संत एकनाथ अभंग - 1



ॐ कार स्वरुप सदगुरु असंग । अक्षय अभंग पांडुरंग ॥१॥ नसे ज्याचा ठायीं द्वैतद्वैत भाव । ब्रह्मा स्वयमेव पाडूरंग ॥२॥ मस्तक हें माझे तयांचे चरणी । असे जनीं वनीं पांडुरंग ॥३॥ सदसदभाव हे नसती ज्यांचे ठायीं । नित्य तो मी गाई पाडुंरंग ॥४॥ गुरुराज माझा दीनांचा दयाळ । तो डीमायाजाळ पांडुरंग ॥५॥ रवी शशी दीप्ती जेणें प्रकाशती । तो ही तेजमुर्ती पांडुरंग ॥६॥ वेद जयालागीं नित्य वाखाणिती । तो हा वेदमुर्ती पाडुरंग ॥७॥ श्रीमान हा माझा सदगुरु समर्थ । देई मोक्ष स्वार्थ पांडुरंग ॥८॥ पांचा भुतांची जो करितो झाडणी । तो हा ज्ञानखाणी पांडुरंग ॥९॥ डुरकणी देई मोह पंचानन । करी त्या हनन पांडुरंग ॥१०॥ रंगे चित्त माझे तयाच्या स्वरुपीं । असे आप आपीं पाडुरंग ॥११॥ गर्व अभिमान सोडावा समूळ । भेटे तो दयाळ पाडुरंग ॥१२॥ महामाया एके क्षणांत निरसी । सुखाची पै राशी पाडुरंग ॥१३॥ हाव ही धरी जो सदगुरुपायाची । इच्छा पुरवी त्याची पांडुरंग ॥१४॥ राजा त्रैलोक्याचा गुरुराजस्वामी । वसे अंतर्यामी पाडुरंग ॥१५॥ जायां पुत्र धन तयासी अपील । सर्वस्वे रक्षील पांडुरंग ॥१६॥ यमाची जाचणी तयासी चुकली । गुरुमुर्ति भेटली पाडुरंग ॥१७॥ प्रभा हे जयाची पसरली जनीं । चिदरुपणाची खाणी पाडुरंग ॥१८॥ भुतळीं; या नसे दुजा कोनी ऐसा । भक्तांचा कोंवसा पाडुरंग ॥१९॥ नेई भक्तांसे जो आपुल्या समीप । तो हा मायाबाप पांडुरंग ॥२०॥ इति कर्वव्याता हीच दासालागीं । सेवावा हा जगीं पाडुरंग ॥२१॥ तीकडी सांखळी त्रिगुनाची तोडी । भवातूनि काढी पाडुरंग ॥२२॥ उपमा तयासी काय देऊम आतां । सकाळार्थ दाता पाडुरंग ॥२३॥ परोपकारालागीं अवतार केला । आनंदाचा झेल पांडुरंग ॥२४॥ नाम हें तयाचें जन्ममरण वारी । भक्तां सहाकरी पाडुरंग ॥२५॥ मन हें जडलें तयाचियां पदीं । उतरी भवनदी पाडुरंग ॥२६॥ कायवाचामनें स्वरुपी रहावें । नाम आठवावें पाडुरंग ॥२७॥ यम नियम साधीं साधन अष्टांग । होईल सर्वांग पाडुरंग ॥२८॥ एका जनार्दनीं देह हारपला । होऊनि राहिला पाडुंरंग ॥२९॥

ॐ कार हा वर्ण नामाचें पैं मूळ । परब्रह्मा केवळ रामनाम ॥१॥ रामकृष्ण हरी गोविंदा गोपाळा । आठवा वेळोवेळां अहो जन ॥२॥ एका जनार्दनीं वदतां वैखरीं । देखे चराचरीं परब्रह्मा ॥३॥

ॐ कार हा वृक्ष विस्तारला । चतुःशाखें थोर जाहला । पुढें षडंतर शाखें विस्तारला । आठरांचा तया मोहोर आला ॥१॥ उघडें माझें कोडें । जाणती न जाणती ते वेडे । पडलें विषयांचें सांकडें । तया न कळे हें कोडें रे ॥२॥ चौर्‍यांयशी लक्ष पत्रे असती । सहस्त्र अठ्ठ्यायंशी पुष्पें शोभती । तेहतीस कोटी फळें लोंबती । ऐशी वृक्षाची अनुपम्य स्थिती रे ॥३॥ आदि मध्य अंत पाहतां न लगे मुळ । एकवीस स्वर्ग सप्त पाताळ । एका जनार्दनीं वृक्ष तो सबळ । उभा विटेवरी समुळ वो ॥४॥

ॐ कार हें मुळ सर्वांचे जाणावें । तेथुनी पहावें वेदशास्त्र ॥१॥ नमन करावें कुळदैवतांसी । मातापितरांसी सर्व भावें ॥२॥ मस्तक ठेवावें संतांचे चरणीं । सदा वसो वाणी शिवनाम ॥३॥ शिव शिव ऐसें उच्चारावें मुखें । जन्ममरण दुःखें नासताती ॥४॥ वायां जाऊं देऊं नये एक क्षण । भक्तीचे लक्षण जाणावें हें ॥५॥ यमधर्म त्याचे पाय पै वंदित । एका जनार्दनीं नित्य नाम गाय ॥६॥

ॐ कारा परतें निर्गुणा आरुतें । भक्तांसी निरुतें गोकुळीं वसे ॥१॥ सांवळें सगुन चैतन्य परिपुर्ण । संवगदियासी जाण क्रीडा करी ॥२॥ आदि मध्य अंत न कळे ज्या रुपाचा । तोचि बाळ नंदाचा म्हणताती ॥३॥ एका जनार्दनीं वेगळाचि पाहीं । हृदयीं धरुनी राही सांवळियासी ॥४॥

ॐ नमो सदगुरुनिर्गुणा । पार नाहीं तंव गुणा । बसोनि माझिया रसना । हरिगुणा वर्णवीं ॥१॥ हरिगुण विशाळ पावन । वदवीं तूं कृपा करुन । मी मूढमती दीन । म्हणोनि कींव भाकितसें ॥२॥ तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण । हरिगुण वर्णीन मी जाण । एका वंदितसें चरण । सदगुरुचें आदरें ॥३॥

ॐ नमोजी शिवा । नमो तुज महादेव करुनी उपकार जीवा । अवतार धरिला ॥१॥ सोपा मंत्र रामनाम । तेणें झालें सर्व काम । साधनांचा श्रम । गोवा उगविअला ॥२॥ बैसनियां दृढासनीं । नाम जपे निशिदीनीं । तयासी अवनीं । सोपी दिसे ॥३॥ बरवें साधन उत्तम । अवघा निवारिला श्रम । गातां तुमचें नाम । वंद्य तिहें लोकीं ॥४॥ जड जीव उद्धरिले । कलिमाजीं सोपें केलें । रामराम जप वहिलें । थोर साधन हें ॥५॥ अवतार धरुनी साचा । उद्धार केला जड जीवांचा । एका जनार्दनीं नामाचा । वाढविला महिमा ॥६॥

ॐ नमोजी सदाशिवा । ब्रह्मादिकांन कळे लाघवा । तुम्हीं स्वामी देवाधिदेवा । ध्यान करितासां कवणाचें ॥१॥ ऐक रमणीय पार्वती त्रैलोक्यांत ज्याची कीर्ति । पुराण वेद जया वानिती । तो श्रीपती ध्योतीं मी ॥२॥ आवड कीर्तन चित्ती । रंगीं नाचतो जया वैकुंठपति । माझी धांव तेथें निश्चिती । ते सुखविश्रांती काय सांगूं ॥३॥ भाळे भोळे हरीचे दास । कीर्तनरंगीं नाचती उदास । त्यांच्या भार वाहें मी सर्वेश । उणे तयांस येऊं नेदीं ॥४॥ ऐसा अनुवाद कैलासगिरीं । गिरिजेसी सांगे त्रिपुरारी । एका जनार्दनीं सत्य निर्धारी । कीर्तनगजरीं उभे तिन्हीं देव ॥५॥

ॐकरस्वरुपा सदगुरु समर्था । अनाथाच्या नाथा तुज नमो ॥१॥ नमो मायाबापा गुरु कॄपाघना । तोडी या बंधना माया मोहा ॥२॥ मोहोजाळ माझें कोण आणि निरशील । तुजवीण दयाळा सदगुरुराया ॥३॥ सदगुरुराया माझा आनंदसागर । त्रैलोक्य आधार गुरुराव ॥४॥ गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश । ज्यापुढें उदास चंद्र रवीं ॥५॥ रवि शशि अग्नि नेणती ज्या रुपा । स्वप्रकाशरुपा नेणें वेद ॥६॥ वेदां पडलें मौन शास्त्रें वेडावलीं । वाचा हे निमाली ते श्रीगुरु ॥७॥ श्रीगुरु जयासी पाहे कृपादृष्टी । तयासी हे सृष्टी पांडुरंग ॥८॥ पांडुरंग माझा दीना मायबाप । नासी सर्व पाप भाव दुजा ॥९॥ दुजेपणा ठाव नाही जया रुपीं । तेथें आपोआपीं मन रंगें ॥१०॥ रंगे चित्त माझे सदगुरुचरणीं । स्वरुप निर्वाणी होय गती ॥११॥ गति अधोगति दोनी या नासती । सदगुरुची मुर्ति ध्यातां मनीं ॥१२॥ मनीं वसे ज्याच्या सदगुरुदयाळ । तयासी सकळ सिद्धि हातीं ॥१३॥ हातीं मोक्ष परी नावडत्या ठायीं । सदगुरुच्या पायीं बुद्धि राहे ॥१४॥ राहे गुरुगृही सदा सर्व काळ । परब्रह्मीं केवळ होय जागा ॥१५॥ जागा शिष्य चित्त सदगुरु वसती । कैसी असे स्थिती शमदमीं ॥१६॥ शमादिकी चित्त जयाचें निर्मळ । तेथें तो गोपाळ वसे प्रभु ॥१७॥ प्रभुराज माझा स्वामी गुरुराव । देतो मज भाव शुद्ध भुमि ॥१८॥ भूमि शुद्ध करी ज्ञानबीज पेरी । अद्वैत हें धरी मी तुं नेणें ॥१९॥ नेणें मी तुं कांहीं द्वैतादैत भाव । एक स्वयमेव आत्मा इति ॥२०॥ इतिकर्तव्यता हीच दासालागीं । माया गुणसंगीं नाश तिचा ॥२१॥ तिचा नाश करणे हाचि येक थोरु । करिता सदगुरु उपकार ॥२२॥ उपकारा त्याच्यानोहे उतराई । ठेवीम जीव पायीं थोडा पाहा ॥२३॥ पाहा गुरुरायें ब्रह्मा दाखविलें । अखंड स्मरविलें मज नाम ॥२४॥ नाम निरामय अज अविनाशी । प्रिय तेंमानसी सदा मज ॥२५॥ मजलागीं माझी सदगुरु माउली । करा कृपा साउली वर्णू काय ॥२६॥ काय वर्णू माझ्य सदगुरु दयाळा । बहुत कळवळा दासा यया ॥२७॥ यया दासा मनीं सदगुरुचें ध्यान । झालासे तल्लीन गुरुपायीं ॥२८॥ एका जनार्दनी गुरु परब्रह्मा । तयांचें पैं नाम सदा मुखीं ॥२९॥
१०
ॐकार सह मकार आदि अंत नाहीं जया । तें पुंडलिक भुलवोनि आणिलें या ठायां ॥१॥ भुललें वो माय पुंडलिकांप्रीतीं । उभाचि राहे परी खेद न करी चित्तीं ॥२॥ अथरा पुराणांसी वाडशास्त्रें वेदादती ॥ तो सांवळा श्रीकृष्ण उभा विटे पुंडलिकाचे भक्ति ॥३॥ वेद वेदांतरें मत मतांतरें न कळे श्रुती पैं वेवादती । तोएका जनार्दनांचे ह्रुदयी सांवळा घेउनि बुंथीं ॥४॥
११
ॐनमो ज्ञानेश्वरा । करुणाकरा दयाळा ॥१॥ तुमचा अनुग्रह लाधलों । पावन जालों चराचरीं ॥२॥ मी कळाकुसरी काहींच नेणें । बोलतों वचनें भाविका ॥३॥ एका जनार्दनीं तुमचा दास । त्याची आस पुरवावी ॥४॥
१२
अंकित अंकिला । देव भक्तांचा पैं जाला ॥१॥ पहा पुंडलीकासाठी । उभा असें वाळूवंटीं ॥२॥ युगें अठ्ठावीस जालीं । न बैसें अद्यापि तो खालीं ॥३॥ न बैसोनि उभा असे । एका जनार्दनीं भक्तिपिसें ॥४॥
१३
अंकित अंकिला भक्तांचा कैवारी । वेद निरंतरी वाखाणिता ॥१॥ तें रुप गोजिरें सांवळें साजिरें । उभे तें भीवरे पैलथडीं ॥२॥ योगीयांचे ध्यान पारुषलें मन । ते समचरण विटेवरी ॥३॥ एका जनार्दनी चहूं अठरा वेगळा । न कळे ज्यांची लीला सनकादिकां ॥४॥
१४
अंकित भक्ताचा । नीच काम करी साचा ॥१॥ काढी धर्माघरीं । उच्छिष्ट पात्रें निर्धारीं ॥२॥ कुब्जेसी रतला । एका जनार्दनीं भला ॥३॥
१५
अंकितपणें राहिला उभा । विठ्ठल चैत्यन्याच गाभा । उजळली दिव्य प्रभा । अंगकांति साजिरी ॥१॥ पीतांबर माळ कंठीं । केशर कस्तुरीची उटी । मुगुटा तळवटीं । मयुरपिच्छें शोभती ॥२॥ सनकादिकांचें जेंध्यान । उभें विटे समचरण । भक्तांचें ठेवणें । जाप्य गौरीशिवाचे ॥३॥ तो देवाधिदेव विठ्ठल । वाचे वद्तां न लगे मोल । एका जनार्दनीं बोल । फुकाचें तें वेचितां ॥४॥
१६
अंकिला देव संतद्वारीं । भिक्षा मागें तो निर्धारीं ॥१॥ मज द्याहो प्रेमभिक्षा । देव बोले तया प्रत्यक्षा ॥२॥ नाम गाणें हेंचि दक्ष । एका जनार्दनीं प्रत्यक्ष ॥३॥
१७
अंगा लावुनियां राख । करी भलतेंची पाप ॥१॥ मेळवी शिष्यांचा मेळा । अवघा भांगेचा घोंटाळा ॥२॥ नानापरी सांगे मंत्र । नेणें विधीं अपवित्र ॥३॥ न कळे ज्ञानाची हातवटी । सदां परदार राहाटी ॥४॥ एका जनार्दनीं सोंग । तेथें नाहीं पांडुरंग ॥५॥
१८
अंगावरी आलिया घाव । अवघा देव निवारी ॥१॥ काया वाचा शरण आतां । नुपेक्षी अनाथा विठ्ठल ॥२॥ मुख्य आधीं पाहिजे भाव । तेणें देव कव घाली ॥३॥ एका जनार्दनीं भावापाठीं । धावें उठाउठी देव मागें ॥४॥
१९
अंगासी राख ढूंगासी लंगोटी । गोसावे हातवटी मिरविती ॥१॥ अल्लख म्हणोनि भिक्षा मागताती । अलखाची गती न कळे मूढां ॥२॥ भांगेचा सुकाळ चेले करी मूढ । यम तया दृढ दंड करी ॥३॥ अलक्ष अलक्ष आलख कळेना । जगीं विटंबना उगीच करिती ॥४॥ एका जनार्दनीं नको ऐसें सोंग । तेणें पांडुरंग अंतरेल ॥५॥
२०
अंगीं चंदनाची उटी । माथां शोभे मयोरवेटी ॥१॥ शंख चक्र पद्म करीं ।उभा विटेवरी श्रीहरीं ॥२॥ भोवतें उभे सनकादिका । नारद तुंबरादि आणिक ॥३॥ ऐसा आनंद सोहळा । एका जनार्दनी पाहे डोळां ॥४॥
२१
अंगीं जया पुर्ण शांती । वाचा रामनाम वदती । अनुसरले चित्तवृत्तीं । संतचरणीं सर्वदा ॥१॥ घडो तयांचा मज संग । जन्ममरणाचा फिटतसे पांग । आधिव्याधि निरसोनी सांग । घडतां संग वैष्णवांचा ॥२॥ जें दुर्लभ तिहीं लोकां । आम्हां सांपडलें फुका । एका जनार्दनीं घोका । नाम त्यांचे आवडी ॥३॥
२२
अंगे येऊनियां रामें नवल पैं केलें भवाब्धी बांधिली सेतु । अतिशयेसी जड दगड तैसें मुढ नामेंचि तारितु । अविश्वासिया तेथे मार्गचि न कळे स्वेतबंधीं भवें आवर्तु रया ॥१॥ रामीं आरामु त्या संसार समु अभिमानियां तोचि पशु । अंतरीं बोध नाहीं बाहेरी ज्ञातेपण लटक्याचा न घेती त्रासु ॥धृ ॥ सर्वातरीं राम म्हणोनि बोलती परी बोला ऐसी नाहींस्थिती । चरणीं लागल्या शीळा उद्धारल्या हें तव रायाची ख्याती । तेंचि रामु हृदयीं अविश्वासें नरका जाती रया ॥२॥ राम म्हणता गणिका उद्धरिली सरला संसारलेशु । सकळ शास्त्र मंथुनि श्रुति वाखणितां नये चित्तींचा विश्वासु । वेश्यें निपटा रे वाचुनियां जालों मी नुरेचि संसारपाशु रया ॥३॥ अंतरीं रामनाम सांगती कानीं परी न सांगती वेदध्वनीं । वेदांचा विश्वासु कर्म प्रकृति परी राम तारिल निर्वाणीं । तोचि राम जीतां विश्वासें भजाल तरी सेवक होईल निदानीं ॥४॥ सांडोनि अभिमान विश्वासें भजाल तरी स्वयोंचि व्हाल राम । मातीयेची मूर्ति द्रोण करुनिया कीं लौकिका फावला भावो । एका जनार्दनीं एकपणें भजतां संसारासी नुरे ठावो रया ॥५॥
२३
अंतरशुद्धीचें कारण । वाचे करा हरिकीर्तन ॥१॥ देवा आवडी कैसी । धेनु धांवे वत्सा जैसी ॥२॥ कीर्तनीं तारिला गणिका । नामस्मरणें मोक्ष देखा ॥४॥ किर्तनीं तारिली गणिका । नामस्मरणें मोक्ष देखा ॥४॥ ऐशी कीर्तनाची गोडी । एका जनार्दनीं घाली उडी ॥५॥
२४
अंतरीं भरला दृढ काम । वरीवरी दावीतसे नेम ॥१॥ जैसें फळ वृंदावन । परी अंतरीं कडुं पूर्ण ॥२॥ सदा वाहे तळमळ चित्त । वरीवरी दावी परमार्थ ॥३॥ एका शरण जनार्दनीं । ऐसे नर पापखाणी ॥४॥
२५
अंतरीं विचार करितो श्रीहरी । सुदाम्याचे घरीं फ़ार कष्ट ॥१॥ विश्वकर्म्यालागीं पाचारिलें तेव्हां । सांगतसे निर्मावा ग्राम ऐसा ॥२॥ जैशी हे द्वारावती दिसती साजिरी । ऐशी सुदामपुरी रची वेगीं ॥३॥ एका जनार्दनीं तुष्टलासे देव । मग कैंचें भेव दैन्याचें तें ॥४॥
२६
अंतरीं शुद्ध नाहीं भाव । वरी मिरवी वैराग्य ॥१॥ जळो जळो त्याचें ज्ञान । काय नटाचें भाषण ॥२॥ टिळा टोपी दावी सोंग । बकध्याना मिरवी रंग ॥३॥ शरण एका जनादनीं । त्याचा मंत्र न घ्यावा कानीं ॥४॥
२७
अंतरींचा भाव दृढ धरी मना । सेवीं तूं चरणा विठोबाच्या ॥१॥ आणिक नको कष्ट कांहीं । राममुखीं गायी सदा नेमें ॥२॥ आकार निराकार सर्वही व्यापक । तो उभा सम्यकक समपदीं ॥३॥ एका जनार्दनीं वाहूनियां आण । विठ्ठलाचे चरण ध्यावे आधीं ॥४॥
२८
अंबऋषिराया पडिले सायास । सोसी गर्भवास स्वयें देव ॥१॥ उच्छिष्टहीं खातां प्रायश्चित्त असे । गोपाळांचें ग्रास खाय हरी ॥२॥ एका जनार्दनीं भक्तांचा अंकित । म्हणोनी तिष्ठत विटेवरी ॥३॥
२९
अकळ अनुपम्य तुझी लीला । न कळे अकळा सर्वासी ॥१॥ वेदशास्त्रां न कळे पार । षडनिर्विकार दर्शनें ॥२॥ जों जों धरुं जावा संग । तों तों विरंग उपाधी ॥३॥ शरण एका जनार्दनीं । रंकाहुनी मी रंक ॥४॥
३०
अकळ तो खेळ नाकळे वेदांतीं । वाउलें कुंथती भारवाही ॥१॥ ऐसा तो अकळ न कळेची कळा । लावियेला चाळा सर्व जीवा ॥२॥ परस्परें एकएका पैं मैत्री । ऐशी चाले धात्री पंचभुतें ॥३॥ जगपटतंतु आपणचि होय । ऐसा हा निश्चय सत्ता ज्याची ॥४॥ एका जनार्दनीं सर्वसत्ताधारी । न माय चराचरी कीर्ति ज्याची ॥५॥
३१
अकार उकार मकार नामचि ठेविलें । शिवतेंहि केलें निराकार ॥१॥ जीव शिव दोन्हीं विराले ज्यामाजीं । ते नाम सहजीं विठ्ठल होय ॥२॥ नामावीया नाहीं आणिकांसी ठाव । दुजा नाहीं भाव जीवां सर्वां ॥३॥ एका जनार्दनीं नाम घनदाट । भुवैकुंठ पेठ पंढरी देखा ॥४॥
३२
अकार उकार मकार योगीयांची स्थिती । हे प्रकाशज्योति विटेवरी ॥१॥ सबाह्म परिपुर्न भरुनी उरलें । अलक्ष्य तें जाहलें लाक्ष्याकार ॥२॥ सुक्ष्म सरळ दिसतें प्रबळ । एका जनार्दनीं सुढाळ विटेवरी ॥३॥
३३
अकार उकार मकारां वेगळां । परब्रह्मा पुतळा शिव एक ॥१॥ अंडज जारज स्वदेज उद्भिजां वेगळा । परब्रह्मा पुतळा शिव एक ॥२॥ प्राण अपान व्यान उदान समान । यांवेगळा जाण शिव एक ॥३॥ पृथ्वी आप तेज वायु आकाश । यांवेगळा भास शिव एक ॥४॥ द्वैता अद्वैता वेगळांचि जाण । एका जनार्दनीं पूर्ण शिव एक ॥५॥
३४
अकार उकार मकारांपरता सर्वेश्वर । कटीं धरुनी कर उभा विटे ॥१॥ नीरा भीवरा संगम पुंडलीक मुनी । नारद वेणुनाद ऐसेंस्थळ लक्षुनी ॥२॥ योगियां हृदयींचें ठेवणें गोमटें । जोडलें उद्भटे पुंडलीका ॥३॥ आषाढी कार्तिकी आनंद सोहळा । संताचा मेळा घनवट ॥४॥ एका जनार्दनीं जनार्दन एकपणीं । त्रैलोक्यांचा धनी विटेवरी ॥५॥
३५
अकार तो अकारु मकार तो मकारु । उकाराचा पालाऊ शोभे गे माय ॥१॥ आदि अंत नसे ज्या रुपा वेगळें । तें कैसें वोळलें पुंडलिका गे माय ॥२॥ वेद उपरमला पुराणें कुंठीत । शास्त्रांची मती नेणत तया सुखा गे माय ॥३॥ जाणते नेणते सर्व वेडावले । ठकलेचि ठेलें सांगुं काय गे माय ॥४॥ या पुंडलिकें वेडविलें चालवुनि गोविलें । एका जनार्दनीं उभें केलें विटेवरी गे माय ॥५॥
३६
अखंड वाचे नाम । तया न बाधी क्रोध काम ॥१॥ रामनाम वदता वाचे । ब्रह्मासुख तेथें नाचें ॥२॥ राम नाम वाचे टाळी । महादोषां होय होळीं ॥३॥ दो अक्षरासाठीं । ब्रह्मा लागे पाठोपाठीं ॥४॥ एका जनार्दनीं नाम । सहज चैतन्य निष्काम ॥५॥
३७
अखंड सदा ध्यान । पाडुरंगी लावा मन ॥१॥ ऐसा उदार हा हिरा । टाकूनी वेचिताती गारा ॥२॥ अमृत सांडोनी । बळें घेती कांजवंणी ॥३॥ कामधेनु कल्पतरु । एका जनार्दनीं आगरु ॥४॥
३८
अखंडित वाचे । विठ्ठल वदा साचें ॥१॥ तेणें चुकतीं बंधन । कर्माकर्मीं नाहीं पतन ॥२॥ सदा विठ्ठल ध्यानी मनीं । तोचि पुण्यपावन जनीं ॥३॥ जननी पवित्र तयांची हाव । एका जनार्दनीं धन्य सुख ॥४॥
३९
अखंडित संतसंग । तेथें काय सुखा उणें मग ॥१॥ माझे आलें अनुभवा । संतसेवा घडावी ॥२॥ हेंचि मागें आणिक नाहीं । संतसंग देई सर्वकाळ ॥३॥ एका जनार्दनीं धरुनि विश्वास । होईन त्यांचा दास जन्मोजन्मीं ॥४॥
४०
अगम्य तुझा खेळ । ब्रह्मादिकां तो अकळ । नेणवेचि सबळ । वेदशास्त्रां ॥१॥ तो वसे पंढरपुरीं । कट धरिलें दोनी करीं । पीतांबर साजिरी । बुंथी शोभे तयासी ॥२॥ तुळशीमाळा शोभती गळां । कांसे कसिला सोनसळां । पदक आणि वनमाळा । वैजयंती शोभती ॥३॥ वामभागीं ती रुक्मीणी । राही सत्यभामा दोन्हीं । पुढें पुंडलीक मनी । तीर्थ तें चंद्रभागा ॥४॥ वेणुनाद गोपाळपुर । पद्माळें तें परिकर । बिंदुतीर्थ सर्वेश्वर । सभोंवती शोभातातीं ॥५॥ गरुड हनुमंता दोन्हीं । शोभाताती राउळांगणीं । विठ्ठमूर्ति धणी । पाहतांचि सुखावें ॥६॥ भक्त उभे सहपरिवार । करिती नामाचा गजर । एका जनार्दनीं परिकर । सेवा तेथें करितसें ॥७॥
४१
अगम्य तुझा खेळ न कळे अकळ । ब्रह्मादिक वेडे जाले तेथें आम्हां कैचें बळ ॥१॥ कान्होबा भला भला तुं होसी । चोरी करुनि दिसों न देसी रे कान्होबा ॥२॥ चोरुनी शिदोर्‍या आमुच्या खासी । शेखी वळतीया धाडिसी रे कान्होबा ॥३॥ एका जनार्दनीं आमुचा होंसी । दास्यात्व करुनी दिसों न देसी कान्होबा ॥४॥
४२
अगाध चरणाचें महिमान । वेदशास्त्रां पडिलें मौन ॥१॥ चरणें तारिलें पाषाण । चरणें तारिलें भक्तजन ॥२॥ तारियेलें प्रल्हादासी । उद्धारिले अजामेळासी ॥३॥ एका जनार्दनीं शरण । चरण तिहीं लोकीं पावन ॥४॥
४३
अगाध चरणाचें महिमान वानितां वेदां पडिलें मौन्य ॥१॥ पुराणें वर्णितां भागलीं सहाशास्त्रें वेडावलीं ॥२॥ तें पुडलिकांचे लोभें एका जनार्दनीं विटे उभें ॥३॥
४४
अगाध जीवनीं मत्स्य ते असती । नाहीं दुःखप्राप्ति तयां कधीं ॥१॥ परि आलिया ढीवर घालितसे गळ । मग तळतळ करुनी काय ॥२॥ आमीष देखोनी भक्षावया जाय । परिनेणे काळ आहे म्हणोनियां ॥३॥ एका जनार्दनीं प्राणी तेक भुलले । आमिषा गुंतले मीनापरी ॥४॥
४५
अगाध तुझीं लीला आकळ कैसेनी कळे । ब्रह्मा मुंगी धरूनी तुझें स्वरुप सांवळें ॥१॥ तुज कैसे भजावें आपणां काय देखावें । तुजपाशीं राहुनी तुजला कैसें सेवावें ॥२॥ अंगा देव तुं आम्हां म्हणसी मानवी । हेम अलंकार वेगळे निवडावे केवीं ॥३॥ एका जनार्दनीं सबाह्मभ्यंतरीं नांदे । मिथ्या स्वप्नजात जेवीं जाय तें बोधे ॥४॥
४६
अगाध भगवंतांची नामें । अगाध त्यांची जन्मकर्में ॥१॥ शिणले ते वाखाणितां । शेषा न कळें तत्त्वतां ॥२॥ रमा जाणों गेली । ती सुखें मौनावली ॥३॥ वेडावलीं दरुशनें । भांबावलीं तीं पुराणें ॥४॥ ऐसा उदार श्रीहरीं । शोभतसे भीमातीरीं ॥५॥ शरण एका जनार्दनीं । मीनला एकपणें जाऊन ॥६॥
४७
अग्नीस आपदा बहुवस । रावणाचे असोस । नानापरीचे स्पर्शदोष । धूई अहर्निशीं धुपधुपीत ॥१॥ उदक सेवा वरुणा हातीं । विंजणें सेवा नित्य वसती । निरोप सांगावया बृहस्पती । प्रजापती शांतिपाठा ॥२॥ ऐसे आम्हीं देव समस्त । रावणाचे नित्यांकित । लंके आलिया रघुनाथ । एका जनार्दनीं बंधमुक्त करील ॥३॥
४८
अचुक साधन कष्ट नाहीं कांहीं । वाचे विठ्ठलरखुमाई म्हणे सुखें ॥१॥ जन्ममरणाच्या तुटतील खेपा । सोपा होय बापा मार्ग तुज ॥२॥ बहुत मार्ग बहुत साधन । परी वाचा जाण शीण दुर्गम तें ॥३॥ एका जनार्दनीं कष्ट ना सायास । म्हणा वाचे विठ्ठलास जीवेंभावें ॥४॥
४९
अजानवृक्षांची पानें जाण । जो भक्षून करील अनुष्ठान । त्यासी साध्य होईल ज्ञान । येथें संशय नाहीं ॥१॥ ज्ञानेश्वरी तीन सप्तकें । जो श्रवण करील विवेकें । तो होय ज्ञानी अधिकें । येथें संशय नाहीं ॥२॥ मणिकर्णिका भागीरथी । इंद्रायणीचे स्नान करिती । ते मोक्षपदासी जाती । येथे संशय नाहीं ॥३॥ अश्वत्थ सिध्देश्वर । समाधीसी करी नमस्कार । तो पावे मोक्ष पैं सार । येथें संशय नाहीं ॥४॥ येथींचे वृक्षपाषाण । ते अवघे देव जाण । म्हणे एका जनार्दन । येथें संशय नाहीं ॥५॥
५०
अजीव शिव व्यापुनी राहिला वेगळा । परब्रह्मा पुरळा विटेवरी ॥१॥ तयाचिये पायीं वेधलें मन । झाले समाधान पाहतां रुप ॥२॥ विश्रांती समाधि लोपोनियां ठेली । पाहतां सांवळा मूर्ती देखा ॥३॥ एका जनार्दनीं सर्वां वेगळा तो । बाळलीला खेळे कृष्ण ॥४॥
५१
अज्ञानीं विश्वासें साधून्सी वंदी । ज्ञानिया तो सदा तया निंदी ॥१॥ ऐशी उभयतांचि क्रिया । पाहतां चर्या एकची ॥२॥ वंदुं निंदूं कोणी ऐसा एक भाव । तेथें तो देव वसे सदा ॥३॥ ज्ञान अज्ञानाचा निवाडा होय । एका शरण जनार्दनीं जाय ॥४॥
५२
अट्टाहास शब्द करुनि कांता रडे । आहा मज येवढें बाळ होतें ॥१॥ जळो तें भजन आपुलेनि हातें । बाळ मृत्तिकेंत तुडविलें ॥२॥ ऐकोनियां शब्द जाहला पैं सावध । एका जनार्दनीं क्रोध आला मनीं ॥३॥
५३
अडके कमळिणीं कोशीं । भ्रमरू जैसा आमोदासी ॥१॥ तैसा विषया लोधला । रामनामें विवंचला ॥२॥ कोरडें काष्ठ भेदोनि जाये । तो कमळदळीं गुंतला राहे ॥३॥ ऐसा विषयीक सायासी । एका जनार्दनीं धरीं मानसीं ॥४॥
५४
अणुरेणु पासोनि ब्रह्मांडी भरला । तो म्यां देखिला विटेवरी ॥१॥ स्थावर जंगम भरुनी उरला । तो म्यां देखिला पंढरीये ॥२॥ वेदशास्त्र पुराणें गाती जयासाठीं । तो पुंडलिका पाठीं उभा दिसे ॥३॥ वेडावल्या श्रुति न कळे म्हणती । तो उभा श्रीपती वाळुवंटी ॥४॥ संताचा समागम गाती आनंदानें । तो हरी कीर्तने नाचतसे ॥५॥ एका जनार्दनें सुखाचा सागरु । विठ्ठल कल्पतरु वोळला आम्हा ॥६॥
५५
अणुरेनुपासोनी सब्राह्म भरला । भरुनी उरला संतापुढें ॥१॥ उघडाची दिसे सर्वा ठायीं वसे । मागणेंचि नसे दुजें कांहीं ॥२॥ कर ठेऊनि कटीं तिष्ठत रहाणें । वाट तें पाहनें मागेल कांहीं ॥३॥ चंद्रभागा तीर पुंडलिकासमोर । एका जनार्दनीं हरिहर उभे राहाताती ॥४॥
५६
अदृष्टी असेल जें जें वेळे । तें तें मिळेल तें तें काळें ॥१॥ ऐशी प्रारब्धाची गती । ब्रह्मादिकां न चुकतीं ॥२॥ जें जें होतें ज्या संचितीं । ते तयासवें चालती ॥३॥ जैशी जैशी कर्मरेषा । तैसें भोगणें सहसा ॥४॥ एका जनार्दनीं भोग । भोगविल्याविण न चुके सांग ॥५॥
५७
अधर्में अदृष्टांचें चिन्ह । विपरीत वचन तें ऐका ॥१॥ भांडारीं ठेविला कापूर उडे । समुद्रामाजीं तारूं बुडे ॥२॥ ठक येवोनि एकान्ती । मुलाम्याचें नाणें देती ॥३॥ परचक्र विरोध धाडी । खणीत लावूनी तळघरें फोडी ॥४॥ पाणी भरे पेंवा आंत । तेणें धान्य नासे समस्त ॥५॥ गोठण शेळ्या रोग पडे । निमती गाईम्हशींचें वाडे ॥६॥ भूमीनिक्षेप करूं जाती । ते आपुल्याकडे धुळी वोढिती ॥७॥ बुद्धी सांगे वाडोवाड । तेथोनी तोंडी घाला दगड ॥८॥ ऐशी कर्माची अधर्म स्थिती । एका जनार्दनीं सोशी फजिती ॥९॥
५८
अनंत नामाचा हा काला । पुराणें म्हणते पाहुं चला ॥१॥ हरिनामाचा कवळू घेतां। तेणें धालों पैअ सर्वथा ॥२॥ एका कवळासाठीं । गणीका बैसविली वैकुंठीं ॥३॥ एका जनार्दनीं कवळ । सेवुं जाणती ते प्रेमळ ॥४॥
५९
अनंता जन्मीचें पुण्य बहुत । तैं देखे पंढरीनाथ ॥१॥ वायं शिणताती बापुडी । काय गोडी धरुनी ॥२॥ पाहतं विठ्ठलाचें मुख । हरे सर्व पाप निवारें दुःख ॥३॥ एका जनार्दनीं विठ्ठल उभा । त्रैलोक्याचा गाभा विटेवरी ॥४॥
६०
अनतांचे अनंत गुण । अपार पार हें लक्षण । तो समचरण ठेवुन । विटे उभा राहिला ॥१॥ करीं दास्यत्व काळ । भक्तजनां प्रतिपाळ । उदार आणि स्नेहाळ । तो उभा भीवरे ॥२॥ धीर सर्वस्वे बळसागर । निद्रा करी शेषावर । लक्ष्मी समोर । तिष्ठत सर्वदा ॥३॥ खेळे कौतुकें खेळ । तोडी भक्तांचे मायाजाळ । एका जनार्दनीं कृपाळ । स्वामीं माझा विठ्ठल ॥४॥
६१
अनन्य आवरी उदक निर्मळ । वासना सोज्वळ नम्रपणें ॥१॥ प्रक्षाळिले पाय वाही एक माथा । हृदयीं प्रीति धरितां प्रेमलाभ ॥२॥ घेऊनियां तीर्थ इंद्रियें तो धांलीं । सकळ निवालीं जनार्दनीं ॥३॥
६२
अनन्य शरण विठोबासी निघाले । ते जीवन्मुक्त जाले याचि देहीं ॥१॥ देहीं याचि देवो विटेवरी पाहे । सबाह्म उभा आहे कर कटीं ॥२॥ कर कटीं उभा लावण्याचा गाभा । श्रीमुखाची शोभा काय वानुं ॥३॥ कोटी रवीतेज वोवाळवे चरणीं । एका जनार्दनीं धन्य तोची ॥४॥
६३
अनाथाचा नाथ दीनाचा दयाळ । म्हणवोनि सांभाळ करीं माझा ॥१॥ तुज ऐसा देव नाहीं त्रिभुवनीं । म्हणोवोनि चरणीं विनटलों ॥२॥ बापा जनार्दनीं कृपा करीं दान । सांभाळीं वचन आपुलें तें ॥३॥ एका जनार्दनीं भेटी देई देवा । संतपायीं भावा मिठी पडी ॥४॥
६४
अनाथाचा नाथ पतीतपावन । हें नामभिदान तया साजे ॥१॥ भाळी अर्धचंद्र जटाजुट गंगा । दरुशनें पापें जातीं ॥२॥ एका जनार्दनीं नाम जपा होटीं । पातकें नाशाकोटी हेळामात्रें ॥३॥
६५
अनादि सांवळा देखियेला डोळां । मनु माझा वेधिला सांगु काय ॥१॥ जीवाविरहित जालें देह हारपलें । शिवपणें गुंतलें गुरुकृपें ॥२॥ जें शब्दासी नातुडे वैखरीयेसी कानडें । तें रुप उघडे पंढरीयें ॥३॥ एका जनार्दनीं जीवींचे जीवन । विठ्ठल निधान विटेवरी ॥४॥
६६
अनामिकादि चांडाळ । नामें सकळ तारिले ॥१॥ ब्रह्माहत्या पापराशी । नामें वैकुंठवासी पावले ॥२॥ दुराचारी व्याभिचारी । गणिकानारी तारिली ॥३॥ एका जनार्दनीं नाम । मंगळधाम मंगला ॥४॥
६७
अनुताप नाहीं ज्यासी । विवेक नुमजे मानसीं ॥१॥ मुख्य पाविजे अनुताप । तेणें निरसे त्रिविधताप ॥२॥ अनुतापावांचुन । ब्रह्माज्ञान होय दीन ॥३॥ एका जनार्दनीं शरण । तैंच अनुताप बाणे पूर्ण ॥४॥
६८
अनुतापावांचुनी नाम न ये मुखा । वाउगाचि देखा शीण होय ॥१॥ मुख्य तो संकल्प अनुताप वाहे । मग चित्त होय शुद्ध तेणें ॥२॥ अनुताप जाहलिया सहज समाधी । तुटेल उपाधी सहजचि ॥३॥ एका जनार्दनीं अनुतापें पाहे । मग देव आहे जवळी तया ॥४॥
६९
अनुतापाविण । नोहे कदा ब्रह्मज्ञान ॥१॥ हें तो मागील रहाटी । अनुताप घ्यावा पोटीं ॥२॥ अनुतापावांचुन । कवण तरलासे जाण ॥३॥ अनुताप नाहीं पोटीं । वायां बोलुं नयें गाठीं ॥४॥ अनुताप वांचुन जाण । नाहीं नाहीं ब्रह्माज्ञान ॥५॥ एका जनार्दनीं अनुताप । होतां निवारें त्रिविधताप ॥६॥
७०
अनुपम्य उदार नाम । अनुपम्य सकाम संत तें ॥१॥ अनुपम्य पंढरीसी जाती । अनुपम्य नाचती वाळुवंटी ॥२॥ अनुपम्य टाळ घोळ अनुपम्य रसाळ वाद्यें वाजती ॥३॥ अनुपम्य संतमेळ । अनुपम्य प्रेमळ नाम घेती ॥४॥ अनुपम्य एका जनार्दनी । अनुपम्य आयणी चुकले ॥५॥
७१
अनुपम्य उपासना । अनुपम्य चरणी संताचिये ॥१॥ अनुपम्य भक्ति गोड । अनुपम्य लिगाड तुटत ॥२॥ अनुपम्य पंढरीचा वास । अनुपम्य दैवास दैव त्यांचे ॥३॥ अनुपम्य नाचती वैष्णव । अनुपम्य गौरव तयांचे ॥४॥ अनुपम्य एका जनार्दनीं । अनुपम्य चरणीं संताचिये ॥५॥
७२
अनुपम्य क्षेत्र अनुपम्य देव । नसे तोचि ठाव पंढरीये ॥१॥ अनुपम्य वाहे पुढें चंद्रभागा । अनुपम्य भंगा दोष जाती ॥२॥ अनुपम्य होय पुंडलिक भेटी । अनुपम्य कोटी सुखलाभ ॥३॥ अनुपम्य संत नामाचा गजर । अनुपम्य उद्धार जडजीवां ॥४॥ अनुपम्य शोभा विठ्ठलचरणीं । एक जनार्दनीं गात गीतीं ॥५॥
७३
अनुपम्य घनदाट । करिती बोभाट अनुपम्य ॥१॥ पंढरीसी जाती अनुपम्य । धन्य जन्म अनुपम्य त्यांचा ॥२॥ अनुपम्य त्यांच्या पुण्या नाहीं पार । अनुपम्य निर्धार सुख त्यांसी ॥३॥ अनुपम्य दशा आली त्यांच्या दैवा । अनुपम्या देवा चुकले ते ॥४॥ अनुपम्य शरण एका जनार्दनीं । पंढरीं सांडोनि नेम नाहीं ॥५॥
७४
अनुपम्य ज्ञान अनुपम्य मतें । अनुपम्य सरतें पंढरीयें ॥१॥ अनुपम्य वेद अनुपम्य शास्त्र । अनुपम्य पवित्र पंढरीये ॥२॥ अनुपम्य भक्ति अनुपम्य मुक्ति । अनुपम्य वेदोक्ती पंढरीये ॥३॥ अनुपम्य कळा अनुपम्य सोहळा । अनुपम्य जिव्हाळा पंढरीये ॥४॥ अनुपम्य दया अनुपम्य शांती । अनुपम्य विरक्ति एका जनार्दनीं ॥५॥
७५
अनुपम्य नारीनर ते दैवाचे । अनुपम्य त्यांचे पुण्य देखा ॥१॥ अनुपम्य वास जयांसी पंढरी । प्रत्यक्ष वैकुंठपुरी अनुपम्य ॥२॥ अनुपम्य पहाती विठलरायातें । दरुशनें पावती मुक्तीने अनुपम्य ॥३॥ अनुपम्य भक्त नंदिती दैवाचे । अनुपम्य त्यांचे सुख देखा ॥४॥ अनुपम्य एका जनार्दनीं चरणीं । अनुपम्य विनवणी करितसे ॥५॥
७६
अनुपम्य पुराणं सांगर्ती सर्वथा । अनुपम्य तत्त्वतां पंढरीये ॥१॥ अनुपम्य योग अनुपम्य याग । अनुपम्य अनुराग पंढरीये ॥२॥ अनुपम्य ध्यान । अनुपम्य धारणा । अनुपम्य पंढरीराणा विटेवरी ॥३॥ अनुपम्य क्षेत्र तीर्थ तें पवित्र । अनुपम्य गोत्र उद्धरती ॥४॥ अनुपम्य शरण एका जनार्दनी । अनुपम्य भुवनीं नांदतसे ॥५॥
७७
अनुपम्य वाचे वदतां पंढरी । होतसे बोहरे महात्पापा ॥१॥ अनुपम्य ज्याचा विठ्ठली जो भाव । अनुपम्य देव तिष्ठे घरीं ॥२॥ अनुपम्य सदा कीर्तनाची जोडी । अनुपम्य गोडी मनीं ज्यांच्या ॥३॥ अनुपम्य संग संतांचा विसांवा । अनुपम्य भावा पालट नाहीं ॥४॥ अनुपम्य शरण एका जनार्दनीं । कायावाचामनीं छंद यासी ॥५॥
७८
अनुपम्य वास पंढरीस ज्याचा । धन्य तो दैवाचा अनुपम्य ॥१॥ अनुपम्य घडे चंद्रभागे स्नान । अनुपम्य दान नाम वाचे ॥२॥ अनुपम्य घडे क्षेत्र प्रदक्षिणा । अनुपम्य जाणा नारीनर ॥३॥ अनुपम्य सोहळा नित्य दिवाळी । अनुपम्य वोवाळी विठोबासी ॥४॥ अनुपम्य शरण एका जनार्दनीं । अनुपम्य ध्यानीं एक नाम ॥५॥
७९
अनुपम्य सप्तपुर्‍याअ त्या असती । अनुपम्य त्या वरती पंढरीये ॥१॥ अनुपम्य तीर्थ सागरादि असती । अनुपम्य सरती पंढरीये ॥२॥ अनुपम्य देव उदंडे असती । अनुपम्य विठलमूर्ति पंढरीये ॥३॥ अनुपम्य संत वैष्णवांचा मेळ । अनुपम्य गदारोळ पंढरीये ॥४॥ अनुपम्य शरण एका जनार्दनी । अनुपम्य चिंतनीं डुल्लतसे ॥५॥
८०
अनुपम्य सुख संताचिया पायीं । राहीन तये ठायीं अखंडित ॥१॥ अखंडित गोडी सेवीन आवडी । ब्रह्मादिकां जोडी ऐशीं नाहीं ॥२॥ सर्व पर्वकाळ आले तयां ठायां । विश्रांती घ्यावया इच्छिताती ॥३॥ एका जनार्दनीं सुखाचें माहेर । भवसिंधुपार तारक हें ॥४॥
८१
अनुभवें नाम गाताती गणिका । मोक्षपद देखा प्राप्त जालें ॥१॥ उलट्या अक्षरी वाल्हा तो तरला । उद्धार तो केला चोखियाचा ॥२॥ यातीसी संबंध नाही नामस्मरणीं । जपोत पैं कोणी आदरें नाम ॥३॥ जनार्दनीं एका सांगतसे खूण । श्रीरामनाम पुर्ण सोडूं नये ॥४॥
८२
अनुभवें पंथें निरखिता देहभाव । देह नाहीं विदेहीं म्हणो वाव । लटिका नसतां साचार कैसा ठाव । गेला गेला समूळ भवाभाव ॥१॥ सदगुरुकृपें कल्याण ऐसें जाहलें । द्वैताद्वैत निरसुनी मन ठेलें ॥ध्रु॥ कैंचा भाव अभाव उरला आतां । देव म्हणें तोटा नाहीं भक्ता । समरस करितां तो हीन होतां । शून्य भरला सदगुरु जनार्दन दाता ॥२॥ ऐशी खुण दावितां गुरुराव । नुरेचि तात्काळ देहीं सोहंभाव । सुखदुःखाचा भेद गेला वाव । एका जनार्दनीं फिटला भेव ॥३॥
८३
अनुहत टिपरी घाई खेळ जाणें तो भाई रे । खोटा खेळ खेळोनि काय स्वतः अनुभव घेई रे ॥ धृ॥ मत्स्येद्रं कुळीं एक गोरख जाला । तो बहुत खेळ खेळला रे । पवन साधुनि अष्टांग योगे तेणेंचि बळें मातला रे । खेचरीं भूचरीं चाचरी धरुनीं अगोचरी मिळाली रे । गोल्हाट योग साधुनि तेणें काळ तो जिंकुनि गेला रे ॥१॥ निवृत्तिचा पोर एक ज्ञाना जाण तो खेळियामाजी शहाणा रे । कवित्व केला प्रकाश मातला प्रवृत्ति गाळिलें घाणा रे । असोनि भेला नसोनि गेला काळ केला आंकणा रे । भले भले गडी मिळाविले तेणें अकाय सांगु कवणा रे ॥२॥ जनार्दनाची सात पाँच पोरें त्यामाजी लाडका येका रे । एकही साधन न करी परी तो बळेचि मातला फुका रे । आपपर देही कांहींच नेणें रायासी म्हणे तो रंका रे । भलेंभले गडी मेळवोनि तेनें खेळ दाविला असका रे ॥३॥ तिघा जिणांचें खेळणें जालें चवर्थे एक उठविलें रे । अनन्यभावें सदगुरुचरणीं गुरुसी शरण गेलें रे । भवासी न भ्यालं कळलें म्हणोनि तिघांचि समान जालें रे । आपण जैसें पुर्ण तैसें एका जनार्दनी केलें रे ॥४॥ विटीदांडु, चेंडू
८४
अपाय उपाय न टाकी कीर्तन । सदा सर्वकाळ ध्यान रामकृष्ण ॥१॥ तयाचिये घरीं वसे नारायण । लक्ष्मी सह आपण कार्य करी ॥२॥ एका जनार्दनीं कीर्तनासाठीं । देव धांवें पाठीं त्या मागें ॥३॥
८५
अपार महिमा संतांचा । काय बोलुं मी वाचा ॥१॥ मागें तरले पुढें तरती । जदजीवा उद्धरती ॥२॥ नाममात्रा रसायन । देउनी तारिती संतजन ॥३॥ ऐशा संतां शरण जाऊं । एका जनार्दनीं ध्याऊं ॥४॥
८६
अबोलणें बोल कुंठीट पै जाहलें । तें निधान देखिलें नंदाघरीं ॥१॥ अधिष्ठान मुळ व्यापक सकळ । जगाचें तें कुअळ कल्पद्रुम ॥२॥ एका जनार्दनीं बिंबी बिंबाकार । सर्वत्र श्रीधर परिपुर्ण ॥३॥
८७
अभक्त पातकी अपार । नामें पैल पार पावलें ॥१॥ ऐसं सोपें रामनाम । आणिकांसीतो विश्राम ॥२॥ नामें पावन होय त्रिजगती । वाचे जे वदतीं रामनाम ॥३॥ एका जनार्दनीं नाम । हरे श्रम बहुतांचा ॥४॥
८८
अभक्त सभक्त दोघांसी सारखा दिसे । लवनीं जैसें नदिसे दुजेपण गे माय ॥१॥ ऐसा परात्पर सोइरा पुंडलिकाचे पाठीं । मौन्य वाक्पुटीं धरुनी गे माय ॥२॥ पुण्य पाप सर्व देखतसे दृष्टी । चालवी सर्व सृष्टी गे माय ॥३॥ ऐसा वेषधारी उभा भीवरेतीरीं । एका जनार्दनीं अंतरी दृढ ठसावें गे माय ॥४॥
८९
अभक्ता दुर्जना यमदुत यातना । नानापरी जाणा करिताती ॥१॥ नाम नाहीं मुखीं दूत तया ताडिती । नेऊन घालिती कुंभपाकीं ॥२॥ ताम्र भूमीवरी खैराचे इंगळ । लाविताती ज्वाळ अंगालागीं ॥३॥ एका जनार्दनीं यातनेचें दुःख । कोणा सांगेल मूर्ख यमलोकीं ॥४॥
९०
अभक्तां देव कंटाळती । परी सरते करीतीं तंव त्या ॥१॥ म्हणोनि महिमा त्यांचा जगीं । वागविती अंगीं सामर्थ्य ॥२॥ तंत्र मंत्रा नोहे बळ । भक्ति प्रेमळ पाहिजे ॥३॥ आगमानिगमाचा पसारा । उगाचि भारा चिंध्यांचा ॥४॥ वेदशास्त्रांची घोकणी । ती तो कहाणी जुनाट ॥५॥ पुरातन वाटा असती बहु । त्या त्या न घेऊं यामाजी ॥६॥ एका जनार्दनीं सोपा मार्ग । संतसंग चोखडा ॥७॥
९१
अभागियां नावडे वैष्णवांचा संग । सदा तो उद्योग परनिंदेचा ॥१॥ ऐसे जे पामर भोगिती अघोर । सुटिका निर्धार नोहे त्यासी ॥२॥ जन्मोनी मरती पुन्हा जन्मा येती । होतसे फजिती मागें पुढें ॥३॥ एका जनार्दनीं नरकाचें बिढार । यमाचें तें घर माहेर केलें ॥४॥
९२
अभागी असोत चांडाळ । संतदरुशनें तात्काळ उद्धरती ॥१॥ हा तो आहे अनुभव । स्वयमेव संत होती ॥२॥ पापतापां माहामारी । कामक्रोधाची नुरे उरी ॥३॥ एका जनार्दनीं लीन । संत पावन तिहीं लोकीं ॥४॥
९३
अभागी ते पामर । भोगिती नरक अघोर ॥१॥ जाहला बाइलेचा अंकित । वर्ते जाणोनी मनोगत ॥२॥ नावडे माता पितयाची गोष्टी । म्हणे हे बोलती चावटी ॥३॥ एका जनार्दनीं दुर्जन । पावती नरकीं ते पतन ॥४॥
९४
अभागी तो जाण । न करी विठ्ठलस्मरण ॥१॥ तया व्यालीसे जननी । अभागी तो पापखाणी ॥२॥ न जाय पंढरपुरा । मांडी वेदान्त पसारा ॥३॥ एका जनार्दनीं म्हणे । श्वानापरी जायाचें जिणें ॥४॥
९५
अभाग्य न भजती भगवंतीं । त्यांसी पृथ्वीं असे जडत्व देती । जळें दिधली त्या अधोगती तेजें दिधली त्या संतापवृत्ति ॥१॥ ऐसा कैसोनि भेटे भगवंतु । नरदेहीं मुकले निजस्वार्थु । जन्ममरणाचें भोगिती आवर्तु । त्यासी विन्मुख होय हृदयास्थु ॥२॥ वायुनें दिधलें त्या चंचळत्व । नभें दिधलें त्या भावशुन्यत्व । महतत्व हरिलें निजसत्व । मायें दिधलें त्या ममत्व ॥३॥ सभाग्य भावें भजती भगवंती । त्यासी पृथ्वी देतसे निज शांती । जळें दिधलीं मधुर रसवृत्ती । तेजें दिधली निजतेज प्रभादीप्ती ॥४॥ ऐशा सहजें प्रसन्न होय देवो । जेणें भूतांचा पालटे देहभावो । निजीं निजाचा वाढे निर्वाहो । जनीं विजनीं अखंड ब्रह्माभावो ॥५॥ वायु उपरमें दे निश्चळत्व । नभें दिधलें त्या अलिप्तत्व । महत्तत्वें दिधलें शोधित सत्व । मायें दिधलें सद्विद्या परमतत्वा ॥६॥ एकाजनार्दनीं निज भक्ति । तैं अलभ्य लाभु होय प्राप्ती । भुतें महाभुतें प्रसन्न होतीं । तेणें न भंगें ब्रह्मास्थिति ॥७॥
९६
अभाविक यासी न रुचे भजन । सदा पिशाच्चपण देह त्याचा ॥१॥ असोनि संसारीं प्रेतवत देहे । काळ मुखा वाहे भार सदा ॥२॥ जगीं अपकीर्ति फजितीचें जिणें । सदा तें लपणें श्वानापरी ॥३॥ एका जनार्दनीं ऐसें तें पामर । भोगिती अघोर कल्पकोटी ॥४॥
९७
अभाविकांचे कर्म । तया न कळे कांहीं वर्म । संता म्हणती भ्रम । यासी झाला ॥१॥ हरुषें मुखें नाम गाय । तया म्हणती वेडा होय अभाविकांचें भय । जन मनीं वाहे ॥२॥ बोले जैसा का भाट । वर्म कांहीं न कळे नीट । नामस्मरण स्पष्ट । न घडे तया ॥३॥ ऐशियाची संगती । न घडावी निश्चिती । एका जनार्दनींक अप्रीति । तयाची देवा ॥४॥
९८
अभिनव गुरुनें दाखविलें । ओहं सोहं माझें गिळिलें ॥१॥ प्रपंचाचें उगवोनि जाळें । केलें षडवैरीयांचें तोंड काळें ॥२॥ उदयो अस्तावीण प्रकाश । स्वयें देहीं दाविला भास ॥३॥ मीपण नाहीं उरलें । एका जनार्दनीं मन रमलें ॥४॥
९९
अभिनव सांगतां विस्मयो दाटला । देहींच भासला देव माझ्या ॥१॥ नवल कृपेंचें विंदान कैसें । जनार्दनें सरसें केलें मज ॥२॥ साधनाची आटी न करितां गोष्टी । हृदयसंपुष्टीं दाविला देव ॥३॥ एका जनार्दनीं एकपणें शरण । नवळे महिमान कांहींमज ॥४॥
१००
अभिमान नका धरुं पोटीं । होय अर्थासवें तुटी ॥१॥ म्हणोनि स्मरा रामराम । तेणें पावाल निजधाम ॥२॥ विहित करा आपुलें कांहीं । आठवा वाचे राम देहीं ॥३॥ काकुलती येतां जनां । शरण एका जनार्दनीं ॥४॥
१०१
अभिमानासाठीं । वेंचिती तपाचिया कोटी ॥१॥ अभिमान दुर्वासासी । व्यर्थ शापिला अबंऋषी ॥२॥ अभिमान ब्राह्मीयासी । नेलें गाई गोप वत्सासी ॥३॥ अभिमान नाडला पूर्ण । विश्वामित्र ऋषि जाणा ॥४॥ एका जनार्दनीं शरण । समूळ सांडावा अभिमान ॥५॥
१०२
अभेद भक्तांचें निजमंदिर । तें मज निर्गुणाचें घर ॥१॥ निर्गुणासी घर ठावो । बोलणें हेंचि दिशे वावो ॥२॥ सांडुनी आकाराचें ज्ञान । निराकारी सुखसंपन्न ॥३॥ सुखें सुखासी मिळणी । शरण एका जनार्दनीं ॥४॥
१०३
अभेद भजनाचा हरीख । देव भक्ता जाहले एक ॥१॥ कोठें न दिसे भेदवाणी । अवघी कहाणी बुडाली ॥२॥ हरपलें देवभक्तपण । जनीं जाहला जनार्दन ॥३॥ देवभक्त नाहीं मात । मुळींच खुंटला शब्दार्थ ॥४॥ एका जनार्दनीं देव । पुढें उभा स्वयमेव ॥५॥
१०४
अभेदाचे उत्तम गुण । तेचि भक्ति तेंचि ज्ञान ॥१॥ अभेद भक्ति वाडेंकोडें । देवा आवडे तें गोड ॥२॥ अभेद भजनीं सुख देवा । एका जनार्दनीं विसरे जीवा ॥३॥
१०५
अभेदाच्या द्वारापाशीं । तीर्थे प्रयागादि काशीं ॥१॥ भक्तिमुक्तिचें माहेर । अभेदाचें तें घर ॥२॥ ऐसी अभेद भक्ति घडे । कामक्रोध तेथें दडे ॥३॥ एका जनार्दनीं शरण । अभेद भक्ति मुख्य ज्ञान ॥४॥
१०६
अभेदावांचुन न कळे भक्तीचें महिमान । साधितां दृढ साधन । विठ्ठलरुप न कळे ॥१॥ येथें पाहिजे विश्वास । दृढता आणि आस । मोक्षाचा सायास । येथें कांहीं नकोची ॥२॥ वर्ण भेद नको याती । नाम स्मरतां अहोरात्री । उभी विठ्ठलमूर्ति । तयापाशीं तिष्ठत ॥३॥ आशा मनिशा सांडा परतें । कामक्रोध मारा लातें । तेणेंचि सरतें । तुम्हीं व्हाल त्रिलोकीं ॥४॥ दृढ धरा एक भाव । तेणें चरणीं असे ठाव । एका जनार्दनीं भेव । नाहीं मग काळाचें ॥५॥
१०७
अभ्यासीं द्रष्ट आटला । अहं सोहंचा घोट भरला । साक्षित्व देखोनि विराला । वास्तुमाजीं ॥१॥ जो जो वस्तु झाला केवळ । तेंचि अंतःकरण निश्चळ । त्रिगुणाची तळमळ । हारपोनि गेली ॥२॥ हारपलें ब्रह्मांड । हारपले पिंड - अंड । वस्तु झाला अखंड । त्यासी खंड नाहीं ॥३॥ एका जनार्दनीं जाण । द्वैत गेलें मावळोल । मग वस्तुचि परिपुर्ण । भरली असे ॥४॥
१०८
अमंगळाचा अमंगळ वाण । न ये वाचे नारायण ॥१॥ सदा सर्वकाळ परनिंदा करी । वाचे हरिहरी न म्हणे पापी ॥२॥ कस्तुरी उत्तम परि शेजार हिंगाचा । अमंगळासी साचा बोध नोहे ॥३॥ एका जनार्दनीं तयाची पैं गोष्टी । बोलणें चावटी परमार्थ नोहे ॥४॥
१०९
अमृत तें स्वर्गी निर्जर सेविती । परि चरफडती नामामृत ॥१॥ धन्य ते दैवाचे नाम घेती वाचे । होतें पैं जन्माचें सार्थक तेणें ॥२॥ न लगे उपवासकरणे अष्टांग । न लगे नानायोग साधनें तीं ॥३॥ एका जनार्दनीं नामामृत सार । उतरले पैलपार वैष्णव जन ॥४॥
११०
अमृत विकूनि कांजी प्याला । तैसा नरदेह गमाविला ॥१॥ लाहोनी उत्तम शरीर । वेंचिलें ते विषयपर ॥२॥ ऐशी मूर्खाची गोष्टी । एकनाथ देखोनि होतसे कष्टी ॥३॥
१११
अमृता उणें आणिता संतजन । नाम अमृत खूण पाजिताती ॥१॥ नाशिवंत यासी अमृत उपकार । अनाशिवंता नामामृतसार ॥२॥ नाशिवंत देह नाशिवंत जीव । नाशिवंत ठाव जगडंबर ॥३॥ एका जनार्दनीं संताचिये दृष्टी । नाशिवंत सृष्टी सजीव होती ॥४॥
११२
अमृतासी रोग स्वर्गी जाहला पाही । अमरनाथा तेही गोड नसे ॥१॥ नारदातें प्रश्न करी अमरनाथ । शुध्द हें अमृत कोठें होय ॥२॥ सांगे तये वेळीं ऐका हें भूतळीं । सांगेन नव्हाळी तुम्हांपाशीं ॥३॥ पंढरी वैकुंठ आहे भूमीवरी पुडलिकाचे द्बारीं देव उभा ॥४॥ अनाथाचा नाथ विटेवरी उभा । एका जनार्दनीं गाभा लावण्याचा ॥५॥
११३
अरे अरे मना । कांहीं करी विचारणा ॥१॥ शरण विठोबासी जाई । मन राही भलते ठायीं ॥२॥ वाउगा तुंचि सोस । मना न करी सायास ॥३॥ येतो काकुळती । एका जनार्दनीं प्रीति ॥४॥
११४
अरे अरे मना । सत्य सत्य धरी ध्याना । पंढरीचा राणा । वेध ठेवीं तयाचा ॥१॥ तुज नाहें रे बंधन । सहज आकळे ब्रह्माज्ञान । वाउगें शोधन । नको करूं ग्रंथाचें ॥२॥ मागां तुज शिकविलें । परि तूं रे नायकशी वहिलें । तुझें हितगुज कथिलें । शुद्धि करी कांही ते ॥३॥ तूं अनिवार सर्वांसी । म्हणोनि कींव भाकितो तुजसी । शरण गुरु जनार्दनासी । एका भावें जाई तूं ॥४॥ एका जनार्दनीं शरण । जातां होईल समाधान । वाउगें नको भ्रमण । चरणीं राहे निवांत ॥५॥
११५
अरे माझ्या मना । नित्य भजे नारायणा ॥१॥ तेणें तुटेल बंधन । उभय लोकीं कीर्ति जाण ॥२॥ मिळेल सकळ संपत्ति । नाश पावेल विपत्ति ॥३॥ प्राप्त होय ब्रह्मापद । वाचे वदावा गोविंद ॥४॥ एका जनार्दनीं मन । सदा चिंती नारायण ॥५॥
११६
अर्जुनाचे रथीं श्रमला जगजेठी । म्हणोनि कर ठेउनी कंटीं उभा येथें ॥१॥ धरुनी गोवर्धन उभा सप्तदीन । म्हणोनि कर जघन ठेउनी उभा ॥२॥ कंसादी मल्ल मारी जरासंध । ते चरणरविंद उभे विटे ॥३॥ धर्माघरीं उच्छिष्टपात्र काढी करें । म्हणोनि श्रमें निर्धारें ठेविले कटीं कर ॥४॥ पुंडलीक भक्त देखोअनि तल्लीन जाला । एका जनार्दनीं ठेविला कटाई कर ॥५॥
११७
अर्थ तो विवाद ज्ञान ते उपाधी । आम्हां उघड समाधी नाममात्रें ॥१॥ हेंचि निरुपण उद्धवा श्रीकृष्ण । सांगतसे खुन जीवींची ते ॥२॥ स्तुति अथवा निंदा परस्त्री परधन । तेथें कदा मन घालुं नये ॥३॥ एका जनार्दनीं हेचि ब्रह्मज्ञान । यापरतें साधन आन नाहीं ॥४॥
११८
अर्थ नाहीं जयापाशीं । असत्य स्पर्शेना तयासी ॥१॥ अर्थापाशीं असत्य जाण । अर्थापाशीं दंभ पूर्ण ॥२॥ अर्थापोटीं नाहीं परमार्थ । अर्थापोटीं स्वार्थ घडतसे ॥३॥ अर्थ नका माझे मनीं । म्हणे एका जनार्दनीं ॥४॥
११९
अर्ध क्षण घडता संतांची संगती । तेणें होय शांती महत्पापा ॥१॥ संतसंग देई संतसंग देई । आणिक प्रवाही घालुं नको ॥२॥ संसार मज न करणें सर्वथा । परमार्थ पुरता हाती देई ॥३॥ जनार्दनाचा एका करुणावचनीं । करी विनवणी पायांपाशीं ॥४॥
१२०
अलंकार जाहलेपणें । जेवीं असे निखळ सोनें ॥१॥ नाम भिन्न रुप एक । देहीं देहात्मा तैसा देख ॥२॥ गोडी आणि गुळ । नोहे वेगळे सकळ ॥३॥ जीव शिव नामें भिन्न । एकपणें एकचि जाण ॥४॥ एका जनार्दनीं शरण । भेदरुपें दिसे भिन्न ॥५॥
१२१
अलक्ष अगोचर म्हणती वृक्ष । तो दृष्टी न दिसे साक्ष । योगी म्हणती पाहिला लक्ष ॥१॥ कान्होबा तुझें कोडें । तुजपुढें केलें उघडें । सांगतां वेद जाहले वेडे रे ॥२॥ सहा अठरांची मिळणी । छत्तिसांचें घांतलें पाणी । तो वृक्ष देखिला नयनीं रे ॥३॥ पंचाण्णवची एक शाखा । एका जनार्दनीं वृक्ष देखा । अर्थ पाहतां मोक्ष रेखा रे ॥४॥
१२२
अलक्ष केली वावडी । लक्षाचा दोर परवडी । उडविती बारा चौदा गडी । भरली ती गगनी उडी ॥१॥ भली चंग वावडी । दादांनों भली चंग वावडी ॥धृ॥ औट हात सोडोनी दोरा । मध्यें कामटी लाविल्या बारा । आत्मास्थितीच्या चंग उबारा । वावडी उडती अंबरा ॥२॥ साहा चार मिळवोनी गडी । अठराजण सोडिती वावडी । एका जनार्दनीं त्यांची जोडी । जनार्दनाचे पायी गोडी ॥३॥
१२३
अल्प आयुष्य अल्प सर्व । अल्प वैभव समजेना ॥१॥ म्हणे सदा माझें माझें । परी न लाजे काळासी ॥२॥ त्यासी ऐसें न कळें सदा । संसाराधंदा मिथ्या हा ॥३॥ शरण एका जनार्दनीं नाठवई मनीं श्रीहरीसी ॥४॥
१२४
अल्प आयुष्य नरदेहीं जाण । कांहीं तरी भजन करी वाचे ॥१॥ जाणार जाणार नरदेह जाणार । न चुकेक वेरझारा जन्ममृत्यु ॥२॥ करी धंदा आठवी गोविंदा । वायां तूं आपदा नको घेऊं ॥३॥ एका जनार्दनीं पंढरी पाहून । तेथें करी मन ठेवणें देखा ॥४॥
१२५
अल्प ते आयुष्य धन कलीं । मर्यादा हे केली संतजनीं ॥१॥ जनमय प्राण न घडें साधन । नोहे तीर्थाटन व्रत तप ॥२॥ असत्याचें गृह भरलें भांडार । अवघा अनाचार शुद्धबुद्ध ॥३॥ एका जनार्दनीं म्हणोनि । येते कींव । बुडताती सर्व महाडोहीं ॥४॥
१२६
अवघा वायां संसार । अवघा सार विठ्ठल ॥१॥ अवघे आले वायां जाती । फजिती हे समजेना ॥२॥ अवघे नरदेहीं चोर । अवघा सार विठ्ठल ॥३॥ अवघें वायां जातें जन्म । अवघें कर्म चुकेना ॥४॥ अवघ लटिका साच नव्हे । अवघा वायां जात असे ॥५॥ अवघा जनीं भरला । एका जनार्दनीं उरला ॥६॥
१२७
अवघा व्यापक दाविला । माझा संदेह फिटला ॥१॥ मन होतें गुंडाळलें । आपुलें चरणीं पैं ठेविलें ॥२॥ केलें देहाचें सार्थक । तुटला जन्ममरण धाक ॥३॥ नाहीं पहावया दृष्टी । अवघा जनार्दनीं सृष्टी ॥४॥ कार्यकरण हारपलें । द्वैत अवघें निरसलें ॥५॥ उडालें वैरियाचें ठाणें । आतां एकचि जहालें एकपणें ॥६॥ दुजा हेत हारपला । एका जनार्दनीं एकला ॥७॥
१२८
अवघा सुखचा आनंद । अवघा विटेवर परमानंद ॥१॥ अवघें चराचर सुख । अवघे जालिया विमुख ॥२॥ अवघे डोळे भरुनी पहा । अवघे सुखें पूर्ण व्हा ॥३॥ अवघा अंतरीं आठवा । एका जनार्दनीं साठवा ॥४॥
१२९
अवघियांसे विश्रातीस्थान । एक विठ्ठल चरण ॥१॥ देह वाचा अवस्थात्रय । अवघें विठ्ठलमय होय ॥२॥ जागृती स्वप्न सुषुप्ती । अवघा विठ्ठलाचि चित्ती ॥३॥ जनीं वनीं विजनीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥
१३०
अवघे अवघे ते देव । अवघे अवघे एक भाव ॥१॥ अवघे अवघे प्रेमळ । अवघे अवघे निर्मळ ॥२॥ अवघे अवघे भावाचे । अवघे अवघे प्रेमाचे ॥३॥ अवघा एका अवघा एका । अवघा अवघा जनार्दन एका ॥४॥
१३१
अवघे जन्म उत्तम । वाचे स्मरा रामनाम ॥१॥ अवघे वदती नाम साचें । धन्य धन्य ते दैवाचे ॥२॥ संतसंग सदा । अवघा तया हाचि धंदा ॥३॥ अवघे वर्ण उत्तम । भेदाभेद नाही काम ॥४॥ अवघा एका जनार्दन । भेदाभेदाचें नाहीं कारण ॥५॥
१३२
अवघे ते दैवाचे । विठ्ठल विठ्ठल वदती वाचे ॥१॥ अवघा धंदा दुजा नाहीं । वाचे विठ्ठल रखुमाई ॥२॥ अवघा संसार करिती । वाचे अवघे विठ्ठल म्हणती ॥३॥ अवघीं कर्में घडलीं तया । अवघें विठ्ठलाचि पायां ॥४॥ अवघा एका जनार्दनीं । अवघा जनीं जनार्दनीं ॥५॥
१३३
अवघे दैवतां नका पाहुं । आदरें आवडी विठ्ठल गाउं ॥१॥ अवघे पोटाचे भिकारी । हिंडीविती दारोदारीं ॥२॥ अवघे तें वायं जाय । काय धरुनि त्याचें पाय ॥३॥ अपल्या पोटा जें रडतें । आणिकातें काय देतें ॥४॥ मागुन खाती जना । काय पुरविती वासना ॥५॥ ऐसियासी देव म्हणणें । सदा आम्हां लाजिरवाणें ॥६॥ आम्हीं आणिकां शरण जातां । लाज लागेल सर्वथा ॥७॥ ऐसें नका येऊ देऊं मना । शरण एका जनार्दनीं ॥८॥
१३४
अवघे रंगलें रंगी । अवघे त्या पांडुरंगीं ॥१॥ अवघा दुजा भाव नाहीं । अवघे विठ्ठलची पाही ॥२॥ अवघे आनंदें नाचती । अवघे रंगीं त्या गाती ॥३॥ अवघे भळे भोळे । अवघे प्रेमाचे आगळे ॥४॥ अवघा जनार्दन । एका जनार्दनीं भजन ॥५॥
१३५
अवघे रामराम वदा । नाहीं कळिकाळाची बाधा ॥१॥ अवघें वदतां नाम । नाममात्रें निष्काम ॥२॥ अवघे रंगुनी रंगले । अवघें नामें उद्धरिलें ॥३॥ अवघियां भरंवसा । एका जनार्दनीं ऐसा ठसा ॥४॥
१३६
अवघे सुखाचे सांगाती । दुःख देखतां पळती ॥१॥ सुख देखोनि म्हणती माझें । दुःख देखतां पळती वोजें ॥२॥ यापरि अवघे लटिकें देख । एका जनार्दन पाहे सुख ॥३॥
१३७
अवघें आनंदाचें । क्षेत्रं विठ्ठल देवांचे ॥१॥ अवघें हे पावन । तीर्थ चंद्रभागा स्नान ॥२॥ अवघे संतजन । पुंडलिकासी वंदन ॥३॥ अवघा विठ्ठल देव । एका जनार्दनीं भाव ॥४॥
१३८
अवघें आयुष्य काळाधीन जाहलें । परी चित्त गुंतलें संसारांत ॥१॥ सापें दर्दूर गिळियेला मुखीं । तेणेंचि तो शेखीं मक्षिका धरी ॥२॥ ऐसे हावभरी प्राणी पैं नाडले । म्हणती माझे वहिले कन्यापुत्र ॥३॥ एका जनार्दनीं मृगजळाची आशा । पडे तेणें फांसा गळां बळें ॥४॥
१३९
अवघें क्षेत्र पंढरी । अवघा आनंद घरोघरीं ॥१॥ अवघा विठ्ठलचि देव । अवघा अवघिया एक भाव ॥२॥ अवघे समदृष्टी पहाती । अवघे विठ्ठलाचि गाती ॥३॥ अवघे ते दैवाचे । एका जनार्दनीं साचे ॥४॥
१४०
अवघें देवा तुजसमान । मज नाहीं भिन्न भिन्न ॥१॥ नाम वाचे सदा गाऊं । आवदी ध्याऊं विठ्ठल ॥२॥ वारंवार संतसंग । कीर्तनरंग उल्हास ॥३॥ एक जनार्दनीं सार । विठ्ठल उच्चार करुं आम्हीं ॥४॥
१४१
अवघें परब्रह्मा क्षेत्र ।अवघें तेथें तें पवित्र ॥१॥ अवघा पर्वकाळ । अवघे दैवाचे सकळ ॥२॥ अवघीयां दुःख नाहीं । अवघे सुखाचि तया ठायीं ॥३॥ अवघे आनंदभरित । एका जनार्दनीं सदोदित ॥४॥
१४२
अवघें या रे चला जाऊं । विठ्ठल रखुमाई पाहुं ॥१॥ अवघे ते भाग्याचें । नाम घेती विठ्ठलाचें ॥२॥ अवघे ब्रह्माज्ञानी । शरण एका जनार्दनीं ॥३॥
१४३
अवघें संतां एकमेळ । अवघा देव तो विठ्ठल ॥१॥ अवघे प्रेमरसाचे । अवघे विठ्ठल वदती वाचे ॥२॥ अवघे एकभावी । एका जनार्दनीं सोहंभावी ॥३॥
१४४
अवघें साधनें साधिलें । अवघें विठ्ठलरुप जालें ॥१॥ अवघें कर्म नेणतीं धर्म । अवघा तया परब्रह्मा ॥२॥ अवघी सिद्धि समाधी । अवघी तुटली आधिव्याधी ॥३॥ अवघें जालें एकरुप । एक जनार्दनीं स्वरुप ॥४॥
१४५
अवघेंचि त्रैलोक्य आनंदाचे आतां । चरणीं जगन्नाथा चित्त ठेलें ॥१॥ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ । अनाथांचा नाथ जनार्दन ॥२॥ एका जनार्दनीं एकपणें उभा । चैतन्याची शोभा शोभलीसे ॥३॥
१४६
अवघेंची सुख तयासी जोडलें । अवघे पाउलें देखतांची ॥१॥ अवघें ब्रह्मारुप नाहीं कांहीं चिंता । अवघाचि देखतां पांडुरंग ॥२॥ अवघे ते धन्य क्षेत्रवासी दैवाचे । एका जनार्दनीं वाचे विठ्ठल वदती ॥३॥
१४७
अवघ्या लोकीं जाहलीं मात । नामें पतीत तरती ॥१॥ तोचि घेउनी अनुभव । गाती वैष्णव नाम तें ॥२॥ तेणें त्रिभुवनीं सत्ता । उद्धरती पतिता अनायासें ॥३॥ एका जनार्दनीं गाजली हांक । नाम दाहक पापांसी ॥४॥
१४८
अवघ्या संसाराचा कळस जाला । आमुलाची कैसा पोट आला ॥१॥ पाठीं बैसला तोचि पोटी । उघड्या दिठीं देखतसे ॥२॥ अमोल्यांचें कुळ न सांगवें तोंडें । सोय धरी तरी सखीं भांवडें ॥३॥ पाठीम पोटीं बैसला पाठीं । सोयरीक गोष्टी एका जनार्दनीं ॥४॥
१४९
अवचट दैवयोगें नाम येत मुखा । त्रैलोक्याचा सखा प्राण होय ॥१॥ आवडी आदरें उच्चारी जो नाम । वैकुंठ निजधाम तया सुख ॥२॥ एका जनार्दनीं नामाची ही थोरी । होतसे बोहरी केली पापा ॥३॥
१५०
अवचट मुखीं म्हणतां राम । सर्व दुरितें होती भस्म ॥१॥ नामापुढें पाप रहे । ऐसा कोण वदताहे ॥२॥ घडतां पातकांच्या राशी । तोही नेला वैकुंठासी ॥३॥ भाविकांशी वर्म सोपें । राम मुखें जपावें ॥४॥ जनीं वनीं निरंजनीं । शरण एका जनार्दनीं ॥५॥
१५१
अवतरला श्रीराम परब्रह्मा पुतळा । सुहास्य मुख सुंदर कांसे पितांबर पिवळा ॥१॥ दशरथनंदन रामपाहतां वो मनी ध्यातां । देहबुद्धी हरपली डोळें भरी पहातां ॥२॥ वसिष्ठ गुरुंनींआध्यात्माचा रस बिंबविला । ताटिका समुळ मर्दुनी याग रक्षिला ॥३॥ त्र्यंबक धनुष्य भंगुनीं जनकदुहिता आणिसी । कैकयीवरदें दशरथ निमाला श्रीराम गेले वनवासीं ॥४॥ येवोनियां वनीं रावणें केलें जानकीहरण । सीताविरहें राम आलिंगी वृक्ष पाषाण ॥५॥ वाली वधुनी सुग्रीवा दिली किष्किंदा नगरी । सीताशुद्धी करुनी आला वानर केसरी ॥६॥ सेतुबंधन करुनी सुवेळी आला श्रीराम । राक्षसांसहित रावणा दिलें निजधाम ॥७॥ बिभीषण स्थापिला आणिली जनकनंदिनी । सीतेसह राम बैसले पुष्पक विमानीं ॥८॥ आला श्रीराम सकळां आनंद झाला । भरतभेटीसमयीं राम हृदयीं गहिंवरला ॥९॥ राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न वामांगीं सीता । सिंहासनीं बैसविलें वोवाळिलें रघुनाथा ॥१०॥ झाला जयजयकार आनंदें पिटिली टाळी । एका जनार्दनीं नाचती आनंदें सकळीं ॥११॥
१५२
अवतार शिवाचा । निवृत्ति साचा जप करा ॥१॥ श्रीविष्णूचा अवतार । स्वामी माझा ज्ञानेश्वर ॥२॥ सोपानदेव तो निर्धार । ब्रह्मयाचा अवतार ॥३॥ मुक्ताईचे चरणीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥
१५३
अवरोध विरोध करितां हरिभक्ति । सायुज्यता मुक्ति देणें तया ॥१॥ ऐसा कृपाळू लक्ष्मीच्या पती । पुराणें वर्णिती महिमा ज्याचा ॥२॥ विष पाजुं आली पुतना राक्षसी । अक्षयपदासी दिलें तिसी ॥३॥ अगबग केशी असुर वधिले । सायुज्यता दिलें पद त्यासी ॥४॥ एका जनार्दनीं भक्तांचा कैवारी । ब्रीद हें साचारीं मिरवितसें ॥५॥
१५४
अवलोकितां चंद्रभागा । सकळ दोष जाती भंगा ॥१॥ स्नान करितं भीवरेसी ॥ तरती पातकी अपैसी ॥२॥ दृष्टीं पाहतां विठठल देव न राहे काळाचें भेव ॥३॥ हरुषें वाहातां टाळीं । एका जनार्दनी मुक्त केलीं ॥४॥
१५५
अवलोकितां रामराणा । धणी न पुरे मन नयना ॥१॥ पाहतां नयन लोधले । सुरवर वानर बोधले ॥२॥ भरत राम अलिगनीं । रामीं हारपलें दोन्हीं ॥३॥ एका जनार्दनीं काज । एकछत्रीं रामराज्य ॥४॥
१५६
अविद्या निशींचा लोटला पहार । रजेंसी लोपला तम अंधकार । सत्व शोधित शुद्ध सुमनहार । प्रबोध पाहतां परतला कृष्ण वीरवो ॥१॥ आला रे आला रे म्हणती पहा कृष्ण । जैसा निर्जीवा मीनला जीवप्राण । श्रुती परतल्या आत्मासाक्षात्कार देखोनि । तैशा विव्हळ गोपिका हरि पाहुन वो ॥२॥ कृष्णापाशीं मिनल्या व्रजनारी । कां हो निष्ठुर तूं जालासी हरी । स्नेह धरिती तयासी होसी दुरी । लोभु सांडीती त्यापाशी निरंतरी वो ॥३॥ थोर शिणलाती तुम्हीं मजविण । माझे स्वरुपीं ठेविला जीव प्राण । माझे भेटीसी तंव नाहीं खंडन । सब्राह्मा अंतरी माझे अधिष्ठान वो ॥४॥ ऐसें वचन ऐकोनि हरिमुखें थोर चकल्या वियोगाचे दुःखे । आम्हांमारिले शस्त्राविण वचन तिखें । शेखी हें ना तें केले संगदोषें वो ॥५॥ कृष्णां गोपिका वेधल्या एका मनें । माना मुरडिती प्रीति प्रेमाचें रुसणं । जेवी श्रुति परतल्या नेति या वचनें । एका जनार्दनी धरुनी ठेल्या मौन्ये वो ॥६॥
१५७
अविद्येचे भ्रांतपण । मिथ्या दावी साच धन ॥१॥ तेथ गुंतती लिगाडा । तेणें पडे पायीं खोडा ॥२॥ जन्ममाण भोंवरा । भ्रमें फिरसी निर्धारा ॥३॥ कळोनि कां रें वेडा होसी । एका जनार्दनीं न पाहसी ॥४॥
१५८
अविनाश क्षेत्र पंढरी सर्वथा । आणीक ती वर्ता नये मना ॥१॥ सर्व तीर्थ मार्ग विधियुक्त आहे । येथें उभा पाहे पांडुरंग ॥२॥ आटणी दाटणी मुंडणी सर्वथा । नाहीं पैं तत्त्वतं यया तीर्थो ॥३॥ करावें तें स्नान पुंडलीक वंदन । देखावें चरण विठोबाचे ॥४॥ जनार्दनाचा एका पंढरी सांडुनी । न जाय अवनीं कवण तीर्थीं ॥५॥
१५९
अविनाश नाम स्वयंभ संचलें । तें उभें चांगले विटेवर ॥१॥ वर्णितां वेदांसी न कळेचि पार । तें उभे साचार विटेवरी ॥२॥ मौन्यरुप श्रुती राहिल्या तटस्थ । तो आहे मूर्तिमंत विटेवरी ॥३॥ एका जनार्दनीं नाम अविनाश । गातां जातीं दोष जन्मांतरींचे ॥४॥
१६०
अविवेकें देखा नवल केलें । अभिमानें कैसें लग्न लाविलें ॥१॥ गुणाची नोवरी अवगुणाचा नोवरा । सख्या सहोदरा लग्न केलें ॥२॥ पांचें सुरवाडी सासुरवाडी ये । अकल्पीचे शेजे निजलिये ॥३॥ अंगसंगेविण संतती जाहली । आब्रह्म कैसी तात्काळ व्याली ॥४॥ गुणाचेनि बळें वरसोनी पोटें । घरोघरीं भेटी नेत असे ॥५॥ सत्कर्म विवेकु पोटासी आला । तेणें जागविला आपुला व्याला ॥६॥ उठोनियां वरु संतती खाये । नोवरीसहित गेली माये ॥७॥ पितामहाचा पिता सुभानुतेजें । एका जनार्दनीं न दिजे दुजें ॥८॥
१६१
अविश्वासा घरीं । विकल्प नांदे निरंतरीं ॥१॥ भरला अंगी अविश्वास । परमार्थ तेथें सदा भुस ॥२॥ सकळ दोषांचा राजा । अविश्वास तो सहजा ॥३॥ अविश्वास धरितां पोटीं । एका जनार्दनीं नाहीं भेटी ॥४॥
१६२
अविश्वासापुढें । परमार्थ कायसें बापुडें ॥१॥ अविश्वासाची राशी । अभिमान येतसे भेटीसी ॥२॥ सदा पोटीं जो अविश्वासासी । तोचि देखे गुणदोषासी ॥३॥ सकळ दोषां मुकुटमणी । अविश्वास तोचि जनीं ॥४॥ एका जनार्दनीं विश्वास । नाहीं त्यास भय कांहीं ॥५॥
१६३
अविश्वासी वाडेंकोडें । जेथें जाय तेथें सांकडें ॥१॥ अंगोअंगीं कष्ट सदा । ऐसी तयासी आपदा ॥२॥ जिकडे जाय तिकडे कष्ट । नोहे परमार्थी वरिष्ठ ॥३॥ एका शरण जनार्दनीं । अविश्वास त्यागा झणीं ॥४॥
१६४
अव्यक्त परब्रह्मा न्हाणी पायांवरी । अभेद नरनारी मिळोनियां ॥१॥ पीतांबर पदरें पुशिला घननीळा । निजविला निर्मळ पालखांत ॥२॥ निंब कातबोळ त्रिगुण त्रिखुंडी । प्रेमाचे आवडी सेवी माय ॥३॥ एका जनार्दनीं दत्त पाळण्यांत घातिला । हालविती त्याला अनुसुया ॥४॥
१६५
अशाश्वत देह काळाचें भातुकें पंचप्राण कौतुकें खेळ तेथें ॥१॥ जीव शिव दोन्हीं मध्य बैसाकार । व्यापारी व्यापार सर्व त्याचा ॥२॥ जीव गुंतलासे विषयाचे वोढीं । शिव जाणे गौरी आत्मस्वरूप ॥३॥ ऐसा हा खेळ अनादि पसर । एका जनार्दनीं निर्धार नाम जपा ॥४॥
१६६
अशाश्वत देह जाईल जाईल । वायांचि गमावील अभागी तो ॥१॥ न ये मुखीं कदा श्रीरामचरित्र । वायांचि पैं वक्त्र जल्पे सदा ॥२॥ दिननिशीं कारी संसाराचा धंदा । नाठवी गोविंदा मूढ कांहीं ॥३॥ एका जनार्दनीं अभागी तो खरा । तपाच्या डोंगरा हांव धरी ॥४॥
१६७
अशाश्वतासाठीं । कां रें देवासवें तुटीं ॥१॥ अंतकाळींचें बंधन । कोण निवारी पतन ॥२॥ तूं म्हणसी हें माझें । खरा ऐसें वाहसी वोझें ॥३॥ पावलिया अवसानीं । कोणी नाहीं बा निर्वाणीं ॥४॥ याचा न धरी विश्वास । एका जनार्दनाचा दास ॥५॥
१६८
अष्टदिशी व्यापक नारायण । तेथें नाहीं पूर्व पश्चिमेंचें भान ॥१॥ पहा कर्माची राहाटी । सर्व व्यापक संकल्प म्हणती उठाउठी ॥२॥ नको विष्णु म्हणतां भेद उरला नाहीं । भेदभावें पाहाती सर्वाठायीं ॥३॥ भेदाभेद टाकुनी देई वेगें । एका जनार्दनीं शरण रिघे ॥४॥
१६९
अष्टधातुवेगळा देखिला पुतळा । जिवींचा जिव्हाळा श्रीविठ्ठल ॥१॥ तयाचे चरणीं माझा दंडवत । घडो आणि चित्त जडो नामीं ॥२॥ एका जनार्दनीं देखिला डोळां । जावीं जीवनकळा विठ्ठल देवो ॥३॥
१७०
अष्टही दिशा पुर्ण भरला देव । मा पुर्व पश्चिम भाव तेथें कैंचा ॥१॥ पाहे तिकदे देव व्यापुनी भरला । रिता ठाव ठरला कोठें नाहीं ॥२॥ समाधी समाधान मनाचें उन्मन । मा देवा भिन्नपण नाहीं नाहीं ॥३॥ एका जनार्दनीं एकपणासाठीं । देव पाठीपोटीं भक्तामागें ॥४॥
१७१
अष्टही प्रहर करिसी संसाराचा धंदा । कां रे त्या गोविंदा स्मरसी ना ॥१॥ अंतकांळी कोण सोडवील तूंतें । कां रे स्वहितातें विसरलासी ॥२॥ यमाची यातना न चुके बंधन । सोडवील कोण तुजलागीं ॥३॥ एका जनार्दनीं गुंतलासी वायां । भजे यादवराया विसरूं नको ॥४॥
१७२
अष्टांग योग साधिती साधनी । तो हारिकीर्तनीं नाचे बापा ॥१॥ यज्ञादिकीं अवदान नेघें वो माये । तो उभा राहुनी क्षीरापती खाये ॥२॥ पवन कोंडोनि योगी जाती निराकारीं । तो हरि धर्माघरीं पाणी वाहे ॥३॥ सनकनंदन जया ध्याताती आवडी । तो अर्जुनाची घोडीं धुतो हरि ॥४॥ एका जनार्दनीं भक्तांच्या अंकित । म्हणोनि तिष्ठत विटेवरी ॥५॥
१७३
अष्टांग साधन धूम्रपाण अटी । ब्रह्माज्ञानासाठीं करिताती ॥१॥ परि तें न लभे न लभे सर्वथा । वाउग्याची कथा बोलताती ॥२॥ शाब्दिकाचा शब्द कुंठित ते ठायीं । वाउगें कांहीं बाहीं बोलुं नये ॥३॥ एका जनार्दनीं संतकृपा होतां । ब्रह्माज्ञान तत्त्वतां घर रिघे ॥४॥
१७४
अष्टांग साधन न करी वाउगें । धूम्रपान वेगें कासया करिसी ॥१॥ मनीं हरि धरीं मनीं हरि धरीं । वाउगा तुं फेरीं पडों नको ॥२॥ साधन फुकट वाउगे ते कष्ट । वेगें धरीं हरि वरिष्ठ मनामाजीं ॥३॥ साधन साधितां शिणताती मुनी । तो हरि कीर्तनीं नाचतसे ॥४॥ सायास न लगे करावें तें कांही । एका जनार्दनीं पायीं बुडी दिली ॥५॥
१७५
अष्टांग साधनें करिताती योगी । परी मन अव्यंगीं होत नाहीं ॥१॥ जिंकितांचि मन साधनें साधती । न जिंकितां फजिती मागें पुढें ॥२॥ एका जनार्दनीं काया वाचा मन । धरुनि बंधन त्यासी करी ॥३॥
१७६
अष्टादश पुराणें सांगती बडिवार । नाम सारांचें सार कलियुगीं ॥१॥ तारिले पातकी विश्र्वास घातकी । मुक्त झाले लोकीं तिहीं सत्य ॥२॥ सर्वांतर सार नामजपु निका । जनार्दनाचा एका घोकितसें ॥३॥
१७७
असंख्य वचने असोनी नसती । कोण तया रीती चालतसे ॥१॥ प्रमाण अप्रमाण देहींचा निवाडा । केलासे उघडा श्रुतींशास्त्रीं ॥२॥ हरि नाम वचन एकचि प्रमाण । हें तो अप्रमाण करील कोण ॥३॥ जनार्दनाचे वचनीं द्यावे अनुमोदन । एका जनार्दनीं प्रमण तेंचि होय ॥४॥
१७८
असतां बंदिशाळें । देवकी डोहळे । गर्भ घननिळे । आथियला ॥१॥ गुज पुसे भ्रतारा । आनु नेणें दुसरा । आवडी अवधारा । जिवा होय ॥२॥ मेळवुनि लेंकुरी । खेळ खेळावा साकार । गोकुळीं अवतार । गौळीया घरीं ॥३॥ वर्षतां शिळाधारीं । उचलवा माहागिरी । वेणु पावे करीं । वाजवीत ॥४॥ जळीं रिघ करावा । भवसर्प नाथावा । वरि बैसो बरवा । भाव माझा ॥५॥ कंसादिक वीर । त्यांचा कारावा संहार । ईजे राज्यधर । उग्रसेना ॥६॥ एक यश द्यावें त्रैलोक्य जिंकावें । कनकपूर बसवावें । सिंधुमाजीं ॥७॥ एका जनार्दनीं । डोहाळे संपूर्ण । पुरवी नारायणा । वासनेचे ॥८॥
१७९
असत्य जन्मलें असत्याचें पोटीं । अर्थबळें चावटीं शिकविती ॥१॥ अर्थीं धरूनी आस असत्य बोलणें । अर्थासाठीं घेणें मंत्रयंत्र ॥२॥ अर्थासाठीं प्राण त्यजिती जनीं । अर्थें होत हानी प्राणिमात्रा ॥३॥ एका जनार्दनीं अर्थाचा संबंध । तेथें भेदाभेद सहज उठे ॥४॥
१८०
असत्याचा शब्द नको वाचे माझें । आणिक हो का वोझें भलतैसें ॥१॥ परि संतरज वंदीन मी माथां । असत्य सर्वथा नोहे वाणी ॥२॥ अणुमात्र रज डोळां न साहे । कैसा खुपताहे जन दृष्टी ॥३॥ एका जनार्दनीं असत्याची वाणी । तोचि पापखाणी दुष्टबुद्धि ॥४॥
१८१
असत्याचें मूळ नरदेह साचें । वायां काय याचे कवतूक ॥१॥ हरिनाम सार सेवीं तूं निर्धारें । आणीक पसार शीण वायां ॥२॥ एका जनार्दनीं मृगजळ वोखटें । दिसें तें गोमटें तृषा न हारे ॥३॥
१८२
असोनि उत्तम कुळीं । नाम नाहीं ज्याचे कुळीं ॥१॥ जन्मोनी अधम कुळीं । सदा जपे नामावळी ॥२॥ कुळासी तो नाहीं काज । नाम वदतांचि निज ॥३॥ नाम पावन हे जनीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥
१८३
असोनि कुळींचा हीन । परी ज्यासी ब्रह्माज्ञानी । त्यासी तिन्हीं देवादि सुरगण । वंदिताती ॥१॥ त्याची मृत्युलोकीं सेवा । जयासी घडे सदैवा । मा ब्राह्मण भूदेवा । असंख्य पुण्य जोडे ॥२॥ तयासी वस्त्र अन्न । जठर करिती तृप्त जाण । त्यासी वैकुंठादि आंदण । देव देतो ॥३॥ त्यासी जो करी शीतळ । त्यासी पुण्य जोडे सकळ । एका जनार्दना केवळ । तोचि साधु ॥४॥
१८४
असोनि दुराचारी । मुखा गाय नित्य हरी ॥१॥ तयाचें नमस्कारावे चरण । धन्य जगीं तो पावन ॥२॥ वाचे सदा गाय नाम । तोचि पावे निजधाम ॥३॥ एका शरण जनार्दनीं । तोचि पवित्र त्रिभुवनीं ॥४॥
१८५
असोनि न दिसे वेगळाचि असे । तो पंढरीसी वसे विटेवरी ॥१॥ कैवल्य उघडें राहिलेंसे उभे । कर्दळींचें गाभे समपदीं ॥२॥ द्वैत अद्वैत विरहित सचेतनीआं उभा । एका जनार्दनीं शोभा गोजिरी ती ॥३॥
१८६
असोनि ब्राह्मण । न करी जो संध्या स्नान ॥१॥ तो पातकी चांडाळ । अधम खळाहुनी खळ ॥२॥ वेदमंत्र न ये मुखा । सदा द्वेष निंदा देखा ॥३॥ नाहें श्राद्धसंकल्प घरीं । हिंडें सदा दारोदारीं ॥४॥ हरिनामीं न बैसे चित्त । लोकां पुराण सांगत ॥५॥ ऐसे पामर अभागी । तयांचे दोष कोण भंगी ॥६॥ एका जनार्दनीं नाम । वाचे होऊनी वदा निष्काम ॥७॥
१८७
असोनि संसारीं आपदा । वाचे वदे विठ्ठल सदा ॥१॥ नाहीं मानसीं तळमळ । सदा शांत गंगाजळ ॥२॥ असोनियां अंकिंचन । जयाची वृत्ति समाधान ॥३॥ एका जनार्दनीं ऐसें थोडे । लक्षामध्येंअ एक निवडे ॥४॥
१८८
असोनी उत्तम न करी भजन । संतसेवा दान धर्म नेणें ॥१॥ काय त्यांचे कुळ चांडाळ चांडाळ । मानी तो विटाळ यमधर्म ॥२॥ सदा सर्वकाळ्फ़ संतांची करी निंदा । पापांची आपदा भोगी नरक ॥३॥ स्वमुखें आपण सांगे जनार्दन । एका जनार्दन पूजन करी सुखें ॥४॥
१८९
असोनी देहीं आम्हीं विदेही भाई । नातळों कर्म अकर्माचें ठायीं ॥१॥ माझें नवल म्यांच पाहिलें डोळां । शब्द निःशब्द राहिलों वेगळा ॥२॥ काय सांगु नवलाची कहाणी । पाहतें पाहणें बुडाले दोन्हीं ॥३॥ न पहावें न देखवें नायकावें कानीं । कायावाचामनें शरण एका जनार्दनीं ॥४॥
१९०
असोनी सबराभरी बाह्मा आणि अंतरीं । संपुष्टामाझारीं म्हणती देव ॥१॥ कल्पनेचा देव ऐसा जया भाव । तो न करी निर्वाहो आम्हा लागीं ॥२॥ सुक्षेत्रीं पुण्य अनुक्षेत्रीं पाप । न चले हा संताप कल्पनेचा ॥३॥ काशी हो पंढरी तीर्थयात्रा करी । सर्वत्र नरहरी तोचि भाव ॥४॥ एका जनार्दनीं सर्व सिद्धि असे । नाथिलेंचि पिसें मतवाद्या ॥५॥
१९१
अस्तमान जालिया ग्रामांत परतले । गोपाळ ते गेले घरोघरीं ॥१॥ आपुलिया गृहीं रामकृष्ण आले । यशोदेनें केलें निंबलोण ॥२॥ षड्रस पक्वान्नीं विस्तारिलें ताट । जेविती वैकुंठ नंदासवें ॥३॥ नंदासवें जेवीं वैकुंठीचा हरी । ब्रह्मादिक सरी न पावती ज्यांची ॥४॥ एका जनार्दनीं ऐसी लीला खेळे । परब्रह्मा सांवळें कृष्णरुप ॥५॥
१९२
अस्थिमांसाचा हा कोथला । ऐसा देह अमंगळा ॥१॥ प्राणी म्हणती माझें माझें । खर जैसे वाहे वोझें ॥२॥ न कंटाळे कधीं मन । जेवीं भुलें सर्प जाण ॥३॥ एका जनार्दनीं देवा । याचा विसर पाडावा ॥४॥
१९३
अहं तृणावर्त बळी । प्रवेशला गोकुळीं । मोहममतेची राहाटोळी । भवंडीतसु ॥१॥ रज उधळले तेणें बळें । झाकोळले बुद्धीचे डोळे । कृष्ण आहे नाहीं हें न कळे । सकळिकांसी हो ॥२॥ श्रद्धा यशोदा म्हणे । माझा कृष्ण नेला कोणें । न दिसें रजोगुणें । मायें काय करुं वो ॥३॥ कैसें निबीड निबीड रज । मीचि न देखें मज । तेथें कृष्ण सोय निज । कवण दावी ॥४॥ तळमळीताहे मन । गेलें निधान । संतां सोय सविघ्र । बाधीना बा ॥५॥ बाळ सांवळें देखोनियां दिठी । आला धांवोनि उठाउठीं । कृष्णें घातली मिठी । अद्वैतपणें ॥६॥ वेगें नेला गगनावरी । कृष्णची गगनभरी । यावया जावया तिळभरी । वावो नाहीं बा ॥७॥ जडला कृष्ण अंगीं । कृष्णचि जाला वेंगीं । द्वैतभाव भंगीं । गेला त्याचा ॥८॥ संकल्प विकल्प पांख । उपडिलें दोन्हीं देख । येणें जाणें निःशेष । खुंटलें त्यांचें ॥९॥ कृष्णकारणीं हेंदुर्घट । आली भुलविली वाट । जिवनीं जेवीं मीठ । विरोनि जाय ॥१०॥ तृणावर्ता आवर्तु । भवंडी कृष्णनाथु । करणें देहा घातु । करुनी ठेला ॥११॥ पाहतां वेदविधी । द्वेत दृष्ट बुद्धी । एका जनार्दनीं । बैसविली निजपदीं ॥१२॥
१९४
अहं सोहं कोहं सर्व आटलें । दृश्य द्रष्ट्रत्व सर्व फिटलें ॥१॥ ऐसी कृपेची साउली । माझी जनार्दन माउली ॥२॥ द्वैत अद्वैताचें जाळें । उगविलें कृपाबळें ॥३॥ अवघें एकरुप जाहलें । दुजेपणाचे ठाव पुसिले ॥४॥ शरण एका जनार्दनीं । एकपणें भरला अवनीं ॥५॥
१९५
अहं सोहं कोहं सांडोनियां देई । निवृत्तीचे पायीं बुडी देखा ॥१॥ अकार उकार मकार निर्धार । सर्व चराचर निवृत्तिरुप ॥२॥ स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण । तें निवृत्तिनाम जाण सत्य होय ॥३॥ शुध्द बुध्द नाम निवृत्तीचे वाचे । एका जनार्दनीं साचें स्मरे मनीं ॥४॥
१९६
अहं सोहं वृक्षा तो निघाला वोहं । याचा शेंडा नाहीं मा कोठें कोहं ॥१॥ कान्होबा उघद माझें कोडें । बोल बोलती साबडे । अर्थ करे कां रे निवाडे ॥२॥ वृक्ष जाहला मन पवन । वृक्ष तो सहजचि हवन । वृक्षें वेधलें चराचर गहन रे ॥३॥ वृक्षे भेदिलें आकाश । एका जनार्दनीं निरवकाश । वृक्षचि जाहला अलक्ष रे ॥४॥
१९७
अहंममता घारीपुरी । समुळ साधली दुरी ॥१॥ चतुर्विध केलीं ताटें । मानी शरण गोमटें ॥२॥ मन पवन समर्पिलें । भोग्य भोक्तृत्व हारपलें ॥३॥ एका जनार्दनीं भोजन । तृप्त झालें त्रिभुवन ॥४॥
१९८
अहर्निशी ध्यान शंकर धरींज्याचेंआ । तो श्रीराम वाचे कां रे नाठविसी ॥१॥ रामनाम म्हणतां तुटेल बंधन । होईल खंडन कर्माकर्मी ॥२॥ रामनामें गणिका नेली मोक्षपदा । तुटती आपदा गर्भवास ॥३॥ रामनाम जप नित्य ती समाधी । एका जनार्दनीं उपाधि तुटोनि गेली ॥४॥
१९९
अहर्निशी म्हणतां । तेथें न बाधे काळ सत्ता ॥१॥ वरीष्ठा वरिष्ठ नाम । तिहीं लोकीं तें उत्तम ॥२॥ असो भलते याती । परी मुखीं नाम जपती ॥३॥ वंद्य होती हरिहरां । देवा इंद्रादिकां थोरां ॥४॥ ऐशीं नामीं जयां आवडी । एका जनार्दनीं गोडीं ॥५॥
२००
अहा गे पापिष्टे भजन भंगिलें । ताडनालागीं घेतलें काष्ठ हातीं ॥१॥ नेणवेची बाळ आपण तुडविलें । भजनाचें वाटलें दु:ख मनीं ॥२॥ घेऊनियां काष्ठ तांतडी धांवला । कां गे त्वा भंगिला नेम माझा ॥३॥ एका जनार्दनीं मारुं जाता घाय । तेव्हां कांता बोले काय गोरोबासी ॥४॥
२०१
अहा रे अभाग्या काय केलें । फुकट नरदेह गामविलें ॥१॥ भजें भजें रामकृष्ण वासुदेव । वाउगा सांडोनी देई हेवा ॥२॥ मुळ संकल्प तोडोनिया टाकीं । अहंकार ममता वासना उपाधि शेखीं ॥३॥ एका जनार्दनीं टाकुनी परता होय । वाचे सदा गाय वासुदेव ॥४॥
२०२
अहा रे पामरा मीपण फुगारा । व्यर्थ कां रे भारा वागविसी ॥१॥ शस्त्राचेनि रोम चक्र नोहे अंगा । तया सहस्त्र भगा जाहले देखा ॥२॥ विष अग्नीचेनि मेळे । तया कांहें न पोळे ॥३॥ एका जनार्दनीं मन । देवापायीं केलेंक अर्पण ॥४॥
२०३
अहा रे मुढा अहा रे मूढा । जन्मोनी दगडा काय केलें ॥१॥ साठी घाटी करसी संसाराचा छंद । वाचे तो गोविंद नुच्चारिसी ॥२॥ एका जनार्दनीं श्रीरामावांचून । चुकवील बंधन कोण मूढ ॥३॥
२०४
अहिरावणे राम धरुनियां नेला थोर मांडिले निर्वाण । घायातळीं राम उभा करुनियां म्हणतसे करीं रे स्मरण ॥१॥ जगाच्या संकटीं रामातें स्मरती राम स्मरावें कवण ॥धृ०॥ देवांचें मरण भक्तें चुकविलें म्हणोनि अमर केला हनुमंतु । न तुटे न जळे न बुदे न ढळे संसारी असोनी अलिप्तु ॥२॥ दुसरेनि अवतारें रामासी जन्मु परी हनुमंत जन्मातीतु । देवासी जन्ममरण दिसते अविनासी । एका जनार्दनीं केले भक्तु रे या ॥३॥
२०५
अहो करुणाकरा पतितपावना । आमुच्या वचना चित्त द्यावें ॥१॥ दिन मी हीन रंकाहुनी रंक । म्हणोनियां देह शरण तुम्हां ॥२॥ आमुचें सांकडें वारुनिया देवा । द्यावी तुम्ही सेवा एका चित्तें ॥३॥ एका जनार्दनीं संकल्प हा दृढ । आतां नाहीं गुढ तुम्हापुढें ॥४॥
२०६
अहो दयाळे ज्ञानाबाईं । आर्त माझें तुझ्या पायीं ॥१॥ इंद्रायणीचे तटीं । ज्ञानाबाईं वो गोमटी ॥२॥ सकळ मेळा हो सिध्दांचा । ज्ञानाबाई अनुग्रहाचा ॥३॥ पूर्व पश्चिम देवस्थान । मध्यें ज्ञानाबाई आपण ॥४॥ ऐशी ज्ञानाबाई ध्याऊं । एका जनार्दनीं शरण जाऊं ॥५॥
२०७
अहो देवा गुणनिधाना । परिसा विज्ञापना माझी एक ॥१॥ माझें मज आश्वासन । देखिल्या चरण तुमचे ॥२॥ हेंचि माझी करुणा करा । भक्ति अवधारा भोळी ते ॥३॥ शरण एका जनार्दनीं । माझा विनवणी परिसावी ॥४॥
२०८
अहो नारायणा । सांभाळावें आम्हां दीना ॥१॥ आमुची राखावी ती लाज । परंपरा हेंचि काज ॥२॥ सांभाळावे ब्रीदावळी । करुणाकल्लोळीं दयाळ ॥३॥ एका जनार्दनीं शरण । करुणाकर पतितपावन ॥४॥
२०९
अहोरात्र वाचे वदा । राम गोविंद नामची ॥१॥ तेणें तुटे भेदाभेद । निरसे संसाराच्या कंद ॥२॥ ध्यानीं मनीं आणि शयनीं । वाचे वदा चक्रपाणी ॥३॥ ध्येय ध्याता ध्यान । आठवावें मधुसुदन ॥४॥ एका जनार्दनीं घोका । आवडीनें रामसखा ॥५॥
२१०
आंगीचिया बळें खेळसी हुतुतु । वृद्धपण आलिया तोंडावरी थुथुथु ॥१॥ कासया खेळसी वायां भजें गुरुराया । चुकविल डाया हुतुतुतु ॥२॥ एका जनार्दनीं हुतुतु नको भाई । मन जिंकुनियां लागे कान्होबाचे पायीं ॥३॥
२११
आंगुलींवरी आंगुली । खेळतसे तान्हुली । पडली तिची साउली । भिन्न माध्यान्ही ॥१॥ दिवसांचें पाहणें । पाहतां दिसे लाजिरवाणें । खेळ मांडिला विंदानें । नवल ऐका ॥२॥ बारा सोळा घागरीं । पाणी नाहीं थेंबवरी । नाहायासी बैसली नारी । मुक्त केशें ॥३॥ घरधनी उभा ठेला । तेणें रांजण उचलिला । जाउनी समुद्रीं बुडाला । नवल ऐका ॥४॥ नाहतां नारी उठली । परपुरुष भेटली । आनंदानें बैसली । निजस्थानी ॥५॥ काळें निळें नेसली । जाउनी दारवंटीं बैसली एका जनार्दनीं देखिला । नवल ऐका ॥६॥
२१२
आंबिया पाडुं लागला जाण । अंगीं असे आंबटपण ॥१॥ सेजे मुराल्याची गोडी । द्वैताविण ते चोखडी ॥२॥ टीकाळले सेजे घालिती । तयांसंगें दुजे नासती ॥३॥ अग्निपोटीं निपजे अन्न । वाफ न जिरतां परमान्न ॥४॥ एका जनार्दनीं गोडी । तोडा लिगाडीची बेडी ॥५॥
२१३
आंबे केळीं द्राक्ष घडु । रामनामापुढें अवघें कडू ॥१॥ नाम गोड नाम गोड । हरी म्हणता पुरे कोड ॥२॥ गूळ साखर कायसी निंकीं । अमृताची चवी जाली फिकी ॥३॥ एका जनार्दनीं पडली मिठी । चवी घेतली ती कधीच नुठी ॥४॥
२१४
आकार निराकार विश्वरुपाचा ॐकार । तो हा सर्वेश्वर बाळरुपें ॥१॥ रांगणारांगतु हळुच पिलंगतुं । आनंदभरितु नंदराय ॥२॥ अंगणीं धांवतु सर्वेंचि बैसतु । अचोज दावितु भक्तालागीं ॥३॥ एका जनार्दनीं नित्य निरामय । न कळे वो माया काय बोलूं ॥४॥
२१५
आकाशापासोनी वायु झाला । तो गगनावेगळा नाहीं गेला ॥१॥ अग्नीपासुनी जळाचा अंशु । जळापासुनी पृथ्वीप्रकाशु ॥२॥ तैसें कार्य आणि कारण । परस्परें अभिन्न जाण ॥३॥ जेवीं तंतु आणि पटु । दोन्हीं दिसती एकवटु ॥४॥ साखरेचे नारळ केले । परि साखरत्व नाहीं मुकले ॥५॥ जेवीं कां पृथ्वीमृत्तिका । मृत्तिकेंचें भांडें देखा ॥६॥ ऐसें कार्यकारण विशेष । एका जनार्दनीं निज दास ॥७॥
२१६
आगमी निगमीं पाहतां तो सुगमीं । वेदादिकां दुर्लभ आम्हां तो सुगमीं ॥१॥ नवचे वाचे बोल बोला तो वेगळा । व्यापुनी ब्रह्मांडी आहे तो उगला ॥२॥ सार मथिल कोढोनि चैत्यन्य गाभा । पाहतां दिसे त्याची अनुपभ्य शोभा ॥३॥ सांकडे नव्हें भेटी जातां लवलाहे । उभारुनि बाह्मा आलिंगी लाहे ॥४॥ एका जनार्दनीं सर्व सारांचे सार । उभा विटेवरे परब्रह्मा निर्धार ॥५॥
२१७
आजी उत्तम सुदीन । झालें दरुशन संतांचें ॥१॥ पापताप दैन्य गेलें । संत पाउलें पहातां ॥२॥ आवघा यत्न फळा आला । अवघा झाला आनंद ॥३॥ अवघें कर्म सुकर्म झालें । अवघे भेटले संतजन ॥४॥ एका जनार्दनीं बरा । संतसमागम खरा ॥५॥
२१८
आजी कांहो कृष्ण वर्जिली यमुना ।बाऊ तो जाणा कोठोनि आला ॥१॥ कैसा आहे बाहु पाहिन तयातें । म्हणोनि त्वरित उठिलासे ॥२॥ वारितां वारितां पेंदा पै गेला । पहातसे उगला यमुनेंत ॥३॥ बाऊ तो न दिसे कोठें खल्लाळ वाजत । पेंदा तया म्हणत क्रोधयुक्त ॥४॥ म्हणतसे पेंदा यमुनेसी जाण । स्त्री तूं होऊन हुंबरी घेसी ॥५॥ मी कृष्णदास घेसी तुं हुबरी । तुज निर्धारी बळ बहु ॥६॥ मी काय निर्बळ घेसी तुं हुबरी । आतांची निर्धारी पाहें माझें ॥७॥ म्हणोनियां पेंदा तेथेंची बैसला । हुबरीं तो तयाला घालीतसे ॥८॥ पेंदा कां नये काय जाहलें त्याला । कृष्णें पाठविला दुजा एक ॥९॥ तोही मीनला तयांसी तत्काळ । गडी तों सकळ आलें तेथें ॥१०॥ उरलेसे दोघे कृष्ण आणि राम । गुंतलें सकाम गडी तेथें ॥११॥ काय जाहलें म्हणोनि आले उभयंता । पाहुनी तत्त्वतां हांसताती ॥१२॥ सावध करितां न होती सावध । लागलासे छंद घुमरीचा ॥१३॥ एका जनार्दनीं कौतुकें कान्हया । आली असे दया भक्तांची ते ॥१४॥
२१९
आजी दिवस धन्य झाला । संतसमागम पावला ॥१॥ बरवा फळला शकून । अवघा निवारला शीण ॥२॥ सुस्नात झालों । संतसमागरीं नाहलों ॥३॥ एका जनार्दनीं भावें । संतचरणीं लीन व्हावें ॥४॥
२२०
आजी दिवाळी दसरा । आलों विठ्ठलाचे द्वारा ॥१॥ पाहूनिया देव तीर्थ । आनंदें आनंद लोटत ॥२॥ नाठवें कांहीं आन दुजें । विठ्ठलावांचुनी मनीं माझें ॥३॥ आशा केलीं तें पावलों । एका जनार्दनीं धन्य जालों ॥४॥
२२१
आजी दिवाळी दसरा । श्रीसाधुसंत आले घरा ॥१॥ पायीं घालूं मिठी । आनंदें नाचुं वाळुवंटीं ॥२॥ पाहूं हरींचें ध्यान । तेणें मना समाधान ॥३॥ एका जनार्दनीं भाव । विटे उभा विठ्ठलराव ॥४॥
२२२
आजी देखिलीं पाउलें । तेणें डोळे धन्य जाहले ॥१॥ मागील शीणभारु । पाहतां न दिसे निर्धारु ॥२॥ जन्मांचें तें फळ । आजी जाहलें सुफळ ॥३॥ एक जनार्दनीं डोळा । विठ्ठल देखिला सांवळा ॥४॥
२२३
आजी धन्य दिन जाला । स्बामी निवृत्ति भेटला ॥१॥ जन्म जरामरण व्याधी । अवघी तुटली उपाधि ॥२॥ मन इंद्रियांसहित । पायीं जडियेलें चित्त ॥३॥ समूळ अहंकार गेला । निवृत्तिनाथ पाहतां डोळां ॥४॥ एका विनवी जनार्दन । निवृत्तिनामें जालों पावन ॥५॥
२२४
आजी नवल झालें वो माय । पाहण्या पाहण्या पाहणें दृष्टी धाये ॥१॥ ऐसा लाघवी सुखकर मूर्ती । संतसंगे जाली मज विश्रांती ॥२॥ योगीश्वर जया चिंतिती । सनकादिक जया ध्याती ॥३॥ योग साधनें नातुडे जो माये । एका जनार्दनीं कीर्तनीं नाचतु आहे ॥४॥
२२५
आजी नीलवर्ण कुसुमसम । देखिला मेघ शाम विटेवरी ॥१॥ अतसीकुसुम रंग रंगला श्रीरंग । भोंवाता शोभे संग संतजन ॥२॥ निळीय भासत तो रंग दिसत । शामंकित शोभत विठ्ठल देव ॥३॥ एका जनार्दनीं नीलवर्ण रुपडें । पाहतां चहुकडे कोंदाटलें ॥४॥
२२६
आजी मी तयाचे न पाहतां चरण । देईन आपुला प्राण याचिक्षणीं ॥१॥ जाणोनी निर्धार सांवता बोले त्यासी । ह्रदयनिवासी आत्माराम ॥२॥ अभिमानें नाडले प्रपंचीं भागलें । ते या श्रीविठ्ठलें उध्दरिले ॥३॥ नामदेव तुज तंव नाहीं अभिमान । मग कळली खूण अंतरांत ॥४॥ एका जनार्दनीं सदगद होउनी । मिठी घाली चरणीं सांवत्याच्या ॥५॥
२२७
आजी वो कां हो कृष्ण नाहीं आला । म्हणोनि खेद करी गौळणी बाळा । काय हो ऐसा देहीं लागला चाळा । कां रे न येसी बाळा नंदाचिया ॥१॥ कवण देवा नवसी नवसू । कवणा गुरुतें मार्ग पुंसुं । कैसा भेटेल हा हृषीकेशु म्हणोनि । मन जाहलें उदासू ॥२॥ हा कृष्ण आजी कां घरी नये । आतां काय करुं यासी उपाय । एका जनार्दनी धरुं जाय पाय । तैच दरुशन होय आजी याचें ॥३॥
२२८
आजी सुदिन आम्हांसी । संतसंग कैवल्यराशी ॥१॥ हेंचि आमुचें साधन । आणिक नको आम्हां पठण ॥२॥ वेदश्रुति पुराण मत । संतसेवा तें सांगत ॥३॥ जाणोनि विश्वासलों मनीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥
२२९
आजीचा सुदीनु आम्हां झाला आनंदु । सकळां स्वरुपीं स्वयें देखें गोविंदु ॥१॥ पाहिला गे माय आतां सांगुं मी कैसें । जेथें पाहे तेथेंक गोविंदु दिसे ॥२॥ पाहतां पाहणें तटस्थ ठेलें । सबाह्म अभ्यंतरीं पुरुषोत्तम कोंदलें ॥३॥ यापरी पाहतां हरुष होतसें मना । एका जनार्दनीं धणी न पुरे मना ॥४॥
२३०
आठ दिवसांची ऐवजाची बोली । आहे ते नेमिली नामा सांगे ॥१॥ सांगोनियां नामा राउळासी आला । वृत्तांत सांगितला विठोबासी ॥२॥ कापड विकिलें धोंडोबा गणोबासी । ऐवज आठवे दिवशीं आपुला घ्यावा ॥३॥ एका जनार्दनीं सर्वांचा तो आत्मा । सांगतांचि नामा देव हांसे ॥४॥
२३१
आठवण ती हीच असो । वाचे वसो हरिनाम ॥१॥ काया वाचा आणि मन । करुं कीर्तन धुमाळी ॥२॥ धरुं वैष्णवांचा संग । टाकूं कुसंग लाजोनी ॥३॥ म्हणूं आम्ही हरीचे दास । एका जनार्दनीं निजदास ॥४॥
२३२
आठवा आठवा वेळोवेळा आठवा । श्रीकृष्ण आठवा वेळोवेळां ॥१॥ कलीमाजीं सोपें आठवा आठवण । पावन तो जन्म आठव्यानें ॥२॥ आठवा नामें तरी पांडवा सहाकारी । दुराचारियां मारी आठवा तो ॥३॥ एका जनार्दनीं आठव्याची आठवण । हृदयीं सांठवण करा वेंगीं ॥४॥
२३३
आठवावें हरीचे गुण । तेणें मना समाधान ॥१॥ मग न जाय सैरावैरा । चुके जन्माच्या वेरझारा ॥२॥ एका जनार्दनीं ध्यान । सदा मनीं नारायण ॥३॥
२३४
आठवितां दत्तात्रय । नासताती तापत्रय ॥१॥ प्राप्त होय ऋद्धिसिद्धि । दत्तनामें ती समाधी ॥२॥ योगयागादि साधन । गुरुभक्त पावे जाण ॥३॥ विवेक वैराग्य शमादी । हस्ती व्यसे निष्कर्मसिद्धि ॥४॥ एका जनार्दनीं दत्त । सदा हृदयीं तिष्ठत ॥५॥
२३५
आठवी गोविंद वेळोवेळी वाचें । तेणें या देहांचे सार्थक होय ॥१॥ विठ्ठल विठ्ठल मनीं निरंतर साचा । काय मने वाचा छंद त्यांचा ॥२॥ त्याविण आणिक दैवत पै नाहीं । आणिक प्रवाहि गुंतुं नको ॥३॥ सर्व सुखाचा विठ्ठल सांगाती । एक जनार्दनीं भ्रांती काढी काढी ॥४॥
२३६
आडक्या कारणें जीव जात । म्हणती आम्ही उदार भक्त ॥१॥ ऐसिया दांभिकांसी । दुरी होय हरी त्यांसी ॥२॥ गाजराची तुळा साची । वाट पाहाती विमानाची ॥३॥ एका जनार्दनीं खोटा भाव । तयासी न भेटे देव ॥४॥
२३७
आणिक एक चमत्कार । जेव्हा उद्वस अलंकापूर । तेव्हां रंकांसी आदर । ज्ञानेश्वरें केला ॥१॥ वाणी होउनी आपण । प्रत्यक्ष मांडिलें दुकान । अन्न उदक तृप्त जाण । सर्वही केलें ॥२॥ ऐसें हे कौतुक । आश्चर्य मानती लोक । एका जनार्दनाचा रंक । चरणारविंदींचा ॥३॥
२३८
आणिक तें आम्हां न दिसे प्रमाण । कीर्तनावांचून आनु नेणों ॥१॥ राम कृष्ण हरि विठ्ठल उच्चार । करुं हा गजर वाहुं टाळी ॥२॥ आनंदे नामावळी गाऊं पैं कीर्तनीं । श्रुतीं टाळ घोळ लाऊनी गजरेंसी ॥३॥ एका जनार्दनीं हाचि आम्हां छंदा । वाऊगा तो ढंग न करुं कांहीं ॥४॥
२३९
आणिक साधन नाहीं नाहीं जगीं । नामपाठ वेगीं गाय जना ॥१॥ तुटली बंधनें खुंटलें पतन । नामपाठ खुण वैकुंठाची ॥२॥ जनार्दनाचा एका नामपाठें रंगला । भोळ्या भाविकाला नामपाठ ॥३॥
२४०
आणिक साधनीं नको गुंतुं मना । धरी या चरणीं । विठोबाच्या ॥१॥ वाउगा बोभाट कासया खटपट । पंढरीची वाट सोपी बहु ॥२॥ एका जनार्दनीं कायावाचामनें । सतत राहणें संतापायीं ॥३॥
२४१
आणिकांची आस नको करूं मना । चिंती तूं चरणा विठोबाच्या ॥१॥ वाचे नाम गाये वाचे नाम गाये । वाचे नाम गाये विठोबाचे ॥२॥ करकटीं उभा चंद्रभागें तटीं । पुंडलिकापाठीं धरूनी ध्यान ॥३॥ ठेविले चरण दोन्हीं विटेवरी । वाट पाहे हरी भाविकाची ॥४॥ एका जनार्दनीं उभारुनी बाह्मा । आलंगीत आहे भोळे भोळे ॥५॥
२४२
आणिकांचे धरितां आस । होतो नाश जीवित्वा ॥१॥ म्हणोनि निर्धारिलें मन । धरिलें ठाणें रामकृष्ण ॥२॥ न धांवे आतां कोठें मन । हृदयीं ध्यान धरिलें तें ॥३॥ एका जनार्दनीं प्राण । ठेविला जाण समूळ चरणीं ॥४॥
२४३
आणिकांचें मत नका पडुं तेथ । भजा पंढरीनाथ एकभावें ॥१॥ काय होणार तें होईल देहांचें । नाशिवंत साचें काय हातीं ॥२॥ मृतिकेचा गोला गोळाचि मृत्तिका । वाउगाचि देखा शीण वाहे ॥३॥ घट मठ जेवीं आकाश निराळें । एका जनार्दनीं खेळें अकळची ॥४॥
२४४
आणिकाचे मनीं आणीक संकल्प । न धरा विकल्प वासनेचा ॥१॥ नका यातायाती वाउगी फजिती । उगवा गोवांगुंती आपुलाली ॥२॥ एका जनार्दनीं एकचि स्मरा । जन्म वेरझारा खंड होती ॥३॥
२४५
आणिकाचें मतें सायास न करणें । आम्हांसी पाहुणे पंढरीराव ॥१॥ डोळां भरुनिया पाहिलें देवासी । तेणें चौर्‍यायंशी चुकली सत्य ॥२॥ एका जनार्दनी देवाधिदेव । देखिला स्वयमेव विटेवरी ॥३॥
२४६
आणिकासीं जाता शरण । हें तों तुम्हां उणीवपण ॥१॥ दास विठोबाचें व्हावें । तिहीं सर्व सुख भोगावें ॥२॥ एका जनार्दनीं म्हणा दास । तुमची आस पुरवील ॥३॥
२४७
आणीकाचें नामें कोण हो तरला । ऐसें सांगा मला निवोडोनी ॥१॥ या रामनामें पातकी पतीत । जीव असंख्यात उद्धरीले ॥२॥ जुनाट हा पंथ शिवाचें हें ध्येय । रामनाम गाये स्मशानीं तो ॥३॥ गिरजेसी आवडी रामनामें गोडी । एका जनार्दनीं जोडी हेंचि आम्हां ॥४॥
२४८
आणुनी धोंडोबा कोंडियेला घरीं । मात सांगे हरिजवळी नामा ॥१॥ दामशेटी गेला आपुले कारणा । मागें आणिलें जाणा धोंडोबासी ॥२॥ देव म्हणे नाम्या बरें नाहीं केलें । एका जनार्दनीं बोले काय तेव्हां ॥३॥
२४९
आणूनियां सिंहासनीं बैसविला । पूजा उपचार केला षोडशोपचार ॥१॥ वस्त्र अलंकार देउनी गौरविला । मग पुसता जाहला क्षेम सर्व ॥२॥ अष्टनायकादि मिळालीसे मांदी । नमिती आनंदी सुदाम्यासी ॥३॥ एका जनार्दनीं सारुनी भोजन । सुखरुप शयन करविलें ॥४॥
२५०
आतां आम्हीं सहजचि थोर । ब्रह्मा विष्णु महेश्वर । परब्रह्मा स्वयें ॐकार । परात्पर जगदात्मा ॥१॥ आम्हीं सहजचि स्वतः सिद्ध । जागृति सुषुप्ति साध्य । तूर्या त्रिसाक्षीणी बोध । अति अगाध उन्मनी ॥२॥ ते उन्मनीं परात्पर । निर्गुण हो निराकार । तुर्या तिचा आकार । एका जनार्दनीं सगुणाकार देह झाला ॥३॥
२५१
आतां उरलें तें मत । तेथें वस्तु सदोदित । त्यासी नाहीं अंत । कवणे काळीं ॥१॥ महाकारण शरीर । ज्याचा अभिमानी ईश्वर । मुर्ध्नीं तें घर । ब्रह्माडीचें ॥२॥ तेथें नाहीं काळ । त्यासी नाहीं वेळ । उत्तम स्थळ । पवित्र असे ॥३॥ प्रभा आणि ज्योति । रत्‍न आणि दीप्ती । किरण आणि गभास्ती । एकरुप ॥४॥ तैसी वस्तु आणी ईश्वर । एक पैं प्रकार । पृथ्वी अंबर । दोन्हीं एक ॥५॥ तैशा शरीरा ज्योति । आदिमध्य अंतीं । वस्तु तें तत्त्वार्थीं । भरली असें ॥६॥ देह जावो अथवा राहो । आम्हीं वस्तुचि आहों । एक जनार्दनीं भावों । दृढ झालिया ॥७॥
२५२
आतां काय पुजुं देवा । माझी मज घडे सेवा ॥१॥ तोडुं गेलों तुळशीपान । तेथें पाहतां मधुसूदन ॥२॥ अत्रगंध धूप दीप । तेंही माझेंचिक स्वरुप ॥३॥ एका जनार्दनीं पूजा । पुज्य पूजक नाहीं दुजा ॥४॥
२५३
आतां कारण जें अज्ञान । तेंहीं गेलें वोसरोन । बोधाचें आसन । बैसलें तेथें ॥१॥ कारण रुप सुषुप्ति । आनंद भासत हृदयीं प्राप्ती । या समस्ताची वस्ती । वस्तु झाली ॥२॥ ऐसा असोन वोहोट झाला । ज्ञानरसें पैं भरला । मग सर्वांठायीं देखिलां । आत्मबोध ॥३॥ एका जनार्दनीं आत्म्याची भेटी । तेथें उडाली त्रिगुण । मग बोधासी राहटी । जेथें तेथें ॥४॥
२५४
आतां धर्माधर्म विचार । तो ऐका सविस्तर ॥१॥ शुद्र पतीत गृहींचें अन्न । एक रात्र पावन जाण ॥२॥ व्याघ्र - नख गज - दंत । अपवित्र जंव स्नेहयुक्त ॥३॥ पटतंतु स्वयें पुनीत । वायूनें शुद्ध उर्णावस्त्र ॥४॥ गोक्षीर पवित्र कास्यपात्रीं । तेंचि अपवित्र ताम्रपात्रीं ॥५॥ घृत पवित्र अग्नि संस्कारीं । अग्नि पवित्र ब्राह्मणमंत्री ॥६॥ वेद पवित्र गुरुमुखें । गुरुपवित्र निजात्मसुखें ॥७॥ पृथ्वी पवित्र जळ संस्कारी । जळ पवित्र पृथ्वीवरी ॥८॥ व्याघ्राजिन मृगाजिन । हें स्वाभाविक पवित्र जाण ॥९॥ एका जनार्दनीं निर्धार । मुख्य पवित्रता अंतर ॥१०॥
२५५
आतां यजन कैशापरी । संसारा नोहे उरी ॥१॥ सदगुरुवचन मंत्र अरणी । तेथोनि प्रगटला निर्धुम अग्नी ॥२॥ सकळीं सकळांच्या मुखें । अर्पितसे यज्ञ पुरुषें ॥३॥ एका जनार्दनीं यज्ञे अर्पी । अर्पीं त्यामाजीं समर्पी ॥४॥
२५६
आत्मज्ञान वैश्वानरीं । धूप जाळिला सरोभरी ॥१॥ तेणें मातला परिमळ । पिंडब्रह्मांडीं सकळ ॥२॥ वासाचा निजवास । एका जनार्दनीं सुवास ॥३॥
२५७
आत्मज्ञानें बिंबलें हृदयीं । दत्त वोळखिला ठायीं ॥१॥ पारिखेपणा दुर केला । अवघा दत्तचि गमला ॥२॥ नामें पवन चराचरें । तें दत्तनाम दोन अक्षरें ॥३॥ एका जनर्दनीं छंद । दत्तनामें लागला वेधु ॥४॥
२५८
आत्मत्वाचें ठायीं सर्व एकाकार । नाहीं नारीनर भेद भिन्न ॥१॥ वर्णाश्रम धर्म ज्ञाति कुलगोत । एकाकारी होत आत्मतत्त्वीं ॥२॥ सदोदित पाहे सर्वाठायीं आहे । एकाजनार्दनीं सोय धरी त्याची ॥३॥
२५९
आत्मा केवळ एकला एक । तेथें सुखदुःख कैंचे ॥१॥ आत्मा सुखदुःखावेगळा । हें तों न कळे कळा तयाची ॥२॥ म्हणे जनार्दनाचा एका । आत्मा देखाक सर्वघटीं ॥३॥
२६०
आत्मा तो देहीं नाशिवंत नाहीं । आशाश्वत पाहीं कलेवर ॥१॥ उमजोनी उमजोनी झाकिती डोळे । बळेंचि अंधळे होती मूर्ख ॥२॥ मरणाचे हावे एकमेकां बोलती । गेला गेला म्हणती असोनी जवळी ॥३॥ एका जनार्दनीं ऐसे ते अंध । भुलले मतिमंद भ्रांतियोगें ॥४॥
२६१
आदरें आवडी गाती जे नाम । तया न बाधी क्रोध काम ॥१॥ नाम आठव नाम अठवा । हृदयीं सांठवा रामनाम ॥२॥ संत समुदाय वंदावे आवंडीं । अंतरीची गोडी नित्य नवी ॥३॥ एक जनार्दनीं प्रेमाचा पुतळा । विठ्ठल देखिला डोळां धन्य झालों ॥४॥
२६२
आदि अंत नाहीं जयाचे रुपासी । तोचि संतापाशीं तिष्ठतसे ॥१॥ गातां गीतीं साबडें भावें तें कीर्तन । तेथें नारायण नाचतसे ॥२॥ योगियांची ध्यानें कुंठीत राहिलीं । संतनामामृतवल्ली गोड वाटे ॥३॥ एका जनार्दनीं संतसेवा जाण । घडती कोटी यज्ञ स्मरणमात्रें ॥४॥
२६३
आदि गुरु शंकर ब्रह्माज्ञान खूण । बाणली पैं पुर्ण मत्स्येंद्रनाथीं ॥१॥ मत्स्येंद्र वोळला गोरक्ष बोधिला । ब्रह्माज्ञान त्याला कथियेलें ॥२॥ गोरक्ष संपुर्ण निवेदिलें गहिनी । तेणें निवृत्तिलागुनी उपदेशिलें ॥३॥ निवृत्तिनाथें ज्ञानदेवासी दिधलें । परंपरा आले ऐशा परी ॥४॥ एका जनार्दनीं तयाचा मी दास । उच्छिष्ट कवळास भक्षीतसे ॥५॥
२६४
आदि नाटक सर्व व्यापक व्यापुनी निराळा । गोप गोधनें गौळणीयांसी लाविला चाळा ॥१॥ मनमोहन कृष्ण यशोदेचा बाई । चोरी करी नानापरी धरितां न सांपडे बाई ॥२॥ जयाचे विंदान न कळे ब्रह्मादिकां वो माये । ठकविलें देवा आपणाचि काला खाये ॥३॥ एका जनार्दनीं ऐसा चौदेहा वेगळा । पुराणें वेडावलीं न कळे अगम्य ज्याची लीला गे माये ॥४॥
२६५
आदि पुरुष सबरा भरीत भरला । भरुनि उरला पंढरीये ॥१॥ आतळ वितळ सुतळ रसातळ । सप्ताहि पाताळें भरुनि उरला ॥२॥ वैंकुंठ कैलास चतुर्दश लोक । भरलासे व्यापक दशदिशां ॥३॥ एका जनार्दनीं स्थावर जंगमीं । भरलाअसे व्योमीं आदि अंतीं ॥४॥
२६६
आदि मध्य अंत न कळे कोणासी । तो हृषीकेशी पंढरीये ॥१॥ जया वेवादती साही दरुशनें । न कळे म्हणोन स्तब्ध जाहलीं ॥२॥ वेडावल्या श्रुति नेती पैं म्हणती । तो पुंडलिकाचे प्रीति विटे उभा ॥३॥ एका जनार्दनीं आनंदाचा कंद । उभा सच्चिदानंद भीमातीरीं ॥४॥
२६७
आदिनाथ शंकरे केला उपकार । ठेवणें निर्धार प्रगट केलें ॥१॥ तोचि महाराज निवृत्ति अवतार । केला उपकार जगालागीं ॥२॥ निवृत्तिने गुज सांगितलें ज्ञानदेवा । होतां जो ठेवा गुह्य कांहीं ॥३॥ ज्ञानदेव केले ठेवणें प्रगट । एका जनार्दनीं नीट मार्ग सोपा ॥४॥
२६८
आधी देव पाठीं भक्त । ऐसें मागें आले चालते ॥१॥ हेंहि बोलणेंचि वाव । भक्ता आधीं कैचा देव ॥२॥ भक्त शिरोमणी भावाचा । देव लंपट जाला साचा ॥३॥ भक्तासाठीं अवतार । ऐसा आहे निर्धार ॥४॥ वडील भक्त धाकुला देव । एकाजनार्दनीं नाहीं संदेह ॥५॥
२६९
आधीं घेई निरपेक्षता । त्याचे चरण वंदीन माथां ॥१॥ निरपेक्ष जेथेम घडें । यमकाळ पायी जोडे ॥२॥ निरपेक्षाची आवडी । ब्रह्माज्ञान घाली उडी ॥३॥ निरपेक्षेवांचुन । नाहीं नाहीं रें साधन ॥४॥ एका जनार्दनीं शरण । निरपेक्ष पाविजे ज्ञान ॥५॥
२७०
आधीं शुद्ध करा भाव । पाठीं पहा मग देव ॥१॥ नका पडुं वायां भरी । चित्त नागवें निर्धारीं ॥२॥ भाव जाहलिया शुद्ध तत्त्वतां । मग देव होय प्राप्ता ॥३॥ एका जनार्दनीं देव । जेथेम जाय तेथें आहे ॥४॥
२७१
आन नाहीं दुजा हेत । सदा रामनाम जपत ॥१॥ धन्य धन्य तें शरीर । पावन देह चराचर ॥२॥ अनुग्रहासाठी । हरिहर लाळ घोटी ॥३॥ एका जनार्दनीं देव । तेथें तिष्ठे स्वयमेव ॥४॥
२७२
आनंताचे गुण अनंत अपार । न कळेचि पारश्रुतीशास्त्रीं ॥१॥ तो हा महाराज विटेवरी उभा लावण्याचा गाभा शोभतसे ॥२॥ कटावरी कर ठेवी जगजेठी । पाहे कृपादृष्टी भक्तांकडे ॥३॥ पुंडलिकाचे तेजें जोडलासे ठेवा । एका जनार्दनी सेवा देई देवा ॥४॥
२७३
आनंद अद्वय नित्य निरामय । सावळा भासताहे मजलागीं ॥१॥ वेधु तयाचा माझिया जीवा । काया वाचा मनोभावा लागलासे ॥२॥ वेधलें मन झालें उन्मन । देखतां चरण गोड वाटे ॥३॥ पाहतां पावतां पारुषला जीव । एका जनार्दनीं देव कळों आला ॥४॥
२७४
आनंद समाधि संत भक्त देव । करिती उत्साह संवत्सरीं ॥१॥ गरुड हनुमंत भक्त ते मिळाले । जयजयकार केलें सुरवरीं ॥२॥ पुष्पांचा वर्षाव विमानांची दाटी । सोपानदेवा भेटी येती देव ॥३॥ तो सुखसोहळा वर्णावया पार । नोहेचि निर्धार माझी मती ॥४॥ एका जनार्दनीं सोपानाचरणीं । मस्तक ठेवूनि निवांत राहीन ॥५॥
२७५
आनंद सोहळा वृंदावनीं पाहों । नंदजीचा कृष्ण तेणें केला नवलावो ॥१॥ धाकुले संवंगडे गौलणींचा थाट । वेणु पावां वाजविती नाचती दाट ॥२॥ एका जनार्दनीं वेधलें मन । पाहतां पाहतां चित्त जालें उन्मन ॥३॥
२७६
आनंदाचा कंद उभा पाडुरंग । गोपाळांचा संघ भोवतां उभा ॥१॥ चंद्रभागा तीरीं शोभे पुंडलीक । संत अलोकिक गर्जताती ॥२॥ भाळे भोळे जन गाती तेंसाबडें । विठ्ठला आवदे प्रेम त्यांचे ॥३॥ नारीनर मिलाले आनंदें गजर । होत जयजयकार महाद्वारी ॥४॥ एका जनार्दनीं प्रेमळ ते जन । करिती भजन विठोबाचें ॥५॥
२७७
आनंदें करुनी संसारीं असावें । नाम आठवावें श्रीरामाचें ॥१॥ नामाचियां योगे संसार तो चांग । येरव्हीं तें अंग व्यर्थ जाय ॥२॥ ऋषी मुनी सिद्ध संत महानुभाव । रामनामें भवा सुखें केला ॥३॥ नामें होयसुख असुअख नामे निरसें दुःख । रामनाम एक हृदयीं धरा ॥४॥ एका जनार्दनी नामाचा आठव । सुखदुःख भाव दुराविला ॥५॥
२७८
आनंदें निर्भर नाम गावें वाचे । तेणें कळिकाळाचें भय नाहीं ॥१॥ नामाचें सामर्थ्य कळिकाळ वंदी माथां । मुक्ति सायुज्यता पाठी लागे ॥२॥ यज्ञ योग जप तप नामें सर्व सिद्धि । वायां तूं उपाधी गुंतूं नको ॥३॥ एका जनार्दनीं नाम भवांचें तारक । निश्चियेंसी देख गाये वाचे ॥४॥
२७९
आनदाचा भोग घालीन आसनीं । वैकुंठनिवासनी तुझेंनावें ॥१॥ येई वो विठ्ठले अनाथाचे नाथे । पंढरी दैवते कुळदेवी ॥२॥ आपुलें म्हणावें सनाथ करावें । एका जानर्दना वंदावें संतजना ॥३॥
२८०
आनुपम्य भाग्य नांदतें पंढरी । विठ्ठल निर्धारीं उभ जेथें ॥१॥ अनुपम्य वाहे पुढें चंद्रभागा । दोषा जातीं भंगा नाम घेतां ॥२॥ अनुपम्य मध्यें पुंडलीके मुनी । अनुपम्य चरणीं मिठी त्याच्या ॥३॥ संत शोभती दोही बाहीं । अनुपम्य देहीं सुख वाटे ॥४॥ अनुपम्य एका जनार्दनीं ठाव । अनुपम्य पंढरीराव विटेवरी ॥५॥
२८१
आनुपातें विरहिण बैसे । कां वो कर्म बळिवंत दिसे । संगवर्जित मज झालें ऐसें । कोणी योगे भेटी नसे ॥१॥ मज भेटवा संतसंगती । तेणे निवारेण सर्व भ्रांती ॥धृ॥ विरहें बहुत पीडिली बाळा । कोन शांतवी तया अबलां । वेधे श्रीरंग जीवी लागला । तया भेटलीया सुख होईल तयाला ॥२॥ नेणें आपपरावे दुजें कांहीं । विरहें विरह जडला हृदयीं । कोण सोडवी गुरु मज देहीं । या विराहा अंतपार नाहीं ॥३॥ ऐसा विरह करिता दुःख । दैव योगें घडलें संतसुख । तापत्रय विरह गेला देख । सुखें सुख अपार झालें देख ॥४॥ संतसंग निरसे विरह । पावन देह झाला विदेह । एका जनार्दनी आनंद पाहे । विरह निरसला सुख झालें गे माय ॥५॥
२८२
आपणा आपण पाहे विचारुनी विचारतां मनी देव तुंचीं ॥१॥ तूंचि देव असतां फिरशी वनोवनीं । प्रगटली काहाणी बोलायासी ॥२॥ देहींचे देवळीं आत्माराम नांदे । भांबावला भक्त हिंडे सदा रानें ॥३॥ एका जनार्दनें भ्रमाची गोष्टी । वायांचि शिणती होती कष्टी ॥४॥
२८३
आपुला न टाकीं पां आचार । उपजले कुळींचा वेव्हार । स्वधर्म तो सार । पाळीं पाळीं बापा ॥१॥ त्यातें म्हणणें संसार । येर बोलणें असार । निष्ठावंत जे नर । देवाचि समान ॥२॥ अथीतासी द्यावें अन्न । गोब्राह्मणांचें पूजन । मुखीं नामस्मरण । तोचि एक संसारीं ॥३॥ सांडोनियां गृह दारा । धांव घेतली डोंगरा । अंतरीं भरला सारा । विषयीक भाव ॥४॥ बकाचे परि ध्यान । नको नको अनुष्ठान । एका जनार्दनीं मन । स्थिर करीं सर्वदा ॥५॥
२८४
आपुलिया घरा जाती मुकवत । नाहीं दुजा हेत चित्तीं कांहीं ॥१॥ परस्परें बोल बोलती अबळा । कैशीं नवल कळा देखियली ॥२॥ धरुनिया करीं जाती तेथवरी । उभा असे हरी जवळींच ॥३॥ एका जनार्दनीं न कळें लाघव । तटस्थ गोपी सर्व मनामाजीं ॥४॥
२८५
आपुलिया हिता आपण जागिजे । वायां न नागविजे देही देहा ॥१॥ हाचि अनुताप घेऊनियां मना । करी पां चिंतना रामनाम ॥२॥ नाहीं कांहीं मोल सुलभ फुकाचें । घेई सदा वाचे रामनामक ॥३॥ एका जनार्दनीं किती हें सांगावें । गुंतलें ते हावे नायकती ॥४॥
२८६
आपुली पूजा आपण करावी । ही जंव ठावी राहटीं नाहीं ॥१॥ कासया ती पूजा जाणिवेचा शीण । त्याहुनी अज्ञान बरा दिसे ॥२॥ एका जनार्दनीं ज्ञानाज्ञानें । पुजावें श्रीचरण विठोबाचे ॥३॥
२८७
आपुलीच दारा जरी टेके व्यभिचार । क्रोधाचा थारा अंतरीं नये ॥१॥ आपुलेंच धन तस्करें नेतां जाण । जयांचें मन उद्विग्र नव्हे ॥२॥ आपुलाची पुत्र वधोनि जाय शत्रु । परी मोहाचा पाझरु नेत्रीं नये ॥३॥ आपुलें शरीर गांजितां परनरें । परी शंतींचें घर चळो नेदी ॥४॥ एका जनार्दनीं जया पूर्ण बोधू । तोचि एक साधु जगामाजीं ॥५॥
२८८
आपुले पारखे सांगतां नायकती । करितसे खंती संसाराची ॥१॥ काय संसाराचें सुख तें तयासी । कोण फांसा चुकवील ॥२॥ कधीं रामनाम नाठवी पामर । भोगिती अघोर जन्म कोटी ॥३॥ एका जनार्दनीं एकपणें शरण । जनीं जनार्दनीं आम्हां आहे ॥४॥
२८९
आपुलें कल्याण इच्छिलें जयासी । तेणें या नामासी विसंबूं नये ॥१॥ करील परिपुर्ण मनींचे हेत । ठेविलिया चित्त नामापाशी ॥२॥ भुक्ति आणि मुक्ति वोळगंती सिद्धि । होईल कीं वृद्धि आत्मनिष्ठा ॥३॥ एका जनार्दनीं जपतां हें नाम । पुरवील काम जो जो हेतु ॥४॥
२९०
आपुल्या काजासाठी । धावें भक्ताचिये पाठीं ॥१॥ ऐसा कृपाळू उदार । विटे उभा कटीं कर ॥२॥ एका जनार्दनीं शरण । भक्ताचे मनोरथ पुरती जाण ॥३॥
२९१
आपुल्या नामा आपण वाढवी । भक्तपणस्वयें मिरवीं । अवतार नाना दावीं । लाघव आपुलें ॥१॥ करी भक्तांचे पाळण । वाढवी त्यांचें महिमान । तयासी नेदी उणीव जाण । वागवी ब्रीद नामाचें ॥२॥ करी नीच काम नाहीं थोरपण । खाय भाजींचें आनंदें पान । तृप्त होय एका जनार्दनीं । तेणें समाधान होतसें ॥३॥
२९२
आपुल्या नामाची आवडी । वैकुंठाहुनी घाली उडी । वारी भक्तांची सांकडीं । नामासाठीं आपुल्या ॥१॥ ऐसा नामाचा पोवाडा । नाम उच्चारा घडघडा । तेणीं निवारें यमपीडा । साचपणें भक्तांची ॥२॥ एका जनार्दनीं नाम । सोपें सोपें हो सुगम । तरावया आन नाहीं धाम । नामावांचुन सर्वथा ॥३॥
२९३
आपुल्या पित्यासी तिणें बोलाविलें । जाहलें तें कथिलें वर्तमान ॥१॥ पतीचा संकल्प नोहे अंगसंग । राहिला उद्योग प्रपंचाचा ॥२॥ महाजन शेटे सर्व मेळविले । विचारी बैसले कुल्लाळ सर्व ॥३॥ धाकुटी ती मूल आपण पैं द्यावी । संतती चालवावी गोरोबाची ॥४॥ एका जनार्दनीं करुनी विचार । विवाह प्रकार केला दुजा ॥५॥
२९४
आपुल्या मनासीं करिती विचार । न धरवे साचार कृष्ण करीं ॥१॥ योगीयांचे ध्यानीं न सांपडे कांहीं । तया गोपिकाही धरुं म्हणतीं ॥२॥ धारितां न धरवे तळमळ । वाउगा कोल्हाळ करिती वायां ॥३॥ एका जनार्दनीं शुद्ध भक्तिविण । पवे नारायण कवणा हातीं ॥४॥
२९५
आबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडुं । खेळे विटिदांडु पोरा खेळे विटिदांडु ॥१॥ सत्व विटी घेउनि हातीं धीर धिर दाडु । भावबळें टोला मारी नको भिऊं गांडु ॥२॥ ब्रीदबळें खेळ खेळूं लक्ष लावीतिसी । मूर्खापाशीं युक्ति नाहीं उडोनि गेली उशी ॥३॥ वकट लेंड मूंड नाल पुढें आणी लेका । भावबळें खेळ खेळ जनार्दन एका ॥४॥
२९६
आब्रह्म भुवन एक । तर्पण जाहलें ऐक्य ॥१॥ कैसा होता हे ब्रह्मयज्ञ । ब्रह्मा दृष्टी ब्रह्मार्पण ॥२॥ सव्य अपसव्य न लगे जाण । पितरापितर जनार्दन ॥३॥ एका जानर्दनीं तिलोदक । ब्रह्मरुप तिन्हीं लोक ॥४॥
२९७
आभाविकांसी तो जवळीचा दुरीं । दुरीचा जवली हरी भाविकांसीं ॥१॥ म्हणोनि आभावें ठाकतीं गोपिका । त्या यदुनायका न धरती ॥२॥ वावुगे ते कष्ट मनींचा तो सोस । सायासें सायास शिणताती ॥३॥ एका जनार्दनींशीण गोपीकांसी । तेणें हृषीकेशी हांसतांसे ॥४॥
२९८
आमिश लाउनी मीनातें गोविती । तैसी संसारस्थिती जाण बापा ॥१॥ पान लागलिया गूळ न म्हणे गोड । नामामृतीं चाड न धरती ॥२॥ पाहती डोळां देखती प्रकार । परि विषयाचा आदर न सांडिती ॥३॥ माझें माझें म्हणोनि दृढ धरिताती । एका जनार्दनीं भोगिती चौर्‍यायंशीं ॥४॥
२९९
आमिष देखोनि मीन गुंतलासे गळीं । तैसा काळ बळी पाश घाली ॥१॥ आप्त गोत्रज असोनि जवळी । नेताती वहिली यमकाळ ॥२॥ दांत विचकूनियां म्हणती गेला गेला । ऐशा अभाग्याला काय बोध ॥३॥ एका जनार्दनीं मनुष्य देहें मूढ । प्रत्यक्ष दगड अवनी भार ॥४॥
३००
आमुचा आचार आमुचा विचार । सर्वभावें निर्धार जनार्दन ॥१॥ आमुचा दानधर्म यज्ञ तें हवनक । सर्व जनार्दन एकरुप ॥२॥ आमुचा योगयाग तप तीर्थाटन । सर्व जनार्दन रुप असे ॥३॥ आमुचें आसन मुद्रा जनार्दन । एका जनार्दन भजन हेंचि खरें ॥४॥
३०१
आमुचिया पोरा । नाहीं बैसावया थारा ॥१॥ ऐसा याचा पायगुण । न मिळे खावयासी अन्न ॥२॥ हाटा बाजारासी जातां । जाऊं नेदी पैं सर्वथा ॥३॥ माझा नामा कोठें आहे । नामा नामा म्हणोनी वाहे ॥४॥ एका जनार्दनीं सवे । येणें लावियेली देवें ॥५॥
३०२
आमुचिये कुळीं दैवत सदगुरु। आम्हांसी आधारु पाडुरंग ॥१॥ सदगुरु आमुची माता सदगुरु तो पिता । सदगुरु तो भ्राता आम्हालांगीं ॥२॥ इष्ट मित्र बंधु सज्जन सोयरे । नाहीं पै दुसरें गुरुवीण ॥३॥ सदगुरु आचार सदगुरु विचार । सदगुरुचि सार साधनांचें ॥४॥ सदगुरुचि क्षेत्र सदगुरु तो धर्म । गुरुगुह्मा वर्म आम्हांलागीं ॥५॥ सदगुरु तो यम सदगुरु नियम । सदगुरु प्राणायाम आम्हांलागीं ॥६॥ सदगुरु तो सुख सदगुरु तो मोक्ष । सदगुरु प्रत्यक्ष परब्रह्मा ॥७॥ सदगुरुचें ध्यान अखंड हृदयीं । सदगुरुच्या पायीं वृत्ती सदा ॥८॥ सदगुरुचें नाम नित्य आम्हां मुखीं । गुणातीत सुखी सदगुरुराज ॥९॥ एका जनार्दनीं गुरुकृपादृष्टीं । दिसे सर्व सृष्टी परब्रह्मा ॥१०॥
३०३
आमुचिये घरीं । परीस पाहिला श्रीहरी ॥१॥ आवडीनें नामा सांगे । पांडुरंग हांसूं लागे ॥२॥ आमुचा दैन्यकाळ । गेला म्हणती सकळ ॥३॥ एका जनार्दनीं मात । नामा देवासी सांगत ॥४॥
३०४
आमुची तो एवढी आस । होऊं दास हरीचे ॥१॥ मना मागें न जाऊं देखा । सांपडला शिक्का उत्तम ॥२॥ त्रैलोक्याचा धनीं देव । आम्हा भेव नाहीं कोठें ॥३॥ जाहलों बळिये शिरोमणी । एका चरणीं जनार्दनाचें ॥४॥
३०५
आमुचें कुळींचे दैवत । श्रीगुरुदत्तराज समर्थ ॥१॥ तोचि आमुचा मायबाप । नाशी सकळ संताप ॥२॥ हेंचि आमुचें व्रत तप । मुखी दत्तनाम जप ॥३॥ तयाविण हे सुटिका । नाहीं नाहीं आम्हां देखा ॥४॥ एका शरण जनार्दनीं । दत्त वसे तनमनीं ॥५॥
३०६
आमुचें हेचि साधन खरें । नाम बरें जनार्दन ॥१॥ नाहीं भय आणि चिंता । जन्ममरण वार्ता विसरलो ॥२॥ नाहीं येणें जाणें मरण धाक । अवघा एक जनार्दन ॥३॥ एका शरण जनार्दनीं । जनार्दन जनीं वनीं ॥४॥
३०७
आमुच्या निजसुखधामा । तुझें चरण पुरुषोत्तमा ॥१॥ आम्हांवरी कृपा करा । उद्धरा दातारा दीनासी ॥२॥ देऊनियां नाम कीर्ति । वसवा मूर्ति हृदयीं ॥३॥ एका शरण जनार्दनीं । ठाव मागतसे चरणी ॥४॥
३०८
आमुच्या स्वहिता आम्हीं जागूं । वाउग्यां न लागूं मार्गासी ॥१॥ करुं पुजन संतसेवा । हेंचि देवा आवडतें ॥२॥ तुळसीमाळा घालुं गळां । मस्तकीं टिळा चंदन ॥३॥ मुद्रा अलंकार भूषण । करुं कीर्तन दिननिशीं ॥४॥ एका जनार्दनीं न सेवूं आन । वाहूं आण देवाची ॥५॥
३०९
आम्हां काळांचें भय तें काय । जनार्दन बापमाय ॥१॥ पाजी प्रेमाचा तो पान्हा । नये मना आन दुजें ॥२॥ दिशाद्रुम भरला पाहीं । जनार्दन सर्वाठायी ॥३॥ एका जनार्दनीं ध्यात । जनार्दन तो ध्यानाआंत ॥४॥
३१०
आम्हां जप जनार्दन तप जनार्दन । स्वरुप जनार्दन जनीं वनीं ॥१॥ आम्हां कर्म जनार्दन धर्म जनार्दन । ब्रह्मा जनार्दन जन सहित ॥२॥ आम्हां योग जनार्दन याग जनार्दन । भोग जनार्दन अहर्निशी ॥३॥ आम्हां ध्येय जनार्दन ध्यान जनार्दन । एका जनार्दन ज्ञानरुप ॥४॥
३११
आम्हां तुमचा भरंवसा । सांभाळावें जगदीशा ॥१॥ आपुली आपण जतन करा । ब्रीदावली हे दातारा ॥२॥ आम्हीं पतितांनी कोडें । तुम्हां घातलें सांकडें ॥३॥ शरण एका जानर्दनीं । मोक्ष मुक्ति तुमचें चरणीं ॥४॥
३१२
आम्हां नादीं विठ्ठलु छंदीं विठ्ठलु । हृत्पदी विठठलु मिळतसे ॥१॥ आम्हां धातुं विठ्ठलु मातु विठ्ठलु । गातुं विठ्ठलु आनंदें ॥२॥ आम्हां राग विठ्ठलु रंग विठ्ठलु । संग विठ्ठलु वैष्णवांचा ॥३॥ आम्हां ताल विठ्ठलु मेळ विठ्ठलु । कल्लोळ विठ्ठलु कीर्तनें ॥४॥ आम्हां श्रुति विठ्ठलु श्रोता विठ्ठलु । वक्ता विठ्ठलु वदनीं ॥५॥ आम्हां मनीं विठ्ठलु ध्यानीं विठ्ठलु । एका जनार्दनीं अवघा विठ्ठलु ॥६॥
३१३
आम्हां येणें न जाणें जिणें ना मरणें । करणें ना भोगणें पापपुण्य ॥१॥ जैसें असों तैसे आपोआप प्रकाशों । कवणा न दिसों ब्रह्मादिकां ॥२॥ नवल नवल सांगती सखोल । अनुभवीं हे बोल जाणताती ॥३॥ आम्हां कवण पदा जाणें ना कवण देवा भेटणें । आप आपणांमाजीं राहणें अखंडीत ॥४॥ सत्य कैलास वकुंठ हे आम्हां माजी होती जाती । या सकळां विश्रांती आमुच्या रुपीं ॥५॥ चंद्र सुर्य तारा हा पंचभौतिक पसारा । आम्हांमाजीं खरा होत जात ॥६॥ इतुकें दिधलें आम्हांक गुरुजनार्दनीं । एक जनार्दनीं । एका जनार्दनीं व्यापियेला ॥७॥
३१४
आम्हां विधिनिषेधाचें नाहीं पैं कारण । नाम मुखीं स्मरण गोविंदाचें ॥१॥ घडेल तें घडो जोडेल तें जोडो । आम्हीं तों न सोडोंक रामकृष्ण ॥२॥ शरीर पतन घडे अनायासें । काय तें सायासें जतनेंचि ॥३॥ एका जनार्दनीं श्रीरामावांचुनीं । दुजा छंद मनीं हा न वाहे ॥४॥
३१५
आम्हां सकळां देखतां । पुरवी लळे तो सर्वथा ॥१॥ जें जें मागावें तयासीं । तें तें देतो निजभक्तांसीं ॥२॥ न मने अंकिताचा शीण । राहे द्वारपाळ होऊन ॥३॥ घोडे धूतले रणांगणीं । एका शरण जनार्दनीं ॥४॥
३१६
आम्हांसी ती मुख्य संतसेवा प्रमाण । विठ्ठलकीर्तन वाचें गाऊं ॥१॥ दुजे नेणों स्वप्नीं विठठलवांचुनीं । जनीं मनीं निरंजनीं देखा हेंचि ॥२॥ संताचियां पायीं मस्तक ठेवून । आवडी चरणा विठ्ठलांच्या ॥३॥ एका जानार्दनीं जनार्दन एकपणीं । विठ्ठलां वाचूनीं दुजें नेणों ॥४॥
३१७
आम्हांसी तो एक संतांचे । दुजें अनुमान नेणों कांहीं ॥१॥ सर्वभावे त्याचें करितां सेवन । आमुचें हितकल्याण जन्मोजन्मीं ॥२॥ एका जनार्दनीं संतांचे चरणीं । जाईन लोटांगणीं जीवेभावें ॥३॥
३१८
आम्हांसी विश्वासी पुरे एक भाव । या विठ्ठलावांचोनि देव न मानो कोण्हा ॥१॥ विश्रांतीचें घर संताचें माहेर । करिती निर्धार वेदशास्त्रें ॥२॥ जनार्दनाचा एका प्रेमें तो आठवी । विठ्ठल साठवी हृदयामाजीं ॥३॥
३१९
आम्हांसे तो पुरे विठ्ठलाची एक । वाउगाची देखा दुजा न मनीं ॥१॥ ध्यानीं धरुं विठ्ठल करुं तयाचें कीर्तन । आणिक चिंतन नाहीं दुजें ॥२॥ ध्येय ध्याता ध्यान खुंटला पैं शब्द विठ्ठ्ल उद्धबोध सुख आम्हां ॥३॥ एका जनार्दनीं विठ्ठल भरला । रिता ठाव उरला कोठें सांगा ॥४॥
३२०
आम्ही दीन तूं दीनानाथ । तिहीं लोकीं तुझी मात ॥१॥ आम्ही पतित तूं पावन । ऐसें साजे नामभिधान ॥२॥ आम्ही अनाथ तूं कैवारी । ऐसे तुझी आहे थोरी ॥३॥ आम्ही दीन तूं वत्सल । ऐकीला तो ऐसा बोल ॥४॥ नको धरुं दुजे आतां । कृपाळु तूं दीनानाथा ॥५॥ एका शरण जनार्दनीं । ऐसें चालत आलें दुरुनी ॥६॥
३२१
आम्ही ब्रह्मापुरींचे ब्राह्मण । यातिकुळ नाहीं लहान ॥१॥ आम्हां सोवळें वोवळें नाहीं । विटाळ न देखों कवणें ठायीं ॥२॥ आम्हां सोयरे जे जाहले । ते यातिकुळा वेगळे केले ॥३॥ एका जनार्दनीं बोधु । यातिकुळींचा फिटला संबंधु ॥४॥
३२२
आम्ही यासी नवस केला । शेखीं कामा बराच आला ॥१॥ आम्ही पाहुं पुत्रसुख । हा तो दावितसे दु:ख ॥२॥ आमुचें जाईल दारिद्र्य जन्मांचें । ऐसें मनीं होतें साचें ॥३॥ एका जनार्दनीं कष्टी । येणें पुरविली पाठी ॥४॥
३२३
आम्हीं असतां माजघरीं । रात्र झाली दोन प्रहरीं । मी असतां पतिशेजारीं । अवचित हरी तुझा आला ॥१॥ काय संगु सखये बाई । वेदशास्त्रां अगम्य पाहीं । आगमनिगमां न कळे कांहीं । मन पवन पांगुळलें गे बाई ॥२॥ आम्हीं असतां निदसुरी । मुंगुस घेउनी आपुले करीं । सोडियलें अदोघा माझारीं । तंव तें बोचकरी आम्हांतें ॥३॥ आम्हीं भ्यालों उभयतां । चीर फिटलें बाई तत्त्वतां । नग्नाचि जाहलें मी सर्वथा । भूतभूत म्हणोनि भ्यालें ॥४॥ ऐसें करुनि आपण पळाला । जाउनी माये आड लपला । एका जनार्दनी म्हणे भला । आतां सांपडतां न सोडी त्याला ॥५॥
३२४
आम्हीं जाहालों गोसावी । आमची विभूत चालवावी ॥१॥ भांग भुरका हें साधन । शिष्य मिळाले चहुकोन ॥२॥ हें तों सोंगाचे साधन । राजी नाहीं जनार्दन ॥३॥ एका जनार्दनीं भाव । भाव तेथें वसे देव ॥४॥
३२५
आम्हीं तो वासना भाजियेली बळें । वैराग्याचोनि बळेंक आथियलें ॥१॥ सांडिला वेव्हार माया लोकाचार । भरला निर्धार हृदयामाजी ॥२॥ एका जनार्दनीं खुंटली भावना । जनीं जनार्दना अभ्यासिलें ॥३॥
३२६
आम्हीं धारक नामाचे । आम्हां भय नाहीं काळांचें ॥१॥ ऐशीं नामाची ती थोरी । कळिकाळ दास्य करी ॥२॥ येरा अवघिया उद्धार । नाममंत्र परिकर ॥३॥ एका जनार्दनीं पोटीं । नाम गावें सदा होटीं ॥४॥
३२७
आम्हीं मागतों फुकांचे । तुम्हां देतां काय वेंचे ॥१॥ संतसंग देई देवा । दुजा नको कांहीं गोवा ॥२॥ पंढरीसी ठाव द्याव । हेंचि मागतसें देवा ॥३॥ एका जनार्दनीं मागत । येवढा पुरवी मनींचा हेत ॥४॥
३२८
आम्हीं मुक्त म्हणोनि विचरती महीं । मुक्त ही पदवी नाहीं अंगी ॥१॥ सैर धांवे मन नाहीं पैं अटक । मुक्तज्ञान मौक्तिक वायां जाय ॥२॥ भूतमात्रीं द्रोही करिती नानापरी । वेदशास्त्र निर्धारी ठाउकें नाहीं ॥३॥ एका जनार्दनीं कायसे ते मुक्त । जगीं जाणा फजींत नलाजरे ॥४॥
३२९
आम्हीं योग साधियेला । भांग भुरका तो आणला ॥१॥ योग कळे तयां मूढा । साधन काय तें दगडा ॥२॥ आंत काळा बाहेर काळा । माप नाहीं अमंगळा ॥३॥ एका जनार्दनीं ते पामर । साधन साधिती ते खर ॥४॥
३३०
आयुष्य जातें पळ पळ तुजला कैसें कळेना । दो दिवसाची तनु हे साची आलासी रे पाहुणा ॥१॥ चौसष्ट घडीयामाजीं रात्र गेलीं समजेना । आयुष्य खातो काळ तुम्हीं राम कां रे म्हणाना ॥२॥ नरदेह पांचाचा आणिलासे उसना । कांहीं तरी स्वहित करा व्यर्थ कां रे वल्गना ॥३॥ राम दृढ धरशील तरी तुटेल यातना । भ्रांति माया काढी नको पडुं बंधना ॥४॥ वाल्मिक तरला उलट्या नामस्मरणा । एका जनार्दनीं म्हणे जाई साधुदर्शना ॥५॥
३३१
आयुष्य जातें मागुतें येतें । रामनामें सरतें होय मुख ॥१॥ देह जातें मागुतें होतें । रामनामें सरतें होय मुख ॥२॥ आकार जातें मागुतें होतें । रामनामीं सरतें होय मुख ॥३॥ एका एकपण नाहीं जातें । एका जनार्दनीं सरतें होय मुख ॥४॥
३३२
आयुष्य जाय माझे व्यर्थ । दत्त समर्थ महाराज ॥१॥ धांव धांव लवकरी । करुणा करी गुरूराया ॥२॥ मी तंव अनाथ अपराधी । हीनबुद्धि स्वामीया ॥३॥ काळ घाला पडिलावरी । धांव श्रीहरी लवलाह्मा ॥४॥ दत्ता पतित पावना । शरण एका जनार्दना ॥५॥
३३३
आयुष्य तें तीन भाग जाहलें । परी मुखीं राम न बोले ॥१॥ सदा प्रपंचासी मन । वरवर ब्रह्माज्ञान ॥२॥ चित्त शुद्ध झालें नाहीं । ज्ञान कोरडें सांगोनी कायीं ॥३॥ उपाधीचा निषेध भेद । सदा वाद अपवाद ॥४॥ एका जनार्दनीं मना । तेथें राहुं नको जना ॥५॥
३३४
आयुष्य देहींचें जंव पुरलें नाहीं । तंवचि हृदयीं राम जपा ॥१॥ आपुलेच देहीं करा सोडवण । चुकवा पतन यमलोकीं ॥२॥ संसाराचा छंद वाउगा पसारा । यांत सैरावैरा हिंडुं नका ॥३॥ एका जनार्दनीं धरा भरंवसा । श्रीराम सरसा वाचे वदा ॥४॥
३३५
आयुष्य भविष्य हें तंव कवणा हातीं । वायांची वाहती कुंथाकुंथी ॥१॥ आयुष्याचा अंत आलिया जवळी । कोण तया वेळीं सांभळीत ॥२॥ गुंतुनीं संसारी पडती अघोरीं । न चुकेची फेरी येतां जातां ॥३॥ एका जनार्दनीं संतकृपेंविण । कोण वारी शीण जन्मामृत्यु ॥४॥
३३६
आयुष्य सरतां न लगे वेळ । यम काळ उभाची ॥१॥ म्हणोनियां लाहो करा । सप्रेम आळवावें ॥२॥ धरा संतासमागम । करा सप्रेम कीर्तन ॥३॥ जावें सुखें पंढरीसी । नाचा सरसें वाळुवंटीं ॥४॥ एका जनार्दनीं विठ्ठल भेटी । होतां लाभा नोहे तुटी ॥५॥
३३७
आयुष्याच्या अंतीं । राम म्हणतां वक्त्रीं । ते नर सेविती मुक्ती । संदेह नाहीं ॥१॥ हात पाय सिद्ध आहे । तंव तूं तीर्था जाये । तीर्थाचें मूळ पाहे । राम जप ॥२॥ नको जप माळा कांहीं । उगाच बैसे एके ठायीं । हृदयीं दृढ ध्याई । राम नाम ॥३॥ ऐसे घेई पा उपदेश । नको करुं वाउगा सोस । तेणें होय नाना क्लेश । जन्म यातना ॥४॥ हेंचि तुज सोपे वर्म । येणें तुटे कर्माकर्म । एका जनार्दनीं श्रम । सर्व नासे ॥५॥
३३८
आरशाअंगींक लागतां मळ । मुख न दिसेचि निर्मळ ॥१॥ मळ तो झाडुनि पाहतां । सुख दिसें निर्मळता ॥२॥ पाहतां शुद्धभाव रीतीं । परमार्थ हाचि चित्तीं ॥३॥ एका जनार्दनीं हा विचार । आरशासारिखा प्रकार ॥४॥
३३९
आरोहण ज्याचें नंदीवरी । वामांकी शोभे गिरिजां नारी ॥१॥ त्रिशुळ डमरु शंख कपाल । मस्तकी गंगा चंद्रभाळ ॥२॥ अंकीं षडानन गजवदन । सदा प्रसन्न ज्याचें ध्यान ॥३॥ भुतें वेताळ शोभती । हर्षयुक्त उमापती ॥४॥ अंगीं विभूति लेपन । सदा समाधि तल्लीन ॥५॥ मुखीं रामनाम छंद । एका जनार्दनीं परमानंद ॥६॥
३४०
आर्ते आरती दत्त वोवाळूं जातां । आरतीचें हरण दत्तें केलें तत्त्वतां ॥१॥ आरती खुंटली आतां वोवाळूं कैसें । तरी निजभजनें निरंजन होतसे ॥२॥ आरतीचे आर्त पुरवी श्रीदत्त । एका जनार्दनीं सहज वोवाळीत ॥३॥
३४१
आला आषाढी पर्वकाळ । भक्तमिळाले सकळ ॥१॥ निवृत्तिनाथ ज्ञानदेव । मुक्ताबाई सोपानदेव ॥२॥ चांगदेव विसोबा खेचर । सांवता माळी गोरा कुंभार ॥३॥ रोहिदास कबीर सूरदास । नरहरी आणि भानुदास ॥४॥ नामदेव नाचे कीर्तनीं । एका शरण जनार्दनीं ॥५॥
३४२
आला पुडंलिंकासाठी । उभा सम पाय विटीं ॥१॥ विठु मदनाचा पुतळा । भुलवणा तो सकळा ॥२॥ अराध्य दैवत शिवाचें । कीर्तनीं उघदाची नाचे ॥३॥ एका जनार्दनीं मन । वोवाळावें पायांवरुन ॥४॥
३४३
आला रे आला आला काळ निकटी । राम नाम कोटी केव्हां जपसी ॥१॥ बाळ तरुण वृद्ध दशा ती पावली । काळाची पडली छाया अंगीं ॥२॥ यातायाती करतां जन्म वायां गेला परी नाहीं वदला मुखीं राम ॥३॥ एका जनार्दनीं फजितखोर जिणें । सवेंचि मरणें पुढती जन्म ॥४॥
३४४
आलासी पाहुणा नरदेहीं जाणा । चुकवी बंधनापासूनियां ॥१॥ वाउगाची सोस न करी सायास । रामनामें सौरसा जप करी ॥२॥ यज्ञयागादिकक न घडतां साधनें । न्युन पडतां पतन सहज जोडे ॥३॥ एका जनार्दनीं चुकवी येरझार । करीं तूं उच्चार रामनाम ॥४॥
३४५
आलासी पाहुणा नरदेहीं जाणा । चुकवी बंधनापासूनियां ॥१॥ वाउगाची सोस न करीं सायासा । रामनाम सौरसा जप करीं ॥२॥ यज्ञायागादिका न घडती साधनें । न्युन पडतां सहज पतन जोडे ॥३॥ एका जनार्दनीं चुकवीं वेरझार । करीं तूं उच्चार अखंड वाचे ॥४॥
३४६
आलिंगन संतपायां । पावली काया विश्रांती ॥१॥ सुख अपार झालें । संत पाउलें देखतां ॥२॥ अवघा श्रम फळा आला । काळ गेला देशधडी ॥३॥ एका जनार्दनीं संत । मज भेटोत अखंडित ॥४॥
३४७
आलिंगनालागीं उतावेळ मन । देखेन चरण विठोबाचे ॥१॥ मना समाधान मना समाधान । मना समाधान राहें मना ॥२॥ देखिलिया मूर्ति सांवळी सगुण । मन नाहीं बंधन मना तुज ॥३॥ एका जनार्दनीं मन आवारिलें । दृढ तें ठेविलें विठ्ठलपायीं ॥४॥
३४८
आलिंगोनी देवभक्त । सरते एकरुपी होत ॥१॥ तें हें पहा पंढरपूर । देव भक्त तीर्थ माहेर ॥२॥ आलियासी दान । नामामृताचि पान ॥३॥ जैसा ज्याचा हेत । पुरवित रुक्मिणीकांत ॥४॥ एका जनार्दनीं शरण । दाखवा पंढरी पावन ॥५॥
३४९
आलिया द्विजासी द्यावें अन्नदान । नसतां अभ्युत्थान द्यावें त्यासी ॥१॥ तेणें जोडे यज्ञ सर्व धर्म जाण । विन्मुख गेलिया पतन घडतसे ॥२॥ एका जनार्दनीं घडतां नमस्कार । तेणे हरिहर संतोषती ॥३॥
३५०
आली आषाढी जाये पंढरीसी । चित्त पायापाशी विठोबाच्या ॥१॥ वैष्णव गर्जती नामामृत सार । फुटतसे पाझर कामक्रोधा ॥२॥ एका जनार्दनीं धरुनी विश्वास । जाये पंढरीस होय संतांचा दास ॥३॥
३५१
आले आले हरीचे दास । मुखीं रामनाम घोष । तोडोनियां भवपाश । जीवन्मुक्त ते ॥१॥ वैराग्याचें कवच अंगीं । नाचताती प्रेमरंगीं । ज्ञान शस्त्र तें निसंगीं । छेदिती संग ॥२॥ अनुभव तीक्ष्ण शर । सोडिताती निरंतर । वर्मी खोचले तें वीर । क्रोधादि असुर ॥३॥ सांडोनि देहाभिमान । तोचि जीवन्मुक्त जाण । एका जनार्दना शरण । रामकृष्ण जपताती ॥४॥
३५२
आलों ऐकोनी खंडोबाची थोरी । वाघा होऊनि मज मागा म्हणती वारी ॥१॥ ठकलों ठकलों वाउगा सीण । वारी मागतां पोट न भरे जाण ॥२॥ सदा वागवी कोटंबा आणि झेंडा । रांडापोरें त्यजिलीं जालों काळतोंडा ॥३॥ गेले दोनी ठाव आतां कोठें उरला वाव । एका जनार्दनीं भेटवा मज पंढरीरावो ॥४॥
३५३
आल्या पांच गौळणी पांच रंगाचे शृंगार करुनी ॥धृं॥ पहिली गौळण रंग सफेत । जशी चंद्राची ज्योत । गगनी चांदणी लखलखीत । एका चिती मात । मंथन करीत होती दारीत । धरुन कृष्णांचा हात । ऐशा आल्या पांच गौळणी ॥१॥ दुसरी गौळण भाळीभोळी । रंग हळदीहुनि पिवळी । पिवळा पितांबर नेसुन आली । अंगीं बुट्टे दार चोळी । एक लहान तनु उमर कवळी । जशी चांफ्यांची कळी । ऐशा आल्या पांच गौलणी ॥२॥ तिसरी गौळण रंग काळा । नेसुन चंद्रकाळा । काळे काजल लेऊन डोळां । रंग तिचासांवळा । काळीं गरसोळी लेऊन गळां । आली राजस बाळा । ऐशा आल्या पांच गौळनी ॥३॥ चवथी गौळण रंग लाल । लाल लालही लाल । कपाळी कुंकुम चिरी लाल । भांगी भरुन गुलाल । मुखी विडा रंग लाल । जैसे डांळिबीचे फुल । ऐशा आल्या पांच गौळणी ॥४॥ पांचवीं गौळण हिरवा रंग । अवघ्या झाल्या दंग । हिरव्या कांकणांचा पहा रंग । जसें आरशींत जडलें भिंग । फुगडी खेळतां कृष्णसंग । एकनाथ अभंग । ऐशा आला पांच गौळणी ॥५॥
३५४
आल्हाददायकश्रीमुख चांगलें । पाहतां मोहिले भक्त सर्व ॥१॥ गाई गोपाळ विधिल्या गोपिका । श्रीमुख सुंदर देखा सजिरें तें ॥२॥ आल्हाददायक तें मुखकमळ । वैजयंती माळ हृदयावरी ॥३॥ एका जर्नादनी पाहतां रुपडें । आनंदी आनंद जोडे आपेआप ॥४॥
३५५
आल्हादयुक्त गोपिका आली आपुलें सदनीं । नंदासहित मोक्षदानी प्रवेशलें भुवनीं ॥१॥ म्हणे यशोदा बा कृष्णा न करी तूं खोडी । बोलती गोपिका वाईट त्या जगझोडी ॥२॥ एका जनार्दनीं माझा अपराध नाहीं । जया जैसा भाव तया तोचि देहीं ॥३॥
३५६
आळस करसी नाम घेतां । जासी यमाचिया पंथा । कोण ती सर्वथा । सोडवील तुजलागीं ॥१॥ बंधु बहिणी न ये कामा । काय सांगावें तुज अधमा । गुंतलासी स्त्रीभोग कामा । तेव्हां दूर पळती ते ॥२॥ कोण्ही न होती कोणाचे । तूं म्हणसी मामे भाचे । एका जनार्दनीं साचे । कोणी नाहीं पामरा ॥३॥
३५७
आळस निद्रा सांडी । रामनाम म्हणे तोंडीं ॥१॥ धन वित्त मान । हें तों श्वानविष्ठाक समानक ॥२॥ पुत्र पत्‍नी संसार । वायां व्यर्थचि भार ॥३॥ हें परतें सांदीं मनें । एका जनार्दनीं जिणें ॥४॥
३५८
आवंती क्षेत्रवासी । होते संदीपन ऋषी ॥१॥ कृष्ण बळिराम सुदामा । आले सदगुरुच्या ग्रामा ॥२॥ लोटांगण नमन करिती । कर जोडोनि तिष्ठती ॥३॥ स्वामी करा अंगीकार । आम्ही विद्यार्थी अनुचर ॥४॥ अनन्य भावें आलों शरण । एका विनवी जनार्दन ॥५॥
३५९
आवडी करितां हरिकीर्तन । हृदयीं प्रगटे जनार्दन ॥१॥ थोर कीर्तनाचें सुख । स्वयें तिष्ठेक आपण देख ॥२॥ घात आलिया निवारी । चक्र गदा घेउनी करीं ॥३॥ कीर्तनीं होऊनी सादर । एका जनार्दनीं तत्पर ॥४॥
३६०
आवडीं विष खाउनी मेला । तो स्वयें नरका गेला ॥१॥ कवणा कवण ठेवी दोष । ऐसा मूर्ख तो तामस ॥२॥ अमृत सांडुनी कांजी प्याला । तैसा नर देह गमाविला ॥३॥ लाहूनि उत्तम शरीर । गमाविलें परिकर ॥४॥ एका शरण जनार्दनीं । कोण लोभ जाहली हानी ॥५॥
३६१
आवडीच्या सुखा सुखावला । वैकुंठ सांडोनी पंढरीये आला ॥१॥ देखोनियां पुंडलीका । उभा सम पाई देखा ॥२॥ न बैसे खालीं । युगें अठ्ठावीस जालीं ॥३॥ ऐशी भक्तांची माउली । उभी तिष्ठत राहिली ॥४॥ एका जनार्दनीं देव । उभा राहिला स्वयमेव ॥५॥
३६२
आवडीनें नाम वदा कीं रें राम । नासे भवभ्रम क्षणमात्रें ॥१॥ सोपें हें साधन कलयुगा माझारी । नामें पैठा हरी धरें होय ॥२॥ नाम मुखी गातां कीर्तनीं नाचतां । तुटे भवव्यथा अनेक जन्म ॥३॥ एका जनार्दनीं सारांचे पैं सार । तुटे येरझार नाना योनी ॥४॥
३६३
आवडीनें भावें हरिनाम गावें । सप्रेम नाचावें कीर्तनरंगीं ॥१॥ तरती तरती तरती संसार । आणिक विचार दुजा नाहीं ॥२॥ एका जनार्दनीं भावाचे माहेर । तरिजे संसार क्षणमात्रें ॥३॥
३६४
आवडीनें भावें हरिनाम घेसी । तुझी चिंता त्यासी सर्व आहे ॥१॥ नको खेद धरुं कोणत्या गोष्टीचा । पति तो लक्ष्मीचा जाणतसे ॥२॥ सकळ जीवांचा करितो सांभाळ । तुज मोकलील ऐसें नाहीं ॥३॥ जैशी स्थिति आहे तैशापरी राहे । कौतुक तू पाहें संचिताचें ॥४॥ एका जनार्दनीं भोग प्रारब्धाचा । हरिकृपे त्याचा नाश झाला ॥५॥
३६५
आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन ॥१॥ तुळसीमाळ गळा गोपीचंदन टिळा । हृदयीं कळवळा वैष्णवांचा ॥२॥ आषाढी कार्तिकी पंढरीची वारी । साधन निर्धारी आन नाहीं ॥३॥ एका जनार्दनीं ऐसा ज्याचा नेम । तो देवा परमपूज्य जगीं ॥४॥
३६६
आवरीं आवरीं आपुला हरी ।दुर्बळ्यांची केली चोरी । घरा जावयाची उरी । कृष्णें ठेविली नाहीं ॥१॥ गौळणी उतावेळी । आली यशोदेजवळी ।अवरीं आपुला वनमाळी । प्रळय आम्हां दिधला ॥२॥ कवाड भ्रांतीचें उघडिलें कुलुप मायेचे मोडिलें । शिंके अविद्येचें तोडिलें । बाई तुझिया कृष्णें ॥३॥ होती क्रोधांची अर्गळा । हळूचि काढिलोसे बळां । होती अज्ञानाची खिळा । तीहि निर्मूळ केली ॥४॥ डेरा फोडिला दंभाचा ।त्रिगुण तिवईस ठाव कैसा । प्रंपंच सडा हा ताकाचा । केला तुझिया कृष्णें ॥५॥ अहंकार होता ठोंबा । उपडिला धुसळखांबा । तोहि टाकिला स्वयंभा । बाई तुझिया कृष्णें ॥६॥ संचित हें शिळें लोणी । याचि केली धूळीधाणीं । संकल्प विकल्प दुधाणीं । तीहीं फोडिली कृष्णें ॥७॥ प्रारब्ध हें शिळें दहीं । माझें खादलें गे बाई । क्रियमाण दुध साई । तींही मुखीं वोतिली ॥८॥ द्वेष रांजण सगळे । स्पर्शे होती हात काळे । होतें कामाचें तें पाळें । तेंहि फोडिलें कृष्णें ॥९॥ सुचित दुश्चित घृत घागरी । लोभें भरल्या अहोत्या घरीं । त्याही टाकिलय बाहेरी । तुझिया कृष्णें ॥१०॥ कल्पनेची उतरंडी । याची केली फोडाफॊडी । होती आयुष्याची दुरडी । तेंही मोडिली कृष्णें ॥११॥ पोर रे अचपळ आमुची । संगती धरली या कृष्णाची । मिळणी मिळाली तयांची । संसाराची शुद्धी नाहीं ॥१२॥ ऐशी वार्ता श्रवनीं पडे । मग मी धांवोनि आलें पुढे । होतें द्वैताचें लुगडें । तेंही फिटोनि गेलें ॥१३॥ आपाअपणा विसरणें । कृष्णस्वरुपीं मिळालें । एका जनार्दनीं केलें । बाई नवल चोज ॥१४॥
३६७
आवाडी जाती पंढरीसी । अहर्निशी ते वारकरी ॥१॥ तयांचे पायीं माझे भाळ । सर्वकाळ असो देवा ॥२॥ हातीं टाळ मुखीं नाम । नेणती सकाम दुसरें ॥३॥ एकविध तयांचे मन । शरण एका जनार्दन ॥४॥
३६८
आवाडीने माता बोले बाळकासी । तंव तो म्हणे विवसा पाठी लागे ॥१॥ सांगे लोकांपाशीं ब्रह्मज्ञान । झाला स्त्रीं आधीन स्वदेंहें तो ॥२॥ बैसोनी बाजारीं सांगे ज्ञान गोष्टी । मातेसी करंटी म्हणे नष्ट ॥३॥ एका जनार्दनीं ते जन अधम । चौर्‍याशीं लक्ष जन्म भोगिताती ॥४॥
३६९
आशा टाकुनी फकीर जाला । परी भिक्षा मागणें जन्म गेला ॥१॥ तैशी नोहे परमार्थ रहाटी । शुद्ध मन करीजे पोटीं ॥२॥ सर्वांभुतीं नांदे एक देव । वाउगा कां वाढवा अहंभाव ॥३॥ जे जे वाणी स्तुति केली । ती ती देवासी पावली ॥४॥ ऐसा धरी दृढभाव । एका जनार्दनीं मागें ठाव ॥५॥
३७०
आशा धरुनि आलों येथवरी । पाहतां पंढरी पाव्न झालों ॥१॥ आलिया जन्माचें सुफळ झालें काज । दृष्टी गरुडध्वज पाहतांचि ॥२॥ एका जनार्दनीं पावलो विश्रांति । पाहतां विठठलमूर्ती भीमातटीं ॥३॥
३७१
आशा पाश देवा नको या संसारी । नका चौर्‍यायंशीं फेरी वेरझार ॥१॥ सोडवी देवा कुंसगा टाकुन । मन तें उन्मन तुझे चरणीं ॥२॥ एका जानर्दनीं मनोगत सिद्धि । कैं कृपानिधी पुरवाल ॥३॥
३७२
आशा मनीषाचा विरह लागला । तेणें सांवळा दुरी ठेला । जवळी असोनी बोलती अबला । कवणें गुणें कान्हु रुसला ॥१॥ धांवे धावे कान्हई नंदनंदना । पुरवीं तूं आमुची वासना । आणिक नको दुजी कल्पना । विरह निवारी देई दर्शना ॥२॥ छंदे छंदें विरहिणी बोलें । कां वो बोलण्या अबोलणें जालें । एका जनर्दनी ऐसें केलें । नंदनंदना चित्त गुंतलें ॥३॥
३७३
आशापाश सोडोनि देई । संतासीं तूं शरण जाईं । चौर्‍याशींचें भय नाहीं । प्राणिया तुज ॥१॥ आवडी धरीं संतसंग । कामक्रोधा होय भंग । षडवैरीयां मार्ग । मोकळाची ॥२॥ संतसंग धरतां चित्तीं । उपाधी ते सर्व तुटती । भावें होय मोक्षप्राप्ती । क्षणमात्रें ॥३॥ नाहीं आणीक साधन । संतसंगतीवांचून । शरण एका जनार्दन । संतसंग धरीं ॥४॥
३७४
आशाबद्ध करिती देवाचें पूजन । तेणें नारायण तुष्ट नोहे ॥१॥ आशाबद्ध करिती वेदाचें पठन । तेणें नारायण तुष्ट नोहे ॥२॥ आशाबद्ध करिती श्रवण । तेणें नारायण तुष्ट नोहे ॥३॥ आशाबद्ध करिती दैवत उपासन । तेणें नारायण तुष्ट नोहे ॥४॥ आशाबद्ध करिती जपतप हवन । तेणें नारायण तुष्ट नोहे ॥५॥
३७५
आशामनीषातृष्णा बांधिती दावणीं । सोडवी चक्रपाणीं संतसंगें ॥१॥ कामक्रोधालोभ याचा पसर । पाडिती विसर तुझा देवा ॥२॥ मोह ममता भ्रांति ढकलिती कूपीं । दावीं पैं सोपी वाट आम्हां ॥३॥ जनार्दनाचा एका विनवी सर्वांतें । भजा एकचित्तें विठोबासे ॥४॥
३७६
आशेपाशी काम आशेपाशीं क्रोध । आशेपाशी भेद लागलासे ॥१॥ आशेपाशीं कर्म । आशेपाशीं धर्म । आशेपाशीं नेम नानात्वाचा ॥२॥ आशेपाशीं याती आशेपाशीं जाती । आशेपाशीं वस्ती अहंकाराची ॥३॥ एका जनार्दनीं निराशी तो धन्य । ज्यासी नारायण सांभाळिता ॥४॥
३७७
आशेपाशीं नाहीं सुख । आशेपाशीं परम दुःख ॥१॥ आशा उपजली देवासी । तेणें नीचत्व आले त्यासी ॥२॥ आशेसाठीं जगदानी । मागें बळीसी स्वयें पाणी ॥३॥ एका जनार्दनीं आशा । तिनें गुंतविलेंक महेशा ॥४॥
३७८
आषाढी पर्वकाळ । निघताती संतमेळ । करिती गदारोळ । विठ्ठलकीर्तनीं ॥१॥ धन्य धन्य त्यांचें कुळ । पावन ते सकळ । येवोनि उतावीळ । विठ्ठल भेटती ॥२॥ करती चंद्रभागे स्त्रान । पुंडलिकाचें अभिवंदन । तीर्थ प्रदक्षिणा दरुशन । विठ्ठलाचें ॥३॥ एकादशी करती व्रत । नमें जागरण करीत । आनंदे भरीत नाचत । विठ्ठलासमोर ॥४॥ ऐसें भाळे भोळें सकळ । विठ्ठलाचे लडिवाळ । एका जनार्दनीं कृपाळ । विठ्ठल माझा ॥५॥
३७९
आषाढीची यात्रा आला पर्वकाळ । निघाला संतमेळ पंढरीसी ॥१॥ निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताई । आणिकही अनुभवी संत बहु ॥२॥ येतां त्याची मार्गे तेरेसी ते आले । तिहीं पुशियेलें गोरोबासी ॥३॥ गावांतील जन सांगती प्रकार । गोरियाचा विचार जाहला सर्व ॥४॥ परदेशी कुंभार पंढरीचा विठा । राहिलासे वांटा करुनियां ॥५॥ ज्ञानदेव खूण आणितलीं मनीं । एका जनार्दनीं पाहूं त्यातें ॥६॥
३८०
आष्टांग साधन मौनी जटाधारी । एक चरणावरी करती तप ॥१॥ वायु ते आहार असती दिंगबर । परि न कळे विचार देव कोठें ॥२॥ कैशी तया भ्रांती असोनी देव जवळा । रिगती साधन कळा हुडाकिती ॥३॥ एका जनार्दनीं तया नाहीं सुख । संतांवांचुनी देख मार्ग न लागें ॥४॥
३८१
आसनीं भोजनीं शयनीं । जो चिंती रुप मनीं ॥१॥ जागृति स्वप्न आणि सुषुप्ति । सदा ध्यान रुप चित्तीं ॥२॥ नसे आणिके ठायीं मन । एका शरण जनार्दन ॥३॥
३८२
आहर्निशी योगी साधिती साधन । तयासी महिमान न कळेची ॥१॥ तो हा श्रीहरी बाळवेषें गोकुळीं । खेळे वनमाळी गोवाळीयांसीं ॥२॥ एका जनर्दनीं न कळे महिमान । तटस्थ तें ध्यान मुनीजनीं ॥३॥
३८३
आहाच वाहाच झकविलें लोकां । ऐसिया ठका देव कैचा ॥१॥ शिकवूनी जन वंचला आपण । नरकीं पतन होत असे ॥२॥ मी ज्ञाता म्हणुनी फुगोनी बैसला । ब्रह्माविद्येचा पसारा घातिला ॥३॥ अभ्यासी ते मिरवीं लोकीं । पडलीया चुकी निजपंथें ॥४॥ ज्यासी दंभ तो काय नेणें । लोकीं मानवणें हेंची पाहें ॥५॥ घरोघरीं गुरु आहेत आईते । गूळ घेऊनियां विकिती रायतें ॥६॥ संसारापासोनी सोडवी साचे । सदगुरु ऐसें नांव त्याचें ॥७॥ बोलाचेनि ज्ञानें पावोनि देवा । भुलविलें भावा अभिमानें ॥८॥ एका जनार्दनीं नव्हे त्या भेटी । वोसणतां भेटी साच होय ॥९॥
३८४
आहारालागीं कथा । करिताती पैं सर्वथा ॥१॥ आहार न मिळतां जाण । कथेलागीं पुसे कोण ॥२॥ आहार मिळतां पोट भरी । पुराण सांगे बरव्या परी ॥३॥ आहार मिळतां संध्यास्नान । आहारार्थ जपध्यान ॥४॥ आहारालागीं उपासना । नीचसेवना आहारेंची ॥५॥ आहाराकारणें सर्व हेत । एका जनार्दनीं गात आहारेंची ॥६॥
३८५
आहारालागीं करी देवाचें भजन । मिळे मिष्ठान्न भोजनासी ॥१॥ आहारालागीं करी तीर्थांचे भ्रमण । आहारें जिंकिलें मन सर्वपरी ॥२॥ आहारालागीं करी तीर्थप्रदक्षणा । आहारें व्यापिलें जनां एकमय ॥३॥ आहार निर्धार नाहीं जनार्दनीं । एका जनार्दनीं निराहार ॥४॥
३८६
आहारालागीं देवपूजा । आहारें खादलेंसी निजा ॥१॥ न कळेची हिताहित । आहारें खादलीं पंचभूतें ॥२॥ आहारालागीं कर्म धर्म । भुलला वर्म आहारेंची ॥३॥ आहारालागीं मंत्र तंत्र । आहारलागीं करी अपवित्र ॥४॥ आहारालागीं जाला भांड । एका जनार्दनीं काळें तोंड ॥५॥
३८७
आहारे निर्देवा काय करसी तप । वाउगाची जप शांतीविण ॥१॥ आहारे पाररा नेणसी देवासी । वाउगा शिणसी काय काजा ॥२॥ आहारे तामसा कोण तुझी गती । संताची प्रचीति नाहीं तुज ॥३॥ एका जनार्दनीं ऐसा हीनभागी । भूभार जगीं वायां जाहला ॥४॥
३८८
इंद्रिया देवाची सुटली बांदवडी । स्वानंदें उभाविली गुढी सरली असुर धाडी ॥१॥ रामराज्य झालें रामराज्य झालें । रामराज्य झालें सदगुरुचेनि बोले ॥२॥ अहं रावणु रामें मारिला प्रचंडु । धरी मारी देही सरला इंद्रिय दंडु ॥३॥ त्रिकुटशिखरी पिटलें रामराज्य धेंडे । क्रोधादि असुर गेलें करुनी काळीं तोडे ॥४॥ विषयांचेकारभार कामिनी करिती अंतु । राम रामराज्यें विराला मन्मथु ॥५॥ रामनाम तेथें कळिकाळ कांपती । रामनामें सम अधमोत्तमा मुक्ति ॥६॥ शरणागत निज स्थापिलें निजपदीं । रामनामें जड तरती भवाब्धी ॥७॥ एका जनार्दनीं रामनाम जपे । रामराज्य झालें सदगुरुकृपें ॥८॥
३८९
इंद्रिये कुंठित जालीं । विठु माउली पाहतां ॥१॥ वेधलें मन दुजें नेणें । विसरलें पेणें ताहानभूक ॥२॥ मदमत्सर समूळ गेला । ऐसा लागला वेध त्याचा ॥३॥ काम क्रोध पळाले दुरी । आशा तृष्णा झडकरी लपाल्या ॥४॥ मन मनाधीन जालें । एका जनार्दनीं रूप देखिलें ॥५॥
३९०
इंद्रिये नाना छळती पामरें । समाधान शरीरें नोहे कधीं ॥१॥ त्याचा जो व्यापार करती सैरावैरा । परि त्या सर्वेश्वरा न भजती ॥२॥ विषयाचे कामें करिती विवंचना । परी नारायणा न स्मरती ॥३॥ एका जनार्दनीं कृपा नव्हती पूर्ण । इंद्रियां समाधान केवीं होय ॥४॥
३९१
इकडुनी तिकडे चालू जैसें माप । तैशी जन्ममरण खेप प्राणियांसी ॥१॥ भोगितां नूतन सांडिती ते जाण । तैसें जन्ममरण प्राणियांसी ॥२॥ पुष्पाचा परिमळ घेऊनी सांडिती जाण । तिसें जन्ममरण प्राणियांसी ॥३॥ देह धरूनी आला न करा स्वहित । करी अपघात आपणासी ॥४॥ एका जनार्दनीं दोषी तोचि जाणा । न भजे चरणा संताचिया ॥५॥
३९२
इकडे रुक्माईसी सांगे करुणाकर । चला पैं सत्वर पंढरीये ॥१॥ गरुडासहित वेगें पैं निघाले । पूर्ववत आले पंढरीये ॥२॥ एका जनार्दनीं भक्ताचा कैवारी । ऐसे करुनी हरी उभा विटे ॥३॥
३९३
इच्छा केली तें पावलों । देखतांचि धन्य जाहलों ॥१॥ होते सुकृत पदरीं । तुमचें चरण देखिलें हरी ॥२॥ गेले भय आणी चिंता । कृतकृत्य जाहलों आतां ॥३॥ आजी पुरला नवस । एका जनार्दनीं जाहलों दास ॥४॥
३९४
इच्छिताती देव पंढरीचा वास । न मिळे सौरस तयां कांहीं ॥१॥ ऐसें श्रेष्ठ क्षेत्र उत्तमा उत्तम । याहुनी सुगम आहे कोठें ॥२॥ जनार्दनाचा एक म्हणतसे भावें । तीर्थ ते वंदावें पंढरी सदा ॥३॥
३९५
इतुकी करावीहे जोडी । रामनामीं धरा गोडी ॥१॥ आणिक नलगे साधन । एकलें मन जिंका पूर्ण ॥२॥ एका जनार्दनीं मन । देवा पायीं बांधून ॥३॥
३९६
इष्ट मित्र बंधु चुलते पुतणे । काळाचे पोसणें सर्व देख ॥१॥ यमाची यातना पडतां जीवा ती । कोणा काकुलती करसी मूढा ॥२॥ जोंवरी आहे तुज जवळी धन । तोंवरी पिशून म्हणती माझें ॥३॥ एका जनार्दनीं जवळी आला काळ । तेव्हा ते निर्बळ सर्व होती ॥४॥
३९७
इहलोकीं बरा तो परलोकीं वंद्य । त्यासी भेदत्व निंद्य उरलें नाहीं ॥१॥ परस्त्री देखतां नपुंसक वागे । परधन पाहतां अंधापरी निघे ॥२॥ वाद वेवादा नोहे त्याची मती । हृदयीं भगवद्भक्ति सदा वाहे ॥३॥ एका जनार्दनीं ऐसें विरळे प्राणी । कोटी माजीं जनें एक देखो ॥४॥
३९८
उंच नीच नाहीं नामाचियां पुढें जातीचें तें गाढें नाहीं काम ॥१॥ अनामिकाहुनी असोत चांडाळ । परी नामाचा उच्चार मुखीं वसो ॥२॥ यवनादि नीच असोत भलते । परी नाम सर्वदा तें मुखी वसो ॥३॥ एका जनार्दनीं नाम वसो मुखीं । तेणें तो तिहीं लोकीं सरता होय ॥४॥
३९९
उगम संगम प्रवास गती । ऐसी त्रिविध देहस्थिती ॥१॥ बाळत्व तारुण्य वृद्धत्व । ऐसें देहाचें विविधत्व ॥२॥ जरामरण नाश पावे । ऐसा देह व्यर्थ जाये ॥३॥ ऐसियाचा भरंवसा । एका जनार्दनीं ठसा ॥४॥
४००
उघड जगीं दिसोनियां कां झांकितीसी डोळां । पाहतां पाहतां खेळामध्ये वरपडा होसी काळा ॥१॥ नको खेळूं लंपडाई नको खेळूं लपडाई । मिळाले ते गडी जाती पळुनि पडाल दांत विचकुन भाई ॥२॥ उगाचि डोळे झांकुनि कांरे होसी अंध । संसारमायामोह याचा टाकी बा छंद ॥३॥ शरण एका जनार्दनीं जातां चुके हा खेळ । नाहीं तरी पडसी गुतोंनि कोण करील कळवळ ॥४॥
४०१
उघड दाखविलें देवा । नाहीं सेवा घेतली ॥१॥ ऐसी प्रेमाची माउली । जगीं व्यापक व्यापली ॥२॥ नाहीं घालीत भार कांहीं । आठव देहीं रामकृष्ण ॥३॥ एका जनार्दनीं शरण । मन माझें नेलें चोरुन ॥४॥
४०२
उघड दृष्टी करुन पाहुं । रामकृष्णनामें ध्याऊं । अहोरात्र मुखीं गाऊं । राम हरी वासुदेव ॥१॥ हेंचि अध्यात्माज्ञानाचें वर्म । येणें घडतीकर्माकर्म । ब्रह्माविद्येचा आराम । येणें पावे सर्वथा ॥२॥ सदा वाचे नामावळी । महा दोषा होय होळी । कळीकाळ पायांतळीं । ब्रह्मानंदें गर्जतां ॥३॥ एका जनार्दनीं नाम । भवसिंधु तारक धाम । साधकांचा श्रम । येणें दुर सर्वथा ॥४॥
४०३
उघड बोलती संत । जैसा हेत पुरविती ॥१॥ मनीचें जाणती ते सदा । होऊं नेदी विषयबाधा ॥२॥ अज्ञान सज्ञान । तारिती कृपें करुन ॥३॥ संतापायें ज्याचा भाव । तेथें प्रवटेचि देव ॥४॥ एका जनार्दनींबरा । द्यावा मज तेथें थारा ॥५॥
४०४
उघडा अनुभव असोनिया देहीं । वायांचि प्रवाहीं कां पडसी ॥१॥ संसार दुस्तर कूप हा निर्धार । पडतां अंधकार सुटे जाण ॥२॥ भ्रमतां भ्रमतां नयेचि बाहेरी । चौर्‍यांयशी फेरी पुनः पुनः ॥३॥ एका जनार्दनीं नको हा विचार । वायां फजितखोर हाशी बापा ॥४॥
४०५
उघडा देव दिंगबर भक्त । दोहींचा सांगात एक जाहला ॥१॥ देव नागवा भक्त नागवा । कोणाची केशवा लाज धरुं ॥२॥ देव निलाजरा भक्त बाजारी । देहामाझारी उरीं नाहीं ॥३॥ उघडें नागवें जाहलें एक । एका जनार्दनीम देखणें देख ॥४॥
४०६
उघडा विठ्ठल विटेवरी उभा । अनुपम्य शोभा दिसतसे ॥१॥ विटेवरी पाय जोडियले सम । तेंचि माझे धाम ह्रुदयीं राहो ॥२॥ एका जनार्दनीं विठ्ठल सांवळा । देखियेला डोळां विटेवरी ॥३॥
४०७
उघडा हा मंत्र विठ्ठल वदा वाचे । अनंता जन्माचे दोष जाती ॥१॥ न करी आळस आल्या संसारीं । वदा निरंतरी विठ्ठलानाम ॥२॥ साधेल साधन तुटती बंधने । विठ्ठलनाम जाण जप करीं ॥३॥ एका जनार्दनीं असनीं शयनीं । विठ्ठल निशिदिनीं जप करी ॥४॥
४०८
उचित अनुचित कळें तुम्हां । सदैव निर्दैव हासती ॥१॥ ऐशी राहे कर्मगती । वायां फजिती होती जगीं ॥२॥ कर्म सोडीना या नरा । करी आयुष्याचा मातेरा ॥३॥ एका जनार्दनीं निजसार । कर्म हिंडवी गिरिगव्हार ॥४॥
४०९
उच्चार नामाचा करी पां साचार । आळस निर्धारें टाकून देई ॥१॥ तें नाम सोपें निवृत्तीचें जाणा । कायावाचा मना जप करीं ॥२॥ यातना तें कांही न पडे व्यसन । नाम उच्चारण निवृत्तीचें ॥३॥ निवृत्तिनामाचा लागलिया छंद । तुटे भवकंद नामें तोचि ॥४॥ एका जनार्दनीं निवृत्तिनाम धणी । गाईन मी वाणी सदोदित ॥५॥
४१०
उच्चार फुकाचा नाम हें विठ्ठल । नाहीं कांही मोल द्रव्य वेंचे ॥१॥ जागृती सुषुप्ती स्वप्नीं विठ्ठलनाम ध्यानी । गाऊं तें कीर्तनीं दिननिशीं ॥२॥ एका जनार्दनीं केला लागपाठ । तेणें सोपी वाट वैकुंठीची ॥३॥
४११
उठतां बैसतां खेळता बोलतां । चालतांनिजतां राम म्हणा ॥१॥ आसनीं शयनी भोजनीं परिपुर्ण । वाचे राम नारायण जप करीं ॥२॥ कार्याकारणीं समाधीं उन्मनीं । राम ध्यानींमनीं जपे सदा ॥३॥ एकांती लोकांती देहत्यागांअंती । रामनाम वस्ती जिव्हेवरी ॥४॥ एका जनार्दनीं वाचे वदे राम । अखंड निष्काम होसी बापा ॥५॥
४१२
उठोणि मध्यरात्रीं तेथें आला सांवळा । सुखसेजे पहुडली देखे गोपी बाळा ॥१॥ पती आणि गौळणी एके सेजे पहुडली । बैसोनियां सेजे विपरीत करणी केली ॥२॥ धरुनी गोपी वेणी दाढी पतीची बांधिली । न सुटे ब्रह्मादिकी ऐशी गांठ दिधली ॥३॥ करुनी कारण आले आपुले मंदिरा । यशोदे म्हणे कृष्णा काय केलें सुंदरा ॥४॥ जाहला प्राप्तःकाळ लगबग उठे कामिनी । वोढातसे दाढी जागा झाला तो क्षणीं ॥५॥ कां गे मातलीस दिली दाढी वेणी गांठी । एका जनार्दनीं आण वाहे गोरटी ॥६॥
४१३
उठोनि एके दिनीं म्हणे यशोदा कान्हया । गोधनें घेऊनियां जाई वनासी लवलाह्मा ॥१॥ सवें मिळालें चिमणे सवंगडी । शिदोरी काठी कांबळी जाळी घेती आवडी ॥२॥ एका जनार्दनी गाई सोडिल्या सार्‍या । रामकृष्ण सवंगडीया देव येती पहावया ॥३॥
४१४
उठोनि प्रातःकाळीं गोपी येती घरा । आवरीं आवरीं यशोदे आपुलिया पोरा ॥१॥ थोर पीडीयेलें सांगतां नये आम्हां । दहीं दूध तूप लोनी नासिलें सीमा ॥२॥ लेकी सुना पोरें वेडाविलीं सकळ । चोरी करिताती भुलविलें सबळ ॥३॥ एका जनार्दनीं आवरीं आपुला कान्हा । तुझा तुज गोड वाटे हांसतीस मना ॥४॥
४१५
उठोनि प्रातःकाळीं म्हणे यशोदा मुरारी । गोपाळ वाट पाहती उभे तुझ्या द्वारीं । शिदोरी घेउनि वेगीं जाय रानीं ॥१॥ यमुनेचे तीरीं खेळ खेळतो कान्हा । नानापरी क्रीडा करी यादवांचा राणा ॥धृ॥ मागे पुढे गोपाळ मध्यें चाले हरी । सांवळा सुकुमार वाजवीं मुरलीम अधरीं । पुच्छे वर करुनी गाई नाचती नाना ॥२॥ मुरलीचा नाद समाय त्रिभुवनीं । किती एक नादें भुलल्या गौळणी । देह गेह सांडोनि चालताती वनीं ॥३॥ खग मृग गायी व्याघ्र नसे दुजा भाव । सकळीं उच्चारण एक कॄष्ण नांव । काया वाचा मनें शरण एका जनार्दनीं ॥४॥
४१६
उठोनियां बैसतां घरीं । नाम्या म्हणोनी हांक मारी ॥१॥ पाहो नेदी कांही धंदा । लावियेलें आपुल्या छंदा ॥२॥ हा तो जन्माचा भिकारी । सदा हिंडे दारोदारीं ॥३॥ एका जनार्दनीं म्हणे । आपुल्यासारखें केलें येणें ॥४॥
४१७
उतरावया धरा भार । घेतिला अवतार इहीं जगें ॥१॥ ते हें बळिये रामकृष्ण । केलेंक कंदन दैत्यासी ॥२॥ केला जो जो कीर्तिघोष । उच्चारितां निर्दोष होती प्राणी ॥३॥ एका जनार्दनीं कृपाळु । भक्त स्नेहाळू समर्थ ते ॥४॥
४१८
उतरावया धरा भार । धरीं अवतार कृपाळूं ॥१॥ पाळीतसे भक्तलळा । नोहे वेगळा वेगळीक ॥२॥ जया आवडे जें कांही । देतां न म्हणे थोडें कांहीं ॥३॥ पुरवी इच्छा जैसी आहे । मच्छ कच्छ तयासाठीं होय ॥४॥ ऐसा कृपेचा कोंवळा । एका जनार्दनीं पाहुं डोळा ॥५॥
४१९
उतावेळपणें उभा । त्रैलोक्य शोभा पंढरीया ॥१॥ मना छंद घेई वाचें । विठ्ठल साचे पाहुं डोळां ॥२॥ गळां तुळशीच्या माळा । केशर टिळा लल्लाटी ॥३॥ चंदनाचे शोभे उटी । वैजयंती कंठी मिरवत ॥४॥ दाष्टी धाय पाहतां रुप ।एका जनार्दनीं स्वरुप ॥५॥
४२०
उत्तम अथवा चांडाळ । अधम खळाहुनी खळ ॥१॥ तेही तरले एका नामें । काय उपमें आन देऊं ॥२॥ एका जनार्दनीं नाम । गातां सकाम मुक्ति जोडे ॥३॥
४२१
उत्तम अथवा चांडाळ । न पाहेचि खळाखळ ॥१॥ शरण आलिया तत्त्वतां । तया नुपेक्षी सर्वथा ॥२॥ न म्हणे शुचि अथवा चांडाळ । स्मरणेंचि मुक्तिफळ ॥३॥ ऐसा पतीत पावन । शरण एका जनार्दन ॥४॥
४२२
उत्तम अधम येथें नाहीं काम । जपें तूं श्रीराम सर्वकाळ ॥१॥ मंत्रतप कांहीं योगाची धारणा । न लगे नामस्मरणा वांचुनियां ॥२॥ योग याग तप वाउगा बोभाट । अष्टांग नेटपाट न लगें कांहीं ॥३॥ एका जनार्दनीं गावें मुखी नाम । तेणें वारे काम क्रोध सर्व ॥४॥
४२३
उत्तम अन्न देखतां दिठी । ठेवी पोटीं जतन तें ॥१॥ तान्हुल्याची वाहे चिंता । जेवीं माता बाळातें ॥२॥ न कळे तया उत्तम कडु । परी परवडु माता दावी ॥३॥ एका जनार्दनीं तैसा देव । घेत धांव भक्ताघरीं ॥४॥
४२४
उत्तम तें क्षेत्र उत्तम तें स्थळ । धन्य ते राऊळ पाहतां डोळां ॥१॥ एक एक तीर्थ घडती कॊटी वेळां । चंद्रभागा डोळां देखिलिया ॥२॥ गंगा प्रदक्षिणा समुद्राचे स्नान । परी हें महिमान नाहीं कोठें ॥३॥ वैष्णवांचा मेळ करिती गदारोळ । दिंडी पताका घोळ नोहे कोठें ॥४॥ एका जनार्दानी सारांचे हें सार । पंढरी मोहरे भाविकांसी ॥५॥
४२५
उत्तम पुरुषाचें उत्तम लक्षण । जेथें भेद शून्य मावळला ॥१॥ भेदशुन्य जाला बोध स्थिरावला । विवेक प्रगटला ज्ञानोदय ॥२॥ जिकडे पाहे तिकडे उत्तम दरुशन । दया शांति पूर्ण क्षमा अंगीं ॥३॥ एका जनार्दनीं उत्तम हें पाप्ती । जेथें मावळती द्वैताद्वैत ॥४॥
४२६
उत्तम मध्यम कनिष्ठ यांचें नाहीं काम । जपावें तें नाम आधीं आधीं ॥१॥ वर्णाश्रम धर्म याचें नाहीं काम । जपावें तें नाम आधीं आधीं ॥२॥ रज तम सत्व यांचें नाहीं काम । जपावें तें नाम आधीं आधीं ॥३॥ एका जनार्दनीं हें परतें सारा । जपा रघुवीरा एका भावें ॥४॥
४२७
उत्तम मध्यम चांडाळ । अत्यजहि तरलें खळ ॥१॥ ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र । नामें पवित्र पैं जाहलें ॥२॥ यवन माई तो कुंभार । शिंपी सोनार तरले ॥३॥ एका जनार्दनीं सांगूं किती । मागें तरले पुढें तरती ॥४॥
४२८
उत्तम साधन रामनाम जाण । यापरतें निधान आणिक नाहीं ॥१॥ नलगे समाधि रामनाम घेतां । उघडा जप तत्त्वतां सूपा राम ॥२॥ नलगे विरक्ति नाम मंत्र तंत्र । रामनाम पवित्र जप सोपा ॥३॥ एका जनार्दनीं सोपें रामनाम ध्यान । पवित्र पावन रामनाम ॥४॥
४२९
उत्तम स्त्री देखोनि दृष्टी । मुर्ख कैसा लाळ घोटी ॥१॥ तैसा विनटें रामनामा । तेणें चुकशी कर्माकर्मा ॥२॥ मुषक देखोनि मार्जार । तैसे उभे यम किंकर ॥३॥ मीन तळमळी जैसा । विषयीक प्राणी तैसा ॥४॥ शरण एका जनार्दनीं । दुजा छंद नाहीं मनीं ॥५॥
४३०
उत्तम स्थळ पंढरी देखा । उभा सखां विठ्ठल ॥१॥ एकदां जा रे तये ठायीं । प्रेमा उणें मग काई ॥२॥ भाग्य जोडले सर्व हातां । त्रैलोकीं सत्ता होईल ॥३॥ मोक्षामुक्ती तुम्हीपुढें । दास्यत्व घडे तयांसी ॥४॥ एका जनार्दनीं त्याचे भेटी । सुखसंतोषा पडेल मिठी ॥५॥
४३१
उदंड क्षेत्राची पाहिली रचना । पंढरी ते जाणा भुवैकुंठ ॥१॥ तीर्थ आणि देव संतसमागम । ऐसें सर्वोत्तम कोठें नाहीं ॥२॥ सागरादि तीर्थ पाहतां पाहिलें । परी मन हें वेधलें पंढरीये ॥३॥ एका जनार्दनीं सुखाची विश्रांती । पाहतां विठ्ठलमुर्ति लाभ बहु ॥४॥
४३२
उदंड तीर्थ महिमा वर्णिला । परी नाहीं भेटला पांडुरंग ॥१॥ पंढरींसारखे तीर्थ महीवरी । न देखों चराचरीं त्रैलोक्यांत ॥२॥ ऐसा नामघोष संतांचा मेळ । ऐस भक्त्कल्लोळ नाहीं कोठें ॥३॥ एका जनार्दनीं अनाथा कारण । पढरीं निर्माण भूवैकुंठ ॥४॥
४३३
उदंड तीर्थे उदंड क्षेत्रें । परि पवित्र पंढरी ॥१॥ उदंड देव उदंड दैवतें । परि कृपांवतं विठ्ठल ॥२॥ उदंड भक्त उदंड संत । परी कृपावंत पुडलीक ॥३॥ उदंड गातो एक एका । परी एका जनार्दनीं सखा ॥४॥
४३४
उदंड तीर्थे पृथ्वींच्या ठायीं । ऐसा महिमा नाही कोणें जागीं ॥१॥ तया पुंडलीकें आम्हा सोपें केलें । परब्रह्य्मा उभे ठेलें विटेवरी ॥२॥ भुवैकुंठ पंढरी क्षेत्र । पवित्रा पवित्र उत्तम हें ॥३॥ म्हनोनी करा करा लाहें । एकदां जा हो पंढरीये ॥४॥ एका आगळें अक्षर । एका जनार्दनी निर्धार ॥५॥
४३५
उदंड तीर्थें क्षेत्रें पाहातां दिठीं । नाहीं सृष्टी तारक ॥१॥ स्नानें पावती मुक्ति जगा । ऐशी चंद्रभागा समर्थ ॥२॥ पुडलिका नमस्कार । सकळ पूर्वजां उद्धार ॥३॥ पाहतां राउळाची ध्वजा । मुक्ती सहजा राबती ॥४॥ एका जनार्दनीं विठ्ठल भेटी । मग लाभा नये तुटी ॥५॥
४३६
उदंड भक्त भाग्यवंत देखिले । परी निधान दाविलें पुंडलिकें ॥१॥ धन्य धन्य केला जगाचा उद्धार । नाहीं लहानथोर निवडिले ॥२॥ एका जनार्दनीं दावियेला तारु । सुखाचा सागरु विठ्ठल देव ॥३॥
४३७
उदंड मंत्र उदंड तीर्थे । परी पवित्र निर्धार पंढरीये ॥१॥ उदंड महिमा उदंड वर्णिला । परी या विठ्ठलावांचुनी नाहीं ॥२॥ उदंड भक्त उदंड शिरोमणी । एका जनार्दनीं चरण उदंडची ॥३॥
४३८
उदकी साखर पडत । विरोनी उदका गोड करीत ॥१॥ तेथें हेतुसी नाहीं ठावो । निमाला भाव आणी अभावो ॥२॥ सांडोनी मोपणासी । खेंव दिधला समरसी ॥३॥ एका जनार्दनीं शरण । एकपणें एकचि जाण ॥४॥
४३९
उदय सुर्याचा जाला । मिळाला गौळणीचा मेळा । धाउनी सकळां । आलीया अंगणीं ॥१॥ बोलती आणि संक्रोधें । थोर पीडेलें बाळकें ।चोरी करुनियां देखे । आला पळोनि ॥२॥ आमुचीं फोडिलीं भाजनें । दहीं दुध खादलें येणें । एका जनार्दनी तान्हें । यशोदे तुझें ॥३॥
४४०
उदयो अस्तु मावळलें भान । कर्माकर्मीं सहज समाधान ॥१॥ कर्म तें गेलें करणें हारपलें । सहजीं पारुषले धर्माधर्म ॥२॥ उदयो अस्तुभान न देखे समाधान । अवघा जनार्दन जनीं वनीं ॥३॥ एका जनार्दनीं एकपणें कर्म । देहींच देह धर्म एकरूप ॥४॥
४४१
उदापरणें संत भले । पापीं उद्धरिलें तात्काळ ॥१॥ ऐसे भावें येतां शरण । देणें पेणें वैकुंठ ॥२॥ ऐसें उदार त्रिभुवनीं । संतावांचुनीं कोण दुजें ॥३॥ एका जनार्दनीं शरण । संत पतीतपावन ॥४॥
४४२
उदार उदार । सखा पांडुरंग उदार ॥१॥ ठेवामन त्याचे पायीं । तुम्हं उणें मग कायी ॥२॥ दुजीयासी कींव । कां रें भाकितसां जीव ॥३॥ तीं काय देतील बापुडीं । एका जनार्दनीं धरा गोडी ॥४॥
४४३
उदार दयाळ गुरुदत्त । पुरवी हेत भक्तांचा ॥१॥ त्याचे चरणीं लीन व्हावें । शुद्धभावें करुनी ॥२॥ मुखीं स्मरा गुरुदत्ता । नाहीं दाता दुसरा ॥३॥ पायीं करा तीर्थयात्रा । गुरुसमर्था भजावें ॥४॥ म्हणे एका जनार्दनीं । जनीं वनीं दत्त हा ॥५॥
४४४
उदार देव उदार देव । नाशी भेव भक्तांचें ॥१॥ प्रल्हादाचे निवारी घात । राहिला जळता अग्नीसी ॥२॥ पांडवांचें करी काम । निवारी दुर्गम स्वअंगें ॥३॥ गौळियांचीं गुरें राखी । आपण शेखीं एकला ॥४॥ येतां शरण एकपणें । एका जनार्दनीं ऐसें देणें ॥५॥
४४५
उदार धीरनीधी । श्रीविठ्ठल नाम आधीं ॥१॥ पतीतपावन सिद्धी । श्रीविठ्ठल नाम आधीं ॥२॥ सुखसागरनिधी । श्रीविठ्ठल नाम आधीं ॥३॥ एका जनार्दनीं बुद्धी । श्रीविठ्ठल नाम आधीं ॥४॥
४४६
उदार भक्त उदार भक्त । त्रैलोकीं मात जयाची ॥१॥ केला भगवदगीते अर्थ । ऐसे समर्थ तिहीं लोकीं ॥२॥ बोलविला रेडा चालविली भिंती । चांगदेवातें उपदेशिती ॥३॥ एका जनार्दनीं समर्थ ते भक्त । देव त्यांचा अंकित दास होय ॥४॥
४४७
उदार विश्वाचा दीपकु तेजाचा । प्रकाशु कृपेचा दावियेला ॥१॥ हारपले विश्व विश्वभरपणे । दाविलें जनार्दनें स्वयमेव ॥२॥ अकार उकार मकार शेवट । घेतिलासे घोट परब्रह्मीं ॥३॥ एका जनार्दनीं विदेह दाविला । सभराभरीं दाटला हृदयामाजीं ॥४॥
४४८
उदार संत एक जगीं । वागवितीं अंगीं सामर्थ्य ॥१॥ काय महिमा वर्णू दीन । पातकीं पावन करिती जगीं ॥२॥ अधम आणि पापराशी । दरुशनें त्यांसी उद्धार ॥३॥ लागत त्यांच्या चरणकमळीं । पापतांपां होय होळी ॥४॥ एका जनार्दनीं भेटतां । हरे संसाराची चिंता ॥५॥
४४९
उदारपणें उदार सर्वज्ञ । श्रीजनार्दन उभा असे ॥१॥ तयाचे चरणीं घातली मिठी । जाहली उठाउठी भेटी मज ॥२॥ अज्ञान हारविलें ज्ञान प्रगटलें । हृदयीं बिंबलें पूर्ण ब्रह्मा ॥३॥ एका जनार्दनीं नित्यता समाधी । वाउग्या उपाधी तोडियेल्या ॥४॥
४५०
उदित तेथे परब्रह्मा उभें । सह्स्त्र कोंभ शोभे विटेवरी ॥१॥ कोटी सुर्य तेज लोपले तें प्रभे । तें असे उभे पंढरीये ॥२॥ एका जनार्दनीं कैवल्यपुतळा । पाहतां अवलीळा मन निवे ॥३॥
४५१
उद्धव अक्रूर गोपाळ सवंगडे । हनुमंतादिक बागडे भक्त देखा ॥१॥ गुहक बिभीषण नळनीळ देखा । ऐशी भक्तामालिका शोभतसे ॥२॥ एका जनार्दनीं घेतां त्याचें नाम । सर्व हरती कामक्रोधादिक ॥३॥
४५२
उद्धव बोले कृष्णाप्रती । ऐकोनि संतांचीं कीर्ति । धन्य वैष्णव होती । कलीमाजीं ॥१॥ तुम्हां जयाचा निजछंद । मानीतसा परमानंद । अखंड तयाचा वेध । तुमचें मनीं ॥२॥ ऐशी याची संगती । मज घडो अहोरातीं । नये पुनरावृत्ती । पुनः जन्मासी ॥३॥ हर्ष देव सांगे आपण । उद्धवा तयाचें मज ध्यान । एका जनार्दनीं शरण । ते मज आवडती ॥४॥
४५३
उद्धवा तूं करी कीर्तन । अनन्यभावें माझे भजन । नको आणीक साधन । यापरतें सर्वथा ॥१॥ धरी प्रेम सदा वाचे । कीर्तनरंगीं तूं नाचे । मी तूं पण साचें । अंगीं न धरीं कांहीं ॥२॥ भोळे भोळे जन । गाती अनुदिनीं कीर्तन । तेथें अधिष्ठान । माझें जाण सर्वथा ॥३॥ नको चुकूं तया ठायीं । वसे सर्वदा मीही । एका जनार्दनीं पाहीं । किर्तनी वसें सर्वदा ॥४॥
४५४
उद्धवा तूं धर संतसमागम । तेणें भवश्रम हरे उद्धवा ॥१॥ सांगासे गुज मना धरीरें उद्धवा । आणिक श्रम वायां न करी रे तें ॥२॥ तयाची संगती उद्धवा धरावी । सेवा ते करावी काया वाचा ॥३॥ मज तयाचा वेध उद्धवा प्रसिद्ध । तूं सर्वभावें सदगद नाम घेई ॥४॥ ज्याची आवडी मजसी उद्धवा । जाई तया ठायां प्रेमभरित ॥५॥ उच्च नीच कांहीं न म्हणें उद्धवा । एका जनार्दनीं तया शरण जावें ॥६॥
४५५
उद्धवा स्वमुखें सांगे श्रीकृष्ण । संतसेवा जाण सर्वश्रेष्ठ ॥१॥ हाची योग जाण उद्धवा स्वीकारी । आणिक न करी भरोवरी साधन उद्धवा ॥२॥ योगयाग तप वत कसवटी । न करी आन गोष्टीरे उद्धवा ॥३॥ कीर्तन भजन सर्वभावें करी । जाई संतद्वारी शरणागत रे उद्धवा ॥४॥ मनींचे निजगुज सांगितलें तुज । एका जनार्दनीं निज साधे रे उद्धवा ॥५॥
४५६
उद्धवासे एकांतीं बोले गुज सांवळा । गोकुळासी जाऊनी बोधीं सुंदरीं गोपीबाळा । रथीं बैसोनी निघाला वेगीं पावला गोकुळां । तो उद्धव देखोनी दृष्टी गोपींन वेढींला ॥१॥ उद्धवा जाय मथुरेला । आणी लौकरे हरीला ॥धृ॥ मुखसुंदर शोभे कपाळीं टिळक रेखिला । नवरत्नजडित मुद्रिका हार कंठी घातिला । झळकती कुंडलें कानीं शिरीं मुगुट शोभला । मुरली धरुनी अधरीं नाचे यमुना तीरीं देखिला ॥२॥ मथुरेसी राहिला हरी विसरोनी आम्हांसी । कुब्जेनें मोहिला भाळल्या तिच्या रुपासी । डोळे पिचके खुरडच जे चाले काय वानुं मुखासी । शुद्ध भाव देखोनी तिच्या अनुसरला तियेसा ॥३॥ रासमंडली नाचे मुरारी कधीं भेटेल न कळे । वेणु वाजवी सुस्वर सोज्वळ पदकमळें । धणी न पुरे तया पाहातां मन आमुचें वेधिलें ॥४॥ हा अक्रुर कोठोन आला हरी गेला घेउनी । तोवियोग जाळी न जाय जीव आमुचा अझुनी । घरदार सोडोनी जावें गोकुळ हें सांडोनी । उद्धवा कधीं भेटविसी हरीला आणुनी ॥५॥ घडी घडी घरां येतो चोरिती श्रीहरी । तो झडकरी दाखवीं उद्धवा लौकरी । धन्य प्रेम तयांचें सदगदित अंतरीं । एका जनार्दनीं हरिरुपीं । वेधल्या नारी ॥६॥
४५७
उन्मनीचा हेलावा । तूर्या त्रिनयनीं दावावा । त्रिगुण तूर्या सांठवावा । तें कारण उन्मनीं ॥१॥ हातीं देऊनी बावन कस । भुमंडळईं फिरवा भलत्यास । नाहें लांछन हीनकसास । बाळकांस तेंवें तें ॥२॥ एका जनार्दनीं हा बोध । उघड बोलिलों सुबोध । अनुभवोनि हा बोध । संतचरण धरावे ॥३॥
४५८
उपजोनि प्राणी गुंतला संसारीं । आपुला आपण वैरी होय रया ॥१॥ न कळे पामरा नरकाचें तूं मूळ । विषय सुख अमंगळ भोगी रया ॥२॥ नाथिलिया प्रपंचा गुंतला बराडी । सैर वोढावोढी होईल रया ॥३॥ न कळे तयासी जाहला बुद्धिहीन । माझें माझें कवळोन रडे रया ॥४॥ एका जनार्दनीं अभागी पामर । भोगितीक अघोर नरक रया ॥५॥
४५९
उपदेश अनुपम्य खुण । विटे समचरण शोभले ॥१॥ अनुपम्य सदैव भाग्य ज्यांचें । अनुपम्य वाचे नाम गाती ॥२॥ अनुपम्य जातीं पंढरीये । अनुपम्य वस्ती होय पंढरीये ॥३॥ अनुपम्य ते भाग्याचे । विठ्ठल वाचे आळविती ॥४॥ अनुपम्य एका जनार्दनीं । अनुपम्य वदनी गाती नाम ॥५॥
४६०
उपमन्यु प्रल्हादु तारिलें आळीकें । मी तुझें लाडकें सानपणें ॥१॥ नेणतीयांसी धांवसी तुं त्वरा । शाहणे वेरझारा मरताती ॥२॥ एका जनार्दनीं शरण एकपनीं । नेणतां जाणतांचरणीं तुझे देवा ॥३॥
४६१
उपमन्यु सान देवासी कळवळ । क्षीरसिंधु तात्काळ दिला त्यासी ॥१॥ सानपणें अर्जुनें साधियेलें काज । श्रीकृष्ण निजगूज सांगतसे ॥२॥ सानपणें उद्धव झालासे विमुक्त । सानप्णें तो निश्चित तारियेला ॥३॥ सानपणें सुख गोपाळ गौळणी । एका जनार्दनीं सदोदित ॥४॥
४६२
उपवर ती कांता जाहली असे जाण । गोर्‍याची वासना नाहीं कामीं ॥१॥ विठोबाची आण घालोनि निरविलें । उभयतां ते वहिलें पाळा तुम्ही ॥२॥ सांगूनियां बध्द आपुल्या ग्रामा गेला । पुढें काय विचार जाहला परियेसा ॥३॥ एका जनार्दनीं सुखरुप तिघें । कामधाम वेगें करिताती ॥४॥
४६३
उपवास पडिले भारी । ती वेदना जाणे हरी ॥१॥ मज जाली नाहीं बाधा । देहीं देखतां गोविंदा ॥२॥ देहींचें दुःख अथवा सुख । भेटों नयेचि सन्मुख ॥३॥ एका जनार्दनीं सुख । विसरला तहान भुक ॥४॥
४६४
उपवास पारणें न लगे । आणिक साधन । नामापरतें निधान नाहीं जगीं ॥१॥ म्हणोनि सांडी सांडी काम परतें । वाचेसी आरुतें नाम जपें ॥२॥ नामापरता मंत्र नाहीं त्रिभुवनीं । नाम हें निर्वाणीं तारक जगा ॥३॥ एका जनार्दनीं नाम श्रेष्ठाचें श्रेष्ठ । सर्वांही वरिष्ठ नाम एक ॥४॥
४६५
उपवास पारणें न लागे समाधी । वायांचि उपाधि कोण धरी ॥१॥ आम्हां विष्णुदासा कळलेंसे वर्म । मुखीं गावें नाम हातीं टाळीं ॥२॥ आनंदें बागडे जाती पंढरीसी । पहाती विठोबासी दृष्टीभरी ॥३॥ एका जनार्दनीं मनाचें उन्मन । एका दरुशनें मुक्तिपद ॥४॥
४६६
उपाधि या नांव भूतांचा तो द्वेष । तो तूं या निःशेष सांडीं बापा ॥१॥ सर्वांठायीं देव जगीं तो भरला । व्यापूनियां ठेला जळीं स्थळीं ॥२॥ काम अकाम सकाम निष्काम । हे सोपें उपाय साधकांसी ॥३॥ आसन ध्यान धारण तें ध्येय । हे सोपे उपाय साधकांसी ॥४॥ दंडन मुंडन नको तीर्थाटन । एका जनार्दन हृदयीं धरीं ॥५॥
४६७
उपाधीच्या नांवें घातियेलें शून्य । आणिका दैन्यवाणें काय बोलुं ॥१॥ टाकूनिइयां संग धरियेला देव । आतां तो उपाय दुजा नाहीं ॥२॥ सर्व वैभव सत्ता जयाचें पदरीं । जालों अधिकारी आम्हीं बळें ॥३॥ एका जनादनीं तोडियेला संग । जालों आम्हीं निःसंग हरिभजनीं ॥४॥
४६८
उपाय यासी एक आहे । जो या जाय शरण विठ्ठला ॥१॥ मग न चले काळाचें बळ । घेतां सरळ नामक वाचे ॥२॥ आम्हां आलेसे प्रचीत । म्हणोनि मात सांगतों ॥३॥ शरण एका जनार्दनीं । विठ्ठल वदनीं उच्चारा ॥४॥
४६९
उपासना धरुनी जीवीं । आलों गांवीं विठोबाच्या ॥१॥ उभयतांच्या दरुशनें । जाहलें पारणें जीवशिवा ॥२॥ कष्टलों होतों दाहीं दिशा । पाहतां अशा निमाली ॥३॥ केला परिहार श्रम । उरला नाहीं भवभ्रम ॥४॥ जडलें सदा पायीं मन । आतां न करीं साधन ॥५॥ जाहलों जीवें भावें दास । एका जनार्दनीं पुरली आस ॥६॥
४७०
उपासना हीच बरी । वाचे हरि हरि म्हणावें ॥१। कायदुसर्‍याचे काम । वाचें नाम आठवितां ॥२॥ चातकाचा जैसा नेम । पुर्न काम हरि हरि करी ॥३॥ एकविध आमुचा भाव । एका जनार्दनचि देव ॥४॥
४७१
उभयतां काकुलती येती । नाम्या नको करुं फजिती ॥१॥ आम्हां आलें वृध्दपण । कोण चालवी दुकान ॥२॥ व्यापाराचा नाहीं धाक । सुखें बैसशी तूं देख ॥३॥ अन्नवस्त्र नाहीं घरीं । एका जनार्दनीं निर्धारीं ॥४॥
४७२
उभयतां बैसोनि क्रोधें बोलती । कैशीं जाहलीं करणी एकमेक रडतीं ॥१॥ गोदोहन राहिलें दिवस आला दुपारी । धाउनी शेजारी येती पहाती नवलपरी ॥२॥ शस्त्रें घेउनियां ग्रंथीं बळे कपिती । कपितांचि शस्त्रें आन कापें कल्पांतीं ॥३॥ घेऊनियां अग्नि लाविताती दाढी वेणी । न जळेचि वन्ही ऐशी केली कृष्णें करणी ॥४॥ ऐसा समुदाव लक्षावधि मिळाला । बोल बोलती बोला भलतेंचि बरळा ॥५॥ धावूंनिया नंदनारायतें सांगती । एका जनार्दनीं नवल विपरित गती ॥६॥
४७३
उभयतांचे समाधान राजाईनें केलें । माझें तों घडलें उत्तम कार्य ॥१॥ मानसी तुम्ही नका करुं दु:ख । विठ्ठलाचें सुख मज जाहलें ॥२॥ एका जनार्दनीं राजाईची वाणी । ऐकतांच मनीं संतोषले ॥३॥
४७४
उभा कर ठेऊनी कटीं । अवलोकी दृष्टी पुंडलीकं ॥१॥ न्या मज तेथवरी । या वारकारी सांगातें ॥२॥ पाहीन डोळे भरुनी हरी । दुजी उरी ठेविना ॥३॥ मीपणाचा वोस ठाव । पाहतां गांव पंढरी ॥४॥ वारकारी महाद्वारी । कान धरुनी करीं नाचती ॥५॥ शरण एका जनार्दनीं । ते संत पावन पतीत ॥६॥
४७५
उभा चंद्रभागे तीरीं । कट धरुनियां करीं ॥१॥ रुप सावळें सुंदर । कानीं कुंडलें मकराकर ॥२॥ तुळसेमाळा शोभे कंठीं । अंगी चंदनाची उटी ॥३॥ भक्त आनंदें गर्जती । विठ्ठल विठठल उच्चरिती ॥४॥ एका जनार्दनी ध्यान । शोभे सगुण निर्गुण ॥५॥
४७६
उभा देव उभा देव । निरसी भेव भविकांचे ॥१॥ न लगे कांही खटाटेप । पेठ सोपी पंढरी ॥२॥ नको नको वेदपाठ । सोपी वाट पंढरी ॥३॥ शास्त्रांची तो भरोवरी । सांडी दुरी पंढरीचे ॥४॥ योगयाग तीर्थ तप । उघडती अमुप पंढरीये ॥५॥ एका जनार्दनीं स्वयं ब्रह्मा । नांदे निष्काम पंढरीये ॥६॥
४७७
उभा पुंडलिकांपुढें । कटीं कर ठेउनी रुपडें ॥१॥ पाहतां वेडावलें मन । शिवा लागलेंसे ध्यान ॥२॥ सनकादिक वेडावले । ते पुंडलिके भुलविले ॥३॥ भक्ता देखोनि भुलला । एका जनार्दनीं सांवळां ॥४॥
४७८
उभा भीमातीईं कट धरुनी करीं । वैकुंठीचा हई मौनरुप ॥१॥ ठेविनिया विटेसम पद दोन्हीं । उभा चक्रपाणी मौनरुपें ॥२॥ वैजयंती माळ किरीट कुंडलें । निढळ शोभलें केशरानें ॥३॥ कांसे पीतांबर दिसे सोनसळा । पदक आणि माळा कौस्तुभ ते ॥४॥ चरणींचा तोडर एका जनार्दन । करीत स्तवन भक्तिभावें ॥५॥
४७९
उभा विटेवरी । कट धरुनिया करीं । भीमा ती सामोरी । वहात आहे ॥१॥ जाऊं तया ठाया । आनंद तेणे काया । वैष्णवांचिया पायां ॥ लोटागंणी ॥२॥ कर्मोकर्म नाहीं वाद । भेदभ्रम नाहीं भेद । वैष्णवंचा छंद । नाम गाती आनंदे ॥३॥ सुख अनुपम्य अभेदें । एका जनार्दनीं छंदे । गातां नाचतां आल्हादें । प्रेम जोडे ॥४॥
४८०
उभा विटेवरी कट धरुनियां करीं । पीतांबर साजिरी बुंथी शोभे ॥१॥ विठोबा विठोबा नामाचा हा छंद । मन तें उद्धबोध जडी पायीं ॥२॥ त्री अक्षर नाम जप हा परम । तो मंगळधाम विठ्ठल माझा ॥३॥ एका जनार्दनीं विठ्ठल कानडा । देखिला उघडा विटेवरी ॥४॥
४८१
उभारुनी बाह्मा सकळां आश्वासन । या रे अठरा वर्ण पंढरीसी ॥१॥ दरुशनें एकामुक्ति जोडे फुका । साधनांचा धोका करुं नका ॥२॥ माया मोह आशा टाकुनि परती । चरणीं चित्तवृत्ति जडों द्यावी ॥३॥ एका जनार्दनीं सांगे लहान थोरां । पंढरीस बरा कृपाळु तो ॥४॥
४८२
उभारुनी ब्राह्मा पाहतसे वाट । पीतांबर नीट सांवरुनी ॥१॥ आलियासी इच्छा मिळतसे दान । जया जें कारण पाहिजे तें ॥२॥ भुक्ति मुक्ति तेथें लोळती अंगणीं । कोन तेथें मनीं वास नाहीं ॥३॥ कामधेनु कल्पतरु चिंतामणी । लोळती अंगणीं पढरीये ॥४॥ एका जनार्दनीं महा लाभ आहे । जो नित्य न्हाये चंद्रभागे ॥५॥
४८३
उलट पालट कासया खटपटी । नको तूं कपाटी रिघूं वायां ॥१॥ आसन मातृका साधन समाधी । वाउगी उपाधि तेणें होय ॥२॥ एका जनार्दनीं वाउगा सायास । नामचि सौरस पुरे काम ॥३॥
४८४
उलट भावना पालट मनाची । कायावाचा देहाची स्थिती एक ॥१॥ होणार तें होय देहाचें पतन । तेथें कोणा कमीपण येतें जातें ॥२॥ आणिलें जयाचें तें देणेंचि आहे । सोस वाउगा वाहे काय फळ ॥३॥ एका जनार्दनीं वाउगा पसारा । व्यर्थ हांवभर प्राणी जाहले ॥४॥
४८५
ऊंचा उंचपणा नीचा नीचपणा । तें नाहीं कारण विठ्ठलभेटी ॥१॥ उंच नीच याती असो भलते जाती । विठ्ठल म्हणतां मुक्ती जड जीवां ॥२॥ उभारुनि बाह्मा कटीं कर उभा । एका जनार्दनीं शोभा विटेवरी ॥३॥
४८६
एक आधार खोंचुनी स्वाधिष्ठाना येती मणिपुरी घेताती झटे । चंद्रसुर्य कला म्हणती बारा सोळा पवनासी करिती उफराटे । सतरावीचें क्षीर सेउनी शरीर कलीकाळवंचनीं ताठे । सबाह्म आत्माराम नेणुनी विश्राम व्यर्थचि करिती या चेष्टे ॥१॥ तें वर्मा चुकेलें रें तें वर्म चुकलें रे । जवळींच असतां रे तें वर्म चुकलें रे । जवळींच असतां अंतरीं न पाहे । ब्रह्माप्राप्ती केवीं होय ॥ध्रु०॥ मीमांसक मात्त कर्माचा आचार स्नानसंध्या यथायुक्ति । एक दोन तीन स्नानें झालीं तरी आगळी लाविती माती । द्वादश जपतां घरींची चिंता करिती नारायणस्मरण चिंत्तीं । स्वयें नारायण कीं तेथें आपण नेणती स्वरुपस्थिती ॥२॥ चारी वेद पुर्ण आचार होम क्रिया नित्य नेम आचरती । शिखासुत्र मंत्र त्रिकाळ क्रिया संध्यादि यथापद्धति । पुजा ब्रह्मायज्ञ उपवास पारणें मध्यामातें नातळती । आत्मज्ञानेवीण न तुटे बंधन कष्टचि पावत अंतीं ॥३॥ विष्णु उदरीं त्रिभुवन अवघें म्हणउनि वैष्णव झाले । तुळशीवृंदावनें हरीचें पुजन विष्णुपदीं मिरविलें । हरिहर भेद करिताती वाद जाणविनें नागविलें । आत्मज्ञानेविण न तुटे बंधन कणेविण उपणिलें ॥४॥ दैवत शिवापरतें नाहीं जंगम राहिलें नेहटी । शैव पाशुपत रुद्राक्ष विभुति आचार लिंगे कंठीं । पाषाण पुजुनी पवाडा करिती घालूनिया शस्त्रें पोटीं । आत्मज्ञानेविण न तुटे बंधन मरण पावती हटीं ॥५॥ दरवेश काजी सैद मुलांना पडताती नित्य किताब । करिती पंच वक्त निमाज गळा घालुन पोकळ जुभा । परमात्मा देहीं न पडेचि ठायीं पश्निमें मारिती बोंबा । आत्मज्ञानेंविन न तुटे बंधन अंतीं करिती तोबा तोबा ॥६॥ शक्तीचे उदरीं त्रिभुवन अवघे आवडी पूजिती शक्ति । अर्चन हवन पूजन कामना वाढवुनी फळें घेती । जारण मारण स्तंभन मोहन अभक्त लाविलें भक्ति । आत्मज्ञानेविण न तुटे बंधन चुकले तें निजमुक्तिः ॥७॥ बौध्यरुपालागीं क्षपाणिक जाहलें करिताती लुंचि कर्मे । वेद निरोधन मनीं निरोधन आचरती जैंन कर्मे । वस्त्रें फेडण्या नग्न फिरताती न चुकती मरण जन्मे । आत्मज्ञानेवीण न तुटे बंधन चुकली त्या गुरु वर्मे ॥८॥ भ्रष्टाचा आचार पालव माथां उफराटी काठी धरिती । पंचक्रोधी ध्यान पंथीचें स्मरण षटचक्रा उलटितीं । दर्शन खंडिती सज्जन निंदिती दृष्ट कर्में आचरती । अत्माज्ञानेवीण न तुटे बंधन व्यर्थ तनु विटंबि ॥९॥ ऐसा एक एका संवाद करितां अहंता ममताची पाही । नेणतां निपुण बुडाले संसारडोहीं । स्वकर्माचरणमतांचें विवरण परमात्मा न पडेचि ठायीं । एका जनार्दनीं अनुभवी तो जाणे सर्वेश्वर याच देहीं ॥१०॥
४८७
एक आहे मज आस । संत दासाचा मी दास ॥१॥ कै पुराती मनोरथ । संत सनाथ करतील ॥२॥ मनींचें साच होईल कोई । क्षेम मी देई संतांची ॥३॥ शरण एका जनार्दनीं । माझा मनीं नवस पुरे ॥४॥
४८८
एक एक मंत्र करिती अनुष्ठान । परि विठोबाचे चरण दुर्लभ ते ॥१॥ एक एक तीर्था करिती प्रदक्षिणा । परि विठोबाचे चरण दुर्लभ ते ॥२॥ एक एक ग्रामी करिती भ्रमण । परि विठोबाचे प्राप्ती दुर्लभ ते ॥३॥ एका जनार्दनीं सत्संगावांचुनीं । परि विठोबाची मिळणी दुर्लभ ते ॥४॥
४८९
एक एक मरती पहाती । दुजियासी भ्रांति कैशी बापा ॥१॥ अरे ग्रासिलें शरीर काळे देखा । परि तया मूर्खा न कळे कांहीं ॥२॥ एका जनार्दनीं भुलला प्रपंचा । कोण दुःखा त्याच्या सोडवील ॥३॥
४९०
एक एक म्हणती सकळ लोक । पाहतां एका एक हारपलें ॥१॥ एकाविण एक गणीत नाहीं देख । तें नित्य वोळख निजें आत्मीया रे ॥२॥ त्वंपद असिपद नाहीं । ठायींच्या ठायीं निवोनि पाही ॥३॥ सच्चिदानंद तिन्हीं नाम माया । सूक्ष्म कारण तेथें भुलुं नको वायां ॥४॥ अहं तें मीपण सोहं तें तूंपण । अहं सोहं सांडोनि पाहें निजकानन ॥५॥ एका जनार्दन सांडी एकपण । सहज चैतन्य तेथें नाहीं जन्ममरण ॥६॥
४९१
एक एक योनी कोटी कोटी फेरा । नरदेह थारा अवचटा ॥१॥ मांडिलासे खेळ मांडिलासे खेळ । मांडियेला खेळ नरदेहीं ॥२॥ स्त्री पुत्र नातु बाहुले असती । नाचवितो पती त्रैलोक्याचा ॥३॥ एका जनार्दनीं मांडियेला खेळ । त्रैलोक्य सकळ बाहुलें त्याचें ॥४॥
४९२
एक एकाच्या भावा । गुंतुनीं ठेलेंक अनुभवा ॥१॥ प्रेम न समाये गगनीं । धन्य धन्य चक्रपाणी ॥२॥ उद्धरी पतिता । मोक्ष देतो सायुज्यता ॥३॥ एका शरण जानार्दनीं । उदार हा जगदानी ॥४॥
४९३
एक कीर्तन करितां पंढरीसी । सुकृताच्या राशी ब्रह्मा नेणें ॥१॥ संतसमागम टाळ घोळ नाद । ऐकतां गोविंद सुख पावे ॥२॥ जनार्दनाचा एक करी विनवणी । मस्तक चरणीं ठेवितसे ॥३॥
४९४
एक तीन पांच मेळा पंचविसाचा । छत्तीस तत्वांचा मुळ हरि ॥१॥ कल्पना अविद्या तेणें झाला जीव । मायोपाधि शिव बोलिजे रवी ॥२॥ जीव शिव दोनी हरिरुपी तरंग । सिंधु तो अभंग नेणें हरि ॥३॥ शक्तिवरी रजत पाहतां डोळां दिसे । रज्जुवरीं भासे मिथ्या सर्प ॥४॥ क्षेत्रक्षेत्रज्ञाते जाणताती ज्ञानीं । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
४९५
एक ते एक एकासी कळेना । उगेचि कल्पना घेतीं वेडे ॥१॥ एकवांचुनी नाहीं एक सर्वां ठायीं । एकचि हृदयीं पुरें बापा ॥२॥ एकातें आवडी धरितां प्रेमें पोटीं । दुजा ठाव सृष्टीं कोठें असे ॥३॥ एका जनार्दनीं एकाची आवडी । एकपणें गोडी एक जाणें ॥४॥
४९६
एक दोन असे करिती विचार । एकाचें अंतर एका न कळें ॥१॥ दोन ऐसें एक सर्वा ठायीं वसे । योगियां न दिसे एक दोन ॥२॥ जयासाठीं सर्व करिती आटाआटी । एक दोन सृष्टी भरलेसे ॥३॥ एका जनार्दनीं एक दोन वेळां । जनार्दनीं कळातीत जाणें ॥४॥
४९७
एक दोन तीन पांचा वेगळा । आहे तो निराळा शिव एक ॥१॥ सात पांच बारा चौदा वेगळा । आहे तो निराळा शिव एक ॥२॥ भेदा अभेदा सोळांसी वेगळा । एका जनार्दनीं निराळा शिव एक ॥३॥
४९८
एक दोन तीन विचार करती । परि न कळे गति त्रिवर्गातें ॥१॥ त्रिरूप सर्व हा मायेचा पसार । त्रिवर्ग साचार भरलें जग ॥२॥ त्रिगुणात्मक देह त्रिगुण भार आहे । त्रिमुर्ती सर्व होय कार्यकर्ता ॥३॥ एका जनार्दनीं त्रिगुणांवेगळा । आहे तो निराळा विटेवरी ॥४॥
४९९
एक धरलिया भाव । आपणचि होय देव ॥१॥ नको आणीक सायास । जाय जिकडे देवभास ॥२॥ ध्यानीं मनीं शयनीं । देव पाहे जनीं वनीं ॥३॥ अवलोकी जिकडे । एका जनार्दना देव तिकडे ॥४॥
५००
एक धांवुनी सांगिती । अहो नंदराया म्हणती । पुत्रसुख प्राप्ति । मुख पहा चला ॥१॥ सर्वें घेऊनि ब्राह्माण । पहावया पुत्रवदन । धावूंनियां सर्वजण । पहावया येती ॥२॥ बाळ सुंदर राजीवनयन । सुहास्यवदन घनः श्यामवर्ण । पाहूनियां धालें मन । सकळिकांचे तटस्थ ॥३॥ पाहूनि परब्रह्मा सांवळा । वेधलें मान तमालनीळा । एका जनार्दनी पाहतां डोळा । वेधें वेधिलें सकळ ॥४॥
५०१
एक ध्याती एकामेंकीं । वेगळें अंतर नोहे देखा ॥१॥ ऐसी परस्परें आवडी । गुळ सांडुनी वेगळी नोहे गोडी ॥२॥ एकमेकांतें वर्णिती । एकमेकांतें वंदिती ॥३॥ एका जनार्दनीं साचार । सर्वभावें भुजा हरिहर ॥४॥
५०२
एक नरदेह नेणोनि वायां गेले । एक न ठके म्हणोनि उपेक्षिले । एक ते गिळले ज्ञान गर्वे ॥१॥ एक तें साधनीं ठकिले । एक ते करूं करुं म्हणतांचि गेले । करणें राहिलेंसे तैसें ॥२॥ यापरि अभिमान जगीं । ठकवितसे अंगसंगीं । नडी लागवेगीं जाणत्यासी ॥३॥ जें जें करी साधन । तेथें होय अभिमान । नागवी लावणें तेथें । सावधांवा करी कोण ॥४॥ ज्ञानें व्हावी ब्रह्मप्राप्ती । तें ज्ञान वेची विषयासक्तीं । भांडवल नाहीं हातीं । मा मुक्ति कैंची ॥५॥ स्वप्नींचे निजधनें जाग्रतीं नोहे धर्म । ब्रह्माहमस्मि हेंही समाधान । सोलीव भ्रम ॥६॥ अभिमानाचिया स्थिती । ब्रह्मादिकां पुनरावृत्ती । ऐसी वेदश्रुती । निश्चयो बोले ॥७॥ एका जनार्दनीं एकपण अनादी । अहं आत्मा तेथें समुळ उपाधी ॥८॥
५०३
एक नाम गाये । तेथें सदा सुख आहे ॥१॥ नाम गातांचि वदनीं । उभा असे चक्रपाणी ॥२॥ नामाचिया हाकें । उडी घाली कवतुकें ॥३॥ घात आघात निवारी । उभी राहे सदा द्वारी ॥४॥ एका जनार्दनीं नामासाठीं । धांवे भक्तांचिये पाठीं ॥५॥
५०४
एक नाम वाचे । सदा जपे श्रीरामचे ॥१॥ तेणें तुटेल बंधन । आन नाहीं पै साधन ॥२॥ नामा परतें साधन । नाहीं नाहीं उत्तम जाण ॥३॥ नाम जपे चंद्रमौळी । जपी तपी ते सकळीं ॥४॥ एका जनार्दनीं नाम । हेंची मोक्ष निजधाम ॥५॥
५०५
एक निष्ठा धरी बापा । मार्ग सांगतों हा सोपा ॥१॥ देहीं भाव धरी भोळा । पाहें विठ्ठल सांवळा ॥२॥ मन करितां चंचळ । देव न येचि जवळ ॥३॥ ऐसा कल्पनेचा संग । तिळभरी नको अंग ॥४॥ सच्चिदानंद निरंजन । शरण एका जनार्दन ॥५॥
५०६
एक पांच तीन नावांचे शेवटीं । अठरा हिंपुटीं जयासाठी ॥१॥ सात तेरा चौदा घोकितां श्रमले । पंचवीस शिणले परोपरी ॥२॥ तेहतिसां आटणी चाळिसां दाटणीं । एकुणपन्नसांची कहाणी काय तेथें ॥३॥ एकाजनार्दनीं एकपणें एक । बावन्नाचा तर्क न चालेचि ॥४॥
५०७
एक पांच सात मिळोनि खेळती विटिदांडु । डाव आलिया पळूणि जातां तया म्हणती गांडु ॥१॥ खेळों विटिदांडु खेळॊं विटिदांडु ॥धृ ॥ मुळींचा दांडुं हातीं धरुनि भावबळें खेळूं खेळा । भक्तिबळें टोला मारुं नभिऊं कळिकाळा ॥२॥ आपुली याची सांडोनि आस जावें गुरुसी शरण । काया वाचा मनें चरणींलोळे एका जनार्दन ॥३॥
५०८
एक पाठी एक पुढा । आहे मरणाचा हुडा ॥१॥ आज मेले उद्यां मरती । मागें राहाती तेही रडती ॥२॥ मरण जाणोनियां पाही । उगेच बोलती प्रवाहीं ॥३॥ ऐसी उगेच भुली पडली देखा । एका जनार्दनीं भुलले एका ॥४॥
५०९
एक बाळ ब्रह्माचारी । एक उदास निर्विकारी ॥१॥ एका शोभेंपाशुपत । एका सुदर्शन झळकत ॥२॥ एका करी पद्मगदा । एकपरशु वाहे सदा ॥३॥ ऐसे परस्परें ते दोघे । शोभताती ब्रह्मानंदें ॥४॥ एका जनार्दनीं ध्याऊं । तया चरणीं लीन होऊं ॥५॥
५१०
एक भाव दुजा न राहो मनीं । श्रीरंगावांचुनी दुजें नाहीं ॥१॥ मनासी ते छंद आदर आवड । नामामृत चाड गोविंदाची ॥२॥ एका जनार्दनीं नाम वाचे गाऊं । आणिक न ध्याऊं दुजें कांहीं ॥३॥
५११
एक मागें एक पुढें । उभें रोकडें असती ॥१॥ चला जाऊं तया ठाया । पाहुं सखया आवडी ॥२॥ एक एकाचें करुनि मीस । रहिवासले सावकाश ॥३॥ बहु युगें जाहलीं पाहतां । खालीं न बैसती उभयतां ॥४॥ आनंदीं आनंद मना होय । एका जनार्दनीं पाहुनीं धाय ॥५॥
५१२
एक माझी माता दोघेंजणे पिता । मज तीन कांता दोघे सुत ॥१॥ वेद जाणा बंधु दशक बहिणी । कन्या झाल्या तिन्हीं माझें पोटीं ॥२॥ बंधु बहिणींस लग्न तें लाविलें । विपरीत झालें सांगवेना ॥३॥ एका जनार्दनीं सांगतसे गूढ । नाहीं तरी गुढ होउनी राहे ॥४॥
५१३
एक म्हणती आत्मा सगूण । एक म्हणताती निर्गुण ॥१॥ एक प्रतिपादिती भेद । एक प्रतिपादितसे अभेद ॥२॥ एक म्हणती मिथ्या भूत । प्रत्यक्ष दिसत जो येथें ॥३॥ ऐसें नानाभेद वाद सकळ । विचारितां अज्ञान मूळ ॥४॥ अज्ञान तें मिथ्या जाणा । शरण एकाजनार्दना ॥५॥
५१४
एक विठ्ठल वदतां वाचे । आणिक साचें नावडती ॥१॥ बैसलासे ध्यानीं मनीं । विठ्ठलावांचुनीं दुजें नेणें ॥२॥ जावें तिकडे विठ्ठल भरला । रिता ठाव नाहीं उरला ॥३॥ एका जनार्दनीं भावें । विठ्ठल म्हणतां पाठी धांवें ॥४॥
५१५
एक विठ्ठलचिंतन । आणिक दुजें नेघे मन । ऐसें घडतां साधन । जोडे सर्व तयासी ॥१॥ हेचि एकविधा भक्ति । येणें जोडे सर्व मुक्ति । पर्वकळ विश्रांति । तेथें घेती सर्वदा ॥२॥ तीर्थ ओढवती माथा । वंदिताती सर्वथा । तपांच्या चळथा । घडताती आपेआप ॥३॥ घडतें यज्ञाचें पुण्य । आणिक तया नाहीं बंधन । शरण एका जनार्दन । निश्चय ऐसा जयाचा ॥४॥
५१६
एक वेळ गाय विठ्ठलाचें नाम । मोक्ष मुक्ति सकाम पुढे उभें ॥१॥ आवडीने घाली तया लोटागण । संताचें चरण वंदी माथां ॥२॥ पंढरेची वारी संतांचा सांगात । पुरती सर्व हेत निश्चयेंसी ॥३॥ एका जनार्दनीं धरुनि विश्वास । संतांचा दास होय आधी ॥४॥
५१७
एक वेळ वाचे वेद कां रे नाम । निरसे सर्व श्रम भवदूःख ॥१॥ नाम हे नौका नाम हे नौका । जगीं तारक देखा भाविकांसी ॥२॥ एका जनार्दनीं नाम हें अमृत । सेवितां त्वरित मुक्ति होय ॥३॥
५१८
एक शुद्ध ब्रह्मा ज्ञानाचें भांडार । एक तें अंतर मळीन सदा ॥१॥ दोघांमांजी वसे परमात्मा एक । परि बुद्धिचा तो देख पालटची ॥२॥ एका जानर्दनीं गुरुसी शरण । काया वाचा मन ठेवा पायीं ॥३॥
५१९
एकचि नाम उच्चारिलें । गणिकें नेलें निजपदीं ॥१॥ नाम घोकी कोली वाल्हा । दोष जाहला संहारा ॥२॥ नामें परीक्षिती उद्धरिला मुक्त जाहला सर्वांथीं ॥३॥ एका जनार्दनीं नाम । भवतारक निष्काम ॥४॥
५२०
एकचि नाम वाचे । श्रीरामाचें सर्वकाळ ॥१॥ पर्वत उल्लंघी पापाचे । नाम वाचे वदतांची ॥२॥ आवडी करितां कीर्तन । नासे भवाचें बंधन ॥३॥ श्रेष्ठ साधन कीर्तन । तेणें तोषें जनार्दन ॥४॥ एका जनार्दन कीर्तन । मना होय समाधान ॥५॥
५२१
एकचि माहेर नाथिली । हे तंव जाण भ्रांति बोली ॥१॥ विठ्ठल विठ्ठल रोकडा । विठ्ठल पाहे चहुंकडा ॥२॥ आपण आंत बाहेरी पाहे । विठ्ठल देखोनि उगाची राहे ॥३॥ एका जनार्दनीं शरण । विठ्ठल विठ्ठल परिपूर्ण ॥४॥
५२२
एकदां जारे तेथवरी । पहा पुंडलीक हरी ॥१॥ जन्मा आलीया विश्रांती । निरसेल अवधी भ्रांती ॥२॥ विठ्ठलपायीं ठेवा भाळ । जन्म मग तुमचा सुफळ ॥३॥ पुंडलीकां नमस्कार । विनवणी जोडीन कर ॥४॥ म्हणे एका जनार्दनीं । पंढरी पुण्याची अवनी ॥५॥
५२३
एकपण पाहतां सृष्टी । भरली दृष्टी विठ्ठल ॥१॥ नाहें द्वैताची भावना । बैसला ध्याना विठ्ठल ॥२॥ मीतुंपणा वोस ठाव । बैसला सर्व विठ्ठल ॥३॥ ध्यानीं विठ्ठल मनीं विठ्ठल । एका जनार्दनीं अवघा विठ्ठल ॥४॥
५२४
एकपणें एक पाहतां जग दिसें । योगियांसि पिंसे सदा ज्यांचे ॥१॥ आनंद अद्वय नित्य निरामय । परापश्यंति वेगळा होय पंढरीये ॥२॥ व्यापक विश्वभंर भरूनि उरला । तो प्रत्यक्ष संचला कीर्तन मेळीं ॥३॥ एका जनार्दनी त्रिगुणांवेगळा । पहा पहा डोळां विठ्ठल देव ॥४॥
५२५
एकपणें एकसा दिसे । उभा असे विटेवरी ॥१॥ नेणती यासाठीं लहान । होय आपण स्वइच्छें ॥२॥ जाणतांचि लागें चाड । न धरी भीड तयाची ॥३॥ एका जनार्दनीं शरण । भावमोचन तारक ॥४॥
५२६
एकपणेंदेव विटेवरी उभा ।चैतन्याचा गाभा पाडुरंग ॥१॥ मानस मोहन भक्तांचे जीवन । योगियांचे ध्यान पाडुरंग ॥२॥ अनाथा कोंवसा ध्यानीं नारायणा । सुखाची सांठवण पाडुरंग ॥३॥ एका जनार्दनीं आनंदाचा कंद । पाहतां आनंद पाडुरंग ॥४॥
५२७
एकपणेंविण प्रसवला । विदेही जन्मला श्रीराम ॥१॥ पूर्वी पितामहाचा पिता । तया प्रसन्न सुभानु होतां ॥२॥ यालागीं सुर्यवंशीं तंव पिता । जन्म जाला श्रीराम ॥३॥ एका जनार्दनीं श्रीराम । सर्वहरतील श्रमा ॥४॥
५२८
एकप्णें असें सर्वाठायीं वसे । योगी ज्या ध्यातसे हृदयकमळी ॥१॥ तें रूप साजिरें पाहतां गोजिरें । मन तेथें मुरे पाहतां पाहतां ॥२॥ खुंटली भावना तुटली वासना । साधनें तीं नाना हारपली. ॥३॥ संकल्प विकल्प मुळींच उडाला । एका जनार्दनीं धाला एकपणें ॥४॥
५२९
एकमेका गौळणी करिती विचार । चोरी करी कान्हा नंदाचा कुमर ॥१॥ नायके वो बाई करुं गत काई । धरू जातां पळुन जातो न सांपडेचि बाई ॥२॥ दहीं दूध लोणी चोरी करुनियां खाये । पाहूं जातां कवाड जैसे तैसे आहे ॥३॥ एका जनार्दनी न कळें लाघव तयाचें । न कळेची ब्रह्मादिकां वेडावले साचें ॥४॥
५३०
एकरुप मन जालेंसे दोघांचें । देव आणि भक्तांचे रुप एका ॥१॥ पुंडलिकाकारणें समुच्चय उभा । त्रैलोक्याची शोभा पांडुरंग ॥२॥ ध्याता चित्त निवे पाहतां ठसावें । एका जनार्दनीं सांठवें हृदयीं रुपे ॥३॥
५३१
एकविध भाव संतांच्या चरणीं । घेईन पायवाणी धणीवरी ॥१॥ आनंदें चरण धरीन आवडी । हीच माझी जोडी सर्व जाणा ॥२॥ उतराई तयांच्या नोहे उपकारा । धाडिती माहेरा निजाचिया ॥३॥ एका जनार्दनीं घडतां त्यांचा संग । जन्ममरण पांग तुटे मग ॥४॥
५३२
एकविध भावें हरी । वाचे उच्चारी सर्वदा ॥१॥ सर्व साधनांचे सार । विठ्ठलमंत्राचा उच्चार ॥२॥ असा सदा हेंचि ध्यान । विठ्ठलनामाचे चिंतन ॥३॥ एका जनार्दनीं जपा । विठ्ठलमंत्रसोपा ॥४॥
५३३
एकविध वाचे नामयासी छंद । पैं नोहे भेद आन कांहीं ॥१॥ संसारयातना दु:खाचें डोंगर । परि देवाचा विसर नाहीं मनीं ॥२॥ म्हणोनियां देव धांवे मागें मागें । सुख त्याचे संगें देवा होय ॥३॥ एका जनार्दनीं भक्त सुखासाठीं । हिंडे पाठोपाठीं देवराव ॥४॥
५३४
एका आरोहणा नंदी । एका गरुड वाहे स्कंधीं ॥१॥ एका नित्य वास स्मशानीं । एका क्षीरनिधी शयनीं ॥२॥ एका भस्मलेपन सर्वांग । एका चंदन उटी अव्यंग ॥३॥ एका रुंडमाळा कंठीं शोभती । एका रुळे वैजयंती ॥४॥ एका जनार्दनीं सारखे । पाहतां आन न दिसे पारखें ॥५॥
५३५
एका घरी चोरी लोणी । एक घरी वाहे पाणी ॥१॥ एका घरीं बांधिला राहे । एका घरी चिमणा होय ॥२॥ एका घरीं ब्रह्माचारी । एका घरीं भोगी नारी ॥३॥ एका घरीं सुखें नाचे । एका घरीं प्रेम त्याचें ॥४॥ ऐसा व्यापला दोहीं घरीं । एका जनार्दनीं श्रीहरीं ॥५॥
५३६
एका घरीं द्वारपाळ । एक घरीं होय बाळ ॥१॥ एका घरीं करी चोरी । एका घरें होय भिकारी ॥२॥ एका घरीं युद्ध करी । एका घरी पूजा बरी ॥३॥ एका घरीं खाय फळें । एका घरीं लोणी बळें ॥४॥ एका एकपणें एकला । एका जनार्दनीं प्रकाशला ॥५॥
५३७
एका जटा मस्तकी शोभती । एका कीरीट कुंडलें तळपती ॥१॥ एका अर्धांगी कमळा । एका विराजे हिमबाळा ॥२॥ एका गजचर्म आसन । एक हृदयींश्रीवत्सलांछन ॥३॥ एका जटा जुट गंगा । एका शोभें लक्ष्मी पैं गा ॥४॥ एका जनार्दनीं दोघे । तयां पदीं नमन माझें ॥५॥
५३८
एका देहामाजीं दोघे पैं वसती । एकासी बंधन एका मुक्त गति ॥१॥ पहा हो समर्थ करी तैसें होय । कोण त्यासी पाहे वक्र दृष्टी ॥२॥ पापपुण्य दोन्हीं भोगवी एक हातीं । ऐशी आहे गति अतर्क्य ते ॥३॥ एका जनार्दनीं जनीं जनार्दन । तयासी नमन सर्वभावें ॥४॥
५३९
एका नामावांचुन । अवघा शीण भ्रामक ॥१॥ कां रे हिंडसी सैरावैरा । तपाचिया गिरिकंदरा ॥२॥ बैससी घालुनि आसन । मना मुळीं वाउगें ध्यान ॥३॥ दाविसी तें अवघें सोंग । एका जनार्दनीं नाहीं रंग ॥४॥
५४०
एका नामासाठी । प्रगटतसे कोरडे काष्ठीं । भक्तवचनाची आवडी मोठीं । होय जगजेठी अंकित ॥१॥ एका घरीं उच्छिष्ट काढणें । एका द्वारी द्वारपाळपण करणें । एका घरीं गुरें राखणें । लोणी खाणें चोरुनी ॥२॥ एकाचि उगेचि धरुनि आस । उभा राहे युगें अठ्ठावीस । एका जनार्दनीं त्याचा दास । नामें आपुल्या अंकित ॥३॥
५४१
एका भावासाठीं । देव धांवे उठाउठी ॥१॥ पोहे सुदामदेवाचे । भक्षी आवडीनें साचे ॥२॥ खाऊनियां भाजी पान । दिधलें भोजन ऋषींसी ॥३॥ आवडीनें कण्या खाय । प्रेम न समाय अंतरीं ॥४॥ गौळियांचें उच्छिष्ट खाये । एका जनार्दनीं धाये ॥५॥
५४२
एका भावें कार्यसिद्धि । एका भावें तुटें उपाधी । एका भावें आधिव्याधी । जन्मजरा पाश तुटे ॥१॥ एक भावें करी भजन । एका भावें संतसेवन । एका भावें वेदवचन । पाळीतां तुटे भवपीडा ॥२॥ एका भावें योगयाग । एका भावें तप आष्टांग । एका भावें द्वैत तें सांग । तेथें द्वैत नको बापा ॥३॥ एका भावें रिघे शरण । एका भावें एक जनार्दन । एका भावें धरीं चरण । कायावाचामनेंशीं ॥४॥
५४३
एका वेलांटिची आढी । मुर्ख नेणती बापुडीं ॥१॥ हरिहर शब्द वदतां । यमदुतां पडतसे चिंता ॥२॥ कीर्तनीं नाचतां अभेद । उभयतांसी परमानंद ॥३॥ एका जनार्दनीं सुख संतोष । हरिहर म्हणतां देख ॥४॥
५४४
एका शोभे कौपीन । एका पीतांबर परिधान ॥१॥ एका कंठीं वैजयंती । एका रुद्राक्ष शोभती ॥२॥ एका उदास वृत्ति सदा । एका भक्तापांशीं तिष्ठे सदा ॥३॥ एका एका ध्यान करिती । एक एकातें चिंतिती ॥४॥ एका जनार्दनीं हरिहर । तया चरणीं मज थार ॥५॥
५४५
एका स्तुति एका निंदा । करितां अंगीं आदळे बाधा ॥१॥ अर्धांगी लक्ष्मी काय वंदावी । चरणीची गंगा निंदावी ॥२॥ भज्य करावें भजन भजनीं । निंदा स्तुति सांडोनी दोन्हीं ॥३॥ तेची भक्ति निजस्थिती । आवड चिंत्तीं भजनाची ॥४॥ वसावें सदा चरणीं मन । एका शरण जनार्दन ॥५॥
५४६
एकांती बैसणें शरीर रोधणें । अष्टांग साधनें श्रम नको ॥१॥ गुदातें अंगुष्ठ लावुनी बैसणें । शरीरीं रोधणें पंचप्राण ॥२॥ नको नको व्यर्थ जीवासी यातना । रामनाम स्मरणा करी सुखें ॥३॥ एका जनार्दनीं नको यातायाती । नामस्मरणें मुक्ति सत्वर जोडे ॥४॥
५४७
एकाएकीं एकला काशीवासा गेला । स्वलीला श्रीदत्त स्वयें प्रगटला ॥१॥ दत्त देव आला दत्त देव आला । स्वभाव सांडोनी भेटावया चला ॥२॥ मुक्त मंडपामाझारीं निजनाम नगरी । दत्त प्रगटला कीर्तनामाझारीं ॥३॥ भेटणें भेटीं उठी दत्ता आली भेटी । सांगणें ऐकणें दत्त होऊनि उठी ॥४॥ कीर्तनी आतौता नाम श्रीदत्त दत्ता । निजकीर्ति ऐकोनि डोळे तत्त्वतां ॥५॥ जळा सबाह्म आंतरी मनकर्णिका तीरीं । दत्त स्नान करी आत्ममुद्रेवरी ॥६॥ दत्त जंगमीं स्थावरी विश्वी विश्व धरी । तोचि दत्त घरोघरीं नित्य भिक्षा करी ॥७॥ एका जनार्दनीं दत्तवचनें देख । प्रपंच परमार्थ मीच चालवी एक ॥८॥
५४८
एकाचि दिठी एकाचे डोळे । एक चाले कैसें एकाचिये खोळे ॥१॥ सबाह्म अभ्यंतरीं सारिखा चांग । दोघे मिळोनियां एकचि अंग ॥२॥ यापरि रिगाले अभिन्न अंगीं । दोघे सामावाले अंगीच्या अंगीं ॥३॥ ऐसें लेकीनें बापासी बांधलें कांकण । एका जनार्दनीं केलें पाणिग्रहण ॥४॥
५४९
एकाचिया चाडें । उगवी बहुतांचीं कोडें ॥१॥ म्हणोनि उभा विटेवरी । पाउले समचि साजिरीं ॥२॥ एकासाठीं गर्भवास । एकाद्वारीं रहिवास ॥३॥ एका घरीं उच्छिष्ट काढी । एकाची रणीं धुत घोडीं ॥४॥ एका द्वारीं भिकारी होय । एका घरीं भाजी खाय ॥५॥ एका एकपणें हरी । एका जनार्दनीं दास्य करी ॥६॥
५५०
एकाचिया द्वारी भीकचि मागणें उभेचि राहाणे एका द्वारी ॥१॥ एकाचिया घरी उच्छिष्ट काढणें । लोणी जें चोरणें एका घरीं ॥२॥ एकाचिये घरीं न खाये पक्कान्न । खाय भाजी पान एका घरीं ॥३॥ एकाचिये घरीं व्यापुनी राहाणें । एकासी तो देणें भुक्तीमुक्ती ॥४॥ एका जनार्दनी सर्वाठायीं असे । तो पंढरीये वसे विटेवरी ॥५॥
५५१
एकाची काजें फीटलें सांकडें । उगाविलें कोंडे बहुतांची ॥१॥ तोचि हरी उभा चंद्रभागें तटीं । कर ठेउनी कटीं अवलोकित ॥२॥ पडतां संकआट धांवतसे मागें । गोपाळांचिया संगें काला करी ॥३॥ चोरुनी शिदोरी खाय वनमाळी । प्रेमाचे कल्लोळीं आनंदाचेम ॥४॥ यज्ञ अवदानीं करी वांकडें तोंड । लोणी चोरितां भांड गौळणी म्हणती ॥५॥ एका जनार्दनीं ठेवणें संतांचे । उभें तेंसांचें विटेवरी ॥६॥
५५२
एकाची स्तुती एकाची निंदा । करितां अंगीं आदळे बाधा ॥१॥ अर्धांगीं लक्ष्मी वंदावी । चरणीं गंगा ती काय निंदावी ॥२॥ ऐसा नाहीं जया विचार । भक्ति नोहे अनाचार ॥३॥ एका जनार्दनीं शरण । एकपणे जनार्दन ॥४॥
५५३
एकाचे अंगणीं राहिला परिवारें । उदर तो न भरे दु:ख करी ॥१॥ कांता पुत्र स्वयें क्षुधेनें मरती । होतसे फ़जिती प्रपंचाची ॥२॥ बैसोनियां कांता विचार सांगे । द्वारके लागवेगें जावें तुम्हीं ॥३॥ कृष्णाजी कृपाळु बंधु तुम्हां मानी । एका जनार्दनीं कांता बोले ॥४॥
५५४
एकाच्या कैवारें । कली मारिले सर्व धुरे । तयांसे ते बरे । आपणापाशीं ठेवी ॥१॥ ऐसा कृपावंत स्नेहाळ । भरलें कीर्ति भूमंडळ तया स्मरे हळाहळ । निशीदिनीं ॥२॥ भक्ति भावचेनि प्रेमें द्वारपाळ जाहला समें । अद्यापि तिष्ठे नेमें । वचन तें नुल्लुमीं ॥३॥ अंकितपणे तिष्ठत उभा । एका जनार्दनीं धन्य शोभा । पुडंलिकाच्या लोभा । युगें अठ्ठावीस ॥४॥
५५५
एकासी शुद्ध एकासी अशुद्ध । बोलतां अबद्ध नरक जोडे ॥१॥ शुद्ध अशुद्ध हें विठोबाचें नाम । जपतां घडे सकाम मोक्ष मुक्ति ॥२॥ सकाम निष्काम देवाचेंक भजन । तेणें चुके पतन इहलोकीं ॥३॥ एका जनार्दनीं शुद्ध आणि अशुद्ध । टाकूनियां भेद भजन करी ॥४॥
५५६
एकी पुढें एक सांगतीं गार्‍हणीं । लिहितां पृथ्वीं न पुरेचि धूणी ॥१॥ म्हणे यशोदा कृष्णा काय हें कैसें । खोडी नको करुं हरि बोलतसे ॥२॥ मज नेती गृहांत दहा पांच मिळती । नग्न होऊनियां मज पुढें नाचती ॥३॥ म्हणती रे पोरा तु दिससी साना । हृदयी धरुनी करी देती स्तना ॥४॥ ऐसे यांचे तुज सांगु म्हनतां माते । एका जनार्दनी नवल वाटे तुंते ॥५॥
५५७
एकीबेकी पोरा सांग झडकरी । एकी जिंकीशी बेको म्हणतां हरी ॥धृ ॥ नव्हें काई बाई तेथें झालें एक शुन्य । त्यासी फाटां फुटतां मग लेखा आलें जाण ॥ एकी ॥१॥ एक दोनी तीन पांच विस्तारिला जाण । दहापासुनी सहस्त्रवरी एक झाली पुर्ण । एकी ॥२॥ एक ब्रह्मा पुर्ण तेथें फाट झाली माया । एका जनार्दनी नित्य लक्ष लावीं पायां ॥ एकी ॥ ३॥
५५८
एके दिनी नवल जालें । ऐकवें भावें वहिलें ॥१॥ घरीं असतां श्रीकृष्ण । योगीयाचें निजध्यान ॥२॥ नंद पूजेसी बैसला । देव जवळी बोलाविला ॥३॥ शाळीग्राम देखोनि । मुखांत घाली चक्रापाणी ॥४॥ नंद पाहे भोवतालें । एका जनार्दनी बोले ॥५॥
५५९
एके दिनीं प्रातः काळीं । कृष्णें घेतलीसे आळी । देखोनियां उदय मेळीं । सुर्यबिंब ॥१॥ देई देई मज तें आई । रडत बैसला हो बाई । काय सांगो हो सई । या बाळातें ॥२॥ मांडिलें विंदान । न कळे कोना महिमान । रडतां राहिना पुर्ण । तों देखे राधिका ॥३॥ राधा म्हणे कृष्णांसी । का रे चोरा रडतोसी । येरु म्हणे गोळा दे मजसी । मग मी न रडे ॥४॥ उचलोनी काखेसी घेतला । तंव तो रडतां राहिला । यशोदा म्हणे राधिकेला । नेई घरा कृष्णतें ॥५॥ घेऊनियां झडकरीं । घरी आली सत्वरीं । सुमनांचे सेजेवरी । पहुडविलें कृष्णा ॥६॥ घरी देखोनी एकांत । चुबन देउनि बोले माते । अससी धाकुटी बहुत । नचले कांहीं ॥७॥ तंव बोले वनमाळी । थोर होतो हेचि वेळी । डोळें झांकीं तूं वेल्हांळीं दावी विंदान ॥८॥ नेत्र झाकितां तें क्षणीं । जाहला निमासुर तरुणी । षोडश वर्षी मोक्षदानी । देखे राधिका ॥९॥ धांउनी घातालीसे मिठी । हरुष न समाये पोटीं । शयन सुखें गोष्टीं । करी कृष्णांसी ॥१०॥ असतां सुखें एकांतासी । भ्रतार आला ते समयासी । उभा राहुनि द्वारासी । हांक मारी ॥११॥ ऐकतां भ्रतारांचें वचन । घाबरलें राधिकेचें मन । धरी कृष्नाचे चरण । सान होई ॥१२॥ कृष्ण बोले हास्यमुखे । मंत्र विसरलों या सुखें । आतां होणार तें सुखें । होवो यावरी ॥१३॥ भक्तांचे मानसींचा चोर । पाहूनियां तो विचार । पुर्ववत साचार होऊनि रडे ॥१४॥ दहीं भात कालवुनी । ठेविला पुढें आणुनी । बोले आनयासी प्रती वचनीं । क्षणभरी बैसा ॥१५॥ जेवितसे कृष्णनाथ । क्षणभरी बैसा स्वस्थ । ऐकतांचि ऐशीअ मात । निवांत बैसे ॥१६॥ मग द्वार उघडिविलें । राया कृष्णातें देखिलें । मन तें मोहिलें । अनायांचें ॥१७॥ आनया बोले राधिकेसी । गृहीं नगमें तुजसी । क्षणभरी कृष्णासी । आणीत जाई ॥१८॥ तुमची आज्ञा प्रणाम । म्हणोनि वंदिले चरण । एका जनार्दनी समाधान । पावले दोघे ॥१९॥
५६०
एके दिवशी शारंगपाणी । खेळत असतां राजभुवनीं । तेव्हा देखिली नयनीं । गौळणी ते राधिका ॥१॥ मीस करुनी पाणीयाचें । राधा आली तेथें साचें । मुख पहावया कृष्णाचे । आवड मोठी ॥२॥ देव उचलोनि घेतला । चुंबन देउनि आलंगिला । सुख संतोष जाहला । राधेलागीं ॥३॥ यशोदा म्हणे राधिकेसी । क्षणभरी नेई गे कृष्णासी । कडे घेउनी वेगेंशीं आणिला घरा ॥४॥ हृदयमंचकीं बैसविला । एकांत समय देखिला । हळूच म्हणे कृष्णाला । लहान असशी ॥५॥ कृष्णा म्हणे राधिकेसी । मंत्र आहे मजपाशी । थोर होतो निश्चयेंसी । पाहें पा आतां ॥६॥ वैकुंठाचा मन मोहन । सर्व जगांचे जीवन । एका जनार्दनीं विंदान । लाघव दावीं ॥७॥
५६१
ऐक एक सखये बाई नवल;अ मी सांगुं काई । त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेसी म्हणतो आई ॥१॥ देवकीने वाईला यशोदेनें पाळिला । पांडवाचा बंदिजन होऊनियं राहिला ॥२॥ ब्रह्माडाची साठवन योगीयाचें निजधन । चोरी केली म्हणऊनी उखळासी बंधन ॥३॥ सकळ तीर्थें जया चरणीं सुलभ हा शूलपाणी । राधिकेसी म्हणे तुझी करीन वेणीफणी ॥४॥ शरण एका जनार्दनीं कैवल्याचा मोक्षदानीं । गाई गोप गोपीबाळां मेळवीले आपुलेपणीं ॥५॥
५६२
ऐकतां तो नाद मोहिलेसे मन । न कळे विंदान तिहीं लोकां ॥१॥ सावध हो उनी गडी ते पहाती । स्थिर पई होती यमुना ते ॥२॥ एकाजनार्दनीं ऐसा दासाचा कळवळा । म्हणोनि भक्तलळा पाळितसे ॥३॥
५६३
ऐकतां वचन कान्हया म्हणती गडी । काय खेळायाची आतां न धरुं गोडी ॥१॥ लावियेला चाळा त्वा जगजेठी । आतां आम्हां सांगसी तुं ऐशा गोष्टी ॥२॥ एका जनार्दनीं कान्होबा खेळ पुरे आतां । मांडु रे काला आवडी आनंता ॥३॥
५६४
ऐका ऐका वचन माझें । तुम्हीं वदा विठ्ठलवाचें ॥१॥ नामापरतें साधन नाहीं । वेदशास्त्रें देती ग्वाहीं॥२॥ चार वेद सहा शास्त्र । अवघ नामाचा पसर ॥३॥ अठरा पुराणांचे पोटी । नामेंविण नाहीं गोष्टी ॥४॥ नामें तारिलें पातकी । मुक्त झालें इहलोंकी ॥५॥ अजामेळ तारिला । वाल्हा कोळी ऋषी केला ॥६॥ गणिका नेली निजपदा । रमनाम वादे एकदां ॥७॥ ऐसीं नामजी ती थोरी । पुतना तारिली निर्धरीं ॥८॥ आवडीनें नाम गाय । एका जनार्दनीं वंदी पाय ॥९॥
५६५
ऐका नामाचें महिमान । नाम पावन तें जाण ॥१॥ हास्य विनोंदें घेतां नाम । तरती जन ते अधम ॥२॥ एका जनार्दनीं धरीं विश्वास । नामें नासती दोष कळिकाळाचे ॥३॥
५६६
ऐका नामाचें महिमान । नामें पातकी पावन । तरले ते अधम जन । कलयुगामाझारीं ॥१॥ धन्य धन्य राम पावन । सर्व साधनांचें साधन । मोक्ष नामचि पूर्ण । स्मरतांचि जोडे ॥२॥ न लगे आन विधि मुद्रा । न लगे तपांचा डोंगरां । कासया हिंडताती सैरा । नाम जपा सादर ॥३॥ भोळ्या भाविकां हें वर्म । दृढ जपावें हो नाम । एका जनार्दनीं धाम । पावे वैकुंठीचें ॥४॥
५६७
ऐका रे उद्धवा तुज सांगतों गुज । संतचरणरज वंदीं तु सहज । तेणें कार्य कारण होईल तुज । अंतरदृष्टी करुनी परीस निज ॥१॥ घाली लोटांगण वंदी चरण । कायावाचामनें धरुनी जीवीं ॥धृ०॥ आलीया संतजन आलिंगन देई । पुजा ती बरवी समर्पावी । ज्ञान ध्यान त्याचें करावें जीवीं । हेतु सर्व भावी मनीं धरी उद्धवा ॥२॥ कायिक वाचिक मानसिक भाव । अपीं तेथें जीव देहभाव । एक जनार्दनीं तयांचें वैभव । सांगितलें तुज उद्धवा ॥३॥
५६८
ऐका संतसज्जन । निजहित कुशल पूर्ण । करुनी सर्वांगाचे कान । शब्दार्थ जाणावा ॥१॥ जीवामाजीं घालुनी जीव । परिसतां हे अर्थगौरव । तैं सिद्धि पावे कार्य सर्व । भव विभव निवारे ॥२॥ असो आतां जानकीसी । मंदोदरी अति प्रीतीसी । पुसती झाली वेगेंसी । रामानुभव तो कैसा ॥३॥ सांगे एका जनार्दनीं । चित्त करा समाधान । अनुभवाचें लक्षण । सावधान ऐकावें ॥४॥
५६९
ऐके उद्धवा प्रेमळा । सांगतों जीवाचा जिव्हाळा । तुं भक्तराज निर्मळा । सुचित्तें ऐके ॥१॥ मी बैसोनी आसनीं । पुजा करितों निशिदिनीं । तें पूय मुर्ति तुजलागुनी । नाहीं ठाउको उद्भवा ॥२॥ जयाचोनि मातें थोरपण । वैकुंठादि हें भुषण । तयाचे पूजेचें महिमान । एक शिव जाणे ॥३॥ येरा न कळेचि कांहीं । वाउगे पडती प्रवाहीं । उद्धवा तुं पुसिलें पाही । म्हणोनि तुज सांगतों ॥४॥ माझे जें अराध्य दैवत । तें कोण म्हणसी सत्य । भक्त माझे जीवेचे हेत । जाणती ते ॥५॥ तयांविण मज आवड । नाहीं कोणता पोवाड । माझा भक्त मज वरपड । काया वाचा मनेंसी ॥६॥ माझें विश्रांतीचें स्थान । माझे भक्त सुखनिधान । काया वाचा मन । मी विकिलो तयांसी ॥७॥ ते हे भक्त परियेसीं । उद्धवा सांगें हृषीकेशी । एका जनार्दनीं सर्वासी । तेंचि वदतसे ॥८॥
५७०
ऐके ऐके बाई यशोदे । नवल केलें तुझ्या गोविंदे । आमुची मुलें तुडविली पदें । आतां यासी बांधीना ॥१॥ आवरीं आवरीं आपुला कान्हां । नाशियल्या आमुच्या सुना । अझुनि नये तुझ्या मना ॥ तुझा तुला गोड वाटे कान्हा ॥२॥ येतो आमुचे घरासी । धमकावितो लेकीसुनासी । कोठें लोणी सांग आम्हांसी । न सांगतां वासुरें सोडी बिदीसी ॥३॥ आपण खातो दहीं दुध लोणीं । हात पुसतो सुनेच्या मुखालागुनीं । एका जनर्दनी करी करणी । जातो पळोनि तेथोनी ॥४॥
५७१
ऐके गा हृषीकेशी । जाणोनि तुं विश्वासी । निजगुह्मा तुजपाशी । ठेवणें दिधलें ॥१॥ आम्हां चाळवोनि विषयासी । थितें बुडवूं पाहासी । क्रियानष्ट होसी तूंचि येक ॥२॥ आमुचें आम्हां देता । तुज कां नये चित्ता । लाजसी तत्त्वतां । भक्ति घेसी ॥३॥ नेतां पंचापाशी । भले नव्हें हृषीकेशीं । मजसी समान होसी । एका जनार्दनीं ॥४॥
५७२
ऐके देवा सावधान । एवढे पुरवावें जाण । दुधावांचुनी दुसरें आन । न मागे मी सर्वथा ॥१॥ मातापिता उपमन्यु । तिघे गरुडावर बैसून । क्षीरसागरीं नेऊन । इच्छा त्यांची पुरविली ॥२॥ राज्य दिधलें क्षीरसागरीचें । अमर शरीर केलें त्यांचे । नित्य दर्शन श्रीहरीचें । सायुज्यता दिधली ॥३॥ एका जनार्दनीं शरण । उपमन्यु आख्यान पावन । श्रीव्यासें कथिले जाण । तेंचि येथें वर्णिलें ॥४॥
५७३
ऐकोनि संतकीर्ति । मना जालीसे विश्रांती । नाहीं पुनरावृत्ती । जन्माची तया ॥१॥ धन्य धन्य संतजन । मज केलें वो पावन । विश्रांतीचें स्थान । हृदयीं माझ्या ठसविलें ॥२॥ बहु जाचलों संसारें । बहु जन्म केले फेरे । ते चुकविले सारे । आजी कृपा करुनी ॥३॥ शरण एका जनार्दनीं । माझें हरिलें मीपण । तुम्हीं कृपा करुन । अभय वर दिधला ॥४॥
५७४
ऐकोनियां कांतेचें वचन । चित्तसमाधान सुदाम्याचें ॥१॥ म्हणतसे भेटी रिक्तहस्तें नवजावें । हा शास्त्राचा प्रवाहो भाष्य असे ॥२॥ देव द्विज गुरु या तिघांचें दरुशन । रिक्तपणें जाण न घ्यावें जी ॥३॥ एका जनार्दनीं करुनी विचार । भेटीचा निर्धार बाणलासे ॥४॥
५७५
ऐकोनियां देव नाम्यासी बोलत । बाजार करुनि त्वरित येई वेगीं ॥१॥ तुज पाहिल्यावांचून मज नोहे समाधान । नाम्या तुझी आण वाहातसे ॥२॥ लौकरी नामया यावें परतोनी । ऐसें चक्रपाणी बोलतसे ॥३॥ एका जनार्दनीं ऐसें बोलोनि सर्वथा । नामा तो तत्त्वतां घरीं आला ॥४॥
५७६
ऐकोनी कीर्ति उदार संत । आला धांवत शरण ॥१॥ सांभाळावे सांभाळावें । सांभाळावें अनाथा ॥२॥ धरुनियां हाती हात । ठेवा मस्तकीं निवांत ॥३॥ एका जनार्दनीं एकपण । एका भावें आलों शरण ॥४॥
५७७
ऐकोनी कृष्णाचें बोलणे । उद्धव संतोषला तेणें । म्हणें कृपा करुनी मज दाखवणें । भक्तांचे मंदिर ॥१॥ मग धरुनी उद्धवाच्या हात । स्वयें दावी श्रीकृष्णानाथ । आणिकांसी नोहे तें प्राप्त । हरिभक्ताविण ॥२॥ देवें देवघर उघडिलें । सन्मुख उद्धवा बैसविलें । देव सांगतसे वहिलें । तया उद्धवाप्रति ॥३॥ एका जनार्दनीं प्रेम । भक्तांचें ऐकतां नाम । प्राणी होती निष्काम । अहर्निशीं जपतां ॥४॥
५७८
ऐकोनी दुधाची बोली । का मनीं निष्ठुरता केली । श्रियाळ सत्वें राखिली । नगरी नेली वैकुंठा ॥१॥ अंबऋषीच्या बोला । दाहीही अवतार नटला । माझे देखोनि उणिवाला । दूध कांहे न देसी ॥२॥ शरीर कर्वतीं भेदीन । अष्टांग योग साधीन । भक्तिबळे तुज काढीन । हुडकोनी तत्वतां ॥३॥ ऐकोनी तो शब्द करुणा । एका जनार्दनीं धांवे जाणा । माझिया भक्ताचिया वचना । उणिवता येऊं नेदी ॥४॥
५७९
ऐकोनी सीतेच्या उत्तरीं । पुर्णावस्था मंदोदरी । चढली स्वेदकंप शरीरी । आनंदलहरी दाटली ॥१॥ इंद्रिय विकळता जाली । चित्त चैतन्य मिठी पडली । अंतरी सुखोर्मी दाटई । तेणेंपडली मुर्छित ॥२॥ बाप सदगुरुचें सामर्थ्य । अलोकिक अति अदभुत । वचनमात्रें शक्तिपात । जाला निश्चित मंदोदरी ॥३॥ नाहीं हस्त मस्तक । कृपा कवळोनी देख । वचनामात्रें दिधलें सुख । एका जनार्दनीं सरेना ॥४॥
५८०
ऐक्य तें जालिया मीतूंपण नाहीं । गौरव हा कांहीं नाहीं नामीं ॥१॥ नाहीं चतुर्दल तुर्याही उन्मनीं । स्वयंभ ती खाणी उभी उसे ॥२॥ चित्त जडलिया तेथें काय उणें । लज्जित साधनें होतीं देखा ॥३॥ एका जनार्दनीं नाहीं मीतूंपण । व्यापक तें जाण सर्वांठायीं ॥४॥
५८१
ऐवजानिमित्त धोंड्यासी आणिलें । कोंडोनी घातिलें घरामाजीं ॥१॥ ऐकतांचि दामा क्रोधयुक्त जाहला । पुसे गोणाईला नाम्या कोठें ॥२॥ बैसला जाउनी काळ्याचे शेजारीं । फ़जिती ती थोरी मांडिली तेणें ॥३॥ एका जनार्दनीं ऐकोनियां मात । दामा आला धांवत राउळासी ॥४॥
५८२
ऐशी आवडी मीनली सुखा । देव उभा भक्तद्वारीं देखा ॥१॥ धन्य धन्य पुंडलीका । उभे केलें वैकुंठनायका ॥२॥ युगें अठ्ठावीस नीत । उभा विते कर धारुनियां कट ॥३॥ एका जनार्दनीं शरण जाऊं । काया वाचा मनें त्यासी ध्याऊं ॥४॥
५८३
ऐशी प्रपंचाची गोडी । जन्ममरण घेती कोडी ॥१॥ नाहीं तया कांहीं धाक । जन्ममरणाचा देख ॥२॥ आलिया देहासी । नाठविती हृदयस्थासी ॥३॥ जरा आलिया निकटी । करी प्रपंचाची राहटी ॥४॥ एका जनार्दनीं शरण । नायकती मूर्ख जन ॥५॥
५८४
ऐशी शांती जयासी देखा । तोचि सर्व भुतांचा सखा ॥१॥ सर्व लोकीं आवडता । जाला सरता कीर्तनीं ॥२॥ सर्व लोकीं आवडता । जाला ठायीं देखें देवो ॥३॥ सर्व दृष्टीचा देखणा । शरण एका जनार्दना ॥४॥
५८५
ऐशीं निर्धारें विरहिण करी । परेपरता देखेन श्रीहरी । मन पवन साधन न करीं । संतसंग घडलिया धन्य संसारीं ॥१॥ धन्य धन्य संतमहिमा । विरह गेला पावलें सुखधामा ॥धृ॥ नामविरहित विरह तो कोण । विषय विरह थुंकीन मी जाण । नामांवांचुनी नेणें साधन । तो विरह न व्हावा पुर्ण ॥२॥ एका जनार्दनी सत्य वचन । विरहविरह गेला मुळीहून । नाम जपतां स्थिर झालें मन । विरह गेला त्यागुना ॥३॥
५८६
ऐशीं शांती ज्यासी आहे । त्याचे घरीं देव राहे ॥१॥ हा अनुभव मनीं । पहा प्रत्यक्ष पुराणीं ॥२॥ धर्माघरीं वसे । अर्जुनाचे रथीं बैसे ॥३॥ अंकित दासाचा होय । एका जनार्दनीं देव ॥४॥
५८७
ऐसा ज्याचा एक भाव । तेथें नाहीं द्वैता ठाव ॥१॥ द्वैत अद्वैत हारपलें । अवघें एकरुप जाहलें ॥२॥ संकल्प विकल्प विराला । अवघा देहीं देव जाहला ॥३॥ एका जनार्दनीं ठाव । स्वयमेव भरला देव ॥४॥
५८८
ऐसा रोगाचा पवाडु । परमार्थ गोड तो जाहला कडु ॥१॥ कामक्रोधाचा उफाडा । शांति क्षमेचा दिला काढा ॥२॥ देतां नाममात्रा रसायन । प्रपंच रोग जाहला क्षीण ॥३॥ निधडा वैद्य जनार्दन । एका जनार्दन शरण ॥४॥
५८९
ऐसा समुदाव चंद्रभागे तीरीं । तेव्हां आपुले घरीं चोखा होता ॥१॥ एकादशी व्रत करती दोघेजण । उपवास जाग्रण निशीमाजीं ॥२॥ तीन प्रहर जाहले उपवास जाग्रण । चोखामेळा म्हणे स्त्रीसी तेव्हां ॥३॥ तुझिया घरासी येऊं पारण्यासी । सांगून मजसी गेला देव ॥४॥ एका जनार्दनीं चोखा करी करुणा । तेव्हां नारायणा जाणवलें ॥५॥
५९०
ऐसी कीर्तनाची आवडी । प्रायश्चित्तें जाली देशधडी ॥१॥ होती तीर्थें तीं बापुडीं । मळ रोकडी टाकिती ॥२॥ ऐकोनी कीर्तनाचा गजर । ठेला यमलोकीचा व्यापार ॥३॥ यमपाश टाकिती खालीं । देखोनि कीर्तनाची चालीं ॥४॥ ऐसा कीर्तनसोहळा । एका जनार्दनीं देखे डोळीं ॥५॥
५९१
ऐसी जगाची माऊली । दत्तनामें व्यापुनि ठेली ॥१॥ जीवें जिकडें तिकडे दत्त । ऐशी जया मति होत ॥२॥ तया सांकडेंचि नाहीं । दत्त उभा सर्वा ठायीं ॥३॥ घात अघात निवारी । भक्तां बाहे धरी करीं ॥४॥ ऐशीं कृपाळु माऊली । एका जनार्दनीं देखिली ॥५॥
५९२
ऐसी मी मी करतां । अज्ञानाची अहंता । तेव्हा तैसी ईश्वरसत्ता । वर्तू लागे ॥१॥ सज्ञान अज्ञान । दोघे अदृष्टाधीन । साधुत्व वर्ते सज्ञान । अज्ञानीं अहंकर्ता ॥२॥ अद्रुष्टाधीन देह । त्यांत ज्ञान मुरुनी जाय । मग द्रष्टा होउनी पाहे । जग ब्रह्मारूप ॥३॥ तेथें निंदा आणि स्तवन । हारपले दोष गुण । ऐसें एका जनार्दन सांगतसे ॥४॥
५९३
ऐसी वाढलिया सद्वासना । तेथें जिराली मनाची कल्पना । इंद्रियें विषय प्राणा । बोध जाला ॥१॥ लिंग विष्णु स्वप्न कंठस्नान । काल्पनिक भोग जाण । वाचा मध्यमा ऐसी खूण । मिळोनि ठेली त्या पदा ॥२॥ तेथें इंद्रिया ऊर्वसी । आलीया सेजेसी । जयाचिया मानसीं । कामा नुठी ॥३॥ एका जनार्दनीं बोध । अवघा झाला ब्रह्मानंद । लिंग देहाचा खेद । वस्तु जाला ॥४॥
५९४
ऐसीं प्राप्ति कै लाहीन । संतसंगती राहीन । त्यांचे संगती मी ध्याईन । नाम गाईन अहर्निशीं ॥१॥ भावें धरलिया संतसंग । सकळ संगा होय भंग । अभयसितां आगळे योग । पळे भवरोग आपभयें ॥२॥ सेविलिया संतचरणतीर्था । तीर्थ पायवणी वोढविती माथां । सुरनर असुर वंदिती तत्त्वतां । ब्रह्मा सायुज्यता घर रिघे ॥३॥ संतचरणरज मस्तकी पडे । देह संदेह समुळ उडे । उघडिलीं मुक्तीची कवाडें । कोदाटें पुढें परब्रह्मा ॥४॥ दृढ धरलिया सत्संगती । अलभ्य लाभ आतुडे हातीं । चारी पुरुषार्थ चारी मुक्ती । पायां लागती निज्दास्य ॥५॥ जैं कृपा करिती संतजन । जन विजन होय जनार्दन । एका जनार्दनीं शरण । ब्रह्मा परिपुर्ण तो लाहे ॥६॥
५९५
ऐसे कांही दिन लोटलेसे जाण । परिसा कारण देवाचें तें ॥१॥ नाम्यासी चौघे पुत्र पैं जाहले । नाम तें ठेविलें विठ्ठलरायें ॥२॥ एका जनार्दनीं भक्ताचा सोहळा । दावितसे डोळां उघड ऐका ॥३॥
५९६
ऐसे नित्यकाळ जाताती वना । गोपाळ रामकृष्ण खेळती खेळ नाना ॥१॥ यमुनेचे तटीं कळंबा तळवटीं । मांडियला काला गोपाळांची दाटी ॥२॥ आणिती शिदोर्‍या आपाअपल्या । जया जैसा हेत तैशा त्या चांगल्या ॥३॥ शिळ्या विटक्या भाकरी दहीं भात लोणी । मिळेवोनी मेळा करी चक्रपाणी ॥४॥ एका जनार्दनीं अवघ्यां देतो कवळ । ठकविलें तेणें ब्रह्मादिक सकळ ॥५॥
५९७
ऐसे बहु दिन लोटले । दामा नामयासी बोले ॥१॥ जाउनी बैसशी राउळीं । सुखें सदा सर्वकाळीं ॥२॥ नाहीं प्रपंचाचा घोर । पुढें कैसा रे विचार ॥३॥ नको धरुं छंद मनीं । विनवी एका जनार्दनीं ॥४॥
५९८
ऐसे बहुत दिन तयांसी लोटले । उभयतां कळलें गुज त्याचें ॥१॥ स्त्रियेचें चरित्र न कळे ब्रम्हादिकां । उभयतां विचार देखा करिताती ॥२॥ दोघी दो बाजूंस करिती शयन । कर उचलोनि धरती ह्रदयीं ॥३॥ सावध होउनी पाहे कर चोरी गेला । एका जनार्दनीं त्याला शिक्षा करुं ॥४॥
५९९
ऐसे म्हणशील कोण । ज्याचें गातां नामभिधान । देवाधि देव आपण । स्वमुखें सांगे उद्धवा ॥१॥ नारद पराशर पुंडलीक । व्यास शुक वाल्मिकादिक । ध्रुव उपमन्यु भीष्मादिक । वंद्य जाण उद्धवा ॥२॥ वासिष्ठ वामदेव विश्वामित्र । आत्रि दत्तात्रेय पवित्र । ऐसे पुण्यश्लोक सर्वत्र । ते तुज वंद्य उद्धवा ॥३॥ रघु दिलीप हरिश्चंद्र । शीभ्रीराज बली थोर । जयाचा अंकित मी निर्धार । हें तूं जाणें उद्धवा ॥४॥ पांडव माझे पंचप्राण । कायावाचा वेचिलें मन । मज निर्धारितां पूर्ण । जीव वेंचिला उद्धवा ॥५॥ निवृत्ति ज्ञानेश्वर सोपान । मुक्ताबाई ज्ञाबकळा आपण । इहीं अवतार धरुन । जग तारिलें उद्धवा ॥६॥ गोरा सांवता जगमित्र । चोखा रोहिदास कबीर । हे माझे प्राणमित्र । आहेस जाण उद्धवा ॥७॥ दामा नामा जनाबाई । राजाई आणि गोणाई । येशि आणि साकाराई । जिवलग माझे उद्धवा ॥८॥ कान्हुअपात्रा जन जसवंत । हनुमंतादि समस्त । पाठक कान्हा आनंदभरित । तयाचेनि उद्धवा ॥९॥ परसा भागवत सुरदास । वत्सरा आणि कुर्मदास । एका जनार्दनीं निजदास । संतांचा मी उद्धवा ॥१०॥
६००
ऐसे लागलिया ध्यान । अंतकाळीं ठसावें मन ॥१॥ म्हणोनि भोगक्षयें जाण । मागील देहाचें अनुसंधान ॥२॥ मागील सांडी रे दगड । कां घालिसी पायखोडा ॥३॥ भुलोनि जाऊं नको वायां । एका जनार्दनीं लागे पायां ॥४॥
६०१
ऐसे विश्रांतींचे स्थान । आणिके ठायीं नाहीं जाण ॥१॥ तें हें जाणा पंढरपुर । मुक्त मुमुक्षुचें माहेर ॥२॥ जगीं ऐसें स्थळ । नाहीं नाहीं हो निर्मळ ॥३॥ एका जनार्दनीं निकें । भूवैकुंठं नेटकें ॥४॥
६०२
ऐसे वेरझारी कोटी कोटी फेरा । वरी त्या पामरा समजेना ॥१॥ माझें माझें म्हणोनि झोंबतसे बळें । केलेंसे वाटोळें नरदेहा ॥२॥ फजितीचा जन्म मरावें जन्मावें । हें किती सांगावें मूढ जना ॥३॥ एका जनार्दनीं माझें माहें टाकुनीं । वैष्णव कीर्तनीं नाचे सुखें ॥४॥
६०३
ऐसे संतभार ऐसें भीमातीर । ऐसा जयजयकार सांगा कोठें ॥१॥ समुद्रवलयांकित तीर्थे असतीं पावन । परी ऐसें महिमान नाहीं कोठें ॥२॥ ऐसा नामघोष आनंद सोहळा । न देखे आणिके स्थळां माझे नेत्रीं ॥३॥ एका जनार्दनीं पंढरीवांचुनीं । आनंद माझें मनीं नाहीं कोठें ॥४॥
६०४
ऐसें कीर्तीचें पोवाडे । जाहले ब्रह्मादिक वेडे । श्रुतीशास्त्रां कुवाडे । न कळे कांहीं ॥१॥ तो परात्पर श्रीहरी । पुंडलिकांचे उभा द्वरीं । युगें अठ्ठाविसे जाहलीं परीं ॥ न बैसे तरी खालुता ॥२॥ धरुनी भक्तीची मर्यादा । आहे पाठीपागें सदा । एका जनार्दनीं छंदा । विटेवरी उभाची ॥३॥
६०५
ऐसें कृपण मनाचें । तें या पंढरीसी न वचे ॥१॥ पापीयासी पंढरपुर । नावडे ऐसा निर्धार ॥२॥ ब्रह्माज्ञान पाषांडियां । नावडे काया वाचा जीवेंसी ॥३॥ विषयीं जो दुराचारी । तया नावडे ज्ञानेश्वरी ॥४॥ अभक्तांसी संत भेटी । झाल्या नावडे म्हणे चावटी ॥५॥ एका जनार्दनीं म्हणे देवा । तया दुरी मज ठेवा ॥६॥
६०६
ऐसें जाणोनि वेदमत । संतसेवा सदोदित ॥१॥ पुराणे शास्त्रें अनुवादिती । संतसेवन दिनरातीं ॥२॥ संतचरणीं ज्यांचें मन । तयां सुखा काय उणें ॥३॥ एका जनार्दनीं भावें । संतचरणीं लीन व्हावें ॥४॥
६०७
ऐसें जे धाले पुर्ण निमाले । ते नाहीं आले परतोनियां ॥१॥ घडीनें घडी चढतसे गोडी । अखंड आवडी संतापायीं ॥२॥ सांडोनियां काम स्मरे रामनाम । अंतरीं तें प्रेम धरुनियां ॥३॥ एका जानर्दनीं रंगलें नामीं । तया वंदुं आम्हीं सर्वभावें ॥४॥
६०८
ऐसें नानापरी सांगती गार्‍हाणे । ऐकता घडे कोटी अश्वमेध यज्ञ ॥१॥ पुनरपी संसार नवेची मागुती । शंख चक्र गदा पद्म ऐसे जन्म होती ॥२॥ एका जनार्दनी ऐकतां चोरीकर्म । कर्म आणि धर्म पावती विश्राम ॥३॥
६०९
ऐसें पंढरीचें स्थान । याहुनी आणिक आहे कोण ॥१॥ विष्णसहित कर्पूरगौर । जेथे उभे निरंतर ॥२॥ पुढें भीवरा शोभती । पुंडलिकांची वसती ॥३॥ ऐसें सांडोनी उत्तम स्थळ । कोठें वास करुं निर्मळ ॥४॥ म्हणे जनार्दनाचा एका । प्रेमळ संत नांदती देखा ॥५॥
६१०
ऐसें सुख कोठें आहे । भजन सोडोनि करिशी काय ॥१॥ सोंडोनि भजनाचा प्रेमा । मुक्ति मागसी अधमा ॥२॥ सांडोनियां संतसंग । काय मुक्ति ते अभंग ॥३॥ एका जनार्दनीं मुक्ति । भजन केलिया दासी होती ॥४॥
६११
ऐसें हें वचन ऐकोन । श्रीतीं केलासे प्रश्न । कैसें अपरोक्ष ज्ञान । सांगा मज ॥१॥ हा शब्द अलोलिक । श्रवणीं झालें सुख । मग जनार्दनाचा रंक । बोलता झाला ॥२॥ पंचभुतें तिन्हीं गुण । स्थुल सुक्ष्म कारण । हें अपरोक्ष अज्ञान । पंचीकरण ॥३॥ यासी तो जाणता साक्षित्वे देखतां । तोचि अपरोक्ष ज्ञाता । जाणावा पैं ॥४॥ सोहमाचा साक्षात्कार । एक जनार्दनीं निवडोनि साचार । वस्तुंचें घर । दाखविलें ॥५॥
६१२
ओळखिला हरि धन्य तो संसारी । मोक्ष त्याचे घरीं सिद्धिसहित ॥१॥ सिद्धि लावी पिसे कोणतया पुसे । नेणे राजहंसे पाणी कायी ॥२॥ काय तें करावें संदेहीं निर्गुण । ज्ञानाने सगुण ओस केलें ॥३॥ केलें कर्म झालें तेंचि भोगा आलें । उपजलें मेले ऐसे किती ॥४॥ एका जनार्दनीं नाहीं यातायाती । सुखाची विश्रांती हरिसंगे ॥५॥
६१३
ओळखिला हरि सांठविला पोटीं । होतां त्याची भेटीं दुःख कैचें ॥१॥ नर अथवा नारी हो कां दुराचारी । मुखीं गातां हरी पवित्र तो ॥२॥ पवित्र तें कुळ धन्य त्याची माय । हरिमुखें गाय नित्य नेंमें ॥३॥ काम क्रोध लोभ जयाचे अंतरीं । नाहीं अधिकारी ऐसा येथें ॥४॥ वैष्णवांचें गुह्मा काढिलें निवडुनी । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
६१४
ओहं सोहं यापरतें प्रमाण । जघन सघन विटेवरीं ॥१॥ भीवरासंगम पुडंलीक दृष्टी । सम कर कटीं उभा हरी ॥२॥ वेदांचे जन्मस्थान विश्रांति पैं मूर्ति । त्रैलोक्य कीर्ति विजयध्वज ॥३॥ एका जनार्दनीं पुराणासी वाड । पुरवितसे कोड भाविकांचें ॥४॥
६१५
कथा कीर्तन नेणें । सदा बोलणें वाचाळ ॥१॥ ऐसा अभागी जन्मला । कोण सोडवी तयाला ॥२॥ गाये डपगाणें नानापरी । स्वप्नीं नेणें वाचे हरी ॥३॥ आपण बुडोनि बुडवी लोकां । शरण जनार्दनीं एका ॥४॥
६१६
कधी भेटेल रघुपती । मजला सांगा मारुती ॥धृ॥ मी अपराधी शब्द शरानें । दुःखित उर्मीलापती । कीं मजला सांगा बा० ॥१॥ साधु छळले माझें मज कळलें । वनीं राक्षस संगती । कीं मजला० ॥२॥ एका जनार्दनीं आश्रय तुझा । सज्जन जन जाणती । कीं मजला० ॥३॥
६१७
कनक कांता न ये चित्त्ता । तोची परमार्थी पुरता ॥१॥ हेंचि एक सत्य सार । वायां व्युप्तत्तीचा भार ॥२॥ वाचा सत्यत्वें सोंवळी । येर कविता वोवळी ॥३॥ जन तोचि जनार्दन । एका जनार्दनीं भजन ॥४॥
६१८
कनकफळ भक्षितां सहज भ्रांति येती । तैशी ही फजिती संसारिका ॥१॥ मर्कटाचीये परे नाचे घरोघरीं । नाचवोनि भरी पोट तैसें ॥२॥ करिती तितुकें अवघें तें सोंग । नाहीं कांहीं रंग भाव भक्ति ॥३॥ एका जनार्दनीं पडिलासे भ्रांती । नेणें कधीं स्तुति देवाची तो ॥४॥
६१९
कन्या पुत्रादिक धन । हें तो जाण भ्रमवत् ॥१॥ मागील अनुभव घेउनी कसवटी । पडलीसे तुटी रामनामीं ॥२॥ नाथिले याचा काय तो धिवसा । कवण तो आकाशा कुंपण घाली ॥३॥ अभ्रींची छाया मृगजळ पाणी । काय तें रांजणीं भरतां येतें ॥४॥ एका जनार्दनीं सारीमारीचेंक वचन । काय तें प्रमाण आयुष्याविण ॥५॥
६२०
कन्यादान केल्या पाहें । तो आपले घरों घेउनी जाये ॥१॥ वायां कायशी तळमळ । तेथें कांहीं न चले बळ ॥२॥ आयुष्याचें अंतीं । पडसी काळाचीये हातीं ॥३॥ करी कांहीं पां विचार । कवणाचें घरदार ॥४॥ जनीं जनार्दन एकला । एका जनार्दनीं देखिला ॥५॥
६२१
कन्यापुत्रादिक मरती उपवासी । उपाव तयासी काहीं न चले ॥१॥ आणूनियां तृण बीज तें भक्षिती । निर्वाह या रीति चालविती ॥२॥ वस्तीसी त्या ठाव न देती कोण्ही । दुर्बळ म्हणोनि उपहासीती ॥३॥ एका जनार्दनीं ऐसें भोगी दु:ख । तयासी तें सुख स्वप्नीं नाहीं ॥४॥
६२२
कन्येचा करी जो नर विकरा । चांडाळ तो खरा अधमची ॥१॥ तयाचिया मुखा श्वानाची ते विष्ठा । पातकी वरिष्ठा सर्वाहुनीं ॥२॥ पंचमहापातकी विश्वासघातकी । यापरता दोष का तया अंगीं ॥३॥ एका जनार्दनीं त्याचें नाम घेतां । सचैल सर्वथा स्नान कीजे ॥४॥
६२३
कपटें पयपानसी । मोहें मोहनराशी । विषयी विष स्तनासी ।देवों आली ॥१॥ तंव तो सावध निजमुखीं । जिवासहित शोखी । सायुज्याच्या समसुखीं । समाधान बा ॥२॥ स्वरुपी घडोघडीं । म्हणें बापा सोंडीं । कृष्णमुखीं कुडी । सरती झाली बा ॥३॥ योगियां न कळे चित्तीं । सिद्धा दुर्लभ प्राप्ती । अंतीं कृष्णमुर्ती । हृदयावरी बा ॥४॥ पाजु आली विष । तियेसी परमसुख । कृष्णभजनीं दुःख । कवणा नाहीं बा ॥५॥ भक्ता परम प्राप्ती । द्वेषियां तेचि गती । एका जनार्दनीं प्रीति । वैरियां चार्‍हीं मुक्ति बा ॥६॥
६२४
कपटें रावण हो गेला । रामु तंव कळला त्याचा कपट भावो । सकळ वृत्ति रामचि देखे फिटला देह संदेहो । सबाह्म अभ्यंतरींरामु नांदे सीतेसी नाहीं तेथें ठावो रया ॥१॥ राम राम राम अवघाची राम फिटला रावणाचा भ्रम । भोग्य भोग भोक्ता रामचि जाला कैंचा । उठी तेथ कामु रया ॥धृ॥ जनीं रामु वनीं रामु नरनारी देखे रामु । तो हा रामु कीं कामु निःसिम नेमु । सरला भावनेचा भ्रमु । कामचेनि काजें कपटें रामु । होता फिटला तयाचा जन्मु श्रुमु रया ॥२॥ ऐसा सकळरुपें रामु स्वरुपें आला काय कीजे त्यासी पुजा । रामाचा वाणीसी रे छेदुनी चरणींवाहातसे वोजा । रामाचा विश्वासु बाणला त्या रावणासी रे निघती अधिक पैजा ॥३॥ हृदयीं रामु तेंचि अमृत कुपिका । म्हणोनि शिरें निघती तया देखा । शिरांची लाखोली रामासी वाहिली । अधिकचि येतसे हरिखा । अवघाचि राम गिळियेला रावणें । देह कुरंवडी केला तया सुखा रया ॥४॥ शरणागत दिधलें तें तंव उणें । म्हणोनि अधिक घेतलें रावणें रामाचे यश तें रावण । विजय गुढीं विचारुनि पहा पां मनें । अरि मित्रा समता समान एकपदीं एकाएकीं केलें जनार्दनीं रया ॥५॥
६२५
कपींद्रा सुखी आहे कीं षडगुण तरु हा राम ॥धृ॥ कनक कुरंग पाठी श्रमले । प्रभु सर्वज्ञ काम ॥१॥ मज विरहित त्या निद्रा कैंची । अखिल लोकभिराम ॥२॥ सौमित्रा दुर्वाक्यें छळिलें । त्याचा हा परिणाम ॥३॥ त्र्यंबक भंगीं एका जनार्दन । करिती विबुध प्रणाम ॥४॥
६२६
कमलदलाक्ष गोपी जीवनलक्ष । तो अलक्षा न बैसे लक्ष तो देखिला वो ॥१॥ मनमृग आमुचा वेधोनि गेला । पाहातांचि डोळा श्रीकृष्ण ॥२॥ सहजची आवडी पाहतां समदृष्टी । वेधोनि गेली सृष्टी पाहतां गे माय ॥३॥ एका जनार्दनीं परात्पर शोभला । तेणें मज वेधेंक वेध लाविला गे माय ॥४॥
६२७
कमळगभींचा पुतळा । पाहतां दिसे पूर्ण कळा । शशी लोपलासे निराळा । रुपवासही ॥१॥ वेधक वेधक नंदनंदनु । लाविला अंगीं चंदनु । पुराणपुरुष पंचाननु । सांवळां कृष्ण ॥२॥ उभे पुढे अक्रुर उद्धव । मिळाले सर्व भक्तराव । पाहाती मुखकमळभाव । नाठवे द्वैत ॥३॥ रुप साजिरें गोजिरें । दृष्टि पाहतां मन न पुरे । एका जनार्दनीं झुरे । चित्त तेथे सर्वदा ॥४॥
६२८
कमळगर्भींचा गाभा । तोचि उभा पंढरीये ॥१॥ वेधलें चरणीं मन माझें । नावडे दुजें तयाविण ॥२॥ ध्यान बैसलें हृदयीं । तयाविण दुसरे नाहीं ॥३॥ बैसलो तो नुठे मागें । एका जनार्दनीं गूज सांगें ॥४॥
६२९
कमळनेत्र पाहतां मन माझें भुललें । योगी ध्याती जयातें रूप पंढरीये आलें ॥१॥ आनंदु वो परमानंदु ध्यातां । समाधी उन्मनी वोवाळणी तत्त्वतां ॥२॥ योगयाग तप न लगे आचरण कांहीं । सुलभ सोपारा वसे सर्वांठायीं ॥३॥ वेदशास्त्र श्रमलें पुराणें भांडतीं । शेषादिकां न कळे कुंठित मती ॥४॥ एका जनार्दनीं पहात आनंदें मन । तद्रुपति झालें जनीं सर्व जनार्दन ॥५॥
६३०
कर कटावरी वैजयती माळा । तो हरीडोळां देखियेला ॥१॥ रुप सांवळे शोभें विटेवरी । तो हरी डोळेभरी देखियेला ॥२॥ एका जनार्दनीं पाहतां रुपडें ।त्रिभुवन थोकडें दिसतसे ॥३॥
६३१
करा करा लागपाठ । धरा पंढरीची वाट । पुंडलिकांची पेठ । सोपी आहे सर्वांसी ॥१॥ नाहीं कोठें गोवा गुंती । दुजा नको रे सांगातीं । एका चित्तवृत्ति । दृढ करीं मानसीं ॥२॥ नको माझें आणि तुझें । टाकी परतें कीं रे वोझें । संतचरण रज । सेवीं कां रे आदरें ॥३॥ तुटतीं भक्तिजाळ गुंती । सहज होतसे विरक्ति । एका जनार्दनीं प्रीती । धरा संतचरणीं ॥४॥
६३२
करा रे बापानों साधन हरीचें । झणीं करणीचें करुं नका ॥१॥ जेणें नये जन्म यमाची यातन ऐसिया साधना करा कांही ॥२॥ साधनांचे सार मंत्रबीज हरि । आत्मतत्त्व धरी तोचि एक ॥३॥ कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम । एक हरिनामा जपतां घडे ॥४॥ एका जनार्दनीं न घ्यावा संशय । निश्चयेंसी होय हरिरुपा ॥५॥
६३३
करावें पुजन मुखीं नामस्मरण । अनुदिनीं ध्यान संतसेवा ॥१॥ आणिक न लगे यातायाती कांहीं । वाचें विठोबाई वदे कां रे ॥२॥ एका जनार्दनीं संतांचे सांगात । त्यांचे वचनें मात कळों येत ॥३॥
६३४
करितां अनुष्ठान । मन धांवे सहज जाण ॥१॥ मंत्र जंत्र यंत्र भेद । मनें केला वादावाद ॥२॥ आधीं मनातें जिंकावें । सहज रूप मग पहावें ॥३॥ मन करे आधीन आधीं । एका जनार्दनीं तुटे व्याधी ॥४॥
६३५
करितां कीर्तन श्रवण । अतर्मलाचें होत क्षालन ॥१॥ तुमचें कीर्तन पवित्र कथा । पावन होत श्रोता वक्ता ॥२॥ तुमचे कीर्तनीं आनंद । गातां तारले ध्रुव प्रल्हाद ॥३॥ कीर्तनाचा गजर होतां । यम काळ पळे सर्वथा ॥४॥ एका जनार्दनीं कीर्तन । तिन्हीं देव वंदिती चरण ॥५॥
६३६
करितां भगवद्भक्ती । चारी मुक्ति पायां लागती ॥१॥ ऐसा लाभ नाहीं कोठें । कीर्तनामाजीं देव भेटे ॥२॥ योगयाग तप साधन । कासया तें ब्रह्माज्ञान ॥३॥ न लगे तीर्थाचें भ्रमण । सदा ध्यान नारायण ॥४॥ एका जनार्दनीं भक्ति । तेणें पावे उत्तम गती ॥५॥
६३७
करितां विषयाचें ध्यान । जीव होय मनाधीन ॥१॥ ऐसें भुलले विषयासी । अंचवले परमार्थासी ॥२॥ संसार सागरीं वाहिला । गोड परमार्थ राहिला ॥३॥ गेलें भुलोनियां मन । विसरला आठवण ॥४॥ जन्मा येवोनियां देख । एका जनार्दनीं ते मूर्ख ॥५॥
६३८
करितां वेदशास्त्रं श्रवण । गर्वांचें भरतें होय गहन ॥१॥ करूं जातां निजकर्म । कर्मक्रिया अति दुर्गम ॥२॥ कर्म केवळ देह असे । एका जनार्दनें तें नसे ॥३॥
६३९
करितां साधनांच्या कोटी । नामाहुनि त्या हिंपुटीं ॥१॥ नाम वाचे आठवितां । साधनें सर्वा येती हातां ॥२॥ नामापरतां दुजा मंत्र । नाहींनाहीं धुंडितां शास्त्र ॥३॥ एका जनार्दनीं नाम । शुद्ध चैतन्य निष्काम ॥४॥
६४०
करितां हरिकथा श्रवण । स्वेद रोमांच नये दारुण । रुका वेचितां प्राण । जाऊं पाहें ॥१॥ द्रव्यदारा लोभ अंतरीं । हरिकथा वरी वरी । बीज अग्नीमाझारीं । विरुढें कैसें ॥२॥ टाळी लावूनियां जाण । दृढ घालिती आसन । अंतरी तो ध्यान । वल्लभेचें ॥३॥ धनलोभाचा वोणवा । तेथें जाळिलें जीवभावा । हरिकथेचा करी हेवा । लोकारुढी ॥४॥ धनलोभी आसक्तता । हरिकथा करी वृथा । तयासी तो परमार्थ तत्त्वतां । न घडे जाणा ॥५॥ एकलीच कांता । नाश करी परमार्था । तेथें धनलोभ येतां । अनर्थचि होय ॥६॥ एका जनर्दनीं । काम क्रोध लोभ तिन्हीं । द्रव्यदारा त्यजोनी । नित्य तो मुक्त ॥७॥
६४१
करिताती कथा । द्रव्य मागती सर्वथा ॥१॥ नाहीं पुण्य दोघां गांठीं । हीन भाग्य तीं करंटीं ॥२॥ नैराश्य कथा भजन । तेणें तुष्ट नारायण ॥३॥ एका जनार्दनीं वाणी । व्यास बोललें पुराणीं ॥४॥
६४२
करिती सडा संमार्जन । आणि गोमूत्र जीवन ॥१॥ वस्त्रें पात्रें प्रक्षाळिती । गुरुसेवेंत सेविती ॥२॥ चौदा विद्या चौसष्ट कळा । शस्त्रास्त्र धनुर्विद्या सकळा ॥३॥ उपासना बीज मंत्र । आत्मज्ञान देव शास्त्र ॥४॥ गुरुसेवें सर्व प्राप्ती । एका जनार्दनीं विनंती ॥५॥
३४३
करी कांहीं मनाएका विचरणा । संतांच्या चरणा न विसंबे ॥१॥ तयाचा मी दास कामारी दुर्बळ । तेंचि माझे सकळ हित करती ॥२॥ देउनि प्रेमपान्हा लाडिवाळपणें । कृपेचें पोसणें तुमचे मी ॥३॥ जनार्दनीं एका तुमचा तो दास । तयासी उदस धरुं नये ॥४॥
६४४
करी जो सृष्टीचे रचन । तया न कळे बह्माज्ञान । तो श्रीनारायण । शरण रिघे ॥१॥ न कळे न कळे ब्रह्माज्ञान । म्हणोनिक धरितसे चरण । नारायण परिपूर्ण । उपदेशी ब्रह्मा ॥२॥ ब्रह्मा अत्रीतें सांगत । ब्रह्माज्ञान हृदयीं भरित । अत्री पूर्ण कृपेस्थित । दत्तात्रय सांगतसे ॥३॥ दत्तात्रय कृपें पुर्ण । जनार्दनीं पूर्णज्ञान । जगचि संपूर्ण । एक रुप तयासी ॥४॥ एका जनार्दनीं पूर्ण । ब्रह्माज्ञानाची खुण । बोधोनियां संपूर्ण । मेळविलें आपणीया ॥५॥
६४५
करी हरिकथा टाकी दंभमान । वायंचि पतन पडूं नको ॥१॥ नामाचा विश्वास संतांचा सांगात । तेणें तुझें हित सर्व होय ॥२॥ द्रव्य दारा यांचा मानी पा विटाळ । सर्वां ठायीं निर्मळ होसी बापा ॥३॥ एका जनार्दनीं ऐसा धरी मार्ग । सोपा संसर्ग पूर्वजांसी ॥४॥
६४६
करुणावचनीं बोलतसे स्ववाणी । कृष्णाचा बंधु जन म्हणताती ॥१॥ ऐकोनियां दूत हांसती मानसीं । जगदबंधु सर्वांसी होय दुरी ॥२॥ एका जनार्दनीं वंदुनी सांगती । द्विज एक अवचितीं बंधु म्हणे ॥३॥
६४७
करुनियां काला सर्व आले गोकूळीं । गोपाळांसहित गाईवत्स सकळीं ॥१॥ वोवाळिती श्रीमुख कुर्वडी करिती । रामकृष्णातें सर्व वोवाळिती ॥२॥ जाहला जयजयकार आनंद सकळां । एका जनार्दनीं धणी पाहतां डोळां ॥३॥
६४८
करुनियां स्नान नामा बाहेरी आला । परिसाचा मेळा घेउनी हातीं ॥१॥ घेउनी परीस सांगे परिसासी । तुझा निश्चयेंसी वोळखून घेईं ॥२॥ ऐकतांचि ऐसें नामयाचें बोलणें । परी कर जोडून विनवितसे ॥३॥ ऐसा आनंदसोहळा होतसे संपूर्ण । आनंद निमग्न सर्व जाहले ॥४॥ एका जनार्दनीं आनंद पैं जाहला । आनंदानें गेला परिसा घरीं ॥५॥
३४९
करुनी कीर्तन मागती जे द्रव्य । तें जाणावें वैधव्य विधवेचें ॥१॥ सर्व अलंकार शरीर शोभलें । वायांपरी गेलें कुंकुहीन ॥२॥ मावनानें भावें करावें कीर्तन । आनंदे वर्तन वैष्णवांपुढें ॥३॥ एका जनार्दनीं कामनीक कीर्तन । करितां पतन जन्मोजन्मीं ॥४॥
६५०
करुनी निर्धारा । जाय जाय पंढरापुर ॥१॥ उणें पडों नेदीं काहीं । धावें देव लवलाहीं ॥२॥ संकट कांहीं व्यथा । होऊं नेदी सर्वथा ॥३॥ शंख चक्र घेउनी करीं । एका जनार्दनीं घरटी करी ॥४॥
६५१
करुनी वेदशास्त्र पठण । निर्धारितां निज ज्ञान ॥१॥ करुनी वेदशास्त्र श्रवण । होय शिश्वोदरपरायण ॥२॥ महा मोहो गिळिला ज्ञाना । शरण एका जनार्दना ॥३॥
६५२
करुनी हरिकीर्तन । तेथें सेविती जे अन्न ॥१॥ ऐसे अभागी खळ । परम चांडाळ कलीयुगीं ॥२॥ हरिकथा माउली । विकिताती अर्थभुली ॥३॥ पंच महापातक । तया घडे दोष देख ॥४॥ एका जनार्दनीं । करा कीर्तन अनुदिनीं ॥५॥
६५३
करूं करूं म्हणता गेले वायांविण संसार तो शीण केला वेगी ॥१॥ अधमा न कळे अधमा न कळे । झांकोनियां डोळे घाणा नेतीं ॥२॥ यमदूत नेती तयांसी तांतडीं । मारिती वरी कोडी यमदंडें ॥३॥ एका जनार्दनीं चुकवी या यातना । संतांच्या चरणा शरण रिघे ॥४॥
६५४
करूं जातां निजकर्म । कर्मक्रिया अति दुर्गम ॥१॥ कर्म केवळ देहाचे माथां । आत्मा देहीं विदेहता ॥२॥ कर्म अकर्माचें सांकडें । कांहीं न घेडी आत्म्याकडे ॥३॥ एका जनार्दनीं कर्म । देहांचे देहीं परब्रह्मा ॥४॥
६५५
करूं देईना मज दुध तुप बाई । मथितां दधि तो धरी रवीं ठायीं ठायीं । हट्टे का कदापि नुमजे समजाविल्यास काई । समजाउनी यातें तुझ्या घरांत नेई नेई ॥१॥ राधे हा मुकुंद कडिये उचलोनि घेइ घेई । रडतानां राहिना करुं यांस गत काई काई ॥धृ॥ हरिसी आनंदे राधा मृदु मृदु बोलवीते । पाळण्यांत तुला कृष्णा निजवोणी हालवितें । गुह्मा नेऊनियां दही भात कालवितें । यशोदेसी सोडीं कान्हा माझ्याजवळी येई येई ॥२॥ हट्ट मोठा घेतो मला छळितो गे राधे पाहाणें । असाच हा नित्य राधे हरि घरा नेता जाणें । उगाचि हा निश्चळ कैसा राहे त्वां समजावल्यानें । तुझी धरिते हनुवटी यासी गुहां नेई नेई ॥३॥ गोविंदा गोपाळा कृष्ना मुकुंदा शेषशाई । जगज्जीवना गोकुळभुषणा गोपी भुलवणा बाई । उगा नको रडुं कृष्णा यशोदेसी सोडीं तूंही । एका जनार्दनीं शरण राधे । घेऊन यासी जाई जाई ॥४॥
६५६
करूनि नवस मागती ते पुत्र । परी तो अपवित्र होय पुढे ॥१॥ नासोनियां धर्म करी वेडेचार । भोगिती अघोर पापमती ॥२॥ सदा सर्वकाळ निंदावें सज्जन । काया वाचा मन परद्रव्या ॥३॥ परनारी देखतां सुख वाटे मनीं । भोगी वित्त हानी पाप जोडे ॥४॥ ऐसिया पामरा दंड तो कोण । तयाचे वदन कृष्णवर्ण ॥५॥ एका जनार्दनीं नवासाचें फळ । कुळीं झाला बाळ बुडवणा ॥६॥
६५७
कर्म आणि धर्म अष्टांग साधन । नको यज्ञदान नाम जपें ॥१॥ तुटेल बंधन खुंटेल पतन । नाममुखीं गर्जन सोपा मंत्र ॥२॥ कलियुगामाजीं सोपें हें साधन । रामनाम खुण मुक्त वाट ॥३॥ एका जनार्दनीं खुंटली उपाधी । सहज समाधि रामनामें ॥४॥
३५८
कर्म उपासना न कळें जयांसी । तेणें संतांसी शरण जावें ॥१॥ सर्व कर्मभावें विठ्ठलनाम गावें । जाणिवेनेणिवेचें हावें पडुं नये ॥२॥ अभिमान झटा वेदांचा पसारा । शास्त्रांचा तो थारा वहातां अंगीं ॥३॥ एका जनार्दनीं सर्व कर्म पाही । विठ्ठल म्हणतां देहीं घडतसे ॥४॥
६५९
कर्म करतां काहीं न कळे विचार । परि द्वेषाद्वेष संचार होतां असे ॥१॥ राजस तामस सात्विक तें देखा । उपाधी ते देखा मूळ जाणा ॥२॥ यथाविधी कर्म न घडे निश्चयें । उणें पडतां जाय पतनासी ॥३॥ एका जनार्दनीं नाम मुखीं गातां । सर्व कर्में तत्त्वतां घडती सांग ॥४॥
६६०
कर्म करसी तरी कर्मठचि होसी । परि निष्कर्म नेणसी कर्मामाजीं ॥१॥ ब्रह्मालागीं कर्म सांडणें हें कुंडें । पाय सांडोनि पुढें चालुं पाहसी ॥२॥ डोळ्यांची नव्हाळी घेवों जातां करतळी । पाहों जातां मुळीं पाहणेंचि नाहीं ॥३॥ एका जनार्दनीं सर्व कर्म पाहीं । सांडी मांडी नाहीं तये ठायीं ॥४॥
६६१
कर्म करितां फलाशा वाढे । तें तें फल भोगणें घडे ॥१॥ कर्म करितां फळ बाधक । न करितां प्राप्त नरक ॥२॥ ऐशीं कर्माची रहाटी । सदैव देखे उफराटी ॥३॥ एका जनार्दनीं कर्म । तेथें कैंचा भवभ्रम ॥४॥
६६२
कर्म केवळ देहाच्या माथां । आत्मा देही असोनि विदेहता । शेखीं म्हणती तत्त्वतां । कर्में बांधला आत्मा ॥१॥ आकाश जातां दळे । तैं कर्मीं ब्रह्मा आतळे । कर्म अकर्मा नातळे । परब्रह्मा रया ॥२॥ कर्माचें न कळे वर्म । तंव केवीं फळे परब्रह्मा । म्हणोनि न सोडीं श्रम । साधकासी ॥३॥ कर्माकर्म विवंचना । न कळे पैं सज्ञाना । एका शरण जनार्दना । परि तुझीच कल्पना रया ॥४॥
६६३
कर्म धर्म ऐसा आहे । ब्रह्मी शोदूनियां पाहें ॥१॥ स्नान करावें ते कैसें । संध्या आपरुप असे ॥२॥ कैसा आहे ब्रह्मायज्ञ । मन अर्जवा तें नमन ॥३॥ एका जनार्दनीं भजे । कर्म धर्म सहज बुजे ॥४॥
६६४
कर्मक्रिया जेणें कळे । तोचि कर्मी कां नाकळे ॥१॥ काय करुनी कर्म सकळ । हरिप्राप्तीविण निष्फळ ॥२॥ कर्मीं ब्रह्मा प्रतीति नाहीं । तरी त्या कर्म केलें काई ॥३॥ एका जनार्दनीं कर्म । कर्मीं पाहे परब्रह्मा ॥४॥
६६५
कर्माच्या पोटीं भ्रम । कीं भ्रमाच्या पोटीं कर्म । हें दोहींचे न कळे वर्म । जाणत्यासी ॥१॥ घटीं उदक भरिलें । तेणें घटाकाश नव्हे बोले । कर्मीं ब्रह्मा संचलें । कर्मातीत ॥२॥ वाढवितां कर्मभ्रम । न कळे परब्रह्मा । मीमांसक धर्म । अनश्वर ॥३॥ कर्माची कर्मगती । न सोडी पुनरावृत्ति । निशेष कर्म निश्चिती । ब्रह्माप्राप्ती ॥४॥ निष्कर्म लभ्यते सिद्धी । हे कृष्णें उपदेशिलें कृपानिधी । तरी कर्माची कर्मबुद्धी । न सोडी आत्मा ॥५॥ कर्माचें निजकर्म । केवळ परब्रह्मा । एका जनार्दनीं मिथ्या । कर्मश्रम ॥६॥
६६६
कर्मी कर्मठपणा धर्मीं धर्मिष्ठपणा । हीं दोन्हीं अनुसंधानें चुकती जगीं ॥१॥ कर्माचें जें कर्म धर्माचा अधिधर्म । तो हा सर्वोत्तम विटेवरी ॥२॥ निगमांचे निजसार अगमाचे भांडार । न कळे ज्याचा पार वेदशास्त्रां ॥३॥ एका जनार्दनीं श्रुतीसी नाकळे । तो भक्तिबळें उभा विटे ॥४॥
६६७
कर्मे नित्य नैमित्तीक । करावी तीं आवश्यक ॥१॥ तेचि होय शिवपुजा । चित्तशुद्धि ते सहजा ॥२॥ मनःस्थिर तें कारण । करा शंकराचें ध्यान ॥३॥ गुरु होऊनि शंकर । ज्ञान उपदेशीं सत्वर ॥४॥ तेणें अज्ञानाचा नाश । प्राप्त होय अविनाश ॥५॥ एका जनार्दनीं धर्म । ब्रह्माप्राप्तीचे हें वर्म ॥६॥
६६८
कलत्रपुत्रबाधा अभिमानाची । तेही त्याजिल्या शेखी त्यागी म्हणे निजाची ॥१॥ अभिमान कैसेनि सरे। ही कृपा कीजे माहेरें दातारा ॥२॥ देही देहातीत प्रतिपादिजे ज्ञान । तेणेंचि ज्ञान देही येतुसे अभिमान ॥३॥ जें जें होय रुतें तें अहंकारु । त्यागी भोगी होय दिंगबरु ॥४॥ ब्रह्माज्ञानें म्हणती अभिमानाची तुटी । सोऽहं सोऽहं म्हणोनी तेथेंही लागे पाठीं ॥५॥ द्वैत नाहीं जगीं मीच येकला येकु । येणें स्फुरणें आला अभिमान घातकु ॥६॥ अति सुक्ष्म अभिमान कवणा न पडे ठाईं । देहातीत ज्ञानी म्हणती जो विदेही ॥७॥ एका जनार्दनीं जगद्‌गुरु न्याहाळी । गौखुर वंदितां अभिमानाची धुळी ॥८॥
६६९
कलिकाळाचे न चले बळ । ऐसे सबळ हरिदास ॥१॥ सेवेचें तो कवच अंगीं । धीर प्रसंगीं कामक्रोध ॥२॥ रामनाम हाचि बाण । शस्त्र निर्वाण सांगातीं ॥३॥ एका जनार्दनीं यमाचे भार । देखतां समोर पळती ते ॥४॥
६७०
कलिमाजीं दैवतें उघड दिसती फार । नारळ आणि शेंदुर यांचा भडिमार ॥१॥ लटिका देव लटिका भक्त लटिके सर्व वाव । सात धान्याचें धपाटे मागती काय त्यांचा बडिवार ॥२॥ तेल रांधा मागती मलीदा वरती काजळ कुंकूं । फजीतखोर ऐसें देव तयाचें तोडावर थुंकु ॥३॥ एका जनार्दनीं सर्वभावें सोपा पंढरीराव । तया सांडोनी कोण पुसे या देवाची कायसी माव ॥४॥
६७१
कलियुगामाजीं एक हरिनाम साचें । मुखे उच्चारितां पर्वत छेदी पापांचे ॥१॥ सर्वभावें भजा एक हरीचें नाम । मंगळा मंगल करील निर्गुण निष्काम ॥२॥ दोषी अजामेळ तोहि नामें तरला । हरिनामें गणिकेल्चा उद्धार जाहला ॥३॥ एका जनार्दनीं नाम सारांचें सार । स्त्रियादि अत्यंजा एका दांचि उद्धार ॥४॥
३७२
कलियुगामाजीं थोर जाले पाषांड । पोटासाठीं संत जाले उदंड ॥१॥ नाहीं विश्वास संतदया मानसीं । बोलती वायांविण सौरस अवघा उपहासी ॥२॥ वेद पठण शास्त्रें संभाषे पुराणमत । अवघें बोधोनि ठेविती बोलती वाचाळ मत्त ॥३॥ देव भजन संतपुजन तीर्थ महिमान न कळे मुढ । ऐसें कलियुगीं जाले जाणत जाणत दगडा ॥४॥ एका जनार्दनीं काया वाचा राम जपा । सोपें हें साधन तेणें नोहे पुण्यपापा ॥५॥
३७३
कलियुगी तारक । स्वामी दत्तराज एक ॥१॥ त्याचें नाम नित्य गावें । भवसिंधुसि तरावें ॥२॥ दत्तमूर्ति हृदयीं ध्यातां । पावे मोक्ष सायुज्यता ॥३॥ दत्त वसे जया मनीं । तया दत्त जनीं वनीं ॥४॥ एका जनार्दनीं दत्त । सबाह्म स्वानंदभरित ॥५॥
६७४
कलियुगी नाम तारक । दुजें होय दुःखदायक ॥१॥ पहा अनुभवो मना । नाम भवनदी नौका जाणा ॥२॥ अठरा वर्ण याती । नामें पावनचि होती ॥३॥ न करा आळस क्षणभरी । एका जनार्दनीं निर्धारी ॥४॥
६७५
कलियुगीं नाम सोपें तें सुजाण । ऐशी भाषा जाण बहुतांची ॥१॥ वाल्मिक सांगतु रामनाम जपा । तरले तरती सोपा राममंत्र ॥२॥ पुराणकर्ता तो व्यास मुगुटमणी । म्हणे रामकृष्ण वदनीं सोपा मंत्र ॥३॥ बहुतांच्या मतें एका जनार्दनी । रामनाम वाणी गाय सदा ॥४॥
३७६
कलीमाजीं नोहे अनुष्ठान । कालीमाजीं नोहे हवन । कालीमाजीं नोहे पठण । नोहे साधन मंत्राचें ॥१॥ नोहे योगयागाविधी । नसती अंगीं ते उपाधी । वाढतसे भेदबुद्धी । नोहे सिद्धि कोणती ॥२॥ न चले कर्माचें आचरण । विधिनिषेधांचे महिमान । लोपली तीर्थे जाण । देवप्रतिमा पाषाण ॥३॥ न ठाके कोणाचा कोठें भाव । अवघा लटिका वेवसाव । एका जनार्दनीं भेव । जेथें तेथें वसतसे ॥४॥
६७७
कलीमाजीं सोपें घेतां रामनाम । नाहीं कांहीं श्रम जपतप ॥१॥ न लगे साधन पंचाग्री धुम्रपान । नामेंचि पावन युगायुगीं ॥२॥ योगयाग यज्ञ न लगे वेरझारा । नाममंत्र पुरा जप आधीं ॥३॥ एका जनार्दनीं निश्चयो नामाचा । तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥४॥
६७८
कलीमाजें संत जाले । टिळा टोपी लाविती भले ॥१॥ नाहीं वर्माचें साधन । न कळे हृदयीं आत्मज्ञान ॥२॥ सदा सर्वदां गुरगुरी । द्वेष सर्वदां ते करी ॥३॥ भजनीं नाहीं चाड । सदा विषयीं कबाड ॥४॥ ऐसिया संतांचा सांगात । नको मजसी आदिअंत ॥५॥ भोळियाच्या पायीं । एका जनार्दनीं ठाव देई ॥६॥
३७९
कल्पतरु दाता पुंडलीक मुनी । तयासाठीं परब्रह्मा तिष्ठे अझुनी ॥१॥ नवलाव गे माय नवलाव गे माय । विटे ठेऊनी पाय उभा असे ॥२॥ शेष श्रमला शास्त्र भागलें । वेवादिती वाहिली अठरा ज्यासी ॥३॥ आदि अंत कोना न कळे जयाचा । मौनावली वाचा वेदादिकीं ॥४॥ तो डोळेभरी पहिला श्रीहरी । एका जनार्दनी वेरझारी खुंटली देवा ॥५॥
६८०
कल्पनेचे जळीं वासना काल्लोळीं । बुडाले भवजळीं नामहीन ॥१॥ तयाच्या धांवण्या कोण धांवे देव । ऐसा तो उपाव नेणेचिना ॥२॥ दुःखाचे डोंगर भोगिती बापुडीं । कोण काढाकाढी करील त्यांची ॥३॥ एका जनार्दनीं संतावांचूनिया । त्या अभाग्याची दया कोण करी ॥४॥
६८१
कल्पनेपासुनी कल्पिला जो ठेवा । तेणें पडे गोंवा नेणें हरि ॥१॥ दिधल्यावांचुनि फलप्राप्ति कैंची । इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा ॥२॥ इच्छावें तें जवळी हरीचे चरण । सर्व नारायण देतो तुज ॥३॥ न सुटे कल्पना अभिमानाची गांठी । घेता जन्म कोटी हरि कैंचा ॥४॥ एका जनार्दनीं सांपडलीं खुण । कल्पना अभिमानी हरि झाल ॥५॥
६८२
कल्पित देह कल्पित प्रबंध । कल्पित षट् चक्रमाळा । कल्पित धारण कल्पित सुषुम्ना । कल्पित मेरुमंडळ रे ॥१॥ कल्पित छांडो कल्पित छांडो । निर्विकल्प वृत्ति मांडो । सहजीं सहज भरपुर भरले । देह विदेह दुरी छांडो ॥धृ॥ कल्पित द्विदळ कल्पित चतुर्दळ । कल्पित अष्टकमळ कल्पित । द्वादश कल्पित षोडश । कल्पित ते सहस्त्र दळ रे ॥२॥ कल्पित श्रीहट कल्पित गोल्हाट । कल्पित औठ पीठ कल्पित भ्रमरगुंफा । कल्पित हंसपद कल्पित योग अचाट रे ॥३॥ कल्पित शिव कल्पित शक्ति । कल्पित ते निजप्राप्ति । जनार्दनीं निजकल्पयोगें । सहज चैतन्य निज शांति रे ॥४॥
६८३
कळला गुरुसी वृत्तान्त । आले वन धुंडाळीत ॥१॥ गुरु शिष्या हांका मारी । तिघे आले त्या अवसरीं ॥२॥ पोटासी धरुनी आणिलें घरां । उतरिला काष्ठभारा ॥३॥ मुख कुर्वाळुनी हातें । वर दिला सदगुरुनाथें ॥४॥ म्हणे मागा गुरुदक्षिणा । एका विनवी जनार्दना ॥५॥
६८४
कळा ते कुसरी नव्हे हें शाब्दिक । अणुरेणु एक भरुनी उरला ॥१॥ तोचि डोळाभरी पहा श्रीहरीं । परेपरता दुरी ठसावला ॥२॥ एका जनार्दनीं शब्दवेगळा असे । तो उभा दिसें कीर्तनरंगीं ॥३॥
६८५
कळा तो अभ्यास कासया करणें । निवृत्ति नाम घेणें धणीवरी ॥१॥ धणीवरी नाम घेईं पां अंतरीं । निवृत्ति बाह्यात्कारीं होईल तुझी ॥२॥ व्यर्थ खटपट न करी पसार । निवृत्ति नामें साचार जप करीं ॥३॥ गुज गुह्य तुज सांगतों मना । निवृत्तिनाम जाणा ह्रदयीं धरीं ॥४॥ एका जनार्दनीं निवृत्ति नाम वाचे । संसाराचे साचें सार्थक जालें ॥५॥
६८६
कळिकाळ बापुडें नामापुढें दडे । ऐसे थोर पोवाडे श्रीरामाचे ॥१॥ ऐसे वर्म सोपें सांडोनी शिणती । वायां हीन होती हांव भरी ॥२॥ असोनियां देहीं फिरती ते वायां । वाउगाचि तया शीण होय ॥३॥ एका जनार्दनीं आत्माराम देहीं । आसोनी न कळे कांहीं शिणती वायां ॥४॥
६८७
कळिकाळसी दरारा । रामनाम स्मरण करा ॥१॥ भुक्ति मुक्ति लागती पायां । करितां दया वैष्णवांनीं ॥२॥ सुगम सोपें हेंचि वर्म । नको श्रम मज दुजा ॥३॥ एका जनार्दनीं नाम सार । नाहीं बडिवार दुसरा ॥४॥
६८८
कळिकाळा नाहीं बळ । नाम जपे तो सबळ ॥१॥ ऐसेंअ नाम सदा जपे । कळिकाळा घाली खेपे ॥२॥ हरिचिया दासा साचें । भय नाहीं कळिकाळाचें ॥३॥ एका जनार्दनीं काळ । काळ होय तो कृपाळू ॥४॥
६८९
कवडी कवडी घाली खांचे । नित्य नूतन भिक्षा वाचे ॥१॥ अतिथासी दान । तेंतों स्वप्नीं नाहीं जाण ॥२॥ पर्वकळ विधी । न कळे अभाग्यासी कधीं ॥३॥ ठेवुनी चित्त धनावरी । सवेंचि फिरे घरोघरीं ॥४॥ जन्मा येवोनि अघोर । एका जनार्दनीं भोगिती पामर ॥५॥
६९०
कवण देव कवण भक्त । एक दिसे दोहीं आंत ॥१॥ भक्त ध्यानीं जंव बैसला । पूज्य पुजक स्वयें जाहला ॥२॥ ध्यानीं हारपलें मन । सरलें ध्यातां ध्येय ध्यान ॥३॥ एका जनार्दनीं भाव । देव म्हणण्या नुरे ठाव ॥४॥
६९१
कशी जाऊं मी वृंदावन । मुरली वाजवी कान्हा ॥धृं॥ पैलतीरीं हरी वाजवीं मुरली । नदी भरली यमुना ॥१॥ कांसे पितांबर कस्तुरी टिळक । कुंडल शोभे काना ॥२॥ काय करु बाई कोणाला सांगुं । नामाची सांगड आणा ॥३॥ नंदाच्या हरीने कौतुक केलें । जाणे अंतरीच्या खुणा ॥४॥ एका जनार्दनी मनीं म्हणा । देवा महात्म्य कळेना कोणा ॥५॥
६९२
कष्ट न करितां योग्य जरी साधी । श्रम ते उपाधि वाउगी कां बा ॥१॥ नाम तें सोपें श्रम नाहीं कांहीं । उच्चारितां पाहीं सर्व जोडे ॥२॥ एका जनार्दनीं नको योगयाग । म्हणावा श्रीरंग वाचे सदा ॥३॥
६९३
कसा मला टाकुनी गेला राम ॥धृ॥ रामविणा जीव व्याकुळ होतो । सुचत नाही काम ॥१॥ रामविण मज चैन पडेना । नाही जीवासी आराम ॥२॥ एका जनार्दनी पाहुनीं डोळा । स्वरुप तुझे घनःश्याम ॥३॥
६९४
कस्तुरी परिमळ नाशितसे हिंग । ऐसा खळाचा संग जाणिजेती ॥१॥ साकरेचे आळा निंब जो पेरिला । शेवटी कडू त्याला फळें पत्रें ॥२॥ चंदनाचे संगेकं हिंगण वसती । परी चंदनाची याती वेगळीच ॥३॥ एका जनार्दनीं हा अभाविकाचा गुण । वमनासमान लखुं आम्हीं ॥४॥
६९५
कस्तुरीची उटी टिळक लल्लाटीं । सांवळां जगजेठी उभा विटे ॥१॥ नाम हें चांगलें रुप हें चांगलें । दरुशन चांगलें विठोबाचें ॥२॥ आला पंढरीसी पुंडलिकाचें भक्ति । दरुशनें मुक्तिं पातकीयांसी ॥३॥ एका जनार्दनी आनंदाचा कंद । उभा तों गोविंद विटेवरी ॥४॥
६९६
कां रे जन्मला अभागी । प्रीति न धरी पांडुरंगीं ॥१॥ उत्तर चांगलें रें मुख । रामनाम न म्हणती विख ॥२॥ उत्तम क्रूर ते दिसती । दानधर्म न घडे हातीं ॥३॥ उत्तम पद ते शोभती । परि तीर्थयात्रे न जाती ॥४॥ पुष्ट दिसतें शरीर । व्यर्थ वांचोनि भूमीभार ॥५॥ ऐसे अभागी जन्मले । एका जन्मार्दनीं वायां गेलें ॥६॥
६९७
कां रे नागविसी काळा । मानिसी संसार सोहळा । शेवटीं तो गळां । यमपाश पडतील ॥१॥ वाचे म्हणे रामनाम । आणीक नको दुजें काम । मोक्ष मुक्ति धाम । नामें एका जोडती ॥२॥ वाउगें जप तप कर्म । याचा न धरी संभ्रम । वाचे गाय सदा नाम । तेणें सर्व जोडतसे ॥३॥ एका जनार्दनीं नेमक । कायावाचा - मनें सप्रेम । वाचे सम्रतसे नाम । श्रीराम सर्वदा ॥४॥
६९८
कां रे नाठवीसी दिवसाचे चोरी । प्रपंच भोंवरीं पडसी रया ॥१॥ वाचे नाम गाय वाचे नाम गाय । नाम न गातां होय दुःख रया ॥२॥ सुख दुःखें दोन्ही भातुकी असती । प्रपंचाचे अंतीं भोगिसी रया ॥३॥ रामनाम वाचे वाचे सदा गात जाय । न धरीं तूं हाय वाउगी रया ॥४॥ एका जनार्दनीं किती सांगुं मूढा । वायां तूं दगडा भूमीभार ॥५॥
६९९
कां रे नाम्या नायकशी । म्हणोनी ताडित तयासी ॥१॥ नको जाऊं राउळास । म्हणोनी कोंडिती तयास ॥२॥ अन्न उदकाविण पीडिती । परी तो विठू ध्याय चित्तीं ॥३॥ मनीं करीतसे खेद । एका जनार्दनीं गोविंद ॥४॥
७००
कां रे नायकसी गव्हारा । कां रे न भजसी ईश्वरा ॥१॥ सोपा मंत्र विठ्ठराज । तेणें पुरे सर्व काज ॥२॥ नको संसाराचें कोड । अंतकांळीं यमदंड ॥३॥ एका जनार्दनीं कींव भाकी । रामनाम वदा मुखीं ॥४॥
७०१
कां रे भांबावसी नास्तिकासाठीं । कोरडी कां आटी करसी वायां ॥१॥ हें तों पोसणें आणिलें उसणें । जयाचें तया देणें अनायासें ॥२॥ 'घ्यावें त्याचें द्यावे' ऐशी आहे नीत । तूं रे दुश्चित वाउगा मनीं ॥३॥ न देतां उरी देणें आहे केव्हां । वाउगा तो हेवा धरती पोटीं ॥४॥ एका जनार्दनीं भरता मापोडी । पडतसे उडी खालीं मग ॥५॥
७०२
कां रें हावभरी जाहालसी पामरा । भार वाहसी खरा प्रपंचाचा ॥१॥ नाम श्रीरामांचे नित्य घेई वाचे । तुटलें जन्माचें दुःख जाण ॥२॥ यातना यमाची दुःखाची परवडी । नामें धरी गोडी आवडीनें ॥३॥ एका जनार्दनीं नायकसीं मूढा । अहा रे दगड धर्मलंडा ॥४॥
७०३
कांहीं न करुं आणिक आन । वाचे गुण गाऊं तुमचे ॥१॥ पाहुं डोळेभरी मुख । तेणें सुख इंद्रियां ॥२॥ न करी कोना ताडातोडी । आहे खोडी दूर करुं ॥३॥ एका जनार्दनीं प्रमाण । वाचे नारायण आठवुं ॥४॥
७०४
काकुलते गोपाळ म्हणती रे कान्हया । गाई न येती माघारी कोन बळी कासया ॥१॥ आमुची खुंटली गति आवरीं तुं हरी । तुजवांचुनी कोण रेखा आमुचा कैवारी ॥२॥ नको वेरझारा पुरे आतां हरी । एका जनार्दनीं ऐशी करुणा करी ॥३॥
७०५
काचरट पाहतां कडु तें शेंद । परिपाकीं पाहतां गोडचि शुद्ध ॥१॥ कडु तेंचि गोड कडू तेंचि गोड । समरस सोयारिक ॥२॥ साखरेचें वृंदावन केलें । चाखो नेणें तें नाडोनि गेलें ॥३॥ एका जनार्दनीं प्रपंचु एकु । नश्वर म्हणतां नाडला लोकु ॥४॥
७०६
काढिली हळदुली लखलखीत सोज्वळी । जन्म ब्रह्मचळी झालें तिये ॥१॥ अति सूक्ष्म सुरंग शोभिवंत अंग । ज्यासी होय भाग्य त्यासीच लागे ॥२॥ शेष कूर्मासनीं सतशक्तिपासुनी । भूमिका शोधूनि शुध्द केली ॥३॥ तयावरी देख बहुलें सुरेख । देखतांची सुख होय मना ॥४॥ उठिती वधूवरें हळदुली स्वानंदे । लाज मध्यें मध्यें परम प्रीती ॥५॥ नोवरा मेघश्याम बहुलाल पुरुषोत्तम । उटणी या संभ्रम मूळ केलें ॥६॥ कृष्णमेचु अलंकार लेवूनि सनागर । बैसली सुंदर वामभागीं ॥७॥ वराअंगी भली नोवरी बिंबिली । म्हणती प्रकाशली पुरुषोत्तमें ॥८॥ नोवरी शहाणी आपुला निजगुणी । वश्य चक्रपाणी करुनी ठेली ॥९॥ मुळें पाठविल्या आल्या बारा सोळा । करवली वेल्हाळा उन्मनी चाले ॥१०॥ पदोपदीं त्याग करितसे आनेग । वराचें तें अंग टाकूनि आली ॥११॥ आणिक नवजणी आल्या व-हाडिणी । जयाच्या वचनीं वरु वर्ते ॥१२॥ त्या हितगुजाचिया वरा निजाचिया । सदा यशाचिया काय समीप असती ॥१३॥ सकलांमाजीं वृध्द शांति पैं प्रबुध्द । ते म्हणे हा विध ऐसा आहे ॥१४॥ सर्व स्वयंवरा कुरवंडी करा । मग पाय धरा उटणीया ॥१५॥ उजळूनियां वाती अक्षता पैं देती । भीमकीये म्हणती वेगु करी ॥१६॥ तंव भवया देऊनियां गाठीं न पाहे ते दिठी । सखी म्हणे गोठी कळली मज ॥१७॥ तंव शांति म्हणे सरा सांगेन ते करा । कुरवंडी या वरा ऐसी नोहे ॥१८॥ जया दीपमेळी नाहीं धूम काजळी ।तो दीपु उजळी निरंजना ॥१९॥ ऐकोनि ते बोली भीमकी आनंदली । मनीं म्हणे भली साधु होसी ॥२०॥ मनोगत कळे ऐसें संवाद जे मिळे । तें दैव न कळे काय वश्य झाली ॥२१॥ तेज बीज रुप प्रकाश अमुप । चिद्रत्नाचे दीप भीमकी लावी ॥२२॥ ते प्रकाशता प्रभा सूर्या लोपे उभा । कोंदलेसे नभा लखलखीत ॥२३॥ तो पाहतां प्रकाशु अवघा ह्रषीकेशु । तंव तंव उल्हासु भीमकीयेसी ॥२४॥ त्या प्रकाशावेगळी न निवडे ते बाळी । निजभावें वोवाळी प्राणनाथा ॥२५॥ धन्य तुझें दैव सिध्दी गेले भाव । घेऊनियां नांव पाय मागें ॥२६॥ येरी म्हणे पोटीं काय बोलो ओठी । नांवांची हे गोठी नाहीं यासी ॥२७॥ याच्या नामभेदा नेणवेचि वेदां । नेती म्हणोनि सदा परतला तो ॥२८॥ जेथें रुपाचा दुष्काळू नामाचा विटाळू । उच्चारीचा चळू केवीं चळे ॥२९॥ म्हणे कळलें आतां गो इंद्रिया नियंता । गोवळा म्हणतां दोष नाहीं ॥३०॥ ऐसे विचारुनि बाळा न्याहाळी चरणकमळा । मग म्हणे गोवळा पाय देसी ॥३१॥ तंव पिटली टाळ्या टाळी होसीजे सकळी । भीमकीया रांडोळी भली केली ॥३२॥ त्या वचना संतोषला देतुसे पाउला । वर्तती आंतुला खुणा दोघे ॥३३॥ कृष्ण बहु काळा उटी वेळोवेळां । उठुनी सोज्वळा करुं पाहे ॥३४॥ जैं कृष्ण अंगी लागे तें मागुतें न निघे । मळी लागवेगें निघेल कैंची ॥३५॥ मळी काढावयालागीं पाहे नख भागीं । अभिन्नव तें अंगीं देखियेलें ॥३६॥ सहित रवि चंद्र आणि क्षीरसागर । बिंबसे अरुवार नखामाजीं ॥३७॥ शेषाचिया बहुला श्रीकृष्ण नोवरा । उटणे सुंदरा करवी त्या ती ॥३८॥ तेथें व-हाडी हे देव बैसलेजी सर्व । अक्रुर उध्दव चवरे ढाळा ॥३९॥ देवकन्या व-हाडिणी भोंवल्या सवासिणी । हळदी लावी चरणीं क्षीरात्मजा ॥४०॥ ऐसे कृष्णनखी देखे एकाएकी । देखतां भीमकी मूर्च्छित झाली ॥४१॥ तेथें आश्वासित गुरु म्हणे स्थिरु स्थिरु । निर्धारेंसी धरी धिरु बाळे ॥४२॥ तंव बाष्प दाटे कंठी कंप जाली गोरटी । उन्मळितां दृष्टी होउनी ठेली ॥४३॥ तंव धांविन्नली धाये म्हणे झाले काये । झणे तुज माये दिठी लागे ॥४४॥ जें दृष्टी देखिले तें न बोलवे बोले । धायें तें वरिलें संज्ञेनें ॥४५॥ कृष्ण ओहणीचें बिरडें फ़ेडी आपुले चाडे । सुभद्रा हे लाडे बोलतीसे ॥४६॥ मेहुणे म्हणती जगजेठी जाणे हातवटी । यमुनेच्या तटीं अभ्यासू केला ॥४७॥ तंव यादव म्हणती कृष्णा उशीर कां येसणा । बिरडिया फ़ेसण पाहूं आम्हां ॥४८॥ झुंझारा विराचें बिरडें फ़ेडिलें । मग इथें परणीलें राजबाळें ॥४९॥ कृष्ण पाहे दृष्टी तंव बिरडें सुटे गांठी । कांचोळी समदृष्टी द्वैताची फ़ेडी ॥५०॥ पाहा गे नवल केलें डोळांचि उगविलें । बिरडें काढिलें नयनबळें ॥५१॥ कृष्णदृष्टीपुढें फ़िटे संसार बिरडें । मग हें केवढें नवल त्यासी ॥५२॥ व्रत तप याग करितां न टिके अंग । परि भाग्य सभाग्य भीमकी्चें ॥५३॥ मुखां मुख सन्मुखी बैसविली भीमकी । लाजे अधोमुखीं होउनी ठेली ॥५४॥ तंव तळीं कृष्णमुख देखिलें सन्मुख । पाठिमोरी देख होउनी ठेली ॥५५॥ मागाहीं ते मूर्ति सन्मुख श्रीपती । म्हणे मी केउती रिघों आतां ॥५६॥ वाम सख्य दिशा पडिला कृष्ण ठसा । लाज ह्रषीकेशा माजीं नुरे ॥५७॥ यापरी गोरटी कृष्णी लाजे भेटी । मग उघडियेली दृष्टी स्वरुप बळें ॥५८॥ सुभद्रा म्हणे चांग उटी ईचें आंग । स्वलीला श्रीरंग हळदी घेती ॥५९॥ तंव रेवती म्हणे देवा आधीं घ्यावें नांवा । हळदुली मग लावा उटी इसी ॥६०॥ मज नांव घेतां लाज नाहीं आतां । सावधान चित्ता ऐका तुम्ही ॥६१॥ नामा हे रुपाची गुणमयी गुणाची । प्रिया हे कोणाची कवण जाणे ॥६२॥ माझें येथें लक्ष वधुवरासी साक्ष । पुसा पां प्रत्यक्ष रुक्मिणीसी ॥६३॥ ऐकोनी तया नांवा गहिंवरु उध्दवा । तटस्थ यादवा सुरवरांसी ॥६४॥ कवण जाणे लीळा आकळ याची कळा । हांसती सकळ व-हाडिणी ॥६५॥ यावरी श्रीरंगे हळदी घेऊनि स्वांगे । उटीतु अष्टांगें रुक्मिणीचीं ॥६६॥ कृष्णकरयोगें सबाह्य निवों लागे । जाणतील अंगे अनुभवीये ॥६७॥ लाभु चरणकमळा जाणें ब्रम्हबाळा । त्याचिया करतळा वैदर्भी भोगी ॥६८॥ हा ईशु ब्रम्हादिकी तो सेवक भीमकी । केलासे कवतीकी हळदी मिसें ॥६९॥ दासाचाही दासु साचा ह्रषीकेशु । भीमकीया उल्हासु देतु असे ॥७०॥ जया जैसा भावो तया तैसा देवो । भक्तीचा निर्वाहो हाचि जाणें ॥७१॥ कृष्णचरणावरती सुरंग अक्षता । भीमकीये माथां ठेवी वेगीं ॥७२॥ येरी आनंदली रोमांचित जाली । कपाळा पैं आली दशा आजी ॥७३॥ तंव सखीया देखोन दिठी लाज आली पोटीं । तोचि भेदु दृष्टी आशंकेचा ॥७४॥ तेणें चुकविलें समचरण तत्वतां न लगती अक्षता । नमस्कारी माथां भूमि लागे ॥७५॥ तंव अभिमानली बाळी धरी अंगुष्ठ करतळीं । नमन इये वेळीं चुकों नेदी ॥७६॥ मस्तक जंव लोटी तंव पायां पडे फ़ुटी । अभिमानें तुटी चरणकमळा ॥७७॥ नमस्कार भले मागुतें अवंगिलें । तंव समचरणीं पाउलें दिसों नेदी ॥७८॥ अभिमानाचें बळ तें जाली पटळ । नेणें चरणकमळ अंतरले ॥७९॥ उश्वासें निश्वासें स्फ़ुंदे ते कामिनी । आसुवें लोचनीं पूर्ण आलीं ॥८०॥ मनीं ऐसी आस नमीन सावकाश । ते दैव उदास आजी जालें ॥८१॥ म्हणे कटकटा धांत्रया विकटा । चरण लल्लाट न भेटती ॥८२॥ आजि हें कपाळ जालें हें निर्फ़ळ । कृष्णचरणकमळ नातळती ॥८३॥ चंडवातें केळी कांपे चळचळी । त्याहुनी वेगळी भीमकी दिसे ॥८४॥ गळती कांकणें अवस्था भूषणें । अवशेष प्राणें मूर्च्छित जाली ॥८५॥ देखोनि तो भावो गहिंवरे उध्दव । एकाएकीं देव निष्ठुर जाले ॥८६॥ भीमकी आनंद मेळीं न संडे उकळी । उध्दव ते वोसंडला ॥८७॥ नेत्रीं आनंदजळ वहातसे सोज्वळ । म्हणे धन्य बाळ भीमकाची ॥८८॥ धरुनी तिची बाहे म्हणी उठी माये । नमस्कारी पाये या वरिष्ठाचे ॥८९॥ सांडिली लाज अभिमान निर्विकल्प मन । मस्तकीं श्रीचरण धरुनी ठेली ॥९०॥ यापरी कामिनी घाली लोटांगणी । जडली कृष्णचरणीं उठवेना ॥९१॥ तें अभिनव मुख फ़िटलें जन्मदु:ख । विसरली नि:शेख देहभावा ॥९२॥ तेथें सुखें वांकुलिया बोधाच्या गुतकुलीया । उसळती उकलीया आनंदाच्या ॥९३॥ अहं सोहं गांठी सुटल्या चरणभेटी । आनंदुची सृष्टी हेलावतु ॥९४॥ सेव्य सेवक भावो नाठवे विवाहो । देवी आणि देवो एक जाली ॥९५॥ सच्चिद पाउली स्वानंदु तळवटी । जाहली उठाउठी सहजीं निज ॥९६॥ तेथें वाच्यवाचक मौन ना जल्पक । म्हणावें ते एक म्हणतें नाहीं ॥९७॥ हरी म्हणे वेल्हाळ झणीं होय बरळ । करिती कोल्हाळ सोयरे या ॥९८॥ उपराटी विकडी देवासी सांकडी । सावध हे किडी केवीं होय ॥९९॥ त्या सुखाचे अंतरीं प्रवेशले हरी । तंव विसरली सुंदरी सावध करुं ॥१००॥ दोघां एक सुख लागली टकमक । चेतविते देख कवणा कवण ॥१॥ त्या मुखा वेगळी न निवडे ते बाळी । सुखेसी वेल्हाळी उठविली ॥२॥ त्या देहा जरी येणें तरी देह मी न म्हणें । अवघी कृष्णपणें रचली असे ॥३॥ चराचर दिसे तें मजमाजींच असे । रचले मदांशें ब्रह्मगोळ ॥४॥ ऐसी कृष्ण रुक्मिणी बैसली ऐक्य होउनी । तटस्थ अस्तानी काय सकळीकेसी ॥५॥ तो सोहळा देखोनि एका जनार्दनीं । उल्हासु जनीं वनीं साठवेना ॥६॥ त्या आनंदाचा लोंढा न कळे उदंडा । तेणें सुखें झेंडा नाचतसे ॥७॥ एका जनार्दनीं बोलतांची मौनी । हळदुली कैसेनी हातां आली ॥८॥ पितामहाचा पिता सुभानु तत्वतां । हळदुली हे कथा येथुनी जाली ॥९॥
७०७
काढी काढी भ्राती देहाची सर्वथा । प्रपंचाची चिंता नको तुज ॥१॥ सर्वभावें शरण विठठलासी जाई । ठायीचाचि ठायीं निवारिल ॥२॥ देह गेह माझें म्हणणें हें दुजें । सर्व विठ्ठलाराजे समपीं तुं ॥३॥ एका जनार्दनी करी आठवण । चिंती तुं पावन परब्रह्मा ॥४॥
७०८
कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल । कानडा विठ्ठल विटेवरी ॥१॥ कानडा विठ्ठल नामें बरवा । रुपें विठ्ठल हृदयीं ध्यावा ॥२॥ कानडा विठ्ठल रुपे सावळां । कानडा विठ्ठल पाहिला डोळा ॥३॥ कानडा विठ्ठल चंद्रभागे तटी । कानडा विठ्ठल पहावा उठाउठी ॥४॥ कानडा विठ्ठल कानड बोले । कानड्या विठ्ठलें मन वेधियलें ॥५॥ वेधियेलें मनकानडीयानें माझें । एका जनार्दनीं दुजें नाठवेची ॥६॥
७०९
कानावाटें मी नयनासी आलों । शेखीं नयनाचा नयन मी जाहलों ॥१॥ दृष्टीद्वारां मी पाहे सृष्टीं । सृष्टी हरपली माझें पोटी ॥२॥ ऐसं जनार्दनें मज केलें । माझें चित्ताचें जीवपण नेलें ॥३॥ एका जनार्दनीं जाणोनि भोळा । माझा सर्वांग जाहला डोळा ॥४॥
७१०
कान्ता ही अबला नाहीं तिसी ज्ञान । माझें वृध्दपण जाहलें आतां ॥१॥ नवस करुनी हा मागितला नामा । संसार विश्राम होईल आम्हां ॥२॥ येणें तो मनीं धरिला विठ्ठल । याजकडे नाहीं बोल प्रारब्धेंचि ॥३॥ एका जनार्दनीं ऐसा होय कष्टी । तो दामशेटी आपुले मनीं ॥४॥
७११
कान्होबा खेळ खेळू रानीं । तुम्हीं आम्हीं दोघे मिळोनी ॥१॥ हमामा रे भाई हमामा ॥धृ॥ हमामा घाली मत्स्य अवतारी । शंखासुरा धरुनी मारी ॥२॥ हमामा घाली समुद्रतीरीं । धरुनी पर्वत पाठीवरी ॥३॥ हमामा घाली नानापरी । पृथ्वी धरुनी दाढेवरी ॥४॥ हमामा घाली हिरण्य कश्यपाघरीं । प्रगटुनी स्तंभामाझारीं ॥५॥ हमामा घाली बळीचे द्वारीं । आपण होऊनि भिकारी ॥६॥ हमामा घाली परशु हातीं । निःक्षात्री पृथ्वी केली जगतीं ॥७॥ हमामा घाली लंकेवर । केला बिभीषण राज्यधर ॥८॥ हमामा घाली नंदाघरीम । गोपाळ नाचती गजरीं ॥९॥ हमामा घाली भीमातटीं । उभाचि धरुनि कर कटीं ॥१०॥ एका जनार्दनी खेळ । नानापरीचा आकळ ॥११॥
७१२
कान्होबा नवल सांगतों गोष्टी । एक वृक्ष दृष्टी देखिला तयावरी सृष्टी ॥१॥ कोडें रे कोडें कान्होबा तुझें कोडें । जाणती जाणती अर्थ पाहतां उघडें ॥ध्रृ०॥ वृक्षाग्री नाहीं मूळ वर शेंडा नाहीं सरळ । बावन शाखा पल्लव पत्र पुष्प भरलें सकळ ॥२॥ एका जनार्दनींक वृक्ष सुढाळ । तयांवरी खेळे एक एकुलतें बाळ ॥३॥
७१३
कान्होबा सांभाळी आपुली गोधनें तुझ्या भिडेनें कांहीं न म्हणे ॥१॥ तुं बैसासी कळंबाखाली । वळती देतां आमुचे पाय गेली ॥२॥ तुझीं गोधनें बा अचाट । धांवती देखोनी विषय हिरवट ॥३॥ तूं बैसोनी करिसी काला । आमुच्या शिदोर्‍या करुनी गोळा ॥४॥ खातोसी दहीं भाताचा गोळा । आम्हाकदे न पहासी उचलोनी डोळा ॥५॥ वेधिलें आमुचे जीवपण । ठकविलें आम्हाकारण ॥६॥ एका जनार्दनीं परमानंद । आम्ही भुललों तुज गोविंदा ॥७॥
७१४
काम क्रोध नाहीं अंगीं । तोचि नर जन्मला जगीं ॥१॥ तयाचें होतां दरुशन । तुटे देहाचें बधन ॥२॥ अरुणोदयीं जाण । तम निरसे सहज आपण ॥३॥ एका जनार्दनीं शरण । नोहे एकपणावांचून ॥४॥
७१५
काम क्रोध मद मत्सर शरीरी । रात्रंदिवस निर्धारीं छळिताती ॥१॥ आशा तृष्णा भ्रांति भुली हे वासना । सदोदित मना छळिताती ॥२॥ एका जनार्दनीं यांचा टाकी संग । मग पांडुरंग हातीं लागे ॥३॥
७१६
काम क्रोध लोभ दंभ मद मत्सर । षड्‌वैरी तत्पर हेचि येथें ॥१॥ क्षुधा तृष्णा मोद शोक जरा मरण । षडऊर्मी पूर्ण देहीं हेंची ॥२॥ आशा मनीषा कल्पना इच्छा तृष्णा वासना । हे अठरा गुण जाणा देहामाजीं ॥३॥ एका जनार्दनीं त्यजोनि अठरा । तोचि संसारामाजीं शुद्ध ॥४॥
७१७
काम क्रोध लोभ नाहीं संतां अंगी । वर्तताती जगीं जगरुप ॥१॥ नातळोनी संसारा दाविती पसारा । भाव एक खरा विठ्ठलपायीं ॥२॥ आणिकांची स्तुति नायकती कानीं । न बोलती वचनीं वायां बोला ॥३॥ एका जनार्दनीं तेचि संत तारू । भवाचा सागरु उतरिती ॥४॥
७१८
काम क्रोध वैरी हे खळ । लोभ अहंकार आशा बरळ । कर्म बळीवंत लागलें सबळ । तेणें वेधिलें आमुतें निखळ ॥१॥ नको नको वियोग हरी । येई येई तूं झडकरी । आम्हा भेटें नको धरुं दुरी । वियोग झाला तो आवरीं ॥२॥ तुझिया भेटिंचे आर्त मनीं । याकारणें विरह बोलणें वाणी । एका शरण जनार्दनीं । वियोग गेला पाहतां समचरणीं ॥३॥
७१९
कामक्रोध लागले मागें । तप करुनी काय सांगें ॥१॥ कायसा जाशी वनांतरीं । कामक्रोध भरले अंतरीं ॥२॥ वनीं जाऊनियां चिंता । रात्रंदिवस घोकिशी कांता ॥३॥ योग अभ्यास न कळे वर्म । शिणतो मूढ धांवतें कर्म ॥४॥ कर्मे लिहलीं न चुके रेखा । म्हणे जनार्दनीं एका ॥५॥
७२०
कामक्रोध वैरीयांचे तोडियेले फांसे । जनार्दनें सरसें केलें मज ॥१॥ देहाची वासना खंडुन टाकिली । भ्रांतीची उडाली मूळ दोरी ॥२॥ कल्पनेचा कंद समूळ उपडिला । हृदयीं दाविला आरसा मज ॥३॥ एक जनार्दनीं सहज आटलें । स्वदेहीं भेटलें गुरुकृपें ॥४॥
७२१
कामधेनु देउनी पालटा । अजा घे जैसा करंटा ॥१॥ तैसा ठकला कीर्तनीं । निशिदिनीं गाय गाणीं ॥२॥ दवडोनियां हिरकणीं । वेंची आनंदें गारमणी ॥३॥ ऐसा अभागी पामर । एका जनार्दनीं म्हणे खर ॥४॥
७२२
कामाचिया आशें घडला प्रकार । राहिला वेव्हार प्रपंचाचा ॥१॥ भाजन घडणें राहिलें सर्वथा । पडियेली चिंता अन्नवस्त्रा ॥२॥ उदरानिमित्त कष्ट बहु करिती । निर्भय तो चित्तीं असे गोरा ॥३॥ एका जनार्दनीं न सोडीच भजन । पाहूनि नारायण काय करी ॥४॥
७२३
काय ऐसा यासी मानला विचार । संसार पसर गोड वाटे ॥१॥ बुडतां देखती आणि कांसी डोळे । परि नुमजे अंधळे बळें होती ॥२॥ सायांसें शिणती माझें म्हणोनियां । एका जनार्दनीं वायां जाती हीन ॥३॥
७२४
काय चरितार्थ प्रपंचाचा आहे । सुदामा तो लाहे नेत्रीं जळ ॥१॥ एक मास येथें राहिलें निवांत । घरची तों मात न कळे कांही ॥२॥ जोडोनियां हात विनवी चक्रपाणी । आज्ञा मजलागुनी द्यावी आतां ॥३॥ एका जनार्दनीं नाटकी तो देव । दावितसे भाव भक्तालागीं ॥४॥
७२५
काय जाणों विधि- । निषेधाचे ते बुद्धी ॥१॥ आम्ही गाऊं नाम मुखें । नाचुं सुखें कीर्तनीं ॥२॥ न पडो भलतिया भरीं । वाचे म्हणों हरिहरी ॥३॥ एका जनार्दनीं शरण । विधिनिषेध गेला पूर्ण ॥४॥
७२६
काय तुझें वेंचे देवा । मन आपुलें स्वाधीन ठेवा ॥१॥ हेंचि मागणें तुजप्रती । वारंवार हें विनंती ॥२॥ माझी ठेवा आठवण । म्हणे एका जनार्दन ॥३॥
७२७
काय तें वैराग्य बोकडाचे परी । भलतीया भरीं पडतसे ॥१॥ काय ती समाधी कुकुटाचे परी । पुढेंचि उकरी लाभ तेणें ॥२॥ बैसोनी आसनीं वाउगें तें ध्यान । सदां लक्ष्मी मान आपुलाची ॥३॥ घालूनियां जेठा बैसतो करंटा । करीतसे चेष्टा मर्कटापरी ॥४॥ नाहीं शुद्ध कर्म योगाचा विचार । सदां परद्वार लक्षीतसे ॥५॥ ऐशिया पामरा कासया तो बोध । एका जनार्दनीं शुद्ध खडक जैसा ॥६॥
७२८
काय नपुंसका पद्मिणीचे सोहळे । वांझेसी डोहळें कैंचे होती ॥१॥ अधांपुढें दीप खरारी चंदन । सर्पा दुधपान करुं नये ॥२॥ क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैंचा । व्यर्थ आपुली वाचा शिणवुं नये ॥३॥ खळाची संगतेरे उपयोगासी नये । आपण अपाय त्याचे संगे ॥४॥ वैष्णवीं कृपथ्य टाकिलें वाकुळीं । एका जनार्दनीं तेचि भले ॥५॥
७२९
काय मनुष्यदेहाचें होय । नाशिवंत जाय शेवटीं ॥१॥ हें तो काळाचें खाजें सहजी । कांहीं तरी राजी हरि करा ॥२॥ जाता आयुष्य न लगे वेळ । स्मरें घननीळ रामराणा ॥३॥ एका जनार्दनीं भाकी कींव । वायां हांव धरूं नका ॥४॥
७३०
काय याचे मुखीं बैसे दांतखीळ । नामोच्चारा बळ क्षीण होतें ॥१॥ काय याचे कर्ण बधिर पैं वहिले । हरिकीर्तनीं जाहले पांगुळ ते ॥२॥ काय याचे नेत्रां अंधत्व तें आलेक । न देखती सांवळें रूप कधीं ॥३॥ एका जनार्दनीं ऐसा तो चांडाळ । त्याचा मन विटाळ नको नको ॥४॥
७३१
काय याचें बोलें तुज वाटतसे कोडे बोलते सांवळा अवघे वितंड ॥१॥ पुरें तुझें गाव नको आतां वस्ती । आम्हीं जाऊं सर्व मिळुनि मथुरेप्रती ॥२॥ नाहीं तसे बोल बोलतसे वायां । एका जनार्दनीं हा तुझा कान्हया ॥३॥
७३२
काय वानुं हरिचा महिमा । आगमानिगमां अतर्क्य ॥१॥ वेदशास्त्रें शिणोनि ठेलीं । पुराणें निवांत राहिलीं ॥२॥ दरुशनें तटस्थ होऊन । धरुनी ठेलीं तीं मौन ॥३॥ श्रुती अनुवादा जो नये । त्यासी एका जर्नादनीं ध्याये ॥४॥
७३३
काय सांगू यशोदेबाई । आम्ही घरांत बैसलों पाहीं । कृष्ण आला लवलाही । म्हणे मज भूक लागली ॥१॥ ऐसा लाघवी हा हरी । खोडी करी नानापरी । धारितां न धरवे निर्धारीं । जातों पळुनिया दुरी ॥२॥ माझी सुन एकली घरीं । नाहात होती परसद्वारीं । आपण येउनि झडकरी । उभा पुढें राहिला ॥३॥ तवं ती म्हणे का आलासी । कृष्ण म्हणे तूं परियेसी । मी खेळत होतों बिदीसीं । चेंडु उडोनियां आला ॥४॥ तंव ती म्हणे पाहे कृष्णा । क्रियाहीन नष्ट तूं कान्हां । घाली मिठी धरी स्तना । कां गे चेंडू देईना ॥५॥ तव ती म्हणे परतां सर । कृष्ण म्हणे दे चेंडूं सत्वर । एका जनार्दनीं निर्धार । परा भक्ति हे साचार ॥६॥
७३४
काय सुख आहे संसारीं । म्हणोनि भरलासी हावभरी । वाचे स्मरे श्रीहरी । दिननिशीं प्रपंचीं ॥१॥ जन्म जाहलीयापासोन । सदा संसाराचें ध्यान । नाहीं कधीं आठवण । न ये मुखीं रामनाम ॥२॥ ऐसा भार वाही खर । परितया न कळे साचार । आहे पुढें यातना अघोर । हें कांहीं नाठवीं ॥३॥ ऐसें होतां भरलें आयुष्य । मृत्युं पुन्हां येत जन्मास । ऐशा भोगी चौर्‍यांयशी निःशेष । एका जनार्दनीं म्हणे त्यास लाज नाहीं ॥४॥
७३५
काया वाचा आणि मन । एक करुनी करी भजन ॥१॥ हाचि मुख्य भजनभावो । सांडीं भेद अभेदाचा ठावो ॥२॥ मना धरुनियां शांती । प्रेमें भजें कमळापती ॥३॥ एका जनार्दनीं भजन । तेणें पावसी समाधान ॥४॥
७३६
काया वाचा आणि मन । जयाचें ध्यान संतचरणीं ॥१॥ तोचि पावन जाहला जगीं । दुजे अंगीं कांहीं नेणें ॥२॥ सदा वाचे गाय नाम । न करी काम आणीक तो ॥३॥ एका जनार्दनीं देव । नेदी तया दुजा ठाव ॥४॥
७३४
काया वाचा आणि मन । संत चरण प्रमाण ॥१॥ ऐसें चालत आलें मागें । तया वाउगेंक कोण करीं ॥२॥ उपासना मार्ग आधीं । भाविकांसी ती समाधी ॥३॥ एका जनार्दनीं आस । आहे पायांस दास्यत्वें ॥४॥
७३८
काया वाचा मन एकविध करी । पाहे तो श्राहरी पंढरीये ॥१॥ ब्रह्मादिका जया ध्याती शिवादि वंदिती । ती विटेवरी मूर्ति पांडुरंग ॥२॥ वेद पै भागले शास्त्रें वेवादती । पुराणांसी भ्रांती अद्यापवरी ॥३॥ नेति नेति शब्दें श्रुति त्या राहिल्य । न कळे तयाला पार त्याचा ॥४॥ एका जनार्दनीं भक्तालागीं सोपा । भीमातटीं पाहें पां विठ्ठलासी ॥५॥
७३९
कायाक वाचीक मानसीक । सदां वसे राम एक ॥१॥ तो नर अथवा नारी । हो कां पतीत दुराचारी ॥२॥ सदा वसे राम ध्यानीं । आणिक कांही नाहीं मनीं ॥३॥ एका जनार्दनी जनीं । राम पाहें मनी ध्यानीं ॥४॥
७४०
कायावाचामनें । कृपाळू दीनाकारणें ॥१॥ ऐसा समर्थ तो कोन । माझ्या जनार्दनावांचुन ॥२॥ माझें मज दाखविलें । उघडें वाचे बोलविलें ॥३॥ जनीं जनार्दन । एका तयासी शरण ॥४॥
७४१
कायावाचामनें छंद । धरा गोविंद ह्रुदयीं ॥१॥ नका जाऊं लिगाडामागें । ऐसें सांगे वेदशास्त्र ॥२॥ पुराण पठण यज्ञयाग । नोहे भाग कलीमाजीं ॥३॥ एका जनार्दनीं नाम सार । उतरील पार भवसागरीं ॥४॥
७४२
कायावाचामनें निग्रह करीं । कीर्तन सर्व भावे ऐकें निर्धारीं । अष्टांग साधन न करी । सुखें करी कीर्तन ॥१॥ देव तुष्टेल तुष्टेल । सर्वभाव तुझा पुरवेल ॥ध्रु॥ शांती क्षमा दया उन्मनी । आशा मनीषा तृष्णा दवडोनी । काम क्रोध मद लोभ बंदीखानी । घालीं नेउनी निर्धारें ॥२॥ सर्वांभुतीं समदृष्टी । पाहे सर्व एकमय सृष्टी । तरी ऐक्य कीर्तनगोठीं । परमानंदें आल्हाद ॥३॥ धरी संतांचा सांगात । कीर्तनीं करीं शुद्ध चित्त । एका जनार्दनीं वचनार्थ । राम हरि गोविंदा ॥४॥
७४३
कायिक वाचिक मानसिक भाव । ठेवीं हा निःसंदेह देवापायीं ॥१॥ काय उणें मग न लगे सांकडें । उगवेल कोंडें द्वैतांचें तें ॥२॥ आशा मनीषा तृष्णा पडतील वोस । धरितां उल्हास रामनामीं ॥३॥ एका जनार्दनीं विश्वास हो मनीं । प्रत्यक्ष पुराणां बोलिलें तें ॥४॥
७४४
कार्य कर्ता आणि कारण । त्रिगुणेशीं त्रिपुटी शुन्य ॥१॥ अंगीं गुण आदळतां तिन्हीं गुण । जया चित्तवृत्ति नोहे भिन्न ॥२॥ ऐसा त्रिगुणावेगळां । एका जनार्दनीं पाहे डोळां ॥३॥
७४५
काळ आला रे जवळी । वाचे जपें नामावळी ॥१॥ अंतकाळीं जाण । तुज होईल बंधन ॥२॥ नको गुंतूं संसारा । चुकवी जन्ममरण फेरा ॥३॥ कोनी कोणाचे न सांगाती । अवघे सुखाचेच होती ॥४॥ एका जनार्दनीं शरण । कायावचामनें जाण ॥५॥
७४६
काळाची ती ऐशी सत्ता । भरतां न पुरे एक क्षण ॥१॥ यांत कांहीं हित करा । राम स्मरा निशिदिनीं ॥२॥ नुमगे शेवट घडी येती । गुंतती तत्त्वतां देह आशा ॥३॥ शरण एका जनार्दनीं । करा सोडवणी देहाची ॥४॥
७४७
काळाचे आहारीं । पडसी शेवटीं निर्धारीं ॥१॥ ऐसें असोनि ठाउक मना । परि न स्मरे रामराणा ॥२॥ गुंतले ते मायाजाळीं । न कळे गळीं लागती ॥३॥ एका जनार्दनीं शरण । वाचे न म्हणती नारायण ॥४॥
७४८
काळाचे तो न चले बळ । करितां कल्लोळ कीर्तनीं ॥१॥ शिव सांगे गिरजेप्रती । कीर्तनीं प्रीति धरावीं ॥२॥ सांगे शुक परिक्षिती । कीर्तनीं उद्धार पावती ॥३॥ एका अनन्य त्यांचा दास । धरतीं आस कीर्तनीं जे ॥४॥
७४९
काळाचेंशासन । गातां श्रीहरीचे गुण ॥१॥ ऐसें सुलभ नाम वाचे । घेई घेई गोविंदाचे ॥२॥ संसाराचा छंद । येणें तुटे भवकंद ॥३॥ एका जनार्दनीं नाम । भवसिंधु तारक धाम ॥४॥
७५०
काळानें ग्रासिलें सावधान व्हा रे । सोडवण करा रे हरिनामें ॥१॥ आयुष्य सरलीया कोण पां सांगाती । पुढें हो फजिती यमदंड ॥२॥ उपाय तो सोपा नामाचा गजर । न करी विचार पुढें काहीं ॥३॥ एका जनार्दनीं तूं कां रे अंधळा । देखतोसी डोळां सुख दुःख ॥४॥
७५१
काळिकाळावरी नाम । जाले जैसे मनोधर्म । वदतं पुरुषोत्तम । पुण्य जोडे असंख्य ॥१॥ वाचे सदा श्रीराम । तेणें पुरे सर्व काम । मोक्षामार्ग सुगम । नाम उच्चारणें जोडें ॥२॥ आधीं पाहिजे विश्वास । म्हणा आम्हीं विष्णुदास । पापाच तो लेश । कद नुरे कल्पातीं ॥३॥ धरा वैष्णव सांगात । आणिक नका दुजा हेत । एका जनार्दनीं चित्त । रामनामीं असों द्या ॥४॥
७५२
काळी घोंगडी हातीं काठी । लागला धेनुंचे पाठी ॥१॥ अरे हरी व्रज वांकुंडा कीं तुजसाठीं । बैसला यमुनेचे तटीं ॥२॥ राधा गोरटीं हातीं वाटी । लागली कृष्णाचे पाठी ॥३॥ एका जनार्दनीं झाली दाटी । घातली पायांवर मिठी ॥४॥
७५३
काळे गोरे एकापुढें एक । धांवताती बिदो बिदीं देख । अलक्ष लक्ष्या नये सम्यक । तो नंदनंदन त्रिभुवननायक गे माय ॥१॥ गाईवत्स नेताती वनां । गोपाळ म्हणती अरे कान्हा । जो नये वेदा अनुमाना । ज्यासी चतुरानन ध्यानीं ध्यातसे ॥२॥ जें योगिजनांचे ध्येय ध्यान । ज्याकरणें अष्टांग योगसाधन । तयांसि नोहे कधीं दृश्यमान । तो गौळ्यांचें उच्छिष्ट खाय जाण गे माय ॥३॥ एका जनार्दनीं व्यापक । सर्वां ठायीं समसमान देख । अरिमित्रां देणें ज्यांचे एक । तो हा नायक वैकुठींचा ॥४॥
७५४
काळें काय वायां जातु । तेणें होय आयुष्य अंतु ॥१। जाणोनियां रक्षी कोण । सोडी देहाचा अभिमान ॥२॥ अभिमान सांडोनि झडकरी । एका जनार्दनीं दास्य करी ॥३॥
७५५
काळें ग्रासिलेंक सकळ । उरला जाऊं नेदी वेळ । घटिका आणि पळ । रामनाम स्मरे जना ॥१॥ अरे आलेती संसारा । कांहीं ती विचार करा । आयुष्याचा दोरा । तुटे तो न कळेची ॥२॥ करुणा नाहीं तया यमासी । काढिती वोढिती जिवासी । भोगविती चौर्‍यांशी । यातना ते दुस्तर ॥३॥ म्हणोनी येतसे करुणा । शरण एका जनार्दना । वाचें रामनाम म्हणा । मग सुख पावाल ॥४॥
७५६
काळें ना सांवळें गोरें नापिवळें । वर्ण व्यक्ति वेगळें विटेवरी ॥१॥ आनंद स्वानंद नित्य परमानंद । आनंदाचा कंद विटेवरी ॥२॥ निगुण सगुण चहुं वांचावेगळा । आदि अंत पाहतां डोळां न दिसे कांहीं ॥३॥ एका जनार्दनीं देखिला तो डोळा । त्रिगुणा वेगळा विटेवरी ॥४॥
७५७
काळ्या कांबळ्याची घडी । घालिताती सवंगडी बैसवुनि हरी । कवळ घेती ॥१॥ कृष्ण अपुलेनी हातें । कवळ घाली गडियातें । तयांचीं उच्छिष्ट शितें । घालितसे मुखीं ॥२॥ मुखामाजीं कवळ । सवंगडे घालिउती सकळ । वैकुंठीचा पाळ । ब्रह्मानंदें डुल्लत ॥३॥ तृप्त झाला जनार्दन । एका वंदीतसे चरण । काया वाचा मन । खुन भक्त जाणती ॥४॥
७५८
काशी क्षेत्र श्रेष्ठ सर्वांत पवित्र । परी तेथें वेंचे जीवित्व श्रेष्ठ तेव्हा ॥१॥ तैसी नोहे जाण पंढरी हे । पेठ वैकुंठा वैकुंठ जुनाट हें ॥२॥ न लगें वेंचणें धन वित्त जीव । मुख्य एक भाव पुरे येथें ॥३॥ दरुशनें मुक्ति प्राणिया सर्वथा । चुकती नाना चळता पापांचिया ॥४॥ एका जनार्दनीं पंढरीसी जा रे । प्रेमसुख मागा रे विठ्ठल देवा ॥५॥
७५९
कासया निर्मिला अपवित्र संसार । न घडे विचार योग्यायोग्य ॥१॥ दिननिशीं मना द्रव्याची वासना । परी नारायणा स्मरण नाहीं ॥२॥ ऐसी मी भुललों प्रपंच लिगाडीं । एक जनार्दनीं उडी घाली देवा ॥३॥
७६०
कासया संसार लाविला छंद । तेणें हा गोविद अंतरला ॥१॥ न कळे दिवस जातो तेंकळेना । संसार फिरतसों ॥२॥ एका जनार्दनीं भाकितो करुणा । माझिया वचना चित्त द्यावें ॥३॥
७६१
कासया साधन तपाचिया हावा । पाचरितां धावो येतो लवलाही ॥१॥ ऐसा अंकिला धांवे वचनासाठीं । पहा जगजेठी भक्तकाजा ॥२॥ संकटीं पडला गजा नक्रमिठी । धांवे उठाउठीं ब्रीदासाठीं ॥३॥ अळीकर धांकुटा ध्रुव बैसे वनीं । तयासी तत्क्षणीं अढळ केलें ॥४॥ पडतां संकट द्रौपदी करीं धांवा । धांवे लवलाह्मा सारुनी ताट ॥५॥ एका जनार्दनीं भक्तकाज कैवारी । धांवे सत्वारीं आपुल्या लाजा ॥६॥
७६२
कासयासी मूढा करिती संसार । पुढें तो अघोर थोर आहे ॥१॥ बळेंचि कां रे नागवासी पाहतां । विषयभोग भोगितां दुःख बहु ॥२॥ पातकाची राशी हे तो कन्यापुत्र । तूं कां रे पवित्र त्यांसी म्हणसी ॥३॥ एका जनार्दनीं नाशिवंतासाठीं । देवासवें तुटी पाडितोसी ॥४॥
७६३
कासयासी हटयोग धूम्रपान । घालुनी आसन चिंती वेगीं ॥१॥ सोपा रे मंत्र राम अक्षरें दोनी । जपतां चुके आयणी चौर्‍यांशीची ॥२॥ मागें बहुतांचा उपदेश हाची । तरले रामनामेंची पातकी जन ॥३॥ एका जनार्दनीं रामनाम ख्याती । जाहलीपै विश्रांती शंकरासी ॥४॥
७६४
कासियासी तपा धांवा । जवळी असतां शेजे गांवा ॥१॥ रामा जवळी चुकले । तप तपें भांबावले ॥२॥ तीर्थी नाहीं क्षेत्रीं नाहीं । जवळी असतां भ्रांति पाहीं ॥३॥ असतां सबाह्मभ्यंतरीं । नाहीं म्हणुनी दैन्य करी ॥४॥ तयालगीं सैरा हिंडे । तोचि तया मागें पुढें ॥५॥ एका जनार्दनीं योग । रामचि होय सर्वांग ॥६॥
७६५
किती काकुलती यावें । किती वेळां फजीत व्हावें ॥१॥ न भीचि तो यमदंडा । जैसा मेंढा मातलासे ॥२॥ भलतिया वरी धांवें । श्वान जैसें ते स्वभावें ॥३॥ एका जनार्दनीं जाण । वाहतो देवाची तो आण ॥४॥
७६६
किती किती जन्म किती किती फेरे । किती किती अघोरें भोगिताती ॥१॥ न सुटे न सुटे न सुटे बंधन । याची आठवण धरा चित्तीं ॥२॥ किती किती विषय भोगिती वासना । यमाचे सदना जावयासी ॥३॥ एका जनार्दनीं न करी विचार । नरक तो अघोर भोगिताती ॥४॥
७६७
किती बोलूं किती सांगूं । नायकती त्यांचा न सरे पांगु ॥१॥ जातां न राहाती आडवाटे । मोडती काटें कर्मधर्म ॥२॥ वाउगे पंथें असती जनीं । तसे मांडणी गुंतू नका ॥३॥ एका जनार्दनीं लडिवाळ । पूर्ण कृपाळू संतांचा ॥४॥
७६८
किती वेळां जन्म किती वेळां मृत्यु । हाचि न कळे अंतु भाग्यहीना ॥१॥ जन्मोनीं संसार मानितां बरवा । परि या राघवा शरण न जाय ॥२॥ पावलिया मरण सहज नरक कुंडीं । कोण तया सोडी अधमासी ॥३॥ स्वप्नामाजीं नेणें परमार्थ मानसीं । सदा चौर्‍यांयंशी फेरे भोगी ॥४॥ एका जनर्दनीं नोहेंचि सुटिका । भाग्यहीन देखा मरे जन्में ॥५॥
७६९
कीर्तन ते पूजा कीर्तन तें भक्ति । कीर्तनें होय मुक्ति सर्व जीवां ॥१॥ पातकी चांडाळ असोत भलते । कीर्तनीं सरते कलियुगी ॥२॥ कीर्तन श्रवण मनन पठण । कीर्तनें पावन तिन्हीं लोक ॥३॥ एका जनार्दनीं कीर्तनीं आवडी । घालीतसे उडी वैकुंठाहुनी ॥४॥
७७०
कीर्तन श्रेष्ठ कलियुगीं सेवा । तरले पातकी ते देवा ॥१॥ वाल्हा तारिला कीर्तनीं । पावन जाला त्रिभुवनीं ॥२॥ गणिका कीर्तनें तरली । मोक्षधामा ती नेली ॥३॥ अजामेळ चोखा महार । कीर्तनीं तरले अपार ॥४॥ एका जनार्दनीं कीर्तन । तिन्हीं लोक जाले पावन ॥५॥
७७१
कीर्तनाचा गजर होत आनंदाने । तंव नामा म्हणे उच्चारा नाम ॥१॥ टाळी बाहुनी होतें मुखीं वदा नाम । ऐकतां सकाम भक्त जाहले ॥२॥ गोरियाचे मना संकोच वाटला । कर नाहीं आपुल्याला टाळी वाहतां ॥३॥ वाटलेंसे दु:ख नयनीं नीर आलें । एका जनार्दनीं बोले नाम मुखीं ॥४॥
७७२
कीर्तनाची आवडी देवा । वैकुंठाहुनी घाली धांवा ॥१॥ नवल वैकुंठीच नसे । तो कीर्तनीं नाचतसें ॥२॥ भाळ्याभोळ्यासाठीं । धावें त्याच्या पाठोपाठीं ॥३॥ आपुलें सुख तया द्यावें । दुःख् आपण भोगावे ॥४॥ दीनानाथ पतीतपावना । एका जनार्दनीं वचना ॥५॥
७७३
कीर्तनाची आवडी मोठी । प्रेमें देव घाली मिठी ॥१॥ कीर्तन प्रिय पैं गोविंदा । आदरें पूजितो नारदा ॥२॥ कीर्तन करिता अभेदु । आदरें रक्षिला प्रल्हादु ॥३॥ राजेंद्र करी नामस्मरण । धांवण्या धांवे नारायण ॥४॥ एका जनार्दनीं कळवळा । भक्तालांगीं देव भोळा ॥५॥
७७४
कीर्तनाची देवा आवडी । म्हणोनी धांवे तो तांतडी ॥१॥ सुख कीर्तनींअद्भुत आहे । शंकरराज जाणताहे ॥२॥ गोडी सेविती संतजन । येरां न कळे महिमान ॥३॥ ऐसा कीर्तनसोहळा । एका जनार्दनीं पहा डोळां ॥४॥
७७५
कीर्तनाची मर्यादा कैसी । देव सांगे उद्धवासी ॥१॥ गावें नाचावें साबडें । न घालावेंकोडें त्या कांहीं ॥२॥ मिळेल तरीं खावें अन्न । अथवा पर्णे ती भक्षुन ॥३॥ जाईल तरी जावो प्राण । परी न सांडोवे कीर्तन ॥४॥ किर किर आणूं नये पाठी । बोलुं नये भलत्या गोष्टी ॥५॥ स्वये उभा राहुन । तेथें करी मी कीर्तन ॥६॥ घात आलिया निवासी । माता जैसी बाळावरी ॥७॥ बोलें उद्धवासी गुज । एका जनार्दनीं बीज ॥८॥
७७६
कीर्तनाचें थोर सुख । यदुनायक राहे उभा ॥१॥ भाळे भोळे घेती नाम । करिती आराम कीर्तन ॥२॥ नाना साधनांचे वोढी । न लगे सांकडी सोसाव्या ॥३॥ एका जनार्दनीं सोपें बहू । कीर्तनीं पाहे देवातें ॥४॥
७७७
कीर्तनानंद चारी मुक्ती । धांवत येती घरासी ॥१॥ सोपें सार सोपें सार । कीर्तन उच्चार कलीयुगीं ॥२॥ वाहतां टाळीं कीर्तनछंदें । जाती वृंदे पातक ॥३॥ एका विनटला कीर्तनीं । भुक्तिमुक्ति लागतीं चरणीं ॥४॥
७७८
कीर्तनासाठी चारी मुक्ती । उभ्या राबती हरिदासां ॥१॥ कलीयुगीं हेंचि सार । करावें साचार कीर्तन ॥२॥ कृता त्रेता द्वापारीं । कीर्तनमहिमा परोपरी ॥३॥ एका तयांसी शरण । कीर्तन करितीं अनुदिन ॥४॥
७७९
कीर्तनीं आवडी जया नरा देखा । चुकतीस खेपा जन्माकोटी ॥१॥ कीर्तनीं समाधीं कीर्तनीं समाधी । पुढें आधीव्याधी कीर्तनेची ॥२॥ कीर्तनें बोध कीर्तनें सिद्धी । एका जनार्दनीं गोविंदीं कीर्तनीं ऐक्य ॥३॥
७८०
कीर्तनीं प्रल्हाद तरला । बिभीषण मुक्त जाला ॥१॥ ऐसा कीर्तनमहिमा । गनिका नेली निजधामा ॥२॥ तारिले वानर असुर । कीर्तनीं पावन चराचर ॥३॥ गाई गोपाळ सवंगडे । कीर्तनीं तरले वाडेंकोडें ॥४॥ अजामेळ उद्धरिला । कीर्तनीं आल्हाद भला ॥५॥ एका जनार्दनीं कीर्तन । कली कल्मष नाशीं क्षण ॥६॥
७८१
कीर्तनीं स्वधर्म वाढे । कीर्तनीं जोडे चित्तशुद्धी ॥१॥ ऐसा महिमा कीर्तनाचा । शुक सांगे परिक्षिती साचा ॥२॥ होती पावन अधम जन । करितां कीर्तन कलियुगीं ॥३॥ एका त्याचा दासानुदास । जाती कीर्तनास आवडी जे ॥४॥
७८२
कीर्तनें तोषे अधोक्षज । राखी लाज भक्तांचीं ॥१॥ धावें द्रौपदीचें पानासाठीं । भीड मोठी कीर्तनाची ॥२॥ दहा गर्भवास सोसले । उणें नाहीं आलें भक्तांचें ॥३॥ एका विनवी जनार्दनीं । कीर्तनीं प्राणी धन्य होती ॥४॥
७८३
कीर्तनें सिद्धि कीर्तनें सिद्धि । कीर्तनें निरसे आधिव्याधी ॥१॥ कीर्तनें काया कीर्तनें माया । कीर्तनें सर्व एक ठाया ॥२॥ द्वंद्व द्वैत भेद नुरेची ठाव । कीर्तनीं तिष्ठें उभाचि देव ॥३॥ निद्रेमाजीं वोसणें देवो । म्हणें मज ठावो कीर्तनीं ॥४॥ एका जनार्दनीं कीर्तनासाठी । देव धावें भक्तापाठीं ॥५॥
७८४
कीर्ति तुमची तिहीं लोकीं । तारिलें पातकी अपार ॥१॥ जाहला विश्वास आधीं मना । धरिलें चरणां दृढ मग ॥२॥ एका जनार्दनीं लडिवाळ । करा सांभाळ आतां माझा ॥३॥
७८५
कुर्वडींन काया मन । समचरण देखोनियां ॥१॥ ऐसा वेधी वेधक कान्हा । विटु मना बैसलासे ॥२॥ नावडे कांहीं दुजें चित्तीं । श्रीविठ्ठलमुर्ति पाहतांचि ॥३॥ एका जनार्दनीं ध्यान । सुकुमार गोजिरें ठाण ॥४॥
७८६
कुल्लाळ वंशांत गोरा कुंभार । कीर्ति चराचर भरियेलें ॥१॥ प्रतिज्ञा करुनी करकमळ तोडी । भाजनेंही घडी श्रीविठ्ठल ॥२॥ नाम निरंतर वदतसे वाचे । प्रेम मी तयाचें काय वानूं ॥३॥ एका जनार्दनीं भक्ताचा कैवारी । भाजनें तीं करीं घरीं त्याच्या ॥४॥
७८७
कृतांताचे माथां देऊनियां पाय । वाचे नाम गाय अहर्निशीं ॥१॥ उघडा रे मंत्र उघडा रे मंत्र । शिव जपे स्तोत्र रामनाम ॥२॥ एका जनार्दनीं न करी आळस । चौर्‍यांशीचा लेश नको भोगुं ॥३॥
७८८
कृपाळ उदार तुम्हीं संत । दीन अनाथ तारिलें ॥१॥ हाचि महिमा ऐकिला । जीव गुंतला चरणीं ॥२॥ करा माझें समाधान । देउनी वचन अभयांचें ॥३॥ यावई फार बोलुं नेणें । उचित करणें तुम्हासी ॥४॥ एका जनार्दनें शरण । आहे मी दीन पामर ॥५॥
७८९
कृपाळु उदार । उभा कटीं ठेवुनी कर ॥१॥ सर्व देवांचा हा देव । निवारीं भेव काळांचें ॥२॥ निघतां शरण काया वाचा । चालवी त्याचा योग क्षेम ॥३॥ दृढ वाचे वदतां नाम । होय निष्कामसंसारीं ॥४॥ एका जनार्दनीं ठेवणें । खंरे तें जाणें पंढरीं ॥५॥
७९०
कृपाळु माउली अनाथा साउली । उभा ती राहिली विटेवरी ॥१॥ भक्त करुणाकर कैवल्याचा दानी । उभा तो जघनी ठेवुनी कर ॥२॥ मोक्षमुक्ति फुका वांटितो दरुशनें । नाहीं थोर सानें तयासी तेथें ॥३॥ एका जनार्दनीं एकपणें उभा । कैवल्याच गाभा पाडुरंग ॥४॥
७९१
कृपाळु माउली उभी भीमातटीं । लागलीसे आशा जीवासी मोठी ॥१॥ कई भेटेल माझा मायबाप । उजळोनी दीप ओवाळीन श्रीमुख ॥२॥ शुन्य स्थावर व्यापुनी वेगाळा राहे । एका जानार्दनीं वंदीन त्याचे पय ॥३॥
७९२
कृपाळु माधव तुं मुरारी । अच्युता अनंता श्रीहरी ॥१॥ तुम्हीं तारिलें अहिल्येसी । उद्धरिलें अजामेळासी ॥२॥ महा दोषांची दोषश्रेणीं । ती तारिली कुंटिणी ॥३॥ रामनाम जपे अनुदिनीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥
७९३
कृपाळुपणें उभा विटेवरी । पाहे अवलोकोनी दृष्टीभरी ॥१॥ न पुरेचि धणी न बैसे खालीं । उभा राहे समचि पाउलीं ॥२॥ युगें जाहलीं नोहे लेखा । एका जनार्दनीं भुलला देखा ॥३॥
७९४
कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर । तया नमस्कार वारंवार ॥१॥ न पाहे यातीकुळांचा विचार । भक्त करुणाकर ज्ञानाबाई ॥२॥ भलतिया भावें शरण जातां भेटी । पाडितसे तुटी जन्मव्याधी ॥३॥ ज्ञानाबाई माझी अनाथाची माय । एका जनार्दनीं पाय वंदितसे ॥४॥
७९५
कृपासिंधु ते संत । तारिती पतीत अन्यायी ॥१॥ न पहाती गुणदोष । देती समरस नाममात्रा ॥२॥ तारिती भवसिंधूचा पार । एक उच्चार स्मरणें ॥३॥ एका जनार्दनीं धन्य संत । अनाथ पतीत तारिती ॥४॥
७९६
कृष्ण आला परिसुनी मथुरे नारी । चपळा धांवती अति सुंदरी । एकी त्या कवळ करीं । एकीं त्या आलिया मार्जन शिरीं ॥१॥ अरे कृष्णा अरे कान्हा मनमोहना । गोपिका भाळल्या तुझिया गुणा । जय जय मानस मनमोहना । जीवीं जीवें गुंतल्या नंदनंदना ॥२॥ कृष्णदृष्टी पहावया प्राणपिसा । एकी त्या आलिया मुक्तकेशां । एकी त्या आलिया विगुंतवासा । देह गेह नाठवे कृष्णमानसा ॥३॥ कृष्णदृष्टी पहावया वेगु कामिनी । अस्ताव्यस्त इंद्रिया बाणलीं लेणीं । एकी त्या आलिया कर्म सांडोनी बाणलीं लेणीं । तत्नुमन वेधला सांगपणी ॥४॥ एकी त्या काजळ सुदल्या मुखीं । जावड कुंकम लाविती नाकीं । तांबुल विडीया खोविती मस्ताकीं । कृष्णदृष्टी इंद्रिया नाहीं वोळखी ॥५॥ एकी त्या तानवडे लेइल्या पायीं । पायींची पोल्हारे कानीं वो बाई । वाळे वाक्या बांधिल्या कंठाचे ठायीं । लाहे लाहे नेपुरें बांधिली डोई ॥६॥ एकी त्या आलिया चोखणा शिरीं । नागवें शरीर नेणें सुंदरीं । मोतियाचे हार नेसल्या नारीं । पाटाउ विसरल्या घरच्या घरीं ॥७॥ एकी त्या अर्धांगी लेईल्या चोळी । गुढरिया बांधिली मोतिया जाळी । नाकींचे मुक्ताफळ खोविती भाळीं । देह गेह नाठवें कृष्ण स्नेहाळी ॥८॥ एकी त्या कडिये घेतिल्या झारी । बाळकें विसरल्या घरींच्याघरीं । दृष्टीं सम दृश्या न दिसे नारी । पुत्र स्नेहें नाठवे देखोनि हरी ॥९॥ रंगी रंगल्या आल्हादें भारी । आपपर नाठवे तया सुंदरी । एका जनार्दनीं वेधल्या नारी । परतोनी संसारा नुरेची उरी ॥१०॥
७९७
कृष्ण देखतांचि गेलें । शेखीं बुडविली महिमान ॥१॥ भली नव्हें हे कृष्णगती । सखे पळविलें सांगाती ॥२॥ मायेचा करविला बंदु । शमशमादि पळविलें बंधु ॥३॥ द्रष्टा दृश्य आदि दर्शन । तिन्हीं सांडिलें पुसुन ॥४॥ ब्रह्माहमास्मि शुद्ध जाण । तेथील शून्य केला अभिमान ॥५॥ एका जनार्दनाची प्राप्ती । ज्ञान अज्ञान हारपती ॥६॥
७९८
कृष्णचंदन आणिलें । सकळ वेधिलेंक परिमळें ॥१॥ तेणेंक फुटती अंकुर । अंगीं भावाचे तरुवर ॥२॥ खैर धामोडे चंदन । कृष्णवेधें वेधिलें मन ॥३॥ एका एक हरिख मनीं । वसंत दाटे जनार्दन ॥४॥
७९९
कृष्णमूर्ती होय गे काळी आली सोयं गे । प्राणाचाही प्राण पाहतां सुख सांगुं काय गे ॥१॥ तुळशी माळ गळां गे कस्तुरीचा टिळा गे । आर्धांगी रुक्मिणी विंझणे वरित गोपी बाळा गे ॥२॥ पीतांबराची कास गे कसिली सावकाश गे । नारद तुंबर गायन करती पुढें निजदास गें ॥३॥ भक्त कृपेची माय गे वोळखिली विठाई गे । एका जनार्दनीं विटे जोदियेले पाय गे ॥४॥
८००
कृष्णा कैशी खेळूं लपंडाई । अनंत लोचन तुझे पाही । तेथें लपावें कवणे ठायीं । तुझें देखणे लागलें पाहीं ॥१॥ कान्होबा पाववी आपुल्या खुणा ॥धृ॥ लपुं ममतेच्या पोटीं । जेथेंतेथें तुझीच दृष्टी । तेथें लपायाची काय गोष्टी । तुझे देखणें लागलें पाठीं ॥२॥ लपुं गिरीं कपाटीं कडवसा । जेथें तेथें तुझाचि ठसा । एका जनार्दनी सरिसा । तेणें मोडली खेळायाची आशा ॥३॥
८०१
कृष्णारुपीं भाळल्या गोपिका नारी । नित्य नवा कृष्ण जीवा आवडतो भारी । पवन वेगीं चालिल्या कालिंदीतीरीं । चिदानंद भावें भोगावा श्रीहरीं ॥१॥ वाजती गाजती अनुहत टिपरी । बारा सोळा मिळोनी गौळ्याच्या नारी । प्रातः काळी जाती यमुनातीरीं । कृष्णप्राप्तिलागीं पूजिती गौरी ॥२॥ एकमेकींतें खुणाविती दृष्टी । हरिरुपीं आवड जीवा लागली मोठी । समयीं एकांत होईल काय भेटी । मनींचे आर्त सांगुं गुज गोष्टी ॥३॥ कृष्नारुपीं वेधल्या विसरल्या अन्नपान । माया विलास नेघे अंजन चंदन । रात्र आणि दिवस कृष्नाचें ध्यान । एका जनार्दनीं चरणी वेधलें मन ॥४॥
८०२
कृष्णाला भुलविलें गोपीने ॥धृ॥ यशोदे तुझा हा कान्हा राहीना । मी मारीन क्रोधाने ॥१॥ नंदजी तुमचा कृष्ण लाडका हाका मरितो मोठ्यानें ॥२॥ वेताटी घेउनी नावेंत बैसला । वांचविले देवानें ॥३॥ एका जनार्दनी पूर्ण कृपेनें । नाहीं ऐकिलें मातेनें ॥४॥
८०३
कृष्णालाजे ती राधिका राहे घरी । जीवनालागीं जिवें जीव भरी । कृष्णदृष्टी तो माझी नुरे उरी । यमुने जातां सन्मुख देखे हरी ॥१॥ कृष्ण पावलावो हरी पावलावो ॥धृ॥ एकाएकी एक हा एकटु । माझ्या संसारा झाला शेवटु । मी पतिव्रता तो झोंबतो आलगटु । आपपर नाहीं तुं होसी क्रियानष्टु ॥२॥ दृश्य न दिसे तंव जाली दुपारी । रळीया वासना ते वास फेडी हरी । सुटली लिंग देह गाठी अभ्यंतरीं । सर सर निर्लज्जा मी परात्परा नारी वो ॥३॥ कृष्णा मागे मागे ते माया आली जाणा । पुसे यशोदा बा काय जालें कान्हा येऊ । स्फुंदस्फुंदे करितो रुदना । भावचेंडु चोरिला गोपांगंना वो ॥४॥ गोपी म्हणती हा कर्मनष्ट कुडा । क्रिया प्रमाणेंसी बोल याचा खुडा । हा बोलतसे अवाडीच्या चाडा । कृष्ण म्हणे तु माग इसी झाडा वो ॥५॥ वासना वास तें फेडी प्रमदा । भाव चेंडुवातें तंव देखें यशोदा । हरी कृष्ण येरु हांसे खदाखदां । स्वेदु रोमांचित वरी कांपत गदागदां वो ॥६॥ नष्ट गवळणी विजन व्यभिचारी । परा रातली या निर्लज्ज निर्धारी । दैवें आलीये मा चुकली कुमरी ॥७॥ कृष्णें लाधव तें कैसें केलें पाहें । गोपी उपरमोनि पाठिमोरी राहे । माथा वंदीतसे कान्हयाचे पाय । एका जनार्दनीं दोष नाहीं वो माय ॥८॥
८०४
कृष्णाविण दुजे नेणती काया वाचा । जाला पांडवांचा सहकारी ॥१॥ वारिलें संकट भक्तांचा अंकित । धांवेचि त्वरित नाम घेतां ॥२॥ भोजनाची आस न धरा मानसीं । धांवतो त्वरेसी नाम घेतां ॥३॥ एका जनार्दनीं नामाची आवडी । घालितासे उडी वैकुंठाहुनी ॥४॥
८०५
केल सती उपकार । दिधलें घर दावुनी ॥१॥ नये ध्यानीं मनीं लक्षीं । तो प्रत्यक्षीं दाविला ॥२॥ संकल्पाचें तोंडिलें मूळ । आलें समुळ प्रत्यया ॥३॥ एका जनार्दनीं कृपावंत । होती संत सारखे ॥४॥
८०६
केला उपकार जगीं तारियेले सर्व । निवृत्ति गुरु माझा जीव उध्दरिले सर्व ॥१॥ कायावाचामनें शरण निवृत्तिपायीं । देहभावें मीतूंपणा उरलाची नाहीं ॥२॥ ऐसा श्रीनिवृत्ति ज्ञानदेवें धरिला चित्तीं । चांगया प्रेम दिधलें गुरु वोळखिला चित्तीं ॥३॥ एका जनार्दनीं शरण निवृत्तिप्रती । संसार नुरेचि उरी निवृत्ति म्हणतां चित्तीं ॥४॥
८०७
केलिया कर्मा येत असे वांटा । अभागी करंटा मतिमंद ॥१॥ जेथें राहे उभा दिसे दैन्यवाणा । चुकला भजना गोविंदाच्या ॥२॥ एका जनार्दनीं नामाच्या उच्चारा । न करितां अघोरा जाती प्राणी ॥३॥
८०८
केलें आवाहन । जेथें नाहीं विसर्जन ॥१॥ भरला ओतप्रोत । स्वामी माझा देव दत्त ॥२॥ गातां येत नाहीं । पूर्ण सुलीनता पाही ॥३॥ एका जनार्दनीं खुण । विश्वी भरला परिपुर्ण ॥४॥
८०९
केलें तुवां काय जाऊनियां तीर्था । सर्वदां विषयार्था भुललासी ॥१॥ मनींची तीं पापें नाहीं धोवियेलीं । वृत्ति हे लाविली संसारींच ॥२॥ तीर्थस्नानें अंग तरी शुद्ध केलें । नाहीं धोवियेलें अंतरासी ॥३॥ वरी दिससी शुद्ध अंतरीं मलीन । तोवरीं हें स्नान व्यर्थ होय ॥४॥ तीर्थयात्रायोगें कीर्तिही पावली । बुद्धि शुद्धि झाली नाहीं तेणें ॥५॥ शांति क्षमा दया नाहीं पैं अंतरीं । वायां येरझारी कष्ट केले ॥६॥ एका जनार्दनीं सद्‌गुरु पाय धरी । शांतीचें जिव्हारीं पावशील ॥७॥
८१०
कैं तयामागें चरण चालती । ऐशी वाटे खंती दिनराती ॥१॥ कैं या मनाची पुरेल वासना । कैं मिठी चरणा देईन जीवें ॥२॥ कैं हें भाळ ठेवीन चरणीं । कैं पायवनी घेईन सुखें ॥३॥ एका जनार्दनीं कैं होईल कृपादान । कैं नारायण प्रेमें भेटे ॥४॥
८११
कैं मनींची इच्छा पुरेल ही धांव । पाहीन पंढरीराव जाऊनियां ॥१॥ आलीया जन्माचें होईल सार्थक । निवारेल दुःख भव पीडा ॥२॥ कैं हें मस्तक ठेवीन चरणीं । पाहीन डोळे भरुनी श्रीमुख तें ॥३॥ एका जनार्दनीं कैं होईन पात्र । नासेल समस्त तापत्रय ॥४॥
८१२
कैंचे ध्येय ध्याता ध्यान । अवघें विषयावरी मन ॥१॥ तेथें कैचें कर्माचरण । सदा विषयींच मन ॥२॥ कैंचा दोष कैंचा गुण । अवघे विषयींच मन ॥३॥ कैंचा बोध कैंचा भेद । सदा विषयीं तो धुंद ॥४॥ ऐसा भुलोनि विषयीं । एका जनार्दनीं बुडे पाहीं ॥५॥
८१३
कैंचें सुख कैंचें दुःख । कैंचा बंध कैंचा मोक्ष ॥१॥ कैंचा देव कैंचा भक्त । कैंचा शांत कैंचा अशांत ॥२॥ कैंचे शास्त्र कैंचा वेद । कैंची बुद्धि कैंचा बोधा ॥३॥ जन नोहें जनार्दन । एका जनार्दनीं भजन ॥४॥
८१४
कैचें आम्हां यातीकुळ । कैंचें आम्ही धर्मशीळ ॥१॥ तुझें नामीं अनुसरांलों । तिहीं लोकीं सरतें झालों ॥२॥ कैची क्रिया कैंचे कर्म । कैचा वर्नाश्रम धर्म ॥३॥ एका जनार्दनीं यातीकुळ । अवघा व्यापक विठ्ठल ॥४॥
८१५
कैवल्य निधान तुम्ही संतजन । काया वाच मन जडलें पायीं ॥१॥ सर्वभावें दास अंकित अंकीला । पूर्णपणें जाहला बोध देहीं ॥२॥ जें जें दृष्टी दिसे तें तें ब्रह्मारुप । एका जनार्दनीं दीप प्रज्वळिला ॥३॥
८१६
कैवल्याचा पुतळा । प्रगटला भूतळा । चैतन्याचा जिव्हाळा । ज्ञानोबा माझा ॥१॥ ज्ञानियाचा शिरोमणी । वंद्य जो का पूज्यस्थानीं । सकळांसी शिरोमणी । ज्ञानोबा माझा ॥२॥ चालविली जड भिंती । हारली चांग्याची भ्रांती । मोक्षमार्गाचा सांगाती । ज्ञानोबा माझा ॥३॥ रेड्यामुखीं वेद बोलविला । गर्व द्विजांचा हरविला । शांतिबिंब प्रगटला । ज्ञानोबा माझा ॥४॥ गुरुसेवेलागीं जाण । शरण एका जनार्दन । चैतन्याचें जीवन । ज्ञानोबा माझा ॥५॥
८१७
कैवल्याची राशी वैष्णवांचे घरीं । मुक्ति भुक्ती कामारी आहे जेथें ॥१॥ तो हा विठ्ठल निधान परेपरता उभा । सांवळी ती प्रभा अंगकांती ॥२॥ मुनिजनांचे ध्येय योगियांचें उन्मन । ज्या पैं माझें लीन चित्त्त जाहलें ॥३॥ जया आष्टांग योगां सांकडें साधित । तें उगडें पाहतां उभें विटेवरी ॥४॥ एका जनार्दनीं सगुण निर्गुण । यापरता चैतन्यघन उभा असे ॥५॥
८१८
कैसा पुंडलिका उभा केला । वैकुंठाहुनी भक्ति चाळविला ॥१॥ नेणें रे कैसें वोळलें । अधीन केलें आपुलिया ॥२॥ दर्शनमात्रें प्राणियां उद्धार । ऐशी कीर्ति चराचर ॥३॥ एका जनार्दनीं म्हणे पुंडलिक । भक्त शिरोमणि तुंचि देखा ॥४॥
८१९
कैसी समचरणीं शोभा । अवघा जगीं विठ्ठल उभा ॥१॥ येणें विठ्ठले लाविलें पिसें । जिकडे पाहे तिकडे दिसे ॥२॥ पहाते पाहाणीया माझारी । पहाते गेलें पाहाण्यापरी ॥३॥ एका जनार्दनीं एकु । विठ्ठल अवलोकी लोकु ॥४॥
८२०
कैसे चरण गोमटे । देखिले विटे पंढरीये ॥१॥ पाहतांचि वेधलें मन । जाहलें समाधान जीवाशीवां ॥२॥ विश्रांतीचें विश्रांतिघर । आगम निगमांचे माहेर ॥३॥ म्हणे एका जनार्दनी । काया कुर्वडी करुनी ॥४॥
८२१
कैसे झालें देवदर्शन । देवा पाहतां आहे कोण ॥१॥ डोळा उघडॊनियां पाहे । पैल देव दिसताहे ॥२॥ पैल देव तो मी भक्त । दोहींसी कोण आहे देखत ॥३॥ एका जनार्दनीं पाहे । पाहणें पाहतां देवाचि आहे ॥४॥
८२२
कोटी कंदर्प सांडा वोवाळुनी । ऐसा जगदानीं पंढरीये ॥१॥ हेळु लोपला तेजें जें देखतां मन निवे । दरुशनें भागलें हेवा करता गे गाय ॥२॥ मदन मनमोहन सनकासनंदन वंद्य । सर्वाठायीं व्यापुनी उभे विटे आनंद ॥३॥ सुखाची सुखमूर्ति पूडांलिकाचे भक्ति । एका जनार्दनी सगुण व्यक्तिसी आला ॥४॥
८२३
कोटी कंदर्पांच्या श्रेणीं । कुर्वडींतक जनार्दनीं ॥१॥ बरवा जनार्दनीं जनीं । पाहतां तनुमन भुलवणी ॥२॥ नयन लाचावले दोन्हीं । आन न दिसे त्रिभुवनीं ॥३॥ शंकरासी झाला गोड । काय इतरांचा पाड ॥४॥ रूपा भाळला कंदर्प । तेणें कृष्ण केला बाप ॥५॥ रमा रमणीये सर्वांसी । झाली चरणाची दासी ॥६॥ सनकादिक अति विरक्ति । तेहि हरिपदीं आसक्त ॥७॥ जनीं जनार्दन नेटका । एकाएकी चरणीं देखा ॥८॥
८२४
कोटी कोटी फेरे घेऊनि आलासी अद्यापि पडसी गर्तैं रया ॥१॥ कोण तुज सोडी कोण तुज सोडी । पडेल जेव्हा बेडी पायीं रया ॥२॥ हाणिती मारिती निष्ठुर ते दूत । विचकुनियां दांत पडसी रया ॥३॥ एका जनार्दनीं मागील आठव । कांहीं तरी भेव धरी रया ॥४॥
८२५
कोटी जन्म आम्हीं करूं हरिकथा । कर्मकांड माथां धरूनियां ॥१॥ ऐहिकादि कर्में करुनी सर्वदा । भजो जी गोविंदा निरंतर ॥२॥ यजन याजन करुनी अग्निहोत्र । पूजोनि पवित्र द्विजवर ॥३॥ एका जनार्दनीं कर्म ब्रह्मा एक । वेदान्ती विवेक बोलियेला ॥४॥
८२६
कोटी जन्मांचि येरझारी । तें तो हरी रामनाम ॥१॥ तें तुं वाचे सुगम वदें रामनाम आणीक नको श्रम करुं वायां ॥२॥ श्रम केलिया पडसी सांकडीं । जन्ममरण बेडी तोडी नाम ॥३॥ संतसमागम भावें करी भक्ति । एका जनार्दनीं वस्ती नामीं करी ॥४॥
८२७
कोटी ब्रह्माहत्या घडे । कथाविक्रय तया जोडे ॥१॥ हा तों पुराणी निवाडा । पाहे कीं रे दगडा ॥२॥ एका जनार्दनीं जाण । पंचमहापातकीं तो पुर्ण ॥३॥
८२८
कोण पार नेई भवनदींतुनीं । सदगुरुवांचुनी तुम्हालांगीं ॥१॥ अनंत उपाय जरी तुम्हीं केले । पार पावविलें नव जाय ॥२॥ नाना तीर्थयात्रा घडल्या तुम्हांसी । परी संतोषासी न पावल ॥३॥ व्रतें तपें यज्ञें दानें चित्तशुद्धि । परी निजपदीं स्थिर नोहे ॥४॥ विवेक वैराग्य बळें सदगुरुभेटी । आन आटाआटी नलगे कांहीं ॥५॥ एका जनार्दनीं गुरुचरण धरीं । तेथें स्थिर करी मन नरा ॥६॥
८२९
कोण मानील हा नामाचा विश्वास । कोण होईल उदास सर्वभावें ॥१॥ कलियुगामाजीं अभाविक जन । करती उच्छेदन भक्तिपंथा ॥२॥ नानापरीचीं मतें नसती दाविती । नानामंत्र जपती अविधीनें ॥३॥ एका जनार्दनीं पातकाची राशी । नाम अहर्निशीं न जपती ॥४॥
८३०
कोण हरी आतां संसाराचा छंद । न स्मरतां गोविंद दुःख बहु ॥१॥ शहाणे बुडती शहाणे बुडती । शहाणे बुडती भवडोहीं ॥२॥ तत्त्वज्ञानाच्या सांगताती गोष्टी । परि संसार हिंपुटी होती मूढ ॥३॥ एका जनार्दनीं संसाराचा छंद । टाकुनी गोविंद भजे कां रे ॥४॥
८३१
कोणता उपाय । जोडे जेणें संतपाय ॥१॥ हाचि आठव दिवस रात्रीं । घडो संतांची संगती ॥२॥ न करुं जप तप ध्यान । संतापायी ठेवुं मन ॥३॥ न जाऊं तीर्थप्रदक्षिणा । आठवुं संतांचे चरणा ॥४॥ होता ऐसा निजध्यास । एका जनार्दनीं दास ॥५॥
८३२
कोणा ब्रह्मकर्म कळेना हें वर्म । नासिलें जीवन संध्या वेळें ॥१॥ धरिलें नासिक अनुभवावांचुनीं । त्रिपुटीस पाणी लावियेलें ॥२॥ डोळिया वंदना स्वीकारिले कान । तेथें वर्म कोण नेणवेची ॥३॥ हृदयावरी हात नाभीस लाउनी । डोळे ते झाकुनी नाश केला ॥४॥ करी प्रदक्षिणा गुरु गुह्माविण । व्यर्थ केला शीण वायां तो ॥५॥ वेळ चुकवुनी संध्या करी भलते वेळे । केलें अमंगळ ब्रह्माकर्म ॥६॥ फिरवितो मणी बुटबुटा ते होट । अजप तो कोठें स्थान नेणे ॥७॥ नेणे तो आचाट करी वेडेचार । काय तो गव्हार संध्या जाणे ॥८॥ एका जनार्दनीं चुकविला नेम । काय पशु अधम जन्मा आले ॥९॥
८३३
कोणाचें घरदार मृगजळ संसार । तुझा तूं विचार करी बापा ॥१॥ सोयरा तूं देव करी पां संसारीं । वायां हाव भरी होऊं नको ॥२॥ द्वैत अद्वैत टाकुनी परता । होई पां सरता देवापायीं ॥३॥ एका जनार्दनीं देवाविण तुज । राखील पां सहज कोण दुजा ॥४॥
८३४
कोणासवें आमुचें काय काज । पंढरीराज कैवारी ॥१॥ उभा राहे मागें पुढें । निवारी सांकडेंक भक्तांचें ॥२॥ आघात घात निवारी । पीतांबरी करी छाया ॥३॥ ऐसा अनुभव मज यावा । धांवे राया पंढरीच्या ॥४॥ एका जनार्दनीं भाव । धरिलिया धांवे देव ॥५॥
८३५
कोणासी न कळे अवघे जहाले मूढ । म्हणती हें गुढ वायां शास्त्र ॥१॥ आपुलाला धर्म नाचरती जनीं । अपीक धरणी पीक न होय ॥२॥ अनावृष्टी मेग न पडे निर्धार । ऐसा अनाचार कलीमाजीं ॥३॥ एका जनार्दनीं नीचाचा स्वभाव । न कळे तया भाव कोण कैसा ॥४॥
८३६
कोणासी न कळे हा पंढरीचा राणा । केली विवंचना लग्नाची ते ॥१॥ सहपरिवार आपण निघाला । लग्नाचा सोहळा करीतसे ॥२॥ एका जनार्दनीं करुनि पाणिग्रहण । निघाला तेथोनियां ॥३॥
८३७
कोणी कांहीं तरी म्हणो । आम्ही न जाणो तया बोला ॥१॥ गाऊं सुखें नामावळी । सुख कल्लोळीं सर्वदां ॥२॥ नाचुं संतमेळीं सदा । कीर्तनीं गोविंदा रंजवुं ॥३॥ एका जनार्दनीं हाचि धंदा । वायां शब्दा न लागूं ॥४॥
८३८
कोण्या वियोगे गुंतला कवर्णे हातीं । परा पश्यंती मध्यमा जया धाती । श्रुति शास्त्र जया भांडती । तो कां हो रुसला श्रीपती ॥१॥ येई येई कान्हा देई आलिंगन । भेटी देऊनि पुरवीं मनोरथ पुर्ण । विरहाविरहा करी समाधान । दावी तु आपुले चरण ॥२॥ येथें अपराध आमुचा नाहीं । खेळ सर्व तुझा पाहीम । एका जनार्दनी नवल काई । एकदां येउनी भेटी देई ॥३॥
८३९
कौतुक वाटतें मनाचें । नामस्मरण नेणें साचें ॥१॥ कां रे मानिशी कंटाळा । मना खळा अधम तूं ॥२॥ नका घालुं गोंवागुंती । तेणें फजिती मागें पुढें ॥३॥ एका जनार्दनीं भाव । अवघा दिसे देवाधिदेव ॥४॥
८४०
कौसल्या यज्ञशे सेउनी राम जन्मला तियेचें पोटीं । वनवासासी जातां वियोग पावली दुःख शोकें हिंपुटीं ॥१॥ धन्य धन्य ते अहिल्या शिळा । हरीच्या पावली चरणकमळा ॥धृ॥ त्र्यंबकभजनीं जानकी पर्णिली । केली एक पतिव्रता रणी । रामा वेगळी रावणें चोरुनियां नेली । दुःखीत अशोक वनीं ॥२॥ रामें रणांगणीं राक्षस मारिले । ते मरणातीत होऊनि ठेले । देवांची बंधनें तोडिली रामें । शेखी अमर ते प्रळयीं निमाले ॥३॥ दशरथ पिता निमाला । त्याचें कलेवर पचे तैल द्रौणीं । सकुळी अयोध्या वैकुंठासी । नेली अभिनव श्रीरामकरणीं ॥४॥ सुरांचा कैवारी कीम असुरांचा वैरी । ऐसें न मानीच रामरावो । वैरियांचा बंधु बिभीषण आप्तु । एका जनार्दनीं समभावो ॥५॥
८४१
क्रोधयुक्त अंतःकरण । तेणें नासे स्वधर्माचरण ॥१॥ ऐसें द्वेषें बांधलें घर । ते ठायीं क्रोध अनिवार ॥२॥ ऐशिया स्वभावावरी । नर अथवा हो कां नारी ॥३॥ स्वभाव बाधी सत्य जाण । शरण एक जनार्दनीं ॥४॥
८४२
क्षणभंगुर देह । याचा मानिसी संदेह ॥१॥ उदकावरील तरंग । तैसे दिसे सर्व जग ॥२॥ पाहतां मृगज्ळा । जळ नोहेची निर्मळा ॥३॥ साउली अभ्राची । वायां जाय जैसी ॥४॥ करितां लवण पुतळा । विरे जैसा मिलतां जळा ॥५॥ एका जनार्दनीं तैसें । दिसतां देह नासे जैसें ॥६॥
८४३
क्षीरसागर सांडोनि हरि । कीर्तनी उभा सहपरिवारी । लक्ष्मी गरुड कामारी । होती तया कीर्तनीं ॥१॥ आलिया विघ्न निवारी आपण । शंख चक्र गदा हाती घेऊन । सुदर्शन कौस्तुभ मंडित जाण ॥२॥ गरुडतिष्ठे जोडिल्या करीं । लक्ष्मी तेथें कामारी । ऋद्धिसिद्धि सहपरिवारी । तिष्ठताती स्वानंदें ॥३॥ कीर्तनगजरें वाहे टाळीं । महादोषांची होय होळी । एका जनार्दनीं गदारोली । नामोच्चार आनंदें ॥४॥
८४४
क्षीरसागरीचें निजरुपडें । पुंडलिकाचेनि पडिपाडें । उभें असे तें रोंकडें । पंढरीये गोजिरें ॥१॥ पहा पहा डोळेभरी । शंख चक्र मिरवे करीं । कास कसिली पिंताबरीं । हृदयावरी वैजयंती ॥२॥ भीमरथी वाहे पुढां । करित पापाचा रगडा । पुंडलिकाचे भिडा । उभा उगा राहिला ॥३॥ शरण एका जनार्दनीं । त्रैलोक्याचा धनी । नाचतो कार्तनीं । भक्तांमागें सर्वदा ॥४॥
८४५
खंडन मुंडन दंडन करुनी घ्यती रुप । तें आम्हां सोपें झालें वर्णितां चिद्रुप ॥१॥ तो देखिला वो देखिला वो । पहाता पहाणें विसरुन गेलें ठक पडलें सकळां वो ॥२॥ नेति नेति शब्द भुलल्या वेडावल्या श्रुति । आगमनिगमां न कळे चोज चिंत्तीं ॥३॥ एका जनार्दनीं सकळ ब्रह्मा शोभा । अनुपम्य उभा कर्दळीचा गाभा ॥४॥
८४६
खांद्यावरे कांबळी हातामधीं काठी । चारितसे धेनु सांवळा जगजेठी ॥१॥ राधे राधे राधे राधे मुकुंद मुरारी । वाजवितो वेणु कान्हा श्रीहरी ॥२॥ एका एक गौळनी एकएक गोपाळा । हातीं धरुनि नाचती रासमंडळा ॥३॥ एका जनार्दनी रासमडळ रचिलें । जिकडे पाहे तिकडे अवघें ब्रह्मा कोंदलें ॥४॥
८४७
खांबसुत्राची बाहुली । सुत्राआधीन उगली ॥१॥ माझें मीपण नाहीं स्वतंत्र । क्रियाकर्म ते परतंत्र ॥२॥ बाहुलीये नाहीं स्वतंत्रता तैसा नव्हे कर्म कर्ता ॥३॥ एका एकपणाचे सूत्र । जनार्दनपायीं स्वतंत्र ॥४॥
८४८
खुंटलासे शब्द बोलतां आनंद । सर्व बह्मानंद कोंदाटला ॥१॥ तें हें दत्तनाम आवडी आदरें । उच्चारी सोपारें सर्वकाळ ॥२॥ कलिमाजीं सोपें दत्तनाम घेतां । संसाराची वार्ता उरी नुरे ॥३॥ एका जानार्दनीं लागलासे छंद । दत्तनामे आनंद सर्वकाळ ॥४॥
८४९
खुर्पूं लागे सांवत्यासी । न पाहे यातीसी कारण ॥१॥ घडी मडकें कुंभाराचें । चोख्यामेळ्याचीं ढोरें वोढी ॥२॥ सजन कसायाचें विकी मांस । दामाजीचा दास स्वयें होय ॥३॥ एका जनार्दनीं जनीसंगें । दळूं कांडु लागे आपण ॥४॥
८५०
खेळ खेळुं सुरकवडी । कान्होबा उगाचि पाहे गोडी ॥१॥ एकीबेकी पोरा खेळ भला बेकी । साडुनि एकीबेकी धरितां शेवटीं होईल फुकी ॥२॥ एका दोन तीन चार पांच सहाच्या पडो नको डाई । सहास्त्र लक्ष कोट गेले उगाचि शीण पाहीं ॥३॥ एका जनार्दनीं म्हणे कान्होबा वाउगा नको गोऊं । जेणे करुनी संसार खेळ तुटोन लक्ष तुझें पायीं लाऊं ॥४॥
८५१
खेळ मांडिला लगोरी । खेळताती नानापरी । चेंडु घेउनि अपुलें करीं । खेळताती एकमेक ॥१॥ देती आपुलाला डाव । ज्याचा जैसा आहे भाव । तोचि जिंकीतसे वैभव । आणिक पहाती उगे वाव ॥२॥ बरोबर करुं गडी । नाहीं विषमता जोडी । चेंडु हाणती तांतडी । येती हरिया बैसती गडी ॥३॥ एका जनार्दनी कान्होबा भला । खेळा गोविलें कीं सकळां । आपण असेचि निराळा । नवल कळा पाहे डोळा ॥४॥
८५२
खेळ मांडिला वो खेळ मांडिला वो । या संसाराचा खेळ मांडिला वो ॥१॥ पंचप्राणांचे गडी वाटिले । तेथें जीवशिव नाम ठेविलें वो ॥२॥ एका जनार्दनी खेळ मांडिला । शाहाणा तो येथें नाही गुंतला वो ॥३॥
८५३
खेळतसे खेळ सवंगडियांसहित । गोपिकांचे हेत पुरवितसे ॥१॥ जयाचिये चित्तीं जे कांही वासना । तेचि नारायण पुरविणें ॥२॥ जया जैसा हेत पुरवीं तयांचा । विकला काया वाचा भाविकांचा ॥३॥ एका जनार्दनी भाविकांच्या पाठीं । धावें जगजेठी वनोवनीं ॥४॥
८५४
खेळतां सांवळा गडियांसी म्हणे । खेळ तो पुरे गाई जमा करणें ॥१॥ आपुलाल्या आपण वळाव्या गाई । नवल तो तेणें खेळ सांडावया भाई ॥२॥ धांवती संवगडी पाठोंपाठ लवलाह्मा । गुंतल्या त्या गाई वळती न येती वळाया ॥३॥ येवोनि दीन मुख करिती हरिपुढें । एका जनार्दनीं तया पाहतां प्रेम चढें ॥४॥
८५५
खेळसी टिपर्‍या घाईं रे । वाचे हरिनाम गाई रे । टिपरीस टिपरी चुकुं जातां भाई । पडसी यमाच्या घाई रे ॥१॥ सहा चार अठरा गड्यांचा मेळा रे । टिपरीयांचा खेळ खेळा रे । एका खेळा दोन्हीं गुतला । यमाजी घालीला डोळा रे ॥२॥ वायं खेळ खेळतीसी बाळा रे । सावध होई पाहें डोला रे । एक एका जनार्दनी शरण जातां । चुकशील कळिकाळारे ॥३॥
८५६
खेळसी तुं लीळा । तुझी अनुपम्य काळा ।१॥ बारवा बरवा श्रीमुकुंद । गाई गोपाळी लावला वेध ॥२॥ खेळसी बाळपनीं । बांधीताती तुज गौळणी ॥३॥ ऐसा नाटकी हरी । उभा ठेला विटेवरीं ॥४॥ विटे उभा समचरणीं । शरण एका जनार्दनीं ॥५॥
८५७
खेळे कान्हा यमुनेचे तटीं । राखितो गोधनें घेउनी हातीं काठी ॥१॥ पांघुरला घोंगडें रत्नजडित गे माये । नंदरायाचा खिल्लारी तो होय ॥२॥ गोप गोंधनें सवंगडे नानापरी । दहींभात काला वांटितो शिदोरी ॥३॥ एका जनार्दनीं खेळे नानापरी । वेधोनि नेलें मन नाठवे निर्धारी ॥४॥
८५८
खेळें भोवरां गेबाई भोंवरां । राधिकेचा नवरा ॥धृ॥ माझ्या भोंवर्‍यांची अरी । सप्त पाताळें त्यावरी । फिरे गरगरां । राधिकेचा नवरा ॥ खेळे॥१॥ भोवरां बनला र्निगुणीं । त्यावर चंद्र सुर्य दोनी । जाळीं शंकर गवरा । राधिकेचा नवरा ॥ खेळे०॥२॥ एका जनार्दनीं खेळिया । भोवरां खेळुन पाहे चेलिया । नाद देतो हरिहरा । राधिअकेचा नवरा ॥ खेळे॥३॥
८५९
गंगा सागरादि तीर्थे भूमीवरी । परि पंढारीची सरी न पवती ॥१॥ श्रेष्ठांमांजी श्रेष्ठ तीर्थ पं समर्थ । दरुशनें मनोरथ पूर्ण होती ॥२॥ ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलीक । ऐसे वैष्णव देखे नाही कोठें ॥३॥ गाताती वैष्णव आनंदें नाचती । सदोदित कीर्ति विठ्ठलाची ॥४॥ एका जनार्दनीं पंढरीचा हाट । भूवैकुंठ पेठ पंढरी देखा ॥५॥
८६०
गंगोदक तें पवित्र । येर कडु अपवित्र ॥१॥ दोनीं उदकें तंव सारखीं । शुद्ध अशुद्ध काय पारखीं ॥२॥ गंगा देवापासून जाली । येर काय मध्यवर्ती केली ॥३॥ शुद्धाशुद्ध हे वासना । शरण एका जनार्दना ॥४॥
८६१
गंध ग्रहण घ्राणता । त्रिपुटी मांडिली सर्वथा ॥१॥ सुबुद्धि सुगंध चंदन । केलें दत्तात्रया अर्पण ॥२॥ शांति क्षमा अक्षता । तिलक रेखिला तत्त्वतां ॥३॥ एका जनार्दनीं । करुनि साष्टांगें नमन ॥४॥
८६२
गगनामाजीं जैसे शोभे तारांगण । तैसा विटेवरी शोभे समचरण ॥१॥ देखताचि मना समाधान होय । आनंदी आनद होय ध्याती जया ॥२॥ चतुर्भुज शंख चक्र ते शोभती । गळां वैजयंती मिरवे शोभा ॥३॥ कांसे पीतांबर मेखळा झळाळ । एका जनार्दनीं भाळ पायावरी ।४॥
८६३
गजाचें तें वोझें गाढवासी न साजे । भाविकाचे भजन अभाविका न विराजे ॥१॥ पतिव्रतेची रहाटी सिंदळीसी न साजे । श्रोतियाचें कर्म हिंसक लाजे ॥२॥ एका जनार्दनीं कवित्व सर्वांसी साजे । वाचे श्रीगुरु म्हणतो कदा न लाजे ॥३॥
८६४
गजाचें भार वोझें । गाढवा तें न साजे ॥१॥ तैसे भक्त अभक्त दोन्ही । वेगळीक वेगळेपणीं ॥२॥ मेघ वरुषे निर्मळ जळ । परी जैसे बीज तैसें फळ ॥३॥ एका जनार्दनीं गुण । चंदन वेळू नोहे समान ॥४॥
८६५
गडियांचे उत्तर ऐकोनी सांवळा वेधियलें मन तटस्थ सकळां ॥१॥ घेउनी मोहरीं गाई पाचारी सकळां । नवल तें जाहलें गोपाळा सकळां ॥२॥ नको वेरझारा पुरे आतां हरी । एका जनार्दनीं ऐशी करुना करी ॥३॥ एका जनार्दनी विश्वांचा निवासी । गाई आणि गोपाळां वेधिला सर्वासी ॥४॥
८६६
गडियासी सांगे वैकुंठीचा राव । आजीं आला भेवो यमुनेंत ॥१॥ जीवनालागीं तेथें कोण्ही पै न जावें । बाऊ आला आहे तया ठायीं ॥२॥ तयांचे बालेणें लागे सर्वा गोड । म्हणोनि धरिती चाड संवगडे ॥३॥ एका जनार्दनींऐकोनि वचन । पढती वचन पेंदा बोले ॥४॥
८६७
गडी मिळाले सकळ । यमुनेतटीं खेळ खेळती ॥१॥ धांवती ते सैरावैरा । खेळ बरा म्हणती ॥२॥ विसरलें तहान भुक । देखोनी कौतुक खेळांचे ॥३॥ भुललें संवगडी देखोनी । एका जनार्दनीं म्हणतसे ॥४॥
८६८
गडी म्हणती सकळ । कृष्णा तुं घेई कवळ । हरी म्हणे उतावीळ । घ्यावा तुम्हीं ॥१॥ गडी नायकती सर्वथा । हरी म्हणे मी नेहे आतां । म्हणोनी रुदोनी तत्त्वतां । चालिला कृष्ण ॥२॥ कृष्णा नको जाऊं जाण । तुझें ऐकूं वचन । म्हणोनि संबोखुन ।आणिला कृष्ण ॥३॥ एका जनार्दनीं । लाघव दावी चक्रपाणी । भक्ता वाढवुनीं । महिमा वदवी ॥४॥
८६९
गणिका नेली मोक्षपदां । रामनाम वदे एकदां ॥१॥ धन्य नामाचा महिमा । वदतां शेषा उपरमा ॥२॥ ध्यानी ध्यातो शूळपाणी । रामनाम निशिदिनीं ॥३॥ रामनाम दोन अक्षर । एका जनार्दनीं निर्धार ॥४॥
८७०
गत तें आयुष्य गत तें धन । गत दृश्यमान पदार्थ तो ॥१॥ गत अंबर गत तो पवन । गत तें हवन गत होय ॥२॥ एका जनार्दनीं अगत तें नाम । म्हणोनि विश्राम योगियांसी ॥३॥
८७१
गरुड हनुमंतादि आपण । सामोरा येत जगज्जीवन ॥१॥ आवडी कीर्तना ऐशी । लक्ष्मी तेथे प्रत्यक्ष दासी ॥२॥ मोक्षादिकां नव्हें वाड । येरा कोण वाहे काबाड ॥३॥ एका जनार्दनीं भुलला । उघडा कीर्तनी रंगला ॥४॥
८७२
गर्दभाचे अंगीं चंदनाची उटी । व्यर्थ शीण पोटीं लावूनियां ॥१॥ श्वान तो भोजनीं बैसविली अढळ । परी वोकावरी ढाळ जाऊं नेदी ॥२॥ सूकरा लेपन कस्तुरीचें केलें । परी तो लोळे चिखलां सदा ॥३॥ एका जनार्दनीं अभाविकाचे गुण । व्यर्थ शीण जाण प्राणियासी ॥४॥
८७३
गर्भवासा भीती ते अंधळे जन । मुक्तीसी कारण नाहीं आम्हां ॥१॥ गर्भवास झालिया संतसेवा घडती । मुक्त जालिया न कळे भगवद्भक्ती ॥२॥ आम्ही सुखें गर्भवास घेऊं देखा । मुक्तिचिया मस्तकां पाय देऊं ॥३॥ एका जनार्दनीं गर्भवास सोसुं । संतांचा सोरसु हातीं लागे ॥४॥
८७४
गर्भवासीचें दुःख सांगतां आटक । मलमुत्र दाथरीं जननीं जठरीं अधोमुख ॥१॥ शिव शिव सोहं सोहं । कोहं कोहं सांडुई पाहे निज जीवन ॥२॥ गर्भवासीचें सांकडे सांगावें कवणापुढे । सर्वांगी विष्टालेपु नाकीं तोंडीं किडे ॥३॥ एका जनार्दनीं भेटी तैं जन्ममरणा तुटी । जननी पयपान पुढती न करणें गोष्टी ॥४॥
८७५
गव्हंची राशी जोडिल्या हातीं । सकळ पक्कान्नें तै होतीं ॥१॥ ऐसा नरदेह उत्तम जाण । वाचे वदे नारायण ॥२॥ द्रव्य जोडितां आपुलें हाती । सकळ पदार्थ घरा येती ॥३॥ भावें करी संतसेवा । एका जनार्दनीं प्रिय देवा ॥४॥
८७६
गांठीं बांधोनियां धन मिरविती भक्ति । मनीं ते आसक्ती अधिक व्हावी ॥१॥ चित्तवित्ता वरी भक्ति लोकाचारीं । देव अभ्यंतरी केवीं भेटी ॥२॥ असें चित्त वित्ता लावी कळांतरी । अनुष्ठान करी दिवस गणी ॥३॥ जपतप विधान अवघेंची सांडी । धरणेंची मांडी सावकाश ॥४॥ धन सांडोनी मन धरी जानार्दन । एकाएकीं भक्ती फळेल तेणें जाण ॥५॥
८७७
गांवढे सहस्त्र ब्राह्मण । तृप्त केलिया भोजन । पुण्यक्षेत्रांचे एकचि जाण । सुकृत तितुकेंचि जोडे ॥१॥ ऐसें पुण्यक्षेत्रांचे दशशतक । तृप्त केलिया पाठक । पाहतां सुकृत । तितुकेंचि जोडे ॥२॥ ऐसे सहस्त्र वेदपाठक । तृप्त केलिया पंडीत एक । पहातां सुकृत । तितुकेंचि जोडे ॥३॥ तैसेच पंडित सहस्त्र एक । तृप्त केलिया संन्यासी देख । तरी तें सुकृत । तितुकेंची जोडे ॥४॥ तैसे सहस्त्र संन्यासी । गणिका एक परमहंसी । पाहतां सुकृतांसी । एक तृप्त केलिया ॥५॥ परमहंसी सहस्त्रगणि । तैसीच ब्रह्माज्ञानाची मांडणी । जोडे सुकृत तृप्तकरणी । एका ब्रह्मावेत्ता ॥६॥ उपमा देता ब्रह्मावेत्यासी । पाहता ब्रह्माडीं नाहीं त्यासी । तृप्त केलिया ब्रह्मावेत्यासी । हरिहर तृप्त ॥७॥ ऐसें वेत्ते अपरंपार । न ये नामधारका बरोबर । नामधारका सादर । पाहें एका जनार्दनीं ॥८॥
८७८
गाई गोपांसमवेत गोकुळिंहुन आला । पाहुनि भक्तिं भुलला वैष्णवाला ॥१॥ मुगुटमनी धन्य पंडलिक नेका । तयालागीं देखा उभा गे माय ॥२॥ युगें अठ्ठावीस जालीं परी न बैसे खालीं । मर्यादा धरली प्रेमाची गे माय ॥३॥ ऐसा व्यापक जगाचा जीवन । एका जनार्दनीं शरण गे माय ॥४॥
८७९
गाई चारी कान्होबा । गोपाळ सांगाती उभा । अनुपम्य त्याची शोभा । नाचती प्रेमानंदें । गाताती भोगिता छंदे । मन वेधिलें परमानंदें रे कान्होबा ॥१॥ भला कान्होबा भला । भला कान्होबा भला ॥धृ॥ गौळियांची आंधळीं पोरें । गाईपाठीं धांवतीं सैरें । हरि म्हणे रहा स्थिरें । तुमची आमची बोली । पहिलीच आहे नेमिली । त्वा बरीच ओळखी धरली रे कान्होबा ॥२॥ तुझीं संगती खोटी । आम्हां धाडिसी गाईचे पाठीं । तुं बैससी जगजेठी । तिझें काय केलें आम्हीं । तुं जगाचा हा स्वामी । तुझा महिमा आगमनिगमीं । काहीं न कळे रे कान्होबा ॥३॥ माझी गाय आहे दुधाची । तुला सांपडली फुकाची । मला चोरी काय लोकांची । कां पडलासी आमुचे डायीं । भिन्न भेद नाहीं । एक जनार्दनीं मन पायी रे कान्होबा ॥४॥
८८०
गाई राखतां दिससी साना । तैं म्हणों यशादेचा कान्हा ॥ आतां न मानिसी अवघ्या गगना ।तुं ना कळसी ध्यानामना रे कान्होबा ॥१॥ कान्होबा आमुचा सखा होसी । शेखीं नीच नवा दिससा रे कान्होबा ॥धृ॥ गाई राखितां लागली संवे । तैं जेऊं आम्हीं तुजसवें । तुं मिटक्या मारिसी लाघवें । तुझीं करणी ऐशी होये ॥२॥ धांगडतुतु खेळुं सुरक्या । डायीं आलीया मारुं बुक्या । आतां महिमा ये देख्या । काय कीर्ति वर्णावी सख्या ॥३॥ तूं ठायींचा खादाड होसी । तुं शोकिली बा मावसी । आतां माया गिळुं पाहासी । उबगलों तुझ्या बा पोटासी ॥४॥ तुज लक्षिता पारुषे ध्यान । ध्यातां ध्येय हारपलं मन । एका अवलोकीं जनार्दन । तुझें हुंबलीनें समाधान रे कान्होबा ॥५॥
८८१
गाऊं तरी एक विठ्ठलाचि गाऊं । ध्याऊं तरी एक विठ्ठलचि ध्याऊं ॥१॥ पाहूं तरी एक विठ्ठलचि पाहूं । आणिकां न गोवुं वासनाही ॥२॥ आठवुं तो एक विठ्ठल आठवुं । आणिक न सांठवुं हृदयामाजीं ॥३॥ विठ्ठलावांचुनीं मनीं नाहीं आन । सर्वभावें प्रमाण विठ्ठल मज ॥४॥ एका जनार्दनीं जडला जिव्हारीं । विठ्ठल चराचरीं व्यापुनि ठेला ॥५॥
८८२
गाजी परमानंदु मानसीं । संत भेटतां सुखराशी । कीर्तनें तारिलें सर्वांसी । विठ्ठल नामस्मरणें ॥१॥ धन्य धन्य विठ्ठल मंत्र । सोपा तीन अक्षरीं पवित्र । काळिकाळ उघडोनि नेत्र । पाहूं न शके जयासी ॥२॥ एका जनार्दनीं उघडोनि नेत्र । पाहुं न कीर्तनें प्राप्त सर्व स्थिती । जयजय रामकृष्ण म्हणती । ते तरती कालीमाजीं ॥३॥
८८३
गाठीं बांधोनियां धना । क्षणाक्षणा पाहे त्यातें ॥१॥ न जाय तीर्थयात्रेप्रती । धनाशा चित्तीं धरूनी ॥२॥ बैसलासे सर्प दारीं । तैशापरी धुसधुसी ॥३॥ नको धनाशा मजशी जाण । शरण एका जनार्दन ॥४॥
८८४
गाढवासांगती सुकाळ लाथांचा । श्रम जाणिवेचा वायां जाय ॥१॥ आम्हांसी तों एक प्रेमाचे कारण । नामाचें चिंतन विठोबाच्या ॥२॥ एका जनार्दनीं आवडी हें माझी । संतचरण पुजीं सर्वकाळ ॥३॥
८८५
गाणे बाणे मुर्तीकडें । राम अध ऊर्ध्व मागें पुढें ॥१॥ मुखीं उच्चारितां नाम । जिव्हेंमाजीं वसे राम ॥२॥ श्रुति मृदंग टाळ घोळ । ते नाद राम सकळ ॥३॥ एका जनार्दनीं नित्य गात । श्रोता वक्ता जनार्दन तेथें ॥४॥
८८६
गाण्याचें कीर्तन वाखणिलें । जाणिवेचें ज्ञान तें जाणिवेनें खादलें ॥१॥ भवार्णव हा अवघा उभारी । तो कळे जाणिवेवरी रे ॥२॥ पंडिताचा बोध विध्वंसी वाद । तापसाचें तप निर्दाळी क्रोध ॥३॥ योगियाचा योग नाडियेला सिद्धि । अभिमान नाडी सज्ञान बुद्धी ॥४॥ कर्माकर्म नाडी वर्णाश्रम । संबंधी विषम विकल्प करी ॥५॥ एकाजनर्दनीं भगवत कृपा पुर्ण । निरभिमानें चरण धरियेलें ॥६॥
८८७
गाती नाचती आनंदे वैष्णवजन । ते दाखवा भुवन पंढरी ॥१॥ आदरें येती वारकारी । नानापरी संवगडे ॥२॥ नरनारी एके ठायीं । पाहतीं वीठ्ठल रखुमाई ॥३॥ सुख अदभुत विश्रांती । एका जनार्दनीं धरा चित्ती ॥४॥
८८८
गातो एका ध्यातो एका । अंतरबाहीं पाहातों एका ॥१॥ अगुणां एक सगुणीं एका । गुणातीत पाहातो एका ॥२॥ जनीं एका वनीं एका । निरंजनीं देखो एका ॥३॥ संत जना पढिये एका । जनार्दनीं कडिये एक ॥४॥
८८९
गाय नामपाठ न करीं आळस । हातां येईल सौरस इच्छिलें तें ॥१॥ न करी आळस आलिया संसारीं । नामपाठ निरंतरीं गाय सदा ॥२॥ जनार्दनाचा एक प्रेमें विनटला । नामपाठें झाला कृतकृत्य ॥३॥
८९०
गायत्री मंत्राचा मानुनी कंटाळा । जाय तो वेताळा पूजावया ॥१॥ देवाचें पूजन करितां वाटे दुःख । आवडीं देख भांग घोटी ॥२॥ ब्राह्मणासी पाणी देतां मानीं शीण । वेश्येचें धूवण वस्त्रें धूई ॥३॥ कीर्तनीं बैसतां म्हणे निद्रा येत ।खेळतसे द्यूत अहोरात्रीं ॥४॥ पुराण श्रवणीं मानीत कंटाळा । नटनाट्य खेळा पाहों जाय ॥५॥ एका जनार्दनीं ऐसा तो गव्हार । चंद्रअर्कवर नरक भोगी ॥६॥
८९१
गायन तें सोपें गाऊं । वाचे ध्याऊं विठ्ठल ॥१॥ तेणें सर्व होय सिद्धि । तुटे उपाधि जन्मजरा ॥२॥ साधनांचा न करुं श्रम । गाऊं नाम आवडीं ॥३॥ शुकादिक रंगले रंगीं । त्याची मार्गीं आम्हीं आऊं ॥४॥ एका जनार्दनीं धणीवरी । उच्चारुं हरी संतसंगें ॥५॥
८९२
गीता गीता वाचे जे म्हणती । नाहीं पुनरावृत्ति तया नरां ॥१॥ नित्य वाचे वदतां अक्षरें । भवसिंधु तरे अर्धक्षणीं ॥२॥ एका जनार्दनीं जयाचा हा नेम । तया पुरुषोत्तम न विसंबे ॥३॥
८९३
गीतेंचें सुव्रत । ज्यासी जालें प्राप्त । त्याचे पितर मुक्त । सहजचि जाले ॥१॥ नष्ट चांडाळ दुर्जन । परदारी तस्कर मात्रागमन । त्यासी गीता आवर्तन । श्रवणें मोक्ष होय ॥२॥ सुवर्णस्तेय सुरापान । भूत पिशाच्च राक्षसगण । मित्रद्रोही कृतघ्न । गीता आवर्तनें मोक्ष त्यासी ॥३॥ एका जनार्दनीं गीतार्थी । पठणें श्रवणें सर्वांसी मुक्ती । ऐसें पार्वतीप्रती । शंभु सांगे ॥४॥
८९४
गीतेचें आवर्तन त्यांचे ऐका पुण्य । सावध अंत:करण करुनियां ॥१॥ गीतेच्या सुकृता मौनावला विधाता । हरिहरां तत्वतां बोध जाला ॥२॥ वैकुंठापासूनि जाण तेणें बांधलें सदन । त्रिलोकीचें तीर्थाटन घडलें त्यासी ॥३॥ वाराणशी यात्रा तेणें केल्या अपारा । लक्षलक्षांतरा द्विजभोजनें ॥४॥ आणिक मेरुसमान वांटिलें सुवर्ण । कोट्यान कोटी पूजन साधूचें केलें ॥५॥ एका जनार्दनीं जाण इतुकें घडे महा पुण्य । हे सत्य सत्य वचन गीता आवर्तनीं ॥६॥
८९५
गीतेचें महिमान ऐकावें श्रवणीं । सावधान सज्जनीं द्यावें आतां ॥१॥ जयाचे अंतरी वसे नित्य गीता । पावन तत्वतां ब्रह्मरुप ॥२॥ गीता म्हणतां ऐसें दोन्हीच अक्षरें । पाप तें निर्धारें दिशा लंघी ॥३॥ भगवदगीता पठण सर्वकाळ ज्यासी । मोक्षाची तो राशी मूर्तिमंत ॥४॥ गीता म्हणतां त्यासी काय पुण्य आहे । इतिहास पाहे पुराणींचा ॥५॥ पार्वतीयेप्रती शिवें सांगितलें । अध्यात्म बोलिले ब्रह्मविद्या ॥६॥’ ब्रह्मरुप त्याचें स्वयें चित्त झालें । बोलणें खुंटले आहे नाहीं ॥७॥ नित्य म्हणतां गीता वाचेसी स्मरण । केलिया पठण पुण्य काय ॥८॥ दोषाचे पर्वत भस्म होती तेणें । गीतेचे पठण केलियानें ॥९॥ श्रवण पठण गीतेचे पूजन । सर्वही साधन कलियुगीं ॥१०॥ पद्मपुराणीचें सांगितलें सार । गीता आहे थोर ब्रह्मविद्या ॥११॥ सर्वही पातकें जळोनियां जाती । अर्जुना श्रीपती बोलियेला ॥१२॥ गीता अभ्यासितां कळे सारासार । महिमा आहे थोर पठणाचा ॥१३॥ गीता म्हणतां आहे पापा प्रायश्चिता । मुक्ति सायुज्यता वरी त्यासी ॥१४॥ गीता म्हणतां जाण भागीरथीं स्नान । पृथ्वीचि दान दिधली तेणें ॥१५॥ गीता ध्याई नर सर्वदा तो सुची । सर्वही तीर्थांची महिमा तेथें ॥१६॥ तीर्थक्षेत्रयात्रा देवाचें पूजन । यज्ञयाग दान उद्यापन ॥१७॥ धरणी पारणी नित्य उपोषण । पृथ्वीचें भ्रमण निराहारी ॥१८॥ जप तप व्रत नित्य अनुष्ठान । कर्म आचरण उपासना ॥१९॥ पुराण श्रवण वेदशास्त्रीं जाण । सर्वही साधन घडे त्यासी ॥२०॥ ब्रह्मविद्या गीता सर्वांचें साधन । करी जो पठण नित्य काळीं ॥२१॥ एका जनार्दनीं नित्य हेंचि ध्यान । पूर्ण समाधान घडे तेणें ॥२२॥
८९६
गुंतला सर्प भुलला नादा । तैसी प्राणियासी आपदा संसाराची ॥१॥ सदा तळमळ मन नाहीं स्थिर । भोगिती अघोर जन्मोजन्मीं ॥२॥ नळिका यंत्रामाजीं सांपडे वानर । संसारीं तो नर तैसा गुंते ॥३॥ एका जनार्दनीं करितां नाना युक्ति । मागें ही फजिती पुढें होती ॥४॥
८९७
गुंतलासी मायापाशी । कोण सोडवील तुजसी । धाये मोकलेनि रडसी । न ये करूणा कवणातें ॥१॥ वाचे सदा नाम गाय । तेणें चुकती अपाय । सहजची सोय । नाम मुखीं वदतां ॥२॥ बंधनाची तुटेल बेडी । होईल कैवल्याची सहज जोडी । एका जनार्दनीं आवडी । रामनामीं धरितां ॥३॥
८९८
गुंतलों प्रपंचीं सोडवी गा देवा । देई तुझी सेवा जीवेंभावें ॥१॥ न लगे धन मान पुत्र दारा वित्त । सदां पायीं चित्त जडोनि राहो ॥२॥ वैष्णवांचा दास कामारी निःशेष । हेचि पुरवी आस दुजें नको ॥३॥ एका जनार्दनीं करीत विनंती । मागणें श्रीपति हेंचि द्यावें ॥४॥
८९९
गुडघेमेटाइ बैसले तोंडी खरस आलें । ते असे देखिले रामकृष्णें ॥१॥ मोहरी काढोनि लावियली मुखा । नांदे तिहीं लोकां मोहियलें ॥२॥ तयांमध्ये म्हणे गडे हो ऐका । पळालीसे देखा भिउनी तुम्हां ॥३॥ मोहियलें मन सर्वांचे भावें । एका जनार्दनीं देवें नवल केलें ॥४॥
९००
गुणदोष नायकावे कानीं । सदा वाचा नामस्मरणीं ॥१॥ हेंचि परमार्थचें सार । मोक्ष मुक्तिचे भांडार ॥२॥ साधे सर्व योगस्थिती । द्वेष धरुं नये भूतीं ॥३॥ सर्वाठायीं जनार्दन । म्हणोनि वंदावे ते जन ॥४॥ खूण सांगे जनार्दन । एका जनार्दनीं पूर्ण ॥५॥
९०१
गुतंली भ्रमर कमळणी कोशीं । आदरें आमोदासी सेवितसे ॥१॥ तैसें रामनामीं लागतां ध्यान । मन उन्मन होय जाण रामनामीं ॥२॥ रामनाम बळें कर्माकार्मीं चळे । जीवासी सोहळे रामनामें ॥३॥ एका जनर्दनीं राम परिपूर्ण । प्रपंच परमार्थ रामचि जाण ॥४॥
९०२
गुरु जनार्दन सांगे राममंत्र । पूजावे पवित्र द्विजवर ॥१॥ जोडिली संपदा ब्राह्मणासी द्यावी । अखंड करावी चरणसेवा ॥२॥ ब्राह्मणाचें तीर्थ जे नर सेविती । हरिहर येती वंदावया ॥३॥ ब्राह्मणाचें तीथ ज्या नर मस्तकीं । सायुज्यता मुक्ति पायां लागे ॥४॥ एका जनार्दनीं मुक्ति हे तो वाव । भजा हे भूदेव कोटी जन्मीं ॥५॥
९०३
गुरु परमत्मा पुरेशु । ऐसा ज्याचा दृढ विश्वासु ॥१॥ देव तयाचा अंकिला । स्वयें संचला त्याचे घरा ॥२॥ एका जनार्दनीं गुरुदेव । येथें नाहीं बा संशय ॥३॥
९०४
गुरु माता गुरु पिता । गुरु आमुची कुळदेवता ॥१॥ थोर पडतां सांकडें । गुरु रक्षी मागें पुढें ॥२॥ काया वाचा आणि मन । गुरुचरणींच अर्पण ॥३॥ एका जनार्दनीं शरण । गुरु एक जनार्दनीं ॥४॥
९०५
गुरुच्या उपकारा । उत्तीर्ण नव्हे गा दातारा ॥१॥ माझें रुप मज दाविलें । दुःख सर्व हारविलें ॥२॥ तन मन धन । केलें गुरुसी अर्पण ॥३॥ एका जनार्दनीं आदर । ब्रह्मारुप चराचर ॥४॥
९०६
गुरुपत्नीं आज्ञापिलें । तिघे इंधनासी गेले ॥१॥ घोर क्रमिती कांतार । माथां बांधोनी काष्ठभार ॥२॥ रात्र झाली सुटला वारा । मेघ वर्षे मुसळधारा ॥३॥ म्हणे चपळा गारा रिचवती । तिघे थरथरां कांपती ॥४॥ म्हणे एक जनार्दनु । मग उदया आला भानु ॥५॥
९०७
गुरुमुखें घेतां तो निर्दोष । येर्‍हर्वीं आयास पडे कष्ट ॥१॥ राम कृष्न हरिमंत्र हा सोपा । उच्चारितां खेपा खंडे कर्म ॥२॥ तुटती भावना द्वैताची ते बुद्धि । निरसे उपाधि कामक्रोध ॥३॥ एका जनार्दनीं सत्य सत्य साचा । रामनाम मंत्रांचा जप करीं ॥४॥
९०८
गुरुस्मरण करितां देख । स्मरणें विसरे तहानभुक ॥१॥ आसनीं शयनीं भोजनीं । गुरुतें न विसंबे ध्यानीं मनीं ॥२॥ गुरुसेवेची आवडी । सेवा करी चढोवोढी ॥३॥ गुरुचरणाची गोडी । एका जनार्दनी पायीं दडीं ॥४॥
९०९
गेला आपुल्या गृहाप्रती । बाळ तो निद्रा न करी रात्रीं । क्षुधा लागलीसे बहुती । मागे दूधभात जेवाया ॥१॥ पुढें ती करड्या वांटुनी । काढिले शुभ्रपाणी । येरें टाकिलें थुंकोनी । म्हणे माते कालीचें नव्हे ॥२॥ बारे त्या समर्थाचे घरीं । देवें दिधली दूध क्षीरी । आम्हां दुष्कृताचे घरीं । तें कैंचे रे बाळका ॥३॥ कोठें आहे तो श्रीहरी । दाखवी मज निर्धारी । एका जनार्दनीं परी । ध्यान लागलें हरीचें ॥४॥
९१०
गेलों गुरुलागीं शरण । माझें हारपलें मीतुपण ॥१॥ द्वैतभाव गेला देशोधडी । बोध दिठा मज संवगडी ॥२॥ मंत्र सांगे त्रिअक्षर । परात्पर निजघर ॥३॥ जपतां मंत्र लागलें ध्यान । सहज खुटलें मीतूंपण ॥४॥ एका जनार्दनीं समाधी । सहज तुटली उपाधी ॥५॥
९११
गो गोरसातीत स्वानंद साखरेसी । प्रेमें पेहें पाजीन संख्या सोयर्‍यासी ॥१॥ घेई घेई बाळा घोट एक । झणी पायरव होईल कुशलीं पडे तर्क ॥२॥ दृश्य न दिसे तें कांळीं अवघें लावी होटीं । सद्युक्तीचें शिंपीवरी गिळी तैसें पोटीं ॥३॥ अंतर तृप्त जालें सबाह्म कोंदलें । निज गोडिये गोडपणें तन्मय जालें ॥४॥ सदगुरु माउली पेहे पाजी अंगीं भरला योग । तेणें देह बुद्धी समुळ केला त्याग ॥५॥ पंचभुतांचे अंगुलें सुवर्ण हारपलें । माझें माझें म्हणत होतें त्या गुणा विसरलें ॥६॥ आतींची हारली भूक जालें सुख । निजनंदी पालखी पहुडलें स्वात्ममुख ॥७॥ पेहे पाजायाचे मिसें देतसे पुष्टी तुष्टी । एका सामावाला जनार्दना पोटीं ॥८॥
९१२
गोकुंळींचा कान्हा अवतरला तान्हा । प्रथम पूतना शोषियेली ॥१॥ जन्मला वोखट घालुं आला वीट । पिढें महाबळभट पिटविला ॥२॥ वारा वाजे थोर सुटला आवर्तु । कृष्णें तृणावर्तु मर्दियेला ॥३॥ पाय होनोनिया मोडिला शकटु । कृष्ण अलगटु देवकीचा ॥४॥ मृतिका खादली वरितां पै देख । उदरीं तिन्हीं लोक दाखविलें ॥५॥ दहीं दुध चोरी आली बा मुरारी । माया दावें वरी बांधितसे ॥६॥ नऊ लक्ष गोप न पुरती उदरा । माया दामोदरा बांधितसे ॥७॥ दावा दामोदरु बांधिला मायेनें विमलार्जुन दोन्ही उद्धरिलें ॥८॥ वत्साचोनि रुपें आला पै असुर । झाडीं वत्सासुर झाडियेला ॥९॥ ध्यानस्थाचें परी बैसलासे तीरीं । बका दोन्हीं चिरी केल्या कृष्णें ॥१०॥ चेंडु वाचे मिसें नाथिला काळिया । फणीरंगी कान्हया नृत्य करी ॥११॥ इंद्रा मान हरी गोवर्धन करीं । धरोनि श्रीहरी व्रज राखे ॥१२॥ ताडाफळासाठीं धेनुक उठिला । कृष्णें निवटिला क्षणमात्रें ॥१३॥ वणवा गिळिला राखिलें गोपाळ । संतोषे सकळ नाचताती ॥१४॥ गोपाळ वासुरें अघासुर गिळी । कृष्णें दोन्हीं केली पहिल्या ऐसी ॥१५॥ वत्स वत्सपाळ नेले सत्य लोकां । अवघीं कृष्ण देखा होऊनि ठेला ॥१६॥ वळितं गोधनें गोपाळांशी खेळे । पाहतां निवतीं डोळे गोपिकांचे ॥१७॥ शरदऋतु शोभा शोभली रजनी । कृष्ण वृंदावनीं वेणु वाहे ॥१८॥ वेणुनादध्वनी वेधिल्या कामिनी । कृष्णादीपें हरिणी दीपियेल्या ॥१९॥ गोपीप्रती गोपी कृष्ण एक एकु । सहस्त्रघटीं अर्कू नसोनि दिसे ॥२०॥ वेणुनाद ध्वनि वेधिल्या गोपिका । रंगी त्या मायिका नाचविय्ल्या ॥२१॥ अरिष्टा अरिष्ट झाला कृष्णनाथु । केशिया आघातु केला तेणें ॥२२॥ गोकुळीं दैत्यासी केला आडदरा । थोर कंसासुर धाक पडे ॥२३॥ गोकुळा अक्रुर पाठविला रांगे । म्हणे आणी वेगें रामकृष्णा ॥२४॥ भाग्य भाव माझा कंसाचिया काजा । वैकुंठीचा राजा देखेन आजीं ॥२५॥ गाईचे रे खुर विष्णुपदांकित । पृथ्वी शोभत अक्रुर देखे ॥२६॥ ध्वजवज्राकुम्श कुंकुमांकित पदें । अक्रुर आनंदें डोलतसे ॥२७॥ तृणतरुवरां घाली लोटांगण । पुढती कृष्णचरण कैं देखेन ॥२८॥ पावला गोकूळां तंव वैकुंठ थोकडें । व्रज तेणें पांडे कृष्णमुखें ॥२९॥ देखोनियां कृष्ण विसरलां आपणां । आक्रुर श्रीकृष्ण चरणीं लोळे ॥३०॥ जाणोनि त्याचा भावो वेगीं निघे देवो । चला मथुरा पाहों आजीं आम्हीं ॥३१॥ व्रजीच्या अंगना करिताती रुदना । मागुता कैं कान्हा देखो आतां ॥३२॥ रथारुढ हरी पाहाती नरनारी । यमुना परतीरीं उतरले ॥३३॥ मारुनी रजक घेतलीं लुगडीं । गोपाळ आवडीं श्रृंगारिले ॥३४॥ पाटाउ परिकर नेसले पितांबर । कासे मनोहर नाना मेचु ॥३५॥ अक्रुरें जाउनी कंसा जाणविलें । मथुरेसी आले रामकृष्ण ॥३६॥ ऐसें ऐकोनि कंस दचकला मनीं । सर्व रुप नयनीं कृष्ण देखे ॥३७॥ चंदन कचोळी भेटली कुब्जा । वैकुंठीचा राज चर्चियेला ॥३८॥ कुब्जा म्हणे हरी चला माझे घरीं । सुमनेंही वरी श्रुंगारिली ॥३९॥ हातीं धरोनी बरी ते केली साजिरी । कंस भेटीवरी येईन घरां ॥४०॥ माळीयें सुमनें श्रृंगारिला हरी । वैकुंठ पायरीं केली तया ॥४१॥ मुक्त मुमुक्ष विषयीं हे लोक । पाहाती कौतुक कृष्णलीला ॥४२॥ मथुरे चोहाटाचा चालिला राजवाटा । टाकिला दारवंटा धनुर्याग ॥४३॥ तेथें अतिबळें कुवलया उन्मत्त । पेली महावुत कृष्णावरी ॥४४॥ त्यासी हाणोनिया लात उपडिलें दोन्हीं दांत । घायें महावत मुक्त केलें ॥४५॥ यागीचें कादडें केलें दुखंड । बळी ते प्रचंड रामकृष्ण ॥४६॥ घेऊनि गजदंत पावले त्वरित । मारिले अमित वीर कृष्णें ॥४७॥ न धरत पैं वेगीं आला मल्लरंगीं । कंस तो तवकेकें चाकाटला ॥४८॥ माल मल्लखडा करीतसे रगडा । कृष्ण तो निधडा एकपणें ॥४९॥ मुष्टीकचाणुर घायें केला घातु । कोपला अंनतु कंस पाहें ॥५०॥ चाणुर मुष्टिक हातें निवटिलें । दैत्य धुमसिलें अनुक्रमें ॥५१॥ रणरगडा अशुद्धचा सडा । कृष्ण कंसा कडा उठावला ॥५२॥ न लगतां घायें धाकें सांडी देहो । मथुरे केला रावो उग्रसेन ॥५३॥ सोडिलीं पितरें तोडिलें बंधनें । एका जनार्दने मुक्त केली ॥५४॥
९१३
गोकुळामाजी कृष्णें नवल केलें । स्त्री आनि भ्रतारा विंदान दाविलें ॥१॥ खेळ मांडिला हो खेळ मांडिला । न कळे ब्रह्मादिकां अगम्य त्याची लीळां वो ॥२॥ एके दिनीं गृहा गेले चक्रपाणी । बैसोनी ओसरी पाहे पाळतोनी लोनी ॥३॥ गौळणी आली घरां म्हणे शारंगपाणी । चोरीचे विंदान पाळती पाहसी मनीं ॥४॥ चोरी करावया जरी येसी सदनीं । कृष्णा धरुनी तुझी शेंडी बांधीन खांबालागुनी ॥५॥ एका जनार्दनीं ऐसे बोले व्रजबाळी । दाविलेंअ लाघव ब्रह्मादिकां न कळे ते काळीं ॥६॥
९१४
गोकुळी गोपाळसवें खेळतसे देव । ऐक प्रेमभाव तयांचा तो ॥१॥ गोधनें राखणें उच्छिष्ट खादणें । कालाहि करणे यमुनेतीरी ॥२॥ सवंगडियांचे मेळी खेले वनमाळी । घोंगडी ते काळी हातीं काठी ॥३॥ त्रैलोक्यांच्या धनीं वाजवी मुरली । भुलवी गौळणी प्रेमभावें ॥४॥ घरोघरीं चोरी करितो आदरें । एका जनार्दनीं पुरे इच्छा त्यांची ॥५॥
९१५
गोकुळी जे शोभलें । तें विटेवरी देखिलें ॥१॥ काळ्या पृष्ठी शोभलें । तें विटेवरी देखिलें ॥२॥ पूतनेहृदयीं शोभलें । तें विटेवरी देखिलें ॥३॥ काळयवनें पाहिलें । तें विटेवरी देखिलें ॥४॥ एका जनार्दनीं भलें । ते विटेवरे देखिलें ॥५॥
९१६
गोकुळीं आनंद जाहला । रामकृष्ण घरा आला । नंदाच्या दैवाला । दैव आलें अकस्मात ॥१॥ श्रावण वद्य अष्टमीसीं । रोहिणी नक्षत्र ते दिवशी । बुधवार परियेसी । कृष्णमूर्ति प्रगटलीं ॥२॥ आनंद ब समाये त्रिभुवनी । धांवताती त्या गौळणी । वाण भरुनी नंदराणी । सदनाप्रती ॥३॥ एका जनार्दनी अकळ । न कळे ज्याचें लाघव सकळ तया म्हणती बाळ जो म्हणती बाळ । हालविती ॥४॥
९१७
गोकुळीं गोमाई गवळणी । तिच्या सुना चवघी जणीं । यमुने गेल्या एके दिनीं । त्यांनी कृष्ण पहिला ॥१॥ कृष्णा पाहतां मधुसूदन । मोहिलें चवघीचें मन । कृष्ण कृष्ण लागलें ध्यान । देहभान विसरल्या ॥२॥ सर्वें एके होती शेजारीण । आली सदनासी धांवुन । गोमाईसी वर्तमान । अवघे विदित केलें ॥३॥ राखी लपवी आपुल्या सुना । सुनेचें नख दृष्टी पडुं देइना । जर कां येशील माझे सदना नासिका चुना तीन बोटें ॥४॥ कृष्ण काय म्हणे तिसीं । येणें जाणें नाहीं आम्हांसी । जें कां वदली रमनेसे । तिची प्राप्ती तुजलागीं ॥५॥ देव ब्राह्मणीचा वेष । धरिता जाला जगन्निवासा । हा रस ऐकतां सायास । मुढ जन उद्धरती ॥६॥ पांढर्‍या पातलाची कासोटी । जीर्ण चीर वेष्टिलें कंठीं । हाता घेउनी धाकुटी । काठी धरुनी चालिली ॥७॥ वार्‍यासारखी चाचरी जाये । तोल सांभाळुनी उभी राहे । अवसान धरुनिया पाहें । गोमाइनें देखिली ॥८॥ गोमाई म्हणे अहो ब्राह्मणि । कोठें जातेस आसीस कोठुनी । आशापाश नाहीं कोणी । माझी मीच ऐकली ॥९॥ करुनी आले वाराणाशी । पुढें जाणें रामेश्वरासी । आणिक जाणे बहु तीर्थासे । ऐसी गोमाईसी बोलली ॥१०॥ येवढ्या नगरामध्ये कोणी । दयाळु नाहीं तुजावांचुनी । जागा देई वृंदावनीं । रातचे रात करमीन ॥११॥ अस्ता गेला वासरमणी । सुखें राहें वृदावनी । आज्ञा केली इंद्रालागुनी । सत्वर मेघा पाठवी ॥१२॥ वीज लावली मेघमंडळी । ढग निवाला तेच काळीं । मेघानें सोडिल्या फळीं । जनलोकक पाहतसे ॥१३॥ मेघानें सोडिल्या धारा । थंड गार सुटला वारा । शामाई कांपतसे थरथरां ॥ गोमाइने देखिली ॥१४॥ गोमाई म्हणे अहो साजणी । आंत येई वो ब्राह्मणी । मरुनी जाशील वृंदावनीं । प्रायश्चित्त मजवरी येईल ॥१५॥ मरूनि जाईल वृंदावनीं । परी मी येईना कोणाचे सदनीं । देव राखीव मजलागुनी । ऐशी शामाई बोलली ॥१६॥ इतुका मेघ वर्षला थोर । भिजलें नाहीं तुझे वस्त्र । शामाई म्हणे आम्हांवर । इश्वराची बहु कृपा ॥१७॥ तुम्ही शुद्ध गे ब्राह्मणी । देव तुम्हीं केला ऋणी । आम्ही नरदेहासी येऊनी । प्रपंचसदनीं बुडालों ॥१८॥ दारावाटे बोलावुन । नेत्रीं पाहे अवलोकुन । चक्रपाणी ओळखुन ।चरणीं ठाव मज देई ॥१९॥ आतां उठावेना करुं काई । हाती धरुनि उठवी गोमाई । कवाड उघडोनि लावलाही । बळे सदना लोटलीं ॥२०॥ बळें सदनीं लोटलें मला । मजवर बलात्कार केला । मी सांगेन नंदजीला । म्हणोनी गलबला करितसे ॥२१॥ सदनी जातां तत्क्षाणी । चवघी उद्धरल्या कामिनी । दारापाशी येऊनी । हाकां मारी गोमाई ॥२२॥ गोमाई येऊनी लागे चरणां । पुनीत केल्या आमुच्या सुना । नासिका लावियेला चुना । पाहुन पळे गोविंद ॥२३॥ गोमाई उद्धरली कथा । आपण होऊनि श्रोता वक्ता । एका जनार्दनी दाता । सत्य वार्ता ही माझी ॥२४॥
९१८
गोकुळीं चोरी करितो चक्रपाणी गवळणी येउनी सांगती गार्‍हाणीं । येणेंमाझें भक्षिलें दहीं दूध लोणी । पळोनियां येथें आला शारंगपाणी वो ॥१॥ आवरीं आवरीं यशोदे आपुला कान्हा । याच्या खोडी किती सांगु जाणा । याचें लाघव न कळे चतुरानना । यासी पाहतां मन नुरे मीपणा वो ॥२॥ एके दिवशीं मी आपुलें मंदिरीं । मंथन करितां देखिला पुतनारी । जवळी येवोनि रवीदंड धरी । म्हणे मी घुसळितोम तु राहें क्षणभरी वो ॥३॥ परवां आमुचे घरासी आला । संगे घेउनी गोपाळांचा मेळा । नाचले ऐकत धरें पाहें अचला । धरूं जातां तो पळोनियां गेला वो ॥४॥ ऐसें बहु लाघव केलें येणें । किती सांगावें तुज गार्‍हाणें । एका जनार्दनीं परब्रह्मा तान्हें । यासी ध्याता खुंटलें येणे जाणे वो ॥५॥
९१९
गोकुळीं ठेवितां श्रीकृष्णनाथ । वसुदेवास माया प्राप्त । तेणें पावला त्वरित । देह बंदिशाळे ॥१॥ तंव तुटली जडली बेडी । कपाटा पडली कडी । भव भयाच्या कडाडी । अहं कंस पावे ॥२॥ श्रीकृष्ण सांडिला मागें । पंचमहाभूत पाठी लागे । मिथ्या बंधन वाउगें । उठी मरण भये ॥३॥ कंस पुसे लवलाह्या । काय प्रसाली तुझी जाया । म्हणोनी आणिली योगमाया । वसुदेवें ॥४॥ वेगें देवकी म्हणे । कंस पुसेल जेव्हां तान्हें । तेव्हा तुवां देणें । हे तया हातीं ॥५॥ ते तें देतां देवकी जवळी । गर्जे ब्रह्मांड किंकाळी । टाहो फुटली आरोळी । दैत्या निधीची ॥६॥ तेणें दचकलें दुर्धर । कामक्रोधादि असुर । कंस पावला सत्वर । धरावयासी ॥७॥ वेंगीं आठवा आणवी । तंव हातां आली आठवीं । कंस दचकला दुर्धर जीवीं । नोहें जालेंचि विपरित ॥८॥ आठवा न दिसे डोळां । आठवी पडली गळां । कर्म न सोडी कपाळा । आलें मरण मज ॥९॥ परासि मारितां जाण । मारिल्या मारी मरण । कंस भीतसे आपण । कृष्ण भय करी ॥१०॥ आठवीं उपडितां तांतडीं । तंव तें ब्रह्मांड कडाडी । हातांतुन निष्टली हडबडी । कंस भयाभीतु ॥११॥ तंव ते गर्जलीं अंबरीं । पैले गोकुळीं वाढे हरी । तुज सगट बोहरी । करील दैत्याकुळाची ॥१२॥ वधिता देवकीचीं बाळें । माझें पाप मज फळलें । माझें निजकर्म बळें । आलें मरण मज ॥१३॥ भय संचलें गाढें । तेणें पाऊल न चले पुढें । पाहतां गोकुळाकडे । मूर्च्छित कंस बा ॥१४॥ आसनीं भोजनीं शयनीं । भये क्रृष्ण देखे नयनीं । थोर भेदरा मनीं । जनीं वनीं हरी देखे ॥१५॥ कृष्ण भयाचें मथित । कंसपणा विसरे चित्त । एकाजनार्दनी भक्त । भयें जीवन्मुक्त ॥१६॥
९२०
गोकुळीं लाघव दावितो चक्रपाणी । भोवंत्या वेष्टित बैसल्या अवघ्या गौळणी । मध्येम सुकुमार सांवळा शारंगपाणी । चिमणी पितांबर पिवळा । गळां वैजयंती माळा । घवघवीत घनसांवळा । पाहे नंदराणी ॥१॥ नाच रे तू कृष्णा मज पाहुं दे नयनी ॥धृ॥ नाचतो सांवळा सुंदर निमासुर वदन । वाळेघोळ घागरीयांच्या क्षणत्कार पूर्ण । आकर्ण नयन सुहास्य वदन पाहुनी भुले मदन । हातीच्या मुद्रिका झळकती । क्षुद्र किंकणी सुस्वर गती । वाकी नेपुरे ढाळा देती । पहाती गौळणी ॥२॥ सप्तही पाताळें नाचती हरिचिया गण गंधर्व देव सर्व अक्षर हरिपदें । वैकुंठ कैलास नाचती । चंद्र सुर्य रसनायक दीप्ति । ऋषिमंडळ धाक तोडिती । अदभुत हरिकिरणी ॥३॥ नाचती सर्वही फणीपाळ । परिवारेस नाचती पृथ्वेचे भूपाळ । मेरू पर्वत भोगी नायक । वनस्पती नाचती कौतुक । वेदशास्त्र पुराण पावक । नाचत शुळपाणी ॥४॥ नाचती गोपाळा गोपिका सुंदर मंदिरें । उखळें जाती मुसळें पाळीं आणि देव्हारें । धातुमुर्ति नाचुं लागल्या एकसरें । गौळणी अवघ्या विस्मित । देहभाव हरपला समस्त । यशादेसी प्रेम लोटत । धरिला धांउनि ॥५॥ शिणलासी नाचतां आतां पुरें करी हरी । विश्वरुप पाहतां गोपी विस्मित अंतरीं । यशोदेनें कृष्ण घेतला कडियेवरी । एका जनार्दनी भक्तिभाव । अनन्य भक्ता दावी लाघव । निज भक्तांचे काज सर्व । करितां शिण न मानीं ॥६॥
९२१
गोकुळीच्या जना ध्यान । वाचे म्हणती कृष्ण कृष्ण । जेवितां बैसतां ध्यान । कृष्णमय सर्व ॥१॥ ध्यानी ध्यती कृष्णा । आणिक नाहीं दुजी तृष्णा । विसरल्या विषयध्याना । सर्व देखती कृष्ण ॥२॥ घेतां देतां वदनीं कृष्ण । आनं नाहीं कांही मन । वाचा वाच्य वाचक कृष्ण । जीवेंभावें सर्वदा ॥३॥ कृष्णारुपीं वेधली वृत्तीं । नाहीं देहाची पालट स्थितीं । एका जनार्दनी देखती । जागृती स्वप्नी कृष्णांतें ॥४॥
९२२
गोजिरें ठाण विठोबांचे । आवडी साचें बैसली ॥१॥ आणखी न धावें कोठें मन । समचरण पाहातांचि ॥२॥ नाहीं आन दुजी वासना । आवडी चरआणा बैसलासे ॥३॥ एका जनार्दनीं मन । सांडिन कुर्वंडी करुन ॥४॥
९२३
गोड साखरसे गोड साखरसे । रामनाम रसे चवी आली ॥१॥ देठीचें फळ देठीं पिके । रान तोडितां चवी चाखे ॥२॥ न फोडी न तोडी सगळेंचि सेवी । ब्रह्मादिकां तो वाकुल्या दावी ॥३॥ एका जनार्दनीं घेतली गोडी । जीव गेला तरी मी न सोडी ॥४॥
९२४
गोडी वेगळा ऊंस वाढे । हें तो न जोडे कल्पांतीं ॥१॥ जों जों वाढे तों तों गोड । ऐशी चाड भावाची ॥२॥ जों जों धरिशील भाव । तों तों देव दिसे पुढें ॥३॥ ही तों प्रचीति घ्या अंगीं । नाचा रंगीं संतांच्या ॥४॥ रुपावेगळी ती छाया । एका जानर्दनीं लागे पायीं ॥५॥
९२५
गोधनें चाराया जातो शारंगपाणी । मार्गीं भेटली राधिका गौळणी । कृष्ण दान मागे निरी आसडोनी । तंव ती देखिली यशोदा जननी ॥१॥ यशोदा म्हणे नाटका हृषीकेशी । परनारीसी कैसा रे झोंबसी । येरु रुदत सांगतो मातेपाशीं । माझा चेंडुं लपविला निरिपाशीं ॥२॥ राधिका म्हणे यशोदे परियेसी । चेंडु नाही नाहीं वो मजपाशी । परि हा लाटिका लबाड हृषीकेशी । निरी आसडितां चेंडु पडे धरणीसी ॥३॥ यशोदा म्हणे चाळका तुम्ही नारी । मार्गीं बैसतां क्षण एक मुरारी । एका जनार्दनीं विनवीं श्रीहरी । नाम घेतां पातकें जती दुरी ॥४॥
९२६
गोपाळ गौळणी शोभती त्या मुर्ती । तें सुख परिक्षिती संतजन ॥१॥ ऐसें अपरंपार भक्त ते असती । स्वयेंचि श्रीपती दावितसे ॥२॥ एका जनार्दनीं भक्ताचा तो मेळ । दावीत सकळ वैभव हरिभक्तां ॥३॥
९२७
गोपाळ म्हणती कान्हया कृष्नातें । आजी यमुनेचे जळ वर्जा कां जी ॥१॥ हरी म्हणे तयातें तेथें बाऊ आला । म्हणोनि तया स्थळा नवजावें ॥२॥ ऐकोनियां पेंदा नाचतो दुपांडी । गदियांची मादि सवें घेत ॥३॥ बाऊ पहावया गडे हो अवघे चला । या कृष्णबोला राहुं नका ॥४॥ एका मागें एक गडी ते निघाले । एका जनार्दनीं आले यमुनेटीं ॥५॥
९२८
गोपाळ म्हणती कान्हा । सांभाळीं आपुल्या गोधळा । पळतां सैराट धांवती राना । गेल्या ठेल्या त्या तुम्हीं जाणां ॥१॥ कान्होबा पुरे पुरे तुझी गडी । आम्हा गाईनें केली ओढाओढी ॥धृ॥ तूं बैससी टेकावरी । आम्हीं श्रमतों वेरझारीं । ऐसें कैसें तुझें मुरारी । आपुलीं गोधनें जतन करीं ॥२॥ तुझ्या न लगती आम्हां गाई । तुझी संगती पुरे भाई । जरी कोपेल तुझी आई । तरी करील आमचें काई रे ॥३॥ तुझी गोधनें सैराटें । दाहीं पळतां दाही वाटे । वळितां कष्ट होताती मोठे । ठेचा लागुनी फुटली । बोटें ॥४॥ पैल श्रवणीं पाहे गाये । ते साद होये तिकडे जाये । उभी क्षणभरीं न राहे । वळितां जाती आमुचे पाय ॥५॥ पैल सावळीं डोळे सुटी । देखोनि धांवे हिरवटी । वळीतां धाप न साहे पोटीं । ती तु सांभाळी जगजेठी ॥६॥ पैले हुंगी कैसा सुजाण । स्वाद घे परी न खाये तृण । इसी हिंडवया थोडकें रान । वळीतां जाती आमुचे प्राण ॥७॥ पैल चोरटी रसाळ रंगी । कळप सांडोनी वाढे वेगीं । वळितां न वळे ती आम्हालांगीं । तुझी संगत नको वेंगीं ॥८॥ पैल सर्वांग सुकुमार मोठी । चहूंकडे ती धांवत खोटीं । मऊ रान देखोनियां अंग लोटी । तिसी वळितं जालों हिंपुटी ॥९॥ पैल लोभिष्ट हुंबरे कैशी । उगा न राहे हुंबरे द्वेषी । वळीतसं न वळे ती आम्हांसी । ती तु सांभाळी हृषीकेशी ॥१०॥ पैल हाताळ वोढाळ येकी । तेणे पाते गुड हाकी । ऐशी खट्याळ नाहीं आणिका । वळितां वळित्या घेती निकी ॥११॥ पैल पाय करिती भारी । उभी न राहे क्षणभरीं । वळतां शिणलों बहु मुरारी । तें तुं आपुलें जतन करीं ॥१२॥ पैल पोटफुगी खादाड । कैशी खाउनी हागे बाड । धुतां कधींच नव्हे धड । तुझीं गोधने न लगती गोड ॥१३॥ पैल मुतरीं मुंजी लांडी । कैशी सांचलीं घेत होडी । धांवे जेथें गोड लागे तोंडीं । वळतां पडती आमुची मुरकुंडी ॥१४॥ पैल मनमोहन सुंदर । कोणें काळी नव्हें स्थिर । इसी हिंदावया थोर वावर । हांव धरुनी धावती फार ॥१५॥ ऐसी गोधनें आमुच्या माथां । घालूं पहातोसी अनंता । एका जनार्दनीं विनवितं कृपा आली आलिंगी निजभक्ता ॥१६॥
९२९
गोपाळपुरीं काला गोपाळ करिती । तेथील लाभा देव लाळ घोटिती ॥१॥ ऐसा आनंड गे माय तया पंढरपुरी । धन्य भक्त देवंचे वारकरी ॥२॥ आषाढी कार्तिकी नित्य नेमें जाण । जाउनी भीवरे करिताती स्नान ॥३॥ घेतां दरुशन पुंडलिकाचे भेटी । एका जनार्दनी पुण्य न समाये सृष्टी ॥४॥
९३०
गोपिका त्या बोल बोलती आवडी । एकताती गडी संभोवतें ॥१॥ सभोंवतें तया न कळेची खूण । पहाती विंदान श्रीहरींचें ॥२॥ गोपिका कामातुर त्या मनीं । जाणोनि चक्रपाणी रास खेळे ॥३॥ षण्मास खेळ खेळती अबला । एका जनार्दनीं कळा न कळे कोण्हा ॥४॥
९३१
गोपी धावुनियां धरिती तयातं । उगा पाहे बहतें न बोले कांहीं ॥१॥ करिती गलबला मिळती सकळां । बोलती अबला वाईट तें ॥२॥ कां रें चोरा आतां कैसा सांपडलासी । म्हणोनि हातासी धरियलें ॥३॥ वोढोनियां नेती यशोदे जवळी । आहे वनमाळी कडेवरी ॥४॥ एका जनार्दनी यशोदेचे करीं । उभा श्रीहरी लोणी मागें ॥५॥
९३२
गोमटीं गोजिरी पाउलें साजिरीं । कटी मिरविली करें दोन्हीं ॥१॥ वामभागी शोभे भीमकतनया । राही सत्यभामा या जीवलगा ॥२॥ गरुड हनुमंत जोडलें ते करी । उभे महाद्वारी भक्तजन ॥३॥ एका जनार्दनीं आनंदे भक्तांचा । जयजयकार साचा विठ्ठलनामें ॥४॥
९३३
गोमटें गोजिरें पाउलें साजिरें । धरियेलीं गोजिरीं विटेवरी ॥१॥ वेध तो तयाचा मनें कायावाचा । दुजा छंद साचा नाही मना ॥२॥ इंद्रिये धांवतों आकळती ठायीं । विठोबाचे पायीं ठेवियलें ॥३॥ एका जनार्दनीं वेधलेंसे मन । धरुनी चरण दृढ ठेलों ॥४॥
९३४
गोमटेंक नागर कटीं धरुनि कर । उभा तों सुकुमार वैकुंठींचा ॥१॥ रूपाचें रूपस पाहतां सावकाश । धणीं धाय मनास तया पाहतां ॥२॥ नाठवे कल्पना मनाचिया मना । बुद्धि ते चरणा विनटली ॥३॥ एका जनार्दनीं इंद्रियांची चाली । सर्व हारपली पंढरी पाहतां ॥४॥
९३५
गोरक्षनाथें उपदेश केला । ब्रह्मारुप झाला गहिनीनाथें ॥१॥ गहिनीनें निवृत्तिनाथासी । उपदेश त्यासी आत्मबोध ॥२॥ निवृत्तिनाथाने ज्ञानदेव पाहीं । एका जनार्दनीं तेही बोधियेलें ॥३॥
९३६
गोरियाचे कांता आनंदली चित्तीं । वंदिली माता ती रुक्मादेवी ॥१॥ रुक्मादेवी म्हणे न करा काहीं चिंता । शपथ सर्वथा मुक्त होय ॥२॥ ऐसें भक्तचरित्र ऐकतां कान । होतसे नाशन महापापा ॥३॥ एका जनार्दनीं पुरले मनोरथ । रामनाम गर्जत आनंदेसी ॥४॥
९३७
गोरियाच्या वाडा संत प्रवेशले । गोरियाने देखिले दृष्टीं सर्व ॥१॥ देउनी आसन बैसविलें संतां । तंव ज्ञानदेव पुढतां होउनी बोले ॥२॥ कर ते तुटले प्रपंच चाले कवणे परी । येरु म्हणे वांटेकरी पंढरीचा ॥३॥ ज्ञानदेव म्हणती तयासी बोलवा । तंव ते लगबगा धांवे कांता ॥४॥ स्त्रियेसहित नाहीं तेथें कुंभकार विठा । एका जनार्दनीं वांटा गेला कवणें ॥५॥
९३८
गोरियानें केला मनासीं विचार । हाचि एक निर्धार बरा जाहला ॥१॥ लिगाड तें आपोआप मावळलें । विषयांचे जाहलें तोंड काळें ॥२॥ विठ्ठलें करुणा केली सर्वपरी । तारियेलें भवपुरीं संसाराचें ॥३॥ एका जनार्दनीं खुंटला वेव्हार । नाहीं आन विचार प्रपंचाचा ॥४॥
९३९
गोल्हाट उल्हाट कासया आटाआटी । घेतां संतभेटीं पुरे हेंची ॥१॥ गुद ते पीडन नागिणी दमन । संतदरुशन घडतां जोडे ॥२॥ ओहं सोहं यातायाती कोहं जाण । टाकुनि संतचरण धरां आधीं ॥३॥ एका जनार्दनीं मानावा विश्वास । होय देवदास आपोआप ॥४॥
९४०
गोविंद गोपाळ वदतां वाचे । पायीं यमदूताचें भय नाहीं ॥१॥ नित्य जया ध्यान गोविंद स्मरण । संसारबंधन तया नाहीं ॥२॥ उठतां बैसतां खेळतां हासतां । गोविंद गीतीं गातां मोक्ष जोडे ॥३॥ गोविंदाचें नाम सदा ती समाधी । एका जनार्दनीं उपाधी तुटली त्याची ॥४॥
९४१
गोविंयेंलें देवें आम्हांसी अभिमानें । नामरुप पेणें अंतरलों ॥१॥ करिती विचार इंद्रादी देव । हें सुखवैभव न मिळे आम्हां ॥२॥ शेष उष्टावळी मिळतां आम्हांसी । पावन जन्मासी होऊं आम्ही ॥३॥ ऐसा विचार करुनियां देव । मत्स्यरुप सर्व धरिताती ॥४॥ गोपाळासी सांगे वैकुंठीचा रावो । आजी नवलावो तुम्ही करा ॥५॥ कवळ खाउनी हात टिरी पुसा । यमुनें सहसा जाऊं नका ॥६॥ कां तो सांगे हरी न कळे तयासीं । एका जनार्दनासी गुज पुसे ॥७॥
९४२
गौ आणि कन्या कथेचा विकरा । चांडाळ निर्धार पापराशी ॥१॥ तयाचें तें मुख न पाहती जन । अपवित्र दुर्जन पातकी तो ॥२॥ एका जनार्दनीं दोषां न परिहार । भोगिती अघोर कल्पकोटीं ॥३॥
९४३
गौळणी गार्‍हाणे सांगतो यशोदेसी । दहीं दुध खाऊनियां पळुनी जातो हृषीकेशी ॥१॥ लाडका हा कान्हा बाई तुझा तुला गोड वाटे । याच्या खोडी किती सांगु महीपत्र सिंधु आटे ॥२॥ मेळवानि गोपाळ घरामध्यें शिरे कान्हा । धरुं जातां पळुनि जातो यादवांचा राणा ॥३॥ ऐसें मज याने पिंसे लावियसे सांगु काई । एका जनार्दनी कायावचामनें पायी ॥४॥
९४४
गौळणी बारा सोळा । हो उनी येके ठायीं मेळा । म्हणती गे कृष्णांला । धरुं आजीं ॥१॥ कवाड लाउनीं । बैसल्या सकळजणी । रात्र होतांचि माध्यांनी । आला कृष्ण ॥२॥ दहीं दुध तुप लोणी । यांची भोजनें आणुनी । रितीं केली तत्क्षणीं परी तयां न कळें ॥३॥ थोर लाघव दाविलें । सकळां निद्रेनें व्यापिलें । द्वार तें नाहीं उघडिलें । जैसें तैसेंची ॥४॥ खाउनी सकळ । मुखा लाविलें कवळ । आपण तात्काळ । पळे बाहेरी ॥५॥ एका जनार्दनी ऐशी करुनि करणी । यशोदे जवळी येउनी । वोसंगा बैसे ॥६॥
९४५
गौळणी म्हणती यशोदेला । कोठें गे सांवळां । कां रथ शृंगारिला । सांगे वो मजला । अक्रुर उभा असे बाई गे साजरी ॥१॥ बोले नंदाची आंगणीं । मिळाल्या गौळणी ॥धृ॥ बोले नंदाची पट्टराणी । सद्गदेत होउनी । मथुरेसी चक्रपाणी । जातो गे साजणी । विव्हळ झाले मन वचन ऐकोनी ॥२॥ अक्रुरा चांडाळा । तुज कोनी धाडिला । कां घातां करुं आलासी । वधिशी सकळां । अक्रुरा तुझे नाम तैशीच करणी ॥३॥ रथीं चढले वनमाळी । आकांत गोकूळीं । भूमि पडल्या व्रजबाळी । कोण त्या सांभाळी । नयनींच्या उदकांनें भिजली धरणी ॥४॥ देव बोले अक्रुरासी वेगें हांकी रथासी । या गोपींच्या शोकासी । न पहावेंमजसी । एका जनार्दनीं रथ गेला निघोनि ॥५॥
९४६
गौळणी सांगती गार्‍हाणीं । रात्री आला चक्रपणी । खाऊनी दहीं दूध तूप लोणी । फोडिली अवघीं विरजणीं ॥१॥ हा गे बाई कोणासी आवरेना । यशोदा बाळ तुइझा कान्हा । कोठवर सांसुद धिंगाणा ॥धृ०॥ दुसरी आली धांवत । याने बाई काय केली मात । मुखाशीं मुखचुंबन देत । गळ्यामधी हात घालीत धरुं जातां सांपडेना ॥२॥ तिसरी आली धांउनी । म्हणे गे बाई काय केली करणी । पतीची दाढ़ी माझी वेणी । दोहीसी गांठ देउनी । गांठ बाई कोणा सुटेना ॥३॥ मिळोनि अवघ्या गौळणी । येती नंदाच्या अंगणीं । जातों आम्हीं गोकुळ सोडोनी । आमुच्या सुना घेउनी । हें बाई आम्हांसी पहावेना ॥४॥ ऐशीं ऐकतां गार्‍हाणीं । यशोदानयनीं आलें पाणीं । कृष्ण खोड दे टाकुनी एका जनार्दनीं चरणीं । प्रेम तया आवरेना ॥५॥
९४७
गौळणीचा थाट निघाला मथुरे हातालागीं । तें देखोनि जगदीश धांवला गोप घेऊनी वेगीं ॥१॥ कान्हयां सरसर परता नको आरुता येऊं । तुझा संग झालिया मग मी घरा कैसी जाऊं ॥धृ॥ सासुरवासिनी आम्ही गौळणी जाऊं दे रे हरी । बहु वेळ लागतां सासु सासरे कोपतील घरीं ॥२॥ आम्हीं बहुजनी येकला तु शारंगपाणी दिससी येथें । हृदयमंदिरीं ठेऊनी तुंतें जाऊं मथुरांपथें ॥३॥ एका जनार्दनी ब्रह्मावादिनी गोपिका बरवटां । कृष्णापदीं त्या लीन झाल्या पूर्णपणें तन्निष्ठा ॥४॥
९४८
ग्रामाचे बाहेरी येवोनि श्रीहरी । सुदाम्यासी भेटुनी करी समाधान ॥१॥ जोडोनियां हात विनवी सुदामा । पूर्ववत प्रेमा असों द्यावा ॥२॥ एका जनार्दनीं बोलोनियां ऐसें । तांतडी निघतसे क्रमीत मार्ग ॥३॥
९४९
घटघवीत वैकुंठनाथ । भक्तवत्सल शोभत ॥१॥ तयाचे पायीं माझें मन । राहो वृत्तिसह जडोन ॥२॥ नेणें आणिक दुजा छंद । वाचें आठवीन गोविंद ॥३॥ एका जनार्दनीं कटीं कर । उभा चंद्रभागे तीर ॥४॥
९५०
घटामाजीं घालिजे अमृत । अथवा घालिजे खात मूत ॥१॥ घट घाई करितां चूर । आकाशासी नुमटे चीर ॥२॥ घट फोडुनी केला नाश । आकाश तैसेंचि अविनाश ॥३॥ तेवीं देव नश्वर जाण । एका जनार्दनीं परिपुर्ण ॥४॥
९५१
घटामाजीं जीवन घालितां अभ्र दिसों लागें सर्वथा ॥१॥ घट फुटलिया जाण । अभ्र न नासेचि पुर्ण ॥१॥ घटाकार देहस्थिती । जाणावी पां त्वां निश्चिती ॥३॥ एका जनार्दनीं पूर्ण । सबाह्म आत्मा परिपुर्ण ॥४॥
९५२
घटिका पळ न वजे वायां । संतपायां सांडोनी ॥१॥ मनोरथ पुरले मनीचें । झाले देहांचें सार्थक ॥२॥ जन्मा आलियांचें काज । संतसंग घडला निज ॥३॥ एका जनार्दनीं मिठी । संतसंग जडला पोटीं ॥४॥
९५३
घटिका भरतां न लगे वेळ । उभा काल वाट पाहे ॥१॥ कोणी न ये रे संगाती । वायां होतसे फजिती ॥२॥ माप भरतां नाहीं गुंती । वायां कुंथी फळ काय ॥३॥ शरण रिघा जनार्दनीं । मोक्षदानीं उदार ॥४॥ एका विनवी जनार्दनीं । अंतकाळीं नाहीं कोणी ॥५॥
९५४
घडती पुण्याचियां रासी । जे पंढरीसी जाती नेमे ॥१॥ घडतां चंद्रभागे स्नान । आणि दरुशन पुडंलीक ॥२॥ पाहता विटेवरी जगदीश । पुराणपुरुष व्यापक ॥३॥ वारकारी गाती सदा । प्रेमें गोविंदा आळविती ॥४॥ तया स्थळीं मज ठेवा । आठवा जनीं जनार्दन ॥५॥
९५५
घनाःश्याम मूर्ति नीलवर्ण गाभा । कैवल्याची शोभा शोभे बहु ॥१॥ कस्तुरी मळवट चंदनाची उटी । बाहुवटे कंठी गोरेपणें ॥२॥ एका जनार्दनीं चरणाची शोभा । अनुपम्य उभा भीमातटीं ॥३॥
९५६
घर सोडोनि जावें परदेशा । मजसवें देव सरिसा ॥१॥ कडे कपाटे सीवरी । जिकडे पाहे तिकडे हरी ॥२॥ आतां कोणीकडे जावें । जिकडे पाहे तिकडे देव ॥३॥ एका बैसला निरंजनीं । न जाइजे जनीं वनीं ॥४॥
९५७
घरचा वृत्तांत पाहुनी नयनीं । नामा तेचि क्षणीं राउळीं गेला ॥१॥ पायांवर भाळ ठेवुनी तत्वतां । म्हणे पंढरीनाथ सांभाळिलें ॥२॥ जन्माचा पोसणा दास तुझा दीन । तें त्वां वचन सत्य केलें ॥३॥ एका जनार्दनीं दासाचें धांवणें । देवाविण कोण करील तें ॥४॥
९५८
घरीं धनधान्य पुरून । सदा मागे जो कोरान्न ॥१॥ द्रव्य असोनी नाहीं म्हणे । केविलवाणे म्हणे मी दीन ॥२॥ असोनि द्रव्याचिया राशी । भिक्षा मागे अहर्निशीं ॥३॥ ऐसा संचय करुन । सवेंची पावल मरण ॥४॥ वायां गेला नरदेहीं । एका जनार्दनीं पाही ॥५॥
९५९
घरोघरी कृष्ण धरिला बोभाटा । घेऊनि येती धीटा राजद्वारी ॥१॥ पाहती तो उभा यशोदे जवळी । वाउगी ती कळी दिसताती ॥२॥ गोपिका धांवती घेऊनियां कृष्ण । न कळे विंदान कांहीं केल्या ॥३॥ घेऊनियां येती तटस्थ पाहती । विस्मित त्या होती आपुले मनीं ॥४॥ एका जनार्दनींदावीत लाघव । न कळेंचि माव ब्रह्मादिकां ॥५॥
९६०
घरोघरीं चोरी करितो हृषीकेश । गार्‍हाणे संगिती येऊनी यशोदेसी ॥१॥ भली केली गोविंदा भली केली गोविंदा । निजभक्तालागीं दखाविसी लीला ॥२॥ कवाड उघडोनि शिंके वो तोडिलें । दहीं दुध भक्षूनि ताक उलंडिलें ॥३॥ अंतर बाहेर मज व्यापियलें माया । एका जनार्दनी म्हणे न सोडी पायां ॥४॥
९६१
घालितां संतापायीं मिठी । पुर्वज वैकुंठी उद्धरती ॥१॥ ऐसा संतांचा महिमा । वानुं न शके शिवब्रह्मा ॥२॥ इच्छिलें तें फळ । जन पावती सकळ ॥३॥ एका जनार्दनीं विश्वास । संत दासांचा मी दास ॥४॥
९६२
घाली देवावरी भार । आणिक न करी विचार । योगक्षेम निर्धार । चालवील तुझा ॥१॥ वाचे गाय नामावळी । वासुदेवीं वाहे टाळीं । प्रेमाचें कल्लोळीं । नित्यानंदें सर्वथा ॥२॥ सोस घेई कां रेक वाचे । रामकृष्ण वदतां साचें । धरणें उठतें यमाचें । निःसंदेह ॥३॥ शरण एका जनार्दनीं । करी रामनाम ध्वनी । कैवल्याचा दानीं । रक्षी तुज निर्धारें ॥४॥
९६३
घालुनी आसन पोटीं भाव नाहीं । वायां केली पाही विटंबना ॥१॥ देव सर्वांभुतीं तयासी न कळे । वाउगें गवाळें पसरिलें ॥२॥ अंतरीं तो हेत द्रव्य मिळेल कांहीं । वरपांग दावी वेषधारी ॥३॥ एका जनार्दनीं ऐसीया सोंगासी । काय देवा त्यासी दंड करा ॥४॥
९६४
घालुनी माया म्हणे नंदराया । भजे यादव राया कायावाचा ॥१॥ संसारसुख भोगाल चिरकाळ । परब्रह्मा निर्मळ तया भजे ॥२॥ नंद म्हणे देव दूर आहे बापा । आम्हांसी तो सोपा कैसा होये ॥३॥ ऐकातांचि वचन काय करी नारायण । प्रगटरुप जाण दाखविलें ॥४॥ शंख चक्र गदा पद्म तें हस्तकीं । मुगुट मस्तकीं शोभायमान ॥५॥ ऐसा पाहतां हरी आनंद पैं झाला । एका जनार्दनी भेटला जीवेंभावें ॥६॥
९६५
घालूनियां काखे धन । सदा मागे जो कोरान्न ॥१॥ धन्य वायां जिणें पाही । श्वान सुकर सम तेही ॥२॥ असोनियां दरिद्रता । सदा धर्मावरी चिंता ॥३॥ द्रव्य पदरीं बहु आहे । अतिथि रिक्त हस्तें जाये ॥४॥ एका जनार्दनीं ऐसें पामर । नरक भोगिती अघोर ॥५॥
९६६
घालूनियां फ़ांसा वोढी आपणाकडे । न येतां सांकडें घाली बहु ॥१॥ भजातियाचे निवारी आघात आपण । न भजतिया अकल्याण करी स्वयें ॥२॥ ऐशी याची सवे मागाहुनी आली । एका जनार्दनीं बोली काय बोलों ॥३॥
९६७
घालूनियां मिठी करीत स्फ़ुंदन । न सोडी चरण विठोबाचे ॥१॥ कां रे मायबापा लावियेली सवे । ऐशी वां कां माव केली आतां ॥२॥ नामयासी देवें करें उचलिलें । प्रीतीनें आलिंगिलें तये वेळीं ॥३॥ एका जनार्दनीं सज्जनांचा दास । म्हणोनी चरित्रास कथियेलें ॥४॥
९६८
घेऊनि कापड निघे बाजारासीं । आठवी देवासी वेळोवेळां ॥१॥ व्यापार तो कैंचा मज नाहीं ठावा । काय वो केशवा करुं आतां ॥२॥ माझी हे फ़जितीं होईल पांडुरंगा । काय या प्रसंगा करुं जातां ॥३॥ एका जनार्दनीं ऐसा नामा कष्टी । होऊनी हिंपुटी चालिलासे ॥४॥
९६९
घेऊनि गोधनें जाती यमुने तटीं । नानापरी खेळ खेळताती जगजेठी ॥१॥ मेळेवोनि गोपाळ मध्यें खेळे कान्हा । न कलेचि महिमान ऐसा यादवांचा राणा ॥२॥ नानापरींचे खेळ खेळती गोपाळ । नाचती गदारोल मिळोनी सकळ ॥३॥ एका जनार्दनी खेळे मदनपुतळा । नंदरायाचा कुमरु म्हणतात सांवळा ॥४॥
९७०
घेऊनि मौनपणाचा वेष । उभा सावकाश विटेवरी ॥१॥ न बोलेचि कोना न बैसेचि खालीं । पुरानें वेडावलीं अष्टादाश ॥२॥ भागलीं दर्शनें शास्त्रे वेवादितां । मतितार्थ पुरता न कळे तयां ॥३॥ शेष जाणूं गेला तोही मौनावला । वेदादिकां अबोला पडोनि ठाके ॥४॥ संगतीं संताचे भुलोनिया उभा । एक जनार्दनी शोभा न वर्णवे ॥५॥
९७१
घेऊनि लवलाही गृहासी ती आली । मनी संतोषली आनंदभरित ॥१॥ पतीसी तत्वंता दिले तें पृथक । बांधावला वस्त्र धड नाहीं ॥२॥ शत एक ग्रंथी वस्त्रासी बांधोनी । निघाला तेथोनि झडझडा ॥३॥ पतिव्रता बोले लवकरी यावें । एका जनार्दनीं बरबों म्हणोनि निघे ॥४॥
९७२
घेऊनियां परिवारा । आला असे पंढरपुरा ॥१॥ भक्तां पुंडलिकासाठी । उभा ठेवुनी कर कटीं ॥२॥ केशर कस्तुरी चंदन टिळा । कांसे शोभें सोनसळा ॥३॥ वामांकी शोभे रुक्मिणी । शरण एका जनार्दनीं ॥४॥
९७३
घेऊनियां हातीं काठी । पोरा खेळसी सुरकांडी रे ॥१॥ खेळे सुरकांडी पोरा खेळे सुरकांडी । विषयांची वासना धरुनी चढसी प्रपंचाचे झांडी ॥२॥ बुडापासुन शेंडा रे चढसी फांडोफादी रे । कामक्रोध पोरें लागती पाठींम्हणती माझा दादा रे ॥३॥ धरीं एका जनार्दनी गोडी तरी खेळ जोडा रे । वायां खेळ खेळू जाती होईल भ्रकवडी रे ॥४॥
९७४
घ्या रे रामनामाची कावड भाई । शिव हरहर वदा भाई ॥१॥ अकार उकार मकार तिचा पाया । उभारिले त्रिगुण तनयां ॥२॥ हरिहर कावड घेतां खांदीं । तुटे जन्ममरण व्याधी ॥३॥ घेऊनि कावडी नाचे एका । एका जनार्दनीं आवडी देखा ॥४॥
९७५
घ्यावया वोखदाची वाटी । माता साखर दे चिमुटी ॥१॥ तेणेंक घोटी गोडपणें । हारे व्याधी नाना पेणें ॥२॥ तयासाठीं घाबरी । माता होय ती निर्धारी ॥३॥ शरण एका जनार्दनीं । तैसा लोभ ठेवा मनीं ॥४॥
९७६
चंचळ तें मन मुष्टीमाजी धरी । नामपाठ हरि गाये सदा ॥१॥ जोडेल सर्व सिद्धि तुटेल उपाधी । नामपाठी आधींभावें गाय ॥२॥ जनार्दनाचा एका निश्चयें करुनीं । नामपाठ निर्वाणीं जपतसे ॥३॥
९७७
चंचळत्व मनाचें मोडे । दृष्टीचें स्थिरत्व जोडे । सहज समाधि घडे । हरिकॄपेनें पाहे पां ॥१॥ पवफ़्न पवनाची आटणी । आसनीं दृढ दृष्टी ठेउनी । गोल्हाट भेदोनी । त्रिकुटाचल मस्तकीं ॥२॥ निरालंबीं विश्रांति । पूर्ण एकाजर्नादन स्थिति । अखंड भोगिताति । जनार्दन कृपें ॥३॥
९७८
चंदनाचे झाडा भुजंग वेष्टला । प्राणी तो गुंतला तैसा व्यर्थ ॥१॥ कमळणीं पुष्पीं भ्रमर गुंतला । प्राणी वोथंबला तयापरी ॥२॥ मंजुळ गायनी । कुरंग वेधला प्राणी तो गुंतला तैशापरी ॥३॥ मोहळ कंदासी मक्षिका गुंतली । तैशी परी जाहली प्राणियासी ॥४॥ एका जनार्दनीं गुंतू नको वायां । जासी भोगावया सुख दुःख ॥५॥
९७९
चंद्र पौर्णिमेचा दिसे पा सोज्वळ । तैसा श्रीविठ्ठल पंधरीये ॥१॥ क्षीरसिंधुसम भीवरा ती वाहे । स्नान करितां जाय महत्पाप ॥२॥ सनकसनंदनसम पुंडलीक । शोभा आलोलिक वर्णु काय ॥३॥ लक्ष्मी प्रत्यक्ष रखुमाई राही । एका जनार्दनीं पायीं लीन जाला ॥४॥
९८०
चंद्र पौर्णिमेचा शोभते गगनीं । तैसा मोक्षदानी विटेवरी ॥१॥ बाळ सुर्य सम अंगकांती कळा । परब्रह्मा पुतळा विटेवरी ॥२॥ मृगनाभी टिळक मळवटीं शोभला । तो घननीळ सांवळा विटेवरी ॥३॥ एका जनार्दनीं ध्यानाचें ध्यान । तें समचरण विटेवरी ॥४॥
९८१
चंद्रभागा तटीं उभा वाळुवंटीं । वैजंयतीं कंठीं शोभतसें ॥१॥ गोमटें साजिरें सुकुमार ठाण । धरिलें जघन करें दोन्हीं ॥२॥ राहीरखुमाई शोभती वामभागीं । शोभे उटी सर्वांगी चंदनाची ॥३॥ मोर पिच्छ शिरीं शोभती ते वरी । केशर कस्तुरी शोभे भाळी ॥४॥ शंख चक्र गदा पद्म ते शोभती । सावळी हे मुर्ति विटेवरी ॥५॥ शोभती भुषणें चरणीं वाळे वाकीं । जानु जंघा शेखीं शोभताती ॥६॥ एका जनार्दनी वर्णितां ध्यान । मनाचें उन्मन सुखें होय ॥७॥
९८२
चंद्रभागे तीरीं समपदीं उभा चैतन्याचा गाभा पाडुरंग ॥१॥ कांसे पीतांबर गळा तुळशीहार । पदक हृदयावर वैजयंती ॥२॥ एकाजनार्दनीं लावण्य साजिरें । रुप ते गोजिरें विटेवरी ॥३॥
९८३
चंद्राहुनी शीतळ रवीहुनी सोज्वळ तेणे मज केवळ वेधियलें ॥१॥ वेध कैसा मज लागला वो बाई ॥धृ॥ अमृताहुनी स्वादू गगनाहुनी मृदु । रुपेंविण आनंद देखिला बाई ॥२॥ ऐका जनार्दनी आनंदु परिपूर्ण । काया वाचा मनें वेधिलें वो बाई ॥३॥
९८४
चक्षुदर्पणीं जग हें पहा । जगज्जीवनीं मुरुनी रहा । तूर्या कालिंदि तीर्थीं नाहा । पापपुण्यासी तिळांजुळीं वहा ॥१॥ डोळ्यांनों सत्य ही गुरूची खूण । आपुलें स्वरूप घ्या ओळखून ॥ध्रु०॥ तिन्हीं अवस्था सांडुनी मांगें । अर्ध चंद्राचा चांदण्यांत वागे । चांदणें ग्रासुनी त्या ठायीं जागे । गड उन्मनी झडकरी वेगें ॥२॥ एवढें ब्रह्मांडफळ ज्या देठी । तें आटलें देखण्याचें पोटीं । त्यासी पहातां पाठीं ना पोटीं । मीतूंपणांची पडली तुटी ॥३॥ चहूं शून्याचा निरसी जेणें । शून्य नाहीं तें शून्यपणें । शुन्यातीतचि स्वयंभ होणें । शून्य गाळूनि निःशून्यपणें ॥४॥ चार सहा दहा बारा सोळा । ह्मा तो आटल्या देखण्याच्या कळा । कळातीत स्वयंभ निराळा । एका जनार्दनीं सर्वांग डोळा ॥५॥
९८५
चतुर्भुज शामसुंदर । गळां गुण्जींचे हार । निढळीं चंदन शोभे परिकर । मिरवे नंदरायाचा किशोर ॥१॥ हातीं काठी खांदी कांबळीं । गाई राखे यमुनेचे पाबळी । नाचती गोपाळ धुमाळी । पृष्टी जाळी दहींभात ॥२॥ जे निगमांचे ठेंवणें । सनकसनंदाचे घोसुलें येणें । शंभुचे आराध्यदैवत केणें । तें चरित गोधनें नंदाची ॥३॥ ऐसा अकळ नाकळें हरी । वेणु वाजवी छंदे नानापरी । एका जानार्दनी गोपेवेषें निर्धारीं । वाटी शिदोरी गोपाळं ॥४॥
९८६
चतुर्भुज श्याममुर्ति । शंखचक्र ते शोभती । पीतांबर वैजयंती । रुळती गळां ॥१॥ देव देखिला देखिला । तेणें संसाराचा ठावो पुशिला । विदेही तो भेटला । भक्त तयातें ॥२॥ दोघा होतांचि मिळणी । नुरे देव भक्तपणीं । फिटली आयणी । सर्व कोड कठीण ॥३॥ छंद पाहिजे नामाचा । निश्चयो काया मनें वाचा । एका जनार्दनीं त्याचा । देव होय अंकित ॥४॥
९८७
चतुर्भुज साजरी शोभा । चुन्मात्र गाभा साकार ॥१॥ शंख चक्र गदा कमळ । कांसे पीतांबर सोज्वळ ॥२॥ मुगुट कुंडलें मेखळा । श्रीवत्स शोभे वक्षस्थळां ॥३॥ निर्गुण सगुण ऐसें ठाण । एका जनार्दनीं ध्यान ॥४॥
९८८
चरण गोमटे माय । पाहतां पाहतां मन न धाय । पुनरपि फिरुनी तेथें जाय । ऐसा वेध होय तयाचा गे माय ॥धृ॥ नवल गे माय न कले वेदां । आचोज विवाद शास्त्रंचिया ॥१॥ पुराणें भागलीं दरुशनें विडावलीं । कांही केलिया न कळे तया ॥२॥ तो पुडलिकाचे आवडीं विटे धरुनी मीस । युगें अठठावीस उभा असे ॥३॥ परे परता परात्पर पश्यंती न कळे विचार । मा मध्यमा वैखरींचा निर्धार थकीत ठेला ॥४॥ एका जनार्दनीं आहे तैसा देखिला । सबाह्म भरला हृदयीं गे माय ॥५॥
९८९
चरण वंदिती का निंदिती । तेही हरिपदा जाती ॥१॥ एक तरले चरण पूजितां । कोणी तरलें चरण ध्यातां ॥२॥ चरण वंदितां तरली शिळा । निंदितां तारिले शिशुपाळा ॥३॥ ऐसें चरणाचें महिमान । एका जनार्दनीं शरणक ॥४॥
९९०
चरणरज लागुनी उद्धरली अहिल्या बाळा । रामा तुझेनि प्रतापें तरली भवसागर शीळा ॥१॥ जयजय रामरामा शामा भवभंजन नांवें । तुझे रुप ध्यातां उमा शिवे निवे ॥२॥ रामनामें कळिकाळ कापती सदा । रामनामें गणिका नेली निजपदा ॥३॥ रामनामें उद्धरले सुर नर वानर । एका जनार्दनी सदा समाधि स्थिर ॥४॥
९९१
चरणांची थोरी । जाण गौतम सूंदरीं ॥१॥ हृदयाची थोरी । भक्त जाणती परोपरी ॥२॥ करांची ती थोरी । जाणे सुदामा निर्धारी ॥३॥ समचरणींची शोभा । एका जनार्दन उभा ॥४॥
९९२
चरणाची सेवा आवडी करीन । कायावाचामन धरुनी जीवीं ॥१॥ यापरतें साधन न करीं तुझीं आण । हाचि परिपुराण नेम माझा ॥२॥ एका जनार्दनीं एकत्वें पाहिन । ह्रुदयीं ध्याईन जनार्दन ॥३॥
९९३
चरणामृत देव स्वादला । वटपत्रीं तो बाळ जाला ॥१॥ अभिन्नव भक्ति नेली गोडी । चुरचुरा पावो चोखी आवडी ॥२॥ भक्तिरसाची लागली गोडी । तोंडीचा अंगुष्ठ बाहेर न काढी ॥३॥ एका जनार्दनीं सांगतों भावो । आपुली गोडी आपण घ्यावी ॥४॥
९९४
चरणीं ठेउनि माथा संतांसी पूजावें । उगेंचि ऐकावें हरिकीर्तन ॥१॥ कलीमाजीं श्रेष्ठ कलीमाजी श्रेष्ठ । कीर्तन बोभाटें पळतीं दोष ॥२॥ न लगे नाना युक्ती व्युप्तत्तीचें वर्म । हरीचें कीर्तन सोपें बहु ॥३॥ योगयागादिक नोहें यथासांग । तेणें होय भंग सर्व कर्मां ॥४॥ एका जनार्दनीं धरुनि विश्वास । जाई तूं संतांस शरण सुखें ॥५॥
९९५
चला बाई वृंदावनीं रासक्रीडाम पाहुं । नंदाचा बाळ येणें केला नवलाऊ ॥१॥ कल्पनेची सासु इचा बहुताचि जाचु । देहभाव ठेऊनी पायां ब्रह्मापदीं नाचुं ॥२॥ सर्व गर्व सोडूनी बाई चला हरेपाशीं । द्वैतभाव ठेवुनी पायीं हरिरुप होसी ॥३॥ एका जनार्दनी विश्वव्यापक हा देव । एक एक पाहतां अवघें स्वप्नवत वाव ॥४॥
९९६
चहुं वाचांपरता चहुं वेदां निरुता । न कळे तत्त्वतां चतुर्वक्त्रा ॥१॥ चौबारा खेळतु सौगंडी सांगातु । लोणी चोरुं जातु घरोघरीं ॥२॥ चौसष्ट वेगळा चौदांसी निराळा । अगम्य ज्याची लीळा सनकादिकां ॥३॥ एका जनार्दनीं चहुं देहावेगळा । संपुष्टी आगळा भरला देव ॥४॥
९९७
चांडाळादि तरले । महादोषी उद्धरले ॥१॥ नाम पावन पावन । नामापरतें थोर कोण ॥२॥ नामाग्नीनें न जळे । ऐसे दोष नाहीं केले ॥३॥ वाल्मिक म्हणती दोषी । नाम उच्चारितां वंद्य सर्वांसी ॥४॥ अजामेळ गणिका । नामे दोष भंगिले देखा ॥५॥ एका जनार्दनीं नाम जाण । शस्त्र निर्वाणीचा बाण ॥६॥
९९८
चांदाळादि ब्राह्मण सर्व नारिनर । सर्वांसी आधार नाम सत्य ॥१॥ नामाविण गति नसेचि आणिक । वैकुंठनायक सुलभ देखा ॥२॥ नाम विठोबांचे घ्यावें निशिदिनीं । चौर्‍यांशंची खाणी तेव्हा चुकें ॥३॥ एका जनार्दनीं पूर्णता एकपणीं । नाम घ्या निशिदिनीं सर्वकाळ ॥४॥
९९९
चातकाची तहान किती । तृप्ति करूनि निववी क्षिती ॥१॥ धेनु वत्सातें वोरसे । घरीं दुभतें पुरवी जैसें ॥२॥ पक्कान्न सेवुं नेणती बाळें । माता मुखीं घालीं बळें ॥३॥ एका जनार्दनीं बोले । एकपण माझें नेलें ॥४॥
१०००
चार देह चार अवस्था समाधी । कासया उपाधि करिसी बापा ॥१॥ चार वेद जाण युगें प्रमाण । पांचवें विवरण न करी बापा ॥२॥ जनार्दनाचा एक चतुर्थ शोधोनी पांचवें ते स्थानीं लीन झाला ॥३॥
१००१
चार मुद्रा आणि समाधी त्या चारी । दिसती चक्राकारी स्वरुप हें ॥१॥ चहूं समाधीचें पाहीं हें देखणें । विकळतां तेणेंक सहजीं व्हावी ॥२॥ जिकडे पाहतां तिकडे स्वरूपचि दिसे । तयामाजी ठसे आणिक बिंब ॥३॥ मसूरप्रमाण शून्य महा तें कारण । गुरुमुखें खूण जाणावी पैं ॥४॥ साचार स्वरूपाची मेळवणी केली । परात्पर ठेली हेंचि ज्योती ॥५॥ त्याच वस्तूसाठीं भांडती पुराणें । वेद शास्त्रें येथें मौनावलीं ॥६॥ गुह्मा हें पंचक देखोनी समाधी । बोलोनियां वेदीं निश्चयो केला ॥७॥ एका जनार्दनीं स्वरूप उरलें पाहीं । द्वैत गेलें पायीं सद्‌गुरूच्या ॥८॥
१००२
चालतां मारगीं फुटतसे वाट । मागतो वो भाट सहजीं होय ॥१॥ तैसें नोहे संतमार्गाचें लक्षण । चालत मागुन आले सर्व ॥२॥ नोहे गुंतागुंती चुकीचा बोभाट । मार्ग आहे नीट संतसंग ॥३॥ एका जनार्दनीं सांपडलें सहज । तेणे जाहलें काज सरतें माझें ॥४॥
१००३
चालतानां वाटें अपूर्व देखिलें । मनीं हें वहिलें द्वारका दिसे ॥१॥ श्रमलासे मनीं न सुचे विचार । म्हणे द्वारके सत्वर कैसा आलों ॥२॥ एका जनार्दनीं करी कवतुक । प्रधान सेवक दूत आले ॥३॥
१००४
चिंतन तें करी सदा । रामकृष्ण हरि गोविंदा ॥१॥ हेंचि एक सत्य सार । वायां व्यत्पुत्तीचा भार ॥२॥ नको जप तप अनुष्ठान । वाचे वदे नारायण ॥३॥ एका जनार्दनीं भाव । अवघा देहीं पाहें देव ॥४॥
१००५
चिंतन तें सोपें जगीं । रामकृष्ण म्हणा सत्संगी । उणें पडॊं नेदी व्यंगीं । देव धांवे चिंतनें ॥१॥ चिंतन करितां द्रौपदीं । पावलासें भलते संधीं । ऋषिश्वरांची मांदी । तृप्त केली क्षणमात्रें ॥२॥ चिंतनें रक्षिलें अर्जुना । लागों नेदी शक्तिबाणा । होऊनी अंकणा । रथारूढ बैसला ॥३॥ चिंतनें प्रल्हाद तारिला । जळीं स्थळीं सांभाळिला । एका जनार्दनीं भला । चिंतनाचा अंकित ॥४॥
१००६
चिंतन तें हरिचरण । हेंचि कालीमाजींप्रमाण । सर्व पुण्याचें फल जाण । नामस्मरण विठ्ठल ॥१॥ मागें तरले पुढे तरती । याची पुराणीं प्रचिती । वेद शास्त्र जया गाती । श्रुतीहि आनंदें ॥२॥ हेंचि सर्वांशी माहेर । भुवैकुंठ पंढरपुर । एका जनार्दनीं नर । धन्य जाणा तेथीचे ॥३॥
१००७
चिंतनासी न लगे वेळ । कांही न लगे तया मोल । वाचे वदा सर्वकाळ । राम हरी गोविंद ॥१॥ हाचि पुरे मंत्र सोपा । तेणें चुके जन्म खेपा । आणिक तें पापा । कधी नुरें कल्पातीं ॥२॥ चौर्‍यांशीची न ये फेरी । एवढी चिंतनाची ही थोरी । सांडोनी वेरझारी । का रे शिणतां बापुडी ॥३॥ एका जनार्दनीं चिंतन । वाचे वदा परिपूर्ण । तेणें घडे कोटीयज्ञ । नाम चिंतन जपतां ॥४॥
१००८
चिंतनी केला उद्धार । चिंतनें तरले नारीनर । पशुपक्ष्यादि साचार । चिंतनेची तारिले ॥१॥ एवढी चिंतनाची थोरी । महा पापा होय बोहरी । यातीकुळाची वारी । कोण पुसे थोरीया ॥२॥ भुक्तिमुक्तीचें सांकडें । तया न पडेचि बापुडें । चिंतनेंची कोंडें । सर्व हरे तयांचे ॥३॥ एका जनार्दनीं मन । दृढ ठेवावें बांधून । चिंतनेंचि जाण । सर्व लाभ घडती ॥४॥
१००९
चिंतने कंसासुर तरला । चिंतनें पूतनेचा उद्धार केला । चिंतने आनंद जाहला । अर्जुनादिकांसी ॥१॥ म्हणोनी करावें चिंतन । काया वाचा आणि मन । संतांचे चरण । नित्य काळ चिंतावें ॥२॥ चिंतन आअनीं शयनीं । भोजनीं आणि गमनागमनीं । सर्वकाळ निजध्यानीं । चिंतन रामकृष्णाचें ॥३॥ चिंतन हेंची तप थोरा । चिंतनें साधे सर्व संसार । एका जनार्दनीं निर्धार । नामस्मरण चिंतन ॥४॥
१०१०
चिंतनें उद्धरला पापी । महा दोषी केला निःपापी । तया म्हणती ऋषी तपी । पुराणीं तें सर्व ॥१॥ नारदें सांडोनिया मंत्र । केला जगी तो पवित्र । चिंतना एवढें पात्र । आन नाही सर्वथा ॥२॥ चिंतनें शुकादिक मुक्त । राजा जाहला परिक्षित । ऐसें अपार आहेत । चिंतनें मुक्त जाहले ते ॥३॥ चिंतनाची येवढी थोरी । गणिका नारी परद्वारी । वाचे उच्चारितां हरि । मोक्षधामीं बैसविली ॥४॥ चिंतनें हनुमंता समाधी । तुटोनि गेली आधिव्याधी । एका जनार्दनीं बुद्धि । चिंतनीच जडलीसे ॥५॥
१०११
चिंतनें गणिका निजपदा । चिंतने अजामेळ तोहि सदा । बैसविला आपुले पदा । चिंतनेची सर्वथा ॥१॥ चिंतनें उद्धरी सर्वथा । न म्हणे यातिकुळ कुपात्रा । चिंतनें तारी सर्वत्रा । प्राणिमात्रा जगासी ॥२॥ पुराणें डांगोरा पिटती । चिंतनें उद्धार सर्व गती । न लगे नेम नाना युक्ति । नाम चिंता श्रीरामाचें ॥३॥ एवढें चिंतनाचें बळ । एका जनार्दनीं कृपाळ । यम काळवंदी सकळ । नामचिंतनीं सर्वदा ॥४॥
१०१२
चिंतनें धांवे भक्तांपाठीं । धरीं कांबळीं हातीं काठी । चिंतनें उठाउठी । बांधवितो आपणिया ॥१॥ ऐसा भुकेला चिंतनाचा । न पाहे यातीहीन उंचाचा । काय अधिकार शबरीचा । फळें काय प्रिय तीं ॥२॥ एका जनार्दनीं चिंतन । तेणें जोडे नारायण । आणिक न लगे साधन । कलीमाजीं सर्वथा ॥३॥
१०१३
चिंतनें पर्वकाळ रासी । येती अपैशा घरासी । चिंतन तें सार सर्वांसी । व्रतां तपांसी चिंतन ॥१॥ चिंतनें यज्ञ दान धर्म । चिंतनें घडे नाना नेम । आणिक तें वर्म । चिंतने घडे सर्वथा ॥२॥ चिंतनें वेदशास्त्र पुराण । नाना मंत्र तंत्र पठण । नाना तीर्थाचें भ्रमण । चिंतनें होय ठायींच ॥३॥ ऐसा चिंतनमहिमा । नाहीं आणिक उपमा । एका जनार्दनीं प्रेम । चिंतनें चिंतिता ॥४॥
१०१४
चिंतनें बळिद्वारें बंधन । चिंतनें ह्य समाधान । न म्हणे उच्छिष्ट अथवा पुर्ण । चिंतनेंची मुख पसरी ॥१॥ चिंतनें भोळे भाविक जन । तयाचें वारी नाना विघ्न । धर्माघरीं उच्छिष्ट जाण । चिंतनसाठी काढितसे ॥२॥ चिंतनासाठीं सारथी जाहला । चिंतनासाठी उभा ठेला । चिंतनेची गोविला । पुंडलिकें अद्यापी ॥३॥ चिंतनें उभा विटेवरी । न बैसे अद्यापि वरी । एका जनार्दनीं निर्धारी । चिंतन सोपें सर्वांत ॥४॥
१०१५
चिंतनें बिभीषण मुक्त । चिंतनें जाहला जनक जीवमुक्त । चिंतनें कुळ सरित । सर्वेभावें हरि होय ॥१॥ आवडी चिंतावे चरण । दुजेंनको मानधन । नाम स्मरणावांचुन । चिंतनचि नसो ॥२॥ ऐसा एकविध भावें । चिंतन असो मनीं जीवें । एका जनार्दनी देव । तया पाठीं धांवतसे ॥३॥
१०१६
चिंतनेंक नासतसे चिंता । चिंतनें सर्व कार्य ये हातां । चिंतनें मोक्ष सायुज्यता । घर शोधितसे ॥१॥ ऐसे चिंतनाचें महिमान । तारिले अधम खळ जन । चिंतने समाधान । प्राणिमात्रा होतसे ॥२॥ चिंतनें तुटे आधीव्याधी । चिंतने तुटतसे उपाधी । चिंतने होय सर्व सिद्धि । एका जनार्दनाचे चरणीं ॥३॥
१०१७
चिंतातुर मन नसावें कदाकाळीं । हृदयीं नामावळी जप करी ॥१॥ श्रीअनंता माधवा गोविंदा । हाचि जप सदा चिंत्तामाजीं ॥२॥ वारंवार चिंतावीं देवाचीं पाउलें । जेणें जन्मजाळें उकलेल ॥३॥ एका जनार्दनीं आलासे प्रत्यय । सर्वभावें गाय नाम त्याचें ॥४॥
१०१८
चित्त चैतन्य पडली गांठी न सुटे मिठी । संचित कर्माचि झाली आटी उरफाटी दृष्टी ॥१॥ कैंचा आठव दृश्याचा । खुंटली वाचा उदय झाला सुखाचा ॥२॥ देह विदेह वाढिलें मीतूंपणे । एका जनार्दनीं सहज एकपणें ॥३॥
१०१९
चित्त वेधियलें नदांच्या नंदनें । मोहियलें ध्यानें योगीराज ॥१॥ सगुण सुंदर पाहतां मनोहर । सबाह्म अभ्यंतर व्यापियेलें ॥२॥ एका जनार्दनीं सांवळें चैतन्य । श्रीगुरुची खुण विटेवरी ॥३॥
१०२०
चित्त समाधान । सुख दुःख सम जाणे ॥१॥ न करी आणीक उपाधी । निवारली आधि व्याधी ॥२॥ वृत्ति झाली समरस । सेवीं नित्य ब्रह्मारस ॥३॥ एका जनार्दनीं चित्त । ब्रह्मारसें झालें शांत ॥४॥
१०२१
चित्रगुप्त म्हणती करावें काई । यमदूताविण न चले कांहीं ॥१॥ नामें नागविलें नामें नागविलें । यम म्हणे माझे सामर्थ्य न चले ॥२॥ यम चित्रगुप्त नाम विवंचीत । नम विवंचितां जाले मुक्त ॥३॥ यमें यमदुता आल्हादें भेटी । अवघे चतुर्भुज झाले वैकुंठीं ॥४॥ जनामाजी थोर दाटुगें नाम । यमें यमदूत झाले आत्माराम ॥५॥ एका जनार्दनीं नामाचा गुण । यमेसी यमलोक जाला परब्रह्मा पूर्ण ॥६॥
१०२२
चैतन्याचा साक्षी सर्वांसी परीक्षी । अलक्षाच्या लक्षी न ये ध्याना ॥१॥ बहुत भागले बहुत श्रमले । परी नाहीं लाभलें रुप ज्यांचें ॥२॥ भक्तांचेनि भावें पंढरीये उभा । आनंदाचा गाभा सांवळा तो ॥३॥ एका जनार्दनीं तो सर्वव्यापक उभा असे नायक वैकुंठीचा ॥४॥
१०२३
चोखामेळियाची ऐकोनी करुणा । चालिले भोजना देवराव ॥१॥ नामदेवासहित अवघे गणगंधर्व । इंद्रादिक देव चालियले ॥२॥ जाउनी नारद सांगे चोखियासी । तुझिया घरासी येती देव ॥३॥ ऋध्दिसिध्दि आल्या चोखियाचे घरीं । जाहला ते सामोग्री भोजनाची ॥४॥ रुक्मिणीसहित आला पंढरीनिवास । चोखियाचे घरास आले वेगीं ॥५॥ चोखामळा गेला पुढें लोटांगणी । उचलोनि देवांनी आलंगिला ॥६॥ एका जनार्दनीं ऐसा चोखियाचा भाव । जाणोनी आले देव भोजनासी ॥७॥
१०२४
चोखियाची भक्ति कैसी । प्रेमें आवड देवासी ॥१॥ ढोरें वोढी त्याचे घरीं । नीच काम सर्व करी ॥२॥ त्याचे स्त्रीचें बाळंतपण । स्वयें करी जनार्दन ॥३॥ ऐसी आवड भक्तासी देखा । देव भुलले तया सुखा ॥४॥ नीच याती न मनीं कांहीं । एका जनार्दनीं भुलला पाही ॥५॥ १०. संकीर्ण
१०२५
चोख्याचे अंगणीं बैसल्या पंगती । स्त्री ते वाढिती चोखियाची ॥१॥ अमृताचें ताट इंद्रें पुढें केलें । शुध्द पाहिजे केलें नारायणा ॥२॥ तेव्हां देवराव पाचारी चोखियासी । शुध्द अमृतासी करी वेगीं ॥३॥ चोखामेळा म्हणे काय हें अमृत । नामापुढें मात काय याची ॥४॥ अमृताचे ताट घेउनी आला इंद्र । हेतु गा पवित्र करी वेगीं ॥५॥ चोखियाची स्त्री चोखा दोघेजण । शुध्द अमृत तेणें केलें देखा ॥६॥ चोखियाच्या घरीं शुध्द होय अमृत । एका जनार्दनीं मात काय सांगू ॥७॥
१०२६
चोरासी खंडन करावें हाचि धर्म । आणीक नाहीं वर्म दुजें कांहीं ॥१॥ माझ्या विठोबाची आज्ञा पैं मोडिली । शपथ पाळिलीं नाहीं दुष्टे ॥२॥ घेऊनियां शस्त्र केलें पैं ताडन । खंडिले कर जाण उभयतां ॥३॥ एका जनार्दनीं करितां सुपरीत । तों घडलें विपरीत स्त्रियेसीं हें ॥४॥
१०२७
चोर्‍यांयशी लक्ष देहाप्रती । कोटी कोटी फेरे होती ॥१॥ अवचट देह मनुष्य जन्म । तेथें साधावें परब्रह्मा ॥२॥ जन्मोनियां मनुष्यदेहीं । परमार्थ साधिला तो नाहीं ॥३॥ सदा विषयीं अनुसंधान । भुले प्रपंचीं अनुदिन ॥४॥ तया नोहे संतभेटी । एकाजनर्दनीं जातां भेटी ॥५॥
१०२८
चोहें देहांची क्रिया । अघ्यें दिले दत्तात्रेय ॥१॥ जे जे कर्म धर्म । शुद्ध सबळ अनुक्रम ॥२॥ इंद्रिय क्रियाजात । कांहीं उचित अनुचित ॥३॥ आत्मा माझा देव दत्त । एका जनार्दनीं स्वस्थ ॥४॥
१०२९
चौ देहांचा पूर्णघट । त्याचा अवघा बोभाट ॥१॥ माझें माझें म्हणती वेडे । घट भरला रिता फूडें ॥२॥ ऐसे भांबावले देहा । दिवसां नागविले पहा ॥३॥ एका जनार्दनीं पुर्ण घट । एक नांदे उघड प्रगट ॥४॥
१०३०
चौर्‍यांयशी लक्ष योनी फिरतां । अवचट नरदेह आला होतां ॥१॥ करीं याचें समाधान । वाचे गाई नारायण ॥२॥ सोडविता तुज कोणी । नाहीं नाहीं त्रिभुवनीं ॥३॥ भुलुं नको जासी वायां । एका जनार्दनीं लागे पायां ॥४॥
१०३१
चौर्‍यांयशीं भोगितां । दुःख न सरे सर्वथा । संतसमागम घडतां । दुःख नासे तात्काळ ॥१॥ नको गुतूं या संसारीं । पडसी काळाचे आहारीं । संतसमागम धरी । तैं यातना चुकती ॥२॥ मागें बहुतांचा उद्धार । संतीं केलासे साचार । तोचि हा धरी निर्धार । संतसंग सर्वदा ॥३॥ एका जनार्दनीं शरण । संतसंग सुलभ जाण । भोळ्याभाविकांक तारण । समागम संतांचा ॥४॥
१०३२
चौर्‍यायंशी लक्ष योनी फिरे । परि मनीं सोय न धरे ॥१॥ दोचि अक्षरांचें काम । अधम नुच्चारी रामनाम ॥२॥ मरतीयां हांसे । आपण स्वयें मरतसे ॥३॥ एका जनार्दनीं भांड । जन्मोनी लाजविली रांड ॥४॥
१०३३
छत्तिसांतील चेतना । तोचि पुरुष जाणा । हेंचि निवडुनी अर्जुना । सांगितलें ॥१॥ तेची दैवी प्रकृति माया । तेचि बोध आणि तुर्या । ऐसें धनंजया । सांगितलें ॥२॥ तेचि ॐकार अर्धं मात्रा । तेंचि महाकारण जाणा परा । एका जनार्दनीं सारा । निवाडा केला ॥३॥
१०३४
छळणे करुनी बोलतां । तात्काळ जाली समाधी अवस्था । सद्भावें विनटतां संतां । न कळे तत्त्वता काय देती ॥१॥ जाणा जाणते सकळ । ज्यासी निजप्राप्तीची कळवळ । तिहीं सांडोनि स्थळ । संतजन वंदावे ॥२॥ एका जनार्दनीं तान्हें । भुकाळू पै मागूं नेणे । कुर्वाळूनियां स्तनें । जनार्दनें लाविले ॥३॥
१०३५
छळिला न येती रागावरी । तदाकरी वृत्ती मुराली ॥१॥ आपपर नाहीं जेथें । भेद तेथें नसेची ॥२॥ याती असो भलते परी । एकसरी जयासी ॥३॥ एका जनार्दनीं भाव । अवघियां ठाव एकची ॥४॥
१०३६
छाया पैं वृक्षाची बैसतां सुख । तैसा संसार देख प्राणिमात्रां ॥१॥ गुंडती बळें गुंडती बळें । माझें माझें सळें काळतोंडें ॥२॥ असतां बरवी करिती आणिक सेवा । आवडली या देवा धांवे म्हणती ॥३॥ ऐसा काळतोंडा जनीं जाला वेडा । एका जनार्दनीं रेडा पशुजन्मीं ॥४॥
१०३७
छेदी विषयांचा समुळ कंदु । मग भेदु तुटेल ॥१॥ मूळ छेदितां वृक्ष खुडें । तैं समुळ विषय उडे ॥२॥ ऐसा अनुराग धरीं मनीं । देईं विषयासी पाणी ॥३॥ एका जनार्दनीं गोडी । सहज परमार्थ उघाडी ॥४॥
१०३८
जंव देहातें देखती तंव माझें म्हणती । निमालीया रांडा पोरें रडतीं ॥१॥ पहा कैसा अनुभव लौकिकाचा । देह निमाला कीं न कळे साचा ॥२॥ जीव आत्मा न मरे कोणे काळीं । निमाला देह चतुष्टयाची होळी ॥३॥ एका जनार्दनीं देहा देखती मरण । गेला आला नाहीं तो तैसाचि जाण ॥४॥
१०३९
जग तरिलें कीर्तनीं । श्रीविठ्ठल नामवानी ॥१॥ ऐसा मंत्र अक्षरी । विठ्ठल विठ्ठल निर्धारीं ॥२॥ एका जनार्दनीं । विठ्ठल पाहे ध्यानीं मनीं ॥३॥
१०४०
जग रामनाम म्हणे । तया कां न येती विमानें ॥१॥ नवल स्मरणाची ठेव । नामीं नाही अनुभव ॥२॥ नष्ट गणिका राम म्हणे । तिसीं वैकुंठींचे पेणें ॥३॥ एका जनार्दनीं ध्यात । राम पाहे ध्याना आंत ॥४॥
१०४१
जगत्रय जननी मुक्ताबाई माते । कृपा करीं वरदहस्तें मजवरी ॥१॥ आदिनाथें अनुग्रह नाथासी दिधला । नाथें हस्त ठेविला मस्तकीं तुमच्या ॥२॥ बाळलीला केली जगीं ख्याती मिरविली । चांगयाची हरली चौसष्ट कळा ॥३॥ कळा पासष्टावी ज्ञानदेवें दाविली । चांगयाची विराली अहं ममता ॥४॥ चांगदेव शरण कायावाचामनें । एका जनार्दनीं म्हणे तैशापरी ॥५॥
१०४२
जगदात्मा श्रीहरि आनंदें पूजीन । अंतरीं करीन महोत्सव ॥१॥ शांति सिंहासनीं बैसवीन भावें । बैसावें अवघें हारकारीन ॥२॥ द्वैत विसरुनि करीन पादपुजा । तेणें गरुडध्वजा पंचामृत ॥३॥ शुद्धोदक स्नान घालीन मानसीं । ज्ञानें स्वरुपासी परिमार्जन ॥४॥ सत्त्व क्षीरोदक देवानेसवीन । राजन प्रावर्ण पीतांबर ॥५॥ दिव्य अलंकार तोडर सोज्वळ । सहज स्थिती लेईल स्वामी माझा ॥६॥ भक्त नवविध घालूनि सिंहासन । एका जनार्दनीं पूजा करी ॥७॥
१०४३
जगलागीं शिणती रात्रंदिन । यज्ञयागादिकरिता हवन । ध्येय ध्यान धारणा अनुष्ठान । साधिती अष्टांग आणि पवन ॥१॥ तो गे माय सोपा केला सर्वांसी । लांचावला देखोनि भक्तीसी । उभा राहिला युगें आठ्ठावीस विटेसी । न बोले न बैसे नुल्लंघी मर्यादेसी ॥२॥ एका जनार्दनीं कृपेचा सागर । भक्त करुणाकर तारु हा दुस्तर । उभा भीवरेचे तीरीं कटीं धरुनी कर । जडजीवां दरुशनें उद्धार ॥३॥
१०४४
जगांचे जीवन भक्तांचे मोहन । सगुण निर्गुण ठाण शोभतसे ॥१॥ तें रुप गोकुळीं नंदाचिये घरीं । यशोदे मांडिवरी खेळतसे ॥२॥ इंद्रादी शंकर ध्यान धरती ज्यांचें । तो लोणी चोरी गौळ्यांचे घरोघरीं ॥३॥ सर्वावरी चाले जयाची ते सत्ता । त्यांची बागुल आला म्हणतां उगा राहे ॥४॥ एकाचि पदें बळीं पाताळी घातला । तो उखळीं बांधिला यशोदेनें ॥५॥ जयाचेनी तृप्त त्रिभुवन सगळे । तो लोणीयाचे गोळे मागुन खाय ॥६॥ एका जनार्दनी भरुनी उरला । तो असें संचला विटेवरी ॥७॥
१०४५
जगाचा जनक बाप हा कृपाळू । दीनवत्सल प्रतिपाळु पांडुरंग ॥१॥ पहा डोळेभरी द्वैत तें टाकुनी । करील झाडणी महत्पापा ॥२॥ ज्या कारणें योगी साधन साधिती । ती हे उभी मुर्ति भीमातटीं ॥३॥ एका जनार्दनीं भक्त करुणाकर । ठेवुनी कटीं कर उभा विटे ॥४॥
१०४६
जगाचा जो पिता । म्हणसी ईश्वरु नियंता । त्यासी विद्या अविद्या दोघी कांता । एकी माथां अर्धांगी ॥१॥ पाहता ईश्वर करणी । माथां बैसविली राणी । हा महिमा वेदीं पुराणीं । गाती कीर्तनीं निरंतर ॥२॥ अविद्या आणि ईश्वर । दोहीं मांडिला घराचार । कैसी अनन्य भक्ति सधर । आवडी थोर पैं देखा ॥३॥ दोघां एकची नेसणें । दोघां एक सत्ता बैसणें । एकें अंगां दोनीपणें । संपादणी करिताती ॥४॥ दोघां एकची चाखणें । दोघा एकची देखणें । दोघां आनु माजी असणें । सावकाश सहजें ॥५॥ दोघां आवडी कैसा देख । येरयेरांविण नेघे उदक । दोघां मिळोनी एक सुख । अति संतोष येरयेरां ॥६॥ जैं उभयां मेळविलें । तैंचि शिवा शिवत्व कळे । प्रियानें देखतां सगळें । शिवत्वही सांडिजे ॥७॥ दोघा एकत्र बसणें । दोघा मिळोनी एक करणें । दोघे वर्तती एके प्राणें । दोनी दावणें एकपणी ॥८॥ शिवत्व लोपुनी शिवें । अंगावरी वाढविलें शांभवें । येरी पतिव्रता अहेवें । रुपें नांवें शिव पूजी ॥९॥ दोघांपासुनी जालें जग । परि न दिसे तिसरें अंग । न तुटे अनन्यमिळणी योग । भिन्न विभाग दाखवितां ॥१०॥ पतीविण जे पतिव्रता । अवघीच विरे पैं तत्वतां । जी विण असतुची नसतां । होये सर्वथा गोसावी ॥११॥ शिव नि:संगु जो पैं सदा । क्रिया करणेंविण नुसुधा । त्यासही सुखदु:खाची बाधा । या प्रमदा भोवविजे ॥१२॥ यापरी तो नोवरा । अविद्या गोंविला घराचारा । मग त्याचियाची शरीरा । अर्धांगीं बैसविली ॥१३॥ गंगे न देखवे दृष्टीं । सवतीमत्सरु उठिला पोटीं । सद्विभागें जटाजुटीं । होती मुकुटीं मौळली ॥१४॥ सविद्या गंगा मुकुटीं । वैराग्याचे प्रवाह लोटी । शिवाची उपरमली दृष्टी । न करी गोष्टी भोगाची ॥१५॥ अखंड वसे ते एकांतीं । प्रकृति न साहे पार्वती । सांडुनी अवघी हे प्रवृत्ति । मग अद्वैतीं रहिवासू ॥१६॥ ते संधी आला नारदमुनी । देखोनि शिव शंकला मनीं । मग बैसला तो ध्यानीं । म्हणे कळी हा झणीं लावा ॥१७॥ गुज सांगितलें प्रियेसी । वेगीं लावी ऋषीसी । हासें आलें नारदासी । मग कलहासी उत्पादी ॥१८॥ नारद नमी पार्वतीसी । सांगे शिव केवी गुंतले ध्यानासी । आवो तूं भोळी ऐसी कैसी । तो आणिकीसी रतला ॥१९॥ मी कळीलावा हें पुढें । माझें वचन मानिसी कुडें । पैल पाहें मुगुटाकडे । दिसे रुपडे सुरेख ॥२०॥ आधींच तंव ते उताविळ । वरी नारदें चेतविली प्रबळ । मज असतां कोण गे बरळ । मुकुटीं सर्व मोकाट ॥२१॥ येरी म्हणे बाई तुम्ही कां नेणा । शिव शिवप्रिया मी अंगना । मान राखो वडीलपणा । कोपू मना नाणावा ॥२२॥ पापें जया वसे पैं गा । तेणें आलिंगिजे गंगा । ते तूं जडली शिवा अंगा । नातळे लिंगा उधटे ॥२३॥ माझेनी अंगे पाप पळे । हें जाणिजे आश्वनिळे । विष निस्तारिजे माझेनी मेळे । द्वेष कुटिळे सांडी पां ॥२४॥ चढला कोपाचा बासटु । गंगे तुझा बहु गे नेटु । ठकारे भुलविला निळकुंठ । माझा विठु घालिसी ॥२५॥ अगे तूं गौतमें नेलीसी । निर्लज्जे मागुती आलिसी । येरी म्हणे शिव रावणा दिधलीसी । माझेनी बापें सोडविले ॥२६॥ गंगे तूं नुसुधें उदक । तुजमाजीं कई रमणीय सुख । येरी म्हणे जनीं त्र्यंबक । जेणें मस्तकें धरियलें ॥२७॥ अगे तुज जवळी भगवें । आणिक बोडिकें अवघें । जट्याळ गाट्याळ तुजसवें । तेथें काय शिवें भोगिजे ॥२८॥ गिरिजे नोळखिसी पायरी । मी मस्तकें तूं पायांवरी । तुझ्या अंगीं दोष भारी । परि नव्हेरी भोळा हा ॥२९॥ जैं गे झालें तुझें लग्न । भटा झालें वीर्यस्खलन । एव्हढें अंगीचे लक्षण । केवीं मस्तक इच्छिसी ॥३०॥ गंगे तूं वाजट गळदट । माथा वाहिलीसी धीट । कांहीन बोलसी नीट । विद्या उध्दट तुजमाजीं ॥३१॥ अगे तुं शिवें शापिलासी । तैं गे शांतनीनें नेलिसी । तैथें हिंवसुतें व्यालिसी । केवीं आलिसी मस्तका ॥३२॥ उमे भीतसों तुझिया कोपा । आगीं रिघोनी मारविलें बापा । नरसुरां आटूं पहा पां । सुधी संतापा पैं नाहीं ॥३३॥ दक्षा मारविलें यज्ञिष्टा । ब्रम्हहत्या तुझा वांटा । येव्हढा अंगीं दोष मोठा । झणे नीळकंठा आतळसी ॥३४॥ गंगे तुजमजीं खळाळ । तेणें तूं गर्जसी सबळ । शिवें सोसिजें खळखळ । माझें कपाळ उठिलें ॥३५॥ माझें लागतां खळाळ । तरले सुरनर सकळ । तुझेंचि कां कठीण कपाळ । द्वेषें छळण करितेसी ॥३६॥ गंगे तुज ऐसी ओंगळ । आन न देखें मी कुश्चिळ । मच्छ कच्छ विष्टा तें जळ । आणि शेवाळ सर्वांगीं ॥३७॥ ऐकोनि गंगे आलें हांसें । काय बोलसी वावसे । चराचर जें दिसतसे । तें तें असें मजमाजीं ॥३८॥ गंगे तूं जासी सागरा पोटीं । हें प्रत्यक्ष जगु देखें दिठी । पुराणी ही त्याची गोठी । गंगा सागरगामिनी ॥३९॥ उमे तुझा खोटा भावो । गिरिसागर माझा देवो । शिवावांचोनि पहाहो गमनागमन मज नाहीं ॥४०॥ गौरी गंगेतें म्हणें धांगडी । येरी म्हणे घर रिगालिसी आवडी । बापें बेल वहावया मिसें लाविली गोडी । तैसी फ़ुडी मी नव्हे ॥४१॥ वर्मे क्रोधे चढल्या क्रोधा । नारदु हांसतु खदखदां । भलिया मिनलों विनोदा । दोहीच्या शब्दा साक्षी तो ॥४२॥ तुज कुटिल जाणोनि मानसीं । शिरु तारकु ब्रम्ह उपदेशी । भावों नाहीं त्या वचनासी । छळूं जासी श्रीरामा ॥४३॥ देववचनीं नाहीं भावो । तंववरी न तुटे देहसंदेहो । कैसेनि राहे काम कलहो । न्याय अन्यायो न कळे ॥४४॥ तूं अविद्या सदा विन्मुख । यालागीं नेणसी निज सुख । जगाचे देखसी दोख । कामें सुख मानिसी ॥४५॥ आम्ही तंव शिववचनीं सन्मुख । अखंड आम्हां आत्मसुख । शिवावांचूनियां देख । आन नाहीं सर्वथा ॥४६॥ तुझा जावयासी द्वेष । कळे भांडण्याचें मिष । कलहो अंतीं उपजे सुख । परम निर्दोष त्या नांव ॥४७॥ पाहे पां मुळींच्या मिळणी । आम्ही तुम्ही एकी दोघीजणी । शिणलिसी माय गे बहिणी । द्वेषु मनीं न धरावा ॥४८॥ जें सांगितलें सदाशिवें । तें ह्रदयी धरावें निजभावें । तेणें द्वेषाद्वेष न संभवे । पालट पावे वृत्तीशीं ॥४९॥ त्याची वृत्ति परतोनी पाही । देहीं प्रगटेल विदेहीं । मग देह विदेह दोन्ही नाहीं । निजतत्व ठायीं होउनी ठासी ॥५०॥ ऐकतां गंगेचें वचन । गिरिजें चालिलें स्फ़ुदंन । धांवूनि दिधलें आलिंगन । समाधान पैं झालें ॥५१॥ ते वेळीं मिनले मनामन । उपनिषदां पडिलें मौन । देखणें ठेलें भिन्नाभिन्न । शिवचैतन्य अनुभवीं ॥५२॥ शिव तो निजरुप सकळ । गंगा सच्छक्ति निर्मळ । येरी अविद्या चपळ । नारदु केवळ निजबोधु ॥५३॥ दोहीं शक्तींचा फ़िटला भेदु । सकळीं सकळा शिवूचि श्रध्दु । एका जनार्दनीं बोधु । परमानंदु प्रगटला ॥५४॥
१०४७
जगाचिये नेत्री दिसे तो संसारीं । परि तो अंतरीं स्फटिक शुद्ध ॥१॥ वायांचि हांव नधरी कांहीं पोटीं । वाउगी ती गोष्टी न करी जगा ॥२॥ स्त्रिया पुत्र धन नाही तेथें मन । इष्टमित्र कारण नाहीं ज्याचें ॥३॥ एका जनार्दनीं प्रपंच परमार्थ । सारिखाचि होत तयालागीं ॥४॥
१०४८
जगाचियें देहीं नांदतो आपण । तरी करतें कर्म परियेसा ॥१॥ जीव शिव दोन्हीं शरीरीं नांदती । कर्मधर्म स्थिति तया हातीं ॥२॥ शिव तो उपाधीवेगळाचि वसे । कामक्रोध पिसें जीवालागीं ॥३॥ लिगाडाचे मिसें जीवासी बंधन । एका जनार्दनीं जाण शिव मुक्त ॥४॥
१०४९
जगाची ती रहाटी । जैशी अंधाहातीं दिली काठी । चिखलाची पाउती । काय मार्ग दिसे ॥१॥ तैसे भुलोनियां जन । गेले म्हणती माझे जाण । बा कवणाचें कवण । कामा न ये शेवटीं ॥२॥ चालतो पाहतो ऐकतो कानीं । दुजियाचे गुणदोश मनीं । नका आणूं चुकवा पतनीं । पुढील पेणें अंतरू नका ॥३॥ हेंचि बोधाचें लक्षण । धरा हृदयीं याची खुण । शरण एका जनार्दन । वारंवार विनवितसे ॥४॥
१०५०
जगाचें जीवन ब्रह्मा परिपुर्ण । जनीं जनार्दन व्यापक तो ॥१॥ तो ह्री गोकुळीं रांगणा नंदाघरीं । गौळणी त्या सुंदरीं खेळविती ॥२॥ वेद गीतीं गातीं शास्त्रें विवादतीं । खुंटलीसे मति शेषादिकांची ॥३॥ एका जनार्दनी चहूं वाचां परता । उच्छिष्ट सर्वथा भक्षी सुखें ॥४॥
१०५१
जगाचें जीवन मनाचें मोहन । योगियांचें ध्यान विठ्ठल माझा ॥१॥ द्वैताद्वैताहुनि वेगळा । श्रीविठ्ठल कळा पौर्णिमेचा ॥२॥ न कळे आगमां नेणवेचि दुर्गमा । एका जनार्दनीं आम्हां सांपडला ॥३॥
१०५२
जगामध्यें काय हालत । तें दृष्टीसी नाहीं भरत । अचळ असोनि चळत । चंचळ म्हणत आहे मुठींत ॥१॥ कैसें बोटानें दाखवुं तुला । सावध होई गुरूच्या मुला । हा शब्द अचोज वेगळा अर्थ जाणे सहस्त्रांत विरळा ॥२॥ कांहीं नसोनि तें दिसत । नाहीं म्हणतां सत्य भासत । आकारीं आकार लपत । वाउगें जाणत्यासी भासत ॥३॥ अहं सोहं कोहं लपाला । उघड दृष्टीरूपा आला । जगीं व्यापक नसोनि व्यापला । एका जनार्दनीं गुरुपुत्र भला ॥४॥
१०५३
जगामाजीं कीर्ति ऐक श्रीराम । वाउगा तुं श्रम न करीं जना ॥१॥ सदा सर्वकाळ आठवी वेळोवेळां । मग सुखसोहळा काय उणें ॥२॥ येणें यातायाती चुकती संसार । भवभ्रम निर्धार दुरी ठाके ॥३॥ सांपडलें वर्म आम्हां इह जनीं । एका जनार्दनीं नाम गाऊं ॥४॥
१०५४
जगासी तारक हरि हा उच्चार । सर्व वेरझार खुटें जेणें ॥१॥ पाहता ब्रह्मांडीं व्यापका तो हरी । सबाह्म अभ्यंतरीं भरलासे ॥२॥ एका जनार्दनीं रिता ठाव कोठें । पुंडलीक पेठे उभा नीट ॥३॥
१०५५
जगासी भुलवणा भाविकांचे मन । तो जनार्दन विटेवरी ॥१॥ कामारी कामारी ऋद्धिसिद्धि घरीं । तो परमात्मा श्रीहरीं विटेवरी ॥२॥ सनकसनंदन सगुण निर्गुणाचे गुण । एका जनार्दनीं विटेवरी ॥४॥
१०५६
जगीं जनार्दन मुख्य हाचि भाव । संत तेचि देववृति ऐसी ॥१॥ समाधी साधन संतजन । विश्रांतीचें स्थान संतापायीं ॥२॥ योगयाग धारण पंचाग्र्नि साधन । तें हें ध्यान संतापायीं ॥३॥ एका जनार्दनीं तयांचा सांगात घडो मज निश्चित सर्वकाळ ॥४॥
१०५७
जगीं तो व्यापक भरुनी उरला । शरण तूं तयाला जाय वेगीं ॥१॥ उघडा मंत्र जाण वदे नारायणा । नोहे तुज विध्व यमदुत ॥२॥ अखंड वाचेसी उच्चार नामाचा । तेणें कलीकाळाचा धाक नाहीं ॥३॥ एका जनार्दनीं संतसेवेविण । आणिक साधन नाहीं दुजें ॥४॥
१०५८
जगीं धन्य एक नाम । गातां उत्तम सर्व नेम ॥१॥ धन्य धन्य पंढरपुर । नांदे भीमातीर विठ्ठल ॥२॥ धन्य धन्य वेणुनाद । वसे गोविंद ते स्थानीं ॥३॥ धन्य धन्य गोपाळपुर । करिती गोपाळ गजरेकं काला ॥४॥ एका जनार्दनीं पाद्माळें । अखंड सोहळें तये गांवीं ॥५॥
१०५९
जघन प्रमाण दावीत श्रीअनंत । या रे या रे म्हणत भेटावया ॥१॥ आवडीची धणी ध्या रे प्रेमभावें । संतचरणां द्यावें आलिंगन ॥२॥ कट धरूनि करीं समचि पाउलीं । उभा वनमाळी भक्तांसाठीं ॥३॥ जीवींचें जीवन मनाचें मोहन । सगुण हें ध्यान भक्तिकाजा ॥४॥ रूपाचें रूपस निर्गुणावेगळें । पहतां तो संतमेळे उभा असे ॥५॥ विटे नीट उभा आनदाचा कंद । पाहतां परमानंद सुख वाटे ॥६॥ एका जनार्दनीं भक्ताचिया काजा । उभारूनि भुजा वाट पाहे ॥७॥
१०६०
जडजीवातें उद्धरी । ऐसी नामामाजी थोरी ॥१॥ तेंचि नाम वाचे गातां । हरे जन्ममरणव्यथा ॥२॥ नामें पाषाण तारिले । गजेंद्राते उद्धारिलें ॥३॥ ऐसा नामाचा निजछंद । एका जनार्दनीं परमानंद ॥४॥
१०६१
जडजीवासी उद्धार । करावयासी निर्धार ॥१॥ पापी दोषी जैसे तैसे । लाविलें कांसे अपुलिया ॥२॥ जया जें जें गोड लागें । तें तें अंगेंक देताती ॥३॥ एका जनार्दनीं शरण । शरणागता नाही न्युन ॥४॥
१०६२
जनार्दन कृपा केली । वृत्ति ब्रह्माकार झाली ॥१॥ धन्य धन्य जनार्दन । तयापायींमम वंदन ॥२॥ मन मनपणा हरपलें । तन्मय होऊनियां ठेंलें ॥३॥ चित्त चिंतना विसरलें । चैतय्न्यरुप होऊनि ठेलें ॥४॥ निश्चयरुप जे का बुद्धि । परब्रह्मा तें निरवधी ॥५॥ अहंपणे अहंभाव । तोही झाला देवाधि देव ॥६॥ श्रोत्रेद्रिय ग्राहा शब्द । होऊनि राहिला निःशब्द ॥७॥ त्वगिंद्रिय स्पर्श । तो पैं जाहल परेश ॥८॥ नेत्रें पाहती रुपातें । तें पैं परब्रह्मा आतें ॥९॥ जिव्हासेवितसे रस । तें हें ब्रह्मा स्वयंप्रकाश ॥१०॥ घ्राण सेवितसे गंध । तें हें परात्पर निर्द्वद ॥११॥ वाणीं उच्चारी वचन । तें हें परब्रह्मा जाण ॥१२॥ गमन करिताती पाद । तें हें ब्रह्मा परम पद ॥१३॥ पाणीद्रियें घेणे देणें । तेंचि ब्रह्मा परिपुर्ण ॥१४॥ गुह्मोंद्रियाचा आनंद । तो हा झाला परमानंद ॥१५॥ जे जे क्रिया घडे अंगी । तें तें ब्रह्मारुप जगीं ॥१६॥ पंचप्राण ते अमुप । परब्रह्माचें स्वरुप ॥१७॥ स्थुल सुक्ष्म तें कारण । सकळ ब्रह्मा परिपूर्ण ॥१८॥ महाकारण प्रकृति । परब्रह्माची आकृती ॥१९॥ अन्नमय कोश । परब्रह्माचा विकाश ॥२०॥ कोश तोहि प्राणमय । दिसे प्रत्यक्ष चिन्मय ॥२१॥ मनोमय कोश जाण । परात्पर परिपूर्ण ॥२२॥ कोश विज्ञान पहावा । द्रष्टा दृश्यातीत अवघा ॥२३॥ कोश जाणावा आनंद । तो हा केवळ परमानंद ॥२४॥ समाष्टिव्यष्टयात्मक जग । तें हें परब्रह्मा अभंग ॥२५॥ जनार्दन जन वन । जनार्दन निरंजन ॥२६॥ एका जनार्दन भाव । एकनाथ झाला देव ॥२७॥
१०६३
जनार्दन पाया धरूनियां राहें । संसार तो काय करील तुझें ॥१॥ स्वरूपाचें ज्ञान नोहे अनायासें । ज्याचें श्रुति पिसें लागलेंसे ॥२॥ जाणीव नेणीव सांडोनियां मागें । शरण रिघे वेगें एका जनार्दनीं ॥३॥
१०६४
जनार्दनं मज केला उपकार । पाडिला विसर प्रपंचाचा ॥१॥ प्रपंच पारखा जाहला दुराचारी । केलीसे बोहरी कामक्रोधां ॥२॥ आशा तृष्णा यांचे तोडियलें जाळें । कामनेचें काळें केलें तोंड ॥३॥ एका जनार्दनीं तोडियेलें लिगाड । परमार्थ गोड दाखविला ॥४॥
१०६५
जनार्दनाचा गुरु । स्वामी दत्तात्रय दातारु ॥१॥ त्यांनीं उपकार केला । स्वानंदाचा बोध दिला ॥२॥ सच्चित्सुखाचा अनुभव । दाखविला स्वयमेव ॥३॥ एका जनार्दनीं दत्त । वसो माझ्या हृदयांत ॥४॥
१०६६
जनार्दनीं माय जनार्दन बाप । जनार्दन ताप निवारिती ॥१॥ जनार्दन बंधु जनार्दन भगिनी । जनार्दन निर्वाणी मजलागीं ॥२॥ जनार्दन सखा जनार्दन चुलता । जनार्दन तत्त्वतां प्राण माझा ॥३॥ जनार्दन सुहृद जनार्दन मित्र । पवित्रापवित्र जनार्दन ॥४॥ जनार्दन जन जनार्दन विजन । माझें तनमन जनार्दन ॥५॥ जनार्दन ऐश्वर्य जनार्दन धन । मज निरंजन जनार्दन ॥६॥ जनार्दन जीव जनार्दन भाव । जनार्दन शिव मजलागीं ॥७॥ जनार्दन पिंड जनार्दन ब्रह्मांड । जनार्दन अखंड परब्रह्मा ॥८॥ एका जनार्दन वृत्ति होय लीन । जालासे तल्लीन परब्रह्मी ॥९॥
१०६७
जनार्दनीं शोभित जन । जनार्दनें साचार ज्ञान । जनार्दनें आकळें मन । ध्याता ध्येय ध्यान जनार्दन ॥१॥ गाई जनार्दन मुखकमळीं । जनार्दनु नयनीं न्याहाळी । ह्रुदयकमळीं । जनार्दनु ॥२॥ जनार्दनें बोलिला वेदु । जनार्दनें बुद्धिसे बोधु । जनार्दनें तोडिला भेदु । परमानदु जनार्दनु ॥३॥ जनार्दनें ज्ञानदृष्टी । जनार्दनें पावन सृष्टी । जनार्दने संतुष्ट पुष्टी । निजभावें भेटी जनार्दनें ॥४॥ जनार्दनें सर्व ज्ञान डोळसु । जनार्दन स्वयंप्रकाशु । जनार्दनें देहबुद्धि निरासु । परमहंसु जनार्दन ॥५॥ जनारने अज्ञानभंग । जनार्दनें नित्य नवा रंग । जनार्दनें वैष्णवसंग । वोडगे रंग जनार्दनें ॥६॥ जनार्दनें सुख होय सुखा । जनार्दन पाठीराखा । जनार्दनें तारिला एका । आम्हां निजसखा जनार्दन ॥७॥
१०६८
जनार्दनें आम्हां सांगितलें गुज । पूजावे हे द्विज आवडीनें ॥१॥ मुखीं ज्याच्या तोचि नारायण । भिन्नभाव जाण भावूं नको ॥२॥ भाविकांहि भिन्न तयासी दंडिती ।रवरव भोगिती कुळांसहित ॥३॥ एका जनार्दनीं ब्राह्मणांची पूजा । चुकवील खेपा संसारींच्या ॥४॥
१०६९
जनार्दनें कृपा केली । माझे खांदी कावड दिली ॥१॥ सांगितला सोपा मंत्र । वाचे वदे हरिहर ॥२॥ बहुत साधनें न करिता । अनायासें आलें होतां ॥३॥ पूर्ण कॄपें जनार्दन । एका जनार्दनीं निजखुण ॥४॥
१०७०
जनार्दनें केलें अभिनव देखा । तोडियेलें शांखा अद्वैताची ॥१॥ केला उपकार केला उपकार । मोडियेलें घर प्रपंचाचें ॥२॥ एका जनार्दनीं एकपणें देव । दाविला नवलाव अभेदाचा ॥३॥
१०७१
जनार्दनें मज सांगितला मंत्र । रामनम पवित्र जप करीं ॥१॥ सोडवील राम संसार सांकडीं । न पडेचि बेडी अरिवर्गां ॥२॥ जप तप साधन पुराण श्रवण । नाम घेतां जाण सर्व घडती ॥३॥ एका जनार्दनीं टाकुनी संशयो । नाम मुखीं राहो प्रेमें पोटीं ॥४॥
१०७२
जनार्दनें माझें केलें असे हित । दाविला देहातीत देव मज ॥१॥ नाठवे भाव अभावना तें कांहीं । स्वर्ग मोक्षनाहीं चाड आम्हां ॥२॥ देहांचें देहत्व देहपण गेलें । एका जनार्दनीं केलें विदेहत्व ॥३॥
१०७३
जन्म कर्म अवघें व्यर्थ । ज्ञाते विवेकीं घेती अर्थ ॥१॥ हरि हाचिधर्मा मुख्य । रामकृष्ण उच्चारी मुखें ॥२॥ दिन जाऊं नेदी वाउगा जाण । काळाचें जनन रामकृष्ण ॥३॥ एका जनार्दनीं जन्म कर्म धर्म । ब्रह्मार्पण वर्म हेंचि खरें ॥४॥
१०७४
जन्म कोट्यांनीं हरिसेवा जोडे । नवविद्या भजन सांग घडे । तंव वैराग्य तें पाहें पुढें । पूर्व प्राचीन फळ रोकडें ॥१॥ ऐसें तैंच मिळती ते साधु । ज्यांचा संग करी उद्धोधु । ज्यांचा स्पर्श करी आल्हादु । ज्यांचा महिमा न कळे आनंदु ॥२॥ घडे काम कर्म परित्याग । झडे समुळ विषयांचा संग । सर्व कामना नुरे मुसमार्ग । तैं आतुडे मानवा संतसंग ॥३॥ शुद्ध सत्वगुण देहीं पाहें । दंभ अहंकार मानापमान जाये । कामक्रोध लोभ सांदी सोये । तैं भूतभाव नाहीं होय ॥४॥ जैं जनार्दनीं शुद्धभाव । स्वकर्मासी विश्रांती ठाव । ऐक्य दुजे दोन्हीं होती वाव । देहबुद्धीच भासे देव ॥५॥ जैं संतदया होय बापा । तैंचि विश्रांती त्रिविध तापा । तैंचि मिळणी होय स्वरुपा । पूर्ण एका जनार्दनीं कृपा ॥६॥
१०७५
जन्म जन्मांतरी विराहिणी । होती दुश्चित्त अंतःकरणी । दुःखी सेशिलें होतें मागें जन्मीं । ये खेपे निरसलें स्थुळ कारणीं ॥१॥ येउने भेंटी देहीं देहातीत । तयाचा विरह मजलागीं होत । मना समुळ मन पहात । तो भेटला गोपीनाथ ॥२॥ दुःख फिटलें मान जालें थोर । हर्षें आनंदें आनंद तुषार । एका जनार्दनीं भेटला परात्पर । तेणें संसार विरह गेला निर्धार ॥३॥
१०७६
जन्म जरा तुटे कर्म । संतसमागम घडतांची ॥१॥ उपदेश धरित पोटीं । दैन्ये दाही वाटी पळताती ॥२॥ खंडे फेरा चौर्‍यांशी । धरितां जीवेंशीं पाऊलें ॥३॥ शरण एका जनार्दनीं । ते दिनमणी प्रत्यक्ष ॥४॥
१०७७
जन्म जरा मरण व्याधी । ही तो उपाधी लागलीसे ॥१॥ लिगाड तेंमुळीं वायां । जैसी छाया अभ्रीची ॥२॥ विषयकर्दमाचें मेळीं । विठ्ठल वनमाळीं येवो आतां ॥३॥ एका जनार्दनीं ध्यास । अवघीं आस पायां पैं ॥४॥
१०७८
जन्मकाळीं देवें प्रतिज्ञा पैं केली । शतकोटी लिहिली काव्यरचना ॥१॥ चौदाजणीं त्यांचे काव्य तें केलें । निरभिमानें वंदिले संतजन ॥२॥ लाडका तो नामा समाधी महाद्वारीं । समदृष्टी हरी वरी त्याची ॥३॥ पाळोनियां लळा समाधी ठेविला । एका जनार्दनीं झाला आनंदमय ॥४॥
१०७९
जन्मजन्मातरीचें सुकृत जोडणें । संतचरण पावणें तेणें भाग्यें ॥१॥ हा माझा विश्वास संतचरण सेवा । दुजा नाहीं हेवा प्रपंचाचा ॥२॥ मागणें तें नाहीं आणिक तयासी । संत हे सेवेसी झिजवी अंग ॥३॥ एका जर्नादनीं सेवेसी मन । रात्रंदिवस ध्यान लागो त्याचें ॥४॥
१०८०
जन्ममरण कोडें निवारी हा संग । भजें पाडुंरंग आधी ॥१॥ वायांची पसारा नासिलासी सारा । कां रे चुकसी पामरा भजनासी ॥२॥ एकविध भाव भक्ति करी मोळी । तेणें कुळींची मुळी हाती लागे ॥३॥ एका जनार्दनीं संतांचा सेवक । तयाचा मग धाक ब्रह्मादिकां ॥४॥
१०८१
जन्ममरण सांकडें निवारावया कोडें । विठ्ठल उघडें पंढरीये ॥१॥ तयाचे चरणां मिठी घाली मना । नाहीं तुज यातना जन्मकोटी ॥२॥ चंद्रभागे स्नान पुंडलीक भेटी । पूर्वजा वैकुंठीं मार्ग सोपा ॥३॥ महाद्वारीं नाचा जोडोनियां पाणी । पुढें चक्रपाणी उभा विटे ॥४॥ एका जनार्दनीं तयांसी भेटतां । मोक्ष सायुज्यता पायीं लागे ॥५॥
१०८२
जन्ममरणांच्या चुकवा रे खेपा । यासी तो सोपा राममंत्र ॥१॥ वेळोवेळां वाचे उच्चारावें नाम । तेणें निष्काम प्राणी होय ॥२॥ सायास नाहीं अनायासें वर्म । वाचे रामनाम आठवावें ॥३॥ एका जनार्दनीं नामविण काहीं । आणिक थोर नाहीं कलीमाजीं ॥४॥
१०८३
जन्ममरणाचें तुटलें सांकडें । कैवल्य रोकडें उभें असे ॥१॥ डोळियाचा डॊळा उघड दाविला । संदेह फिटला उरी नुरे ॥२॥ एका जनार्दनीं संशयाचें नाहीं । जन्ममरण देहीं पुन्हा नये ॥३॥
१०८४
जन्ममरणाचें निवारेल दुःख । करितां देख कीर्तन ॥१॥ नारद प्रल्हाद अंबऋषी । विनटले कीर्तनासी ॥२॥ व्यास शुक वामदेव । धरिती भाव कीर्तनीं ॥३॥ एका त्याचा दास खरा । करी पसारा कीर्तन ॥४॥
१०८५
जन्मला जो प्राणी । रामनाम नेघे वाणी ॥१॥ महापाताकी चांडाळ । अधम खळाहुनी खळ ॥२॥ सदा परद्वारी हिंडे । नाम घेतो कान कोडें ॥३॥ करूं नये तेंचि करी । सदा परद्रव्य हरी ॥४॥ जन्मोनियां अडं । एका जनार्दनीं रांड ॥५॥
१०८६
जन्मलें तें बाळ । परी वाट पाहे काळ ॥१॥ नाहीं संतसमागम । सदाविषयाचें काम ॥२॥ मुखीं रामनाम नाहीं । सदा संसार प्रवाहीं ॥३॥ एका जनार्दनीं भुलोन । स्त्रीआधीन जाहला दीन ॥४॥
१०८७
जन्मा येऊनियां नरा । न करी आयुष्याचा मातेरा ॥१॥ वाचे उच्चारी हरहर । तेणें सुखरुप संसार ॥२॥ शिवनामीं होई रत । सदा समाधान चित्त ॥३॥ म्हणे एका जनार्दन । शिवनामें भरो वदन ॥४॥
१०८८
जन्मांचा पोसणा तुझा मी पामर । काय आतां विचार केशिराजा ॥१॥ घरासी पैं जातां ताडतील मज । आतां तुझी लाज तुज देवा ॥२॥ म्हणे नाम्या न करीं काहीं चिंता । एका जनार्दनीं सर्वथा नुपेक्षी देव ॥३॥
१०८९
जन्मातर सुखे घेऊं । श्रीविठ्ठलनाम आठवु ॥१॥ नाहीं त्यांचे आम्हां कोडें । विठ्ठल उभा मागें पुढें ॥२॥ कळिकाळाचें भय तें किती । पाय यमधर्म वंदिती ॥३॥ एका जनार्दनीं सिद्धी । नामें तुटती उपाधी ॥४॥
१०९०
जन्मासी येऊनि पहा रे पंढरी । विठ्ठल भीमातीरीं उभा असे ॥१॥ ठेविले चरण दोन्ही विटेवरी । आलियांसी तारी दरुशनें एका ॥२॥ पंचक्रोशी प्रानी पुनीत पै सदा । ऐशी ही मर्यादा पंढरीची ॥३॥ एका जनार्दनीं कीर्तनगजर । ऐकतां उद्धार सर्व जीवां ॥४॥
१०९१
जन्मोजन्मी केला लाग । म्हणोनि भाग पावलों ॥१॥ तेणें घडे संतसेवा । हेंचि देवा परम मान्य ॥२॥ आलिया जन्मांचे सार्थक । गांतां रामनाम देख ॥३॥ नामावांचुनी सुटिका । ब्रह्मादिकां नोहे देखा ॥४॥ नाम जपे शूलपाणी । एका जनार्दनीं ध्यानीं ॥५॥
१०९२
जन्मोजन्मीं आम्हीं बहु पुण्य केलें । मग या विठ्ठलें कृपा केली ॥१॥ जन्मोनी संसारीं झालों याचा दास । माझा तो विश्वास पांडुरंगीं ॥२॥ भ्रमर सुवासी मधावरी माशी । तैसें या देवासी मन माझें ॥३॥ आणिका देवासी नेघें माझें चित्त । गोड गातां गीत विठोबाचें ॥४॥ एका जनार्दनीं मज तेथें न्यावें । हाडसोनी द्यावें संतांपाशीं ॥५॥
१०९३
जन्मोजन्मींचे संचित । गुरुपायीं जडलें चित्त ॥१॥ तेंतो सोडिल्या न सुटे । प्रेमतंतु तो न तुटे ॥२॥ दुःखें आदळलीं वरपडा । पाय न सोडी हा धडा ॥३॥ देह गेला तरी जावो । गुरुचरणीं दृढ भावो ॥४॥ वरी पडोन पाषाण । परी न सोडी गुरुचरण ॥५॥ एका जनार्दनीं निर्धार । तेथें प्रगटे विश्वंभर ॥६॥
१०९४
जन्मोनी प्राणी नाम न घेत वाचे । त्याचिया जन्माचें व्यर्थ वोझें ॥१॥ प्रसवोनी तयां वांझ तो जननी । बुडविलीं दोन्हीं कुळें त्यानें ॥२॥ पूर्वज पतनीं पडती बेचाळीस । नाम न ये मुखास ऐसा प्राणी ॥३॥ एकाजनार्दनीं पतित दुराचारी । यम तया अघोरीं घालितसे ॥४॥
१०९५
जप जाप्य तप नको अनुष्ठान । पंचाग्नि साधन नको ॥१॥ नको तीर्थाटन नको मंत्रावळी । वेदशास्त्र जाळीं गुंतुं नको ॥२॥ नको आत्मस्थिती नको ब्रह्माज्ञान । नको अष्टांग साधन नको वायां ॥३॥ नको यंत्रमंत्र नको रे कल्पना । भ्रांती भूली जाणा नको नको ॥४॥ नको तूं करूं सायास धरी पा विश्वास । एका जनार्दनीं पाहें डोळां ॥५॥
१०९६
जप तप निष्ठा नेम । ऐसा साधिला दुर्गम ॥१॥ तरी ब्रह्माज्ञान नये हातां । क्रोध भरें अधिक चित्ता ॥२॥ ब्रह्माज्ञानाची प्रौढी । न घडेचि अर्थ घडी ॥३॥ एका जनार्दनीं शरण । कोठें नाहीं दुजेपण ॥४॥
१०९७
जप तप मंत्र न लगे साधन । वाचे नाराय्ण इतुका जप ॥१॥ तुटेल बंधन खुंटेल पतन । जप जनार्दन एकविध ॥२॥ एका जनार्दनें नको आणीक बोल । वाचेसी विठ्ठल जपे आधीं ॥३॥
१०९८
जप तपें तपता कोटीं । होती हिंपुटी भाग्यहीन ॥१॥ तया विश्रांतीसी स्थान । पंढरी जाण भुमंडली ॥२॥ योगयाग धूम्रपान करिती । नोहे प्राप्ति तयासी ॥३॥ तो उभा कटीं कर ठेवुनी । समचरणीं विटेवरी ॥४॥ एका जनार्दनीं पाहातां । दिठीं कंदर्प कोटी वोवाळिजे ॥५॥
१०९९
जपजाप्य मंत्र नको यंत्र तंत्र । वर्णिजें जगत्र रामनाम ॥१॥ पाउला पाउली घडतसें यज्ञ । तेणें सर्व पुण्य हातीं जोडे ॥२॥ संतांची संगतीं नामाचा निजध्यास तेणें । जोडे सौरस हातीं मग ॥३॥ होई सावधान म्हणे जनार्दन । एकनाथ पूर्ण होईल धन्य ॥४॥
११००
जपतां नाम पडे धाक । पातकें पळती त्रिवाटे देख । कळिकाळाचें नासे दुःख । ऐसें नामीं सामर्थ्य ॥१॥ जप तप नामावळी । आणिक नको मंत्रावळी । ब्रह्माज्ञान बोली । वायां शीण आटाआटी ॥२॥ साधनें पुण्य असेल गांठीं । तरीच नाम येईल होटीं । एका जनार्दनीं पोटीं । दया शांति आकळे ॥३॥
११०१
जय गोविंदा परमानंदा ऐक माझें बोल । निर्गुणरुपें असतां तुझें कांहींच नव्हें मोल । मग तुं माया रुप धरणी अती जाहलासी सबळ । नसतें देवपणा अंगी आणुनी चाळविसी केवळ ॥१॥ ऐस लाघवी तूं रामा । नको चाळवुं आह्मां ॥ध्रु०॥ नसतां तुज मज भेद देवा लटिकें जीवपण देसी । आपुले ठायीं थोरपण आणुनी आमुची सेवा घेसी । नसती अविद्या पाठीं लावुनी संसारी गोंविसे । नाना कर्मे केलीं म्हणोनी आम्हा कां दंडिसी ॥२॥ मातें भावें भजिजे ऐसा उपदेश करिसी । आपुल्या भक्तां तारीन म्हणोनी प्रतापें बोलसी । निंदक दुर्जन अभक्त त्यांतें नरकी तूं घालिसी । आपुल्या स्वार्थालागुनी दुसरीयातें कां पीडिसी ॥३॥ आपुली महिमा वाढो म्हणोनि आम्हां भक्त केलें । लक्ष चौर्‍यायंशी योनी देउनी संसारीं गोविंले । भावें तुंतें न भजों म्हणोनि आकस आरंभिलें । तुज मज वैर देवा ऐसें करितां नव्हे भलें ॥४॥ ऐसें तुज मज वैर म्हणोनि गुरुसी शरण गेलों । देवभक्तपण कोण्या कर्में मग पुसों लागलों । सदगुरु म्हणती सर्वही मायिक निश्चयें बोलिलों । देव आणि भक्त एकचि गोष्टिसी पावलों ॥५॥ मग गृरुकृपें करुन तुझें गिळीन देवपण । तुझिया नेणों भक्तावरी घालीन पाषाण । जीव शिव दोन्हीं मिळोनी मग मे सुखें राहीनक । तुज मज रुप ना रेखा त्यांतें निर्धारीन ॥६॥ ऐसें भक्तबोल ऐकुनी देवा थोर उपजली चिंता । विवेकबळें करुनि माझें देवपण उडवील आतां । यालागीं भिणें भक्तजनांसी ऐक्य करुनी तत्त्वतां । एका जनार्दनीं दरुशन द्यावें लागेल त्वरिता ॥७॥
११०२
जय विश्वव्यापका विश्वमुर्ति वंदन । वर्णितां थकलें सहा अठराजण । मुनिजन धुंडती साधिती साधन । नव्हे दरुशन तयांसी ॥१॥ तो तूं लाघवा सुत्रधारी । करिसी गोकुळामाजीं चोरी । धरितां न सांपडसी निर्धारी । आगमनिगमां सरी न पवेची ॥२॥ न कळे न कळे कवणा महिमान । शेषादिक श्रमले जाहले आसन्न । शरण एका जनार्दन । काया वाचा मन दृढेंसी ॥३॥
११०३
जयजय राम नाम दो अक्षरीं । सहस्त्र नामावरी ब्रीद गाजे ॥१॥ उफराटें अक्षरीं वाल्मिक वैखरी । सहस्त्र नामावरी उच्चारिलें ॥२॥ पुंसा पढवितां नाम दो अक्षरीं । सहस्त्र नामावली सिद्ध झालें ॥३॥ अहं महि षासुर भेदिला जिव्हारीं । नामें दो अक्षरीं निर्दाळिला ॥४॥ सदगुरु नारदें उफराटें केलें । बोधिलें लाधिलें वाल्मिकासी ॥५॥ एका जनार्दनीं रामनाम घोष । त्रैलोकीचे दोष सरते जालें ॥६॥
११०४
जयजय रामचंद्रा जयजय रामचंद्रा । हर हरि जपे त्याचे हृदयीं मुद्रा ॥१॥ सोपा जप अखंड वाचेसी वदतां । कामक्रोध लोभ पळे अहं ममता ॥२॥ कासया जप तप अनुष्ठान वाउगा श्रम । नका गुंतू संसारा वाचे म्हणा रामनाम ॥३॥ वाउगी उपाधी सांडोनी भजा श्रीरामा । एका जनार्दनीं वाचे वदा अत्मारामा ॥४॥
११०५
जयजय वो जनार्दनें विश्वव्यापक सपुर्ण वो । सगुन अगुण विगुण पुर्णपूर्णानंदघन वो ॥१॥ ब्रह्मा विष्णु रुद्र निर्माण तुजपासुनी वो । गुणत्रय उभय वनीं तुंचि पंचक अंतःकरणीं वो ॥२॥ व्यापुनी पंचक प्राण दश इंद्रिय करणी वो । पंचक विषय स्थानें पंच विषयांचे स्वामिनी वो ॥३॥ स्थूललिंग कारण चौथें महाकारण वो । जागृती स्वप्न सुषुप्ति तुर्या उन्मनीं हें स्थान वो ॥४॥ नेत्र कंठ हृदय मूध्नीं या प्रमाण वो । विश्वजैस प्राज्ञ प्रत्यगात्मा तुं संपुर्न वो ॥५॥ स्थुळ प्रविविक्त सुख चौथे आनंदाभास वो । पिंड ब्रह्मांड आणिक तुं ॐकाराचें सुख वो ॥६॥ त्वंपद आणिक असिपद ते तूं एक वो । आजी पंचकारण षडचक्रांचे भेदन वो ॥७॥ मंत्र तंत्र स्थानी अनावराचे आवरण वो । नसोनि एकपणीं एकाएकीं जनार्दन वो ॥८॥
११०६
जयजयाची देवाधिदेवा । पंढरीरावा श्रीविठ्ठला ॥१॥ भुक्ति मुक्तिनका कांहीं । लिगाड तेहि मज आतां ॥२॥ भाळी भोळी घ्यावी सेवा । होचि देवा विनवणी ॥३॥ एका जनार्दनीं तुमचा दास । त्याची आस पाया पैं ॥४॥
११०७
जयतां रामनामावळी । महदोषां होय होळी ॥१॥ ऐसा महिमा नामाचा । किती वर्णावा पै वाचा ॥२॥ बैसोनि स्मशानीं । शंभु जपे ध्यानीं मनीं ॥३॥ गिरजेसी वारंवार । सांगे रामनाम शंकर ॥४॥ तें हें उत्तम रामनाम । एका जनार्दनी निजधाम ॥५॥
११०८
जया अनुताप वैराग्य । तया म्हणती पहा अभागी ॥१॥ वरे अरी दांभिक आचार । तया म्हणती पवित्र नर ॥२॥ जया बोले मनुष्य मरे । तया म्हणती सिद्धत्व खरें ॥३॥ एका जनार्दनीं बोध । अभाविकासी हाचि खेद ॥४॥
११०९
जया करणें आत्महित । स्वधर्म आचरावा सतत ॥१॥ कर्मे नित्य नैमित्तिक । ब्रह्माप्राप्ति लागीं देख ॥२॥ तींचि नित्य आचरावीं । चित्तशुद्धि तेणें व्हावी ॥३॥ एका जनार्दनीं कर्म । इश भक्तीचें हें वर्म ॥४॥
१११०
जया कारणें योगयोग तपें करती । ती हे उभी बाळ विठ्ठल मूर्तीं । अंगीं तेजाची न माय दीप्ती । कंठीं वैजयंती शोभती गे माया ॥१॥ त्याचा वेधु लागला जीवीं । क्षण परता नोहे देहीं । काया वाचा मनें भावी । वेगें वेधकु गे माये ॥२॥ ने माये त्रैलोकीं तो उभा विटों । दोन्हीं कर समपदेम ठेवुनी कटीं । सर्वांगी चंदन कस्तुरी उटी । अवामभागी रुक्मीणी गोमटी गे माय ॥३॥ ऐसा सर्व सुखाचा आगरु । उभारुनि बाह्मा देत अभयकरु । एका जनार्दनीं निर्धारु । विठ्ठलराज गे माय ॥४॥
११११
जया कारणें वेद अनुवादती । शास्त्रे पुरणें भांडती ॥१॥ तो हा देवाधिदेव बरवा । विठ्ठल ठावा जगासी ॥२॥ नये श्रुतीसी अनुमाना । तो देखणा पुडंलीका ॥३॥ आगम निगमां न कळे पार । एका जनार्दनीं निर्धार ॥४॥
१११२
जया जैसा हेत । तैसा संत पुरविती ॥१॥ उदारपणें सम देणें । नाहीं उणें कोणासी ॥२॥ भलतिया भावें संतसेवा । करिता देवा माने तें ॥३॥ एका जनार्दनीं त्यांचा दास । पूर्ण वोरस कृपेचा ॥४॥
१११३
जया ठायीं जैसा भाव । प्रगटे देव तैसाची ॥१॥ हा तो जगी अनुभव । नुपेक्षी देव कवणासी ॥२॥ स्त्रियादि हीन याती । नामें तयां उत्तम गती ॥३॥ निंदका वंदका सम । गाता जोडे एकधाम ॥४॥ कृपाळु माऊली । एका जनार्दनीं साउली ॥५॥
१११४
जया म्हणती नीचवर्ण । स्त्री शुद्रादि हीनजन ॥१॥ सर्वाभूतीं देव वसे । नीचा ठाई काय नसे ॥२॥ नीच कोठोनि जन्मला । पंचभूतां वेगळा जाला ॥३॥ तया नाहीं का जनन । सवेंचि होत पतन ॥४॥ नीच म्हणोनि काय भुली । एका जनार्दनीं देखिली ॥५॥
१११५
जया संतचरणी नाहीं विश्वास । धिक त्यास वास यमपुरी ॥१॥ संतचरणीं मन ठेवा रे निश्चळ । करुना उतावेळ भाका त्यासी ॥२॥ घाला लोटांगण वण्दू पा चरण । तेणें समाधान होईल मना ॥३॥ एका जनार्दनीं सत्संगावांचुनी । तरला तो कोण्ही मज सांगा ॥४॥
१११६
जया हेत नामीं ध्यास । नेणें आणिक सायास । कोण लेखी संसारास । नामापुढें तृणवत ॥१॥ आम्हां नामाचें भूषण । नामें सुखासी मंडण । नामें होतसे खंडण । नानापरी पापांचे ॥२॥ जपतां नाम मंत्रावळी । काळ कांपतसे चळी । एका जनार्दनीं नव्हळी । रामनामें अतर्क्य ॥३॥
१११७
जयां आहे मुक्ति चाड । तयांसी गोड पंढरी ॥१॥ देव तीर्थ क्षेत्र संत । चहूंचा होत मेळा जेथ ॥२॥ कृष्णरामादि नामगजर । करिती उच्चार अट्टाहास्ये ॥३॥ स्त्रियाआदि नर बाळें । कौतुक लीळे नाचती ॥४॥ एका जनार्दनीं तयांसंगीं । विठ्ठलरंगी नाचतुसे ॥५॥
१११८
जयां आहे मुक्तीचें कोडें । तें तें उघडें नांदत ॥१॥ वेगीं जाय पंढरपुरा । मुक्ति सैरा फुकटची ॥२॥ मोक्ष मुक्ति राबे द्वरी । वैष्णवा घरी कामारी ॥३॥ एका जनार्दनीं मुक्ति त्याग । वैष्णव पांग धरिती ॥४॥
१११९
जयां नामाचा विश्वास । धन्य तेंचि हरिचे दास । वंदीन पायंस । वारंवार तयांच्या ॥१॥ कुळ तारिलें सकळ । वाचे नामावळी अढळ । गाती रामनाम सरळ । नोहे क्षण आराणूक ॥२॥ ते भाग्याचे नरीनर । ज्यांचा ऐसा निर्धार । एका जनार्दनीं साचार । दृढ भाव रामनामीं ॥३॥
११२०
जयां सुखाची आशा आहे । त्यांनी जावें पंढरीसी ॥१॥ अमुपासी अमुप देतां । परी भरले ते सर्वथा ॥२॥ सुखाचिया भरल्या राशी । पाहिजे त्यासी त्यांनें घ्यावें ॥३॥ न सरेचि ब्राह्मादिकीं । भरलेंदेखा भरतें ॥४॥ एका जनार्दनीं सुख । अलौकिक देख पंढरीये ॥५॥
११२१
जयांचे उदारपण काय वानुं । उपमेसी नये कल्पतरु कामधेनु । वेधीं विधियेलें आमुचें मनु । तो हा देखिला सावळा श्रीकृष्ण ॥१॥ मंजुळ मंजुळ वाजवी वेणु । श्रुतीशास्त्रा न कळें अनुमानु । जो हा परापश्यंती वेगळा वामनु । तया गोवळा म्हणती कान्हू ॥२॥ रुप अरुपाशीं नाहीं ठाव । आगमीनिगमां न कळे वैभव । वेदशास्त्रांची निमाली हांव । एका जनार्दनीं देखिला स्वयमेव ॥३॥
११२२
जयांचें चित्त संताच्या चरणा । तेणें नारायणा जिंकियलें ॥१॥ भावें देव मिळे भावें देव मिळे । संतचरणीं लोळे सर्व काळ ॥२॥ संतांची आवडी म्हणोनि अवतार धरी । योगक्षेम भारी चालवी त्यांचा ॥३॥ संतचरणी सेवा आदर उपचार । एका जनार्दनीं साचार करीतसे ॥४॥
११२३
जयांचें पाहतां श्रीमुख । हरे कोटी जन्म दुःख ॥१॥ तो हा उभा विटेवरी । भक्तकाज म्हणवी कैवरी ॥२॥ वेदासी जो दुर्गम । आम्हां कळलें तयांचें वर्म ॥३॥ ऐसा भक्तवत्सल तो एक दीनानाथ । एका जनार्दनीं तया ध्यान ॥४॥
११२४
जयाकारणें श्रमलें भांडती । वेदादिकां न कळे मती । वोळला सगुण मूर्ती । पुंडलिकाकारणें ॥१॥ धन्य धन्य पावन देखे । पुण्यभूमि पावन सुरेख । तया गातां होतसे हर्ष । प्रेमानंदे डुल्लती ॥२॥ एका जनार्दनीं शरण । पाहतां पाहतां वेधलें मन । मोक्ष मुक्ति कर जोडून । उभे तिष्ठती सर्वद ॥३॥
११२५
जयाचिया अंगीं सकळ त्या कळा । तो परब्रह्मा पुतळा पंढरीये ॥१॥ वेदांती सिद्धांती थकले धादांती । परी एकाचीही मती चालेचिना ॥२॥ वानितां वानितां जाहलासे तल्पक । सहस्त्र मुखीं देख मौनावला ॥३॥ एक मुखें वानुं किती मी पामर । एका जनार्दनीं साचार न कळेची ॥४॥
११२६
जयाचिया भेटी जातां । मोक्ष सायुज्यता पाठीं लागें ॥१॥ ऐसा उदार पंढरीराणा । पुरवी खुणा मनींच्या ॥२॥ एक वेळ दरुशनं । तुटतीं बंधनें निश्चयें ॥३॥ एका जनार्दनीं ऐक्याभावें । काया वाचा मनें गावें ॥४॥
११२७
जयाचियें द्वारी तुळशीवृंदावन । धन्य तें सदन वैष्णावांचे ॥१॥ उत्तम चांडाळ अथवा सुशीळ । पावन सकळ वैकुंठी होती ॥२॥ जयांचिया मळां तुळशीमाळा । यम पदकामळा वंदी त्याच्या ॥३॥ गोपीचंदन उटाई जयाचिया अंगीं । प्रत्यक्ष देव जगें तोचि धन्य ॥४॥ एका जनार्दनीं तयाच सांगात । जन्मोजन्मी प्राप्त हो कां मज ॥५॥
११२८
जयाची समदृष्टी पाहुं धावे मन । शोभते चरण विटेवरी ॥१॥ कानडें कानडें वेदांसी कानडें । श्रुतीसी जो नातुडें गीतीं गातां ॥२॥ परात्पर साजिरें बाळरुप गोजिरें । भाग्यांचे साजिरे नरनारी ॥३॥ एका जनार्दनी कैवल्य जिव्हाळा । मदनाची पुतळा विटेवरी ॥४॥
११२९
जयाचीं ती अनंत नामें । अनंत अवतार अनंत जन्में ॥१॥ अगाध श्रीहरीचा महिमा । त्याचा पार नेणें ब्रह्मा ॥२॥ अवतार चरित्र नामें । परिसतां निवारे कर्में ॥३॥ जे जे अवतारी देव सगुण । गाईले निर्गुणाचे गुण ॥४॥ धन्य धन्य ते भाग्याचे । हरिगुण वर्णिती वाचे ॥५॥ कांहीं सगुण निर्गुण ठाव । अवघा एकचि देंहीं देव ॥६॥ एकपणे वेगळा । एका जनार्दनीं देखिला ॥७॥
११३०
जयाचें देखतां चरण । तुटेल जन्म जरा मरण ॥१॥ तो हा चंद्रभागेच्या तीरी । कट धरुनिया करीं ॥२॥ नाम घेतां आवडी । तुटेल संसाराची बेडी ॥३॥ भाविकांसी पावे । मागें मागें त्यांच्या धांवे ॥४॥ म्हणे जनार्दनाचा एका । आवडीने नाम घोका ॥५॥
११३१
जयाचेचि चरणीं तीर्था तीर्थपण । तों हृदयीं केला सांठवण ॥१॥ नवल महिमा हरिदासाची । तीर्थें उपजती त्याचे कुशीं ॥२॥ काशीं मरणें होय मुक्ति । तेथें वचनें न मरतां होय मुक्ति ॥३॥ एका जनार्दनाचे भेटी । सकळ तीर्थे वोळंगतीं दिठी ॥४॥
११३२
जयाचेनि तुटे भवबंधन । तयासी जाण विसरती ॥१॥ करिती आणिकांची सेवा । ऐसे ते अभागी निर्दैवा ॥२॥ मुळींच नाहीं देवपण । तेथें करिती जप ध्यान ॥३॥ विसरूनि खर्‍या देवासी । भुलले आपुल्या मानसीं ॥४॥ सत्य सत्य बुडती जनीं । एका शरण जनार्दनीं ॥५॥
११३३
जयाच्या चरणां मिठी घाली भावें । धन्य ते जाणावे सदैव संत ॥१॥ प्रेमाचे सागर भक्तीचे उदधी । तोडिला उपाधी नाममात्रें ॥२॥ जडजीवां तारक सत्य सत्य वाचे । आणीक तें न वचे उपमे त्याच्या ॥३॥ एका जनार्दनीं कृपाळु संतजन । तेणे मज पावन केलें जगीं ॥४॥
११३४
जयाच्या दरुशनें शिवादिकां तृप्ती । योगी हृदयीं जया ध्याती । सहा चारा अठरा जया वर्णिता । सहस्त्रमुखा न कळे जायाची गती ॥१॥ तो हा नंदनंदनु यशोदेचा तान्हा । संवगदे गोपाळ म्हणती कान्हा । पराश्ययंती मध्यमा वैखरी नातुडे जाणा । वेडावले जया ठायी रिघाले साधना ॥२॥ आष्टांग साधन साधितां अटी । नोहे नोहे मुनिजना ज्यांची भेटी । एका जनार्दनी हातीं घेऊनी काठी । गोधनें चारी आवडीं जगजेठी ॥३॥
११३५
जयामुखीं नाममंत्र । तया जग हें पवित्र ॥१॥ नाम वंदें ज्याची वाचा । देव हृदयीं वसे साचा ॥२॥ नामीं प्रीति अखंड ज्यासी । मोक्ष तया करी वसे ॥३॥ एका जनार्दनीं नाम । हेंचि चैतन्य निजधाम ॥४॥
११३६
जयालागीं करिती योगी सायास । तो हरी पंढरीस उभा असे ॥१॥ न लगे साधन मांडणें तत्त्वता । नाम गातीं गातां सोपा सर्वां ॥२॥ नर अथवा नारी न म्हणे दुराचारी । दर्शनें उद्धरे जडजीवां ॥३॥ पुंडलिका भाक देऊनि सावकाश । पुरवितो सौरस अद्यापिवरी ॥४॥ एका जनार्दनीं चैतन्याचा गाभा । विटेवरी उभा भक्तासाठीं ॥५॥
११३७
जरा पावली निजसंधी । अनिवार येती आधी व्याधीं ॥१॥ पायीं पडतसें वेंगडी । अधारीं धरणें लागे काठीं ॥२॥ डोळांचि पडे तोंडा लाळ । नाका येत शेंबूड वोंगळ ॥३॥ चुंबन देतां पोरांप्रती । बाऊ म्हणोनि पोरें पळती ॥४॥ ऐशी दशा येईल अंगा । एका जनार्दनीं शरण रिघा ॥५॥
११३८
जरी न बनेचि गुरुवचनीं । तरी बैसोनि सहजासनीं । हेंचि एक निर्वाणी । साधेजे सुख ॥१॥ सकळीं सकळपणें । अखंडरूप पाहणें । साध्य हेंचि साधनें । करुनी घेईं ॥२॥ जया संतचरणीं नाहीं भावो । त्यासी लडिवाळ संदेहो । तेथें साधनामाजीं देवो । दिसे कैसा ॥३॥ हेतु मातु अनुमाना । आकळी दृध एकमना । अधिकचि कल्पना । वाढविली ॥४॥ जाणीव नेणीव हें वाड । कल्पनेचें समूळ झाड । तुझें तुजचि आड । उभे ठाकती ॥५॥ नाना हेतु विवंचना । सांडुनियां कल्पना । एका जनार्दना । शरण रिघे ॥६॥
११३९
जळ स्पर्शा जाता स्नानीं । तंव चिन्मात्र भासे जीवनीं ॥१॥ कैसी वहाताहे गंगा । स्नानीं हारपलें अंगा ॥२॥ अंगत्व मुकलें अंगा । स्नानीं सोवळी जाली गंगा ॥३॥ एका जनार्दनीं मज्जन । सकळ तीर्थे जालीं पावन ॥४॥
११४०
जळतिया घरा । कोण वस्ती करी थारा ॥१॥ तैसे अभागी पामर । गुरुपण मिरविती वरवर ॥२॥ नाहीं मंत्रशुद्धीचें ज्ञान । भलतियाचें फुंकिती कान ॥३॥ मनुष्य असोनी गुरु पाही । एका जनार्दनीं तें नाहीं ॥४॥
११४१
जाईन पंढरी । हेंचि चिंतन धरीं । मग तो श्रीहरी । नुपेक्षी भक्तांतें ॥१॥ धरुनी पहा विश्वास । नका आणिक सायास । पहातसे वास चिंतनाची सर्वथा ॥२॥ न धरी माझें आणि तुझें । भार घाली पारे वोझें । एका जनार्दनीं दुजें । मग नाहीं तयातें ॥३॥
११४२
जाईल तरी जावो प्राण । परी न सोडा चरण संतांचे ॥१॥ होणार तें हो कां सुखे । परी मुखें रामनाम न सोडा ॥२॥ कर्म धर्म होतु कं होनी । परी प्रेम कीर्तनीं न सोडा ॥३॥ एका जनार्दनीं वर्म । सोपा धर्म सर्वांसी ॥४॥
११४३
जाईल तरीं जावो प्राण । परी मी न सोडी चरण ॥१॥ ऐसा विश्वासलों हरीं । नाम तुमचें कंठीं धरीं ॥२॥ होईल एं होवो साचा । परी न संडो नाम वाचा ॥३॥ चित्त वेधलें चिंतनीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥
११४४
जाऊनियां आंत धोंड्यासी दाविलें । सुवर्ण तें जाहलें अंतर्बाह्य ॥१॥ तुमचें तें द्रव्य मोजूनियां घ्यावें । उरलें तें धाडावें गणोबासी ॥२॥ एका जनार्दनीं पाहूनियां दामा । आलिंगिला नामा सद्रदित ॥३॥
११४५
जाऊनियां माळीं नामा तो बैसला । व्यापार तो केला पाषाणाशीं ॥१॥ देऊनि कापड सुखें आला घरां । सर्व समाचारा विदित केलें ॥२॥ धोंडोबा गणोबा आले ते व्यापारी । तयांचे पदरीं कापड दिलें ॥३॥ आठ दिवसां ऐवज घेऊनियां जावा । एका जनार्दनीं पहावा हस्त त्याचा ॥४॥
११४६
जागा परी निजला दिसे । कर्म करी स्फुरण नसे ॥१॥ सकळ शरीराचा गोळा । होय आळसाचा मोदळा ॥२॥ संकल्पविकल्पाची ख्याती । उपजेचिना सदा चित्तीं ॥३॥ यापरी जनीं असोनि वेगळा । एका जनार्दनीं पाहे डोळां ॥४॥
११४७
जागृति स्वप्न सुषुप्ति । तिही अवस्थातें प्रकाशिती ॥१॥ जे जागृतीते जागले । तेचि स्वप्रातें चेईले ॥२॥ क्षणें जागृति क्षणें सुषुप्ती । क्षणें एक स्वप्रचि प्रतीति ॥३॥ सर्व दिसे तितुकें मिथ्याभूत । एका जनार्दनीं शाश्वत ॥४॥
११४८
जागृती स्वप्नीं सुषुप्तीमाझारीं । जपें नाम श्रीहरी सर्वकाळ ॥१॥ साधन आणीक न लगे सकळ ॥२॥ रामनाम निखळ जपें आधीं ॥३॥ पापाचे पर्वत छेदी नाम व्रज । हाचि पैं निर्धार ऋषीश्वर ॥४॥ एका जनार्दनीं नाम निजधीर । पावन साचार रामनाम ॥५॥
११४९
जागृतीं स्वप्नीं आणि सुषुप्ती । तिहीं अवस्थात हरि म्हणतां मुक्ति ॥१॥ ऐसें वेदशास्त्रें गर्जती । विवादतीं पुराणें ॥२॥ नाम निरंतर मुखीं सदा । नोहे बाधा भौतिक ॥३॥ एका जनार्दनीं शरण । भुक्तिमुक्तिची नाहीं कारण ॥४॥
११५०
जाणतां जाणतां कां रे वेडा होसी । नाथिल्याच्या पिसीं हांव भरी ॥१॥ दोन दिवसांचे उसणे व्यापारी । काय त्यांची थोरी मानितोसी ॥२॥ दिवसांची छाया पुर्व पश्चिमेसी । तैशी या देहाची स्थिती जाणा ॥३॥ एका जनार्दनीं हरिकृपेंवीण । दावील ही खूण कोण बापा ॥४॥
११५१
जाणती हे कळा हारपोनि गेली । वृत्ति मावळली तयामाजीं ॥१॥ पाहतां पहाणें हारपोनि गेलें । मी माझें सरलें तयामाजीं ॥२॥ अंतर बाहेरीं पाहतां शेजारीं । शून्याची वोवरी ग्रासियेली ॥३॥ ग्रासियेलें तेणें चंद्र सुर्य दोन्हीं । एका जनार्दनीं आनंद झाला ॥४॥
११५२
जाणती हे हातवटी । संत पोटीं दयाळू ॥१॥ न म्हणती अधम जन । करिती कृपेचें पोषण ॥२॥ शुचि अशुचि न म्हणे कांहीं । एकरुप वर्ते देहीं ॥३॥ एका जनार्दनीं मज । तारियेलें तेणे सहज ॥४॥
११५३
जाणते नेणते दोघेही गुंतती । वायां कुंथाकुंथीं करिती रया ॥१॥ प्रपंच व्यसन न चुके पामरा । करती वेरझारा न चुके रया ॥२॥ वोढाळ सांपडतां बांधिती दावणी । कोण करुणावचनीं सोडी रया ॥३॥ एका जनार्दनीं करितां प्रयाणा । नाहीं ती करुणा यमासी ॥४॥
११५४
जाणते नेणते होतु ब्रह्माज्ञानी । तयांचे तो ध्यानी नातुडेची ॥१॥ सुलभ सोपारे गोकुळामाझारीं । घरोघरीं चोरी खाय लोणी ॥२॥ न कळे ब्रह्मादिकां करितां लाघव । योगियांची धांव खुटें जेथें ॥३॥ एका जनार्दनीं चेंडुवाचे मिसें । उडी घालितसे डोहामाजीं ॥४॥
११५५
जाणतें संत जाणते संत । जाणते संत अतरीचें ॥१॥ जे जे इच्छा देती फळ । काळ वेळ चुकवोनी ॥२॥ मनोरथ पुरले वो माझे । एका जनार्दनी वोझें ॥३॥
११५६
जाणतेपणें विधिनिषेध पोटीं । अज्ञान तें दृष्टी पळे दूर ॥१॥ अज्ञान बरवें अज्ञान बरवें । सज्ञान तें हावे बुडोनि जाये ॥२॥ अज्ञानें ज्ञान होतसे आपण । सज्ञानें मीतूपण घडतसे ॥३॥ एका जनार्दनीं अज्ञानाची बरा । सज्ञनाचा वारा नको मज ॥४॥
११५७
जाणत्या नेणत्या एकचि ठाव । तेणेंहि भजावा पंढरीराव ॥१॥ एका पंडुं आणिका भरीं । तेणें फेरी चौर्‍याशींची ॥२॥ लागा पंढरीच्या वाटे । तेणें तुटें बंधन ॥३॥ अनुभवें अनुभव पाहां । येच देहीं प्रत्यक्ष ॥४॥ एका जनार्दनीं प्रचीत । विठ्ठलनामें मुक्त सत्य ॥५॥
११५८
जाणत्या नेणत्या हाचि उपदेश । विठ्ठल वाचे जप सुखें करा ॥१॥ न करा साधन वाउगाची शीण । विठ्ठलरुपीं मन निमग्न राहो ॥२॥ भलतिया परी विठ्ठलासी गाये । सुखा उणें काय तुजाला आहे ॥३॥ जन्ममरणा तुटे आधिव्याधी । विठ्ठलनामें सिद्धि पायां लागे ॥४॥ एका जनार्दनीं जपतां विठ्ठल । न लगे तया मोल धन कांहीं ॥५॥
११५९
जाणपणें वस्तु जाणों मी जाये । माझी जाणीव कैसी मज आड ठाये ॥१॥ जाणों मी कैसें जाणों मी कैसें । जाणपणें पिसें लावियेलें ॥२॥ जाणपणाचें पडळ जें आलें । जवळीचे वस्तुचें देखणे ठेलें ॥३॥ एका जनार्दनीं सुदलें अंजन । पडळ भेदोनियां दाविलें निधान ॥४॥
११६०
जाणा पाळूं कळा । कृपाळुवा जी दयाळा ॥१॥ कां हो आतां उपेक्षिलें । मज दीनासी ये वेळें ॥२॥ पाहतं वास देऊनी धीर । कां हो पडियेला विसर ॥३॥ चित्त सर्व तुमचें पायीं । कृपावंत भेटी देईं ॥४॥ एका जनार्दनीं एकपणें । तया नाहीं दुजें पेणें ॥५॥
११६१
जाणा याचा तुम्ही भाव । देहीं देव प्रगटे ॥१॥ एकविध भक्ति करा । तेणें घरां धांवतों ॥२॥ सर्वभावें अर्पा मन । हेंचि साधन तुम्हांसी ॥३॥ संसाराचा नका घोक । सर्व देव पुरवितो ॥४॥ लाजतसे आपुल्या नांवा । म्हणोनि सेवा करी त्याची ॥५॥ ब्रीद साच हें जगीं । नुपेक्षी यालागीं दीनातें ॥६॥ एका जनार्दनीं ठाव । धरा भाव दृढ मनीं ॥७॥
११६२
जाणार जाणार देह हा जाणार । काय उपचार करिसी वायां ॥१॥ मृत्तिकेचें घर बांधितां खचलें । तैसें परि जाहलें न कळे तुज ॥२॥ गृहधनदारा पुत्रपौत्र वायां । स्मरें देवराया एका भावें ॥३॥ एका जनार्दनीं घेई अनुतापा । चुकवीं खेपा हे जन्ममृत्यु ॥४॥
११६३
जाणिव नेणिवांच्या वाटा । खटपटा पंडुं नका ॥१॥ संतां शरण जा रे आधीं । तुटे उपाधी तत्काळ ॥२॥ तेणें तुटें भवबंधन । आत्मज्ञान प्रगटे ॥३॥ एका जनार्दनीं शरण । संत परिपूर्ण उदार ॥४॥
११६४
जाणिवेच्या मागें होत कुंथाकुंथी । हे तों प्रवृत्ति निवृत्ति मार्ग दोन्ही ॥१॥ जाणीव शहाणीव येथें नाहीं काम । वाचे वदतां नाम सर्व साधे ॥२॥ जाणिव जाणपण नेणिवा नेणपण दोहींचे । अधिष्ठान एकनाम ॥३॥ एका जनार्दनीं नामक परतें आन । दुसरें साधन सीण जगीं ॥४॥
११६५
जाणीव फेडा जाणीव फेडा । जाणिवेनें वेडा लावियेलें ॥१॥ नेणपणें मज होता जो भाव । जाणीवेनें कैसें मज नागविलें ॥२॥ नेणपणें मी सर्वांसी मानी । जाणीव येतां कोण्हा न मानी ॥३॥ जाणीण नेणीव नेणेंचि कांहीं । एक जनार्दनीं लागला पायीं ॥४॥
११६६
जाणोनियां वेडा होसी कां रे गव्हारा । भजें तूं पामरा श्रीविठ्ठला ॥१॥ नका रे साधन व्युप्तत्तीचा भार । चुकवी वेरझारा विठ्ठलानामें ॥२॥ एका जनार्दनीं विठ्ठलावांचुनी । सोडविता कोणी नाहीं दुजा ॥३॥
११६७
जातांना राउळीं परीस मागे नामा । पाहूं द्या तो आम्हां कैसा आहे ॥१॥ राजाईनें त्वरें आणूनियां दिला । नाम्यानें तो घेतिला सव्य करीं ॥२॥ जाऊनि चंद्रभागे टाकूनियां दिला । नामदेव आला राउळासी ॥३॥ एका जनार्दनीं मस्तक चरणीं । ठेवूनि विनवणी करी नामा ॥४॥
११६८
जाले ज्ञानदेव वाणी । आले सामुग्री घेउनी ॥१॥ पर्वकाळ द्वादशी । दिली सामुग्री आम्हांसी ॥२॥ ज्ञानदेवाच्या चरणीं । शरण एका जनार्दनीं ॥३॥
११६९
जाश्वनीळ सदा ध्याये ध्यानीं मनीं । बैसोनी स्मशानीं निवांतपणें ॥१॥ तें हें उघडें रुप विठ्ठ्ल साचार । निगमांचे माहेर पंढरी हें ॥२॥ न बुडे कल्पांती आहे तें संचलें । म्हणोनि म्हणती भए भूवैकुंठ ॥३॥ एका जनार्दनी कल्पाचें निर्धारी । निर्विकल्प पंढरी उरतसे ॥४॥
११७०
जाहला अस्तमान आले गोकूळां । वोवाळिती आरत्या गोपिका बाळां ॥१॥ जाती सवंगंडी आपुलाले घरां । राकाकृष्ण दोघे आले मंदिरां ॥२॥ नानापरीचीं पक्कान्नें वाढिती भोजना । यशोदा रोहिणी राम आणि कृष्णा ॥३॥ एका जनार्दनीं पहुडले देव । गोकुळामाजीं दावी ऐसें लाघव ॥४॥
११७१
जाहला बहु दीन । मग म्हणे नारायण ॥१॥ तया हीन पामरासी । ब्रह्महत्या घडल्या राशी ॥२॥ जें न करावें तें केलें । मग राम म्हणोनि डोले ॥३॥ काय तयाचें तें गाणें । जैसें मोलाचें रडणें ॥४॥ शुद्ध भावांवांचुनी निका । एका जनार्दनीं नाहीं सुटका ॥५॥
११७२
जाहली गेली तुटली खुंटली हाव । पहातां पाहणें एकचि जाहला देव ॥१॥ जंगम स्थावर अचळ चळाचळ । अवघा व्यापुनी राहिला अकळ ॥२॥ न कळे लाघव खेळ खेळ करूणादानी । कायावाचामनें शरण एका जनार्दनीं ॥३॥
११७३
जाहली भाग्याची उजरी । संतसेवा निरंतरी ॥१॥ हेंचि मज वाटे गोमटें । येणें भवभ्रम फिटे ॥२॥ करिता सावकाश ध्यान । होय मनाचें उन्मन ॥३॥ एका जनार्दनीं संत । सदा शांत अंतरीं ॥४॥
११७४
जिकडे जावें तिकडे देवाचि सांगातें । ऐसें केलें नाथें पंढरीच्या ॥१॥ शब्द तिथें झाला समूळचि वाव । गेला देहभाव हारपोनी ॥२॥ अंतरी बाहेरी एकमय जाहलें । अवघें कोंदटलें परब्रह्मा ॥३॥ एका जनार्दनीं ऐसी जाहली वृत्ती । वृत्तीची निवृत्ति चिदानंदीं ॥४॥
११७५
जिता मायबापा न घालिती अन्न । मेल्या प्रेतावरी करिती पिंडदान ॥१॥ पहा पहा संसारींचा कैसा आचारु । जिता अबोला मा मेल्या उच्चारु ॥२॥ जित्या मायाबापा न करिती नमन । मेल्यामगें करिती मस्तक वपन ॥३॥ जित्या मायबापा धड गोड नाहीं । श्राद्धीं तळण मळण परवडी पाही ॥४॥ जित्या मायबापा गालीप्रदान । मेल्या त्याचेनी नांवें देती गोदान ॥५॥ जित्या मायबापा नेदी प्याला पाणी । मेल्या पितरांलागीं बैसती तर्पणीं ॥६॥ प्याया पाणी न घालिती सासरा जिता । पिंडापाशीं येती मग दंडवता ॥७॥ एका जनार्दनीं कृपेचें तान्हें । विधिनिषेध दोन्हीं आतळों नेदी मनें ॥८॥
११७६
जितुका आकार दिसत । नाशिवंत जात लया ॥१॥ एक नाम सत्य सार । वाउगा पसार शीण तो ॥२॥ नामें प्राप्त ब्रह्मापद । नामें देह होय गोविंद ॥३॥ एका जनार्दनीं नाम । सर्व निरसे क्रोधकाम ॥४॥
११७७
जिव्हा रस चाखी अवलोकी नेत्र । प्रेरक पवित्र आत्माराम ॥१॥ बोलतसे मुख त्वचे कळे स्पर्श । प्रेरक परेश आत्माराम ॥२॥ सुखदुःख ज्ञान होतसे पैं चित्ता । प्रेरक पंढरीनाथविण नाहीं ॥३॥ घ्राणा परिमळ ऐकती श्रवण । प्रेरक नारायण सर्वसाक्षी ॥४॥ हस्तें घेणें देणें चरणीं गमन । प्रेरक ईशान आत्माराम ॥५॥ ज्याच्या सत्ताबळें हाले वृक्षपान । प्रेरक भगवान सर्वांचा तो ॥६॥ एका जनार्दनीं पाय हे धरावे । ध्यान हें करावें हृदयीं त्याचें ॥७॥
११७८
जीं जीं भक्त बोलतीं वचनें । तीं तीं प्रमाण करणें देवा ॥१॥ याजसाठीं अवतार । धरी मत्स्य कांसव सुकर ॥२॥ भक्तवचना उणेंपण । येऊं नेदी जाण निर्धारें ॥३॥ स्वयें गर्भवास सोशी । अंबऋषीकारणें ॥४॥ एका जनार्दनीं ब्रीद साचा । वागवी भक्ताचा अभिमान ॥५॥
११७९
जीव परमात्मा दोन्ही । ऐसे जाणती तेचि ज्ञानी ॥१॥ ऐसं असोनि संपन्न । सदा करिती माझे भजन ॥२॥ माझ्या भजना हातीं । उसंतु नाहीं दिवसराती ॥३॥ जन नोहें जनार्दन । एका जनार्दनीं लोटांगण ॥४॥
११८०
जीव शिव दोन्हीं एकचि आसनीं । पूजी अवसानीं सर्वकाळ ॥१॥ कामक्रोध यांचा मानूनि विटाळ । पूजन सर्वकाळ बरें होय ॥२॥ परद्रव्य परस्त्री येथें आसक्त नोहे मन । तेणें जनार्दन पूजा पावे ॥३॥ एका जनार्दनीं ममता टाकुनी । संतांचे चरणीं पूजन करी ॥४॥
११८१
जीवभाव जेणें अर्पियला देवा । तयाची ते सेवा देव करी ॥१॥ न म्हणे नीच अथवा उंचपण । भावासी कारण मुख्य देवा ॥२॥ देव भावासाठीं लागे पाठोपाठीं । एका जनार्दनीं भेटी देतो देव ॥३॥
११८२
जीवा शिवा एकपण । तुमचा चरणांचे महिमान ॥१॥ गेलें अज्ञान हारपोनी । लाविलें तें आपुलें ध्यानीं ॥२॥ कर्म धर्म पारुषले । अवघे जाहले परब्रह्मा ॥३॥ उगविली गोंवागुतीं । एका जनार्दनीं प्रचीती ॥४॥
११८३
जीवाचें जीवन जनीं जनार्दन । नांदतो संपूर्ण सर्व देहीं ॥१॥ वाउगी कां वायां शिणती बापुडीं । काय तया जोडी हातीं लागे ॥२॥ पंचाग्रि साधन अथवा धूम्रपान । तेणें काय संपूर्ण हरी जोडे ॥३॥ एका जनार्दनीं वाउगीं तीं तपें । मनाच्या संकल्पें हरी जोडे ॥४॥
११८४
जीवामाजीं घालुनी जीव । परिसी अर्थ तोगौरव ॥१॥ तैं सिद्धि पावे कार्य सर्व । भव विभव निवारें ॥२॥ व्यापक तो सर्वदेशीं । भरुनी उरला सर्व साक्षी ॥३॥ राम व्यापकु सर्वदेशीं । ऐशीं कल्पना जयासी ॥४॥ जळीं स्थळीं राम भरला । एका जनार्दनीं देखिला ॥५॥
११८५
जीवेंभावें जाहलों दास । नाहीं आस संसारा ॥१॥ नाशिवंता पाठीं धांवे । कोन हावे भोगील ॥२॥ जन्मजरामरण फेरा । या संसारा आंचवलों ॥३॥ जाहला संतसमागम । भवभ्रम फिटला ॥४॥ एका जनार्दनीं काम । मन जाहलें तें निष्काम ॥५॥
११८६
जीहीं जाणितलें वर्मासी । त्याचें दास्य करिसी । गर्भवास सोसिशी । त्याचें साठी ॥१॥ घर कुंटुंब ना आभावो । गांव न तुज ठावो । सोलाट तुं पाहा हो । लागला जगीं ॥२॥ बहुतांचें ठेवणें । बुडविलें येणें । शेख जीव घेणें । मागत्यासी ॥३॥ मायबापेंविण । वाढला हा जाण । शरण एका जनार्दनीं । जाती गोतपणें ॥४॥
११८७
जुनाट कीर्तनमहिमा । तया काय देऊं उपमा ॥१॥ धन्य धन्य हरीचे दास । करिती आस कीर्तनीं ॥२॥ मागें तरले पुढें तरती । पहा प्रचीती पुराणीं ॥३॥ म्हणोनि एका काकुलतीं । कीर्तन करा दिनराती ॥४॥
११८८
जुनाट जुगादीचें नाणें । बहु काळांचे ठेवणें । पुंडलिकांचे पायाळपणें । उभें ठेलें विटेवरी ॥१॥ युगें जाहलीं अठ्ठवीस । वास भीवरेतीरास । भक्तांची धरु आस । विटे उभा राहिला ॥२॥ एका जनार्दनीं भाव । तया भेटतसे देव । अभागीये भेव । सदा वसे अंतरीं ॥३॥
११८९
जे आसक्त संसारीं । ते अघोरीं पडती ॥१॥ तयां नाहीं सोडविता । सदगुरुनाथावांचुनी ॥२॥ त्याचे चरण धरा चित्तीं । मग भीति कासया ॥३॥ एका जनार्दनीं शरण । जन्ममरण चुकलें ॥४॥
११९०
जे जे भक्तांची आवडी । तया संकटीं घाली उडी । वाढवी आपुली आपण गोडी । करी जोडी नामाची ॥१॥ होय तयांचा अंकित । नेणें लहान थोर मात । आपुलें आपण पुढें धांवत । न सांगतां करी सर्व ॥२॥ एका जनार्दनीं कनवाळ । पतितपावन म्हणवी दयाळ । माता स्नेहें परीस सबळ । भक्तांलांगीं स्वयें रक्षी ॥३॥
११९१
जे जे वेळें जें जें लागे । तें न मागतां पुरवी वेगें ॥१॥ ऐसा भक्तांचा अंकित । राहे द्वारीं पैं तिष्ठत ॥२॥ आवडी गौळियांची मोठी । गायी राखी जगजेठी ॥३॥ भक्ति भावार्थें भुकेला । एका जनार्दनीं विकला ॥४॥
११९२
जे भजती मज जैसे वासना । मीही तया तैसा असे ॥१॥ जयां जैशी पैं वासना । मीहि तैसा होय जाणा ॥२॥ हो का माझी प्रतिमा मूर्ति । आदरें करितां माझी भक्ति ॥३॥ मी जनीं असोनीं निराळा । एकाजनार्दनीं अवलीला ॥४॥
११९३
जे या नेले संता शरण । जन्ममरण चुकलें त्या ॥१॥ मागां बहुतां अनुभव आला । पुढेंहि देखिला प्रत्यक्ष ॥२॥ महापापी मूढ जन । जाहले पावन दरुशनें ॥३॥ एका जनार्दनीं संत । कॄपावंत दयाळू ॥४॥
११९४
जें जें कर्म करावें या देहीं । भोगावें तेंही देहादेह ॥१॥ देहींचें कर्म देहींच भोगावें । वायां कां शिणावें हाव भरी ॥२॥ आपुलें संचित तैसा कर्मभोग । वाउगा उद्योग बोलून काय ॥३॥ एका जनार्दनीं कर्माची जे रेखा । न चुके सकळिकां भोग त्याचा ॥४॥
११९५
जें जें क्षेत्र जें जें स्थळीं । तें तें बळी आपुलें ठायीं ।१॥ परे ऐसें माहात्म्य नाहीं कोठें । जें प्रत्यक्ष भेटे हरिहर ॥२॥ ऐत संतसामगाम । ऐसा निरुपम नाममाहिमा ॥३॥ दिंडी टके मृदंग नाद । नाहींभेद यातीसी ॥४॥ एका जनार्दनीं निजसार । पंढरी माहेर भुलोकीं ॥५॥
११९६
जें जें दिसें तें तें नासे । अवघें वोसे जायाचें ॥१॥ नाशिवंत सर्व काया । भेणें उपाया करा कांहीं ॥२॥ पदार्थ मात्र जात असे । कांहीं नसे आनु दुजें ॥३॥ एका जनार्दनीं सर्व वाव । धरा भाव विठ्ठलीं ॥४॥
११९७
जें जें दृष्टी दिसे तें तें हरिरुप । पुजा ध्यान जप त्यासी नाहीं ॥१॥ वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्रीं देव । तयाविण ठाव रिता कोठें ॥२॥ वैष्णवांचे गुह्मा मोक्षाचा एकांत । अनंताचा अंत पाहतां नाहीं ॥३॥ आदि मध्य अंती अवघा हरि एक । एकचि अनेक एक हरि ॥४॥ एकाकार झाले जीव तोचि दोन्ही । एकाजनार्दनी ऐसें केलें ॥५॥
११९८
जें जें देखिलें तें तें भगलें । रुप एक उरलें विटेवरी ॥१॥ डोळियाची धनी पाहतां पुरलीं । परी वासना राहिली चरणाजवळील ॥२॥ एका जनार्दनीं विश्वास तो मनीं । संतांचें चरणी सदा बैसों ॥३॥
११९९
जें जें बोले तैसा चाले । तोचि वहिलें निवांत ॥१॥ अंगी असोनी जाणपण । सदा सर्वदा तो लीन ॥२॥ निंदा अथवा वंदा । नाहीं विषय ती बाधा ॥३॥ शांतीचा मांदूस । भरला असे सदोदित ॥४॥ एका जनार्दनीं धन्य । त्याचें दरुशन जगमान्य ॥५॥
१२००
जें देवा दुर्लभ स्थान । मनुष्यासी तें सोपें जाण ॥१॥ या ब्रह्माडांमाझारीं । सृष्टी जाणावी पंढरी ॥२॥ एक एक पाऊल तत्त्वतां । घडे अश्वमेध पुण्यता ॥३॥ एका जनार्दनीं ठसा । विठ्ठल उभाची सरसा ॥४॥
१२०१
जें द्रौपदीनें स्मरिलें । तें विटेवरी शोभलें ॥१॥ जें अर्जुन स्मरिलें । तें विटेवरी शोभलें ॥२॥ जेणें गजेंद्रा उद्धारिलें । तें विटेवरी शोभलें ॥३॥ जें हनुमंतें स्मरिलें । तें विटेवरी शोभलें ॥४॥ जें पुंडलिके ध्याइलें । ते एका जनार्दनीं देखिले ॥५॥
१२०२
जें पदींनिरुपण तेंचि हृदयीं ध्यान । तेथें सहजीं स्थिर राहे मन । कीर्तनासी तोषोनि कळिकाळ तुष्टला । समाधीसी समाधान रे ॥१॥ कीर्तनें सिद्धि कीर्तनें सिद्धि । कीर्तनें समाधान बुद्धी । कीर्तनीं विनटले नारद प्रल्हाद । द्वंद्वामाजीं समाधी रे ॥२॥ कीर्त्नीं सद्भाव अखंड अहर्निशीं । पाप नरिघे त्याच्या देशीं । निजनामे निष्पाप अंतर देखोनीं देव तिष्ठे तयापशीं रे ॥३॥ हरिनम कीर्तनें अभिमान सरे । आणिक श्रेष्ठ आहे काज । सद्भावें कीर्तनीं गातां पैं नाचतां । लोकेषणा सांडीं लाज रे ॥४॥ कलीमाजी कीर्तन श्रेष्ठ पैं साधन । साच अन मानी ज्यांचें मन । नामासी विन्मुख जन्म त्यसी दुःख । त्या केविं होय समाधान रे ॥५॥ कीर्तानाचेनि पंथें लाजविलीं तीर्थें । जप तपासे केले मुक्त । हरिनामे लोधला देवाधि देवो । वैकुंठचि केलें तेथें रे ॥६॥ व्रतां तपां तीर्थों न भेटे जो पाहतां । तो कीर्तनीं सांपडे देवो । तनु मन प्राणें कीर्तनीं विनटले । भावा विकला वासुदेवो रे ॥७॥ एका जनार्दनीं कीर्तन भावें । श्रोता वक्ता ऐसें लाहावें । गर्जत नामें निशाण लागुनि । सकळिकां वैकुंठासी जावें रे ॥८॥
१२०३
जें या चराचरीम गोमटें । पाहतां वेंदां वाट न फूटे । तें पुंडलिकाचे पेठे । उभें नीट विटेवरी ॥१॥ सोपारा सोपारा झाला आम्हां । शास्त्रें वर्णिती महिमा । नकळे जो आगमा निंगमां । वंद्य पुराणा तिहीं लोकीं ॥२॥ सहस्त्र मुखांचें ठेवणें । योगीं ध्याती जया ध्यानें । तो नाचतो कीर्तनें । प्रेमभक्त देखोनी ॥३॥ एका जनार्दनीं देखा । आम्हां झाला सुलभ सोपा । निवारुनी भवतापा । उतरीं पार निर्धारें ॥४॥
१२०४
जें वेदांसी नातुडे श्रुतींसी सांकडें । ते उभे वांडेंकांडें पंढरीये ॥१॥ न माये चराचरीं योगियांच्या ध्याना । तया म्हणती कान्हा नंदाचा जो ॥२॥ आगम निगम लाजोनी राहिले । तया बांधिती वहिलें उखळासी ॥३॥ काळाचा जो काळ भक्ता प्रतिपाळ । तया भेडविती बागुल आला म्हणोनी ॥४॥ बारा चौदा सोळा अठरा विवादती । तो गायी राखी प्रीती गोकुळांत ॥५॥ एका जनार्दनीं भक्तीचा भुकाळू । खाय तुळसीदळू भाविकांचें ॥६॥
१२०५
जें सुख संतसज्जनाचे पायीं । तें सुख नाहीं आणिके ठायी ॥१॥ तुकितां या सुखाचेनी तुके । पैं वैकुंठ जाले फिकें ॥२॥ पाहोंजातां लोकीं तिहीं । ऐसें न देखें आणिकें ठायीं ॥३॥ नवल या सुखाची गोडी । हरिहर ब्रह्मा घालिती उडी ॥४॥ क्षीरसागर सांडोनी पाही । अंगें धांवे शेषशाई ॥५॥ एका जनार्दनीं जाली भेटीं । सुख संतोषा पडली मिठी ॥६॥
१२०६
जेणे नाम धरिलें कंठीं । धावें त्यांच्या पाठीं पोटीं ॥१॥ नामें गातां जनीं वनी । आपण उभा तेथे जाउनी ॥२॥ नामासाठी मागें धावें । इच्छिअलें तेणे पुरवावें ॥३॥ यातीकुळ तयाचें । न पाहे कांही सांचें ॥४॥ वर्णाची तों चाड नाहीं । नाम गातां उभा नाहीं ॥५॥ एका जनार्दनीं भोळा । नामासाठीं अंकित जाला ॥६॥
१२०७
जेणें घेतलेंसे विख । तया सर्प लाविती देख ॥१॥ जें केलें आपुलें आपण । जें भोगितां दुःख कोण ॥२॥ एका जनार्दनीं कर्म । कर्मामाजी घडे वर्म ॥३॥
१२०८
जेणें जेणें आमुच्या मना समाधान । तें तें करुं ध्यान तुमचें देवा ॥१॥ करुनाकर तुम्हीं पतितपावना । अहो नारायणा वेदवंद्या ॥२॥ भाकितसों कीव होऊनि उदास । आता निराश नका करुं ॥३॥ एका जनार्दनीं नका दुजें आतां । अहो रुक्मादेवीकांता पाडुरंगा ॥४॥
१२०९
जेथें कष्टें न लभे ज्ञान । आधीं पाहिजे समाधान । योगयाग तपाचें नाहीं कारण । शांति क्षमा दया जाण मुख्य धरी ॥१॥ आणिक नको रे साधन । वायां शीण ब्रह्माज्ञान । आम्हीं मुखीं गाऊं रामकृष्ण । हेंचि समाधान आमुचें ॥२॥ आलिया जन्माचें सार्थक । जन्मजरा निवारुं दुःख । कायावाचामनें संतसेवा देख । दुजा हेतु नाहीं मनीं ॥३॥ जन तोचि जनार्दन । साक्षी तया लोटांगण । एका जनार्दना शरण । कायावाचामनेंसी ॥४॥
१२१०
जेथें जेथें भक्त वसे । तेथें देव नांदे अपैसें ॥१॥ हाचि पहा अनुभव । नका ठाव चळूं देऊं ॥२॥ बैसले ठायीं दृढ बैसा । वाचे सहसा विठ्ठल ॥३॥ एका जनार्दनीं ठाव । धरितां देव हातीं लागे ॥४॥
१२११
जेथें जेथें मन जाईल वासना । फिरवावें नारायण हेचि देई ॥१॥ वारंवार द्यावा नामाचा आठव । कुबुद्धिचा ठाव पुसा सर्व ॥२॥ भेदाची भावना तोडावी कल्पना । छेदावी वासना समूळ कंद ॥३॥ एका जनार्दनीं नका दुजा छंद । रामकृष्ण गोविंद आठवावा ॥४॥
१२१२
जेथें न पुरे काळाचा हात । काय मात सांगूं त्याची ॥१॥ यमधर्म जोडोनी हात । उभेचि तिष्ठत द्वारेसी ॥२॥ ब्रह्मज्ञान लाळ घोटी । ऐशी कसवटी जयाची ॥३॥ शरण एका जनार्दनीं । लोळे ज्ञानदेवा चरणीं ॥४॥
१२१३
जेथें निरसोनियां द्वैत म्हणताती अद्वैत । त्याहुनी अतीत स्वरुप माझें ॥१॥ तें मी लक्ष्याही लक्ष्य पराचेंही पर । जेथें वेदशास्त्रें लाजोनी गेलीं ॥२॥ गिळोनी अज्ञान निखळ म्हणती ज्ञान । उभयाहुनी भिन्न स्वरुप माझें ॥३॥ सच्चिदानंदा प्रतिपादिती वेद । याहुनी अगाध स्वरुप माझें ॥४॥ निरसूनियां कर्म म्हणती परब्रह्मा । याहुनी उत्तम स्वरुप माझें ॥५॥ माया आणि ममत्व निरसुनी शुद्ध सत्त्व । सत्त्वाचें निजसत्व स्वरुप माझें ॥६॥ जेथें पद आणी पिंड अभिन्न अखंड । त्याहुनी उदंड स्वरुप माझें ॥७॥ जेथें शुद्ध आणि शबल म्हणताती केवळ । याहुनी निर्मळ स्वरुप माझें ॥८॥ ब्रह्मा स्फुरण स्फुर्तीचि कारण । याहुनी परतें जाण स्वरुप माझें ॥९॥ एका जनार्दनीं एकपणा अतीत । चित्ताचें अचिंत्य स्वरुप माझें ॥१०॥
१२१४
जेथें परापश्यन्तीची मावळली भाष । तो स्वयंप्रकाश दावी गुरु ॥१॥ तेणें माझें मना जाहलें समाधान । निरसला शीण जन्मोजन्मी ॥२॥ उपाधी तुटली शांति हे भेटली । सर्व तेथें आटली तळमळ ॥३॥ एका जनार्दनीं प्रेमाचें तें प्रेम । दाविलें सप्रेम हृदयांत ॥४॥
१२१५
जेथें पापपुण्यकर्माचरण । वाढविताहे जन्ममरण ॥१॥ जया पुण्याचीया गोडी । स्वधर्म जोडिताती जोडी ॥२॥ जय नाहीं हा विश्वास । असोनि न दिसे जगीं भाष ॥३॥ एका जनार्दनीं डोळा । असोनि देही तो अंधळा ॥४॥
१२१६
जेथें मुख्यत्वें करावी भक्ति । घडावी संतांची संगती । हेंचि मागणें तुम्हाप्रतीं । द्यावें निश्चिती मज देवा ॥१॥ पुरवा पुरवा माझा हेत । दुजें मागणें नाहीं निश्चित ॥धृ॥ आयुष्य अंतवरी नामस्मरण । गीता भागवताचें श्रवण । विष्णु शिवमूर्तींचें ध्यान । हेंच देणें सर्वथा ॥२॥ ऐकोनी ऐसें वचन । जनार्दन तुष्टला प्रेमें करुन । एका जनार्दनीं पाय धरुन । सप्रेमें आलिगिंला ॥३॥
१२१७
जेथें वाजविला वेणु शुद्ध । म्हणोनि म्हणती वेणुनाद ॥१॥ सकळीक देव आले । ते भोंवती राहिले ॥२॥ जोडिलें जेथे समपद । तया म्हणती विष्णूपद ॥३॥ भोवंतालीं पदें उमटली । तेथे गोपाळ नाचती ॥४॥ जेथें उभे गाईचें भार । ते अद्यापि दिसत खुर ॥५॥ गोपाळांची पदें समग्र । ठाई शोभते सर्वत्र ॥६॥ एका जर्नादनीं हरी शोभले । कार कटावरी ठेऊनि भले ॥७॥
१२१८
जेथें सत्त्वाचें प्राधान्य । जेथें सात्विकाचें आचरण । तो परलोक साधुन । साधूनी गेला ॥१॥ जेथें राजाचें प्राधान्य । त्याचें लोभी वसे मन । ज्ञान सांगे मुख्य करून । परि निष्ठा नाहीं ॥२॥ जेथें प्राधान्य तामस । तो द्वेषी आणि कर्कस । ज्ञान सांगे अपरोक्ष । परी अंतईं कठीण ॥३॥ जेथें प्राधान्य तूर्या । तेथें सत्त्व शांति दया । विवेक वैराग्य करूनियां । सर्वासीं भजे ॥४॥ जो वस्तु झाला केवळ । त्याचें अंतर निर्मळ । भूतमात्रीं दयाळ । सर्वापरी भजत ॥५॥ जेथें रज तम वसती । तेथें द्वेष लोभ नांदती । त्याचे संगें ज्ञानज्योती । विझोनि जाये ॥६॥ एका जनार्दनीं शरण । जेथें शुद्ध सत्वाचें प्राधन्य । तो वस्तुसी जाय । मिळोनि सहजीं सहज ॥७॥
१२१९
जेथें सर्वदा कीर्तनघोष । जाती दोष पळुनी ॥१॥ यमधर्म संगे दूता । तुम्ही सर्वथा जाऊं नका ॥२॥ जेथे स्वयें हरि उभा । कोण शोभा तुमची ॥३॥ तुम्ही रहावें उभे पुढें । आलें कोडें निवारावें ॥४॥ एका जनार्दनीं कीर्तन । श्रेष्ठ सर्वाहुनी जाण ॥५॥
१२२०
जेथें हरिनामाचा गजर । कर्म पळतसे दूर ॥१॥ नाम निर्दाळीं पापातें । वदती शास्त्र ऐशीं मतें ॥२॥ पापाचे पर्वत । नाम निर्दाळी सत्य ॥३॥ नाम जप जनार्दन । एका जनार्दनीं पावन ॥४॥
१२२१
जेथोनि त्रिपुटीचें विंदान । दृश्य द्रष्टा आणि दरुशन ॥१॥ अध्यात्म अधिभुत असतां पाहीं । अधिदैव सुर्य जेथें नाहीं ॥२॥ अध्यात्म अधिदैव दोन्हीं आहे । अधिभुत दृश्य दरुशन पाहे ॥३॥ जेथें दृश्याचें दरुशन । तेथें एक जनार्दन ॥४॥
१२२२
जैशी देहापाशीं छाया । तैशी दिसे मिथ्या माया ॥१॥ आत्मा शुद्ध काया मळीन । काया जड आत्मा चिदघन ॥२॥ जीव अलिप्त माया गुणी । माया वेष्टन जीवालागुनी ॥३॥ एका जनार्दनीं शिव । सदा असे स्वयमेव ॥४॥
१२२३
जैसा केला तैसा होय आपोआप । संकल्प विकल्प न धरी कांहीं ॥१॥ न म्हणे उंच नीच यातीकुळ । वर्ण व्यक्ति शील न पाहेची ॥२॥ उच्छिष्ट तें प्रिय गौळियांचे खाये । हमामा हुंबरी नाचतसे घायें ॥३॥ एका जनार्दनीं सांडोनियां थोरपणा । खेळतांहीं न्युन न बोलें कांहीं ॥४॥
१२२४
जैसा गळीं लागला मासा । तैसा फांसा यमाचा ॥१॥ जाणते परी वेडे होती । फेरे घेती चौर्‍यांयशी ॥२॥ परि नेघे रामनाम । सदा काम विषयाचें ॥३॥ म्हणे जनार्दनीं एका । यासी सुटका कैसेनी ॥४॥
१२२५
जैसा जैसा जया भाव । तैसा तैसा पावे देव ॥१॥ हा देव अनुभव पहा । देही पहा विदेहीं ॥२॥ शुद्ध करावें तें मन । जनीं पहा जनार्दन ॥३॥ एका जनार्दनीं भाव । देहीं वसतसें देव ॥४॥
१२२६
जैसी फांशाची गति पडे । तैसा सोंगटीं डाव पडे । त्याचें कर्तृत्व वाडें । फांशाधीन ॥१॥ झाला देखणा परी । उगला वर्तूं लागे शरीरीं । तैसी शक्ति ईश्वरीं । भूतें चळती ॥२॥ अदृश्य गतीनें वर्तती । तेथें ईश्वराची शबल शक्ति । तेथें आणिकांची मति । कांही न चाले ॥३॥ यालागीं प्राचीनाधीन । ब्रह्मा विष्णु रुद्र पुर्ण । याचें कार्यभुत जाण । सृष्टादिक ॥४॥ एका जनार्दनीं जाण । बाधक अदृश्य शक्ति जाण । जैसें ज्याचें प्राचीन । तैसें ते वर्तती ॥५॥
१२२७
जो कनकबीजें भुलविला । तो गाये नाचे उडे भला ॥१॥ शुद्धि नाहीं पा देहाचीं । सैरावैरा बोले वाचे ॥२॥ देह अभिमानें उन्मत्त । अतिकामें कामासक्त ॥३॥ ज्यासी विष चढलें गहन । तया करविती विष्ठापान ॥४॥ एका जनार्दनीं वर्म । हारपे तेणें कर्माकर्म ॥५॥
१२२८
जो काळासी शासनकर्ता । तोचि आमुचा मातापिता ॥१॥ ऐसा उदार जगदानी जनार्दन त्रिभुवनीं ॥२॥ आघात घात निवारी । कृपादृष्टी छाया करी ॥३॥ जन तोचि जनार्दन । एका जनार्दनीं भजन ॥४॥
१२२९
जो जया चित्तीं भाव । तैसा तैसा होय देव । येथें संदेही धरणें न लगे ॥१॥ द्रौपदी स्मरतां माधव । धांव घेतली लवलाहे । जया जैसा भाव । तैसा देव होतसे ॥२॥ अशोक वनीं सीता । शुद्धि जातां हनुमंता । भावेंचि तत्त्वतां । कार्यसिद्धि ॥३॥ समरांगणीं तो अर्जुन । मोहिलासे गोत्र देखोन । तेथेंचि जनार्दन । भावें गीता सांगे ॥४॥ ऐसा भावाचा लंपट । सांडोनी आलासे वैकुंठ । एका जनार्दनीं नीट । विटे उभा राहिला ॥५॥
१२३०
जो जो काळ वेंचिता कीर्तनीं । तों तों सार्थक जनेकें होतसे ॥१॥ साधन जागा साधन जागा । पुढें दगा चुकवी ॥२॥ करी कीर्तनीं तूं वेग । तेणें संग तुटेल ॥३॥ म्हणे जनार्दनाचा एका । उपाय सोपा कलीमाजीं ॥४॥
१२३१
जो जो कोणी भजनीं बैसे । तेथे मी दिसे तैसाची ॥१॥ उपासनेचा निर्वाहो । सर्वाभूति देवाधिदेवो ॥२॥ हो कां माझी प्रतिमा मूर्ति । अंतर्ज्योति मी वसें ॥३॥ तेथें करितां भावें भक्ति । एका जनार्दनीं मुक्ति तयासी ॥४॥
१२३२
जो जो कोणी मनीं ध्याये । तो मीचि होऊनियां राहे ॥१॥ ऐसा अनुभव बहुतां । अर्जुनादि सर्वथा उद्धवा ॥२॥ एक एक सांगतां गोष्टी । कल्प कोटी न सरेचि ॥३॥ शरण येतां जीवेभावें । एका जानार्दनीं भावें हरीसी ॥४॥
१२३३
जो जो जो जो रे निज आया । हालविती अनुसुया ॥धृ॥ पालख पुरुषार्थ चौकोनी । भक्तिनाडी गुंफोनी । दोरी प्रेमाची लाउनी । शांती गाती गाणीं ॥१॥ करितां उप्तत्ति शिणलासी । विश्रांति आलासी । निज रे ब्रह्माया तपलासी । कमळोद्भव जालासी ॥२॥ लक्ष्मीपति निज हो घनःश्यामा । सांडोनि वकुंठधामा । प्रतिपाळ करी हो जीव नामा । दर्शन दिलें आम्हां ॥३॥ पार्वतीरमण शिवा निज आतां । संहारक जीवजंता । निजरुप निगमा हो आदिनाथा । एका जनार्दनीं दाता ॥४॥
१२३४
जो जो धरसील भाव । तें तें देईल देव । ये अर्थी संदेह । मानूं नको ॥१॥ भावें भक्ति फळे । भावें देह मिळे । निजभावें सोहळे । स्वानंदाचे ॥२॥ एका जनार्दनीं । भावाच्या आवडी । मनोरथ कोडी । पुरवी तेथें ॥३॥
१२३५
जो देवांचें पद सोडी । सदा गोडी अंतरीं ॥१॥ पापें पळती रामनामें । खंडताती कर्माकर्में ॥२॥ नामें कळिकाळासी धाक । यमदुतां न मिळे भीक ॥३॥ ऐसा नामाचा महिमा । नाहीं आणिक उपमा ॥४॥ आवडी जो नाम गाय । एका जनार्दनीं वंदी पाय ॥५॥
१२३६
जो न कळे वेदशास्त्र गे माये । तो गोकुळी चोरुनी लोणी खाये ॥१॥ ऐशी भाविकांची आवडी देखा । टाकुनी आला वैकुंठ सुखा ॥२॥ एका जनार्दनीं ब्रह्मा परिपूर्ण । तया घालिती यशोदा भोजन ॥३॥
१२३७
जो निर्गुण निराभास । जेथुन उद्भव शबल ब्रह्मास । आदिनारायण म्हणती ज्यास । तो सर्वांस आदिगुरु ॥१॥ तयाचा ब्रह्मा अनुग्रहीत । ब्रह्मा अत्रीस उपदेशीत । अत्रीपाद प्रसादीत । श्रीअवधुत दत्तात्रय ॥२॥ दत्तात्रय परंपरा । सहस्त्रार्जुन यदु दुसरा । जनार्दन शिष्य तिसरा । केला खरा कलियुगीं ॥३॥ जनार्दन कृपेस्तव जाण । समुळ निरसलें भवबंधन । एका जनार्दनीं शरण । झाली संपुर्ण परंपरा ॥४॥
१२३८
जो परात्पर परेपरता । आदि मध्य अंत नाहीं पाहतां । आगमानिगमां न कळे सर्वथा । तो पंढरीये उभा राहिला ॥१॥ धन्य धन्य पाडुरंग भोवतां शोभें संतसंग । धन्य भाग्याचे जे सभाग्य तेचि पंढरी पाहती ॥२॥ निरा भिवरापुढें वाहे । मध्य पुडंलीक उभा आहे । समदृष्टी चराचरी विठ्ठल पाहें । तेचि भाग्याचे नारीनर ॥३॥ नित्य दिवाळी दसरा । सदा आनंद पंढरपुरा । एका जनार्दनी निर्धार । धन्य भाग्याचे नारी नर ॥४॥
१२३९
जो परिपुर्ण परब्रह्मा व्यापक गे माये । तो गोकुळीं गाई चारिताहे ॥१॥ पहा हो भुलला भक्ति प्रेमासी । शिदोर्‍या चोरुनी खाये वेगेंसी ॥२॥ एका जनार्दनी व्यापक देखा । तो गोकुळीम चोरी करी कौतुका ॥३॥
१२४०
जो साक्षात परब्रह्मा । करुं निघाला चोरीकर्म । धरुनी बाळलीला संभ्रम । आवडी परम नवनीताची ॥१॥ सवें नवलक्ष संवगडे । पशुपाल वेडे बागडे । सुदामा बोले बोबडें । ते आवडे गोविंदा ॥२॥ थोगला अत्यंत वांकुडा । जो निजाचा निजगडा । कृष्ण गुज सांगे त्या पुढां । होई गाढा चोरीकार्मा ॥३॥ घ्या रे सामुग्री चोखट । खेडे सराटे निकट । माजीं बांधारे बळकटा । शब्द कांहीं करुं नका ॥४॥ वस्त्र गाळिव मृत्तिका । घेउनी प्रवेशतं शंकु नका । सकळ गृहींचा आवांका । मज ठाउक समाचार ॥५॥ गोपाळ म्हणती चक्रपाणी । चोरीकर्म ऐकिलें श्रवणीं । परी खडे सराटे मृतिका घेउनी । न देखो कोणीही रिगाले ॥६॥ कृष्ण म्हणे एका निवाडे । रचिताती पत्रांचे उतरंडे । पाहतां न दिसती दृष्टीपुढे । जैं अंधार पडे रजनीचा ॥७॥ भीतरी प्रवेशोनी एकीकडे । सव्य अपसव्य टाकावे खडे । पात्रीं नाद उमटती धडाडे । जाउनी रोकडे आणावे ॥८॥ शिंकीं लांबविलीं अंतराळीं । काठी टोंचुनी पाडावी दुळी । धार लागेल मोकळी । मिळोनि सकळीं प्राशन करा ॥९॥ साचल एकतील गौळणी । कवाडें धरतील धांवोनी । सराटे पसरा आंगणीं । पायीं चुंबकोनी गुंतती ॥१०॥ तेहि चुकवोनि येती अबला । तरी मृत्तिका घाला त्यांचे डोळां । नेत्र चोळतील तंव तुम्हीं पळा । नवलकळा सांगितली ॥११॥ हांसें आलें कृष्णातरीं । मग प्रवेशलें घरोघरीं । कवाडें उघडोनि भीतरीं । अंतरीं प्रवेशलें ॥१२॥ हळुं हळूं ठेविती पाउलें । तंव गर्जती वांकीया वाळे । जन ऐकतील म्हणोनि गोपाळें । कर्णीं अंगोळी घातलीं ॥१३॥ कृष्ण नायके तंव जग बधीर । कृष्ण न देखे तंव अंध जगत्रय । कृष्ण न चाले तंव पांगुळ सर्वत्र । चालक सर्व श्रीकृष्ण ॥१४॥ सांचलें दहींपात्रें काढिती । थिजलें घृत करीं घेती । कांही भक्षिती कांही खाती । तोंडा मखिती निजल्यांच्या ॥१५॥ एकापुढें एक धांवती । एक एकाचें लोणी हिरोनी घेती । एक एकातें झोंबती । वाटा मागती चिमटोनी ॥१६॥ देखोनी नवनीताची भांडीं । पेंदा नाचे दुपांडी । उगा पोरा म्हणोनी धरी शेंडी । गोळा तोंडी लाविला ॥१७॥ शिकें उंच न पावे कर । काठी टोचोनी पाडिलें छिद्र । कृष्ण निजमुखीं लावी धार । देखोनी गोपाळ गजबजिलें ॥१८॥ गोपाळ म्हणती कृष्णासी । जाई बा सकळ दुधतुपेंसी । येरु म्हणे लागा रे कोपराशी । घ्या रे सावकाशी दोहींकडे ॥१९॥ तंव वाकुंड्यानें केली टवाळी । टांचें तुडवोनि पोरें उठविलीं । ती मातेसी बोभाईली ॥ तंववत्से सोडिलीं वडजानें ॥२०॥ वत्सें करिती स्तनपान । बाळकें करिती रुदन । गोपी उठल्या गजबजोन । तंव नवनीतें वदन माखलें ॥२१॥ वृद्धा सांडोनि शेजेसी । उठतां देखिलें सुनेसी । सासु देखतां तोंड पुसीं । येउनी केशी धरियेली ॥२२॥ तुंचि भक्षिणी नवनीत । आणि दुसर्‍याचें नांव सांगत । ऐशा सासु सुना भांडत । आपण तेथोनि निघाले ॥२३॥ मग पळाले सकळ । दुजे गृहीं प्रवेशलें गोपाळ । गौळणी निद्रें व्यापिल्या सकळ । टवाळी नवल मांडियेली ॥२४॥ शिंकी लांबविलीं दुरीं । यत्न करिती परी न येती करीं । मग वेंघोनी एक एकाच्या खांद्यावरी । उतरती दहींपात्रें ॥२५॥ उतरंडी दुरी लाविल्या न कळती । सव्य अपसव्य खडे टाकिती । पात्रीं लागतां नाद उठती । तेंचि घेउनि येती हरिपाशीं ॥२६॥ सुखसेजे गोपी बाळी । निद्रिस्त देखोनि अंबरें फेडिलीं । तरुण देखोनी मुली । टवाळी थोर मांडिली ॥२७॥ तंव गजबजोनी सुंदरा । एके करें सांवरी चिरा । जाउनी धरी मधलीया द्वारां । सकळ चोरां कोंडिलें ॥२८॥ तंव पुढें देखोनी वनमाळी । म्हणे भला रे सांपडलासी ये वेळा । तंव धरुं वेल्हाळी । नयनीं गुरळीं घातली ॥२९॥ नेत्र चोळी व्रजकामिनी । आपण तिचा हात धरुनी । गोपाळातें खूनवोनी । सकळ तेथोनी पळाले ॥३०॥ येरी धावें पाठोपाठे । तंव पायीं चुबकले सराटे । वाम करी धरुनि बोटें । बैसे गुतोंनी धरणीवरी ॥३१॥ तंव दुसरी धांवली गोपिका । तिच्या नयनीं घातली मृत्तिका । नेत्र चोळीत अधोमुखा । देखोनि यदुनायक हांसतसे ॥३२॥ मग चोरीकर्म सोडिनी । सकळ प्रवेशले सदनीं । प्रातःकाळ झालिया गौळनी । गार्‍हाणीं सांगों आलिया ॥३३॥ यशोदे म्हणती सकळां । तुझिया पुत्राची नवलकळा । कानी न ऐकीली न देखों डोळां । सुना सकळीं विटंबिल्या ॥३४॥ एक मह्णती यशोदेम सुंदरे । तुझी गांवची वस्ती पुरे । उठवितो निजलीं पोरें । फेडी चिरें करी नग्न ॥३५॥ खालीं ठेवोनि नवनीत मांजरामुखी चाटवीत । आपण खदखदां हांसत । ऐसें विटबित नानापरी ॥३६॥ एक म्हणे गौळणी । माझे भक्षिलें क्षीण लोणी । उच्छिष्ट मुखासी लावोनी । आपण तेथोनि पळाला ॥३७॥ एक म्हणे माझी सोडिलीं वासुरें । उठविलीं निजली पोरें । शिंकी तोडिलीं एकसरें । फोडिल्या त्वरें माथणी ॥३८॥ गोपिकांसी बुझविते सुमती । म्हणे निर्गुणासी गुण लविती । तुमचें खादलें किती निश्चिती । संगा तितुके देईन ॥३९॥ किती भक्षिलें रें गोविंदा । तंव कृष्णापुढेंअ आली राधा । तिचे स्तन धरुन हांसे गदगदां । म्हणे येवढा मुद्धा होता तिच्या ॥४०॥ हांसों आलों राधिकेसी । गौळणी गेल्या घरासी । यशोदा म्हणे कृष्णासी । सोडी वेगेसी गोधनें ॥४१॥ जो वेदासी अगोचरा । श्रुतीसी न कळे ज्याचा पार । वर्णितां श्रमाला फणीवर । तो गुण गंभीर श्रीकृष्ण ॥४२॥ माथां मुगुट तेजःपुजं । नयन श्रवनीं सांगे गुज । ललाटी कस्तुरी नोज । तळपे तेज तळवीया ॥४३॥ वैजयंती वनमाआळा । सुरंग गुजाहार गळां । कंठी मिरवे मेखळा । झलके कळा कौस्तुभाची ॥४४॥ मुगुटा सुमने वैष्टिलीं मयुरपिच्छें शिरी खोविलीं । मग चालिले तये वळीं । जाळी पृष्ठीवरी टाकिलीं ॥४५॥ काळीं कांबळी खांद्यावरी । कासे खोविली शृंग मोहरी । जाला नंदाचा खिललरी । हांकिली झडकरी गोधनें ॥४६॥ बळिराम राजीवनयनु । अलंकारमंडित शुद्ध तनु । चालिले गोपाळ घेऊनी धेनु । दोघे बाळ नंदाचे ॥४७॥ सवें नव लक्ष संवगडे । पशुपाळ वेडेबागडे । गोरज उधळले चहुकडें । पावले थंडी यमुनेच्या ॥४८॥ गाई सोडिल्या सैरावैरा । भ्रमती सुखें खाती चारा । वडज्या म्हणे पेद्यां पोरा । आणी सत्वर पलशपत्रें ॥४९॥ मथुरेचे मीष करुनी । हाटा निघालिया गौळणी । माथा दहीं दुध घृत लोणी । त्यामाजीं मुख्य राधा ॥५०॥ गगन गर्जे वाक्या वाळे । घनदाट चालती उताविळे । मनीं इच्छिती कृष्णसोहळे । तंव देखिलें वदज्यानें ॥५१॥ टाळी पिटोनी उठे वोजे । म्हणे कृष्ण आलें खाजें । धावोणी आला गोपीसमाजे । उभ्या थोकविल्या गौळणी ॥५२॥ तंव वडज्या करी झगडा । एकसरें धांवला वाकुडा । पात्रें फोडिलीं कडाडा । धरुनी रोकड्या आणिल्या ॥५३॥ कृष्णें राधा धरली करीं । एका करें लोणी चोरी । एका करेकं फेडी निरी । एका करें कंचुकीं ॥५४॥ हांसों आले राधिकेसी । सोंडी गोवळ्या सलगीं कायसी । भुलली कृष्णरुपा झाली पिसी । लोणी पुसी कृष्णमुखा ॥५५॥ ऐस विनोद विचित्र केला । करीतसे घननीळा सावळा । घ्या रे आतां सामुग्री चला । अति क्षुधा लागली ॥५६॥ पाहुनी कल्पतरुची छाया । घडिया घालिती बैसावया । बैस म्हणती यदुराया । करुं काला आवडीं ॥५७॥ पेंदा घाली पत्रावळी । वडज्या सोडी मोटा जाळीं । वांकुडा बैसवीं गोपाळमंडळी । वाढिताती पत्रशाखा ॥५८॥ नानापरेंचीं पक्कान्नें । षडरस बहुत अन्नें । गोडी सांगतां अनन्यें । पसरतीं पदर इंद्रादिकीं ॥५९॥ सकळां वाढिलें परिपुर्ण । सकळ म्हणती ब्रह्मार्पण । संतासीं कळली खुण । घालिती ग्रास कृष्णमुर्खीं ॥६०॥ तंव जेवितां केली टवाळी कृष्णापुढें होती गुळपोळी । ती उचलोनी पत्रावळी । न राहे जवळी दुरी गेला ॥६१॥ वाकुल्या दावी कृष्णापुढां । नेत्रा खूणवितसे गाढा । वाकुड्यातें हाणोनि थोबाडा । धरुनी रोकडा आणिला ॥६२॥ धरिली वांकुड्याची शेंडी । उच्छेष्ट घाली तयां तोडीं । पेंदा नाचे दुपांडीं । थोगला गडी सांपडला ॥६३॥ सरलें पुढलें पक्वान्न । कृष्णें आणिलें दध्योदन । मग पेंदा म्हणे आपण । कृष्नासी पैं ॥६४॥ आवड वडज्याची थोरी । पेंदा म्हणे टाका दुरी । कां टाकितां म्हणोनी रुदन करी । बुझावी श्रीहारी स्वानंदें ॥६५॥ एकांसी दाउनी शेखीं । घालिती दुसर्‍याचे मुखीं । कां रे पोरें म्हणोनी तवकी । डोळे रोखी वांकुडा ॥६६॥ ऐसे खेळती सकळ मिळोनी । तंव देव पाहाती विमानीं । वंचलों म्हणती अभिमानी । कृष्णशेष न मिळेची ॥६७॥ नोहे श्रीकृष्णची शेषप्राप्ती । मग एकमेकंसी बोलती । गोपाळ यमुनेतीरीं येती । चला शीघ्र गती जाऊं तेथें ॥६८॥ विमानें ठेवोनी अंतराळीं । कृष्ण शेषालागीं तें वेळीं । देवीं मत्स्यरुपें धरलों । यमुनेमाजीं रिगती ॥६९॥ ब्रह्मादिक मत्स्य जालें । हें श्रीकृष्णासी कळलें । जाणोनि गोपाळां बोलें । म्हणे हात धुवुं नका ॥७०॥ सहज उदकाची वाटाळी ॥ अकर्मकार गोवळी । हात पुसिले कांबळी । एक टिरीसी पुसती ॥७१॥ उठलें घोंगडीया झाडोनी । खेळ खेळत आले वृदांवनीं । तुळही प्रदक्षणी करुनी । खोविल्या शिरीं मंजुरीया ॥७२॥ तंव इतक्यांत लोपल्या माध्यान्ह । आस्तमान गेला दिनमान । श्रीकृष्णा म्हणे वचन । चला जाऊं घराप्रती ॥७३॥ देहुडा उभा राहुनी गायी खुणविल्या वेणुधनी । टवकारिल्या चारा विसरुनी । आल्या मुरडोनीं त्वरित ॥७४॥ गाई मेळविल्या हरी । गोपाळ घालती हुंबरी । डांगा झेलिती अंबरीं । पावे मोहरी वाजविता ॥७५॥ सुदामा जाला वेत्रधारी ।\ ऐसे गोपळ गजरीं । चालिले मग झदकरी । पेंदा छरीछत्र तरुचें ॥७६॥ वडजा घेऊनि अशोक डाहाळी । वारीतसे मुखावरील धुळी । वाकुंडा फोडी कौतुकें आरोळी । ग्रामाजवळी पातलें ॥७७॥ रामकृष्ण आले ऐकोनी । उताविळ झाल्या गौळणी । रांगोळ्या नानापरी आंगणीं । घालिताती सप्रेमें ॥७८॥ नव लक्ष आरत्या करी । घेऊनि उभ्या गोपिका नारी । भावें ओवाळिला श्रेहरी । लोण उतरी यशोदा ॥७९॥ गाई निघाल्या गोठनी । गोपाळ गेले आज्ञा घेउनी । आपण प्रवेशले निजभुवनीं । सिंहासनीं बैसलें ॥८०॥ ऐसा बाळक्रीडेचा सोहळा । आनंद जाहला सकळां । एका जनार्दनी देखिला श्रीबाळक्रीडा संपविली ॥८१॥
१२४१
जो हा उद्धार प्रसवे ॐ कार । तें रुप सुंदर विटेवरी ॥१॥ ध्याता ध्यान ध्येय जेथें पैं खुटलें । तें प्रगटलें पंढरीयें ॥२॥ ज्ञेय ज्ञाता ज्ञान प्रेमाचें आथिलें । तें रुप सानुलें पंढरीये ॥३॥ एका जनार्दनीं रुपांचे रुपस । वैकुंठनिवास पंढरीये ॥४॥
१२४२
जों जों धरसी वासना । तों तों नोहे रे उगाणा । पंढरीचा राणा । ध्यानामाजीं आणिक ॥१॥ हेंचि सर्व साधनांचें सार । नको व्युप्तत्तीचा भार । या वचनीं निर्धार । धरी संतपायीं ॥२॥ नको योगयाग तप । वाउगा मंत्र खटाटोप । येणें न धाये माप । जन्मजरा मृत्युचे ॥३॥ नको पडूं याचे भरी । वाचे म्हणे कृष्ण हरी । एका जनार्दनीं निर्धारी । निष्पाप होसी तूं ॥४॥
१२४३
जों विनटला श्रीहरिचरणीं । त्यासी भवबंधनीं श्रम नाहीं ॥१॥ देव उभा मागें पुढें । वारी सांकडें भवाचें ॥२॥ नामस्मरणीं रत सदा । तो गोविंद आवडे ॥३॥ त्याचे तुळणें दुजा नाहीं । एका पाही जनार्दनीं ॥४॥
१२४४
जोडोनिया हात दोन्हीं । पुंडलीक मुनी विनवीत ॥१॥ आम्हा तैसें उगेचि रहा । माझिये पहा प्रेमासी ॥२॥ जे जे येती ज्या ज्या भावें । ते ते तारावें कृपाळुवा ॥३॥ एका शरण जनार्दनीं । ब्राह्मा पसरुनि हरी बोलें ॥४॥ आजगदोद्धारार्थ श्रीकृष्नांनें दिलेला वर
१२४५
जोडोनियां दोन्ही हात । जगीं जाणवितों मात ॥१॥ एकदा जा रे अलंकापुरा । जन्म वेरझारा चुकवा ॥२॥ आवडीं सांगा जीवींचें आर्त । माउली पुरविती जाणोनी ॥३॥ ज्ञानराज माझी माउली । एका जनार्दनाची साउली ॥४॥
१२४६
जोडोनियां धन नाशी वेश्या घरीं । अतिथी आलिया द्वारीं नाहीं म्हणे ॥१॥ वेश्या ती अमंगळ जग भुलवणी । पडे निशिदिनीं तेथें श्वान ॥२॥ घरीं कोणी अभ्यागत आलिया मागता । धांवतोम सर्वथा श्वानासम ॥३॥ एका जनार्दनीं ऐसा दुराचार । नरक अघोर भोगिताती ॥४॥

Labels

Followers