तुकारामगाथा-४

Sant Tukaram Abhag bhag 2
3751
रामराम कहे रे मन । औरसुं नहिं काज । बहुत उतारे पार । आघे राख तुकाकी लाज ॥१॥
3752
रामरूप केली । रामें कौसल्या माउली ॥१॥ राम राहिला मानसीं । ध्यानीं चिंतनीं जयासी । राम होय त्यासी । संदेह नाहीं हा भरवसा ॥ध्रु.॥ अयोध्येचे लोक । राम जाले सकळीक ॥२॥ स्मरतां जानकी । रामरूप जाले कपि ॥३॥ रावणेसी लंका । राम आपण जाला देखा ॥४॥ ऐसा नित्य राम ध्याय । तुका वंदी त्याचे पाय ॥५॥
3753
रामा अयोध्येच्या राया । दिनानाथा रे सखया ॥१॥ पाप ताप विघ्न हरीं । दिनानाथा सुख करीं ॥ध्रु.॥ भिलटीचिया रे उच्छिष्टा । स्वीकारिसी रे तूं भ्रष्टा ॥२॥ मी तों सलगीचें मूल । तुका म्हणे तू सखोल ॥३॥
3754
रामा वनवास । तेणें वसे सर्व देश ॥१॥ केलें नामाचें जतन । समर्थ तो नव्हे भिन्न ॥ध्रु.॥ वनांतरीं रडे । ऐसे पुराणीं पवाडे ॥२॥ तुका म्हणें ॠषिनेम । ऐसा कळोनि कां भ्रम ॥३॥
3755
रामें स्नानसंध्या केलें क्रियाकर्म । त्याचा भवश्रम निवारला ॥१॥ आणिकें दुरावलीं करितां खटपट । वाउगे बोभाट वर्माविण ॥ध्रु.॥ रामनामीं जिंहीं धरिला विश्वास । तिंहीं भवपाश तोडियेले ॥२॥ तुका म्हणे केलें कळिकाळ ठेंगणें । नामसंकीर्तनें भाविकांनीं ॥३॥
3756
रायाचें सेवक । सेवटीचें पीडी रंक ॥१॥ हा तों हिणाव कवणा । कां हो नेणां नारायणा ॥ध्रु.॥ परिसेंसी भेटी । नव्हे लोहोपणा तुटी ॥२॥ तुझें नाम कंठीं । तुक्या काळासवें भेटी ॥३॥
3757
रासभ धुतला महा तीर्थांमाजी । नव्हे जैसा तेजी शामकर्ण ॥१॥ तेवीं खळा काय केला उपदेश । नव्हे चि मानस शुद्ध त्याचें ॥ध्रु.॥ सर्पासी पाजिलें शर्करापीयूष । अंतरींचें विष जाऊं नेणे ॥२॥ तुका म्हणे श्वाना क्षिरीचें भोजन । सवें चि वमन जेवी तया ॥३॥
3758
राहाणें तें पायांपाशी । आणिकां रसीं विटोनि ॥१॥ ऐसा धीर देई मना । नारायणा विनवितों ॥ध्रु.॥ अंतरीं तों तुझा वास । आणिकां नास कारण ॥२॥ तुका म्हणे शेवटींचें । वाटे साचें राखावें ॥३॥
3759
राहिलों निराळा । पाहों कवतुक डोळां ॥१॥ करूं जगाचा विनोद । डोळां पाहोनियां छंद ॥ध्रु.॥ भुललिया संसारें । आलें डोळ्यासी माजिरें ॥२॥ तुका म्हणे माथा । कोणी नुचली सर्वथा ॥३॥
3760
राहे उभा वादावादीं । तरी फंदीं सांपडे ॥१॥ लव्हाळ्यासी कोठें बळ । करिल जळ आपुलें ॥ध्रु.॥ कठिणासी बळजोडा । नम्र पीडा देखेना ॥२॥ तुका म्हणे सर्वरसीं । मिळे त्यासी गोत तें ॥३॥
3761
राहो आतां हें चि ध्यान । डोळा मन लंपटो ॥१॥ कोंडकोंडुनि धरीन जीवें । देहभावें ओंवाळीन ॥ध्रु.॥ होईल येणें कळसा आलें । स्थिरावलें अंतरीं ॥२॥ तुका म्हणे गोजिरिया । विठोबा पायां पडों द्या ॥३॥
3762
राहो ये चि ठायीं । माझा भाव तुझे पायीं ॥१॥ करीन नामाचें चिंतन । जाऊं नेदीं कोठें मन ॥ध्रु.॥ देईंन ये रसीं । आतां बुडी सर्वविशीं ॥२॥ तुका म्हणे देवा । साटी करोनियां जीवा ॥३॥
3763
रिकामें तूं नको मना । राहों क्षणक्षणा ही ॥१॥ वेळोवेळां पारायण । नारायण हें करीं ॥ध्रु.॥ भ्रमणांच्या मोडीं वाटा । न भरें फाटा आडरानें ॥२॥ तुका म्हणे माझ्या जीवें । हें चि घ्यावें धणीवरी ॥३॥
3764
रिण वैर हत्या । हें तों न सुटे नेंदितां ॥१॥ हें कां नेणां पांडुरंगा । तुम्ही सांगतसां जगा ॥ध्रु.॥ माझा संबंध तो किती । चुकवा लोकाची फजिती ॥२॥ तुका म्हणे या चि साठीं । मज न घेतां नये तुटी ॥३॥
3765
रिद्धीसिद्धी दासी कामधेनु घरीं । परि नाहीं भाकरी भक्षावया ॥१॥ लोडें वालिस्तें पलंग सुपति । परि नाहीं लंगोटी नेसावया ॥ध्रु.॥ पुसाल तरि आम्हां वैकुंठींचा वास । परि नाहीं राह्यास ठाव कोठें ॥२॥ तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे । परि नाहीं कोणाचें उणे पुरें ॥३॥
3766
रुची रुची घेऊं गोडी । प्रेमसुखें जाली जोडी ॥१॥ काळ जाऊं नेदूं वांयां । चिंतितां विठोबाच्या पायां ॥ध्रु.॥ करूं भजन भोजन । धणी घेऊं नारायण ॥२॥ तुका म्हणे जीव धाला । होय तुझ्यानें विठ्ठला ॥३॥
3767
रुचे सकळा मिष्टान्न । रोग्या विखाच्या समान ॥१॥ तरि कां तया एकासाटीं । काम अवघें करणें खोटीं ॥ध्रु.॥ दर्पण नावडे एका । ठाव नाहीं ज्याच्या नाका ॥२॥ तुका म्हणे खळा । उपदेशाचा कांटाळा ॥३॥
3768
रुळें महाद्वारीं । पायांखालील पायरी ॥१॥ तैसें माझें दंडवत । सांगा निरोप हा संत ॥ध्रु.॥ पडे दंडकाठी । देह भलतीसवा लोटी ॥२॥ तुका म्हणे बाळ । लोळे न धरितां सांभाळ ॥३॥
3769
रुसलों आम्हीं आपुलिया संवसारा । तेथें जनाचारा काय पाड ॥१॥ आम्हां इष्ट मित्र सज्जन सोयरे । नाहीं या दुसरें देवाविण ॥ध्रु.॥ दुराविले बंधु सखे सहोदर । आणीक विचार काय तेथें ॥२॥ उपाधिवचन नाइकती कान । त्रासलें हें मन बहु माझें ॥३॥ तुका म्हणे करा होईंल ते दया । सुख दुःख वांयां न धरावें ॥४॥
3770
रुसलों संसारा । आम्ही आणीक व्यापारा ॥१॥ म्हणऊनि केली सांडी । देउनि पडिलों मुरकंडी ॥ध्रु.॥ परते चि ना मागें । मोहो निष्ठ‍ जालों अंगें ॥२॥ सांपडला देव । तुका म्हणे गेला भेव ॥३॥
3771
रूप नांवें माया बोलावया ठाव । भागा आले भाव तयावरि ॥१॥ सींव वाटे परी न खंडे पृथिवी । शाहाणे ते जीवीं समजती ॥ध्रु.॥ पोटा आलें तिच्या लोळे मांड्यांवरि । पारखी न करी खंतीं चित्तीं ॥२॥ तुका म्हणे भक्तीसाटीं हरिहर । अरूपीचें क्षरविभाग हें ॥३॥
3772
रूपीं जडले लोचन । पायीं स्थिरावलें मन ॥१॥ देहभाव हरपला । तुज पाहातां विठ्ठला ॥ध्रु.॥ कळों नये सुखदुःख । तान हरपली भूक ॥२॥ तुका म्हणे नव्हे परती । तुझ्या दर्शनें मागुती ॥३॥
3773
रूपें गोविलें चित्ती । पायीं राहिलें निश्चिंत ॥१॥ तुम्हीं देवा अवघे चि गोमटे । मुख देखतां दुःख न भेटे ॥ध्रु.॥ जाली इंद्रियां विश्रांति । भ्रमतां पीडत ते होतीं ॥२॥ तुका म्हणे भेटी । सुटली भवबंदाची गांठी ॥३॥ स्वामींनीं तेरा दिवस निद्रा केली. मग भगवंतें येऊन समाधान केलें कीं,कवित्व कोरडें आहे तें काढणें उदकांतून
3774
रोगिया मिष्टान्न मर्कटा चंदन । कागासी लेपन कर्पूराचें ॥१॥ निर्नासिका जैसा नावडे आरिसा । मूर्खालागीं तैसा शास्त्रबोध ॥ध्रु.॥ दास तुका म्हणे विठ्ठलउदारें । अज्ञानअंधारें दूरी केलें ॥२॥
3775
रोजकीर्दी जमा धरुनी सकळ । खताविला काळ वरावरी ॥१॥ नाहीं होत झाड्यापाड्याचें लिगाड । हुजराती ते गोड सेवा रूजू ॥ध्रु.॥ चोरासाटीं रदबदल आटा हाश । जळो जिणे दाश बहुताचें ॥२॥ सावधान तुका निर्भर मानसीं । सालझाड्यापाशी गुंपों नेणे ॥३॥
3776
लंकेमाजी घरें किती तीं आइका । सांगतसें संख्या जैसीतैसी ॥१॥ पांच लक्ष घरें पाषाणांचीं जेथें । सात लक्ष तेथें विटेबंदी ॥ध्रु.॥ कोटि घरें जेथें कांशा आणि तांब्याचीं । शुद्ध कांचनाचीं सप्त कोटी ॥२॥ तुका म्हणे ज्याची संपदा एवढी । सांगातें कवडी गेली नाहीं ॥३॥
3777
लक्षूनियां योगी पाहाती आभास । तें दिसे आम्हांस दृष्टीपुढें ॥१॥ कर दोनी कटी राहिलासे उभा । सांवळी हे प्रभा अंगकांती ॥ध्रु.॥ व्यापूनि वेगळें राहिलेंसे दुरी । सकळां अंतरीं निर्विकार ॥२॥ रूप नाहीं रेखा नाम ही जयासी । आपुला मानसीं शिव ध्याय ॥३॥ अंत नाहीं पार वर्णा नाहीं थार । कुळ याति शिर हस्त पाद ॥४॥ अचेत चेतलें भक्ताचिया सुखें । आपुल्या कौतुकें तुका म्हणे ॥५॥
3778
लक्ष्मीवल्लभा । दिनानाथा पद्मनाभा ॥१॥ सुख वसे तुझे पायीं । मज ठेवीं ते चि ठायीं ॥ध्रु.॥ माझी अल्प हे वासना । तूं तो उदाराचा राणा ॥२॥ तुका म्हणे भोगें । पीडा केली धांव वेगें ॥३॥
3779
लचाळाच्या कामा नाहीं ताळावाळा । न कळे ओंगळा उपदेश ॥१॥ वचनचर्येची न कळे चांचणी । ऐसी संघष्टनी अमंगळ ॥ध्रु.॥ समय न कळे वेडगळ बुद्धि । विजाती ते शुद्धि चांच चाट ॥२॥ तुका म्हणे याचा धिक्कार चि बरा । बहुमति खराहूनि हीन ॥३॥
3780
लटिका ऐसा म्हणतां देव । संदेहसा वाटतसे ॥१॥ ऐसें आलें अनुभवा । मज ही सेवा करिता ॥ध्रु.॥ शून्याकारी बहु मोळा । भेंडोळा हे पवाडे ॥२॥ तुका म्हणे ताळी नाहीं । एके ठायीं चपळत्वें ॥३॥
3781
लटिका चि केला । सोंग पसारा दाविला ॥१॥ अवघा बुडालासी ॠणें । बहुतांचे देणें घेणें ॥ध्रु.॥ लावियेलीं चाळा । बहू दावूनि पुतळा ॥२॥ तुका म्हणे हात । आम्ही अवरिली मात ॥३॥
3782
लटिका तो प्रपंच एक हरि साचा । हरिविण आहाच सर्व इंद्रियें ॥१॥ लटिकें तें मौन्य भ्रमाचें स्वप्न । हरिविण ध्यान नश्वर आहे ॥ध्रु.॥ लटिकिया विपत्ति हरिविण करिती । हरि नाहीं चित्ती तो शव जाणा ॥२॥ तुका म्हणे हरि हें धरिसी निर्धारीं । तरीं तूं झडकरी जासी वैकुंठा ॥३॥
3783
लटिका प्रपंच वांजेची संतति । तत्वज्ञा हे भ्रांति बाधूं नेणे ॥१॥ सूर्यबिंबीं काय अंधार रिघेल । मृगजळें तिंबेल नभ काईं ॥ध्रु.॥ तैसा दृश्यभास नाडळे चि डोळा । प्रकाशसोहळा भोगीतसे ॥२॥ भोग भोग्य भोक्ता नाडळे चि कांहीं । चैतन्यविग्रहीं पूर्णकाम ॥३॥ तुका ब्रम्हानंदीं आहे तुकब्रम्ह । प्रपंचाचें बंड न देखे डोळां ॥४॥
3784
लटिकियाच्या आशा । होतों पडिलों वळसा । होउनियां दोषा । पात्र मिथ्या अभिमानें ॥१॥ बरवी उघडली दृष्टी । नाहीं तरी होतों कष्टी । आक्रंदते सृष्टी । मात्र या चेष्टांनीं ॥ध्रु.॥ मरणाची नाहीं शुद्धी । लोभीं प्रवर्तली बुद्धी । परती तों कधीं । घडे चि ना माघारीं ॥२॥ सांचूनि मरे धन । लावी पोरांसी भांडण । नाहीं नारायण । तुका म्हणे स्मरीला ॥३॥
3785
लटिकी ग्वाही सभेआंत । देतां पतित आगळा ॥१॥ कुंभपाकीं वस्ती करूं । होय धुरु कुळेसी ॥ध्रु.॥ रजस्वला रुधिर स्रवे । तें चि घ्यावें तृषेसी ॥२॥ तुका म्हणे जन्मा आला । काळ जाला कुळासी ॥३॥
3786
लटिकें तें ज्ञान लटिकें ते ध्यान । जरि हरिकिर्तन प्रिय नाहीं ॥१॥ लटिकें चि दंभ घातला दुकान । चाळविलें जन पोटासाटीं ॥ध्रु.॥ लटिकें चि केलें वेदपारायण । जरि नाहीं स्फुंदन प्रेम कथे ॥२॥ लटिकें तें तप लटिका तो जप । अळस निद्रा झोप कथाकाळीं ॥३॥ नाम नावडे तो करील बाहेरी । नाहीं त्याची खरी चित्तशुद्धि ॥४॥ तुका म्हणे ऐसीं गर्जती पुराणें । शिष्टांची वचनें मागिला ही ॥५॥
3787
लटिकें तें रुचे । साच कोणां ही न पचे ॥१॥ ऐसा माजल्याचा गुण । भोगें कळों येइल सीण ॥ध्रु.॥ वाढवी ममता । नाहीं वरपडला तो दूतां ॥२॥ कांहीं न मनी माकड । तुका उपदेश हेकड ॥३॥
3788
लटिकें हासें लटिकें रडें । लटिकें उडें लटिक्यापें॥१॥ लटिकें माझें लटिकें तुझें । लटिकें ओझें लटिक्याचें ॥ध्रु.॥ लटिकें गायें लटिकें ध्यायें । लटिकें जायें लटिक्यापें ॥३॥ लटिका भोगी लटिका त्यागी । लटिका जोगी जग माया ॥३॥ लटिका तुका लटिक्या भावें । लटिकें बोले लटिक्यासवें ॥४॥
3789
लटिक्याचे वाणी चवी ना संवाद । नांहीं कोणां वाद रुचों येत ॥१॥ अन्याय तो त्याचा नव्हे वायचाळा । मायबापीं वेळा न साधिली ॥ध्रु.॥ अनावर अंगीं प्रबळ अवगुण । तांतडीनें मन लाहो साधी ॥२॥ तुका म्हणे दोष आणि अवकळा । न पडतां ताळा घडे तसे ॥३॥
3790
लटिक्याचें आंवतणें जेविलिया साच । काय त्या विश्वास तो चि खरा ॥१॥ कोल्हांटिणी लागे आकाशीं खेळत । ते काय पावत अमरपद ॥ध्रु.॥ जळमंडपयाचे घोडे राउत नाचती । ते काय तडवती युद्धालागीं ॥२॥ तुका म्हणे तैसें मतवादीयांचें जिणें । दिसे लाजिरवाणें बोलतां चि ॥३॥
3791
लडिवाळ म्हणोनी निष्ठ‍ न बोला । परी सांभाळिला लागे घात ॥१॥ बहु वागवीत आणिलें दुरूनि । दासांची पोसनी बहु आहे ॥ध्रु.॥ नाहीं लागों दिला आघाताचा वारा । निष्ठ‍ उत्तरा कोमेजतों ॥२॥ तुका म्हणे तुम्ही कृपावंत हरि । शांतवा उत्तरीं अमृताच्या ॥३॥
3792
लय लक्षी मन न राहे निश्चळ । मुख्य तेथें बळ आसनाचें ॥१॥ हें तों असाध्य जी सर्वत्र या जना । भलें नारायणां आळवितां ॥ध्रु.॥ कामनेचा त्याग वैराग्य या नांव । कुटुंब ते सर्वविषयजात ॥२॥ कर्म उसंतावें चालत पाउलीं । होय जों राहिली देहबुद्धि ॥३॥ भक्ति तें नमावें जीवजंतुभूत । शांतवूनि ऊत कामक्रोध ॥४॥ तुका म्हणे साध्य साधन अवघडें । देतां हें सांकडें देह बळी ॥५॥
3793
लय लक्षूनियां जालों म्हणती देव । तो ही नव्हे भाव सत्य जाणा ॥१॥ जालों बहुश्रुत न लगे आतां कांहीं । नको राहूं ते ही निश्चिंतीनें ॥ध्रु.॥ तपें दान काय मानिसी विश्वास । बीज फळ त्यास आहे पुढें ॥२॥ कर्म आचरण यातीचा स्वगुण । विशेष तो गुण काय तेथें ॥३॥ तुका म्हणे जरी होईंल निष्काम । तरि च होय राम देखे डोळां ॥४॥
3794
लये लये लखोटा । मूळबंदि कासोटा । भावा केलें साहें । आतां माझें पाहें ॥१॥ हातोहातीं गुंतली । जीवपणा मुकली । धीर माझा निका । सांडीं बोल फिका ॥२॥ अंगीकारी हरि । नको पडों फेरी । लाज धरीं भांडे । जग झोडी रांडे ॥३॥ बैस भावा पाठीं । ऐक माझ्या गोष्टी । केला सांडीं गोहो । येथें धरीं मोहो ॥४॥ पाठमोरा डोल । आवरी तें बोल । पांगलीस बाळा । पुढें अवकळा ॥५॥ आतां उभी ठायीं । उभाउभीं पाहीं । नको होऊं डुकरी । पुढें गाढव कुतरी ॥६॥ नामा केलें खरें । आपुलें म्या बरें। तुका म्हणे येरी । पांगविल्या पोरी ॥७॥ हुंबरी - अभंग १
3795
लवण मेळवितां जळें । काय उरलें निराळें ॥१॥ तैसा समरस जालों । तुजमाजी हरपलों ॥ध्रु.॥ अग्निकर्पुराच्या मेळीं । काय उरली काजळी ॥२॥ तुका म्हणे होती । तुझी माझी एक ज्योती ॥३॥
3796
लवविलें तया सवे लवे जाती । अभिमाना हातीं सांपडेना ॥१॥ भोळिवेचें लेणें विष्णुदासां साजे । तेथें भाव दुजे हारपती ॥ध्रु.॥ अर्चन वंदन नवविधा भक्ति । दया क्षमा शांति ठायीं ॥२॥ तये गांवीं नाहीं दुःखाची वसती । अवघा चि भूतीं नारायण ॥३॥ अवघें चि जालें सोंवळें ब्रम्हांड । विटाळाचें तोंड न देखती ॥४॥ तुका म्हणे गाजे वैकुंठीं सोहळा । याही भूमंडळामाजी कीर्ति ॥५॥
3797
लांब धांवे पाय चोरी । भरोवरी जनाच्या ॥१॥ आतां कैसें होय याचें । सिजतां काचें राहिलें ॥ध्रु.॥ खाय ओकी वेळोवेळां । कैसी कळा राहेल ॥२॥ तुका म्हणे भावहीण । त्याचा सीण पाचावा ॥३॥
3798
लांब लांब जटा काय वाढवूनि । पावडें घेऊनि क्रोधें चाले ॥१॥ खायाचा वोळसा शिव्या दे जनाला । ऐशा तापशाला बोध कैंचा ॥ध्रु.॥ सेवी भांग अफू तमाखू उदंड । परि तो अखंड भ्रांतीमाजी ॥२॥ तुका म्हणे ऐसा सर्वस्वें बुडाला । त्यासी अंतरला पांडुरंग ॥३॥
3799
लांबवूनि जटा नेसोनि कासोटा । अभिमान मोटा करिताती ॥१॥ सर्वांगा करिती विभूतिलेपन । पाहाती मिष्टान्न भक्षावया ॥२॥ तुका म्हणे त्यांचा नव्हे हा स्वधर्म । न कळतां वर्म मिथ्यावाद ॥३॥
3800
लागपाठ केला । आतां वांटा नित्य त्याला ॥१॥ करा जोडीचा हव्यास । आलें दुरील घरास ॥ध्रु.॥ फोडिलीं भांडारें । मोहोरलीं एकसरें ॥२॥ अवघियां पुरतें । तुका म्हणे घ्यावें हातें ॥३॥
3801
लागलिया मुख स्तनां । घाली पान्हा माउली ॥१॥ उभयतां आवडी लाडें । कोडें कोड पुरतसे ॥ध्रु.॥ मेळवितां अंगें अंग । प्रेमें रंग वाढतो ॥२॥ तुका म्हणे जड भारी । अवघें शिरीं जननीचे ॥३॥
3802
लागलें भरतें । ब्रम्हानंदाचें वरतें ॥१॥ जाला हरिनामाचा तारा । सीड लागलें फरारा ॥ध्रु.॥ बैसोनि सकळ । बाळ चालिले गोपाळ ॥२॥ तुका म्हणे वाट । बरवी सांपडली नीट ॥३॥
3803
लागो तुझी सोय ऐसे कोणी करी । माझे विठाबाईं जननिये ॥१॥ पतितपावन म्हणविसी जरी । आवरण करीं तरी माझें ॥ध्रु.॥ नाहीं तरी ब्रीद टाकीं सोडूनियां । न धरिसी माया जरी माझी ॥२॥ बोलिला तो बोल करावा साचार । तरि लोक बरें म्हणतील ॥३॥ करावा संसार लोक लाजे भेणें । वचनासी उणें येऊं नेदीं ॥४॥ तुम्हां आम्हां तैसें नाहीं म्हणे तुका । होशील तूं सखा जीवलग ॥५॥
3804
लागों दिलें अंगा । ऐसें कां गा सन्निध ॥१॥ कोण्या पापें उदो केला । तो देखिला प्रळय ॥ध्रु.॥ न देखवे पिडला सर्प । दया दर्प विषाचा ॥२॥ तुका म्हणे भलें । मज तो न वजे साहिलें ॥३॥
3805
लागों नेदीं बोल पायां तुझ्या हरी । जीव जावो परि न करीं आण ॥१॥ परनारी मज रखुमाईंसमान । वमनाहूनि धन नीच मानीं ॥२॥ तुका म्हणे याची लाज असे कोणा । सहाकारी दीना ज्याची तया ॥३॥
3806
लागोनियां पायां विनवितों तुम्हाला । करें टाळी बोला मुखें नाम ॥१॥ विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळां । हा सुखसोहळा स्वर्गी नाहीं ॥ध्रु.॥ कृष्ण विष्णु हरि गोविंद गोपाळ । मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा ॥२॥ सकळांसीं येथें आहे अधिकार । कलयुगीं उद्धार हरिनामें ॥३॥ तुका म्हणे नामापाशीं चारी मुक्ति । ऐसें बहुग्रंथीं बोलियेलें ॥४॥
3807
लाघवी सूत्रधारी दोरी नाचवी कुसरी । उपजवी पाळूनि संसारि नानापरिचीं लाघवें ॥१॥ पुरोनि पंढरिये उरलें भक्तिसुखें लांचावलें । उभें चि राहिलें कर कटीं न बैसे ॥ध्रु.॥ बहु काळें ना सावळें बहु कठिण ना कोंवळें । गुणत्रया वेगळें बहुबळें आथीलें ॥२॥ असोनि नसे सकळांमधीं मना अगोचर बुद्धी । स्वामी माझा कृपानिधि तुका म्हणे विठ्ठल ॥३॥
3808
लाज ना विचार । बाजारी तूं भांडखोर ॥१॥ ऐसें ज्याणें व्हावें । त्याची गांठी तुजसवें ॥ध्रु.॥ फेडिसी लंगोटी । घेसी सकळांसी तुटी ॥२॥ तुका म्हणे चोरा । तुला आप ना दुसरा ॥३॥
3809
लाज वाटे पुढें तोंड दाखवितां । परि जाऊं आतां कोणापाशी ॥१॥ चुकलिया काम मागतों मुशारा । लाज फजितखोरा नाहीं मज ॥ध्रु.॥ पाय सांडूनिया फिरतों बासर । स्वामिसेवे चोर होऊनियां ॥२॥ तुका म्हणे मज पाहिजे दंडिलें । पुढें हे घडलें न पाहिजे ॥३॥
3810
लाज वाटे मज मानिती हे लोक । हें तों नाहीं एक माझे अंगी ॥१॥ मजुनि झिजलों मापाचिया परी । जाळावी हे थोरी लाभाविण ॥ध्रु.॥ कोमळ कंटक तीक्षण अगरीं । पोचट ते वरी अंगकांति ॥२॥ चित्रींचे लेप शृंगारिलें निकें । जीवेंविण फिकें रूप त्याचें ॥३॥ तुका म्हणे दिसें वांयां गेलों देवा । अनुभव ठावा नाहीं तेणें ॥४॥
3811
लाजती पुराणें । वेदां येऊं पाहे उणें ॥१॥ आम्ही नामाचे धारक । किविलवाणीं दिसों रंक ॥ध्रु.॥ बोलिले ते संतीं । बोल वायांविण जाती ॥२॥ तुका म्हणे देवा । रोकडी हे मोडे सेवा ॥३॥
3812
लाजोनियां काळें राहिलें लिखित । नेदितां ही चित्त समाधान ॥१॥ कैसें सुख वाटे वचनाचे तुटी । प्रीतिविण भेटी रुचि नेदी ॥ध्रु.॥ एकाचिये भेटी एकाचा कोंपर । मावेचा पदर कळों येतो ॥२॥ होत्या आपल्या त्या वेचूनियां शक्ती । पुढें जालों युक्तिकळाहीन ॥३॥ तुका म्हणे तुम्ही समर्थ जी देवा । दुर्बळाची सेवा कोठें पावे ॥४॥
3813
लाडाच्या उत्तरीं वाढविती कलहे । हा तो अमंगळ जातिगुण ॥१॥ तमाचे शरीरीं विटाळ चि वसे । विचाराचा नसे लेश तो ही ॥ध्रु.॥ कवतुकें घ्यावे लेंकराचे बोल । साहिलिया मोल ऐसें नाहीं ॥२॥ तुका म्हणे काय उपदेश खळा । न्हाउनि काउळा खतें धुंडी ॥३॥
3814
लाडें भाकितों करुणा । तूं रे उदाराचा राणा ॥१॥ करिसी आमुचा सांभाळ । तूं रे माउली स्नेहाळ ॥ध्रु.॥ नाहीं चिंता रे आम्हांसी । तूं चि भार चालविसी ॥२॥ आम्ही जालों उदासीन । तूं चि करिसी जतन ॥३॥ आम्हां नाहीं जीवनास । तूं चि पुरविसी घास ॥४॥ तुका म्हणे भलते सवें । जातां मागें मागें धांवे ॥५॥
3815
लापनिकशब्दें नातुडे हा देव । मनिंचे गुह्य भाव शुद्ध बोला ॥१॥ अंतरिंचा भेद जाणे परमानंद । जयासी संवाद करणें लागे ॥२॥ तुका म्हणे जरी आपुलें स्वहित । तरी करीं चत्ति शुद्धभावें ॥३॥
3816
लाभ खरा नये तुटी । नाहीं आडखळा भेटी ॥१॥ जाय अवघिया देशा । येथें संचलाची तैसा ॥ध्रु.॥ मग न लगे पारखी । अवघीं सकट सारखीं ॥२॥ तुका म्हणे वोळे । रूपें भुलविले डोळे ॥३॥
3817
लाभ जाला बहुतां दिसीं । लाहो करा पुढें नासी । मनुष्यदेहा ऐसी । उत्तमजोडी जोडिली ॥१॥ घेई हरिनाम सादरें । भरा सुखाचीं भांडारें । जालिया व्यापारें । लाहो हेवा जोडीचा ॥ध्रु.॥ घेउनि माप हातीं । काळ मोवी दिवस राती । चोर लाग घेती । पुढें तैसें पळावें ॥२॥ हित सावकासें । म्हणे करीन तें पिसें । हातीं काय ऐसें । तुका म्हणे नेणसी ॥३॥
3818
लाभ पुढें करी । घात नारायण वारी ॥१॥ ऐसी भक्ताची माउली । करी कृपेची साउली ॥ध्रु.॥ माय बाळकासी । जीव भाव वेची तैसी ॥२॥ तुका म्हणे नाड । नाहीं शरणागता आड ॥३॥
3819
लाल कमलि वोढे पेनाये । मोसु हरिथें कैसें बनाये ॥ध्रु.॥ कहे सखि तुम्हें करति सोर । हिरदा हरिका कठिन कठोर ॥१॥ नहिं क्रिया सरम कछु लाज । और सुनाउं बहुत हे भाज ॥२॥ और नामरूप नहिं गोवलिया । तुकाप्रभु माखन खाया ॥३॥
3820
लालुचाईंसाटीं बळकाविसी भावा । परी मी जाण देवा जिरों नेदीं ॥१॥ असों द्या निश्चय हा मनीं मानसीं । घातली येविशीं दृढ कास ॥ध्रु.॥ मज आहे बळ आळीचें सबळ । फोडीन अंत्राळ हृदय तुझें ॥२॥ करुणारसें तुकयाबंधु म्हणे भुलवीन । काढूनि घेईंन निज वस्तु ॥३॥
3821
लावुनि काहाळा । सुखें करितों सोहोळा ॥१॥ सादवीत गेलों जना । भय नाहीं सत्य जाणां ॥ध्रु.॥ गात नाचत विनोदें । टाळघागर्‍यांच्या छंदें ॥२॥ तुका म्हणे भेव । नाहीं पुढें येतो देव ॥३॥
3822
लावुनियां गोठी । चुकवूं आदरिली दिठी । देउनियां मिठी । पळे महिमा थुलिया ॥१॥ पुढें तो चि करी आड । तिचा लोभ तिसी नाड । लावुनि चरफड । हात गोऊनि पळावें ॥ध्रु.॥ आधीं काकुलती । मोहो घालावा पुढती । तोंडीं पडे माती । फिरतां मागें कैचा तो ॥२॥ तुका म्हणे देवा । यासी रडवी याचा हेवा । भावें कां हे सेवा । सुखें तुम्हां नार्पिती ॥३॥
3823
लावूनि कोलित । माझा करितील घात ॥१॥ ऐसे बहुतांचे संधी । सांपडला खोळेमधीं ॥ध्रु.॥ पाहातील उणें । तेथें देती अनुमोदनें ॥२॥ तुका म्हणे रिघे । पुढें नाहीं जालें धींगे ॥३॥
3824
लावूनियां पुष्टी पोरें । आणि करकर कथेमाजी ॥१॥ पडा पायां करा विनंती । दवडा हातीं धरोनियां ॥ध्रु.॥ कुर्वाळूनि बैसे मोहें । प्रेम कां हे नासीतसे ॥२॥ तुका म्हणे वाटे चित्ती । करा फजित म्हणऊनि ॥३॥
3825
लावूनियां मुद्रा बांधोनियां कंठीं । हिंडे पोटासाटीं देशोदेशीं ॥१॥ नेसोनि कोपीन शुभ्रवर्ण जाण । पहाती पक्वान्न क्षेत्रींचें तें ॥२॥ तुका म्हणे ऐसे मावेचे मइंद । त्यापाशीं गोविंद नाहीं नाहीं ॥३॥
3826
लहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥१॥ ऐरावत रत्न थोर । तया अंकुशाचा मार ॥ध्रु.॥ ज्याचे अंगीं मोठेपण । तया यातना कठीण ॥२॥ तुका म्हणे जाण । व्हावें लहानाहुनी लहान ॥३॥
3827
लीलाविग्रही तो लेववी खाववी । यशोदा बैसवी मांडीवरी ॥१॥ मांडीवरी भार पुष्पाचिये परी । बैसोनियां करी स्तनपान ॥२॥ नभाचा ही साक्षी पाताळापरता । कुर्वाळिते माता हातें त्यासि ॥३॥ हातें कुर्वाळुनी मुखीं घाली घांस । पुरे म्हणे तीस पोट धालें ॥४॥ पोट धालें मग देतसे ढेंकर । भक्तीचें तें फार तुळसीदळ ॥५॥ तुळसीदळ भावें सहित देवापाणी । फार त्याहुनि क्षीरसागरा ॥६॥ क्षीराचा कांटाळा असे एकवेळ । भक्तीचें तें जळ गोड देवा ॥७॥ देवा भक्त जिवाहुनि आवडती । सकळ हि प्रीति त्यांच्याठायीं ॥८॥ त्यांचा हा अंकित सर्व भावें हरि । तुका म्हणे करी सर्व काज ॥९॥
3828
लेंकरा लेववी माता अळंकार । नाहीं अंतपार आवडीसी ॥१॥ कृपेचें पोसणें तुमचें मी दीन । आजि संतजन मायबाप ॥ध्रु.॥ आरुषा उत्तरीं संतोषे माउली । कवळूनि घाली हृदयात ॥२॥ पोटा आलें त्याचे नेणे गुणदोष । कल्याण चि असे असावें हें ॥३॥ मनाची ते चाली मोहाचिये सोईं । ओघें गंगा काईं परतों जाणे ॥४॥ तुका म्हणे कोठें उदार मेघां शिक्त । माझी तृषा किती चातकाची ॥५॥
3829
लेंकराचें हित । वाहे माउलीचें चित्त ॥१॥ ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभेंविण प्रीती ॥ध्रु.॥ पोटीं भार वाहे । त्याचें सर्वस्व ही साहे ॥२॥ तुका म्हणे माझें । तैसे तुम्हां संतां ओझें ॥३॥
3830
लेकरा आईतें पित्याची जतन । दावी निजधन सर्व जोडी ॥१॥ त्यापरि आमचा जालासे सांभाळ । देखिला चि काळ नाहीं आड ॥ध्रु.॥ भुकेचे संनिध वसे स्तनपान । उपायाची भिन्न चिंता नाहीं ॥२॥ आळवूनि तुका उभा पैलथडी । घातली या उडी पांडुरंगें ॥३॥
3831
लेकराची आळी न पुरवी कैसी । काय तयापाशीं उणें जालें ॥१॥ आम्हां लडिवाळां नाहीं तें प्रमाण । कांहीं ब्रम्हज्ञान आत्मस्थिती ॥ध्रु.॥ वचनाचा घेईन अनुभव पदरीं । जें हें जनाचारीं मिरवलें ॥२॥ तुका म्हणे माझी भोळिवेची आटी । दावीन शेवटीं कौतुक हें ॥३॥
3832
लेखिलें कवित्व माझे सहज बोल । न लगे चि ओल जिव्हाळ्याची ॥१॥ नये चि उत्तर कांहीं परतोनि । जालों नारायणीं न सरतें ॥ध्रु.॥ लाजिरवाणी कां वदली हे वाचा । नव्हे च ठायींचा मननशीळ ॥२॥ तुका म्हणे फळ नव्हे चि सायासा । पंढरीनिवासा काय जालें ॥३॥
3833
लेखी दुखण्यासमान । वेचला नारायणीं क्षण । उद्यांचें आजि च मरण । आणोनि म्हणे हरि भोक्ता ॥१॥ नाहीं कांहीं पडों येत तुटी । जाणें तो आहे सेवटीं । लाभ विचारोनि पोटीं । होई सेवटीं जागृत ॥ध्रु.॥ आहे ते उरे कटा । लावुनि चळ आपुला फाटा । पुरे हें न पुरे सेवटा । तरण्या बळकटा सदा वास ॥२॥ म्हणोनि मोडावा कांटाळा । अविद्यात्मक कोंवळा । होतील प्रबळा । आशा तृष्णा माया ॥३॥ क्षण या देहाच्या अंतीं । जड होउनि राहेल माती । परदेश ते परवर होती । चिळसविती नाकडोळे ॥४॥ जंव या नाहीं पातल्या विपत्ति । आयुष्य भविष्य आहे हातीं । लाभ विचारोनि गुंती । तुका म्हणे अंतीं सर्व पिसुनें ॥५॥
3834
लोक फार वाखा अमंगळ जाला । त्याचा त्याग केला पांडुरंगा ॥१॥ विषयां वंचलों मीपणा मुकलों । शरण तुज आलों पांडुरंगा ॥ध्रु.॥ घर दार अवघीं तजिलीं नारायणा । जीवींच्या जीवना पांडुरंगा ॥२॥ तुका म्हणे पडिलों पुंडलिकापाशीं । धांव हृषीकेशी आळिंगीं मज ॥३॥
3835
लोक म्हणती मज देव । हा तों अधर्म उपाव ॥१॥ आतां कळेल तें करीं । सीस तुझे हातीं सुरी ॥ध्रु.॥ अधिकार नाहीं । पूजा करिती तैसा कांहीं ॥२॥ मन जाणे पापा । तुका म्हणे मायबापा ॥३॥
3836
लोकमान देहसुख । संपत्तिउपभोग अनेक । विटंबना दुःख । तुझिये भेटीवांचूनि ॥१॥ तरी मज ये भेट ये भेट । काय ठाकलासी नीट । थोर पुण्यें वीट । तुज दैवेंचि लाधली ॥ध्रु.॥ काय ब्रम्हज्ञान करूं कोरडें । रितें मावेचें मापाडें । भेटीविण कुडें । तुझिये अवघें मज वाटे ॥२॥ आत्मस्थितीचा विचार । काय करूं हा उद्धार। न देखतां धीर । चतुर्भुज मज नाहीं ॥३॥ रिद्धीसिद्धी काय करूं । अथवा अगम्य विचारू । भेटीविण भारु । तुझिये वाटे मज यांचा ॥४॥ तुजवांचूनि कांहीं व्हावें । ऐसें नको माझिया जीवें । तुका म्हणे द्यावें । दरुषण पायांचें ॥५॥
3837
लोकां कळों आला देव आम्हांमधीं । टाकिली उपाधि तिहीं शंका ॥१॥ शंका नाहीं थोरां लाहानां जीवांसि । कळला हा हृषीकेशी मग ॥२॥ मग मनीं जाले निर्भर सकळ । संगें लोकपाळ कृष्णाचिया ॥३॥ कृष्णाचिया ओंव्या गाणें गाती गीत । कृष्णमय चत्ति जालें त्यांचें ॥४॥ त्यांसि ठावा नाहीं बाहेरिल भाव । अंतरीं च वाव सुख जालें ॥६॥ सुखें तया दीस न कळे हे राती । अखंड या ज्योती गोविंदाची ॥६॥ चिंतनें चि धालीं न लगे अन्नपाणी । तुका म्हणे मनीं समाधान ॥७॥
3838
लोखंडाचे न पाहे दोष । शिवोन परीस सोनें करी ॥१॥ जैसी तैसी तरीं वाणी । मना आणी माउली ॥ध्रु.॥ लेकराचें स्नेहे गोड । करी कोड त्यागुणें ॥ ॥ मागें पुढें रिघे लोटी । साहे खेटी करी तें ॥३॥ तुका विनंती पांडुरंगा । ऐसें सांगा आहे हें ॥४॥
3839
लोभावरी ठेवुनि हेत । करी असत्य न्याय नीत ॥१॥ त्याच्या पूर्वजां पतन । नरकीं किडे होती जाण ॥ध्रु.॥ कोटिगोहत्यापातक । त्यासी घडेल निष्टंक ॥२॥ मासां श्रवे जे सुंदरा । पाजी विटाळ पितरां ॥३॥ तुका म्हणे ऐसियासी । यम गांजील सायासी ॥४॥
3840
लोभीकें चित धन बैठे । कामीन चित्त काम । माताके चित पुत बैठें । तुकाके मन राम ॥१॥
3841
लोह कफ गारा सद्धि हे सामुग्री । अग्नि टणत्कारी दिसों येतो ॥१॥ सांगावें तें काईं सांगावें तें काईं । चत्तिा होय ठायीं अनुभव तो ॥ध्रु.॥ अन्नें सांगों येतो तृप्तीचा अनुभव । करूनि उपाव घेऊं हेवा ॥२॥ तुका म्हणे मिळे जीवनीं जीवन । तेथें कोणा कोण नांव ठेवी ॥३॥
3842
लोह चुंबकाच्या बळें । उभें राहिलें निराळें ॥१॥ तैसा तूं चि आम्हांठायीं । खेळतोसी अंतर्बाहीं ॥ध्रु.॥ भक्ष अग्नीचा तो दोरा । त्यासि वांचवी मोहरा ॥२॥ तुका म्हणे अधीलपणें । नेली लांकडें चंदनें ॥३॥
3843
लौकिकापुरती नव्हे माझी सेवा । अनन्य केशवा दास तुझा ॥१॥ म्हणऊनि करीं पायांसवें आळी । आणीक वेगळी नेणें परी ॥ध्रु.॥ एकविध आम्ही स्वामिसेवेसाटीं । वरी तो चि पोटीं एकभाव ॥२॥ तुका म्हणे करीं सांगितलें काम । तुम्हां धर्माधर्म ठावे देवा ॥३॥
3844
लौकिकासाटीं या पसार्‍याचा गोवा । कांहीं नाहीं देवा लागों येत ॥१॥ ठेवावा माथा तो नुचलावा पायीं । ठांयींचिये ठांयीं हालों नये ॥ध्रु.॥ डव्हळिल्या मनें वितळिलें रूप । नांवऐसें पाप उपाधीचें ॥२॥ तुका म्हणे देव प्रीतीनें कवळी । ठेवील जवळी उठवूनि ॥३॥
3845
वंचुनियां पिंड । भाता दान करी लंड ॥१॥ जैसी याची चाली वरी । तैसा अंतरला दुरी ॥ध्रु.॥ मेला राखे दिस । ज्यालेपणें जालें वोस ॥२॥ तुका म्हणे देवा । लोभें न पुरे चि सेवा ॥३॥
3846
वंदिलें वंदावें जीवाचिये साटीं । किंवा बरी तुटी आरंभीं च ॥१॥ स्वहिताची चाड ते ऐका हे बोल । अवघें चि मोल धीरा अंगीं ॥ध्रु.॥ सिंपिलें तें रोंप वरीवरी बरें । वाळलिया वरी कोंभ नये ॥२॥ तुका म्हणे टाकीघायें देवपण । फुटलिया जन कुला पुसी ॥३॥
3847
वंदीन मी भूतें । आतां अवघीं चि समस्तें ॥१॥ तुमची करीन भावना । पदोपदीं नारायणा ॥ध्रु.॥ गाळुनियां भेद । प्रमाण तो ऐसा वेद ॥२॥ तुका म्हणे मग । नव्हे दुजयाचा संग ॥३॥
3848
वंदूं चरणरज सेवूं उष्टावळी । पूर्वकर्मा होळी करुनी सांडूं ॥१॥ अमुप हे गांठीं बांधूं भांडवल । अनाथा विठ्ठल आम्हां जोगा ॥ध्रु.॥ अवघे होती लाभ एका या चिंतनें । नामसंकीर्तनें गोविंदाच्या ॥२॥ जन्ममरणाच्या खुंटतील खेपा । होईल हा सोपा सिद्ध पंथ ॥३॥ गेले पुढें त्यांचा शोधीत मारग । चला जाऊं माग घेत आम्ही ॥४॥ तुका म्हणे घालूं जीवपणा चिरा । जाऊं त्या माहेरा निजाचिया ॥५॥
3849
वक्त्या आधीं मान । गंध अक्षता पूजन । श्रोता यति जाला जाण । तरी त्या नाहीं उचित ॥१॥ शीर सर्वांगा प्रमाण । यथाविधि कर चरण । धर्माचें पाळण । सकळीं सत्य करावें ॥ध्रु.॥ पट्ट पुत्र सांभाळी । पिता त्याची आज्ञा पाळी । प्रमाण सकळीं । ते मर्यादा करावी ॥२॥ वरासनीं पाषाण । तो न मानावा सामान्य । येर उपकरणें । सोनियाचीं परी तीं नीच ॥३॥ सोनियाचा पैंजण । मुगुटमणि केला हीण । जयाचें कारण । तया ठायीं अळंकार ॥४॥ सेवका स्वामीसाठीं मान । त्याचें नाम त्याचें धन । तुका म्हणे जाण । तुम्ही संत तदर्थी ॥५॥
3850
वचन तें नाहीं तोडीत शरीरा । भेदत अंतरा वज्रा-ऐसें ॥१॥ कांहीं न सहावें काशा करणें । संदेह निधान देह बळी ॥ध्रु.॥ नाहीं शब्द मुखीं लागत तिखट । नाहीं जड होत पोट तेणें ॥२॥ तुका म्हणे जरी गिळेअहंकार । तरी वसे घर नारायण ॥३॥
3851
वचना फिरती अधम जन । नारायण तो नव्हे ॥१॥ केला आतां अंगीकार । न मनी भार समर्थ ॥ध्रु.॥ संसाराचा नाहीं पांग । देव सांग सकळ ॥२॥ तुका म्हणे कीर्त वाणूं । मध्यें नाणूं संकल्प ॥३॥
3852
वचनांचे मांडे दावावे प्रकार । काय त्या साचार कौतुकाचे ॥१॥ जातां घरा मागें । उरों नेणें खंती । मिळाल्या बहुतीं फांकलिया ॥ध्रु.॥ उदयीं च अस्त उदयो संपादला । कल्पनेचा केला जागेपणें ॥२॥ जाणवूनि गेला हांडोरियां पोरां । सावध इतरां करुनी तुका ॥३॥ स्वामीस संतांनीं पुसलें कीं तुम्हांस वैराग्य कोण्या प्रकारें जालें तें सांगा - ते अभंग ॥ ३ ॥
3853
वचनाचा अनुभव हातीं । बोलविती देव मज ॥१॥ परि हें न कळे अभाविकां । जडलोकां जिवांसी ॥ध्रु.॥ अश्रुत हे प्रसादिक । कृपा भीक स्वामीची ॥२॥ तुका म्हणे वरावरी । जातों तरी सांगत ॥३॥
3854
वचनें चि व्हावें आपण उदार । होइल विश्वंभर संपुष्ट चि ॥१॥ सत्यसंकल्पाचीं फळें बीजाऐसीं । शुद्ध नाहीं नासी पावों येत ॥ध्रु.॥ वंचिलिया काया येतसे उपेगा । शरीर हें नरकाचें चि आळें ॥२॥ तुका म्हणे जीव जितां थारे लावा । पडिलिया गोवा देशधडी ॥३॥
3855
वचनें ही नाड । न बोले तें मुकें खोड ॥१॥ दोहीं वेगळें तें हित । बोली अबोलणी नीत ॥ध्रु.॥ अंधार प्रकाशी । जाय दिवस पावे निशी ॥२॥ बीज पृथिवीच्या पोटीं । तुका म्हणे दावी दृष्टी ॥३॥
3856
वटवट केली । न विचारितां मना आली ॥१॥ मज कराल तें क्षमा । कैसें नेणों पुरुषोत्तमा ॥ध्रु.॥ उचित न कळे । जिव्हा भलतें चि बरळे ॥२॥ तुका म्हणे कांहीं । लौकिकाची चाड नाहीं ॥३॥
3857
वडिलें दिलें भूमिदान । तें जो मागे अभिळासून ॥१॥ अग्रपूजेचा अधिकारी । श्रेष्ठ दंड यमा घरीं ॥ध्रु.॥ उभयकुल समवेत । नर्का प्रवेश अद्भुत ॥२॥ तप्तलोहें भेटी । तुका म्हणे कल्पकोटी ॥३॥
3858
वणूप महिमा ऐसी नाहीं मज वाचा । न बोलवे साचा पार तुझा ॥१॥ ठायींची हे काया ठेविली चरणीं । आतां ओवाळुनि काय सांडूं ॥ध्रु.॥ नाहीं भाव ऐसा करूं तुझी सेवा । जीव वाहूं देवा तो ही तुझा ॥२॥ मज माझें कांहीं न दिसे पाहातां । जें तुज अनंता समर्पावें ॥३॥ तुका म्हणे आतां नाहीं मज थार । तुझे उपकार फेडावया ॥४॥
3859
वत्स पळे धेनु धांवे पाठीलागीं । प्रीतीचा तो अंगीं आयुर्भाव ॥१॥ शिकविलें काय येईल कारणा । सूत्र ओढी मना आणिकांच्या ॥ध्रु.॥ सांडिलें तें नाहीं घेत मेळवितां । म्हणऊनि लाता मागें सारी ॥२॥ तुका म्हणे आग्रह करावा न लगे । सांगतसे अंगें अनुभव ॥३॥
3860
वदवावी वाणी माझी कृपावंता । वागपुष्प संतां समर्पीशी ॥१॥ सर्वसंकटाचा तुम्हां परिहार । घालावा म्यां भार पांडुरंगा ॥ध्रु.॥ एकसरें चिंता ठेवूनियां पायीं । जालों उतराईं होतों तेणें ॥२॥ तुका म्हणे येथें जालें अवसान । काया वाचा मन वेचूनियां ॥३॥
3861
वदे वाणी परि दुर्लभ अनुभव । चालीचा चि वाहो बहुतेक ॥१॥ आम्ही ऐसें कैसें राहावें निश्चळ । पाठिलाग काळ जिंतितसे ॥ध्रु.॥ वाढवितां पोट दंभाचे पसारे । येतील माघारे मुदला तोटे ॥२॥ तुका म्हणे बरें जागवितां मना । तुमच्या नारायणा अभयें करें ॥३॥
3862
वदे साक्षत्वेंसीं वाणी । नारायणीं मिश्रित ॥१॥ न लगे कांहीं चाचपावें । जातों भावें पेरीत ॥ध्रु.॥ भांडार त्या दातियाचें । मी कैचें ये ठायीं ॥२॥ सादावीत गेला तुका । येथें एकाएकीं तो ॥३॥
3863
वरता वेंघोनि घातली उडी । कळंबाबुडीं यमुनेसी ॥१॥ हरि बुडाला बोंब घाला । घरचीं त्यांला ठावा नाहीं ॥ध्रु.॥ भवनदीचा न कळे पार । काळिया माजी थोर विखार ॥२॥ तुका म्हणे काय वाउग्या हाका । हातींचा गमावुनियां थिंका ॥३॥
3864
वरतें करोनियां तोंड । हाका मारितो प्रचंड ॥१॥ राग आळवितो नाना । गातो काय तें कळेना ॥ध्रु.॥ आशा धरोनि मनीं । कांहीं देईंल म्हणऊनि ॥२॥ पोटा एका साटीं । तुका म्हणे जाले कष्टी ॥३॥
3865
वरि बोला रस । कथी ज्ञान माजी फोस ॥१॥ ऐसे लटिके जे ठक । तयां येहे ना पर लोक ॥ध्रु.॥ परिस एक सांगे । अंगा धुळी हे न लगे ॥२॥ तुका म्हणे हाडें । कुतर्‍यां लाविलें झगडें ॥३॥
3866
वरिवरि बोले युद्धाचिया गोष्टी । परसैन्या भेटी नाहीं जाली ॥१॥ पराव्याचे भार पाहुनियां दृष्टी । कांपतसे पोटीं थरथरां ॥ध्रु.॥ मनाचा उदार रायांचा जुंझार । फिरंगीचा मार मारीतसे ॥२॥ धन्य त्याची माय धन्य त्याचा बाप । अंगीं अनुताप हरिनामें ॥३॥ तुका म्हणे साधु बोले खर्गधार । खोचती अंतरें दुर्जनाचें ॥४॥
3867
वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची । कीर्ती मानवाची सांगों नये ॥१॥ उदंड चि जाले जन्मोनियां मेले । होऊनियां गेले राव रंक ॥ध्रु.॥ त्यांचें नाम कोणी नेघे चराचरीं । साही वेद चारी वर्णिताती ॥२॥ अक्षय अढळ चळेना ढळेना । तया नारायणा ध्यात जावें ॥३॥ तुका म्हणे तुझी विठ्ठल चित्ती ध्यातां । जन्ममरण व्यथा दूर होती ॥४॥
3868
वर्णावे ते किती । केले पवाडे श्रीपति ॥१॥ विश्वासिया घडे लाभ । देइल तरी पद्मनाभ ॥ध्रु.॥ भाव शुद्ध तरी । सांगितलें काम करी ॥२॥ तुका म्हणे भोळा देव । परि हा नागवी संदेह ॥३॥
3869
वर्णाश्रम करिसी चोख । तरि तूं पावसी उत्तम लोक ॥१॥ तुजला तें नाहीं ठावें । जेणें अंगें चि ब्रम्ह व्हावें ॥ध्रु.॥ जरि तूं जालासी पंडित । करिसी शब्दाचें पांडित्य ॥२॥ गासी तान मान बंध । हाव भाव गीत छंद ॥३॥ जाणसील तूं स्वतंत्र । आगमोक्त पूजायंत्र ॥४॥ साधनाच्या ओढी । डोळियांच्या मोडामोडी ॥५॥ तुका म्हणे देहीं । संत जाहाले विदेही ॥६॥
3870
वर्त्ततां बासर । काय करावें शरीर ॥१॥ ठेवा नेमून नेमून । माझें तुमचे पायीं मन ॥ध्रु.॥ नेदाविया वृत्ती । कोठें फांकों चि श्रीपती ॥२॥ तुका म्हणे भले । जन्मा येऊनियां जाले ॥३॥
3871
वर्म तरि आम्हां दावा । काय देवा जाणें मी ॥१॥ बहुतां रंगीं हीन जालों । तरि आलों शरण ॥ध्रु.॥ द्याल जरि तुम्ही धीर । होईल स्थिर मन ठायीं ॥२॥ तुका म्हणे सत्ताबळें । लडिवाळें राखावीं ॥३॥
3872
वळितें जें गाई । त्यासि फार लागे काई ॥१॥ निवे भावाच्या उत्तरीं । भलते एके धणी वरी ॥ध्रु.॥ न लगती प्रकार । कांहीं मानाचा आदर ॥२॥ सांडी थोरपणा । तुका म्हणे सवें दीना ॥३॥
3873
वळी गाई धांवे घरा । आमच्या करी येरझारा ॥१॥ नांव घेतां तो जवळी । बहु भला कान्हो बळी ॥ध्रु.॥ नेदी पडों उणें पुरें । म्हणे अवघें चि बरें ॥२॥ तुका म्हणे चित्ता । वाटे न व्हावा परता ॥३॥
3874
वसनें थिल्लरीं । बेडुक सागरा धिक्कारी ॥१॥ नाहीं देखिला ना ठावा । तोंड पिटी करी हांवा ॥ध्रु.॥ फुगातें काउळें । म्हणे मी राजहंसा आगळें ॥२॥ गजाहूनि खर । म्हणे चांगला मी फार ॥३॥ मुलाम्याचें नाणें । तुका म्हणे नव्हे सोनें ॥४॥
3875
वसवावें घर । देवें बरें निरंतर ॥१॥ संग आसनीं शयनीं । घडे भोजनीं गमनीं ॥ध्रु.॥. संकल्प विकल्प । मावळोनि पुण्यपाप ॥२॥ तुका म्हणे काळ । अवघा गोविंदें सुकाळ ॥३॥
3876
वांजा गाईं दुभती । देवा ऐसी तुझी ख्याति ॥१॥ ऐसें मागत नाहीं तुज । चरण दाखवावे मज ॥ध्रु.॥ चातक पाखरूं । त्यासी वर्षे मेघधारु ॥ पक्षी राजहंस । अमोलिक मोतीं त्यास॥३॥ तुका म्हणे देवा । कां गा खोचलासी जीवा ॥४॥
3877
वांझेनें दाविलें ग†हवार लक्षणें । चिरगुटें घालून वाथयाला ॥१॥ तेवीं शब्दज्ञानी करिती चावटी । ज्ञान पोटासाटीं विकूनियां ॥ध्रु.॥ बोलाचि च कढी बोलाचा चि भात । जेवुनियां तृप्त कोण जाला ॥२॥ कागदीं लिहितां नामाची साकर । चाटितां मधुर गोडी नेदी ॥३॥ तुका म्हणे जळो जळो ते महंती । नाहीं लाज चित्तीं आठवण ॥४॥
3878
वांटा घेई लवकरि । मागें अंतरसी दुरी । केली भरोवरी । सार नेती आणीक ॥१॥ ऐसीं भांमावलीं किती । काय जाणों नेणों किती । समय नेणती । माथां भार वाहोनि ॥ध्रु.॥ नाहीं सारिलें तोंवरी । धांव घेई वेग करीं । घेतलें पदरीं । फावलें तें आपुलें ॥२॥ फट लंडी म्हणे तुका । एक न साहावे धका । तरि च या सुखा । मग कैसा पावसी ॥३॥
3879
वांयां ऐसा जन्म गेला । हें विठ्ठला दुःख वाटे ॥१॥ नाहीं सरता जालों पायीं । तुम्ही जई न पुसा ॥ध्रु.॥ कां मी जीतों संवसारीं । अद्यापवरी भूमिभार ॥२॥ तुका म्हणे पंढरिनाथा । सबळ व्यथा भवरोग ॥३॥
3880
वांयां जातों देवा । नेणें भक्ती करूं सेवा ॥१॥ आतां जोडोनियां हात । उभा राहिलों निवांत ॥ध्रु.॥ करावें तें काय । न कळें अवलोकितों पाय ॥२॥ तुका म्हणे दान । दिलें पदरीं घेईंन ॥३॥
3881
वांयां जाय ऐसा । आतां उगवावा फांसा ॥१॥ माझें परिसावें गार्‍हाणें । सुखदुःखाचीं वचनें ॥ध्रु.॥ हा चि आम्हां ठाव। पायीं निरोपाया भाव ॥२॥ तुका म्हणे जार । तुझा तुज देवा भार॥३॥
3882
वांयां तैसे बोल हरिशीं अंतर । केले होती चार भयभेदें ॥१॥ भेदभय गेलें नोळखे आपणा । भेटी नारायणा कंसा जाली ॥२॥ जाली भेटी कंसा हरिशीं निकट । सन्मुख चि नीट येरयेरां ॥३॥ येरयेरां भेटी युद्धाच्या प्रसंगीं । त्याचें शस्त्र अंगीं हाणितलें ॥४॥ त्याचें वर्म होतें ठावें या अनंता । तुका म्हणे सत्तानायक हा ॥५॥
3883
वांयांविण वाढविला हा लौकिक । आणिला लटिक वाद दोघां ॥१॥ नाहीं ऐसा जाला देव माझ्या मतें । भुकेलें जेवितें काय जाणे ॥ध्रु.॥ शब्दज्ञानें गौरविली हे वैखरी । साच तें अंतरीं बिंबे चि ना ॥२॥ जालों परदेशी गेले दोन्ही ठाय । संसार ना पाय तुझे देवा ॥३॥ तुका म्हणे मागें कळों येतें ऐसें । न घेतों हें पिसें लावूनियां ॥४॥
3884
वाइटानें भलें । हीनें दाविलें चांगलें ॥१॥ एकाविण एका । कैचें मोल होतें फुका ॥ध्रु.॥ विषें दाविलें अमृत । कडू गोड घातें हित ॥२॥ काळिमेनें ज्योती । दिवस कळों आला राती ॥३॥ उंच निंच गारा । हिरा परिस मोहरा ॥४॥ तुका म्हणे भले । ऐसे नष्टांनीं कळले ॥५॥
3885
वाखर घेउनि आलें । त्यासी तरवारेणें हालें ॥१॥ नव्हे आपुलें उचित । करुनि टाकावें फजित ॥ध्रु.॥ अंगुळिया मोडी । त्यासी काय सिलें घोडीं ॥२॥ नपुंसकासाठीं । तुका म्हणे न लगे जेठी ॥३॥
3886
वाघाचा काळभूत दिसे वाघाऐसा । परी नाहीं दशा साच अंगीं ॥१॥ बाहेरील रंग निवडी कसोटी । संघष्टणें भेटी आपेआप ॥ध्रु.॥ सिकविलें तैसें नाचावें माकडें । न चले त्यापुढें युक्ति कांहीं ॥२॥ तुका म्हणे करी लटिक्याचा सांटा । फजित तो खोटा शीघ्र होय ॥३॥
3887
वाघें उपदेशिला कोल्हा । सुखें खाऊं द्यावें मला ॥१॥ अंतीं मरसी तें न चुके । मज ही मारितोसी भुके ॥ध्रु.॥ येरू म्हणे भला भला । निवाड तुझ्या तोंडें जाला ॥२॥ देह तंव जाणार । घडेल हा उपकार ॥३॥ येरू म्हणे मनीं । ऐसें जावें समजोनि ॥४॥ गांठी पडली ठका ठका । त्याचा धर्म बोले तुका ॥५॥
3888
वाचाचापल्ये बहु जालों कुशळ । नाहीं बीजमूळ हाता आलें ॥१॥ म्हणोनि पंढरिराया दुखी होतें मन । अंतरींचे कोण जाणे माझें ॥ध्रु.॥ पूज्य जालों अंगा आला अभिमान । पुढील कारण खोळंबलें ॥२॥ तुका म्हणे खूण न कळे चि निरुती । सांपडलों हातीं अहंकाराचे ॥३॥
3889
वाचाळ लटिके अक्त जे खळ । आपुलें तें बळ वाखाणीती ॥१॥ बळें हुंबरती सत्य त्यां न कळे । नुघडती डोळे अंधळ्यांचे ॥२॥ आसुडिल्या माना हात पाय नेटें । तंव भार बोटें उचलिला ॥३॥ लटिका चि आम्हीं सीण केला देवा । कळों आलें तेव्हां सकळांसि ॥४॥ आलें कळों तुका म्हणे अनुभवें । मग अहंभावें सांडवलीं ॥५॥
3890
वाचे विठ्ठल नाहीं । तो चि प्रेतरूप पाहीं ॥१॥ धिग त्याचें ज्यालेपण । भार न साहे मेदिन ॥ध्रु.॥ न बैसे कीर्तनीं । गुण नाइके जो कानीं ॥२॥ जातां कांटाळे देउळा । तो चि सुना मुखकाळा ॥३॥ हरिभक्तीविण । त्याचें जळो शाहाणपण ॥४॥ तुका म्हणे तेणें । वंशा आणियेलें उणें ॥५॥
3891
वाचेचिया आळा कवळिलें ब्रम्ह । चुकविला श्रम पृथक तो ॥१॥ सुलभ जालें सुलभ जालें । जवळी आलें पंढरिये ॥ध्रु.॥ नामरूपाचें बांधलें मोटळें । एक एका वेळे सारियेलें ॥२॥ तुका म्हणे वाटे चुकली वसती । उद्धार तो हातीं आणियेला ॥३॥
3892
वाजतील तुरें । येणें आनंदें गजरें ॥१॥ जिंकोनियां अहंकार । पावटणी केलें शिर ॥ध्रु.॥ काळा नाहीं वाव । परा श्रमा कोठें ठाव ॥२॥ तुका म्हणे आतां । सोपें वैकुंठासी जातां ॥३॥
3893
वाट दावी त्याचें गेलें काय । नागवला जो वारितां जाय ॥१॥ ऐसीं मागें ठकलीं किती । सांगतां खाती विषगोळा ॥ध्रु.॥ विचारोनि पाहे त्यास । न वजे जीवें नव्हे नास ॥२॥ तुका म्हणे जो रुसला जीवा । तयासी केशवा काय चाले ॥३॥
3894
वाट पाहें बाहे निडळीं ठेवुनियां हात । पंढरीचे वाटे दृष्टी लागलें चित्त ॥१॥ कई येतां देखें माझा मायबाप । घटिका बोटें दिवस लेखीं धरूनियां माप ॥ध्रु.॥ डावा डोळा लवे उजवी स्फुरते बाहे । मन उतावळि भाव सांडुनियां देहे ॥२॥ सुखसेजे गोडचित्तीं न लगे आणीक । नाठवे घर दार तान पळाली भूक ॥३॥ तुका म्हणे धन्य दिवस ऐसा तो कोण । पंढरीचे वाटे येतां मूळ देखेन ॥४॥
3895
वाट पाहें हरि कां नये आझूनि । निष्ठ‍ कां मनीं धरियेलें ॥१॥ काय करूं धीर होत नाहीं जीवा । काय आड ठेवा उभा ठेला ॥ध्रु.॥ नाहीं माझा धांवा पडियेला कानीं । कोठें चक्रपाणी गुंतलेती ॥२॥ नाही आलें कळों अंतरा अंतर । कृपावंत फार ऐकतो ॥३॥ बहुता दिसांचें राहिलें भातुकें । नाहीं कवतुकें कृवाळिलें ॥४॥ तुका म्हणे देई एकवेळा भेटी । शीतळ हें पोटीं होइल मग ॥५॥
3896
वाट वैकुंठीं पाहाती । भक्त कैं पां येथें येती । तयां जन्ममरणखंती । नाहीं चित्तीं परलोक ॥१॥ धन्यधन्य हरिचे दास । तयां सुलभ गर्भवास । ब्रम्हादिक करिती आस । तीर्थावास भेटीची ॥ध्रु.॥ कथाश्रवण व्हावयास । यमधर्मा थोर आस । पाहे रात्रदिवस । वाट कर जोडोनियां ॥२॥ रिद्धिसिद्धि पाचारितां । त्या धुंडिती हरिभक्तां । मोक्ष सायोज्यता । वाट पाहे भक्तांची ॥३॥ असती जेथें उभे ठेले । सदा प्रेमसुखें धाले । आणीक ही उद्धरिले । महादोषी चांडाळ ॥४॥ सकळ करिती त्यांची आस । सर्वभावें ते उदास । धन्यभाग्य त्यांस । तुका म्हणे दरुषणें ॥५॥
3897
वाटीभर विष दिलें प्रल्हादासी । निर्भय मानसीं तुझ्याबळें ॥१॥ भोक्ता नारायण केलें तें प्राशन । प्रतापें जीवन जालें तुझ्या ॥ध्रु.॥ नामाच्या चिंतनें विषाचें तें आप । जाहालें देखत नारायणा ॥२॥ तुका म्हणे ऐसे तुझे बडिवार । सिणला फणीवर वर्णवेना ॥३॥
3898
वाटुली पाहातां सिणले डोळुले । दाविसी पाउलें कइं वो डोळां ॥१॥ तूं माय माउली कृपेची साउली । विठ्ठले पाहिली वास तुझी ॥२॥ तुका म्हणे माझ्या असांवल्या बाह्या । तुज क्षेम द्याया पांडुरंगा ॥३॥
3899
वाटे या जनाचें थोर बा आश्चर्य । न करिती विचार कां हिताचा ॥१॥ कोण दम ऐसा आहे यांचे पोटीं । येईल शेवटीं कोण कामा ॥ध्रु.॥ काय मानुनियां राहिले निश्चिंती । काय जाब देती यमदूतां ॥२॥ कां हीं विसरलीं मरण बापुडीं । काय यांसी गोडी लागलीसे ॥३॥ काय हातीं नाहीं करील तयासी । काय जालें यांसी काय जाणों ॥४॥ कां हीं नाठविती देवकीनंदना । सुटाया बंधनापासूनियां ॥५॥ काय मोल यासी लागे धन वित्त । कां हें यांचें चित्त घेत नाहीं ॥६॥ तुका म्हणे कां हीं भोगितील खाणी । कां त्या चक्रपाणी विसरलीं ॥७॥
3900
वाढलियां मान न मनावी निश्चिती । भूतांचिये प्रीती भूतपण ॥१॥ म्हणऊनि मना लावावी कांचणी । इंद्रियांचे झणी ओढी भरे ॥ध्रु.॥ एका एकपणें एकाचिये अंगीं । लागे रंग रंगीं मिळलिया ॥२॥ तुका म्हणे देव निष्काम निराळा । जीवदशे चाळा चळणांचा ॥३॥
3901
वाढवावा पुढें आणीक प्रकार । एक चि तें फार रुचि नेदी ॥१॥ निंच नवें लेणें देह हा पवाडा । पालट रोकडा वरावरी ॥ध्रु.॥ दिसे शोभिवंत सेवेनें सेवक । स्वामीची ते लोकत्रयीं कीर्ति ॥२॥ तुका म्हणे आजी पाववा संतोष । करुनि कीर्तिघोष नाचईंन ॥३॥
3902
वाढविलें कां गा । तुम्ही एवढें पांडुरंगा ॥१॥ काय होती मज चाड । एवढी करावया बडबड ॥ध्रु.॥ ब्रम्हसंतर्पण । लोकीं करावें कीर्तन ॥२॥ निमित्याचा धणी । तुका म्हणे नेणे कोणी ॥३॥
3903
वारंवार तुज द्यावया आठव । ऐक तो भाव माझा कैसा ॥१॥ गेले मग नये फिरोन दिवस । पुडिलांची आस गणित नाहीं ॥ध्रु.॥ गुणां अवगुणांचे पडती आघात । तेणें होय चित्त कासावीस ॥२॥ कांहीं एक तुझा न देखों आधार । म्हणऊनी धीर नाहीं जीवा ॥३॥ तुका म्हणे तूं ब्रम्हांडाचा जीव । तरी कां आम्ही कींव भाकीतसों ॥४॥
3904
वारंवार हा चि न पडावा विसर । वसावें अंतर तुमच्या गुणीं ॥१॥ इच्छेचा ये दाता तूं एक समर्था । अगा कृपावंता मायबापा ॥ध्रु.॥ लाभाचिये वोढी उताविळे मन । त्यापरि चिंतन चरणाचें ॥२॥ तुका म्हणे जीवी जीवन ओलावा । पांडुरंगे दावा शीघ्र आतां ॥३॥
3905
वारकरी पायांपाशीं । आले त्यांसी विनविलें ॥१॥ काय काय तें आइका । विसरों नका रंकासी ॥ध्रु.॥ चिंतावोनि चिंता केली । हे राहिली अवस्था ॥२॥ तुका म्हणे संसारा । रुसलों खरा यासाठीं ॥३॥
3906
वाराणसी गया पाहिली द्वारका । परी नये तुका पंढरीच्या ॥१॥ पंढरीसी नाहीं कोणा अभिमान । पायां पडे जन एकमेका ॥२॥ तुका म्हणे जाय एकवेळ पंढरी । तयाचिये घरीं यम न ये ॥३॥
3907
वाराणसीपयपत असों सुखरूप । सांगावा निरोप संतांसी हा ॥१॥ येथूनियां आम्हां जाणें निजधामा । सवें असे आम्हां गरुड हा ॥२॥ कृपा असों द्यावी मज दीनावरी । जातोंसों माहेरी तुका म्हणे ॥३॥ शखे १५७१ एकाहत्तरीं विरोधनामसंवत्सरीं फालगुनवद्य द्वितीया सोमवासरीं प्रथमप्रहरीं तुकोबा गुप्त जाले ॥१॥
3908
वारितां बळें धरितां हातीं । जुलुमें जाती नरकामधीं ॥१॥ रंडीदासाप्रति कांहीं । उपदेश तो ही चालेना ॥ध्रु.॥ जन्म केला वाताहात । थोर घात येठायीं ॥२॥ तुका म्हणे पंढरीनाथा । तुझी कथा दूषीती ॥३॥
3909
वारिलें लिगाड । बहुदिसांचें हें जाड ॥१॥ न बोलावें ऐसें केलें । काहीं वाउगें तितुलें ॥ध्रु.॥ जाला चौघांचार । गेला खंडोनि वेव्हार ॥२॥ तुका म्हणे देवा । करीन ते घ्यावी सेवा ॥३॥
3910
वाळूनियां जन सांडी मज दुरी । करिसील हरी ऐसें कधीं ॥१॥ आठवीन पाय धरूनि अनुताप । वाहे जळ झोंप नाहीं डोळां ॥ध्रु.॥ नावडती जीवा आणीक प्रकार । आवडी ते फार एकांताची ॥२॥ तुका म्हणे ऐसी धरितों वासना । होई नारायणा साई मज ॥३॥
3911
वाळो जन मज म्हणोत शिंदळी । परि हा वनमाळी न विसंबें ॥१॥ सांडूनि लौकिक जालियें उदास । नाहीं भय आस जीवित्वाची ॥२॥ नाइकें वचन बोलतां या लोकां । म्हणे जालों तुका हरिरता ॥३॥
3912
वास नारायणें केला मथुरेसि । वधूनि दुष्टांसि तये ठायीं ॥१॥ ठायीं पितियाचे मानी उग्रसेना । प्रतिपाळ जनांसहित लोकां ॥२॥ लोकां दुःख नाहीं मागील आठव । देखियेला देव दृष्टी त्यांणीं ॥३॥ देखोनियां देवा विसरलीं कंसा । ठावा नाहीं ऐसा होता येथें ॥४॥ येथें दुजा कोणी नाहीं कृष्णाविणें । ऐसें वाटे मनें काया वाचा ॥५॥ काया वाचा मन कृष्णीं रत जालें । सकळां लागलें कृष्णध्यान ॥६॥ ध्यान गोविंदाचें लागलें या लोकां । निर्भर हे तुका म्हणे चित्ती ॥७॥
3913
वासनेच्या मुखीं अदळूनि भीतें । निर्वाहापुरतें कारण तें ॥१॥ या नांवें अंतरा आला नारायण । चित्तसमाधान खुण त्याची ॥ध्रु.॥ सर्वकाळ हा चि करणें विचार । विवेकीं सादर आत्मत्वाचे ॥२॥ तुका म्हणे जों जों भजनासी वळे । अंग तों तों कळे सन्निधता ॥३॥
3914
वाहवितों पुरीं । आतां उचित तें करीं ॥१॥ माझी शक्ति नारायणा । कींव भाकावी करुणा ॥ध्रु.॥ आम्हां ओढी काळ । तुझें क्षीण झालें बळ ॥२॥ तुका म्हणे गोडी । जीवा मातेचिया ओढी ॥३॥
3915
विंचा पीडी नांगी । ज्याचा दोष त्याचे अंगीं ॥१॥ केला पाहिजे विचार । मन मित्र दावेदार ॥ध्रु.॥ मधुरा उत्तरीं । रांवा खेळे उरावरी ॥२॥ तुका म्हणे रेडा । सुखें जाती ऐशा पीडा ॥३॥
3916
विकल तेथें विका । माती नांव ठेवूनि बुका ॥१॥ हा तो निवाड्याचा ठाव । खर्‍या खोट्या निवडी भाव ॥ध्रु.॥ गर्‍हवारे हा विधि । पोट वाढविलें चिंधीं ॥२॥ लावूं जाणे विल्हे। तुका साच आणिक कल्हे ॥३॥
3917
विचा केला ठोबा । म्हणोनि नांव तो विठोबा ॥१॥ कां रे नेणां त्याचें नांव । काय वेदासि नाहीं ठाव ॥ध्रु.॥ शेष स्तुती प्रवर्तला । जिव्हा चिरूनि पलंग जाला ॥२॥ तुका म्हणे सत्ता । ज्याची काळाचिये माथा ॥३॥
3918
विचार करिती बैसोनि गौळणी । ज्या कृष्णकामिनी कामातुरा ॥१॥ एकांत एकल्या एका च सुखाच्या । आवडती त्यांच्या गोष्टी त्यांला ॥२॥ तर्कवितर्किणी दुराविल्या दुरी । मौन त्या परिचारी आरंभिलें ॥३॥ कुशळा कवित्या कथित्या लोभिका । त्या ही येथें नका आम्हांपाशीं ॥४॥ बोलक्या वाचाळा कृष्णरता नाहीं । यां चोरोनि तींहीं खेट केली ॥५॥ भेऊनियां जना एकी सवा जाल्या । वाती विझविल्या दाटोबळें ॥६॥ कृष्णसुख नाहीं कळलें मानसीं । निंदिती त्या त्यासी कृष्णरता ॥७॥ तो नये जवळी देखोनि कोल्हाळ । म्हणउनि समेळ मेळविला ॥८॥ अंतरीं कोमळा बाहेरी निर्मळा । तल्लीन त्या बाळा कृष्णध्यानीं ॥९॥ हरिरूपीं दृष्टि कानीं त्या च गोष्टी । आळंगिती कंठीं एका एकी ॥१०॥ न साहे वियोग करिती रोदना । भ्रमष्टि भावना देहाचिया ॥११॥ विसरल्या मागें गृह सुत पती । अवस्था याचिती गोविंदाची ॥१२॥ अवस्था लागोनि निवळ चि ठेल्या । एका एकी जाल्या कृष्णरूपा ॥१३॥ कृष्णा म्हणोनियां देती आलिंगन । विरहताप तेणें निवारेना ॥१४॥ ताप कोण वारी गोविंदावांचूनि । साच तो नयनीं न देखतां ॥१५॥ न देखतां त्यांचा प्राण रिघों पाहे । आजि कामास ये उसिर केला ॥१६॥ रित्या ज्ञानगोष्टी तयां नावडती । आळिंगण प्रीती कृष्णाचिया ॥१७॥ मागें कांहीं आम्ही चुकलों त्याची सेवा । असेल या देवा राग आला ॥१८॥ आठविती मागें पापपुण्यदोष । परिहार एकीस एक देती ॥१९॥ अनुतापें जाल्या संतप्त त्या बाळा । टाकुनि विव्हळा धरणी अंग ॥२०॥ जाणोनि चरित्र जवळी च होता । आली त्या अनंता कृपा मग ॥२१॥ होउनी प्रगट दाखविलें रूप । तापत्रय ताप निवविले ॥२२॥ निवालेया देखोनि कृष्णाचें श्रीमुख । शोक मोह दुःख दुरावला ॥२३॥ साच भाव त्यांचा आणुनियां मना । आळंगितो राणा वैकुंठींचा ॥२४॥ हरिअंगसंगें हरिरूप जाल्या । बोलों विसरल्या तया सुखा ॥२५॥ व्यभिचारभावें भोगिलें अनंता । वर्तोनि असतां घराचारी ॥२६॥ सकळा चोरोनि हरि जयां चित्ती । धन्य त्या नांदती तयामध्यें ॥२७॥ उणें पुरें त्यांचें पडों नेंदी कांहीं । राखे सर्वां ठायीं देव तयां ॥२८॥ न कळे लाघव ब्रम्हादिकां भाव । भक्तिभावें देव केला तैसा ॥२९॥ तुका म्हणे त्यांचा धन्य व्यभिचार । साधिलें अपार निजसुख ॥३०॥ बाळक्रीडा प्रारंभ अभंग - १००
3919
विचार नाहीं नर खर तो तैसा । वाहे ज्ञान पाठी भार लगड तैसा ॥१॥ वादावाद करणें त्यासी तों च वरी । गुखाडीची चाड सरे तों च बाहेरी ॥ध्रु.॥ सौभाग्यसंपन्न हो कां वृद्ध प्रतिष्ठ । चिकरूनि सांडी पायां लागली ते विष्ठ ॥२॥ नाहीं याति कुळ फांसे ओढी तयासी । तुका म्हणे काय मुद्रासोंग जाळिसी ॥३॥
3920
विचारा वांचून । न पवीजे समाधान ॥१॥ देह त्रिगुणांचा बांधा । माजी नाहीं गुण सुदा ॥ध्रु.॥ देवाचिये चाडे । देवा द्यावें जें जें घडे ॥२॥ तुका म्हणे होतें । बहु गोमटें उचितें ॥३॥
3921
विचारिलें आधीं आपुल्या मानसीं । वांचों येथें कैसीं कोण्या द्वारें ॥१॥ तंव जाला साहए हृदयनिवासी । बुद्धि दिली ऐसी नास नाहीं ॥ध्रु.॥ उद्वेगाचे होतों पडिलों समुद्रीं । कोण रीती तरी पाविजेल ॥२॥ तुका म्हणे दुःखें आला आयुर्भाव । जाला बहु जीव कासावीस ॥३॥
3922
विटंबिलें भट । दिला पाठीवरी पाट ॥१॥ खोटें जाणोनि अंतर । न साहे चि विश्वंभर ॥ध्रु.॥ तें चि करी दान । जैसें आइके वचन ॥२॥ तुका म्हणे देवें । पूतना शोषियेली जीवें ॥३॥
3923
विटाळ तो परद्रव्य परनारी । येथुनि जो दुरी तो सोंवळा ॥१॥ गद्यें पद्यें कांहीं न धरावी उपाधी । स्वाधीन चि बुद्धि करुनी ठेवा ॥ध्रु.॥ विचाराचें कांहीं करावें स्वहित । पापपुण्यांचीत भांडवल ॥२॥ तुका म्हणे न लगे जावें वनांतरा । विश्व विश्वंभरा सारिखें चि ॥३॥
3924
विटेवरी समचरण । तो हा रुक्मिणीरमण ॥१॥ वेदशास्त्रा माहेर । केले दासा उपकार ॥ध्रु.॥ नामापाशीं चारी मुक्ति । पहा हृदयीं प्रतीति ॥२॥ तुका म्हणे कळा । अंगीं जयाच्या सकळा ॥३॥
3925
विठो सांपडावया हातीं । ठावी जाली एक गती । न धरीं भय चित्तीं । बळ किती तयाचें ॥१॥ लागे आपण चि हातीं । किंव भाकावी काकुलती । करी मग चित्तीं । असेल तें तयाचें ॥ध्रु.॥ एकलिया भावबळें । कैं सांपडे तो काळें । वैष्णवांच्या मेळें। उभा ठाके हाकेसी ॥२॥ बांधा माझिया जीवासी । तुका म्हणे प्रेमपाशीं । न सोडीं तयासी । सर्वस्वासी उदार ॥३॥
3926
विठोबाचे पायीं जीव म्यां ठेविला । भक्तीभावें केला देव ॠणी ॥१॥ देव माझा ॠणी आहे सहाकारी । परसपरवारि भवभय ॥ध्रु.॥ भवभयडोहीं बुडों नेदी पाहीं । धरूनियां बाही तारी मज ॥२॥ तारियेले दास पडिल्या संकटीं । विष केलें पोटीं अमृतमय ॥३॥ अमृतातें सेवीतसे नामरसा । तोडियेला फांसा बंधनाचा ॥४॥ बंधनाचा फांसा आम्हीं कांहीं नेणों । पाय तुझे जाणों पद्मनाभा ॥५॥ पद्मनाभा नाभिकमळीं ब्रम्हादिक । त्रैलोक्यनायक म्हणविसी ॥६॥ म्हणविसी देवा दासाचा अंकित । मनाचा संकेत पाहोनियां ॥७॥ पाहोनियां दृढ निश्चय तयाचा । तो चि दास साचा जवळीक ॥८॥ जवळीक जाली ब्रम्हीं सुखावले । मार्ग दाखविले मूढा जना ॥९॥ मूढा जनामाजी दास तुझा मूढ । कास तुझी दृढ धरियेली ॥१०॥ धरियेले तुझे पाय रे विठ्ठला । तुका सुखी जाला तुझ्या नामें ॥११॥
3927
विठोबाचें नाम ज्याचे मुखीं नित्य । त्या देखिल्या पतित उद्धरिलि ॥१॥ विठ्ठलविठ्ठल भावें म्हणे वाचे । तरी तो काळाचे दांत ठेंसी ॥ध्रु.॥ बहुत तारिले सांगों किती आतां । ऐसा कोणी दाता दुजा नाहीं ॥२॥ तुका म्हणे म्यां ही ऐकोनियां कीर्ती । धरिला एकांतीं हृदयामाजी ॥३॥
3928
विठ्ठल आमचें जीवन । आगमनिगमाचें स्थान । विठ्ठल सिद्धीचें साधन । विठ्ठल ध्यानविसावा ॥१॥ विठ्ठल कुळींचें दैवत । विठ्ठल वत्ति गोत । विठ्ठल पुण्य पुरुषार्थ । आवडे मात विठ्ठलाची ॥२॥ विठ्ठल विस्तारला जनीं । सप्त ही पाताळें भरूनी । विठ्ठल व्यापक त्रिभुवनीं । विठ्ठल मुनिमानसीं ॥३॥ विठ्ठल जीवाचा जिव्हाळा । विठ्ठल कृपेचा कोंवळा । विठ्ठल प्रेमाचा पुतळा । लावियेलें चाळा । विश्व विठ्ठलें ॥४॥ विठ्ठल बाप माय चुलता । विठ्ठल भगिनी आणि भ्राता । विठ्ठलेंविण चाड नाहीं गोता । तुका म्हणे आतां नाहीं दुसरें ॥५॥
3929
विठ्ठल आमुचा निजांचा । सज्जन सोयरा जीवाचा ॥१॥ मायबाप चुलता बंधु । अवघा तुजशीं संबंधु ॥ध्रु.॥ उभयकुळींसाक्ष । तूं चि माझा मातुळपक्ष ॥२॥ समपिऩली काया । तुका म्हणे पंढरिराया ॥३॥
3930
विठ्ठल कीर्तनाचे अंतीं । जय जय हरी जे म्हणती ॥१॥ तें चि सुकृताचें फळ । वाचा रामनामें निखळ ॥ध्रु.॥ बैसोनि हरिकथेसी । होय सावध चित्तासी ॥२॥ तुका म्हणे त्याचा जन्म । सुफळ जाला भवक्रम ॥३॥
3931
विठ्ठल गीतीं गावा विठ्ठल चित्तीं ध्यावा । विठ्ठल उभा पाहावा विटेवरी ॥१॥ अनाथाचा बंधु विठ्ठल कृपासिंधु । तोडी भवबंधु यमपाश ॥ध्रु.॥ तो चि शरणागतां हा विठ्ठल मुक्तिदाता । विठ्ठल या संतांसमागमें ॥२॥ विठ्ठल गुणनिधि विठ्ठल सर्व सिद्धि । लागली समाधि विठ्ठलनामें ॥३॥ विठ्ठलाचें नाम घेतां जालें सुख । गोडावलें मुख तुका म्हणे ॥४॥
3932
विठ्ठल गीतीं विठ्ठल चित्तीं । विठ्ठल विश्रांति भोग जया ॥१॥ विठ्ठल आसनीं विठ्ठल शयनीं । विठ्ठल भोजनीं ग्रासोग्रासीं ॥ध्रु.॥ विठ्ठल जागृतिस्वप्नी सुषुप्ति । आन दुजें नेणती विठ्ठलेंविण ॥२॥ भूषण अळंकार सुखाचे प्रकार । विठ्ठल निर्धार जयां नरां ॥३॥ तुका म्हणे ते ही विठ्ठल चि जाले । संकल्प मुराले दुजेपणें ॥४॥
3933
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥१॥ विठ्ठल अवघ्या भांडवला । विठ्ठल बोला विठ्ठल ॥ध्रु.॥ विठ्ठल नाद विठ्ठल भेद । विठ्ठल छंद विठ्ठल ॥२॥ विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा । तुकया मुखा विठ्ठल ॥३॥
3934
विठ्ठल नावाडा फुकाचा । आळविल्या साटीं वाचा ॥१॥ कटीं कर जैसे तैसे । उभा राहिला न बैसे ॥ध्रु.॥ न पाहे सिदोरी । जाती कुळ न विचारी ॥२॥ तुका म्हणे भेटी । हाका देतां उठाउठीं ॥३॥
3935
विठ्ठल भीमातीरवासी । विठ्ठल पंढरीनिवासी । विठ्ठल पुंडलिकापासीं । कृपादानाविसीं उदार ॥१॥ विठ्ठल स्मरणा कोंवळा । विठ्ठल गौरवीं आगळा । आधार ब्रम्हांडा सकळा । विठ्ठल लीळाविग्रही ॥ध्रु.॥ उभा चि परी न मनी सीण । नाहीं उद्धरितां भिन्न । समर्थाचे घरीं एक अन्न । आर्तभूता क्षणोक्षणा सांभाळी ॥२॥ रुचीचे प्रकार। आणिताती आदरें । कोठें ही न पडे अंतर । थोरां थोर धाकुट्या धाकुटा ॥३॥ करितां बळ धरितां नये । झोंबतां डोळे मनें च होय । आपुल्या उद्देशाची सोय । जाणे हृदयनिवासी ॥४॥ पान्हा तरी आल्या अंतर तेथें । तों नाहीं भरिलें रितें । करितों सेवन आइतें । तुका म्हणे चित्ते चित्त मेळवूनी ॥५॥
3936
विठ्ठल माझा जीव विठ्ठल माझा भाव । कुळधर्म देव विठ्ठल माझा ॥१॥ विठ्ठल माझा गुरु विठ्ठल माझा तारूं । उतरील पारु भवनदीचा ॥ध्रु.॥ विठ्ठल माझी माता विठ्ठल माझा पिता । विठ्ठल चुलता बहिणी बंधु ॥२॥ विठ्ठल हे जन विठ्ठल माझें मन । सोयरा सज्जन विठ्ठल माझा ॥३॥ तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा । नश्वरित गांवा जाइन त्याच्या ॥४॥
3937
विठ्ठल माझी माय । आम्हां सुखा उणें काय ॥१॥ घेतों अमृताची धनी । प्रेम वोसंडलें स्तनीं ॥ध्रु.॥ क्रीडों वैष्णवांच्या मेळीं । करूं आनंदाच्या जळीं ॥२॥ तुका म्हणे कृपावंत । ठेवीं आम्हांपाशीं चत्ति ॥३॥
3938
विठ्ठल मुक्तिदाता । नव्हे मरो हें बोलता ॥१॥ मज न साहावें कानीं । विष उत्तर लागे मनीं ॥ध्रु.॥ हरीकथेतें धीकारी । शत्रु माझा तो वैरी ॥२॥ सुना काळतोंडा । जो या देवा म्हणे धोंडा ॥३॥ अहं म्हणे ब्रम्ह । नेणे भक्तीचें तें वर्म ॥४॥ तुका म्हणे क्षण । नको तयाचें दर्षण ॥५॥
3939
विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा । करी पापा निर्मूळ ॥१॥ भाग्यवंता छंद मनीं । कोडें कानीं ऐकती ॥ध्रु.॥ विठ्ठल हें दैवत भोळें । चाड काळें न धरावी ॥२॥ तुका म्हणे भलते याती । विठ्ठल चित्ती ते शुद्ध ॥३॥
3940
विठ्ठल विठ्ठल येणें छंदें । ब्रम्हानंदें गर्जावें ॥१॥ वाये टाळ टाळ्याटाळी । होइल होळी विघ्नांची ॥ध्रु.॥ विठ्ठल आद्ये अवसानीं । विठ्ठल मनीं स्मरावा ॥२॥ तुका म्हणे विठ्ठलवाणी । वदा कानीं आईंका ॥३॥
3941
विठ्ठल सोयरा सज्जन विसांवा । जाइन त्याच्या गांवा भेटावया ॥१॥ सीण भाग त्यासी सांगेन आपुला । तो माझा बापुला सर्व जाणे ॥ध्रु.॥ माय माउलिया बंधुवर्गा जना । भाकीन करुणा सकळिकांसी ॥२॥ संत महंत सद्धि महानुभाव मुनि । जीवभाव जाऊनि सांगेन त्या ॥३॥ माझिये माहेरीं सुखा काय उणें । न लगे येणें जाणें तुका म्हणे ॥४॥
3942
विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती । विठ्ठल या चित्तीं बैसलासे ॥१॥ विठ्ठलें हें अंग व्यापिली ते काया । विठ्ठल हे छाया माझी मज ॥ध्रु.॥ बैसला विठ्ठल जिव्हेचिया माथां । न वदे अन्यथा आन दुजें ॥२॥ सकळां इंद्रियां मन एक प्रधान । तें ही करी ध्यान विठोबाचें ॥३॥ तुका म्हणे या विठ्ठलासी आतां । नये विसंबतां माझें मज ॥४॥
3943
विठ्ठल हा चित्ती । गोड लागे गातां गीतीं ॥१॥ आम्हां विठ्ठल जीवन । टाळ चिपळिया धन ॥ध्रु.॥ विठ्ठल हे वाणी । अमृत हे संजिवनी ॥२॥ रंगला या रंगें । तुका विठ्ठल सर्वांगें ॥३॥
3944
विठ्ठलनामाचा नाहीं ज्या विश्वास । तो वसे उदास नरकामध्यें ॥१॥ तयासी बोलतां होईंल विटाळ । नेव जाये तो जळस्नान करितां ॥ध्रु.॥ विठ्ठलनामाची नाहीं ज्या आवडी । त्याची काळ घडी लेखिताहे ॥२॥ तुका म्हणे मज विठोबाची आण। जरी प्रतिवचन करिन त्यासी ॥३॥
3945
विठ्ठला रे तुझे वर्णितां गुणवाद । विठ्ठला रे दग्ध जालीं पापें ॥१॥ विठ्ठला रे तुझें पाहातां श्रीमुख । विठ्ठला रे सुख जालें नयना ॥ध्रु.॥ विठ्ठला रे तुज देतां आलिंगन । विठ्ठला तनमन निवाल्या बाह्या ॥२॥ विठ्ठला रे तुझी ऐकतां कीर्ति । विठ्ठल हे विश्रांति पावले स्मरणें ॥३॥ विठ्ठला रे तुकयाबंधु म्हणे देहभाव । विठ्ठला जीवीं पाव धरितां गेला ॥४॥
3946
विठ्ठला रे तूं उदाराचा राव । विठ्ठला तूं जीव या जगाचा ॥१॥ विठ्ठला रे तूं उदाराची रासी । विठ्ठला तुजपाशीं सकळसिद्धी ॥ध्रु.॥ विठ्ठला रे तुझें नाम बहु गोड । विठ्ठला रे कोड पुरविसी ॥२॥ विठ्ठला रे तुझें श्रीमुख चांगलें । विठ्ठला लागलें ध्यान मनीं ॥३॥ विठ्ठला रे वाचे बोला बहुरस । विठ्ठला रे सास घेतला जीवें ॥४॥ विठ्ठला रे शोक करीतसे तुका । विठ्ठला तूं ये कां झडकरी ॥५॥
3947
विठ्ठला विठ्ठला । कंठ आळवितां फुटला ॥१॥ कई कृपा करिसी नेणें । मज दीनाचें धांवणें ॥ध्रु.॥ जाल्या येरझारा । जन्मां बहुतांचा फेरा ॥२॥ तुका म्हणे नष्टा । अबोलण्या तुझ्या चेष्टा ॥३॥
3948
विठ्ठलावांचोनि ब्रम्ह जें बोलती । वचन तें संतीं मानूं नये ॥१॥ विठ्ठलावांचूनि जेजे उपासना । अवघा चि जाणा संभ्रमु तो ॥ध्रु.॥ विठ्ठलावांचूनि सांगतील गोष्टी । वांयां ते हिंपुटी होत जाणा ॥२॥ विठ्ठलांवाचूनि जें कांहीं जाणती । तितुल्या वित्पित्त वाउगीया ॥३॥ तुका म्हणे एक विठ्ठल चि खरा । येर तो पसारा वाउगा चि ॥४॥
3949
वितीयेवढेंसें पोट । केवढा बोभाट तयाचा ॥१॥ जळो याची विटंबना । भूक जना नाचवी ॥ध्रु.॥ अभिमान सिरीं भार । जाले खर तृष्णेचे ॥२॥ तुका म्हणे नरका जावें । हा चि जीवें व्यापार ॥३॥
3950
विधवेसि एक सुत । अहर्निशीं तेथें चत्ति ॥१॥ तैसा तूं मज एकला । नको मोकलूं विठ्ठला ॥ध्रु.॥ सुपुत्रालागीं बाप । अवघे तेथें चि संकल्प ॥२॥ तुका म्हणे चित्ती । पतिव्रते जैसा पति ॥३॥
3951
विधीनें सेवन । विषयत्यागातें समान ॥१॥ मुख्य धर्म देव चित्तीं । आदि अवसान अंतीं ॥ध्रु.॥ बहु अतिशय खोटा । तर्कें होती बहु वाटा ॥२॥ तुका म्हणे भावें । कृपा करीजेते देवें ॥३॥
3952
विनति घातली अवधारीं । मज देई वो अभय करीं । पीडिलों खेचरीं । आणीक वारी नांवांची ॥१॥ रंगा येई वो एकला रंग वोडवला । हरिनाम उठिला गजर केला हाकारा ॥ध्रु.॥ देवांचे दैवते । तुज नमिलें आदिनाथे । ये वो कृपावंते । भोगा माझ्या धांवति ॥२॥ न लवीं आतां वेळ । आइत सारिली सकळ । तुका म्हणे कुळ । आमुचिये दैवते ॥३॥
3953
विनवितों चतुरा तुज विश्वंभरा । परियेसी दातारा पांडुरंगा ॥१॥ तुझे दास ऐसें जगीं वाखाणिलें । आतां नव्हे भलें मोकलितां ॥ध्रु.॥ माझे गुणदोष कोण जाणे मात । पावनपतित नाम तुझें ॥२॥ लोभ मोह माया आम्हां बांधवितां । तरि हा अनंता बोल कोणा ॥३॥ तुका म्हणे मी तों पतित चि खरा । परि आलों दातारा शरण तुज ॥४॥
3954
विनवितों तरी आणितोसि परी । याचकानें थोरी दातयाची ॥१॥ आमुचे ही कांहीं असों द्या प्रकार । एकल्यानें थोर कैचे तुम्ही ॥ध्रु.॥ नेघावी जी कांहीं बहु साल सेवा । गौरव तें देवा यत्न कीजे ॥२॥ तुका म्हणे नाहीं आमुची मिरासी । असावेंसें ऐसीं दुर्बळें चि ॥३॥
3955
विनवितों सेवटीं । आहे तैसें माझे पोटीं ॥१॥ कंठीं राहावें राहावें । हें चि मागतसें भावें ॥ध्रु.॥ पुरली वासना । येणें होईंल नारायणा ॥२॥ तुका म्हणे जो देहाडा । तो चि वर्णी पवाडा ॥३॥
3956
विनवीजे ऐसें कांहीं । उरलें नाहीं यावरि ॥१॥ आतां असो पंढरीनाथा । पायीं माथा तुमचिये ॥ध्रु.॥ मागें सारियेली युHी । कांहीं होती जवळी ते ॥२॥ निराशेची न करी आस । तुका दास माघारी ॥३॥
3957
विनवीजे ऐसें भाग्य नाहीं देवा । पायांशीं केशवा सलगी केली ॥१॥ धीटपणें पत्र लिहिलें आवडी । पार नेणे थोडी मति माझी ॥ध्रु.॥ जेथें देवा तुझा न कळे चि पार । तेथें मी पामर काय वाणूं ॥२॥ जैसे तैसे माझे बोल अंगीकारीं । बोबड्या उत्तरीं गौरवितों ॥३॥ तुका म्हणे विटेवरि जी पाउलें । तेथें म्यां ठेविलें मस्तक हें ॥४॥
3958
विभ्रंशिली बुद्धि देहांत जवळी । काळाची अकाळीं वायचाळा ॥१॥ पालटलें जैसें देंठ सोडी पान । पिकलें आपण तयापरी ॥ध्रु.॥ न मारितां हीन बुद्धि दुःख पावी । माजल्याची गोवी तयापरी ॥२॥ तुका म्हणे गळ लागलिया मत्स्या । तळमळेचा तैसा लवलाहो ॥३॥
3959
वियोग न घडे सन्निध वसलें । अखंड राहिलें होय चित्ती ॥१॥ विसरु न पडे विकल्प न घडे । आलें तें आवडे तया पंथें ॥ध्रु.॥ कामाचा विसर नाठवे शरीर । रसना मधुर नेणे फिकें ॥२॥ निरोपासी काज असो अनामिक । निवडितां एक नये मज ॥३॥ तुका म्हणे हित चित्ते ओढियेलें । जेथें तें उगलें जावें येणें ॥४॥
3960
विरहतापें फुंदे छंद करिते जाती । हा गे तो गे सावधान सवें चि दुश्चिती । न सांभाळुनि अंग लोटी पाहे भोंवतीं । वेगळी च पडों पाहे कुळाहुनिया ती ॥१॥ खुंटलीसी जाली येथें अवघियांची गती । आपुलीं परावीं कोण नेणें भोंवती । त्यांचीं नांवें बोभे अहो अहो श्रीपती । नवलाव हा येरां वाटोनियां हांसती ॥ध्रु.॥ बाहेरी च धांवे रानां न धरी च घर । न कळे बंधना जाला तेणें संचार । विसरूनि गेली सासुरें की माहेर । एका अवलोकी एका पडिला विसर ॥२॥ तुका म्हणे तुम्ही अवघ्या राहा निश्चळा । न ये आतां येऊं येथें सर्वथा बळा । त्याचा त्याच्या मुखें अवघाची निर्वाळा । बहुतां मतें येथें तर्कवाद निराळा ॥३॥
3961
विशमाची शंका वाटे । सारिखें भेटे तरी सुख ॥१॥ म्हणऊनि चोरिलें जना । आल्या राणां एकांतीं ॥ध्रु.॥ दुजियासी कळों नये । जया सोय नाहीं हे ॥२॥ तुका म्हणे मोकळें मन । नारायण भोगासी ॥३॥
3962
विश्वंभरा वोळे । बहुत हात कान डोळे ॥१॥ जेथें असे तेथें देखे । मागितलें तें आइके ॥ध्रु.॥ जें जें वाटे गोड । तैसें पुरवितो कोड ॥२॥ तुका म्हणे भेटी । कांहीं पडों नेदी तुटी ॥३॥
3963
विश्वव्यापी माया । तिणें झाकुळिलें छाया ॥१॥ सत्य गेलें भोळ्यावारी । अविद्येची चाली थोरी ॥ध्रु.॥ आपुलें चि मन । करवी आपणां बंधन ॥२॥ तुका म्हणे देवा । तुम्ही कोडीं हीं उगवा ॥३॥
3964
विश्वाचा जनिता । म्हणे यशोदेसि माता ॥१॥ ऐसा भक्तांचा अंकित । लागे तैसी लावी प्रीत ॥ध्रु.॥ निष्काम निराळा । गोपी लावियेल्या चाळा ॥२॥ तुका म्हणे आलें । रूपा अव्यक्त चांगलें ॥३॥
3965
विश्वास तो देव । म्हणुनि धरियेला भाव ॥१॥ माझी वदवितो वाणी । ज्याणें धरिली धरणी ॥ध्रु.॥ जोडिलीं अक्षरें । नव्हेती बुद्धीचीं उत्तरें ॥२॥ नाहीं केली आटी । कांहीं मानदंभासाटीं॥३॥ कोणी भाग्यवंत । तया कळेल उचित ॥४॥ तुका म्हणे झरा । आहे मुळींचा चि खरा ॥५॥
3966
विश्वास धरूनि राहिलों निवांत । ठेवूनियां चित्त तुझे पायीं ॥१॥ तरावें बुडावें तुझिया वचनें । निर्धार हा मनें केला माझा ॥ध्रु.॥ न कळे हें मज साच चाळविलें । देसी तें उगलें घेइन देवा ॥२॥ मागणें तें सरे ऐसें करीं देवा । नाहीं तरी सेवा सांगा पुढें ॥३॥ करावें कांहीं कीं पाहावें उगलें । तुका म्हणे बोलें पांडुरंगा ॥४॥
3967
विश्वासिया नाहीं लागत सायास । रंग अनायासें अंगा येतो ॥१॥ लेंकराच्या हातें घास मागे माता । वोरसोनि चित्ता सुख पावे ॥ध्रु.॥ गौरव त्या मानी आरुषा वचनीं । भूषण ते वाणी मिरवावी ॥२॥ तुका म्हणे आहेस सकळ ही साक्षी । माझा कई पक्षी पांडुरंग ॥३॥
3968
विश्वीं विश्वंभर । बोले वेदांतींचा सार ॥१॥ जगीं जगदीश । शास्त्रें वदती सावकास ॥ध्रु.॥ व्यापिलें हें नारायणें । ऐसीं गर्जती पुराणें ॥२॥ जनीं जनार्दन । संत बोलती वचनें ॥३॥ सूर्याचिया परी । तुका लोकीं क्रीडा करी ॥४॥
3969
विष पोटीं सर्वा । जन भीतें तया दर्पा ॥१॥ पंच भूतें नाहीं भिन्न । गुण दुःख देती शीण ॥ध्रु.॥ चंदन प्रिय वासें । आवडे तें जातीऐसें ॥२॥ तुका म्हणे दाणा । कुचर मिळो नये अन्ना ॥३॥
3970
विषम वाटे दुरवरी । चालूनि परती घरी । मागील ते उरी । नाहीं उरली भयाची ॥१॥ मुख्य न व्हावा तो नाड । सेवटाचे हातीं गोड । सरलिया चाड । मग कैचे उद्वेग ॥ध्रु.॥ होता पहिला अभ्यास । समयीं घालावया कास । तेव्हां लटिके दोष । योगें अनुतापाच्या ॥२॥ तुका म्हणे आहे । बुद्धी केलियानें साहे । जवळी च पाहें । देव वाट स्मरणाची ॥३॥
3971
विषय तो मरणसंगीं । नेणे सुटिका अभागी ॥१॥ शास्त्राचा केला लुंडा । तोंडीं पाडियेला धोंडा ॥ध्रु.॥ अगदीं मोक्ष नाहीं ठावा । काय सांगावें गाढवा ॥२॥ तुका म्हणे ग्यानगड । सुखें देवा पावेना नाड ॥३॥
3972
विषयओढीं भुलले जीव । आतां यांची कोण करील कींव । नुपजे नारायणीं भाव । पावोनि ठाव नरदेह ॥१॥ कोण सुख धरोनि संसारीं । पडोनि काळाचे आहारीं । माप या लागलें शरीरीं । जालियावरी सळे ओढिती ॥ध्रु.॥ बापुडीं होतील सेवटीं । आयुष्यासवें जालिया तुटी । भोगिले मागें पुढे ही कोटी । होईल भेटी जन्मासी ॥२॥ जंतिली घाणां बांधोनि डोळे । मागें जोडी आर तेणेंही पोळे । चालिलों किती तें न कळे । दुःखें हारंबळे भूकतान ॥३॥ एवढें जयाचें निमत्ति । प्रारब्ध क्रियमाण संचित । तें हें देह मानुनि अनित्य । न करिती नित्य नामस्मरण ॥४॥ तुका म्हणे न वेंचतां मोल । तो हा यासि महाग विठ्ठल । वेंचितां फुकाचे चि बोल । केवढें खोल अभागिया ॥५॥
3973
विषयांचे लोलिंगत । ते फजीत होतील ॥१॥ न सरे येथें यातिकुळ । शुद्ध मूळबीज व्हावें ॥ध्रु.॥ शिखासूत्र सोंग वरि । दुराचारी दंड पावे ॥२॥ तुका म्हणे अभिमाना । नारायणा न सोसे ॥३॥
3974
विषयाचें सुख एथें वाटे गोड । पुढें अवघड यमदंड ॥१॥ मारिती तोडिती झोडिती निष्ठ‍ । यमाचे किंकर बहुसाल ॥ध्रु.॥ असिपत्रीं तरुवरखैराचे विंगळ । निघतील ज्वाळ तेलपाकीं ॥२॥ तप्तभूमीवरि लोळविती पाहीं । अग्निस्तंभ बाहीं कवळविती ॥३॥ म्हणऊनि तुका येतो काकुलती । पुरे आतां योनी गर्भवास ॥४॥
3975
विषयीं अद्वये । त्यासी आम्हां सिवो नये ॥१॥ देव तेथुनि निराळा । असे निष्काम वेगळा ॥ध्रु.॥ वासनेची बुंथी । तेथें कैची ब्रम्हस्थिति ॥२॥ तुका म्हणे असतां देहीं । तेथें नाही जेमेतीं ॥३॥
3976
विषयीं विसर पडिला निःशेष । अंगीं ब्रम्हरस ठसावला ॥१॥ माझी मज झाली अनावर वाचा । छंद या नामाचा घेतलासे ॥ध्रु.॥ लाभाचिया सोसें पुढें चाली मना । धनाचा कृपणा लोभ जैसा ॥२॥ तुका म्हणे गंगासागरसंगमीं । अवघ्या जाल्या ऊर्मि एकमय ॥३॥
3977
विष्ठा भक्षी तया अमृत पारिखें । वोंगळ चि सखें वोंगळाचें ॥१॥ नये पाहों कांहीं गोर्‍हावाडीचा अंत । झणी ठाका संत दुर्जनापें ॥ध्रु.॥ भेंसळीच्या बीजा अमंगळ गुण । उपजवी सीण दरुषणें ॥२॥ तुका म्हणे छी थूं जया घरीं धन । तेथें तें कारण कासयाचें ॥३॥
3978
विष्णुदासां भोग । जरी आम्हां पीडी रोग ॥१॥ तरि हें दिसे लाजिरवाणें । काय तुम्हांसी सांगणें ॥ध्रु.॥ आम्हां काळें खावें । बोलिलें तें वांयां जावें ॥२॥ तुका म्हणे दास । आम्ही भोगूं गर्भवास ॥३॥
3979
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ ॥१॥ अइका जी तुम्ही भक्त भागवत । कराल तें हित सत्य करा ॥ध्रु.॥ कोणा ही जिवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वरपूजनाचें ॥२॥ तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे ॥३॥
3980
विष्णुमय सर्व वैष्णवांसी ठावें । येरांनीं वाहावे भार माथां ॥१॥ साधनें संकटें सर्वांलागीं सीण । व्हावा लागे क्षीण अहंमान ॥ध्रु.॥ भाव हा कठीण वज्र हें भेदवे । परि न छेदवे मायाजाळ ॥२॥ तुका म्हणे वर्म भजनें चि सांपडे । येरांसी तों पडे ओस दिशा ॥३॥
3981
विसरले कुळ आपुला आचार । पती भावे दीर घर सोय ॥१॥ सांडिला लौकिक लाज भय चिंता । रातलें अनंता चित्त माझें ॥२॥ मज आतां कोणी आळवाल झणी । तुका म्हणे कानीं बहिरी जालें ॥३॥
3982
वीट नेघे ऐसें रांधा । जेणें बाधा उपजे ना ॥१॥ तरी च तें गोड राहे । निरें पाहे स्वयंभ ॥ध्रु.॥ आणिकां गुणां पोटीं वाव । दावी भाव आपुला ॥२॥ तुका म्हणे शुद्ध जाती । ते मागुती परतेना ॥३॥
3983
वीर विठ्ठलाचे गाढे । किळकाळ पायां पडे ॥१॥ करिती घोष जेजेकार । जळती दोषांचे डोंगर ॥ध्रु.॥ क्षमा दया शांति । बाण अभंग ते हातीं ॥२॥ तुका म्हणें बळी । ते चि एक भूमंडळीं ॥३॥
3984
वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें । पक्षी ही सुस्वरें आळविती ॥१॥ येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाहीं गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥ आकाश मंडप पृथुवी आसन । रमे तेथें मन क्रीडा करी ॥२॥ कंथाकुमंडलु देहउपचारा । जाणवितो वारा अवश्वरु ॥३॥ हरिकथा भोजन परवडी विस्तार । करोनि प्रकार सेवूं रुची ॥४॥ तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुला चि वाद आपणांसी ॥५॥
3985
वृत्ति भूमि राज्य द्रव्य उपार्जिती । जाणा त्या निश्चितीं देव नाहीं ॥१॥ भाडेकरी वाहे पाठीवरी भार । अंतरींचें सार लाभ नाहीं ॥ध्रु.॥ देवपूजेवरी ठेवूनियां मन । पाषाणा पाषाण पूजी लोभें ॥२॥ तुका म्हणे फळ चिंतिती आदरें । लाघव हे चार शिंदळीचे ॥३॥
3986
वृत्तीवरि आम्हां येणें काशासाटीं । एवढी हे आटी सोसावया ॥१॥ जाणतसां परी नेणते जी देवा । भ्रम चि बरवा राखावा तो ॥ध्रु.॥ मोडूनि क्षरलों अभेदाची मूस । तुम्हां कां अळस वोडवला ॥२॥ तुका म्हणे होई लवकरि उदार । लांबणीचें फार काम नाहीं ॥३॥
3987
वृद्धपणी न पुसे कोणी । विटंबणी देहाची ॥१॥ नव द्वारें जाली मोकळीक । गांड सरली वाजती ॥ध्रु.॥ दंत दाढा गळे थुंका । लागे नाका हनुवटी ॥२॥ शब्द नये मुखावाटा । करिती चेष्टा पोरें ती ॥३॥ तुका म्हणे अजूनि तरी । स्मरें श्रीहरी सोडवील ॥४॥
3988
वृद्धपणीं आली जरा । शरीर कांपे थरथरा ॥१॥ आयुष्य गेलें हें कळेना । स्मरा वेगीं पंढरिराणा ॥ध्रु.॥ दांत दाढा पडिल्या ओस । हनुवटि भेटे नाकास ॥२॥ हात पाय राहिलें कान । नेत्रा पाझर हाले मान ॥३॥ अंगकांति परतली । चिरगुटा ऐसी जाली ॥४॥ आड पडे जिव्हा लोटे । शब्द नये मुखा वाटे॥५॥ लांब लोंबताती अंड । भरभरा वाजे गांड ॥६॥ तुका म्हणे आतां तरी । स्मरा वेगीं हरी हरी ॥७॥
3989
वेचावें तें जीवें । पूजा घडे ऐशा नावें ॥१॥ बिगारीची ते बिगारी । साक्षी अंतरींचा हरी ॥ध्रु.॥ फळ बीजाऐसें । कार्यकारणासरिसें ॥२॥ तुका म्हणे मान । लवणासारिखें लवण ॥३॥
3990
वेठी ऐसा भाव । न करी अहाच उपाव ॥१॥ रूप डसवी न जिवा । अवघा ये च ठायीं हेवा ॥ध्रु.॥ कृपणाचेपरि । लेखा पळनिमिषेवरि ॥२॥ तुका म्हणे आस । संनिध चि जगदीशा ॥३॥
3991
वेडावलीं काय करावें या काळीं । म्हणे वनमाळी गोपाळांसि ॥१॥ शिरी धरूं गोवर्धन उचलूनि । म्हणे तुम्ही कोणी भिऊं नका ॥२॥ नका सांडूं कोणी आपला आवांका । मारितां या हाका आरोळिया ॥३॥ अशंकित चित्ते न वटे त्यां खरें । धाकें च ते बरें म्हणती चला ॥४॥ चित्ती धाक परि जवळी अनंत । तुका म्हणे घात होऊं नेदी ॥५॥
3992
वेडिया उपचार करितां सोहळे । काय सुख कळे तयासी तें । अंधापुढें दीप नाचती नाचणें । भक्तिभावेंविण भक्ति तैसी ॥१॥ तिमाणें राखण ठेवियेलें सेता । घालुनियां माथां चुना तया । खादलें म्हणोनि सेवटीं बोबाली । ठायींची भुली कां नेणां रया ॥ध्रु.॥ मुकियापासाव सांगतां पुराण । रोगिया मिष्टान्न काईं होय । नपुंसका काय करील पद्मिणी । रुचिविण वाणी तैसे होय ॥२॥ हात पाय नाहीं करिल तो काईं । वृक्षा फळ आहे अमोलिक । हातां नये तैसा वांयां च तळमळी । भावेंविण भोळीं म्हणे तुका ॥३॥
3993
वेडीं तें वेडीं बहुत चि वेडीं । चाखतां गोडी चवी नेणे ॥ध्रु.॥ देहा लावी वात । पालव घाली जाली रात ॥१॥ कडिये मूल भोंवतें भोंये । मोकलुनि रडे धाये ॥२॥ लेंकरें वत्ति पुसे जगा । माझा गोहो कोण तो सांगा ॥३॥ आपुली शुद्धि जया नाहीं । आणिकांची ते जाणे काईं ॥४॥ तुका म्हणे ऐसे जन । नर्का जातां राखे कोण ॥५॥
3994
वेडें वांकडें गाईंन । परि मी तुझा चि म्हणवीन॥१॥ मज तारीं दिनानाथा । ब्रीदें साच करीं आता ॥ध्रु.॥ केल्या अपराधांच्या राशीं । म्हणऊनि आलों तुजपाशीं ॥२॥ तुका म्हणे मज तारीं । सांडीं ब्रीद नाहींतरी ॥३॥
3995
वेढा वेढा रे पंढरी । मोर्चे लावा भीमातिरीं ॥१॥ चलाचला संत जन । करा देवासी भांडण ॥ध्रु.॥ लुटालुटा पंढरपूर । धरा रखुमाईचा वर ॥२॥ तुका म्हणे चला । घाव निशानी घातला ॥३॥
3996
वेद अनंत बोलिला । अर्थ इतका चि शोधिला ॥१॥ विठोबासी शरण जावें । निजनष्टि नाम गावें ॥ध्रु.॥ सकळशास्त्रांचा विचार । अंतीं इतका चि निर्धार ॥२॥ अठरापुराणीं सिद्धांत । तुका म्हणे हा चि हेत ॥३॥
3997
वेद जया गाती । आम्हां तयाची संगति ॥१॥ नाम धरियेलें कंठीं । अवघा सांटविला पोटीं ॥ध्रु.॥ ॐकाराचें बीज । हातीं आमुचे तें निज ॥२॥ तुका म्हणे बहु मोटें । अणुरणियां धाकुटें ॥३॥
3998
वेद नेलें शंखासुरें । केलें ब्रम्ह्यानें गार्‍हाणें ॥१॥ धांव धांव झडकरी । ऐसें कृपाळुवा हरी ॥ध्रु.॥ गजेंद्र नाडियें गांजिला । तेणें तुझा धांवा केला ॥२॥ तुका म्हणे पद्मनाभा । जेथें पाहें तेथें उभा ॥३॥
3999
वेद शास्त्र नाहीं पुराण प्रमाण । तयाचें वदन नावलोका ॥१॥ तार्कियाचें अंग आपणा पारिखें । माजिर्‍यासारिखें वाईंचाळे ॥ध्रु.॥ माता निंदी तया कोण तो आधार । भंगलें खपर याचे नावें ॥२॥ तुका म्हणे आडराणें ज्याची चाली । तयाची ते बोली मिठेंविण ॥३॥
4000
वेदपुरुष तरि नेती कां वचन । निवडूनि भिन्न दाखविलें ॥१॥ तुझीं वर्में तूं चि दावूनि अनंता । होतोसी नेणता कोण्या गुणें ॥ध्रु.॥ यज्ञाचा भोक्ता तरि कां नव्हे सांग । उणें पडतां अंग क्षोभ घडे ॥२॥ वससी तूं या भूतांचे अंतरीं । तरि कां भेद हरी दावियेला ॥३॥ तपतिर्थाटणें तुझे मूर्तिदान । तरि कां अभिमान आड येतो ॥४॥ आतां क्षमा कीजे विनवितो तुका । देऊनियां हाका उभा द्वारीं ॥५॥ लोहागांवीं स्वामींच्या अंगावर ऊन पाणी घातलें - तो अभंग ॥१॥
4001
वेदविहित तुम्ही आइका हो कर्में । बोलतों तीं वर्में संतांपुढे ॥१॥ चारी वर्ण जाले एकाचिये अंगीं । पापपुण्य भागीं विभागिलें ॥ध्रु.॥ प्रथम पाउलीं पावविला पंथ । आदि मध्य अंत भेद नाहीं ॥२॥ आंबे बोरी वड बाभुळा चंदन । गुणागुणें भिन्न अग्नि एक ॥३॥ तुका म्हणे मन उन्मन जों होय । तोंवरि हे सोय विधि पाळीं ॥४॥
4002
वेदाचा तो अर्थ आम्हांसी च ठावा । येरांनी वाहावा भार माथां ॥१॥ खादल्याची गोडी देखिल्यासी नाहीं । भार धन वाही मजुरीचें ॥ध्रु.॥ उत्पत्तिपाळणसंहाराचें निज । जेणें नेलें बीज त्याचे हातीं ॥२॥ तुका म्हणे आलें आपण चि फळ । हातोहातीं मूळ सांपडलें ॥३॥
4003
वेदाचें गव्हर न कळे पाठकां । अधिकार लोकां नाहीं येरां ॥१॥ विठोबाचें नाम सुलभ सोपारें । तारी एक सरे भवसिंधु ॥ध्रु.॥ जाणत्या असाध्य मंत्र तंत्र काळ । येर तो सकळ मूढ लोक ॥२॥ तुका म्हणे विधि निषेध लोपला । उच्छेद या जाला मारगाचा ॥३॥
4004
वेरझारीं जाला सीण । बहु केलें क्षीदक्षीण । भांडणासी दिन । आजी येथें फावला ॥१॥ आतां काय भीड भार । धरूनियां लोकचार । बुडवूनि वेव्हार । सरोबरी करावी ॥ध्रु.॥ आलें बहुतांच्या मना । कां रे न होसी शाहाणा । मुळींच्या वचना । आम्ही जागों आपुल्या ॥२॥ तुका म्हणे चौघांमधीं । तुज नेलें होतें आधीं । आतां नामधीं । उरी कांहीं राहिली ॥३॥
4005
वेळोवेळां हें चि सांगें । दान मागें जगासि ॥१॥ विठ्ठल हे मंगळवाणी । घेऊं धणी पंगती ॥ध्रु.॥ वेचतसे पळें पळ । केलें बळ पाहिजे ॥२॥ तुका म्हणे दुश्चित नका । राहों फुका नाड हा ॥३॥
4006
वेश वंदाया पुरते । कोण ब्राम्हण निरुते ॥१॥ ऐसें सांगा मजपाशीं । संतां निरवितों येविशीं ॥ध्रु.॥ असा जी प्रवीण । ग्रंथीं कळे शुद्धहीण ॥२॥ तुका म्हणे लोपें । सत्याचिया घडती पापें ॥३॥
4007
वेशा नाहीं बोल अवगुण दूषीले । ऐशा बोला भले झणें क्षोभा ॥१॥ कोण नेणे अन्न जीवाचें जीवन । विषमेळवण विष होय ॥ध्रु.॥ सोनें शुद्ध नेणे कोण हा विचार । डांकें हीनवर केलें त्यासी ॥२॥ याती शुद्ध परि अधम लक्षण । वांयां गेलें तेणें सोंगें ही तें ॥३॥ तुका म्हणे शूर तो चि पावे मान । आणीक मंडण भार वाही ॥४॥
4008
वेसन गेलें निष्काम जालें नर नव्हे नारी । आपल्या तुटी पारख्या भेटी सौरियांचे फेरी ॥१॥ त्याचा वेध लागला छंद हरि गोविंद वेळोवेळां । आपुलेमागें हासत रागें सावलें घालिती गळां ॥ध्रु.॥ जन वेषा भीतें तोंडा आमुच्या भांडपणा । कर कटीं भीमा तटीं पंढरीचा राणा ॥२॥ वेगळ्या याति पडिलों खंतीं अवघ्या एका भावें । टाकियेली चाड देहभाव जीवें शिवें ॥३॥ सकळांमधीं आगळी बुद्धि तिची करूं सेवा । वाय तुंबामूढासवें भक्ति नाचों भावा ॥४॥ म्हणे तुका टाक रुका नाचों निर्लज्जा । बहु जालें सुख काम चुकलों या काजा ॥५॥
4009
वैकुंठा जावया तपाचे सायास । करणें जीवा नास न लगे कांहीं ॥१॥ तया पुंडलिकें केला उपकार । फेडावया भार पृथीवीचा ॥२॥ तुका म्हणे सोपी केली पायवाट । पंढरी वैकुंठ भूमीवरी ॥३॥
4010
वैकुंठींचा देव आणिला भूतळा । धन्य तो आगळा पुंडलीक ॥१॥ धारष्टि धैर्याचा वरिष्ठ भक्तांचा । पवित्र पुण्याचा एकनिष्ठ ॥ध्रु.॥ पितृसेवा पुण्यें लाधला निधान । ब्रम्ह सनातन अंगसंगें ॥२॥ अंगसंगें रंगें क्रीडा करी जाणा । ज्या घरीं पाहुणा वैकुंठींचा ॥३॥ धन्य त्याची शक्ति भक्तीची हे ख्याति । तुका म्हणे मुक्ति पायीं लोळे ॥४॥
4011
वैकुंठींचें सुख पंढरिये आलें । अवघें पुंडलिकें सांटविलें ॥१॥ घ्या रे घ्या रे माझे बाप । जिव्हा घेउनि खरें माप। करा एक खेप । मग करणें न लगे ॥ध्रु.॥ विषय गुंडोनी ठेवीं पसारा । मग धांव घ्या पंढरपुरा ॥२॥ जंव आहे आयुष्याचा लेश । तंव करीं पंढरीचा वास ॥३॥ अळस न करीं लाभाचा । तुका विनवी कुणबियाचा ॥४॥
4012
वैकुंठीच्या लोकां दुर्लभ हरिजन । तया नारायण समागमें ॥१॥ समागम त्यांचा धरिला अनंतें । जिहीं चत्तिवत्ति समर्पिलें ॥२॥ समर्था तीं गाती हरीचे पवाडे । येर ते बापुडे रावराणे ॥३॥ रामकृष्णें केलें कौतुक गोकुळीं । गोपाळांचे मेळीं गाईं चारी ॥४॥ गाईं चारी मोहोरी पांवा वाहे पाठीं । धन्य जाळी काठी कांबळीचें ॥५॥ काय गौळियांच्या होत्या पुण्यरासी । आणीक त्या म्हैसी गाईं पशु ॥६॥ सुख तें अमुप लुटिलें सकळीं । गोपिका गोपाळीं धणीवरि ॥७॥ धणीवरि त्यांसी सांगितली मात । जयाचें जें आर्त तयापरी ॥८॥ परी याचि तुम्ही आइका नवळ । दुर्गम जो खोल साधनासि ॥९॥ शिक लावूनियां घालिती बाहेरी । पाहाती भीतरी सवें चि तो ॥१०॥ तोंडाकडे त्यांच्या पाहे कवतुकें । शिव्या देतां सुखें हासतुसे ॥११॥ हांसतसे शिव्या देतां त्या गौळणी । मरतां जपध्यानीं न बोले तो ॥१२॥ तो जेंजें करिल तें दिसे उत्तम । तुका म्हणे वर्म दावी सोपें ॥१३॥
4013
वैद वाचविती जीवा । तरी कोण ध्यातें देवा ॥१॥ काय जाणों कैसी परी । प्रारब्ध तें ठेवी उरी ॥ध्रु.॥ नवसें कन्यापुत्र होती । तरि कां करणें लागे पती ॥२॥ जाणे हा विचार । स्वामी तुकयाचा दातार ॥३॥
4014
वैद्य एक पंढरिराव । अंतर्भाव तो जाणे ॥१॥ रोगाऐशा द्याव्या वल्ली । जाणे जाली बाधा ते ॥ध्रु.॥ नेदी रुका वेचों मोल । पोहे बोल प्रीतीचे ॥२॥ तुका म्हणे दयावंता । सदा चिंता दीनांची ॥३॥
4015
वैभव राज्य संपत्ती टाकावी । उदरार्थ मागावी माधोकरी ॥१॥ आपुलें तें आधीं करावें स्वहित । ऐसी आहे नीत स्वधर्माची ॥ध्रु.॥ वर्ण कुळ जाति याचा अभिमान । तजावा सन्मान लौकिकाचा ॥२॥ तुका म्हणे राहे एकाकी निःशंक । देउनियां हाक कंठीं काळ ॥३॥
4016
वैभवाचे धणी सकळां शरणागत । सत्यभावें चत्ति अर्पिलें तें ॥१॥ नेदी उरों देव आपणावेगळें । भावाचिया बळें ठायाठाव ॥ध्रु.॥ जाणोनि नेणोनि अंगा आली दशा । मग होय इच्छा आपणच ॥२॥ तुका म्हणे बरें धाकट्याचें जिणें । माता स्तनपानें वाढवते ॥३॥
4017
वैभवाचे धनी सकळ शरणागत । सत्यभावें चित्त अर्पिलें तें ॥१॥ नेदी उरों देव आपणांवेगळें । भावाचिया बळें ठायाठाव ॥ध्रु.॥ जाणोनि नेणती अंगा आली दशा । मग होय इच्छा आपणे चि ॥२॥ तुका म्हणे बरे धाकट्याचें जिणें । माता स्तनपानें वाढविते ॥३॥
4018
वैरागरापाशीं रत्नाचिया खाणी । हे चि घ्यावी धणी फावेल तों ॥१॥ येथें नाहीं तर्कवितर्काची चाड । होतसे निवाड खर्‍या खोट्यां ॥ध्रु.॥ उगा च सारावा वाढिला तो ठाव । वाढितिया भाव कळतसे ॥२॥ तुका म्हणे टांचणीचें पाणी । येथें झरवणी जैशातैसें ॥३॥
4019
वैराग्याचा अंगीं जालासे संचार । इच्छी वनांतर सेवावया ॥१॥ कां जी याचें करूं नये समाधान । वियोगानें मन सिणतसे ॥ध्रु.॥ नये चि यावया पंढरीचें मूळ । न देवे चि माळ कंठींची ही ॥२॥ तुका म्हणे जालें अप्रीतीचें जिणें । लाजिर हें वाणें सेवा करी ॥३॥
4020
वैराग्याचें भाग्य । संतसंग हा चि लाग ॥१॥ संतकृपेचे हे दीप । करी साधका निष्पाप ॥ध्रु.॥ तो चि देवभक्त । भेदाभेद नाहीं ज्यांत ॥२॥ तुका प्रेमें नाचे गाये । गाणियांत विरोन जाये ॥३॥
4021
वैष्णव तो जया । अवघी देवावरी माया ॥१॥ नाहीं आणीक प्रमाण । तन धन तृण जन ॥ध्रु.॥ पडतां जड भारी । नेमा न टळे निर्धारीं ॥२॥ तुका म्हणे याती । हो का तयाची भलती ॥३॥
4022
वैष्णवमुनिविप्रांचा सन्मान । करावा आपण घेऊं नये ॥१॥ प्रभु जाला तरी संसाराचा दास । विहित तयासी यांची सेवा ॥२॥ तुका म्हणे हे आशीर्वादें बळी । जाईंल तो छळी नरकायासीं ॥३॥
4023
वैष्णवां संगती सुख वाटे जीवा । आणीक मी देवा कांहीं नेणें ॥१॥ गायें नाचें उडें आपुलिया छंदें । मनाच्या आनंदें आवडीनें ॥ध्रु.॥ लाज भय शंका दुराविला मान । न कळे साधन यापरतें ॥२॥ तुका म्हणे आतां आपुल्या सायासें । आम्हां जगदेशें सांभाळावें ॥३॥
4024
वैष्णवांची कीर्ती गाइली पुराणीं । साही अठरांजणीं चहूं वेदीं ॥१॥ ऐसे कोणी दावा ग्रंथांचे वाचक । कर्मठ धार्मिक पुण्यशील ॥ध्रु.॥ आदिनाथ शंकर नारद मुनेश्वर । शुका ऐसा थोर आणिक नाहीं ॥२॥ तुका म्हणे मुगुटमणी हे भक्ति । आणीक विश्रांति अरतिया ॥३॥
4025
वैष्णवें चोरटीं । आलीं घरासी करंटीं ॥१॥ आजि आपुलें जतन । करा भांडें पांघुरण ॥ध्रु.॥ ज्याचे घरीं खावें । त्याचें सर्वस्वें ही न्यावें ॥२॥ तुका म्हणे माग । नाहीं लागों देत लाग ॥३॥
4026
वोखटा तरी मी विटलों देहासी । पुरे आतां जैसी जोडी पुन्हां ॥१॥ किती मरमर सोसावी पुढती । राहिलों संगती विठोबाचे ॥ध्रु.॥ आतां कोण याचा करील आदर । जावो कळिवर विटंबोनि ॥२॥ तुका म्हणे आतां सांडि तें चि सांडि । कोण फिरे लंडी यासी मागें ॥३॥
4027
वोडविलें अंग । आतां करूनि घ्यावें सांग ॥१॥ काय पूजा ते मी नेणें । जाणावें जी सर्वजाणें ॥ध्रु.॥ पोटा आलें बाळ । त्याचें जाणावें सकळ ॥२॥ चुका म्हणे हरी । वाहावें जी कडियेवरी ॥३॥
4028
वोनव्या सोंकरीं । सेत खादलें पांखरीं ॥१॥ तैसा खाऊं नको दगा । निदसुरा राहुनि जागा ॥ध्रु.॥ चोरासवें वाट । चालोनि केलें तळपट ॥ २॥ डोळे झांकुनि राती । कूर्पी पडे दिवसा जोती ॥३॥ पोसी वांज गाय । तेथें कैची दुध साय ॥४॥ फुटकी सांगडी । तुका म्हणे न पवे थडी ॥५॥
4029
वोरसोनि येती । वत्सें धेनुवेच्या चित्ती ॥१॥ माझा कराया सांभाळ । वोरसोनियां कृपाळ ॥ध्रु.॥ स्नेहें भूक तान । विसरती जाले सीण ॥२॥ तुका म्हणे कौतुकें । दिलें प्रेमाचें भातुकें ॥३॥
4030
वोळलीचा दोहूं पान्हा । मज कान्हा सांगितला ॥१॥ घ्या जि हेंगे क्षीर हातीं । निगुतीनें वाढावें ॥ध्रु.॥ सांगितलें केलें काम । नव्हे धर्म सत्याचा ॥२॥ तुका म्हणे नवें जुनें । ऐसें कोणें सोसावें॥३॥
4031
व्यभिचारिणी गणिका कुंटणी । विश्वास चि मनीं राघोबाचा ॥१॥ ऐसी ही पापिणी वाइली विमानी । अचळ भुवनीं टेवियेली ॥ध्रु.॥ पतितपावन तिहीं लोकीं ठसा । कृपाळू कोंवसा अनाथांचा ॥२॥ तुका म्हणे विठोबाची धरा सोय । आणिक उपाय नेणों किती ॥३॥
4032
व्यवहार तो खोटा । आतां न वजों तुझ्या वाटा ॥१॥ एका नामा नाहीं ताळ । केली सहजरांची माळ ॥ध्रु.॥ पाहों जातां घाईं । खेळसी लपंडाईं ॥२॥ तुका म्हणे चार । बहु करितोसी फार ॥३॥
4033
व्यापक हा विश्वंभर । चराचर याचेनी ॥१॥ पंढरिराव विटेवरि । त्याचींच धरीं पाउलें ॥ध्रु.॥ अवघियांचा हा चि ठाव । देवोदेवीं सकळ ॥२॥ तुका म्हणें न करीं सोस । भेदें दोष उफराटे ॥३॥
4034
व्यापिलें सर्वत्र । बाहेरी भीतरीं अंत ॥१॥ ऐसें गोविंदें गोविलें । बोलें न वजाये बोलिले ॥ध्रु.॥ संचिताची होळी । करूनि जीव घेतला बळी ॥२॥ तुकयाबंधु म्हणे नाहीं । आतां संसारा उरी कांहीं ॥३॥
4035
व्याल्याविण करी शोभनतांतडी । चार ते गधडी करीतसे ॥१॥ कासया पाल्हाळ आणिकांचे देखी । सांगतां नव्हे सुखी साखरेसि ॥ध्रु.॥ कुंथाच्या ढेकरें न देवेल पुष्टी । रूप दावी कष्टी मळिण वरी ॥२॥ तुका म्हणे अरे वाचाळ हो ऐका । अनुभवेंविण नका वाव घेऊं ॥३॥
4036
व्हावया भिकारी हें आम्हां कारण । अंतरोनि जन जावें दुरी ॥१॥ संबंध तुटावा शब्दाचा ही स्पर्श । म्हणऊनि आस मोकलिली ॥२॥ तुका म्हणे दुःखें उबगला जीव । म्हणऊनी कीव भाकीं देवा ॥३॥
4037
शंख करिशी ज्याच्या नांवें । त्याचें तुज नाहीं ठावें । ऐक सांगतों एका भावें । सांपडे घरीं तें जीवउनि खावें । रे विठ्ठल ॥१॥ टिळे माळा करंडी सोंग । धरुनि चाळविलें जग । पसरी हात नाहीं त्याग । दावी दगड पुजी भग । रे विठ्ठल ॥२॥ राख लावुनि अंग मळी । वाये ठोके मी एक बळी । वासने हातीं बांधवी नळी । त्यासि येउनि गाळी । रे विठ्ठल ॥३॥ कोण तें राहडीचें सुख । वरते पाय हारतें मुख । करवी पीडा भोगवी दुःख । पडे नरकीं परी न पळे चि मूर्ख । रे विठ्ठल ॥४॥ सिकला फाक मारी हाका । रांडा पोरें मेळवी लोकां । विटंबी शरीर मागे रुका । केलें तें गेलें अवघें चि फुका । रे विठ्ठल ॥५॥ कळावें जनां मी एक बळी । उभा राहोनि मांडी फळी । फोडोनि गुडघे कोंपर चोळी । आपला घात करोनि आपण चि तळमळे । रे विठ्ठल ॥६॥ फुकट खेळें ठकलीं वांयां । धरुनि सोंग बोडक्या डोया । शिवों नये ती अंतरीं माया । संपादणीविण विटंबिली काया । रे विठ्ठल ॥७॥ धुळी माती कांहीं खेळों च नका । जवादी चंदन घ्यावा बुका । आपणा परिमळ आणिकां लोकां । मोलाची महिमा फजिती फुका । रे विठ्ठल ॥८॥ बहुत दुःखी जालियां खेळें । अंगीं बुद्धि नाहींत बळें । पाठीवरी तोबा तोंड काळें । रसना द्रवे उपस्थाच्या मुळें । रे विठ्ठल ॥९॥ काय सांगतो तें ऐका तुका । मोडा खेळ कांहीं अवगों च नका । चला जेवूं आधीं पोटीं लागल्या भुका । धाल्यावरी बरा टाकमटिका । रे विठ्ठल ॥१०॥
4038
शंखचक्रगदापद्म । पैल आला पुरुषोत्तम ॥१॥ ना भी ना भी भक्तराया । वेगीं पावलों सखया ॥ध्रु.॥ दुरूनि येतां दिसे दृष्टी । धाकें दोष पळती सृष्टी ॥२॥ तुका देखोनि एकला । वैकुंठींहूनि हरि आला ॥३॥
4039
शकुनानें लाभ हानि । येथूनि च कळतसे ॥१॥ भयारूढ जालें मन । आतां कोण विश्वास ॥ध्रु.॥ प्रीत कळे आलिंगनीं । संपादनीं अत्यंत ॥२॥ तुका म्हणे मोकलिलें । कळों आलें बरवें हें ॥३॥
4040
शक्ती द्याव्या देवा । नाहीं पदार्थी सेवा ॥१॥ मुख्य आहे ऐसा धर्म । जाणते हो जाणा वर्म ॥ध्रु.॥ मना पोटीं देव । जाणे जैसा तैसा भाव ॥२॥ तुका म्हणे सोसें । लागे लाविल्याचें पिसें ॥३॥
4041
शब्दज्ञानी येऊं नेदीं दृष्टीपुढें । छळवादी कुडे अभक्त ते ॥१॥ जळो ते जाणींव जळो त्याचे दंभ । जळो त्याचें तोंड दुर्जनाचें ॥२॥ तुका म्हणे येती दाटूनि छळाया । त्यांच्या बोडूं डोया न धरूं भीड ॥३॥
4042
शब्दा नाहीं धीर । ज्याची बुद्धि नाहीं स्थिर ॥१॥ त्याचें न व्हावे दर्शन । खळा पंगती भोजन ॥ध्रु.॥ संतास जो निंदी । अधम लोभासाठीं वंदी ॥२॥ तुका म्हणे पोटीं । भाव अणीक जया होटीं ॥३॥
4043
शब्दांचीं रत्नें करूनी अळंकार । तेणें विश्वंभर पूजियेला ॥१॥ भावाचे उपचार करूनि भोजन । तेणें नारायण जेवविला ॥ध्रु.॥ संसारा हातीं दिलें आंचवण । मुखशुद्धी मन समर्पिलें ॥२॥ रंगलीं इंद्रियें सुरंग तांबूल । माथां तुळसीदळ समर्पिलें ॥३॥ एकभावदीप करूनि निरांजन । देऊनि आसन देहाचें या ॥४॥ न बोलोनि तुका करी चरणसेवा । निजविलें देवा माजघरीं ॥५॥
4044
शरण आलें त्यासी न दावीं हे पाठी । ऐका जगजेठी विज्ञापना ॥१॥ अळविती तयांसी उत्तर झडकरी । द्यावें परिसा हरी विज्ञापना ॥ध्रु.॥ गांजिलियाचें करावें धांवणें । विनंती नारायणें परिसावी हे ॥२॥ भागलियाचा होई रे विसांवा । परिसावी केशवा विज्ञापना ॥३॥ अंकिताचा भार वागवावा माथां । परिसावी अनंता विज्ञापना ॥४॥ तुका म्हणे आम्हां विसरावें ना देवा । परिसावी हे देवा विज्ञापना ॥५॥
4045
शरण शरण जी हनुमंता । तुज आलों रामदूता ॥१॥ काय भक्तीच्या त्या वाटा । मज दावाव्या सुभटा ॥ध्रु.॥ शूर आणि धीर । स्वामिकाजीं तूं सादर ॥२॥ तुका म्हणे रुद्रा । अंजनीचिया कुमरा ॥३॥
4046
शरण शरण वाणी । शरण त्रिवाचा विनवणी ॥१॥ स्तुती न पुरे हे वाचा । सत्य दास मी दासांचा ॥ध्रु.॥ देह सांभाळून । पायांवरी लोटांगण ॥२॥ विनवी संता तुका दीन । नव्हे गोरवें उत्तीर्ण ॥३॥
4047
शरणागत जालों । तेणें मीपणा मुकलों ॥१॥ आतां दिल्याची च वाट । पाहों नाहीं खटपट ॥ध्रु.॥ नलगे उचित । कांहीं पाहावें संचित ॥२॥ तुका म्हणे सेवा । माने तैसी करूं देवा ॥३॥
4048
शरीर दुःखाचें कोठार । शरीर रोगाचें भांडार । शरीर दुगपधीची थार । नाहीं अपवित्र शरीरा ऐसें ॥१॥ शरीर उत्तम चांगलें । शरीर सुखाचें घोंसुलें । शरीरें साध्य होय केलें । शरीरें साधलें परब्रम्ह ॥ध्रु.॥ शरीर विटाळाचें अळें । मायामोहपाशजाळें । पतन शरीराच्या मुळें । शरीर काळें व्यापिलें ॥२॥ शरीर सकळ हें शुद्ध । शरीर निधींचा ही निध । शरीरें तुटे भवबंध । वसे मध्यें भोगी देव शरीरा ॥३॥ शरीर अविद्येचा बांधा । शरीर अवगुणाचा रांधा । शरीरीं वसे बहुत बाधा । नाहीं गुण सुदा एक शरीरीं ॥४॥ शरीरा दुःख नेदावा भोग । न द्यावें सुख न करीं त्याग । नव्हे वोखटें ना चांग । तुका म्हणे वेग करीं हरिभजनीं ॥५॥
4049
शांतीपरतें नाहीं सुख । येर अवघें ची दुःख ॥१॥ म्हणउनी शांति धरा । उतराल पैल तीरा ॥ध्रु.॥ खवळलिया कामक्रोधीं । अंगी भरती आधिव्याधी ॥२॥ म्हणे त्रिविध ताप । जाती मग आपेंआप ॥३॥
4050
शाक्त गधडा जये देशीं । तेथें राशी पापाच्या ॥१॥ सुकृताचा उदो केला । गोंधळ घाला इंद्रियें ॥ध्रु.॥ क्रोधरूपें वसे काम । तीचें नाम जपतसे ॥२॥ मद्यभक्षण मांगिण जाती । विटाळ चित्तीं सांटविला ॥३॥ स्तवुनियां पूजी रांड । न लजे भांड दाढीसी ॥४॥ तुका म्हणे भगवती । नेइल अंतीं आपणापें ॥५॥
4051
शाक्तांची शूकरी माय । विष्ठा खाय बिदीची ॥१॥ तिची त्या पडली सवे । मागें धांवें म्हणोनि ॥ध्रु.॥ शाक्तांची गाढवी माय । भुंकत जाय वेसदारा ॥२॥ तुका म्हणे शिंदळीचे । बोलतां वाचे निंद्य ते ॥३॥
4052
शादीचें तें सोंग । संपादितां जरा वेंग ॥१॥ पाहा कैसी विटंबना । मूर्खा अभाग्याची जना ॥ध्रु.॥ दिसतें तें लोपी । झिंज्या बोडुनियां पापी ॥२॥ सिंदळी त्या सती । तुका म्हणे थुंका घेती ॥३॥
4053
शास्त्रज्ञ हो ज्ञाते असती बहुत । परि नाहीं चित्त हाता आलें ॥१॥ क्षणा एका साटीं न धरवे धीर । तेणें हा रघुवीर अंतरतो ॥ध्रु.॥ तोळाभर सोनें रतिभार राई । मेळविल्या पाहीं नास होतो ॥२॥ हरीचे अंकित असती विरळागत । तयांसी अच्युत कृपा करी ॥३॥ तुका म्हणे काय धुडवण्या गोष्टी । जंव नाहीं गांठी चित्त आलें ॥४॥
4054
शास्त्राचें जें सार वेदांची जो मूर्ति । तो माझा सांगाती प्राणसखा ॥१॥ म्हणउनी नाहीं आणिकांचा पांग । सर्व जालें सांग नामें एका ॥ध्रु.॥ सगुण निर्गुण जयाचीं अंगें । तो चि आम्हां संगें क्रीडा करी ॥२॥ तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते । स्वयंभू आइते केले नव्हों ॥३॥
4055
शाहाणपणें वेद मुका । गोपिका त्या ताकटी ॥१॥ कैसें येथें कैसें तेथें । शहाणे ते जाणती ॥ध्रु.॥ यज्ञमुखें खोडी काढी । कोण गोडी बोरांची ॥२॥ तुका म्हणे भावाविण । अवघा सीण केला होय ॥३॥
4056
शाहाणियां पुरे एक चि वचन । विशारती खुण ते चि त्यासी ॥१॥ उपदेश असे बहुतांकारणें । घेतला तो मनें पाहिजे हा ॥ध्रु.॥ फांसावेना तरिं दुःख घेतें वाव । मग होतो जीव कासावीस ॥२॥ तुका म्हणे नको राग धरूं झोंडा । नुघडितां पीडा होइल डोळे ॥३॥
4057
शिंकें लावियेलें दुरी । होतों तिघांचे मी वरी ॥१॥ तुम्ही व्हारे दोहींकडे । मुख पसरूनि गडे ॥ध्रु.॥ वाहाती त्या धारा । घ्यारे दोहींच्या कोंपरा ॥२॥ तुका म्हणे हातीं टोका । अधिक उणें नेदी एका ॥३॥
4058
शिंदळा साल्याचा नाहीं हा विश्वास । बाईल तो त्यास न विसंभे ॥१॥ दुष्ट बुद्धि चोरी करी निरंतर । तो म्हणे इतर लोक तैसे ॥२॥ तुका म्हणे जया चित्तीं जे वासना । तयाची भावना तयापरी ॥३॥ काला चेंडुफळी - अभंग १००
4059
शिकल्या बोलाचे सांगतील वाद । अनुभव भेद नाहीं कोणा ॥१॥ पंडित हे ज्ञानी करितील कथा । न मळिती अर्था निजसुखा ॥२॥ तुका म्हणे जैसी लांचासाठीं ग्वाही । देतील हे नाहीं ठावी वस्तु ॥३॥
4060
शिकल्या शब्दाचें उत्पादितों ज्ञान । दरपणींचें धन उपर वाया ॥१॥ अनुभउ कइं होईंन भोगिता । सांकडें तें आतां हें चि आलें ॥ध्रु.॥ गायें नाचें करीं शरीराचे धर्म । बीजकळावर्म तुमचें दान ॥२॥ तुका म्हणे केला उशीर न साहे । द्याल तरी आहे सर्व सद्धि ॥३॥
4061
शिकवणें नाक झाडी । पुढील जोडी कळेना ॥१॥ निरयगांवीं भोग देता । तेथें सत्ता आणिकांची ॥ध्रु.॥ अवगुणांचा सांटा करी । ते चि धरी जीवासी ॥२॥ तुका म्हणे जडबुद्धि । कर्मशुद्धी सांडवीं ॥३॥
4062
शिकवणेसाटीं वाटते तळमळ । पुढें येईंल काळा फोडों डोईं ॥१॥ तेव्हां त्यासि काय देशील उत्तर । मेळउनि अंतर ठेवितोसि ॥ध्रु.॥ येथींचिया सोंगें भोरपियाचे परि । होईंल तें दुरि शृंगारिलें ॥२॥ तुका म्हणे कां रे राखिलें खरकटें । रागेल्याचे तंट रागेलें का ॥३॥
4063
शिकविले बोल । बोलें तैसी नाहीं ओल ॥१॥ आतां देवा संदेह नाहीं । वांयां गेलों यासी कांहीं ॥ध्रु.॥ एकांताचा वास । नाहीं संकल्पाचा नास ॥२॥ बुद्धि नाहीं स्थिर । तुका म्हणे शब्दा धीर ॥३॥
4064
शिकविलें तुम्हीं तें राहे तोंवरी । मज आणि हरी वियोग तों ॥१॥ प्रसंगीं या नाहीं देहाची भावना । तेथें या वचना कोण मानी ॥२॥ तुका म्हणे चित्तीं बैसला अनंत । दिसों नेदी नित्य अनित्य तें ॥३॥
4065
शिकवूनि बोल । केलें कवतुक नवल ॥१॥ आपणियां रंजविलें । बापें माझिया विठ्ठलें ॥ध्रु.॥ हातीं प्रेमाचें भातुकें । आम्हां देऊनियां निकें ॥२॥ तुका करी टाहो । पाहे रखुमाईंचा नाहो ॥३॥
4066
शिकवूनि हित । सोयी लावावे हे नीत ॥१॥ त्याग करूं नये खरें । ऐसें विचारावें बरें ॥ध्रु.॥ तुमचिया तोंडें । धर्माधर्म चि खंडे ॥२॥ मजसाटीं देवा । कां हो लपविला हेवा ॥३॥ जाला सावधान । त्यासी घालावें भोजन ॥४॥ तुका म्हणे पिता । वरी बाळाच्या तो हिता ॥५॥
4067
शिखा सूत्र तुझा गुंतला जमान । तंववरि तूं जाण श्रुतिदास ॥१॥ त्याची तुज कांहीं चुकतां चि नीत । होसील पतित नरकवासी ॥ध्रु.॥ बहु जालासी चतुर शाहणा । शुद्ध आचरणा चुकों नको ॥२॥ शिखा सूत्र याचा तोडीं तूं संबंध । मग तुज बाध नाहींनाहीं ॥३॥ तुका म्हणे तरि वत्तूऩिन निराळा । उमटती कळा ब्रम्हींचिया ॥४॥
4068
शिजल्यावरी जाळ । वांयां जायाचें तें मूळ ॥१॥ ऐसा वारावा तो श्रम । अतिशयीं नाहीं काम ॥ध्रु.॥ सांभाळावें वर्म । उचिताच्या काळें धर्म ॥२॥ तुका म्हणे कळे । ऐसें कारणाचे वेळे ॥३॥
4069
शिळा जया देव । तैसा फळे त्याचा भाव ॥१॥ होय जतन तें गोड । अंतरा येती नाड ॥ध्रु.॥ देव जोडे भावें । इच्छेचें तें प्रेम घ्यावें ॥२॥ तुका म्हणे मोड दावी । तैशीं फळें आलीं व्हावीं ॥३॥
4070
शिळा स्फटिकाची न पालटे भेदें । दाउनियां छंदे जैसी तैसी ॥१॥ जैसा केला तैसा होय क्षणक्षणा । फेडावी वासना भक्तिभावें ॥२॥ फेडावया आला अवघियांची धणी । गोपाळ गौळणी मायबापा ॥३॥ मायबापा सोडविलें बंदीहुनि । चाणूर मर्दुनी कंसादिक ॥४॥ दिक नाहीं देणें अरिमित्रा एक । पूतना कंटक मुक्त केली ॥५॥ मुक्त केला मामा कंस महादोषी । बाळहत्या रासी पातकांच्या ॥६॥ पाप कोठें राहे हरी आठवितां । भक्ती द्वेषें चिंता जैसा तैसा ॥७॥ साक्षी तयापाशीं पूर्वीलकर्माच्या । बांधला सेवेच्या रुणी देव ॥८॥ देव भोळा धांवे भक्ता पाठोवाठी । उच्चारितां कंठीं मागेंमागें ॥९॥ मानाचा कंटाळा तुका म्हणे त्यासी । धांवे तो घरासी भाविकांच्या ॥१०॥
4071
शिव शक्ति आणि सूर्य गणपति । एक चि म्हणती विष्णूस ही ॥१॥ हिरा गार दोनी मानिती समान । राजस भजनें वांयां जाती ॥ध्रु.॥ अन्य देवतांसि देव म्हणऊन । तामस जीवन तमोयोग्या ॥२॥ वांयां जायासाठीं केलासे हव्यास । अन्य देवतांस देवपण ॥३॥ आपुलिया मुखें सांगतसे धणी । नव्हे माझी वाणी पदरींची ॥४॥ धन्य ते वैष्णव भजती केशव । साित्वक हे जीव मोक्षा योग्य ॥५॥ तुका म्हणे मोक्ष नाहीं कोणापासीं । एका गोविंदासी शरण व्हा रे ॥६॥
4072
शिष्या सांगे उपदेश । गुरुपूजा हे विशेष ॥१॥ दावी आचार सोवळे । दंड कमंडलु माळे ॥ध्रु.॥ छाटी भगवी मानसीं । व्यर्थ म्हणवी संन्यासी ॥२॥ तुका म्हणे लोभ । न सुटे नाहीं लाभ ॥३॥
4073
शिष्यांची जो नेघे सेवा । मानी देवासारिखें ॥१॥ त्याचा फळे उपदेश । आणिकां दोष उफराटे ॥ध्रु.॥ त्याचें खरें ब्रम्हज्ञान । उदासीन देहभावीं ॥२॥ तुका म्हणे सत्य सांगें । योत रागें येती ते ॥३॥
4074
शीतळ तें शीतळाहुनी । पायवणी चरणींचें ॥१॥ सेवन हे शिरसा धरीं । अंतरीं हीं वरदळा ॥ध्रु.॥ अवघें चि नासी पाप । तीर्थ बाप माझ्याचें ॥२॥ बैसोनियां तुका तळीं । त्या कल्लोळीं डौरला ॥३॥
4075
शीतळ साउली आमुची माउली । विठाईं वोळली प्रेमपान्हा ॥१॥ जाऊनि वोसंगा वोरस । लागलें तें इच्छे पीइन वरी ॥ध्रु.॥ कृपा तनु माझा सांभाळी दुभूनि । अमृतजीवनी लोटलीसे ॥२॥ आनंदाचा ठाव नाहीं माझा चित्तीं । सागर तो किती उपमेसी ॥३॥ सैर जाये पडे तयेसी सांकडें । सांभाळीत पुढें मागें आस ॥४॥ तुका म्हणे चिंता कैसी ते मी नेणें । लडिवाळ तान्हें विठाईंचें ॥५॥ रामचरित्र - अभंग ॥१४॥
4076
शुकसनकादिकीं उभारिला बाहो । परिक्षितीला हो दिसां सातां ॥१॥ उठाउठी करी स्मरणाचा धांवा । धरवत देवा नाहीं धीर ॥ध्रु.॥ त्वरा जाली गरुड टाकियेला मागें । द्रौपदीच्या लागें नारायणें ॥२॥ तुका म्हणे करी बहु च तांतडी । प्रेमाची आवडी लोभ फार ॥३॥
4077
शुद्ध ऐसें ब्रम्हज्ञान । करा मन सादर ॥१॥ रवि रसां सकळां शोषी । गुणदोषीं न लिंपे ॥ध्रु.॥ कोणासवें नाहीं चोरी । सकळांवरी समत्व ॥२॥ सत्य तरी ऐसें आहे । तुका पाहे उपदेशीं ॥३॥
4078
शुद्ध चर्या हें चि संताचें पूजन । लागत चि धन नाहीं वत्ति ॥१॥ सगुणाचे सोई सगुण विश्रांती । आपण चि येती चोजवीत ॥ध्रु.॥ कीर्तनीं चि वोळे कृपेचा वोरस । दुरीपणें वास संनिधता ॥२॥ तुका म्हणे वर्म सांगतों सवंगें । मन लावा लागें स्वहिताच्या ॥३॥
4079
शुद्ध दळणाचें सुख सांगों काई । मानवित सईबाई तुज ॥१॥ शुद्ध तें वळण लवकरी पावे । डोलवितां निवे अष्टांग तें ॥ध्रु.॥ शुद्ध हें जेवितां तन निवे मन । अल्प त्या इंधन बुडा लागे ॥२॥ शुद्ध त्याचा पाक सुचित चांगला । अविट तयाला नाश नाहीं ॥३॥ तुका म्हणे शुद्ध आवडे सकळां । भ्रतार वेगळा न करी जीवें ॥४॥
4080
शुद्धबीजा पोटीं । फळें रसाळ गोमटीं ॥१॥ मुखीं अमृताची वाणी । देह वेचावा कारणीं ॥ध्रु.॥ सर्वांगीं निर्मळ । चित्त जैसें गंगाजळ ॥२॥ तुका म्हणे जाती । ताप दर्शनें विश्रांती ॥३॥
4081
शुद्धाशुद्ध निवडे कैसें । चर्म मास भिन्न नाहीं ॥१॥ कांहीं अधिक नाहीं उणें । कवण्या गुणें देवासी ॥ध्रु.॥ उदक भिन्न असे काईं । वाहाळ बावी सरिता नईं ॥२॥ सूर्य तेजें निवडी काय । रश्मी रसा सकळा खाय ॥३॥ वर्णां भिन्न दुधा नाहीं । सकळा गाई सारखें ॥४॥ करितां भिन्न नाहीं माती । मडक्या गति भिन्न नांवें ॥५॥ वर्त्ते एकविध अग्नि । नाहीं मनीं शुद्धाशुद्ध ॥६॥ तुका म्हणे पात्र चाड । किंवा विसें अमृत गोड ॥७॥
4082
शुद्धीचें सारोनि भरियेली पाळी । भरडोनि वोंगळी नाम केलें ॥१॥ आडसोनि शुद्ध करीं वो साजणी । सद्धि कां पापिणी नासियेलें ॥ध्रु.॥ सुपीं तों चि पाहें धड उगटिलें । नव्हतां नासिलें जगझोडी ॥२॥ सुपीं तों चि आहे तुज तें आधीन । दळिल्या जेवण जैसें तैसें ॥३॥ सुपीं तों चि संग घेइप धडफुडी । एकसा गधडी नास केला ॥४॥ दळितां आदळे तुज कां न कळे । काय गेले डोळे कान तुझे ॥५॥ सुपीं तों चि वोज न करितां सायास । पडसी सांदीस तुका म्हणे ॥६॥ दळण - अभंग १
4083
शुभ जाल्या दिशा अवघा चि काळ । अशुभ मंगळ मंगळाचें ॥१॥ हातींचिया दीपें दुराविली निशी । न देखिजे कैसी आहे ते ही ॥ध्रु.॥ सुख दुःखाहूनि नाहीं विपरीत । देतील आघात हितफळें ॥२॥ तुका म्हणे आतां आम्हांसी हें भलें । अवघे चि जाले जीव जंत ॥३॥
4084
शुभ मात तिहीं आणिली गोपाळीं । चेंडू वनमाळी घेउनि आले ॥१॥ आली दारा देखे हरुषाची गुढी । सांगितली पुढी हरुषें मात ॥२॥ हरुषलीं माता केलें निंबलोण । गोपाळांवरून कुरवंडी ॥३॥ गोपाळां भोवतें मिळालें गोकुळ । अवघीं सकळ लहान थोरें ॥४॥ थोर सुख जालें ते काळीं आनंद । सांगती गोविंद वरि आला ॥५॥ आले वरि बैसोनियां नारायण । काळया नाथून वहन केलें ॥६॥ नगराबाहेरी निघाले आनंदें । लावूनियां वाद्यें नाना घोष ॥७॥ नारायणापुढें गोपाळ चालती । आनंदें नाचती गाती गीत ॥८॥ तंव तो देखिला वैकुंठींचा पती । लोटांगणीं जाती सकळ ही ॥९॥ सकळ ही एका भावें आलिंगिले । अवघियां जाले अवघे हरि ॥१०॥ हरि आलिंगनें हरिरूप जालीं । आप विसरलीं आपणास ॥११॥ सकळांसी सुख एक दिलें देवें । मायबापां भावें लोकपाळां ॥१२॥ मायबाप देवा नाहीं लोकपाळ । सारिखीं सकळ तुका म्हणे ॥१३॥
4085
शूकरासी विष्ठा माने सावकास । मिष्टान्नाची त्यास काय गोडी ॥१॥ तेवीं अभक्तांसी आवडे पाखांड । न लगे त्यां गोड परमार्थ ॥ध्रु.॥ श्वानासी भोजन दिलें पंचामृत । तरी त्याचें चित्त हाडावरि ॥२॥ तुका म्हणे सर्पा पाजिलिया क्षीर । वमितां विखार विष जालें ॥३॥
4086
शूद्रवंशी जन्मलों । म्हणोनि दंभें मोकलिलों ॥१॥ अरे तूं चि माझा आतां । मायबाप पंढरीनाथा ॥ध्रु.॥ घोकाया अक्षर । मज नाहीं अधिकार ॥२॥ सर्वभावें दीन । तुका म्हणे यातिहीन ॥३॥
4087
शूरत्वासी मोल । नये कामा फिके बोल ॥१॥ केला न संडी कैवाड । जीवेंसाटीं तों हे होड ॥ध्रु.॥ धीर तो कारण । साह्य होतो नारायण ॥२॥ तुका म्हणे हरि । दासां रक्षितो निर्धारीं ॥३॥
4088
शूरां साजती हतियारें । गांढव्या हासतील पोरें ॥१॥ काय केली विटंबण । मोतीं नासिकावांचून ॥ध्रु.॥ पतिव्रते रूप साजे । सिंदळ काजळ लेतां लाजे ॥२॥ दासी पत्नी सुता । नव्हे सरी एक पिता ॥३॥ मान बुद्धीवंतां । थोर न मनिती पिता ॥४॥ तुका म्हणे तरी । आंत शुद्ध दंडे वरी ॥५॥
4089
शृंगारिक माझीं नव्हती उत्तरें । आळवितों खरे अवस्थेच्या ॥१॥ न घलावा मधीं कामाचा विलंब । तुम्ही तों स्वयंभ करुणामूर्ति ॥२॥ तुका म्हणे केलें सन्मुख वदन । देखतां चरण पोटाळीन ॥३॥
4090
शेवटची विनवणी । संतजनीं परिसावी ॥१॥ विसर तो न पडावा । माझा देवा तुम्हांसी ॥ध्रु.॥ पुढें फार बोलों काई । अवघें पायीं विदित ॥२॥ तुका म्हणे पडिलों पायां । करा छाया कृपेची ॥३॥
4091
शेवटींची विनंती । ऐका ऐका कमळापती ॥१॥ काया वाचा मन । चरणीं असे समर्पण ॥ध्रु.॥ जीवपरमात्मा ऐक्यासि । सदा वसो हृदयेंसीं ॥२॥ तुका म्हणे देवा । कंठीं वसावें केशवा॥३॥
4092
शोकवावा म्यां देहे । ऐसें नेणों पोटीं आहे ॥१॥ तरी च नेदा जी उत्तर । दुःखी राखिलें अंतर ॥ध्रु.॥ जावें वनांतरा । येणें उद्देशें दातारा ॥२॥ तुका म्हणे गिरी । मज सेववावी दरी ॥३॥
4093
शोकें शोक वाढे । हिमतीचे धीर गाढे ॥१॥ येथें केले नव्हे काई । लंडीपण खोटें भाई ॥ध्रु.॥ करिती होया होय । परी नव्हे कोणी साह्य ॥२॥ तुका म्हणे घडी । साधिलिया एक थोडी ॥३॥
4094
शोधितां चि नये । म्हणोनि वोळगतों पाये ॥१॥ आतां दिसों नये जना । ऐसें करा नारायणा ॥ध्रु.॥ परतोनि मन । गेलें ठायीं चि मुरोन ॥२॥ विसरला तुका । बोलों चालों जाला मुका ॥३॥
4095
शोधिसील मूळें । त्याचें करीसी वाटोळें ॥१॥ ऐसे संतांचे बोभाट । तुझे बहु जाले तट ॥ध्रु.॥ लौकिका बाहेरी । घाली रोंखीं जया धरी ॥२॥ तुका म्हणे गुण । तुझा लागलिया शून्य ॥३॥
4096
शोधूनि अन्वय वंश वंशावळी । परस्परा कुळीं उच्चारण ॥१॥ म्हणविलें मागें पुढें चाले कैसें । केला सामरस्यें अभिषेक ॥ध्रु.॥ एकछत्र झळके उन्मनी निशाणी । अनुहाताच्या ध्वनी गगन गर्जे ॥२॥ तुकया स्वामी स्थापी निजपदीं दासा । करूनि उल्हासा सप्रेमता ॥३॥
4097
श्रमपरिहारा । मूळ हें जालें दातारा ॥१॥ देह निवेदूनि पायीं । जालों रिकामा उतराईं ॥ध्रु.॥ आपली ते सत्ता । येथें असों नेदीं आतां ॥२॥ राहिला निराळा । तुका कटकटे वेगळा ॥३॥
4098
श्रीअनंता मधुसूदना । पद्मनाभा नारायणा । जगव्यापका जनादऩना । आनंदघना अविनाशा ॥१॥ सकळदेवा आदिदेवा । कृपाळुवा जी केशवा । महा महानुभवा । सदाशिवा सहजरूपा ॥ध्रु.॥ चक्रधरा विश्वंभरा । गरुडध्वजा करुणाकरा । सहस्रपादा सहस्रकरा । क्षीरसागरा शेषशयना ॥२॥ कमलनयना कमलापती । कामिनीमोहना मदनमूर्ती । भवतारका धरित्या क्षिती । वामनमूर्ती त्रिविक्रमा ॥३॥ अगा ये सगुणा निर्गुणा । जगज्जनित्या जगज्जीवना । वसुदेवदेवकीनंदना । बाळरांगणा बाळकृष्णा ॥४॥ तुका आला लोटांगणी । मज ठाव द्यावा जी चरणीं । हे चि करीतसें विनवणी । भवबंधनीं सोडवावें ॥५॥
4099
श्रीपंढरीशा पतितपावना । एक विज्ञापना पायांपाशीं ॥१॥ अनाथां जीवांचा तूं काजकैवारी । ऐसी चराचरीं ब्रिदावळी ॥ध्रु.॥ न संगतां कळे अंतरीचें गुज । आतां तुझी लाज तुज देवा ॥२॥ आळिकर ज्याचें करिसी समाधान । अभयाचें दान देऊनियां ॥३॥ तुका म्हणे तूं चि खेळें दोहीं ठायीं । नसेल तो देई धीर मना ॥४॥
4100
श्रीमुख वोणवा गिळीत चालिलें । भ्यासुर वासिलें वदनांबुज ॥१॥ विक्राळ त्या दाढा भ्यानें पाहावेना । धाउनी रसना ज्वाळ गिळी ॥ध्रु.॥ जिव्हा लांब धांवे गोळा करी ज्वाळ । मोटें मुखकमळ त्यांत घाली ॥ २॥ तुका म्हणे अवघा वोणवा गीळिला। आनंद जाहाला गोपाळांसी ॥३॥
4101
श्रीराम सखा ऐसा धरीं भाव । मीपणाचा ठाव पुसीं मना ॥१॥ शरण निरंतर म्हण तूं गोविंदा । वाचे लावीं धंदा नारायण ॥ध्रु.॥ यापरि सोपान नाहीं रे साधन । वाहातसें आण तुझी मना ॥२॥ नको कांहीं करूं अळस अंतरीं । जपें निरंतर रघुपती ॥३॥ तुका म्हणे मोठा लाभ नरदेहीं । देहीं च विदेही होती नामें ॥४॥
4102
श्रीसंतांचिया माथा चरणांवरी । साष्टांग हें करीं दंडवत ॥१॥ विश्रांती पावलों सांभाळउत्तरीं । वाढलें अंतरीं प्रेमसुखें ॥ध्रु.॥ डौरली हे काया कृपेच्या वोरसें । नव्हे अनारिसें उद्धरलों ॥२॥ तुका म्हणे मज न घडतां सेवा । पूर्वपुण्यठेवा वोडवला ॥३॥
4103
श्वान शीघ्रकोपी । आपणा घातकर पापी ॥१॥ नाहीं भीड आणि धीर । उपदेश न जिरे क्षीर ॥ध्रु. ॥ माणसांसि भुंके । विजातीनें द्यावे थुंके ॥२॥ तुका म्हणे चित्त । मळिण करा तें फजित ॥३॥
4104
श्वाना दिली सवे । पायांभोंवतें तें भोंवे ॥१॥ तैसी जाली मज परी । वसे निकट सेजारीं ॥ध्रु.॥ जेवितां जवळी । येऊनियां पुंस घोळी ॥२॥ कोपेल तो घनी । तुका म्हणे नेणें मनीं ॥३॥
4105
श्वानाचियापरी लोळें तुझ्या दारीं । भुंकों हरिहरि नाम तुझें ॥१॥ भुंकीं उठीं बैसें न वजायें वेगळा । लुडबुडीं गोपाळा पायांपाशीं ॥२॥ तुका म्हणे आम्हां वर्म आहे ठावें । मागेन ते द्यावें प्रेमसुख ॥३॥
4106
षडधसीं रांधिलें खापरीं घातलें । चोहोटा ठेविलें मध्यरात्रीं ॥१॥ त्यासी सदाचारी लोक न शिवती । श्वानासी निश्चिती फावलें तें ॥ध्रु.॥ तैसें दुष्टकर्म जालें हरिभक्ता । त्यागिली ममता विषयासक्ति ॥२॥ इहपरलोक उभय विटाळ । मानिती केवळ हरिचे दास ॥३॥ तुका म्हणे देवा आवडे हे सेवा । अनुदिनीं व्हावा पूर्ण हेतु ॥४॥
4107
संकल्पासी अधिष्ठान । नारायण गोमटें ॥१॥ अवघियांचें पुरे कोड । फिडे जड देहत्व ॥ध्रु.॥ उभय लोकीं उत्तम कीर्ति । देव चित्तीं राहिलिया ॥२॥ तुका म्हणे जीव धाय । नये हाय जवळी ॥३॥
4108
संकिल्पला तुज सकळ ही भाव । कोण एक ठाव उरला तेथें ॥१॥ इंद्रियव्यापार जेंजें कांहीं कर्म । करितों ते धर्म सकळ तुझे ॥ध्रु.॥ माझें हित फार लागला विचार । तुज सर्व भार चालवणें ॥२॥ जो कांहीं लौकिक करिसी तो तुझा । अपमान पूजा कांहींतरि ॥३॥ तुका म्हणे मी तों राहिलों निश्चिंत । तुज कळे हित तैसें करीं ॥४॥
4109
संकोचतो जीव महत्वाच्या भारें । दासत्व चि बरें बहु वाटे ॥१॥ कळावी जी माझी आवडी हे संतां । देणें तरि आतां हें चि द्यावें ॥ध्रु.॥ तुमचे चरण पावविलों सेवा । म्हणउनि हेवा हा चि करीं ॥२॥ विनउनी तुका वंदितो चरण । लेखा रजरेण चरणींचें ॥३॥
4110
संकोचोनि काय जालासी लहान । घेई अपोशण ब्रम्हांडाचें ॥१॥ करोनि पारणें आंचवें संसारा । उशीर उशिरा लावूं नको ॥ध्रु.॥ घरकुलानें होता पडिला अंधार । तेणें केलें फार कासावीस ॥२॥ झुगारूनि दुरी लपविलें काखे । तुका म्हणे वाखे कौतुकाचे ॥३॥
4111
संगतीनें होतो पंगतीचा लाभ । अशोभीं अनुभव असिजेतें ॥१॥ जैसीं तैसीं असों पुढिलांचे सोईं । धरिती हातीं पायीं आचारिये ॥ध्रु.॥ उपकारी नाहीं देखत आपदा । पुढिलांची सदा दया चित्तीं ॥२॥ तुका म्हणे तरीं सज्जनाची कीतिऩ । पुरवावी आर्ति निर्बळांची ॥३॥
4112
संगें वाढे सीण न घडे भजन । त्रिविध हें जन बहु देवा ॥१॥ याचि दुःखें या जनाचा कांटाळा । दिसताती डोळां नानाछंद ॥ध्रु.॥ एकविध भाव राहावया ठाव । नेदी हा संदेह राहों चित्तीं ॥२॥ शब्दज्ञानी हित नेणती आपुलें । आणीक देखिलें नावडे त्या ॥३॥ तुका म्हणे आतां एकलें चि भलें । बैसोनि उगलें राहावें तें ॥४॥
4113
संचित उत्तम भूमि कसूनियां । जाऊं नेणे वांयां परि त्याचें ॥१॥ त्याचिया पिकासि आलिया घुमरी । आल्या गाईंवरी आणिक गाईं ॥२॥ गाईं दवडुनि घालिती बाहेरी । तंव म्हणे हरि बांधा त्या ही ॥३॥ त्याही तुम्ही बांधा तुमच्या सारिख्या । भोवंडा पारिख्या वाड्यातुनि ॥४॥ पारिख्या न येती कोणाचिया घरा । सूत्रधारी खरा नारायण ॥५॥ नारायण नांदे जयाचिये ठायीं । सहज तेथें नाहीं घालमेली ॥६॥ मेलीं हीं शाहाणीं करितां सायास । नाहीं सुखलेश तुका म्हणे ॥७॥
4114
संचित तैशी बुद्धि उपजे मनामधीं । सांगितलें सिद्धि नव जाय ॥१॥ ज्याचा जैसा ठेवा तो त्यापाशीं धांवे । न लगती करावे उपदेश ॥२॥ घेऊन उठती आपुलाले गुण । भविष्याप्रमाणें तुका म्हणे ॥३॥
4115
संचित प्रारब्ध क्रियमाण । अवघा जाला नारायण ॥१॥ नाहीं आम्हांसी संबंधु । जरा मरण कांहीं बाधु ॥ध्रु.॥ द्वैताद्वैतभावें । अवघें व्यापियेलें देवें ॥२॥ तुका म्हणे हरि । आम्हांमाजी क्रीडा करी ॥३॥
4116
संचितावांचून । पंथ न चलवे कारण ॥१॥ कोरडी ते अवघी आटी । वांयां जाय लाळ घोंटीं ॥ध्रु.॥ धन वित्त जोडे । देव ऐसें तों न घडे ॥२॥ तुका म्हणे आड । स्वहितासी बहु नाड ॥३॥
4117
संचितें चि खावें । पुढें कोणाचें न घ्यावें ॥१॥ आतां पुरे हे चाकरी । राहों बैसोनियां घरीं ॥ध्रु.॥ नाहीं काम हातीं । आराणूक दिसराती ॥२॥ तुका म्हणे सत्ता । पुरे पराधीन आतां ॥३॥
4118
संत आले घरा । तों मी अभागी दातारा ॥१॥ कासयानें पूजा करूं । चरण हृदयीं च धरूं ॥ध्रु.॥ काया कुरवंडी । करुन ओंवाळून सांडी ॥२॥ तुका म्हणे भावें । हात जोडीं असो ठावें ॥३॥
4119
संत गाती हरिकीर्त्तनीं । त्यांचें घेइन पायवणी ॥१॥ हें चि तप तीर्थ माझें । आणीक मी नेणें दुजें ॥ध्रु.॥ काया कुरवंडी करीन । संत महंत ओंवाळीन ॥२॥ संत महंत माझी पूजा । अनुभाव नाहीं दुजा ॥३॥ तुका म्हणे नेणें कांहीं । अवघें आहे संतापायीं ॥४॥
4120
संत देखोनियां स्वयें दृष्टी टाळी । आदरें न्याहाळी परस्त्रीसी ॥१॥ वीट ये कर्णासी संतवाक्यामृता । स्त्रीशब्द ऐकतां निवे कर्ण ॥ध्रु.॥ कथेमाजी निज वाटे नित्यक्षणीं । स्त्रियेचे कीर्तनीं प्रेमें जागे ॥२॥ तुका म्हणे तुम्ही क्रोधासी न यावें । स्वभावा करावें काय कोणीं ॥३॥
4121
संत पंढरीस जाती । निरोप धाडीं तया हातीं ॥१॥ माझा न पडावा विसर । तुका विनवितो किंकर ॥ध्रु.॥ केरसुणी महाद्वारीं । ते मी असें निरंतरीं ॥२॥ तुमचे पायीं पाइतन । मोचे माझे तन मन ॥३॥ तांबुलाची पिकधरणी । ते मी असें मुख पसरूनि ॥४॥ तुमची इष्टा पंढरीराया । ते सारसुबी माझी काया ॥५॥ लागती पादुका । ते मी तळील मृत्तिका ॥६॥ तुका म्हणे पंढरिनाथा । दुजें न धरावें सर्वथा ॥७॥
4122
संत मागे पाणी नेदी एक चूळ । दासीस आंघोळ ठेवी पाणी ॥१॥ संतासी देखोनी होय पाठमोरा । दासीचिया पोरा चुंबन देतो ॥ध्रु.॥ संतासी देखोनि करितो ढवाळ्या । भावें धुतो चोळ्या दासीचिया ॥२॥ तुका म्हणे त्याच्या तोंडावरी थुंका । जातो यमलोका भोगावया ॥३॥
4123
संत मानितील मज । तेणें वाटतसे लाज ॥१॥ तुम्ही कृपा केली नाहीं । चित्त माझें मज ग्वाही ॥ध्रु.॥ गोविलों थोरिवां । दुःख वाटतसे जीवा ॥२॥ तुका म्हणे माया । अवरा हे पंढरिराया ॥३॥
4124
संत मारगीं चालती । त्यांची लागो मज माती ॥१॥ काय करावीं साधनें । काय नव्हे एक तेणें ॥ध्रु.॥ शेष घेईंन उच्छिष्ट । धाय धणीवरी पोट ॥२॥ तुका म्हणे संतां पायीं । जीव ठेविला निश्चयीं ॥३॥
4125
संतचरणरज लागतां सहज । वासनेचें बीज जळोन जाय ॥१॥ मग रामनामीं उपजे आवडी । सुख घडोघडी वाढों लागे ॥ध्रु.॥ कंठीं प्रेम दाटे नयनीं नीर लोटे । हृदयीं प्रगटे रामरूप ॥२॥ तुका म्हणे साधन सुलभ गोमटें । परि उपतिष्ठे पूर्वपुण्यें ॥३॥
4126
संतचिन्हें लेउनि अंगीं । भूषण मिरविती जगीं ॥१॥ पडिले दुःखाचे सागरीं । वहावले ते भवपुरीं ॥ध्रु.॥ कामक्रोधलोभ चित्तीं । वरिवरि दाविती विरक्ती ॥२॥ आशापाशीं बांधोनि चित्त । म्हणती जालों आम्ही मुक्त ॥३॥ त्यांचे लागले संगती । जाली त्यांसी ते चि गति ॥४॥ तुका म्हणे शब्दज्ञानें । जग नाडियेलें तेणें ॥५॥
4127
संतजना माझी यावया करुणा । म्हणउनी दीन हीन जालों ॥१॥ नेणें योग युक्ती नाहीं ज्ञान मति । गातसें या गीती पांडुरंगा ॥ध्रु.॥ भाव भक्ती नेणें तप अनुष्ठान । करितों कर्तिन विठ्ठलाचें ॥२॥ ब्रम्हज्ञान ध्यान न कळे धारणा । एका नारायणा वांचूनियां ॥३॥ तुका म्हणे माझा विटोबासी भार । जाणे हा विचार तो चि माझा ॥४॥
4128
संतन पन्हयां लें खडा । राहूं ठाकुरद्वार । चलत पाछेंहुं फिरों । रज उडत लेऊं सीर ॥१॥
4129
संतनिंदा ज्याचे घरीं । नव्हे घर ते यमपुरी ॥१॥ त्याच्या पापा नाहीं जोडा । संगें जना होय पीडा ॥ध्रु.॥ संतनिंदा आवडे ज्यासी । तो जिता चि नर्कवासी ॥२॥ तुका म्हणे तो नष्ट । जाणा गाढव तो स्पष्ट ॥३॥
4130
संतपाउलें साजिरीं । गंगा आली आम्हांवरी ॥१॥ जेथें पडे रजधुळी । तेथें करावी अंघोळी ॥ध्रु.॥ स्वेतबंद वाराणसी । अवघीं तीथॉ तयापासीं ॥२॥ तुका म्हणे धन्य जालों । संतसागरीं मिळालों ॥३॥
4131
संतसंगतीं न करावा वास । एखादे गुणदोष अंगा येती ॥१॥ मग तया दोषा नाहीं परिहार । होय अपहार सुकृताचा ॥२॥ तुका म्हणे नमस्कारावे दुरून । अंतरीं धरून राहें रूप ॥३॥
4132
संतसंगें याचा वास सर्वकाळ । संचला सकळ मूर्तिमंत ॥१॥ घालूनियां काळ अवघा बाहेरी । त्यासी च अंतरीं वास दिला ॥ध्रु.॥ आपुलेसें जिंहीं नाहीं उरों दिलें । चोजवितां भलें ऐसीं स्थळें ॥२॥ तुका म्हणे नाही झांकत परिमळ । चंदनाचें स्थळ चंदन चि ॥३॥
4133
संतसमागम एखादिया परी । राहावें त्याचे द्वारीं श्वानयाती ॥१॥ तेथें रामनाम होईल श्रवण । घडेल भोजन उच्छिष्टाचें ॥ध्रु.॥ कामारी बटीक सेवेचे सेवक । दीनपण रंक तेथें भलें ॥२॥ तुका म्हणे सर्व सुख त्या संगती । घडेल पंगती संतांचिया ॥३॥
4134
संतसेवेसि अंग चोरी । दृष्टी न पडो तयावरी ॥१॥ ऐसियासी व्याली रांड । जळो जळो तिचें तोंड ॥ध्रु.॥ संतचरणीं ठेवितां भाव । आपेंआप भेटे देव ॥२॥ तुका म्हणे संतसेवा । माझ्या पूर्वजांचा ठेवा ॥३॥
4135
संतां आवडे तो काळाचा ही काळ । समर्थाचें बाळ जेवीं समर्थ ॥१॥ परिसतां तेथें नाहीं एकविणें । मोहें न पवे सीण ऐसें राखे ॥ध्रु.॥ केले अन्याय ते सांडवी उपचारें । न देखें दुसरें नासा मूळ ॥२॥ तुका म्हणे मुख्य कल्पतरुछाया । काय नाहीं दया तये ठायीं ॥३॥
4136
संतां नाहीं मान । देव मानी मुसलमान ॥१॥ ऐसे पोटाचे मारिले । देवा आशा विटंबिले ॥ध्रु.॥ घाली लोटांगण । वंदी नीचाचे चरण ॥२॥ तुका म्हणे धर्म । न कळे माजल्याचा भ्रम ॥३॥
4137
संतांचा पढीयावो कैशापरि लाहो । नामाचा आठवो कैसा राहे ॥१॥ हे चि थोर चिंता लागली मनासी । निजतां निद्रेसी न लगे डोळा ॥ध्रु.॥ जेवितां जेवणीं न लगे गोड धड । वाटतें काबाड विषयसुख ॥२॥ ऐसिया संकटीं पाव कृपानिधी । लावीं संतपदीं प्रेमभावें ॥३॥ तुका म्हणे आम्हीं नेणों कांहीं हित । तुजविण अनाथ पांडुरंगा ॥४॥
4138
संतांचा महिमा तो बहु दुर्गम । शाब्दिकांचे काम नाहीं येथें ॥१॥ बहु धड जरी जाली म्हैस गाय । तरी होईंल काय कामधेनु ॥२॥ तुका म्हणे अंगें व्हावें तें आपण । तरी च महिमान येईंल कळों ॥३॥
4139
संतांचिया पायीं माझा विश्वास । सर्वभावें दास जालों त्यांचा ॥१॥ ते चि माझें हित करिती सकळ । जेणें हा गोपाळ कृपा करी ॥ध्रु.॥ भागलिया मज वाहतील कडे । यांचियातें जोडे सर्व सुख ॥२॥ तुका म्हणे शेष घेईंन आवडी । वचन न मोडीं बोलिलों तें ॥३॥
4140
संतांचिये गांवीं प्रेमाचा सुकाळ । नाहीं तळमळ दुःखलेश ॥१॥ तेथें मी राहीन होऊनि याचक । घालितील भीक ते चि मज ॥ध्रु.॥ संतांचिये गांवीं वरो भांडवल । अवघा विठ्ठल धन वित्त ॥२॥ संतांचे भोजन अमृताचे पान । करिती कीर्तन सर्वकाळ ॥३॥ संतांचा उदीम उपदेशाची पेठ । प्रेमसुख साटीं घेती देती ॥४॥ तुका म्हणे तेथें आणिक नाहीं परी । म्हणोनि भिकारी जालों त्यांचा ॥५॥
4141
संतांची स्तुति ते दर्शनाच्या योगें । पडिल्या प्रसंगें ऐसी कीजें ॥१॥ संकल्प ते सदा स्वामीचे चि चित्ती । फाकों नये वृत्ति अखंडित ॥ध्रु.॥ दास्यत्व तें असे एकविध नांवें । उरों नये जीवें भिन्नत्वासी ॥२॥ निज बीजा येथें तुका अधिकारी । पाहिजे तें पेरी तये वेळे ॥३॥
4142
संतांचीं उच्छिष्टें बोलतों उत्तरें । काय म्यां गव्हारें जाणावें हें ॥१॥ विठ्ठलाचे नाम घेता नये शुद्ध । तेथें मज बोध काय कळे ॥ध्रु.॥ करितो कवतुक बोबडा उत्तरी । झणी मजवरि कोप धरा ॥२॥ काय माझी याति नेणां हा विचार । काय मी तें फार बोलों नेणें ॥३॥ तुका म्हणे मज बोलवितो देव । अर्थ गुह्य भाव तो चि जाणे ॥४॥
4143
संतांचे गुण दोष आणितां या मना । केलिया उगाणा सुकृताचा ॥१॥ पिळोनियां पाहे पुष्पाचा परिमळ । चिरोनि केळी केळ गाढव तो ॥ध्रु.॥ तुका म्हणे गंगे अग्नीसि विटाळ । लावी तो चांडाळ दुःख पावे ॥२॥
4144
संतांचे घरींचा दास मी कामारी । दारीं परोपरीं लोळतसें ॥१॥ चरणींचे रज लागती अंगांस । तेण बेताळीस उद्धरती ॥ध्रु.॥ उच्छष्टि हें जमा करुनि पत्रावळी । घालीन कवळी मुखामाजी ॥२॥ तुका म्हणे मी आणीक विचार । नेणें हे चि सार मानीतसें ॥३॥
4145
संतांचें सुख जालें या देवा । म्हणऊनि सेवा करी त्यांची ॥१॥ तेथें माझा काय कोण तो विचार । वर्णावया पार महिमा त्यांचा ॥ध्रु.॥ निर्गुण आकार जाला गुणवंत । घाली दंडवत पूजोनियां ॥२॥ तीर्थे त्यांची इच्छा करिती नित्यकाळ । व्हावया निर्मळ आपणांसी ॥३॥ अष्टमा सिद्धींचा कोण आला पाड । वागों नेदी आड कोणी तया ॥४॥ तुका म्हणे ते बिळया शिरोमणी । राहिलों चरणीं निकटवासें ॥५॥
4146
संतांच्या धीकारें अमंगळ जिणें । विश्वशत्रु तेणें सांडी परि ॥१॥ कुळ आणि रूप वांयां संवसार । गेला भरतार मोकलितां ॥ध्रु.॥ मूळ राखे तया फळा काय उणें । चतुर लक्षणें राखों जाणे ॥२॥ तुका म्हणे सायास तो एके ठायीं । दीप हातीं तई अवघें बरें ॥३॥
4147
संतांच्या पादुका घेईन मोचे खांदीं । हातीं टाळ दिंडी नाचेन पुढें ॥१॥ भजनविधी नेणें साधन उपाय । सकळ सिद्धी पाय हरिदासांचे ॥ध्रु.॥ ध्यानगति मति आसन समाधि । हरिनाम गोविंदीं प्रेमसुख ॥२॥ नेणता निर्लज्ज नेणें नादभेद । सुखें हा गोविंद गाऊं गीतीं ॥३॥ सर्व जोडी मज गोत आणि वित्त । तुका म्हणे संतमहंतपाय ॥४॥
4148
संतांच्या हेळणे बाटलें जें तोंड । प्रत्यक्ष तें कुंड चर्मकाचें ॥१॥ भेसळीचें वीर्य ऐशा अनुभवें । आपुलें परावें नाहीं खळा ॥ध्रु.॥ संतांचा जो शोध करितो चांडाळ । धरावा विठाळ बहु त्याचा ॥२॥ तुका म्हणे केली प्रज्ञा या च साटीं । कांहीं माझे पोटीं शंका नाहीं ॥३॥
4149
संतांनीं सरता केलों तैसेपरी । चंदनीं ते बोरी व्यापियेली ॥१॥ गुण दोष याती न विचारितां कांहीं । ठाव दिला पायीं आपुलिया ॥२॥ तुका म्हणे आलें समर्थाच्या मना । तरि होय राणा रंक त्याचा ॥३॥
4150
संतांपायीं विन्मुख जाला । तो जरि संगति मागों आला ॥१॥ तरि त्याहुनि दुरी जावें । सुखें एकांतीं बैसावें ॥ध्रु.॥ आत्मचर्चा नाहीं जेथें । अगी लावुनि द्यावी तेथें ॥२॥ तुका म्हणे नाहीं । चित्ता समाधान कांहीं ॥३॥
4151
संतांसी क्षोभवी कोण्या ही प्रकारें । त्याचें नव्हें बरें उभयलोकीं ॥१॥ देवाचा तो वैरी शत्रु दावेदार । पृथ्वी ही थार नेदी तया ॥ध्रु.॥ संतांपाशीं ज्याचा नुरे चि विश्वास । त्याचे जाले दोष बळिवंत ॥२॥ तुका म्हणे क्षीर वासराच्या अंगें । किंवा धांवे लागें विषमें मारूं ॥३॥
4152
संतांसी तों नाहीं सन्मानाची चाड । परि पडे द्वाड अव्हेरितो ॥१॥ म्हणऊनि तया न वजावें ठाया । होतसे घात या दुर्बळाचा ॥ध्रु.॥ भावहीना आड येतसे आशंका । उचितासी चुका घालावया ॥२॥ तुका म्हणे जया संकोच दर्शनें । तया ठाया जाणें अनुचित ॥३॥
4153
संताचा अतिक्रम । देवपूजा तो अधर्म ॥१॥ येती दगड तैसे वरी । मंत्रपुष्पें देवा शिरीं ॥ध्रु.॥ अतीतासि गाळी । देवा नैवेद्यासी पोळी ॥२॥ तुका म्हणे देवा । ताडण भेदकांची सेवा ॥३॥
4154
संताचे उपदेश आमुचे मस्तकीं । नाहीं मृतेलोकीं राहाणेसा ॥१॥ म्हणऊनि बहु तळमळी चित्ती । येईवो धांवत पांडुरंगे ॥ध्रु.॥ उपजली चिंता लागला उसीर । होत नाहीं धीर निढळ वाटे ॥२॥ तुका म्हणे पोटीं रिघालेंसे भय । करूं आतां काय ऐसें जालें ॥३॥
4155
संतापाशीं बहु असावें मर्यादा । फलकटाचा धंदा उर फोडी ॥१॥ वासर तो भुंके गाढवाचेपरी । उडे पाठीवरि दंड तेणें ॥ध्रु.॥ समय नेणें तें वेडें चाहाटळ । अवगुणाचा ओंगळ मान पावे ॥२॥ तुका म्हणे काय वांयां चाळवणी । पिटपिटघाणी हागवणेची ॥३॥
4156
संतीं केला अंगीकार । त्यासी अभिमान थोर ॥१॥ कांहीं ठेविलें चरणीं । घेतीं तें चि पुरवूनि । तुका पायवणी । घेऊनियां निराळा ॥ध्रु.॥ नसतां कांहीं संचित । भेटी जाली अवचित ॥२॥ देव मिळोनियां भक्त । तुका केलासे सनाथ ॥३॥
4157
संतोषे माउली आरुषा वचनी । वोरसोनि स्तनीं लावी बाळा ॥१॥ तैसे परिमळाचें अवघें चि गोड । पुरवितो कोड पांडुरंग ॥ध्रु.॥ सेवा करी साहे निष्ठ‍ उत्तरें । त्याचें वाहे मनीं तेंच बरें ॥२॥ तुका म्हणे इच्छावसे खेळ खेळें । चिंता ते सकळ कांहीं नेणें ॥३॥
4158
संदेह निरसे तरि रुचिकर । फिक्यासी आदर चवी नाहीं ॥१॥ आतां नको मज खोट्यानें फटवूं । कोठें येऊं जाऊं वेळोवेळां ॥ध्रु.॥ गेला तरि काय जीवाचें सांकडें । वांचउनि पुढें काय काज ॥२॥ तुका म्हणे कसीं निवडा जी बरें । केलीं तैसीं पोरें आळीपायीं ॥३॥
4159
संदेह बाधक आपआपणयांतें । रज्जुसर्पवत भासतसे । भेऊनियां काय देखिलें येणें । मारें घायेंविण लोळतसे ॥१॥ आपणें चि तारी आपण चि मारी । आपण उद्धरी आपणयां । शुकनळिकेन्यायें गुंतलासी काय । विचारूनि पाहें मोकळिया ॥ध्रु॥ पापपुण्य कैसे भांजिले अख । दशकाचा एक उरविला । जाणोनियां काय होतोसी नेणता । शून्या ठाव रिता नाहीं नाहीं ॥२॥ दुरा दृष्टी पाहें न्याहाळूनि । मृगजला पाणी न म्हणें चाडा । धांवतां चि फुटे नव्हे समाधान । तुका म्हणे जाण पावे पीडा ॥३॥
4160
संध्या करितोसी केशवाच्या नांवें । आरंभीं तें ठावें नाहीं कैसें ॥१॥ किती या सांगावें करूनि फजित । खळ नेणे हित जवळीं तें ॥ध्रु.॥ माजल्या न कळे उचित तें काय । नेघावें तें खाय घ्यावें सांडी ॥२॥ तुका म्हणे घेती भिंती सवें डोकें । वावसी तें एकें अंधारलीं ॥३॥
4161
संध्या कर्म ध्यान जप तप अनुष्ठान । अवघें घडे नाम उच्चारितां । न वेचे मोल कांहीं लागती न सायास । तरी कां आळस करिसी झणी ॥१॥ ऐसें हे सार कां नेघेसी फुकाचें । काय तुझें वेचे मोल तया ॥ध्रु.॥ पुत्रस्नेहें शोक करी अजामेळ । तंव तो कृपाळ जवळी उभा । अनाथांच्या नाथें घातला विमानीं । नेला उचलूनि परलोका ॥२॥ अंतकाळीं गणिका पक्षियाच्या छंदें । राम राम उच्चारिलें । तंव त्या दिनानाथा कृपा आली । त्यानें तयेसी वैकुंठा नेलें ॥३॥ अवचिता नाम आलिया हे गती । चिंतितां चित्ती जवळी असे । तुका म्हणे भावें स्मरा राम राम । कोण जाणे तये दशे ॥४॥
4162
संपदा सोहळा नावडे मनाला । करी तें टकळा पंढरीचा ॥१॥ जावें पंढरिसी आवडी मनासी । कधीं एकादशी आषाढी हे ॥२॥ तुका म्हणे ऐसें आर्त ज्याचे मनीं । त्याची चक्रपाणी वाट पाहे ॥३॥
4163
संबाल यारा उपर तलें दोन्हो मारकी चोट । नजर करे सो ही राखे पश्वा जावे लुट ॥१॥ प्यार खुदाई रे बाबा जिकिर खुदाई ॥ध्रु.॥ उडे कुदे ढुंग नचावे आगल भुलन प्यार । लडबड खडबड कांहेकां खचलावत भार ॥२॥ कहे तुका चलो एका हम जिन्होंके सात । मिलावे तो उसे देना तो ही चढावे हात ॥३॥
4164
संयोग सकळां असे सर्वकाळ । दुश्चित्त गोपाळ आला दिसे ॥१॥ गोपाळ गुणाचा म्हणे गुणमय । निंबलोण माये उतरिलें ॥२॥ उतरूनि हातें धरि हनूवठी । ओवाळूनि दिठी सांडियेली ॥३॥ दिठी घाली माता विश्वाच्या जनका । भक्तिचिया सुखा गोडावला ॥४॥ लहान हा थोर जीवजंत भूतें । आपण दैवतें जाला देवी ॥५॥ देवी म्हैसासुर मुंजिया खेचर । लहान हि थोर देव हरि ॥६॥ हरि तुका म्हणे अवघा एकला । परि या धाकुला भक्तासाटीं ॥७॥
4165
संवसार तीहीं केला पाठमोरा । नाहीं द्रव्य दारा जया चित्तीं ॥१॥ शुभाशुभ नाहीं हर्षामर्ष अंगीं । जनार्दन जगीं होउनि ठेला ॥२॥ तुका म्हणे देहें दिला एकसरें । जयासि दुसरें नाहीं मग ॥३॥
4166
संवसारतापें तापलों मी देवा । करितां या सेवा कुटुंबाची ॥१॥ म्हणऊनी तुझे आठविले पाय । ये वो माझे माय पांडुरंगे ॥ध्रु.॥ बहुतां जन्मींचा जालों भारवाही । सुटिजे हें नाहीं वर्म ठावें ॥२॥ वेढियेलों चोरीं अंतर्बाह्यात्कारीं । कणव न करी कोणी माझी ॥३॥ बहु पांगविलों बहु नागविलों । बहु दिवस जालों कासाविस ॥४॥ तुका म्हणे आतां धांव घाली वेगीं । ब्रीद तुझें जगीं दीननाथा ॥५॥
4167
संवसारसांते आले हो आइका । तुटीचें ते नका केणें भरूं ॥१॥ लाभाचा हा काळ अवघे विचारा । पारखी ते करा साह्य येथें ॥ध्रु.॥ शृंगारिलें दिसे न कळें अंतर । गोविला पदर उगवेना ॥२॥ तुका म्हणे खोटें गुंपतां विसारें । हातिंचिया खरें हातीं घ्यावें ॥३॥
4168
संसार करिती मोठ्या महत्वानें । दिसे लोका उणें न कळे त्या ॥१॥ पवित्रपण आपुलें घरच्यासी च दिसे । बाहेर उदास निंदिताती ॥ध्रु.॥ आपणा कळेना आपले अवगुण । पुढिलाचे दोषगुण वाखाणिती ॥२॥ विषयाचे ध्यासें जग बांधियेलें । म्हणोनि लागले जन्ममृत्यु ॥३॥ तुका म्हणे माझें संचित चि असें । देवाजीचें पिसे सहजगुण ॥४॥
4169
संसार तो कोण देखे । आम्हां सखे हरिजन ॥१॥ काळ ब्रम्हानंदें सरे । आवडी उरे संचली ॥ध्रु.॥ स्वप्नीं ते ही नाहीं चिंता । रात्री जातां दिवस ॥२॥ तुका म्हणे ब्रम्हरसें । होय सरिसें भोजन ॥३॥
4170
संसारसंगें परमार्थ जोडे । ऐसें काय घडे जाणतेनो ॥१॥ हेंडग्याच्या आळां अवघीं चिपाडें । काय तेथें गोडें निवडावीं ॥ध्रु.॥ ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना । मूर्खत्व वचना येऊं पाहे ॥२॥ तुका म्हणे मद्य सांडवी लंगोटी । सांगितला सेटीं विचार त्या ॥३॥
4171
संसारसिंधु हा दुस्तर । नुलंघवे उलंघितां पार । बहुत वाहाविलें दूर । न लगे चि तीर पैल थडी ॥१॥ किती जन्म जाला फेरा । गणित नाहीं जी दातारा । पडिलों आवर्ति भोंवरा । बहुता थोरा वोळसिया ॥ध्रु.॥ वाढलों परी नेणती बुद्धी । नाहीं परतली धरिली शुद्धी । मग म्यां विचारावें कधीं । ऐसी संधी सांडुनिया ॥२॥ अनेक खाणीं आहार निद्रा । भयमैथुनाचा चि थारा । बाळत्व तारुण्य जरा । प्रधान पुरा भोग तेथें ॥३॥ ऐसीं उलंघूनि आलों स्थळें । बहु भोवंडिलों काळें । आतां हें उगवावें जाळें । उजेडा बळें दिवसाच्या ॥४॥ सांडीन या संसाराची वाट । बहु येणें भोगविले कष्ट । दावी सत्या ऐसें नष्ट । तुका म्हणे भ्रष्ट जालों देवद्रोही ॥५॥
4172
संसारसोहळे भोगितां सकळ । भक्तां त्याचें बळ विटोबाचें ॥१॥ भय चिंता धाक न मनिती मनीं । भक्तां चक्रपाणि सांभाळीत ॥ध्रु.॥ पापपुण्य त्यांचें धरूं न शके अंग । भक्तांसी श्रीरंग सर्वभावे ॥२॥ नव्हती ते मुक्त आवडे संसार । देव भक्तां भार सर्व वाहे ॥३॥ तुका म्हणे देव भक्तां वेळाईंत । भक्त ते निश्चिंत त्याचियानें ॥४॥
4173
संसारा आलिया एक सुख आहे । आठवावे पाय विठोबाचे ॥१॥ येणें होय सर्व संसार सुखाचा । न लगे दुःखाचा लेश कांहीं ॥ध्रु.॥ घेईल तयासी सोपें आहे सुख । बोलियेलें मुखें नारायण ॥२॥ सांगितली सोय करुणासागरें । तुम्हां कांहो बरें न वाटतें ॥३॥ तुका म्हणे तेणें उपकार केला । भोऑया भाविकाला तरावया ॥४॥
4174
संसाराचा माथां भार । कांहीं पर न ठेवीं ॥१॥ भक्तीची ते जाती ऐसी । सर्वस्वासी मुकावें ॥ध्रु.॥ भिक्षाणी वेवसाव । काला करितो गाढव ॥२॥ करुनि वस्ती बाजारीं । म्हणवी कासया निस्पृही ॥३॥ प्रसादा आडुनि कवी । केलें तुप पाणी तेवीं ॥४॥ तुका म्हणे होंई सुर । किंवा निसुर मजुर ॥५॥
4175
संसाराची कोण गोडी । दिली जोडी करूनि ॥१॥ निष्ठ‍ तूं बहु देवा । पुरे हेवा न म्हणवी ॥ध्रु.॥ पाहोनियां कर्म डोळां । निराळा तो वर्जीना ॥२॥ तुका म्हणे तुज माझें । म्हणतां ओझें फुकट ॥३॥
4176
संसाराचे अंगीं अवघीं च वेसनें । आम्ही या कीर्तनें शुद्ध जालों ॥१॥ आतां हें सोंवळें जालें त्रिभुवन । विषम धोऊन सांडियेलें ॥ध्रु.॥ ब्रम्हपुरीं वास करणें अखंड । न देखिजे तोंड विटाळाचें ॥२॥ तुका म्हणे आम्हां एकांताचा वास । ब्रम्हीं ब्रम्हरस सेवूं सदा ॥३॥
4177
संसाराचें धांवे वेठी । आवडी पोटीं केवढी ॥१॥ हागों जातां दगड सांची । अंतरीं ही संकल्प ॥ध्रु.॥ लाज तेवढी नारायणीं। वांकडी वाणी पोरांपें ॥२॥ तुका म्हणे बेशरमा । श्रमावरी पडिभरू ॥३॥
4178
संसाराच्या नांवें घालूनियां शून्य । वाढता हा पुण्य केला धर्म ॥१॥ हरिभजनें हें धवळिलें जग । चुकविला लाग कळिकाळाचा ॥ध्रु.॥ कोणां ही नलगे साधनांचा पांग । करणें केला त्याग देहबुद्धी ॥२॥ तुका म्हणे सुख समाधि हरिकथा । नेणें भववेथा गाईंल तो ॥३॥
4179
संसाराच्या भेणें । पळों न लाहेसें केलें ॥१॥ जेथें तेथें आपण आहे । आम्हीं करावें तें काये ॥ध्रु.॥ एकांतींसी ठाव । तिहीं लोकीं नाहीं वाव ॥२॥ गांवा जातों ऐसें । न लगे म्हणावें तें कैसें ॥३॥ स्वप्नाचे परी । जागा पाहे तंव घरीं ॥४॥ तुका म्हणे काये । तुझे घेतले म्यां आहे ॥५॥
4180
संसारापासूनि कैसें सोडविशी । न कळे हृषीकेशी काय जाणें । करितां न सरे अधिक वाट पाहीं । तृष्णा देशधडी केलों । भक्तिभजनभाव यांसी नाहीं ठाव । चरणीं तुझ्या अंतरलों । मागें पुढें रीग न पुरे चि पाहातां । अवघा अवघीं वेष्टिलों ॥१॥ आतां माझी लाज राखें नारायणा । हीन हीन लीन याचकाची । करितां न कळे कांहीं असतील गुण दोष । करीं होळी संचिताची ॥ध्रु.॥ इंद्रियें द्वारें मन धांवे सैरें । नांगवे करितां चि कांहीं । हात पाय कान मुख लिंगस्थान । नेत्र घ्राणद्वारें पाहीं । जया जैसी सोय तया तैसें होय। क्षण एक स्थिर नाहीं । करिती ताडातोडी ऐसी यांची खोडी । न चले माझें यास कांहीं ॥२॥ शरीरसंबंधु पुत्र पत्नी बंधु । धन लोभ मायावंत । जन लोकपाळ मैत्र हे सकळ । सोइरीं सज्जनें बहुतें । नाना कर्म डाय करिती उपाय । बुडावया घातपातें । तुका म्हणे हरी राखे भलत्या परी । आम्ही तुझीं शरणागतें ॥३॥
4181
संसारीं असतां हरिनाम घेसी । तरीं च उद्धरसी पूर्वजेंसी ॥१॥ अवघीं च इंद्रियें न येती कामा । जिव्हे रामनामा उच्चारीं वेगीं ॥ध्रु.॥ शरीरसंपित्त नव्हे रे आपुली । भ्रांतीची माउली अवघी व्यर्थ ॥२॥ तुका म्हणे सार हरिनामउच्चार । येर्‍हवी येरझार हरीविण ॥३॥
4182
संसारींचें ओझें वाहता वाहाविता । तुजविण अनंता नाहीं कोणी ॥१॥ गीतेमाजी शब्द दुंदुभीचा गाजे । योगक्षेमकाज करणें त्याचें ॥ध्रु.॥ चतुर्भुजा करीं वारू शृंगारावे । सारथ्य करावें अर्जुनाचें ॥२॥ श्वपच अंत्यज भक्तिस्नेहें जाला । अचळपदीं केला ध्रुव तुका ॥३॥
4183
सकलगुणें संपन्न । एक देवाचें लक्षण ॥१॥ वरकड कोठें कांहीं । एक आहे एक नाहीं ॥ध्रु.॥ षड्गुण ऐश्वर्य संपन्न । एक भगवंतीं जाण ॥२॥ तुका म्हणे जेंजें बोला । तेंतें साजे या विठ्ठला ॥३॥
4184
सकळ चिंतामणी शरीर । जरी जाय अहंकार आशा समूळ ॥ निंदा हिंसा नाहीं कपट देहबुद्धि । निर्मळ स्फटिक जैसा ॥१॥ मोक्षाचें तीर्थ न लगे वाराणसी । येती तयापासीं अवघीं जनें॥ तीर्थांसी तीर्थ जाला तो चि एक । मोक्ष तेणें दर्शनें ॥ध्रु.॥ मन शुद्ध तया काय करिसी माळा । मंडित सकळा भूषणांसी ॥ हरिच्या गुणें गर्जताती सदा । आनंद तया मानसीं ॥२॥ तन मन धन दिलें पुरुषोत्तमा । आशा नाहीं कवणाची ॥ तुका म्हणे तो परिसाहूनि आगळा । काय महिमा वर्णूं त्याची ॥३॥
4185
सकळ तुझे पायीं मानिला विश्वास । न करीं उदास आतां मज ॥१॥ जीवीं गातां गोड आइकतां कानीं । पाहातां लोचनीं मूर्ती तुझी ॥ध्रु.॥ मन स्थिर माझें जालेंसे निश्चळि । वारिलीं सकळ आशापाश ॥२॥ जन्मजराव्याधि निवारिलें दुःख । वोसंडलें सुख प्रेम धरी ॥३॥ तुका म्हणे मज जाला हा निर्धार । आतां वांयां फार काय बोलों ॥४॥
4186
सकळ देवांचें दैवत । उभें असे रंगा आंत ॥१॥ रंगा लुटा माझे बाप । शुद्ध भाव खरें माप ॥ध्रु.॥ रंग लुटिला बहुतीं । शुक नारदादि संतीं ॥२॥ तुका लुटितां हे रंग । साह्य जाला पांडुरंग ॥३॥
4187
सकळ धर्म मज विठोबाचें नाम । आणीक त्यां वर्म नेणें कांहीं ॥१॥ काय जाणों संतां निरविलें देवें । करिती या भावें कृपा मज ॥२॥ तुका म्हणे माझा कोण अधिकार । तो मज विचार कळों यावा ॥३॥
4188
सकळ पूजा स्तुति । करावी ते व्होवें याती ॥१॥ म्हणऊनि वारा जन । संतपूजा नारायण ॥ध्रु.॥ सेवावें तें वरी । दावी उमटूनि ढेंकरीं ॥२॥ तुका म्हणे सुरा । दुधा म्हणतां केवीं बरा॥३॥
4189
सकळ सत्ताधारी । व्हावें ऐसें काय हरी ॥१॥ परि या कृपेच्या वोरसें । कुढावयाचें चि पिसें ॥ध्रु.॥ अंगें सर्वोत्तम । अवघा चि पूर्णकाम ॥२॥ तुका म्हणे दाता । तरि हा जीव दान देता ॥३॥
4190
सकळ ही माझी बोळवण करा । परतोनि घरा जावें तुम्हीं ॥१॥ कर्मधर्में तुम्हां असावें कल्याण । घ्या माझें वचन आशीर्वाद ॥ध्रु.॥ वाढवूनि दिलों एकाचिये हातीं । सकळ निश्चिंती जाली तेथें ॥२॥ आतां मज जाणें प्राणेश्वरासवें । माझिया भावें अनुसरलों ॥३॥ वाढवितां लोभ होईंल उसीर । अवघींच स्थिर करा ठायीं ॥४॥ धर्म अर्थ काम जाला एके ठायीं । मेळविला जिंहीं हाता हात ॥५॥ तुका म्हणे आतां जाली हे चि भेटी । उरल्या त्या गोष्टी बोलावया ॥६॥
4191
सकळ हे माया नागवे कवणा । भांबाविलें जना दाही दिशा ॥१॥ आशा तृष्णा दंभ लागलीं हीं पाठी । नेदी बैसों हाटीं मोह ठायीं ॥ध्रु.॥ काम क्रोध घरा लावितील आगी । निंदा हिंसा दोघी पळतां खाती ॥२॥ लाज पुढें उभी राहिली आडवी । ते करी गाढवी थोर घात ॥३॥ तुका म्हणे चिंता घाली गर्भवासीं । ओढोनियां पाशीं चहूंकडे ॥४॥
4192
सकळतीर्थांहूनि । पंढरीनाथ मुगुटमणी ॥१॥ धन्यधन्य पंढरी । जे मोक्षाची अक्षय पुरी ॥ध्रु.॥ विश्रांतीचा ठाव । तो हा माझा पंढरीराव ॥२॥ तुका म्हणे सांगतों स्पष्ट । दुजी पंढरी वैकुंठ ॥३॥
4193
सकळतीर्थाहुनि । पंढरी हें मुगुटमणि ॥१॥ काय सांगों तेथिल शोभा । रमावल्लभ जेथें उभा ॥ध्रु.॥ न लभे व्रततीर्थदानीं । तें या विठ्ठलदर्शनीं ॥२॥ साधु संत गाती नाम । सकळ भूतांचा विश्राम ॥३॥ तुका म्हणे स्तुती । करूं काय सांगों किती ॥४॥
4194
सकळिकांचें समाधान । नव्हे देखिल्यावांचून ॥१॥ रूप दाखवीं रे आतां । सहजरभुजांच्या मंडिता ॥ध्रु.॥ शंखचक्रपद्मगदा । गरुडासहित ये गोविंदा ॥२॥ तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ॥३॥
4195
सकळिकांच्या पायां माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥ अहो श्रोते वक्ते सकळ ही जन । बरें पारखुन बांधा गांठी ॥ध्रु.॥ फोडिलें भांडार धन्याचा हा माल । मी तंव हामाल भारवाही ॥२॥ तुका म्हणे चाली जाली चहूं देशी । उतरला कसीं खरा माल ॥३॥
4196
सकुमार मुखकमळ निजसारनिर्मळ । सावळी सुनीळ तनु भ्रमरांग कुरळ । झळकति दिव्य तेजें दंत माज पातळ । मिरवलिं मयोरपत्रें मुगुट कुंडलें माळ ॥१॥ जय देवा जगदीश्वरा । धन्य रखुमाईंवरा । आरती करीन काया । ओंवाळिन सुंदरा । जय. ॥ध्रु.॥ गोजिरें ठाणमाण भुजा मंडित चारी । शोभति शंखचक्रगदापद्म मोहरी । हृदयीं ब्रम्हपद बाणलें शृंगारीं । गर्जति चरणीं वांकी कंठ कोकळिास्वरीं ॥२॥ घवघवित उटी अंगीं बावन चंदनांची । लल्हाट कस्तुरिचा कास पितांबरीची । कटिसूत्र वरि साजिरें प्रभा वर मोतियांची । संगीत सकळ मुद्रा पाउलें कुंकुमाचीं ॥३॥ सौभाग्यसुख सागर गुणलावण्यखाणी । लाघवी दीनवत्सळ विश्व लाविलें ध्यानीं । आश्चर्य देव करिती ॠषि राहिले मुनि । धन्य ते प्रसवली ऐसिया नंदपत्नी ॥४॥ वर्णितां ध्यान महिमा श्रुति राहिल्या नेति । रविकोटि चंद्र तारा प्रकाशा न तुळती । उदार सुर गंभीर पूर्ण आनंदमूर्ति । तुकयाबंधु म्हणे स्तवूं मी काय किती ॥५॥
4197
सख्यत्वासी गेलों करीत सलगी । नेणें चि अभागी महिमा तुझा ॥१॥ पावलों आपुलें केलें लाहें रास । निर्दैवां परिस काय होय ॥ध्रु.॥ कष्टविलासी म्यां चांडाळें संसारीं । अद्यापिवरि तरि उपदेशीं ॥२॥ उचित अनुचित सांभाळिलें नाहीं । कान्हा म्हणे कांहीं बोलों आतां ॥३॥
4198
सज्जन तो शब्द सत्य जो मानी । छळी दुर्जन आणिकांसी ॥१॥ एक गुण तो केला दोंठायीं । ज्याचा त्यास पाहीं जैसा तैसा ॥ध्रु.॥ भाविक शब्द बोले वाणीचा । लटिका वाचा वाचाळ तो ॥२॥ परउपकार घडे तो भला । नाठ्याळ तया दया नाहीं ॥३॥ जाणीवंत तो पायरी जाणे । अधम तो नेणे खुंट जैसा ॥४॥ हित तें अनहित केलें कैसें । तुका म्हणे पिसें लागलें यास ॥५॥
4199
सतीचें तें घेतां वाण । बहु कठीण परिणामीं ॥१॥ जिवासाटीं गौरव वाढे । आहाच जोडे तें नव्हे ॥ध्रु.॥ जरि होय उघडी दृष्टि । तरि गोष्टी युद्धाच्या ॥२॥ तुका म्हणे अंगा येतां । तरी सत्ता धैर्याची ॥३॥
4200
सत्ताबळें येतो मागतां विभाग । लावावया लाग निमित्य करूं ॥१॥ तुझीं ऐसीं मुखें करूं उच्चारण । बोलें नारायण सांपडवूं ॥ध्रु.॥ आसेविण नाहीं उपजत मोहो । तरि च हा गोहो न पडे फंदीं ॥२॥ तुका म्हणे आतां व्हावें याजऐसें । सरिसें सरिसें समागमें ॥३॥
4201
सत्तावर्त्ते मन । पाळी विठ्ठलाची आन ॥१॥ आज्ञा वाहोनियां शिरीं । सांगितलें तें चि करीं ॥ध्रु.॥ सरलीसे धांव । न लगे वाढवावी हांव ॥२॥ आहे नाहीं त्याचें । तुका म्हणे कळे साचें ॥३॥
4202
सत्तेचें भोजन समयीं आतुडे । सेवन ही घडे रुचिनेसी ॥१॥ वर्में श्रम नेला जालें एकमय । हृदयस्थीं सोय संग जाला ॥ध्रु.॥ कोथळीस जमा पडिलें संचित । मापल्याचा वित्त नेम जाला ॥२॥ तुका म्हणे धणी ऐसा जालों आतां । करीन ते सत्ता माझी आहे ॥३॥
4203
सत्य आठवितां देव । जातो भेंव पळोनि ॥१॥ न लगे कांहीं करणे चिंता । धरी सत्ता सर्व तो ॥ध्रु.॥ भावें भाव राहे पायीं । देव तैं संनिध ॥२॥ तुका म्हणे कृष्णनामें । शीतळ प्रेम सर्वांसी ॥३॥
4204
सत्य आम्हां मनीं । नव्हों गाबाळाचे धनी ॥१॥ ऐसें जाणा रे सकळ । भरा शुद्ध टांका मळ ॥ध्रु.॥ देतों तीक्ष्ण उत्तरें । पुढें व्हावयासी बरें ॥२॥ तुका म्हणे बरें घडे । देशोदेशीं चाले कोडें ॥३॥
4205
सत्य तूं सत्य तूं सत्य तूं विठ्ठला । कां गा हा दाविला जगदाकार ॥१॥ सांभाळीं आपुली हाक देतो माया । आम्हांसी कां भयाभीत केलें ॥ध्रु.॥ रूप नाहीं त्यासी ठेवियेलें नाम । लटका चि श्रम वाढविला ॥२॥ तुका म्हणे कां गा जालासी चतुर । होतासी निसुर निर्विकार ॥३॥
4206
सत्य तो आवडे । विकल्पानें भाव उडे ॥१॥ आम्ही तुमच्या कृपादानें । जाणों शुद्ध मंद सोनें ॥ध्रु.॥ आला भोग अंगा । न लवूं उसीर त्या त्यागा ॥२॥ तुका म्हणे देवा । अंजन ते तुझी सेवा ॥३॥
4207
सत्य त्यागा चि समान । नलगे वेचावें वचन ॥१॥ नारायणा ऐसे दास । येरयेरांची च आस ॥ध्रु.॥ मळ नाहीं चित्ता । तेथें देवाची च सत्ता ॥२॥ तुका म्हणे जाण । तें च भल्याचें वचन ॥३॥
4208
सत्य सत्यें देतें फळ । नाहीं लागत चि बळ ॥१॥ ध्यावे देवाचे ते पाय । धीर सकळ उपाय ॥ध्रु.॥ करावी च चिंता । नाहीं लागती तत्वता ॥२॥ तुका म्हणे भावें । शरण म्हणवितां बरवें ॥३॥
4209
सत्य साच खरें । नाम विठोबाचें बरें ॥१॥ जेणें तुटती बंधनें । उभयलोकीं कीर्ति जेणें ॥ध्रु.॥ भाव ज्याचे गांठी । त्यासी लाभ उठाउठी ॥२॥ तुका म्हणे भोळा । जिंकुं जाणे कळिकाळा ॥३॥
4210
सत्यत्वेंशीं घेणें भक्तीचा अनुभव । स्वामीचा गौरव इच्छीतसें ॥१॥ मग तें अवीट न भंगे साचारें । पावलें विस्तारें फिरों नेणे ॥ध्रु.॥ वाणी वदे त्याचा कोणांसी विश्वास । अभयें करें दास सत्य तई ॥२॥ तुका म्हणे आधीं न करीं तांतडी । पायीं जाली जोडी तेणें शुद्ध ॥३॥
4211
सत्यसंकल्पाचा दाता नारायण । सर्व करी पूर्ण मनोरथ ॥१॥ येथें अळंकार शोभती सकळ । भावबळें फळ इच्छेचेंतें ॥ध्रु.॥ अंतरींचें बीज जाणे कळवळा । व्यापक सकळां ब्रम्हांडाचा ॥२॥ तुका म्हणे नाहीं चालत तांतडी । प्राप्तकाळघडी आल्याविण ॥३॥
4212
सत्या माप वाढे । गबाळाची चाली खोडे ॥१॥ उतरे तें कळें कसी । विखरोणें सर्वदेशीं ॥ध्रु.॥ घरामध्ये राजा । नव्हे हो वा पाटपूजा ॥२॥ तुका म्हणे साचें । रूप तें दर्पणाचें ॥३॥
4213
सदा तळमळ । चित्ताचिये हळहळ ॥१॥ त्याचें दर्शन न व्हावें । शव असतां तो जिवे ॥ध्रु.॥ कुशब्दाची घाणी । अमंगळविली वाणी ॥२॥ नेणे शब्द पर । तुका म्हणे परउपकार ॥३॥
4214
सदा नामघोष करूं हरिकथा । तेणें सदा चित्ति समाधान ॥१॥ सर्वसुख ल्यालों सर्व अलंकार । आनंदें निर्भर डुलतसों ॥ध्रु.॥ असों ऐसा कोठें आठव ही नाहीं । देहीं च विदेही भोगूं दशा ॥२॥ तुका म्हणे आम्ही जालों अग्निरूप । लागों नेदूं पापपुण्य आतां ॥३॥
4215
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥ गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥ विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥२॥ तुका म्हणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥
4216
सदा सर्वकाळ अंतरीं कुटिल । तेणें गळां माळ घालूं नये ॥१॥ ज्यासी नाहीं दया क्षमा शांति । तेणें अंगीं विभूती लावूं नये ॥ध्रु.॥ जयासी न कळे भक्तीचें महिमान । तेणें ब्रम्हज्ञान बोलों नये ॥२॥ ज्याचें मन नाहीं लागलें हातासी । तेणें प्रपंचासी टाकुं नये ॥३॥ तुका म्हणे ज्यासी नाहीं हरिभक्ति । तेणें भगवें हातीं धरूं नये ॥४॥
4217
सदैव तुम्हां अवघें आहे । हातपाय चालाया ॥१॥ मुखीं वाणी कानीं कीर्ति । डोळे मूर्ती देखाया ॥ध्रु.॥ अंध बहिर ठकलीं किती । मुकीं होती पांगुळें ॥२॥ घरास आगि लावुनि जागा । न पळे तो गा वांचे ना ॥३॥ तुका म्हणे जागा हिता । कांहीं आतां आपुल्या ॥४॥
4218
सदैव हे वारकरी । जे पंढरी देखती । पदोपदीं विठ्ठल वाचे । त्यांसी कैचा संसार ॥१॥ दोष पळाले दोष पळाले । पैल आले हरिदास ॥ध्रु.॥ प्रेमभातें भरलें अंगीं । निर्लज्ज रंगीं नाचती । गोपीचंदनाची उटी । तुळसी कंठीं मिरवती ॥२॥ तुका म्हणे देव चित्तीं । मोक्ष हातीं रोकडा । दुर्बळा या शक्तिहीना । त्या ही जना पुरता ॥३॥
4219
सद्गदित कंठ दाटो । येणें फुटो हृदय ॥१॥ चिंतनाचा एक लाहो । तुमच्या अहो विठ्ठला ॥ध्रु.॥ नेत्रीं जळ वाहो सदां । आनंदाचे रोमांच ॥२॥ तुका म्हणे कृपादान । इच्छी मन हे जोडी ॥३॥
4220
सद्ग‍ुरायें कृपा मज केली । परी नाहीं घडली सेवा कांहीं ॥१॥ सांपडविलें वाटे जातां गंगास्नाना । मस्तकीं तो जाणा ठेविला कर ॥ध्रु.॥ भोजना मागती तूप पावशेर । पडिला विसर स्वप्नामाजी ॥२॥ कांहीं कळहे उपजला अंतराय । म्हणोनियां काय त्वरा जाली ॥३॥ राघवचैतन्य कैशवचैतन्य । सांगितली खुण मळिकेची ॥४॥ बाबाजी आपलें सांगितलें नाम । मंत्र दिला राम कृष्ण हरि ॥५॥ माघाशुद्ध दशमी पाहुनि गुरुवार । केला अंगीकार तुका म्हणे ॥६॥
4221
सद्ग‍ूचे चरणीं ठेविला मस्तक । देउनियां हस्तक उठविलें ॥१॥ उठविलें मज देऊनियां प्रेम । भावाथॉ सप्रेमे नमस्कारीं ॥२॥ नमस्कारीं त्याला सद्ग‍ुरायाला । तुका म्हणे बोला नाम वाचें ॥३॥
4222
सद्ग‍ूने मज आशीर्वाद दिला । हरुष भरला हृदयीं माझे ॥१॥ हृदयींचा भाव कळला गुरूसी । आनंदउल्हासीं बोले मज ॥२॥ बोले मज गुरू कृपा तो करूनि । तुका म्हणे मनीं आनंदलों ॥३॥
4223
सद्ग‍ूवांचूनि प्रेतरूप वाणी । बोलती पुराणीं व्यासॠषि ॥१॥ म्हणोनि तयाचें पाहूं नये तोंड । निगुरा अखंड सुतकाळा ॥ध्रु.॥ कोणे परी तया नव्हे चि सुटका । देह त्याचा लटिका जाणा तुम्ही ॥२॥ तुका म्हणे ऐसीं बोलती पुराणें । संतांचीं वचनें मागिलां हो ॥३॥
4224
सन्मुख चि तुम्हीं सांगावी जी सेवा । ऐसे माझे देवा मनोरथ ॥१॥ निघों आम्ही कांहीं चित्तवित्त घरें । आपुल्या उदारें जीवावरी ॥ध्रु.॥ बोल परस्परें वाढवावें सुख । पाहावें श्रीमुख डोळेभरी ॥२॥ तुका म्हणे सत्य बोलतों वचन । करुनी चरण साक्ष तुझे ॥३॥
4225
सब संबाल भ्याने लौंढे खडा केऊं गुंग । मदिरथी मता हुवा भुलि पाडी भंग ॥१॥ आपसकुं संबाल आपसकुं संबाल । मुंढे खुब राख ताल । मुथिवोहि बोला नहीं तो करूँगा हाल ॥ध्रु.॥ आवलका तो पीछें नहीं मुदल बिसर जाय । फिरते नहीं लाज रंडी गधे गोते खाय ॥२॥ जिन्हो खातिर इतना होता सो नहीं तुझे बेफाम । उचा जोरो लिया तुंबा तुंबा बुरा काम ॥३॥ निकल जावे चिकल जोरो मुंढे दिलदारी । जबानीकी छोड दे बात फिर एक तारी ॥४॥ कहे तुका फिसल रुका मेरेको दान देख । पकड धका गांडगुडघी मार चलाऊं आलेख ॥५॥
4226
सम सपाट वेसनकाट निःसंग जालें सौरी । कुडपीयेला देश आतां येऊं नेदीं दुसरी ॥१॥ गाऊं रघुरामा हें चि उरलें आम्हां । नाहीं जीवतमा वित्तगोतासहीत ॥ध्रु.॥ ठाव जाला रिता झाकुनि काय आतां । कोणासवें लाज कोण दुजा पाहता ॥२॥ सौरीयांचा संग आम्हां दुरावलें जग । भिन्न जालें सुख भाव पालटला रंग ॥३॥ लाज भय झणी नाहीं तजियेलीं दोन्ही । फिराविला वेष नव्हों कोणाचीं च कोणी ॥४॥ तुका म्हणे हा आम्हां वेष दिला जेणें । जनाप्रचित सवें असों एकपणें ॥५॥
4227
समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥१॥ आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ध्रु.॥ ब्रम्हादिक पदें दुःखाची शिराणी । तेथें दुश्चित झणी जडों देसी ॥२॥ तुका म्हणे त्याचें कळलें आम्हां वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत ॥३॥
4228
समरंगणा आला । रामें रावण देखिला ॥१॥ कैसे भीडतील दोन्ही । नांव सारुनियां रणीं ॥ध्रु.॥ प्रेमसुखाचें संधान । बाणें निवारिती बाण ॥२॥ तुकयास्वामी रघुनाथ । वर्म जाणोनि केली मात ॥३॥
4229
समर्थ या नांवें दिनांचा कृपाळ । हें तंव सकळ स्वामीअंगीं ॥१॥ मज काय लागे करणें विनवणी । विदित चरणीं सकळ आहे ॥ध्रु.॥ दयासिंधु तुम्हां भांडवल दया । सिंचावें आतां या कृपापीयूषें ॥२॥ तुका म्हणे अवो पंढरिनिवासे । बहु जीव आसे लागलासे ॥३॥
4230
समर्थपणें हे करा संपादणी । नसतें चि मनीं धरिल्याची ॥१॥ दुसर्‍याचें येथें नाहीं चालों येत । तरि मी निवांत पाय पाहें ॥ध्रु.॥ खोटियाचें खरें खरियाचें खोटें । मानलें गोमटें तुम्हांसी तें ॥२॥ तुका म्हणे तुम्हां सवें करितां वाद । होईंजेतें निंद जनीं देवा ॥३॥
4231
समर्थाचा ठाव संचलाचि असे । दुर्बळाची आस पुढें करी ॥१॥ पावलें घेईंन पदरीं हें दान । एकांतीं भोजन करूं दाऊं ॥ध्रु.॥ न लगे पाहावी उचिताची वेळ । अयाचित काळ साधला तो ॥२॥ तुका म्हणे पोट धालिया उपरी । गौरवा उत्तरीं पूजूं देवा ॥३॥
4232
समर्थाची धरिली कास । आतां नाश काशाचा ॥१॥ धांव पावें करीन लाहो । तुमच्या आहो विठ्ठला ॥ध्रु.॥ न लगे मज पाहाणें दिशा । हाकेसरिसा ओढसी ॥२॥ तुका म्हणे नव्हे धीर । तुम्हां स्थिर दयेनें ॥३॥
4233
समर्थाचे पोटीं । आम्ही जन्मलों करंटीं ॥१॥ ऐसी जाली जगीं कीर्ति । तुझ्या नामाची फजिती ॥ध्रु.॥ येथें नाहीं खाया । न ये कोणी मूळ न्याया ॥२॥ तुका म्हणे जिणें । आतां खोटें जीवपणें ॥३॥
4234
समर्थाचे सेवे कोठें नाहीं घात । पाहों नये अंत पांडुरंगा ॥१॥ आहे तैसी नीत विचारावी बरी । येऊनी भीतरी वास करा ॥ध्रु.॥ निढळ राखिलें तरी भयाभीत । हर्षामर्ष चित्त पावतसे ॥२॥ तुका म्हणे तरी कळेल निवाड । दर्शनाची चाड शुभकीर्ति ॥३॥
4235
समर्थाचे सेवे बहु असे हित । विचार हृदयांत करुनी पाहें ॥१॥ वरकडोऐसा नव्हे हा समर्थ । क्षणें चि घडित सृष्टी नाशें ॥ध्रु.॥ ज्याची कृपा होतां आपणा ऐसें करी । उरों नेदी उरी दारिद्राची ॥२॥ ऐशालागीं मन वोळगे अहर्निशीं । तेणें वंद्य होशी ब्रम्हांदिकां ॥३॥ तुका म्हणे हें चि आहे पैं मुद्दल । सत्य माझा बोल हा चि माना ॥४॥
4236
समर्थाचें केलें । कोणां जाईंल मोडिलें ॥१॥ वांयां करावी ते उरे । खटपटें सोस पुरे ॥ध्रु.॥ ठेविला जो ठेवा । आपुलाला तैसा खावा ॥२॥ ज्याचें त्याचें हातीं । भुके तयाची फजिती ॥३॥ तुका म्हणे कोटी । बाळे जाले शूळ पोटी ॥४॥
4237
समर्थाचें बाळ कीविलवाणें दिसे । तरी कोणा हांसे जन देवा ॥१॥ अवगुणी जरी जालें तें वोंगळ । करावा सांभाळ लागे त्याचा ॥२॥ तुका म्हणे तैसा मी एक पतित । परि मुद्रांकित जालों तुझा ॥३॥
4238
समर्थाचें बाळ पांघरे वाकळ । हसती सकळ लोक कोणा ॥१॥ समर्थासी लाज आपुल्या नांवाची । शरण आल्याची लागे चिंता ॥२॥ जरी तुज कांहीं होईंल उचित । तरी हा पतित तारीं तुका ॥३॥
4239
समर्थासी नाहीं वर्णावर्णभेद । सामग्री ते सर्व सद्धि घरीं ॥१॥ आदराचे ठायीं बहु च आदर । मागितलें फार तेथें वाढी ॥ध्रु.॥ न म्हणे सोइरा सुहुर्द आवश्यक । राजा आणि रंक सारिखा चि ॥३॥ भाव देखे तेथें करी लडबड । जडा राखे जड निराळें चि ॥३॥ कोणी न विसंभे याचकाचा ठाव । विनवुनी देव शंका फेडी ॥४॥ तुका म्हणे पोट भरुनी उरवी । धालें ऐसें दावी अनुभवें ॥५॥
4240
समर्थासी लाज आपुल्या नामाची । शरण आल्याची लागे चिंता ॥१॥ न पाहे तयाचे गुण दोष अन्याय । सुख देउनि साहे दुःख त्याचें ॥ध्रु.॥ मान भलेपण नाहीं फुकासाटीं । जयावरि गांठी झीज साहे ॥२॥ तुका म्हणे हें तूं सर्व जाणसी । मज अधिरासी धीर नाहीं ॥३॥
4241
समर्पक वाणी । नाहीं ऐकिजेसी कानीं ॥१॥ आतां भावें करूनि साचा । पायां पडिलों विठोबाच्या ॥ध्रु.॥ न कळे उचित । करूं समाधान चित्ती ॥२॥ तुका म्हणे विनंती । विनविली धरा चित्ती ॥३॥
4242
समर्पिली वाणी । पांडुरंगीं घेते धणी ॥१॥ पूजा होते मुक्ताफळीं । रस ओविया मंगळीं ॥ध्रु.॥ धार अखंडित । ओघ चालियेला नित ॥२॥ पूर्णाहुति जीवें । तुका घेऊनि ठेला भावें ॥३॥
4243
समश्रुळित असतां वाचा । घोष न करिसी कां नामाचा ॥१॥ कां रे वैष्णव नव्हेसी । कवण्या दंभें नागवलासी ॥ध्रु.॥ हरि हरि म्हणतां लाजसी । गर्वें फुगोनि चालसी ॥२॥ तारुण्यें उताणा । पुंसेंविण बांडा सुना ॥३॥ जालेंसि महिमेचे वेडें । नाचों लाजसी दिंडीपुढें ॥४॥ अळंकारांच्यानि बळें । वंचलासी तुळसीमाळें ॥५॥ कैसा सकुमार जालासी । म्हणसी न टकें एकादशी ॥६॥ स्नान न करिसी आंघोळी । विभुती न लाविसी कपाळीं ॥७॥ वरिवरि न्याहाळिसी त्वचा । उपेग नाहीं मांसाचा ॥८॥ पद्मनाभी विश्वनाथ । तुका अझून रडत ॥९॥
4244
समागमें असे हरि नेणतियां । नेदी जाऊं वांयां अंकितांसि ॥१॥ अंकितां सावध केलें नारायणें । गोपाळ गोधनें सकळिकां ॥२॥ सकळही जन आले गोकुळासि । आनंद मानसीं सकळांच्या ॥३॥ सकळांचा केला अंगीकार देवें । न कळतां भावें वांचवी त्यां ॥४॥ त्यां जाला निर्धार हरि आम्हांपासीं । निवांत मानसीं निर्भर तीं ॥५॥ निर्भर हे जन गोकुळींचे लोक । केले सकळिक नारायणें ॥६॥ नारायण भय येऊं नेदी गांवा । तुका म्हणे नांवा अनुसरे त्या ॥७॥
4245
समाधान त्यांचीं इंद्रियें सकळ । जयां तो गोपाळ समागमें ॥१॥ गोविंदाचा जाला प्रकाश भीतरी । मग त्यां बाहेरी काय काज ॥२॥ काज काम त्यांचें सरले व्यापार । नाहीं आप पर माझें तुझें ॥३॥ माया सकळांची सकळां ही वरी । विषय तें हरि दिसों नेदी ॥४॥ दिसे तया आप परावें सारिखें । तुका म्हणे सुखें कृष्णाचिया ॥५॥
4246
समुद्र हा पिता बंधु हा चंद्रमा । भगिनी ते रमा शंखाची या ॥१॥ मेहुणा जयाचा द्वारकेचा हरि । शंख दारोदारीं भीक मागे ॥२॥ दुष्ट हें जाणावें आपुलें स्वहित । तुका म्हणे मात ऐसी आहे ॥३॥
4247
समुद्रवळयांकित पृथ्वीचें दान । करितां समान न ये नामा ॥१॥ म्हणऊनि कोणीं न करावा आळस । म्हणा रात्रीदिवस रामराम ॥ध्रु.॥ सकळ ही शास्त्रें पठण करतां वेद । सरी नये गोविंदनाम एकें ॥२॥ सकळ ही तीर्थी प्रयाग काशी । करितां नामाशीं तुळेति ना ॥३॥ कर्वतीं कर्मरीं देहासी दंडण । करितां समान नये नामा ॥४॥ तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार । नाम हें चि सार विठोबाचें ॥५॥
4248
सरतें माझें तुझें । तरि हें उतरतें ओझें ॥१॥ न लगे सांडावें मांडावें । आहे शुद्ध चि स्वभावें ॥ध्रु.॥ घातला तो आशा । मोहोजाळें गळां फासा ॥२॥ सुखदुःखाचा तो मान । नाहीं दुःखाचा तो शीण ॥३॥ करितां नारायण । एवढें वेचितां वचन ॥४॥ लाभ हानि हे समान । तैसा मान अपमान ॥५॥ तुका म्हणे याचें । नांव सोंवळें साचें ॥६॥
4249
सरलियाचा सोस मनीं । लाजोनियां राहिलों ॥१॥ आवडीनें बोलावितों । येथें तें तों लपावें ॥ध्रु.॥ माझें तें चि मज द्यावें । होतें भावें जोडिलें ॥२॥ तुका म्हणे विश्वंभरा । आळीकरा बुझावा ॥३॥
4250
सरलें आतां नाहीं । न म्हणे वेळकाळ कांहीं ॥१॥ विठ्ठल कृपाळु माउली । सदा प्रेमें पान्हायेली ॥ध्रु.॥ सीण न विचारी भाग । नव्हे निष्ठ‍ नाहीं राग ॥२॥ भेदाभेद नाहीं । तुका म्हणे तिच्याठायीं ॥३॥
4251
सरळीं हीं नामें उच्चारावीं सदा । हरि बा गोविंदा रामकृष्णा ॥१॥ पुण्य पर्वकाळ तीर्थे ही सकळ । कथा सिंधुजळ न्हाऊं येती ॥ध्रु.॥ अवघे चि लाभ बैसलिया घरा । येती भाव धरा एके ठायीं ॥२॥ सेळ्या मेंढ्या गाई सेवा घेती म्हैसी । कामधेनु तैसी नव्हे एक ॥३॥ तुका म्हणे सुखें पाविजे अनंता । हें वर्म जाणतां सुलभ चि ॥४॥
4252
सरे आम्हांपाशीं एक शुद्धभाव । नाहीं तरी वाव उपचार ॥१॥ कोण मानी वरी रसाळ बोलणें । नाहीं जाली मनें ओळखी तों ॥२॥ तुका म्हणे आम्हां जाणीवेचें दुःख । न पाहों त्या मुख दुर्जनाचें ॥३॥
4253
सरे ऐसें ज्याचें दान । त्याचे कोण उपकार ॥१॥ नको वाढूं ऐसें काचें । दे वो साच विठ्ठला ॥ध्रु.॥ रडत मागें सांडी पोर । ते काय थोर माउली ॥२॥ तुका म्हणे कीर्ति वाढे । धर्म गाढे ते ऐसे ॥३॥
4254
सर्प भुलोन गुंतला नादा । गारुडियें फांदां घातलासे। हिंडवुनि पोट भरी दारोदारीं । कोंडुनि पेटारी असेरया ॥१॥ तैसी परी मज जाली पांडुरंगा । गुंतलों तो मी गा सोडीं आतां । माझें मज कांहीं न चलेसें जालें । कृपा तुज न करितां ॥ध्रु.॥ आविसें मिनु लावियला गळीं । भक्ष तो गिळी म्हणउनियां । काढूनि बाहेरी प्राण घेऊं पाहे । तेथे बापुमाये कवण रया ॥२॥ पक्षी पिलयां पातलें आशा । देखोनियां फांसा गुंते बळें । मरण नेणें माया धांवोनि वोसरे । जीवित्व ना जालीं बाळें ॥३॥ गोडपणें मासी गुंतली लिगाडीं । सांपडे फडफडी अधिकाअधिक । तुका म्हणे प्राण घेतला आशा । पंढरीनिवासा धाव घालीं ॥४॥
4255
सर्प विंचू दिसे । धन अभाग्या कोळसे ॥१॥ आला डोळ्यांसि कवळ । तेणें मळलें उजळ ॥ध्रु.॥ अंगाचे भोंवडी । भोय झाड फिरती धोंडी ॥२॥ तुका म्हणे नाड । पाप ठाके हिता आड ॥३॥
4256
सर्व काळ डोळां बैसो नारायण । नयो अभिमान आड मध्यें ॥१॥ धाड पडो तुझ्या थोरपणावरि । वाचे नरहरि उच्चारीना ॥ध्रु.॥ जळो अंतरींचें सर्व जाणपण । विवादवचन अहंतेचें ॥२॥ सकळां चरणीं गळित माझा जीव । तुका म्हणे भाव एकविध ॥३॥
4257
सर्व भाग्यहीन । ऐसें सांभाळिलों दीन ॥१॥ पायीं संतांचे मस्तक । असों जोडोनि हस्तक ॥ध्रु.॥ जाणें तरि सेवा । दीन दुर्बळ जी देवा ॥२॥ तुका म्हणे जीव । समर्पून भाकीं कींव ॥३॥
4258
सर्व संगीं विट आला । तूं एकला आवडसी ॥१॥ दिली आतां पायीं मिठी । जगजेठी न सोडीं ॥ध्रु.॥ बहु जालों क्षीदक्षीण । येणें सीण तो नासे ॥२॥ तुका म्हणे गंगवास । बहु त्या आस स्थळाची ॥३॥
4259
सर्व सुख आम्ही भोगूं सर्व काळ । तोडियेलें जाळ मोहपाश ॥१॥ याचसाठी सांडियेले भरतार । रातलों या परपुरुषाशीं ॥२॥ तुका म्हणे आतां गर्भ नये धरूं । औषध जें करूं फळ नव्हे ॥३॥
4260
सर्व सुखें आजी एथें चि वोळलीं । संतांचीं देखिलीं चरणांबुजें ॥१॥ सर्वकाळ होतों आठवीत मनीं । फिटली ते धणी येणें काळें ॥२॥ तुका म्हणे वाचा राहिली कुंटित । पुढें जालें चत्ति समाधान ॥३॥
4261
सर्वकाळ माझे चित्ती । हे चि खंती राहिली ॥१॥ बैसलें तें रूप डोळां । वेळोवेळां आठवे ॥ध्रु.॥ वेव्हाराची सरली मात । अखंडित अनुसंधान ॥२॥ तुका म्हणे वेध जाला । अंगा आला श्रीरंग ॥३॥
4262
सर्वथा ही खोटा संग । उपजे भंग मनासी ॥१॥ बहु रंगें भरलें जन । संपन्न चि अवगुणी ॥ध्रु.॥ सेविलिया निःकामबुद्धी । मदें शुद्धी सांडवी ॥२॥ त्रासोनियां बोले तुका । आतां लोकां दंडवत ॥३॥
4263
सर्वपक्षीं हरि साहेसखा जाला । ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला ॥१॥ सहजचाली चालतां पायवाटे । चिंतामणींसमान होती गोटे ॥२॥ तुका तरी सहज बोले वाणी । त्याचे घरीं वेदांत वाहे पाणी ॥३॥
4264
सर्वभावें आलों तुज चि शरण । कायावाचामनेंसहित देवा ॥१॥ आणीक दुसरें नये माझ्या मना । राहिली वासना तुझ्या पायीं ॥ध्रु.॥ माझिये वारचें कांहीं जडभारी । तुजविण वारी कोण एक ॥३॥ तुझे आम्ही दास आमुचा तूं ॠणी । चालत दूरूनी आलें मागें ॥३॥ तुका म्हणे आतां घेतलें धरणें । हिशोबाकारणें भेटी देई ॥४॥
4265
सर्वरसीं मीनलें चित्त । अखंडित आनंदु ॥१॥ गोत पति विश्वंभरीं । जाला हरि सोयरा ॥ध्रु.॥ वोळखी ते एका नांवें । इतरभावें खंडणा ॥२॥ तुका म्हणे नांवें रूपें । दुसरीं पापें हारपलीं ॥३॥
4266
सर्वविशीं आम्हीं हे चि जोडी केली । स्वीमीची साधिली चरणसेवा ॥१॥ पाहिलें चि नाहीं मागें परतोनी । जिंकिला तो क्षणीं क्षण काळ ॥ध्रु.॥ नाहीं पडों दिला विचाराचा गोवा । नाहीं पाठी हेवा येऊं दिला ॥२॥ केला लाग वेगीं अवघी चि तांतडी । भावना ते कुडी दुराविली ॥३॥ कोठें मग ऐसें होतें सावकास । जळो तया आस वेव्हाराची ॥४॥ तुका म्हणे लाभ घेतला पालवीं । आतां नाहीं गोवी कशाची ही ॥५॥
4267
सर्वविशीं माझा त्रासलासे जीव । आतां कोण भाव निवडे एक ॥१॥ संसाराची मज न साहे चि वार्ता । आणीक म्हणतां माझें कोणी ॥ध्रु.॥ देहसुख कांहीं बोलिले उपचार । विष तें आदर बंद वाटे ॥२॥ उपाधि दाटणी प्रतिष्ठा गौरव । होय माझा जीव कासावीस ॥३॥ तुका म्हणे कांहीं आणीक न साहे । आवडती पाय वैष्णवांचे ॥२॥
4268
सर्वसुखा अधिकारी । मुखें उच्चारी हरिनाम ॥१॥ सर्वांगें तो सर्वोत्तम । मुखीं नाम हरीचें ॥ध्रु.॥ ऐशी उभारिली बाहे। वेदीं पाहें पुराणीं ॥२॥ तुका म्हणे येथें कांही । संदेह नाहीं भरवसा ॥३॥
4269
सर्वसुखाचिया आशा जन्म गेला । क्षण मुक्ती यत्न नाहीं केला । हिंडतां दिशा सीण पावला । मायावेष्टीला जीव माझा ॥१॥ माझें स्वहित नेणती कोणी । कांहीं न करितां मजवांचुनी । स्वजन तंव सुखमांडणी । नेणती कोणी आदि अंत ॥ध्रु.॥ काय सांगों गर्भीची यातना । मज भोगितां नारायणा । मांस मळ मूत्र जाणा । तुज क्षणक्षणा ध्यात असें ॥२॥ मज चालतां प्रयाणकाळीं । असतां न दिसती जवळी । मृत्तिके मृत्तिका कवळी । एकले मेळीं संचिताचे ॥३॥ आतां मज ऐसें करीं गा देवा । कांहीं घडे तुझी चरणसेवा । तुका विनवीतसे केशवा । चालवीं दावा संसारें ॥४॥
4270
सर्वस्वा मुकावें तेणें हरीसी जिंकावें । अर्थ प्राण जीवें देहत्याग ॥१॥ मोह ममता माया चाड नाहीं चिंता । विषयकंदुवेथा जाळूनियां ॥ध्रु.॥ लोकलज्जा दंभ आणि अहंकार । करूनि मत्सर देशधडी ॥२॥ शांति क्षमा दया सखिया विनउनी । मूळ चक्रपाणी धाडी त्यांसी ॥३॥ तुका म्हणे याती अक्षरें अभिमान । सांडोनिया शरण रिघें संतां ॥४॥
4271
सर्वस्वाचा त्याग तो सदा सोंवळा । न लिंपे विटाळा अग्नि जैसा ॥१॥ सत्यवादी करी संसार सकळ । अलिप्त कमळ जळीं जैसें ॥ध्रु.॥ घडे ज्या उपकार भूतांची दया । आत्मस्थिती तया अंगीं वसे ॥२॥ नो बोले गुणदोष नाइके जो कानीं । वर्तोनि तो जनीं जनार्दन ॥३॥ तुका म्हणे वर्म जाणितल्याविण । पावे करितां सीण सांडीमांडी ॥४॥
4272
सर्वस्वाची साटी । तरि च देवासवें गांठी ॥१॥ नाहीं तरी जया तैसा । भोग भोगवील इच्छा ॥ध्रु.॥ द्यावें तें चिं घ्यावें । म्हणउनि घ्यावें जीवें ॥२॥ तुका म्हणे उरी । मागें उगवितां बरी ॥३॥
4273
सर्वा भूतीं द्यावें अन्न । द्रव्य पात्र विचारोन । उपतिष्ठे कारण । तेथें बीज पेरीजे ॥१॥ पुण्य करितां होय पाप । दुग्ध पाजोनि पोशिला साप । करोनि अघोर जप । दुःख विकत घेतलें ॥ध्रु.॥ भूमी पाहातां नाहीं वेगळी । माळ बरड एक काळी । उत्तम निराळी । मध्यम कनिष्ठ ॥२॥ म्हणोनि विवेकें । कांहीं करणें निकें । तुका म्हणे फिकें । रुची नेदी मिष्टान्न ॥३॥
4274
सर्वात्मकपण । माझें हिरोनि नेतो कोण ॥१॥ मनीं भक्तीची आवडी । हेवा व्हावी ऐशी जोडी ॥ध्रु.॥ घेईंन जन्मांतरें । हें चि करावया खरें ॥२॥ तुका म्हणे देवा । ॠणी करूनि ठेवूं सेवा॥३॥
4275
सर्वापरी तुझे गुण गाऊं उत्तम । तुझेठायीं प्रेम राहो माझें ॥१॥ माउलीपरिस आहेसी उदार । तरि कां निष्ठ‍ मन केलें ॥ध्रु.॥ गजेंद्राकारणें केलें त्वां धांवणें । तरि कां निर्वाण पाहातोसी ॥२॥ प्रल्हादास कष्टीं रिक्षलें तों देवा । तरि कां केशवा सांडी केली ॥३॥ अन्यायी अजामेळ तो जाला पावन । ऐसें हें पुराण हाका मारी ॥४॥ तुका म्हणे माझे थोर अपराध । नाम करी छेद क्षणमात्रें ॥५॥
4276
सवंग जालें सवंग जालें । घरा आलें बंदरींचे ॥१॥ आतां हेवा करावा सोस । भक्तिरस बहु गोड ॥ध्रु.॥ पाउल वेचे चिंता नाहीं । आड कांहीं मग नये ॥२॥ तुका म्हणे संचिताचें । नेणें काचें राहों तें ॥३॥
4277
सहज पावतां भगवंतीं परि हीं विकल्पें परतीं । फुकाची हे चित्तीं वाठवण कां न धरिती ॥१॥ हरि व्यापक सर्वगत हें तंव मुख्यत्वें वेदांत । चिंतनासी चित्त असों द्यावें सावध ॥ध्रु.॥ विरजाहोम या चि नांवें देह नव्हे मी जाणावें । मग कां जी यावें वरी लागे संकल्पा ॥२॥ कामक्रोधे देह मळिण स्वाहाकारीं कैंचें पुण्य । मंत्रीं पूजियेला यज्ञ मनमुंडण नव्हे चि ॥३॥ अनन्यभक्तीचे उपाय ते या विठोबाचे पाय । ध्याइल तो काय जाणे चुकों मारग ॥४॥ आतां सांगे तुका एक तुम्ही चुकों नका । सांडीमांडी धोका शरण रिघतां गोमटें ॥५॥
4278
सहज मी आंधळा गा निजनिराकार पंथें । वृत्ति हे निवृत्ति जाली जन न दिसे तेथें । मी माजी हारपलें ठायीं जेथींचा तेथें । अदृश्य तें चि जालें कांहीं दृश्य जें होतें ॥१॥ सुखी मी निजलों गा शून्य सारूनि तेथें । त्रिकूटशिखरीं गा दान मिळे आइतें ॥ध्रु.॥ टाकिली पात्र झोळी धर्मअधर्म आशा । कोल्हाळ चुकविला त्रिगुणाचा वोळसा । न मागें मी भीक आतां हा चि जाला भरवसा । वोळली सत्रावी गा तिणें पुरविली इच्छा ॥२॥ ऊर्ध्वमुखें आळविला सोहं शब्दाचा नाद । अरूप जागविला दाता घेऊनि छंद । घेऊनि आला दान निजतत्व निजबोध । स्वरूपीं मेळविलें नांव ठेविला भेद ॥३॥ शब्द हा बहुसार उपकाराची राशी । म्हणोनि चालविला मागें येतील त्यांसीं । मागोनि आली वाट सिद्धिओळीचि तैसी । तरले तरले गा आणीक ही विश्वासी ॥४॥ वर्म तें एक आहे दृढ धरावा भाव । जाणिवनागवण नेदी लागो ठाव । म्हणोनि संग टाकी सेवीं अद्वैत भाव । तुका म्हणे हा चि संतीं मागें केला उपाव ॥५॥
4279
सहज लीळा मी साक्षी याचा । नये वंचूं वाचा ऐसें जालें ॥१॥ उपक्रमें वदे निशब्दाची वाणी । जे कोठें बंधनीं गुंपों नेणें ॥ध्रु.॥ तम नासी परि वेव्हारा वेगळा । रविप्रभाकळा वर्ते जन ॥२॥ तुका म्हणे येथें गेला अतिशय । आतां पुन्हा नये तोंड दावूं ॥३॥
4280
सांखळिलों प्रीती गळां । भुंके वेळा जाणोनियां ॥१॥ तुमचें मी केशीराजा । सुनें या काजा पाळिलों ॥ध्रु.॥ आलें गेलें कळे वाटा । कोण निटा वाकडिया ॥२॥ तुका म्हणे आलें वारी । दुरितें दुरी नातळतां ॥३॥
4281
सांग त्वां कोणासी तारिलें । संतांवेगळें उद्धरिलें ॥१॥ संत शब्द उपदेशी । मग तूं हो म्हणशी ॥२॥ तुका म्हणे नाहीं तुझा उपकार । करूं संतांचा उच्चार ॥३॥
4282
सांग पांडुरंगा मज हा उपाव । जेणें तुझे पाव आतुडति ॥१॥ न कळे हा निर्धार ब्रम्हादिकां पार । कायसा विचार माझा तेथें ॥२॥ तुका म्हणे आतां धरुनियां धीर । राहूं कोठवर मायबापा ॥३॥
4283
सांगतां गोष्टी लागती गोडा । हा तो रोकडा अनुभव ॥१॥ सुख जालें सुख जालें । नये बोले बोलतां ॥ध्रु.॥ अंतर तें नये दिसों । आतां सोस कासया ॥२॥ तुका म्हणे जतन करूं । हें चि धरूं जीवेंसी ॥३॥
4284
सांगतां दुर्लभ ज्ञानाचिया गोष्टी । अनुभव तो पोटीं कैचा घडे ॥१॥ भजनाचे सोई जगा परिहार । नेणत्यां सादर चित्त कथे ॥ध्रु.॥ नाइकवे कानीं साधन उपाय । ऐकतो गाय हरुषें गीत ॥२॥ नव्हे आराणूक जावयासी वना । वेध कामिमना हरिकथेचा ॥३॥ काळाच्या साधना कोणा अंगीं बळ । चिंतना मंगळ अष्टप्रहर ॥४॥ तुका म्हणे आम्ही खेळों भातुकुलें । विभागासी मुलें भोळीं येथें ॥५॥
4285
सांगतां हें नये सुख । कीर्ती मुख न पुरे ॥१॥ आवडीनें सेवन करू । जीवींचें धरूं जीवीं च ॥ध्रु.॥ उपमा या देतां लाभा । काशा शोभा सारिखी ॥२॥ तुका म्हणे नुचलीं डोई । ठेविली पायीं संतांचे ॥३॥
4286
सांगतों तरि तुम्ही भजा रे विठ्ठला । नाहीं तरि गेला जन्म वांयां ॥१॥ करितां भरोवरी दुरावसी दुरी । भवाचिये पुरीं वाहावसी ॥२॥ कांहीं न लगे एक भाव चि कारण । तुका म्हणे आण विठ्ठलाची ॥३॥
4287
सांगतों तें तुम्हीं अइकावें कानीं । आमुचे नाचणीं नाचूं नका ॥१॥ जोंवरी या तुम्हां मागिलांची आस । तोंवरी उदास होऊं नका ॥२॥ तुका म्हणे काय वांयांविण धिंद । पति ना गोविंद दोन्ही नाहीं ॥३॥
4288
सांगतों या मना तें माझें नाइके । घातावरी टेंके चांडाळ हें ॥१॥ म्हणऊनि पाहे तरतें बुडतें । न ल्हाये पुरतें बळ करूं ॥ध्रु.॥ काय तें संचित न कळे पाहातां । मतिमंद चित्ती उपजतें ॥२॥ तुका म्हणे ऐसें बळ नाहीं अंगी । पाहोनियां वेगीं पार टाकीं ॥३॥
4289
सांगा दास नव्हें तुमचा मी कैसा । ऐसें पंढरीशा विचारूनि ॥१॥ कोणासाटीं केली प्रपंचाची होळी । या पायां वेगळी मायबापा ॥ध्रु.॥ नसेल तो द्यावा सत्यत्वासी धीर । नये भाजूं हीर उफराटे ॥२॥ तुका म्हणे आम्हां आहिक्य परत्रीं । नाहीं कुळगोत्रीं दुजें कांहीं ॥३॥
4290
सांगावें तें बरें असतें हें पोटीं । दुःख देते खोटी बुद्धी मग ॥१॥ आपला आपण करावा वेव्हार । जिंकोनि अंतर मन ग्वाही ॥ध्रु.॥ नाहीं मागें येत बोलिलें वचन । पावावा तो सीण बरा मग ॥२॥ तुका म्हणे बहु भ्यालों खटपटे । आतां देवा खोटे शब्द पुरे ॥३॥ वाराणसीस यात्रा चालली तेव्हां स्वामींनीं भागीरथीस पत्र धाडिलें - ते अभंग ॥ ४ ॥
4291
सांगों काय नेणा देवा । बोलाची त्या आवडी ॥१॥ वांयां मज चुकुर करा । विश्वंभरा विनोदें ॥ध्रु.॥ आवडीच्या करा ऐसें । अंतर्वासें जाणतसां ॥२॥ तुका म्हणे समाधानें । होइन मनें मोकळा ॥३॥
4292
सांगों जाणती शकुन । भूत भविष्य वर्तमान ॥१॥ त्यांचा आम्हांसी कंटाळा । पाहों नावडती डोळां ॥ध्रु.॥ रिद्धिसिद्धींचे साधक । वाचासद्धि होती एक ॥२॥ तुका म्हणे जाती । पुण्यक्षयें अधोगती ॥३॥
4293
सांटविला हरी । जींहीं हृदयमंदिरीं ॥१॥ त्यांची सरली वेरझार । जाला सफळ व्यापार ॥ध्रु.॥ हरी आला हाता । मग कैंची भय चिंता । तुका म्हणे हरी । कांहीं उरों नेदी उरी ॥३॥
4294
सांटविले वाण । पैस घातला दुकान ॥१॥ जें ज्या पाहिजे जे काळीं । आहे सद्धी चि जवळी ॥ध्रु.॥ निवडिलें साचें । उत्तममध्यमकनिष्ठाचें ॥२॥ तुका बैसला दुकानीं । दावी मोला ऐसी वाणी ॥३॥
4295
सांडवले सकळांचे अभिमान । आणिले शरण लोटांगणीं ॥१॥ लोटांगणीं आले होऊनियां दीन । मग नारायण म्हणे भलें ॥२॥ भला आजि तुम्ही केला साच पण । गिरि गोवर्धन उचलिला ॥३॥ लागती चरणा सकळ ते काळीं । आम्हांमध्यें बळी तूं चि एक ॥४॥ एका तुजविण न यों आम्ही कामा । कळों कृष्णा रामा आलें आजी ॥५॥ आजिवरि आम्हां होता अभिमान । नेणतां चरणमहिमा तुझा ॥६॥ तुझा पार आम्ही नेणों नारायणा । नखीं गोवर्धना राखियेलें ॥७॥ राखियेलें गोकुळ आम्हां सकळांसि । दगडाच्या राशी वरुषतां ॥८॥ वर्णावें तें काय तुझें महिमान । धरिती चरण सकळिक ॥९॥ सकळ ही तान विसरलीं भूक । सकळ ही सुख दिलें त्यांसि ॥१०॥ त्यासि कळों आला वैकुंठनायका । तुका म्हणे लोक निर्भर ते ॥११॥
4296
सांडावी हे भीड अधमाचे चाळे । मद्यपीर बरळे भलत्या छंदें ॥१॥ ऐसे तंव तुम्ही नाहीं जी दिसत । कां हें अनुचित वदलेत ॥ध्रु.॥ फांटा जाला त्यासी नाहीं वोढा वारा । वेरसा चि खरा हाटो गुण ॥२॥ तुका म्हणे नाहीं ज्याच्या बापा ताळा । तो देखे विटाळा संतां अंगीं ॥३॥
4297
सांडियेला गर्भ उबगोनि माउली । नाहीं सांभाळिली भूमि शुद्ध ॥१॥ उष्ण तान भूक एवढिये आकांतीं । ओसंगा लाविती काय म्हुण ॥ध्रु.॥ खांद्यावरि शूळ मरणाचिये वाटे । अन्याय ही मोठे केले साच ॥२॥ हातींचा हिरोनि घातला पोटासी । तुका म्हणे ऐसी परी जाली ॥३॥ ओंव्या प्रारंभ २३१ अभंग ३
4298
सांडियेली काया । वरी ओंवाळूनी पायां ॥१॥ शरण शरण नारायणा । मज अंगीकारा दीना ॥ध्रु.॥ आलों लोटांगणीं । रुळें तुमचे चरणीं ॥२॥ तुका म्हणे कई । डोईं ठेवीन हे पायीं ॥३॥
4299
सांडियेलें रूप विक्राळ भ्यासुर । झालें सकुमार कोडिसवाणें ॥१॥ शाम चतुर्भुज मुकुट कुंडलें । सुंदर दंडलें नव बाळ ॥ध्रु.॥ गोपाळ म्हणती कैसें रे बा कृष्णा । रूप नारायणा धरियेलें ॥२॥ कैसा वाढलासी विक्राळ जालासी । गटगटा ज्वाळांसी गिळियेलें ॥३॥ तुका म्हणे भावें पुसती गोपाळ । अनाथवत्सल म्हणोनियां ॥४॥
4300
सांडुनि सुखाचा वांटा । मुक्ति मागे तो करंटा ॥१॥ कां रे न घ्यावा जन्म । प्रेम लुटावें नाम ॥ध्रु.॥ येथें मळितो दहीं भात । वैकुंठीं ते नाहीं मात ॥२॥ तुका म्हणे आतां । मज न लगे सायुज्यता ॥३॥
4301
सांडुनियां पंढरीराव । कवणातें म्हणों देव ॥१॥ बहु लाज वाटे चित्ता । आणिकांतें देव म्हणतां ॥ध्रु.॥ सांडुनियां हिरा । कोणें वेचाव्या त्या गारा ॥२॥ तुका म्हणे हरिहर । ऐसी सांडुनियां धुर ॥३॥
4302
सांडुनियां सर्व लौकिकाची लाज । आळवा यदुराज भिक्तभावें ॥१॥ पाहूनियां झाडें वरबडूनि पाला । खाऊनि विठ्ठला आळवावें ॥ध्रु.॥ वेंचूनियां चिंध्या भरूनियां धागा । गुंडाळूनि ढुंगा आळवावें ॥२॥ तुका म्हणे ऐसें मांडिल्या निर्वाण । तया नारायण उपेक्षीना ॥३॥
4303
सांडूनि कीर्तन न करीं आणीक काज । नाचेन निर्लज्ज तुझ्या रंगीं ॥१॥ आवडीचें आर्त पुरवीं पंढरिराया । शरण तुझ्या पायां या चि लागीं ॥ध्रु.॥ टाळी वाहूनियां विठ्ठल म्हणेन । तेणें निवारीन भवश्रम ॥२॥ तुका म्हणे देवा नुपेक्षावें आम्हां । न्यावें निजधामा आपुलिया ॥३॥
4304
सांडूनि वैकुंठ । उभा विटेवरी नीट ॥१॥ आला आला रे जगजेठी । भक्ता पुंडलिकाचे भेटी ॥ध्रु.॥ पैल चंद्रभागे तिरीं । कट धरूनियां करीं ॥२॥ तुकयाबंधु म्हणे अंबर । गजर होतो जयजयकार ॥३॥
4305
सांडोनी दों अक्षरां । काय करूं हा पसारा । विधिनिषेधाचा भारा । तेणें दातारा नातुडेसी ॥१॥ म्हणोनि बोबडा उत्तरीं । वाचें जपें निरंतरीं । नाम तुझें हरी । भवसागरीं तारूं तें ॥ध्रु.॥ सर्वमय ऐसें वेदांचें वचन । श्रुति गर्जती पुराणें । नाहीं आणीक ध्यान । रे साधन मज चाड ॥२॥ शेवटीं ब्रम्हार्पण । या चि मंत्राचें कारण । काना मात्र वांयांविण । तुका म्हणे बिंदुलीं ॥३॥
4306
सांता पांचां तरीं वचनां सेवटीं । निरोप कां भेटी एक तरी ॥१॥ कां नेणें निष्ठ‍ केलें नारायणा । न देखें हें मना येतां कांहीं ॥२॥ तुका म्हणे ऐसा न देखें निवाड । कडू किंवा गोड फळ पोटीं ॥३॥
4307
सांपडला संदीं । मग बळिया पडे फंदीं ॥१॥ ऐसी कोणी वाहे वेळ । हातीं काळाच्या सकळ ॥ध्रु.॥ दाता मागे दान । जाय याचका शरण ॥२॥ तुका म्हणे नेणां । काय सांगों नारायणा ॥३॥
4308
सांपडला हातीं । तरी जाली हे निश्चिंती ॥१॥ नाहीं धांवा घेत मन । इंद्रियांचें समाधान ॥ध्रु.॥ सांडियेला हेवा । अवघा संचिताचा ठेवा ॥२॥ तुका म्हणे काम । निरसुनियां घेतों नाम ॥३॥
4309
सांपडलें जुनें । आमुच्या वडिलांचें ठेवणें । केली नारायणें । कृपा पुण्यें पूर्वाचिया ॥१॥ सुखें आनंदरूप आतां । आम्ही आहों याकरितां । निवारली चिंता । देणें घेणें चुकलें ॥ध्रु.॥ जालें भांडवल घरिंचें । अमुप नाम विठ्ठलाचें । सुकृत भावाचें । हें तयानें दाविलें ॥२॥ तुकयाबंधु म्हणे फिटला । पांग नाहीं बोलायाला । चाड दुसरी विठ्ठ्ला । वांचूनियां आणीक ॥३॥ ॥३७॥
4310
सांवळें रूपडें चोरटें चित्ताचें । उभें पंढरीचे विटेवरी ॥१॥ डोळियांची धणी पाहातां न पुरे । तया लागीं झुरे मन माझें ॥ध्रु.॥ आन गोड कांहीं न लगे संसारीं । राहिले अंतरीं पाय तुझे ॥२॥ प्राण रिघों पाहे कुडी हे सांडुनी । श्रीमुख नयनीं न देखतां ॥३॥ चित्त मोहियेलें नंदाच्या नंदनें । तुका म्हणे येणें गरुडध्वजें ॥४॥
4311
सांवळें सुंदर पाहे दृष्टिभरि । ऐसें कांहीं करीं मन माझें ॥१॥ मना तुज ठाव दिला त्याचे पायीं । राहें विठाबाईंसवें सदा ॥ध्रु.॥ मना नको धरूं आणिकांचा संग । नाहीं पांडुरंग जयां मनीं ॥२॥ वरपंग भाव नको म्हणे तुका । करीं प्राणसखा नारायणा ॥३॥
4312
साकरेचें नाम घेतां कळे गोडी । तैसी आम्हां जोडी वैष्णवांची ॥१॥ मोक्ष गांठी असे ठेविला बांधोनी । सोस तो भजनीं आवडीचा ॥ध्रु.॥ भोजनाची चिंता माय वाहे बाळा । आम्हांसि तरी खेळावरि चित्त ॥२॥ तुका म्हणे आम्ही देहउपकारें । गाऊं निरंतर नाचों लागों ॥३॥
4313
साकरेच्या गोण्या बैलाचिये पाठी । तयासी सेवटीं करबाडें ॥१॥ मालाचे पैं पेटे वाहाताती उंटें । तयालागीं कांटे भक्षावया ॥ध्रु.॥ वाउगा हा धंदा आशा वाढविती । बांधोनियां देती यमा हातीं ॥२॥ ज्यासी असे लाभ तो चि जाणे गोडी । येर तीं बापुडीं सिणलीं वांयां ॥३॥ तुका म्हणे शहाणा होई रे गव्हारा । चोर्‍यासीचा फेरा फिरों नको ॥४॥
4314
साकरेच्या योगें वर्ख । राजा कागदातें देखे ॥१॥ तैसें आम्हां मानुसपण । रामनाम केण्यागुणें ॥ध्रु.॥ फिरंगीच्या योगें करी । राजा काष्ठ हातीं धरी ॥२॥ रत्नकनका योगें लाख । कंठीं धरिती श्रीमंत लोक ॥३॥ देवा देवपाट देव्हार्‍यावरी बैसे स्पष्ट ॥४॥ ब्रम्हानंदयोगें तुका । पढीयंता सज्जन लोकां ॥५॥
4315
साच मज काय कळों नये देवा । काय तुझी सेवा काहे नव्हे ॥१॥ करावें तें बरें जेणें समाधान । सेवावें हें वन न बोलावें ॥ध्रु.॥ शुद्ध माझा भाव होइल तुझे पायीं । तरि च हें देई निवडूनि ॥२॥ उचित अनुचित कळों आली गोष्टी । तुझे कृपादृष्टी पांडुरंगा ॥३॥ तुका म्हणे मज पायांसवे चाड । सांगसी तें गोड आहे मज ॥४॥
4316
साच माझा देव्हारा । भाक ठेवा भाव खरा । त्रिगुणाचा फुलवरा । आणा विनति सांगतों ॥१॥ माझें दैवत हें रंगीं । नाचे वैष्णवांच्या संगीं । भरलें मग अंगीं । निवाड करी दोहींचा ॥ध्रु.॥ तुझें आहे तुजपासीं । परि तूं जागा चुकलासी । चिवडुनियां नासी । तुझ्या घरिच्यांनीं केली ॥२॥ आतां न पडे ठावें । वांचूनियां माझ्या देवें । अंधकार व्हावें । नासु ठाव शोधावा ॥३॥ आंधळ्यासी डोळे । देते पांगुळासी पाय । वांजा पुत्र फळे । नवस पुरविते विठाई ॥४॥ उगविलीं कोडीं । मागें कितेकांचीं बापुडीं । तुका म्हणे घडी । न लगे नवस द्या आधीं ॥५॥
4317
साच हा विठ्ठल साच हें करणें । संत जें वचनें बोलियेले ॥१॥ साच तें स्वहित साच ते प्रचित । साच वेद नीत सांगतील ॥२॥ तुका म्हणे घेती साच साच भावें । लटिकें वर्म ठावें नाहीं त्यांसी ॥३॥
4318
साजे अळंकार । तरि भोगितां भ्रतार ॥१॥ व्यभिचारा टाकमटिका । उपहास होती लोकां ॥ध्रु.॥ शूरत्वाची वाणी । रूप मिरवे मंडणीं ॥२॥ तुका म्हणे जिणें । शर्त्तीविण लाजिरवाणें ॥३॥
4319
सात पांच गौळणी आलिया मिळोनी यशोदे गार्‍हाणें देती कैसें । काय व्यालीस पोर चोरटें सिरजोर जनावेगळें ची कैसें। दहिं दुध लोणी शिंकां नुरे चि कांहीं कवाड जैशाचें तैसें । चाळवूनि नाशिली कन्याकुमरें आमुच्या सुनांसि लाविलें पिसें गे बाइये ॥१॥ आझुनि तरी यासि सांगें बरव्या परी नाहीं तरी नाहीं उरी जीवेसाटी । मिळोनि सकळै जणी करूं वाखा सखीं तुज मज होईल तुटी गे बाइये ॥ध्रु.॥ नेणे आपपर लौकिक वेव्हार भलते ठायीं भलतें करी । पाळतुनि घरीं आम्ही नसतां तेथें आपण संचार करी । सोगया चुंबन देतो आलिंगन लोळे मेजाबाजावरी । शिंकीं कडा फोडी गोरसाचे डेरे धरितां न सांपडे करीं गे बाइये ॥२॥ आतां याची चाड नाहीं आम्हां भीड सांपतां कोड पुरवूं मनिचें । सोसिलें बहु दिस नव्हता केला निस म्हणुनि एकुलतें तुमचें । चरण खांबीं जीवें बांधैन सरिसा जवें न चले कांहीं याचें । अर्थ प्राण देतां न सोडी सर्वथा भलतें हो या जिवाचें गे बाइये ॥३॥ घेउनी जननी हातीं चक्रपाणी देतिसे गौळणी वेळोवेळां । निष्ठ‍ वाद झणीं बोलाल सकळा क्षोभ जाइल माझ्या बाळा । जेथें लागे हात वाढतें नवनीत अमृताच्या कल्लोळा । देखोनि तुकयास्वामी देश देहभाव विसरल्या सकळा गे बाइये ॥४॥
4320
सातादिवसांचा जरी जाला उपवासी । तरीं कीर्तनासी टाकुं नये ॥१॥ फुटो हा मस्तक तुटो हें शरीर । नामाचा गजर सोडूं नये ॥ध्रु.॥ शरीराचे होत दोनी ते ही भाग । परि कीर्तनाचा रंग सोडों नये ॥२॥ तुका म्हणे ऐसा नामीं ज्या निर्धार । तेथें निरंतर देव असे ॥३॥
4321
सातें चला काजळ घाला तेल फणी करा । दिवाणदारीं बैसले पारीं नाचों फेर धरा ॥१॥ या साहेबाचें जालें देणें वेळोवेळां न लगे येणें । आतां हाटीं काशासाठीं हिंडों पाटी दुकानें ॥ध्रु.॥ अवघ्या जणी मुंढा धणी नाचों एकें घाई । सरसावलें सुख कैसा चाळा एके ठायीं ॥२॥ तुका म्हणे वोळगों एका तोड चिंता माया । देऊं उद्गार आतां जाऊं मुळीचिया ठाया ॥३॥
4322
सादाविलें एका । सरें अवघियां लोकां ॥१॥ आतां आवडीचे हातीं । भेद नाहीं ये पंगती ॥ध्रु.॥ मोकळी च पोतीं । नाहीं पुसायाची गुंती ॥२॥ तुका म्हणे बरा । आहे ढसाळ वेव्हारा ॥३॥
4323
साधक जाले कळी । गुरुगुडीची लांब नळी ॥१॥ पचीं पडे मद्यपान । भांगभुर्का हें साधन ॥ध्रु.॥ अभेदाचें पाठांतर । अति विषयीं पडिभर ॥२॥ चेल्यांचा सुकाळ । पिंड दंड भंगपाळ ॥३॥ सेवा मानधन । बरे इच्छेनें संपन्न ॥४॥ सोंगाच्या नरकाडी । तुका बोडोनियां सोडी ॥५॥
4324
साधकाची दशा उदास असावी । उपाधि नसावी अंतर्बाही ॥१॥ लोलुपता काय नद्रिेतें जिणावें । भोजन करावें परमित ॥ध्रु.॥ एकांती लोकांतीं स्त्रियांशीं वचन । प्राण गेल्या जाण बोलों नये ॥२॥ संग सज्जनाचा उच्चार नामाचा । घोष कीर्तनाचा अहर्निशीं ॥३॥ तुका म्हणे ऐसा साधनीं जो राहे । तो चि ज्ञान लाहे गुरुकृपा ॥४॥
4325
साधन संपत्ति हें चि माझें धन । सकळ चरण विठोबाचे ॥१॥ शीतळ हा पंथ माहेराची वाट । जवळी च नीट सुखरूप ॥ध्रु.॥ वैष्णवांचा संग रामगाणें गाणें । मंडित भूषण अळंकार ॥२॥ भवनदी आड नव्हतीसी जाली । कोरडी च चाली जावें पायी ॥३॥ मायबाप दोघें पाहातील वाट । ठेवूनिया कटीं कर उभी ॥४॥ तुका म्हणे केव्हां देखेन कळस । पळाली आळस निद्रा भूक ॥५॥
4326
साधनांच्या कळा आकार आकृति । कारण नवनीतीं मथनाचें ॥१॥ पक्षियासी नाहीं मारगीं आडताळा । अंतराक्षी फळासी चि पावे ॥ध्रु.॥ भक्तिची जोडी ते उखत्या चि साटीं । उणें पुरें तुटी तेथें नाहीं ॥२॥ तुका म्हणे आलें सांचत सांचणी । आजि जाली क्षणी एकसरें ॥३३॥
4327
साधनाचे कष्ट मोटे । येथें वाटे थोर हें ॥१॥ मुखें गावें भावें गीत । सर्व हित बैसलिया ॥ध्रु.॥ दासा नव्हे कर्म दान । तन मन निश्चळि ॥२॥ तुका म्हणे आत्मनष्टि । भागे चेष्ट मनाची ॥३॥
4328
साधनें आमुचीं आज्ञेचीं धारकें । प्रमाण सेवकें स्वामिसत्ता ॥१॥ प्रकाशिलें जग आपुल्या प्रकाशें । रवि कर्मरसें अलिप्त त्या ॥ध्रु.॥ सांगणें तें तें नाहीं करणें आपण । मोलही वचन बाध जालें ॥२॥ तुका म्हणे आम्हां भांडवल हातीं । येरझारा खाती केवढियें ॥३॥
4329
साधनें तरी हीं च दोन्ही । जरी कोणी साधील ॥१॥ परद्रव्य परनारी । याचा धरीं विटाळ ॥ध्रु.॥ देवभाग्यें घरा येती । संपत्ती त्या सकळा ॥२॥ तुका म्हणे तें शरीर । गृह भांडार देवाचें ॥३॥
4330
साधावया भक्तिकाज । नाहीं लाज हा धरीत ॥१॥ ऐसियासी शरण जावें । शक्ती जीवें न वंची ॥ध्रु.॥ भीष्मपण केला खरा । धनुर्धरा रक्षीलें ॥२॥ तुका म्हणे साक्ष हातीं । तो म्यां चित्ती धरियेला ॥३॥
4331
साधावा तो देव सर्वस्वाचेसाटीं । प्रारब्ध तुटी क्रियमाण ॥१॥ मग कासयानें पुन्हा संवसार । बीजाचे अंकुर दग्ध होती ॥ध्रु.॥ जिणें दिल्हें त्यासी द्यावा पिंडदान । उत्तीर्ण चरण धरूनि व्हावें ॥२॥ तुका म्हणे निज भोगईंल निजता । नाहीं होइल सत्ता दुजियाची ॥३॥
4332
साधूच्या दर्शना लाजसी गव्हारा । वेश्येचिया घरा पुष्पें नेसी ॥१॥ वेश्या दासी मुरळी जगाची वोंवळी । ते तुज सोंवळी वाटे कैशी ॥२॥ तुका म्हणे आतां लाज धरीं बुच्या । टांचराच्या कुच्या मारा वेगीं ॥३॥
4333
साधूनी बचनाग खाती तोळा तोळा । आणिकातें डोळां न पाहवे ॥१॥ साधूनी भुजंग धरितील हातीं । आणिकें कापती देखोनियां ॥२॥ असाध्य तें साध्य करितां सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ॥३॥
4334
सापें ज्यासी खावें । तेणें प्राणासी मुकावें ॥१॥ काय लाधला दुर्जन । तोंडावरी थुंकी जन ॥ध्रु.॥ विंचु हाणें नांगी । अग्न लावी आणिकां अंगीं ॥२॥ तुका म्हणे जाती । नरका पाउलीं चालती ॥३॥ स्वामींनीं स्त्रीस उपदेश केला ते अभंग ॥ ११ ॥
4335
सामावे कारण । नाहीं सोसत धरणें ॥१॥ लादी थींके लाजिरवाणी । हीनकमाईंची घाणी ॥ध्रु.॥ पुष्प जवळी नाका । दुगपधीच्या नांवें थुंका ॥२॥ तुका म्हणे किती । उपदेशहीन जाती ॥३॥
4336
सारावीं लिगाडें धरावा सुपंथ । जावें उसंतीत हळूहळू ॥१॥ पुढें जातियाचे उमटले माग । भांबावलें जग आडरानें ॥ध्रु.॥ वेचल्याचा पाहे वरावरि झाडा । बळाचा निधडा पुढिलिया ॥२॥ तुका म्हणे जैसी दाखवावी वाणी । ते द्यावी भरोनी शेवट तों ॥३॥
4337
सारासार विचार करा उठाउठी । नाम धरा कंठीं विठोबाचें ॥१॥ तयाच्या चिंतनें निरसलें संकट । तरलों दुर्घट भवसिंधु ॥ध्रु.॥ जन्मोनियां कुळीं वाचे स्मरे राम । धरी हा चि नेम अहिर्निशीं ॥२॥ तुका म्हणे कोटी कुळें तीं पुनीत । भावें गातां गीत विठोबाचे ॥३॥
4338
सारीन तें आतां एकाचि भोजनें । वारीन मागणें वेळोवेळां ॥१॥ सेवटींच्या घासें गोड करीं माते । अगे कृपावंते पांडुरंगे ॥ध्रु.॥ वंचूं नये आतां कांहीं च प्रकार । धाकल्याचें थोर जाल्यावरी ॥२॥ तुका म्हणे आतां बहु चाळवावें । कांहीं नेदीं ठावें उरों मागें ॥३॥
4339
सालोमालो हरिचे दास । म्हणउन केला अवघा नास ॥१॥ अवघें बचमंगळ केलें । म्हणती एकांचें आपुले ॥ध्रु.॥ मोडूनि संतांचीं वचनें । करिती आपणां भूषणें ॥२॥ तुका म्हणे कवी । जगामधीं रूढ दावी ॥३॥
4340
साळंकृत कन्यादान । करितां पृथ्वीसमान ॥१॥ परि तें न कळे या मूढा । येइल कळों भोग पुढां ॥ध्रु.॥ आचरतां कर्म । भरे पोट राहे धर्म ॥२॥ सत्या देव साहे । ऐसें करूनियां पाहें ॥३॥ अन्न मान धन । हें तों प्रारब्धा आधीन ॥४॥ तुका म्हणे सोस । दुःख आतां पुढें नास ॥५॥
4341
सावडीं कांडण ओवी नारायण । निवडे आपण भूस सार ॥१॥ मुसळ आधारीं आवरूनि धरीं । सांवरोनि थिरीं घाव घालीं ॥ध्रु.॥ वाजती कांकणें अनुहात गजरें । छंद माहियेरे गाऊं गीति ॥२॥ कांडिता कांडण नव्हे भाग शीण । तुजमजपण निवडे तों ॥३॥ तुका म्हणे रूप उमटे आरिसा । पाक त्या सरिसा शुद्ध जाला ॥४॥ आडसण दळण - अभंग १
4342
सावध जालों सावध जालों । हरिच्या आलों जागरणा ॥१॥ तेथें वैष्णवांचे भार । जयजयकार गर्जतसे ॥ध्रु.॥ पळोनियां गेली झोप । होतें पाप आड तें ॥२॥ तुका म्हणे त्या ठाया । ओल छाया कृपेची ॥३॥
4343
सावधान ऐसें काय तें विचारा । आले हो संसारा सकळ ही ॥१॥ अंतीं समयाचा करणें विचार । वेचती सादर घटिका पळें ॥ध्रु.॥ मंगळ हें नोहे कन्यापुत्रादिक । राहिला लौकिक अंतरपाट ॥२॥ तुका म्हणे देव अंतरला दुरी । डोळिया अंधारी पडलीसे ॥३॥
4344
सावळें सुंदर रूप मनोहर । राहो निरंतर हृदयीं माझे ॥१॥ आणीक कांहीं इच्छा आम्हां नाहीं चाड । तुझें नाम गोड पांडुरंगे ॥ध्रु.॥ जन्मोजन्मीं ऐसें मागितलें तुज । आम्हांसी सहज द्यावें आतां ॥२॥ तुका म्हणे तुज ऐसे दयाळ । धुंडितां सकळ नाहीं आम्हां ॥३॥
4345
सावित्रीची विटंबण । रांडपण करीतसे ॥१॥ काय जाळावें तें नांव । अवघें वाव असे तें ॥ध्रु.॥ कुबिर नांव मोळी वाहे । कैसी पाहें फजिती ॥२॥ तुका म्हणे ठुणगुण देखें । उगीं मूर्ख फुंदता ॥३॥
4346
सासुरियां वीट आला भरतारा । इकडे माहेरा स्वभावें चि ॥१॥ सांडवर कोणी न धरिती हातीं । प्रारब्धाची गति भोगूं आतां ॥२॥ न व्हावी ते जाली आमुची भंडाई । तुका म्हणे काई लाजों आतां ॥३॥
4347
साही शास्त्रां अतिदुरी तो परमात्मा श्रीहरि । तो दशरथाचे घरीं क्रीडतो राम ॥१॥ शिवाचें निजदेह वाल्मीकाचें निजगुहे । तो भिल्लटीचीं फळें खाय श्रीराम तो ॥ध्रु.॥ योगियांचे मनीं नातुडे चिंतनीं । वानरांचे कानीं गोष्टी सांगे ॥२॥ चरणीं शिळा उद्धरी नामें गणिका तारी । तो कोळिया घरीं पाहुणा राम ॥३॥ क्षण एक सुरवरा नातुडे नमस्कारा । तो रिसा आणि वानरा क्षम दे राम ॥४॥ राम सांवळा सगुण राम योगियाचें ध्यान । राम राजीवलोचन तुका चरण वंदितो ॥५॥
4348
साहोनियां टांकीघाये । पाषाण देव चि जाला पाहें ॥१॥ तया रीती दृढ मन । करीं साधाया कारण ॥ध्रु.॥ बाण शस्त्र साहे गोळी । सुरां ठाव उंच स्थळीं ॥२॥ तुका म्हणे सती । अग्न न देखे ज्या रीती ॥३॥
4349
साहोनियां टोले उरवावें सार । मग अंगीकार खर्‍या मोलें ॥१॥ भोगाचे सांभाळीं द्यावें किळवर । संचित चि थार मोडूनियां ॥ध्रु.॥ महत्वाचे ठायीं भोगावी अप्रतिष्ठा । विटवावें नष्टां पंचभूतां ॥२॥ तुका म्हणे मग कैंचा संवसार । जयाचा आदर तें चि व्हावें ॥३॥
4350
सिंचन करितां मूळ । वृक्ष वोल्हावे सकळ ॥१॥ नको पृथकाचे भरी । पडों एक मूळ धरीं ॥ध्रु.॥ पाणचोर्‍याचें दार । वरिल दाटावें तें थोर ॥२॥ वस्व जाला राजा । मग आपुल्या त्या प्रजा ॥३॥ एक चिंतामणी । फिटे सर्व सुखधणी ॥४॥ तुका म्हणे धांवा । आहे पंढरिये विसांवा ॥५॥
4351
सिंदळीचे सोर चोराची दया । तो ही जाणा तया संवसर्गी ॥१॥ फुकासाटीं भोगे दुःखाचा वाटा । उभारोनी कांटा वाटेवरी ॥ध्रु.॥ सर्प पोसूनियां दुधाचा नास । केलें थीता विष अमृताचें ॥२॥ तुका म्हणे यासी न करितां दंडण । पुढिल खंडण नव्हे दोषा ॥३॥
4352
सिंदळीसी नाहीं पोराची पैं आस । सांटविल्याबीजास काय करी ॥१॥ अथवा सेतीं बीज पेरिलें भाजोन । सारा देइल कोण काका त्याचा ॥२॥ तुका म्हणे नाहीं खायाची ते चाड । तरि कां लिगाड करुनी घेतोस ॥३॥
4353
सिकविला तैसा पढों जाणे पुसा । कैंची साच दशा तैसी अंगीं । स्वप्नींच्या सुखें नाहीं होत राजा । तैसा दिसे माझा अनुभव ॥१॥ कासया हा केला जिहुवे अळंकार । पायांसी अंतर दिसतसे ॥ध्रु.॥ दर्पणींचें धन हातीं ना पदरीं । डोळां दिसें परी सत्याचिये । आस केली तरी लाळ चि घोंटावी । ठकाठकी तेवीं दिसतसे ॥२॥ कवित्वें रसाळ वदविली वाणी । साक्ष ही पुराणीं घडे ऐसी । तुका म्हणे गुरें राखोनि गोंवारी । माझीं म्हणे परि लाभ नाहीं ॥३॥
4354
सिणलेती सेवकां देउनि इच्छादान । केला अभिमान अंगीकारा ॥१॥ अहो दीनानाथा आनंदमूर्ती । तुम्हांसि शोभती ब्रीदें ऐसीं ॥ध्रु.॥ बहुतांनीं विनविलें बहुतां प्रकारीं । सकळां ठायीं हरी पुरलेती ॥२॥ तुका म्हणे अगा कुटुंबवत्सळा । कोण तुझी लीळा जाणे ऐसी ॥३॥
4355
सिणलों दातारा करितां वेरझारा । आतां सोडवीं संसारापासोनियां ॥१॥ न सुटे चि बाकी नव्हे झाडापाडा । घातलोंसें खोडा हाडांचिया ॥ध्रु.॥ मायबापें माझीं जीवाचीं सांगाती । तीं देतील हातीं काळाचिया ॥२॥ पडताळूनि सुरी बैसली सेजारीं । यमफासा करीं घेऊनिया ॥३॥ पाठी पोटीं एकें लागलीं सरसीं । नेती नरकापाशीं ओढूनियां ॥४॥ जन साहेभूत असे या सकळां । मी एक निराळा परदेशी ॥५॥ कोणा काकुलती नाहीं कोणे परी । तुजविण हरी कृपाळुवा ॥६॥ तुका म्हणे मज तुझाची भरवसा । म्हणऊनि आशा मोकलिली ॥७॥
4356
सिद्ध करूनियां ठेविलें कांडण । मज सांगातीण शुद्ध बुद्धि गे ॥१॥ आठव हा धरीं मज जागें करीं । मागिले पाहारीं सेवटिचा गे ॥ध्रु.॥ सम तुकें घाव घालीं वो साजणी । मी तुजमळिणी जंव मिळे ॥२॥ एक कशी पाखडी दुसरी निवडी । निःशेष तिसडी ओज करी ॥३॥ सरलें कांडण पाकसद्धि करी । मेळवण क्षिरीसाकरेचें ॥४॥ उद्धव अक्रूर बंधु दोघेजण । बाप नारायण जेवणार ॥५॥ तुका म्हणे मज माहेरीं आवडी । म्हणोनि तांतडी मूळ केलें ॥६॥
4357
सिद्धीचा दास नव्हें श्रुतीचा अंकिला । होईंन विठ्ठला सर्व तुझा ॥१॥ सर्वकाळ सुख आमच्या मानसीं । राहिलें जयासी नास नाहीं ॥ध्रु.॥ नेणें पुण्य पाप न पाहें लोचनीं । आणिका वांचूनि पांडुरंगा ॥२॥ न करीं आस मुक्तीचे सायास । भक्तिप्रेमरस सांडूनियां ॥३॥ गर्भवासीं धाक नाहीं येतां जातां । हृदयीं राहतां नाम तुझें ॥४॥ तुका म्हणे जालों तुझा चि अंकिला । न भें मी विठ्ठला कळिकाळासी ॥५॥
4358
सिळे खातां आला वीट । सुनें धीट पावि धरी ॥१॥ कान्होबा ते जाणे खूण । उन उन घास घाली ॥ध्रु.॥ आपुलिये ठायींचे घ्यावें । लाड भावें पाळावा ॥२॥ तुका म्हणे मी जुनाट । मोहो आट परतला ॥३॥
4359
सीण भाग हरे तेथींच्या निरोपें । देखिलिया रूप उरी नुरे ॥१॥ इंद्रियांची धांव होईंल कुंटित । पावेल हें चित्ती समाधान ॥ध्रु.॥ माहेर आहेसें लौकिकीं कळावें । निढळ बरवें शोभा नेदी ॥२॥ आस नाहीं परी उरी बरी वाटे । आपलें तें भेटे आपणासी ॥३॥ तुका म्हणे माझी अविट आवडी । खंडण तांतडी होऊं नेदीं ॥४॥
4360
सुंदर अंगकांती मुखें भाळ सुरेख । बाणली उटी अंगीं टिळा साजिरी रेख । मस्तकीं मुगुट कानीं कुंडलां तेज फांके । आरक्त दंत हिरे कैसे शोभले निके ॥१॥ जय देवा चुतर्भुजा जया लावण्यतेजा । आरती ओवाळीन भवतारिया हा वोजा । जय. ॥ध्रु.॥ उदार जुंझार हा जया वाणिती श्रुति । परतल्या नेति म्हणती तयां न कळे गति । भाट हा चतुर्मुखें अनुवाद करिती । पांगलीं साही अठरा रूप न गति ॥२॥ ऐकोनि रूप ऐसें तुजलागीं धुंडिती । बोडके नग्न एक निराहार ईति । साधनें योग नाना तपें दारुण किती । सांडिलें सुख दिली संसारा शांती ॥३॥ भरूनि माजी लोकां तिहीं नांदसि एक । कामिनी मनमोहना रूप नाम अनेक । नासति नाममात्रें भवपातकें शोक । पाउलें वंदिताती सिद्ध आणि साधक ॥४॥ उपमा द्यावयासी दुजें काय हें तुज । तत्वासि तत्वसार मूळ जालासी बीज । खेळसि बाळलीळा अवतार सहज । विनवितो दास तुका कर जोडोनि तुज ॥५॥
4361
सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥१॥ तुळसीचे हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि रूप ॥ध्रु.॥ मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥२॥ तुका म्हणे माझें हें चि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥३॥
4362
सुंदर मुख साजिरें । कुंडलें मनोहर गोमटीं वो । नागर नाग खोपा । केशर कस्तुरी मळवटीं वो । विशाळ व्यंकट नेत्र । वैजयंती तळपे कंठीं वो । कास पीतांबराची । चंदन सुगंध साजे उटी वो ॥१॥ अतिबरवंटा बाळा । आली सुलक्षणीं गोंधळा वो । राजस तेजोराशी । मिरवी शिरोमणी वेल्हाळा वो । कोटि रविशशिप्रभा । लोपल्या सकळा वो । न कळे ब्रम्हादिकां । अनुपम्य इची लीळा वो ॥ध्रु.॥ सावळी सकुमार । गोरी भुजा शोभती चारी वो । सखोल वक्षस्थळ । सुढाळ पदक झळके वरी वो । कटीं क्षुद्र घंटिका । शब्द करिताती माधुरी वो । गर्जत चरणीं वाकी । अभिनव संगीत नृत्य करी वो ॥२॥ अष्टांगें मंडित काय । वर्णावी रूपठेवणी वो । शोधिव सुंदर रसाची ओतिली । सुगंध लावण्यखाणी वो । सर्वकळासंपन्न । मंजुळ बोले हास्यवदनीं वो । बहु रूपें नटली । आदिशक्ति नारायणी वो ॥३॥ घटस्थापना केली । पंढरपुरमहानगरीं वो । अस्मानी मंडप दिला । तिन्ही ताळांवरी वो । आरंभिला गोंधळ इनें । चंद्रभागेतिरीं वो । आली भक्तिकाजा । कृष्णाबाई योगेश्वरी वो ॥४॥ तेहतिस कोटि देव । चौंडा अष्ट कोटि भैरव वो । आरत्या कुरवंड्या । करिती पुष्पांचा वरुषाव वो । नारद तुंबर गायन । ब्रम्हानंद करिती गंधर्व वो। वंदी चरणरज तेथें । तुकयाचा बंधव वो ॥५॥
4363
सुकलियां कोमां अत्यंत जळधर । तेणें च प्रकार न्याय असे ॥१॥ न चलें पाउलीं सांडीं गरुडासन । मनाचें हो मन त्वरेलागीं ॥२॥ तुका म्हणे भूक न साहावे बाळा । जीवनांची कळा ओढलीसे ॥३॥
4364
सुकाळ हा दिवसरजनी । नीत धणी नवी च ॥१॥ करुण सेवूं नानापरी । राहे उरी गोडीनें ॥ध्रु.॥ सरे ऐसा नाहीं झरा । पंक्ती करा समवेत ॥२॥ तुका म्हणे बरवा पान्हा । कान्हाबाईं माउलीचा ॥३॥
4365
सुख नाहीं कोठें आलिया संसारीं । वांया हांवभरी होऊं नका ॥१॥ दुःखबांदवडी आहे हा संसार । सुखाचा विचार नाहीं कोठें ॥ध्रु.॥ चवदा कल्पेंवरी आयुष्य जयाला । परी तो राहिला ताटीखालीं ॥२॥ तुका म्हणे वेगीं जाय सुटोनियां । धरूनि हृदयामाजी हरि ॥३॥
4366
सुख पाहतां जवापाडें । दुःख पर्वता एवढें ॥१॥ धरीं धरीं आठवण । मानीं संताचें वचन ॥ध्रु.॥ नेलें रात्रीनें तें अर्धें । बाळपण जराव्याधें ॥२॥ तुका म्हणे पुढा । घाणा जुंती जसी मूढा ॥३॥
4367
सुख या संतसमागमें । नित्य दुनावे तुझिया नामें । दहन होती सकळ कर्में । सर्वकाळ प्रेमें डुलतसों ॥१॥ म्हणोनि नाहीं कांहीं चिंता । तूं चि आमुचा मातापिता । बहिणी बंधु आणि चुलता । आणिकां गोतां सर्वांठायीं ॥२॥ ऐसा हा कळला निर्धार । मा माझा तुज न पडे विसर । अससी देऊनियां धीर । बाह्य अभ्यंतर मजजवळा ॥३॥ दुःख तें कैसें नये स्वप्नासी । भुक्तिमुक्ति जाल्या कामारी दासी । त्यांचें वर्म तूं आम्हांपाशीं । सुखें राहिलासी प्रेमाचिया ॥४॥ जेथें तुझ्या कीर्तनाचा घोष । जळती पापें पळती दोष । काय तें उणें आम्हां आनंदास । सेवूं ब्रम्हरस तुका म्हणे ॥५॥
4368
सुख वाटे तुझे वर्णितां पवाडे । प्रेम मिठी पडे वदनासी ॥१॥ व्याले दोन्ही पक्षी एका वृक्षावरी । आला दुराचारी पारधी तो ॥ध्रु.॥ वृक्षाचिया माथां सोडिला ससाना । धनुष्यासि बाणा लावियेलें ॥२॥ तये काळीं तुज पक्षी आठविती । धांवें गा श्रीपती मायबापा ॥३॥ उडोनियां जातां ससाना मारील । बैसतां विंधील पारधी तो ॥४॥ ऐकोनियां धांवा तया पिक्षयांचा । धरिला सर्पाचा वेश वेगीं ॥५॥ डंखोनि पारधी भुमीसि पाडिला । बाण तो लागला ससान्यासी ॥६॥ ऐसा तूं कृपाळु आपुलिया दासा । होसील कोंवसा संकटींचा ॥७॥ तुका म्हणे तुझी कीर्ति त्रिभुवना । वेदाचिये वाणी वर्णवेना ॥८॥
4369
सुख वाटे परी वर्म । धर्माधर्म न कळे ॥१॥ गायें नाचें एवढें जाणें । विठ्ठल म्हणे निर्लज्ज ॥ध्रु.॥ अवघें माझें एवढें धन । साधन ही सकळ ॥२॥ तुका म्हणे, पायां पडें । तुमच्या कोडें संतांच्या ॥३॥
4370
सुख सुखा भेटे । मग तोडिल्या न तुटे ॥१॥ रविरिश्मकळा । नये घालितां पैं डोळां ॥ध्रु.॥ दुरि तें जवळी । स्नेहें आकाशा कवळी ॥२॥ तुका म्हणे चत्ति । माझें पायीं अखंडित ॥३॥
4371
सुख सुखा विरजण जालें । तें मथलें नवनीत ॥१॥ हाले डोले हरुषे काया । निवती बाह्या नयन ॥ध्रु.॥ प्रबल तो नारायण । गुणें गुण वाढला ॥२॥ तुका म्हणे भरली सीग । वरी मग वोसंडे ॥३॥
4372
सुख हें नावडे आम्हां कोणा बळें । नेणसी अंधळें जालीशी तूं ॥१॥ भूक तान कैसी राहिली निश्चळ । खुंटलें चपळ मन ठायीं ॥ध्रु.॥ द्रव्य जीवाहूनि आवडे या जना । आम्हांसी पाषाणाहूनि हीन ॥२॥ सोइरे सज्जन जन आणि वन । अवघें समान काय गुणें ॥३॥ तुका म्हणे आम्हां जवळी च आहे । सुख दुःख साहे पांडुरंग ॥४॥
4373
सुखरूप ऐसें कोण दुजें सांगा । माझ्या पांडुरंगा सारिकें तें ॥१॥ न लगे हिंडणें मुंडणें ते कांहीं । साधनाची नाहीं आटाआटी ॥ध्रु.॥ चंद्रभागे स्नान विध तो हरिकथा । समाधान चित्ता सर्वकाळ ॥२॥ तुका म्हणे काला वैकुंठीं दुर्लभ । विशेष तो लाभ संतसंग ॥३॥
4374
सुखरूप चाली । हळूहळू उसंतिली ॥१॥ बाळगोपाळाची वाट । सेवे सेवकता नीट ॥ध्रु.॥ जरी झाला श्रम । तरी पडों नये भ्रम ॥२॥ तुका म्हणे दासां । देव सरिसासरिसा ॥३॥
4375
सुखवाटे ये चि ठायी । बहु पायीं संतांचें ॥१॥ म्हणऊनि केला वास । नाहीं नास ते ठायीं ॥ध्रु.॥ न करवे हाली चाली । निवारिली चिंता हे ॥२॥ तुका म्हणे निवे तनु । रजकणु लागती ॥३॥
4376
सुखाची वसति जाली माझे जीवीं । तुमच्या गोसावी कृपादानें ॥१॥ रूप वेळावेळां आठवीं अंतरीं । बैसोनि जिव्हारीं राहिलें तें ॥ध्रु.॥ विसांवलें मन विठ्ठलें प्रपंचा । गोडावली वाचा येणें रसें ॥२॥ तुका म्हणे कांहीं नाठवेसें केलें । दुसरें विठ्ठलें मज आतां ॥३॥
4377
सुखाचे व्यवहारीं सुखलाभ जाला । आनंदें कोंदला मागें पुढें ॥१॥ संगती पंगती देवासवें घडे । नित्यानित्य पडे तें चि सांचा ॥ध्रु.॥ समर्थचे घरीं सकळ संपदा । नाहीं तुटी कदा कासयाची ॥२॥ तुका म्हणे येथें लाभाचिया कोटी । बहु वाव पोटीं समर्थाचे ॥३॥
4378
सुखाचें ओतलें । दिसे श्रीमुख चांगलें ॥१॥ मनेंधरिला अभिळास । मिठी घातली पायांस ॥ध्रु.॥ होतां दृष्टादृष्टी । तापगेला उठाउठी ॥२॥ तुका म्हणे जाला । लाभें लाभ दुणावला ॥३॥
4379
सुखें खावें अन्न । त्याचें करावें चिंतन ॥१॥ त्याचें दिलें त्यासी पावे । फळ आपणासी फावे ॥ध्रु.॥ आहे हा आधार । नाम त्याचें विश्वंभर ॥२॥ नाही रिता ठाव । तुका म्हणे पसरीं भाव ॥३॥
4380
सुखें घेऊं जन्मांतरें । एक बरें इहलोकीं ॥१॥ पंढरीचे वारकरी । होतां थोरी जोडी हे ॥ध्रु.॥ हरिदासांचा समागम । अंगीं प्रेम विसांवे ॥२॥ तुका म्हणे हें चि मन । इच्छादान मागतसे ॥३॥
4381
सुखें न मनी अवगुण । दुःख भोगी त्याचें कोण ॥१॥ हें कां ठायींचें न कळे । राती करा झांकुनि डोळे ॥ध्रु.॥ चालोनि आड वाटे । पायीं मोडविले कांटे ॥२॥ तुका म्हणे कोणा । बोल ठेवितो शाहाणा ॥३॥
4382
सुखें वोळंब दावी गोहा । माझें दुःख नेणा पाहा ॥१॥ आवडीचा मारिला वेडा । होय होय कैसा म्हणे भिडा ॥ध्रु.॥ निपट मज न चले अन्न । पायली गहूं सांजा तीन ॥२॥ गेले वारीं तुम्हीं आणिली साकर । सातदी गेली साडेदहा शेर ॥३॥ अखंड मज पोटाची व्यथा । दुधभात साकर तूप पथ्या ॥४॥ दो पाहरा मज लहरी येती । शुद्ध नाहीं पडे सुपती ॥५॥ नीज नये घाली फुलें । जवळीं न साहती मुलें ॥६॥ अंगी चंदन लावितें भाळीं । सदा शूळ माझे कपाळीं ॥७॥ हाड गळोनि आलें मास । माझें दुःख तुम्हां नेणवे कैसें ॥८॥ तुका म्हणे जिता गाढव केला । मेलियावरि नरका नेला ॥९॥
4383
सुखें होतो कोठें घेतली सुती । बांधविला गळा आपुले हातीं ॥१॥ काय करूं बहु गुंतलों आतां । नये सरतां मागें पुढें ॥ध्रु.॥ होतें गांठी तें सरलें येतां । आणीक माथां रीण जालें ॥२॥ सोंकरिलियाविण गमाविलें पिक । रांडापोरें भिके लावियेलीं ॥३॥ बहुतांचीं बहु घेतलीं घरें । न पडे पुरें कांहीं केल्या ॥४॥ तुका म्हणे कांहीं न धरावी आस । जावें हें सर्वस्व टाकोनियां ॥५॥
4384
सुगरणीबाईं थिता नास केला । गुळ तो घातला भाजीमध्यें ॥१॥ क्षीरीमध्यें हिंग दुधामध्यें बोळ । थितें चि वोंगळ कैसें केलें ॥ध्रु.॥ दळण दळोनी भरूं गेली पाळी । भरडोनि वोंगळी नास केला ॥२॥ कापुराचे सांते आणिला लसण । वागवितां सीण दुःख होय ॥३॥ रत्नाचा जोहारी रत्न चि पारखी । येर देखोदेखीं हातीं घेती ॥४॥ तुका म्हणे जरी योग घडे निका । न घडतां थुंका तोंडावरी ॥५॥
4385
सुटायाचा कांहीं पाहातों उपाय । तों हे देखें पाय गोवियेले ॥१॥ ऐसिया दुःखाचे सांपडलों संदी । हारपली बुद्धि बळ माझें ॥ध्रु.॥ प्रारब्ध क्रियमाण संचिताचें । वोढत ठायींचे आलें साचें ॥२॥ विधिनिषेधाचे सांपडलों चपे । एकें एक लोपे निवडेना ॥३॥ सारावें तें वाढे त्याचिया चि अंगें । तृष्णेचिया संगें दुःखी जालों ॥४॥ तुका म्हणे आतां करीं सोडवण । सर्वशक्तिहीन जालों देवा ॥५॥
4386
सुदिन सुवेळ । तुझा गोंधळ वो । पंच प्राण दिवटे । दोनी नेत्रांचे हिलाल वो ॥१॥ पंढरपुरनिवासे । तुझे रंगी नाचत असें वो । नवस पुरवीं माझा । मनिंची जाणोनियां इच्छा वो ॥ध्रु.॥ मांडिला देव्हारा । तुझा त्रिभुवनामाझारी वो । चौक साधियेला । नाभिकळस ठेविला वरी वो ॥२॥ बैसली देवता । पुढें वैष्णवाचें गाणें वो । उद्गारे गर्जती । कंठीं तुळसीचीं दर्शनें वो ॥३॥ स्वानंदाचे ताटीं । धूप दीप पंचारती वो । ओवाळिली माता । विठाबाई पंचभूतीं वो ॥४॥ तुझें तुज पावलें । माझा नवस पुरवीं आतां वो । तुका म्हणे राखें । आपुलिया शरणागता वो ॥५॥
4387
सुधारसें ओलावली । रसना धाली न धाय ॥१॥ कळों नये जाली धणी । नारायणीं पूर्णता ॥ध्रु.॥ आवडे तें तें च यासी । ब्रम्हरसीं निरसें ॥२॥ तुका म्हणे बहुतां परी । करूनि करीं सेवन ॥३॥
4388
सुनियांचा हा चि भाव । आपला ठाव राखावा ॥१॥ दुजियाचा येऊं वारा । नेदूं घरावरी देऊं ॥ध्रु.॥ केली याची फाडाफाडी। तडामोडी क्षेत्राची ॥२॥ पातेजत नाहीं लोकां । तुका देवावांचूनि ॥३॥
4389
सुनियांची आवडी देवा । घेत सेवा नाहीं कांहीं ॥१॥ सिकविलें जवळी बैसों । जेथें असों तेथें चि ॥ध्रु.॥ नेदी दुजें बोलों करूं । गुरुगुरु न साहे ॥२॥ तुका म्हणे कृवाळितां । अंग सत्ता संगाची ॥३॥
4390
सुरवर येती तीर्थे नित्यकाळ । पेंठ त्या निर्मळ चंद्रभागा ॥१॥ साक्षभूत नव्हे सांगितली मात । महिमा अत्यद्भुत वर्णवेना ॥ध्रु.॥ पंचक्रोशीमाजी रीग नाहीं दोषा । जळती आपैसा अघोर ते ॥२॥ निर्विषय नर चतुर्भुज नारी । अवघा घरोघरीं ब्रम्हानंदु ॥३॥ तु का म्हणे ज्यापें नाहीं पुष्पलेश । जा रे पंढरीस घेई कोटि ॥४॥
4391
सुराणीचीं जालों लाडिकीं एकलीं । वडील धाकुलीं आम्ही देवा ॥१॥ म्हणऊनि कांहीं न घडे अव्हेर । गोमटें उत्तर भातुकें ही ॥ध्रु.॥ कांहीं एक नाहीं वंचिलें वेगळें । मुळीचिया मुळें स्थिराविलें ॥२॥ लेवविलीं अंगीं आपुलीं भूषणें । अळंकार लेणें सकळ ही ॥३॥ सारितां न सरे आमुप भांडार । धना अंतपार नाहीं लेखा ॥४॥ तुका म्हणे आम्ही आळवूं आवडी । म्हणऊनी जोडी दाखविली ॥५॥
4392
सुलभ कीर्तनें दिलें ठसावूनि । करितां धरणी उरी कोण ॥१॥ आतां न टळावें केलिया नेमासी । उदाराचा होसी हीन काय ॥ध्रु.॥ एका नेमें कोठें दुसरा पालट । पादिर तो धीट म्हणती त्यासी ॥२॥ तुका म्हणे किती बोलसी उणें । एकाच वचनें खंड करीं ॥३॥
4393
सेंकीं हें ना तेंसें जालें । बोलणें तितुकें वांयां गेलें ॥१॥ स्वयें आपण चि रिता । रडे पुढिलांच्या हिता ॥ध्रु.॥ सुखसागरीं नेघे वस्ती । अंगीं ज्ञानपणाची मस्ती ॥२॥ तुका म्हणे गाढव लेखा । जेथें भेटेल तेथें ठोका ॥३॥
4394
सेंदरीं हें देवी दैवतें । कोण तीं पुजी भुतेंकेतें । आपुल्या पोटा जीं रडतें । मागती शितें अवदान ॥१॥ आपुले इच्छे आणिकां पीडी । काय तें देईल बराडी । कळों ही आली तयाची जोडी । अल्प रोकडी बुद्धी अधरा ॥ध्रु.॥ दासीचा पाहुनरउखतें । धणी देईल आपुल्या हातें । करुणाभाषणउचितें । हें तों रितें सतंत शक्तिहीन ॥२॥ काय तें थिल्लरीचें पाणी । ओठ न भिजे फिटे धणी । सीण तरीं आदीं आवसानीं । क्षोभे पुरश्चरणीं दिलें फळ ॥३॥ विलेपनें बुजविती तोंड । भार खोल वाहाती उदंड । करविती आपणयां दंड । ऐसियास भांड म्हणे देव तो ॥४॥ तैसा नव्हे नारायण । जगव्यापक जनार्दन । तुका म्हणे त्याचें करा चिंतन । वंदूं चरण येती सकळें ॥५॥
4395
सेजेचा एकांत आगीपाशीं कळे । झांकिलिया डोळे अधःपात ॥१॥ राहो अथवा मग जळो अगीमधीं । निवाडु तो आधीं होऊनि गेला ॥ध्रु.॥ भेणें झडपणी नाहीं येथें दुजें । पादरधिटा ओझें हतियारें ॥२॥ तुका म्हणे मज नाहीं जी भरवसा । तोवरि सहसा निवाडु तो ॥३॥
4396
सेत आलें सुगी सांभाळावे चारी कोण । पिका आलें परी केलें पाहिजे जतन ॥१॥ सोंकरीं सोंकरीं विसावा तों वरा । नकोउभें आहे तों ॥ध्रु.॥ गोफणेसी गुंडा घालीं पागोर्‍याच्या नेटें । पळती हाहाकारें अवघीं पांखरांची थाटें ॥२॥ पेटवूनि आगटी राहें जागा पालटूनि । पडिलिया मान बळ बुद्धि व्हावीं दोनी ॥३॥ खळे दानें विश्व सुखी करीं होतां रासी । सारा सारूनियां ज्याचे भाग देई त्यासी ॥४॥ तुका म्हणे मग नाहीं आपुलें कारण । निज आलें हातां भूस सांडिलें निकण ॥५॥
4397
सेत करा रे फुकाचें । नाम विठोबारायाचें ॥१॥ नाहीं वेठी जेवा सारा । जाहाती नाहीं म्हणियारा । सरिक नाहीं रे दुसरा । धनी सारा तुझा तूं ॥ध्रु.॥ जपतप नांगरणी । न लगे आटी दुनवणी ॥२॥ कर्म कुळवणी । न लगे धर्मपाळी दोन्ही ॥३॥ ज्ञानपाभारी ती फणी । न लगे करावी पेरणी ॥४॥ बीज न लगे संचिताचें । पीक पिकलें ठायींचे ॥५॥ नाहीं यमाचें चोरटें । विठ्ठल पागोर्‍याच्या नेटें ॥६॥ पीक न वजे हा भरवसा । करी उद्वेग तो पिसा ॥७॥ सराये सर्व काळ । वांयां न वजे घटिकापळ ॥८॥ प्रेम पिकलें अपार । नाहीं सांटवावया थार ॥९॥ ऐसीये जोडी जो चुकला । तुका म्हणे धिग त्याला ॥१०॥
4398
सेवकासी आज्ञा निरोपासी काम । स्वामीचे ते धर्म स्वामी जाणे ॥१॥ मनाचिये मुळीं रहावें बैसोन । आक्रशावे गुण पायांपाशीं ॥ध्रु.॥ भेटीचे तांतडी करीतसे लाहो । ओंवाळावा देहो ऐसें वाटे ॥३॥ तुका म्हणे माझें करावें कारण । आपुलें जतन ब्रीद कशाला ॥४॥
4399
सेवकासी आज्ञा स्वामीची प्रमाण । जोंवरी हा प्राण जाय त्याचा ॥१॥ आणिकांचा धाक न धरावा मनीं । निरोपावचनीं टळों नये ॥ध्रु.॥ समय सांभाळूनि आगळें उत्तर । द्यावें भेदी वज्र तपायरी ॥२॥ तुका म्हणे तरी म्हणवावें सेवक । खादलें तें हाक अन्न होय ॥३॥
4400
सेवकें करावें सांगितलें काम । सिक्याचा तो धर्म स्वामी राखे ॥१॥ काय देवा नेणों आलें गांढेपण । तुम्ही शक्तिहीन जाले दिसां ॥ध्रु.॥ विष्णुदास आम्ही निर्भर ज्याबळें । तें दिसे या काळें अव्हेरिलें ॥२॥ तुका म्हणे मूळ पाठवा लौकरी । किंवा करूं हरी काय सांगा ॥३॥
4401
सेवकें करावें स्वामीचें वचन । त्यासी हुंतूंपण कामा नये ॥१॥ घेईंल जीव कां सारील परतें । भंगलिया चित्ती सांदी जनां ॥ध्रु.॥ खद्योतें दावावी रवी केवीं वाट । आपुलें चि नीट उसंतावें ॥२॥ तुका म्हणे तो ज्ञानाचा सागर । परि नेंदी अगर भिजों भेदें ॥३॥
4402
सेवट तो भला । माझा बहु गोड जाला ॥१॥ आलों निजांच्या माहेरा । भेटों रखुमाईंच्या वरा ॥ध्रु.॥ परिहार जाला । अवघ्या दुःखाचा मागिल्या ॥२॥ तुका म्हणे वाणी । गेली आतां घेऊं धणी ॥३॥
4403
सेवट तो होती तुझियानें गोड । म्हणऊनि चाड धरीतसों ॥१॥ देऊं भोगाभोग कलिवरचा भार । साहों तुज थार त्याचमधीं ॥ध्रु.॥ तुझ्या बळें कांहीं खटपट काम । वाढवावा श्रम न लगे तो ॥२॥ तुका म्हणे आम्ही चेंपलों या भारें । तुमचें तें खरें देवपण ॥३॥
4404
सेवटासी जरी आलें । तरी जालें आंधळें ॥१॥ स्वहिताचा लेश नाहीं । दगडा कांहीं अंतरीं ॥ध्रु.॥ काय परिसासवें भेटी । खापरखुंटी जालिया ॥२॥ तुका म्हणे अधम जन । अवगुणें चि वाढवी ॥३॥
4405
सेवटींची हे विनंती । पाय चित्तीं रहावे ॥१॥ ऐसे करा कृपादान । तुम्हां मन सन्निध ॥ध्रु.॥ भाग्याविण कैंची भेटी । नव्हे तुटी चिंतनें ॥२॥ तुका म्हणे कळसा आलें । हें विठ्ठलें परिसावें ॥३॥
4406
सेवा ते आवडी उच्चारावें नाम । भेदाभेदकाम निवारूनि ॥१॥ न लगे हालावें चालावें बाहेरी । अवघें चि घरीं बैसलिया ॥ध्रु.॥ देवाचीं च नामें देवाचिये शिरीं । सर्व अळंकारीं समर्पावीं ॥२॥ तुका म्हणे आहे भावें चि संतोषी । वसे नामापाशीं आपुलिया ॥३॥
4407
सेवितों रस तो वांटितों आणिकां । घ्या रे होऊं नका राणभरी ॥१॥ विटेवरी ज्याचीं पाउलें समान । तो चि एक दानशूर दाता ॥ध्रु.॥ मनाचे संकल्प पाववील सिद्धी । जरी राहे बुद्धी याचे पायीं ॥२॥ तुका म्हणे मज धाडिलें निरोपा । मारग हा सोपा सुखरूप ॥३॥
4408
सेवीन उच्छिष्ट लोळेन अंगणीं । वैष्णवां चरणीं होइन जोडा ॥१॥ ऐसें जन्म आतां मज देई देवा । आवडी हे जीवा सर्व काळ ॥ध्रु.॥ त्यांचे चरणरज येती अंगावरी । वंदीत ते शिरीं जाइन मागें ॥२॥ तुका म्हणे येथें राहिलासे भाव । सकळ ही वाव जाणोनियां ॥३॥
4409
सैन्य जन हांसे राया जालें काईं । वासपे तो ठायीं आपणासि ॥१॥ आपणा आपण जयास तीं तैसीं । वैरभाव ज्यांसि भक्ति नाहीं ॥२॥ नाहीं याचा त्याचा भाव एकविध । म्हणउनि छंद वेगळाले ॥३॥ वेगळाल्या भावें ती तया हांसती । तयास दिसती अवघीं हरि ॥४॥ हरिला कंसाचा जीव भाव देवें । द्वेषाचिया भावें तुका म्हणे ॥५॥
4410
सोंगें छंदें कांहीं । देव जोडे ऐसें नाहीं ॥१॥ सारा अवघें गाबाळ । डोळ्या आडील पडळ ॥ध्रु.॥ शुद्ध भावाविण । जो जो केला तो तो सीण ॥२॥ तुका म्हणे कळे । परि होताती अंधळे ॥३॥
4411
सोंवळा होऊं तों वोंवळें जडलें । सांडीमांडी बोलतोंडीं बीजीं ॥१॥ एकसरीं केलीं कळिवरें साटी । आतां नका तुटी पायांसवें ॥ध्रु.॥ संकल्पीं विकल्प पापाचा सुकाळ । रज्जुसर्प मूळ मरणाचें ॥२॥ तुका म्हणे हें तूं ब्रम्हांड चाळिता । मी कां करूं चिंता पांडुरंगा ॥३॥
4412
सोइरे धाइरे दिल्याघेतल्याचे । अंत हें काळीचें नाहीं कोणी ॥१॥ सख्या गोत्रबहिणी सुखाचे संगती । मोकलुनी देती अंतकाळीं ॥ध्रु.॥ आपुलें शरीर आपुल्यासी पारिखें । परावीं होतील नवल काई ॥२॥ तुका म्हणे आतां सोड यांची आस । धरीं रे या कास पांडुरंगा ॥३॥
4413
सोइर्‍यासी करी पाहुणेर बरा । कांडितो ठोंबरा संता साटीं ॥१॥ गाईंसी देखोनी बदबदा मारी । घोडएाची चाकरी गोड वाटे ॥ध्रु.॥ पान फुल नेतो वेश्येसी उदंड । ब्राम्हणासी खांड देऊं नेदी ॥२॥ पर्वकाळीं धर्म न करी नासरी । वेची राजद्वारीं उदंड चि ॥३॥ कीर्त्तना जावया होतसे हींपुष्टी । खेळतो सोंकटीं रात्रंदिवस॥४॥ बाइलेच्या गोता आवडीनें पोसी । मातापितियासाठी दवडितो ॥५॥ तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी । जातो यमपुरी भोगावया ॥६॥
4414
सोडवा सोडवा । सोडवा हो अनंता ॥१॥ तुजविण ऐसा । कोण दुजा प्राणदाता ॥ध्रु.॥ कोणा लाज नेणां ऐसें । आणिकां शरण आम्ही जातां ॥२॥ तुका म्हणे सखया । माझ्या रखुमाईच्या कांता ॥३॥
4415
सोडियेल्या गांठी । दरुषणें कृष्णभेटी ॥१॥ करिती नारी अक्षवाणें । जीवभाव देती दानें ॥ध्रु.॥ उपजल्या काळें । रूपें मोहीलीं सकळें ॥२॥ तुका तेथें वारी । एकी आडोनि दुसरी ॥३॥
4416
सोडियेल्या गाईं नवलक्ष गोपाळीं । सवें वनमाळी चालियेला ॥१॥ सुदीन समय भाग्याचा उदय । चारावया गाईं वनामाजी ॥ध्रु.॥ गाईंगोपाळांच्या संगें चाली हरि । क्रीडा नानापरि खेळताति ॥२॥ काठी कांबळीया मोहरीया पोंवा । सिदोरी गांजिवा खांद्यावरि ॥३॥ गोधनें संवगडे खेळे नानापरी । आले भीमातीरीं वेणुनादा ॥४॥ तेथें उभा ठेला गोपाळांसहित । सिदोरिया सोडीत बैसे तेथें ॥५॥ तुका म्हणे ज्यांनीं आणिल्या भाकरी । नेऊनियां हरीपुढें देती ॥६॥
4417
सोडिला संसार । माया तयावरि फार ॥१॥ धांवत चाले मागें मागें । सुखदुःख साहे अंगे ॥ध्रु.॥ यानें घ्यावें नाम । तीसीकरणें त्याचें काम ॥२॥ तुका म्हणे भोळी । विठ्ठलकृपेची कोंवळी ॥३॥
4418
सोनियांचा कळस । माजी भरिला सुरारस ॥१॥ काय करावें प्रमाण । तुम्ही सांगा संतजन ॥ध्रु.॥ मृत्तिकेचा घट । माजी अमृताचा सांट ॥२॥ तुका म्हणे हित । तें मज सांगावें त्वरित ॥३॥ सेतावर - अभंग ३
4419
सोनियाचें ताट क्षीरीनें भरिलें । भक्षावया दिलें श्वाना लागीं ॥१॥ मुक्ताफळहार खरासि घातला । कस्तुरी सुकराला चोजविली ॥ध्रु.॥ वेदपरायण बधिरा सांगे ज्ञान । तयाची ते खुण काय जाणे ॥२॥ तुका म्हणे ज्याचें तो चि एक जाणे । भक्तीचें महिमान साधु जाणे ॥३॥
4420
सोनें दावी वरी तांबें तयापोटीं । खरियाचे साटीं विकुं पाहे ॥१॥ पारखी तो जाणे तयाचे जीवींचें । निवडी दोहींचें वेगळालें ॥ध्रु.॥ क्षीरा नीरा कैसें होय एकपण । स्वादीं तो चि भिन्न भिन्न काढी ॥२॥ तुका म्हणे थीता नागवला चि खोटा । अपमान मोटा पावईल ॥३॥
4421
सोन्याचे पर्वत करवती पाषाण । अवघे रानोरान कल्पतरू ॥१॥ परि या दुर्लभ विठोबाचे पाय । तेथें हे उपाय न सरती ॥ध्रु.॥ अमृतें सागर भरवे ती गंगा । म्हणवेल उगा राहें काळा ॥२॥ भूत भविष्य कळों येईंल वर्तमान । करवती प्रसन्न रिद्धिसिद्धी ॥३॥ स्थान मान कळों येती योगमुद्रा । नेववेल वारा ब्रम्हांडासी ॥४॥ तुका म्हणे मोक्ष राहे आलीकडे । इतर बापुडें काय तेथें ॥५॥
4422
सोपें वर्म आम्हां सांगितलें संतीं । टाळ दिंडी हातीं घेउनि नाचा ॥१॥ समाधीचें सुख सांडा ओंवाळून । ऐसें हें कीर्तन ब्रम्हरस ॥ध्रु.॥ पुढती घडे चढतें सेवन आगळें । भक्तिभाग्यबळें निर्भरता ॥२॥ उपजों चि नये संदेह चित्तासी । मुक्ति चारी दासी हरिदासांच्या ॥३॥ तुका म्हणे मन पावोनि विश्रांती । त्रिविध नासती ताप क्षणें ॥४॥
4423
सोलीव जें सुख अतिसुखाहुनि । उभें हें अंगणीं वैष्णवांच्या ॥१॥ वृंदावन सडे चौक रंग माळा । नाचे तो सोहोळा देखोनियां ॥ध्रु.॥ भूषणमंडित सदा सर्वकाळ । मुद्रा आणि माळ तुळसी कंठीं ॥२॥ नामओघ मुखीं अमृताचें सार । मस्तक पवित्र सहित रजें ॥३॥ तुका म्हणे मोक्ष भक्तचिया मना । नये हा वासना त्याची करी ॥४॥
4424
सोळा सहस्र होऊं येतें । भरलें रितें आम्हापें ॥१॥ ऐसे तुम्हां ठायाठाव । देव म्हुण संपादे ॥ध्रु.॥ कैची चिरामध्यें चिरे । मना बरें आलें तें ॥२॥ तुका म्हणे पांडुरंगा । अंगलगा भिन्न करा ॥३॥
4425
सोवळा तो जाला । अंगीकार देवें केला ॥१॥ येर करिती भोजन । पोट पोसाया दुर्जन ॥ध्रु.॥ चुकला हा भार । तयाची च येरझार ॥२॥ तुका म्हणे दास । जाला तया नाहीं नास ॥३॥
4426
सोसियेला आटी गर्भवास फेरे । आयुधांचे भारे वागवितां ॥१॥ वाहोनि सकळ आपुलिये माथां । भार दासां चिंता वाहों नेदी ॥२॥ नेदी काळाचिये हातीं सेवकांसि । तुका म्हणे ऐसी ब्रिदावळी ॥३॥
4427
सोसें बहुगर्भवासीं । मेलों असों उपवासीं । नाहीं सखीं ऐसीं । तेथें कोणी भेटलीं ॥१॥ करीं करीं रे स्वहित । देह तंव हे अनित्य । नाहीं दिलें चित्त । सोडवूं मोहापासोनि ॥ध्रु.॥ पाळी तोंडीचिया घांसें । तें चि होय अनारिसें । ज्या नव्हे ऐसें । खेदी परि सोडवीना ॥२॥ तुका म्हणे धनमानें । माझ्या बाटलों मीपणें । नाहीं दिला जनें । देखों लाभें हा लाभ ॥३॥
4428
सोसें वाढे दोष । जाला न पालटे कस ॥१॥ ऐसें बरवें वचन । करितां तें नारायण ॥ध्रु.॥ असे प्रारब्ध नेमें । श्रमुचि उरे श्रम ॥२॥ सुख देते शांती । तुका म्हणे धरितां चित्तीं ॥३॥
4429
सोसें सोसें मारूं हाका । होइल चुका म्हणऊनि ॥१॥ मागें पुढें क्षणभरी । नव्हे दुरी अंतर ॥ध्रु.॥ नाम मुखीं बैसला चाळा । वेळोवेळां पडताळीं ॥२॥ तुका म्हणे सुखी केलें । या विठ्ठलें बहुतांसी ॥३॥
4430
सोसोनि विपत्ती । जोडी दिली तुझे हातीं ॥१॥ त्याचा हा चि उपकार । अंतीं आम्हाशीं वेव्हार ॥ध्रु.॥ नामरूपा केला ठाव । तुज कोण म्हणतें देव ॥२॥ तुका म्हणे हरी । तुज ठाव दिला घरीं ॥३॥
4431
सौरी सुर जालें दुर डौर घेतला हातीं । माया मोह सांडवलें तीही लोकीं जालें सरती ॥१॥ चाल विठाबाई अवघी पांज देई । न धरीं गुज कांहीं वाळवंटीं सांपडतां ॥ध्रु.॥ हिंडोनि चौर्‍यांशी घरें आलें तुझ्या दारा । एक्या रुक्यासाठीं आंचवलें संसारा ॥२॥ लाज मेली शंका गेली नाचों महाद्वारीं । भ्रांति सावलें फिटोनि गेलें आतां कैची उरी ॥३॥ जालें भांडी जगा सांडी नाहीं भीड चाड । घालीन चरणीं मिठी पुरविन जीविंचें तें कोड ॥४॥ तुका म्हणे रुका करी संसारतुटी । आतां तुम्हां आम्हां कैसी जाली जीवे साटीं ॥५॥
4432
स्तवूनियां नरा । केला आयुष्याचा मातेरा ॥१॥ नारायणचिया लोपें । घडलीं अवघीं चि पापें ॥ध्रु.॥ जीव ज्याचें दान । त्याचा खंडूनियां मान ॥२॥ तुका म्हणे वाणी । आइके त्या दोष कानीं ॥३॥
4433
स्तुति करीं जैसा नाहीं अधिकार । न कळे विचार योग्यतेचा ॥१॥ तुमचें मी दास संतांचें दुर्बळ । करूनि सांभाळ राखा पायीं ॥ध्रु.॥ रामकृष्णहरि मंत्र उच्चारणा । आवडी चरणां विठोबाच्या ॥२॥ तुका म्हणे तुमचें सेवितों उच्चिष्ट । क्षमा करीं धीट होऊनियां ॥३॥
4434
स्तुति करूं तरी नव्हे चि या वेदा । तेथें माझा धंदा कोणीकडे ॥१॥ परी हे वैखरी गोडावली सुखें । रसना रस मुखें इच्छीतसे ॥ध्रु.॥ रूप वर्णावया कोठें पुरे मती । रोमीं होती जाती ब्रम्हांडें हीं ॥२॥ तुका म्हणे तूं ऐसा एक साचा । ऐसी तंव वाचा जाली नाहीं ॥३॥
4435
स्तुती अथवा निंदा करावी देवाची । अधम तो वेची व्यर्थ वाणी ॥१॥ आइकोनि होती बहिर हे बोल । वेचूनि ते मोल नरका जाती ॥ध्रु.॥ इह लोकीं थुंका उडे तोंडावरी । करणें अघोरी वास लागे ॥२॥ तुका म्हणे माप वाचेऐसें निकें । भरलें नरकें निंदेसाटीं ॥३॥
4436
स्तुती तरि करूं काय कोणापासीं । कीर्त तरि कैसी वाखाणावी ॥१॥ खोट्या तंव नाहीं अनुवादाचें काम । उरला भ्रम वरि बरा ॥ध्रु.॥ म्हणवावें त्याची खुण नाहीं हातीं । अवकळा फजिती सावकाशें ॥२॥ तुका म्हणे हेंगे तुमचें माझें तोंड । होऊनिया लंड आळवितों ॥३॥
4437
स्त्रिया धन बा हें खोटें । नागवले मोठे मोठे ॥१॥ म्हणोनि सांडा दोनी । सुख पावाल निदानीं ॥ध्रु.॥ सर्वदुःखासी कारण । हीं च दोन्हीचीं प्रमाण ॥२॥ आशा सर्वस्वें सांडावी । तेणें निजपदवी पावावी ॥३॥ देह लोभें नाडला । घाला यमाचा पडला ॥४॥ तुका म्हणे निरापेक्षा । कांहीं न धरावी अपेक्षा ॥५॥
4438
स्त्रिया पुत्र कळत्र हें तंव मायावंत । शेवटींचा अंत नाहीं कोणी ॥१॥ यमाचिये हातीं बांधोनियां देती । भूषणें ही घेती काढूनियां ॥२॥ ऐसिया चोरांचा कैसा हा विश्वास । धरिली तुझी कास तुका म्हणे ॥३॥
4439
स्त्रियांचा तो संग नको नारायणा । काष्ठा या पाषाणामृत्तिकेच्या ॥१॥ नाठवे हा देव न घडे भजन । लांचावलें मन आवरे ना ॥ध्रु.॥ दृष्टिमुखें मरण इंद्रियाच्या द्वारें । लावण्य तें खरें दुःखमूळ ॥२॥ तुका म्हणे जरी अग्नि जाला साधु । परी पावे बाधूं संघष्टणें ॥३॥
4440
स्त्रीपुत्रादिकीं राहिला आदर । विषयीं पडिभर अतिशय ॥१॥ आतां हाता धांवा नारायणा । मज हे वासना अनावर ॥ध्रु.॥ येउनियां आड ठाके लोकलाज । तें हें दिसे काज अंतरलें ॥२॥ तुका म्हणे आम्हां जेथें जेथें गोवा । तेथें तुम्हीं देवा सांभाळावें ॥३॥
4441
स्थिरावली वृित्त पांगुळला प्राण । अंतरींची खुण पावूनियां ॥१॥ पुंजाळले नेत्र जाले अर्धोन्मीळित । कंठ सद्गदित रोमांच आले ॥ध्रु.॥ चित्त चाकाटलें स्वरूपा माझारी । न निघे बाहेरी सुखावलों ॥२॥ सुनीळ प्रकाश उदैजला दिन । अमृताचें पान जीवनकळा ॥३॥ शशिसूर्या जाली जीवें ओंवाळणी । आनंदा दाटली आनंदाची ॥४॥ तुका म्हणे सुखें प्रेमासी डुलत । वीरालों निश्चिंत निश्चिंतीनें ॥५॥
4442
स्मरणाचे वेळे । व्हावें सावध न कळे ॥१॥ पडिलों विषयांचे ओढीं । कोणी न दिसेसें काढी ॥ध्रु.॥ भांडवल माझें । वेच जालें भूमी ओझें ॥२॥ तुका म्हणे कळे । तूं चि धावें ऐसें वेळे ॥३॥
4443
स्मरतां कां घडे नास । विष्णुदास यावरी ॥१॥ ऐसी सीमा जाली जगीं । तरी मी वेगीं अनुसरलों ॥ध्रु.॥ धरिलें तें निवडे आतां । न घडे चित्तावेगळें ॥२॥ तुका म्हणे नाश नाहीं । पुराणें ही गर्जती ॥३॥
4444
स्मशान ते भूमि प्रेतरूप जन । सेवाभक्तिहीन ग्रामवासी ॥१॥ भरतील पोट श्वानाचिया परी । वस्ति दिली घरीं यमदूतां ॥ध्रु.॥ अपूज्य लिंग तेथें अतित न घे थारा । ऐसी वस्ती चोरां कंटकांची ॥२॥ तुका म्हणे नाहीं ठावी स्थिति मती । यमाची निश्चिती कुळवाडी ॥३॥
4445
स्मशानीं आम्हां न्याहालीचें सुख । या नांवें कौतुक तुमची कृपा ॥१॥ नाहीं तरीं वांयां अवघें निर्फळ । शब्द ते पोकळ बडबड ॥ध्रु.॥ झाडें झुडें जीव सोइरे पाषाण । होती तई दान तुम्हीं केलें ॥२॥ तुका म्हणे आतां पाहे अनुभव । घेऊनि हातीं जीव पांडुरंगा ॥३॥
4446
स्वगाअचे अमर इच्छिताति देवा । मृत्युलोकीं व्हावा जन्म आम्हां ॥१॥ नारायणनामें होऊं जिवनमुक्त । कर्तिनीं अनंत गाऊं गीती ॥ध्रु.॥ वैकुंठींचे जन सदा चिंतिताति । कइं येथें येती हरिचे दास ॥२॥ यमधर्म वाट पाहे निरंतर । जोडोनियां कर तिष्ठतसे ॥३॥ तुका म्हणे पावावया पैल पार । नामंत्र सार भाविकासि ॥४॥
4447
स्वप्नींचें हें धन हातीं ना पदरीं । प्रत्यक्ष कां हरि होऊं नये ॥१॥ आजुनि कां करा चाळवाचाळवी । सावकाशें द्यावी सत्य भेटी ॥ध्रु.॥ बोलोनियां फेडा जीवींची काजळी । पाहेन कोमळीं चरणांबुजें ॥२॥ तुका म्हणे माझ्या जीवींचिया जीवा । सारूनियां ठेवा पडदा आतां ॥३॥
4448
स्वप्नींच्या व्यवहारा काळांतर लेखा । जागृतीसि रुका गांठ नाहीं ॥१॥ तेवीं शब्दज्ञानें करिती चावटी । ज्ञान पोटासाटीं विकों नये ॥ध्रु.॥ बोलाची च कढी बोलाचा ची भात । जेवूनियां तृप्त कोण जाला ॥२॥ कागदीं लिहिली नांवाची साकर । चाटितां मधुर केवीं लागे ॥३॥ तुका म्हणे जळो जळो त्याचें ज्ञान। यमपुरी कोण दंड साहे ॥४॥
4449
स्वप्नीचिया गोष्टी । मज धरिलें होतें वेठी । जालिया सेवटीं । जालें लटिकें सकळ ॥१॥ वायां भाकिली करुणा । मूळ पावावया सिणा । राव रंक राणा । कैंचे स्थानावरि आहे ॥ध्रु.॥ सोसिलें तें अंगें । खरें होतें नव्हतां जागें । अनुभव ही सांगे । दुःखें डोळे उघडीले ॥२॥ तुका म्हणे संतीं । सावचित केलें अंतीं । नाहीं तरि होती । टाळी बैसोनि राहिली ॥३॥
4450
स्वयें आपण चि रिता । रडे पुढिलांच्या हिता ॥१॥ सेकीं हें ना तेंसें जालें । बोलणें तितुकें वांयां गेलें ॥ध्रु.॥ सुखसागरीं नेघे वस्ती । अंगीं ज्ञानपणाची मस्ती ॥२॥ तुका म्हणे गाढव लेखा । जेथें भेटेल तेथें ठोका ॥३॥
4451
स्वयें पाक करी । संशय तो चि धरी । संदेहसागरीं । आणीक परी बुडती ॥१॥ जाणे विरळा एक । जालें तेथींचे हें सुख । देखिले बहुतेक । पुसतां वाट चुकले ॥ध्रु.॥ तो चि जाणे सोंवळें । शोधी विकल्पाचीं मुळें । नाचती पाल्हाळें । जे विटाळें कोंडिले ॥२॥ तो चि साधी संधी । सावध त्रिकाळ जो बुद्धी । संदेहाचा संधी । वेठी आणि करियेले ॥३॥ अखंड ते ध्यान । समबुद्धी समाधान । सोंग वांयांविण । ते झांकून बैसती ॥४॥ करणें जयासाटीं । जो नातुडे कवणे आटी । तुका म्हणे साटी । चित्तवित्तेवांचूनि ॥५॥
4452
स्वयें सुखाचे जाले अनुभव । एक एकीपाशीं सांगतील भाव । अवघ्यां अवघा हा कैसा नवलाव । सर्वसाक्ष तेथें चि त्याचा जीव वो ॥१॥ आपआपणाशीं करिती नवल । परि वादावाद न संडिती बोल । एका मेघःशामें जलधर वोल । रसीं उतावळि हृदय सखोल वो ॥ध्रु.॥ एक विषय तो सकळांचा हरि । त्याच्या आवडीनें आवडी इतरीं । अंध बहिर हे प्रेत लोकां चारी । त्यांची कीर्ति गाइली पुराणांतरी वो ॥२॥ स्तुति पराविया मुखें रुचिकर । प्रीतिपात्राच्या गौरवीं आदर । परस्परें हे सादरा सादर । योग सज्जनाच्या सुखा नाहीं पार वो ॥३॥ भक्तिवल्लभ न तुटे चराचरीं । आप्त अनाप्त हे ऐशी ठेवी उरी । दुरी जवळी संचिता ऐसें धरी । रंगा रंगा ऐसें होणें लागे हरि वो ॥४॥ तुका लाधला हें उच्छिष्ट भोजन । आला बाहेरी प्रेमें वोसंडून । पडिलें कानीं त्या जीवाचें जतन । धरियेले एकाभावें हृदयीं चरण वो ॥५॥
4453
स्वल्प वाट चला जाऊं । वाचे गाऊं विठ्ठल ॥१॥ तुम्ही आम्ही खेळीमेळीं । गदा रोळी आनंदें ॥ध्रु.॥ ध्वजा कुंचे गरुडटके । शृंगार निके करोनि ॥२॥ तुका म्हणे हें चि नीट । जवळी वाट वैकुंठा ॥३॥
4454
स्वामिकाज गुरुभक्ति । पितृवचन सेवा पति ॥१॥ हे चि विष्णूची महापूजा । अनुभाव नाहीं दुजा ॥ध्रु.॥ सत्य बोले मुखें । दुखवे आणिकांच्या दुःखें ॥२॥ निश्चयाचें बळ । तुका म्हणे तें च फळ ॥३॥
4455
स्वामित्वाचीं वर्में असोनि जवळी । वाहों जावें मोळी गुणांसवें ॥१॥ काबाडापासूनि सोडवा दातारा । कांहीं नका भारा पात्र करूं ॥ध्रु.॥ धनवंत्याचिये अंगीं सत्ताबळ । व्याधि तो सकळ तोडावया ॥२॥ तुका म्हणे आलें मोड्यासी कोंपट । सांडव्याची वाट विसरावी ॥३॥
4456
स्वामिसेवा गोड । माते बाळकाचें कोड ॥१॥ जेंजें मागावें भातुकें । तेंतें पुरवी कौतुकें ॥ध्रु.॥ खेळविलें कोडें । हरुषें बोले कीं बोबडें ॥२॥ तुका म्हणे लाड । तेथें पुरे माझें कोड ॥३॥
4457
स्वामी तूं ही कैसा न पडसी डोळां । सुंदर सांवळा घवघवीत ॥१॥ चतुर्भुज माळा रुळे एकावळी । कस्तुरी निडळीं रेखिलीसे ॥ध्रु.॥ शंख चक्रा गदा रुळे वैजयंती । कुंडलें तळपती श्रवणीं दोन्ही ॥२॥ तुका म्हणे स्वामी आतां दावीं पाय । पांडुरंग माय कृपावंते ॥३॥
4458
स्वामीचिया सत्ता । आधीं वर्म येतें हाता । पुढती विशेषता । लाभें लाभ आगळा ॥१॥ करीं कवतुकाचे बोल । परि जिव्हाळ्याची ओल । आवडे रसाळ । मायबापा लाडाचें ॥ध्रु.॥ मनें मेळविलें मना । नाहीं अभावी शाहणा । अंतरींच्या खुणा । वरि दिल्या उमटोनि ॥२॥ नाहीं पराश्रमें काळा । अवघ्या जागविल्या वेळा । देवासी निराळा । तुका क्षण न सोडी ॥३॥
4459
स्वामीचें हें देणें । येथें पावलों दर्षणें ॥१॥ करूं आवडीनें वाद । तुमच्या सुखाचा संवाद ॥ध्रु.॥ कळावया वर्म । हा तों पायांचा चि धर्म ॥२॥ तुका म्हणे सिद्धी । हे चि पाववावी बुद्धी ॥३॥
4460
स्वामीच्या सामर्थ्या । चाले बोलिला पुरुषार्थ ॥१॥ पाठी देवाचें हें बळ । मग लाभे हातीं काळ ॥ध्रु.॥ देव ज्यासी साह्य । तेणें केलें सर्व होय ॥२॥ तुका म्हणे स्वामीसत्ता । मग नाहीं भय चित्ता ॥३॥
4461
स्वामीसी संकट पडे जे गोष्टीचें । काय त्या प्रेमाचें सुख मज ॥१॥ दुःखवीना चित्त तुझें नारायणा । कांहीं च मागेना तुजपासीं ॥ध्रु.॥ रिद्धि सिद्धि मोक्ष संपित्त विलास । सोडियेली आस याची जीवें ॥२॥ तुका म्हणे एके वेळे देई भेटी । वोरसोनि पोटीं आलिंगावें ॥३॥
4462
हनुमंत महाबळी । रावणाची दाढी जाळी ॥१॥ तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ॥ध्रु.॥ करोनी उड्डाण । केलें लंकेचें दहन ॥२॥ जाळीयेली लंका । धन्य धन्य म्हणे तुका ॥३॥
4463
हम दास तीन्हके सुनाहो लोकां । रावणमार विभीषण दिईं लंका ॥ध्रु.॥ गोबरधन नखपर गोकुल राखा । बर्सन लागा जब मेंहुं फत्तरका ॥१॥ वैकुंठनायक काल कौंसासुरका । दैत डुबाय सब मंगाय गोपिका ॥२॥ स्तंभ फोड पेट चिरीया कसेपका । प्रल्हाद के लियें कहे भाईं तुकयाका ॥३॥
4464
हमामा रे पोरा हमामा रे । हमामा घालितां ठकलें पोर । करी येरझार चौर्‍याशीची ॥१॥ पहिले पहारा रंगासि आलें । सोहं सोहं सें बार घेतलें । देखोनि गडी तें विसरलें । डाई पडिलें आपणची ॥ध्रु.॥ दुसर्‍या पहारा महा आनंदें । हमामा घाली छंदछंदें । दिस वाडे तों गोड वाटे । परि पुढें नेणे पोर काय होतें तें ॥२॥ तिसर्‍या पहारा घेतला बार । अहंपणे पाय न राहे स्थिर । सोस सोस करितां डाईं पडसी । सत्य जाणें हा निर्धार ॥३॥ चौथ्या पहारा हमामा । घालिसी कांपविसी हातपाय । सुर्‍यापाटिलाचा पोर यम । त्याचे पडलीस डाईं ॥४॥ हमामा घालितां भ्याला तुका । त्यानें सांडिली गड्याची सोई । यादवांचा मूल एक । विठोबा त्यासवें चारितो गाई ॥५॥ गाई - अभंग १
4465
हरि गोपाळांसवें सकळां । भेटे गळ्या गळा मेळवूनी ॥१॥ भाविकें त्यांची आवडी मोठी । सांगे गोष्टी जीविंचिया ॥ध्रु.॥ योगियांच्या ध्याना जो नये । भाकरी त्यांच्या मागोनि खाये ॥२॥ तुका म्हणे असे शाहाणियां दुरी । बोबडियां दास कामारी ॥३॥
4466
हरि तूं निष्ठ‍ निर्गुण । नाहीं माया बहु कठिण । नव्हे तें करिसी आन । कवणें नाहीं केलें तें ॥१॥ घेऊनि हरिश्चंद्राचें वैभव । राज्य घोडे भाग्य सर्व । पुत्र पत्नी जीव । डोंबाघरीं वोपविलीं ॥ध्रु.॥ नळा दमयंतीचा योग । बिघडिला त्यांचा संग । ऐसें जाणे जग । पुराणें ही बोलती ॥२॥ राजा शिबी चक्रवर्ती । कृपाळु दया भूतीं । तुळविलें अंतीं । तुळें मास तयाचें ॥३॥ कर्ण भिडता समरंगणीं । बाणीं व्यापियेला रणीं । मागसी पाडोनी । तेथें दांत तयाचे ॥४॥ बळी सर्वस्वें उदार । जेणें उभारिला कर । करूनि काहार । तो पाताळीं घातला ॥५॥ श्रियाळाच्या घरीं । धरणें मांडिलें मुरारी । मारविलें करीं । त्याचें बाळ त्याहातीं ॥६॥ तुज भावें जे भजती । त्यांच्या संसारा हे गति । ठाव नाहीं पुढती । तुका म्हणे करिसी तें ॥७॥
4467
हरि तैसे हरीचे दास । नाहीं तयां भय मोह चिंता आस । होउनि राहाती उदास । बळकट कांस भक्तीची ॥१॥ धरूनि पाय तजिलें जन । न लगे मान मृत्तिकाधन । कंठीं नाम अमृताचें पान । न लगे आन ऐसें जालें ॥ध्रु.॥ वाव तरी उदंड च पोटीं । धीर सिंधु ऐसे जगजेठी । कामक्रोधा न सुटे मिठी । वेठी तरी गिर्‍हे राबवीती ॥२॥ बळें तरि नांगवती काळा । लीन तरि सकळांच्या तळा । उदार देहासी सकळा । जाणोनि कळा सर्व नेणते ॥३॥ संसार तो तयांचा दास । मोक्ष तें पाहातसे वास । रिद्धीसिद्धी देशटा त्रास । न शिवति यास वैष्णवजन ॥४॥ जन्ममृत्युस्वप्नांसारिखें । आप त्यां न दिसे पारखें । तुका म्हणे अखंडित सुखें । वाणी वदे मुखें प्रेमा अमृताची ॥५॥
4468
हरि म्हणतां गति पातकें नासती । कळिकाळ कांपती हरि म्हणतां ॥१॥ हरि म्हणतां भक्ति हरि म्हणतां मुक्ति । चुके यातायाती हरि म्हणतां ॥ध्रु.॥ तपें अनुष्ठानें न लगती साधनें । तुटती बंधनें हरि म्हणतां ॥२॥ तुका म्हणे भावें जपा हरिचें नाम । मग काळयम शरण तुम्हा ॥३॥
4469
हरि हरि तुम्हीं म्हणा रे सकळ । तेणें मायाजाळ तुटईल ॥१॥ आणिका नका कांहीं गाबाळाचे भरी । पडों येथें थोरी नागवण ॥ध्रु.॥ भावें तुळसीदळ पाणी जोडा हात । म्हणावा पतित वेळोवेळां ॥२॥ तुका म्हणे ही तंव कृपेचा सागर । नामासाटीं पार पाववील ॥३॥
4470
हरिकथे नाहीं । विश्वास ज्याचे ठायीं ॥१॥ त्याची वाणी अमंगळ । कान उंदराचें बीळ ॥ध्रु.॥ सांडुनि हा रस । करिती आणीक सायास ॥२॥ तुका म्हणे पिसीं । वांयां गेलीं किती ऐसीं ॥३॥
4471
हरिकथेची आवडी देवा । करितो सेवा दासांची॥१॥ म्हणोनि हिंडे मागें मागें । घरटी जागे घालितसे ॥ध्रु.॥ निर्लज्ज भोजें नाचत रंगीं । भरतें अंगीं प्रेमाचें ॥२॥ तुका म्हणे विकलें देवें । आपण भावें संवसाटी ॥३॥
4472
हरिकथेवांचून इच्छिती स्वहित । हरिजन चित्ती न घला तेथें ॥१॥ जाईंल भंगोन आपुला विश्वास । होईंल या नास कारणांचा ॥ध्रु.॥ ज्याचिया बैसावे भोजनपंगती । त्याचिया संगती तैसे खावें ॥२॥ तुका म्हणे काय जालेसि जाणते । देवा ही परते थोर तुम्ही ॥३॥
4473
हरिचिया भक्ता नाहीं भयचिंता । दुःखनिवारिता नारायण ॥१॥ न लगे वाहणें संसारउद्वेग । जडों नेदी पांग देवराया ॥ध्रु.॥ असों द्यावा धीर सदा समाधान । आहे नारायण जवळी च ॥२॥ तुका म्हणे माझा सखा पांडुरंग । व्यापियेलें जग तेणें एकें ॥३॥
4474
हरिची हरिकथा नावडे जया । अधम म्हणतां तया वेळ लागे । मनुष्यदेहीं तया नाट लागलें । अघोर साधिलें कुंभपाक ॥१॥ कासया जन्मा आला तो पाषाण । जंत कां होऊन पडिला नाहीं । उपजे मरोनि वेळोवेळां भांड । परिलाज लंड न धरी कांहीं ॥ध्रु.॥ ऐसियाची माता कासया प्रसवली । वर नाहीं घातली मुखावरी । देवधर्मांविण तो हा चांडाळ नर । न साहे भूमि भार क्षणभरी ॥२॥ राम म्हणतां तुझें काय वेचेल । कां हित आपुलें न विचारिसी । जन्मोजन्मींचा होईंल नरकीं । तुका म्हणे चुकी जरी यासी ॥३॥
4475
हरिच्या दासां भये । ऐसें बोलों तें ही नये ॥१॥ राहोनियां आड । उभा देव पुरवी कोड ॥ध्रु.॥ हरिच्या दासां चिंता । अघटित हे वार्ता ॥२॥ खावे ल्यावें द्यावें । तुका म्हणे पुरवावें ॥३॥
4476
हरिच्या दासां सोपें वर्म । सर्व धर्म पाउलें ॥१॥ कडिये देव बाहेर खांदी । वैष्णव मांदी क्रीडेसी ॥ध्रु.॥ सरती येणें आटाआटी । नाहीं तुटी लाभाची ॥२॥ तुका म्हणे समाधान । सदा मन आमुचें ॥३॥
4477
हरिजनाची कोणां न घडावी निंदा । साहात गोविंदा नाहीं त्याचें ॥१॥ रूपा येऊनियां धरी अवतार । भक्तां अभयंकर खळां कष्ट ॥ध्रु.॥ दुर्वास हा छळों आला आंबॠषी । सुदर्शन त्यासी जाळित फिरे ॥२॥ द्रौपदीच्या क्षोभें कौरवांची शांति । होऊनि श्रीपति साहे केलें ॥३॥ न साहे चि बब्रु पांडवां पारिखा । धुडाविला सखा बळिभद्र ॥४॥ तुका म्हणे अंगीं राखिली दुर्गंधि । अश्वत्थामा वधी पांडवपुत्रां ॥५॥
4478
हरिजनीं प्राण विकली हे काया । अंकिला मी तया घरीं जालों ॥१॥ म्हणियें सत्वर करीन सांगतां । घेईन मी देतां शेष त्यांचें ॥ध्रु.॥ आस करूनियां राहेन अंगणीं । उश्चिष्टाची धणी घ्यावयासी ॥२॥ चालतां ते मार्गा चरणीचे रज । उडती सहज घेइन आतां ॥३॥ दुरि त्यांपासूनि न वजें दवडितां । तुका म्हणे लाता घेइन अंगीं ॥४॥
4479
हरिदासाचिये घरीं । मज उपजवा जन्मांतरीं ॥१॥ म्हणसी कांहीं मागा । हें चि देगा पांडुरंगा ॥ध्रु.॥ संतां लोटांगणीं । जातां लाजों नको मनीं ॥२॥ तुका म्हणे अंगीं । शक्ती देई नाचें रंगीं ॥३॥
4480
हरिनामवेली पावली विस्तार । फळीं पुष्पीं भार बोल्हावला ॥१॥ तेथें माझ्या मना होई पक्षिराज । साधावया काज तृप्तीचें या ॥ध्रु. ॥ मुळऴिचया बीजें दाखविली गोडी । लवकर चि जोडी जालियाची ॥२॥ तुका म्हणे क्षणक्षणां जातो काळ । गोडी ते रसाळ अंतरेल ॥३॥
4481
हरिनामाचें करूनि तारूं । भवसिंधुपार उतरलों ॥१॥ फावलें फावलें आतां । पायीं संतां विनटलों ॥ध्रु.॥ हरिनामाचा शस्त्र घोडा । संसार गाढा छेदिला ॥२॥ हरिनामाचीं धनुष्यकांडें । विन्मुख तोंडें कळिकाळ ॥३॥ येणें चि बळें सरते आम्ही । हरिचे नामें लोकीं तिहीं ॥४॥ तुका म्हणे जालों साचे । श्रीविठ्ठलाचे डिंगर ॥५॥
4482
हरिनें माझें हरिलें चित्त । भार वित्त विसरलें ॥१॥ आतां कैसी जाऊं घरा । नव्हे बरा लौकिक ॥ध्रु.॥ पारखियांसी सांगतां गोटी । घरची कुटी खातील ॥२॥ तुका म्हणे निवांत राहीं । पाहिलें पाहीं धणीवरि ॥३॥
4483
हरिबिन रहियां न जाये जिहिरा । कबकी थाडी देखें राहा ॥१॥ क्या मेरे लाल कवन चुकी भई । क्या मोहिपासिती बेर लगाई ॥ध्रु.॥ कोई सखी हरी जावे बुलावन । बार हि डारूं उसपर तन ॥२॥ तुका प्रभु कब देखें पाऊं । पासीं आऊं फेर न जाऊं ॥३॥
4484
हरिभक्त माझे जिवलग सोइरे । हृदयीं पाउले धरिन त्यांचे ॥१॥ अंतकाळीं येती माझ्या सोडवणे । मस्तक बैसणें देइन त्यांसी ॥ध्रु.॥ आणिक सोइरे सज्जन वो कोणी । वैष्णवांवांचोनि नाहीं मज ॥२॥ देइन आळिंगण धरीन चरण । संवसारसीण नासे तेणें ॥३॥ कंठीं तुळशीमाळा नामाचे धारक । ते माझे तारक भवनदीचे ॥४॥ तयांचे चरणीं घालीन मी मिठी । चाड हे वैकुंठीं नाहीं मज ॥५॥ अळसें दंभें भावें हरिचें नाम गाती । ते माझे सांगाती परलोकींचे ॥६॥ कायावाचामनें देइन क्षेम त्यासी । चाड जीवित्वासी नाहीं मज ॥७॥ हरिचें नाम मज म्हणविती कोणी । तया सुखा धणी धणी वरी ॥८॥ तुका म्हणे तया उपकारें बांधलों । म्हणऊनि आलों शरण संतां ॥९॥
4485
हरिरता चपळा नारी । लागवरी न रिघती ॥१॥ अवघ्या अंगें सर्वोत्तम । भोगी काम भोगता ॥ध्रु.॥ वाचा वाच्यत्वासि न ये । कोठें काय करावें ॥२॥ तुका म्हणे देवा ऐशा । देवपिशा उदारा ॥३॥
4486
हरिसुं मिल दे एक हि बेर । पाछे तूं फिर नावे घर ॥१॥ मात सुनो दुति आवे मनावन । जाया करति भर जोबन ॥ध्रु.॥ हरिसुख मोहि कहिया न जाये । तव तूं बुझे आगोपाये ॥२॥ देखहि भाव कछु पकरि हात । मिलाइ तुका प्रभुसात ॥३॥
4487
हरिहर सांडूनि देव । धरिती भाव क्षुल्लकीं ॥१॥ ऐका त्यांची विटंबणा । देवपणा भक्तांची ॥ध्रु.॥ अंगीं कवडे घाली गळां । परडी कळाहीन हातीं ॥२॥ गळां गांठा हिंडें दारीं । मनुष्य परी कुतरीं तीं ॥३॥ माथां सेंदुर दांत खाती । जेंगट हातीं सटवीचें ॥४॥ पूजिती विकट दौंद । पशु सोंड गजाची ॥५॥ ऐशा छंदें चुकलीं वाटा । भाव खोटा भजन ॥६॥ तुका म्हणे विष्णुशिवा । वांचुनि देवा भजती ती ॥७॥
4488
हरिहरां भेद । नाहीं करूं नये वाद ॥१॥ एक एकाचे हृदयीं । गोडी साखरेच्या ठायीं ॥ध्रु.॥ भेदकासी नाड । एक वेलांटी च आड ॥२॥ उजवें वामांग । तुका म्हणे एक चि अंग ॥३॥
4489
हरी तुझी कांति रे सांवळी । मी रे गोरी चांपेकळी । तुझ्या दर्शनें होईन काळी । मग हें वाळी जन मज ॥१॥ उगला राहें न करीं चाळा । तुज किती सांगों रे गोवळा । तुझा खडबड कांबळा । अरे नंदबाळा आलगटा ॥ध्रु.॥ तुझिये अंगीं घुरट घाणी । बहु खासी दुध तुप लोणी । घरिचें बाहेरिल आणोनी । मी रे चांदणी सकुमार ॥२॥ मज ते हांसतील जन । धिःकारिती मज देखोन । अंगीं तुझें देखोनि लक्षण । मग विटंबणा होइल रे ॥३॥ तुज लाज भय शंका नाहीं । मज तंव सज्जन पिशुन व्याही । आणीक मात बोलूं काहीं । मसी भीड नाहीं तुज माझी ॥४॥ वचन मोडी नेदी हात । कळलें न साहे ची मात । तुकयास्वामी गोपीनाथ । जीवन्मुक्त करूनि भोगी ॥५॥
4490
हरी तुझें नाम गाईन अखंड । याविण पाखंड नेणें कांहीं ॥१॥ अंतरीं विश्वास अखंड नामाचा । कायामनेंवाचा देई हें चि ॥२॥ तुका म्हणे आतां देई संतसंग । तुझे नामीं रंग भरो मना ॥३॥
4491
हरीच्या जागरणा । जातां कां रे नये मना ॥१॥ कोठें पाहासील तुटी । आयुष्य वेचे फुकासाटीं ॥२॥ ज्यांची तुज गुंती । ते तों मोकलिती अंतीं ॥२॥ तुका म्हणे बरा । लाभ काय तो विचारा ॥३॥
4492
हरीविण जिणें व्यर्थ चि संसारीं । प्रेत अळंकारीं मिरवत ॥१॥ देवाविण शब्द व्यर्थ चि कारण । भांड रंजवण सभेसि गा ॥ध्रु.॥ आचार करणें देवाविण जो गा । सर्पाचिया अंगा मृदुपण ॥२॥ तुका म्हणे काय बहु बोलों फार । भक्तीविण नर अभाग्य कीं ॥३॥
4493
हळूहळू जाड । होत चालिलें लिगाड । जाणवेल निवाड । न करिसी परी पुढें ॥१॥ मी तों सांगून उतराईं । जालों आतां तुज काईं । कळों येईंल भाईं । तैसा करीं विचार ॥ध्रु.॥ मागें युगें अठ्ठाविस । जालीं दिवसाचा दिवस । मुदल व्याज कासावीस । होसी देवा ये कामें ॥२॥ तुकयाबंधु म्हणे राखें । आतां टाकीं तुझीं तीं सुखें । जगजाहिर ठाउकें । जालें नाहीं खंडलेंसें ॥३॥
4494
हा गे आलों कोणी म्हणे बुडतिया । तेणें किती तया बळ चढे ॥१॥ तुम्ही तंव भार घेतला सकळ । आश्वासिलों बाळ अभयकरें ॥ध्रु.॥ भुकेलियां आस दावितां निर्धार । किती होय धीर समाधान ॥२॥ तुका म्हणे दिली चिंतामणीसाटीं । उचित कांचवटी दंडवत ॥३॥
4495
हा गे माझा अनुभव । भक्तिभाव भाग्याचा ॥१॥ केला ॠणी नारायण । नव्हे क्षण वेगळा ॥ध्रु.॥ घालोनियां भार माथा। अवघी चिंता वारली ॥२॥ तुका म्हणे वचन साटीं । नाम कंठीं धरोनि ॥३॥
4496
हा गे माझे हातीं । पाहा कवळ सांगाती ॥१॥ देवें दिला खातों भाग । कराल तर करा लाग ॥ध्रु.॥ धालें ऐसें पोट । वरी करूनियां बोट ॥२॥ तुका म्हणे घरीं । मग कैं जी या परी ॥३॥
4497
हा गे हा चि आतां लाहो । माझा अहो विठ्ठला ॥१॥ दंडवत दंडवत । वेगळी मात न बोलें ॥ध्रु.॥ वेगळाल्या कोठें भागें । लाग लागें लावावा ॥२॥ तुका म्हणे केल्या जमा । वृत्तितमा भाजूनि ॥३॥
4498
हा चि परमानंद आळंगीन बाहीं । क्षेम देतां ठायीं द्वैत तुटे ॥१॥ बोलायासि मात मन निवे हरषें चित्त । दुणी वाढे प्रीत प्रेमसुख ॥ध्रु.॥ जनांत भूषण वैकुंठीं सरता । फावलें स्वहिता सर्वभावें ॥२॥ तुटला वेव्हार माया लोकाचार । समूळ संसार पारुषला ॥३॥ तुका म्हणे हा विठ्ठल चि व्हावा । आणिकी या जीवा चाड नाहीं ॥४॥
4499
हा चि माझा नेम धरिला हो धंदा । यावरि गोविंदा भेटी द्यावी ॥१॥ हा चि माझा ध्यास सदा सर्वकाळ । न्यावयासी मूळ येसी कधीं ॥ध्रु.॥ डोळियांची भूक पहातां श्रीमुख । आलिंगणे सुख निवती भुजा ॥२॥ बहु चित्त ओढे तयाचिये सोई । पुरला हाकांहीं नवस नेणें ॥३॥ बहुबहु काळ जालों कासावीस । वाहिले बहुवस कळेवर ॥४॥ तुका म्हणे आतां पाडावें हें ओझें । पांडुरंगा माझें इयावरि ॥५॥
4500
हा तों नव्हता दीन । टाळायाच्या ऐसा क्षण ॥१॥ कां जी नेणों राखा हात । कैसें देखावें रडत ॥ध्रु.॥ दावूनियां आस । दूर पळविता कास ॥२॥ तुका म्हणे धांव । घेतां न पुरे चि हांव ॥३॥
4501
हा तों नव्हे कांहीं निराशेचा ठाव । भलें पोटीं वाव राखिलिया ॥१॥ विश्वंभरें विश्व सामाविलें पोटी । तेथें चि सेवटीं आम्ही असों ॥ध्रु.॥ नेणतां चिंतन करितों अंतरीं । तेथें अभ्यंतरीं उमटेल ॥२॥ तुका म्हणे माझा स्वामी अबोलणा । पुरवूं खुणे खुणा जाणतसों ॥३॥
4502
हाकेसरिसी उडी । घालूनियां स्तंभ फोडी ॥१॥ ऐसी कृपावंत कोण । माझे विठाईवांचून ॥ध्रु.॥ करितां आठव । धांवोनियां घाली कव ॥२॥ तुका म्हणे गीती गातां । नामें द्यावी सायुज्यता ॥३॥
4503
हागतां ही खोडी । चळण मोडवितें काडी ॥१॥ ऐसे अनावर गुण । आवरावे काय म्हुण ॥ध्रु.॥ नाहीं जरी संग । तरी बडबडविती रंग ॥२॥ तुका म्हणे देवा । तुमची न घडे चि सेवा ॥३॥
4504
हागिल्याचे सिंके वोणवा चि राहे । अपशकुन पाहे वेडगळ ॥१॥ अत्यंत समय नेणतां अवकळा । येऊं नये बळा सिक धरा ॥ध्रु.॥ भोजनसमयीं ओकाचा आठव । ठकोनियां जीव कष्टी करी ॥२॥ तुका म्हणे किती सांगों उगवून । अभाग्याचे गुण अनावर ॥३॥
4505
हाचि नेम आतां न फिरें माघारी । बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥१॥ घररिघी जालें पट्टराणी बळें । वरिलें सांवळें परब्रम्ह ॥२॥ बळियाचा अंगसंग जाला आतां । नाहीं भय चिंता तुका म्हणे ॥३॥
4506
हातपाय मिळोनि मेळा । चला म्हणती पाहों डोळां ॥१॥ देखणी नव्हे देखती कैसे । सकळांचा देखणा डोळा चि असे ॥२॥ डोऑयाचा डोळा पाहों गेला । तुका म्हणे तो पाहों ठेला ॥३॥
4507
हातीं घेऊनियां काठी । तुका लागला किळवरा पाठी ॥१॥ नेऊनि निजविलें स्मशानीं । माणसें जाळी ते ठाकणीं ॥ध्रु.॥ काडिलें तें ओढें । मागील उपचाराचें पुढें ॥२॥ नाहीं वाटों आला भेव । सुख दुःख भोगिता देव ॥३॥ याजसाटीं हें निर्वाण । केलें कसियेलें मन ॥४॥ तुका म्हणे अनुभव बरा । नाहीं तरी सास्त होय चोरा ॥५॥
4508
हातीं धरिलियाची लाज । देवा असोंदे गा तुज ॥१॥ आहें अमंगळ दुर्बळ । होई दीन तूं दयाळ ॥ध्रु.॥ बाळ सेंबडें मातेसि । काय नावडे तियेसि ॥२॥ तुका म्हणे जाणें । करोनि देहाचें सांडणें ॥३॥
4509
हातीं धरूं जावें । तेणें परतें चि व्हावें ॥१॥ ऐसा कां हो आला वांटा । हीन भाग्याचा करंटा ॥ध्रु.॥ देव ना संसार । दोहीं ठायीं नाहीं थार ॥२॥ तुका म्हणे पीक । भूमि न दे न मिळे भीक ॥३॥
4510
हातीं होन दावी बेना । करिती लेंकीच्या धारणा ॥१॥ ऐसे धर्म जाले कळीं । पुण्य रंक पाप बळी ॥ध्रु.॥ सांडिले आचार । द्विज चाहाड जाले चोर ॥२॥ टिळे लपविती पातडीं । लेती विजारा कातडीं ॥३॥ बैसोनियां तक्तां । अन्नेंविण पिडिती लोकां ॥४॥ मुदबख लिहिणें । तेलतुपावरी जिणें ॥५॥ नीचाचे चाकर । चुकलिया खाती मार ॥६॥ राजा प्रजा पीडी । क्षेत्री दुश्चितासी तोडी ॥७॥ वैश्यशूद्रादिक । हे तों सहज नीच लोक ॥८॥ अवघे बाह्य रंग । आंत हिरवें वरी सोंग ॥९॥ तुका म्हणे देवा । काय निद्रा केली धांवा ॥१०॥
4511
हातींचें न संडावें देवें । शरण आलों जीवें भावें । आपुलें ऐसें म्हणावें । करितों जीवें निंबलोण ॥१॥ बैसतां संतांचे पंगती । कळों आलें कमळापती । आपुलीं कोणी च नव्हती । निश्चय चित्तीं दृढ जाला ॥ध्रु.॥ येती तुझिया भजना आड । दाविती प्रपंचाचें कोड । कनिष्ठीं रुचि ठेऊनि गोड । देखत नाड कळतसे ॥२॥ मरती मेलीं नेणों किती । तो चि लाभ तयाचे संगती । म्हणोनि येतों काकुलती । धीर तो चित्ती दृढ द्यावा ॥३॥ सुखें निंदोत हे जन । न करीं तयांशीं वचन । आदिपिता तूं नारायण । जोडी चरण तुमचे तें ॥४॥ आपलें आपण न करूं हित । करूं हें प्रमाण संचित । तरी मी नष्ट चि पतित । तुका म्हणे मज संत हांसती ॥५॥
4512
हारपल्याची नका चित्ती । धरूं खंती वांयां च ॥१॥ पावलें तें म्हणा देवा । सहज सेवा या नांवें ॥ध्रु.॥ होणार तें तें भोगें घडे । लाभ जोडे संकल्पें ॥२॥ तुका म्हणे मोकळें मन । अवघें पुण्य या नांवें ॥३॥
4513
हारपोनि गेली निशी । निद्रा कैसी न देखों ॥१॥ नारायणीं वसलें घर । निरंतर आनंद ॥ध्रु.॥ अवघा रुधविला ठाव । नेला वाव मी माझें ॥२॥ तुका म्हणे एके ठावीं । असूं नाहीं सीनाभिन्न ॥३॥
4514
हारस आनंदाचा । घोष करा हरिनामाचा । कोण हा दैवाचा । भाग पावे येथील ॥१॥ पुण्य पाहिजे बहुत । जन्मांतरींचें संचित । होईल करीत । आला अधिकारी तो ॥ध्रु.॥ काय पाहातां हे भाई । हरुषें नाचा धरा घाई । पोटभरी कांहीं । घेतां उरी कांहीं ठेवा ॥२॥ जें सुख दृष्टी आहे । तें च अंतरीं जो लाहे । तुका म्हणे काय । कळिकाळ तें बापुडें ॥३॥
4515
हालवूनि खुंट । आधीं करावा बळकट ॥१॥ मग तयाच्या आधारें । करणें अवघें चि बरें ॥ध्रु.॥ सुख दुःख साहे । हर्षामर्षी भंगा नये ॥२॥ तुका म्हणे जीवें । आधीं मरोनि राहावें ॥३॥
4516
हासों रुसों आतां वाढवूं आवडी । अंतरींची गोडी अवीट ते ॥१॥ सेवासुखें करूं विनोदवचन । आम्ही नारायण एकाएकीं ॥२॥ तुका म्हणे आम्ही जालों उदासीन । आपुल्या आधीन केला पति ॥३॥
4517
हित जाणे चित्त । कळों येतसे उचित ॥१॥ परिहार ते संपादनी । सत्य कारण कारणीं ॥ध्रु.॥ वरदळ तें नुतरे कसीं । आगीमध्यें तें रसीं ॥२॥ तुका म्हणे करुनी खरें । ठेवितां तें पुढें बरें ॥३॥
4518
हित तें हें एक राम कंठीं राहे । नाठविती देहभाव देही ॥१॥ हा चि एक धर्म निज बीजवर्म । हें चि जाळी कर्में केलीं महा ॥ध्रु.॥ चित्ती राहे पायीं रूप बैसे डोळां । जीवें कळवळा आवडीचा ॥२॥ अखंड न खंडे अभंग न भंगे । तुका म्हणे गंगे मिळणी सिंधु ॥३॥
4519
हित व्हावें तरी दंभ दुरी ठेवा । चित्त शुद्ध सेवा देवाची हे ॥१॥ आवडी विठ्ठल गाईंजे एकांतीं । अलभ्य ते येती लाभ घरा ॥ध्रु.॥ आणीकां अंतरीं निदावी वसति । करावी हे शांती वासनेची ॥२॥ तुका म्हणे बाण हा चि निर्वाणींचा । वाउगी हे वाचा वेचूं नये ॥३॥
4520
हित सांगे तेणें दिलें जीवदान । घातकी तो जाण मनामागें ॥१॥ बळें हे वारावे अधर्म करितां । अंधळें चालतां आडरानें ॥ध्रु.॥ द्रव्य देऊनियां धाडावें तीर्थासी । नेदावें चोरासी चंद्रबळ ॥२॥ तुका म्हणे ऐसें आहे हें पुराणीं । नाहीं माझी वाणी पदरींची ॥३॥
4521
हितावरी यावें । कोणी बोलिलों या भावें ॥१॥ नव्हे विनोदउत्तर । केले रंजवाया चार ॥ध्रु.॥ केली अटाअटी । अक्षरांची देवासाटीं ॥२॥ तुका म्हणे खिजों । नका जागा येथें निजों ॥३॥
4522
हिरण्याक्ष दैत्य मातला जे काळीं । वरदानें बळी शंकराच्या ॥१॥ इंद्रपदराज्य घेतलें हिरोनी । देवा चक्रपाणी म्हणती धांव ॥ध्रु.॥ तइं पांडुरंगा शूकर जालेती । तया दैत्यपती मारविले ॥२॥ तुका म्हणे ज्यांचीं राज्यें त्यांसी दिलीं । ऐसी तूं माउली पांडुरंगा ॥३॥
4523
हिरा ठेवितां ऐरणीं । वांचे मारितां जो घणीं ॥१॥ तोचि मोल पावे खरा । करणीचा होय चुरा ॥ध्रु.॥ मोहरा होय तोचि अंगें । सूत न जळे ज्याचे संगें ॥२॥ तुका म्हणे तोचि संत । सोसी जगाचे आघात ॥३॥
4524
हिरा ठेवितां काळें गाहाण । मोल न तुटे दुकाळीं जाण ॥१॥ तैसे संतजन पाहीं । विनटले श्रीहरिपायीं ॥२॥ तुका म्हणे तैसे भक्त । तयांसी जन हें निंदित ॥३॥
4525
हिरा शोभला कोंदणीं । जडित माणिकांची खाणी ॥१॥ तैसा दिसे नारायण । मुख सुखाचे मंडण ॥ध्रु.॥ कोटि चंद्रलीळा । पूर्णिमेच्या पूर्णकळा ॥२॥ तुका म्हणे दृष्टि धाये । परतोनि माघारी ते न ये ॥३॥
4526
हीं च त्यांचीं पंचभूतें । जीवन भातें प्रेमाचें ॥१॥ कळवळा धरिला संतीं । ते निगुती कैवाड ॥ध्रु.॥ हा च काळ वर्तमान । साधन ही संपत्ती ॥२॥ तुका म्हणे दिवसरातीं । हें चि खाती अन्न ते ॥३॥
4527
हीन माझी याति । वरी स्तुती केली संतीं ॥१॥ अंगीं वसूं पाहे गर्व । माझें हरावया सर्व ॥ध्रु.॥ मी एक जाणता । ऐसें वाटतसे चित्ता ॥२॥ राख राख गेलों वांयां । तुका म्हणे पंढरीराया ॥३॥
4528
हीनवर बीजवर दोघी त्या गडणी । अखंड कहाणी संसाराची ॥१॥ माझे पति बहु लहान चि आहे । खेळावया जाय पोरांसवें ॥ध्रु.॥ माझें दुःख जरी ऐकशील सईं । म्हातारा तो बाईं खोकतसे ॥२॥ खेळे सांजवरी बाहेरी तो राहे । वाट मी पाहें सेजेवरी ॥३॥ पूर्व पुण्य माझें नाहीं वा नीट । बहु होती कष्ट सांगो कांही ॥४॥ जवळ मी जातें अंगा अंग लावूं । नेदी जवळ येऊं कांटाळतो ॥५॥ पूर्व सुकृताचा हा चि बाईं ठेवा । तुका म्हणे देवा काय बोल ॥६॥
4529
हीनसुरबुद्धीपासी । आकृतीसी भेद नाहीं ॥१॥ एक दांडी एक खांदी । पदीं पदीं भोगणें ॥ध्रु.॥ एकाऐसें एक नाहीं । भिन्न पाहीं प्रकृती ॥२॥ तुका म्हणे भूमी खंडे । पीक दंडे जेथें तें ॥३॥
4530
हुंदकी पिसवी हलवी दाढी । मणी वोढी निंदेचे ॥१॥ त्याचें फळ पाकीं यमाचे दंड । घर केलें कुंड कुंभपाक ॥ध्रु.॥ क्रोध पोटीं मांग आणिला अंतरा । भुंकोनि कुतरा जप करी ॥२॥ तुका म्हणे स्नान केलें मळमूत्रें । जेवविलीं पितरें अमंगळें ॥३॥
4531
हुंबरती गाये तयांकडे कान । कैवल्यनिधान देउनि ठाके ॥१॥ गोपाळांची पूजा उच्छिष्ट कवळी । तेणें वनमाळी सुखावला ॥ध्रु.॥ चोरोनियां खाये दुध दहीं लोणी । भावें चक्रपाणि गोविला तो ॥२॥ निष्काम तो जाला कामासी लंपट । गोपिकांची वाट पाहात बैसे ॥३॥ जगदानी इच्छी तुळसीएकदळ । भावाचा सकळ विकिला तो ॥४॥ तुका म्हणे हें चि चैतन्यें सावळें । व्यापुनि निराळें राहिलेंसे ॥५॥
4532
हे चि अनुवाद सदा सर्वकाळ । करुनियां गोपाळकाला सेवूं ॥१॥ वोरसलें कामधेनूचें दुभतें । संपूर्ण आइतें गगनभरी ॥ध्रु.॥ संत सनकादिक गोमट्या परवडी । विभाग आवडी इच्छेचिये ॥२॥ तुका म्हणे मधीं घालूं नारायण । मग नव्हे सीण कोणा खेळें ॥३॥
4533
हे चि तुझी पूजा । आतां करीन केशीराजा ॥१॥ अवघीं तुझींच हें पदें । नमस्कारीन अभेदें ॥ध्रु.॥ न वर्जितदिशा । जाय तेथें चि सरिसा ॥२॥ नव्हे एकदेशी । तुका म्हणे गुणदोषीं ॥३॥
4534
हे चि थोर भक्ति आवडती देवा । संकल्पावी माया संसाराची ॥१॥ ठेविलें अनंतें तैसें चि राह वें । चित्ती असों द्यावें समाधान ॥ध्रु.॥ वाहिल्या उद्वेग दुःख चि केवळ । भोगणें तें फळ संचिताचें ॥२॥ तुका म्हणे घालूं तयावरी भार । वाहूं हा संसार देवा पायीं ॥३॥
4535
हे चि भेटी साच रूपाचा आठव । विसावला जीव आवडीपें ॥१॥ सुखाचें भातुकें करावें जतन । सेविल्या ताहान भूक जाय ॥ध्रु.॥ दुरील जवळी आपण चि होतें । कवळिलें चित्ते जिवापासीं ॥२॥ तुका म्हणे नाम घेतों वेळोवेळां । होतील सकळा शीतळा नाडी ॥३॥
4536
हे चि माझे चित्ती । राहो भावप्रीति । विठ्ठल सुषुप्ती । जागृति स्वप्नासी ॥१॥ आणिक नाहीं तुज मागणें । राज्यचाड संपत्ति धन । जिव्हे सुख तेणें । घेतां देहीं नाम तुझें ॥ध्रु॥ तुझें रूप सर्वाठायीं । देखें ऐसें प्रेम देई । न ठेवावा ठायीं । अनुभव चित्तीचा ॥२॥ जन्ममरणाचा बाध । समुळूनि तुटे कंद । लागो हा चि छंद । हरि गोविंद वाचेसी ॥३॥ काय पालटे दरुषणें । अवघें कोंदाटे चैतन्य । जीवशिवा खंडण । होय ते रे चिंतितां ॥४॥ तुका म्हणे या चि भावें । आम्हीं धालों तुझ्या नामें । सुखें होत जन्म । भलते याती भलतैसीं ॥५॥
4537
हे चि वेळ देवा नका मागें घेऊं । तुम्हांविण जाऊं शरण कोणा ॥१॥ नारायणा ये रे पाहें विचारून । तुजविण कोण आहे मज ॥ध्रु.॥ रात्रहि दिवस तुज आठवूनि आहें । पाहातोसी काये सत्व माझें ॥२॥ तुका म्हणे किती येऊं काकुलती । कांहीं माया चित्ती येऊं द्यावी ॥३॥
4538
हे माझी मिराशी । ठाव तुझ्या पायांपाशीं ॥१॥ याचा धरीन अभिमान । करीन आपुलें जतन ॥ध्रु.॥ देऊनियां जीव । बळी साधिला हा ठाव ॥२॥ तुका म्हणे देवा । जुन्हाट हे माझी सेवा ॥३॥
4539
हें आम्हां सकळा । तुझ्या नामाचें चि बळ ॥१॥ करूं अमृताचें पान । दुजें नेणों कांहीं आन ॥ध्रु.॥ जयाचा जो भोग । सुख दुःख पीडी रोग ॥२॥ तुका म्हणे देवा । तुझे पायीं माझा हेवा ॥३॥
4540
हें का आम्हां सेवादान । देखों सीण विषमाचा ॥१॥ सांभाळा जी ब्रीदावळी । तुम्हीं कां कळीसारिखे ॥ध्रु.॥ शरणागत वैर्‍या हातीं । हे निश्चिंती देखिली ॥२॥ तुका म्हणे इच्छीं भेटी । पाय पोटीं उफराटे ॥३॥
4541
हें चि जतन करा दान । धरुनी चरण राहिलों तो॥१॥ आणीक कांहीं न घलीं भार । बहुत फार सांकडें ॥ध्रु.॥ घ्यावी माझ्या हातें सेवा । हे चि देवा विनवणी ॥२॥ तुका तुमचा म्हणवी दास । तेणें आस पुरवावी ॥३॥
4542
हें चि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥१॥ गुण गाईंन आवडी । हे चि माझी सर्व जोडी ॥ध्रु.॥ न लगे मुक्ति आणि संपदा । संतसंग देई सदा ॥२॥ तुका म्हणे गर्भवासीं । सुखें घालावें आम्हासी ॥३॥
4543
हें चि भवरोगाचें औषध । जन्म जरा तुटे व्याध । आणीक कांहीं नव्हे बाध । करील वध षड्वर्गा ॥१॥ सांवळें रूप ल्यावें डोळां । सा चौ अठरांचा गोळा । पदर लागों नेदी खळा । नाममंत्रमाळा विष्णुसहस्र ॥ध्रु.॥ भोजना न द्यावें अन्न । जेणें चुके अनुपान । तरीं च घेतल्याचा गुण । होईल जाण सत्य भाव ॥२॥ नये निघों आपुलिया घरा । बाहेर लागों नये वारा । बहु बोलणें तें सारा । संग दुसरा वर्जावा ॥३॥ पास तें एक द्यावें वरी । नवनीताची होईल परी । होईल गुसळिलें तें निवारी । सार भीतरी नाहीं तया ॥४॥ न्हायें अनुतापीं पांघरें दिशा । स्वेद निघों दे अवघी आशा । होसिल मागें होतासि तैसा । तुका म्हणे दशा भोगीं वैराग्य ॥५॥
4544
हें चि मागणें विठाबाईं । पायीं ठेवूनियां डोईं ॥१॥ शांति दया अंतःकरणीं । रंगो रामनामीं वाणी ॥ध्रु.॥ मूळ द्वंद्वाचें विघडो । निजानंदीं वृत्ति जडो ॥२॥ तुका म्हणे हरी । आतां आपुलेंसें करीं ॥३॥
4545
हें चि माझे धन । तुमचे वंदावे चरण ॥१॥ येणें भाग्यें असों जीत । एवढें समर्पूनी चित्त ॥ध्रु.॥ सांभाळिलें देवा । मज अनाथा जी जीवा ॥२॥ जोडूनियां कर । तुका विनवितो किंकर ॥३॥
4546
हें चि माझें तप हें चि माझें दान । हें चि अनुष्ठान नाम तुझें ॥१॥ हें चि माझें तीर्थ हें चि माझें व्रत । सत्य हें सुकृत नाम तुझें ॥ध्रु.॥ हा चि माझा धर्म हें चि माझें कर्म । हा चि नित्यनेम नाम तुझें ॥२॥ हा चि माझा योग हा चि माझा यज्ञ । हें चि जपध्यान नाम तुझें ॥३॥ हें चि माझें ज्ञान श्रवण मनन । हें चि निजध्यासन नाम तुझे ॥४॥ हा चि कुळाचार हा चि कुळधर्म । हा चि नित्यनेम नाम तुझें ॥५॥ हा माझा आचार हा माझा विचार । हा माझा निर्धार नाम तुझें ॥६॥ तुका म्हणे दुजें सांगायासि नाहीं । नामेंविण कांहीं धनवित्त ॥७॥
4547
हें चि याच्या ऐसें मागावें दान । वंदूनि चरण नारायणा ॥१॥ धीर उदारींव निर्मळ निर्मत्सर । येणें सर्वेश्वर ऐसें नांव ॥ध्रु.॥ हा चि होईंजेल याचिया विभागें । अनुभववी अंगें अनुभववील ॥२॥ जोडे तयाचे कां न करावे सायास । जाला तरि अळस दीनपणे ॥३॥ पावल्यामागें कां न घलावी धांव । धरिल्या तरि हांव बळ येतें ॥४॥ तुका म्हणे घालूं खंडीमध्ये टांक । देवाचें हें एक करुनी घेऊं ॥५॥
4548
हें चि वारंवार । पडताळुनी उत्तर ॥१॥ करितों पायांसी विनंती । नुपेक्षावें कमळापती ॥ध्रु.॥ गंगोदकें गंगे । अर्घ्य द्यावें पांडुरंगे ॥२॥ जोडोनियां हात । करी तुका प्रणिपात ॥३॥
4549
हें चि सर्वसुख जपावा विठ्ठल । न दवडावा पळ क्षण वांयां ॥१॥ हें चि एक सर्वसाधनांचें मूळ । आतुडे गोपाळ येणें पंथें ॥ध्रु.॥ न लगती कांहीं तपांचिया रासी । करणें वाराणसी नाना तीर्थी ॥२॥ कल्पना हे तळि देहीं अभिमान । नये नारायण जवळी त्यांच्या ॥३॥ तुका म्हणे नामें देव नेदी भेटी । म्हणे त्याचे होंटीं कुष्ट होय ॥४॥
4550
हें चि सुख पुढे मागतों आगळें । आनंदाचीं फळें सेवादान ॥१॥ जन्मजन्मांतरीं तुझा चि अंकिला । करूनि विठ्ठला दास ठेवीं ॥ध्रु.॥ दुजा भाव आड येऊं नेदीं चत्तिा । करावा अनंता नास त्याचा ॥२॥ अभय देऊनि करावें सादर । क्षण तो विसर पडों नेदीं ॥३॥ तुका म्हणे आम्ही जेजे इच्छा करूं । ते ते कल्पतरू पुरविसी ॥४॥
4551
हें तों एक संतांठायीं । लाभ पायीं उत्तम ॥१॥ म्हणवितां त्याचे दास । पुढें आस उरेना ॥ध्रु.॥ कृपादान केलें संतीं । कल्पांतीं ही सरेना ॥२॥ तुका म्हणे संतसेवा । हा चि हेवा उत्तम॥३॥
4552
हें तों टाळाटाळीं । परि भोवताहे कळी ॥१॥ बरें नव्हेल शेवटीं । भय असों द्यावें पोटीं ॥ध्रु.॥ मुरगाळिला कान । समांडिलें समाधान ॥२॥ धन्य म्हणे आतां । येथें नुधवा माथां ॥३॥ अबोलणा तुका । ऐसें कांहीं लेखूं नका ॥४॥
4553
हें तों वाटलें आश्चर्य । तुम्हां न धरवे धीर ॥१॥ माझा फुटतसे प्राण । धांवा धांवा म्हणऊन ॥ध्रु.॥ काय नेणों दिशा । जाल्या तुम्हांविण ओशा ॥२॥ तुका म्हणे कां गा । नाइकिजे पांडुरंगा ॥३॥
4554
हें ही ऐसें तें ही ऐसें । उभय पिसें अविचार ॥१॥ अभिमानाचे ठेलाठेलीं । मधीं जाली हिंपुष्टी ॥ध्रु.॥ धीरा शांती ठाव नुरे । हा चि उरे आबाळ्या ॥२॥ कौतुक हें पाहे तुका । कढतां लोकां अधनि ॥३॥
4555
हेंदर्‍याचें भरितां कान । हलवी मान भोंक रितें ॥१॥ नाहीं मी येथें सांगों स्पष्ट । भावें नष्ट घेत नाहीं ॥ध्रु.॥ अवगुणी वाटलें चित्त । तया हित आतळे ना ॥२॥ तुका म्हणे फजितखोरा । म्हणतां बरा उगा रहा ॥३॥
4556
हेचि वादकाची कळा । नाहीं येऊं येत बळा ॥१॥ धीर करावा करावा । तरी तो आहे आम्हां देवा ॥ध्रु.॥ रिघावें पोटांत । पायां पडोन घ्यावा अंत ॥२॥ तुका म्हणे वरि । गोडा आणावा उत्तरीं ॥३॥
4557
हो का पुत्र पत्नी बंधु । त्यांचा तोडावा संबंधु ॥१॥ कळों आलें खट्याळसें । शिवों नये लिंपों दोषें ॥ध्रु.॥ फोडावें मडकें । मेलें लेखीं घायें एकें ॥२॥ तुका म्हणे त्यागें । विण चुकीजेना भोगें ॥३॥
4558
हो कां दुराचारी । वाचे नाम जो उच्चारी ॥१॥ त्याचा दास मी अंकित । कायावाचामनेंसहित ॥ध्रु.॥ नसो भाव चित्तीं । हरिचे गुण गातां गीतीं ॥२॥ करी अनाचार । वाचे हरिनामउच्चार ॥३॥ हो कां भलतें कुळ । शुचि अथवा चांडाळ ॥४॥ म्हणवी हरिचा दास । तुका म्हणे धन्य त्यास ॥५॥
4559
हो कां नर अथवा नारी । ज्यांचा आवडता हरि ॥१॥ ते मज विठोबासमान । नमूं आवडी ते जन ॥ध्रु.॥ ज्याचें अंतर निर्मळ । त्याचें सबाह्य कोमळ ॥२॥ तुका म्हणे भावें । जिव्हें प्रेम वोसंडावें ॥३॥
4560
होइन खडे गोटे । चरणरज साने मोठे । पंढरीचे वाटे । संतचरणीं लागेन ॥१॥ आणीक काय दुजें । म्या मागणें तुजपासीं । अविट तें सुख । भय नास नाहीं ज्यासी ॥ध्रु.॥ होइन मोचे वाहणा । पायीं सकळां संतजनां । मांजर सुकर सुणा । जवळी शेष घ्यावया ॥२॥ सांडोवा पायरी । वाहळ बावी गंगातिरी । होइन तयावरी । संतसज्जन चालती ॥३॥ लागें संतां पांयीं । ऐसा ठेवीं भलता ठायीं । तुका म्हणे देई । धाक नाहीं जन्माचा ॥४॥
4561
होइल कृपादान । तरी मी येईंन धांवोन ॥१॥ होती संतांचिया भेटी । आनंदें नाचों वाळवंटीं ॥ध्रु.॥ रिघेन मातेपुढें । स्तनपान करीन कोडें ॥२॥ तुका म्हणे ताप । हरती देखोनियां बाप ॥३॥
4562
होइल तरि पुसापुसी । उत्तर त्यासी योजावें ॥१॥ तोंवरि मी पुढें कांहीं । आपुलें नाहीं घालीत ॥ध्रु.॥ जाणेनियां अंतर देव । जेव्हां भेव फेडील ॥२॥ तुका म्हणे धरिला हातीं । करील खंतीवेगळें ॥३॥
4563
होइल माझी संतीं भाकिली करुणा । जे त्या नारायणा मनीं बैसे ॥१॥ शृंगारूनि माझीं बोबडीं उत्तरें । होतील विस्तारें सांगितलीं ॥ध्रु.॥ क्षेम आहे ऐसें होइल सांगितलें । पाहिजे धाडिलें शीघ्र मूळ ॥२॥ अवस्था जे माझी ठावी आहे संतां । होइल कृपावंता निरोपिली ॥३॥ तुका म्हणे सवें येईंल मुर्‍हाळी । किंवा कांहीं उरी राखतील ॥४॥
4564
होई आतां माझ्या भोगाचा भोगिता । सकळ अनंता शुभाशुभ ॥१॥ आठवुनी पाय राहिलों हृदयीं । निवारली तई सकळ चिंता ॥ध्रु.॥ अचळ न चळे देहाचें चळण । आहे हें वळण प्रारब्धें चि ॥२॥ तुका म्हणे जालें एक चि वचन । केलिया कीर्तन आराणुक ॥३॥
4565
होईंल जाला अंगें देव जो आपण । तयासी हे जन अवघे देव ॥१॥ येरांनीं सांगावी रेमट काहाणी । चित्ता रंजवणी करावया ॥ध्रु.॥ धाला आणिकांची नेणे तान भूक । सुखें पाहें सुख आपुलिया ॥२॥ तुका म्हणे येथें पाहिजे अनुभव । शब्दाचें गौरव कामा नये ॥३॥
4566
होईंल तो भोग भोगीन आपुला । न घलीं विठ्ठला भार तुज ॥१॥ तुम्हांपासाव हें इच्छीतसें दान । अंतरींचें ध्यान मुखीं नाम ॥ध्रु.॥ नये काकुलती गर्भवासांसाटीं । न धरीं हें पोटीं भय कांहीं ॥२॥ तुका म्हणे मज उदंड एवढें । न वांचावें पुढें मायबापा ॥३॥
4567
होईंल निरोप घेतला यावरी । राउळाभीतरीं जाऊनियां ॥१॥ करूनियां दधिमंगळभोजन । प्रयाण शकुनसुमुहूर्तें ॥ध्रु.॥ होतील दाटले सद्गदित कंठीं । भरतें या पोटीं वियोगाचें ॥२॥ येरयेरां भेटी क्षेम आलिंगनें । केलीं समाधान होतीं संतीं ॥३॥ तुका म्हणे चाली न साहे मनास । पाहाती कळस परपरतों ॥४॥
4568
होईन भिकारी । पंढरीचा वारकरी ॥१॥ हा चि माझा नेम धर्म । अवघें विठोबाचें नाम ॥ध्रु.॥ हे चि माझी उपासना । लागन संतांच्या चरणा ॥२॥ तुका म्हणे देवा । करीन ते भोळी सेवा ॥३॥
4569
होउनि कृपाळ । भार घेतला सकळ ॥१॥ तूं चि चालविसी माझें । भार सकळ ही ओझें ॥ध्रु.॥ देह तुझ्या पायीं । ठेवुनि झालों उतराईं ॥२॥ कायावाचामनें । तुका म्हणे दुजें नेणें ॥३॥
4570
होउनी जंगम विभूती लाविती । शंख वाजविती घरोघरीं ॥१॥ शिवाचें निर्माल्य तीर्था न सेविती । घंटा वाजविती पोटासाठीं ॥२॥ तुका म्हणे त्यासी नाहीं शिवभक्ती । व्यापार करिती संसाराचा ॥३॥
4571
होऊं नको कांहीं या मना आधीन । नाइकें वचन याचें कांहीं ॥१॥ हटियाची गोष्टी मोडून टाकावी । सोईं ही धरावी विठोबाची ॥ध्रु.॥ आपुले आधीन करूनियां ठेवा । नाहीं तरि जीवा घातक हें ॥२॥ तुका म्हणे जाले जे मना आधीन । तयांसी बंधन यम करी ॥३॥
4572
होऊं शब्दस्पर्श नये माझा तुम्हां । विप्रवृंदा तुम्हां ब्राम्हणांसी ॥१॥ म्हणोनियां तुम्हां करितों विनंती । द्यावें शेष हातीं उरलें तें ॥ध्रु.॥ वेदीं कर्म जैसें बोलिलें विहित । करावी ते नीत विचारूनि ॥२॥ तुमचा स्वधर्म माझा अधिकार । भोजन उत्तर तुका म्हणे ॥३॥
4573
होऊनि संन्यासी भगवीं लुगडीं । वासना न सोडी विषयांची ॥१॥ निंदिती कदान्न इच्छिती देवान्न । पाहाताती मान आदराचा ॥२॥ तुका म्हणे ऐसें दांभिक भजन । तया जनार्दन भेटे केवीं ॥३॥
4574
होतीं नेणों जालीं कठिणें कठीण । जवळी च मन मनें ग्वाही ॥१॥ आम्ही होतों सोईं सांडिला मारग । घडिलें तें मग तिकून ही ॥ध्रु.॥ निश्चिंतीनें होते पुढिलांची सांडी । न चाले ते कोंडी मायबापा ॥२॥ आम्हां नाहीं त्यांचा घडिला आठव । त्यांचा बहु जीव विखुरला ॥३॥ तुका म्हणे जालें धर्माचें माहेर । पडिलें अंतर आम्हांकूनि ॥४॥
4575
होतें तैसें पायीं केलें निवेदन । अंतरलों दिन बहुत होतों ॥१॥ संबोखुनी केलें समाधान चित्त । वोगरुणि भात प्रेमरस ॥ध्रु.॥ नामरत्नमणी करूनी भूषण । अळंकारमंडण माळा दिली ॥२॥ तुका म्हणे सुखें जालों निरामय । नामीं नामसोय निमग्नता ॥३॥
4576
होतें बहुत हें दिवस मानसीं । आजि नवस हे फळले नवसीं । व्हावी भेटी ते जाली गोविंदासीं । आतां सेवा करीन निश्चयेसीं वो ॥१॥ स्थिर स्थिर मज चि साहे करा । बहु कष्ट सोसिल्या येरझारा । येथें आड मज न साहावे वारा । देऊनि कपाट आलें तें दुसरें वारा वो ॥ध्रु.॥ मूळ सत्ता हे सायासाची जोडी । नेदी वेगळें होऊं एकी घडी । नाहीं लौकिक स्मरला आवडी । आता येणें काळें या वो लोभें वेडी वो ॥२॥ उदयीं उदय साधिला अवकाश । निश्चिंतीनें निश्चिंती सावकाश । धरिये गोडी बहुत आला रस । तुका म्हणे हा मागुता न ये दिवस वो ॥३॥
4577
होतों तें चिंतीत मानसीं । नवस फळले नवसीं । जोडिते नारायणा ऐसी । अविट ज्यासी नाश नाहीं ॥१॥ धरिले जीवीं न सोडीं पाय । आलें या जीवित्वाचें काय । कैं हे पाविजेती ठाय । लाविली सोय संचितानें ॥ध्रु.॥ मज तों पडियेली होती भुली । चित्तीची अपसव्य चाली । होती मृगजळें गोवी केली । दृष्टी उघडली बरें जालें ॥२॥ आतां हा सिद्धी पावो भाव । मध्यें चांचल्यें न व्हावा जीव । ऐसी तुम्हां भाकीतसें कींव । कृपाळुवा जगदानिया ॥३॥ कळों येतें आपुले बुद्धी । ऐसें तों न घडतें कधीं । केवढे आघात ते मधीं । लज्जा रिद्धी उभी आड ठाके ॥४॥ कृपा या केली संतजनीं । माझी अळंकारिली वाणी । प्रीति हे लाविली कीर्तनीं । तुका चरणीं लोळतसे ॥५॥
4578
होतों सांपडलों वेठी । जातां भेटी संसारा ॥१॥ तों या वाटे कृपा केली । भेटी जाली विठोबासी ॥ध्रु.॥ होता भार माथां माझे । बहु ओझें अमुप ॥२॥ तुका म्हणे केली चिंता । कोण दाता भेटेल ॥३॥
4579
होयें वारकरी । पांहे पांहे रे पंढरी ॥१॥ काय करावीं साधनें । फळ अवघें चि तेणें ॥ध्रु.॥ अभिमान नुरे । कोड अवघें चि पुरे ॥२॥ तुका म्हणे डोळां । विठो बैसला सांवळा ॥३॥

Labels

Followers