ वंदूं निंदूं काय दुराचार । खळाचा विचार तुका म्हणे ॥३॥
2703
नेणें अर्थ कांहीं नव्हती माझे बोल । विनवितों कोपाल संत झणी ॥१॥ नव्हती माझे बोल बोले पांडुरंग । असे अंगसंगें व्यापूनिया ॥ध्रु.॥ मज मूढा शक्ति कैंचा हा विचार । निगमादिकां पार बोलावया ॥२॥ राम कृष्ण हरी मुकुंदा मुरारि । बोबडा उत्तरीं हें चि ध्यान ॥३॥ तुका म्हणे गुरुकृपेचा आधार । पांडुरंगें भार घेतला माझा ॥४॥
2704
नेणें काुंफ्कों कान । नाहीं एकांतींचें ज्ञान ॥१॥ तुम्ही आइका हो संत । माझा सादर वृत्तांत ॥ध्रु.॥ नाहीं देखिला तो डोळां । देव दाखवूं सकळां ॥२॥ चिंतनाच्या सुखें । तुका म्हणे नेणें दुःखें ॥३॥
2705
नेणें गाऊं कांहीं धड बोलतां वचन । कायावाचामनेंसहित आलों शरण ॥१॥ करीं अंगीकार नको मोकलूं हरी । पतितपावन ब्रिदें करावीं खरीं ॥ध्रु.॥ नेणें भक्तिभाव तुझा म्हणवितों दास । जरि देसी अंतर तरि लज्जा कोणास ॥२॥ म्हणे तुकयाबंधु तुझे धरियेले पाये । आतां कोण दुजा ऐसा आम्हांसी आहे ॥३॥
2706
नेणें गाणें कंठ नाहीं हा सुस्वर । घालूं तुज भार पांडुरंगा ॥१॥ नेणें राग वेळ काळ घात मात । तुझे पायीं चित्त ठेवीं देवा ॥२॥ तुका म्हणे मज चाड नाहीं जना । तुज नारायणा वांचूनिया ॥३॥
2707
नेणें जप तप अनुष्ठान याग । काळें तंव लाग घेतलासे ॥१॥ रिघालो या भेणें देवाचे पाठीसी । लागे त्याचें त्यासी सांभाळणें ॥ध्रु.॥ मापें माप सळे चालिली चढती । जाली मग राती काय चाले ॥२॥ तुका म्हणे चोरा हातीं जे वांचलें । लाभावरी आलें वारिलेशु ॥३॥
2708
नेणें वर्ण धर्म जीं आलीं सामोरीं । अवघीं च हरी आळिंगिलीं ॥१॥ हरि लोकपाळ आले नगरांत । सकळांसहित मायबाप ॥२॥ पारणें तयांचें जालें एका वेळे । देखिलें सावळें परब्रम्ह ॥३॥ ब्रम्हानंदें लोक सकळ नाचती । गुढिया उभविती घरोघरीं ॥४॥ घरोघरीं सुख आनंद सोहळा । सडे रंग माळा चौकदारीं ॥५॥ दारीं वृंदावनें तुळसीचीं वनें । रामकृष्णगाणें नारायण ॥६॥ नारायण तिहीं पूजिला बहुतीं । नाना पुष्पयाती करूनियां ॥७॥ यांचें ॠण नाहीं फिटलें मागील । पुढें भांडवल जोडिती हीं ॥८॥ हीं नव्हतीं कधीं या देवा वेगळीं । केला वनमाळी सेवाॠणी ॥९॥ सेवाॠणें तुका म्हणे रूपधारी । भक्तांचा कैवारी नारायणा ॥१०॥
2709
नेणों काय नाड । आला उचित काळा आड ॥१॥ नाहीं जाली संतभेटी । येवढी हानी काय मोठी ॥ध्रु.॥ सहज पायांपासीं । जवळी पावलिया ऐसी ॥२॥ चुकी जाली आतां काय । तुका म्हणे उरली हाय ॥३॥
2710
नेणों वेळा काळ । धालों तुझ्यानें सकळ ॥१॥ नाहीं नाहीं रे कान्होबा भय आम्हापाशीं । वळूनि पुरविसी गाई पोटा खावया ॥ध्रु.॥ तुजपाशीं भये । हें तों बोलों परी नये ॥२॥ तुका म्हणे बोल । आम्हा अनुभवें फोल ॥३॥
2711
नेत्र झाकोनियां काय जपतोसी । जंव नाहीं मानसीं भावप्रेम ॥१॥ उघडा मंत्र जाणा राम कृष्ण म्हणा । तुटती यातना गर्भवास ॥ध्रु.॥ मंत्र यंत्र कांहीं करिसी जडी बुटी । तेणें भूतसृष्टी पावशील ॥२॥ सार तुका जपे बीजमंत्र एक । भवसिंधुतारक रामकृष्ण ॥३॥
2712
नेत्राची वासना । तुज पाहावें नारायणा ॥१॥ करीं याचें समाधान । काय पहातोसी अनुमान ॥ध्रु.॥ भेटावें पंढरिराया । हें चि इच्छिताती बाह्या ॥२॥ म्हणतों जावें पंढरीसीं । हेंचि ध्यान चरणासी ॥३॥ चित्त म्हणे पायीं । तुझे राहीन निष्चयीं ॥४॥ म्हणे बंधु तुकयाचा । देवा भाव पुरवीं साचा ॥५॥
2713
नेदावी सलगी न करावा संग । करी चित्ता भंग वेळोवेळा ॥१॥ सर्प शांतिरूप न म्हणावा भला । झोंबे खवळीला तात्काळ तो ॥२॥ तुका म्हणे दुरी राखावा दुर्जन । करावें वचन न घडे तें ॥३॥
2714
नेदी कळों केल्याविण तें कारण । दाखवी आणून अनुभवा ॥१॥ न पुरेसा हात घाली चेंडूकडे । म्हणीतलें गडे सांभाळावें ॥२॥ सांभाळ करितां सकळां जिवांचा । गोपाळांसि वाचा म्हणे बरें ॥३॥ बरें विचारुनी करावें कारण । म्हणे नारायण बर्‍या बरें ॥४॥ बरें म्हणउनि तयांकडे पाहे । सोडविला जाय चेंडू तळा ॥५॥ तयासवें उडी घातली अनंतें । गोपाळ रडते येती घरा ॥६॥ येतां त्यांचा लोकीं देखिला कोल्हाळ । सामोरीं सकळ आलीं पुढें ॥७॥ पुसतील मात आपआपल्यासि । हरिदुःखें त्यांसी न बोलवे ॥८॥ न बोलवे हरि बुडालासें मुखें । कुटितील दुःखें उर माथे ॥९॥ मायबापें तुका म्हणे न देखती । ऐसें दुःख चित्ती गोपाळांच्या ॥१०॥
2715
नेदी दुःख देखों दासा नारायण । ठेवी निवारून आल्या आधीं ॥१॥ आधीं पुढें शुद्ध करावा मारग । दासांमागें मग सुखरूप ॥२॥ पर्वतासि हात लाविला अनंतें । तो जाय वरतें आपेंआप ॥३॥ आपल्याआपण उचलिला गिरी । गोपाळ हे करी निमित्यासि ॥४॥ निमित्य करूनि करावें कारण । करितां आपण कळों नेदी ॥५॥ दिनाचा कृपाळु पतितपावन । हें करी वचन सांच खरें ॥६॥ सांगणें न लगे सुखदुःख दासा । तुका म्हणे ऐसा कृपावंत ॥७॥
2716
नेलें सळेंबळें । चित्तावित्ताचें गांठोळें ॥१॥ साहए जालीं घरिच्या घरीं । होतां ठायीं च कुठोरी ॥ध्रु.॥ मी पातलों या भावा । कपट तें नेणें देवा ॥२॥ तुका म्हणे उघडें केलें । माझें माझ्या हातें नेलें ॥३॥
2717
नेसणें आलें होतें गर्‍या । लोक रर्‍या करिती ॥१॥ आपणियां सावरिलें । जग भलें आपण ॥ध्रु.॥ संबंध तो तुटला येणें । जागेपणें चेष्टाचा ॥२॥ भलती सेवा होती अंगें । बारस वेगें पडिलें ॥३॥ सावरिलें नीट वोजा । दृष्टीलाजा पुढिलांच्या ॥४॥ बरे उघडिले डोळे । हळहळेपासूनि ॥५॥ तुका म्हणे विटंबना । नारायणा चुकली ॥६॥
2718
नो बोलावें ऐसें जनासी उत्तर । करितों विचार बहु वेळा ॥१॥ कोण पाप आड ठाकतें येऊन । पालटिति गुण अंतरींचा ॥ध्रु.॥ संसारा हातीं सोडवूनि गळा । हें कां अवकळा येती पुढें ॥२॥ तुका म्हणे सेवे घडेल अंतराय । यास करूं काय पांडुरंगा ॥३॥
2719
पंचभूतांचा गोंधळ । केला एकेठायीं मेळ । लाविला सबळ । अहंकार त्यापाठीं ॥१॥ तेथें काय मी तें माझें । कोण वागवी हें ओझें । देहा केवीं रिझे । हें काळाचें भातुकें ॥ध्रु.॥ जीव न देखे मरण । धरी नवी सांडी जीर्ण । संचित प्रमाण । भोगा शुभा अशुभा ॥२॥ इच्छा वाढवी ते वेल । खुंटावा तो खरा बोल । तुका म्हणे मोल । झाकलें तें पावेल ॥३॥
2720
पंचभूतांचिये सांपडलों संदीं । घातलोंसे बंदीं अहंकारें ॥१॥ आपल्या आपण बांधविला गळा । नेणें चि निराळा असतां हो ॥ध्रु.॥ कासया हा सत्य लेखिला संसार । कां हे केले चार माझें माझें ॥२॥ कां नाहीं शरण गेलों नारायणा । कां नाहीं वासना आवरिली ॥३॥ किंचित सुखाचा धरिला अभिळास । तेणें बहु नास केला पुढें ॥४॥ तुका म्हणे आतां देह देऊं बळी । करुनि सांडूं होळी संचिताची ॥५॥
2721
पंचाग्निसाधन करूं धूम्रपान । काय तीर्थाटण करूं सांग ॥१॥ सांग कोणे देशीं आहे तुझें गांव । घेऊनियां धांव येऊं तेथें ॥ध्रु.॥ सांग कांहीं वृत्त कोण करूं व्रत । जेणें कृपावंत होशील तूं ॥२॥ वाटतें सेवटीं जालासि निष्ठ‍ । न देसी उत्तर तुका म्हणे ॥३॥
2722
पंडित तो चि एक भला । नित्य भजे जो विठ्ठला ॥१॥ अवघें सम ब्रम्ह पाहे । सर्वां भूतीं विठ्ठल आहे ॥ध्रु.॥ रिता नाहीं कोणी ठाव । सर्वां भूतीं वासुदेव ॥२॥ तुका म्हणे तो चि दास । त्यां देखिल्या जाती दोष ॥३॥
2723
पंडित म्हणतां थोर सुख । परि तो पाहातां अवघा मूर्ख ॥१॥ काय करावें घोकिलें । वेदपठण वांयां गेलें ॥ध्रु.॥ वेदीं सांगितलें तें न करी । सम ब्रम्ह नेणे दुराचारी ॥२॥ तुका देखे जीवीं शिव । हा तेथींचा अनुभव ॥३॥
2724
पंडित वाचक जरी जाला पुरता । तरी कृष्णकथा ऐके भावें ॥१॥ क्षीर तुपा साकरे जालिया भेटी । तैसी पडे मिठी गोडपणें ॥ध्रु.॥ जाणोनियां लाभ घेई हा पदरीं । गोड गोडावरी सेवीं बापा ॥२॥ जाणिवेचें मूळ उपडोनी खोड । जरी तुज चाड आहे तुझी ॥३॥ नाना परिमळद्रव्य उपचार । अंगी उटी सारचंदनाची ॥४॥ जेविलियाविण शून्य ते शृंगार । तैसी गोडी हरिकथेविण ॥५॥ ज्याकारणें वेदश्रुति ही पुराणें । तें चि विठ्ठलनाणें तिष्ठे कथे ॥६॥ तुका म्हणे येर दगडाचीं पेंवें । खळखळ आवघें मूळ तेथें ॥७॥
2725
पंढरपुरींचें दैवत भजावें । काया वाचा जावें शरण त्या ॥१॥ मनीं ध्यान करी अहंता धरूनी । तया चक्रपाणी दूर ठेला ॥ध्रु.॥ मान अभिमान सांडुनियां द्यावे । अवघ्यां नीच व्हावें तरी प्राप्त ॥२॥ तुका म्हणे हें चि कोणासी सांगावें । सादर होउनि भावें भजें देवा ॥३॥
2726
पंढरि पुण्यभूमी भीमा दिक्षणावाहिनी । तीर्थ हें चंद्रभागा महा पातकां धुनी । उतरलें वैकुंठमहासुख मेदिनी ॥१॥ जय देवा पांडुरंगा जय अनाथनाथा । आरती ओंवाळीन तुम्हां लक्ष्मीकांता ॥ध्रु.॥ नित्य नवा सोहळा हो महावाद्यां गजर । सन्मुख गरुड पारीं उभा जोडुनि कर । मंडितचतुर्भुजा कटीं मिरवती कर ॥२॥ हरिनाम कीर्तन हो आनंद महाद्वारीं । नाचती प्रेमसुखें नर तेथिंच्या नारी । जीवन्मुक्त लोक नित्य पाहाती हरी ॥३॥ आषाढी कार्तिकी हो गरुडटकयां भार । गर्जती नाम घोष महावैष्णववीर । पापासी रीग नाहीं असुर कांपती सुर ॥४॥ हें सुख पुंडलिकें कसें आणिलें बापें । निर्गुण साकारले आम्हांलागिं हें सोपें । म्हणोनि चरण धरोनि तुका राहिला सुखें ॥५॥
2727
पंढरी चोहटा मांडियेला खेळ । वैष्णव मिळोनि सकळ रे । टाळ टिपरी मांदळे एक नाद रे । जाला बसवंत देवकीचा बाळ रे ॥१॥ चला तें कवतुक भाई रे । पाहों डोळां कामीं गुंतलेति काई रे । भाग्यवंत कोणी गेले सांगाति । ऐसें सुख त्रिभुवनीं नाहीं रे ॥ध्रु.॥ आनंदाचे वाद सुखाचे संवाद । एक एका दाखविती छंद रे । साही अठरा चारी घालुनियां घाई । नाचती फेरी टाळशुद्ध रे ॥२॥ भक्ताचीं भूषणें मुद्रा आभरणें । शोभती चंदनाच्या उट्या रे । सत्व सुंदर कास घालूनि कुसरी । गर्जती नाम बोभाटीं रे ॥३॥ हरि हर ब्रम्हा तीर्थासहित भीमा । देव कोटी तेहतीस रे । विस्मित होऊनि ठाकले सकळ जन । अमरावती केली ओस रे ॥४॥ वाणितील थोरी वैकुंठिचीं परी । न पवे पंढरीची सरी रे । तुकयाचा दास म्हणे नका आळस करूं । सांगतों नरनारींस रे ॥५॥
2728
पंढरी पंढरी । म्हणतां पापाची बोहोरी ॥१॥ धन्य धन्य जगीं ठाव । होतो नामाचा उत्साव ॥ध्रु.॥ रिद्धिसिद्धी लोटांगणीं । प्रेमसुखाचिया खाणी ॥२॥ अधिक अक्षरानें एका । भूवैकुंठ म्हणे तुका ॥३॥
2729
पंढरी पावन जालें माझें मन । आतां करूं ध्यान विठोबाचें ॥१॥ आतां ऐसें करूं नाम गाऊं गीतीं । सुखाचा सांगाती विठो करूं ॥ध्रु.॥ संग करूं त्याचा तो सखा आमचा । अनंतां जन्मांचा मायबाप ॥२॥ परतोनि सोईं धरीं कां रे मना । विठ्ठलचरणा घालीं मिठी ॥३॥ घातलीसे मिठी नाही भक्तिभाव । उदार पंढरिराव तुका म्हणे ॥४॥
2730
पंढरीचा महिमा । देतां आणीक उपमा ॥१॥ ऐसा ठाव नाहीं कोठें । देव उभाउभी भेटे ॥ध्रु.॥ आहेति सकळ । तीर्थे काळें देती फळ ॥२॥ तुका म्हणे पेठ । भूमिवरी हे वैकुंठ ॥३॥
2731
पंढरीचा वारकरी । खेपा वैकुंठबंदरीं ॥१॥ तया नाहीं आणखी पेणें । सदा वैकुंठीं राहाणें ॥ध्रु.॥ आला गेला केल्या यात्रा । उद्धरिलें कुळा सर्वत्रा ॥२॥ तुका म्हणे नाहीं । यासि संदेह कल्पांतीं ही ॥३॥
2732
पंढरीचा वास धन्य ते चि प्राणी । अमृताची वाणी दिव्य देहो ॥१॥ मूढ मतिहीन दुष्ट अविचारी । ते होती पंढरी दयारूप ॥ध्रु.॥ शांति क्षमा अंगीं विरक्ति सकळ । नैराश्य निर्मळ नारी नर ॥२॥ तुका म्हणे नाहीं वर्णा अभिमान । अवघे जीवनमुक्त लोक ॥३॥
2733
पंढरीची वाट पाहें निरंतर । निडळावरी कर ठेवूनियां ॥१॥ जातियां निरोप पाठवीं माहेरा । कां मज सासुरा सांडियेलें ॥ध्रु.॥ पैल कोण दिसे गरुडाचे वारिकें । विठ्ठलासारिकें चतुर्भुज ॥२॥ तुका म्हणे धीर नाहीं माझ्या जीवा । भेटसी केधवां पांडुरंगा ॥३॥
2734
पंढरीची वारी आहे माझे घरीं । आणीक न करीं तीर्थव्रत ॥१॥ व्रत एकादशी करीन उपवासी । गाइन अहर्निशीं मुखीं नाम ॥२॥ नाम विठोबाचें घेईंन मी वाचे । बीज कल्पांतींचें तुका म्हणे ॥३॥
2735
पंढरीची वारी जयांचिये घरीं । पायधुळी शिरीं वंदिन त्यांची ॥१॥ दासाचा मी दास पोसणा डोंगर । आतां बहु फार काय बोलों ॥ध्रु.॥ जातीचें मी हीन न कळे भजन । म्हणोनि संतचरण इच्छीतसें ॥२॥ तुका म्हणे मज म्हणावें आपुलें । बहुता तारिलें संतजनीं ॥३॥
2736
पंढरीचे वारकरी । ते अधिकारी मोक्षाचे ॥१॥ पुंडलिका दिला वर । करुणाकरें विठ्ठलें ॥ध्रु.॥ मूढ पापी जैसे तैसे । उतरी कासे लावूनि ॥२॥ तुका म्हणे खरें जालें । एका बोलें संतांच्या ॥३॥
2737
पंढरीचे भूत मोठे ।आल्या गेल्या झडपी वाटे ।। बहु खेचरीचे रान । जातां वेडे होय मन ।। तेथे जाऊ नका कोणी ।गेले नाही आले परतोनि ।। तुका पंढरीसी गेला । पुन्हां जन्मा नाही आला ।।
2738
पंढरीये माझें माहेर साजणी । ओविये कांडणीं गाऊं गीत ॥१॥ राही रखुमाईं सत्यभामा माता । पांडुरंग पिता माहियेर ॥ध्रु.॥ उद्धव अक्रूर व्यास आंबॠषि । भाईं नारदासी गौरवीन ॥२॥ गरुड बंधु लडिवाळ पुंडलीक । यांचें कवतुक वाटे मज ॥३॥ मज बहु गोत संत आणि महंत । नित्य आठवीत ओवियेसी ॥४॥ निवृत्ति ज्ञानदेव सोपान चांगया । जिवलगा माझिया नामदेवा ॥५॥ नागोजन मित्रा नरहरि सोनारा । रोहिदास कबिरा सोईंरिया ॥६॥ परसो भागवता सुरदास सांवता । गाईंन नेणतां सकळांसी ॥७॥ चोखामेळा संत जिवाचे सोइरे । न पडे विसर यांचा घडी ॥८॥ जीवींच्या जीवना एका जनार्दना । पाटका कान्हया मिराबाईं ॥९॥ आणीक हे संत महानुभाव मुनि । सकळां चरणीं जीव माझा ॥१०॥ आनंदें ओविया गाईंन मी त्यांसी । जाती पंढरीसी वारकरी ॥११॥ तुका म्हणे माझा बळिया बापमाय । हरुषें नांदों सये घराचारी ॥१२॥
2739
पंढरीस घडे अतित्यायें मृत्य । तो जाय पतित अधःपाता ॥१॥ दुराचारें मोक्ष सुखाचे वसति । भोळी बाळमूर्ति पांडुरंग ॥ध्रु.॥ केला न सहावे तीर्थउपवास । कथेविण दोषसाधन तें ॥२॥ कालियापें भेद मानितां निवडे । श्रोत्रियांसी जोडे आंतेजेता ॥३॥ माहेरीं सलज्ज ते जाणा सिंदळी । काळिमा काजळी पावविते ॥४॥ तुका म्हणे तेथें विश्वास जतन । पुरे भीमास्नान सम पाय ॥५॥
2740
पंढरीस जाऊं म्हणती । यम थोर चिंता करि ती ॥१॥ या रे नाचों ब्रम्हानंदें । विठ्ठलनामाचिया छंदें ॥ध्रु.॥ धरिली पंढरीची वाट । पापें रिगालीं कपाट ॥२॥ केलें भीमरेचें स्नान । यमपुरी पडिले खान ॥३॥ दुरोनि देखिली पंढरी । पापें गेलीं दुरच्यादुरी ॥४॥ दुरोनि देखिलें राउळ । हरुषें नाचती गोपाळ ॥५॥ तुका म्हणे नाहीं जाणें । अखंड पंढरिराहणें ॥६॥
2741
पंढरीस जाते निरोप आइका । वैकुंठनायका क्षम सांगा ॥१॥ अनाथांचा नाथ हें तुझें वचन । धांवें नको दीन गांजों देऊं ॥ध्रु.॥ ग्रासिलें भुजंगें सर्पें महाकाळें । न दिसे हें जाळें उगवतां ॥२॥ कामक्रोधसुनीं श्वापदीं बहुतीं । वेढलों आवर्ती मायेचिये ॥३॥ मृदजलनदी बुडविना तरी । आणूनियां वरी तळा नेते ॥४॥ तुका म्हणे तुवां धरिलें उदास । तरि पाहों वास कवणाची ॥५॥
2742
पंढरीस दुःख न मिळे ओखदा । प्रेमसुख सदा सर्वकाळ ॥१॥ पुंडलिकें हाट भरियेली पेंठ । अवघें वैकुंठ आणियेलें ॥ध्रु.॥ उदमासी तुटी नाहीं कोणा हानि । घेऊनियां धणी लाभ घेती ॥२॥ पुरलें देशासी भरलें सिगेसी । अवघी पंचक्रोशी दुमदुमीत ॥३॥ तुका म्हणे संतां लागलीसे धणी । बैसले राहोनि पंढरीस ॥४॥
2743
पंढरीसी जा रे आलेनो संसारा । दीनाचा सोयरा पांडुरंग ॥१॥ वाट पाहे उभा भेटीची आवडी । कृपाळूं तांतडी उतावीळ ॥ध्रु.॥ मागील परिहार पुढें नेहे सीण । जालिया दर्षणें एकवेळा ॥२॥ तुका म्हणे नेदी आणिकांचे हातीं । बैसला तो चत्तिीं निवडेना ॥३॥
2744
पंढरीसी जाय । तो विसरे बापमाय ॥१॥ अवघा होय पांडुरंग । राहे धरूनियां अंग ॥ध्रु.॥ न लगे धन मान । देहभावें उदासीन ॥२॥ तुका म्हणे मळ । नासी तात्काळ तें स्थळ ॥३॥
2745
पंढरीसी जावें ऐसें माझें मनीं । विठाई जननी भेटे केव्हां ॥१॥ न लगे त्याविण सुखाचा सोहळा । लागे मज ज्वाळा अग्निचिया ॥२॥ तुका म्हणे त्याचे पाहिलिया पाय । मग दुःख जाय सर्व माझें ॥३॥
2746
पंधरा दिवसांमाजी साक्षात्कार जाला । विठोबा भेटला निराकार ॥१॥ भांबगिरिपाठारीं विस्त जाण केली । वृत्ति थिरावली परब्रम्हीं ॥ध्रु.॥ निर्वाण जाणोनि आसन घातलें । ध्यान आरंभिलें देवाजीचें ॥२॥ सर्प विंचू व्याघ्र आंगासी झोंबले । पीडूं जे लागले सकळिक ॥३॥ दीपकीं कर्पूर कैसा तो विराला । तैसा देह जाला तुका म्हणे ॥४॥
2747
पंधरां दिवसां एक एकादशी । कां रे न करिसी व्रतसार ॥१॥ काय तुझा जीव जातो एका दिसें । फराळाच्या मिसें धणी घेसी ॥ध्रु.॥ स्वहित कारण मानवेल जन । हरिकथा पूजन वैष्णवांचें ॥२॥ थोडे तुज घरीं होती उजगरे । देउळासी कां रे मरसी जातां ॥३॥ तुका म्हणे कां रे सकुमार जालासी । काय जाब देसी यमदूतां ॥४॥
2748
पक्षीयाचे घरीं नाहीं सामुगरी । त्यांची चिंता करी नारायण ॥१॥ अजगर जनावर वारुळांत राहे । त्याजकडे पाहे पांडुरंग ॥ध्रु.॥ चातक हा पक्षी नेघे भूमिजळ । त्यासाटीं घननीळ नित्य वर्षे ॥२॥ तुका म्हणे आम्ही पिप्पलिकांची जात । पुरवीं मनोरथ पांडुरंगा ॥३॥
2749
पटे ढाळूं आम्ही विष्णुदास जगीं । लागों नेदूं अंगीं पापपुण्य ॥१॥ निर्भर अंतरीं सदा सर्वकाळ । घेतला सकळ भार देवें ॥ध्रु.॥ बळिवंत जेणें रचिलें सकळ । आम्हां त्याचें बळ अंकितांसी ॥२॥ तुका म्हणे आम्ही देखत चि नाहीं । देवाविण कांहीं दुसरें तें ॥३॥
2750
पडतां जड भारी । दासीं आठवावा हरी ॥१॥ मग तो होऊं नेदी सीण । आड घाली सुदर्शन ॥ध्रु.॥ नामाच्या चिंतनें । बारा वाटा पळती विघ्नें ॥२॥ तुका म्हणे प्राण । करा देवासी अर्पण ॥३॥
2751
पडली घोर रजनी । संगी कोणी नसे चि ॥१॥ पहा हो कैसें चालविलें । पिसें गोवलें लावूनि ॥ध्रु.॥ कोठें लपविलें तें अंग । होता संग दिला तो ॥ ।२॥ मज कधीं नव्हतें ठावें । दोही भावें वाटोळें ॥३॥ तुका म्हणे कैंची उरी । दोहीपरि नाडिलें ॥४॥
2752
पडियेलों वनीं थोर चिंतवनी । उसीर कां आझूनि लावियेला ॥१॥ येई गा विठ्ठला येईगा विठ्ठला । प्राण हा फुटला आळवितां ॥ध्रु.॥ काय तुज नाहीं लौकिकाची शंका । आपुल्या बाळका मोकलितां ॥२॥ तुका म्हणे बहु खंती वाटे जीवा । धरियेलें देवा दुरी दिसे ॥३॥
2753
पडिला प्रसंग कां मी ऐसा नेणें । संकल्प ते मनें जिरवले ॥१॥ चेष्टाविलें तरी सांगावें कारणे । भक्ती ते उजेवन करावया ॥ध्रु.॥ लावूनियां दृिष्ट घेतली सामोरी । बैसलें जिव्हारीं डसोन तें ॥२॥ तुका म्हणे जीवा लाविला तो चाळा । करावें गोपाळा शीघ्र दान ॥३॥
2754
पडिलिया ताळा । मग अवघा चि निर्वाळा । तेथें कोणी बळा । नाहीं येत कोणासी ॥१॥ जोडिलें तें लागें हातीं । आपआपली निश्चिंती । हर्ष आणि खंती । तेथें दोनी नासलीं ॥ध्रु.॥ सहज सरलिया कारणें । मग एकला आपण । दिसे तरी भिन्न । वचनाचा प्रसंग ॥२॥ करूनि झाडा पाडा । तुका वेगळा लिगाडा । निश्चिंतीच्या गोडा । गोष्टी म्हुण लागती ॥३॥
2755
पडिली भुली धांवतें सैराट । छंद गोविंदाचा चोजवितें वाट । मागें सांडोनि सकळ बोभाट । वंदीं पदांबुजें ठेवुनि ललाट वो ॥१॥ कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी । होतें वहिलें लपाला आतां खांदीं । कोठें आड आली हे देहबुद्धी । धांवा आळवीं करुणा कृपानिधी वो ॥ध्रु.॥ मागें बहुतांचा अंतरला संग । मुळें जयाचिया तेणें केला त्याग । पहिलें पाहातां तें हरपलें अंग । खुंटली वाट नाहींसें जालें जग वो ॥२॥ शोकें वियोग घडला सकळांचा । गेल्या शरण हा अन्याय आमुचा । केला उच्चार रे घडल्या दोषांचा । जाला प्रगट स्वामी तुकयाचा वो ॥३॥
2756
पडिली हे रूढि जगा परिचार । चालविती वेव्हार सत्य म्हूण ॥१॥ मरणाची कां रे नाहीं आठवण । संचिताचा धन लोभ हेवा ॥ध्रु.॥ देहाचें भय तें काळाचें भातुकें । ग्रासूनि तें एकें ठेविलेंसे ॥२॥ तुका म्हणे कांहीं उघडा रे डोळे । जाणोनि अंधळे होऊं नका ॥३॥
2757
पडिलों बाहेरि आपल्या कर्तव्यें । संसाराचा जीवें वीट आला ॥१॥ एकामध्यें एक नाहीं मिळे येत । ताक नवनीत निडळिया ॥ध्रु.॥ दोनी जालीं नांवें एकाच्या मथनें । भुस सार गुणें वेगळालीं ॥२॥ तुका म्हणे कोठें वसे मुक्ताफळ । सिंपल्याचें स्थळ खंडलिया ॥३॥
2758
पडिलों भोवणीं । होतों बहु चिंतवणी ॥१॥ होतों चुकलों मारग । लाहो केला लाग वेगें ॥ध्रु.॥ इंद्रियांचे संदी । होतों सांपडलों बंदीं ॥२॥ तुका म्हणे बरें जालें । विठ्ठलसें वाचे आलें ॥३॥
2759
पडोनियां राहीं । उगा च संतांचिये पायीं ॥१॥ न लगे पुसणें सांगावें । चत्ति शुद्ध करीं भावें ॥ध्रु.॥ सहज ते स्थिति । उपदेश परयुक्ति ॥२॥ तुका म्हणे भाव । जवळी धरूनि आणी देव ॥३॥
2760
पढियंतें आम्ही तुजपाशीं मागावें । जीवींचें सांगावें हितगुज ॥१॥ पाळसील लळे दीन वो वत्सले । विठ्ठले कृपाळे जननिये ॥ध्रु.॥ जीव भाव तुझ्या ठेवियेला पायीं । तूं चि सर्वा ठायीं एक आम्हां ॥२॥ दुजियाचा संग लागों नेदीं वारा । नाहीं जात घरा आणिकांच्या ॥३॥ सर्वसत्ता एकी आहे तुजपाशीं । ठावें आहे देसी मागेन तें ॥४॥ म्हणउनि पुढें मांडियेली आळी । थिंकोनियां चोळी डोळे तुका ॥५॥
2761
पढीयंतें मागा पांडुरंगापाशीं । मज दुर्बळासी काय पीडा ॥१॥ या चि साटीं दुराविला संवसार । वाढे हे अपार माया तृष्णा ॥ध्रु.॥ कांहीं करितां कोठें नव्हें समाधान । विचारितां पुण्य तें चि पाप ॥२॥ तुका म्हणे आतां निश्चळि चि भलें । तुज आठविलें पांडुरंगा ॥३॥
2762
पतनासि जे नेती । तिचा खोटा स्नेह प्रीती ॥१॥ विधीपुरतें कारण । बहु वारावें वचन ॥ध्रु.॥ सर्वस्वासि नाडी । ऐसी लाघवाची बेडी ॥२॥ तुका म्हणे दुरी । राखतां हे तों ची बरी ॥३॥
2763
पतित पतित । परी मी त्रिवाचा पतित ॥१॥ परी तूं आपुलिया सत्ता । मज करावें सरता ॥ध्रु.॥ नाहीं चित्तशुद्धि । स्थिर पायांपाशीं बुद्धि ॥२॥ अपराधाचा केलों । तुका म्हणे किती बोलों ॥३॥
2764
पतित मी पापी शरण आलों तुज । राखें माझी लाज पांडुरंगा ॥१॥ तारियेले भक्त न कळे तुझा अंत । थोर मी पतित पांडुरंगा ॥ध्रु.॥ द्रौपदी बहिणी वैरीं गांजियेली । आपणाऐसी केली पांडुरंगा ॥२॥ प्रल्हादाकारणें स्तंभीं अवतार । माझा कां विसर पांडुरंगा ॥३॥ सुदामा ब्राम्हण दारिद्रे पीडिला । आपणाऐसा केला पांडुरंगा ॥४॥ तुका म्हणे तुज शरण निजभावें । पाप निदाऩळावें पांडुरंगा ॥५॥
2765
पतितपावना । दिनानाथा नारायणा ॥१॥ तुझें रूप माझे मनीं । राहो नाम जपो वाणी ॥ध्रु.॥ ब्रम्हांडनायका । भक्तजनाच्या पाळका ॥२॥ जीवांचिया जीवा । तुका म्हणे देवदेवा ॥३॥
2766
पतितमिरासी । ते म्यां धरिला जीवेंसी ॥१॥ आतां बळिया सांग कोण । ग्वाही तुझें माझें मन ॥ध्रु.॥ पावणांचा ठसा । दावीं मज तुझा कैसा ॥२॥ वाव तुका म्हणे जालें । रोख पाहिजे दाविलें ॥३॥
2767
पतिव्रता ऐसी जगामध्यें मात । भोगी पांच सात अंधारीं ते ॥१॥ भ्रतारासी लेखी श्वानाचे समान । परपुरुषीं जाण संभ्रम तो ॥२॥ तुका म्हणे तिच्या दोषा नाहीं पार । भोगील अघोर कुंभपाक ॥३॥
2768
पतिव्रता नेणे आणिकांची स्तुती । सर्वभावें पति ध्यानीं मनीं ॥१॥ तैसें माझें मन एकविध जालें । नावडे विठ्ठलेंविण दुजें ॥ध्रु.॥ सूर्यविकासिनी नेघे चंद्रकळा । गाय ते कोकिळावसंतेंसी ॥२॥ तुका म्हणे बाळ मातेपुढें नाचे । बोल आणिकांचे नावडती ॥३॥
2769
पतिव्रते आनंद मनीं । सिंदळ खोंचे व्यभिचारवचनीं ॥१॥ जळो वर्म लागो आगी । शुद्धपण भलें जगीं ॥ध्रु.॥ सुख पुराणीं आचारशीळा । दुःख वाटे अनर्गळा ॥२॥ शूरा उल्हास अंगीं । गांढव्या मरण ते प्रसंगीं ॥३॥ शुद्ध सोनें उजळे अगी । हीन काळें धांवे रंगीं ॥४॥ तुका म्हणे तो चि हिरा । घनघायें निवडे पुरा ॥५॥
2770
पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण । आम्हां नारायण तैशापरी ॥१॥ सर्वभावें लोभ्या आवडे हें धन । आम्हां नारायण तैशापरी ॥२॥ तुका म्हणे एकविध जालें मन । विठ्ठला वांचून नेणे दुजें ॥३॥
2771
पतिव्रतेची कीर्ती वाखाणितां । सिंदळईंच्या माथां तिडिक उठे ॥२॥ आमुचें तें आहे सहज बोलणें । नाहीं विचारून केलें कोणीं ॥ध्रु.॥ अंगें उणें त्याच्या बैसे टाळक्यांत । तेणें ठिणग्या बहुत गाळीतसे ॥२॥ तुका म्हणे आम्ही काय करणें त्यासी । ढका खवंदासी लागतसे ॥३॥
2772
पत्र उचटिलें प्रेत्नें । ग्वाही कराया कारणें । नाहींतरी पुण्यें । तुझ्या काय उणें आम्हां ॥१॥ नांव तुझें चि करोनि । आहों सुखें पोट भरोनि । केली जाणवणी । म्हणउनि नाहीं म्हणसील ॥ध्रु.॥ आतां इतकियाउपरी । दे नको भलतें करीं । म्हणती ॠणकरी । आमुचा इतकें उदंड ॥२॥ तुकयाबंधु जागा । अळवावया पांडुरंगा । केला कांहीं मागायाची । नव्हती गरज ॥३॥
2773
पदोपदीं दिलें अंग । जालें सांग कारण ॥१॥ रुधवूनि ठेलों ठाव । जगा वाव सकळ ॥ध्रु.॥ पुढती चाली मनालाहो । वाढे देहो संतोष ॥२॥ तुका म्हणे क्षरभागीं । जालों जगीं व्यापक ॥३॥
2774
पदोपदीं पायां पडणें । करुणा जाण भाकावी ॥१॥ ये गा ये गा विसांवया । करुणा दयासागरा ॥ध्रु.॥ जोडोनियां करकमळ । नेत्र जळ भरोनि ॥२॥ तुका उभें दारीं पात्र । पुरवीं आर्त विठोबा ॥३॥
2775
पय दधि घृत आणि नवनीत । तैसें दृश्यजात एकपणें ॥१॥ कनकाचे पाहीं अलंकार केले । कनकत्वा आले एकपणें ॥ध्रु.॥ मृत्तिकेचे घट जाले नानापरी । मृत्तिका अवधारीं एकपणें ॥२॥ तुका म्हणे एक एक ते अनेक । अनेकत्वीं एक एकपणा ॥३॥
2776
परउपकारें कायावाचामन । वेचे सुदर्शन रक्षी तया ॥१॥ याजसाटीं असें योजिलें श्रीपति । संकल्पाचे हातीं सर्व जोडा ॥ध्रु.॥ परपीडे ज्याची जिव्हा मुंडताळे । यमदूत डाळे करिती पूजा ॥२॥ तुका म्हणे अंबॠषी दुर्योधना । काय झालें नेणां दुर्वासया ॥३॥
2777
परतें मी आहें सहज चि दुरी । वेगळें भिकारी नामरूपा ॥१॥ न लगे रुसावें धरावा संकोच । सहज तें नीच आलें भागा ॥ध्रु.॥ पडिलिये ठायीं उच्छिष्ट सेवावें । आरते तें चि देवें केलें ऐसें ॥२॥ तुका म्हणे तुम्ही आम्हां जी वेगळे । केलेती निराळे द्विज देवें ॥३॥
2778
परद्रव्य परकांता । नातळे जयाचिया चित्त । आणि कर्मी तो तत्वता । बांधला न वजाय ॥१॥ ऐसा अनुभव रोकडा । विश्वासीतो जीवा जोडा । एकांत त्या पुढां । अवघा करी उकल ॥ध्रु.॥ सकट आंबलें तें अन्न । शोधीं तें चि मद्यपान । विषमानें भिन्न । केलें शुद्धाशुद्ध ॥२॥ तुका म्हणे नित । बरवें अनुभवें उचित । तरी काय हित । मोलें घ्यावें लागतें ॥३॥
2779
परद्रव्य परनारी । अभिळासूनि नाक धरी ॥१॥ जळो तयाचा आचार । व्यर्थ भार वाहे खर ॥ध्रु.॥ सोहोर्‍याची स्थिती । क्रोधें विटाळला चित्ती ॥२॥ तुका म्हणे सोंग । दावी बाहेरील रंग ॥३॥
2780
परद्रव्यपरनारीचा अभिळास । तेथूनि हारास सर्वभाग्या ॥१॥ घटिका दिवस मास वरुषें लागेतीन । बांधलें पतन गांठोडीस ॥ध्रु.॥ पुढें घात त्याचा रोकडा शकुन । पुढें करी गुण निश्चयेंसी ॥२॥ तुका म्हणे एकां तडतांथवड । काळ लागे नाड परी खरा ॥३॥
2781
परपीडक तो आम्हां दावेदार । विश्वीं विश्वंभर म्हणऊनि ॥१॥ दंडूं त्यागूं बळें नावलोकुं डोळा । राखूं तो चांडाळा ऐसा दुरि ॥ध्रु.॥ अनाचार कांहीं न साहे अवगुणें । बहु होय मन कासावीस ॥२॥ तुका म्हणे माझी एकविध सेवा । विमुख ते देवा वाळी चित्ते ॥३॥
2782
परपुरुषाचें सुख भोगे तरी । उतरोनि करीं घ्यावें सीस ॥१॥ संवसारा आगी आपुलेनि हातें । लावूनि मागुतें पाहूं नये ॥२॥ तुका म्हणे व्हावें तयापरी धीट । पतंग हा नीट दीपासोई ॥३॥
2783
परमानंदा परमपुरुषोत्तमरामा । अच्युता अनंता हरि मेघश्यामा । अविनाशा अलक्षा परता परब्रम्हा । अकळकळा कमळापती न कळे महिमा ॥१॥ जय देव जय देव जया जी श्रीपती । मंगळशुभदायका करीन आरती ॥ध्रु.॥ गोविंदा गोपाळा गोकुळरक्षणा । गिरिधरकर भवसागरतारक दधिमथना । मधुसूदन मुनिजीवन धरणीश्रमहरणा । दीनवत्सळ सकळां मूळ जय जयनिधाना ॥२॥ विश्वंभरा सर्वेश्वर जगदाधारा । चक्रधर करुणाकर पावन गजेंद्रा । सुखसागर गुणआगर मुगुटमणी शूरा । कल्याणकैवल्यमूर्ति मनोहरा ॥३॥ गरुडासना शेषशयना नरहरी । नारायणा ध्याना सुरहरवरगौरी । नंदा नंदनवंदन त्रिभुवनांभीतरी । अनंतनामीं ठसा अवतारांवरी ॥४॥ सगुणनिर्गुणसाक्ष श्रीमंत संतां । भगवाना भगवंता कालकृदांता । उत्पत्तिपाळणपासुन संहारणसत्ता । शरण तुकयाबंधु तारीं रिति बहुतां ॥५॥
2784
परमार्थी तो न म्हणावा आपुला । सलगी धाकुला हेळूं नये ॥१॥ थोडा चि स्फुलिंग बहुत दावाग्नी । वाढतां इंधनीं वाढविला ॥ध्रु.॥ पितियानें तैसा वंदावा कुमर । जयाचें अंतर देवें वसे ॥२॥ तुका म्हणे शिरीं वाहावें खापर । माजी असे सार नवनीत ॥३॥
2785
परमेष्ठिपदा । तुच्छ करिती सर्वदा ॥१॥ हें चि ज्यांचें धन । सदा हरीचें स्मरण ॥ध्रु.॥ इंद्रपदादिक भोग । भोग नव्हे तो भवरोग ॥२॥ सार्वभौमराज्य । त्यांसि कांहीं नाहीं काज ॥३॥ पाताळींचें आधिपत्य । ते तों मानिती विपत्य ॥४॥ योगसिद्धिसार । ज्यासि वाटे तें असार ॥५॥ मोक्षायेवढें सुख । सुख नव्हे चि तें दुःख ॥६॥ तुका म्हणे हरीविण । त्यासि अवघा वाटे सिण ॥७॥
2786
परस्त्रीतें म्हणतां माता । चत्ति लाजवितें चित्ती ॥१॥ काय बोलोनियां तोंडें । मनामाजी कानकोंडें ॥ध्रु.॥ धर्मधारष्टिगोष्टी सांगे । उष्ट्या हाते नुडवी काग ॥२॥ जें जें कर्म वसे अंगीं । तें तें आठवे प्रसंगीं ॥३॥ बोले तैसा चाले । तुका म्हणे तो अमोल ॥४॥
2787
पराधीन माझें करूनियां जीणें । सांडीं काय गुणें केली देवा ॥१॥ उदार हे कीर्ति असे जगामाजी । कां तें ऐसें आजि पालटिलें ॥ध्रु.॥ आळवितों परी न पुरे चि रीग । उचित तो त्याग नाहीं तुम्हां ॥२॥ तुका म्हणे कां बा मुळीं च व्यालासी । ऐसें कां नेणसी पांडुरंगा ॥३॥
2788
पराविया नारी माउलीसमान । मानिलिया धन काय वेचे ॥१॥ न करितां परनिंदा द्रव्य अभिलाष । काय तुमचें यास वेचे सांगा ॥ध्रु.॥ बैसलिये ठायी म्हणतां रामराम । काय होय श्रम ऐसें सांगा ॥२॥ संताचे वचनीं मानितां विश्वास । काय तुमचें यास वेचे सांगा ॥३॥ खरें बोलतां कोण लागती सायास । काय वेचे यास ऐसें सांगा ॥४॥ तुका म्हणे देव जोडे याचसाटीं । आणीक ते आटी न लगे कांहीं ॥५॥
2789
पराविया नारी रखुमाईसमान । हें गेलें नेमून ठायींचें चि ॥१॥ जाई वो तूं माते न करीं सायास । आम्ही विष्णुदास नव्हों तैसे ॥ध्रु.॥ न साहावें मज तुझें हें पतन । नको हें वचन दुष्ट वदों ॥२॥ तुका म्हणे तुज पाहिजे भ्रतार । तरी काय नर थोडे जाले ॥३॥
2790
परि आतां माझी परिसावी विनंती । रखुमाईच्या पती पांडुरंगा ॥१॥ चुकलिया बाळा न मारावें जीवें । हित तें करावें मायबापीं ॥२॥ तुका म्हणे तुझा म्हणताती मज । आतां आहे लाज हे चि तुम्हां ॥३॥
2791
परि तो आहे कृपेचा सागर । तोंवरी अंतर पडों नेदी ॥१॥ बहुकानदृष्टी आइके देखणा । पुरोनियां जना उरलासे ॥ध्रु.॥ सांगितल्याविणें जाणे अंतरिंचें । पुरवावें ज्याचें तैसें कोड ॥२॥ बहुमुखें कीर्ती आइकिली कानीं । विश्वास ही मनीं आहे माझा ॥३॥ तुका म्हणे नाहीं जात वांयांविण । पाळितो वचन बोलिलों तें ॥४॥
2792
परिमळ म्हणूनी चोळूं नये फूल । खाऊं नये मूल आवडतें ॥१॥ मोतियाचें पाणी चाखूं नये स्वाद । यंत्र भेदुनि नाद पाहूं नये ॥२॥ कर्मफळ म्हणुनी इच्छूं नये काम । तुका म्हणे वर्म दावूं लोकां ॥३॥
2793
परिमळें काष्ठ ताजवां तुळविलें । आणीक नांवांचीं थोडीं । एक तें कातिवें उभविलीं ढवळारें एकाचिया कुड मेडी । एक दीनरूप आणिती मेळिया । एक ते बांधोनि माड । अवघियां बाजार एक चि जाला । मांविकलीं आपुल्या पाडीं ॥१॥ गुण तो सार रूपमध्यकार । अवगुण तो फार पीडीतसे ॥ध्रु.॥ एक गुणें आगळे असती । अमोल्य नांवांचे खडे । एक समर्थ दुर्बळा घरीं । फार मोलाचे थोडे । एक झगमग करिती वाळवंटीं । कोणी न पाहाती तयांकडे । सभाग्य संपन्न आपुलाले घरीं । मायेक दैन्य बापुडें ॥२॥ एक मानें रूपें सारिख्या असती । अनेकप्रकार याती । ज्याचिया संचितें जैसें आलें पुढें । तयाची तैसी च गति । एक उंचपदीं बैसउनि सुखें । दास्य करवी एका हातीं तुका म्हणे कां मानिती सुख । चुकलिया वांयां खंती ॥३॥
2794
परिस काय धातु । फेडितो निभ्रांतु लोहपांगु ॥१॥ काय तयाहूनि जालासी बापुडें । फेडितां सांकडें माझे एक ॥ध्रु.॥ कल्तपरु कोड पुरवितो रोकडा । चिंतामणि खडा चिंतिलें तें ॥२॥ चंदनांच्या वासें वसतां चंदन । होती काष्ठ आन वृक्षयाती ॥३॥ काय त्याचें उणें जालें त्यासी देतां । विचारीं अनंता तुका म्हणे ॥४॥
2795
परिसाचे अंगें सोनें जाला वळिा । वाकणें या कळा हीन नेव्हे ॥१॥ अंतरीं पालट घडला कारण । मग समाधान तें चि गोड ॥ध्रु.॥ पिकली सेंद पूर्वकर्मा नये । अव्हेरु तो काय घडे मग ॥२॥ तुका म्हणे आणा पंगती सुरण । पृथक ते गुण केले पाकें ॥३॥
2796
परिसें गे सुनेबाई । नको वेचूं दूध दहीं ॥१॥ आवा चालिली पंढरपुरा । वेसीपासुनि आली घरा ॥ध्रु.॥ ऐकें गोष्टी सादर बाळे । करीं जतन फुटकें पाळें ॥२॥ माझे हातींचा कलवडू । मजवाचुंनि नको फोडूं ॥३॥ वळवटिक्षरीचें लिंपन । नको फोडूं मजवांचून ॥४॥ उखळ मुसळ जातें । माझें मन गुंतलें तेथें ॥५॥ भिक्षुक आल्या घरा । सांग गेली पंढरपुरा ॥६॥ भक्षीं मपित आहारु । नको फारसी वरो सारूं ॥७॥ सून म्हणे बहुत निकें । तुम्ही यात्रेसि जावें सुखें ॥८॥ सासूबाई स्वहित जोडा । सर्व मागील आशा सोडा ॥९॥ सुनमुखीचें वचन कानीं । ऐकोनि सासू विवंची मनीं ॥१०॥ सवतीचे चाळे खोटे । म्यां जावेंसें इला वाटे ॥११॥ अतां कासया यात्रे जाऊं । काय जाउनि तेथें पाहूं॥ १२॥ मुलें लेंकरें घर दार । माझें येथें चि पंढरपूर ॥१३॥ तुका म्हणे ऐसें जन । गोवियेलें मायेंकरून ॥१४॥
2797
परिसें वो माते माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥ भागीरथी महादोष निवारणी । सकळां स्वामिणी तीर्थांचिये ॥ध्रु.॥ जीतां भुक्ति मोक्ष मरणें तुझ्या तिरीं । अहिक्यपरत्री सुखरूप ॥२॥ तुका विष्णुदास संतांचें पोसनें । वागपुष्प तेणें पाठविलें ॥३॥
2798
परिसोनि उत्तर । जाब देईंजे सत्वर ॥१॥ जरी तूं होसी कृपावंत । तरि हा बोलावीं पतित ॥ध्रु.॥ नाणीं कांहीं मना । करूनि पापाचा उगाणा ॥२॥ तुका म्हणे नाहीं । काय शक्ति तुझे पायीं ॥३॥
2799
पर्वकाळीं धर्म न करी नासरी । खर्ची राजद्वारीं द्रव्यरासी ॥१॥ सोइर्‍याची करी पाहुणेर बरा । कांडवी ठोंबरा संतांलागीं ॥ध्रु.॥ बाइलेचीं सर्व आवडीनें पोसी । मातापितरांसी दवडोनी ॥२॥ श्राद्धीं कष्टी होय सांगतां ब्राम्हण । गोवार मागून सावडीतो ॥३॥ नेतो पानें फुलें वेश्येला उदंड । ब्राम्हणासी खांड नेदी एक ॥४॥ हातें मोर्‍या शोधी कष्ट करी नाना । देवाच्या पूजना कांटाळतो ॥५॥ सारा वेळ धंदा करितां श्रमेना । साधूच्या दर्शना जातां कुंथे ॥६॥ हरिच्या कीर्तनीं गुंगायासि लागे । येरवीं तो जागे उगला चि ॥७॥ पुराणीं बैसतां नाहीं रिकामटी । खेळतो सोंगटी अहोरात्रीं ॥८॥ देवाच्या विभुती न पाहे सर्वथा । करी पानवथा नेत्रभिक्षा ॥९॥ गाईंला देखोनी बदबदां मारी । घोड्याची चाकरी गोड लागे ॥१०॥ ब्राम्हणाचें तीर्थ घेतां त्रास मोटा । प्रेमें घेतो घोंटा घटघटां ॥११॥ तुका म्हणे ऐसे प्रपंचीं गुंतले । जन्मोनि मुकले विठोबासी ॥१२॥
2800
पळाले ते भ्याड । त्यांसि येथें जाला नाड ॥१॥ धीट घेती धणीवरी । शिंकीं उतरितो हरी ॥ध्रु.॥ आपुलिया मतीं । पडलीं विचारीं तीं रितीं ॥२॥ तुका लागे घ्यारे पायां । कैं पावाल या ठाया ॥३॥
2801
पवित्र तें अन्न । हरिचिंतनीं भोजन ॥१॥ येर वेठ्या पोट भरी । चाम मसकाचे परी ॥ध्रु.॥ जेऊनि तो धाला । हरिचिंतनीं केला काला ॥२॥ तुका म्हणे चवी आलें । जें कां मिश्रित विठ्ठलें ॥३॥
2802
पवित्र तें कुळ पावन तो देश । जेथें हरिचे दास घेती जन्म ॥१॥ कर्मधर्म त्याचे जाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु.॥ वर्णअभिमानें कोण जाले पावन । ऐसें द्या सांगून मजपाशीं ॥३॥ अंत्यजादि योनि तरल्या हरिभजनें । तयाचीं पुराणें भाट जालीं ॥३॥ वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार । धागा हा चांभार रोहिदास ॥४॥ कबीर मोमीन लतिब मुसलमान । शेणा न्हावी जाण विष्णुदास ॥५॥ काणोपात्र खोदु पिंजारी तो दादु । भजनीं अभेदू हरिचे पायीं ॥६॥ चोखामेळा बंका जातीचा माहार । त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी ॥७॥ नामयाची जनी कोण तिचा भाव । जेवी पंढरीराव तियेसवें ॥८॥ मैराळा जनक कोण कुळ त्याचें । महिमान तयाचें काय सांगों ॥९॥ यातायातीधर्म नाहीं विष्णुदासा । निर्णय हा ऐसा वेदशास्त्रीं ॥१०॥ तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ । तारिले पतित नेणों किती ॥११॥
2803
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत । जो वदे अच्युत सर्व काळ ॥१॥ तयाच्या चिंतनें तरतील दोषी । जळतील रासी पातकाच्या ॥ध्रु.॥ देव इच्छी रज चरणींची माती । धांवत चालती मागें मागें ॥२॥ काय त्यां उरलें वेगळें आणीक । वैकुंठनायक जयां कंठीं ॥३॥ तुका म्हणे देवभक्तांचा संगम । तेथें ओघ नाम त्रिवेणीचा ॥४॥
2804
पवित्र व्हावया घालीन लोळणी । ठेवीन चरणीं मस्तक हें ॥१॥ जोडोनि हस्तक करीन विनवणी । घेइन पायवणी धोवोनियां ॥२॥ तुका म्हणे माझें भांडवल सुचें । संतां हें ठायींचें ठावें आहे ॥३॥ पत्राचे अभंग समाप्त । ३६ । १९ । ११ ॥ ६६॥
2805
पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा । सांपडला तो साधा आजि मुहूर्त बरा । गर्जा जेजेकार हरि हृदयीं धरा । आळस नका करूं लाहानां सांगतों थोरां ॥१॥ या हो या हो बाइयानो निघाले हरी । सिलंगणा वेगीं घेउनि आरत्या करीं । ओवाळूं श्रीमुख वंदूं पाउलें शिरीं । आम्हां दैव आलें येथें घरिच्या घरीं ॥ध्रु.॥ अक्षय मुहूर्त औठामध्यें साधे तें । मग येरी गर्जे जैसें तैसें होत जातें । म्हणोनि मागें पुढें कोणी न पाहावें येथें । सांडा परतें काम जाऊं हरी सांगातें ॥२॥ बहुतां बहुतां रीतीं चित्तीं धरा हें मनीं । नका गै करूं आइकाल ज्या कानीं । मग हें सुख कधीं न देखाल स्वप्नीं । उरेल हायहाय मागें होईल काहाणी ॥३॥ ऐसियास वंचती त्यांच्या अभाग्या पार । नाहीं नाहीं नाहीं सत्य जाणा निर्धार । मग हे वेळ घटिका न ये अजरामर । कळलें असों द्या मग पडतील विचार ॥४॥ जयासाटीं ब्रम्हादिक जालेति पिसे । उच्छिष्टा कारणें देव जळीं जाले मासे । अद्धापगीं विश्वमाता लक्षुमी वसे । तो हा तुकयाबंधु म्हणे आलें अनायासें ॥५॥
2806
पवित्र सोंवळीं । एक तीं च भूमंडळीं ॥१॥ ज्यांचा आवडता देव । अखंडित प्रेमभाव ॥ध्रु.॥ तीं च भाग्यवंतें । सरतीं पुरतीं धनवित्तें ॥२॥ तुका म्हणे देवा । त्यांची केल्या पावे सेवा ॥३॥
2807
पवित्र होईंन चरित्रउच्चारें । रूपाच्या आधारें गोजिरिया ॥१॥ आपुरती बुद्धी पुण्य नाहीं गांठी । पायीं घालीं मिठी पाहें डोळां ॥ध्रु.॥ गाईंन ओविया शिष्टांच्या आधारें । सारीन विचारें आयुष्या या ॥२॥ तुका म्हणे तुझें नाम नारायणा । ठेवीन मी मना आपुलिया ॥३॥
2808
पशु ऐसे होती ज्ञानी । चर्वणीं या विषयांचे ॥१॥ ठेवूनियां लोभीं लोभ । जाला क्षोभ आत्मत्वीं ॥ध्रु.॥ केला आणिकां वाढी पाक । खाणें ताक मूर्खासी ॥२॥ तुका म्हणे मोठा घात । वाताहात हा देह ॥३॥
2809
पसरूनि राहिलों बाहो । सोयी अहो तुमचिये ॥१॥ आतां यावें लागवेगें । पांडुरंगे धांवत ॥ध्रु.॥ बैसायाची इच्छा कडे । चाली खडे रुपताती ॥२॥ तुका म्हणे कृपाळुवा । करीन सेवा लागली ॥३॥
2810
पसरोनि मुखें । कैसे धालों बा हारीखें ॥१॥ ब्रम्हादिका दुर्लभ वांटा । आम्हां फावला राणटां ॥ध्रु.॥ गोड लागे काय तरि। कृपावंत जाला हरि ॥२॥ उडती थेंबुटें । अमृताहुनि गोमटें ॥३॥ गोडाहुनि गोड । जिव्हा नाचे वाटे कोड ॥४॥ खुणावुनि तुका । दावी वर्म बोलों नका ॥५॥
2811
पहा ते पांडव अखंड वनवासी । परि त्या देवासी आठविती ॥१॥ प्रल्हादासी पिता करितो जाचणी । परि तो स्मरे मनीं नारायण ॥ध्रु.॥ सुदामा ब्राम्हण दरिद्रे पीडिला । नाहीं विसरला पांडुरंग ॥२॥ तुका म्हणे तुझा न पडावा विसर । दुःखाचे डोंगर जाले तरी ॥३॥
2812
पहावया तुझा जरि बोलें अंत । तरि माझे जात डोळे देवा ॥१॥ स्तंबीं तुज नाहीं घातलें प्रल्हादें । आपुल्या आनंदें अवतार ॥ध्रु.॥ भक्ताचिया काजा जालासी सगुण । तुज नाहीं गुण रूप नाम ॥२॥ ऐसा कोण देवा अधम यातीचा । निर्धार हा साचा नाहीं तुझा ॥३॥ तुका म्हणे बोले कवतुकें गोष्टी । नेदीं येऊं पोटीं राग देवा ॥४॥
2813
पहावा नयनीं विठ्ठल चि एक । कांहीं तरी सार्थक संसाराचें ॥१॥ कोठें पाहों तुज कां गा लपालासि । कांहीं बोल मशीं नारायणा ॥ध्रु.॥ वाटते उदास मज दाही दिशा । तुजविण हृषीकेशा वांचोनियां ॥२॥ नको ठेवूं मज आपणा वेगळें । बहुत कळवळें तुजलागीं ॥३॥ तुका म्हणे भेटी देई नारायणा । घडी कंठवेना तुजविण ॥४॥
2814
पहिली माझी ओवी ओवीन जगत्र । गाईंन पवित्र पांडुरंग ॥१॥ दुसरी माझी ओवी दुजें नाहीं कोठें । जनीं वनीं भेटे पांडुरंग ॥ध्रु.॥ तिसरी माझी ओवी तिळा नाहीं ठाव । अवघा चि देव जनीं वनीं ॥२॥ चवथी माझी ओवी वैरिलें दळण । गाईंन निधान पांडुरंग ॥३॥ पांचवी माझी ओवी ते माझिया माहेरा । गाईंन निरंतरा पांडुरंगा ॥४॥ साहावी माझी ओवी साहा ही आटले । गुरूमूर्त भेटले पांडुरंग ॥५॥ सातवी माझी ओवी आठवे वेळोवेळां । बैसलासे डोळां पांडुरंग ॥६॥ आठवी माझी ओवी आठावीस योग । उभा चंद्रभागे पांडुरंग ॥७॥ नववी माझी ओवी सरलें दळण । चुकलें मरण संसारीचें ॥८॥ दाहावी माझी ओवी दाहा अवतारा । न यावें संसारा तुका म्हणे ॥९॥
2815
पांगुळ जालों देवा नाहीं हात ना पाय । बैसलों जयावरी सैराट तें जाय । खेटितां कुंप कांटी । खुंट दरडी न पाहे । आधार नाहीं मज कोणी । बाप ना माये ॥१॥ दाते हो दान करा । जातें पंढरपुरा । न्या मज तेथवरी । अखमाचा सोयरा ॥ध्रु.॥ हिंडतां गव्हानें गा । शिणलों दारोदारीं । न मिळे चि दाता कोणी । जन्मदुःखातें वारी । कीर्ति हे संतां मुखीं । तो चि दाखवा हरी । पांगळां पाय देतो । नांदे पंढरपुरीं ॥२॥ या पोटाकारणें गा । जालों पांगीला जना । न सरे चि बापमाय । भीक नाहीं खंडणा । पुढारा म्हणती एक । तया नाहीं करुणा । श्वान हें लागे पाठीं । आशा बहु दारुणा ॥३॥ काय मी चुकलों गा । मागें नेणवे कांहीं । न कळे चि पाप पुण्य । तेथें आठव नाहीं । मी माजी भुललों गा । दीप पतंगासोयी । द्या मज जीवदान । संत महानुभाव कांहीं ॥४॥ दुरोनि आलों मी गा । दुःख जालें दारुण । यावया येथवरी होतें । हें चि कारण । दुर्लभ भेटी तुम्हां । पायीं जालें दरुषन । विनवितो तुका संतां । दोन्ही कर जोडून ॥५॥
2816
पांडुरंगा आतां ऐका हे विनंती । बहु माझे चित्तीं भय वाटे ॥१॥ नाहीं आइकिलें संतांचिया मुखें । तें या मज लोकें भडसाविलें ॥ध्रु.॥ विष्णुदासां गति नाहीं तरावया । म्हणती गेले वांयां कष्टत ही ॥२॥ धिक्कारिती मज करितां कीर्तन । काय सांगों शीण ते काळिचा ॥३॥ तुका म्हणे मज वाटतें उदास । काय करूं यास पांडुरंगा ॥४॥
2817
पांडुरंगा ऐसा सांडुनि वेव्हारा । आणिकांची करा आस वांयां ॥१॥ बहुतांसी दिला उद्धार उदारें । निवडीना खरें खोटें कांहीं ॥ध्रु.॥ याचिया अंकिता वैकुंठ बंदर । आणीक वेव्हार चालितना ॥२॥ तुका म्हणे माझे हातींचें वजन । यासी बोल कोण ठेवूं सके ॥३॥
2818
पांडुरंगा करूं प्रथम नमन । दुसरें चरणा संतांचिया ॥१॥ याच्या कृपादानें कथेचा विस्तार । बाबाजीसद्ग‍ुदास तुका ॥२॥ काय माझी वाणी मानेल संतांसी । रंजवूं चित्तासी आपुलिया ॥३॥ या मनासी लागो हरिनामाचा छंद । आवडी गोविंद गावयासी ॥४॥ सीण जाला मज संवसारसंभ्रमें । सीतळ या नामें जाली काया ॥५॥ या सुखा उपमा नाहीं द्यावयासी । आलें आकारासी निर्विकार ॥६॥ नित्य धांवे तेथें नामाचा गजर । घोष जयजयकार आइकतां ॥७॥ तांतडी ते काय हरिगुण गाय । आणीक उपाय दुःखमूळ ॥८॥ मूळ नरकाचें राज्यमदेंमाते । अंतरे बहुत देव दुरी ॥९॥ दुरी अंतरला नामनिंदकासी । जैसें गोंचिडासी क्षीर राहे ॥१०॥ हे वाट गोमटी वैकुंठासी जातां । रामकृष्णकथा दिंडी ध्वजा ॥११॥ जाणतयांनीं सांगितलें करा । अंतरासी वारा आडूनियां ॥१२॥ यांसी आहे ठावें परि अंध होती । विषयाची खंती वाटे जना ॥१३॥ नाहीं त्या सुटलीं द्रव्य लोभ माया । भस्म दंड छाया तरुवराची ॥१४॥ चत्ति ज्याचें पुत्रपत्नीबंधूवरी । सुटल हा परि कैसें जाणा ॥१५॥ जाणत नेणत करा हरिकथा । तराल सर्वथा भाक माझी ॥१६॥ माझी मज असे घडली प्रचित । नसेल पतित ऐसा कोणी ॥१७॥ कोणीं तरी कांहीं केलें आचरण । मज या कीर्तनेंविण नाहीं ॥१८॥ नाहीं भय भक्ता तराया पोटाचें । देवासी तयाचें करणें लागे ॥१९॥ लागे पाठोवाटी पाहे पायांकडे । पीतांबर खडे वाट सांडी ॥२०॥ डिंकोनियां कां रे राहिले हे लोक । हें चि कवतुक वाटे मज ॥२१॥ जयानें तारिले पाषाण सागरीं । तो ध्या रे अंतरीं स्वामी माझा ॥२२॥ माझिया जीवाची केली सोडवण । ऐसा नारायण कृपाळु हा ॥२३॥ हा चि माझा नेम हा चि माझा धर्म । नित्य वाचे नाम विठोबाचें ॥२४॥ चेतवला अग्नि तापत्रयज्वाळ । तो करी शितळ रामनाम ॥२५॥ मना धीर करीं दृढ चिता धरीं । तारील श्रीहरि मायबाप ॥२६॥ बाप हा कृपाळु भक्ता भाविकांसी । घरीं होय दासी कामारी त्या ॥२७॥ त्याचा भार माथां चालवी आपुला । जिहीं त्या दिधला सर्व भाव ॥२८॥ भावेंविण त्याची प्राप्ति । पुराणें बोलती ऐसी मात ॥२९॥ मात त्याची जया आवडे जीवासी । तया गर्भवासीं नाहीं येणें ॥३०॥ यावें गर्भवासीं तरी च विष्णुदासीं। उद्धार लोकांसी पूज्य होती ॥३१॥ होती आवडत जीवाचे ताइत । त्यां घडी अच्युत न विसंभे ॥३२॥ भेदाभेद नाहीं चिंता दुःख कांहीं । वैकुंठ त्या ठायीं सदा वसे ॥३३॥ वसे तेथें देव सदा सर्वकाळ । करिती निर्मळ नामघोष ॥३४॥ संपदा तयांची न सरे कल्पांतीं । मेळविला भक्ती देवलाभ ॥३५॥ लाभ तयां जाला संसारा येऊनी । भगवंत ॠणी भक्ती केला ॥३६॥ लागलेंसे पिसें काय मूढजनां । काय नारायणा विसरलीं ॥३७॥ विसरलीं तयां थोर जाली हाणी । पचविल्या खाणी चौर्‍यासी ॥३८॥ शिकविलें तरी नाहीं कोणा लाज । लागलीसे भाज धन गोड ॥३९॥ गोड एक आहे अविट गोविंद । आणीक तो छंद नासिवंत ॥४०॥ तळमळ त्याची कांहीं तरी करा । कां रे निदसुरा बुडावया ॥४१॥ या जनासी भय यमाचें नाहीं । सांडियेलीं तिहीं एकराज्यें ॥४२॥ जेणें अग्निमाजी घातलासे पाव । नेणता तो राव जनक होता ॥४३॥ तान भूक जिहीं साहिले आघात । तया पाय हात काय नाहीं ॥४४॥ नाहीं ऐसा तिहीं केला संवसार । दुःखाचे डोंगर तोडावया ॥४५॥ याच जन्में घडे देवाचें भजन । आणीक हें ज्ञान नाहीं कोठें ॥४६॥ कोठें पुढें नाहीं घ्यावया विसांवा । फिरोनि या गांवा आल्याविण ॥४७॥ विनवितां दिवस बहुत लागती । म्हणउनि चित्ती देव धरा ॥४८॥ धरा पाय तुम्ही संतांचे जीवासी । वियोग तयांसी देवा नाहीं ॥४९॥ नाहीं चाड देवा आणीक सुखाची । आवडी नामाची त्याच्या तया ॥५०॥ त्याची च उच्छष्टि बोलतों उत्तरें । सांगितलें खरें व्यासादिकीं ॥५१॥ व्यासें सांगितलें भक्ति हे विचार । भवसिंधु पार तरावया ॥५२॥ तरावया जना केलें भागवत । गोवळ गोपी क्त माता पिता ॥५३॥ तारुनियां खरे नेली एक्यासरें । निमित्ति उत्तरें रुसिया ॥५४॥ यासी वर्म ठावें भक्तां तरावया । जननी बाळ माया राख तान्हें ॥५५॥ तान्हेलें भुकेलें म्हणे वेळोवेळां । न मगतां लळा जाणोनियां ॥५६॥ जाणोनियां वर्म देठ लावियेला । द्रौपदीच्या बोलासवें धांवे ॥५७॥ धांवे सर्वता धेनु जैसी वत्सा । भक्तालागीं तैसा नारायण ॥५८॥ नारायण व्होवा हांव ज्याच्या जीवा । धन्य त्याच्या दैवा पार नाहीं ॥५९॥ पार नाहीं सुखा तें दिलें तयासी । अखंड वाचेसी रामनाम ॥६०॥ रामनाम दोनी उत्तम अक्षरें । भवानीशंकरें उपदेशिलीं ॥६१॥ उपदेश करी विश्वनाथ कानीं । वाराणसी प्राणी मध्यें मरे ॥६२॥ मरणाचे अंतीं राम म्हणे जरी । न लगे यमपुरी जावें तया ॥६३॥ तयासी उत्तम ठाव वैकुंठीं । वसे नाम चित्ती सर्वकाळ ॥६४॥ सर्वकाळ वसे वैष्णवांच्या घरीं । नसे क्षणभरी थिर कोठें ॥६५॥ कोठें नका पाहों करा हरिकथा । तेथें अवचिता सांपडेल ॥६६॥ सांपडे हा देव भाविकांचे हातीं । शाहाणे मरती तरी नाहीं ॥६७॥ नाहीं भलें भक्ती केलियावांचूनि। अहंता पापिणी नागवण ॥६८॥ नागवलों म्हणे देव मी आपणा । लाभ दिला जना ठकलों तो ॥६९॥ तो चि देव येर नव्हे ऐसें कांहीं । जनार्दन ठायीं चहूं खाणी ॥७०॥ खाणी भरूनियां राहिलासे आंत । बोलावया मात ठाव नाहीं ॥७१॥ ठाव नाहीं रिता कोणी देवाविण । ऐसी ते सज्जन संतवाणी ॥७२॥ वाणी बोलूनियां गेलीं एक पुढें । तयासी वांकुडें जातां ठक ॥७३॥ ठका नाहीं अर्थ ठाउका वेदांचा । होऊनि भेदाचा दास ठेला ॥७४॥ दास ठेला पोट अर्थ दंभासाटीं । म्हणउनि तुटी देवासवें ॥७५॥ सवें देव द्विजातीही दुराविला । आणिकांचा आला कोण पाड ॥७६॥ पाड करूनियां नागविलीं फार । पंडित वेव्हार खळवादी ॥७७॥ वादका निंदका देवाचें दरुशन । नव्हे जाला पूर्ण षडकर्मा ॥७८॥ षडकर्मा हीन रामनाम कंठीं । तयासवें भेटी सवें देवा ॥७९॥ देवासी आवड भाविक जो भोळा । शुद्ध त्या चांडाळा करुनि मानी ॥८०॥ मानियेल्या नाहीं विश्वास या बोला । नाम घेतां मला युक्ति थोडी ॥८१॥ युक्त थोडी मज दुर्बळाची वाचा । प्रताप नामाचा बोलावया ॥८२॥ बोलतां पांगल्या श्रुति नेति नेति । खुंटलिया युक्ति पुढें त्यांच्या ॥८३॥ पुढें पार त्याचा न कळे चि जातां । पाउलें देखतां ब्रम्हादिकां ॥८४॥ काय भक्तीपिसें लागलें देवासी । इच्छा ज्याची जैसी तैसा होय ॥८५॥ होय हा सगुण निर्गुण आवडी । भक्तिप्रिय गोडी फेडावया ॥८६॥ या बापासी बाळ बोले लाडें कोडें । करुनि वांकुडें मुख तैसें ॥८७॥ तैसें याचकाचें समाधान दाता । होय हा राखता सत्वकाळीं ॥८८॥ सत्वकाळीं कामा न येती आयुधें । बळ हा संबंध सैन्यलोक ॥८९॥ सैन्यलोक तया दाखवी प्रताप । लोटला हा कोप कोपावरी ॥९०॥ कोपा मरण नाहीं शांत होय त्यासी । प्रमाण भल्यासी सत्वगुणीं ॥९१॥ सत्वरजतमा आपण नासती । करितां हे भक्ति विठोबाची ॥९२॥ चित्त रंगलिया चैतन्य चि होय । तेथें उणें काय निजसुखा ॥९३॥ सुखाचा सागरु आहे विटेवरी । कृपादान करी तो चि एक ॥९४॥ एक चित्त धरूं विठोबाचे पायीं । तेथें उणें कांहीं एक आम्हां ॥९५॥ आम्हांसी विश्वास याचिया नामाचा । म्हणउनि वाचा घोष करूं ॥९६॥ करूं हरिकथा सुखाची समाधि । आणिकाची बुद्धी दुष्ट नास ॥९७॥ नासे संवसार लोकमोहो माया । शरण जा रे तया विठोबासी ॥९८॥ सिकविलें मज मूढा संतजनीं । दृढ या वचनीं राहिलोंसे ॥९९॥ राहिलोंसे दृढ विठोबाचे पायीं । तुका म्हणे कांहीं न लगे आंता ॥१००॥
2819
पांडुरंगा कांहीं आइकावी मात । न करावें मुक्त आतां मज ॥१॥ जन्मांतरें मज तैसीं देई देवा । जेणें चरणसेवा घडे तुझी ॥ध्रु.॥ वाखाणीन कीर्ती आपुलिया मुखें । नाचेन मी सुखें तुजपुढें ॥२॥ करूनि कामारी दास दीनाहुनी । आपुला अंगणीं ठाव मज ॥३॥ तुका म्हणे आम्ही मृत्युलोकीं भले । तुझे चि अंखिले पांडुरंगा ॥४॥
2820
पांडुरंगा कृपाळुवा दयावंता । धरिसील सत्ता सकळ ही ॥१॥ कां जी आम्हांवरी आणिकांची सत्ता । तुम्हासी असतां जवळिक ॥२॥ तुका म्हणे पायीं केलें निवेदन । उचित हें दान करीं आतां ॥३॥
2821
पांडुरंगा तुझे काय वाणूं गुण । पवाडे हे धन्य जगीं तुझे ॥१॥ दंडिलें दुर्वासा सुरा असुरानें । तो आला गार्‍हाणें सांगावया ॥ध्रु.॥ बळिचिये द्वारीं तुम्ही बैसलेती । दुर्वास विनंती करी भावें ॥२॥ तुका म्हणे कृपासागरा श्रीहरी । तुझी भक्तावरी प्रेमच्छाया ॥३॥
2822
पांडुरंगे पांडुरंगे । माझे गंगे माउलिये ॥१॥ पान्हां घाली प्रेमधारा । पूर क्षीरा लोटों दे ॥ध्रु.॥ अंगें अंग मेळउनी । करीं धणी फेडाया ॥२॥ तुका म्हणे घेइन उड्या । सांडिन कुड्या भावना ॥३॥
2823
पांडुरंगे पाहा खादलीसे रडी । परिणाम सेंडी धरिली आम्ही ॥१॥ आतां संतांनीं करावी पंचाईत । कोण हा फजितखोर येथें ॥ध्रु.॥ कोणाचा अन्याय येथें आहे स्वामी । गर्जतसों आम्ही पातकी ही ॥२॥ याचें पावनपण सोडवा चि तुम्ही । पतितपावन आम्ही आहों खरें ॥३॥ आम्ही तंव आहों अन्यायी सर्वथा । याची पावन कथा कैसी आहे ॥४॥ तुका म्हणे आम्ही मेलों तरी जाणा । परि तुमच्या चरणा न सोडावें ॥५॥
2824
पांडुरंगें सत्य केला अनुग्रह । निरसोनि संदेह बुद्धिभेद ॥१॥ जीवशिवा सेज रचिली आनंदें । औठावे पदीं आरोहण ॥२॥ निजीं निजरूपीं निजविला तुका । अनुहाते बाळका हलरु गाती ॥३॥
2825
पाइकपणें खरा मुशारा । पाईंक तो खरा पाइकीनें ॥१॥ पाईंक जाणें मारितें अंग । पाइकासी भंग नाहीं तया ॥ध्रु.॥ एके दोहीं घरीं घेतलें खाणें । पाईंक तो पणें निवडला ॥२॥ करूनि कारण स्वामी यश द्यावें । पाइका त्या नांव खरेपण ॥३॥ तुका म्हणे ठाव पाइकां निराळा । नाहीं स्वामी स्थळा गेल्याविण ॥४॥
2826
पाइकांनीं पंथ चालविल्या वाटा । पारख्याचा सांटा मोडोनियां ॥१॥ पारखिये ठायीं घेउनियां खाणें । आपलें तें जन राखियेलें ॥ध्रु.॥ आधारेंविण जें बोलतां चावळे । आपलें तें कळे नव्हे ऐसें ॥२॥ सांडितां मारग मारिती पाईंक । आणिकांसी शीक लागावया ॥३॥ तुका म्हणे विश्वा घेऊनि विश्वास । पाईंक तयास सुख देती ॥४॥
2827
पाइकीचें सुख पाइकासी ठावें । म्हणोनियां जीवें केली साटीं ॥१॥ येतां गोळ्या बाण साहिले भडमार । वर्षातां अपार वृष्टी वरी ॥ध्रु.॥ स्वामीपुढें व्हावें पडतां भांडण । मग त्या मंडन शोभा दावी ॥२॥ पाइकांनीं सुख भोगिलें अपार । शुद्ध आणि धीर अंतर्बाहीं ॥३॥ तुका म्हणे या सिद्धांताच्या खुणा । जाणे तो शाहाणा करी तो भोगी ॥४॥
2828
पाईंक जो जाणे पाइकींनीं भाव । लाग पगें ठाव चोरवाट ॥१॥ आपणां राखोनि ठकावें आणीक । घ्यावें सकळीक हरूनियां ॥ध्रु.॥ येऊं नेदी लाग लागों नेदी माग । पाईंक त्या जग स्वामी मानी ॥२॥ ऐसें जन केलें पाइकें पाईंक । जया कोणी भीक न घलिती ॥३॥ तुका म्हणे ऐसे जयाचे पाईंक । बिळया तो नाइक त्रैलोकींचा ॥४॥
2829
पाईंक तो प्रजा राखोनियां कुळ । पारखिया मूळ छेदी दुष्टा ॥१॥ तो एक पाईंक पाइकां नाईंक । भाव सकळीक स्वामिकाजीं ॥ध्रु.॥ तृणवत तनु सोनें ज्या पाषाण । पाइका त्या भिन्न नाहीं स्वामी ॥२॥ विश्वासावांचूनि पाइकासी मोल । नाहीं मिथ्या बोल बोलिलिया ॥३॥ तुका म्हणे नये स्वामी उणेपण । पाइका जतन करी त्यासी ॥४॥
2830
पाईंकपणें जोतिला सिद्धांत । सुर धरी मात वचन चित्तीं ॥१॥ पाइकावांचून नव्हे कधीं सुख । प्रजांमध्यें दुःख न सरे पीडा ॥ध्रु.॥ तरि व्हावें पाईंक जिवाचा उदार । सकळ त्यांचा भार स्वामी वाहे ॥२॥ पाइकीचें सुख जयां नाहीं ठावें । धिग त्यांनीं ज्यावें वांयांविण ॥३॥ तुका म्हणे एका क्षणांचा करार । पाईंक अपार सुख भोगी ॥४॥
2831
पाखांड्यांनीं पाठी पुरविला दुमाला । तेथें मी विठ्ठला काय बोलों ॥१॥ कांद्याचा खाणार चोजवी कस्तुरी । आपुलें भिकारी अर्थ नेणे ॥ध्रु.॥ न कळे तें मज पुसती छळूनी । लागतां चरणीं न सोडिती ॥२॥ तुझ्या पांयांविण दुजें नेणें कांहीं । तूं चि सर्वांठायीं एक मज ॥३॥ तुका म्हणे खीळ पडो त्यांच्या तोंडा । किती बोलों भांडां वादकांशीं ॥४॥
2832
पाचारितां धावे । ऐसी ठायींची हे सवे ॥१॥ बोले करुणा वचनीं । करी कृपा लावी स्तनीं ॥ध्रु.॥ जाणे कळवळा । भावसिद्धींचा जिव्हाळा ॥२॥ तुका म्हणे नाम । मागें मागें धांवे प्रेम॥३॥
2833
पाटीं पोटीं देव । कैचा हरिदासां भेव ॥१॥ करा आनंदें कीर्तन । नका आशंकितमन ॥ध्रु.॥ एथें कोठें काळ । करील देवापाशीं बळ ॥२॥ तुका म्हणे धनी । सपुरता काय वाणी ॥३॥
2834
पाठवणें पडणें पायां । उद्धार वांयां काशाचा ॥१॥ घडलें तें भेटीसवें । दिसेल बरवें सकळां ॥ध्रु.॥ न घडतां दृष्टादृष्टी । काय गोष्टी कोरड्या ॥२॥ अबोल्यानें असे तुका । अंतर ऐका साक्षीतें ॥३॥
2835
पाठवाल तेथें गर्जेन पवाडे । कार्या देहाकडे नावलोकीं ॥१॥ म्हणउनि मागें कंठींचा सौरस । पावतील नास विघ्नें पुढें ॥ध्रु.॥ कृपेच्या कटाक्षें निभें कळिकाळा । येतां येत बळाशक्तीपुढें ॥२॥ तुका म्हणे गुढी आणीन पायांपें । जगा होइल सोपें नाम तुझें ॥३॥
2836
पाठी लागे तया दवडीं दुरी । घालीं या बाहेरी संवसारा ॥१॥ येउनि दडें तुमच्या पायीं । धांवें तई छो म्हणा ॥ध्रु.॥ पारखियाचा वास पडे । खटबड उठी तें ॥२॥ तुका म्हणे लाविला धाक । नेदी ताक खाऊं कोणी ॥३॥
2837
पाठीलागा काळ येतसे या लागें । मी माझें वाउगें मेंढीऐसें ॥१॥ आतां अगी लागो ऐसिया वेव्हारा । तूं माझा सोइरा पांडुरंगा ॥ध्रु.॥ वागविला माथां नसतां चि भार । नव्हे तें साचार जाणील तों ॥२॥ तुका म्हणे केलें जवळील दुरी । मृगजळ वरी आड आलें ॥३॥
2838
पाठीवरी भार । जातो वाहूनियां खर ॥१॥ संत नेतील त्या ठाया । माझी आधीन त्यां काया ॥ध्रु.॥ मोटचौफळ । अंतीं उच्छिष्टाचें बळ ॥२॥ न संडीं मारग । येथें न चोरूनि अंग ॥३॥ आपुलिया सत्ता । चालविती नाहीं चिंता ॥४॥ कळवळिला तुका । घराचार येथें नका ॥५॥
2839
पाठेळ करितां न साहावे वारा । साहेलिया ढोरा गोणी चाले ॥१॥ आपणां आपण हे चि कसवटी । हर्षामर्ष पोटीं विरों द्यावें ॥ध्रु.॥ नवनीत तोंवरी कडकडी लोणी । निश्चळ होऊनी राहे मग ॥२॥ तुका म्हणे जरी जग टाकी घाया । त्याच्या पडे पायां जन मग ॥३॥
2840
पाडावी ते बरी । गांठी धुरेसवें खरी ॥१॥ नये मरों लंडीपणें । काय बापुडें तें जिणें ॥ध्रु.॥ लुटावें भांडार । तरी जया नाहीं पार ॥२॥ तुका म्हणे नांवें । कीर्ती आगळीनें ज्यावें ॥३॥
2841
पाणिपात्र दिगांबरा । हस्त करा सारिखे ॥१॥ आवश्यक देव मनीं । चिंतनींच सादर ॥ध्रु.॥ भिक्षा कामधेनुऐशी । अवकाशीं शयन ॥२॥ पांघरोनि तुका दिशा । केला वास अलक्षीं ॥३॥
2842
पाण्या निघाली गुजरी । मन ठेविलें दो घागरीं । चाले मोकऑया पदरीं । परी लक्ष तेथें ॥१॥ वावडी उडाली अंबरीं । हातीं धरोनियां दोरी । दिसे दुरिच्या दुरी । परी लक्ष तेथें ॥ध्रु.॥ चोर चोरी करी । ठेवी वनांतरीं । वर्ततसे चराचरीं । परी लक्ष तेथें ॥२॥ व्यभिचारिणी नारी । घराश्रम करी । परपुरुष जिव्हारीं । परी लक्ष तेथें ॥३॥ तुका म्हणे असों भलतिये व्यापारीं । लक्ष सर्वेश्वरीं । चुकों नेदी ॥४॥
2843
पात्र शुद्ध चत्ति गोही । न लगे कांहीं सांगणें ॥१॥ शूर तरी सत्य चि व्हावें । साटी जीवें करूनि ॥ध्रु.॥ अमुप च सुखमान । स्वामी जन मानावें ॥२॥ तुका म्हणे जैसी वाणी । तैसे मनीं परिपाक ॥३॥
2844
पानें जो खाईल बैसोनि कथेसी । घडेल तयासी गोहत्या ॥१॥ तमाखू ओढूनि काढला जो धूर । बुडेल तें घर तेणें पापें ॥ध्रु.॥ कीर्तनीं बडबड करील जो कोणी । बेडुक होउनी येइल जन्मा ॥२॥ जयाचिये मनीं कथेचा कंटाळा । होती त्या चांडाळा बहु जाच ॥३॥ जाच होती पाठी उडती यमदंड । त्याचें काळें तोंड तुका म्हणे ॥४॥
2845
पाप ताप दैन्य जाय उठाउठीं । जालिया भेटी हरिदासांची ॥१॥ ऐसें बळ नाहीं आणिकांचे अंगीं । तपें तिर्थे जगीं दानें व्रतें ॥ध्रु.॥ चरणींचे रज वंदी शूळपाणी । नाचती कीर्तनीं त्यांचे माथां ॥२॥ भव तरावया उत्तम हे नाव । भिजों नेंदी पाव हात कांहीं ॥३॥ तुका म्हणे मन जालें समाधान । देखिले चरण वैष्णवांचे ॥४॥
2846
पाप ताप माझे गुणदोष निवारीं । कृष्णा विष्णु हरी नारायणा ॥१॥ काम क्रोध वैरी घालोनि बाहेरी । तूं राहें अंतरीं पांडुरंगा ॥ध्रु.॥ करिशील तरी नव्हे कांइ एक । निर्मिलें त्रैलोक्य हेळामात्रें ॥२॥ समर्थासि काय आम्हीं शिकवावें । तुका म्हणे यावें पांडुरंगा ॥३॥
2847
पाप पुण्य दोन्ही वाहाती मारग । स्वर्गनर्कभोग यांचीं पेणीं ॥१॥ एका आड एक न लगे पुसावें । जेविल्या देखावें मागें भूक ॥ध्रु.॥ राहाटीं पडिलें भरोनियां रितीं । होतील मागुतीं येतीं जातीं ॥२॥ तुका म्हणे आम्ही खेळतियांमधीं । नाहीं केली बुद्धी स्थिर पाहों ॥३॥
2848
पापपुण्यसुखदुःखाचीं मंडळें । एक एकाबळें वाव घेती ॥१॥ कवतुक डोळां पाहिलें सकळ । नाचवितो काळ जीवांसी तो ॥ध्रु.॥ स्वर्गाचिया भोगें सरतां नरक । मागें पुढें एक एक दोन्ही ॥२॥ तुका म्हणे भय उपजलें मना । घेई नारायणा कडिये मज ॥३॥
2849
पापांचीं संचितें देहासी दंडण । तुज नारायणा बोल नाहीं ॥१॥ पेरी कडू जिरें मागे अमृतफळ । आकाऩ वृक्षफळें कैसीं येती ॥ध्रु.॥ सुख अथवा दुःख भोग हो देहेचा । नास हा ज्ञानाचा न करावा ॥२॥ तुका म्हणे आतां देवा कां रुसावें । मनासी पुसावें काय केलें ॥३॥
2850
पापाचिया मुळें । जालें सत्याचें वाटोळें ॥१॥ दोष जाले बळिवंत । नाहीं ऐसी जाली नीत ॥ध्रु.॥ मेघ पडों भीती । पिकें सांडियेली क्षिती ॥२॥ तुका म्हणे कांहीं । वेदा वीर्य शक्ति नाहीं ॥३॥
2851
पापाची मी राशी । सेवाचोर पायांपाशीं ॥१॥ करा दंड नारायणा । माझ्या मनाची खंडणा ॥ध्रु.॥ जना हातीं सेवा । घेतों लंडपणें देवा ॥२॥ तुझा ना संसार । तुका दोहींकडे चोर ॥३॥
2852
पापाची वासना नको दावूं डोळां । त्याहुनि अंधळा बराच मी ॥१॥ निंदेचें श्रवण नको माझे कानीं । बधिर करोनि ठेवीं देवा ॥ध्रु.॥ अपवित्र वाणी नको माझ्या मुखा । त्याजहुनि मुका बराच मी ॥२॥ नको मज कधीं परस्त्रीसंगति । जनांतुन माती उठतां भली ॥३॥ तुका म्हणे मज अवघ्याचा कांटाळा । तूं एक गोपाळा आवडसी ॥४॥
2853
पापिया चांडाळा हरिकथा नावडे । विषयालागीं आवडें गाणें त्याला ॥१॥ ब्राम्हणा दक्षणा देतां रडे रुका । विषयालागीं फुका लुटीतसे ॥ध्रु.॥ वीतभरि लंगोटी नेदी अतीताला । खीरम्या देतो शाला भोरप्यासी ॥२॥ तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरि । जातो यमपुरी भोगावया ॥३॥
2854
पापी तो नाठवी आपुल्या संचिता । ठेवी भगवंता वरी बोल ॥१॥ भेईना करितां पापाचे डोंगर । दुर्जन पामर दुराचारी ॥ध्रु.॥ नाठवी तो खळ आपुली करणी । देवासी निंदोनि बोलतसे ॥२॥ तुका म्हणे त्याच्या तोंडा लागो काटी । नाहीं जगजेठी जया चित्तीं ॥३॥
2855
पापी म्हणों तरि आठवितों पाय । दोष बळी काय तयाहूनि ॥१॥ ऐशा विचाराचे घालूनि कोंडणी । काय चक्रपाणी निजलेती ॥ध्रु.॥ एकवेळ जेणें पुत्राच्या उद्देशें । घेतल्याचें कैसें नेलें दुःख ॥२॥ तुका म्हणे अहो वैकुंठनायका । चिंता कां सेवका तुमचिया ॥३॥
2856
पायरवे अन्न । मग करी क्षीदक्षीण ॥१॥ ऐसे होती घातपात । लाभे विण संगें थीत ॥ध्रु.॥ जन्माची जोडी । वाताहात एके घडी ॥२॥ तुका म्हणे शंका । हित आड या लौकिका ॥३॥
2857
पाया जाला नारू । तेथें बांधला कापूरु । तेथें बिबव्याचें काम । अधमासि तों अधम ॥१॥ रुसला गुलाम । धणी करीतो सलाम । तेथें चाकराचें काम । अधमासि तों अधम ॥ध्रु.॥ रुसली घरची दासी । धणी समजावी तियेसि । तेथें बटकीचें काम । अधमासि तों अधम ॥२॥ देव्हार्‍यावरि विंचू आला । देवपूजा नावडे त्याला । तेथें पैजारेचें काम । अधमासि तों अधम ॥३॥ तुका म्हणे जाती । जातीसाटीं खाती माती ॥४॥
2858
पायां पडावें हें माझें भांडवल । सरती हे बोल कोठें पायीं ॥१॥ तरि हे सलगी कवतुक केलें । लडिवाळ धाकुलें असें बाळ ॥ध्रु.॥ काय उणें तुम्हां संताचिये घरीं । विदित या परी सकळ ही ॥२॥ तुका म्हणे माझें उचित हे सेवा । नये करूं ठेवाठेवी कांहीं ॥३॥
2859
पायां लावुनियां दोरी । भृंग बांधिला लेंकुरीं ॥१॥ तैसा पावसी बंधन । मग सोडवील कोण ॥ध्रु.॥ गळां बांधोनियां दोरी । वांनर हिंडवी घरोघरीं ॥२॥ तुका म्हणे पाहें । रीस धांपा देत आहे ॥३॥
2860
पायांच्या प्रसादें । कांहीं बोलिलों विनोदें ॥१॥ मज क्षमा करणें संतीं । नव्हे अंगभूत युक्ति ॥ध्रु.॥ नव्हे हा उपदेश । तुमचें बडबडिलों शेष ॥२॥ तुमचे कृपेचें पोसणें । जन्मोजन्मीं तुका म्हणे ॥३॥
2861
पायांपासीं चित्त । तेणें भेटी अखंडित ॥१॥ असे खेळे भलते ठायीं । प्रेमसूत्रदोरी पायीं ॥ध्रु.॥ केलेंसे जतन । मुळीं काय तें वचन ॥२॥ तुका म्हणे सर्वजाणा । ठायीं विचारावें मना ॥३॥
2862
पाळितों वचन । परि बहु भीतें मन ॥१॥ करितें पायांशीं सलगी । नये बैसों अंगसंगीं ॥ध्रु.॥ जोडोनियां कर । उभें असावें समोर ॥२॥ तुका म्हणे संत । तुम्ही मी बहु पतित ॥३॥
2863
पाळियेले लळे । माझे विठ्ठले कृपाळे ॥१॥ बहुजन्माचें पोषणें । सरतें पायांपाशीं तेणें ॥ध्रु.॥ सवे दिली लागों । भातें आवडीचें मागों ॥२॥ तुका म्हणे भिन्न । नाहीं दिसों दिलें क्षण ॥३॥
2864
पाळिलों पोसिलों जन्मजन्मांतरीं । वागविलों करीं धरोनियां ॥१॥ आतां काय माझा घडेल अव्हेर । मागें बहु दूर वागविलें ॥ध्रु.॥ नेदी वारा अंगीं लागों आघाताचा । घेतला ठायींचा भार माथां ॥२॥ तुका म्हणे बोल करितों आवडी । अविट ते चि गोडी अंतरींची ॥३॥
2865
पावतों ताडन । तरी हें मोकलितों जन ॥१॥ मग मी आठवितों दुःखें । देवा सावकाश मुखें ॥ध्रु.॥ होती अप्रतिष्ठा । हो तों वरपडा कष्टा ॥२॥ तुका म्हणे मान । होतां उत्तम खंडन ॥३॥
2866
पावला प्रसाद आतां विटोनि जावें । आपला तो श्रम कळों येतसे जीवें ॥१॥ आतां स्वामी सुखें निद्रा करा गोपाळा । पुरले मनोरथ जातों आपुलिया स्थळा ॥ध्रु.॥ तुम्हांसि जागवूं आम्ही आपुलिया चाडा । शुभाशुभ कर्में दोष वाराया पीडा ॥२॥ तुका म्हणे दिलें उच्छिष्टाचें भोजन । आम्हां आपुलिया नाहीं निवडिलें भिन्न ॥३॥
2867
पावलें पावलें तुझें आम्हां सर्व । दुजा नको भाव होऊं देऊं ॥१॥ जेथें तेथें तुझीं च पाउलें । त्रिभुवन संचलें विठ्ठला गा ॥ध्रु.॥ भेदाभेदमतें भ्रमाचे संवाद । आम्हां नको वाद त्यांशीं देऊं ॥२॥ तुका म्हणे अणु तुजविण नाहीं । नभाहूनि पाहीं वाढ आहे ॥३॥
2868
पावलों पंढरी वैकुंठभवन । धन्य आजि दिन सोनियाचा ॥१॥ पावलों पंढरी आनंदगजरें । वाजतील तुरें शंख भेरी ॥ध्रु.॥ पावलों पंढरी क्षेमआलिंगनीं । संत या सज्जनीं निवविलें ॥२॥ पावलों पंढरी पार नाहीं सुखा । भेटला हा सखा मायबाप ॥३॥ पावलों पंढरी येरझार खुंटली । माउली वोळली प्रेमपान्हा ॥४॥ पावलों पंढरी आपुलें माहेर । नाहीं संवसार तुका म्हणे ॥५॥
2869
पावलों पावलों । देवा पावलों रे ॥१॥ बरवें संचित होतें तैसें जालें रें । आतां काय बोलों रे ॥२॥ सोज्ज्वळ कंटकवाटा भावें करूं गेलों रे । तुका म्हणे करूनि वेगळा केलों रे ॥३॥
2870
पावलों प्रसाद इच्छा केली तैसी । जालें या चित्तासी समाधान ॥१॥ मायबाप माझा उभा कृपादानी । विटे सम जोडूनि पादांबुजें ॥ध्रु.॥ सांभाळासी येऊं नेदी च उणीव । अधिकारगौरव राखे तैसें ॥२॥ तुका म्हणे सर्व अंतर्बाहए आहे । जया तैसा राहे कवळूनी ॥३॥
2871
पावलों हा देह कागतालिन्यायें । न घडे उपायें घडों आलें ॥१॥ आतां माझीं खंडीं देह देहांतरें । अभय दातारें देऊनियां ॥ध्रु.॥ अंधळ्याचे पाठीं धनाची चरवी । अघटित तेंवि घडों आलें ॥२॥ तुका म्हणे योग घडला बरवा । आतां कास देवा न सोडीं मी ॥३॥
2872
पाववावें ठाया । ऐसें सवें बोलों तया ॥१॥ भावा ऐसी क्रिया राखे । खोट्या खोटेपणें वाखे ॥ध्रु.॥ न ठेवूं अंतर । कांहीं भेदाचा पदर ॥२॥ तुका म्हणे जीवें भावें । सत्या मानविजे देवें ॥३॥
2873
पाववील ठाया । पांडुरंग चिंतिलिया ॥१॥ त्यासी चिंतिलिया मनीं । चित्ता करी गंवसणी ॥ध्रु.॥ पावावया फळ । अंगीं असावें हें बळ ॥२॥ तुका म्हणे तई । सिद्धी वोळगती पायीं ॥३॥
2874
पावावे संतोष । तुम्हीं यासाटीं सायास ॥१॥ करीं आवडी वचनें । पालटूनि क्षणक्षणें ॥ध्रु.॥ द्यावें अभयदान । भुमीन पाडावें वचन ॥२॥ तुका म्हणे परस्परें । कांहीं वाढवीं उत्तरें ॥३॥
2875
पावे ऐसा नाश । अवघियां दिला त्रास ॥१॥ अविटाचा केला संग । सर्व भोगी पांडुरंग ॥ध्रु.॥ आइता च पाक । संयोगाचा सकळिक ॥२॥ तुका म्हणे धणी । सीमा राहिली होऊनी ॥३॥
2876
पाषाण देव पाषाण पायरी । पूजा एकावरी पाय ठेवी ॥१॥ सार तो भाव सार तो भाव । अनुभवीं देव ते चि जाले ॥ध्रु.॥ उदका भिन्न पालट काईं । गंगा गोड येरां चवी काय नाहीं ॥२॥ तुका म्हणे हें भाविकांचें वर्म । येरीं धर्माधर्म विचारावें ॥३॥
2877
पाषाण परिस भूमि जांबूनद । वंशाचा संबंध धातयाचा ॥१॥ सोनियाची पुरी समुद्राचा वेढा । समुदाय गाढा राक्षसांचा ॥ध्रु.॥ ऐसी सहस्र त्या सुंदरा कामिनी । माजी मुखरणी मंदोदरी ॥२॥ पुत्रपौत्राचा लेखा कोण करी । मुख्य पुत्र हरी इंद्रा आणी ॥३॥ चौदा चौकडिया आयुष्यगणना । बंधुवर्ग जाणा कुंभकर्ण ॥४॥ तुका म्हणे ज्याचे देव बांदवडी । सांगातें कवडी गेली नाहीं ॥५॥
2878
पाषाण प्रतिमा सोन्याच्या पादुका । हें हो हातीं एका समर्थाचे ॥१॥ अनामिका हातीं समर्थाचा सिक्का । न मानितां लोकां येइल कळों ॥२॥ तुका म्हणे येथें दुराग्रह खोटा । आपुल्या अदृष्टा शरण जावें ॥३॥
2879
पाषाण फुटती तें दुःख देखोनि । करितां गौळणी शोक लोकां ॥१॥ काय ऐसें पाप होतें आम्हांपासीं । बोलती एकासी एक एका ॥२॥ एकांचिये डोळां असुं बाह्यात्कारी । नाहीं तीं अंतरीं जळतील ॥३॥ जळतील एकें अंतर्बाह्यात्कारें । टाकिलीं लेकुरें कडियेहूनि ॥४॥ निवांत चि एकें राहिलीं निश्चिंत । बाहेरी ना आंत जीव त्यांचे ॥५॥ त्यांचे जीव वरी आले त्या सकळां । एका त्या गोपाळांवांचूनियां ॥६॥ वांचणें तें आतां खोटें संवसारीं । नव्हे भेटी जरी हरिसवें ॥७॥ सवें घेऊनियां चालली गोपाळां । अवघीं च बाळा नर नारी ॥८॥ नर नारी नाहीं मनुष्याचें नावें । गोकुळ हें गांव सांडियेलें ॥९॥ सांडियेलीं अन्नें संपदा सकळ । चित्ती तो गोपाळ धरुनि जाती ॥१०॥ तिरीं माना घालूनियां उभ्या गाईं । तटस्थ या डोहीं यमुनेच्या ॥११॥ यमुनेच्या तिरीं झाडें वृक्ष वल्ली । दुःखें कोमाइलीं कृष्णाचिया ॥१२॥ यांचें त्यांचें दुःख एक जालें तिरीं । मग शोक करी मायबाप ॥१३॥ मायबाप तुका म्हणे सहोदर । तोंवरी च तीर न पवतां ॥१४॥
2880
पाहतां तव एकला दिसे । कैसा असे व्यापक ॥१॥ ज्याचे त्याचे मिळणीं मिळे । तरी खेळे बहुरूपी ॥ध्रु.॥ जाणिवेचें नेदी अंग । दिसों रंग निवडीना ॥२॥ तुका म्हणे ये चि ठायीं । हें तों नाहीं सर्वत्र ॥३॥
2881
पाहा किती आले शरण समान चि केले । नाहीं विचारिले गुण दोष कोणांचे ॥१॥ मज सेवटींसा द्यावा ठाव तयांचिये देवा । नाहीं करीत हेवा कांहीं थोरपणाचा ॥ध्रु.॥ नाहीं पाहिला आचार कुळगोत्रांचा विचार । फेडूं आला भार मग न म्हणे दगड ॥२॥ तुका म्हणे सर्वजाणा तुझ्या आल्यावरि मना । केला तो उगाणा घडल्या दोषांच्या ॥३॥
2882
पाहा कैसेकैसे । देवें उद्धरिले आनयासें ॥१॥ ऐका नवल्याची ठेव । नेणतां भक्तिभाव ॥ध्रु.॥ कैलासासी नेला । भिल्ल पानेडी बैसला ॥२॥ पांखांच्या फडत्कारीं । उद्धरुनी नेली घारी ॥३॥ खेचरें पिंडी दिला पाव । त्या पूजनें धाये देव ॥४॥ तुका म्हणे भोळा । स्वामी माझा हो कोंवळा ॥५॥
2883
पाहा रे तमासा तुमचा येथें नव्हे लाग । देईन तो भाग आलियाचा बाहेरी ॥१॥ जागा रे गोपाळ नो ठायीं ठायीं जागा । चाहुलीनें भागा दूर मजपासूनि ॥ध्रु.॥ न रिघतां ठाव आम्हा ठावा पाळतियां । भयाभीत वांयां तेथें काय चांचपा ॥२॥ तुका म्हणे हातां चडे जीवाचिये साटीं । मिटक्या देतां गोड मग लागतें शेवटीं ॥३॥
2884
पाहा रे हें दैवत कैसें । भक्तिपिसें भाविक ॥१॥ पाचारिल्या सरिसें पावे । ऐसें सेवे बराडी ॥ध्रु.॥ शुल्क काष्ठीं गुरुगुरी । लाज हरि न धरी ॥२॥ तुका म्हणे अर्धनारी । ऐसीं धरी रूपडीं ॥३॥
2885
पाहा हो कलिचें महिमान । असत्यासी रिझलें जन । पापा देती अनुमोदन । करिती हेळण संतांचे ॥१॥ ऐसें अधर्माचें बळ । लोक झकविले सकळ । केलें धर्माचें निर्मूळ । प्रळयकाळ आरंभला ॥ध्रु.॥ थोर या युगाचें आश्चर्य । ब्रम्हकर्म उत्तम सार । सांडूनियां द्विजवर । दावलपीर स्मरताती ॥२॥ ऐसे यथार्थाचे अनर्थ । जाला बुडाला परमार्थ । नाहीं जाली ऐसी नीत । हा हा भूत पातलें ॥३॥ शांति क्षमा दया । भावभक्ति सित्क्रया । ठाव नाहीं सांगावया । सत्वधैर्य भंगिलें ॥४॥ राहिले वर्णावर्णधर्म । अन्योन्य विचरती कर्म । म्हणवितां रामराम । श्रम महा मानिती ॥५॥ थेर भोरपाचे विशीं । धांवती भूतें आविसा तैसीं । कथा पुराण म्हणतां सिसी । तिडीक उठी नकर्‍याचे ॥६॥ विषयलोभासाटीं । सर्वार्थेसीं प्राण साटी । परमार्थी पीठ मुठी । मागतां उठती सुनींसीं ॥७॥ धनाढए देखोनि अनामिक । तयातें मनिती आवश्यक । अपमानिले वेदपाठक । सात्विक शास्त्रज्ञ संपन्न ॥८॥ पुत्र ते पितियापाशीं । सेवा घेती सेवका ऐसी । सुनांचिया दासी । सासा जाल्या आंदण्या ॥९॥ खोटें जालें आली विंवसी । केली मर्यादा नाहींसी । भ्रतारें तीं भार्यासी । रंक तैसीं मानिती ॥१०॥ नमस्कारावया हरिदासां । लाजती धरिती कांहीं गर्वसा । पोटासाटीं खौसा । वंदिती मलिंछाच्या ॥११॥ बहुत पाप जालें उचंबळ । उत्तम न म्हणती चांडाळ। अभक्ष भिक्षती विटाळ । कोणी न धरी कोणाचा ॥१२॥ कैसें जालें नष्ट वर्तमान । एकादशीस खाती अन्न । विडे घेऊनि ब्राम्हण । अविंदवाणी वदताती ॥१३॥ कामिनी विटंबिल्या कुळवंती । वदनें दासीचीं चुंबिती । सोवळ्याच्या स्फीती । जगीं मिरविती पवित्रता ॥१४॥ मद्यपानाची सुराणी । नवनीता न पुसे कोणी । केळवती व्यभिचारिणी । दैन्यवाणी पतिव्रता ॥१५॥ केवढी दोषाची सबळता । जाली पाहा हो भगवंता । पुण्य धुडावोनी संता । तीर्थां हरी आणिली ॥१६॥ भेणें मंद जाल्या मेघवृष्टि । आकांतली कांपे सृष्टि । देव रिगाले कपाटीं । आटाआटी प्रवर्तली ॥१७॥ अपीक धान्यें दिवसें दिवसें । गाईं म्हैसी चेवल्या गोरसें । नगरें दिसती उध्वंसें । पिकलीं बहुवसें पाखांडें ॥१८॥ होम हरपलीं हवनें । यज्ञयाग अनुष्ठानें । जपतपादिसाधनें । आचरणें भ्रष्टलीं ॥१९॥ अठरा यातींचे व्यापार। करिती तस्कराईं विप्र । सांडोनियां शुद्ध शुभ्र । वस्त्रें निळी पांघरती ॥२०॥ गीता लोपली गायत्री । भरले चमत्कार मंत्रीं । अश्वाचियापरी । कुमारी विकिती वेदवक्ते ॥२१॥ वेदाध्ययनसंहितारुचि । भकाद्या करिती तयांची । आवडी पंडितांची । मुसाफावरी बैसली ॥२२॥ मुख्य सर्वोत्तम साधनें । तीं उच्छेदुनि केलीं दीनें । कुडीं कापटें महा मोहनें । मिरविताती दुर्जन ॥२३॥ कळाकुशळता चतुराईं । तर्कवादी भेद निंदेठायीं । विधिनिषेधाचा वाही । एक ही ऐसीं नाडलीं ॥२४॥ जे संन्यासी तापसी ब्रम्हचारी । होतां वैरागी दिगांबर निस्पृही वैराग्यकारी । कामक्रोधें व्यापिले भारी । इच्छाकरीं न सुटती ॥२५॥ कैसें विनाशकाळाचें कौतुक । राजे जाले प्रजांचे अंतक । पिते पुत्र सहोदर । एकाएक शत्रुघातें वर्त्तती ॥२६॥ केवढी ये रांडेची अंगवण । भ्रमविलें अवघें जन । याती अठरा चार्‍ही वर्ण । कर्दम करूनि विटाळले ॥२७॥ पूवाअहोतें भविष्य केलें । संतीं ते यथार्थ जालें । ऐकत होतों ते देखिलें ।प्रत्यक्ष लोचनीं ॥२८॥ आतां असो हें आघवें । गति नव्हे कळीमध्येंवागवरावें । देवासी भाकोनि करुणावें । वेगें स्मरावें अंतरीं ॥२९॥ अगा ये वैकुंठानायका । काय पाहातोसि या कौतुका । धांव कलीनें गांजिलें लोकां । देतो हाका सेवक तुकयाचा ॥३०॥
2886
पाहा हो देवा कैसे जन । भिन्न भिन्न संचितें ॥१॥ एक नाहीं एका ऐसें । दावी कैसे शुद्ध हीन ॥ध्रु.॥ पंचभूतें एकी रासी । सूत्रें कैसीं खेळवी ॥२॥ तुका म्हणे जे जे जाती । तैसी स्थिति येतसे ॥३॥
2887
पाहातां गोवळी । खाय त्यांची उष्टावळी ॥१॥ करिती नामाचें चिंतन । गडी कान्होबाचें ध्यान ॥ध्रु.॥ आली द्यावी डाई । धांवे वळत्या मागें गाई ॥२॥ एके ठायीं काला । तुका म्हणे भाविकाला ॥३॥
2888
पाहातां ठायाठाव । जातो अंतरोनि देव ॥१॥ नये वाटों गुणदोषीं । मना जतन येविशीं ॥ध्रु.॥ त्रिविधदेह परिचारा । जनीं जनार्दन खरा ॥२॥ तुका म्हणे धीरें । विण कैसें होतें बरें ॥३॥
2889
पाहातां रूप डोळां भरें । अंतर नुरे वेगळें । इच्छावशें खेळ मांडी । अवघें सांडी बाहेरी ॥१॥ तो हा नंदानंदन बाइये । यासी काय परिचार वो ॥ध्रु.॥ दिसतो हा नव्हे तैसा । असे दिशाव्यापक । लाघव हा खोळेसाटीं । होतां भेटी परतेना ॥२॥ म्हणोनि उभी ठालीये । परतलीये या वाटा । आड करोनियां तुका । जो या लोकां दाखवितो ॥३॥
2890
पाहातां श्रीमुख सुखावलें सुख । डोळियांची भूक न वजे माझी ॥१॥ जिव्हे गोडी तीन अक्षरांचा रस । अमृत जयास फिकें पुढें ॥ध्रु.॥ श्रवणीची वाट चोखाळली शुद्ध । गेले भेदाभेद वारोनियां ॥२॥ महामळें मन होतें जें गांदलें । शुद्ध चोखाळलें स्पटिक जैसें ॥३॥ तुका म्हणे माझ्या जीवाचें जीवन । विठ्ठल निधान सांपडलें ॥४॥
2891
पाहातां हें बरवें जालें । कळों आलें यावरी ॥१॥ मागिलांचा जाला झाडा । त्या निवाडास्तव ॥ध्रु.॥ विसांवलें अंग दिसे । सरिसे अनुभव ॥२॥ तुका म्हणे बरें जालें । देवें नेलें गवसूनि ॥३॥
2892
पाहाती गौळणी । तंव पालथी दुधाणी ॥१॥ म्हणती नंदाचिया पोरें । आजि चोरी केली खरें ॥ध्रु.॥ त्याविण हे नासी । नव्हे दुसरिया ऐसी ॥२॥ सवें तुका मेळा । त्याणें अगुणा आणिला ॥३॥
2893
पाहातोसी काय । आतां पुढें करीं पाय ॥१॥ वरि ठेवूं दे मस्तक । ठेलों जोडूनि हस्तक ॥ध्रु.॥ बरवें करीं सम । नको भंगों देऊं प्रेम ॥२॥ तुका म्हणे चला । पुढती सामोरे विठ्ठला ॥३॥
2894
पाहावया माजी नभा । दिसे शोभा चांगली ॥१॥ बैसला तो माझे मनीं । नका कोणी लाजवूं ॥ध्रु.॥ जीवा आवडे जीवाहूनि । नव्हे क्षण वेगळा ॥२॥ जालें विश्वंभरा ऐसी । तुकया दासी स्वामीची ॥३॥
2895
पाहुणे घरासी । आजि आले हृषीकेशी ॥१॥ काय करूं उपचार । कोंप मोडकी जर्जर । कण्या दरदर । पाण्यामाजी रांधिल्या ॥ध्रु.॥ घरीं मोडकिया बाजा । वरि वाकळांच्या शेजा ॥२॥ मुखशुद्धि तुळसी दळ । तुका म्हणे मी दुर्बळ ॥३॥
2896
पाहुनियां ग्रंथ करावें कीर्तन । तेव्हां आलें जाण फळ त्याचें ॥१॥ नाहीं तरि वांयां केली तोंडपिटी । उरी ते शेवटी उरलीसे ॥ध्रु.॥ पढोनियां वेद हरिगुण गावे । ठावें तें जाणावें तेव्हां जालें ॥२॥ तप तिर्थाटण तेव्हां कार्यसिद्धि । स्थिर राहे बुद्धि हरिच्या नामीं ॥३॥ यागयज्ञादिक काय दानधर्म । तरि फळ नाम कंठीं राहे ॥४॥ तुका म्हणे नको काबाडाचे भरी । पडों सार धरीं हें चि एक ॥५॥
2897
पाहें तिकडे दिशा ओस । अवघी पास पायांपें ॥१॥ मन चि साच होइल कई । प्रेम देई भेटोनि ॥ध्रु.॥ सर्वापरि पांगुळ असें । न कळे कैंसे तें तुम्हा ॥२॥ तुका म्हणे कृपावंता । तूं तों दाता दीनाचा ॥३॥
2898
पाहें प्रसादाची वाट । द्यावें धोवोनियां ताट ॥१॥ शेष घेउनि जाईन । तुमचें जालिया भोजन ॥ध्रु.॥ जालों एकसवा । तुम्हां आडुनियां देवा ॥२॥ तुका म्हणे चित्त । करूनि राहिलों निश्चित ॥३॥
2899
पाहें मजकडे भरोनियां दृष्टी । बहुत हिंपुष्टी जालों माते ॥१॥ करावेंसे वाटे जीवा स्तनपान । नव्हे हें वचन श्रुंघारिक ॥ध्रु.॥ सत्यासाटीं माझी शब्दविवंचना । जोडिल्या वचनाचें तें नव्हे ॥२॥ तुका म्हणे माझी कळवळ्याची कींव । भागलासे जीव कर्तव्यानें ॥३॥
2900
पाहों ग्रंथ तरी आयुष्य नाहीं हातीं । नाहीं ऐशी मति अर्थ कळे ॥१॥ होईंल तें हो या विठोबाच्या नांवें । आचरलें भावें जीवीं धरूं ॥ध्रु.॥ एखादा अंगासी येईंल प्रकार । विचारितां फार युक्ति वाढे ॥२॥ तुका म्हणे आळी करितां गोमटी । मायबापा पोटीं येते दया ॥३॥
2901
पिंड पदावरी । दिला आपुलिये करीं ॥१॥ माझें जालें गयावर्जन । फिटलें पितरांचें ॠण ॥ध्रु.॥ केलें कर्मांतर । बोंब मारिली हरिहर ॥२॥ तुका म्हणे माझें । भार उतरलें ओझें ॥३॥
2902
पिंड पोसावे हें अधमाचें ज्ञान । विलास मिष्टान्न करूनियां ॥१॥ शरीर रक्षावें हा धर्म बोलती । काय असे हातीं तयाचिया ॥ध्रु.॥ क्षणभंगुर हें जाय न कळतां । ग्रास गिळि सत्ता नाहीं हातीं ॥२॥ कर्वतिलीं देहें कापियेलें मांस । गेले वनवासा शुकादिक ॥३॥ तुका म्हणे राज्य करितां जनक । अग्नीमाजी एक पाय जळे ॥४॥
2903
पिंडदान पिंडें ठेविलें करून । तिळी तिळवण मूळत्रयीं॥१॥ सारिले संकल्प एका चि वचनें । ब्रम्हीं ब्रम्हार्पण सेवटींच्या ॥ध्रु.॥ सव्य अपसव्य बुडालें हें कर्म । एका एक वर्म एकोविष्णु ॥२॥ पित्यापुत्रत्वाचें जालें अवसान । जनीं जनादऩन अभेदेंसी ॥३॥ आहे तैसी पूजा पावली सकळ । सहज तो काळ साधियेला ॥४॥ तुका म्हणे केला अवघियांचा उद्धार । आतां नमस्कार सेवटींचा ॥५॥
2904
पिंडपोशकाच्या जळो ज्ञानगोष्टी । झणी दृष्टिभेटी न हो त्याची ॥१॥ नाहीं संतचिन्ह उमटलें अंगीं । उपदेशालागीं पात्र जाला ॥ध्रु.॥ पोहों सिणलें नये कासे लावितो आणिका । म्हणावें त्या मूर्खा काय आतां ॥२॥ सिणलें तें गेलें सिणलियापासीं । जाली त्या दोघांसी एक गति ॥३॥ तुका म्हणे अहो देवा दिनानाथा । दरुषण आतां नको त्याचें ॥४॥
2905
पिकलिये सेंदे कडुपण गेलें । तैसें आम्हां केलें पांडुरंगें ॥१॥ काम क्रोध लोभ निमाले ठायीं चि । सर्व आनंदाची सृष्टि जाली ॥ध्रु.॥ आठव नाठव गेले भावाभाव । जाला स्वयमेव पांडुरंग ॥२॥ तुका म्हणे भाग्य या नांवें म्हणीजे । संसारीं जन्मीजे या चि लागीं ॥३॥
2906
पिकल्या सेताचा आम्हां देतो वांटा । चौधरी गोमटा पांडुरंग ॥१॥ सत्तर टके बाकी उरली मागे तो हा । मागें झडले दाहा आजिवरी ॥ध्रु.॥ हांडा भांडीं गुरें दाखवी ऐवज । माजघरीं बाजे बैसलासे ॥२॥ मज यासी भांडतां जाब नेदी बळें । म्हणे एका वेळे घ्याल वांटा ॥३॥ तुका म्हणे स्त्रिये काय वो करावें । नेदितां लपावें काय कोठें ॥४॥
2907
पिकवावें धन । ज्याची आस करी जन ॥१॥ पुढें उरे खातां देतां । नव्हे खंडण मवितां ॥ध्रु.॥ खोलीं पडे ओली बीज । तरीं च हातीं लागे निज ॥२॥ तुका म्हणे धनी । विठ्ठल अक्षरी हीं तिन्ही ॥३॥
2908
पिकवावें धन । ज्याची आस करी जन ॥१॥ पुरोनि उरे खातां देतां । नव्हे खंडन मवितां ॥ध्रु.॥ खोलीं पडे ओली बीज । तरीं च हाता लागे निज ॥२॥ तुका म्हणे धणी । विठ्ठल अक्षरें या तिन्ही ॥३॥
2909
पुंडलिकाचे निकटसेवे । कैसा धांवे बराडी ॥१॥ आपुलें थोरपण । नारायण विसरला ॥ध्रु.॥ उभा कटीं ठेवुनि कर। न म्हणे पर बैससें ॥२॥ तुका म्हणे जगदीशा । करणें आशा भक्तांची ॥३॥
2910
पुंडलीक भक्तराज । तेणें साधियेलें काज । वैकुंठींचें निज । परब्रम्ह आणिलें ॥१॥ पांडुरंग बाळमूर्ति । गाईंगोपाळां संगती । येऊनियां प्रीति । उभें सम चि राहिलें ॥ध्रु.॥ एका आगळें अक्षर । वैकुंठ चि दुसरें । म्हणविती येरें । परि ती ऐसीं नव्हेती॥२॥ पाप पंचक्रोशीमधीं । येऊ न सकेचिना आधीं । कैंची तेथें विधि । निषेधाची वसति ॥३॥ पुराणें वदती ऐसें । चतुर्भुज तीं मानसें । सुदर्शनावरी वसे । रीग न घडे कल्पांतीं ॥४॥ महाक्षेत्र हें पंढरी । अनुपम्य इयेची थोरी । धन्य धन्य वारकरी । तुका म्हणे तेथींचे ॥५॥
2911
पुढिलाचें इच्छी फळ । नाहीं बळ तें अंगीं ॥१॥ संत गेले तया ठाया । देवराया पाववीं ॥ध्रु.॥ ज्येष्ठांचीं कां आम्हां जोडी । परवडी न लभों ॥२॥ तुका म्हणे करीं कोड । पुरवीं लाड आमुचा ॥३॥
2912
पुढिलिया सुखें निंब देतां भले । बहुत वारलें होय दुःख ॥१॥ हें तों वर्म असे माउलीचे हातीं । हाणी मारी प्रीती हितासाठीं ॥ध्रु.॥ खेळतां विसरे भूक तान घर । धरूनियां कर आणी बळें ॥२॥ तुका म्हणे पाळी तोंडीचिया घांसें । उदार सर्वस्वें सर्वकाळ ॥३॥
2913
पुढीलांचे सोयी माझ्या मना चाली । मताची आणिली नाहीं बुद्धी ॥१॥ केलासी तो उभा आजवरी संतीं । धरविलें हातीं कट देवा ॥ध्रु.॥ आहे तें ची मागों नाहीं खोटा चाळा । नये येऊं बळा लेंकराशीं ॥२॥ तुका म्हणे माझा साक्षीचा वेव्हार । कृपण जी थोर परी तुम्ही ॥३॥
2914
पुढें आतां कैंचा जन्म । ऐसा श्रम वारेसा ॥१॥ सर्वथाही फिरों नये । ऐसी सोय लागलिया ॥ध्रु.॥ पांडुरंगा ऐसी नाव । तारूं भाव असतां ॥२॥ तुका म्हणे चुकती बापा । पुन्हा खेपा सकळा ॥३॥
2915
पुढें जेणें लाभ घडे । तें चि वेडे नाशिती ॥१॥ येवढी कोठें नागवण । अंधारुण विष घ्यावें ॥ध्रु.॥ होणारासी मिळे बुद्धि । नेदी शुद्धी धरूं तें ॥२॥ तुका म्हणे जना सोंग । दावी रंग आणीक ॥३॥
2916
पुढें तरी चित्ती । काय येईंल तें आतां ॥१॥ मज सांगोनिया धाडीं । वाट पाहातों वराडी ॥ध्रु.॥ कंठीं धरिला प्राण । पायांपाशीं आलें मन ॥२॥ तुका म्हणे चिंता । बहु वाटतसे आतां ॥३॥
2917
पुढें येते देवी । तिची जती चालों द्यावी । मागील झाडावी । झाडा मान आसडी ॥१॥ एकवीरा आली अंगा । आतां निवारील रोगा । माझ्या भक्तापाशीं सांगा । पूजा भावें करावी ॥ध्रु.॥ मेंढा मारावा लोवाळ । पूजा पावली सकळ । तुम्हीं केलें बळ । मग मी ठायीं न पडें ॥२॥ तुका म्हणें मुळीं । लागली ते आली कुळीं । वंदुनी सकळीं । जीवें भावों ओवाळा ॥३॥
2918
पुण्य उभें राहो आतां । संताचें याकारणें ॥१॥ पंढरीचे लागा वाटे । सखा भेटे विठ्ठल ॥ध्रु.॥ संकल्प हे यावे फळा । कळवळा बहुतांचा ॥२॥ तुका म्हणे होऊनि क्षमा । पुरुषोत्तमा अपराध ॥३॥
2919
पुण्य परउपकार पाप ते परपीडा । आणीक नाहीं जोडा दुजा यासी ॥१॥ सत्य तो चि धर्म असत्य तें कर्म । आणीक हे वर्म नाहीं दुजें ॥ध्रु.॥ गति ते चि मुखीं नामाचें स्मरण । अधोगति जाण विन्मुखते ॥२॥ संतांचा संग तो चि स्वर्गवास । नर्क तो उदास अनर्गळा ॥३॥ तुका म्हणे उघडें आहे हित घात । जयाचें उचित करा तैसें ॥४॥
2920
पुण्य फळलें बहुतां दिवसां । भाग्यउदयाचा ठसा । जाला सन्मुख तो कैसा । संतचरण पावलों ॥१॥ आजि फिटलें माझें कोडें । भवदुःखाचें सांकडें । कोंदाटलें पुढें । ब्रम्ह सावळें ॥ध्रु.॥ आलिंगणें संतांचिया । दिव्य जाली माझी काया । मस्तक पाया । वरी त्यांच्या ठेवितां ॥२॥ तुका म्हणे धन्य झालों । सुखें संतांचिया धालों । लोटांगणीं आलों । पुढें भार देखोनी ॥३॥
2921
पुण्यपापा ठाव नाहीं सुखदुःखा । हानिलाभशंका नासलिया ॥१॥ जिंता मरण आलें आप पर गेलें । मूळ छेदियेलें संसाराचें ॥ध्रु.॥ अधिकार जाती वर्णधर्मयाती । ठाव नाहीं सत्यअसत्याशी ॥२॥ जन वन भिन्न आचेत चळण । नाहीं दुजेपण ठाव यासी ॥३॥ तुका म्हणें देह वाईलें विठ्ठलीं । तेव्हां च घडली सर्व पूजा ॥४॥
2922
पुण्यवंत व्हावें । घेतां सज्जनांची नांवें ॥१॥ नेघे माझे वाचे तुटी । महा लाभ फुकासाठी ॥ध्रु.॥ विश्रांतीचा ठाव । पायीं संतांचिया भाव ॥२॥ तुका म्हणे जपें । संतांचिया जाती पापें ॥३॥
2923
पुण्यविकरा तें मातेचें गमन । भाडी ऐसें धन विटाळ तो ॥१॥ आत्महत्यारा हा विषयांचा लोभी । म्हणावें तें नाभी करवी दंड ॥ध्रु.॥ नागवला अल्प लोभाचिये साटीं । घेऊनि कांचवटि परिस दिला ॥२॥ तुका म्हणे हात झाडिले परत्रीं । श्रम तो चि श्रोत्रीं वेठी केली ॥३॥
2924
पुत्र जाला चोर । मायबापा हर्ष थोर ॥१॥ आतां काशासाटीं जोडी । हाट धाटे गुंडगे घडी ॥ध्रु.॥ ऐते अपाहार । आणूनियां भरी घर ॥२॥ मानिली निश्चिंती । नरका जावया उभयतीं ॥३॥ झोडाझोडगीचे पोटीं । फळें बीजें तीं करंटीं ॥४॥ तुका म्हणे बेट्या । भांडवल न लगे खट्या ॥५॥
2925
पुत्राची वार्ता । शुभ ऐके जेवीं माता ॥१॥ तैसें राहो माझें मन । गातां ऐकतां हरिगुण ॥ध्रु.॥ नादें लुब्ध जाला मृग । देह विसरला अंग ॥२॥ तुका म्हणे पाहे । कासवीचें पिलें माये ॥३॥
2926
पुनीत केलें विष्णुदासीं । संगें आपुलिया दोषी ॥१॥ कोण पाहे तयांकडे । वीर विठ्ठलाचे गाढे । अशुभ त्यांपुढें शुभ होउनियां ठाके ॥ध्रु.॥ प्रेमसुखाचिया रासी । पाप नाहीं ओखदासी ॥२॥ तुका म्हणे त्यांनीं । केली वैकुंठ मेदिनी ॥३॥
2927
पुरली धांव कडिये घेई । पुढें पायीं न चलवीं ॥१॥ कृपाळुवे पांडुरंगे । अंगसंगे जिवलगे ॥ध्रु.॥ अवघी निवारावी भूक । अवघ्या दुःख जन्माचें ॥२॥ तुका म्हणे बोलवेना । लावीं स्तनां विश्वरें ॥३॥
2928
पुरविली आळी । जे जे केली ते ते काळीं ॥१॥ माय तरी ऐसी सांगा । कृपाळुवा पांडुरंगा ॥ध्रु.॥ घेतलें नुतरी । उचलोनि कडियेवरी ॥२॥ तुका म्हणे घांस । मुखीं घाली ब्रम्हरस ॥३॥
2929
पुराणप्रसिद्ध सीमा । नामतारकमहिमा ॥१॥ मागें जाळी महा दोष । पुढें नाही गर्भवास ॥ध्रु.॥ जें निंदिलें शास्त्रें । वंद्य जालें नाममात्रें ॥२॥ तुका म्हणे ऐसा । त्रिभुवनीं नामठसा ॥३॥
2930
पुराणींचा इतिहास । गोड रस सेविला ॥१॥ नव्हती हे आहाच बोल । मोकळें फोल कवित्व ॥ध्रु.॥ भावें घ्या रे भावें घ्या रे । येगदा जा रे पंढरिये ॥२॥ भाग्यें आलेति मनुष्यदेहा । तो हा पाहा विठ्ठल ॥३॥ पापपुण्या करील झाडा । जाइल पीडा जन्माची ॥४ ॥ घ्यावी हातीं टाळदिंडी । गावे तोंडीं गुणवाद ॥५॥ तुका म्हणे घटापटा । न लगे वाटा शोधाव्या ॥६॥
2931
पुरुषा हातीं कंकणचुडा । नवल दोडा वृत्ति या ॥१॥ पाहा कैसी विटंबणा । नारायणा देखिली ॥ध्रु.॥ जळो ऐसी ब्रिदावळी । भाटवोळीपणाची ॥२॥ तुका म्हणे पाहों डोळां । अवकळा नये हे ॥३॥
2932
पुष्ट कांति निवती डोळे । हे सोहळे श्रीरंगीं ॥१॥ अंतर्बाहीं विलेपन । हें भूषण मिरवूं ॥ध्रु.॥ इच्छेऐसी आवड पुरे । विश्वंभरे जवळी ॥२॥ तुका करी नारायण । या या सेवन नामाचें ॥३॥
2933
पुसावें तें ठाईं आपुल्या आपण । अहंकारा शून्य घालूनियां ॥१॥ येर वाग्जाळ मायेचा अहंकार । वचनाशीं थार अज्ञान तें ॥ध्रु.॥ फळ तें चि बीज बीज तें ची फळ । उपनांवें मूळ न पालटे ॥२॥ तुका म्हणे अवघे गव्हांचे प्रकार । सोनें अलंकार मिथ्या नांव ॥३॥
2934
पुसावेंसें हें चि वाटे । जें जें भेटे तयासी ॥१॥ देव कृपा करील मज । काय लाज राखील ॥ध्रु.॥ अवघियांचा विसर जाला । हा राहिला उदेग ॥२॥ तुका म्हणे चिंता वाटे । कोण भेटे सांगेसें ॥३॥
2935
पूजा पुज्यमान । कथे उभे हरिजन ॥१॥ ज्याची कीर्ती वाखाणिती । तेथें ओतली ते मुर्ती ॥ध्रु.॥ देहाचा विसर । केला आनंदें संचार ॥२॥ गेला अभिमान । लाज बोळविला मान ॥३॥ शोक मोह चिंता । याची नेणती ते वार्ता ॥४॥ तुका म्हणे सखे । विठोबा च ते सारिखे ॥५॥
2936
पूजा समाधानें । अतिशयें वाढे सीण ॥१॥ हें तों जाणां तुम्ही संत । आहे बोलिली ते नीत ॥ध्रु.॥ पाहिजे तें केलें । सहज प्रसंगीं घडलें ॥२॥ तुका म्हणे माथा । पायीं ठेवीं तुम्हां संतां ॥३॥
2937
पूज्या एकासनीं आसनीं आसन । बैसतां गमन मातेशीं तें ॥१॥ सांगतों ते धर्म नीतीचे संकेत । सावधान हित व्हावें तरी ॥ध्रु.॥ संतां ठाया ठाव पूजनाची इच्छा । जीवनीं च वळसा सांपडला ॥२॥ तुका म्हणे एकाएकीं वरासनें । दुजें तेथें भिन्न अशोभ्य तें ॥३॥
2938
पूर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या ॥१॥ बांधूं विठ्ठलसांगडी । पोहुनि जाऊं पैल थडी । अवघे जन गडी । घाला उडी भाई नो ॥ध्रु.॥ हें तों नाहीं सर्वकाळ । अमुप अमृतांचें जळ ॥२॥ तुका म्हणे थोरा पुण्यें । ओघ आला पंथें येणें ॥३॥
2939
पूर्वजांसी नकाऩ । जाणें तें आइका ॥१॥ निंदा करावी चाहाडी । मनीं धरूनि आवडी ॥ध्रु.॥ मात्रागमना ऐसी । जोडी पातकांची रासी ॥२॥ तुका म्हणे वाट । कुंभपाकाची ते नीट ॥
2940
पूर्वा बहुतांचे केले प्रतिपाळ । तें मज सकळ श्रुत आहे ॥१॥ अज अविनाश निर्गुण निरामय । विचारिलें काय त्यांचे वेळे ॥ध्रु.॥ तयांचियें वेळे होशी कृपावंत । माझा चि कां अंत पहातोसि ॥२॥ नारद प्रर्‍हाद उपमन्य धुरू । त्यांचा अंगीकारु कैसा केला ॥३॥ अंबॠषीसाटीं गर्भवास जाले । कां गा मोकलिलें कृपासिंधु ॥४॥ धर्माचें उच्छष्टि अर्जुनाचीं घोडीं । आणीक सांकडीं कितीएक ॥५॥ जालासि लुगडीं तया द्रौपदीचीं । न ये कां आमुची कृपा कांहीं ॥६॥ तुका म्हणे कां गा जालासि कठीण । माझा भाग सीण कोण जाणे ॥७॥
2941
पूवाअ पूर्वजांची गती । हे चि आईंकिली होती । सेवे लावूनि श्रीपती । निश्चिंती केली तयांची ॥१॥ कां रे पाठी लागलासी । ऐसा सांग हृषीकेशी । अद्यापवरी न राहासी । अंत पाहासी किती म्हुण ॥ध्रु.॥ जन्मजन्मांतरीं दावा । आम्हां आपणां केशवा । निमित्य चालवा । काईंसयास्तव हें ॥२॥ तुकयाबंधु म्हणे अदेखणा । किती होसी नारायणा । देखों सकवेना । खातयासी न खात्या ॥३॥
2942
पूवाअहूनि बहु भक्त सांभाळिले । नाहीं अव्हेरिले दास कोणी ॥१॥ जेजे शरण आले तेते आपंगिले । पवाडे विठ्ठले ऐसे तुझे ॥ध्रु.॥ मिरवे चरणीं ऐसीये गोष्टीचें । भक्तसांभाळाचें ब्रीद ऐसें ॥२॥ तुका म्हणे आम्हांसाटी येणें रूपा । माझ्या मायबापा पांडुरंगा ॥३॥
2943
पृथक मी सांगों किती । धर्म नीती सकळां ॥१॥ अवघियांचा एक ठाव । शुद्ध भाव विठ्ठलीं ॥ध्रु.॥ क्षराअक्षराचा भाग । करा लाग पंढरीये ॥२॥ तुका म्हणे आगमींचें । मथिलें साचें नवनीत ॥३॥
2944
पेणावलें ढोर मार खाय पाठी । बैसलें तें नुठी तेथूनियां ॥१॥ तैसी माझ्या मना परी जाली देवा । धावें अहंभावा सांडावलों ॥ध्रु.॥ कडां घालीं उडी मागिलांच्या भेणें । मरणामरण न कळे चि ॥२॥ तुका म्हणे जालों त्यापरी दुःखित । असें बोलावीत पांडुरंगा ॥३॥
2945
पैल आला राम रावणासी सांगती । काय निदसुरा निजलासी भूपति ॥१॥ अवघें लंकेमाजी जाले रामाचे दूत । व्यापिलें सर्वत्र बाहेरी भीतरी आंत ॥ध्रु.॥ अवघे अंगलग तुझे वधियेले वीर । होईं शरणागत किंवा युद्धासी सादर ॥२॥ तुका म्हणे ऐक्या भावें रामेसी भेटी । करूनि घेईं आतां संवंघेसी तुटी ॥३॥
2946
पैल आली आगी कान्हो काय रे करावें । न कळे तें कैसें आजि वांचों आम्ही जीवें ॥१॥ धांव रे हरी सांपडलों संधी । वोणव्याचे मधीं बुद्धि कांहीं करावी ॥ध्रु.॥ अवचितां जाळ येतां देखियेला वरी । परतोनि पाहतां आधीं होतों पाठमोरी ॥२॥ सभोंवता फेर रीग न पुरे पळतां । तुका म्हणे जाणसी तें करावें अनंता ॥३॥
2947
पैल आले हरि । शंख चक्र शोभे करीं ॥१॥ गरुड येतो फडत्कारें । ना भी ना भी म्हणे त्वरे ॥ध्रु.॥ मुगुटकुंडलांच्या दीप्ति । तेजें लोपला गभस्ति ॥२॥ मेघश्यामवर्ण हरि । मूर्ति डोळस साजिरी ॥३॥ चुतर्भुज वैजयंती । गळां माळ हे रुळती ॥४॥ पीतांबर झळके कैसा । उजळल्या दाही दिशा ॥५॥ तुका जालासे संतुष्ट । घरा आलें वैकुंठपीठ ॥६॥
2948
पैल घरीं जाली चोरी । देहा करीं बोंब ॥१॥ हाबा हाबा करिसी काये । फिराऊनि नेट्यां वायें ॥ध्रु.॥ सांडुनियां शुद्धी । निजलासी गेली बुद्धी ॥२॥ चोरीं तुझा काढला बुर । वेगळें भावा घातलें दूर ॥३॥ भलतियासी देसी वाव । लाहेसि तूं एवढा ठाव ॥४॥ तुका म्हणे अझुनि तरी । उरलें तें जतन करीं ॥५॥
2949
पैल दिसतील भार । दिंडी पताका अपार ॥१॥ आला पंढरीचा राणा । दिसतील त्याच्या खुणा । सुख वाटे मना । डोळे बाह्या स्फुरती ॥ध्रु.॥ उठिले गजर नामाचे । दळभार वैष्णवांचे ॥२॥ तुका करी रिता ठाव । त्यांसी बैसावया वाव ॥३॥
2950
पैल सांवळें तेज पुंजाळ कैसें । सिरीं तुर्बिलीं साजिरीं मोरवीसें । हरे त्यासि रे देखतां ताप माया । भजा रे भजा यादव योगिराया ॥१॥ जया कामिनी लुब्धल्या सहस्रसोळा । सुकुमार या गोपिका दिव्य बाळा । शोभे मध्यभागीं कळा चंद्रकोटी । रुपा मीनली साजिरी माळकंठीं ॥२॥ असे यादवां श्रेष्ठ हा चक्रपाणी । जया वंदिती कोटि तेहतीस तीन्ही । महाकाळ हे कांपती दैत्य ज्यासी । पाहा सांवळें रूप हें पापनासी ॥३॥ कसीं पाउलें साजिरीं कुंकुमाचीं । कसी वीट हे लाधली दैवांची। जया चिंतितां अग्नि हा शांति नीवे । धरा मानसीं आपला देहभाव ॥४॥ मुनी देखतां मूख हें चित्त ध्याय । देह मांडला भाव हा बापमाय। तुक्या लागलें मानसीं देवपीसें । चित्त चोरटें सांवळें रूप कैसें ॥५॥
2951
पोट धालें आतां जीवनीं आवडी । पुरवावे परवडी बहुतांचे ॥१॥ काय आंचवणा तांतडीचें काम । मागील तीं श्रम न पवावीं ॥ध्रु.॥ वाढितिया पोटीं बहु असे वाव । सांभाळितां ठाव काय वांचे ॥२॥ दाविल्यावांचूनि नाहीं कळों येत । तेथें ही दुश्चित एकपणें ॥३॥ नावेचा भार तो उदकाचे शिरीं । काय हळू भारी तये ठायीं ॥४॥ तुका म्हणे गीतीं गाऊनि गोविंद । करूं ब्रम्हानंद एकसरें॥५॥
2952
पोट धालें मग न लगे परती । जालिया निश्चिंती खेळ गोड ॥१॥ आपुलिया हातें देईं वो कवळ । विठ्ठल शीतळ जीवन वरी ॥ध्रु.॥ घराचा विसर होईंल आनंद । नाचेन मी छंदें प्रेमाचिया ॥२॥ तुका म्हणे तों च वरी करकर । मग हें उत्तर खंडईंल ॥३॥
2953
पोट लागलें पाठीशीं । हिंडवितें देशोदेशीं ॥१॥ पोटाभेणें जिकडे जावें । तिकडे पोट येतें सवें ॥ध्रु.॥ जप तप अनुष्ठान । पोटासाटीं जाले दीन ॥२॥ पोटें सांडियेली चवी । नीचापुढें तें नाचवी ॥३॥ पोट काशियानें भरे । तुका म्हणे झुरझुरूं मरे ॥४॥ आरत्या ॥ १३ ॥
2954
पोटाचे ते नट पाहों नये छंद । विषयांचे भेद विषयरूप ॥१॥ अर्थ परमार्थ कैसा घडों सके । चित्त लोभी भीके सोंग वांयां ॥ध्रु.॥ देवाचीं चरित्रें दाखविती लीळा । लाघवाच्या कळा मोहावया ॥२॥ तुका म्हणे चित्तीं राहे अभिळास । दोघां नरकवास सारिखा चि ॥३॥
2955
पोटापुरतें काम । परि अगत्य तो राम ॥१॥ कारण तें हें चि करीं । चित्तीं पांडुरंग धरीं ॥ध्रु.॥ प्रारब्धी हेवा । जोडी देवाची ते सेवा ॥२॥ तुका म्हणे बळ । बुद्धी वेचूनि सकळ ॥३॥
2956
पोटासाठीं खटपट करिसी अवघा वीळ । राम राम म्हणतां तुझी बसली दांतखीळ ॥१॥ हरिचें नाम कदाकाळीं कां रे नये वाचे । म्हणतां राम राम तुझ्या बाचें काय वेचें ॥ध्रु.॥ द्रव्याचिया आशा तुजला दाही दिशा न पुरती । कीर्तनासी जातां तुझी जड झाली माती ॥२॥ तुका म्हणे ऐशा जीवा काय करूं आता । राम राम न म्हणे त्याचा गाढव मातापिता ॥३॥
2957
पोटीं जन्मती रोग । तरि कां म्हणावे आप्तवर्ग ॥१॥ रानीं वसती औषधी । तरि कां म्हणाव्या निपराधी ॥२॥ तैसें शरीराचें नातें । तुका म्हणे सर्व आप्तें ॥३॥
2958
पोटीं शूळ अंगीं उटी चंदनाची । आवडी सुखाची कोण तया ॥१॥ तैसें मज कां गा केलें पंढरिराया । लौकिक हा वांयां वाढविला ॥ध्रु.॥ ज्वरिलियापुढें वाढिलीं मिष्टान्नें । काय चवी तेणें घ्यावी त्याची ॥२॥ तुका म्हणे मढें शृंगारिलें वरी । ते चि जाली परी मज देवा ॥३॥
2959
पोरा लागलीसे चट । धरी वाट देवळाची ॥१॥ सांगितलें नेघे कानीं । दुजें मनी विठ्ठल ॥ध्रु.॥ काम घरीं न करी धंदा । येथें सदा दुश्चित्त ॥२॥ आमुचे कुळीं नव्हतें ऐसें । हें चि पिसें निवडलें ॥३॥ लौकिकाची नाहीं लाज । माझें मज पारिखें ॥४॥ तुका म्हणे नरका जाणें । त्या वचनें दुष्टाचीं ॥५॥
2960
प्रगट व्हावें हे अज्ञानवासना । माझी नारायणा हीनबुद्धि ॥१॥ खाणीवाणी होसी काष्टीं तूं पाषाणीं । जंतु जीवाजनीं प्रसद्धि हा ॥ध्रु.॥ ज्ञानहीन तुज पाहें अल्पमति । लहान हा चित्ती धरोनियां ॥२॥ परि तूं कृपाळ होसी देवराणा । ब्रिदें तुझीं जना प्रसिद्ध हें ॥३॥ उतावीळ बहु भक्तांचिया काजा । होसी केशीराजा तुका म्हणे ॥४॥
2961
प्रगटलें ज्ञान । नारायण भूतीं तें ॥१॥ अनुभव च घेऊं व्हावा । विनंती देवा करूनियां ॥ध्रु.॥ देखोवेखीं वदे वाणी । पडिल्या कानीं प्रमाणें ॥२॥ तुका म्हणे योगक्षेम । घडे तें वर्म साधावें ॥३॥
2962
प्रजन्यें पडावें आपुल्या स्वभावें । आपुलाल्या दैवें पिके भूमि ॥१॥ बीज तें चि फळ येईंल शेवटीं । लाभहानितुटी ज्याची तया ॥ध्रु.॥ दीपाचिये अंगीं नाहीं दुजाभाव । धणी चोर साव सारिखे चि ॥२॥ काउळें ढोंपरा ककर तित्तिरा । राजहंसा चारा मुक्ताफळें ॥३॥ तुका म्हणे येथें आवडी कारण । पिकला नारायण जयां तैसा ॥४॥
2963
प्रजी तो पाईंक ओळीचा नाईंक । पोटासाटीं एकें जैशीं तैशीं ॥१॥ आगळें पाऊल आणिकांसी तरी । पळती माघारीं तोडिजेती ॥ध्रु.॥ पाठीवरी घाय म्हणती फटमर । धडा अंग शूर मान पावे ॥२॥ घेईंल दरवडा देहा तो पाईंक । मारी सकळीक सर्व हरी ॥३॥ तुका म्हणे नव्हे बोलाचें कारण । कमाईंचा पण सिद्धी पावे ॥४॥
2964
प्रथम नमन तुज एकदंता । रंगीं रसाळ वोडवीं कथा । मति सौरस करीं प्रबळता । जेणें फिटे आतां अंधकार ॥१॥ तुझिये कृपेचें भरितें । आणीक काय राहिलें तेथें । मारग सिद्धाच्यानि पंथें । पावविसी तेथें तूं चि एक ॥ध्रु.॥ आरंभा आदि तुझें वंदन । सकळ करितां कारण । देव ॠषि मुनि आदिकरुन । ग्रंथ पुराण निर्माणी ॥२॥ काय वणूप तुझी गती । एवढी कैची मज मती । दिनानाथ तुज म्हणती करी । करीं सत्य वचन हें चि आपुलें ॥३॥ मज वाहावतां मायेच्या पुरीं । बुडतां डोहीं भवसागरीं । तुज वांचुनि कोण तारी । पाव झडकरी तुका म्हणे ॥४॥
2965
प्रथमारंभीं लंबोदर । सकळ सिद्धींचा दातार । चतुर्भुज फरशधर । न कळे पार वर्णितां ॥१॥ तो देव नटला गौरीबाळ । पायीं बांधोनि घागर्‍यां घोळ । नारदतुंबरसहित मेळ । सुटला पळ विघ्नांसी ॥२॥ नटारंभी थाटियला रंग । भुजा नाचवी हालवी अंग । सेंदुरविलेपनें चांग । मुगुटीं नाग मिरविला ॥३॥ जया मानवतीदेव ॠषि मुनी । पाहातां न पुरें डोळियां धनी । असुर जयाच्या चरणीं । आदीं अवसानीं तो चि एक ॥४॥ सकळां सिद्धींचा दातार । जयाच्या रूपा नाहीं पार । तुका म्हणे आमुचा दातार । भवसागर तारील हा ॥५॥
2966
प्रपंच परमार्थ संपादोनि दोन्ही । एक ही निदानीं न घडे त्यासी ॥१॥ दोहीं पेंवावरी ठेवूं जातां हात । शेवटीं अपघात शरीराचा ॥२॥ तुका म्हणे तया दोहींकडे धका । शेवटीं तो नरकामाजी पडे ॥३॥
2967
प्रपंच वोसरो । चत्ति तुझे पायीं मुरो ॥१॥ ऐसें करिं गा पांडुरंगा । शुद्ध रंगवावें रंगा ॥ध्रु.॥ पुरे पुरे आतां । नको दुजियाची सत्ता ॥२॥ लटिकें तें फेडा । तुका म्हणे जाय पीडा ॥३॥
2968
प्रपंचाची पीडा सोसिती अघोरी । जया क्षणभरी नाम नये ॥१॥ नाम नाठविती आत्मया रामाचें । धिग जिणें त्याचें भवा मूळ ॥ध्रु.॥ मूळ ते पापाचें आचरण तयाचें । नाहीं राघवाचें स्मरण त्या ॥२॥ स्मरण भजन नावडे जयासी । आंदणीया दासी यमदूतां ॥३॥ चिंतन रामाचें न करी तो दोषी । एकांत तयासीं बोलों नये ॥४॥ नये त्याचा संग धरूं म्हणे तुका । धरितां पातका वांटेकरी ॥५॥
2969
प्रमाण हें त्याच्या बोला । देव भक्तांचा अंकिला ॥१॥ न पुसतां जातां नये । खालीं बैसतां ही भिये ॥ध्रु.॥ अवघा त्याचा होत । जीव भावाही सहित ॥२॥ वदे उपचाराची वाणी । कांहीं माग म्हणऊनि ॥३॥ उदासीनाच्या लागें । तुका म्हणे धांवे मागें ॥४॥
2970
प्रल्हादाकारणें नरसिंहीं जालासी । त्याचिया बोलासी सत्य केलें ॥१॥ राम कृष्ण गोविंदा नारायणा हरि । गर्जे राजद्वारीं भक्तराज ॥ध्रु.॥ विठ्ठल माधव मुकुंद केशव । तेणें दैत्यराव दचकला ॥२॥ तुका म्हणे तयां कारणें सगुण । भक्तांचें वचन सत्य केलें ॥३॥
2971
प्रवृत्तिनिवृत्तीचे आटूनियां भाग । उतरिलें चांग रसायण ॥१॥ ज्ञानाग्निहुताशीं कडशिले वोजा । आत्मसिद्धिकाजा लागूनियां ॥ध्रु.॥ ब्रम्हीं ब्रम्हरस शीघ्र जाला पाक । घेतला रुचक प्रतीतीमुखें ॥२॥ स्वानुभवें अंगीं जाला समरस । साधनी निजध्यास ग्रासोग्रासीं ॥३॥ अरोग्यता तुका पावला अष्टांगीं । मिरविला रंगीं निजात्मरंगें ॥४॥
2972
प्रसद्धि हा असे जगा । अवघ्या रंगारंगाचा ॥१॥ तरी वाटा न वजे कोणी । नारायणीं घरबुडी ॥ध्रु.॥ बहुतां ऐसें केलें मागें । लाग लागें लागेना ॥२॥ हो कां नर अथवा नारी । लाहान थोरीं आदर ॥३॥ जालें वेगळें लोकीं पुरे । मग नुरे समूळ ॥४॥ कळेना तो आहे कैसा । कोणी दिशा बहु थोडा ॥५॥ तुका म्हणे दुसर्‍या भावें । छायें नावें न देखवे ॥६॥
2973
प्राक्तनाच्या योगें आळशावरी गंगा । स्नान काय जगा करूं नये ॥१॥ उभी कामधेनु मागिलें अंगणीं । तिसी काय ब्राम्हणीं वंदूं नये ॥ध्रु.॥ कोढियाचे हातें परिसें होय सोनें । अपवित्र म्हणोन घेऊं नये ॥२॥ यातिहीन जाला गांवींचा मोकासी । त्याच्या वचनासी मानूं नये ॥३॥ भावारूढ तुका मुद्रा विठोबाची । न मनी तयांचीं तोंडें काळीं ॥४॥
2974
प्राण समर्पिला आम्ही । आतां उशीर कां स्वामी ॥१॥ माझें फेडावें उसणें । भार न मना या ॠणें ॥ध्रु.॥ जाला कंठस्फोट। जवळी पातलों निकट ॥२॥ तुका म्हणे सेवा । कैसी बरी वाटे देवा ॥३॥
2975
प्राणियां एक बीजमंत्र उच्चारीं । प्रतिदिनीं रामकृष्ण म्हण कां मुरारि ॥१॥ हें चि साधन रे तुज सर्व सिद्धीचे । नाम उच्चारीं पां गोपाळाचें वाचे ॥ध्रु.॥ उपास पारणें न लगे वनसेवन । न लगे धूम्रपान पंचाअग्नतापन ॥२॥ फुकाचें सुखाचें कांहीं न वेचें भांडार । कोटी यज्ञां परिस तुका म्हणे हें सार ॥३॥
2976
प्रायिश्चत्तें देतो तुका । जातो लोकां सकळां ॥१॥ धरितील ते तरती मनीं । जाती घाणी वांयां त्या ॥ध्रु.॥ निग्रहअनुग्रहाचे ठाय । देतो घाय पाहोनि ॥२॥ तुका जाला नरसिंहीं । भय नाहीं कृपेनें ॥३॥
2977
प्रारब्ध क्रियमाण । भक्तां संचित नाहीं जाण ॥१॥ अवघा देव चि जाला पाहीं । भरोनियां अंतर्बाहीं ॥ध्रु.॥ सत्वरजतमबाधा । नव्हे हरिभक्तांसि कदा ॥२॥ खाय बोले करी । अवघा त्यांच्या अंगें हरी ॥३॥ देवभक्तपण । तुका म्हणे नाहीं भिन्न ॥४॥
2978
प्रारब्धा हातीं जन । सुख सीण पावतसे ॥१॥ करितां घाईळाचा संग । अंगें अंग माखावें ॥ध्रु.॥ आविसा अंगें पीडा वसे । त्यागें असे बहु सुख ॥२॥ तुका म्हणे जीव भ्याला । अवघ्या आला बाहेरी ॥३॥
2979
प्रारब्धें चि जोडे धन । प्रारब्धें चि वाडे मान ॥१॥ सोस करिसी वांयां । भज मना पंढरीराया ॥ध्रु.॥ प्रारब्धें चि होय सुख। प्रारब्धें चि पावे दुःख ॥२॥ प्रारब्धें चि भरे पोट । तुका करीना बोभाट ॥३॥
2980
प्रीति करी सत्ता । बाळा भीती मातापिता ॥१॥ काय चाले त्याशीं बळ । आळी करितां कोल्हाळ ॥ध्रु.॥ पदरीं घाली मिठी । खेदी मागें पुढें लोटी ॥२॥ बोले मना आलें । तुका साहिला विठ्ठलें ॥३॥
2981
प्रीति नाही राया वर्जिली ते कांता । परी तिची सत्ता जगावरी ॥१॥ तैसे दंभी जालों तरी तुझे भक्त । वास यमदूत न पाहाती ॥ध्रु.॥ राजयाचा पुत्र अपराधी देखा । तो काय आणिकां दंडवेल ॥२॥ बाहातरी खोडी परी देवमण कंठीं । तैसो जगजेठी म्हणे तुका ॥३॥
2982
प्रीतिचिया बोला नाहीं पेसपाड । भलतसें गोड करूनि घेईं ॥१॥ तैसें विठ्ठलराया तुज मज आहे । आवडीनें गायें नाम तुझें ॥ध्रु.॥ वेडे वांकडे बाळकाचे बोल । करिती नवल मायबाप ॥२॥ तुका म्हणे तुज येवो माझी दया । जीवींच्या सखया जिवलगा ॥३॥
2983
प्रीतिभंग माझा केला पांडुरंगा । भक्तिरस सांगा कां जी तुम्हीं ॥१॥ म्हणऊनि कांहीं न ठेवीं चि उरी । आलों वर्मावरी एकाएकीं ॥ध्रु.॥ न देखों चि कांहीं परती माघारी । उरली ते उरी नाहीं मुळीं ॥२॥ तुका म्हणे आला अंतरासी खंड । तरि माझें तोंड खविळलें ॥३॥
2984
प्रीतीचा कलहे पदरासी घाली पीळ । सरों नेदी बाळ मागें पुढें पित्यासी ॥१॥ काय लागे त्यासी बळ हेडावितां कोण काळ । गोवितें सबळ जाळीं स्नेहसूत्राचीं ॥ध्रु.॥ सलगी दिला लाड बोले तें तें वाटे गोड । करी बुझावोनि कोड हातीं देऊनि भातुकें ॥२॥ तुका म्हणे बोल कोणा हें कां नेणां नारायणा । सलगीच्या वचना कैचें उपजे विषम ॥३॥
2985
प्रीतीचा तो कळवळा । जिव्हाळाचि वेगळा ॥१॥ बहु नेदी रडों माता । दुश्चित होतां धीर नव्हे ॥ध्रु.॥ वरी वरी तोंडापुरतें । मोहोरी तें कळतसे ॥२॥ जाणोनियां नेणता तुका । नव्हे लोकांसारिखा ॥३॥
2986
प्रीतीच्या भांडणा नाहीं शिरपाव । वचनाचे चि भाव निष्ट‍ता ॥१॥ जीणें तरी एका जीवें उभयता । पुत्राचिया पिता दुखवे दुःखें ॥ध्रु.॥ काय जाणे तुटों मायेचें लिगाड । विषम तें आड उरों नेणें ॥२॥ तुका म्हणे मज करुणा उत्तरें । करितां विश्वंभरे पाविजैल ॥३॥
2987
प्रेम अमृताची धार । वाहे देवा ही समोर ॥१॥ उर्ध्ववाहिनी हरिकथा । मुगुटमणि सकळां तीर्थां ॥ध्रु.॥ शिवाचें जीवन । जाळी महादोष कीर्तन ॥२॥ तुका म्हणे हरि । इची स्तुति वाणी थोरी ॥३॥
2988
प्रेम जडलें तुझे पायीं । आणीक न सुचे मजला कांहीं ॥१॥ रात्रीदिवस तुझें ध्यान । तें चि माझें अनुष्ठान ॥ध्रु.॥ नामापरतें नेणें दुजें । ऐसें कळलें मजला निज ॥२॥ तुका म्हणे अंतकाळीं । आम्हां सोडवीं तात्काळीं ॥३॥
2989
प्रेम तेथें वास करी । मुखीं उच्चारितां हरी ॥१॥ प्रेम यावें तया गांवा । चोजवीत या वैष्णवां ॥ध्रु.॥ प्रेमें पाठी लागे बळें । भक्त देखोनियां भोळे ॥२॥ प्रेम न वजे दवडितां । शिरे बळें जेथें कथा ॥३॥ तुका म्हणे थोर आशा । प्रेमा घरीं विष्णुदासां ॥४॥
2990
प्रेम देवाचें देणें । देहभाव जाय जेणें । न धरावी मनें । शुद्धी देशकाळाची ॥१॥ मुH लज्जाविरहित । भाग्यवंत हरिभक्त। जाले वोसंडत । नामकीर्तिपवाडे ॥ध्रु.॥ जोडी जाली अविनाश । जन्मोनि जाले हरिसे दास । त्यांस नव्हे गर्भवास । परब्रम्हीं सौरस ॥२॥ हे चि वाहाती संकल्प । पुण्यप्रसंगाचे जप । तुका म्हणे पाप । गांवीं नाहीं हरिजना ॥३॥
2991
प्रेम नये सांगतां बोलतां दावितां । अनुभव चित्ता चित्त जाणे ॥१॥ कासवीचें बाळ वाढे कृपादृष्टी । दुधा नाहीं भेटी अंगसंगें ॥ध्रु.॥ पोटामध्यें कोण सांगितलें सर्पां । उपजत लपा म्हणऊनि ॥२॥ बोलों नेणें परी जाणे गोड क्षार । अंतरीं विचार त्यासी ठावा ॥३॥ तुका म्हणे बरें विचारावें मनीं । आणिक भल्यांनी पुसों नये ॥४॥
2992
प्रेमअमृतें रसना ओलावली । मनाची राहिली वृत्ति पायीं ॥१॥ सकळ ही तेथें वोळलीं मंगळें । वृष्टि केली जळें आनंदाच्या ॥ध्रु.॥ सकळ इंद्रियें जालीं ब्रम्हरूप । ओतलें स्वरूप माजी तया ॥२॥ तुका म्हणे जेथें वसे भक्तराव । तेथें नांदे देव संदेह नाहीं ॥३॥
2993
प्रेमभेटी आळिंगण । मग चरण वंदावे ॥१॥ ऐसामाझा भोळा बाप । हरी ताप कवळोनि ॥ध्रु.॥ न संगतां सीण भाग । पांडुरंग जाणतसे ॥२॥ तुका म्हणे कृपावंतें । द्यावें, भातें न मागतां ॥३॥
2994
प्रेमसूत्र दोरी । नेतो तिकडे जातों हरी ॥१॥ मनेंसहित वाचा काया । अवघें दिलें पंढरीराया ॥ध्रु.॥ सत्ता सकळ तया हातीं । माझी कींव काकुलती ॥२॥ तुका म्हणे ठेवी तैसें । आम्ही राहों त्याचे इच्छे ॥३॥
2995
फजितखोरा मना किती तुज सांगों । नको कोणा लागों मागें मागें ॥१॥ स्नेहवादें दुःख जडलेंसे अंगीं । निष्ठ‍ हें जगीं प्रेमसुख ॥ध्रु.॥ निंदास्तुती कोणी करो दयामया । न धरीं चाड या सुखदुःखें ॥२॥ योगिराज कां रे न राहाती बैसोनी । एकिये आसनीं या चि गुणें ॥३॥ तुका म्हणे मना पाहें विचारून । होई रे कठिण वज्राऐसें ॥४॥
2996
फटएाचे बडबडे चवी ना संवाद । आपुला चि वाद आपणासी ॥१॥ कोणें या शब्दाचे मरावें घाणी । अंतरें शाहाणी राहिजे हो ॥ध्रु.॥ गाढवाचा भुंक आइकतां कानीं । काय कोडवाणी ऐसियेचें ॥२॥ तुका म्हणे ज्यासी करावें वचन । त्याचे येती गुण अंगास ते ॥३॥
2997
फटकाळ देव्हारा फटकाळ अंगारा । फटकाळ विचारा चालविलें ॥१॥ फटकाळ तो देव फटकाळ तो भक्त । करवितो घात आणिका जीवा ॥२॥ तुका म्हणे अवघें फटकाळ हें जन । अनुभविये खूण जाणतील ॥३॥
2998
फल पाया तो खुस भया । किन्होसुं न करे बाद । बान न देखे मिरगा रे । चित्त मिलाया नाद ॥१॥
2999
फळ देंठींहून झडे । मग मागुतें न जोडे ॥१॥ म्हणोनि तांतडी खोटी । कारण उचिताचे पोटीं ॥ध्रु.॥ पुढें चढे हात । त्याग मागिलां उचित ॥२॥ तुका म्हणे रणीं । नये पाहों परतोनि ॥३॥
3000
फळ पिके देंठीं । निमित्य वारियाची भेटी ॥१॥ हा तों अनुभव रोकडा । कळों येतो खरा कुडा ॥ध्रु.॥ तोडिलिया बळें । वांयां जाती काचीं फळें ॥२॥ तुका म्हणे मन । तेथे आपुलें कारण ॥३॥
3001
फळकट तो संसार । येथें सार भगवंत ॥१॥ ऐसें जागवितों मना । सरसें जनासहित ॥ध्रु.॥ अवघें निरसूनि काम । घ्यावें नाम विठोबाचें ॥२॥ तुका म्हणे देवाविण । केला सीण तो मिथ्या ॥३॥
3002
फळाची तों पोटीं । घडे वियोगें ही भेटी ॥१॥ करावें चिंतन । सार तें चि आठवण ॥ध्रु.॥ चित्त चित्ती ग्वाही । उपचारें चाड नाहीं ॥२॥ तुका म्हणे देवा । पावे अंतरींची सेवा ॥३॥
3003
फावलें तुम्हां मागें । नवतों लागें पावलों ॥१॥ आलों आतां उभा राहें । जवळी पाहें सन्मुख ॥ध्रु.॥ घरीं होती गोवी जाली । कामें बोली न घडे चि ॥२॥ तुका म्हणे धडफुडा । जालों झाडा देई देवा ॥३॥
3004
फिरंगी वाखर लोखंडाचे विळे । परि ते निराळे गुणमोल ॥१॥ पायरी प्रतिमा एक चि पाषाण । परि तें महिमान वेगळालें ॥२॥ तुका म्हणे तैशा नव्हतील परी । संतजना सरी सारिखिया ॥३॥
3005
फिरविलें देऊळ जगामाजी ख्याति । नामदेवा हातीं दुध प्याला ॥१॥ भरियेली हुंडी नरसी महत्याची । धनाजीजाटाचींसेतें पेरी ॥ध्रु.॥ मिराबाईंसाटीं घेतों विष प्याला । दामाजीचा जाला पाढेवार ॥२॥ कबीराचे मागीं विणूं लागे सेले । उठविलें मूल कुंभाराचें ॥३॥ आतां तुम्ही दया करा पंढरिराया । तुका विनवी पायां नमीतसे ॥४॥
3006
फिराविलीं दोनी । कन्या आणि चक्रपाणी ॥१॥ जाला आनंदें आनंद । अवतरले गोविंद ॥ध्रु.॥ तुटलीं बंधनें । वसुदेवदेवकीचीं दर्शनें ॥२॥ गोकुळासी आलें । ब्रम्ह अव्यक्त चांगलें ॥३॥ नंद दसवंती । धन्य देखिले श्रीपती ॥४॥ निशीं जन्मकाळ । आले अष्टमी गोपाळ ॥५॥ आनंदली मही । भार गेला सकळ ही ॥६॥ तुका म्हणे कंसा । आट भोविला वळसा ॥७॥
3007
फुकाचें तें लुटा सार । व्हा रे अमर सदैव ॥१॥ नाहीं गर्भवास पुढती । डोंगर जळती दोषांचे ॥ध्रु.॥ उदंड भावें उदंड घ्यावें । नाम गावें आवडी ॥२॥ तुका म्हणे घरिच्या घरीं । देशा उरीं न सीणीजे ॥३॥
3008
फुगडी फू फुगडी घालितां उघडी राहे । लाज सांडोनि एक एकी पाहे ॥१॥ फुगडी गे अवघें मोडी गे । तरीच गोडी गे संसार तोडी गे ॥ध्रु.॥ मागें जें शिकली होतीस पोटीं । तें चि विचारूनि आतां उच्चारी ओठीं ॥२॥ त्रिगुणांची वेणी तुझे उडते पाठीं । सावरूनि धरी घाली मूळबंदीं गांठी ॥३॥ आगळें पाउल जिंके एकाएक । पावसी मान हे मानवती तिन्ही लोक ॥४॥ तुका म्हणे तुजमजमध्यें एक भाव । सम तुकें बार घेऊं पावों उंच ठाव ॥५॥
3009
फुगडी फू सवती माझे तूं । हागुनि भरलें धू तुझ्या ढुंगा तोंडावरि ॥१॥ फुगडी घेतां आली हरी । ऊठ जावो जगनोवरी ॥ध्रु.॥ हातपाय बेंबळ जाती । ढुंगण घोळितां लागे माती ॥२॥ सात पांच आणिल्या हरी । वांचुनी काय तगसी पोरी ॥३॥ सरला दम पांगले पाय । आझुनि वरी घोळिसी काय ॥४॥ तुका म्हणे आझुन तरी । सांगितलें तें गधडी करी ॥५॥ लखोटा - अभंग १
3010
फोडिलें भांडार । माप घेऊनियां खरें ॥१॥ केली हरिनामाची वरो । मागितलें आतां सरो ॥ध्रु.॥ देशांत सुकाळ । जाला हारपला काळ ॥२॥ घ्यावें धणीवरी । तुका म्हणे लाहान थोरीं ॥३॥
3011
फोडुनि सांगडी बांधली माजासी । पैल थडी कैसी पावे सहजीं ॥१॥ आपला घात आपण चि करी । आणिकां सांगतां नाइके तरी ॥ध्रु.॥ भुकेभेणें विष देऊ पाहे आतां । आपल्या चि घाता करूं पाहे ॥२॥ तुका म्हणे एक चालतील पुढें । तयांसी वांकडें जातां ठके ॥३॥
3012
बंधनाचा तोडूं फांसा । देऊं आशा टाकोनि ॥१॥ नाहीं तें च घेतां शिरीं । होइल दुरी निजपंथ ॥ध्रु.॥ नाथिलें चि माझें तुझें । कोण वोझें वागवी ॥२॥ तुका म्हणे अंतराय । देवीं काय जिणें तें ॥३॥
3013
बरगासाटीं खादलें शेण । मळितां अन्न न संडी ॥१॥ फजित तो केला आहे । ताडण साहे गौरव ॥ध्रु.॥ ओढाळाची ओंगळ ओढी । उगी खोडी नवजाय ॥२॥ तुका फजीत करी बुच्या । विसरे कुच्या खोडी तेणें ॥३॥
3014
बरवयांबरवंट । विटे चरण सम नीट ॥१॥ ते म्या हृदयीं धरिले । तापशमन पाउलें ॥ध्रु.॥ सकळां तीर्थां अधिष्ठान । करी लक्षुमी संवाहन ॥२॥ तुका म्हणे अंतीं । ठाव मागितला संतीं ॥३॥
3015
बरवा झाला वेवसाव । पावलों चिंतिला चि ठाव । दृढ पायीं राहिला भाव । पावला जीव विश्रांती ॥१॥ बरवा फळला शकुन । अवघा निवारिला सिण । तुमचें जालिया दरुषण । जन्ममरण नाहीं आता ॥ध्रु.॥ बरवें जालें आलों या ठाया । होतें संचित ठायींच पाया । देहभाव पालटली काया । पडली छाया ब्रम्हींची ॥२॥ जोडिलें न सरे हें धन । अविनाश आनंदघन । अमूर्तमूर्ति मधुसूदन । सम चरण देखियेले ॥३॥ जुनाट जुगादिचें नाणें । बहुता काळाचें ठेवणें । लोपलें होतें पारिखेपणें । ठावचळण चुकविला ॥४॥ आतां या जीवाचियासाठीं । न सुटे पडलिया मिठी । तुका म्हणे सिणलों जगजेठी । न लगो दिठी दुसर्‍याची ॥५॥
3016
बरवा बरवा बरवा रे देवा तूं । जीवाहूनी आवडसी जीवा रे देवा तूं ॥१॥ पाहातां वदन संतुष्ट लोचन । जाले आइकतां गुण श्रवण रे देवा ॥ध्रु.॥ अष्टै अंगें तनु त्रिविध ताप गेला सीण । वर्णितां लक्षण रे देवा ॥२॥ मन जालें उन्मन अनुपम ग्रहण । तुकयाबंधु म्हणे महिमा नेणें रे ॥३॥
3017
बरवी नामावळी । तुझी महादोषां होळी ॥१॥ जालें आम्हांसी जीवन । धणीवरि हें सेवन ॥ध्रु.॥ सोपें आणि गोड । किती अमृता ही वाड ॥२॥ तुका म्हणे अच्युता । आमचा कल्पतरु दाता ॥३॥
3018
बरवी हे वेळ सांपडली संधि । साह्य जाली बुद्धि संचितासी ॥१॥ येणें पंथें माझीं चालिलीं पाउलें । दरुषण जालें संतां पायीं ॥ध्रु.॥ त्रासिलें दरिद्रें दोषा जाला खंड । त्या चि काळें पिंड पुनीत जाला ॥२॥ तुका म्हणे जाला अवघा व्यापार । आली वेरझार फळासी हे ॥३॥
3019
बरवे दुकानीं बैसावें । श्रवण मनन असावें ॥१॥ सारासाराचीं पोतीं । ग्राहिक पाहोनि करा रितीं ॥ध्रु.॥ उगे चि फुगों नका गाल । पूर्ण सांठवावा माल ॥२॥ सत्य तराजू पैं धरा । नका कुडत्रिम विकरा ॥३॥ तुका जाला वाणी । चुकवुनि चौर्‍यासीच्या खाणी ॥४॥
3020
बरवें ऐसें आलें मना । नारायणा या काळें ॥१॥ देव आम्हा प्राणसखा । जालें दुःखा खंडण ॥ध्रु. ॥ जन्मांतरिंच्या पुण्यरासी । होत्या त्यांसी फळ आलें ॥२॥ तुका म्हणे निजठेवा । होईंल हेवा लाधलों ॥३॥
3021
बरवें जालें लागलों कारणीं । तुमचे राहिलों चरणीं । फेडीन संतसंगती धणी । गर्जइल गुणीं वैखरी ॥१॥ न वंचें शरीर सेवेसी । काया वाचा आणि मनेसीं । जालों संताची अंदणी दासी । केला याविशीं निर्धार ॥ध्रु.॥ जीवनीं राखिला जिव्हाळा । जालों मी मजसी निराळा । पंचभूतांचा पुतळा । सहज लीळा वर्ततसे ॥२॥ जयाचें जया होईल ठावें । लाहो या साधियेला भावें । ऐसें होतें राखियलें जीवें । येथूनि देवें भोवहुनी ॥३॥ आस निरसली ये खेपे । अवघे पंथ जाले सोपे । तुमचे दीनबंधु कृपें । दुसरें कांपे सत्ताधाकें ॥४॥ अंकिले पणें आनंदरूप । आतळों नये पुण्यपाप । सारूनि ठेविले संकल्प । तुका म्हणे आपें आप एकाएकीं ॥५॥
3022
बरवें झालें आलों जन्मासी । जोड जोडिली मनुष्य देहा ऐसी । महा लाभाची उत्तम रासी । जेणें सुखासी पात्र होइजे ॥१॥ दिलीं इंद्रियें हात पाय कान । डोळे मुख बोलावया वचन । जेणें तूं जोडसी नारायण । नासे जीवपण भवरोग ॥ध्रु.॥ तिळेंतीळ पुण्य सांचा पडे । तरि हें बहुतां जन्मीं जोडे । नाम तुझें वाचेसी आतुडे । समागम घडे संतांचा ॥२॥ ऐसिये पावविलों ठायीं । आतां मी कांई होऊं उतराई । येवढा जीव ठेवीन पायीं । तूं माझे आई पांडुरंगे ॥३॥ फेडियेला डोळियांचा कवळ । धुतला गुणदोषांचा मळ । लावूनि स्तनीं केलों सीतळ । निजविलों बाळ निजस्थानीं ॥४॥ नाहीं या आनंदासी जोडा । सांगतां गोष्टी लागती गोडा । आला आकारा आमुच्या चाडा । तुका म्हणे भिडा भक्तिचिया ॥५॥
3023
बरवें देशाउर जालें । काय बोलें बोलावें ॥१॥ लाभें लाभ दुणावला । जीव धाला दरुषणें ॥ध्रु.॥ भाग्यें जाली संतभेटी । आवडी पोटीं होती ते ॥२॥ तुका म्हणे श्रम केला । अवघा आला फळासी ॥३॥
3024
बरवें बरवें केलें विठोबा बरवें । पाहोनि आंत क्षमा अंगी कांटीवरी मारविलें ॥१॥ शिव्या गाळी नीत नाहीं । बहु फार विटंबिलें ॥२॥ तुका म्हणे क्रोधा हातीं । सोडवूनि घेतलें रे ॥३॥
3025
बरवें माझ्या केलें मनें । पंथें येणें निघालें ॥१॥ अभयें च जावें ठाया । देवराया प्रतापें ॥ध्रु.॥ साधनाचा न लगे पांग । अवघें सांग कीर्तन ॥२॥ तुका म्हणे सत्ता थोरी । कोण करी खोळंबा ॥३॥
3026
बरा कुणबी केलों । नाहीं तरि दंभेंचि असतों मेलों ॥१॥ भलें केलें देवराया । नाचे तुका लागे पायां ॥ध्रु.॥ विद्या असती कांहीं । तरी पडतों अपायीं ॥२॥ सेवा चुकतों संताची । नागवण हे फुकाची ॥३॥ गर्व होता ताठा । जातों यमपंथें वाटा ॥४॥ तुका म्हणे थोरपणें । नरक होती अभिमानें ॥५॥
3027
बरा जाणतोसी धर्मनीती । उचित अनुचित श्रीपती। करूं येते राती । ऐसी डोळे झांकूनि ॥१॥ आतां जाब काय कैसा । देसी तो दे जगदीशा । आणिला वोळसा । आपणां भोंवता ॥ध्रु.॥ सेवेचिया सुखास्तव । बळें धरिलें अज्ञानत्व । येइल परि हा भाव । ज्याचा त्यासी कारणा ॥२॥ तुकयाबंधु म्हणे नाहीं । आतां आम्हां बोल कांहीं । जडोनियां पायीं । तुझे त्वां चि घेतलें ॥३॥
3028
बरा रे निर्गुणा नष्ट नारायणा । घरबुडवणा भेटलासी ॥१॥ एके घरीं कोणी कोणासी न धरी । ऐसी अपरांपरी केली आम्हां ॥२॥ कान्हा म्हणे कां रे निःकाम देखिलें । म्हणोनि मना आलें करितोसी ॥३॥
3029
बराडियाची आवडी पुरे । जया झुरे साटीं तें ॥१॥ तैसें जालें माझ्या मना । नुठी चरणावरूनि ॥ध्रु.॥ मागलिया पेणें पावे । विसांवे तें ठाकणीं ॥२॥ तुका म्हणे छाया भेटे । बरें वाटे तापे त्या ॥३॥
3030
बरें आम्हां कळों आलें देवपण । आतां गुज कोण राखे तुझें ॥१॥ मारिलें कां मज सांग आजिवरी । आतां सरोबरी तुज मज ॥ध्रु.॥ जें आम्ही बोलों तें आहे तुझ्या अंगीं । देईंन प्रसंगीं आजि शिव्या ॥२॥ निलाजिरा तुज नाहीं याति कुळ । चोरटा शिंदळ ठावा जना ॥३॥ खासी धोंडे माती जीव जंत झाडें । एकलें उघडें परदेसी ॥४॥ गाढव कुतरा ऐसा मज ठावा । बईंल तूं देवा भारवाही ॥५॥ लडिका तूं मागें बहुतांसी ठावा । आलें अनुभवा माझ्या तें ही ॥६॥ तुका म्हणे मज खविळलें भांडा । आतां धीर तोंडा न धरवे ॥७॥
3031
बरें जालीयाचे अवघें सांगाती । वाइटाचे अंतीं कोणी नाहीं ॥१॥ नोहे मातापिता नोहे कांतासुत । इतरांची मात काय सांगों ॥२॥ तुका म्हणे जन दुतोंडी सावज । सांपडे सहज तिकडे धरी ॥३॥
3032
बरें जालें आजिवरी । नाहीं पडिलों मृत्याचे आहारीं । वांचोन आलों एथवरी । उरलें तें हरी तुम्हां समर्पण ॥१॥ दिला या काळें अवकाश । नाहीं पावलें आयुष्य नाश । कार्या कारण उरलें शेष । गेलें तें भूस जावो परतें ॥ध्रु.॥ बुडणें खोटें पावतां थडी । स्वप्नीं जाली ओढाओढी । नासली जागृतीची घडी । साच जोडी शेवटीं गोड घास ॥२॥ तुम्हासि पावविली हाक । तेणें निरसला धाक । तुमचें भातें हें कवतुक । जे शरणागत लोक रक्षावे ॥३॥ रवीच्या नावें निशीचा नाश । उदय होतां चि प्रकाश । अतां कैचा आम्हां दोष । तूं जगदीश कैवारी ॥४॥ आतां जळो देह सुख दंभ मान । न करीं याचें साधन । तूं जगदादि नारायण । आलों शरण तुका म्हणे ॥५॥
3033
बरें जालें आलीं ज्याचीं त्याच्या घरा । चुकला पार्‍हेरा ओढाळांचा ॥१॥ बहु केलें दुखी त्यांचिया सांभाळें । आतां तोंड काळें तेणें लोभें ॥ध्रु.॥ त्यांचिया अन्यायें भोगा माझें अंग । सकळ ही लाग द्यावा लागे ॥२॥ नाहीं कोठें स्थिर राहों दिलें क्षण । आजिवरी सिण पावलों तो ॥३॥ वेगळाल्या खोडी केली तडातडी। सांगावया घडी नाहीं सुख ॥४॥ निरवूनि तुका चालिला गोवारें । देवापाशीं भार सांडवूनि ॥५॥
3034
बरें जालें गेलें । आजी अवघें मिळालें ॥१॥ आतां खाईन पोटभरी । ओल्या कोरड्या भाकरी ॥ध्रु.॥ किती तरी तोंड । याशीं वाजवूं मी रांड ॥२॥ तुका बाइले मानवला । चीथू करूनियां बोला ॥३॥
3035
बरें जालें देवा निघालें दिवाळें । बरी या दुष्काळें पीडा केली ॥१॥ अनुतापें तुझें राहिलें चिंतन । जाला हा वमन संवसार ॥ध्रु.॥ बरें जालें जगीं पावलों अपमान । बरें गेलें धन ढोरें गुरें ॥३॥ बरें जालें नाहीं धरिली लोकलाज । बरा आलों तुज शरण देवा ॥४॥ बरें जालें तुझें केलें देवाईल । लेंकरें बाईल उपेक्षिलीं ॥५॥ तुका म्हणे बरें व्रत एकादशी । केलें उपवासीं जागरण ॥६॥॥३॥
3036
बरें सावधान । राहावें समय राखोन ॥१॥ नाहीं सारखिया वेळा । अवघ्या पावतां अवकळा ॥ध्रु.॥ लाभ अथवा हानी । थोड्यामध्यें च भोवनी ॥२॥ तुका म्हणे राखा । आपणा नाहीं तोंचि वाखा ॥३॥
3037
बळ बुद्धी वेचुनियां शक्ति । उदक चालवावें युक्ति ॥१॥ नाहीं चळण तया अंगीं । धांवें लवणामागें वेगीं ॥ध्रु.॥ पाट मोट कळा । भरित पखाळा सागळा ॥२॥ बीज ज्यासी घ्यावें । तुका म्हणे तैसें व्हावें ॥३॥
3038
बळियाचे अंकित । आम्ही जालों बळिवंत ॥१॥ लाता हाणोनि संसारा । केला षडूर्मीचा मारा ॥ध्रु.॥ जन धन तन । केलें तृणाही समान ॥२॥ तुका म्हणे आतां । आम्ही मुक्तीचिया माथां ॥३॥
3039
बळिवंत आम्ही समर्थाचे दास । घातली या कास कळिकाळासी ॥१॥ तेथें मानसाचा कोण आला पाड । उलंघोनि जड गेलों आधीं ॥ध्रु.॥ संसाराचे बळी साधिलें निधान । मारिले दुर्जन षडवर्ग ॥२॥ तुका म्हणे एक उरला धरिता ठाव । येर केले वाव तृणवत ॥३॥
3040
बळिवंत कर्म । करी आपुला तो धर्म ॥१॥ पुढें घालुनियां सत्ता । न्यावें पतना पतिता ॥ध्रु.॥ आचरणें खोटीं । केलीं सलताती पोटीं ॥२॥ तुका म्हणे देवा । नाहीं भजन केली सेवा ॥३॥
3041
बळी म्हणे आजि दुर्वासया स्वामी । मागों नका तुम्ही नारायणा ॥१॥ बहुतां प्रयासीं जोडला श्रीहरी । बैसविला द्वारीं राखावया ॥ध्रु.॥ परतला दुर्वास मग हो तेथूनि । चिंतातुर मनीं उद्वेगला ॥२॥ काय तूं एकाचा आहेसी अंकित । होई कृपावंत तुका म्हणे ॥३॥
3042
बळें डाईं न पडे हरी । बुद्धि करी शाहणा तो ॥१॥ मोकळें देवा खेळों द्यावें । सम भावें सांपडावया ॥ध्रु.॥ येतो जातो वेळोवेळां । न कळे कळा सांपडती ॥२॥ तुका म्हणे धरा ठायींच्या ठायीं । मिठी जीवीं पायीं घालुनियां ॥३॥ सुतुतू - अभंग १
3043
बळें बाह्यात्कारें संपादिलें सोंग । नाहीं जाला त्याग अंतरींचा ॥१॥ ऐसें येतें नित्य माझ्या अनुभवा । मनासी हा ठावा समाचार ॥ध्रु.॥ जागृतीचा नाहीं अनुभव स्वप्नीं । जातों विसरुनि सकळ हें ॥२॥ प्रपंचाबाहेरि नाहीं आलें चत्ति । केले करी नित्य वेवसाय ॥३॥ तुका म्हणे मज भोरप्या चि परी । जालें सोंग वरी आंत तैसें ॥४॥
3044
बसतां चोरापाशीं तैसी होय बुद्धि । देखतां चि चिंधी मन धांवे ॥१॥ व्यभिचार्‍यापासीं बैसतां क्षणभरी । देखतां चि नारी मन धांवे ॥ध्रु.॥ प्रपंचाचा छंद टाकूनियां गोवा । धरावें केशवा हृदयांत ॥२॥ सांडुनियां देई संसाराची बेडी । कीर्तनाची गोडी धरावी गा ॥३॥ तुका म्हणे तुला सांगतों मी एक । रुक्मिणीनायक मुखीं गावा ॥४॥
3045
बहु उतावीळ भक्तीचिया काजा । होसी केशीराजा मायबापा ॥१॥ तुझ्या पायीं मज जालासे विश्वास । म्हणोनियां आस मोकलिली ॥ध्रु.॥ ॠषि मुनि सद्धि साधक अपार । कळला विचार त्यांसी तुझा ॥२॥ नाहीं नास तें सुख दिलें तयांस । जाले जे उदास सर्वभावें ॥३॥ तुका म्हणे सुख न माये मानसीं । धरिले जीवेंसी पाय तुझे ॥४॥
3046
बहु काळीं बहु काळी । आम्ही देवाचीं गोवळीं ॥१॥ नाहीं विटों देत भात । जेऊं बेसवी सांगातें ॥ध्रु.॥ बहु काळें बहु काळें । माझें पांघरे कांबळें ॥२॥ तुका म्हणे नाहीं नाहीं । त्याचें आमचें सें कांहीं ॥३॥
3047
बहु कृपावंते माझीं मायबापें । मी माझ्या संकल्पें अंतरलों ॥१॥ संचितानें नाहीं चुकों दिली वाट । लाविलें अदट मजसवें ॥ध्रु.॥ आतां मी रुसतों न कळतां वर्म । परी ठावे धर्म सर्व देवा ॥२॥ तुका म्हणे उभा राहिला न बैसे । आमची माय असे उद्वेग त्या ॥३॥
3048
बहु क्लेशी जालों या हो नरदेहीं । कृपादृष्टी पाहीं पांडुरंगा ॥१॥ पांडुरंगा सर्वदेवांचिया देवा । घ्यावी माझी सेवा दिनानाथा ॥ध्रु.॥ दिनानाथ ब्रिद त्रिभुवनीं तुझें । मायबापा ओझें उतरावें ॥२॥ उतरीं सत्वर पैलथडी नेई । पूर्णसुख देई पायांपाशीं ॥३॥ पायांपाशीं मज ठेवीं निरंतर । आशा तुझी फार दिवस केली ॥४॥ केली आस तुझी वाट मी पाहातों । निशिदिनीं ध्यातों नाम तुझें ॥५॥ नाम तुझें गोड स्वभक्ता आवडे । भक्तांलागीं कडे खांदा घेसी ॥६॥ घेसी खांद्यावरी खेळविसी लोभें । पाउल शोभे विटेवरि ॥७॥ विटेवरि उभा देखिलासी डोळां । मनाचा सोहळा पुरविसी ॥८॥ पुरवीं सत्वर त्रैलोक्यस्वामिया । मिठी घाली पायां तुका भावें ॥९॥
3049
बहु जन्मांतरें फेरे । केले येरे सोडवीं ॥१॥ आळवितों करुणाकरे । विश्वंभरे दयाळे ॥ध्रु.॥ वाहवतों मायापुरीं । येथें करीं कुढावा ॥२॥ तुका म्हणे दुजा कोण । ऐसा सीण निवारी ॥३॥
3050
बहु टाळाटाळी । होतां भोवताहे कळी ॥१॥ बरें नव्हेल सेवटीं । भय असों द्यावें पोटीं ॥ध्रु.॥ मुरगाळी कान । घुसमाडील सावधान ॥२॥ अबोलणा तुका । ऐसें कोणी लेखूं नका ॥३॥
3051
बहु दिस नाहीं माहेरिंची भेटी । जाली होती तुटी व्यवसायें ॥१॥ आपुल्याला होतों गुंतलों व्यासंगें । नाहीं त्या प्रसंगें आठवलें ॥ध्रु.॥ तुटातें तुटतें जडती जडलें । आहे तें आपुलें आपणापें ॥२॥ बहु निरोपाचें पावलें उत्तर । जवळी च पर एक तें ही ॥३॥ काय जाणों मोह होईंल सांडिला । बहु दिस तुटला तुका म्हणे ॥४॥
3052
बहु दूरवरी । वेठी ओझें होतें शिरीं ॥१॥ आतां उतरला भार । तुम्हीं केला अंगीकार ॥ध्रु.॥ बहु काकुलती । आलों मागें किती ॥२॥ तुका म्हणे देवा । आजि सफळ जाली सेवा ॥३॥ पाईंक - अभंग ११
3053
बहु देवा बरें जालें । नसतें गेलें सोंवळें ॥१॥ धोवटाशीं पडिली गांठी । जगजेठीप्रसादें ॥ध्रु.॥ गादल्याचा जाला जाडा । गेली पीडा विकल्प ॥२॥ तुका म्हणे वरावरी । निर्मळ करी निर्मळा ॥३॥
3054
बहु धीर केला । जाण न होसी विठ्ठला ॥१॥ आतां धरीन पदरीं । करीन तुज मज सरी ॥ध्रु.॥ जालों जीवासी उदार । उभा राहिलों समोर ॥२॥ तुका विनवी संतां । ऐसें सांगा पंढरिनाथा ॥३॥
3055
बहु नांवें ठेविलीं स्तुतीचे आवडी । बहुत या गोडी आली रसा ॥१॥ बहु सोसें सेवन केलें बहुवस । बहु आला दिस गोमट्याचा ॥ध्रु.॥ बहुतां पुरला बहुतां उरला । बहुतांचा केला बहु नट ॥२॥ बहु तुका जाला निकट वृत्ती । बहु काकुलती येऊनियां॥३॥
3056
बहु फिरलों ठायाठाव । कोठें भाव पुरे चि ना ॥१॥ समाधान तों पावलों । उरलों बोलों यावरि ॥ध्रु.॥ घे गा देवा आशीर्वाद । आमुच्या नांद भाग्यानें ॥२॥ तुका म्हणे जेवूं आधी । खवखव मधीं सारावी ॥३॥
3057
बहु बरा बहु बरा । यासांगातें मळि चारा ॥१॥ म्हणोनि जीवेंसाठीं । घेतली कान्होबाची पाठी ॥ध्रु.॥ बरवा बरवा दिसे । समागम याचा निमिषें ॥२॥ पुढती पुढती तुका । सोंकला सोंकवितो लोकां ॥३॥
3058
बहु बरें एकाएकीं । संग चुकी करावा ॥१॥ ऐसें बरें जालें ठावें । अनुभवें आपुल्या ॥ध्रु.॥ सांगावें तें काम मना । सलगी जना नेदावी ॥२॥ तुका म्हणे निघे अगी । दुजे संगीं आतळतां ॥३॥ अलकापुरीं स्वामी कीर्तनास उभे राहिले तेव्हां कवित्वाचा निषेध करून लोक बोलिले कीं कवित्व बुडवणें तेव्हां कवित्व बुडवून पांच दिवस होते ॥ लोकांनीं फार पीडा केली कीं संसारही नाहीं व परमार्थही बुडविला आणीक कोणी असतें तें जीव देतें मग निद्रा केली ते अभंग ॥ २० ॥
3059
बहु बोलणें नये कामा । वाउगें तें पुरुषोत्तमा । एकाचि वचनें आम्हां । काय सांगणें तें सांग ॥१॥ देणें आहे कीं भांडाईं । करणें आहे सांग भाईं । आतां भीड कांहीं । कोणी न धरी सर्वथा ॥ध्रु.॥ मागें गेलें जें होउनी । असो तें धरित नाहीं मनीं । आतां पुढें येथूनि । कैसा काय विचार ॥२॥ सारखी नाहीं अवघी वेळ । हें तों कळतें सकळ । तुकयाबंधु म्हणे खळखळ । करावी ते उरेल ॥३॥
3060
बहु भितों जाणपणा । आड न यो नारायणा । घेइन प्रेमपान्हा । भक्तिसुख निवाडें ॥१॥ यासी तुळे ऐसे कांहीं । दुजें त्रिभुवनीं नाहीं । काला भात दहीं । ब्रम्हादिकां दुर्लभ ॥ध्रु.॥ निमिशा अर्ध संतसंगति । वास वैकुंठीं कल्पांतीं । मोक्षपदें होती । ते विश्रांति बापुडी ॥२॥ तुका म्हणे हें चि देई । मीतूंपणा खंड नाहीं । बोलिलों त्या नाहीं । अभेदाची आवडी ॥३॥
3061
बहु या प्रपंचें भोगविल्या खाणी । टाकोनियां मनीं ठेविला सीण ॥१॥ आतां पायांपाशीं लपवावें देवा । नको पाहूं सेवा भक्ती माझी ॥ध्रु.॥ बहु भय वाटे एकाच्या बोभाटें । आली घायवटे फिरोनियां ॥२॥ तुका म्हणे सिगे भरूं आलें माप । वियोग संताप जाला तुझा ॥३॥
3062
बहु वाटे भये । माझे उडी घाला दये ॥१॥ फांसा गुंतलों लिगाडीं । न चले बळ चरफडी ॥ध्रु.॥ कुंटित चि युक्ति । माझ्या जाल्या सर्व शक्ति ॥२॥ तुका म्हणे देवा । काममोहें केला गोवा ॥३॥
3063
बहु होता भला । परि ये रांडेनें नासिला ॥१॥ बहु शिकला रंग चाळे । खरें खोटें इचे वेळे ॥ध्रु.॥ नव्हतें आळवितें कोणी । इनें केला जगॠणी ॥२॥ ज्याचे त्यासी नेदी देऊं । तुका म्हणे धांवे खाऊं ॥३॥
3064
बहुक्षीदक्षीण । आलों सोसुनियां वन ॥१॥ विठोबा विसांवया विसांवया । पडों देई पायां ॥ध्रु.॥ बहुतां काकुलती । आलों सोसिली फजिती ॥२॥ केली तुजसाटीं । तुका म्हणे येवढी आटी ॥३॥
3065
बहुजन्मां शेवटीं स्वामी तुझी भेटी । बहु मोह पोटीं थोर जाला ॥१॥ बहु पुरें पाहिलीं बहु दिशा शोधिली । बहु चिंता वाहिली दुर्भराची ॥ध्रु.॥ बहु काळ गेले अनुचित केलें । बहु नाहीं गाइलें नाम तुझें ॥२॥ ऐसा मी अपराधी अगा कृपानिधि । बहु संतां संनिधि ठेवीं तुका ॥३॥
3066
बहुजन्में केला लाग । तो हा भाग लाधलों ॥१॥ जीव देइन हा बळी । करीन होळी संसारा ॥ध्रु.॥ गेलें मग नये हाता । पुढती चिंता वाटतसे ॥२॥ तुका म्हणे तांतड करूं । पाय धरूं बळकट ॥३॥
3067
बहुजन्में सोस केला । त्याचा जाला परिणाम ॥१॥ विठ्ठलसें नाम कंठीं । आवडी पोटीं संचितें ॥ध्रु.॥ येथुन तेथवरी आतां । न लगे चिंता करावी ॥२॥ तुका म्हणे धालें मन । हें चि दान शकुनाचें ॥३॥
3068
बहुडविलें जन मन जालें निश्चळ । चुकवूनी कोल्हाळ आला तुका ॥१॥ पर्यंकीं निद्रा करावें शयन । रखुमाई आपण समवेत ॥ध्रु.॥ घेउनियां आलों हातीं टाळ वीणा । सेवेसि चरणा स्वामीचिया ॥२॥ तुका म्हणे आतां परिसावीं सादरें । बोबडीं उत्तरें पांडुरंगा ॥३॥
3069
बहुत असती मागें सुखी केलीं । अनाथा माउली जिवांची तूं ॥१॥ माझिया संकटा न धरीं अळस । लावुनियां कास पार पावीं ॥ध्रु.॥ कृपावंता करा ज्याचा अंगीकार । तया संवसार नाहीं पुन्हां ॥ ।२॥ विचारितां नाहीं दुजा बळिवंत । ऐसा सर्वगत व्यापी कोणी ॥३॥ म्हणउनि दिला मुळीं जीवभाव । देह केला वाव समाधिस्थ ॥४॥ तुका म्हणे नाहीं जाणत आणीक । तुजविण एक पांडुरंगा ॥५॥
3070
बहुत करूनि चाळवाचाळवी । किती तुम्ही गोवी करीतसां ॥१॥ लागटपणें मी आलों येथवरी । चाड ते दुसरी न धरूनि ॥ध्रु.॥ दुजियाचा तंव तुम्हांसी कांटाळा । राहासी निराळा एकाएकीं ॥२॥ तुका म्हणे आतां यावरी गोविंदा । मजशीं विनोदा येऊं नये ॥३॥
3071
बहुत कृपाळु दीनाचा दयाळु । जगीं भक्तवत्सळु नाम तुझें ॥१॥ मानियेला चत्तिीं बळीचा उपकार । अझूनि त्याचें द्वार राखसील ॥ध्रु.॥ काय त्याच्या भेणें बैसलासी द्वारीं । नाहीं तुज हरि कृपा बहु ॥२॥ तुका म्हणे भक्तजनाची ममता । तुम्हांसी अनंता अलोलिक ॥३॥
3072
बहुत जाचलों संसारीं । वसें गर्भि मातेच्या उदरीं । लक्ष चौर्‍यांशी योनिद्वारीं । जालों भिकारी याचक ॥१॥ जिणें पराधीन आणिकां हातीं । दृढ पाशीं बांधलों संचितीं । प्रारब्ध क्रियमाण सांगाती । भोवंडिती सत्ता आपुलिया ॥ध्रु.॥ न भरे पोट नाहीं विसांवा । नाहीं नेम एक ठाव गांवा । नाहीं सत्ता न फिरे ऐसी देवा । लाहे जीवा खापरीं तडफडी ॥२॥ काळ बहुत गेले ऐसिया रीती । आणीक पुढें नेणों किती । खंडणा नाहीं पुनरावृत्ती । मज कल्पांतीं तरी वेगळें ॥३॥ ऐसें दुःख कोण हरील माझें । कोणा भार घालूं आपुलें ओझें । भवसिंधुतारक नाम तुझें । धांवसि काजें आडलिया ॥४॥ आतां धांव घालीं नारायणा । मजकारणें रंका दीना । गुण न विचारीं अवगुणा । तुका करुणा भाकीतसे ॥५॥
3073
बहुत प्रकार परि ते गव्हाचे । जिव्हा नाचे आवडी ॥१॥ सरलें परि आवडी नवी । सिंधु दावी तरंग ॥ध्रु.॥ घेतलें घ्यावें वेळोवेळां । माय बाळा न विसंबे ॥२॥ तुका म्हणे रस राहिला वचनीं । तो चि पडताळूनि सेवीतसें ॥३॥
3074
बहुत सोसिले मागें न कळतां । पुढती काय आतां अंध व्हावें ॥१॥ एकाचिये अंगीं हें ठेवावें लावून । नये भिन्न भिन्ना चांचपडो ॥ध्रु.॥ कोण होईल तो ब्रम्हांडचाळक । आपणें चि हाके देईल हाके ॥२॥ तुका म्हणे दिलीं चेतवूनि सुणीं । कौतुकावांचूनि नाहीं छळ ॥३॥
3075
बहुतां छंदाचें बहु वसे जन । नये वांटूं मन त्यांच्या संगें ॥१॥ करावा जतन आपुला विश्वास । अंगा आला रस आवडीचा ॥ध्रु.॥ सुखाची समाधी हरिकथा माउली । विश्रांति साउली सिणलियांची ॥२॥ तुका म्हणे बुडे बांधोनि दगड । तेथें काय कोड धांवायाचें ॥३॥
3076
बहुतां जन्मां अंतीं । जोडी लागली हे हातीं ॥१॥ मनुष्यदेहा ऐसा ठाव । धरीं पांडुरंगीं भाव ॥ध्रु.॥ बहु केला फेरा । येथें सांपडला थारा ॥२॥ तुका म्हणे जाणे । ऐसे भले ते शाहाणे॥३॥
3077
बहुतां जन्मां अंतीं जन्मलासी नरा । देव तूं सोइरा करीं आतां ॥१॥ करीं आतां बापा स्वहिताचा स्वार्थ । अनर्थाचा अर्थ सांडीं आतां ॥ध्रु.॥ सांडि आतां कुडी कल्पनेची वाट । मार्ग आहे नीट पंढरीचा ॥२॥ पंढरीस जावें सर्व सुख घ्यावें । रूप तें पाहावें विटेवरि ॥३॥ विटेवरि नीट आनंदाचा कंद । तुका नाचे छंद नामघोषें ॥४॥
3078
बहुतां जन्मींचें संचित । सबळ होय जरि बहुत । तरि चि होय हरिभक्त । कृपावंत मानसीं ॥१॥ म्हणवी म्हणियारा तयांचा । दास आपुल्या दासांचा । अनुसरले वाचा । काया मनें विठ्ठलीं ॥ध्रु.॥ असे भूतदया मानसीं । अवघा देखे हृषीकेशी । जीवें न विसंबे तयासी । मागें मागें हिंडतसे ॥२॥ तुका म्हणे निर्विकार । शरणागतां वज्रपंजर । जे जे अनुसरले नर । तयां जन्म चुकलें ॥३॥
3079
बहुतां जातीचा केला अंगीकार । बहुत ही फार सवाौत्तमें ॥१॥ सरला चि नाहीं कोणांचिये वेचें । अक्षोभ ठायींचें ठायीं आहे ॥ध्रु.॥ लागत चि नाहीं घेतां अंतपार । वसवी अंतर अणुचें ही ॥२॥ तुका म्हणे केला होय टाकीऐसा । पुरवावी इच्छा धरिली ते ॥३॥
3080
बहुतां दिसांची आजि जाली भेटी । जाली होती तुटी काळगती ॥१॥ येथें सावकासें घेईंन ते धणी । गेली अडचणी उगवोनि ॥ध्रु.॥ बहु दुःख दिलें होतें घरीं कामें । वाढला हा श्रमश्रमें होता ॥२॥ बहु दिस होता पाहिला मारग । क्लेशाचा त्या त्याग आजि जाला ॥३॥ बहु होती केली सोंगसंपादणी । लौकिकापासूनि निर्गमलें ॥४॥ तुका म्हणे येथें जालें अवसान । परमानंदीं मन विसावलें ॥५॥
3081
बहुतां पुरे ऐसा वाण । आलें धन घरासी ॥१॥ घ्या रे फुका मोलेंविण । नारायण न भुला ॥ध्रु.॥ ऐका निवळल्या मनें । बरवें कानें सादर ॥२॥ तुका म्हणे करूनि अंतीं । निश्चिंती हे ठेवावी ॥३॥
3082
बहुतां रीती काकुलती । आलों चित्तीं न धरा च ॥१॥ आतां काशासाटीं देवा । मिथ्या हेवा वाढवूं ॥ध्रु.॥ तुम्हां आम्हां जाली तुटी । आतां भेटी चिंतनें ॥२॥ तुका म्हणे लाजिरवाणें । आधर जिणें इच्छेचें ॥३॥
3083
बहुतांचे संगती । बहु पावलों फजिती ॥१॥ बरें केलें नंदबाळें । मागिलांचें तोंड काळें ॥ध्रु.॥ माझा करितील तंटा । लपती आलिया बोभाटा ॥२॥ तुका म्हणी काई । किती म्हणों बाप आई ॥३॥
3084
बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥ विचार करितां वांयां जाय काळ । लटिकें तें मूळ फजितीचें ॥२॥ तुका म्हणे तुम्ही करा घटापटा । नका जाऊं वाटा आमुचिया ॥३॥
3085
बहुतें गेलीं वांयां । न भजतां पंढरीराया ॥१॥ करिती कामिकांची सेवा । लागोन मागोन खात्या देवा ॥ध्रु.॥ अवघियांचा धनी । त्यासी गेलीं विसरोनि ॥२॥ तुका म्हणे अंतीं । पडती यमाचिया हातीं ॥३॥
3086
बा रे कृष्णा तुझें मुख कीं कोमळ । कैसे येवढे ज्वाळ ग्रासियेले ॥१॥ बा रे कृष्णा तुझी जिव्हा कीं कोवळी । होईंल पोळिली नारायणा ॥ध्रु.॥ बैसें कृष्णा तुझें पाहूं मुखकमळ । असेल पोळलें कोणे ठायीं ॥२॥ घोंगडिया घालीं घालूनियां तळीं । वरी वनमाळी बैसविती ॥३॥ तुका म्हणे भावें आकळिला देव । कृपासिंधुराव त्रैलोक्याचा ॥४॥
3087
बा रे पांडुरंगा केव्हां येशी भेटी । जाहालों हिंपुटी तुजवीण ॥१॥ तुजवीण सखें न वटे मज कोणी । वाटतें चरणीं घालूं मिठीं ॥ध्रु.॥ ओवाळावी काया चरणांवरोनि । केव्हां चक्रपाणी भेटशील ॥२॥ तुका म्हणे माझी पुरवीं आवडी । वेगीं घालीं उडी नारायणा ॥३॥
3088
बांधे सोडी हें तों धन्याचिये हातीं । हेंकडें गोविती आपणां बळें ॥१॥ भुललियासी नाहीं देहाचा आठव । धोतर्‍यानें भाव पालटिला ॥ध्रु.॥ घरांत रिघावें दाराचिये सोईं । भिंतीसवें डोईं घेऊनि फोडी ॥२॥ तुका म्हणे देवा गेलीं विसरोन । आतां वर्म कोण दावी यांसी ॥३॥
3089
बाइल तरी ऐसी व्हावी । नरकीं गोवी अनिवार ॥१॥ घडों नेदी तीर्थयात्रा । केला कुतरा हातसोंका ॥ध्रु.॥ आपुली च करवी सेवा । पुजवी देवासारिखें ॥२॥ तुका म्हणे गाढव पशु । केला नाशु आयुष्या ॥३॥
3090
बाइले अधीन होय ज्याचें जिणें । तयाच्या अवलोकनें पडिजे द्वाड ॥१॥ कासया ते जंत जिताती संसारीं । माकडाच्या परी गारोड्यांच्या ॥ध्रु.॥ वाइलेच्या मना येईंल तें खरें । अभागी तें पुरें बाइलेचें ॥२॥ तुका म्हणे मेंग्या गाढवाचें जिणें । कुतर्‍याचें खाणें लगबगा ॥३॥
3091
बाईंल चालिली माहेरा । संगें दिधला म्हातारा ॥१॥ सिधा सामग्री पोटाची । सवें स्वारी बइलाची ॥ध्रु.॥ जाता पाडिली ढोरानें । सिव्या देती अन्योविन्ये ॥२॥ न सावरी आपणातें । नग्न सावलें वरतें ॥३॥ फजित केलें जनलोकीं । मेला म्हणे पडे नरकीं ॥४॥ गोहाची हे गेली लाज । गांजितां कां तुम्ही मज ॥५॥ तुका म्हणे जनीं । छी थू केली विटंबणी ॥६॥
3092
बाईल मेली मुक्त जाली । देवें माया सोडविली ॥१॥ विठो तुझें माझें राज्य । नाहीं दुसर्‍यांचें काज ॥ध्रु.॥ पोर मेलें बरें जालें । देवें मायाविरहित केलें ॥२॥ माता मेली मज देखतां । तुका म्हणे हरली चिंता ॥३॥
3093
बाईल सवासिण आई । आपण पितरांचे ठायीं ॥१॥ थोर वेच जाला नष्टा । अवघ्या अपसव्य चेष्टा ॥ध्रु.॥ विषयांचे चरवणीं । केली आयुष्याची गाळणी ॥२॥ तुका म्हणे लंडा । नाहीं दया देव धोंडा ॥३॥
3094
बाप करी जोडी लेंकराचे ओढी । आपुली करवंडी वाळवूनी ॥१॥ एकाएकीं केलों मिरासीचा धनी । कडिये वागवूनी भार खांदीं ॥ध्रु.॥ लेवऊनी पाहे डोळा अळंकार । ठेवा दावी थोर करूनियां ॥२॥ तुका म्हणे नेदी गांजूं आणिकांसी । उदार जीवासी आपुलिया ॥३॥
3095
बाप माझा दिनानाथ । वाट भक्तांची पाहात ॥१॥ कर ठेवुनियां करीं । उभा चंद्रभागे तिरीं ॥ध्रु.॥ गळां वैजयंतीमाळा। रूपें डोळस सांवळा ॥२॥ तुका म्हणे भेटावया । सदा उभारिल्या बाह्या ॥३॥
3096
बारंबार काहे मरत अभागी । बहुरि मरन संक्या तोरेभागी ॥ध्रु.॥ ये हि तन करते क्या ना होय । भजन भगति करे वैकुंठे जाय ॥१॥ रामनाम मोल नहिं वेचे कबरि । वो हि सब माया छुरावत झगरी ॥२॥ कहे तुका मनसुं मिल राखो । रामरस जिव्हा नित्य चाखो ॥३॥
3097
बारावर्षे बाळपण । तें ही वेचलें अज्ञानें ॥१॥ ऐसा जन्म गेला वांयां । न भजतां पंढरिराया ॥ध्रु.॥ बाकी उरलीं आठ्याशीं । तीस वेचलीं कामासी ॥२॥ बाकी उरलीं आठावन्न । तीस वेचली ममतेनें ॥३॥ बाकी उरलीं आठावीस । देहगेह विसरलास ॥४॥ तुका म्हणे ऐसा झाडा । संसार हा आहे थोडा ॥५॥
3098
बाराही सोळा गडियांचा मेळा । सतरावा बसवंत खेळिया रे । जतिस पद राखों जेणें टिपरिया घाई । अनुहातें वायें मांदळा रे ॥१॥ नाचत पंढरिये जाऊं रे खेळिया । विठ्ठल रखुमाई पाहूं रे ॥ध्रु.॥ सा चहूं वेगळा अठराही निराळा । गाऊं वाजवूं एक चाळा रे । विसरती पक्षी चारा घेणें पाणी । तारुण्य देहभाव बाळा रे ॥२॥ आनंद तेथिचा मुकियासि वाचा । बहिरे ऐकती कानीं रे । आंधळ्यासि डोळे पांगळांसि पाय । तुका म्हणे वृद्ध होती तारुण्यें रे ॥३॥
3099
बाळ काय जाणे जीवनउपाय । मायबाप वाहे सर्व चिंता ॥१॥ आइतें भोजन खेळणें अंतरीं । अंकिताचे शिरीं भार नाहीं ॥ध्रु॥ आपुलें शरीर रिक्षतां न कळें । सांभाळूनि लळे पाळी माय ॥२॥ तुका म्हणे माझा विठ्ठल जनिता । जेथें आमची सत्ता तयावरी ॥३॥
3100
बाळ बापा म्हणे काका । तरी तो कां निपराध ॥१॥ जैसा तैसा भाव गोड । पुरवी कोड विठ्ठल ॥ध्रु.॥ साकरेसि म्हणतां धोंडा । तरी कां तोंडा न रुचे ॥२॥ तुका म्हणे आरुष बोल । नव्हे फोल आहाच ॥३॥
3101
बाळ माते निष्ठ‍ होये । परि तें स्नेह करीत आहे ॥१॥ तैसा तूं गा पुरुषोत्तमा । घडी न विसंबसी आम्हां ॥ध्रु.॥ नेणती भागली । कडे घेतां अंग घाली ॥२॥ भूक साहे ताहान । त्याचें राखे समाधान ॥३॥ त्याच्या दुःखें धाये । आपला जीव देऊं पाहे ॥४॥ नांवें घाली उडी । तुका म्हणे प्राण काढी ॥५॥
3102
बाळ माते लाते वरी । मारी तेणें संतोषे ॥१॥ सुख वसे चित्ती अंगीं । तें हें रंगीं मिळालें ॥ध्रु.॥ भक्षी त्याचा जीवमाग । आले भाग तो बरा ॥२॥ तुका म्हणे ॠणानुबंधें । सांगें सुदें सकळां ॥३॥
3103
बाळ मातेपाशीं सांगे तानभूक । उपायाचें दुःख काय जाणे ॥१॥ तयापरी करीं पाळण हें माझें । घेउनियां ओझें सकळ भार ॥ध्रु.॥ कासया गुणदोष आणिसील मना । सर्व नारायणा अपराधी ॥२॥ सेवाहीन दीन पातकांची रासी । आतां विचारिसी काय ऐसें ॥३॥ जेणें काळें पायीं अनुसरलें चित्त । निर्धार हें हित जालें ऐसें ॥४॥ तुका म्हणे तुम्ही तारिलें बहुतां । माझी कांहीं चिंता असों दे वो ॥५॥
3104
बाळपणीं हरि । खेळे मथुरेमाझारी । पायीं घागरिया सरी । कडदोरा वांकी । मुख पाहे माता । सुख न माये चित्ता । धन्य मानव संचिता । वोडवलें आजि ॥१॥ बाळ चांगलें वो । बाळ चांगलें वो । म्हणतां चांगलें । वेळ लागे तया बोलें । जीवापरीस तें वाल्हें । मज आवडतें ॥ध्रु.॥ मिळोनियां याती । येती नारी कुमारी बहुती । नाही आठव त्या चित्तीं । देहभाव कांहीं । विसरल्या घरें । तान्हीं पारठीं लेकुरें । धाक सांडोनियां येरें । तान भूक नाहीं ॥२॥ एकी असतील घरीं । चित्त तयापासीं परी । वेगीं करोनि वोसरी । तेथें जाऊं पाहे । लाज सांडियेली वोज । नाहीं फजितीचें काज । सुख सांडोनियां सेज । तेथें धाव घाली ॥३॥ वेधियेल्या बाळा । नर नारी या सकळा । बाळा खेळवी अबला । त्याही विसरल्या । कुमर कुमारी । नाभाव हा शरीरीं । दृष्टी न फिरे माघारी । तया देखतां हे ॥४॥ वैरभाव नाहीं । आप पर कोणीं कांहीं । शोक मोह दुःख ठायीं । तया निरसलीं । तुका म्हणे सुखी । केलीं आपणासारिखीं । स्वामी माझा कवतुकें । बाळवेषें खेळे ॥५॥
3105
बाळपणें ऐसीं वरुषें गेलीं बारा । खेळतां या पोरा नानामतें ॥१॥ विटू दांडू चेंडू लगोरया वाघोडीं । चंपे पेंड खडी एकीबेकी ॥ध्रु.॥ हमामा हुंबरी पकव्याच्या बारे । खेळे जंगीभोंवरे चुंबाचुंबी ॥२॥ सेलडेरा आणि निसरभोंवडी । उचली बाले धोंडी अंगबळें ॥३॥ तुका म्हणे ऐसें बाळपण गेलें । मग तारुण्य आलें गर्वमूळ ॥४॥
3106
बाळाचें जीवन । माता जाणें भूक तान ॥१॥ काय करूं विनवणी । असो मस्तक चरणीं ॥ध्रु.॥ ठेविलिये ठायीं । चत्ति ठेवुनि असें पायीं ॥२॥ करितों हे सेवा । चिंतन सर्वां ठायीं देवा ॥३॥ न्यून तें चि पुरें । घ्यावें करोनि दातारें ॥४॥ तुका म्हणे बुद्धि । अल्प असे अपराधी ॥५॥
3107
बाळेंविण माय क्षणभरि न राहे । न देखतां होये कासाविस ॥१॥ आणिक उदंड बुझाविती जरी । छंद त्या अंतरीं माउलीचा ॥ध्रु.॥ नावडती तया बोल आणिकाचे । देखोनियां नाचे माय दृष्टी ॥२॥ तुका म्हणे माझी विठ्ठल माउली । आणिकांचे बोलीं चाड नाहीं ॥३॥
3108
बाहिर पडिलों आपुल्या कर्तव्यें । संसारासि जीवें वेटाळिलों ॥१॥ एकामध्यें एक नाहीं मिळो येत । ताक नवनीत निवडीलें ॥ध्रु.॥ जालीं दोनी नामें एका चि मथनीं । दुसरिया गुणीं वेगळालीं ॥२॥ तुका म्हणे दाखविल्या मुक्ताफळीं । शिंपले चि स्वस्थळीं खुंटलिया ॥३॥
3109
बीज पेरे सेतीं । मग गाडेवरी वाहाती ॥१॥ वांयां गेलें ऐसें दिसे । लाभ त्याचे अंगीं वसे ॥ध्रु.॥ पाल्याची जतन । तरि प्रांतीं येती कण ॥२॥ तुका म्हणे आळा । उदक देतां लाभे फळा ॥३॥
3110
बीज भाजुनि केली लाही । आम्हां जन्ममरण नाहीं ॥१॥ आकाराशी कैंचा ठाव । देहप्रत्यक्ष जाला देव ॥ध्रु.॥ साकरेचा नव्हे उस । आम्हां कैंचा गर्भवास ॥२॥ तुका म्हणे औघा योग । सर्वां घटीं पांडुरंग ॥३॥
3111
बीजापोटीं पाहे फळ । विध न करितां सकळ ॥१॥ तया मूर्ख म्हणावें वेडें । कैसें तुटेल सांकडें ॥ध्रु.॥ दावितिया वाट । वेठी धरूं पाहे चाट ॥२॥ पुढिल्या उपाया । तुका म्हणे राखे काया ॥३॥
3112
बीजीं फळाचा भरवसा । जतन सिंचनासरिसा । चाविलिया आसा । काकुलती ते नाड ॥१॥ हा तों गडसंदीचा ठाव । पिके पिकविला भाव । संकोचोनि जीव । दशा केली जतन ॥ध्रु.॥ माती घाली धनावरी । रांडा रोटा वरीवरी । सुखाचे सेजारीं । दुःख भ्रमें भोगीतसे ॥२॥ तुका म्हणे दिशाभुली । जाल्या उफराटी चाली । निवाडाची बोली । अनुभवें साक्षीसी ॥३॥
3113
बुडतां आवरीं । मज भवाचे सागरीं ॥१॥ नको मानूं भार । पाहों दोषांचे डोंगर ॥ध्रु.॥ आहे तें सांभाळीं । तुझी कैसी ब्रीदावळी ॥२॥ तुका म्हणे दोषी । मी तों पातकांची राशी ॥३॥
3114
बुद्धिमंद शिरीं । भार फजिती पदरीं ॥१॥ जाय तेथें अपमान । पावे हाणी थुंकी जन ॥ध्रु.॥ खरियाचा पाड । मागें लावावें लिगाड ॥२॥ तुका म्हणे करी । वर्म नेणें भरोवरी ॥३॥
3115
बुद्धिहीना उपदेश । तें तें विष अमृतीं ॥१॥ हुंगों नये गो†हवाडी । तेथें जोडी विटाळ ॥ध्रु.॥ अळसियाचे अंतर कुडें। जैसें मढें निष्काम ॥२॥ तुका म्हणे ऐशा हाती । मज श्रीपती वांचवा ॥३॥
3116
बुद्धिहीनां जडजीवां । नको देवा उपेक्षूं ॥१॥ परिसावी हे विज्ञापना । आम्हां दीनां दासांची ॥ध्रु.॥ चिंतूनियां आले पाय । त्यांसी काय वंचन ॥२॥ तुका म्हणे पुरुषोत्तमा । करीं क्षमा अपराध॥३॥
3117
बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पति । आठवितां चित्तीं काय नव्हे ॥१॥ आणिकां उपायां कोण वांटी मन । सुखाचें निधान पांडुरंग ॥ध्रु.॥ गीत गावों नाचों छंदें वावों टाळी । वैष्णवांचे मेळीं सुखरूप ॥२॥ अनंत ब्रम्हांडें एके रोमावळी । आम्ही केला भोळीं भावें उभा ॥३॥ लडिका हा केला संवसारसिंधु । मोक्ष खरा बंधु नाहीं पुढें ॥४॥ तुका म्हणे ज्याच्या नामाचे अंकित । राहिलों निश्चिंत त्याच्या बळें ॥५॥
3118
बुद्धीचा पालट धरा रे कांहीं । मागुता नाहीं मनुष्यदेह ॥१॥ आपुल्या हिताचे नव्हती सायास । गृहदाराआसधनवित्त ॥ध्रु.॥ अवचितें निधान लागलें हें हातीं । भोगावी विपत्ती गर्भवास ॥२॥ यावें जावें पुढें ऐसें चि कारण । भोगावें पतन नरकवास ॥३॥ तुका म्हणे धरीं आठव या देहीं । नाहींतरि कांहीं बरें नव्हे ॥४॥
3119
बेगडाचा रंग राहे कोण काळ । अंगें हें पितळ न देखतां ॥१॥ माझें चित्ती मज जवळीच गो ही । तुझी मज नाहीं भेटी ऐसें ॥ध्रु.॥ दासीसुतां नाहीं पितियाचा ठाव । अवघें चि वाव सोंग त्याचें ॥२॥ तुका म्हणे माझी केली विटंबना । अनुभवें जना येईंल कळों ॥३॥
3120
बैसतां कोणापें नाहीं समाधान । विवरे हें मन ते चि सोईं ॥१॥ घडी घडी मज आठवे माहेर । न पडे विसर क्षणभरी ॥ध्रु.॥ नो बोलावें ऐसा करितों विचार । प्रसंगीं तों फार आठवतें ॥२॥ इंद्रियांसी वाहो पडिली ते चाली । होती विसांवली ये चि ठायीं ॥३॥ एकसरें सोस माहेरासी जावें । तुका म्हणे जीवें घेतलासे ॥४॥
3121
बैसलों तों कडियेवरी । नव्हें दुरी वेगळा ॥१॥ घडलें हें बहुवा दिसां । आतां इच्छा पुरवीन ॥ध्रु.॥ बहु होता जाला सीण । नाहीं क्षण विसांवा ॥२॥ दुःखी केलें मीतूंपणें । जवळी नेणें होतें तें ॥३॥ पाहात जे होतों वास । ते चि आस पुरविली ॥४॥ तुका म्हणे मायबापा । झणी कोपा विठ्ठला ॥५॥
3122
बैसलोंसे दारीं । धरणें कोंडोनि भिकारी ॥१॥ आतां कोठें हालों नेदीं । बरी सांपडली संदी ॥ध्रु.॥ किती वेरझारा । मागें घातलीया घरा ॥२॥ माझें मज नारायणा । देतां कां रे नये मना ॥३॥ भांडावें तें किती । बहु सोसिली फजिती ॥४॥ तुका म्हणे नाहीं । लाज तुझे अंगीं कांहीं ॥५॥
3123
बैसवुनि फेरी । गडियां मध्यभागीं हरी । अवघियांचें करी । समाधान सारिखें ॥१॥ पाहे तो देखे समोर । भोगी अवघे प्रकार । हरुषें झेली कर । कवळ मुखीं देती ते ॥ध्रु.॥ बोले बोलतिया सवें । देतील तें त्यांचें घ्यावें । एक एका ठावें । येर येरा अदृश्य ॥२॥ तुका म्हणे देवा । बहु आवडीचा हेवा । कोणाचिया जीवा । वाटों नेदी विषम ॥३॥
3124
बैसो आतां मनीं । आले तैसें चि वदनीं ॥१॥ मग अवघें चि गोड । पुरे सकळ हि कोड ॥ध्रु.॥ बाहेरील भाव । तैसा अंतरीं हि वाव ॥२॥ तुका म्हणे मणि । शोभा दाखवी कोंदणीं ॥३॥
3125
बैसों खेळूं जेवूं । तेथें नाम तुझें गाऊं ॥१॥ रामकृष्णनाममाळा । घालूं ओवुनियां गळा ॥ध्रु.॥ विश्वास हा धरूं । नाम बळकट करूं ॥२॥ तुका म्हणे आतां । आम्हां जीवन शरणागतां ॥३॥
3126
बैसों पाठमोरीं । मना वाटे तैसे करीं ॥१॥ परिं तूं जाणसीं आवडीं । बाळा बहुतांचीं परवडी ॥ध्रु.॥ आपुलाल्या इच्छा । मागों जया व्हावें जैशा ॥२॥ तुका म्हणे आईं । नव्हसी उदास विठाईं ॥३॥
3127
बैसोनि निवांत शुद्ध करीं चित्त । तया सुखा अंतपार नाहीं ॥१॥ येऊनि अंतरीं राहील गोपाळ । सायासाचें फळ बैसलिया ॥ध्रु.॥ राम कृष्ण हरि मुकुंद मुरारि । मंत्र हा उच्चारीं वेळोवेळां ॥२॥ तुका म्हणे ऐसें देईंन मी दिव्य । जरी होइल भाव एकविध ॥३॥
3128
बैसोनि निश्चळ करीं त्याचें ध्यान । देईंल तो अन्नवस्त्रदाता ॥१॥ काय आम्हां करणें अधिक सांचुनी । देव जाला ॠणी पुरविता ॥ध्रु.॥ दयाळ मयाळ जाणे कळवळा । शरणागतां लळा राखों जाणे ॥२॥ न लगे मागणें सांगणें तयासी । जाणे इच्छा तैसी पुरवी त्याची ॥३॥ तुका म्हणे लेई अळंकार अंगीं । विठ्ठल हा जगीं तूं चि होसी ॥४॥
3129
बैसोनियां खाऊं जोडी । ओढाओढी चुकवूनि ॥१॥ ऐसें केलें नारायणें । बरवें जिणें सुखाचें ॥ध्रु.॥ घरीच्या घरीं भांडवल । न लगे बोल वेचावे ॥२॥ तुका म्हणे आटाआटी । चुकली दाटी सकळ ॥३॥
3130
बोध्यअवतार माझिया अदृष्टा । मौन्य मुखें निष्ठा धरियेली ॥१॥ लोकांचियेसाटीं शाम चतुर्भुज । संतांसवें गुज बोलतसां ॥ध्रु.॥ आलें कलियुग माझिया संचिता । डोळां हाकलितां न पडेसी ॥२॥ म्यां च तुझें काय केलें नारायणा । कां नये करुणा तुका म्हणे ॥३॥
3131
बोल नाहीं तुझ्या दातृत्वपणासी । आम्ही अविश्वासी सर्वभावें ॥१॥ दंभें करी भक्ती सोंग दावी जना । अंतरीं भावना वेगळिया ॥२॥ तुका म्हणे देवा तूं काय करिसी । कर्मा दुस्तरासी आमुचिया ॥३॥
3132
बोल बोलतां वाटे सोपें । करणी करितां टीर कांपे ॥१॥ नव्हे वैराग्य सोपारें । मज बोलतां न वटे खरें ॥ध्रु.॥ विष खावें ग्रासोग्रासीं । धन्य तो चि एक सोसी ॥२॥ तुका म्हणे करूनि दावी । त्याचे पाय माझे जीवीं ॥३॥
3133
बोल बोले अबोलणे । जागें बाहेर आंत निजेलें । कैसें घरांत घरकुल केलें । नेणों आंधार ना उजेडलें गा ॥१॥ वासुदेव करितों फेरा । वाडियांत बाहेर दारा । कोणी कांहीं तरी दान करा । जाब नेदा तरी जातों सामोरा गा ॥ध्रु.॥ हातीं टाळ दिंडी मुखीं गाणें । गजर होतो बहु मोठ्यानें । नाहीं निवडिलीं थोरलाहानें । नका निजों भिकेच्या भेणें गा ॥२॥ मी वासुदेव तत्वता । कळों येईल विचारितां । आहे ठाउका सभाग्या संतां । नाहीं दुजा आणीक मागता गा ॥३॥ काय जागाचि निजलासी । सुनें जागोन दारापासीं । तुझ्या हितापाठीं करी व्यास व्यासी । भेटी न घेसी वासुदेवासी गा ॥४॥ ऐसें जागविलें अवघें जन । होतें संचित तींहीं केलें दान । तुका म्हणे दुबळीं कोणकोण । गेलीं वासुदेवा विसरून गा ॥५॥
3134
बोलणें चि नाहीं । आतां देवाविण कांहीं ॥१॥ एकसरें केला नेम । देवा दिले क्रोध काम ॥ध्रु.॥ पाहेन ते पाय । जोंवरि हे दृष्टी धाय ॥२॥ तुका म्हणे मनें । हे चि संकल्प वाहाणें ॥३॥
3135
बोलणें तें आम्ही बोलों उपयोगीं । पडिलें प्रसंगी काळाऐसें ॥१॥ जयामध्यें देव आदि मध्यें अंतीं । खोल पाया भिंती न खचेसी ॥ध्रु.॥ करणें तें आम्ही करूं एका वेळे । पुढिलिया बळें वाढी खुंटे ॥२॥ तुका म्हणे असों आज्ञेचीं धारकें । म्हणऊनि एकें घायें सारूं ॥३॥
3136
बोलतां वचन असा पाठमोरे । मज भाव बरे कळों आले ॥१॥ मागतिलें नये अरुचीनें हातां । नाहीं वरी सत्ता आदराची ॥ध्रु.॥ समाधानासाटीं लाविलासे कान । चोरलें तें मन दिसतसां ॥२॥ तुका म्हणे आम्हां तुमचे चि फंद । वरदळ छंद कळों येती ॥३॥
3137
बोलतों निकुरें । नव्हेत सलगीचीं उत्तरें ॥१॥ माझे संतापलें मन । परपीडा ऐकोन ॥ध्रु.॥ अंगावरि आलें । तोंवरि जाईल सोसिलें ॥२॥ तुज भक्तांची आण देवा । जरि तुका येथें ठेवा ॥३॥
3138
बोललों तें कांहीं तुमचिया हिता । वचन नेणतां क्षमा कीजे ॥१॥ वाट दावी तया न लगे रुसावें । अतित्याई जीवें नाश पावे ॥ध्रु.॥ निंब दिला रोग तुटाया अंतरीं । पोभाळितां वरि आंत चरे ॥२॥ तुका म्हणे हित देखण्यासि कळे । पडती आंधळे कूपा माजी ॥३॥
3139
बोलविले जेणें । तो चि याचें गुह्य जाणे ॥१॥ मी तों काबाडाचा धनी । जेवूं मागावें थिंकोनि ॥ध्रु.॥ मजुराच्या हातें । माप जालें गेलें रितें ॥२॥ जाला पुरविता । पांडुरंग माझा पिता ॥३॥ मायबापासवें । बाळें कौतुकें खेळावें ॥४॥ जैसा करिती धंदा । तैसा पडोनियां छंदा ॥५॥ त्याच्या साच गाईं म्हैसी । येणें खेळावें मातीशीं ॥६॥ तुका म्हणे बोल । माझा बोलतो विठ्ठल ॥७॥
3140
बोलविसी तरी । तुझ्या येईंन उत्तरीं ॥१॥ कांहीं कोड कवतिकें । हातीं द्यावया भातुकें ॥ध्रु.॥ बोलविसी तैसें । करीन सेवन सरिसें ॥२॥ तुका म्हणे देवा । माझें चळण तुज सवा ॥३॥
3141
बोलविसी तैसें आणीं अनुभवा । नाहीं तरी देवा विटंबना ॥१॥ मिठेंविण काय करावें मिष्टान्न । शव जीवेंविण शृंगारिले ॥ध्रु.॥ संपादणीविण विटंबिले सोंग । गुणेंविण चांग रूप हीन ॥२॥ कन्यापुत्रेंविण मंगळदायकें । वेचिलें हें फिके द्रव्य तरी ॥३॥ तुका म्हणे तैसी होते मज परी । न देखे अंतरीं प्रेमभाव ॥४॥
3142
बोलविसी माझें मुख । परी या जना वाटे दुःख ॥१॥ जया जयाची आवडी । तया लागीं तें चरफडी ॥ध्रु.॥ कठीण देतां काढा । जल्पे रोगी मेळवी दाढा ॥२॥ खाऊं नये तें चि मागे । निवारितां रडों लागे ॥३॥ वैद्या भीड काय । अतित्याईं जीवें जाय ॥४॥ नये भिडा सांगों आन । पथ्य औषधाकारण ॥५॥ धन माया पुत्र दारा । हे तों आवडी नरका थारा ॥६॥ तुका म्हणे यांत । आवडे ते करा मात ॥७॥
3143
बोलाचे गौरव । नव्हे माझा हा अनुभव ॥१॥ माझी हरिकथा माउली । नव्हे आणिकांसी पांगिली ॥ध्रु.॥ व्याली वाढविलें । निजपदीं निजवलें ॥२॥ दाटली वो रसें । त्रिभुवन ब्रम्हरसें ॥३॥ विष्णु जोडी कर । माथां रज वंदी हर ॥४॥ तुका म्हणे बळ । तोरडीं हा कळिकाळ ॥५॥
3144
बोलायाचा त्यासीं । नको संबंध मानसीं ॥१॥ जया घडली संतनिंदा । तुज विसरूनि गोविंदा ॥ध्रु.॥ जळो त्याचें तोंड । नको दृष्टीपुढें भांड ॥२॥ तुका म्हणे देवा । तया दुरी मज ठेवा ॥३॥
3145
बोलाल या आतां आपुल्यापुरतें । मज या अनंतें गोवियेलें ॥१॥ झाडिला न सोडी हातींचा पालव । वेधी वेधें जीव वेधियेला ॥ध्रु.॥ तुमचे ते शब्द कोरडिया गोष्टी । मज सवें मिठी अंगसंगें ॥२॥ तुका म्हणे तुम्हां होईंल हे परी । अनुभव वरी येईंल मग ॥३॥
3146
बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥ येणें सोसें मन जालें हांवभरी । परती माघारी घेत नाहीं ॥ध्रु.॥ बंधनापासूनि उकलली गांठी । देतां आली मिठी सावकाशें ॥२॥ तुका म्हणे देह भारिला विठ्ठलें । कामक्रोधें केलें घर रितें ॥३॥
3147
बोलावे म्हुण हे बोलतों उपाय । प्रवाहें हें जाय गंगाजळ ॥१॥ भाग्ययोगें कोणां घडेल सेवन । कैंचे येथें जन अधिकारी ॥ध्रु.॥ मुखीं देतां घांस पळवितीं तोंडें । अंगींचिया भांडे असुकानें ॥२॥ तुका म्हणे पूजा करितों देवाची । आपुलिया रुची मनाचिये ॥३॥
3148
बोलावें तें आतां आम्ही अबोलणे । एका चि वचनें सकळांसी ॥१॥ मेघदृष्टि कांहीं न विचारी ठाव । जैसा ज्याचा भाव त्यासी फळो ॥२॥ तुका म्हणे नाहीं समाधानें चाड । आपणा ही नाड पुढिलांसीं ॥३॥
3149
बोलावें तें धर्मा मिळे । बरे डोळे उघडूनि ॥१॥ काशासाठीं खावें शेण । जेणें जन थुंकी तें ॥ध्रु.॥ दुजें ऐसें काय बळी । जें या जाळी अग्नीसि ॥२॥ तुका म्हणे शूर रणीं । गांढें मनीं बुरबुरी ॥३॥
3150
बोलिलिया गुणीं नाहीं पाविजेत । देवा नाहीं होत हित तेथें ॥१॥ कवतुक तुझें नवल यावरि । घेसील तें शिरीं काय नव्हे ॥ध्रु.॥ नाहीं मिळे येत संचिताच्या मता । पुराणीं पाहतां अघटित ॥२॥ तुका म्हणे पायीं निरोपिला भाव । न्याल तैसा जाव सिद्धी देवा ॥३॥
3151
बोलिलीं तीं काय । माझा बाप आणि माय ॥१॥ ऐसें सांगा जी झडकरी । तुम्ही सखे वारकरी ॥ध्रु.॥ पत्राचें वचन । काय दिलें फिरावून ॥२॥ तुका म्हणे कांहीं । मना आणिलें कीं नाहीं ॥३॥
3152
बोलिलीं लेकुरें । वेडीं वांकुडीं उत्तरें ॥१॥ करा क्षमा अपराध । महाराज तुम्ही सिद्धी ॥ध्रु.॥ नाहीं विचारिला । अधिकार म्यां आपुला ॥२॥ तुका म्हणे ज्ञानेश्वरा । राखा पायांपें किंकरा ॥३॥
3153
बोलिलें चि बोलें पडपडताळूनि । उपजत मनीं नाहीं शंका ॥१॥ बहुतांची माय बहुत कृपाळ । साहोनि कोल्हाळ बुझाविसी ॥ध्रु.॥ बहुतांच्या भावें वांटिसी भातुकें । बहु कवतुकें खेळविसी ॥२॥ तुका म्हणे ऐसें जाणतसों वर्म । करणें तो श्रम न वजे वांयां॥३॥
3154
बोलिलेती ते देवॠषी दुर्वासया । जाय पुसावया मागत्यानें ॥१॥ मागुता दुर्वास पुसे बळिराया । निरोप जावया देई देवा ॥ध्रु.॥ बळी म्हणे त्यासी जाय मी न म्हणें । जाईंल नारायण लागला ची ॥२॥ मजपाशीं राहें कोठें तरीं जाय । तुका म्हणे पाय न सोडीं मी ॥३॥
3155
बोलिलों उत्कषॉ । प्रेमरस दाशत्वें ॥१॥ साच करिता नारायण । जया शरण गेलों तो ॥ध्रु.॥ समर्थ तो आहे ऐसा । धरिली इच्छा पुरवी ॥२॥ तुका म्हणे लडिवाळाचें । द्यावें साचें करूनियां ॥३॥
3156
बोलिलों जैसें बोलविलें देवें । माझें तुम्हां ठावें जातिकुळ ॥१॥ करा क्षमा कांहीं नका धरूं कोप । संत मायबाप दीनावरि ॥ध्रु.॥ वाचेचा चाळक जाला दावी वर्म । उचित ते धर्म मजपुढें ॥२॥ तुका म्हणे घडे अपराध नेणतां । द्यावा मज आतां ठाव पायीं ॥३॥
3157
बोलिलों ते आतां । कांहीं जाणतां नेणतां ॥१॥ क्षमा करावे अन्याय । पांडुरंगे माझे माय ॥ध्रु.॥ स्तुती निंदा केली । लागे पाहिजे साहिली ॥२॥ तुका म्हणे लाड । दिला तैसें पुरवा कोड ॥३॥ या पत्राच्या उत्तराच्या मार्गप्रतीक्षेचे अभंग १९
3158
बोलिलों ते धर्म अनुभव अंगें । काय पांडुरंगें उणें केलें ॥१॥ सर्व सिद्धि पायीं वोळगती दासी । इच्छा नाहीं ऐसी व्हावें कांहीं ॥ध्रु.॥ संतसमागमें अळंकार वाणी । करूं हे पेरणी शुद्ध बीजा ॥२॥ तुका म्हणे रामकृष्णनामें गोड । आवडीचें कोड माळ ओऊं ॥३॥
3159
बोलिलों तें आतां पाळावें वचन । ऐसें पुण्य कोण माझे गांठी ॥१॥ जातों आतां आज्ञा घेऊनियां स्वामी । काळक्षेप आम्ही करूं कोठें ॥ध्रु.॥ न घडे यावरि न धरवे धीर । पीडतां राष्ट्र देखोनि जग ॥२॥ तुका म्हणे तुम्ही दिसे मोकलिलें । काय आतां आलें जीवित्वाचें ॥३॥
3160
बोली मैंदाची बरवी असे । वाटे अंतरीं घालावे फांसे ॥१॥ कैसा वरिवरि दिसताहे चांग । नव्हे भाविक केवळ मांग ॥ध्रु.॥ टिळा टोपी माळा कंठीं । अंधारीं नेउनि चेंपी घांटी ॥२॥ तुका म्हणे तो केवळ पुंड । त्याजवरी यमदंड ॥३॥
3161
बोले तैसा चाले । त्याचीं वंदीन पाउलें ॥१॥ अंगें झाडीन अंगण । त्याचें दासत्व करीन ॥ध्रु.॥ त्याचा होईंन किंकर। उभा ठाकेन जोडोनि कर ॥२॥ तुका म्हणे देव । त्याचे चरणीं माझा भाव ॥३॥
3162
बोलों अबोलणें मरोनियां जिणें । असोनि नसणें जनि आम्हां ॥१॥ भोगीं त्याग जाला संगीं च असंग । तोडियेले लाग माग दोन्ही ॥२॥ तुका म्हणे नव्हें दिसतों मी तैसा । पुसणें तें पुसा पांडुरंगा ॥३॥
3163
बोलोनि दाऊं कां तुम्ही नेणा जी देवा । ठेवाल तें ठेवा ठायीं तैसा राहेन ॥१॥ पांगुळलें मन कांहीं नाठवे उपाय । म्हणऊनि पाय जीवीं धरूनि राहिलों ॥ध्रु.॥ त्यागें भोगें दुःख काय सांडावें मांडावें । ऐसी धरियेली जीवें माझ्या थोरी आशंका ॥२॥ तुका म्हणे माते बाळा चुकलिया वनीं । न पवतां जननी दुःख पावे विठ्ठले ॥३॥
3164
बोलोनियां काय दावूं । तुम्ही जीऊ जगाचे ॥१॥ हे चि आतां माझी सेवा । चिंतन देवा करितों ॥ध्रु.॥ विरक्तासी देह तुच्छ । नाहीं आस देहाची ॥२॥ तुका म्हणे पायापाशीं । येइन ऐसी वासना ॥३॥
3165
बोळविला देह आपुलेनि हातें । हुताशिलीं भूतें ब्रम्हाग्नीसीं ॥१॥ एकवेळे जालें सकळ कारण । आतां नारायण नारायण ॥ध्रु.॥ अमृतसंजीवनी निवविली खाईं । अंगें तये ठायीं हारपलीं ॥२॥ एकादशीविध जागरण उपवास । बारावा दिवस भोजनाचा ॥३॥ अवघीं कर्में जालीं घटस्पोटापाशीं । संबंध एकेसी उरला नामीं ॥४॥ \ तुका म्हणे आतां आनंदीं आनंदु । गोविंदीं गोविंदु विस्तारला ॥५॥
3166
ब्रम्ह न लिंपे त्या मेळें । कर्माअकर्मा वेगळें ॥१॥ तो चि एक तया जाणे । पावे अनुभविलें खुणें ॥ध्रु.॥ शोच अशौचाचे संधी । तन आळा तना चि मधीं ॥२॥ पापपुण्यां नाहीं ठाव । तुका म्हणे सहज भाव ॥३॥
3167
ब्रम्हचारी धर्म घोकावें अक्षर । आश्रमीं विचार षटकर्में ॥१॥ वानप्रस्थ तरी संयोगीं वियोग । संन्यास तो त्याग संकल्पाचा ॥ध्रु.॥ परमहंस तरी जाणे सहज वर्म । तेथें याती धर्म कुळ नाहीं ॥२॥ बोले वर्म जो चाले याविरहित । तो जाणा पतित श्रुति बोले ॥३॥ तुका म्हणे कांहीं नाहीं नेमाविण । मोकळा तो सीण दुःख पावे ॥४॥
3168
ब्रम्हज्ञान जरी कळें उठाउठी । तरि कां हिंपुटी वेदशास्त्रें ॥१॥ शास्त्रांचे भांडण जप तीर्थाटणें । उर्वीचें भ्रमण या च साटीं ॥ध्रु.॥ याचसाटीं जप याचसाटीं तप । व्यासें ही अमुप ग्रंथ केले ॥२॥ या च साटीं संतपाय हे सेवावे । तरि च तरावें तुका म्हणे ॥३॥
3169
ब्रम्हज्ञान जेथें आहे घरोघरीं । सर्व निरंतरी चतुर्भुज ॥१॥ पापा नाहीं रीग काळाचें खंडण । हरिनामकीर्तन परोपरी ॥२॥ तुका म्हणे हा चि भाव माझ्या चित्तीं । नाहीं आणिकां गती चाड मज ॥३॥
3170
ब्रम्हज्ञान तरी एके दिवसीं कळे । तात्काळ हा गळे अभिमान ॥१॥ अभिमान लागे शुकाचिये पाठी । व्यासें उपराटी दृष्टी केली ॥ध्रु.॥ जनकभेटीसी पाठविला तेणें । अभिमान नाणें खोटें केलें ॥२॥ खोटें करूनियां लाविला अभ्यासीं । मेरुशिखरासी शुक गेला ॥३॥ जाऊनियां तेणें साधिली समाधी । तुका म्हणे तधीं होतों आम्ही ॥४॥
3171
ब्रम्हज्ञान दारीं येतें काकुलती । अव्हेरिलें संतीं विष्णुदासीं ॥१॥ रिघों पाहे माजी बळें त्याचें घर । दवडिती दूर म्हणोनियां ॥२॥ तुका म्हणे येथें न चाले सायास । पडिले उदास त्याच्या गळां ॥३॥
3172
ब्रम्हज्ञानाची भरोवरी । पुढिला सांगे आपण न करी ॥१॥ थू थू त्याच्या तोंडावरी । व्यर्थ सिणवी वैखरी ॥ध्रु.॥ कथा करी वरिवरी । प्रेम नसे चि अंतरीं ॥२॥ तुका म्हणे कवित्व करी । मान वस्तु हे आदरी ॥३॥
3173
ब्रम्हनिष्ठ काडी । जरी जीवानांवें मोडी ॥१॥ तया घडली गुरुहत्या । गेला उपदेश तो मिथ्या ॥ध्रु.॥ सांगितलें कानीं । रूप आपुलें वाखाणी ॥२॥ भूतांच्या मत्सरें । ब्रम्हज्ञान नेलें चोरें ॥३॥ शिकल्या सांगे गोष्टी । भेद क्रोध वाहे पोटीं ॥४॥ निंदा स्तुति स्तवनीं । तुका म्हणे वेंची वाणी ॥५॥
3174
ब्रम्हयाचे वेद शंखासुरें नेले । त्यासाटीं धरिलें मत्स्यरूप ॥१॥ तेणें आत्मा नव्हता नेला ब्रम्हांडासी । काय ब्रम्हयासी नव्हतें ज्ञान ॥ध्रु.॥ परि तेणें धावा केला आवडीनें । जाले नारायण कृपासिंधु ॥२॥ तुका म्हणे विठोबा मी नामधारक । पोसनें सेवक भेटी देई ॥३॥
3175
ब्रम्हरस घेई काढा । जेणें पीडा वारेल ॥१॥ पथ्य नाम विठोबाचें । अणीक वाचे न सेवीं ॥ध्रु.॥ भवरोगाऐसें जाय । आणीक काय क्षुल्लकें ॥२॥ तुका म्हणे नव्हे बाधा । अणीक कदा भूतांची ॥३॥
3176
ब्रम्हरसगोडी तयांसी फावली । वासना निमाली सकळ ज्यांची ॥१॥ नाहीं त्या विटाळ अखंड सोंवळीं । उपाधीवेगळीं जाणिवेच्या ॥ध्रु.॥ मन हें निश्चळ जालें एके ठायीं । तयां उणें काईं निजसुखा ॥२॥ तीं चि पुण्यवंतें परउपकारी । प्रबोधी त्या नारीनरलोकां ॥३॥ तुका म्हणे त्यांचे पायीं पायपोस । होऊनियां वास करिन तेथें ॥ ४॥
3177
ब्रम्हरूपाचीं कर्में ब्रम्हरूप । विरहित संकल्प होती जाती ॥१॥ ठेविलिया दिसे रंगाऐसी शिळा । उपाधि निराळा स्फटिक मणि ॥ध्रु.॥ नानाभाषामतें आळविती बाळा । प्रबोध तो मूळा जननीठायीं ॥२॥ तुका म्हणे माझें नमन जाणतियां । लागतसें पायां वेळोवेळां ॥३॥
3178
ब्रम्हहत्या मारिल्या गाई । आणीक काई पाप केलें ॥१॥ ऐका जेणें विकिली कन्या । पवाडे त्या सुन्याचे ॥ध्रु.॥ नरमांस खादली भाडी । हाका मारी म्हणोनि ॥२॥ अवघें पाप केलें तेणें । जेणें सोनें अभिळाषिलें ॥३॥ उच्चारितां मज तें पाप । जिव्हे कांप सुटतसे ॥४॥ तुका म्हणे कोरान्न रांड । बेटा भांड मागे ना कां ॥५॥
3179
ब्रम्हादिक जया लाभासि ठेंगणे । बळिये आम्ही भले शरणागत ॥१॥ कामनेच्या त्यागें भजनाचा लाभ । जाला पद्मनाभ सेवाॠणी ॥ध्रु.॥ कामधेनूचिया क्षीरा पार नाहीं । इच्छेचिये वाही वरुषावे ॥२॥ बैसलिये ठायीं लागलें भरतें । त्रिपुटीवरतें भेदी ऐसें ॥३॥ हरि नाहीं आम्हां विष्णुदासां जगीं । नारायण अंगीं विसावला ॥४॥ तुका म्हणे बहु लाटे हें भोजन । नाहीं रिता कोण राहत राहों ॥५॥
3180
ब्रम्हादिकां न कळे खोळ । ते हे आकळ धरिली ॥१॥ मोहरी पांवा वाहे काठी । धांवे पाठीं गाईचे ॥ध्रु.॥ उच्छिष्ट न लभे देवा । तें हें सदैवां गोवळ्या ॥२॥ तुका म्हणे जोड जाली । ते हे माउली आमुची ॥३॥
3181
ब्राम्हण तो नव्हे ऐसी ज्यासी बुद्धी । पाहा श्रुतीमधीं विचारूनि ॥१॥ जयासी नावडे हरिनामकीर्तन । आणीक नृत्य न वैष्णवांचें ॥ध्रु.॥ सत्य त्याचे वेळे घडला व्यभिचार । मातेसी वेव्हार अंत्यजाचा ॥२॥ तुका म्हणे येथें मानी आनसारिखें । तात्काळ तो मुखें कुष्ट होय ॥३॥
3182
ब्राम्हण तो याती अंतेज असतां । मानावा तत्वता निश्चयेसी ॥१॥ रामकृष्णें नाम उच्चारी सरळें । आठवी सांवळें रूप मनीं ॥ध्रु.॥ शांति क्षमा दया अलंकार अंगीं । अभंग प्रसंगीं धैर्यवंत ॥२॥ तुका म्हणे गेल्या शडऊर्मी अंगें । सांडुनियां मग ब्रम्हं चि तो ॥३॥ एक करिती गुरु गुरु । भोंवता भारु शिष्यांचा ॥१॥ पुंस नाहीं पाय चारी । मनुष्य परी कुतरीं तीं ॥ध्रु.॥ परस्त्री मद्यपान । पेंडखान माजविलें ॥२॥ तुका म्हणे निर्भर चित्तीं । अधोगती जावया ॥३॥
3183
ब्राम्हणा न कळे आपुलें तें वर्म । गंवसे परब्रम्ह नामें एका ॥१॥ लहानथोरासि करितों प्रार्थना । दृढ नारायणा मनीं धरा ॥ध्रु.॥ सर्वांप्रति माझी हे चि असे विनंती । आठवा श्रीपती मनामाजी ॥२॥ केशव नारायण करितां आचमन । ते चि संध्या स्नान कर्म क्रिया ॥३॥ नामें करा नित्य भजन भोजन । ब्रम्हकर्म ध्यान याचे पायीं ॥४॥ तुका म्हणे हें चि निर्वाणींचें शस्त्र । म्हणोनि सर्वत्र स्मरा वेगीं ॥५॥
3184
ब्रिदावळी ज्याचे रुळते चरणीं । पाउलें मेदिनी सुखावे त्या ॥१॥ सुखावे मेदिनी कृष्णाचिये चालीं । कुंकुमें शोभलीं होय रेखा ॥२॥ होउनि भ्रमर पाउलांचें सुख । घेती क्त मुख लावूनियां ॥३॥ याचसाटीं धरियेला अवतार । सुख दिलें फार निजदासां ॥४॥ निज सुख तुका म्हणे भक्तां ठावें । तींहीं च जाणावें भोगूं त्यासि ॥५॥
3185
ब्रीद मेरे साइंयाके । तुका चलावे पास । सुरा सो हि लरे हमसें । छोरे तनकी आस ॥१॥
3186
ब्रीद याचें जगदानी । तो चि मनीं स्मरावा ॥१॥ सम पाय कर कटी । उभा तटीं भींवरेच्या ॥ध्रु.॥ पाहिलिया वेध लावी । बैसे जीवीं जडोनि ॥२॥ तुका म्हणे भक्तिकाजा । धांवें लाजा लवलाहें ॥३॥
3187
भक्त ऐसे जाणा जे देहीं उदास । गेले आशापाश निवारूनि ॥१॥ विषय तो त्यांचा जाला नारायण । नावडे धन जन माता पिता ॥ध्रु.॥ निर्वाणीं गोविंद असे मागेंपुढें । कांहीं च सांकडें पडों नेदी ॥२॥ तुका म्हणे सत्य कर्मा व्हावें साहे । घातलिया भये नर्का जाणें ॥३॥
3188
भक्त देवाघरचा सुना । देव भक्ताचा पोसणा ॥१॥ येर येरां जडलें कैसें । जीवा अंगें जैसें तैसें ॥ध्रु.॥ देव भक्ताची कृपाळु माता । भक्त देवाचा जनिता ॥२॥ तुका म्हणे अंगें । एक एकाचिया संगें ॥३॥
3189
भक्त भागवत जीवन्मुक्त संत । महिमा अत्यद्भुत चराचरीं । ऐसिया अनंतामाजी तूं अनंत । लीलावेश होत जगत्राता ॥१॥ ब्रम्हानंद तुकें तुळे आला तुका । तो हा विश्वसंख्या क्रीडे जनीं ॥ध्रु.॥ शास्त्रा श्रेष्ठाचार अविरुद्ध क्रिया । तुझी भक्तराया देखियेली । देऊनि तिळाजुळी काम्य निषिद्धांसी । विधिविण योगेशी ब्रम्हार्पण ॥२॥ संत ग्रहमेळीं जगधंद्या गिळी । पैल उदयाचळीं भानु तुका । संत वृंदें तीर्थ गौतमी हरिकथा । तुकया नर सिंहस्ता भेटों आली ॥३॥ शांति पतिव्रते जाले परिनयन । काम संतर्पण निष्कामता । क्षमा क्षमापणें प्रसद्धि प्रथा जगीं । तें तों तुझ्या अंगी मूर्तिमंत ॥४॥ दया दिनानाथा तुवा जीवविली । विश्वीं विस्तारली कीर्ति तुझी । वेदवाक्यबाहु उभारिला ध्वज । पूजिले देव द्विज सर्वभूतें ॥५॥ अधर्म क्षयव्याधि धर्मांशीं स्पर्शला । तो त्वां उपचारिला अनन्यभक्ति । ब्रम्ह ऐक्यभावें भक्ति विस्तारिली । वाक्यें सपळ केलीं वेदविहितें ॥६॥ देहबुद्धि जात्या अभिमानें वंचलों । तो मी उपेक्षिलों न पाहिजे । न घडो याचे पायीं बुद्धीचा व्यभिचार । मागे रामेश्वर रामचंद्र ॥७॥
3190
भक्तॠणी देव बोलती पुराणें । निर्धार वचनें साच करीं ॥१॥ मागें काय जाणों अइकिली वार्त्ता । कबिर सातें जातां घडिया वांटी ॥ध्रु.॥ माघारिया धन आणिलें घरासि । न घे केला त्यासि त्याग तेणें ॥२॥ नामदेवाचिया घरासि आणिलें । तेणें लुटविलें द्विजां हातीं ॥३॥ प्रत्यक्षासि काय द्यावें हें प्रमाण । व्यंकोबाचें ॠण फेडियेलें ॥४॥ बीज दळोनियां केली आराधना । लागे नारायणा पेरणें तें ॥५॥ तुका म्हणे नाहीं जयासि निर्धार । नाडला साचार तो चि एक ॥६॥
3191
भक्तजनां दिलें निजसुख देवें । गोपिका त्या भावें आळंगिल्या ॥१॥ आळंगिल्या गोपी गुणवंता नारी । त्यांच्या जन्मांतरीं हरि ॠणी ॥२॥ रुसलिया त्यांचें करी समाधान । करविता आण क्रिया करी ॥३॥ क्रिया करी तुम्हां न वजे पासुनि । अवघियाजणी गोपिकांसी ॥४॥ गोपिकांसी म्हणे वैकुंठींचा पति । तुम्हीं माझ्या चित्ती सर्वभावें ॥५॥ भाव जैसा माझ्याठायीं तुम्ही धरा । तैसा चि मी खरा तुम्हांलागीं ॥६॥ तुम्हां कळों द्या हा माझा साच भाव । तुमचा चि जीव तुम्हां ग्वाही ॥७॥ ग्वाही तुम्हां आम्हां असे नारायण । आपली च आण वाहातसे ॥८॥ सत्य बोले देव भक्तिभाव जैसा । अनुभवें रसा आणूनियां ॥९॥ यांसी बुझावितो वेगळाल्या भावें । एकीचें हें ठावें नाहीं एकी ॥१०॥ एकी क्रिया नाहीं आवघियांचा भाव । पृथक हा देव घेतो तैसें ॥११॥ तैसें कळों नेदी जो मी कोठें नाहीं । अवघियांचे ठायीं जैसा तैसा ॥१२॥ जैसा मनोरथ जये चित्ती काम । तैसा मेघशाम पुरवितो ॥१३॥ पुरविले मनोरथ गोपिकांचे । आणीक लोकांचे गोकुळींच्या ॥१४॥ गोकुळींच्या लोकां लावियेला छंद । बैसला गोविंद त्याचा चित्ती ॥१५॥ चित्ते ही चोरूनि घेतलीं सकळा । आवडी गोपाळांवरी तयां ॥१६॥ आवडे तयांसी वैकुंठनायक । गेलीं सकळिक विसरोनि ॥१७॥ निंदा स्तुती कोणी न करी कोणाची । नाहीं या देहाची शुद्धि कोणा ॥१८॥ कोणासी नाठवे कन्या पुत्र माया । देव म्हणुनि तया चुंबन देती ॥१९॥ देती या टाकून भ्रतारांसी घरीं । लाज ते अंतरीं आथी च ना ॥२०॥ नाहीं कोणा धाक कोणासी कोणाचा । तुका म्हणे वाचा काया मनें ॥२१॥
3192
भक्तवत्सल दिनानाथ । तिहीं लोकीं ज्याची मात ॥१॥ तो हा पुंडलिकासाठीं । आला उभा वाळवंटीं ॥ध्रु.॥ गर्भवास धरी । अंबॠषीचा कैवारी ॥२॥ सकळां देवां अधिष्ठान । एका मंत्रासी कारण ॥३॥ तुका म्हणे ध्यानीं । ज्यासि ध्यातो शूळपाणी ॥४॥
3193
भक्ता म्हणऊनि वंचावें जीवें । तेणें शेण खावें काशासाटीं ॥१॥ नासिले अडबंद कौपीन ते माळा । अडचण राउळामाजी केली ॥ध्रु.॥ अंगीकारिले सेवे अंतराय । तया जाला न्याय खापराचा ॥२॥ तुका म्हणे कोठें तगों येती घाणीं । आहाच ही मनीं अधीरता ॥३॥
3194
भक्तां समागमें सर्वभावें हरि । सर्व काम करी न संगतां ॥१॥ सांटवला राहे हृदयसंपुष्टीं । बाहेर धाकुटी मूर्ति उभा ॥ध्रु.॥ मागण्याची वास पाहे मुखाकडे । चिंतिल्या रोकडे मनोरथ ॥२॥ तुका म्हणे जीव भाव देवापायीं । ठेवूनि ते कांहीं न मगती ॥३॥
3195
भक्तांचा महिमा भक्त चिं जाणती । दुर्लभ या गति आणिकांसी ॥१॥ जाणोनि नेणते जाले तेणें सुखें । नो बोलोनि मुखें बोलताती ॥ध्रु.॥ अभेदूनि भेद राखियेला अंगीं । वाढावया जगीं प्रेमसुख ॥२॥ टाळ घोष कथा प्रेमाचा सुकाळ । मूढ लोकपाळ तरावया ॥३॥ तुका म्हणे हें तों आहे तयां ठावें । जिहीं एक्या भावें जाणीतलें ॥४॥
3196
भक्तांची सांकडीं स्वयें सोसी देव । त्यांपाशीं केशव सर्वकाळ ॥१॥ जये ठायीं कीर्तन वैष्णव करिती । तेथें हा श्रीपति उभा असे ॥२॥ तुका म्हणे देव सर्वाठायीं जाला । भरुनी उरला पांडुरंग ॥३॥
3197
भक्तांहून देवा आवडे तें काइ । त्रिभुवनीं नाहीं आन दुजें ॥१॥ नावडे वैकुंठ क्षीराचा सागर । धरोनि अंतर राहे दासा ॥ध्रु.॥ सर्वभावें त्याचें सर्वस्वें ही गोड । तुळसीदळ कोड करुनी घ्यावें ॥२॥ सर्वस्वें त्याचा म्हणवी विकला । चित्त द्यावें बोला सांगितल्या ॥३॥ तुका म्हणे भक्तीसुखाचा बांधिला । आणीक विठ्ठला धर्म नाहीं॥४॥
3198
भक्ताविण देवा । कैंचें रूप घडे सेवा ॥१॥ शोभविलें येर येरां । सोनें एके ठायीं हिरा ॥ध्रु.॥ देवाविण भक्ता । कोण देता निष्कामता ॥२॥ तुका म्हणे बाळ । माता जैसें स्नेहजाळ ॥३॥
3199
भक्ति तें नमन वैराग्य तो त्याग । ज्ञान ब्रम्हीं भोग ब्रम्हतनु ॥१॥ देहाच्या निरसनें पाविजे या ठाया । माझी ऐसी काया जंव नव्हे ॥ध्रु.॥ उदक अग्नि धान्य जाल्या घडे पाक । एकाविण एक कामा नये ॥२॥ तुका म्हणे मज केले ते चांचणी । बडबडीची वाणी अथवा सत्य ॥३॥
3200
भक्ति तों कठिण शुळावरील पोळी । निवडे तो बळी विरळा शूर ॥१॥ जेथें पाहें तेथें देखीचा पर्वत । पायाविण भिंत तांतडीची ॥ध्रु.॥ कामावलें तरि पाका ओज घडे । रुचि आणि जोडे श्लाघ्यता हे ॥२॥ तुका म्हणे मना पाहिजे अंकुश । नित्य नवा दिस जागृतीचा ॥३॥
3201
भक्तिॠण घेतलें माझें । चरण गाहाण आहेत तुझे ॥१॥ प्रेम व्याज देई हरी । माझा हिशेब लवकरी करीं ॥ध्रु.॥ माझें मी न सोडीं धन । नित्य करितों कीर्तन ॥२॥ तुझें नाम आहे खत । सुखें करी पंचाईंत ॥३॥ तुका म्हणे गरुडध्वजा । यासी साक्ष श्रीगुरुराजा ॥४॥
3202
भक्तिचिया पोटीं रत्नाचिया खाणी । बम्हींची ठेवणी सकळ वस्तु ॥१॥ माउलीचे मागें बाळकांची हरी । एका सूत्रें दोरी ओढतसे ॥ध्रु.॥ जेथील जें मागे तें रायासमोर । नाहींसें उत्तर येत नाहीं ॥२॥ सेवेचिये सत्ते धनी च सेवक । आपुलें तें एक न वंची कांहीं ॥३॥ आदिअंताठाव असे मध्यभाग । भोंवतें भासे मग उंचासनी ॥४॥ भावारूढ तुका जाला एकाएकीं । देव च लौकिकीं अवघा केला ॥५॥
3203
भक्तिप्रतिपाळे दीन वो वत्सळे । विठ्ठले कृपाळे होसी माये ॥१॥ पडिला विसर माझा काय गुणें । कपाळ हें उणें काय करूं ॥२॥ तुका म्हणे माझें जाळूनि संचित । करीं वो उचित भेट देई ॥३॥
3204
भक्तिप्रेमसुख नेणवे आणिकां । पंडित वाचकां ज्ञानियांसी ॥१॥ आत्मनिष्ठ जरी जाले जीवन्मुक्त । तरी भक्ति सुख दुर्लभ त्यां ॥२॥ तुका म्हणे कृपा करिल नारायण । तरि च हें वर्म पडे ठायीं ॥३॥
3205
भक्तिभाव आम्ही बांधिलासे गांठी । साधावितों हाटीं घ्या रे कोणी ॥१॥ सुखाचिया पेंठे घातला दुकान । मांडियेले वान रामनाम ॥ध्रु.॥ सुखाचें फुकाचें सकळांचें सार । तरावया पार भवसिंधु ॥२॥ मागें भाग्यवंत जाले थोर थोर । तिहीं केला फार हा चि सांटा ॥३॥ खोटें कुडें तेथें नाहीं घातपात । तुका म्हणे चत्ति शुद्ध करीं ॥४॥
3206
भक्तिभावें करी बैसोनि निश्चित । नको गोवूं चित्त प्रपंचासी ॥१॥ एका दृढ करीं पंढरीचा राव । मग तुज उपाव पुढिल सुचे ॥ध्रु.॥ नको करूं कांहीं देवतापूजन । जप तप ध्यान तें ही नको ॥२॥ मानिसील झणी आपलिक कांहीं । येरझार पाहीं न चुके कदा ॥३॥ ऐसे जन्म किती पावलासी देहीं । अझूनि का नाहीं कळली सोय ॥४॥ सोय घरीं आतां होय पां सावध । अनुभव आनंद आहे कैसा ॥५॥ सहज कैसें आहे तेथीचें तें गुज । अनुभवें निज पाहे तुकीं ॥६॥ तुका म्हणे आतां होईं तूं सावध । तोडीं भवबंध एका जन्में ॥७॥
3207
भक्तिसुखें जे मातले । ते कळिकाळा शूर जाले ॥१॥ हातीं बाण हरिनामाचे । वीर गर्जती विठ्ठलाचे ॥ध्रु.॥ महां दोषां आला त्रास । जन्ममरणां केला नाश ॥२॥ सहस्रनामाची आरोळी । एक एकाहूनि बळी ॥३॥ नाहीं आणिकांचा गुमान । ज्याचें अंकित त्यावांचून ॥४॥ का म्हणे त्यांच्या घरीं । मोक्षसिद्धी या कामारी ॥५॥
3208
भक्ती आम्ही केली सांडुनी उद्वेग । पावलों हें सांग सुख याचें ॥१॥ सुख आम्हां जालें धरितां यांचा संग । पळाले उद्वेग सांडूनिया ॥२॥ तुका म्हणे सुख बहु जालें जिवा । घडली या सेवा विठोबाची ॥३॥
3209
भक्ती ज्याची थोडी । पूर्ण विषयांची गोडी ॥१॥ तो नर चि नव्हे पाहीं । खर जाणावा तो देहीं ॥ध्रु.॥ भजन पूजन ही नेणे । काय स्वरूपासी जाणे ॥२॥ तुका म्हणे त्याला । भोवंडून बाहेर घाला ॥३॥
3210
भक्तीचिया पोटीं बोध कांकडा ज्योती । पंचप्राण जीवें भावें ओंवाळूं आरती ॥१॥ ओंवाळू आरती माझ्या पंढरीनाथा । दोन्ही कर जोडोनि चरणीं ठेवीन माथा ॥ध्रु.॥ काय महिमा वर्णू आतां सांगणें तें किती । कोटि ब्रम्हहत्या मुख पाहतां जाती ॥२॥ राही रखुमाईं दोही दों बाही । मयूर पिच्छचामरें ढाळिति ठायीं ठायीं ॥३॥ तुका म्हणे दीप घेऊनि उन्मनति शोभा । विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा ॥४॥
3211
भक्तीचें वर्म जयाचिये हातीं । तया घरी शांति दया ॥१॥ अष्टमासिद्धि वोळगती द्वारीं । न वजती दुरी दवडितां॥ध्रु.॥ तेथें दुष्ट गुण न मिळे निशेष । चैतन्याचा वास जयामाजी ॥२॥ संतुष्ट चित्त सदा सर्वकाळ । तुटली हळहळ त्रिगुणाची ॥३॥ तुका म्हणे येथें काय तो संदेह । आमचें गौरव आम्ही करूं ॥४॥
3212
भक्तीवीण जिणें जळो लाजिरवाणें । संसार भोगणें दुःखमूळ ॥१॥ वीसलक्ष योनि वृक्षामाजी घ्याव्या । जलचरीं भोगाव्या नवलक्ष ॥ध्रु.॥ अकरालक्ष योनि किड्यामाजी घ्याव्या । दशलक्ष भोगाव्या पर्‍यांमध्ये ॥२॥ तीसलक्ष योनि पशूंचीये घरीं । मानवाभीतरीं चारलक्ष ॥३॥ एकएक योनि कोटिकोटि फेरा । मनुष्यदेहाचा वारा मग लागे ॥४॥ तुका म्हणे तेव्हां नरदेह नरा । तयाचा मातेरा केला मूढें ॥५॥
3213
भक्तीसाटीं केली यशोदेसी आळी । थिंकोनिया चोळी डोळे देव ॥१॥ देव गिळुनियां धरिलें मोहन । माय म्हणे कोण येथें दुजें ॥२॥ दुजें येथें कोणी नाहीं कृष्णाविण । निरुते जाणोन पुसे देवा ॥३॥ देवापाशीं पुसे देव काय जाला । हांसें आलें बोला याचें हरि ॥४॥ यांचे मी जवळी देव तो नेणती । लटिकें मानिती साच खरें ॥५॥ लटिकें तें साच साच तें लटिके । नेणती लोभिकें आशाबद्ध ॥६॥ सांग म्हणे माय येरु वासी तोंड । तंव तें ब्रम्हांड देखे माजी ॥७॥ माजी जया चंद्र सूर्य तारांगणें । तो भक्तांकारणें बाळलीला ॥८॥ लीळा कोण जाणे याचें महिमान । जगाचें जीवन देवादिदेव ॥९॥ देवें कवतुक दाखविलें तयां । लागतील पायां मायबापें ॥१०॥ मायबाप म्हणे हा चि देव खरा । आणीक पसारा लटिका तो ॥११॥ तो हि त्यांचा देव दिला नारायणें । माझें हें करणें तो हि मी च ॥१२॥ मीं च म्हणउनि जें जें जेथें ध्याती । तेथें मी श्रीपति भोगिता तें ॥१३॥ तें मज वेगळें मी तया निराळा । नाहीं या सकळा ब्रम्हांडांत ॥१४॥ ततभावना तैसें भविष्य तयाचें । फळ देता साचें मी च एक ॥१५॥ मी च एक खरा बोलें नारायण । दाविलें निर्वाण निजदासां ॥१६॥ निजदासां खूण दाविली निरुती । तुका म्हणे भूतीं नारायण ॥१७॥
3214
भगवंता तुजकारणें मेलों जीता चि कैसी । निष्काम बुद्धी ठेली चळण नाहीं तयासी । न चलती हात पाय दृष्टी फिरली कैसी । जाणतां न देखों गा क्षर आणि अक्षरासी ॥१॥ विठोबा दान दे गा तुझ्या सारिखें नामा । कीर्ति हे वाखाणिली थोर वाढली सीमा ॥ध्रु.॥ भक्तिमुक्ति तूं चि एक होसि सिद्धीचा दाता । म्हणोनि सांडवली शोक भय लज्जा चिंता । सर्वस्वें त्याग केला धांव घातली आतां । कृपादान देई देवा येउनि सामोरा आतां ॥२॥ संसारसागरू गा भवदुःखाचें मूळ । जनवाद अंथरुण माजी केले इंगळ । इंयें वज्रघातें तपे उष्ण वरी जाळ । सोसिलें काय करूं दुर्भर हे चांडाळ ॥३॥ तिहीं लोकीं तुझें नाम वृक्ष पल्लव शाखा । वेंघलों वरि खोडा भाव धरूनि टेंका । जाणवी नरनारी जागो धरम लोकां । पावती पुण्यवंत सोई आमुचिये हाका ॥४॥ नाठवे आपपर आतां काय बा करूं । सारिखा सोइसवा हारपला विचारू । घातला योगक्षेम तुज आपुला भारू । तुकया शरणागता देई अभयकरू ॥५॥ वासुदेव - अभंग ६
3215
भगवें तरी श्वान सहज वेष त्याचा । तेथें अनुभवाचा काय पंथ ॥१॥ वाढवुनी चटा फिरे दाही दिशा । तरी जंबुवेषा सहज स्थिति ॥ध्रु.॥ कोरोनियां भूमी करिती मधीं वास । तरी उंदरास काय वाणी ॥२॥ तुका म्हणे ऐसें कासया करावें । देहासी दंडावें वाउगें चि ॥३॥
3216
भजन घाली भोगावरी । अकर्तव्य मनीं धरी ॥१॥ धिग त्याचें साधुपण । विटाळूनी वर्ते मन ॥ध्रु.॥ नाहीं वैराग्याचा लेश । अर्थचाड जावें आस ॥२॥ हें ना तें सें जालें । तुका म्हणे वांयां गेलें ॥३॥
3217
भजन या नासिलें हेडि । दंभा लंडा आवडी ॥१॥ जेवीत ना आइता पाक । नासी ताक घुसळूनि ॥ध्रु.॥ एकाएकीं इच्छी पाठ । नेणे चाट कां जेवूं ॥२॥ तुका म्हणे मुलाम्याचें । बंधन साचें सेवटीं ॥३॥
3218
भजनें चि जालें । मग जीवाचें काय आलें ॥१॥ येऊं नेदावी पुढती । आड भयाची ते जाती ॥ध्रु.॥ करितां सरोबरी । कांहीं न ठेवावी उरी ॥२॥ तुका म्हणे शूर । व्हावे धुरेसीं च धुरे॥३॥
3219
भजल्या गोपिका सर्व भावें देवा । नाहीं चित्ती हेवा दुजा कांहीं ॥१॥ दुजा छंदु नाहीं तयांचिये मनीं । जागृति सपनीं कृष्णध्यान ॥२॥ ध्यान ज्यां हरीचें हरीसि तयांचें । चित्त ग्वाही ज्यांचें तैशा भावें ॥३॥ भाग्यें पूर्वपुण्यें आठविती लोक । अवघे सकळिक मथुरेचे ॥४॥ मथुरेचे लोक सुखी केले जन । तेथें नारायण राज्य करी ॥५॥ राज्य करी गोपीयादवांसहित । कमिऩलें बहुतकाळ तेथें ॥६॥ तेथें दैत्यीं उपसर्ग केला लोकां । रचिली द्वारका तुका म्हणे ॥७॥
3220
भय नाहीं भेव । अनुतापीं नव्हतां जीव ॥१॥ जेथें देवाची तळमळ । तेथें काशाचा विटाळ ॥ध्रु.॥ उच्चारितां दोष । नाहीं उरों देत लेश ॥२॥ तुका म्हणे चित्त । होय आवडी मिश्रित ॥३॥
3221
भय वाटे पर । न सुटे हा संसार ॥१॥ ऐसा पडिलों कांचणी । करीं धांवा म्हणउनी ॥ध्रु.॥ विचारितों कांहीं । तों हें मन हातीं नाहीं ॥२॥ तुका म्हणे देवा । येथें न पुरे रिघावा ॥३॥
3222
भय हरिजनीं । कांहीं न धरावें मनीं ॥१॥ नारायण ऐसा सखा । काय जगाचा हा लेखा ॥ध्रु.॥ चित्ती वत्ति हेवा । समर्पून राहा देवा ॥२॥ तुका म्हणे मन । असों द्यावें समाधान ॥३॥
3223
भय होतें आम्हीपणें । पाठी येणें घातलें ॥१॥ अवघा आपुला चि देश । काळा लेश उरे चि ना ॥ध्रु.॥ समर्थाचें नाम घेतां । मग चिंता काशाची ॥२॥ तुका म्हणें नारायणें । जालें जिणें सुखाचें ॥३॥
3224
भयाची तों आम्हां चिंत्तीं । राहो खंती सकेना ॥१॥ समर्पिलों जीवें भावें । काशा भ्यावें कारणें ॥ध्रु.॥ करीन तें कवतुकें। अवघें निकें शोभेल ॥२॥ तुका म्हणे माप भरूं । दिस सारूं कवतुकें ॥३॥
3225
भरणी आली मुH पेठा । करा लाटा व्यापार ॥१॥ उधार घ्या रे उधार घ्या रे । अवघे या रे जातीचे ॥ध्रु.॥ येथें पंक्तिभेद नाहीं । मोठें कांहीं लहान ॥२॥ तुका म्हणे लाभ घ्यावा । मुद्दल भावा जतन ॥३॥
3226
भरला दिसे हाट । अवघी वाढली खटपट । संचिताचे वाट । वाटाऊनि फांकती ॥१॥ भोगा ऐसे ठायाठाव । कर्मा त्रिविधाचे भाव । द्रष्टा येथें देव । विरहित संकल्पा ॥ध्रु.॥ दिला पाडूनियां धडा । पापपुण्यांचा निवाडा । आचरती गोडा । आचरणें आपुलाल्या ॥२॥ तुका म्हणे पराधीनें । जालीं ओढलिया ॠणें । तुटती बंधनें । जरि देवा आळविते ॥३॥
3227
भरिला उलंडूनि रिता करी घट । मीस पाणियाचें गोविंदाची चट । चाले झडझडां उसंतूनि वाट । पाहे पाळतूनि उभा तो चि नीट वो ॥१॥ चाळा लावियेले गोप गोपीनाथें । जाणे आवडीचें रूप जेथें तेथें । दावी बहुतांच्या बहुवेषपंथें । गुणातीतें खेळ मांडियेला येथें वो ॥ध्रु.॥ मनीं आवडे तें करावें उत्तर । कांहीं निमित्ताचा पाहोनि आधार । उगा राहे कां मारिसी कंकर । मात वाढविसी उत्तरा उत्तर वो ॥२॥ धरिली खोडी दे टाकोनियां मागें । न ये विनोद हा कामा मशीं संगें । मिठी घालीन या जीवाचिया त्यागें । नाहीं ठाउकी पडिलीं तुझीं सोंगें रें ॥३॥ सुख अंतरींचें बाहय ठसठसी । म्हणे विनोद हा काय सोंग यासी । तुज मज काय सोयरीक ऐसी । नंदानंदन या थोरपणें जासी रे ॥४॥ करी कारण तें कळों नेदी कोणा । सुख अंतरींचे बाह्य रंग जाना । मन मिनलें रे तुका म्हणे मना । भोग अंतरींचा पावे नारायणा वो ॥५॥
3228
भलते जन्मीं मज घालिसील तरी । न सोडीं मी हरी नाम तुझें ॥१॥ सुख दुःख तुज देईंन भोगितां । मग मज चिंता कासयाची ॥ध्रु.॥ तुझा दास म्हणवीन मी अंकिला । भोगितां विठ्ठला गर्भवास ॥२॥ कासया मी तुज भाकितों करुणा । तारीं नारायणा म्हणवुनि ॥३॥ तुका म्हणे तुज येऊं पाहे उणें । तारिसील तेणें आम्हां तया ॥४॥
3229
भला म्हणे जन । परि नाहीं समाधान ॥१॥ माझें तळमळी चित्ती । अंतरलें दिसे हित ॥ध्रु.॥ कृपेचा आधार । नाहीं दंभ जाला भार ॥२॥ तुका म्हणे कृपे । अंतराय कोण्या पापें ॥३॥
3230
भले भणवितां संतांचे सेवक । आइत्याची भीक सुखरूप ॥१॥ ठसावितां बहु लागती सायास । चुकल्या घडे नास अल्प वर्म ॥ध्रु.॥ पाकसिद्धी लागे संचित आइतें । घडतां सोई तें तेव्हां गोड ॥२॥ तुका म्हणे बरे सांगतां चि गोष्टी । रणभूमि दृष्टी न पडे तों ॥३॥
3231
भले रे भाईं जिन्हें किया चीज । आछा नहिं मिलत बीज ॥ध्रु.॥ फीरतफीरत पाया सारा । मीटत लोले धन किनारा ॥१॥ तीरथ बरत फिर पाया जोग । नहिं तलमल तुटति भवरोग ॥२॥ कहे तुका मैं ताको दासा । नहिं सिरभार चलावे पासा ॥३॥
3232
भले लोक तुज बहु मानवती । वाढेल या कीर्ति जगामाजी ॥१॥ म्हणे मेलीं गुरें भांडीं नेलीं चोरें । नाहींत लेंकुरें जालीं मज ॥ध्रु.॥ आस निरसूनि कठिण हें मन । करीं वो समान वज्र तैसें ॥२॥ किंचित हें सुख टाकीं वो थुंकोनि । पावसील धनी परमानंद ॥३॥ तुका म्हणे थोर चुकती सायास । भवबंद पाश तुटोनियां ॥४॥
3233
भले लोक नाहीं सांडीत ओळखी । हे तों झाली देखी दुसर्‍याची ॥१॥ असो आतां यासी काय चाले बळ । आपुलें कपाळ वोडवलें ॥ध्रु.॥ समर्थासी काय कोणें हें म्हणावें । आपुलिया जावें भोगावरि ॥२॥ तुका म्हणे तुम्हां बोल नाहीं देवा । नाहीं केली सेवा मनोभावें ॥३॥
3234
भलो नंदाजीको डिकरो । लाज राखीलीन हमारो ॥१॥ आगळ आवो देवजी कान्हा । मैं घरछोडी आहे म्हांना ॥ध्रु.॥ उन्हसुं कळना वेतो भला । खसम अहंकार दादुला ॥२॥ तुका प्रभु परवली हरी । छपी आहे हुं जगाथी न्यारी ॥३॥
3235
भल्याचें कारण सांगावें स्वहित । जैसी कळे नीत आपणासी ॥१॥ परी आम्ही असों एकाचिये हातीं । नाचवितो चित्ती त्याचें तैसें ॥ध्रु.॥ वाट सांगे त्याच्या पुण्या नाहीं पार । होती उपकार अगणित ॥२॥ तुका म्हणे तुम्ही बहु कृपावंत । आपुलें उचित केलें संतीं ॥३॥
3236
भल्याचें दरुषण । तेथें शुभ चि वचन ॥१॥ बोलावी हे धर्मनीत । क्षोभें होत नाहीं हित ॥ध्रु.॥ मर्यादा ते बरी । वेळ जाणावी चतुरीं ॥२॥ तुका म्हणे बहु । लागे ऐसें बरें मऊ ॥३॥
3237
भवसागर तरतां । कां रे करीतसां चिंता । पैल उभा दाता । कटीं कर ठेवुनियां ॥१॥ त्याचे पायीं घाला मिठी । मोल नेघे जगजेठी । भावा एका साठीं । खांदां वाहे आपुल्या ॥ध्रु.॥ सुखें करावा संसार । परि न संडावे दोन्ही वार । दया क्षमा घर । चोजवीत येतील ॥२॥ भुक्तिमुक्तिची चिंता । नाहीं दैन्य दरिद्रता । तुका म्हणे दाता । पांडुरंग वोळगिल्या ॥३॥
3238
भवसिंधूचें काय कोडें । दावी वाट चाले पुढें ॥१॥ तारूं भला पांडुरंग । पाय भिजों नेदी अंग ॥ध्रु.॥ मागें उतरिलें बहुत । पैल तिरीं साधुसंत ॥२॥ तुका म्हणे लाग वेगें । जाऊं तयाचिया मागें ॥३॥
3239
भवसिंधूचें हें तारूं । मज विचारूं पाहातां ॥१॥ चित्तीं तुझे धरिन पाय । सुख काय तें तेथें ॥ध्रु.॥ माझ्या खुणा मनापाशीं । तें या रसीं बुडालें ॥२॥ तुका म्हणे वर्म आलें । हातां भलें हें माझ्या ॥३॥
3240
भवाचिया संगें बहु च नाडिले । कळिकाळें पाडिले तोंडघसीं ॥१॥ तया भवसंगें गुंतलासी वांयां । धन पुत्र जाया भुलों नको ॥ध्रु.॥ जेजे घडी जाय तेते काळ खाय । प्राण्या तरणोपाय काय केला ॥२॥ तुका म्हणे करीं सर्व ही तूं त्याग । अर्पी हें सर्वांग जगदीशीं ॥३॥
3241
भांडवल माझें लटिक्याचे गांठी । उदीम तो तुटी यावी हा चि ॥१॥ कैसी तुझी वाट पाहों कोणा तोंडें । भोंवतीं किं रे भांडे गर्भवास ॥ध्रु.॥ चहूं खाणीचिया रंगलोंसें संगें । सुष्ट दुष्ट अंगें धरूनियां ॥२॥ बहुतांचे बहु पालटलों सळे । बहु आला काळें रंग अंगा ॥३॥ उकलूनि नये दावितां अंतर । घडिचा पदर सारूनियां ॥४॥ तुका म्हणे करीं गोंवळें यासाटीं । आपल्या पालटीं संगें देवा ॥५॥
3242
भांडवी माउली कवतुकें बाळा । आपणा सकळां साक्षित्वेसीं ॥१॥ माझी माझी म्हणे एकएकां मारी । हें तों नाहीं दुरी उभयतां ॥ध्रु.॥ तुझें थोडें भातें माझें बहु फार । छंद करकर वाद मिथ्या ॥२॥ तुका म्हणे एके ठायीं आहे वर्म । हें चि होय श्रम निवारितें ॥३॥
3243
भांडावें तें गोड । पुरे सकळ ही कोड ॥१॥ ऐसा घरींचा या मोळा । ठावा निकटां जवळां ॥ध्रु.॥ हाक देतां दारीं । येती जवळी सामोरीं ॥२॥ तुका म्हणे शिवें । मागितलें हातीं द्यावें ॥३॥ ॥२॥
3244
भांडावें तों हित । ठायी पडा तें उचित ॥१॥ नये खंडों देऊं वाद । आम्हां भांडवलभेद ॥ध्रु.॥ शब्दासारसें भेटी । नये पडों देऊं तुटी ॥२॥ तुका म्हणे आळस । तो चि कारणांचा नास ॥३॥
3245
भाग त्या सुखाचे वांकड्या बोबड्या । आपलिया गड्या भाविकांसि ॥१॥ भारवाही गेले टाकुनि कावडी । नवनीतगोडी भाविकांसि ॥२॥ काला करूनियां वांटिलां सकळां । आनंदें गोपाळांमाजी खेळे ॥३॥ खेळेंमेळें दहीं दुध तूप खाती । भय नाहीं चित्ती कवणाचें ॥४॥ कवणाचें चाले तुका म्हणे बळ । जयासी गोपाळ साह्य जाला ॥५॥
3246
भाग सीण गेला । माझा सकळ विठ्ठला ॥१॥ तुझा म्हणवितों दास । केली उच्छिष्टाची आस ॥ध्रु.॥ राहिली तळमळ । तई पासोनी सकळ ॥२॥ तुका म्हणे धालें । पोट ऐसें कळों आलें ॥३॥
3247
भागलेती देवा । माझा नमस्कार घ्यावा ॥१॥ तुम्ही क्षेम कीं सकळ । बाळ अवघे गोपाळ ॥ध्रु.॥ मारगीं चालतां । श्रमलेती येतां जातां ॥२॥ तुका म्हणे कांहीं । कृपा आहे माझ्या ठायीं ॥३॥
3248
भागलों मी आतां आपुल्या स्वभावें । कृपा करोनि देवें आश्वासीजे ॥१॥ देउनि आलिंगन प्रीतीच्या पडिभरें । अंगें हीं दातारें निववावीं ॥ध्रु.॥ अमृताची दृष्टी घालूनियां वरी । शीतळ हा करीं जीव माझा ॥२॥ घेई उचलूनि पुसें तानभूक । पुसीं माझें मुख पीतांबरें ॥३॥ बुझावोनि माझी धरीं हनुवंटी । ओवाळुनि दिठी करुनी सांडीं ॥४॥ तुका म्हणे बापा आहो विश्वंभरा । आतां कृपा करा ऐसी कांहीं ॥५॥
3249
भागल्यांचा तूं विसांवा । करीं नांवा निंबलोण ॥१॥ परमानंदा पुरुषोत्तमा । हरीं या श्रमापासूनि ॥ध्रु.॥ अनाथांचा अंगीकार । करितां भार न मनिसी ॥२॥ तुका म्हणे इच्छा पुरे । ऐसें धुरेगे विठ्ठल ॥३॥
3250
भागल्याचें तारूं शिणल्याची साउली । भुकेलिया घाली प्रेमपान्हा ॥१॥ ऐसी हे कृपाळू अनाथांची वेशी । सुखाची च राशी पांडुरंग ॥ध्रु.॥ सकळां सन्मुख कृपेचिया दृष्टी । पाहे बहु भेटी उतावीळां ॥२॥ तुका म्हणे येथें आतां उरला कैंचा । अनंता जन्मींचा शीण भाग ॥३॥
3251
भाग्यवंत आम्ही विष्णुदास जगीं । अभंग प्रसंगीं धैर्यवंत ॥१॥ नाही तें पुरवीत आणुनि जवळी । गाउनी माउली गीत सुखें ॥ध्रु.॥ प्रीति अंगीं असे सदा सर्वकाळ । वोळली सकळ सुखें ठायीं ॥२॥ आपुल्या स्वभावें जैसे जेथें असों । तैसे तेथें दिसों साजिरे चि ॥३॥ वासनेचा कंद उपडिलें मूळ । दुरितें सकळ निवारिलीं ॥४॥ तुका म्हणे क्तजनाची माउली । करील साउली विठ्ठल आम्हां ॥५॥
3252
भाग्यवंत म्हणों तयां । शरण गेले पंढरिराया ॥१॥ तरले तरले हा भरवसा । नामधारकांचा ठसा ॥ध्रु.॥ भक्तिमुक्तीचें तें स्थळ । भाविकनिर्मळ निर्मळ ॥२॥ गाइलें पुराणीं । तुका म्हणे वेदवाणी ॥३॥
3253
भाग्यवंता ऐशी जोडी । परवडी संतांची ॥१॥ धन घरीं पांडुरंग । अभंग जें सरेना ॥ध्रु.॥ जनाविरहित हा लाभ । टांचें नभ सांटवणें ॥२॥ तुका म्हणे विष्णुदासां । नाहीं आशा दुसरी ॥३॥
3254
भाग्यवंता हे परवडी । करिती जोडी जन्माची ॥१॥ आपुलाल्या लाहो भावें । जें ज्या व्हावें तें आहे ॥ध्रु.॥ इच्छाभोजनाचा दाता । न लगे चिंता करावी ॥२॥ तुका म्हणे आल्या थार्‍या । वस्तु बर्‍या मोलाच्या ॥३॥
3255
भाग्यवंतां हें चि काम । मापी नाम वैखरी ॥१॥ आनंदाची पुष्टी अंगीं । श्रोते संगीं उद्धरती ॥ध्रु.॥ पिकविलें तया खाणें किती । पंगतीस सुकाळ ॥२॥ तुका करी प्रणिपात । दंडवत आचारियां ॥३॥
3256
भाग्याचा उदय । ते हे जोडी संतपाय ॥१॥ येथूनिया नुठो माथा । मरणांवाचूनि सर्वथा ॥ध्रु.॥ होई बळकट । माझ्या मना तूं रे धीट ॥२॥ तुका म्हणे लोटांगणीं । भक्तिभाग्यें जाली धणी ॥३॥
3257
भाग्यालागी लांचावले । देवधर्म ते राहिले ॥१॥ कथे जातां अळसे मन । प्रपंचाचें मोटें ज्ञान ॥ध्रु.॥ अखंडप्रीति जाया । नेणे भजनाच्या ठाया ॥२॥ कथाकीर्तन धनाचें । सर्वकाळ विषयीं नाचे ॥३॥ तुका म्हणे पंढरिराया । ऐसे जन्मविले वांयां॥४॥
3258
भाग्यासाटीं गुरु केला । नाहीं आम्हांसी फळला ॥१॥ याचा मंत्र पडतां कानीं । आमच्या पेवांत गेलें पाणी ॥ध्रु.॥ गुरु केला घरवासी । आमच्या चुकल्या गाईम्हसी ॥२॥ स्वामी आपुली बुटबुट घ्यावी । आमुची प्रताप टाकुन द्यावी ॥३॥ तुका म्हणे ऐसे नष्ट । त्यांसी दुणे होती कष्ट ॥४॥
3259
भाग्यें ऐसी जाली जोडी । आतां घडी विसंभेना ॥१॥ विटेवरी समचरण । संतीं खुण सांगितली ॥ध्रु.॥ अवघें आतां काम सारूं । हा चि करूं कैवाड ॥२॥ तुका म्हणे खंडूं खेपा । पुढें पापापुण्याच्या ॥३॥
3260
भाते भरूनि हरिनामाचे । वीर गर्जती विठ्ठलाचे॥१॥ अनंतनामाची आरोळी । एक एकाहूनि बळी ॥ध्रु.॥ नाहीं आणिकांचा गुमान । ज्याचे अंकित त्यावांचून ॥२॥ रिद्धि सिद्धी ज्या कामारी । तुका म्हणे ज्याचे घरीं ॥३॥
3261
भार घालीं देवा । न लगे देश डोईं घ्यावा ॥१॥ देह प्रारब्धा अधीन । सोसें अधिक वाढे सीण ॥ध्रु.॥ व्यवसाय निमत्ति । फळ देतसे संचित ॥२॥ तुका म्हणे फिरे । भोंवडीनें दम जिरे ॥३॥
3262
भार देखोनि वैष्णवांचे । दूत पळाले यमाचे ॥१॥ आले आले वैष्णववीर । काळ कांपती असुर ॥ध्रु.॥ गरुडटकयाच्या भारें । भूमी गर्जे जेजेकारें ॥ २॥ तुका म्हणे काळ । पळे देखोनियां बळ ॥३॥
3263
भारवाही नोळखती या अनंता । जवळी असतां अंगसंगें ॥१॥ अंगसंगें तया न कळे हा देव । कळोनि संदेह मागुताला ॥२॥ मागुती पडती चिंतेचिये डोहीं । जयाची हे नाहीं बुद्धि स्थिर ॥३॥ बुद्धि स्थिर होउं नेदी नारायण । आशबद्ध जन लोभिकांची ॥४॥ लोभिकां न साहे देवाचें करणें । तुका म्हणे तेणें दुःखी होती ॥५॥
3264
भाव तैसें फळ । न चले देवापाशीं बळ ॥१॥ धांवे जातीपाशीं जाती । खुण येरयेरां चित्तीं ॥ध्रु.॥ हिरा हिरकणी । काढी आंतुनि आहिरणी ॥२॥ तुका म्हणे केलें । मन शुद्ध हें चांगलें ॥३॥
3265
भाव दावी शुद्ध देखोनियां चित्त । आपल्या अंकित निजदासां ॥१॥ सांगे गोपाळांसि काय पुण्य होतें । वांचलों जळते आगी हातीं ॥२॥ आजि आम्हां येथें राखियेलें देवें । नाहीं तरी जीवें न वंचतों ॥३॥ न वंचत्या गाईं जळतों सकळें । पूर्वपुण्यबळें वांचविलें ॥४॥ पूर्वपुण्य होतें तुमचिये गांठी । बोले जगजेठी गोपाळांसि ॥५॥ गोपाळांसि म्हणे वैकुंठनायक । भले तुम्ही एक पुण्यवंत ॥६॥ करी तुका म्हणे करवी आपण । द्यावें थोरपण सेवकांसि ॥७॥
3266
भाव देवाचें उचित । भाव तोचि भगवंत ॥१॥ धन्यधन्य शुद्ध जाती । संदेह कैंचा तेथें चित्तीं ॥ध्रु.॥ बहुत बराडी । देवजवळी आवडी ॥२॥ तुका म्हणे हें रोकडें । लाभ अधिकारी चोखडे ॥३॥
3267
भाव धरिला चरणीं म्हणवितों दास । अहिर्निशीं ध्यास करीतसें ॥१॥ करीतसें ध्यास हृदयीं सकळ । भाव तो सबळ धरियेला ॥२॥ धरिले निश्चळि न सोडीं ते पाय । तुका म्हणे सोय करीं माझी ॥३॥
3268
भाव धरी तया तारील पाषाण । दुर्जना सज्जन काय करी ॥१॥ करितां नव्हे नीट श्वानाचें हें पुंस । खापरा परीस काय करी ॥ध्रु.॥ काय करिल तया साकरेचें आळें । बीज तैसीं फळें येती तया ॥२॥ तुका म्हणे वज्र भंगे एक वेळ । कठीण हा खळ तयाहूनी ॥३॥
3269
भाव नाहीं काय मुद्रा वाणी । बैसे बगळा निश्चळ ध्यानीं ॥१॥ न मनी नाम न मनी त्यासी । वाचाळ शब्द पिटी भासी ॥ध्रु.॥ नाहीं चाड देवाची कांहीं । छळणें टोंके तस्करघाईं ॥२॥ तुका म्हणे त्याचा संग । नको शब्द स्पर्शअंग ॥३॥
3270
भावनेच्या मुळें अंतरला देव । शिरला संदेह भयें पोटीं ॥१॥ पोटीं होतें मागें जीव द्यावा ऐसें । बोलिल्या सरिसें न करवे ॥२॥ न करवे त्याग जीवाचा या नास । नारायण त्यास अंतरला ॥३॥ अंतरला बहु बोलतां वाउगें । अंतरींच्या त्यागेंविण गोष्टी ॥४॥ गोष्टी सकळांच्या आइकिल्या देवें । कोण कोण्याभावें रडती तीं ॥५॥ तीं गेलीं घरास आपल्या सकळ । गोधनें गोपाळ लोक माय ॥६॥ मायबापांची तों ऐसी जाली गति । तुका म्हणे अंतीं कळों आलें ॥७॥
3271
भावबळें कैसा जालासी लाहान । मागें संतीं ध्यान वर्णियेलें ॥१॥ तें मज उचित करूनियां देवा । दाखवीं केशवा मायबापा ॥ध्रु.॥ पाहोनियां डोळां बोलेन मी गोष्टी । आळंगुनि मिठी देइन पांयीं ॥२॥ चरणीं दृष्टी उभा राहेन समोर । जोडोनियां कर पुढें दोन्ही ॥३॥ तुका म्हणे उत्कंठित वासना । पुरवीं नारायणा आर्त माझें ॥४॥
3272
भावबळें विष्णुदास । नाहीं नास पावत ॥१॥ योगभाग्यें घरा येती । सर्व शक्ति चालत ॥ध्रु.॥ पित्याचें जें काय धन । पुत्रा कोण वंचील ॥२॥ तुका म्हणे कडे बैसों । तेणें असों निर्भर ॥३॥
3273
भावभक्तीवादें करावें कीर्तन । आशाबधी मन करूं नये ॥१॥ अन्न पाणी धन द्रव्य नारायण । विठ्ठला वांचून बोलूं नये ॥ध्रु.॥ सप्रेम करावें देवाचें कीर्तन । भय द्या सोडून शरीराचें ॥२॥ तरी मग जोडे विठ्ठलनिधान । केलिया कीर्तन सिद्धि पावे ॥३॥ देव जोडिलिया तया काय उणें । तुका म्हणे मन धीट करा ॥४॥
3274
भावाचिया बळें । आम्ही निर्भर दुर्बळें ॥१॥ नाहीं आणिकांची सत्ता । सदा समाधान चित्ती ॥ध्रु.॥ तर्का नाहीं ठाव । येथें रिघावया वाव ॥२॥ एकछत्रीं राज । तुक्या पांडुरंगीं काज ॥३॥
3275
भावापुढें बळ । नाहीं कोणाचे सबळ ॥१॥ करी देवावरी सत्ता । कोण त्याहूनि परता ॥ध्रु.॥ बैसे तेथें येती । न पाचारितां सर्व शक्ति ॥२॥ तुका म्हणे राहे । तयाकडे कोण पाहे ॥३॥
3276
भाविकां हें वर्म सांपडलें निकें । सेविती कवतुकें धणीवरि ॥१॥ इच्छितील तैसा नाचे त्यांचे छंदें । वंदिती तीं पदें सकुमारें ॥ध्रु.॥ विसरले मुक्ति भक्तिअभिळासें । ओढत सरिसें सुखा आलें ॥२॥ तुका म्हणे नाहीं मागायाची आस । पांडुरंग त्यांस विसंबेना ॥३॥
3277
भाविकांचें काज अंगें देव करी । काढी धर्माघरीं उच्छिष्ट तें ॥१॥ उच्छिष्ट तीं फळें खाय भिल्लटीचीं । आवडी तयांची मोठी देवा ॥ध्रु.॥ काय देवा घरीं न मिळेची अन्न । मागे भाजीपान द्रौपदीसी ॥२॥ अर्जुनाचीं घोडीं धुतलीं अनंतें । संकटें बहुतें निवारिलीं ॥३॥ तुका म्हणे ऐसीं आवडती लडिवाळें । जाणीवेचें काळें तोंड देवा ॥४॥
3278
भावें गावें गीत । शुद्ध करूनियां चित्त ॥१॥ तुज व्हावा आहे देव । तरि हा सुलभ उपाव ॥ध्रु.॥ आणिकांचे कानीं । गुण दोष मना नाणीं ॥२॥ मस्तक ठेंगणा । करी संतांच्या चरणा ॥३॥ वेचीं तें वचन । जेणें राहे समाधान ॥४॥ तुका म्हणे फार । थोडा तरी पर उपकार ॥५॥
3279
भिऊं नका बोले झाकुनियां राहा डोळे । चालवील देव धाक नाहीं येणें वेळे ॥१॥ बाप रे हा देवांचा ही देव कळों । नेदी माव काय करी करवी ते ॥ध्रु.॥ पसरूनि मुख विश्वरूप खाय जाळ । सारूनियां संधी अवघे पाहाती गोपाळ ॥२॥ तुका म्हणे आम्ही मागें भ्यालों वांयांविण । कळों आलें आतां या सांगातें नाहीं शिण ॥३॥
3280
भिक्षापत्र अवलंबणें । जळो जिणें लाजिरवाणें । ऐसियासी नारायणें । उपेक्षीजे सर्वथा ॥१॥ देवा पायीं नाहीं भाव । भक्ति वरी वरी वाव । समर्पिला जीव । नाहीं तो हा व्यभिचार ॥ध्रु.॥ जगा घालावें सांकडें । दीन होऊनि बापुडें । हें चि अभाग्य रोकडें । मूळ आणि विश्वास ॥२॥ काय न करी विश्वंभर । सत्य करितां निर्धार । तुका म्हणे सार । दृढ पाय धरावे ॥३॥
3281
भीत नाहीं आतां आपुल्या मरणा । दुःखी होतां जना न देखवे ॥१॥ आमची तो जाती ऐसी परंपरा । कां तुम्ही दातारा नेणां ऐसें ॥ध्रु.॥ भजनीं विक्षेप तें चि पैं मरण । न वजावा क्षण एक वांयां ॥२॥ तुका म्हणे नाहीं आघाताचा वारा । ते स्थळीं दातारा ठाव मागें ॥३॥
3282
भीतरी गेले हरी राहा क्षणभरी । होईल फळ धीर करावा ॥१॥ न करीं त्वरा ऐकें मात । क्षण एक निवांत बैसावें ॥ध्रु.॥ करूनी मर्दन सारिलें पाणी । न्हाले देव अंग पुसी भवानी ॥२॥ नेसला सोनसळा विनवी रखुमाई । वाढिलें आतां ठायीं चलावें जी ॥३॥ करुनियां भोजन घेतलें आंचवण । आनंदें नारायण पहुडले ॥४॥ तुका मात जाणवी आतां । सकळां बहुतां होती ची ॥५॥
3283
भीमातिरींचा नाटक । यानें लावियेलें चेटक ॥१॥ मन बुद्धि जाली ठक । नेणे संसाराची टुक ॥ध्रु.॥ कैशी प्रसंगीक वाणी । प्रत्यादर कडसणी ॥२॥ तुका म्हणे मोठा ठक । जेथें तेथें उभा ठाके ॥३॥
3284
भीमातीरवासी । तेथें नश्चियेंसी काशी ॥१॥ मुख्यमुक्तीचें माहेर । ऐसें जाणा पंढरपुर ॥ध्रु.॥ घडे भींवरेशीं स्नान । त्यासि पुन्हा नाहीं जन्म ॥२॥ भाव धरोनि नेटका । मोक्ष जवळी म्हणे तुका ॥३॥
3285
भीमातीरीं एक वसलें नगर । त्याचें नांव पंढरपुर रे । तेथील मोकासी चार भुजा त्यासी । बाइला सोळा हजार रे ॥१॥ नाचत जाऊं त्याच्या गांवा रे खेळिया । सुख देईल विसावा रे । पुढें गेले ते निधाई जाले । वाणितील त्याची सीमा रे ॥ध्रु.॥ बळियां आगळा पाळी लोकपाळां । रीघ नाहीं कळिकाळा रे । पुंडलीक पाटील केली कुळवाडी । तो जाला भवदुःखा वेगळा रे ॥२॥ संतसज्जनीं मांडिलीं दुकाने । जया जें पाहिजे तें आहे रे । भुक्तिमुक्ति फुका च साठीं । कोणी तयाकडे न पाहे रे ॥३॥ दोन्हीच हाट भरले घनदाट । अपार मिळाले वारकरी रे । न वजों म्हणती आम्ही वैकुंठा । जिहीं देखिली पंढरी रे ॥४॥ बहुत दिस होती मज आस । आजि घडलें सायासीं रे । तुका म्हणे होय तुमचेनी पुण्यें । भेटी तया पायांसी रे ॥५॥
3286
भीस्त न पावे मालथी । पढीया लोक रिझाये । निचा जथें कमतरिण । सो ही सो फल खाये ॥१॥
3287
भुंकती तीं द्यावीं भुंकों । आपण त्यांचें नये शिकों ॥१॥ भाविकांनीं दुर्जनाचें । मानूं नये कांहीं साचें ॥ध्रु.॥ होइल तैसें बळ । फजीत करावे ते खळ ॥२॥ तुका म्हणे त्यांचें । पाप नाहीं ताडणाचें ॥३॥
3288
भुंकुनियां सुनें लागे हस्तीपाठी । होऊनि हिंपुटी दुःख पावे ॥१॥ काय त्या मशकें तयाचें करावें । आपुल्या स्वभावें पीडतसे ॥ध्रु.॥ मातलें बोकड विटवी पंचानना । घेतलें मरणा धरणें तें ॥२॥ तुका म्हणे संतां पीडितील खळ । घेती तोंड काळें करूनियां ॥३॥
3289
भुके नाहीं अन्न । मेल्यावरी पिंडदान ॥१॥ हे तों चाळवाचाळवी । केलें आपण चि जेवी ॥ध्रु.॥ नैवेद्याचा आळ । वेच ठाकणीं सकळ ॥२॥ तुका म्हणे जड । मज न राखावें दगड ॥३॥
3290
भुिH मुक्ति तुझें जळों ब्रम्हज्ञान । दे माझ्या आणोनी भावा वेगीं ॥१॥ रद्धिी सिद्धी मोक्ष ठेवीं गुंडाळून । दे माझ्या आणून भावा वेगीं ॥ध्रु.॥ नको आपुलिया नेऊं वैकुंठासी । दे माझ्या भावासी आणुन वेगीं ॥२॥ नको होऊं कांहीं होसील प्रसन्न । दे माझ्या आणून भावा वेगीं ॥३॥ तुकयाबंधु म्हणे पाहा हो नाहींतरी । हत्या होईंल शिरीं पांडुरंगा ॥४॥
3291
भूक पोटापुरती । तृष्णा भरवी वाखती । करवी फजीती । हांवें भार वाढला ॥१॥ कुळिकेसी लांस फांस । डोईं दाढी बोडवी दोष । अविहितनाश । करवी वजन चुकतां ॥ध्रु.॥ विधिसेवनें विहितें । कार्यकारणापुरतें । न वाटे तो चित्तें । अधमांच्या तो त्यागी ॥२॥ आज्ञापालणें ते सेवा । भय धरोनियां जीवा । तुका म्हणे ठेवा । ठेविला तो जतन ॥३॥
3292
भूत नावरे कोणासी । पुंडलीकें खिळिलें त्यासी ॥१॥ समचरण असे विटे । कटिकर उभें नीट ॥ध्रु.॥ वाळुवंटीं नाचती संत । प्रेमामृतें डुल्लत ॥२॥ तुका म्हणे पुंडलीका । भक्तिबळें तूं चि निका ॥३॥
3293
भूत भविष्य कळों यावें वर्तमान । हें तों भाग्यहीन त्यांची जोडी ॥१॥ आम्हीं विष्णुदासीं देव ध्यावा चित्तें । होणार तें होतें प्रारब्धें ॥ध्रु.॥ जगरूढीसाटीं घातलें दुकान । जातो नारायण अंतरोनि ॥२॥ तुका म्हणे हा हो प्रपंच गाढा । थोरली ते पीडा रिद्धिसिद्धी ॥३॥
3294
भूतदयापरत्वें जया तया परी । संत नमस्कारीं सर्वभावें ॥१॥ शिकल्या बोलाचा धरीसील ताठा । तरी जासी वाटा यमपंथें ॥ध्रु.॥ हिरा परिस मोहरा आणीक पाषाण । नव्हे परी जन संतां तैसी ॥२॥ सरितां वाहाळां गंगे सागरा समान । लेखी तयाहून अधम नाहीं ॥३॥ आणीक अमुप होती तारांगणें । रविशशिमानें लेखूं नये ॥४॥ तुका म्हणे नाहीं नरमता अंगी । नव्हे तें फिरंगी कठिण लोह ॥५॥
3295
भूतबाधा आम्हां घरीं । हें तों आश्चर्य गा हरी ॥१॥ जाला भक्तीचा कळस । आले वस्तीस दोष ॥ध्रु.॥ जागरणाचें फळ । दिली जोडोनि तळमळ ॥२॥ तुका म्हणे देवा । आहाच कळों आली सेवा ॥३॥
3296
भूतांचिये नांदे जीवीं । गोसावी च सकळां ॥१॥ क्षणक्षणां जागा ठायीं । दृढ पायीं विश्वास ॥ध्रु.॥ दावूनियां सोंग दुजें । अंतर बीजें वसतसे ॥२॥ तुका म्हणे जाणे धने । धरी तें वर्म चिंतन ॥३॥
3297
भूतीं देव म्हणोनि भेटतों या जना । नाहीं हे भावना नरनारी ॥१॥ जाणे भाव पांडुरंग अंतरींचा । नलगे द्यावा साचा परिहार ॥ध्रु.॥ दयेसाटीं केला उपाधिपसारा । जड जीवा तारा नाव कथा ॥२॥ तुका म्हणे नाहीं पडत उपवास । फिरतसे आस धरोनियां ॥३॥
3298
भूतीं भगवंत । हा तों जाणतों संकेत ॥१॥ भारी मोकलितों वाण । ज्याचा त्यासी कळे गुण ॥ध्रु.॥ करावा उपदेश । निवडोनि तरि दोष ॥२॥ तुका म्हणे वाटे । चुकतां आडरानें कांटे ॥३॥
3299
भूतीं भगवद्भाव । मात्रासहित जीव । अद्वैत ठाव । निरंजन एकला ॥१॥ ऐसीं गर्जती पुराणें । वेदवाणी सकळ जन । संत गर्जतील तेणें । अनुभवें निर्भर ॥ध्रु.॥ माझें तुझें हा विकार । निरसतां एकंकार । न लगे कांहीं फार । विचार चि करणें ॥२॥ तुका म्हणे दुजें । हें तों नाहीं सहजें । संकल्पाच्या काजें । आपें आप वाढलें ॥३॥
3300
भूमि अवघी शुद्ध जाणा । अमंगळ हे वासना ॥१॥ तैसे वोसपले जीव । सांडी नसतां अंगीं घाव ॥ध्रु.॥ जीव अवघे देव । खोटा नागवी संदेह ॥२॥ तुका म्हणे शुद्ध । मग तुटलिया भेद ॥३॥
3301
भूमीवरि कोण ऐसा । गांजूं शके हरिच्या दासा ॥१॥ सुखें नाचा हो कीर्त्तनीं । जयजयकारें गर्जा वाणी ॥ध्रु.॥ काळा सुटे पळ । जाती दुरितें सकळ ॥२॥ तुका म्हणे चित्तीं । सांगूं मानाची हे निति ॥३॥
3302
भेटीची आवडी उतावळि मन । लागलेंसे ध्यान जीवीं जीवा ॥१॥ आतां आवडीचा पुरवावा सोहळा । येऊनी गोपाळा क्षेम देई ॥ध्रु.॥ नेत्र उन्मळित राहिले ताटस्त । गंगा अश्रुपात वहावली ॥२॥ तुका म्हणे तुम्ही करा साचपणा । मुळींच्या वचना आपुलिया ॥३॥
3303
भेटीलागीं जीवा लागलीसे आस । पाहे रात्रीं दिवस वाट तुझी ॥१॥ पूर्णिमेचा चंद्र चकोराचें जीवन । तैसें माझें मन वाट पाहे ॥ध्रु.॥ दिवाळीच्या मुळा लेंकी आसावली । पाहतसे वाटुली पंढरीची ॥२॥ भुकेलिया बाळ अति शोक करी । वाट पाहे परि माउलीची ॥३॥ तुका म्हणे मज लागलीसे भूक । धांवूनि श्रीमुख दावीं देवा ॥४॥
3304
भेटीलागीं पंढरिनाथा । जीवीं लागली तळमळ व्यथा ॥१॥ कैं कृपा करिसी नेणें । मज दीनाचें धांवणें ॥ध्रु.॥ सीणलें माझें मन । वाट पाहातां लोचन ॥२॥ तुका म्हणे भूक । तुझें पाहावया मुख ॥३॥
3305
भेटीवांचोनियां दुजें नाहीं चित्तीं । येणें काकुलती याजसाटीं ॥१॥ भेटोनियां बोलें आवडीचें गुज । आनंदाच्या भोजें जेवूं संगें ॥ध्रु.॥ मायलेकरासीं नाहीं दुजी परि । जेऊं बरोबरी बैसोनियां ॥२॥ तुका म्हणे ऐसें अंतरींचें आर्त । यावें जी त्वरित नारायणा ॥३॥
3306
भेणें पळे डोळसा । न कळे मृत्यु तो सरिसा ॥१॥ कैसी जाली दिशाभुली । न वजातिये वाटे चाली ॥ध्रु.॥ संसाराची खंती । मावळल्या तरी शिक्त ॥२॥ तुका म्हणे हीणा । बुद्धि चुकली नारायणा ॥३॥
3307
भेद तुटलियावरी । आम्ही तुमचीं च हो हरी ॥१॥ आतां पाळावे पाळावे । आम्हां लडिवाळांचे लळे ॥ध्रु.॥ आणिकांची देवा । नाहीं जाणत चि सेवा ॥२॥ तुका म्हणे हेवा । माझा हेत पायीं देवा ॥३॥
3308
भेदाभेदताळा न घडे घालितां । आठवा रे आतां नारायण ॥१॥ येणें एक केलें अवघें होय सांग । अच्युताच्या योगें नामें छंदें ॥ध्रु.॥ भोंवरे खळाळ चोर वाटा घेती । पावल मारिती सिवेपाशीं ॥२॥ तुका म्हणे येथें भावेंविण पार । न पविजे सार हें चि आहे ॥३॥
3309
भोंदावया मीस घेऊनि संतांचें । करी कुटुंबाचें दास्य सदा ॥१॥ मनुष्याचे परी बोले रावा करी । रंजवी नरनारी जगामध्यें ॥ध्रु.॥ तिमयाचा बैल करी सिकविलें । चित्रींचें बाहुलें गोष्टी सांगे ॥२॥ तुका म्हणे देवा जळो हे महंती । लाज नाहीं चित्ती निसुगातें ॥३॥
3310
भोक्ता नारायण लक्षुमीचा पति । म्हणोनि प्राणाहुती घेतलिया ॥१॥ भर्ता आणि भोक्ता कर्त्ता आणि करविता । आपण सहजता पूर्णकाम ॥ध्रु.॥ विश्वंभर कृपादृष्टी सांभाळीत । प्रार्थना करीत ब्राम्हणांची ॥२॥ कवळोकवळीं नाम घ्या गोविंदाचें । भोजन भक्तांचें तुका म्हणे ॥३॥
3311
भोग तो न घडे संचितावांचूनि । करावें तें मनीं समाधान ॥१॥ म्हणऊनी मनीं मानूं नये खेदु । म्हणावा गोविंद वेळोवेळां ॥ध्रु.॥ आणिकां रुसावें न लगे बहुतां । आपुल्या संचितावांचूनियां ॥२॥ तुका म्हणे भार घातलिया वरी । होईंल कैवारी नारायण ॥३॥
3312
भोग द्यावे देवा । त्याग भोगीं च बरवा ॥१॥ आपण व्हावें एकीकडे । देव कळेवरी जोडे ॥ध्रु.॥ योजे यथाकाळें । उत्तम पाला कंदें मूळें ॥२॥ वंचक त्यासी दोष । तुका म्हणे मिथ्या सोस ॥३॥
3313
भोग भोगावरी द्यावा । संचिताचा करुनी ठेवा ॥१॥ शांती धरणें जिवासाटीं । दशा उत्तम गोमटी ॥ध्रु.॥ देह लेखावें असार । सत्य परउपकार ॥२॥ तुका म्हणे हे मिरासी । बुडी द्यावी ब्रम्हरसी ॥३॥
3314
भोगावरि आम्हीं घातला पाषाण । मरणा मरण आणियेलें ॥१॥ विश्व तूं व्यापक काय मी निराळा । काशासाठीं बळा येऊं आतां ॥ध्रु.॥ काय सारूनियां काढावें बाहेरी । आणूनि भीतरी काय ठेवूं ॥२॥ केला तरी उरे वाद चि कोरडा । बळें घ्यावी पीडा स्वपनींची ॥३॥ आवघे चि वाण आले तुम्हां घरा । मजुरी मजुरा रोज कीदव ॥४॥ तुका म्हणे कांहीं नेणें लाभ हानी । असेल तो धनी राखो वाडा ॥५॥
3315
भोगियेल्या नारी । परि तो बाळब्रम्हचारी ॥१॥ ऐसी ज्याचें अंगीं कळा । पार न कळे वेदाला ॥ध्रु.॥ वळीवळी थोरथोर । मोडोनियां केले चूर ॥२॥ वांकडी कुबज्या । सरसी आणियेली वोजा ॥३॥ मल्ल रगडिला पायीं । गज झुगारिला बाहीं ॥४॥ जिवें मारियेला मामा । धांवें भक्ताचिया कामा ॥५॥ तुका म्हणे पूर्ण । दावी भक्तीचीं विंदानें ॥६॥
3316
भोगिला गोपिकां यादवां सकळां । गौळणीगोपाळां गाईंवत्सां ॥१॥ गाती धणीवरी केला अंगसंग । पाहिला श्रीरंग डोळेभरि ॥२॥ भक्ति नवविधा तयांसि घडली । अवघीं च केली कृष्णरूप ॥३॥ रूप दाखविलें होतां भिन्न भाव । भक्त आणि देव भिन्न नाहीं ॥४॥ नाहीं राहों दिलें जातां निजधामा । तुका म्हणे आम्हांसहित गेला ॥५॥
3317
भोगी जाला त्याग । गीती गातां पांडुरंग । इंद्रियांचा लाग । आम्हांवरूनि चुकला ॥१॥ करुनि ठेविलों निश्चळि । भय नाहीं तळमळ । घेतला सकळ । अवघा भार विठ्ठलें ॥ध्रु.॥ तळीं पिक्षणीचे परी । नखें चोंची चारा धरी । आणुनियां घरीं । मुखीं घाली बाळका ॥२॥ तुका म्हणे ये आवडी । आम्हीं पांयीं दिली बुडी । आहे तेथें जोडी । जन्मांतरींचें ठेवणें ॥३॥
3318
भोगें घडे त्याग । त्यागें अंगा येती भोग ॥१॥ ऐसें उफराटें वर्म । धर्मा अंगीं च अधर्म ॥ध्रु.॥ देव अंतरे तें पाप । खोटे उगवा संकल्प ॥२॥ तुका म्हणे भीड खोटी । लाभ विचारावा पोटीं ॥३॥
3319
भोजन तें पाशांतीचें । निंचें उंचें उसाळी ॥१॥ जैशी कारंज्याची कळा । तो जिव्हाळा स्वहिता ॥ध्रु.॥ कल्पना ते देवाविण । न करी भिन्न इतरीं ॥२॥ तुका म्हणे पावे भूती । ते निश्चिंती मापली ॥३॥
3320
भोजनाच्या काळीं । कान्हो मांडियेली आळी । काला करी वनमाळी । अन्न एकवटा । देई निवडुनी । माते म्हणतो जननी । हात पिटूनि मेदिनी । वरि अंग घाली ॥१॥ कैसा आळ घेसी । नव्हे तें चि करविसी । घेई दुसरें तयेसी । वारी म्हणे नको ॥ध्रु.॥ आतां काय करूं । नये यासि हाणूं मारूं । नव्हे बुझावितां स्थिरू । कांहीं करिना हा । तोंचिं केलें एके ठायीं । आतां निवडूनि खाई । आम्हा जाचितोसि काई । हरिसि म्हणे माता ॥२॥ त्याचें तयाकुन । करवितां तुटे भान । तंव जालें समाधान । उठोनियां बैसे । माते बरें जाणविलें । अंग चोरूनि आपुलें । तोडियलें एका बोलें । कैसें सुखदुःख ॥३॥ ताट पालवें झाकिलें । होतें तैसें तेथें केलें । भिन्नाभिन्न निवडिलें । अन्नें वेगळालीं । विस्मित जननी । भाव देखोनियां मनीं । म्हणे नाहीं ऐसा कोणी । तुज सारिखा रे ॥४॥ हरुषली माये । सुख अंगीं न समाये । कवळूनि बाहे देती आलिंगन । आनंद भोजनीं । तेथें फिटलीसे धणी । तुका म्हणे कोणी । सांडा शेष मज ॥५॥
3321
भोरप्यानें सोंग पालटिलें वरी । ध्यान धरी मत्स्या जैसें ॥१॥ टिळे माळा मैंद मुद्रा लावी अंगीं । देखों नेदि जगीं फांसे जैसे ॥ध्रु.॥ ढीवर या मत्स्या चारा घाली जैसा । भीतरील फांसा कळों नेदी ॥२॥ खाटिक हा स्नेहवादें पशु पाळी । कापावया नळी तया साठीं ॥३॥ तुका म्हणे तैसा भला मी लोकांत । परी तूं कृपावंत पांडुरंगा ॥४॥
3322
भोळे भक्तीभाव धरिती मानसीं । त्यासी हृषीकेशी जवळी च ॥१॥ भाव नाहीं मनीं अभाविक सदा । त्याचिया मी खेदा काय सांगों ॥ध्रु.॥ गणिकेसारिकीं नामें उद्धरीलीं । सज्ञानें पडिलीं खटाटोपीं ॥२॥ तुका म्हणे काय शुद्ध माझी जाति । थोर केली ख्याती हरिनामें ॥३॥
3323
भोळे भाविक हे जुनाट चांगले । होय तैसें केलें भक्तिभावें ॥१॥ म्हणउनि चिंता नाहीं आम्हां दासां । न भ्यो गर्भवासा जन्म घेतां ॥ध्रु.॥ आपुलिया इच्छा करूं गदारोळ । भोगूं सर्वकाळ सर्व सुखें ॥२॥ तुका म्हणे आम्हां देवाचा सांगात । नाहीं विसंबत येर येरां ॥३॥
3324
भोवंडींसरिसें । अवघें भोंवत चि दिसे ॥१॥ ठायीं राहिल्या निश्चळ । आहे अचळीं अचळ ॥ध्रु.॥ एक हाकेचा कपाटीं । तेथें आणीक नाद उठी ॥२॥ अभ्रें धांवे शशी । तुका असे ते तें दुसरें भासी ॥३॥
3325
भ्यालीं जिवा चुकलीं देवा । नाहीं ठावा जवळीं तो ॥१॥ आहाकटा करिती हाय । हात डोकें पिटिती पाय ॥ध्रु.॥ जवळी होतां न कळे आम्हां । गेल्या सीमा नाहीं दुःखा ॥२॥ तुका म्हणे हा लाघवी मोटा । पाहे खोटा खरा भाव ॥३॥
3326
भ्रतारअंगसंगें सुखाची वेवस्था । आधीं तों सांगतां नये कोणा ॥१॥ तथापि सांगणें कुमारिकेपाशीं । ते काय मानसीं सुख मानी ॥ध्रु.॥ तैसा आत्मबोध आधीं बोलों नये । बोलासी तो काय सांपडेल ॥२॥ तथापि सांगणें बहिर्मुखापाशीं । तो काय संतोषासी मूळ होय ॥३॥ तुका म्हणे संत सुखाचे विभागी । ब्रम्हानंद जगीं साधुरूपें ॥४॥
3327
भ्रतारेंसी भार्या बोले गुज गोष्टी । मज ऐसी कष्टी नाहीं दुजी ॥१॥ अखंड तुमचें धंद्यावरी मन । माझें तों हेळण करिती सर्व ॥ध्रु.॥ जोडितसां तुम्ही खाती हेरेंचोरें । माझीं तंव पोरें हळहळीती ॥२॥ तुमची व्याली माझे डाई हो पेटली । सदा दुष्ट बोली सोसवेना ॥३॥ दुष्टव्रुति नंदुली सदा द्वेष करी । नांदों मी संसारीं कोण्या सुखें ॥४॥ भावा दीर कांहीं धड हा न बोले । नांदों कोणां खालें कैसी आतां ॥५॥ माझ्या अंगसंगें तुम्हांसी विश्रांति । मग धडगति नाहीं तुमची ॥६॥ ठाकतें उमकतें जीव मुठी धरूनि । परि तुम्ही अजूनि न धरा लाज ॥७॥ वेगळे निघतां संसार करीन । नाहीं तरी प्राण देतें आतां ॥८॥ तुका म्हणे जाला कामाचा अंकित । सांगे मनोगत तैसा वर्ते ॥९॥
3328
भ्रमना पाउलें वेचिलीं तीं वाव । प्रवेशतां ठाव एक द्वार ॥१॥ सार तीं पाउलें विठोबाचीं जीवीं । कोणीं न विसंभावीं क्षणभरि ॥ध्रु.॥ सुलभ हें केलें सकळां जीवन । फुंकावे चि कान न लगेसें ॥२॥ तुका म्हणे येथें सकळ ही कोड । पुरे मूळ खोड विस्ताराचें ॥३॥
3329
मंगळाचा मंगळ सांटा । विट तोटा नेणे तें ॥१॥ हें भरा सातें आलें । भलें भलें म्हणवावें ॥ध्रु.॥ जनीं जनार्दन वसे । येथें दिसे तें शुद्ध ॥२॥ तुका म्हणे बहुतां मुखें । खरें सुखें ठेवावें ॥३॥
3330
मंत्र चळ पिसें लागतें सत्वर । अबद्ध ते फार तरले नामें ॥१॥ आशोचे तो बाधी आणिकां अक्षरां । नाम निदसुरा घेतां तरे ॥ध्रु.॥ रागज्ञानघात चुकतां होय वेळ । नाम सर्वकाळ शुभदायक ॥२॥ आणिकां भजना बोलिला निषेध । नाम तें अभेद सकळां मुखीं ॥३॥ तुका म्हणे तपें घालिती घालणी । वेश्या उद्धरूनि नेली नामें ॥४॥
3331
मंत्रयंत्र नहिं मानत साखी । प्रेमभाव नहिं अंतर राखी ॥१॥ राम कहे त्याके पगहूं लागूं । देखत कपट अमिमान दुर भागूं ॥ध्रु.॥ अधिक याती कुलहीन नहिं ज्यानु । ज्याणे नारायन सो प्राणी मानूं ॥२॥ कहे तुका जीव तन डारू वारी । राम उपासिंहु बलियारी ॥३॥
3332
मऊ मेनाहूनि आम्ही विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे ॥१॥ मेले जित असों निजोनियां जागे । जो जो जो जें मागे तें तें देऊं ॥ध्रु.॥ भले तरि देऊं गांडीची लंगोटी । नाठ्याळा चि गांठीं देऊं माथां ॥२॥ मायबापाहूनि बहू मायावंत । करूं घातपात शत्रूहूनि ॥३॥ अमृत तें काय गोड आम्हांपुढें । विष तें बापुडें कडू किती ॥४॥ तुका म्हणे आम्ही अवघे चि गोड । ज्याचें पुरे कोड त्याचेपरि ॥५॥
3333
मज अंगाच्या अनुभवें । काईं वाईंट बरें ठावें ॥१॥ जालों दोहींचा देखणा । नये मागें पुढें ही मना ॥ध्रु.॥ वोस वसती ठावी । परि हे चाली दुःख पावी ॥२॥ तुका म्हणे घेऊं देवा । सवें करूनि बोळावा ॥३॥
3334
मज अनाथाकारणें । करीं येणें केशवा ॥१॥ जीव झुरे तुजसाटीं । वाट पोटीं पहातसें ॥ध्रु.॥ चित्त रंगलें चरणीं । तुजवांचूनि न राहे ॥२॥ तुका म्हणे कृपावंत । माझी चिंता असावी ॥३॥
3335
मज अभयदान देईं दातारा । कृपेच्या सागरा मायबापा ॥१॥ देहभाव तुझ्या ठेवियेला पायीं । आणीक मी कांहीं दुजें नेणें ॥ध्रु.॥ सेवाभक्तिहीन नेणता पतित । आतां माझे हित तुझ्या पायीं ॥२॥ तुका म्हणे माझें सर्व ही साधन । नाम संकीर्तन विठोबाचें ॥३॥
3336
मज ऐसें कोण उद्धरिलें सांगा । ब्रीदें पांडुरंगा बोलतसां ॥१॥ हातींच्या कांकणां कायसा आरिसा । उरलों मी जैसा तैसा आहें ॥ध्रु.॥ धनमंत्री हरी रोग्याचिये वेथे । तें तों कांहीं येथें न देखिजे ॥२॥ तुका म्हणे नाहीं अनुभव अंगें । वचन वाउगें कोण मानी ॥३॥
3337
मज कांहीं सीण न व्हावा यासाटीं । कृपा तुम्हां पोटीं उपजलीं ॥१॥ होतें तैसें केलें आपलें उचित । शिकविलें हित बहु बरें ॥ध्रु.॥ आम्ही न मनावी कोणाची आशंका । तुम्हां भय लोकां आहे मनीं ॥२॥ तुका म्हणे आतां संचिताचा ठेवा । वोडवला घ्यावा जैसा तैसा ॥३॥
3338
मज कोणी कांहीं करी । उमटे तुमचे अंतरीं ॥१॥ व्याला वाडविलें म्हुण । मज सुख तुज सीण ॥ध्रु.॥ माझें पोट धालें । तुझे अंगीं उमटलें ॥२॥ तुका म्हणे खेळें । तेथें तुमचिया बळें ॥३॥
3339
मज चि भोंवता केला येणें जोग । काय याचा भोग अंतरला ॥१॥ चालोनियां घरा सर्व सुखें येती । माझी तों फजीती चुके चि ना ॥ध्रु.॥ कोणाची बाईल होऊनियां वोढूं । संवसारीं काढूं आपदा किती ॥२॥ काय तरी देऊं तोडितील पोरें । मरतीं तरी बरें होतें आतां ॥३॥ कांहीं नेदी वांचों धोवियेलें घर । सारवावया ढोर शेण नाहीं ॥४॥ तुका म्हणे रांड न करितां विचार । वाहुनियां भार कुंथे माथां ॥५॥
3340
मज ते हांसतील संत । जींहीं देखिलेती मूर्तिमंत । म्हणोनि उद्वेगलें चत्ति । आहा च भक्त ऐसा दिसें ॥१॥ ध्यानीं म्या वर्णावेति कैसे । पुढें एकीं स्तुति केली असे । तेथूनि जीव निघत नसे । ऐसिये आश लागलोंसें ॥ध्रु.॥ कासया पाडिला जी धडा । उगा चि वेडा आणि वांकडा । आम्हां लेंकरांसि पीडा । एक मागें जोडा दुसर्‍याचा ॥२॥ सांगा कोणाचा अन्याय । ऐसें मी धरीतसें पाय । तूं तंव सम चि सकळां माय । काय अन्याय एक माझा ॥३॥ नये हा जरी कारणा । तरी कां व्यालेति नारायणा । वचन द्यावें जी वचना । मज अज्ञाना समजावीं ॥४॥ बहुत दिवस केला बोभाट । पाहातां श्रमलों ते वाट । तुका म्हणे विस्तारलें ताट । काय वीट आला नेणों स्वामी ॥५॥
3341
मज त्याची भीड नुलंघवे देवा । जो म्हणे केशवा दास तुझा ॥१॥ मज आवडती बहु तैसे जन । करिती कीर्तन कथा तुझी ॥ध्रु.॥ सांडूनियां लाज नाचेन त्यांपुढें । आइकती कोडें नाम तुझें ॥२॥ न लगे उपचार होईंन भिकारी । वैष्णवांच्या घरीं उष्टावळी ॥३॥ तुका म्हणे जाणों उचित अनुचित । विचारूनि हित तें चि करूं ॥४॥
3342
मज दास करी त्यांचा । संतदासांच्या दासांचा ॥१॥ मग होत कल्पवरी । सुखें गर्भवास हरी ॥ध्रु.॥ नीचवृत्तिकाम । परी मुखीं तुझें नाम ॥२॥ तुका म्हणे सेवे । माझे संकल्प वेचावे ॥३॥
3343
मज नष्टा माया मोह नाहीं लोभ । अधिक हो क्षोभ आदराचा ॥१॥ धिग हें शरीर अनउपकार । न मनी आभार उपकाराचा ॥ध्रु.॥ मजहून नष्ट आहे ऐसा कोण । नावडे मिष्टान्न बहुमोल ॥२॥ न दिसती मज आपलेसे गुण । संचित तें कोण जाणे मागें ॥३॥ तुका म्हणे देखोनियां काईं । पांडुरंगा पायीं राखियेलें ॥४॥
3344
मज नाहीं कोठें उरला दुर्जन । मायबापाविण ब्रम्हांडीं हें ॥१॥ कासया जिकीर करणें येविसीं । भयाची मानसीं चिंता खंती ॥ध्रु.॥ विश्वंभराचिये लागलों सांभाळीं । संत नेती चाली आपुलिया ॥२॥ तुका म्हणे माझें पाळणें पोषणें । करी नारायण सर्वस्वेंसी ॥३॥
3345
मज नाहीं तुझ्या ज्ञानाची ते चाड । घेतां वाटे गोड नाम तुझें ॥१॥ नेणतें लेंकरूं आवडीचें तान्हें । बोलतों वचनें आवडीनें ॥ध्रु.॥ भक्ती नेणें कांहीं वैराग्य तें नाहीं । घातला विठाईं भार तुज ॥२॥ तुका म्हणे नाचें निर्लज्ज होऊनि । नाहीं माझे मनीं दुजा भाव ॥३॥
3346
मज नाहीं धीर । तुम्ही न करा अंगीकार ॥१॥ ऐसें पडिलें विषम । बळी देवाहूनि कर्म ॥ध्रु.॥ चालों नेणें वाट । केल्या न पवा बोभाट ॥२॥ वेचों नेणे जीवें । तुका उदास धरिला देवें ॥३॥
3347
मज पाहातां हें लटिकें सकळ । कोठें मायाजाळ दावीं देवा ॥१॥ कोणाचा कोणासीं न धरे संबंध । आहे शुद्धबुद्ध ठायींचे ठायीं ॥ध्रु.॥ काढा काढा जी मोह बुंथा जाळ । नका लावूं बळें वेड आम्हां ॥२॥ जीव शिव कां ठेवियेलीं नांवें । सत्य तुम्हां ठावें असोनियां ॥३॥ सेवेच्या अभिळासें न धरा चि विचार । आम्हां दारोदार हिंडविलें ॥४॥ आहे तैसें आतां कळलियावरी । परतें सांडा दुरी दुजेपण ॥५॥ तुका म्हणे काय छायेचा अभिलाष । हंस पावे नाश तारागणीं ॥६॥
3348
मज माझा उपदेश । आणिकां नये याचा रीस ॥१॥ तुम्ही अवघे पांडुरंग । मी च दुष्ट सकळ चांग ॥ध्रु.॥ तुमचा मी शरणागत । कांहीं करा माझें हित ॥२॥ तुका पाय धरी । मी हें माझें दुर करीं ॥३॥
3349
मज संतांचा आधार । तूं एकलें निर्विकार ॥१॥ पाहा विचारूनि देवा । नको आम्हांसवें दावा ॥ध्रु.॥ तुज बोल न बोलवे । आम्हां भांडायाची सवे ॥२॥ तुका म्हणे तरी । ऐक्यभाव उरे उरी ॥३॥
3350
मजपुढें नाहीं आणीक बोलता । ऐसें कांहीं चित्ती वाटतसें ॥१॥ याचा कांहीं तुम्हीं देखा परिहार । सर्वज्ञ उदार पांडुरंगा ॥ध्रु.॥ काम क्रोध नाहीं सांडिलें आसन । राहिले वसोन देहामध्यें ॥२॥ तुका म्हणे आतां जालों उतराईं । कळों यावें पायीं निरोपिलें ॥३॥
3351
मजशीं पुरे न पडे वादें । सुख दोहींच्या संवादें ॥१॥ तूं चि आगळा काशानें । शिर काय पायांविणे ॥ध्रु.॥ वाहों तुझा भार । दुःख साहोनि अपार ॥२॥ तुका म्हणे नाहीं भेद । देवा करूं नये वाद ॥३॥
3352
मजसवें आतां येऊं नका कोणी । सासुरवासिनी बाइयानो ॥१॥ न साहवे तुम्हां या जनाची कूट । बोलती वाईट ओखटें तें ॥२॥ तुका म्हणे जालों उदास मोकळ्या । विचरों गोवळ्यासवें आम्ही ॥३॥
3353
मजसवें नको चेष्टा । नव्हे साळी कांहीं कोष्टा ॥१॥ बैस सांडोनि दिमाख । जाय काळें करीं मुख ॥ध्रु.॥ येथें न सरे चार । हीण आणीक वेव्हार ॥२॥ तुका विष्णुदास । रस जाणतो नीरस ॥३॥
3354
मजुराचें पोट भरे । दाता उरे संचला ॥१॥ या रे या रे हातोहातीं । काय माती सारावी ॥ध्रु.॥ रोजकीर्दी होतां झाडा । रोकडा चि पर्वत ॥२॥ तुका म्हणे खोल पाया । वेचों काया क्लेशेसीं ॥३॥
3355
मढें झांकुनियां करिती पेरणी । कुणबियाचे वाणी लवलाहें ॥१॥ तयापरी करीं स्वहित आपुलें । जयासी फावलें नरदेह ॥ध्रु.॥ ओटीच्या परिस मुठीचें तें वाढे । यापरि कैवाडें स्वहिताचें ॥२॥ नाहीं काळसत्ता आपुलिये हातीं । जाणते हे गुंती उगविती ॥३॥ तुका म्हणे पाहें आपुली सूचना । करितो शाहाणा मृत्युलोकीं ॥४॥
3356
मणि पडिला दाढेसी मकरतोंडीं । सुखें हस्तें चि काढवेल प्रौढीं ॥१॥ परि मूर्खाचें चत्ति बोधवेना । दुधें कूर्मीच्या पाळवेल सेना ॥ध्रु.॥ सकळ पृथ्वी हिंडतां कदाचित । ससीसिंगाची प्राप्त होय तेथें ॥२॥ अतिप्रयत्नें गाळितां वाळुवेतें । दिव्य तेलाची प्राप्त होय तेथें ॥३॥ अतिक्रोधें खवळला फणी पाही । धरूं येतो मस्तकीं पुष्पप्रायी ॥४॥ पहा ब्रम्हानंदें चि एकीं हेळा । महापातकी तो तुका मुक्त केला ॥५॥
3357
मतिविण काय वर्णू तुझें ध्यान । जेथें पडिलें मौन्य वेदश्रुती ॥१॥ करूनि गोजिरा आपुलिये मती । धरियेलें चित्तीं चरणकमळ ॥ध्रु.॥ सुखाचें ओतिलें पाहों ते श्रीमुख । तेणें हरे भूक तान माझी ॥२॥ रसना गोडावली ओव्या गातां गीत । पावलेंसे चित्त समाधान ॥३॥ तुका म्हणे माझी दृष्टि चरणांवरी । पाउलें गोजिरीं कुंकुमाचीं ॥४॥
3358
मत्स्यकूर्मशेषा कोणाचा आधार । पृथिवीचा भार वाहावया ॥१॥ काय धाक आम्हां कासयाची चिंता । ऐसा तो असतां साहाकारी ॥ध्रु.॥ शंखचक्रगदा आयुधें अपार । वागवितो भार भक्तांसाटीं ॥२॥ पांडवां जोहरी राखिलें कुसरी । तो हा बंधुचा कैवारी तुकयाच्या ॥३॥
3359
मथनासाटीं धर्माधर्म । त्याचें वर्म नवनीत ॥१॥ तें चि तें घाटूं नये । आलें जाय नासूनि ॥ध्रु.॥ सांभाळावें वरावर । वर्म दूर न वजावें ॥२॥ तुका म्हणे घालें पोट । मग बोटचांचणी ॥३॥
3360
मथनीचें नवनीत । सर्व हितकारक ॥१॥ दंडवत दंडा परी । मागें उरी नुरावी ॥ध्रु.॥ वचनाचा तो पसरुं काईं । तांतडी डोईंपाशींच ॥२॥ तुका म्हणे जगजेठी । लावीं कंठीं उचलूनि ॥३॥
3361
मथनें भोगे सार । ताकें घडे उपकार ॥१॥ बरवी सायासाची जोडी । अनुभविया ठावी गोडी ॥ध्रु.॥ पाक आणि रुचि । जेथें तेथें ते कइंची ॥२॥ वाढितो पंगती । तुका आवडी संगती ॥३॥
3362
मथुरेच्या राया । माझें दंडवत पायां ॥१॥ तुमचे कृपेचें पोसनें । माझा समाचार घेणें ॥ध्रु.॥ नाम धरिलें कंठीं । असें आर्तभूत पोटीं ॥२॥ जीवींचें ते जाणा । तुका म्हणे नारायणा ॥३॥
3363
मदें मातलें नागवें नाचे । अनुचित वाचे बडबडी ॥१॥ आतां शिकवावा कोणासी विचार । कर्म तें दुस्तर करवी धीट ॥ध्रु.॥ आलें अंगासी तें बळिवंत गाढें । काय वेड्यापुढें धर्मनीत ॥२॥ तुका म्हणे कळों येईंल तो भाव । अंगावरिल घाव उमटतां ॥३॥
3364
मधुरा उत्तरासवें नाहीं चाड । अंतरंगीं वाड भाव असो ॥१॥ प्राणावेगळा न करी नारायण । मग नसो ज्ञान मूर्ख बरा ॥ध्रु.॥ जननिंदा होय तो बरा विचार । थोरवीचा भार कामा नये ॥२॥ तुका म्हणे चित्तीं भाव निष्टावंत । दया क्षमा शांत सर्वां भूतीं ॥३॥
3365
मन उतावळि । जालें न राहे निश्चळ ॥१॥ दे रे भेटी पंढरिराया । उभारोनि चारी बाह्या ॥ध्रु.॥ सर्वांग तळमळी । हात पाय रोमावळी ॥२॥ तुकयाबंधु म्हणे कान्हा । भूक लागली नयना ॥३॥
3366
मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचें कारण । मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ॥१॥ मनें प्रतिमा स्थापिली । मनें मना पूजा केली । मनें इच्छा पुरविली । मन माउली सकळांची ॥ध्रु.॥ मन गुरू आणि शिष्य । करी आपुलें चि दास्य । प्रसन्न आपआपणास । गति अथवा अधोगति ॥२॥ साधक वाचक पंडित । श्रोते वक्ते ऐका मात । नाहीं नाहीं आनुदैवत । तुका म्हणे दुसरें ॥३॥
3367
मन गुंतलें लुलयां । जाय धांवोनि त्या ठाया ॥१॥ मागें परती तो बळी । शूर एक भूमंडळीं ॥ध्रु.॥ येऊनियां घाली घाला । नेणों काय होई तुला ॥२॥ तुका म्हणें येणें । बहु नाडिले शाहाणे ॥३॥
3368
मन जालें भाट । कीर्ति मुखें घडघडाट । पडियेली वाट । ये चि चाली स्वभावें ॥१॥ बोलें देवाचे पवाडे । नित्य नवे चि रोकडे । ज्या परी आवडे । तैसा तैसा करूनि ॥ध्रु.॥ रोखीं रहावें समोर । पुढें मागें चाले भार । करावें उत्तर । सेवा रुजू करूनि ॥२॥ पूर वर्षला देकारें । संतोषाच्या अभयें करें । अंगींच्या उत्तरें । तुकया स्वामी शृंगारी ॥३॥
3369
मन माझें चपळ न राहे निश्चळ । घडी एकी पळ स्थिर नाहीं ॥१॥ आतां तूं उदास नव्हें नारायणा । धांवें मज दीना गांजियेलें ॥ध्रु.॥ धांव घालीं पुढें इंद्रियांचे ओढी । केलें तडातडी चत्ति माझें ॥२॥ तुका म्हणे माझा न चले सायास । राहिलों हे आस धरुनी तुझी ॥३॥
3370
मन वोळी मना । बुद्धी बुद्धी क्षण क्षणां ॥१॥ मी च मज राखण जालों । ज्याणें तेथें चि धरिलों ॥ध्रु.॥ जें जें जेथें उठी । तें तें तया हातें कुंटी ॥२॥ भांजिली खांजनी । तुका साक्ष उरला दोन्ही ॥३॥
3371
मनवाचातीत तुझें हें स्वरूप । म्हणोनियां माप भक्ति केलें ॥१॥ भक्तीचिया मापें मोजितों अनंता । इतरानें तत्वता न मोजवे ॥ध्रु.॥ योग याग तपें देहाचिया योगें । ज्ञानाचिया लागें न सांपडेसी ॥२॥ तुका म्हणे आम्ही भोळ्या भावें सेवा । घ्यावी जी केशवा करितों ऐसी ॥३॥
3372
मना एक करीं । म्हणे जाईंन पंढरी । उभा विटेवरी । तो पाहेन सांवळा ॥१॥ करीन सांगती तें काम । जरी जपसी हें नाम । नित्य वाचे राम । हरि कृष्ण गोविंदा ॥ध्रु.॥ लागें संतांचिया पायां । कथे उल्हास गावया । आलों मागावया । शरण देई उचित ॥२॥ नाचें रंगीं वाहें टाळी । होय सादर ते काळीं । तुका म्हणे मळी । सांडूनियां अंतरी ॥३॥
3373
मना वाटे तैसीं बोलिलों वचनें । केली धिटपणें सलगी देवा ॥१॥ वाणी नाहीं शुद्ध याति एक ठाव । भक्ति नेणें भाव नाहीं मनीं ॥२॥ नाहीं जालें ज्ञान पाहिलें अक्षर । मानी जैसें थोर थोरी नाहीं ॥३॥ नाहीं मनीं लाज धरिली आशंका । नाहीं भ्यालों लोकां चतुरांसि ॥४॥ चतुरांच्या राया मी तुझें अंकित । जालों शरणागत देवदेवा ॥५॥ देवा आतां करीं सरतीं हीं वचनें । तुझ्या कृपादानें बोलिलों तीं ॥६॥ तुझें देणें तुझ्या समर्पूनि पायीं । जालों उतरायी पांडुरंगा ॥७॥ रंकाहुनि रंक दास मी दासांचें । सामर्थ्य हें कैचें बोलावया ॥८॥ बोलावया पुरे वाचा माझी कायी । तुका म्हणे पायीं ठाव द्यावा ॥९॥
3374
मना सांडिं हे वासना दुष्ट खोडी । मती मानसीं एक हे व्यर्थ गोडी । असे हीत माझें तुज कांहीं एक । धरीं विठ्ठलीं प्रेम हें पायिं सूख ॥१॥ ऐसा सर्वभावें तुज शरण आलों । देहदुःख हें भोगितां फार भ्यालों । भवतारितें दूसरें नाहिं कोणी । गुरु होत कां देव तेहतीस तीन्ही ॥२॥ जना वासना हे धना थोरि आहे । तुज लागली संगती ते चि सोये । करीं सर्व संगी परि त्यागु ठायीं । तुका विनवीतो मस्तक ठेवुनि पायीं ॥३॥
3375
मनाचिये साक्षी जाली सांगों मात । सकळ वृत्तांत आपला तो ॥१॥ तुम्हां परामृश घेणें सत्ताबळें । धरितां निराळें कैसीं वांचों ॥ध्रु.॥ मी माझें सांडून यावया पसारा । आणीक दातारा काय काज ॥२॥ तुका म्हणे आम्ही तुजविण एका । निढळें लौकिका माजी असों ॥३॥
3376
मनीं भाव असे कांहीं । तेथें देव येती पाहीं ॥१॥ पाहा जनाई सुंदरी । तेथें देव पाणी भरी ॥ध्रु.॥ शुद्ध पाहोनियां भाव । त्याचे हृदयीं वसे देव ॥२॥ तुका म्हणे विठोबासी । ठाव देई चरणापासीं ॥३॥
3377
मनीं वसे त्याचें आवडे उत्तर । वाटे समाचार घ्यावा ऐसें ॥१॥ जातीचें तें झुरे येर येरासाटीं । वियोगें ही तुटी नेघे कधीं ॥ध्रु.॥ भेटीची अपेक्षा वरता आदर । पुसे नव्हे धीर मागुतालें ॥२॥ तुका म्हणे माझ्या जीवाचें जीवन । सोइरे हरिजन प्राणसखे ॥३॥
3378
मनु राजा एक देहपुरी । असे नांदतु त्यासि दोघी नारी। पुत्र पौत्र संपन्न भारी । तेणें कृपा केली आम्हांवरी गा ॥१॥ म्हणउनि आलों या देशा । होतों नाहीं तरी भुललों दिशा । दाता तो मज भेटला इच्छा । येउनि मारग दाविला सरिसा गा॥ध्रु.॥ सवें घेउनि चौघेजण । आला कुमर सुलक्षण । कडे चुकवुनि कांटवण । ऐका आणिली तीं कोण कोण गा ॥२॥ पुढें भक्तिनें धरिलें हातीं । मागें ज्ञान वैराग्य धर्म येती । स्थिर केलीं जीं आचपळें होतीं । सद्धि आणुनि लाविलीं पंथीं गा ॥३॥ केले उपकार सांगों काय । बाप न करी ऐसी माय । धर्में त्याच्या देखियेले पाय । दिलें अखय भय वारुनि दान गा ॥४॥ होतों पीडत हिंडतां गांव । पोट भरेना राहावया ठाव । तो येणें अवघा संदेह । म्हणे फेडियेला तुकयाचा बंधव गा ॥५॥
3379
मनें हरिरूपीं गुंतल्या वासना । उदास या सुना गौळियांच्या ॥१॥ यांच्या भ्रतारांचीं धरूनियां रूपें । त्यांच्या घरीं त्यांपें भोग करी ॥२॥ करी कवतुक त्याचे तयापरी । एकां दिसे हरि एकां लेंक ॥३॥ एक भाव नाहीं सकळांच्या चित्ती । म्हणऊनि प्रीति तैसें रूप ॥४॥ रूप याचें आहे अवघें चि एक । परि कवतुक दाखविलें ॥५॥ लेंकरूं न कळे स्थूल कीं लहान । खेळे नारायण कवतुकें ॥६॥ कवतुक केलें सोंग बहुरूप । तुका म्हणे बाप जगाचा हा ॥७॥
3380
मनोमय पूजा । हे चि पढीयें केशीराजा ॥१॥ घेतो कल्पनेचा भोग । न मानेती बाह्य रंग ॥ध्रु.॥ अंतरींचें जाणे । आदिवर्तमान खुणे ॥२॥ तुका म्हणे कुडें । कोठें सरे त्याच्या पुढें ॥३॥
3381
मनोरथ जैसे गोकुळींच्या जना । पुरवावी वासना तयापरी ॥१॥ रिण फेडावया अवतार केला । अविनाश आला आकारासी ॥२॥ सीण जाला वसुदेवदेवकीस । वधी बाळें कंस दुराचारी ॥३॥ दुराचारियासी नाहीं भूतदया । आप पर तया पाप पुण्य ॥४॥ पुण्यकाळ त्याचा राहिलासे उभा । देवकीच्या गर्भा देव आले ॥५॥ गर्भासी तयांच्य आला नारायण । तुटलें बंधन आपेंआप ॥६॥ आपेंआप बेड्या तुटल्या शंकळा । बंदाच्या आगळा किलिया कोंडे ॥७॥ कोंडमार केला होता बहु दिस । सोडवी निमिष्य नलगतां ॥८॥ न कळे तो त्यासी सांगितला भाव । आपणासी ठाव नंदाघरीं ॥९॥ नंदाघरीं जातां येतां वसुदेवा । नाहीं जाला गोवा सवें देव ॥१०॥ सवें देव तया आड नये कांहीं । तुका म्हणे नाहीं भय चिंता ॥११॥
3382
मरण माझें मरोन गेलें । मज केलें अमर ॥१॥ ठाव पुसिलें बुड पुसिलें । वोस वोसलें देहभावा ॥ध्रु.॥ आला होता गेला पूर । धरिला धीर जीवनीं ॥२॥ तुका म्हणे बुनादीचें । जालें साचें उजवणें ॥३॥
3383
मरणा हातीं सुटली काया । विचारें या निश्चयें ॥१॥ नासोनियां गेली खंती । सहजिस्थति भोगाचे ॥ध्रु.॥ न देखें सें जालें श्रम । आलें वर्म हाता हें ॥२॥ तुका म्हणे कैची कींव । कोठें जीव निराळा ॥३॥
3384
मरणाही आधीं राहिलों मरोनी । मग केलें मनीं होतें तैसें ॥१॥ आतां तुम्ही पाहा आमुचें नवल । नका वेचूं बोल वांयांविण ॥२॥ तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी । कैसे संग सरी तुम्हां आम्हां ॥३॥
3385
मरोनि जाईंन गुणनामावरूनि । तुझ्या चक्रपाणी मायबापा ॥१॥ चुकविलीं दुःखें मायेचा वोळसा । तोडोनियां आशापाश तेणें ॥ध्रु.॥ केली काया तनु हिंवसी शीतळ । चिंतातळमळ नाहीं ऐसी ॥२॥ काळें तोंड काळ करूनि राहिलें । भूतमात्र जालें सज्जनसखें ॥३॥ तुकयाबंधु म्हणें अवघ्या देशदिशा । मुक्त रे परेशा तुझ्या पुण्यें ॥४॥
3386
मरोनियां गेली माया । मग तया कोण पुसे ॥१॥ पोरटियांची दाद कोणा । ऐसा जाना प्रवाहो ॥ध्रु.॥ निढळास निढळ जोडा । होय कोडा कवतुका ॥२॥ तुका म्हणे देवाऐसी । आहों सरसीं आपण ॥३॥
3387
मविलें मविती । नेणों रासी पडिल्या किती ॥१॥ परि तूं धाला चि न धासी । आलें उभाउभीं घेसी ॥ध्रु.॥ अवघ्यां अवघा काळ । वाटा पाहाती सकळ ॥२॥ तुका म्हणे नाहीं । अराणूक तुज कांहीं ॥३॥
3388
मशीं पोरा घे रे बार । तुझें बुजीन खालील द्वार ॥१॥ पोरा हमामा रे हमामा रे ॥ध्रु.॥ मशीं हमामा तूं घालीं । पोरा वरी सांभाळीं खालीं ॥२॥ तरी च मशीं बोल । पोरा जिव्हाळ्याची ओल ॥३॥ मशीं घेतां भास । जीवा मीतूंपणा नास ॥४॥ मज सवें खरा । पण जाऊं नेदी घरा ॥५॥ आमुचिये रंगीं । दुजें तगेना ये संगीं ॥६॥ तुक्यासवें भास । हरी जीवा करी नास ॥७॥
3389
मस्तकीं सहावें ठांकियासी जाण । तेव्हां देवपण भोगावें गा ॥१॥ आपुलिये स्तुती निंदा अथवा मान । टाकावा थुंकोन पैलीकडे ॥ध्रु.॥ सद्ग‍ुसेवन तें चि अमृतपान । करुनी प्राशन बैसावें गा ॥२॥ आपुल्या मस्तकीं पडोत डोंगर । सुखाचें माहेर टाकुं नये ॥३॥ तुका म्हणे आतां सांगूं तुला किती । जिण्याची फजीती करूं नये ॥४॥
3390
महा जी महादेवा महाकाळमर्दना । मांडियेलें उग्रतप महादीप्त दारुणा । परिधान व्याघ्रांबर चिदाभस्मलेपना । स्मशान क्रीडास्थळ तुम्हा जी त्रिनयना ॥१॥ जय देवा हरेश्वरा जय पार्वतीवरा । आरती ओंवाळिन कैवल्यदातारा । जय. ॥ध्रु.॥ रुद्र हें नाम तुम्हां उग्र संहारासी । शंकर शिव भोळा उदार सर्वस्वीं । उदक बेलपत्र टाळी वाहिल्या देसी । आपुलें पद दासां ठाव देई कैलासीं ॥२॥ त्रैलोक्यव्यापका हो जन आणि विजन । विराटस्वरूप हें तुझें साजिरें ध्यान । करितो वेद स्तुती कीर्ती मुखें आपण । जाणतां नेणवे हो तुमचें महिमान ॥३॥ बोलतां नाम महिमा असे आश्चर्य जगीं । उपदेश केल्यानंतरें पापें पळती वेगीं । हरहर वाणी गर्जे प्रेम संचरे अंगीं । राहिलि दृष्टी चरणीं रंग मीनला रंगीं ॥४॥ पुजूनि लिंग उभा तुका जोडोनी हात । करिती विज्ञापना परिसावी हे मात । अखंड राहूं द्यावें माझें चरणीं चत्ति । घातले साष्टांग मागे मस्तकीं हात ॥५॥
3391
महारासि सिवे । कोपे ब्राम्हण तो नव्हे ॥१॥ तया प्रायश्चित्त कांहीं । देहत्याग करितां नाहीं ॥ध्रु.॥ नातळे चांडाळ । त्याचा अंतरीं विटाळ ॥२॥ ज्याचा संग चित्तीं । तुका म्हणे तो त्या याती ॥३॥
3392
महुरा ऐसीं फळें नाहीं । आलीं कांहीं गळती ॥१॥ पक्वदशे येती थोडीं । नास आढी वेचे तो ॥ध्रु.॥ विरुळा पावे विरुळा पावे । अवघड गोवे सेवटाचे ॥२॥ उंच निंच परिवार देवी । धन्या ठावी चाकरी ॥३॥ झळके तेथें पावे आणी । ऐसे क्षणी बहु थोडे ॥४॥ पावेल तो पैल थडी । म्हणों गडी आपुला ॥५॥ तुका म्हणे उभार्‍यानें । कोण खरें मानितसे ॥६॥
3393
मांडवाच्या दारा । पुढें आणिला म्हातारा ॥१॥ म्हणे नवरी आणा रांड । जाळा नवर्‍याचें तोंड ॥ध्रु.॥ समय न कळे । काय उपयोगीं ये वेळे ॥२॥ तुका म्हणे खरा । येथूनिया दूर करा ॥३॥
3394
मांडे पुर्‍या मुखें सांगों जाणे मात । तोंडीं लाळ हात चोळी रिते ॥१॥ ऐसियाच्या गोष्टी फिक्या मिठेंविण । रुचि नेदी अन्न चवी नाहीं ॥ध्रु.॥ बोलों जाणे अंगीं नाहीं शूरपण । काय तें वचन जाळावें तें ॥२॥ तुका म्हणे बहुतोंडे जे वाचाळ । तेंग तें च मूळ लटिक्याचें ॥३॥
3395
मांस खातां हाउस करी । जोडुनि वैरी ठेवियेला ॥१॥ कोण त्याची करिल कींव । जीवें जीव नेणती ॥ध्रु.॥ पुढिलांसाटीं पाजवी सुरी । आपुली चोरी अंगुळी ॥२॥ तुका म्हणे कुटिती हाडें । आपुल्या नाडें रडती ॥३॥
3396
माउलीची चाली लेंकराचे ओढी । तयालागीं काढी प्राणें प्रीती ॥१॥ ऐसी बळिवंत आवडी जी देवा । संतमहानुभावा विनवितों ॥ध्रु.॥ मोहें मोहियेलें सर्वकाळ चित्त । विसरु तो घेत नाहीं क्षणें ॥२॥ तुका म्हणे दिला प्रेमाचा वोरस । सांभाळिलें दास आपुलें तें ॥३॥
3397
माउलीसी सांगे कोण । प्रेम वाढवी ताहानें ॥१॥ अंतरींचा कळवळा । करीतसे प्रतिपाळा ॥ध्रु.॥ मायबापाची उपमा। तुज देऊं मेघश्यामा ॥२॥ ते ही साजेना पाहातां । जीवलगा पंढरिनाथा ॥३॥ माय पाळी संसारीं । परलोक राहे दुरी ॥४॥ तैसा नव्हेसी अनंता । काळावरी तुझी सत्ता ॥५॥ तुका म्हणे नारायणा । तुम्हां बहुत करुणा ॥६॥
3398
माकडा दिसती कंवटी नारळा । भोक्ता निराळा वरील सारी ॥१॥ एका रस एका तोंडीं पडे माती । आपुलाले नेती विभाग ते ॥ध्रु.॥ सुनियांसी क्षीर वाढिल्या ओकवी । भोगित्यां पोसवी धणीवरी ॥२॥ तुका म्हणे भार वागविती मूर्ख । नेतील तें सार परीक्षक ॥३॥
3399
माकडें मुठीं धरिलें फुटाणे । गुंतले ते नेणे हात तेथें ॥१॥ काय तो तयाचा लेखावा अन्याय । हित नेणे काय आपुलें तें ॥ध्रु.॥ शुकें नळिकेशीं गोवियेले पाय । विसरोनि जाय पक्ष दोन्ही ॥२॥ तुका म्हणे एक ऐसे पशुजीव । न चले उपाव कांहीं तेथें ॥३॥
3400
माग विटूदांडू । आणीक कांही खेळ मांडूं ॥१॥ बहु अंगा आले डाव । स्थिर नाहीं कोठें पाव ॥ध्रु.॥ कोली हाणे टोला । झेली तेणें तो गोविला ॥२॥ एकमेकां हाका मारी । सेल जाळी एक धरी ॥३॥ राजी आलें नांव । फेरा न चुकेचि धांव ॥४॥ पुढें एक पाटी । एक एकें दोघां आटी ॥५॥ एका सोस पोटीं । एक धांवे हात पिटी ॥६॥ तुका म्हणे आतां । खेळ मोडावा परता ॥७॥
3401
मागणें तें एक तुजप्रति आहे । देशी तरि पाहें पांडुरंगा ॥१॥ या संतांसी निरवीं हें मज देई । आणिक दुजें काहीं न मगें तुज ॥२॥ तुका म्हणे आतां उदार होई । मज ठेवीं पायीं संतांचिया ॥३॥ स्वामींनीं काया ब्रम्ह केली ते अभंग ॥ २४ ॥
3402
मागणें तें मागों देवा । करूं भक्ति त्याची सेवा ॥१॥ काय उणे तयापाशीं । रिद्धिसिद्धी ज्याच्या दासी ॥ध्रु.॥ कायावाचामन । करूं देवा हें अर्पण ॥२॥ तुका म्हणे विश्वंभर । ज्याच्यानें हें चराचर ॥३॥
3403
मागता भिकारी जालों तुझे द्वारीं । देई मज हरी कृपादान ॥१॥ प्रेम प्रीति नाम उचित करावें । भावें संचरावें हृदयामाजी ॥ध्रु.॥ सर्वभावें शरण आलों पांडुरंगा । कृपाळु तूं जगामाजी एक ॥२॥ तापत्रयें माझी तापविली काया । शीतळ व्हावया पाय तुझे ॥३॥ संबंधीं जनवाद पीडलों परोपरी । अंतरलों दुरी तुजसी तेणें ॥४॥ तुका म्हणे आतां तुझा शरणागता । करावें सनाथ मायबापा ॥५॥
3404
मागतां विभाग । कोठें लपाल जी मग ॥१॥ संत साक्षी या वचना । त्यांसी ठाउकिया खुणा ॥ध्रु.॥ होइन धरणेकरी । मग मी रिघों नेदीं बाहेरी ॥२॥ तुका म्हणे मी अक्षर । तुज देवपणाचा भार ॥३॥
3405
मागतियाचे दोनि च कर । अमित भांडार दातियाचें ॥१॥ काय करूं आतां कासयांत भरूं । हा मज विचारु पडियेला ॥ध्रु.॥ एकें सांटवणें प्रेमें वोसंडलीं । जिव्हा हे भागली करितां माप ॥२॥ तुका म्हणे आतां आहे तेथें असो । अंखुनियां बैसों पायांपाशीं ॥३॥
3406
मागत्याची कोठें घडते निरास । लेंकरा उदास नाहीं होतें ॥१॥ कासया मी होऊं उतावीळ जीवीं । जाणता गोसावी सर्व आहे ॥ध्रु.॥ जाला तरी वेळ कवतुकासाटीं । निर्दया तों पोटीं उपजेना ॥२॥ तुका म्हणे त्यासी ठाउकें उचित । होईंल संकेत नेमियेला ॥३॥
3407
मागत्याची टाळाटाळी । झिंझ्या वोढूनि कपाळीं ॥१॥ ऐसा तंव मोळा । तुमचा नसेल गोपाळा ॥ध्रु.॥ नसेल ना नवें । ऐसें धरियेलें देवें ॥२॥ तुका म्हणे जाला । उशीर नाहीं तो विठ्ठला ॥३॥
3408
मागायाची नाहीं इच्छा । जो मी ऐसा संकोचों ॥१॥ लटिकियाची न करूं स्तुति । इच्छा चित्तीं धरूनि ॥ध्रु.॥ हिशोबें तें आलें घ्यावें । हें तों ठावें सकळांसी ॥२॥ तुका म्हणे स्वामिसेवा । येथें देवा काशाची ॥३॥
3409
मागायास गेलों सिदोरी । तुझ्या मायाघरीं गांजियेलों ॥१॥ तुजविणें ते नेदी कोणा । सांगतां खुणा जिवें गेलों ॥ध्रु.॥ वांयांविण केली येरझार । आतां पुरे घर तुझी माया ॥२॥ तुका म्हणे तूं आम्हां वेगळा । राहें गोपाळा म्हणउनी ॥३॥
3410
मागितल्यास आस करा । उरी धरा कांहींबाहीं ॥१॥ म्हणऊनि सारिली आस । होती यास मूळ तें ॥ध्रु.॥ माझ्या मोहें तुज पान्हा । लोटे स्तना वोरस ॥२॥ तुका म्हणे आळवणे । माझ्या देणें उत्तर ॥३॥
3411
मागितल्यास कर पसरी । पळतां भरी वाखती ॥१॥ काय आम्ही नेणों वर्म । केला श्रम नेणतां ॥ध्रु.॥ बोलतां बरें येतां रागा । कठीण लागा मागेंमागें ॥२॥ तुका म्हणे येथें बोली । असे चाली उफराटी ॥३॥
3412
मागील ते आटी येणें घडे सांग । सुतवेल अंग एका सूत्रें ॥१॥ पहिपाहुणेर ते सोहळ्यापुरते । तेथुनि आरते उपचार ते ॥ध्रु.॥ आवश्यक तेथें आगळा आदर । चाली थोडें फार संपादतें ॥२॥ तुका म्हणे ॠण फिटे एके घडी । अलभ्य ते जोडी हातां आल्या ॥३॥
3413
मागील विसर होईंल सकळ । केली तळमळ दुःखाची ते ॥१॥ दोहींचें अहिक्य घालीं गडसंदीं । स्थिरावेल बुद्धि पायांपाशीं॥ध्रु.॥ अहाच या केलों देहपरिचारें । तुमचें तें खरें वाटों नये ॥२॥ तुका म्हणे व्हावें लवकरी उदार । मी आहें सादर प्रतिग्रहासी ॥३॥
3414
मागुता हा चि जन्म पावसी । भोगिलें सुखदुःख जाणसी। हें तों न घडे रे सायासीं । कां रे अंध होसी जाणोनियां ॥१॥ लक्ष चौर्‍यांशी न चुके फेरा । गर्भवासीं यातना थोरा । येउनि पडसी संदेहपुरा । वोळसा थोरा मायाजाळीं ॥२॥ पशु काय पापपुण्य जाणती । उत्तम मध्यम भोग भोगिती । कांहीं एक उपजतां मरती । बहिरीं अंध होती पांगुळ मुकीं ॥३॥ नरदेह निधान लागलें हातीं । उत्तम सार उत्तम गती । होइन देव चि म्हणती ते होती । तरि कां चित्ती न धरावें ॥४॥ क्षण एक मन स्थिर करूनी । साव होई डोळे उघडोनी । पाहें वेद बोलिले पुराणीं । तुका विनवणी करीतसे ॥५॥
3415
मागें असताशी कळला । उमस घेऊं नसता दिला। तेणें चि काळें केला । असता अवघा निवाडा ॥१॥ इतका न लगता उशीर । न धरितों भीडभार । सद्धिासी वेव्हार । कासयासी लागला ॥ध्रु.॥ असोनियां माल खरा । किती केल्या येरझारा । धरणें ही दिवस तेरा । माझ्या भावें घेतलें ॥२॥ अझुन तरी इतक्यावरी । चुकवीं जनाचार हरी । तुकयाबंधु म्हणे उरी । नाहीं तरी नुरे कांहीं ॥३॥
3416
मागें चिंता होती आस । केला नास या काळें ॥१॥ तुम्ही आम्हां उदासीन । भिन्नाभिन्न वारिलें ॥ध्रु.॥ मोहजाळें दुःख वाढे । ओढे ओढे त्यास तें ॥२॥ तुका म्हणे कोण देवा । आतां हेवा वाढवी ॥३॥
3417
मागें जैसा होता माझे अंगीं भाव । तैसा एक ठाव नाहीं आतां ॥१॥ ऐसें गोही माझें मन मजपाशीं । तुटी मुदलेंसी दिसे पुढें ॥ध्रु.॥ पुढिलांचे मना आणि गुणदोष । पूज्य आपणांस करावया ॥२॥ तुका म्हणे जाली कोंबड्याची परी । पुढें चि उकरी लाभ नेणें ॥३॥
3418
मागें नेणपणें घडलें तें क्षमा । आतां देतों सीमा करूनियां ॥१॥ परनारीचें जया घडलें गमन । दावीतो वदन जननीरत ॥ध्रु.॥ उपदेशा वरी मन नाहीं हातीं । तो आम्हां पुढती पाहूं नये ॥२॥ तुका म्हणे साक्षी असों द्यावें मन । घातली ते आण पाळावया ॥३॥
3419
मागें पुढें जालों लाटा । अवघा मोटा सरळ ॥१॥ नाहीं कोठें रितें अंग । नित्य रंग नवा चि ॥ध्रु.॥ पोसिंद्याचे पडिलों हातीं । वोझें माती चुकली ॥२॥ जोगावलों पोटीं खर । पाठी भार वरि नाहीं ॥३॥ अवघिया मोकळ्या दिशा । नाहीं वोळसा कामाचा ॥४॥ संताचिये लोळें द्वारीं । पळती दुरी गोमाशा ॥५॥ कांहीं न साहेसा जाला । तुका नेला समर्थ ॥६॥ पातोगें महाद्वारीं । वरि झुली वाकळा ॥७॥
3420
मागें पुढें नाहीं । दुजें यावेगळें कांहीं ॥१॥ नाहीं उरलें आणीक । केला झाडा सकळिक ॥ध्रु.॥ विश्वासावांचून । नांवें दुजियाचे शून्य ॥२॥ देवाविण कांहीं । तुका म्हणे उरी नाहीं ॥३॥
3421
मागें पुढें पाहें सांभाळूनि दोनी ठाय । चुकावूनि जाय गडी राखे गडियांसि ॥१॥ मुरडे दंडा दोहीं तोंडें गडियां सावध करी । भेटतियासंगे तया हाल तुजवरी ॥ध्रु.॥ गडियां गडी वांटुनि देई । ज्याचा सोडी तेचि ठायीं ॥२॥ अगळ्या बळें करील काय । तुज देणें लागे डोय ॥३॥ नवां घरीं पाउला करीं । सांपडे तो तेथें धरीं ॥४॥ जिंकोनि डाव करीं । टाहो सत्ता आणिकांवरी ॥५॥ सांपडोनि डाईं बहु । काळ गुंतलासी ॥६॥ बळिया गडी फळी । फोडी न धरितां त्यांसी ॥७॥ चुकांडी जो खाय मिळोनि अंगीं जाय । गुंतलासी काय तुका म्हणे अझूनी ॥८॥
3422
मागें बहुत जाले खेळ । आतां बळ वोसरलें ॥१॥ हालों नये चालों आतां । घट रिता पोकळ ॥ध्रु.॥ भाजल्याची दिसे घडी । पट ओढी न साहे ॥२॥ तुका म्हणे पाहतां घडी । जगा जोडी अंगारा ॥३॥
3423
मागें बहुतां जनां राखिलें आडणी । धांवसी निर्वाणी नाम घेतां ॥१॥ ऐसें ठावें जालें मज बरव्या परी । म्हणऊनि करीं धांवा तुझा ॥ध्रु.॥ माझेविशीं तुज पडिला विसरु । आतां काय करूं पांडुरंगा ॥२॥ अझुनि कां नये तुम्हासी करुणा । दुरि नारायणा धरिलें मज ॥३॥ तुका म्हणे जीव जाऊं पाहे माझा । आतां केशीराजा घालीं उडी ॥४॥
3424
मागें बहुतां जन्मीं हें चि करित आलों आम्ही । भवतापश्रमी दुःखें पीडिलीं निववूं त्यां ॥१॥ गर्जावे हरिचे पवाडे मिळों वैष्णव बागडे । पाझर रोकडे काढूं पाषाणामध्यें ॥ध्रु.॥ भाव शुद्ध नामावळी हषॉ नाचों पिटूं टाळी । घालूं पायां तळीं किळकाळ त्याबळें ॥२॥ कामक्रोध बंदखाणी तुका म्हणे दिले दोन्ही । इंद्रियांचे धणी आम्ही जालों गोसांवी ॥३॥
3425
मागें शरणागत तारिले बहुत । म्हणती दीनानाथ तुज देवा ॥१॥ पाहिले अपराध नाहीं याती कुळ । तारिला अजामेळ गणिका भिल्ली ॥ध्रु.॥ अढळपदीं बाळ बैसविला धुरु । क्षीराचा सागरु उपमन्ये ॥२॥ गजेंद्रपशु नाडियें जळचरें । भवसिंधुपार उतरिला ॥३॥ प्रल्हाद अग्नींत राखिला जळांत । विषाचें अमृत तुझ्या नामें ॥४॥ पांडवां संकट पडतां जडभारी । त्यांचा तू कैवारी नारायणा ॥५॥ तुका म्हणे तूं या अनाथाचा नाथ । ऐकोनियां मात शरण आलों ॥६॥
3426
मागें संतीं होतें जें जें सांगितलें । तें येऊं लागलें अनुभवा ॥१॥ आचारभ्रष्ट होती लोक कळी । पुण्य क्षीण बळी जालें पाप ॥ध्रु.॥ वर्णधर्म कोण न धरी विटाळ । घालिती गोंधळ एके ठायीं ॥२॥ वेदाचे पाठक सेवितील मद्य । न देखती भेद विषयीं भांड ॥३॥ तुका म्हणे किती करावे फजित । ते चि छंद नित्य बहु होती ॥४॥
3427
मागेन तें एक तुज । देई विचारोनि मज ॥१॥ नको दुर्जनांचा संग । क्षणक्षणा चित्तभंग ॥ध्रु.॥ जन्म घेईंन मी नाना । बहु सोसीन यातना ॥२॥ रंक होईंन दीनांचा । घायें देहपात साचा ॥३॥ तुका म्हणे हें चि आतां । देई देई तूं सर्वथा ॥४॥
3428
माझा घात पात अथवा हित फार । अवघा विचार तुझ्या हातीं ॥१॥ ठेवुनि जीव भाव तुझ्या ठायीं चित्त । राहिलों निवांत पांडुरंगा ॥ध्रु.॥ चित्ताचा चाळक बुद्धीचा जनिता । काय नाहीं सत्ता तुझे हातीं ॥२॥ तुका म्हणे काय करिसी तें पाहीन । ठेविसी राहीन सुखें तेथें ॥३॥
3429
माझा तंव खुंटला उपाव । जेणें तुझे आतुडती पाव । करूं भक्ति तरि नाहीं भाव । नाहीं हातीं जीव कवणेविशीं ॥१॥ धर्म करूं तरि नाहीं चत्ति । दान देऊं तरि नाहीं वत्ति । नेणें पुजों ब्राम्हण अतीत । नाहीं भूतदया पोटा हातीं ॥२॥ नेणें गुरुदास्य संतसेवन । जप तप अनुष्ठान । नव्हे वैराग्य वनसेवन । नव्हे दमन इंद्रियांसी ॥३॥ तीर्थ करूं तरि मन नये सवें । व्रत करूं तरि विधि नेणें स्वभावें । देव जरि आहे म्हणों मजसवें । तरि आपपरावें न वंचे ॥४॥ म्हणोनि जालों शरणागत । तुझा दास मी अंकित । यास कांहीं न लगे संचित । जालों निश्चिंत तुका म्हणे ॥५॥
3430
माझा तुम्ही देवा केला अंगीकार । हें मज साचार कैसें कळे ॥१॥ कां हो कांहीं माझ्या नये अनुभवा । विचारितां देवा आहें तैसा ॥ध्रु.॥ लौकिकाचा मज लाविसी आभार । शिरोरत्नभार दुःखाचा हा ॥२॥ तुका म्हणे नाहीं पालट अंतरीं । तेथें दिसे हरी ठकाठकी ॥३॥
3431
माझा देव्हारा साचा । नाहीं आणीक कोणाचा । त्रिभुवनीं याचा । ठसा न लगे पुसावें ॥१॥ या रे लोटांगणीं । कांहीं करा विनवणी । करील झाडणी । भूत काढी संसार ॥ध्रु.॥ पडिले विषयांचे गोंधळीं । ते त्रिगुण आकळी । हरिनाम आरोळी । कानीं पडतां ते उठी ॥२॥ घेतला अहंकार । काम क्रोध या मत्सरें । पळती प्रेमभरें । अवघे ठाव सांडुनी ॥३॥ घेतलासे पुरा । माया ममता आसरा । अवघ्या एक सरा । पळती रंग देखोनी ॥४॥ तुका म्हणे द्यावा भाव । फिटेल मनिचा संदेह । आणीक न लगे ठाव । कांहीं कोठें हिंडावें ॥५॥
3432
माझा पाहा अनुभव । केला देव आपुला ॥१॥ बोलविलें तें चि द्यावें । उत्तर व्हावें ते काळीं ॥ध्रु.॥ सोडिलिया जग निंद्य । मग गोविंद म्हणियारा ॥२॥ तुका म्हणे धीर केला । तेणें याला गोविलें ॥३॥
3433
माझा मज नाहीं । आला उबेग तो कांहीं ॥१॥ तुमच्या नामाची जतन । नव्हतां थोर वाटे सीण ॥ध्रु.॥ न पडावी निंदा । कानीं स्वामींची गोविंदा ॥२॥ तुका म्हणे लाज । आम्हां स्वामीचें तें काज ॥३॥
3434
माझा स्वामी तुझी वागवितो लात । तेथें मी पतित काय आलों ॥१॥ तीथॉ तुमच्या चरणीं जाहालीं निर्मळ । तेथें मी दुर्बळ काय वाणूं ॥२॥ तुका म्हणे तुम्ही देवा द्विजवंद्य । मी तों काय निंद्य हीन याति ॥३॥
3435
माझिया जीवाचा मज निरधार । न करीं उत्तर जनासवें ॥१॥ आपुलें कारण साधों जी विचार । करावा हा धीर धरूनियां ॥ध्रु.॥ काय कराविया आणिका या युक्ति । काय नव्हे भक्ती विठोबाची ॥२॥ एक पुढें गेले वाट दावूनियां । मारग तो वांयां कोण सांडी ॥३॥ तुका म्हणे माझी विठोबासी चिंता । भेईना सर्वथा न घडे तें ॥४॥
3436
माझिया जीवासी हे चि पैं विश्रांति । तुझे पाय चत्तिीं पांडुरंगा ॥१॥ भांडवल गांठी आलें सपुरतें । समाधान चत्तिें मानियेलें ॥ध्रु.॥ उदंड उच्चारें घातला पसरु । रूपावरी भरु आवडीचा ॥२॥ तुका म्हणे मज भक्तीची आवडी । अभेदीं तांतडी नाहीं म्हुण ॥३॥
3437
माझिया तो जीवें घेतला हा सोस । पाहें तुझी वास भेटावया ॥१॥ मातेविण बाळ न मनी आणिका । सर्वकाळ धोका स्तनपाना ॥ध्रु.॥ वोसंगा निघाल्या वांचूनि न राहे । त्याचें आर्त माय पुरवीते ॥२॥ तुका म्हणे माते भक्तां तूं कृपाळ । गिळियेले जाळ वनांतरीं ॥३॥
3438
माझिया देहाची मज नाहीं चाड । कोठें करूं कोड आणिकांचें ॥१॥ इच्छितां ते मान मागा देवापासीं । आसा संचितासी गुंपले हो ॥ध्रु.॥ देह आम्ही केला भोगाचे सांभाळीं । राहिलों निराळीं मानामानां ॥२॥ तुका म्हणे कोणें वेचावें वचन । नसतां तो सीण वाढवावा ॥३॥
3439
माझिया मनाची बैसली आवडी । अवसान घडी एकी नेघे ॥१॥ पाय चित्तीं रूप डोळांच राहिलें । चिंतने गोविलें मुख सदा ॥ध्रु.॥ अवघियांचा जाला विसर हा मागें । वेध हा श्रीरंगें लावियेला ॥२॥ तुका म्हणे कानीं आइकली मात । तो चि जाला घात जीवपणा ॥३॥
3440
माझिया मीपणा । जाला यावरी उगाणा ॥१॥ भोगी त्यागी पांडुरंग । त्यानें वसविलें अंग ॥ध्रु.॥ टाळिलें निमित्त । फार थोडें घात हित ॥२॥ यावें कामावरी । तुका म्हणे नाहीं उरी ॥३॥
3441
माझिया मीपणावर पडों पाषाण । जळो हें भूषण नाम माझें । पापा नाहीं पार दुःखाचे डोंगर । जालों ये भूमीसी ओझें ॥१॥ काय विटंबना सांगों किती । पाषाण फुटती ऐसें दुःख । नर नारी सकळ उत्तम चांडाळ । न पाहाती माझें मुख ॥ध्रु.॥ काया वाचा मनें अघटित । करणें चर्मचक्षु हात पाय । निंदा द्वेष घात विश्वासीं व्यभिचार । आणीक सांगों किती काय ॥२॥ लक्ष्मीमदें मातें घडले महा दोष । पत्नी दोनी भेदभेद । पितृवचन घडली अवज्ञा अविचार। कुटिल कचर वादी निंद्य ॥३॥ आणीक किती सांगों ते अवगुण । न वळे जिव्हा कांपे मन । भुतदया उपकार नाहीं शब्दा धीर । विषयीं लंपट हीन ॥४॥ संत महानुभाव ऐका हें उत्तरें । अवगुण अविचारें वृद्धि पापा । तुका म्हणे सरतें करा पांडुरंगीं । शरण आलों मायबापा ॥५॥
3442
माझिया संचिता । दृढ देखोनि बळिवंता । पळसी पंढरिनाथा । भेणे आतां तयाच्या ॥१॥ तरि मज कळलासी । नव्हतां भेटी जाणीवेसी । एक संपादिसी । मान करिसी लोकांत ॥ध्रु.॥ तरि हें प्रारब्ध जी गाढें । कांहीं न चले तयापुढें । काय तुज म्यां कोंडें । रें सांकडें घालावें ॥२॥ भोगधीपति क्रियमाण । तें तुज नांगवे अजून । तरि का वांयांविण । तुज म्यां सीण करावा ॥३॥ तुज नव्हतां माझें कांहीं । परि मी न संडीं भक्तिसोईं । हो कां भलत्या ठायीं । कुळीं जन्म भलतैसा ॥४॥ तूं भितोसि माझिया दोषा । कांहीं मागणें ते आशा । तुका म्हणे ऐसा । कांहीं न धरीं संकोच ॥५॥
3443
माझिये जातीचें मज भेटो कोणी । आवडीची धणी फेडावया ॥१॥ आवडे ज्या हरि अंतरापासूनि । ऐसियाचे मनीं आर्त माझें ॥ध्रु.॥ तयालागीं जीव होतो कासावीस । पाहातील वास नयन हे ॥२॥ सुफळ हा जन्म होईंल तेथून । देतां आलिंगन वैष्णवांसी ॥३॥ तुका म्हणे तो चि सुदिन सोहळा । गाऊं या गोपाळा धणीवरि ॥४॥
3444
माझिये बुद्धीचा खुंटला उपाव । करिसील काय पाहेन तें ॥१॥ सूत्रधारी तूं हें सकळचाळिता । कासया अनंता भार वाहों ॥ध्रु.॥ वाहिले संकल्प न पवती सिद्धी । येऊं देहबुद्धीवरि नयों ॥२॥ तुका म्हणे दुःखी करिती तरंग । चिंतूं पांडुरंग आवरून ॥३॥
3445
माझिये मनींचा जाणा हा निर्धार । जिवासि उदार जालों आतां ॥१॥ तुजविण दुजें न धरीं आणिका । भय लज्जा शंका टाकियेली ॥ध्रु.॥ ठायींचा संबंध तुज मज होता । विशेष अनंता केला संतीं ॥२॥ जीवभाव तुझ्या ठेवियेला पायीं । हें चि आतां नाही लाज तुम्हां ॥३॥ तुका म्हणे संतीं घातला हावाला । न सोडीं विठ्ठला पाय आतां ॥४॥
3446
माझिये मनींचा जाणोनियां भाव । तो करी उपाव गुरुराजा ॥१॥ आवडीचा मंत्र सांगितला सोपा । जेणें गुंपा कांहीं कोठें ॥ध्रु.॥ जाती पुढें एक उतरले पार । हा भवसागर साधुसंत ॥२॥ जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी । उतार सांगडी तापे पेटीं ॥३॥ तुका म्हणे मज दावियेला तारू । कृपेचा सागरु पांडुरंग ॥४॥
3447
माझी आतां लोक सुखें निंदा करू । म्हणती विचारू सांडियेला ॥१॥ कारण होय तो करावा विचार । काय भीड भार करूं देवा ॥२॥ तुका म्हणे काय करूं लापनिक । जनाचार सुख नासिवंत ॥३॥
3448
माझी आतां सत्ता आहे । तुम्हां पायां हे वरती ॥१॥ एकाविण नेणें दुजा । पंढरिराजा सर्वांगें ॥ध्रु.॥ पुरवावी केली आळी । जे जे काळीं मागण तें ॥२॥ तुका म्हणे सुटसी कैसा । धरूनि दिशा राहिलों ॥३॥
3449
माझी पाठ करा कवी । उट लावी दारोदार ॥१॥ तंव तया पारखी सिव । लाजे ठाव सांडितां ॥ध्रु.॥ उष्टावळी करूनि जमा । कुंथुनि प्रेमा आणितसे ॥२॥ तुका म्हणे बाहेरमुदी । आहा च गोविंदीं न सरती ॥३॥
3450
माझी भक्ती भोळी । एकविध भावबळी ॥१॥ मी कां पडेन निराळा । ऐसा सांडूनि सोहळा ॥ध्रु.॥ आतां अनारिसा । येथं न व्हावें सहसा ॥२॥ तुका म्हणे जोडुनि पाय । पुढें उगा उभा राहें ॥३॥
3451
माझी मज जाती आवरली देवा । नव्हतां या गोवा इंद्रियांचा ॥१॥ कासया मी तुझा म्हणवितों दास । असतों उदास सर्व भावें ॥ध्रु.॥ भयाचिया भेणें धरियेली कास । न पुरतां आस काय थोरी ॥२॥ तुका म्हणे आपआपुलीं जतन । कैचें थोरपण मग तुम्हां ॥३॥
3452
माझी मेलीं बहुवरिं । तूं कां जैसा तैसा हरी ॥१॥ विठो कैसा वांचलासि । आतां सांग मजपाशीं ॥ध्रु.॥ तुज देखतां चि माझा । बाप मेला आजा पणजा ॥२॥ आम्हां लागलेंसे पाठी । बालत्व तारुण्यें काठीं ॥३॥ तुज फावलें तें मागें । कोणी नसतां वादिलागें ॥४॥ तुका म्हणे तुझ्या अंगीं । मज देखिल लागलीं औघीं ॥५॥
3453
माझी विठ्ठल माउली । प्रेमें पान्हा पान्हायेली ॥१॥ कृवाळूनि लावी स्तनीं । न वजे दुरी जवळूनि ॥ध्रु.॥ केली पुरवी आळी । नव्हे निष्ठ‍ कोंवळी ॥२॥ तुका म्हणे घांस । मुखीं घाली ब्रम्हरस ॥३॥
3454
माझी सर्व चिंता आहे विठोबासी । मी त्याच्या पायांसी न विसंभें ॥१॥ विसरतां रूप क्षण एक चत्तिीं । जिवलग मूर्ती सांवळी ते ॥ध्रु.॥ विसरतां हरी क्षण एक घडी । अंतरली जोडी लक्षलाभ ॥२॥ तुका म्हणे माझ्या विठोबाचे पाये । संजीवनी आहे हृदयामाजी ॥३॥
3455
माझे अंतरींचें तो चि जाणे एक । वैकुंठनायक पांडुरंग ॥१॥ जीव भाव त्याचे ठेवियेला पायीं । मज चिंता नाहीं कवणेविशीं ॥ध्रु.॥ सुखसमारंभें संतसमागमें । गाऊं वाचे नाम विठोबाचें ॥२॥ गातां पुण्य होय आइकतां लाभ । संसारबंद तुटतील ॥३॥ तुका म्हणे जीव तयासी विकिला । आणीक विठ्ठलाविण नेणें ॥४॥
3456
माझे गडी कोण कोण । निवडा भिन्न यांतुनी ॥१॥ आपआपणामध्यें मिळो । एक खेळों एकाशीं ॥ध्रु.॥ घाबरियांच्या मोडा काड्या । धाडा भाड्यां वळतियां ॥२॥ तुका म्हणे देवापाशीं । विटाळशी नसावी ॥३॥
3457
माझे तों फुकाचे कायेचे चि कष्ट । नव्हे क्रियानष्ट तुम्हांऐसा ॥१॥ कांहीं च न वंचीं आजिचा प्रसंगीं । सकळा ही अंगीं करीन पूजा ॥ध्रु.॥ द्यावें काहीं तुम्हीं हें तों नाहीं आस । असों या उदास देहभावें ॥२॥ तुका म्हणे माझी मावळली खंती । समाधान चित्तीं सर्वकाळ ॥३॥
3458
माझे तों स्वभाव मज अनावर । तुज ही देतां भार कांहीं नव्हे ॥१॥ ऐसें कळों आलें मज नारायणा । जागृती स्वपना ताळ नाहीं ॥ध्रु.॥ संपादितों तो अवघा बाहए रंग । तुझा नाहीं संग अभ्यंतरीं ॥२॥ तुका म्हणे सत्या नाहीं पाठी पोट । असतें निघोंट एकी जाती ॥३॥
3459
माझे पाय तुझी डोईं । ऐसें करिं गा भाक देई ॥१॥ पाहतां तंव उफराटें । घडे तईं भाग्य मोठें ॥ध्रु.॥ बहु साधन मोलाच । यासी जोडा दुजें कैचें ॥२॥ नका अनमानूं विठ्ठला । तुका म्हणे धडा जाला ॥३॥
3460
माझे मज कळों येती अवगुण । काय करूं मन अनावर ॥१॥ आतां आड उभा राहें नारायणा । दयासिंधुपणा साच करीं ॥ध्रु.॥ वाचा वदे परी करणें कठीण । इंद्रियां अधीन जालों देवा ॥२॥ तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास । न धरीं उदास मायबापा ॥३॥
3461
माझे मनोरथ पावले सिद्धी । तई पायीं बुद्धि स्थिरावली ॥१॥ समाधान जीव राहिला निश्चळ । गेली हळहळ स्मरण हें ॥ध्रु.॥ त्रिविध तापाचें जालेंसे दहन । सुखावलें मन प्रेमसुखें ॥२॥ महालाभ वाचे वसे पांडुरंग । अंगोअंगीं संग अखंडित ॥३॥ जीवनाचा जाला ओलावा अंतरीं । विश्व विश्वंभरीं सामावलें ॥४॥ तुका म्हणे माप भरी आलें सिगे । धारबोळ गंगे पूर वाहे ॥५॥
3462
माझे माथां तुझा हात । तुझे पायीं माझें चित्त ॥१॥ ऐसी पडियेली गांठी । शरीरसंबंधाची मिठी ॥ध्रु.॥ येरयेरांपाशीं । सांपडोन गेलों ऐसीं ॥२॥ तुका म्हणे सेवा । माझी कृपा तुझी देवा ॥३॥
3463
माझे लेखीं देव मेला । असो त्याला असेल ॥१॥ गोष्टी न करी नांव नेघें । गेलों दोघें खंडोनी ॥ध्रु.॥ स्तुतिसमवेत निंदा । केला धंदा उदंड ॥२॥ तुका म्हणे निवांत ठेलों । वेचित आलों जीवित्व ॥३॥
3464
माझे विषयीं तुज पडतां विसर । नको धरूं दूर पांडुरंगा ॥१॥ तुझा म्हणवितों हे चि लाज तुला । आतां झणी मला विसरेसी ॥२॥ तुका म्हणे तुझी माझी नाहीं उरी । आतां केली खरी देवराया ॥३॥
3465
माझे हातीं आहे करावें चिंतन । तुम्ही कृपादान प्रेम द्यावें ॥१॥ मागति यां भांडवल आळवण । नामाची जतन दातियासी ॥ध्रु.॥ बाळक धांवोनि आड निघे स्तनीं । घालावा जननी कृपे पान्हां ॥२॥ तुका म्हणे करीं कासवाचे परी । आहे सूत्रदोरी तुझे हातीं ॥३॥
3466
माझें आराधन । पंढरपुरींचें निधान ॥१॥ तया एकाविण दुजें । कांहीं नेणें पंढरीराजें ॥ध्रु.॥ दास विठ्ठलाचा । अंकित अंकिला ठायींचा ॥२॥ तुका म्हणे आतां । नव्हे पालट सर्वथा ॥३॥
3467
माझें कोण आहे तुजविण देवा । मुकुंदा केशवा नारायणा ॥१॥ वाट पाहतसें कृपेच्या सागरा । गोपीमनोहरा पांडुरंगा ॥ध्रु.॥ साच करीं हरी आपुली ब्रिदावळी । कृपेनें सांभाळीं महाराजा ॥२॥ क्षमा करीं सर्व अपराध माझा । लडिवाळ मी तुझा पांडुरंगा ॥३॥ साह्य होसी तरी जाती साही वैरी । मग सुखें अंतरीं ध्यान तुझें ॥४॥ कृपा करोनि देई दया क्षमा शांती । तेणें तुझी भक्ति लाभईंल ॥५॥ माझें हें सामर्थ्य नव्हे नारायणा । जरी कांहीं करुणा येइल तुज ॥६॥ तुका म्हणे मज कैसें आपंगा जी । आपुलेंसें करा जी पांडुरंगा ॥७॥
3468
माझें घोंगडें पडिलें ठायीं । माग तया पायीं सांपडला ॥१॥ चोर तो भला चोर तो भला । पाठिसी घातला पुंडलिकें ॥ध्रु.॥ चोर कुठोरि एके चि ठायीं । वेगळें पाहावें नलगेच कांहीं ॥२॥ आणिकांचीं ही चोरलीं आधीं । माझें तयामधीं मेळविलें ॥३॥ आपल्या आपण शोधिलें तींहीं । करीन मी ही ते चि परी ॥४॥ तुका म्हणे माझें हित चि जालें । फाटकें जाउन धडकें चि आलें ॥५॥
3469
माझें चित्त तुझे पायीं । राहें ऐसें करीं कांहीं । धरोनियां बाहीं । भव तारीं दातारा ॥१॥ चतुरा तूं शिरोमणि । गुणलावण्याची खाणी । मुगुट सकळां मणि । तूं चि धन्य विठोबा ॥ध्रु.॥ करीं त्रिमिराचा नाश । दीप होउनि प्रकाश । तोडीं आशापाश । करीं वास हृदयीं ॥२॥ पाहें गुंतलों नेणतां । तुज असो माझी चिंता । तुका ठेवी माथा । पायीं आतां राखावें ॥३॥
3470
माझें जड भारी । आतां अवघें तुम्हांवरी ॥१॥ जालों अंकित अंकिला । तुमच्या मुकलों मागिला ॥ध्रु.॥ करितों जें काम। माझी सेवा तुझें नाम ॥२॥ तुका पायां लागे । कांहीं नेदी ना न मगे ॥३॥
3471
माझें जीवन तुझे पाय । कृपाळुं तूं माझी माय ॥१॥ नेदीं दिसों किविलवाणें । पांडुरंगा तुझें तान्हें ॥ध्रु.॥ जन्ममरण तुजसाटीं । आणीक नेणें दुजी गोष्टी ॥२॥ तुका म्हणे तुजविण । कोण हरिल माझा सीण ॥३॥
3472
माझें परिसावें गार्‍हाणें । चत्ति द्यावें नारायणें ॥१॥ माझे हृदयींचें वर्म । देवा जाणशी तूं कर्म ॥ध्रु.॥ सबाह्यअंतरसाक्ष । ऐसा वेदीं केला पक्ष ॥२॥ तुका म्हणे नेणां । काय सांगों नारायणा ॥३॥
3473
माझें मज आतां न देखें निरसतां । म्हणऊन आधार केला । संसाराची आस सांडुनि लौकिक । जीव भाव तुज दिला । नव्हतीं माझीं कोणी मी कवणांचा । अर्थ मोहो सांडवला । तारीं मारीं करीं भलतें दातारा । होऊन तुझा आतां ठेलों रे ॥१॥ असो माझें कोडें तुज हे सांकडें । मी असेन निवाडें सुखरूप । बाळकासी चिंता काय पोटवेथा । जया शिरीं मायबाप ॥ध्रु.॥ पापपुण्यें श्रुति आटिल्या । शास्त्रांस न लगे चि ठाव । विधिनिषिधें गोविलीं पुराणें वेदांसी तो अहंभाव । ओंकाराचें मूळ व्यापिलें माया । तेथें न धरे च भाव । म्हणऊन काबाड सांडिलें उपसतां । धरिलें तुझें चि नांव ॥२॥ तनमनइंद्रियें ठेवूनि राहिलों । सर्व आशा तुझे पायीं । तप तीर्थ दान करवूं कवणा । हातीं अधीन तें मज काईं । आहिक्यें परत्रें चाड नाहीं सर्वथा । जन्म सदा मज देहीं । मायामोहपाश करीं विष तैसें । तुका म्हणे माझ्याठायीं ॥३॥
3474
माझें मज द्यावें । नाहीं करवीत नवें ॥१॥ सहस्रनामाचें रूपडें । भक्त कैवारी चोखडें ॥ध्रु.॥ साक्षीविण बोलें । तरी मज पाहिजे दंडिलें ॥२॥ तुका म्हणे माल । माझा खरा तो विठ्ठल ॥३॥
3475
माझें मन पाहे कसून । परि चित्त न ढळे तुजपासून ॥१॥ कापुनि देइन शिर । पाहा कृपण कीं उदार ॥ध्रु.॥ मजवरि घालीं घण । परि मी न सोडीं चरण ॥२॥ तुका म्हणे अंतीं । तुजवांचूनि नाहीं गति ॥३॥
3476
माझें मागणें तें किती । दाता लक्ष्मीचा पति ॥१॥ तान्हेल्यानें पीतां पाणी । तेणें गंगा नव्हे उणी ॥ध्रु.॥ कल्पतरु जाला देता । तेथें पोटाचा मागता ॥२॥ तुका म्हणे संतां ध्यातां । परब्रम्ह आलें हाता ॥३॥
3477
माझें माझ्या हाता आलें । आतां भलें सकळ ॥१॥ काशासाटीं विषम थारा । तो अंतरा विटाळ ॥ध्रु.॥ जालीं तया दुःखें तुटी । मागिल पोटीं नसावें ॥२॥ तुका म्हणे शुद्धकुळ । तेथें मळ काशाचा ॥३॥
3478
माझें मुख नामीं रंगो सर्वकाळ । गोविंद गोपाळ राम कृष्ण ॥१॥ अबद्ध चांगलें गाऊं भलतैसें । कळलें हें जैसें मायबापा ॥२॥ तुका म्हणे मज न लगे वांकडें । मी तुझें बोबडें बाळ तान्हें ॥३॥
3479
माझें म्हणतां याला कां रे नाहीं लाज । कन्या पुत्र भाज धन वित्त ॥१॥ कोणी सोडवी ना काळाचे हातींचें । एकाविणें साचें नारायणा ॥२॥ तुका म्हणे किती सांगावें चांडाळा । नेणे जीवकळा कोण्या जीतो ॥३॥
3480
माझ्या इंद्रियांसीं लागलें भांडण । म्हणतील कान रसना धाली ॥१॥ करिती तळमळ हस्त पाद भाळ । नेत्रांसी दुकाळ पडिला थोर ॥ध्रु.॥ गुण गाय मुख आइकती कान । आमचें कारण तैसें नव्हे ॥२॥ दरुषणें फिटे सकळांचा पांग । जेथें ज्याचा भाग घेइल तें ॥३॥ तुका म्हणे ऐसें करीं नारायणा । माझी ही वासना ऐसी आहे ॥४॥
3481
माझ्या कपाळाच्या गुणें । किंवा सरलेंसे नेणें ॥१॥ नये वचन बाहेरी । उभें तिष्ठतसें दारीं ॥ध्रु.॥ काय सांगायास वेचे । रींद आरंभीं ठायींचे ॥२॥ तुका म्हणे किती । भीड धरावी पुढती ॥३॥
3482
माझ्या बापें मज दिधलें भातुकें । म्हणोनि कवतुकें क्रीडा करीं ॥१॥ केली आळी पुढें बोलिलों वचन । उत्तम हें ज्ञान आलें त्याचें ॥ध्रु.॥ घेऊनि विभाग जावें लवलाहा । आलेति या ठाया आपुलिया ॥२॥ तुका ज्ञानदेवीं समुदाय । करावा मी पाय येइन वंदूं ॥३॥
3483
माझ्या भावें केली जोडी । न सरेसी कल्पकोडी । आणियेलें धाडी । घालुनि अवघें वैकुंठ ॥१॥ आतां न लगे यावें जावें । कोठें कांहीं च करावें । जन्मोजन्मीं खावें । सुखें बैसोनसें जालें ॥ध्रु.॥ असंख्य संख्या नाहीं पार । आनंदें दाटलें अंबर । न माये अपार । त्रिभुवनीं सांटवितां ॥२॥ अवघें भरलें सदोदित । जाले सुखाचे पर्वत । तुकयाबंधु म्हणे परमार्थ । धन अद्भुत सांपडलें ॥३॥
3484
माझ्या मना लागो चाळा । पहावया विठ्ठला डोळां॥१॥ आणीक नाही चाड । न लगे संसार हा गोड ॥ध्रु.॥ तरि च फळ जन्मा आलों । सरता पांडुरंगीं जालों ॥२॥ तुका म्हणे देवा । देई चरणांची सेवा ॥३॥
3485
माझ्या मुखावाटा नयो हें वचन । व्हावें संतान द्रव्य कोणां ॥१॥ फुकाचा विभाग पतनदुःखासी । दोहींमुळें त्यासी तें चि साधे ॥ध्रु.॥ नाइकावी निंदा स्तुति माझ्या कानें । सादर या मनें होऊनियां ॥२॥ तुका म्हणे देव असाध्य यामुळें । आशामोहजाळें गुंतलिया ॥३॥
3486
माझ्या मुखें मज बोलवितो हरि । सकळां अंतरीं नारायण ॥१॥ न करावा द्वेष भूतांचा मत्सर । हा तंव विचार जाणों आम्ही ॥२॥ तुका म्हणे दोष नाहीं या विचारें । हिताचीं उत्तरें शिकवितां ॥३॥
3487
माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपण चि देव होय गुरू ॥१॥ पढियें देहभावें पुरवितो वासना । अतीं तें आपणापाशीं न्यावें ॥ध्रु.॥ मागें पुढें उभा राहे सांभाळीत । आलिया आघात निवारावे ॥२॥ योगक्षेम जाणे जडभारी । वाट दावी करीं धरूनियां ॥३॥ तुका म्हणे नाहीं विश्वास ज्या मनीं । पाहावें पुराणीं विचारूनी ॥४॥
3488
माता कापी गळा । तेथें कोण राखी बाळा ॥१॥ हें कां नेणां नारायणा । मज चाळवितां दिना ॥ध्रु.॥ नागवी धावणें । तेथें साह्य व्हावें कोणें ॥२॥ राजा सर्व हरी । तेथें दुजा कोण वारी ॥३॥ तुझ्या केल्याविण । नव्हे स्थिर वश जन ॥४॥ तुका म्हणे हरी । सूत्र तुम्हां हातीं दोरी ॥५॥
3489
माते लेकरांत भिन्न । नाहीं उत्तरांचा सीन ॥१॥ धाडींधाडीं वो भातुकें । रंजविल्याचें कौतुकें ॥ध्रु.॥ करुनि नवल । याचे बोलिलों ते बोल ॥२॥ तुका म्हणे माते । पांडुरंगे कृपावंते ॥३॥
3490
मातेचिये चित्ती । अवघी बाळकाची व्याप्ति ॥१॥ देह विसरे आपुला । जवळीं घेतां सीण गेला ॥ध्रु.॥ दावी प्रेमभातें । आणि अंगावरि चढतें ॥२॥ तुका संतापुढें । पायीं झोंबे लाडें कोडें ॥३॥
3491
मातेची अवस्था काय जाणे बाळ । तिसी तों सकळ चिंता त्याची ॥१॥ ऐसें परस्परें आहे चि विचारा । भोपळ्याचा तारा दगडासी ॥ध्रु.॥ भुजंग पोटाळी चंदनाचें अंग । निवे परि संग नव्हे तैसा ॥२॥ तुका म्हणे करा परिसाचे परी । मज ठेवा सरी लोखंडाचे ॥३॥
3492
मातेचीं जो थानें फाडी । तया जोडी कोण ते ॥१॥ वेदां निंदी तो चांडाळ । भ्रष्ट सुतकिया खळ ॥ध्रु.॥ अगी लावी घरा । मग वसती कोठें थारा ॥२॥ तुका म्हणे वर्म । येरा नाचवितो भ्रम ॥३॥
3493
मातेविण बाळा । आणिक न माने सोहळा ॥१॥ तैसें जालें माझ्या चित्ती । तुजविण पंढरिनाथा ॥ध्रु.॥ वाट पाहेमेघा बिंदु । नेघे चातक सरिता सिंधू ॥२॥ सारसांसी निशीं । ध्यानरवीच्या प्रकाशीं ॥३॥ जीवनाविण मत्स्य । जैसें धेनूलागीं वत्स ॥४॥ पतिव्रते जिणें । भ्रताराच्या वर्त्तमानें ॥५॥ कृपणाचें धन । लोभालागीं जैसें मन ॥६॥ तुका म्हणे काय । तुजविण प्राण राहे ॥७॥
3494
मान अपमान गोवे । अवघे गुंडूनी ठेवावे ॥१॥ हें चि देवाचें दर्शन । सदा राहे समाधान ॥ध्रु.॥ शांतीची वसती । तेथें खुंटे काळगती ॥२॥ आली ऊर्मी साहे । तुका म्हणे थोडें आहे ॥३॥
3495
मान इच्छी तो अपमान पावे । अमंगळ सवे अभाग्याची ॥१॥ एकाचिये अंगीं दुजियाचा वास । आशा पुढें नाश सद्धि करी ॥ध्रु.॥ आधीं फळासी कोठें पावों शके । वासनेची भिकेवरी चाली ॥२॥ तुका म्हणे राजहंस ढोरा नांव । काय तया घ्यावें अळंकाराचें ॥३॥
3496
मानामान किती । तुझ्या क्षुल्लका संपत्ती ॥१॥ जा रे चाळवीं बापुडीं । कोणी धरिती तीं गोडी ॥ध्रु.॥ रिद्धीसिद्धी देसी । आम्हीं चुंभळें नव्हों तैसीं ॥२॥ तुका म्हणे ठका । ऐसें नागविलें लोकां ॥३॥
3497
मानावया जग व्हावी द्रव्यमाया । नाहीं ते माझिया जीवा चाड ॥१॥ तुझ्या पायांसाठीं केली आराणूक । आतां कांहीं एक नको दुजें ॥ध्रु.॥ करूनियां कृपा करीं अंगीकार । न लवीं उसीर आतां देवा ॥२॥ नव्हे साच कांहीं कळों आलें मना । म्हणोनि वासना आवरिली ॥३॥ तुका म्हणे आतां मनोरथ सिद्धी । माझे कृपानिधी पाववावे ॥४॥
3498
मानी भक्तांचे उपकार । रुणीया म्हणवी निरंतर । केला निर्गुणीं आकार । कीर्त मुखें वर्णितां ॥१॥ म्हणोनि जया जे वासना । ते पुरवितो पंढरिराणा । जाला भक्तांचा आंदणा । ते उपकार फेडावया ॥ध्रु.॥ अंबॠषीकारणें । जन्म घेतले नारायणें । एवडें भक्तीचे लहणें । दास्य करी हा दासाचें ॥२॥ म्हणियें करितां शंका न धरी । रक्षपाळ बिळच्या द्वारीं । भक्तीचा आभारी । रीग न पुरे जावया ॥३॥ अर्जुनाचे रथवारु । ते वागवी सर्वेश्वरु । एवडे भक्तीचे उपकारु । मागें मागें हिंडतसे ॥४॥ पुंडलिकाचे द्वारीं । सम पाउलीं विटेवरी । न वजे कट करीं । धरूनि तेथें राहिला ॥५॥ भावभक्तीचा अंकित । नाम साजे दिनानाथ । म्हणोनि राहिला निवांत । तुका चरण धरोनि ॥६॥
3499
मानूं कांहीं आम्ही आपुलिया स्वइच्छा । नाहीं तरि सरिसा रंकरावो ॥१॥ आपुल्या उदास आहों देहभावीं । मग लज्जाजीवीं चाड नाहीं ॥२॥ तुका म्हणे खेळों आम्ही सहजलीळे । म्हणोनी निराळे सुख दुःख ॥३॥
3500
माप म्हणे मी मवितें । भरी धणी ठेवी रितें ॥१॥ देवा अभिमान नको । माझेठायीं देऊं सकों ॥ध्रु.॥ देशी चाले सिका । रितें कोण लेखी रंका ॥२॥ हातीं सूत्रदोरी । तुका म्हणे त्याची थोरी ॥३॥
3501
माय बाप बंधु सोयरा सांगाती । तूं चि माझी प्रीति गण गोत ॥१॥ शरण आलीं त्यांचीं वारिलीं दुरितें । तारिले पतित असंख्यात ॥ध्रु.॥ इतर कोण जाणे पावलें विश्रांति । न येतां तुजप्रति शरणागत ॥२॥ तयामध्यें मज ठेवीं नारायणा । लक्षुमीरमणा सोइरिया ॥३॥ तुका म्हणे देई दर्शनाचा लाभ । जे पाय दुर्लभ ब्रम्हादिकां ॥४॥
3502
माय वनीं धाल्या धाये । गर्भ आंवतणें न पाहें॥१॥ तैसें पूजितां वैष्णव । सुखें संतोषतो देव ॥ध्रु.॥ पुत्राच्या विजयें । पिता सुखातें जाये ॥२॥ तुका म्हणे अमृतसिद्धी । हरे क्षुधा आणि व्याधि ॥३॥
3503
मायझवा खर गाढवाचें बीज । तें ऐसें सहज कळों येतें ॥१॥ आपमानिलें जेणें श्रेष्ठाचें वचन । ते चि त्याची खुण ओळखावी ॥ध्रु.॥ मद्यपीर पुरा अधम यातीचा । तया उपदेशाचा राग वांयां ॥२॥ तुकयाबंधु म्हणे पिसाळलें सुनें । आप पर तेणें न विचारावें ॥३॥
3504
मायबाप करिती चिंता । पोर नाइके सांगतां ॥१॥ नको जाऊं देउळासी । नेतो बागुल लोकांसी ॥ध्रु.॥ कर्णद्वारें पुराणिक । भुलवी शब्दें लावी भीक ॥२॥ वैष्णवां संगती । हातीं पडलीं नेणों किती ॥३॥ आम्हां कैंचा मग । करिसी उघडियांचा संग ॥४॥ तुका म्हणे जाणें नरका । त्यांचा उपदेश आइका ॥५॥
3505
मायबाप जोहार । सारा साधावया आलों वेसकर ॥१॥ मागील पुढील करा झाडा । नाहीं तरी खोडा घालिती जी ॥ध्रु.॥ फांकुं नका रुजू जालिया वांचून । सांगा जी कोण घरीं तीं धण्या ॥२॥ आजि मायबाप करा तडामोडी । उद्यां कोणी घडी राहेना हो ॥३॥ तुका म्हणे कांहीं न चले ते बोली । अखरते सालीं झाडा घेती ॥४॥
3506
मायबाप निमाल्यावरी । घातलें भावाचे आभारीं । तो ही परि हरी । तुज जाला असमाईं ॥१॥ हे कां भक्तिचे उपकार । नांदतें विध्वंसिलें घर । प्रसन्नता वेव्हार । सेवटीं हे जालासी ॥ध्रु.॥ एका जिवावरी । होतों दोनी कुटुंबारी । चाळवूं तो तरीं । तुज येतो निर्लज्जा ॥२॥ तुकयाबंधु म्हणे भला । आणीक काय म्हणावें तुला । वेडा त्यानें केला । तुजसवें संबंधु ॥३॥
3507
मायबाप सवें नये धनवत्ति । करावें संचित भोगावें तें ॥१॥ म्हणऊनि लाभ काय तो विचारीं । नको चालीवरी चत्ति ठेवूं ॥ध्रु.॥ आयुष्य सेवटीं सांडूनि जाणार । नव्हे हें साचार शरीर हें ॥२॥ तुका म्हणे काळें लावियेलें माप । जमे धरी पापपुण्याची ही ॥३॥
3508
मायबापाचिये भेटी । अवघ्या तुटी संकोचा ॥१॥ भोगिलें तें आहे सुख । खातां मुख मोकळें ॥ध्रु.॥ उत्तम तें बाळासाटीं । लावी ओठीं माउली ॥२॥ तुका म्हणे जाली धणी । आनंद मनीं न समाये ॥३॥
3509
मायबापापुढें लाटिकें लेंकरूं । तैसे बोल करूं कवतुकें ॥१॥ कृपावंता घालीं प्रेमपान्हारस । वोळली वोरसे पांडुरंग ॥ध्रु.॥ नाहीं धीर खुंटी जवळी हुंबरे । ठायीं च पाखर कवळिते ॥२॥ तुका म्हणे मज होऊं नेदी सीण । कळों नेदी भिन्न आहे ऐसें ॥३॥
3510
मायबापापुढें लेंकराची आळी । आणीक हे पाळी कोण लळे ॥१॥ सांभाळा जी माझीं विषमें अनंता । जवळी असतां अव्हेर कां ॥ध्रु.॥ आणिकांची चाले सत्ता आम्हांवरी । तुमची ते थोरी काय मग ॥२॥ तुका म्हणे आलों दुरोनि जवळी । आतां टाळाटाळी करूं नये ॥३॥
3511
मायबापें केवळ काशी । तेणें न वजावें तीर्थासी ॥१॥ पुंडलीकें काय केलें । परब्रम्ह उभें ठेलें ॥ध्रु.॥ तैसा होई सावधान । हृदयीं धरीं नारायण ॥२॥ तुका म्हणे मायबापें । अवघीं देवाचीं स्वरूपें ॥३॥
3512
मायबापें जरी सर्पीण बोका । त्यांचे संगें सुखा न पवे बाळ ॥१॥ चंदनाचा शूळ सोनियाची बेडी । सुख नेदी फोडी प्राण नाशी ॥२॥ तुका म्हणे नरकीं घाली अभिमान । जरी होय ज्ञान गर्व ताठा ॥३॥
3513
मायबापें सांभाळिती । लोभाकारणें पाळिती ॥१॥ तैसा नव्हे देवराव । याचा कृपाळु स्वभाव ॥ध्रु.॥ मनासारिखें न होतां । बाळकासी मारी माता ॥२॥ तुका म्हणे सांगूं किती । बाप लेंकासी मारिती ॥३॥
3514
मायलेंकरांत भिन्न । नाहीं उत्तराचा सीण ॥१॥ धाडीं धाडीं वो भातुकें । रंजविल्याचें कौतुकें ॥ध्रु.॥ करूनि नवल । याचें बोलिलों ते बोल ॥२॥ तुका म्हणे माते । पांडुरंगे कृपावंते॥३॥
3515
माया तें चि ब्रम्ह ब्रम्ह तेंचि माया । अंग आणि छाया तया परी ॥१॥ तोडितां न तुटे सारितां निराळी । लोटांगणांतळीं हारपते ॥ध्रु.॥ दुजें नाहीं तेथें बळ कोणासाठीं । आणिक ते आटी विचाराची ॥२॥ तुका म्हणे उंच वाढे उंचपणें । ठेंगणीं लवणें जैसीं तैसीं ॥३॥
3516
माया ब्रम्ह ऐसें म्हणती धर्मठक । आपणासरिसे लोक नागविले ॥१॥ विषयीं लंपट शिकवी कुविद्या । मनामागें नांद्या होऊनि फिरे ॥ध्रु.॥ करुनी खातां पाक जिरे सुरण राई । करितां अतित्याई दुःख पावे ॥२॥ औषध द्यावया चाळविलें बाळा । दावूनियां गुळा दृष्टीपुढें ॥३॥ तरावया आधीं शोधा वेदवाणी । वांजट बोलणीं वारा त्यांचीं ॥४॥ तुका म्हणे जयां पिंडाचें पाळण । न घडे नारायणभेट तयां ॥५॥
3517
माया मोहोजाळीं होतों सांपडलों । परि या विठ्ठला कृपा आली ॥१॥ काढूनि बाहेरि ठेविलों निराळा । कवतुक डोळां दाखविलें ॥ध्रु.॥ नाचे उडे माया करी कवतुक । नासिवंत सुखें साच केलीं ॥२॥ रडे फुंदे दुःखें कुटितील माथा । एकासी रडतां तें ही मरे ॥३॥ तुका म्हणे मज वाटतें नवल । मी माझे बोल ऐकोनियां ॥४॥
3518
माया साक्षी आम्ही नेणों भीड भार । आप आणि पर नाहीं दोन्ही ॥१॥ सत्याचिये साटीं अवघा चि भरे । नावडे व्यापार तुटीचा तो ॥ध्रु.॥ पोंभाळिता चरे अंतरींचें दुःख । लांसें फांसें मुख उघडावें ॥२॥ तुका म्हणे नव्हे स्फीतीचा हा ठाव । निवाड्यासी देव साक्षी केला ॥३॥
3519
मायारूपें ऐसें मोहिलेंसे जन । भोगिती पतन नामाकर्में॥१॥ काय याची प्रीती करितां आदर । दुरावितां दूर तें चि भलें ॥ध्रु.॥ नाना छंद अंगीं बैसती विकार । छळियेले फार तपोनिधि ॥२॥ तुका म्हणे ऐसें सिकवितों तुज । आतां धरी लाज मना पुढें ॥३॥
3520
मायें मोकलिलें कोठें जावें बळें । आपुलिया बळें न वंचे तें ॥१॥ रुसोनियां पळे सांडुनियां ताट । मागें पाहे वाट यावें ऐसीं ॥ध्रु.॥ भांडवल आम्हां आळी करावी हे । आपणें माये धांवसील ॥२॥ तुका म्हणे आळी करुनियां निकी । देसील भातुकीं बुझाऊनि ॥३॥
3521
मायेचा मारिला अंगीं नाहीं घाव । दुःखें तरी लव धडधडी ॥१॥ न लभे हा काळ न सुटे हातींचा । न बोलवे वाचा खोडावली ॥ध्रु.॥ न पवे धांवणें न पवे चि लाग । न चलती माग धरावया ॥२॥ भेणें तरि अंगा लावियेल्या राखा । परी त्यासी वाखा करीतसे ॥३॥ तुका म्हणे नेदी हाका मारूं देवा । लोकापाठी हेवा लागलासे ॥४॥
3522
मायेवरी सत्ता आवडीची बाळा । संकोचोनि लळा प्रतिपाळी ॥१॥ अपराध माझे न मनावे मनीं । तुम्ही संतजनीं मायबापीं ॥ध्रु.॥ आरुष वचन लेंकुराची आळी । साहोनि कवळी मागुताली ॥२॥ तुका म्हणे अंगीं काय नाहीं सत्ता । परि निष्ठ‍ता उपेजना ॥३॥
3523
मारगीं चालतां पाउलापाउलीं । चिंतावी माउली पांडुरंग ॥१॥ सर्व सुख लागे घेउनिया पाठी । आवडींचा कंठीं रस ओती ॥ध्रु.॥ पीतांबरें छाया करी लोभापर । पाहे तें उत्तर आवडीचें ॥२॥ तुका म्हणे हें चि करावें जीवन । वाचे नारायण तान भूक ॥३॥
3524
मारगीं बहुत । या चि गेले साधुसंत ॥१॥ नका जाऊ आडराणें । ऐसीं गर्जती पुराणें ॥ध्रु.॥ चोखाळिल्या वाटा । न लगे पुसाव्या धोपटा ॥२॥ झळकती पताका । गरुड टके म्हणे तुका ॥३॥
3525
मारिले असुर दाटले मेदिनी । होते कोणाकोणी पीडित ते ॥१॥ ते हा नारायण पाठवी अघोरा । संतांच्या मत्सरा घातावरी ॥२॥ वरिले ते दूतीं यमाचिया दंडीं । नुच्चरितां तोंडीं नारायण ॥३॥ नारायण नाम नावडे जयासि । ते जाले मिरासी कुंभपाकीं ॥४॥ कुंभपाकीं सेल मान तो तयांचा । तुका म्हणे वाचा संतनिंदा ॥५॥
3526
मारूं नये सर्प संतांचिये दृष्टी । होतील ते कष्टी व्यापकपणें ॥१॥ एक सूत्र जीवशिवीं आइक्यता । रोम उपडितां अंग कांपे ॥ध्रु.॥ नाहीं साहों येत दुखाची ते जाती । परपीडा भूतीं साम्य जालें ॥२॥ तुका म्हणे दिला नीतीचा संकेत । पुजा नांवें चित्त सुखी तेणें ॥३॥
3527
मार्ग चुकले विदेशीं एकले । तयावरि जाले दिशाभुली ॥१॥ हातीं धरूनियां पावविलें घरा । त्याच्या उपकारा काय द्यावें ॥२॥ तैसा मी कुडकुडा होतों केशीराजा । सेवा न घडे लाजा म्हणऊनि ॥ध्रु.॥ सांडियेला गर्भ उबगोनि माउली । नाहीं सांभाळिली भूमि शुद्ध ॥३॥ उष्ण तान भूक एवढिये अकांतीं । वोसंगा लाविती काय म्हणिजे ॥४॥ खांद्यावरी शूळ मरणाचे वाटे । अन्याय हि मोटे साच केले ॥५॥ हातींचें हिरोनि घातला पाठीसी । तुका म्हणे ऐसी परी जाली ॥६॥
3528
मासं चर्म हाडें । देवा अवघीं च गोडें ॥१॥ जे जे हरिरंगीं रंगले । कांहीं न वचे वांयां गेले ॥ध्रु.॥ वेद खाय शंखासुर । त्याचें वागवी कलिवर ॥२॥ तुका म्हणे ऐसा । बराडी हा भक्तिरसा ॥३॥
3529
माहार माते चपणी भरे । न कळे खरें पुढील ॥१॥ वोंगळ अधमाचे गुण । जातां घडी न लगे चि ॥ध्रु.॥ श्वान झोळी स्वामिसत्ता । कोप येतां उतरे ॥२॥ तुका म्हणे गुमान कां । सांगों लोकां अधमासी ॥३॥
3530
माहेरिंचा काय येईंल निरोप । म्हणऊनि झोंप नाहीं डोळां ॥१॥ वाट पाहें आस धरूनियां जीवीं । निडळा हे ठेवीं वरी बाहे ॥ध्रु.॥ बोटवरी माप लेखितों दिवस । होतों कासावीस धीर नाहीं ॥२॥ काय नेणों संतां पडेल विसर । कीं नव्हे सादर मायबाप ॥३॥ तुका म्हणे तेथें होईंल दाटणी । कोण माझें आणी मना तेथें ॥४॥
3531
माहेरींचें आलें तें मज माहेर । सुखाचें उत्तर करिन त्यासी ॥१॥ पायांवरी माथा आळिंगीन बाहीं । घेईंन लवलाहीं पायवणी ॥ध्रु.॥ सुख समाचार पुसेन सकळ । कैसा पर्वकाळ आहे त्यास ॥२॥ आपुले जीवींचें सुखदुःख भावें । सांगेन अघवें आहे तैसें ॥३॥ तुका म्हणे वीट नेघें आवडीचा । बोलिली च वाचा बोलवीन ॥४॥
3532
मिटवण्याचे धनी । तुम्ही वेवसाय जनीं ॥१॥ कोण पडे ये लिगाडीं । केली तैसीं उगवा कोडीं ॥ध्रु.॥ केलें सांगितलें काम । दिले पाळूनियां धर्म ॥२॥ तुका म्हणे आतां । असो तुमचें तुमचे माथां ॥३॥
3533
मिथ्या आहे सर्व अवघें हें मायिक । न कळे विवेक मज कांहीं ॥१॥ सर्व बाजागिरी वाटती ही खरी । पहातां येथें उरी कांहीं नाहीं ॥ध्रु.॥ आतां मज दुःख वाटतें अंतरीं । उपाय झडकरी सांग कांहीं ॥२॥ पुढें कोण गति न कळे सर्वथा । तुझे पायीं माथा ठेवियेला ॥३॥ करणें तें करीं सुखें आतां हरी । तुज म्यां निर्धारीं धरियेलें ॥४॥ स्वहित तें काय न कळे सर्वथा । तारीं तूं अनंता तुका म्हणे ॥५॥
3534
मिळे हरिदासांची दाटी । रीग न होय शेवटी ॥१॥ तेथें म्या काय करावें । माझें कोणें आइकावें ॥ध्रु.॥ कैसें तुज लाजवावें । भक्त म्हणोनियां भावें ॥२॥ नाचतां नये ताळीं । मज वाजवितां टाळी ॥३॥ अंतीं मांडिती भुषणें भूषणे । शरीर माझें दैन्य वाणें ॥४॥ तुका म्हणे कमळापति । मज न द्यावें त्या हातीं ॥५॥
3535
मिळोनि गौळणी देती यशोदे गार्‍हाणीं । दहिं दुध तुप लोणीं शिंकां नुरे कांहीं । मेळवुनी पोरें तेथें रिघे एकसरें । वेगीं आणोनी सामोरें तेथें लोणी खाय ॥१॥ हरि सोंकला वो हरि सोंकला वो । सोंकला तो वारीं तुज लाज नाहीं तरी । आम्हां सांपडतां उरी तुज मज नाहीं ॥ध्रु.॥ तुज वाटतसे कोड यासि लागतसे गोड । काय हासतेसी वेड तुज लागलें वो । आम्ही जाऊं तुजवरी पोरें चाळविल्या पोरी । काय सांगों भांडखोरी लाज वाटे आम्हां ॥२॥ मुख मळिण वदन उभा हाडतिये घोणे । तंव दसवंती म्हणे आणा शीक लावूं । थोर आणिला कांटाळा घरीं दारीं लोकपाळां । डेरा रिघोनी गुसळा तेथें लोणी खाय ॥३॥ मिळोनि सकळा दावें लावूनियां गळां । कैशा बांधिती उखळा येथें राहे उगा । बरा सांपडलासी हरी आजिच्यानें करिसिल चोरी । डोळे घालुनियां येरी येरीकडे हांसे ॥४॥ फांकल्या सकळा उपडूनियां उखळा । मोडी वृक्ष विमळार्जुन दोन्ही । उठिला गजर दसवंती नव्हे धीर । धांवे तुकयाचा दातार आळंगिला वेगीं ॥५॥
3536
मी अवगुणी अन्यायी किती म्हणोन सांगों काईं । आतां मज पायीं ठाव देई विठ्ठले ॥१॥ पुरे पुरे हा संसार कर्म बिळवंत दुस्तर । राहों नेदी स्थिर एके ठायीं निश्चळ ॥ध्रु.॥ अनेक बुद्धिचे तरंग क्षणक्षणां पालटती रंग । धरूं जातां संग तंव तो होतो बाधक ॥२॥ तुका म्हणे आतां अवघी तोडीं माझी चिंता । येऊनि पंढरिनाथा वास करीं हृदयीं ॥३॥
3537
मी च विखळ मी च विखळ । येर सकळ बहु बरें ॥१॥ पाहिजे हें क्षमा केलें । येणें बोलें विनवणी ॥ध्रु.॥ मी च माझें मी च माझें । जालें ओझें अन्याय ॥२॥ आधीं आंचवला आधीं आंचवला । तुका जाला निमनुष्य ॥३॥
3538
मी तंव अनाथ अपराधी । कर्महीन मतिमंदबुद्धी । तुज म्यां आठविलें नाहीं कधीं । वाचे कृपानीधी मायबापा ॥१॥ नाहीं ऐकिलें गाइलें गीत । धरिली लाज सांडिलें हित । नावडे पुराण बैसले संत । केली बहुत परनिंदा ॥ध्रु.॥ केला करविला नाहीं उपकार । नाहीं दया आली पीडितां पर । करू नये तो केला व्यापार । वाहिला भार कुटुंबाचा ॥२॥ नाही केलें तीर्थाचें भ्रमण । पाळिला पिंड करचरण । नाहीं संतसेवा घडलें दान । पूजावलोकन मुर्तीचें ॥३॥ असंगसंग घडले अन्याय । बहुत अधर्म उपाय । न कळे हित करावें तें काय । नये बोलूं आठवूं तें ॥४॥ आप आपण्या घातकर । शत्रु जालों मी दावेदार । तूं तंव कृपेचा सागर । उतरीं पार तुका म्हणे ॥५॥
3539
मी तव बैसलों धरुनियां ध्यास । न करीं उदास पांडुरंगा ॥१॥ नको आतां मज दवडूं श्रीहरी । मागाया भिकारी जालों दास ॥ध्रु.॥ भुकेलों कृपेच्या वचनाकारणें । आशा नारायणें पुरवावी ॥२॥ तुका म्हणे येऊनियां देई भेटी । कुरवाळुनी पोटीं धरीं मज ॥३॥
3540
मी तें मी तूं तें तूं । कुंकुड हें लाडसी ॥१॥ वचनासी पडो तुटी । पोटींचें पोटीं राखावें ॥ध्रु.॥ तेथील तेथें येथील येथें । वेगळ्या कुंथे कोण भारें ॥२॥ याचें यास त्याचें त्यास । तुक्यानें कास घातली ॥३॥
3541
मी तों अल्प मतिहीन । काय वर्णू तुझे गुण । उदकीं तारिले पाषाण । हें महिमान नामाचें ॥१॥ नाम चांगलें चांगलें । माझे कंठीं राहो भलें । कपिकुळ उद्धरिलें । मुक्त केलें राक्षसां ॥ध्रु.॥ द्रोणागिरि कपिहातीं । आणविला सीतापती । थोर केली ख्याति । भरतभेटीसमयीं ॥२॥ शिळा होती मनुष्य जाली । थोर कीर्ति वाखाणिली । लंका दहन केली । हनुमंते काशानें ॥३॥ राम जानकीजीवन । योगियांचे निजध्यान । राम राजीवलोचन । तुका चरण वंदितो ॥४॥ श्लोकरूपी अभंग - ॥६॥
3542
मी तों दीनाहूनि दीन । माझा तूज अभिमान ॥१॥ मी तों आलों शरणागत । माझें करावें स्वहित ॥ध्रु.॥ दिनानाथा कृपाळुवा । सांभाळावें आपुल्या नांवा ॥२॥ तुका म्हणे आतां । भलें नव्हे मोकलितां ॥३॥
3543
मी तों बहु सुखी आनंदभरिता । आहें साधुसंतां मेळीं सदा ॥१॥ देवा कांहीं व्हावें ऐसें नाहीं माझ्या जीवा । आणीक केशवा तुजविण ॥ध्रु.॥ न लगे वैकुंठ मोक्ष सायुज्यता । सुख वाटे घेतां जन्म ऐसें ॥२॥ मृत्युलोकीं कोण धरिलें वासना । पावावया जनासवें दुःख ॥३॥ तुका म्हणे तुझा दास ऐसें लोकां । कांहीं सकळिकां कळों यावें ॥४॥
3544
मी तों सर्वभावें अनधिकारी । होइल कैसी परी नेणों देवा ॥१॥ पुराणींचे अर्थ आणितां मनास । होय कासावीस जीव माझा ॥ध्रु.॥ इंद्रियांचीं आम्ही पांगिलों अंकितें । त्यांचे रंगीं चत्ति रंगलेंसे ॥२॥ एकाचें ही मज न घडे दमन । अवघीं नेमून कैसीं राखों ॥३॥ तुका म्हणे मज तारीं पंढरीराया । नाहीं तरी वांयां गेलों दास ॥४॥
3545
मी त्यांसी अनन्य तीं कोणा असती । ऐसें तंव चित्तीं विचारावें ॥१॥ आहे तो विचार आपणयापाशीं । कळा बिंबाऐसी प्रतिबिंबीं ॥ध्रु.॥ शुभ शकून तो शुभ लाभें फळे । पुढील तें कळे अनुभवें ॥२॥ तुका म्हणे माझा असेल आठव । तैसा माझा भाव तुझ्या पायीं ॥३॥
3546
मी दास तयांचा जयां चाड नाहीं । सुखदुःख दोहीं विरहित ॥१॥ राहिलासे उभा भीवरेच्या तीरीं । कट दोहीं करीं धरोनियां ॥ध्रु.॥ नवल काय तरी पाचारितां पावे । न स्मरत धांवे भक्तकाजा ॥२॥ सर्व भार माझा त्यासी आहे चिंता । तो चि माझा दाता स्वहिताचा ॥३॥ तुका म्हणे त्यासी गाईंन मी गीतीं । आणीक तें चित्तीं न धरीं कांहीं ॥४॥
3547
मी दास तयाचा जया चाड नाहीं । सुख दुःख दोहीविरहित जो ॥१॥ राहिलासे उभा भीमरेच्या तीरीं । कट दोहीं करीं धरोनियां ॥ध्रु.॥ नवल काईं तरी पाचारितां पावे । न श्मरित धांवे भक्तिकाजें ॥२॥ सर्व भार माझा त्यासी आहें चिंता । तों चि माझा दाता स्वहिताचा ॥३॥ तुका म्हणे त्यास गाईंन मी गीतीं । आणीक तें चित्तीं न धरीं कांहीं ॥४॥
3548
मी माझें करित होतों जतन । भीतरिल्या चोरें घेतलें खानें ॥१॥ मज आल्याविण आधीं च होता । मज न कळतां मज माजी ॥ध्रु.॥ घोंगडें नेलें घोंगडें नेलें । उघडें केलें उघडें चि ॥२॥ तुका म्हणे चोरटा चि जाला साव । सहज चि न्याय नाहीं तेथें ॥३॥
3549
मी याचक तूं दाता । काय सत्य पाहों आतां ॥१॥ म्या तों पसरिला हात । करीं आपुलें उचित ॥ध्रु.॥ आम्ही घ्यावें नाम । तुम्हां समाधान काम ॥२॥ तुका म्हणे देवराजा । वाद खंडीं तुझा माझा ॥३॥
3550
मीं हें ऐसें काय जाती । अवघड किती पाहातां ॥१॥ नाहीं होत उल्लंघन । नसतां भिन्न दुसरें ॥ध्रु.॥ अंधारानें तेज नेलें । दृष्टीखालें अंतर ॥२॥ तुका म्हणे सवें देव । घेतां ठाव दावील ॥३॥
3551
मीचि मज व्यालों । पोटा आपुलिया आलों ॥१॥ आतां पुरले नवस । निरसोनी गेली आस ॥ध्रु.॥ जालों बरा बळी । गेलों मरोनि तेकाळीं ॥२॥ दोहींकडे पाहे । तुका आहे तैसा आहे ॥३॥
3552
मुंगी आणि राव । आम्हां सारखाची जीव ॥१॥ गेला मोह आणि आशा । कळिकाळाचा हा फांसा ॥ध्रु.॥ सोनें आणि माती । आम्हां समान हें चित्ती ॥२॥ तुका म्हणे आलें । घरा वैकुंठ सगळें ॥३॥
3553
मुंगी होउनि साकर खावी । निजवस्तूची भेटी घ्यावी॥१॥ वाळवंटी साकर पडे । गज येउनि काय रडे ॥ध्रु.॥ जाला हरिदास गोसांवी । अवघी मायिक क्रिया दावी ॥२॥ पाठ पाठांतरिक विद्या । जनरंजवणी संध्या ॥३॥ प्रेम नसतां अंगा आणी । दृढ भाव नाहीं मनीं ॥४॥ ब्रम्हज्ञान वाचे बोले । करणी पाहातां न निवती डोळे ॥५॥ मिथ्या भगल वाढविती । आपुली आपण पूजा घेती ॥६॥ तुका म्हणे धाकुटें व्हावें । निजवस्तूसी मागुनि घ्यावें ॥७॥
3554
मुंगीचिया घरा कोण जाय मूळ । देखोनियां गूळ धांव घाली ॥१॥ याचकाविण काय खोळंबला दाता । तोचि धांवे हिता आपुलिया ॥ध्रु.॥ उदक अन्न काये म्हणे मज खा ये । भुकेला तो जाये चोजवीत ॥२॥ व्याधी पिडिला धांवे वैद्याचिया घरा । दुःखाच्या परिहारा आपुलिया ॥३॥ तुका म्हणे जया आपुलें स्वहित । करणें तो चि प्रीत धरी कथे ॥४॥
3555
मुकें होतां तुझ्या पदरीचें जातें । मूर्ख तें भोगितें मीमीपण ॥१॥ आपुलिये घरीं मैंद होऊनी बसे । कवण कवणासी बोलों नका ॥२॥ तुका म्हणे तुम्हां सांगतों मी खुण । देवासी तें ध्यान लावुनि बसा ॥३॥
3556
मुक्त कासया म्हणावें । बंधन तें नाहीं ठावें ॥१॥ सुखें करितों कीर्तन । भय विसरलें मन ॥ध्रु.॥ देखिजेना नास । घालूं कोणावरी कास ॥२॥ तुका म्हणे साहे । देव आहे तैसा आहे ॥३॥
3557
मुक्त तो आशंका नाहीं जया अंगीं । बद्ध मोहोसंगीं लज्जा चिंता ॥१॥ सुख पावे शांती धरूनि एकांत । दुःखी तो लोकांत दंभ करी ॥२॥ तुका म्हणे लागे थोडा च विचार । परी हे प्रकार नागविती ॥३॥
3558
मुक्त होता परी बळें जाला बद्ध । घेउनियां छंद माझें माझें ॥१॥ पाप पुण्य अंगीं घेतलें जडून । वर्म नेणे कोण करिता तो ॥२॥ तुका म्हणे वांयां गेलें वांयां विण । जैसा मृगशीण मृगजळीं ॥३॥
3559
मुक्तिपांग नाहीं विष्णुचिया दासां । संसार तो कैसा न देखती ॥१॥ बैसला गोविंद जडोनियां चित्ती । आदि ते चि अंतीं अवसान ॥ध्रु.॥ भोग नारायणा देऊनि निराळीं । ओविया मंगळीं तो चि गाती ॥२॥ बळ बुद्धी त्यांची उपकारासाटीं । अमृत तें पोटी सांटवलें ॥३॥ दयावेंत तरी देवा च सारिखीं । आपुलीं पारखीं नोळखती ॥४॥ तुका म्हणे त्यांचा जीव तो चि देव । वैकुंठ तो ठाव वसती तो ॥५॥
3560
मुख डोळां पाहे । तैशी च ते उभी राहे ॥१॥ केल्याविण नव्हे हातीं । धरोनि आरती परती ॥ध्रु.॥ न धरिती मनीं । कांहीं संकोच दाटणी ॥२॥ तुका म्हणें देवें । ओस केल्या देहभावें ॥३॥
3561
मुखाकडे वास । पाहें करूनियां आस ॥१॥ आतां होईंल ते शिरीं । मनोगत आज्ञा धरीं ॥ध्रु.॥ तुम्हीं अंगीकार । केला पाहिजे हें सार ॥२॥ तुका म्हणे दारीं । उभें याचक मीं हरी ॥३॥
3562
मुखीं नाम हातीं मोक्ष । ऐसी साक्ष बहुतांसी ॥१॥ वैष्णवांचा माल खरा । तुरतुरा वस्तूसी ॥ध्रु.॥ भस्म दंड न लगे काठी । तीर्थां आटी भ्रमण ॥२॥ तुका म्हणे आडकाठी । नाहीं भेटी देवाचे ॥३॥
3563
मुखीं विठ्ठलाचें नाम । मग कैचा भवभ्रम ॥१॥ चालतां बोलतां खातां । जेवितां निद्रा करितां ॥ध्रु.॥ सुखें असों संसारीं । मग जवळी च हरि ॥२॥ मुक्तिवरील भक्ती जाण । अखंड मुखीं नारायण ॥३॥ मग देवभक्त जाला । तुका तुकीं उतरला ॥४॥
3564
मुखें बोलावें तें जीविंचें जाणसी । विदित पायांपाशीं सर्व आहे ॥१॥ आतां हें चि भलें भाकावी करुणा । विनियोग तो जाणां तुम्ही त्याचा ॥ध्रु.॥ आपलें तों येथें केलें नव्हे कांहीं । साधनाचा वांहीं पडों नये ॥२॥ तुका म्हणे देह दिला पिंडदान । वेळोवेळां कोण चिंता करी ॥३॥
3565
मुखें बोले ब्रम्हज्ञान । मनीं धनअभिमान ॥१॥ ऐशियाची करी सेवा । काय सुख होय जीवा ॥ध्रु.॥. पोटासाठीं संत । झाले कलींत बहुत ॥२॥ विरळा ऐसा कोणी । तुका त्यासि लोटांगणी ॥३॥
3566
मुखें संति इंद्रियें जती । आणिक नेणे भाव भक्ती॥१॥ देवा हे चि दोन्ही पदें । येर गाइलीं विनोदें ॥२॥ चित्ताचें आसन । तुका करितो कीर्त्तन ॥३॥
3567
मुखें सांगे त्यांसि पैल चेंडू पाहा । उदकांत डोहाचिये माथां ॥१॥ माथां कळंबाचे अवघडा ठायीं । दावियेला डोहीं जळामाजी ॥२॥ जळांत पाहातां हाडति या दृष्टि । म्हणे जगजेठी ऐसें नव्हे ॥३॥ नव्हे साच चेंडू छाया दिसे आंत । खरा तेथें चत्ति लावा वरी ॥४॥ वरी देखियेला अवघ्यांनीं डोळां । म्हणती गोपाळा आतां कैसें ॥५॥ कैसें करूनियां उतरावा खालीं । देखोनियां भ्यालीं अवघीं डोहो ॥६॥ डोहो बहु खोल काळया भीतरी । सरलीं माघारीं अवघीं जणें ॥७॥ जयाचें कारण तयासी च ठावें । पुसे त्याच्या भावें त्यास हरि ॥८॥ त्यासि नारायण म्हणे राहा तळीं । चढे वनमाळी झाडावरी ॥९॥ वरि जातां वरि पाहाती गोपाळ । म्हणति सकळ आम्ही नेणों ॥१०॥ नेणों म्हणती हें करितोसि काईं । आम्हां तुझी आईं देइल सिव्या ॥११॥ आपुलिया कानां देउनियां हात । सकळीं निमित्य टाळियेलें ॥१२॥ निमित्याकारणें रचिलें कारण । गेला नारायण खांदीवरी ॥१३॥ खांदीवरी पाव ठेवियेला देवें । पाडावा त्या भावें चेंडू तळीं ॥१४॥ तळील नेणती तुका म्हणे भाव । अंतरींचा देव जाणों नेदी ॥१५॥
3568
मुखें सांगे ब्रम्हज्ञान । जन लोकाची कापितो मान ॥१॥ ज्ञान सांगतो जनासी । नाहीं अनुभव आपणासी ॥ध्रु.॥ कथा करितो देवाची । अंतरीं आशा बहु लोभाची ॥२॥ तुका म्हणे तो चि वेडा । त्याचें हाणूनि थोबाड फोडा ॥३॥
3569
मुख्य आधीं विषयत्याग । विधिभाग पाळणें ॥१॥ मन पावे समाधान । हें चि दान देवाचें ॥ध्रु.॥ उदासीन वृत्ति देहीं । चाड नाहीं पाळणें ॥२॥ तुका म्हणे नाहीं भय । सम सोय विषमाची ॥३॥
3570
मुख्य आहे आम्हां मातेचा पटंगा । तुज पांडुरंगा कोण लेखी ॥१॥ नको लावूं आम्हां सवें तूं तोंवरी । पाहा दूरवरी विचारूनी ॥ध्रु.॥ साहे संतजन केले महाराज । न घडे आतां तुज भेईंन मी ॥२॥ तुकयाबंधु म्हणे अहिक्यें ऐक्यता । वाढतें अनंता दुःखें दुःख ॥३॥
3571
मुदल जतन जालें । मग लाभाचें काय आलें ॥१॥ घरीं देउनि अंतर गांठी । राख्या पारिख्यां न सुटे मिठी ॥ध्रु.॥ घाला पडे थोडें च वाटे । काम मैंदाचें च पेटे ॥२॥ तुका म्हणे वरदळ खोटें । फांसे अंतरिंच्या कपटें ॥३॥
3572
मुदलामध्यें पडे तोटा । ऐसा खोटा उदीम ॥१॥ आणिकांची कां लाज नाहीं । आळसा जिहीं तजिलें ॥ध्रु.॥ एके सांते सरिखीं वित्ते । हानि हित वेगळालीं ॥२॥ तुका म्हणे हित धरा । नव्हे पुरा गांवढाळ ॥३॥
3573
मुनि मुक्त जाले भेणें गर्भवासा । आम्हां विष्णुदासां सुलभ तो ॥१॥ अवघा चि संसार केला ब्रम्हरूप । विठ्ठलस्वरूप म्हणोनियां ॥ध्रु.॥ पुराणीं उपदेश साधन उध्दट । आम्हां सोपी वाट वैकुंठींची ॥२॥ तुका म्हणे जनां सकळांसहित । घेऊं अखंडित प्रेमसुख ॥२॥
3574
मुरुकुश दोन्ही मारिले आसुर । दुर्वास ॠषीश्वर सुखी केला ॥१॥ मारियेला मुरु म्हणोनी मुरारी । नाम तुझें हरी पडियेलें ॥ध्रु.॥ पूवाअहुनी ऐसा भक्तिप्रतिपाळ । केला त्वां सांभाळ नारायणा ॥२॥ तुका म्हणे ये चि वेळे काय जालें । कां सोंग धरिलें मोहनाचें ॥३॥
3575
मुळाचिया मुळें । दुःखें वाढती सकळे ॥१॥ ऐसा योगियांचा धर्म । नव्हे वाढवावा श्रम ॥ध्रु.॥ न कळे आवडी । कोण आहे कैसी घडी ॥२॥ तुका म्हणे थीत । दुःख पाववावें चित्त ॥३॥
3576
मुळीं नेणपण । जाला तरी अभिमान ॥१॥ वांयां जावें हें चि खरें । केलें तेणें चि प्रकारें ॥ध्रु.॥ अराणूक नाहीं कधीं । जाली तरि भेदबुद्धि ॥२॥ अंतरली नाव । तुका म्हणे नाहीं ठाव ॥३॥
3577
मुळींचा तुम्हां लागला चाळा । तो गोपाळा न संडा ॥१॥ घ्यावें त्याचें देणें चि नाहीं । ये चि वाहिं देखतसों ॥ध्रु.॥ माझी तरी घोंगडी मोठी । गांडीची लंगोटी सोडिस ना ॥२॥ तुका म्हणे म्यां सांडिली आशा । हुंगिला फांसा येथुनियां ॥३॥
3578
मुसळाचें धनु नव्हे हो सर्वथा । पाषाण पिळितां रस कैंचा ॥१॥ वांझे बाळा जैसें दुध नाहीं स्तनीं । गारा त्या अधणीं न सिजती ॥ध्रु.॥ नवखंड पृथ्वी पिके मृगजळें । डोंगर भेटे बळें असमानासी ॥२॥ नैश्वर ब्रम्ह तेव्हां होय ब्रम्ह । तुका म्हणे श्रम करुनी काय ॥३॥
3579
मुसावलें अंग । रंगीं मेळविला रंग ॥१॥ एकीं एक दृढ जालें । मुळा आपुलिया आलें ॥ध्रु.॥ सागरीं थेंबुडा । पडिल्या निवडे कोण्या वाटा ॥२॥ तुका म्हणे नवें । नव्हे जाणावें हें देवें ॥३॥
3580
मूर्तिमंत देव नांदतो पंढरी । येर ते दिगांतरीं प्रतिमारूप ॥१॥ जाउनियां वना करावें कीर्तन । मानुनी पाषाण विठ्ठलरूप ॥२॥ तुका मुख्य पाहिजे भाव । भावापासीं देव शीघ्र उभा ॥३॥
3581
मूळ करणें संतां । नाहीं मिळत उचिता ॥१॥ घडे कासयानें सेवा । सांग ब्रम्हांडाच्या जीवा ॥ध्रु.॥ सागर सागरीं । सामावेसी कैंची थोरी ॥२॥ तुका म्हणे भावें । शरण म्हणवितां बरवें ॥३॥
3582
मूळस्थळ ज्याचें गोमतीचे तीरीं । तो हा सारी दोरी खेळवितो ॥१॥ ऐसें हे कळलें असावें सकळां । चोर त्या वेगळा नाहीं दुजा ॥ध्रु.॥ वैष्णव हे रे तयाचे पाळती । खूण हे निरुती सांगितली ॥२॥ तुकयाबंधु म्हणे आलें अनुभवास । तेणें च आम्हांस नागविलें ॥३॥
3583
मृगजळ दिसे साचपणा ऐसें । खोटियाचें पिसें ऊर फोडी ॥१॥ जाणोन कां करा आपुलाले घात । विचारा रे हित लवलाहीं ॥ध्रु.॥ संचित सांगातीं बोळवणें सवें । आचरलें द्यावें फळ तेणें ॥२॥ तुका म्हणे शेखी श्मशान तोंवरी । संबंध गोवरी अंगीं सवें ॥३॥
3584
मृगजळा काय करावा उतार । पावावया पार पैल थडी ॥१॥ खापराचे होन खेळती लेंकुरें । कोण त्या वेव्हारें लाभ हाणि ॥ध्रु.॥ मंगळदायक करिती कुमारी । काय त्यांची खरी सोयरीक ॥२॥ स्वप्नींचें जें सुखदुःख जालें काहीं । जागृतीं तो नाहीं साच भाव ॥३॥ सारीं जालीं मेलीं लटिकें वचन । बद्ध मुक्त शीण तुका म्हणे ॥४॥
3585
मृगाचिये अंगीं कस्तुरीचा वास । असे ज्याचा त्यास नसे ठाव ॥१॥ भाग्यवंत घेती वेचूनियां मोलें । भारवाही मेले वाहतां ओझें ॥ध्रु.॥ चंद्रामृतें तृप्तिपारणें चकोरा । भ्रमरासी चारा सुगंधाचा ॥२॥ अधिकारी येथें घेती हातवटी । परीक्षावंता दृष्टी रत्न जैसें ॥३॥ तुका म्हणे काय अंधळिया हातीं । दिले जैसें मोतीं वांयां जाय ॥४॥
3586
मृत्युलोकीं आम्हां आवडती परी । नाहीं एका हरिनामें विण ॥१॥ विटलें हें चित्त प्रपंचापासूनि । वमन हें मनीं बैसलेंसे ॥ध्रु.॥ सोनें रूपें आम्हां मृत्तिके समान । माणिकें पाषाण खडे तैसे ॥२॥ तुका म्हणे तैशा दिसतील नारी । रिसाचियापरी आम्हांपुढें ॥३॥
3587
मेघवृष्टीनें करावा उपदेश परि गुरुनें न करावा शिष्य । वांटा लाभे त्यास केल्या अर्धकर्माचा ॥१॥ द्रव्य वेचावें अन्नसत्रीं भूतीं द्यावें सर्वत्र । नेदावा हा पुत्र उत्तमयाती पोसना ॥ध्रु.॥ बीज न पेरावें खडकीं ओल नाहीं ज्याचे बुडखीं । थीतां ठके सेखीं पाठी लागे दिवाण ॥२॥ गुज बोलावें संतांशीं पत्नी राखावी जैसी दासी । लाड देतां तियेसी वांटा पावे कर्माचा ॥३॥ शुद्ध कसूनिपाहावें वरि रंगा न भुलावें । तुका म्हणे घ्यावें जया नये तुटी तें ॥४॥
3588
मेरे रामको नाम जो लेवे बारोंबार । त्याके पाऊं मेरे तनकी पैजार ॥ध्रु.॥ हांसत खेलत चालत बाट । खाणा खाते सोते खाट ॥१॥ जातनसुं मुजे कछु नहिं प्यार । असते की नही हेंदु धेड चंभार ॥२॥ ज्याका चित लगा मेरे रामको नाव । कहे तुका मेरा चित लगा त्याके पाव ॥३॥
3589
मेला तरी जावो सुखें नरकासी । कळंकी याविशीं शिवों नये ॥१॥ रजस्वला करी वेलासी आघात । अंतरें तों हित दुरी बरें ॥ध्रु.॥ उगी च कां आलीं नासवावीं फळें । विटाळ विटाळें कालवूनि ॥२॥ तुका म्हणे लोणी घालोनि शेणांत । उपेगाची मात काय असे ॥३॥
3590
मेलियांच्या रांडा इच्छिती लेकरूं । लाज नाहीं धरूं प्रीती कैशी ॥१॥ मागिलां पुढिलां एकी सरोबरी । काळाची पेटारी खांदा वाहे ॥ध्रु.॥ आन दिसे परी मरणें चि खरें । सांपळा उंदिरें सामाविलीं ॥२॥ तुका म्हणे जाली मनाची परती । निवळली ज्योती दिसों आली ॥३॥
3591
मेल्यावरि मोक्ष संसारसंबंधें । आरालिया बधे ठेवा आम्हां ॥१॥ वागवीत संदेह राहों कोठवरी । मग काय थोरी सेवकाची ॥ध्रु.॥ गाणें गीत आम्हां नाचणें आनंदें । प्रेम कोठें भेदें अंगा येतें ॥२॥ तुका म्हणे किती सांगावे दृष्टांत । नसतां तूं अनंत सानकुळ ॥३॥
3592
मेळउनि सकळ गोपाळ । कांहीं करिती विचार ॥१॥ चला जाऊं चोरूं लोणी । आजि घेऊं चंद्रधणी । वेळ लावियेला अझुणी । एकाकरितां गडे हो ॥ध्रु.॥ वाट काढिली गोविंदीं । मागें गोपाळांची मांदी ॥२॥ अवघा चि वावरे । कळों नेदी कोणा फिरे ॥३॥ घर पाहोनि एकांताचें । नवविधा नवनीताचें ॥४॥ रिघे आपण भीतरी । पुरवी माथुलियाच्या हरी ॥५॥ बोलों नेदी म्हणे स्थिर । खुणा दावी खा रे क्षीर ॥६॥
3593
मैं भुली घरजानी बाट । गोरस बेचन आयें हाट ॥१॥ कान्हा रे मनमोहन लाल । सब ही बिसरूं देखें गोपाल ॥ध्रु.॥ काहां पग डारूं देख आनेरा । देखें तों सब वोहिन घेरा ॥२॥ हुं तों थकित भैर तुका । भागा रे सब मनका धोका ॥३॥
3594
मैंद आला पंढरीस । हातीं घेउनि प्रेमपाश ॥१॥ पुढें नाडियलें जग । नेतो लागों नेदी माग ॥ध्रु.॥ उभारोनि बाहे । दृष्टादृष्टी वेधीताहे ॥२॥ वैकंठीहुनि पेणें । केलें पंढरीकारणें ॥३॥ पुंडलिकें यारा । देउनि आणिलें चोरा ॥४॥ तुका म्हणे चला । तुम्ही आम्ही धरूं त्याला ॥५॥
3595
मैत्र केले महा बळी । कामा न येती अंतकाळीं ॥१॥ आधीं घे रे रामनाम । सामा भरीं हा उत्तम ॥ध्रु.॥ नाहीं तरी यम । दांत खातो करकरा ॥२॥ धन मेळविलें कोडी । काळ घेतल्या न सोडी ॥३॥ कामा न ये हा परिवार । सैन्य लोक बहु फार ॥४॥ तंववरि मिरविसी बळ । जंव आला नाहीं काळ ॥५॥ तुका म्हणे बापा । चुकवीं चौर्‍याशींच्या खेपा ॥६॥
3596
मोकळी गुंते रिती कुंथे नाहीं भार दावें । धेडवाडा बैसली खोडा घेतली आपुल्या भावें ॥१॥ ऐका बाई लाज नाहीं आणिकां त्या गरतीची । समाधानीं उंच स्थानीं जाणे सेवा पतीची ॥ध्रु.॥ न बोलतां करी चिंता न मारिता पळे । दादला सेज नावडे निजे जगझोडीचे चाळे ॥२॥ देखत आंध बहिर कानीं बोल बोलतां मुकें । तुका म्हणे पतन सोयरीं ऐसीं जालीं एकें ॥३॥
3597
मोकळें मन रसाळ वाणी । या चि गुणीं संपन्न ॥१॥ लIमी ते ऐशा नावें । भाग्यें ज्यावें तरि त्यांनीं ॥ध्रु.॥ नमन नम्रता अंगीं । नेघे रंगीं पालट ॥२॥ तुका म्हणे त्याच्या नांवें । घेतां व्हावें संतोषी ॥३॥
3598
मोक्ष तुमचा देवा । तुम्ही दुर्लभ तो ठेवा ॥१॥ मज भक्तीची आवडी । नाहीं अंतरीं ते गोडी ॥ध्रु.॥ आपल्या प्रकारा । करा जतन दातारा ॥२॥ तुका म्हणे भेटी । पुरे एक चि शेवटीं ॥३॥
3599
मोक्ष देवापाशीं नाहीं । लटिक्या घाई वळिवतें ॥१॥ काय खरें न धरी शुद्धी । गेली बुद्धी भ्रमलें ॥ध्रु.॥ अहंकारास उरलें काईं । पांचांठायीं हें वांटे ॥२॥ तुका म्हणे कुंथे भारें । लटिकें खरें मानुनियां ॥३॥
3600
मोक्षपदें तुच्छ केलीं याकारणें । आम्हां जन्म घेणें युगायुगीं ॥१॥ विटे ऐसें सुख नव्हे भक्तिरस । पुडतीपुडती आस सेवावें हें ॥ध्रु.॥ देवा हातीं रूप धरविला आकार । नेदूं निराकार होऊं त्यासी ॥२॥ तुका म्हणे चत्ति निवांत राहिलें । ध्याई तीं पाउलें विटेवरि ॥३॥
3601
मोक्षाचें आम्हांसी नाहीं अवघड । तो असे उघाड गांठोळीस ॥१॥ भक्तीचे सोहळे होतील जीवासी । नवल तेविशीं पुरवितां ॥ध्रु.॥ ज्याचें त्यासी देणें कोण तें उचित । मानूनियां हित घेतों सुख ॥२॥ तुका म्हणे सुखें देई संवसार । आवडीसी थार करीं माझे ॥३॥ ॥१२॥
3602
मोटळें हाटीं सोडिल्या गांठी । विकर्‍या घातलें केण । ज्याचे भाग त्यासी देऊनि वारिलें । सारूनि लिगाड दान । खरें माप हातीं घेऊनि बैसलों । मानिती ते चौघे जन । खरें वत्ति तेथें आले चोजवीत । गिर्‍हाइक संतजन ॥१॥ झाडिला पालव केला हाट वेच । जाली सकाळीं च अराणूक । याल तरि तुम्ही करा लगबग । आमचे ते कोणी लोक ॥ध्रु.॥ एक ते उत्तम मध्यम कनिष्ठ । वित्ताचे प्रकार तीन । बहुतां जनाचे बहुत प्रकार । वेगळाले वाण । लाभ हाणि कोणा मुदल जालें । कोणासी पडिलें खाण । अर्धमर्ध कोणी गुंतोनि राहिले । थोडे तैसे बहु जन ॥२॥ एके सांते आले एक गांवीहून । येकामे चि नव्हे जाणें । येतां जातां रुजू नाहीं दिवाणा । काळतोंडीं एकें तेणें । लाग भाग एकी एकानीं गोविलें । मागील पुढिलां ॠणें । तुका म्हणे आतां पाहूं नये वास । साधावें आपुलें पेणें ॥३॥
3603
मोल घेऊनियां कथा जरी करीं । तरी भंगो हरी देह माझा ॥१॥ माझी कथा करा ऐसें म्हणें कोणा । तरी झडो जाणा जिव्हा माझी ॥ध्रु.॥ साहए तूं जालासी काय उणें तुपें । आणीक भूतांपें काय मागों ॥२॥ तुका म्हणे सर्व सिद्धी तुझे पायीं । तूं माझा गोसावी पांडुरंगा ॥३॥
3604
मोल देऊनियां सांटवावे दोष । नटाचे ते वेश पाहोनियां ॥१॥ हरिदासां मुखें हरिकथाकीर्तन । तेथें पुण्यें पुण्य विशेषता ॥ध्रु.॥ हरितील वस्त्रें गोपिकांच्या वेशें । पाप त्यासरिसें मात्रागमन ॥२॥ तुका म्हणे पाहा ऐसें जालें जन । सेवाक्तिहीन रसीं गोडी ॥३॥
3605
मोल वेचूनियां धुंडिती सेवका । आम्ही तरी फुका मागों बळें ॥१॥ नसतां जवळी हित फार करूं । जीव भाव धरूं तुझ्या पायीं ॥ध्रु.॥ नेदूं भोग आम्ही आपुल्या शरीरा । तुम्हांसी दातारा व्हावें म्हूण ॥२॥ कीर्ती तुझी करूं आमुचे सायास । तूं का रे उदास पांडुरंगा ॥३॥ तुका म्हणे तुज काय मागों आम्ही । फुकाचे कां ना भी म्हणसी ना ॥४॥
3606
मोलाचें आयुष्य वेचतसे सेवे । नुगवतां गोवे खेद होतो ॥१॥ उगवूं आलेति तुम्हीं नारायणा । परिहार या सिणा निमिस्यांत ॥ध्रु.॥ लिगाडाचे मासी न्यायें जाली परी । उरली ते उरी नाहीं कांहीं ॥२॥ तुका म्हणे लाहो साधीं वाचाबळें । ओढियेलों काळें धांव घाला ॥३॥
3607
मोलाचें आयुष्य वेचुनियां जाय । पूर्वपुण्यें होय लाभ याचा ॥१॥ अनंतजन्मींचे शेवट पाहतां । नर देह हातां आला तुझ्या ॥ध्रु.॥ कराल ते जोडी येईंल कार्यासी । ध्यावें विठ्ठलासी सुखालागीं ॥२॥ सांचलिया धन होईंल ठेवणें । तैसा नारायण जोडी करा ॥३॥ करा हरिभक्ती परलोकीं ये कामा । सोडवील यमापासोनियां ॥४॥ तुका म्हणे करा आयुष्याचें मोल । नका वेचूं बोल नामेंविण ॥५॥
3608
मोलें घातलें रडाया । नाहीं असुं आणि माया ॥१॥ तैसा भिक्तवाद काय । रंगबेगडीचा न्याय ॥ध्रु.॥ वेठी धरिल्या दावी भाव । मागें पळायाचा पाव ॥२॥ काजव्याच्या ज्योती । तुका म्हणे न लगे वाती ॥३॥
3609
मोहरोनी चित्ती । आणूं हळूं चि वरि हिता ॥१॥ तों हे पडती आघात । खोडी काढिती पंडित ॥ध्रु.॥ संवसारा भेणें । कांहीं उसंती तों पेणें ॥२॥ एखादिया भावें । तुका म्हणे जवळी यावें ॥३॥
3610
मोहोर्‍याच्या संगें । सुत नव्हे आगीजोगें ॥१॥ नाहीं तरी त्याचें भक्ष । काय सांगणें ते साक्ष ॥ध्रु.॥ स्वामीचिया अंगें । रूप नव्हे कोणाजोगें ॥२॥ तुका म्हणे खोडी । देवमणी न देती दडी ॥३॥
3611
मौन कां धरिलें विश्वाच्या जीवना । उत्तर वचना देई माझ्या ॥१॥ तूं माझें संचित तूं चि पूर्वपुण्य । तूं माझें प्राचीन पांडुरंगा ॥ध्रु.॥ तूं माझें सत्कर्म तूं माझा स्वधर्म । तूं चि नित्यनेम नारायणा ॥२॥ कृपावचनाची वाट पाहातसें । करुणा वोरसें बोल कांहीं ॥३॥ तुका म्हणे प्रेमळाच्या प्रियोत्तमा । बोल सर्वोत्तमा मजसवें ॥४॥
3612
म्हणउनि काय जीऊं भक्तपण । जायाचीं भूषणें अळंकार ॥१॥ आपुल्या कष्टाची करूनियां जोडी । मिरवीन उघडी इच्छावसें ॥ध्रु.॥ तुके तरि तुकीं खर्‍याचे उत्तम । मुलाम्याच्या भ्रम कोठवरि ॥२॥ तुका म्हणे पुढें आणि मागें फांस । पावें ऐसा नास न करीं देवा ॥३॥
3613
म्हणउनि जाली तुटी । नाहीं भेटी अहंकारें ॥१॥ दाखविलें देवें वर्म । अवघा भ्रम नासला ॥ध्रु.॥ हातें मुरगाळितां कान । नाहीं भिन्न वेदना ॥२॥ तुका म्हणे एकांतसुखें । अवघें गोतें गुंतलें ॥३॥
3614
म्हणउनि शरण जावें । सर्वभावें देवासी ॥१॥ तो हा उतरील पार । भवदुस्तरनदीचा ॥ध्रु.॥ बहु आहे करुणावंत । अनंत हें नाम ज्या ॥२॥ तुका म्हणे साक्षी आलें । तरी केलें प्रगट ॥३॥
3615
म्हणउनी खेळ मांडियेला ऐसा । नाहीं कोणी दिशा वर्जीयेली ॥१॥ माझिया गोतें हें वसलें सकळ । न देखिजे मूळ विटाळाचें ॥ध्रु.॥ करूनि ओळखी दिली एकसरें । न देखों दुसरें विषमासी ॥२॥ तुका म्हणे नाहीं काळापाशीं गोवा । स्थिति मति देवा वांचूनियां ॥३॥
3616
म्हणउनी दास नव्हे ऐसा जालों । अनुभवें बोलों स्वामीपुढें ॥१॥ कां नाहीं वचन प्रतिउत्तराचें । मी च माझ्या वेचें अट्टाहासें ॥ध्रु.॥ कासयाने गोडी उपजावा विश्वास । प्रीती कांहीं रस वाचुनियां ॥२॥ तुका म्हणे अगा चतुरा शिरोमणी । विचारावें मनीं केशीराजा ॥३॥
3617
म्हणऊनि काकुळती । येतों पुढतों पुढती । तुम्हां असे हातीं । कमळापती भांडार ॥१॥ फेडूं आलेती दरद्रि । तरी न लगे उशीर । पुरे अभयंकर । ठाया ठाव रंकाशी ॥ध्रु.॥ कोठें न घली धांव । याजसाठीं तजिली हांव । घेऊं नेदी वाव । मना केला विरोध ॥२॥ कारणांच्या गुणें । वेळ काळ तोही नेणें । तुमच्या कीर्तनें । तुका तुम्हां जागवी ॥३॥
3618
म्हणऊनि जालों क्षेत्रींचे संन्यासी । चत्ति आशापाशीं आवरूनि ॥१॥ कदापि ही नव्हे सीमा उल्लंघन । केलें विसर्जन आव्हानीं च ॥ध्रु.॥ पारिखा तो आतां जाला दुजा ठाव । दृढ केला भाव एकविध ॥२॥ तुका म्हणे कार्यकारणाचा हेवा । नाहीं जीव देवा समर्पिला ॥३॥
3619
म्हणऊनि धरिले पाय । अवो माय विठ्ठले ॥१॥ आपुलें चि करूनि घ्यावें । आश्वासावें आम्हास ॥ध्रु.॥ वाढली ते तळमळ चिंता । शम आतां करावी ॥२॥ तुका म्हणे जीवीं वसे । मज नसे वेगळी ॥३॥
3620
म्हणऊनी लवलाहें । पाय आहें चिंतीत ॥१॥ पाठिलागा येतो काळ । तूं कृपाळू माउली ॥ध्रु.॥ बहु उसंतीत आलों । तया भ्यालों स्थळासी ॥२॥ तुका म्हणे तूं जननी । ये निर्वाणीं विठ्ठलें॥३॥
3621
म्हणतां हरिदास कां रे नाहीं लाज । दीनास महाराज म्हणसी हीना ॥१॥ काय ऐसें पोट न भरे तें गेलें । हालविसी कुले सभेमाजी ॥२॥ तुका म्हणे पोटें केली विटंबना । दीन जाला जना कींव भाकी ॥३॥
3622
म्हणती धालों धणीवरी । आतां न लगे शिदोरी । नये क्षणभरी । आतां यासि विसंबों ॥१॥ चाल चाल रे कान्होबा । खेळ मांडूं रानीं । बैसवूं गोठणीं । गाई जमा करूनि ॥ध्रु.॥ न लगे जावें घरा । चुकलिया येरझारा । सज्जन सोयरा । मायबाप तूं आम्हां ॥२॥ तुका म्हणे धालें पोट । आतां कशाचा बोभाट । पाहाणें ते वाट । मागें पुढें राहिली ॥३॥
3623
म्हणवितां हरी न म्हणे तयाला । दरवडा पडिला देहामाजी ॥१॥ आयुष्यधन त्याचें नेले यमदूतीं । भुलविला निश्चिंतीं कामरंगें ॥ध्रु.॥ नावडे ती कथा देउळासी जातां । प्रियधनसुता लक्ष तेथें ॥२॥ कोण नेतो तयां घटिका दिवसा एका । कां रे म्हणे तुका नागवसी ॥३॥
3624
म्हणविती ऐसे आइकतों संत । न देखीजे होत डोळां कोणीं ॥१॥ ऐसियांचा कोण मानितें विश्वास । निवडे तो रस घाईडाई ॥ध्रु.॥ पर्जन्याचे काळीं वाहाळाचे नद । ओसरतां बुंद न थारे चि ॥२॥ हिर्‍या ऐशा गारा दिसती दूरोन । तुका म्हणे घन न भेटे तों ॥३॥
3625
म्हणवितों दास । परि मी असें उदास ॥१॥ हा चि निश्चय माझा । परि मी निश्चयाहुनि दुजा ॥ध्रु.॥ सरतें कर्तुत्व माझ्यानें । परि मी त्याही हून भिन्न ॥२॥ तुका तुकासी तुकला । तुका तुकाहुनि निराळा ॥१॥
3626
म्हणवितों दास । मज एवढी च आस ॥१॥ परी ते अंगीं नाहीं वर्म । करीं आपुला तूं धर्म ॥ध्रु.॥ बडबडितों तोंडें । रितें भावेंविण धेंडें ॥२॥ तुका म्हणे बरा । दावूं जाणतों पसारा ॥३॥
3627
म्हणवितों दास ते नाहीं करणी । आंत वरी दोन्ही भिन्न भाव ॥१॥ गातों नाचतों तें दाखवितों जना । प्रेम नारायणा नाहीं अंगीं ॥ध्रु.॥ पाविजे तें वर्म न कळे चि कांहीं । बुडालों या डोहीं दंभाचिया ॥२॥ भांडवल काळें हातोहातीं नेलें । माप या लागलें आयुष्यासी ॥३॥ तुका म्हणे वांयां गेलों ऐसा दिसें । होईल या हांसें लौकिकाचें ॥४॥
3628
म्हणवितों दास न करितां सेवा । लंडपणें देवा पोट भरीं ॥१॥ खोटें कोठें सरे तुझे पायांपाशीं । अंतर जाणसी पांडुरंगा ॥ध्रु.॥ आचरण खोटें आपणासी ठावें । लटिकें बोलावें दुसरें तें ॥२॥ तुका म्हणे ऐसा आहें अपराधी । असो कृपानिधी तुम्हां ठावा ॥३॥
3629
म्हणसी दावीन अवस्था । तैसें नको रे अनंता ॥१॥ होऊनियां सहाकार । रूप दाखवीं सुंदर ॥ध्रु.॥ मृगजळाचिया परी । तैसें न करावें हरी ॥२॥ तुकयाबंधु म्हणे हरी । कामा नये बाह्यात्कारी ॥३॥
3630
म्हणसी नाहीं रे संचित । न करीं न करीं ऐसी मात ॥१॥ लाहो घेई हरिनामाचा । जन्म जाऊं नेदीं साचा ॥ध्रु.॥ गळां पडेल यमफांसी । मग कैंचा हरि म्हणसी ॥२॥ पुरलासाटीं देहाडा । ऐसें न म्हणें न म्हणें मूढा ॥३॥ नरदेह दुबळा । ऐसें न म्हणें रे चांडाळा ॥४॥ तुका म्हणे सांगों किती । सेको तोंडीं पडेल माती ॥५॥
3631
म्हणसी होऊनी निश्चिंता । हरूनियां अवघी चिंता । मग जाऊं एकांता भजन करूं । संसारसंभ्रमें आशा लागे पाठी । तेणें जीवा साटी होईंल तुझ्या ॥१॥ सेकीं नाडसील नाडसील । विषयसंगें अवघा नाडसील । मागुता पडसील भवडोहीं ॥ध्रु.॥ शरीर सकळ मायेचा बांधा । यासी नाहीं कधीं अराणूक । करिती तडातोडी । आंत बाह्यात्कारीं । ऐसे जाती चारी दिवस वेगीं ॥२॥ मोलाची घडी जाते वांयांविण । न मिळे मोल धन देतां कोडी । जागा होई करीं हिताचा उपाय । तुका म्हणे हाय करिसी मग ॥३॥
3632
म्हणे चेंडू कोणें आणिला या ठाया । आलों पुरवाया कोड त्याचें ॥१॥ त्याचें आइकोन निष्ठ‍ वचन । भयाभीत मन जालें तीचें ॥२॥ तिची चित्तवृत्ती होती देवावरी । आधीं ते माघारी फिरली वेगीं ॥३॥ वेगीं मन गेलें भ्रताराचे सोयी । विघ्न आलें कांहीं आम्हांवरीं ॥४॥ वरि उदकास अंत नाहीं पार । अक्षोभ सागर भरलासे ॥५॥ संचार करूनि कोण्या वाटे आला । ठायीं च देखिला अवचिता ॥६॥ अवचिता नेणों येथें उगवला । दिसे तो धाकुला बोल मोठे ॥७॥ मोठ्यानें बोलतो भय नाहीं मनीं । केला उठवूनी काळ जागा ॥८॥ जागविला काळसर्प तये वेळीं । उठिला कल्लोळीं विषाचिये ॥९॥ यमुनेच्या डोहावरी आला ऊत । कार्‍याकृतांतधूदकारें ॥१०॥ कारणें ज्या येथें आला नारायण । जालें दरुषण दोघांमधीं ॥११॥ दोघांमध्यें जाले बोल परस्परें । प्रसंग उत्तरें युद्धाचिया ॥१२॥ चिंतावला चित्ती तोंडे बोले काळ । करीन सकळ ग्रास तुझा ॥१३॥ जाला सावकाश झेंप घाली वरी । तंव म्हणे हरि मुष्टिघातें ॥१४॥ तेणें काळें त्यासि दिसे काळ तैसा । हरावया जैसा जीव जाला ॥१५॥ आठवले काळा हाकारिलें गोत । मिळालीं बहुतें नागकुळें ॥१६॥ कल्हारीं संधानीं धरियेला हरि । अवघा विखारीं व्यापियेला ॥१७॥ यांस तुका म्हणे नाहीं भक्तीविण । गरुडाचें चिंतन केलें मनीं ॥१८॥
3633
म्हणे विठ्ठल पाषाण । त्याच्या तोंडावरि वाहाण॥१॥ नको नको दर्शन त्याचें । गलितकुष्ट भरो वाचे ॥ध्रु.॥ शाळिग्रामासि म्हणे धोंडा । कोड पडो त्याच्या तोंडा ॥२॥ भावी सद्ग‍ु मनुष्य । त्याचें खंडो का आयुष्य ॥३॥ हरिभक्ताच्या करी चेष्टा । त्याचे तोंडीं पडो विष्ठा ॥४॥ तुका म्हणे किती ऐकों । कोठवरी मर्यादा राखों ॥५॥
3634
म्हणे विठ्ठल ब्रम्ह नव्हे । त्याचे बोल नाइकावे ॥१॥ मग तो हो का कोणी एक । आदि करोनि ब्रम्हादिक ॥ध्रु.॥ नाहीं विठ्ठल जया ठावा । तो ही डोळां न पाहावा ॥२॥ तुका म्हणे नाहीं । त्याची भीड मज कांहीं ॥३॥
3635
म्हातारपणीं थेटे पडसें खोकला । हात कपाळाला लावुनि बैसे ॥१॥ खोबरियाची वाटी जालें असे मुख । गळतसे नाक श्लेष्मपुरी ॥ध्रु.॥ बोलों जातां शब्द नये चि हा नीट । गडगडी कंठ कफ भारी ॥२॥ सेजारी म्हणती मरेना कां मेला । आणिला कांटाळा येणें आम्हां ॥३॥ तुका म्हणे आतां सांडुनी सर्वकाम । स्मरा राम राम क्षणक्षणा ॥४॥
3636
यज्ञ भूतांच्या पाळणा । भेद कारीये कारणा । पावावया उपासना । ब्रम्हस्थानीं प्रस्थान ॥१॥ एक परी पडिलें भागीं । फळ बीजाचिये अंगीं । धन्य तो चि जगीं । आदि अंत सांभाळी ॥ध्रु.॥ आवशक तो शेवट । मागें अवघी खटपट । चालों जाणे वाट । ऐसा विरळा एखादा ॥२॥ तुका होवोनि निराळा । क्षराअक्षरावेगळा । पाहे निगमकळा । बोले विठ्ठलप्रसादें ॥३॥
3637
यज्ञनिमित्त तें शरिरासी बंधन । कां रे तृष्णा वांयांविण वाढविली ॥१॥ नव्हे ते भक्ति परलोकसाधन । विषयांनीं बंधन केलें तुज ॥ध्रु.॥ आशा धरूनि फळाची । तीर्थी व्रतीं मुक्ति कैंचि ॥२॥ तुका म्हणे सिणसी वांया । शरण न वजतां पंढरिराया ॥३॥
3638
यत्न आतां तुम्ही करा । मज दातारा सत्तेनें ॥१॥ विश्वास तो पायांवरि । ठेवुनि हरी राहिलों ॥ध्रु.॥ जाणत चि दुजें नाहीं । आणीक कांहीं प्रकार ॥२॥ तुका म्हणे शरण आलों । नेणें बोलों विनवितां ॥३॥
3639
यथार्थ वाद सांडूनि उपचार । बोलती ते अघोर भोगितील ॥१॥ चोरा धरितां सांगे कुठोर्‍याचें नांव । दोघांचे ही पाव हात जाती ॥२॥ तुका म्हणे असे पुराणीं निवाड । माझी हे बडबड नव्हे कांहीं ॥३॥
3640
यथार्थवादें तुज न वर्णवे कदा । बोलतों ते निंदा करितों तुझी । वेदश्रुति तुज नेणती कोणी । चोवीस ठेंगणीं धांडोळितां॥१॥ आतां मज क्षमा करावें देवा । सलगी ते केशवा बोलियेलों ॥ध्रु.॥ सगुण कीं साकार निर्गुण कीं निराकार । न कळे हा पार वेदां श्रुतीं । तो आम्ही भावें केलासी लहान । ठेवूनियां नांवें पाचारितों ॥२॥ सहजरमुखें शेष सीणला स्तवितां । पार न कळतां ब्रम्हा ठेला । तेथें माझी देहबुद्धि तें काईं । थोर मी अन्यायी तुका म्हणे ॥३॥
3641
यथाविधि पूजा करी । सामोग्री तोंवरि हे नाहीं ॥१॥ आतां माझा सर्व भार । तूं दातार चालविसी ॥ध्रु.॥ मंगळ तें तुम्ही जाणां । नारायणा काय तें ॥२॥ तुका म्हणे समर्पिला । तुज विठ्ठला देहभाव ॥३॥
3642
यम सांगे दूतां तुम्हां नाहीं तेथें सत्ता । जेथें होय कथा सदा घोष नामाचा ॥१॥ नका जाऊं तया गांवां नामधारकाच्या शिवां । सुदर्शन येवा घरटी फिरे भोंवती ॥ध्रु.॥ चक्र गदा घेउनी हरि उभा असे त्यांचे द्वारीं । लIमी कामारी रिद्धिसिद्धीसहित ॥२॥ ते बिळयाशिरोमणी हरिभक्त ये मेदिनी । तुका म्हणे कानीं यम सांगे दूतांचे ॥३॥
3643
यमधर्म आणिक ब्रम्हादिक देव । त्यांचा पूर्ण भाव तुझे पायीं ॥१॥ करिती स्मरण पार्वतीशंकर । तेथें मी किंकर कोणीकडे ॥ध्रु.॥ सहजरमुखेंसी घोष फणिवराचा । मज किंकराचा पाड काय ॥२॥ चंद्र सूर्य आणि सर्व तारांगणें । करिती भ्रमण प्रदक्षिणा ॥३॥ तुका म्हणे त्यांसी स्वरूप कळेना । तेथें मज दीना कोण पुसे ॥४॥
3644
यमपुरी त्यांणीं वसविली जाणा । उच्छेद भजना विधी केला ॥१॥ अवघड कोणी न करी सांगतां । सुलभ बहुतां गोड वाटे ॥ध्रु.॥ काय ते नेणते होते मागें ॠषी । आधार लोकांसी ग्रंथ केले ॥२॥ द्रव्य दारा कोणें स्थापियेलें धन । पिंडाचें पाळण विषयभोग ॥३॥ तुका म्हणे दोहीं ठायीं हा फजित । पावे यमदूतजना हातीं ॥४॥
3645
यमाचे हे पाश नाटोपती कोणातें । आम्हां दिनानाथें रक्षियेलें ॥१॥ यम नेतां तुम्हां रक्षील हें कोण । तुम्हां धन्यधन्य कोण म्हणती ॥ध्रु.॥ संतसज्जनमेळा पवित्र संतकीर्ति । त्यांनीं उत्तम स्थिति सांगितली ॥२॥ तें चि धरोनि चित्ती तुका हित करी। यमासि पांपरी हाणे आतां ॥३॥
3646
यमुनें पाबळीं । गडियां बोले वनमाळी । आणा सिदोर्‍या सकळी । काला करूं आजी । अवघें एके ठायीं । करूनि स्वाद त्याचा पाहीं । मजपाशीं आहे तें ही । तुम्हामाजी देतों ॥१॥ म्हणती बरवें गोपाळ । म्हणती बरवें गोपाळ । वाहाती सकळ । मोहरी पांवे आनंदें । खडकीं सोडियेल्या मोटा । अवघा केला एकवटा । काला करूनियां वांटा । गडियां देतो हरि ॥ध्रु.॥ एकापुढें एक । घाली हात पसरी मुख । गोळा पांवे तया सुख । अधिक चि वाटे । म्हणती गोड जालें । म्हणती गोड जालें । आणिक देई । नाहीं पोट धालें ॥२॥ हात नेतो मुखापासीं । एर आशा तोंड वासी । खाय आपण तयासी । दावी वांकुलिया । देऊनियां मिठी । पळे लागतील पाठीं । धरूनि काढितील ओठीं । मुखामाजी खाती ॥३॥ म्हणती ठकडा रे कान्हा । लावी घांसा भरी राणा । दुम करितो शहाणा । पाठोवाठीं तयाच्या । अवघियांचे खाय । कवळ कृष्णा माझी माय । सुरवर म्हणती हाय हाय । सुखा अंतरलों ॥४॥ एक एका मारी । ढुंगा पाठी तोंडावरी । गोळा न साहवे हरि । म्हणे पुरे आतां । येतो काकुलती । गोळा न साहवे श्रीपती । म्हणे खेळों आतां नीती । सांगों आदरिलें ॥५॥ आनंदाचे फेरी । माजी घालुनियां हरी । एक घालिती हुंबरी । वाती सिंगें पांवे । वांकडे बोबडे । खुडे मुडे एक लुडे । कृष्णा आवडती पुढें । बहु भाविक ते ॥६॥ करी कवतुक । त्यांचें देखोनियां मुख । हरी वाटतसे सुख । खदखदां हांसे । एक एकाचें उच्छिष्ट । खातां न मानिती वीट । केलीं लाजतां ही धीट । आपुलिया संगें ॥७॥ नाहीं ज्याची गेली भुक । त्याचें पसरवितो मुख । अवघियां देतो सुख । सारिखें चि हरी । म्हणती भला भला हरी । तुझी संगती रे बरी । आतां चाळविसी तरी । न वजों आणिकां सवें ॥८॥ गाई विसरल्या चार । पक्षी श्वापदांचे भार । जालें यमुनेचें स्थिर । जळ वाहों ठेलें । देव पाहाती सकळ । मुखें घोटूनियां लाळ । धन्य म्हणती गोपाळ । धिग जालों आम्ही ॥९॥ म्हणती कैसें करावें । म्हणती कैसें करावें । यमुनाजळीं व्हावें । मत्स्य शेष घ्यावया । सुरवरांचे थाट । भरलें यमुनेचें तट । तंव अधिक ची होंट । मटमटां वाजवी ॥१०॥ आनंदें सहित । क्रीडा करी गोपीनाथ । म्हणती यमुनेंत हात । नका धुऊं कोणी । म्हणती जाणे जीवीचें । लाजे त्यास येथें कैचें । शेष कृष्णाचें । लाभ थोरिवे ॥११॥ धन्य दिवस काळ । आजी पावला गोपाळ । म्हणती धालों रे सकळ । तुझिया नि हातें । मानवले गडी । एक एकांचे आवडी । दहीं खादलें परवडी । धणीवरी आजी ॥१२॥ तुझा संग बरवा । नित्य आम्हां द्यावा । ऐसें करूनि जीवा । नित्य देवा चालावें । तंव म्हणे वनमाळी । घ्यारे काठिया कांबळी । आतां जाऊं खेळीमेळीं । गाई चारावया ॥१३॥ तुका म्हणे प्रेमें धालीं । कोणा न साहवे चाली । गाई गोपाळांसि केली । आपण यांसरी । आजि जाला आनंद । आजि जाला आनंद । चाले परमानंद । सवें आम्हांसहित ॥१४॥
3647
यमुनेतटीं मांडिला खेळ । म्हणे गोपाळ गडियांसि ॥१॥ हाल महाहाल मांडा । वाउगी सांडा मोकळी ॥ध्रु.॥ नांवें ठेवूनि वांटा गडी । न वजे रडी मग कोणी ॥२॥ तुका म्हणे कान्हो तिळतांदळ्या । जिंके तो करी आपुला खेळ्या ॥३॥
3648
या चि नांवें दोष । राहे अंतरीं किल्मिष ॥१॥ मना अंगीं पुण्य पाप । शुभ उत्तम संकल्प ॥ध्रु.॥ बिजाऐसीं फळें । उत्तम कां अमंगळें ॥२॥ तुका म्हणे चित्त । शुद्ध करावें हे नित ॥३॥
3649
या चि हाका तुझे द्वारीं । सदा देखों रिणकरी ॥१॥ सदा करिसी खंड दंड । देवा बहु गा तूं लंड ॥ध्रु.॥ सुखें गोविसी भोजना । लपवूनियां आपणां ॥२॥ एकें एक बुझाविसी । तुका म्हणे ठक होसी ॥३॥
3650
या रे करूं गाई । जमा निजलेती काई । बोभाटानें आई । घरा गेल्या मारील ॥१॥ घाला घाला रे फुकारे । ज्याची तेणें चि मोहरे । एवढें चि पुरे । केलियानें सावध ॥ध्रु.॥ नेणोनियां खेळा । समय समयाच्या वेळा । दुश्चिताजवळा । मिळालेति दुश्चित ॥२॥ तुका म्हणे शीक । न धरितां लागे भीक । धरा सकळीक । मनेरी धांवा वळतियां ॥३॥
3651
या रे गडे हो धरूं घाई जाणतां ही नेणतां । नाम गाऊं टाळी वाहूं आपुलिया हिता ॥१॥ फावलें तें घ्यारे आतां प्रेमदाता पांडुरंग । आजि सोनियाचा दिवस सोनियाचा वोडवला रंग ॥ध्रु.॥ हिंडती रानोरान भुजंगांत कांट्यावन । सुख तयांहून आम्हां गातां नाचतां रे ॥२॥ तुका म्हणे ब्रम्हादिकां सांवळें दुर्लभ सुखा । आजि येथें आलें फुका नाम मुखा कीर्तनीं ॥३॥
3652
या रे नाचों अवघेजण । भावें प्रेमें परिपूर्ण ॥१॥ गाऊं पंढरीचा राणा । क्षेम देऊनिं संतजना ॥ध्रु.॥ सुख साधु सुखासाटीं । नाम हरिनाम बोभाटीं ॥२॥ प्रेमासाटीं तो उदार । देतां नाहीं सानाथोर ॥३॥ पापें पळालीं बापुडीं । काळ झाला देशधडी ॥४॥ तुका म्हणे धन्य काळ । आजि प्रेमाचा सुकाळ ॥४॥
3653
या रे हरिदासानो जिंकों कळिकाळा । आमुचिया बळा पुढें किती बापुडें ॥१॥ रंग सुरंग घमंडी नाना छंदें । हास्यविनोदें मनाचिये आवडी ॥ध्रु.॥ येणें तेणें प्रकारें बहुतां सुख जोडे । पूजन तें घडे नारायणा अंतरीं ॥२॥ वांकड्या माना बोल बोलावे आर्ष । येईंल तो त्यांस छंद पढीयें गोविंदा ॥३॥ आपुलालें आवडी एकापुढें एक नटा । नाहीं थोर मोठा लहान या प्रसंगीं ॥४॥ तुका म्हणे येथें प्रेम भंगूं नये कोणीं । देव भक्त दोन्ही निवडितां पातक ॥५॥
3654
या हो या चला जाऊं सकळा । पाहों हा सोहळा आजि वृंदावनींचा ॥१॥ वाइला गोपाळें वेणुनाद पडे कानीं । धीर नव्हे मनीं चित्त जालें चंचळ ॥ध्रु.॥ उरलें तें सांडा काम नका करूं गोवी । हे चि वेळ ठावी मज कृष्णभेटीची ॥२॥ निवतील डोळे याचें श्रीमुख पाहातां । बोलती तें आतां घरचीं सोसूं वाईट ॥३॥ कृष्णभेटीआड कांहीं नावडे आणीक । लाज तरी लोक मन जालें उदास ॥४॥ एकाएकीं चालियेल्या सादावीत सवें । तुका म्हणे देवें रूपें केल्या तन्मय ॥५॥ फुगड्या - अभंग २
3655
यांच्या पूर्वपुण्या कोण लेखा करी । जिंहीं तो मुरारी खेळविला ॥१॥ खेळविला जिंहीं अंतर्बाह्यसुखें । मेळवूनि मुखें चुंबन दिलें ॥२॥ दिलें त्यांसी सुख अंतरीचें देवें । जिंहीं एका भावें जाणितला ॥३॥ जाणितला तिहीं कामातुर नारी । कृष्णभोगावरी चित्त ज्यांचें ॥४॥ ज्यांचें कृष्णीं तन मन जालें रत । गृह पति सुत विसरल्या ॥५॥ विष तयां जालें धन मान जन । वसविती वन एकांतीं त्या ॥६॥ एकांतीं त्या जाती हरीसी घेउनि । भोगइच्छाधणी फेडावया ॥७॥ वयाच्या संपन्ना तैसा त्यांकारणें । अंतरींचा देणें इच्छाभोग ॥८॥ भोग त्याग नाहीं दोन्ही जयापासीं । तुका म्हणे जैसी स्पटिकशिळा ॥९॥
3656
यांसि समाचार सांगतों सकळा । चलावें गोकुळा म्हणे देव ॥१॥ देव राखे तया आडलिया काळें । देव सुखफळें देतो दासां ॥२॥ दासां दुःख देखों नेदी आपुलिया । निवारी आलिया न कळतां ॥३॥ नाहीं मेघ येतां जातां देखियेला । धारीं वरुषला शिळांचिये ॥४॥ एवढें भक्तांचें सांकडें अनंता । होय निवारिता तुका म्हणे ॥५॥
3657
याचा कोणी करी पक्ष । तो ही त्याशी समतुल्य ॥१॥ फुकासाठीं पावे दुःखाचा विभाग । पूर्वजांसि लाग निरयदंडीं ॥ध्रु.॥ ऐके राजा न करी दंड । जरि या लंड दुष्टासि ॥२॥ तुका म्हणे त्याचें अन्न । मद्यपाना समान ॥३॥
3658
याचा तंव हा चि मोळा । देखिला डोळा उदंड ॥१॥ नेदी मग फिरों मागें । अंगा अंगें संचरे ॥ध्रु.॥ कां गा याची नेणां खोडी । जीभा जोडी करितसां ॥२॥ पांघरे तें बहु काळें । घोंगडें ही ठायींचें ॥३॥ अंगीं वसे चि ना लाज । न म्हणे भाज कोणाची ॥४॥ सर्वसाक्षी अबोल्यानें । दुश्चित कोणें नसावें ॥५॥ तुका म्हणे धरिला हातीं । मग निश्चिंतीं हरीनें ॥६॥
3659
याचिया आधारें राहिलों निश्चिंत । ठेवूनियां चित्ती पायीं सुखें ॥१॥ माझें सुखदुःख जाणे हित फार । घातलासे भार पांडुरंगा ॥ध्रु.॥ कृपेचीं पोसणीं ठायींचीं अंखिलीं । म्हणऊनि लागली यास चिंता ॥२॥ मन राखे हातीं घेऊनियां काठी । इंद्रियें तापटीं फांकों नेदी ॥३॥ तुका म्हणे यासी अवघड नाहीं । शरणागता कांहीं रक्षावया ॥४॥
3660
याची कोठें लागली चट । बहु तट जालेंसे ॥१॥ देवपिसीं देवपिसीं । मजऐसीं जग म्हणे ॥ध्रु.॥ एकांताचें बाहेर आलें । लपविलें झांकेना ॥२॥ तुका म्हणे याचे भेटी । जाली तुटी आपल्यांसी ॥३॥
3661
याची सवे लागली जीवा । गोडी हेवा संगाचा ॥१॥ परतें न सरवे दुरी । क्षण हरीपासूनि ॥ध्रु.॥ जालें तरी काय तंट । आतां चट न संटे ॥२॥ तुका म्हणे चक्रचाळे । वेळ बळें लाविलें ॥३॥
3662
याजसाटीं केला होता आटाहास्ये । शेवटाचा दिस गोड व्हावा ॥१॥ आतां निश्चितीनें पावलों विसांवा । खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥ध्रु.॥ कवतुक वाटे जालिया वेचाचें । नांव मंगळाचें तेणें गुणें ॥२॥ म्हणे मुक्ति परिणिली नोवरी । आतां दिवस चारी खेळीमेळीं ॥३॥
3663
याजसाठीं भक्ति । जगीं रूढवावया ख्याति ॥१॥ नाहीं तरी कोठें दुजें । आहे बोलाया सहजें ॥ध्रु.॥ गौरव यासाटीं । स्वामिसेवेची कसोटी ॥२॥ तुका म्हणे अळंकारा । देवभक्त लोकीं खरा ॥३॥
3664
याजसाठीं वनांतरा । जातों सांडुनियां घरा ॥१॥ माझें दिठावेल प्रेम । बुद्धी होईल निष्काम ॥ध्रु.॥ अद्वैताची वाणी । नाहीं ऐकत मी कानीं ॥२॥ तुका म्हणे अहंब्रम्ह । आड येऊं नेदीं भ्रम ॥३॥
3665
याति गुणें रूप काय ते वानर । तयांच्या विचारें वर्ते राम ॥१॥ ब्रम्हहत्यारासि पातकी अनेक । तो वंद्य वाल्मीक तिहीं लोकीं ॥२॥ तुका म्हणे नव्हे चोरीचा व्यापार । म्हणा रघुवीर वेळोवेळां ॥३॥
3666
याति शूद्र वैश केला वेवसाव । आदि तो हा देव कुळपूज्य ॥१॥ नये बोलों परि पाळिलें वचन । केलियाचा प्रश्न तुम्हीं संतीं ॥ध्रु.॥ संवसारें जालों अतिदुःखें दुखी । मायबाप सेखीं कर्मलिया ॥२॥ दुष्काळें आटिलें द्रव्यें नेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करितां मेली ॥३॥ लज्जा वाटे जीवा त्रासलों या दुःखें । वेवसाय देख तुटी येतां ॥४॥ देवाचें देऊळ होतें तें भंगलें । चित्तासी जें आलें करावेंसें ॥५॥ आरंभीं कीर्तन करीं एकादशी । नव्हतें अभ्यासीं चित्त आधीं ॥६॥ कांहीं पाठ केलीं संतांचीं उत्तरें । विश्वासें आदरें करोनियां ॥७॥ गाती पुढें त्यांचें धरावें धृपद । भावें चित्त शुद्ध करोनियां ॥८॥ संताचें सेविलें तीर्थ पायवणी । लाज नाहीं मनीं येऊं दिली ॥९॥ टाकला तो कांहीं केला उपकार । केलें हें शरीर कष्टवूनि ॥१०॥ वचन मानिलें नाहीं सहुर्दाचें । समूळ प्रपंचें वीट आला ॥११॥ सत्यअसत्यासी मन केलें ग्वाही । मानियेलें नाहीं बहुमतां ॥१२॥ मानियेला स्वप्नीं गुरूचा उपदेश । धरिला विश्वास दृढ नामीं ॥१३॥ यावरि या जाली कवित्वाची स्फूर्ति । पाय धरिले चित्तीं विठोबाचे ॥१४॥ निषेधाचा कांहीं पडिला आघात । तेणें मध्यें चित्त दुखविलें ॥१५॥ बुडविल्या वह्या बैसलों धरणें । केलें नारायणें समाधान ॥१६॥ विस्तारीं सांगतां बहुत प्रकार । होईल उशीर आतां पुरे ॥१७॥ आतां आहे तैसा दिसतो विचार । पुढील प्रकार देव जाणे ॥१८॥ भक्ति नारायण नुपेक्षी सर्वथा । कृपावंत ऐसा कळों आलें ॥१९॥ तुका म्हणे माझें सर्व भांडवल । बोलविले पांडुरंगें ॥२०॥
3667
यातिहीन मज काय तो अभिमान । मानी तुज जन नारायणा ॥१॥ काय सुख मज तयाची हे खंती । आपुलाला घेती गुणभाव ॥ध्रु.॥ द्रव्यामुळें माथां वाहियेली चिंधी । होन जयामधीं होता गांठी ॥२॥ तुका म्हणे जन वंदितो वेगळा । मजसी दुर्बळा काय चाड ॥३॥
3668
याती मतिहीन रूपें लीन दीन । आणीक अवगुण जाणोनियां ॥१॥ केला त्या विठ्ठलें माझा अंगीकार । ऐसा हा विचार जाणोनियां ॥ध्रु.॥ जें कांहीं करितों तें माझे स्वहित । आली हे प्रचित कळों चित्ता ॥२॥ जालें सुख जीवा आनंद अपार । परमानंदें भार घेतला माझा ॥३॥ तुका म्हणे यासी नांवाचा अभिमान । म्हणोनि शरण तारी बळें ॥४॥
3669
याती हीन मति हीन कर्म हीन माझें । सांडोनियां सर्व लज्जा शरण आलों तुज ॥१॥ येई गा तूं मायबापा पंढरीच्या राया । तुजविण सीण जाला क्षीण जाली काया ॥ध्रु.॥ दिनानाथ दीनबंधू नाम तुज साजे । पतितपावन नाम ऐसी ब्रीदावळी गाजे॥२॥ विटेवरि वीट उभा कटावरी कर । तुका म्हणे हें चि आम्हां ध्यान निरंतर ॥३॥
3670
याल तर या रे लागें । अवघे माझ्या मागें मागें ॥१॥ आजि देतों पोटभरी । पुरे म्हणाल तोंवरी ॥ध्रु.॥ हळू हळू चला । कोणी कोणाशीं न बोला ॥२॥ तुका म्हणे सांडा घाटे । तेणें नका भरूं पोटें ॥३॥
3671
यालागीं आवडी म्हणा राम कृष्ण । जोडा नारायण सर्वकाळ ॥१॥ सोपें हें साधन लाभ येतो घरा । वाचेसी उच्चारा राम हरि ॥ध्रु.॥ न लगती कष्ट न लगे सायास । करावा अभ्यास विठ्ठलाचा ॥२॥ न लगे तप तीर्थ करणें महादान । केल्या एक मन जोडे हरि ॥३॥ तुका म्हणे कांहीं न वेचितां धन । जोडे नारायण नामासाटीं ॥४॥
3672
यावरि न कळे संचित आपुलें । कैसें वोडवलें होइल पुढें ॥१॥ करील विक्षेप धाडितां मुळासी । किंवा धाडा ऐसी तांतडी हे ॥ध्रु.॥ जोंवरी हे डोळां देखें वारकरी । तों हें भरोवरी करी चित्ती ॥२॥ आस वाढविते बुद्धीचे तरंग । मनाचे ही वेग वावडती ॥३॥ तुका म्हणे तेव्हां होतील निश्चळ । इंद्रियें सकळ निरोपानें ॥४॥
3673
यासाटीं करितों निष्ठ‍ भाषण । आहेसी तूं जाण सर्वदाता ॥१॥ ऐसें दुःख कोण आहे निवारिता । तें मी जाऊं आतां शरण त्यासी ॥ध्रु.॥ बैसलासे केणें करुनि एक घरीं । नाहीं येथें उरी दुसर्‍याची ॥२॥ तुका म्हणे आलें अवघें पायांपें । आतां मायबापें नुपेक्षावें ॥३॥
3674
यासी कोणी म्हणे निंदेचीं उत्तरें । नागवला खरें तो चि एक ॥१॥ आड वाटे जातां लावी नीट सोईं । धर्मनीत ते ही ऐसी आहे ॥ध्रु.॥ नाइकता सुखें करावें ताडण । पाप नाहीं पुण्य असे फार ॥२॥ जन्म व्याधि फार चुकतील दुःखें । खंडावा हा सुखें मान त्याचा ॥३॥ तुका म्हणे निंब दिलियावांचून । अंतरींचा सीण कैसा जाय ॥४॥
3675
युक्ताहार न लगे आणिक साधनें । अल्प नारायणें दाखविलें ॥१॥ कलियुगामाजी करावें कीर्तन । तेणें नारायण देइल भेटी ॥ध्रु.॥ न लगे हा लौकिक सांडावा वेव्हार । घ्यावें वनांतर भस्म दंड ॥२॥ तुका म्हणे मज आणि उपाव । दिसती ते वाव नामाविण ॥३॥
3676
युिक्त तंव जाल्या कुंटित सकळा । उरली हे कळा जीवनाची ॥१॥ संतचरणीं भावें ठेविलें मस्तक । जोडोनि हस्तक राहिलोंसें ॥ध्रु.॥ जाणपणें नेणें कांहीं चि प्रकार । साक्षी तें अंतर अंतरासी ॥२॥ तुका म्हणे तुम्ही केलें अभयदान । जेणें समाधान राहिलेंसे ॥३॥
3677
ये गा महाविष्णु अनंतभुजाच्या । आम्हां अनाथांच्या माहेरा ये ॥१॥ भेटावया तुज ओढे माझा जीव । एकवेळा पाय दावीं डोळां ॥ध्रु.॥ आणीक हे आर्त नाहीं नारायणा । ओढे हे वासना भेटावया ॥२॥ वाटे चित्ती काय करावा विचार । चरण सुंदर पहावया ॥३॥ तुका म्हणे माझे पुरवीं मनोरथ । येईं गा न संवरीत पांडुरंगा ॥४॥
3678
ये दशे चरित्र केलें नारायणें । रांगतां गोधनें राखिताहे ॥१॥ हें सोंग सारिलें या रूपें अनंतें । पुढें हि बहु तें करणें आहे ॥२॥ आहे तुका म्हणे धर्म संस्थापणें । केला नारायणें अवतार ॥३॥
3679
ये रे कृष्णा खुणाविती खेळों भातुकें । मिळालिया बाळा एके ठायीं कवतुकें । कळों नेदी माया त्याचें त्यास ठाउकें । खेळतोंसें दावी लक्षलक्षापें मुकें ॥१॥ अखंडित चटे त्यांनीं लावियेला कान्हा । आवडे तया त्या वाहाती संकल्प मना । काया वाचा मनें रूपीं गुंतल्या वासना । एकांताचें सुख जाती घेवोनियां राणा ॥ध्रु.॥ अवघियांचा जाणें जाला मेळासा हरी । मिळोनियां जावें तेथें तया भीतरी । कळों नेदी घरिच्या करी गोवूनी चोरी । हातोहातीं नेती परपरत्या दुरी ॥२॥ आनंदें निर्भर आपणाशीं आपण । क्रीडतील बाळा त्यजिलें पारिखें जन । एकाएकीं तेथें नाहीं दुसरें भिन्न । तुका म्हणे एका नारायणा वांचून ॥३॥
3680
येइल घरा देव न धरीं संदेहा । फकिराचा यावा व्हावा जेव्हां ॥१॥ होइल फकीर योगी महानुभाव । घडीघडी देव सांभाळील ॥२॥ तुका म्हणे ऐसें बोलती बहुत । येणे गुणें संत जाले राम ॥३॥
3681
येइल तुझ्या नामा । जाल म्हणों पुरुषोत्तमा ॥१॥ धीर राहिलों धरूनि । त्रास उपजला मनीं ॥ध्रु.॥ जगा कथा नांव । निराशेनें नुपजे भाव ॥२॥ तुम्ही साक्षी कीं गा । तुका म्हणे पांडुरंगा ॥३॥
3682
येइल तें घेइन भागा । नव्हे जोगा दुसरिया ॥१॥ आवडी ते तुम्ही जाणा । बहु गुणांसारिखी ॥ध्रु.॥ मज घेती डांगवरी । सवें हरि नसलिया ॥२॥ तुका म्हणे राबवा देवा । करीन सेवा सांगितली ॥३॥
3683
येई गे विठ्ठले विश्वजीवनकले । सुंदर घननीळे पांडुरंगें ॥१॥ येई गे विठ्ठले करुणाकल्लोळे । जीव कळवळे भेटावया ॥ध्रु.॥ न लगती गोड आणीक उत्तरें । तुझें प्रेम झुरे भेटावया ॥२॥ तुका म्हणे धांव घालीं कृष्णाबाईं । क्षेम चाहूंबाही देई मज ॥३॥
3684
येईवो येईवो येईधांवोनियां । विलंब कां वायां लाविला कृपाळे ॥१॥ विठाबाईं विश्वंभरे भवच्छेदके । कोठें गुंतलीस अगे विश्वव्यापके ॥ध्रु.॥ न करीं न करीं न करीं आतां अळस अव्हेरु । व्हावया प्रकट कैंचें दूरि अंतरु ॥२॥ नेघें नेघें नेघें माझी वाचा विसांवा । तुका म्हणे हांवा हांवा हांवा साधावा ॥३॥
3685
येउनि संसारीं । मी तों एक जाणें हरी ॥१॥ नेणें आणिक कांहीं धंदा । नित्य ध्यातसें गोविंदा ॥ध्रु.॥ कामक्रोधलोभस्वार्थ । अवघा माझा पंढरिनाथ ॥२॥ तुका म्हणे एक । धणी विठ्ठल मी सेवक ॥३॥
3686
येउनी जाउनी पाहें तुजकडे । पडिल्या सांकडें नारायणा ॥१॥ आणीक कोणाचा मज नाहीं आधार । तुजवरि भार जीवें भावें ॥ध्रु.॥ निष्ठ‍ अथवा होई तूं कृपाळ । तुज सर्वकाळ विसरेंना ॥२॥ आपुलें वचन राहावें सांभाळून । तुम्हां आम्हां जाण पडिपाडु ॥३॥ ज्याच्या वचनासी अंतर पडेल । बोल तो होईंल तयाकडे ॥४॥ तुम्हां आम्हां तैसें नाहीं म्हणे तुका । होशील तूं सखा जीवलगा ॥५॥
3687
येऊं द्या जी कांहीं वेसकरास । आंतून बाहेर वोजेचा घास ॥१॥ जों यावें तों हात चि रिता नाहीं । कधीं तरीं कांहीं द्यावें घ्यावें ॥२॥ तुका म्हणे उद्यां लावीन म्हनेरा । जे हे दारोदारांभोंवतीं फिरा ॥३॥
3688
येऊनि नरदेहा झांकितील डोळे । बळें चि अंधळे होती लोक ॥१॥ उजडासरसी न चलती वाट । पुढील बोभाट जाणोनियां ॥ध्रु.॥ बहु फेरे आले सोसोनि वोळसा । पुढें नाहीं ऐसा लाभ मग ॥२॥ तुका म्हणे जाऊं सादावीत वाट । भेटे तरी भेटो कोणी तरी ॥३॥
3689
येऊनि नरदेहा विचारावें सार । धरावा पैं धीर भजनमार्गा ॥१॥ चंचळ चत्तिासी ठेवूनियां ठायीं । संतांचिये पायीं लीन व्हावें ॥ध्रु.॥ भावाचा पैं हात धरावा नश्चियें । तेणें भवभय देशधडी ॥२॥ नामापरतें जगीं साधन सोपें नाहीं । आवडीनें गाई सर्वकाळ ॥३॥ तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा । ऐसा नश्चियाचा मेरु जाला ॥४॥
3690
येऊनि संसारा काय हित केलें । आयुष्य नासिलें शिश्नोदरा ॥१॥ विषय सेवितां कोण तृप्त जाला । इंधनीं निवाला अग्नि कोठें ॥ध्रु.॥ देखोनी मृगजळ भांबावलीं वेडीं । विचाराची थडी न टाकिती ॥२॥ ऐसियां जीवांसी सोय न लाविसी । निष्ठ‍ कां होसी कृपाळुवा ॥३॥ तुका म्हणे देवा अगाध पैं थोरी । सर्वांचे अंतरीं पुरलासी ॥४॥
3691
येगा येगा पांडुरंगा । घेईं उचलुनि वोसंगा ॥१॥ ऐसी असोनियां वेसी । दिसतों मी परदेसी ॥ध्रु.॥ उगवूनि गोवा । सोडवूनि न्यावें देवा ॥२॥ तुज आड कांहीं । बळ करी ऐसें नाहीं ॥३॥ तुका म्हणे हृषीकेशी । काय उशीर लाविसी ॥४॥
3692
येणें जाणें तरी । राहे देव कृपा करी ॥१॥ ऐसें तंव पुण्य नाहीं । पाहातां माझे गांठी कांहीं ॥ध्रु.॥ भय निवारिता कोण वेगळा अनंता ॥२॥ तुका म्हणे वारे भोग । वारी तरी पांडुरंग ॥३॥
3693
येणें जाला तुमचे पोतडीचा झाडा । केलासी उघडा पांडुरंगा ॥१॥ भरूनियां घरीं राहिलों वाखती । आपुली निश्चिंती आपल्यापें ॥ध्रु.॥ आतां काय उरी उरली ते सांगा । आणिलेति जगाचिये साक्षी ॥२॥ तुका म्हणे कोठें पाहोंजासी आतां । माझी जाली सत्ता तुम्हांवरि ॥३॥
3694
येणें पांगें पायांपाशीं । निश्चयेंसी राहेन ॥१॥ सांगितली करीन सेवा । सकळ देवा दास्यत्व ॥ध्रु.॥ बंधनाची तुटली बेडी । हे चि जोडी मग आम्हां ॥२॥ तुका म्हणे नव्हें क्षण । पायांविण वेगळा ॥३॥
3695
येणें बोधें आम्ही असों सर्वकाळ । करूनि निर्मळ हरिकथा ॥१॥ आम्ही भूमीवरी एक देवांचे । निधान हें वाचे सांपडलें ॥ध्रु.॥ तरतील कुळें दोन्ही उभयतां । गातां आइकतां सुखरूप ॥२॥ न चळे हा मंत्र न म्हणों यातीकुळ । न लगे काळ वेळ विचारावी ॥३॥ तुका म्हणे माझा विठ्ठल विसांवा । सांटवीन हांवा हृदयांत ॥४॥
3696
येणें मागॉ आले । त्यांचें निसंतान केलें ॥१॥ ऐसी अवघड वाट । कोणा सांगावा बोभाट ॥ध्रु.॥ नागविल्या थाटी । उरों नेदी च लंगोटी ॥२॥ तुका म्हणे चोर । तो हा उभा कटिकर ॥३॥
3697
येणें मुखें तुझे वर्णि गुण नाम । तें चि मज प्रेम देई देवा ॥१॥ डोळे भरूनियां पाहें तुझें मुख । तें चि मज सुख देई देवा ॥ध्रु.॥ कान भरोनियां ऐकें तुझी कीर्ती । ते मज विश्रांती देईं देवा ॥२॥ वाहें रंगीं टाळी नाचेन उदास । हें देई हातांस पायां बळ ॥३॥ तुका म्हणे माझा सकळ देहभाव । आणीक नको ठाव चिंतूं यासी ॥४॥
3698
येती वारकरी । वाट पाहातों तोंवरी ॥१॥ घालूनियां दंडवत । पुसेन निरोपाची मात ॥ध्रु.॥ पत्र हातीं दिलें । जया जेथें पाठविलें ॥२॥ तुका म्हणे येती । जाइन सामोरा पुढती ॥३॥
3699
येतील अंतरा शिष्टाचे अनुभव । तळमळी जीव तया सुखा ॥१॥ आतां माझा जीव घेउनियां बळी । बैसवावें वोळी संतांचिये ॥ध्रु.॥ विस्तारिली वाचा फळेंविण वेल । कोरडे चि बोल फोस वांझे ॥२॥ तुका म्हणे आलों निर्वाणा च वरी । राहों नेदीं उरी नारायणा ॥३॥
3700
येथीचिया अळंकारें । काय खरें पूजन ॥१॥ वैकुंठींच्या लावूं वाटा । सर्व साटा ते ठायीं ॥ध्रु.॥ येथीचिया नाशवंतें । काय रितें चाळवूं ॥२॥ तुका म्हणे वैष्णव जेन । माझे गण समुदाय ॥३॥
3701
येथील जें एक घडी । तये जोडी पार नाहीं ॥१॥ ती त्यांचा सासुरवास । कैंचा रस हा तेथें ॥ध्रु.॥ अवघे दिवस गेले कामा । हीं जन्मा खंडण ॥२॥ तुका म्हणे रतल्या जनीं । सोडा झणी कान्होबा ॥३॥
3702
येथील हा ठसा । गेला पडोनियां ऐसा ॥१॥ घरीं देवाचे अबोला । त्याची ते चि सवे त्याला ॥ध्रु॥. नाहीं पाहावें लागत । एकाएकीं च ते रित ॥२॥ तुका म्हणे जन । तयामध्यें येवढें भिन्न ॥३॥
3703
येथीलिया अनुभवें । कळों जीवें हें येतसे ॥१॥ दोहीं ठायीं एक जीव । माझी कींव त्या अंगीं ॥ध्रु.॥ भूक भुके चि खाउनि धाय । नाहीं हाय अन्नाची ॥२॥ तुका म्हणे सुख जालें । अंतर धालें त्यागुणें ॥३॥
3704
येथूनियां ठाव । अवघे लक्षायाचे भाव ॥१॥ उंची देवाचे चरण । तेथें जालें अधिष्ठान ॥ध्रु.॥ आघातावेगळा । असे ठाव हा निराळा ॥२॥ तुका म्हणे स्थळ । धरूनि राहिलों अचळ ॥३॥
3705
येथें आड कांहीं न साहे आणीक । प्रमाण तें एक हें चि जालें ॥१॥ गाऊं नाचों टाळी गाऊं गाऊं गीत छंदें । डोलवूं विनोदें अंग तेणें ॥ध्रु.॥ मथुनियां सार काढिलें बाहेरी । उपाधि ते येरी निवडिली ॥२॥ तुका म्हणे जगा लाविली शिराणी । सेवितां हे धणी होत नाहीं ॥३॥
3706
येथें दुसरी न सरे आटी । देवा भेटी जावया ॥१॥ तो चि ध्यावा एका चित्तें । करूनि रितें किळवर ॥ध्रु.॥ षडउर्मी हृदयांत । यांचा अंत पुरवूनि ॥२॥ तुका म्हणे खुंटे आस । तेथें वास करी तो ॥३॥
3707
येथें नाहीं उरों आले अवतार । येर ते पामर जीव किती ॥१॥ विषयांचे झणी व्हाल लोलिंगत । चेवलिया अंत न लगे मज ॥ध्रु.॥ वाहोनियां भार कुंथसील ओंझे । नव्हे तें चि माझें थीता त्याग ॥२॥ तुका म्हणे कैसी नाहीं त्याची लाज । संतीं केशीराज साधियेला ॥३॥
3708
येथें बोलोनियां काय । व्हावा गुरू तरि जाय ॥१॥ मज न साहे वांकडें । ये विठ्ठलकथेपुढें ॥ध्रु.॥ ऐकोनि मरसी कथा। जंव आहेसि तुं जीता ॥२॥ हुरमतीची चाड । तेणें न करावी बडबड ॥३॥ पुसेल कोणी त्यास । जा रे करीं उपदेश ॥४॥ आम्ही विठ्ठलाचे वीर । फोडूं कळिकाळाचें शीर ॥५॥ घेऊं पुढती जन्म । वाणूं कीर्त मुखें नाम ॥६॥ तुका म्हणे मुक्ती । नाहीं आस चि ये चित्ती ॥७॥
3709
येहलोकीं आम्हां वस्तीचें पेणें । उदासीन तेणें देहभावीं ॥१॥ कार्यापुरतें कारण मारगीं । उलंघूनि वेगीं जावें स्थळा ॥ध्रु.॥ सोंगसंपादणी चालवितों वेव्हार । अत्यंतिक आदर नाहीं गोवा ॥२॥ तुका म्हणे वेंच लाविला संचिता । होइल घेतां लोभ कोणां ॥३॥
3710
योग तप या चि नांवें । गळित व्हावें अभिमानें ॥१॥ करणें तें हें चि करा । सत्यें बरा व्यापार ॥ध्रु.॥ तरि खंडे येरझार । निघे भार देहाचा ॥२॥ तुका म्हणे मानामान । हें बंधन नसावें ॥३॥
3711
योगाचें तें भाग्य क्षमा । आधीं दमा इंद्रियें ॥१॥ अवघीं भाग्यें येती घरा । देव सोयरा जालिया ॥ध्रु.॥ मिरासीचें म्हूण सेत । नाहीं देत पीक उगें ॥२॥ तुका म्हणे उचित जाणां । उगीं सिणा काशाला ॥३॥
3712
योग्याची संपदा त्याग आणि शांति । उभयलोकीं कीर्ति सोहळा मान ॥१॥ येरयेरांवरी जायांचें उसिणें । भाग्यस्थळीं देणें झाडावेसीं ॥ध्रु.॥ केलिया फावला ठायींचा तो लाहो । तृष्णेचा तो काहो काव्हवितो ॥२॥ तुका म्हणे लाभ अकर्तव्या नांवें । शिवपद जीवें भोगिजेल ॥३॥
3713
रंगलें या रंगें पालट न घरी । खेवलें अंतरीं पालटेना ॥१॥ सावळें निखळ कृष्णनाम ठसे । अंगसंगें कैसे शोभा देती ॥ध्रु.॥ पवित्र जालें तें न लिंपे विटाळा । नैदी बैसों मला आडवरी ॥२॥ तुका म्हणे काळें काळें केलें तोंड । प्रकाश अभंड देखोनियां ॥३॥
3714
रंगीं रंगें नारायण । उभा करितों कीर्त्तन ॥१॥ हातीं घेउनियां वीणा । कंठीं राहें नारायणा ॥ध्रु.॥ देखिलीसे मूर्ती । माझ्या हृदयाची विश्रांति ॥२॥ तुका म्हणे देवा । देई कीर्तनाचा हेवा ॥३॥
3715
रंगीं रंगें रे श्रीरंगे । काय भुललासी पतंगें ॥१॥ शरीर जायांचें ठेवणें । धरिसी अभिळास झणें ॥ध्रु.॥ नव्हे तुझा हा परिवार । द्रव्य दारा क्षणभंगुर ॥२॥ अंतकाळींचा सोइरा । तुका म्हणे विठो धरा ॥३॥
3716
रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न । चिन्मय अंजन सुदलें डोळां ॥१॥ तेणें अंजनगुणें दिव्यदृष्टि जाली । कल्पना निवाली द्वैताद्वैत ॥ध्रु.॥ देशकालवस्तुभेद मावळला । आत्मा निर्वाळला विश्वाकार ॥२॥ न जाला प्रपंच आहे परब्रम्ह । अहंसोहं ब्रम्ह आकळलें ॥३॥ तत्वमसि विद्या ब्रम्हानंद सांग । तें चि जाला अंगें तुका आतां ॥४॥
3717
रचियेला गांव सागराचे पोटीं । जडोनि गोमटीं नानारत्नें ॥१॥ रत्न खणोखणी सोनियाच्या भिंती । लागलिया ज्योति रविकळा ॥२॥ कळा सकळ ही गोविंदाचे हातीं । मंदिरें निगुतीं उभारिलीं ॥३॥ उभारिलीं दुगॉ दारवंठे फांजी । कोटी चर्या माजी शोभलिया ॥४॥ शोभलें उत्तम गांव सागरांत । सकळांसहित आले हरि ॥५॥ आला नारायण द्वारका नगरा । उदार या शूरा मुगुटमणि ॥६॥ निवडीना याति समान चि केलीं । टणक धाकुलीं नारायणें ॥७॥ नारायणें दिलीं अक्षईं मंदिरें । अभंग साचारें सकळांसि ॥८॥ सकळ ही धर्मशीळ पुण्यवंत । पवित्र विरक्त नारीनर ॥९॥ रचिलें तें देवें न मोडे कवणा । बळियांचा राणा नारायण ॥१०॥ बळबुद्धीनें तीं देवा च सारिखीं । तुका म्हणे मुखीं गाती ओंव्या ॥११॥
3718
रज्जु धरूनियां हातीं । भेडसाविलीं नेणतीं । कळों येतां चित्ती । दोरी दोघां सारिखी ॥१॥ तुम्हांआम्हांमध्यें हरी । जाली होती तैसी परी । मृगजळाच्या पुरीं । ठाव पाहों तरावय ॥ध्रु.॥ सरी चिताक भोंवरी । अळंकाराचिया परी । नामें जालीं दुरी । एक सोनें आटितां ॥२॥ पिसांचीं पारवीं । करोनि बाजागिरी दावी । तुका म्हणे तेवीं । मज नको चाळवूं ॥३॥
3719
रज्जुसर्पाकार । भासयेलें जगडंबर ॥१॥ म्हणोनि आठवती पाय । घेतों आलाय बलाय ॥ध्रु.॥ द्रुश द्रुमाकार लाणी । केलों सर्व सासी धणी ॥२॥ तुकीं तुकला तुका । विश्वीं भरोनि उरला लोकां ॥३॥
3720
रडे अळंकार दैन्याचिये कांती । उतमा विपित्तसंग घडे ॥१॥ एकाविण एक अशोभ दातारा । कृपेच्या सागरा पांडुरंगा ॥ध्रु.॥ रांधूं नेणे तया पुढील आइतें । केलें तें सोइतें वांयां जाय ॥२॥ तुका म्हणे चिंतामणि शेळी गळा । पावे अवकळा म्हणउनी ॥३॥
3721
रडोनियां मान । कोण मागतां भूषण ॥१॥ देवें दिलें तरी गोड । राहे रुचि आणि कोड ॥ध्रु.॥ लावितां लावणी । विके भीके केज्या दानी ॥२॥ तुका म्हणे धीरा । विण कैसा होतो हिरा ॥३॥
3722
रणीं निघतां शूर न पाहे माघारें । ऐशा मज धीरें राख आतां ॥१॥ संसारा हातीं अंतरलों दुरी । आतां कृपा करीं नारायणा ॥ध्रु.॥ वागवितों तुझिया नामाचें हत्यार । हा चि बडिवार मिरवितों ॥२॥ तुका म्हणे मज फिरतां माघारें । तेथें उणें पुरें तुम्ही जाणां ॥३॥
3723
रत्नजडित सिंहासन । वरी बैसले आपण ॥१॥ कुंचे ढळती दोहीं बाहीं । जवळी रखुमाई राही ॥ध्रु.॥ नाना उपचारीं । सिद्धि वोळगती कामारी ॥२॥ हातीं घेऊनि पादुका । उभा बंदिजन तुका ॥३॥
3724
रत्नाच्या वोवणी कांचे ऐशा घरी । आव्हेरुनी दुरी अधिकारें ॥१॥ जातिस्वभाव आला डोळ्यां आड । तया घडे नाड न कळतां ॥ध्रु.॥ कामधेनु देखे जैशा गाईंम्हैसी । आणिकांतें ऐसी करोनियां ॥२॥ तुका म्हणे काय बोलोनियां फार । जयाचा वेव्हार तया साजे ॥३॥
3725
रवि दीप हीरा दाविती देखणे । अदृश्य दर्षने संतांचे नी ॥१॥ त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर । न कळे तो साचार ब्रम्हादिकां ॥ध्रु.॥ तापली चंदन निववितो कुडी । त्रिगुण तो काढी संतसंग ॥२॥ मायबापें पिंड पाळीला माया । जन्ममरण जाया संतसंग ॥३॥ संतांचें वचन वारी जन्मदुःख । मिष्टान्न तें भूकनिवारण ॥४॥ तुका म्हणे जवळी न पाचारितां जावें । संतचरणीं भावें रिघावया ॥५॥
3726
रवि रश्मीकळा । नये काढितां निराळा ॥१॥ तैसा आम्हां जाला भाव । अंगीं जडोनि ठेला देव ॥ध्रु.॥ गोडी साकरेपासुनी । कैसी निवडती दोन्ही ॥२॥ तुका म्हणे नाद उठी । विरोनि जाय नभा पोटीं ॥३॥
3727
रवीचा प्रकाश । तो चि निशी घडे नाश । जाल्या बहुवस । तरि त्या काय दीपिका ॥१॥ आतां हा चि वसो जीवीं । माझे अंतरी गोसावीं । होऊं येती ठावीं । काय वर्में याच्यानें ॥ध्रु.॥ सवें असतां धणी । आड येऊं न सके कोणी । न लगे विनवणी । पृथकाची करावी ॥२॥ जन्माचिया गति । येणें अवघ्या खुंटती । कारण ते प्रीति । तुका म्हणे जवळी ॥३॥
3728
राउळासी जातां त्रास मानी मोठा । बैसतो चोहोटां आदरेशीं ॥१॥ न करी स्नान संध्या म्हणे रामराम । गुरुगुडीचे प्रेम अहर्निशी ॥ध्रु.॥ देवाब्राम्हणासी जाईंना शरण । दासीचे चरण वंदी भावें ॥२॥ सुगंध चंदन सांडोनियां माशी । बसे दुगपधीशीं अतिआदरें ॥३॥ तुका म्हणे अरे ऐक भाग्यहीना । कां रे रामराणा विसरसी ॥४॥
3729
राजस सुंदर बाळा । पाहों आलिया सकळा वो । बिबीं बिंबोनि ठेली । माझी परब्रम्ह वेल्हाळा वो । कोटि रविशशि माझी । परब्रम्ह वेल्हाळा वो ॥१॥ राजस विठाबाई । माझें ध्यान तुझे पायीं वो । त्यजुनियां चौघींसी । लावी आपुलिये सोई वो ॥ध्रु.॥ सकुमार साजिरी । कैसीं पाउलें गोजिरीं वो । कंठीं तुळसीमाळा । उभी भीवरेच्या तिरीं वो । दंत हिरया ज्योति । शंखचक्र मिरवे करीं वो ॥२॥ निर्गुण निराकार । वेदां न कळे चि आकार वो । शेषादिक श्रमले । श्रुती न कळे तुझा पार वो । उभारोनि बाहे । भक्तां देत अभयकर वो ॥३॥ येउनि पंढरपुरा । अवतरली सारंगधरा वो । देखोनि भक्ति भाव । वोरसली अमृतधारा वो । देउनि प्रेमपान्हा । तुकया स्वामीनें किंकरा वो ॥४॥
3730
राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥१॥ कस्तुरीमळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती ॥ध्रु.॥ मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतलें सकळ ही ॥२॥ कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सांवळा बाइयानो ॥३॥ सकळ ही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥४॥
3731
राजा करी तैसे दाम । ते ही चाम चालती ॥१॥ कारण ते सत्ता शिरीं । कोण करी अव्हेर ॥ध्रु.॥ वाइले तें सुनें खांदीं । चाले पदीं बैसविलें ॥२॥ तुका म्हणे विश्वंभरें । करुणाकरें रिक्षलें ॥३॥
3732
राजा चाले तेथें वैभव सांगातें । हें काय लागतें सांगावें त्या ॥१॥ कोणी कोणा एथें न मनी जी फुका । कृपेविण एका देवाचिया ॥ध्रु.॥ शृंगारिलें नाहीं तगोंयेत वरि । उमटे लौकरि जैसे तैतें ॥२॥ तुका म्हणे घरीं वसे नारायण । कृपेची ते खुण साम्या येते ॥३॥
3733
राजा प्रजा द्वाड देश । शाक्त वास करिती तो ॥१॥ अधर्माचें उबड पीक । धर्म रंक त्या गांवीं ॥ध्रु.॥ न पिके भूमि कांपे भारें । मेघ वारें पीतील ॥२॥ तुका म्हणे अवघीं दुःखें । येती सुखें वस्तीसी ॥३॥
3734
रात्री दिवस आम्हां युद्धाचा प्रसंग । अंतर्बाह्य जग आणि मन ॥१॥ जीवा ही आगोज पडती आघात । येऊनियां नित्य नित्य करी ॥२॥ तुका म्हणे तुझ्या नामाचिया बळें । अवघीयांचें काळें केलें तोंड ॥३॥
3735
राम कहे सो मुख भला रे । बिन रामसें बीख । आव न जानूं रमते बेरों । जब काल लगावे सीख ॥१॥
3736
राम कहे सो मुख भलारे । खाये खीर खांड । हरिबिन मुखमो धूल परी रे । क्या जनि उस रांड ॥१॥
3737
राम कहो जीवना फल सो ही । हरिभजनसुं विलंब न पाईं ॥ध्रु.॥ कवनका मंदर कवनकी झोपरी । एकारामबिन सब हि फुकरी ॥१॥ कवनकी काया कवनकी माया । एकरामबिन सब हि जाया ॥२॥ कहे तुका सब हि चेलक्तहार । एकारामविन नहिं वासार ॥३॥
3738
राम कृष्ण ऐसीं उच्चारितां नामें । नाचेन मी प्रेमें संतांपुढें ॥१॥ काय घडेल तें घडो ये सेवटीं । लाभ हाणी तुटी देव जाणे ॥ध्रु.॥ चिंता मोह आशा ठेवुनि निराळीं । देईन हा बळी जीव पायीं ॥२॥ तुका म्हणे कांहीं उरों नेदीं उरी । सांडीन हे थोरी ओवाळोनी ॥३॥
3739
राम कृष्ण गोविंद नारायण हरी । केशवा मुरारी पांडुरंगा ॥१॥ लक्ष्मीनिवासा पाहें दिनबंधु । तुझा लागो छंदु सदा मज ॥२॥ तुझे नामीं प्रेम देई अखंडित । नेणें तप व्रत दान कांहीं ॥३॥ तुका म्हणे माझें हें चि गा मागणें । अखंड ही गाणें नाम तुझें ॥४॥
3740
राम म्हणतां कामक्रोधांचें दहन । होय अभिमान देशधडी ॥१॥ राम म्हणतां कर्म तुटेल भवबंधन । नये श्रम सीण स्वप्नास ही ॥ध्रु.॥ राम म्हणे जन्म नाहीं गर्भवास । नव्हे दारिद्रास पात्र कधीं ॥२॥ राम म्हणतां यम शरणागत बापुडें । आढळ पद पुढें काय तेथें ॥३॥ राम म्हणतां धर्म घडतील सकळ । त्रिमिर पडळ नासे हेळा ॥४॥ राम म्हणतां म्हणे तुकयाचा बंधु । तरिजेल भवसिंधु संदेह नाहीं ॥५॥
3741
राम म्हणतां तरे जाणता अणतां । हो का यातिभलता कुळहीन ॥१॥ राम म्हणतां न लगे आणीक सायास । केले महा दोष तेही जळती ॥ध्रु.॥ राम म्हणे तया जवळी नये भूत । कैचा यमदूत म्हणतां राम ॥२॥ राम म्हणतां तरे भवसिंधुपार । चुके वेरझार म्हणतां राम ॥३॥ तुका म्हणें हें सुखाचें हें साधन । सेवीं अमृतपान एका भावें ॥४॥
3742
राम म्हणतां राम चि होइजे । पदीं बैसोन पदवी घेइजे ॥१॥ ऐसें सुख वचनीं आहे । विश्वासें अनुभव पाहें ॥ध्रु.॥ रामरसाचिया चवी । आन रस रुचती केवीं ॥२॥ तुका म्हणे चाखोनि सांगें । मज अनुभव आहे अंगें ॥३॥
3743
राम म्हणे ग्रासोग्रासीं । तो चि जेविला उपवासी ॥१॥ धन्यधन्य तें शरीर । तीर्थांव्रतांचे माहेर ॥ध्रु.॥ राम म्हणे करितां धंदा । सुखसमाधि त्या सदा ॥२॥ राम म्हणे वाटे चाली । यज्ञ पाउलापाउलीं ॥३॥ राम म्हणें भोगीं त्यागीं । कर्म न लिंपे त्या अंगीं ॥४॥ ऐसा राम जपे नित्य । तुका म्हणे जीवन्मुक्त ॥५॥
3744
राम राज्य राम प्रजा लोकपाळ । एक चि सकळ दुजें नाहीं ॥१॥ मंगळावांचूनि उमटेना वाणी । अखंड चि खाणी एकी रासी ॥ध्रु.॥ मोडलें हें स्वामी ठावाठाव सेवा । वाढवा तो हेवा कोणा अंगें ॥२॥ तुका म्हणे अवघें दुमदुमिलें देवें । उरलें तें गावें हें चि आतां ॥३॥
3745
राम राम दोनी अक्षरें । सुलभ आणि सोपारें । जागा मागिले पाहारें । सेवटिचें गोड तें चि खरें गा ॥१॥ राम कृष्ण वासुदेवा । जाणवी जनासि । वाजवी चिपळिया । टाळ घागर्‍याघोषें गा ॥ध्रु.॥ गाय वासुदेव वासुदेवा । भिन्न नाहीं आणिका नांवा । दान जाणोनियां करीं आवा । न ठेवीं उरीं कांहीं ठेवा गा ॥२॥ एक वेळा जाणविती । धरूनियां राहा चित्तीं । नेघें भार सांडीं कामा हातीं । नीज घेउनि फिरती गा ॥३॥ सुपात्रीं सर्व भाव । मी तों सर्व वासुदेव । जाणती कृपाळु संत महानुभाव । जया भिन्न भेद नाहीं ठाव गा ॥४॥ शूर दान जीवें उदार । नाहीं वासुदेवी विसर । कीर्ति वाढे चराचर । तुका म्हणे तया नमस्कार गा ॥५॥
3746
रामकृष्ण गीती गात । टाळ चिपळ्या वाजवीत । छंदें आपुलिया नाचत । नीज घेऊनि फिरत गा ॥१॥ जनीं वनीं हा अवघा देव । वासनेचा हा पुसावा ठाव । मग वोळगती वासुदेव । ऐसा मनीं वसूं द्यावा भाव गा ॥ध्रु.॥ निज दासाची थोर आवडी । वासुदेवासि लागली गोडी । मुखीं नाम उच्चारी घडोघडीं । ऐसी करा हे वासुदेवजोडी गा ॥२॥ अवघा सारूनि सेवट जाला । प्रयत्न न चले कांहीं केला । जागा होई सांडुनि झोपेला । दान देई वासुदेवालागा ॥३॥ तुका म्हणे रे धन्य त्याचें जिणें । जींहीं घातलें वासुदेवा दान । त्याला न लगे येणें जाणें । जालें वासुदेवीं राहणे गा ॥४॥ गांवगुंड - अभंग १
3747
रामनाम हा चि मांडिला दुकान । आहे वानोवाण घ्यारे कोणी ॥१॥ नका कोणी करूं घेता रे आळस । वांटितों तुम्हांस फुकाचें हें ॥ध्रु.॥ संचितासारिखे पडे त्याच्या हाता । फारसें मागतां तरी न ये ॥२॥ तुका म्हणे आम्हीं सांठविलें सार । उरलिया थार विचारितां ॥३॥
3748
रामनामाचे पवाडे । अखंड ज्याची वाचा पढे ॥१॥ धन्य तो एक संसारीं । रामनाम जो उच्चारी ॥ध्रु.॥ रामनाम गर्जे वाचा । काळ आज्ञाधारक त्याचा ॥ २ ॥ तुका म्हणे रामनामीं । कृतकृत्य जालों आम्हीं ॥३॥
3749
रामभजन सब सार मिठाईं । हरि संताप जनमदुख राईं ॥ध्रु.॥ दुधभात घृत सकरपारे । हरते भुक नहि अंततारे ॥१॥ खावते जुग सब चलिजावे । खटमिठा फिर पचतावे ॥२॥ कहे तुका रामरस जो पावे । बहुरि फेरा वो कबहु न खावे ॥३॥
3750
रामराम उत्तम अक्षरें । कंठीं धरिलीं आपण शंकरें ॥१॥ कैसीं तारक उत्तम तिहीं लोकां । हळाहळ शीतळ केलें शिवा देखा ॥ध्रु.॥ हा चि मंत्र उपदेश भवानी । तिच्या चुकल्या गर्भादियोनि ॥२॥ जुन्हाट नागर नीच नवें । तुका म्हणें म्यां धरिलें जीवें भावें ॥३॥

Labels

Followers