संत एकनाथ अभंग-३


२४६३
मंत्रतंत्राची कथा कोण । गाइत्री मंत्र विकिती ब्राह्मण ॥१॥ ऐसा कलीमाजीं अधर्म । करिताती नानाकर्में ॥२॥ वेदशास्त्रीं नाहीं चाड । वायां करिती बडबड ॥३॥ एका जनार्दनीं धर्म । अवघा कलीमाजीं अधर्म ॥४॥
२४६४
मंत्रामाजीं मंत्र विठ्ठल त्रिअक्षरीं । जपतां निर्धारीं सुख होय ॥१॥ म्हणोनियां करा लागपाठ बळें । संसारीं अंधळे होऊं नका ॥२॥ संसारसागर भरला दुस्तर । विठ्ठल पैलपार नौका जगीं ॥३॥ तापत्रयें तापली भवार्णवीं पीडिली । तयां विठ्ठलवली प्रकाशली ॥४॥ जाणिवेचे डोहीं नको पडुं फेरे । विठ्ठल उच्चारें कार्यसिद्धि ॥५॥ एका जनार्दनीं विठ्ठलाची आण । दुजा तारी कोण मज सांगा ॥६॥
२४६५
मंदोदरी पोटीं । सीतेसी व्हावी भेटी तयेसी करुं गोष्टी । स्वानुभवें ॥१॥ तंव दशानना मनीं । वश्य व्हावी शयनीं । धाडिली अशोकवनीं । मंदोदरी ॥२॥ तंव दृश्या दृश्य मिळे । विरालियाही वरदळे । मिनलिया प्रीति मिळे । अहंत्यागें ॥३॥ परेसहित गोष्टी । परतोनी पडली मिठी । शब्द निमाला पोटीं । नभाचिये ॥४॥ निखळ सावधानें । बोलेविण बोलणें । परिसतीं शहाणे । सर्वांग श्रोते ॥५॥ तेथींची ही मात । आहाच न चढे हातां । जीव हा जीवा आंत । घालूनि पहा ॥६॥ नवल मंदोदरी छंदु । सीतेसी अनुवादु । रामरुपीं संवादु । स्वानुभवाचा ॥७॥ राम सकळ देहोदेहीं । रावणीं काय नाहीं । दुराग्रह तुझा ठायीं । जानकीये ॥८॥ राम सकळां देहीं आहे । रावणें केलें काये । हेंचि सांगणें माये । विशद करोनी ॥९॥ रामीं ठेवुनी रती । रावणीं अति प्रीती । करितां काय स्थिती । उणी होय ॥१०॥ येरी म्हणे अभेद रामराणा । उरी कैंची रावणा । साच ती मीतूंपणा । ठाव नाहीं ॥११॥ ऐसीये हातवटी । रावंणां कैंची भेटी । समूळ तुझिया गोष्टी । आहाच गे बाईये ॥१२॥ राम व्यापक कीं एकदेशी । सांगे पां मजपाशीं । सकळ देह त्यासी । रिते कीं पूर्ण ॥१३॥ येरी म्हणे रावणा वेगळे देख । व्याप असावे एक । तरी त्यासी व्यापक । होईल सुखें व्यापक ॥१४॥ व्याप व्यापक दोन्ही । गेली हारपोनी । रामरावण मानी । कवण तेथें ॥१५॥ दृश्याचिये भेटी । दृश्यपणेंसी उठी । तेणेंसी झालिया तुटी । तेंही नाहीं ॥१६॥ नाहींपणें असे । असें तेचि दिसे । तेथें रावणाचें पिसें । कायसें गे बाईये ॥१७॥ तेथें अवस्था मंदोदरी । स्वेद कंप शरीरीं । चढली आनंदहरी । स्वानुभवाची ॥१८॥ कष्टी म्हणे माय । देखिले तुझे पाय । सुख झालें काय । केवीं सांगों ॥१९॥ ऐसें बोलतां बाष्प कंठी । मन मागुती नुठी । चित्तें घातली आठी । चैतन्यासी ॥२०॥ पाहे सावधान । निरसूनियां मन । रामरुपीं नयन निडारले ॥२१॥ न्याहाळितां आत्मबिंब । उचटत आहे नभ । तंव त्या दोघी स्वयंभ । तेचि जाहलिया ॥२२॥ एका जनार्दनीं । एक जालिया दोन्ही । ऐसिये अशोकवनीं । शोक कैंचा गे बाईये ॥२३॥
२४६६
मक्षिकेनें जैसा रचियेला कंद । वाउगाचि वेध तैशापरी ॥१॥ आणिकें झाडितां गुंतोनि पडती । तैशी ही फजिती संसाराची ॥२॥ एका जनार्दनीं कृपा न करी देव । तोंवरी अभाव सर्व जाणा ॥३॥
२४६७
मग बोले संदीपन । माझा पुत्र दे आणून ॥१॥ स्नान करितां अकस्मात । बुडाला तो सागरात ॥२॥ गोष्ट ऐकोनी रामकृष्ण । गेले समुद्रीं धाऊन ॥३॥ सिंधु पायासीं लागला । गुरुपुत्र पांचजन्यें नेला ॥४॥ शोधोनि वधियेला नित्य । गुरुपुत्र नाहीं तेथें ॥५॥ वधियला पांचजन्य । एका विनवी जनार्दन ॥६॥
२४६८
मच्छिंद्रानें मंत्र गोरक्षासीदिला । गोरक्ष वोळला गहिनीराजा ॥१॥ गहिनीनें खूण निवृत्ति दिधली । पूर्ण कृपा केली ज्ञानराजा ॥२॥ ज्ञानदेवें बोध जगासी पैं केला । एका जनार्दनीं धाला पूर्ण बोधें ॥३॥
२४६९
मज करुं दिली नाहीं सेवा । दाविलें देवा देहींचे ॥१॥ जग व्यापक जनार्दन । सदा वसे परिपुर्ण ॥२॥ भिन्न भिन्न नाहीं मनीं । भरलासे जनीं वनीं ॥३॥ एका जनार्दनीं शरण । सर्वां ठायीं व्यापक जाण ॥४॥
२४७०
मज कोनी न देखावें । मज कोणी नोळखावें ॥१॥ मान देखोनियां दृष्टी । पळे देह उपेक्षा पोटी ॥२॥ मी एक लौकिकी आहे । ऐसें कवणा ठावें नोहे ॥३॥ सांडावया अहं ममता । मान न पाहे सर्वथा ॥४॥ त्याचे पोटीं दृढ अभिमान । तो सदा इच्छि सन्मान ॥५॥ सन्मान घ्यावया सर्वथा । ज्ञातेपण मिरवी वृथा ॥६॥ ऐसा निरपेक्ष सज्ञानी । एका शरण जनार्दनीं ॥७॥
२४७१
मज जे अनुसरले काय वाचा मनें । त्याचें चालवणें सर्व मज ॥१॥ ऋणवई त्यांचा आनंद जन्माचा । जे गाती वाचा कीर्ति माझी ॥२॥ तयांचियां द्वारीं लक्षीसहित । उभा मी तिष्ठत याचकपणें ॥३॥ सर्व जडभारी जाणे योगक्षेम । एकाजनार्दनीं नेम जाणा माझा ॥४॥
२४७२
मज तयांची आवड । पुरवणें लागे त्याचें कोड । गर्भवास सांकड । तयालागी उद्धवा ॥१॥ घेऊनी अवतार । करी दृष्टांचा संहार माझा हा बडिवार । तयाचेनि उद्धवा ॥२॥ माझें जप तप अनुष्ठान । देव पूजा मंत्र पठण । नाना नेमादि साधन । संत माझे उद्धवा ॥३॥ मज आणिलें नामरुपा । त्याची मजवर कृपा । दाविला हो सोपा । मार्ग मज उद्धवा ॥४॥ माझा योगयाग सर्व । संत माझें वैभव । वैकुंठादि राणीव । तयाचेनि मज उद्धवा ॥५॥ ऐसें वरिष्ठ पावन । पुनीत केलें मजलागून । एका जनार्दनीं शरण । तयांसीच उद्धवा ॥६॥
२४७३
मज तो आणिक नाहीं चाड । येवढी जोड पायांची ॥१॥ वास द्यावा पंढरीचा । संतांचा समागम ॥२॥ कीर्तनीं नाचेन महाद्वारी । गरुडपारी कान धरुनी ॥३॥ ऐसें लडीवाळ तान्हें । एका जनार्दनें पोसणें ॥४॥
२४७४
मज तों अधिकार नाहीं । शरण आलों तुझें पायीं ॥१॥ तुम्हीं पशु गजातें उद्धरिलें । गणिके तारिलें कुंटनीसी ॥२॥ ऐशी शरणागत माउली । एका जनार्दनीं साउली ॥३॥
२४७५
मज भक्त आवडता फार । ऐसा माझा निर्धार ॥१॥ भक्तांअंगीं मीच वसें । माझा भक्त मजमाजीं असे ॥२॥ मज आणलें नामरुपा । भक्त सखा माझा तो ॥३॥ एकाजनार्दनीं निर्गुण । भक्तें सगुण मज केलें ॥४॥
२४७६
मजसि जेणें विकिलें शरीर । जाणें मी निर्धारें अंकित त्याचा ॥१॥ त्याचें सर्व काम करीन मी अंगें । पडों नेदीं व्यंगें सहासा कोठें ॥२॥ एका जनार्दनीं त्याचा मी अंकित । राहे पैं तिष्ठत त्याचे द्वारीं ॥३॥
२४७७
मजूर राऊळाचें वृत्त नेतां । तो तुरंगीं चढे मनोरथा ॥१॥ सबळ वारुवांचे उड्डाण । म्हणोनि उडों जात आपण ॥२॥ बळें उडाला माझा घोडा । परि स्मरण नाहीं दगडा ॥३॥ उडीसरसी घागरी पडे । एका जनार्दनीं पाहुनी रडे ॥४॥
२४७८
मति माझी लागो सोपनाचरणीं । रात्रंदिवस चिंतनी जप सदा ॥१॥ आणीक न करीं दुजा नेम धर्म । सर्व सोपें वर्मं सोपानदेवा ॥२॥ वेदशास्त्रें भांडती ज्यालागीं कोडें । ते असे उघडे संवत्सर ग्रामीं ॥३॥ प्रत्यक्ष विष्णुमूर्ति श्रीविठ्ठल देव । समाधीचा गौरव करीतसे ॥४॥ करुनी सोहळा समाधीं बैसविला । एका जनार्दनीं राहिला पुढें मागे ॥५॥
२४७९
मती लागो संतसंरणीं । तेथें उन्मनी साधती ॥१॥ तुच्छ वाटे स्वर्ग लोक । जैसा रंक इंद्रासी ॥२॥ आधार तो जैसा फळे । किरण उजाळे देखतां ॥३॥ एका जनार्दन शरण । मनचि जालें कृष्णार्पण ॥४॥
२४८०
मत्सर ज्ञानीयातें न सोडी । मा इतर कायसीं बापुडीं ॥१॥ शिणताती मत्सरवेधे । भोगिताती भोग विविधें ॥२॥ निर्मत्सर भजनीं गोष्टीं । ऐसा कोण्ही नाहीं सृष्टीं ॥३॥ एका जनार्दनीं मत्सर । तेणें परमार्थ पळे दूर ॥४॥
२४८१
मथुरेसी गोरस विकूं जातां नितंबिनी । तयामाजीं देखिली राधिका गौळणी । जवळी जाऊनियां धरिली तिची वेणी ॥१॥ सोडी सोडी कान्हा शारंगपाणी । माझीया संसारा घातलें पाणी । नांव रुप माझें बुडविलें जनीं ॥२॥ राधा म्हणे येथोनियां बहु चावट होसी । घरीं चोरी करुनियां वाटे आडविसी । ओढोनिया नेते आतां तुज मातेपाशीं ॥३॥ धरिलीं पदरीं राधा न सोडिच निरी । दान दे आमुचे म्हणे मुरारी । भोवंताली हांसती व्रज सुंदरी ॥४॥ भक्तीचियां पोटीं राधा समरस जाली । कृष्णरुप पाहूनियां देहभावा विसरली । एका जनार्दनीं राधा शेजे पहुडली ॥५॥
२४८२
मधाचिया बोटा गुंतले लिगाडीं । तैशी परवडी संसाराची ॥१॥ वाउगाची सोस रचिलिया कंद । झाडुनि नेतां वेध मक्षिकेसी ॥२॥ एका जनार्दनीं विचारी मानसीं । वायां भवपाशीं गुंतुं नको ॥३॥
२४८३
मधुपर्कादिक नावडे पूजन । आवडे कीर्तन भाविकांचें ॥१॥ शंखचक्रादिक नावडती मनीं । वोडवितसे पाणी भाजीपाना ॥२॥ लक्ष्मीसारखी नावडती जीवा । आवडे या देवा तुळशी बुक्का ॥३॥ एका जनार्दनीं कीर्तनीं नाचे । आणिक सुख त्याचे नये मना ॥४॥
२४८४
मन एके ठायीं । राहे ऐसें करीं कांहीं ॥१॥ सर्व साधनांचें सार । मनीं करावा विचार ॥२॥ एकाग्र तें मन । करूनि करावें भजन ॥३॥ मन जिंकावें पां आधीं । तेणें तुटेल उपाधी ॥४॥ एका जनार्दनीं मन । दृढ ठेवावें बांधुन ॥५॥
२४८५
मन करूनियां सावध । वाचे स्मरे तूं गोविंद ॥१॥ तेणें साधे सर्व काज । सकळ साधनांचें निज ॥२॥ मन धरी एकमुष्टी । वाचे जपे नाम गोष्टी ॥३॥ मन धांवे भलतीकडे । साधन वायां जाय कोडें ॥४॥ मन आवरुनी साधन । तेणें पावसी निजखुण ॥५॥ खूण संतांवांचुनी । एक जानार्दनीं ध्यानी ॥६॥
२४८६
मन करूनियां स्थिर । हृदयीं ध्याई तो साचार ॥१॥ मग सुखाची वसती । सदा समाधान चित्तीं ॥२॥ समाधि समाधान । सहज घडे ब्रह्माज्ञान ॥३॥ तुटे संसाराचा कंद । वाचा नामस्मरण छंद ॥४॥ हेंचि साधनांचें सार । सदा चित्तीं परोपकार ॥५॥ एका जनार्दनीं ध्यानक । ध्यानीं मनीं जनार्दन ॥६॥
२४८७
मन मनासी होय प्रसन्न । तेव्हां वृत्ति होय निरभिमान ॥१॥ पावोनि गुरुकृपेची गोडी । मना मन उभवी गुढी ॥२॥ साधकें संपुर्ण । मन आवरावें जाण ॥३॥ एका जनार्दनीं शरण । मनें होय समाधान ॥४॥
२४८८
मन माझें लागो सोपानचरणीं । मस्तक हें धणी पायांवरी ॥१॥ सोपान सोपान जपेन हें नाम । अन्य न करीं नेम दुजा कांहीं ॥२॥ वारी पां सांकडें प्रपंच काबाड । घालूनियां आड नामशास्त्र ॥३॥ जीवींच्या जीवना माझिया सोपाना । एका जनार्दनी अभय द्यावें ॥४॥
२४८९
मन माझें वेधलें मन माझें वेधलें । पहातां भलें सच्चिदानंद ॥१॥ आनंदीआनंद मनासी पैं झाला । देखिला सांवळा पाडुरंग ॥२॥ एका जनार्दनीं उघडाचि देखिला । आनंद तो झाला मनीं माझ्या ॥३॥
२४९०
मन रामीं रंगलें अवघें मनचि राम जालें । सबाह्म अभ्यंतरीं अवघें रामरुप कोंदलें ॥ध्रु०॥ चित्तचि हारपले अवघें चैतन्यचि जालें । देखतां देखतां अवघें विश्वा मावळलें । पहातां पहातां अवघें सर्वस्व ठकलें ॥१॥ आत्मयारामाचें ध्यान लागलें मज कैसें । क्रियाकर्म धर्म येणेचि प्रकाशे । सत्य मिथ्या प्रकृति पर रामचि अवघा भासे ॥२॥ भक्ति अथवा ज्ञान शांति आणिक योगास्थिति । निर्धारितां न कळे रामस्वरुपीं जडली प्रीती । एका जनार्दनीं अवघा रामची आदिअंतीं ॥३॥
२४९१
मन हें ओढाळ । सदा करी तळमळ ॥१॥ तयालागीं स्थिर करीं । चित्तीं महादेव धरी ॥२॥ तरी तुज होय सुख । येर अवघें तें दुःख ॥३॥ चित्तींची वासना । जंव नाहीं गेली जाणा ॥४॥ एका जनार्दनीं मन । असो द्यावें समाधान ॥५॥
२४९२
मनमोहन मुरलीवाला । नंदाचा अलबेला ॥१॥ भक्तासाठीं तो जगजेठी । कुब्जेसी रत जाला ॥२॥ विदुरा घरच्या भक्षुनि कण्या । परमानंदें धाला ॥३॥ भक्तिसुखें सुखावला । एका जनार्दनीं निमाला ॥४॥
२४९३
मना ऐक एक मात । धरीं हरिनामीं हेत ॥१॥ तेणें चुकती बंधन । वाचे म्हणे नारायण ॥२॥ नारायण नाम । तेणें सर्व होय काम ॥३॥ दृढ धरी भाव । न करी आणिक उपाव ॥४॥ उपाव न करी कांहीं । शरण देवासी तूं जाई ॥५॥ एका जनार्दनीं मन । करी देवासी अर्पण ॥६॥
२४९४
मना ऐक हे विनंती । तूं न करी दुजी खंती । विठ्ठलावांचुनी प्रीती । दुजी नको आणिक ॥१॥ वाउगा तूं न करी सोस । दृढ घालीं तूं कास । धरीं पां विश्वास । विठ्ठलचरणीं ॥२॥ सांडीं माझें आणि तुझें । वाउगें नको वाहुं वौझें । निपजती बीजें । संतचरणी सकळ ॥३॥ हेंचि साधनांचें सार । विठ्ठलमंत्र उच्चार । एका जनार्दनीं वेरझार । येणें तुटें समूळ ॥४॥
२४९५
मना तुं अधीर अधीर । बहु पातकी पामर । न राहासी स्थिर । क्षणभर निश्चयें ॥१॥ किती शिकवावें तूंतें । नायकसी एक चिंत्तें । बहु गुणें बोलतां तूंतें । नायकसी पामरा ॥२॥ एकपणें धरी भाव । दृढ चित्तीं विठ्ठलराव । वाउगा तो भेव । नको धरूं आणीक ॥३॥ हेंचि धरीं शिकविलें । कांहीं नको आन दुजें वहिलें । एका जनार्दनीं बोले । करुणा भरीत मनासी ॥४॥
२४९६
मना तुं परम चांडाळ । अधम खळाहुनीं खळ । विषयीं तळमळ । बह् करसी पापिष्ठा ॥१॥ धरीं विठ्ठलीं विश्वारी । आणिक नको रे सायास । वाउगा तो सोस । सांडीं सांडी अधमा ॥२॥ करी संतांचा सांगात । पूर्ण होती मनोरथ । न धरीं दुजा हेत । विठ्ठलावांचुनीं ॥३॥ बहु सांडीं तुं भाषण । आणिक न करी साधन । एका जनार्दनीं शरण । विठ्ठलासी निघे पां ॥४॥
२४९७
मना तूं एक करीं । वाचे आठवी श्रीहरी ॥१॥ आणिक न करी साधन । वाचे म्हणे नारायण ॥२॥ सर्व काळ हाचि धंदा । वाचे आठवी गोविंदा ॥३॥ तेणें जीवा सोडवण । शरण एका जनार्दन ॥४॥
२४९८
मना तूं एक माझी मात । श्रीविठ्ठली न धरी कां रें हेत ॥१॥ कांहीं पडतां जड भारी । वाचे म्हणे विठठल हरी ॥२॥ तुज ही खूण निर्वाणीं । शरण एका जनार्दनीं ॥३॥
२४९९
मना दुजीं बुद्धि नको बा ही । संतसमागमीं राही । यापरतें कांहीं । दुजें नको सर्वथा ॥१॥ मीपणाचा ठावो । टाकीं हा संदेहो । पडसी प्रवाहो । वाउगाची शिणसी ॥२॥ बहुत मतमतांतरे । कासया शिणसी रे आदरें । संतचरणीं झुरे । रात्रंदिवस मानसीं ॥३॥ कायिक वाचिक सर्वथा । भजे भजे पंढरीनाथा । एका जनार्दनीं तत्त्वतां । संतचरणीं लीन होय ॥४॥
२५००
मना नको नको हिंडों दारोदारीं । कष्ट झाले भारी येतां जातां ॥१॥ कल्पना सोडोनि संतासंगें राहें । सर्व सुख आहे त्यांचे पायीं ॥२॥ ज्याचिया दरुशनें शोक मोह जळे । पाप ताप पळे काळभय ॥३॥ जवळीच दिसे भावितां भावितां । एका जनार्दनीं ध्यातां सुख मोठें ॥४॥
२५०१
मना निश्चय तूं करी । म्हणे जाईन पंढरी ॥१॥ नेमधर्मक हाचि माझा । पंढरीवांचूनि नाहीं दुजा ॥२॥ सर्व तीर्थाचें माहेर । विटे उभा कटीं कर ॥३॥ आवडीनें धरा भाव । एका जनार्दनीं भेटे देव ॥४॥
२५०२
मना सांडीं विषयखोडी । लावीं विठ्ठलेशीं गोडी ॥१॥ आणिक न लगे साधन । एकलें मन करी उन्मन ॥२॥ विठ्ठल विठ्ठल सांवळा । पाहें पाहे उघडा डोळां ॥३॥ एका जनार्दनीं शराण । मनाचि होय विठ्ठल पुर्ण ॥४॥
२५०३
मनाचा सविस्तार । ऐका तुम्हीं वो निर्धार ॥१॥ मनें केलें सगुण निर्गुण । मनें दाखविलें चैतन्य ॥२॥ मनें नागविलें देवा । मनें लोळविलें जीवां ॥३॥ मन अज्ञानाची राशी । मन धांवें ते सायासी ॥४॥ एका जनार्दनीं मन । दृढ ठेवावें बांधोन ॥५॥
२५०४
मनाची तो खुटलीं गती । संत संगती घडतांचि ॥१॥ बहु जन्मांचा तो लाग । फीटला पांग जन्मोजन्मीं ॥२॥ कृतकृत्य थोर जाहलों । सुखें पावलों इच्छित ॥३॥ एका जनार्दनीं चित्त । जाहलें निवांत ते ठायीं ॥४॥
२५०५
मनाची नखी न लगे जयां ठाया । तेणें उणी पायां भेटवी संत ॥१॥ संत उदार उदार । नामामृतें भरलें सागर ॥२॥ एका जनार्दनीं संत । कोण जाणेंत्यांचा अंत ॥३॥
२५०६
मनाचे माथां घातिला धोंडा । वासना कापुनी केला लांडा ॥१॥ जनीं लांडा वनीं लांडा । वासना रांडा सांडियलें ॥२॥ वासना सांडोनी जालों सांड्या । कामना कामिक म्हणती गांड्या ॥३॥ कामना सांडे विषयीं लाताडे । एका जनार्दनीं तयाची चाड ॥४॥
२५०७
मनाचें तें मन ठेविलें चरणीं । कुर्वडीं करुनी जनार्दनीं ॥१॥ ध्यानाचें तें ध्यान ठेविलें चरणीं । कुर्वडीं करुनी जनार्दनीं ॥२॥ ज्ञानाचें तें ज्ञान ठेविलें चरणीं । कुर्वडीं करुनी जनार्दनीं ॥३॥ शांतीची शांती ठेविली चरणीं । कुर्वंडी करुनी जनार्दनीं ॥४॥ दयेचि ते दया ठेविली चरणीं । कुर्वंडी करुनी जनार्दनीं ॥५॥ उन्मनी समाधी ठेविली चरणीं । कुर्वंडी करुनी जनार्दनीं ॥६॥ एका जनार्दनीं देहाची कुर्वंडी । वोवाळोनी सांडी जनार्दनीं ॥७॥
२५०८
मनाचेनि मनें जहालों शरणागत । कृपावंत संत मायबाप ॥१॥ धरुनियां आस घातली लोळणीं । मस्तक चरणीं माझा तुमच्या ॥२॥ तुमचा मी दास कामारी त्रिवाचा । आणिक मनाचा संकल्प नाहीं ॥३॥ एका जनार्दनीं तुम्हीं तों पावन । काय हा मी दीन वानुं महिमा ॥४॥
२५०९
मनामधीं तर्क करी भीमकबाळी । त्रैलोक्यचि सकळी देइल राज्य ॥१॥ म्हणोनी विनोदें धरीतसे हात । एक ग्रास मुखांत घालितांची ॥२॥ आम्हांसी तो कांही प्रसाद जी द्यावा । खूण ती केशवा कळली मनीं ॥३॥ एका जनार्दनीं हांसे चक्रपाणी । न कळे कोणा करणी त्याची कांही ॥४॥
२५१०
मनासी खेचिलें मायेसी मोकलिलें । तें शस्त्र आपुलें सज्ज करी ॥१॥ यापरी सैरा होय कारणी । माया ममता दोन्हीं मारूनियां ॥२॥ जागृति स्वप्न निवटिलें पाहे । सुषुप्ति सळीयेली । सुखा धायें ॥३॥ एका जनार्दनीं मांडियेलें खळें । पुरेंचि जिंकलीं अंगीचेनी बळें ॥४॥
२५११
मनासी निर्धार केलासे देखा । संतसंग सुखा आतुडलों ॥१॥ इच्छिलें पावलों इच्छिलें पावलों । इच्छिलें पावलों संतसंग ॥२॥ एका जनार्दनीं सांगात तयाचा । अनुभवें अनुभवाचा बोध लाहे ॥३॥
२५१२
मनासी स्थिरता नामें दत्त वेध । दुजा नाहीं छंद आणीक कांहीं ॥१॥ म्हणोनि संकल्प दृढ झाला पायीं । दत्तावाचुनी ठायीं नोहे कांहीं ॥२॥ पाहतां पाहणें परतलें मन । पाहण्याचें विंदान विसरलें ॥३॥ एका जनार्दनीं परब्रह्मा पुतळा । दत्त देखिला डोळां आत्मदृष्टी ॥४॥
२५१३
मनुष्य देहीं व्हावें ब्रह्मज्ञान । घेतो पुढीलें आमंत्रण ॥१॥ पुढें जन्माचा विसार । घेतों अतिमानें तो पामर ॥२॥ चौर्‍यांयशीं लक्ष योनीप्रती । कोटी कोटी फेरे होती ॥३॥ ऐसा मनुष्यदेह पावन । तो वेंची विषयाकारण ॥४॥ होतां विषयीं वासना । नाठवीची एका जनार्दना ॥५॥
२५१४
मनुष्यखेपे हित होय । शरण तूं जाय श्रीसंतां ॥१॥ काय महिमा कीर्ति जगीं । नाहीं सामर्थ्य दुजिया अंगीं ॥२॥ एका जनार्दनीं संत । उदार पतीत तारिती ॥३॥
२५१५
मनें करूनि विश्वास । संतचरणीं व्हा रे दास ॥१॥ आणीक न लगे साधन । मन आवरुनी करी भजन ॥२॥ मन धरी मृष्टीमाजीं । वाव तूम न शिणे सहजीं ॥३॥ मन दृढ देवापायीं । एका जनार्दनीं पाहीं ॥४॥
२५१६
मनें कल्पोनियां केली विटंबना । हिंडविले रानां वासनेच्या ॥१॥ तैसें नका करूं वाउगें चिंतन । मन आकळुन कार्य करा ॥२॥ मनाचें आकलन करावें पां आधीं । वाउगी उपाधी तुटतसे ॥३॥ एका जनार्दनीं आवरुनी मन । मग करीं भजन सुखरूप ॥४॥
२५१७
मनें नागविलें बहुतांपारीं । धांव धांव तूं श्रीहरी ॥१॥ आतां माझें मन । दृढ ठेवावें आकळुन ॥२॥ वाहात चालिलों मनामागें । बुडतसे प्रपंच गंगे ॥३॥ धांवे धांवे विठाबाई । एका जानर्दनीं लागे पायीं ॥४॥
२५१८
मनें ब्रह्मादिकां केलीसे थोकडी । तेथें परवडी कोण मानवाची ॥१॥ इंद्रिय न चाले मनाविण देखा । मनाची मनरेखा नुल्लंघवे ॥२॥ शस्त्रें तें न सुटे जळ तें न बुडे । ऐसे ते पोवाडे मनें होतीं ॥३॥ एक जनार्दनीं मन तें स्वाधीन । करितां सर्व यज्ञ हातीं जोडे ॥४॥
२५१९
मनोभाव जाणोनि माझा । सगुणरुप धरिलें वोजा । पाहुणा सदगुरुराजा । आला वो माय ॥१॥ प्रथम अंतःकरण जाण । चित्तःशुद्ध आणि मन । चोखाळोनी आसन । स्वामीसी केलें ॥२॥ अनन्य आवडीचें जळ । प्रक्षाळिलें चरणकमळ । वासना समुळ । चंदन लावी ॥३॥ अहं जाळियल धूप । सदभाव उजळिला दीप । पंचप्राण हे अमूप । नैवेद्य केला ॥४॥ र्जतम सांडोनी दोन्हीं । विडा दिला सत्त्वगुनीं । स्वानुभवेंण रंगोनी । सुरंग दावी ॥५॥ एका जनार्दनीं पुजा । देवभक्त नाही दुजा । अवघाचि सदगुरुराजा । होवोनि ठेला ॥६॥
२५२०
ममता ठेवूनि घरीदारीं । वायां कां जाशी बाहेरीं ॥१॥ आधीं ममत्व सांदावें । पाठीं अभिमानी सहजी घडे ॥२॥ ममता सांडी वांडेकोडें । मोक्षसुख सहजी घडे ॥३॥ एका जनार्दनीं शरण । ममता टाकी निर्दाळून ॥४॥
२५२१
मरणापाठीं जन्म जन्मापाठीं मरण । ही शिदोरी जाण पडती पदरीं ॥१॥ शतवर्ष कराल घेतां वाते गोड । कर्माकर्म सुघड न कळे कांहीं ॥२॥ मरणाची भ्रान्ती विसरुनी गूढ । वागवी काबाडे प्रपंचाचें ॥३॥ बाळ तरुणदशा वृद्धाप्य पावला । सवेंचि तो गेला अधोगती ॥४॥ एका जनार्दनीं मापाचिये परी । सवेंचि गोणी भरी सवें रिती ॥५॥
२५२२
मर्कटासी मदिरा पाजिली । तैशी भुलली विषयांसी ॥१॥ मातला गज नावरे जैसा । विषय फांसा त्यावरी ॥२॥ रेडा जैसा मुसमुशी । तैसा लोकांसी बोलत ॥३॥ श्वाना जैसे पडती किडे । तैसा चहुकडे रेडे ॥४॥ शरण एका जनार्दनीं । अंतीं यमाची जांचणी ॥५॥
२५२३
मर्दुनी शंखासुरा हातें वागविसी कलीवरा । तेवीं निवटोनि अहंकारा । माझ्या वागविशी शरीरा ॥१॥ येथें नवल नव्हे पहा हो । माझा देहचि वागवे देवो ॥२॥ शंख वाजविशी नाना स्वरा । तें तंव न बाधी शंखासुरा ॥३॥ तैसी चेतउनी माझी गिरा । बोली बोलविता तूं खरा ॥४॥ कर्म कार्य कर्तव्यता । माझेनि नांवें तूंचि आतां ॥५॥ एका जनार्दनीं निजात्मता । कर्म करून नित्य अर्कता ॥६॥
२५२४
मस्तक माझें संतापायीं । ठेउनी होऊं उतराई ॥१॥ वारंवार क्षणक्षणा । नामघोष करिती जाणा ॥२॥ देउनी अभयदान । करिती पतीतपावन ॥३॥ एका जनार्दनीं पाही । संतापायीं ठेवी डोई ॥४॥
२५२५
मस्तकीं केश चिकटलें होती । जैं ते निघती आपुले हातीं ॥१॥ मिळती जैशा माय बहिणी । हातीं घेउनी तेलफणी ॥२॥ ऐसा त्रिगुणाचा ठावो । एका जनार्दनीं पहा वो ॥३॥
२५२६
महा तम अंक दाता जो मोक्षाचा । गुरुपदी साचा भाव असो ॥१॥ आनंदित मन चिंतनाचे ठायीं । मनी नसो काहीं विकल्प तो ॥२॥ पाप ताप दैन्य जातील सहज । गुरुचरणरज वंदिलीया ॥३॥ एका जनार्दनीं सदगुरुचरणीं । वृत्ति असो वाणी नाम वदो ॥४॥
२५२७
महा पापराशी तरले कीर्तनीं । प्रत्यक्ष पुराणीं वंद्य जाले ॥१॥ वाल्हा अजामेळ तारिली गणिका । त्रैलोक्यीं देखा सरते जाले ॥२॥ कीर्तनीं दोष पळती रानोरान । यापरतें आन दुजें नाहीं ॥३॥ एका जनार्दनीं कीर्तन सार । तेणें पैलपार उतरलों ॥४॥
२५२८
महा मात्रा हरीचे नाम । तरती अधमादि अधम । हाचि कालिमाजीं धर्म । नामापरते न देखें ॥१॥ जगीं नाम तारक नौका । आन उपाय नाहीं देखां । साधन साधितां साधकां । नामापरते थोर नाहीं ॥२॥ धरा विश्वास बांधा गांठी । नाम जप जगजेठी । एका जनार्दनीं भय पोटीं । नाहीं तुम्हा काळाचें ॥३॥
२५२९
महाकारण जें देहज्ञान । त्याचाही साक्षी आत्मा आपण । जैसा सेजे ये आंबा मुरोन । तैसा तो जाण ॥१॥ ऐशीं मुराली तुर्या अवस्था । मग साक्षी जाला परौता । तो मुरोनि वस्तुता । वस्तु जाला ॥२॥ ऐशी विवेकाची राबणूक । विवेक आत्मा वोळख । एका जनार्दनीं परम सुख । प्राप्त जालें ॥३॥
२५३०
महाक्षेत्र पंढरपुर । नांदे विठ्ठ्ल सचार ॥१॥ तया ठायीं सुख आहे ।संत जाणती तो लाहें ॥२॥ विश्रांतीचें स्थान । भावाभाव समान ॥३॥ दुःख दरिद्र नाहीं । वाचे म्हणतां विठाबाई ॥४॥ नोहे बाधा काळाची । ऐसी मर्यादा संताची ॥५॥ जनार्दनाचा एक म्हणे । घ्यावें पेणें तेथींचें ॥६॥
२५३१
महादेव नाम वदे नित्य मुखें । तेथें सर्व सुखें वसताती ॥१॥ शिवनामें कामक्रोधाचे दहन । त्रिविध ताप शमन पावताती ॥२॥ शिवनामें भुक्ति शिवनामें मुक्ति । चुके यातायाती शिवनामें ॥३॥ ऋद्धिसिद्धि हात जोडती तयासी । मुखीं अहर्निशीं शिव जया ॥४॥ एका जनार्दनीं शिवनाम सार । भवसिंधु पार पावावया ॥५॥
२५३२
महादोषीयासी ठाव । एका पंढरीचा राव ॥१॥ तयावीण दुजा नाहीं । आणिका प्रवाही नको पडुं ॥२॥ जाशी देशदेशांतरीं । कोठें ही सरी ऐसा नाहीं ॥३॥ ऐसा देव उभा वीटे । दावा कोठें आहे तो ॥४॥ ऐसा वैश्णवांचा मेळ । गदारोळ नामाचा ॥५॥ ऐसें चंद्रभागा तीर्थ । आहे समर्थ कोठें पां ॥६॥ ऐसा पुंडलीक संत । दरुशने तारीत जडजीवां ॥७॥ एका जनार्दनीं ठाव । वैकुंठराव उभा जेथें ॥८॥
२५३३
महापुरी जैसें वहातें उदक । मध्य ती तारक नौका जैशी ॥१॥ तैसें प्राणियासी नाम हें तारक । भव सिंधु धाक नुरे नामें ॥२॥ तये नावेंसंगें ब्राह्मण तरती । केवीं ते बुडती अनामिक ॥३॥ नाना काष्ठ जात पडे हुताशनीं । जाती ते होऊनी एकरुप ॥४॥ तेथें निवेडना धुरें रुई कीं चंदन । तैसा भेदवर्ण नाहीं नामीं ॥५॥ पूर्वा न वोळखे तेंचि पैं मरण । एका जनार्दनीं स्मरण रामनाम ॥६॥
२५३४
महालाभ हाचि आहे । जो या गाये विठ्ठलासी ॥१॥ प्रेमभरीत सदा कंठ । अंगीं बळकट भावना ॥२॥ हेंचि वैराग्याचें सार । वायां कासया वेरझार ॥३॥ एका जनार्दनीं भाव । अवघा पाठीं पोटीं देव ॥४॥
२५३५
माई मोरे घर आयो शामछे । गावढी छोरी मारे मनछे ॥१॥ दधीं दूध माखन चुरावें हमछे । छोकारीया खिलावन देवछे ॥२॥ मारी सुसोवन लगीछे । बालन उनके पकड लीनछे ॥३॥ एका जनार्दन थारो छोडछे । वेड लगाये माई हामछे ॥४॥
२५३६
मागणें तें आम्हीं मागूं देवा । देई हेवा कीर्तनीं ॥१॥ दुजा हेत नाहीं मनीं । कीर्तनावांचुनी तुमचीया ॥२॥ प्रेमें हरिदास नाचत । कीर्तन होत गजरीं ॥३॥ एका जनार्दनीं कीर्तन । पावन होती चराचर जाण ॥४॥
२५३७
मागणें तें एक आम्हांप्रती द्यावें । निरंतर यावें जागरणा ॥१॥ या हरिदासांचा संग बरवा । आनंदें राघवा गाऊं गीतीं ॥२॥ जो न लभे तप तीर्थदानीं । तो हरिकीर्तनीं तिष्ठातसे ॥३॥ जनार्दनाचा एका म्हणे । कृपा करणें जागरणें ॥४॥
२५३८
मागणें हेंचि माझे देवा । दुजेपा दुरी ठेवा ॥१॥ मी तुं ऐसी नको उरी । जनार्दना कृपा करी ॥२॥ रंक मी एक दीन । माझें करावें स्मरण ॥३॥ नीच सेवा मज द्यावी । एका जनार्दनीं आस पुरवावी ॥४॥
२५३९
मागा बहुतांचें मत । नामें तरले पतीत । हीच सोपी जगीं नीत । रामनाम अक्षरें ॥१॥ येणे तरलें पुढें तरती । ऐशी नामाची थोर ख्याती । नाम धरा दृढ चित्तीं । एका भावें आदरें ॥२॥ नाम श्रेष्ठांचे साधन । नामें तुटे भवबंधन । शरण एका जनार्दनीं । रामनाम वदतसे ॥३॥
२५४०
मागें एक पुढें एक । दोन्हीं मिळोनि विठ्ठल देख ॥१॥ ऐसा होतांची मिळाणी । दिलें संसारासी पाणी ॥२॥ एक एक पाहतां दिठी । होय विठ्ठलेसी भेटी ॥३॥ एका सांडुनि दुजा नाहीं । एका जनार्दनीं ध्याई ॥४॥
२५४१
मागें पुढें उभा हातीं घेउनी काठी वळत्या धांवे पाठीं गाईमागें ॥१॥ गोपाळ बैसती आपण धांवे राणा । तयांच्या वासना पूर्ण करी ॥२॥ वासना ते देवें जाया दिली जैशी । पुरवावी तैसी ब्रीद साच ॥३॥ ब्रीद तें साच करावें आपुलें । म्हणोनियां खेळे गोपाळांत ॥४॥ एका जनार्दनीं खेळतो कन्हया । ब्रह्मादिकां माया न कळेची ॥५॥
२५४२
मागें पुढें विठ्ठल भरला । रिता ठाव नाहीं उरला ॥१॥ जिकडे पहावें तिकडे आहे । दिशाद्रुम भरला पाहे ॥२॥ एका जनार्दनीं सर्व देशीं । विठ्ठल व्यापक निश्चयेंशीं ॥३॥
२५४३
मागें बहुतां गुणा आलें । रामनाम रसायन चांगलें ॥१॥ बहुतीं सेविलें आदरें । तेणे तरलें भवसागर ॥२॥ शुकें उतरिलें निगुती । दिधलें असे परिक्षिती ॥३॥ सेवितां आरोग्या झाला । एका जनार्दनीं म्हणे भला ॥४॥
२५४४
मागें बहुतांनीं मानिला विश्वास । म्हणोनि मी दास जाहलों ॥१॥ कायावाचामन विकिलें चरणीं । राहिलों धरूनि कंठीं नाम ॥२॥ एका जनार्दनीं नामाचा प्रताप । भक्त आपोआप तरताती ॥३॥
२५४५
मागें बहुतांसी सांगितलें संतीं । वायां हे फजिती संसार तो ॥१॥ अंधाचे सांगाती । मिळालेसे अंध । सुख आणि बोध काय तेथें ॥२॥ विष खाऊनियां प्रचीत पाहे कोणी । तैसा अधमपणीं गुंतूं नको ॥३॥ एका जनार्दनीं जाऊं नको वायां । संसार माया लटिकी ते ॥४॥
२५४६
मागें बहुतांसी सांभाळिलें । ऐसें वरदान ऐकिलें ॥१॥ म्हणवोनी धरिला लाहो । मनींचा संदेहो टाकुनी ॥२॥ अजामेळ पापराशी । नेला निज नित्य टाकुनी ॥३॥ तारिले उदकीं पाषाण । ऐसें महिमान नामाचें ॥४॥ एका जनार्दनीं जाहलों दास । नाहीं आस दुसर्‍याची ॥५॥
२५४७
मागें विरह बहुतंशी झाला । संसारश्रम वायां केला । क्षणभरीं विश्रांती नाहीं मला । तो सदगुरु जिवलगा भेटला ॥१॥ आतां विरहाची सरली गोठीं । डोळेंभरी पाहिल्या जगजेठी । जाउनी चरणीं घालावी मिठी । विरह गेला समुळ दृष्टी ॥२॥ एका जनार्दनीं पाहतां आनंदलें । जन्म जन्मातरींचें दुःख । फिटलें विरहाविरहें हर खुंटलें । काया वाचा मनें वेधलें वो ॥३॥
२५४८
मागें संतीं उपकार । केला फार न वर्णवें ॥१॥ पाप ताप दैन्य गेलें । सिद्धची जाहले सर्वमार्ग ॥२॥ दुणा थाव आला पोटीं । संतभेटी होतांची ॥३॥ शरण एका जनार्दनीं । पावन जनीं संत ते ॥४॥
२५४९
माझा कृष्ण देखिला काय । कोणी तरी सांगा गे ॥ धृ ॥ हाती घेऊनिया फूल । अंगणीं रांगत आलें मूल । हातें सारवित मी चूल । कैसी भूल पडियेली ॥१॥ माथां शोभे पिंपळपान । मेघवर्ण ऐसा जाण । त्याला म्हणती श्रीभगवान । योगी ध्यान विश्रांती ॥२॥ संगे घेऊनि गोपाळ । बाळ खळॆ आळुमाळ । पायीं पोल्हारे झळाळ । गळां माळ वैजंयती ॥३॥ एका जनार्दनीं माय । घरोघरांप्रती जाय । कृष्णा जाणावें तें काय । कोणी सांगा गे ॥४॥
२५५०
माझा देहीं असतां डोळा । काय जालें रे गोपाळा ॥१॥ माझा डोळा गिवसोनी दीजे । मी पाऊल न सोडीं तुझें ॥२॥ डोळा मुराला डोळियांत । कवण जाणे तेथील मात ॥३॥ एका जनार्दनीं अवलीला । पाहतां त्रैलोक्य जाहला डोळा ॥४॥
२५५१
माझा ब्रीदावळी । कदाकाळीं न संडी मी ॥१॥ तुम्हां पडतां अंतर । मज वाटे हुरहुर ॥२॥ तुमची न होते भेटी । मज दुःख पोटीं अनिवार ॥३॥ अंकिता अंकिलोंक तुमचा । एका जनार्दनीं सत्य साचा ॥४॥
२५५२
माझा भक्त मज अंतरीं । मी सदा बाहेरी तिष्ठतसें ॥१॥ ऐशी परस्परें खूण । जाणती तें ब्रह्माज्ञान ॥२॥ माझी सायुज्यता मुक्ति । घेउनी बळें मीच होती ॥३॥ सायुज्यापरीस भक्ती गोड । एका जनार्दनीं धरिती चाड ॥४॥
२५५३
माझा भक्त मज भीतरीं । मी स्वयें असे तया माझारीं ॥१॥ बहु बोलाचें नाहीं कारण । मी देह तो आत्मा जाण ॥२॥ माझिया भक्तिसी जे लागले । ते तीच होउनी ठेले ॥३॥ एकाजनार्दनीं अभेद । तया हृदयीं मी गोविंद ॥४॥
२५५४
माझा वडिलांचे दैवत । कृपाळु हा पंढरीनाथ ॥१॥ पंढरीसी जाऊं चला । भेटुं रखुमाईविठ्ठला ॥२॥ पुडलिकें बरवें केलें । कैसें भक्तीनें गोविलें ॥३॥ एका जनार्दनीं नीट । पायी जडलीसे वीट ॥४॥
२५५५
माझा शरणागत न दिसे केविलवाणा । ही तो लाज जाणा माझी मज ॥१॥ एकविध भावें आलिया शरण । कर्म धर्म जाण पूर्ण त्याचें ॥२॥ समर्थाचे मुला काय खावयाची चिंता । तैसें मी त्या तत्त्वतां न विसंबें ॥३॥ एका जनार्दनीं हा माझा नेम । आणीक नाहीं वर्म भावेंविण ॥४॥
२५५६
माझिया जीवीं आवडे । संतसमागम रोकडे ॥१॥ हेंचि द्यावें कृपादान । कृपाळू तूं नारायण ॥२॥ एका जनार्दनीं म्हणवी दास । त्याची पुरवावी आस ॥३॥
२५५७
माझिया मनींचा फिटलासे बिहो । पाहुनियां देवो दत्तराव ॥१॥ फिटला संकल्प तुटली वासना । आन नाहीं कल्पना दुजी कांहीं ॥२॥ एका जनार्दनीं दत्त वेगळा जाण । नोहे माझा प्राण क्षणभरी ॥३॥
२५५८
माझी ऐकावी विनंती । ज्ञानदेव श्रेष्ठमूर्ती ॥१॥ तुम्ही बैसोनि अंतरी । मज जागवा निर्धारीं ॥२॥ तुम्ही सत्ताधारी । प्रपंच करावा बाहेरी ॥३॥ श्रेष्ठा ज्ञानदेवा । एका जनार्दनीं आठवा ॥४॥
२५५९
माझी जनार्दन माउली । प्रेमपान्हा पान्हावली ॥१॥ तीच नित्य मज सांभाळी रात्रंदिवस सर्वकाळीं ॥२॥ आठवितों वेळोवेळां माझा तिजलागीं कळवळा ॥३॥ एका जनार्दनीं बाळ । माता रक्षीं पैं स्नेहाळ ॥४॥
२५६०
माझी दत्त माऊली । प्रेमपान्हा पान्हावली ॥१॥ कुर्वाळुनी लावी स्तनीं । नोहे निष्ठुर क्रोध नाहीं मनीं ॥२॥ भक्तांसी न विसंबे । सदा वाट पाहे बिंबे ॥३॥ एका जनार्दनीं निश्चित । दत्तनामें पावन पतीत ॥४॥
२५६१
माझी माता दत्तगुरु । मज तिचाचि आधारु ॥१॥ तियेविण मजलागीं । कोण रक्षील सर्वांगी ॥२॥ दत्त माझा आधार । त्यासी चिंतीं वारंवार ॥३॥ निर्विकार निरंजन । स्वामी माझा दत्त जाण ॥४॥ एका जनार्दनीं दत्त । नित्य देखे ध्याना आंत ॥५॥
२५६२
माझी मुख्यं उपासना । लागेन चरणां संतांच्या ॥१॥ भांडवल तें हेंचि देख । भक्तियुक्त उपासना ॥२॥ मन वसो संतापायीं । आर्त ठायी कीर्तनीं ॥३॥ एका जनार्दनीं । विनवणी करीतसे ॥४॥
२५६३
माझे मज कळलें माझें मज कळलें । नाहीं परतें केलें आपणातुनीं ॥१॥ उदकीं लवण पडतां न निघे बाहेरीं । तैशी केली परी जनार्दनें ॥२॥ एका जनार्दनीं एकपणें भाव । सर्वाभूतीं देव दाखविला ॥३॥
२५६४
माझे मनीं आनंद जाहला । बोलतां बोला नवजाय ॥१॥ एक संत जाणती खुण । येरा महिमान न कळे ॥२॥ हृदयींच उदय दिसे । लाविलें पिसे देवानें ॥३॥ शरण एका जनार्दनीं । करी विनवणी सलगीनें ॥४॥
२५६५
माझे मनोरथ चरणाची आवडी । दुजियाची जोडी नको आतां ॥१॥ वाउगा पसारा नका गोऊं मन । चरणाशी जाण स्थिर होय ॥२॥ एका जनार्दनीं पुरवी वासना । दुजें नारायणा नको कांहीं ॥३॥
२५६६
माझे माहेर पंढरी । आहे भीवरेचे तीरीं ॥१॥ बाप आणि आई । माझी विठ्ठल रखुमाई ॥२॥ पुंडलिक बंधु आहे । त्यांची ख्याती सांगु काय ॥३॥ माझी बहिण चंद्रभगा । करितसे पापभंगा ॥४॥ एका जनर्दनी शरण । करी माहेरीची आठवण ॥५॥
२५६७
माझें देईं मजलागुन । म्हणोनि दृढ धरिले चरण ॥१॥ भक्तीचें ऋण देवा । देई माझें मज केशवा ॥२॥ माझें देतां जड काई । अभिलाषेंक धरीन पायीं ॥३॥ एका अभिलाषें फावला । एका जनार्दनीं उभा केला ॥४॥
२५६८
माझें मन अति चंचळ । त्यासी बांधा तुम्हीं सबळ ॥१॥ मग तें कोठें नव जाय । तुमचे सोडोनियां पाय ॥२॥ सुखदुःखाचेम कारण । मनचि हें अधिष्ठान ॥३॥ एका जनार्दनीं शरण । मनें मनासी बंधन ॥४॥
२५६९
माझें मन तेथें वसों । आणीक नसों दुजें कांहीं ॥१॥ होईन हरीचा वारकरी । करीन वारी पंढरीची ॥३॥ शरण एका जनार्दनीं । करी विनवणी येवढी ॥४॥
२५७०
माझें मन राखोनी पायीं । करा समाधान देहीं ॥१॥ हेंचि मागतों साचार । वारंवार जोडोनी कर ॥२॥ ब्रह्माज्ञानाची आटी । नका योगाची कसवटी ॥३॥ भुक्ति मुक्ति नका आड । ब्रह्मा सायुज्यता भीड ॥४॥ लागती चरणा । शरण एका जनार्दना ॥५॥
२५७१
माझें मन राहो तुझे पायीं । वास पंधरीचा देई ॥१॥ जन्न्म देशी भलते परी । वाचे राम विठठल हरी ॥२॥ जन्मासी या भिणें । हें तों आम्हा लाजिरवाणें ॥३॥ मोक्ष मुक्तिंतें देवा । नको गोऊं तयाठाया ॥४॥ म्हणे जनार्दनीं एका । संतसंग द्यावा निका ॥५॥
२५७२
माझें माझें म्हणोनि करितोसी कष्ट । उडाला तो हंस राहिलें फलकट ॥१॥ तनांचें बुजवणें तैशी देहस्थिती । चित्ता अग्नि उजळोनि मिळे मातीसी माती ॥२॥ स्वजन स्वगोत्र सारे करती विचार । काढा काढा म्हणती जाला भूमीभार ॥३॥ देहाची जनकें केवळ मातापिता । गेला गेला म्हणती तोचि देह असतां ॥४॥ अष्टही प्रहर भोगी देह गेह वित्त । सेजेची भार्या पळे म्हणे भुतभूत ॥५॥ यापरी जाणोनी सांडी देहाची खंती । एका जनार्दनीं राहिला विदेह स्थिती ॥६॥
२५७३
माझें माहेर पंढरी । विठ्ठल उभा विटेवरी ॥१॥ संत मिळाले अपार । करिताती जयजयकार ॥२॥ टाळघोष पताका । नाचताती वैष्णव देखा ॥३॥ विठ्ठल नामें गर्जती । प्रेमभरीत नाचती ॥४॥ एका जनर्दनीं शरण । विठ्ठलनामें लाधें पूर्ण ॥५॥
२५७४
माझें मीपण देहीच मुरालें । प्रत्यक्ष देखिलें परब्रह्मा ॥१॥ परब्रह्मा सुखाचा सोहळा । पाहिलासे डोळां भरूनियां ॥२॥ ब्रह्माज्ञानाची तें उघडली पेटी । जाहलों असे पोटीं शीतल जाणा ॥३॥ एका जनार्दनीं ज्ञानाचें तें ज्ञान । उघड समाधान जाहलें जीवा ॥४॥
२५७५
माझ्या देहाचें देहपण । नागविता नारायण ॥१॥ माझें मीपणा पाडिलें वोस । वायां कां मज ठेविला दोष ॥२॥ जेथें; मीपण जाले वाव । तेथें करतेपणाचा ठाव ॥३॥ एका जनार्दनीं अभिमान । सांडोनियां झाला लीन ॥४॥
२५७६
माझ्या मना तूं करीं पां विचार । नाम निरंतर निवृत्ति जपें ॥१॥ जपतां नामावळी आळस न करीं । कोटि जन्म फ़ेरी चुके तेणें ॥२॥ सुखरुप तूं होसील साचार । गर्भाचा उदगार खुंटे साचा ॥३॥ एका जनार्दनीं सांगे निर्धार । निवृत्ति उच्चार नाम करी ॥४॥
२५७७
माझ्या मना धरीं गोडी । संत जोडी करी तूं ॥१॥ मग सुखा काय उणें । देवचि ठाणें दुणावें ॥२॥ कळिकाळ वंदी माथां । नाहीं चिंता संसार ॥३॥ एका जनार्दनीं दास । हेंचि आस पुरवावी ॥४॥
२५७८
माझ्या मना लागो छंद । नित्य गोविंद गोविंद ॥१॥ तेणें देह ब्रह्मारुप । निरसेल नामरुप ॥२॥ तुटेल सकळ उपाधी । निरसेल आधिव्याधी ॥३॥ गोविंद हा जनीं वनीं । म्हणें एका जनार्दनीं ॥४॥
२५७९
माझ्या मना लागो छंद । नित्य गोविंद गोविंद ॥१॥ तेणें निरसेल बंधन । मुखीं वदे नारायण ॥२॥ ब्रह्मारूप होय काया । माया जाईल विलया ॥३॥ होय सर्व सुख धणी । चुके जन्ममरण खाणी ॥४॥ म्हणे एका जनार्दन । सदा समाधान मन ॥५॥
२५८०
माझ्या मनाचा संदेह । फिटला देखतांचि पाय ॥१॥ तुम्हीं कृपा केली संतीं । निरसली भय खंती ॥२॥ माझें मज दिलें हाती । जाहली समाधान वृत्ती ॥३॥ एका जनार्दनीं शरण । निरसला भवशील ॥४॥
२५८१
माझ्या मनाचें तें मन । चरणीं ठेवावें बांधून ॥१॥ मग तें जाऊं न शके कोठें । राहे तुमच्या नेहटें ॥२॥ मनासी तें बळ । देवा तुमचें सकळ ॥३॥ एका जनार्दनीं देवा । मन दृढ पायीं ठेवा ॥४॥
२५८२
माडियेला खेळ हमामा हुंबरी । मारुनी हिरण्यकश्यपु प्रल्हाद खेळिया करी ॥१॥ हुतुतुतु हुमरी हुतुतुतु हुमरी ॥धृ॥ जाउनी लंकेवरी खेळ मांडियेला । रावण कुंभकर्ण वधोनि शरणगत रक्षिला ॥२॥ माडियेला खेळ खेळें अर्जुनाचे रथीं । मारुन कौरव खेळे नानापरींची गती ॥३॥ धरुनी गोपेवेष मरियेला कंसमामा । नानापरी खेळ खेळे गोपाळांसी हमामा ॥४॥ येउनी पंढरेपुरा पुंडलिकासाठीं । एका जनार्दनीं कर ठेवुनीं उभा राहिला काटीं ॥५॥
२५८३
माडियेला डाव पोरा हुतुतुतुतु । नको घालुं फेरा पोरा हुतुतुतुतु ॥१॥ लक्ष चौर्‍याशींचा डाव खेळ मांडियेला । लक्ष जाणे तोचि तेंथोनि सुटला ॥२॥ सहा चार अठरा यांचे पडों नको । एका जनार्दनी संता शरण जाई ॥३॥
२५८४
मातला बोकड भलत्यावरी धांवे । तैसा भरला विषय हावे ॥१॥ नाठवेचि आपपर । सदा हिंडे परद्वार ॥२॥ शिकविलें मानी वोखटें । उताणा नेटें चालतसे ॥३॥ कर्म धर्म नावडेचि कांहीं । विषयप्रवाहीं बुडतसे ॥४॥ एका जनार्दनी तें पामर । भोगिती अघोर कुंभपाक ॥५॥
२५८५
माता पिता देव गुरु । ऐसा ज्याचा । एक विचारु ॥१॥ धन्य धन्य तयाचें शरीर । नर नोहे तो ईश्वर ॥२॥ चारी दैवतें समान मानी । शरण एका जनार्दनीं ॥३॥
२५८६
मातापितयांसी जो करी नमन । धन्य त्याचें पुण्य इह जगीं ॥१॥ मातापितयांचें करी जो पूजन । धन्य तयाचें पुण्य इहलोकीं ॥२॥ मातापितयांची करीत जो सेवा । एका जनार्दनीं देवा वरिष्ठ तो ॥३॥
२५८७
मातेचा आठव बाळावरी स्नेहो । तैसा धरा देवो मनीं सदा ॥१॥ बाळा पाहूनियां माता संतोषत । तैसा धरा हेत देवावरी ॥२॥ बोबडें साबडें असोत तें बाळ । तैसा धरा कळवळ देवावरी ॥३॥ एका जनार्दनीं देव धरा मनीं । आसनीं शयनीं विसरूं नका ॥४॥
२५८८
मातेचिया गळां न मिले गळसरी । बाइलेसी सरी सोनियाची ॥१॥ मातेचिये हातां न मिळे कांकण । बाइले करीं तोडे घडी जाण ॥२॥ मातेसी न मिळे अंगीं चोळी । बाइलेसी नेसवी चंद्रकळा काळी ॥३॥ बाइले आधीन ठेविले जिणें । एका जनार्दनीं नरकी पेणें ॥४॥
२५८९
मातेसी न मिळे खावयासी अन्न । बाईलेसी घाली नित्य मिष्टान्न ॥१॥ म्हणे बाईल माझी संसारी बहु । मातेनें मज बुडवलें बहु ॥२॥ मातेनें माझा संसार बुडविला । माझ्या बाइलेनें वाढविला ॥३॥ माता माझी अभागी करंटी । बाईल प्रत्यक्ष सभागी मोठी ॥४॥ एका जनार्दनीं बाइलेआधीन जाहला । मातेसी अबोला धरिला तेणें ॥५॥
२५९०
मातेसी म्हणे बाळ । दूध पितीं मुलें सकळ । मजही दूध तात्काळ । मातें देईं भोजना ॥१॥ मग ते करड्या वांटूनी । जननी काढी शुभ्र पाणी । बारे दूध म्हणोनी । वाटीयें भात कालविला ॥२॥ तंव शेजारीं ब्राम्हणें श्राध्द केलें । तयाचिया घरां जेवावया नेलें । बरवें उत्तम पक्वान्न वाढिलें । नानापरी भोजना ॥३॥ बाळासी वाढिली दूध क्षीरी । तें जेविलें पोटभरी । एका जनार्दनीं निर्धारी । गेलें आपुल्या गृहासी ॥४॥
२५९१
माथां ठेवोनियां पाव । माझा देहींच केला दीव ॥१॥ नवलाव पायाचा मी केला । माझा देहींचे देवपणा नेला ॥२॥ पायींपराक्रम पंचानन । पायीं निरसला देह अभिमान ॥३॥ पायीं देहासी पाहें ठावो । पायीं देहचि केला वावो ॥४॥ नवल पायाचा हा भावों । पायीं निरेचि देहीं देवो ॥५॥ एका जनार्दनाच्या पायीं । देह विदेह दोन्हीं नाहीं ॥६॥
२५९२
मान देखोनि सहसा । संतां असंतोष होय जैसा ॥१॥ नाम ऐकुनि बागुलातें । बाळ सांडु पाहें प्राणातें ॥२॥ चंडवातें ते कर्दळी । समूळ कांपे चळचळीं ॥३॥ सन्मानें नामरुप जाय । एका जनार्दनीं सत्य पाहे ॥४॥
२५९३
मानवा रामनामीं भजें । तेणें तुझें कार्य होतें सहजें ॥१॥ अनुभव घेई अनुभव घेई । अनुभव घेई रामनामीं ॥२॥ शंकारादि तरले वाल्मिकादि उद्धरले । तें तूं वहिलें घेईं रामनाम ॥३॥ एक जनार्दनीं नामाच्या परिपाठीं । दोष पातकें पळती कोटी ॥४॥
२५९४
मानसींच अर्थ मानसींच स्वार्थ । मानसें परमार्थ दृढ असे ॥१॥ मानसींच देव मानसींच भक्त । मानसींच अव्यक्त दिसतसे ॥२॥ मानसींच संध्या मानसीं मार्जन । मानसी ब्रह्मायज्ञ केला आम्हीं ॥३॥ मानसी आसन मानसीं जनार्दन । एका जनार्दनीं शरण मानसींच ॥४॥
२५९५
मानसींच ध्यान मानसींच स्नान । मानसींच अर्चन करुं आम्हीं ॥१॥ न करुं साधन लौकिकापुरतें । न पुजूं दैवत आन वायां ॥२॥ मानसेंच तप मानसेंच जप । मानसीं पुण्यपाप नाहीं आम्हां ॥३॥ मानसीं तीर्थयात्रा मानसीं अनुष्ठान । मानसें धरूं ध्यान जनार्दन ॥४॥ एका जनार्दनीं मानसी समाधी । सहज तेणें उपाधि निरसली ॥५॥
२५९६
मानी नामाचा कंटाळा । तया वोंगळा न पाहावे ॥१॥ सदा त्याचें विषयीं ध्यान । वाचे बोले भलते वचन ॥२॥ आलिया तो घरा । तया न द्यावा पैं थारा ॥३॥ ऐसा चांडाळ जन्मला । वायां भूमीभार पैं जाहला ॥४॥ एका जनार्दनीं निर्धार । तया थार नाहीं कोठें ॥५॥
२५९७
मानी भक्तांचे उपकार । धरी गौळ्याघरीं अवतार ॥१॥ प्रेमें नाना छंदें नाचे । उणें पडो नेदी साचे ॥२॥ अंगें धांव घाली । ऐशी कृपेची माउली ॥३॥ एका जनार्दनीं साचा । देव अंकित भक्तांचा ॥४॥
२५९८
मानी भक्ताचे उपकार । म्हणोनि धरी अवतार ॥१॥ उच्छिष्ट काढी धर्माघरीं । नीच काम करी गौळ्यांचें ॥२॥ अर्जुनाचें रथीं बैसे । सारथ्या सरसे करीतसें ॥३॥ एका जनार्दनीं अंकितपणें । द्वार राखणें बळींचें ॥४॥
२५९९
मायबाप तुम्ही संत । मी पतित कींव भाकी ॥१॥ करा माझें समाधान । अभय वचन देउनी ॥२॥ मागें तारिलें सकळ । उत्तम अधम चांडाळ ॥३॥ तोचि आहे अनुभव । म्हणोनि कींव भाकितसे ॥४॥ एका जनार्दनीं शरण । मज पावन करावें ॥५॥
२६००
मायबाप माझा सोयरा जिवलग । तूंचि पांडूरंग मजलागी ॥१॥ माझियाकारणें पुरविलें धन । केलें माझें संरक्षण मायबाप ॥२॥ म्हणोनियां डोई ठेवियेली पायीं । प्रेमभरित पाहीं नामा जाहला ॥३॥ एका जनार्दनीं देवाचा एकुलता । नामयापरता कोणी नाहीं ॥४॥
२६०१
मायबापा न घाली अन्न । बाईलेच्या गोता संतर्पण ॥१॥ मायबापा नसे लंगोटी । बाइलेच्या गोता नेसवी धट्टी ॥२॥ मायबापान मिळे गुंजभर सोनें । बाइलेच्या गोता उडी अळंकार लेणें ॥३॥ मायबापें श्रमोनियां मेलीं । एका जनार्दनीं बाईल प्रिय जाहली ॥४॥
२६०२
माया जिवलगा जातां बैसली कृष्ण म्हणे गे आई ।दळण दळिण शिणलिसी हात लावुं गे आई । समान तळी तळींवरी ठेवी पावो ठायीं ॥ क्षणामाजी मी वो दळीन तु कोतुक पाहीं ॥ धृ ॥ येई गे येई गे येई गे कान्हाई हात लावी तु वहिली । जातीये जातां शिणलीये किती दळुम एकली । विसावा निजाचा तूं माझा विश्रांती साऊली । येइ गे येई गे कान्हाई ॥१॥ ब्रह्माहमस्मि टाकिया उकटी द्वैत दळी । अधिष्ठान खुंटा निश्चय दोहीं एकची बोली । पाहिले चारी निरसोनी निज नित्य न्याहाळीं । सहासी वैरण वेरुणी अठराही दळी ॥२॥ पंच भुतें पंच धान्यें दळियेलें जातां । शशी सुर्य दोन्हीं दाळिले प्राण्याच्या समता । ध्येय ध्याता ध्यान दळियेलें धारणा धरितां । पंचविषय तेही दळियेलें वैराग्य राहतां ॥३॥ वैकुठं कैलास दळिलें गती एक देशी । क्षीरसागर तोही दळियेला शेषशयनेसी । ध्रुव तोही जातां वैरिला अढळ पदेशी । जें जें देखें तेही दळियलें दृश्या दृश्यासी ॥४॥ वासना मिथ्या भाजुनि वैरिलिया जातां । मेळवणी गुण घातले समान समता । गुणा गुणातेंहि दळियेलें पहातें पाहाता ।ब्रह्मा विष्णु रुद्र दळिलें ओवीया गातां ॥५॥ कर्माकर्मा कैसें दळिलें जन्ममरणेसी । मीतुपण दोन्ही दळियलें जीवाशिवेसी । पुडे वैरिणिया कांहीं न दिसे पाहतां चौपाशी । मायो तेहीं जाता दळिली दळते दळणेसी ॥६॥ वृत्तीए तेहि निवर्तली पडियली ठका । समाधि उत्थाना दळियलें देहबुद्धीसी देखा । दळितें जातें तेंहि दळियलें कवतुक देखा । स्वभावें लीला हे खेळे जनार्दनी एका ॥७॥
२६०३
माये आधीं लेक जन्मली । दोघींच्या लग्नाची आयती केली ॥१॥ कोण नोवारा कोण नोवरी । अर्थ पाहतां न कळे निर्धारीं ॥२॥ बापा आधीं लेक जन्मला । लग्नाचा सोहळा बापाचा केला ॥३॥ वरात निघाली नोवरा नोवरी । एका जनार्दनीं जाहली नवलपरी ॥४॥
२६०४
मारग ते बहु बहुत प्रकार । प्रणव विचार जयापरी ॥१॥ आदि अंतु नाहीं मार्गाची ग्वाही । साधनें लवलाहीं वायां पंथें ॥२॥ जया जी भावना तोचि मार्ग नीट । परी समाधान चित्त नाहें तेथें ॥३॥ एका जनार्दनीं संतमार्ग खरा । येर तो पसारा हाव भरी ॥४॥
२६०५
मारी गावढी चुकलीसे भाई । देखन देखन त्रिभुवनसे आई । उन शोधन लागछे भाई । अब कैसी गत करुछे आई ॥१॥ मथुरा लमानीना मारो नामछे । गावढी देखत आई गांवछे । दृष्टी देखन नहीं मानछे । कैसें भुलाय कन्हयानछे ॥२॥ भूली भूली जाई मानछे । कहीं मिलन मोरे ध्यानछे । एका जनार्दन से पगछे । अखंड चित्त जडो गावढीछे ॥३॥
२६०६
मार्ग ते बहुतां आहेत । सोपा पंथ पंढरीचा ॥१॥ अमुपासी अमुप देतां । परी भरले ते सर्वथा ॥२॥ सुखाचिया भरल्या राशी । पाहीजे त्यासी त्यांने घ्यावें ॥३॥ न सरेचि ब्रह्मादिकीं । भरलें देखा भरतें ॥४॥ एका जनार्दनीं सुख । अलौकिक देख पंढरीये ॥५॥
२६०७
मार्ग सोपा पंढरीचा । सांपडला साचा उत्तम ॥१॥ नाहीं पुसायाचें काम । वाचें नाम मुखीं गाऊं ॥२॥ नाहीं कोठें आडकाठी । साधनकपाटीं पंचाग्र ॥३॥ नलगे योगयाग तप । वाचे जप विठ्ठल ॥४॥ त्रिअक्षराचें काम । एका निष्काम जनार्दनीं ॥५॥
२६०८
मार्गी जातां विस्मय करी । कैसें विंदान केले नवल परी । आम्हीं अबला घालितो अचोरी । श्रीहरी परापश्यंती वेगळा ॥१॥ नवल जाहलें काय सांगू माये । चोरी करितां धरिला पाहे । घरां घेऊनि जातां उभा आहे । न कळे विंदान सये काय सांगू ॥२॥ एका जनार्दनी परिपूर्ण । व्यापाक सर्वाठायीं संपूर्ण । जनींवनीं जनार्दनी । पाहतां महिमान न कळे ॥३॥
२६०९
मालधनी घेउनी आलों असें घरा । तुम्ही कां दातार शिव्या देतां ॥१॥ द्रव्याचा मालक आणूनियां घरीं । ठेविला निर्धारीं काय भय ॥२॥ चलावें घरासी घ्यावी द्रव्यरासी । न देतां गणोबासी घेउन येतों ॥३॥ एका जनार्दनीं दामा पुढें आला । नामा विठोबाला कींव भाकी ॥४॥
२६१०
माळियांचे वंशी सांवता जन्मला । पावन तो केला वंश त्याचा ॥१॥ त्यासवें हरी खुरुपूं लागे अंगें । धांउनी त्याच्या मागें काम करी ॥२॥ पीतांबर कास खोवोनी माघारी । सर्व काम करी निजसंगें ॥३॥ एका जनार्दनीं सांवता तो धन्य । तयाचें महिमान न कळे कांहीं ॥४॥
२६११
माहेरींची वास पाहीन मी डोळां संतांचा पैं मेळा येतां देखें ॥१॥ घालुनी दंडवत लागेन मी पायीं । जीव हा उतराई करुनी सांडीं ॥२॥ कुर्वडीन काया तयावरुन भावें । जीवें वोवाळावें जीवलगा ॥३॥ आषाढी कार्तिकी प्रेमे करिती वारी । तयांची मी थोरी काय वानुं ॥४॥ एका जनार्दनीं धन्य ते दैवाचे । निरंतर वाचे विठ्ठलनाम ॥५॥
२६१२
मिठी घालूनियां भक्तां । म्हणे सिणलेती आतां ॥१॥ धांवे चुरावया चरण । ऐसा लागवी आपण ॥२॥ योगियासी भेटी नाहीं । तो आवडीनें कवळीं बाहीं ॥३॥ एका जनार्दनीं भोळा । भक्तां आलिंगीं सांवळा ॥४॥
२६१३
मिथ्या भूतकाया मिथ्या भूतमाया । मिथ्या भूतछाया जेवीं वसे ॥१॥ मिथ्याभूत नाशिवंत जाण । मिथ्याभूत भान सर्व दिसे ॥२॥ मिथ्या भूत जन मिथ्या भूत वन । एका जनार्दन शरण वेगीं ॥३॥
२६१४
मिथ्या मायेच्या धाकासाठीं । योगी रिगाले कपाटीं ॥१॥ आसन घालूनियां जाण । आकळिती पंचप्राण ॥२॥ क्षुधेनें खादली भूक । तृषा तहान प्याली देख ॥३॥ बुद्धी सुबुद्धि धरूनि हातीं । आकळितसे इंद्रियवृत्ती ॥४॥ शांतीचेनि बळें । संकल्प त्यागिले सकळ ॥५॥ ऐशी योगाची कहाणी । शरण एका जनार्दनीं ॥६॥
२६१५
मिथ्या हा संसार । अवघा मायेचा बाजार ॥१॥ स्त्रिया पत्रधन । हें तों सर्व मायिक जाण ॥२॥ यांत गुंतुं नको नरा । न करी आयुष्य मातेरा ॥३॥ वाचे वदे हरिहर । करी ध्यान निरंतर ॥४॥ एका जनार्दनीं नरा । नित्य भजे हरिहरा ॥५॥
२६१६
मिळती गौळणी दारवटीं बैसती । धरुं आतां निश्चिती घरामध्यें ॥१॥ येतो जातो हें न कळे त्यांची माव । वाउगीच हांव धरिताती ॥२॥ पांच सात बारा होऊनियां गोळा । बैसती सकळां टकमक ॥३॥ एका जनार्दनी न सांपडेचि तयां । योगी ध्याती जया अहर्निशीं ॥४॥
२६१७
मिळती सकळां गौळणी ते बाळा । लक्ष लाविती डोळां कृष्णमुखा ॥१॥ धन्य प्रेम तयांचे काय वानुं वाचें । न कळे पुण्य त्यांचे आगमानिगमां ॥२॥ आदरें गृहा नेती मुख पैं धृताती । जेवूं पै घालिती दहींभात ॥३॥ एका जनार्दनीं प्रेमाची पैं लाठी । धांवुनी इठी मिठी घेतो बळें ॥४॥
२६१८
मिळती सख्या माया बहिणी । हातीं घेउनी तेजफणी ॥१॥ जंव आहे शरीर चांग । तंव काढिताती चांग भांग ॥२॥ नासिल्या शरीरांतें । टाकिताती तया परते ॥३॥ पहा देहीं देव असतां । नाहीं म्हणती सर्वथा ॥४॥ एका जनार्दनीं पंचत्व । मग म्हणती भूतभुत ॥५॥
२६१९
मिळल्या गिपिका यशोदा जवळा । तटस्थ सकळां पाहताती ॥१॥ यशोमाती म्हणे आलेती कासया । वाउगें तें वायां बोलताती ॥२॥ एका जनार्दनीं बोलण्याची मात । खुंटली निवांत राहिल्या त्या ॥३॥
२६२०
मिळवोनी पांच सात गडी मेळी । डाव खेळती चेंडुफळी ॥१॥ खेळ चेंडुंचाझेला रे झेला बाळा । विचारुन खेळ खेळां न पडुं प्रवाही काळा ॥२॥ यंदु यरडु मारु नाकु मिळालेती गडी । जनार्दनीं शाण अनुपम्य धरा गोडी ॥३॥
२६२१
मिळाले भक्त अपार । होतो जयजयाकार भीमातीरीं ॥१॥ वैष्णवांचे मेळ मृदंग वाजती दिंड्या पताका शोभती ॥२॥ एका जनार्दनी कीर्तनीं । नाचतसे शारंगपाणी ॥३॥
२६२२
मिळोनि अबळा बैसती परसद्वारी । येरे येरे कृष्णा म्हणोनि बाहाती व्रजनारी ॥१॥ ऐशा लांचावल्या नंदनंदना । घरींच बैसती लक्ष लावीत कान्हा ॥२॥ वेदश्रुतीसी न कळे जयांची शुद्धी । तो नवनीत खावया लाहे लाहे घरामाधी ॥३॥ एका जनार्दनी ब्रह्मा परिपूर्ण । पूर्ण वेधे वेधिलें आमुचे मनाचें मन ॥४॥
२६२३
मिळोनि गोपाळ सकळीं । यमुनेतटीं खेळे चेंडुफळीं । गाई बैसविल्या कळंबातळीं । जाहली दुपारीं खेळतां ॥१॥ काला मांडिला वो काला मांडिला वो । नवलक्ष मिळोनी काला मांडिला वो ॥धृ॥ नानापरींचे शोभती दहीभात । पंक्ती बैसविल्या पेंदा बोबडा वाढीत । जो जया संकल्प तें तया मिळत । अनाधिकारिया तेथें कोणी न पुसत ॥२॥ पुर्वसंचित खालीं पत्रावळी । वाढती भक्तिभावाची पुरणपोळी । नामस्मरणाची क्षुधा पोटीं आगळीं । तेणें तृप्ती होय सहजीं सकळीं ॥३॥ ऐसे तृइप्त जाहले परमानंदें । कवळ कवळाचे निजछंदें । एक जनार्दनीं अभेदं । शुद्ध समाधिबोधें मुखसंवादें ॥४॥
२६२४
मिळोनि गौळणी । देती यशोदे गार्‍हाणीं । खोडी करी आमुचे घरा । दारीं यशोदे ॥१॥ परां आला आमुचे घरा । दारी निजला होता म्हातारा । घेऊनि ताकाचा ही डेरा । फोडिला सैरा त्यावरीं ॥२॥ दुसरी बोले बाई यशोदे । कांही सांगते तुझिया मुकुंदें । आमचेंघरा येऊनि गोविंदे । नवल केलें साजणी ॥३॥ सुन होती माझी गर्भिणी । तीस पुसे चक्रपाणी । कैसी जाहलीली हो गर्भिणी । तव ती हांसु लागली ॥४॥ जवळा बैसला जाऊनी । पोट आहे चांचुपनी । न कळे इश्वराची करणी । तंव ती झिडकावी ॥५॥ ऐशा खोडी नानापरी । किती म्हणोनि सांगु सुंदरी । ऐका जनार्दनीं आवरी । आपुलीयां कृष्णांतें ॥६॥
२६२५
मिळोनि धमकटी दहीं दूध ते खाती । मी खेळतां राजबिंदीं घरांत नेतीं ॥१॥ नग्न होऊनियां नाहती अबळा । डोळें झांक म्हणती मज त्यां सकळां ॥२॥ न झांकितां डोळे लोणी देती । मजसी खादलें म्हणोनि सांगती तुजासी ॥३॥ एका जनार्दनी बोलतां हांसतीं बाळा । रागावुनी मग बोला बोलती सकळां ॥४॥
२६२६
मिळोनि बारा सोळा घोकणी घोकिती । तो ही श्रीपती पंढरीये ॥१॥ रुप ते सांवळें सुंदर सोभलें । गळां मिरवलें तुळशीहार ॥२॥ मुगुट कुंडलें वैजयंती माळ । कौस्तुभ झळाळ हृदयावरीं ॥३॥ शंख चक्र करीं दोन्हीं ते मिरवले । सुंदर शोभले वाळरुप ॥४॥ एका जनार्दनीं हृदयीं श्रीवत्सलांछन । वागवी भूषण भक्तांसाठी ॥५॥
२६२७
मी एक शुची जग हें अपवित्र । कर्माचि विचित्र वोढवलें ॥१॥ देखत देखत घेतसे विख । अंतीं तें सुख केवीं होय ॥२॥ अल्पदोष ते अवघेंची टाळी । मुखें म्हणे सर्वोत्तम बळी ॥३॥ अभिलाषें अशुची झालासे पोटीं । एका जनार्दनीं नव्हेंचि भेटी ॥४॥
२६२८
मी तुं ऐसी परी । जैसे तरंग सागरीं ॥१॥ दोहींमाजीं एका जाणा । कृष्ण द्वारवती राणा ॥२॥ तंतु वस्त्र दोनी एक । तैसें जगासी व्यापक ॥३॥ देवभक्त ऐसी बोली । भ्रांति निरसेनासी जाली ॥४॥ सरिता सागरीं मिनल्या । तैसें होय भ्रांतिं गेल्या ॥५॥ एका जनार्दनीं कृपा । भ्रांति कैसी जगीं पहा पां ॥६॥
२६२९
मी तेचि माझी प्रतिमा । तेथें नाहीं आन धर्मा ॥१॥ तेथें असे माझा वास । नको भेदे आणि सायास ॥२॥ कलियुगीं प्रतिमेपरतें । आसना साधन नाहीं निरुतें ॥३॥ एका जनार्दनीं शरण । दोन्हीं रूपें देव आपण ॥४॥
२६३०
मी तो दरिद्री नाहीं जवळी द्रव्य । कैसा तरणोपाय होय आतां ॥१॥ या नामयाचें कैसें होईल लग्न । कोण देईल धन आम्हांलागी ॥२॥ आमुचा घराचार येणें बुडविला । पोर फ़ितविला काय करुं ॥३॥ या विठोबाचा येणें धरिलासे छंद । आमुचें जाहलें धिंद जगामाजीं ॥४॥ एका जनार्दनीं कोणा सांगूं गुज । कोण आहे मज जीवलग ॥५॥
२६३१
मी तो स्वयें परब्रह्मा । मीचि स्वयें आत्माराम ॥१॥ मी तों असे निरुपाधी । मज नाहीं आधिव्याधी ॥२॥ मी तों एकट एकला । द्वैतभाव मावळला ॥३॥ मजविण नाहीं कोणीं । एका शरण जनार्दनीं ॥४॥
२६३२
मी ब्रह्मा जाहलों म्हणें अंतरीं ब्रह्मा नव्हें ऐसें कांहीं । ब्रह्माविण अनु न दिसे कोठें । तितुकें ब्रह्मा पाहीं ॥१॥ होय नाहीं ऐसा संशयचि नाहीं निश्चयेंसी तेंचि आहे । आहे तेंचि ब्रह्मा नाहीं तेंचि ब्रह्मा अवघेंचि ब्रह्मा पाहे ॥२॥ वर्णाश्रमधर्म साचार मानुनी यथाविधी आचरती । स्वमताचा देहीं अभिमान धरुनी पृथक पृथक वाद करिती ॥३॥ पाषांडाच्या बळें होताती तोडागळे भेदें साचि हें अम्हीं ना हो म्हणती । सर्वदा तरी ब्रह्मा आहे ऐसें न कळे तयाप्रती ॥४॥ जळेंशी लवण वेगळे नाहीं जाण । तैसें आदिमध्य अंतीं ब्रह्माचि असे तेथें कैंचें न्युन पूर्ण ॥५॥ कर्ता कार्य कर्म अभिन्न तेथें बद्ध आणि मुक्त कवण । एका जनार्दनीं ऐक्यपणें मुळींच नाहीं भिन्न ॥६॥
२६३३
मी माझें आणि तुझें । टाकी परतें हें वोझें । नामें पावन होसी सहजें । तेंचि सेवीं आवडीं ॥१॥ नको गुंतूं या लिगाडा । सोडी सोडी या दगडा । भवबंधनाचा हुडा । पडेल अंगावरुता ॥२॥ देई टाकुनी लवलाही । रामनाम सुखें गाईं । एका जनार्दना पायीं । तरी सुखा काय उणें ॥३॥
२६३४
मी मी म्हणतां अवघें मी जालों । तूंपणाचा बोला लाजूनियां ठेलों ॥१॥ मी ना कोणाचा ना माझें कोणी । एकुविण एकु सहज निर्वाणीं ॥२॥ माझें मीपण मजमाजीं निमालें । एकोनेक सकळ सहजीं सहज जालें ॥३॥ एकाजनार्दनीं गणीत नवानी येकु । परापरते सारुनी उगला सिध्दांतु ॥४॥
२६३५
मी मी म्हणतां माझें मीच मी नेणें । चुकली रविकिरणें सुर्या धुंडिती ॥१॥ मजलागीं मी तो म्यां भेटावें तें कैंसें । दीपप्रभा पुसे दीपकासी ॥२॥ सबाह्म अभ्यंतरीं गगन सावकाश । तैसें घटावकाश महदाकाशी ॥३॥ एका जनार्दनीं एकत्वें जन वन । जन आम्हां दिसे जनार्दन ॥४॥
२६३६
मी मी म्हणतां वायां गेलें सर्व । पाहे तूं अपूर्व नवल बापा ॥१॥ रावण नासला मीपणें गेला । रामें क्षय केला पुत्रापौत्रीं ॥२॥ मीपणे दुर्योधन बहुत गर्वीत । नासलें जीवित रणांगणीं ॥३॥ ऐसें तें बहुत मीपणें नासलें । एका जनार्दनीं भलें मीपण रहित ॥४॥
२६३७
मी म्हणोनियां भार वाहे । वाउगा जाय कुंथत ॥१॥ रात्रंदिवस जैसा खर । वोझें अपार वहातुसे ॥२॥ नावडे भजन पूजा कथा । संसाराची वाहे चिंता ॥३॥ आला आयुष्याचा काळ । परि न राहे तळमळ ॥४॥ आपण मरुनी आणिकां मारी । ऐसा नष्ट दुराचारी ॥५॥ एका जनार्दनीं नाहीं भाव । तेथें न भेटेचि देव ॥६॥
२६३८
मीच देवो मीच भक्त । पूजा उपचार मी समस्त ॥१॥ मीच माझी करीं पुजा । मीच माझा देवो सहजा ॥२॥ हेंचि उपासनाकांडाचें सार । आगमनिगमांचे गुह्मा भांडार ॥३॥ एका जनार्दनीं देव । स्वयें पाहे देवाधिदेव ॥४॥
२६३९
मीच देवो मीच भक्त । पूजा उपचार मी समस्त ॥१॥ हीच उपासना भक्ति । धर्म अर्थ सर्व पुरती ॥२॥ मीच गंध मीच अक्षता । मीच वाहें मीच पुर्ता ॥३॥ मीच धुप मीच दीप । मी माझें देख स्वरुप ॥४॥ मीच माझी करी पूजा । एका जनार्दनीं नाहीं दुजा ॥५॥
२६४०
मीही संतचरण वंदीतसे माथां । वेदादि साम्यता थोडी तेथें ॥१॥ पुराणासी धाड पडलें सांकडे । शास्त्रांचें तें कोडे उगवेल ॥२॥ अहं ब्रह्मा ऐशा श्रुति वेवादती । नेति त्या म्हणती तटस्थ ठेल्या ॥३॥ उपासनामार्ग परंपरा जाला । तो बोध तुला सांगितला ॥४॥ एका जनार्दनीं संतांचा सांगत । न चुको देऊं हित आपुलें तूं ॥५॥
२६४१
मुक्तपणें मुक्त श्रेष्ठपणें श्रेष्ठ । सर्वत्रीं वरिष्ठ आदिशक्ती ॥१॥ जगाच्या उध्दारा तुमचा अवतार । पावन हे साचार मूढ जन ॥२॥ अज्ञानासी बोध सज्ञानाची शुध्दी । तोडिली उपाधी सर्वत्रांची ॥३॥ लडिवाळ तान्हें एका जनार्दनें । कृपा असो देणें मजवरी ॥४॥
२६४२
मुक्तिची तो नाही चाड । ऐसे वाड हरि दास ॥१॥ मोक्षमुक्तिसी कोण पुसे । हें तों सरसें भांडवल ॥२॥ लक्ष्मीसहित देव नांदे । येरा विनोदें काय चाड ॥३॥ एका जनार्दनीं दास्य करी । मुक्ति तेथें फुका वरी ॥४॥
२६४३
मुख सुंदर मंडित साजिरा । विंझणे वारिती राहिरखुमाई सुदरां ॥१॥ नवल वो हरी देखिला डोळां । पाहतां पाहतां मन विरालें अबळा ॥२॥ नेणें तहान भूक लज्जा अपमान । वेधिलें देवकीनंदनें गे माय ॥३॥ एका जनार्दनीं पाहतां मुख । मुख पाहतां अवघें विसरलों दुःख ॥४॥
२६४४
मुखाचा व्यापार । करावा हरिनाम उच्चार ॥१॥ पायांचा व्यापार । करावें तीर्थाटन निर्धार ॥२॥ हातांचा व्यापार । करावें दानधर्म सार ॥३॥ एका जनार्दनाचा निर्धार । मुखीं नामाचा उच्चार ॥४॥
२६४५
मुखीं उच्चार हरिहर । करिताती निरंतर ॥१॥ नित्यरामकृष्णहरी । वदतसे पैं वैखरी ॥२॥ करिती देवाचे पैं ध्यान । वृत्ति झालीसे तल्लीन ॥३॥ एका जनार्दनीं नाम । हेंचि पाववी निजधाम ॥४॥
२६४६
मुखीं नाम वदे करें वाहे टाळी । कीर्तनाचे मेळीं सद्रदित ॥१॥ भक्ताचा महिमा वाढवी श्रीपती । कीर्तनीं गोरियाप्रती कर आले ॥२॥ टाळी पिटूनियां नामाचा उच्चार । करीत साचार गोरा तेव्हां ॥३॥ एका जनार्दनीं पुरला मनोरथ । मूलही कीर्तनांत देखियेलें ॥४॥
२६४७
मुखीं नाम हातें टाळीं । साधन कलीं उत्तम हें ॥१॥ न घडे योगयाग तप । नाहीं संकल्प दुसरा ॥२॥ संतापायीं सदा मन । हृदयीं ध्यान मूर्तीचें ॥३॥ एका जनार्दनीं सेवा । हीचि देवा उत्तम ॥४॥
२६४८
मुखीं नाही निंदा स्तुती । साधु वरिती आत्मस्थिती ॥१॥ राग द्वेष समुळ गेले । द्वैताद्वैत हारपलें ॥२॥ घेणे देणें हा पसारा । नाहीं जयासी दुसरा ॥३॥ एका जनार्दनीं संत । ज्याचे हृदयीं भगवंत ॥४॥
२६४९
मुखीं वसे ब्रह्माज्ञान । चित्तीं चिंती धनमान ॥१॥ ऐसें ठक जे पतित । तयां साधन स्वहित ॥२॥ स्त्रीसंगी सदां सक्त । वदनीं गोष्टी परमार्थ ॥३॥ एका जनार्दनीं तयां । देव भेटेल कासया ॥४॥
२६५०
मुखें गावें नाम । तेणें पुरें सर्व काम ॥१॥ सर्व साधनांचें सार । तेणें पावे पैलपार ॥२॥ नामें बहुत तारिलें । महा दोषी उद्धरिलें ॥३॥ रामनाम बहु श्रेष्ठ । घेतां न लगती कष्ट ॥४॥ नाम नित्य ज्याचे मुखीं । तो जाणावा सर्वसुखी ॥५॥ रामनाम हेंसी सार । सत्य जाणा हानिर्धार ॥६॥ रामनाम निरसी ताप । पापें जाती आपेआप ॥७॥ रामनाम जो उच्चारी । सुख पावे तो संसारीं ॥८॥ एका जनार्दनीं नाम । पाववितें परमधाम ॥९॥
२६५१
मुख्य आदिनाथ प्रणवाचें निज । पार्वतीतें बीज उपदेशिलें ॥१॥ सनकसनदंन अत्रि कपिलमुनी । नारदादि शिरोमणी भक्तराज ॥२॥ व्यास आणि वसिष्ठ वाल्मिकादिक । ध्रुव प्रल्हाद देख शिरोमणी ॥३॥ एका जनार्दनीं भक्तांचें महिमान । स्वयें नारायण वाढवीत ॥४॥
२६५२
मुख्य पाहिजे अनुताप । हेंचि वैराग्याचें रूप ॥१॥ कोरड्या त्या ज्ञानगोष्टी । अनुताप नाहीं पोटीं ॥२॥ अनुतापाविण ज्ञान । कदा नोहे समाधान ॥३॥ एका जनार्दनीं तप । अनुताप हेंचि देख ॥४॥
२६५३
मुद्रा ती पाचवी लाऊनियां लक्ष । तो आत्मा प्रत्यक्ष हरि दिसे ॥१॥ कानीं जें पेरिलें डोळां तें उगवले । व्यापलें भरिलें तोचिक हरी ॥२॥ कर्म उपासना ज्ञानमार्गी झाले । हरिपाठी आले सर्व मार्ग ॥३॥ नित्य प्रेमभावें हरिपाठ गाय । हरिकृपा होय तयावरी ॥४॥ झाला हरिपाठ बोलणें येथुनी । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
२६५४
मुनीजन साधिती साधनीं । तो हरी कोंदला नयनीं ॥१॥ नवल हो नवल वाटलें । निरखितां निरखितां मनहीं आटले ॥२॥ स्थूल देहीं देहधर्मा । गोष्टी केली हो परब्रह्मां ॥३॥ व्यापला तो एका जनार्दनीं । पाहतां दिसे जनीं वनीं ॥४॥
२६५५
मुरली धरुनी अधरीं । वाजवीं छंदें नानापरी । भोवतें गोपाळ नाचती गुजरीं । यमुनातीरी आनंदें ॥१॥ तो हा नंदनंदन गे माये । त्याचा वेध लागला मज सये । कांहीं केलीया तो न राहें । नाठवे देह गेह गे माय ॥२॥ स्थूल सूक्ष्म कारणांपरतां । चहु वाचा वेगळा तत्त्वतां । आगमांनिगमांही वरतां । ज्याचा वेध शिवाचिया चित्ता गे माय ॥३॥ अचोच अवेदा चोजवेना । श्रुतीशास्त्रं नये अनुमाना । शरण एका जनार्दना । एकपणें जाणा सर्वा ठायीं ॥४॥
२६५६
मुरली मनोरह रे माधव ॥धृ॥ श्रीवत्सलांछन हृदयीं विलासन । दीन दयाघन रे ॥१॥ सुरनर किन्नर नारद तुंबर । गाती निरंतर रे ॥२॥ एका जनार्दनीं त्रिभुवनमोहन । राखी गोधन रे ॥३॥
२६५७
मुळींच पापाचा नाहीं लेश । ऐसा घोष नामाचा ॥१॥ ब्रह्माहत्या मात्रागमन । दारूण कठीण पाप हें ॥२॥ तेंही नासें नामें कोटी । उच्चारी होटीं रामनाम ॥३॥ नामें नासे पाप । एका जनार्दनीं अनुताप ॥४॥
२६५८
मुळीच निर्विकार ब्रह्मा तें निश्चळ । त्यामाजीं चंचळ अहंस्फूर्ति ॥१॥ तेचि ज्ञप्तीकळा चिन्मात्र स्वरुप । तो हरी संकल्प पुरातन ॥२॥ संकल्पी कल्पेन तेचि मूळ प्रकृती । जन्म अव्यक्त ती माया पोटीं ॥३॥ तेथोनी हिरण्यगर्भ तें जन्मलें । तया पोटा आलें विराट पैं ॥४॥ गुणभूत देह होतो माये पोटीं । तत्त्वज्ञान पाठीं विस्तारलें ॥५॥ स्थळा पासोनियां मुळाकडे जावें । सर्वसाक्षी व्हावें स्वयंब्रह्मा ॥६॥ सदगुरुचा तो पैं जालिया प्रसाद । एकाजनार्दनीं बोध ठरावे तो ॥७॥
२६५९
मुळीचे आहे संतवचन । नामस्मरणें तरती जन ॥१॥ तोचि आधार धरुनी पोटीं । बोलतों नेहटीं भाविकां ॥२॥ अवघ्या यातीसी उद्धार । न लगे श्रम करा नामोच्चार ॥३॥ एका जनार्दनीं पूर्वापार । नामाचा बडिवार बोलती ॥४॥
२६६०
मूर्ति अनुपम्य विटेवरी साजिरी । पाउलें गोजिरें कोविळीं तीं ॥१॥ तेथें माझें मन वेडावलें भारी । परत माघारी परतेना ॥२॥ वेधलासेंअ जीव सुखा नाहीं पार । माहेर माहेर पंढरी देखा ॥३॥ एका जनार्दनीं सुखाची वसती । भाविकां विश्रांती पंढरीरावा ॥४॥
२६६१
मूर्ति चतुर्भुज वेल्हाळ । शंख चक्र गदा कमळ ॥१॥ मुकुट शोभे कटीं मेखळा । कांसे मिरवें सोनसळा ॥२॥ कौस्तुभ वैजयंती माळ । अकार्णा नयन विशाळ भाळ ॥३॥ ऐसा सुंदर सांवळा । एका जनार्दनी पाहें डोळा ॥४॥
२६६२
मूर्ति सांवळी गोमटी । अंगीं केशराची उटी ॥१॥ मुगुट कुंडलें वनमाळा । टिळक रेखिला पिवळा ॥२॥ कणीं कुडल मकराकार । गळं शोभें वैजयंती हार ॥३॥ नेत्र आकर्ण सुकुमार । एका जनार्दनीं विटेवर ॥४॥
२६६३
मूळ नाशासी कारण । कनक आणि स्त्री जाण ॥१॥ जो न गुंते येथें सर्वथा । त्याचा परमार्थ पुरता ॥२॥ जया सुख इच्छा आहे । तेणें एकान्तासी रहावें ॥३॥ दृष्टी नाणी मनुष्यासी । तोचि परमार्थासी राशी ॥४॥ एका जनार्दनीं धन्य । त्याचा परमर्था पावन ॥५॥
२६६४
मूळची एक सांगतों खूण । एक आधीं मग दोन । तयापासाव चार तीन । व्यापिलें पांचें परिपूर्णं ॥१॥ तें भरुनी असें उरलें । सर्वां ठायीं व्यापियलें । जळीं स्थळीं सर्व भरलें । शेंखीं पाहतां नाहीं उरलें ॥२॥ निवृत्ति ज्ञानदेव सोपान । हेचि जाणती प्रेमखुण । समाधी पावलें समाधान । नाहीं उरलें भिन्नाभिन्न ॥३॥ शरण एका जनार्दनीं । खुण बाणलीं निजमनीं । व्यापक दिसे तिहीं त्रिभुवनीं । गेला देहभाव विसरुनी ॥४॥
२६६५
मृगजळ जेथें नसे । तेथें वसे कोरडें ॥१॥ ऐसा घ्यावा अनुभव । पदोपदीं भाव जीवासी ॥२॥ जे दिसें ते नासे । ऐसें असे सर्वत्र ॥३॥ यापरी जाणावें मिथ्यापण । शरण एका जनार्दन ॥४॥
२६६६
मृगजळाचें दोहीं निःशेष जळ नाहीं । यापरी माया समूळ मिथ्या पाहीं ॥१॥ माया नाहीं माया नाहीं । जगचि ब्रह्मारुप पाहीं ॥२॥ दोराचें सर्पत्व जिताचि मेलें । मायोची बद्धता तुजचि तुझेनि बोले ॥३॥ एका जनार्दनीं पाहतां चैतन्यघन । बद्धता मुक्तता समुळ मिथ्या जाण ॥४॥
२६६७
मृगजळाचेनि काय तृषा हरे । अर्कफळें निर्धारें नोहे तृप्ति ॥१॥ पाहतां गोजिरें दिसे वृदांवन । कैं गोडपर न ये त्यासी ॥२॥ बचनाग खातां आधीं लागे गोड । शेवटीं अवघड देहपीडा ॥३॥ एका जनार्दनीं दुर्जन अभाविकक । खळ अमंगळ देख संसारांत ॥४॥
२६६८
मृगजळाच्या पुरीं गुंतशीं पामरा । कोण तुज निर्धारा सोडविल ॥१॥ पडशी पतनी चौर्‍यायंशीं आवर्ती । तेव्हा तुझी गती कैशी होय ॥२॥ जीवीं जीवपण शिवीं शीवपण । वेगळें तें जाण दोन्हीं होती ॥३॥ यातना अनंत तुज भोगविती । तेथें काकुळती कोणा येशी ॥४॥ यमाचे ते दूत मारिती पामरा । कां रे संसारा न चुकशी ॥५॥ एका जनार्दनीं सांगतो विचार । रामनामें परिकर जप करी ॥६॥
२६६९
मृगजळीं पहातां दिसतसे जळ । परी तें कोरडेंचि केवळ ॥१॥ तेवीं दिसे जगदाभास । अवघा मिथ्या साभिलाष ॥२॥ जेथें मिथ्या द्वैत भाविक । पहातां जनार्दनचि एक ॥३॥ तरंग हरपलें पाणी । शरण एका जनार्दनीं ॥४॥
२६७०
मृतिका आणि अग्नी । देहासी दहन । वस्तुतें व्यापुन । घेतलीं दोनीं ॥१॥ अग्नीमाजीं अग्निरुप । मृत्तिकामाजीं मृत्तिकारुप । जैसें आपीं आप । मिळोनि गेलें ॥२॥ वस्तु नाहीं एकदेशी । ते सर्वत्र समरसी । जयाचे प्रकाशीं । त्रैलोक्य वर्ते ॥३॥ तैसे मेले आणि जीत । हें अज्ञान भासत । तें वस्तुंतें नांदत । देहींमाजीं ॥४॥ एका जनार्दना । विचारुनीं ज्ञानी । संशयापासोनी । मुक्त झाले ॥५॥
२६७१
मेघ वर्ष निर्मळ जळ । जैसें बीज तैसें फळ ॥१॥ तया परी भक्ति कीजे । बीजासारिखें फळ घेईजे ॥२॥ उत्तम अलंकार गोमटे । तेथें नाक असे नकटें ॥३॥ भजना जातां लाज वाटे । वेश्याघरीं भांग घोटे ॥४॥ एका जनार्दनीं नर । प्रत्यक्ष जाणावा तो खर ॥५॥
२६७२
मेघदर्शनें मयूर नाचतीं । चंद्रदरुशनें चकोर सुखावती ॥१॥ धेनुदर्शन वत्सें सुखावती । साधुदर्शनें जीवा आनंदवृत्ती ॥२॥ सुर्यदर्शनें जीवाते सुख होय । पितृदर्शनें सुपुत्रा आनंद होय ॥३॥ मातृदर्शनें कन्या सुख मानें । मित्रदर्शनें सुमित्रा आनंदी ठाणें ॥४॥ या रिति सतत चिंतितां हरी । एका जनार्दनीं धन्य संसारीं ॥५॥
२६७३
मेघापरिस उदार संत । मनोगत पुरविती ॥१॥ आलिया शरण मनें वाचा । चालविती त्याचा भार सर्व ॥२॥ लिगाड उपाधी तोडिती । सरते करिती आपणामाजीं ॥३॥ काळाचा तो चुकवितो घाव । येउं न देती ठाव आंगासी ॥४॥ शरण एका जनार्दनीं । तारिले जनीं मूढ सर्व ॥५॥
२६७४
मेळवीं संवगडे खेळतसे बिन्दी । शोभतसे मांदी गोपाळांची ॥१॥ सांवळां सुंदर वैजयंती हार । चिन्मय परिकर पीतांबर ॥२॥ मुगुट कुंडले चंदनाचा टिळा । झळके हृदयस्थळी कौस्तुभमणी ॥३॥ एका जनार्दनीं वेधलेंसे मन । नाही भेद भिन्न गौळणीसी ॥४॥
२६७५
मेळवोनि मेळा गोपाळांचा हरी । निघे करावया चोरी गोरसाची ॥१॥ धाकुल सवंगडी घेऊनि आपण । चालती रामकृष्ण चोरावया ॥२॥ ठेवियलें लोणी काढितो बाहेरी । खाती निरंतरी संवगडी ॥३॥ एका जनार्दनीं तयाचें कौतुक । न पडे ठाऊके ब्रह्मादिकां ॥४॥
२६७६
मेळेवानि मुलें करावी हे चोरी । पूर्ण अवतारी रामकृष्न ॥१॥ पाळती पाहती एका जाणविती । सर्वे जाऊनी खाती दहींदूधा ॥२॥ सांडिती फोडिती भाजन ताकाचें । कवळ नवनीताचे झेलिताती ॥३॥ एका जनार्दनीं नाटकी तो खेळ । न कळे अकळ वेदशास्त्रां ॥४॥
२६७७
मैं ज्यावगी छोरकर तोरे गांवाछे । तूं खोरी मतकर मोरे लालछे ॥१॥ मोरे घर तूं आकर लालछे । माखन चुरावत आपणे हातछे ॥२॥ मैं कहँगी तोरे मातछे । किसननें चोरी करी मोरी घरछे ॥ ३॥ कहे एका जनार्दनी लालछे । चरण पकरु मो तुमछे ॥४॥
२६७८
मैं दधी बेचन मथुरा । तुम केवं थारे नंदजीको छोरा ॥१॥ भक्ति का आचला पकडा हरी । मत खेचो मोरी फारी चुनरीं ॥२॥ अहंकारको मोरा गरगा फोरा । व्हाको गोरस सबही गिरा ॥३॥ द्वैतनकी मोरी आंगेया फारी । क्या कहुं मैं नंगी नार उधारी ॥४॥ एका जनार्दनी ज्यासो भेटा । लागत पगसे कबु नहीं छुटा ॥५॥
२६७९
मोकळा मार्ग पंढरीचा । नाहीं साधन करणें साचा । योग अभ्यासाचा । श्रमाचि नको ॥१॥ जाय जाय पंढरपुरा । पाहे दीनांचा सोयरा । पुंडलिकें थारा । दिधला जाय आवडीं ॥२॥ तेथें करितां वसती । नाहीं तया पुनरावृत्ती । जन्ममृत्युची खंती न करी कांहीं ॥३॥ पावन तीर्थ महिवरी । समान या नाहीं दुसरी । एका जनार्दनीं निर्धारी । प्रेमे वारी करिती ॥४॥
२६८०
मोकळें तें मन ठेविलें बांधोनी । जनार्दनचरणीं सर्वभावें ॥१॥ स्थिर मति जाली वार्ता तीही गेली । द्वैताची फिटली सर्वसत्ता ॥२॥ मोह आशाबद्ध कमी निवारली । पावन तो जालों संतचरणीं ॥३॥ एका जनार्दनीं धन्य संतसेवा । उगविला गोंवा गुंती सर्व ॥४॥
२६८१
मोक्ष मुक्ति ऋध्दिसिध्दि । पाहतां समाधी ज्ञानदेवा ॥१॥ ऐसा लाभ सांगे देव । ऐके नामदेव आवडी ॥२॥ दरुशनें नासे व्याधी पीडा । ऐसा सवंगडा ज्ञानदेव ॥३॥ एका जनार्दनीं मापारी । नाचतसे अलंकापुरीं ॥४॥
२६८२
मोक्ष मुक्तीचे लिगाड । वागवी अवघड कासया ॥१॥ एक नाम जपा कंठीं । राबती कोटी मुक्ति देखा ॥२॥ मोक्ष तेथें जोडोनि हात । उभाचि तिष्ठत सर्वदा ॥३॥ एका जनार्दनीं देखा । मुक्ति फुका राबती ॥४॥
२६८३
मोक्ष मुक्तीचें ठेवणें । देती पेणें संत ते ॥१॥ नाहीं सायासांचे कोड । नलगे अवघड साधन ॥२॥ नको वनवनांतरी जाणें । संतदरुशनें लाभ हातां ॥३॥ एका जनार्दनीं शरण । संतसमान देवाच्या ॥४॥
२६८४
मोक्षमुक्ति काकुलती । संतांप्रती येताती ॥१॥ करा माझा अंगिकार । नाहीं थार तुम्हांवीण ॥२॥ हेंचि द्यावें आम्हांलागुनी । तुमचें चरणीं वास सदा ॥३॥ एका जनार्दनीं करी विनंती । कींव भकिती संतांप्रती ॥४॥
२६८५
मोह ममता ही समुळ नाशावी । तेव्हाचि पावावी आत्मशुद्धि ॥१॥ चित्तशुद्धि झालिया गुरुचरणसेवा । तेणें ज्ञानठेवा प्राप्त होय ॥२॥ एका जनार्दनीं प्राप्त झाल्या ज्ञान । ब्रह्मा परिपुर्ण अनुभवेल ॥३॥
२६८६
मौनचि आला मौनचि आला । मौन्य उभा ठेला विटेवरी ॥१॥ मौन्याचि ध्यान गोजिरें गोमटें । मौन्यचि ठेविले विटे समपद ॥२॥ मौन्यचि पैं माथां धरिला शंकर । मौन्य ध्यान दिगंबर बाळवेष ॥३॥ मौन्याचि एका शरण जनार्दनीं । मौन्याचि चरणीं मिठी घाली ॥४॥
२६८७
म्यां गुरु केला म्यां गुरु केला । सर्व बोध तेणें मज दिधला ॥१॥ घालुनियां भक्ति अंजन । दावियेलें विठ्ठलनिधान ॥२॥ कान फुकुनि निगुती । दिधलें संताचिये हाती ॥३॥ एका जनार्दनीं गुरु बरा । तेणें दाविलें परात्परा ॥४॥
२६८८
म्हणता दत्त दत्त । दत्त करी गुणातीत ॥१॥ दत्तनामाचा निजंछंद । नामें प्रगटे परमानंद ॥२॥ निज भाव समर्थ । जेथें नाम तेथें दत्त ॥३॥ एका जनार्दन दत्त । दत्त करी देहातीत ॥४॥
२६८९
म्हणती दक्षिण द्वारका । पुण्यभुमी वैकुंठीं देखा । पाहुनियां पुंडलीका । राहिलासे उभा विटेवरी ॥१॥ काय वर्णावा महिमा । न कळेचि आगम निगमं । वेदादिक पावले उपरमा । जयासी पैं वर्णितां ॥२॥ तो आला आपुले पायीं । भक्त इच्छा धरुनी हृदयीं । एका जनार्दनीं सायी । सर्वावरी सारखी ॥३॥
२६९०
म्हणती देव मोठे मोठे । पूजिताती दगडगोटे ॥१॥ कषाट नेणती भोगिती । वहा दगडातें म्हणती ॥२॥ जीत जीवा करुनि वध । दगडा दाविती नैवेद्य ॥३॥ रांदापोरें मेळ जाला । एक म्हणतो देव आला ॥४॥ नाक घासुनी गव्हार । देवा म्हणती गुन्हेगार ॥५॥ एका जनार्दनीं म्हणे । जन भुललें मुर्खपणें ॥६॥
२६९१
म्हणती नरदेह पावन । परी अत्यंत निंद्य जाण ॥१॥ योनिद्वारें ज्याचें जनन । सवेंचि मरण लागलेंसे ॥२॥ जंव जन्मलेंचि नाहीं । तंव तें मरण लागलें पाहीं ॥३॥ गर्भाच्याही ठायीं भेवो । मरण भावों न चुकेची ॥४॥ एका जनार्दनीं नाहीं मरण । तेथें नाहीं जनन येणें जाणें ॥५॥
२६९२
म्हणा तुम्हीं विष्णुदास । तेणें पुरे तुमची आस । काळा पडे त्रास । नामस्मरणें करूनी ॥१॥ उघडा मंत्र विठ्ठल हरी । सदा वाचे जो उच्चारी । होतसे बोहरी । पातकांसी तात्काळ ॥२॥ न लगे कांहीं साधन । वाचे म्हणा रामकृष्ण । एका जनार्दनीं शरण । कायावाचामनेंसी ॥३॥
२६९३
म्हणे कृष्णराया शाळीग्राम देई । येरू लवलाही वदन पसरी ॥१॥ चवदा भुवनें सप्त तीं पाताळें । देखियलीं तात्काळें मुखमाजीं ॥२॥ स्वर्गीचे देव मुखामाजी दिसती । भुलली चित्तवृत्ति नंदराव ॥३॥ एका जनार्दनी नाठवें भावना । नंद आपणा विसरला ॥४॥
२६९४
म्हणे नामयासी क्षण एक न पाहातां । होय माझ्या चित्ता कासाविशी ॥१॥ तुमचा पुत्र तुम्हांसी जैसा प्रिय । तैसा मज होय नामदेव ॥२॥ क्षणोक्षणीं येणें पुरविली पाठी । लाविली लंगोटी आम्हांलागीं ॥३॥ एका जनार्दनीं वारितां नायके । येऊनियां सुखें बैसतो घरीं ॥४॥
२६९५
यमुने तटीं मांडिला खेळ । मेळवोनी गोपाळ सवंगडे ॥१॥ जाहले गडी दोहींकडे । येकीकडे रामकृष्ण ॥२॥ खेळती विटीदांडु चेंडु । भोवरें लगोर्‍या उदंडु ॥३॥ ऐसा खेळ खेळे कान्हा । एका जनार्दनीं जाणे खुणा ॥४॥
२६९६
यमुनेचे तीरीं नवल परि वो । तेथें गोपाळ वत्सें स्वयं झाला हरी वो ॥१॥ नवल देखा ठक तिन्हीं लोकां । भुली ब्रह्मादिकां पार नाहीं सुखा ॥२॥ कृष्णवत्साची ध्वनी गाइ पान्हा । तेथें वोळलें निराळे विस्मयो गौळीजनां ॥३॥ गोपाळांचे वचनीं सुखें सुखा भेटी । तेथें वोसंडला आनंद माय कृष्णीं भेटी ॥४॥ ऐसा रचिला आनंद देखोनि निवाडा । तेथे सृष्टिकर्ता तोहि झाला वेडा ॥५॥ ऐसें अचोज पै मना नये अनुमाना । अचुंबीत करनें एका जनार्दना ॥६॥
२६९७
यशोदेचा हरी जाय यमुनातीरीं । वाजवीतो मुरली पोवा नानापरी ॥१॥ छंदे छंदे वाजे वृंदावनीं फुजें । वेधलें मन माझें नाठवें कांहीं ॥२॥ ऐसें येणें पिसें लाविलें गे माये । एका जनार्दनीं पाहिला यादवराय ॥३॥
२६९८
यशोदेसी गौळणी सांगती गार्‍हाणे । नट नाटक कपटी सांभाळ आपुले तान्हें । किती खोडी याच्या सांगु तुजकारणें ॥१॥ सहस्त्रमुख लाजला । निवांतचि ठेला । वेद परतला ।गाती अनुछंदे । वेध लाविला गोविंदे । परमानंदे आनंदकंदें ॥धृ॥ एके दिवशी मी गेलें यमुनातट जीवना । गाई गोप सांगतें घेऊनि आला कान्हा । करीं धरी पदरा न सोडी तो जाणा । एकांत घातली मिठी । न सुटे गांठीं तो पाहिला दृष्टी । नित्य आनंदु वेध लाविला ॥२॥ माझ्या घरासी एकदां आले शारंगपाणी । दहीं दुध भक्षुनी रितीं केली दुधाणीं । अज्ञान मडकीं टाकिलें निपटुनी । पाहिला हरी पळाला दुरी । घरा भीतरीं बाई यशोदे । वेध लाविला ॥३॥ किती खोडी याच्या सांगू तुज साजणी । गुण यांचे लिहितां न पुरे मेदिनी । रुप सुंदर पाहतां न पौरे नयनी । एका जनार्दनीं देखिला । ध्यानी धरिला । मनीं बैसला । सच्चिदानंद ॥ वेध लाविला ॥४॥
२६९९
या देहा अमंगळा । पासुनी आत्मा वेगळा । ऐसा ज्ञानाचा डोळा । प्रत्यक्ष दिसे ॥१॥ ज्ञान म्हणजे शुद्ध सत्वगुण । जेथें द्वैत प्रकृतीचें अधिष्ठान । जी पासाव सव्वीस लक्षणें । बोलिलें षोढशाध्यायीं ॥२॥ ते दैवी प्रकृतीचें घरीं । परमात्मा राज्य करी । तो जयाएं अंगिकारी । तो सुटला गा ॥३॥ या पुरुषाचें बेचाळीस कुळ । पद पावले अढळ । आत्मतत्त्वीं सकळ । मिळणी आली ॥४॥ एका जनार्दनीं तेचि भेटी । जे अहंभावाची सुटे गांठीं । तो दैवी प्रकृतीचे मुगुटीं । सहजचि बैसे ॥५॥
२७००
या पंढरीचे सुख पाहतां डोळां । उभा तो जिव्हाळा योगीयांचा ॥१॥ म्हणोनियां मन वेधलें चरणीं । आणिक त्यागुनी बुडी दिली ॥२॥ जनार्दनाचा एका धांवे लोटांगणीं । करी वोवाळणी शरीराची ॥३॥
२७०१
या पाउलासाठीं लक्ष्मी पिसी । सनकादिक वेडावले मानसीं ॥१॥ सुख जोडलें पुंडलिकासी । विटेवरी हृषिकेशी ॥२॥ म्हणे जनार्दनाचा एका । धन्य धन्य पुंडलीका ॥३॥
२७०२
या पोटाकारणें न करावें तें करिती । वेद ते विकिती थोर याती ॥१॥ नीचासी शब्दज्ञान सांगती ब्राह्मण । ऐकती ब्रह्माज्ञान त्यांचें मुखें ॥२॥ श्रेष्ठवर्ण होउनी नीचकर्म करिती । कांहीं न तें भीती पुण्यपापा ॥३॥ एका जनार्दनीं सांडोनि आचार । करिती पामर नानामतें ॥४॥
२७०३
या रे नाचुं प्रेमानंदे । रामनामचेनि छंदें ॥१॥ म्हणा जयरामा श्रीराम । भवसिंधु तारक नाम ॥२॥ ऐसी नामाची आवडी । काळ गेला देशोधडी ॥३॥ आवडीने नाम घोका । म्हणे जनार्दन एका ॥४॥
२७०४
या हो या चला जाऊं कीर्तना । आनंद तेणें मना नाचती वैष्णव ॥१॥ राम कृष्ण हरि वासुदेवा । गातती प्रेमभाव आवडी आदरें ॥२॥ सुख तेथें शांती विरक्ति कोण पुसे । सबाह्म अभ्यंतरीं अवघा वासुदेव वसे ॥३॥ एका जनार्दनीं वासुदेवीं मन । जन वन तेथें अवघा जनार्दन ॥४॥
२७०५
याचिया छंदा जें पैं लागलें । निर्मूलन केलें त्यांचे येणें ॥१॥ बापुडा नारदु लाविला लंगोटी । हिंडे दाटोदाटि त्रैलोक्यांत ॥२॥ हरिश्चंद्र शिबी कोण यांची गती । आपण निवांत चित्तीं पाहतसे ॥३॥ एका जनार्दनीं याचा छंद नाहीं बरा । मैंद खरा वाळुवंटीं ॥४॥
२७०६
याचिये संगतीं दु:खाची विश्रांती । संसार वाताहाती होत असे ॥१॥ आम्ही प्रंपचीक करावा प्रंपच । हा तो निष्प्रपंच होउनी असे ॥२॥ येणें आमुच्या पोरा लावियेला चाळा । आपण निराळा राहुतसे ॥३॥ एका जनार्दनीं ऐशियाची माव । न येतां नामदेव कींव भाकी ॥४॥
२७०७
यातिहीन असो भला । जो या गेला शरण संतां ॥१॥ त्यांचें जन्ममरण चुकलें । पावन जाहलें तिहीं लोकीं ॥२॥ उत्तम अधम न म्हणती । समचि देती सर्वांसी ॥३॥ शरण एका जनार्दनीं । केलें पावन दीनालागुनी ॥४॥
२७०८
यातीकुळ कांहीं नाणी तो मानसीं । धांवें त्यांचे पाठीसी लागवेंगें ॥१॥ आपुलें म्हणविल्या न देखे पारिखें । रक्षी त्या कौर्तुकें आपुले काजा ॥२॥ एका जनार्दनीं पहा अनुभव । धांवतसे देव लवलाहे ॥३॥
२७०९
यातीसी नाहीं कारण । नामस्मरण हरीचें ॥१॥ तेणें तराल भवपार । आणिक विचार न करा ॥२॥ मागां पहा अनुभव । तारिले जीव निर्जिव ॥३॥ स्त्रिया शूद्र नारी नर । नामें निर्धारा मुक्तिपद ॥४॥ एका जनार्दनीं नाम । जपा विश्रामदायक ॥५॥
२७१०
याहांकी बात नहीं मेरी आवछे । तोरे चरण कमल मैं द्यावछे ॥१॥ सुंदरतुन नंदनंदन लालछे । गळां शोभे वैजंयती मालछे ॥२॥ पीत पीतांबर घोंगरीयाछे । गोपाल नाचती तोरे सातछे ॥३॥ एका जनार्दनी रखत गावढीछे । चित्त जडे मोरे पावडीछे ॥४॥
२७११
युगायुगीं पीडिली विरहिणी । नाठवीं ध्यानीं मनीं चक्रपाणी । म्हणोनी वियोगाची जाचणी । तो भेंटला संतसंग साजणी ॥१॥ विरह गेला सुख झालें अपार । जन्मोजन्मी चीं तुटे वेरझार वो ॥धृ॥ घडतां संतसंग विश्रांती । तुटली माया पडळभ्रांति । भव संसार याची झाली शांती संतमहिमा वर्णावा किती ॥२॥ महिमा वर्णितां विरहा फिटलें । एका जनार्दनी तया भेटलें । सुख अनुभवे अंतरीं दाटलें । विरहाचें बीज भाजिलें वो ॥३॥
२७१२
युगें आठ्ठावीस जालीं । परी न बैसें तो खालीं ॥१॥ कोण पुण्य न कळे माय । विटे लाधलें या विठ्ठलाचें पाय ॥२॥ नाहीं बोलाचालीअ मौन धरियलें । कैसें चाळविलें पुंडलिकें ॥३॥ एका जनर्दनीं विटेवर । दोन्हीं कटीं ठेविलें कर ॥४॥
२७१३
येई वो श्रीरंगा कान्हाबाई । विरहाचें दुःख दाटलें हृदयीं । कोण सोडवील यांतुन पाहीं । दैवयोगें सांपडला सगुण देहीं ॥१॥ सगुण निर्गुण याचा वेध । वेधें वेधलें मन झालें सद्गद । वाचा कुंठित हारपला बोध । नेणें आणिक परमानंद ॥२॥ स्थित स्थित मति झाली । वृत्ति विरक्ति हारपली समाधि उन्मनी स्थिरावला । ऐशी विरहाची मति ठेली वो ॥३॥ संगविवर्जित मन झालें । काया वाचा मन चित्त ठेलें । एका जनार्दनीं ऐसें केलें । विरह दुःख निरसिलें ॥४॥
२७१४
येई हो कान्हाई मी दळीन एकली । एकली दळीतां शिनले हात लावी वहिली ॥धृ॥ वैराग्य जातें मांडुनी विवेक खुंटीं थापटोनी । अनुहात दळण माडुनि त्रिगुण वैरणी घातलें ॥येई ॥१॥ स्थुळ सूक्ष्म दळियलें देहकारणसहित महाकारण दळियलें औट मत्रेसहित । येई ॥२॥ दशा दोनी दाळिल्या द्वैत अद्वैतासहित । दाही व्यापक दळियेंले अहं सोहं सहितं ॥येई ॥३॥ एकवीस स्वर्ग दळियेलें चवदा भवनासंहित । सप्त पाताळें दलियेंलीं सप्त सागरांसहित । येई ॥४॥ बारा सोळा दळियल्या सत्रावीसहित । चंद्र सुर्य दळियलें तारागणांसहित ॥येई ॥५॥ नक्षत्र वैरण घालुनी नवग्रहांसहित । तेहतीस कोटी देव दळियेलें ब्रह्मा विष्णुसहित ॥येई ॥६॥ ज्ञान अज्ञान दळियेलें विज्ञानसहित । मीतुंपण दळियेलें जन्ममरणसहित । येई ॥७॥ ऐसें दळण दळियेलें दोनी तळ्यासहित एका जनार्दनीं कांहीं नाहीं उरलें द्वैत ॥येई ॥८॥
२७१५
येउनी नरदेहा गमविलें आयुष्य । नाहीं हृषीकेश स्मरला मनीं ॥१॥ मुखें नाहीं केलें देवाचें स्मरण । ऐसा अधम जन जाहलों देवा ॥२॥ नाहीं तें ऐकलें कीर्तन संतांचे । कर्ण बधिर साचें जाहलें देवा ॥३॥ करें नाही केला दानधर्म कांहीं । ऐसा अपराधी पाहीं जाहलों देवा ॥४॥ चरणन चालती तीर्थयात्रेप्रती । ऐसा आत्मघाती जाहलों देवा ॥५॥ एका जनार्दनीं संसारांचा छंद । नाहीं तो गोविंद आठविला ॥६॥
२७१६
येउनी नरदेहा भूतातें पूजिती । परमात्मा नेणती महामुर्ख ॥१॥ दगडाच्या देवा सेंदुराचा भार । दाविती बडीवार पूजनाचा ॥२॥ रांडापोरें घेती नवासाची बगाड । नुगवे लिगाड तयाचेनि ॥३॥ आपण बुडती देवा बुडविती । अंतकाळी होती दैन्यावाणें ॥४॥ एका जनार्दनीं ऐसिया देवा । जो पूजी गाढवासम होय ॥५॥
२७१७
येऊनि नरदेहीं वायां जाय । नेणें संतसंग कांहीं उपाय ॥१॥ कली वाढलासे अधम । ब्रह्माण सांडिती आपुलें कर्म ॥२॥ शुद्ध याति असोनि चित्त । सदा नीचाश्रय करीत ॥३॥ देवपूजा नेणें कर्म । न घडे स्नानसंध्या धर्म ॥४॥ ऐसा कलीचा महिमा । कोणी न करी कर्माकर्म ॥५॥ एका जनार्दन शरण । घडो संतसेवा जाण ॥६॥
२७१८
येऊनियां कांता सांगे गोरियासी । सहकुटुंबेंसी विठा नाहीं ॥१॥ मृत्तिका आणावयाची नाहीं जाहली वेळ । गेलासे समूळ न पडे दृष्टीं ॥२॥ ऐकतांचि ऐसी ज्ञानदेवें गोठी । गोरियासी कंठी धरियेलें ॥३॥ परदेशी नोहे पंढरीपणा । केलेंसे कारणा कार्य तुझें ॥४॥ आमुतें न भेटे जाहला असे गुप्त । एका जनार्दनीं मात प्रगटली ॥५॥
२७१९
येऊनियां घरा नामदेव पाहे । आजी दिसताहे विपरीत ॥१॥ राजाई तो पुढें येऊनियां बोले । देवें नवल केलें आपुले घरी ॥२॥ जातां चंद्रभागें परीस सांपडला । आपुला तो गेला दैन्यकाळ ॥३॥ एका जनार्दनीं ऐकोनियां मात । क्रोधें पैं संतप्त मनीं नामा ॥४॥
२७२०
येऊनियां घरा बोले राजाईस । या परिसें सुवर्णासी करीं आतां ॥१॥ आजाचिये दिन ठेवीं आपुले घरीं । आपदा ती हरी प्रपंचाची ॥२॥ सरलिया काम देईं मजलागीं । म्हणोनियां वेगें गृहां आली ॥३॥ एका जनार्दनीं झाली ऐसी मात । नामयासी श्रुत केली नाहीं ॥४॥
२७२१
येऊनियां पंढरपुरा । उभा सामोरा पुडलिका ॥१॥ उभारुनी बाह्मा हात । भक्ता इच्छिलें तें देत ॥२॥ भलते याती नारी नर । दरुशनें उद्धार सर्वांसी ॥३॥ साक्ष भीमरथी आई । एका जनार्दनीं पाही ॥४॥
२७२२
येऊनियां परिसा बोले राजाईसी । आमुचा परीस मजसी देईं बाई ॥१॥ राजाई तंव म्हणे घेऊनि नामदेवें । गेले ते स्वभावें राउळासी ॥२॥ तुम्ही बसा घरीं मी जातें राउळीं । म्हणोनियां वेगीं आली राउळासी ॥३॥ घालूनियां नामा दंडवत देवा । सांगितला भाव सर्व मनींचा ॥४॥ एका जनार्दनीं नामदेव बोले । परिसा टाकियेलें चंद्रभागें ॥५॥
२७२३
येऊनियां मातेपाशीं सांगे वृत्तांत । नामयाची होत आपदा घरीं ॥१॥ आपुला परीस देऊं क्षणभरी । आपदातें दुरी करुं त्याची ॥२॥ एका जनार्दनीं करुनि विचार । परीस तो साचार घेऊनि आली ॥३॥
२७२४
येऊनी नामदेव बोले धोंडोबासी ऐवज आमुचा आम्हांसी द्यावा आतां ॥१॥ तुमचा तो करार जाहलासे संपूर्ण । ऐवज आमुचा जाण आम्हां द्यावा ॥२॥ परि तो प्रत्यक्ष धोंडोबा दगड । अचेतन मूढ जीव नाहीं ॥३॥ धोंडोबा गणोबा एके ठायीं केले । कांहीं तुम्ही वहिलें बोलानाची ॥४॥ एका जनार्दनीं घेउनी धोंडोबासी । आपुले घरासी नामा आला ॥५॥
२७२५
येऊनी राउळा सांगे विठोबासी । वडील आम्हांसी गांजिताती ॥१॥ उदईक कापड घेऊनि बाजारासी जातों । परतोनि येतो सवेंचि घरा ॥२॥ व्यापार करावा तो कैसा मी नेणें । जन्मोनि पोसणें तुमचें देवा ॥३॥ आलें जें भोगांसी ते करणें लागे । एका जनार्दनीं सांगे गुज देवा ॥४॥
२७२६
येकीपुढें येक सरसावोनि गोपिका । सांगतो गाह्माणीं तुज नाहीं ठाऊका ॥१॥ रात्री मंचकावारी पहुडतां साजणी । अवचित येऊनी बांधी दाढी आणि वेणी ॥२॥ नाहतां आपुलेअ अंतसदनीं । येऊनियां पुढें बैसें शारंगपाणी ॥३॥ ऐसा कटाळा आणियला येणें । एका जनार्दनीं तुझें आवडतें तान्हें ॥४॥
२७२७
येणें आमुचे पोरा लावियेला चाळा । आपण निराळा वेगळाची ॥१॥ याचें तो बिढार राउळींच असे । आम्हांसी कोपट नसे बैसावया ॥२॥ एका जनार्दनीं किती यासी बोलूं । नायके विठ्ठलु आमुचें तो ॥३॥
२७२८
येणें आमुच्या पोरा लाविलासे चाळा । तो हा वेगळा उपाधीसी ॥१॥ प्रपंचाचा धाक नाहीं याचे मागें । फ़िरतसे अंगे घरोघरीं ॥२॥ घरीं कोंडोनियां ठेवितां नामयासी ।A आपण त्यापाशीं बैसतसे ॥३॥ जातो येतो कैसा न पडेचि दृष्टी । एका जनार्दनीं नाही विठु ऐसा ॥४॥
२७२९
येणें कृष्णें आमुचें खादलं दुध दहीं । फोडोनि टाइलें भाजनें पाहीं ॥१॥ आवरी आवरी बाई आपुला कान्हा । न कळे याची कारणी ब्रह्मादिकां नये ध्याना ॥२॥ घेऊनियां पोरें घरामध्यें येतो पाहे । चोरी करुनियां पळुनी जातो लवलाहें ॥३॥ एका जनार्दनीं किती सांगू गार्‍हाणें । पुन्हां आलिया यासी शोक लावीन सत्य जाणे ॥४॥
२७३०
येणें छंदे छंद लागली नव्हाळी । हा कान्हो वनमाळी वेध याचा ॥१॥ सरितां सरेना बैसला हृदयीं । तो आतां ठाईचें ठायीं जडलासे ॥२॥ एका जनार्दनी नोहेची परता । संपूर्ण पुरता भरला देहीं ॥३॥
२७३१
येणें जानें खुंटलें क्रियाकर्म ठेलें । मज माझें भेटलें आत्मरुप ॥१॥ त्यागुं तें काय भोगुं तें काय । सर्व ब्रह्मारुप पाहे कोंदाटलें ॥२॥ क्रियाकर्मधर्म निखिळ परब्रह्मा । त्यागुं भोगुं तेथें केवळ भ्रम ॥३॥ एका जनार्दनीम सहजीं सहज एक । एकीएक पहातां कैंचे अनेक ॥४॥
२७३२
येणें पंथें बहुत तरले निश्चितीं । आवडी जे गाती विठोबासी ॥१॥ तारक हा मंत्र सोपा पैं सर्वासी । उच्चारितां अहर्निशीं सर्वसिद्ध ॥२॥ पापा प्रायश्चित कलियुगीं नाम । आणिक सोपें वर्म संतसेवा ॥३॥ न लगे दंडन मुंडन ते आटी । नाम घेतां होटीं सर्व जोडें ॥४॥ एका जनार्दनीं संतांसी शरण । चुके जन्ममरण नाना पीडा ॥५॥
२७३३
येणें पांडुरंग लावियेला चाळा । बैसलासे डोळां निवडेना ॥१॥ मनाचियें मनें घातिलेंसे ठाण । नोहे उत्थानपन कोणीकडे ॥२॥ वेधकु वेधकु पंढरीचा राणा । एका जनार्दना शरण होय ॥३॥
२७३४
येणें पुरतें सर्व काज । विश्वास हा जाहला मज । सांपडलें तें निज । बहुकाळांचे ठेवणे ॥१॥ केला पुंडलिकें उपकार । दाविला सोपामार्ग निर्धार जडजीवां उद्धार । नाममत्रें एकाची ॥२॥ तुटलीं बंधने । मागा पाहा अनुभणे एका जानार्दनीं म्हणे । धन्य वास पंढरीसे ॥३॥
२७३५
येणेंचि आश्रमें साधती साधनें । तुटती बंधनें यमपाश ॥१॥ काया क्लेश न करणें व्रत तप दान । न लगे हवन तीर्थाटन ॥२॥ संतांचा सांगत गावें रामनाम । सुखें सुख विश्राम लाभे तुजसी ॥३॥ प्रपंच परमार्थ ऐक्य रुपें दोन्हीं । तोचि ब्रह्माज्ञानीं मनीं समजा ॥४॥ व्यापक तो जगीं व्यापुनीं निराळा । एका जनार्दनीं वेगळा सुखदुःखां ॥५॥
२७३६
येणेंचि नामें तारिलें बहुतां । दोषी तो पुरता अजामेळ ॥१॥ गणिका आणि वाला अजामेळ भिल्लणी । गोपाळ गौळणी तारियेल्या ॥२॥ गजेंद्र तो पशु नाडितां जळचर । धांवे देव सत्वरें ब्रीदासाठीं ॥३॥ प्रल्हाद संकट पडता निवारी । चोखयाचें करी बाळंतपण ॥४॥ दामाजीचा महार होऊनियां ठेला । उणेंपण त्याला येवों नेदी ॥५॥ एका जनार्दनीं भक्तांचा अंकित । उभाचि तिष्ठत विटेवरी ॥६॥
२७३७
येती कीर्तना आल्हादें । गाती नाचती परमानंदे । सुखाची तीं दोंदें । आनंदें तयासी ॥१॥ धन्य धन्य कीर्तन । धन्य धन्य संतजन । जाले कीर्तनीं पावन । परमानंदगजरीं ॥२॥ हरि कृष्ण गोविंद । हाचि तया नित्य छंद । तेणें जाय भेदाभेद । कीर्तनगजरीं ॥३॥ एका जनार्दनीं सार । कीर्तनीं केलासे निर्धार । आणिक नाहीं दुजा विचार । कीर्तनावांचोनी ॥४॥
२७३८
येती नरदेहा गमाविती आयुष्य । प्रथम बाळदशेस । भोगिताती ॥१॥ वाचा नाहीं तया रडे आक्रंदोनी । जननीं तों स्तंनीं लावी बळें ॥२॥ क्षुधा लागलीया औषध पाजिती । उदर दुखतां देती स्तन बळें ॥३॥ संपता द्वादशा जालासे शहाणा । करुनी अंगना वेगीं देती ॥४॥ विषयाचे बळें मातलासे सर्व । सदा धुस् दर्प अंगीं वसे ॥५॥ सरलीया तारुण्य आला वृद्ध दशे । भोगितसे क्लेश नाना व्याधी ॥६॥ रामनाम वाचें सदा आठवणी नाहीं । धन दारा पुत्र पाही माझें माझें ॥७॥ शेवटील घडी परिपुर्ण भरली । माती जड झाली पापिष्ठाची ॥८॥ येउनी यमदूत नेताती बांधुन । नानापरी ताडन करिताती ॥९॥ यातना ती सर्व भोगुनी ढकलिती । पुनरपि येती गर्भवासा ॥१०॥ चौर्‍यांयशी लक्षा योनी फिरतां फिरतां । एका जनार्दनीं तत्त्वतां नरदेह ॥११॥
२७३९
येथोनी आनंदु रे । कृपासागर तो गोविंदु रे ॥१॥ महाराजाचें राउळी । वाजे ब्रह्मानंद टाळी ॥२॥ आनंदले भक्तजन । म्हणे धन्य रघुनंदन ॥३॥ लक्ष्मी चतुर्भुज झाली । प्रसाद घेउनी बाहेर आली ॥४॥ एका जनार्दनीं नाम । पाहतां निवे आत्माराम ॥५॥
२७४०
येवढा पुरवा मनींचा छंद । वाचे गोविंद आठऊं द्या ॥१॥ मग मी तुमच्या न सोडीं पायां । कारीन काया कुर्वंडीं ॥२॥ वारंवार क्षणक्षणा । संत चरणीं वंदीन ॥३॥ दुजा नका काहीं हेत । एका जनार्दनीं मागत ॥४॥
२७४१
येवढा मंत्र सोपा सांडोनी सायासीं । कां रें प्रपंचासी गुंतुनीं पडसी ॥१॥ वाचे ब्रह्मज्ञान गोष्टी ते फोल । अंतरींचे बोल सर्व वायां ॥२॥ वृंदावनाचे परी वर वर रेखा । तैसें पढतमूर्खा वेद गोष्टी ॥३॥ एका जनार्दनीं प्रपंच टाकुनीं । परमार्थ साधनीं रिघें वहिला ॥४॥
२७४२
येवोनि गोपाळ कृष्णासी बोलतीं । यमुनेचा बाऊ पळाला वो श्रीपती ॥१॥ धन्य बळीया आम्हीं की वो त्रिभुवनी । धन्य धन्य कृष्णा म्हणोनि नाचती अवनी ॥२॥ एका जनार्दनीं ऐकोनी तयांचे बोल । आनंदे गोपाळ तयाशीं खेळे ॥३॥
२७४३
येवोनिया काळ बैसलासे उसां । झाकितोसी कैसा डोळे आतां ॥१॥ वाचे नारायण वदे तूं सादर । काळपाश साचार चुके जेणें ॥२॥ वायां हा संसार करसी हावभरी । काळाची तो फेरी निकट आली ॥३॥ एका जनार्दनीं नको यातायाती । संसार फजिती जन्म दुःख ॥४॥
२७४४
येवोनियां जवळीं बोभाट तो केला । धरुनी हाताला पुसती जाहली ॥१॥ ठेवूनियां बाळ जीवनालागीं गेलें । तुम्हीं काय केलें बाळ माझें ॥२॥ परि तो समाधिस्थ नायकेचि बोल । वाचे गाय विठ्ठल प्रेमभरित ॥३॥ नाचे आनंदानें गाय नामावळी । एका जनार्दनीं बोली कोण मानी ॥४॥
२७४५
येवोनियां रागें नाम्यासी बोलत । व्यापार बहुत निका केला ॥१॥ चतुर व्यापारी जाहलासी सुजाण । आतां आम्हांकारण काय कमी ॥२॥ तुझिये व्यापारें भोपळा हा घ्यावा । भिकेसी बरवा उपाय असे ॥३॥ एका जनार्दनीं दामा बोले क्रोधें । नामा तो सद्वदे उत्तर देत ॥४॥
२७४६
येवोनी जवळीं कुर्वाळिलें वदन । चालिले स्फ़ुंदन सदगदित ॥१॥ सांवता म्हणे नाम्या कां रे रडतोसी । काय जाहले तुजसी सांग मज ॥२॥ नामा म्हणे देव पळोनियां आले । येथें गुप्त जाहले न कळे कांहीं ॥३॥ एका जनार्दनीं करितसे खेद । कां हो तो गोविंद दुरी गेला ॥४॥
२७४७
येव्हढें जया कृपेचें करणें । रंक राज्यपदें मिरवती ॥१॥ तो हा कल्पतरु गुरुजनार्दनु । छेदी देहाभिमानु भवकंदु ॥२॥ कृपेचें वोरसें धांवे कामधेनु । तैसा माझा मनु वेधिलासे ॥३॥ एका जनार्दनीं तयावांचुनी कांहीं । दुजे पाहाणें नाहीं मनामाजीं ॥४॥
२७४८
योग याग तप नलगे साधन । वाचे रामकृष्ण जपे आधीं ॥१॥ कायिक वाचिक मानसिक भाव । तेणें सर्व ठाव एकरुप ॥२॥ संसार सांकडें भ्रमिष्टासी पडे । उच्चारितां नाम तया न पडे सांकडें ॥३॥ एका जनार्दनीं नेम हाचि राम । सोपें तें वर्म गूढ नको ॥४॥
२७४९
योग साधोनी पंचाग्नी साधिती । न कळे योगाची गती फजीतखोरा ॥१॥ वाउगें साधन वाउगें साधन । तेणें विटंबन होत असे ॥२॥ एका जनार्दनीं योगाचा योग । भजे पांडुरंग एका भावें ॥३॥
२७५०
योगयाग तप जयासाठीं करणें । तें उभे कोणें पंढरीसी ॥१॥ काउलाची पेठ पंढरीचा हाट । मिळाले घनदाट वानकरी ॥२॥ पताकांचे भार गर्जती हरिदास । होऊनी उदास सर्वभावें ॥३॥ एका जनार्दनीं नाहीं कामक्रोध । अवघा गोविंद हृदयीं त्यांचें ॥४॥
२७५१
योगयाग तप व्रतें आचरितां । नाम सोपें गातांसर्व जोडें ॥१॥ पाहोनियां प्रचीत नाम घे अनंत । तुटे नाना जपे नाम ॥२॥ एका जनार्दनीं नामाचा महिमा । वर्णितां उपरमा शेष आला ॥३॥
२७५२
योगियां न कळे वर्म । कोणा साधे शुद्ध कर्म । न घ्डे दान आणि धर्म । वाउगा श्रम जाणिवेचा ॥१॥ मुखें गाउं नाम वाचे । ब्रह्माज्ञान पुढें नाचे । भय नाहीं पापियां दुतांचे । आम्हांसी ते सर्वथा ॥२॥ ना करुं वाउग्या खटपटा । आगमनिगमांचा न घेऊ ताठा । वाउग्या त्या चेष्टा । नामविण न करुं ॥३॥ योगयाग न करुं तीर्थाटन । सुखें गाऊं जनार्दन । एका जनार्दनीं भजन । मुख्य मंत्र सोपरा ॥४॥
२७५३
योगियांचा मुकुट म्हणती धूर्जटी । तोही रामनाम कंठी जपताहे ॥१॥ स्पशानी तो राहे रामनाम गाये । भोवतें उभे पाहे ऋषी सर्व ॥२॥ सदा समाधिस्त रामनामें रंगला । वाचे सदा चाळा रामनाम ॥३॥ एका जनार्दनीं श्रीरामावांचुनीं । दुजा छंद मनीं नाही त्याचे ॥४॥
२७५४
योगियांचा योग साधन तें सांग । तो पांडुरंग विटेवरी ॥१॥ मुमुक्ष संपदा ज्ञानीयाचा बांधा । तो पांडुरंग विटेवरी ॥२॥ सच्चिदानंदघन अमुर्त मधुसुदन । एका जनार्दन विटेवरी ॥३॥
२७५५
योगियांचें ध्यान पैं विश्रांती । आदिशक्ति म्हणती तुम्हांलागी ॥१॥ नित्य मुक्त तुम्ही सर्व जीवां वंद्य । अकार उकार मकार भेद मावळला ॥२॥ अहं सोहं कोहं तुमचा प्रकार । वेदशास्त्र सार तुम्ही जाणां ॥३॥ अनुग्रह कृपेचा मजलागीं तो द्यावा । एका जनार्दनीं करावा कृपापात्र ॥४॥
२७५६
योगी ध्याती जया चिंतिती मानसी । तो हृषीकेशी पंढरीये ॥१॥ जाऊं लवलाहे पाहूं पैं चरण । क्षेमालिंगन देऊं सुखें ॥२॥ एका जनार्दनीं पाहतां रुपडें । ब्रह्मा फाडोवाडें विटेवरी ॥३॥
२७५७
योगी रिगाले कपाटीं । हटयोगी साधिती आटी ॥१॥ परी तयांसी दुर्लभ । तो गोकुळीं जाहला सुलभ ॥२॥ यज्ञादिकीं अवदाना नये । तो गोपाळांचे उच्छिष्ट खाये ॥३॥ सदा ध्याती जपी तपी ज्यासी । तो नाचे कीर्तनीं उल्हासीं ॥४॥ एका जनार्दनीं प्रेमळ । भोळ्या भाविकां निर्मळ ॥५॥
२७५८
योगी शिणताती साधनकपाटीं । तया नोहे भेटीं कांही केल्या ॥१॥ तो हरी गोकुळीं बाळवेषे खेळे । पुरती सकळ मनोरथ ॥२॥ गोपिका तयासी कडेवरी घेती । वालादुला म्हणती माझे माझें ॥३॥ एका जनार्दनीं जया जैसा हेत । तैसा पुरवीत देवराव ॥४॥
२७५९
योगी शिणती साधनीं । पावन होती ते कीर्तनीं ॥१॥ अष्टांग धूम्रपान । तया श्रेष्ठ हें साधन ॥२॥ समाधी उन्मनी । कीर्तनीं पावन हे दोनी ॥३॥ चौदेहांसी अतीत । कीर्तनीं होतीं तें मुक्त ॥४॥ कर्म धर्म न लगे श्रम । व्यर्थ वाउगा विश्रांम ॥५॥ कीर्तन छंद निशिदिनीं । एका शरण जनार्दनीं ॥६॥
२७६०
योगीयांचे चिंतनी न बैसे । यज्ञ यागादिकांसीं जो न गिवसे । तो भाविकांचें कीर्तनासरिसें । नाचतसें आनंदें ॥१॥ तो भाविकांचे कीर्तनीं आपुलें । सुख अनुभवी वहिलें । प्रेमें ब्रह्मानंदी डोले । वैष्णावांचें सदनीं ॥२॥ यज्ञांचें अवदानीं न धाये । तो क्षीरापतीलागीं मुख पसरुनि धांवें । केवढें नवले सांगावें । या वैष्णवसुखाचें ॥३॥ सुख येतें समाधानीं । म्हणोनि सुख जनार्दनीं । एका जनार्दनाचे चरणीं । सप्रेमें विनटला ॥४॥
२७६१
योग्याचे ध्यान बैसलेंसे मौन । तो हा निधान विटेवरी ॥१॥ विठ्ठल सांवळा पाहुं चला डोळां । धरुनी बाळलीला कटीं कर ॥२॥ संतांचा समुदाव आरत्यांची दाटी । नामघोष सृष्टी न समाय ॥३॥ आषाढी कार्तिक आनंद सोहळा । येती नरनारी बाळा पाहवया ॥४॥ एका जनार्दनीं पुरला मनोरथ । विठ्ठल पाहतां चित्त गुंतलेसे ॥५॥
२७६२
रंक बैसतां पालखीसी । उपेक्षी पहिल्या पदवीसी ॥१॥ तैसें नाम मुखी गातां । कोण ब्रह्मा ज्ञान वार्ता ॥२॥ मूळीचे जाहले नाहीं खंडन । वादविवाद अभेदी जाण ॥३॥ एका जनार्दनी शरण । ब्रह्माज्ञानाची कोण आठवण ॥४॥
२७६३
रकारासी कान्हा मकारपुढती । स्मरतां होय मुक्ति सर्व जनां ॥१॥ नारी अथवा नर हो कां दुराचारी । वाचे म्हणतीं हरी सर्व मुक्त ॥२॥ सायास तो नाहीं अनायासें काम । वाचे रामनाम सदां गावें ॥३॥ एका जनार्दनीं धरा हेतू मनीं । श्रीराम वदनीं उच्चारावा ॥४॥
२७६४
रखितो गोध्नेआं मनाचेनी मनें । न पुरे अवसरु धावण्यां धावणें । कुंठित जाहली गति पवनाची तेणें । तो हा नंदाचा नंदन यशोदेचें तान्हें ॥१॥ देखिला देखिला मंडित चतुर्भुज । वैकुठींचा भूपति तेजःपुंज । पहातांचि तय नावडे काहीं दुजें । ऐसें लाघव याचें सहज ॥२॥ चित्त चैतन्य पडिली मिठी । कामिनी मनमोहना जगजेठी । तुझ्या वेधे ध्यानस्थ धुर्जटी । ऐसा गोवळु योगीयांसीनोहे भेटी ॥३॥ एका जनार्दनी शब्दवेगळा । आंगमांनिगमां कांहीं न काळे लीळा । सोहं कोहं शब्दावेगळा । पहा पहा परब्रह्मा पुतळा ॥४॥
२७६५
रघुनंदन पायीं गेला । रथ त्वां कां रे आणिला ॥१॥ सूर्यवंशी नारायणा । माझा राघव जातो वनां ॥२॥ सुर्यवंशीं दिनकरा । तपुं नको तुं भास्करा ॥३॥ अहो धरणी मायबहिणी । सांभाळा हो कोदंडपाणी ॥४॥ एका जनार्दनीं भाव । पदोपदीं राघवराव ॥५॥
२७६६
रघुवीरस्मरणें चित्त माझें रंगलें वो बाई । आसनींशयनीं भोजनीं भोजनीं त्याविण न रुचे काई ॥१॥ जीवींचे जीवन माझें त्रैलोक्याचें सुख । त्यासी पाहतां सर्व हरली तहानभुक । ब्रह्मानंदें नाचूं लागे निरसुनी गेलें दुःख ॥२॥ दीनबंधु सखा जीवलग अयोध्येचा राजा । निर्वाणी सकंटी धावें भक्ताचिया काजा । कनवाळु तोचि प्राण विसावा माझा ॥३॥ श्यामवर्ण गोमटी गळां वैजयंती माळा । वामांगी घवघवीत शोभे जनकाची बाळा । एका जनार्दनीं तो म्यां राम देखिला डॊळा ॥४॥
२७६७
रडती पोटासाठीं । झालों म्हणती संन्यासी ॥१॥ वर्म न कळेची मुढां । होतो फजित रोकडा ॥२॥ जनीं नारायणा । अवघा भरला जनार्दन ॥३॥ तडातोडी करूनी वर्म । चुकला तो अधम ॥४॥ सर्वांठायीं नारायण । एका जनार्दनीं भजन ॥५॥
२७६८
रडती रांडापोरें नाशिवंतासाठीं । केवढी आटाआटी जीवीं होसी ॥१॥ कुडीसी मरण न कळेचि जाण । आत्मा अविनाश परिपूर्ण स्वयंज्योती ॥२॥ एका जनार्दनीं नाथिलाची भास । विठ्ठलनामें सौरस न घे कोणी ॥३॥
२७६९
रतीच्या अंती जें होय सुख । सर्वांगीं तें सर्वदा देख ॥१॥ इंद्रियाविण आहे गोडी । तेथींचा स्वादु कवण काढी ॥२॥ आधींच करणी कैसी यक्षिनी । गोडपणें कैसी देत आहे धणी ॥३॥ एका जनार्दनीं लागला छंदु । एकपणेंविण घेतला स्वादु ॥४॥
२७७०
रमा रमेश मस्तकी हर । पुढे तीर चंद्रभागा ॥१॥ मध्यभागीं पुंडलीक । सुख अलोलिक न वर्णवे ॥२॥ बहुता वैष्णवांचा मेळ । गदरोल नामाचा ॥३॥ वामभागीं रुक्मिनी राही । जनार्दन तेथें पाहीं ॥४॥
२७७१
रमेसह पंढरी आला । येऊनि भेटला पुंडलिका ॥१॥ म्हणे उभारुनि बाह्मा हात । तरतील नामें महापतित ॥२॥ नका कांहीं आटाआटी । योग यागांची कसवटी ॥३॥ ब्रह्माज्ञान नसाधे लोकां । मुखीं घोका विठ्ठला ॥४॥ शरण एका जनार्दनीं । सांगे वचनीं पुंडलीक ॥५॥
२७७२
रवि न लपेचि अंधारीं । तैशी तुमची जगीं थोरी ॥१॥ कृपावंत तुम्ही संत । यावरी हेत दुजा नाहीं ॥२॥ एका जनार्दनीं शरण । संत परिपुर्ण दयाळू ॥३॥
२७७३
रस सेविल्यासाठीं । भोगवी जन्माचिया कोटी ॥१॥ रसने आधीन सर्वथा । रसनाद्वारें रसु घेतां ॥२॥ जंव रसना जिंतिली । तंव वाउगीच बोली ॥३॥ एका जनार्दनीं शरण । रस रसना जनार्दन ॥४॥
२७७४
रसने रसभोग्य रसाचा भोक्ता रस ग्रासी होय भेटी । रसस्वादाचा सौरसु तोची ब्रह्मारसो कृष्णीं पडतसे गांठीं ॥१॥ आत्मा कान्हा भोग निधी । आम्हीं सकळां भोग अवघी ॥धृ०॥ श्राव्य श्रावक श्रवणा समाधान सहजीं सिद्धचि पाहे । गगन गर्भें सरे गगना अलिप्त शब्दें कोंदाटलें ठायीं राहें ॥२॥ दृष्टी दृश्य नसे दृश्य सबाह्म दिसे दृष्टीविण डॊळा पाहे । अरुपाचें रुप अगुनी होउनी देख देखणें कवण आहे ॥३॥ घ्राणाचे जें घ्राण वासाचा अवकाशु ज्ञप्ती मात्र आहे शुद्ध । गंधाचा गंधु सुवास जीवन दृष्टी भोग सुगंध ॥४॥ देहाचे आंतील कठीण कीं कोंवळें न कळे तेथीचा भावो । आत्मारामीं वृत्ति जडोनी गेली मा सबाह्म रिता नुरेची ठावो ॥५॥ मनाचाही वेगु दिसताहे सवें नुप्तमाजीं उभा देवो । म्हणवोनी मन होतें तें उन्मन जालें पडिला कृष्ण स्वभावो ॥६॥ काष्ठ भक्षितां दाहकु काष्ठामाजीं असें मथिलिया काष्ठाचि अग्नि । एका जनार्दनीं कृपा देहींचाचि देहीं मी भोग भोगितां राहे कृष्ण होऊनि ॥७॥
२७७५
राखीत गोधनें भक्ताचियां काजा । उणीव सहजा येवो नेदी ॥१॥ आपुलें थोरपणा सारुनी परतें । भक्तांचे आरुतें काम करी ॥२॥ उच्छिष्ट काढणें सारथ्य करणें । उच्छिष्टं तें खाणें तयांसवें ॥३॥ चुकतां वळती आपण वोळणें । एका जनार्दनीं पुण्य धन्य त्यांचें ॥४॥
२७७६
राजाई येऊनियां घरीं । नमस्कार करी नामदेवा ॥१॥ परीस देणें झडकरी । परिसा उभा असे द्वारीं ॥२॥ ऐकतांचि ऐसी मात । आलें भीमेसी धांवत ॥३॥ पुंडलीकासी नमस्कार । केला जयजयकार नामघोष ॥४॥ एका जनार्दनीं स्नान । नामा करितसे जाण ॥५॥
२७७७
राजाईस तेव्हां म्हणतसे नामा । दैन्यकाळ आम्हां नाहीं नाहीं ॥१॥ आम्ही हरिदास कुबेर भांडारी । संपदा ती थोरी घरीं वसे ॥२॥ कृपावंतें मज नाहीं उपेक्षिलें । आम्ही का वहिले दैन्यवाणें ॥३॥ एका जनार्दनीं बोलोनियां मात । गेला राउळांत तेव्हां नामा ॥४॥
२७७८
राजाला आळस संन्याशाला सायास । विधवेसी विलास विटंबना ॥१॥ व्याघ्रासी शांतता गाईसी उग्रता । वेश्येसी हरिकथा । विटंबना ॥२॥ दानेंविण पाणी । घ्राणेविन घाणी । नामेंविण वाणी विटंबना ॥३॥ एका जनार्दनीं भावभक्तीविणा । पुण्य केलें नाना विटंबना ॥४॥
२७७९
राजीवाक्ष प्रभु रुक्मिणीरण । मनोहर ध्यान श्रीकृष्णाचें ॥१॥ शंख चक्रगदा पीतांबरधारी । नमिला कंसारी प्रेमभावें ॥२॥ मोक्ष अधिष्ठान पुण्य कीर्ति स्थान । पतितपावन पाडुरंग ॥३॥ जनार्दनीं देवाधिदेव । चित्तीं वासुदेव राहो सदा ॥४॥
२७८०
रात्रंदिवस जप होती साठ घटिका । संख्या त्याची ऐका निरनिराळी ॥१॥ दीड घटिका पळें दहा निमिष दोन । प्रथम तें स्थान आधारचक्र ॥२॥ साडेसोळाआ घटिका दहा पळें लेखा । निमिषें तीन देखा स्वाधिष्ठानी ॥३॥ दहा पळें देखा घटिका साडेसोळा असती । मणिपुर गणती निमिष चार ॥४॥ आणिक घटी पळें तितुकींची पाही । अनुहत ठायीं निमिष पांच ॥५॥ पावणेतीन घटिका दहा पळें जाणा । विशुद्धींची गणना निमिष एक ॥६॥ अग्निचक्रावरी पावणेतीन घटिका । दीड पळ देखा निमिष एक ॥७॥ पळ आठ घटिका अडिचाची गणती । निमिष चवदा असती सहस्त्रदळीं ॥८॥ साहाशें ते सहस्त्र एकवीस होती । जनार्दनप्राप्ति एका उपायें ॥९॥
२७८१
रात्रंदिवस भार वाहे खरा । बाइलेंचें उदर भरितसे ॥१॥ नेणे दानधर्म व्रत आचरण । अतिथी पूजन स्वप्नी नाहीं ॥२॥ नेणे श्राद्ध पक्ष आपुला आचार । सदा दुराचारी कर्में करी ॥३॥ पत्‍नी गृहीं सदा वसवसे मन । न वेंची काहीं धन कवडी धन ॥४॥ एका जनार्दनीं ऐसा हीनभागी । जोडीतसे अभागी नरकवास ॥५॥
२७८२
रात्रंदिवस मनीं करीतसे चिंता । काय हे अनंता कर्म माझें ॥१॥ माझीया अदृष्टीं नाही पुत्रसुख । नित्त्यानित्य दु:ख आम्हालागीं ॥२॥ चालेना व्यापार मज न चले युक्ति । कैशी आतां गति नामयाची ॥३॥ येणे धरिला छंद विठ्ठलाचा मनीं । एका जनार्दनीं काय करुं ॥४॥
२७८३
रात्रदिवस मन रंजलें । हरिचरणीं चित्त जडलें । विरहाचें दुःख फिटलें । धन्य झालें संसारीं ॥१॥ विरह गेला सुख झालें वो माया । पुढतोपुढती आनंद न समाये ॥धृ॥ संतसंग घडला धन्य आजीं । मोह ममता तुटली माझी । भ्रांती फिटोनि गेली सहजीं । विरह गेला सुख झालें आजीं ॥२॥ धन्य धन्य संतसंगती । अवधी झाली विश्राती । एका जनार्दनी चिंत्तीं । विरहभ्रांति निरसली ॥३॥
२७८४
रात्रीची प्रौढी नोहे सुर्याचा प्रकाश । तोवंरींचे भास आंधाराचा ॥१॥ सुर्याचे उदयीं अंधार हा नासे । तैसें अज्ञानें नासे ज्ञान सर्व ॥२॥ एका जनार्दनीं सदगुरुवांचुनी । प्रकाश तो मनीं नोहे कांहीं ॥३॥
२७८५
राम आठवितां नुरेचि पैं पाप । ऐसा दाखव मज पा कोणी एक ॥१॥ नाम त्रिभुवनीं वरिष्ठ साचार । म्हणोनि निर्धार सनकदिकीं ॥२॥ एका जनार्दनीं जपतां निर्धारें । भवसिंधु तरे रामनामें ॥३॥
२७८६
राम कृष्ण हरी । नित्य वदे जो वैखरी ॥१॥ तयापाशी नुरे पाप । नासे त्रिविध हा ताप ॥२॥ नाम तेंचि परब्रह्मा । जप यज्ञ तो परम ॥३॥ एका जनार्दनीं जपा । रामकृष्ण मंत्र सोपा ॥४॥
२७८७
राम नाम वदे वाचे । धन्य मुख तयाचें लोटांगणीं साचे । हरिहर पैं येती ॥१॥ नाम चांगलें चांगलें । जड जीव उद्धरले । वैकुंठवासी केलें । कुडे कपाटियासी ॥२॥ अजमेळादि पातकी । नामें तारिलें महादोषी । यवनादि सुखी नामें केलें ॥३॥ हास्य विनोदें नाम । घेतं पावे सर्वोत्तम । मा दृढ धरलीया प्रेम । देवचि होय ॥४॥ एका जनार्दनीं अनुभव । कालीमाजीं तारक सर्व । नामवांचुनीं अन्यभाव । नाहीं नाहीं ॥५॥
२७८८
राम भावाचा भुकेला । सांडोनी दुर्योधनसदनाला ॥१॥ विदुर गृहाप्रति गेला । विश्रांति तेथें पावला ॥२॥ शबरींची फळें भक्षी । क्षीरनिधी शयन साक्षी ॥३॥ एका जनार्दनीं निश्चय ऐसा । देव भक्ताधीन सहसा ॥४॥
२७८९
राम म्हणोनि दीन येती काकुलती । त्याच्या यातनेचे दोषे सांगावे किती ॥१॥ काय साचलें नाठवे पाप । नामें निष्पाप महादोषी ॥२॥ चित्रगुप्त जव पाहे वही । कोरडें पान रेघही नाहीं ॥३॥ खोडी ना मोडीसमुळ उडे । एका जनार्दनीं नामें पाप झडे ॥४॥
२७९०
राम राम ध्वनी जयाचे मुखासी । धन्य पुण्यराशी पावन झाला ॥१॥ सदोदित नाम जपे श्रीरामाचें । अनंता जन्माचें दोष जाती ॥२॥ राम राम वदे सादा सर्वकाळं । काळाचा तो काळ रामनामें ॥३॥ राम वदे ध्यानीं राम वदे मनीं । एका जनार्दनीं राम वदे ॥४॥
२७९१
राम राम म्हणतां वाचे । रामरुप होय साचें ॥१॥ रामें तारिली शबरी । नित्य राम ती उच्चारी ॥२॥ रामें तारिली गणिका । केल्या अजामेळ सखा ॥३॥ शिळा तारिल्या सागरीं । राम अहिल्या उद्धरी ॥४॥ एका जनार्दनीं । राम भरला जनीं वनीं ॥५॥
२७९२
राम रावण रणांगणीं । युद्धा मीनला नीज निर्वाणीं । येरयेरातें लक्षुणीं । स्वयें विधों पाहे ॥१॥ तंव गज ध्वजीं राम । रामाचि धनुष्यबाण । रामरुप आपण । आपणा देखें ॥२॥ रावणा पाडलें ठक । रामरुप कटक । पारिकें आणीक । तया न दिसें कांहीं ॥३॥ रामरुप नर । रामरुप वानर । वैरी निशाचर । रामरुप ॥४॥ रावण पाहे लंकेकडे । रामरुप लंकेचे हुडे । सबाह्म चहूकडे । राम दिसे ॥५॥ ऐसें निर्वाण युद्ध । विसरला द्वंद्वभेद । एका जनार्दनीं आनंद प्रगटला ॥६॥
२७९३
राम रावण हुंबली खेळती । खेळीया हनुमान तीरे ॥१॥ खेळ माडिला खेळ मांडिला कान्होबाचे बळें खेळ मांडिला ॥धृ॥ राम कृष्णा हुंबली खेळती । खेळ्या अर्जुन झाला रे ॥२॥ अठरा अक्षौहिणी कौरव मारिले । शिशुपाळसह वक्रदंत वधिले रे ॥३॥ एका जनार्दनीं खेळतां खेळतां हुंबली आनंद बहु जाला ॥४॥ खेळ खेळतां अवघे निमाले मीतुपणा ठाव नाहीं उरला ॥५॥
२७९४
राम सर्वांच्याहृदयीं आहे । धरितां त्या हृदयस्थाची सोये । तेथें रामरावणु कोठें आहे । सांग माय यथार्थ ॥१॥ भोगितां हृदयस्थासी । अवकाश कैंचा भोक्तियासी । तेथें रावण कैंचा आणिसी । जें तयासी भोगावें ॥२॥ दृश्याचिये भेटी । दृश्यपणें उठी । होता तेणेंसी तुटी । तोही शेवटीं असेना ॥३॥ आतां नाहींपण असे । असेतोचि दिसे । एका जनार्दनीं पिसें । रावणाचें कायसें ॥४॥
२७९५
राम सर्वाघटीं व्यापक संचला । जैसा भाव तया तैसा भेटला ॥१॥ रीस आणि वानर राक्षसहि पहाती । सर्वां एकची मुक्ति रामसंगे ॥२॥ वैर अथवा सख्य वाचे वदे नाम । मुक्ति आम्हां राम स्वयें देती ॥३॥ एका जनार्दनीं वदतां निष्काम । स्वर्गसुख द्त राजाराम ॥४॥
२७९६
राम हें माझें जीवींचें जीवन । पाहतां मन हें जालें उन्मन ॥१॥ साधन कांहीं नेणें मी अबला । शाम हें वीजु बैसलेंसे डोळा ॥२॥ लोपल्या चंद्रसुर्याच्या कळा । तो राम माझा जीवीचा जिव्हाळा ॥३॥ प्रकाश हा दाटला दाही दिशा । पुढें वो मार्ग न दिसे आकाशा ॥४॥ खुंटली गति श्वासा वो उश्वासा । तो राम माझा भेटेल वो कैसा ॥५॥ यासी हो साच परिसा हो कारण । शरण एका जनार्दन नेणें तेंचि साधन ॥६॥
२७९७
रामकृष्ण ऐसें नाम । सुलभ सोपें तें सप्रेम । उच्चारितां नित्य नेम । तया पेणें वैकुंठ ॥१॥ नका करुं आळस कोणी । लहान थोर धरा मनीं । तुटेल आयणी । जन्म आणि मृत्यूची ॥२॥ आहे मज भरंवसा । एका जनार्दनीं ठसा । आळस नका करुं सहसा । लहान थोर सकळ ॥३॥
२७९८
रामकृष्णनाम । कथा करूं कीर्तन ॥१॥ हाचि आम्हां मंत्र । सोपा दिसे सर्वत्र ॥२॥ संतांचे संगती । मुखीं नामामृत तृप्ती ॥३॥ बसो कीर्तनीं सदा । माझी मति गोविंदा ॥४॥ जनार्दनाचा एक । म्हणे माझी कींव भाका ॥५॥
२७९९
रामनाम उच्चार होटीं । संसाराची होये तुटी ॥१॥ संसार तो समुळ जाय । राम उच्चारुनी पाहे ॥२॥ मागें अनुभवा आलें । गजेंद्रादि उद्धरिलें ॥३॥ शिव ध्यातो मानसीं । रामनाम अहर्निशीं ॥४॥ एका जनार्दनीं राम । पूर्ण परब्रह्मा निष्काम ॥५॥
२८००
रामनाम जपे शिव तो स्मशानीं । वाल्मिक तो मुनी नाम जपे ॥१॥ गणिका तारिली रामनाम घेतां । पातकी तत्त्वतां उद्धरिले ॥२॥ रामनाम सुख शिव जाणें तत्वतां । येरांसी महत्व न कळे नाम ॥३॥ साधनांचे सार नाम मुखी गात । रामनाम म्हणतां कार्यसिद्धि ॥४॥ एका जनार्दनीं रामनाम जप । वैकुंठीचा सोपा मार्ग तुम्हां ॥५॥
२८०१
रामनाम ज्याचे मुखीं । तो नर धन्य तिहीं लोकीं ॥१॥ रामनामें वाजेटाळी । महादोषा होय होळी ॥३॥ रामनाम सदा गर्जे । कळेकाळ भय पाविजे ॥४॥ ऐसा रामनामीं भाव । तया संसाराचि वाव ॥५॥ आवडीने नाम गाय । एका जनार्दनीं वंदी पाय ॥६॥
२८०२
रामनाम पावन । यापरतें थोर कोण ॥१॥ जडशिळा ते सागरीं । नामें तरल्या निर्धारीं ॥२॥ राम जप सदा । नोहे काळाची ती बाधा ॥३॥ नाम घेतां निशिदिनीं । एका शरण जनार्दनीं ॥४॥
२८०३
रामनाम मुखीं गाय । यम त्यांचेंवंदी पाय ॥१॥ ऐसा नामाचा महिमा । सरी न पावेचि ब्रह्मा ॥२॥ उत्तमाउत्तम नाम । सर्व सुखासी विश्राम ॥३॥ एका जनार्दनीं नाम । भवसिंधु तारक धाम ॥४॥
२८०४
रामनाम वसे ज्याचे मुखीं नित्य । त्याचेनि पतीत उद्धरण ॥१॥ रामनाम मंत्र जपे नित्यकाळ । त्यासी कळिकाळ हात जोडी ॥२॥ रामनामीं त्याची जडली चित्तवृत्ती । वृत्तीची निवृती झाली त्यासी ॥३॥ एका जनार्दनीं जपे रामनाम । तेणें पूर्ण काम स्वयें झाला ॥४॥
२८०५
रामनाम स्मरे पुरुषोत्तम रे । सहज विद्या ज्ञेय हाही अविद्या धर्म रे ॥१॥ अहं आत्मा हेंही न साही सर्व क्रिया भ्रम रे । विजनवन निरंजन जनार्दन रे ॥२॥ अगम्य गति ध्येय ध्यान साधन बंधन रे । एका जनार्दनीं एका स्वानंद परिपुर्ण रे ॥३॥
२८०६
रामनामाची धन्य ख्याती । पापी तरले पुढें तरती ॥१॥ तरला कोळी अजामेळ । गणिका आणि ते सकळ ॥२॥ नामें पावन स्त्रियादी याती । नामें सर्वा एकचि मुक्ति ॥३॥ एका जनार्दनीं शरण । नामें तिहीं लोकी पावन ॥४॥
२८०७
रामनामाचेनि बळें । ब्रह्मा सर्वत्रैक मिळे ॥१॥ रामनामाची ही ख्याती । कर्माकर्माची निवृत्ति ॥२॥ कृष्ण विष्णु हरि गोविंद । म्हणतां प्रगटे परमानंद ॥३॥ जों जों उच्चारी नाम । तों तों प्रगटे मेघःशाम ॥४॥ व्रत तप यज्ञ दान । रामनामासी साधन ॥५॥ एका जनार्दनीं कीर्तीं । सहज चैतन्य विश्रांती ॥६॥
२८०८
रामनामाच्या प्रतापें । जळती असंख्यात पापें ॥१॥ महा दोषांची दोष खाणी । नामें तारिली कुंटनी ॥२॥ नामें तरला अजामेळ । नष्ट गणिका अमंगळ ॥३॥ एका जनार्दनीं नाम । मंगल मंगल तें विश्राम ॥४॥
२८०९
रामनामावांचुनी । श्रेष्ठ नाहीं दुजें कोणही ॥१॥ हाचि अनुभव मना । घेई घेई सत्य जाणा ॥२॥ नको वाउगी खटपट । एका जनार्दनी सोपी वाट ॥३॥
२८१०
रामनामीं भाव न धरिती कोणी । नाना मंत्र तंत्र घेती जनीं । सकुडी कुंटणी वैकुंठासी नेली । अवचटें राम वदनीं ॥१॥ रामनाम न मानिती जनीं । सैर समाधि हरिकीर्तनीं ॥धृ॥ वारितां नाम प्रल्हाद स्मरे । त्याचे चुकविले नाना घात । कोरडिये काष्ठी नर मृग जाला । भक्तां साह्य जगन्नाथ ॥२॥ अभिलाषें नाम अजामेळ स्मरे । तो सोडिला यमकिंकरीं । मागील किल्मिष निःशेष जाळिलें । ऐसी नामाची ही थोरी ॥३॥ उफाराटे अक्षरीं रामु नारदमुनी । वाल्मिकासी उपदेशी । नष्ट वाटपाडा पुनीत जाला । या महाकवि म्हणविंती त्यासी ॥४॥ रामनाम कीर्तनी कैसें सुख आहे । हें शिवची जाणें साचें । दोचि अक्षरी काशी मुक्त केली । तारक ब्रह्मा हें त्यांचें ॥५॥ लाजेच्या संकटीं द्रौपदी नाम स्मरे । देवो वर्षला तिसी अंबरें । वैरी याचे शिरीं पाउल आणिला । नामें भक्तकाज सरे ॥६॥ नामाचेनी बळें पाप पुढें पळें । कर्माकर्म तेथें जळे । एका जनार्दनीं नाममात्रें । निजीं निजसुखाचे सोहळे ॥७॥
२८११
रामनामे जो धरी भाव । तया सुलभ उपाव । नामस्मरणीं जीव । सदोदित जयाचा ॥१॥ तेणें सधिलें साधन । आभ्यासिला हो पवन । अष्टांग योग साधून । लय लक्ष दिधलें ॥२॥ योगयाग कसवटी । अभ्यासिल्या चौसष्टी । हृदयीं चिदानंद राहाटी । रामनामें ॥३॥ ध्यान धारणा मंत्रतंत्र । अवघा श्रीराम पवित्र । एका जनार्दनीं सतत । जपे वक्त्रीं ॥४॥
२८१२
रामनामें गणिका नेली वैकुंठासी । कलीमाजीं जनांसी तारक हेंची ॥१॥ म्हणोनि आळस न करा वाचे । उच्चारण नामाचें करा वेंगीं ॥२॥ न लगे मान धन सोपें हें साधन । तुटतें पतन जन्मोजन्मीं ॥३॥ एका जनार्दनीं न करा आळस । रामनाम सौरस घ्यावें वाचे ॥४॥
२८१३
रामनामें तारिलें । पशु पक्षी उद्धरिले ॥१॥ ऐसे रामनाम बोध । घेई कां रें तूं शुद्ध ॥२॥ तारिले तारिले । रामनामें उद्धरिले ॥३॥ शुकादिक योगी झाले । रामनामें तें रंगले ॥४॥ ब्रह्माज्ञानी महा मुनी । रामनाम जपती वाणी ॥५॥ एका जनार्दनीं राम । नाम करी तुं विश्राम ॥६॥
२८१४
रामनामें तृप्त जे नर जाहले । पुनरावृत्ती न आले संसारासी ॥१॥ जाणार जाणार सर्व हें जाणार । रामनाम साचार जप करीं ॥२॥ अभ्राची छाया मृगजळाचें जळ । तैसा हा देह केवळ मिथ्या असे ॥३॥ मिथ्याचें सत्य मनिती गव्हार । रामनामीं विसर पडोनि ठेला ॥४॥ विसरुनी राम करिशी प्रपंच धंदा । भुललासी मतिमंदा नाशिवंता ॥५॥ नाशिवंतासाठी रडतोसी काह्मा । एका जनार्दनीं पाया शरण रिघे ॥६॥
२८१५
रामनामें नामरुपा निरास । कृष्णकर्म स्मरतां कर्माचा ग्रास ॥१॥ नामें जिव्हां गर्जत अहर्निशीं । भवभव तें बापुडें परदेशीं ॥२॥ रामनाम जपतां जीवीं । जीव पवे ब्रह्मापदवी ॥३॥ जीव म्हणतां तोचि परब्रह्मा । नामें निरसलें कर्माकर्म ॥४॥ रामनामाची जीं जीं अक्षरें । तीं तंव क्षराक्षरातींत सारें ॥५॥ एका जनार्दनीं चमत्कार । नाम तें चैतन्य निर्धार ॥६॥
२८१६
रामनामें नित्य जयासी आनंद । तया ठायीं भेदाभेद नुमटती ॥१॥ ऐसे जें रंगले रामनामी नर । चुकवी यमप्रहार जन्मो जन्मीं ॥२॥ धरावी वासना रामनामजप । दुजा तो संकल्प आन नाहीं ॥३॥ एका जनार्दनीं नामापरता मंत्र । दुजें नाहीं शस्त्र कलियुगीं ॥४॥
२८१७
रामनामेंसुख अत्यंत जें आहे । म्हणोनि मना ध्याये नित्य नाम ॥१॥ सुखाचिया गोडी जया नाहीं ठावीं । ते ते नर असोनिया देहीं प्रेतवत ॥२॥ शंकर जाणोनि स्मशानीं राहिला । अनुभव तो त्याला तोचि जाणें ॥३॥ एका जनार्दनीं सुखाचेंजें सुख । रामनाम देख पवित्र मुखीं ॥४॥
२८१८
रामानाम वदतां वाचे । सुकृत जोडे पैं पुण्याचें ॥१॥ ऐसा नामाचा महिमा । न कळेचि आगमानिगमां ॥२॥ नामें तारिलें पातकी । वंद्य जाहले तिहीं लोकीं ॥३॥ एका जनार्दनीं नाम । सुखा चैतन्य निजधाम ॥४॥
२८१९
रामें रावण रणीं । निवटिला निजबोध वाणीं । येर सर्वस्व मानुनी । निज सुखीं जाहला ॥१॥ दहा मुखांते छेदिलें । शेखीं विश्वमुखें केलें । रणीं रामें सुख दिधलें । परम सुख ॥२॥ राम तो वैरी नव्हे राजा । सखा जिवलग माझा । दहा मुखें वीस भुजा । फ़ेडिला केरु ॥३॥ नश्वरा राज्य नेलें । रावणपण गेलें । अक्षयीं राज्य दिधलें । श्रीरघुनाथें ॥४॥ माझे देह संदेह छेदिलें । ली वेदामृत पाजिलें । ऐसें बोलतां बोलें । बोलवेना ॥५॥ राम रावण रणीं । बोधाची झोट धरणी । एका जनार्दनीं । मिनलें एकपणीं ॥६॥
२८२०
रावण म्हणे नवल चोज । माझें कटक पारखे मज । अश्व आणि नर गज । रामजी स्वयें ॥१॥ निशाचर वीर । राम बाणले साचार । रामरुप वानर । सरसावले ॥२॥ युध्दीं ठक पडिलें लंकानाथा । जीऊचि पारिखा आतां । इंद्रियांची सत्ता । रामरुप जाली ॥३॥ शस्त्रांचें तिखटपण । राम जाला आपण । शत्रुमित्र संपूर्ण । राम स्वयें ॥४॥ युध्दीं पारखें अंत:करण । मन जालें उन्मन । अहं तें सोहं जाण । होउनी ठेलें ॥५॥ चित्त जालें चैतन्य । बुध्दि ते समाधी धन । देह तो विदेह पूर्ण । राम जाला ॥६॥ राम पारखें केले लंकागड । दृढ राम जाला दुर्ग आगड । न झुंजतां अवघड । घेतला रामें ॥७॥ रामें घेतलें घर । राम जाला कलत्रपुत्र । अवयव अलंकार । राम झाला ॥८॥ मी म्हणे हा अवघड गड । तंव राम जाला गडीचे दगड । महामार अति गूढ । राम जाला ॥९॥ आतां कायसी निज देह निकुंभिला । येथें कोण मानी मोह कुंभकर्णाचे बळ । बळाच्या सबळ बळा । राम जाला ॥१०॥ एका जनार्दनीं निजभावें युध्द पूर्ण । रावणचि आपण राम जाला ॥११॥
२८२१
रासक्रीडा करुनी आलिया कामिनी । कृष्णी लांचावल्या आन न रिघे मनीं ॥१॥ जें जें दृष्टी दिसे तें तें कृष्ण भासे । गोपिका समरसे नित्य बोधु ॥२॥ आसनीं शयनीं भोजनीं गमनागमनीं सर्व कर्मीं सदा कृष्णमय कामिनी ॥३॥ एका जनार्दनी व्याभिचार परवडी । गोपिका तारिल्या सप्रेम आवडीं ॥४॥
२८२२
रासक्रीडा खेळ खेळॊनिया श्रीहरी येती परोपरी गोकुळासी ॥१॥ न कळेची कवणा कैसें हें विंदान । वेदादिकां मौन पडिलेंसे ॥२॥ तें काय कळे आणिकां जीवांसी । ऋषी मुनी तापसी धुंडीताती ॥३॥ एका जनार्दनीं ऐसा खेळे खेळां । परब्रह्मा पुतळा नंदाघरीं ॥४॥
२८२३
राहातें एक जातें दोनपणें । तेथेंचि नाहीं पां देखणें ॥१॥ एकचि एक बोलता रे साचे । एक नाहीं तेथें अनेक कैंचे ॥२॥ अनेकी एक निर्धारितां पाहीं । मुळीं मन ठेवुनियां ठायीं ॥३॥ राहातें जातें दोन्हींही वाव । एका जनार्दनीं एकचि भाव ॥४॥
२८२४
राहिला हरि लक्ष्मीसहित घरीं । दैन्य सहपरिवारीं पळोनी गेलें ॥१॥ उठोनी पहाटे गरुडा खोगीर घाली । मृत्तिका वहिली वरी आणी ॥२॥ भाजनें तीं नानापरी करी । नाटकी मुरारी चाळक जो ॥३॥ ऐसे सुखरुप राहिलें निर्धारे । न कळे विचार गोरोबासी ॥४॥ एका जनार्दनीं पुढें काय जाहलें । सर्व दैन्य गेलें गोरोबाचें ॥५॥
२८२५
राहुनी पंढरी । आणिकाची आस करी ॥१॥ तो पातकी चांदाळ । खळाहुनी अमंगळ ॥२॥ सांडोनियां विठ्ठल देव । आणिकासी म्हणे देव ॥३॥ साडोनियां पुडलिका । गाय आणिकासी देखा ॥४॥ ऐसा पातकी तो खळक । तयाचा न वहावा विटाळ ॥५॥ म्हणे जनार्दनाचा एका । तया तेथें ठेवूं नका ॥६॥
२८२६
राहुनी पंढरीये जाण जो नेघे विठठलदरुशन ॥१॥ महापातकी चांडाळ । त्याचा न व्हावा विटाळ ॥२॥ जिताची भोगी नर्क । जो विठ्ठला विन्मुख ॥३॥ न करी स्नान चंद्रभागे ॥ तो कुष्टी सर्वागें ॥४॥ नेघे पुंडलीकदरुशन । एका जनार्दनीं तया बंधन ॥५॥
२८२७
रिता ठाव न दिसें पाहतां । भरला पुरता विठ्ठल ॥१॥ जनीं वनीं विजनीं देखा । विठ्ठल सखा भरलासे ॥२॥ पाहतां पाहणें परतलें । विठ्ठलें व्यापिलेंक सर्वत्र ॥३॥ नाहीं पाहण्यासी ठाव । अवघा भाव विठ्ठल ॥४॥ एका जनादनीं व्यापक । विठ्ठल देख त्रिवभुनीं ॥५॥
२८२८
रीघ नाही कोणा पाहुं आले जना । फिटलें पारणा लोचनाचे ॥१॥ नाचत नारद गाताती गंधर्व । तुंबर हावभाव दाविताती ॥२॥ स्तुति करीशेष न वर्णवें वेदांसी । स्तवन विरिंची करीतसे ॥३॥ करिताती नारी अभ्यंग रामासी । पायांवरी त्यासी न्हाणिताती ॥४॥ नीति नाहीं गुण विश्वाचा जनिता । तयाचिया माथा पाणी घाली ॥५॥ घाली तेल माथां माखील ते टाळू । दीनाचा दयाळू कुर्वाळिती ॥६॥ तीर्थे वास करिती जयचिये चरणीं । पायांवरी न्हाणी त्यासी माता ॥७॥ लाउनी पालव रामासी पुसिलें । वेगीं फुंकियेले कान दोन्हीं ॥८॥ दोघांदोहीकडे सिद्धि बुद्धि जाणा । घातिलें पाळणां रामराजा ॥९॥ त्यांनी धणीवरी गाईला पाळणा । एका जनार्दनीं पहुडविले ॥१०॥
२८२९
रुक्माईसी सांगे एकांतासी गोठी । गोर्‍याची कसवटी पांडुरंग ॥१॥ माझियाकारणें कर तोडियेले । सांकडें पडिलें मज त्याचें ॥२॥ माझिया भक्ताची मज राखणें लाज । म्हणोनियां गुज तुज सांगितलें ॥३॥ एका जनार्दनीं उभयतां निघाले । सांगाते घेतलें गरुडासी ॥४॥
२८३०
रुक्मिणीसी सांगे स्वयें कृष्णनाथ । याचें वस्त्र त्वरित आणुनि द्यावें ॥१॥ आणूनियां ग्रंथीं देई जगन्माता । वस्त्र अलंकार तत्वतां काढुनी ठेवा ॥२॥ जीर्ण तें वस्त्र करुनी परिधान । वंदिले चरण कृष्णजीचे ॥३॥ एका जनार्दनीं करुनी नमन । निघाला ब्राम्हण तेथोनियां ॥४॥
२८३१
रुप गोजिरें तें सान । विटेवरी समचरण ॥१॥ कांसे कसिला पीतंबर । रुळे वैजयंती हार ॥२॥ सम कर ठेवुनी कटीं । पाहे पुंडलिका दृष्टी ॥३॥ एका जनार्दनी रुपडें । पाहतां मन झालें वेडें ॥४॥
२८३२
रुप सांवळे गोमटें अंग । उटी चांग चंदनाची ॥१॥ अंगीं चंदन साजे उटी । शोभे कंठी कंठसुत्र ॥२॥ शंख चक्र पद्म मिरवे करीं । बाह्मा उभारी भाविका ॥३॥ वेधी वेधोनि आमुचें मन । शरण एका जनार्दन ॥४॥
२८३३
रुप सावळें सुकुमार । कानीं कुडंलें मकराकार ॥१॥ तो हा पंढरीचा राणा । न कळे योगियंच्या ध्याना ॥२॥ पीतांबर वैजयंती । माथां मुकुट शोभे दीप्ती ॥३॥ एका जनार्दनीं ध्यान । विटे पाउलें समन ॥४॥
२८३४
रूप तेंचि नाम नाम तेंचि रुप । अवघा संकल्प एकरुप ॥१॥ पहातां पहाणें हरपलें देहीं । देहचि विदेही होउनी ठेलों ॥२॥ सांगतां नवल पाहतां सखोल । बोलतां अबोल चोज वाटे ॥३॥ एका जनार्दनीं बोलण्या वेगळा । उभा तो सांवळा विटेवरी ॥४॥
२८३५
रूपें सुंदर सांवळा गे माये । वेणू वाजवीं वृदांवना गोधनें चारिताहे ॥१॥ रुणझुण रुणझुण वाजवी वेणु । वेधीं वेधलें आमुचें तनमुन वो माये ॥२॥ गोधनें चारी हातीं घेऊनी काठी । वैकुंठीचा सुकुमार गोपवेषें जगजेठी ॥३॥ एका जनार्दनीं भुलवी गौळणी । करिती तनुमनाची वोवाळणी वो माये ॥४॥
२८३६
रोकेडेंचि ब्रह्मा ब्रह्माज्ञानाचें गोठलें । तें उभें असे ठेल पंढरीये ॥१॥ नये अनुमाना वेदांत सिद्धातियां । मा ब्रह्माज्ञानिया कोण पुसे ॥२॥ चारी वाचा जेथें कुंठीत पै जाहल्या । मौन त्या राहिल्या वेदश्रुति ॥३॥ एका जनादनी सारांचे हें सार । परब्रह्मा निर्धार पंढरीये ॥४॥
२८३७
लंकाबंदी पडले देव । सुटका चिंतिताती सर्व ॥१॥ रामा रामा रामा दशकंठनिकंदन रामा । भवबंधविमोचना तारी । कृपा करी हो मेघःश्यामा ॥धृ॥ वेगीं बांधोनी सत्याचा सेतु । करी अधर्मा रावणाचा घातु ॥२॥ थोर पसरैत वासना भुजा । तुजवांचुनी छेदितां नाहीं दुजां ॥३॥ अहं गर्वित रावणु । छेदी सोडुनी कृपेची बाणू ॥४॥ त्रिगुण लंका हे जाळूनी । सीत प्रकृती सोडवी निजपत्नी ॥५॥ अखंड लावुनी अनुसंधान । तोडी देहबुद्धी बंधन ॥६॥ अनन्य शरण जनार्दन एका । त्यासी राज्य करुनी दिधलें देखा ॥७॥
२८३८
लक्ष गांवें तरणी । पृथ्वी व्यापी निज करणीं । तो साक्षी अलिप्तपणीं । जोथींच्या तेथें ॥१॥ तैसा आत्म देहीं । म्हणती त्यासी ज्ञान नाहीं । तो व्यापुनी सर्वा ठायीं । साक्षत्व असे ॥२॥ सदगुरुमुखींचा विचार । जयासी झाला साक्षत्कार । उदेरा ज्ञानभास्कर । अज्ञानतिमिरीं ॥३॥ हिरवा पिवळा । संगें रंग जाला निळा । स्फटिक या वेगळा । आत्मा तैसा ॥४॥ तैसा ज्ञानकिली । जयाचें हातां आली । तयानें उगविलीं । अज्ञान कुलुपें ॥५॥ एकाजनार्दनाचा रंक । त्याचे बोधें कळला विवेक । पूर्ण बोधाचा अर्क । उदया आला ॥६॥
२८३९
लक्ष चौर्‍यांयशीं फिरतां । अवचिता लाभ हातां ॥१॥ उत्तम पावला नरदेह । त्याचें सार कांहीं पाहे ॥२॥ नको श्रमूं विषयकामा । कांहीं तरी भजे रामा ॥३॥ मरणजन्मांच्या खेपा । निवारीं निवारीं रे बापा ॥४॥ एका जनार्दनीं गूज सोपें । रामनाम सदा जपे ॥५॥
२८४०
लक्षांचे जें लक्ष तो दिसे अलक्ष । तो असे प्रत्यक्ष नंदाघरीं ॥१॥ बाळरुप गोजिरें वाळे वांकी साजिरें । पाहतां दृष्टीचे पुरे कोड सर्व ॥२॥ ध्यानाचें निज ध्यान मनाचें अधिष्ठान । व्यापक विधान महेशाचे ॥३॥ एका जनार्दनीआं शब्दाची नातुडे । गौळणी वाडेंकोडें जेवाविती ॥४॥
२८४१
लग्नाचा सोहळा यथासांग जाहला । नामा वेगीं आला पंढरीसी ॥१॥ देऊनियां सर्व पाहती संपदा । येथें तो आपदा न मिळे आन ॥२॥ एका जनार्दनीं माता आणि पिता । राजाईचा तत्वतां शीण करिती ॥३॥
२८४२
लज्जा अभिमान टाकूनि परता । परमार्थ सरतां करी कां रें ॥१॥ वादक निदक भेदक ऐसें त्रिविध । याचा टाकूनि भेद भजन करी ॥२॥ एका जनार्दनीं त्रिविधापारता । होऊनि परमार्था हित करीं ॥३॥
२८४३
लटिका संसार । वाचे उच्चारी हरिहार ॥१॥ तरी दुःख निरसन । मना होय समाधान ॥२॥ नित्य करी संतसेवा । शुद्ध भावें भजें देवा ॥३॥ एका जनार्दनीं धाला । तोंचि संसार तरला ॥४॥
२८४४
लटिक्या भावाचें । देवपण नाहीं साचें ॥१॥ भाव नाहीं जेथें अंगी । देव पाहतां न दिसे जगीं ॥२॥ सर्व काळ मनीं कुभाव । जैसा पाहे तैसा देव ॥३॥ लटिकी भंड फजिती । एका जनार्दनीं निश्चिती ॥४॥
२८४५
लडिवाळ नामा विठोबाचा दास । तयाचे चरणां दंडवत ॥१॥ भक्त शिरोमणी लाडका डिंगर । आवडता फ़ार विठोबाचा ॥२॥ कवित्व करुनी तारिलें सकळ । निरभिमानी निर्मळ सदोदित ॥३॥ नामावांचुनी कांहीं नेणें तो नामा । तयाचा तो प्रेमा पांडुरंगीं ॥४॥ ऐसिया संतांसीं नमन माझें भावें । एका जनार्दनीं जावें वोवाळुनी ॥५॥
२८४६
लहानाहूनि लहान न धरी अभिमान । तेणें हो कारण सर्व बापा ॥१॥ उंचपणें पाहतां वेळुचीये परी । लोहाळा अंतरीं नम्र होये ॥२॥ भक्ति करतां मुक्ति संताचें संगतीं । मग मनीं विश्रांति हरी जोडे ॥३॥ एका जनार्दनीं संतांसी शरण । धरूनियां कान नाचूं द्वारीं ॥४॥
२८४७
लांब लांब तुम्हीं सांगाल गोष्टी । तत्त्वेंसी भेटी करी उठाउठीं ॥१॥ मीपण जोंवरी गेलें नाहीं । तोंवरी तुम्हीं केलें काई ॥२॥ मीपण देहीं प्रपंच दृष्टी । कोरड्या काय सांगाल गोष्टी ॥३॥ एका जनार्दनीं बांधावें सत्य । बोलामाजीं तेणेंक दाखविलें तत्त्व ॥४॥
२८४८
लागलें दैवत अक्षत सांगा । देव देऊळ आलें अंगा ॥१॥ देव देऊळ अवघाचि देव । देखोनियां भाव लागतसे ॥२॥ जाणतां नेणतां उरी नुरे मना । यालागीं शरण एका जनार्दना ॥३॥
२८४९
लागूनियां पायां जना विनवीत । मुखीं बोला दत्त वारंवार ॥१॥ तेणें तुम्हां सुख होईल अपार । दत्त दयासागर आठवावा ॥२॥ स्त्रिया पुत्र संसारा गुंतसी पामरा । तेणें तुं अघोरा पावशील ॥३॥ एका जनार्दनीं चित्तीं दत्तपायां । दत्तरुप काया झाली त्याची ॥४॥
२८५०
लाडिके विठोबाचे आम्हीं । गाऊं नित्यनेमीं नाम तुझें ॥१॥ उत्तम उत्तम साधन हें नाम । गांता प्रेम वाटे जीवीं ॥२॥ न कळेचि वेदां उपनिषद्‌बोधा । त्या हरि गोविंदा लगे आम्हीं ॥३॥ एका जनार्दनीं मंगळा मंगळ । न लगे आम्हां मोल उच्चारितां ॥४॥
२८५१
लाभें लाभ हातासी ये । हेचि गोय धरीं मना ॥१॥ वाउगा सोस नको वाहुं । सुखें गाऊं विठ्ठला ॥२॥ नको नको श्रम पसारा । सैरावैरा धांवुं नको ॥३॥ निवांत सेवों हरिकीर्तना । एका जनार्दनीं म्हणे मना ॥४॥
२८५२
लावण्य मनोहर प्रेमाचा पुतळा । देखिलासे डोळां दत्तराव ॥१॥ चरणीं घातली मिठी प्रेम दुणावें पोटीं । पाहतां हारपली दृष्टी दुजेपणा ॥२॥ मन माझें वेधलें परिपुर्ण भरलें । एका जनार्दनीं सांठविलें हृदयीं दत्त ॥३॥
२८५३
लावुनी आसन बैससी समाधी । तों तों उपाधी सहज लागे ॥१॥ नाममुखीं गातीं जोडे सायुज्यता । उपाधि तत्त्वतां दूरी पळे ॥२॥ घडती कोटी यज्ञयागांचें तें फळ । मुखीं रामनाम सबळ असो ॥३॥ एका जनार्दनीं जयी ऐसा नेम । तोचि पुरुषोत्तम जनामाजीं ॥४॥
२८५४
लावूनियां अंगा राख । म्हणती सुख आम्हांपाशीं ॥१॥ भोळे भाविका भोंदिती । भलते मंत्र तयां देती ॥२॥ म्हणती आम्हां करा गुरु । उपचारु पूजेचा ॥३॥ एका जनार्दनीं तैं मैंद । नाहीं गोविंद तयांपाशीं ॥४॥
२८५५
लावूनियां नेत्र सदा समाधिस्थ । आठवी अनंत ह्रदयामाजीं ॥१॥ नाहीं देहावरी रुपीं जाहला मग्न । नाचे उडे पूर्ण विठ्ठलनामें ॥२॥ अज्ञान तें बाळ धरित तें पायां । चित्त देवराया समरसलें ॥३॥ एका जनार्दनीं नाचतां समरसें । बाळ पायांसरसें चिखलीं आलें ॥४॥
२८५६
लाहे लाहे सोडीत गोधनें । भोंवतें गोपाळ वेष्टित तारांगणें । शोभला तो बाळवेषें परिपुर्ण । वेधु लाविला आम्हांसी तेणें वो ॥१॥ छंदे छंदें वाजवितो वेणु । आमुचा गुंतला तेथे जीवप्राणू । नाठवे दुजा हेत कांहीं आनु । तो हा नंदनंदुनु यशोदचा ॥२॥ खेळे खेळे यमुनेचे तटीं । सुकुमार सांवळा जगजेठी । खांदा घोगडें शोभे हातीं काठी । गोपाळांसी वळत्या दे सये घाली मिठी ॥३॥ एका जनार्दनीं कळंबातळीं । मिळोनियां गोपाळमंडळीं । काला मांडियेला मिळोनि सकळीं । लाहे लाहे वाटी शिदोरी ॥४॥
२८५७
लाहो करा लाहो करा । वाचे स्मरा विठ्ठल ॥१॥ तुटेल बंधन उपाधी । बाधों न शके आधीव्याधी ॥२॥ न लगे खटपट पसारा । वाचे विठ्ठल उच्चार ॥३॥ एका जनार्दनीं सोपें । विठ्ठल म्हणतां नुरतीं पापें ॥४॥
२८५८
लेंकुरातें बाप खेळवी साचें । बाईल देखतां ती पुढें नाचे ॥१॥ माझां बाप माझी आई । बाईल देखतां नाचतो पायीं ॥२॥ धडसेनी तोंडे बोबडें बोले । आवडीनें म्हणे पाहे बाइले ॥३॥ सासू सासरा पहाती साला । नाचतो जांवई घेउनी मुला ॥४॥ यापरी ममता नाचवी जन । देवद्वारीं आलीया धरी अभिमान ॥५॥ एका जनार्दनीं सांडोनी अभिमान । संतापुढें नाचें धरूनियां कान ॥६॥
२८५९
लेकुरें खेळतीं वो साचें । मायबाप प्रेमें नाचे ॥१॥ तैसा हेत पांडुरंगीं । धरितां उणें काय जगीं ॥२॥ जैसा जैसा छंद त्याचा । पुरवणें लागें साचा ॥३॥ एका जनार्दनाचा बाळ । कौतुकें खेळतसें खेळ ॥४॥
२८६०
लोकांचे हे पुत्र संसार करिती । आमुची फ़जिती होय जगीं ॥१॥ सांगतां नायके नाहीं कोणाचा धाक । पंढरीनायक धरिला मनीं ॥२॥ एका जनार्दनीं ऐसें ऐकोनि दु:ख । मग तो नामा देख काय करी ॥३॥
२८६१
लोखंडाची बेडी तोडी । आवडी सोनियाची घडी ॥१॥ मी ब्रह्मा म्हणतां अभिमान । तेथें शुद्ध नोहे ब्रह्माज्ञान ॥२॥ जळापासुनी लवण होये । ते जळीचें जळीं विरुनी जाये ॥३॥ जैशी देखिली जळगार । शेवटीं जळचि निर्धार ॥४॥ मुक्तपणें मोला चढलें । शेवटीं सोनियांची फांसी पडीलें ॥५॥ एका जनार्दनीं शरण । बद्धमुक्ता ऐसा शीण ॥६॥
२८६२
लोह तांबे सोनें । रुपें माती पाषाण । टवाळी भिन्न भिन्न । निर्मित होती ॥१॥ वाती स्नेह भरती । पदार्थ वेगळे दिसती । परि तयामाजी ज्योती । असे एकरुप ॥२॥ तैसे अठरा वर्ण । अत्यंजादि ब्राह्मण । मेरु मशक धरून । भरले जीव ॥३॥ यांचे शरीर भिन्न । आत्मा एक परिपुर्ण । नामरुप जाती वर्ण । नाहीं तेथें ॥४॥ आत्मा स्वयंप्रकाश ज्योति । जे ज्योति ती सुर्या म्हणती । ती तुर्या ज्ञानशक्ति । ईश्वराची असे ॥५॥ एका जनर्दनीं शरण । उजळलें आत्मज्ञान । पदार्थ जाती जळुन । क्षणमात्रें ॥६॥
२८६३
लोह परिसासी झगटे । मग काळिमा कैची भेटे ॥१॥ तैसें विनटो रामनामा । पहिलेंपण कैंचें आम्हां ॥२॥ गंगा मीनली सागरीं । ती परतेना ब्रह्मागिरि ॥३॥ नीच रतली रायासी । तिची कोण म्हणेल दासी ॥४॥ हरिभक्तांचे संगतीं । अभक्तांही उपजे भक्ति ॥५॥ एक जनार्दनी भेटी । चौदेहांची सुटें गांठी ॥६॥
२८६४
लौकिकापुरता नोहे हा विभाग । साधलें अव्यंग सुखसार ॥१॥ अविट विटेना बैसलें वदनीं । नाम संजीवनीं ध्यानीं मनीं ॥२॥ बहुता काळांचें ठेवणें शिवाचें । सनकसनंदनाचेंक कुळदैवत ॥३॥ एका जनार्दनीं भाग्य तें चांगलें । म्हणोनि मुखा आलें रामनाम ॥४॥
२८६५
वंदुं अभाविक जन । ऐकावेंक साधन पावन । कलियुगीं अज्ञान । अभाविक पैं होती ॥१॥ न कळे श्रुती वेदशास्त्र । पुराण न कळे पवित्र । ज्ञान ध्यान गायत्री मंत्र । जप तप राहिलें ॥२॥ यज्ञ यागादिक दान । कोणां न कळें महिमान । अवघे जाहले अज्ञान । न कळे कांहीं ॥३॥ लोपले मंत्र औषध । गाईस न निघे दुग्ध । पतिव्रता ज्या शुद्ध । व्यभिचार करिती ॥४॥ ऐसियानें करावें काय । तिहीं ध्यावें विठ्ठल पाय । एका जनार्दनीं ध्याय । विठ्ठल नाम आवडी ॥५॥
२८६६
वंदें तूं अच्युत सर्वकाळ सदा । मायापाश बंध तुटोनि जाय ॥१॥ करी कां रे नेम धरीं का रे प्रेम । अच्युताचें नाम वंदे सदा ॥२॥ जनार्दनाचा एका अच्युत पै झाला । सप्रेमे रंगला प्रेमें रंगीं ॥३॥
२८६७
वचन मात्रासाठी । पगटला कोरडे काष्ठीं ॥१॥ ऐसी कृपाळु माउली । भक्तासाठीं धांव घाली ॥२॥ कृपेची कोंवळा । राखे भक्तांचा तो लळा ॥३॥ एका जनार्दनीं डोळा । पहा विठ्ठल सांवळा ॥४॥
२८६८
वत्साचिये लळे जैसी । धेनु अपैशी येत घरां ॥१॥ तैसा भक्तांघरी नारायण । धांवे आपण वोढीनें ॥२॥ मुंगुयांच्या घरां मुळ । धांडी समुळ कोण तो ॥३॥ एका जनार्दनीं देव । घेत धांव आपणचि ॥४॥
२८६९
वत्सालागीं गोप धाउनी वारसे । तैसें असो पिसें देवा ठायां ॥१॥ पाडसां चुकलीं हरीण पाहे वास । तैसी धरा आस देवा ठायीं ॥२॥ मातेलागीं चुके बाळ एकुलतें । तैसें देवापरतें न धरा मनीं ॥३॥ एका जनार्दनीं देव करा सखा । प्रपंच पारिखा सहज तेणें ॥४॥
२७७०
वदतां वदनीं अहर्निशीं राम । उपदेश सुगम सोपा मंत्र ॥१॥ दो अक्षरीं राम तेणें जोडे धाम । आणिक तो श्रम वायां जाये ॥२॥ सर्वाभूति समदृष्टिते पहाणें । मग नाहीं पेणें आन दुजें ॥३॥ दुजें पेनें नाहीं एका जनार्दनीं । श्रीरामावाचुनीं आन नेणें ॥४॥
२८७१
वदुनीं श्रीगुरुचरण । संतमहिमा वर्णु ध्यान ॥१॥ आदिनाथगुरु । तयापासोनी विस्तारु ॥२॥ आदिनाथें उपदेश । केला मत्स्येद्रा तोशिष्य ॥३॥ मत्स्येंद्र तो वोळला । गोरक्षासी बोध केला ॥४॥ गोरक्ष अनुग्रहित । गहिनी संप्रदाययुक्त ॥५॥ गहिनी दातारें । निवृत्ति बोधिलासे त्वरें ॥६॥ निवृत्ति प्रसाद । ज्ञानदेवा दिला बोध ॥७॥ ज्ञानदेव कृपेंकरुन । शरण एका जनार्दन ॥८॥
२८७२
वदे तोचि कल्पित शास्त्र तें शाब्दिक । पुराणा सकळिक बाष्कळचि ॥१॥ बाहुली तो जीव सुत्रधारी तो शिव । मिथ्याचि हे भाव जग सर्व ॥२॥ येथें कैंचा मुक्त मुळींच नाहीं बद्ध । सर्वहि अबद्ध दिसे जें कां ॥३॥ एका जनार्दनीं ऐसी याची खूण । जाणें तोचि धन्य गुरुपुत्र ॥४॥
२८७३
वनमाजीं नेती गोपिका तयासीं । राम क्रीडा खेळावयासी एकांती ॥१॥ जैसा जया चित्ती हेत आहे मनीं । तैसा चक्रपाणी खेळतसे ॥२॥ जया जैसा भाव तैसा पुरविणें । म्हणोनि नारायणें अवतार ॥३॥ एका जनार्दनी घेऊनी अवतार । भक्ताचे अंतर जैसें तैसें ॥४॥
२८७४
वमिल्या मिष्टान्ना । परतोई श्रद्धा न धरी रसना ॥१॥ ऐसे आठवितां माझे गुण । मिथ्या ठायीं नसें ज्ञान ॥२॥ जेथें कर्माचे परिपाठीं । हें तों पुन्हा नये गोष्टी ॥३॥ येव्हढें कथेचें महिमान । एका जनार्दनीं शरण ॥४॥
२८७५
वरपांग सोंग नको माळा मुदी । ठाव संतपदी देई देवा ॥१॥ प्रेमभाव देई प्रेमभाव देई । मागणें दुजें नाहीं आणिक तें ॥२॥ नाम मुखीं सदा संतांचा सांगात । प्रेम हृदयांत विठोबाचे ॥३॥ एका जनार्दनीं हा माझा निर्धार । जन्माची वेरझार तोडी देवा ॥४॥
२८७६
वरीवरी दाविती आचार । अंतरीं तो अनाचार ॥१॥ मुखीं नाहीं कधीं नाम । सदा काम विषयाचा ॥२॥ नेणें कधीं संतसेवा । न करी देवा पूजन ॥३॥ शरण एका जनार्दनीं । ऐसा जन्मला तो जनीं ॥४॥
२८७७
वरीवरी दावी भक्ति । अंतरीं असे कामासक्ति ॥१॥ माझें घर माझें कलत्र । माझें गोत्र माझा पुत्र ॥२॥ ऐसा प्रपंची गुंतला । तयावरी काळघाला ॥३॥ एका जनार्दनीं शरण । काळ वंदितसें चरण ॥४॥
२८७८
वरुषला मेघ खडकावरुता । चिखल ना तत्त्वता थेंब नाहीं ॥१॥ वायां तो प्राणी आला नरदेहा । गेला वाया पहा भक्तिविण ॥२॥ अरण्यांत जैशी सुकरें बैसतीं । तैसें मठाप्रती करुनी बैसे ॥३॥ उदय होतांची लपतें उलुक । तैसें तो मूर्ख समाधि बैसे ॥४॥ एका जनार्दनीं वायां गेलें सर्व । संसार ना देव दोन्हीं शून्य ॥५॥
२८७९
वर्णावर्ण नाहीं । हेंचि प्रावराण त्याचे ठायीं ॥१॥ परभक्तिईच्या पालवीं । जिवो अज्ञाना मालवी ॥२॥ करा करा जन्मोद्धार । हरिभक्तीचा बडीवार ॥३॥ एका जनार्दनीं बोध । दत्तापायीं तो स्वानंद ॥४॥
२८८०
वर्णावी ती थोरी एका सदगुरुची । येरा मानवाची कामा नये ॥१॥ सदगुरु समर्थ कृपेचा सागर । मनी वारंवार आठवावा ॥२॥ सदगुरुचरणीं तल्लीन हे वृत्ति । वृत्तीची निवृत्ति क्षणमात्रें ॥३॥ एका जनार्दनीं आठवीं सदगुरु । भवसिंधु पारु पावलसे ॥४॥
२८८१
वर्णितां वेदमती कुंठित पैं जाली । पुराणें भागलीं विवादतां ॥१॥ सोपारा सुगम पुंडलिकापाठीं । उभा जगजेठी विटेवरी ॥२॥ लक्ष्मी ते स्वयें रुक्मिणी शोभत । विंझणें वारीत सत्यभामा ॥३॥ सांडुनी रत्‍नकिळा गळां तुळसीमाळा । चंदनाचा टिळा केशरयुक्त ॥४॥ गोपाळ गजरें आनंदें नाचती । मध्यें विठ्ठलमूर्ति प्रेमें रंगें ॥५॥ मनाचें मोहन योगाचें निजधन । एका जनार्दनीं चरण विटेवरी ॥६॥
२८८२
वर्म जाणें तो विरळा । तयांचीं लक्षणें पैं सोळा । देहीं देव पाहे डोळां । तोचि ब्रह्माज्ञानीं ॥१॥ जन निंदो अथवा वंदो । जया नाहीं भेदाभेद । विधिनिषेधाचें शब्द । अंगीं न बाणती ॥२॥ कार्य कारण कर्तव्यता । हें पिसें नाहीं सर्वथा । उन्मनी समाधी अवस्था । न मोडे जयाची ॥३॥ कर्म अकर्मचा ताठा । न बाणेचि अंगी वोखटा । वाउग्या त्या चेष्टा । करीना कांहीं ॥४॥ शरण एका जनार्दनीं । तोचि एक ब्रह्माज्ञानी । तयाचे दरुशनीं । प्राणियासी उद्धार ॥५॥
२८८३
वसती सदा पंढरीसी । नित्य नेमें हरी दरुशनासी । तयां सारखे पुण्यराशी । त्रिभुवनीं दुजे नाहीत ॥१॥ धन्य क्षेत्र भीवरातीर । पुढे पुंडलीक समोर । तेथें स्नान करती नर । तयां जन्म नाहीं सर्वथा ॥२॥ करती क्षेत्र प्रदक्षिणा । त्याच्यां पार नाहीं पुण्या । जगीं धन्य ते मान्य । एका जनार्दनीं म्हणतसे ॥३॥
२८८४
वसो कां भलते ठायीं जन । परि कीर्तन करी हरीचें ॥१॥ तोचि सर्वांमध्यें वरिष्ठ । एकनिष्ठपणें होतां कीर्तनीं ॥२॥ मनीं वसो सदा कीर्तन । अहर्निशीं ध्यान कीर्तनीं ॥३॥ पावन तो तिहीं लोकीं । एका अवलोकीं तयातें ॥४॥
२८८५
वहिनीनें आम्हां काय धाडियेलें । मग आठवलें सुदाम्यासी ॥१॥ म्हणे माझें वस्त्र ग्रंथीं कोठें आहे । तंव ती आणुनी देतसे जगन्माता ॥२॥ बंधूची संपदा पहा कृष्णनाथा । सत्यभामा तत्वतां बोलतसे ॥३॥ सोडोनियां ग्रंथी समग्र ते केले । पुढे वोढविले कर देवें ॥४॥ एक ग्रास मुखीं घालितांचि जाण । एका जनार्दनीं खूण समजली ॥५॥
२८८६
वांझचिया बाळा बागुलें ग्रासिलें । तैसे मिथ्या देह कळिकाळें ग्रासिलें ॥१॥ नेणा नवलावो जाणा ब्रह्माभावो । देहींचा संभव समूळ मिथ्या ॥२॥ जळगार पाषाण तें जैसें जीवन । साकार देह तैसा ब्रह्मार्पण ॥३॥ एका जनार्दन एकत्व पाहीं । देहविदेह समुळ तेथे नाहीं ॥४॥
२८८७
वाउगा पसारा नेणें तो पामर । कीर्तनीं निर्धार ठेवीचिना ॥१॥ सोपें हें वर्म कीर्तन हरीचें । उच्चारी रे वाचे रामनाम ॥२॥ एका जनार्दनीं कीर्तन आदरें । सर्वभावें निर्धारें श्रवण करी ॥३॥
२८८८
वाउगाचि शीण करिसी सर्वथा । चुकसी परमार्था मूढा जाण ॥१॥ किती करिसी सोस माझें माझें म्हणोनि । शेवटीं बंधनीं पडसी मूढा ॥२॥ अंतकाळीं कोणी नाही रे सांगाती । होईल फजिती तुझी तुला ॥३॥ एका जनार्दनीं वाउगाचि धंदा । त्यजुनी गोविंदा सेवी बापा ॥४॥
२८८९
वाउगाचि सोस न करी सायास । भजे श्रीसंतांस एकभावें ॥१॥ जाणोनि नेणतां कां होसीं रे मुर्ख । सुखांचे निजमुख विटेवरी ॥२॥ एका जनार्दनीं धरुनि विश्वास । होई कां रे दास संतचरणीं ॥३॥
२८९०
वाउगाची पसारा । कां रे वाढविला गव्हारा ॥१॥ म्हणसी माझें माझें । अंती कोण आहे तुझें ॥२॥ भुललासी वायां । गमाविसी व्यर्थ काया ॥३॥ कोण हें कोणाचें । एका जनार्दनीं साचें ॥४॥
२८९१
वाउगाची सोस वाहताती वोझें । म्हणती माझें माझें हीन भाग्य ॥१॥ जाणती नेणती राहाटी देखती । मरती रडती देखती त्या ॥२॥ एका जनार्दनीं भुलले ते वायां । परि देवराया शरण न जाती ॥३॥
२८९२
वाउगी उपाधी न करी रे मना । चिंती या चरणा राघवाच्या ॥१॥ अंतकाळीं सखा कोणी नाहीं दुजा । पुत्र पत्‍नी वोजा न ये कामा ॥२॥ चालतांचि देह म्हणती माझा माझा । अंतकाळ पैजा यम बांधी ॥३॥ एका जनार्दनीं सर्व हें मायिक । शाश्वत तें एकक श्रीरामनाम ॥४॥
२८९३
वाउगे ते बोल बोलती अबळा । कवण ते गोपाळा धरुं शके ॥१॥ प्रेमावीण कोण्हा न सांपडे हरी । वाउगी वेरझारी घरामध्यें ॥२॥ एका जनार्दनीं गोपीकांसीं शीण । म्हणोनि विंदान करीतसे ॥३॥
२८९४
वाउगे ते बोल बोलती चावटी । ब्रह्माज्ञान कसवटी अंगीं नाहीं ॥१॥ संसारीं असोनी अलिप्त नलिनी । तैसा ब्रह्माज्ञानीं विरक्त तो ॥२॥ आकाशमंडळीं रवि तो भ्रमला । परिरांजणीं बिंबला नाथिलाची ॥३॥ एका जनार्दनीं प्रसादावांचुनीं । ब्रह्माज्ञान मनीं न ठसे कधीं ॥४॥
२८९५
वाउगे बोल जाती वायां । पंढरीराया कृपेविण ॥१॥ तुमचा छंद वसो मनीं । संतचरणीं वास सदा ॥२॥ नको आत्मस्थिति वायां शीण । तुम्हांवीण दयाळा ॥३॥ एका जनार्दनीं शरण । मनाचें मोहन तुम्ही माझें ॥४॥
२८९६
वाऊगाची सोस करितोसी तूं मना । चिंती तुं चरणां विठोबाच्या ॥१॥ अविनाश सुख देईल सर्वदा । वाचे वदा सदा रामनाम ॥२॥ तारिले पातकी पावन कलियुगी । नामनौका जगीं तारावया ॥३॥ भवसिंधु पार रामनाम सार । न करीं विचार दुजां कांहीं ॥४॥ एका जनार्दनीं घ्यावा अनुभव । प्रत्यक्ष पाहा देव विटेवरी ॥५॥
२८९७
वाऊगे तें वायां । कुंथाकुंथी खेळावया ॥१॥ हा खेळ नोहेरे बरा । गाई आधी ते आवरा ॥२॥ करा आपुले स्वाधीन तेणें तुटेल बंधन ॥३॥ एका गुंतूं वायां । एका जनार्दनीं लागे पायां ॥४॥
२८९८
वाचे बोला दत्त दत्त । होय सकळ परमार्थ ॥१॥ दत्तरुपीं लागतां दृष्टी । दत्तरुप अवघी सृष्टी ॥२॥ दत्तकथा वसे कानी । दत्तमुर्ति ध्यानीं मनीं ॥३॥ दत्तालागीं आलिंगना । कर समर्थ हें जाणा ॥४॥ एका जनार्दनीं दत्त । सदा वसे हृदयांत ॥५॥
२८९९
वाचे म्हणा रामनाम । तेणें निवारे क्रोध काम । संसाराचा श्रम । नुरे कांहीं तिळमात्र ॥१॥ न लगे वेदविधि आचार । सोपा मंत्राचा उच्चार । अबद्ध अथवा शुचि साचार । राम म्हणा सादर ॥२॥ एका जनार्दनीं धरूनी भाव । वाचे वदा रामराव । भवसिंधूचें भेव नुरे तुम्हां कल्पातीं ॥३॥
२९००
वाचे विठ्ठल बोलावें । मग पाऊल ठाकावें ॥१॥ ऐसा ज्याचा नेमधर्म । मुखीं विठ्ठलाचें नाम ॥२॥ सर्वकाळ वाचें । विठ्ठलनाम वदती साचें ॥३॥ कुळधर्म आमुचा । म्हणे एका जनार्दनाचा ॥४॥
२९०१
वाचे सदा रामनाम । तया न बाधी क्रोध काम ॥१॥ हेंचि एक सत्य सार । वायां नको वेरझार ॥२॥ संसार वायां न म्हणे सार । करी परमार्थ विचार ॥३॥ एका जनार्दनीं रामनाम । वाचे वदे तुं निष्काम ॥४॥
२९०२
वाट पिकली संतांची । अवघें स्वरुप मुद्दलची ॥१॥ उकल करा लवडसवडीं । मुद्दल देव घडोघडीं ॥२॥ द्वैतांची दाटणी सोडी । वासनेची वासना फेडी ॥३॥ आळ करितां सरळ सात । मन पडेल विचारांत ॥४॥ अखिल गुरुनामाचे । स्थापिले सुरंग भक्तीचे ॥५॥ अंगळू मंगळु नंद भाषा । द्वैत दळणीं वटील घसा ॥६॥ आंत बाहेर एकचि सुत । मुद्दल देतां सुखी होत ॥७॥ एका जनार्दनीं एकचि भेटी । सरिसी साठी संसारा ॥८॥
२९०३
वाणी वदे रामनाम । तेणें साधे सर्व काम ॥१॥ मनें रामाचें चिंतन । नामीं चित्त समाधान ॥२॥ बुद्धिलागीं हाचि छंद । नित्य वदावा गोविंद ॥३॥ गोविंदावांचुनी । दुजा ध्यास नाहीं मनीं ॥४॥ एका जनार्दनीं मन । नित्य करी ब्रह्माध्यान ॥५॥
२९०४
वादविवाद अतिवाद । नावडे कोणाचीही संमध ॥१॥ बोल एक आम्हां बोलणें । वाचे विठ्ठलुचि म्हणे ॥२॥ आणिकाची चाड चित्तीं । नाहीं नाहीं गा त्रिजगतीं ॥३॥ शरण एका जनार्दनीं । विठ्ठल भरलासे व्यापुनी ॥४॥
२९०५
वायां खेळ एकीबेकी । पडलीस काळाचे मुखीं ॥१॥ आधींच एक निर्गुण रे । मायेनें केलें सगुण रे ॥२॥ एकीबेकी म्हणतां एकलें रे । दोन म्हणतां सर्व आतलें रे ॥३॥ एका जनार्दनीं ऐकलें रे । एक जण अवघें फिटलें रे ॥४॥
२९०६
वायां बोभाट अनंता । शरणगता उपेक्षिलिया ॥१॥ अपमानाचें भातुकें । तुम्हां सुखे देतील ॥२॥ एका परीस एक थोर । तुमचा बडिवार चालुं नदेती ॥३॥ विनती जनर्दनाचा एका । देवा लौकिका सांभाळा ॥४॥
२९०७
वायां वायां शिणती साधक जन । साधक तितुकें ज्ञानघन । साध्य साधन मानितां भिन्न । निजात्मा पुर्ण नव्हती ॥१॥ साखरेवेगळी पाहतां गोडी । पाहे म्हणती ते बुद्धि कुडी । साखर अवघी गोड धाकुडी । आत्मा निरवडी जग तैसें ॥२॥ साधनें साधूं आत्मायासी । ऐसें म्हणती ते परम पिसी । आत्मा प्रकाशी साधनासी । तो केवीं त्यासी आकळे ॥३॥ एक ते मंत्र उपदेशिती । जपू करावा नेणों किती । जेणें होय निजात्मप्रत्पि । ते मंत्रयुक्ति न कळे ॥४॥ मंत्री मंत्रामाजीं अक्षर । ॐ नमः इत्यादि उच्चार । अक्षरीं अक्षर चिन्मात्र । मंत्र साचार परब्रह्मा ॥५॥ पाठका साधन वेदपठण । अक्षर उच्चार स्वर वर्ण । कोरडी वाची तोंड पठण । नव्हे बोळवण कामक्रोधा ॥६॥ वेदमुळ तो ॐकार । तोचि परब्रह्मा साचार । अकार उकार मकार । वेद चिन्मात्र पठणेसी ॥७॥ शास्त्र श्रवण साधन शुद्ध । देहाभिमानें केलें विरुद्ध युक्तिप्रगुक्तिचें बोध । अति विवाद पंडितीं ॥८॥ शास्त्र तितुकें ज्ञानसंपन्न । जे जे युक्ति ते केवळ ज्ञान । शास्त्रामाजीं जाणपन । तेंचि ब्रह्मापुर्ण श्रवणार्थ ॥९॥ प्रल्हादा साधन केवळ हरी । हरी सर्वांगें विघ्न निवारी । अनाम भक्त वचनें करी । नरकेसरी होऊन ठेला ॥१०॥ जैसा जैसा भक्तांचा पैं भावो । तैसा तैसा भाळे देवो । भावे वाचूनियां पाहो । हायो अभावो देवाचा ॥११॥ ऐसे साध्य तेंचि साधन । ज्ञेय तेंचि धृतिज्ञान । ध्येय तेंचि होय ध्यान । समाधान गुरुवाक्यें ॥१२॥ जें जें विषयांचें गोडपण । तें तें गोडी चैतन्यघन । विषयीं विषय ब्रह्मापुर्ण । इंद्रिय स्फुरण चिन्मात्र ॥१३॥ जेथें जो म्हणविसी अज्ञाना अज्ञान । देखणें तो ज्ञानघन । आम्ही नेणों ज्ञानाज्ञान । तो ब्रह्मापुर्ण सहजेंचि ॥१४॥ एका पाहातां एकपण । जन तोचि जनार्दन । एकाजनार्दनीं शरण । जग संपुर्ण परब्रह्मा ॥१५॥
२९०८
वायां शब्दज्ञान बोलावा गौरव पोटींचा पैं भाव मिथ्या सोंग ॥१॥ मैंदाचिया परी बेसती ध्यानस्थ । सदां चित्त ओढत परधनीं ॥२॥ वैराग्य तें फोल सांगताती गोष्टी । काय तें चावटी मिथ्या बोल ॥३॥ एका जनार्दनीं ऐसीया सोंगासीं । कैं हृषीकेशी प्राप्त होय ॥४॥
२९०९
वायांचि कासया करितां आटाआटी झणें पाडा तुटी संसारासी ॥१॥ संसार कर्दमीं गुंतलेली बापा । किती वेळां खेपा कराव्या त्या ॥२॥ मरावें जन्मावें मरावें जन्मावें । खंडन केव्हां व्हावें न धरा शुद्धी ॥३॥ एका जनार्दनीं किती तें सांगावें । नायकर्ता हावे भरले जीव ॥४॥
२९१०
वायांचि भुली पडली गव्हारा । भ्रमली भोंवरा संसारींच्या ॥१॥ कां रे सावध न होशी मूढा । शिणशी दगडा फजितखोरा ॥२॥ गुंतुनी पडसी वाउग्या व्यसनीं । संसार घसणीं चौर्‍यांयशींच्या ॥३॥ एका जनार्दनीं किती हें सांगावें । जाणत जाणत नागवे निलाजिरा ॥४॥
२९११
वायांची आयुष्य जातसे खरें । उपाय तो बरें हरी एक ॥१॥ अवघा वेळ अवघा काळ । नका पोकळ घालवुं ॥२॥ जे जे घडी जे जे वेळीं । करा कल्लोळीं हरिकथा ॥३॥ शरण एका जनार्दनीं । भजा अनुदिनें संतासीं ॥४॥
२९१२
वायांची सोस संसार कामाचा । रामनामीं वाचा रंगी कां रे ॥१॥ यापरती जीवा सोडवण नाहीं । वेदशास्त्रीं पाहीं भाष्य असे ॥२॥ पुराणे डांगोरा पिटती नामाचा । तें तूं कां रे वाचा न वदसी ॥३॥ सायास साधनें न लगे आणीक । एका जनार्दनीं ऐक्य मन करी ॥४॥
२९१३
वायांविण करुं नये बोभाट । सांपडली वाट सरळ आम्हां ॥१॥ आतां नाहीं भय तत्त्वतां । ठेविला माथा चरणावरी ॥२॥ धरिल्या जन्माचें सार्थक । निवारला थोर धाक ॥३॥ गेला मागील तो शीण । तुमचें दरुशन होतांची ॥४॥ पूर्णपणें पूर्ण जाहलों । एका जनार्दनीं धालों ॥५॥
२९१४
वारंवार जन्म घेऊं । परी पाहूं पंढरपूर ॥१॥ दुजें मागणें देवा । करुं सेवा वैष्णवांची ॥२॥ न मागों भुक्ति आणि मुक्ति ती फजिती कोण सोसी ॥३॥ एका जनार्दनीं मागे । कीर्तनरंगी रंगला वेगें ॥४॥
२९१५
वारंवार देही हेचिं पैं वासना । अखंड चरणा घालीन मिठी ॥१॥ हा माझा नवस आठवीन पाय । आणिक तें कांहीं नेणें दुजें ॥२॥ संअल्पासी कैं येईल । कैं धीरा धीर होईल मन ॥३॥ एक जनार्दनीं अखंड वासना । पुरवा नारायणा देउनी भेटी ॥४॥
२९१६
वारंवार संतसंग । गाऊं अभंग हरि नाम ॥१॥ वाचे किर्ति पाय पंथीं । आणिकांची स्तुति न गाऊं ॥२॥ एकविधपणें राहूं । वाचे गाऊं विठ्ठल ॥३॥ एका जनार्दनीं सेवा । तुमचें देवा दास्यत्व ॥४॥
२९१७
वारकरी पंढरीचा । धन्य धन्य जन्म त्याचा ॥१॥ जाय नेमें पढंरीसी । चुको नेदी तो वारीसी ॥२॥ आषाढी कार्तिकी । सदां नाम गाय मुर्खीं ॥३॥ एका जनार्दनीं करी वारी । धन्य तोचि बा संसारीं ॥४॥
२९१८
वासना विषयीं सदा वसे । तेथें देवा कोण पुसे ॥१॥ सदा तळमळी मन । करी ध्यान विषयांचें ॥२॥ रात्रंदिवस करी चिंता । नाठवी सर्वथा रामनाम ॥३॥ एका जनार्दनीं नाहीं भाव । तंव कैंचा भेटे देव ॥४॥
२९१९
वासनेंचे वसन समूळ फाडी । त्रिगुण जानवेंक तयावरी तोडी ॥१॥ यापरी जाणोनी संन्यासु घेई । गुरुवचनें सुखें विचरतु जाई ॥२॥ मन दंडिजे तोचि घेई सुंदंडु । जीवनेंविण कमंडलु अखंडु ॥३॥ एकाक्षरजप करी । क्षराक्षरातीत धरणा धरी ॥४॥ स्वानंदाचें करी करपात्र । सहजीं सहज जेवीं नारायण वक्त्र ॥५॥ एका जनार्दनीं सहज संन्यासु । सहजीं सहज तेथें न लगे आयासु ॥६॥
२९२०
वासुदेव नाम प्रातःकाळीं वाचे । धन्य जन्म त्यांचें सुफळ सदा ॥१॥ वाहतां टाळीं मुखीं नाम सार । वासुदेव उच्चार करी आधीं ॥२॥ जनार्दनाचा एका एकपणें देखा । जनार्दन सखा जोडियेला ॥३॥
२९२१
वाहूनिया हातीं टाळी । करुं भजन प्रेमळीं ॥१॥ विठ्ठल विठ्ठल वाचे वदूं । दुजा नाहीं आम्हां छंदु ॥२॥ जाऊं पंढरीस नेमें । संतासंगें अनुक्रमें ॥३॥ पुंडलीक चंद्रभागा । दरुशनें जाय पापभंगा ॥४॥ एका जनार्दनीं स्नान । पातकें पळती रानोरान ॥५॥
२९२२
वाहे भक्तांचे उपकार । न संडी भार त्यांचा तो ॥१॥ म्हणे इहीं थोरपण आम्हां । ऐसा वाढवी महिमा भक्तांचा ॥२॥ एका जनार्दनीं कृपाळू । दीनाचा दयाळ विठ्ठलु ॥३॥
२९२३
विकल्प वासना समूळ दे टाकुनी । मग तुज भजनी सुख बापा ॥१॥ आशापाश मोह सांडी तूं निराळा । भजन तें गोपाळा प्रिय वाटे ॥२॥ भेद अभेददाचें मूळ आधीं खंडी । भजन तें तोंडीं मग गोड ॥३॥ एका जनार्दनीं शुद्ध हे वासना । तैं नारायणा प्रिय भक्ति ॥४॥
२९२४
विचारावेंविवेक दृष्टी । संतचरणीं द्यावीं मिठी ॥१॥ तेणें चुके जन्मजरा । चुकवी चौर्‍यांशींचा फेरा ॥२॥ संतचरण अनुदिन । द्रुढ राखावें तेथें मन ॥३॥ एका जनार्दनीं शरण । सहज निवारे जन्ममरण ॥४॥
२९२५
विचारितां तुज नामाची नसे । नामरुपी तुझें स्वरुप भासे ॥१॥ नाम आरामता पाउनी पठण । यापरी स्मरिजे या नांव पठण ॥२॥ गर्जत नामीं जो जो शब्द उठी । शब्दानुशब्दा पडतसे मिठी ॥३॥ एका जनार्दनीं नित्य स्मरें नाम । नामरुप जाला आत्माराम ॥४॥
२९२६
विचारीं पां धडफुडें । देह तंव केवळ जडमूढे । कर्मसंबधन तयाकडे । केवीं लागे ॥१॥ आत्मनीं न रिघे कर्म । कर्म केवळ श्रम । थिल्लरी जेवी सोम । चळी कांपे ॥२॥ देह जगत्व न लगे देहीं । अथवा न लगे आत्म्याच्या ठायीं । आतां कर्म तें मिथ्या पाहीं ॥३॥ भ्रमरुप वाढवितां कर्मठपण । ठकलें सज्ञान जन । एका जनार्दनीं कर्म भ्रमण । बोळवण रया ॥४॥
२९२७
विटिदांडु खेळसी वांया । चौर्‍यायंशी वेरझारा होती पाया ॥१॥ नको विटिदांडु सांडीं हा छंदु । आवडी वदे रामगोविंदू ॥२॥ किती वेरझारी करीसी पा वायां । शरण रिघे एका जनार्दन पायां ॥३॥
२९२८
विटिदांडु चेंडु भला रे । मनीं समजोनी मारा टोला रे ॥१॥ खेळूं विटिदाडुं चेंडु । काळा नका भिऊ गांडु रे ॥धृ॥ सहा चारएकत्र करुनी अवघे पुढें रहा । सावध होऊनि धरा चेंडु कोणी कोणाकडे न पहा ॥२॥ प्रपंचाचे घाई धन वित्त म्हनता भाई । हातीचा चेंडु सोडुनी देई पुढें मारील डोई ॥३॥ खेळ खेळा परी मनीं धरा जनार्दन । तेणे चुके जन्ममरण शरण एका जनार्दन ॥४॥
२९२९
विटेवरी दिसे स्वानंदाचा गाभा । श्रीमुखाची शोभा काय वानुं ॥१॥ कटीं पिंतांबर तुळशीचे हार । उभा सर्वेश्वर भक्तिकाजा ॥२॥ लावण्य रुपडें पाहें पुडंअलीक । आणीक सम्यक नये दुजा ॥३॥ पाहतां पाहतां विश्रांती पै जाली । एका जनार्दनीं माउली संताची ते ॥४॥
२९३०
विटोळेंविण पोटा आला । अवघा संसार मिंधा केला ॥१॥ लग्न लागतां आला पोटा । मग सोडिलें अंतरपाता ॥२॥ ॐकारेसी बुडाली घडी । लग्न लाविलें औटावे घडीं ॥३॥ एका जनार्दनीं लग्न समरसें । पाहों गेलिया त्या लाविलें पिसें ॥४॥
२९३१
विठठल पुडलिकासाठीं । उभा राहिला वाळुवंटीं । कर ठेवुनियां कटीं । भक्तासाठीं अद्याप ॥१॥ न कळे तयांचे महिमान । वेदां पडलेसें मौन । शास्त्रांचे भांडण । परस्परें खुटले ॥२॥ नेणवे तो सोळा बारां । आणीक साहा तें अठरा । पंचविसासी पुरा । न कळे बारा छत्तिसां ॥३॥ ऐसां त्रिवाचा वेगळा । परमानंदाचा तो पुतळा । एका जनार्दनीं डोळां । देखिला देव ॥४॥
२९३२
विठुच्या छंदासी । पडतां आहे रे विवसी ॥१॥ संसाराची वाताहात । नामया होसी तूं निवांत ॥२॥ वडिलाची गोष्टी । नामा सांगे जगजेठी ॥३॥ एका जनार्दनीं वेधलें मन । ध्यानीं मनीं विठ्ठल पूर्ण ॥४॥
२९३३
विठ्ठल देवाधिदेवो । भक्तजनांचें निवारी बिहो । तो पंढरीचा रावो । विटे उभा ठाकला ॥१॥ मना लागो त्याचा छंद । निरसोनि भेदाभेद । अवघाचि गोविंद । ठसावें हदयीं ॥२॥ स्नान केया चंद्रभागें । पातकें नासतील वेगें । संकल्प विकल्प त्याग । दरुशन घेतांची ॥३॥ ऐसा घडतां हा नेम । तयापाशी पुरुषोत्तम । एका जनार्दनीं काम । देव करी स्वयं अंगे ॥४॥
२९३४
विठ्ठल नाम घेती वाहाती टाळिया । ब्रह्मादिक येऊनियां वंदिती पायां ॥१॥ धन्य धन्य हरिभक्त जगीं । वाहाताती टाळी नाचताती रंगीं ॥२॥ पेमभरित सदा करिती कीर्तन । एका जनार्दनीं वंदूं तयाचे चरण ॥३॥
२९३५
विठ्ठल पंढरपुर निवासी । विठ्ठल उभा भिवरेसी । विठ्ठल पुंडलिकापाशीं । भक्ति प्रेमेशीं तिष्ठत ॥१॥ जाई जाई मना तेथें । सुखें वैष्णव नाचती जेथें । ब्रह्मानंदपद दरुशनमात्रें । देत आहे भक्तांसी ॥२॥ सुलभ सुलभ मंत्रराज । शंभु जाणे निजबीज । एका जनार्दनीं गुज । सांगतसे भाविकां ॥३॥
२९३६
विठ्ठल म्हणतां विठ्ठलाचि होसी । संदेह येविशीं धरुं नको ॥१॥ सागरीं उठती नाना पईं तरंग । सिंधु तो अभंग विठ्ठल एक ॥२॥ तैसे मन करी द्वैत न धरी । सर्व चराचरी विठ्ठल एक ॥३॥ एका जनार्दनी विठ्ठलावांचुनी । दुजा नेणो कोणी स्वप्नी आम्हीं ॥४॥
२९३७
विठ्ठल रुक्मिणी राहीं सत्यभामा एकरुपी परमात्मा पंढरीये ॥१॥ कैवल्य उघडें क्षीरसागर निवासी । तपें पुंडलिकासे वश्य जाहिलें ॥२॥ अणूरेणुपासोनि भरुनि उरला । तो म्यां देखियेला पंढरीये ॥३॥ एका जनार्दनीं सांवळा श्रीकृष्ण । जनीं जनार्दनीं पुर्ण भरला ॥४॥
२९३८
विठ्ठल विठ्ठल वदतां वाचे । स्वरुप त्यांचे ठसांवे ॥१॥ हा तो अनुभवा अनुभव । निरसे भेव काळांचे ॥२॥ रुप देखतां आनंद । जन्म कंद तुटे तेणें ॥३॥ एका जनार्दनीं मन । जडोन ठेलें चरणीं ॥४॥
२९३९
विठ्ठल सांवळा पंढरीये उभा । धन्य त्यांची शोभा सोभतसे ॥१॥ पुंडलिका मागें कर ठेवुनी कटीं । समपाय विटीं देखियेला ॥२॥ राहीं रखुमाई शोभती त्या बाहीं । बैष्णव दोही बाहीं गरुडपारीं ॥३॥ एका जनार्दनीं पाहुनियां । ध्यान मनाचें उन्मन होत असें ॥४॥
२९४०
विठ्ठलावांचुनीं आणिकाचे ध्यान । नाहीं आम्हां चिंतन दुजियांचे ॥१॥ आमुचे कुळींचे विठ्ठल दैवत । कुळधर्म समस्त विठ्ठल देव ॥२॥ विठ्ठलावांचुनी नेणों क्रियाकर्म । विठठलावांचुनी धर्म दुजा नाहीं ॥३॥ एका जनार्दनीं विठ्ठल भरला । भरुनीं उरला पंढरीये ॥४॥
२९४१
विठ्ठलासी गाय विठ्ठलासी ध्याय । विठ्ठलासी पाहे वेळोवेळां ॥१॥ विठ्ठल विसावा सोडवला जीवां । म्हणोनि त्याच्या गांवा जावें आधीं ॥२॥ विठ्ठलावाचुनी सोयरा जिवलग । विठ्ठलाचि मार्ग जपा आधीं ॥३॥ एका जनार्दनीं विठ्ठलावांचोनि । दुजा नेणे स्पप्नी संग कांही ॥४॥
२९४२
विदेहदेह विस्मृति पावले । देहादेहीं फिटलें द्वैताद्वैत ॥१॥ ऐसें जनार्दनें उघड दाविलें । देहींच आटलें देहपण ॥२॥ एका जनार्दनीं चौदेहा वेगळा । दाविलासे डोळा उघड मज ॥३॥
२९४३
विद्या जलिया संपूर्ण । पंडित पंडिता हेळसण ॥१॥ धन जालिया परिपुर्ण । धनाढ्यासी हेळसण ॥२॥ कळतां आत्मज्ञान स्थिति । भलत्यासवें वाद घेती ॥३॥ वृश्चिका अंगीं विष थोडें । तैसा वादालागीं चढे ॥४॥ भुलोनि पामर । एका जनार्दनीं बुडवी घर ॥५॥
२९४४
विधिनिषेध कवणेपरी । कार्या कारण ते परी ॥१॥ नाम जपतां सादर । विधिनिषेध पळे दूर ॥२॥ व्रत करा एकादशी । कंठीं मिरवा तुळशी ॥३॥ करा घोष हरिकथा । विधिनिषेध वंदीत माथां ॥४॥ एकपणें जनार्दनें । एका विधिनिषेध नेणें ॥५॥
२९४५
विधिनिषेध धरितां मनीं । सहजें कार्य होय हानीं ॥१॥ जें जें वेळे जें जें घडे । विधिनिषेध सर्व जोडे ॥२॥ अन्य नाहीं विचारणा । कार्यकारण सर्व जाणा ॥३॥ एका जनार्दनीं खूण । जाणते ते परिपुर्ण ॥४॥
२९४६
विधियुक्त नोहे संध्यास्नान । तेणें घडें पतन कल्पकोटी ॥१॥ रेचक पूरक कुंभक ब्रहाटक । प्राणायाम देखन साधेचि ॥२॥ मूळ मंत्र न्यास विधि बीज । न घडतां सहज दोष लागे ॥३॥ हृदय कवच शिखा शिरीं । नेत्र अस्त्रादिक फटकारीन साचे ॥४॥ एका जनार्दनीं यातायाती । पुढें फजिती जन्मोजन्मीं ॥५॥
२९४७
विधियुक्त पाणिग्रहण पैं जाहलें । जामातालागीं वहिलें काय बोले ॥१॥ तुम्ही हरिभक्त दुजा नाहीं भाव । चालवा गौरव उभयतां ॥२॥ एक एकपणें न धरावें भिन्न । पाळावें वचन वडिलांचें ॥३॥ एका जनार्दनीं सांगूनियां मात । घातली शपथ विठोबाची ॥४॥
२९४८
विनंती माझी परिसावी । कृपा दीनावार करावी ॥१॥ नित्य नवा नामघोष । आठव द्यावा सावकाश ॥२॥ नामावांचुनी कांही दुजें । मना आणिक नमो माझें ॥३॥ एका विनंति करी । जनार्दन कृपा करी ॥४॥
२९४९
विपरीत अर्थ ऐकतां कानीं । पुरुष गाभणी स्त्रीचेनि चिंतनीं ॥१॥ नवल गे माय नवल गे गाय । तीन पोरें व्याला सांगुं काय ॥२॥ एक ब्रह्माचारीं कळिलावा मोठा । साठ पोरें व्याला पहा चोहटा ॥३॥ एक मेलें गर्भीं असतां गे माय । बारा वर्षे लपलें सांगूं मी काय ॥४॥ एका जनार्दनीं उघडली दृष्टी । अर्थ पाहतां सुख होय पोटीं ॥५॥
२९५०
विपरीत सुपरीत हा तो काळाचा विभाग । तेथें त्याग भोग करूनी काय ॥१॥ होणार तें होतें आपुलें न चले कांहीं । वायां दुःख पाहीं मानू नये ॥२॥ जी जी संचितीं लिहिलीसे रेखा । ती तों ब्रह्मादिकां न चुकेचि ॥३॥ एका जनार्दनीं वायां कां सायास । सुखदुःख लेश पूर्व कर्म ॥४॥
२९५१
विरहिणी विरहा विरहित बोले । कां वो पुर्वकर्म आड ठेलें । वाचें न येती नाम सावळें । तया विरहा मन माझें वेधलें ॥१॥ ऐशा परी बोलती गोपबाळा । कोठें गेला नेणो सांवआळा । पहातां पहातां ठकविलें गोपाळा । ऐसा याच विरह लागला ॥२॥ नेणो कांही कर्म आड ठेलें । वियोग वियोगाचें वर्म ऐसें जाले । एका जनार्दनीं कौतुक बोले । ऐशा दुःखा विराहिणा बोले ॥३॥
२९५२
विवाद वाद हें तो अधम लक्षण । भक्तीचें कारण न साधे येणे ॥१॥ मुख्य एक करी एकविधपण । सम दरुशनें देखें जगीं ॥२॥ नर अथवा नारी असो भलते याती । वंदावे विभूति म्हणोनियां ॥३॥ एका जनार्दनीं बोध धरी मना । होऊनियां साना सानाहुनी ॥४॥
२९५३
विवेक कांडणीं कांडितें साजणी । निजबोध स्मरणी फिरतसे ॥१॥ देह हें उखळ मन हें मुसळ । काडिलें तांदुळ विवेकाचे ॥२॥ एका जनार्दनीं कांडन कांडितां । ब्रह्मा सायुज्यता प्राप्त झाली ॥३॥
२९५४
विवेक वैराग्य दोघें भांडती । ज्ञान अज्ञान पाहाती रे । आपुले स्वरुपीं होऊनि एक चित्त झाली सकळ सृष्टी रे ॥१॥ हुतुतुतुतु खेळूं रे गडिया हुतुतुतुतु खेळू रें । रामकृष्ण गोविंद हरी नारायण निशिदिनीं भजन करा रे ॥धृ॥ हिरण्यकश्यप प्रल्हादपुत्र खेळतां आले हातघाई रे । बळेंचि आला फळी फोडुनी गेला पित्यासी दिधलें डायीं रें ॥२॥ राम रावण सन्मुख भिडता बरवा खेळ मांडिलां रे । कुंभकर्ण आखया इंद्रिजितासी तिघांसी पाडिले डायीं रे ॥३॥ कौरव पांडव हुतुतु खेळती खेळिया चक्रपाणी रे । कामक्रोध जीवें मारिला उरुं दिला नाहीं कोणी रे ॥४॥ एका जनार्दनीं हुतुतु खेळतां मन जडलें हरी पायी रे । विवेक सेतु त्यांनी बांधिला उतरुन गेलें शायीं रे ॥५॥
२९५५
विश्रांतीचें आसन घालुनियां जपा । मंत्र तोचि सोपा रामनाम ॥१॥ सर्व याती वर्णा आहे अधिकार । रामनाम उच्चार सोपा बहु ॥२॥ कल्पना अविद्या टाकुनी उपाधी । रामनामें समाधि उघड दिसे ॥३॥ एका जनार्दनीं नाम पवित्र परिकर । साधनाचें सार हेंचि एक ॥४॥
२९५६
विश्रांतीचें स्थान संतांचें माहेर । तें या भूमीवर अलंकापूर ॥१॥ तये स्थळीं माझा जीवाचा वो ठेवा । नमीन ज्ञानदेवा जाऊनियां ॥२॥ सिध्देश्वर स्थान दरुशनें मुक्ती । ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वर ॥३॥ चौर्‍यांयशी सिध्दांचा सिध्द भेटी मेळा । प्रत्यक्ष स्थापिला कल्पवृक्ष ॥४॥ तयासी नित्यतां घडतां प्रदक्षणा । नाहीम पार पुण्या वास स्वर्गीं ॥५॥ अमृतमय वाहे पुढें इंद्रायणी । भागीरथी आदिकरुनि तीर्थराज ॥६॥ ऐशिया स्थळीं समाधी ज्ञानदेवा । एका जनार्दनीं ठाव अलंकापूर ॥७॥
२९५७
विश्वपाळिता हे हरी । दासा केवीं तो अव्हेरी ॥१॥ नव मास गर्भवास । नाहीं भागला आम्हांस ॥२॥ बाळपणीं वांचविलें । स्तनीं दुग्ध तें निर्मिलें ॥३॥ कीटक पाषाणांत वसे । त्याचें मुखीं चारा असे ॥४॥ धरा धरा हा विश्वास । एका जनार्दनीं त्याचा दास ॥५॥
२९५८
विश्वाचा तो गुरु । स्वामी निवृत्ति दातारु ॥१॥ आदिनाथापासून । परंपरा आली जाण ॥२॥ ज्ञानदेवा ज्ञान दिलें । चांगदेवातें बोधिलें ॥३॥ तोचि बोध माझे मनीं । राहो एका जनार्दनीं ॥४॥
२९५९
विश्वाचा व्यापक विश्वंभर साक्षी । नये अनुमानासी वेदशास्त्रां ॥१॥ नवल गे माय नवल गे माय । चोरुनियां खाय नवनीत ॥२॥ धरिती बांधती गौळणी बाळा । वोढोअनि सकळां आणिताती ॥३॥ एका जनार्दनीं येतो काकुलती । न कले ज्यांची गति वेदशास्त्रां ॥४॥
२९६०
विषय विरह गुंतले संसारीं । तया जन्म जन्मातरीं फेरी । कोणी न सोडवी निर्धारीं । यालागी न गुंता संसारीं ॥१॥ मज सोडवा तुम्हीं संतजन । या विषयविरहापासोन ॥धृ ॥ क्षणिक विषय संसार । भरला दिसे भवसागर । यांतुनी उतरीं पैलपार । संतसंग मिळविया ॥२॥ यासी शरण गेलिया वांचुनी ।संतसंग न जोडे त्रिभुवनी । शरण एकाभावें जनार्दनी । विरह गेला समूळ निरसोनी ॥३॥
२९६१
विषयप्राप्तीलागीं जाण । धरी बकापरी ध्यान ॥१॥ विषयीक गायन करी । जैसा खर भुकें स्वरी ॥२॥ नाहीं संतचरणीं मन । सदा विषयावरी ध्यान ॥३॥ विषय लोटी परता होई । एका जनार्दन पायीं ॥४॥
२९६२
विषयवासना भाजी त्याचें मूळ । मग सुख कल्लोल प्राप्ति तुज ॥१॥ आशेचें काबाड कल्पना सगळी । अपटोनि मुळी टाकी परती ॥२॥ भेदाचें भांडें वैराग्याचें हातें । धुवोनि सरतें करी बापा ॥३॥ शांतीचेनि सवें धरीं वेगें सोय । एका जनार्दनीं पाय पावशील ॥४॥
२९६३
विषया जो लंपट । तया नावडे ही वाट । पंढरी सुभट । नावडेचि पापिष्ठा ॥१॥ अमृत फळें पूर्ण आलीं । कां गा जैसी परी जालीं । तैसीच हे चाली । पापिष्ठाची जाणावी ॥२॥ धनलुब्धका नावडे धर्म । मद्यपिया नावडे कर्म । जारासी संतसमागम । नाठवेचि सर्वथा ॥३॥ स्त्रीलुब्ध परद्वारी । काय तया गीता निर्धारी । एका जनार्दनीं हरी । नको संग तयाचा ॥४॥
२९६४
विषयाचे अभिलाषे सबळ भेदु भासे । विषयलेषु तेथें मुक्ति केवीं वसे ॥१॥ विषयतृष्णा सांडी मग तूं साधन मांडी । वैराग्याची गोडी गुरुसी पुसे ॥२॥ स्त्रीपुरुष भावना भेदु भासे मना । तेथें ब्रह्माज्ञाना गमन कैंचें ॥३॥ कणुभरित जो डोळा शरीरासी दे दुःख । अणुमात्र विषय तो संसारदायक ॥४॥ शुद्धभाव तें वैराग्य आवडे । अति विषय विषयाधीन ते किडे ॥५॥ एका जनार्दनीं निजज्ञानशक्ति । निर्विषय मन ते अभेद भक्ति ॥६॥
२९६५
विषयाचें सुख मानितो पामर । भोगितो अघोर नरकगती ॥१॥ मारिती ताडिती यमाचे किंकर । कोण सोडी साचार त्यासी तेथें ॥२॥ कळोनी पडती न कळोनी पडती । कोण होईल गती न कळे तया ॥३॥ एका जनार्दनीं येतसे करुणा । म्हणोनि वचना बोलणें हें ॥४॥
२९६६
विषयाच्या व्यथें दुःख भोगितो अघोर । तया दुजा थार कोठें नाहीं ॥१॥ शुद्ध करूनि मन घ्यावें रामनाम । संतांचें पूजन क्रिया हेची ॥२॥ उपदेश किती सांगावा वेळोवेळां । अमंगळ अंधळा नेणे कांहीं ॥३॥ एका जनार्दनीं विषयाच्या संगें । कर्मकांड लागे भोगणे तेथें ॥४॥
२९६७
विषयालागीं उपाय जाण । नानापरी करिसी शीण ॥१॥ पोट भरावया भांड । वाजविताती जैसें तोंड ॥२॥ विशयवासना ती थोर । वरी दाविती आदर ॥३॥ एका जनार्दनीं शरण । तंव न चुके देहींचें पतन ॥४॥
२९६८
विषयीं होउनी उदास । सांडी संसाराची आस ॥१॥ तरीच पावाल चरण । संतसेवा घडेल जाण ॥२॥ होऊन उदासवृत्ति । भजन करा दिनरातीं ॥३॥ ऐसी आवड धरा मनीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥
२९६९
विषयीं होऊनि उदास । सांडीं संसाराची आस ॥१॥ ऐसी मुक्ताची वासना । मुमुक्षु चिंती तुझ्या चरणा ॥२॥ ब्रह्माज्ञान लाळ घोटी । येरी वाउगी ती आटी ॥३॥ शब्द निःशब्द खुंटला । एका जनार्दनीं देखिला ॥४॥
२९७०
विष्णुदासा घरें ब्रह्माज्ञान लोळे । म्हणतसे बळें घ्या घ्या कोणी ॥१॥ आरुषे सावडे नाम मुखीं जया । ब्रह्माज्ञान तया विनवितसे ॥२॥ माझा अंगिकार करा संतजन । ऐसें ब्रह्माज्ञन कींव भाकी ॥३॥ एक जनार्दनीं संताचें चरणीं । होउनी दीन वदनीं कींव भाकी ॥४॥
२९७१
विष्णुनामपाठ करी वेळोवेळां । पाहे तूं सावळा विष्णुसखा ॥१॥ विष्णुनाम गाय अंतरी सर्वदा । तुटें जन्मजरा बाधा येणें नामें ॥२॥ जानर्दनाचा एका विष्णुरुप देखा । जनार्दन सखा एकरुप ॥३॥
२९७२
विष्णुमूर्ति चतुर्भुज शंख चक्र हातीं । गदा पद्म वनमाळा शोभती ॥१॥ गाई गोपाळ सवंगडे वनां । घेऊनीयां जाय खेळे नंदाचा कान्हा ॥२॥ विटी दांडु चेंडु लागोरी नानापरी । खेळ मांडियेला यमुनेचे तीरीं ॥३॥ एका जनार्दनीं पाहतां तन्मय । वेधलें मन वृत्तिसहित माय ॥४॥
२९७३
विसर तो अवघा जाहला । विठ्ठला पाहतां ॥१॥ निवारला क्रोधकाम । जाहला तम शांत तो ॥२॥ इंद्रियाची होती चाली । निवांत राहिली एकरुप ॥३॥ दुजेपणाचा भेद गेला । एका ठेला जनार्दनीं ॥४॥
२९७४
विसरुनी विठोबासी । भरले हव्यासी साधन ॥१॥ काय त्यांचा कले मंत्र । कोण पवित्र म्हणे तयां ॥२॥ दाविती वरी वरी भक्ति । अंतरीं युक्ति वेगळीच ॥३॥ एका जनार्दनीं जप । वाउगें तप करितो ते ॥४॥
२९७५
वृक्ष पाहतां परतला आगम । निगमा न कळे दुर्गम । वेदशास्त्रांसी निरुतें वर्म । तो वृक्ष देखिला विठ्ठलनाम ॥१॥ माझें सोपें कोंडें । कान्होबा करीं तुं निवाडे । अर्थ सखोल ब्रह्मांड । भक्तिभाव तयासि उघडे रे ॥२॥ साहांसी येथें न चाले मती । चार गुंतलें न कळे गती । अठरा भाटीव वर्णिती । ऐशियासी न कळे स्थिति रे ॥३॥ चौर्‍यांयशीं लक्ष भुलले वायां । अठ्ठ्यायंशीं सहस्त्र भोगिता छाया । तेहतीस कोटी न कळे आयतया । एक जनार्दनीं लागे पायां रे ॥४॥
२९७६
वृक्ष व्याला आकाश पाताळ । वृक्षीं प्रसवलें लोकपाळ । आठ्ठ्यायेंशीं सहस्त्र ऋषिमंडळें ॥१॥ कान्होबा बोलों तुझें कोडें । अर्थ ऐकतां ब्रह्मा जोडें । अभक्त होती केवळ वेडे रे ॥२॥ वृक्षाअंगीं पंचभुतें । प्रसवला तत्त्वें निरुतें । अहं सोहं पाहतां तें होतें ॥३॥ एका जनार्दनीं पाहिला वृक्ष । गुरुकृपें वोळखिला साक्ष । भेदभाव गेला प्रत्यक्ष रे ॥४॥
२९७७
वेडावला वेडावला । उभ ठेला मौन्यची ॥१॥ ब्रह्मादिकां अंत न कळे रुपाची । तो माझे माझे साचा भक्ता म्हणें ॥२॥ कमळाचरणीं विनटलीं न कळें तीस थोरी । ते चरण विटेवरी देखियेले ॥३॥ एका जनार्दनीं विश्वव्यापक हरी । सबाह्म अभ्यंतरीं कोंदलासे ॥४॥
२९७८
वेणुनादाचिया किळा । पान्हा फुटला निराळा ॥१॥ आर्तभूत जीव तिन्हीं । चातक निवाले जीवानीं ॥२॥ स्वानुभवाचे सरितें । जेवीं जीवना दाटे भरतें ॥३॥ एका एक गजें घनीं । पूर आला जनार्दनीं ॥४॥
२९७९
वेद गुरु माता पिता । ऐसा भाव जया चित्ता ॥१॥ नाहीं दुजा आठव कांहीं । चित्त जडलें चौघांपायीं ॥२॥ एका जनार्दनीं साचें । ऐसें मनीं नित्य ज्याचे ॥३॥
२९८०
वेद तो आम्हां जनार्दन । शास्त्र तें आम्हां जनार्दन । पुराण जनार्दन । सर्वभावें ॥१॥ सुख जनार्दन । दुःख जनार्दन । कर्म धर्म जनार्दन । सर्वभावें ॥२॥ योग जनार्दन । याग जनार्दन । पाप आणि पुण्य । तेंही जनार्दन ॥३॥ यापरे सर्वस्व अर्पी जनार्दन । एका जनार्दनीं साधे भजन ॥४॥
२९८१
वेद तो प्रमाण । वचन करी जो अप्रमाण ॥१॥ तो स्वहिता नाडला । जन्मोजन्मीं कुडा जहाला ॥२॥ वेदाची जे मर्यादा । नायकेचि जो कदा ॥३॥ वेदें सांगतिलें कर्म । करी सदा तो अधर्म ॥४॥ जन्मतांचि प्राणी । एका जनार्दनीं वांझ जनीं ॥५॥
२९८२
वेद बोलिला जो जो गुण । तो तो नव्हेची पठण ॥१॥ वेदें सांगितलें न करी । ब्रह्माद्वेषीं दुराचारी ॥२॥ न करा सुरापान । कन्या-गो-विक्रय जाण ॥३॥ ऐसे वेदाची मर्यादा । न कळेचि मतिमंदा ॥४॥ निजमुखें स्वयें बोले वेदु । न करावा परापवादु ॥५॥ एका जनार्दनीं शरण । वेदाचें नोहे आचरण ॥६॥
२९८३
वेद वेद ब्रह्मा एक । स्वानुभवें तैसेंच देख ॥१॥ हा वेदाचा गौरव । कोण घेतो अनुभव ॥२॥ वेद ब्रह्मास्थिति । कोण प्रतिपाद्य करिती ॥३॥ वेदी ब्रह्माचें ब्रह्मापण। शरण एका जनार्दन ॥४॥
२९८४
वेदवचनें सुतक पावे । ब्रह्मा म्हणतां ब्रह्म नव्हें ॥१॥ वेद न कळेंचि साचार । देहबुद्धिं अविचार ॥२॥ सकळ ब्रह्मा पैं अद्वैत । वेद परीसोनी ना तुटे द्वैत ॥३॥ श्रुति सांगती परमार्था । हिंसा न करावी सर्वथा ॥४॥ संकल्प नाशी तो संन्यासी । तेथें तों कल्पना कायसी ॥५॥
२९८५
वेदवाणी देवें केली । येर काय चोरापासून झाली ॥१॥ सकळ वाचा वदवी देव । कां वाढावा अहंभाव ॥२॥ ज्या ज्या वाणी स्तुती केली । ते तीक देवासी पावली ॥३॥ एका जनार्दनीं मातु । वाचा वाचक जगन्नाथु ॥४॥
२९८६
वेदविधि कांही न कळे पाठका । गुणदोष देखा मलीन सदा ॥१॥ दशग्रंथीं ज्ञान होतांचि जाण । निंदितो देखोन भलत्यासी ॥२॥ सर्व ब्रह्मरुप ऐसें बोले वेद । तेथें वादावाद उरला नाहीं ॥३॥ ओऽहं सोऽहं कोऽहं नाहीं ठाव । उगेचि गौरव मिरवी ज्ञान ॥४॥ एका जनार्दनीं ब्रह्माज्ञानासाठीं । हिंडताती कोटी जन्म घेत ॥५॥
२९८७
वेदशास्त्र पुराणें अनेक शब्दज्ञानें । भारताचे श्रवणे सर्वस्व जोडे ॥१॥ ते सव्वालक्ष भारत जोडे पैं सुकृत । तेंचि गीते सात शतें प्राप्त होय ॥२॥ ऐशी भगवदगीता कृष्णार्जुन संवादतां । तेंचि फ़ळ लाभे वाचितां ऐक्यभावें ॥३॥ गीतीचें महा नेमें करा श्रवण पठण । ऐसें एका जनार्दन सांगतसे ॥४॥
२९८८
वेदशास्त्र वक्ता अति निःसीम पाही । सिद्धान्त बोलतां उरीं ठेवी कांहीं । लयलक्ष ध्यान मुद्रा दावी आपुलें ठायीं । वेडे वेडे चार करितां मोक्ष न ये हातां ॥१॥ तो खूण वेगळी विरळा जाणें एक । जाणीव ग्रासोनी त्यासी बाणे देख ॥ध्रु०॥ अष्टांग योग जाणे मंत्र तंत्र कळा । प्रबोध भक्तीनें वश्य सिद्धि सकळा । वर्म चुकला भाग्यहीन अंधळा । मी कोण हेंचि नेणें कळ त्या विकळा ॥२॥ सिद्धान्त एक निका सावध ऐका । सुखासी मेळवितें वर्म नातुडे फुका । भाव धरुनी संतापायीं नाम वोळखा । तैंचे एका जनार्दनीं भेटी देखा ॥३॥
२९८९
वेदशास्त्रीं गाईला पुराणीं वर्णिला । तो शिव पाहिला डोळेभरीं ॥१॥ तेणें माझ्या मना होय समाधान । आठवितो चरण वेळोवेळीं ॥२॥ सकळ इंद्रियां झालीं पैं विश्रांती । पाहतां ती मूर्ती शंकराची ॥३॥ एका जनार्दनीं शिव हा भजावा । संसार करावा सुखरुप ॥४॥
२९९०
वेदांचा विवेक शास्त्रांचा हा बोध । तो ह परमानंद विठ्ठलमूर्ती ॥१॥ पुराणासी वाड साधनांचे कोड । ते गोडांचे गोड विठ्ठलमूर्ती ॥२॥ ब्रह्मादि वंदिती शिवादी ज्या ध्याती । सर्वांसी विश्रांती विठ्ठलमूर्ती ॥३॥ मुनीजनांचे ध्यान परम पावन । एका जनार्दनीं पावन विठ्ठलमूर्ती ॥४॥
२९९१
वेदांचा संवाद श्रुतींचा अनुवाद । नामाचा मकरंद पुराण वदे ॥१॥ शास्त्रांचें मत नामाचा इतिहास । यापरती भाष नाहीं नाहीं ॥२॥ एका जनार्दनीं संताचें हे मत । नामे तरती पतित असंख्यात ॥३॥
२९९२
वेदांचे वचन शास्त्रांचे अनुमोदन । पुराणीं कथन हेंचि केलें ॥१॥ कलियुगामाजीं नाम एक सार । व्यसाची निर्धार वचनोक्ति ॥२॥ तरतील येणें विश्वासी जे नर । तत्संगें दुराचार उद्धरती ॥३॥ एका जनार्दनीं ऐसा हा अनुभव । प्रत्यक्ष सांगे देव उद्धवासी ॥४॥
२९९३
वेदांचे सार निगमाचे माहेर तो हा परात्पर उभा विटे ॥१॥ शास्त्रांचे निजगह्र पुराणाचे निजसार । तो हा विश्वभर उभा विटे ॥२॥ काळाचा तो काळ भक्तांचा प्रतिपाळ । तो हा दीनदयाळ उभ विटे ॥३॥ एका जनार्दनीं शोभे दीनमणीं । भक्त भाग्य धणी पंढरीये ॥४॥
२९९४
वेदांत सिद्धांत पाहतां खटपट । वाउगा बोभाट नामविण ॥१॥ नामें होय भुक्ति नामें होय मुक्ति । नामें वैकुंठप्राप्ति सर्व जीवां ॥२॥ नामेंचि तरले नारदादि योगी । नाम पावन जगीं कीर्ति नामें ॥३॥ एका जनार्दनीं तारक हें नाम । भावसिंधु धाम उतरी नाम ॥४॥
२९९५
वेदाचा वेदार्थ शास्त्राचा शास्त्रार्थ । आमुचा परमार्थ वेगळाची ॥१॥ श्रुतीचें निजवाक्य पुराणींचे गुज । आमुचें आहे निज वेगळेंची ॥२॥ तत्त्वाचें परमतत्त्व महत्वासी आलें । आमुचें सोनुलें नंदाघरीं ॥३॥ एका जनार्दनीं ब्रह्माडांचा जीव । आमुचा वासुदेव विटेवरी ॥४॥
२९९६
वेदाचिया बोला कर्मातें गोंविला । परी नाहीं भजला संतालागीं ॥१॥ घोकूनियां वेद द्वैत नवजाय । वाउगाची होय श्रम तया ॥२॥ तया अद्वैताच्या वाटां जायतो करंटा । शीण तो अव्हाटा आदिअंत ॥३॥ एका जनार्दनीं संतांसी शरण । गेलीया पठण सर्वजोडे ॥४॥
२९९७
वेदाचिया मतें विसरुनि कीर्तन । करती जे पठण शीण त्यांसी ॥१॥ वेदाचा अर्थ न कळेची पाठका । कीर्तनीं नेटका भाव सोपा ॥२॥ श्रुतीचेनी मतें पाहे तो उच्चार । परी सारासारविचार कीर्तनीं ॥३॥ एका जनार्दनीं पुराणाच्या गोष्टी । कीर्तन वाक्पुटीं करा सुखें ॥४॥
२९९८
वेदादिक श्रमले न कळे जया पार । शस्त्रांसी निर्धार न कळेची ॥१॥ तो हा श्रीहरी नंदाचिया घरीं । क्रीडे नानापरी गोपिकांसी ॥२॥ चोरावया निघे गोपिकांचें लोणी । सौगडें मिळोनी एकसरें ॥३॥ एका जनार्दनी खेळतसे खेळा । न कळे अकळ आगमनिगमां ॥४॥
२९९९
वेदान्त प्रतिपाद्य करावा हा धर्म । न करितां अधर्म सहज लागे ॥१॥ मुख्य चारी वर्ण यांचा पैं धर्म । न करितां अधर्म सहज लागे ॥२॥ जयां जे जे धर्म तयां तें तें कर्म । न करितां अधर्म सहज लागे ॥३॥ ब्राह्माणांचा धर्म संध्या षट्‌कर्म । न करितां अधर्म सहज लागे ॥४॥ शरणागताचें रक्षण क्षत्रियांचा धर्म । न करितां अधर्म सहज लागे ॥५॥ वैश्यांचा धर्म वैव्हारिक कर्म । न करितां अधर्म सहज लागे ॥६॥ शूद्रांचा धर्म सर्वभावें पूजन । एका जनार्दन तृप्ती तेणें ॥७॥
३०००
वेदान्त सिद्धांत पाहणें ते आटी । जनार्दन भेटी निरसली ॥१॥ आगम निगम कासया दुर्गम । जनार्दन सुवर्म सांगितलें ॥२॥ न्यायमीमांसा पांतजली शास्त्रें । पाहतां सर्वत्र निवारलें ॥३॥ एका जनार्दनीं पूर्ण कृपा केली । भ्रांती निरसली मनाची ते ॥४॥
३००१
वेदाभ्यास नको सायास ज्योतिष । नामाचा लेश तेथे नाहीं ॥१॥ बहुत व्युत्पत्ती सांगती पुराण । व्यर्थ स्मरण नाम नाहीं ॥२॥ अनंत हें नाम जयापासुनि जालें । तें वर्म चुकलें संतसेवा ॥३॥ संतांसी शरण गेलिया वांचुनि । एका जनार्दनीं न कळे नाम ॥४॥
३००२
वेदाभ्यासं श्रमलें । पुराण वक्ते ते भागले ॥१॥ तया विश्रांतीस स्थान । अधिष्ठान पंढरी ॥२॥ शास्त्राभ्यास नेहटीं । वादावाद दाटोदाटीं ॥३॥ एका जनार्दनीं शरण । पंढरी स्थान ऐशिया ॥४॥
३००३
वेदामाजीं ओंकार सार । शास्त्रासार वेदान्त ॥१॥ मंत्रामाजीं गायत्री सार । तीर्थ सार गुरुचरणीं ॥२॥ ज्ञान सार ध्यान सार । नाम सार सर्वांमाजीं ॥३॥ व्रतामाजी एकादशीं सार । द्वादशी सार साधनीं ॥४॥ पूजेमाजीं ब्रह्माण सार । सत्य सार तपामाजीं ॥५॥ दानामाजीं अन्नदान सार । कीर्तन सार कलियुगी ॥६॥ जनामाजीं संत भजन सार । विद्या सार विनीतता ॥७॥ जिव्हा उपस्थ जय सार । भोग सार शांतिसुख ॥८॥ सुखामाजीं ब्रह्मासुखसार । दुःख सार देहबुद्धी ॥९॥ एका जनार्दनीं एका सार । सर्व सार आत्मज्ञान ॥१०॥
३००४
वेदीं जैसा वर्णिला । तैसा विटेवरी देखिला ॥१॥ पुराणें सांगती ज्या गोष्टी । तो विटेवई जगजेठी ॥२॥ शास्त्रें वेवादती पाहीं । तोचि विटे समपाई ॥३॥ न कळे न कळे आगामां निगमाहीं । न कळे सीमा ॥४॥ जाला अंकित आपण । एका जनार्दनीं शरण ॥५॥
३००५
वेदें सांगितले पुराणीं आनुवादलें । शास्त्र बोलें बोलत पांगुळलें ॥१॥ न कळेचि कोना शेषादिकां मती । कुंठिता निश्चितई राहियेल्या ॥२॥ श्रुती अनुवादती नेती नेति पार । तोचि सर्वेश्वर उभा विटे ॥३॥ एका जनार्दनीं ठेवुनी कटीं कर । उभा असें तीरीं भीवरेच्या ॥४॥
३००६
वेदोक्त पठण करितां चढे मान । तेणें होय पतन कर्मभूमी ॥१॥ सोपें ते साधन संतांसी शरण । तेणें चुके बंधन जडजीवां ॥२॥ अभ्यासाचा सोस वाउगाची द्वेष । न करी सायास नाम जपे ॥३॥ एका जनार्दनीं सायासाचे भरी । नको पडुं फेरी चौर्‍याशींच्या ॥४॥
३००७
वेधला जीव माझा भेटवा श्रीरंग । सर्व सांडियेला मोह ममता संग । जीवीं जिवला जाला अनंग । भेटता भेटवा मज श्रीरंग ॥१॥ ऐशी विरहिण बोले बोली । कां रे हरी तु सांडी केली ॥धृ ॥ समभाव तुज पहावया । मन आमुचे गुंतलें देवराया । तुं तंव मध्यें घालिसी माया । नको आतां विरह पायां ॥२॥ आमुचा विरह कोण निवारी । विरहिनी बोले ऐशिया परी । एका जनार्दनी श्रीहरी । जन्ममरणाचा विरह निवासी ॥३॥
३००८
वेधल्या गोपिका सकळ । गोवळ आणि गोपाळ । गायी म्हशी सकळ । तया कृष्णाचें ध्यान ॥१॥ नाठवें दुजें मनीं कांही । कृष्णावांचुनीं आन नाहीं । पदार्थमात्र सर्वही । कृष्णाते देखती ॥२॥ करितां संसाराचा धंदा । आठविती त्या गोविंदा । वेधें वेधल्या कृष्णाछंदा । रात्रंदिवस समजेना ॥३॥ एका जनार्दनी छंद । ह्रुदयीं तया गोविंद । नाहीं विधि आणि निषेध । कृष्णावांचुनी दुसरा ॥४॥
३००९
वेधल्या त्या गोपी नाठवे आपपर कृष्णमय शरीर वृत्ति जाहली ॥१॥ नाठवे भावना देह गेह कांहीं । आपपर त्याही विसरल्या ॥२॥ एका जनर्दनीं व्यापला हृदयीं । बाहेर मिरवी दृष्टिभरित ॥३॥
३०१०
वेधिलें ज्यांचें मन सदा नामस्मरणीं । रामनाम ध्वनीं मुखीं सदा ॥१॥ प्रपंच परमार्थ त्यासी पैं सारखा । अद्वैती तो देखा भेद नाहीं ॥२॥ एका जनार्दनीं एकरुप भाव । नाहीं भेदा ठाव तये ठायीं ॥३॥
३०११
वेधोनि गेलें माझें मन । हारपलें दुजेंपण ॥१॥ ऐसी ब्रह्मामूर्ति दत्त । वोतलीसे आनंदभरीत ॥२॥ तयाविण ठाव । रिता कोठें आहे वाव ॥३॥ एका जनार्दनीं भरला । सबाह्म अभ्यंतर व्यापिला ॥४॥
३०१२
वेधोनि नेलें आमुचें मन । लागलें ध्यान अंतरीं ॥१॥ दृष्टी धांवें पाहावया । आलिंगना बाह्मा उतावेळ ॥२॥ चरण उतावेळ चालतां पंथ । दुजा हेत नाहीं मनासी ॥३॥ एका जनार्दनीं डोई पायीं । दुजा भाव नाहीं इंद्रियां ॥४॥
३०१३
वेरझार खुंटे नाम वदतां वाचे । आणिक सायासाचें न करीं कोड ॥१॥ तुटे रे बंधन नोहेंचि पतन । वाचे जनार्दन जप करी ॥२॥ एका जनार्दनीं वाचे जपे नाम । आणिक दुर्गम साधन नको ॥३॥
३०१४
वेळोवेळां सांग जना । मागें दाना सर्वांसी ॥१॥ मंगल श्रीदत्तराज । स्मरा गुरुराज समर्थ ॥२॥ आयुष्य जाय पळ पळ । करा बळ चिंतना ॥३॥ एका जनार्दनीं लोकां । विसरुं नका सांगतों ॥४॥
३०१५
वेव्हाराच्या ठाई । तुझें न चले कांहीं । मी तूं दोघे पाहीं । सरिसें तेथें ॥१॥ ठेविलें बुडविसी । शेखी जाबही न देसी । ऐकोन नायकसी । गहिंसपणें ॥२॥ खवळलों तरी जाण गिळीन मीतूंपण । तेथें देवपण । उडवीन तुझें ॥३॥ जो सांगे पांचापाशीं । त्याचें तोडं तूं धरिसी । ठकडा कैसा होसी । म्हणे एका जनार्दनीं ॥४॥
३०१६
वेश्येचिया घरी जातो उताविळा । जातांची देउळा रडतसे ॥१॥ काय ऐशा पामरा सांगावें गव्हारा । भोगितो अघोरा नरकवासा ॥२॥ एका जनार्दनीं नको त्याचा संग । अंतरें पाडुरंग तयाचेनीं ॥३॥
३०१७
वेष घेउनी नुसता कां । उगेच जगावरी रुसतां कां । भोग देखोनि घुसतां कां । आम्हीं भले म्हणोनि पुसतां कां ॥१॥ थिता बाईल कां सांडिली । आशा परवंधूं कां धुंडिली । शुभ्र सांडोनि भगवी कां गुंडिली । ऐसी भंडी कांहो मांडिली ॥२॥ तुम्हा प्रपंचावर एके घाई रुसवेना । अहं ज्ञातेपणा कोण्हा पुसवेना । एका जनार्दनीं मन जिंकवेना । मेल्या कुतर्‍यासारखें कां बसवेना ॥३॥ अभाविक - खल - दुर्जन
३०१८
वेष पालटोनी देव कुंभार पैं जाहले । गरुडासी केलें गाढव तेव्हां ॥१॥ येऊनियां तेरें पुसतसे लोकां । कुल्लाळ तो देखा गोरा कोठें ॥२॥ आम्ही परदेशी जातीचे कुंभार । नाम विठु साचार मज म्हणती ॥३॥ एका जनार्दनीं गोरियाचिया वाडां । आलासे उघडा देवराव ॥४॥
३०१९
वैकुंठा जावया न लगे ते सायास । रामनामें पाश दृढ तुटती ॥१॥ तारिलें वानर वनचरे रामें । गोपिका त्या कामें मुक्त केल्या ॥२॥ गोपाळ सवंगडे नामेंचि तारिलें । जडजीव उद्धरिले कलियुगीं ॥३॥ एका जनार्दनीं सांगांवें तें किती । रामनामें मती न लगे याची ॥४॥
३०२०
वैकुंठीचे वैभव पंढरीसी आलें । भक्तें सांठविलें पुंडलिकें ॥१॥ बहुतांसी लाभ देतां घेतांजाहला । विसावा वोळला पाडुरंग ॥२॥ योग याग साधने करिती जयालागीं । तो उभाचि भक्तालागीं तिष्ठतसे ॥३॥ हीन दीन पापी होतुका भलते याती । पाहतां विठ्ठलमूर्ती मुक्त होती ॥४॥ एका जनार्दनीं सुखाचे माहेर । बरवें भीमातीर उत्तम तें ॥५॥
३०२१
वैकुंठीचें वैभव । संतांपांयीं वसे सर्व ॥१॥ संत उदार उदार । देतो मोक्षांचे भांडार ॥२॥ अनन्य भावें धरा चाड । मग सुरवाड सुख पुढे ॥३॥ एका जनार्दनीं ठाव । नोहे भाव पालट ॥४॥
३०२२
वैकुठींचा हरी गोपवेष धरी । घूऊनि शिदोरी जाय वनां ॥१॥ धाकुले संवगडे संगती बरवा । ठाई ठाई ठेवा गोधनांचा ॥२॥ बाळ ब्रह्माचारी वाजवी मोहरी । घेताती हुंबरी एकमेंकां ॥३॥ दहीं भात भाकरी लोणचें परोपरी । आपण श्रीहरी वाढितसे ॥४॥ श्रीहरी वाढिलें गोपाळ जेविलें । उच्छिष्ट सेविलें एका जनार्दनीं ॥५॥
३०२३
वैखरी वाचा वदे रामकृष्ण । धन्य वंश संपूर्ण जगीं त्याचा ॥१॥ आठवी नित्य नाम सदा वाचे । कळिकाळ त्यांचें चरण चुरी ॥२॥ शिव विष्णु ब्रह्मा इंद्रादिक देव । करिती गौरव त्याचा बहु ॥३॥ जनार्दनाचा एका सांगतसे उपाव । धरा नामीं भाव दृढ जनीं ॥४॥
३०२४
वैजंयती माळ किरीट कुंडलें । रुप तें सांवळें विटेवरी ॥१॥ वेधलें वो मन तयांच्या चरणीं । होताती पारणीं डोळीयांची ॥२॥ पुराणासी वाड शास्त्रासी तें गुढ । तें आम्हालागी उघड परब्रह्मा ॥३॥ ध्यानी ध्याती मुनी चिंतिती आसनीं । तोहा चक्रपाणी सुलभ आम्हां ॥४॥ सन्मुख भीवरा मध्यें पुंडलिक । एका जनार्दनीं सुख धन्य धन्य ॥५॥
३०२५
वैजयंती वनमाळा गळां । टिळक रेखिला कस्तुरी ॥१॥ अंगीं चंदन साजे उटी । शोभे कंठी कठसूत्र ॥२॥ शंख चक्र पद्म मिरवें करी । बाह्मा उभारीं भाविकां ॥३॥ वेधी वेधोनि आमुचें मन । शरण एका जनार्दन ॥४॥
३०२६
वैर करुनी मन मारावें । मनाधीन पैं न व्हावें ॥१॥ मनामार्ग जाऊं नये । मन आकळुनी मन पाहे ॥२॥ मन म्हणे तें न करावें । मनीं मनासी बांधावें ॥३॥ मन म्हणेल तें सुख । परी पाहतां अवघें दुःख ॥४॥ एका जनार्दनीं मन । दृढ ठेवावें आकळून ॥५॥
३०२७
वैराग्य अनुताप जाहलियावांचुन । रामनाम वदनीं न ये बापा ॥१॥ मुख्यत्वें कारण साधीं हें भजन । येणें समाधान होय बापा ॥२॥ विरक्ति देहीं जाहलियावांचुनीं । शांति समाधानी नये बापा ॥३॥ एका जनार्दनीं सत्संगावांचुनी । जन्माची आयणी न चुके बापा ॥४॥
३०२८
वैराग्य प्रथम असावी शांती । तेणें विरक्ति अंगीं जोडे ॥१॥ हेंचि मुर्ख वर्म साधतां साधन । येणें जनार्दन जवळी असे ॥२॥ उपासना मार्ग हेंचि कर्मकांड । हेंचिक जें ब्रह्मांड जनीं वनीं ॥३॥ हेचि देहस्थिति विदेह समाधी । तुटती उपाधी कर्माकर्म ॥४॥ एका जनार्दनीं शांति क्षमा दया । यांविण उपाय उपाधी ते ॥५॥
३०२९
वैष्णवा भुषण मुद्रांचें श्रृंगार । तुळशी परिकर वाहती कंठीं ॥१॥ तयांचियां पायीं माझा दंडवत । सदा जे जपत नाम मुखीं ॥२॥ आसनीं शयनीं भोजनीं नित्यता । स्मरणी जे तत्त्वतां रामनाम ॥३॥ पुण्यपावन देह जन्माचें सार्थक । एका जनार्दनीं कौतुक त्याचे मज ॥४॥
३०३०
वैष्णवाघरीं देव सुखावला । बाहिर नवजे दवडोनि घातिला ॥१॥ देव म्हणे माझें पुरतसें कोड । संगती गोड या वैष्णावांची ॥२॥ जरी देव नेउनी घातिला दुरी । परतोनि पाहे तंव घराभीतरीं ॥३॥ कीर्तनाची देवा आवडी मोठी । एका जनार्दनीं पडली मिठी ॥४॥
३०३१
वोखद घेतलिया पाठी । जेवीं होय रोग तुटी ॥१॥ तैसें घेतां रामनाम । नुरे तेथें क्रोध काम ॥२॥ घडतां अमृतपान । होय जन्माचें खंडन ॥३॥ एका जनार्दनीं जैसा भाव । तैसा भेटे तया देव ॥४॥
३०३२
वोखद घेतलिया पाठीं । तेणें तुटी होय रोगा ॥१॥ पथ्य साचार साचार । नामीं धरा निर्धार ॥२॥ वोखदासी कारण पथ्य । भवरोगीयां रामनामें मुक्त ॥३॥ एका जनार्दनीं करा । श्रीराम राम उच्चारा ॥४॥
३०३३
वोस घर वस्तीस काह्मा । तैसें देवा कोण पुसे ॥१॥ सांडोनियां पंढरीराणा । वोस राना कोण धांवे ॥२॥ घेती मासांचें अवदान । देवपण कैंचे तेथें ॥३॥ ऐसिया देवासी पुजणें । एका जनार्दनीं खोटें जिणें ॥४॥
३०३४
व्याघ्रामुखीं सांपडतां गाय । तेथें धांवण्या कोण जाय ॥१॥ तैसा विषयभोग साचा । भोगितां सुखाचा सुख म्हणती ॥२॥ येतां यमदुतें बापुडीं । कोण सोडी अधमासीं ॥३॥ म्हणोनि मारितसे हाका । भुलुं नका संसारा ॥४॥ शरण एका जनार्दनीं । सोडवील धनी त्रैलोक्याचा ॥५॥
३०३५
व्याघ्रामुखीं सांपडे गाय । अद्वैतीं तूं रामनाम ध्याय ॥१॥ वाचे गांतां रामनाम । निवारेल क्रोधाकाम ॥२॥ भेदभावाची वासना । रामनामें निरसे जाणा ॥३॥ एकपणें जनीं वनीं । एका शरण जनार्दनीं ॥४॥
३०३६
व्यापक जनार्दनीं व्यापूनि राहिला । अखंड भरला ह्रुदयसंपुटीं ॥१॥ पाहतां पाहणें परतें गेलें दुरी । अवघा चराचरीं जनार्दन ॥२॥ व्यापक व्यापला अक्षयी संचला । भरूनी उरला जळीं स्थळीं ॥३॥ एका जनार्दनीं रिता नाहीं ठाव । अवघा देहीं देव जनार्दन ॥४॥
३०३७
व्यापक तें नाम अनंत ब्रह्माडीं । मना सोंस सांडीं कल्पनेचा ॥१॥ कल्पनाविरहित नाम तूंचि गाये । सर्व पाहे विठ्ठला पायीं ॥२॥ ठसावेल मूर्ति पाहतां अनुभव । पांचांचा मग ठाव कैंचा तेथें ॥३॥ एका जनार्दनीं संपुर्ण अवघा । भीमातीरीं थडवा उभा असे ॥४॥
३०३८
व्यापक तो हरी पंढरीये राहिला । वेदंदिकां अबोला जयाचा तो ।१॥ सांवळें नागर कटीं ठेउनी कर । वैजयंती हार तुळशी गळां ॥२॥ एका जनार्दनीं विश्वव्यापक । उभाचि सम्यक विटेवरी ॥३॥
३०३९
व्यापक विठ्ठल नाम तेव्हाचि होईल । जेव्हा तें जाईल मीतूंपण ॥१॥ आपलें तें नाम जेव्हा वोळखील । व्यापक साधेल विठ्ठल तेणें ॥२॥ आपले ओळखी आपणचि सांपडे । सर्वत्राही जोडे विठ्ठलनाम ॥३॥ नामविण जन पशुच्या समान । एका जनार्दनीं जाण नाम जप ॥४॥
३०४०
व्यापका हा जनार्दन । जगाची भरला संपूर्ण ॥१॥ मागें पुढें आहे उभा । काय वानुं त्याची शोभा ॥२॥ भरुनी उरला । सर्वांठायीं तो संचला ॥३॥ शरण एक जनार्दनीं । व्यापक तो जनीं वनीं ॥४॥
३०४१
व्यापुनी जगीं तोचि उरला । तो विटेवरी देखिला गे माय ॥१॥ चतुर्भुज पीतंबरधारी । गलां शोभे वरी वैजयंती गे माय ॥२॥ हातीं शोभें शंख चक्र पद्म गदा । रूळे चरणींसदा तोडर गे माय ॥३॥ एका जनार्दनी मदनाचा पुतळा । देखियेला डोळा विठ्ठलरावो ॥४॥
३०४२
व्यापूनियां भरला देव । रिता ठाव कोठें पां ॥१॥ तयाचें करा रे चिंतन । मग तुम्हां न पडे न्यून ॥२॥ वाचे वदा विठ्ठल साचा । सोइरा साचा अंतकाळी ॥३॥ मागें पुढें उभा असे । एका जनार्दनीं दिसे ॥४॥
३०४३
व्यास वाल्मिक नारद मुनी । नित्य चिंतित चिंतनी । येती पंढरपुरभुवनीं । श्रीविठ्ठल दरुशना ॥१॥ मिळोनि सर्वांची मेळ । गाती नाचती कल्लोळ । विठ्ठल स्नेहाळ । तयालागीं पहाती ॥२॥ करिती भीवरेचें स्नान । पुंडलिका अभिवंदन । एका जनार्दनीं स्तवन । करिती विठ्ठलाचें ॥३॥
३०४४
व्यासादिका गाती ज्यासी । शुक सांगे परीक्षितीसी । श्रीकृष्ण उपदेशी उद्धवासी । नाम सार कलींत ॥१॥ तोचि वेध बैसला मना । ध्यानीं मनीं रामराणा । नाहीं दुजी उपासना । नामापरते साधन ॥२॥ वेदशास्त्र पुराणें । नामापरतें नाहीं घेणें । एका जनार्दनीं म्हणे । नाम उत्तम चांगलें ॥३॥
३०४५
व्याही जांवयांच्या कोडी । पोषितसे अति आवडी ॥१॥ देहसुखाचिया चाडा । अवघे मेळविले वोढा ॥२॥ देहीं वाढवी अतिप्रीती । पुत्र दारा माझे म्हणती ॥३॥ जैसा जोंधळा कणा चढे कणभारे क्षितीं पडें ॥४॥ वृक्षा फळे येती अपारें । फळभारें वृक्ष लवें ॥५॥ ऐसा भुलला स्वजनासी । एका जनार्दनीं सायासी ॥६॥
३०४६
व्रजात कोणे एक वेळेशी । आले गर्गाचार्य ऋषी । त्यासी दाखवितां कृष्नासी । चिन्हें बोलतां झाला ॥१॥ यशोदेबाई ऐक पुत्राची । लक्षणे ॥धृ ॥ मध्ये मुख्य यशोदा बाळा । सन्मुख रोहिणी वेल्हाळा । भोवंता गोपिकांचा पाळा । त्या गोपाळा दाखविती ॥२॥ करील दह्मा दुधाची चोरी । भोगिल गौळियांच्या पोरी । सकळ सिंदळांत चौधरी । निवडेल निलाजरा ॥३॥ चोरुनी नेईल त्यांची लुगडीं । त्यांचे संगे घेईल फुगडी । मेळवुनी गोवळ गडी । सुगडी फोडी शिंकींची ॥४॥ पांडव राजियाचे वेळीं । काढील उष्टया पात्रावळी । ढोरें तुमच्या घरची वेळीं । निवडेल निलाजरा ॥५॥ यावरी कलवंडतील झाडें । लत्ता खळाळ हाणील घोडे । महा हत्ती धरील सोंडे । परी ती विघ्रे मावळतीं ॥६॥ यावरी गाडा एक पडावा । अथवा डोहामाजीं बुडावा । वावटुळीनें उडुनी जावा । सांपडावा वैरियाला ॥७॥ कारण सच्चिदानंदाचें । बीज नोहे हें नंदाचें । जन्मांतर गोविंदाचें । नव्हें कथिल्य मथिल्यांचे ॥८॥ हृदयीं श्रीवत्सलांछन । ब्राह्मणलत्तेचें भूषण । हा होईल ब्राह्मणा जन । एका जनार्दनीं घरींचा ॥९॥
३०४७
व्हावें निसंतान । हेंचि एक बरें जाण ॥१॥ येर श्वान ते सूकर । जन्मा येवोनियां खर ॥२॥ मातापित्यांचा कंटाळा । न पहावें त्या चांडाळा ॥३॥ देखतांचि सचेल स्नान । करावें तें पाहुनी जाण ॥४॥ पुत्र नोहे दुराचारी । एका जनार्दनीं म्हणे वैरी ॥५॥
३०४८
शंख चक्र पद्म विराजत करी । बाप तो श्रीहरीं उभा वटी ॥१॥ रुक्मिणी सत्यभामा शोबतसे राही । गरुड हनुमंत दोघे दों ठायीं ॥२॥ एका जनार्दनीं सर्वांचे सार । विठ्ठल विठ्ठल वाचें जपा निर्धार ॥३॥
३०४९
शत वरुषांची घेउनी आला चिठ्ठी । अर्ध रात्रीं खादलें उठाउठीं ॥१॥ केव्हां जपसील रामनाम वाचें । आयुष्य सरलीया पडतील यमफांसे ॥२॥ अज्ञानत्व गेलें वरुषें बारा । खेळतसे विटीदांडु भोंवरा ॥३॥ उपरी तारुण्य मदाचा ताठा । करी बैसोनि विषयाच्या चेष्टा ॥४॥ ऐशीं पन्नास वर्षे गेलीं भरोवरीं । एका जनार्दनीं पडला चौर्‍यांयशींचे फेरी ॥५॥
३०५०
शत वर्षाचा कउल घेउनी । आलासी योनी नरदेहा ॥१॥ गर्भ जठरीं सोहं सोहम् । जन्मतांची म्हणसी कोहं कोहम् ॥२॥ ऐसा ठकरा पापिष्ठा । पुढे कारिसी विषयचेष्टा ॥३॥ बाल तारूण्य गेलें । पुढें वृद्धाप्य वयही आलें ॥४॥ नाहें घडलें कीर्तन । तों पुढें आलें मरण ॥५॥ घेउनी जाती यमदुत । कुंभपाकीं तुज घालीत ॥६॥ नाना यातना ते करती । अग्निस्तंभा भेटविती ॥७॥ तेथें कोण सोडी तुज । आतां म्हणसी माझें माझें ॥८॥ ऐसा भुलला गव्हार । भोगी चौर्‍यांशीचा फेर ॥९॥ फेरे फिरूनी नरदेहीं आला । एका जनार्दनीं वायां गेला ॥१०॥
३०५१
शतावती श्रवण अधिक पैं जालें । तेणें अंगा आलें जाणणेपण ॥१॥ पुराण श्रवण लौकिक प्रतिष्ठा । विचार चोहटा जाणिवेचा ॥२॥ श्रवण तो लौकिक मनीं नाहीं विवेक । बुद्धीसी परिपाक कैसेनि होय ॥३॥ मी एक ज्ञाता मिरवीलौकिक । म्हणोनि आक्षेपक सभेमाजीं ॥४॥ नानापरी व्यक्ति मिरवी लोकांप्रती । वाढवितो महंती मानालागीं ॥५॥ मी एक स्वयपांकी मिरवे लौकिकीं । इतर कर्मासी शुद्धी नाहीं ॥६॥ कर्माकर्मीं कांहीं न धरीं कंटाळा । मानितो विटाळा ब्राह्मणाच्या ॥७॥ मजहुनी ज्ञाता आणिक तो नाहीं । ऐसें जाणिवेचे डोहीं गर्वें गेला ॥८॥ नित्य पुढिलाचें गुण दोष आरोपिती । श्रवणाची निष्पत्ति फळली ऐशी ॥९॥ लौकिक प्रतिष्ठा धनावरी आस्था । वरी वरी हरिकथा काय करिसी ॥१०॥ एका जनार्दनीं साच न रिघे मन । तंववरी समाधान केवीं होय ॥११॥
३०५२
शब्द आदि मध्य अंती । उच्चारिता व्यक्ताव्यक्ति ॥१॥ विठ्ठल विठ्ठल जिव्हारी । मुक्ति होईल कामारी ॥२॥ विश्वीं विठ्ठल उघडा पाहे । मुक्त होतां वेळुं काये ॥३॥ एका जनार्दनीं ठसा । विठ्ठल उभा नामासरिसा ॥४॥
३०५३
शम दम तप शौच आणि क्षमा । आर्जव तो प्रेमा ज्ञानालागीं ॥१॥ आत्मा अनुभव वेदीं सत्य भाव । ब्राह्मण स्वभाव कर्म ऐसें ॥२॥ ब्राह्मणाच्या ठायीं गुण शुद्ध सत्त्व । वसे ब्रह्मातत्त्व तया चित्तीं ॥३॥ सर्वांभुतीं दया असे तयापाशीं । विटला उपाधीसी सर्वभावें ॥४॥ एकाजनार्दनीं ऐसे हे ब्राह्मण । तयांचे चरण नित्य वंदूं ॥५॥
३०५४
शम दम साधन । नामावांचुन न करीं जाण ॥१॥ नाम गावें नाम गावें । वेळोवेळां नाम गावें ॥२॥ नामावांचुनी साधन नाहीं । ऐसी वेदशास्तें देती ग्वाही ॥३॥ मज भरंवसा नामाचा । एका जनार्दनीं म्हणे वाचा ॥४॥
३०५५
शय्याशयन आणि शेजार । तें अवघेंचि जालें शरीर ॥१॥ कैसें नीज घेतसे निजे । नीज देखोनी समाधी लाजे ॥२॥ जागृती जागे निजे । स्वप्न सुषुप्तीचे निजगुंजें ॥३॥ एका जनार्दनीं निजला । तो नीजचि होउनी ठेला ॥४॥
३०५६
शरण आलों तुझियां पायां । कॄपानिधी देवराया ॥१॥ पशु उद्धरिलें गजासी । गणिका नेली वैकुंठासी ॥२॥ ऐसा कृपेचा कोंवळा । भक्ता अधीन गोपाळा ॥३॥ एका जनार्दनीं शरण । हीच लाधली निजखुण ॥४॥
३०५७
शरण गेलियां संतांसी । तेणें चुकती चौर्‍यांशीं ॥१॥ द्यावें संतां आलिंगन । तेणें तुटे भवबंधन ॥२॥ वंदितांचरणरज । पावन देह होती सहज ॥३॥ घालितां चरणीं मिठी । लाभ होय उठाउठी ॥४॥ प्रेमें दर्शन घेतां । मोक्ष सायुज्य ये हातां ॥५॥ म्हणे जनार्दन । एका लाधलीसे खुण ॥६॥
३०५८
शरण शरण नारायणा । आम्हां दीना तारावें ॥१॥ मागें बहु शीण पोटीं । पाडा तुटी तयाची ॥२॥ संसाराचा चुकवा हेवा । मागील उगवा गुंती ते ॥३॥ तुम्हीं कृपा केल्यावरी । मी निर्धारी पात्राची ॥४॥ शरण एका जनार्दनीं । तुम्हीं तो धनी त्रैलोक्याचे ॥५॥
३०५९
शरणागत आलिया नुपेक्षी सर्वथा । ऐसा बोध चित्ता आहे माझ्या ॥१॥ सर्व भावें जावें नाम वाचे गावें । जिवलगा भेटावें विठोबासी ॥२॥ साधुसंत गाती आनंदें नाचती । क्षेम तयाप्रति द्यावें सुखें ॥३॥ एका जनार्दनीं पाहतां विठ्ठल । जन्ममरण निवारेल हेळामात्रें ॥४॥
३०६०
शरणागता कृपाळु उदार पंढरीराणा । जाणतसे खुणा अंतरीच्या ॥१॥ तिहीं त्रिभुवनी चाले एक सत्ता । म्हणोनि तत्त्वतां कींव भाकी ॥२॥ करुणाकर तुम्ही भक्तांची जीवन । हें आम्हां वचन श्रुतिवाक्य ॥३॥ एका जनार्दनीं आलोंसें शरण । काया वाचा मन जडलें पायीं ॥४॥
३०६१
शरणागता नुपेक्षी हरी । ऐसी चराचरीं कीर्ति ज्याची ॥१॥ बिभीषणें नमस्कार केला । राज्यदह्र केला श्रीरामें ॥२॥ उपमन्या दुधाचा पैं छंद । क्षीरसागर गोविंद त्या देतु ॥३॥ ध्रुव बैसविला अढळपदीं । गणिका बैसली मोक्षपदीं ॥४॥ ऐसी कृपेची साउली । एका जनार्दनीं माउली ॥५॥
३०६२
शहाणा तो जाण रे । उद्धवा आत्मत्वें पाहें रे । नेणता तो जाण रे । उद्धवा देहबुद्धीस वाहे रे ॥१॥ उद्धव म्हणे कान्होबा सांग रे । गोडा गोडा गोष्टी स्वभाव रे । निज गोडा गोष्टी ऐकतां । चित्त चैतन्य फांवे रे ॥२॥ सज्ञान तोची रे उद्धवा । ज्याची जाणीव विरे । अज्ञान तोची रे उद्धवा । ज्ञानग्र्वें हुंबरे ॥३॥ साधु तोची रे उद्धवा । जो सद्वस्तुतें दावी । असाधु तोची रे उद्धवा । देही प्रपंची गोवी ॥४॥ धर्मिष्ठ तोची रे उद्धवा । जो जन्ममरण निवारी । अधर्मीं तोची रे उद्धवा । लोभ दंभ शरीरीं ॥५॥ सुख तें जाण रे उद्धवा । जेथें मी तुं पण नुरे । दुःख ते जाण रे उद्धवा । काम सुखासी झुरे ॥६॥ शम तो जाण रे उद्धवा । ज्याची आत्मत्वें बुद्धीं । दम तो जाण रे उद्धवा । तो त्यागी उपाधी ॥७॥ धृतीची धारणा रे उद्धवा । जिव्हा उपस्थ जिंके । सोलीव करंटा तोचि रे उद्धवा । जिव्हा उपस्थी आटके ॥८॥ तप तें जाणरे उद्धवा । नित्य नामस्मरण । अभागी तोची रे उद्धवा । नामीं विन्मुखपण ॥९॥ बळिया बलिष्ठ तोची रे उद्धवा । निज मानसीं जिंकणें । नपुंसक तोची रे उद्धवा । मनामागें धांवणें ॥१०॥ लाभ तो जाण रे उद्धवा । नित्य भगवद्भक्ती । अलाभ तो जाण रे उद्भवा । सम ब्रह्मा देखणें ॥११॥ सत्य तें जाण रे उद्धवा । सम ब्रह्मा देखणें । असत्य तेंची रे उद्धवा । जो देह मी म्हणे ॥१२॥ वाचा सत्य अनुवादणें । तें लोक सत्य । सम ब्रह्मा न देखणें । तें अलक्ष्य निर्धूत ॥१३॥ उत्तम धर्म तोची रे उद्धवा । निज धर्म ज्या गांठीं । अधर्म तोची रे उद्धवा । धनलोभीया दृष्टी ॥१४॥ पावन यज्ञ तोची रे उद्धवा । द्विजमुखीं अर्पें । अधम यज्ञ तो उद्धवा । लोभावरी समर्पे ॥१५॥ वरिष्ठ लक्ष्मी ती जाण रे उद्धवा । सर्वभावीं निरास । अलक्ष्मी ते रे उद्धवा । ज्यासी आशापाश ॥१६॥ भाग्य तें जाण रे उद्धवा । वैराग्य बाणें । अभाग्य तेंची रे उद्धवा । जो देहीं मी म्हणे ॥१७॥ ईश्वर तोची रे उद्धवा । ज्यासी सर्व सत्ता । अनीश्वर तोचि रे उद्धवा । ज्यासी स्त्री आधीन जीविता ॥१८॥ पवित्र तोची रे उद्धवा । कर्मीं ब्रह्मा प्रीती । अपवित्र तोचि रे उद्धवा । कर्मीं बद्धप्राप्ती ॥१९॥ पंदित तोची रे उद्धवा । जो देह अहंता छेदी । मूर्ख तोचि रे उद्धवा । देह अभिमानी बुद्धी ॥२०॥ संन्यासी तोची रे उद्धवा । सर्व संकल्प त्यागी । परगृहीं तोची रे उद्धवा । मोह ममता अंगीं ॥२१॥ स्वर्ग तो जण रे उद्धवा । नित्य संग संतीं । नरक तो तो जाण रे उद्धवा । नित्य अधर्मीं वृत्ती ॥२२॥ सखा तो जाण रे उद्धवा । स्वयें सदगुरुराव । वैरी तो जाण रे उद्धवा । देहीं अहंभाव ॥२३॥ दरिद्री तो जाण रे उद्धवा । ज्यासी लोलुप चित्तीं । कृपण तोची रे उद्धवा । द्रव्यदारा आसक्ती ॥२४॥ एका जनार्दनीं कवित्य । चित्तीं चैतन्य गोड । एकीं एकहीं धरितां । पुर्व सर्वहीं कोड ॥२५॥
३०६३
शहाणा हो म्हणविती । हरिभक्ति कां रे वरवर करिती ॥१॥ उगीच कासया करसील फड । जग हें बोधावया बापुडें ॥२॥ अंतर भक्ति न करिसी मूढा । कासया लौकिकीं मिरविसी बापुडा ॥३॥ एका जनार्दनीं धरूनी कान । संतापायीं नाचे सांदुनी अभिमान ॥४॥
३०६४
शांती क्षमा दया ज्ञानविज्ञान । निरसले जाण भेदाभेद ॥१॥ यापरतें सुलभ आम्हां एक नाम । मोक्ष मुक्ति धाम फोलकट ॥२॥ न करुं सायास ब्रह्माज्ञान आटी । योगाची कसवटीं वायां तप ॥३॥ एका जनार्दनीं एक जनार्दनीं । जनींवनीं संपुर्ण भरलासे ॥४॥
३०६५
शांतीचेनि मंत्रें मंत्रुनी विभुती । लाविली देहाप्रती सर्व अंगा ॥१॥ तेणें तळमळ हारपले व्यथा । गेली सर्व चिंता पुढिलाची ॥२॥ लिगाडाची मोट बांधोनि टाकिली । वासना भाजली क्रोध अग्नी ॥३॥ एका जनार्दनीं शांत जाहला देव । कामनीक देव प्रगटला ॥४॥
३०६६
शाकार भारे मस्तकीं वाहिले । घर शाकारिलें नामयाचें ॥१॥ दामशेटी पुसे कोठील तूं कोण । येरु म्हणे जाण वस्ती येथें ॥२॥ बिर्‍हाड तुर्ती माझें राउळाभीतरीं । विठूजी निर्धारी नाम माझें ॥३॥ तूमच्या नामयाची ममता मज असे फ़ार । एका जनार्दनीं निर्धारें ऋणी त्याचा ॥४॥
३०३७
शाब्दिक शब्दाचा करिती कंटाळा । द्वेषाचा उमाळा अंगीं वसे ॥१॥ शब्द ब्रह्माज्ञानें फुगविती अंग । वाउगाची सोंग गर्व वाहाती ॥२॥ सर्वां भूतमात्रीं शब्द तो संचला । न कळे तयाला शब्दभेद ॥३॥ एका जनार्दनीं शब्दाचा भेद । न कळे प्रसिद्ध ज्ञानीयासी ॥४॥
३०६८
शास्त्रज्ञ पंडित हो कां वेदवक्ते । परी हरि भजनीं रत वंद्य सदा ॥१॥ भक्तीचें कारण तेणें सरतेपण । वाउगाची शीण जाणिवेचा ॥२॥ मी एक जाणता पैल नेणता । ऐसा विकल्प भाविता पतन जोडे ॥३॥ एका जनार्दनीं विकल्प त्यजोनी । विठ्ठल चरणीं मिठी घाली ॥४॥
३०६९
शास्त्रवेत्ते ज्ञानी नामपाठ गाती । तेणें तयां विश्रांती सर्वकाळ ॥१॥ पुराणें वदती नाम पाठ कीर्ती । व्यासादिकीं निश्चितीं नेम केला ॥२॥ जनार्दनाचा एका सांगतसे गुज । नामपाठ निज जपे जना ॥३॥ नामापाठफल प्राप्त झालेले भक्त
३०७०
शिकलासे टाणटोणा । तेणें ब्रह्माज्ञाना तुच्छ मानी ॥१॥ बोले बहु चावट वचन । वेदां म्हणे तो अप्रमाण ॥२॥ सिद्धान्त धातांतांसी म्हणे । हें तो पाषांडी बोलणें ॥३॥ ऐसा पामर दुराचारी । वाचे न वदे कधीं हरी ॥४॥ एका जनार्दनीं मन । ज्याचें पाषाणचि जाण ॥५॥
३०७१
शिकविलें नाईके वचन । वारितां करी कर्म जाण ॥१॥ न देखे आपुले गुणदोष । पारावियाचे बोले निःशेष ॥२॥ न करावें तें करी । न बोलावें तें बोले निर्धारीं ॥३॥ न मानीं स्वयातीचा आचार । सदा करी अनाचार ॥४॥ शिकविलें गेलें वायां । शरण एका जनार्दनीं पायां ॥५॥
३०७२
शिणले ते वेद श्रुती पैं भांडती पुराणांची मती कुंठीत जाहली ॥१॥ तो हा पांडुरंग उभा विटेवरी । पाउले साजिरी समचि दोन्ही ॥२॥ कर कटावरीं तुळशीच्या माळा ।निढळीं शोभला मुकुट तो ॥३॥ एका जनार्दनीं गोजिरें तें ठाण । शोभलें जघन करयुगुली ॥४॥
३०७३
शिणल्या भरल्या विठोबाचें नाम । विश्रांतीचें धाम पंढरपुर ॥१॥ म्हणोनियां करा नामाचाचि लाहो । पंढरीचा नाही पहा डोळां ॥२॥ एका जनार्दनीं पुरवील आशा । पंढरीनिवासा पाहतांचि ॥३॥
३०७४
शिणसी कां रे वायां । वाचे वदे पंढरीराया ॥१॥ मग तुज नाहीं रे बंधन । पारुषे पां कर्माकर्म ॥२॥ कर्म धर्म न करी तूं सोस । अवघा विठ्ठलचि देख ॥३॥ नको करूं कुंथाकुंथी । तेणें होते फजिती ॥४॥ अनुभव घेई देखा । एका जनार्दनीं सुखा ॥५॥
३०७५
शिव ऐसा मंत्र सुलभ सोपा रे । जपावा परिकर नित्य नेमें ॥१॥ न बाधिच विघ्न संसाराचें भान । धन्य तें भजन शिवनामें ॥२॥ एका जनार्दनीं नाम शिव ईशान । वदतां घडे पुण्य कोटी यज्ञ ॥३॥
३०७६
शिव भोळा चक्रवती । त्याचे पाय माझे चित्तीं ॥१॥ वाचे वदतां शिवनाम । तया न बाधी क्रोधकाम ॥२॥ धर्म अर्थ काम मोक्ष । शिवा देखतां प्रत्यक्ष ॥३॥ एका जनार्दनीं शिव । निवारी कलिकाळाचा भेव ॥४॥
३०७७
शिव शिव अक्षरें दोन । जो जपे रात्रंदिन ॥१॥ धन्य तयाचा संसार । परमार्थाचें तेंच घर ॥२॥ सदोदित वाचे । जपे शिव शिव साचें ॥३॥ एका जनार्दनीं शिव । सोपा मंत्र तो राणीव ॥४॥
३०७८
शिव शिव नाम वदतां वाचे । नासे पातक बहुतां जन्माचें ॥१॥ जो मुकुटमणी निका वैष्णव । तयाचें नाम घेतां हरे काळांचें भेव ॥२॥ तिहीं लोकीं श्रेष्ठ न कळे आगमां निगमां । तयाची गोडी ठाऊक श्रीरामा ॥३॥ एका जनार्दनीं नका दुजा भावो । विष्णु तोची शिव ऐसा निर्वाहो ॥४॥
३०७९
शिव सांगे गिरजेप्रती । रामनामें उत्तम गती ॥१॥ असो अधम चांडाळ । नामें पावन होय कुळ ॥२॥ नाम सारांचें पैं सार । भवसिंधू उतरी पार ॥३॥ नाम श्रेंष्ठांचे पईं श्रेष्ठ । एका जनार्दनीं वरिष्ठ ॥४॥
३०८०
शिवनाम उच्चारा । तेणें कळिकाळासी दरारा ॥१॥ ऐसा नामाचा महिमा । न कळेचि आगमां निगमां ॥२॥ सकळ मंत्राचें माहेर । शिवमंत्र पंचाक्षर ॥३॥ एका जनार्दनीं वाचे । शिवनाम जपा साचें ॥४॥
३०८१
शिवनाम उच्चारी । आळस न करी क्षणभरी । महापापा होय बोहरी । नाम घेतां ॥१॥ शिव शिव नाम । जपे कां रे उत्तम । तेणें नासे भवभ्रम । निःसंदेह ॥२॥ दो अक्षरीं काम । वाचे घेई तूं नाम । आणीक तें वर्म । सोपे नाहीं ॥३॥ एका जनार्दनीं । शिव जप ध्यानीं मनीं । वेद शास्त्र पुराणीं । बोलियेलें ॥४॥
३०८२
शिवनामाची कावड खांदीं । आम्हीं घेतली समताबुद्धि ॥१॥ हर हर हर वोळंगा रे भाई । आशा मनिशा तृष्णा सांडुनी पाही ॥२॥ मागें बहुतीं घेतली खांदीं । ते उतरले पैलपार भवनदी ॥३॥ ज्ञानदेव कावड घेतां । सुख समाधान वाटे चित्ता ॥४॥ निवृत्ति सोपान चांगदेव भारी । कावडीचे अधिकारी ॥५॥ एका जनार्दनीं त्यांचा दास । कावड घेतां बहु उल्हास ॥६॥
३०८३
शिवरात्र व्रत करी यथाविधी । भावें पूजी आधीं शिवलिंग ॥१॥ चुकलें चुकलें जन्माचें बंधन । पुनरागमन नये तेणें ॥२॥ एक बिल्वदळ चंदन अक्षता । पुजन तत्त्वतां सोपें बहु ॥३॥ एका जनार्दनीं पूजितां साचार । इच्छिलें हरिहर पुर्ण करिती ॥४॥
३०८४
शिवाचे हृदयीं नांदसी श्रीरामा । काय वर्णुं महिमा न कळे आगमानिगमां ॥१॥ वेदशास्त्रें मौनावलीं पुरणें भांबावलीं । श्रुति म्हणती नेति नेति शब्दे खुंटली ॥२॥ वाच्य वाचक जगन्नथ स्वयें शिवाचा आत्माराम । एका जनार्दनीं सुख तयांसी गातां निष्काम ॥३॥
३०८५
शिव्या देतां यासी हांसतसे सुखें । न मानी कांहीं दु:खें नाम्यासाठीं ॥१॥ ऐसें येणें मोहिलें आमुचिया बाळा । हा कोठोनि काळा आला येथें ॥२॥ एका जनार्दनीं पुरविली पाठी । काय याची गोठी सांगावी ते ॥३॥
३०८६
शिष्यापासून सेवा घेणें । हें तो लक्षण अधमाचें ॥१॥ ऐसें असतीं गुरु बहु । नव्हेंचि साहुं भार त्यांचा ॥२॥ एकपणें समानता । गुरुशिष्य उरतां उपदेश ॥३॥ एका जनार्दनीं शरण । गुरु माझा जनार्दन ॥४॥
३०८७
शुकादिक योगी रंगले श्रीरंगीं । नाम पवित्र जगीं जपा आधीं ॥१॥ साधनें साधितां कष्ट होती जीवा । नाम सोपें सर्वां गोड गातां ॥२॥ परंपरा नाम वाचे तें सुगम । सनकादिक श्रम न करिती ॥३॥ एका जनार्दनीं नाम तें पावन । वाचे उच्चारितां जाण श्रम हरे ॥४॥
३०८८
शुचि अथवा अशुचि । परि श्रीरामनाम ज्याचे मुखीं ॥१॥ तोचि त्रैलोकी पावन । तिन्हीं देवांसि समान ॥२॥ त्यांचे होतां दरुशन । घडे त्रिवेणीचें स्नान ॥३॥ एका जनार्दनी देहीं । सदासर्वदा तो विदेही ॥४॥
३०८९
शुद्ध करूनियां मन । नारायण चिंतावा ॥१॥ मग उणें नाहीं काहीं । प्रत्यक्ष पाही अनुभव ॥२॥ आठवितां उपमन्यु बाळ । दिला क्षीरसागर सुढाळ ॥३॥ ध्रुवें चिंतिलें चरणा । अधळपदीं स्थापिलें जाणा ॥४॥ बिभीषणें केला नमस्कार । तया केलें राज्यधर ॥५॥ विष पाजिलें पूतना । पाठविली वैकुंठसदना ॥६॥ गणिकेंनें आठविलें । तैसी वैकुंठीं बैसविलें ॥७॥ हनियाती कुब्जादासी । जाहली प्रिय ती देवासी ॥८॥ अर्जुनाच्या भावार्थासाठीं । रथ हांकी जगजेठीं ॥९॥ गोपाळांची आवड पोटीं । उच्छिष्टासाठीं लाळ घोटी ॥१०॥ विदुराच्या भक्षा कण्या । तेणें आवडी मानीं मना ॥११॥ एका शरण जनार्दनीं । दासां न विसरें चक्रपाणी ॥१२॥
३०९०
शुद्ध ज्याचें मन । तया आवडे कीर्तन ॥१॥ येर ते पामर पातकी । दैन्यवाणें तिहीं लोकीं ॥२॥ नावडे हरीचें कीर्तन । तेथें वसे नाना विघ्र ॥३॥ एका शरण जनार्दनीं । करा कीर्तन अनुदिनीं ॥४॥
३०९१
शुद्ध ब्रह्माज्ञानाचा धडा । पंचभूतांचा खचला खडा । देह चतुष्टय पुसिला वाडा । धन्य धडफुडा आत्मा मी ॥१॥ शुद्धब्रह्माज्ञानाचा मार्ग । मृत्यु पातला सरलें सर्ग । पिंड ब्रह्माडाचें दुर्ग ब्रह्मांडाचें दुर्ग । विरोनी अर्व आत्मा मी ॥२॥ ॐ नमो जी जगदगुरु । सर्वांभुती साक्षात्कारु । ब्रह्मा विष्णु महेश्वर । ॐकार तो वोळखिजे ॥३॥ अनंत ब्रह्मांडाचा टिळा । लावुनी बैसे ब्रह्माकपाळा । त्यांतही वळी तरंग जळा । वरी तेविं ब्रह्मांड ॥४॥ ऐशा अनंत विभूती । दिगंबर अंगीं चर्चिती । घडीनें घडी लेप देती । पुसोनी जाती क्षणक्षणां ॥५॥ तैसे नव इंद्रियां सबाह्म । ब्रह्मा कोंदलें अनुभव पाहे । घट जळीं बुडोनी राहे । ऐसा आहे दृष्टांन्त ॥६॥ गगन ग्रासोनी अपार । तैसा मी आहे सर्वेश्वर । अनंत ब्रह्मांडो अवतार । तरंग फिर मजवरी ॥७॥ तुम्हांआम्हां मध्यें जें अवकाश । तें सबाह्म ब्रह्मा सावकाश । अनंत ब्रह्मांडें फुटती तयास । निराभास निगुण ॥८॥ हें ब्रह्मा हे माया । का बोट लावुनी दाखवुं शिष्यराया । आधारापासोनी सहस्त्रदळ काया । बुडे ठाया तें ब्रह्मा ॥९॥ ब्रह्मा म्हणजे आकाश । कीं ब्रह्मा म्हणजे महदाकाश । कीं ब्रह्मा म्हणजे निर्गुण निराभास । आदि अवकाश तें ब्रह्मा ॥१०॥ ब्रह्मा म्हणजे तें पोकळ । कीं ब्रह्मा म्हणजे आकाशहुन पातळ । कीं ब्रह्मा म्हणजे शुन्य सकळ । मिथ्या मूळ तें ब्रह्मा ॥११॥ सोहं नाद सर्वांसी । विश्वनाथ विश्वासी । अमृतफळ अंबियासी । लक्ष चौर्‍यायंशीं लोंबती ॥१२॥ तैसें जन फळ जनार्दनीं लोंबे । सोहं देठ दोहींकडे झोंबे । फळ दे वृक्ष लोंबें । अद्वैत बिंबलें एका जनार्दनीं ॥१३॥
३०९२
शुद्ध स्फटिके आपुलें रुप देखे । कृष्ण तेणें हारिखें डोलतसे ॥१॥ देहाविदेहा आलिंगन स्वानंदें चुंबन । तये संधीं मन हारपत ॥२॥ स्वस्वरुपीं भेटीं थोर उल्हास पोटीं । उन्मळींत दाष्टी निजरुप पाहें ॥३॥ हें जाणोनि माया धावे लावलाह्मा । उचलोनि कान्हाया दृश्य दावी ॥४॥ माझें रुप मज देई घालितो लोळणी । जननी नानागुणी बुझावीत ॥५॥ माया मोहं गुणाचे खेळणें । येथें कृष्ण म्हणे जीवेभावें ॥६॥ देह घटाबाहेरी न वचें मी मुरारी । श्रद्धा उष्ण भरी तावितसे ॥७॥ विषय पंचधारा देइन बा साकर । नाथिली करकर कां करिसी ॥८॥ घेई स्तनपान वोरसु इंद्रियां गोरसु । मायेसी उदासू रुसूं नको ॥९॥ इच्छा माउलीची साय सावकाश खाय । गोगोरसाची माय मज चाड नाहीं ॥१०॥ तो तंव ठाईच्या ठाई म्यां तव काहीं नेले नाहीं । निजरुप पाही जैंसे तैसें ॥११॥ तुझी पडलीया पडसाई असतांचि जालें नाहीं । नास्तिक तेचि डोई सबळ जाले ॥१२॥ तुझिया सांगातें करणें आणि भुतें । अहंकारें थिते चोरुनि नेलीं ॥१३॥ दुजेपणें पाहतां धरितां नये हातां । निजरुपा तत्त्वतां काढोनि देई ॥१४॥ होसी चक्रचाळ घाइसी आळ । बाळलीळा खेळ निर्वाणीचा ॥१५॥ मज मायावेगळा नवचे बा गोपाळा । आपरुपीं खेळा खेळू नको ॥१६॥ नेणों कैशी आवडी माया म्हणसी कुडी । भूली नव्हें खोडी तान्हुलिया ॥१७॥ हें नायके उत्तर म्हणे परती सर । निजरुपी साचार दावीं मज ॥१८॥ यापरी कान्हया स्वरुपीं थाया । बुझावितां माया वेढोनि गेली ॥१९॥ आपुलैया स्वप्रभा आपण पावे शोभा । सबाह्म कृष्ण उभा एकपणें ॥२०॥ माया मोहकता गुणाची वार्ता । कृष्णापणीं एकत्वेंची ॥२१॥ एक जनार्दनी निजीं निज मिळणी । सगुणी निर्गुणीं कृष्ण एक ॥२२॥
३०९३
शुद्धभाव चित्तीं । तरी कांहीं न लगे युक्ति ॥१॥ नलगे आणिक विचार । शुद्ध भाव हाचि सार ॥२॥ भावाविण वांझे । साधनें तीं अवघीं ओझें ॥३॥ एका जनार्दनीं भाव । पाववी अक्षय तो ठाव ॥४॥
३०९४
शुद्धभावें गावें नाम श्रीहरींचें । भेदभाव साचे टाकूनियां ॥१॥ भोळे भाविक ज्याचा आहे देव जवळा । टवाळास निराळा भास दिसे ॥२॥ अविश्वासियासी होय बोध वायां । ब्रह्माज्ञान तया सांगुन काय ॥३॥ एका जनार्दनीं अभाविक खळ । बोध तो सकळ जाय वायां ॥४॥
३०९५
शुद्रादिक वर्ण त्याचे पाय धुती । उपदेश घेती तयाचे गा ॥१॥ वेदशास्त्रांलागीं अव्हेर करती । आपुलाले मती पाषांडी ते ॥२॥ आचार सांडोनी होती शब्दज्ञानी । व्यर्थ अभिमानी पडताती ॥३॥ एका जनार्दनीं ऐसिया पामरा । केवीं विश्वंभरा पावसील ॥४॥
३०९६
शुन्य निरशुन्य तयामाजीं बीज । तया नांव गुज निजवस्तु ॥१॥ जाणण्याचें मूळ अकुळांचें कुळ । अलक्ष्याचें स्थळ तयाठायीं ॥२॥ एकाजर्नादनीं प्रसाद लाधला । जनार्दनीं वोळला सुखरुप ॥३॥
३०९७
शेषादिक श्रमले न कळे ज्याचा पार । आगमानिगमा निर्धार न कळेची ॥१॥ तें हें बाळरुप यशोदे वोसंगा । पाहतां दोषभंगा जाती रया ॥२॥ करितसे चोरी खोडी नानापरी । यशोदा सुंदरी कोड वाटे ॥३॥ बांधिती गळिया धांवोनी दाव्यानें । नका नका म्हणे दीनवाणी ॥४॥ त्रिभुवनासी ज्याचा धाक तो ब्रह्मांडी । त्यासी म्हणती भांडी आला बाऊ ॥५॥ भिऊनियां लपे यशोदे वोसंगा । ऐशा दावी सोंगा भाविकांसी ॥६॥ एका जनार्दनीं दावितो लाघव । ब्रह्मादिकां माव न कळे ज्यांची ॥७॥
३०९८
शेषादिक श्रमले वेद मौनावले । पुरणें भागलीं न कळे त्यांसी ॥१॥ तोचि हा सोपा सुलभ सर्वांसी । विठ्ठल पंढरीसी उघड लीळा ॥२॥ शास्त्राचिया मता न कळे लाघव । तो हा विठ्ठलदेव भीमातीरीं ॥३॥ कर्म धर्म जयालागीं आचरती । ती ही उभी मूर्ति विटेवरी ॥४॥ आगमां निगमां न कळे दुर्गमा । एका जनार्दनी प्रेमा भाविकांसी ॥५॥
३०९९
शोभती दोनी कटीं कर । रुप सांवळें सुंदर । केशराची उटी नागर । गळां माळ वैजयंती ॥१॥ वेधें वेधक हा कान्हा । पहा वेधतुसे मना । न बैसेचि ध्याना । योगियांच्या सर्वदा ॥२॥ उभारुनी दोन्हीं बाह्मा । भाविकांची वाट पाहे । शाहाणे न लभती पाय । तया स्थळी जाऊनी ॥३॥ ऐसा उदार मोक्षदानी । गोपी वेधक चक्रपाणी । शरण एका जनार्दनीं । नाठवे दुजे सर्वदा ॥४॥
३१००
श्याम चतुर्भुज पीतांबरधारी । शंख चक्र मिरवे करीं ॥१॥ आला पुंडलिका कारणें । आवडी कीर्तनें धरुनीं ॥२॥ युगे अठ्ठावीस जाली । न बैसे उभा सम पाउली ॥३॥ कीर्तनीं धरुनियां हेत । उभा राहिला तिष्ठत ॥४॥ एका शरण जनार्दनीं । अनुदिती करा किर्तन ॥५॥
३१०१
श्यामसुंदर मूर्ति विटेवरी साजिरी । पाउलें गोजिरीं कोवळीं तीं ॥१॥ ध्वजवज्रांकुश चिन्हें मिरवती । कटीं धरीले कर अनुपम्य शोभती ॥२॥ ऐसा देखिला देव विठठलु माये । एका जनार्दनीं त्यासी गाये ॥३॥
३१०२
श्रमोनी वाउग्या बोलती चावटी । परी हातवटी नये कोणा ॥१॥ ब्रह्माज्ञानी ऐसे मिरविती वरी । क्रोध तो अंतरीं वसतसे ॥२॥ सर्वरुप देखे समचि सारिखें । द्वैत अद्वैत पारखें टाकूनियां ॥३॥ एका जनार्दनीं ब्रह्माज्ञान बोली । सहजचि आली मज अंगीं ॥४॥
३१०३
श्रवण नयन घ्राण रसन । यमाजीं कोण ज्ञान प्रमाण ॥ महादेव ॥१॥ इंद्रियां अतीत आपण । देखिजें हें ज्ञान कारण ॥ महादेव ॥२॥ जन वन जीवन निरंजन । यामाजीं कवण करुं भजन ॥ महादेव ॥३॥ एका जनार्दनीं जन । तो भजकां तो मुख्य भजन ॥ महादेव ॥४॥
३१०४
श्रवणीं ऐकेन तुमचें गुणनाम । वाचे आणिक काम न करीं न कांहीं ॥१॥ डोळें भरुनियां पाहीन श्रीमुख । सुखाचें तें सुख हृदयांत ॥२॥ अष्टभावें कंठीं दाटेन सगद्रद । सांडोनी भेदाभेद आन देवा ॥३॥ एका जनार्दनीं यापरतें प्रेम । आन नाहीं विषम मजपाशी ॥४॥
३१०५
श्रवणीं ऐकोनी पाहावया येणें । तंव डोळेचि जाले देखणें ॥१॥ आतां पहावें तें काये । जे पाहें तें आपणचि आहे ॥२॥ जें जें देखों जाये दिठी । तें देखणें होउनी नुठी ॥३॥ एका जनार्दनीं पाहे लीला । पाहतां पाहणें अवलीळा ॥४॥
३१०६
श्रीकृष्ण न्यावा गोकुळा । पायीं स्नेहाच्या शृंखळा । कायाकपटीं अर्गळा । मोहममतेच्या ॥१॥ कृष्णीं धरितां आवडी । स्वयें विराली स्नेहाची बेडी । मुक्तद्वारा परवडी । नाहीं अर्गळा शृखंळा ॥२॥ कृष्ण जंव नये होतां । तंवचि बंधनकथा । पावलीया कृष्णानाथा । बंदी मोक्ष ॥३॥ ते संधि रक्षणाईते । विसरली रक्षणातें । टकमकीत पहाते । स्वयें कृष्ण नेतां ॥४॥ श्रीकृष्ण अंगशोभा । नभत्व लोपलें नभा । दिशेची मोडली प्रभा । राखते कवण ॥५॥ अंधारामाजी सूर्य जातु । श्रीकृष्णासी असे नेतु । सत्व स्वभावें असे सांगतु । कृष्णाकडिये पडियेला ॥६॥ अंध ते बंधन नेलें । राखतो राखणे ठेलें । एका जनार्दनी केलें । नित्य मुक्त ॥७॥
३१०७
श्रीक्षेत्र पंढरी शोभे भीमातीरीं । विठ्ठल विटेवरी उभा असे ॥१॥ सांवळें रुपडें कटीं ठेउनि कर । भक्त जयजयकार करिताती ॥२॥ एका जनार्दनीं गोजिरें तें ठाण । शोभती जघन कटीं कर ॥३॥
३१०८
श्रीगुरुंचें नाममात्र । तेंचि आम्हां वेदशास्त्रं ॥१॥ श्रीगुरुचें चरणत्रीर्थ । सकळां तीर्था करी पवित्र ॥२॥ श्रीगुरुच्या उपदेश । एका जनार्दनीं तो रस ॥३॥
३१०९
श्रीगुरुकृपें दत्त वोळखिला । हृदय डोल्हार्‍यावरी बैसविला । अभेद पुर्ण चांदवा तेथें दिला । शुद्ध भक्तीनें दत्त पुजियेला ॥१॥ दत्तचरणीं मज लागलीसे गोडी । भवभयाची तुटोनी गेली बेडी ॥धृ॥ सोहं गुढी तेथें उभारिली । मंत्र उपदेशें देहबुद्धी गेली । पुर्ण निवृत्ति प्रवृत्तिहि धाली । सहज पुर्णनंद पूर्णता जालीं ॥२॥ जिकडे पाहे तिकडे चक्रपाणी । बोलावयाची राहिली शिराणी । जनीं वनीं एकात्मता खाणी । एका जनार्दनीं रंगलीसे वाणी ॥३॥
३११०
श्रीगुरुचें नाममात्र । तेंचि आमुचें वेदशास्त्र ॥१॥ श्रीगुरुंचे तीर्थ मात्र । सकळ तीर्था करी पवित्र ॥२॥ श्रीगुरुंचे चरणरज । तेणें आमुचें जाहलें काज ॥३॥ श्रीगुरुंची ध्यानमुद्रा । तेंचि आमुचि योगनिद्रा ॥४॥ एका जनार्दनीं मन । श्रीगुरुचरणीं केलें लीन ॥५॥
३१११
श्रीगुरुच्या चरणागुष्ठीं । वंदिती ब्रह्मादी देव कोटी ॥१॥ सकळ वेदांचि निजसार । श्रीसदगुरु परात्पर ॥२॥ श्रीगुरु नांव ऐकतां कानीं । यम काळ कांपतीं दोनी ॥३॥ सदगुरुसी भावें शरण । एका जनार्दनीं नमन ॥४॥
३११२
श्रीगुरुपायीं ठेवींतुं विश्वास । दासाचा तुं दास होय त्यांच्या ॥१॥ परब्रह्मा राम वसिष्ठा शरण । कृष्णें संदीपन गुरु केला ॥२॥ वाल्मिका उपदेशी नारद तो मुनी । वंद्य त्रिभूवनीं झाला वाल्हा ॥३॥ एका जनार्दनीं गुरु मज भेटला । मोकळा दाविला मार्ग तेंणें ॥४॥
३११३
श्रीगुरुराया पार नाहीं तव गुणी । म्हणोनि विनवयी करितसों ॥१॥ मांडिला व्यवहार हरिनामीं आदर । सादरा सादरा वदवावें ॥२॥ न कळेचि महिमा ऊंच नीचपणे । कृपेंचे पोसणें तुमचे जाहलों ॥३॥ एका जनार्दनी करुनी स्तवन । घातिलें दुकान मोलेंविण ॥४॥
३११४
श्रीगुरुराया स्वामी दिनानाथा । उद्धरी अनाथा पांडुरंग ॥१॥ गुण निर्गुणरुपा देवा यतिवरा । त्रैलोक्य आधारा पाडुरंगा ॥२॥ रुप वर्णावया नाहीं मज मती । देई तुं बा शक्ति पांडुरंगा ॥३॥ देई मजलागीं प्रभो नित्य शांती । करितों विनंति पाडुरंगा ॥४॥ वदविसी मज तंव सत्ते देवा । देई मज भावा पाडुंरंगा ॥५॥ दशा हें यौवन मज करी बाधा । सांगे स्वयंबोधा पाडूरंगा ॥६॥ तमगुणरजोगुणांतें निरसी । तारी या दासासी पाडुरंगा ॥७॥ असावें मी सदा विषयीं विरक्त । पुरवींमाझे आर्त पाडुरंगा ॥८॥ वससी अंतरीं दासाच्या तुं सदा । आनंदाच्या कंदा पाडुरंगा ॥९॥ धूतपाप व्हावें तुमच्या कृपादृष्टी । सुखाची तुं सृष्टीं पांडुरंगां ॥१०॥ तरती सज्जन तुमच्या दर्शनें । कॄपेचें तुं ठाणें पाडूरंगा ॥११॥ श्रियाळ चांगुना भक्त तारियेले । सत्व रक्षियेलें पाडुरंगा ॥१२॥ पाश हा भ्रांतीचा मजलागीं गोंवा । त्वाचि पैंक तोडावा पांडुरंगा ॥१३॥ दमावी इंद्रियें तेव्हा गुरुभेटी । नको आटाआटी पांडुरंगा ॥१४॥ श्रीद श्रीद माझा समर्थ सदगुरु । देवा तुं आधारु पाडुरंगा ॥१५॥ वन जन सर्व त्वाचि व्यापियलें । स्वरुप शोभलें पांडुरंगा ॥१६॥ लव निमिषभरी तुजविण रहावें । मरणें मज व्हावें पाडुरंगा ॥१७॥ भवसागरांत बुडतों मी देवा । करी माझा काढावा पाडुरंगा ॥१८॥ स्वानंद आरामी मी तो विश्रांमावें । मजलागीं पावावें पाडुरंगा ॥१९॥ मीपणेंनसिलें मजलागीं देवा । देई स्वानुभवा पाडुंरगा ॥२०॥ नृप हा जगाचा परमानंद साचा । वदों माझी वाचा पाडुरंगा ॥२१॥ सिंहासन हृदयीं करोनिया माझ्या । बैसे गुरुराजा पांडुरंगा ॥२२॥ हस्तांत धरावें आपुलिया दासा । हेअ जगन्निवासा पांडुरंगा ॥२३॥ सर्वकाळ चित्ती माझिया वसावें । शुद्ध प्रेम द्यावें पाडुरंगा ॥२४॥ रण कामक्रोध लोभाचें माजलें । निवारी उगलें पाडूरंगा ॥२५॥ स्वभाव हा माझा रजो तमो युक्त । नाशी तुं क्षणांत पांडुरंगा ॥२६॥ तीकडी सांखळी त्रिगुणाची सारी । भव हा निवारी पांडुरंगा ॥२७॥ मनन करावें रात्रंदिवस तुझें । ऐसी कृपा कीजे पांडुरंगा ॥२८॥ हाव ही धरावी सदगुरुपायांची । विनंती दीनाची पाडुरंगा ॥२९॥ रहावें सर्वदा तुझ्या पायांपाशीं । देई तुं वरांसी पाडुरंगा ॥३०॥ जय जय सदगुरो स्वामी तुं समर्थ । पुरवी मनोरथा पाडुरंगा ॥३१॥ एका जनार्दनीं सदगुरों उदारा । दयेच्या सागरा पांडुरंगा ॥३२॥
३११५
श्रीगुरुसारखा वंद्य नाहीं त्रिभुवनीं । तो कैवल्याचा धनीं विटेवरी ॥१॥ विटेवरी उभा आनंदें राहिला । वैष्णवांचा मेळा शोभे तेथें ॥२॥ आनंद भीमातीरीं पुंडलिकापाशीं । नाम आनंदेसी गाऊं गीती ॥३॥ एका जनार्दनीं कैवल्याचा धनी । तो नंदाचें अंगणीं खेळे लीला ॥४॥
३११६
श्रीगोविंदा मधुसूदना । ऐशा नामांची करिता उच्चारणा । तुटताती यमयातना । नाना पातकियाच्या ॥१॥ माना हाचि रे विश्वास । नामीं धरा दृढ वास । आणिक ते सायास । फोलकत न करावें ॥२॥ योगयाग कसवटी । नको नको कोरड्या गोष्टी । वांयाचि हिंपुटी । शिणती मुर्ख ॥३॥ शरण रिघा जनार्दनीं । एकपणें मन करुनी । एका जनार्दनीं ध्यानी मनीं । चिंतन तें असों द्यावें ॥४॥
३११७
श्रीज्ञानदेवा चरणीं । मस्तक असो दिवसरजनीं ॥१॥ केला जगासी उपकार । तारियेले नारीनर ॥२॥ पातकी दुर्जन हीन याती । चार अक्षरें तयां मुक्ती ॥३॥ संस्कृताची भाषा । मर्‍हाठी नि:शेष अर्थ केला ॥४॥ ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । अनुभव दावी भाविकां ॥५॥ एका जनार्दनीं अनुभव । समाधि ठावें अलंकापुरीं ॥६॥
३११८
श्रीज्ञानदेवें येउनी स्वप्नांत । सांगितली मात मजलागीं ॥१॥ दिव्य तेज:पुंज मदनाचा पुतळा । परब्रह्म केवळ बोलतसे ॥२॥ अजानवृक्षाची मुळी कंठास लागली । येऊनि आनंद स्थळीं काढ वेगीं ॥३॥ ऐसें स्वप्न होतां आलों अलंकापुरीं । तंव नदीमाझारी देखिलें द्वार ॥४॥ एका जनार्दनीं पूर्वपुण्य फळलें । श्रीगुरु भेटले ज्ञानेश्वर ॥५॥
३११९
श्रीदत्त ऐसी ज्याची वाचा पढे । पोक्ष सायुज्यता जोडे ॥१॥ ऐसी प्रचीत पहा देहीं । व्यापुनी असे देही विदेही ॥२॥ एका जनार्दनीं दत्त । सबाह्म आनंदभरीत ॥३॥
३१२०
श्रीपांडुरंग सदगुरु हें स्वामी । तया पादपद्मीं नमन माझें ॥१॥ गजाननमुर्ति सदगुरुसमर्थ । देई मज स्वार्थ निजपदीं ॥२॥ नेत मजलागीं गुरु निजधामीं । वसे अंतर्यामीं सर्वकाळीं ॥३॥ शामसुंदरमुर्ति सदगुरुदयाळ । भक्ता प्रतिपाळ गुरुराव ॥४॥ यम नियम मज करविती सदगुरु । सर्वस्वें आधारु मज त्यांचा ॥५॥ नर नारायण रुप हा सदगुरु । उतरी भवपारु क्षणमात्रें ॥६॥ मस्तक तयाच्या पायीं हा ठेवावा । नित्य तो पहावा हृदयामाजीं ॥७॥ ॐकार प्रणव सदगुरुस्वरुप । मिळे आपेंआप अंतर्यामीं ॥८॥ नका विसरुं त्या सदगुरुदयाळा । दासाचा कळवळा तयालागीं ॥९॥ मस्त होऊं नका तारुण्याच्या भरें । करावी या करें सदगुरुसेवा ॥१०॥ ऋद्धिसिद्धि तुम्हीं मनीं त्या न आणा । भजावा तो राणा सदगुरुराव ॥११॥ धंदा नका करु आणिक तयाविण । तन्नाम श्रवम दृढ करा ॥१२॥ अवन होतसे सदगुरुच्या कृपें । निरसती पापें सकळही ॥१३॥ आशा हे त्यागावी पासुनियां मना । सदगुरुचरणा तेव्हा भेटीं ॥१४॥ इहलोकीं सुख सदगुरु देणार । मना सर्व भार तेथें ठेवीं ॥१५॥ ईशान स्वरुपीं सदगुरु प्रत्यक्ष । देत ज्ञान अक्ष दासालागीं ॥१६॥ उपकार त्याचे अनंत अपार । भवसिंधु पार त्याचेंयोगें ॥१७॥ उदास जो झाला देहाचिये ठायीं । तया लागीं पायीं ठाव देई ॥१८॥ ऋषिसिद्ध मुनी ज्या लागी भजती । वसे आत्मस्थिति सर्वकाळ ॥१९॥ ऋण हें फेडावें जन्ममरणाचें साधन हे साचे नाम धरा ॥२०॥ लुब्ध होऊं नका विषयांच्या स्वादा । पावाल आपदा नानापरी ॥२१॥ लुसलुसित कोंवळी बिल्वतुळसीपत्रें । वहावीं पवित्र चरणावरीं ॥२२॥ एक दोन तीन चार पांच सहा । साडुनियां रहा गुरुपायें ॥२३॥ ऐहिक हें सुख तुच्छ नाशिवंत । सेवावा अनंत सदगुरुराव ॥२४॥ ओवी नाममाळा वृत्ति तंतुमाजीं । इंद्रियसमाजी गुरु वसे ॥२५॥ औदार्य गुरुचें अनिवार जगीं । माना पायालागीं दृढ धरीं ॥२६॥ अंगीं मजलागेकें गुरु बैसविती । उपदेश देती ब्रह्माज्ञान ॥२७॥ अहा काय सांगुं सदगुरुची कीर्ति । परब्रह्मा मुर्ति गुरुराव ॥२८॥ कल्पना त्यागावी तेव्हं ब्रह्माप्राप्ती । चुके यातायाती आपेंआप ॥२९॥ खटपट करिती प्रपंचाचेविशी । भजे त्या गुरुशी तैशापरी ॥३०॥ गर्व अभिमान मनीं नको धरुं । तुजसी अधारु सदगुरुराज ॥३१॥ घटिका दीस मास अयन संवत्सर । गुरु विश्वभर भजें बापा ॥३२॥ ॐआकारस्वरुप गुरुमहाराज । मुर्ति हे सहज ह्रुदयीं लक्षीं ॥३३॥ चमत्कार माझ्या सदगुरुरायाचा । दाता स्वानंदाचा लाभ होय ॥३४॥ छत्तीस तत्त्वांचे शरीर हें साचें । कांहीं अनुभवाचें पाव लक्ष ॥३५॥ जवानिका माया समूळ नुरवीं । प्रेम पुरवीं सद्‌गुरुपायीं ॥३६॥ झरा हा सुखाचा सद्‌गुरुच्या पायीं । मना तुं राही अक्षयीं तेथें ॥३७॥ ॐकार वर्णात्मक सदगुरु पांडुरंग ।अक्षय अभंग सर्वासाक्षीं ॥३८॥ टणत्कार करा विरागाच्या योगं । सदगुरुच्या संगे ब्रह्माप्राप्ती ॥३९॥ ठकुं नका तुम्हीं माया विद्यायोगें । चरणीं करा जागे वृत्तीसी त्या ॥४०॥ डमरु त्रिशूळ सदग्रुच्या हातीं । दासांसी रक्षिती सर्वकाळ ॥४१॥ ढवळूं तूं नको विषयाच्या ठायीं । वृत्ति स्थिर पायीं सदा करी ॥४२॥ नकार तिरेघाटी । भेदावला नसे । सदगुरु हा असें ऐक्य तैसा ॥४३॥ तदाकर मन करा सदगुरुरुपीं । सच्चितस्वरुपीं तुम्हीं व्हाल ॥४४॥ थरथर कांपा सदगुरुसमीप । ब्रह्मीं आपेआप प्राप्त व्हाल ॥४५॥ दया शांति क्षमा सद्गुरुसी मागा । सदगुरुच्या वागा आज्ञा ऐसें ॥४६॥ धरा भाव तुम्ही सद्‌गुरूच्या पायीं । परब्रहमा ठायीं गति जेणें ॥४७॥ नमस्कार करा तुम्हीं सदगुरुसी । तेणें निजपदासी प्राप्त व्हाल ॥४८॥ पहावें नयना सदगुरुरायाला । तेणें आनंदाला अनुभावावें ॥४९॥ फजिती ही तुम्हीं नका करुं आतां । वेगीं सदगुरुनाथा शरण जा ॥५०॥ बरवें जनहो तुम्हांसी सांगतों । तुम्हीं चित्तीं ध्या तो सदगुरुरावों ॥५१॥ भरावा मानसीं सदगुरुदयाळ । पद हें पावाल परब्रह्मा ॥५२॥ मरणें जन्मणें सत्वर निवारा । वृत्ति हे आवरा विषयांतुनीं ॥५३॥ यामाच्या हातीचे सोडवील तुम्हां । भजा आत्मारामा गुरुराया ॥५४॥ रमवा हें चित्त सदगुरुच्या ध्यानीं । पहा जनीं वनीं सदगुरुराव ॥५५॥ लगाम हा देणें अश्वासी ज्या परी । वृत्ति स्थिर करी गुरुध्यान ॥५६॥ वमनवत हे विषय त्यागावें । ब्रह्मा अनुभवावें गुरुकृपें ॥५७॥ शम दम श्रद्धा उपरम तितिक्षा । सातवी अपेक्षा सदगुरुपायीं ॥५८॥ षकार स्वरुप सदगुरु नारायण । गुण हे श्रवण त्याचे करा ॥५९॥ समाधि साधनीं वृत्ति स्थिर करा । दृढ चरण धरा सद्‌गुरूचे ॥६०॥ हवाशिर स्थान एकांत पहावें । ध्यान तें धरावें सदगुरुचें ॥६१॥ लववावी वृत्ति सदगुरुचरणें । तें पायांपासुनी सोडुं नये ॥६२॥ क्षमा शस्त्र हातीं गुरुकृपें धरा । कामक्रोध करा शांत जना ॥६३॥ ज्ञप्ति हे आकळे सदगुरुप्रसादें । वर्ताल स्वानंदें सर्वकाळ ॥६४॥ एका जनार्दनीं गुरुपदीं लीन । ब्रह्मा परिपुर्ण अनुभविलें ॥६५॥
३१२१
श्रीपांडुरंगाचे दरुशन । वास पंढरीसी जाण । कोटी यागांचे पुण्य । तया घडे नित्यची ॥१॥ हाचि माना रे विश्वास । धरा संतवचनीं निजध्यास । मोक्षाचा सायास । न लगे कांहीं अनुमात्र ॥२॥ न रिघा तपांचे हव्यासें । साधनाचे नको फांसे । कीर्तन सौरसें । प्रेमें नाचा रंगणीं ॥३॥ नका माझें आणि तुझें । टाका परतें उतरुनी वाझें । एका जनार्दनीं सहजें । विठ्ठलनामें मुक्त व्हां ॥४॥
३१२२
श्रीमुख साजिरें कुंडलें शोभती । शंख चक्र हातीं पद्म गदा ॥१॥ पीतांबर कासें वैजंयंती कंठीं । टिळक लल्लाटीं चंदनाचा ॥२॥ मुगुट कुडलें झळके पाटोळा । घननीळ सांवळा विटेवरी ॥३॥ श्रीवत्सलांचन हृदयीं भूषण । एका जनार्दन तृप्त जाला ॥४॥
३१२३
श्रीमुखाचें सुख पाहतां पाहतां । नयन तत्त्वतां वेधलें माझें ॥१॥ सांवळां सुंदर कटीं ठेवुनीं कर । रुप तें नगर भीमातीरीं ॥२॥ नित्य परमानंद आनंद सोहळा । सनकादिक या स्थळीं येती जातीं ॥३॥ वैष्णवांचा थाट टाळ घोळ नाद । दिंड्या मकरंद हर्ष बहु ॥४॥ सन्मुख ती भीमा वाहे अमृतमय नीर । जडजीवां उद्धार स्नानमात्रें ॥५॥ एक जनार्दनीं मुक्तांचे माहेर । क्षेत्र तें साचार पंढरपूर ॥६॥
३१२४
श्रीरम ऐसें वदतांचि साचें । पातक नासतें अनंत जन्माचें ॥१॥ श्रीराम ऐसें जो उच्चारी । तयाचा पापाची होतसे बोहरीं ॥२॥ श्रीराम ऐसें उच्चारी नाम । एका जनार्दनीं नासती क्रोध काम ॥३॥
३१२५
श्रीराम जयराम वदतां वाचे । पातकें जाती कोटी जन्मांची ॥१॥ जयजय राम जयजय राम । तुमचें नाम गाये शंकर उमा ॥२॥ नाम थोर तिहीं लोकीं साजे । उफराटे वदतां पातक नासलें वाल्हाचें ॥३॥ एका जनार्दनीं नाम सारांचे सार । नामस्मरण तुटें भवबंध वेरझार ॥४॥
३१२६
श्रीराम व्यापक कीं एकदेशी । हें सांगावें मजपाशी । सकळ देहीं श्रीरामासी । स्थिती कैसी वस्तीची ॥१॥ जरी म्हणसी परिच्छिन्न । तरी व्यापकत्वा पडिलें खाण । आत्माराम हें अभिधान । न घडे जाण तयासी ॥२॥ जरी त्यातें व्यापक म्हणसी । तरी तो सर्व भूतनिवासी । तेथें उपेक्षितां रावणासी । अद्वैत भजनासी अभाव ॥३॥ एका जनार्दनीं । भेद भाष्यवचन । राम परमात्मा जाण । सर्वगत निर्धारें ॥४॥
३१२७
श्रीराम श्रीराम वाचे म्हणतां । तेणें सायुज्यता हातां लागे ॥१॥ श्रीराम श्रीराम ध्यान जयासी । तोची तपराशी पावन झाला ॥२॥ श्रीराम श्रीराम ज्याची वाणी । धन्य धन्य जनीं पावन तो ॥३॥ एका जनार्दनीं श्रीराम ध्यात । निरंतर चित्त रामनामीं ॥४॥
३१२८
श्रीराम श्रीराम सदा ज्याचे वाचा । त्या प्राणियासी साचा दंडवत ॥१॥ घेईन पायवणी वंदीन मस्तकीं । देईन हस्तकीं क्षेम त्यासी ॥२॥ तयाचा भार वाहे अंकीतपणें । नोहेचि उत्तीर्ण जन्मोजन्मीं ॥३॥ एका जनार्दनीं श्रीराम वाचे । वदतां पातक नासें कोटी जन्मांचें ॥४॥
३१२९
श्रीरामनाम पावन क्षितीं । नामें दोषां होय शांती । नामेंचि उद्धरती । महा पातकी चांडाळ ॥१॥ नाम पावन पावन । शंभु राजा जपे जाण । इतरां ती खूण । न कळेचि कल्पातीं ॥२॥ नाम श्रेष्ठ तिहीं लोकीं । त्यांची कीर्ति जो घोकी । जाय सत्यलोकीं । नाम घेतां प्राणी तो ॥३॥ एका जनार्दनीं नाम । पाववितें निजधाम । स्त्रियादि अंत्यजां सम । सारिखेंचि सर्वांसी ॥४॥
३१३०
श्रीरामानामें तारिलें पाषाण । नामाचें महिमान कोण जाणें ॥१॥ उफराट नामें तारियेला कोळी । दोष जाहले होळी रामनामें ॥२॥ तारियेली गणिका तारियेली देखा । पवित्र तो चोखा रामनामें ॥३॥ एका जनार्दनीं रामनाम जप । पवित्र तें देख रामनाम ॥४॥
३१३१
श्रीरामानामें तुटती यातना । म्हणोनि रामराणा दृढ धरा ॥१॥ यमाची यातना तुटेल निर्धारें । चुकतील फेरे चौर्‍याशींचे ॥२॥ जन्ममरणाचा तुटेल तो बोध । ठसावतां बोध रामनाम ॥३॥ एका जनार्दनीं नामापरतें थोर । नाहीं नाहीं निर्धार केला व्यासें ॥४॥
३१३२
श्रीरामानें जगाचा उद्धार । करितां उच्चार दों अक्षरीं ॥१॥ पाहतां साधन आन नसे दुजें । रामनामें नासे महत्पाप ॥२॥ ब्रह्माहत्यारी वाल्हा नामेंचि तरला । रामायणीं मिरविला बडिवार ॥३॥ एका जनार्दनीं नामापरतें थोर । नसे बडिवार दुजियाचा ॥४॥
३१३३
श्रीरामासी राज्याभिषेचन । इंद्रादिकां चिंता गहन । समस्त देवमिळोन । चतुरानन विनिविला ॥१॥ देव म्हणती ब्रह्मायासी । तुझें आश्वासन आम्हांसी । श्रीराम अवतार सुर्यवंशीं । तो रावणासी वधील ॥२॥ सपुत्र बंधु प्रधान । राम करील राक्षसकंदन । तेणें देवासी बंधमोचन । एका जनार्दनीं होईल ॥३॥
३१३४
श्रीविठ्ठलांचें नाम मंगल । अमंगल उद्धारलें ॥१॥ ऐस याचा थोर महिमा । शिव उमा जाणती ॥२॥ एका जनार्दनीं नाम बह्मा । सोपें वर्म जपतां ॥३॥
३१३५
श्रीशंभुचें आराध्य दैवत । क्षणीं वैकुंठीं क्षीरसागर । जयालागीं योगी तप तपती समस्त । तो सांपडला आम्हां कीर्तनरंगांत ॥१॥ धन्य धन्य कीर्तन भूमंडळी । महादोषां होतसे होळी । पूर्वज उद्धरती सकळीं । वाहतां टाळी कीर्तनीं ॥२॥ पार्वतीसी गुज सांगे आपण । शंकर राजा बोलें वचन । माझें आराध्य दैवत जाण । कीर्तनरंगणीं उभे आहें ॥३॥ मी त्रिशूळ पाशुपत घेउनी करीं । कीर्तनाभोंवतीं घिरटी करी । विघ्ना हाणोनि लाथा निवारी । रक्षी स्वयें हरिदासां ॥४॥ त्याचे चरणींचें रज वंदी आपण । हें पार्वतीसी सांगे गृह्मा ज्ञान । एका जनार्दनीं शरण । कीर्तनरंगी नाचतसें ॥५॥
३१३६
श्रुतिशास्त्रां अति दुरी । तो परमात्मा श्रीहरि । तो दशरथाचे घरीं । क्रीडतु राम ॥१॥ क्षण एक नमस्कारा । नातुडे सुरवरा । तो रिसां आणि वानर क्षेम देतो राम ॥२॥ चरणीं शिळा उद्धरी । नामें गणिका तारी ।तो कोळियाचे घरीं । पाहुणा राम ॥३॥ शिवाचें निजध्येय । वाल्मिकाचें गुह्मा । तो भिल्लणीचीं फळें खाय । श्रीराम ॥४॥ न कळे ध्यानी मनीं । तो नातुडे जो चिंतनीं । तो वानरांच्या कानीं । गोष्टी सांगे राम ॥५॥ एका जनार्दनीं एका । श्रीराम निजसखा । वानरें वनचरें फुका । तारियेलीं ॥६॥
३१३७
श्रुतीशास्त्रांचा आधार । पुराणांचा परिकर । दरुशनें सांगती आधार । वाचे नाम उच्चारा ॥१॥ तारक जगीं हें नाम । जपतां निष्काम सकाम । पावे स्वर्ग मोक्ष धाम । कलिमाजीं प्रत्यक्ष ॥२॥ म्हणोनि धरिलें शिवें कंठीं । तेणें हळाहळ शमलें पोटीं । एका जनार्दनी गुह्मा गोष्टी । गिरजेंप्रति अनुवाद ॥३॥
३१३८
श्वानाचा तो धर्म करावी वसवस । भले बुरे त्यास कळे कांहीं ॥१॥ वेश्यांचा धर्म द्रव्य ते हरावें । भलें बुरे भोगावें न कळें कांहीं ॥२॥ निंदकाचा धर्म निंदा ती करावी । भलें बुरें त्यागावी न कळे कांहीं ॥३॥ सज्जानांचा धर्म सर्वाभुतीं दया । भेदाभेद तया न कळे कांहीं ॥४॥ संतांचा तो धर्म अंतरी ती शांती । एका जनार्दनीं वस्ती सर्वांठायीं ॥५॥
३१३९
श्वानाचिये परी धांवे । विषयासक्त जीवें भावें ॥१॥ नेणे मान अपमान । सदा विषयावरी ध्यान ॥२॥ नाहीं देवाची स्मृती । सदा लोळे विषयावर्ती ॥३॥ नाठवेचि कांहीं धंदा । भुलला तो विषयमदा ॥४॥ एका जनार्दनीं देवा । नाठवी अभागी न करी सेवा ॥५॥
३१४०
षडवैरियांचा करावा आधीं नाश । मग सुखें संन्यास घ्यावा जगीं ॥१॥ आशा मनीषा यांचा तोडोनियां पाश । मग मुखें संन्यास घ्यावा आधीं ॥२॥ एका जनार्दनीं संकल्पाचा त्याग । सुखें संन्यास मग घ्यावा आधीं ॥३॥
३१४१
संकल्प विकल्प जाण । हेंचि मनाचें लक्षण ॥१॥ सुख दुःखें उभीं । मन वर्तें धर्माधर्मीं ॥२॥ स्वर्ग नरकक बंध मोक्ष । मन जाणतें प्रत्यक्ष ॥३॥ शुभ अशुभ कर्म । मनालागीं कळें वर्म ॥४॥ करा निःसंकल्प मन । म्हणे एका जनार्दनीं ॥५॥
३१४२
संकल्प विकल्प नका वायां । धरा पायां विठोबाच्या ॥१॥ सर्व तीर्था हेचि मुळ । आणीकक केवळ दुजे नाहीं ॥२॥ संतसमागमेम उपाधी । तुटती आधिव्याधी घडतांची ॥३॥ एका जनार्दनीं वर्म सोपें । हरती पापे कलियुगीं ॥४॥
३१४३
संकल्पाचा आन ठाव । नाहीं भाव दुसरा ॥१॥ तुम्च्या चरणांसी शरण । काया वाचा आणि मन ॥२॥ आलों दीन हो उनी हीन । तुम्हीं तंव पतीतपावन ॥३॥ एका जनादनीं शरण । करा खंडन जन्ममुत्यु ॥४॥
३१४४
संकल्पे विकल्पें रामानाम घेतां । कोटीकुळें तत्त्वतां उद्धरती ॥१॥ अमृत सहजीं थेंब मुखी पडे । मृत्युचें सांकडे चुके जेवीं ॥२॥ तैशी परी होय रामनामें स्थिती । समाधि विश्रांति घर रिघे ॥३॥ एका जनार्दनीं रामनाम सार । न लगे विचार दुजा येथें ॥४॥
३१४५
संगती बावनाचें रावलों सर्व भावें । चंदन होऊनी सवें ठेलों मी वो ॥१॥ वेधिला जीव माझा संतचरणीं । आन दुजें मना नाठवेचि स्वप्नी ॥२॥ जागृति स्वप्न सुषुप्तीचा ठाव । अवघा देखे देवाधिदेव ॥३॥ पहातां पाहांता मन नाहीसें जालें । एका जनार्दनीं केलें मज ऐसें ॥४॥
३१४६
संचित क्रियामाण । केलें सर्वाचें आचमनक ॥१॥ प्रारब्ध शेष उरलें यथा । तेथें ध्याऊं सदगुरुदत्त ॥२॥ झालें सकळ मंगळ । एका जनार्दनीं फळ ॥३॥
३१४७
संचित माझे वोखटें देवा । तुम्हीं केशवा काय करा ॥१॥ पहा वासुकी शिवकंठीं । क्षुधा पोटी वायूची ॥२॥ एका जनार्दनीं शरण । कर्माची गहन पैं माझें ॥३॥
३१४८
संत आधीं देव मग । हाचि उगम आणा मना ॥१॥ देव निगुर्ण संत सगुण । म्हणोनि महिमान देवासी ॥२॥ नाम रुप अचिंत्य जाण । संतीं सगुण वर्णिलें ॥३॥ मुळीं अलक्ष लक्षा नये । संतीं सोय दाविली ॥४॥ एका जनार्दनीं संत थोर । देव निर्धार धाकुला ॥५॥
३१४९
संत आमुचे देव संत आमुचें भाव । आमुचें गौरव संत सर्व ॥१॥ वेदशास्त्रा पुराण मंत्रादि साधन । संतसेवा ध्यान आम्हां धन्य ॥२॥ योगयाग व्रत साधन पसर । संतांठायीं आदर हेंचि बरें ॥३॥ जनीं जनार्दन संतसेवा जाण । एका जनार्दन तोचि धन्य ॥४॥
३१५०
संत आले वरले दिंडीं । हातीं खुरक्या काखेंत मुंडी ॥१॥ पंढरपुरीं पडली होड । मुटक्या परीस धांगडगोड ॥२॥ आली वैष्णवांची मांदी । मेलें डुकर बांधलें खांदी ॥३॥ एका जनार्दनीं अर्थ उलटा । तो जाणे तो गुरुचा बेटा ॥४॥
३१५१
संत उपाधिरहित । नाहीं तया दुसरा हेत ॥१॥ सदा मुखीं नाम वाचे । तेणें जन्माचें सार्थक ॥२॥ संग नावडे तयां कांहीं । सदा कीर्तनप्रवाहीं ॥३॥ एका जनार्दनीं चित्त । ध्यानीं मनीं संत आठवीत ॥४॥
३१५२
संत कृपाळुं उदार । ब्रह्मादिकां न कळे पार ॥१॥ काय वानूं मी पामर । थकले सहा अठरा चार ॥२॥ नेति नेति शब्दें । श्रुति विरालिये आनंदें ॥३॥ एका जनार्दनीं शरण । धरा माझी आठवण ॥४॥
३१५३
संत केवळ घातकी पाही । परी त्यासि पातक नाहीं ॥१॥ निजबोधाचे करुनी फांसे । दोघे गोसावी मारिले कैसे ॥२॥ अती खाणोरिया कर्म करी । दिवसां जाळिले गांव चारी ॥३॥ एका जनार्दनीं घातकी मोठे । त्यासी अंतक केवी भेटे ॥४॥
३१५४
संत जाती हरिकीर्तनी । त्यांच्या वाहीन मोचे वहाणा ॥१॥ हेंचि भवसिंधुचें तारुं । तेणें उतरुं पैलपारु ॥२॥ जन्मोजन्मींचे भेषज । तें हें संतचरणरज ॥३॥ संतचरणींच्या पादुका । जाहला जनार्दन एका ॥४॥
३१५५
संत ती मंडळी महाद्वारां आली । मूर्ति देखियेली विटेवरी ॥१॥ चरणावरी माथां ठेविती भक्तजन । आनंदले लोचन पाहुनी भक्त ॥२॥ महाद्वारी नामा कीर्तनीं उभा ठेला । मिळालासे मेळा सकळ संत ॥३॥ सद्रदित कंठ कीर्तन करतां । एका जनार्दनीं सर्वथा भक्त होती ॥४॥
३१५६
संत ते देव देव ते संत । ऐसा हेत दोघांचा ॥१॥ देव ते संत संत ते देव । हाचि भाव दोघांचा ॥२॥ संतांविण देवा कोण । संत ते जाण देवासी ॥३॥ फळपुष्प एका पाठीं । एका जनार्दनीं राहाटी ॥४॥
३१५७
संत ते सोईरे सांगाती आमुचे । तेणें कळिकाळाचें भय नाहीं ॥१॥ जयाची आवडी धरी नारायण । म्हणोनि चरण धरूं त्याचें ॥२॥ परलोकीचे सखे सोइरे सांगाती । मज ते आदीअंती सांभाळिती ॥३॥ एका जनार्दनीं धरुनि विश्वास । होईन त्यांचा दास जन्मोजन्मीं ॥४॥
३१५८
संत ते सोयरे जिवलग सांगाती । भेटतां पुरती सर्व काम ॥१॥ कामधेनु कल्पतरु चिंतामणी । उदार चुडामणी याहुनी संत ॥२॥ देऊं परिसाची यासी उपमा । परी ते अये समा संताचिये ॥३॥ एका जनार्दनीं संतांचा सांगात । पुरती सर्व आर्त जीवींचें जें ॥४॥
३१५९
संत दयाळ दयाळ । अंतरीं होताती प्रेमळ ॥१॥ शरण आलियासी पाठीं । पहाताती कृपादृष्टी ॥२॥ देउनियां रसायना । तारिताती भवार्णव जाणा ॥३॥ संतांसी शरण जावें । एका जनार्दनीं त्यांसी गावें ॥४॥
३१६०
संत देवाचा लाडका । देव तेणें केला बोडका ॥१॥ अर्थ पाहतां सखोल असे । बोडका देव पंढरी वसे ॥२॥ संत लाडका देव बोडका । म्हणे जनार्दन लाडका एका ॥३॥
३१६१
संत भलते याती असो । परी विठ्ठल मनीं वसो ॥१॥ तया घालीन लोळणीं । घेईन मी पायवणी ॥२॥ ज्ञाती कुळासी संबंध । मज नाहीं भेदाभेद ॥३॥ भलते ज्ञातीचा । विठ्ठल उच्चारी वाचा ॥४॥ तेथें पावन देह चारी । एका जनार्दनीं निर्धारीं ॥५॥
३१६२
संत मायबाप म्हणतां । लाज वाटे बहु चित्ता ॥१॥ मायबाप जन्म देती । संत चुकविती जन्मपंक्तीं ॥२॥ मायबापापरीस थोर । वेदशास्त्रीं हा निर्धार ॥३॥ शरण एका जनार्दनीं । संत शोभती मुगुटमणी ॥४॥
३१६३
संत श्रेष्ठ संत श्रेष्ठ । पातकी नष्ट तारिती ॥१॥ ऐसा आहे अनुभव । पुराणीं पहाहो निर्वाहो ॥२॥ वेद शास्त्र देती ग्वाही । संत श्रेष्ठा सर्वा ठायीं ॥३॥ एका जनार्दनीं संत । ब्रह्मादिकां न कळे अंत ॥४॥
३१६४
संत सज्जन जिवलग माझे । त्यांचे चरण चुरीन वोजे ॥१॥ त्यांचे संगे सुख मना होय । आनंद आनंदी पाहतां होय ॥२॥ त्यांचे पिसे मजलागीं मोठें । ऐसें भाविक केवी भेटे ॥३॥ त्यांचे नामाची घेऊं धणीं । तया जाऊं लोटांगणीं ॥४॥ तया शेजार करितां बरा । चुके जन्ममरण फेरा ॥५॥ तया जीव करुं कुर्वंडी पाही । एका जनार्दनीं लागतसे पायीं ॥६॥
३१६५
संतचरणरज वंदुनीं तत्त्वतां । सायुज्य भक्ति माथां पाय देऊं ॥१॥ थोरीव थोरीव संतांची थोरीव । आणिक वैभव कांही नेणें ॥२॥ संतापरतें दैवत नाहीं जया चित्तीं । तोचि एकपुर्णस्थिति ब्रह्माज्ञानीं ॥३॥ संत तोचि देव जयांची वासना । एका जनार्दनीं भावना नाहीं दुजीं ॥४॥
३१६६
संतचरणी सेवा घडे । भाग्य पहा हो केव्हढें ॥१॥ व्यर्थ शिणती बापुडे । योग याग करुनी गाडे ॥२॥ संतचरणी जे विन्मुख । स्वप्नी न देखती सुख ॥३॥ संतचरणी नाही थारा । भरले तपांच्या डोंगरा ॥४॥ नाम न म्हणती कोंडें । धूम्रपान करिती तोंडे ॥५॥ एका जनार्दनीं साचें । मन नाहीं सुख कैचें ॥६॥
३१६७
संतचरणीं आलिंगन । ब्रह्माज्ञानी होती पावन ॥१॥ इतर सहज उद्धरती । वाचे गातां ज्यांची कीर्ति ॥२॥ लाभे लाभ संतचरणीं । मोक्षसुख वंदी पायवणीं ॥३॥ शरण एका जनार्दनीं । उदार संत त्रिभुवनीं ॥४॥
३१६८
संतचरणीं जीवभाव । ठेविला देह विसर ॥१॥ आतां तुम्हीं उपेक्षिल्यावरी । कोण वानील तुमची थोरी ॥२॥ बहु जाहलों कासावीस धरली कास आदरें ॥३॥ एका जनार्दनीं परता । करितां लाज येई माथां ॥४॥
३१६९
संतचरणीं विश्वास । धरुनी राहिलों रात्रंदिवस ॥१॥ मज दीना सांभाळावें । हेंचि मागें जीवेंभिव ॥२॥ धनवित्ता चाड नाहीं । सेवा सुखें माज द्यावी ॥३॥ एका जनार्दनीं अपुला । एका एकपणें अंकिला ॥४॥
३१७०
संतचरणीं सावधान । ज्याचें जडलेसें मन ॥१॥ तया नाहीं जन्ममरण । मुक्तीअ उभ्या कर जोडोन ॥२॥ ब्रह्माज्ञान हात जोडी । संताघरी घाली उडी ॥३॥ शरण एक जनार्दनीं । वंदितसे अनुदिनी ॥४॥
३१७१
संतचरणींचा महिमा । कांहीं न कळें आगमां निगमां ॥१॥ ब्रह्मा घाले लोटांगण । विष्णु वंदितो आपण ॥२॥ शिव ध्यातो पायवणी । धन्य धन्य संतजनीं ॥३॥ तया संतांचा सांगात । एका जनार्दन निवांत ॥४॥
३१७२
संतचरणीचें रजःकण । तेणें तिन्हीं देव पावन ॥१॥ ऐसा महिमा ज्याची थोरी । वेद गर्जें परोपरी ॥२॥ शास्त्रें पुराणें सांगत । दरुशनें प्राणी होती मुक्त ॥३॥ शरण एका जनार्दनीं । ठाव द्यावा संतचरणीं ॥४॥
३१७३
संतजनाची मिळाली मिळणी । रामनामाची भरली भरणी ॥१॥ रामनाम सेवा हा राम सांठवा । परमानंदाचा लाभ जाला जीवा ॥२॥ कीर्तनाचे तारुं लाधलं । रामनाम केणें सवंगले ॥३॥ एका जनार्दनीं रामनामसेवा । परमानंदाचा लाभ जाला जीवा ॥४॥
३१७४
संतदरुशनें लाभ होय । ऐसा आहे अनुभव ॥१॥ पुराणीं महिमा सांगें व्यास । संतदया सर्वांस सारखी ॥२॥ यातिकुळ हो कां भलतें । करिती सरते सर्वांसी ॥३॥ एका जनार्दनीं शरण । संतमहिमान वेगळें ॥४॥
३१७५
संतद्वारी कुतरा जालों । प्रेमरसासी सोकलों ॥१॥ भुंकत भुंकत द्वारां आलों । ज्ञान थारोळ्या बैसलों ॥२॥ कुतरा भुंकत आला हिता । संतीं हात ठेविला माथां ॥३॥ कुतर्‍या गळ्यांची सांखळी । केली संतानी मोकळी ॥४॥ एका जनार्दनीं कुतरा । दांत पाडुनी केला बोथरा ॥५॥
३१७६
संतपूजन देव । तुष्टतसे वासुदेव ॥१॥ संतपूजेचें महिमान । वेदां न कळें प्रमाण ॥२॥ संतचरणतीर्थ माथा । वंदिती तीर्थें पैं सर्वथा ॥३॥ एका जनार्दनीं करी पूजा । पूज्यापूजक नाहीं दुजा ॥४॥
३१७७
संतभेटीचा आनंदु । सुखसागर परमानंदु । गातां नुरेची भेदु । नामस्मरणें ॥१॥ कैवल्याचे अधिकारी । मोक्ष राबे त्यांचे घरीं । ऋद्धि सिद्धि कामारी । कोन त्या पुसे ॥२॥ भुक्ति आणि मुक्ति । सदा तिष्ठे अहोरातीं । कैवल्यपद येती । सामोरी तयासी ॥३॥ नाम गाती जे आनंद । हृदयीं नहीं दुजा भेद । एका जनार्दनीं छंद । तयांच मज ॥४॥
३१७८
संतमहिमा न वदतां वाचा । नोहे साचा उपरम ॥१॥ वेदशास्त्रें देती ग्वाही । संतमहिमा न कळे कांहीं ॥२॥ पुराणासी वाड । श्रुति म्हणती न कळे कोड ॥३॥ योग याग वोवाळणी । शरण एका जनार्दनीं ॥४॥
३१७९
संतवचने साधे मुक्ति । संतवचनें बह्मस्थिती । कर्माकर्माची शांती । संतवचनें ॥१॥ संतवचनें याग । संतवचनें सांग योग । संतवचनें अनुराग । घडतां संग संतांचा ॥२॥ संतवचनें ब्रह्माप्राप्ती । संतवचनें सायुज्य मुक्ती । ब्रह्मादि पदें येती । संतवचनें समोर ॥३॥ संतवचनें सर्व सिद्धि । संतवचनें समाधी । संतवचनें उपाधि । एका जनार्दनें तुटतसे ॥४॥
३१८०
संतवचनें देव जोडे । सायुज्य मुक्ति पायां पडे । संतवचनें सांकडें । नुरेचि कांहीं ॥१॥ धन्य धन्य संतसंग । उभा तेथें श्रीरंग । लक्ष्मीसहित अभंग । तिष्ठे सदा ॥२॥ संतवचनें कर्म झडे । संतवचनें मोक्ष जोडे । संतवचनीं तीर्थ झडे । धन्य संग संताचा ॥३॥ संतवचने तुटे उपाधी । संतवचनें सरे आधिव्याधी । संतवचनेंक भवनदी । प्राणी तरती ॥४॥ संतवचनीं धरा भाव । तेणें सर्व निरसे भेव । एका जनार्दनीं देव । प्रत्यक्ष भेटे ॥५॥
३१८१
संतसंगत घडे । सायुज्यता जोडे ॥१॥ मुक्ति लागती चरणीं । ब्रह्माज्ञान लोटांगणीं ॥२॥ एका जनार्दनीं सांगात । घडतां होय देहातीत ॥३॥
३१८२
संतसंगतीने झाले माझे काज । अंतरीं तें निज प्रगटलें ॥१॥ बरवा झाला समागम । अवघा निवारला श्रमक ॥२॥ दैन्य दरिद्र दुर गेलें । संतपाउले देखतां ॥३॥ एका जनार्दनीं सेवा । करीन मी आपुल्या भावा ॥४॥
३१८३
संतसंगे तरला वाल्हा । पशु तरला गजेंद्र ॥१॥ ऐसा संतसमागम । धरतां उत्तम सुखलाभ ॥२॥ तुटती जन्मजरा व्याधी । आणिक उपाधी नातळती ॥३॥ संसाराचा तुटे कंद । नरसे भेद अंतरीचा ॥४॥ परमार्थाचे फळ ये हातां । हा जोडता संतसंग ॥५॥ घडती तीर्थादिक सर्व । सकळ पर्व साधतीं ॥६॥ एका जनार्दनीं संत । धन्य समर्थ तिहीं लोकीं ॥७॥
३१८४
संतसमागमें सुखाची ते राशी । म्हणोनि पायांपाशीं सलगी केली ॥१॥ वंदूं चरणरज घालूं लोटांगण । अभय तें दान संत देती ॥२॥ पंचमहापातकी विश्वास घातकी । ऐशींयासी निकी संतसेवा ॥३॥ एक जनार्दनीं संतांचा मी दास । अनन्य पायांस न विसंबें ॥४॥
३१८५
संतसुखसागरीं । बुडी दिधली निर्धारी । भव दुःख हरी । संतनामें ॥१॥ ऐसा संताचा महिमा । नाहीं द्यावय उपमा । ब्रह्मासुखधामा । पुढें नाचे ॥२॥ बोलती तें वचन साचें । नाहीं बोलणें असत्याचें । नामीं पेम जायाचें । जडोनि ठेलें ॥३॥ कृपावंत संत । दीन तारिले त्वरित । एका जनार्दनीं मात । श्रवण मज झालीं ॥४॥
३१८६
संतसुखा नाहीं पार । तेणें आनंद पैं थोर ॥१॥ ऐशी सुखाची वसती । सनकादिक जया गाती ॥२॥ सुखें सुख अनुभव । सुखें नाचतसे देव ॥३॥ तया सुखाची वसती । एका जनार्दनीं ध्यातसे चिंत्तीं ॥४॥
३१८७
संतसेवा केल्यापाठीं । कैंची संसाराची गोष्टी ॥१॥ तेथें कैंचें कर्माकर्म । अवघा देव परब्रह्मा ॥२॥ कैंचे ध्येय ध्याता ध्यान । एक संतचरणी मन ॥३॥ कैंचा भेद कैंचे भान । एक जनार्दनीं ध्यान ॥४॥
३१८८
संतां द्यावें आलिंगन । सांडुनियां थोरपण ॥१॥ अंगे देव करी सेवा । इतराचा कोण केवा ॥२॥ ब्रह्माज्ञानी वंदिती माथां । मुक्ताची सहज मुक्तता ॥३॥ शरण एका जनार्दनीं । यमकाळ वंदिती दोन्हीं ॥४॥
३१८९
संतां निंदी जो पामर । तो दुराचार जन्मोजन्मीं ॥१॥ त्यांसी करितां संभाषण । करावें सचैल तें स्नान ॥२॥ तयांसी येऊं न द्यावें घरां । आपण जाऊं नये द्वारां ॥३॥ एका जनार्दनीं शरण । त्यांचें न पहावें वदन ॥४॥
३१९०
संतांचा उपकार । सांगावया नाहीं पार ॥१॥ आपणासारिखें करिती । यातिकुळ नाहीं चित्तीं ।२॥ दया अंतरांत वसे । दुजेपणा तेथें नसे ॥३॥ उदारपणें उदार । एका जनार्दनीं निर्धार ॥४॥
३१९१
संतांचा दास तो देवाचा भक्त । तरती पतीत दरुशनें त्यांच्या ॥१॥ त्याचिया योगें घडती सर्व । तीर्थ तें पवित्र होतीं तीर्थें ॥२॥ तयाचियां पदें धरा धन्य म्हणे । ऐसे जे भेदरहित मनें तेचि संत ॥३॥ एका जनार्दनीं तयाच्या प्रसादे । कर्मे अकर्मा दोंदें निघताती ॥४॥
३१९२
संतांचा महिमा । नाहीं द्यावया उपमा ॥१॥ मज तारिले तारिले । भवजळां उद्धरिलें ॥२॥ पावन केलें संतीं । अवघी निरसली गुंतीं ॥३॥ संतचरण वंदीन माथां । एका जनार्दनीं तत्त्वता ॥४॥
३१९३
संतांचा महिमा वर्णावा किती । अलक्ष मूर्ति ज्ञानोबा तो ॥१॥ अर्जुना संकट पडतां जडभारीं । गीता सांगे हरी कुरुक्षेत्रीं ॥२॥ तोचि अवतार धरी अलंकापुरी । ज्ञानाबाई सुंदरी तारावया ॥३॥ गीता शोधोनियां अर्थ तो काढिला । ग्रंथ तो निर्मिला ज्ञानेश्वरी ॥४॥ जगाचा उध्दार ज्ञानाबाई नामें । साधन हें आणिक नेणें न करीं कांहीं ॥५॥ एका जनार्दनीं ज्ञानाबाई नाम । पावेन निजधाम संतांचें तें ॥६॥
३१९४
संतांचा विभुती । धर्मालागीं अवतरती ॥१॥ धर्मरक्षणाकारणें । साधु होताती अवतीर्ण ॥२॥ जगा लावावें संप्तर्थीं । हेंचि साधुचि पैं कृती ॥३॥ एका जनार्दनीं साधु । हृदयीं वसे ब्रह्मानदु ॥४॥
३१९५
संतांची आवडे तो देवाचाही देव । कळिकाळांचे भेव पायातळीं ॥१॥ आणिकाची चड नसेची वासना । संताचियां चरणा वाचूंनिया ॥२॥ ऐसें ज्यांचे प्रेम ऐशी ज्याची भक्ति । एका जनार्दनीं मुक्ति तेथें राबें ॥३॥
३१९६
संतांची जो निंदा करितो चांडाळ । प्रत्यक्ष अमंगळ हीन याती ॥१॥ तयाच्या विटाळा घ्यावें प्रायश्चित । आणिक दुजी मात नाहीं ॥२॥ तयाचें वचन नायकावें कानीं । हो कां ब्रह्माज्ञानीं पूर्ण ज्ञाता ॥३॥ एका जनार्दनीं ऐसे जे पामर । भोगिती अघोर रवरव नरक ॥४॥
३१९७
संतांचे चरणतीर्थ घेतां । अनुदिनीं पातकांची धुणी सहज होय ॥१॥ संतांचें उच्छिष्ट प्रसाद लाधतां । ब्रह्माज्ञान हातां सहज होय ॥२॥ संतांच्या दरुशनें साधतीं साधनें । तुटतीं बंधनें सहज तेथें ॥३॥ एका जनार्दनीं संत कृपादृष्टीं । पाहतां सुलभ सृष्टी सहज होय ॥४॥
३१९८
संतांचे चरणीं । सुख घेईन मी धणी ॥१॥ करीन नीचवृत्ति काम । मना होईल विश्राम ॥२॥ बंधनाची बेडी । तुटेल तयाचीये जोडी ॥३॥ एका जनार्दनीं शरण । वासना जाईन करपोन ॥४॥
३१९९
संतांचे ठायीं नाहीं द्वैतभाव । रंक आणि राव सारिखाची ॥१॥ संताचें देणें अरिमित्रां सम । कैवल्यांचें धाम उघड तें ॥२॥ संतांची थोरीव वैभव गौरव । न कळे अभिप्राय देवासी तो ॥३॥ एका जनार्दनीं करी संतसेवा । परब्रह्मा ठेवा प्राप्त जाला ॥४॥
३२००
संतांचे संगती । पाप नुरे तें कल्पांती ॥१॥ ऐसा संतांचा महिमा । नाहीं द्यावया उपमा ॥२॥ तीर्थ व्रत जप दान । अवघें टाका वोवाळुन ॥३॥ संतचरणींचे रजःकण । वंदी एका जनार्दन ॥४॥
३२०१
संतांचे सुख जिहीं अनुबहविलें । ते जीवनमुक्त जहले जन्मोजन्मीं ॥१॥ संतांचा संग जयासी हो जाहला । प्रत्यक्ष घडला सत्यलोक ॥२॥ एका जनार्दनीं संतांचा अनुभव । धाला माझा जीव परमानंदें ॥३॥
३२०२
संतांच्या दरुशनें । तुटे जन्ममरण पेणें ॥१॥ ऐसा संतांचा महिमा । बोलतां नाहीं वो उपमा ॥२॥ तीर्थ पर्वकाळ यज्ञ दान । संतचरणीं होती पावन ॥३॥ शरण एका जनार्दनीं । संत पावन इये जनीं ॥४॥
३२०३
संताअंकीं देव वसे । देवाअंकीं संत बैसे ॥१॥ ऐशा परस्परें मिळणी । समुद्र तरंग तैसें दोन्हीं ॥२॥ हेम अलंकारवत । तैसे देव भक्त भासत ॥३॥ पुष्पीं तो परिमळ असे । एका जनार्दनीं देव दिसे ॥४॥
३२०४
संताचा करी जो अपमान । तोचि जाणावा दुर्जन ॥१॥ जन्मोनियां पापराशी । जातो पतना नरकासी ॥२॥ सोडवावया नाहीं कोणी । पडती चौर्‍यांशी पतनीं ॥३॥ एका जनार्दनीं शरण । ऐसा अभागी खळ जाण ॥४॥
३२०५
संताचा महिमा देवचि जाणें । देवाची गोडी संतांची पुसणें ॥१॥ ऐसी आवडी एकमेकां । परस्परें नोहे सुटिका ॥२॥ बहुत रंग उदक एक । यापरी देव संत दोन्ही देख ॥३॥ संताविण देवा न कंठे घडी । उभयतां गोडी एक असे ॥४॥ मागें पुढें नहो कोणी । शरण एका जनार्दनीं ॥५॥
३२०६
संताचिया माथां चरणांवरी माझा । देहीं भाव दुजा नाहीं नाहीं ॥१॥ नामांचे चिंतन करिती सर्व काळ । ते माझे केवळ मायबाप ॥२॥ मायबाप म्हणो तरी लाजिरवाणें । चुकविलें पेणे संतजनीं ॥३॥ ज्या ज्या जन्मा जावें मायबाप दोन्हीं । परी संतजन निर्वाणी मिळतीना ॥४॥ येचि देहीं डोलां संताची देखिलें । एका जनार्दनीं वंदिलें चरण त्यांचे ॥५॥
३२०७
संताचिये घरीं होईन श्वानयाती । उच्छिष्ट तें प्रीति मिळेल मज ॥१॥ तेणें या देहाची होईल शुद्धता । भ्रम मोह ममता निवारेल ॥२॥ आशा पाश सर्व जातील तुटोनी । जीव हा बंधनीं मुक्त होय ॥३॥ एका जनार्दनीं भाकीन करुणा । श्रीसंतचरणा वारंवार ॥४॥
३२०८
संताचिये द्वारी होईन द्वारपाळ । न सांगतां सकळ करीन काम ॥१॥ तेणें माझ्या जीवा होईल समाधान । यापरतें साधन आणिक नाहीं ॥२॥ शेष उष्टावळी काढीन पत्रावळी । पूर्वकर्मा होळी सहज होय ॥३॥ एका जनार्दनीं हेंचि पैं मागत । नाहीं दुजा हेत सेवेविण ॥४॥
३२०९
संताचिये परिवारी । लोळेन मी निर्धारी ॥१॥ जीवा होईल महालाभ । ऐसा घडतां उद्योग ॥२॥ सांडोनियां थोरपण । शिव घालीं लोटांगण ॥३॥ आपुलें महत्त्व । तेथें मिरवुं नये सत्य ॥४॥ शरण एका जनार्दनीं । वोवाळावा जीव चरणीं ॥५॥
३२१०
संताचिये पायीं । भावे ठेविलीआं म्यां डोई ॥१॥ करा माझे समाधान । आलों पतीत शरण ॥२॥ आपुलिया सेवे । माझे संकल्प वेचावे ॥३॥ एका जनार्दनीं तुमचा दास । पुरवा आस माझी ॥४॥
३२११
संताचिये पायीं मज पैं विश्रांती । नाहीं माया भ्रांति तये ठायीं ॥१॥ सांगतों तें मनीं धरावें वचन । संतांसी शरण जावें सुखें ॥२॥ संत तुष्टलिया देवा आनंद होय । मागें मागें धांवे तया पाठीं ॥३॥ एका जनार्दनीं माहेर सुखाचें । घेतलीया वाचे संतनाम ॥४॥
३२१२
संताची जो निंदी देवासे जो वंदी । तो नर आपदीं आपदा पावे ॥१॥ देवासी जो निंदी संतांसी जो वंदी । तो नर गोविंदी सरता होय ॥२॥ कृष्णा कंस द्वेषी नारदा सन्मानी । सायुज्यसदनीं पदवी पावे ॥३॥ एका जनार्दनीं गूज सांगे कानीं । रहा अनुदिनीं संतसंगे ॥४॥
३२१३
संताचें चरण ध्यातां । हारपली जन्मव्यथा ॥१॥ पुढती मरणाचें पेणें । चुकती जन्मजरा तेणें ॥२॥ संतसमुदाय दृष्टी । पडतां लाभ होय कोटी ॥३॥ शरण एका जनार्दनीं । काया कुर्वडीं संतचरणीं ॥४॥
३२१४
संताच्या विभुती जगासी उपदेश । देताती सौरस सर्वभावें ॥१॥ परिसाचे परी करिती उपकार । कामधेनु कल्पतरुवर त्यासी वंद्य ॥२॥ एका जनार्दनीं सर्वामाजी श्रेष्ठ । संत ते वरिष्ठ वंदू आम्हीं ॥३॥
३२१५
संतापोटीं देव वसे । देवा पोटीं संत असे ॥१॥ ऐसा परस्परें मेळा । देव संतांचा अंकिला ॥२॥ संतांठायीं देव तिष्ठे । देव तेथें संत वसे ॥३॥ एका जनार्दनीं संत । देव तयांचा अंकित ॥४॥
३२१६
संतावाचोनियां नाम नये हातां । साधनें सांधितां कोटी जाणा ॥१॥ जैसें कातेंविण कारणें संसार । साधन विचार व्यर्थ ठेला ॥२॥ संतसमागम धरलिया वांचुनी । संसार सांडणी नोहे बापा ॥३॥ एका जनार्दनीं संतांसी शरण । रिघलिया जाण देव जोडे ॥४॥
३२१७
संतावाचोनियां सुख कोठें नाहीं । अमृत त्यांचे पायीं नित्य वसे ॥१॥ संताचें संगती होय मोक्षप्राप्ती । नको पा संगती दुर्जनाची ॥२॥ दुर्जनाचे संगें दुःख प्राप्त होय । तेथें कैंचि सोय तरावया ॥३॥ एका जनर्दनीं हेंचि सत्य साचा । नको अभक्तांचा संग देवा ॥४॥
३२१८
संध्यावंदनीं प्रणव जपावा । वाच्य वाचकु प्रणव अवघा ॥१॥ कैसी संध्येसी साधिली संधी । देहीं हारपली देहबुद्धी ॥२॥ छंद ऋषि मंत्र उच्चार । तीं अक्षरीं झालें अक्षर ॥३॥ जपी जपमाळा मौनी । संध्या साधिली निज समाधानीं ॥४॥ सायं प्रातः माध्यान्हींक । तिहीं संधीं निःसंदेह एक ॥५॥ काळेंक काळ तीन चुळा पाणी । संध्या साधिली एका जनार्दनीं ॥६॥
३२१९
संन्यासी करी गृहस्थाश्रम । तेथें तया अधर्म वोढवला ॥१॥ करपात्रीं भिक्षा हाचि त्याचा धर्म । न करितां अधर्म स्वयें जोडे ॥२॥ नाश करावे षड्‌वैरी नेमें । तया संन्यास कर्में म्हणिजेती ॥३॥ एका जनार्दनीं गृहस्थाची बरा । फजिती बाजारा उभ्या होय ॥४॥
३२२०
संपत्ती देखोनि म्हणती माझें माझें । वागवितों वोझें खरा ऐसा ॥१॥ क्षणिक आयुष्य क्षणिक संपत्ती । न कळे तयाप्रती अंध जैसा ॥२॥ जाणार जाणार सर्व हें जाणार । हरिनाम सार जपे सदां ॥३॥ जनार्दनाचा एका सांगतसें मातु । धरी रे सांगातु वैष्णावांचा ॥४॥
३२२१
संपत्ती संतती मजला नावडे । स्वरुप आवडें तुझें देवा ॥१॥ तुझ्या रुपी सुख माझिया लोचनां । आणिक नारायणा न पाहती ॥२॥ हस्त इच्छिताती तुज भेटावया । सेवाहि कराया सर्व काळ ॥३॥ चित्त जडलें पायीं सदा सर्वकाळ । राहिली तळमळ तयाची ते ॥४॥ एका जनार्दनीं तुझें नाम मुखीं । नको अणिका सुखीं गोवुं मज ॥५॥
३२२२
संसाई परजनीं बुडतों महाडोहीं । सोडविण्या येई गुरुराया ॥१॥ गुरुराया धांवें लवदसवडी । जाती एकघडी युगाऐसी ॥२॥ माझी चित्तवृत्ती अज्ञान हेंगाय । एका जनार्दनीं पाय दावीं डोळा ॥३॥
३२२३
संसार असार जाणोनि निर्धार । केलासे विचार सनकादिकीं ॥१॥ नामीं आतुडले नामीं आतुडले । साधन साधिलें हेंचि एक ॥२॥ अर्जुना उपदेश हाचि सांगे कृष्ण । एका जनार्दनीं खूण बाणलीसे ॥३॥
३२२४
संसार तो गज । राम पंचानन सहज ॥१॥ शब्द ऐकतां तातडी । रज जैसा सोडी ॥२॥ धाके पळे महाभूत । राम म्हणे नित्यानित्य ॥३॥ न लगे जप माळ । राम वदे सर्व काळ ॥४॥ एका जनार्दनीं राम । अखंड जपे हृदयधाम ॥५॥
३२२५
संसार पसर करिसी तळमळ । कां रे घननीळ नाठवीसी ॥१॥ पुत्रदाराधन कवण हे कवणाचे । आहे तोंवरी माझें माझें म्हणती ॥२॥ लटिका प्रपंच सर्व नाशिवंत । एक हे शाश्वत हरिनाम ॥३॥ म्हणे जनार्दन एकनाथ घेईं । प्रमसुख पाहीं पावशील ॥४॥
३२२६
संसार पाल्हाळ सांगती परिकर । नामपाठ सार सिद्धवरी ॥१॥ न करी आळस नामपाठ गातां । तुटे भवचितां नाना व्याधीं ॥२॥ जनार्दनाचा एका जनार्दन चरणीं । भासे जनीं वनीं जनार्दन ॥३॥
३२२७
संसार म्हणसी माझा । कां रे गुंतसी बोजा ॥१॥ राहे अलिप्त संसारीं । अंतरीं धरूनियां हरी ॥२॥ तेणें चुकती बंधनें । पावन करिती संतजन ॥३॥ त्रैलोक्यीं ज्याचा शिक्का । एका जनार्दनीं नाम घोका ॥४॥
३२२८
संसारकूपीं हरि पडियेलों श्रीहरीं लाहुनी पैं शरीर । एका पिसें लागे कांहींएक न करवें पंचभूतिक विकार । सुष्ट दुष्ट कर्में करितां हे शिणलें मळमुत्र दोष जर्जर । ऐसिया जीवातें उद्धरसी म्हणोनी दोष जर्जर । ऐसिया जीवतें उद्धरसी म्हणोनी ब्रीद साजे रघुवीर ॥१॥ यालागीं रामचंद्रा रामचंद्रा हृदयींक धरिली नाममुद्रा ॥धृ०॥ आशा तृष्णा दोन्ही स्नेहाळ नागिणी कामक्रोध हे विकार । त्यांचिया संगति विषयवृद्धि जाली लहरी दुःख दरिद्र । इंगळाचे शेजे अंथुरितां वरी तिकडिया अरुवार । ऐसा हा संसार जाणोनी दुस्तर ठाकियेलें तुझें द्वार ॥२॥ कौळींके रुप कपटीं धरियेलें ते त्वा साचार केले । साभिमान्या देव गुरुचक्रवर्ती त्रिभुवनीं यश थोरलें । पांखीरु वाचिया लोभाकारणें गणिकेसी कैवल्य दिधलें । दंभ प्रपंच वोळगंता जीव तया तुं सायुज्य देती आपुलें ॥३॥ श्रीवत्स ब्राह्मणें झालासी पामरा आतां तुं तें पद मिरवीसी दातार । चरणस्पर्शे त्वां अहिल्या उद्धरिली विस्मयो थोर सुरनरां । जे गती देवकिये तैसीच पुतनें विश्राम एका वो वरा । तुझें मुद्रांकित न भीयें कळिकाळा तुं स्वामीं सारंगधरा ॥४॥ वनीं सिंहाचें भय दाखविलें जसा जे बैसविली गजस्कंधीं । परमपुरुषा तुझें नाम उच्चारितां वोळंगताती ऋद्धिसिद्धि । उपमन्या आरतें क्षिरसिंधु दिधली येवढी प्रसन्नबुद्धी । न गणितां रावणु शरणागतु केला लंका निरोपली आंधीं ॥५॥ नर सुर किन्नर पन्नग यक्ष त्रासियलें संसारें । जाणोनि शुकदेव गर्भी स्थिरावला भयाभीत बोले उत्तरें । जननीयेच्या कष्टा निष्कृती व्हावया उपदेश केला दातारें । जीवन्मुक्त शुक मुनिजनां वरिष्ठ जपतांची ध्यानीं दोन अक्षरें ॥६॥ ऐसा सहस्त्रमुखें वर्णितां नातुडसी गा देवा धांडोळितां सिद्ध पंथ । जगदबंधु दीनानाथ समुद्धरण द्रौपदीचा वेळाईत । सुदामियांच्या दों पोह्माकारणें स्नेहें पसरिसी हात । एका जनार्दनीं जवळीं बोलउनी उच्छिष्ट प्रसाद देत ॥७॥
३२२९
संसारा आलिया जा रे पंढरीपुरा । पाडुरंग सोयरा पहा आधीं ॥१॥ पुरती मनोरथ इच्छिले ते सांचे । अनंत जन्माचे दोष जाती ॥२॥ करितां स्नान भीमरथी तटीं । पुंडलीक दृष्टी लक्षुनियां ॥३॥ वेणुनाद गया पिडंदान फळ । गोपाळपूर सकळ देखिलिया ॥४॥ एका जनार्दनीं सारांचेआं तें सार । पंढरी माहेर सकळ जीवां ॥५॥
३२३०
संसारा आलिया प्राणी । तया यमाची जाचणीं । अंतीं तयासी निर्वाणी । कोणी नाहीं ॥१॥ करी नामाचें स्मरण । तेणें तुटेल बंधन । काया वाचा मनें जाण । संतां शरण जाई ॥२॥ नासती पापें होय होळी । विठ्ठलनामें वाजवी टाळी । कळिकाळ पायातळीं । वैष्णवासांगातें ॥३॥ भाव धरी बळकट । आशापाश तोडी नीट । रामनाम जपे स्पष्ट । यातना ते चुकती ॥४॥ सोस करीं नामाचा । आणीक शीण उगाचि साचा । एका जनार्दनीं म्हणे वाचा । रामनाम गाये ॥५॥
३२३१
संसाराचा धाक घेऊनियां पोटीं । जाहला हटतटी गोसावी तो ॥१॥ पहिल्या परीस यातायाती मागें । शिणला उद्योगें भाक मागूं ॥२॥ उठोनियां पहाटें अलख मागावे । परतोनी यावेअं झोपडीसी ॥३॥ नाहीं तेथें कोणी दिसे केविलवाणा । मग म्हणे नारायणा व्यर्थ जिणें ॥४॥ जरी असतों घरबारी स्त्री पुत्र असती । आतां ही फजीती नको देवा ॥५॥ टाकूनियां वेष स्त्री करुं धांवे । तों आयुष्याचें हावेंक ग्रासियेला ॥६॥ राहिली वासना संसार करणें । एका जनार्दनीं म्हणती जन्म घेती ॥७॥
३२३२
संसाराचा हेत राहिला मागें । अंगसंग वेगें नोहे कांते ॥१॥ एकांती राहाती परि न लिंपे कर्मा । वाउगाचि प्रेमा वरी दावी ॥२॥ माझ्या विठोबाची घातलीसे आण । नहोचि संतान वंशासी या ॥३॥ एका जनार्दनीं ऐसें चालत आलें । परि स्त्रियेनें केलें नवल देखा ॥४॥
३२३३
संसाराचें सुख कोण पैं सांगती । होत फजिती लहानथोरां ॥१॥ सर्पें मंडुक धारिला से मुखीं । तेणें पैं शेखीं मक्षिका धरी ॥२॥ मरती बापुडी हाव धरती गोडी । तरी तीं वेंडीं नागवती ॥३॥ एका जनार्दनें न धरी सोय । वायांचि धांवो जाय हांव भरी ॥४॥
३२३४
संसारासागरी बुडालिया प्राणी । करी सोडवणी कोण त्याची ॥१॥ अविद्यादि पंच क्लेश हे तरंग । बुडालें सर्वांग प्राणियाचें ॥२॥ भ्रमाच्या आवर्तामाजीं सांपडला । सोडवी तयाला कोण आतां ॥३॥ स्त्रियापुत्र आप्त बंधु हे सोयरे । ओढताती सारे मत्स्या ऐसीं ॥४॥ प्रपंच या कामें पसरिलें आलें । त्यामाजीं गुंतलें प्राणिजात ॥५॥ एका जनार्दनीं उच्चारील नाम । सुखाचा आराम प्राप्त होय ॥६॥
३२३५
संसारीं असोनी जीनन्मुक्त भक्त । आलासे धांवत तया भेटी ॥१॥ समाधिसुखें तल्लीन वाचे नारायण । लाविले नयन उन्मळीत ॥२॥ माथां ठेवुनी हात केला सावधान । वदे नारायण सांवत्यासी ॥३॥ येतां तुझे भेटी चोर मागें आला । लपवी मजला लवलाही ॥४॥ एका जनार्दनीं ऐकोनियां बोल । सांवत्याने सखोल दृष्टी केली ॥५॥
३२३६
संसारीं तरले बोलती ते कुडे । जाती ते बापुडे अधोगती ॥१॥ नेणती आचार विचार स्वधर्म । करताती कर्म मना तैसें ॥२॥ न तरती भवसागरीं बुडती हव्यासें । लागतसे पिसें धन आशा ॥३॥ एका जनार्दनीं आशा हे सांडोनी । गोविंद चरणी मिठी घाला ॥४॥
३२३७
सकळ गोडिये जें गोड आहे । तें रसनाची जाली स्वयें ॥१॥ आतां चाखावें तें काये । जिव्हा अमृता वाकुल्या वाये ॥२॥ तया गोडपणाच्या लोभा । कैशा सर्वांगीं निघती जिभा ॥३॥ एका जनार्दनीं गोड । तया क्षण एक रसना न सोडी ॥४॥
३२३८
सकळ तपांचें तें तप । सोपा राममंत्र जप ॥१॥ नाहीं साधनांचे कोडें । राम म्हणा वाडें कोडें ॥२॥ न लगे जप तप अनुष्ठान । रामनामें सर्व साधन ॥३॥ एक जनार्दनी म्हणतां राम । नासे संसार भवभ्रम ॥४॥
३२३९
सकळ तीर्थे । घडती करितां नामस्मरण । देवाधि देव उत्तम । तोही धांवे समोरा ॥१॥ पहाहो वैषणवांचे घरीं । सकळ तीर्थे कामारी । ऋद्धिसिद्धि मोक्ष चारी । दास्यत्व करिती सर्वदा ॥२॥ शरण एक जनार्दनीं । तीर्थांचा तो अधिष्ठानी नामस्मरणक आनुदिनीं । तया तीर्थे वंदितीं ॥३॥
३२४०
सकळ देवा शिरोमणी । सकळ तीर्थे वंदिती चरणीं । सकळांसी मुगुटमणी । तो उभा पंढरीये ॥१॥ सकळ तेजाचा पुतळा । सकळ जयांच्या अंगी कळा । सकळ जीवांचा आकळा । तो उभा राहिल्या विटेवरी ॥२॥ सकळ मंत्रांचा मंत्र । सोपा सकळ पवित्र । सकळ पर्वकाळ परत्र । दर्शनेंचि घडति ॥३॥ सकळ अधिष्ठानाचें सार । सकळ गुह्मांचे माहेर । सकळ भक्तांचें जे घर । निजमंदिर पंढरी ॥४॥ सकळ वैराग्यांचा निधी । सकळां कृपेची तो मांदी । एका जनर्दनीं निरुपाधी । आशापाश विरहित ॥५॥
३२४१
सकळ देवांचा जनिता । त्रिगुण सत्ता चाळविता ॥१॥ शरण जाता ज्याच्या पायां । सर्व हारपली माया ॥२॥ भेदाभेद निवारिले । सर्व स्वरुप कोंदलें ॥३॥ एका जनार्दनीं शिवें । जीवपणा मुकलों जीवें ॥४॥
३२४२
सकळ देवांचा नियंता । माझी विठ्ठल माता पिता ॥१॥ तो हा उभा विटेवरी । कटे धरुनियां करीं ॥२॥ मिरवें वैजयंती माळा । केशर कस्तुरीचा टिळा ॥३॥ मकराकार कुंडलें । करीं शंख चक्र शोभलें ॥४॥ एका शरण जनार्दनीं । विठ्ठल पाहे ध्यानीं मनीं ॥५॥
३२४३
सकळ दोषा मुगुटमणीं । निंदी जनीं संतां तो ॥१॥ जन्मतांची नाहीं मेला । व्यर्थ वांचला भूभार ॥२॥ त्याचियानें दुःखी धरा । नाहीं थारा जन्मोजन्मीं ॥३॥ दांत खाय यमधर्म । देखोनियां त्याचें कर्म ॥४॥ अभागी तो वसे जनीं । एका शरण जनार्दनीं ॥५॥
३२४४
सकळ पापांपासोनि मुक्त । वाचे उच्चारित राम हरि ॥१॥ ऐसे महिमा वेद सांगें । नक आड मार्गें जाऊं कोण्ही ॥२॥ भावे करितं भगवद्भक्ती । मोक्षप्राप्ति तात्काळ ॥३॥ स्वानंदें भगवद्भजन । एका वंदी त्याचे चरण ॥४॥
३२४५
सकळ प्रपंचाचे भान । तें तंव मृगजळासमान ॥१॥ जन्ममरणापरता । त्रिगुणातें नातळता ॥२॥ प्रपंचाची अलिप्त युक्ति । ऐसी आहे देहस्थिती ॥३॥ प्रपंची न दिसे भान । एका शरण जनार्दन ॥४॥
३२४६
सकळ संकल्पांचा त्याग । करितां संतसंग जोडला ॥१॥ मुळ पाहिजे हेंचि शुद्ध । भेदाभेद न यावे ॥२॥ संकल्पाचें दृढ बळ विकल्पाचे छेदी मुळ ॥३॥ संकल्प दृढ धरितां पोटी । एका जनार्दनीं होय भेटी ॥४॥
३२४७
सकळ साधनांचें फळ । रामनामचि केवळ ॥१॥ जप तप अनुष्ठान । अंतीं नामचि प्रमाण ॥२॥ नाना मंत्र यंत्रावळी । सोडवीना अंतकाळीं ॥३॥ महापातकी पतित । नामें तरलें असंख्यात ॥४॥ नाम सारांचें हें सार । एका जनार्दनी निर्धार ॥५॥
३२४८
सकळ साधनांचें सार । जनार्दन इतका उच्चार ॥१॥ येणें घडे सर्व कर्म । नको भेदाभेद वर्म ॥२॥ सांडा द्वैताचा भाव । तेणें सर्व दिसें वाव ॥३॥ एका जनार्दनीं भाव । भाव तेथें वसें देव ॥४॥
३२४९
सकळ साधितां साधन । नामावांचुन नाहीं पावन ॥१॥ पहा विचारुनि ग्रंथ । नामें तरले असंख्यात ॥२॥ दोषी सदोषियां उद्धार । रामनामें पैं साचार ॥३॥ कोटी कुळें तारी । एका जनार्दनीं निर्धारी ॥४॥
३२५०
सकळ सुख रामनामीं आहे । परमामृत ध्याये रामनाम ॥१॥ नामें न घडे कर्म नामें होय निष्कर्म । नाम परब्रह्मा सार नाम ॥२॥ नामें होय मुक्ति नामें होय भुक्ती । नामें स्वर्गप्राप्ति जपतीया ॥३॥ नामें होय बोध नामें जाय बाध । एका जनार्दनीं छंद नाम गातां ॥४॥
३२५१
सकळ सुखाचे जें सुख । तेंचि सोलीव श्रीमुख ॥१॥ विठ्ठल विठठलीं शोभा । मिरवितसे स्वयंभा ॥२॥ मीतूंपणाचा शेवट तोचि मस्तकी मुगुट ॥३॥ अधिष्ठान जें निर्मळ । तेंचि लल्लट सोज्वळ ॥४॥ श्रुति विवेक ये विवेका । तेंचि श्रवण ऐका ॥५॥ जिव शिवएक ठसा । कुंडलें सर्वांग डोळसा ॥६॥ जें कां आदित्यां तेज तेजाळें । तेंचि तया अंगीं झाले डोळे ॥७॥ चितशक्तीचें जाणनेंपणा । तेंचि नयनींचे अंजन ॥८॥ शोभा शोभवी जें बिक । तेंचि मुखीचे नासिक ॥९॥ वदन म्हणिजे सुखसागर । तळपती हिरिया ऐसें अधर ॥१०॥ सच्चित्पर्दाची जे माळा । माळागुणें पडली गळां ॥११॥ कर्म कर्तव्य जें फळें । तेचि कर कटीं सरळ ॥१२॥ कोहं कोहं मुस अटी । तेचि आटीव बहुवटीं ॥१३॥ कवणें व्यक्ती नये रुपा । हृदयीं पदक पहा पा ॥१४॥ नाभीका पुर्णानंदी । तेचि नाभी तया दोंदी ॥१५॥ निःशेष सारुनी अंबर । तो कासे पीतांबर ॥१६॥ महासिद्धी ज्या वाजंटा । त्याची मेखळे जडल्या घंटा ॥१७॥ गती चालविती गती । तेचि समचरण शोभती ॥१८॥ अहं सांडोनि अहंकार । तोचि चरणीम तोडर ॥१९॥ अर्थाअर्थी जडली निकी । ते शोभती वाळे वाकी ॥२०॥ शंख चक्र पद्म गदा । चरी पुरुषार्थ आयुधा ॥२१॥ शून्यशून्य पायातळीं । तेचि विट हे शोभली ॥२२॥ दृश्य सारोनियां शोभा । समचरणीं विठ्ठल उभा ॥२३॥ चरणातळीं ऊर्ध्व रेखा । जाला जनार्दन एका ॥२४॥
३२५२
सकळ सुरां मुगुतमणीं । जो का त्रैलोक्याचा धनी । भक्ता अभयदानी । उदारपणें ठाकला ॥१॥ आठवावा वेळोवेळां । भय नाहीं कळिकाळा । लागलासे चाळा । न फिरोचि माघारीं ॥२॥ मागां बहुतां अनुभव । तारियेले पापीं सर्व । एका जनार्दनीं स्वयमेव । पंढरीराव पुरवीत ॥३॥
३२५३
सकळांमध्यें श्रेष्ठ । शिवनाम जें वरिष्ठ ॥१॥ आवडीनें नाम जपा । शिव शिव मंत्र सोपा ॥२॥ ऐसा भक्तांचा अंकित । स्मरतांचि मोक्ष देत ॥३॥ एका जनार्दनीं उदार । देणें त्रिभुवनीं साचार ॥४॥
३२५४
सकळीं ध्याइला सकळीं पाहिला । परी असे भरला जैसा तैसा ॥१॥ युगानुयुगीं मीनले व्यापारी । परी न पवेचि सरी पुंडलीका ॥२॥ मापें केलीं परी नये अनुमाना । योगियांच्या ध्याना वोथबंला ॥३॥ एकाजनार्दनीं मापचि आटचें । मोजणें खुंटविलें पुंडलिकें ॥४॥
३२५५
सकळीक तीर्थे पाहतां डोळा । निवांत नोहे हृदयकमळा ॥१॥ पाहतां तीर्थे चंद्रभागा । सकळ दोष गेले । भंगा ॥२॥ पाहती विठ्ठल सांवळा । परब्राह्मा डोळां देखियेलें ॥३॥ एका जनार्दनीं पाहोनी ध्यान । भुललें मन त्या ठायीं ॥४॥
३२५६
सका साधनांचें सार । मुखी नामाचा उच्चार ॥१॥ सकळ तपांचे जें सार । मुखीं नामाचा उच्चार ॥२॥ सकळ ज्ञानाचें जें सार । मुखी नामाचा उच्चार ॥३॥ सकळ ब्रह्मा विद्येंचें जे घर । एका जनार्दनींचें माहेर ॥४॥
३२५७
सकाम निष्काम । वाचे गातां रामनाम ॥१॥ नाम उच्चारितां होटीं । जन्म जरा तुटे आटी ॥२॥ नामांचे महिमान । महा दोषी जाहले पावन ॥३॥ ब्रह्महत्य बाळहत्यारी । नामें तरलें निर्धारीं ॥४॥ एका जनार्दनीं नाम । उत्तमा उत्तम निजधाम ॥५॥
३२५८
सकाम निष्काम वदे नामावळी । सर्व दोषां होळी नाम मंत्रें ॥१॥ सोपाचि मंत्र नाहीं अवघड । तें जपा उघड रामनाम ॥२॥ यातीहिन असो भलते नारीनर । वाचे जो उच्चारी रामनाम ॥३॥ एका जनार्दनीं एकपणें शरण । वाचे नारायण जप करा ॥४॥
३२५९
सकामासी स्वर्गप्राप्ती । ऐशी बोले वेदश्रुती ॥१॥ हाचि घेई अनुभव । सकाम निष्कम भजे देव ॥२॥ भजतां निष्काम पैं देवा । स्वर्ग मोक्ष कोणे केवा ॥३॥ एका जनार्दनीं निष्काम । वाचे वदे रामनाम ॥४॥
३२६०
सक्षत्वे जीत त्याचा होय अंत । विचारें मुरत वस्तुमाजीं ॥१॥ पिंडीचें ते दोन्हीं ब्रह्माडींचे दोन्हीं । हे प्रळय पुराणीं बोलिलेती ॥२॥ प्रळय आत्यांतिक जेथें संहारत । विवेक आपणचि येत सर्वाठायीं ॥३॥ मग प्रचीत सहज बरवे वाईट वोज । निपजे तेथें दुजे भाव नाहीं ॥४॥ एका जनार्दनीं भला आपणचि ईश्वर झाला । तो भरुनी उरला साक्षत्वेंसी ॥५॥
३२६१
सखी पुसे सखियेसी । युगें जालीं अठ्ठावीसी । उभा ऐकिला संतामुखीं । अद्यापीं वर । कटावरी कर । भीवरी तीर । वाळूवंटीं संतसभा सभा ॥१॥ देव काहां विटेवरी उभा उभा ॥धृ॥ पुंसु नका बाई । वेदासी काई । कळलेंचि नाहीं । शेष शिणला जाहल्या द्विसहस्त्र जिभा जिभा ॥२॥ जेथें करीताती गोपाळाकाला । हरिनामी तयांचा गलबला । देवभावाचा भुकेला । मिळले संत मदनारी । तो हरी आला तयांचिया लोभा ॥३॥ हरी वैकुंठाहुनी । आला पुंडलिका लागुनी । उभा राहिला अझुनी । युगानुयुगें भक्तासंगें । एका जनार्दनीं संतशोभा शोभा ॥४॥
३२६२
सखीये अनुतापें वैराग्यतापें अति संतप्त नयनीं । अश्रु अंगीं स्वेद रोमांच जीवीं जीव मूर्च्छित वो ॥१॥ माझें मजलागीं गुरुकृपा मन तें जालें उन्मन वो । देही देह कैसा विदेह जालें क्रिया चैतन्यघन वो ॥२॥ माझें मीपण पहातां चित्तीं चित्त अचिंत वो । वृत्तिनिवृत्ति तेथें चिद्रुप जालो परमानंदें तृप्त वो ॥३॥ एका जनार्दनीं एकत्वें जन वन समसमान एक । एकपणें परिपुर्ण जाला त्रैलोक्य आनंदघन वो ॥४॥
३२६३
सगुण चरित्रें परम पवित्रें सादर वर्नावी । सज्जनवृदें मनोभावे आधीं वंदावीं ॥१॥ संतसंगे अंतरंगे नाम बोलावें । कीर्तनरंगें देवा सन्निध सुखें डोलावें ॥२॥ भक्तिज्ञानाविरहित गोष्टी इतरां न कराव्या । प्रमभरें वैराग्याच्या युक्ति विवराव्या ॥३॥ जेणे करुनी मुर्ति ठसावी अंतरीं श्रीहरीची । ऐशी कीर्तनमार्यादा आहे संतांच्या घरची ॥४॥ अद्वय भजने अखंड स्मरणें वाजवीं करटाळी । एका जनार्दनीं मुक्त होय तत्काळीं ॥५॥
३२६४
सगुण निर्गुण नोहे वृक्ष । पाहतां नित्रीं न भासे सादृश्य । देखतां देखत होतो अदृश्य ॥१॥ सांग रे कान्होबा हें कोंडे । तुझें तुजपाशीं केलें उघडें । आम्हां न कळे वाडेंकोडें ॥२॥ एक मुळीं वृक्ष देखिला । द्विशाखां तो शोभला । पाहतां पत्र पुष्पें न देखिला ॥३॥ ऐसें वृक्ष अपरंपार । एकाजनार्दनीं करा विचार । मग चुकेल वेरझार ॥४॥
३२६५
सगुण निर्गुण बुंथींचे आवरण । ब्रह्मा सनातन पंढरीये ॥१॥ तो हा श्रीहरीं नंदाचा खिल्लरी । योगी चराचरीं ध्याती जया ॥२॥ शिवाचें जेंध्येय मुनिजनांचे ध्यान । ब्रह्मा परिपूर्ण पंढरीये ॥३॥ एका जनार्दनी अठरां निराळा । लाविलासे चाळा सहां चहुसी ॥४॥
३२६६
सगुण निर्गुण मूर्ति उभी असे विटे । कोटी सुर्य दांटे प्रभा तेथें ॥१॥ सुंदर सगुण मूर्ति चतुर्भुज । पाहतां पूर्वज उद्धरती ॥२॥ त्रिभुवनीं गाजे ब्रीदाचा तोडर ॥ तोचि कटीं कर उभा विटे ॥३॥ एका जनार्दनीं नातुडे जो वेदां । उभा तो मर्यादा धरुनि पाठीं ॥४॥
३२६७
सगुण रूपडें अद्वैत बुंथी । घेऊनि पंढरपुरी उभा विटे ॥१॥ डोळियांची धणी पहातां न पुरे । मनचि चांचरे पाहतां पाहतां ॥२॥ रुप आकारलें पुंडलिकाचे भेटी । उभे असे तटी भीवरेच्या ॥३॥ एका जनार्दनीं उपाधी निराळा । उभा तो सांवळा विटेवरी ॥४॥
३२६८
सचेतनी द्वेष अचेतनीं पूजा । भक्ति गरुडध्वजा केवीं पावे ॥१॥ व्यर्थ खटाटोप नाथिला पसारा । गोविंद गव्हारा केवीं कळे ॥२॥ हरिदासाचेनि गुणें शिळा दैवतपणें । त्या शिळा पुजोनि त्याचें द्वेषा ॥३॥ एका जनार्दनीं नाथिलाची दावी । सजीव निर्जिवों गोंवियेलें ॥४॥
३२६९
सतीं केला उपकार । मज निर्धार बाणला ॥१॥ चुकविलें जन्माचें सांकडें । उगविलें कोडें बहुतांचें ॥२॥ गुण अवगुण नणितां मनीं । देती दरुशनीं मुक्ति त्या ॥३॥ शरण एका जनादनें । करुं वोवाळणीं देहाची ॥४॥
३२७०
सत्त्व रज तम गेले निरसोनी । दृश्याची लावणी कैशी झाली ॥१॥ गेलिआ माघारीं पाहतां न दिसे । स्वतः तो प्रकाशे सदोदित ॥२॥ अंतर बाहेरीं पाहतां शेजारीं । प्रकाशतां अंतरीं लखलख ॥३॥ एका जनार्दनीं प्रकाश संपुर्ण । सर्व नारायण बिंबलासे ॥४॥
३२७१
सत्पद तें ब्रह्मा चित्पद तें माया । आनंद पदीं जया म्हणती हरी ॥१॥ सप्त्द निर्गुण चित्पद सगुण । सगुण निर्गुण हरिपायीं ॥२॥ तत्सादिति ऐसे पैल वस्तुवरी । गीतेमाजी हरि बोलियेले ॥३॥ हरिपदप्राप्ति भोळ्यां भाविकांसी । अभिमानियांसी गर्भवास ॥४॥ अस्ति भाति प्रिय ऐशी पदें तिनी । एका जनार्दनीं तेंचि झालें ॥५॥
३२७२
सत्य असत्य दोनीं देहींच भासत । तेणेंचि नासत सर्व काम ॥१॥ एकासी वंदावें एकासी निंदावें । ऐसिया भावा काय सत्य तें मानावें ॥२॥ देह जातो गोष्टी असत्य न बोलूं । सर्वज्ञ विठ्ठ्लू म्हणों आम्हीं ॥३॥ सत्य असत्याची वार्ता नको देवा । एका जनार्दनीं जीवा हेंचि प्रेम ॥४॥
३२७३
सत्य करी आपुलें वचन । आमुचें करीं बंधमोचन । आमुचें विपत्तीचें विधान । सावधान अवधारी ॥१॥ इंद्रबारी चंद्र कर्‍हेरी । यम पाणी वाहे घरोघरीं । वायु झाडी सदा वोसरी । विधि तेथें करी दळाकांडा ॥२॥ अश्विनी देव दोन्हीं । परिमळ देतीं स्त्रिये लागुनी । विलंब अर्धक्षणी । दासी बाधोनी धुमासिती ॥३॥ मारको केली तरळी । सटवी बाळातें पाखाडी । रात्रीं जागे काळी कराळी । मेसको बळी शोभतिया ॥४॥ मैराळ देव कानडा । करी राक्षसांच्या दाढ । आरसा न दाखवी ज्यापुढा । तो रोकडा बुकाली ॥५॥ विघ्न राहुं न शके ज्यापुढें । तो गणेशबापुडें । गाढवांचें कळप गाढे । एका जनार्दनीं वळीत ॥६॥
३२७४
सत्यपुरीं ऐसें म्हणती तेरेसी । हरि भक्तराशी कुंभार गोरा ॥१॥ नित्य वाचे नाम आठवी विठ्ठल । भक्तिभाव सबळ ह्रदयामाजीं ॥२॥ उभयतांचा प्रपंच चालवी व्यापार । भाजन अपार घडितसे ॥३॥ एका जनार्दनीं ऐका सविस्तर । पुढील प्रकार आनंदानें ॥४॥
३२७५
सत्यसत्य ब्रीदावळी । नाम उत्तम हें कलीं ॥१॥ जपतां चार अक्षरें । मुक्ति जगासी निर्धारें ॥२॥ नामें सर्वांवरी सत्ता । ऐसें वदे पैं गीता ॥३॥ तें नाम जपा पावन । शरण एका जनार्दन ॥४॥
३२७६
सदगुरु तोचि जाण । जो अपरोक्ष सांगे ज्ञान । देहत्रय निरसुन । परमपदीं ठेवी ॥१॥ जेणें देहत्रय निरसिलें । ज्ञान अग्नीमाजीं जाळिलें । अच्युतपद प्राप्त केलें । त्यासी वेळ नाहीं ॥२॥ निराकार निरामय । निर्भय तें अद्वय । तयामाजीं लिंगदेह । मरुनियां गेले ॥३॥ एका जनार्दनीं प्राप्ती । जैं लिंगदेहाची होय शांती । मग सायुज्यमुक्ति । पायां लागे ॥४॥
३२७७
सदगुरुसी शरण जाय । त्यासी ब्रह्माप्राप्ति होय ॥१॥ न लगे आणिक उपाव । धरी सदगुरुचे पाय ॥२॥ सदगुरुचें चरणतीर्थ । मस्तकी वंदावें पवित्र ॥३॥ एका जनार्दनीं सदगुरु । हाचि भवसिंधुचा तारु ॥४॥
३२७८
सदा नामें घडे आचार । नामें साधें सर्व विचार । नाम पवित्र परिकर । सादर वदनीं घेतां ॥१॥ शुद्ध वैराग्य घडे नामीं । तप तीर्थ घडे निष्कामीं । दान धर्म पुण्यपावन इये धर्मा । नाम वाचे आठवितां ॥२॥ नामें साधे अष्टांग पवन । नामें साधे पंचाग्रि धूम्रपान । नामें एका जनार्दनीं भजन । नामें पावन देह होय ॥३॥
३२७९
सदा वसे अंगीं शांती । चारी मुक्ति होती दासी ॥१॥ तोचि सखे हरीचे दास । सदा सोंवळे उदास ॥२॥ कामक्रोधाची वार्ता । अंगीं नाहीं पैं सर्वथा ॥३॥ एका जनार्दनीं निष्काम । सदा परिपूर्ण मंगळधाम ॥४॥
३२८०
सदा वाचे नामावळी । नित्य जिव्हा ज्याची चाळी । पातकांचे होळी । होत तेणे केली ये ॥१॥ नको ध्यानधारणा आसन । वाचे सदा नारायण । केलिया ऐसा नेम जाण । मेरुसमान सुकृत ॥२॥ उपमा नव्हे तया नरा । जनार्दन तो निर्धारा । एका जनार्दनीं बरा । त्याचा सांगात घडतां ॥३॥
३२८१
सदा सर्वकाळ नाम मुखीं गाये । आणीक तें नये दुजा हेत ॥१॥ धन्य त्याची माय पावन तें कुळ । धन्य तो निर्मळ वंश त्याचा ॥२॥ जन्मजन्मांतरींचें सुकृत पदरीं । वाचे तो उच्चारी रामकृष्ण ॥३॥ एका जनार्दनीं सदा जपे नाम । तो देह उत्तम इहलोकीं ॥४॥
३२८२
सदा सर्वकाळ बाइलेचा दास । होउनी कामास श्वान जैसा ॥१॥ नेणे भीड कधीं मर्यादा स्वजनीं । बाइलेचे कानीं गुज सांगें ॥२॥ बैसतां राउळीं बाइले एकान्त । देवापाशीं चित्त न बैसेचि ॥३॥ एका जनार्दनीं ऐसा तो पतित । अघोर भोगीत कल्पकोडी ॥४॥
३२८३
सदा सर्वकाळ मनीं वसे देव । तेथें नाहीं भेव कळिकाळाचा ॥१॥ काळ तो पुढरी जोडितसे हात । मुखीं नाम गात तयापुढें ॥२॥ म्हणोनि आदरें वाचे नाम घ्यावें । रात्रंदिवस ध्यावें विठ्ठलासी ॥३॥ एका जनार्दनीं जपतां नाम होटीं । पुर्वजां वैकुंठी पायवाट ॥४॥
३२८४
सदा सर्वकाळ वाचे । नाम जया श्रीहरीचें ॥१॥ धन्य जन्मोनी संसारीं । सदा मनीं धरी हरी ॥२॥ रात्रंदिवस ध्यानीं मनीं । शरण एका जनार्दनीं ॥३॥
३२८५
सदा सुरवर सुख तें इच्छिती । ऐसा लक्ष्मीपती कां रें न भजा ॥१॥ सोइरा धाइरा आन दुजा नाहीं । गुरु पिता पाहीं हाचि बंधु ॥२॥ सज्जन सांगती आन नाहीं आम्हां । एका जनार्दनीं प्रेमा वसें देहीं ॥३॥
३२८६
सदाशिव अक्षरें चार । जो जपे निरंतर ॥१॥ तया न बाधी संसार । वाचे वदतां हरहर ॥२॥ ऐसें शिवाचें महिमान । उच्चारितां नोहे पतन ॥३॥ एका जनार्दनीं शिव । वाचे वदतां निरसे भेव ॥४॥
३२८७
सदैव आवडे ज्यां कीर्तन । धन्य पावन जगीं ते ॥१॥ ब्रह्माचारी गृहस्थाश्रमीं । करिती कीर्तन निजधामीं ॥२॥ शुद्र अथवा अति निंद्य । कीर्तनीं वंद्य सर्वथा ॥३॥ यवन मांतगादि जन । कीर्तनीं पावन कलियुगीं ॥४॥ एका शरण जीवेंभावें । सदा कीर्तन करावें ॥५॥
३२८८
सदोदित मना निवृत्तीचे पायीं । मना आणिक ठायीं जाऊं नको ॥१॥ जपतप काहीं न करीं साधन । तुटेल बंधन निवृत्तिनामें ॥२॥ तीर्थ व्रत चाड न धरीं अहंकार । नामाचा उच्चार निवृत्ति करी ॥३॥ तीर्थाचें हें तीर्थ निवृत्ति माहेर । एका जनार्दनीं निर्धार निवृत्तिपायीं ॥४॥
३२८९
सदोदीत गाय श्रीराम गुण । धन्य तो पावन नरदेहीं ॥१॥ नरदेहीं आलीया रामनाम गावें । तरीच जन्मा यावें गुरुपुत्रा ॥२॥ नरदेह उत्तम लागलासे हातीं । रामनामें विश्रांती देहीं याची ॥३॥ कन्यापुत्र माझे न करी सायास । रामनामें उदास वृत्ती करी ॥४॥ वृत्ती करी सदा समाधान । रामनामचिंतन निशिदिनीं ॥५॥ निशिदिनीं ध्यान एका जनार्दनीं । काया वाचा मनीं रामनामा ॥६॥
३२९०
सद्गदित कंठ बाष्प पैं दाटत । जया भेटिलागीं हृदयें फुटत ॥१॥ तो देखिलावो तो देखिला । सबाह्म अभ्यंतरीं व्यापुनियां राहिला ॥२॥ सबराभरीत भरुनी पंढरीये उभा । सभोंवतीं दाटी संतांची शोभा ॥३॥ ऐसा लावण्य - पुतळा देखिला दृष्टी । एका जनार्दनीं सुख न समय सृष्टी ॥४॥
३२९१
सन्मानुनी ब्राम्हण राज्यीं बैसविले । चित्त आनंदले सुदाम्याचें ॥१॥ तुष्टला नारायण दिधली सुवर्ण नगरी । द्वारकेसम पुरी पोह्यांसाठी ॥२॥ भक्ताचे मनोरथ पुरवी वैकुंठपती । ऐशी ज्याची कीर्ति त्रिभुवनीं ॥३॥ एका जनार्दनीं देव तो तुष्टला । राज्याधीश केला अकिंचन ॥४॥
३२९२
सन्मुख देखोनियां भेटी धांवा । तंव दशादिशा उचलल्या खेंवा ॥१॥ आतां नवल भेटी देव । पुढें आलिंगितां सर्वांगी खेंव ॥२॥ आलिंगनीं गगन लोपे । खेंव द्तां गगन हारपे ॥३॥ एका जनार्दनीं भेटी भावो । जिण्या मरण्या नुरेचि ठावो ॥४॥
३२९३
सप्त दिन जेणें गोवर्धन धरिला । काळिया नाथिला देउनी पाय ॥१॥ तो हा गोपवेषें आला पंढरपुर । भक्त समाचारा विठ्ठल देवो ॥२॥ बाळपणीं जेणें पूतनें शोषिले । अघ बघ मारिलें खेळे खेळ ॥३॥ कंसचाणुराचा करुनियां घात । केला मथुरानाथ उग्रसेन ॥४॥ समुद्राचे तटी द्वारके उभाविलें । सोळा सहस्त्र केलें कुटुबांसी ॥५॥ धर्माचीयें घरी उच्छिष्ट काढिलें । दृष्टा त्या वधिलें कौरवांसी ॥६॥ एका जनार्दनीं ऐशी बाळलीला । खेळ खेळोनी वेगळा पंढरीये ॥७॥
३२९४
सप्तपुर्‍या क्षेत्र पवित्र सोपार । तयांमांजी श्रेष्ठ पंढरपुर ॥१॥ जा रे आधीं तया ठाया । जेथें वास वैकुंठराया ॥२॥ पुंडलिकांचे दारुशनें । तुटती प्राणीयांची बंधनें ॥३॥ स्नान करितां भीमेसी । पुर्वज उद्धरई सरसी ॥४॥ एका जनार्दनीं पावन । देव क्षेत्र तीर्थ उत्तम जाण ॥५॥
३२९५
सप्तपुर्‍यांमांजीं पढरी पावन । नामघोष जाण वैष्णव करिती ॥१॥ देव तो विठ्ठल देव तो विठ्ठल । आहे सोपा बोल वाचेम म्हणतां ॥२॥ आणिक कांहीं नको यापरतें साधन । विठ्ठल निधान टाकुनियां ॥३॥ एका जनार्दनीं विठ्ठला वांचुनी । आन नेणें मनीं दुजें कांहीं ॥४॥
३२९६
सप्रेम करितां भजन । नोहे भावाचें बंधन ॥१॥ भक्तांचे आधीन देवो । नाहीं नाहीं हो संदेहो ॥२॥ भक्तीची एवढी गोडी । वैकुंठाहुनी घाली उडी ॥३॥ भक्तामाजीं देव असे । देवा अंगीं भक्त दिसे ॥४॥ ऐशी परस्परें मिळणी । शरण एका जनार्दनीं ॥५॥
३२९७
सप्रेम नाचोनि वाजवा टाळी । गर्जा हरिकथा नामावळी ॥१॥ ऐशी कथेची आवडी । दोष गेले देशोधडी ॥२॥ सेवितां कथामृतसार । दीनवदनें दिसे संसार ॥३॥ एका जनार्दनीं प्रेम । स्वयें सांगें पुरुषोत्तम ॥४॥
३२९८
सप्रेमें करितां भजन । तेणें घडती कोटी यज्ञ ॥१॥ प्रेम सार प्रेम सार । वायां भार कुंथेचा ॥२॥ प्रेमेंविण न भेटे देवो । अवघा वावो पसारा ॥३॥ एका जनार्दनीं प्रेम सार । तुटे वेरझार येणें जाणें ॥४॥
३२९९
सबराभरित देव असोनी जवळी । व्यर्थ ते कवळी मृत्तिका जळ ॥१॥ ज्याचीया सत्तेचा पंचभुत खेळ । विसरती गोपाळ तयालागीं ॥२॥ वल्कलें वेष्टन भस्माचें धारण । करिती धूम्रपान वाउगेंचीं ॥३॥ एका जनार्दनें हृदयस्थ असतां । कां हो शीण तत्त्वतां करिताती ॥४॥
३३००
सम असे सुखदुःख । संत त्यासी म्हणती देख ॥१॥ पापपुण्य मावळलें । द्वैत सव दुरावलें ॥२॥ हर्ष शोक नाहीं देहीं । संत जाणावे विदेही ॥३॥ एका जनार्दनीं संत । जनालागीं कृपावंत ॥४॥
३३०१
सम आणि विषम हीं तो काळाची फळें । भोगिल्याविण बळें न सुटती कधीं ॥१॥ वाउगी कल्पना वाउगी कल्पना । वागविती मना परम मूर्ख ॥२॥ उसनें आणि ताना जीवा वाटे गोड । देतों तें लिगाड होय मग ॥३॥ एका जनार्दनीं हाही अनुभव । सुखदुःखा ठाव याचपरी ॥४॥
३३०२
समचरणीं उभा चैतन्याचा गाभ । त्रैलाक्याची शोभ पांडुरंग ॥१॥ भक्तांचे जीवन साधकांचे साधन । सुखाची विधान पाडुंरग ॥२॥ मुक्ति कल्पद्रुम महाफळ उत्तम । गोपिकांचा काम पाडुंरग ॥३॥ एकाएकी विनटला । तो सदा संचला । एका जनार्दनीं भेटला पांडुरंग ॥४॥
३३०३
समचरणीं मन माझे वेधलें । तें वेगळें होतां विरह बोलें । हर्षामर्षा चित्त उन्मन ठेलें । म्हणोनि विरहिनी विरह बोले ॥१॥ सांवळीया कान्हया नको जाऊं दुरी । राहे पेरपरता परतोनि हरी । पश्यंती मध्यमा मरुनी वैखरी । चारी वाचा तटस्थ जाहल्या हरी ॥२॥ तुझ्या वियोगाचा न व्हावा संग । अखंड नामीं असो अनुसंधान । शरण एका जनार्दने । काया वाचा मनें जाणोन ॥३॥
३३०४
समसाम्य सर्वाभुतीं । ज्यासी घडे भगवद्भक्ति ॥१॥ जालिया सदगुरुकृपा । सर्व मार्ग होय सोपा ॥२॥ हृ़दयीं ठसतांचि भावो । प्रगटे देवाधिदेवो ॥३॥ भक्तां भावार्थें विकला । एका जनार्दनीं देखिला ॥४॥
३३०५
समसृष्टीं । म्हणो नये थोर सान । ऐसें उपदेशी ज्ञान । आपण ही गोष्टीं ॥१॥ काया वाचा मनें भावें । संतांशीं शरण जावें । संगती ते जीवेंभावें । अंतरीची गोष्टी ॥२॥ पूर्ण बुद्धिचाची रावो । पापपुण्य नाहीं ठावो । साधु संतांसी भजावो । मुख्य ही गोष्टी ॥३॥ ऐसिया संतांसी जाण । शरण एका जनार्दन । घालीतसे लोटांगण । मुख्य ही गोष्टी ॥४॥
३३०६
समाधि घेतली आळंदी । भोंवतीं शोभे सिध्द मांदी ॥१॥ सन्मुख पुढें अजानवृक्ष । देव येती तेथें साक्ष ॥२॥ कीर्तन गजरीं । नामघोष चराचरी ॥३॥ ऐसा सोहळा आनंद । एका जनार्दनीं नाहीं भेद ॥४॥
३३०७
समाधि निवृत्ति म्हणतां । हारे संसाराची व्यथा ॥१॥ दृष्टीं पाहातां निवृत्तिनाथ । काय भय नाहीं तेथ ॥२॥ समाधि पाहतांचि डोळां । काय सांगूं तो सोहळा ॥३॥ एका जनार्दनीं शरण । समाधि पहातांचि जाण ॥४॥
३३०८
समाधीचें स्थान हरिकीर्तन । येर अवघा वांयां शीण । कासया गुदाग्रीं अंगुष्ठ लाऊन । खटाटोप पसारा ॥१॥ राम कृष्णा हरि वासुदेवा । हाचि छंद असो जीवा ॥धृ॥ आसन ध्यान मुद्रा लक्षण । कर्मकांड क्रिया धर्म जाण । वाउगें कासया भस्मलेपन । कीर्तन अंतरीं नसेची ॥२॥ माळा मुद्रा शृंगार भारी । भाळे भोळे भोदीं निरंतरीं । ऐशी कीर्तनमर्यादा नाहीं निर्धारीं । निरपेक्ष हरिकीर्तन ॥३॥ श्रोता वक्ता होउनी सावधान । परनिंदा परपीडा टाकून । कीर्तन करावें श्रवण । रामकृष्ण नामें उच्चार ॥४॥ ऐसं ऐकतां कीर्तन । समाधीसी तेथें समाधान । अष्टांगादि कर जोडोनि । उभें सर्वदा राहाती ॥५॥ कीर्तनें होय सर्व सिद्धी । तुटती भवपाश आधिव्याधी । एका जनार्दनीं नाहीं उपाधी । कीर्तनी श्रवण केलिया ॥६॥
३३०९
समुद्र क्षोभे वेळोवेळीं । योगिया क्षोभेना कोण्हाकाळीं ॥१॥ समुद्रा भरितें पर्वसंबंधे । योगी परिपूर्ण परमानंदें ॥२॥ समुद्र सर्वदा तो क्षार । तैसा नव्हे योगीश्वर ॥३॥ समुद्रीं वरुषतां घन । जीवनीं मिळतसे जीवन ॥४॥ योगियांची योग स्थिती । सदा परमार्थ भक्ती ॥५॥ एका जनार्दनीं शरण । योगियांचें जें योगचिन्ह ॥६॥
३३१०
समुद्रवलयांकित तीर्थ । स्नानें करती जे पवित्र । परी तेथें नसतां भाव । निर्फळ वाव होतसे ॥१॥ ऐसा निर्णय शास्त्री । पुराणीं सांगतसे व्यक्ति । तेचि उघड सर्वाप्रती । सांगतसें परियेसा ॥२॥ जे शुचिर्भूत शुद्धमती । ईश्वर मानिती सर्वाभूतीं । ते सर्वदा वसती तीर्थीं । तीर्थे वसती त्यांच्या संगें ॥३॥ तीर्थीं नसतां तीर्थवास । सत्य निष्ठा नित्य निर्दोष । तीर्थो वसतां पुण्यलेश । न पावे तीर्थ निंदितां ॥४॥ मत्सर निष्ठुर भूतद्वेष । भजनमार्गीचा उपहार । तीर्थें घेती त्यांचा त्रास । कीटक द्वेष त्या करिती ॥५॥ काम क्रोध लोभ माया । स्पर्श न करी जयाची काया । तो तीर्थवासी जाणे राया । तीर्थे पायां वंदितीं ॥६॥ विष्णुस्मरण शिवस्मरण । नित्य वसवी ज्यांचे वदन । तोचि तीर्थ जाण । तीर्थें चरण वंदिती ॥७॥ इंद्रिय नियमाचे आसनीं । नित्य माधुर्य बोलली वाणी । अहंकार ज्याचिये ज्ञानीं । संतचरणा सर्वथा ॥८॥ तो सकळ शिष्टांचा धात्रा । तीर्थे करिती त्याची यात्रा । पादोदकालागीं पवित्रा । तीर्थे माथा वोढविती ॥९॥ तीर्थीं असोनि इच्छारहित । प्रतिग्रहा न वोढवी हात । यथालाभें संतोषत । तो तीर्थरुप जाणावा ॥१०॥ परधनीं अंधत्व जयाचे नयना । परस्त्री पाहतां क्लीबत्व जयाचे मना । परापवादी मूकत्व जयाचे वदना । तो जनक जाण तीर्थाचा ॥११॥ मनें इंद्रिया निग्रह करी । तो गृहीं असतां जान्हवीतीरीं । तीर्थी असो अनाचारी । तो कीटकवासी जाणावा ॥१२॥ सत्यशील दृढव्रती । आत्मभावना सर्वाभुती । क्रोधकंटका नातळे चित्तीं । तो सर्व तीर्थीं सेविजे ॥१३॥ शुद्धशीळ विद्यातीर्थीं । साधु सुस्नात सत्यतीर्थी । कुलांगना लज्जातीर्थीं । पवित्र होती जाण पां ॥१४॥ धनाढ्य निर्दोष दानतीर्थीं । पापी निष्पाप गंगातीर्थीं । क्षत्रिय राजे धारातीर्थीं । प्रक्षाळिती अघातें ॥१५॥ योगी आत्मध्यान तीर्थीं । आत्मस्वरुप स्वयें होती । श्रवणादिक नवही तीर्थी । भक्त होती हरिरुप ॥१६॥ असो या निरोपणाच्या युक्ती । जाणते अथवा हो नेणती । शरीर प्रक्षाळितां तीर्थीं । मोक्षप्राप्ति निर्धारें ॥१७॥ ऋषीश्वरीं वेदवचनीं । महा फलें कल्पीं यज्ञीं । ती यज्ञफळीं तीर्थस्त्रानीं । सकळ तीर्थें नामस्मरणीं ॥१८॥ शरण एका जनार्दनीं । सकळ तीर्थे नामस्मरणीं । घडती संतसंघटनीं । येथें संशय नाहीं ॥१९॥
३३११
समुद्रवलयांकित पृथ्वी पाहतां । ऐसें तीर्थ सर्वथा नाहीं कोठें ॥१॥ भाविकांचें माहेर जाणा पंढरपुर । विठ्ठल विटेवर उभा असे ॥२॥ एका जनार्दनीम तयाचाचि ठसा । भरुनि आकाशा उरलासे ॥३॥
३३१२
समुळ मुळीं पाहतां पाहण्या उपरम । भोग भोक्ता तेथें सहज परब्रह्मा ॥१॥ भोगुं मी काय त्यागुं मी काय । त्याग भोग दोन्हीं चैतन्य माय ॥२॥ भोग भोगितां भोग त्यागितां त्याग । दोन्हींचें निखळ अधिष्ठान अंग ॥३॥ एका जनार्दनीं एकपण त्यागी । ब्रह्मारुप जग आदळे अंगीं ॥४॥
३३१३
समूळ कमानेतें दंडावें । मग शिरादिक मुंडावे ॥१॥ अंतरीं अनिवार कामना । विरक्ति तो दाखवी जनी ॥२॥ नाम गर्जता हे होटी । एका जनार्दनीं काम पळे नेहटी ॥३॥
३३१४
सर्प बिळामाजीं रिगें । हें तो देखतीक सवेगें ॥१॥ तैसा योगियांचा योग । सर्पापरी भूमी व्यंग ॥२॥ दावितां आचारू । हासताती लहान थोरू ॥३॥ म्हणती एक कर्मठ । ऐक म्हणती योगभ्रष्ट ॥४॥ एक निंदिती वंदिती । ऐशी आहे योगस्थिती ॥५॥ यापरीस उत्तम साधन । एका जनार्दनीं शरण ॥६॥
३३१५
सर्पे धावोनि धरिल्या तोंडीं । सर्वांगा घालितसे बेडी ॥१॥ सर्पबाधेची सांकडीं । निवारी मंत्रवादी गारुडी ॥२॥ रिघतां सदगुरुसी शरण । तैसें निरसे जन्ममरण ॥३॥ संसार सर्प मिथ्या देहीं । एका जनार्दनीं सदा ध्याई ॥४॥
३३१६
सर्पें दर्दुर धरियेला मुखीं । तोही मक्षिका शेखीं धरीतसे ॥१॥ तैसें ते अभागी नेणतीच काळ । वाउगा सबळ करिती धंदा ॥२॥ नेणती नेणती रामनाम महिमा । व्यर्थ तप श्रमा शिणती वायां ॥३॥ एका जनार्दनीं तपांचें हें तप । तो हा सोपा जप श्रीरामनाम ॥४॥
३३१७
सर्व इंद्रियांचे पुरले कोड । नामवाड ऐकतां ॥१॥ हरुषें नाचतां वाळूवंटीं । गेलें कसवटीं पळूनी ॥२॥ पंचभूतें स्थिर झालीं । जीवशिवा एक चाली ॥३॥ एका जनार्दनीं मंगळ झाला । अवघा भेटला श्रीविठ्ठल ॥४॥
३३१८
सर्व कर्म मदर्पण । करितां मन शुद्ध होय ॥१॥ न्य़ुन तें चढतें जाण । करी संपुर्ण मी एक ॥२॥ माझ्या ठायीं ठेवुनी मन । करी कीर्तन आवडी ॥३॥ मन ठेवुनी माझ्या ठायीं । वसो कोठें भलते ठायीं ॥४॥ एकाजनार्दनीं मन । करा मजचि अर्पण ॥५॥
३३१९
सर्व देवांचा हा देव । उभा राहे विटेवरी ॥१॥ त्याचे ठायीं भाव माझा । न दिसे दुजा पालटु ॥२॥ वारंवार ठेवीन डोई । उगेच पायीं सर्वदा ॥३॥ न मागें भुक्ति आणि मुक्ति । संतसंगति मज गोड ॥४॥ त्यांचें वेड माझें मनीं । शरण एका जनार्दनीं ॥५॥
३३२०
सर्व देशीं सर्व जीवीं तो हरी । सर्वाठायीं सर्व भावें सर्व मुरारी ॥१॥ सर्व गांवी सर्व रुपीं भरुनी उरला । सर्व व्यापक सर्वां भूतीं तो व्यापला ॥२॥ सर्व आदि सर्व अंतीं सर्वीं सर्वे भावो । एका जनार्दनीं देखा देवाधिदेवो ॥३॥
३३२१
सर्व पर्वकाळ दत्त वदतां वाचे । आणिक सायासाचें मुळ खुंटें ॥१॥ म्हणा दत्त दत्त म्हणा दत्त दत्त । म्हणा दत्त दत्त वेळोवेळां ॥२॥ काळ वेळ कांहीं न लगे तत्त्वतां । नाम उच्चिरितां दरुशनं ॥३॥ भोळ्या भावीकांसी जप मंत्रावळी । दत्तनाम माउली सोपा जप ॥४॥ एका जनार्दनीं नामाचा प्रताप । निवारे भवताप दरुशनें ॥५॥
३३२२
सर्व भावें सुख असतां घेई अनुताप । मग करी संकल्प भजनाचा ॥१॥ ऐसा अनुताप घडतां मनासी । भजन तें सुखासी येत स्वभावेंची ॥२॥ एका जनार्दनीं अनुतापाविण । भजन प्रमाण नोहे देवा ॥३॥
३३२३
सर्व महाराजाचा रावो । विटेवरी पंढरीरावो ॥१॥ तया न जाती हे शरण । दीना घालिती लोटांगण ॥२॥ तारा म्हणतीं आम्हांसी । ऐसें अभागी ते दोषी ॥३॥ एका जनार्दनीं नाहीं भाव । तया अवघेंचि वाव ॥४॥
३३२४
सर्व साधनांचें सार । वाचे उच्चार शिवनाम ॥१॥ न लगे योगाची कसवटी । शिवनाम उच्चार होटीं ॥२॥ घडे जप तप अनुष्ठान । वाचें वदतां शिव जाण ॥३॥ एका जनार्दनीं सोपें । शिवनामें जाती पापें ॥४॥
३३२५
सर्व सामोग्री ते भरुनी ठेविली । द्वारकेसम निर्मिली सुदामपुरी ॥१॥ विश्वकर्मा येउनी वंदोनियां पाय । निर्मिला तो आहे ग्राम तेथें ॥२॥ एका जनार्दनीं ऐसें करुनी कृत्य । मग जगन्नाथ काय बोले ॥३॥
३३२६
सर्व सिद्धि मनोरथ । पंढरीनाथ पहातां ॥१॥ दैन्य दरिद्र्य तें गेलें । सुंदर पाउलें पाहतां ॥२॥ विषयांतें पळ सुटला । सुंदर सांवळां पाहतां ॥३॥ काम क्रोध विलया गेले । श्रीमुख चांगलें न्याहाळितां ॥४॥ एका जनार्दनीं बरें जाहलें । सुंदर देखिलें समचरणक ॥५॥
३३२७
सर्व सुखाची लहरी । ज्ञानाबाई अलंकापुरी ॥१॥ शिवपीठ हें जुनाट । ज्ञानाबाई तेथें मुगुट ॥२॥ वेदशास्त्र देती ग्वाही । म्हणती ज्ञानाबाई आई ॥३॥ ज्ञानाबाईचे चरणीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥
३३२८
सर्वकाळ आठवीं पाय । हाचि होय संकल्प ॥१॥ नेणें काहीं दुजीं मात । जागृती स्वप्नांत हरिविण ॥२॥ समाधि उन्मनीं आसनीं । शरण एका जनार्दनीं ॥३॥
३३२९
सर्वकाळ ज्यांचा नेम । वाचें श्रीविठ्ठलांचें नाम । दुजा नाहीं काहीं श्रम । विठ्ठल विठ्ठल वदती ॥१॥ धन्य पुण्य तया साचें । नामस्मरण नित्य वाचे । त्रीअक्षरीं नाम वाचें । धन्य त्यांचे पुण्य तें ॥२॥ ऐसा साधे जया नेम । तया सोय राखे आत्माराम । एका जनार्दनीं परम । प्रिय तो देवाचा ॥३॥
३३३०
सर्वकाळ सुख रामनामीं । ऐसा ज्याचा देह धन्य तोचि ॥१॥ जागृती सुषुप्ती रामनाम ध्यान । कार्य आणि कारण रामनामें ॥२॥ एका जनार्दनीं ध्यानीं मनीं । श्रीरामावांचुनीं आन नेणें ॥३॥
३३३१
सर्वभवें दास झालों मी उदास । तोडिला मायापाश जनार्दनें ॥१॥ माझें मज दावियलें माझें मज दावियलें । उघडें अनुभविलें परब्रह्मा ॥२॥ रविबिंबापरी प्रकाश तो केला । अंधार पळविला कामक्रोध ॥३॥ बांधलों होतो मायाममतेच्या पाशीं । तोडिलें वेगेंसी कृपादृष्टी ॥४॥ एका जनार्दनीं उघडा बोध दिला । तोचि ठसावला हृदयामाजीं ॥५॥
३३३२
सर्वभावे जे झाले उदास । धरुनियां आस कीर्तनीं ॥१॥ सर्व काळ सर्व वाचे । सर्व साचें कीर्तन ॥२॥ सर्वां देहीं सर्व वेदेहीं । सर्वां वदवीं कीर्तन ॥३॥ सर्व मनीं सर्व ध्यानीं । सर्वां ठिकाणीं कीर्तन ॥४॥ सर्व देशीं सर्व गांवीं । एका भावीं कीर्तन ॥५॥
३३३३
सर्वभावें तुज आलों मी शरण । भेटवी निधान वैकुंठीचें ॥१॥ तयावीण प्राण कासावीस होती । भेटवी श्रीपती मजलागीं ॥२॥ तुम्ही संत उदार सोइरे निजाचे । दरुशन तयाचें मज करवा ॥३॥ एका जनार्दनीं ऐशी भाकी कींव । अभिमान सर्व दुरी गेला ॥४॥
३३३४
सर्वभावें दास होती सदगुरुचे । धन्य भाग्य तयाचें काय वानूं ॥१॥ पार नाहीं सुखा तयांचिया दैवा । वांचुनी केशवा भक्ति नाहीं ॥२॥ एका जनार्दनीं सर्वभावें शरण । तनुमनधन वोवाळावें ॥३॥
३३३५
सर्वभावें विनवणी । मस्तक चरणीं देवाच्या ॥१॥ सदा रुप पहावें डोळां । वाचे चाळा हरिनाम ॥२॥ निजध्यास कीर्तनाचा । समागम तो संतांचा ॥३॥ एका शरण जनार्दनीं । ठाव मागतसे चरणीं ॥४॥
३३३६
सर्वभावें शरणागत । जाहलों निश्चित कृपाळु ॥१॥ आतां कळे तैसे करीं । तुम्हीं उदार श्रीहरी ॥२॥ मी आलों असे शरण । कृपा करणें उचितची ॥३॥ शरण एका जनार्दनीं । ऋद्धिसिद्धि तुमचे चरणीं ॥४॥
३३३७
सर्वसुखाची उघडली खाणी । श्रीमुख नयनीं पाहतां ॥१॥ मोक्षसुख आम्हां न लगे गा देवा । विश्रांतीसी ठेवा आणिकासी ॥२॥ धनसुख मज कासया हें पोटीं । पाहिजे लंगोटी सर्वभावें ॥३॥ स्त्रीसुख संसार कासया वेरझार । नको हा पसर मज देवा ॥४॥ एका जनार्दनीं नाशिवंत सुख । पाहतां तुझें मुख इच्छा पुरती ॥५॥
३३३८
सर्वस्व हरुनी म्हणसी बळीसी । म्यां बांधिलें विचारिसे कोण कोण ॥१॥ द्वारी द्वारपाळ झालासी अंकीत । सांग बुद्धिमंत ऐसा कोण ॥२॥ ऐसें नाथिलेंसी आपणा गोंविसी । एका जनार्दनीं बोल आम्हां कां ठेविसी ॥३॥
३३३९
सर्वां आदि मुळ कळे अकळ । तो भक्त प्रतिपाळ भीमातीरीं ॥१॥ योगियांच्या ध्याना न ये अनुमाना । कैलासीचा राणा ध्यात ज्यासी ॥२॥ शुकादिका ज्याचा वेध अहर्निशीं । तो उभा हृषीकेशी विटेवरी ॥३॥ एका जनार्दनीं ब्रह्मा परिपुर्ण । सगुण निर्गुण तोचि एक ॥४॥
३३४०
सर्वांगी सुवास परि तो उगला न राहे । सभोंवतें तरुवर चंदन करिताचि जाये ॥१॥ धणी धाय परी परी त्याची भुक्ति न धाये । सागर भरिता परी त्या सरिता समाये ॥२॥ वैरागर मणी पुर्ण तेजाचा होय । सभोंवतेम हारळ हिरे करिताचि जाय ॥३॥ एका जनार्दनीं पुर्ण जालासे निज । आपणासारिखें परीं तें करितसे दुजें ॥४॥
३३४१
सर्वांघटीं बिंबोनी ठेला । तो हा आला पंढरीये ॥१॥ सर्वांघटीं ज्यांची वस्ती । ते हीं मूर्ति विटेवरी ॥२॥ सर्वांठायीं भरूनि उरे । पंढरीये पुरे मापासी ॥३॥ जनार्दनाचा एका म्हणे । धन्य पेणें पंढरी ॥४॥
३३४२
सर्वांचा तो आत्मा कळली तया खूण । नामयाचें लग्न करावें तें ॥१॥ जाऊनियां स्वयें देवें माव केली । सोयरीक आणिली नामयासी ॥२॥ लग्नाचें कारण मेळविलें देखा । एका जनार्दनीं ऐका नवल चोज ॥३॥
३३४३
सर्वांचा तो आत्मा कळली तया खूण । बाळपणींचा जाण सुदामा तो ॥१॥ उठोनि सत्वर धावें आलिंगना । वैकुंठीचा राणा लवलाहे ॥२॥ एका जनार्दनीं देउनी आलिंगन । आणिला संबोखून सुदामा तो ॥३॥
३४४४
सर्वांचे जे मूळ सर्वांचे जें स्थळ । तें पद्ययुगलु विटेवरी ॥१॥ साजिरें साजिरें कर दोन्हीं कटीं । उभा असे तटीं भीवरेच्या ॥२॥ नये ध्याना मना आगमाच्या खुणा । कैलासीचा राणा ध्यात जया ॥३॥ एका जनार्दनी पुरे परता दुरी । पुंडलीकांचे द्वारीं उभा विटे ॥४॥
३४४५
सर्वांभुतीं दया । साधु म्हणावें ऐशिया ॥१॥ जग ब्रह्मरुप जाण । हेंचि सांधुचें लक्षण ॥२॥ सर्वाभुतीं समदृष्टी । तोचि साधु इये सृष्टी ॥३॥ एका जनार्दनीं संत । नित्य साधी आत्महित ॥४॥
३४४६
सर्वांमाजीं सार नाम विठोबाचे । सर्व साधनांचे घर जें कां ॥१॥ सहा चार अठरा वर्णिताती कीतीं \ नामें मोक्षप्राप्ती अर्धक्षणीं ॥२॥ शुकादिकीं नाम साधिलेंसे दृढ । प्रपंच काबाड निरसिलें ॥३॥ एका जनार्दनीं जनीं ब्रह्मनाम । तेणें नेम धर्म सर्व होय ॥४॥
३४४७
सर्वांवरी वरिष्ठ सत्ता । वाचे गातां हरिनाम ॥१॥ साधन सोपें पाहतां जगीं । सांडावी उगी तळमळ ॥२॥ रामनामें करा ध्यास । व्हा रे उदास प्रपंची ॥३॥ एका जनार्दनीं मन । करा वज्राहुनी कठीण ॥४॥
३४४८
सर्वाघटीं बिंबला व्यापुनी राहिला । पुडलिकें उभा केला विटेवरी ॥१॥ सांवळा चतुर्भुज कांसे पीतांबर । वैजयंती माळ शोभे कंठीं ॥२॥ कटावरी कर पाउलें साजिरीं । उभा तो श्रीहरीं विटेवरी ॥३॥ एका जनार्दनीं बिंबे तो बिंबला । बिंब बिंबोनी ठेला देहामाजीं ॥४॥
३४४९
सर्वाठायीं ज्याची सत्ता । तो भक्ताधीन तत्त्वता ॥१॥ ज्याची आज्ञा प्रमाण । बारा अंगुळें विचरे प्राण ॥२॥ आज्ञा ज्याची धडफुडी । पर्वत बैसका न सोडी ॥३॥ ज्याचें आज्ञेविण । पवनु न चाले एक क्षण ॥४॥ जो सर्वांसी आधार । एका जनार्दनीं विश्वभंर ॥५॥
३४५०
सर्वात्मक भरला देवो । तेथें न ठेविती भावो ॥१॥ ऐशी भुललीं कर्मासी । आचरती तीं दोषासीं ॥२॥ सर्व ठायीं व्यापक हरी । कोण द्वेषी कोण वैरी ॥३॥ ऐसे अभागी ते हीन । भोगीताती जन्मपतन ॥४॥ नको ऐसें ब्रह्माज्ञान । एका जनार्दनीं शरण ॥५॥
३४५१
सर्वाभुतीं तुझें रुप । हृदयीं सिद्धची स्वरुप ॥१॥ इतुलें देईं अधोक्षाजा । नाहीं तरी घोट भरीन तुझा ॥२॥ सकळांहुनी कई सान । सकळिका समसमान ॥३॥ सदा द्यावा संतसंग । अखंड कीर्तनीं अनुराग ॥४॥ निःशेष दवडोनियां स्वार्थ । अवघा करीं परमार्थ ॥५॥ एका जनार्दनीं मागें । नाहीं तरी घाला घालीन अंगे ॥६॥
३४५२
सर्वाभुतीं दिसे देव । जया ऐसा अनुभव ॥१॥ तया चित्तीं देव असे । जिकडे पाहे तिकडे दिसे ॥२॥ देव जन देव विजन । देवीं जडलें तन मन ॥३॥ देव घरीं देव दारीं । देव दिसे व्यवहारीं ॥४॥ देव काम देव धंदा । देवीं पावला स्वानंदा ॥५॥ देव मार्गें देव पुढें । दृष्टी चैतन्य उघडें ॥६॥ माता देव पिता देव । देवरुप स्वयमेव ॥७॥ देव बंधु देव जाया । देवरुप अवघी माया ॥८॥ देव गुण देव निर्गुण । गुणातीत देव जाण ॥९॥ देवाविण कांहीं नाहीं । ऐशी ज्याची दृष्टी पाहीं ॥१०॥ एका जनार्दनीं देव । सहज चैतन्य स्वयमेव ॥११॥
३४५३
सर्वाभुतीं सारखा भाव । येणें माया तरे जीव ॥१॥ करितां अद्वैतपणें भक्ती । तेणें जीवा जीवन्मुक्ति ॥२॥ हरिनाम भजनाच्या कल्लोळ । जीव घेउनी माया पळे ॥३॥ एक करितां हरिभक्ति । एका जनार्दनीं तृप्ती ॥४॥
३४५४
सलगीनें सर्प हातीं तो धरिला । परि डंश तो वहिला करी बापा ॥१॥ तैसें विषयासी सलगी पैं देतां । नेती अधःपाता प्राणिमात्र ॥२॥ विष उत्तम चांगलें घातलेंसे मुखीं । परि राण शोखी क्षनमात्रें ॥३॥ जाणोनी जाणोनीं नको भुलूं वायां । एका जनार्दनीं पायां भजे आधीं ॥४॥
३४५५
सलीलकमलदलाक्ष राजीवलोचनु । परे परता पाहतां निवे आमुचें मनु ॥१॥ कान्हया परम गोजरीया । कान्हया परम गोजरीया ॥ध्रु०॥ तनु मन बोधलें चित्त विगुंतले । पाहतां पाहतां मना समाधान जालें ॥२॥ ऐसा कमलगर्भींचा कंदु उभा परमानंदु । एका जनार्दना वेधु मजलागे माय ॥३॥
३४५६
सहज तो चेंडु समान फळी । झेलुं जाणेतो खेळियां बळी ॥१॥ झेला रे भाइनों झेलारे सदगुरुवचनें झेला रे ॥धृ ॥ अवघे गडी समान रहा । येतां यावा सावध पहा ॥२॥ सुटे सुटाए तंव सरिसाचि पावे । लक्ष जाणें तो माघारा नव्हें ॥३॥ गडियांने गडियची न धरावी आस । आपुलिया बळें घालावी कास ॥४॥ अभिमाना चढे तो बाहेरी पडे । हतींचे जाय मग उगलाचि रडे ॥५॥ एका जनार्दनी येकची बोली । भावार्थी तो सदगुरुवचनें झेली ॥६॥
३४५७
सहज नाम आठवितां । यमा पडे धाक सर्वथा ॥१॥ ऐसें शिवनाम समर्थ । कळिकाळ पायां पडत ॥२॥ शुद्ध भावें आठवितां । मुक्ति होय सायुज्यता ॥३॥ ऐशी आहे वेदवाणी । एका शरण जनार्दनीं ॥४॥
३४५८
सहज सहज ऐशा करिताती गोष्टी । परि सहजाची भेटी विरळा जाणें ॥१॥ सहजाच्या आवडी विद्या अविद्या तोडी । जाणीव नेणीवेची राहुं नेदी बेडी ॥२॥ जाणीव जाणपण नेणिवां नेणपण । दोहींच्या विंदाने सहजाचें दर्शन ॥३॥ एका जनार्दनीं जाणीव नेणीव । सहज चैतन्यासी देउनी ठेला खेव ॥४॥
३४५९
सहज सुखासनीं अनुसुयानंदन । पाहतां हें ध्यान वृत्ती निवे ॥१॥ बालोन्मत्त पिशाच्च त्रिविध अवस्था धरी । आपण निराकारी सोहंभावे ॥२॥ कारण प्रकाऋती न घेचि तो माथा । चिदानंद सत्ता विलसतसे ॥३॥ एका जनार्दनीं हृदयीं आसन । अखंडीत ध्यान निजतत्त्वीं ॥४॥
३४६०
सहजची पूजा पुरे । श्रम वाउगांची उरे ॥१॥ आठवीन वेळोवेळां । केशवा माधव गोपाळा ॥२॥ मंत्रस्नान विभूती । मुखीं राम जपविती ॥३॥ नाहीं आणीक काम । वाचे म्हणे रामनाम ॥४॥ एका जनार्दनीं बरवी । पूजा करीन देवदेवीं ॥५॥
३४६१
सहस्त्र मुखांचा वर्णितां भागला । तें सुख तुजला प्राप्त कैचें ॥१॥ संतांचे संगती सुख तें अपार । नाहीं पारावार सुखा भंग ॥२॥ एका जनार्दनीं सुखाचीच राशी । उभा हृषिकेशी विटेवरी ॥३॥
३४६२
सहस्त्रदल कमलाकर । कंठीं अर्पिले हार ॥१॥ सोळा बार अठरा चार । मांथां वाहुंक पुष्पभार ॥२॥ एका जनार्दनीं अलिकुळु । दत्त चरणाब्ज निर्मळू ॥३॥
३४६३
सहा चार अठरा बारा जे वर्णिती । चौदांची तों गति कुठित गे माय ॥१॥ पांचासी न कळे सात पैं भांडती । आठांची तो गति कुंठित जाली गे माय ॥२॥ नवल मौनावलें दशम स्थिरावलें । एका दशें धरिलें हृदयीं गे माय ॥३॥ द्वादशा पोटीं त्रयोदशा होटीं । एका जनार्दनाचे दृष्टी उभा गे माये ॥४॥
३४६४
सहा ते भागले वेवादती सदा । सहांची आपदा होती जगीं ॥१॥ सहांचे संगती घडतसे कर्म । सहा ते अधर्म कारिताती ॥२॥ सहांचे संगती नोहे योगप्राप्ती । होतसे फजिती सहायोगें ॥३॥ एका जनार्दनीं सहांच्या वेगळा । सातवा आठवो मज वेळोवेळां ॥४॥
३४६५
सहा शास्त्र चारी वेद । नामापासोनी प्रसिद्ध ॥१॥ तें नाम गाऊं सदा । रामकृष्ण हरि गोविंदा ॥२॥ कर्म धर्म पडतां न्यून । तें सांग हरिचिंतनें ॥३॥ योग याग तप तीर्थ । नामेंविण अवघें व्यर्थ ॥४॥ गणिका मोक्ष पदा नेली । रामनामें उद्धरली ॥५॥ तारिलें जड जीव । एका जनार्दनीं दृढ भाव ॥६॥
३४६६
सांगतां ते खुण न बिंबे पोटीं । वायां आटाआटीं करुनी काय ॥१॥ जो गुरुचें दास पुर्ण अधिकारी । ब्रह्माज्ञानी सारा तया लोभे ॥२॥ अभ्यास पुर्वीच्या पुण्य लेश जन्माचा । तैं ब्रह्माज्ञानाचा लाभ होय ॥३॥ एक जनार्दनीं पुर्ण कृपा होतां । सहज सायुज्यता पाठीं लागें ॥४॥
३४६७
सांगती ते ज्ञान तैसें । श्वान सूकरा सरिसें ॥१॥ अंगीं नसोनि वर्म । दाविताती गुणकर्म ॥२॥ द्वैताची दावणी वाढ । भुलविती रांडानाड ॥३॥ अभागी ते पामर । नर्क भोगिती अघोर ॥४॥ सांगती पुराणकथा । उभे बाजारीं सर्वथा ॥५॥ एक जनार्दनीं नाहीं भाव । तेथें कैंचा उभा देव ॥६॥
३४६८
सांगती लोकां गुरु करा । आपुली आपण शुद्धी धरा ॥१॥ त्यांचे बोलणें वितंड । शिष्य मिळती तेहीं भांड ॥२॥ उपदेशाची न कळे रीत । द्रव्यसाठीं हात पसरीत ॥३॥ ऐशा गुरुच्या ठायीं भाव । एका जनार्दनीं वाव ॥४॥
३४६९
सांगे बहु सोपया गोष्टी । करूं नेणो तो हातवटी ॥१॥ ऐसें याचें नको ज्ञान । ज्ञान नोहें तें पतन ॥२॥ सांगे लोका उपदेश । आपण नेणें तो सायास ॥३॥ शरण एका जनार्दनीं । त्याची अमंगळ वाणी ॥४॥
३४७०
सांगें ब्रह्माज्ञान गोष्टी । माते पाहतां होती कष्टी ॥१॥ काय ज्ञान ते जाळावें । वदन तयाचें तें न पाहावें ॥२॥ करी कथा सांगें पुराण । वायां मिरवी थोरपण ॥३॥ जन्मला जिचें कुशीं । तिसीं म्हणे अवदसा ऐसी ॥४॥ ऐसें नसो तें संतान । एका विनवी जनार्दन ॥५॥
३४७१
सांगेन तें धरा पोटी । वायां चावटीं बोलुं नये ॥१॥ एक नाम वदतां वाचे । कोटी जन्माचें सार्थक ॥२॥ चुके जेणें वेरझार । करी उच्चार रामनाम ॥३॥ एका जनार्दनीं साधन सोपें । संगतों जपें श्रीराम ॥४॥
३४७२
सांडा सांडा वायां छंद । धरा गोविंद मानसीं ॥१॥ नका भरुं आडरानी । सोडविता कोनी मग नाहीं ॥२॥ पडाल यमाचे पीडणीं । लक्ष चौर्‍यांयशीं पतनीं ॥३॥ एका जनार्दनीं शरण । एकपणें जनार्दन ॥४॥
३४७३
सांडिला प्रपंच जाहलोंसे उदास । सर्वभावें कास धरिली तुमची ॥१॥ आतां माझे हित करीं गा देवराया । नाही तरी वाया सहज गेलों ॥२॥ लौकिकांची चाड नाहीं मज शंका । तुम्हावांचुनी एका पाडुरंगा ॥३॥ एका जनार्दनीं पायाची आवडी । सर्व माझी जोडी नाम तुझें ॥४॥
३४७४
सांडी परापवाद खोडी । घेई विठ्ठलस्वरुपी गोडी ॥१॥ व्यर्थ टवाळाचे बोल । बोलुं नका म्हणा विठ्ठल ॥२॥ विठ्ठल विठ्ठल नेटका । भावें म्हणतां ब्रह्मा फुका ॥३॥ एका जनार्दनीं साचें । विठ्ठल विठ्ठल म्हणतां वाचे ॥४॥
३४७५
सांडी पां सांडी संसाराचा छंद । आठवी गोविंद वेळोवेळां ॥१॥ न लगे सायास न लगे सायास । आठवी श्रीहरीस मनोभावें ॥२॥ षड्‍वैरीयांचेंक तोडी पां बिरडें । करीं तूं कोरडे आशापाश ॥३॥ एका जनार्दनीं शरण स्वभावें । भोगी तूं गौरव वैकुंठीचें ॥४॥
३४७६
सांडी मांडी नको करूं । वाउगा भरूं श्रमाचा ॥१॥ जेथें तेथें धावें मन । करा खंडन तयाचें ॥२॥ नका घालुं गोंवागुंती । तेणें फजिती मागें पुढें ॥३॥ एका जनार्दनीं भाव । अवघा दिसे देवाधिदेव ॥४॥
३४७७
सांडोनिया संतसेवा । कोण हेवा मग जोडी ॥१॥ नानापरीचे साधन । अष्टांगयोग धूर्मपान ॥२॥ यज्ञ योग तीर्थकोटी । संताचिया चरणागुष्ठीं ॥३॥ एका जनार्दनीं मग । संतचरणीं समाधान ॥४॥
३४७८
सांडोनियां विठाबाई । कां रें पूजितां मेसाई ॥१॥ विठाबाई माझी माता । चरणीं लागो इचे आतां ॥२॥ अरे जोगाई तुकाई । इजपुढें बापुड्या काई ॥३॥ एका जनार्दनीं माझीं आई । तिहीं लोकीं तिची साई ॥४॥
३४७९
सांडोनी आचार करती अनाचार । ब्रह्माचा विचार न कळे ज्यांसी ॥१॥ वाहाती भार वेदाचा आधार । शास्त्रांचा संभार सांगताती ॥२॥ पुराण व्युप्तत्ती वाउग्या त्या कथा । सांगती सर्वथा हितपर ॥३॥ एका जनार्दनीं अनुभवावांचुनीं । कोरडी ती कहाणी ब्रह्माज्ञान ॥४॥
३४८०
सांपडलें होतों भ्रमाचियां जाळीं । मायामोहकल्लोळीं भ्रमत होतों ॥१॥ परी जनार्दनें केलोंसे मोकळा । दवडुनी अवकळा आशा तृष्णा ॥२॥ मीनाचिये परीतळमळ संसारीं । माझे माझें भोवरीं दृढ धरित ॥३॥ ते परतें करुनी केलेंसे सरतें । आपणापरौतें जाऊं नेदी ॥४॥ जनार्दनाचा एका लडिवाळ तान्हा । पाजी प्रेमपान्हा जनार्दन ॥५॥
३४८१
सांबें बोधियेला कृपावंत विष्णु । परब्रह्मा पुर्ण सांब माझा ॥१॥ सांब उपदेशी उमा मच्छिद्रासी । ब्रह्मारुप त्यासी केलें तेणें ॥२॥ मच्छिंद्रापासुनी चौरंगी गोरक्ष । एका जनार्दनीं अलक्ष दाखविलें ॥३॥
३४८२
सांवळा देखिला नंदाचा । तेणें आनंदाचा पुर झाला ॥१॥ काळीं घोंगडी हातामध्यें काठी । चारितो यमुनातटीं गोधनें तो ॥२॥ एका जनार्दनीं सावंळा श्रीकृष्ण । गौळणी तल्लीन पाहतां होती ॥३॥
३४८३
सांवळा श्रीकृष्ण राखितो गाई । वेधियलें मन आमुचें तें पायीं ॥१॥ नवल लाघव न कळे ब्रह्मादिकां । वेदश्रुतीं शिणल्या ठक पडलें सकळिकां ॥२॥ साही दरुशनें वेडावलीं जयासाठीं । खांदी घेऊनी कांबळा गोधन राखी जगजेठी ॥३॥ एका जनार्दनीं ब्रह्मा गोकुळीं उघडें । पाहतां चित्त तेथें वेधलें ॥४॥
३४८४
सांवळें कोंवळें ढवळें ना पिवळें । रंगरंगा वेगळें पढरींगे माये ॥१॥ चांदिणें जैसें शोभतें नभी । तैसा नट धरुनि नभी चंद्र गे माये ॥२॥ विटेवरी नीट जघनीं कर । उभा देखे परात्पर गे माये ॥३॥ एका जनार्दनीं पाहतां तयासी । मन चक्रोर तृप्त झालें गे माये ॥४॥
३४८५
सांवळें सानुलें म्हणती तान्हुलें । खेळें तें वहिलें वृंदावनीं ॥१॥ नागर गोमटें शोभे गोपवेषें । नाचत सौरसे गोपाळासीं ॥२॥ एका जनार्दनीं रुपासी वेगळें । अहं सोहमा न कळें रुप गुण ॥३॥
३४८६
साकर दिसे परि गोडी न दिसे । तें काय त्यावेगळी असे ॥१॥ तैसा जनीं आहे जनार्दन । तयांचें पहावया सांडीं अभिमान ॥२॥ कापुराअंगीं परिमळु गाढा । पाहतां उघडा केविं दिसे ॥३॥ पाठपोट जैसें नाहींच सुवर्णा । एका जनार्दन यापरी जाणा ॥४॥
३४८७
साकरेची गोडी साकर सांडुनि उभी घडी । तैसें आयुष्य जोडिलें जोडी नरदेहा ॥१॥ मातियाचें आवदाणें घालिताती अंगीं । भोगावयालागीं विषयसुख ॥२॥ गेलें गेलें बापा हित हातोहातीं । पुढें आली राती काळवंखी ॥३॥ आयुष्याच्या शेवटीं सुखाचिया गोष्टी । काळा नळा पोटीं पडसील बापा ॥४॥ सोलवी सुकृत भरूनियां मापा । विषयासाठीं पाहे पां लावितोसी ॥५॥ अमृत जोडोनि सायासी गळीं कां लावितोसी । घालूनि मत्स्यासी कवण काज ॥६॥ मिनली चिंतामणीची शिळा घोटिव चौबळा । कां रे नेउनी पायातळा रचितोसी ॥७॥ तेथें जें जें कांहीं चिंतिसी तें अधिकची पावसी । नरकासी चौपासी वाढविली ॥८॥ कल्पतरू देखोनि डोळां उभा राहुनी तया तळां । म्हणसी मर मर निर्फळा काय करूं ॥९॥ तेथें मर मर उच्चारिलें मरण अधिक जालें । तुझिया कल्पना केलें वैर तुज ॥१०॥ येवोनि ये जनीं जन्म उत्तम योगी । कां रे भजन नारायणीं चुकलासीं ॥११॥ जंववरी आयुष्य आहे तंववरी हिताची सोये । एका जनार्दनीं शरण जाये एकपणें ॥१२॥
३४८८
साक्षात्कार होतां । साच बद्धता नुरे तत्त्वतां ॥१॥ माझा होतां अनुभव । कल्पनेसी नुरे ठाव ॥२॥ माझें देखतां चरण । संसारचि नुरे जाण ॥३॥ माझी भक्ति करितां । दोष नुरेचि सर्वथा ॥४॥ सर्वांठायीं मी वसे । एकाजनार्दनीं भेद नासे ॥५॥
३४८९
साक्षीभूत आत्मा म्हणती आहे देही । वायां कां विदेही जाहला मग ॥१॥ नानामतें तर्क करितां विचार । पापांचे डोंगर अनायासें ॥२॥ देहीं असोनि देव वायां कां शिणती । एका जनार्दनीं फजिती होती तया ॥३॥
३४९०
सागरींची लहरी । मी एक म्हणे सागरीं । तैसा तुझा तुंचि तुजवरी । एकदशीं ॥१॥ शुद्ध आणि शबल । तुंचि एक सकळ । औटहात केवळ । ते तंव कल्पना तुझी ॥२॥ डोळे झाकून किती । पहासी आतौतें । बाहेर न करी ते वोस पाडुं ॥३॥ सबाह्म संमतु असतां वाडेंकोडें । एक देशीं थोडें कल्पनेसाठीं ॥४॥ लेंकुराचें खेळणीं । दिवस म्हणती जाली रजनी । उठती लटिके निजोनी । आतां उदयो जाला ॥५॥ तेथे अखंड प्रकाश पाहो । उदयो अस्त दोन्हीं वावो । तैसा भावो आणि अभावो । एका जनार्दन चरणीं ॥६॥
३४९१
साचपणें देवा शरण पैं जाती । तया वैकुंठपती विसरेना ॥१॥ जैसी कन्या दुरदेशीं एकटी । रात्रंदिवस संकटीं घोकी मायबाप ॥२॥ पतिव्रतेचें सर्व मन पतिपायीं । तैसा देव ठायीं तिष्ठतसे ॥३॥ एका जनार्दनीं मज हा अनुभव । जनार्दनें देव दाखविला ॥४॥
३४९२
साचपणें माझें करावें धांवणें । काया वाचा मनें शरण तुम्हां ॥१॥ अहो पंढरीया नका आतां दुजें । विश्रांती सहज तवचरणीं ॥२॥ एका जनार्दनीं माझा अभिमान । वाढविलें आपण म्हणोनियां ॥३॥
३४९३
साजिरें सुंदर श्रीमुख पाहतां । नाठवे ती चिंता संसाराची ॥१॥ तो हा पाडुरंग विटेवरी उभा । त्रैलोक्याचा गाभा शोभतसे ॥२॥ एका जनार्दनीं कर ठेवुनी कटीं । उभा वाळूवटीं चंद्रभागे ॥३॥
३४९४
साडंआ वाउगे ते बोल । वाचे म्हणा विठ्ठल विठ्ठल ॥१॥ तेणें तुटती यातना । भवपाश तुटेल जाणा ॥२॥ बैसला जिव्हारीं । व्यापूनि ठेला तो अंतरीं ॥३॥ एका जनार्दनीं ध्यान । ध्यानीं मनीं विठ्ठल पूर्ण ॥४॥
३४९५
सातवा तो सर्वाठायीं वसे । शंकरादिक ध्याती तया अपेक्षा ॥१॥ तो सातवा हृदयीं आठवा । आठवितो तुटे जन्ममरण ठेवा ॥२॥ सातवा हृदयीं घ्यावा जनीं वनीं पहावा । पाहुनियां ध्यावा मनामाजीं ॥३॥ एक जनार्दनीं सातवा वसे मनीं । ध्नय तो जनीं पुरुष जाणा ॥४॥
३४९६
साती भागीरथी सत्रावीची धार । सुभाक्ति ते मकर समर्पिली ॥१॥ अर्पियले स्नान झालें समाधान । मनाचें उन्मन होऊनियां ॥२॥ चित्त हें शीतळ गेली तळमळ । पाहिलें निढळ अमूर्तासी ॥३॥ एका जनार्दनीं केला जयजयकार । अत्रीवरद थोर तिन्हीं लोकीं ॥४॥
३४९७
सात्विकाभरणें रोमासी दाटणे । स्वेदाचे जीवन येऊं लागे ॥१॥ कांपे तो थरारी स्वरुप देखे नेत्री । अश्रु त्या भीतरीं वाहताती ॥२॥ आनंद होय पोटीं स्तब्ध जाती कंठीं । मौन वाक्पृटीं धरुनी राहे ॥३॥ टाकी श्वासोच्छवास अश्रुभाव देखा । जिरवुनी एका स्वरुप होय ॥४॥ एका जनार्दनीं ऐसेम अष्टभाव । उप्तन्न होतां देव कृपा करी ॥५॥
३४९८
साधक सर्वदा पुसती । कोण बाधा चित्तवृत्ती ॥१॥ एकचि गुण जैं पुरता जोडे । तैं एकविधा वृत्ती वाढे ॥२॥ एकचि न जोडे गुणावस्था । यालागीं नोहे एकविधता ॥३॥ एका जनार्दनीं पूर्ण । चित्तचैतन्य संपुर्ण ॥४॥
३४९९
साधकांसी साधतां ज्ञान । तंव आडवें येत मायविघ्न ॥१॥ म्हणोनि करा हरिचिंतन । तेणें तुटे भवबंधन ॥२॥ सांडी सांडी थोरपण । व्हावें लीन कीर्तनीं ॥३॥ शरण एका जनार्दनीं । सांडा अभिमान संतजनीं ॥४॥
३५००
साधन कांहीं नेणें मी अबला । श्याम हें रुप बैसलेंसे डोळा । लोपली चंद्रसुर्याची कळा । तो राम माझा जीवींचा । जिव्हाळा ॥१॥ राम हें माझे जीवींचे जीवन । पाहता मन हें जाले उन्मन ॥धृ०॥ प्रकाश दाटला दाही दिशा । पुढेही मार्ग न दिसे आकाशा । खुटली गति श्वासोच्छावासा । तो राम माझा भेटेल हो कैसा ॥२॥ यासी साच हो परिसा कारण । एका जनार्दनीं शरण । कृपा होय परिपूर्ण । तरीच साधे हेंसाधन ॥३॥
३५०१
साधन कांहीं नेणें मी अबळा । शाम हें रूप बैसलेंसे डोळां । लोपली चंद्रसुर्याची कळा । तो माझा राम जीवांचा जिव्हाळा ॥१॥ राम हें माझें जीवींचे जीवन । पाहतां मन हें माझें उन्मन ॥२॥ प्रकाश दाटला दाही दिशा । पुढेंही मार्ग न दिसे आकाशा । खुंटली गति श्वासोच्छ्‌‍वासा । तो राम माझा भेटेल हो कैसा ॥३॥ यासी साच हो परिसा कारण । एका जनार्दनीं शरण । त्याची कृपा होय परिपूर्ण । तरीच साधें हें साधन ॥४॥
३५०२
साधन कासया श्रम ते करावे । निवृत्तिनाम गावें सदोदित ॥१॥ तीर्थयात्रा कांहीं नाम मुखें गाईं । निवृत्तिनामें डोहीं बुडी दे का ॥२॥ एका जनार्दनीं निवृत्ति नाम सार । करीं रे उच्चार वेळोवेळां ॥३॥
३५०३
साधन तें साधा वाचे । नाम म्हणा गोविंदाचें ॥१॥ तेणें तुटेल बंधन । वाचे गातां रामकृष्ण ॥२॥ नामासरसींवाजे टाळी । महा पापा होय होळी ॥३॥ हा तो पुराणीं निश्चय । नाम निशिदिनीं गाय ॥४॥ आवडीनें नाम गाय । एका जनार्दनीं वंदी पाय ॥५॥
३५०४
साधन तें सार पंढरीचीवारी । आन तुं न करी सायासाचें ॥१॥ वेद तो घोकितां चढे अभिमान नाडेल तेणें जाण साधन तें ॥२॥ शास्त्रमतवाद कासया पसार । करी सारासार वारी एक ॥३॥ पुराण सांगतां मन वेडावलें । निंदुं जें लागलें आणिकांसी ॥४॥ ग्रंथ पाहावें तरी आयुष्य क्षणीक । व्यर्थ खटपट करुनी काई ॥५॥ एका जनार्दनीं सारांचे पैं सार । विठ्ठल त्रिअक्षर जप करी ॥६॥
३५०५
साधन नको आणिक कांहीं । करी लवलाही कीर्तन ॥१॥ मोक्ष मुक्ती ठाके पुढें । येर अवघें तें बापुडें ॥२॥ भक्ति साधे नवरत्न । कीर्तनें होती ते पावन ॥३॥ एका जनार्दनीं कीर्तन । ओहं सोहं कोहं जाती पळुन ॥४॥
३५०६
साधन सोपें नाम वाचे । पर्वत भंगती पापाचें । विश्वासितातें साचे । नाम तारक कलियुगी ॥१॥ अहोरात्र वदता वाणी । ऐसा छंद ज्याचे मनीं । त्याचेनि धन्य ही मेदिनी । तारक तो सर्वांसी ॥२॥ एका जनार्दनीं नाम । भाविकंचें पुरे काम । अभागियांतें वर्म । नव्हे नव्हे सोपारें ॥३॥
३५०७
साधनें कासया करसी रे गव्हारा । चौर्‍यांयशींचा फेरा चुकवी कांहीं ॥१॥ वाउगेंचि माझें म्हणोनि घेशी वोझें । आदी अंती तुझें कोण होती ॥२॥ वाउगीयाच्या छंद लागशी तूं मूढा । पतनाचा खोडा चुकवी वेगें ॥३॥ एका जनार्दनीं श्रीरंगवांचुनीं । धांवण्या धांवणीं कोण धांवे ॥४॥
३५०८
साधावया परमार्था । साह्य नव्हती माता पिता ॥१॥ साह्म न होताव्याहीं जांवई । आपणा आपणा साह्म पाहीं ॥२॥ साह्म सदगुरु समर्थ । तेंचि करिती स्वहित ॥३॥ एका जनार्दनीं शरण । नोहें एकपणावांचून ॥४॥
३५०९
साधावया स्वरुपसिद्धी । सिद्ध साधका समाधी । बैसोनि ध्यानस्थ बुद्धी । परी तो हरी न सांपडे ॥१॥ धन्य धन्य वैष्णवसंग । खेळे तेथे पांडुरंग । कीर्तनीं नाचतसे स्वयंभ । सदा काळ सर्वदा ॥२॥ घेतां नाम धांवे विठ्ठल । नको तप नको मोल । न लगती कष्ट बहुसाल । तो कृपाळु दीनांचा ॥३॥ एका जनार्दनीं शरण । भक्तीस तुष्टें नारायन । त्यांचे करितां चिंतन । आपोआप येतसे ॥४॥
३५१०
साधिता साधन योगी शिणताती । तेथें तुझी मति काय बापा ॥१॥ उलट पालट न करी गोल्हाट । आहे तोचि नीट पाहे बापा ॥२॥ पंचाग्नी साधन धूम्रपान यज्ञ । आहे तो संपूर्ण उभा बापा ॥३॥ साधन खटपट वाउगा तो बोभाट । एका जनार्दनी नीट उभा बापा ॥४॥
३५११
साधु म्हणावें तयासी । दया क्षमा ज्याच्या दासी ॥१॥ जयापाशी नित्य शांती । संत जाणा आत्मस्थिती ॥२॥ ऋद्धिसिद्धि त्यांच्या दासी । भुक्ति मुक्ति पायांपाशी ॥३॥ एका जनार्दनीं साधु । जयापाशी आत्मबोधु ॥४॥
३५१२
सानपणासाठीं गर्भवास सोसी जगजेठी ॥१॥ सानपण भलें सानपण भलें । सानपण भलें संतापायीं ॥२॥ एका जनार्दनीं सानपणावांचुनीं । कैवल्याचा धनी हातां नये ॥३॥
३५१३
सानपणें तरले अनंत भक्त अपार । जाणिवेचा भार टाकूनियां ॥१॥ सानपणें शुक व्यास नारदमुनि । जाहले मुगुटमणी सानपणें ॥२॥ सानपणें गज तारिली गणिका । उद्धरिला देखा अजामिळ ॥३॥ एका जनार्दनीं सानपणावांचुनी । न चुके आयणी प्रपंचाची ॥४॥
३५१४
सानपणें धूरु अढळी बैसला । सानपणें केला कृतकृत्य ॥१॥ सानपणें प्रल्हादें साधियेलें काज । सानपणें सहज बळी पूजी ॥२॥ सानपणें बिभीषण शरण आला । राज्यधर केला श्रीरामें त्यासी ॥३॥ एका जनार्दनें सानपणावांचुनी । ब्रह्माज्ञान जनीं नातुडेची ॥४॥
३५१५
सानपणें साधे सर्व येत हातां । जाणीवेने तत्त्वती नागवशी ॥१॥ महापुर येतां वृक्ष तेथें जाती । लव्हाळें राहती नवल कैंचे ॥२॥ चंदनाचे संगें तरुवर चंदन । सानवण कारण संगतीचें ॥३॥ संतांचे संगतीं अभाविक तरती । एका जनार्दनीं निश्चितीं सानपणें ॥४॥
३५१६
सानुले तानुले राम आणि कृष्ण । गोकुळीं विंदान दाविताती ॥१॥ गाई राखिताती लोनी चोरिताती । अकळ खेळताती नानापरी ॥२॥ एका जनार्दनी नये अनुमाना । ब्रह्मादिक चरणा वंदिताती ॥३॥
३५१७
सायासाचा न करी सोस । एक आंस संतचरणी ॥१॥ नावडे वैभव विलास मनीं । अनुदिनीं संतसेवा ॥२॥ पेमें प्रेम दुणावलें । सुख जाहलें सुखासी ॥३॥ एका जनार्दनीं शरण । संतचरण वंदी माथां ॥४॥
३५१८
सायासाचा श्रम न करुं पसारा । विठ्ठलाची बरा वाचे गातां ॥१॥ गोडपणें मिठी पडलीसे जीवां । कायामनें हेवा दुजा नाहीं ॥२॥ या विठ्ठलापारतें न करीं साधन । देखेन समचरण विटेवरी ॥३॥ एका जनार्दनीं विठ्ठलाची भेटी । सरलीसे तुटी गर्भवास ॥४॥
३५१९
सायासाचें बळ । तें आजी जाहलें अनुकुळ ॥१॥ धन्य जाहलें धन्य जाहलें । देवा देखिलें हृदयीं ॥२॥ एका जनार्दनीं संशय फिटला । देव तो देखिला चतुर्भुज ॥३॥
३५२०
सारांचे सार गुह्मांचें निजगुह्मा । तें हें उभें आहे पंढरेये ॥१॥ चहुं वांचापरतें वेदां जें आरुतें । ते उभे आहे सरतें पंढरीये ॥२॥ शास्त्रांचें निज सार निगमां न कळे पार । तोचि हा परात्पर पंढरीये ॥३॥ एका जनार्दनी भरुनि उरला । तोचि हा देखिला पंढरीये ॥४॥
३५२१
सारुनी दृश्य देखतां जालीसे ऐक्याता । पाहे कृष्णनाथा पंढरीये ॥१॥ कर ठेउनी कंटीं बुंथी वाळुवंटीं । वैजयंती कंठीं आती माझी ॥२॥ एका जनार्दनींशरण त्याची कृपा पूर्ण । पाहतां पाहतां मन हारपालें ॥३॥
३५२२
सारुनी भोजनें कीर्तनीं बैसले । थोरीव वर्णिले विठोबाचे ॥१॥ प्रात:काळीं स्त्रियांसहित तो गोरा । निघालासे त्वरा पंढरीये ॥२॥ संतसमुदाय सवें पैं असती । पावलें त्वरित भीमातीरीं ॥३॥ एका जनार्दनीं करुनियां स्नान । घेतिलें दरुशन पुंडलिकाचें ॥४॥
३५२३
सावध ऐकें साजणी । प्रवेशतां रामानुसंधांनीं । चित्त चित्तपणा विसरुणी । राम होउनी स्वयें राहे ॥१॥ द्रष्टा परिछिन्न होय । तैं दृश्य दृश्यत्वें दिसों लाहे । श्रीराम स्वयें तैसा नोहे । परी तें माय सांगेन ॥२॥ श्रीराम हो उनी व्याप्य एक । असतां राम होआवें व्यापक । त्रिपुटीचा आभावो देख । व्याप्य व्यापक तेथें कैचें ॥३॥ म्हणती सर्वांच्या अंतरीं । राम असे चराचरीं । तो रावणाचे शरीरीं । एका जनार्दनीं नांदत ॥४॥
३५२४
सावध पाहतां तुम्हीं ज्ञानाचें अज्ञान । मानूं तोचि म्हणे महंता महाधन ॥१॥ ज्ञानाचें अज्ञान कवण ज्ञाता फेडी । अनुतापाची जंव जीवीं नाहीं आवडी ॥२॥ नश्वर देह म्हणती ज्ञानेंच निंदिजे । तोचि देह घेउनी ज्ञातेपणे फुंजें ॥३॥ सच्चिदानंद माया या नांवें । याहुनी परती स्थिति तें तें ज्ञान जाणावें ॥४॥ एका जनार्दनीं अनुतापाची गोडी । ज्ञानाज्ञानाची तोडोनि सांडिली बेडी ॥५॥
३५२५
सावधान सर्व आहे । तुझे हात आणि पाय । तोंवरीं तूं जाय । तीर्थयात्रेकारणेकं ॥१॥ सरलीया आयुष्यकाळ । इंद्रिये होतील विकळ । कांही न चाले बळ । वाउगी ते तळमळ ॥२॥ डोळे कान नाक आहे । तोंवरी संतां शरण जाय । हीं मावळलीया होय । हाय हाय तुजलागीं ॥३॥ काय म्हणशी माझें माझें । हें तों शेवटींचें वोझें । एका जनार्दनीं दुजें । तुज कोण सोडवील ॥४॥
३५२६
सिद्धि साधक जया ह्रुदयीं ध्याती । तो गोपिकेचा पती विठ्ठलराव ॥१॥ सांवळे सांवळें रुप तें सांवळें । देखितांचि डोळे प्रेमयुक्त ॥२॥ जीवांचें जीवन मनांचे उन्मन । चैतन्यघन पूर्ण विटेवरी ॥३॥ एका जनार्दनीं आनंद अद्वय । न कळें त्यांची सोय ब्रह्मादिकां ॥४॥
३५२७
सीमगीयाचे सणीं । रामकृष्ण न म्हणे कोण्ही ॥१॥ महाशब्द उच्चारण । कैसे भुलले अज्ञान ॥२॥ गजरें शब्द करी । एका जनार्दनीं म्हणा हरी ॥३॥
३५२८
सुंदर तें ध्यान मांडिवर घेउनी । कौसल्या जननी गीतीं गाये ॥१॥ सुंदर तें ध्यान नंदाच्या अंगणीं । गोपाळ गौळनी खेळताती ॥२॥ सुंदर ते ध्यान चंद्रभागे तटीं । पुंडलिकापाठीं उभे असे ॥३॥ सुंदर ते ध्यान एका जनार्दनीं । जनीं वनीं मनीं भरलासे ॥४॥
३५२९
सुंदर बाळका म्हणती गोपिका यशोदा रोहिणी सन्मुखा । आदि नाटका नाच व्यापका मिळालिया अनेका । सर्व पाळका सकळ चाळका सुखदाता सकळिका । धिमी धिमी बाळा नाचे वहिला म्हणती मायादिका ॥१॥ कृष्णा नाव रे व्यापका । म्हणाताती गोपिका ॥धृ॥ दणदण मेदनी वाजत वाम चरणनिघातें । थोंगीत थोंगीत थाक तोडीत चित्त अनुकारें संगीतें । टाळछंदें मन वेधें टाळी वाजे अनुहातें । धिम धिम धिमतांग थोंकीत ताळछंदें सांवळें नाचतें ॥२॥ गुप्त प्रगटीत थाक दावित स्थुळ सुक्ष्म आनंदें । धिगीतां धिगीतां वाजती गजरें शास्त्राचेनी विवादें । घटतन घटतनं शब्दे बोलती तार्किक गेले भेदें । गर गर गर गर भोवरी देत अवतार संबंधे ॥३॥ रणुझुणु रणझुणु वाजती श्रुति नेति नेति उअच्चारी । आत्मा हा व्यापक नाटक त्रैलोक्य पडलें फेरी । यशोदा रोहिणी वृद्ध गौळणी नाचत देह विसरी । पक्षी चारा विसरलें पवन मुख पसरे अंबरी ॥४॥ देव विमानीं पहाती गगनीं ब्रह्मा नाचताहे येउनी । इंद्र ऐरावत नाचत जवळील ब्रह्मास्पती तो मुनी । गण गधर्व देव सर्व तेहतीस कोटी मिळोनी । कुबेर पोटा नाचत मोठा कृष्णांछंन घेउनी ॥५॥ शेष वासुकि नाचत वेंगीं चवदा भुवनें माथां । वराह गाढा पृथ्वी दाढां नाचे विसरुनि चिंता । तृणें तरुवरें पर्वत कुंजर लाचावले अनंता । सगुण निर्गुण अजंगम स्थावर वेधले अच्युता ॥६॥ घुळु घुळु घुळु घुळु कंकण वाजती बाहुभूषित भूषणां । तो परात्पर त्रैलोक्य सुंदर जगाचिया जीवना । खुण खुण संतबोलती संत घांगुरले हरिचरणा । दृष्टी देखिला सबाह्म निवाला एकशरण जनार्दना ॥७॥
३५३०
सुंदर मुख साजिरें कस्तुरी मळवटीं । मुरली वाजवीत उभा यमुनेचे तटीं । गोपवेष शोभे खांदा कांबळी हातीं काठी । तो नंदनंदन देखीला जगजेठी वो ॥१॥ मजुंळ मंजुळ वाजवी मुरली । ऐकता माझी चित्तवृत्ति हरली ॥धृ ॥ चारी वेद जया गाताती आनंदें । तो गोकुळीं गाई चारी परमानंदें । श्रुतिशास्त्रें वेधला जयाचिया छंदें । तया गोवळा म्हणती कान्हा आनंदें ॥२॥ ऐशी आवडी भक्तिंची देखा । उच्छिष्ट खातां कांहीं न धरी शंका । एका जनार्दनीं भुलला तयाचिया । सुखा वैकुंठ नावडेचि देखा ॥३॥
३५३१
सुंदर विभुति लावी अंगीं । मिरवी जगीं भूषण ॥१॥ घालूनियां गळां माळा । वागवी गबाळा वोंगळ ॥२॥ नेणे कधीं योगयाग । दावी सोंग भाविका ॥३॥ एका जनार्दनीं भाव । नाहें तेथें कदा देव ॥४॥
३५३२
सुंदरु बाळपणाची बुंथी घेऊनी श्रीपती । सनकादिकां गाती तेथें कुंठित गे माय ॥१॥ ब्रह्मा वेडावलें ते वेंडावलें । पुंडलिकाधीन झालें गे माय ॥२॥ इंद्र चंद्र गुरु उपरमोनी जया सुखा । तो वाळूवंटीं देखा संतासवें गे माय ॥३॥ ऐसा नटधारी मनु सर्वांचे हरी । एका जनार्दनाचे करीं उच्छिष्ट खाय ॥४॥
३५३३
सुकुमार हरीची पाउलें । सुंदर हरीचीं पाउलें ॥१॥ भीमातटीं देखिलें । वोळलें तें पुंडलिका ॥२॥ शेषशयनीं जी पाउलें । लक्ष्मीकरीं तीं पाउलें ॥३॥ गरुडपृष्ठी जी पाउलें । बळीयागीं तीं पाउलें ॥४॥ विटेवरीं जी पाउलें । एका जनार्दनीं तीं पाउलें ॥५॥
३५३४
सुख अनुपम्य संतसमागमें । अखंड दुणावतें नामें । दहन होती सकळ कर्में । आणिक वर्म दुजें नाहीं ॥१॥ वाचे म्हणे कृष्णहरी । तेणें पापा होय बोहरी । संसारासी नुरे उरी । हा महिमा सत्संगाचा ॥२॥ काशी प्रयागादि तीर्थे बरी । बहुत असती महीवरी । परी संतसमागमाची थोरी । तीर्थे न पावती सर्वदा ॥३॥ असती दैवतें अनंत कोटी । परी संतसमागमक भेटी । दैवती सामर्थ्य हिंपुटी । हा महिमा संतांचा ॥४॥ एका जनार्दनीं मन । संतचरणीं दृढ ध्यान । तेणें प्राप्त सच्चिदानंदघन । विठ्ठल देव विसंबे ॥५॥
३५३५
सुख अपार संतसंगीं । दुजें अंगीं न दिसे कोठे ॥१॥ बहु सुख बहुता परी । येथेंची सई नसेची ॥२॥ स्त्रिया पुत्र धन सुख । नाशिवंत देख शेवटीं ॥३॥ एका जनार्दनीं संतसुखा । नोहे लेखा ब्रह्मांडी ॥४॥
३५३६
सुख एक आहे हरि आठवितां । इतर जपतां दुःख बहु ॥१॥ ऐशी आठवण धरूनि मानसीं । हरि गावा मुखासी दिननिशीं ॥२॥ सारे दिन करा संसाराचा हेत । परी भजनीं प्रीत असों द्यावी ॥३॥ एका जनार्दनी धरूनि विश्वास । होई कां रे दास संतचरणीं ॥४॥
३५३७
सुख बहु असे आम्हां । तुझा गातां नाममहिमा । तेणें अंगी होतसे प्रेमा । नामीं दृढता सदोदित ॥१॥ तें नाम सोपें जयराम । भवसिंधुतारक निष्काम । मुखें गातां उत्तमोत्तम । सुलभ आणि सोपारे ॥२॥ नाम नौका जगालागीं । नामें पावन होत कलियुगीं । एका जनार्दनीं मुराला अंगीं । पावन होय नाम घेता ॥३॥
३५३८
सुख रामनामें अपार । शंकर जाणें तो विचार ॥१॥ गणिका जाणें रामनाम । गजेंद्र उद्धरिला राम ॥२॥ शिळा मुक्त केली । रामनामें पदा गेली ॥३॥ तारिले वानर । रामनामें ते साचार ॥४॥ रामनामें ऐसी ख्याती । एका जनार्दनीं प्रीती ॥५॥
३५३९
सुखकर मुर्ति रुप रेखेवीण । उभा असे व्यापुन ब्रह्मांडी गे माय ॥१॥ वेधला जीऊ तयाचिया गुणा । क्षणभरी न बिसंबे दिवकीनंदना ॥२॥ सकळ विश्रांती घर चंद्रभागा तीर । एका जनार्दनीं मनोहर गोमटें गे माय ॥३॥
३५४०
सुखदुःखांचिया कोडी । संतदरुशनें तोडी बेडी ॥१॥ थोर मायेचा खटाटोप । संतदरुशनें नुरे ताप ॥२॥ चार देहांची पैं वार्ता । संतदरुशनें तुटे तत्त्वतां ॥३॥ एका जनार्दनीं संत । सबाह्म अभ्यंतर देहातीत ॥४॥
३५४१
सुखरुप धन्य जाणावा संसारी । सदा वाचे हरि उच्चारी जो ॥१॥ रामकृष्णानाम वदे वेळोवेळां । हृदयीं कळवळां संतभेटी ॥२॥ एका जनार्दनीं प्रेमाचा कल्लोळ । भुक्ति मुक्ति सकळ वसे देव ॥३॥
३५४२
सुखरूप असतां म्हणे माझें माझें । संकट देखोनियां घाली देवावरी वोझें ॥१॥ पापी तो अधममती । कदा नेणे नामस्मरण गती ॥२॥ नामावांचोनि गती नाहीं । ऐसेंक वेदशास्त्र बोलती पाहीं ॥३॥ एका जनार्दनीं म्हणे भुलला । पुनः अधम जन्मा आला ॥४॥
३५४३
सुखवोनि पतंग दीपावरी पडे । परि शेवटीं जोडे देह अंत ॥१॥ तैसे प्राणिमात्र संसारीं भुलले । कष्ट ते उगले करिताती ॥२॥ भिलाव्याचें परी प्रपंच गोमटा । परी काढी चपेटा अंतरींचा ॥३॥ एका जनार्दनीं भुलले पामर । वायां नरक घोर भोगिताती ॥४॥
३५४४
सुखाची विश्रांति सुख समाधान । मनाचें उन्मन नाम गाता ॥१॥ तेंहें नाम सोपें रामकृष्ण हरी । प्रपंच बाहेरी उच्चारितां ॥२॥ अहं भाव द्वेष नुरे ती वासना । द्वैताची भावना दुरी ठाके ॥३॥ एका जनार्दनी नांम हे सोपारे । येणेंचि पैं सरे भवसिंधु ॥४॥
३५४५
सुखे संसारा हा करी । वाचे उच्चारावा हरी ॥१॥ दुःखरूप हा संसार । रामनामें सुख साचार ॥२॥ रामनामाचें स्मरण । नाश पावे जन्ममरण ॥३॥ जयापाशीं नाम असे । नारायण तेथें वसे ॥४॥ एका जनार्दनीं नाम । संसार हा परब्रह्मा ॥५॥
३५४६
सुखें मुख सोज्वळ पहातां दृष्टी । आनंदी आनंदमय तेणे सृष्टी ॥१॥ देखिला देखिला वैष्णवांचा रावो । देवाधिदेवी श्रीविठ्ठल ॥२॥ गोपाळ गजरीं नाचतीं आनंदें । लीला विनोदें प्रेमरसें ॥३॥ भावाचा अंकित उगा रहए उभा । धन्य त्याची शोभा काय वानूं ॥४॥ पाहतां पाहतां मन धालें सृष्टी । जनार्दनाचा एका परमानंदें पोटीं ॥५॥
३५४७
सुटला म्हणतां बांधला होता । मुक्त म्हणे त्याचें अंगीं ये बद्धता ॥१॥ बद्धता येथें नाहीं मुक्त ते काई । भ्रांती दो ठाई झोंबतसे ॥२॥ स्वप्नीचेनि सुखे सुखासनीं बैसे । जागा जालिया कांहींच नसे ॥३॥ एका जनार्दनीं एकापणा तुटी । बद्ध मोक्षाची तेथें वार्ताहि नुठी ॥४॥
३५४८
सुदर्शन घेऊनि हातीं । पावला तो लक्ष्मीपती ।देखतांची श्रीपती । तन्मय बाळ जाला ॥१॥ बाळकें धरिले चरण । देवें दिधलें आलिंगन । करें कुर्वाळुनी वदन । चुंबनाते दिधले ॥२॥ देव म्हणे बाळकातें । काय अपेक्षा माग मातें । बाळ बोले दूधभातें । मातें देईं सत्वर ॥३॥ हासे वैकुंठीचा राणा । बाळक हें अज्ञाना । एका जनार्दनीं शरण । काय मागणें मागत ॥४॥
३५४९
सुदामा सवंगडी । त्याची बहु गोडी हरीसी ॥१॥ बाळपणीं खेळले खेळ । विद्या सकळ गुरुगृहीं ॥२॥ कृष्ण द्वारकेसी आला । सुदामा राहिला सुदामपुरीं ॥३॥ एका जनार्दनीं साचे । परिसा चरित्र भक्ताचें ॥४॥
३५५०
सुर्य आहे डोळा नाहीं । तेथें पाहणें न चले कांहीं ॥१॥ सुर्य आणि दृष्टी दोन्हीं आहे । परि दृश्य पाहणें नाहीं होय ॥२॥ सुर्य प्रकाशी रूपासी । एका जनार्दनीं स्वरुपासी ॥३॥
३५५१
सुलभ सोपारें नाम मुखीं गातां । पातकांच्या चळथा कांपताती ॥१॥ हरिनाम सार वाचे तो उच्चार । तरलें नारीनर नाममात्रें ॥२॥ वेदांत सिद्धांत तयांचा संकेत । नामें होती मुक्त महापापी ॥३॥ एका जनार्दनीं वेदांचें निजसार । नाम परात्पर जपती सर्व ॥४॥
३५५२
सूर्य अंधारांतें नासी । परी तो सन्मुख नये त्यासी ॥१॥ माझें जिणें देखणेपण । तेंचि मायेचें लक्षण ॥२॥ देहीं देहअभिमान । जीवीं मायेचें तें ध्यान ॥३॥ एका जनार्दनीं माया । देहाधीन देवाराया ॥४॥
३५५३
सेवितां कथासार अमृत । तेणें गोड जाले भक्त ॥१॥ मातले मरणातें मारिती । धाके पळती यमदुत ॥२॥ प्रेमें नाचे कथामेळीं । सुखकल्लोळीं हरिनाम ॥३॥ गर्जती नाम सदा वाचे । एका जनार्दनी तेथें नाचे ॥४॥
३५५४
सेवेंचे कारण मुख्य तो सदभाव । इतर ते वाव इंद्रिय बाधा ॥१॥ साधन हेंचि साधी तोडी तूं उपाधी । नका ऋद्धिसिद्धि आणिक कांही ॥२॥ नामाचा उच्चार मुख्य हेचि भक्ति । एका जनार्दनीं विरक्ति तेणें जोडें ॥३॥
३५५५
सेवेची आवडी । आराम नाहीं अर्धघडी ॥१॥ नित्य करितां गुरुसेवा । प्रेम पडीभर होत जीवा ॥२॥ आळस येवोची सरला । आराणुकेचा ठावो गेला ॥३॥ तहान विसरली जीवन । भूक विसरली मिष्टान्न ॥४॥ जांभईसी वाव पुरता । सवड नाहींची तत्त्वतां ॥५॥ ऐसें सेवे गुंतलें मन । एका जनार्दनीं शरण ॥६॥
३५५६
सैराटगोधनें चालती वनां । तयामागें चाले वैकुंठीचा राणा ॥१॥ सांवळे चतुर्भुज मेघःश्याम वर्ण । गाईगोपाळां समवेदा खेळे मनमोहन ॥२॥ यमुनेचे पाबळीं मिळोनियां सकळीं । खेळें चेंडुफळी गाडियांसम ॥३॥ एका जनार्दनीं मदनपुतळा । देखियेला डोळां नंदरायाचा ॥४॥
३५५७
सोईरे धाईरे आम्हीं संतजन । तयाविण चिंतन आन नाहीं ॥१॥ हाचि माझा बहव हीच माझी भक्ति । आणिक विश्रांती दुजी नाहीं ॥२॥ हेंचि माझे कर्म हाचि माझा धर्म । वाउगाचि श्रम न करी दुजा ॥३॥ हेंचि माझे ज्ञान हेंचि माझे विज्ञान । संताविन शरण न जाय कोणा ॥४॥ एका जनार्दनीं हा माझा निश्चय । वंदिन मी पाय सर्वभावें ॥५॥
३५५८
सोनियांचा देव सोनियाचें देऊळ । सोनियांचा भक्त पूजी सोनियाच्या कमलें ॥१॥ नामची पैं रूप तें अभिन्न । जगीं जनार्दन तोचि पाहे ॥२॥ मृत्तिकेचा घट मृत्तिकेची वेळणी । मृत्तिकेचें आळें तेथें मृत्तिकेची माथणी ॥३॥ भिन्न भिन्नाकारीं मृत्तिका दिसते. साकार । एका जनार्दनीं निज निर्विकार ॥४॥
३५५९
सोनियाचा दिवस आजी झाला । संतसमागम पावला ॥१॥ तेणें फिटलें अवघें कोडें । झालें परब्रह्मा उघडें ॥२॥ एका जनार्दनीं सेवा । करीन मी त्याची भावां ॥३॥
३५६०
सोपा मंत्र द्वदश अक्षरीं । वाचे जपे तुं निर्धारीं । अंतकाळीं हरी । न विंसबे तुजसी ॥१॥ धन्य धन्य मंत्रराज । तेणें साधिलें बहुकाज । आम्हं सांपडले निज । वैकुंठभुवनाचें निर्धारें ॥२॥ मन करीं गा बळकट । जपे वरिष्ठावरिष्ठ । एका जनार्दनीं वाट । सोपी मग सहजची ॥३॥
३५६१
सोपा मंत्र वाचे हरीहरी म्हणा । तुटेल बंधना यमाचिया ॥१॥ न करी आळस हाचि उपदेश । येणें सावकाश तरती जगीं ॥२॥ कलीमाजीं सोपें रामनाम ध्यान । यापरतें साधना आन नाही ॥३॥ एका जनार्दनीं न करीं आळस । रामनाम घोष मुखें करीं ॥४॥
३५६२
सोपा वृक्ष फळासी आला । विठ्ठलनामें विस्तारला ॥१॥ वेदां न कळे मूळ शेंडा । शास्त्रें भांडतां पैं तोंडा ॥२॥ पुराणें स्तवितां व्याकुळ जाहलीं । निवांत होऊनियां ठेली ॥३॥ मूळ वृक्ष जनार्दन । एका जनार्दनीं विस्तार पूर्ण ॥४॥
३५६३
सोपानदेव नाम पावन परम । आणिक उत्तम जप नाहीं ॥१॥ माझ्या मना तूं करी कां रे लाहो । सोपानदेव ध्यावो ह्रदयामाजीं ॥२॥ ब्रह्मा अवतार नाम हें सोपान । केलेंसे पावन चराचर ॥३॥ एका जनार्दनीं सोपानाच्या पायीं । ठेवितसे डोई काया वाचा ॥४॥
३५६४
सोपी नामावळी । वाचे वदावी सकळीं ॥१॥ उंच नीच वर्ण याती । रामनामें सर्वां मुक्ति ॥२॥ हा तो पुरणी अनुभव । तारियेलें जीव सर्व ॥३॥ येतों काकुळती । रामनाम धरा चित्तीं ॥४॥ एका जनार्दनीं राम । वदती दोषी निष्काम ॥५॥
३५६५
सोपें वर्म अति सुगम । मुखे स्मरा रामनाम ॥१॥ ऐसा गजर नामाचा । कर्माकर्म लेश कैंचा ॥२॥ नामें पाप निर्दाळिलें । वेद शास्त्र हेंचि बोले ॥३॥ पुरणाचें हें संमत । नाम मुख्य मतितार्थ ॥४॥ एका जनार्दनीं नाम । तेणें निरसे कर्माकर्म ॥५॥
३५६६
सोमवार व्रत एकादशीं करी । त्याचें चरण शिरीं वंदीन मी ॥१॥ शिव विष्णु दोन्हीं एकचि प्रतिमा । ऐसा जया प्रेमा वंदिन त्यासी ॥२॥ सदा सर्वकाळ शिवाचें कीर्तन । आनंदें नर्तन भेदरहित ॥३॥ ऐसा जया भाव सदोदित मनीं । तयाचें चरणीं मिठी घाली ॥४॥ एका जनार्दनीं व्रताचा महिमा । नकळेंचि ब्रह्मा उपरमला ॥५॥
३५६७
सोलींव ब्रह्माज्ञान सांगत जे गोष्टी । तें उघड नाचे दृष्टी संतासंगें ॥१॥ गळां तुळशीहार मुद्रांचें श्रृंगार । नामाचा गजर टाळ घोळ ॥२॥ दिंडी गरुड टक्के मकरंद वैभव । हारुषें नाचे देव तया सुखी ॥३॥ एका जनार्दनीं सुखाची मादुस । जनार्दनें समरस केलें मज ॥४॥
३५६८
सोळा सहस्त्र गोपी भोगुनी बह्माचारी । ऐशी अगाध कीर्ति तुमची श्रीहरी ॥१॥ दीन आम्ही रंक वंदितों चरणा । सांभाळीं दीनांलागीं मानसमोहना ॥२॥ एका जनार्दनीं धन्य धन्य लाघव । एकरुपें असोनी दिसों नेदी कैसें वैभव ॥३॥
३५६९
सोहं नव्हे नाद । कर्णद्वयाचा भेद । लक्ष भूमध्य । नव्हें सोहं ॥१॥ चवदा चक्रें बावन्न मात्रा । अकार उकार मकारा । यासी जाणें अर्धमात्रा । तेंचि सोहं ॥२॥ अधिष्ठानीं सहाशे जप । स्वाधिष्ठांनी सहाशंजप तितुकें वोळखा निःशेष मणीपुरीं ॥३॥ अनुहातीं सहस्त्र । विशुद्ध अग्नी चक्र सहस्त्र । तीन ठायीं तीन सहस्त्र । जप होय ॥४॥ एकवीस सहस्त्र साशत । हें अवघेचि मारुत । त्यासी सोहं म्हणत । ते नाडिले ॥५॥ एका जनार्दनीं । सोहं नाहे पवन । पवनाचें वर्तन । सोहं सत्ता ॥६॥
३५७०
सोहं नव्हें प्रपंच ज्ञान । अंतःकरण चतुष्टय योजन । इंद्रियांचे वर्तन । नव्हे सोहं ॥१॥ सोहं नव्हें विषयपंचक । सोहं नव्हे त्रैशोधक । सोहमाचा विवेक । विरळाचि जाणे ॥२॥ सकार जाण माया । हंकार पुरुष शिष्यमय । शबक शुद्ध इये । जाणावें पैं गा ॥३॥ ब्रह्मा विष्णु महेश्वर । हा शबल पैं सकार । शुद्ध तो हंकार । ईश्वर पैं ॥४॥ स्थुल सूक्ष्म कारण । हा सकारचि जाण । हंकार तो महाकारण । ज्ञानरुप ॥५॥ एक जनार्दनीं तूर्या । सोहं तें दैवी माया । साक्षित्वें जाण असें श्रोतिया । सांगितलें ॥६॥
३५७१
सोहमाची साक्षा मंत्र तोचि दीक्षा । तयाची परीक्षा सांगा मज ॥१॥ सोहमाचें ज्ञान निवडोनियां खूण । अनुभव मज जाण करावा जी ॥२॥ ऐसें श्रोते जन विनंति करुन । एका जनार्दन नमस्कारिला ॥३॥
३५७२
स्त्रियांचें सगतीं । नोहें परमार्थ निश्चिती ॥१॥ स्वप्नीं होतां दरुशन । तेथेंच गुंततसे मन ॥२॥ पहा स्त्रियांच्या अंगसंगे । भुलविला ऋषिश्रृंग ॥३॥ विश्वामित्र तपिया खाणी । कुत्रा करूनी हिंडे वनीं ॥४॥ ऐसे भुलले थोर थोर । तेथें जीव किती पामर ॥५॥ एका जनार्दनीं भुलले । वायां स्त्रीसंगीं गुंतलें ॥६॥
३५७३
स्त्री पुत्र दारा धन । देखोनियां नाचे श्वान ॥१॥ जातां बळें कीर्तनीं । बका ऐसा बैसे ध्वनीं ॥२॥ लक्ष ठेउनी बाहेरी । वरवर डोले दुराचारी ॥३॥ एका जनार्दनीं म्हणे। श्वानापरि त्याचें जिणें ॥४॥
३५७४
स्थापक व्यापक सर्वदेशीं भरला । पाहतां तो भला पंढरीये ॥१॥ असोनियां नसे नसोनियां असे । योगिया हृदयीं वसे दृष्टीं न पडे ॥२॥ एका जनार्दनीं भुवैकुंठनायक । उभा असे सम्यक विटेवरी ॥३॥
३५७५
स्थिर करुनियां मन । वाचें गावा जनार्दन ॥१॥ तुटती बंधनें । यमयातनेची ॥२॥ ऐशी विठ्ठल माऊली । वाचे स्मरा वेळोवेळी । कळिकाळाची चाली । होऊं नेदी सर्वथा ॥३॥ कापालिया काळ । येथें न चले त्यांचे बळ । वाउगा पाल्हाळ । सांडा सांडा परता ॥४॥ धरा विश्वासा दृढ मनीं । लक्ष लावावें चरणीं । शरण एका जनार्दनीं । नुपेक्षी तो सर्वथा ॥५॥
३५७६
स्थूल देहाचा विचार । हातां आलिया साचार । तेथें देहें अहंकार । विरोनि जाये ॥१॥ स्थूल ब्रह्माज्ञान नेत्रीं । स्थूलभोग जागृति वैखरी । हें नव्हे मी ऐसा अंतरी । बोध झाला ॥२॥ मग देहें मारितां तोडितां । पूजितां कां गाजितां । नसे हर्षे खेदवार्ता । तया पुरुषा ॥३॥ एका जनार्दनीं । लीन झाला संतचरणीं । दर्पणामाजीं बिंबोनि । दर्पणातीत ॥४॥
३५७७
स्थूळ ना सुक्ष्म कारण ना महाकारण । यापरता वेगळाचि जाण आहे गे जाय ॥१॥ पुंडलिकाचें प्रेमें मौनस्थ उभा । कोणा न बोले उगला उभा ठेला गे माय ॥२॥ निंद्य वंद्य जगीं यावेंभेटीलागीं । दरुशनें उद्धार वेगीं तया गे माय ॥३॥ ऐसा लाघवी खेळ खेळोनी निराळा । एका जनार्दनीं डोळा देखिला गे माय ॥४॥
३५७८
स्नान दानाचें एक फळ । त्याहुनी नामाचें सुफळ । कोटी गुणें विशाळ । पुण्य हातां चढतसे ॥१॥ धन्य धन्य नाम श्रेष्ठ । गाय अखंड नीळकंठ । आणिक श्रेष्ठ श्रेष्ठ । नाम मुखीं जपताती ॥२॥ नाम त्रिभुवनीं साजिरें । नाम पावन गोजिरें । एक जनार्दनीं निर्धारें । सांगें ब्राह्मा उभारूनी ॥३॥
३५७९
स्नानसंध्या शौचाचार । स्वधर्म नावडे साचार ॥१॥ कनकफळ नाम गोमटें । बाहेर आंत दिसे कांटे ॥२॥ शरीर श्वेत निर्नासिक । तोंडाळ ओढाळ पतिनिंदक ॥३॥ ऐशीं आचारहीन बापुडीं । एका जनार्दनीं न धरी जोडी ॥४॥
३५८०
स्नानाचा परिकळा स्वरवण अडथळा । सकळ मंत्री साचा पाहीं । आसनीं शयनीं भोजनीं गमनागमानीं । राम म्हणता दोष नाहीं ॥१॥ श्रीराम जयराम श्रीराम जयराम । जपतां हें दो अक्षरीं नाम । संसारातें दळसी कळिकाळा तें कढसी । निरसेल कर्माकर्म ॥धृ॥ योग याग तपें तपताती बापुडें । जन धन शिणताती वेडे । निःशंक निर्लज्ज हरिनाम गातां । पायवाट वैकुंठां चढें ॥२॥ गूढ गुह्मा जपसी वाचे श्रीराम । ते नामें जपाचा भावो । तेणें नामें भुलला वैकुंठ सांडुनी । कीर्तनीं नाचतो देवो ॥३॥ रामनामें वाचा गर्जती उठी । अमर येती त्याच्याभेटी । तीर्थीचे समुदाय अघ्रिरेणु वांछिणी । श्रुति ऐको ठाती गोठी ॥४॥ सकल साधनामांजी वरिष्ठ हें भावें । जपा रामनाम । एका जनार्दनीं संतोषला तो । पुरविल निष्काम काम ॥५॥
३५८१
स्पर्श कराल मजसी तरी विठोबाची आण । ऐकतांचि वचन मागें फ़िरे ॥१॥ जनमुखें सर्व कळाला समाचार । परि अंतरी साचार व्यग्र नोहे ॥२॥ ह्रदयी ध्यातसे रखुमाईचा पती । निवारिली भ्रांती संसाराची ॥३॥ एका जनार्दनीं चालविला नेम । परि पुरुषोत्तम नवलपरी ॥४॥
३५८२
स्मरण स्वयाती नलगे ती जपमाळ हातीं । नाठवितां चित्तीं स्मरण होय ॥१॥ तैसा देहीं देवो परिसुनीं भावो । नाठव तोचि आठवो होत असे ॥२॥ वस्तु वस्तुपणें जडोनि गेली अंगीं । आठवू तो विसरु वेगीं जाला वावो ॥३॥ अगाध डोहीं गगन बुडालें दिसे । परि न बुडतांचि असे गगनी गगन ॥४॥ तैसा देहीं देह असतांचि संचला । म्हणती हारपला लाज नाहीं ॥५॥ मृगजळाचि व्यक्ति जळपणाची प्रतीति । भासत असतां स्थिति मिथ्या जैसी ॥६॥ एका जनार्दनीं एकपणें निर्वाही । असतांचि देह वावो देहपणें ॥७॥
३५८३
स्मरता निवृत्ति पावलो विश्रांती । संसाराची शांती जाली माझ्या ॥१॥ नमितां ज्ञानदेवा पावलो विसावां । अंतरींचा हेवा विसरलों ॥२॥ सुखाचा निधान तो माझा सोपान । विश्रांतीचें स्थान मुक्ताबाई ॥३॥ चांगदेव माझा आनदाचा तारु । सुखाचा सागरु वटेश्वर ॥४॥ सुखाचा सागर विसोबा खेचर । नरहरी सोनार प्राण माझा ॥५॥ आठवितां नामा पावलों विश्राम । मोक्षमार्गीं आम्हां वाट जालीं ॥६॥ परिसा भागवत जीवा आवडता । गोरा आणि सांवता सखे माझे ॥७॥ जनजसवंत सुरदास संत । नित्य प्राणिपात वैष्णवांसी ॥८॥ वंदूं भानुदास वैष्णवांचे कुळीं । ज्यासी वनमाळी मागें पुढें ॥९॥ बाळपणीं जेणें भानु आराधिला । वंश निरविला देवराया ॥१०॥ धन्य त्यांचा वंश धन्य त्यांचे कुळ । परब्रह्मा केवळ त्यांचे वंशीं ॥११॥ एका जनर्दनीं संताचें स्तवन । जनीं जनार्दन नमीयेला ॥१२॥
३५८४
स्वगोत्र परगोत्र यांचा भरंवसा । मानूं नये सहसा अरे मूढा ॥१॥ वेदींचें वचन वेदीं तें प्रमाण । एक नारायण सार जप ॥२॥ शास्त्रांचा प्रभाव शास्त्रिकांसी ठावा । उघड जपावा राममंत्र ॥३॥ न करी आळस नको पडों भरीं । एका जनार्दनीं हरी स्मरे देहीं ॥४॥
३५८५
स्वजनीं जनार्दन विजनीं जनार्दन । जीव तो जनार्दन जीवनकळा ॥१॥ जनक जनार्दन जननी जनार्दन । जन तो जनार्दन होऊनी ठेला ॥२॥ भाव जनार्दन स्वभाव जनार्दन । देव जनार्दन जेथें तेथें ॥३॥ एका जनार्दनीं आकळे जनार्दन । एका जनार्दन निश्चळ तेथें ॥४॥
३५८६
स्वप्नवत देह स्वप्नवत संसार । नाहीं पारावार दुःखा तेथें ॥१॥ काय त्याची गोडी लागसीसे मूढा । नाचतो माकोडा गारोड्याचा ॥२॥ स्त्री पुत्र धन कवणाचें तें आप्त । वायां भुललें चित्त म्हणें माझें ॥३॥ सावध होउनी गाये रामनाम । एका जनार्दनीं विश्राम तेणें तुज ॥४॥
३५८७
स्वप्नवत संसार माना हा निर्धार आशाश्वत्र जाणार छाया जैसी ॥१॥ मृगजळ नाथिलें दिसतसे जळ । पाहा हो प्रबळ पटळ मेघ जैसे ॥२॥ एका जनार्दनीं वाउगा आभास । देवाविण सौरस वाउगा भासे ॥३॥
३५८८
स्वप्नामाजीं अनिरुद्धें देखिलीसे उखा । तयालागीं घेउनी गेली चित्ररेखा ॥१॥ तया सोडविण्या हरी । धांव घेतसे झडकरी ॥२॥ पाहे स्वप्नाचेनि कांतें । अनिरुद्धा केलेसे निरुतें ॥३॥ स्वप्नेंचि देखे सारा । एका जनार्दनीं पसारा ॥४॥
३५८९
स्वप्नामाजीं नेणें देवा । करी सेवा भूतांची ॥१॥ नाना साधन ते चेष्टा । तेणें कष्टा भरीं भरला ॥२॥ जे जे करी ते उपाधी । मंत्र जपे तो अविधी ॥३॥ सकळ मंत्रा मंत्रराज । एका जनार्दनीं नेणें निज ॥४॥
३५९०
स्वप्नामाजीं बंधन । जागृति पाहतां लटिकें स्वप्न ॥१॥ ऐशी जाणा देहस्थिती । जागृति स्वप्न तें भास चित्तीं ॥२॥ जागृति धरितां भाव । स्वप्नीं दिसे तो प्रकाश ॥३॥ जागृति स्वप्न दोन्हीं पाहीं । एका जनार्दनीं पायीं ॥४॥
३५९१
स्वप्नीं चालतां लवलाही । आडामध्यें पडिला पाही ॥१॥ घाबरूनी म्हणे धांवा । तैसे भुलले जीवजीवा ॥२॥ मृगजळ भासे नीर । वायां मागें पसर ॥३॥ सावध होऊनि जंव पाहे । वायां स्वप्न मिथ्या आहे ॥४॥ एका जनार्दनीं भुलले । वायां गेले अधोगती ॥५॥
३५९२
स्वप्नींचा भांबावला । म्हणे मज चोरें नागविला ॥१॥ ऐशीं अभाग्याची मती । वायां बुले चित्तवृत्ती ॥२॥ नेणें कधी मुखीं नाम । सदा वसे क्रोधकाम ॥३॥ एका जनार्दनीं देव । नाहीं भेव निरसीत ॥४॥
३५९३
स्वप्नें दिसे स्वयेंचि नासे । तैसें काल्पनिक जग भासे ॥१॥ मुळींच मिथ्या मृगजळ । त्यामाजीं नसे शीतळ जळ ॥२॥ पिंपळावरुनी मार्गु आहे । ऐकोनी वृक्षा वेघों जाये ॥३॥ ऐसेंक अभागीं पामर । नकळे तयांसी विचार ॥४॥ म्हनॊनि शरण जनार्दनी । एका जनार्दनीं एकपणीं ॥५॥
३५९४
स्वयंप्रकाशामाजीं केलें असें स्नान । द्वैतार्थ त्यागुन निर्मळ जाहलों ॥१॥ सुविद्येचें वस्त्र गुंडोनि बैसलों । भूतदया ल्यालों विभूती अंगीं ॥२॥ चोविसापरतें एक वोळखिलें । तेचि उच्चारिलें मुळारंभीं ॥३॥ आकार हारपला उकार विसरला । मकरातीत केला प्रणव तो ॥४॥ अहं कर्म सर्व सांडियेल्या चेष्टा । तोचि अपोहिष्ठा केलें कर्म ॥५॥ संसाराची तीन वोंजळीं घातलें पाणी । आत्मत्वालागुनी अर्घ्य दिलें ॥६॥ सोहं तो गायत्री जप तो अखंड । बुद्धिज्ञान प्रचंड सर्वकाळ ॥७॥ एका भावे नमन भूतां एकपणीं । एका जनार्दनीं संध्या जाहली ॥८॥
३५९५
स्वरुप सुंदर अति विशाळ । नेत्रीं निघती अग्निज्वाळ । हृदयावरी सर्पाची माळ । दुष्ट दुर्जना प्रत्यक्ष काळ ॥१॥ वाचे वदे हरहर शब्द । तेणें निरसे भवबंध ॥धृ ॥ माथां जटा शोभे पिंगटवर्ण । मध्यें गंगा वाहे परिपुर्ण । हृदयीं सदा रामध्यान । तयासी पाहतां निवे मन ॥२॥ शिव शिव नाम हें तारक । जया ध्याती ब्रह्मादिक । सिद्ध साधक वानिती अनेक । तया ध्यातां सुख अलोकिक ॥३॥ वामांगीं गौरी सुंदर । तेजें लोपतसें दिनकर । ह्रुदयीं ध्यातां परात्पर । एका जनार्दन तुटे विरझार ॥४॥
३५९६
स्वर्ग जयाची पायरी । मोक्ष ज्यांचा आज्ञाधारीं ॥१॥ ऐसा संतांचा महिमा । पायवणी ये शिवब्रह्मा ॥२॥ ब्रह्माज्ञानाची ती मात । कोण तया तेथें पुसत ॥३॥ भुक्ति मुक्ति लोटांगणी शरण एका जनार्दनीं ॥४॥
३५९७
स्वर्ग नरक इहलोक । यांची प्रीति सांडोनि देख ॥१॥ भावें करितां माझी भक्ति । भाविक आपें आप उद्धरती ॥२॥ गव्हांची राशी जोडिल्या हातीं । सकळ पक्कान्न त्याची होतीं ॥३॥ द्रव्य जाहलें आपुलें हातीं । सकल पदार्थ घरां येती ॥४॥ एका जनार्दनीं बोध । सहज घडी एकविध ॥५॥
३५९८
स्वर्ग मृत्यु पाताळ सर्वावरी सत्ता । नाहीं पराधीनता जिणें आमुचें ॥१॥ नाहीं त्या यमाचे यातनेंचे भय । पाणी सदा वाहे आमुचे घरीं ॥२॥ नाहीं जरामरण व्याधीचा तो धाक । सुखरुप देख सदा असों ॥३॥ एका जनार्दनीं नामाच्या परिपाठ । सुखदुःख गोष्टी स्वप्नीं नाहीं ॥४॥
३५९९
स्वर्गासुख आम्ही मानुं जैसा ओक । सांडुनियां सुख पंढरीचें ॥१॥ पंढरीं पावन चंद्रभागा स्थान । आहे तो निधान विठ्ठल देव ॥२॥ मध्यस्थळीं राहे पुंडलीक मुनी । तयाचे दरुशनी पातक हरे ॥३॥ दोनी कर कटीं उभा जगजेठी । एका जनार्दनीं भेटी सुख होय ॥४॥
३६००
स्वहित हित विचारीं मानसीं । कां रे नागविसी देहासी या ॥१॥ साव्धान हो पाहे बा पंढरी । धरीं तु अंतईं संतसंग ॥२॥ नको पंडुं फेरी चौर्‍यायंशीं आवृत्ती । गाय तुं किर्ती वैष्णवांची ॥३॥ तरले बहुत तरती भरंवसा । विश्वास हा बापा धरी ऐसा ॥४॥ सुगम सोपा चुकती जेणें खेपा । एका जनार्दनीं जपा विठ्ठल नाम ॥५॥
३६०१
स्वहिताकारणें संगती साधुची । भावें भक्ति हरीची भेटी तेणें ॥१॥ हरि तेथें संत संत तेथें हरि । ऐसे वेद चारी बोलताती ॥२॥ ब्रह्मा डोळसां तें वेदार्थ नाकळे । तेथें हे आंधळें व्यर्थ होती ॥३॥ वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष । वेदें नाहीं ऐसें सांगितलें ॥४॥ वेदांची हीं बीजाक्षरें हरि दोनी । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
३६०२
स्वानंदे आवडी दत्त पाहुं गेलों डोळां । तंव चराचर अवघें श्रीदत्तची लीला ॥१॥ विस्मयो दाटला आतां पाहुं मी कैसें । देखता देखणें अवघे दत्तचि दिसे ॥२॥ असे आणि नसे हा तंव विकल्प जनांत । जनीं जनार्दन निजरुपें दत्त ॥३॥ एका जनार्दनीं तेथें अद्वय नित्य । सबाह्म अभ्यंतरी दत्त नांदत ॥४॥
३६०३
स्वामीदर्शनें पतिता आनंद । देवदर्शनें संतोषें भक्तवृंद ॥१॥ यापरी आनंद सदा मनीं हरि । वांचूनी छंद दुजा नाहीं मनीं ॥२॥ एका जनार्दनीं प्रेमयुक्त छंद । गीता गातां आवडी गोविंद ॥३॥
३६०४
स्वामीसी तो पुरे एक भाव गांठीं । वाउगा श्रम नेहटी वायां जाय ॥१॥ भावासाठीं देव अंकित अंकिला । राहिला उगला बळीचे द्वारीं ॥२॥ अर्जुनाचे रथीं सारथीं होउनी । राहे मोक्षदानी भावासाठीं ॥३॥ विदुराचे घरीं आवडीनें भक्षी । कण्या साक्षेंपेसी खाती देव ॥४॥ पोहे सुदाम्याचे खाउनी तुष्टला । एका जनार्दनीं दिला सुवर्णगांव ॥५॥
३६०५
स्वामीसेवका अबोला । ऐसा जन्मचि अवघा गेला ॥१॥ जन्मवरी जुनें भातें । साधन शिऊं नेदी हातें ॥२॥ काम करुं नेदी हातीं । उसंत नाहें अहोरातीं ॥३॥ श्रद्धें विण अचाट सांगें । ढळॊं नेदी पुढें मांगें ॥४॥ न गणीं दिवस मास वरुषी । भागों जातां वहीच पुसी ॥५॥ चाव चावी करुं नेदी । सगळें गिळवी त्रिशुद्धी ॥६॥ जो कां ग्लानी साधन मागें । तेंचि बंधन त्यासी लागे ॥७॥ जो सेवा करी नेटका । त्यासी करुनी सांडी सुडका ॥८॥ झोंप लागों नेदी कांहीं । निजे निज निजवी पाही ॥९॥ एका जनार्दनीं निज सेवा । जीवें ऊरूं नेदी जीवा ॥१०॥
३६०६
स्वाहिताकारणें विचार न कळे । संध्येंचें हें मुळ आम्ही जाणों ॥१॥ अर्ध बिंबीं सूर्य धरूं माध्यान्हासी । अस्तु जातां त्यासी अर्घ्य देतो ॥२॥ नासिकेचें अग्र सुषुम्ना विंदान । करी प्राणायाम वेगळाची ॥३॥ साहीं चक्र जप वर्णदळीं संकल्प । पूजा तर्पणयुक्त मंत्र सहज ॥४॥ त्रिपुटीपासोनि डोळिया वंदन । रक्त श्वेत गुण पीत भासे ॥५॥ आर्धाकीं पाहे अणुरेणु सरी । गगन शून्याकारी विखुरलें ॥६॥ विराजली संध्या बैसली जे बाळा । चंद्र सूर्य कळा लाजविल्या ॥७॥ हृदयापासोनी नाबेहेचा नेट । मनीं बळकट पुष्टी व्हावी ॥८॥ मूळबंधापासूनि दिधली आटणी । हृदयीं कुंडलिनी सिद्ध संघ ॥९॥ दाही दिशा करी प्रदक्षिणा वेडा । गगनीं बीज सडा माजिविलें ॥१०॥ एका जनार्दनीं संध्या हेंचि रीती । सहस्त्रदळीं ज्योति निजबिंदु ॥११॥
३६०७
हमामा घाली राम अवतारीं । कैकईची भीड तुला भारी । प्रस्थान ठेविलें लंकेवरी ॥१॥ हमामा तुं घाली । कान्होंबा हुतुतुतु खेळुं ॥धृ॥ हमामा घाली नंदाघरीं । मिळोनि गौळियांच्या नारी । गोपाळ नाचती गजरीं ॥२॥ हमामा घाली पंढरपुरी । पुंडलीकाची भीड भारी । गोपाळ नाचती गजरीं ॥३॥ हमामा आषाडीकार्तिकीचा । साधुसंत गर्जती वाचा । एका जनार्दनीं म्हणे त्याचा ॥४॥
३६०८
हमामा घालूं सोई । सांभाळूं शिवा दोही ॥१॥ हमामा रे भाई । कान्होबाचे बळे घालुं हमामा ॥२॥ हमामा घालुं ऐसा । भक्तिबळें कान्होबा बैसा ॥३॥ हमामा घालूं नेटें ।एका जनार्दनांचे बळ मोठें ॥४॥
३६०९
हमामा पोरा हमामा । घुंबरींवाजे घमामा ॥१॥ हमाम्यांचे नादानी । घुंबरी वाजली रानीं ॥२॥ हमाम्यांची शीतळ शाई । पोरा मेली तुझी आई ॥३॥ काम क्रोध पोरा नाशी । अहंकार तोंड वासी ॥४॥ एका जनार्दनांशीं । पोरा वहिल्या गांवा जाशीं ॥५॥
३६१०
हमामा बाळा घालीं । नको पडों काळाचे चालीं ॥१॥ हमामा पोरा हमामा ॥धृ॥ हमामा घालीं बरव्यापरी । क्रोधकामा सारुनी दुरी ॥२॥ हमामा घालीं नेटें । धरीं भक्तींचे बळ मोठे ॥३॥ हमामा घालसील जरी । एका जनार्दनाचे चरण धरीं ॥४॥
३६११
हमामा बोला बाळा । खोटा सोडुनी द्यावा चाळा ॥१॥ बोला हमामा बोला हमामा ॥धृ॥ हमामा बोला होटीं । बुद्धी सांडोनि द्यावी खोटी ॥२॥ हमामा बोला भाई । पुन्हां जन्मा येणें नाहीं ॥३॥ एका जनार्दनांचे पायीं । भावें ठेवियेली डोई ॥४॥
३६१२
हमामा भाई हुंबरी । खेळों भाई हमामा हुंबरी ॥१॥ राम रावण हमामा घालितीं । हनुमान बेळें खेळीया निज ज्योंती ॥२॥ अर्जुन भीष्म हमामा खेळती । कृष्णे सुदर्शन धरिलें हातीं ॥३॥ एका जनार्दनीं हमामा जाहला ।अवघा खेळ ग्रासोनि ठेला ॥४॥
३६१३
हमामा भाई हुंबली । गोपाळ वासुरें कान्होबा जाला ना ब्रह्मामाया बोंबली रे ॥१॥ हमामा भाई बार कोंडे । वासुरें लेकुंरें कान्होबा जाला ठकविलें ब्राह्मण चहुं तोडें ॥२॥ हमामा भाई बारकोंडा । कंआचा केशीया कान्होबा मरिला हांसता आला होऊनियां घोडा रे ॥३॥ हमामा भाई खोल पाणी । यमुनेमाझारी कान्होबा पोहतां कुटिला काळिया फणी रे ॥४॥ हमामा भाई तोंड वासी । शिंक्याचें लोटकें कान्होबा भेदिलें लागली धार गोड कशी रे ॥५॥ हमामा भाई तोंड वासी ॥ औटचि मात्रा कान्होबा भेदिली लागली गोड कैसी रे ॥६॥ हमामा भाई चाट बोटे । चोरीचें दुध गोड मोठें ॥७॥ हमामा भाई गटगोळे । स्वर्गीच्या देवां लाळ गळे ॥८॥ हमामा भाई गट गोळी । जेविती खेळीमेळीं ॥९॥ हमाम भाई मिठी मिठी । आजचें भोजन गोड सुटी ॥१०॥ एका जनार्दनीं तृप्त झाला । ब्रह्मादेव लाळ घोटी ॥११॥
३६१४
हमामा माडिला कान्होबा भाई । हमामा खेळूं भाई कान्ह्बा तुझें पायीं ॥१॥ हमामा रे हमामा । कान्होबा खेळूं हमामा ॥धृ॥ हमामा खेळा वेंगीं । सांडुनीं द्वैताच्या संगीं ॥२॥ हमामा खेळूं नेटें । कान्होंबाचे बळ मोठें ॥३॥ हमामा खेळॊं सोई । एका जनार्दनाचे पायीं ॥४॥
३६१५
हमामा हुंबरी घालुं नका एक भावें । जेथे वसे कान्होबा तें घर आम्हां ठावें ॥१॥ हमामा घालुं आवडीं । कान्होंबा तुं आमुचा गडी ॥२॥ हमामा घालुं सोई । आमुचा कान्होबा भाई ॥३॥ हमामा घालुं रानीं । एका जनार्दनाचे चरणीं ॥४॥
३६१६
हमामा हुबरी खेळती एक मेळा । नानापरींचें गोपाळ मिळती सकळां ॥१॥ एक धावें पुढें दुजा धावे पाठीं । एक पळें एकापुढें एक सांडोनि आटी ॥२॥ ऐसें गुतलें खेळा गाई धांवती वनीं । परतेनाची कोण्हा एका जनार्दनीं ॥३॥
३६१७
हरि बोला देतां हरि बोला घेतां । हांसतं खेळतां हरि बोल ॥१॥ हरि बोला हरि बोला खातां । सर्व कार्य करितां हरि बोला ॥२॥ हरि बोला एकांतीं हरि बोला लोकांतीं । देहत्यागा अंती हरि बोला ॥३॥ हरि बोला भांडतां हरि बोला कांडतां । उठतां बैसतां हरि बोला ॥४॥ हरि बोला जनीं हरि बोला विजनीं । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
३६१८
हरि बोला हरि बोला नाहीं तरी अबोला । व्यर्थ गलबला करुं नका ॥१॥ नको नको मान नकों अभिमान । सोडी मीतूंपण तोचि सुखी ॥२॥ सुखी जेणें व्हावें जग निववावें । अज्ञानी लावावें सन्मार्गासी ॥३॥ मार्ग जया कळें भाव भक्तिबळें । जगाचियें मळें न दिसती ॥४॥ दिसती जनीं वनींप्रत्यक्ष लोचनीं । एका जनार्दनीं ओळखिलें ॥५॥
३६१९
हरि म्हणा बोलतां हरि म्हणा चालतां । हरि म्हणा खेळतां बाळपणीं ॥१॥ म्हणा हरिनाम पुरती सकळ काम । हरिनामें ब्रह्मा हातां चढें ॥२॥ हरि म्हणा उठतां हरि म्हणा बैसतां । हरि म्हणा पाहतां लोकलीला ॥३॥ हरि म्हणा आसनीं हरि म्हणा शयनीं । हरि अम्हणा भोजनीं ग्रासोग्रासीं ॥४॥ हरि म्हणा जागतां हरि म्हणा निजतां । हरिम्हणा झुंजतां रणांगणां ॥५॥ हरि महणा एकटीं हरि म्हणा संकटीं । हरि धरा पोटींभावबळें ॥६॥ हरि म्हणा हिंडतां हरि म्हणा भांडतां । हरि म्हणा कांडितां साळी दाळी ॥७॥ हरि म्हणा देतां हरि म्हणा मागतां । हरि म्हणा गातां पदोपदीं ॥८॥ हरि म्हणा देशीं हरि म्हणा परदेशीं । हरि म्हणा अहर्निशी सावधान ॥९॥ हरि म्हणा एकांतीं हरि म्हणा लोकांती । हरि म्हणा अंतीं देहत्यागीं ॥१०॥ हरि म्हणा धर्मता हरि म्हणा अर्थता । हरि म्हणा कामता सकाम काम ॥११॥ हरि म्हणा स्वार्थी हरि म्हणा परमार्थी । हरि म्हणा ब्रह्माप्राप्तीलागीं ॥१२॥ हरि म्हणा भावता हरि म्हणा अभावता । हरि म्हणा पावतां मोक्षपद ॥१३॥ हरि म्हणा निजनिधी हरि म्हणा आनंदि । हरि परमानंदि आनंद तो ॥१४॥ हरि म्हणा जनीं हरि म्हणा विजनीं । एका जनार्दनीं हरि नांदें ॥१५॥
३६२०
हरिकथा परिसोनि जरी देखसी दोष । भुजंगा तेंचि परतले विष ॥१॥ हरिनाम ऐकतां जरी न वाटे सुख । अंतरीं तुं देख पाप आहे ॥२॥ कस्तुरीचे आळां पेरिला पलांडु । सुवास लोपोनि कैसा वाडे दुर्गधु ॥३॥ धारोष्णा पय परी ज्वरितांचें मुख । थुंकोनि सांडी म्हणे कडु वीख ॥४॥ पान लागलिया गूळ न म्हणे गोडु । गोडाचे गोड तें झालें कडु ॥५॥ एका जनार्दनीं भाव नुपजे नरा । नरदेहीं आयुष्य तेंही केला मातेरा ॥६॥
३६२१
हरिकथा श्रवण परिक्षिती सुजाण ऐकतां आपण अंगें होय । होय न होय ऐसा संशय नाहीं पुर्वत्व राहे । राहिलें गेलें देह ज्याचा तो नेणें देहींचे विदेहीं होय । श्रवण समाधी नीचनवा आनंद ब्रह्माहस्मि न साहे रया ॥१॥ नवविधा भक्ति नवविधा व्यक्ति अवघिया एकची प्राप्ती । एका जनार्दनीं अखंडता मुक्तीची फिटे भ्रांति रया ॥ध्रु०॥ हरीच्या कीर्तनें शुक आणि नारद छेदिती अभिमानाचा कंदु । गातां पैं नाचतां अखंड पैं उल्हास कीर्तनीं प्रेमाल्हादु । हरिनाम गजर स्वानंदें हंबरें जिंतिला पायेचा बाधू । श्रोता वक्ता स्वयें सुखरुप जाला वोसंडला ब्रह्मानंदु रया ॥२॥ हरीचेनि स्मरणें द्वंद्व दुःख नाहीं हें भक्ति प्रल्हादा ठायीं । कृतांत कोपलिया रोमही वक्र नोहे मनीं निर्भयता निज देहीं । अग्नि विष आप नेदी त्या संताप न तुटे शस्त्राचे घाई । स्मरणाचेनि बळें परिपुर्ण जाला देह विदेह दोन्हीं नाहीं रया ॥३॥ हरिचरणामृत गोड मायेसी उठी चाड लाहे जाली रमा । चरणद्वय भजतां मुकलीं द्वंद्वभावा म्हणोनि पढिये पुरुषोत्तमा । हरिपदा लागली शिळा उद्धरली अगाध चरणमहिमा । चरणीं विनटोनी हरिपदा पावली परि चरण न सोडी रया ॥४॥ शिव शिव यजिजे हें वेदांचें वचन पृथुराया बाणलें पूर्ण । पूज्यपुज्यक भाव सांडोनी सद्भावें करी पुजन । देवी देव दाटला भक्त सांडोनी सद्भावें करी पुजन । देवी देव दाटला भक्त प्रेमे आटला मुख्य हें पूजेचें विधान । त्रिगुण त्रिपुटीं छेदुनियां पूजेमाजीं समाधान रया ॥५॥ हरिचरण रज रेणु वंदूनिया पावना जाला अक्रुर । पावनपणें प्रेमें वोसंडें तेणें वंदी श्वानसुकर । वृक्ष वल्ली तृणा घाली लोटांगण सद्भावें पूजी गौखुर । दंडाचिये परी लोटांगण घाली हरिस्वरुप चराचर रया ॥६॥ जीव जावो जिणें परि वचन नुलंघणें सेवेची मुख्य हा हेतु । या सेवा विनटोनि सर्वस्वें भजोनि दास्य उद्भट हनुमंतु । शास्त्रचेनि बळें न तुटे न बुडे न जलें देहीं असोनि देहातीतु । जन्ममरण होळी कासे भासें बळी भजनें मुक्त कपिनाथु रया ॥७॥ सख्यत्वें परपार पावला अर्जुन त्यासी न पुसत दे ब्रह्माज्ञान । स्वर्गाची खणखण बाणाची सणसण उपदेशा तेंचि स्थान । युद्धाचिये संधीं लाविली समाधी कल्पातीं न मोडें जाण । निज सख्य दोघां आलिंगन पडिलें भिन्नपणें अभिन्न रया ॥८॥ बळीची दानदीक्षा कैसी जीवें देउनी सर्वस्वेंसीं निजबळें बाधीं देवासी । अनंत अपरंपार त्रिविक्रम सधर आकळिला हृषीकेशी । हृदयींचा हृदयस्थ आकळितां तंव देवची होय सर्वस्वेंसी । यापरि सर्वच देवासी अर्पुनी घरींदारी नांदें देवेशीं रया ॥९॥ भक्ति हे अखंड अधिकाराचे तोंड खंडोनि केलें नवखंड । एकएका खंडें एक एक तरला बोलणें हें वितंड । अखंडतां जंव साधिली नाहीं तंव मुक्त म्हणणे हें पाषांड । बद्धता मुक्तता दोन्हीं नाहीं ब्रह्मात्व नुरे ब्रह्मांड रया ॥१०॥ सहज स्वरुपस्थिती तया नांव भक्ति नवविधा भक्ति भासती । ऐसी भक्तिप्रति अंगें राबे मुक्ति दास्य करी अहोराती । दासीसी अनुसरणें हें तंव लाजिरवाणें मूर्ख ते मुक्ति मागती । एका जनार्दनीं एकविधा भक्ति तैं चारी मुक्ति मुक्ति होती रया ॥११॥ सार
३६२२
हरिकिर्तन नामोच्चर । जे नर करिती वारंवार । तया नाही संसार । ब्रह्मादि देव वंदिती ॥१॥ कीर्तनमहिमा नारदु । जाणतसे परमानंदु । जालासे सर्वां बंधु । देवा असुर मानवां ॥२॥ कीर्तनमहिमा परिक्षिती । जाणतसे परम प्रीती । अंतीं सायुज्यता मुक्ती । पावती झाली ॥३॥ कीर्तनमहिमा जाणें शुक । जाणती ते व्यासदिक । वाल्मिकादि सर्व सुख । कीर्तनें सरते ॥४॥ कीर्तनमहिमा जाणें प्रल्हादु । तोदियेला मायाकंदु । कोरडे कांष्ठी गोविंदु । प्रगटला ॥५॥ कीर्तनमहिमा जाणें बळी । याचक झाला वनमाळी । एका जनार्दनीं कली । कीर्तनें न पीडी ॥६॥
३६२३
हरिकीर्तनालागीं प्रल्हाद गाढा । द्वंद्वाचा रगडा तेणें केला ॥१॥ कोरडिया काष्ठीं प्रगटले हरी । म्हणवोनि नृत्य करी तयापुढें ॥२॥ विणा वाहातु गातु नारदु नाचे । न कळे तयाचें महिमान ॥३॥ जनाभिमानें धरिली प्रतिष्ठा । वंचला करंटा मुक्तिसीच ॥४॥ साच अथवा लटिकें नाचतु रंगीं । अभिमान भंगी पैं होय ॥५॥ निरभिमानिया जवळीच देवो । एकाएकीं भावो जनार्दनीं ॥६॥
३६२४
हरिकीर्तनें चित्त शुद्ध । जाय भेद निरसुनीं ॥१॥ कामक्रोध पळती दुरी । होत भोंवरी महापापा ॥२॥ गजरें हरिचें कीर्तन । पशु पक्षी होती पावन ॥३॥ स्त्री पुरुष अधिकार । कीर्तन सार कलियुगीं ॥४॥ एका जनार्दनीं उपाय । तरावया भवनदीसी ॥५॥
३६२५
हरिखाची गुढी बोधावा आला । अहंकार गर्जतु अविवेकु मारिला ॥१॥ संतोषें विवेक आपाआपणिया विसरला । लाजुनी महाहारुष आनंदासी गेला ॥२॥ मारविला क्रोध ममता सती निघाली । तुटला मत्सर शांति सुखें सुखावली ॥३॥ एका जनार्दनीं पाहतां सहजीं पैं सहजे । स्वराज्य सांग तेथें नाहीं पैं दुजें ॥४॥
३६२६
हरिचिया दासां दाही दिशा । भावें जैसा तैसा हरि एक ॥१॥ हरि मुखी गातां हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणें ॥२॥ जन्म घेणें लागे वासनेच्या संगे । तेचि झाली अंगें हरिरुप ॥३॥ हरिरुप झाले जाणणें हरपलें । नेणणें तें गेलें हरीचें ठायीं ॥४॥ हरिरुप ध्यानीं हरिरुप मनीं । एका जनार्दनीं हरी बोला ॥५॥
३६२७
हरिचे ते दास । ज्यांचा पंढरीसी वास ॥१॥ येती नेमें पंढरीसी । दरुशन घेती विठ्ठलासी ॥२॥ करिती चंद्रभागे स्नान । पूर्वजा उद्धरतीं जाण ॥३॥ करिती गोपाळकाला । गोपाळपुरी मिळोनी मेळा ॥४॥ ऐसा जया घडे नेम । एका जनार्दनी निष्काम ॥५॥
३६२८
हरिनाम भजन कल्लोळ जेथे सदा । नोहे तेथें बाधा विषयाची ॥१॥ वेदशास्त्र देती ग्वाही । पुराणे तोहि बोलती ॥२॥ नामस्मरणे निरसे भेद । तुटे समुळ कंद संसार ॥३॥ निरसे भोग दुःखव्याधी । तुटे उपाधी शरीर ॥४॥ जनार्दनाचा एका म्हणे । नाम गाणें सतत ॥५॥
३६२९
हरिनाम स्मरतो म्हणोनि आचरसी दोष । श्रवण स्मरण भक्ति तेणें पडली वोस ॥१॥ हरिनामाचेनि बळे करिसी अदर्ध । देवाचेनी तुमचें शुद्ध नोहें कर्म ॥२॥ दुर्वासाचेनि कोपे अंबऋषीस शाप । देवाचे चक्रें त्या दिधलें संताप ॥३॥ सत्यवती धर्म सदयज्ञनिष्ठ । असत्य वचनी त्याचा झाला अंगुष्ठ ॥४॥ निष्पाप मांडव्य शुळीं वाइला । इतुकियास्तव यम दासीपुत्र केला ॥५॥ एका जनार्दनीं संत सोयीनें चाले । सदगुरुवचनें सबाह्म शुद्ध जालें ॥६॥
३६३०
हरिनामामृत सेवी सावकाश । मोक्ष त्याचे भुस दृष्टीपुढें ॥१॥ नित्य नामघोष जयाचे मंदिरीं । तेचि काशीपुरी तीर्थक्षेत्र ॥२॥ वाराणशी तीर्थ क्षेत्रा नाश आहे । अविनाशासी पाहे नाश कैंचा ॥३॥ एका तासामाजीं कोटीं वेळां सृष्टी । होती जाती दृष्टी पाहे तोची ॥४॥ एका जानर्दनीं ऐसें किती झाले । हरिनाम सेविलें तोचि एक ॥५॥
३६३१
हरिनामीं ज्याची प्रीती । सदा वानिती हरिनाम ॥१॥ धन्य धन्य जन्म त्याचा । उच्चार वाचा हरिनाम ॥२॥ नेणती शीण योग यागीं । घेती जगीं हरिनाम ॥३॥ एका जनार्दनीं हरिनाम । उमेशी सांगे राम जप करी ॥४॥
३६३२
हरिनामें तरले । पशुपक्षी उद्धरले ॥१॥ ऐशी व्याख्या वेदशास्त्रीं । पुराणें सांगताती वक्त्री ॥२॥ नामें प्रल्हाद तरला । उपमन्यु अढळपदीं बैसला ॥३॥ नामें तरली ती शिळा । तारियेला वानरमेळा ॥४॥ हनुमंत ज्ञानी नामें । गणिका निजधामीं नामें ॥५॥ नामें पावन वाल्मिक । नामें अजामेळ शुद्ध देख ॥६॥ नामें चोखामेळा केला पावन । नामें कबीर कमाल तरले जाण ॥७॥ नामें उंच नीच तारिले । एका जनार्दनीं नाम बोले ॥८॥
३६३३
हरिप्राप्तीसी उपाय । धरावें संतांचें ते पाय ॥१॥ तेणें साधती साधनें । तुटतीं भवांचीं बंधनें ॥२॥ संताविण प्राप्ति नाहीं । ऐशीं वेद देत ग्वाही ॥३॥ एका जनार्दनीं संत । पूर्ण करिती मनोरथ ॥४॥
३६३४
हरिभजनीं घेतां गोडी । निवारे जन्ममरण कोडी ॥१॥ भावें करितां हरीचें भजन । देवा होय समाधान ॥२॥ हरिभजनाची आवडी । काळ केला देशोधडी ॥३॥ एका जनार्दनीं भजन । भजनीं पावे समाधान ॥४॥
३६३५
हरिभजनीं घेतां गोडीं । निवारे जन्ममरण कोडी ॥१॥ भावें करितां हरीचें भजन । देवा होय समाधान ॥२॥ हरिभजनाची आवडी । काळ केला देशोधडी ॥३॥ एका जनार्दनीं भजन । भजनीं पावे समाधान ॥४॥
३६३६
हरिवांचुनी ठाव रिता कोठें आहे । विचारुनी पाहें मनामाजीं ॥१॥ सर्व तो व्यापक भरुनि उरला । वाउगाचि चाळा वाहुं नको ॥२॥ एका जनार्दनीं भरुनि उरला । तो म्या देखियेला विटेवरी ॥३॥
३६३७
हरिस्मरणीं सावध व्हावें । स्वहित आपुलें विचारावें ॥१॥ तरला प्रल्हाद आणि धुरु । उपमन्यु क्षीरसागरु ॥२॥ एका जनार्दनीं छंद । अवघा भरला श्रीगोविंद ॥३॥
३६३८
हरिहरं भेद । नका करुं अनुवाद । धरितां रे भेद । अधम तो जाणिजे ॥१॥ वैष्णव निका संभ्रम । महादेव सर्वोत्तम । द्वैताचा भ्रम । धरुं नको ॥२॥ आदिनाथ परंपरा । चालत आली तो पसारा । जनार्दनें निर्धारा । उघडे केलें ॥३॥ गुह्मा जाप्य शिवांचें । उघडें केलें पां साचें । एका जनार्दनीं वाचे । रामनाम ॥४॥
३६३९
हरिहरांचे चिंतनीं । अखंड वदे ज्याची वाणी ॥१॥ नर नोहे नारायण । सदा वाचे हरिहर जाण ॥२॥ पळती यमदुतांचे थाट । पडती दुर जाऊनी कपाट ॥३॥ विनोदें हरिहर म्हणतां । मोक्षप्राप्ती तयां तत्त्वतां ॥४॥ एका जनार्दनीं हरिहर । भवसिंधु उतरी पार ॥५॥
३६४०
हरिहरांसी जे करिती भेद । ते मतवादी जाण निषिद्ध ॥१॥ हरिहर एक तेथें नाहीं भेद । कासयासि वाद मूढ जनीं ॥२॥ गोडीसी साखर साखरेस गोडी । निवाडितां अर्ध दुजी नोहे ॥३॥ एका जनार्दनीं हरिहर म्हणतां । मोक्ष सायुज्यता पायं पडे ॥४॥
३६४१
हरी म्हणोनी टाकी पाय । तया लाभा उणें काय ॥१॥ नेमें जाती पंढरीसी । आषाढी कार्तिकी वारीसी ॥२॥ घनदाट पिकली पेठ । आलें चोखट ग्राहीक ॥३॥ वस्तु अमोल विटेवरी । एका जनार्दनी अंगिकरी ॥४॥
३६४२
हरीचे नामें हरीचे भक्त । उद्धरले असंख्यात ॥१॥ दैत्य दानव मानव । रीस वानर जीव सर्व ॥२॥ वृक्ष पाषाणादि तृण । हरिनामें ते पावन ॥३॥ पशु पक्षी अबला । एका जनार्दनीं तरल्या ॥४॥
३६४३
हरीचें चिंतन हरीचें हृदयीं । हरीचें चिंतन हरांचे हृदयीं ॥१॥ ऐशीं परस्परें गोडी देखा । काय वर्णावें तया सुखा ॥२॥ सुख पाहता आनंद । एका जनार्दनीं परमानंद ॥३॥
३६४४
हरीचें पाहतां श्रीमुख । सुखावलें मन नित्य नवा हर्ष ॥१॥ परमाप्रिय वो श्रीहरी । ध्याता ध्यान ध्येय सर्व हरि ॥२॥ एका जनार्दनीं पाहतां हरी । हरिरुप दिसे चराचरी ॥३॥
३६४५
हरीनामामृत तरले अपार । व्यास वाल्मिकादि निर्धार तरलें जाण ॥१॥ सेवेचिनि मिसें अक्रूर तरला । उद्धोध जाहला हृदयामाजीं ॥२॥ सख्यत्वयोगें अर्जुन तरला । प्रत्यक्ष भेटला कृष्णराव ॥३॥ दास्यत्व निकटीं हनुमंता भेटी । हृदय संपुटीं राम वसे ॥४॥ नामधारकपणें प्रल्हादु तरला । प्रत्यक्ष देखिला नरहरी ॥५॥ उपमन्यु बाळक दुधाचिया छंदें । तयासी गोविंदे कृपा केली ॥६॥ ऐसें अपरंपार तरलें नामस्मरणी । एका जनार्दनीं नाम जपे ॥७॥
३६४६
हरे भवभय व्यथा चिंतनें । दुर पळती नाना विघ्नें । कलीं कल्मष बंधनें । न बांधती चिंतनें ॥१॥ करा करा म्हणोनि लाहो । चिंतनाचा निर्वाहो । काळाचा तो बिहो । दुर पळे चिंतनें ॥२॥ हीच माझी विनवणी । चिंतन करा रात्रंदिनी । शरण एका जनार्दनीं । रामनाम चिंतावें ॥३॥
३६४७
हर्षा नमाये अंबरीं । येऊनियां झडकरी । द्वारा उघडी निर्भरी । आनंदमय ॥१॥ वृद्धा येऊनियां पाहें । उचलोनि लवलाहे । मुख चुंबिलें तें पाहें । कृष्णाचे देखा ॥२॥ मोहिलें वृद्धेचें मन । नाठवे आपपर जाण । लाघवी तो नारायण । करुनियां आकर्ता ॥३॥ दोहीं करें उचलिला । राधिकेजवळीं तो दिला । म्हणे राधेसी ते वेळां । यांसी नित्य आणी ॥४॥ तुज न गमे एकटी । आणीत जाई जगजेठी । एका जनार्दनाचे भेटी । रे कांहीं विकल्प ॥५॥
३६४८
हाती सांपडतां वर्म । वाउगा श्रम कोन करी ॥१॥ पायाळची जवळी असतां । धन सर्वथा बहु जोडे ॥२॥ अंजन तें गुरुकृपा । पुण्य पापा कोण लेखा ॥३॥ शरण एका जानर्दनी । दुजेपणीं एकला दिसे ॥४॥
३६४९
हातीं कमंडलु दंड । दत्तमुर्ति ती अखंड ॥१॥ ध्यान लागो माझे मना । विनवितो गुरुराणा ॥२॥ अंगीं चर्चिली विभुती । हृदयीं वसे क्षमा शांती ॥३॥ तोचि चित्तांत आठव । गुरुराज दत्त देव ॥४॥ एका जनार्दनीं दत्त । तद्रुप हें झालें चित्त ॥५॥
३६५०
हामे आपले सोवते घरछे । रात आयो थारोशामछे ॥१॥ मारी वेणी पकड करी हतछे । दाढी बांधी गाठछे ॥२॥ मोरी घागरीया फोर करछे । भागन गया गाप घरछें ॥३॥ एका जनार्दनीं तोरे शामनेछे । मोरो संसारको नासछे ॥४॥
३६५१
हासोनिया राधा बोले यशोदेशी । यह ओ हा चोर बोल विश्वासी ॥१॥ आण वाहतसे लटकीची मामिसे । याचिया वचनीं सर्वास विश्वासे ॥२॥ खोडी न करी ऐशी वाहे तू आण । गोरसांवांचुनि चोरी न करीं तुझी आण ॥३॥ एका जनार्दनीं बोले विनोद वाणी । यशोदेसह हांसती गौळणीं ॥४॥
३६५२
हित अनाहिताचीं असतीं वचनें । तेथें अनुमोदन देतां भलें ॥१॥ परमार्थाचे वचनीं द्यावें अनुमोदन । तेथें नारायण संतोषत ॥२॥ विषयिक वचना देतां अनुमोदन । तेणें नारायण क्रोध पावे ॥३॥ भक्तिप्रेम वचना द्यावें अनुमोदन । तेणें नारायण संतोषत ॥४॥ दुर्बुद्ध वचना देतां अनुमोदन । तेणे नारायण क्रोध पावे ॥५॥ संतांचें वचना द्यावें अनुमोदन । तेणें नारायण संतोषत ॥६॥ असंतांचें वचनीं द्यावें अनुमोदन । तेणें नारायण क्रोध पावे ॥७॥ एका जनार्दनाचे वचनीं द्यावें अनुमोदन । तेणें जनार्दन संतोषतो ॥८॥
३६५३
हिताकरणें तुम्ही सांगतसे गुज । कांहीं तरी लाज धरा आतां ॥१॥ अवचट नरदेह पावलें निधान । कांहीं सोडवण करीं बापा ॥२॥ पूर्व सुकृताचें फळ तें पदरीं । म्हणोनि हा देह निर्धारी प्राप्त तुज ॥३॥ एका जनार्दनीं वाया जातो काळ । कांहीं तरी गोपाळ आठव वेगें ॥४॥ प्रपंच
३६५४
हींच दोनी पैंक साधनें । साधकें निरंतर साधणें ॥१॥ परद्रव्य परनारी । यांचा विटाळ मनें धरी ॥२॥ नको आणिक उपाय । सेवी सद्गुरूचे पाय ॥३॥ म्हणे एका जनार्दन । न लगे आन तें साधन ॥४॥
३६५५
हीच मुख्य उपासना । तुमच्या चरणां दंडवत ॥१॥ गुणदोष पाहुं नका । कीर्तनीं सुखा लुटवें ॥२॥ संतचरणीं सदा भाव । करा वाव संसार ॥३॥ लडिवाळ जनार्दनीं एका । कीव देखा भाकितसे ॥४॥
३६५६
हीन जे पामर नावडे वाचे नाम । सदा कामीं काम प्रपंचाचें ॥१॥ भोगिती यातना न सुटे कल्पकोडी । चौर्‍यांयशीची बेडी दृढ पायीं ॥२॥ जैसें कर्म केलें तैसेक फळ आलें । कुंथतां वाहिले भार माथां ॥३॥ एका जनार्दनीं संशय न धरावा । आला तो भोगावा विषमकाळ ॥४॥
३६५७
हृदयस्थ अत्माराम नैणती । मूर्ख ते फिरती तीर्थाटणी ॥१॥ काय त्या भ्रंती पुडलीसे जीवा । देवाधिदेवा विसरती ॥२॥ विश्वाचा तो आत्मा उभा विटेवरी । भक्ताकाज कैवारी पांडुरंग ॥३॥ प्रणवा पैलीकडे वैखरीये कानडे । भाग्य तें केवढें पुंडलिकांचें ॥४॥ तयाचिया लोभा गुंतूनि राहिले । अठ्ठवीसे युग जालें न बैसे खालीं ॥५॥ सन्मुख चंद्रभागा संतांचा सोहळा । एका जनार्दनी डोळा पाहूं चला ॥६॥
३६५८
हृदयस्थ असोनी कां रे फिरसी वायां । दीप आणि छाया जयापरी ॥१॥ आत्मतीर्थी सुस्नात झालिया मन । आणिक साधन दुजें नाहीं ॥२॥ साधन तें मन करी आपुलें आधीन । यापरतें कारण आन नाहीं ॥३॥ एका जनार्दनीं मनासी आवरी । मग तुं संसारीं धन्य होसी ॥४॥
३६५९
हृदयस्थ जया नाहीं ठावा देव । पूजा करती वाव सर्वभावें ॥१॥ जाणावा अंतरीं मानावा हृदयीं । पहावा सर्वांतरीं परमात्मा ॥२॥ एका जनार्दनीं व्यापक सर्वांठायीं । भरुनीं उरला ठाई जेथें तेथें ॥३॥
३६६०
हृदयीं नांदें संदेह मूळ । तेथें फळ विरुढें केंवी ॥१॥ जैसें बीज तैसा अंकुर । दिसे निर्धार जाणावा ॥२॥ योगयाग शास्त्रपाठें । वाउगी खटपटे तर्काची ॥३॥ करितां कर्म धर्म नेहटी । नोहे भेटी संतांची ॥४॥ एका जनार्दनीं त्याचा दास । सहज आस पुरतसे ॥५॥
३६६१
हृदयीं परमात्मा नांदे परिपुर्ण । तो शिव सनातन पूर्णब्रह्मा ॥१॥ जीव तो गुंतला विषयाचे लक्षीं । शिव सर्वसाक्षीं परब्रह्मा ॥२॥ भाव अभावना जया जैसी पाही । एका जनार्दनीं देहीं परब्रह्मा ॥३॥
३६६२
हृदयीं सदा नाम जपे राम । तया बाधी ना क्रोध काम ॥१॥ हें तो आलें अनुभवां । जीवां सर्वा कलियुगीं ॥२॥ अजामेळादि पापराशि । नामें नेलें वैकुंठासी ॥३॥ गणिका तारिलीसे देखा । म्हणे जनार्दनीं एका ॥४॥
३६६३
हृदयींच स्नान हृदयींच ध्यान । हृदयींच भजन सर्वकाळ ॥१॥ हृदयींच दान हृदयींच धर्म । ह्रुदयींच नेम सर्व जोडे ॥२॥ हृदयींच कथा पुराण श्रवण । हृदयींच चिंतन सर्व सदा ॥३॥ हृदयींचा दिसे एक जनार्दनीं । हृदयींच एकपणीं बिंबलासे ॥४॥
३६६४
हृदयींचे देव हृदयींच भक्त । हृदयींच होत पूजा सर्व ॥१॥ ह्रुदयींच ध्यान हृदयीं जें मन । हृदयीं तें आसन देव वसे ॥२॥ ह्रुदयीं ते भुक्ति ह्रुदयीं ते मुक्ति । हृदयीं सर्वस्थिती देव जाणों ॥३॥ एका जनार्दनीं हृदयींच पाहाल । तें सुख घ्याल हृदयामाजीं ॥४॥
३६६५
हें तों अवघें फजितीचें भांड । अंतकाळीं तोंड काळें करती ॥१॥ चालता इंदियें म्हणती माझें माझें । अंतकाळीचें वोझें न घेती हे ॥२॥ जरा आलिया निकट भरुनी । जाती हे पळोनि आपुले गृहां ॥३॥ एका जनार्दनीं धरी हा विश्वास । रामनामीं ध्यास सुखें करी ॥४॥
३६६६
हें शरीर नाशिवंत साचें । जायाचें हो जायाचें अंतकाळीं ॥१॥ काय याचें सुख मानिती हे जन । पडिलेसें जाण मायाचक्री ॥२॥ संसाराचा या करिती विचार । भुलले पामर अधोगती ॥३॥ एका जनादनीं वायाची भ्रमती । पुढें ती फजिती नेणवेची ॥४॥
३६६७
हें सहजवि थोरावले । पृथ्वी आप तेज झालें । वायु आकाश संचलें । आनंदले सकलही ॥१॥ तें माहेरी येवढें चक्र । गगनीं हा निर्धार । याचा पाहे पां विचार । चैतन्यामाजीं ॥२॥ तेथें वेदासी बोबडी । अनुभवी पैलथडी । एका जनार्दनीं गोडी । नित्य घेतसे ॥३॥
३६६८
हेंचि एक खरें । सदा वाचे नाम स्मरे ॥१॥ धन्य त्याची जननी । प्रसवली त्या लागोनी ॥२॥ हरुषे नाचे कीर्तनांत । प्रेम न खंडे शुद्ध चित्त ॥३॥ एका जनार्दनीं शरण । वंदीन तयाचे चरण ॥४॥
३६६९
हेंचि कलीमाजीं साधन । आवडी कीर्तन हरीचें ॥१॥ न घडे योगयागतप । होय अनुताप कीर्तनीं ॥२॥ भावभक्ति लागे हातीं । प्रेम धरिती कीर्तनीं ॥३॥ आवडी धरा हरिकीर्तनीं । एका शरण जनार्दनीं ॥४॥
३६७०
हेंचि वेदोक्ति निजसार । आत्मा अविनाश साचार ॥१॥ नाहीं जन्ममरणाचा धाक । बोले शुद्ध बुद्ध ऐसा वेद ॥२॥ श्रुतिशास्त्र तेही वदती । आत्मा अविनाश म्हणती ॥३॥ एका जनार्दनीं नाहीं मरण । मग कैंचे देहींचें स्फुरण ॥४॥
३६७१
हेंचि साचें बा साधन । मुखीं नाम हृदयीं ध्यान ॥१॥ येणे तुटे नाना कंद । पीडा रोग भवछंद ॥२॥ नको ते वाउगी खटपट । मन करी एकनिष्ठा ॥३॥ घडे साधन समाधी । तेथेम अवघी उपाधी ॥४॥ एका जनार्दनीं ध्यान । साधी परमार्थ साधन ॥५॥
३६७२
हेंची माझी मणींची आस । करा दास सेवेसी ॥१॥ नका कांही गुंतांगुतीं । लिगाड फजिती मज मांगें ॥२॥ संसार तो फलकट । दाखवा आट पंढरी ॥३॥ एका जनार्दनीं विनंती । पुढती करुणा असो द्या ॥४॥
३६७३
हेचि देवासी विनंती । संतसेवा दिवसरातीं ॥१॥ वास देई पंढरीचा । नामघोष कीर्तनाचा ॥२॥ सदा सर्वदा नाम मुखीं । दुर्जें नको कांही पारखीं ॥३॥ एका जनार्दनीं हरीचा दास । म्हणतां पुरें सर्व आस ॥४॥
३६७४
हेमवंताच्या पोटीं एक जन्मली गोरटी । तये त्या धूर्जटी वरियलें ॥१॥ मंडपाच्या द्वारीं आला जंव नोवरा । अवगुणाचा म्हातारा रुप नाहीं ॥२॥ नांवा येव्हडिया बाळा अति नोवरा । कुवारीच्या संसारा शून्य जालें ॥३॥ येणें जाणें ठेलें भोगणें खुंटलें । नारदाचेनी बोलें ऐसी दशा ॥४॥ काय कुमारी तया दिधली हे बाळा । इचिया कपाळीं कवण जाणे ॥५॥ शकुनालागीं दासी उभ्या पूर्ण कळसासी । पांच मुखें वरासी तिन्ही डोळे ॥६॥ दारा वरु आला मुद पैं वोवाळी । साजुकासी घाली माळ गळां ॥७॥ सासू म्हणे कवणीं दिधली दुर्बुध्दी । विकल्याचा नंदी गोमाशा लावी ॥८॥ लग्नघडी आली अंतरपाटू धरा । अतिशयें नोवरा उंच देखा ॥९॥ डोळ्यासी पुरे ऐसा नव्हे नोवरा । अंतरपाटू पुढा काय धरुं ॥१०॥ कन्यादान वरा गोत्र पैं उच्चारा । वृध्द परंपरा आहे वेगीं ॥११॥ बापु तो नाठवे माय ते मी नेणें । कूळ गोत्र लाहणें नाहीं आम्हां ॥१२॥ बहुला वधुवरें संभ्रम सोहळा । अक्षवाणें बाळा करुं आल्या ॥१३॥ तंव कंठीचा वासुकी दीपा फ़णु करी । धुधु:कारें नारी पळालिया ॥१४॥ प्रात:काळ जालीया काढिला भस्मारा । विभूती शरीरां लावियेली ॥१५॥ अगे हा काळाचाही काळु नव्हे धारी जाणा । संसारी लाहाणा जांवई नव्हे ॥१६॥ लग्ना येरे दिसीं उटणें मांडलें । धवळ आरभिलें संभ्रमेशी ॥१७॥ धवळामाजीं गाणीं गाईलें रामानाम । ऐकोनियां प्रेम वरा आलें ॥१८॥ रामनाम ध्वनी ऐकतांच कानीं । स्वेदु कंपु नयनीं अश्रु आले ॥१९॥ उन्मळिता दृष्टी बाष्पु दाटे कंठीं । मूर्च्छा पूर्ण सृष्टी विकळ पडे ॥२०॥ वरा पायरवूं रक्षा पैं कपाळा । त्रितीय नेत्रीं ज्वाळा उठलिया ॥२१॥ नोवरा हा नव्हे संसारु विवसी । देहभावें कवणासी नेदी उरो ॥२२॥ वेगीं वधुवरा चौक न्हाणें करा । उकलिती सुंदरा जटाभारु ॥२३॥ वराचिया माथां सोज्वळ सुंदरी । येरी म्हणे नोवरी मी महेशाची ॥२४॥ गौरी ते अर्धांगीं सवती बैसे माथां । ऐसी याची कांता उमा गेली ॥२५॥ हा अकुळी अती वृध्द कां केला समंधु । जिवेसी विरोधु पडिला साचें ॥२६॥ जेथें वडिलाधारें नाहीं तेथें बोळवण काई । कुंवारी कवणे ठायीं दिधली देखा ॥२७॥ जेथें संघात अभाव तेथें येव जावो । जिण्यामरणा ठावो नुरेची ईसी ॥२८॥ विवेकेंसी जेथें परतलिया श्रुति । गौरी त्याचे हाता लावियेली ॥२९॥ माया माहेर खुंटलें संकल्पें तुटलें । ममत्व विटलें आजिचेनी ॥३०॥ बहु काळा जुनाट त्यासी शेषपाटु । संसारा शेवटु जाला माये ॥३१॥ एका जनार्दनीं प्रकृति प्राणेश्वरें । मिरवती बोहरें एकपणें ॥३२॥
३६७५
हो भलो तुम नंदन लालछे । मुजे गांवढी बतावछे ॥१॥ आगल पिछिल ध्यानमें आवछे । मंगल नाम तोरा मे गावछे ॥२॥ तरो सुंदर रुप मोरे मनछे । प्रीत लगी कान्हा हमछे ॥३॥ एक जनार्दनीं तोरे नामछे । गावत ध्यावत हृदयमेछे ॥४॥
३६७६
होई शरणागत भाकी रे करुणा । तरीच बंधना चुकशील ॥१॥ आपुलें तूं हित करूनियां घेई । सदा वाचे गाई रामनाम ॥२॥ जंववरी आहे इद्रियसंबंध । तोंवरी तूं बोध करी मना ॥३॥ एका जनार्दनीं मावळलिया दीप । सहजची खेप येईल बापा ॥४॥
३६७७
होईन मी दास कामारी संताचा । संकल्प हा साचा जीवभावें ॥१॥ घालीन लोटांगण करीन पुजन । भावें वोवाळीन प्राण माझा ॥२॥ आणिक सायास न करीं कांहीं आस । होईल निजदास संतचरणीं ॥३॥ एका जनार्दनीं हेंचि वाटे बरें । आणिक दुसरें नको कांहीं ॥४॥
३६७८
होउनि विठोबाचा दास । करी आस दुजियाची ॥१॥ वायां माता व्याली तया । भूमार कासया अवनीसी ॥२॥ पूर्वज तया कंटाळती जन्मला । म्हणती खर हा ॥३॥ एकाजनार्दनीं म्हणे । तया पेणें यमलोकीं ॥४॥
३६७९
होउनी उदास । मागा प्रेम सावकाश ॥१॥ उभा विटेवरी उदित । देतां न पाहे चित्त वित्त ॥२॥ जें जें पाहिजे जयालागीं । तें तें देतो त्या प्रसंगीं ॥३॥ न म्हणे उत्तम चांडाळ । ऐसा भक्तीचा भुकाळ ॥४॥ एका जनार्दनीं म्हणा दास । करा आस निर्भय ॥५॥
३६८०
होउनी भक्तांचा अंकिला । पुरवितसे मनोरथ । ऐसी हे प्रचीत । उघड पहा ॥१॥ देव भक्ताचा अंकिला । धांवे आपण वहिला । भक्ताचिया बोला । उणें पडों नेदी ॥२॥ उपमन्यूचिया काजासाठी । क्षीरसिंधु भरुनि वाटी । लाविली त्याचे होटीं । आपुला म्हणोनी ॥३॥ वनीं एकटें ध्रुवबाळ । तयासी होउनी कृपाळ । दिधलें पद अढळ । आपुलिया लाजा ॥४॥ प्रल्हाद पडतां सांकडीं । खांबांतुन घाली उडी । दैत्य मारी कडोविकडी । आपुलिया चाडा ॥५॥ पडतां संकट पांडवासी । जाहला सारथी धुरेसी । मारविली बापुडी कैसा । कौरवें सहकुळ ॥६॥ ऐसा भक्ताचिया काजा । धांवें न धरत लाजा । एका जनार्दना दुजा । एकपणें एकटु ॥७॥
३६८१
होउनी मानभाव । अवघा बुडविला ठाव ॥१॥ नाहीं चित्त शुद्ध गती । द्वेष देवाचा करिती ॥२॥ धरती उफराटी काठी । रंडापोरें भोंदी वाटी ॥३॥ नेसोनियां काळेंपण । अंगा लाविती दूषण ॥४॥ एका जनार्दनीं देवा । जळी जळो त्यांची सेवा ॥५॥
३६८२
होऊनि सावधान चित्ता । उपमन्यूची कथा । एका भावें ऐकतां । सायुज्यता पाविजे ॥१॥ उपमन्यु मागितलें । देवें तयासी दिधलें । तें सांगेन वहिलें । चित्त देऊनी परियेसा ॥२॥ ब्राम्हणासी पुत्र झाला । पित्यासी हर्ष वाटला । थोर कष्टें वाढविला । स्नेहो आशा धरुनी ॥३॥ बाळक तो जाणता । पित्यासी उपजली चिंता । एका जनार्दनीं तत्वतां । वचनार्थ परिसावा ॥४॥
३६८३
होऊनियां विष्णुभक्त । शिवनिंदा जो करीत ॥१॥ तोची अधम चांडाळ । महादोषी अमंगळ ॥२॥ मुख्य मार्गाचा शिक्का । बंध होय तिहीं लोकां ॥३॥ एका जनार्दनीं शिव । उच्चारितां नाहीं भेव ॥४॥
३६८४
होऊनी आभारी । राहिलासे द्वारीं ॥१॥ समचरण विटेवरी । कटीं धरुनियां कर ॥२॥ मिरवीं मस्तकीं भुषण । सिद्ध साधकांचे ध्यान ॥३॥ सुहास्य वदन चांगलें । एका जनार्दनी वंदिलें ॥४॥
३६८५
होऊनी वैष्णव । जो कां निंदी सदाशिव ॥१॥ त्याचें न पहावें वदन । मुर्खाहुनी मुर्ख पूर्ण ॥२॥ भक्तीचा सोहळा । शिवें दाविला सकळां ॥३॥ एका जनार्दनीं वैष्णव । शिरोमणी महादेव ॥४॥
३६८६
होणार जणार न चुके कल्पांतीं वाउगी । कुंथाकुंथी करुनी काय ॥१॥ लिहिलें संचितें न चुके कल्पांतीं । वाउगाचि भ्रांतीं फळ काय ॥२॥ एका जनार्दनीं प्रारब्धाचा भोग । करितां उद्वेग न टळेची ॥३॥
३६८७
होतां द्वारपाल लाज वाटे थोरी । न साहे भिकारी जाला हरी ॥१॥ बळीच्या तो द्वारी सारथीं पर्थाचा । गोसावी आमुचा वेदवाणी ॥२॥ गर्भ न साहाती यातायाती जना । एका जनार्दनीं शरण वेगें ॥३॥
३६८८
होती पोटासाठीं संत । नाहीं हेत विठ्ठली ॥१॥ तयांचा उपदेश नये कामा । कोण धर्मा वाढवी ॥२॥ घालुनी माळा मुद्रा गळां । दाविती जिव्हाळा वरवरी ॥३॥ एका जनार्दनीं ते पामर । भोगिती अघोर यातना ॥४॥

Labels

Followers